Saturday, December 16, 2023

फेस्बुक महाराष्ट्र ट्रेकर्स कट्टा Maharashtra Trekker's Katta


 



   किल्ले सांगोला...
सांगोला गावातील एका बुरुजाच्या
काहीशा अवशेषांपुरता उरलेला किल्ले सांगोला !!
 















 
किल्ले भूपाळगड उर्फ बाणूरगड....🚩🚩🚩
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेला हा भूपाळगड किल्ला. पुणे-कराड-विटा पंढरपुर रोडवरील पळशी गावात असलेला हा किल्ला.शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासाठी एका किल्ल्याची आवश्यकता होती. भूपाळगडाचा हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षणाच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्व होते.इतिहासातील ‘बुसातिन-उस-सलातिन’ या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी पळशीनजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले.
गडाच्या माथ्यावर श्री.बानलिंग हे शंकराचे मंदिर आहे.मंदिराच्या पुढे एक दीपमाळ आहे. पौराणिक दंतकथेनुसार व स्थानिक यांच्या माहितीनुसार दशरथ राजा यांनी येथुन गडाच्या उत्तर बाजूला असलेल्या तळेवाडी येथील तळ्याच्या दिशेने बाण मारला व तो बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला.ते ठिकाण म्हणजे तळेवाडी.या वाडीत श्रावण बाळाची समाधी आहे.
अफझलखानाच्या वधानंतर हा किल्ला स्वराज्यात आला. शाहिस्तेखानाने केलेल्या स्वारीत फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने चाकणचा संग्रामदुर्ग ५५ दिवस लढवला म्हणून त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे मोगलास जाऊन मिळाले. या घटनेनंतर संभाजीराजांनाबरोबर घेऊन दिलेरखान मराठी मुलूखावर हल्ला करीत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळ्गडावर मोघलांनी हल्ला चढविला. दिलेर खानाने शेजारील डोंगरावर तोफा चढवल्या, तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एकाच प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. महाराजांना ही खबर लागताच सैन्याची कुमक मदतीस पाठवली, पण ही मदत मिळायच्या आतच किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता.भूपाळगडावरून प्रतिकार झालाच नव्हता कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते. शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की,स्वराजाचा युवराज म्हणून किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.उल्लेख स्वराजाचा युवराज म्हणून केला गेला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही, त्यामुळे फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध तलवार उचलली नाही.भूपाळगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच सर्व गडांवर निरोप धाडले की संभाजीराजे जातीने आले तरी तलवार चालवणे. गड ताब्यात न देणे.आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने लगेच इखलासखान, जसवंतसिंग बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील सर्व लोकांना कैद केले गेले.जे ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे.
बाणूरलिंग मंदिराच्या बाहेर महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली तेव्हापासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचे साक्षीदार बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक हे कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. फ़किर, वासुदेव, कोळी, भिक्षेकरी, संत,असे अनेक वेशांतर करून शत्रूची महत्त्वपूर्ण माहिती मिळवत.बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला शत्रूचा घाव बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येवून प्राण सोडले. समाधी समोरून जाणार्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर आपणास गडाची तटबंदी पहायला मिळते. भूपाळ्गड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी सद्यस्थितीत काही थोडके अवशेष शिल्लक आहेत.
माहिती साभार - टीम-पुढची मोहीम

















किल्ले कोळदुर्ग
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात पळशी गावाजवळ असलेला हा कोळदुर्ग किल्ला. सध्या किल्ल्याचे अवशेष विखुरलेल्या आहेत व व ते आपल्याला शोधावे लागतात. किल्ल्याला दोन्ही बाजूने डोंगरांनी वेढलेले आहे व मध्ये खोल दरी आहे तेच म्हणजे किल्ल्याला असलेले नैसर्गिक खंदक होय. गडावर पूर्वी काही वाडे होते याचे अवशेष दिसतात. मंदिराचे अवशेष दिसतात. तलावाच्या पुसट खुणा दिसतात. तुरळक तटबंदीचे अवशेष आहेत.
नुकतेच गडावर संवर्धन कार्य करत असताना एक शिलालेख सापडलेला आहे. तो शिलालेख जुन्या कन्नड लिपीतील आहे. शिलालेखावर जैन मुनिंचे वर्णन करण्यात आलेले आहे. ते पर्वतासारखे श्रेष्ठ, कामदेवावर विजय प्राप्त केलेले, कुलीन, अभ्यासू, विद्वान आहेत असे लिहिले आहे. चालुक्य राजा "जगदेकम्मल" यांचाही उल्लेख आढळतो. हे राजा इसवी सन ११३८ ते ११५० या काळात राज्य करत होते. आणि किल्ला कोळी राजाने बांधला अशी गॅझेटमध्ये नोंद आहे. मोत्या कोळी राजाने पन्हाळ्याच्या राजा दुसरा भोज याबरोबर बंड केले होते. सध्या या भागात जैन समाज आढळत नाही पण त्याकाळी जैन आणि मुनी यांच्या अस्तित्व होते हे कळते. स्थानिक लोक याला कुळदुर्ग किंवा राजवाडा असे संबोधतात.
माहिती साभार - टीम-पुढची मोहीम
 









