Sunday, December 3, 2023

आशियाई स्थापत्य वैभव – उगवत्या सूर्याच्या देशातील स्थापत्य वैभव

 

सामना ऑनलाईन

>>डॉ. मंजिरी भालेराव

आज संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱया देशांमधला सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली देश म्हणजे जपान. साधारणपणे इ.स.च्या 6व्या शतकापर्यंत जपानमध्ये शिंतो या धर्माचाच प्रभाव होता. ‘आसुका कालखंडामध्ये जपानमध्ये बौद्ध धर्माने शिरकाव केला आणि तेव्हापासून विविध प्रकारचे चढ-उतार पाहत, कधी स्थानिक धर्माशी संघर्ष तर कधी हातमिळवणी करत तो आतापर्यंत टिकून राहिला आहे.

’उगवत्या सूर्याचा देश‘ म्हणून प्रसिद्ध असलेला जपान हा अतिपूर्वेकडचा देश, आकाराने जरी छोटासा असला तरी राखेतून उठणाऱया फिनिक्स पक्ष्यासारखा आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आकाशात भराऱया मारतो आहे. हिंदुस्थानसारखीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या देशाशी फार पूर्वीपासूनच हिंदुस्थानींचे नाते आहे. आज संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱया देशांमधला सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी प्रभावशाली देश म्हणजे जपान आहे. हिंदुस्थान ही गौतम बुद्धाची जन्मभूमी असल्यामुळे हिंदुस्थानवर या देशाचे विशेष प्रेम आहे. हिंदुस्थानमध्ये बौद्ध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विविध सोयीसुविधा तयार करण्यासाठी मदत करायला जपान नेहमी अग्रेसर असतो आणि कोटय़वधी रुपयांच्या देणग्या देत असतो. अजिंठा, सारनाथ, बोध गया या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी जपानने मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत केली आहे हे आपल्याला ज्ञातच आहे. नेपाळमध्येसुद्धा भूकंपानंतर ज्या वारसा स्थळांना हानी पोचली होती, त्यांना जपान सरकारने मदतीचा हात देऊ केला आहे.

आपल्या धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याची भावना त्यांच्या मनात येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या स्वतच्या देशाचा प्राचीन सांस्कृतिक वारसा. हा वारसा जसा स्थानिक शिंतो या धार्मिक परंपरेचा आहे, तसाच खूप मोठय़ा प्रमाणात बौद्ध धर्माचाही आहे. फार प्राचीन काळापासून जपानमध्ये बौद्ध धर्माचे पालन होत आले आहे. जपानचा इतिहास जर पाहायला गेले तर अश्मयुगापासून या देशात मानवाची वस्ती असावी असे पुरावे आहेत, पण अंदाजे इ.स.पूर्व 14,000 पासून तिथे मानवाच्या वस्तीचे स्पष्ट अवशेष दिसतात. ‘जोमोन कालखंड‘ नावाने ओळखल्या जाणाऱया या काळातील लोकांची संस्कृती त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. ते लोक भांडे ओले असताना त्यावर दोरखंडाने नक्षीकाम करत असत, नंतर वाळवून भाजत असत. त्यामुळे ती नक्षी पक्की राहत असे. त्यानंतर जपानमध्ये ‘यायोई‘ नावाच्या लोकांच्या समूहाचे अस्तित्व दिसते. त्यांच्या काळात जपानमध्ये नवाश्मयुगीन तंत्रज्ञानाचे आगमन झालेले दिसते. ते पुढे कास्ययुग आणि नंतर लोहयुगात विकसित झाले असावे असे लक्षात येते.

