सकाळ साप्ताहिक
लेखिका : डॉ. राधिका टिपरे
आतापर्यंत चारपाच वेळा तरी काझीरंगाला जाऊन आले आहे. पण दरवेळेस या जंगलाला भेट देण्यासाठी नव्या उत्साहाने जायला तयार असते मी. ईशान्येची भटकंती मला नेहमीच प्रचंड आनंद देते. कारण, विपुलतेनं भरलेल्या आपल्या देशाच्या या भागात गेल्यानंतर इथला कंच हिरवा निसर्ग आपल्याला अक्षरशः संमोहित करतो. आपण दोन्ही बाहू विस्तारून याच्या भेटीला जावं, तर तो निसर्ग आपल्याला उरापोटी कडकडून भेटतो. मन अगदी संतृप्त होऊन जातं. त्यामुळेच इकडे आल्यावर अगदी एकटीनं भटकायलासुद्धा मी तयारच असते.
ह्यांना काही कामानिमित्त गुवाहाटीला जायचं होतं, मग मीही
त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळच्या गुवाहाटी भेटीत आधी
पोबितारा आणि चांदडुबी या दोन जागा पाहून झाल्यानंतर आम्ही काझीरंगाच्या
दिशेनं निघालो. अर्थात त्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटी शहराची गर्दी
ओलांडूनच पुढं जावं लागलं. कारण ब्रह्मपुत्र नदीच्या दोन्ही काठावर
पसरलेल्या गुवाहाटी शहराच्या एका बाजूला चांदडुबी तलाव आहे, तर दुसऱ्या
बाजूनं काझीरंगाकडे जाणारा प्रशस्त हायवे बाहेर पडतो. त्या दिवशी
संध्याकाळपर्यंत आम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या काठावर असलेल्या
आसाम टुरिझमच्या टुरिस्ट रिसॉर्टवर पोहोचलो. आसाम टुरिझममध्ये मॅनेजर
असलेल्या डॅनीमुळे मोठ्या मुश्किलीनं खोल्यांचं दोन दिवसांचं आरक्षण मिळालं
होतं. तेथून मला पुढे ईगल्स नेस्ट या अभयारण्यात पोहोचायचं होतं, पण
काझीरंगाच्या जंगलातील दोन सफारी केल्यानंतरच…!
या जंगलात आल्यानंतर वाघ पाहण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं, तर पदरात
फारसं काही पडणार नाही. कारण इथं वाघ मुबलक आहेत हे जरी खरं असलं, तरी
घनदाट जंगलामुळे ते दिसतीलच याची मात्र खात्री नसते. या उलट गेंडे,
हत्तींचे कळप, हरणांचे कळप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नशीबवान असलो तर
ग्रेट इंडियन हॉर्नबिल हे सुंदर पक्षी दिसावेत अशी मनोमन आशा ठेवली तर
मात्र झोळी भरभरून समाधान मिळतंच. शिवाय इतरही लहानसहान जीव पाहायला मिळतात
ते वेगळंच. हे जंगल म्हणजे खऱ्या अर्थानं एक परिपूर्ण जंगल आहे. त्यामुळे
गेल्या काही वर्षांत पाच-सहावेळा येऊनही माझ्या मनाचं समाधान मात्र होत
नाही. पुन्हा पुन्हा या जंगलात येण्यासाठी माझं मन नेहमीच आसुसलेलं असतं!
