Sunday, December 3, 2023

आमचा वादळी प्रवास

 सकाळ साप्ताहिक


लेखक : गौतम पंगू

दोनअडीच तास विमान सुटण्याची वाट बघून कंटाळलेल्या प्रवाशांमध्ये आता स्टाफशी वाद घालण्याचाही उत्साह नव्हता… निमूटपणे सगळे प्लेनबाहेर पडलो आणि पुन्हा गेटच्या भागात आलो. प्रवाशांनी जागा मिळेल तिथं सामान टाकलं. कुणी खुर्च्यांवर बसून डुलकी काढायला लागले, तर कुणी सामान उशाला घेऊन सरळ जमिनीवर झोपणं पसंत केलं. कंटाळलेली तान्ही मुलं रडायला लागली, तर थोडी मोठी मुलं इकडंतिकडं पळायला लागली. लवकरच गेटला ‘यष्टी ष्ट्यांडा’ची कळा आली….

मर्फीचा नियम असं सांगतो की एखादं महत्त्वाचं काम करत असताना जे जे म्हणून काही चुकण्याची शक्यता असते ते ते सगळं हटकून चुकतंच! हा नियम विशेषतः प्रवासाला निघालं की खरा ठरलाच पाहिजे, असं आमच्या नशिबात आहे. पण तो दिवस मात्र अपवाद होता. प्रवासाला निघालं की जे गोंधळ होतात, त्यातला एकही न होता बोर्डिंग सुरू व्हायच्या चक्क अर्धा तास आधी आम्ही गेटपाशी होतो. फ्लाइट वेळेवर सुटणार होती. सुट्यांच्या सीझनमध्ये ऐनवेळी काढूनही तिकिटं स्वस्त मिळाली होती. पुढचे पाच दिवस आमच्या भागातच काय, तर जवळजवळ सगळ्या अमेरिकेत येऊ घातलेलं ‘वन्स-अ-जनरेशन’ हिमवादळ टाळून आम्ही योग्य वेळी एका तुलनेनं गरम ठिकाणी निघालो होतो. मी पुढाकार घेऊन या ट्रीपचा प्लॅन परफेक्ट जुळवून आणल्यानं स्वतःवरच खूश होत बायकोला म्हटलं, “कसा मारलाय मास्टरस्ट्रोक!” “आधी विमान उडू दे, मग बोलू. तू त्याआधीच आत्मप्रशस्तीचं विमान उडवू नको.” मला जमिनीवर आणत ती थंडपणे म्हणाली.

बोर्डिंगला सुरुवात झाली. सुहास्य मुद्रेनं सगळ्यांचं स्वागत करणाऱ्या गेटवरच्या एजंटनं मला मात्र अडवलं.

“तुमच्या बॅगा आम्ही नेमून दिलेल्या आकारात बसत नाहीत. तुम्हाला जादा पैसे भरावे लागतील.”

झालं असं होतं की ऐनवेळी प्लॅनिंगला सुरुवात केल्यानं नेहमीच्या एअरलाइनची तिकिटं काहीच्या काही महाग झाली होती, म्हणून मी एका नवीन आणि स्वस्त विमानप्रवासाची जाहिरात करणाऱ्या एअरलाइनची तिकिटं काढली होती. तिकीट जरी स्वस्त असलं तरी बाकीच्या प्रत्येक गोष्टीत ही एअरलाइन प्रवाशांकडून जास्तीत जास्त पैसे उकळायचा प्रयत्न करते हे ऐकलं होतं. केबिन बॅगचा आकार एका मर्यादेपेक्षा मोठा असला तर त्याला ते अवाच्या सव्वा पैसे लावतात हे वाचून मी आकार मोजून योग्य त्या बॅगच निवडल्या होत्या (असं मला वाटलं होतं). पण लहानपणापासून गणिताशी वाकडं असल्यानं सेंटिमीटर, इंच आणि फूट यांच्या आकडेमोडीत माझी काहीतरी गफलत झाली होती आणि त्या बॅग मर्यादेपेक्षा मोठ्या असल्याचं ऐनवेळी निष्पन्न झालं होतं.

