सकाळ साप्ताहिक
लेखक : प्रतिमा दुरूगकर
त्रिपुरारी पौर्णिमेचा तेजःपुंज चंद्र वेगाने मंडपाच्या उघड्या वर्तुळाच्या मध्यभागी मार्गक्रमण करीत होता. आत गेलो. आत अंधार होता. फक्त निळ्यासावळ्या आकाशाचा गोल तुकडा वर दिसत होता आणि त्याच्या मध्यभागी तेजस्वी चंद्र. हा आकाशातील दीपोत्सव. तो चंद्रही जणू या दीपोत्सवात सामील झाला होता. चांदणे बरसत होता. मंदिर खालून मानवाच्या दिव्याच्या प्रकाशाने आणि वरून चंद्राच्या प्रकाशाने नहात होते. अनुपम सोहळा!
यावर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिरात साजरी
करायची असे मी ठरविले. एक तर हे प्राचीन शिवमंदिर. शिवाय तेथे त्रिपुरारी
पौर्णिमेचा उत्सव दिव्यांच्या रेषणाईने करतात. त्यातच कोप्पेश्वरचे
वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा उघडा बिनशिखराचा सभामंडप. त्रिपुरारी
पौर्णिमेला याच्या बरोबर मध्यभागी येणाऱ्या तेजस्वी चंद्राचे विलक्षण दृश्य
बघायचे, भूमिज शैलीतील मंदिराचे स्थापत्य, इतिहास जाणून घ्यायचा,
मंदिरावरील विविध कलात्मक मूर्तींचा कलास्वाद घ्यायचा अशी अनेक उद्दिष्टे
डोळ्यासमोर ठेवून आम्ही खिद्रापूरला कूच केले.
हिवाळ्यातील सुखद गारव्याचा तो दिवस होता. नरसोबाच्या वाडीत
सोमणकाकांच्या हातचे सात्त्विक, चविष्ट साधे जेवण भरपेट जेवून, तृप्त होऊन
आम्ही दुपारी खिद्रापूरला निघालो. कृष्णामाईच्या कुशीतील हा प्रदेश सुपीक,
त्यामुळे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहरलेली शेती होती. जाताना
‘सैनिक टाकळी’ हे सैनिकांचे गाव दिसले. येथील जवळजवळ प्रत्येक घरातील एकजण
तरी सैन्यात आहे असे समजले. म्हणजे हे एक आधुनिक तीर्थक्षेत्रच की! मनोमन
प्रणाम केला.
आम्ही जेव्हा खिद्रापूरला कोप्पेश्वर मंदिरासमोर उभे होतो, तेव्हा उन्हे
कलू लागली होती. दगडी प्रवेशद्वारातून आत गेलो की नगारखाना लागतो. तो
ओलांडला की आपण प्रशस्त प्रांगणात असतो. समोरील प्राचीन कोप्पेश्वर मंदिर
बघून आपण स्तब्ध होतो. दगडी तटबंदीने बंदिस्त आवारात तेराव्या शतकातील
भूमिज शैलीतील विलक्षण देखणे स्थापत्त्य आपल्याला तेथेच बांधून ठेवते आणि
मग थोड्या वेळाने आपण भानावर येतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर हे छोटेसे गाव.
कृष्णवेणी (कृष्णा) आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेले. खरेतर याचे
प्राचीन नाव कोप्पम. मध्ययुगात कधीतरी खिद्रापूर झाले. दक्षिणवाहिनी
कृष्णामाई येथे उत्तरवाहिनी होते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला विशेष
महत्त्व आहे. शिलाहार घराण्यातील गंडरादित्य राजाकडे या मंदिराच्या
निर्मितीचे श्रेय जाते. स्थापत्यविशारद, मूर्तिशास्त्रातील जाणकार आणि
त्यांच्या विचारांना मूर्त स्वरूप देणारे कसबी कारागीर यांचा अनोखा संगम
होऊन हे देखणे स्वप्नशिल्प साकारले गेले आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान यांना
कलेचे कोंदण लाभले आहे. मंदिराचे अंतरंग आणि बाह्यांग दोन्हीही आत्यंतिक
कलापूर्ण आहेत. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, मंडप (गूढमंडप) आणि मुखमंडप
(स्वर्गमंडप) यांनी युक्त अशी आहे.
प्रदक्षिणेसाठी डावीकडे वळले की प्रांगणातील विस्तीर्ण अश्वत्थ दिसतो.
