https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2023/07/blog-post_31.html
कपिलेश्वर मंदिर निंब मुडावद
जळगाव व धुळे जिल्ह्याच्या, तसेच अमळनेर, शिंदखेडा व शिरपूर या तीन
तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे कपिलेश्वर
महादेव मंदिर ! तापी पांझरा व गुप्त कपिलगंगा यांच्या त्रिवेणी संगमावर
असल्याने येथील स्थानमहात्म्यास अनन्यसाधारण महत्व आहे. स्कंध पुराणात
उल्लेख असलेल्या भारतातील प्रमुख १०८ शिवमंदिरामध्ये श्री क्षेत्र
कपिलेश्वर महादेव मंदिराचा समावेश होतो. स्कंदपुराण व तापी महात्म्य या ग्रंथांमध्ये श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराची महती गायली आहे.
प्राचीन ग्रंथात कपिल मुनी यांचा उल्लेख आढळतो. कर्दम ऋषींचे
पुत्र कपिल मुनी हे सांख्यशास्त्राचे जनक मानले जातात. उपनिषद ग्रंथात
वर्णन केलेल्या सिद्धांताचे यांनीच प्रथम विवेचन केले व सांख्यशास्त्राला
प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा महाविद्वान ऋषींचे वास्तव्य काही काळ या
ठिकाणी होते. त्यांच्या वास्तव्याच्या कालखंडात त्यांनी शंकराची उपासना
केली. शिवाने अंशरुपाने येथे स्थानापन्न व्हावे म्हणून त्यांनी शंकराला गळ
घातली. कपिल ऋषींनी याच जागेवर त्रिपिंडी महादेवाची प्रतिष्ठापना केली.
कपिल मुनींच्या विनंतीला मान देऊन शिवशंकर या ठिकाणी अंशरूपाने विराजमान
झाले.
स्कंधपुराणात कपिलेश्वर महात्म्य यात वर्णन केले आहे की सूर्यजा (तापी)
पांझरा संगमी पाताळबिळात कपिल मुनींच्या भक्तीने शिवप्रकट झाले व
गुप्तगंगेचा प्रवाह पाताळबिळातून निर्माण झाला. येथील लिंग स्वयमेव असून
केवळ दर्शन व स्पर्शाने स्वर्गगमनाचे द्वार खुले होते. येथील संगम स्नानास
अलौकिक महत्त्व असून कपिल मुनींसमवेत कित्येक तपस्वी, संत, महंतांनी येथे
तपसाधना केल्याने परिसराचे पावित्र्य कित्येक पटींनी वाढले आहे.
कपिलमुनींच्या समवेत असलेल्या असंख्य मुनींनी, विद्वानांनी या
जागेवर तप, यज्ञकर्म, आराधना करून शिवस्तुती गायली. नामसाधना करीत असता या
क्षेत्री कपिला गाय देखील अवतरत असे. कपिल मुनींच्या हस्ते स्थापन
झालेल्या या त्रिपिंडी महादेव मंदिरास कालांतराने श्री क्षेत्र कपिलेश्वर
महादेव म्हणून प्रसिद्धी मिळाली. तापी व पांजरा तसेच गुप्त कपिलगंगा
यांच्या त्रिवेणी संगमावर असल्याकारणाने येथील स्थान महात्म्यास विशेष
महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रावर मनोभावे शिवाची आराधना केल्यास
मनोवांच्छित फळप्राप्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे.
अकराव्या शतकात येथे भव्य मंदिर उभारण्यात आले होते.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालखंडापासून मराठ्यांच्या उत्तरेत मोहिमा
सुरू झाल्या. माळव्यात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेतून जे अनेक मार्ग होते
त्यापैकी एक मार्ग येथूनच थाळनेरकडे जात होता. तापीला या ठिकाणी योग्य उतार
असल्याने हा मार्ग सोयीस्कर होता. सन १६९७ मध्ये सरदार नेमाजी शिंदे यांनी
सुरत - बुरहानपुर या मार्गावर असलेला थाळनेर किल्ला ८००० घोडेस्वारांशी
लुटला. त्यांनी मोगल सरदार हुसेन अली खान याचा पराभव करून सुमारे एक लाख ८०
हजार रुपयांची लूट मिळवली. यावरून थाळनेर किल्ला किती वैभव संपन्न होत आहे
लक्षात येते.