“असं कसं? मी घरी मोजून बघितलंय. थांबा तुम्हाला दाखवतो,” मी उगाचच घोडं दामटलं आणि आमच्या बॅग त्यांनी आकार तपासून बघायला ठेवलेल्या साच्यात कोंबाकोंबी करून बसवून दाखवायचा निष्फळ प्रयत्न सुरू केला. तो साचा मोडेल अशी चिन्हं दिसायला लागल्यावर ती एजंट वैतागली. “सर, प्लीज स्टॉप,” लोकांवर रागवताना वापरायचा ठेवणीतला उद्धट ‘सर’ तिनं माझ्यावर फेकला. बायकोही मला म्हणाली, “इनशर्ट करताना कोंबून पोट बसवतोस तशा बॅग साच्यात बसवून काही होणार नाहीये. त्यापेक्षा किती पैसे भरायला लागणार आहेत ते विचारू.” एजंटनं रक्कम सांगितल्यावर ते हिमवादळ आधीच आल्यासारखी मला हुडहुडी भरली, पण बायको पुढं होऊन एजंटला म्हणाली, ‘‘ऐक नं, माझ्या नवऱ्याला वाटलं की तो योग्य आकाराच्या बॅग भरतोय, पण त्यानं नेहमीप्रमाणं घोळ घातला. हजबंड्स, यू नो…” एजंटनंही मान हलवली. त्यांचं दोनेक मिनिटं गुफ्तगू झालं. एजंटनं माझ्याकडं अपार करुणेनं भरलेला दृष्टिक्षेप टाकला. ‘फक्त तू म्हणून हे ध्यान सांभाळतेस गं बाई!’ अशा नजरेनं बायकोकडं पाहिलं, बॅगांची फी थोडी कमी केली आणि आम्ही विमान बोर्ड केलं.

“तुम्हां सगळ्या चतुर लोकांचं आमच्या विमानात स्वागत आहे,”

पायलटचा उत्साही आवाज विमानात घुमला. ‘‘तुम्ही हुशारीनं फिलाडेल्फियात हिमवादळ यायच्या आत इथून दूर निघाला आहात आणि आम्ही तुम्हाला आज रात्रीच इथून घेऊन जाऊ, हे आमचं वचन आहे.” मघाच्या बॅग प्रकरणानं दुखावला गेलेला माझा इगो पायलटच्या या वाक्यानं पुन्हा कुरवाळला गेला आणि मी बायकोकडं कुर्रेबाज नजर टाकली. “पण आपल्या विमानाला एक इवलुसा, अगदी चिंटूसा मेंटेनन्स इश्यू आहे, तो वीसेक मिनिटांत रिझॉल्व्ह होईल आणि मग आपण निघूच! मी तुम्हाला अपडेट देईनच.” वीस मिनिटंच नं? तोवर एखादी डुलकी काढू असा विचार करून मी डोळे मिटले. अर्ध्या तासानं पायलटचा पुन्हा आवाज आला, ‘‘कबूल केल्याप्रमाणं मी अपडेट द्यायला आलोय- बघा मी शब्दाचा पक्का आहे की नाही! तर झालंय असं की ते मेंटेनन्सवाले लोक अजून आले नाहीयेत. खूप विमानं आज रात्री इथून टेकऑफ करणार आहेत, त्यामुळं पुरेसा स्टाफ नाहीये, शिवाय बाहेर किती थंडी आहे ते तुम्ही जाणताच. त्यामुळं ते लोक नक्की कधी येणार आम्हाला सांगता येत नाहीये, पण ते कोणत्याही क्षणी येऊ शकतील बरं का! तोवर तुम्ही आमचं कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक एन्जॉय करा आणि रिलॅक्स व्हा. पुढचं अपडेट घेऊन मी वीस मिनिटांत येतोच.”