काझीरंगाचं जंगल फार सुरेख आहे. राष्ट्रीय महामार्ग सोडून काझीरंगाच्या
टुरिस्ट रिसॉर्टकडे जाणाऱ्या सुरेख रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहाचे मळे
आहेत. तसंही हा सर्व परिसर फारच निसर्गरम्य आहे. खोली नेहमीप्रमााणे चांगली
आणि स्वच्छ होती. जेवून लवकर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच
आम्ही जीप बुकिंगसाठी ऑफिसजवळ पोहोचलो. मात्र खिडकी सातला उघडली. कारण
यावेळी जंगलात जाण्याची वेळ साडेसात ठेवली होती. सकाळी साधारण साडेसात
वाजता आम्ही काझीरंगाच्या ‘कोहरा’ या जंगलामध्ये प्रवेश केला. कोहराच्या
घनदाट जंगलात प्रवेश करताना आपसूकच मनात विचार आले… अहाहा…! खरंच किती
घनगर्द जंगल आहे हे! हिरवं कंच…! हिरव्या रंगाच्या विविध छटांमुळे आपण
काझीरंगाच्या प्रेमातच पडतो. जंगलात शिरल्या शिरल्याच एका मोठ्या गेंड्याचं
दर्शन झालं. काही वेळानंतर दुसरा गेंडाही पाहता आला. हिरव्यागार हत्ती
गवतामध्ये राखाडी रंगाच्या गेंड्याचं भलंमोठं धूड अगदी दुरूनही चटकन नजरेला
पडतं. काझीरंगामध्ये गेंड्यांची संख्या भरपूर असल्यामुळं गेंड्यांचं हमखास
दर्शन होतंच.
काझीरंगा अभयारण्याच्या उत्तर बाजूनं ब्रह्मपुत्र नदी वाहते. पण खुद्द
काझीरंगाच्या जंगलातूनही ब्रह्मपुत्र नदीचाच एक प्रवाह वाहताना दिसतो. या
जंगलात इतरही खूप लहान मोठे जलाशय आहेत. त्यामुळे काझीरंगामध्ये सगळीकडे
पाणी, दलदल, घनदाट वाढणारं हत्ती गवत आणि त्याच्या जोडीला उंच, महाकाय आणि
आकारानं प्रचंड असणारे सदाहरित वृक्ष, शिवाय बांबूची बेटं असं सर्व
प्रकारचं वनवैभव पाहायला मिळतं… त्यामुळेच निसर्गप्रेमींना प्रेमात पडायला
लावणारं हे जंगल मलाही मनापासून आवडतं.
थोडं पुढे गेल्यावर नदीच्या पलीकडील तीरावर खूप मोठा जंगली टस्कर
पाहायला मिळाला. एक मोठा वृक्ष मुळापासून हलवून उपटण्याचे त्याचे प्रयत्न
आम्ही जीपमध्ये बसून बराचवेळ पाहत राहिलो. त्याच्याबरोबर दोन हत्तिणीही
होत्या. थोडं पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूच्या गवताळ मैदानात खूप मोठा
हत्तींचा कळप पाहायला मिळाला. त्यामध्ये एक गाभण हत्तीण होती; बापरे… तिचा
तो गोल गरगरीत प्रचंड देह पाहून मनात आलं, ‘कसं झेलत असतील हत्तिणी त्यांचं
गरोदरपण?’ गर्भारपण ही निसर्गातील एक अत्यंत अवघड गोष्ट… मग ती स्त्रीसाठी
असो किंवा हत्तिणीसाठी! पण निसर्गाची लीला अगाध असते म्हणतात, ते काही
खोटं नाही. त्या तशा अवघडलेल्या अवस्थेतही ती हत्तीण ज्या चपळतेनं गवतातून
एकटीच पुढं जात होती ते पाहून मन थक्क झालं. कोहराच्या जंगलातील तो दिवस
केवळ आणि केवळ हत्ती आणि गेंडे यांच्यासाठीच राखून ठेवलेला होता बहुधा…
कारण त्यानंतर आम्हाला नदीच्या पाण्यात मजेत जलक्रीडा करणाऱ्या हत्तींचा
आणखी एक कळप पाहायला मिळाला. त्यात लहान पिल्लं होती. सोंडेनं पाणी उडवत
खेळणारी चार-पाच पिल्लं आणि त्यांच्या आया एकत्र पाहून खूप गंमत वाटली.
त्यानंतर एका ठिकाणी एक हत्तीण तिच्या पिल्लाबरोबर पाहायला मिळाली. एकूण
काय तर सकाळच्या कोहरा सफारीत आम्हाला ‘छप्पर फाडके’ हत्ती दर्शन झालं.
गेंड्यांचेही मनसोक्त फोटो काढता आले.