उत्तर मराठे शाहीच्या कालखंडात थाळनेर हा सरंजाम सन १७५० मध्ये होळकरांना
मिळाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सन१७८३ मध्ये कपिलेश्वर मंदिराचा
जिर्णोद्धार केला. त्यासाठी वापरण्यात आलेला लालबकाम हा पाषाण या परिसरात
आढळत नाही. तो नर्मदा तीरावरून आणला असावा.
सरदार नारो दादाजी नेवाळकर यांनी सन १७६६ मध्ये या ठिकाणी तापी
नदीला घाट बांधला व दीपमाळ उभारली. या आशयाचा एक शिलालेख घाट उतरताना
दीपमाळेच्या पायथ्याशी आढळतो. या दीपमाळेची रचना टेहळणी बुरूजासारखी केलेली
आहे. वर चढण्यासाठी आतून गोलाकार दगडी पायऱ्या आहेत. दीपमाळेची उंची ८०
फुटांच्या आसपास असावी. वरच्या टोकावर दोन माणसे आरामशीर बसू शकतील एवढी
जागा आहे. येथून तापीचे विस्तृत पात्र, तर पलीकडे असलेला थाळनेर परगण्याचा
मुलुख दिसू शकतो. शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत
असावा. हे निश्चित ! तसेच तापी पार करताना योग्य दिशानिर्देश देण्यासाठी
देखील या दीपमाळेचा उपयोग होत असावा.
या दीपमाळेचे बांधकाम संपूर्ण दगडात केलेले आहे. दीपमाळेची
उभारणी दगडी चौथ्यावर केलेली आहे. दीपमाळेच्या पाठीमागे पाच दगडी चौरंग
उभारण्यात आलेले आहे. पूर्वेकडून येणाऱ्या तापीमातेचे विलोभनीय दर्शन येथून
होते. या दगडी चौरंगांवरून विशेष प्रसंगी तापीमातेची आरती केली जात असावी.
पश्चिमवाहिनी तापीच्या तीव्र प्रवाहापासून मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून
सरदार नेवाळकरांनी मजबूत घाटाचे बांधकाम केले आहे. मंदिरापासून
नदीपात्रापर्यंत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. सन २०१६/१७
मध्ये या घाटाचा जिर्णोद्धार महामंडलेश्वर हंसानंदतीर्थ महाराज यांनी
पंचक्रोशीत झोळी फिरवून केला.
कपिलेश्वर मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाहता क्षणीच
प्रेमात पडावे असे विलोभनीय नक्षीकाम केलेले आहे.आपण वाचत आहात संजीव
बावसकर लिखित पोस्ट. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी
तीन बाजूने प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी विराजमान आहे.
तिन्ही प्रवेशद्वारांचे कळस वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पूर्वद्वारावरील आमलक
पिळदार रेषायुक्त असून मोदकाच्या आकाराचा आहे, तर दक्षिणेकडील आमलक उमलत्या
कमळपुष्पासारखा आहे. आमलकाच्या पायथ्याशी असलेली सज्जातटबंदी संपूर्णपणे
राजस्थानी शैलीतील आहे.
मुख्य सभागृहावरील असलेले शिखर पसरट गोलाकार असून त्याची
गोलाई नजरेत भरण्यासारखी आहे. त्यात कमालीची प्रमाणबद्धता आहे. सभामंडप १८
दगडी खांबांवर भक्कमपणे तोलून धरला आहे. सकाळी सूर्यकिरणांचा पहिला अभिषेक
गर्भगृहातील त्रिपिंडी महादेवाला होतो. हा विलक्षण अनुभव काही काळ
भक्तांना अनुभवता येतो.