बायकोनं वैतागून माझ्याकडं बघितलं. “होऊ दे नं थोडा उशीर, काय बिघडलं? निदान फुकट ड्रिंक तरी देतायत,” मी सारवासारव केली. पण ते कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक म्हणजे अक्षरशः फक्त पाणी निघालं. ही स्वस्त एअरलाइन प्रवाशांना पाण्याशिवाय काहीही फुकट देत नाही हे वाचलं होतं ते आठवलं. एअरहोस्टेस सगळ्यांना आग्रह करकरून अमृत दिल्यासारखं पाणी देत होत्या. बायकोच्या रागीट नजरा झेलून माझ्याही तोंडचं पाणी पळालं होतं, त्यामुळं मी दोनतीन ग्लास पाणी रिचवलं आणि पुढच्या अपडेटची वाट बघत गप बसलो.

“मित्रांनो, एक गूड न्यूज आहे,” पायलट म्हणाला तसा सुस्तावलेल्या प्रवाशांमध्ये उत्साह संचारला. पण त्याचे पुढचे शब्द ऐकून तो उत्साहाचा फुगा फुस्स झाला. “आम्हाला दुरून एक माणूस आपल्या विमानाकडं येताना दिसतोय. तो नक्की कोण आहे ते माहीत नाही, पण तो मेंटेनन्सचा असायची दाट शक्यता आहे! म्हटलं होतं की नाही मी तुम्हांला अपडेट देईन म्हणून?” प्रवाशांची आता ‘फ्लाइट नको, पण अपडेट आवर’ अशी अवस्था झाली होती. ‘आम्हाला तिकीट कॅन्सल करून घरी जाऊ द्या,’ अशी काही प्रवाशांनी मागणी केली. पण पायलट मात्र ‘आज मी तुम्हाला नेणारच – मग मला विमान गाडीसारखं रस्त्यावरून चालवत न्यावं लागलं तरी बेहत्तर!’ अशा निश्चयाला पेटला होता. वैतागलेल्या प्रवाशांमध्ये एक छोटीशी बंडाळी माजली आणि ते उठून एअरलाइनच्या स्टाफला न जुमानता विमानात इकडंतिकडं फिरायला लागले. कॉम्प्लिमेंटरी पाणी रिचवलेल्या काही मंडळींनी विमानातल्या रेस्टरूमच्या समोर रांग लावली. हा गोंधळ काबूत आणता आणता हवाईसुंदऱ्यांची एकाच तारांबळ उडाली.

‘‘मित्रांनो, पुढचं अपडेट ऐका,’’ या सगळ्या गडबडीत पुन्हा पायलटची आकाशवाणी झाली, ‘‘मघाचा तो माणूस मेंटेनन्सचा नव्हताच मुळी. चेक इन केलेलं सामान विमानात लोड करणाऱ्या स्टाफपैकी तो एक होता. सामानाबरोबर त्यानं चुकून स्वतःच्या घराची किल्ली आत टाकली होती, ती घ्यायला तो घाईघाईनं आला होता. बघा, विमान लेट झालं ते एका दृष्टीनं बरं झालं की नाही? विमान वेळेवर सुटलं असतं तर त्या बिचाऱ्याला आजची रात्र कुडकुडत घराबाहेर काढायला लागली असती! असो. आता मात्र खरोखर मेंटेनन्सचा माणूस विमानाकडं येतोय. पण काय आहे, तो येणार, सर्व्हिसिंग करणार, टेस्टिंग करणार, विमानाला पुन्हा क्लिअरन्स मिळणार, मग आम्हाला विमानाची थोडी साफसफाई करावी लागणार… या सगळ्या प्रकारात तास दीड तास सहज जाईल. इथं विमानात बसण्यापेक्षा तुम्ही पुन्हा बाहेर गेट एरियामध्ये जा, तिथं मस्त आराम करा, आणि विमान रेडी झालं की पुन्हा बोर्ड करा. आहे की नाही चांगली आयडिया? तुम्हाला आराम मिळावा हेच आमचं ध्येय आहे!’’