किल्ले रामदुर्ग...🚩🚩🚩
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेला हा रामदुर्ग किल्ला. गढी प्रकारातील हा किल्ला आहे. सरदार डफळे ह्यांनी ह्याची उभारणी केली. जत हा तसा शेवटचा तालुका व कर्नाटक राज्याच्या हद्दीजवळ आहे. विजापूर जवळ आहे. जत पासून रामनगर ह्या गावात थोड्या अवशेषांसह उभा आहे. छोट्या टेकडीवर उभा असलेल्या ह्या गढीचे प्रवेशद्वार शाबूत आहे. तुरळक तटबंदी आहे आणि आत प्राचीन शिवमंदिर आहे.
स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी हा छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेत जास्त वापरला गेला असावा.रामपुर गावातील टेकडीवर एक पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांचा वावर किल्ला बांधण्याच्या आधीच्या काळापासुन होता. तसेच या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने आजुबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी किल्ला बांधण्यासाठी ही योग्य जागा होती.
माहिता साभार- टीम-पुढची मोहीम
 















 
किल्ले पिलीव...🚩🚩🚩
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात छोट्याश्या टेकडीवर जहागिरदार लोखंडे घराण्याची गढी म्हणजे बळकट भुईकोट उभा आहे. पिलीव गाव अकलूजपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गढीचे बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत अस्तित्वात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक चौक लागतो व गढीत प्रवेश होतो. तटबंदी आणि बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वरून टेहळणी करता येते व जंग्या आहेत. गढीमध्ये आत घरे आहेत. गढीच्या बाहेर एक चुन्याचा घाणा आहे.
लोखंडे सरदार हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवणी जवळील पारद गावचे. बाबाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतर हे घराणे जहागीरदार म्हणून पिलीवला आले. सयाजी लोखंडे यांना तीन मुले होती त्यापैकी राणोजी हे छत्रपती शाहू महाराजांना दत्तक दिले तेच म्हणजे फत्तेसिंह भोसले. यांच्या तीन शाखा आहेत पिलीव, अक्कलकोट, राजाचे कुर्ले. यांच्या घराण्यातील पुरूषाने एका युद्धात पराक्रम गाजवला पण वीरमरण प्राप्त झाले. हे युद्ध दिवाळीदरम्यान घडले तेव्हापासून हे घराणे दिवाळी साजरी करत नाही. रणजीतसिंह जहागीर हे त्यांचे वंशज गढीत राहतात.
माहिती साभार - टीम-पुढची मोहीम
 








 
 