काझीरंगामध्ये हत्ती सफारीसुद्धा करता येते. जीप सफारीपेक्षा हत्ती
सफारीमध्ये अधिक मजा येते. कारण हत्ती रस्ता सोडून गवतात जातो. त्यामुळे
आपण गेंड्याला अगदी जवळून पाहू शकतो. माझ्या पहिल्या भेटीत मी हत्ती सफारी
केली होती. हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी आपल्याला कोहराच्या जंगलातील
विवक्षित ठिकाणी वेळेत पोहोचावं लागतं. त्यासाठी स्वतःचं वाहन असेल तर ठीक
नाहीतर पंचाईत होते. पण एक मात्र खरं, हत्तीवरून गेंडा पाहायला खूप मज्जा
येते. कारण हत्तीवर असताना आपण जवळ गेलो तरी गेंडा बिचकून दूर जात नाही.
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही आगरतुलीच्या जंगलात गेलो. ही रेंज खूप
लांब आहे. त्यासाठी जवळपास वीस किमी अंतर हायवेवरून गुवाहाटीच्या दिशेनं
मागं जावं लागतं. जीपमध्ये बसून अंगावर वारं घेत भरधाव वेगानं आगरतुली
रेंजच्या दिशेनं निघालो. जीपच्या वेगामुळे कॅमेरा सांभाळणं माझ्यासाठी अवघड
होऊन गेलं. वाटेत लहान लहान खेड्यांना ओलांडून एकदाचं गेटजवळ पोहोचलो.
जंगलाच्या आत प्रवेश करण्यासाठी मन अधीर झालं होतं. आगरतुलीच्या जंगलात
पक्ष्यांचं वैभव मुबलक प्रमाणात पाहायला मिळतं. या भागात एका जागी आपल्याला
जीपमधून खाली उतरता येतं. समोर खूप मोठं मैदान आहे आणि त्या पलीकडे नदीचा
प्रवाह आहे. या मोकळ्या मैदानात खूप जनावरं पाहायला मिळतात. आम्ही तिथं
असताना आम्हाला हत्ती, गेंडे, हॉग हरणांचे कळप, बार हेडेड गूज पक्ष्यांचे
थवे, बाराशिंगा म्हणजेच स्वॉम्प डिअर असं बरंच काही पाहायला मिळालं… खरंच
नंदनवन आहे काझीरंगा!
आम्हाला वाघ बघण्याची आस नव्हती, पण एका ठिकाणी बऱ्याच जीप लावलेल्या
होत्या. उजव्या हाताला असणाऱ्या नदीच्या पलीकडे असणाऱ्या वाळूच्या
पट्ट्यावर वाघ आल्याचं कुणीतरी पाहिलं होतं. तो परत येईल या आशेनं जीपमधील
लोक वाट पाहत होते. आम्हीसुद्धा जीप रस्त्याच्या बाजूला लावून काही वेळ वाट
पाहायचं ठरवलं. पण वाघोबा काही आले नाहीत, त्यामुळे आम्ही थोडावेळ वाट
पाहून पुढं निघालो. काही वेळातच मला हवं होतं ते पाहायला मिळालं. अचानक
विमानाची घरघर ऐकू यावी असा आवाज ऐकू आला आणि दोन मोठे पक्षी उंच
वृक्षाच्या फांदीवर येऊन विसावले आणि माझं मन हरखून गेलं. अगदी माझ्या
नजरेसमोर ग्रेट इंडियन हॉर्नबिलची जोडी समोरच्या फांदीवर येऊन बसली. त्याच
वेळी मी एका गरुड पक्ष्याचा फोटो घेण्यासाठी मान वाकडी करून आभाळाकडे पाहत
होते… एकाच क्षणी नर आणि मादी हॉर्नबिलची जोडी समोर होती… फोटो घेण्यासाठी
मी क्षणार्धात लेन्स तिकडं फोकस केली हे सांगणे न लगे…! खूप सुंदर फोटो
मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी जोडी अशीच फांदीवर फुदकताना दिसली.
