Sunday, December 3, 2023

आशियाई स्थापत्य वैभव – जपानचा अशोक म्हणजे राजकुमार शोतोकु

 

सामना ऑनलाईन

>>डॉ. मंजिरी भालेराव

शोतोकु या राजकुमाराने चिनी इतिहास, संस्कृती, साहित्य या सर्वांचा सखोल अभ्यास केला होता. तो स्वत फार मोठा विचारवंत आणि विद्वान लेखक म्हणून काळाच्या ओघात उदयाला आला. जपानमधील बौद्ध धर्माला त्याने एक अतिशय भक्कम अधिष्ठान मिळवून दिले. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी जे कार्य हिंदुस्थानात मौर्य सम्राट अशोक याने केले तसेच कार्य जपानमध्ये राजकुमार शोतोकु याने केले.

जपानमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारास जो खरा वेग आला तो म्हणजे राजकुमार शोतोकु ताइशी याच्या काळापासून इ. स. 574 ते 622 या काळामध्ये. हा काळ जपानच्या इतिहासात आसुका कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात साम्राज्ञी सुइको जपानवर राज्य करीत होती. जपानमध्ये जरी पितृसत्ताक कुटुंब पद्धती असली तरीसुद्धा विविध कारणांमुळे तिथे स्त्रियांनी राज्य केल्याची इतिहासात नोंद आहे. अशा एकून सात साम्राज्ञी जपानमध्ये होऊन गेल्या. त्यापैकी सर्वात पहिली म्हणजे सुइको. जपानच्या राजघराण्यात राजाच्या विविध राण्यांपासून झालेली (सावत्र) बहीण-भावंडं यांचे विवाह होत असत. त्या पद्धतीने सम्राट बिदात्सु या आपल्या सावत्र भावाशी तिचा विवाह झाला होता, पण त्याची मोठी राणी मृत्यू पावल्यावर तिचे स्थान सुइको हिला मिळाले. पुढे सम्राटाच्या मृत्यूनंतर झालेल्या सत्तासंघर्षाचा परिणाम म्हणजे जपानच्या इतिहासात प्रथमच एका राणीला सिंहासनावर बसवले गेले. तिचा सख्खा भाऊ म्हणजे सम्राट योमेई याचा आधीच मृत्यू झाला होता, पण त्याचा मुलगा राजकुमार शोतोकु याला तिने आपला जावई केला. तिच्या राज्याचा सांभाळ करण्यात तसेच राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यात राजकुमार शोतोकु याचा मोठा वाटा होता.

शोतोकु हे मुळात एक वेगळय़ा प्रकारचे व्यक्तिमत्त्व होते. या राजकुमाराने चिनी इतिहास, संस्कृती, साहित्य या सर्वांचा सखोल अभ्यास केला होता. त्याच्यावर कन्फ्युशियसच्या विचारांचाही मोठा पगडा होता. त्याने चीनमधल्या कालगणनेसारखी कालगणना जपानमध्ये सुरू केली. तो स्वत फार मोठा विचारवंत आणि विद्वान लेखक म्हणून काळाच्या ओघात उदयाला आला. जपानमधील बौद्ध धर्माला त्याने एक अतिशय भक्कम अधिष्ठान मिळवून दिले. त्याने देशात राजकीय आणि धार्मिक स्थैर्य आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी जे कार्य हिंदुस्थानात मौर्य सम्राट अशोक याने केले तसेच कार्य जपानमध्ये राजकुमार शोतोकु याने केले. त्याने चीनमधून बौद्ध धर्माची सविस्तर माहिती आणि ग्रंथ आणण्यासाठी आपली माणसे पाठवली. त्यांनी अनेक बौद्ध सूत्रग्रंथ आणले. चीनमधील राजकीय आणि सामाजिक संस्था यांचीही माहिती यानिमित्ताने जपानमध्ये आली. त्याचा परिणाम म्हणून चीन तसेच कोरियामधल्या राजदरबारात प्रचलित असलेल्या काही प्रथा जपानमधेही सुरू झाल्या. यामध्ये दरबारातील व्यक्तींना त्यांच्या पदाप्रमाणे शिरोभूषण देणे या परंपरेचा समावेश होतो. तसेच त्याने 17 कलमांची राज्यघटनासुद्धा तयार केली. जगातील सर्वात प्राचीन राज्यघटनांमध्ये तिचा समावेश होतो. एखाद्या देशाच्या राज्यघटनेमध्ये साधारणपणे विविध प्रकारचे नियम किंवा राजकीय स्वरूपाची कलमे असतात, पण या राज्यघटनेमध्ये मात्र बौद्ध धर्म तसेच कन्फ्युशियन विचार यावर आधारलेली काही मूल्ये दिली आहेत.