श्री अर्धनारी नटेश्वर देवस्थान....🚩🚩🚩
श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या अवस्थेत आहे. मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थाही पुजारी गुरव महादेव व गौरीहर विश्वनाथ हे परंपरेने करत आहेत.
अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते. डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात, म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते. मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. मुख्य शिवलिंग सुंदर आहे. छोटा नंदी आहे. बाहेरील बाजूस उंच आसनावर गणेशमूर्ती आहे. दुस-या दोन आसनांवरील दोन मूर्ती पुरातन वास्तू खात्याकडे आहेत. त्याच्यासमोर नागदेवता. त्या प्रत्यक्षात दक्षिणेकडे मुखाकडून एकमेकाला वेटोळे घातलेल्या स्वरूपात दोन नाग मूर्ती आहेत.
मुख्य मंदिराकडे जावे लागते ते प्रवेशद्वारापासून बारवेला डाव्या बाजूने वळसा घालून, पिंपळ वृक्षाखालून. मंदिराबाहेर चौकोनी उंच आसनावर दगडी मंडपामध्ये नंदी आहे. नंदीच्या शिंगामधून मंदिराच्या कळसाचे प्रथम दर्शन होते. नंदी मानेने थोडा वळून बघत थाटात बसलेला आहे. नंदी आकाराने मोठा आहे. नंदी मंडपाला चार खांब आहेत.
मुख्य अर्धनारी नटेश्वर मंदिरात प्रवेशासाठी तीन पाय-या आहेत. दोन्ही बाजूंला आसनव्यवस्था आहे. प्रथम मंदिरामध्ये दक्षिणमुखी सिद्धिविनायक गणेशमूर्ती आहे. त्यानंतर चालुक्य काळापासून पूजनीय असलेल्या सप्तमातृका पाहावयास मिळतात. त्यांच्यानंतर मंदिरात डाव्या बाजूस दोन खण आतमध्ये महान शिवोपासक, शांडिल्य ऋषींचे शिवलिंगरूपी पूर्वाभिमुख स्थान आहे. शांडिल्य ऋषींनी दंडकारण्यात असलेल्या या वेळापूर (एकचक्रनगर) या ठिकाणी तपस्या केली. त्यांनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितले.
मुख्य शिवपार्वती मूर्तीतील पार्वतीच्या चरणावर चक्रचिन्ह आहे. त्यावरून गावाला एकचक्रनगर हे नाव पडले असावे. शाडिल्य ऋषी स्थानावर उत्तरेकडे मुख व हंस वाहन असलेली चतुर्भुज देवाची मूर्ती थोड्या भंगलेल्या अवस्थेत पाहावयास मिळते. तिच्या शेजारी, सिंहावर आरुढ झालेली, दशभुजा असलेली, विविध शस्त्रे हातात घेऊन उभी, महिषासुराचा वध करणारी देवीची पुरातन मूर्ती आहे. तीही काही ठिकाणी भंग पावली आहे. मंदिराच्या उत्तरेकडे गणेशाची बिगरसोंडेची मूर्ती आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. तीही भंग पावलेली आहे. त्याशेजारी चामुंडा देवीची मुखामध्ये बोट धरलेली मूर्ती दक्षिणमुखी आहे. तिच्या वरच्या बाजूला सप्तमातृका आहेत.
तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले
तेथेच पार्वतीचे वाहन घोरपड आहे व शेजारी सर्वांत प्रथम पूज्य अशी गणेशाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे काम अतिशय नाजूक आहे.
मंदिराचे शिखर हे सुंदर असून जमिनीपासून थोड्या उंच भरावावर बांधकाम असून मंदिर दगडाचे आहे. शिखर जुन्या पद्धतीचे वीट व चुना यांचे आहे. मंदिर फार पुरातन असून मंदिराचा इतिहास व ब-याच दंतकथाही ऐकण्यास मिळतात. बळी मंदिराचे शिखरही तशाच पद्धतीचे आहे. मंदिरामध्ये काही साधू-संतांनी तपस्या करून संजीवन समाधी घेतल्या आहेत. त्यांपैकी काही बांधलेल्या आहेत. प्रत्येक समाधीवर शिवलिंग आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस (उत्तरेस) ओळीने मंदिरांसारख्या बांधलेल्या तीन साधूंच्या, सत्पुरुषांच्या फार जुन्या समाधी आहेत.