मंदिराच्या पुढे तो जणू पहारा देत उभा आहे. आम्ही पुढे गेलो तेव्हा
मंदिरावर मावळतीच्या उन्हाचा सोनसळी अभिषेक चालू होता. बाह्यांगावरील
मूर्तिवैभव सोन्यात नहात होते. ते वैभव डोळ्यात साठवतच मंदिराकडे नजर
टाकली. येथून मंदिराचे सर्वच रूप एका नजरेत सामावत होते. गर्भगृहापासून
मुखमंडपापर्यंतचे स्थापत्य त्याच्या शैलीमुळे उठून दिसत होते. मंदिराचे तीन
प्रमुख भाग – अधिष्ठान, मंडोवर आणि शिखर त्यावरील शिल्पवैभवासह
पाहणाऱ्याला दिग्मूढ करत होते. मूळचे शिखर आता अस्तित्वात नाही हे सहजच
दिसत होते. काळाचे आघात, परकीयांची आक्रमणे सोसत हे शिल्पवैभव आपल्यापर्यंत
पोहोचले हेच ‘अहो आश्चर्यम्’ असे वाटले. मंदिर दीड मीटर अधिष्ठानावर उभे
आहे. त्यावरील अर्धा मीटर उंचीचे देखणे हत्ती चटकन नजरेत भरतात. ९२ देखण्या
गजराजांनी हे मंदिर तोलून धरले आहे. अधिष्ठानावर ‘मंडोवर’ आहे. त्यातील
ज्या भागावर मूर्ती कोरलेल्या असतात, त्याला जंघा म्हणतात. येथे त्याचे दोन
थर आहेत. या द्विजंघा मंडोवरावरील देखणे शिल्पवैभव हे खिद्रापूरच्या
कोप्पेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे.
येथे शिवाबरोबर विष्णुमूर्तीही आढळतात. तसेच ब्रह्माच्या एकूण सोळा
मूर्ती आहेत. त्यातील एक गायत्री व सावित्रीसह आहे. हातातील अक्षमाला,
कमंडलू यामुळे ब्रह्मा पटकन ओळखता येतो. कोप्पेश्वर शिवमंदिर असल्यामुळे
बाह्यांगावर असंख्य शिवमूर्ती कोरल्या आहेत. केवल शिव, चतुर्भुज शिव अशा
सर्वच आयुधे व लांछनयुक्त (त्रिशुल, नाग, बीजपूरक) प्रतिमा कलाकारांनी
देखण्या स्वरूपात साकार केल्या आहेत. शिवाचे रुद्र रूप ‘भैरव’, तेही येथे
नऊ ठिकाणी उत्तम साकारले आहे. येथे काय नाही? नटराज आहे, उमेसह महेश्वर
आहे, अर्धनारीश्वर आहे, हरिहर आहे, शिवाचा अठ्ठाविसावा अवतार लकुलीशसुद्धा
आहे, ज्याला पाशुपतपंथाचा स्थापक मानतात. शिवाचे दोन पुत्र कार्तिकेय व
गणेशही येथे दिसतात. विष्णूचे दशावतार दिसतात. सूर्यनारायण दिसतो.
देवतांमध्ये पार्वती दिसते. सरस्वती, गजलक्ष्मी, चामुंडा, महिषासुरमर्दिनी
दिसते. भीम आणि द्रौपदी, राम आणि हनुमान अशी रामायण, महाभारतातील पात्रेही
येथे हजेरी लावतात. प्राचीन काळी कुशीलवांनी (राजाचे भाट) रामायण, महाभारत
परंपरेने पुढे नेले, तेच काम नंतरच्या काळात मंदिरावरील शिल्पांनीही केले.
अष्ट्दिक्पाल आणि नवग्रह यांचे शिल्पांकन हे या मंदिराचे अनोखेपणच म्हणावे
लागेल. सर्व ग्रह अलंकृत आहेत. दहा अश्वांच्या रथातील चंद्र लक्ष वेधून
घेतो. वास्तुशास्त्रातील सूरसुंदरी म्हणजेच देखणी स्त्री शिल्पे
कोप्पेश्वराचे सौंदर्य खुलवतात. डॉ. गो. ब. देगलुरकर म्हणतात त्याप्रमाणे
‘संसारात जशी स्त्री गृहलक्ष्मी असते, सौंदर्य व पावित्र्याची निदर्शक
असते, तशीच ती परमार्थमार्गावरसुद्धा सहाय्यकच ठरते.’ अशा विधायक विचारांनी
सूरसुंदरींचा कलास्वाद घ्यावा आणि परमार्थाकडे वाटचाल करावी.
प्रदक्षिणा घालत घालत बाह्यांगावरील शिल्पवैभवाने आपण भारावलेलो असतो,
पण याही पुढे मंदिराचे अंतरंग त्यातील वैशिष्ट्यांसह आपली वाट पाहत असते.
चारी बाजूंनी उघड्या, तारकाकृती स्वर्गमंडपात जेव्हा आपण प्रवेश करतो,
तेव्हा क्षणभर स्तब्ध होतो. बारा स्तंभ, अष्टदिक्पाल, रंगशीला यांनी युक्त
हा मंडप शिखरविहीन आहे. तो आपल्याला नीलाकाशाचे गोलाकार दर्शन घडवितो.
त्रिपुरारी पौर्णिमेला याच अवकाशात मध्यभागी चंद्र येतो आणि अनुपम, विलक्षण
अनुभव देतो. यानंतर आपण गुढमंडपात जातो. तो भव्य आहे. येथील खांबावर
पंचतंत्रातील कथा कोरल्या आहेत. याला तीन द्वारे आहेत. आत बारा खांब,
त्याभोवती वीस खांब अशी रचना आहे. मधे रंगशीला आहे. येथे कडेला
सप्तमातृकापट्ट ठेवला आहे. यानंतर अंतराळातून आपण गर्भगृहापाशी पोहोचतो.