जपानमध्ये शेतीला सुरुवात झाल्यानंतर भटके जीवन संपवून स्थिर जीवन जगायला सुरुवात झाली आणि लोकसंख्येची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. सामाजिक स्तरवारीची जडणघडण व्हायला सुरुवात झाली. विविध लोकसमूहांमध्ये युद्धं होऊ लागली. इ.स.च्या पहिल्या शतकात चीनमधील हान राजांच्या काळात पूर्ण झालेल्या एका ग्रंथात जपानचा पहिला लिखित उल्लेख सापडतो. त्यामध्ये जपानचे नाव ‘वा’ असे दिलेले आहे. चीन आणि कोरियातील साधनांमध्ये जपानला ‘वा’ असे संबोधलेले दिसते. अनेक इतिहासकारांच्या मते हे ‘यामातो’ राज्याचे संबोधन असावे. याबरोबरच ‘कोजिकी’ आणि ‘निहोन शोकी’ हे ग्रंथसुद्धा प्राचीन जपानच्या इतिहासाची माहिती सांगतात, पण जसे जगातील सर्व देशांच्या बाबतीत घडते तसेच जपानच्या बाबतीत आहेच, ते म्हणजे प्राचीन काळाबद्दलच्या ऐतिहासिक आणि दंतकथा स्वरूपातील नोंदींचे मिश्रण. या सर्व ग्रंथांमधून काही पारंपरिक दंतकथासुद्धा नोंदल्या गेल्यामुळे नेमके ऐतिहासिक तथ्य कोणते आणि कल्पना कोणती हे समजणे अवघड जाते. या सर्व लिखित साधनांमधून हे मात्र लक्षात येते की, जपान आणि चीन यांचे प्राचीन काळापासून अतिशय घनिष्ठ संबंध होते. जपानच्या संस्कृतीवर चिनी धर्माचा आणि संस्कृतीचा खूप प्रभाव पडला होता. जपानचा मूळचा निसर्गपूजक धर्म म्हणजे शिंतो. जपानी लोकांची मूल्यव्यवस्था, विचार आणि आचरण यांच्याशी शिंतोचा घनिष्ठ संबंध आहे. शिंतो धर्माचे सिद्धांत काय असावेत याचे अनुमान पौराणिक व धार्मिक चालीरीतींच्या वर्णनांतून काढता येते. सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे जे काही महान असेल, त्याला प्राचीन जपानी लोक देवत्व बहाल करीत. उदा. पृथ्वी, समुद्र, पर्वत, प्राणी, वनस्पती यातले अनेक देव हे अनेक कुटुंबांचे रक्षक देवही होते.

काळाच्या ओघात यामध्ये अमातेरासु किंवा अमातेरासु-कामी म्हणजे सूर्य या देवतेचे स्थान खूप महत्त्वाचे बनले. जपानमधील जनतेची रक्षण करणारी देवता म्हणून सूर्याची उपासना व्हायला सुरुवात झाली. इथे स्त्राr रूपात सूर्याची उपासना होते. शिंतो देवतांना ‘कामी’ अशी संज्ञा आहे. देवतेच्या नावापुढे ‘-कामी’ हा प्रत्यय लावलेला अनेकदा दिसून येतो. साधारणपणे इ.स.च्या 6व्या शतकापर्यंत जपानमध्ये शिंतो या धर्माचाच प्रभाव होता असे दिसते, पण साधारणपणे इ.स. 538मध्ये (काहींच्या मते 552) मध्ये कोरियामधून जपानमध्ये बौद्ध धर्माचे आगमन झाले. इ.स.538 ते 710 हा कालखंड जपानच्या इतिहासात ‘आसुका कालखंड’ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये जपानमध्ये बौद्ध धर्माने शिरकाव केला आणि तेव्हापासून विविध प्रकारचे चढ-उतार पाहत, कधी स्थानिक धर्माशी संघर्ष तर कधी हातमिळवणी करत तो आतापर्यंत टिकून राहिला आहे. या धर्माचा प्रभाव चीन, कोरिया या देशांमध्ये पडल्यावर त्यांच्या शेजारचा महत्त्वाचा देश जपानवर न पडता तरच नवल होते. जपानमधील बौद्ध धर्माच्या प्रवेशाची, स्थिर होऊन स्वतचे स्थान पक्के करायची कहाणी खूप रंजक आहे. जुन्या प्रस्थापित शिंतो धर्माचे स्थान डळमळीत करून हा नवीन बौद्ध धर्म जपानमध्ये कसा प्रस्थापित झाला आणि त्याअनुषंगाने कला आणि स्थापत्याचे वैभव कसे बहराला आले, हे इथून पुढच्या काही भागांमध्ये पाहू या! सायोनारा!

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट
प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

– manjirib24@gmail.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...