Saturday, December 9, 2023

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

Who am I

नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .

९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा ! 

२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .

सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला . तोल गेला की कपाळमोक्ष निश्चित ! अशा ज्या पारंपारिक मार्गाने केवळ एक टक्का परिक्रमावासी व नागा साधू जातात ,त्या मार्गाची ही एक डोळस अंतर्यात्रा ... 

परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .

ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय ,  स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .

कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .

आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !

चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा

 नर्मदे हर !

हर हर नर्मदे !

(वाचनाचा अधिक आनंद मिळवण्यासाठी कृपया सर्व लेख क्रमानुसार वाचावेत . प्रत्येक लेखाच्या आरंभी आणि शेवटी लेखांक दिलेला आहे )

नर्मदे हर ! मातुगंगे हर ! जटाशंकरी हर! ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव ! 

https://mazinarmadaparikrama.blogspot.com/2023/02/blog-post_66.html


अनुक्रमणिका
(जे प्रकरण वाचायचे आहे त्याच्यावर क्लिक करा )

१ लेखांक एक : नर्मदे हर
९ लेखांक नऊ : इंदोरी पोहे आणि गरमागरम जिलेबी
१८ लेखांक अठरा : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश
२७ लेखांक सत्तावीस : नर्मदेचे उगमस्थान श्रीक्षेत्र अमरकंटक
३३ लेखांक तेहत्तीस ( अपूर्ण )
३४ लेखांक चौतीस
३५ लेखांक पस्तीस
३६ लेखांक छत्तीस
३७ लेखांक सदोतीस
३८ लेखांक अडोतीस
३९ लेखांक एकोणचाळीस
४० लेखांक चाळीस
४१ लेखांक एक्केचाळीस
४२ लेखांक बेचाळीस
४३ लेखांक त्रेचाळीस
४४ लेखांक चव्वेचाळीस
४५ लेखांक पंचेचाळीस
४६ लेखांक सेहेचाळीस
४७ लेखांक सत्तेचाळीस
४८ लेखांक अठ्ठेचाळीस
४९ लेखांक एकोणपन्नास
५० लेखांक पन्नास
५१ लेखांक एक्कावन्न
५२ लेखांक बावन्न
५३ लेखांक त्रेपन्न

 लेखांक १ : नर्मदे हर !

नर्मदे हर ! परमहंस परिव्राजकाचार्य अवधूतानंद महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले नर्मदे ss हर हर हे पुस्तक वाचल्यापासून नर्मदा जलाचा खळखळाट कानाला रुंजी घालत होता .कृष्णमेघ आणि चैतन्य हे त्यांचे दोन्ही चिरंजीव मुलखाचे अवलिया आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे खात्री होती की पुस्तकातले अनुभव बऱ्यापैकी अद्भुत आणि सत्य असणार . माझ्याकडे नर्मदे हर या पुस्तकाची स्वतः कुंटे यांनी स्वाक्षरी केलेली प्रत आहे !
प.प. अवधूतानंद महाराज ( पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे )
अवधूतानंद स्वामी यांची स्वाक्षरी असलेली प्रत

परंतु खरे सांगायचे तर त्यातील काही गोष्टी ह्या अतिरंजीत आहेत असे मला विनाकारण वाटायचे .तसेच त्यांनी पुस्तक मेधा पाटकर यांना अर्पण केले होते ते देखील मला मान्य नव्हते , कारण मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात मेधा पाटकर यांच्याबरोबर जवळून काम केलेले होते व त्यांच्या कामाचे "खरे गमक " मला पक्के उमगल्यामुळे मी त्या कामातून बाहेर पडलो होतो .  त्यांची बाकीची अनेक पुस्तके देखील मी वाचली आहेत . परंतु नर्मदे हर या पुस्तकातील त्यांचे अनुभव हे जास्त हृदयस्पर्शी वाटायचे . आणि त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीमुळे आपण स्वतः तिथे राहून तो अनुभव जगतो आहोत असे वाटायचे .काहीही म्हणा परंतु नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा कोणाच्याही मनामध्ये सहज उत्पन्न करणारे हे पुस्तक आहे हे कोणी देखील मान्य करेल . 

ह्या पुस्तकामुळे नर्मदा परिक्रमेतील मराठी टक्का निर्विवादपणे वाढला आहे

माझ्या मावशीची एक घनिष्ट मैत्रीण सौ माया दिवाण यांनी देखील दोन परिक्रमा केल्या होत्या व त्यातील एक परिक्रमा पायी आणि एकटीने केली होती त्याचे अनुभव देखील तिने मला खूप सांगितले होते .ते अनुभव ऐकून खूप अद्भुत आणि जबरदस्त वाटले होते .त्या अनुभव कथनामुळे देखील नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली होती .सज्जनगडावरील एक तरुण रामदासी मंदार बुवा रामदासी यांनी देखील दरम्यानच्या काळात ९२ दिवसाची शीघ्र नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती व त्यांचे देखील अलौकिक अनुभव सज्जनगडावर बसून ऐकण्याचा योग आला होता . तेव्हा देखील असे वाटले होते की आपण कधी ही परिक्रमा करणार कोण जाणे .

       समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी (दादेगाव )
मला अनेक साधुसंतांचा सहवास परमेश्वरी कृपेने आजवर लाभला आहे .परंतु देहधारी सद्गुरूंचा सहवास लाभणे यासारखे भाग्य नसते .त्या बाबतीत देखील मी भरपूर श्रीमंत आहे . माझे सद्गुरु देहात असताना त्यांचा पुरेपूर सहवास मला लाभलेला आहे .बडोदा येथील थोर संत श्री जनार्दन स्वामी खेर यांच्या सहवासामध्ये असताना मी त्यांना परिक्रमेविषयी विचारले होते . 

बडोदा जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहत असल्यामुळे परमपूज्य स्वामींना नर्मदेविषयी विशेष आकर्षण आणि ओढ नेहमीच होती .
श्री नाना महाराज तराणेकर आणि टेंबे स्वामी
श्री रंगावधूत महाराज आणि टेंबे स्वामी

त्यांनी मला परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उपाख्य श्री टेंबे स्वामी महाराज , श्री नाना महाराज तराणेकर इंदोर आणि बापजी श्रीरंगावधूत महाराज नारेश्वर यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांविषयी माहिती सांगितली होती .आणि शक्य होईल त्या प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे हे सांगितलं होतं .ही सर्व दत्त संप्रदायातील अतिशय थोर विभूतीमत्वे आहेत . जनार्दन स्वामींचे गुरु म्हणजे नाना महाराज तराणेकर . रंगावधूत महाराज देखील याच परंपरेतील .आणि या तिघांवर अनुग्रह केला होता टेंबे स्वामींनी !थोडक्यात माझ्या गुरु परंपरेतील या सर्व लोकांनी नर्मदा परिक्रमा आवर्जून केली होती !मी माझे भाग्य समजतो की मला अशा थोर विभूती मत्त्वाचा ऐन तारुण्यात सदेह सहवास लाभला !
परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या सेवेत प्रस्तुत लेखक
सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी
 बारामतीचे राहणारे व निवृत्त आरटीओ कमिशनर असणारे श्री पांडकर साहेब हे देखील माझे चांगले परिचित आहेत व आम्ही हिमालयामध्ये एकत्र ट्रेकिंग साठी गेलो असताना त्यांनी मला एकत्र नर्मदा परिक्रमा करण्याविषयी सुचविले होते . चालत नाही जमली तरी किमान सायकलने ही परिक्रमा करूयात असा त्यांचा आग्रह होता . आणि मला ती कल्पना आवडली होती परंतु मनोमन असे वाटायचे की नर्मदा परिक्रमा आयुष्यात पहिल्यांदा केली तर ती पायीच करावी सायकलने करू नये . या एकाच मुद्द्यावर आमचा किरकोळ तात्विक मतभेद होता . परंतु परिक्रमा करण्याची इच्छा मात्र तीव्र होत चालली होती . 

माझा एक लाडका मामे भाऊ आहे , वेदमूर्ती प्रीतेश दावलभक्त . त्याला भेटण्याकरिता गेलो होतो तेव्हा कळले की ह्याने देखील अतिशय सुंदर अशी पायी नर्मदा परिक्रमा केली आहे . त्याचे देखील अनुभव ऐकले आणि मन पुन्हा एकदा नर्मदा खंडामध्ये विहार करू लागले !

    २०१३ मध्ये नर्मदा परिक्रमा करणारे माझे बंधू                   वेदमूर्ती प्रीतेश दावलभक्त गुरुजी

 मी माझे केस स्वतः घरी कापतो . लॉकडाऊन लागल्यापासून मी ती सवय करून घेतली आणि स्वतः आरशाशिवाय यंत्राने मी माझे केस उत्तम कापतो ! परंतु असे असून देखील एक दिवस मी रस्त्याने असाच जात असताना एक अतिशय हाय फाय एसी युनिसेक्स सलून मला दिसले .सिजर्स नावाचे हे सलून बिबवेवाडी मध्ये भगली हॉस्पिटल रस्त्यावर आहे . अशा कुठल्या सलून मध्ये मी आयुष्यात कधी जाण्याची शक्यताच नाही परंतु असे असून देखील मला असे उगाच वाटले की आपण या सलून मध्ये आत्ता जावे आणि केस कापून घ्यावेत !

एकदा केस कापले की महिनाभर केस दाढीकडे मी पुन्हा लक्ष देत नाही आणि पुढच्या वेळी केस कापताना जे काय कापाकापी करायची असेल ती करून घेतो . आपल्या जिवंत मानवी शरीरामध्ये दोन मृत अवयव आहेत ,त्यातील एक म्हणजे केस आणि दुसरा म्हणजे नखे . त्यामुळे या दोघांची सर्वसामान्य स्वच्छता वगळता फारशी काळजी घेणे मला आवडत नाही आणि तशी काळजी , रंगरंगोटी , स्टाईल्स प्रमाणाबाहेर व विनाकारण करून घेणारी माणसे ही मला थोडीशी दांभिकच वाटतात ! असो . या सलून मध्ये गेल्यावर तिथले मालक वैभव दळवी हे शक्यतो कोणाचे केस कापत नाहीत . गल्ल्यावर बसलेले असतात . आणि त्यांची माणसे केस कापत असतात . अगदीच फार गर्दी असेल तर ते स्वतः काही ठराविक लोकांचे केस कापून देतात . 
 
श्री वैभव दळवी आपल्या केशकर्तनालयामध्ये

परंतु त्या दिवशी फारशी गर्दी नसताना ते स्वतः माझे केस कापायला आले . आणि केसाला कात्री लावल्या लावल्या त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे का ? हा प्रश्न माझ्यासाठी त्या ठिकाणी अतिशय अनपेक्षित असाच होता ! कारण माझ्या डोक्यामध्ये नर्मदा परिक्रमेविषयी विचार चालू आहेत हे माझ्या काही जवळच्या मोजक्या मित्रांना सोडले तर कोणालाच माहिती नव्हते अगदी घरी सुद्धा माहिती नव्हते ! कारण पाच सहा महिने घरापासून लांब राहायचे अशी परवानगी तरुण वयामध्ये घरून मिळण्याची शक्यता अतिशय दुरापास्तच आहे !
 या प्रश्नाने मी एकदम चमकलो आणि त्यांना म्हणालो तुम्ही मला असे का विचारत आहात ? ते म्हणाले मला असे वाटले की तुम्हाला हा प्रश्न विचारावा . मी विचारले तुमचा काय अनुभव आहे नर्मदा परिक्रमे विषयी ? ते म्हणाले मी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करून आलो आहे ! झाले ! मी त्यांना अनुभव विचारले आणि केस कापता कापता त्यांनी एक एक अनुभव सांगायला सुरुवात केली ! 
श्री वैभव दळवी यांच्या परिक्रमातील काही क्षण खालील प्रमाणे



(प्रस्तुत लेखक धूम्रपानाचा तीव्र निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी)







ते अनुभव कथन इतके रंजक होते की संपूच नये असे वाटत होते , त्यामुळे केस कापून झाल्यावर मी त्यांना दाढी सुद्धा करायला सांगितली जेणेकरून अजून वेळ मिळेल ! अशा पद्धतीने सर्व करून झाल्यावर ते मला म्हणाले तुम्ही नर्मदा परिक्रमा अवश्य करा ! मला हा एक प्रकारे नर्मदा मातेकडून आलेला संकेतच वाटला! 




लेखांक एक समाप्त (क्रमशः)

 लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

नर्मदा मातेचे सर्वप्रथम दर्शन मी भरूच मधील पुलावरून घेतलेले आहे . इथून रेल्वे जात असताना एकदा मला अचानक खूप ऊर्जा जाणवू लागली काहीतरी खालून मुंग्या अंगात येत आहेत असा भास झाला .
 म्हणून मी चटकन बर्थ वरून उठून खाली आलो आणि पाहिले तर रेल्वे गाडी नर्मदेच्या पुलावरून चालली होती ! ते नर्मदा मातेचे आयुष्यातील पहिले दर्शन होते माझे ! त्याही वेळी नर्मदा मातेच्या काठावरील परिक्रमेचा मार्ग मला अगदी ठळकपणे दिसला होता वरून ! तिथून पुढे जेव्हा मी नर्मदा आता ओलांडली तेव्हा तेव्हा पुलावर थांबून तिचे साग्र संगीत दर्शन घेतले आहे . अगदी विमानातून सुद्धा नर्मदा मैयाचे खूप सुंदर दर्शन होते ते देखील मी अनेक वेळा केलेले आहे ! 


अमरावती जवळ पिंपळखुटा नावाचा एक आश्रम आहे .तिथे परमहंस सद्गुरु श्री शंकर महाराज नावाचे अतिशय थोर विभूतीमत्व , साक्षात संत निवास करतात . माझे एक मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर त्यांच्या दर्शनाकरिता दर गुरुवारी गेली तेरा वर्षे न चुकता वारी करत आहेत . पुणे ते आश्रम हे तब्बल ६६६ किलोमीटरचे अंतर बरेच वेळा ते स्वतः गाडी चालवत जातात व चालवत येतात .

परमपूज्य संत श्री शंकर महाराज पिंपळखुटा अमरावती

मला साधुसंतांच्या दर्शनाची आणि वाहन चालवायची तसेच प्रवासाची मोठी हौस असल्यामुळे मी बरेचदा त्यांच्यासोबत जात असे. माझ्याकडून नर्मदा परिक्रमा घडेल याचे संकेत शंकर बाबांनी अडीच वर्षांपूर्वीच दिलेले होते ! परंतु तेव्हा अज्ञानामुळे मला त्याचा अर्थ कळला नव्हता . श्री बराटे साहेब नावाचे कृषी अधिकारी महाराजांच्या दर्शनाला आलेले असताना शंकर बाबा माझ्याकडे अंगुली निर्देश करत त्यांना म्हणाले हे आमचे मार्कंडेय महामुनी आहेत . मला तेव्हा याचा अर्थ कळला नव्हता म्हणून मी बराटे साहेबांना विचारला असता ते म्हणाले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडेय ऋषींचा मोठा आश्रम आहे त्या संदर्भात बाबा काहीतरी म्हणत असतील . योगायोगाने त्याच महिन्यात साहेबांची बदली गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील झाली .

यज्ञामध्ये पूर्णाहुती देताना पू. शंकर महाराज . डावीकडे काठीवाल्याच्या वेशात प्रस्तुत लेखक . सर्वात उजवीकडे बराटे साहेब .याच दिवशी बाबांनी परिक्रमेचा संकेत लेखकाला दिला होता .

 एक प्रकारे त्यांना मिळालेला हा संकेत होता परंतु माझे त्या उत्तराने समाधान झाले नव्हते . म्हणून मी बाळासाहेब वाल्हेकर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले मार्कंडेय ऋषींनी जशी महादेवाची पिंड धरून ठेवली होती तसे तुम्ही देवाला धरून रहावे अशी बाबांची इच्छा दिसते . परंतु आता परिक्रमा करून आल्यावर लक्षात येते आहे की नर्मदा परिक्रमा ही परंपराच मुळी मार्कंडेय महामुनींनी चालू केलेली आहे . असो . तर बाळासाहेबांनी सुमारे बारा मंदिरे आजपर्यंत बांधलेली आहेत , त्यातीलच एका मंदिराचे बांधकाम अमरावती जिल्ह्यामध्ये वर्ध्या नजीक मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी सुरू होते . 

विदर्भातील एक साक्षात्कारी संत श्री लहानुजी बाबा यांचे जन्मगाव असलेले हे ठिकाण तिथे त्यांचे जन्म मंदिर बांधण्याचे काम शंकर महाराजांनी बाळासाहेबांना दिले होते . सुमारे ५५ फूट उंचीचे संपूर्ण दगडी मंदिर अगदी खालपासून वरपर्यंत बांधण्याचा अनुभव मला जवळून घेता आला .

 ही संपूर्ण प्रक्रिया मला आवडली होती त्यामुळे काहीतरी शिकायला मिळते आहे या हेतूने मी जवळपास दर आठवड्याला तिकडे जात असे . अखेरीस मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला आणि त्या सर्व मूर्ती जयपूर वरून ठरलेल्या कारागिराकडून आपण मागविल्या . सुमारे १९ छोट्या मोठ्या मूर्ती होत्या . संगमरवराच्या अतिशय नाजूक कलाकुसर असलेल्या या मूर्ती विशेष पद्धतीने आणाव्या लागतात . सर्वसामान्य ट्रान्सपोर्ट वाल्याला हे काम जमत नाही . अशा पद्धतीने या मूर्ती जयपूर वरून निघाल्या आणि अचानक रात्री आम्हाला फोन आला की मूर्ती घेऊन येणाऱ्या ट्रकला मध्य प्रदेशातील घनदाट जंगलामध्ये अपघात झालेला आहे ! 
       भोपाळ नजीकच्या जंगलातील अपघातग्रस्त गाडी 
आमचे सर्वांचे धाबे दणाणले कारण दोन दिवसांनी प्राणप्रतिष्ठा होती ! आणि या सर्व मूर्ती घडविण्याचे काम सुमारे दीड दोन वर्षे सुरू होते ! लहानोजी महाराज यांची पूर्णकृती मूर्ती , त्यांचे आई वडील व मांडीवर लहानुजी महाराज बालस्वरूपात बसले आहेत अशी मूर्ती व लहानुजी महाराजांची संन्यासी वेशातील मूर्ती अशा सर्व मूर्ती घडविण्यासाठी शेकडो चित्रे परमपूज्य शंकर महाराजांनी माझ्याकडून काढून घेतली होती . व त्यात प्रत्येक वेळी काहीतरी बदल सुचवून पुन्हा नवीन चित्र काढायला सांगितले होते . अखेरीस त्यांच्या लांबच्या नात्यातील काही माणसांना भेटून त्यांच्या चेहऱ्यांचे फोटो काढून त्यावरून लहानुजी महाराज कसे दिसत असतील याचा अंदाज बांधला गेला व त्यांचे आई-वडिलांचे चेहरे कसे दिसतील याचा देखील अंदाज बांधला गेला . व तो तंतोतंत खरा निघाला कारण त्यांच्या आई-वडिलांना प्रत्यक्ष बघितलेली एक दूरची बहीण आम्हाला सापडली जिने फोटो पाहताच हे महाराजांचे आई-बाबा आहेत असे सांगितले ! व त्यानुसार केलेल्या या मूर्ती होत्या त्यामुळे पुन्हा त्या मूर्ती करता येणे अशक्य होते !

   परमपूज्य संत लहानुजी महाराज यांचे जन्म मंदिर

 ड्रायव्हर जवळ साधा फोन होता आणि फोनची बॅटरी मरत चालली होती त्याने जाता जाता केवळ बैतूल येथील जंगलामध्ये एका पुलावर माझी गाडी लटकली आहे इतकाच निरोप दिला आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाला ! प्रत्यक्षामध्ये त्याची गाडी त्याहून बरीच पुढे भोपाळ च्या अलीकडील जंगलात बंद पडली होती ! हा सर्व वाघांचा परिसर आहे . रात्रीच्या वेळी घनदाट अरण्यामध्ये त्याचा ट्रक अपरात्री एका ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्याला धडकून पुलावरून खाली पडता पडता वाचला होता व तसाच उभा राहिला होता ! गाडीचे दिवे बंद झाले होते त्यामुळे अरुंद पुलावरून जाताना दुसरी एखादी गाडी या गाडीवर आढळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती ! आम्ही रातोरात दोन ट्रक आणि पंधरा माणसे घेऊन मूर्ती आणण्याकरता निघालो . परंतु मध्य प्रदेश सीमेवरती पोलिसांनी व वनरक्षकांनी आम्हाला अडविले आणि अडीच तीन तास हुज्जत घालून देखील त्यांनी आम्हाला अजिबात सोडण्यास नकार दिला . मध्यप्रदेश मध्ये त्याकाळी कडक लॉकडाऊन सुरू होता त्याचा हा परिणाम होता . अखेरीस चीनच्या शत्रुत्वाचा दाखला घेत मी केलेल्या मध्यस्थीला थोडेसे यश आले आणि एक गाडी व दोन माणसे सोडण्यास त्यांनी परवानगी दिली . त्यात आम्ही एक गनिमी कावा केला . दोन माणसे आणि गाडी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश सीमेमध्ये शिरली परंतु आम्ही सात आठ माणसे गुपचूप जंगलातील अंधाऱ्या पायवाटेने मध्य प्रदेशात घुसलो ! वन खात्याचे आणि पोलिसांचे लक्ष असल्यामुळे दिवा लावणे शक्य नव्हते त्यामुळे अंधारातच चाचपडत चाचपडत आम्ही चार किलोमीटर जंगल तुडविले आणि पुढे जिथे आमची गाडी थांबली होती तिथपर्यंत येऊन पोहोचलो ! हा सर्व वाघांचा परिसर होता व वेळ रात्री एक दीड ची अर्थात वाघांची फिरण्याची वेळ होती ! परंतु मूर्ती परत आणणे या एकाच ध्येयामुळे पेटलेले असल्यामुळे आम्हाला त्याचा काही फारसा धोका जाणवला नाही .  अखेरीस पहाटे साडेतीन चार वाजता आम्हाला तो ट्रक सापडला .
               ह्याच खांबाने मूर्ती वाचविल्या

 सुदैवाने आत मधील एकाही मूर्तीला बारीकसा तडा देखील गेला नव्हता ही परमेश्वराची फार मोठी लीला होती ! परंतु ट्रकचे मात्र अपरिमित नुकसान झाले होते त्यामुळे तो तिथून इंचभर देखील पुढे नेता येणे शक्य नव्हते . आम्ही ताबडतोब सर्व मूर्ती सोबत नेलेल्या  गाडीत भरून घेतल्या आणि परतीचा प्रवास सुरू केला .

        सोडविलेल्या मूर्तींसोबत प्रस्तुत लेखक

 परत येताना आता ज्याचे नाव पुन्हा नर्मदापुरम झाले आहे त्या होशंगाबाद शहरातील नर्मदा मातेवरील पूल लागला . आणि मी विनंती करून गाडी थांबविली व सर्वांना सुचविले की आपण आता नर्मदेचे दर्शन घेऊयात !

नर्मदापुरम येथील पुलावरून होणारे नर्मदा मातेचे दर्शन

 हे दर्शन घेत असताना योगायोगाने मला खालून तीन परिक्रमावासी चालत जाताना दिसले ! आयुष्यात प्रथमच मी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या कोणालातरी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो ! माझ्या सर्वांगातून शहरे निघू लागले ! आणि डोळ्यातून टचकन पाणी आले आणि मी नर्मदा मातेला मनापासून म्हणालो ! हिंदीमध्ये म्हणालो अगदी लक्षात आहे माझ्या ! सबको बुलाती है मैया !  मुझे कब बुलायेगी ? 
मला खरोखरच कल्पना नव्हती की इथून पुढच्या काही दिवसातच मैया माझी ही हाक पूर्ण करणार आहे . . .


 लेखांक दोन समाप्त (क्रमशः)

लेखांक ३ : चोराची धन

Who am I

मनोमन अशी इच्छा मी करीत होती की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये (डिसेंबर २०२१ ) कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा उचलायचीच ! जोपर्यंत आपण नर्मदा परिक्रमा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या इच्छेने वागण्याची खूप सवय झालेली असते ! एकदा नर्मदा परिक्रमा झाली की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नष्ट होऊन जातात आणि केवळ देवाच्या इच्छेने वर्तावे ।देव करील ते मानावे । मग सहजची स्वभावे । कृपाळू देव ॥ या समर्थ उक्तीप्रमाणे वागण्याची सवय अंगी बाणते ! तसेच काहीसे घडले . परिक्रमेची इच्छा केली तर होती परंतु अचानक अमरावतीच्या शंकर महाराजांचा पुणे दौरा ठरला . पुण्यामध्ये धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे .यांची देखील एक जबरदस्त अनुभूती मला परिक्रमे दरम्यान आली ती योग्य वेळी सांगतो परंतु हे शंकर महाराज निराळे आणि मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज निराळे . मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज अजून देहामध्ये आहेत . शंकर बाबांचा हा ऐतिहासिक दौरा होता ज्यामध्ये ते भक्तांच्या नियोजनानुसार हेलिकॉप्टरने पंढरपूरला गेले व तेथील नवीन आश्रमाचे उद्घाटन करून हेलिकॉप्टरने पुण्याला आले व पुन्हा हेलिकॉप्टरने पिंपळखुट्याला परत गेले . त्यांच्या आगमनामुळे माझा नर्मदा परिक्रमेचा मनोवांछित मुहूर्त जरी हुकला होता तरी या दौऱ्यामध्ये मला त्यांच्या दर्शनाचा व सेवेचा भरपूर लाभ मिळाला . 

पुणे दौऱ्यामध्ये परमपूज्य शंकर बाबांसोबत प्रस्तुत लेखक

दौऱ्यामध्ये पुण्यातील सर्व भक्तांच्या घरी लोकांनी त्यांना फिरविले . अखेरीस त्यांच्याकरिता खास बनवलेल्या हेलिपॅड वरून बाबांनी अमरावतीसाठी पुन्हा उड्डाण केले . शंकर बाबा अमरावतीला गेले आणि मला असे वाटले की केवळ आपल्याकरिता ते इतक्या दुरून येथे आले तर आपण किमान त्यांना पुन्हा सोडायला म्हणून अमरावतीला जायला हवे होते असा विचार करून आश्रमाची इनोवा गाडी घेऊन रातोरात मी अमरावती आश्रम गाठला .दुसऱ्या दिवशी गोटीराम तथा रामदास दांगट शेठ यांचे सोबत परत पुण्याला आलो .माझे लष्करातील एक मित्र चीनच्या सीमेवरून सुट्टीवर आले होते आणि दोनच दिवसात परत जाणार होते त्यांना शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्याची यात्रा करायची होती . त्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला पादाक्रांत करून आलो .गडावर माझे इतिहास अभ्यासक मित्र श्री सचिन जोशी भेटले .या यात्रेमध्ये माझ्या असे लक्षात आले की मी न थकता न भागता बरेच कष्ट अजूनही करू शकत आहे . दोनच दिवसात बाळासाहेब वाल्हेकर यांच्या नित्य गुरुवारच्या वारीसाठी पुन्हा गाडी चालवत पिंपळखुटा गाठले सोबत वेदमूर्ती यदुवीर पाटील गुरुजी देखील होते . मोठा दौरा झाल्यामुळे बाबांच्या थकलेल्या शरीराला गुरुजींनी अतिशय चांगला रगडा मसाज करून दिला व त्यामुळे बाबांची तब्येत एकदम खुश होऊन गेली .त्या दोन दिवसांमध्ये परमपूज्य शंकर महाराजांचा अतिशय मोलाचा सहवास मला लाभला व त्यांचे खूप मौलिक मार्गदर्शन देखील याच काळात मला झाले .

पू.शंकर महाराजांसोबत प्रस्तुत लेखक (काठी वाला ) मागे श्री बाळासाहेब वाल्हेकर .

 एकदा बाबा मला म्हणाले " तुम्ही पुणेकरांनी मला सोन्याचे कडे , मुकुट दिलेत . चांदीची भांडीकुंडी दिलीत . दक्षिणा दिलीत ,सर्वांनी आपापल्या प्रॉपर्टी आम्हाला फिरवून फिरवून दाखविल्या . अहो पण हे सोने-नाणे-पैसा-प्रॉपर्टी ही सर्व चोराची धन आहे . त्याचा कुणाला काय उपयोग ? " बाबांच्या या एकाच वाक्याने मनामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न झाले . साधू संतांच्या सहवासामध्ये राहण्याचे हेच फायदे असतात की तुम्हाला कधी कुठल्या क्षणी कुठल्या रूपातून काय बोधामृत मिळेल हे सांगता येत नाही !

 पिंपळखुटा आश्रमात शंकर बाबांच्या सेवेत लेखक

 इकडे त्याच काळामध्ये स्वतःची चार-पाच घरे असताना घरातल्या लोकांच्या नादाला लागून मी जमीन खरेदी करून तिथे बंगला बांधण्याचा घाट घालीत होतो . त्याकरिता जवळपासचे सोने नाणे विकून आणि काही साठलेला पैसा जमा करून तो एकांना मी विसार म्हणून दिला देखील होता ! परंतु एकीकडे माझे विवेकशील मन मला सांगत होते की याची तुला गरज नाही ! परंतु नातेवाईकांच्या अपेक्षांच्या दबावामुळे मी हे सर्व करायला तयार झालो होतो ! शंकर बाबांनी एका क्षणात माझे सर्व प्रश्न सोडवून टाकले ! अमरावती वरून पुण्याला घरी आलो . अंगावरील सर्व कपडे काढून ठेवले आणि एक धोतर घेऊन छाटी सारखे गुंडाळले . आई वडील मावशी यांना साष्टांग नमस्कार करून त्यांना सांगितले की मी नर्मदा परिक्रमेला निघालो आहे . मला परवानगी असावी . हे सर्व अचानक घडल्यामुळे त्यांना देखील काही कळाले नाही व तिघांनी मला आनंदाने आशीर्वाद दिला ! ही देखील नर्मदा मातेचीच कृपा ! आणि अनवाणी पायांनी घर सोडले . सोबत एकही रुपया , पाकीट , आयकार्ड , डेबीट कार्ड ,मोबाईल , पिशवी , कपडे ,चप्पल ,बूट काहीही घेतले नाही ! झप झप पावले टाकत नर्मदा मातेच्या दिशेने निघालो ! नर्मदे हर !

समर्थ रामदास स्वामी म्हणतात

जयासी वाटे वैराग्य व्हावे । तेणे काहीच न विचारावे । उठोनि वाटेसी लागावे । दिगंता प्रती ॥

मनोमन हा बोध स्मरत , सद्गुरूंनी दिलेले नाम मुखाने जपत रस्ता तुडवू लागलो . नर्मदा माता पुणे शहराच्या उत्तर दिशेला आहे हे डोक्यात असल्यामुळे उत्तर दिशा धरून चालत राहायचे असे एकंदर ठरविले होते . पुढे जे काही होईल ती नर्मदा मातेची इच्छा ! जाता जाता अचानक मला आठवले की माझे एक मार्गदर्शक श्री अरुण धारणे काका यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे मुद्रित शोधन मी करत होतो . त्या पुस्तकाची एकमेव प्रत माझ्याकडे होती व ती त्यांना परत नेऊन देणे आवश्यक होते . इतके एकच काम राहून गेलेले माझ्या लक्षात आले ! परंतु एकदा घर सोडल्यामुळे पुन्हा मी घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे आता काय करावे अशा विचारात मी पडलेलो असतानाच गोटीराम तथा रामदास दांगट शेठ यांचे जय हरी मिसळ हॉटेल माझ्यासमोर आले ! 

गोटीराम तथा रामदास दांगट शेठ ( डावीकडे ) यांचे जय हरी मिसळ हॉटेल .

त्यानाच हे काम सांगावे असा विचार करून मी हॉटेलमध्ये गेलो असता समोर परमपूज्य शंकर महाराज यांची मोठी तस्वीर दिसली आणि बरे वाटले ! त्या चित्रामध्ये बाबांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान पसरले आहे असे मला जाणवत होते ! पुस्तकाचा विषय मी शेठ ना सांगितला परंतु त्यांनी या विषयांमध्ये असमर्थता व्यक्त केली व परस्पर बाळासाहेबांना फोन लावून दिला . मी परिक्रमेला निघालो आहे हे ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता बाळासाहेब वाल्हेकर स्वतः त्यांच्या शिवमंदिरातून गाडी घेऊन तत्काळ मला घ्यायला तिथे आले . खरे तर कोणालाच न सांगता निघण्याचा माझा बेत होता परंतु तो इथे अशा पद्धतीने फसला . बाळासाहेब वाल्हेकर हे भारतीय सेनेमध्ये स्पेशल फोर्सेस मध्ये कामगिरी केलेले कट्टर राष्ट्रभक्त माजी सैनिक आहेत . परंतु ऐन तारुण्यांमध्ये साधू वृत्तीने त्यांनी भरपूर संचार केलेला आहे . त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला ऐकणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होते . त्यांची मित्रमंडळी त्यांना भाऊ म्हणतात आणि मित्रमंडळींमध्ये एक प्रसिद्ध अनुभव सिद्ध म्हण आहे . भाऊ बोले , देव बोले ! त्यामुळे आता भाऊ म्हणतील तसे वागायचे हे मी ठरविले . त्यांनी देखील अतिशय आनंदाने मला शंकर महाराजांची एक काठी किंवा दंड , एक छोटी रुद्राक्षांची माळ ,दोन छाट्या , दोन शाली , एक शबनम पिशवी , जिच्यावर विठ्ठल रखुमाई आणि ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो होता , थर्मल कपडे, बाबांचा एक अंगरखा ,भगवद्गीतेचे एक छोटे पुस्तक ,विविध स्तोत्रावली असलेले एक पुस्तक असे सर्व देऊन पाटणापर्यंतचे रेल्वेचे तिकीट त्यांनी मला काढून दिले . सोबत पैसे देऊ लागले असता मी नकार दिला . आणि त्यांना सांगितले की मला पहायचे आहे की पैशाशिवाय परिक्रमा होऊ शकते का . त्यामुळे कृपया पैसे सोबत देऊ नका . तरी देखील शंकर बाबांनी त्यांना पाकिटामध्ये ठेवण्यासाठी दिलेली पाचशे रुपयांची एक नोट त्यांनी माझ्यासोबत दिली आणि सांगितले की ही नोट खर्च करू नकोस फक्त तु हिला आणि शंकर महाराजांच्या दंडाला परिक्रमा घडवून मला परत आणून दे . प्रत्यक्षात झाले उलटेच !मी दंडाला परिक्रमा घडवून आणण्याऐवजी दंडानेच मला परिक्रमा घडवून आणली , अशा अनुभूती पुढे येत गेल्या !  असो . १८५६ रुपये तिकिटाचे झाले . भाऊंनी मला सांगितले ओंकारेश्वर ला परिक्रमा उचलायची असेल तर खंडवा स्टेशनला उतरावे . अमरकंटक वरून उचलायची असेल तर कटनी स्टेशनला उतरावे .परंतु त्यांनी असा सल्ला दिला की जबलपूर येथून परिक्रमा उचलावी हे उत्तम . पूर्वी त्यांनी जबलपूर परिसरात भ्रमण केले होते . त्यांनी त्यांचा फोन क्रमांक त्या शबनम पिशवीवर पेनाने लिहून दिला आणि सांगितले की काही अडचण आली तर या क्रमांकावर अवश्य फोन कर .तसेच माझे एक आधार कार्ड त्यांच्याकडे पडून होते ते देखील त्यांनी मला सोबत दिले .साधू माणसाने काहीतरी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे हा त्यांचा अनुभव होता , त्यामुळे मी नकार दिला नाही . खरे तर मी कुठल्याच गोष्टीला होकार किंवा नकार देण्याच्या पलीकडे पोहोचलो होतो . फक्त 

तुका म्हणे उगेची रहावे । जे जे होईल ते ते पहावे ॥

 ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ असे सर्व सुरू होते . आता पुढे तू ठरव असे सांगून रिक्षामध्ये मला त्यांनी बसवून दिले आणि माझा निरोप घेतला . दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी हे सर्व घडले . 

ओला रिक्षा असल्यामुळे पैसे देण्याचा प्रश्न नव्हता .परंतु परिक्रमा काय आहे याची अनुभूती यायला मला त्या रिक्षा पासून सुरुवात झाली कारण पुणे स्थानकावर उतरल्या उतरल्या त्या रिक्षावाल्याने मला उतरून नमस्कार केला आणि नर्मदा परिक्रमेला शुभेच्छा दिल्या !वर पन्नास रुपये दक्षिणा हातावर टेकवली ! सोबत पैसे बाळगायचे नाहीत असा निश्चय करून मी निघालो होतो त्यामुळे पुढे एका याचकाला मी ते पैसे देऊन टाकले .

बाळासाहेब वाल्हेकर यांनी सोबत झोमॅटो वरून मागविलेला एक डबा आणि एक सफरचंद दिलेले होते तेवढे मला जबलपूर पर्यंत पुरवायचे होते !योगायोग असा की अनवाणी पायांनी साधूच्या वेषामध्ये त्या रेल्वेमध्ये बसलेला मी कदाचित आजूबाजूला कोणी बसले असते तर पहिलटकरी साधू म्हणून संकोचलो असतो .परंतु मी बसलो होतो त्या कंपार्टमेंटमध्ये ,एक कानात हेडफोन घालून बसलेला तरुण मुलगा वगळता अन्य कोणीच नव्हते ! त्यामुळे निवांत प्रवास झाला ! 

सहप्रवासी मुलाने काढलेले छायाचित्र

समोर बसलेल्या मुलाने माझा एक फोटो काढला आणि म्हणाला तुमचा नंबर सांगा तुम्हाला पाठवितो . मी फोन सोबत आणलेला नाही असे सांगितल्यावर तो म्हणाला तुमच्या एखाद्या मित्राचा नंबर सांगा त्यावर पाठवतो .मग मी पिशवीवर लिहिलेला बाळासाहेबांचा क्रमांक त्याला सांगितला आणि त्याने तो फोटो पाठवून दिला .

एरवी रेल्वेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आवर्जून घेणारा भोगी प्रशांत आणि आज खिशात दमडी देखील नसल्यामुळे की काय परंतु खरा योगी शोभत होता ! आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे संपूर्ण प्रवास एकांत वासात आणि चिंतनामध्ये गेला ! कुठलीही मोठी गोष्ट करण्यापूर्वी हे आत्मचिंतन अत्यंत गरजेचे असते ! ते जितके अधिक काळ घडेल तितकी पुढील गोष्ट सुकर होत जाते . आता पुढे कुठे जायचे काय करायचे हे काहीही ठरविले नव्हते ! मुळात नर्मदा परिक्रमा म्हणजे काय ? तिचे नियम काय ?ती कुठून सुरू करतात ? कुठे समाप्त करतात ?हे काहीही मला माहिती नव्हते . माझ्याकडे एकच भांडवल होते ते म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा !

लेखांक तीन समाप्त (क्रमशः)

 लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

जबलपूर स्थानकावर उतरलो आणि बाहेर आलो . जबलपूर बद्दल मी खूप वर्षांपासून ऐकून होतो .

सज्जनगडावर येणाऱ्या एक रामदासी साध्वी पूज्य कमलताई पटवर्धन रामदासी यांचा जबलपूर येथे मठ होता .यांनी स्वतः १९७२ / ७३ साली दोन पायी परिक्रमा केलेल्या होत्या व त्यांच्या अनुभूती देखील अलौकिक अशा होत्या . त्यांचा आश्रम कुठे आहे हे मला माहिती नव्हते परंतु "इंद्रपुरी कॉलनी , ग्वारी घाट मार्ग " असा त्यांचा पत्ता माझ्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता .मला असे वाटले की जबलपूर स्थानकापासून नर्मदा मातेचा काठ जवळ असेल परंतु चौकशी केली असता असे सांगण्यात आले की तिथून नर्मदा मैयाचा काठ आठ किलोमीटर लांब आहे ! आठ किलोमीटर पायी चालायचे ? असा मोठा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता हे प्रामाणिकपणे नमूद करतो ! परंतु खिशात दमडी नसल्यामुळे पर्याय देखील नव्हता त्यामुळे शांतपणे ग्वारी घाटचा रस्ता पकडला . वाटेत एक शेअर रिक्षावाला माझ्या शेजारी थांबला आणि मला म्हणाला , " बाबाजी बैठ जाओ । "  बाबाजी वगैरे कोणी मला म्हणते आहे अशी अजिबात सवय नव्हती त्यामुळे मौज वाटली आणि मी त्याला म्हणालो , "भैय्या मेरे पास पैसे नही है ।आप जाइये । " तर तो म्हणाला , " बाबाजी आपसे पैसे थोडी ना लेंगे !आप तो परिक्रमावासी है ! " आणि पुन्हा एकदा माझ्या लक्षात आले की हा मार्गच वेगळा असणार आहे ! रेल्वेमध्ये माझ्यासोबत बसलेला मुलगा कटनीचा होता . 'रेस्क्यू ऑपरेशन स्पेशालिस्ट' असा त्याचा 'जॉब' होता . त्याने मला अर्धा डझन केळी घेऊन दिली होती . त्यातील चार मी खाल्ली होती . उरलेली दोन केळी त्या रिक्षावाल्याला देऊन टाकली . घेत नव्हता परंतु प्रसाद म्हणून घे असे सांगितल्यावर त्याने ठेवली . इंद्रपुरी कॉलनी जवळ त्याने मला सोडले .
पूज्य कमलाताई रामदासी मला खूप चांगले ओळखायच्या . मंदार बुवा रामदासी परिक्रमे मध्ये जेव्हा त्यांच्या दर्शनाकरता गेले तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला होता ! त्यांनी सांगितलेले एक एक प्रसंग अनुभव माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते आणि मी एक एक पाऊल त्यांच्या घराच्या दिशेने निघालो होतो . आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलेल्या कमलताई या एक थोर विभूती आहेत . 
सज्जनगडावर श्री समर्थ समाधीसमोर प्रवचन सेवा करताना पूज्य कमलताई रामदासी
समर्थांच्या घराण्यातील दहावे वंशज पूज्य बाळासाहेब स्वामी यांचे सोबत कमलताई रामदासी (लाल साडीत) सोबत समर्थ पादुकांच्या पूजनासाठी जमलेली जबलपूर येथील शिष्य मंडळी .

शर्माजी नावाचे त्यांचे एक हिंदी भाषिक शिष्य होते . त्यांनी कमलताई उपाख्य अम्मांची खूप सेवा केली . परंतु एक दिवस अचानक धडधाकट असलेला हा मनुष्य सर्वांना सोडून समर्थ चरणी निघून गेला . आणि जाताना त्याचा बंगला व सर्व मालमत्ता कमलताईंच्या नावावर करून गेला . कमल ताईंचे वय ८० - ८५ असेल . हा शर्माजींचा बंगला म्हणजेच जबलपूर येथील रामदासी मठ होय . जबलपूर शहरामध्ये भरपूर मराठी लोक आहेत व त्यांचे येणे जाणे मठामध्ये सुरू असते . स्थानिक लोक देखील खूप जोडले गेलेले आहेत मठाशी . विशेषतः डॉक्टर चैतन्य ओक आणि सतीश देशपांडे नावाचे दोन शिष्य ब्रह्मचारी राहून कमलताई पटवर्धन यांची मनोभावे सेवा करत असतात . हे सर्वजण आता आपल्याला भेटणार या आनंदामध्ये मी होतो आणि ३६ क्रमांकाच्या बंगल्यासमोर येऊन उभा राहिलो आणि जोरात आरोळी ठोकली जय जय रघुवीर समर्थ ! मला वाटले आता आपली परिक्रमा सुरळीत सुरु होणार ! परंतु बराच वेळ झाला तरी आतून कोणीच आले नाही . थोड्या वेळाने सतीश देशपांडे आले परंतु बंगल्याला आतून कुलूप लावलेले होते . त्यांनी मला सांगितले कमलताई परगावी गेलेल्या आहेत तसेच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे मठ बंद आहे ,तरी दार उघडता येणार नाही . तसेच नर्मदा परिक्रमा देखील बंद झालेली आहे तरी मी ताबडतोब घरी निघून जावे ! हे माझ्यासाठी अनपेक्षित होते कारण सतीश दादा मला खूप चांगले ओळखतो ! मी त्याला विचारले अरे दादा तू मला ओळखले की नाही ? सतीश दादा म्हणाला मी तुला ओळखले आहे परंतु मठाच्या नियमानुसार मी तुला आत्ता आत मध्ये घेऊ शकत नाही ! माझा चांगलाच हिरमोड झाला . तरी मी त्याच्याकडून डॉक्टर चैतन्य ओक यांचा क्रमांक मागून तो टिपून घेतला . कपर्दिकेश्वर मंदिरा मध्ये जा तुला सर्व माहिती कळेल असे त्याने मला सांगितले . तसेच नर्मदा इथून एक दीड किलोमीटर दूर आहे असे देखील सांगितले . थोडे चालल्यावर एका टेलरच्या दुकानातून मी चैतन्य दादाला फोन लावला .

         डॉ. चैतन्य ओक ( रामदासी ) जबलपूर

त्याने देखील मला परिक्रमा बंद असून ताबडतोब घरी जा असा सल्ला दिला !  ( याच तीन व्यक्तींविषयी मी या लेखमालेच्या अगदी शेवटी आवर्जून काही अनुभव सांगणार आहे ! ) आता मात्र खरी पंचाईत झाली ! 
एका क्षणात मला मी निराधार असल्याचे वाटू लागले ! 
आणि माझ्या लक्षात आले की कुठल्याही जिवाचा आधार मानणे व्यर्थ असून आता केवळ नर्मदा मैयाचाच मला आधार उरलेला आहे ! एक किलोमीटर म्हणता म्हणता मैयाचे दर्शन होईपर्यंत तीन चार किलोमीटर पायपीट झाली ! आधीच उपास घडलेला , त्यात ही पायपीट ,त्यात झालेला अपेक्षाभंग आणि त्यात भरीस भर म्हणून की काय तो २०२२ या आंग्ल नववर्षाचा पहिला दिवस होता , तसेच शनिवार असून अमावस्या देखील होती . त्यामुळे नववर्ष आणि शनी अमावस्या अशी एकत्र पर्वणी साधण्यासाठी नर्मदा नदीच्या काठावर अक्षरशः जत्रा भरली होती ! जागोजागी पोलिसांनी रस्ते बंद केले होते आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालू होता . रस्त्याने चालता सुद्धा येत नव्हते इतकी गर्दी ! गर्दी हळूहळू वाढू लागली . कोणीच विश्वासार्ह वाटत नव्हते ! सर्व लोक जत्रेचा आनंद घेण्यात मश्गुल झालेत असे मला वाटले . शाळेमध्ये एक सुभाषित ऐकले होते ते आठवले . 
भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहम् त्वत् प्रसादतः ।
पश्याम्यहं जगत् सर्वम् न मां पश्यति कश्चन ॥
अर्थात कवी उपहासाने दारिद्र्याला म्हणतो अरे दारिद्र्या ! तुला नमस्कार असो ! कारण तुझ्यामुळे मला अशी सिद्धी प्राप्त झाली आहे की मी सर्व जग पाहू शकतो परंतु मी चारचौघांमध्ये असून देखील मला कोणीच पाहत नाही ! माझ्याकडे कोणाचेच लक्ष नाही !
        ग्वारी घाटावर रोज अशी गर्दी असते

 तसेच काहीसे माझे झाले आणि मी धावतच नर्मदा मैया चा काठ गाठला ! मागचा पुढचा कुठलाही विचार न करता नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडी मारली आणि खूप वर्षांनी आपल्या आईला भेटलेले मूल तिच्या गळ्यामध्ये पडून जसे ढसाढसा रडते तसा हमसून हमसून रडू लागलो .
या जगामध्ये आता तुझ्याशिवाय मला कोणीच वाली उरलेला नाही ! आई ! मला वाचव !मला तार ! ह्या जगामध्ये आता तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार उरलेला नाही ! 
समर्थ रामदास स्वामी जेव्हा सर्वस्वाचा त्याग करून तपस्येसाठी निघून गेले तेव्हा रामचंद्राला ते म्हणतात ,
रामचंद्रा तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग । तुज कारणे सर्व संग । त्यक्त केला ॥
अरे रामा ! तुझे स्वामीत्व स्वीकारून तुझ्या नावाने मी माझ्या घरादाराचा , सर्वस्वाचा त्याग करून आलेलो आहे रे ! तू मला भेटला नाहीस असे करू नकोस !नाहीतर मी कुठलाच उरणार नाही ...
अगदी हाच भाव माझ्या प्रार्थनेमध्ये होता . सर्व लोक आजूबाजूला स्नान करत होते . कोणी फोटो काढत होते . कोणी हास्यविनोद करत होते .कोणी भोजन प्रसाद घेत होते . कोणी पितरांना तर्पण करत होते . कुणी नौका विहार करत होते . मी एकटाच माझ्या आईला बिलगून बसलो होतो . दिवस थंडीचे होते आणि पाणी अतिशय थंड होते . परंतु बाहेरचा एकाकीपणा मला इतका बोचत होता की त्यापुढे ते थंड पाणी देखील मला उबदार वाटू लागले होते ! इतक्यात कानावर आवाज पडला , नर्मदे हर ! मी प्रत्युत्तर दिले , "नर्मदे हर ! " भगवी वस्त्रे घातलेला पांढरीशुभ्र दाढी असलेला एक गोरापान साधू माझ्या दिशेने आला आणि म्हणाला , " चेला , परिक्रमा मे हो क्या ? " मी म्हणालो , "नही बाबाजी ,अब तक शुरू नही की । लेकिन परिक्रमा करनी है । " "कहा से उठाओगे परिक्रमा ? " " पता नही बाबाजी । जैसी मैया की इच्छा ।" मी उत्तरलो . साधूच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले . " साथ मे क्या लाये हो ? " मला या प्रश्नाचा अर्थ कळला नाही . मी म्हणालो ,"यह जो वस्त्र पहना है उतनाही लेकर आया हु घर से । " साधू बुचकळ्यात पडला आणि मला म्हणाला , "और कुछ नही लाये साथ मे ? झोला , कपडे , पैसे ,जूते ? इतने कडाके की ठंड मे मर जाओगे ! संकल्प छोडने के लिए , मुंडन करने के लिए , नावडी से समंदर पार करने के लिए , कढाई करने के लिये पैसा तो लगेगा ना ? कैसे करोगे यह सब ?" मी म्हणालो , "वह मुझे कुछ पता नही बाबाजी ।अपने को बस परिक्रमा करनी है । "
साधूच्या डोळ्यात चमक दिसली ! एका क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव बदलून गेले ! आणि मला म्हणाला , "तुम तो कह रहे हो तुम साथ में कुछ नही लाये । " 
" जी बाबाजी । " 
"और बोल रहे हो की परिक्रमा करने की इच्छा है । " 
" हाँ बाबाजी । बहुत तीव्र इच्छा है। " 
मोठ्यांदा हसत साधू मला म्हणाला , " झुठा कही का ! सब कुछ तो लेकर आये हो साथ में ! नर्मदा माई की परिक्रमा करने के लिए और क्या लगता है ? बस तुम्हारी इच्छा हो और उसका बुलावा आना चाहिये ! " 
त्यांच्या या उत्तराने मला अतोनात आनंद झाला ! दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ! आनंदाने मी पाण्यामध्ये उड्या मारू लागलो ! तो ही काठावर नाचू लागला ! आणि ओरडू लागला ,
 " जय हो माई की ! चिंता काहे की ? "

 लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश


ग्वारी घाटा विषयी दोन शब्द लिहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही ! नर्मदा मैया च्या काठावर जितके म्हणून घाट दुतर्फा आहेत त्यातील सर्वात मोठा , सर्वात लांब व सर्वात व्यग्र घाट म्हणजे जबलपूर येथील ग्वारी घाट होय . इथे नर्मदा नदीचे भव्य दिव्य स्वरूपामध्ये दर्शन होते . जयपुर येथील लाल दगडातून बांधलेला औरस चौरस पसरलेला हा घाट अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे . जबलपूर महानगरपालिका या घाटाची विशेष काळजी घेते . पार्वती मातेने अर्थात गौरीने इथे तपश्चर्या केली म्हणून खरे तर या घाटाचे नाव गौरी घाट असे आहे परंतु स्थानिक लोकांनी त्याचा अपभ्रंश करून ग्वारी अथवा गुवारी घाट असे नाव रूढ केले आहे . इथल्या लोकांनी सरकारला निवेदन देऊन या घाटाचे नाव पुन्हा एकदा गौरी घाट करावे असे सुचविलेले आहे .

घाटाची लांबी इतकी आहे की चालून चालून मनुष्य कंटाळतो परंतु घाट संपत नाही . आणि इतका लांब घाट असून देखील प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना तुमच्या दृष्टीपथास पडते . या घाटावर नेहमीच गर्दी राहते . घाटावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .

 ग्वारी घाटावरून समोर दिसणारा गुरुद्वारा आणि मधले बेट

 नर्मदा नदीच्या मधोमध एक बेट असून तिथे देखील मंदिर आहे . समोरच्या काठावर एक मोठा गुरुद्वारा आहे . पांढरा शुभ्र गुरुद्वारा आपले लक्ष वेधून घेतो .शेजारीच एका पंडिताची गोशाळा असून तिथे अतिशय भव्य अशी "नमामि देवी नर्मदे । " अशी अक्षरे रात्रंदिवस विजेच्या लखलखाटामध्ये झळकत असतात आणि ती खूप सुंदर दिसतात .

घाटावर तर्पण , श्राद्ध कर्म व अन्य नैमित्तिक कर्मे करणाऱ्या ब्राह्मणांची लगबग सदैव सुरू असते . पंडित या शब्दाचा अपभ्रंश पंड्या .इथे पुजाऱ्यांना पंड्या म्हणायची पद्धत आहे . लोटी वाला पंडा ,पाच नारियल वाले पंडे , तलवार वाले पंडे ,छाता वाले पंडे ,त्रिशूल वाले पंडा , हाथी वाले पंडे अशी आपल्या कुळाची ओळख ते मिरवत असतात . अशी १४ विविध घराणी इथे आहेत व आपापला ट्रेडमार्क दिमाखात मिरवीत आहेत .पूजेसाठी येणारा बहुसंख्य समाज हा अशिक्षित असल्यामुळे व अनेक वर्षांनी येत असल्यामुळे आपला पंडित कुठला होता त्याचे नाव कदाचित ते विसरले तरी चिन्ह मात्र लक्षात ठेवतात की तलवार वाला हमारा पंडा है! त्यामुळे गादीवर आजोबा बसोत , वडील बसोत किंवा मुलगा बसो , माणूस योग्य त्या घराण्याकडे येतो . या पंडितांचा इतिहास मोठा रंजक आहे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सक्रिय सहभाग घेतला म्हणून इंग्रज जागोजागी ब्राह्मण समाजाच्या मागे हात धुवून लागले होते त्या काळामध्ये काशी परिसरातील ब्राह्मण नर्मदे काठी असलेल्या गोंडवन या जंगल परिसरामध्ये लपण्याकरता म्हणून येऊन राहिले .तेच पुढे इथे स्थिरावले .त्यांनी केलेली मोठी कामगिरी म्हणजे ते इथे आले तेव्हापासून आसपासच्या गावानुसार ,जिल्ह्या नुसार , गल्लीनुसार ,जातीनुसार अशी त्यांनी रीतसर वर्गवारी करून लोकांच्या वंशावळीची लेखी नोंद ठेवलेली आहे .

या सर्वांच्या ठरलेल्या पिढीजात जागा असून तिथे एक लाकडी / लोखंडी खाटा टाकून नर्मदा मातेची मूर्ती ठेवून ते बसलेले असतात . लोक आपल्या ठरलेल्या वंशपरंपरागत पंड्याकडेच पूजेसाठी जातात .एकदा त्यांच्याकडे आलेला मनुष्य कुठल्याही गावचा असू दे त्याला हे ब्राह्मण कधीच विसरत नाहीत ,अशी अद्भुत सिद्धी त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे येणाऱ्या यजमानांची सर्व लिखापढी मोठमोठ्या पेटाऱ्यांमध्ये ठेवलेल्या चोपड्यांमध्ये व्यवस्थित ठेवलेली असते .परंतु एखादा नवीन मनुष्य आला तर मात्र त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी या पंड्यांची मजेशीर स्पर्धा चालू असते ! 

पंडे ,न्हावी , साधू , संधीसाधू ,मुलेबाळे ,तरुण-तरुणी , प्रेमीयुगूले , नवविवाहित ,जराजर्जर , भिकारी ,पर्यटक ,विदेशी पर्यटक , हौसे , नवसे ,गवशे , चोर ,परिक्रमावासी , नावाडी , मच्छीमार , धुणे धुणाऱ्या बायका , पोलीस , पोहणारी लहान मुले , रिकाम टेकडे , दारुडे , गांजाडे , नशेडी , भाविक भक्त अशा सर्वांनी हा घाट सदैव गजबजलेला असतो .सर्वांशी नर्मदा मैया चा व्यवहार एकसारखाच असतो ! कोणी कशाही दृष्टीने तिच्याकडे पाहू दे ती मात्र सर्वांकडे कृपादृष्टीनेच पाहते ! 

मासे , कासव , कुत्री , गाई , म्हशी ,शेळ्या ,मेंढ्या आणि सायबेरियावरून स्थलांतर करून येणारे सायबेरियन सीगल पक्षी या सर्वांना इथे भरपूर अन्न उपलब्ध आहे !

सायबेरियन सीगल पक्षाला खाऊ घालताना ग्वारी घाटावरील लोक

पांढऱ्या शुभ्र रंगाचे सायबेरियन सीगल पक्षी हजारोंच्या संख्येने इथे पाहायला मिळतात . विशेषतः नर्मदेच्या विशिष्ट रंगाच्या पाण्यामध्ये त्यांचे पांढरे शुभ्र पोहणारे थवे अतिशय मनोहारी दिसतात . 

लोक या पक्षांना शेव व अन्य पदार्थ खायला घालतात . असा खायला घालणारा कोणी दिसला की हे पक्षी सर्व भीती ,लाज ,लज्जा सोडून त्या माणसावर अक्षरशः तुटून पडतात ! हे पक्षी दुरून लहान दिसत असते तरी जवळ आल्यावर लक्षात येते की आकाराने खूप मोठे आहेत . यांचा कलकलाट सतत या घाटावर ऐकू येत असतो . 

काश्मीरच्या दल सरोवरातील शिकारा नौकांची आठवण यावी अशा पद्धतीने सजविलेल्या शेकडो नावा हे ग्वारी घाटाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ! अशा रंगीबेरंगी नावांनी हा किनारा कायम गजबजलेला असतो . या नावे मध्ये बसून लोक मधल्या बेटावर जातात किंवा समोरच्या गुरुद्वारापर्यंत जाऊन येतात . काही लोक केवळ पक्षांना आणि माशांना खायला घालण्यासाठी नावेचा वापर करतात . 

 ग्वारी घाटावरील रंगीबेरंगी नौका

या घाटाचे दिवसाच्या प्रत्येक वेळी एक वेगळेच सौंदर्य आहे. पहाटे सूर्योदयाच्या वेळी हा घाट एखाद्या शांत तपस्व्या प्रमाणे भासतो . नर्मदेच्या पाण्यावरून हलके वाहणारे धुके ,पक्षांचा किलबिल किलबिल आवाज ,मंदिरात वाजणाऱ्या घंटा आणि शंख यांचे आवाज ,ढगांशी स्पर्धा करत उगवण्याचा प्रयत्न करणारा सूर्यदेव ,पाण्यातून गाणे म्हणत निघालेला एखादा केवट अर्थात नावाडी , आणि कानांना हळुवारपणे ऐकू येणारा नर्मदेचा खळखळ आवाज ! असे वाटते परिक्रमा करूच नाही ! हेच दृश्य पाहत आयुष्यभर तिथे बसून राहावे !


अशा रम्य सकाळी नर्मदा मातेमध्ये जाऊन स्नान करणे हा एक अलौकिक अनुभव असतो . दिवसभर प्रदूषित झालेले पाणी आता वाहून गेलेले असते आणि अतिशय ताजे स्वच्छ निर्मळ जल घेऊन ती आपली वाट पाहत असते ! शरीराचा , मनाचा , चित्ताचा ,बुद्धीचा मळ अंतर्बाह्य धुवून टाकणारी ही जणू कामधेनुच होय !


ग्वारीवारी घाटावरील सूर्यास्ताची वेगळीच मजा आहे ! दिवसभर आग ओतून अंगाची लाही लाही करणारा सूर्यनारायण संध्याकाळी मात्र अचानक शांत होऊ लागतो ! गोशाळे जवळील नमामि देवी नर्मदे या अक्षरांच्या मागे हळूहळू लपणारा भास्कर आकाशामध्ये जबरदस्त भगव्या रंगाची उधळण करतो। . आणि जणू सांगत असतो की दिवसभर तुम्ही कुठल्याही रंगात रंगा ! तुमचा आरंभ आणि शेवट केवळ भगव्याचा रंगात होणार आहे !


जस जशा संध्या छाया गडद होऊ लागतात तसं तसे स्नान करणारे लोक , इकडे तिकडे विहार करणाऱ्या नौका हे सर्व हळूहळू आपापल्या मूळ स्थानी परततात .आणि मग तीच अवखळ चंचळ नर्मदा मैया थोडीशी धीर गंभीर वाटू लागते !

रात्र होता क्षणीच हाच ग्वारी घाट जणु क्षणात आपले अंग झटकतो आणि सर्व रंग इथे परततात !आपल्या मानवी डोळ्यांना दिसू शकणाऱ्या सर्व रंगांची उधळण येथे मुक्तहस्ताने होत असते !

रात्रीच्या वेळी ग्वारीघाटाहून दिसणारे रम्य दृश्य

वाराणसी येथे ज्याप्रमाणे गंगामैया ची आरती केली जाते अगदी त्याच धरतीवर ग्वारी घाटावर देखील नर्मदा मातेची भव्य दिव्य आरती केली जाते ! हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो ! अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जबलपूर गावातील पंडित घराण्यातील ठरलेले मानाचे लोक ही आरती करतात . 

त्यांच्या वेशभूषेमध्ये , केशभूषेमध्ये , हालचालींमध्ये ,नजाकतीमध्ये आणि सर्व उपचारांमध्ये कमालीची समानता असते व हे पाहून डोळ्यांना खूप आनंद वाटतो ! ही आरती पाहण्यासाठी अक्षरशः हजारो लोक रोज उपस्थित असतात . 

तसेच कुणी विशेष पाहुणे आले असतील तर त्यांच्या हस्ते देखील एक छोटी आरती केली जाते . शक्यतो हे पाहुणे त्या दिवशीच्या आरतीचा सर्व खर्च उचलतात व सर्व प्रसाद , तीर्थ , खीर ,दूध जे काही वाटले जाईल त्याचा भार स्वतःच्या माथ्यावर घेतात . परंतु हा भार मानला जात नाही तर तेवढे पुण्य आपल्या खात्यावर जमा झाले असा त्यांचा भाव असतो ! 
      पाहुण्यांच्या हस्ते नर्मदा मातेची विशेष आरती

विशेषतः एखादा परिक्रमावासी आला तर त्याला अतिशय आदराने आरती मध्ये सम्मिलित करून घेतले जाते व व्हीआयपींच्या देखील पुढे बसायला जागा दिली जाते ! परिक्रमावासींचा संपूर्ण नर्मदा खंडामध्ये अतिशय मान राखला जातो ! साक्षात देवाच्या खालोखाल तुम्हाला मान दिला जातो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ! त्यामुळे परिक्रमावासी ची जबाबदारी कित्येक पटीने वाढते ! असो .


लेखांक पाच समाप्त (क्रमशः)

 लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

ग्वारी घाटाचे महात्म्य तर तुम्हाला सांगितले .नर्मदे काठी भेटलेल्या त्या साधूने मला सांगितले , " इथे दोन चांगले आश्रम आहेत .एक धुनीवाले बाबांचा आश्रम आहे आणि दुसरा झुलेलाल आश्रम आहे . झुलेलाल आश्रमामध्ये गेलास तर तिथे एक साधू आहे . तो तुला सर्व माहिती देईल परिक्रमेची . " हा नर्मदा मातेचा आदेश मानून मी झुलेलाल आश्रमामध्ये गेलो .आश्रम अतिशय सेवाभावी वृत्तीने चालविला जातो आणि इथे नित्य परिक्रमा वासियांची ये जा सुरू असते .मुन्ना नामक एक सेवक , एक अपंग गुरुजी , अजून दोन विमनस्क माणसे आणि दोन बायका असे पाच जण मिळून सर्व डोलारा सांभाळतात .जय झुलेलाल अन्न (क्षेत्र ) , माँ नर्मदा सेवा समिती ,असे शिक्क्यावर असलेले आश्रमाचे नाव आहे .

 आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्धतीने सिताराम सीताराम असे माईकवर जोरजोरात ओरडत , (होय ओरडत हा शब्द योग्य आहे ) जप सांगितला जात असतो . तो अगदी तीन-चार किलोमीटर पर्यंत स्पष्ट ऐकू जातो .स्वयंपाक होईपर्यंत आणि वाढून होईपर्यंत चांगला तास दीड तास सर्वांकडून सीताराम सीताराम जप करून घेतला जातो .आणि मग सर्वांना भोजन प्रसाद दिला जातो . असो .
आश्रमामध्ये पाऊल ठेवताच , "ये ये ! बाळ !इकडे ये असा! " असा आश्वासक मराठी आवाज कानावर पडला ! हे पुण्यातील हडपसर येथील एक परिक्रमावासी होते श्री बबनराव पवार !भारत फोर्ज मध्ये आयुष्यभर नोकरी केली होती आणि संघ विचारांचे होते . 
झुलेलाल आश्रमामध्ये भेटलेले अवलिया श्री बबनराव पवार काका

मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना म्हणालो , "तुम्ही कसं ओळखलंत मी मराठी आहे ते ? "पवार काका म्हणाले "७४ दिवस नर्मदा परिक्रमा करून झाल्यावर इतके सुद्धा ओळखता येत नसेल तर काय उपयोग ! " आणि दिलखुलास हसू लागले ! खरे सांगायचे तर मला कडकडून भूक लागली होती !ते देखील काकांनी लगेच ओळखले ! आणि माझ्यासमोर त्यांनी खाऊची पाकिटे टाकली ! शेव फरसाण बिस्किटे इत्यादी जिन्नस होते .  परिक्रमे मध्ये कोणीतरी काहीतरी खायला देते आहे हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मी संकोच करत घेत नव्हतो आधी ! पण काकांनी सांगितले , " अरे असे लाजलास तर उपाशी राहशील परिक्रमे मध्ये ! जे समोर येईल त्याला नाही म्हणायचे नाही ! गप गिळायचे आणि मोकळे व्हायचे ! हर हर महादेव !" मग काय विचारता ! एका क्षणात तुटून पडलो मी !माझ्या भुकेचा आवाका लक्षात आल्यावर त्यांनी अजून काही पदार्थ खायला दिले ! पवार काकांचा स्वभाव अतिशय दिलखुलास होता . काका अतिशय गप्पीष्ट होते . खाता खाता त्यांचे अनुभव कथन सुरू झाले .मी एखाद्या आसुसलेल्या टीप कागदासारखा एक एक गोष्ट टिपून घेत होतो .ह्या एका परिक्रमावासी कडून मला परिक्रमे विषयी प्रचंड माहिती कळाली . पवार काका आणि सातार पुण्याचे चार-पाच जण गट करून परिक्रमेला निघाले होते .परंतु काकांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते गाडीने ५५ किमी पुढे येऊन थांबले होते . जबलपूर मध्ये औषधोपचाराची सोय आहे , ती मागे पुढे कुठे नव्हती . परंतु ७४ दिवस मात्र ते एकदाही गाडीवर बसले नव्हते . त्यामुळे ते निवांत होते आणि त्यांचा पूर्ण वेळ सहवास मला दोन-तीन दिवस लाभला . दोन-तीन दिवस का वाढले ते देखील सांगतो . खाली नदीवर मला साधूने ज्या महात्म्याबद्दल सांगितले होते ते मूळचे नाशिक परिसरातील सदानंद गिरी नावाचे साधू होते जे जनार्दन स्वामींचे शिष्य होत .ते या आश्रमामध्ये एक छोटीशी खोली भाड्याने घेऊन राहत होते . त्यांनी आम्हाला चहा प्यायला वरती बोलवले . माझा एकंदर वेश पाहून मी परिक्रमे मध्ये नाही हे जाणकार लोकांच्या लगेच लक्षात यायचे . एखादा सीआयडी ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराची कसून चौकशी करतो त्या पद्धतीने सदानंद गिरी महाराजांनी माझी आगदी कसून चौकशी केली ! मला परिक्रमेपासून परावृत्त करण्याचे देखील प्रयत्न त्यांनी केले ! घरी भांडण करून आला असशील तर आता सर्व शांत झाले असेल , परत जा असा गमतीशीर सल्ला त्यांनी दिला ! यातील विनोदाचा भाग सोडून द्या परंतु प्रत्यक्षामध्ये असे होते की बहुतांश परिक्रमावासी कुठेतरी भांडण करून किंवा काहीतरी घोटाळे करून मग परिक्रमेला येत असतात ! त्यामुळे थोडे दिवस त्या रागाच्या भरात ते चालतात परंतु एकदा परिक्रमेतील काठिण्य पातळीचा अनुभव आला की मात्र घराची आठवण येऊ लागते आणि मग अर्धवट परिक्रमा सोडून ते पळून जातात ! मी माझ्या परिक्रमेमध्ये अशी अनेक उदाहरणे प्रत्यक्ष पाहिली ती पुढे वेळोवेळी सांगेनच ! परंतु माझा निर्धार पक्का आहे हे देखील त्यांच्या अनुभवी तर्कबुद्धीला लगेच कळले ! आणि मग मात्र त्यांनी मला अतिशय पद्धतशीरपणे परिक्रमेचे सर्व नियम समजावून सांगितले ! सुंदर असा चहा पिता पिता परिक्रमेविषयी भरपूर माहिती मी त्या तासाभरात गोळा केली ! तुम्ही पुणेकर प्रश्न फार विचारता ! विचार विचार ! असे म्हणून त्यांनी माझ्या मनातील सर्व शंका दूर केल्या ! मी सोबत काय काय सामान आणले आहे याचा अंदाज घेऊन त्यांनी भिंतीवर लटकवलेली निळ्या रंगाची जीन्स च्या कापडाची एक सॅक मला काढायला लावली .ती झोळी रिकामीच होती . मला म्हणाले ही माझी झोळी तू परिक्रमेला घेऊन जा .
          हीच ती माझ्याहून अधिक अनुभवी झोळी

 ही झोळी घेऊन मी एक परिक्रमा केलेली आहे आता तू एक करशील ! त्यांनी दिलेला हा आशीर्वाद मी मनापासून स्वीकारला ! खाली आश्रमामध्ये सांगून त्यांनी अजूनही बारीक सारीक पूजेचे साहित्य मला मिळवून दिले . फुलवाती ,तूप ,तेल ,काड्यापेटी , खाली वर टाकायला रंगीत वस्त्र असे बरेचसे सामान आश्रमाने मला दिले . सदानंद बाबा म्हणाले की आज उद्या (१-२) अमावस्या आहे .तीन तारखेला मात्र सोमवार आहे . शुभ दिवस आहे . पूर्वाषाढा नक्षत्र आहे व तुला देखील पूर्व दिशेलाच जायचे आहे त्यामुळे तीच तिथी योग्य ठरेल . मला तर काही कळतच नव्हते . त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला होकार देत होतो .परंतु परिक्रमा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक परिक्रमावासीला एक प्रमाणपत्र बनवून घ्यावे लागते . एखाद्या स्थानिक नगरसेवकाकडून ते बनवून घेण्याचा सल्ला त्यांनी मला दिला . मी लगेचच बाहेर पडलो . एकाने मला वीस रुपये हातात दिले . फोटो स्टुडिओमध्ये गेलो आणि माझ्याकडे वीस रुपये आहेत आणि मला माझा फोटो काढून हवा आहे असे सांगितल्यावर त्या चुणचुणित मुलीने सहा फोटो वीस रुपयात मला काढून दिले . ते घेऊन मी भाजपच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेलो . आणि परिक्रमेचे प्रमाणपत्र त्यांना मागितले .करोना काळातील बौद्धिक लॉकडाऊनचा प्रभाव अजून राजकीय लोकांवर शिल्लक होता त्यामुळे त्यांनी मला परिक्रमा न करण्याचा सल्ला दिला ! मग मी तसाच पुढे काँग्रेसच्या नगरसेवकाच्या कार्यालयात गेलो .कार्यालयात फक्त कार्यकर्ते होते व त्यांनी देखील मला परत घरी जाण्याचा सल्ला आधी दिला होता . परंतु भाजपने मला नकार दिला आहे हे सांगितल्या सांगितल्या मात्र त्यांनी मला पार्षद अर्थात नगरसेवकाच्या घराचा पत्ता समजावून सांगितला ! पार्षद जी चे घर शोधत शोधत मी दारात उभा राहिलो . सौ. प्रिया पटेल ह्या त्या भागातील अर्थात जबलपूर वार्ड क्रमांक आठ , ग्वारी घाट येथील नगरसेविका होत्या .  परंतु प्रत्यक्षात त्यांचे पती अश्विनी पटेल हे सर्व कारभार सांभाळत आहेत असे माझ्या लक्षात आले .