मंदिराने आपले वेगळेपण गर्भगृहातही जपले आहे. चौरस गर्भगृहात तीन बाजूला
तीन देवळी आहेत. सध्या आत काही नाही. गाभाऱ्याजवळील भिंतीवर एक शिलालेख
असून त्यात कृष्णतीरावरील कोप्प गावातील कोप्पेश्वराचे वर्णन येते. यात
कोप्पेश्वरला- ‘कुकुंटेश्वर, कामेश्वर, कुसवेश्वर’ असे संबोधले आहे. यावरून
डॉ. गो. ब. देगलुरकरांचा एक तर्क असा, की या तीन देवळ्यात हे तीन देव
अर्थात कोप्पेश्वराचीच तीन रूपे असू शकतात. गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत. एक
शाळुंकेसह ते बहुधा नवीन स्थापना केलेले असावे, तर जुने मूळ शिवलिंग पुढील
बाजूस शाळुंकाविरहीत आहे. गावकरी याला ‘धोपेश्वर’ म्हणतात. उंबरठ्यासमोरची
चंद्रशीला आवर्जून बघावी अशी आहे. आजही या प्राचीन मंदिरात यथासांग
पूजाअर्चा चालू आहे. पण मंदिर मात्र पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
मंदिराचे अंतर्बाह्य सौंदर्य पाहत पाहत सूर्यास्त कधी झाला कळलेच नाही.
मंदिरात दिवे लागले आणि मग सुरू झाली त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाची
लगबग. त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात दीपोत्सव साजरा करतात.
त्रिपुरसंहाराची कथा महाभारतात आहे. विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष
हे तारकासुराचे तीन मुलगे. त्यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन
किल्ल्यांचे स्वामित्व मिळविले आणि असा वर प्राप्त केला की हे किल्ले
त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरावेत. हजार वर्षांत ते एका बिंदुवर यावेत,
त्यावेळी कुणी एका बाणाने त्यांना पाडले तरच ते नष्ट व्हावेत. मयासुराने
त्यांना सोने, चांदी व लोखंडाचे किल्ले बांधून दिले. बलवान होऊन या तिघांनी
देवांना छळण्यास सुरुवात केली. शेवटी शंकराने एका ठरावीक क्षणी एकाच बाणात
असुरांचा नाश केला.
कोप्पेश्वर मंदिर पुरातत्त्व विभागाकडे असल्याने संध्याकाळी ते बंद केले
गेले व फक्त स्वर्गमंडपात आणि बाहेर दीपोत्सव साजरा केला गेला. गावातील
उत्साही तरुणांनी अवघ्या एका तासात पूर्ण मंदिराभोवती सुंदर रांगोळी
रेखाटली. त्यानंतर पणत्या ठेवल्या. मग आम्हीपण या दीपोत्सवात सामील झालो.
आम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर दिव्याने स्वस्तिक काढले आणि मग जेव्हा सर्व
पणत्या पेटवल्या गेल्या तेव्हा दिव्यांच्या प्रकाशात ते शिल्पवैभव झळाळून
उठले. या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर वेगळे भासले. त्यावरील मूर्त्या
वेगळ्याच दिसू लागल्या. ते दृश्य अप्रतिम होते. त्याला उपमा नाही.
प्रांगणातील अश्वत्थाच्या बुंध्याजवळ गावकऱ्यांनी त्रिपुरारी वातींचे दिवे
लावले. आता अश्वत्थही दीपोत्सवात सामील झाला. गावकऱ्यांनी मंदिर गजबजून
गेले. ड्रोनने फोटोग्राफी केली गेली. मंदिराभोवती फिरत फिरत आम्ही सर्व
सौंदर्य डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या पणत्याही वेगळी ऊर्जा
देत आहेत, असे जाणवत होते. जगाचा विसर पडला होता. तेजाने आम्ही भारले गेलो
होतो. कितीही बघितले तरी समाधान होत नव्हते. आता वेळ आली होती
स्वर्गमंडपात (मुखमंडपात) जाण्याची. कारण त्रिपुरारी पौर्णिमेचा तेजःपुंज
चंद्र वेगाने मंडपाच्या उघड्या वर्तुळाच्या मध्यभागी मार्गक्रमण करीत होता.
आत गेलो. आत अंधार होता. फक्त निळ्यासावळ्या आकाशाचा गोल तुकडा वर दिसत
होता आणि त्याच्या मध्यभागी तेजस्वी चंद्र. हा आकाशातील दीपोत्सव. तोही जणू
या दीपोत्सवात सामील झाला होता. चांदणे बरसत होता. मंदिर खालून मानवाच्या
दिव्याच्या प्रकाशाने आणि वरून चंद्राच्या प्रकाशाने नहात होते. अनुपम
सोहळा!
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या…
‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी आमची अवस्था झाली होती. सौंदर्यपानाच्या अपूर्णतेची हुरहूर मनात ठेवून आम्ही तेथून बाहेर पडलो.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.