मंदिरामध्ये अर्धनारी नटेश्वर वार्षिक उत्सव यात्रा चैत्र (मार्च) महिन्यामध्ये गुढीपाडवा सणापासून सुरू होतो. चैत्र शुद्ध पंचमी शिवपार्वती विवाह हा वार्षिक उत्सव चालू होतो. पंचमीला हळदी उत्सव (चैत्र शुद्ध अष्टमी), लग्न उत्सव. चैत्र प्रतिपदा राजो पालखी(वरात) यात्रा उत्सव अष्टमीपर्यंत असतो. वार्षिक यात्रा उत्सवाला हजारो भाविक येतात.
श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. श्रावणामध्ये भक्त प्रभू शिवपार्वती पूजा, पोषाख, खाऊच्या पानाची मखर (शिखर) पूजा नवसाने व खुशीने भगवंतांची कृपा, यश, कीर्ती, सुख, संपन्न करण्यासाठी, फलप्राप्तीसाठी करतात. खाऊचे पान पूजा व बिल्व पूजा सुंदर असते. नवरात्रदेवी (अश्विन) महिन्यात शिव व अंबा यांच्या दर्शनाला भक्त शक्ती व शिव दर्शन घेतात. कार्तिक उत्सव – दीपोत्सव सर्व मंदिरात ब-याच वर्ते पासून होतो. मंदिर दीपप्रकाशाने सुवर्णमय दिसते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये व श्रावणामध्ये सोळा सोमवार व्रत केलेली व भाविकाची व्रत सांगता (उद्यापन) अभिषेक होतात. महाशिवरात्रीला दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी, अभिषेक, जागर व रांगोळी उत्सव व वर्षभर नित्य पूजा; अभिषेक, आरती वगैरे परंपरेने गुरव सेवा करतात. येणा-या भक्तांना भक्तनिवास आहे व मंदिरामध्ये अन्नदान सोमवार व गुरूवार या दोन दिवशी असते.
वेळापूरचे ते मंदिर किती काळापासून अर्धनारी नटेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते याद्दलची नेमकी माहिती उपलब्ध नाही. सोलापूरचे इतिहासाचे अभ्यासक आनंद कुंभार यांच्या सांगण्याप्रमाणे शंकर आणि पार्वती यांच्या अर्धनारी नटेश्वर या एकरुपाबद्दलची संकल्पना आणि वेळापूरच्या मंदिरातील मूर्ती यांमध्ये साम्य आढळून येत नाही. कुंभार वेळापूर येथील मूर्ती अर्धनारी नटेश्वराची असल्याचे नाकारतात. वेळापूर परिसरात त्या मंदिराविषयीची माहिती देणारे तीन ते चार शिलालेख आढळतात. त्यात दिलेल्या माहितीप्रमाणे अर्धनारी नटेश्वराचे समजले जाणारे ते मंदिर प्रत्यक्षात वटेश्वर नामक देवतेचे असल्याचा पुरावा सापडतो. मात्र ती मूर्ती आणि ते मंदिर परिसरातील ग्रामस्थांमध्ये अर्धनारी नटेश्वराच्याच नावाने ओळखले जाते.
वेळापूरच्या मंदिरातील देवतेविषयी डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या बृह्दग्रंथात वेळापूर येथील शिलालेखांचा अभ्यास करताना पूरक माहिती दिली आहे. डॉ. तुळपुळे यांचे ते पुस्तक पुणे विद्यापीठाने पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे.
वेळापूरच्या मंदिरात जाण्यासाठी अकलूज किंवा पंढरपूर या दोन ठिकाणाहून एस.टी. मिळतात. ते मंदिर पंढरपूरच्या तुलनेत अकलूजवरुन जवळ आहे. रेल्वेने येणा-यांना माढा तालुक्यातील कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर उतरता येते. तेथून पंढरपूरला येऊन एस.टी.मार्गे वेळापूर गाठावे लागते. रेल्वेने पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोचण्याची सोय आहे.
माहिती स्रोत – रवि गुरव – मंदिराचे पुजारी- 9890372561)
संकलन - विठ्ठल आहेरवाडी
 