मंदिराच्या पूर्वेकडील गणेशपट्टीवर एक शिलालेख कोरलेला आहे.
तो शुद्ध मराठी भाषेत आहे. या शिलालेखात मंदिर जीर्णोद्धार प्रारंभ व
समाप्तीचे दिनांक दिलेले आहे.
गर्भगृहाचे शिखर नागरशैलीतील आहे. चौकोनी आकारातील शिखर वरच्या
दिशेने निमुळते होत गेले आहे. मुख्य शिखराला संलग्न असलेली चार मोठी व चार
लहान अशी आठ उपशिखरे जोडलेली आहेत. त्यामुळे शिखराचा भारदस्तपणा डोळ्यात
भरतो. शिखराच्या चारही बाजूंनी ध्यानस्थ भावमुद्रेतील यतीमूर्ती साधनेत
मग्न आहेत. शिखरावरील गवाक्ष, त्यावरील अप्सरा, त्यांचा वरच्या बाजूला
डरकाळी फोडणाऱ्या सिंहाकृती, अभयमुद्रा दर्शवतात. शिखरावर चढत जाणारी
कलशांची उतरंड, त्यातील आम्रपल्लव, आम्रपल्लवातून आरपार केलेले नाजुक कोरीव
काम, अद्भुत आहे. शिखरावरील आमलक व कलश चार ललनांनी लीलया तोलून धरला आहे.
आमलक पाहताना ओरिसातील मंदिरांची आठवण येते.
कपिलेश्वर मंदिराचे गर्भगृह काळ्या तुकतुकीत पाषाणातून घडवले
आहे. तर सभागृहासाठी लालबकाम वापरला आहे. त्यात असलेले पांढरे पाषाण ठिपके
सर्वत्र गोपीचंद विखुरल्यासारखे वाटतात.
अंतराळ बरेच प्रशस्त असून दोन्ही बाजूंना दोन देवकोष्टके आहेत.
त्यात एकही मूर्ती नसली तरी डाव्या बाजूच्या देवकोष्टकावर सोंडेत कलशधारी
हत्तीचे शिल्प आहे. त्याखाली अर्धपद्मासनात बसलेली लक्ष्मी की पार्वती....?
कळण्यास मार्ग नाही. तर उजवीकडच्या देवकोष्टकावर दोन गज शिल्पांच्या मध्ये
पूर्ण पद्मासनात ध्यानस्थ बसलेली शिवमूर्ती असावी. या मूर्तीला फक्त दोन
हात दाखवलेले आहेत. मंदिराचे अंतराळ प्रशस्त असून गर्भगृहाच्या चौकटीवर
लाकडी शिल्पासारखी कलाकुसर केलेली आहे. पाने, फुले, वेलबुट्टी सुंदर आहे.
पायथ्याशी दोन्ही बाजूंना किर्तीमुख व अर्धस्तंभ आहेत.
गर्भगृह प्रशस्त असून तीन शिवपिंडी स्थापित आहेत. या पिंडींची
स्थापना कपील मुनींनी केली आहे. त्यामुळे कपिलेश्वर महादेव म्हणून या
मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते,
तर श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी अलोट गर्दी असते. परमपूज्य
वेदांताचार्य स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांच्या अथक प्रयत्नातून
दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर २००१ या कालावधीत अखिल भारतीय संत समितीचे
राष्ट्रीय अधिवेशन महाराष्ट्रात प्रथमच श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे संपन्न
झाले. मंदिर ट्रस्ट व परिसरातील भाविकांच्या अनमोल सहकार्यामुळे मंदिराला
प्रथमच हा मान मिळाला आहे. यावेळी भारतातील सर्वच संत व महंत यांचे आगमन
येथे झाले होते. महामंडलेश्वर पूज्य हंसानंद तीर्थ महाराज यांच्या
परिश्रमातून येथे वेदशाळेची स्थापना करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी येथे
वेदाध्ययन करीत असतात. वेदांच्या पवित्र उच्चाराने वातावरणात कमालीचे
पावित्र निर्माण होते. परिसरात पाय ठेवताच आपणास भारावल्यासारखे होते.