 ग्वारीघाटच्या तत्कालीन पार्षद सौ. प्रीयाताई पटेल व सोबत पति  श्री. अश्विनी पटेल जी (INC)

 त्यांनी माझे अतिशय उत्तम आगत स्वागत केले . यांच्या वडिलांनी पायी परिक्रमा केलेली असल्यामुळे ते देखील माझ्याशी गप्पा मारण्याकरिता बाहेर आले व त्यांनी अतिशय उत्तम आदर सत्कार करून मला गरमागरम चहा , प्रशस्तीपत्रक अर्थात प्रमाणपत्र तर दिलेच परंतु सोबत एक चांगली शाल व पाचशे रुपये दक्षिणा तसेच खूप शुभेच्छा देखील दिल्या ! 

 परिक्रमेचे प्रमाणपत्र काहीसे असे असते .

हा माझ्यासाठी नवीनच अनुभव असल्यामुळे मला त्याचे अप्रूप वाटले परंतु पुढे हळूहळू अशा प्रकारच्या आदरातिथ्याची सवय होत गेली ! काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशचे लोक राजाजी किंवा दिग्गीराजा म्हणून ओळखतात , त्यांनी देखील आपल्या तृतीय धर्मपत्नीसह पायी नर्मदा परिक्रमा केली होती ,असे अश्विनी पटेल यांच्याकडून कळले . या परिक्रमेदरम्यान ते पटेल यांच्या घरी देखील येऊन गेले होते .
मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंह यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान स्वागत करताना पटेल दांपत्य

दिग्विजय सिंह यांच्या विषयीचे असे अनेक किस्से पुढे अनेक गावांमध्ये मला ऐकायला मिळाले व त्यांच्या संदर्भात मला नर्मदेच्या कृपेने एक अनुभव देखील आला तो योग्य वेळी सांगेनच . असो . 
प्रमाणपत्र मिळाल्यामुळे माझे महत्त्वाचे काम झाले होते . आता मला कुठल्याही आश्रमामध्ये बिनदिक्कतपणे जाता येणार होते . तसेच प्रत्येक आश्रमामध्ये एक शिक्का ठेवलेला असतो तो आपण आपल्या वहीमध्ये मारून घेणे अपेक्षित असते, ज्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या आश्रमात जाऊन आला याची माहिती तुमच्याकडे राहते .

विविध आश्रमांचे शिक्के अशा पद्धतीने एका पुस्तिकेमध्ये मारून घ्यावे लागतात . साधूंना यातून सवलत असते .

मी परिक्रमा अनवाणी करणार आहे असे सदानंद बाबांना सांगितले .तसेच जमेल तितका काठाने चालण्याची इच्छा आहे हे देखील त्यांना मी सांगितले . परंतु त्यांनी मला काठाने अनवाणी परिक्रमा करण्यातील धोके समजावून सांगितले .नर्मदे काठी करोडो पाण्याचे पंप अर्थात मोटर्स आहेत .त्याच्या पाईपलाईन व विजेच्या वायरी अर्थात तारांची भेंडोळी यांचे अक्षरशः जंजाळ नर्मदेच्या काठी निर्माण झालेले असते .
   नर्मदे काठी असलेल्या पाण्याच्या पंपांचे जंजाळ

 यातील बऱ्याचशा तारा तुटलेल्या , जोड लावलेल्या असल्यामुळे त्यातून विद्युत प्रवाह थेट जमिनीमध्ये , चिखलामध्ये ,पाण्यामध्ये ,किंवा लोखंडी नळ्यामध्ये वगैरे उतरतो . व याचा विद्युत झटका खाऊन आजपर्यंत अनेक परिक्रमावासी ,ग्रामस्थ , शेतकरी व गुराढोरांनी आपले प्राण गमावले आहेत . नुकतीच भोर तालुक्यामध्ये अशीच दुर्दैवी घटना घडून नीरेकाठचे काही शेतकरी बांधव हकनाक प्राणाला मुकले . हाच अनुभव पुढे मला अनेक साधूंनी सांगितला .मी काठाने आलो आहे हे कळल्या कळल्या सर्वप्रथम साधू हेच विचारत की पायात चप्पल आहे का ? सदानंद बाबा मला म्हणाले की नर्मदा मातेची अशी इच्छा आहे की तू काठाने परिक्रमा करावीस परंतु पायात वाहाणा घालाव्यास . त्यामुळे सोबत मिळालेले पाचशे रुपये घेऊन पवार काका आणि मी जबलपूर मध्ये चपलांचे "शॉपिंग" करू लागलो ! एक कॅनवास चे बूट आणि मोजे मी विकत घेतले . २०० रु झाले . ५०० ते ६०० रुपयांचा बूट त्याने दोनशे रुपयाला दिला . सदानंद गिरी बाबांनी दिलेल्या सॅकच्या अर्थात झोळीच्या चेन खराब झाल्या होत्या . त्या देखील एका मोची अर्थात चांभाराकडून बदलून घेतल्या व सगळे टाके मजबूत करून घेतले . तसेच त्याने मला ज्याच्यावर सुखाने झोपता येईल अशी एक फोमची गादी भेट दिली . मी माझ्याकडे होते नव्हते तेवढे सर्व पैसे त्याला देऊन टाकले . कारण तो फोम खरोखरच खूप चांगल्या दर्जाचा होता . बाहेर त्याची किंमत हजाराच्या पुढेच झाली असती . 
    HVAC Aluminium coated Polyurethen Foam sheet

रिक्षाच्या सजावटीसाठी म्हणून त्याने तो आणून ठेवला होता . या शीटवर ०.०८ मिमि जाडीचा अल्युमिनियम धातूचा पातळ थर असतो . याचे घनफळ सुमारे १४ लिटर होते . ( १० मिमी x ६ फूट x २.५ फूट ) आणि वजन फक्त २०० ग्रॅम ! या गादीने पुढे माझे फारच उत्तम काम केले . संपूर्ण परिक्रमेदरम्यान इतकी सुंदर गादी मला कोणाकडे आढळली नाही .जणू काही खास माझ्या मापाची गादी नर्मदा मैयाने कापून ठेवली होती त्या मोची कडे . पुढे पवार काका आणि मी त्यांना काहीतरी हवे होते ते घेण्याकरिता म्हणून एका मॉलमध्ये शिरलो . दोघांचा वेश गबाळा होता . त्यामुळे मॉल मधील सुरक्षारक्षक आम्हाला बोलवायला आला व हाताला धरून बाहेर काढू लागला . मग मात्र मला खूप राग आला आणि मी अस्खलित इंग्रजी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली ! कार्पोरेट जगामध्ये हाताखालच्या माणसाला इंग्रजीमध्ये झाडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . ती मी माझ्या एक्स कलीग्स अर्थात माजी सहकर्मचाऱ्यांकडून चांगली आत्मसात केलेली आहे . मी इंग्रजीमध्ये बोलतो आहे हे पाहता क्षणी स्टोअर मॅनेजर तिथे आला व माझी क्षमा मागू लागला . त्यामुळे तर माझे डोके अजूनच फिरले ,कारण केवळ मनुष्याचा वेष बघून त्याला बावळट ठरवण्याची जी एक भांडवलशाही मानसिकता आपल्या देशामध्ये पद्धतशीरपणे रुजवली गेली आहे त्याला आपण सर्व भारतीय बळी पडल्याचा हा परिणाम होता . महागडे कपडे खपावेत म्हणून साधे कपडे घालणारी माणसे बावळट असतात असा एक भ्रम पद्धतशीरपणे मार्केटिंग वाल्यांनी , जाहिरातदारांनी गेली अनेक वर्ष पसरविला आहे .त्याची ही कटु फळे .अगदी त्याचप्रमाणे इंग्रजी बोलणारा म्हणजे कोणीतरी फार भारी असा देखील भ्रम पसरविला गेला , ज्याच्यामुळे इंग्रजी भाषेची अनाठायी अनैसर्गिक वाढ आपल्या देशामध्ये झाली . या दोन्ही वरून त्याला चांगले सुनावून तिथून काहीही न घेता आम्ही बाहेर पडलो . दोघांकडेही शून्य रुपये होते . इतक्यात पवार काकांना समोर एके ठिकाणी मिळणारी गरमागरम जिलेबी पाहून जिलेबी खायची इच्छा झाली आणि तत्काळ मला रस्त्यावर पडलेले वीस रुपये सापडले !लगेच दोघांनी जिलेबी खाल्ली !
 पुढे पायी जाता जाता पवार काका मला म्हणाले परवा एका बाईने मला पन्नास रुपये दिले . असे ते म्हणतात इतक्यात त्यांच्या शेजारी एक कार येऊन थांबली आणि एका बाईने त्यांना पुन्हा ५० रुपये दिले ! अशी मजा मजा सुरु होती !
आश्रमाकडे परत येताना अजून एक अनुभव आला . रस्त्याच्या कडेला चक्क भिक मागत बसलेल्या एका याचकाने मला पाहून उठून चटकन दहा रुपये माझ्या हातावर टेकवले . मला संकोच वाटला परंतु तो म्हणाला ," आपको यह रखना ही पडेगा ।लक्ष्मी को मना नही करते । " .एका भिकाऱ्यापेक्षा लक्ष्मीची किंमत अधिक कोणाला ठाऊक असणार !  थोडेसे पुढे गेल्या गेल्या एका सदगृहस्थाने गाडी थांबवून माझ्या हातात पाचशे रुपयाची नोट टेकवली , पाया पडला आणि निघून गेला ! मी पवार काकांना म्हणालो , " हे सर्व काय सुरू आहे ?मला हे पैसे नको आहेत . " . पवार काका म्हणाले , " मग दान करून टाक . सोपे आहे " मग मी त्या पैशातून चहापत्ती ,साखर आणि दूध घेतले व ते सदानंद बाबांना दिले . 
असे गमतीशीर अनुभव घेत आम्ही फिरत होतो . काकांच्या पायाला नक्की काय दुखापत झाली आहे तेच मला कळत नव्हते कारण इथे सुद्धा ते माझ्यापेक्षा दुप्पट वेगाने चालत होते !आणि त्यांना गाठता गाठता माझी दमछाक होत होती .मला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमावस्या संपण्याच्या आत क्षौर देखील करून घ्यायचे होते . क्षौर करणे म्हणजे डोक्याचा चमन गोटा करणे . थोडक्यात तुमच्या सर्व जुन्या गोष्टी टाकून एक नवीन सुरुवात करायची ती परंपरा असते . ही परंपरा आपल्या धर्मामध्ये खूप जुनी आहे . त्यामुळे लगबगीने मी ग्वारी घाट गाठला .


लेखांक सहा समाप्त (क्रमशः)

 लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो .

 परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी मेंदूला उगाचच अशी शंका आली होती की इथे 'कमिशन सिस्टीम ' दिसते ! राम लखन सेन शिडशिडीत बांध्याचा एक तरुण मुलगा होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती .त्याच्या मागे मी चालत राहिलो . 
 न्हावीघाटा वरून समोरचा गुरुद्वारा असा काहीसा दिसतो .
चालत चालत तो मला न्हावी घाटावर घेऊन गेला .इथे भरपूर पायऱ्या होत्या व प्रत्येक पायरीवर बसून नाभिक यजमानांचे केस कापत बसले होते .कापणे कसले ? भादरणेच ते ! वस्तरा घेऊन झिरो कट मारणे सुरू होते ! अतिशय कमी वेळात कौशल्याने कुठलीही जखम होऊ न देता ते पटापट चमन गोटे करत होते !इतक्या मोठ्या प्रमाणात नाभिकांना तिरुपती नंतर पहिल्यांदाच पाहत होतो मी ! राम लखन मला म्हणाला पाचशे रुपये होतील .मी म्हणालो माझ्याकडे पैसे नाहीत . मग तो म्हणाला ठीक आहे २५१ रुपये द्या . मी म्हणालो अरे माझ्याकडे खरोखरच एकही रुपया नाही . हे सर्व करेपर्यंत त्याने मला एका उंच खुर्चीवर बसायची आज्ञा केली होती . निळ्या रंगाची मजबूत लाकडी खुर्ची होती आणि अतिशय उंच होती त्यामुळे उभ्या-उभ्या तो केस कापू शकत होता . मला म्हणाला ठीक आहे फोन पे करा.मी म्हणालो माझ्याकडे फोन सुद्धा नाही रे बाबा.आता मात्र थोडासा कठीण प्रसंग तिथे उभा राहिला.राम लखन सेन ने जोरजोरात ओरडून त्याच्या सर्व नाभिक बांधवांना सांगायला सुरुवात केली " अरे देखो भाईलोग ! इधर देखो ! ये बाबाजी परिक्रमा करने के लिए आए है । इनके पास एक रुपया भी नही है और मोबाईल भी नही है । " राम लखन सेनने अचानक केलेल्या या प्रकारामुळे मी भांबावून गेलो . मला एकप्रकारे त्याने बोलवून केलेला माझा तो अपमानच वाटला . टचकन् माझ्या डोळ्यात पाणी आले . मी डोळे गच्च मिटून घेतले .इतक्यात मला कोणीतरी पायावर डोके ठेवले आहे असे वाटले . म्हणून डोळे उघडून पाहिले तर माझ्यासमोर सर्व नाभिकांची रांग लागली होती .आणि ओळीने एक एक जण माझ्या पाया पडू लागला होता. मी चक्रावलो . हे सर्व अनपेक्षित असे होते . मी देखील प्रत्येकाला वाकून नमस्कार करू लागलो . परस्परो देवो भव ! राम लखन मला सांगू लागला , "बाबाजी यहा बहुत परिक्रमावासी आते है । लेकिन साथ मे पैसा मोबाईल सब कुछ लेके आते है । बहुत सालो के बाद कोई असली परिक्रमावासी मिला हमको । आपकी हजामत हम मफत करेंगे । आज मेरा बहुत अच्छा धंदा होने वाला है । मैया ने असली परिक्रमावासी की सेवा का मौका दिया । " मला मात्र हे काही पटेना त्यामुळे निदान पन्नास रुपये तरी याला द्यायला हवेत माझ्या मनात येऊन गेले . राम लखन सेन ने उत्तम पैकी क्षौर करून दिले . मला जो अपमान वाटला खरेतर तो मैय्याने केलेला सन्मान निघाला ! 


लेखांक सात समाप्त (क्रमशः)

 लेखांक ८ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प

क्षौर करून मी निघालो आणि सदानंद गिरी बाबांकडून पुढील आदेश येण्याची वाट पाहू लागलो . 
क्षौर केल्यावरचे प्रस्तुत लेखकाचे रुप काहीसे असे होते 
वाटेमध्ये मला शिवशंकर तिवारी नावाचा एक अत्यंत तेजस्वी आणि सज्जन पुजारी भेटला . जो मोटरसायकल वरून जाता जाता वाटेत जमलेल्या माकडांना केळी खाऊ घालत होता .त्याच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की तो रोज हे काम करतो .मारुतीरायाची सेवा समजून माकडांना केळी खाऊ घालतो . लोक देखील त्याला सहकार्य करतात , कारण त्यांनी केळी खाऊ घातल्यामुळे पोट भरलेली माकडे दिवसभर गावांमध्ये फिरून कोणाला त्रास देत नाहीत . 

त्याच्याकडून संकल्प सोडावा अशी माझ्या मनात इच्छा होती परंतु नर्मदेच्या काठी आपण आपल्या इच्छा गुंडाळून ठेवायचे असतात हे मला अजून माहिती नव्हते . मी शिवशंकर तिवारी पुजारी यांच्याशी बोलत असताना एक हुशार तरुण मुलगा तिथे आला व माझी आणि पंडितजींची परीक्षा घेऊ लागला . त्याचे प्रश्न देखील मजेशीर होते परंतु मूलगामी होते . सुमारे तास दीड तास आमच्या तिघांचा शास्त्रार्थ चालला होता .त्यांची विद्वत्ता , साधेपणा आणि नम्रता माझ्या मनाला खूपच भावली .मी पुढे चालू लागलो आणि माझ्या डोक्यात सतत राम लखन सेनचा विचार येऊ लागला ,की आपण त्याला किमान पन्नास रुपये तरी द्यायला पाहिजे होते . मी आता घाटापासून दोन किलोमीटर दूर आलो होतो आणि अचानक मला एका माणसाने पन्नास रुपये हातात आणून दिले , इतक्यात समोरून मोटरसायकल वरून राम लखन सेन स्वतः आला आणि मला बघून गाडी थांबवली ! बाबाजी कैसे हो ! असे तो म्हणताक्षणी मी पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले .तो नकार देऊ लागला परंतु मी त्याला सांगितलं , " मेरे नही है । मैय्या ने अभी अभी दिये है आपके लिये । आपको लेने ही पडेंगे । " मग मात्र त्यानी निमूटपणे पन्नास रुपये घेतले .अशा पद्धतीने माझी ती इच्छा माईने पूर्ण करून घेतली . आपल्या आजूबाजूला येणारे सर्व लोक हे तिच्याच इच्छेने काम करत आहेत याचा अनुभव हळूहळू येऊ लागला . त्या रात्री खूप प्रचंड थंडी पडली होती .

 पहाटे तीन साडेतीनला उठून मैयावर जाऊन स्नान करून आलो . आश्रमाच्या बरोबर समोर एक अंध तरुण शेकोटी करून बसला होता .थोडेसे अंग शेकावे आणि त्याच्याशी गप्पा माराव्यात असा विचार करून तिथे जाऊन बसलो . हा समीर शाह नावाचा मुसलमान अंध तरुण होता .तो काही काळ मुंबईला राहिला होता त्यामुळे थोडेफार मराठी त्याला येत होते .तो इथे काय करतो आहे असे विचारल्यावर त्याने मला सांगितले की तो एक फूट रिफ्लक्सॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्या मित्राला भेटायला म्हणून तो आला आहे .परंतु मित्राचा संपर्क न झाल्यामुळे नर्मदेच्या काठी घेऊन बसला होता . त्याला थंडी वाजू लागली अचानक खूप ऊब जाणवली म्हणून खाली बसला तर समोर शेकोटी होती .नेमकी ती शेकोटी झुलेलाल आश्रमा समोर असल्यामुळे याची माझी भेट झाली .

त्याला जोराची शौचाला लागली होती आणि जवळपास काय आहे त्याला काहीच माहिती नव्हते , त्यात हा मुस्लिम असल्यामुळे नर्मदेच्या काठी कुठे बसायला घाबरत होता . मी चौकशी केल्यावर कळले की जवळच एक सरकारी संडास कॉम्प्लेक्स आहे .मी तिथपर्यंत त्याला घेऊन गेलो . हे कॉम्प्लेक्स चांगलेच उंच पायऱ्या चढून होते .याला एकट्याला जाता येणे अशक्य होते .संपूर्ण पायऱ्या त्याला हाताला धरून मी वर चढवून नेले आणि त्याचे पैसे देखील भरले .दारावर उभ्या असलेल्या माणसाने माझ्या अवतारकडे पाहून पैसे मला परत दिले .आणि म्हणाला परिक्रमा वासी से पैसे नही लेते । मी दक्षिण भारतामध्ये वास्तव्यास होतो त्या काळात माझा एक चांगला मित्र नरेंद्र कुमार फूट रिफ्रॅक्सॉलॉजी शिकायचा आणि लोक रांगा लावून उपचारार्थ त्याच्याकडे यायचे . त्यामुळे त्यातील काही प्रारंभिक जुजबी ज्ञान मला होते .
        नरेंद्र कुमार आणि कुटुंबीय कीलपट्टी मदुरै

 ते प्रश्न विचारून मी हा खरोखर त्यातला तज्ञ आहे का ते तपासून घेतले .बाहेर आल्यावर समीरला फार हायसे वाटले आणि तो मनापासून माझे आभार मानू लागला .त्याने मला चहा सुद्धा पाजला . त्याला परिक्रमे बद्दल काहीच माहिती नव्हती . त्यामुळे त्याला नर्मदा परिक्रमा व हिंदू धर्म याविषयी पुरेशी माहिती दिली . त्याने देखील मनोमन मान्य केले की ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये नर्मदा नदीचा विषय आला त्या क्षणी त्याला मी भेटलो आणि माझी त्याला मदत झाली म्हणजे ही मैय्याचीच इच्छा असणार हे त्याने मान्य केले ! मी देखील भल्या पहाटे विनाकारण बाहेर आलो होतो ! सकाळी सहाला आंघोळ करायचे माझे नियोजन होते !असो नर्मदे काठी नियोजन करायचे नसते हेच खरे ! खरे तर संपूर्ण आयुष्यात हे सूत्र पाळले तर त्यातील आनंद काय विचारता ! 

बाहेर फिरले की लोक पैसे दक्षिणा देतात हे कळल्यामुळे आज मी दिवसभर आश्रमातच एका जागी शांतपणे बसून राहिलो . एक एक माणसे भेटत होती .परिक्रमावासी आत मध्ये यायचे आणि काही काळ थांबून पुढे जायचे . प्रेम नारायण शुक्ल नावाचा ,खपटिया गाव , चित्रकूट धाम , उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक परिक्रमेमध्ये होता तो आश्रमात भेटला . धिप्पाड देह आणि उत्तम तब्येत . एक वेळ जेवण करायचा . त्याचे ३० किलो वजन कमी झाले होते ! संध्याकाळी अनेक परिक्रमावासी धर्म शाळेमध्ये येऊ लागले . राजू डोईफोडे नावाचा दिघी आळंदी येथील एक विद्यार्थी होता ,तसेच सौ. सुनिता राजू पाचरणे नावाच्या पुण्याजवळील वाघोलीच्या काकू देखील भेटल्या . यांनी मला सांगितले की आता नर्मदा मातेची आरती आहे ती बघायला आपण घाटावर जाऊया . मला वाटले एखादे छोटेसे निरंजन घेऊन काकू स्वतः आरती करतील परंतु प्रत्यक्षात घाटावर जाऊन पाहतो तो चालता येणे देखील अवघड इतकी तुफान गर्दी झालेली होती आणि भव्य दिव्य आरतीचे आयोजन केलेले होते !
रविवारचा दिवस होता तो . मोठ्या मोठ्या स्पीकर वरून आवाहन केले जात होते लोकांना बसवून घेतले जात होते . एक कार्यकर्ता पळतच आला आणि आम्हाला पुढे घेऊन गेला . बॅरिकेट ओलांडून आम्ही "व्हीआयपी लॉन्ज " मध्ये जाऊन बसलो ! कुणाची ओळख ना पाळख परंतु केवळ परमेश्वराचा ध्यास घेऊन त्याचे वस्त्र अंगावर घातले की सगळीकडे अशीच सुलभता प्राप्त होऊन जाते ! आम्ही तिथे बसलो तसे अजून काही परिक्रमावासी येऊन बसले . जळगाव पुणे आळंदीचे काही परिक्रमावासी होते याच्यामध्ये तरुण मुली देखील होत्या . जोग पाठशाळेतील काही युवक होते आणि एक दहा वर्षाचा मुलगा देखील होता . नर्मदे काठी अगदी गंगेची वाराणसी मध्ये आरती होते त्या पद्धतीची किंबहुना त्याहूनही काकणभर सुंदर पद्धतीने आरती केली जाते  ती ग्वारी घाटावरच ! अजून काही ठिकाणी देखील आरती होते .परंतु ग्वारी घाट इतकी गर्दी कुठेच नसते . आजचा माझा मुक्कामाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे मला आता परिक्रमेसाठी निघण्याचे वेध लागले होते . माझी सर्व सिद्धता झालेली होती फक्त कुपीमध्ये मैया भरून घ्यावी लागते ते काम राहिले होते . त्यासाठी कुठलीही कचऱ्यातली बाटली उचलण्याची माझी इच्छा नव्हती त्यामुळे मी एका दुकानात गेलो आणि छोटे अँपी फीज घेतले .परिक्रमावासी बाहेरून विकत घेऊन काही खात नाहीत .त्यामुळे मी ते त्यालाच प्यायला लावले आणि त्याच्याकडून ती रिकामी बाटली घेतली आणि स्वच्छ धुतली . त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत हे वेगळे सांगायची गरज नाही . 

 हीच ती कुपी ज्यात पूजेसाठी मैय्या भरून घेतली

सकाळी लवकर उठून स्नान आदि कर्मे उरकून घेतली . सदानंद गिरी बाबांनी एक लोटेवाला पंड्या ठरविला होता व आदल्या दिवशी त्याला बोलावून माझी भेट घालून दिली होतीच .
इथे ग्रामीण भागातील लोक दर्शनाला खूप येत असतात आणि त्यांना पुजाऱ्याचे नाव लक्षात राहत नाही .म्हणून पुजारी लोकांनी मार्केटिंगची ही पद्धत शोधून काढली आहे . पिढ्यानपिढ्या ती सुरू आहे . पंडिताचे नाव लक्षात राहिले नाही तरी त्याची खूण लक्षात राहते . लोटी वाला पंड्या , छत्री वाला पंड्या , तलवार वाला पंड्या , पाच नारळवाला पंड्या ,अशा खुणा असतात आणि उंच काठीला चक्क लोटी , छत्री ,पाच नारळ वगैरे गोष्टी लटकून ठेवलेल्या असतात .असो . त्यामुळे मी बाबांना नमस्कार करून प्रस्थान ठेवले . झुलेलाल आश्रमाने मला जाता जाता एक थाळी , एक पेला , एक नारळ , वस्त्र ,फुलवाती , काडेपेटी इत्यादी सर्वसामान दिले .नर्मदा मातेची एक छोटीशी प्रतिमा देखील मी वीस रुपयाला विकत घेतली . मी प्रसादासाठी पन्नास रुपयाचा पेठा रात्री विकत घेऊन ठेवला होता . घाटावर पंड्याने सर्व पूजा सांगितली . त्याची मंत्रोच्चार करण्याची पद्धत मोठी मजेशीर होती ! भरधाव गाडीला अचानक ब्रेक लागावा तसा तो उगाचच मध्ये थांबायचा व पुन्हा पिकअप घ्यायचा ! असो . संकल्प सोडताना देखील काही मजा मजा घडल्याच !पंड्या मला म्हणाला की तुमचा काय संकल्प आहे तो सांगा . मी म्हणालो माझा असा काही विशेष वेगळा संकल्प नाही . तो थोडासा वैतागला आणि म्हणाला संकल्प नाही तर मग परिक्रमा कशाला करता ? काहीतरी संकल्प घेतल्याशिवाय परिक्रमा करायची नसते . नाहीतर ते नुसतेच भ्रमण होते . नर्मदेच्या काठावरती मी बसलो होतो आणि नर्मदे काठी पिढ्यानु-पिढ्या पूजा सांगणारा एक ब्राह्मण मला हे सांगत होता त्यामुळे मला ऐकणे भाग होते ! परंतु माझा खरोखरच काही संकल्पना नव्हता त्यामुळे मी त्याला असे म्हणालो की नर्मदा मातेचा जो काही संकल्प माझ्यासाठी असेल तोच माझा संकल्प !असा संकल्प सोडा . तो चक्रावून गेला आणि मला म्हणाला असा कुठे संकल्प असतो का ! काहीतरी संकल्प सोडा जसे की माझे लग्न होऊ दे ,मला मूळ बाळ होऊ दे ,माझे घरदार होऊ दे ,माझा अमुक अमुक प्रश्न सुटू दे , मला कोर्टकचेरी मध्ये यश येऊ दे ,माझा जमिनीचा प्रश्न सुटू दे ,मला पैसा मिळू दे ,इत्यादी . माझा खरोखरच असा कुठलाही प्रश्न नव्हता त्यामुळे मी त्याला ठामपणे सांगितले की नर्मदा मातेचा जो संकल्प आहे तोच माझा संकल्प असा संकल्प कृपा करून तुम्ही सोडा . हे वाक्य संस्कृत मध्ये बसवणे त्याच्याकरता थोडेसे अवघडच होते , त्यामुळे मी त्याला म्हणालो की हिंदीमध्ये बोला . नर्मदा मैया ला हिंदी चांगली कळते ! आणि त्याने ब्रेक मारत मारत खरोखरीच चक्क हिंदीमध्ये संकल्प सोडला ! " हे नरब्दा मैया , जो तेरा संकल्प होगा , वही इनका संकल्प हो जाये । आप ही इनके लिये संकल्प करना । और इनकी परिक्रमा , पूर्ण कराना । नरब्दे हर ! " . आम्ही दोघे अगदी नर्मदा नदीच्या काठावर ओल्या फरशीवर बसकरे टाकून बसलो होतो .मी संपूर्णपणे भिजलो होतो . नर्मदा मैयाला मी तशा ओल्यातच साष्टांग नमस्कार केला . कुपीमध्ये तिचे जल भरून घेतले . पंडिताने मला परिक्रमेचे सर्व नियम समजावून सांगितले . आणि मला म्हणाला यथाशक्ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता . दिली नाही तरी चालेल . इतक्यात एक माणूस माझ्या हातामध्ये शंभर रुपये ठेवून निघून गेला . तेच शंभर रुपये मी पंडिताला दिले . आता कन्या पूजन करायचे असते , परंतु जागेवरून मी बूड देखील उचलले नाही इतक्यात पाच छोट्या कन्या ओळीने माझ्या शेजारी येऊन बसल्या . मी सर्वांचे चरण स्वच्छ धुऊन घेतले . त्यांचे चरण तीर्थ घेतले आणि त्या सर्वांना सोबत आणलेला पेठा हाताने भरविला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले ! पंडित देखील खुश झाला . तो म्हणाला , " आपकी परिक्रमा सफल हो जाये ! शुरुवात तो बहुत अच्छी हुई है ।कन्या स्वयं आपके पास चली आई । यह अच्छा संकेत है । " मला यातले काहीच माहिती नव्हते आणि त्याचे आयुष्यच नर्मदे काठी जात असल्यामुळे तो म्हणतो ते खरेच असणार हे लक्षात घेऊन मी उठलो .काठी हातात घेतली . झोळी पाठीला अडकवली . नर्मदा मातेला नमस्कार केला , सूर्य नारायणाला नमस्कार केला , पाचही कन्यांना नमस्कार केला ,मनोमन सद्गुरूंचे चरण आठवले आणि माझ्या या जन्मातील पहिल्या नर्मदा परिक्रमे करिता मी सिद्ध झालो .गुरुद्वाराच्या दिशेला तोंड करून दोन्ही हात वर केले आणि जोरात आरोळी ठोकली ! नर्मदे हर ! अनवाणी पायांनी परिक्रमा सुरू झाली !तो दिवस होता पौष शुद्ध प्रतिपदा , सोमवार , शालिवाहन शके १९४३ शिवशक ३४८ , आंग्ल दिनांक ३ जानेवारी २०२२ , सकाळी ११ : ११ वाजता !
 मी परिक्रमा सुरू करणारा कोण ? नर्मदा मातेनेच माझे पाऊल टाकून घेतले ! 

 लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !

सगळे आटोपून निघेपर्यंत वेळ झाली होती ११ : ११ !  सूर्य चांगलाच तळपत होता , त्यामुळे थंडी जाणवत नव्हती .नर्मदेच्या काठाकाठाने चालत चालत निघालो . माझ्या असे लक्षात आले की वाटेत लोकच तुम्हाला रस्ता सांगतात .लोक सांगू लागले ,बाबाजी यहा से जाओ । बाबाजी वहा से जाओ । त्याप्रमाणे पुढे चालत राहिलो . वाटेमध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय लागले . मला कोणीतरी असे सांगितले होते की मध्येच पोलीस तुम्ही करोना लस घेतली आहे का नाही याची तपासणी करतात व लस घेतली नसेल तर घरी पाठवतात . मी एक डोस कागदोपत्री घेतला होता . त्यामुळे दुसरा डोस मिळतो का ते पाहण्याकरता आयुर्वेदिक कॉलेजमध्ये चौकशी केली .

 तिथले मुख्य डॉक्टर भेटले . त्यांनी सांगितले , तुम्ही कुठलीही चिंता करू नका . ही नर्मदा माता आहे .हिच्या काठावरती अन्य कोणाचेही नियम चालत नाहीत . मैय्या के किनारे करोना फिरोना कुछ नही चलता ! त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे चालत रहा . संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील नर्मदा परिक्रमा व्यवस्थित चालू होती आणि एकाही परिक्रमा वासीला करोना झालेला नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले .एका डॉक्टरचा देखील नर्मदा मातेवर किती विश्वास आहे हे पाहून आनंद वाटला . अर्थात करोना या रोगाबद्दल माझे विचार वेगळेच होते ,तो मुळात रोग नसून आपल्या देशावर किंवा एकंदरीत जगावरच चीनने केलेले ते एक आक्रमणच होते . ते शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होते . असो . या डॉक्टरांनी मला मध्ये जर काही त्रास झाला तर कुठल्या कुठल्या आयुर्वेदिक वनस्पती वापरता येतात त्याची सविस्तर माहिती दिली . अगदी फोटो वगैरे दाखवून वनस्पती ओळखायला देखील शिकविले . उदाहरणार्थ त्वचारोगासाठी टाकळा नावाची वनस्पती असते तिच्या वाळलेल्या बिया दह्यामध्ये वाटून लावल्या की आराम वाटतो , कुठली जखम झाली तर दगडी पाला वाटून लावावा किंवा रक्तस्त्राव होत असेल तर तिथे कोरफडीचे पान धरावे असे अनेक आयुर्वेदिक नुस्खे त्यांनी मला सांगितले आणि बिनधास्तपणे नर्मदा जलामध्ये स्नान करण्याचा आणि नर्मदा जलपानच करण्याचा सल्ला त्यांनी दिला . ते मला म्हणाले नर्मदेचे पाणी किती जरी खराब तुम्हाला दिसले तरी देखील ते प्या कारण ते सर्वात मोठे औषध आहे .स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर हे सांगत असल्यामुळे मला फार बरे वाटले . तिथून निघालो . पुढे (मोहन धाम ) गीता धाम नावाचा आश्रम लागला .

त्यांनी आत येण्याची विनंती केली परंतु पुढे जावे असे वाटले .त्यामुळे येताना येतो असे त्यांना सांगून पुढे निघालो . मजल दरमजल करत जबलपूरच्या बाहेर पडलो . इथली एक गंमत आहे लोक तुम्हाला खूप आग्रहाने बोलावितात परंतु जर तुम्ही नकार दिला तर तितक्याच सहजपणे तो नकार पचविला जातो . कोणाला  देखील वाईट वाटत नाही . हे लक्षात आल्यावर मात्र मी कधी कुठल्या आश्रमामध्ये कोणालाही कुठला शब्द दिला नाही जो पाळण्या करता पुढचा जन्म घ्यावा लागावा !
जबलपूरच्या बाहेर कालीधाम आश्रम लागला . त्याला बाहेरून नमस्कार केला आणि नर्मदा मातेचा काठ पकडला . 
कालीघाट जबलपूर येथून दिसणारे नर्मदेचे मोहक रूप
आता समोर एक जंगल दिसत होते . नर्मदा नदीवरून एक मोठा पूल गेला होता .याला भटौली पूल (Bhadoli bridge on google map)असे म्हणतात .नर्मदेच्या उत्तर तटावरील भटवली गाव आणि दक्षिण तटावरील मानेगांव , मंगेली  या गावांना हा पूल जोडतो.
भटोली पुलावरून दिसणारे नर्मदा मातेचे विहंगम दृश्य

 मी त्या जंगलामध्ये शिरणार इतक्यात सायकल वरून एक जण वेगाने आला .तो पुलावरून नर्मदा ओलांडून निघाला होता परंतु मला पाहून वेगाने कच्च्या रस्त्याने सायकल चालवत खाली आला होता . नर्मदे हर महाराज ! तिकडे जाऊ नका .तो जुना परिक्रमा मार्ग आहे .नवा मार्ग इकडून महामार्गने आहे .असे तो म्हणाला . त्याने पूर्वी परिक्रमा केलेली होती . नर्मदेवरील बरगी धरणामुळे जुना परिक्रमा मार्ग पाण्यामध्ये बुडाला होता आणि नवीन मार्ग म्हणजे डांबरी सडक याला पर्याय नव्हता .
 कारण पुढे एक गौर किंवा परियत नामक मोठी नदी मध्ये आडवी येणार होती .त्याने सांगितलेले ऐकावे लागले ,कारण गुरुजींनी मला सांगितले होते की वाटेत जो कोणी तुम्हाला भेटेल , नर्मदे हर म्हणेल ,त्याचे बोलणे ऐकायचे .नर्मदा माता सांगते आहे असे समजून ऐकायचे .त्यामुळे पुलावरती चढलो आणि भुकेची जाणीव झाली . पहिलाच दिवस आणि पहिली चाल असल्यामुळे झपाझप चालत इथपर्यंत आलो होतो ! तोपर्यंत पोटात भुकेची काही जाणीव नव्हती . परंतु इथवर आलो आणि मात्र अचानक कडाक्याची भूक लागली . पुलावरून चालता चालता विचार करत होतो गेल्यावेळी आपण जेव्हा मध्य प्रदेश मध्ये आलो होतो तेव्हा इंदोरच्या सराफा बाजार मध्ये जाऊन मस्तपैकी गरमागरम पोहे आणि जलेबी खालली होती !आता मात्र तसले काही मिळणे शक्य नाही . हा सुनसान रस्ता आणि डोक्यावर तळपणारा सूर्य याखेरीज आपल्या सोबत आता काहीच नाही . असे विचार करत मनाला शांत करत नर्मदेचे नामस्मरण सुरू केले आणि इतक्यात एक मिनिटही पूर्ण होण्याच्या आत एक बुलेट माझ्या शेजारी येऊन थांबली . मी गाडीची नंबर प्लेट पाहिली तर ती कोरी होती . गाडीवर दोघेजण बसले होते त्यातील एक जण उतरला . माझ्या हातामध्ये दोन कागदी पुडे ठेवून नर्मदे हर असे म्हणून निघून गेला . गाडीला क्रमांक नव्हता हे माझ्या पक्के लक्षात राहिले आहे .दोन्ही पुडे हातात घेऊन शंभर एक पावले मी विमनस्क अवस्थेमध्ये चाललो. पुडे गरम होते . हाताला चटका बसेल इतके गरम होते .एवढे गरम काय दिले आहे ?उघडून तरी पहावे असे वाटले म्हणून बाजूला थांबलो ,महामार्गाच्या कडेला लोखंडी रेलिंग असतात त्यावर टेकलो आणि पुडे उघडून पाहिले तर काय ! एका पुड्यात गरमागरम पोहे आणि दुसऱ्या पुड्यात गरमागरम साजूक तुपातली जिलेबी होती !  
( प्रातिनिधीक प्रतिमा )

क्षणात डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या ! समोर मंद गतीने स्मितहास्य करत वाहणारी नर्मदा मैया दिसत होती . बुलेट गतीने अदृश्य झाली होती . भरून पावलो . मन भरले . पोटही भरले . अगदी तीच इंदोरी पोह्यांची चव होती जी माझ्या जिभेवर सतत रेंगळायची  आणि अगदी तीच साजूक तुपातली कुरकुरीत जिलेबी , गुलाब पाकळ्या घातलेली! आणि लक्षात आले इथे यायचे तर कुठलीही इच्छा करता कामा नये .निरीच्छ व्हावे तरच परिक्रमावासी म्हणवावे . अन्यथा मैया आहेच कोड कौतुक पुरवायला ...


लेखांक नऊ समाप्त (क्रमशः)

 लेखांक १० : या स्वामी जेवायला !

पोटात अन्न सरकले आणि पायांनी चांगली गती घेतली . नवे कोरे बूट होते ,स्वच्छ डांबरी रस्ता होता , पहिलाच दिवस होता त्यामुळे कुठली इजा वगैरे पायाला झाली नव्हती अथवा वेदनाही नव्हती , झपाझप चालण्यासाठी अनुकूल अशीच ही परिस्थिती होती . त्यामुळे गतीने चालू लागलो . परंतु अजून सुद्धा मला नक्की चालावे कुठल्या गतीने हे कळत नव्हते .फार वेगाने चालले तर पुढे कधीतरी पाय दुखण्याची शक्यता होती .पायाला एखादी इजा झाली एखादा स्नायू ओढला गेला किंवा लिगामेंट वगैरे दुखावले तर सगळाच खेळ थांबणार होता .तेच जर हळूहळू चाललो तर वेळ वाढणार होता आणि पायांवर अधिक भार पडणार होता .मनात हा प्रश्न पडताक्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले आणि तिला म्हणालो की मला मार्गदर्शन कर की माझे पाऊल किती लांबीचे असावे .ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्राइड असे म्हणतात . एका पावलाची झेप .ऐकून तुम्हाला हे सर्व मजेशीर वाटू शकते परंतु तीन हजार सहाशे किलोमीटर चालायचे असेल तर तुम्ही तुमच्या चालण्याच्या सवयी मध्ये केलेला एक छोटासा बदल सुद्धा शेकडो किलोमीटर चा फरक पाडू शकतो . त्यात रक्ताचा अभियंता असल्यामुळे असल्या किरकोळ गोष्टींमध्ये काथ्याकुट करायची सवय मला मुळातच आहे . मला असा प्रश्न पडला आणि इतक्यात माझ्यासमोरून एक गाय चालते आहे असे माझ्या लक्षात आले . गोमाता छान डुलत डुलत चालली होती . तिच्या पावलांचे मी निरीक्षण करू लागलो . गाय एका संथ आणि सुंदर लयी मध्ये चालत होती .मी ठरविले की हिच्या पावलांवर पाऊल टाकून चालूया . तिचे मागचे पाऊल बरोबर पुढच्या पावलावर पडत असे . तिच्या चालण्याची अजून एक गंमत होती . 

तिला गती वाढवावीशी वाटली की ती चाल तशीच ठेवायची फक्त पाऊल टेकता टेकता एक इंच पुढे टेकवायची . गती कमी करताना देखील तीच युक्ती करायची पाऊल टेकता टेकता एक इंच अलीकडे ठेवायचे . या छोट्याशा गोष्टीमुळे देखील मला खूप मोठी शिकवण मिळाली . मी शक्यतो गती वाढविण्यासाठी वारंवारिता अर्थात फ्रिक्वेन्सी वाढवायचो त्यांनी पाय लवकर अवघडून जायचे .परंतु या युक्ती मध्ये वारंवारिता तीच होती आणि फक्त वेवलेंग्थ वाढवली जात होती . फारशी शक्ती लागतच नव्हती. त्या गोमातेचे मी मनोमन आभार मानले आणि पुढे चालू लागलो . महामार्गावरून गाड्या सुसाट वेगाने जात होत्या . परंतु जाता जाता बहुतेक लोक हात उंचावून नर्मदे हर म्हणत होते किंवा नुसता हात तरी दाखवत होते . काही लोक गाडी थांबवून पाच रुपये , दहा रुपये ,पन्नास रुपये यथाशक्ती दक्षिणा हातावर टेकवत होते . ही सर्व माणसे अत्यंत साधी व गरीब घरातील आहेत हे लगेच लक्षात येत होते परंतु त्यांची मैय्यावरील निष्ठा अतिशय वाखाणण्याजोगी होती . 
कोण कुठला परिक्रमावासी ?कुठून आला माहिती नाही . कुठे चालला ते देखील माहिती नाही . परंतु केवळ तो नर्मदेच्या काठावरून निघाला आहे , नर्मदेचे नाव घेत निघाला आहे , हे पाहून लोक तुम्हाला मदत करतात ! हे किती अद्भुत व हृद्य नाते आहे ! रक्ताच्या नात्याच्या फार पलीकडचे व घट्ट!  अजून एक गमतीशीर गोष्ट मी पाहिली . हा पहिलाच कालखंड असल्यामुळे मी रस्त्याने चाललो होतो . पुढे नर्मदा मातेच्या कृपेने रस्त्यावर कधी आलोच नाही ! परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना गाडीवाले ललकारा तर देतच . परंतु थंडीमुळे नाका तोंडाला घट्ट रुमाल गुंडाळला असेल तर केवळ हॉर्न दाबून परिक्रमावासीला नर्मदे हर म्हटले जाई ! इथे बहुतांश लोक आपल्या गळ्यामध्ये एखादा पंचा किंवा टॉवेल लटकवूनच चालतात . तो इथल्या पेहरावाचाच भाग आहे जणू . पुढे चालता चालता गौर नावाची नदी आडवी आली त्याच्याच पुढे गौर नावाचे गाव आहे असे मला सांगण्यात आले . 
                    गौर नदी / परयात नदी
रस्ता सोडून थोडेसे गौर नदीच्या काठाने चालत गेले की जसा नर्मदा नदीला धुवाधार नावाचा धबधबा भेडाघाट येथे आहे त्याची छोटीशी प्रतिकृती इथे भदभदा धबधबा नावाने पाहायला मिळते . 
उन्हाळ्यामध्ये एकच धार चालू असणारा हा धबधबा पावसाळ्यामध्ये मात्र अदृश्य होऊन जातो इतका महापूर या नदीला येतो . 
              भदभदा जलप्रपात ( गौर नदी )

सध्या ही नदी अत्यंत प्रदूषित देखील झालेली आहे त्यामुळे तिचे पाणी काळे पडत चालले आहे .
नदीच्या काठावर एक भली मोठी गाय मरून पडली होती . मी प्रथमच नर्मदेकाठी मृत गोमाता पाहत होतो . तिने नुकताच प्राण सोडला असावा कारण अजून तिच्या देहाचा वास येत नव्हता .
                     (प्रतिनिधिक प्रतिमा)
बहुतेक एखाद्या मोठ्या ट्रकने वगैरे तिला उडवले असावे .मला तेव्हा खरोखरच कल्पना नव्हती की येत्या काही महिन्यांमध्ये अशा शेकडो गायी म्हशी मला पहाव्या लागणार आहेत ! तिला नमस्कार करून मी पुढे चालू लागलो .नदीवर बऱ्यापैकी मोठा पूल होता आणि नदीचे पात्र ओलांडता येणे केवळ अशक्य होते इतकी ती लांब रुंद व खोल नदी वाटत होती . अर्थात ही मला आडवी आलेली पहिली नदी ! नर्मदा नदीला ९९९ लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात .काही नद्या तर तिच्या पेक्षाही मोठ्या असतात ! (उदा . बांद्राभान इथली तवा नदी ) काही नद्यांची नावे पुन्हा पुन्हा तीच ठेवली गेलेली आहेत .अर्थात एका नावाच्या अनेक नद्या आहेत . तवा नावाच्याच दोन नद्या आहेत . छोटे छोटे ओढे आणि नाले तर किती येऊन मिळाले याची गणतीच करू शकत नाही . या सर्व गमती पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच . सध्या आपण भोजनाची सोय कुठे होते ते पाहूयात !सरळ रस्त्याने भरपूर चालल्यावर एका बस थांब्यावर काही क्षण बसलो . माझ्या लक्षात आले की माझ्या पायाला मोठे मोठे फोड येऊ लागले आहेत . (ब्लिस्टर्स ) हे एकदा वाढले की फार तापदायक असतात हा माझा पूर्वानुभव होता . त्यामुळे समोरच असलेल्या बाभळीच्या काट्याने मी सर्व फोड फोडून टाकले .पुढे एक छोटेसे टपरीवजा दुकान होते . तिथे दिनेश महोविया नावाचा एक सज्जन दुकानदार होता .त्याने मला बोलावून घेतले व गरम गरम कॉफी पाजली तसेच अजून काय सेवा करू विचारू लागला व परिक्रमेचा पहिलाच दिवस आहे हे लक्षात आल्यावर त्याने मला सोबत एक छोटी डायरी आणि पेन दिले . 
ते पुढे खूपच सोयीचे ठरले .कारण मी सोबत मोबाईल आणला नव्हता त्यामुळे वाटेत भेटलेल्या सर्व लोकांचे क्रमांक मी याच डायरीमध्ये नोंदवून घेत असे .

त्याने सांगितले की पुढे राजा बाबू नावाचा पेट्रोल पंप आहे तिथे भोजनाची व्यवस्था होईल . मी पुन्हा एकदा भर उन्हामध्ये चालू लागलो . दुपारचा एक वाजला असावा . राजा बाबू पंपावर गेलो .तिथल्या कामगारांनी अतिशय आदबीने मला आत मध्ये नेऊन बसविले . 
            राजा बाबू सोनकर पेट्रोल पंप व अन्नक्षेत्र

पेट्रोल पंपाचे कार्यालय संपूर्ण काचेचे होते व पूर्ण वातानुकूलित होते . आत मध्ये मोठे मोठे सोफे आणि गाद्या अंथरून ठेवल्या होत्या . एक जुनी प्रिया स्कूटर अतिशय सुंदर पद्धतीने आत मध्ये ठेवण्यात आली होती ! मला आत गेल्यावर फारच हायसे वाटले कारण पहिलाच दिवस असल्यामुळे उन्हाचा दाह चांगलाच जाणवला होता मला . दिग्विजय सिंग यांचे कार्यकर्ते असलेल्या सोनकर बंधूंची ही मालमत्ता आहे .पंप मालक संजय सोनकर , राजू भैय्या सोनकर , संजू भैय्या सोनकर आणि हेमंत सोनकर असे चार भाऊ आहेत . ते येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला घरगुती जेवण बनवून देतात .परिक्रमावासींना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवती होमिओ क्लिनिकच्या डॉक्टर राजदीप यांची होमिओपॅथिक औषधे इथे मोफत उपलब्ध आहेत .डोकेदुखी ,अंगदुखी , पाठ दुखी ,जुलाब वगैरे विविध रोगांवरची औषधे इथे परिक्रमावासींसाठी मोफत ठेवलेली होती . माझी चौकशी करण्यासाठी स्वतः मालक आले व त्यांनी आपल्या पत्नीच्या हस्ते अप्रतिम मेथी मलई ,चार गरमागरम रोटी ,गरम वाफाळलेला भात , आणि चविष्ट आमटी असा पहिलाच भोजन प्रसाद मला आणून दिला ! परिक्रमेमध्ये इतके सुग्रास भोजन मिळेल याची मला कल्पनाच नव्हती ! मी अतिशय आनंदाने भोजन प्रसाद ग्रहण केला ! नित्याच्या सवयीप्रमाणे भोजनापूर्वी परमेश्वराचे स्मरण केले .शिवछत्रपतींचे स्मरण केले . प्रत्येक भोजनापूर्वी मी श्लोक म्हणायचो ते असे .

मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेवणार ।
घडो माझीया हातुनी देशसेवा ।
घडो माझिया हातुनी धर्मसेवा ।
म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा ॥

महामंत्र आहे नवे शब्द साधा ।
जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा ।
नुरे देश अवघा जयांचे अभावी ।
शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी ॥

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !
भारत माता की जय !
हिंदूधर्म की जय ! नर्मदा मैय्या की जय ! नर्मदे हर ! मातु गंगे हर ! जटाशंकरी हर ! नमः पार्वती पते हरहर महादेव ! 
या स्वामी जेवायला !


लेखांक दहा समाप्त ( क्रमशः )

 लेखांक ११ : पहिला मुक्काम

पहिलेच भोजन घेऊन तनमन तृप्त झाले ,तिथेच मुक्काम करा असा आग्रह घरातील लोक करत होते परंतु मी मनोमन असे ठरविले होते की या परिक्रमे दरम्यान आपल्या देहाचे कमीत कमी चोचले पुरवायचे , तसेही मी सात आठ किलोमीटरच चाललो होतो सकाळपासून. अजून चालता येईल असे वाटले आणि मी भर उन्हामध्ये सामान उचलले . पुढे बरेला नावाचे गाव लागले . तिथे जमुना पटेल नावाचा एकाच डोळ्याने डोळस असलेला एक चहावाला भेटला . हा गावामध्ये संघाची शाखा लावत असे . त्याच्या आग्रहाखातर सुंदर असा चहा पिऊन पुढे चालू लागलो . माझे कपडे नवे कोरे होते आणि क्षौर केलेले होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळत होते की हा नवीन परिक्रमा वाशी आहे .लोक कुतूहलाने थांबवत , नर्मदे हर चा पुकारा देत आणि चौकशी करत . कहा से हो बाबाजी ? क्या करते हो ? क्यू उठाई परिक्रमा ? वगैरे वगैरे .नर्मदा खंडातील लोकांनी गेल्या अनेक वर्षात इतके परिक्रमावासी पाहिले आहेत की समोरचा मनुष्य पाहिला पाहिला ते त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती ओळखून जातात . हा शिकलेला आहे का अशिक्षित आहे , शहरातला आहे का गावातला आहे ,नोकरी करतो की व्यवसाय करतो ,विवाहित आहे की अविवाहित आहे की ब्रह्मचारी आहे , स्वखुशीने आला आहे की परिस्थितीमुळे आला आहे , अशा बऱ्याचशा गोष्टींचे ज्ञान त्यांना तुम्हाला पाहता क्षणी आधीच झालेले असते . बरेचदा काही लोक तुमची फिरकी सुद्धा घेत राहतात .आपण फक्त नाकापुढे बघून चालत राहायचे .असेच चालता चालता दुपारच्या मावळतीकडे एक मोठी बाजारपेठ लागली.हे बरेला नावाचे गाव होते . चांगलीच गजबज होती तिथे ठणठणपाल दादांच्या आश्रमामध्ये मुक्काम करा असे मला कोणीतरी सुचवले . 

अगदी रस्त्याला लागूनच आश्रम आणि मंदिर होते .दोन-तीन सत्तरी च्या पुढचे सेवेकरी आश्रमाचे काम बघत होते . मला त्यांनी आसन लावायची सूचना केली . तुम्ही जिथे मुक्काम करता त्या ठिकाणी एखादी जागा घेऊन तिथे आपला बोरिया बिस्तारा ठेवायचा असतो त्याला आसन लावणे असे म्हणतात .
 आसन लावण्यापूर्वी मी आतील मंदिरांची दर्शने करून घेतली आणि मग पाच मिनिटे बसून राहिलो . ठणठणपाल बाबांची मूर्ती आत मध्ये होती . तसेच एक सुंदर शिवलिंग देखील होते .देवीची मूर्ती होती . 

 माझ्या असे लक्षात आले की मंदिरामध्ये खूपच गोंगाट ऐकू येत होता . रस्त्यावरचा जरा सुद्धा शांतता नव्हती त्यामुळे मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि सामान घेऊन चालायला लागलो . सेवेकरी काही अंतर माझ्यामागे धावत आला परंतु त्याला मी सांगितले की मला पुढे जायचे आहे मग तो म्हणाला जैसी तुम्हारी इच्छा । वैसे इधर भी रहे सकते थे । मला थोडेसे वाईट वाटले परंतु माझा नाईलाज होता .इतक्या घोंगाटामध्ये राहण्यात काहीच हशील नव्हता .पुढे चालू लागलो इथून पुढे रिछाई नावाचे गाव होते . तिथे शारदा मातेची एक टेकडी होती . 
रिछाई गावातील टेकडीवरील शारदा माता मंदिर समूह
टेकडी वरून दिसणारे परिक्रमा मार्गाचे विहंगम दृश्य

तिथे देखील मुक्कामाची सोय होती आणि गावामध्ये एका कुटुंबामध्ये परिक्रमावासी उतरायचे असे मला कळले . मी चालत असताना काही मुले सायकलवरून जाता जाता रील्स बनवत होती . त्यांना मला पाहून मौज वाटू लागली व ते माझ्याबरोबर चालू लागले .त्यांच्याकडे मोबाईल होते .मला म्हणाले बाबाजी आपकी फोटो लेते है । मी म्हणालो लेकिन मेरे पास तो कॅमेरा नही है । ते म्हणाले हरकत नही । किसी और का नंबर बता देना | हम भेज देंगे । मग त्यांनी माझा एक फोटो काढला . 
   बरेला व रिछाई दरम्यान मुलांनी काढलेले प्रकाशचित्र
मी झपाझप पुढे चालू लागलो आणि रिछाई गावांमध्ये पोहोचलो .इथे कटारे नावाचा परिवार परिक्रमावासींची अतिशय मनापासून सेवा करत असे . मोठे औरस चौरस असे त्यांचे घर होते . चार भाऊ , त्यांची चार घरे व या चारही घरांना जोडणारा एक लांबुळका वरांडे वजा भाग त्यांनी बनविला होता ज्याच्यामध्ये एकावेळी शंभर लोक सुद्धा झोपू शकले असते . अतिशय आगत्याने त्यांनी मला आत मध्ये नेले .तिथे मी एकटाच परिक्रमावासी होतो .परिक्रमावासींना झोपण्यासाठी फोमच्या गाद्या त्यांनी बनवून ठेवल्या होत्या . त्यांची चवड एका बाजूला  जिन्याखाली लावलेली होती .तिथून एक गादी घेऊन मी माझे आसन लावले . माझ्या परिक्रमेतली नर्मदा मातेची पहिली पूजा आणि आरती मी तिथे बसून केली .आरती मला पाठ नव्हती . चाल देखील आपल्या महाराष्ट्रातील चाली पेक्षा वेगळी होती .परंतु संगीताचे थोडेसे अंग असल्यामुळे ती आरती माझ्या लगेच लक्षात येऊन गेली .
 प्रीतम कटारे हे तिथले कुटुंब प्रमुख होते .सत्यम ,चंद्रशेखर आणि वेदांत नावाची या चौघा भावंडांची मुले होती आणि चार मुली देखील होत्या . खरे तर हजारो परिक्रमावासी यांच्या घरी रोज ये जा करत असतील . परंतु तरी देखील त्यांनी मला फारच आदर दिला असे मला जाणवले .कारण रात्रीच्या भोजनाला काय करू असे मला सर्व भावजयी विचारायला आल्या . मी , जो आपकी इच्छा । असे म्हणाल्यावर त्यांनी त्या भागातील वैशिष्ट्य असलेला गक्कड भरता माझ्यासाठी केला . माझ्यासाठी गक्कड हा प्रकार नवीन होता . दाल भाटी मध्ये जी भाटी असते त्यालाच इकडे गक्कड असे म्हणतात . तो कसा फोडतात कसा खातात हे सर्व त्यांना विचारून घेतले . भरता म्हणजे आपले वांग्याचे भरीत .मी जेवायला बसलेलो असताना घरातील सर्व कुटुंबीय माझ्यासमोर उपस्थित होते . आजी , आजोबा जे अत्यंत सुदृढ आणि ठणठणीत होते , चारही मुले , त्यांच्या पत्नी आणि सर्व नातवंडे असा गोतावळा माझ्या भोवती उभा होता .जेवण झाल्यावरती आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो . नातवंडांना चित्रपट सृष्टीचे आकर्षण आहे असे लक्षात आल्यावर त्यांना बॉलीवूड विषयी माहिती दिली .त्यांनी देखील त्यांच्या अनेक शंका विचारून घेतल्या .काही काळ बॉलिवूडमध्ये जवळून काम केलेले असल्यामुळे त्याचे सर्व अंतरंग मला पक्के ठाऊक होते ते त्यांना सांगितले . अन्य बऱ्याच राष्ट्रीय विषयांवर देखील चांगली चर्चा झाली . सातही नातवंडे अतिशय उत्सुकतेने माझे बोलणे ऐकत आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटले . आताच्या काळामध्ये या वयाची मुले शक्यतो मोबाईल मध्ये गुंतलेली दिसतात . हा फारच मोठा फरक मला तिथे जाणवला . त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीकरण चालू आहे त्याची देखील त्यांनी मला माहिती दिली .नातवंडे रात्री उशिरापर्यंत मला चिकटून होती .अखेर आजी-आजोबांनी दरडावून त्यांना सांगितले .बाबाजी को विश्राम करने दो । मग सगळी मुले पळाली .
हा दिवस होता पौष शुद्ध द्वितीया शके १९४३ मंगळवार ३ जाने २२ .
पहाटे चार वाजता मला जाग आली . कडाक्याची थंडी पडलेली होती . साधारण सात आठ तापमान असावे .घराच्या समोरून मागे जायला सोय होती . वाटेत सवत्स धेनुमाई बांधलेली होती .मागे जाऊन मी आता गार पाण्याने अंघोळ करणार इतक्यात आजोबा माझ्यासाठी गरम पाणी घेऊन आले . एकट्या परिक्रमा वासीला मिळणारे हे काही फायदे असतात . लोक तुम्हाला शक्यतो घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागवतात .गटाने येणाऱ्या लोकांना मात्र शक्यतो इतक्या सुविधा मिळत नाहीत बरेचदा त्यांना भोजन ऐवजी शिधा दिला जातो आणि करून खायला सांगितले जाते . नर्मदा खंडामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे . एक निरंजन ।दो सुखी ।तीन मे खटपट और चार दुखी ।
 अर्थात मला माहिती नव्हते की हा माझा परिक्रमेतील पहिला दिवस असल्यामुळे नर्मदा माता मला गरम पाणी वगैरे गोड कौतुक पुरवीत आहे . पुढे मात्र असे गरम पाणी कुठे मिळाले नाही .सकाळची पूजा आरती आटोपून घेतली . माताजी नी आणून दिलेला गरम गरम चहा पिऊन नर्मदे हर केले .अशा पद्धतीने आयुष्यातील पहिल्या वहिल्या नर्मदा परिक्रमेचा पहिला मुक्काम यथा सांग पार पडला !
लेखांक अकरा समाप्त ( क्रमशः )

 लेखांक १२ : वेश धरावा बावळा

परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी मी सुमारे १८ ते २० किलोमीटर पायी चाललो होतो ! हा आकडा खरे तर आश्वासक होता परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . सकाळी थंडी जास्त असल्यामुळे तुम्ही कितीही वेगाने चालले तरी तुम्हाला फारसा घाम येत नाही . किंवा जरी घाम आला तरी थंड वातावरण असल्यामुळे तो सुखद असतो . हा संपूर्ण परिसर थंडीसाठी प्रसिद्ध होता . माझे हात अक्षरशः गोठून जात होते . माझ्या दंडाला (काठीला )दोन्ही बाजूंनी असलेले धातूंचे गठ्ठू अक्षरशः बर्फासारखे गार पडत . वेताचा दंड देखील खूप गार पडायचा . एकदा त्याला जिथे पकडले तिथेच धरून ठेवावे लागायचे . हात जरा देखील वर खाली केला की हाताला गार लागायचे . माझ्याकडे हातमोजे ,कान टोपी , मफलर ,स्वेटर वगैरे काहीच नव्हते . परंतु छाटी हे जे वस्त्र मी घालायचो त्यात छातीवरती कापडाचे दोन पदर येतात त्यामुळे छातीला थंडी कमी वाजायची . मला या छाटी वस्त्राची पूर्वीपासून सवय आहे . आपली छाती आणि कान गरम राहिले की थंडी फारशी वाजत नाही हे सूत्र लक्षात ठेवावे .
   हेळवाक घळ येथे छाटी आणि उपरणे (उपवस्त्र) घालून प्रस्तुत लेखक ( महाविद्यालयीन जीवनात )

छाटी हे पारंपारिक भारतीय वस्त्र . ना टाका ,ना शिवण , ना नाडी ,ना बटण ! फक्त एक कापड ! मुंजी मध्ये मुलाला प्रथम हे वस्त्र नेसवले जाते . तिथून पुढे माझ्या महाविद्यालयीन जीवनात देखील मी भटकंतीसाठी हेच वस्त्र बरेचदा नेसायचो . हे वस्त्र धड सांभाळण्यासाठी उत्तम आहे परंतु गुडघ्या खालचे पाय आणि खांद्यापासूनचे हात ,मान ,गळा हे मात्र चांगलेच गार पडायचे .आपले पारंपारिक धोतर असते , ते दुहेरी केले की त्याची लुंगी किंवा छाटी नेसता येते .
महाविद्यालयीन जीवनात प्रवासादरम्यान प्रस्तुत लेखकाने घातलेली छाटी

परिक्रमेसाठी हे अत्यंत सोयीचे वस्त्र आहे . कारण हेच वस्त्र तुम्ही फेटा म्हणून सुद्धा गुंडाळू शकता .उपवस्त्र म्हणून घेऊ शकता .किंवा मुख्य पेहराव म्हणून घालू शकता .रात्री झोपताना खाली अंथरू शकता किंवा थंडी वाजल्यास पांघरू देखील शकता . अंग पुसावयास देखील याचा उपयोग आहे किंवा घडी करून बसण्यासाठी आसन म्हणून देखील वापरता येते .आपला भारतीय पारंपरिक पोशाख किती विचारपूर्वक बनविलेला आहे हे परिक्रमा केल्यावर लक्षात येते .बर याच्यामध्ये आकाराचा (साईझचा ) घोळ होण्याची शक्यता नाही .परिक्रमेमध्ये जर मी विजार (पॅन्ट ) घातली असती , अशी कल्पना करा , तर मला दर पंधरा दिवसाला एक एक इंच कमी मापाची विजार विकत घ्यावी लागली असती ! सहा आठ इंच कंबर सहज कमी झाली होती माझी .
 डोक्याला मी फेटा बांधलेला असायचा त्यामुळे उन्हापासून आणि थंडीपासून संरक्षण व्हायचे . हा फेटा बांधायची आवड मला अगदी लहानपणापासून आहे ! 
       ९ वर्षाचा असताना स्वतः नेसलेला फेटा
   वय वर्षे ७. मित्रमंडळींसोबत बेंदूर सण , फेट्यात ! 
 वेष कुठलाही असो , फेटा अत्यावश्यक ! अमरावती नजीक बांधलेल्या मंदीराचा कळस बसविताना ...

तात्पर्य परिक्रमेसाठी मी निवडलेला वेश हा अशा पद्धतीने अत्यंत पारंपारिक आणि सोयीचा होता .तसेच मला त्याची सवय असल्यामुळे काहीच त्रास झाला नाही .बऱ्याच लोकांना लुंगी मध्ये इतके चालायची सवय नसते त्यामुळे त्यांना त्रास होतो .बहुतांश परिक्रमावासी आजकाल शिवलेले कपडे घालतात .सदरे , शर्ट , कफनी , बंडी , स्वेटर्स , टोप्या ,हॅटस , बंगाली अथवा झब्बे हे सर्रास घातलेले दिसते . अर्थात देश काल परिस्थितीनुसार ते क्षम्य व योग्य देखील आहे परंतु सोयीचे मात्र निश्चित नाही ! सोयीचा वेश म्हणाल तर आपला पारंपारिक वेषच !त्यात सुद्धा कमरेला एखादी नाडी बांधली की एक मोठा कप्पा पोटापाशी तयार व्हायचा .त्यात तुम्ही चार आणे ठेवले तरी दिवसभर पडत नाहीत . त्यात तुम्ही अक्षरशः दहावीस किलोपर्यंत सामान ठेवू शकता !
अंतर्वस्त्रे देखील मी विकतची घातली नाहीत . छाटीचीच एक चार इंचाची पट्टी फाडायची . आणि अजून एक अर्धा इंची पट्टी फाडून त्याचे कटिसूत्र करायचे (नाडा ) . झाली लंगोटी तयार ! सर्व साधू संन्यासी हाच वेश धारण करतात . परिक्रमेमध्ये देखील हे अंतर्वस्त्र अत्यंत सोयीचे जाते . एक तर ते धुणे वाळविणे सोपे असते .  व जुने विरल्यास किंवा हरविल्यास नवीन बनविणे देखील फार सोपे असते . कोणावरती अवलंबून राहावे लागत नाही .तसेच व्यवस्थित लज्जा रक्षण होते .ही लंगोटी बांधण्याची साधूंची पद्धत मात्र थोडीशी वेगळी आहे .पहिलवान ज्या पद्धतीने बांधतात त्याहून थोडीशी निराळी अशी ही पद्धत आहे .आणि माझे सौभाग्य असे की ती पद्धत मला पू . सियाराम बाबा यांच्याकडून शिकायला मिळाली . कशी ते पुढे त्यांच्या प्रकरणांमध्ये सांगेन .याखेरीज थंडीचे कपडे उदाहरणार्थ थर्मल वेअर वगैरे सोबत ठेवले तर वयोवृद्ध परिक्रमावासींना सोयीचे पडते . गरजेपेक्षा जास्त कपडे सोबत ठेवू नयेत हे मात्र अगदी निश्चित . 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात 
वेश असावा बावळा | परी अंतरी नाना काळा । सगट लोकांचा जिव्हाळा ।मोडोची नये ॥
विशेषतः परिधान कसे असावे या विषयातला माझा थोडासा अभ्यास आहे . हौस म्हणून काही काळ बॉलिवूडमध्ये मी सहायक वेशभूषाकार  केशभूषाकार रंगभूषाकार अर्थात कॉस्चुम डिझायनर व हेअर मेकअप ची कामे केलेली आहेत . मुळात भारतीय वेश म्हणजे काहीतरी कमीपणाचे लक्षण आणि पाश्चात्य वेश म्हणजे काहीतरी खूप भारी असा एक गैरसमज पाश्चात्य व्यापाऱ्यांनी पसरवलेला आहे . कारण सोपे आहे भारतीय वेश अधिक खरेदी करावा लागत नाही . पाश्चिमात्य ते कपडे मात्र सारखे बदलावे लागतात .
मी डिझाईन केलेले काही परिधान खालील प्रमाणे आहेत .
 