 
 
किल्ले अकलूज....🚩🚩🚩
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावी भुईकोट किल्ला आहे.अकलूज गाव नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि किल्ला पण नदी किनारी आहे. अकलूज हे नाव गावात असलेली ग्रामदेवता अकलाई देवीच्या नावावरून पडले. सद्यस्थितीत किल्ल्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शिवसृष्टी उभारताना किल्ल्याचे पडलेले बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार यांची डागडुजी करून बळकट केले. शिवसृष्टी पहाण्यासारखी आहे शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या कालावधीत गाजवलेल्या शौर्याचे प्रसंग साकारले आहेत.
किल्ल्याची उभारणी १३ व्या शतकात यादवांच्या राजवटीत झाली होती. पुढे मोगलांच्या काळामध्ये अकलूज हे "अदसपूर" या नावाने ओळखले जात होते. इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी किल्ल्यात मुक्कामी होते.
माहिती साभार - पुढची मोहीम
 
 
 
 
 
 
















कोपेश्वर मंदिर खिद्रापूर....🚩🚩🚩
कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव ‘खिद्रापूर’ होय. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा घालून परत पश्चिमेकडे फिरते. खिद्रापूर म्हणजे आहे, महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेशांची सीमारेषा.
शिरोळ हा तसा वैशिष्टयपूर्ण तालुका. जीवनाला सर्व दिशांनी स्पर्श करणारा असा हा प्रदेश. त्यात नरसोबावाडीचे दत्त मंदिर, शाहु महाराजांनी वसविलेले व्यापारी केंद्र जयसिंगपूर, ‘कुरुदंवाडकर’ सरकारचे राजवाडे, शिरोळचा साखर कारखाना, घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सेनेत असलेली… ‘सैनिक टाकळी’ हे खिद्रापूरचं वैशिष्टयं. आवर्जून उल्लेख करण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे, खिद्रापूरचे ‘कोपेश्वर मंदिर’ आणि ‘जैन मंदिर’ होय. या मंदिरांच्या सौदंर्यानं व शिल्पकलेनं भल्याभल्या वास्तुविशारदांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.
खिद्रापूरचा प्रवास
३०६ हेक्टर जमीन असलेले, खिद्रापूर हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. हे गाव देवळांच्या सेवकांना इनाम म्हणून दिलेले. यामध्ये वाजंत्री, गुरव आदी आले. एक धर्मनिरपेक्ष गाव म्हणून तालुक्यात प्रसिध्द.
उत्सव
विशालतीर्थ यात्रा भरते यावेळी हजारो भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून दर्शन घेऊन जातात. गावातील सर्व पंथाचे लोक ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवितात व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी करतात.
कुरुंदवाड मार्गे खिद्रापुराला जाता येतं. दुतर्फा हिरवीगार ऊस शेती, केळीच्या बागा, मध्येच लागणारी नारळाची झाडे, आणि पुष्कळ झुळझुळ पाणी. संपूर्ण प्रवासभर आनंदच आनंद जाणवत राहतो.
खिद्रापूर मंदिराविषयी
बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. इ.स. १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंङ यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. हे एक विद्वान वास्तूविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे आपल्याला जंगलात किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करुन, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करुन मंदिर बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे.
मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.
स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. मध्यवर्ती स्वर्गमंडपालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. या स्वर्गमंडपाचे उघडे छत हे होम-हवनाच्या समिधांचे धूर जाण्यासाठी ठेवले आहे. आणि छिद्रांमुळेच या गावाचे नाव छिद्रापूर… ते खिद्रापूर असे पडले.
स्वर्गमंडपाच्या नंतर येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.
या नंतरचा मुख्य भाग म्हणजे, गर्भगृह. जय-विजय या दोन द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक राहीला आहे. मोठया दरवाजाच्या पायथ्याशी कासव व बाजूला भितीवर यक्ष यक्षिणीचे दर्शन होत आपली नजर खिळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर. हे शिवलिंग किंचिंत तांबूस रंगाचे असून शाळुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे. गाभाऱ्यात भरपूर गारवा जाणवतो. गर्भमंडपाच्या दालनात तीन लहान कमानी आहेत, परंतु तेथील सिंहासनांवर मूर्ती मात्र नाहीत.
शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. वाटाडयांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव सम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी ‘कुडलदामवाड’ नावाचे दान दिल्याचा या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितलं जातं. बाहेरुन मंदिराचे निरीक्षण करताना वेरुळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. हत्तींच्या वरच्या रांगेमध्ये कोरलेल्या देव, यक्ष, यक्षिणी यांची रूपे फार मोहक आहेत. पण खालील हत्तीची ओळ अखंड अशी मिळत नाही. या तळातील गजरुपानंतर साधारणपणे ८ ते ९ फुटावर अनेक नर्तकी, नर्तक, वादक आणि शस्त्रधारी शिल्पांची मुक्त उधळण शिल्पकाराने येथे केली आहे. त्यावेळच्या बांधकामांची रचना, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व या परिसरातील तत्कालीन राजांचा वैभवशाली कालखंड, त्याचं कलाप्रेम खिद्रापूरमुळे मनात अधोरेखित केलं जातं.
जैन मंदिर
हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.
संकलक : पद्मनाभ कागवाडे
 







सरसेनापती संताजी घोरपडे....🚩
तळपती अशी तलवार तूझी.. तेजाने शत्रूस भरवली धडकी.. तुझ्या वेगाने घोड्यांनाही पाण्यात दिसे तुझा चेहरा.. शिवरायांच्या स्वराज्याचा तू असा शूर मोहरा..
१८ जून १६९७ सरसेनापती संताजी घोरपडे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला।मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले.. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला...
संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी म्हाळोजीराव घोरपडे यांनी कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणार्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मणेश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे....
एक महान रणमार्तंड सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांना विनम्र अभिवादन....🙏🚩
 








किल्ले गणेशदुर्ग....🚩🚩🚩
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत सांगलीत असलेला हा गणेशदुर्ग किल्ला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती.कृष्णेकाठी वसलेले सांगली हे गाव आहे. इ.स १८०१ साली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं. सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघांबरोबर आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी गणेशदुर्ग हा भुईकोट बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला. सद्यस्थितीत तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे. तटबंदीवर म्हणजे बुरूजावर गणेशाची प्रतिमा आहे.आत किल्ल्यात शासकीय कार्यालय, वस्तुसंग्रहालय, तुरूंग आहे. गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.
पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. जसे त्यांनी मिरजमध्ये गणपतीचे मंदिर उभारले होते तसेच इ.स. १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीत काळ्या पाषाणात गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.गणेश मंदिर आणि गणेशदुर्ग हे पटवर्धन संस्थानची मालकी आहे.
माहिती साभार- टीम-पुढची मोहीम