दोनअडीच तास विमान सुटण्याची वाट बघून कंटाळलेल्या प्रवाशांमध्ये आता स्टाफशी वाद घालण्याचाही उत्साह नव्हता. निमूटपणे सगळे प्लेनबाहेर पडलो आणि पुन्हा गेटच्या भागात आलो. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. गेटच्या आसपासची सगळी दुकानं, रेस्टॉरंट बंद झाल्यामुळं तिथं शुकशुकाट होता. प्रवाशांनी जागा मिळेल तिथं सामान टाकलं. कुणी खुर्च्यांवर बसून डुलकी काढायला लागले, तर कुणी सामान उशाला घेऊन सरळ जमिनीवर झोपणं पसंत केलं. कंटाळलेली तान्ही मुलं रडायला लागली, तर थोडी मोठी मुलं इकडंतिकडं पळायला लागली. लवकरच गेटला ‘यष्टी ष्ट्यांडा’ची कळा आली. गेटवर एअरलाइनची एक एजंट बिचारी जांभया दाबत उभी होती. शेवटी एकदाचा तो ‘क्षण भाग्याचा’ आला आणि रात्री साडेबारा वाजता तिनं बोर्डिंग सुरू होतंय अशी अनाउन्समेंट केली. अर्धवट सुषुम्नावस्थेत आम्ही पुन्हा विमानात गेलो आणि आपापल्या जागी बसलो. “वेलकम बॅक मित्रांनो, आता अजून एक अपडेट…” पायलटचा आवाज आला आणि पुन्हा आमच्या काळजात धडकी भरली. पण सुदैवानं यावेळचं अपडेट चांगलं होतं. “विमानाचा सर्व मेंटेनन्स पूर्ण झालेला आहे, आणि आपण आता उड्डाणाला सज्ज आहोत. एका अर्थी बरंच झालं नाही का? आता मध्यरात्र झालीये. तुम्हाला मस्त झोपता येईल. साडेचार तासांची आपली फ्लाइट आहे. पहाट होता होता आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येईल. म्हणजे तुमची एक झोप तरी व्यवस्थित होईल. आम्ही जे करतो ते विचार करूनच करतो!” या अनाउन्समेंटनंतर काही प्रवाशांनी उपरोधिकपणे टाळ्या वाजवल्या.

“काहीही म्हणा, कुठल्याही गोष्टीकडं सकारात्मकतेनं बघायची या पायलटची सवय चांगली आहे,” मी बायकोला म्हटलं, ‘‘थोडा उशीर झाला तरी काय झालं? शेवटी वादळापासून लांब जातोय हे महत्त्वाचं नाही का?” तिनं माझ्याकडं थंडपणे बघून मान हलवली आणि काहीही न बोलता तिचा फोन माझ्या हातात दिला. त्यावर वेदर ॲप उघडलं होतं आणि येणाऱ्या वादळाचा मॅप दाखवला होता. त्यात चक्क असं दिसत होतं की मागच्या काही तासांत वादळानं आपली दिशा बदलली होती आणि उद्यापासून पुढचे काही दिवस नेमकं आम्ही जिथं चाललो होतो तिथं आता कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीचं भाकीत केलं गेलं होतं!

‘खाऊ की गिळू’ असा दृष्टिक्षेप माझ्यावर टाकत तिनं फोन

माझ्या हातातून काढून घेतला आणि दुसरीकडं नजर फिरवली. ‘उद्यापासून कुठल्या वादळाचा सामना करायला लागतोय काय माहीत?’ असं पुटपुटत मी डोळे मिटले आणि आमच्या विमानानं हवेत झेप घेतली. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...