राजकुमार शोतोकु याने तिथे बरीच मंदिरेही उभारली. साम्राज्याचा पाया बळकट करताना त्याला काही वेळेस संघर्षालाही तोंड द्यावे लागले. त्यामध्ये मोनोनोबे घराण्याच्या लोकांशी त्याचा मोठा संघर्ष झाला. त्यामध्ये त्याला विजय मिळाला. या संघर्षाचे कारण जसे राजकीय होते तसेच धार्मिकही होते. नवीन देवाच्या म्हणजे बुद्धाच्या उपासनेला सुरुवात झाली तर जुने शिंतो देव आपल्यावर नाराज होतील असा या मोनोनोबे लोकांचा समज होता. बौद्ध धर्मातील चार दिशांचे रक्षणकर्ते लोकपाल असलेल्या चार महाराजांना जेव्हा शोतोकुने मदतीचे आवाहन केले तेव्हा त्यांनी त्याला या युद्धात मदत केली आणि त्याचा विजय झाला अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे त्याने त्यांचे एक मंदिर आजच्या ओसाका प्रांतात बांधले. त्या मंदिराचे नाव ‘शितेन्नो-जी’ (चार दैवी राजांचे मंदिर) असे होते. हे जपानमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक होते.

राजकुमार शोतोकु फक्त बौद्ध धर्माचा आश्रयदाताच होता असे नाही तर तो स्वत: अभ्यासकही होता. त्या काळातील इतर कोणाहीपेक्षा त्याची बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाची समज जास्त चांगली होती. याव्यतिरिक्त त्याच्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची चुणूक आपल्याला त्याच्या साहित्यकृतीतही पाहायला मिळते. त्याने सद्धर्मपुण्डरीकसूत्रम्, विमलकीर्तीनिर्देशसूत्र आणि श्रीमालादेवीसिंहनादसूत्र या तीन महत्त्वाच्या महायान सूत्रांवर सविस्तर अभ्यासपूर्ण भाष्ये लिहिली.

राजकुमार शोतोकु जरी बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाचा विद्वान आणि आश्रयदाता असला तरी त्याला शिंतो धर्मातील कामी (देव) पण तितकेच जवळचे होते. असे म्हटले जाते की, बौद्ध मंदिरात (तेरा किंवा देरा) जाण्यापूर्वी तो शिंतो मंदिरात (जिंजा) जाऊन त्या देवतांचे दर्शन घेऊन मग बुद्धाच्या मंदिरात जात असे. बौद्ध आणि शिंतोधर्मीय लोकांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याकडे त्याचा कल होता हे स्पष्टच दिसते. आपली प्रजा सुखी व्हावी आणि समाधानाने राहावी यासाठी त्याने आणि राणी सुइको यांनी ‘होर्यु-जी’ हे मंदिर इ. स. 607 मध्ये बांधले. तो एक बौद्ध मठ तसेच एक शैक्षणिक केंद्रही होते, पण त्यावर वीज पडून तेथील अनेक इमारती जळून खाक झाल्या. पुढे तिथे अनेक इमारतींची पुनर्बांधणी झाली. 1939 मध्ये झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात तिथे राजकुमार शोतोकुच्या राजवाडय़ाचे अवशेष मिळाले. पुढे 1993 मध्ये ‘होर्यु-जी’ आणि ‘होक्की-जी’ या दोन मंदिरांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. जपानमधील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद झालेल्या या सर्वात पहिल्या वास्तू होत.

राजकुमार शोतोकु याने जपानमध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित होण्यासाठी जे कार्य केले त्याची दखल नेहमीच घेतली गेली आणि त्याला ‘Father of Japanese Buddhism’ अशी उपाधीही मिळाली. जपानमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारातील त्याचे स्थान इतके महत्त्वाचे होते की, त्याला लोक तिथे बोधिसत्त्वच समजतात. ‘होर्यु-जी’ मंदिरातील कान्नोन म्हणजे अवलोकीतेश्वराची 7 व्या शतकातील मूर्ती हे शोतोकुचेच अंकन मानले जाते. त्याचे चित्र जपान सरकारने पूर्वी अनेक चलनी नोटांवरसुद्धा छापले होते. जपानी लोकांना त्याचा कधीही विसर पडला नाही.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

manjirib24@gmail.com




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...