>> अभय मिरजकर
महाराष्ट्रातील गडकिल्ले, ऐतिहासिक घटना, स्थळांचा वारसा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील गढी आणि चिरेबंदी वाडे यांचा वारसा देदीप्यमान असा आहे, पण काळाच्या ओघात आता तो लुप्त होत चालला आहे. पंपोशीमध्ये एकतरी गढी असायचीच. महसूल वसुली करणे, तो सुरक्षित ठेवणे आणि इच्छित ठिकाणी पोहोचवणे यासाठी केलेली ती व्यवस्था होती. त्यामुळे चिरेबंदी वाडा आणि बुरुजांची दमदार गढी यांची सुरक्षा व्यवस्था ही एखाद्या किल्ल्याच्या तोडीची असायची.
लातूर जिह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील अण्णासाहेब बापूसाहेब पाटील यांची गढी पंपोशीमध्येच नव्हे तर जिह्यात प्रसिद्ध असणारी एक गढी आहे. किमान साडेचारशे वर्षापूर्वीच्या दहा एकरांवर उभारलेल्या या गढीमध्ये पाटील यांची आठवी पिढी सध्या राहतेय. सात मजबूत बुरुज आणि सात दरवाजे हे या गढीचे वैशिष्टय़ आहे. परिसरातील गावांमधून जमा केलेला महसूल या ठिकाणी ठेवला जायचा आणि नंतर निजामशाहीमधील जिह्याचे ठिकाण असलेल्या बिदरच्या किल्ल्यात पाठवला जायचा.
पूर्वाभिमुख पहिल्या प्रवेशद्वाराला हत्ती बांधण्यासाठी साखळदंडाची व्यवस्था होती. आजही साखळदंड पाहण्यास मिळतात. तटबंदीची मात्र पडझड झालेली असल्याने ती दिसत नाही. या मुख्य प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर मोकळी जागा, जनावरे, घोडे बांधण्याची व्यवस्था होती. सध्या दक्षिण बाजूस शाळेची इमारत आहे. दुसरे प्रवेशद्वारही भक्कम सुरक्षेसह असलेले दिसून येते. असे इतरही प्रवेशद्वार सुस्थितीत आहेत. या दारांच्या बाजूला पहारेकरी यांच्यासाठीची बैठक, निवास व्यवस्था, ढाळज, दरवाज्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला धान्य कोठारे, लावणी, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱया, आत प्रशस्त माळवद अशा सर्व व्यवस्था गढीमध्ये दिसून येतात.
या गढीला सात दरवाजे होते, पण सध्या सहाच शिल्लक आहेत. प्रत्येक दाराला मजबूत आगळ आहेत. चार ाढमांकाच्या दाराला असणारी आगळ व्यवस्था जबरदस्त आहे. दार बंद करून आगळ लावल्यानंतर बाजूच्या भिंतीला एक आगळ दिलेले आहे. मात्र त्याच्या मुखाला घडवलेला दगड बसवलेला आहे. त्याच्यामागे एक आगळ आहे. ती पाठीमागे सरकवली आणि दगड लावून टाकला की, दाराची आगळ लॉक होऊन जाते. जोपर्यंत तो दगड काढून आगळ बाहेर काढली जात नाही तोपर्यंत मुख्य दाराची आगळ इंचभरही मागेपुढे सरकत नाही. विशेष म्हणजे दगडापाठीमागे असणारी आगळ पूर्ण बाहेर काढण्याची गरज नाही. सुमारे दीड ते दोन फुटांपर्यंत ही आगळ पाठीमागे सरकवली जाते व पुढे ओढता येते. घडवलेला दगड अशा पध्दतीने बसतो की, भिंतीमध्ये तो वेगळा दिसतच नाही.
या गढीमधून भुयारी मार्गाने गढीच्या बाहेर निघता येते. त्यातही आणखी वैशिष्टय़पूर्ण म्हणजे या गढीमध्येच लपून बसण्यासाठीच्या अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या जागी लपून बसले तर संपूर्ण गढी ताब्यात घेऊन शोधून काढली तरी गुप्त ठिकाणी बसलेली व्यक्ती कोणालाच सापडून येत नाही.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.