किल्ले मिरज.....🚩🚩🚩
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये भुईकोट किल्ला होता काळाच्या ओघात किल्ला नामशेष झाला. किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले ह्याची ऐतिहासिक नोंद नाही पण विजापूरचा बादशहा इब्राहिम खानाच्या काळात आसतखान लहरी यानी इ.स. १४०५ साली किल्ल्याची डागडुजी केली. इ.स. १७६१ मध्ये श्रीमंत गोविंद पटवर्धन जहागीरदार ह्यांनी आपले वस्तीस्थान बनवून किल्ला एकदम बळकट केला.
गोविंद पटवर्धन यांचे सुपूत्र गंगाधरराव उर्फ बाळासाहेब हे पेशवाई उत्तरार्धातले कुशल सरदार. त्यांनी आपले मोठे बंधू गोपाळराव पटवर्धन यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकातील हैदर व टिपूसोबतच्या लढाईत सहभाग घेतला होता. वयाने लहान असल्याने "बाळ" म्हणत म्हणून "बाळासाहेब" नाव पडले. त्यांनी विष्णू मंदिर, कृष्णा नदीवर घाट, गणेश मंदिर बांधले. गणेश मंदिराच्या पूजेसाठी गंगाधररावांनी गोपाळभट रघुनाथभट आचार्य हे मोपाडे गाव कुडाळ ह्यांना अधिकार दिले. १८०१ मध्ये सनदेद्वारे दिले.
माहिती साभार - टीम-पुढची मोहीम
 















 
किल्ले जुना पन्हाळा....🚩
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर गिरीलिंगाचा डोंगर आहे. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या डोंगरास 'जुना पन्हाळा' या नावानेही ओळखले जाते. या डोंगरावर मोठे पठार असून, येथे सुमारे चारशे एकर शेतजमीन आहे. प्राचीन लेखांमध्ये या डोंगराचा उल्लेख 'वुंद्रगिरी' असा आहे. स्थानिक लोक यास 'उंदरोबा' असेही म्हणतात. डोंगराच्या पश्चिमेकडील भागास 'गिरीलिंग' तर पूर्वेकडील डोंगरास 'गौसिद्ध' डोंगर असेही म्हणतात.
डोंगराच्या या दोन्ही विभागांच्या सीमेवर दगडी तटबंदीसारखी रचना करण्यात आली आहे. त्याला जुन्या पन्हाळ्याचा खंदक, असे स्थानिक लोक संबोधतात. या खंदकसदृष्य रचनेमुळे पूर्वी येथे किल्ला होता, असे सांगण्यात येते. शिलाहार राजांनी गड बांधणीसाठी पाहणी केली होती. नंतर बांधकाम अर्धवट सोडून कोल्हापूरजवळ पन्हाळ्याची उभारणी केली. म्हणून हा जुना पन्हाळा.
गडकोटप्रेमी व गिर्यारोहक आजवर येथील किल्लासदृष्य बांधकामाची चर्चा करीत आले आहेत. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या लेण्या आजवर दुर्लक्षित होत्या. डोंगरावरील पठाराच्या बाजूस कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) या गावाच्या दिशेस तोंड करून उत्तराभिमुख चार लेण्या आहेत. तर डोंगराच्या पूर्वेकडील बेळंकी व कदमवाडी (ता. मिरज) या गावांकडे तोंड करून दक्षिणाभिमुख दोन लेण्या आहेत.
येथील गिरीलिंग व गौसिद्ध या नावने ओळखल्या जाणाऱ्या दोन लेण्या ग्रामस्थांना परिचित होत्या मात्र, इतर चार लेण्यांची कोणतीही माहिती नव्हती. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांनी गेल्या वर्षभरापासून या लेण्यांचा अभ्यास केला. या लेण्या बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
स्तुपयुक्त लेणे, बौद्ध चैत्यगृह व विहार या प्रकारातील ही लेणी आहेत. येथे बौद्ध स्तुपाचे भग्नावशेषही आढळून आले आहेत. लेण्याबरोबरच पाण्याचे टाकेही येथे आहेत. यापैकी काही लेण्यांमध्ये कोणतेच कोरीव काम अथवा शिल्पावशेष नाहीत. काही लेण्यांतील शिल्पावशेष अन्यत्र हलविण्यात आल्याचे दिसते. मिरज इतिहास संशोधन मंडळाने या लेण्याबाबत केलेल्या प्राथमिक अभ्यासात इ. स. तिसऱ्या ते पाचव्या शतकापासून तेराव्या शतकातील यादव काळापर्यंत या लेण्यांचा विकास होत गेल्याचेही समोर आले आहे. लेण्यांवर आधारीत शोधनिबंधही मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी काही दिवसांपूर्वी सादर केला आहे.
महाराष्ट्रात इसवी सनापूर्वीच्या लेण्या आढळतात. यात बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन अशा तीन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्रात आजवर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात बौद्ध लेणी आढळून आली आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यात बौद्ध लेणी समूह आढळून आला नव्हता. मिरज इतिहास संशोधन मंडळाने सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगराच्या पूर्वेस असणाऱ्या गिरीलिंग (जुना पन्हाळा) या डोंगरावर नव्याने सहा लेण्यांचा शोध लावला आहे. नव्या सहा लेण्यांच्या शोधामुळे प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला आहे.
माहिती साभार - मिसळपाव. काॅम
 
 









 समृद्ध बागलाण मुलुखाची
दोन दिवसांची मनमुराद भटकंती...🚩🚩
नावाप्रमाणेच ढेर सार्या विस्ताराचा किल्ले डेरमाळ ,
त्यानंतर त्याचाच सोबती किल्ले पिसोळ यांची
पहिल्या दिवसाची मोक्कार तंगडतोड...!
आकाशाला गवसणी घालू पाहणारी मांगी-तुंगी शिखरे ,
पाताळवाडीचा काहीशा उपेक्षित न्हावीगडाच्या थरारक चढाई-उतराईने दुसर्या दिवसाची सांगता..!!
 





