Sunday, December 3, 2023

वारसावैभव – जतन हेच मुख्य संवर्धन

 

सामना ऑनलाईन

>> डॉ. योगेश प्रभुदेसाई

वारसा हा परंपरेनं चालत आलेला ठेवा असतो. जो संस्कृतीचं, सांस्कृतिक बदलांचं आणि देवाणघेवाणीचं द्योतक असतो. संस्कृती जशी अनेकांगी तसाच वारसाही अनेकांगी असणं ओघानेच आलं. गेल्या दशकांमध्ये वारसा संवर्धनाविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागरण आणि प्रशिक्षणदेखील होताना दिसत आहे. तरीही वारशाचे महत्त्व म्हणावे तितके जनमानसांत पोहोचलेले दिसत नाही. याला कारणं अनेक आहेत आणि त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. सहसा वारसा संवर्धन म्हटले की, मंदिरं, मूर्ती, इतर वास्तू डोळय़ांसमोर येतातच. आपण त्याअनुषंगानेच इथं चर्चा करू या.

मंदिरं आणि इतर वास्तू वगळता मूर्तींच्या बाबतीत संवर्धनाच्या नावाखाली अत्याचारच जास्त वाटेला आलेला दिसतो. इपॉक्सीचे थर देऊन केलेला वज्रलेप हा त्यातलाच प्रकार. यातून मूर्तीची शाश्वत हानी तर होतेच. शिवाय कालांतराने इपॉक्सीचे थर निघू लागले की, मूर्ती भलतीच बीभत्स दिसू लागते. मग पुन्हा संवर्धनाचे अनेक मार्ग चोखाळले जातात. हे पा सुरू झाले की, संपत नाही. सध्या आधुनिक काळात वैज्ञानिक प्रगती झाली असल्याने रासायनिक संवर्धनासारखे मार्ग आहेत मूर्तींचे संवर्धन करायला, पण प्राचीन काळी काय सोय होती, जेव्हा ही मंदिरं आणि मूर्ती घडवल्या गेल्या? जतन करणे हेच संवर्धनाचे मुख्य साधन होते असं दिसतंय आणि जिथं शक्य आहे, तिथं दुरुस्ती करणे/नवीन भाग घडवून बसवणे हे प्रकारदेखील केले जात असत. याअनुषंगाने आपल्याला काही पूर्वमध्ययुगीन अभिलेखांमध्ये मंदिरांच्या बाबतीत ’खंडस्फुटितजीर्णोद्धाराय’ असा शब्द सहसा आढळतो.

राजे किंवा सामंत लोक जेव्हा मंदिरं बांधून काढत असत, तेव्हा त्याच वेळी मंदिरांच्या डागडुजीसाठी आर्थिक सोय करून ठेवत असत. तेच आपल्याला ’खंडस्फुटितजीर्णोद्धाराय’ या शब्दातून दिसते. मंदिराचा एखादा भाग तुटला असेल (खंड), फुटला असेल, भेगाळला असेल (स्फुटित) किंवा मंदिर अगदीच जीर्ण झालंय आणि नव्याने बांधून काढायचं असेल तर (जीर्णोद्धार) त्यासाठी आगाऊ आर्थिक तरतूद केली जात असे, पण मंदिर बांधतानाच असे बांधले जात असे की, विशेषत पाणी आतमध्ये मुरू नये. कारण पाण्याने दगडाचे नुकसान लवकर होते. शिवाय मंदिराची बांधणी ढिसाळ होऊ शकते. म्हणून तर स्थापत्यामध्ये सलीलांतरसारखे भाग शिखरापासून मंदिराच्या भिंतीच्या तळापर्यंत घेतलेले दिसतात (सलील, पाणी, अंतर, जागा/पन्हळीवजा भाग). यावरून आपल्याला असे दिसून येते की, मंदिरांचे होणारे नुकसान शक्यतो टाळले जात असावे आणि त्यातूनही नुकसान झालेच तर डागडुजीसाठी तरतूद केलेलीच असे. जीर्ण किंवा खंडित मूर्तींच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला जात होता, यावर भाष्य सहसा प्रत्येक शिल्पग्रंथात आढळून येत नाही. कदाचित इथे मूर्तीचे व्यवस्थित जतन करणे हाच संवर्धनाचा उपाय असावा असं दिसतं. मूर्तींवर केले जाणारे पंचामृत उपचार प्राचीन काळी कसे सांभाळले जात होते, तर काही अभिलेखांत त्याविषयी उल्लेख येतो की, देवमूर्तीला पंचामृत स्नान झाले की, विविध (जी साधारण भरडी असतात) पिठं चोळली जात असत, जेणेकरून मूर्तीवर ओशटपणा राहू नये. शिवाय मग गरम पाण्याने स्नान घातले जात असे, जेणेकरून सगळा तवंग निघून जावा. हा झाला जतनाचा उपाय. कदाचित मूर्ती भग्न झाल्यावर ती बदलणे हाच एकमेव उपाय अवलंबला जात असावा. अर्थात, त्या काळात मूर्ती भंगली, मंदिराचा भाग भंगला किंवा मंदिरच भंगले तर त्या मूर्ती आणि मंदिराच्या शैलीबरहुकूम नवनिर्मिती तरी होत असे. सध्याच्या काळातदेखील हे शक्य आहेच, पण तुलनेनं कष्ट जास्त.

असो, इतका ऊहापोह झाल्यानंतर इतकंच म्हणावंसं वाटतं की, वारसा नीट जपणं, जतन करणं हाच संवर्धनाचा मुख्य उपाय. रंगरंगोटी, उगाच जुन्याला नवीन बांधकामाची जोड देणे, प्रकाश योजनेसाठी अयोग्य ठिकाणी ड्रिल मारणे हे अत्याचार न केलेलेच बरे. सुदैवाने आज वारसासंवर्धन शाखा विकसित झाली असून त्यात प्रशिक्षण घेतलेले तज्ञ आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेणे कधीही योग्यच. शेवटी आपला वारसा आपण नाही जपायचा तर कुणी जपायचा?




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...