सांगायचे तात्पर्य इतकेच की माझे भारतीय परिधानासंबंधातील विवेचन एकांगी नसून अभ्यासपूर्ण आहे याची वाचकांना कल्पना यावी .
ओघाने वस्त्रांचा विषय निघाला म्हणून थोडे सविस्तर सांगितले .असो .अत्यंत उत्साहाने आणि वेगाने चालत सकाळी दहा वाजता मी एका तिठ्यावर येऊन पोहोचलो . याला हिंदीमध्ये तिराहा असे म्हणतात .देवरी गावानंतर आणि धनपुरी गावाच्या आधी बम्हनी तिराहा लागतो . मी इथून जात असताना एक खणखणीत आवाज मला ऐकू आला बाबाजी आगे मत जाओ ।इधर अंदर आओ ।आवाजातला आत्मविश्वास लगेच जाणविण्यासारखा होता .हे डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणून आहेत ज्यांनी स्वतःच्या जागेमध्ये माँ नर्मदा अन्नक्षेत्र नावाने सेवाकार्य सुरू केलेले आहे .
 हे स्वतः मोठे जमीनदार असून जबलपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत .भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले डॉक्टर प्रल्हाद पटेल मी गेलो तेव्हा देखील गाव पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यग्र होते . स्वतः डॉक्टर असलेले पटेल आपल्या घरी तर रुग्ण तपासातच परंतु आजूबाजूच्या गावांमध्ये देखील त्यांचे दवाखाने आहेत .तसेच गेली अनेक वर्षे न चुकता ते २७ किलोमीटर प्रवास करून ग्वारी घाटावर जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतात ! मग कितीही ऊन वारा थंडी पाऊस असला तरी ते जातातच !
 डॉ . प्रल्हाद पटेल बम्हनी तिराहा जि . जबलपूर

 यांनी मला दवाखान्यामध्ये बसविले आणि चहा मागवला . मला काही वैद्यकीय त्रास होत आहे का हे त्यांनी आधी विचारून घेतले .माझा परिक्रमेचा पहिलाच दिवस असून मी केवळ अर्ध्याच दिवसांमध्ये सुमारे वीस किलोमीटर एका दमात चाललो आहे हे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा मात्र त्यांचा चेहरा गंभीर झाला . ते मला म्हणाले मेरी आपसे बिनती है की आप आज यहा मुकाम करे । मी म्हणालो नाही नाही मला आज तीस किलोमीटर तरी चालायचे आहे ! आता मात्र डॉक्टर साहेबांचा सूर बदलला .ते मला म्हणाले , "बाबाजी मेरा जनम इस गाव मे हुआ है ।मैने इस रास्ते से जाने वाले लगभग हर परिक्रमावासी का दर्शन किया है ।लाखो परिक्रमावासियोंको में व्यक्तिगत रूप से जानता हु ।मेरी सलाह मानिये । शुरू के दिनो मे इतना जादा चलोगे तो बाद मे परिक्रमा पूर्ण नही कर पाओगे । परिक्रमा के शुरुवाती दिनो मे केवल ५ से लेकर दस किलोमीटर ही चलना चाहिए । आप तो उसे चार गुना चल चुके है इसलिये अभी आपको दो तीन दिन विश्राम करना पडेगा । "त्यांचे हे बोलणे ऐकून माझा चेहराच पडला !ते त्यांच्या क्षणाक्ष नजरेच्या लक्षात आले !ते मला म्हणाले , "बाबाजी बुरा मत मानना ।नर्मदा माता की आप पर कृपा है इसलिये आप पहले ही दिन मुझे मिले ।मुझे ज्यादा तर वह परिक्रमावासी मिलते है जो ओंकारेश्वर या अमरकंटक से परिक्रमा उठाते है ।यहा पहुंचने तक उन के पैरोंकी हालत खराब हो जाती है । आपके पास अभी भी समय है । मै जैसे बताता हु वैसे करीये । यह एक डॉक्टर की आग्या मान लिजिए । "
त्यांचे म्हणणे असे होते की मी जर त्यांनी आखून दिलेल्या प्लॅन प्रमाणे चाललो तर भविष्यामध्ये दिवसाला ५० - ५५ किलोमीटर सुद्धा आरामात चालू शकेन ! माझ्यातील विद्यार्थी जागा झाला आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण पायाची रचना शरीरचना अशा बऱ्याच शंकांचे समाधान करून घेतले .डॉक्टर ज्ञानी होते .त्यांनी सांगितलेले मुद्दे मला पटत गेले . सुरुवातीचे फक्त दहा दिवस जर मी संयम बाळगला तर पुढची परिक्रमा अतिशय निर्वेधपणे आणि वेगाने पार पडेल याची मला खात्री पटली .बऱ्याच आरंभ शूर लोकांना पुढे पायाने इतका त्रास दिलेला मला आढळला की ते कधी कधी परिक्रमा अर्धवट सोडून घरी निघून गेले . डॉक्टर प्रल्हाद पटेल दुसऱ्याच दिवशी मला भेटणे ही नर्मदा मातेची माझ्यावर झालेली असीम कृपाच मी मानतो ! थंडी अजूनही खूप होती त्यामुळे मी कडक उन्हामध्ये अंथरूण टाकून पडून राहिलो . डॉक्टर साहेब नित्यनेमाप्रमाणे जबलपूरला नर्मदा मातेच्या दर्शनासाठी निघून गेले . दरम्यान करोना लसीकरण या विषयावर आमची चर्चा झाली होती .माझ्या नावावर दुसरा डोस निश्चितपणे नोंदविण्याची त्यांनी मला ग्वाही दिली . तसेच मी रोज किती किलोमीटर चालतो आहे याची पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत डायरीमध्ये नोंद ठेवण्याची सूचना त्यांनी मला केली .
डॉक्टर साहेबांनी एक सुंदर असे दत्त मंदिर बांधलेले होते .त्या मंदिराच्या दारात दोन तीन तास उन्हामध्ये चांगले अंग शेकून घेतले . दुपारी पटेल काकूंनी अतिशय सुग्रास जेवण आणून वाढले . यांना एक मुलगा व एक मुलगी होती . आल्यावर आपण नक्की गप्पा मारू असे सांगून पटेल साहेब गेले होते . त्यांची वाट पाहत दत्तप्रभूं पुढे मी करुणात्रिपदी वगैरे म्हणू लागलो .माझ्यासोबत भगवद्गीता आणि एक स्तोत्रमालेचे पुस्तक होते .वेळ मिळाला की त्यातील काहीतरी वाचायचे असा संकल्प मनात धरला होता . हा दिवस होता पौष शुद्ध तृतीया शके १९४३ , बुधवार ५ जाने २२ .

लेखांक बारा समाप्त ( क्रमशः )

 लेखांक १३ : दत्तप्रभूंची इच्छा

दुपारी मोकळा वेळ मिळाल्यावर मी प्रल्हाद पटेल यांच्या २२ एकर शेताला वळसा मारून , मागे असलेल्या वीटभट्टीच्या शेजारून वाहणाऱ्या एका छोट्याशा परंतु सुंदर अशा रानवे नामक नदीमध्ये कपडे धुऊन घेतले .
 तिथल्याच खडकावरती पाच दहा मिनिटात कपडे वाळले सुद्धा . संध्याकाळी प्रल्हाद पटेल आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले . त्यांच्याविषयी ते सांगू लागले .गेली २१ वर्षे अव्याहतपणे न चुकता , २७ किलोमीटर दूर जाऊन ग्वारी घाटावरील नर्मदा दर्शनाची वारी ते करत होते . ते मला म्हणाले , मला काय वाटले माहिती नाही .परंतु तुम्ही आज इथे मुक्काम करावा अशी दत्तप्रभूंची इच्छा आहे , असा संकेत मला झाला .म्हणून मी तुम्हाला थांबवले . नाही तर शक्यतो मी कोणालाच थांबवत नाही . भारतीय जनता पक्षाच्या कार्याविषयी ते अतिशय तळमळीने बोलत होते . या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची नुकतीच पुण्यामध्ये काही कामा निमित्त माझी भेट झाली होती व ते त्यांच्या सोबत जावडेकरांच्या मुलाच्या पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाला देखील मला घेऊन गेले होते .हे सांगितल्यावर तर डॉक्टर प्रल्हाद पटेल माझ्या इथून हलेचनात ! कारण हे राष्ट्रीय उपाध्यक्ष सध्या मध्य प्रदेशचे प्रभारी होते ! आणि पटेल साहेबांना पुन्हा एकदा तिकीटाची आस लागली होती ! मग मात्र मी अतिशय नम्रपणे परंतु स्पष्टपणे त्यांना सांगितले की आध्यात्मिक जीवन आणि राजकीय जीवन याची सरमिसळ करणे कसे धोक्याचे आहे ! आपल्या जीवनात जे काही होते आहे ती परमेश्वरी इच्छा आहे असे मानून जर आपण कार्य करत राहिलो तर आपले वैयक्तिक जीवन देखील सामाजिक होऊन जाते . मी सांगतो आहे ते सर्व त्यांना पटत होते परंतु वळत नव्हते . मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही आता राजकीय महत्त्वाकांक्षा थोडी कमी करून आध्यात्मिक मार्गाकडेच लक्ष द्यावे . कारण त्यांचा मूळचा पिंड राजकीय नव्हता हे मला स्पष्टपणे कळत होते .त्यांच्यातील सज्जन पणाचा वापर राजकारणी करून घेत असणार हे मी सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला . आमची अशा पद्धतीने बरीच चर्चा झाली . मला अशी चर्चा करायला फारसे आवडत नाही .परंतु समोरचा मनुष्य जर पोट तिडकीने विचारत असेल आणि आपल्याकडे त्याचे उत्तर असेल तर मात्र ते दिलेच पाहिजे . या शुद्ध भावनेतून मी त्यांच्याशी बोलत होतो . सरते शेवटी ते म्हणाले आता मला कळाले दत्तप्रभूंनी तुम्हाला का थांबवायला सांगितले . कारण त्यांनी दत्तप्रभूंना साकडे घातले होते की या निवडणुकीला मी उभे राहू की नको हे मला तू सांग . मला जी प्रेरणा झाली ती मी त्यांना सांगितली .आता ऐकणे न ऐकणे त्यांच्या हातात . आमची चर्चा थांबते न थांबते तोच होशंगाबाद ( तत्कालीन नाव ) आणि बैतूल या भागातील चार परिक्रमावासी मुक्कामी आले .यामध्ये गुज्जर समाजाचे एक काका पुतणे होते . 
ओम प्रकाश पटेल गुज्जर हे काका चे नाव आणि सुरज सिंग पटेल गुज्जर हा पुतण्या होता .माधव सिंग ओम प्रकाश गुजर पटेल हा त्याचा मुलगा त्या भागातील सक्रिय कार्यकर्ता होता .
 अजून दोन परिक्रमावासी होते . त्यातील एकाचे नाव रुस्तमसिंग गुज्जर उर्फ जग्गू आणि दुसरा यशवंत सिंग गुज्जर . हा सरपंच होता . तत्कालीन होशंगाबाद जिल्ह्यातील पाटणी , साईखेडा ,बाबै ,मारेगाव ही त्यांची गावे होती .त्यांचे अनुभव ऐकत ऐकत हळूहळू पाठ टेकली . इथली बहुतांश आडनावे जातीवरूनच आहेत . आणि जातीच्या बाहेर शक्यतो कोणीही विवाह करत नसल्यामुळे तुम्हाला चेहरेपट्टी पाहता क्षणी मनुष्य कुठल्या समाजाचा आहे हे बऱ्यापैकी सहज ओळखता येते .
या भागातील खूप स्थानिक लोक परिक्रमा करतात . त्यांच्या पायांना गती देखील चांगली असते .सोबत एखादी गाठोडे किंवा बोचके घेऊन ते डोक्यावर ठेवून ते चालतात . महिलांचा देखील लक्षणीय सहभाग यामध्ये असतो .
मध्य प्रदेश आणि गुजरात मधील ग्रामीण भागातील परिक्रमावासींचा सर्वसाधारण पेहराव
 या उलट पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींचा टक्का अलीकडे वाढलेला आहे . ते मात्र अतिशय भारी भारी ट्रेकिंग सॅक्स , शूज , स्लीपींग बॅग्ज वगैरे घेऊन येतात .
शहरी भागातील सुसज्ज परिक्रमावासी (प्रातिनिधिक चित्र)
 दोघांना येणारे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असतात .जितके तप अधिक तितका अनुभव अधिक .जितक्या सुविधा अधिक तितकी नर्मदा मैया दुर्लभ ! असा सोपा फंडा आहे ! 
रात्री छान झोप लागली . पहाटे ब्राह्म मुहूर्तावर जाग आली . रानवे नदीकडे जाण्याचा रस्ता दिवसा पाहून ठेवला होता त्यामुळे पहाटेच्या अंधारात देखील त्याच रस्त्याने नदी गाठली . तिथे मस्त थंडगार पाण्याने स्नान केले .तत्पूर्वी शौच आटोपून घेतले . याला इकडच्या भाषेमध्ये डोलडाल जाना असे म्हणतात . परिक्रमेशी संबंधित असे अनेक शब्द पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच ! आता विषय निघालाच आहे तर या दुर्गंधीपूर्ण विषयाबद्दल थोडेसे बोलूयात .
रामदास स्वामींनी सांगितले आहे ,
उदकी सांडी गुरळी । तो एक मूर्ख ।
गुरळी म्हणजे विष्ठा किंवा लेंडी .विष्ठा ही जर मातीमध्ये गेली तर तिचे सोने होते . मातीमध्ये पुरेसे जिवाणू आहेत आणि अशी व्यवस्था आहे की जी कमीत कमी वेळामध्ये तिचे विघटन करून माती बनविते . परंतु तीच जर पाण्यामध्ये मिसळली तर मात्र पाण्याचे रूपांतर विषामध्ये करते .सांडपाण्याला काळा रंग येतो तो या विष्ठेतील जीवाणू विषाणूंमुळेच ! अगदी मांजरा सारखे छोटे प्राणी सुद्धा व्यवस्थित मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये शौच संमार्जन करून तो खड्डा पुन्हा झाकून टाकतात .परंतु माणसांना आजही विष्ठा कुठे टाकावी याचा विवेक नाही हे दुर्दैवी सत्य आहे . माझे असे स्पष्ट मत आहे की मानवी विष्ठा जोपर्यंत पाण्यामध्ये मिसळते आहे तोपर्यंत जलशुद्धीकरण हा विषय शक्य नाही .शक्य होईल तितक्या लोकांनी शोष खड्डे किंवा अन्य मार्गाने आपली विष्ठा मातीच्या आत कशी राहील याचा प्रयत्न करावा .
या विषयातील चिंतन फार पूर्वीपासून मी केलेले असल्यामुळे मी असा निश्चय केला होता की संपूर्ण परिक्रमेदरम्यान माझ्या डोलडालचा मागमूस कोणालाही लागला नाही पाहिजे . त्यामुळे भरपूर वेळ घेऊन मी अतिशय लांबची निर्मनुष्य जागा शोधत असे . आणि व्यवस्थित खड्डा करून किंवा झाकण्यासाठी आधीच वाळू किंवा माती गोळा करून मगच कार्यक्रम उरकत असे .या पद्धतीने विघटन देखील त्वरित होते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो .पाण्यामध्ये विसर्जन झाल्यावर मात्र सगळेच अवघड होते . दुर्दैवाने बहुतांश परिक्रमावासीयांकडे हा विवेक नसल्याचे मला आढळून आले . असो .आपण उद्या सकाळी देखील बोलणार आहोत असे मला डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी आधी सांगून ठेवले होते आणि तसेही आज वीस पंचवीस किलोमीटर चालण्याचा विषय नव्हता . त्यामुळे मी पूजा आरती वगैरे आटोपून शांत बसून राहिलो . प्रल्हाद पटेल शेजारी येऊन बसले आणि आम्ही पुन्हा छान गप्पा मारल्या . आदल्या रात्री त्यांच्या मुलीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा स्वतः केली होती व आताही तीच करत होती .माझे विवाह या विषयातील चिंतन मी त्यांना सांगितले आणि मुलांचा लवकरात लवकर विवाह करण्यास सुचविले . त्यांना देखील माझे विचार पटत होते व तुम्हाला लवकरच चांगली बातमी कळवितो असे त्यांनी मला सांगितले .खरोखरीच माझी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर काही काळात त्यांच्या मुलीचा विवाह त्यांनी इंदोरला करून दिला .व मला आवर्जून कळविले देखील होते . मी माझा फोन स्विच ऑफ करून आलेला होतो . व कदाचित तो बंदच करून टाकावा असा माझा मानस होता . त्यामुळे एका मित्रांचा पाठ असलेला क्रमांक मी सर्वांना माझ्याशी संपर्काचे माध्यम म्हणून सांगायचो . बऱ्याच लोकांनी माझे काढलेले फोटो याच क्रमांकावर पाठवून दिले . अर्थात माझ्या त्या मित्राला फारसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्यातील बरेचसे फोटो त्यांच्या हातून डिलीट झाले परंतु तरी देखील जे काही फोटो शिल्लक राहिले त्यांची संख्या शेकड्यामध्ये आहे ! आणि तीच चित्रे मी या लेखमालेमध्ये टाकत आहे ! प्रल्हाद पटेल यांची आज्ञा घेऊन पुढे निघालो परंतु त्यांनी मला सांगितले की पुढे मनेरी नावाचे गाव आहे तिथे देखील त्यांचा दवाखाना असून तिथे ते दर बुधवारी दिवसभर थांबतात . त्यामुळे कदाचित नर्मदा मातेचे दर्शन घेऊन ते तिथे येतील तेव्हा माझी व त्यांची भेट होऊ शकते . 
वहीमध्ये शिक्का मारून घेतला .
नर्मदे हर असे म्हणून मी पाऊल उचलले. दिवसभराच्या विश्रांतीमुळे पायात चांगली ताकद होती .धनपुरी गावासोबत जबलपूर जिल्हा संपला आणि मंडला या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपले स्वागत आहे अशी पाटी लागली .पाटीवर लिहिलेली अंतरे किलोमीटर मध्ये अशी होती . मंडला ९५ ,निवास ३० , कुंडम ४५ , दिंडोरी ११२ , शहापुरा ६६ , घुघुवा पार्क ५२ .
चालताना मध्ये पहाडी खेडा नावाचे एक गाव लागले . इथे एक भव्य दिव्य वटवृक्ष होता व त्याच्या खाली एका अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिराचे भग्न अवशेष अस्ताव्यस्त पडलेले होते . तिथे खूप भव्य असे तळे होते आणि त्या तळ्यामध्ये शिंगाड्याची शेती कशी करतात ते मी पाहिले . शिंगाडे साधारण दसऱ्याच्या आसपास येतात आणि पौष महिन्यामध्ये संपून जातात .याची लागवड करावी लागते .त्यासाठी गवताचे भारे बांधून त्याच्यामध्ये बिजारोपण केले जाते व ते भारे तलावामध्ये फेकून दिले जातात . गवत सडले की रोपे उगवू लागतात .
         पहाडी खेडा गावातील शिंगाड्याचे शेततळे

शिंगाडे हा प्रकार आपल्या इथे फारसा पाहायला मिळत नाही . काळ्या रंगाचा भाजलेला कंद ढिगाने विक्रीला आपण कधीतरी बाजारात पाहिला असेल .तेच हे शिंगाडे. हे शिंगाडे वाळवून , त्याचे पीठ करून ते उपवासाला खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाते .
 
मुळात हे कंद काळे नसतात .हिरवट जांभळ्या रंगाची गाठ या वेलीसारख्या पसरणाऱ्या पान वनस्पतीच्या मुळाला येत असते .
याचे कमल वृक्षांसोबत अक्षरशः जंजाळ तलावात पसरलेले असते .ते इतके भयानक असते की त्यामध्ये अडकलेला माणूस बाहेर निघणे अवघड असते .
                 शिंगाड्याची पाण वनस्पती
तरी देखील एक माणूस बसेल अशा एकाच लाकडाच्या ओंडक्यामध्ये कोरलेल्या 'डोंगा' नावाच्या नावे मध्ये बसून लोक शिंगाडे गोळा करत असतात . काही लोक ट्रकच्या टायरची इनर हवा भरून घेतात . व त्याच्या मधोमध दोरीने बांधून मुडपून त्याच्यावर घोड्याप्रमाणे बसतात .आणि शिंगाडे गोळा करतात .या प्रकारामध्ये संपूर्ण शरीर दिवसभर ओले राहते  .

हे काम अतिशय संयमाचे आहे .वेचलेल्या शिंगाड्यांना माशांचा अतिशय घाणेरडा वास येत असतो . शिंगाडे गोळा केल्या केल्या काठावर आणून दिले जातात . जिथे घरातील एखादी स्त्री ते निखार्‍यावर चांगले भाजून काढते किंवा बांबूच्या टोपलीमध्ये चांगली वाफ देते.इथे त्यांचा वास बऱ्यापैकी जातो आणि काळा रंग त्यांना प्राप्त होतो .त्यानंतर एका विळी वर पटापट कापून टरफले काढली जातात .व जागेवर शिंगाडे विकले जातात .मला एका माईने पिशवी भर शिंगाडे दिले !हे कसे खातात मला माहिती नव्हते ते मी समजावून घेतले आणि थोडेफार खाल्ले .परंतु त्याला येणारा माशांचा वास काही जात नव्हता .त्यामुळे मी पुढे लहान मुलांना ते वाटून टाकले !इथले लोक आवडीने शिंगाडे खातात . पिष्टमय पदार्थ ,प्रथिनं आणि विटामिन चा मोठा साठा यातून मिळतो . पुढे एक मोठी औद्योगिक वसाहत लागली . इस्पात बनवणारी एक खूप मोठी कंपनी उजव्या हाताला होती .रेल्वे मध्ये मिळणारे रेल नीर बनवणारी फॅक्टरी , पीव्हीसी पाईप बनवणारी फॅक्टरी आणि एक भव्य एलपीजी गॅस प्लांट देखील या औद्योगिक वसाहतीमध्ये होता .
या महामार्गावरून मोठ्या मालगाड्या अर्थात ट्रकची खूप वर्दळ होती .अतिशय वेगाने ट्रक जात असत .त्यामुळे मी एकदाही रस्त्यावरून चाललो नाही तर कडेच्या पट्टीवरून चालत राहिलो .परंतु या बाजू पट्ट्या अतिशय खडबडीत आणि खड्यांनी भरलेल्या होत्या .त्यामुळे चालताना पायाला खूप त्रास होत होता .बहुतांश परिक्रमावासी हे रस्त्याच्या मधोमध चालत आहेत असे माझ्या लक्षात आले जे अतिशय धोकादायक होते .त्या परिक्रमावासींना चुकविण्यासाठी गाड्यांना मोठी कसरत करावी लागे . आणि चुकून माकून एखाद्या चालकाचे दुर्लक्ष झालेच तर अपघात निश्चित होता .मी स्वतः बऱ्यापैकी चांगला चालक असल्यामुळे मी विरुद्ध दिशेने अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत राहिलो .त्यामुळे मला समोरून येणारे वाहन दिसत राहायचे ,चालकाला देखील मी दिसायचो.आणि मागून येणारे अर्थात मला न दिसणारे वाहन माझ्यापासून थोडे लांब राहायचे . डूँडी ,मेनधी (मेढी ), ताकवेली ही गावे ओलांडत मनेरी गाव गाठले .इथे डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना कुठे आहे विचारल्याबरोबर लोकांनी दवाखाना दाखवला .शेजारीच एका शिंप्याचे दुकान होते .इकडे शिंपी लोकांना नामदेव असे म्हणतात .संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या भारतभ्रमणाचे हे पुण्य फळ आहे ! त्यांनी अतिशय  अगत्याने मला दुकानात बसवून घेतले .आजूबाजूचे दुकानदार देखील लगेच गोळा झाले .यांना एक तरुण मुलगा होता .लहान मुले आणि युवक म्हणजे माझ्या साठी जीव की प्राण !कारण नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द उमेद आणि गरज यांनाच अधिक असते !मग ते चांगले असो वा वाईट ! त्यामुळे अधिकाधिक चांगले कोणाला द्यायचे असेल तर ते या पिढीलाच द्यावे !हे दुकान श्री विजय नामदेव जी यांचे होते .डॉक्टर प्रल्हाद पटेल हे त्यांचे पोट भाडेकरू होते .
मनेरी गावातील डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना , श्री विजय नामदेव जी , सत्यम आणि त्यांच्या शेजारील दुकानदार
डॉक्टर साहेब अजून यायचे होते परंतु त्यांचा कंपाउंडर आला होता व त्याने दवाखाना उघडून औषधे वाटायला सुरुवात सुद्धा केली होती ! नामदेव यांनी आत घरामध्ये भोजनासाठी बोलविले व अतिशय सुग्रास जेवण वाढले .त्यांचा मुलगा सत्यम आदबीने सर्व पदार्थ वाढत होता .याला लष्करामध्ये भरती होण्याची प्रेरणा मी दिली कारण त्याची तब्येत चांगली होती .त्याला बऱ्याच परीक्षांबाबत माहितीच नव्हती .ती सांगितल्यामुळे आणि कुठे माहिती शोधायची ते शिकविल्यामुळे तो खूप खुश झाला .विजय नामदेव यांनी मला एक सुई दोरा दिला , जो मला पुढे अनेक वेळा खूप कामाला आला .या सर्वांचा निरोप घेऊन मी तिथून पाय उचलला आणि अथक चालत कोहानी , भादरी गावे मागे टाकत सकरी गाव गाठले . 
नाही नाही म्हणता दुसर्‍याच दिवशी बावीस किलोमीटर अंतर माझ्याकडून सहज तोडले गेले होते !

लेखांक तेरा समाप्त (क्रमशः)

 लेखांक १४ : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा

डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी सांगितलेला पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा नियम माझ्याकडून पाळला जात नाही याची थोडीशी खंत मनात होती .परंतु पायांना त्रास देखील होत नव्हता .तसेही महाराष्ट्रातील परिक्रमावासी इतर राज्यातील लोकांपेक्षा जास्त अंतर चालतात असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे .महाराष्ट्रामध्ये असलेल्या दऱ्याखोऱ्या हे त्याचे कारण असावे .या दऱ्याखोऱ्या किल्ल्यांवर भटकणाऱ्या पायांना लांब अंतर तोडण्याची सवय असते .सक्री / सकरी गावापर्यंत मी न थांबता चालत राहिलो .इथे उजव्या हाताला एक विहीर आणि खूप मोठा वृक्ष होता . तिथे छोटीशी झोपडी होती .
 हे झोपडीवजा घर म्हणजेच लम्मूलाल विश्वकर्मा यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केलेले परिक्रमावासींचे सेवा क्षेत्र आहे .
अतिशय सुंदर छोटेखानी असा हा आश्रम आहे . संपूर्ण मातीने आणि शेणाने सरविलेला आश्रम अतिशय आरामदायक आणि सुखद असा आहे .दुपारी थंडगार वाटणारा हा परिसर रात्री तितकाच उबदार होऊन जातो ! छोटे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते .
लम्मू लाल विश्वकर्मा यांचा आश्रम
मला बराच काळ नर्मदा मातेचे दर्शन झालेले नव्हते . त्याची खंत मनामध्ये होती .आता देखील जोगी टिकरिया या गावांमध्ये नर्मदा मातेचे दर्शन होणार होते व ते इथून सुमारे शंभर किलोमीटर होते . नर्मदा मातेचे उगमस्थान अमरकंटक या आश्रमापासून मात्र दोनशे किलोमीटर राहिले होते . हा संपूर्ण वन परिसर होता व इथे बहुतांश आदिवासी / वनवासी समाजातील लोक राहत होते .
त्यातल्या त्यात आनंदाची बाब अशी की लम्मू विश्वकर्मा यांनी मला झोपण्यासाठी जी खोली दिली तिथे त्यांनी नर्मदा मातेची एक मूर्ती स्थापन केली होती .आत गेल्या गेल्या शेणाने सरवलेल्या सुंदर व थंडगार ओसरीमध्ये मी आधी बुड टेकले .माझे वजन तसे खूप जास्ती होते आणि मी क्षमतेपेक्षा थोडा जास्तीच चाललो होतो . त्यामुळे बसल्या क्षणी लक्षात आले की आपण दमलो आहोत ! तिथेच लुडकावे अशी इच्छा होऊ लागली !इतक्यात एक परिक्रमावासी आला आणि त्याने माझा फोटो काढला .मित्राच्या क्रमांकावर पाठवून द्यायला त्याला सांगितला .
सकरी आश्रमामध्ये बसलेलो असताना एका परिक्रमावासिनी काढलेले प्रकाशचित्र

परंतु इतक्यात तिथे बरेच परिक्रमावासी गोळा झाले .किमान दहा-बारा !आणि विश्वकर्मा माझ्याकडे आला आणि म्हणाला बाबाजी चलो खाना बनाते है !आता आली का पंचाईत !मला तसा घरी स्वयंपाक करता येतो . परंतु इथे खेडेगावामध्ये चुलीवर किंवा विस्तवावर स्वयंपाक करण्याची सवय मला नव्हती !त्यात भरीत भर म्हणून माझ्या असे लक्षात आले की याच्याकडे चूल सुद्धा नव्हती ! तर बाहेर साधूंसाठी त्याने एक वेगळी कुटी निर्माण केली होती . व त्या कुटीमध्ये अखंड धुनी चालू असायची . त्या धुनीवर त्याने एक लोखंडाची छोटी सदा सहा इंची तीवई ठेवली होती व त्याच्यावरती सर्व स्वयंपाक , चहा वगैरे तो करत असे . एक वयोवृद्ध साधू तेथे आधीच बसला होता .तो सतत गांजा पीत होता .तेव्हा मला त्याचे अप्रूप वाटले . परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की गांजा पिणे ही गोष्ट नर्मदा खंडामध्ये अतिशय सर्वसामान्य आहे . तो मला म्हणाला , चेला आटा लगाओ । मी मला येते तशी कणिक मिळायला सुरुवात केली परंतु ते पाहून त्याला थोडासा राग आला .आणि लाव इधर । असे म्हणत त्याने माझ्या हातातून परात काढून घेतली आणि दणादण कणिक मळली !
 धून्यावर टिक्कड थापणारा साधू (प्रातिनिधिक चित्र )

 जणूकाही एखादा शत्रू हातात सापडला आहे अशा पद्धतीने तो त्या कणकीला मळत होता आणि बुक्क्या टाकत होता ! त्यानंतर त्याने मला विचारले टिक्कड बनाना आता है ? मी विचारले , यह टिक्कड क्य होता है ? आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे हातावर थापून ज्वारीच्या भाकरी केल्या जातात , तशाच पद्धतीने किंवा त्याहून थोडीशी जाड कणिक हातावर थापून ,त्याची पोळी करून ,ती विस्तवामध्ये भाजली जाते .ज्याला इकडे टिक्कड असे म्हणतात . याहून थोडी जाड कड ठेवली तर त्याला रोट असे म्हणतात .माझा हा प्रश्न ऐकून साधू अजूनच भडकला .विश्वकर्मा मला म्हणाला तुम्ही विश्रांती घ्या . जा !परंतु मला काही ते बरोबर वाटेना त्यामुळे मी त्यांना भाजी चिरायला वगैरे मदत चालू केली .त्याच्या घरामध्ये गरिबी होती हे स्पष्टपणे दिसत होते .
          लम्मू विश्वकर्म्याचे छोटेखानी घर
कारण त्याने एक बटाटा , एक कांदा ,एक टोमॅटो, एक वांगे , एक गाजर , एक कच्चे केळे अशा गोष्टी गोळा करून त्याची भाजी बनवायला घेतली होती . एवढी भाजी सर्वांना कशी पुरणार असा मला प्रश्न पडला होता .बहुतेक त्याचसाठी तो सर्वांना स्वयंपाक करण्यासाठी बोलवत होता असे मला वाटले .अंधार पडू लागला आणि जेवण तयार झाले .प्रत्येकाला एक टिक्कड आणि थोडीशी भाजी , भरपूर पाणी घातलेली ,अशी त्याने वाढली .मी स्वतः स्वयंपाक करताना उपस्थित असल्यामुळे मला माहिती होते की भोजन मर्यादित आहे . त्यामुळे मी थोडेच खाल्ले .बाकीचे लोक मात्र यह लाव । वह लाव । करीत होते . विश्वकर्मा हिरमुसल्या तोंडाने आतून रिकामे पातेले घेऊन आला आणि सर्वांसमक्ष भाजी संपल्याचे त्याने जाहीर केले . एक दोन खवट म्हातारे काहीतरी बडबड करत रागाने ताटावरून उठले . मला मात्र खूप वाईट वाटले .एक तर काहीही गरज नसताना हा मनुष्य येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावस्यांची सेवा करत होता .आणि त्यात त्याच्यावरती असा रुबाब करणारे परिक्रमावासी !किती वाईट वाटत असेल त्याला ! रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर जाऊन विहिरीतून पाणी शेंदून मी ताट धुतले . आपले ताट आणि भांडे आपणच सोबत ठेवायचे असते . विम बार वगैरे तिथे काही नसते तर माती किंवा राखुंडीने अतिशय सुंदर भांडी स्वच्छ निघतात ! आपण आपल्या पारंपारिक गोष्टी भांडवलशाहीच्या नादात पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत . रात्री मी माझे आसन नर्मदा मातेची जी खोली होती तिथे लावले .विश्वकर्मा रात्री आला व आम्ही दोघांनी मातेची आरती केली .रात्री त्याचे गुरुदेव येणार आहेत असे मला त्याच्या बोलण्यातून लक्षात आले .सुमारे बाराच्या सुमाराला एक मोठ्या जटा असलेला नागा साधू तिथे उपस्थित झाला .त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते .आल्या आल्या तो धुनीपुढे शेकत बसला . हा साधू देखील अखंड गांजा ओढत होता .त्याची चिलीम रिकामी झाली की लम्मू विश्वकर्मा अतिशय आदबीने पुढची चिलीम त्याला भरून देत होता . मी ज्या खोलीमध्ये झोपलो होतो त्याच्या शेजारीच हा प्रकार चालला होता त्यामुळे त्यांचा सर्व संवाद मला ऐकू येत होता . आणि खोपटाच्या फटीतून सर्व दिसत देखील होते .एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर एकही वस्त्र न घालता हा साधू कुठून आला माहिती नाही ! रात्रभर त्याचा व चेल्यांचा गांजा प्राशन कार्यक्रम चालू होता .त्यांच्या धुरामुळे संपूर्ण परिसर कोंदट झाला होता . मी डोक्यावरून शाल पांघरून घेऊन झोपून टाकले . माझ्याकडे दोनच शाली होत्या .एक वाल्हेकरांनी दिलेली आणि एक अश्विनी पटेल ने जबलपूरला दिलेली .
हा दिवस होता पौष शुद्ध चतुर्थी शके १९४३ गुरुवार ६ जानेवारी २२ .
नेहमीप्रमाणे भल्या पहाटे जाग आली . आणि पुढे जंगलातील एका रस्त्याच्या कडेला डोलडाल आटोपून मी विहिरीकडे आलो . या विहिरीला या भागात बावडी असे म्हणतात .बावडीतील पाणी अतिशय स्वच्छ परंतु चांगलेच थंडगार होते . त्याने भडाभडा आंघोळ केली . अंधारातच कपडे धुवून नर्मदा मातेची पूजा व आरती करून घेतली . परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय स्थान सोडायचे नसते .याला अनेक कारणे आहेत .परंतु महत्त्वाचे कारण असे आहे की सूर्योदयाच्या आधीची वेळ ही वन्य श्वापदांची फिरण्याची वेळ असते .रात्रभर शिकार शोधणारे निशाचर प्राणी यावेळी आपापल्या घरी परतत असतात .ते तुम्हाला सामोरे जाऊ नयेत म्हणून सूर्योदय होण्याची वाट पाहावी . सूर्योदय होता क्षणीच मी निघालो . विश्वकर्म्याने त्याच्या मुलाचा  अर्थात कैलास विश्वकर्मा याचा क्रमांक मला दिला .आणि याला जरा चांगले काहीतरी शिकवा असे म्हणाला . निघताना वहीमध्ये शिक्का मारून घेतला .
माझ्याकडे पन्नास रुपयाची एक नोट होती . ती मी त्याला दिली . हा घेत नव्हता परंतु मी बळे खिशात कोंबली आणि पुढे निघालो .एका गरीब वनवासी मनुष्याला नर्मदा माता प्रेरणा देते आहे आणि इतक्या दूर सेवा कार्य घडवते आहे हा एक मोठा चमत्कारच आहे .इथल्या सर्व सेवाधारी लोकांचे एकच म्हणणे होते की जसजसे आम्ही नर्मदा मातेची सेवा करू लागलो तसतसे आमच्या घरातील दुर्भिक्ष्य , दारिद्र्य निघून गेले ! असो पुढे बऱ्यापैकी घाट रस्ता लागला . 
या घाटामध्ये चालताना अचानक एक कार माझ्यासमोर येऊन थांबली . गाडीचा क्रमांक पाहून मी खुश झालो कारण गाडी नाशिक मधील होती . हे येवला नाशिक येथील उंदीरवाडे नावाचे परिक्रमावासी होते . म्हणजे पूर्वी यांची पायी परिक्रमा झाली होती व आता ते अधून मधून गाडी घेऊन येतात व दुर्गम आदिवासी भागातील सेवा कार्य करणाऱ्या लोकांना धान्य , पैसा इत्यादी भरून देतात .मला त्यांनी पारले जी चा पुडा दिला आणि पाच रुपये दक्षिणा दिली .त्यावेळी मला खरोखरीच माहिती नव्हते की इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पारले-जी हा एक फार मोठा आधारस्तंभ असणार आहे माझ्यासाठी ! 
चार किलोमीटर घाट चढल्यावर घाटामध्येच डाव्या हाताला एक लक्ष्मी मंदिर लागले.
स्थानिक भाषेमध्ये हिला बंजारी माता म्हणतात . बंजारी , बंजारा किंवा बंजार या शब्दाची उत्पत्ती खालील प्रमाणे आहे . 
आपल्या भारतीय भाषांमध्ये संस्कृत मधील वन या शब्दासाठी बन असा प्रतिशब्द वापरला जातो . वनचर याचा अपभ्रंश बन चर , बन जर अथवा बंजारा . आपल्या महाराष्ट्रामध्ये याच शब्दाला वंजारी असे म्हणतात . हे सर्व शब्द एक प्रकारे या समाजाचे वनाशी असलेले नाते व्यक्त करतात . बंजारी माता म्हणजे वनामध्ये राहणारी माता .
                       जय माँ बंजारी !
इथे छोटेखानीच परंतु आश्रम आणि निवासाची सर्व व्यवस्था होती . शनी  , बंजारी माता मंदिर आणि एक खोली होती .एक वयोवृद्ध बाबाजी येथे राहतात .इथे १९८८ पासून अखंड दीप सेवा चालू आहे .

 बाबाजींनी कोरा चहा आणून दिला व रात्री इथे आला असता तरी चालले असते म्हणाले . परंतु घाट रस्ता आणि जंगल पाहूनच मी सक्री गावामध्ये थांबलो होतो . कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्याच्या कडेला बसून तो चहा पिताना स्वर्गीय सुखाचा अनुभव येत होता ! प्रत्येक उछ्वासातून मस्त वाफा निघत होत्या ! यापूर्वीचे जंगल इतके घनदाट होते की पुढे असे काही खायला प्यायला मिळेल याची शक्यताच वाटत नव्हती ! साधूने वहीमध्ये शिक्का मारून दिला .
जय मा बंजारी सिद्ध पीठ , सकरी घाट , तहसील निवास , ग्राम हरदुली , जिल्हा मंडला , बाबा रामप्रसाद चौहान
९ ६ ४ ४ ७ ४ ६ ८ ० ४

 साधू म्हणाला थोडा थांबून जेवण करून जा .परंतु मला असे वाटले की इतक्या सकाळी कशाला थांबायचे ?अजून थोडे चालू या . नर्मदा परिक्रमे मध्ये एक नियम असा आहे की कोणी काही दिले तर घ्यायचे आणि कोणी काही मागितले तर द्यायचे . तिथे आपले डोके लावायचे नसते .इथे मी जेवण नको म्हणण्याची चूक केली होती ! पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला कल्पनाच नव्हती !

लेखांक चौदा समाप्त (क्रमशः)

 लेखांक १५ : अखंड भारताचे नाभीस्थान !

शिक्का मारून घेतला आणि बंजारा मातेचे मंदिर सोडले .मुसरा नदी ओलांडून हरदौली , ग्वारा , भलवारा , हाथीतारा , गुंदलई अशी अनेक गावे सोडली . परंतु गावातील एकही गोंड आदिवासी व्यक्ती नर्मदे हर म्हणत नव्हती ! चहा पाण्यासाठी किंवा भोजनासाठी बोलवणे तर फार लांबची गोष्ट . भुकेने जीव कासावीस झाला . हा संपूर्ण परिसर म्हणजे डोंगर उतारावरील जंगल संपून , डोंगराच्या माथ्यावरील एक मोठा औरस चैरस पसरलेला माळ होता . याला सात पहाडी माळ असे सुद्धा म्हणतात . या संपूर्ण भागामध्ये पाण्याची पातळी आश्चर्यकारक रित्या अधिक होती . रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यांमध्ये देखील पाणी साठलेले दिसायचे . या भागातून भारतातील बऱ्याच नद्यांचा उगम होतो .चालता चालता अनेक छोटे छोटे ओढे , नाले ,नद्या , जलस्रोत मी ओलांडत होतो . सर्वत्र ओसाड माळरान होते . पाणी मुबलक होते परंतु मोठी झाडे नव्हती असे विचित्र वातावरण पाहिले . इथे शेती फक्त निलगिरीच्या झाडांची केली जायची . इथले काही ग्रामस्थ मोठे मजेशीर असतात . पुढे कुठले गाव आहे असे विचारल्यावर एक खेडूत मला म्हणाला आगे एलिफंट स्टार व्हिलेज है ! नंतर कळाले की पुढील गावाचे नाव हाथी तारा होते . कदाचित हस्त नक्षत्रावरून हे नाव पडले असावे . हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ग्रामीण भाषेत हत्तीचा पाऊस म्हणतात . हाथी तारा गावाच्या पुढे दोन मार्ग वेगळे वेगळे होत होते . एक होता निवास -मंडला मार्ग .निवास हे तिथल्या एका तालुक्याचे नाव आहे . या नावामुळे पुढे बरेच मजेशीर गोंधळ झाले ते वेळोवेळी सांगेनच . दुसरा मार्ग होता शहापुरा -जोगी टिकरिया मार्ग .यातील मंडला मार्गाने गेले तर ९० किलोमीटर अंतर वाढायचे . सुमारे आठवड्याभराचे चालणे वाढायचे .परंतु हा मार्ग नर्मदा मातेच्या काठाच्या जवळून होता . इथे नर्मदा नदीने मोठे वळण घेतलेले असल्यामुळे बऱ्यापैकी परिक्रमावासी ते वळण टाळून सरळ योगी टेकडी अथवा जोगी टिकरिया या गावांमध्ये उतरतात . मला त्या क्षणी याबाबत काहीच माहिती नव्हते . दिग्मूढ होऊन मी गुंदलई च्या माळावरील त्या तिठ्यावर उभा राहिलो . जबलपूर सोडल्यापासून नर्मदा मातेचे काही मला दर्शन झालेले नव्हते .आणि मला हा प्रकार फारसा आवडला नव्हता . मला असे वाटायचे की नर्मदा परिक्रमा ही संपूर्ण नर्मदा मातेच्या काठाने होत असते . परंतु इथे काहीतरी वेगळेच चित्र मला पाहायला मिळत होते .मी डोक्याशी ठरविले आणि मंडला मार्गावर चालायला लागलो इतक्यात एक चार-पाच वर्षाची छोटीशी काळी सावळी चुणचुणीत मुलगी पळत माझ्या दिशेने आली .आणि मला म्हणाली , बाबाजी उधर मत जाना । आप इधर से जाना । मला काही कळेना . एक क्षणभर माझे मन बावचळले .उजव्या हाताला नर्मदा माता असते असे सोपे गणित परिक्रमेमध्ये लक्षात ठेवायचे . आणि ही मुलगी तर मला डाव्या हाताने जायला सांगत होती .म्हणजे नर्मदा मातेपासून दूर पाठवत होती . अर्थात माझे दिवस वाचणार होते , पण नर्मदा मातेचे दर्शन लांबणार होते . परंतु सुरुवातीलाच सांगितले त्याप्रमाणे आपण आपले डोके लावायचे नाही असा निर्धार पक्का केला होता .हा सर्व विचार करून मी त्या मुलीला काहीतरी विचारणार , म्हणून पाहिले तर समोर कोणीच नव्हते ! आजूबाजूला पाहिले . त्या सुनसान माळावरती अक्षरशः कोणीही नव्हते . ती मुलगी कुठून आली , कुठे गेली ,कशी गेली  काही कळायला मार्ग नव्हता . मग मात्र माझा निरुपाय झाला आणि मला डाव्या हाताने अर्थात शाहपुरा मार्गाने वाटचाल सुरु करावी लागली .पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे कळवळून भूक लागली होती . पुढे जाण्यापूर्वी या भागाच्या वैशिष्ट्या विषयी थोडेसे सांगणे क्रमप्राप्त आहे . हा मंडल अथवा मंडला नावाचा जिल्हा आहे . मला कुठलेही गावाचे नाव ऐकले की त्यामागे काय इतिहास असेल हे जाणून घ्यायला अतिशय आवडते . या गावाच्या नावाविषयी मात्र मला कोणीच काही माहिती देऊ शकले नाही .मी नर्मदा मातेचे ध्यान केले ,आणि तिला हाच प्रश्न विचारला . त्यानंतर माझ्या बुद्धीला जे उत्तर स्फुरले ते खालील प्रमाणे .


मंडल या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे वर्तुळ किंवा गोल .मंडला जिल्हा केंद्रबिंदू धरून जर आपण वर्तुळ काढले तर त्यात संपूर्ण अखंड भारत मावतो .याचाच अर्थ हा प्रदेश अखंड भारताचा मध्यबिंदू आहे .अखंड भारत म्हणजे अगदी गांधार देश अर्थात इराण कंधार पासून ते जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेल्या कंबुज प्रदेश अर्थात कंबोडिया पर्यंतचा भारत .तिबेट नेपाळ भूतान बांगलादेश ब्रह्मदेश अफगाणिस्तान पाकिस्तान हा सर्व भाग आलाच .
गेल्या काही शे वर्षांमध्ये आपण यातील बहुतांश भूभाग गमावला असल्यामुळे आता भारताचा केंद्रबिंदू नागपूर नजीक आहे . 
नागपूर मध्ये असलेल्या शून्य दगडाची अर्थात झिरो स्टोन ची बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेली प्रतिकृती

परंतु मूळ भारतीय भू-मंडल हे मंडला जिल्ह्या वरूनच समजते आणि तोच भारताचा केंद्रबिंदू आहे असे माझे स्पष्ट मत आहे .
श्रीशैलम आंध्र प्रदेश येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र येथे लावलेला अखंड भारताचा नकाशा
 भारताने आजवर गमविलेले क्षेत्रफळ ( चौरस किलोमीटर मध्ये ) सुमारे ४४,९६,५५० चौ किमी

मी ज्या भागात पोहोचलो होतो ते भिकमपुर नावाचे पठारावरील एक गाव होते .
या भागातून अनेक नद्या उगम पावतात .आणि गमतीचा भाग असा की त्यातील काही नद्या नर्मदेला येऊन मिळतात तर काही नद्या गंगेला जाऊन मिळतात . गंगा आणि नर्मदा अशा पद्धतीने या भागाद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही ! भारताचे नाभी स्थान जणु ! इथे उगम पावणारी गौर नदी नर्मदा मातेला मिळते . झामूल नदी देखील नर्मदा नदीला मिळते . मुसरा नदी नर्मदार्पण होते परंतु नगरार नावाची नदी मात्र थेट गंगेला जाऊन मिळते .भारतीय उपखंडाला उत्तरेकडून दक्षिणेकडे उतार आहे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे . त्यामुळे भारतातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात . त्याला अपवाद आहे तो केवळ नर्मदा नदीचा ! तापीदेखील पश्चिम वाहिनी आहे परंतु तिची लांबी नर्मदेच्या तुलनेने फारच कमी आहे .तसेच कोकणात देखील हजारो छोट्या मोठ्या अल्पजीवी नद्या पश्चिम वाहिनी आहेत परंतु त्यांची तुलना नर्मदे शी होऊच शकत नाही .मोठी नदी असून उताराच्या विरुद्ध दिशेला वाहत गेलेली नर्मदा म्हणूनच गमतीशीर आहे ! बरं ती काही सरळ सोप्या मार्गाने गेलेली नाही ! मेकल पर्वतरांग , सातपुडा पर्वत शृंखला ,विंध्य गिरी आणि सह्याद्री या सर्व पर्वतांना अक्षरशः करवतीने चिरल्यासारखे उभे चिरत ती वाहते आहे . मंडलामधील या पठाराला दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे असा दोन्हीकडे उतार होता असा याचा अर्थ . हे संपूर्ण पठार पाण्याने संपृक्त आहे आणि जागोजागी तुम्हाला पाणी साठलेले आढळते . मोठे वृक्ष अजिबात नाहीत व झुडपे देखील आढळत नाहीत . सर्वत्र फक्त खुरटे गवत दिसते .पठारावर गवतावरती काही मुले पहुडली होती .त्यांनी माझा एक फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
   भीकमपूर पठारावर मुलांनी काढलेले प्रकाशचित्र
आता मी एका छोट्याशा रस्त्यावरून चाललो होतो आणि माझ्या दोन्ही बाजूला ओसाड माळरान पसरले होते . इतक्यात माझ्या मागून एक बजाज एम एटी गाडी येथे आहे असे पाहून मी बाजूला झालो . MH 15 AF 7325 क्रमांक असलेली ही गाडी येवल्याची होती . गाडीवर हरिभाऊ सावळेराम चौतमाळ नावाचे माळी समाजाचे एक अवलिया गृहस्थ होते ( मी कधी कुणाला जात वगैरे विचारत नाही . नर्मदा खंडामध्ये कोणाला जात विचारावी लागत नाही .बरेचदा लोक आपण होऊन त्यांची जात सांगतात.बरेचदा तुम्हाला तुमची जात सुद्धा विचारतात .जाती असा शब्द इथे वापरतात आणि तो संस्कृत मधल्या याती वरून आलेला आहे . याती म्हणजे प्रकार . ज्यांनी आपण होऊन जात सांगितली त्याची नोंद मी डायरीमध्ये करून ठेवायचो व तीच नोंद तुम्हाला येथे वाचायला मिळेल . असो) . तर त्याच M 80 गाडीवर त्यांची ही पाचवी परिक्रमा चालली होती !हे गृहस्थ स्वतः अपंग होते परंतु ही गाडी मात्र चालवू शकत .स्वतःच्या पायांनी चालता येणे त्यांच्यासाठी अशक्य होते .गंमत म्हणजे गेल्या परिक्रमेमध्ये त्यांनी गाडीमध्ये हवा भरल्यानंतर पुन्हा हवा कधीच तपासली नव्हती तरी देखील दोन्ही चाकांमध्ये योग्य दाबांमध्ये हवा होती . त्यांनी अजून एक चमत्कार मला सांगितला .अजून शूलपाणीची झाडी मला लागली नव्हती .परंतु तिच्या भयानकते बद्दल मी फक्त ऐकून होतो .यांनी मात्र याच गाडीवरून शुलपाणीची झाडी यावर्षी पार केली होती . खरे तर ही झाडी ज्यांना नको असेल त्यांच्याकरिता पक्का डांबरी मार्ग आहे .तो थोडासा लांबचा पडतो . परंतु यांनी थेट डोंगररांगांमधला मार्ग निवडला होता हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे .केवळ दोन पर्वत वगळता ९०% मार्ग ते या च M 80 गाडीने चढून गेले आणि उतरून देखील गेले ! हरिभाऊ म्हणाले , " कदाचित माझी ही शेवटची परिक्रमा आहे .आता शरीर खरोखरीच साथ देत नाही .म्हणून मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की माते मला एकदा तरी तुझी शूलपाणीश्वराची झाडी दाखव . " गाडीची अवस्था पाहता हा खरोखरीच चमत्कार होता . चुकून माकून जर हरिभाऊ या गाडीवरून पडले असते तर त्यांना कोणीही वाचवू शकले नसते . कारण ते स्वतःच्या पायावर उभेच राहू शकत नव्हते .परमेश्वराची कृपा असेल तर मूकं करोति वाचालं । पंगुं लंघयते गिरीम् । हे खरोखरीच सत्य आहे . त्यामुळेच हरिभाऊ सारखा अपंग मनुष्य डोंगर चढून जाऊ शकतो आणि माझ्यासारखा मुखदुर्बळ आज आपल्यासमोर ही वाचाळ बडबड करू शकतो ! आपणा सर्व वाचकांची कृपा असेल तर संपूर्ण प्रवास नर्मदा माई या मुर्खाकडून लिहून घेईल . . . सध्या इत्यलम् ।

लेखांक १५ समाप्त (क्रमशः )


 लेखांक १६ : प्रभूजी का भंडार

भिकमपुर या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत .हे तुलनेने छोटेसे गाव आहे .मी गावामध्ये प्रवेश करणार इतक्यात दूरवरून एका शाळेतील मास्तर मला बोलवत आहेत असे मला लक्षात आले .मी शाळेमध्ये पोहोचलो .मास्तरांनी विचारले , " नर्मदे हर महाराज ! आप कहा बिराजेंगे ? छाया मे या धूप मे ? " आपली योग्यता नसली तरी देखील इथे सर्व लोक आपल्याला महाराज , बाबाजी , स्वामीजी ,पंडित जी ,दादाजी ,अशा विविध नावांनी हाक मारतात . ऐन माध्यान्ही ची वेळ झाली होती तरी देखील थंडीमुळे ऊन बरे वाटत होते .मी उन्हातच खुर्ची लावण्याचा इशारा केला . मला हे माहिती नव्हते परंतु परिक्रमावासी परिक्रमेदरम्यान खुर्ची मध्ये सुद्धा बसत नाहीत . शक्यतो जमिनीवरच बसतात .परंतु तिथे अजून चार-पाच शिक्षक होते . त्यामुळे त्यांना संकोच वाटू नये म्हणून मी त्यांचे सोबत खुर्ची मध्ये बसलो .बसणे असा साधा शब्द न वापरता बिराजना असे जड शब्द सर्रास वापरले जातात . बसल्या बसल्या शाळेतील मुलांनी बर्फासारखे थंडगार प्यायला पाणी आणून दिले व चहा आणण्यासाठी निघून गेली . तोपर्यंत शिक्षकांशी एकंदरीत शिक्षण पद्धती विषयी चर्चा करू लागलो .लॉकडाऊन मुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची भावना होती . इतक्या दुर्गम डोंगरी भागात देखील शिक्षणाची दोन वर्षे पुरेशी वाताहात झाली होती . शिक्षक हुशार होते व त्यांनी एकंदरीत त्या भागाविषयी खूप चांगली माहिती दिली . मुलांविषयी सुद्धा भरभरून बोलले . माझ्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर त्यांनी काही चुणचुणीत अशा मैदानात खेळणाऱ्या मुलांना बोलवून घेतले आणि माझ्याशी गप्पा मारायला सांगितले . मी देखील मुलांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आणि ती का करतात हे माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला . ( प्रत्यक्षात इथल्या लोकांना काय बालकांना सुद्धा याची गरज नाही !परंतु नवीन नवीन परिक्रमावासी हे सर्व करतात तसे मी देखील केले ! ) पोटात चहा आणि बिस्कीट चा एक पुडा गेल्यामुळे जरा आधार आला होता . परंतु पुढे अजून बरेच चालावे लागणार होते ,म्हणून मी मास्तरांची रजा घेतली . शिक्षकांनी सांगितले की गावामध्येच एक दुकानदार परिक्रमा वाशींची सेवा करतो . तरी तिथेच भोजन प्रसाद घ्यावा . त्यांनी माझ्यासोबत एक विद्यार्थी पाठवून दिला . तो मला मुख्य रस्त्याने घेऊन न जाता , गावातील छोट्या छोट्या गल्लीबोळातून घेऊन गेला . त्यामुळे मला या आदिवासी लोकांचे गाव जवळून पाहायला मिळाले . या मुलाचे नाव यादव होते .व पाचवीत असला तरी अतिशय हुशार आणि चुणचुणित होता . त्याला भारतीय सेनेत भरतीची प्रेरणा दिली . त्याने नुसते मला सोडायचे काम नाही केले तर दुकानदाराला देखील दोन-चार गोष्टी माझ्याबद्दल सांगून तो निघून गेला . 
आपल्या दुकानासमोर प्रभूलाल परिक्रमावासींना कंबल ( कांबळे ) देताना
हा दुकानदार प्रभू लाल म्हणून एक ब्राह्मण मनुष्य होता आणि घरची परिस्थिती बेताचीच असली तरी आपल्या भाकरीतला अर्धा तुकडा परिक्रमावासींना आवर्जून देत असे .दुकाना शेजारीच एक मंदिर होते त्या मंदिरामध्ये त्याने मला बसविले .
    प्रभू किराणा शेजारील छोटेसे शव मंदिर
 मंदिर अतिशय अस्वच्छ झाले होते .त्यामुळे मी तिथलाच एक झाडाच्या फांद्या तोडून बनवलेला झाडू घेऊन मंदिर स्वच्छ करू लागलो . हे पाहून प्रभू तिथे स्वतः आला आणि मला पुन्हा दुकानात घेऊन गेला .दुकान आणि घर एकाच जागेत होते . मध्ये छोटासा वरांडा होता . दुकानाच्या बाहेर त्याने छान झाडे व वेली लावल्या होत्या . त्यामुळे दुकानापुढे सावली असायची .माझे गाव पुणे आहे असे ऐकल्यावर त्याने मला आपको उदय जोशी पता है क्या असे विचारले ?उदय जोशी जो सदाशिव पेठ मे रहते है ।
प्रत्यक्षामध्ये मी उदय जोशींना ओळखत नव्हतो , परंतु उदय जोशी नावाच्या सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या एका भाजप कार्यकर्त्यांनी २०१६ मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती व जिथे जिथे ते राहिले किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या सर्वांना त्यांनी अतिशय सुंदर असे प्रशस्तीपत्र बनवून पाठविले होते . ते याने अभिमानाने आपल्या दुकानात लटकवले होते .
       उदय जोशी पुणे यांनी दिलेले प्रशस्तीपत्र

त्याच्याकडून उदय जोशी यांचा क्रमांक मी लिहून घेतला .पुढे योगायोगाने पुण्यामध्ये आल्यावर श्री गोरे नामक एका परिचितांनी मला उदय जोशी यांनी लिहिलेले नर्मदा परिक्रमेचे पुस्तक देखील वाचायला दिले .छोटेसे रंगीत पुस्तक होते .त्यांनी अतिशय वेगाने आणि शक्यतो हम रस्ते वापरून परिक्रमा केली होती असे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले . अजून तरी उदय जोशी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला नाही . 
मंदिरामध्ये परिक्रमावासींना कंबल देताना प्रभुलाल
 भुखे को भोजन प्यासे को पानी दे नरमदामाई रे !

घरी बनवलेले जेवण त्याने मला दिले .आमटी आणि दोन पोळ्या होत्या . जेवण अतिशय गरम होते .एकटा परिक्रमावासी आला तर त्यासाठी वेगळा स्वयंपाक शक्यतो कोणी करत नाही .घरातीलच थोडेसे जेवायला दिले जाते ,त्यामुळे आपण देखील मर्यादित खावे असे मला वाटते .उगाच मिळाले आहे म्हणून पोटावर बांधून जेवण्यात काही अर्थ नसतो .कारण त्यामुळे कदाचित घरातील कोणीतरी उपाशी झोपण्याची शक्यता असते . आग्रह मात्र खूप केला जातो .सुरुवातीलाच भरपूर वाढलेले असते . अन्न वाया घालवणे हा प्रकार तर संपूर्ण नर्मदा खंडामध्ये मी जवळपास नाहीच पाहिला .अन्नाचा प्रत्येक कण परब्रह्म समजून संपविला जातो . जेवण झाल्यावर मी पुन्हा एकदा दुकानाचे निरीक्षण करू लागलो .सहा फूट x आठ फूट अशा मापामध्ये जगातील प्रत्येक पदार्थ बसविला होता .दीपक किराणा स्टोअर असे त्याचे नाव होते .प्रभूलाल सद्गुरू कृपा परिक्रमा वासी सेवा असे उपक्रमाचे नाव असल्यामुळे या दुकानाला सगळे प्रभु किराना म्हणायचे .
सद्गुरु कृपा 
परिक्रमावासी सेवा 
प्रभू किराणा एवम जनरल स्टोअर्स
भीकमपूर तह. निवास जिला मण्डला 
मोबाईल नं . ९४२५८५३०२४
त्याने माझ्या वहीमध्ये मारलेला शिक्का थंडीमुळे पानं ओलसर राहून फिस्कटला होता . गुगल नकाशावर मला त्यांचा अजून एक शिक्का सापडला .

नावाप्रमाणे दुकानात सर्व काही होते . तो मला म्हणाला तुम्हाला अजून काय देऊ सांगा .एकंदरीत त्याची परिस्थिती बेताची आहे हे माझ्या लक्षात आले होते .त्यामुळे मीच त्याच्याकडून एक विजेरी विकत घेतली .दोन सेल सुद्धा विकत घेतले .सोबत साठलेल्या पैशाचे करायचे काय हा प्रश्न नेहमीच असायचा .जसजसे चालणे वाढू लागले तसतसे एक रुपयाचे नाणे सुद्धा जड वाटू लागायचे . सकाळपासून इथपर्यंत मी सुमारे १६ किलोमीटर चाललो होतो .पुढचे पाच-सहा किलोमीटर चालताना पाय जड झाले .मी त्यामुळे हळूहळू चालत होतो इतक्यात मागून तीन चार युवक झपाझप चालत माझ्या पुढे गेले .यांच्यामध्ये एक तरुण साधू होता .वासुदेव दास असे त्याचे नाव होते आणि तो अयोध्येचा होता . राजा दशरथाच्या महालापाशी त्याचा आश्रम होता . त्याने मला माझ्या परिक्रमे विषयी माहिती विचारली . पुढचा रस्ता कसा माहिती करून घेतोस असे विचारल्यावर मी सांगितले की जशी मैय्या नेईल तसे जातो आहे . माझ्याकडे कुठलेही इंटरनेट , मोबाईल , नकाशा किंवा पुस्तक नाही हे पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याच्या जवळचे एक पुस्तक लगेच मला दिले .हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमा वासींसाठी अक्षरशः कामधेनू आहे . आत्मकृष्ण नावाच्या एका संन्यासी महाराजांनी स्वतः अनेक वेळा पायी परिक्रमा केल्यानंतर लिहिलेले हे पुस्तक असून याच्या इतकी अचूक माहिती अन्य कुठल्याच पुस्तकांमध्ये सापडत नाही . 
मुळात पुस्तक म्हणजे याच्यात बाकी काही लिहिलेले नसून केवळ गावांची यादी , तीर्थक्षेत्रांची यादी , गावांमधील अंतर , नद्यांची नावे ,जिल्ह्याची तालुक्याची नावे इतकीच माहिती लिहिलेली आहे .नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका असे पुस्तकाचे नाव आहे . हे आत्म कृष्ण महाराज सध्या तिलकवाडा या गुजरात मधील गावातील आपल्या आश्रमामध्ये राहत असून त्यांची प्रकृती सध्या ठीक नसते .त्यामुळे पूर्वीसारखी परिक्रमावासीयांची सेवा ते आता करू शकत नाहीत. त्यांचे गुरुबंधू असलेले डॉक्टर चंद्रमौली स्वामी म्हणून एक आहेत ते त्यांची सर्व व्यवस्था पाहतात . वासुदेव दास साधूने मला हे पुस्तक कसे पाहायचे ते शिकविले .आणि उदाहरणादाखल जिथे आम्ही भेटलो ते गाव शोधून तिथे स्वतःचा नाव क्रमांक त्यांनी लिहून दिला . याने ही दुसरी परिक्रमा केवळ ८४ दिवसांमध्ये पूर्ण केली . अजून एक परिक्रमा करण्याचा त्यांचा मानस आहे सध्या ते उत्तराखंडातील चारधाम पदयात्रेचे नियोजन करीत आहेत . असो .
     प्रत्येक परिक्रमावासी कडे हे पुस्तक हवेच !

या पुस्तकामध्ये दिलेला नर्मदा परिक्रमेचा नकाशा हा अतिशय मार्गदर्शक आहे .वाहनाने परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी देखील नकाशा दिलेला आहे .नर्मदा परिक्रमेची भूमिका , ती का करतात, कशी करतात, याशिवाय नर्मदाष्टक , नर्मदा मातेची आरती , नर्मदेची उत्पत्ती कथा , छोटी भजने ,अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत . हे पुस्तक माझ्यासाठी पुढे अतिशय उपयुक्त ठरले यात वादच नाही . मला हा साधू बिछिया गावाजवळ भेटला . त्याने तशी नोंद पुस्तकांमध्ये करून दिली . आपल्या देशावर इंग्रजांचा फार खोल प्रभाव पडलेला आहे .संपूर्ण परिक्रमेमध्ये मला केवळ एकच साधू भेटला जो देवनागरीमध्ये आकडे लिहीण्याचा आग्रह धरायचा .बहुतांश साधू देवाने निर्माण केलेली देवनागरी लिपी सोडून आपल्या देशाची वाट लावणाऱ्या इंग्रजांची लिपी अंगीकारतात हे पाहून दुःख होते .आपण मात्र सर्व नोंदी देवनागरीमध्येच करत होतो याचा मैय्याला आनंद होत असणार . असो .

त्याने सांगितल्याप्रमाणे मी ज्या गावांमध्ये जायचो त्याची नोंद या पुस्तकात खुणेने करून ठेवायचो . भोजन प्रसाद घेण्यासाठी एक खूण केली होती आणि मुक्कामासाठी वेगळी खूण होती . अधिक काही माहिती मिळाली तर मी पुस्तकातच लिहून ठेवायचो . बिझौली अमगवा गावात अखेरीस पोहोचलो . एक मोठा काँक्रीट रस्ता लागला . हा रस्ता उजवीकडे थेट निवास गावाला जात होता तर डावीकडे शाहपुरा गाव होते . रस्त्यावर मोठे मोठे फूटपाथ बांधले  होते . गाव छोटेसेच होते परंतु टुमदार होते . गावामध्ये एक अतिशय सुंदर असे अति प्राचीन दुर्गा माता देवालय होते . 

तिथे मुक्कामाची इच्छा झाली .मंदिरामध्ये खूप प्राचीन मूर्ती आणि खांबांचे कोरीव कामाचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत . 

 प्राचीन दुर्गामाता व अन्य भग्नावशेष 
ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे .शनीचेही स्थान गतवर्षीच उभे केले आहे .एकंदरीत स्थान उत्तम आहे . शेजारीच नगरार नदी वाहते . संगमावर एक स्मशानभूमी आहे . पाण्याची एक उपसा विहीर   (जॅकवेल ) तिथे आहे . मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . आणि संपूर्ण परिसर फिरून आलो . कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर आसन लावून झाले की , तो संपूर्ण परिसर डोळ्याखालून घालायचा असा परिपाठ ठेवला होता . अनेक छोटी मोठी मंदिरे आजूबाजूला होती . नदीला चांगले पाणी होते . मंदिरामध्ये एक धुनी होती . तिच्या जवळच मी आसन लावले होते . मंदिरामध्ये दर्शनासाठी लोक येत राहत .त्यातील काही लोक जाता जाता नमस्कार करून जात .काहीजण गप्पा मारण्यासाठी थांबत असत .असेच एक माजी शिक्षक असलेले रमेश झारिया नावाचे सद्गृहस्थ बोलण्यासाठी म्हणून शेजारी येऊन बसले .त्यांनी माझ्याकडून बरीच माहिती जाणून घेतली .इथल्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे .ते तुमच्याकडून भरपूर माहिती काढून घेतात .अगदी त्यांना माहिती असलेल्या विषयाबद्दल देखील तुमची मते देखील ,जणू काही त्यांना काहीच माहिती नसल्याप्रमाणे जाणून घेतात !मला नंतर नंतर हे लक्षात येऊ लागले . परंतु सुरुवातीला मी अगदी उत्साहाने ते जे विचारतील ते सांगत राही ! 