 नाशिकच्या निसर्गसंपन्न ईगतपुरी तालुक्यातील ,
दोन दुर्गरत्नांची आजची भटकंती...!!
शिडीच्या जिन्याचा कावनई गावाचा किल्ले कावनई ..!
मारुतीरायाच्या कातळशिल्पाने नटलेल्या महादरवाजाचा किल्ले त्रिंगलवाडी...!!
 
 
 

 
नाशिकच्या निसर्गसंपन्न ईगतपुरी तालुक्यातील ,
दोन दुर्गरत्नांची आजची भटकंती...!!
शिडीच्या जिन्याचा कावनई गावाचा किल्ले कावनई ..!
मारुतीरायाच्या कातळशिल्पाने नटलेल्या महादरवाजाचा किल्ले त्रिंगलवाडी...!!
 
 
 
 
आजच्या तिसऱ्या दिवसाची
विदर्भाच्या भूमीतील दमदार भटकंती....🚩
खामगावचा वेशीपूरता ऊभा असलेला भुईकोट , गोंधणापुरची सुंदर अन् देखणी गढी !
शेगावची सुप्रसिद्ध कचोरी ,
बाळापूरचा बलदंड असा भुईकोट ,
मेहकरचा कंचणी महाल व अस्तित्व हरवलेली गढी ,
सुंदर असे शारंगधर बालाजी मंदिर..!!
दुपारी लोणारच्या जगविख्यात सरोवर अन् तेथील अनेक बारव अन् तेथील सुंदर अशी अनेक मंदिरे...!!!
 
 
 
 
 
 
सकाळची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधील अजिंठा किल्ला ,अजिंठा सराई किल्ला
व अद्भुत लेणी...!
दुपारच्या उन्हातील फरदापुर सराईचा किल्ला तोंडापूरची सुंदर अशी बारव , तेथील गढी ,
त्यानंतर रोहिणखेड येथील प्राचीन अन्
तेवढी सुंदर अशी मशीद व किल्ला..!!
सायंकाळच सत्रात मलकापूरची तटबंदीपुरती गढी , आणि अज्ञात असा महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या किल्ले महेलगडावर
सुंदर सायंकाळची सांगता..!!!

