मनाला कमालीचे समाधान लाभते. नदीपात्रात बोटिंगची व्यवस्था असल्याने
बाळगोपाळांनाही नौकाविहाराच्या आनंद लुटता येतो.
एकंदरीत एक दिवसाच्या सहलीसाठी मंगळग्रह मंदिर, श्री क्षेत्र
सखाराम महाराज वाडी संस्थान व कपीलेश्वर मंदिर असे आयोजन करता येईल.
(प्रसिद्ध शिलालेख वाचक व वीरगळ अभ्यासक श्री.अनिल किसन दुधाने पुणे, यांच्याकडून मिळालेली दोन्ही शिलालेखांची माहिती.)
कपिलेश्वर महादेव मंदिर शिलालेख –मुडावद -अमळनेर
हा
शिलालेख जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे निम मुडावद गावी
येथील तापी व पांझराआणि कपिल गंगा या तीन नदीच्या संगमावर मध्ययुगीन
कपिलेश्वर महादेव मंदिराच्या मुख मंडपावर दर्शनी भागावर आडव्या तुळईवर गणेश
पट्टीच्या वर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून २ ओळीचा शुद्ध
देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून दोन्ही बाजूला
उभे दंड चरणरेघा कोरलेल्या असून अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात.
.गावाचे नाव : निम मुडावद ,ता. अमळनेर, जि. जळगाव
शिलालेखाचे वाचन :
१.॥ श्री गणेशायनम: प्रा.शके १७०५ सा .शके १७०६ क्रोधि(क्रोधिनं) सत ॥
२.॥ पौप वद्य २ तेदिनि सपूर्ण ॥ मास १६ ॥
जी.पी.एस. :-२१.२२ ”३३ ’६१ ,७४ .९४ ’’५२.’ ४७
शिलालेखाचे स्थान :- मंदिराच्या मुख मंडपावर आडव्या तूळईवर कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - प्रा.अश्विन शके १७०५शोभन संवत्सर सा.पौष वद्य२शके१७०६क्रोधन संवत्सर,
काळ वर्ष : अठरावे शतक = (२७जानेवारी १७८३ शनिवार - २५ऑक्टोंबर शनिवार ). ते २८ डिसेंबर १७८४ मंगळवार
कारकीर्द :-सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:-
शिलालेखाचे संशोधन /वाचक : ,श्री अनिल किसन दुधाने, श्री. संजीव बावस्कर
प्रकाशक :
संक्षेप :- प्रा- प्रारंभ, सा-समाप्त , क्रोधि-क्रोधन , सत-संवत्सर. पौप -पौष ,
संदर्भ:- IE VI- ३६८-३७०
अर्थ
:- श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम शालिवाहन शकाच्या १७०५ व्या
वर्षी सुभानु नाम संवत्सरातील पौष २ म्हणजेच सोमवार २०जानेवारी १७८३ च्या
दिवशी चालू होवून शके १७०६ क्रोधि(क्रोधन ) संवत्सर पौष २ म्हणजेच ९.