त्यांनी माझे सोबत दोन फोटो काढून ते माझ्या मित्राला पाठवले . मित्र मोबाईलवर जमेल तेव्हा  अशा पद्धतीने दिनांक व वेळ याची नोंद करून ठेवत असे .पहिले चित्र दुर्गा माता मंदिरातील आहे. तर दुसरे त्यांचे घर आहे . जिथे त्यांनी रात्री मला जेवणासाठी आमंत्रित केले होते .दुसऱ्या चित्रात त्यांचे बंधू माझे सोबत आहेत .
 झरिया यांचे निवास स्थान
 मंदिरात गप्पा मारत बसलेले ग्रामस्थ व झरिया जी
रात्री भोजन प्रसादाला घरी येण्याचे सांगून झरीया निघून गेले .दरम्यान मंदिरामध्ये बरेच परिक्रमावासी येऊन उतरले .त्या सर्वांनी भोजन बनविण्याचा घाट घातला व मला बोलावू लागले परंतु माझे भोजन मैय्याने आधीच निश्चित केलेले असल्यामुळे मी नम्र नकार दिला . मी माझी आरती , उपासना आटोपून त्यांच्या घरी गेलो . त्यांच्या घरी एक मोठी चक्की होती . त्या चक्कीच्या खोलीमध्येच मस्त शेकोटी करून दहा-बारा ग्रामस्थ आणि मी गप्पा मारत बसलो .बराच वेळ गप्पा रंगल्या .राजकारण समाजकारण अर्थकारण अशा विविध विषयांना स्पर्श करत या लोकांची मते जाणून घ्यायला खूप मजा येत होती .वरवर खेडवळ दिसणारी ही माणसे प्रत्यक्षामध्ये अतिशय हुशार आणि अभ्यासू असतात हे सर्व शहरी लोकांनी कायम लक्षात ठेवावे .मनुष्याचा वेश पाहून त्याची बुद्धी ठरवण्याची पाश्चात्त्य पद्धत भारतामध्ये चालत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे . समोर बसलेल्या माणसांपैकी चार पाच जण धूम्रपान करत होते .सौजन्य म्हणून मला देखील बिडी पुढे करायचे मी नम्रपणे नकार देत असे .इथे एक मोठे संत शे दीडशे लोकांची पायी परीक्रमा घेऊन नुकतेच येऊन गेले होते .त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील यांनी मला दाखविले . गप्पा झाल्यावर आत अतिशय मोठ्या असलेल्या घरामध्ये त्यांनी मला बोलावले .बाहेर ओसरी वरच बसून मी गरमागरम पुऱ्या भाजी आणि खिरीचा आस्वाद घेतला .प्रत्येक पुरी तळून झाले की थेट ताटामध्ये वाढली जात होती .ताजे अन्न खाणे ही आपली संस्कृती आहे ती आपण हळूहळू विसरत चालले आहोत .आणि तेच अनेक रोगांचे मूळ ठरत आहे .असो .रात्री मी पुन्हा मंदिरामध्ये परतलो .मंदिरामध्ये उतरलेल्या परिक्रमावासींची ओळख करून घेतली. बुधराम सिंग पवार हे खाटी मोहंदी या गावचे होते .अनुपपूर जिल्ह्यामध्ये यांचे गाव पडत होते .यांचा भाऊ बलराम नायक आणि त्याचा मुलगा मथुरा सिंग हे गावचे सरपंच होते .मला लवकरच हे गाव वाटेमध्ये भेटणार होते .तिथे नक्की आमच्या घरी येऊन जा असे आमंत्रण त्यांनी दिले .यानंतर रात्रीची थंडी भयानक वाढत आहे असे पाहून मी माझे आसन अगदी धूनीला चिकटून लावले .आणि अग्नीदेवतेचा शेक घेत घेत निद्रादेवी च्या अ
आधीन झालो . तीनच तास झोप पुरली . हा दिवस होता पौष शुद्ध चतुर्थी शके १९४३ .६ जाने २२ . गुरुवार .
नगरार नदीमध्ये स्नान आटोपले . पाणी अतिशय थंड होते . मंदिरामध्ये आल्यावर पुन्हा नळावर स्नान केले कारण हे पाणी थोडे गरम होते ! लवकरच सर्व आटोपले आणि उजाडता उजाडता पावलांनी गती घेतली .

लेखांक सोळा समाप्त (क्रमशः)

 लेखांक १७ : कोल्ह्याने शिकविलेला धडा

गेले तीन दिवस मी सरासरी १८ ते २२ किलोमीटर चालत होतो .डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले त्याप्रमाणे हळूहळू माझे पाय बोलू लागले . सुरुवातीचे काही दिवस केवळ पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा सल्ला मी मनावर घेतलेला नव्हता . त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो खरा परंतु माझे पाय खूपच दुखू लागले .पाय दुखू लागले की मी थोडासा एका कडेला उभा राहून थांबायचो आणि थंडी भरून आली की पुन्हा चालायला लागायचो . असा थांबत थांबत मी निघालो होतो . माझ्या मागचे सर्व परिक्रमावासी झपाझप पुढे निघून गेले . ते कसे काय इतक्या गतीने चालत आहेत हेच मला कळत नव्हते . आपल्याकडून काही परिक्रमा पूर्ण होणार नाही असे वाटू लागले . एक क्षणभर असाही विचार मनात आला की आता आपण नर्मदेचे दर्शन घेतलेले आहे . नर्मदेच्या काठी चार पावले चाललो सुद्धा आहे तरी चला घरी परत जाऊया ! अशा सर्व नकारात्मक विचारांनी मनामध्ये गर्दी केलेली असताना अचानक उजवीकडून धावतच एक सुंदर असा कोल्हा माझ्यासमोर आला .आणि माझ्याबरोबर समोर येऊन दचकून थांबला .

याची पूर्ण वाढ झालेली नव्हती हे कदाचित कोल्ह्याचे पिल्लू असावे व ती मादी असावी .अतिशय सुंदर असा तो कोल्हा पाहून मी क्षणभर जागेवर उभा राहिलो ! आमच्या दोघांची नजरा नजर झाली ! त्याचे सुंदर चमकदार पाणीदार भुरे डोळे लक्षात राहिले ! आणि त्याने धूम ठोकली . मी चालत होतो तो एक विस्तृत माळरान प्रदेश होता .पाच-सहा किलोमीटर पर्यंतचा परिसर दिसत होता व या संपूर्ण परिसरात एकही झाड नव्हते . कोल्हा माझ्यासमोरून डाव्या बाजूला असलेल्या माळावर पळाला . मी बघत होतो .एकाच गतीने तो पळत होता .पळत पळत तो लांब गेला .जसजसा लांब जाऊ लागला तसा एक केवळ काळा ठिपका मला पळताना दिसू लागला .माळावरच छोटी टेकडी होती त्या टेकडीवर तो पळत पळत गेला . तिथून खाली उतरला आणि परत उलटा पळत आला .हे सर्व अंतर सुमारे दोन किलोमीटर आरामात असावे .तो दोन किलोमीटर पळत गेला आणि परत उलटे दोन किलोमीटर पळत आला आणि माझ्यासमोरच पुन्हा रस्ता ओलांडून उजवीकडे पळून गेला . आता मात्र तो अदृश्य झाला .कुठे गेला काहीच कळले  नाही .मी विचार करू लागलो . दहा-बारा किलो वजन असलेला तो फुट दीड फुटाचा छोटासा जीव , जर न थकता न थांबता इतकी मोठी धाव सहज घेऊ शकतो आहे! तर माझ्यासारख्या धडधाकट माणसाला पाच पाच मिनिटाला का थांबावे लागत आहे ? आणि मी मनाचा निश्चय केला , की ते काही नाही आपण न थांबता चालत राहायचे .त्यादिवशी मी सलग अठरा किलोमीटर अथक चालून कटंगी गावामध्ये तेजी बाबा नावाच्या एका आदिवासी नागा साधूच्या कुटीमध्ये जाऊनच थांबलो ! परिक्रमेमध्ये तुम्हाला कधी कोण काय शिकवून जाईल याचा नेम नाही !त्या एवढ्या छोट्या कोल्ह्याने मला खूप मोठा धडा शिकविला !पुढे देखील परिक्रमेमध्ये मी अक्षरशः शेकडोंनी कोल्हे पाहिले परंतु हा पहिलाच कोल्होबा चांगला लक्षात राहिला !जेव्हा जेव्हा माझ्या पायाची गती कमी व्हायची तेव्हा तेव्हा मला हा कोल्हा आठवायचा ! दत्तगुरूंनी २४ गुरु केले होते आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकले होते . तसे हा कोल्हा माझा गुरु झाला ! 
आमगाव , भानपूर बिसौरा , माणिकपुर, देव्हारा , देवरी कलाँ , छपरा रयत ही गावे पार करत कटंगी गाठले . 
हा सर्व मार्ग अतिशय सुंदर होता .भरपूर थंडी ,मस्त धुकं , पक्षांचा किलबिलाट ,छोटे मोठे तलाव , त्यात विहार करणारी सुंदर बदके ,कमळे सगळेच स्वर्गीय दृश्य होते .
पक्षीमित्र डॉक्टर सलीम अली यांनी लिहिलेले बुक ऑफ इंडियन बर्ड्स मी लहानपणापासून वाचत आलो आहे .त्यातील चित्रे पाहणे किंवा ती पाहून पुन्हा काढणे हा माझा आवडता छंद शाळेमध्ये असताना होता .त्यामुळे त्या पुस्तकातील बहुतांश पक्षी मला चांगले माहिती आहेत .परिक्रमेमध्ये मी त्यातील जवळपास सर्व पक्ष पाहिले .माणिकपूर गावाजवळ लागलेले २ तलाव तर खूप सुंदर होते . या माणिकपूर गावामध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह देखील होते .सर्व मुलींची चिव चिव लगबग सुरू होती . वाटेमध्ये छोटी छोटी गावे लागत .वाड्या वस्त्या लागत .ज्याला नुकतेच बोलता येऊ लागले आहे अशा मुलापासून ते साधारण दहा अकरा बारा वर्षापर्यंतची मुले पळत बाहेर येत आणि नर्मदे हर करत ! जोपर्यंत तुम्ही दिसत आहात तोपर्यंत ती न थकता नर्मदे हर चा पुकारा देत ! त्यांनी नर्मदे हर म्हटल्यावर आपण नर्मदे हर म्हटलेच पाहिजे ! तुम्ही आवाज देत नाही तोपर्यंत ते पुकारा देत राहतात .
दरम्यान एक गमतीशीर परंतु विचित्र घटना घडली .दुचाकी वरून एक माणूस रागाने माझ्या दिशेने ओरडत आला , " रुक ! साले रुक ! " . त्याच्या ओरडण्यामुळे मी जागेवर उभा राहिलो . तो मला म्हणाला तुम रात को कहा पर रुक थे? मी सांगितले दुर्गा मंदिरामध्ये उतरलो होतो आणि मी एकटाच होतो .माझी बोलण्याची पद्धत आणि एकंदर वेश पाहून त्याच्या लक्षात आले की त्याची काहीतरी चूक झाली आहे आणि मला म्हणाला बाबाजी मुझे क्षमा करना । लेकिन नगरार नदी के किनारे कोई हग के गया है ।आपके साथ कोई नही है यह मुझे पता नही था ।जॅक वेल के बाजू मे चार पाच लोक लाईन मे नक्काशी डाल के गये है । यहा हम कपडे धोते है । नहाते है।पीने का पानी तक भरते है ।शरम आनी चाहिये इन लोगो को । 
मी सुद्धा तिथेच आंघोळ केली होती ना !
मला साधारण हे कृत्य कोणी केले असेल याचा अंदाज आला . परंतु मी त्याला काही फारशी माहिती देत नाही बसलो की ती माणसे कोण आहेत आणि कुठे आहेत . कारण तो चांगलाच चिडलेला होता . तो म्हणाला हे नेहमीचे झालेले आहे . आम्ही खूप वेळा सांगितले मंदिर वाल्या लोकांना की एक संडास बांधा परंतु ते बांधत नाहीत . आणि परिक्रमावासी काही ऐकत नाहीत .दिसले पाणी की बसले शौचाला .तो मनुष्य जे सांगत होता ती गोष्ट अगदी तंतोतंत खरी  होती. विशेषतः मध्य प्रदेशातील काही ठराविक जिल्ह्यामधून येणारे भौतिक मागण्या असणारे परिक्रमावासी अशा गंभीर चुका करत असे माझे निरीक्षण आहे .वृद्ध माणसे ,अपंग माणसे, महिला , पूर्ण शहरी जीवन जगलेली माणसे आणि काही ठराविक जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील माणसे यांच्याकडूनच नेहमी हा अपराध होत असे .या लोकांना फारसे लांब चालत जाणे जमत नसे .मग भल्या पहाटे अंधारामध्ये उठून जवळपास कुठेतरी पटकन ते आटोपून घेत . परंतु त्यांना हे माहिती नसे की उजाडल्यावर ते सर्व जगाला दिसणार आहे . हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला मी विनंती करू इच्छितो की कृपया उघड्यावरतीच शौच विसर्जन करा ,परंतु ते पूर्णपणे झाकण्याची काळजी घ्या . हिमालयामध्ये किंवा अन्यत्र नियमित ट्रेकिंग करणारी माणसे ही काळजी घेतात . सोबत भुसा किंवा मातीची पिशवी ठेवून शेवटी शौच विसर्जन झाल्यावर ते आवर्जून झाकून टाकतात .अगदी इतके नाही केले तरी पायाने एक खड्डा मातीत काढून जाताना तो त्याच मातीने बुजविणे सहज शक्य असते .अशा उघड्या पडलेल्या घाणीवरील माशा खूप मोठ्या प्रमाणात रोगप्रसार करतात . .पाण्याचा स्त्रोत, घरे ,रस्ता , येण्या-जाण्याच्या पायवाटा , शेत अशा कुठल्याही ठिकाणी कृपा करून जात जाऊ नका . त्या माणसाचा त्रागा अतिशय समजून घेण्यासारखाच होता .अशा काही मुठभर लोकांमुळे संपूर्ण परिक्रमा बदनाम होते . तो गाडीवर पुढे निघून गेला आणि काही वेळाने पुन्हा उलटा वळून आला .जाता जाता त्याने पुन्हा एकदा माझी क्षमा मागितली . तो म्हणाला बाबाजी आप यह नही कर सकते यह मै जान चुका हूँ।फिर भी मै आपको बोला । मुझे क्षमा करना ।
मी त्याला सांगितले की माझ्या मनात कुठलेही वाईट भाव त्याच्याबद्दल नाहीत उलट तो करतो आहे ते चांगले काम आहे .अधिकाधिक लोकांचे प्रबोधन याविषयी करणे आवश्यक आहे .तो त्याच्या मार्गाने निघून गेला आणि मी पुढे मार्गस्थ झालो .  असो.
दुपारी भोजनासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आश्रमातून एका माणसाने आवाज दिला . हे देवरी नावाचे गाव होते आणि मला हाक मारणाऱ्या माणसाचे नाव होते चम्मूलाल तीरथलाल झरिया .
 माँ नर्मदा यज ( यज्ञ ) पीठ असे आश्रमाचे नाव होते .खरे म्हणजे ही झरिया यांची खाजगी शेती होती आणि शेतामधील ते घर होते .परंतु पती-पत्नी दोघेच राहत असत व दोघांना मूलबाळ काही नसल्यामुळे त्या दोघांनी असा निर्णय घेतला की या शेतातून येणारे संपूर्ण उत्पन्न परिक्रमावासींची पुत्रवत सेवा करण्यात खर्च करायचे ! किती मोठा त्याग ! ते दोघे आपले नाव सुद्धा कोणाला सांगत नसत .मीच चौकस वृत्तीने त्यांचे नाव शोधून काढले . यांनी येथे नर्मदा मातेचे , महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर ,एक छोटीशी यज्ञशाळा आणि गोशाळा बांधली होती . परिक्रमावासींना जे लागेल ते सर्व हे स्वतः पुरवत . आल्या आल्या माझे मळलेले कपडे पाहून त्यांनी मला सांगितले की आमच्या इकडे कपडे लगेच वाळतात . तरी पाणी भरपूर आहे स्वच्छ कपडे धुऊन टाका ! 
                               नर्मदा मंदीर
        यज्ञशाळा व गौशाळा
मी कपडे धुवून टाकले . शेताच्या कुंपणाच्या तारेवर वाळत घातलेले धोतर पाचच मिनिटात वाळून निघाले .
झपाझप चालत आल्यामुळे मी एकटाच आश्रमामध्ये होतो . थोड्या वेळातच पंधरा-वीस परिक्रमावासी तिथे पोहोचले . दरम्यान झरिया काकूंनी माझ्यासाठी स्वयंपाक करून मला वाढले होते . या लोकांसाठी त्या पुन्हा कंबर कसून स्वयंपाकाला लागल्या . मी मदत करू का विचारल्यावर स्पष्टपणे आणि नम्रपणे नकार दिला .त्यांनी सांगितले की आमच्या आश्रमामध्ये परिक्रमा वासींना कुठल्याही प्रकारचे काम करू दिले जात नाही . चम्मूलाल झरिया माझ्या शेजारी येऊन बसले आणि उन्हामध्ये सुमारे एक तास त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या .मी परिक्रमा का उचलली ?आतापर्यंत मला काय काय अनुभव आले ?असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले .कोल्ह्याचा अनुभव त्यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले आप खुली आखो से परिक्रमा कर रहे है ।आपको बहुत सुंदर अनुभूती आगे आती जायेगी । 
दरम्यान इथे सायकलवरून परिक्रमा करणारे एक परिक्रमावासी मला भेटले .गंगाधर चंद्रभान कदम असे त्यांचे नाव होते मुक्काम सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी . यांनी सायकलवर संपूर्ण भारतभ्रमण केले होते बारा ज्योतिर्लिंगे चारधाम अष्टविनायक सर्व केले होते . अगदी कैलास मानसरोवर ला सुद्धा सायकल वर जाऊन आलो असे त्यांनी मला सांगितले . सीमेवरती यांना कोणी अडविले नाही असे ते मला म्हणाले . यात कितपत तथ्य आहे माहिती नाही परंतु त्यांची प्रकृती आणि वेग पाहता ते आरामात संपूर्ण भारत फिरले आहेत हे कळत होते .विशेष गंमत म्हणजे हे सायकल मधील चाकाची हवा कधी तपासत नसत . तर ती आपोआप देव भरून देतो असा त्यांचा विश्वास होता .इथून पुढे मी मुक्काम कुठे करावा हे मला बाबांनी सांगितले आणि त्याप्रमाणे मी मजल दरमजल करत कटंगी गावामध्ये पोहोचलो .डाव्या हाताला एक बस थांबा होता आणि त्याच्यासमोर दोन मोठ्या विहिरी होत्या .विहिरीवर बायका पाणी भरत होत्या . त्यांना विचारले गावामध्ये आश्रम कुठे आहे .आश्रम मुख्य रस्त्यापासून थोडासा आत मध्ये होता .आश्रम कसला एका गरीब गोंड आदिवासी गृहस्थाचे घरच ते .तेजी बाबा किंवा तेजा बाबा या गोंड आदिवासी गृहस्थाने जुन्या आखाड्याचा अनुग्रह घेतलेला होता व घरातच धुनी लावून तो संन्यस्त जीवन जगत होता .दिसायला याचा वेश साधू सारखा होता परंतु संसारामध्ये राहत होता . घर दगड मातीचे आणि शेणाने सारवलेले कौलारू होते .मातीने दगडाने अंगण तयार करून ते चांगले धोपटून त्यावर शेणाचा सुंदर सडा घालून कलाकुसर केली जाते याला इथे लिपाई पुताई असे म्हणतात .हे आदिवासी लोक इतकी सुंदर रिपाई पुताई करतात की विचारू नका . जरा देखील पाणी पडले किंवा पाऊस आला तरी ही सर्व मेहनत पाण्यामध्ये जाणार असते हे माहिती असून देखील लिपाई पुताई आवर्जून केली जाते . एका बाजूला घर ,मध्ये अंगण , एका बाजूला धुना आणि देवघर , एका बाजूला मोठे झाड , त्याचा पार आणि त्याच्या खाली गोठा अशी घराची रचना होती .चार-पाच शेळ्या मेंढ्या बांधलेल्या होत्या आणि एक म्हैस होती .इतकी बारीक आणि दुबळी म्हैस मी पहिल्यांदा पाहत होतो .ही अस्सल देशी जात होती म्हशीची . पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण ज्या गलेलठ्ठ म्हशी पाहतो त्या वेगळ्या आणि ही जात वेगळी . ही म्हैस आणि तिचे दूध हे एकमेव उत्पन्नाचे साधन होते बाबाला . शेती फारशी नव्हती एक छोटासा प्लॉट त्याच्याकडे होता .त्याच्यामध्ये हरभरा लावून त्यावर उदरनिर्वाह चालवायचा . खाण्यापिण्याची इतकी भ्रांत असलेली माणसे आपल्या घासातला घास दुसऱ्या कोणाला तरी देण्याची इच्छा कशी काय करू शकतात हे माझ्या शहरी तर्क बुद्धीच्या पलीकडचे होते . बराच वेळ बाबा आणि मी अंगणामध्ये बसून गप्पा मारत होतो .त्यादिवशी मी एकटाच मुक्कामी होतो . माझ्या मागचे सर्व लोक आधीच पुढे निघून गेले होते . मुळात मी असे ठरविले होते की मुक्काम कुठे करायचा हे आपण ठरवायचं नाही ! सूर्यास्त होता होता ज्या गावामध्ये असू तिथे जी मिळेल ती सोय पत्करायची . बाबाने ओसरी मध्ये हातपाय पसरायला जागा दिली . प्रचंड थंडी होती त्यामुळे त्याने सुंदर शेकोटी माझ्यासाठी करून ठेवली .या भागामध्ये लाकडाचे देखील दुर्भिक्ष्य आहे .म्हणजे तसे आहे सर्व जंगलच, परंतु वनखात्याची लोक लाकडे तोडू देत नसल्यामुळे लाकडे आणायला खूप दूरवर जावे लागते .आपोआप वाळून पडलेली लाकडे गोळा करायला परवानगी असते .परंतु गावातील सर्वच लोक लाकूड वापरत असल्यामुळे जवळची लाकडे लवकर संपतात .पाच-सहा किलोमीटर पर्यंत सहज जाऊन मोठे मोठे ओंडके डोक्यावर वाहून आणले जातात .कष्टाच्या बाबतीत पुरुष आणि महिला असा भेदभाव खेडोपाडी केला जात नाही . स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना कदाचित थोडेसे अधिकच कष्ट घेत असतात . शेकोटी पेटवण्याची या लोकांची पद्धत मला फार आवडली . एक मोठे लाकूड ठेवले जाते .परंतु ते भसाभसा पेटणार नाही याची काळजी घेतली जाते .छोट्या काडेपेटीतील काडीच्या मापाच्या काड्या काटक्या पेटवून छोटीशी शेकोटी केली जाते .त्या छोट्या शेकोटीच्या उष्णतेमुळे मोठ्या लाकडाला थोडेसे निखारे निर्माण होतात . आणि त्या निखाऱ्यांच्या मदतीने छोटी छोटी लाकडे टाकून शेकोटी प्रज्वलित ठेवली जाते . या पद्धतीमध्ये तुमचा वेळही जातो , थंडी देखील भागते आणि लाकूड देखील फारसे लागत नाही .हे सर्व करत असताना अतिशय एकाग्र चित्त असावे लागते .त्यामुळे धुनी पुढे किंवा शेकोटीपुढे बसून तिला प्रज्वलित ठेवणे हे एक प्रकारचे ध्यानच आहे . विशेषतः तेजी बाबाच्या देवघरामध्ये जो अखंड धुना चालू होता त्यासाठी बरीच लाकडे लागायची . ती एक तर विकत आणावी लागत किंवा खूप दूरवर जाऊन डोक्यावरून वाहून आणावी लागत . बहुतेक वेळा बाबा किंवा त्याची बायको डोक्यावरून लाकडे आणत असत . आता सुद्धा त्याच्या बायकोने लाकडाची एक मोठी मोळी आणून माझ्यासमोर ठेवली . बाबा ने मला एक विनंती केली .तुमची हरकत नसेल तर म्हशीला आणि शेळ्यांना आत मध्ये बांधू का ? त्या मुक्या जीवांना देखील खूप थंडी वाजत होती .आणि आम्ही केलेल्या शेकोटीची ऊब वाया जात होती म्हणून त्याने मला विचारले .मी त्याला म्हणालो काहीच हरकत नाही . तुमचे घर आहे . तुमची गुरे  आहेत. बाबा म्हणाला परंतु तुम्ही अतिथी आहात आणि अतिथी परमेश्वर असतो . छोट्या छोट्या घटनांमधून ही साधी भोळी दिसणारी माणसे किती मोठे तत्त्वज्ञान मला शिकवून जात होती ! सर्व भूतांवर दया करा !अतिथी देवो भव ! हे सर्व पुस्तकांमध्ये वाचण्यापेक्षा असे सहज जगण्यातून शिकणे किती छान आहे ! म्हैस आणि शेळ्यांना शेकोटी आवडत होती .शरीराच्या सर्व बाजू ही जनावरे शेकून घेत होती . बाबाच्या बायकोने रात्री भात आणि हरभऱ्याच्या पातीची आंबट भाजी आणून दिली .कितीही विनंती केली तरी इथले लोक तुमच्यासोबत भोजन घ्यायला बसत नाहीत . कारण त्यांना अशी भीती वाटते की भोजन संपून जाऊ नये .जोपर्यंत अतिथी तृप्त होऊन उठत नाही तोपर्यंत घरातील कोणीही जेवणाला स्पर्श करत नाही . माझे जेवण झाल्यावर बाबा जेवायला बसला . बाबा बरेच गमतीशीर अनुभव सांगत होता . त्याला नर्मदा मातेचे आलेले अनेक अनुभव त्याने मला सांगितले .बाबाने परिक्रमा केली होती त्यामुळे त्याला परिक्रमावासींविषयी सहानुभूती होती . या भागातील बहुतांश आदिवासी किंवा वनवासी समाजामध्ये नर्मदा परिक्रमे बाबत थोडेसे अज्ञानच आहे . मला असे लक्षात आले की बऱ्याच लोकांना परिक्रमा नक्की काय आहे हे खरोखरच माहिती नाही . त्यामुळे बरेचदा परिक्रमावासींना काही अप्रिय अनुभवांना सामोरे जावे लागते . तेजी बाबा सारखा एखादा मनुष्य असतो ज्याने स्वतः नर्मदा परिक्रमा केल्यामुळे त्याला त्यातील सुख आणि दुःख याची चांगली जाणीव असते .बाबाने अजून एक वाईट गोष्ट सांगितली . तो म्हणाला शहरातील खूप लोक इथे येतात . राहून जातात .जाताना मला सांगतात की आत्ता आमच्या जवळ पैसे नाहीत ,परंतु गावी गेल्यावर तुला नक्की पैसे पाठवितो .परंतु आजपर्यंत केवळ एका माणसाने पाच हजार रुपये मला मनी ऑर्डरने पाठवून दिले बाकी कोणीही एक रुपया सुद्धा दिलेला नाही .
( वाचकांपैकी कोणाला तेजी बाबा यांना आर्थिक मदत करायची असेल तर त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे ९१११३०६०११ /  91 11 30 60 11 . मला खरोखरीच जी स्थाने मदत करण्या योग्य वाटतील त्यांचेच क्रमांक मी इथे शेअर करणार आहे .असो.)
रात्री शेकोटी शेजारीच झोपी गेलो .सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला उजाडले होते .बाबा मला त्याच्या देवघरामध्ये घेऊन गेला आणि एक छोटी शंखिणी त्याने मला दिली . आणि म्हणाला हिच्यावरती तुमचाच अधिकार होता . ही तुम्ही ठेवा . अतिशय उच्च स्वरामध्ये ती वाजत होती आणि तिचा आवाज खूपच खणखणीत होता .
 शंख म्हणजे गुळगुळीत असतो तो आणि शंखिणीला काटे असतात .शंखिणी पूजेमध्ये शक्यतो वापरत नाहीत परंतु वाजवण्यासाठी वापर केला जातो . खरे तर पाठीवरील ओझे कमीत कमी असावे असा माझा प्रयत्न होता परंतु अशा एक एक छोट्या छोट्या गोष्टींनी वजनामध्ये भरच पडत होती . 
इथून निघालो . वाटेमध्ये एक मंदिर होते .बाहेरूनच दर्शन घेतले . वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक स्थान देवतेला नमस्कार करीत करीत परिक्रमा करावी .टेंबे स्वामी सांगत की वाटेत येणाऱ्या प्रत्येक नदीला वंदन करून मगच ती ओलांडावी . रस्त्याला लागलो आणि विहिरी वरती पाणी भरून घेतले .यातील एक विहीर कपडे धुण्याची होती आणि एक विहीर पिण्याच्या पाण्याची होती .पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत अतिशय स्वच्छ राखले जातात . त्याच्या आजूबाजूला कोणी देखील कचरा केलेला खपवून घेतले जात नाही .नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान चालू केले खरे परंतु याची गरज छोट्या छोट्या खेड्यापाड्यांना अजिबात नाही कारण ती मुळातच स्वच्छ असतात . दिवसातील अर्धा वेळ स्वच्छता राखण्यातच जातो अशीच दिनचर्या या लोकांची असते . डोळ्यांना अतिशय सुंदर दिसेल अशा पद्धतीने घर , गोठा , अंगण , शेती , विहिरी , तलाव , बगीचे , रस्ते ठेवलेले असतात . 
इथून पुढे आजवरचे सर्वाधिक अंतर मी कापले . पहिले पंधरा दिवस पंधरा किलोमीटर पेक्षा जास्त चालू नये हा परिक्रमावासींचा नियम पाडळी तुडवत चांगले सत्तावीस किलोमीटर अंतर चाललो आणि संघ संचलित जनजाती कल्याण केंद्र आश्रम बरगांव येथे पोहोचलो .मध्ये अनेक छोटे-मोठे घाट रस्ते लागले .अतिशय उत्कृष्ट असे हे जंगल  आहे. साग , ऐन , खैर, बांबू , मोह , निलगिरी याची घनदाट झाडी सर्वत्र दिसते . असे सांगितले जाते की पूर्वी हा प्रदेश जगातील सर्वाधिक घनदाट वनांपैकी एक होता .याची पुष्टी करणारे अनेक पुरावे येथे सापडलेले असून भारतातील एकमेव असे राष्ट्रीय जीवाश्म संग्रहालय कटंगीच्या लगेच पुढे असलेल्या घुघुवा या गावामध्ये बांधलेले आहे . प्रत्येकाने आवर्जून जाऊन पहावे असे हे संग्रहालय आहे . इथे सुमारे साडेसहा करोड वर्ष जुन्या झाडांचे जीवाश्म जतन करून ठेवलेले आहेत . ताडवर्गीय वनस्पती व नारळाच्या विविध प्रजाती ,तसेच केवळ ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सापडणाऱ्या निलगिरीच्या काही जाती ,खाऱ्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि समुद्रातील शंख शिंपले याचे जीवाश्मदेखील इथे करोडो वर्षांपूर्वी चे आढळलेले असल्यामुळे जंबुद्वीप आशिया खंडाला नंतर येऊन चिकटले या दाव्याला पुष्टी करणारे हे जीवाश्म आहेत .
          राष्ट्रीय जीवाश्म संग्रहालय घुघुवा

भारतीय भूप्रदेशाचे प्राचीनत्व सिद्ध करणारा हा मंडला आणि दिंडोरी जिल्ह्याचा प्रदेश आहे . इथे परिक्रमे खेरीज सुद्धा तुम्ही पर्यटक म्हणून येऊन गेले पाहिजे .
याच्यापुढे बरगांव मध्ये अनेक गमती जमती झाल्या त्या पुढच्या भागात सांगतो .

लेखांक सतरा समाप्त (क्रमशः)

 लेखांक १८ : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश

शहापूरा पासूनच्या पुढच्या वन प्रदेशाला मुंडा महारण्य असे नाव आहे . फार पूर्वी इथे अतिशय घनदाट अरण्य होते आता विरळ झाडी शिल्लक आहे . जंगलातून चालता चालता एक छोटासा घाट लागला .मला हळूहळू आता भुकेची जाणीव होऊ लागली . घाटामध्ये डाव्या हाताला खाली एक छोटीशी कुटी दिसली .आतून एका बाबांनी आवाज दिला .
                      बंजरकुटी आश्रम
 छीहार बाबांची शिष्य चेतराम बाबाजी म्हणून इथे राहत होते . या आश्रमाला बंजर कुटी (वनचर कुटी) म्हणत .
काळ्या रंगाचा गॉगल आणि काळे कपडे घातलेले बाबांचे फोटो आश्रमात लावलेले होते .
इथे खाली एक छोटासा झरा होता . एक-दोन छोटी मंदिरे  होती. सकाळचे नऊ वाजले असावेत . बाबा मला म्हणाले भोजन प्रसाद घेऊन पुढे जा .मी म्हणालो मला अजून बरेच चालायचे आहे तरी काही बालभोग असेल तर घेतो .अल्पोपाहार किंवा नाश्ता याला परिक्रमेच्या अथवा साधूंच्या भाषेमध्ये बालभोग असे म्हणतात .याने जंगलामध्ये उगवणाऱ्या कुदै नावाच्या धान्याची अप्रतिम खिचडी मला बालभोग म्हणून चारली .ही खिचडी इतकी चविष्ट होती आणि इतकी अप्रतिम ताकद त्याच्यामध्ये होते की पुढे दिवसभर मला भूकच लागली नाही .
     अत्यंत कमी पाण्यावर जगणारे कुदैचे रोपटे
 कुदै  Paspalum scrobiculatum, commonly called Kodo millet or Koda millet तमिळ मध्ये வரகு वरग , मराठीत वरई (एक प्रकारची )
भारत सरकारच्या विनंतीनुसार २०२३ हे वर्ष युनायटेड नेशन्स ने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे . ज्वारी ,बाजरी , वरई , नाचणी ,कुदै ,राळे , कांगणी राजगिरा अशी ग्लुटेनमुक्त भरडधान्यं भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेतच .परंतु ती पुन्हा एकदा प्रचारामध्ये यावीत आणि शेतकरी जे भरड धान्याच्या उत्पादनापासून दूर गेले आहेत आणि केवळ गहू तांदूळ ऊस याचे उत्पादन करत आहेत त्यांनी पुन्हा भरडधान्याचे उत्पादन सुरू करावे यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम आयोजित केले आहेत .
भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे सोळा प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी(सोर्घम), बाजरी(पर्ल मिलेट), नाचणी किंवा नागली (फिंगर मिलेट), कांगणी किंवा राळे (फॉक्स टेल मिलेट/ मायनर मिलेट), भगर किंवा वरी किंवा वरई (बार्नयार्ड मिलेट), चेना/पुनर्वा (प्रोसो मिलेट), कोद्रा (कोदा/कोदो मिलेट), सावा/साणवा/झांगोरा (लिटल मिलेट), कुटकी (कोराळे/पॅनिकम मिलेट), बकव्हीट/कुट्टू (टू स्युडो मिलेट), राजगिरा (अमेरॅन्थस) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा समावेश आहे
नवीन हॉटेल सुरू करताना भरड धान्याचे पदार्थ देणाऱ्या हॉटेलला १८ लाखाचे अनुदान भारत सरकार देते आहे . म्हणून मुद्दाम या धान्य विषयी थोडी अधिक माहिती आपल्याला दिली . तेवढाच या अभियानामध्ये आपला एक खारीचा वाटा ! 

बजरंग कुटी आश्रमाचा शिक्का

 इथून पुढे तीन वाजेपर्यंत मला काहीही खाण्यापिण्याचे स्थान दिसले नाही . इथली भोजनाची वेळ साधारण साडेअकरा ते दीड दरम्यान असते .त्यानंतर जर तुम्ही एखाद्या स्थानावर पोहोचलात तर तुम्हाला भोजन प्रसाद मिळणे जवळपास अशक्य असते .इथे शिळे अन्न ठेवण्याची पद्धत नसते . प्रत्येक पदार्थ ताजा करून खाल्ला जातो व उरलेला पदार्थ लगेच गाईंना व भैरव अर्थात कुत्र्यांना खायला घातला जातो .तीन वाजेपर्यंत मी उन्हात चालत होतो . मध्ये एक गमतीशीर मंदिर लागले त्याच्यावर कळसा ऐवजी अर्जुना चा रथ होता .
 शहापुरा शहर  लागले. इथे दोन मार्ग होते एक शहरातून जात होता आणि एक गावाबाहेरून बायपास सारखा मार्ग होता . मी गावाबाहेरून जायचे असे ठरविले . जाता जाता एकाने सांगितले डावीकडे वळा .तलावाशेजारी दुर्गा माता मंदिरामध्ये भागवत कथा सुरू आहे .भागवत कथा सुरू असेल तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते म्हणून वळलो आणि भागवत कथेच्या ठिकाणी पोहोचलो .आज कथेचा समारोप झाला होता आणि समारोप झाल्यानंतर महाप्रसादाची लगबग सगळीकडे चालू होती . मंदिराचे पुजारी मला घेऊन आले आणि मागे नेऊन सर्वांच्या आधी त्यांनी मला भोजन प्रसाद घेण्यासाठी बसविले . इतक्यात भागवतकार स्वतः भोजनासाठी आले व ते देखील माझ्या शेजारी बसले .हा एक तिशीतील तरुण होता व त्याने असा संकल्प केला होता की मी नर्मदा मातेची भागवत परिक्रमा करेन . अर्थात नर्मदा मातेच्या काठावरील महत्त्वाच्या गावांमध्ये भागवत कथा करत करत तो पुढे जाणार होता .या अद्भुत संकल्पाला मनापासून शुभेच्छा देऊन मंदिरातून निघालो . हा संपूर्ण प्रवास अत्यंत दमविणारा होता कारण बहुतांश वेळ मी डांबरी रस्त्यावरून चालत होतो आणि पायाला बुटाचा त्रास होत असल्याकारणाने बराच काळ मी बूट हातामध्ये धरून अनवाणी चालत होतो .थंडीमुळे सकाळी दहा-साडेदहापर्यंत रस्ते अतिशय गार राहत होते .तो गारवा अनवाणी पायांना सुखद वाटायचा म्हणून मी अनवाणी चालत होतो . पोटभर जेवून मी पुढे निघालो आणि थोडेसे अंतर चाललो नसेल इतक्यात एक मुलगा पळत माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातामध्ये जेवणाचा एक डबा छान पार्सल बांधून आणलेला , दिला आणि म्हणाला बाबाजी भोजन पाइये।मी हो नाही काही म्हणायच्या आत तो घरी पळून सुद्धा गेला .या जेवणाचे काय करावे मला काही कळेना .पिशवी उघडून पाहिली तर अतिशय छान पद्धतीने पनीर बटर मसाला , रोटी , जीरा भात ,आमटी असे सर्व पदार्थ , सॅलड ,चटणी , कोशिंबीर , असे सर्व त्या डब्यामध्ये दिलेले होते . नर्मदा मातेची इच्छा असे म्हणून मी चालू लागलो .चालताना प्रत्येक पावलाला आपले आपोआप नामस्मरण घडते .
त्वदीय पादपंकजम् नमामि देवी नर्मदे ।असा जप करत पाऊले टाकायची . या एका ओळीमध्ये आठ पावले होतात . आणि चालण्याला एक छान गती सुद्धा येते . हातामध्ये तो भोजन प्रसाद घेऊन मी चालत होतो वाटेमध्ये एका धरम काटा वाल्याने मला हाक मारली .हा महामार्ग सुरू झाला होता आणि इथे ट्रकची वर्दळ असायची .धरम काटा म्हणजे ट्रकचा वजन काटा . साहू नावाच्या मालकाचा हा काटा होता आणि तिथे तिवारी नावाचा एक संघ स्वयंसेवक कामाला होता .त्याने मला उगाचच खुर्ची लावून दिली आणि बसायला सांगितले .खरे तर माझ्या पायांना चांगली गती आली होती आणि चालायची इच्छा होती परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही काहीही सांगितले तर ते निमुटपणे करायचे असते त्याप्रमाणे मी बसलो . त्या भागातील संघाच्या कामाविषयी तो मला सांगू लागला . सहज गंमत म्हणून मी पाठीवरील झोळी सकट माझे वजन धर्म काट्यावर केले तर ते १०० किलो भरले ! झोळी शिवाय वजन ९० किलो होते . या वजन काट्या मध्ये अधिक उणे पाच ते दहा किलोग्रामचा फरक पडतो परंतु मला माझे वजन ९० किलो च्या पुढेच आहे हे माहिती होते .पुढे माझी किती चरबी नर्मदा माता जाळणार आहे हेच ती जणू मला वजन करून सांगत होती ! इतक्यात तीन परिक्रमावासी मोठ्या वेगाने चालत जाताना दिसले .मी आवाज दिला असता तिघे थांबले . तिघेही आळंदीचे होते .पैकी दोघांचे पोटभर जेवण झाले होते आणि तिसरा भुकेने कासावीस झाला होता ! ते मला विचारू लागले इथे जवळपास भोजन कुठे मिळेल ? इथेच मिळेल ! असे म्हणून मी माझ्या हातातली पिशवी त्याच्या हातात दिली आणि तो परिक्रमावासी अक्षरशः आनंदाने नाचू लागला ! तिवारीने लगेच त्याला बसायला जागा करून दिली आणि तिथेच बसून तो गरमागरम भोजन प्रसाद घेऊ लागला ! नर्मदा मातेला सर्वांच्या पोटाची कशी चिंता असते याचा मला आलेला हा एक अद्भुत अनुभव ! कोण मला भोजन आणून देणारा मुलगा,कोण मला रस्त्यामध्ये अडविणारा दुकानदार आणि कोण हा उपाशी परिक्रमावासी ! इथून पुढे चालायला लागल्यावर बरगाव गावातील नावाप्रमाणे उत्कृष्ट काशी धर्मशाळा आहे .
इथे गावातील सेवेकरी सेवा करतात . आणि हे सर्व लोक थांबण्यासाठी खूपच आग्रह करू लागले . परंतु मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बरगाव मध्ये असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित वनवासी मुलांसाठीचा आश्रम बघण्याची ओढ लागली होती . त्यामुळे मी तिथे फक्त चहा घेतला आणि जनजाती कल्याण आश्रम पाहण्यासाठी बोजा उचलला . खरे तर माझे पाय चालून चालून खूप थकले होते . गेले दोन-तीन दिवस मी डांबरी सडके वरून अनवाणी चालल्यामुळे पायाची आग देखील होत होती . परंतु आश्रमात जायचे असा मनाचा हिय्या करून अजून थोडेसे अंतर जाण्याचा निर्धार केला आणि पुढील दहा किलोमीटर अंतर चालण्याचा माझा निर्णय खरोखरी सार्थ ठरला ! इतका सुंदर हा आश्रम होता ! सुमारे ३६ एकर विस्तीर्ण परिसर , गोंड आदिवासी समाजातील साठ मुलांचे वसतीगृह , साठ गाईंची गोशाळा ,ड्रायव्हिंग स्कूल , मंदिर , शेती , उद्योग काय नव्हते इथे ! मुख्य म्हणजे अंघोळीसाठी गरम पाणी आणि बांधलेला संडास प्रथमच परिक्रमेमध्ये पाहायला मिळाला !
 रात्री मुलांना भेटायला काही अधिकारी आले होते . त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन मी मुलांमध्ये खाली बसलो . तर मला सर्वांहून उंच अशा एका उच्चासनावर बसविले गेले .  परिक्रमावाशांचा इथे खूप मान राखला जातो . नंतर मुलांसोबत तासभर संवाद साधला .इथली मुले फारच गोड होती . वय वर्ष आठ ते १८ असा वयोगट होता . आचार्य मन्नू जी महंत नावाचा छत्तीसगड मधला एक पूर्णवेळ शिक्षक त्यांची सर्व जबाबदारी सांभाळत होता . बिलासपूर जवळचे पाली हे त्याचे गाव . आचार्य अतिशय तरुण होता .आणि मुलांसाठी त्याच्या मनामध्ये अत्यंत कळवळा होता हे त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत असे .

 गंमत म्हणजे या वस्तीगृहामध्ये प्रयागराज शारदा प्रसाद चंडेल नावाचा एक पुण्याचा मुलगा होता जो केवळ तिसरीमध्ये होता पुण्याजवळ कात्रज चा मी आहे असे तो म्हणाला .अधिक चौकशी केल्यावर कळाले की तो भूकम येथील होता . वय वर्ष आठ आणि घरापासून पंधराशे किलोमीटर दूर शिक्षणासाठी त्याला ठेवले होते किती मोठा निर्णय होता आई वडिलांच्या दृष्टीने विचार करून पहा !त्या मुलाला आदिवासींची स्थानिक भाषा अजून येत नव्हती परंतु बाकीची मुले त्याला छान सांभाळून घेत होती हे पाहून मला खूप बरे वाटले .खूप दिवसांनी मराठीमध्ये बोलायला मिळाल्यामुळे तो देखील खुश झाला .त्या रात्री मुले आपल्या खोलीमध्ये झोपायला जाईचनात !
 पूर्णवेळ माझ्याच खोलीमध्ये बसून राहिली! मला एक मोठी खोली दिली होती ज्याच्यामध्ये २५-३० खाटा होत्या. आणि झोपणारा मात्र मी एकटाच होतो .बघता बघता सर्व मुले माझ्या खोलीमध्ये येऊन त्या खाटा जोडून त्यावर बसून राहिली .माझ्याशी गप्पा मारू  लागली ! इथली आडनावे मोठी मजेशीर असतात .मार्को , मरावी , गोंडी , गोंड, मरकाम , परस्ते ,विखे ,उके  ,उरेती ,करपेती ,धुरवे ,ओमाम , उमाम ,पुसाम , कुसराम , पठ्ठा ,नेतान , तेकाम , कुलस्ते , पुलस्ते ,परस्ते , पेंद्रे , पेद्राम , शेंद्राम ,सेंद्राम , संयाम अशी आडनावे होती .सचिन परस्ते नावाचा एक माजी विद्यार्थी येथे राहून मुलांची सर्व व्यवस्था पाहत असे . 
रात्री माझ्या खोलीमध्ये येऊन बसलेली आदिवासी मुले
इथे स्वयंपाक मुलेच करतात आणि मुलेच जेवायला वाढतात . रात्री मुलांनी सुंदर असा स्वयंपाक करून मला जेवायला बोलावले . जेवणापूर्वी अतिशय सुंदर असे श्लोक ही मुले म्हणत होती .एका सुरात आणि खणखणीत आवाजामध्ये त्यांनी म्हटलेले श्लोक ऐकत बसावे असे वाटत होते . वाढणारी मुले सुद्धा अतिशय हुशार होती आणि अलटून- पालटून प्रत्येकाला स्वयंपाक आणि वाढण्याची पाळी यायची .मी स्वतः याच वयापासून वस्तीगृहामध्ये राहून शिकलेला असल्यामुळे त्या मुलांचा मला फारच लळा लागला ! 
वसतीगृहातील वनवासी मुलांसोबत भोजन घेताना
रात्री पुन्हा मुले माझ्या खोलीमध्ये गप्पा मारायला आली .गंमत म्हणजे आचार्य मन्नुजी महंत याने देखील त्यांना परवानगी दिली होती . अखेरीस माझ्या लक्षात आले की मुलांना झोप मिळणे आवश्यक आहे म्हणून मीच सर्वांना घेऊन त्यांच्या झोपण्याच्या खोल्यांमध्ये घेऊन गेलो .आणि तुम्ही कसे झोपता मला दाखवा वगैरे सांगत गाणी म्हणत त्या सर्वांना झोपवून मग खाली आलो ! रात्री प्रचंड थंडी पडली होती .मुले माझ्या खोलीमध्ये होती तेव्हा मायेची ऊब जाणवत होती . मुले गेल्यामुळे खोली चांगलीच थंड पडली .पहाटे लवकर जागा झालो आणि बाहेर बघतो तो काय !मुसळधार म्हणता येईल अशा पद्धतीचा पाऊस सुरू होता ! काही केल्या पाऊस थांबण्याची लक्षणे दिसेनात ! आचार्य मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की हा पाऊस आजचा दिवस काही उघडेल असे वाटत नाही तरी तुम्ही आज इथे कृपा करून मुक्काम करावा कारण पुढे खूप मोठे जंगल आहे . आणि पावसामध्ये ते पार करता येणे शक्य नाही . झाले ! मुलांना हेच तर हवे होते ! हा दिवस तर मुलांसोबत इतकी धमाल केली की विचारू नका ! सकाळी सर्व मुलांसोबत उपासना केली .मग व्यायाम केला .सूर्यनमस्कार घातले . पुन्हा एकदा सर्व मुलांसमोर तास दीड तास बोलायला आचार्यजी यांनी सांगितले .मग त्यांना राष्ट्र म्हणजे काय , आपली राष्ट्र कर्तव्ये काय आहेत , नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, संघटन म्हणजे काय , एकता म्हणजे काय, अनुशासन म्हणजे काय, राष्ट्रभक्ती म्हणजे काय , अशा विविध त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर येते देत चर्चात्मक उदबोधन पार पडले . पाऊस उघडण्याची वाट मी पाहत होतो .परंतु पाऊस काही थांबायचे नाव घेईना .वस्तीगृहामध्ये थांबलेला तो दिवस सत्कारणी लागला .आम्ही गाणी म्हटली ,व्यायाम केला ,चित्रे काढली , फिरलो , धारा काढल्या , झाडे लावली ,आश्रम पाहिला , जेवलो , नाचलो , बागडलो ,खेळलो .मुले काही केल्या मला सोडेचनात ! 

एका मुलाने माझ्याकडून शिवाजी महाराजांचे चित्र काढून नेले .ते त्याने सर्वांना दाखवल्याबरोबर माझ्यासमोर चित्र काढून घेण्यासाठी रांग लागली ! शिवाजी महाराज ,महादेव ,गणपती , सरस्वती , लक्ष्मी माता ,भारत माता , नर्मदा माता , नरसिंह , अफजल खान वध असे शेकडो प्रसंग मुलांनी माझ्याकडून मोठ्या कागदावर काढून घेतले !काही हुशार मुलांनी तर चटकन ते रंगवून देखील आणले ! इथली मुले उंचीने जरी कमी असली तरी अत्यंत चिवट काटक आणि हुशार असतात . थोडेसे बसके आणि पसरट नाक , स्वच्छ पांढरे दात आणि पाणीदार डोळे ही त्यांची ओळख .आपल्या महाराष्ट्रातील अमरावती ,अकोले , नागपूर , गोंदिया ,भंडारा ,चंद्रपूर या भागापासूनच अशा पद्धतीची चेहरेपट्टी चालू होते .हा भाग त्याच भागाशी जोडला गेलेला आहे . त्या रात्री जेवताना संघाचे अजून काही पूर्णवेळ प्रचारक आणि स्वयंसेवक भेटले .त्या भागामध्ये काम उभे करण्यासाठी त्यांना कसे व किती कष्ट पडले ते त्यांनी विस्तृत सांगितले . आपल्या दैनंदिन जीवनातील सुख सोई लाथाडून ,अशा एखाद्या दुर्गम वनक्षेत्रामध्ये जाऊन ,तिथल्या अनोळखी आणि परक्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करणारी ही माणसे खरोखरीच प्रातःस्मरणीय आहेत ! रात्री मुलांनी मला पुढच्या आश्रमामध्ये कशी भयंकर भूते आहेत आणि त्यामुळे मी इथेच राहणे कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले !भुताच्या गोष्टी सांगताना त्यांचे हातवारे डोळे आणि चेहरे पाहून माझी हसून हसून पुरेवाट झाली !मी हसतो आहे हे कळल्यावर त्यांनी अजूनच भुताच्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली ! आदिवासी लोकांच्या मनामध्ये भुताच्या काय काय कल्पना असतात ते त्यामुळे मला कळाले ! खरे तर आपण शहरी माणसे हीच या वनक्षेत्रासाठी शाप ठरणारी भूते आहोत हे मात्र अगदी खरे ! मुलांच्या मायेमध्ये अडकणे फारसे बरे नव्हते . त्यामुळे भल्या पहाटे तीन वाजता उठून मी स्नान वगैरे आटोपले आणि पहाटे चारलाच धूम ठोकली .
आश्रमाचा शिक्का आणि मनुदास महंत यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेला संपर्क क्रमांक 
(इच्छुकांनी त्यांना संपर्क करून आश्रमाला मदत करावी )

 आचार्यजींनी माझ्यासाठी एक निळ्या रंगाची छत्री तिथे दाराबाहेर ठेवली होती . त्यांच्या इच्छेचा मान म्हणून मी ती सोबत घेतली .परिक्रमेमध्ये टोपी छत्री वगैरे वापरायचे नसते .पुढे ती कोणाला तरी देऊन टाकू असा विचार करून मी ती झोळीच्या तळाशी टाकून दिली .हा संपूर्ण प्रकल्प सिलगी नावाच्या नदीच्या काठावर आहे . ती नदी ओलांडून रात्रीच्या अंधारात जंगलचा रस्ता झपाझप तुडवू लागलो .बारीक पाऊस अजूनही सुरू होता .परंतु झपाझप चालल्यामुळे शरीर गरम झालेले होते आणि हा शिडकावा सुखद होता . घनघोर अंधारामध्ये कीर्र जंगलातून अनवाणी चालताना सोबत फक्त एकाच गोष्टीची भक्कम साथ होती .नर्मदा मातेला भेटण्याची ओढ आणि तिचे स्मरण !
लेखांक अठरा समाप्त (क्रमशः )

 लेखांक १९ : अखेर किनारा सापडला

आज कहरच झाला ! डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले होते त्याप्रमाणे पाय रुळले आणि तब्बल ३६ ते ३८ किलोमीटर अंतर चालले ! पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात निघालो होतो .सुंदर गारवा , रात्रभर पडलेल्या पावसाने भिजलेली धरणी , घनदाट धुकं, त्यातून पांढुरका दिसणारा सूर्य , उडणारे रंगीबेरंगी पक्षी , वनचर ,नितांत सुंदर वातावरण !  हे जंगल अतिशय समृद्ध आहे . संपूर्ण जंगलामध्ये रस्त्यावरची वाहतूक सोडली तर अजिबात मानवी वावर आढळत नाही .त्यामुळे इथले वन्य जीवन देखील समृद्ध आहे . पनपता राष्ट्रीय अभयारण्य आणि संजय नॅशनल पार्क व व्याघ्र प्रकल्प या दोन्ही वनांना जोडले गेलेले हे वनक्षेत्र आहे . बरेचदा आपल्याला असे वाटते की इतके छान जंगल असून आपल्याला वन्य प्राणी का दिसत नाहीत .प्रत्यक्षामध्ये वन्य प्राणी आपल्याला दिसत नसले तरी वन्य प्राण्यांना आपण दिसत असतो !आपल्या येण्याची चाहूल आधीच लागल्यामुळे ते सुरक्षित जागी लपून आपण जाण्याची वाट पाहत असतात . विशेषतः वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहायचे असेल तर पायाचा आवाज करत किंवा काठीचा आवाज करत जाणे अतिशय श्रेयस्कर .त्यामुळे ते सावध होतात आणि लपून बसतात .बरेचदा माणसे आणि हिंस्र श्वापदे यांच्यामध्ये जी झटापट होते त्याचे कारण अचानक समोर येणे हेच आहे .श्वापदाला तुम्ही येणार आहात हे आधी माहिती असेल तर ते कधीच तुमच्या वाटेला जात नाही .ते लपून बसते आणि तुम्ही मार्ग मोकळा करण्याची वाट पाहत राहते .त्यांचा संयम आपल्यापेक्षा खूप मोठा आहे . तासंतास ते एका जागी बसू शकतात .जंगलाशी सात्मीकरण (कॅमाफ्लॉज ) करण्याची कला त्यांना साधलेली असते .परंतु तुमची नजर जर शोधक असेल तर मात्र तुम्हाला असे लपलेले प्राणी सुद्धा लगेच टिपता येतात .विशेषतः आजूबाजूला असलेली माकडे , वानरे आणि पक्षी हे नेहमी हिंस्र श्वापद जवळपास आल्यावर सूचना देत असतात . त्या सूचना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत . बहुतांश वेळा कुठलेही मोठे प्राणी माणसाच्या वाटेला जात नाहीत , कारण माणूस हा त्यांचा मुख्य आहार नाही आहे .अगदी स्पष्टच बोलायचे तर वाघाने एखादा मनुष्य मारला तर त्याचे पोट देखील भरणार नाही इतके कमी मांस आपल्या शरीरामध्ये आहे . केवळ छातीचा थोडासा भाग आणि दोन मांड्या इतकेच वाघ खाऊ शकतो . मानवी पोट हे रोगांचे आगार असल्यामुळे त्याला स्पर्श देखील हे प्राणी करत नाहीत . आणि बाकी कुठे स्नायू फारसे नसतातच . आपले सरासरी वजन म्हणजे नुसती चरबी आणि हाडे यांचेच वजन आहे . हे ऐकायला थोडेसे घाण वाटेल परंतु कटू सत्य आहे . असे असून देखील मनुष्यप्राणी या जनावरांना खूप घाबरतो आणि त्यांनी काही करू अथवा न करू त्यांची शिकार करून मोकळा होतो , हे अत्यंत चुकीचे आहे . वनवासी लोकांना अनेक वेळा वाघ दिसतो परंतु ते दोघेही एकमेकांच्या वाटेला जात नाहीत . असो .
वनवासी कल्याण केंद्र सोडल्यावर अमेरापर्यंत दोन घाट चढावे उतरावे लागतात . अमठेडा , पिपरिया , कटहरा रयत ,अमेरा ,इशानपुरा रयत ,खमरिया ,आनाखेडा रयत , दियावर रयत अशी गावे पार करत सुमारे २२ किलोमीटर चालून विक्रमपूर गाव गाठले . आनाखेडा गावाच्या पुढे वदाहर नावाची नदी लागते ती देखील पार केली . विक्रमपूर येथे गुप्ता मेडिकल वाले यांच्या धर्म शाळेमध्ये भोजन प्रसाद घेतला .  दोन छोट्या खोल्या बांधल्या होत्या आणि अस्वच्छता खूप होती . मी झाडू घेऊन दोन्ही खोल्या स्वच्छ झाडून ठेवल्या . रस्त्यावर गुप्ता यांचे मेडिकल होते तिथे जाऊन, मी आलो आहे हे सांगितल्यावर त्यांनी धर्म शाळेत डबा आणून दिला . मी जेवायला बसणार इतक्यात अजून एक परिक्रमावासी आला . दोघांनी मिळून एक डबा संपवला . पुरी भाजी आणि भात होता . या गावांमध्ये यवनांची मोठी संख्या होती . परिक्रमेत पहिल्यांदाच हे पाहायला मिळाले .यांच्यापैकी कोणी तुम्हाला विचारत नाही किंवा नर्मदे हर देखील म्हणत नाही .चेष्टापूर्वक तुमच्याकडे पाहिले जाते .परिक्रमा मार्गामध्ये प्रथमच त्यांचे धर्मस्थळ आणि चांद तारा असलेला झेंडा पाहिला . ( या सर्व नोंदी तटस्थपणे करत आहे याची कृपया नोंद घ्यावी .कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता जो प्रत्यक्ष अनुभव आला तो लिहीत आहे . कदाचित आज याची काही गरज नसेल , परंतु चार पाचशे वर्षांनी हा एक लिखित पुरावा मानला जाईल .)
 मध्ये घाटात एक गाडी अचानक माझ्या शेजारी येऊन थांबली . तात्यासाहेब गुंजाळ म्हणून संगमनेरचे सज्जन गृहस्थ होते . जे विविध धर्मशाळांना शिधा पोहोचवण्यासाठी दोन महिने फिरायचे . त्यांनी मलाही खूप मौल्यवान माहिती आणि दक्षिणा दिली . विक्रमपूर नंतरचे १४ किलोमीटर मात्र खूपच लांबले आणि सायंकाळी साडेसातला धर्म शाळेमध्ये पोहोचलो . अरुणजी जयस्वाल का अन्नक्षेत्र ( अंकुर स्मृती ) असे याचे नाव होते .  एक जण वाटेमध्ये लिफ्ट देऊ करत होता मी त्याला नम्रपणे नकार दिल्यावर मला म्हणाला यह जंगल का प्रदेश है । मै आपको अकेला नही छोड सकता । परंतु मी मात्र गाडीवर अजिबात बसत नसल्याचे त्याला निक्षून सांगितले . आश्चर्य म्हणजे यादव नावाचा हा मनुष्य चार किलोमीटर अंतर माझ्यासोबत चालत आला . आणि मला धर्म शाळेमध्ये सोडून पुन्हा उलटा चार किलोमीटर चालत गेला .वाटेमध्ये एका ठिकाणी त्याने मला चहा देखील पाजला . कोण कुठला परिक्रमावासी ? काही संबंध नाही . तरीदेखील त्यांनी आत्मीयतेने मला केलेली ही मदत माझ्या कायम स्मरणात राहिली . पूर्वी नक्की असे काही अप्रिय प्रसंग इथे घडलेले असणार ज्यामुळे संध्याकाळी अंधारच्या वेळी त्याला मला एकटे चालू द्यायचे नव्हते . परंतु त्याकरता स्वतः आठ किलोमीटर चालण्याची तयारी दाखविणे हे आताच्या काळामध्ये अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे . तो तर सामान देखील पाठीवर द्या म्हणून मागे लागला होता .परंतु त्याला देखील मी नम्रपणे नकार दिला .आल्या आल्या सामान धर्म शाळेमध्ये ठेवले .धर्मशाळा कुठली ! घरच होते ते !घराची एक खोली परिक्रमावासींसाठी कायमची राखीव ठेवली होती . बाहेर रस्त्याच्या समोर एक हापसा होता . हापशाला अक्षरशः गरम पाणी येत होते ! जाऊन मस्तपैकी आंघोळ केली ! कपडे धुऊन वाळत टाकले !जाणारे येणारे लोक थंडीने कुडकुडत होते आणि मला उघड्यावर आंघोळ करताना पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते . परंतु सलग अडतीस किलोमीटर चालल्यामुळे शरीर चांगलेच गरम झाले होते .स्नान झाल्यावर नर्मदा मातेची पूजा केली . पूजा करताना आळंदीच्या मुलांनी फोटो काढला . 
        जयस्वाल धर्म शाळेमध्ये पूजा करताना

              आळंदीचे वारकरी परिक्रमावासी
पोट पूजा देखील झाली . सोबत सहा बिश्नोई समाजाचे सालाबेडी परिसरातील परिक्रमा वासी होते आणि आळंदीची दोन वारकरी मुले होती .जोग पाठशाळेतील मुलांना नर्मदा परिक्रमा करावी असे सुचविले गेले असल्यामुळे आळंदीची अक्षरशः शेकड्याने मुले परिक्रमेमध्ये आजकाल भेटतात .हे दोन विद्यार्थी देखील त्यातलेच . हे मंडलामार्गे जंगलातून चालत आले होते आणि त्यांनी तो मार्ग किती सुंदर आहे ते मला सांगितले . परंतु हा मार्ग जर मी निवडला असता तर पुढे मला चातुर्मास करावा लागला असता हे परिक्रमा संपल्यावर लक्षात आले .त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते . या दोन्ही मुलांचे वजन लक्षणीय रित्या कमी झाले होते . त्यांनी त्यांचे जुने फोटो आणि नवीन फोटो मला दाखविले .बिश्नोई समाजातील जे सहा लोक सोबत होते त्यांचे कपडे अतिशय पांढरे स्वच्छ आणि इस्त्री केलेले कडक होते ! मला आश्चर्य वाटले . त्यांच्यामध्ये ब्रिजेश बिश्नोई नावाचा एक तरुण होता . त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली .या सहा लोकांनी एक पंडित सोबत आणला होता .जो यांच्यासाठी पूजा पाठ तर करायचाच. परंतु त्याने एक मोटरसायकल आणली होती . जिच्या मागे मोठे कॅरिअर बनवून घेतले होते . त्यामध्ये या सहाही जणांची आसने बाडबिस्तारा आणि दप्तरे तो टाकायचा आणि पुढच्या मुक्कामी निघून जायचा . हे फक्त कमंडलू आणि काठी घेऊन झपाझप चालून पुढचा मुक्काम गाठायचे ! परिक्रमेचा हा नवीन प्रकार पाहून मला मौज वाटली . ब्रिजेशला घोड्यांचा नाद होता . त्याच्या घरी पाच घोडे होते तर त्याच्या मामाच्या गावामध्ये ५० एक घोडे होते . आमची ही आवड जुळली त्यामुळे आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो . त्याच्याजवळ कॅम्पस कंपनीचे नवे कोरे सॅंडल होते ते त्याने मला दिले .मला म्हणाला हे तुझ्या पुढच्या प्रवासाच्या कामाला येतील सोबत ठेवून दे .मला सॅंडल नको होते परंतु परिक्रमेच्या नियमानुसार काही बोललो नाही शांतपणे स्वीकार केला . धर्मशाळा ज्यांची आहे त्या काकू माजी शिक्षिका होत्या व अक्षरशः आईच्या मायेने प्रत्येक परिक्रमावाशींना काय हवे काय नको ते पाहत होत्या .आल्या आल्या त्यांनी गरमागरम चहा आणि बिस्किटे मला आणून दिली होती . फारच बरे वाटले होते ते खाऊन . रात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली . मी बाहेर वाळत घातलेले कपडे चटकन आत मध्ये आणून वाळत घातले . आमचे नशीब बलवत्तर होते की आम्हाला बांधलेली खोली आज मिळाली होती .अन्यथा तो पाऊस किती भयानक होता हे दुसऱ्या दिवशी चालताना आमच्या लक्षात आले .अमरकंटक च्या पठारावरून अनेक नद्या उगम पावतात त्यातील बहुतांश नद्यांच्या पुलावरून रात्रभर पाणी वाहिले आणि सकाळी काही ठिकाणी तर फक्त पुलांचे सांगाडे शिल्लक राहिले . रस्तेच्या रस्ते वाहून गेले होते ! सकाळी बरोबर सात वाजता काकूंनी गरमागरम चहा बिस्किटे पुन्हा आणून दिली . आज मी असे ठरविले की आपल्याला किती वेगाने चालता येते याची परीक्षा करावी .कारण माझ्या मागून येणारे बिश्नोई लोक खूपच वेगात चालत होते . या संपूर्ण भागामध्ये सरकारने युकेलिप्टस अर्थात निलगिरीची झाडे ओळीने लावलेली आहेत . त्यामुळे कित्येक किलोमीटर तुम्हाला दुतर्फा अथवा एका बाजूने निलगिरीची झाडे लागतात . आळंदीची मुले देखील वेगात चालत होती परंतु मी झपाझप चालत त्यांच्या पुढे गेलो .परंतु बिश्नोई लोकांनी मात्र मला सहज गाठले आणि फार पुढे निघून गेले . चालता चालता ब्रिजेशने माझा एक व्हिडिओ बनवला ! पुढे योगायोगाने परिक्रमेमध्ये त्याच्या गावी जाणे झाले तेव्हा त्याने तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविला .

         शहापूरा ते जोगी टिकरिया दरम्यान चालताना

या लोकांसोबत चालता चालता एका दमात मी बारा किलोमीटर कधी चाललो हे मलाच कळले नाही ! जोगी टिकरिया जवळ आल्यावर नर्मदा मातेचे सुंदर असे दर्शन पहिल्यांदा झाले ! तिथून खाली जाऊन पुढे काठाने चालायचे असे मी ठरवत होतो परंतु ब्रिजेशने तिकडून जाऊ नका हा मार्ग योग्य आहे असे सांगितले .आणि सर्व लोक पुढे निघून गेले . त्यांच्यामध्ये मजेशीर भांडणे होती .सर्वजण नातेवाईक असले तरी दोघा तिघांचे आपापसात पटत नसे त्यामुळे एखादा पुढे निघाला की बाकीचे मागे पडत . ब्रिजेश सर्वात तरुण असल्यामुळे आणि त्याची चाल सर्वात वेगवान असल्यामुळे तो सर्वात मागे थांबायचा आणि मध्ये मनात आले की सहज त्या सर्वांना गाठायचा . त्याने मला चालण्याविषयी बऱ्याच महत्वपूर्ण गमतीजमती सांगितल्या .ज्या युक्त्या मी पुढे वेळोवेळी वापरल्या. जोगी टिकरिया नंतर मात्र पाय बोलू लागले . मग पुढचे १८ किलोमीटर अंतर मी माझ्या गतीने सावकाश पार केले . आज वाटेत भोजन प्रसाद कुठेच मिळाला नाही .सोबतची बिस्किटे खात खात देवरा माळ, मोडकी ,धुर्रा माळ, रुसा अशी गावे पार केली . आकाशामध्ये सूर्यनारायण एकदाही दिसला नाही . सात ते आठ डिग्री तापमान दुपारी बारा वाजता सुद्धा होते . हवेमध्ये आर्द्रता इतकी होती की अंगावरचे कपडे देखील भिजले होते . रुसा गावात एका ख्रिश्चन माणसाच्या घरापासून दुधी घाट अथवा शेष घाटामध्ये जायला शॉर्टकट मार्ग होता . तिथून निघालो असता वाटेत एक बुरखा घातलेली वयस्कर मुस्लिम स्त्री भेटली . तिने मला बराच लांबचा मार्ग सांगितला .परंतु मला साधारण अंदाज आला होता की बहुतेक हा मार्ग उलट्या दिशेला चालला आहे , त्यामुळे मी माझा विवेक वापरत योग्य वाटेल त्या मार्गाने चालत राहिलो . सर्वत्र ओसाड माळरान होते .कुठेही नदी किंवा पाणी असल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. परंतु एका वळणानंतर अचानक आश्रम दिसू लागला आणि त्या आश्रमातील रम्य वातावरण पाहून मंत्रमुग्ध होऊन गेलो! हा नर्मदा नदीचा राधा आणि दुधी या दोन नद्यांसोबत त्रिवेणी संगम होता . निरव शांतता आणि कानावर सतत पडणारा नर्मदा मैया चा खळखळाट ! नर्मदा मातेचे खूप दिवसांनी दर्शन झाल्यामुळे मन भरून आले !
                शेष घाट अथवा दूधी घाट
          घाटावरून होणारे नर्मदेचे रम्य दर्शन

इथे नर्मदादास महाराज नामक साधारण पन्नास वर्षीय एक साधू सर्व व्यवस्था पाहतात . साधू तेजस्वी आणि परखड होते .लाल रंगाचे कपडे घालून ते बसत .
                    नर्मदा दास महाराज
शेष घाटावरून वाहणारी स्वच्छ निर्मळ नर्मदा माता
आल्या आल्या त्यांनी मला रागवायला सुरुवात केली . तुम्ही शहरी परिक्रमा वासी आणि विशेषतः पुण्याचे परिक्रमा वासी कशी परिक्रमेची वाट लावून टाकता हे सांगून ते मला झोपू लागले . मी शांतपणे आणि नम्रपणे त्यांच्या पायाशी बसून सर्व ऐकून घेत होतो . नर्मदे कडे तोंड करून एक बाकडे तिथे टाकलेले आहे त्या बाकड्यावर स्वामी बसले होते आणि समोर एका भिंतीवर खाली मी बसलो होतो .अजून एक दोन परिक्रमावासी आले आणि ते देखील तिथे बसले होते .थोड्या वेळाने माझा भाव त्यांनी ओळखला आणि मग मात्र ते अतिशय प्रेमाने माझ्याशी वागू लागले . एक सायकल वरून परिक्रमा करणारा मनुष्य वाटेत माझ्यापुढे गेला होता तो देखील तिथे पोहोचला होता .अजून एक साधू तिथे पोहोचला .हा चांगला उंचापुरा होता आणि दिवसाला ६० किलोमीटर अंतर सहज चालायचा . मी महाराजांना माझ्या मनातील सर्व शंका विचारू लागलो .मी त्यांना विचारले नर्मदा परिक्रमा अशी कशी काय आहे की जिच्यामध्ये नर्मदा मातेचे दर्शन देखील आम्हाला होत नाही ? महाराज लगेच चिडले आणि मला म्हणाले काठाने केली जाते तीच खरी नर्मदा परिक्रमा आहे .रस्त्याने आणि गावातून माणसे बघत चालणे म्हणजे नर्मदा परिक्रमा थोडीच आहे ? कोणी मला जेवायला देते का ?कोणी मला खायला देते का ? कोणी मला दक्षिणा देते का ? असा भाव मनात ठेवून चालणारी लोक परिक्रमा करत नाहीत .भीक मागतात . नर्मदा माता मला सर्व देईल असा भाव ठेवून चालतो तोच खरा परिक्रमावासी . आता हाच पहा .हा साधू दिवसाला ५० - ६० किलोमीटर सहज चालत असेल.  साधूने देखील लगेच अनुमोदन दिले .तू गृहस्थी आहेस तू जास्तीत जास्त ४० किलोमीटर चालणार . मी गृहस्थी आहे हे महाराजांनी कसे ओळखले असा प्रश्न मला पडला. महाराजांनी माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून लगेच माझा तो देखील भाव ओळखला आणि म्हणाले अरे साधू झालो आहे तो उगाच नाही .समोरचा माणूस किती पाण्यात आहे , काय काय करतो हे सर्व आम्हाला लगेच कळते . आता हा साधूच पहा .याला आज खरे तर अजून वीस किलोमीटर पुढे जायचे होते पण पायाला जखम झाली म्हणून थांबला आहे . बरोबर ना रे ? साधू लगेच हो म्हणाला आणि त्याने पायाला झालेली जखम आम्हाला दाखवली . महाराज मला म्हणाले याच्यामध्ये विशेष सिद्धी वगैरे काही नाही .इथून जाणाऱ्या परिक्रमावासींचे आम्ही सूक्ष्म निरीक्षण करत असतो .त्यामुळे कुठला माणूस पुढे जाऊन आता काय करणार हे आम्हाला बऱ्यापैकी कळलेले आहे आता .आता हेच पहा . तुझ्याकडे तुला कोणीतरी दिलेली अनावश्यक वस्तू पडून आहे . परंतु ती दुसऱ्या कोणाला तू देणार नाहीस ! मला कळेना की माझ्याकडे अनावश्यक कुठली वस्तू पडून आहे ? इतक्यात मला आठवले की कालच एकाने आपल्याला नवे कोरे सॅंडल दिलेले आहेत ! मी लगेच पिशवीतून सॅंडल काढले आणि बाबांच्या पुढे ठेवले . महाराज त्या साधूला म्हणाले बाबाजी उठलो ये चप्पल और निकल पडो ! त्याने सॅंडल घालून पाहिले . साधारण अकराशे बाराशे रुपये किमतीचे चांगले ब्रांडेड कॅम्पसचे लाल काळे सँडल्स होते . साधू खुश झाला आणि नर्मदे हर म्हणून झपाझप निघून देखील गेला ! सहा फूट दोन इंच उंचीचा तो हडकुळा साधू झप झप झप झप काठाने कसा चालत गेला ते मी पाहतच राहिलो ! नर्मदा दास महाराजांनी मला पुन्हा एकदा सांगितले .हा साधू निघाला आहे तो परिक्रमेचा खरा मार्ग आहे . परंतु तुम्हा पुणे मुंबई वाल्या लोकांना हा मार्ग नको असतो . तुम्हाला सुख सुविधायुक्त डांबरी मार्ग बरा पडतो . मी म्हणालो महाराज परंतु मला खरी परिक्रमा करायची आहे . नर्मदा दास म्हणाले अरे बाबा कशाला नाही त्या भानगडी मध्ये पडतोस ! हा मार्ग गृहस्थी लोकांसाठी नाही .हा मार्ग केवळ साधूंसाठी आहे . इथे मध्ये पावला पावलाला मृत्यू आ वासून बसलेला असतो . ज्यांना काही आगापिछा नाही अशा लोकांनीच या मार्गाने चालावे . बाबा एक प्रकारे मला हिणवत आहेत की काय असे मला वाटले . इतक्यात चहा आला . मी अजून माझं आसन देखील लावले नव्हते .चहा पीत पीत नर्मदा मातेकडे पाहत राहिलो . काठाने चालणारा साधू आता दिसेनासा झाला होता .मनोमन मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की माते मला याच मार्गाने घेऊन चल .मला दुसरा कुठला मार्ग नको आहे . कितीही कठीण मार्ग असू दे मला त्याची परवा नाही परंतु मला तुझे दर्शन ,स्पर्शन सतत मिळाले पाहिजे आणि तुझा नाद सतत ऐकू आला पाहिजे . मी साधूला नवे कोरे सॅंडल देऊन टाकले ही कृती नर्मदा दास महाराजांना खूप आवडली . आणि मला म्हणाले तुम्हारी परिक्रमा अच्छी होने वाली है ऐसे मैया मुझे बता रही है ! महाराजांनी बराच वेळ मला खूप चांगला उपदेश केला . मधेच गडबड करणारा एखादा परिक्रमा वाशी आला तर त्याच्यावरती ते चवताळून रागवत .पुन्हा शांत होऊन माझ्याशी बोलू लागत . माझे परिक्रमा विषयक बरेचसे प्रश्न त्यांनी कायमचे दूर केले .तिथे पक्के बांधकाम देखील होते आणि काही कच्च्या कुटी होत्या . त्यांनी एका कुटीकडे हात करून तिकडे राहण्याबाबत मला सूचना केली . मला म्हणाले तुझ्या नादामध्ये आज मी खूप जास्ती गप्पा मारल्या आणि माझे साधनेची वेळ देखील निघून गेली . आता तू आसन लाव .आपण रात्री बोलू किंवा उद्या बोलु . आत मध्ये जाऊन मी आसन लावले .थोड्यावेळाने अजून बरेच परिक्रमावासी तिथे गोळा झाले .
          शेष घाटावरील मी निवास केलेली कुटी
थंडी खूप होती . परंतु कुटी उबदार होती . तशातच नदीवर जाऊन मी स्नान आटपून घेतले . नर्मदेचे पाणी अतिशय थंडगार होते . इथून पलीकडे जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधला होता . कशीबशी एखादी दुचाकी जाईल इतकाच तो मोठा होता . नर्मदेचे पाणी अतिशय निर्मळ स्वच्छ आणि सुंदर होते . नदीचे पात्र विस्तीर्ण होते परंतु पाण्याला खूप गती होती . मध्ये मध्ये खूप सारे गवत आणि पाण वनस्पती उगवल्या होत्या . पाणी काही ठिकाणी खूप खोल तर काही ठिकाणी खूप उथळ होते . काठावर बसून कमंडलूने स्नान करता येत होते . मी स्नान करून वर येत असताना काही गाडीने परिक्रमा करणारे लोक भोजन प्रसाद घेऊन पुढे निघाले होते . त्यातील एक जण मला म्हणाला आप हमारे साथ दाल भाटी खाइये । मी जागेवर पोहोचेपर्यंत त्यांनी दाल भाटी माझ्या जागेवर पोहोचवली देखील . भूक तर लागलेली होतीच त्यामुळे मी ताबडतोब ती दालबाटी खाऊन घेतली . एकाच घरातील काही महिला आणि पुरुष असे मिळून गाडीने परिक्रमा करत होते . मुक्कामी पोहोचल्यावर महिला स्वयंपाक करत आणि मग सगळे भोजन घेऊन पुढे जात . माझ्या खोलीमध्ये एक मराठी बोलणाऱ्या खेडूत काकू , दोन-तीन अजून मराठी परिक्रमावासी ,एक सायकल वाले परिक्रमा वासी असे पाच-सहा जण जमले होते . भोजन प्रसाद संध्याकाळी सहा वाजता होतो असे सांगण्यात आले .इथे अंधार खूप लवकर पडत होता . रात्री भोजन प्रसाद घेताना कार ने आलेले अजून एक जोडपे आणि त्यांची मुलगी महाराजांसोबत विशेष प्रसाद घेताना दिसले . इथे एक आदिवासी समाजातील काळा कुळकुळीत परंतु तेजस्वी डोळ्यांचा सेवेकरी अखंड सेवा करताना मी पाहिला .जेवण झाल्यावर आमच्या कुटी शेजारी मोठी शेकोटी करून तो बसला .मी देखील तास दोन तास त्याच्यासोबत बसून गप्पा मारल्या आणि त्या भागातील जनजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला . हा संपूर्ण वनप्रदेश होता आणि इथले जीवन फार कठीण होते .इथे नर्मदा नदी वाहते खरी परंतु पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही .शेती आणि अन्य उद्योगधंदे यांना पुरेल इतके पाणी येथे नाही . रात्री छान झोप लागली आणि पहाटे उठल्यावर स्नानासाठी नर्मदा मातेवर गेलो असताना तिथले रम्य वातावरण पाहून अक्षरशः मी स्वर्गामध्ये आहे की काय असे वाटू लागले ! असे वाटू लागले की आता इथेच मुक्काम करावा !परंतु असा मोह मनात होता क्षणी ताबडतोब मी माझा बाड बिस्तारा उचलला आणि पुढे प्रस्थान ठेवले .हा अनुपपूर नावाचा जिल्हा सुरू झाला होता .आता मात्र मला माझ्या मनासारखी परिक्रमा सुरू झाली आहे असे वाटू लागले कारण बऱ्यापैकी काठाकाठाने रस्ता होता . अखेर नर्मदा मातेचा किनारा मला सापडला होता ..

लेखांक एकोणीस समाप्त ( क्रमशः )

 लेखांक २० : नर्मदेने खास पाठविलेला साधू

तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वत्र तुफान चिखल झालेला होता . नर्मदे काठची काळीभोर चिकण माती अतिशय चिकट झाली होती .प्रत्येक पावलाला पाय रुतत होते , बूट पायातून सारखे निघत होते . मग मी सरळ बूट काढून हातात धरले आणि अनवाणी चालू लागलो . मागून एक बुढ्ढा बाबा डोक्यावरती भली मोठी पिशवी घेऊन येताना दिसला . हा बाबा कटनी चा होता .त्याचे वय पाहता मला असे वाटले की हा चिखलात घसरून पडेल वगैरे . तरी याला चालायला थोडीशी मदत करावी .असा विचार करून मी माझी चाल हळू केली परंतु हा बाबा माझ्यापेक्षा वेगवान चालणारा निघाला त्याने क्षणात मला ओलांडून पुढचा मार्ग धरला आणि इतक्या वेगाने चालू लागला की त्याला गाठता गाठता माझीच तारांबळ उडायला लागली . शेतकरी लोकांना चिखलातून पार जाण्याचा उत्तम अंदाज असतो .जीवनातील कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि महत्त्वांच्या शेतकऱ्याच्या ठायी उपजत असते . थंडी भरपूर होती आणि शेतामध्ये असलेली विविध पिके पायाला गुदगुल्या करत होती . पिकावर साठलेले दवबिंदू थंडगार पडले होते आणि चालता चालता माझी छाटी संपूर्णपणे भिजवून टाकत होते . तो थंडगार स्पर्श चालून गरम झालेल्या पायांना खूप आराम देत होता . गरम झालेले इंजिन वॉटर कूल केल्यावर जसे छान चालते तसे वॉटर कूलिंग मुळे माझे पाय चांगले चालत होते . चालता चालता चंदन घाटाच्या समोर असलेल्या कचरा टोला गावातील आश्रमामध्ये मी पोहोचलो . हा टेढी नावाच्या नदीचा संगम होता .

कोणीतरी मला सांगितले की तिथल्या पुजाऱ्याच्या घरातील लोक तुम्हाला भोजन प्रसाद बनवून देतील . आश्रमामध्ये एक छोटीशी झोपडी होती आणि निवासासाठी पक्की सिमेंट काँक्रीट मध्ये बांधलेली खोली होती . सिमेंटच्या खोलीमध्ये जाऊन मी माझे सामान ठेवले .
                सामान ठेवले ती खोली
पाहतो तो कालचा लंबू साधू समोर जेवत बसला होता . झोपडी मध्ये तीन महिला मिळून स्वयंपाक करत होत्या . मी नर्मदा मातेचे दर्शन घेऊन वर आलो .
     आश्रमातून होणारे नर्मदा मातेचे मनोहारी दर्शन
आणि झोपडी मध्ये जाऊन माताजींना म्हणालो माताजी मुझे भोजन प्रसादी मिल सकती है क्या ? तिघी बायका माझ्यावरती अचानक चिडल्या ! कुछ नही मिलेगा ! भागो यहा से ! और तुम्हारे साथ अंदर जो भोजन प्रसादी ले रहा है उस साधू को भी लेके जाव !  मला क्षणभर कळेना नक्की काय चालले आहे ? मी हात जोडून नम्रपणे म्हणालो , माताजी क्या हुआ ? मुझसे और साधुजी से कुछ गलती हो गयी क्या ? त्यातील एक महिला समजूतदार होती . ती म्हणाली , नही बाबाजी आपकी कोई गलती नही । लेकिन वह जो परिक्रमावासी अंदर बैठा है उसने कल रात को दस टिक्कड खाये और अभी भी दस टिक्कड खाये है। टिक्कड बना बना के हमारी हालत खराब हो चुकी है । 
आपण महाराष्ट्रामध्ये चपाती किंवा पोळी करतो .ती लाटावी लागते .इकडे मध्य प्रदेश मध्ये मात्र कणकेचा गोळा हातावर घेऊन भाकरी प्रमाणे थापून थेट चुलीवर भाजून जी पोळी केली जाते त्याला टिक्कड असे म्हणतात . याच्यामध्ये तव्यावरून उष्णता देखील दिली जाते . परंतु मुख्य भाजणे हे चुलीतील मंद आचेवर असते .
                  टिक्कड असे बनवितात
 टिक्कड भाजण्यासाठी चुलीतील काही निखारे बाहेर काढून ठेवलेले असतात . त्यामुळे आतून हे अतिशय मऊ थोडेफार केक किंवा ब्रेड सारखे फुलून येतात . ब्रेड किंवा केक बनविताना जी बेकिंगची प्रक्रिया आहे तशीच काहीशी प्रक्रिया येथे कणकीच्या बाबतीत होत असते . परंतु यासाठी आटा गूँदना अर्थात कणिक मळणे ही एक विशेष कला आहे . ती जमली नाही आणि टिक्कड नीट भाजायला जमले नाहीत तर मात्र चक्क कणकेचे गोळे खावे लागतात ! जे पचायला अतिशय जड असतात .आता मात्र माझ्या लक्षात आले की ह्या माता माझ्यावरती का चिडल्या होत्या !आतल्या साधूची मला मोठीच मौज वाटली ! इतक्यात त्याने आतून मला आवाज दिला आणि म्हणाला दो टिक्कड और लेके आओ ! आता मात्र त्या बायकांचा संयम संपला ! त्यांच्यातील एक जण धावतच आत मध्ये गेली ! तिने आत जाऊन काय सुखसंवाद साधला हे मला माहिती नाही . परंतु एका मिनिटाच्या आतच सर्व सामान घेऊन , आणि मी कालच दिलेल्या लाल सॅंडल पायामध्ये अडकवून साधू चटकन बाहेर आला आणि झपाझप चालत पुन्हा एकदा काठाकाठाने नाहीसा झाला !तिथे बसलेल्या दोघी स्त्रियांना मी विनंती केली आप अगर मुझे खिचडी बनाने का सामान देते हो तो मै खुद खिचडी बनाके खा लूंगा । कारण मला खरोखरच खूप जोराची भूक लागली होती . कालचे भोजन संध्याकाळी सहा वाजताच घेतले होते . खिचडी बनविणे तुलनेने सोपे होते आणि मला जमत होते . एक बाई घरामध्ये गेली आणि खिचडी चे सामान घेऊन आली . इतक्यात डोक्यावर सामान घेऊन चालणारा म्हातारा तिथे आला आणि म्हणाला भोजन प्रसादी मिलेगी ना ? मी त्याला म्हणालो खिचडी बना रहा हू बाबा ।आपके लिये भी बनाता हूँ । म्हातारा म्हणाला छे छे खिचडी वगैरे आम्ही काही खात नाही । मला खायला टिक्कडच पाहिजेत ! आता आली का पंचाईत !मला तर टिक्कड कसे बनवायचे काहीच माहिती नव्हते ! तसे त्या बायकांना टिक्कड बनविताना मी पाहिले होते . परंतु ती प्रक्रिया सोपी नव्हती . आता पुन्हा त्या बायकांना मी आटा मागायला गेलो तर त्या माझ्यावर चिडणार हे निश्चित होते .म्हणून मी एक हुशारी केली . त्या बाबाच्या हातामध्ये कटोरी दिली आणि सांगितले, त्या घरातून जाऊन आटा घेऊन या . तोपर्यंत मी भाजीची तयारी करतो ! माझा प्रयोग यशस्वी झाला .त्या म्हाताऱ्या बाबा वरती घरातील बाई जोरात ओरडली ! ( मी वाचलो ) बरेच काय काय बोलली आणि शेवटी नाईलाजाने तिने त्याला आटा दिला . बाबा रागातच माझ्याकडे आला आणि म्हणाला काय बायका आहेत ! मी त्याला म्हणालो तुम्ही टिक्कड बनवा .मी भाजी बनवतो . परंतु बाबा म्हणाला मला स्वयंपाक येत नाही . तुला सर्व बनवावे लागेल . आता मात्र खरंच माझा संयम संपत चालला होता . समोरच्या चुलीतून येणारा धूर , त्यामुळे डोळ्यातून येणारे पाणी ,कणिक मळताना माझी झालेली वाईट अवस्था आणि करपलेल्या बटाट्याची भाजी ! सगळेच वाईट योग एकाच क्षणी जुळून यावेत असे काही असे मला झाले ! झोपडीतून बाहेर आलो . नर्मदा मातेकडे पाहिले आणि म्हणालो माई मला शक्ती दे . परिक्रमे मध्ये स्वयंपाक करण्याची पहिलीच वेळ आलेली आहे !
       कचराटोला येथून वाहणारी नर्मदा माई
चित्रातील साधूच्या मागे निळ्या कापडात झाकलेली दिसते आहे ती स्वयंपाकाची झोपडी होय आणि त्यामागे निळे दार आहे ती मुक्कामाची खोली

 पुन्हा आत मध्ये गेलो . माझ्या आईचे स्मरण केले . ती स्वयंपाक करत असताना मी तिच्या बाजूला तासंतास उभा राहून ती काय काय करते आहे याचे निरीक्षण करत बसायचो . ते सर्व ज्ञान आज कामाला आले . पटापट कणिक मिळून मी त्याचे आठ समान उंडे करून घेतले . एकीकडे भाजी होत आली होती . तिला चुलीच्या धगीजवळ ठेवले आणि तवा तापवायला घेतला . एका फरशी वरती पटापट पोळ्या लाटून तव्यावर टाकायला सुरुवात केली . बघता बघता अर्ध्या तासात आठ पोळ्या आणि भाजी असा स्वयंपाक तयार झाला . तिन्ही बायका अधून मधून चक्कर मारून मी काय करतो आहे ते बघून जात होत्या . एरव्ही अतिशय प्रेमळ असणाऱ्या आदिवासी माताराम ठरविले तर किती क्रूर वागू शकतात याचा अनुभवच मला त्यादिवशी मैय्याने दिला ! त्यांचे म्हणणे देखील बरोबर होते . हा सर्व अतिशय दरिद्री परिसर आहे . इथे स्वतःच्या घासातील घास काढून हे लोक परिक्रमा वासींची सेवा करत आहेत . आपण अतिरिक्त जेवल्यामुळे यांच्या घरातील मुलेबाळे उपाशी राहू नयेत एवढा तरी विवेक किमान प्रत्येकाने बाळगणे अत्यंत आवश्यक आहे . मनुष्य विनाकारण चिडत नसतो .त्यांच्या चिडण्यामागे मोठी अनुभव परंपरा आणि कारण परंपरा असणार याची मला चांगली जाणीव होती . मी झालेले सर्व पदार्थ घेऊन शेजारच्या खोलीमध्ये गेलो . भुकेल्या म्हाताऱ्याने सहा पोळ्या खाल्ल्या . मला खात्री आहे की सुरुवातीला माझ्या ताटामध्ये मी दोन पोळ्या घेतल्या नसत्या तर त्या देखील त्यानेच खाल्ल्या असत्या .आणि आधी गेलेल्या साधू प्रमाणे हा बाबा देखील दहा टिक्कड आरामात खाऊ शकत होता हे देखील मला जाणवले . आपल्या भारतातील खाद्य संस्कृती मजेशीर आहे .दक्षिण भारतातील लोक पानभर भात जसा आरामात गिळंकृत करू शकतात अगदी त्याच पद्धतीने मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश , पंजाब , हरियाणा या भागातील लोक कितीही चपात्या खाऊ शकतात . मी आपले सुसंस्कृत गृहिणी प्रमाणे दोन पोळ्या आणि उरलेली भाजी खाऊन जेवण आटोपते घेतले . बाबा खुश झाला आणि तिथेच लोळू लागला . मी बाहेर जाऊन सर्व भांडीकुंडी स्वच्छ घासून ठेवली . स्वयंपाकाची खोली स्वच्छ आवरून ठेवली . आणि नर्मदेच्या काठावर बांधलेल्या गच्चीवरून तिचे नयन मनोहर रूप पाहू लागलो . 
चित्रातील साधूच्या मागे दिसणारी हीच ती स्वयंपाकाची झोपडी आणि त्यामागे निवासाची खोली . ( प्रातिनिधीक चित्र )
पोटात अन्न गेल्यावर दमलेला म्हातारा रंगांमध्ये आला .आणि मला म्हणाला आता इथून पुढे तू माझ्यासोबत चालायचे . तू स्वयंपाक करून मला जेऊ घालायचे आणि आपण दोघे मिळून परिक्रमा पूर्ण करू .नर्मदा मातेने माझी चांगली सोय केली ! त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला ! माझा जन्म काही अशा भोगी माणसाची सेवा करण्याकरता झालेला नव्हता !त्या माणसाच्या बोलण्यामध्ये अखंडितपणे त्याचा संसार , त्याची मुले , त्याच्या सुना , त्याची नातवंडे , त्याची शेती ,त्याची संपत्ती हेच विषय होते . परमेश्वर प्राप्ती ,साधना ,नर्मदा माता याविषयी एक शब्दही तो बोलत नव्हता . मी हळूच माझे सामान उचलले आणि जोरात तिथून पळ काढला .म्हातारा देखील गडबड करून सामान गोळा करून माझ्या मागे येऊ लागला .परंतु त्याचा पसरलेला संसार इतका मोठा होता की तो आवरता आवरता मी पुढे सटकून गेलो . खऱ्या आयुष्यात देखील असेच होते .ज्याने अनावश्यक पसारा वाढवून ठेवला आहे त्या माणसाला सर्व सोडून पुढे जाता येणे फार अवघड होऊन जाते !म्हणून मर्यादितच पसारा उभा करावा ! प्राणी पक्षी कितीही बलवान असले तरी देखील एका मर्यादेच्या पलीकडे घरटी बांधत नाहीत ! त्यांचा पसारा कायम मर्यादितच राहतो ! हा एक गुण जरी माणसाने घेतला तरी पृथ्वीवरील सर्व जनता सुखी होईल ! असो . नदीच्या काठा काठाने लालपुर ,बसंतपुर , धुरवाटोला , कांचनपूर मार्गे शिवालय घाट आज मला गाठायचा होता . 
या परिसरामध्ये नर्मदा मैया अतिशय सुंदर व नितळ आहे . तिचे पाणी इतके स्वच्छ आहे की पाण्याचा तळ कुठूनही दिसतो . या भागातील नर्मदेचे रुपडे हृदयात साठवून ठेवावे इतके नितांत सुंदर आहे . वाचकांच्या माहिती करता नर्मदेची काही सुंदर रूपे गुगल वर या भागात जी मला सापडली त्याची चित्र खाली देत आहे .दर्शन घेऊन धन्य व्हावे !
नर्मदेचे पाणी इथे इतके नितळ आहे की अक्षरशः तळाचा दगड स्पष्टपणे दिसतो
लालपूर गावामध्ये कसला तरी उत्सव चालू होता .मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते त्यामुळे गावातील सर्व तरुण रस्त्यावर जमलेले होते . मोठ्या आवाजात स्थानिक आदिवासी गाणी लावण्यात आली होती .ही गाणी ऐकायलाच मोठी मजेशीर असतात . मुले नाच गाण्यांमध्ये दंग होती .जुन्या पिढीतील आदिवासी लोक परिक्रमावासींच्या बाबतीत थोडीशी नम्रता दाखवितात . परंतु नवीन पिढीतील मुले मात्र फार क्वचित परिक्रमावाशींशी आदराने वागताना दिसतात . शक्यतो चेष्टा करण्याचा भाव अधिक जाणवतो त्यांच्यात . पायामध्ये घातलेली तंगतुमान अथवा घट्ट जीन्स ,रंगीबेरंगी पादत्राणे , त्यावरती सैलसर आगळपघळ शर्ट , डोक्यावर केसांचा मोठा पुंजका  ठेवलेला व बाजूचे केस कापलेले , डोळ्यावर गॉगल्स , चित्रविचित्र पद्धतीने केस रंगविलेले ,आणि तोंडामध्ये गुटखा मावा खर्रा याचा तोबरा , शिडशिडीत अंगकाठी असा साधारण इथल्या आदिवासी मुलांचा अवतार असतो . 
दिंडोरी परिसरातील आदिवासी मुले साधारण अशी दिसतात .
मला असे जाणवले की चळवळीच्या नावाखाली या साध्या भोळ्या आणि अशिक्षित अथवा अल्पशिक्षित आदिवासी मुलांना भडकवून त्यांना देवाच्या , देशाच्या आणि धर्माच्या विरोधात करण्याचे षडयंत्र काही लोक या भागात राहून अविरतपणे करत आहेत . त्याचा परिणाम आज जरी फारसा जाणवत नसला तरी काही दशकांनी नर्मदा परिक्रमेमध्ये अडथळे आणण्याचे काम या समाज घटकांच्या माध्यमातून काही देश-विघातक शक्ती करू शकतात असे मला फार जाणवले. कारण स्थानिक लोकांच्या सहकार्याच्या शिवाय परिक्रमा करता येणे केवळ अशक्य आहे .सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी या आव्हानाचा विचार जरूर करावा अशी त्यांना विनम्र प्रार्थना आहे . असो.
  गाव संपले आणि थोडासा जंगलवाजा परिसर सुरू झाला . छोट्या मोठ्या टेकड्या आणि असंख्य ओढेनाले असलेला तो परिसर होता . कच्चा रस्ता होता आणि खडे देखील भरपूर होते त्यामुळे मी हळूहळू चालत होतो . इतक्यात एक साधू झप झप चालत माझ्या मागून आला आणि पाहता पाहता पुढे निघून गेला . त्याची चालण्याची ती गती पाहून मी अवाक झालो . मी तसे चालण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु त्याची गती गाठता येणे केवळ अशक्य होते . साधू ज्या गतीने चालत होता ती गती एखाद्या अॅथलीटला देखील लाजवेल अशी होती . मध्ये छोटेसे जंगल लागले . त्यात बरेच प्राणी होते असे मला जाणवले . हळूहळू उन्हाचा पारा चढत होता .थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्यदेव कृपा करतो आहे असे वाटायचे . मी सुमारे अर्धा तास चाललो असेन . हा साधू पुढे एका झाडाखाली बसलेला मला आढळला .मी मनात विचार केला , आपले बरे आहे !हळूहळू जरी चाललो तरी फारसे थांबत नसल्यामुळे आपण वेगाने चालणाऱ्या माणसांना सुद्धा गाठतो आहे !परंतु साधूचा चेहरा पाहिल्यावर मला लक्षात आले की तो वैतागलेला आहे .मला म्हणाला क्या जरुरत थी परिक्रमा मे आने की ? तो असे का म्हणतो आहे मला लक्षात आले नाही .मी त्याला म्हणालो क्या हुआ स्वामीजी ?आप इतने परेशान क्यो लग रहे है? साधू म्हणाला अगर ढंग से चल नही पाते तो परिक्रमा क्यू करते हो ?मी म्हणालो महाराज हम शहर के लोग है । इतना चलने की हमे आदत नही । ऊपर से जबसे परिक्रमा आरंभ की है जादा तर डांबर की सडक पे ही चल रहा हु । ऊस कारण मेरे पाव बहुत दर्द कर रहे है ।इसलिये धीरे धीरे चल रहा हु । साधू मला म्हणाला ,अब मुझे तुम्हारे साथ दो दिन चलना ही पडेगा । मला या वाक्याचा अर्थच कळला नाही .मी त्याला म्हणालो ,मतलब ? साधू उत्तरला ,मतलब यही है की अब मुझे तुम्हारे साथ दो दिन चलना पडेगा ।क्यूकी नर्मदा मैया का मुझे वैसा आदेश है । मला काय बोलावे कळेना .आपको नर्मदा मैया कब मिली ? मी भोळाभाबडा प्रश्न विचारला . वह सब छोडो । इतना धीरे चलने की तुम्ही क्या जरुरत थी ? मला अजूनही कळत नव्हते की नक्की काय प्रकार सुरू आहे .मी त्याला म्हणालो बाबाजी देखिये मेरी गती बहुत कम है और आपकी गती बहुत ज्यादा है । मै आपके साथ नही चल सकता । साधू लगेच उत्तरला ,वही तो मेरा कहना है ।लेकिन अब कुछ नही कर सकते क्यूकी मैया का आदेश आया है । मी लगेच त्याला म्हणालो लेकिन मैया ने मुझे ऐसा कोई सुझाव नही दिया है । साधू म्हणाला वह तुम्हारी चिंता है ।मुझे तो स्पष्ट रूप से आदेश मिला है । इसलिये दो दिन तुम्हारे साथ चलना ही पडेगा । अब जादा समय व्यर्थ मत गवाओ । हमे बहुत आगे जाना है । साधूचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजामध्ये धस्स झाले .कारण त्याची चाल खरोखरीच चित्त्या सारखी होती . आता आपली कुतरओढ होणार हे माझ्या लक्षात आले . साधू त्याची झोळी काठी कमंडलू घेऊन झपाझप चालायला देखील लागला . यांने अर्धीच लुंगी नेसली होती व वरती उघडा होता . छातीपर्यंत रुळणारी मोठी दाढी काळेभोर केस होते .वय साधारण पन्नास असावे .परंतु खरे सांगायचे तर साधूंचे वय ओळखता येत नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे . आपल्याला ४०-४५ वर्षाचा वाटणारा साधू कधीकधी ७० -८० वर्षाचा असतो . नित्य योग साधना , प्राणायाम , अखंड ब्रह्मचर्य आणि ध्यानधारणा याच्यामुळे त्यांचे वय नेहमी लपून राहते . हा साधू झपाझपा चालत पुढच्या गावातील एका चौकात जाऊन बसला . मी मागून अक्षरशः पळत पळत त्याला गाठले . इथे त्याला कोणीतरी चहा आणून दिला . तो चहा पिल्यावर मात्र साधू एकदम शांत झाला . आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला . ,देखो बेटा तुम कौन हो मुझे पता नही ।तुमने परिक्रमा क्यू उठाई है मुझे मालूम नही । तुम कहा से आये हो कहा जाओगे मुझे खबर नही । लेकिन मैयाने तुम्हारे साथ रुकने के लिए मुझे बोला है इसका मतलब तुम कोई अच्छे बच्चे जरूर हो । अब मेरी बात ध्यान से सुनो । तुम जिस परिक्रमा मार्ग से चल रहे हो वह मार्ग गलत था । गलत नही बोल सकते लेकिन सही नही था । परिक्रमा का असली मार्ग जो होता है वो नर्मदा माई के किनारे किनारे से गुजरता है ।मेरी दो परिक्रमा हो चुकी है ।यह तिसरी परिक्रमा है। मै वैसे मैया का किनारा कभी छोडता नही । लेकिन आज पता नही क्यू मैया ने मुझे किनारे से भटकाया और अंदर जंगल मे तुम मिले । मै गुस्सा उसके लिए ही हुआ था कि क्यू मैने किनारा छोडा । लेकिन मैया की शायद ऐसी इच्छा थी की तुम्ही सही मार्ग पर लाऊ । आज से दो दिन तुम मेरे साथ चलोगे । मै तुम्हे असली नर्मदा परिक्रमा कैसे करते है दिखाऊंगा और सिखाऊँगा और फिर आगे चला जाऊंगा । चलो आगे बहोत चलना है । असे म्हणून साधू आणि मी दोघे उठलो .मी रस्त्याच्या दिशेने जाऊ लागतात तो खेकसला.अरे अरे वहा नही , यहा से चलो । किनारे किनारे जायेंगे मैया के । असे म्हणत त्याने अक्षरशः पळत पळत जाऊन एक छोटासा ओढा एका उडीमध्ये ओलांडला . ओढ्याचा उतार मोठा होता . त्यावरून चालत जाता येणे देखील अशक्य . परंतु पळत गेल्यावर मात्र अशी गती यायची की ओढा एकाच उडीमध्ये पार व्हायचा ! मला मनापासून आनंद झाला ! जणू काही माझी इच्छा नर्मदा मातेने ऐकली होती आणि या साधूला माझ्या मदती करता पाठविले होते ! साधूने मला परिक्रमेचे मार्ग आणि गावातील ग्रामस्थांचे मार्ग वेगळे कसे ओळखायचे त्याचे बारकावे शिकविले . ज्या मार्गावर राजश्री/बिमल गुटख्याच्या पुड्या अधिक पडलेल्या असतात तो गावकऱ्यांचा मार्ग असतो आणि ज्या मार्गावर पार्ले जी चे रिकामे पुडे पडलेले दिसतात तो मार्ग परिक्रमेचा असतो ! त्याने सांगितलेले हे बारकावे ऐकून मला मौज वाटली. परंतु पुढे खरोखरच मला त्याने दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचा खूप फायदा झाला . हा साधू बालब्रम्हचारी होता . मोहन पाटीदार असे त्याचे नाव होते . एका छोट्याशा झोपडीमध्ये हा राहायचा . नातेवाईक आगापिछा कोणीही नसल्यामुळे मनात येईल तेव्हा उठायचा आणि नर्मदा परिक्रमा चालू करायचा . एका दिवसामध्ये ५० ते ६० किलोमीटर तो सहज चालायचा .अध्यात्म सोडून कुठल्याही लौकिक विषयावर तो एक शब्दही बोलत नसे . अगदी शेवटपर्यंत त्याने मला माझे नाव आणि गाव देखील विचारले नाही .नर्मदा मातेने मदत करायला सांगितली आहे म्हणजे हा नर्मदेचा प्रिय भक्त आहे इतकाच त्याचा शुद्ध भाव होता . हा साधू म्हणजे माझ्यासाठी नर्मदा मातेचा साक्षात आशीर्वादच ठरला !

लेखांक वीस समाप्त (क्रमश:)

 लेखांक २१ : एकादशी आयुष्याची

साधू ने बघता बघता नदीच्या काठचा रस्ता पकडला . काठावरून म्हणजे किती काठावरून चालावे त्याने ?उजव्या हातातील काठी सतत नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडत होती इतक्या काठाने आम्ही चालत होतो . डावीकडे प्रचंड माजलेले गवत आणि झाडी होती .उजव्या हाताला खळखळून वाहणारी नर्मदा माई होती . कुठून कोणास ठाऊक परंतु एक पाऊल ठेवण्या इतका मार्ग सगळीकडे निर्माण झालेला होता . साधूने मला काठाने कसे चालायचे ते शिकवले . मला खात्री आहे की जर मी एकटा त्या मार्गावर गेलो असतो तर रस्ता नाही असे समजून परत उलटा फिरलो असतो .परंतु त्याने मला समोर रस्ता आहे का नाही हे कसे ओळखायचे ते शिकवून ठेवले . काठावरती उभे राहिल्यावर दोन चार किलोमीटर पुढील नदीची वळणे दिसतात तिथला मार्ग देखील इथूनच ताडून ठेवता येतो ती कला देखील त्याने शिकविली . वाटेत येणाऱ्या नद्या आणि नाले कसे ओलांडायचे ते देखील त्यांनी शिकविले . समोर दूरवर एखादा संगम असेल तर तो देखील अलीकडूनच कळतो, तो कसा ओळखायचा ते देखील त्याने शिकविले .नर्मदे पासून चालत चालत लांब गेल्यावर नर्मदा माता नक्की कुठल्या दिशेला आहे हे ओळखण्याची एक खतरनाक युक्ती त्याने मला शिकविली . कुठल्याही पाण्यामध्ये पाऊल ठेवताना पायातील पादत्राणे हातात घ्यावी असा संकेत आहे . कुठलीही नदी नाला किंवा जलस्त्रोत ही जलदेवता मानली असल्यामुळे तिथे पादत्राणे लावणे मान्य नाही . चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये पाय रुतू नये म्हणून कसे वेगाने पळत जायचे हे देखील त्याने मला शिकवले . नदीच्या काठाला उगवलेले पाण गवत आडवे पाडून त्यावर पाऊल ठेवून चिखलापासून कसा बचाव करता येतो हे देखील मी शिकलो . वाटेत येणारे खेकडे, साप, विंचू कसे बाजूला करायचे हे देखील त्याने मला शिकवले . विविध प्राण्यांचे ठसे आम्हाला दिसू लागले . तेव्हा त्यातील कुत्र्याचे ठसे कुठले ,लांडग्याचे कुठले आणि कोल्ह्याचे कुठले हे ओळखायला त्याने मला शिकवले . मजल दरमजल करत आम्ही शिवालय घाटावर पोहोचलो . इथे नर्मदेचे पात्र अत्यंत विस्तृत झालेले असून या पात्रामध्ये हजारो शिवलिंगे स्थापित केलेली आहेत . पाणी स्वच्छ निर्मळ असल्यामुळे किंवा पातळी उतरली की ही शिवलिंग दिसू लागतात . इथे एक छोटीशी धर्मशाळा आणि त्याला लागून छोटीशी स्वयंपाकाची खोली होती .
पत्रे लावलेले स्वयंपाक घर आणि पलीकडे पक्की धर्मशाळा (शिवालय घाट )

दुसऱ्या बाजूने धर्मशाळेचे दर्शन .समोर हापसा .
शिवालय घाटावरील नर्मदा व शिवमंदिर
नर्मदा मैया आणि शिवजी
शिवालय घाटावरून होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन
साधूने मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या .ज्यापुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये पदोपदी माझ्या कामाला आल्या .अगदी आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर आपण बोलावे कसे , वागावे कसे , बसावे कसे ,झोपावे कसे , पूजा कशी करावी इथपासून सर्व गोष्टी त्याने मला शिकविल्या . गेल्या गेल्या जेवण आहे का असे विचारू नये . तर इथे शिधा मिळू शकतो का असे विचारावे . प्रत्येक ठिकाणी बनविलेले जेवण मिळेलच याची खात्री नसते . किंवा स्वयंपाक बनवणारी व्यक्ती त्यादिवशी तिथे उपस्थित असेल याची खात्री नसते .अशावेळी समोरच्या व्यक्तीला आपण अन्नदान करू शकत नाही याचे दुःख होऊ नये ही आपली जबाबदारी आहे . त्याप्रमाणे आम्ही तेथील साधू कडून सदाव्रत अर्थात शिधा मागून आणला . तिथून पुढे मी आपण होऊन कधी भोजनाची विचारणा केलीच नाही .समोरच्या साधूने अथवा मठपतीने देऊ केले तरच शिधा / भोजन घेतले .
शिवालय घाट आश्रमाचा शिक्का

सोबत नाशिकचा एक म्हातारा आमच्या सह मुक्कामाला होता . हा अतिशय तापट आणि भांडकुदळ होता असे जाणवले . या दोघांनी हापश्यावरील गरम पाण्यावर आंघोळ केली .मी मात्र बर्फासारख्या थंडगार नर्मदा मातेच्या पाण्याने अंघोळ केली .नर्मदेचे पाणी अतिशय स्वच्छ ,नितळ , सुंदर आणि चविष्ट होते . आता चवीचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो .नर्मदा मातेच्या काठावर बसून कधीकधी चिंतन घडायचे त्यात मला जाणवलेले काही मुद्दे .नर्मदेच्या पाण्याची गंमत अशी आहे की उगमापासून ते संगमापर्यंत कुठेही पिऊन पहा त्याची चव एक सारखीच लागते . बरेचदा समोर आलेली नदी नर्मदा आहे की अन्य कुठली नदी आहे असा संभ्रम निर्माण झाला तर पाणी पिऊन पाहणे किंवा पाण्याचा रंग पाहणे या दोन सोप्या परीक्षा आहेत .  इतकी त्या पाण्याची चव वेगळी आहे . थोडेसे भस्म मिश्रित तीर्थ पिल्यासारखे आपल्याला वाटते . रंगही हिरवट निळसर राखाडी असा वेगळाच आहे . अन्य कुठल्याही जलस्त्रोता पुढे हा वेगळा रंग लगेच लक्षात येतो . 
                  नर्मदा जलाचा विवक्षित रंग

याचे कारण काय असावे याबाबत मी विचार केल्यावर मला असे जाणविले की नर्मदा परिक्रमा करणारे लोक गेली लाखो वर्षे नर्मदेच्या संगमातील पाणी ,नाभि क्षेत्रातील पाणी , जानु क्षेत्रातील पाणी , हृदय क्षेत्रातील पाणी आणि उगमावरील पाणी आपल्या बाटलीमध्ये भरून घेतात व बाटलीतले थोडेसे पाणी तिथे टाकून देतात . प्रत्यक्षामध्ये या प्रक्रियेमध्ये त्या भागातील सूक्ष्मजंतूंचे आदान प्रदान केले जाते . कुठल्याही नदीचा प्रवाह एकाच दिशेला वाहत असल्यामुळे संगम क्षेत्रातील सूक्ष्मजंतू कधीच उगम क्षेत्रापाशी जाऊ शकत नाहीत परंतु नर्मदा मात्र याला अपवाद आहे . परिक्रमा वासी गेली अनेक वर्षे इकडचे पाणी तिकडे आणि तिकडे पाणी इकडे करत असल्यामुळे संपूर्ण नर्मदेमध्ये एकसारखे जिवाणू आढळून येतात . या जिवाणूंमुळे पाण्याची चव ठरत असते . त्यामुळेच नर्मदेच्या पाण्याची चव कुठेही प्या एकसारखीच वाटते .अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे . याबाबत तज्ञांनी अधिक खुलासा करावा .
 इकडे साधूने मला चूल कशी पेटवायची , त्यासाठी लाकडे कशा पद्धतीची गोळा करायची ,त्यांची रचना कशी करायची इथपासून ते पातेले कसे तयार करायचे आणि भाज्या कशा कापायच्या किंवा सोबत हत्यार नसेल तर चमच्याने देखील भाज्या कशा कापता येतात इत्यादी सर्व शिकविले . अगदीच काही नसेल तर निखाऱ्यांमध्ये बटाटे , टोमॅटो ,कांदे कसे भाजून मीठ लावून खाता येतात हे देखील शिकवले . त्याने मला कणिक मळायला शिकवली आणि टिक्कड हातानेच कसे बनवतात आणि लाटून कसे बनवतात हे दोन्ही शिकविले . तिघांनी मिळून पटापट स्वयंपाक केला . साधू रोट्या खूपच हलक्या व सुंदर बनवत होता , त्यामुळे चार रोट्या अधिकच खाल्ल्या गेल्या . बहिर्दिशेला जाताना देखील काय काय नियम पाळायचे हे सर्व साधूने मला सकाळी व्यवस्थित समजावून सांगितले . वाचकांच्या माहिती करता सर्व नियम सांगून ठेवतो आहे .  (बहिर्दिशेला जाणे म्हणजे शौचाला जाणे )
०  बहिर्दिशेला जाताना कधीही कुठल्याही नदी नाला किंवा ओढ्याच्या जवळ जाऊ नये .
० उदकी सांडी गुरळी । तो एका मूर्ख ॥ असे रामदास स्वामींनी सांगितले आहे हे नेहमी लक्षात ठेवावे .गुरळी म्हणजे मानवी विष्ठेची लेंडी .
० कितीही चालावे लागले तरी चालावे परंतु मानवी वस्ती पासून अत्यंत दूर अशा ठिकाणीच जावे .
० लोकांच्या जाण्या येण्याच्या सहज वाटेमध्ये घाण करू नये .
० आड मार्गावर किंवा आडराना मध्येच आडोसा पाहून जाऊन बसावे .
० सोबत पुरेसे पाणी घ्यावे . नर्मदा मातेचे जल कधीच वापरू नये . उपजलस्त्रोतांचे पाणी वापरायला हरकत नसते . हापसा पंप टाकी यातील पाणी देखील वापरू शकतो .
० पाण्याच्या बाटलीला झाकण असेल याची खात्री बाळगावी . झाकण आणि बाटली दोन्हीही काम आटोपल्यावर पुन्हा मुक्कामी घेऊन यावे .तिथेच टाकून येऊ नये .
० मानवी विष्ठा मातीमध्ये मिसळली तर तिचे झाडांसाठी अमृत होते परंतु पाण्यामध्ये मिसळली तर मात्र तिच्यामध्ये वाढणाऱ्या विषाणूमुळे पाण्याचे विष बनते .
० सांडपाण्याला येणारा काळा रंग हा या विष्ठेतील सूक्ष्मजीवांमुळेच आलेला असतो . परंतु तीच विष्टा मातीत मिसळली तर मात्र काळेभोर सुंदर जैविक खत तयार होते .आणि त्याला अजिबात दुर्गंध येत नाही .
० बसण्यापूर्वी आजूबाजूला विंचू काटा साप काही नाही ना याची खात्री करावी .
० दगडाने लाकडाने किंवा पायाने एक पुरेसा खोल खड्डा बनवावा . त्यातील माती एका बाजूला ढीग लावून ठेवावी जिचा वापर पुन्हा लोटण्यासाठी करता आला पाहिजे .
० शक्य झाल्यास दोन पायटे तयार होतील असे दगड पहावेत . दोन समान उंचीचे मोठे दगड नैसर्गिकरित्या सापडले तर कमोड सारखा देखील त्यांचा वापर करता येतो . 
० कार्यभाग आटोपल्यावर न विसरता त्यावर माती लोटून द्यावी . किमान पालापाचोळा तरी लोटावाच लोटावा . थोडक्यात काय तर आपण कुठे गेलो होतो हे नंतर आपल्याला देखील सापडू नये इतक्या बेमालूमपणे सर्व काही सुरळीत करावे आणि मगच परत यावे .
० हिमालय किंवा अन्य क्षेत्रामध्ये ट्रेकिंग करणारे लोक नेहमी या पद्धतीचा वापर करतात . ते सोबत माती मिश्रित भुसा ठेवतात व विष्ठे वरती तो टाकून देतात कारण बर्फामुळे कुजण्याची प्रक्रिया खूप धीमी झालेली असते . 
० आपल्या चुकीच्या वागण्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास व्हावा व त्यांनी नर्मदा मातेला व परिक्रम परंपरेला बोल लावावेत असे वर्तन आपल्या हातून चुकूनही घडू नये .
० कितीही मोठा महापूर आला तरी आपल्या चुका नर्मदा मातेला पोटात घालाव्या लागतील अशा अंतरावर त्या करू नयेत . 
० हस्तपाद प्रक्षालन अन्यत्र करावे . नर्मदा मातेमध्ये मुळीच करू नये . 
० आपली वस्त्रे हातपाय वगैरे नर्मदा मातेमध्ये कधीच धुवू नयेत .
असो .रात्रभर खूप थंडी पडलेली होती .पहाटे जाग आली .बाहेर येऊन पाहतो तो काय समोर नर्मदा माता दिसत नव्हती इतके जबरदस्त धुके पडले होते . अंदाजानेच घाट गाठला आणि नर्मदा मातेमध्ये स्नान केले . हापशाचे पाणी वाहत्या पाण्यापेक्षा गरम असते परंतु एकदा थंडगार पाण्याने अंघोळ केली की थंडी कायमची पळून जाते .शिवाय नर्मदा स्नानाचे पुण्य आणि समाधान काही वेगळेच आहे .त्यामुळे मी कायम नर्मदा नदीमध्येच स्नान करायचो . नाशिकचा म्हातारा बाबा भल्या पहाटे उठून आमच्या पुढे निघून गेला होता . तसाही साधूला तो म्हातारा आवडला नव्हताच . बरे झाले पीडा पुढे निघून गेली असे साधू म्हणाला मग त्याने आणि मी बोरिया बिस्तर उचलले आणि नर्मदे हर केले . साधू माझ्या पुढे झपाझप चालत होता .आणि त्याला गाठताना मी अक्षरशः पळत होतो . धुके इतके घनदाट होते की साधू दहा पावले पुढे निघून गेला की दिसायचा बंद व्हायचा . उजव्या हाताला नर्मदा माई वाहते आहे हे फक्त तिच्या खळखळ आवाजावरून आणि पाणबगळे, पाण पक्षी यांच्या आवाजावरून कळत होते .साधूने यावेळी अतिशयच कडेचा मार्ग निवडला होता . नदी जशी उगमाजवळ लहान होत जाते ,तशी तिची वळणे देखील लहान लहान होत जातात आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्या नाल्यांची संख्या वाढत जाते . त्या चार-पाच तासांमध्ये आम्ही अक्षरशः शेकडो ओढे नाले ओलांडले . साधू चिखला मधून चालायला मला शिकवत होता . चिखल दिसला की मी थांबून जायचो .त्याने मला शिकविले की समोर चिखल जरी दिसत असला तरी आपली गती न बदलता आहे त्याच गतीने झपझपझप पावले टाकत गेलो तर चिखलामध्ये पाय रुतण्यापूर्वीच आपण पुढे निघून गेलेला असतो . आणि खरोखरच तसे होऊ लागले .पायाला चिखलाचा एक कणही न लागता आम्ही कित्येक ओढे नाले ओलांडले . साधूच्या आधी परिक्रमा झालेल्या असल्यामुळे त्याला त्या मार्गांबद्दल पक्की खात्री होती . त्यामुळे मला फक्त तो गेला त्या मार्गाने जाणे इतके सोपे काम उरले होते . मी विचार करून पाहिला की जर मी एकटा असतो तर या मार्गाने गेलो असतो का ? निश्चितपणे मी त्या मार्गाने कधीच गेलो नसतो .एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले अनुमान असते . अनुमान आपल्याला एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करते .परंतु अनुमान आणि अनुभव एकच असेल असे नाही . मला आलेला अनुभव हा अतिशय साधा सोपा आणि सुंदर होता . अनुमान मात्र अतिशय भयानक आणि कठीण होते . त्या क्षणी मी ठरवले की इथून पुढे अनुमानाला आपल्या जीवनात थारा द्यायचाच नाही .अनुमानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव श्रेष्ठ . गुरु हा अगदी हेच काम करत असतो . ज्या मार्गाची तुम्हाला कल्पना नाही असा एखादा मार्ग तो तुम्हाला दाखवीतो आणि काही काळ स्वतः सुद्धा त्या मार्गावर चालून दाखवतो . अशावेळी फक्त त्यांच्या पावलांचे अनुसरण करणे हेच शिष्याचे कार्य उरते . चालताना साधू अखंड मार्गदर्शन करत होता .खरे तर त्याला हे सर्व करायचे नव्हते परंतु मैया चा आदेश असल्यामुळे तो सर्व करत होता . त्यामुळे अतिशय पोटतिडकीने तो मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता . मला असे फार वाटून गेले की असा एक साधू प्रत्येक परिक्रमावासीला पहिल्या आठवड्यातच भेटावा ! असे झाले तर त्याची परिक्रमा किती सुफळ संपूर्ण होईल ! एके ठिकाणी कमरे एवढा चिखल असावा असे काठी रुतवल्यावर लक्षात आले . साधूने उंदरासारखी छोटी छोटी पावले टाकत पळण्याची युक्ती मला शिकवली . आश्चर्य म्हणजे तो संपूर्ण चिखल आम्ही सहज पार झालो .इथे साधू थोडासा एका दगडावर टेकून बसला आणि मला सांगू लागला . नर्मदा मैया का नाम लेके अगर तुम चलते हो तो सामने कोई भी मुश्किल आ जाये उसको मैया आसान बना देती है । अब ये वाला किचड देखो । पहिली बार जब मे आया था तो इसी किचड मे बहुत बुरी तरह से फस गया था । जो कीचड हमने मात्र एक मिनिट मे पार किया उसे पार करने मे मुझे दो घंटे लगे थे। लेकिन तब मेरी एक बहुत बडी गलती हुई थी ।मुझे लगा था कि मै यह कीचड आसानीसे पार कर सकता हु । इसीलिए फस गया । अब जब मैया का नाम लेके चलते है तो कीचड भी पत्थर बन जाता है । और पत्थर का किचड बन जाता है । तेरे रास्ते मे आगे बहुत काटे पडेंगे । मैया का नाम ले लेना , उनके फुल बन जायेंगे । मैया पे भरोसा रखना तुम्हे कोई दिक्कत नही आयेगी । मैया का स्मरण छोडना मत । हर समय उसको पुकारते रहना मैया मैया मैया मैया ! मैया ये देखो ! मैया वो देखो ! मैया मुझे ये हो रहा है । मैया मुझे वो हो रहा है । मैया तुम्हे संभाल लेगी ।  मैया का नाम लेके उंची चट्टान से भी कुदोगे तो कोई चोट नही खाओगे ।
आणि भविष्यामध्ये हा अनुभव मला खरोखरच आला .वाटेमध्ये असंख्य काटे कुटे लागले परंतु संपूर्ण परिक्रमेमध्ये माझ्या पायात एकही काटा मोडला नाही .पायात काटा मोडल्यामुळे परिक्रमा थांबविल्याची उदाहरणे मला पाहायला मिळाली . किंवा काही दिवस विश्रांती घ्यावी लागली असे लोक भेटले . हात पाय मोडलेली माणसे भेटली . मी मात्र मध्ये आलेले खोल ओढे आणि नाले अक्षरशः एका उडीमध्ये पार करायचो ! नर्मदेला येऊन मिळताना ओढे आणि नाले भरपूर माती कापत जातात आणि सुमारे सात फूट ते बारा ते पंधरा फूट खोल वाहतात . अशा खड्ड्यामध्ये उतरून पुन्हा चढता येणे केवळ अशक्य असते . नर्मदेच्या बाजूने जावे तर प्रचंड गाळ असतो . डावीकडे वरती जावे तर प्रचंड झाडी ,काटे-कुटे असतात .मग एकच मार्ग उरतो तो म्हणजे उडी मारायची . परंतु ही उडी मारताना एक गंमत होते . उडी मारण्यासाठी थोडेसे लांबून पळत यावे लागते . परंतु अगदी ऐन उडी मारण्याच्या क्षणी भीती वाटून आपण थांबतो आणि नाल्यात पडतो !नेमक्या याच क्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले कि ती तुम्हाला उचलते ! मी अक्षरशः अशा हजारो उड्या परिक्रमेमध्ये मारल्या ! खरे तर माझे वजन खूप जास्त होते .शिवाय आजपर्यंत चौदा वेळा माझा अस्थिभंग झालेला आहे .अर्थात यातील एकही अस्थिभंग अपघाती नाही ,तर सर्व मैदानात खेळताना किंवा घोड्यावरून पडून वगैरे झालेले आहेत .परंतु सांगायचे तात्पर्य हेच की मुळात इतके अस्थिभंग शरीरावर असताना त्या हाडाची ताकद थोडीशी कमी झालेली असते .त्यात आपले वजन वाढलेले .तरीदेखील नर्मदा मातेच्या कृपेने एकदा देखील पाय साधा मुरगळला देखील नाही .
अशा हजारो उड्या नर्मदा मातेच्या कृपेने संपूर्ण परिक्रमे दरम्यान मारल्या परंतु पायाला काहीही त्रास झाला नाही (ही उडी ओंकारेश्वर जवळची आहे )

 काही ठिकाणी कठीण खडक असायचे ! या खडकांवर पाय मुरगळला की पायाचे तुकडेच पडले पाहिजेत ! त्याही ठिकाणी मी खाली उतरून वर चढण्यापेक्षा वरच्या वर उड्या मारत जायचो ! या सर्वांचे श्रेय साधू बाबा ने मला दिलेल्या मूलमंत्रात आहे हे नम्रपणे नमूद करतो ! एकदा तिच्यावरती संपूर्ण भार वाहिला की ती खरोखर तुम्हाला तारते ! नव्हे नव्हे तारतेच ! ज्यांना पोहायला येत आहे त्यांनी आपले पोहणे शिकण्याचे दिवस आठवून पहावेत . पोहायला येत नसताना आपल्याला हे पाणी बुडविणार अशी खात्री असते ! त्यामुळे कितीही हातपाय मारले तरी नाका तोंडात पाणी जात असते ! या उलट एकदा का पोहायला यायला लागले की निवांत आपण त्या पाण्यावर आपला भार टाकून देतो ! आणि ते पाणी तुम्हाला सुखेनैव तारते ! आपल्या जीवनाचे ही तसेच आहे . मी करतो आहे किंवा मी जबाबदार आहे असे वाटू लागले की जीवन तुम्हाला बुडविते .परंतु ईश्वर सर्व करणारा आहे असा भाव ठेवला की तुम्ही सहज तरुन जाता !  आणि हा केवळ भाव न राहता अनुभव होऊन जातो !असे अनेक अनुभव येत गेले की त्या अनुभवाची खात्री होत जाते ! एकदा का खात्री पटली की तुमची नैया पार झाली !  असो .
साधू दगडावरून उठला आणि झप झप चालायला लागला . नर्मदा येथे छोटी छोटी वळणे घेत होती . घनदाट पसरलेले धुके , हलकीशी सुखद गुलाबी थंडी ,कधी संथ , कधी स्तब्ध ,तर कधी रम्य रुणुझुणु आवाज करत वाहणारी नर्मदा नदी ,तिच्यामध्ये विहार करणारे असंख्य जातीचे भव्य दिव्य बगळे , चक्रवाक पक्षी ,विविध रानपक्षी , त्यांचे सुमधुर आवाज आणि पायाखालून झपाझप सरकणारी चिखलाची मऊशार पायवाट ,अतिशय स्वर्गीय अनुभव होता तो . खऱ्या अर्थाने परिक्रमेची अनुभूती येत होती . कारण परिक्रमेला सुरुवात झाल्यापासून अधिकांश रस्त्यावरूनच चालावे लागले होते . आता मात्र माझी उजव्या हातातली काठी बहुतांश वेळा नर्मदेच्या पाण्यामध्येच बुडत होती . ती बुडताना आणि उचलताना येणारा नर्मदा मातेचा आवाज एखाद्या मंत्रद्रष्ट्या तपस्वी ऋषीमुनी नी उच्चारलेल्या महामंत्रासारखा भासत होता ! कमरे एवढ्या उंचीचे गवत दवाने कच्च भिजलेले होते . त्यामुळे कमरेखालचे सगळे कपडे भिजून ओले चिंब झाले होते .हे
नर्मदा मातेच्या काठाचा मार्ग
समोर खळखळ वाहणारी नर्मदा माता
 सर्व अनुभवात आम्ही मोठ्या गतीने थाडपथार घाट गाठला . याच गावाला कडा पत्थर देखील म्हणत . आपल्या मराठी भाषेमध्ये कडेपठार असा शब्द वापरतात त्यातलाच  हा नामप्रकार . या भागामध्ये गाळमाती कमी होऊन थोडासा खडक लागल्यामुळे याला पत्थर नाव पडले असावे .अजूनही सूर्य दिसत नव्हता तर धुक्यामधूनच पांढरे शुभ्र सूर्यबिंब दर्शन देत होते . इथे नर्मदेच्या अगदी काठावर एक सुंदर आश्रम होता . आश्रमाला चहूबाजूने कुंपण घातले होते . आश्रमाच्या भिंतींना गिलावा केलेला नव्हता परंतु जमीन मात्र शेणाने सारवलेली होती . मधून नर्मदे कडे जाण्यासाठी मार्गिका आणि दोन्ही बाजूला खोल्या होत्या . 
थाड पठार घाटावरील निर्मळ नर्मदा माई

डाव्या बाजूला खोल्यांमध्ये गाई आणि एका खोलीत वासरे बांधली होती . तर उजव्या बाजूला स्वयंपाक घर आणि त्याच्या आत अखंड धुनी होती . मागे एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष होता आणि तिथून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होत होते .आश्रमामध्ये काळे कपडे घातलेला एक बाबा होता .याने उजव्या हातामध्ये घुंगरू बांधले होते . या बाबांचे नाव जगन्नाथ पुरी असे होते .यांचे डोळे अतिशय बोलके होते आणि डोळ्याला काळ्या फ्रेमचा मोठा चष्मा त्यांनी लावला होता .
चित्रात डावीकडे जगन्नाथ पुरी महाराज
            जगन्नाथ पुरी बाबा
जगन्नाथ पुरी महाराज यांचा चिमटा आणि उजव्या हातातील घुंगरू
 आम्हाला बसण्यासाठी त्याने आसन दिले.त्या कोरड्या आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले की आमचे पाय चिखलाने आणि पाण्याने किती भिजले होते . संपूर्ण आश्रम गाईच्या शेणाने सरवलेला होता . चिखलाने माखलेले माझे पाय जमिनीवर उठू लागले म्हणून मी स्वच्छ हात पाय धुवून त्याने टाकलेल्या आसनावर येऊन बसलो . 
 थाडपथार आश्रमाचा व्हरांडा
या साधू सोबत त्याच्या गतीने चालल्यामुळे माझ्या पायांची पुरती वाट लागली होती .माझी खुरटी दाढी बारीक केस आणि एकंदर देहयष्टी पाहून साधूने ओळखले की हा नवीन परिक्रमा वाशी आहे . मला त्याने विचारले पाय दुखत आहेत का ? मी हो म्हणताच त्याने मला आतून एक डबी भरून लाल रंगाचे तेल आणून दिले . मला म्हणाला हे तेल पायाला चोळ आणि तू ज्या ब्लॅंकेट वर बसला आहेस त्या ब्लॅंकेट मध्ये पाय गुंडाळ . तेल तर मी लावले परंतु ब्लॅंकेट ला लाल रंग लागेल म्हणून मी ते गुंडाळत नव्हतो .साधूने चार शिव्या हासडत ते ब्लँकेट घेतले आणि माझ्या पायाला घट्ट गुंडाळले .ब्लॅंकेट पायाला गुंडाळता क्षणीच त्या तेलामधून गरम गरम वाफा निघू लागल्या आणि संपूर्ण पायाला गरमागरम शेक बसू लागला ! तो अनुभव इतका सुखद होता की असेच आयुष्यभर बसून राहावे असे वाटू लागले ! 
हेच ते ब्लँकेट जे माझ्या पायाला त्याने गुंडाळले होते आणि पहिला मुलगा बसला आहे , बरोबर त्याच जागी मी बसलो होतो.