 
किल्ले जंजाळा....🚩🚩🚩
किल्ल्याची नक्की निर्मिती कुणी व कधी केली ह्याचा आपल्याला अजून मागोवा लागलेला नाही. काही इतिहास संशोधकांनुसार सोळाव्या शतकात ह्या किल्ल्याचा ताबा अहमदनगरच्या निजामाकडे होता तर सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजहानाने मराठवाड्यातील इतर अनेक किल्ल्यांबरोबरच इथेही कब्जा मिळवला. पुढील दोन शतके ह्या प्रदेशावर हैदराबादच्या निजामाचा अंमल होता. निजामाच्या अखत्यारीतील इतर किल्ल्यांप्रमाणे हा विसागड ही स्वतंत्र भारतात सामील झाला व त्याची जबाबदारी राज्य पुरातत्व खात्याकडे आली. किल्ल्याची एकंदरीत दुरावस्था आणि सुलेखित माहितीफलकांचा अभाव पाहता पुरातत्त्व खात्याचे अजूनतरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.किल्ले तालतम… सिल्लोड तालुक्यातील अंभईनजीकच्या जंजाळा किंवा सोयगाव तालुक्यातल्या जरंडी ह्या जवळच वसलेल्या गावांवरून किल्ले जंजाळा किंवा जरंडीचा किल्ला म्हणूनही ओळख आहे. छत्रपती संभाजी नगर च्या डोंगराळ उत्तर भागात सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यांच्या सीमेवरील अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये २०० ३३’ ५७.८” उ. अक्षांश आणि ७५० ३४’ ५३.५” पू. रेखांशावर वसलेला हा किल्ला. सुतोंडाप्रमाणेच हा किल्लासुद्धा दक्खनच्या उत्तर वेशीवर राज्यरक्षणाचे जणू व्रत घेऊन धीरोदात्तपणे उभा ठाकलेला आहे.
स्थापत्यरचना
महाराष्ट्रातील अवाढव्य किल्ल्यांपैकी एक मानला जाऊ शकेल असा काहीशे एकरांचे क्षेत्रफळ व्यापलेला हा वैशागड किंवा विसागड किल्ला. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पठारावर वसलेल्या जंजाळा गावाच्या दिशेने भूदुर्ग आणि इतर दिशांना डोंगरउतार असल्यामुळे गिरिदुर्ग अशी किल्ले धारूरसारखी रचना.
अमीबासारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या किल्ल्याची तटबंदीसुद्धा काही किलोमीटर आहे. उत्तर पश्चिमेचा जरंडी दरवाजा, दरीत उतरणाऱ्या वाटेवरून वेताळवाडी किल्ल्याकडे पाहणारा आणि भव्य बुरुजांचे संरक्षण लाभलेला वेताळवाडी दरवाजा, एक चोर दरवाजा आणि ५२ बुरुज असा जामानिमा ह्या किल्ल्याला आहे. प्रत्येक दरवाज्याला देवड्या आणि काही खोल्या जोडलेल्या आहेत. वेताळवाडी दरवाज्यालगत फारसी भाषेतील शिलालेख आहेत. जंजाळा गावाच्या दिशेने ह्या भूदुर्गाच्या संरक्षणासाठी एक खंदकाची योजना दिसते. आता हा खंदक पूर्णच बुजला आहे. इथून तटबंदी फुटलेली असल्यामुळे आज किल्ल्यात जायचा सोपा मार्ग झाला आहे. मात्र ह्या बाजूला एखादे प्रवेशद्वार असेल का हा अंदाज आज लागणे अवघड आहे. ह्या भागात खंदकाच्या बाहेर पूर्वी सुरेखशी एक तोफ पडलेली होती. अंतुर किल्ल्यातील तोफेच्या चोरीनंतर संरक्षणार्थ आणि किल्लेप्रेमींच्या आग्रहाखातर आज पुरातत्त्व खात्याने ती सोनेरी महाल संग्रहालयात आणून ठेवलेली आहे.
संरक्षणरचनेबरोबर किल्ल्यात आज राणी महाल, पडका सहा खोल्यांचा वाडा, तीन कमानींची मशीद, सय्यद कबीर कादरी ह्या पीराचा दर्गाह अशा काही इमारतींचे अवशेषमात्र दिसतात. पीराच्या दर्ग्यामागे तीन ओळींचे दोन शिलालेख आहेत. त्यांचे सुयोग्य वाचन अजून झालेले नाही. सुतोंडा किल्ल्यासारखी इथली पाण्याची गरज किल्ल्यावरचे काही मोठी टाकी आणि एक तलाव यातून भागवलेली आहे.
सहाव्या शतकात कोरलेली घटोत्कच लेणी आणि किल्ला बरोबरीने पाहता येतात. मराठवाड्यातील किल्ल्यांची ढोबळ मानाने वर्गवारी केली तर दक्षिण मराठवाड्यातील भूदुर्ग लढाऊ आणि मोठी वस्ती पोटात सांभाळण्याच्या दृष्टीने स्थापत्यरचना असणारे आहेत. त्यांचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचे काम ही बऱ्याच प्रमाणात इतिहास संशोधकांकडून झालेले दिसते. उत्तर मराठवाड्यातील बहुतांशी गिरिदुर्ग हे डोंगराळ दुर्गम भागात निर्मिलेले आहेत. अंतूर, जंजाळा सोडले तर इतर किल्ल्यांमध्ये भव्य स्थापत्यरचना आणि मोठ्या वस्तीच्या खुणा सापडत नाहीत. मात्र त्यांचे भौगोलिक स्थान उत्तरेकडील हालचालींवर टेहळणी करण्यासाठी आणि वेळप्रसंगी आक्रमणे थोपविण्यासाठी मोलाचे ठरत असणार. ह्या पहारेदारांसाठी इतिहासातील नक्की कुठले पान राखून ठेवले आहे कुणास ठावे.
माहिती साभार - मराठी अनलिमिटेड
 






















 
किल्ले सुतोंडा ( नायगावचा किल्ला ).....🚩🚩🚩
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार आणि किल्ल्यावर असलेली पाण्याची २५ हून अधिक टाकी सुतोंडा किल्ल्याच्या डोंगरात असलेल जोगवा मागणारीच लेणही पहाण्यासारख आहे.
खिंडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरुन १२ फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार बनविलेले आहे.... प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस जेथे कातळ संपतो तेथे तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपर्यात तोफेसाठी गोल छिद्र (झरोका) ठेवलेल आहे प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस दरवाजाच्या व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो येथे पहारेकर्यांसाठी कट्टे आहेत. भूयारातून बाहेर पडून फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो येथून या मानव निर्मित खिंडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो.
माहिती नेट साभार....!
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...