त्यांचा प्रेमालाप चालू होता. हॉर्नबिल पक्ष्यांची जोडी मरेपर्यंत
एकमेकांशी एकनिष्ठ राहते. या जोडीतील मादी बहुधा रुसली होती… आणि नर
हॉर्नबिल तिला मनवण्याचे अखंड प्रयत्न करत होता. पण या बाईसाहेब तोंड वळवून
दुसऱ्याच दिशेनं पाहत होत्या. भल्यामोठ्या चोचीत धरलेलं फळ तिला
देण्यासाठी केवढी मिनतवारी चालू होती त्या बिचाऱ्याची…! खरंतर हे सगळं
पाहताना मन इतकं प्रसन्न होऊन गेलं होतं, की शब्दात सांगणं कठीणच आहे. पण
निसर्गाचं लेणं, तिथं काय उणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कॉमन किंगफिशर नावाचा चिमुकला खंड्या नदीच्या काठी बसलेला दिसला. स्नेक
बर्ड अर्थात डार्टर पक्ष्याचाही एक सुरेख फोटो मिळाला. पुन्हा एकदा गेंडा…
एक एकांडा, देखणा आणि आकाराने मोठा टस्कर असं बरंच काही कॅमेऱ्यात टिपता
आलं. नदीच्या वाहत्या पाण्यात असणाऱ्या लाकडी ओंडक्यावर नेहमी लहान
कासवांची रांग उन्हं खायला बसलेली पाहायला मिळते… मस्त दृश्य असतं ते!
निसर्गातील अलवारपण टिपण्यासाठी आपल्याकडे मन आणि वेळ हवा, हे मात्र खरं.
ते तुमच्याठायी असेल तर तुम्ही जंगल वाचायला तयार आहात हे नक्की.
या भेटीत आम्हाला वाघ दिसला नाही. पण काझीरंगाच्या माझ्या पहिल्या भेटीत
पहिल्या पंधरा मिनिटांतच अगदी सहजगत्या वाघाचं दर्शन झालं होतं आणि
आश्चर्याचा धक्काच बसला होता. कोहराच्या जंगलात आमच्या जीपनं नुकताच प्रवेश
केला होता… समोर हिरव्या गवतात तर दहा-बारा हॉग डिअरचा कळप शांतपणे चरत
होता. सांबर हरणासारखीच दिसणारी पण रंगानं थोडी वेगळी असणारी ही हॉग डिअर
जातीची हरणं, काझीरंगाच्या गवताळ प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
गाईडनं ड्रायव्हरला सांगून चटकन जीप थांबवली आणि तो हळू आवाजात म्हणाला,
‘मॅडम, उधर शेर हैं…!’ मला आश्चर्य वाटलं. कारण वाघ जवळ असताना हरणं इतकी
शांतपणे कशी काय चरत राहिली असती? पण तेवढ्यात त्यांचे कान टवकारले गेले.
सर्वजण अलर्ट होऊन, शेपूट वर करून ‘अटेंशन’च्या तयारीत उभी राहिल्याचं
माझ्या लक्षात आलं. नेमकं त्याक्षणी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघानं
थोडीशी हालचाल केली. पुढच्या क्षणार्धात, डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच
गवतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघानं कळपातील सर्वात छोट्या हरणावर झेप
घेतली. मात्र सर्व हरणं विद्युल्लतेच्या वेगानं चारी दिशांना विखुरली.