आश्रम अतिशय सुंदर होता आणि आश्रमाच्या मधोमध एक झोपाळा होता ज्यावरून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन व्हायचे .
नर्मदेच्या बाजूने आश्रम असा दिसे
आश्रमातून नर्मदा मातेचे दर्शन
 इथे आत मध्ये एक अखंड धुनी चालू होती . साधू जीवनामध्ये या धूनीला फार महत्त्व असते . जवळपास सर्व साधू अहिताग्नी असतात . अर्थात त्यांच्या आयुष्यभर त्यांची सोबत करणारा अग्नी त्यांच्यासोबतच निघून जातो .
साधूने विचारले चाय पाओगे ? आम्ही दोघांनी नर्मदे हर म्हटले . साधू आतून दोन कप चहा घेऊन आला . त्याने पारले जी बिस्कीटचे दोन पुडे आणले एक साधूकडे फेकला एक माझ्याकडे फेकला . साधूने तो पुडा त्याच्या झोळीमध्ये टाकून दिला आणि मी मात्र तो पुडा फोडला ! पुडा फोडून पहिले बिस्कीट हातात घेतले आणि चहा मध्ये बुडविले ! इतक्यात तो साधू जोर जोरात ओरडू लागला ! कैसा परिक्रमा वासी है देखो मैया ! कुत्ते की तरह बिस्कुट खा रहा है ! त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या हातातले बिस्किटच गळून पडले ! मला एक क्षणभर कळेना की माझा असा काय अपराध झाला ? मला साधू म्हणाला शरम नाही आती बिस्कुट खा रहे हो ? विनम्रपणे म्हणालो बाबाजी क्या हुआ ? बिस्कुट खाना नही चाहिये क्या ? इतक्यात माझ्याबरोबर चा साधू मला म्हणाला अरे आज ग्यारस है। एकादशी तुम्हारे मराठी मे ! आज उपवास रखना चाहिए ।मैने तो रखा है ।  मी म्हणालो लेकिन मै एकादशी वगैरे व्रत नही रखता । काळे कपडे घातलेला साधू आता मात्र चिडला होता ! तो मला म्हणाला तुम बाकी अपनी जिंदगी मे क्या उखाडते हो उखाडते रहो । लेकिन परिक्रमा के नियमों का पालन करना आवश्यक है । परिक्रमा मे ग्यारस का बडा महत्त्व है। मी बिस्किट खाल्ले नव्हतेच ! मी चटकन ते बिस्कीट बाजूला बसलेल्या कुत्र्यासमोर फेकले . आणि अख्खा पुडाच त्याच्या समोर ठेवला .त्याने ते बिस्किट हुंगले आणि उठून ते कुत्रे निघून गेले . त्याने त्या बिस्किटाला तोंड देखील लावले नाही . साधू मला म्हणाला देखा ? कुत्ते को भी जो बात समझ मे आ रही है वो तुम्हारे जैसे हट्टे कट्टे इन्सान के दिमाग मे नही उतर रही । अरे नर्मदा परिक्रमा मे जो एकादशी व्रत रखता है उसको जिंदगीभर एकादशी व्रत रखने का पुण्य मिल जाता है ! ही गोष्ट मात्र मला आवडीची वाटली ! मी लगेच त्याला विचारलं मतलब अगर परिक्रमा मे एकादशी व्रत का पालन करता हु तो जिंदगीभर मुझे एकादशी का उपवास नही रखना पडेगा ? बिलकुल नही रखना पडेगा !साधू हसत हसत म्हणाला ! ये भोसडी का अभी पक्का उपवास रखेगा ! साला बडा स्वार्थी है ! मैया के लिए उपवास नही रख रहा लेकिन जिंदगी भर के उपवास से छुटकारा पाने के लिए उपवास रख रहा है ! खैर वैसे ही सही उपवास तो कर ! मी कमंडलू मधले पाणी हातामध्ये घेतले आणि पाणी सोडत त्याला सांगितले आज पासून मी परिक्रमा संपेपर्यंत एकादशी व्रत स्वीकारत आहे . साधू खुश झाला आणि त्याने आतून अजून एक कप चहा आणून दिला शिवाय भरपूर गुळ आणि दाणे खायला आणून दिले . जमतील तेवढे खा आणि बाकीचे सोबत घेऊन जा हे सांगायला विसरला नाही . 
आश्रमातील स्वयंपाक गृहामध्ये पुरी तळताना जगन्नाथ पुरी महाराज .उजव्या हातातील घुंगरू सतत वाजत असते .
साधूने दिलेल्या तेलामुळे पायाला खरोखरच आराम मिळाला होता . बाटली परत देऊ लागलो तर मला म्हणाला ठेव तुझ्याजवळ . आणि धुनीच्या दर्शनाकरिता मला आत घेऊन गेला . समोर मोठी धुनी  होती. धुनीला लागून एका कट्ट्यावर व्याघ्र चर्म टाकून त्यावर साधू झोपत असे , बसत असे . 
धुनी समोरील साधूचा कट्टा
त्याने एका वहीमध्ये माझा नाव पत्ता वगैरे लिहून घेतले . इकडे माझ्यासोबत चा साधू मात्र मला हा साधू कुत्रा म्हणाला म्हणून चिडलेला होता . तो त्याला सांगू लागला आपने इस परिक्रमावासी को कुत्ता बोलना नही चाहिये था । खरे तर मला त्याच्या बोलण्यामुळे फारसे काही दुःख झालेले नव्हते । त्याचा हेतू मी जाणला होता । कदाचित तो इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलला नसता तर मी बिस्किटे खाऊन पुढे चालू लागलो असतो . परंतु माझ्यावरून या दोन्ही साधूं मध्ये बाचाबाची सुरू झाली ! माझ्यासाठी हा प्रकार वेदना दायक होता . कारण दोघेही साधू श्रेष्ठ तपस्वी होते हे मला दिसत होते . मी एक अडाणी मूर्ख शहरी मुलगा त्यांच्यापुढे काहीच नव्हतो . परंतु दोघांमध्ये मोठे मोठे युक्तिवाद सुरू झाले . काळे कपडे घातलेला साधू मोहन साधूला म्हणाला दो परिक्रमा करके भी ये बाबा सुखाही रह गया । आणि माझ्याकडे पाहून तो एक वाक्य बोलला . जे वाक्य मला संपूर्ण परिक्रमामध्ये शिदोरी म्हणून पुरले . नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाने हे वाक्य आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवावे .
साधू मला म्हणाला , " देख बेटा । यह साधू तो अब बन चुका है ।इसके स्वभाव मे कोई बदलाव लाना अब असंभव है । लेकिन तू तो  नया बच्चा है । तू इसके  मुकाबले जल्दी सुधर सकता है । मेरी एक बात हमेशा ध्यान मे रखना । यह नर्मदा खंड है ।इस संपूर्ण नर्मदा खंड को तुम्हारी या तुम्हारे दिये हुए किसी भी चीज वस्तू की जरूरत नही है । यहा बडे बडे लोग आते है खुद को दानी कहलाते है । उनको लगता है वे यहाँ कुछ दे गये । 
यहा किसी को भी किसी भी चीज की कोई आवश्यकता नही है । ना ही यहाँ पर अपना ज्ञान बाटने की जरूरत है । यहां सब महा ज्ञानी है । यहां कुछ भी देकर मत जाओ ।जितना हो सके यहां से लेकर जाओ । तुम्हारे सामने कितना भी गलत कुछ हो रहा है उसे सिर्फ देखते रहो ।उसमें अपनी टांग मत अडाओ । सिर्फ साक्षी भाव से देखते जाओ ।" 

लेखांक २१ समाप्त ( क्रमशः )

 लेखांक २२ : अचानकमार व्याघ्र महारण्यात प्रवेश


यह नर्मदाखण्ड है।
यहां कुछ भी देकर मत जाओ ।
जितना हो सके यहां से लेकर जाओ । 
साधूचे हे वाक्य माझ्या मनावर पक्के कोरले गेले. त्याला नर्मदे हर करून आम्ही दोघांनी (मोहन साधू व मी) . काढता पाय घेतला . पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला . आता मात्र माझ्या पायांना इतकी गती आली की मी त्या साधूला देखील मागे टाकत थेट दम्हेडी गाव गाठले . अखंड डांबरी रस्त्याने चालून विटलेल्या माझ्या सह्यभ्रमंतीमध्ये रमणाऱ्या पायांना चिखलाचा , मातीचा तो मऊशार स्पर्श खरोखरीच सुखावह भासत होता , त्याचाच हा परिणाम असावा .
 (प्रतिनिधिक चित्र )
दम्हेडी पासून मात्र पुन्हा एकदा काँक्रीट चा एक मार्ग लागला आणि तिथून तो मोहन साधू जो सुसाट सुटला तो पुन्हा कधीही मला दिसला नाही .त्याने त्याचे कार्य अतिशय चोख बजावले . त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधायचा मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु तो क्रमांक अस्तित्वात नाही असाच संदेश ऐकू येतो . असो . नर्मदा मातेचे आणि त्या साधूचे आभार मानावेत तितके कमीच आहेत . माझ्या कल्पनेतली स्वप्नातली परिक्रमा वास्तवामध्ये देखील करता येते हे त्या साधूने मला नर्मदा मातेच्या आदेशाने शिकविले ही खरोखरीच फार मोठी घटना आहे माझ्या परिक्रमा आयुष्यातील ! असो . मला काही तो काँक्रीटचा नवाकोरा कठोर मार्ग आवडला नाही त्यामुळे शेतातील छोटे-मोठे शॉर्टकट शोधून काढत मी घुईदादर , कुन्नुटोला  , भंगीटोला , सस्वादी , कस्तुरी ही गावे पार करत बिलासपूर गाव गाठलेच . ( बिलासपुर नावाचे छत्तीसगड मधले मोठे गाव आहे ते वेगळे आणि हे वेगळे )एकादशीचा उपवास असल्यामुळे पाय चालायचे बंद होत आहेत असे उगाचच वाटू लागले . गावामध्ये मोठा बाजार भरलेला दिसत होता . वाटेमध्ये एक हॉटेलवाला होता त्याने आवाज दिला आणि हॉटेलच्या पडवीमध्ये मुक्काम करण्याची विनंती केली . हॉटेलच्या पडवीमध्ये सामान ठेवले आणि समोर पेटलेल्या चुलीजवळ जाऊन बसलो . थंडी प्रचंड जाणवत होती . हा हॉटेलवाला मोठा मजेशीर होता . याने माझ्यासमोर ५०-६० कप चहा विकला परंतु मला एक कप सुद्धा चहा त्याने विचारला नाही . माझ्यासमोर मोठी चूल पेटली होती त्याच्यावरती तो पटापट सामोसे बनवून तळत होता . सामोसे बनवून झाल्यावर त्याच चुलीवर त्याने सुंदर अशा गरमागरम जिलेब्या तळल्या . आलुबोंडे देखील तळले. दिवस बाजाराचा असल्यामुळे मोठीच गर्दी सर्वत्र होती . माझा उपवास असल्यामुळे नर्मदा माता माझी परीक्षा पाहते आहे असे मला वाटू लागले ! समोर तळले जाणारे गरमागरम पदार्थ आणि त्यावर ताव मारत , मिटक्या मारत खाणारे लोक पाहून तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल ! परंतु इथेच आपल्या निग्रहाची परीक्षा असते !मुळात उपवास करायचा असतो तोच अशा एखाद्या प्रसंगासाठी ! एरवी त्या उपासाचा फायदा तरी काय ! असो . मी चुलीवर शेकत बसलो होतो आणि साधारण ९० ते १०० च्या दरम्यान वय असलेला एक म्हातारा जो त्या हॉटेलचा मालक वाटत होता तो चुलीमध्ये हळूहळू लाकडे सारत होता . एकही अनावश्यक लाकूड तो जाळत नव्हता . त्याच्याशी गप्पा मारता मारता मी त्या संपूर्ण भागाचा भूगोल समजावून घ्यायला सुरुवात केली . इतक्यात एक जटाधारी साधू तिथे येऊन बसला . उंची साधारण सव्वा सहा फुट असावी परंतु जटांमुळे तो चांगला सात फुटाचा वाटत होता ! साधू आला आणि चिलीम पेटवून मस्त झुरके घेत बसला . मला वाटले आता या साधूला तरी चहासाठी विचारणा होईल ! परंतु कुठले काय आणि कुठले काय ! भरपूर धंदा होत असून देखील त्या मालकाची देण्याची वृत्ती अजिबात नव्हती हे स्पष्टपणे जाणवत होते . मला प्रथमच असा एखादा नकारात्मक छटा असलेला दुकानदार परिक्रमेमध्ये भेटत होता . आता पुढे जो प्रसंग घडला त्यातून सर्वसामान्य मनुष्य आणि साधू यातील फरक तुमच्या लक्षात येईल ! साधूला एका क्षणात सर्व लक्षात आले असावे ! त्याने झोळीतून शंभर रुपयाची नोट काढली . आणि दुकानदाराला देत म्हणाला मला शंभर रुपयाचे सामोसे दे . दुकानदार खुश झाला . त्याने वीस सामोसे साधूला दिले . साधूने त्या सामोशांकडे पाहिले सुद्धा नाही . दुकानाच्या अलीकडे रस्त्यावरती एक गाय कोणीतरी बांधली होती . हा साधू गाईकडे हात करत त्या दुकानदाराला मोठ्या रुबाबात म्हणाला . जाव बेटा ! गोमाता को ये सारे समोसे खिलाके आओ ! दुकानदार म्हणाला गाईला कशाला पाहिजेत सामोसे ? आता मात्र साधू भडकला आणि त्याचा आवाज एका क्षणात चढला ! तुमको जितना बताया है उतना करो ! खुदकी अकल मत लगा, कमदिमाग आदमी ! मैने पैसा गिना है। मै जो चाहे करू , lमेरी मर्जी । दुकानदाराचा नाईलाज झाला . परंतु त्याचा जीव त्या सामोशांमध्ये अडकला होता हे मला स्पष्टपणे दिसत होते . माझ्या मनात क्षणभर विचार आला की आपल्याला जर त्या गाईला खायला घालायला मिळाले तर किती छान होईल ! इतक्यात साधू मला म्हणाला ,जाव चेला ! तुम जाओ ! और गौ माता को खिलाने का पुण्य पाओ । मी लगेच उठलो आणि ते वीस सामोसे घेऊन गायीच्या पुढे गेलो . गाय बऱ्याच दिवसांपासून उपाशी असावी इतकी तिची हाडे वर आली होती . हा दुकानदार स्वभावाने चांगलाच स्वार्थी होता . त्याचीच गाय असून त्याने तिला अतिशय वाईट अवस्थेमध्ये ठेवले होते . गाईने सर्व सामोसे अतिशय आवडीने आणि पटापट खाल्ले !  मी हात स्वच्छ धुऊन परत शेकायला येऊन बसलो . दुपारचे तीन साडेतीन वाजले होते परंतु थंडी प्रचंड जाणवत होती . साधू माझ्याशी बोलू लागला . तो मला म्हणाला तुला आता नक्की काय प्रकार झाला तो लक्षात आला का ? मै कब से देख रहा हू । तुम यहा पे बैठे हो । यह दुकानदार तुम्हे बैठने के लिए तक नही बोल रहा । आख बंद करके बताता हु की इसने तुम्हे कुछ खिलाया पिलाया भी नही होगा । मै इसको बहुत सालो से देख रहा हू । बडा स्वार्थी है । परिक्रमावासियो को बुलाता है ताकी वो कुछ खरीद के खाये । इसलिये मैने जान बुझके उसके समोसे गोमाता को खिलाये । साला खुद तो उसको कुछ खिलाता नही है । ऐसी जगह साधूने एक क्षण भी रुकना नही चाहिये । असे म्हणून साधू महाराज उठले आणि ताडताड चालू लागले . त्यांची ती पाठमोरी आकृती पाहताना माझ्या मनात विचार येऊ लागले की माझा निर्णय चुकला की काय ? आज बिलासपुर मध्ये मुक्काम करावा की न करावा ?  इतक्यात माझ्या लक्षात आले की सूर्यास्ताची वेळ जवळ येत आहे त्यामुळे नर्मदा मातेची पूजा आरती करून घ्यावी . मी घाईगडबडीने ओसरीमध्येच बसून नर्मदा मातेची पूजा आरती केली . परंतु आज मला त्यात फारसा आनंद वाटत नव्हता . मला अजून एक काम करायचे होते ते म्हणजे माझ्या पाठीवरच्या पिशवीचा बंद तुटला होता तो शिवून घ्यायचा होता . गावात एक शिंपी असल्याचे कळले . त्याचे घरी ताबडतोब पिशवी घेऊन गेलो . परंतु तो म्हणाला माझ्या मशीनवर इतका जाड बंद शिवला जाणार नाही . तो तुटका बंद घेऊन चालता येणे माझ्यासाठी अशक्य होते . त्यामुळे मी त्याला विनंती केली की मला मशीन चालविता येते कृपया मला चालवण्याची परवानगी द्याल तर मी माझा मी तो बंद दुरुस्त करून घेतो . त्याने परवानगी दिल्या दिल्या मी दप्तराचे सर्व महत्त्वाचे भाग चार चार पाच पाच टाके टाकून पक्के करून घेतले . दप्तराचे बंध कमी अधिक लांबीचे करता येतात परंतु ती सोय माझ्यासाठी गैरसोय ठरत होती इतकी बकले खराब दर्जाची होती . त्यामुळे ती बकले काढून टाकून तिथे देखील मी एक सरासरी लांबी पकडून भगव्या रंगाची पक्की शिलाई मारून टाकली . 
दप्तराच्या बंधांना मी स्वहस्ते मारलेली पक्की शिलाई . हिने पुढे संपूर्ण परिक्रमा साथ दिली .
दप्तराचे काम अतिशय मजबूत रीतीने पूर्ण झाले ! त्यामुळे माझे खुश झालेले मन समोर चाललेला प्रसंग पाहून क्षणात चिंताक्रांत झाले ! पोलिसांची एक गाडी मोठमोठ्याने सायरन वाजवत आणि पुकारा करत गावचा बाजार उठवत होती ! लॉकडाऊन सुरू झाला असून प्रत्येकाने आपापल्या घरीच रहावे असे पोलीस सर्वांना सांगत होते . मी धावतच हॉटेलच्या ओसरी मध्ये गेलो आणि शांत हालचाल न करता बसून राहिलो . मला अशी भीती वाटली की पोलीस मला पाहतील आणि परिक्रमा थांबवण्याची सूचना करतील . मला अयोध्येच्या साधूने दिलेले पुस्तक मी बसल्या बसल्या चाळू लागलो . पुस्तक चाळताना माझ्या असे लक्षात आले की बिझौली गावामध्ये माझ्यासोबत राहिलेल्या बंजारा समाजाच्या पवार कुटुंबीयांचे घर इथून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती होते . नऊ किलोमीटर गेल्यावर खाटी नावाचे गाव होते आणि दहा किलोमीटरवर मोहंदी नावाचे गाव होते , जिथे पवार कुटुंबीय राहायचे . त्यांची परिक्रमा साधारण माझ्याबरोबरच सुरू होती . त्यामुळे ते त्यांच्या घरी पोहोचले असण्याची शक्यता होती . या हॉटेलमध्ये तसेही माझे मन रमत नव्हते . कारण त्या लोकांना शून्य अगत्य होते . त्यात पोलीस एकेकाला हाकलत आहेत हे पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की कदाचित हे आपली उचल बांगडी करून आपली परिक्रमा थांबवू शकतील . बिलासपूर गाव संपल्यावर खाटी गावापर्यंत संपूर्ण जंगलाचा मार्ग आणि घाट रस्ताच होता त्यामुळे तिथे तुलनेने सुरक्षित वातावरण होते . त्यामुळे सूर्यास्त होतो आहे हे लक्षात येऊन देखील मी झटकन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला . मी निघून जातो आहे हे पाहिल्यावर मात्र दुकानदार म्हातारा , त्याचा मुलगा , त्याची आई असे सर्वजण माझ्या मागे धावत येऊ लागले आणि महाराज जाऊ नका !महाराज कृपया मुक्काम करा ! अशी विनवणी करू लागले . परंतु एकदा उचललेले पाऊल परत फिरवायचे नसते हा परिक्रमेचा नियम पाळत मी तिथून अक्षरशः पोबारा केला . मी पोबारा केला खरा परंतु पुढे काय भयानक संकट वाढून ठेवले आहे त्याची मला जराशीही कल्पना नव्हती . झपाझप पावले उचलत बिलासपूर गाव मी सोडले पुढे एकच घर होते आणि मग अचानक घनघोर जंगल सुरू झाले . एका क्षणामध्ये सर्व उजेड नष्ट होऊन प्रचंड अंधार दाटून येऊ लागला . जंगली श्वापदांचे कर्णकर्कश आवाज कानात घुमू लागले . मला एक क्षणभर असे वाटू लागले की बहुतेक आपला हा निर्णय चुकलेला दिसतो . परंतु खरे पाहायला गेले तर एकादशीचे काही उपवासाचे खायला मिळावे आणि तुटलेले दप्तर शिवून घ्यावे या दोनच कामांसाठी मी बिलासपूर मध्ये थांबणार होतो . पैकी दप्तराचे काम झाले होते आणि पहिल्याच उपासामुळे पोटामध्ये प्रचंड कावळे कोकलत होते . मी अक्षरशः धावतच तो रस्ता तुडवू लागलो . आता मात्र खूपच घनदाट अंधार पडला होता . दुआरी घाट नावाचा एक जंगलातला घाट मी पार करत होतो . या भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये वाघ आहेत याची मला कल्पना होती . हॉटेलमधील म्हाताऱ्या माणसाने वाघाचे अनेक किस्से मला सांगितले होते . वाटेत एकही वाहन येत किंवा जात नव्हते . माझे एक मन मला सांगू लागले की आता जी गाडी येईल त्या गाडीला हात कर आणि बसून पुढचे गाव गाठ . तर दुसरे मन मला सांगत होते नर्मदा मातेचे नाव घे आणि चालत रहा . काही होणार नाही !परिक्रमेचे नियम तोडू नकोस ! 
आता खाटी गाव फक्त चार किलोमीटर उरले होते . अर्ध्या तासामध्ये वेगाने पळत मी बरेचसे अंतर कापले होते . याचा अर्थ एखादी गाडी मिळाली तर पाच मिनिटात मी पोहोचलो असतो . इतक्यात नर्मदा मातेने ठरविले की माझी परीक्षा बघावी . आणि मला समोरच्या वळणावर काही लोकांचे अस्तित्व जाणवू लागले . सुमारे दहा-बारा लोक असावेत .मोबाईलच्या मंद उजेडात त्यांचे काहीतरी चालू होते . एक मोठा ट्रक उभा होता .आणि ही सर्व मंडळी एकही शब्द न बोलता शांतपणे जंगलातील लाकडे जी आधीच कोणीतरी तोडून कापून ठेवली होती ती गुपचूप त्या ट्रक मध्ये भरण्याचे काम करत होती . माझ्या क्षणात लक्षात आले की ही जंगली लाकडाची तस्करी सुरू आहे . मला पाहताच सर्वांनी त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश माझ्या दिशेला वळविले . मला त्या क्षणी तिकडे पाहणे बहुतेक त्यांना अपेक्षित नसावे . नर्मदे हर बाबाजी ! इतने अंधेरे मे कहा चले ? एकाने मला विचारले . मी त्यांना सांगितले की मला खाटी गावामध्ये जायचे आहे . दुसरा म्हणाला अरे बाबाजी इतने रात को इस जंगल से पैदल जाना अच्छी बात नही है । आप थोडा समय रुक जाइये । हमारी गाडी खाटी होके जायेगी ।उसमे बैठके चले जाना । परंतु मी वाहनात बसणार नाही हा माझा निश्चय मी त्यांना सांगितला . ते म्हणाले जैसी आपकी इच्छा । लेकिन इस जंगल से आप अकेले मत जाइये। 
 (प्रातनिधिक संग्रहित चित्र )
मला तिथे थांबणे परवडणारे नव्हते . त्यामुळे मी त्यांना नर्मदे हर केले आणि मोठ्या गतीने पुन्हा पावले उचलली. आता मात्र पुन्हा एकदा निर्जन रस्ता आणि मी एकटाच मार्गक्रमण करतो आहे .अंधार इतका भयंकर वाढला होता की मला रस्ता सुद्धा दिसेनासा झाला . आकाशामध्ये लख्ख चांदण्या दिसू लागल्या . संपूर्ण परिक्रमा मार्गामध्ये प्रकाश प्रदूषण काही मोजकी मोठी शहरे सोडली तर जवळपास नाहीच आहे . त्यामुळे प्रत्येक गावातून अतिशय सुंदर असे आकाशदर्शन होते . त्यात असा जंगलातील घाट रस्ता मिळाला मग तर काय विचारता ! मी आकाशातील ओळखीचे तारे पहात मार्गक्रमणा करू लागलो ! मृग नक्षत्र दिसत होते . अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी सर्वकाही सुंदर आणि ठळक दिसत होते ! 
आकाशात दिसणाऱ्या कृतिका आणि रोहिणी नक्षत्रांचे संग्रहित चित्र 
सारथी चा  पंचकोन दिसत होता . स्वर्गाचे द्वार दिसत होते . परिक्रमेत प्रथमच मी अंधारामध्ये मार्गक्रमण करत होतो . त्यामुळे उत्तर दिशा मी आधीच शोधून ठेवली होती . उत्तर ध्रुव तारा सापडला की उत्तर दिशा माहिती होते . शर्मिष्ठा किंवा सप्तर्षी या दोघांपैकी एक काहीतरी सापडले की उत्तर ध्रुव आणि पर्यायाने उत्तर दिशा सापडलीच म्हणून समजा ! अशा पद्धतीने मी चालत असताना अचानक मागून मोठ्या आवाजात पोलिसांचा सायरन ऐकू येऊ लागला ! त्या निरव शांततेचा भंग त्या सायरनने केला होता . माझ्या शेजारी पोलिसांची एक सफारी गाडी येऊन थांबली . आणि अतिशय करड्या आवाजात गाडीतील पोलिसाने मला दरडावले ! बाबाजी गाडी मे बैठ जाओ ! 
 ( मध्यप्रदेश पोलिसांच्या टाटा सफारी वाहनाचे संग्रहित चित्र )
आता मात्र मला काही सूचेना ! मला वाटले संपली आपली परिक्रमा ! झाला सुरू लॉकडाऊन ! कोरोना रोगाच्या लॉकडाउन ने नुसता उच्छाद मांडला होता जगभर ! मला काय करावे कळेना ! वाहनामध्ये बसावे की जंगलामध्ये निघून जावे ? गाडीमध्ये दोन सशस्त्र पोलीस होते . मी वाहनामध्ये मागच्या आसनावर बसलो परंतु त्यांना सांगितले कृपया गाडी बंद करा . आपण थोडेसे बोलूयात . पोलिसांनी गाडी बंद केली . आता पुन्हा एकदा रातकिड्यांचे आवाज आणि जंगलातील प्राण्यांचे भयानक आवाज ऐकू येऊ लागले . गाडीचे दिवे बंद करता क्षणी पोलिस म्हणाले ,अरे बाबाजी इतक्या भयानक अंधारात तुम्ही कुठे निघाला आहात ? मी त्यांना सांगितले मला खाटीच्या पुढे मोहदी गावात जायचे आहे . तिथे बुधराम सिंह पवार आहेत ज्यांचे घरी मी मुक्काम करणार आहे . पोलिसांना बहुधा खात्री पटली की हा कोणी चोर डाकू नसून परिक्रमावासीच आहे . कारण बुधराम सिंह पवार नायक याचा पुतण्या मथुरा नायक त्या गावचा सरपंच होता आणि तो यांच्या ओळखीचा होता . धार मध्ये पवार घराण्याने राज्य केलेले आहे . त्यामुळे पवार किंवा पंवर किंवा पनवर हे आडनाव उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळते . विशेषतः मोहदी गावात बंजारा समाजाची वस्ती होती आणि त्यांनी पवार हे आडनाव धारण केले होते , ते तसे दुर्मिळ उदाहरण आहे. पोलीस मला म्हणाले आम्ही रोजच या भागात गस्त घालत असतो . आमचे पोलीस ठाणे अमरकंटक आहे . आम्ही तुम्हाला थेट अमरकंटकला सोडतो आमच्या सोबत चला . म्हणजे परवा येणारी मकर संक्रांति तुम्ही अमरकंटक मध्ये साजरी कराल . परंतु मी गाडीने प्रवास न करण्याचा माझा निश्चय आहे हे त्यांना ठासून सांगितले . पोलिसांनी मला गाडीने चलण्याचा खूप जास्ती आग्रह केला . परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो . पोलीस म्हणाले तुम्हाला असे एकट्याला आम्ही जंगलामध्ये सोडून जाऊ शकत नाही काय करावे सांगा . इथे वन्य श्वापदे खूप आहेत. आता दोन किलोमीटर अंतर उरले होते . मी त्यांना म्हणालो तुम्ही माझ्यासोबत तेवढे अंतर गाडीने या आणि पुढे निघून जा . ही कल्पना त्यांना पटली आणि थोड्याच वेळात आम्ही मोहदी गावात येऊन पोहोचलो . एक परिक्रमावासी आपल्या गावामध्ये चालत आला आहे आणि त्याच्या मागे दिवे सायरन इत्यादी चालू असलेली पोलिसांची गाडी आलेली आहे हे पाहून एका क्षणात सारा गाव तिथे गोळा झाला . अशा छोट्या छोट्या गावांमध्ये विशेष काही घटना घडत नसतात . त्यांचे दैनंदिन दिनमान ठरलेले असते त्याप्रमाणेच घडत असते . त्यामुळे आता काहीतरी मसाला गोष्ट घडणार असे वाटून सर्व गावकरी पोलिसांच्या गाडीभोवती गोळा झाले ! इतक्यात सरपंच मथुरा नायक देखील तिथे आला ! मी जेव्हा त्याला त्याच्या काका काकूंचे नाव सांगितले तेव्हा तो अतिशय आनंदित झाला आणि तो म्हणाला आत्ताच काही वेळापूर्वी ते दोघे आपल्या घरी आलेले आहेत !  पोलीस देखील मथुरा नायकशी गप्पा मारू लागले . आणि लोकांना जी सनसनाटी घटना हवी होती ती घडली ! खाटी गावाकडून खन्नत माळमार्गे अमरकंटकला जाणारा घाट रस्ता होता . आणि मोहदी गावातून एक मार्ग वेगळ्या रस्त्याने अमरकंटकलाच जात असे . 
मी एवढ्या अंधारात चालत कसा आलो ते मथुरा नायक ला पोलिसांच्या समक्ष सांगू लागलो . वाटेत मला काही लोक भेटले हे देखील मी सांगितले ! आता मात्र पोलीस सावध झाले ! लाकूड तस्करांची गाडी मी पाहिली आहे हे पाहिल्यावर पोलिसांना मोठाच आनंद झाला ! कारण पोलिसांची गाडी येत आहे याची चाहूल लागल्या लागल्या त्या लोकांनी ट्रकमध्ये मागे गवत वगैरे भरून जंगलामध्ये पलायन केले होते . त्यामुळे पोलिसांना ती लाकडाची गाडी आहे याचा संशय आला नसावा . थोड्याच वेळात ते मला खाटी गावापर्यंत सोडण्यास तयार होते हे देखील मी पोलिसांना सांगितले . याचा अर्थ त्यांची लाकडं भरून झाली आहेत हे पोलिसांनी ओळखले . आणि पोलीस खाटी मधून अमरकंटकच्या दिशेला निघून जाणार त्यामुळे हा ट्रक मोहदीच्या दिशेला येणार हे निश्चित होते . पोलिसांनी लगेच त्यांची गाडी एका रस्त्यावर लपवून लावली आणि सर्वजण सापळा लावून बसून राहिले . इतक्यात लाकडाची तस्करी करणारा तो ट्रक आलाच ! पोलिसांनी ताबडतोब त्या चालकाला गाडीतून खाली खेचले ! आणि पुढची कारवाई सुरू केली ! सफारी गाडीमध्ये जे दोन पोलीस हवालदार /अधिकारी होते त्यातील एकाचे गाव नर्मदे काठीच होते , त्यामुळे त्याला जन्मतः परिक्रमावासींविषयी आस्था होती . त्यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला आणि सांगितले की अमरकंटक मध्ये किंवा संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर कधीही त्यांना फोन करा . त्यांनी जाता जाता माझे आभार देखील मानले कारण त्यांच्या मते माझ्यामुळे ही मोठी चोरी पकडली गेली होती . कदाचित मी त्या रस्त्याने त्यांना भेटलो नसतो तर ते त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार खाटी गावाहून अमरकंटकला वेगाने निघून गेले असते . आणि मग लाकूडतस्कर मोहदी मार्गे पुढच्या मार्गाला मार्गस्थ झाले असते . मला मात्र आता चांगलीच भूक लागली होती त्यामुळे आता पुढे लाकूड तस्करांचे गावकरी आणि पोलीस काय हाल करतात हे पाहण्यात मला काहीही रस उरला नव्हता . मथुरा नायक ने एका छोट्या मुलाला मला बुधराम सिंह पवार चे घर दाखवण्यासाठी पाठवले . बुधराम सिंह पवार आणि त्याची पत्नी तसेच सोबत गावातील अन्य काही दोन-तीन लोक यांनी प्रथमच परिक्रमा संपूर्ण केली होती . त्यामुळे गावातील सर्व लोक त्यांच्या घरी जमले होते आणि जणू काही एका उत्सवाचे वातावरण त्यांच्या घरामध्ये होते . ते सर्वजण परिक्रमेतील शेवटची आरती करण्याकरता तयारी करून बसले होते इतक्यात माझे तिथे आगमन झाले . मी आलेला पाहून त्या सर्वांना इतका आनंद झाला की काय सांगू ! रात्रीचे जवळपास आठ वाजले होते आणि माझे येणे त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित होते ! सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले आणि त्यांच्या रांगेमध्ये मला बसायला जागा दिली आणि माझी नर्मदा मैया बाहेर काढण्याची विनंती केली . मी देखील माझे पूजेचे समान पुन्हा एकदा काढले . मगाशी मी जी आरती केली त्यातून मला पुरेसे समाधान मिळाले नव्हते हे मी आधीच नमूद केले आहे . त्यामुळे आज नर्मदा मातेची पुन्हा एकदा आरती करावी असे मी ठरविले . त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक तिथे दाटीवाटीने गोळा झाले होते . घरातीलच एक छोटा मुलगा मोबाईलवर या सर्व प्रसंगाचे फोटो काढत होता . ते मी माझ्या पिशवीवर लिहिलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले . त्यातील काही फोटो सोबत जोडत आहे . 
मला भेटून पवार दांपत्याला झालेला आनंद
नर्मदा मैया ची आरती करताना आम्ही सर्व परिक्रमावासी
आम्ही सर्वांनी मिळून नर्मदा मातेची हृद्य आरती केली .त्यानंतर मला नायक लोकांनी गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवून पोटभर खायला दिली ! आणि नंतर आम्ही अंगणामध्ये एका लोखंडी पाटीमध्ये छोटीशी शेकोटी करून घरातील सर्व लोक गप्पा मारत बसलो . सर्वांनाच मी आल्याचा अतिशय आनंद झाला होता असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते . सांगून येणाऱ्या माणसाला आपल्याकडे पाहुणा म्हणतात . हा वेळ पाहून आलेला असतो . परंतु काळ वेळ न सांगता अचानक उगवणाऱ्या पाहुण्याला आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी म्हणतात . अर्थात जो तिथी न पाहता, न सांगता येतो तो अतिथी . "अतिथी देवो भव" अशी आपली संस्कृती सांगते . असा अचानक आलेला पाहुणा हा देव समजून त्याची सरबराई करावी अशी परंपरा संपूर्ण भारतात सर्वत्र आढळते . मी त्याच परंपरेचा अनुभव घेत होतो इतकेच ! नायक लोकांची २२ घरे या गावामध्ये आहेत . आणि त्यातील बहुतांश घरे परिक्रमावस्यांची मनोभावे सेवा करतात . आज सुद्धा त्या गावांमध्ये पंचवीस तीस परिक्रमावासी मुक्कामाला उतरले आहेत अशी माहिती मला मिळाली . आणि मी त्या सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली . शेजारच्या घरामध्ये एक परिक्रमावासी उतरला आहे असे मला सांगण्यात आले . घराच्या बाहेर ओळखीचे ते लाल सॅंडल दिसले आणि माझ्या लक्षात आले की हा तोच साधू आहे जो मला शेष घाटावर भेटला होता ! त्याला देखील पुन्हा मला भेटून आनंद वाटला . नाशिकचा तो चिडका बाबा सुद्धा मुक्कामी तिथेच होता ! ते देखील मला भेटून आनंदित झाले . हे गाडीने एक दिवस आधीच येऊन इकडे पोहोचले होते .जेव्हा मी मोहन साधूची चौकशी केली तेव्हा मला कळाले की मोहन साधू दुपारीच इथून पुढे गेला .आणि दोन दिवस अंतरावर असलेल्या अमरकंटकला तो उद्याच पोहोचणार होता . त्याची चाल किती चित्त्याच्या चपळाईची आहे हे मी पाहिले होते त्यामुळे त्याला ते सहज शक्य होते . अतिशय वेगाने परिक्रमा करणारे काही लोक आहेत आणि ते त्यांना सहज शक्य होते . कमी वजन ,लांब ढांगा आणि सलग न थांबता चालण्याची सवय असेल तर कुणीही खूप वेगाने परिक्रमा करू शकतो . असो .नेवाशावरून आलेली काही मराठी मंडळी भेटली जी अतिशय वेगवान चालायची .त्यामुळे सरासरी ५० किलोमीटर अंतर ती रोज तोडत होती . या सर्व परिक्रमा वाशींशी बराच वेळ मी गप्पा मारत बसलो . अखेर खूप उशीर झाला आहे असे पाहून सर्वांना नर्मदे हर केले व बुधराम पवार नायक च्या अंगणामध्ये अंग टाकून दिले . रात्रभर थंडी होतीच . पहाटे लवकर उठून नायक लोकांच्या विहिरीतील पाणी शेंदून मस्तपैकी आंघोळ केली ! माझी आंघोळ पूर्ण झाल्या झाल्या एकाने मला गरम पाणी आणून दिले ! परंतु माझी आंघोळ झालेली होती त्यामुळे मी ते एका छोट्या मुलाला देऊन टाकले . इथे लहान थोर सर्व लोक भल्या पहाटे उठतात .नायक लोकांची परिक्रमा पूर्ण झाली असली तरी संक्रांतीसाठी ते सर्वजण पुन्हा एकदा चालत अमरकंटकला जाणार होते . परंतु त्यांना वेळ होता त्यामुळे मी न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला . एका नायकने मला पुढील सर्व मार्ग नर्मदेच्या काठाने कसा आहे तो लिहून दिला . 
नायक ने लिहून दिलेला पुढील मार्ग
परिक्रमावासींची सेवा येथे राहणारा एक मराठी साधू करतो आहे असे रात्री मला कळले होते परंतु रात्री त्यांची भेट होऊ शकली नव्हती . सकाळी तरी ते महाराज भेटतात का पहावे म्हणून जाता जाता मी मथुरा नायक च्या घरापाशी थांबलो . इतक्यात ते स्वतः खोलीतून बाहेर आले आणि मला अगत्याने आत घेऊन गेले . या अवलियाचे नाव नवनाथ आहेर असे होते . यांनी पायी , गाडीने अशा सर्व मिळून सुमारे १३ परिक्रमा केल्या होत्या असे ते म्हणाले . विशेषतः आपल्या पत्नीला व छोट्याशा राघव नावाच्या मुलाला घेऊन त्यांनी अनवाणी पायांनी केलेली परिक्रमा अधिक मोलाची होती . यांनी एक परिक्रमा तर केवळ ७२ दिवसांमध्ये पूर्ण केली होती ,इतकी त्यांची चालण्याची गती होती . मथुरा नायक याने त्याच्या राहत्या घरातील एक खोली परिक्रमावासींच्या सेवेकरिता यांना दिली होती व तिथून राघव परिक्रमावासी सेवा केंद्र नावाने नवनाथ भाऊ आहेर आपले सेवा कार्य चालवीत होते .
नर्मदा कृपांकित राघव परिक्रमा सेवा केंद्राचे आता सुरू असलेले नवीन बांधकाम

 दोघा पती-पत्नींनी मला एकादशी सोडून द्वादशी चा भोजन प्रसाद घेऊन मगच पुढे जाण्याची विनंती केली .मला संक्रांतीच्या दिवशी अमरकंटक गाठायचे होते असा मानस मी त्यांना सांगितला परंतु नवनाथ आहेर यांनी ते अवघड असल्याचे सांगितले व सावकाश दुपारी जाण्याचा सल्ला दिला . माझ्या करिता त्यांनी पटपट स्वयंपाक करून नऊ वाजताच सर्व जेवण तयार ठेवले . तोपर्यंत नवनाथ आहेर यांच्याशी मी गप्पा मारत बसलो .एक अतिशय आदर्श गृहस्थ जीवन तो महापुरुष जगत होता .
नवनाथ भाऊ आहेर यांचे सोबत प्रस्तुत लेखक
 माझ्याकडे खरे तर नवनाथ भाऊला देण्यासाठी काहीच नव्हते . परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की त्यांचे युट्युब चॅनेल आहे आणि ते मॉनिटाइज करता येते हे त्यांना माहिती नव्हते . मी लगेचच त्यांच्याच मोबाईलवरून त्याना ते चैनल मॉनेटाईज करून दिले .
त्या चॅनेल ची लिंक इथे पहा . त्यामुळे आता त्याना यूट्यूब चैनल मधून थोडेसे अर्थार्जन करता येणे शक्य होणार होते . दोघा पती-पत्नींनी एकत्रितपणे केलेल्या तीन परिक्रमा हा एक विक्रमच मानला पाहिजे ! विशेषतः आपल्या पतीला इतक्या कठीण मार्गांमध्ये साथ देणारी स्त्री ( सौ .सीमामैय्या आहेर ) ही खरोखरीच वंदनीय होय ! आपल्या घरातील चार माणसांचा स्वयंपाक करताना थकणारी शहरी स्त्री कुठे आणि अचानकपणे आलेल्या शंभर दीडशे अनोळखी परिक्रमावासींसाठी न कुरकुरता आनंदाने , निस्वार्थ पणे व प्रेमाने भोजन बनवणारी ही माऊली कुठे ! दोघेही उत्कृष्ट कीर्तनकार होते . नवनाथ आहेर यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला . त्यांचे अक्षर देखील त्यांच्या जीवनाप्रमाणेच अतिशय सुंदर होते ! 
ज्यांना शक्य आहे त्यांनी नवनाथ आहेर यांना अवश्य संपर्क साधावा व त्यांच्या कार्यामध्ये जरूर हातभार लावावा !  विशेष म्हणजे इथून नर्मदेचे मूळ पात्र सहा किलोमीटर दूर होते . परंतु तिथे देखील कोणी नवनाथ भाऊंना संपर्क साधला तर ते गाडीवरती जेवण घेऊन पोहोचवण्याची व्यवस्था करत असत . मला या काठावरील मार्गाने चालायचे आहे हे मी नवनाथ आहेर यांना सांगितले . त्यांनी मला पुढचा सर्व मार्ग समजावून सांगितला आणि त्याप्रमाणे मी साडेनऊ वाजताच नर्मदे हर करून पाऊल उचलले . मोहदी गावातून ९०% लोक सडक मार्ग निवडत असतात . कारण इथूनच पुढे अमरकंटकचे भयाण जंगल सुरू होते . हे जंगल इतके घनदाट आहे की इथे चुकून जरी वाट चुकली तरी पुन्हा मूळ रस्ता सापडणे केवळ अशक्य होते . या जंगलाच्या दुर्गमतेमुळे इथे वाघासह अन्य अनेक जंगली श्वापदे सुखाने वास करत आहेत . या जंगलाचे पुरातन नाव मैकल महारण्य असे आहे . परंतु स्थानिक आदिवासी त्या जंगलाला अचानक मार जंगल म्हणतात .त्याच नावाचे अभयारण्य आता भारत सरकारने स्थापन केलेले आहे .
या जंगलाला अचानकमार असे का म्हणतात ? . इथे कुठूनही येऊन अचानक वन्य श्वापदे मारा करतात , हल्ला करतात त्यावरून हे नाव पडले आहे असे स्थानिकांनी मला सांगितले . नर्मदा परिक्रमेच्या सर्व पुस्तकांमध्ये या जंगलातून जाऊ नये असे सुचविलेले आहे .
परंतु नर्मदा मातेचा किनारा अजिबात सोडायचा नाही असा मनोमन संकल्प केलेला असल्यामुळे माझी पावले आपोआप त्या घनदाट अरण्यातील पायवाटेने निघाली .

लेखांक बावीस समाप्त (क्रमश:)

 लेखांक २३ :अविस्मरणीय संक्रांति

खाटी गावापासून तीन प्रकारचे मार्ग अमरकंटकच्या दिशेला निघतात . एक पक्का डांबरी सडक मार्ग आहे .या मार्गावरून सुमारे ९० टक्के परिक्रमावासी पुढे जातात . एक साधा पायवाटेचा मार्ग आहे ज्या मार्गे नऊ टक्के लोक जातात .आणि चंचल अवखळ छोट्याशा कन्ये प्रमाणे भासणाऱ्या रेवा राणीच्या काठाने जाणारा एक अति खडतर मार्ग आहे जो केवळ एक टक्का लोकच स्वीकारतात . माझी या अखेरच्या मार्गाने जाण्याची इच्छा होती .आणि नर्मदा मैयाने माझी या टप्प्यामध्ये चांगलीच खडतर परीक्षा देखील पाहिली .
इथे लोक नर्मदेच्या काठाने चालत नाहीत यात त्यांचा खरोखरीच दोष नाही कारण या संपूर्ण पठारावर अनेक छोटे ओढे नाले उगम पावतात आणि नर्मदेला येऊन मिळतात . परंतु मुळात नर्मदा माईच इथे इतकी छोटी आहे की तुम्हाला तुमच्या समोर आलेली नदी ही नर्मदाच आहे हे लक्षात देखील येत नाही . आणि सहज एका उडीमध्ये तुम्ही ती ओलांडून जाता आणि तुमची परिक्रमा खंडित होते . असे खूप परिक्रमावस्यांच्या बाबतीत अनेक वेळा झालेले आहे . त्यामुळे इथे स्थानिक लोक देखील तुम्हाला रस्त्याने जाण्याचा सल्ला देतात . परंतु या बाबतीत मी एक फार सोपे सूत्र लक्षात ठेवले होते . नर्मदा नदी सदैव माझ्या उजव्या हाताला राहणार होती . तसेच ती वरून खाली वाहणारी असणार होती . त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नर्मदे कडे तोंड करीन त्यावेळी तिचा प्रवाह माझ्या डाव्या हाताने उजव्या हाताला जाणारा असणार होता कारण मी नर्मदेच्या उत्तर तटावर होतो . त्याचसोबत तिला येऊन मिळणारा कुठलाही ओढा नाला नदी यांचा प्रवाह देखील डावीकडून उजवीकडे वाहणाराच असणार होता . उजवीकडून डावीकडे वाहणारा प्रवाह दिसला तर ओळखायचे आपली परिक्रमा खंडित झाली ! परंतु माझे हे सर्व भ्रम होते हे लवकरच माझ्या लक्षात आले . जंगलातील ओढे नाले ओहोळ कुठूनही कुठल्याही दिशेला वाहत होते ! त्यामुळे नर्मदा मातेचा काठ गाठणे आणि तो न सोडणे हा एकमेव उपाय होता . परंतु काठाने इतकी घनदाट झाडी होती की एक पाऊल देखील ठेवायला जागा नव्हती . मला मधून अजून सारखे असे वाटायचे की परत उलटे फिरावे आणि रस्त्याने अमरकंटकला निघून जावे . परंतु एकदा पुढे टाकलेला पाय मागे घ्यायचा नाही असे ठरवून मी निग्रहाने नर्मदा मातेचे नामस्मरण करीत चालत राहिलो . हे अतिशय सुंदर आणि घनदाट आरण्य होते . अनेक पशु पक्षांचे आवाज इथे येत होते . मला आता नीलकंठ आश्रमात जायचे होते . वाटेमध्ये मनुष्यवस्ती जवळपास शून्य आहे . मध्ये काही छोटी-मोठी गावे लागली परंतु तेथील वस्ती देखील अगदी मोजकी चार-पाच घरे अशा स्वरूपाचीच होती . हर्रै टोला नावाच्या गावाच्या हद्दीतून मी वनक्षेत्रातून चालत होतो . मध्ये काही डोंगर चढावे उतरावे लागले आणि दोन-चार मोठे ओढेनाले आले पार केले . घनदाट अरण्याचा रस्ता लागला . मार्ग विचारण्यासाठी एकही मनुष्य उपलब्ध नव्हता . झाडांवर कुणीतरी नीलकंठ आश्रमाचे हाताने लिहिलेले फलक लावले होते . त्याचा माग घेत मी नीलकंठ आश्रमात पोचलो . हे मिरीया नावाचे गाव होते .इथे नर्मदेचे ब्रह्मकुंड आहे .आश्रमात पोहोचलो आणि त्या रम्य वातावरणामुळे तिथून हलूच नये असे वाटू लागले !
अतिशय घनदाट झाडीच्या मधोमध हा आश्रम होता ! आश्रम म्हणजे कच्चे बांधकामच . त्यामुळे झाडाची लाकडे बांबू पालापाचोळा इत्यादी वापरून केलेला मंडप . दूर कुठेतरी लाकडे तोडण्याचा आवाज येत होता . मी नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर लाकूडतोड्या साधूने नर्मदे हर असा पुकारा केला ! कोणीतरी आहे असे पाहून हायसे वाटले . इतक्यात एक तरुण साधू धावतच माझ्यासमोर आला ! दुरून कोणी पाहिले तर एखादी महिला धावत येते आहे असा भास होत होता ! साधूचा आवाज देखील अतिशय हळुवार आणि मृदू होता . परमेश्वराची लीला अगाध आहे . त्याने स्त्री पुरुष हे जसे बनविले आहेत त्याचप्रमाणे त्याने पुरुषी स्त्रिया आणि स्त्रैण पुरुष देखील बनविले आहेत . हा साधू थोडासा स्त्रैण वाटत होता . या अतिशय सुस्वभावी निरलस निष्पाप प्रेमळ व  तपस्वी साधूचे नाव गौतम गिरी असे होते .
नीलकंठ आश्रमातील एक साधू

 आप पहले संक्रांति का मंगल स्नान करके आईये फिर चाय प्रशादी पाइये । असे साधने अतिशय नाजूक आवाजात मला सांगितले . मध्यप्रदेशात प्रसादला प्रशाद म्हणतात . इथे सर्रास स चा श असा उच्चार केला जातो . मी उतारा वरून खाली निघालो . मागे वळून पाहिल्यावर आश्रम सुंदर दिसत होता . 
 नीलकंठ आश्रम
वाटेमध्ये एका साधूंची समाधी होती . 
थोडासा पुढे गेल्यावर एक मोठा गणपती प्रतिष्ठापित केला होता . 

तिथून पुढे गेल्यावर नर्मदा मातेकडे पाहिले आणि डोळ्यावर विश्वासच बसेना ! आतापर्यंत पाहिलेली औरस चौरस नर्मदा मैया केवळ एका छोट्याशा ओढ्या सारखी दिसत होती !
नदीने एक झोकदार वळण येथे घेतलेले दिसत होते . एक दोन अडीच वर्षाची छोटी मुलगी काठावरती खेळत बसली होती . तिचे विशी पंचशीतले आई वडील नुकतेच स्नान आटोपून काठावरती छोटी चूल बनवून त्यावर स्वयंपाक करत होते . मध्यप्रदेशमध्ये स्नान या शब्दाचा उच्चार "अस्नान " असा करतात . तसेच आपण पिछली बार मैने ये किया था असे म्हणतो . त्या ऐवजी मध्य प्रदेशातील लोक अगली बार मैने ऐसा किया था असे बोलतात . अगली बार हा शब्द महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोक पुढच्या वेळेसाठी वापरतात परंतु मध्य प्रदेशात हा शब्द सर्रास मागच्या वेळेसाठी वापरला जातो . अशी विविध भाषा वैशिष्ट्ये वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणारच आहे .  भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर मी अनुपपूर जिल्हा सोडून शहडोल नावाच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता .नर्मदा मातेला नमस्कार करून मी संक्रांतीचे मंगल स्नान करण्याचा संकल्प सोडला. त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये मी स्नान केले . कमरे एवढ्या खोल पाण्याचा डोह तिथे तयार झाला होता . तळाशी भरपूर वाळू होती . आणि पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ होते की पाण्याचा तळ दिसत होता . पाण्यामध्ये मासे मला तरी दिसले नाहीत . का कोणास ठाऊक परंतु येथून पुढे देखील परिक्रमेतील निम्मे दिवस झाले तरी मला पाण्यामध्ये मत्स्यदेवतेचे दर्शन झालेले नव्हते ! 
आज खरे म्हणजे त्या आश्रमामध्ये मकर संक्रांतीचा मेळा आयोजित करण्यात आला होता .तसे पत्रक तिथे लावले होते परंतु आश्रमातील दोन साधू आणि ही तीन माणसे सोडता त्या संपूर्ण परिसरात कोणीही दिसत नव्हते . तिथले एक पत्रक मला प्राप्त झाले ते आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे .
स्नान करून मी आश्रमामध्ये गेलो . आत मध्ये एक धुनी होती आणि छान नैसर्गिक झाडाझुडपांनी बनवलेला आणि शेणाने सारवलेला मंडप होता , जिथे बसण्याची व्यवस्था होती . तिथे मी बसलो आणि साधूने मला कोरा चहा आणून दिला .
नीलकंठ आश्रमातील धुनी (संग्रहित चित्र )
आश्रमामध्ये बारा ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित केली होती त्यांचे देखील मी दर्शन घेतले .
नीलकंठ आश्रमातील द्वादश ज्योतिर्लिंगे

नर्मदेच्या काठी असलेल्या सर्वच गावांमध्ये पंचक्रोशी परिक्रमा अथवा पंचकोषी परिक्रमा याचे फार महत्त्व आहे . यातील मूळ शब्द पंचकोषी असा असला तरी देखील याच परिक्रमेला अनेक नावाने ओळखले जाते .आपल्या मानवी शरीराचे पाच अर्थात पंच कोष मानले जातात . या सर्वांची शुद्धी या परिक्रमेने होते अशी समजूत आहे . तसेच ही परिक्रमा मर्यादित अंतराचे अर्थात एखाद्या आश्रमापासून साधारण पाच कोस अंतर भरेल इतकीच असते त्यामुळे तिला पंचकोसी असे पण म्हणतात . उदाहरणार्थ अमरकंटक परिसराची पंचकोशी परिक्रमा खालील प्रमाणे असते . या परिक्रमेचा प्रारंभ नीलकंठ आश्रम मिरिया इथेच होतो आणि तिथून पुढे पोरकी /पोडकी , ज्वालेश्वर धाम , माई मढवा ,आमाडोब , जगतपूर , पकरी सोढा , दमगढ राम कुटी ,गणेश धुना , रुद्र गंगा ,पंचधारा आणि पुन्हा नीलकंठ आश्रम अशी यात्रा पूर्ण होते .ही यात्रा बऱ्यापैकी नर्मदेपासून दूर अंतरानेच होते आणि संपूर्ण घनघोर जंगलातून आहे . बहुतांश करून स्थानिक लोकच ही परिक्रमा करतात . दिंडोरी मधील गाडासई येथील अजय कुमार साहू नावाचे एक नर्मदा भक्त या परिक्रमेचे आयोजन करत असतात . सोबत या परिक्रमेची माहिती देखील जोडत आहे . मी नीलकंठ आश्रमात होतो तिथपासून दोनच दिवसांनी ही यात्रा सुरू होणार होती . 

आल्या आल्या मला भेटलेला तरुण साधू (गौतम गिरी) जेवून जा म्हणून आग्रह करू लागला . परंतु मी त्याला सांगितले की संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याची माझी इच्छा आहे तरी कृपया मला अडवू नये . मग मात्र त्याने मला शॉर्टकट मार्गानेच जाण्याचा सल्ला दिला .तत्पूर्वी त्याने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला आणि स्वतःची स्वाक्षरी देखील खाली केली . या नीलकंठ आश्रमाला अमरकंटक क्षेत्राचे प्रवेशद्वार मानले जाते . इथे जुहीला नदीचा संगम आहे आणि या तीर्थाला कुशावर्त तीर्थ किंवा ब्रह्मकुंड असे म्हणतात .
नीलकंठ आश्रमाचा शिक्का

त्याने सुचवलेला काठावरचा हा मार्ग पूर्णपणे नर्मदा मातेच्या काठाने जंगलातून जाणारा होता . तो धावतच पुढे पळाला आणि मला मार्ग दाखवायला सुरुवात केली . जंगलातील झाडांमध्ये ठराविक अंतराने काही चिंध्या व लाल रंगाच्या फिती बांधल्या होत्या . त्याने मला सांगितले की या फिती बघत बघत मला चालायचे आहे . मी त्याला म्हणालो तसेही मळलेली पायवाट लक्षात येतेच . परंतु त्याने पुन्हा एकदा त्याच्या विवक्षित शैलीमध्ये मला सांगितले ,"ना बाबाजी ना ! " मळलेल्या पायवाटा शोधायला जाल तर फसाल . कारण या मार्गाने खूप कमी परिक्रमावासी जातात .पालापाचोळा पडल्यामुळे पायवाटा अशा उरलेल्याच नाहीत . संपूर्ण जंगलातलाच मार्ग आहे फक्त चिंध्या बघत जाणे . चिंध्या चुकलात की तुम्ही संपलात ! मला वाटले त्यात काय एवढे सोपे तर आहे ! आणि साधूला नर्मदे हर करून मी पुढे मार्गक्रमणा सुरू केली !
मला खरोखरच माहिती नव्हते की इथून पुढे नर्मदा मैया माझी किती कठोर परीक्षा घेणार आहे ! थोडेसे अंतर जाईपर्यंत मला चिंध्या दिसत होत्या . एका ठिकाणी अचानक चिंध्या दिसायच्या बंद झाल्या . मला काही पायवाटा दिसल्या त्या पाहून मी पुढे गेलो परंतु चिंध्या दिसत नाहीत असे पाहून परत उलटा फिरलो . परंतु माघारी फिरल्यावर असे लक्षात आले की झेंडे, चिंध्या सर्व काही गायब झालेले आहे . इतक्यात चहू बाजूने अंधार दाटू लागला . खरे तर ही भर दुपारची वेळ होती . परंतु संध्याकाळी सहा-सातला पडतो तसा अंधार सर्वत्र पडू लागला . अतिशय कानठळ्या बसवणाऱ्या मोठ्या आवाजात घनगर्जना होऊ लागली ! आणि मला काही कळायच्या आत सगळे  जंगल धुक्याने भरून गेले ! मी माझ्या आजूबाजूला पाहू लागलो तर मला पाच-सहा फुटाच्या पुढचे दिसायचे बंद झाले ! सोसाट्याचा वारा सुटला सर्व झाडे जोरजोरात हलू लागली . जंगलातील धूळ माती आणि पालापाचोळा सर्वत्र उडू लागला ! एक वीज तर इतक्या मोठ्या आवाजात कडकडली की मला वाटले की बहुतेक आपल्या डोक्यावर पडणार ! आणि न भूतो न भविष्यती असा मुसळधार पाऊस सुरू झाला ! मला कुठे जावे काय करावे काहीच कळेना ! चिंध्या दिसायच्या तर पूर्णपणे बंद झाल्या होत्या . आणि आता तर पाऊस इतका मोठा होता की मला चिंध्या झाडे पाने सगळे एकसारखेच दिसू लागले . माझ्या लक्षात आले की माझी वाट लागली आहे ! अगदी थोड्याच वेळात माझे संपूर्ण दप्तर ओले चिंब भिजले ! अंगावरचे कपडे डोक्यावरचे पागोटे आणि पाठीवरची झोळी पूर्णपणे भिजली ! मी अक्षरशः वाट फुटेल तिकडे धाऊ लागलो ! मला काही केल्या रस्ता सापडेना ! मुखाने जोर जोरात नर्मदा मातेचा धावा सुरू केला ! 
(संग्रहित चित्र )
पाऊस असा कोसळत होता की जणू काही त्याचे या सर्व झाडाझुडपांशी काहीतरी वैर असावे . त्यांच्यासोबत विनाकारण मी देखील जोरदार थेंबांचा मार खात होतो . हाताला तोंडाला पाण्याचे थंडगार थेंब खूप जोरात लागत होते . मी पूर्णतः दिशाभान हरपलो होतो. माझे सर्व प्रयत्न आता संपले होते . आणि माझ्या सर्व आशा मावळल्या होत्या . मला शंभर टक्के खात्री झाली होती की आता फक्त आणि फक्त नर्मदा मैय्याच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते ! त्यामुळे मी नर्मदा मातेचा धावा करत जोरजोरात रस्ता सापडेल तिकडे धावू लागलो . हे जंगल किती मोठे आणि किती भयानक आहे याची मला त्यावेळी कल्पना नव्हती . परिक्रमा संपल्यावर जेव्हा मी गुगल नकाशावर ते जंगल पाहिले तेव्हा मला कळले की मला नर्मदा मातेने किती मोठ्या आणि कठीण प्रसंगातून मला तारले होते . वाचकांच्या माहितीकरता त्या जंगलाचा गुगल फोटो सोबत जोडत आहे . कल्पना करून पहा जर माझी वाट चुकली असती तर मी कुठे जाऊन पोहोचलो असतो !निळकंठ आश्रम ते दूध धारा याच्या दरम्यान लागणारे अरण्य आणि त्यातून वाहणारी छोटीशी नर्मदा माई

मी या वनाचा अगदी थोडासा भाग इथे दाखविला आहे . इच्छुकांनी गुगलवर जाऊन अचानकमार फॉरेस्ट किती मोठे आहे ते पाहावे . माझ्यावर अचानक हल्ला केलेल्या या पावसामुळे मला अचानक मार हे या वनाचे नाव किती सार्थक आहे ते लक्षात आले . मी मनोमन अशी प्रार्थना केली होती की आता जर तुला मला वाचवायचे असेल तर एखादी मनुष्यवस्ती किंवा आश्रम वगैरे भेटव नाहीतर मला असेच या जंगलामध्ये मारून टाक . इतक्या टोकाचा विचार करत मी धावत होतो . जंगलामध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे मी खूप वेळा आपटलो , पडलो , धडपडलो . माझे सर्व कपडे चिखलाने माखले होते . दोन्ही गुडघे हात पाय सर्व चिखलाने बरबटले होते . या पद्धतीने मी सुमारे पाचच मिनिटे धावलो असेन . अचानक मला पावसाचा जोरदार मारा लागू लागला . आणि मग माझ्या लक्षात आले की इतका वेळ मला लागणारा पाऊस काहीच नव्हता कारण तो संपूर्ण पाऊस सर्वप्रथम उंचच उंच झाडे झेलत होती . आता मात्र मी एका मोकळ्या मैदानात आलो होतो . ते मैदान नसून एक छोटेसे खळे होते . शेतकरी आपल्या धान्याची मळणी करण्यासाठी शेतातील एक भाग सपाट करून त्याला कुंपण घालतात त्याला खळे असे म्हणतात . खळे दिसले तसे माझ्या लक्षात आले की आता इथून मनुष्यवस्ती जवळ आहे ! मला खूप आनंद झाला ! मी अतिशय मनापासून नर्मदा मातेचा जयजयकार केला ! एका क्षणापूर्वी आता आपण जगणार की मरणार ही माझ्या मनामध्ये असलेली सार्थ भीती आता आशेच्या नव्या अंकुरांमध्ये रूपांतरित झाली होती ! समोर मला एक शेळ्यांचा गोठा दिसला . मी धावतच जाऊन हाका मारायला सुरुवात केली . परंतु तिथे कोणीच नव्हते . मी तसाच पुढे पळत सुटलो . आणि काही अंतर गेल्यावर एका घराचे दार मला दिसू लागले . मी पळतच दारापाशी गेलो . इतक्यात दारातून एक म्हातारा मनुष्य बाहेर आला ! त्याने मला नर्मदे हर केले आणि पटकन आत येण्याची सूचना केली .मी धावतच त्याच्या घरामध्ये शिरलो . 

 हेच ते जंगला जवळचे पहिले घर ज्याने मला भर पावसात आश्रय दिला

ज्या दारातून त्याने मला आत बोलाविले ते त्याच्या छोट्याशा वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार होते . आत एक छोटासा चौक होता . चौकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन दरवाजे आणि काही खोल्या होत्या . सर्व बांधकाम दगड मातीचे शेणाने सरवलेले आणि लाकडाने बांधून पक्क्या कौलांनी शाकारलेले होते . त्याने मला डावीकडच्या एका खोलीमध्ये आत नेले . हा त्याच्या शेळ्या बांधण्याचा गोठा होता . आत मध्ये शेळ्या नव्हत्या परंतु शेळ्यांच्या लेंड्या सर्वत्र पसरल्या होत्या . तिथे शेजारीच एका खाटेवर बाबा झोपत असे . समोर त्याने एक सुंदर शेकोटी पेटवली होती . मी थंडीने अक्षरशः गारठून गेलो होतो . लहान मुले पाण्यातून बाहेर आल्यावर जशी थडथड उडतात अगदी तशीच माझी अवस्था झाली होती .त्यामुळे त्या क्षणी मला तो गोठा स्वर्गासारखा भासला !म्हातारा मुका होता . त्याचे नाव राजाराम होते . नंतर आलेल्या त्याच्या नातीने मला त्याचे नाव सांगितले . म्हातारा त्याच खोलीमध्ये राहत असे . त्याने मला कपडे बदलायला सांगितले . शेकोटीच्या वर उष्णता लागून ते वाळतील अशा पद्धतीने त्याने ते वाळत घातले . अंगावर घातलेल्या छाटीचाच एक भाग फाडून मी त्याची नाडी आणि लंगोटी बनवत असे , त्यामुळे ती वाळायला फार सोपी ठरत असे. खोली शेणाने सारवलेली असल्यामुळे अतिशय गरम होती . समोर असलेली शेकोटी अतिशय मंद होती . त्याने माझ्याकरता ती थोडीशी अधिक प्रज्वलित केली . या माणसाने मला कमीत कमी लाकडा मध्ये मोठ्यात मोठी शेकोटी कशी पेटवावी हे त्या रात्री शिकवले . तो मुका असला तरी खुणा करून जे काही बोलायचा ते सर्व मला समजत होते .पुढील बराच काळ त्याच्या मौनाची भाषांतरे करत आम्ही गप्पा मारत राहिलो .होय ,पावसाचा जोर इतका वाढत गेला की मला त्या रात्री तिथेच मुक्काम करावा लागला . आणि अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याच्या माझ्या डावावर नर्मदा मातेने धुवाधार पाऊस पडला ! पावसाचा जोर शेवटपर्यंत ओसरला नाही . आताशी संध्याकाळ होत होती परंतु बाहेर रात्री सारखा अंधार पडला होता . राजाराम ची नात अतिशय चुणचुणीत होती . तिने मध्ये येऊन मला तिची पुस्तके वगैरे वाचून दाखवली . ती चौथी पाचवी मध्ये शिकत होती . गावात शाळा नव्हती . तिथून खूप मोठे अंतर जंगलातून चालत गेल्यावर शाळेला पोहोचता येई .राजारामने केवळ खाणाखुणा करून मला सांगितले की मी किती नशीबवान आहे आणि पुढे गेलो असतो तर माझी काय अवस्था झाली असती ! विशेषतः जंगलात वाघ आहेत आणि ते हल्ला कसा करतात हे त्यांनी त्याच्या मूक भाषेतच मला सांगितले आणि मला कळले सुद्धा . रात्री त्यांनी मला गरम गरम भात आणि हरभऱ्याच्या पातीची आंबटसर भाजी खायला दिली . भुकेने कासावीस झालेल्या जीवाला ते भोजन अक्षरशः पंचपक्वान्नांच्या तोडीचे भासले ! एकदा नर्मदा परिक्रमा पूर्णपणे पायी चालून आलेला मनुष्य कधीच त्याच्या ताटामध्ये एक कण सुद्धा अन्न वाया घालवू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे !कारण या संपूर्ण परिक्रमेदरम्यान तुम्हाला अन्नाचे महत्त्व नर्मदामाता इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगते की तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकत नाही ! वाफाळलेला तो गरमागरम भात खाल्ल्यानंतर आपोआपच डोळ्यांवर सुस्ती येऊ लागली . नर्मदा मातेची आरती व उपासना मी संध्याकाळी करून घेतलीच होती . आता मी पाठ टेकणार इतक्यात अचानक आत मध्ये २५ -३० शेळ्या शिरल्या ! इतक्या शेळ्या अचानक आलेल्या पाहून मला मौज वाटली ! सर्व शेळ्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि थंडीने गारठल्या होत्या . आत आल्या आल्या सर्वांच्या लक्षात आले की इथे कुठलातरी नवीन प्राणी बसलेला आहे ! त्यामुळे त्या सर्वच शेळ्या त्यांची पारडे ,बोकड माझ्याकडे मजेशीर नजरेने पाहू लागली ! त्यांच्या त्या नजरा पाहून मला खूप हसू आले ! शेळी हा प्राणी किती वेगवेगळे आवाज करतो हे मला त्या रात्री कळले . सर्व शेळ्या आत मध्ये आल्यावर अंग झटकण्याचा , चारा खाण्याचा , रवंथ करण्याचा , शेपूट हलवण्याचा , कान हलवण्याचा , अंग खाजवण्याचा , लघवी करण्याचा आणि टपाटप लेंड्या टाकण्याचा असे विविध आवाज येऊ लागले ! याखेरीज पारडे आपल्या आईला हाक मारतात तो आवाज आणि त्याला प्रत्युतर देणाऱ्या आया तसेच बोकड विविध कारणासाठी करतात ते विविध आवाज ऐकून मला फारच मजा वाटत होती ! सर्व शेळ्या शेक घेण्याचा प्रयत्न करत होत्या . बाबाने वरती कुठेतरी कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी जागा करून दिली होती . रात्री अचानक त्यातील कोंबड्या देखील इकडे तिकडे उडू लागल्या . एकंदरीत राजाराम बाबाच्या मुकेपणामुळे त्या खोलीमध्ये असलेली एक भेसूर शांतता या सर्व जीवांनी आपल्या अस्तित्वाने संपवून टाकली ! रात्री मला खूप छान झोप लागली . दोन-तीन वेळा काही शेळ्यांनी अंगावरच लेंड्या टाकल्यामुळे मला जाग आली . त्या लेंड्या अतिशय गरम गरम होत्या ! मला या सर्व प्रकारामुळे खूपच हसू येत होते स्वतःचे ! अमरकंटकला पोहोचण्याचे स्वप्न पाहणारा मी त्या शेळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने झोपलो होतो की जणू काही त्यांच्यातीलच एक प्राणी असावा ! शेकोटीचा सिंहाचा वाटा मात्र मी स्वतःला घेत होतो . त्या घनघोर पावसाळी रात्री आम्हाला केवळ त्या शेकोटीचाच आधार होता . पहाटे निघण्यापूर्वी राजारामच्या सुनेने मला गरमागरम कोरा चहा आणून दिला . इथून पुढे फर्रीसेमल नावाचे एक गाव पार करून मला दमगढ गावाच्या हद्दीतील रामकुटी आश्रम गाठायचा होता . पाऊस अजूनही पूर्णपणे थांबला आहे असे म्हणता येत नव्हते . अधून मधून काही टपोरे थेंब पडतच होते . मुख्य म्हणजे रात्रभर झालेल्या पावसामुळे झाडांवर साठलेल्या पाण्याचा क्षणिक पाऊस सर्वत्र पडत होता . गावातून जाणारा रस्ता कच्चा मातीचा होता . तसे रूपांतर आता चांगल्या घोटाभर ते गुडघाभर चिखलामध्ये झाले होते . एखादा ट्रॅक्टर देखील ज्यातून जाणे अवघड आहे असा चिखल सर्वत्र माजला होता .एकतर सर्वत्र घनदाट जंगल , त्यात त्या मार्गावर अजिबात वर्दळ नाही , काळीभोर सुपीक माती आणि झाडांचा पालापाचोळा वगैरे कुजून ती अधिकच सुपीक बनलेली ,त्यात अनेक नद्यांचा उगम स्थान असलेला हा मैकल पर्वत प्रदेश असल्यामुळे जमीन मुळातच पाण्याने अतिशय संपृक्त अशी होती .  त्यामुळे इथे क्षणात चिखल होत असावा. पाय रुतत होते ,सटकत होते , घसरत होते ! मज्जाच मज्जा ! माझ्या डाव्या हाताने वाहत येत उजवीकडे नर्मदे कडे झेपावणाऱ्या ओढ्या नाल्यांना पावसामुळे बऱ्यापैकी पूर आले होते . त्याचे पाणी देखील बर्फासारखे गार होते .नाही म्हणायला सुंदर अशा जंगलाची मात्र अप्रतिम साथ होती . हे जंगल इतके सुंदर होते की मी त्याचे वर्णनच करू शकत नाही . मुळात हा सर्व डोंगराळ प्रदेश . त्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र ढगाळ आणि धुकेयुक्त वातावरण होते . आपण जणू काही एखाद्या स्वर्गातून चालले आहोत असा भास व्हावा इतके सुंदर वातावरण चहू बाजूला पसरले होते . असे वाटे की आयुष्यभर इथेच राहावे ! आजूबाजूला कोणीच नाही ! कुठली माणसे नाहीत ,त्यांची स्वप्ने नाहीत ,त्यांचे अजेंडे नाहीत , त्यांचे झेंडे नाहीत, शुद्ध स्वरूपात भरून उरलेला निसर्ग एके निसर्ग ! पावसामुळे गारठले होते की काय माहिती नाही परंतु पशु पक्षांचे आवाज देखील कमीच होते . त्या निरव शांततेमध्ये त्यामुळे एखाद्या पक्षाचा आवाज आला तर तो खूप मोठा वाटे . शांतता इतकी अप्रतिम होती की फक्त माझ्या पावलांचा चिखलामुळे येणारा आवाज तितकाच कानावर पडत होता . अशा विशुद्ध शांततेमध्ये जर आपण शांतपणे उभे राहिले तर अगदी आपल्या हृदयाची धडधड देखील आपल्याला ऐकू येते . मी अध्ये मध्ये थांबून असा स्वतःचाच आवाज देखील ऐकत होतो .या जंगलातून मी दहा किलोमीटर चाललो परंतु तरीदेखील मला एकही मनुष्य भेटला नाही त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता ! एकदा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्या स्व सोबत राहण्याची सवय झाली की दुसरे काहीही नसले तरी चालते ! आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्ट इतरांसाठीच करत असतो . नर्मदा परिक्रमा धकाधकीच्या आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःसाठी जगण्याची अधिकृत संधी देते , ती तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दवडली नाही पाहिजे ! रात्री त्या चिखलातून बरेच प्राणी गेले असावेत . मला काही लांडग्यांची पावले उठत गेलेली दिसली . त्याच सोबत एका रानमांजराची पावले सुद्धा उठली होती . 
रान मांजराची पावले (संग्रहित चित्र )
रान मांजराची अशासाठी म्हणायचे कारण ती बिबट्याची म्हणावीत तर थोडी छोटी वाटत होती परंतु मांजराची म्हणावीत तर बरीच मोठी होती . मला असे लक्षात आले की लांडग्यांना पायाखाली किती चिखल आहे याचा अंदाज येत नाही ,परंतु रानमांजर मात्र बरोबर कमीत कमी चिखल असलेल्या भागातून चालत होते . जस जसा मी त्या रान मांजराच्या पावलांचा मागवा घेत चालायला सुरुवात केली तसतसे माझे चालणे एकदमच सोपे आणि सुकर होऊन गेले . त्यानंतर एकदाही माझा पाय चिखलामध्ये फसला नाही . त्या मांजराला बरोबर अंदाज होता कुठून कसे चालायचे .त्यामुळे माझा चिखलाचा त्रास कायमचा संपला . विशेष म्हणजे ते मांजर किमान पाच किलोमीटर सरळ रेषेत त्याच रस्त्याने चालले होते . त्यामुळे मी पुढच्या गावात येऊन कधी पोहोचलो माझे मलाच कळले नाही .गाव कसले छोटीशी वस्तीच ती . 
 फर्री सेमल व दमगढच्या मध्ये छोटी वस्ती

पण अतिशय सुंदर ,नीटनेटकी ,आखीव रेखीव , स्वच्छ , निर्मळ ! वनक्षेत्रातली गावे जितकी सुंदर आहेत तितकी सुंदर शहरालगची गावे अजिबात नसतात . फेरीसेमल गाव आणि दमगड गाव ओलांडून रामघाट येथील रामकुटी गाठून तिथे सदाव्रत घ्यायचे आणि मैयाच्या तटाने पुढे जात अमरकंटकला पोहोचायचे असे माझे असे नियोजन होते परंतु मैयाच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच नियोजन होते . 