जानेवारी १७८४ शुक्रवार
रोजी मंदिर संपूर्ण बांधून पूर्ण झाले .सदरील मंदिराचे बांधकाम करण्यासाठी एकूण कालावधी १६ महिने लागला ,
शिलालेखाचे
महत्व :- उत्तर मराठेशाहीच्या कारकिर्दीत येथे एक मंदिर स्थापन केले
.मंदिरावर असलेला शिलालेख हा मंदिराचे बांधकाम सन १७८३ चालू आणि १७८४ साली
पूर्ण केल्याच्या संबधित आहे शिवाय सर्व कालावधी १६ महिने लागला हे ही
महत्वपूर्ण नोंद आहे .कोरक्याने शिलालेखातील अक्षरांना लघु रूप दिलेलं आहे
.तर शिलालेख सुरुवात व शेवटी चरण रेघा आहेत हेच या शिलालेखाचे महत्व आहे.
.
कपिलेश्वर महादेव मंदिर नदी घाट शिलालेख –मुडावद अमळनेर
हा
शिलालेख जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे निम मुडावद गावी
येथील तापी व पांझराआणि कपिल गंगा या तीन नदीच्या संगमावर मध्ययुगीन
कपिलेश्वर महादेव मंदिराच्या समोरील तापी नदीच्या घाटावर दीपमाळेच्या खालील
चौथरा बांधकामावर नदी घाटाकडे जाणाऱ्या पायऱ्या मार्गावरउजव्या बाजूला
भिंतीवर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून २ ओळीचा शुद्ध
देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून दोन्ही बाजूला
उभे दंड चरणरेघा कोरलेल्या असून अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात.
.गावाचे नाव : निम मुडावद ,ता. अमळनेर, जि. जळगाव
शिलालेखाचे वाचन :
१. श्री कपिलेस्वर च्यरणि
२. निरंतर नारो दादा
३. जि नेवाळकर सके
४. १६८८ व्यय नाम सवछरे
जी.पी.एस. :-२१.२२ ”३३ ’६१ ,७४ .९४ ’’५२.’ ४७
शिलालेखाचे स्थान :- नदीघाटाकडे जाताना दीपमाळेच्या चौथऱ्या खालील भिंतीवर आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : नदीवर घाट बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १६८८ व्यय नाम संवत्सर ,
काळ वर्ष : अठरावे शतक = सन १७६६
कारकीर्द :- माधवराव पेशवे ,
व्यक्तीनाम:- नारोदादाजी नेवाळकर
शिलालेखाचे वाचक : ,श्री अनिल किसन दुधाने
संक्षेप :- कपिलेस्वर-कपिलेश्वर , च्यरणि-चरणी ,सके-शके ,सवछरे-संवत्सरे
संदर्भ:- IE VI- ३३४
अर्थ
:- श्री कपिलेश्वर महादेवाच्या चरणी तत्पर असलेले श्री नारोदादाजी
नेवाळकर यांनी शालिवाहन शकाच्या १६८८ व्या वर्षी व्ययनाम संवत्सरात
म्हणजेच सन १७६६व्या वर्षी तापी नदीवरील घाटाचे काम पूर्ण केले .किवा
त्याचा जिर्णोधार केला.
शिलालेखाचे
महत्व :- नदी काठी नेहमी संस्कृती नांदत असते सन १७६६ साली तापी नदीवरील
घाटाचे काम नारोदादाजी नेवाळकर यांनी पूर्ण केल्याच्या शिलालेख घाटावर
लावलेला आहे . नदीवर घाट किवा मंदिर बांधणे हे एक समाजाचे लोकोपयोगी कार्य
आहे .यावरून ते सामाजिक ,धार्मिक वृत्तीचे होते हे सिद्ध होते मराठा
स्थापत्याच्या दृष्टीने या घाटाचे बांधकाम फार महत्व पूर्ण आहे याच बरोबर
मराठेशाहीचा उत्तरे कडील धार्मिक विस्तार याची माहिती मिळते हेच या
शिलालेखाचे महत्व आहे.
नगरदेवळे
जळगाव
(आपणास हे सदर कसे वाटले, लाईक करा,आपले मत मांडा,दुरुस्ती करता येईल.छेडछाड करू नका.)










No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.