वाघोबांची झेप फुकट गेली. मात्र अडीच-तीन वर्षांच्या त्या सुरेख,
तरण्याबांड वाघाचं अकल्पितपणे घडलेलं दर्शन मला मात्र एका ट्रान्समध्ये
घेऊन गेलं… ‘आपण काही क्षणांपूर्वी खरोखरच वाघ बघितला ना?’ असा प्रश्न मी
स्वतःलाच विचारत राहिले. पण कधी कधी अकल्पितपणे घटना घडून जातात आणि आपण
आश्चर्य करीत राहतो…
काझीरंगा म्हणजे निसर्गावर प्रेम करणाऱ्यांच्या दृष्टीनं स्वप्नवत
वाटणारं जंगल! पावसाळ्यात ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे दरवर्षी काझीरंगा
जंगलामध्ये पाण्याची पातळी वाढते. या काळात जंगलात सर्वत्र पुराचं पाणी
असतं. या पुरामुळे येणारी गाळाची माती या जंगलाचं उत्तमरित्या पोषण करतेच,
पण यामुळेच जंगलामध्ये अनेक लहानमोठे जलाशय, दलदलीनं व्याप्त भूभाग तयार
होतात. या जंगलातील गवताळ प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचं हत्ती गवत अक्षरशः
दामदुपटीनं वाढत राहतं. घनदाट वृक्षांनी व्यापलेल्या जंगलाचा पसाराही
जोडीला असतोच… केवळ एकशिंगी गेंडाच नव्हे, तर जंगली हत्तींचे कळपच्या कळप
काझीरंगाच्या जंगलात सुखेनैव राहतात. जंगली म्हैस, स्वॉम्प डिअर, सांबर,
हॉग डिअर या प्रकारची हरणं हे काझीरंगाचं खास वैशिष्ट्यच! हॉग जातीचं हरणं
आपल्याकडे आसामच्या जंगलातच पाहायला मिळतात. त्याशिवाय स्वॉम्प डिअर
म्हणजेच बाराशिंगा हेसुद्धा काझीरंगाचं आणखी एक वैशिष्ट्य. जोडीला आपले
नेहमीचे वाघ आणि बिबट, रानमांजर हे व असे अनेक प्राणी या जंगलात आहेतच.
काझीरंगामध्ये आपल्याला किंगकोब्राही पाहायला मिळतो. अनेकविध जातीचे सुंदर
पक्षी, कॅप्ड लंगुर, मगर, विविध प्रकारचे सर्प, नाग याचबरोबर असंख्य
प्रकारचे वृक्ष, लतावेली, वनस्पती, पाणथळीमुळे येणारे असंख्य पाणपक्षी या
सगळ्यांचं आश्रयस्थान असणारं काझीरंगा मनाला मोहवणारं जंगल आहे यात वादच
नाही.
काझीरंगामध्ये जंगलाचे तीन मुख्य विभाग आहेत. यामध्ये कोहरा, बाघोरा आणि
पूर्व काझीरंगा म्हणजेच आगरतुली अशा तीन विभागात आपल्याला जीप सफारी करता
येतात. सफारीच्या शेवटी खोल जंगलाच्या अंतर्भागामध्ये असणाऱ्या उंचशा
टॉवरवर चढून आपल्याला जंगलाचा सुंदर नजारा न्याहाळता येतो. हे मनोरे
जंगलातील मोठ्या जलाशयाच्या काठावर असल्यामुळं पाण्यावर आलेली हरणं, गवे,
म्हशी आणि गेंडे आपल्याला सहज दिसू शकतात.
काझीरंगाला भेट देणं फारसं अवघड नाही. गुवाहाटीहून जोरहाटकडे जाणाऱ्या
सर्व बस काझीरंगाला थांबतात. आसाम टूरिझमचं बुकिंग फोनवरूनही सहजपणे करता
येतं. गुवाहाटी-काझीरंगा हा पाच-सहा तासांचा प्रवास हायवेवरून असल्यामुळे
प्रवासाचा त्रास होत नाही. राहण्याची उत्तम व्यवस्था होते. निसर्गाने
उदंडहस्ते उधळण केलेल्या आसामच्या हिरव्याकंच हिरवाईचा आनंद आणि जंगलातील
प्राण्यांची भेट यासाठी काझीरंगाला जाणं अपरिहार्यच आहे असं वाटतं.
फेब्रुवारी-मार्च दरम्यान इकडे जाण्याचा कार्यक्रम आखला तर अधिक सुखाचं होतं. थोडा उकाडा असतो, पण उंच वाढलेलं गवत जाळल्यामुळे गेंड्यांचे कळप बघायला मिळतात. माद्या आणि लहान पिल्लंही यावेळी असतात. वाघ दिसला तर तो ‘बोनस’ असं समजायचं. ‘काझीरंगा राष्ट्रीय उद्यान’ हे पूर्वांचलाच्या भटकंतीमध्ये ‘अ मस्ट’ असंच ठिकाण आहे. काही झालं तरी चुकवू नये असं…! चार दिवस निवांत राहाण्यासाठी सवड असेल तर त्याच्या इतकं सुरेख ठिकाण नाहीच!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.