लेखांक तेवीस समाप्त (क्रमश:)

 लेखांक २४ : दमगढची रामकुटी

आता फक्त थोडेसे अंतर चालल्यावर नर्मदा मातेचे उगमस्थान अर्थात अमरकंटक चे अद्भुत दर्शन होणार होते ! फेरी सेमल आणि दमगड गावे ओलांडून रामकुटी मध्ये जावे , तिथे सदाव्रत घेऊन पुढे मैयाच्या काठाकाठाचा मार्ग पकडत पुढे अमरकंटकला पोहोचावे असे नियोजन मनात सुरु होते . 
 दमगढ पूर्वीचे आरण्य
 मार्गातील खुणेच्या चिंध्या
परंतु राम कुटी आश्रमामध्ये तेथील महंत श्रीराम महाराज आलेले आहेत असे कळाले आणि त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे असे देखील गावातील लोकांनी सांगितले . त्यामुळे रामकुटीचा मार्ग पकडला . 
मार्गदर्शक फलक
मार्ग म्हणजे कच्ची पायवाटच होती आणि पावसामुळे तिचा पुरेपूर चिखलदरा झाला होता ! वाटेमध्ये बाबांना भेटायला आलेल्या शहरी भक्तांच्या चिखलात रुतलेल्या एकेक गाड्या दिसू लागल्या ! जिथे गाडी रुतेल तिथेच ती सोडून चालत जाण्याशिवाय भक्तांकडे दुसरा पर्याय नव्हता ! आधी अल्टो मारुती अशा छोट्या गाड्या चिखलात फसल्या होत्या . पुढे इंडिका , वगैरे गाड्या रुतल्या होत्या . सर्वात शेवटी इनोवा , एण्डेवर अशा मोठ्या ताकदवान गाड्या चिखलात परिपूर्ण रुतल्या होत्या ! निसर्गापुढे मानवाची ताकद किती तोकडी आहे याचे उत्तम उदाहरण होते .
प्रातिनिधीक चित्र
इतक्या साऱ्या गाड्या बघता आश्रमामध्ये गर्दी असणार याचा मला अंदाज आला . थोडे अंतर चालल्यावर आश्रमामध्ये पोहोचलो आणि तो अतिशय नितांत सुंदर परिसर पाहून मनातील सर्व थकवा क्षणात निघून गेला !
 दमगढची रामकुटी
रामकुटीतील समोर राम महाराजांची कुटी आणि उजवीकडे परिक्रमावासांची गोलाकार कुटी (निवास व्यवस्था )

 अतिशय सूक्ष्म रूपाने वाहणारी नर्मदा मैया ,तिचा सतत कानावर पडणारा खळखळ आवाज आणि महाराजांनी उभ्या केलेल्या दोन-तीन छोट्याशा कुटी इतकाच आश्रमाचा पसारा होता . 
दमगढ मधून वाहणारी छोटीशी नर्मदा मैया

आश्रमाला छोटेसे कुंपण केलेले होते . आत प्रवेश करता क्षणी सुंदर मातीने चोपून ,बडवून तयार केलेले सुंदर सपाट व प्रशस्त अंगण व त्या शेजारी मधोमध मोठे लाकूड लावून त्याच्या आधारे बांधलेली गोलाकार सुंदर अशी कुटी होती . 
गोलाकार झोपडीचा आतील भाग
महाराजांची एक कुटी
बाबांची सर्व भक्त मंडळी कुटीमध्ये बसली होती . सर्व मोठ्या मोठ्या शहरातील माणसे होती . भोपाळ ,इंदोर , देवास ,बडोदा ,जबलपूर अशा विविध ठिकाणची माणसे तिथे आली होती . मी आलो आहे हे पाहताच सर्व मंडळी उठून उभी राहिली व सर्वांनी मला बसायला आसन दिले . आपल्या मराठी भाषेत म्हण आहे शितावरून भाताची परीक्षा , अगदी त्याच पद्धतीने शिष्यावरून गुरुची परीक्षा करता येत असते . या सर्व शिष्यांचे नम्रपणे वागणे बोलणे व सेवाभाव पाहून माझ्या लक्षात आले की यांचे गुरु देखील खूप चांगली व्यक्ती असणार . श्रीराम महाराज कुठे आहेत अशी पृच्छा मी केल्यावर सर्वांनी मला सांगितले की महाराज त्यांच्या कुटीमध्ये ध्यानस्थ बसलेले असून थोड्याच वेळामध्ये ते बाहेर येतील आणि सर्वांना दर्शन देतील . 
तोपर्यंत मला पिण्यासाठी थंडगार पाणी आणि गरम गरम चहा आणून दिला गेला .सोबत बिस्किटे देखील दिली . एरव्ही मी बेकरी उत्पादने फारशी खात नाही . माझी १९१४ साली जन्मलेली आजी तर पाव ,ब्रेड ,बिस्किटे या सर्वांचा कुत्र्याचे खाणे अशा शेलक्या शब्दांमध्ये उद्धार करायची . परंतु नर्मदा परिक्रमेदरम्यान मात्र बिस्किटे खाण्याला पर्यायच उरत नाही , इतकी ती तुम्हाला योग्य वेळी योग्य तेवढी ऊर्जा देणारी ठरतात . 
ध्यानस्थ बसलेले श्रीराम महाराज (संग्राहित चित्र )
शिष्य मंडळींनी मला महाराजांविषयी अधिक माहिती देण्यास सुरुवात केली . जबलपूर आणि कटनी यांच्या मधोमध घनदाट जंगलातील एका पहाडावर महाराजांचा सिद्धन धाम नावाचा आश्रम आहे .ह्याच डोंगराला लोढा पहाड असे सुद्धा म्हणतात . इथे महाराज बहुतांश वेळ वास्तव्याला असतात .सिताराम शरण महाराज नावाचा त्यांचा एक शिष्य तिथे त्यांच्यासोबत राहतो .महाराजांना काही नाव नाही . काही लोक त्यांना राम महाराज म्हणतात . काही श्रीराम महाराज म्हणतात . काही सिताराम महाराज म्हणतात . महाराज स्वतः विषयी फारसे बोलत नाहीत . इथे फार मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जा असते .या स्थानाची काही छायाचित्रे गुगल नकाशावरून मिळाली ती सोबत टाकत आहे . 
लोढा पहाड चा खडा चढ
लोढा पहाड
आश्रमाचे प्रवेशद्वार
पहाडावरील सिद्ध गुफा ,अशा अनेक गुफा आहेत
पहाडावरून दिसणारे खालचे दृश्य
श्री सिताराम शरण महाराज (श्रीराम महाराजांचे शिष्य )

आम्ही परिक्रमेविषयी गप्पा मारत बसलो होतो इतक्यात अतिशय तार सप्तकात एक गूढरम्य अद्भुत शंखनाद सुरू झाला ! सर्वजण ताडकन उठून उभे राहिले ! श्रीराम महाराजांचे ध्यान संपल्याची ही सूचनात्मक खूण होती . महाराजांनी तीन वेळा शंखानाद केला .
शंखनाद करतानाची राम महाराजांची मुद्रा
आपण एरवी ऐकतो तसा हा शंखनाद नव्हता तर शंखनाद संपवताना महाराज एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत होते ,जो धरून ऐकताना एखाद्या वन्य श्वापदाच्या ओरडण्याप्रमाणे वाटत असे . खरे म्हणजे हा शंख नसून छोट्या आकाराची एक शंखिणी होती .हिला फुंकण्यासाठी अधिक दमसास लागत असतो .एखाद्या योग्यालाच जमणारे हे काम आहे .सर्वांना जमणारे नाही .मी धावतच कुटीच्या दारामध्ये गेलो . इतक्यात महाराज कुटीतून बाहेर आले ! अतिशय तेजस्वी मूर्ती .पक्के योगी असावेत हे लक्षात येत होते .
राम महाराज /श्रीराम महाराज /सिताराम महाराज / लोढा पहाडी वाले बाबा / रामकुटी वाले बाबा
उंची जेमतेम पाच फूट पाच इंच असावी . वजन ४० किलोच्या वर नसावे परंतु चेहऱ्यावर आणि सर्वांगावर खूपच तेज विलसत होते . महाराजांनी पिवळ्या रंगाची छाटी घातली होती .आणि जटा भार व दाढी वाढविली होती .पायात लाकडी खडावा होत्या . महाराजांचे वय फारसे नसावे .तरुणच वाटत होते .परंतु परिक्रमेमध्ये जसजसा अनेक साधूंना भेटू लागलो तसतसे हळूहळू माझ्या लक्षात आले होते की नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केल्यामुळे पन्नास वर्षाचा साधू देखील वीस-बावीस वर्षाच्या मुलासारखा दिसायचा .त्यामुळे साधूचे वय शोधण्याच्या भानगडीत शहाण्या माणसाने कधीच पडू नये . नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ न शोधलेलेच उत्तम ! महाराज कुटीतून बाहेर आले ते थेट नर्मदेच्या काठी गेले आणि त्यांनी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला . सकाळीच महाराजांनी नर्मदा मातेला साडी चोळी नेसून शृंगार केला होता .महाजनो येन गताः स पंथः । असे शास्त्र वचन आहे त्यामुळे मी देखील नर्मदा मातेला मनापासून नमस्कार केला . दरम्यान महाराजांच्या एका शिष्याने हा प्रसंग त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि माझ्याकडून मित्राचा क्रमांक घेऊन त्याला पाठवून दिला .
या खडकावर बराच वेळ बसून राहिलो . अमरकंटक कडून वहात येणारी बाल नर्मदा इतकी सुंदर ,लोभस आणि गोजिरवाणी होती की तिचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे खरोखरीच शब्द नाहीत . अगदी इथे सुद्धा नर्मदेच्या जलाचा तो विवक्षित रंग स्पष्टपणे दिसत होता .इतर नद्यांसारखे नर्मदेचे पाणी संपूर्ण पारदर्शक अजिबात नाही . त्यात निळसर हिरवट राखाडी छटा आहे . तोच रंग ,तीच चव , तेच प्रेम आणि तेवढीच कृपा ! दुपारची वेळ असून देखील सर्वत्र भरपूर धुके दाटलेले होते . कुठल्यातरी अदृश्य स्वर्गातून नर्मदा प्रकट होत आहे असे ते दृश्य वाटे .आपण सोबत जोडलेली चित्रे पुन्हा पुन्हा नीट पहा आपल्याला नर्मदा मातेचे सौंदर्य लक्षात येईल !
महाराजांच्या कुटीमध्ये कोणाला सहजासहजी प्रवेश नव्हता असे तिथले वातावरण पाहून लक्षात आले . परंतु महाराजांनी मला आवाज दिला आणि आत मध्ये बोलावून घेतले . माझ्याशी अर्धा पाऊण तास चर्चा महाराजांनी केली . या भागामध्ये वेगाने होत असलेल्या ख्रिस्तीकरणाबाबत आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो याबाबत आमची साधक-बाधक चर्चा झाली . महाराजांनी मोठ्या आस्थेने परिक्रमेची आणि वैयक्तिक विचारपूस केली . मी बाहेर आल्याबरोबर महाराजांचे सर्व शिष्य माझ्या भोवती गोळा झाले आणि म्हणाले तुम्हाला महाराजांनी आपणहून आत बोलावले याचा अर्थ तुमची परिक्रमा सफल झाली ! कारण ते सहजासहजी कोणाशी असे बोलत नाहीत आणि आत मध्ये तर कोणालाच येऊ देत नाहीत . शिष्यांचा आपल्या गुरुप्रति असलेला तो भाव पाहून मला थोडीशी मौज वाटली आणि बरे देखील वाटले . गुरु चरणी ठेविता भाव । आपोआप भेटे देव ।ही उक्ती सार्थच आहे . महाराज मला म्हणाले चला आपण आता हवन करू या ! आणि बाहेर येऊन त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले आणि आश्रमाच्या समोरच जमिनीवर सर्वांना गोलाकार बसविले .एक शिष्य म्हणाला इथे यज्ञकुंड कुठे आहे ? गुरुदेव म्हणाले अरे साक्षात भुमी माता अग्नीला धारण करू शकत असेल तर वेगळया यज्ञकुंडाची गरज ती काय ? त्यांनी लगेच एक गोवरी आणि काही समिधा आणविल्या . त्याच गावातील एक तरुण युवक  आश्रमामध्ये परिक्रमावासींच्या सेवेसाठी दिवसभर राहत असे .त्याने पळत येऊन सर्व तयारी करून दिली .गुरुजी म्हणाले प्रत्येकाने आपापल्या गुरु मंत्राचे स्मरण करून १०८ वेळा हवन करावे . आम्ही नर्मदा मातेच्या काठावर तिच्यापासून अगदी पाच-सहा फुटावर बसून हे अलौकिक हवन केले .शेजारीच एक छोटेसे शिवमंदिर बांधलेले होते त्याला लागूनच मी बसलो होतो .
हवनाची जागा व मंदिरामागे वाहणारी नर्मदा माता .
राम महाराजांना संस्कृत मंत्र उच्चारण्याची भारी हौस होती असे माझ्या लक्षात आले .त्यांचे पाठांतर काही विशेष नसावे परंतु तरीदेखील चुकीचा मंत्र सुद्धा ते अतिशय रेटून आणि मोठ्याने म्हणत त्यामुळे ऐकणाऱ्याला बरोबर आहे असं वाटे ! त्याशिवाय स चा श आणि श चा स करण्याची सवय त्यांना देखील होती त्यामुळे मंत्राचा अर्थच बदलून जायचा ! सर्व चा शर्व होऊन जायचा ! शरणाचे सरण होऊन जाई ! परंतु त्यांचा भाव श्रेष्ठ असल्यामुळे  आणि साधुत्वाच्या अधिकारामुळे हे सर्व निश्चितच क्षम्य आहे . मी आपले एक जाता जाता निरीक्षण नोंदवून ठेवले इतकेच ! 
महाराजांनी नर्मदा मातेला नैवेद्य दाखविला . एक एक घास हाताने त्यांनी मैय्याला प्रेमाने भरविला . अगदी संपूर्ण ताट रिकामे केले . 
हळूहळू या परिसरामध्ये अनेक ग्रामस्थ जमू लागले .सर्व वनवासी बांधव होते . माता-भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती . आज इथे या सर्वांसाठी भंडारा ठेवला होता . गंमत म्हणजे यातील काही लोक समोरच्या दक्षिण तटावरून इकडे आरामात नर्मदा मैया ओलांडून चालत येत होते . हातामध्ये पादत्राणे घेऊन येताना कुठे गुडघाभर तर कुठे कंबरभर इतकेच पाणी होते .ते देखील दोन-तीन दिवस सलग झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती नाहीतर पाणी याहून कमी असते असे स्थानिकांनी मला सांगितले . बाकी कुठे पाऊस पडो न पडो , या भागामध्ये मात्र घनदाट झाडी असल्यामुळे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे नेहमी पाऊस पडतो असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदविले .
महाराजांनी मला भंडारा घेऊन , आजचा दिवस विश्रांती घेऊन उद्या प्रस्थान ठेवण्याची आज्ञा केली . "आज दिनभर आप भोजन प्रशादी पा करके भ lजन करिये और कल सुबह निकल जाना । " त्यांच्या करारी आवाजातील ही आज्ञा मोडण्याची शक्यता नव्हतीच . गोल झोपडी मध्ये भक्त मंडळी गोल फेर धरून रामनामाचा जप करू लागली . त्यांच्या चालण्यांमध्ये आणि नृत्या मध्ये एक प्रकारची संथ , मंद अशी गती व अतिशय नयन मनोहर लय होती . तिथे बंगाली खोळ हे वाद्य ठेवलेले होते .मी ते घेऊन वाजवायला सुरुवात केली . खरे म्हणजे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी घोड्यावरून पडून माझ्या उजव्या हाताचे मोठेच फ्रॅक्चर झाले होते . आणि ते अजून पुरेसे भरूनच आले नव्हते कारण ते भरून येण्यापूर्वीच मी पुन्हा ड्रायव्हिंग व इतर कामे सुरू केली होती . त्यात परिक्रमा सुरू झाल्यावर उजव्या हातामध्ये दंड आणि कमंडलु धरल्यामुळे त्या हाताच्या हाडाला कायमचा बाक आला . त्यामुळे मला वाद्य वाजवता येईल का नाही याची शंका होती .परंतु नर्मदा मातेचे स्मरण करून वाजवायला सुरुवात केली आणि हात सुरळीत चालू लागला . तिथे अजूनही काही वाद्ये होती . मला वाद्य वादनाची आणि संगीताची उपजत आवड आहे . त्यामुळे मी तबला , पेटी ,खोळ इतकेच काय माझे तोंडही पुरेसे वाजवून घेतले . एक परिक्रमावासी आपल्याला साथ देतो आहे हे पाहून ग्रामस्थांना अजून चेव ,अजून हुरूप चढत होता . थोड्यावेळाने तिथे अजून तीन चार परिक्रमावासी आले . एक अतिशय म्हातारे आजोबा ज्यांच्या तोंडामध्ये एकही दात नव्हता ,त्यांच्यासोबत रमेश जाधव नावाचा बकावा मध्य प्रदेश इथला रहिवासी , नामदेवराव भोळे नावाचे जळगाव असोदा इथले रहिवासी , आणि पवन श्रीकांत नाईक नावाचे नगर येथील एक परिक्रमावासी असे हे सर्व लोक होते . नाईक बुवांनी आल्यावर एक गाणे म्हणू का असे लोकांना विचारले . मी आपला तबला सरसावून बसलो . त्यांनी मला खुणेनेच तबला वाजवू नको असे सांगितले . मला काही कळेना . असे का सांगत असावेत . इतक्यात त्यांनी मोबाईलवर तानपुरा लावला आणि अतिशय सुंदर असा षड्ज आसमंतात घुमू लागला . अतिशय धीर गंभीर आवाजात त्यांनी घेतलेले आरोह आणि आरोह ऐकून माझ्या लक्षात आले की हे कोणी सामान्य गायक नसून एक महान गान तपस्वी आहेत . मी शास्त्रीय संगीताला अनेकदा साथ केलेली असल्यामुळे त्यांची चीज सुरू होताच आपसूकच माझा हात समेवर पडला आणि बुवांच्या लक्षात आले की समोरचा मनुष्य देखील थोडाफार जाणकार दिसतो आहे ! मग मात्र त्यांनी अत्यंत आनंदाने मानेनेच मला वाजवण्याचे अनुमोदन दिले . त्यांच्या अपेक्षेपेक्षा माझी साथ बरी निघाली असे नंतर ते मला म्हणाले ! त्यांचेही बरोबर होते .इतक्या दूर जंगलामध्ये एखाद्या वनक्षेत्रामध्ये एखादा शास्त्रीय संगीताला साथ करू शकणारा वादक मिळणे कठीणच होते. न पेक्षा चालू असलेले गाणे बिघडवणारा एखादा धांगडधिंगा तबलजी समोर बसला असावा असा कोणाचाही समज , माझ्या अवताराकडे पाहून होणे स्वाभाविक होते . त्यात बुवा पडले पट्टीचे शास्त्रीय गायक ! पंडित विकास कशाळकर यांच्याकडे त्यांची तालीम झालेली होती आणि पुणे विद्यापीठातील ललित कला क्रीडा केंद्राचे ते विद्यार्थी राहिले होते . दोघांचे अनेक मित्र संगीत क्षेत्रामुळे सामायिक निघाले ! मग मात्र नाईक बुवा परिक्रमेबद्दल भरभरून बोलले ! त्यांची परिक्रमा अतिशय गतिमान पद्धतीने सुरू होती . नाईक बुवा सुफी संगीत देखील गातात त्यामुळे त्यांचा वरवर पाहता वेश एखाद्या मुसलमान फकिरा सारखा वाटायचा . परंतु मनाने ते अत्यंत निर्मळ आणि अतिशय टोकाचे आध्यात्मिक होते . त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शब्दातून समोरच्याला काही ना काही शिकायला मिळत होते . त्यांच्यासोबत असलेले असोद्याचे नामदेवराव यांना परिक्रमेत पाहून तर कोणी सांगूही शकले नसते की हे केवळ कोट्याधीशच नव्हेत तर अब्जाधीश आहेत ! पुण्यामध्ये त्यांचे स्वतःचे हॉटेल होते शिवाय जळगावला व्यवस्थित घरदार होते . परंतु तेही अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने परिक्रमा करत होते . रमेश जाधव यांचे गाव बकावा . मला आधी जाधव आडनावामुळे ते मराठी आहेत असे वाटले . परंतु ते शुद्ध हिंदी भाषिक होते . उत्तर भारतामध्ये य चा ज करण्याची पद्धत आहे . ( यशोदा > जशोदा । यादव > जाधव ) . व चा ब करण्याची पद्धत आहे (विहार > बिहार । व्रज > बिरज ) त्यामुळे त्यांचे आडनाव जाधव होते . त्यांनी मला मोबाईल क्रमांक विचारला .परंतु माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर ते मला म्हणाले अरे मग तू आमच्या गावी जेव्हा येशील तेव्हा मला कसा काय भेटणार ? कारण त्यांचे गाव नर्मदेच्या काठावर असून इथे शिवलिंगे बनवण्याची लाखो वर्षांची परंपरा आहे . तो व्यवसाय मी पहावा अशी त्यांची इच्छा होती . मी त्यांना म्हणालो जैसी मैया की इच्छा ! आणि आम्ही पाचही जण पुन्हा एकदा नर्मदेच्या काठावरती गेलो ! आत मध्ये भजन सुरूच होते . आम्ही त्या भजनाच्या तालावर नर्मदा मातेच्या पात्रामध्ये उभे राहून अक्षरशः लहान बाळाप्रमाणे नाचत होतो . अतिशय धुंद तल्लीन अशी ती अवस्था होती . इतक्यात रमेश जाधव थरथरत्या हाताने नर्मदेचा एक व्हिडिओ घेऊ लागले . मी त्यांना म्हणालो तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला स्थिर हाताने एक बरा व्हिडिओ घेऊन देतो . आणि तिथे आम्ही काही व्हिडिओ फोटो इत्यादी काढले . पुढे परिक्रमा संपल्यावर मला श्रीक्षेत्र गोंदविले येथे नाईक बुवा अचानक भेटले आणि मग त्यांनी मला सगळे व्हिडिओ फोटो दिले ! ते आपल्या सर्वांसाठी सोबत जोडत आहे . या व्हिडिओमध्ये आपल्याला नर्मदा माता उगमाच्या जवळपास किती बाल स्वरूपात आहे त्याचे दर्शन होते . तिचा आवाज देखील ऐकायला मिळतो . आणि दुपारी बाराच्या सुमाराला देखील अमरकंटकचे जंगलात किती घनदाट अंधार असतो ते पाहायला मिळते . नर्मदेला नेसलेल्या ५वार साडीच्या मापा इतकीच तिची रुंदी आहे ! व्हिडिओ आवर्जून पहा .
राम कुटी येथे मी बनविलेला छोटासा व्हिडिओ
व्हिडिओमध्ये मागे बसलेले रमेश जाधव , डावीकडून उभे नामदेवराव , नाईक बुवा , आजोबा आणि नर्मदा मैया !
आम्ही घेतलेला सेल्फी व्हिडिओ !
आता मात्र हळूहळू ग्रामस्थांची संख्या चांगलीच वाढली सुमारे दोनशे अडीचशे लोक तिथे जमा झाले . भोजनाच्या पंगती बसल्या . मला मोठ्या पंक्तीमध्ये वाढण्याची आवड आहे परंतु परिक्रमा वासींना नर्मदा खंडामध्ये कुठलेही काम करू दिले जात नाही . एका कोपऱ्यामध्ये बसून आम्ही भोजन प्रसाद घेतला . महाराजांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जीवाला वीस रुपये दक्षिणा दिली ! नंतर माझ्या असे लक्षात आले की बरीचशी गरीब आदिवासी मंडळी केवळ दक्षिणा पदरात पडेल या हेतूने घरातील सर्वांना घेऊन आली होती ! आणि त्या निमित्ताने भजन पूजनामध्ये सहभागी झाली होती . अतिशय दारिद्र्य असलेला हा भाग होता . आणि महाराजांचे कार्य तिथे लोकांना आवडत होते . जेवण झाल्यावर लोकांनी थर्माकोलच्या पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लास इतस्ततः फेकायला सुरुवात केली . आणि मला परिक्रमेच्या संपूर्ण प्रवासादरम्यान पहिल्यांदाच प्लास्टिक प्रदूषण काय दर्जाचे होते आहे याची झलक पाहायला मिळाली ! मी ताबडतोब सर्व पत्रावळी आणि पेले उचलायला सुरुवात केली . मी सोबतच्या तरुण आणि लहान आदिवासी मुलांना देखील माझ्यासोबत पत्रावळी आणि ग्लास उचलण्याची विनंती केली . परंतु त्यांच्यापैकी कोणीही पुढे आले नाही कदाचित त्यांना लाजरेपणा बुजरेपणा आड येत असावा . मी मात्र साधारणतः तासभर खपून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला . महाराजांच्या शिष्यांपैकी एका शहरी शिष्याने मला नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले प्लास्टिक गोळा करण्यासाठी अमूल्य मदत केली .कारण मला ते करता येणे शक्य नव्हते . इथे मैयाचे पात्र इतके लहान आहे की चुकून सुद्धा ते पार होऊ शकते . दरम्यान नाईक बुवा आणि मंडळी अतिशय वेगाने पुढे निघून गेली .कारण त्यांना आज कुठल्याही परिस्थितीमध्ये अमरकंटकला पोहोचायचे होते . आणि अमरकंटक इथून कागदोपत्री दहा किलोमीटर दिसत असले तरी संपूर्ण मार्ग जंगलातला असल्यामुळे दुप्पट वेळ लागायचा . मला मात्र मध्ये असलेल्या दुधधारा , पंचधारा ,कपिलधारा इत्यादी अवस्था पाहत पाहत निवांत जायचे होते . त्यामुळे मी आश्रमातच मुक्काम करण्याचे निश्चित केले ! त्या रात्री एक भयंकर घटना घडली !

लेखांक चोवीस समाप्त (क्रमश:)

 लेखांक २५ : जंगल मे मिल, तुझे काट डालूँगा ।

नर्मदेतील सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करून झाल्यावर मी त्या निर्मळ , नितळ पाण्यामध्ये आकंठ स्नान केले ,उपासना केली आणि प्रचंड थंडीचा अनुभव घेत बसून राहिलो . आज मी संक्रांतीच्या उत्तर पर्वावर साक्षात अमरकंटकच्या प्रवेशद्वारातून आत शिरत नर्मदा मातेमध्ये पुन्हा एकदा मंगल स्नान केले होते याचा आनंद वाटत होता ! दिवसभरात अजून काही परिक्रमा वासी त्या कुटीमध्ये मुक्कामासाठी आले . अमरावतीचा एक परिक्रमावासी होता . हा चित्रकार होता.आळंदी मधील दोन वारकरी विद्यार्थी होते .नाशिक मधला चिडका बाबा देखील पोहोचला होता . अचानक भर दुपारी हुतात्मा भगतसिंगांसारखा दिसणारा एक सहा फुटी उंचापुरा धिप्पाड साधू प्रकट झाला . त्याने कमरेला छोटीशी काळी लुंगी गुंडाळली होती . अंगावरती काळे पांढरे चट्टे पट्टे असलेले ब्लॅंकेट होते . डोक्याला पटका होता . भस्म विलेपित शरीर डोक्यावर जटा आणि नजरेत भरेल इतपत पिळदार देहयष्टी !हा चित्र विचित्र हातवारे करून स्वतःशीच असंबद्ध बडबड करत असे .तसेच अखंड गांजा पीत होता . 
त्या साधूची प्रकृती साधारण अशी होती (संग्रहित चित्र )
 मी भजनात बंगाली खोळ वाजवत असताना त्याने मला थांबायला लावले . मी देखील साधूच्या शब्दाचा मान म्हणून थांबलो . तो मध्येच हसायचा ,मध्येच सचिन्त  व्हायचा. सगळेच अगम्य चालू होते . खरे म्हणजे विदेही अवस्थेप्रत पोहोचलेले काही महात्मे असतात . परंतु ते लगेच कळतात . हा मला काहीतरी वेगळाच प्रकार वाटला . तसेच इतकी सोन्यासारखी प्रकृती असून त्याचे अखंड धूम्रपान बघून मला थोडेसे वाईट देखील वाटले .दुपारी सर्व भोजन व दक्षिणा आटोपल्यावर महाराज आपल्या शिष्यांसमवेत निघून गेले . महाराजांच्या शहरी शिष्यांसाठी नवी कोरी ब्लॅंकेट कुटीमध्ये काढली होती . ब्लॅंकेट कसली अतिशय तलम आणि सुंदर ऊब असलेल्या त्या दुलया होत्या ! सर्वांनी शिष्य गेल्याबरोबर पटापट दोन दोन दुलया अंगावर पांघरून घेतल्या ! इतक्यात आश्रमातला स्थानिक व्यवस्थापक आला आणि त्याने सांगितले की या दुलया तुमच्यासाठी नाहीत . अंधार पडल्यामुळे हाडे गोठवणारी थंडी सुरू झाली होती . त्या दुलई मधून बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती . सर्वजण त्याच्याशी भांडू लागले . मला योग्य वेळी नर्मदा मातेने परिक्रमावासीयांनी कसे वागावे कसे वागू नये हे साधूंमार्फत सांगितले होते . त्यामुळे मी माझ्या दुलया परत करून शांतपणे ते भांडण पाहत राहिलो . सोबतचे चार-पाच परिक्रमावासी दुलई देण्यासाठी राजी नव्हते , मी देखील दुलया परत देऊ नये असे ते मला सांगत होते.त्यांचे असे म्हणणे होते की शहरी भक्तांसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय असा दुटप्पीपणा का करता ?
तो मुलगा मला म्हणाला , बाबा आप कुछ बोलते क्यू नही ? मग मी समजावणीच्या स्वरामध्ये सर्वांना सांगितले . हे पहा सज्जन हो, शहरी भक्त महाराजांच्या विविध आश्रमांच्या बांधकामाचा , संचालनाचा व अन्नदान यज्ञयागादि सर्व कर्मकांडाचा , प्रवासाचा , निवासाचा, दानधर्माचा पूर्ण खर्च उचलत असतात . त्यांना सुखरूप आणि आनंदामध्ये ठेवणे हे आश्रमाचे कर्तव्य आहे . तसेच शहरातील सर्व पंचतारांकित सुविधा त्यागून अचानक जंगलामध्ये आल्यावर त्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा मऊशार दुलया त्यांना  आश्रमाने दिल्या तर त्यात काही वावगे नाही . आपण आश्रमासाठी काहीच करत नसून केवळ काही तासांचे पाहुणे आहोत . शिवाय आपण सर्वजण इथे आपल्या सुखांचा त्याग करण्यासाठी आलेले आहोत . आपण अशा किरकोळ गोष्टीचा खेद मानू नये . आळंदीच्या मुलांकडे पाहून मी म्हणालो ,तुकोबाराय म्हणतात , जैसी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक ते पाहे संचिताचे ॥हे बरोबर आहे ना ? अमरावतीचा परिक्रमावासी फारच सालस , समजूतदार , अध्यात्मिक आणि हुशार होता . तसेच ही त्याची दुसरी परिक्रमा होती . पहिली परिक्रमा अमरकंटक नजिकच खंडित झाली होती . त्यामुळे तो पुन्हा परिक्रमेला आला होता . तो आणि आळंदीचे विद्यार्थी माझ्याशी सहमत झाले . नाशिकचा म्हातारा तरी देखील ऐकत नव्हता . अखेरीस मी त्या मुलाला हात जोडून विनंती केली . हे पहा आम्ही सर्व गृहस्थी अथवा सर्वसामान्य परिक्रमावासी आहोत . परंतु हा जो उंचापुरा साधू आपल्या सोबत आहे तो मात्र साधू जीवन जगतो आहे .तरी कृपा करून त्याला दुलई द्यावी कारण त्याच्या अंगावर फारशी वस्त्रे सुद्धा नाहीत . हा तोडगा सर्वांना मान्य झाला आणि निरीच्छेनेच सर्वांनी आपापली पांघरुणे त्याच्या ताब्यात दिली . त्या दुलईची घडी इतकी मोठी व्हायची की एकावेळी एकच उचलता यायची . साधू मात्र त्याच्या दुलई मध्ये मस्त गुरफटून झोपून गेला .सर्वत्र निरव शांतता पसरली . हळूहळू संपूर्ण परिसरामध्ये फक्तआणि फक्त नर्मदा मातेचा झुळझुळ आवाज तेवढा उरला . रात्री कुटीच्या बाहेर कोणीही पडू नका अशी सूचना देऊन सेवक गेला होता . कारण रात्री वाघ व अन्य हिंस्र श्वापदे पाणी प्यायला यायची .परंतु तरीदेखील एकदा नर्मदा मातेचे दर्शन घ्यावे म्हणून मी बाहेर आलो . आणि समोरचे दृश्य बघून मी स्वतःलाच विसरून गेलो ! पौर्णिमेचा टपोरा चंद्र डोक्यावर होता ! चांदण्यांचा लखलखाट होता . आकाशातून जणु पृथ्वीवर रुप्याचा वर्षाव होत होता . नर्मदा मातेचा सूक्ष्म खळखळ खळखळ आवाज आसमंतामध्ये निनादत होता . त्या खळखळाटामध्ये पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अक्षरशः हिऱ्याच्या खाणी सारखे चमकत होते ! ते स्वर्गीय दृश्य पाहून भान हरपले ! आपण कोण आहोत आपण कुठे आहोत या सगळ्याचा विसर पडला ! काही काळ मी तसाच स्तब्ध उभा होतो . 
 ( प्रातिनिधीक चित्र )
कानामध्ये नर्मदा मातेचा तो आवाज इतका खोल साठविला गेला की दुसरे काही ऐकू यायचे बंद झाले ! मनातील विचारांची जागा त्या खळखळाटाने घेतली . डोक्यात फक्त एकच विचारधारा सुरू झाली .खळखळ खळखळ शिव  शिव शिव शिव. चित्तवृत्ती पूर्णपणे निमाल्या . एका अलौकिक अस्तित्वाची अनुभूती येत होती . अनुभूती देणारा कोण व घेणारा कोण असा भेदच मुळी जाणवत नव्हता . आपण एका भयानक अरण्याच्या मधोमध अंधारात एकटेच उभे आहोत याचे देखील भान उरले नव्हते . अचानक समोरच्या तटावर झाडीतून मोठा आवाज झाला . एखाद्या धिप्पाड अवाढव्य श्वापदाच्या पळण्याचा तो आवाज होता . कदाचित रानडुक्कर असावे . कारण वाघ असा आवाज करून कधी पळत नाही . त्याच्या तळपायाला असलेल्या मऊ गाद्यांमुळे त्याच्या पायाचा आवाज येत नाही . नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार करून मी पुन्हा कुटी मध्ये आलो . कुटीला दार नव्हतेच परंतु त्यामुळे आतून एक खाट लावून ती बंद करावी लागे . तशी मी केली .आणि शांतपणे पाठ टेकली . ही कुटी अगदी नर्मदेच्या काठावर असल्यामुळे आत मध्ये देखील तोच आवाज रुंजी घालत होता . उलट छताच्या विशिष्ट आकारामुळे आत मध्ये हा आवाज परावर्तित होऊन अजूनच स्पष्ट ऐकू येत होता ! 
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी । पाहिली शोधूनी अवघी तीर्थे ॥ हे सेना न्हावी महाराजांचे शब्द मनोमन स्मरले . नर्मदा मातेचा तो वैखरी मधील जप ऐकत डोळे मिटले . याच अवस्थेत कायमचे डोळे मिटावेत तर किती भाग्याचे ठरेल असे वाटू लागले ! इतक्यात ...
इतक्यात कानावर शब्द पडले . . .
काटा लगा ऽऽऽऽऽऽऽऽ 
हाय लगा ऽऽ आ आजा ss राजा
बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
मला एक क्षणभर कळायचेच बंद झाले की ही गाणी एवढ्या घनघोर जंगलामध्ये लावली कुणी ? कारण दमगढ गाव तरी इथून दोन किलोमीटर दूर होते .रात्रीच्या शांततेत कदाचित आवाज इतका दूर ऐकू येऊ शकतो . परंतु हा आवाज फारच मोठा होता . उठून बसलो आणि आजूबाजूला पाहू लागलो . मग माझ्या लक्षात आले की  डोक्यापासून पायापर्यंत गुरफटून घेतलेल्या साधूच्या दुलईमधूनच हा आवाज येत होता . माझ्या तळपायाची आगच मस्तकाला गेली ! तरी देखील स्वतःवर संयम ठेवत मी साधूला हलवून जागे केले . त्याने चिडून माझ्याकडे पाहिले .  क्या है ? मी हात जोडून विनंती केली बाबाजी कृपया गाने बंद कर दिजिये | 
क्यों? साधू ओरडला .
अरे बाबाजी . हम भी सून रहे है ।आप भी सूनिये । नर्मदा मैया का कितना सुंदर आवाज अपनी कुटिया मे आ रहा है । साधू म्हणाला मुझे नही सूनना ।
मी त्याला पुन्हा निक्षून सांगितले . रात के बारा बजे चुके है । गाने बंद कर दीजिए ।
साधू म्हणाला ,नही करूँगा ।क्या करेगा बोल ।
आता मात्र माझा संयम सुटत चालला होता . तरीदेखील मी मनोमन नर्मदा मातेचे स्मरण करत स्वतःला शांत संयमी ठेवले होते . मी त्याला म्हणालो अरे इतकी नर्मदेच्या काठाला झोपण्याची जागा कुठेच नसेल . का असे करतो आहेस ?घे ना आनंद !किमान पक्षी आम्हाला तरी घेऊ देत !  त्यावर साधू मला म्हणाला मैया का आवाज सुनना है तो मैया मे जाके सो जाओ ।आता मात्र माझ्या रागाचा पारा खाड करून वर चढला । मी चढ्या आवाजात त्याला म्हणालो , बाबाजी गाना बंद करदो ।
त्यावर साधू मला म्हणाला मै गाने नही । भजन सुन रहा हु । यावर काय बोलावे तेच मला कळेना . मी म्हणालो ये कौनसा भजन है भाई ? बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे ? अगर आपको सचमुच भजन सुनना है तो वो भी सुन सकते हो । लेकिन ये सिनेमा वाले गाने बंद कर दो ।
आमच्या दोघांची चढलेले आवाज पाहून सर्वजण निश्चितपणे जागे झाले होते परंतु मध्ये कोणीच पडत नव्हते . मी सर्वांना उद्देशून म्हणालो अरे बोला की काहीतरी . त्यावर अमरावतीचा बाबा उठून बसला . आणि तो म्हणाला , ये जो बोल रहे है वो सही बता रहे है । आप गाने बंद कर दो । साधू म्हणाला नाही करूँगा ।क्या कर लोगे ? आता माझी खरंच सटकली ! मी त्याला म्हणालो तुझे आखरी बार बोल रहा हु । गाना बंद कर । नही तो आगे क्या होगा उसके लिए जिम्मेदार तू स्वयं होगा । मी असे म्हटल्याबरोबर तो साधू अचानक मोबाईल फेकून त्याची काठी हातात घेऊन माझ्या अंगावर धाऊन आला . त्याचा तो धिप्पाड देह पाहता त्याने काठी डोक्यात घातल्यावर माझ्या डोक्याचा नारळच फुटला असता . परंतु मी देखील सावध होतो . मी चटकन माझी काठी हातात घेऊन उभा राहिलो . तमिळनाडूमध्ये सिलम्बम नावाची एक युद्ध कला आहे तिचे प्रशिक्षण मी घेतलेले आहे . त्याप्रमाणे काठी फिरवून मी पवित्रा घेऊन उभा राहिलो . साधूने एक काठी माझ्या दिशेने हाणलीच .मी मोठ्या वेगाने ती चुकवून गरर करून फिरवून परत त्याच्याच दिशेला पाठवली .त्या कृतीतून साधूला माझ्या शक्तीचा आणि अचूकतेचा अंदाज आला. ती चुकवल्यावर मात्र मी मोठ्या त्वेषाने माझी काठी उगारली आणि त्यावेळी चा माझा जो काही आवेश होता तो पाहून त्या साधूने हातातली काठी फेकून दिली आणि त्याचा बोरिया बिस्तर पटापट गुंडाळून तो जंगलाकडे ओरडत पळत सुटला ! त्याचे अर्धे सामान तिथेच सुटले . जाता जाता त्याने नवीन दुलई घेतली आणि जंगलामध्ये चिखलात फेकून दिली ! तो जोर जोरात पळत सुटला .
मी एकदम भानावर आलो . मीही त्याच्या मागे पळत सुटलो . अरे बाबाजी जंगल मे मत जाओ । इधर आओ ! मुझे क्षमा करना । मेरी गलती हो गयी । पण साधु काही परत आला नाही .तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हताच . जंगलामध्ये जाऊन तो जोरजोरात ओरडू लागला , कल इसी जंगल से जाओगे । जंगल मे मिलना । तुझे काट डालुंगा । एक एक को काट डालुंगा ! मी त्याला म्हणालो कल क्यू ? अभी हात लगा के दिखा मुझे । पण साधू जंगलामध्ये दिशा मिळेल तसा पळत सुटला . इतका सोन्यासारखा धिप्पाड देह पण फुल फाट्या निघाला !त्याच्या या कृतीमध्ये तो निश्चितपणे वन्य श्वापदांना जागृत करत होता . आता बहुतेक रात्रीच याचा जंगलामध्ये कार्यक्रम होणार असे वाटून मी पुन्हा आपल्या कुटीमध्ये आलो . येता येता नर्मदा मातेची मनापासून क्षमा मागितली . आणि तिची प्रार्थना केली ' हे माते , आता जे काही घडले ते मला काहीही अपेक्षित नव्हते .मी साधूला हाकलले नाही . तो आपण होऊन पळाला आहे . हा साधू मूढमती आहे . तो काय करतो आहे त्यालाच कळत नाही .कृपया जंगलामध्ये त्याचे रक्षण कर .
 कुटी मध्ये मी आलो तर सगळे उठून बसलेले होते ! झालेल्या प्रकारामुळे सगळेच भांबावले होते ! एका अतिशय सुंदर वातावरणातून आम्ही उत्कृष्ट असे कलुषित वातावरण उभे करून दाखवले होते ! आणि त्यात सर्वात मोठा हातभार माझाच होता हे दुर्दैव ! परंतु माझी भावना शुद्ध होती . मला नर्मदा मातेचा आवाज ऐकायचा होता .साधूने गाणे बंद केले असते तर विषय संपत होता . परंतु त्याचा अहंकार त्याला दुःखा प्रत घेऊन गेला . मी परत आल्यावर सगळेजण उठून तावातावाने बोलायला लागले . मी सर्वांना म्हणालो अरे तुम्ही सगळे जागे होतात तर मध्ये का नाही पडलात ! आता या साधूचे जंगलात काही बरे वाईट झाले तर ते आपल्यावर येणार . इकडे झाले उलटेच होते . आळंदीची मुले व सर्वचजण त्या साधूच्या धमकीला घाबरले होते ! ते सर्व मला म्हणू लागले . ऐकू द्यायची होती ना गाणी त्याला . आता उद्या जंगलामध्ये हा आपल्यावर हल्ला करणार ! खून करणार ! तुमच्यामुळे आमचा जीव धोक्यात आला ! मला या विधानावर हसावे का रडावे तेच कळेना ! हे सर्वजण घाबरलेले आहेत हे पाहून मी अजून एक गंमत केली ! मी त्या सर्वांना म्हणालो , अरे त्या एवढ्या धिप्पाड साधूचा काठीचा फटका मी उडवून लावला . तुमची काय बिशाद आहे ? उगाच माझ्यावर येऊ नका . नाहीतर ...इतक्यात आळंदीचा एक मुलगा माझ्या बाजूने बोलू लागला ! आणि त्या दोघांची आपापसामध्ये चांगलीच जुंपली ! नाशिकचा बाबा पण अमरावती वाल्याशी विनाकारण भांडू लागला ! कल्पना करून बघा रात्रीचे बारा वाजले आहेत ! आणि त्या घनघोर जंगलामध्ये अशा पद्धतीने चढ्या आवाजात भांडणे सुरू आहेत ! माझी हसून हसून पुरेवाट झाली ! परिक्रमेमध्ये सोबत एखादा मनुष्य घेतला की असे होते ! अति परिचयात अवज्ञा होऊन जाते . आणि मनातील सर्व विकार परिक्रमा बाहेर काढत असते . ते मग असे कधीतरी अचानक बाहेर निघतात ! सुमारे अर्धा तास कडाकडा भांडून झाल्यावर सगळे पुन्हा शांत झाले आणि गप्पा मारू लागले !नर्मदा परिक्रमा तुम्हाला लहान मुलासारखी बनवते .लहान मुलांची भांडणे जशी एका क्षणात मिटतात अगदी तसेच परिक्रमे मध्ये सुद्धा होते ! जणू काही झालेच नव्हते अशा प्रकारे सर्वजण पुन्हा गप्पा मारू लागले . मग त्या साधूचे एक एक किस्से मला या चौघांनी सांगायला सुरुवात केली . मी जेव्हा संध्याकाळी स्नान संध्या उपासनेसाठी नर्मदेच्या काठावर जाऊन बसलो होतो तेव्हा या साधूने बरेच पराक्रम केले होते . मुख्य म्हणजे तो ज्या आश्रमात राहतो आहे त्या आश्रमाला अखंड नावे ठेवत होता .इथल्या तपस्वी राम महाराजांना देखील त्याने अश्लाघ्य भाषेमध्ये शिव्या घातल्या होत्या . दुपारी मिळालेल्या अन्नाला नावे ठेवली होती . आश्रमातील व्यवस्थेचे वाभाडे तो काढत होता . आम्ही सर्वांनी मिळून स्वतः थंडीमध्ये झोपून देखील या साधूला दुलई मिळावी म्हणून प्रयत्न केले होते . परंतु इतके सर्व करून देखील हा साधू काही त्याचा मद सोडत नव्हता .अतिरिक्त गांजा पिल्यामुळे त्याची चित्तवृत्ती पूर्णपणे बहकली होती . हे सर्व नर्मदा मातेला कसे बरे सहन होईल ? त्यामुळेच तिने माझ्या माध्यमातून त्या साधूला शिक्षा म्हणून भर रात्री - मध्यरात्री जंगलामध्ये हाकलून दिले असे सर्वांचे मत पडले . या संपूर्ण थरारपटामध्ये मी नायक ठरलो होतो आणि साधू खलनायक . आणि याचा दुसरा भाग अजून शिल्लक आहे असे या चौघांचे मत होते ! त्यामुळे उद्या कृपया तुम्ही आमच्या सोबत चाला , आपण सर्वजण एकत्र जाऊ आणि जंगलामध्ये साधूचा सामना करू असे सर्वजण मला सांगू लागले . मी सर्वांना निक्षून सांगितले, नाही ! मला हे जमणार नाही .मी एकटाच चालणार .
आयुष्यामध्ये ज्याला नाही म्हणायला जमले त्याला खूप काही जमले . बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण केवळ नाही म्हणता येत नाही यामुळे अनेक अनावश्यक गोष्टी दुःखे भोगत राहतो . मी सर्वांना सांगितले माझा संकल्प एकट्याने चालण्याचा आहे तरी कृपया कोणीही माझ्यासोबत यायचा प्रयत्न करू नका . आणि राहिला प्रश्न साधूचा तर तो तुम्हाला काहीही करणार नाही कारण ज्याला करायचे असते त्याने आत्ताच केले असते .त्याच्यामध्ये हिम्मत असती तर आताच त्याने आपल्याला मारून टाकले असते . जो मनुष्य , उद्या भेट असे करीन ,तसे करीन ,  म्हणतो त्या माणसाला आज काहीही करता येत नसते . उद्याचे तर विसरूनच जा . रात्री पुन्हा एकदा नर्मदा मातेचा मंत्रजप ऐकत झोपी गेलो .
राम कुटीच्या मागच्या बाजूला एक बांधलेले शौचकूप होते . परंतु ते फक्त श्रीराम महाराजांसाठी होते . त्यामुळे पहाटे साडेतीन वाजताच घनघोर अंधारामध्येच कार्यक्रम उरकून घेतला .साधूने चिखलात फेकून दिलेली दुलई मला सापडली.पहिल्यांदाच एखाद्या हिंस्र श्वापदाने झडप घालण्याची भीती असलेल्या जागी बसलो होतो .कुछ जगह पर डर अच्छा होता है ! झटकन कार्यभाग आटोपून बर्फासारख्या थंडगार नर्मदा जलामध्ये मनसोक्त स्नान केले ! अमरकंटक भागामध्ये नर्मदेचे जल अतिशय थंड असते . त्यानंतर पूजा वगैरे आटोपून हे सर्व लोक उठण्याच्या आत निघून जाण्याचा माझा बेत होता . परंतु सर्वजण मी उठण्याची वाटच पाहत होते . साधूच्या भीतीने बहुतेक रात्रभर सारे जागेच होते ! अमरावतीचा बाबा तर रात्री एकदा आसपास चक्कर मारून आला की साधू कुठे दिसतो का ! तर त्याला म्हणे दूर जंगलातून घोरण्याचा आवाज आला ! मी एकटाच पुढे निघालो . आजचा दिवस अतिशय विशेष ठरणार होता ! आज नर्मदेने मला खूप मोठमोठ्या साधुसंतांना आणि विभूतीमत्वांना भेटवले . साधारण अर्धा किलोमीटर घनदाट अरण्य तुडविल्यावर मला समोर एका साधूची राहुटी दिसू लागली . एवढ्या जंगलामध्ये कोण राहिला आहे या उत्कंठेपोटी मी तिकडे गेलो .पिवळ्या रंगाच्या मेण कापडामध्ये झाकलेल्या या तंबू वजा झोपडीमध्ये सोमनाथ गिरी गोसावी नावाचा एक अवलिया साधू राहत होता . हे वनक्षेत्र असल्यामुळे इथे राहण्याची परवानगी कोणालाच नव्हती .बांधकाम करणे तर फारच लांबची गोष्ट .यावर तोडगा म्हणून सोमनाथ गिरी गोसावी यांनी एक मोठी लोखंडाची पेटी अथवा पेटारा बनवून आणला आणि त्यात तो राहू लागला ! 
सोमनाथ गिरी गोसावी यांची पेटी असलेली राहुटी
मी नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर पेटीतून बाबा बाहेर आले . मला आत मध्ये बसण्याची सूचना त्यांनी केली . धावतच जाऊन ताजे ताजे नर्मदा जेल घेऊन आले आणि एक छोटीशी चूल पेटवून त्यावर त्यांनी चहाचे आधण ठेवले . चहा करता करता बाबा बोलू लागले ! यांचे आयुष्य म्हणजे एका साधूची कठोर तपस्या काय दर्जाची असू शकते याचा आदर्श वस्तूपाठच होता ! सुमारे तीन वर्षे बाबा इथे फक्त तुळस , कडुलिंबाची पाने आणि मैयाचे जल पिऊन एका पेटीमध्ये राहिले ! अगदी अमरकंटकच्या भयंकर पावसामध्ये सुद्धा त्यांनी आपला पेटारा सोडला नाही ! बाबा मूळचे पंढरपुर येथील होत . ५५ किलो वजनाचे शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी अकरा ज्योतिर्लिंगे पायी प्रवास केला होता ! बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांना नर्मदे काठी येऊन राहण्याचा आदेश झाला .त्यांच्याशी नर्मदा मैया साक्षात बोलते . त्यांना पशु पक्षांची भाषा देखील कळते . आपल्या पेटीमध्ये त्यांनी चारही वेद ,सर्व उपनिषदे , तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी ,दासबोध इत्यादी सर्व ग्रंथ ठेवलेले आहेत . जनार्दन स्वामी यांचे गुरु होत . जनार्दन स्वामी या नावाचे बरेच महात्मे भारतामध्ये झालेले आहेत .संत एकनाथांचे गुरु देखील जनार्दन स्वामीच होते .हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते .
संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी
ते निराळे .एक जटाधारी जनार्दन स्वामी होऊन गेले त्यांचे आश्रम संपूर्ण भारतभर आहेत .हेच सोमनाथ गिरी बाबांचे गुरु .
या जनार्दन स्वामींचे अनेक शिष्य परिक्रमा करतात व परिक्रमावासींची सेवा देखील करतात
अजून एक जनार्दन स्वामी नामे बडोदा येथे साक्षात्कारी दत्त संप्रदायिक सद्गुरु होऊन गेले . 
वाचकांचा गोंधळ होऊ नये म्हणून तिघांविषयी सांगितले.
साधू दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले ॥
असो .
एकदा वादळामध्ये एक मोठे झाड त्या पेटीवर कोसळले परंतु पेटीला काहीही झाले नाही . आता सुद्धा ती पेटी जंगलामध्ये तिथेच पडलेली आहे .माझे भाग्य चांगले की मला त्या पेटीमध्ये बसलेल्या सोमनाथ गिरी बाबांचे दर्शन झाले . पूर्वी कोणीतरी येऊन बाबांचा एक व्हिडिओ बनवून तो युट्युब वर टाकलेला आहे . तो अवश्य पहा असे बाबांनी मला सांगितले . त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नर्मदा मैया प्रत्यक्ष येऊन त्यांच्याबरोबर कशी भोजन प्रसाद घेऊन गेली त्याचे वर्णन त्यांनी केलेले आहे .मी मोबाईल वापरत नाही तरी कृपया तुम्ही स्वतः तो अनुभव सांगाल तर अधिक बरे अशी मी त्यांना विनंती केली परंतु त्यांनी मला व्हिडिओच बघण्याची शिफारस केली . मला सध्या खूप शोध घेऊनही तो व्हिडिओ काही सापडला नाही . कोणाला सापडल्यास कृपया कळविण्याचे करावे .
बाबांचे एक यूट्यूब चैनल नवीनच सुरू केलेले आहे .सध्या बाबांनी आपली पेटी सोडून पुन्हा एकदा सायकलवरून नर्मदा परिक्रमा सुरू केलेली आहे .
 सायकल परिक्रमेमध्ये कठीण पूल पार करताना सोमनाथ गिरी बाबा
त्या परिक्रमेचे व्हिडिओ आपल्याला बाबांच्या चॅनेलवर पाहायला मिळतील .चॅनेल ची लिंक इथे पहा .
बाबांच्या रिकाम्या पडलेल्या पेटीचे रक्षण एक नाग येऊन करत आहे असा अनुभव परिक्रमावासींना अलिकडेच आला . 
बाबांच्या बंद असलेल्या पेटीचे दर्शन घेणारे परिक्रमावासी , रक्षण करणारा नागोबा आणि पेटीवर पडलेले अवाढव्य झाड ( २०२३ चे दृश्य )

मी बाबांच्या पेटीच्या आत जाऊन पाहिले .पेटी पूर्णपणे लोखंडाची असल्यामुळे बर्फासारखी गार पडली होती .विशेषतः पेटीच्या एका बाजूला बाबांनी कापड पोते वगैरे लावले होते ती बाजू गरम होती . परंतु पेटीच्या दुसऱ्या बाजूला काहीही लावले नव्हते ती बाजू फ्रीज मधल्या फ्रिझर सारखी गार होती ! त्या पेटीमध्ये झोपून पहा असे बाबांनी मला सुचवले . मला अक्षरशः मी शेवपेटीमध्ये झोपल्याचा अनुभव आला इतकी ती पेटी गार होती . या घनघोर जंगलामध्ये त्या पेटी शिवाय पर्यायच नव्हता . बाहेर झोपले की वाघाने उचललेच म्हणून समजा ! माझ्याजवळ एकांनी दिलेली अतिशय उंची शाल होती . अस्सल पश्मिना लोकरीची असल्यामुळे त्या शालीला प्रचंड ऊब होती . मी ती शाल बाबांना दिली . त्यांनी देखील मोठ्या आनंदाने तिचा स्वीकार केला . आणि आपली एक जुनी शाल त्यांनी पेटीच्या मोकळ्या बाजूला लावून तिथून येणारी थंडी थोपवली. आणि माझी शाल पांघरून झोपेन असे मला सांगितले . मला असे लक्षात आले की बाबांनी आरडाओरडा केला तरी जवळपास कुठेही ऐकू जाणार नाही . परंतु जर त्यांनी शंखनाद केला तर किमान राम कुटीपर्यंत आवाज जाईल . पूर्वी मी आपल्याला सांगितले होते की कटंगी येथील तेजी बाबा नामक नागा साधूने मला एक शंख दिला होता . तो शंख देखील त्यामुळे मी बाबांना अर्पण केला . बाबांनी शंख वाजवून पाहिला .त्यांना शंखाचा आवाज खूप आवडला . आता हा शंख कायम माझ्या शिवपुजेमध्ये राहील असे त्यांनी मला सांगितले . मला दुहेरी आनंद झाला . एक तर बाबांना काही मदत केल्याचा आनंद आणि दुसरे म्हणजे धाड करून पाठीवरील वजन कमी झाल्याचा परमानंद! 
इतक्यात मला मागून येणाऱ्या त्या चौघांचा कानोसा लागला म्हणून मी पटकन उठलो आणि बाबांचा निरोप घेतला . तरीदेखील ते चौघे मला वाटेत भेटलेच ! सोमनाथ गिरी बाबा जिथे राहत होते त्या ठिकाणी नर्मदा मातेचे एक अतिशय धोकादायक रूप होते . म्हणजे पाणी खोल वगैरे असे काही नाही परंतु तिथे नर्मदा मैया इतकी छोटी आहे आणि ग्रामस्थांनी इकडून पलीकडे जाणारा एक रस्ता नर्मदेच्या पात्रातून बनविला आहे ,त्यामुळे बहुतांश परिक्रमावासींची परिक्रमा त्या ठिकाणी खंडित होते ! सोमनाथ गिरी बाबांनी आजपर्यंत अनेकांची परिक्रमा खंडित होण्यापासून वाचविली आहे असे त्यांनी मला सांगितले . आता मात्र अतिशय घनदाट अरण्य प्रदेश सुरू झाला होता . इथून थोडेसे पुढे काठाने गेल्यावर पंचधारा नामक स्थान लागते . इथे समोरच्या तीरावर ज्ञानेश्वरी कुटी नामक एक छोटीशी कुटी दिसते . इथे महान संत रामदास महाराज बसलेले असले तर त्यांचे अद्भुत दर्शन समोरच्या तटावरून घडते ! या महाराजांविषयी लिहिण्यासाठी शब्द अपुरे आहेत .त्यांच्याकरता स्वतंत्र काही प्रकरणे खर्ची घालावी लागणार आहेत ! ते भविष्यात वाचूच . तूर्तास मला महाराज न दिसल्यामुळे आम्ही पुढचा मार्ग धरला . जंगलातून वन्य श्वापदांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होते . एक मोठा डोंगर चढून आपल्याला अमरकंटक कडे जावे लागते . या डोंगरावरील पायवाट आपण जरा जरी चुकलो तरी अतिशय घनघोर अरण्यामध्ये भटकण्याचा संभव असतो . त्यामुळे मळलेली पायवाट अजिबात सोडू नये असा इथला दंडक आहे . अर्थात इथे पायवाट म्हणजे जमीन दिसतच नाही तर खाली पडलेला पालापाचोळा जिथे तुडवला गेला आहे तीच मळलेली पायवाट असे समजायचे . पाय पडल्यामुळे पालापाचोळा कोरा करकरीत न राहता त्याचा चुरा होतो . असा चुरा झालेला पालापाचोळा म्हणजेच मळलेली पायवाट . बराच वेळ घनदाट अरण्यातून चालत होतो . मी डोंगरावरून चालत होतो आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी अतिशय बालरूपातील नर्मदा वाहताना अखंड दिसत होती ,ऐकू येत होती . त्या डोंगरावरून खाली उतरता येणे जवळपास अशक्य होते इतकी झाडी घनदाट होती . आणि नर्मदेच्या काठाने तर रस्ता नावाचा पदार्थ अस्तित्वाला देखील नव्हता . त्यामुळे आहे त्या पायवाटेने चालणे क्रमप्राप्त होते . मध्ये मध्ये दगड मातीतच काही पायऱ्यांसारखे खोदलेले भाग लागत होते . परंतु या संपूर्ण भागात मानवी वावर अतिशय कमी असावा हे जाणवत होते . अखेरीस दूध धारा लागली . आता मात्र आधुनिक कपडे घातलेल्या शहरी पर्यटकांची वर्दळ दिसू लागली . आणि अचानक समोर मोठा आवाज करत धडाधड कोसळणारी कपिलधारा दिसली ! कपिलधारा हा नर्मदेचा एक धबधबा असून अमरकंटकच्या डोंगरावरून खालील दरीमध्ये ती याच ठिकाणी झेपावते . मी अगदी जवळ जाऊन त्या जलप्रपाताचे दर्शन घेतले . इथे बाहेरच्या लोकांची फारच गर्दी होती आणि त्यांना परिक्रमावासींशी काही देणे घेणे नव्हते . सर्वजण आपल्याच छछोरपणामध्ये मश्गुल होते . सेल्फी काढणाऱ्या कॉलेज युवक युवतींचा तर महापूर लोटला होता . परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच इतके आधुनिक लोक पाहायला मिळाले आणि सत्ययुगातून एकदम कलियुगात आल्यासारखे झाले ! परंतु हेच अमरकंटकचे प्रवेशद्वार होते ! 

लेखांक पंचवीस समाप्त (क्रमशः )

 लेखांक २६ : विदेही संत मीरा माई ने केलेला चमत्कार !

कपिलधारा हे स्थान अतिशय मनोहर आहे . 
 उंच मेकल पहाडावरून नर्मदा मैया येथे अचानक खोल दरीमध्ये झेप घेते . कपिलधारा जलप्रपात 

केवळ चार ते पाच फूट रुंदीचे नर्मदा मातेचे पात्र मेकल पर्वतावरून झेपावते . अलीकडच्या काळामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये या पाण्याची पातळी फारच कमी होते . आणि पावसाळ्यात मात्र हे पाणी भरभरून वाहते .
चातुर्मासात वाहणारी कपिलधारा

कपिलधारेच्या थोडेसे अलीकडे दूध धारा म्हणून एक छोटासा प्रपात आहे . या स्थानाविषयी अनेक आख्यायिका आहेत . इथून पूर्वी दुधाची धार निघायची असे काही साधू सांगतात . तर भूगर्भ शास्त्रीय नियमानुसार चुनखडक अधिक असेल तर पांढऱ्या रंगाचे फेसाळ पाणी निघू शकते . पुढे अनेक ठिकाणी मला अशा दूध धारा दिसल्या . दूधधारेच्या जवळ काही ध्यान गुफा देखील आहेत .
ध्यान गुफा दूध धारा
दूध धारा
दुर्वास ऋषींची ध्यान गुफा
इथे परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून परिक्रमा मार्गाचे फलक जागोजागी लावलेले आहेत .
कपिलधारेकडे जाणारा वन मार्ग
खालून कपिलधारा अशी दिसते
कपिलधारेवरून अचानकमार व्याघ्र अरण्य असे दिसते

दक्षिण तटावरून होणारे कपिलधारेचे दर्शन
अरण्यामध्ये अनेक वन्य पशु आणि एक भला मोठा गरुड पाहिल्यानंतर हे मनुष्य प्राणी पाहताना फार काही बरे वाटत नव्हते . नाही म्हणायला मोठ्या प्रमाणात माकडे मात्र तिथे होती . वानर देखील होते .
नर्मदा जल पिणारी माकडे . इतक्या लघु रूपामध्ये देखील नर्मदा मातेने आपला रंग सोडलेला नाही !
नर्मदा मैया चे इथले रूप अतिशय अप्रतिम होते ! एखाद्या पंचवार्षीय अल्लड अवखळ कन्ये सारखेच चंचल ,निखळ , स्वच्छ ,निर्मळ .
नर्मदेचे नितांत सुंदर रुप

वरती गेल्यावर एका दुकानदाराने ओंडका टाकून केलेल्या बाकड्यावर बसण्याची विनंती केली .
समोर काही लोक जंगलातील जडीबुटी विकत बसले होते .
अमरकंटक येथे मिळणाऱ्या जंगली जडीबुटी
 बसल्यावर काही परिक्रमावासिनी बिस्किटे काढली .मलाही एक छोटा पुडा खायला दिला . आणि क्षणात माकडांनी हल्ला करून सर्वांची बिस्किटे काढून घेतली ! 
मी मात्र सावध होतो त्यामुळे मी त्या माकडाला फटका टाकून दूर केले ! त्या मोठ्या माकडाने माझ्या हातातून बिस्कीट काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला मी शेवटपर्यंत दाद लागू दिली नाही ! शेवटी मी काठी उगारल्यावर सर्व माकडे पळून गेली . तिथे बसलेला एक साधू म्हणाला आप पहले हो जिसका बिस्किट वे छीन नही पाये महाराज ! इथे वनखात्याने सुंदर कुटी तयार केलेल्या आहेत .
वन खात्याने पर्यटकांसाठी बनविलेल्या कुटी
 तिथे उकडलेल्या शेंगा विकणारा एक मनुष्य बसला होता . त्याच्याकडे एक गलोंल होती आणि त्याने तो माकडांना बारीक खडे अचूक नेम धरून मारत होता त्यामुळे त्याच्या जवळ सुद्धा माकडे फिरकत नव्हती . त्याच्याशी मी दोन शब्द बोललो आणि पुढे निघालो .
 पुन्हा दोन-तीन माकडांनी तोच प्रयोग केला पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही . खरे म्हणजे त्यांना बिस्कीट द्यायला हरकत काही नव्हती . पण त्यांना बिस्किटे न देण्यामागे दोन महत्त्वाची कारणे होती . पहिले कारण म्हणजे वन्य श्वापदांना आपण जे अन्न खातो ते अन्न खायला घालून आपण त्यांची सवय बिघडवून टाकतो . त्यामुळे कधीही वन्य प्राण्यांना आयते अन्न खायला देऊ नये . कारण एकदा आयते अन्न खायची सवय लागली की त्यांना आपण होऊन अन्न शोधण्याची जी निसर्गतः ऊर्मी असते ती हळूहळू कमी होते आणि त्यामुळे ती प्रजाती कालांतराने नष्ट होऊन जाते . हा झाला एक भाग . दुसरे महत्त्वाचे कारण असे होते की अमरावतीच्या महाराजांनी मला सांगितले होते की कपिलधारा क्षेत्रामध्ये एक थोर महान तपस्वी साध्वी राहतात . त्यांचे नाव मीरा माई . 
 महान तपस्विनी व विदेही महात्मा मीरा माई

यांच्या दर्शनाला जाताना बिस्कीटचा पुडा सोबत न्यावा लागतो असे त्याने मला सांगितले . याची परिक्रमा गेल्या वर्षी अगदी याच ठिकाणी खंडित झाली होती . त्याने मला एक छोटासा लोखंडी झुलता पूल दाखविला . नर्मदेच्या या काठावरून त्या काठावर जाणारा हा पूल होता . 
कपिलधारा येथील पूल
गेल्या परिक्रमेच्या वेळी एका म्हाताऱ्या स्त्रीने त्याला सांगितले की समोर फुलवाली बाई बसली आहे तिच्याकडून माझी फुले मला आणून दे . आपण एका वृद्ध स्त्रीला मदत करतो आहोत या भावाने तो चटकन पलीकडे गेला आणि फुले घेऊन आला . आल्यावर पाहिले तो समोर ती म्हातारी नव्हती आणि मग लक्षात आले की आपली परिक्रमा खंडित झालेली आहे ! कारण परिक्रमेदरम्यान नर्मदा नदी पार करायची नसते ती चुकून याच्या हातून पार झाली होती ! त्याला अतोनात दुःख झाले परंतु तेव्हापासून त्याने हा भाग अतिशय पक्का लक्षात ठेवला . मला देखील त्याने तो पूल दाखविला .त्या साधूचे नाव भूषण स्वामी असे होते . जीडी आर्ट्स हा कोर्स पूर्ण केलेला हा एक हाडाचा कलाकार होता . मला आत्ता अचानक त्याचे नाव आठवले ! आमच्या दोघांची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी जुळली होती . परंतु दोघांनाही एकटेच चालायला आवडत असल्यामुळे आम्ही कधीच एकत्र चाललो नाही .
याच पुलावरून पलीकडे जाऊन अमरावतीच्या भूषण स्वामीची परिक्रमा खंडित झाली होती

आता आम्ही अनुपपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला होता .आणि पुल पार करताच समोर दिंडोरी जिल्हा होता . पाहता पाहता जबलपूर पासून तीन चार जिल्हे पार झाले होते ! (जबलपूर , मंडला ,अनुपपुर , शहडोल ) लवकरच एक राज्य देखील पार होणार होते . कारण नर्मदेचा उगम हा छत्तीसगड राज्यामध्ये दिलेला आहे . अर्थात हे मूळचे मध्य प्रदेशचेच प्रांत परंतु त्याची वेगळी राज्यं करण्यात आली . काही लोक मात्र नर्मदेचे उगम स्थान मध्य प्रदेशात आहे असेच मानतात . काहींनी मला सांगितले की नर्मदा कुंड मध्य प्रदेश मध्ये असून माई की बगिया अर्थात नर्मदेचे जुने उगमस्थान छत्तीसगड मध्ये आहे .
कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी गेल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही .

इथे नर्मदा मातेच्या काठी लांबच लांब पक्का सिमेंटचा घाट बांधलेला आहे .
नर्मदा मातेच्या काठी बांधलेला पक्का सिमेंटचा घाट व बाल रेवा
जसा महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरचा एक पर्यटन स्थळ किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकास झालेला आहे अगदी त्याच धर्तीवर मध्य प्रदेश शासनाने अमरकंटक या तीर्थक्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून देखील विकास केलेला आहे . तो योग्य की अयोग्य हा मुद्दा सध्या बाजूला ठेवलेला बरा . परंतु इथे भाविक कमी आणि पर्यटक जास्त दिसत होते हे मात्र नक्की . या ठिकाणी परिक्रमावासींची उतरण्याची सोय देखील एका छोट्याशा धर्म शाळेमध्ये केलेली आहे . एक हनुमान मंदिर देखील आहे .
कपिलधारा येथे परिक्रमावासी उतरण्याची व्यवस्था
असो .
मीरा माई या विदेही अवस्थेतील संत आहेत . कालचे चौघेजण आणि मी पाचवा असे आम्ही पाच जण त्यांच्या आश्रमामध्ये गेलो . 
संत मीरा माई यांचा अमरकंटक येथील आश्रम
हा आश्रम म्हणजे एक दुमजली साधेसुधे आरसीसी बांधकाम असून समोरच्या बाजूला बांधकाम अर्धवट सोडण्यात आलेले आहे . त्यामुळे गच्ची वजा सज्जा वरती लोखंडाच्या सळ्या वर आलेले खांब दिसतात .
त्या नेहमी विवस्त्र अवस्थेमध्ये पडून असतात एका बिछान्यावर . 
आपल्या बिछान्यावर पहुडलेल्या मीरा माई (संग्राहित चित्र )
त्यांच्या आजूबाजूला बारा-पंधरा रोगट , लूथ भरलेली कुत्री बसलेली होती . खोलीत त्या कुत्र्यांचा अतिशय कुबट घाण वास येत होता . पण त्या जटाधारी वयस्कर साध्वी मात्र आपल्याच मस्तीत आनंदामध्ये पहुडल्या होत्या . 
मीरा माई आणि त्यांची कुत्री (संग्रहित चित्र )
ही कुत्री पाळीव अजिबात नव्हती . आम्ही आत मध्ये गेल्याबरोबर सर्वजण गुरगुर करायला लागली. एक कुत्रे तर आम्हाला हुंगण्यासाठी इतके जवळ आले की त्याचे ओले नाक माझ्या पायाला खूप वेळा लागले . तो नाकाने शक्ती प्रयोग करत होता त्यामुळे कधीही चावू शकला असता .आता मला कळाले की सोबत बिस्किटे का न्यावी लागत . बिस्किटचा पुडा काढल्याबरोबर सगळी कुत्री कान टवकारून बसली ! मी माईंना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांना पारले जी बिस्कीटां चा एक पाच रुपयाचा पुडा दिला . तर त्यांनी पडल्या पडल्याच तो फोडला आणि त्यातून आम्हा पाचही लोकांना दोन-दोन बिस्किटे दिली व प्रत्येक कुत्र्याच्या दिशेला अर्धी अर्धी बिस्कीटे फेकली . स्वतः देखील दोन बिस्किटे खाल्ली . मीरा माई या कुत्र्यांवर लेकराप्रमाणे प्रेम करत . एकदा तर एका कुत्र्याने त्यांचा हात चावून खाल्ला होता तरी देखील त्यांनी कुत्री हाकलली नाहीत . संत आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातला हा फार मोठा भेद आहे .आणि तो न भरून येणारा आहे . मी मीरा माईंच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो की मेरी परिक्रमा पूर्ण हो जाये ऐसा आशीर्वाद दिजीये ! मीरा माई स्पष्ट आवाजात बोलल्या , "सबकी होती है । तेरी भी हो जायेगी ! आशीर्वाद है।  जाओ ! " त्यांचे हे आश्वासक आशीर्वचन ऐकून माझ्या अंगात दहा हत्तींचे बळ चढले ! आतला वास असह्य झाल्यामुळे मी बाहेर आलो . आणि माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला ! मी भूषण ला विचारले अरे तुझ्याकडचा पारले जी चा पुडा फोड बरं ! त्याने पुढे फोडल्यावर आम्ही बिस्किटे मोजली तर ती आठ निघाली . 
आणि आत्ता आत मध्ये मात्र चमत्कार झाला होता ! आम्ही पाच जणांनी खाल्लेली प्रत्येकी दोन बिस्किटे , स्वतः मीरा माई यांनी खाल्लेली दोन बिस्किटे ,अशी दहा ,आणि पंधरा कुत्र्यांना प्रत्येकी अर्धे म्हणजे किमान आठ बिस्किटे अशी एकूण १८ बिस्किटे त्यांनी त्या पुड्यातून काढली होती ! आम्ही पाचही जण चकित झालो ! सर्वांनी मिळून त्यांचा एकदा जयजयकार केला ! शंका घेण्यासाठी वावच नव्हता कारण त्या पूर्ण विवस्त्र बसल्या होत्या ! असे अनेक जबरदस्त साक्षात्कारी महात्मे नर्मदेच्या काठी पदोपदी बसलेले आहेत ! फक्त तुमच्या नशिबामध्ये त्यांच्या दर्शनाचा योग हवा ! आणि त्यांना तुम्हाला दर्शन देण्याची इच्छा हवी !

लेखांक सव्वीस समाप्त (क्रमशः)

 लेखांक २७ : नर्मदेचे उगमस्थान श्री क्षेत्र अमरकंटक

मीरा माईंचे दर्शन घेतल्यानंतर मी सोबतच्या सर्वांना सांगितले की त्यांनी कृपया पुढे निघून जावे कारण मला एकट्याने चालायचे आहे .माझ्या विनंतीला मान देत सर्वजण पुढे निघून गेले आणि मी थोडा वेळ नर्मदा मातेचे ते बालरूप न्याहाळत बसलो . माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण इतकी लहान नर्मदा माता मी कधी पाहिलीच नव्हती ! काही ठिकाणी तर तिचे पात्र केवळ एक ते दीड फूट रुंदीचे होते .काठावरून जाताना तोल गेला तरी मनुष्य पलीकडे जाईल इतके सहज सोपे ! 
बालरूपातील नर्मदा मैया
होय ,हा छोटासा झरा म्हणजे नर्मदा नदीच आहे !
इथे घनदाट अरण्य होते आणि झाडी खूप उंच व सदाहरित वाटत होती . इथे मला रस्त्याच्या कडेला टाकळा या झुडुपाची खूप सारी झाडे दिसली व भरपूर बिया देखील मिळाल्या . 
नर्मदा नदीला समांतर असा एक रस्ता अमरकंटक पर्यंत गेलेला आहे . तो रस्ता धरून मी अमरकंटकची दिशा पकडली . मध्ये स्वामी विवेकानंदांचे एक केंद्र लागले . श्री रामकृष्ण कुटीर असे त्याचे नाव आहे . 
इथे आत रामकृष्णांचे मंदिर आहे . स्वामी विवेकानंदांची एक मूर्ती आहे . काही खोल्या देखील आहेत .या संस्थेचा रामकृष्ण मठाशी काही संबंध नाही असो . मी बाहेरून आवाज दिला परंतु आतील साधूने केंद्र बंद असल्याचे खुणेनेच सांगितले .  मग मी पुढे चालण्यास सुरुवात केली .इथून अमरकंटक साधारण एक किलोमीटर उरते .
अमरकंटक कडे जाणारे परिक्रमावासी व स्थानिक रहिवासी
अतिशय लघुरूपत वाहणारी नर्मदा बांध घातल्यामुळे येथे एकदम शंभर दोनशे पट रुंद होते .
अचानक रुंदावलेले नर्मदेचे पात्र 
कपिलधारा ते अमरकंटक हे सहा किलोमीटरचे अंतर चालण्यासाठी अतिशय रम्य व सुंदर आहे . घनदाट झाडांच्या सावलीतून चालताना उजव्या हाताला वाहणाऱ्या नर्मदा मातेचा अवखळ खळखळाट सतत कानावर पडत राहतो . घरात असलेली एखादी खोडकर कन्या सतत खदाखदा हसत असते तसा काहीसा तो आवाज वाटतो ! इकडे अमरकंटक मध्ये मात्र रस्त्यावरती सर्व शुकशुकाट दिसू लागला . चौकशी अंती असे लक्षात आले की अमरकंटक प्रशासनाने अमरकंटक पुरता लॉकडाऊन जाहीर केला आहे . मी माझी चालण्याची गती वाढवली .मला मध्येच कोणीतरी पोलिसांनी वगैरे उचलावे आणि घरी पाठवून द्यावे असे होऊ देण्याची इच्छा अजिबात नव्हती . अमरकंटक गावामध्ये अनेक छोटे मोठे आश्रम आहेत .दक्षिण भारतीय पद्धतीने बनविलेला कल्याण सेवाश्रम ,मृत्युंजय आश्रम ,बर्फानी बाबा यांचा आश्रम ,राम मंदिर , फलाहरी बाबांचा आश्रम , गुरुद्वारा ,गीता स्वाध्याय आश्रम असे अनेक प्रसिद्ध आश्रम आहेत . अमरकंटक हे अतिशय प्राचीन शहर आहे हे तेथील मंदिरे पाहताना आपल्याला जाणवते . या शहरामध्ये एक जबरदस्त ऊर्जा तुम्हाला पदोपदी जाणवते . ही खरोखरीच पुण्यभूमी आहे हे कोणालाही चटकन लक्षात येते . नर्मदा पुराणा मध्ये देखील अमरकंटक या क्षेत्राचे खूप वर्णन केलेले आहे. असो .पोलीस सर्वत्र रविवारचा बाजार हटवत आणि लोकांना मास्क घालण्याची सक्ती करत हाकलून लावत होते . त्यांच्या नजरा चुकवत मी कसा बसा मृत्युंजय आश्रम गाठला . आश्रमाचे प्रवेशद्वार भव्यदिव्य होते . तिथे एका यात्रेकरू ने द्वारपालाच्या शिल्पा शेजारी उभे करून माझा फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
अमरकंटक येथील मृत्युञ्जय आश्रमाच्या महाद्वारातील प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र

आत मध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला व्यवस्थापकांचा कक्ष होता आणि उजव्या हाताला मोठ्या लांबोळक्या खोल्या बांधून परिक्रमावासींची उतरण्याची उत्तम सोय केलेली होती . परिसर अतिशय औरस चौरस होता आणि सुंदर असा बगीचा देखील तिथे निर्माण केला होता .
मृत्युंजय आश्रमाची पाटी आणि त्याचे भव्य प्रवेशद्वार

 मृत्युंजय आश्रमातील सुंदर बगीचा
मी वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये गेलो . आत मध्ये भरपूर फोमच्या गाद्या ठेवलेल्या होत्या . थंडीमुळे आणि डोंगर चढून आल्यामुळे पाय दुखत होते . मला आनंद झाला की चला आता आपल्याला पाठ टेकायला हक्काची जागा मिळाली . परंतु तो फार काळ काही टिकला नाही . कारण भोजन प्रसाद घेण्यासाठी आम्हाला सर्वांना खालून आवाज दिला गेला . 
मृत्युंजय आश्रमाचा परिसर
आश्रमाचा परिसर खूप मोठा होता .साधारण त्याच्यामध्य भागी एक मोठे सभागृह उजव्या हाताला होते जिथे भोजन व्यवस्था केली होती . तत्पूर्वी हात धुण्याची आणि पिण्याच्या पाण्याची खूप मोठी व्यवस्था तिथे केलेली होती . भोजन अतिशय अप्रतिम होते . तरुण मुले वाढत होती . रोटीराम (चपाती ) ,सब्जी राम (भाजी) , दालराम (आमटी ) ,लंका (मिर्ची ) ,राम रस (मीठ ) , महाप्रशाद (भात ) इत्यादी सर्व शब्द आता मला माहिती झाले होते .  आज अजून एक नवीन शब्द कळाला . महापूरण . अर्थात यानंतर पुन्हा काही वाढले जाणार नाही आणि भोजन पूर्ण झाले असे मानले जाईल याची सूचना . मेरा भोजन हो गया असे न म्हणता हम महापुराण हो गये असे म्हणायचे . इथे भोजन प्रसाद घ्यायला भरपूर लोक उपस्थित होते . एक अतिशय तेजस्वी गोरेपान आणि धिप्पाड संन्यासी माझ्यासमोर भोजन प्रसाद घेण्यासाठी बसले होते . ते त्या आश्रमाचे प्रमुख होते . भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर मी सवयीप्रमाणे ताटामध्येच हात धुवून ते पाणी ताट स्वच्छ करून पिऊन घेतले . याच्यामुळे फायदा असा व्हायचा की ताट देखील स्वच्छ व्हायचे , पाणी कमी लागायचे आणि अन्न वाया जायचे नाही .
बाहेर काही म्हातारे परिक्रमा वासी उन्हामध्ये बसले होते . परंतु थंडी एवढी भयानक होते की ते ऊन देखील पुरेसे वाटत नव्हते त्यामुळे आश्रमाच्या मुख्य दरवाज्यापाशी केलेल्या एका मोठ्या ओंडक्याच्या शेकोटी जवळ जाऊन मी शेकत बसलो . आयुष्यात प्रथमच मी भर दुपारी इतकी थंडी अनुभवत होतो . इतक्यात ते तेजस्वी साधू आले आणि मला म्हणाले बाबाजी आप आगे निकल जाना क्योंकि अमरकंटक मे लॉकडाऊन लग चुका है । पुलीस कभी भी आ सकती है और सब को अपने अपने घर भेज सकती है । जितना जल्दी हो सके जंगल के रस्ते लग जाना । जहा पे कोई आपको सताने के लिए नही आ सकता । त्यांचे हे शब्द ऐकले मात्र माझी झोपच उडाली आणि धावतच वरती जाऊन मी सर्व सामान उचलले काठी उचलली आणि नर्मदे हर करून मृत्युंजय आश्रमाची रजा घेतली . इथून थोडेसे चालल्यावरच नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे मंदिर अमरकंटकच्या मधोमध आहे . संपूर्ण अमरकंटक शहरामध्ये हजारो मंदिरे असून त्यांचे कळस मनोरे अतिशय मनोहर दिसतात . मी त्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता मला बाहेरच पोलिसांनी अडविले . आणि या मंदिरामध्ये सध्या कोणालाही प्रवेश नसल्याचे त्यांनी सांगितले . मला थोडेसे वाईट वाटले कारण नर्मदा मातेचे जे उगम स्थान आहे ,त्याचेच दर्शन जर होणार नसेल तर परिक्रमेचा उपयोग तरी काय असे मला वाटू लागले . परंतु देश काल परिस्थिती पुढे निरुपाय होता त्यामुळे मी पुढे चालायला लागलो . तसेच याच मंदिराला समोरच्या तटावरून देखील जाता येते असे मला एका दुकानदाराने सांगितले .ती आशा मनामध्ये जागी ठेवून पुढे निघालो .इथे मोठी बाजारपेठ आहे परंतु पोलीस येऊन सर्व दुकाने बंद करत होते . त्यामुळे मी अत्यंत गतीने पुढे निघालो . इतक्यात मला कोणीतरी सांगितले की इथे नर्मदा ओलांडायची नसते तर इथून दोन किलोमीटर पुढे जंगलामध्ये माई की बगिया नावाचे स्थान आहे इथे जाऊन वळसा मारावा लागतो . मी ताबडतोब पाय उचलला आणि  माई की बगिया च्या दिशेने चालू लागलो . 
अमरकंटक ते माई की बगिया मार्गामधील घनदाट आरण्य

मध्ये एक छोटेसे तलाव वजा पाणी साठलेले होते तिथे मला कालचा रात्री भांडण करून निघून गेलेला साधू बसलेला दिसला ! मी त्याला जोरात ओरडून आवाज दिला बाबाजी कैसे हो ? माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही राग द्वेष कुठलीही भावना नव्हती . परंतु मला पाहताच तलावाच्या काठावर बसलेल्या त्या साधून आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये मुंडके घालून घेतले आणि माझ्याकडे पाठ फिरवली . त्याची ही देहबोली पाहता त्याला माझ्याशी बोलण्यात काही रस नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी पुढे जंगलातील मार्ग पकडला .काल मला मारून टाकण्याची धमकी देणारा माणूस आज अशा पद्धतीने भयभीत होऊन बसलेला पाहिला आणि मौज वाटली . माझ्यासोबत अजूनही काही परिक्रमावासी तिकडे निघाले होते .त्यातील एक तेजस्वी तरुण मुलगा होता ज्याने पायामध्ये पादत्राणे न घालता परिक्रमा सुरू ठेवली होती . त्याच्याशी थोडेफार बोलत मी चालत राहिलो . या संपूर्ण परिसरामध्ये एका ठरलेल्या मार्गाने चालावे लागते . कारण इथे नर्मदा मैया भूमिगत रूपामध्ये आहे आणि ओलांडली जाऊ नये याकरता मार्ग आखून ठेवलेला आहे .हळूहळू आजूबाजूचे अरण्य घनदाट होत गेले . एका मोठ्या झाडाखाली एक आदिवासी मनुष्य बसला होता त्याने सांगितले इथे तुमच्या जवळच्या सगळ्या उदबत्त्या पेटवून टाका . त्याप्रमाणे केले . आज परिक्रमा सुरू करून केवळ १४ दिवस झाले होते आणि साक्षात नर्मदा मातेचे उगमस्थान माझ्यासमोर दिसू लागले होते या नुसत्या कल्पनेने डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रु वाहू लागले . उजव्या हाताला एक छोटेसे हनुमान कुंड होते त्याला वंदन करून धावतच थोडेसे चढावर असलेले नर्मदा मातेचे मूळ उगमस्थान गाठले . 

नर्मदा पुराण मध्ये असा उल्लेख आहे की इथे एका बांबूच्या झाडाच्या मुळापासून नर्मदा मातेचा उगम झालेला आहे . आता ते झाड शिल्लक नाही परंतु उगम स्थान शिल्लक आहे . एका छोट्याशा कुंडामध्ये करंगळी भर धारेतून नर्मदा मातेचा उगम होतो . परंतु हे स्थान थोडेसे मागच्या बाजूला आणि लपलेले राहते . शक्यतो तिथले पुजारी लोक या स्थानाचे दर्शन घेऊ देत नाहीत .
केवळ अमरकंटक क्षेत्रातच नर्मदा मातेचे उगमस्थान आहे असे सांगितले जाणारी पाच सात कुंडे आहेत ,आणि ते स्वाभाविक आहे कारण बरेचदा नदीचा उगम एका धारेचा नसतो तर अनेक उमाळे त्या भागामध्ये असतात परंतु तरीदेखील पौराणिक मान्यता पाहता त्यातील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले कुंड खालील छायाचित्रामध्ये दिसते आहे .
 नर्मदा मातेचे मूळ उगमस्थान
 इथून तेच नर्मदा जल एका छोट्याशा भूमीगत नाळीद्वारे आधी एका तीन चार फूट आकाराच्या मध्यम कुंडामध्ये आणले आहे आणि मग तिथून पुढे पुन्हा खालच्या खाली एका पाच फूट बाय पाच फूट मापाच्या साडेतीन-चार फूट खोल हौदवजा कुंडा मध्ये आणलेले दिसते. परिक्रमा वसींना फक्त या कुंडाचे दर्शन घडवले जाते .मला सुदैवाने मोहन साधूने आधीच सर्व सांगितले असल्यामुळे मी विनंती करून सर्व कुंडांचे दर्शन घेतले .
 मध्यम कुंड
इथे देखील साधारण अंगठ्याएवढी जाड धारा आपल्याला दिसते आणि बाहेर पडताना मात्र चांगली सहा इंच धारा बाहेर पडते .या कुंडामध्ये एक शिवलिंग स्थापित केलेले आहे . लोक या कुंडामध्ये दक्षिणा टाकत राहतात .

इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की नर्मदा मातेचा उगम झाल्यानंतर ती भारतातील सर्व नद्यांप्रमाणेच पूर्व दिशेला प्रवाहित होत आहे . परंतु या नर्मदा कुंडातून खाली ते जल हनुमान कुंडामध्ये नेले आहे आणि हनुमान कुंडामध्ये मात्र ती लुप्त होते . माझे असे स्पष्ट मत आहे की या हनुमान कुंडातून भगवान महादेवांनी नर्मदा मातेचे जल पश्चिम दिशेला नेले आणि अमरकंटक क्षेत्रातील नर्मदा कुंडा मध्ये प्रवाहित केले . माई की बगिया येथील अन्य कुंडांपेक्षा हनुमान कुंडाची पातळी खाली आहे .
 हेच ते हनुमान कुंड जिथून पूर्वेकडे वाहणारी नर्मदा मैय्या भूमिगत होऊन पश्चिम वाहिनी होते
या दोन्ही स्थानांचा नकाशा आपल्याला अवलोकनासाठी सोबत जोडत आहे म्हणजे आपल्याला नक्की काय प्रकार आहे ते लगेच लक्षात येईल .
सोबतच्या चित्रामध्ये लाल चौकटीमध्ये माई की बगिया आणि अमरकंटक येथील नर्मदा कुंड दाखवलेले आहे . तसेच निळ्या बाणांनी नर्मदा मातेचा प्रवाह दाखविला आहे . केशरी बाण परिक्रमेचा मार्ग दाखवितात .इथे आपल्याला स्पष्टपणे दिसते की माई की बगिया इथे अदृश्य झालेली नर्मदा थेट अमरकंटक मध्ये प्रकट होते .
 महादेवांनी आपल्या अभियांत्रिकी सामर्थ्याने प्रयत्नपूर्वक पूर्ववाहिनी नर्मदा मातेला पश्चिम वाहिनी केले आणि पश्चिम भारताचा उद्धार केला असे म्हणायला पुरेसा वाव आहे . अन्यथा गुजरात , मध्य प्रदेश या भागामध्ये अशी कुठलीही मोठी नदी मुळीच नाही . वाटेत येणारे विंध्य पर्वत , सातपुडा पर्वत आणि सह्याद्री पर्वत , या पश्चिम वाहिनी नर्मदा मातेला वाहण्यासाठी जागोजागी फोडल्यासारखे वाटतात . ही देखील कामगिरी महादेवांचीच असावी असा माझा कयास आहे . पुढे खचदऱ्या या नर्मदा मातेने खोल केल्या हे जरी मान्य केले तरी पहिला प्रवाह वाहण्यासाठी ज्या कोणी , जे काही कष्ट घेतले आहेत , ते निःसंशयपणे महादेवांचेच आहेत म्हणूनच महादेवांची कन्या हे नाव नर्मदा मातेला पुरेपूर शोभते ! आज कच्छ , संपूर्ण गुजरात , बहुतांश मध्य प्रदेश ,इंदोर, भोपाळ , उज्जैन सारखी मोठी शहरे , महाराष्ट्रातील धुळे , नंदुरबार ते अगदी राजस्थानातील जयपूर पर्यंत नर्मदेचे पाणी गेलेले आहे . महादेवांची दूरदृष्टी येथे आपल्याला दिसून येते . असो . तर अशा या नर्मदा मातेच्या मूळ उगम स्थानी गेल्यावर तिथल्या पुजाऱ्यांना नमस्कार केला . त्यांनी नर्मदा मातेची बाटली मागितली . बाटली त्यांना दिल्यावर त्यातील अर्धे जल त्यांनी नर्मदेच्या उगम कुंडामध्ये प्रवाहित केले व उगमकुंडातील जल काढून बाटली संपूर्ण भरून दिली . तिथे त्यांनी मंत्र उच्चारण करीत थोडीशी पूजा करविली मी देखील स्वखुशीने काही दक्षिणा त्यांच्या हातावर टेकवली .बहुतेक १०१ रुपये दिले असे मला आठवते . त्यानंतर मी जेव्हा बांबूच्या बेटात उगम पावलेल्या नर्मदा माते बद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी मागे असलेल्या कुंडाचे दर्शन घ्यायला सांगितले . इथे नर्मदेचे पाणी अतिशय नितळ निर्मळ स्वच्छ सुंदर आणि अद्भुत होते ! या संपूर्ण परिसरामध्ये एक अद्भुत ऊर्जा भरून उरली होती ! करोडो लोकांची तहान भागवणारी , करोडो लोकांची जीवनदायीनी , लाखो साधकांची आधारभूत नर्मदा माता येथे उगम पावत होती ! हे स्थान काही साधारण नव्हे ! या स्थानाचे महात्म्य केवळ अद्भुत आहे !
नंतर पुजारी पुन्हा माझ्याकडे आले आणि इथे कन्याभोजन करण्याचे त्यांनी मला सुचवले .परंतु लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तुम्ही पुढे निघून जा मी तुमच्या नावे कन्या भोजन करतो असे त्यांनी मला सांगितल्यामुळे तिथेच केलेल्या एका छोट्याशा ऑफिस वजा टपरी मध्ये जाऊन मी दक्षिणेची पावती फाडली आणि पुढे मार्गस्थ झालो .
कन्या भोजन करविण्यासाठी पावती फाडली ती जागा
 खरे तर इथे मुक्कामच करायला हवा ! तशी सोय देखील इथे आहे . परंतु अमरकंटक पोलिसांनी सगळा खेळ बिघडवून टाकला होता . त्यामुळे पंडिताने देखील आम्हाला लवकरात लवकर अमरकंटक सोडून पुढे जाण्याची विनंती केली . नर्मदा परिक्रमे साठी निघालेले परिक्रमावासी हातचे न राखता दान धर्म करतात हे माहिती असल्यामुळे क्षेत्र पंडे त्याचा व्यवस्थित लाभ उठवितात असे माझ्या लक्षात आले . इथे पुणे मुंबई भागातून आलेले काही परिक्रमा वाशी भेटले . हे सर्वजण गाडीने आलेले होते . दरम्यान एका पंडिताने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला .
 माई की बगिया क्षेत्रातील मला मिळालेला शिक्का
 वरच्या बाजूला एक जुना आश्रम आहे . या आश्रमाचे नाव तुरिया आश्रम असे आहे . परंतु हा देखील पूर्णपणे बंद होता आणि इथून देखील पुढे जाण्यासाठी मला सांगण्यात आले .
या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते .इथे कायम उत्सवाचे वातावरण असते . हा भाग उंच सखल असल्यामुळे मोठ्या मोठ्या पायऱ्या येथे केलेल्या आहेत त्यावर बसलेले लोक तुम्हाला दिसतात . आत्तासुद्धा लॉकडाऊन असून देखील बऱ्यापैकी गर्दी दिसत होती . या क्षेत्राची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता इंटरनेटवरून डाऊनलोड करून टाकत आहे .
माई की बगिया परिसर
माई की बगिया येथील नर्मदा मातेच्या उगमस्थानावरील बालरुपातील सुंदर मूर्ती
संपूर्ण भारतभरातील भाविक येथे नर्मदा मातेच्या दर्शनासाठी येत असतात
इथून पुढे निघून जाण्याचा निर्णय घेऊन मी जंगलातील मार्ग पुन्हा एकदा पकडला .इथले जंगल फारच घनदाट असून अतिशय उंच उंच झाडे आहेत .या बाजूने मात्र माहिती बघूया कडे येणारा रस्त्याचा मार्ग मला लागला . पर्यटकांचे विचित्र चाळे पहात चालत राहिलो . सध्या मोबाईल मुळे आणि सोशल मीडियामुळे रिल्स वगैरे बनविण्याचे आणि सेल्फी काढण्याचे प्रमाण फार वाढले आहे त्याचा इतरांना उपद्रव होतो आहे याचे देखील भान लोकांना राहिलेले नाही . नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार भारतामध्ये जगातील सर्वात जास्त रिल्स पाहणारे लोक आहेत . इथे दर मिनिटाला ६६ लाख नवे रील्स अपलोड केले जातात अशी बातमी आज तक वर नुकतीच लागली होती ! असो . मी सोबत मोबाईल नावाचे चेटूक आणले नव्हते याचा मला आनंदच वाटला . इथून पुढे सोनमुडा या गावांमध्ये शोण नदीचे उगम स्थान बघायचे होते . या शोण नदीबद्दल आणि सोनभद्र राजा बद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत . हा खरे तर या देशाचा राजा होता आणि त्याला नर्मदेशी विवाह करायचा होता परंतु महादेवामुळे दोघांचा विवाह काही होऊ शकला नाही त्यामुळे त्याने दरीमध्ये उडी मारली . अशी कथा नर्मदा पुराणा मध्ये येते . इथे आपण एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे . जगातील प्रत्येक भागामध्ये इतिहासाची नोंद करून ठेवण्याची पद्धत आहे . ब्रिटिश किंवा पाश्चात्य इतिहासकार ही नोंद लेखी स्वरुपात करून ठेवतात . भारतीय परंपरांमध्ये इतिहासाची नोंद ही कथा पुराणे अथवा शिल्पकृती मधून करून ठेवण्याची प्रथा आहे . भारतीय लिखाण हे प्रतीकात्मक असते आणि त्याचा अर्थ कळायला फार तीव्र बुद्धिमत्ता लागते . आता हेच उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल . सोन नदी आणि नर्मदा नदी यांचे मिलन होऊन एक मोठी नदी पूर्ववाहिनी होण्याची शक्यता होती .परंतु अशी भेट होण्यापूर्वीच महादेवांनी नर्मदेचा प्रवाह पश्चिमेकडे वळविल्यामुळे त्यांचा विरह झाला आणि दोन वेगळ्या नद्या निर्माण झाल्या .  शोण नदी उगमा नंतर लगेच खोल दरीमध्ये धबधब्याच्या स्वरूपात पडते .हे दृश्य फार सुंदर असून ते नीट दिसावे म्हणून तेथे एका सेल्फी पॉइंटची निर्मिती मध्य प्रदेश पर्यटन विभागाने केलेली आहे . हेच भौगोलिक वास्तव कथेच्या स्वरूपात गुंफलेले आपल्याला आढळते . याच परिसरामध्ये पार्वतीचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे. सोनाक्षी अथवा शोणाक्षी माता असे तिचे नाव असून सती रूपामध्ये तिचे उजवे नितंब येथे पडले अशी आख्यायिका आहे . हा संपूर्ण परिसर अतिशय ऊर्जा युक्त जाणवतो .
 शोण नदीचे उगमस्थानी असलेले षट्कोनी कुंड
 सतीचे उजवे नितंब पडले त्याचे मंदीर
 शोण उगम स्थान ( भद्रसेन राजा )

माई की बगिया कडून पक्क्या रस्त्याने घनदाट अरण्यातून चालताना आपण नर्मदेला डोक्याच्या बाजूने परिक्रमा पूर्ण करतो .आणि तो रस्ता हळूहळू वळत आपल्याला सोनमुडा या गावामध्ये घेऊन येतो . 
इथे बाहेर थोडाफार बाजार भरलेला  . खाण्यापिण्याची वगैरे छोटी मोठी दुकाने येथे आहेत .इथून डावीकडे खालच्या बाजूला भरपूर पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला सोनाक्षी मातेचे मंदिर आणि सोन नदीचा उगम लागतो .
इथेच एक भव्य मारुतीचे मंदिर असून तिथे एक तेजस्वी जटाधारी साधू बसलेले दिसले . 
इथून अजून खाली गेल्यावर आपल्या उजव्या हाताने शोण नदी छोट्या झर्‍याच्या स्वरूपात वाहताना दिसते . आणि बघता बघता ती समोरच्या अथांग जंगलामध्ये खोल दरीत झेप घेते .
 अथांग दरीत झेपावणारी शोणनदी

 इथून समोर दिसणारे दृश्य अतिशय विहंगम असे आहे . आपली जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडी आपल्याला दिसते . 
ही झाडी इतकी घनदाट आहे की इथे वन्य श्वापदांना सुद्धा फिरताना त्रास होत असेल . 
इथून नदी खाली झेपावते ते नीट पाहता यावे म्हणून मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाने येथे एका सेल्फी पॉइंट गॅलरी ची निर्मिती केलेली आहे .
आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल असल्यामुळे इथे सतत गर्दी असते . जो तो इथे जाऊन सेल्फी काढण्यामध्ये रममाण झालेला आपल्याला दिसतो . 
इथे मोठ्या प्रमाणामध्ये माकडे आणि वानरे दिसून येतात . पर्यटकांची या माकडांशी , माकड चाळ्यांची स्पर्धाच जणू सुरू असते !  इथे मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळेच आर्द्रता देखील भरपूर असते आणि त्यामुळे भिंतीवर ,मंदिराच्या कळसावर , सर्वत्र शेवाळे साठलेले दिसते .
इथल्या सर्व मंदिरांची शांतचित्ताने दर्शने घेत मी हळूहळू पायऱ्या चढत पुन्हा वरच्या रस्त्याला आलो. आणि अमरकंटकच्या दिशेने चालू लागलो . मुखाने नर्मदा मातेचे नामस्मरण सुरूच होते . परंतु या टप्प्यामध्ये ती भूमिगत वाहत असल्यामुळे तिचे दर्शन मात्र होत नव्हते . आजूबाजूचे घनदाट अरण्य पहात चालताना अमरकंटक कधी आले कळलेच नाही ! 
लेखांक सत्तावीस समाप्त (क्रमशः)

 लेखांक २८ : अमरकंटकचे गीता स्वाध्याय मंदिर

सोनमूढा सोडल्यावर वाटेत एकाने सांगितले की पुढे पुष्कर बंधाऱ्या पाशी यशोधन नावाचे पुण्याचे कोणीतरी अन्नछत्र चालवितात तिथे जावे . चालता चालता हळूहळू अमरकंटक गाव दिसू लागले . लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच . पुष्कर बंधाऱ्यावरील या आश्रमाची कोणाला माहिती आहे का हे विचारण्याकरता मी जागा शोधत होतो . एका छोट्याशा आश्रमाचे लोखंडी दार मला दिसले .दारावरती श्री गीता स्वाध्याय मंदिर अशी अक्षरे लोखंडामध्येच घडवलेली होती . 



तिथून आत उन्हामध्ये खुर्ची टाकून एक वयस्कर संन्यासी बसल्याचे माझ्या लक्षात आले . त्यांची समाधी अवस्था लागलेली दिसत होती . मी बराच वेळ त्या लोखंडी दाराच्या बाहेर हात जोडून उभा राहिलो . संन्यासी महाराजांची मूर्ती अतिशय छोटीशी होती . त्या वामनमूर्तीचे वजन जेमतेम ३० ते ३५ किलोच असावे ! नुकतेच क्षौर केलेले होते . इतक्यात आतून कुणीतरी सेवेकरी आला आणि त्याने मला विचारले क्या चाहिये बाबा जी? सेवेकऱ्याच्या त्या आवाजामुळे संन्यासी महाराजांची समाधी भंग पावली .आणि माझ्याकडे पाहत त्यांनी अतिशय दमदार भरदार आणि खर्जातल्या आवाजात विचारले , " नर्मदे हर ! क्या है ?" मी म्हणालो "नर्मदे हर महाराज ! यहा यशोधन नाम के पुनावाले आदमी का आश्रम किधर है ? हमने सुना पुष्कर बाँध के बाजू मे कही है । " क्षणाचा ही विलंब न लावता स्वामी जी म्हणाले , " क्यू ? यहा रहे तो नही चलेगा ? " " वैसी बात नही है स्वामीजी । लेकिन अमरकंटक शहर मे लॉकडाऊन चल रहा है । " " तो ? " " तो आपको मेरे कारन परेशानी ना झेलनी पडे इसलिये शहर से बाहर निकलने की सोच रहे है । " "नर्मदा मैया की परिक्रमा कर रहे हो और खुद सोच रहे हो ? " " पुलीस ने परिक्रमावासीयोंको अमरकंटक के ऊस तट पर रोका था .स्वामीजी । और बताया था जल्दी से जल्द इस शहर को खाली करे । इसलिये . . . " "यह गीता स्वाध्याय आश्रम है । यहा श्रीकृष्ण परमात्मा के कायदे कानून चलते है । आ जाओ अंदर । आसन लगाव और चाय पाओ । " स्वामीजींचे हे शब्द ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही .कारण पहाटेपासून मी अखंड चालत होतो .अमरकंटक चा संपूर्ण डोंगर मी चढून आलो होतो . पाय बोलू लागले होते .थंडी तर इतकी भयंकर होती की चालताना सुद्धा थंडी वाजत होती . चालताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचा काहीही फरक थंडीला पडत नव्हता . मी आत गेलो आणि स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला . "ओम नमो नारायणाय ! " 
थोडेसे धर्मज्ञान घेऊयात.
आपल्या धर्मामध्ये भगवे किंवा काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त चतुर्थाश्रमाला अर्थात संन्यासी लोकांना आहे . ( आपल्या धर्मामध्ये धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत .तसेच ब्रह्मचर्याश्रम , गृहस्थाश्रम ,वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम असे चार आश्रम सांगितलेले आहेत. यातील चौथा असल्यामुळे संन्यासाला चतुर्थाश्रम म्हणतात) 
संन्यासी वेश असा काहीसा असतो . आद्य शंकराचार्यांनी संन्यास आश्रमाचे पुनरुज्जीवन केल्यामुळे त्यांचे चित्र जोडले आहे .दंड कमंडलू आणि काषाय वस्त्र ही प्रमुख अंगे आहेत .

केवळ साधू म्हणून फिरणाऱ्या साधकांनी पांढरे वस्त्र परिधान करणे अपेक्षित आहे . अशा लोकांना शक्यतो भारतामध्ये सीताराम बाबा असे म्हणतात . हे सीताराम बाबा बहुतांश करून वैष्णव असतात . 
 सीताराम बाबा वेषभूषा ( वैष्णव साधू )
काही शाक्त व गाणपत्य ,पिवळे ,तांबडे ,निळे , हिरवे ,काळे असे वस्त्र देखील घालतात .परंतु भगवे वस्त्र मात्र केवळ संन्यासीच घालू शकतो . वरीलपैकी सर्व प्रकारच्या साधूंना अभिवादन करताना सीताराम किंवा रामराम असे म्हटले की पुरेसे असते . परंतु संन्यासी हा साक्षात नारायण स्वरूप मानला जातो . त्यामुळे त्याला अभिवादन करताना मात्र ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो नारायणा असे म्हणण्याची पद्धत आहे .
तुम्हाला या सर्व गोष्टींचे कितपत ज्ञान आहे हे साधू पहिल्या भेटीतच ओळखतात .आणि त्यानुसार तुमच्याशी कसे वागायचे ते ढोबळ मानाने ठरविले जाते असा माझा अनुभव आहे . मुरलेला साधक भेटला तर साधू त्याच्याशी फार प्रेमाने , आस्थेने आणि आनंदाने वागतात . एखादा घोर संसारी भेटला तर त्याची हाड हुड देखील केली जाते . एकंदरीत साधू कधी कसे वागतील याचा काही नेम नसतो त्यामुळे आपण नेहमी सावध राहिलेले बरे असते . असो . 
 मी तसे अभिवादन करून महाराजांच्या पायाशी मांडी घालून उन्हामध्येच बसलो . महाराज मला म्हणाले , अरे खाली बसू नकोस .काहीतरी आसन बसायला घे . इतक्यात एका सेवेकऱ्याने आतून बसकर आणून दिले .मी स्वामीजींच्या तेजस्वी रूपाकडे अनिमिश नेत्राने पाहू लागलो ! इतके छोटे रूप असून देखील स्वामींच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते ! त्यांचा चेहरा अतिशय  , निर्मळ , तेजस्वी आणि निरागस होता . डोळ्यावरचा चष्मा नाकाकडे ढकलत ते माझ्याकडे पाहू लागले . "कहा से आये हो ? " "पुना से स्वामीजी । " "आज तुम यहा रुको यह नर्मदा मैया की इच्छा थी। वैसे हम स्वयम किसी को आग्रह नही करते । आश्रम सब का है ।जिसको आना है आये । जिसको जाना है जाये । परंतु तुमने जब पूछा तो मुझे लगा इस परिक्रमावासी को रोक लेते है । " त्यांचा धीर गंभीर खर्जातला आवाज ऐकून मला खूपच भारी वाटत होते ! पूर्वी टीव्हीवर ओम नमः शिवाय किंवा रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका लागायच्या . त्यात निवेदकाचा जो आवाज असायचा " मै काल हूँ। " तसा हा आवाज वाटत होता .
स्वामी नर्मदानंद गिरी असे या संन्यासी महाराजांचे नाव होते व त्यांचे वय सहज नव्वदीच्या आसपास असावे हे त्यांच्या त्वचेकडे पाहून कळत होते . परंतु त्यांची तब्येत अतिशय उत्तम होती व ते सर्व कामे स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते . 
स्वामी नर्मदानंद गिरी यांचे तरुणपणीचे छायाचित्र
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे स्वामी नर्मदानंदगिरी

त्यांच्या त्या वामन रूपाशी तो आवाज अजिबात जुळत नव्हता ! परंतु साधनेमुळे माणसांमध्ये काय काय बदल होऊ शकतात हे कोणीच जाणू शकत नाही . जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरु या आधुनिक गुरूंच्या एका भाषणात देखील साधुत्व स्वीकारल्यावर त्यांचा आवाज बदलल्याचे त्यांनी सांगितले होते . स्वामीजींचा चांगला तासभर सत्संग मला लाभला . मी परिक्रमा कशासाठी करतो आहे वगैरे सर्व त्यांनी मला व्यवस्थित विचारून घेतले . मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांचे समाधान झाले आहे असे मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवले . त्यांनी आतून सेवेकऱ्याला हाक मारली . तो धावतच चहा घेऊन आला . त्याने माझ्यापुढे चहाचा एक कप ठेवला आणि महाराजांच्या हातात दुसरा कप दिला . इतक्यात स्वामीजींना काय वाटले कोणास ठाऊक त्याला म्हणाले , इनको भी मेरी वाली चाय पिलाओ । मग माझ्या लक्षात आले की स्वामीजी एक काढा पीत होते आणि मला मात्र चहा देण्यात आला होता . सेवक लगेच माझ्या पुढील चहाचा कप घेऊन गेला आणि मला देखील त्याने काढा आणून दिला . माझे पुण्यातील मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर यांनी बरेच संशोधन करून एक आयुर्वेदिक काढा बनविला आहे त्याची आणि या काढ्याची चव हुबेहूब सारखी होती . त्यामुळे मी पटापट त्याच्यामध्ये काय काय टाकले आहे ते स्वामीजींना सांगितले आणि स्वामीजी अजूनच खुश झाले ! साधू संतांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचे समाधान काही निराळेच आहे ! स्वामीजी म्हणाले मी कधीच चहा पीत नाही . हा काढा शोधून काढला आहे . त्या कडकडीत उन्हामध्ये ही अंगात भरलेल्या थंडीमध्ये काढा खरोखरीच अमृताप्रमाणे वाटत होता . महाराजांशी खूप चांगला सत्संग घडला . 

 प.पू . स्वामी नर्मदानंदगिरीजी
त्या आश्रमामध्ये आत गेल्या गेल्या मधोमध फरसबंदी केलेले अंगण होते . उजव्या हाताला महादेवाची पिंड स्थापित केली होती आणि डाव्या हाताला स्वामीजींची बसण्याची व त्यामागेच राहण्याची खोली होती .  या आश्रमाची स्थापना १९७५ साली गीता जयंतीच्या पवित्र दिवशी स्वामी ब्रह्मेंद्रानंद गिरी  यांनी केली होती . या स्वामिनी १९३२ साली नर्मदा परिक्रमा केली होती व त्या काळामध्ये धुनी वाले दादाजी यांना ते भगवद्गीता ऐकवत असत .  दादाजींनी देह ठेवल्यावर भ्रमण करत करत स्वामीजी काशी येथील प्रखर विद्वान नृसिंह गिरी महाराज यांच्या दक्षिणामूर्ती आश्रमामध्ये काही काळ राहिले .तिथून गुरु आज्ञेनुसार प्रयागच्या परमानंद आश्रमात राहून नंतर पुष्कर संन्यास आश्रमाचे महंत पद सांभाळत असताना सर्व सोडून पुन्हा एकदा नर्मदेचे उगमस्थान गाठले आणि नर्मदा मातेच्या प्रेरणेने केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना , मुलांना भगवद्गीता व वेद विज्ञान शिकवण्यासाठी या आश्रमाची स्थापना केली . इथे आजही विविध गोष्टी शिकण्याकरता दुरून लोक येत असतात . माझ्यासमोर देखील अनेक लोक येऊन बऱ्याच गोष्टी महाराजांकडून शिकून गेले . कोणीही आले की महाराज शांतपणे त्या व्यक्तीला समोर बसवत आणि धीर गंभीर आवाजामध्ये शुद्ध उच्चारणासह संथा देत . महाराजांनी मला वस्ती करण्याची सूचना केली . एक सेवेकरी मला खोली दाखवण्याकरता घेऊन गेला . माडीवर एका खोलीमध्ये तीन-चार साधू आधीच उतरले होते . तिथे एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . कुठेही गेल्यावर थोडेसे आजूबाजूला फिरून अवलोकन करण्याची माझी सवय आहे . त्याप्रमाणे मी त्या खोलीचे मागच्या बाजूचे दार उघडले आणि छोट्या सज्जा मध्ये गेलो आणि पाहतो तर काय ! ज्या ठिकाणी नर्मदा मातेचा उगम झाला अशी मान्यता आहे , आणि ज्या ठिकाणाचे दर्शन न घेताच मला पोलिसांनी हाकलून दिले होते , ते नर्मदा कुंड साक्षात माझ्यासमोर मला दिसत होते ! त्या खोलीपासून केवळ शंभर मिटर अंतरावरती नर्मदा मातेचे उगमस्थान होते ! आपल्याला आश्रमाचे नक्की स्थान कळावे म्हणून नकाशा सोबत जोडत आहे . त्यात आपण पाहू शकता की नर्मदा मातेचे उगम स्थान मानले गेलेले कुंड आश्रमापासून किती जवळ आहे ! आश्रमाच्या मागे सरस्वती / सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम होत होता व त्या लगेच नर्मदेला जाऊन मिळत होत्या .

आता माझ्या लक्षात आले की स्वामीजींनी मला का थांबवून घेतले होते . त्या खोलीमध्ये एक तरुण तमिळ परिक्रमावासी होता . मला तमिळ बोलता येते आहे हे पाहून त्याला खूप आनंद झाला . आणि त्याने मला सांगितले की त्याचे गुरुदेव देखील परिक्रमेमध्ये आहेत आणि नुकतेच या आश्रमामध्ये ते आलेले आहेत . ते देखील एक मोठे संन्यासी होते व त्यांनी पायी परिक्रमा सुरू केली होती . मला गुरु देवांची भेट नक्की घालून देईन असा शब्द देऊन तो त्याच्या कामाला निघून गेला . मी आसन लावून शांत बसून राहिलो . प्रचंड थंडी पडलेली होती . त्यामुळे गुरफटून बसले की बरे वाटायचे . चालून चालून खूप थकल्यामुळे स्नान करावे अशी इच्छा मला होत होती . त्यामुळे मी खाली गेलो आणि पक्क्या बांधकाम केलेल्या बाथरूम मध्ये बर्फासारख्या थंडगार पाण्याने स्नान आटोपले . सोबतचे कपडे धुवून पिळून वाळत टाकले . थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे माझी थंडी पळून गेली . बघता बघता संध्याकाळच्या उपासनेची वेळ झाली . मी कमरेला लुंगी गुंडाळून उघडा फिरतो आहे हे पाहून महाराज मला म्हणाले इथे थंडी खूप आहे अंग झाकून घेणे . परंतु दुपारीच स्वामीजींनी मला "अयं न इदं शरीरम् "  मंत्राचा बोध केला होता .त्याप्रमाणे मी वागत होतो . उघड्या अंगानेच उपासना करून घेतली . आणि शिव मंदिरामध्ये होणाऱ्या सामुदायिक उपासने करता जाऊन वाट बघत बसलो .मठातील सर्व सेवेकरी जमा झाले आणि सर्वांनी मिळून शिवमहिम्नस्तोत्र म्हणायला सुरुवात केली . सर्वच जण अंगावर दोन दोन शाली गुंडाळून आलेले होते . कमरेला लुंगी गुंडाळून उघडा बसलेला परिक्रमा वासी पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे हे मला त्यांच्या नजरे कडे पाहून कळत होते . परंतु मला खरोखरच थंडी वाजत नव्हती . किंवा असे म्हणता येईल की थंडी आहे किंवा नाही याच्या पलीकडे माझे शरीर आणि शारीर जाणीवा  गेलेल्या होत्या . स्वतः स्वामीजी देखील संपूर्ण उपासना बसून म्हणून गेले . अतिशय शांत स्वरामध्ये चाललेली ती उपासना खरोखरीच ऐकण्यासारखी होती . आश्रमामध्ये इतके साधक आहेत हे मला उपासनेची संख्या पाहून कळले अन्यथा सर्वजण आपापल्या साधनांमध्ये आणि सेवेमध्ये गुंतलेले होते .आश्रमामध्ये वेदपाठ शाळा होती शिवाय गोसेवा देखील चालत असे त्यामुळे बरेच कर्मचारी होते . ही उपासना झाल्यावर तमिळ संन्यासी महाराजांनी मला भेटण्यासाठी वर बोलावले . यांचे नाव प्रणव स्वरूपानंद सरस्वती महाराज असे होते . त्यांच्या शिष्याचे नाव रंगनाथन असे होते . स्वामीजी अतिशय नम्र साधे व विद्वान होते . त्यांच्या शेजारी जमिनीवर त्यांनी मला बसवून घेतले आणि उपदेश करायला सुरुवात केली . आधी त्यांनी माझा परिक्रमेचा हेतू समजावून घेतला . त्यांनी मला विद्या ,दान आणि तप या तीन गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले आणि परिक्रमा निश्चितपणे पूर्ण होईल असा शुभाशीर्वाद दिला . मला तमिळ भाषा लिहिता वाचता बोलता येते आहे हे पाहून स्वामीजींना खूप आनंद वाटला . स्वामी म्हणाले सर्व भाषा एकच भावना व्यक्त करतात . भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा ! ज्याला भाव कळला त्यालाच देव कळला ! भाषा हे केवळ माध्यम आहे . माझ्या मनामध्ये दान या विषयाबाबत थोडासा किंतु परंतु शिल्लक राहिला होता .वाटेमध्ये आपल्याला मिळालेले पैसे हे लोकांनी दान म्हणून दिलेले आहेत त्याचे पुन्हा दान कसे काय करायचे असे मला क्षणभर वाटले होते .परंतु स्वामीजींनी सांगितल्यामुळे इथून पुढे आलेला प्रत्येक रुपया मी शक्य तितक्या लवकर दान करून मोकळा होत असे ! स्वामीजी तीन वर्षे ,तीन महिने ,तेरा दिवसांची परिक्रमा करीत होते . मी ज्या काठावरील मार्गाने जाणार होतो तोच मार्ग त्यांनी देखील निवडला होता . स्वामीजींचे युट्युब वर चॅनल आहे असे त्यांनी मला सांगितले व ते नेहमी बघत जा असे देखील सांगितले . Tamil Kathopanishad असे YouTube वर शोधले असता स्वामी परमहंसनंद सरस्वती यांची कठोपनिषद या विषयावरील सव्वा ते दीड तास लांबीची शंभर तमीळ प्रवचने आपल्याला आढळतात , हे यांचे गुरुबंधू होत ! ऋषी परंपरा नावाने युट्युब वरती ते क्लासेस घेतात असे देखील त्यांनी मला सांगितले . वाचकांच्या माहिती करता त्यांच्या चॅनल लिंक खाली देत आहे.

https://youtube.com/@parampararishividyabyswami514?si=wUr9b3mktIkushQK

त्यांच्या गुरुपरंपरेचे संकेतस्थळ खालील प्रमाणे .

https://www.parampararishividya.in/

प्रणव स्वरूपानंद सरस्वती स्वामींचे गुरुबंधू स्वामी परमहंसानंद सरस्वती आणि त्यांच्या संपर्काची माहिती
असो .एकंदरीत स्वामींचा संप्रदाय अतिशय विद्वत्ता प्रचूर आणि अभ्यासू होता हे लक्षात येत होते . स्वामींचे वागणे व्रतस्थ होते . आफ्रिकन भोपळ्याचा एक साधा वाडगा त्यांच्याकडे होता . त्यातूनच ते पाणी पीत आणि त्यातच जे काही अन्न मिळेल ते सर्व एकत्र कालवून खात .
स्वामीजी अनवाणी चालत असत . आणि कुठलीही विशेष व्यवस्था मिळेल याची अपेक्षा न करता मिळेल त्या परिस्थितीमध्ये अत्यंत समाधानाने राहत असत. गंमत पाहायला गेले तर आजच्या एका दिवसामध्ये मला रामकुटीच्या महाराजांपासून सोमनाथ गिरी बाबा ,मीरा माई ,नर्मदानंद महाराज आणि आताचे हे संन्यासी महाराज इतक्या थोर महापुरुषांची दर्शने झाली होती ! याचे वर्णन शब्दांमध्ये मी पामर काय करणार ! शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी या आनंदाचे वर्णन आधीच करून ठेवलेले आहे !

धन्य आजी दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥
त्रिविध तापाची झाली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥

रात्री पाठ टेकता क्षणी कधी झोप लागली कळालेच नाही. पहाटे उठून प्रचंड थंडीमध्ये गार पाण्याने अंघोळ करून , उपासना करून निघालो. इतक्यात स्वतः नर्मदानंद स्वामीजी मला आडवे आले आणि म्हणाले , "किधर जा रहे हो ? आज अपने आश्रम मे कन्या भोजन है । उसका भंडारा लेके फिर निकल जाना । " एका तरुण उडिया साधूची परिक्रमा पूर्ण झाली होती आणि त्या निमित्ताने तो कन्या भोजन घालत होता . स्वामीजींनी थांबवल्यावर मग काय !लगेचच मी माझी जोडी एका कोपऱ्यात ठेवून दिली आणि महाराजांच्या पायाशी बसलो . त्या दिवशी त्यांचा खूप अनिर्वचनीय सत्संग मला लाभला .इतक्या त्यांचा एक शहरी शिष्य तिथे आला आणि महाराजांच्या समोर येऊन बसला .महाराज मला म्हणाले , " क्षमा कीजिए । इन को पहले से समय दे चुका हु । लेकिन आप यहा बैठके इनकी संथा सुन सकते है । या आप स्वयं भी इनके साथ संथा बोलेंगे तो मुझे खुशी होगी । "असे म्हणून स्वामींनी त्याला गणपती अथर्वशीर्ष , सप्तशती आणि भगवद्गीतेची संथा दिली . त्यानंतर स्वामीजी भगवद्गीतेवरील काही श्लोकांवर अत्यंत सखोल बोलले . गीता सुगीता कर्तव्या या वाक्यावर त्यांचा पुन्हा पुन्हा भर असे . याचा अर्थ भगवद्गीता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये उतरवली पाहिजे असा होय. महाराजांची काढा पिण्याची वेळ झाली . त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिष्याला एका ऐवजी दोन काढे करायला सांगितले . अगदी हुबेहूब योगविहार काढा ! तीच चव !तोच प्रभाव !मला गंमत वाटली . यानंतर महाराज आपल्या आतल्या खोलीमध्ये निघून गेले आणि मला नर्मदा मातेचे अर्थात नर्मदा मातेचे उगमस्थान असलेल्या नर्मदा कुंडाचे दर्शन घेऊन यायला सांगितले . तिथे दर्शन घेताना परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते देखील महाराजांनी मला सांगितले . काल माझे दर्शन प्रशासनाच्या आगाऊपणामुळे हुकलेले होतेच .त्यामुळे मी धावतच नर्मदा कुंडाकडे निघालो . वरील नकाशात पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की नर्मदा कुंड आश्रमाला अक्षरशः खेटूनच होते . तिथे असलेले पोलीस आणि स्वयंसेवक परिक्रमावासी दिसला की त्याच्या अंगावर धावून जात आणि बाहेर काढत परंतु पर्यटकांना मात्र सर्वत्र मुक्त संचार ठेवला होता . हे माहिती असल्यामुळे जिथून सर्व भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतात ती रांग तोडून मी धावतच कुंडाकडे गेलो आणि पाण्यामध्ये उतरून दर्शन व त्या पुण्य जलाचे आचमन करून घेतले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेले सेवेकरी भांबावले परंतु तोपर्यंत माझे नर्मदा कुंडाचे सुरेख दर्शन झालेले होते ! दोघेजण पळतच माझ्या दिशेने आले ,आणि आरडा ओरडा करू लागले . परंतु तोपर्यंत मी माझा कार्यभाग आटोपून घेतलेला होता . ज्या नर्मदा मातेची आजवर मी नाव ऐकलेल्या व न ऐकलेल्या सुद्धा प्रत्येक महापुरुषांनी परिक्रमा केलेली आहे ,तिचे प्रकट उगमस्थान माझ्यासमोर होते ! पांढरा शुभ्र रंग दिलेली ही टुमदार मंदिरे फार सुंदर दिसतात .इथे वर्षभर भाविकांचा राबता असतो . हा संपूर्ण परिसर अतिशय पवित्र , स्वच्छ आणि सुंदर आहे . इथली स्पंदने जगावेगळी आहेत . या मंदिर परिसराची काही छायाचित्रे आपल्या दर्शनाकरिता खाली टाकत आहे .
यातील चार खांबांचा मंडप दिसतो आहे त्याच्या शेजारील मंदिर हे उगम स्थान मानले जाते .
माई की बगिया येथे जरी नर्मदा मातेचा उगम झालेला असला तरी जगाच्या कल्याणा करता भगवान महादेवांनी तिचा प्रवाह वळवून तिला पश्चिम वाहिनी केली ते ठिकाण म्हणजे अमरकंटक येथील हे नर्मदा कुंड होय .
हा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय आहे आणि इथून हलूच नाही असे इथे आलेल्या प्रत्येक माणसाला वाटते .
साधू संतांचे तर हे माहेरघर आहे . त्यामुळे नर्मदा परिक्रमेमध्ये नसलेले देखील हजारो साधू येथे कायम येत असतात . तिथले पाणी अतिशय स्वच्छ ,शुद्ध व निखळ निवळशंख आहे .
मध्यप्रदेशच्या पाठ्यक्रमामध्ये या उगम स्थानाची माहिती देणारा धडाच शिवराज सिंह चौहान सरकारने समाविष्ट केलेला आहे .
या संपूर्ण परिसराचे विहंगावलोकन केले असता आपल्याला खालील प्रमाणे त्याचा आकार असल्याचे लक्षात येते . या चित्राच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या मंदिरांच्या बाजूने परिक्रमावासी येतात आणि दुरूनच कुंडाचे दर्शन घेऊन पुढे माहिती बघूया या स्थानाकडे मार्गस्थ होतात . तिथून वळसा मारून आल्यावर पुन्हा निळ्या रंगाचा पत्रा दिसतो आहे तेथून आत येतात आणि कुंडाचे दर्शन घेऊन पुन्हा खालच्या दिशेने मार्गस्थ होतात .वरील चित्रामध्ये संपूर्ण दर्शन या शब्दातील "र्ण" हे अक्षर ज्या वास्तूला टेकले आहे , तोच गीता स्वाध्याय आश्रम आणि अगदी त्याच खोलीमध्ये माझा मुक्काम होता ! 
या संपूर्ण परिसरामध्ये छोटी मोठी सुमारे २४मंदिरे आहेत परंतु त्या सर्वांचे दर्शन परिक्रमावासी घेऊ शकत नाहीत . इथे चुकून परिक्रमा खंडित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे पदोपदी स्थानक लोक तुम्हाला सावध करताना दिसतात .तिथे तशा पाट्या देखील लावलेल्या आहेत . विशेषतः नर्मदेचा दक्षिण तट आणि उत्तर तट स्पष्टपणे दाखवणारी एक रेखाच इथे जमिनीवर आखलेली आहे . 

नर्मदा मातेचे येथील मूळ उगम स्थान वरील प्रमाणे आहे .
इथे असलेल्या एका हत्तीच्या शिल्पा खालून निघण्याची चढाओढ भाविकांमध्ये नेहमी पाहायला मिळते . माझ्या दिशेने धावत आलेल्या दोन्ही पुजाऱ्यांना मी गीता स्वाध्याय मंदिरामध्ये उतरलेला असून महाराजांनी मला पाठवले आहेत असे सांगितल्यावर त्यांचे समाधान झाले .मग ते म्हणाले पहिले बताया होता तो हम स्वयं आपको दर्शन करा के लाते । त्यांच्या धावत येण्यामागचा हेतू त्यांनी सांगितला . बरेच लोक अमरकंटक येथे परिक्रमा उचलतात . त्यांचा फारसा प्रश्न नाही परंतु ओंकारेश्वर येथे परिक्रमा उचलून लांब वर चालत आलेल्या लोकांना मात्र अमरकंटक येथे परिक्रमा सहज खंडित होते याची कल्पना येत नाही . नर्मदेचे भव्य दिव्य स्वरूप पहात ते उलटे वरती आलेले असतात .आपण पाहिलेली नर्मदा माता इतक्या बाल स्वरूपामध्ये असेल अशी स्वप्नात देखील कल्पना ते करू शकत नाहीत आणि त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून दक्षिण आणि उत्तर तट वेगळा करणारी रेखा पार होते . ती होऊ नये म्हणून परिक्रमावासींना या परिसरामध्ये जवळपास बंदीच केली आहे असे म्हटले तरी चालेल ! पदोपदी तुम्हाला लोक आठवण करून देतात की बाबाजी इसके आगे मत जाओ ! हे दर्शन झाल्यावर समोरच असलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह मी पाहून आलो . हा मात्र दक्षिण तटावर असल्यामुळे आपण बघू शकतो . खरे म्हणजे यवन आक्रमकानी तोडफोड केलेली ही पुरातन मंदिरे आहेत .
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हा मंदिर समूह अतिशय सुंदर पद्धतीने जतन करण्यात आलेला आहे . कलचुरी वंशातील शासक राजा कर्णदेव याने अकरावे शतकामध्ये ही मंदिरे बांधली अशी मान्यता आहे .
या परिसरातील प्रत्येक कुंडावर नर्मदा मातेचे मूळ उगमस्थान अशी पाटी लावलेली आपल्याला आढळते आणि याच कारणासाठी आपले पूर्वज सांगत असतात की ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये .शहाण्या माणसाला त्यातून काहीही हाती लागत नाही . आणि तसेही मुळात भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ते पठार मुळातच पाण्याने संपृक्त असते त्यामुळे अनेक ठिकाणावरून पाण्याचे स्त्रोत बाहेर पडत असतात आणि ते एकत्र होऊन नदीचे स्वरूप घेत असतात त्यामुळे अनेक कुंडे असणे स्वाभाविक आहे .

इथे शासनाने सुरेख बगीचा उभा केला असून तिथे अनेक लोक येत असतात .या संपूर्ण परिसराला पाहण्यासाठी तिकीट लावलेले असून परिक्रमावासींना मात्र मोफत प्रवेश देतात .संपूर्ण परिक्रमे दरम्यान परिक्रमावासींकडून कुठेही तिकीट आकारले जात नाही .
या अतिशय सुरेख मंदिरांचा आणि त्यातील मूर्तींचा मुसलमानी शासकांनी प्रचंड विध्वंस केलेला स्पष्टपणे दिसत होता .ते पाहून मन विषण्ण होत होते . वर्षानुवर्षे उघडपणे काही ठराविक लोकांनी हिंदू धर्मातील व्यक्त प्रतिकांची विटंबना केलेली स्पष्टपणे आपल्याला दिसते तरी देखील आपला समाज उघड्या डोळ्यांनी सत्य स्वीकारायला तयार होत नाही याचे वाईट वाटते . निदान जे घडलेले आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे . त्या उपर तुम्ही प्रतिक्रिया काय द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .ज्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे जडणघडणीप्रमाणे तो वागेलच. असो . मी गीता स्वाध्याय आश्रमामध्ये परत आलो . प्रचंड थंडी पडलेली होती . सर्वत्र धुके दाटलेले होते . किती वाजले आहेत याचा अंदाज येणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती . इकडे ओडिया साधूची कन्या भोजनाची लगबग सुरू होती .त्याने स्वतःच्या हाताने सर्व स्वयंपाक सिद्ध केला होता .शिरापुरीचा बेत होता .तो मला म्हणाला बाबाजी चलिये नर्मदा मैया को नैवेद्य चढा कर आते है ।मग काय मी पुन्हा त्याच्यासोबत नर्मदा कुंडा मध्ये गेलो . याला तिथे राहून काही दिवस झालेले असल्यामुळे पुजारी लोक ओळखत होते .त्यामुळे यावेळेस आम्हाला कोणी अडवले नाही आणि आम्ही थेट नर्मदा कुंडा पर्यंत गेलो . त्याने अतिशय प्रेमाने नर्मदा मातेला नैवेद्य दाखविला आणि आपल्या हाताने एक एक घास पाण्यामध्ये भरवू लागला . जणु काही ती आ वासून खाते आहे ! नंतर त्याने मला देखील नर्मदा मातेला घास भरवण्याची विनंती केली . मला एक क्षणभर ते या कुंडाचे प्रदूषण वाटले . कारण या कुंडामध्ये कुठलाही जीव जंतू अजून मला दिसलेला नव्हता . इतक्यात एक मोठा मासा मला पाण्यामध्ये दिसला ! किती मोठा असावा ? त्याची लांबी चार ते पाच फूट आणि रुंदी अर्धा फूट होती ! रंगाने मासा काळा कुळकुळीत होता . त्याचा भव्य आकार पाहून क्षणभर मला भीती वाटली .आणि इतक्या छोट्याशा कुंडामध्ये इतका मोठा मासा कसा काय राहतो आहे याचे देखील मला आश्चर्य वाटले . ओडिया साधुला मात्र तो मासा दाखवून देखील दिसला नाही . त्यानंतर आम्ही आश्रमामध्ये परत आल्यावर मी स्वामींना सांगितले की मी असा असा मासा पाहिला . स्वामीजी म्हणाले , "बहुत बढीया । देख लिया तुमने उस मछली को ? बहुत से लोग है जिनकी पूरी उमर अमरकंटक मे बीत गई , लेकिन उन्हे वह मछली आज तक दिखी नही है । " मला मौजच वाटली . इतक्या छोट्या कुंडामध्ये इतका मोठा मासा आणि लोकांना दिसत नाही यामध्ये त्या माशाचे कौशल्य किती भन्नाट आहे पहा !असो . अशा गमती जमती परिक्रमेमध्ये घडतच असतात . त्यांत परिक्रमावासी साधकांनी फारसे अडकायचे नसते .
कन्या भोजनाची वेळ झाल्यावर अचानक कुठून तरी २५ -३० कुमारिका गोळा झाल्या . मला पंगत वाढायची इच्छा होती परंतु महाराजांनी प्रसाद घ्यायला सांगितले . ओडिया साधूने अक्षरशः आपल्या हाताने प्रत्येक मुलीला एक एक घास भरवला . नर्मदा खंडातील छोट्या मुली तशा लाजाळू असतात परंतु कन्या भोजनाच्या दिवशी मात्र अतिशय धिटाईने वागतात !  जणू काही साक्षात नर्मदा माता त्यांच्या अंगामध्ये संचारलेली असते !  ते प्रेमळ कन्याभोजन पाहिले आणि तृप्त होऊन मी सर्वांची रजा घेतली . निघताना आश्रमाचा सही शिक्का एका साधूने मारून दिला .
माझ्या वहीमध्ये गीता स्वाध्याय मंदिराचा मारलेला शिक्का
 अशा पद्धतीने माझ्या नर्मदा परिक्रमेचा पंधरावा मुक्काम आनंदाचा घडला .  माझे वेळेचे गणित आधीच फार पुढे गेलेले होते ! आणि पुढे काय काय वाढून ठेवले आहे याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती !

लेखांक अठ्ठावीस समाप्त (क्रमशः )

 लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू


आजची चाल मोठी आव्हानात्मक होती .गीता स्वाध्याय मंदिरातून निघेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता. आणि पुढे जंगलची वाट सुरू होणार असल्यामुळे पायांना प्रचंड गती देणे अतिशय आवश्यक होते . कारण अंधार पडायच्या आत मला रामदास बाबांची ज्ञानेश्वरी कुटी गाठायची होती . परंतु अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा माता इतकी सुंदर आहे की तिचे रूप पाहताच बसावे असे वाटते ! नर्मदा कुंडातून बाहेर पडल्या पडल्या नर्मदा माता पुन्हा थोडीशी लहान होते आणि थोड्याच अंतरावर घातलेल्या एका मोठ्या बंधाऱ्यामुळे एक विशाल स्वरूप धारण करते . असे छोटे मोठे अनेक बांध अमरकंटक च्या हद्दीमध्ये आहेत . इथे चांगले पक्के घाट बांधलेले असून त्या घाटावरती भाविकांची आणि स्थानिक लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . उगमाचेच स्थान असल्यामुळे पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की विचारू नका ! ज्याप्रमाणे एक दोन वर्षांची बाळे ही अतिशय तेजस्वी सुंदर आणि गोड दिसतात तशी ही नुकतीच जन्माला आलेली नर्मदा राणी दिसत होती ! तिचे ते रूप डावलून पुढे जाणारा कमनशिबीच म्हटला पाहिजे ! त्यामुळे मी अगदी किनारा पकडून काठाकाठाने चालू लागलो . या भागात नर्मदा टप्प्याटप्प्याने कशी लहान मोठी होत जाते त्याची काही नकाशा चित्रे आपल्या माहिती करिता खाली जोडत आहे . क्षणात भव्य दिव्य दिसणारे नर्मदा पात्र क्षणात दीड फुटाच्या ओढ्याचे स्वरूप घेते ! सारेच मजेशीर आहे ! हे सर्व तुम्हाला शब्दांमध्ये वर्णन करून सांगण्याचे सामर्थ्य माझ्या ठायी नाही त्यामुळे मी चित्रांचा आधार घेत आहे याची कृपया नोंद घ्यावी . आकाशातील उपग्रहातून घेतलेल्या या चित्रांमुळे आपल्याला साधारण मी कुठल्या परिसराचे वर्णन करतो आहे त्याचा अंदाज यावा इतकाच हेतू त्यामध्ये आहे .या चित्रातील भयानकता पाहून या मार्गाबद्दल आपल्या मनात भय उत्पन्न व्हावे असा भाव त्यात मुळीच नाही . 
अमरकंटक ते कपिलधारा हा नर्मदा काठचा मार्ग कसा आहे याची साधारण कल्पना यावी म्हणून हा सरधोपट नकाशा आपल्या माहितीकरता जोडत आहे .काठाकाठाने जातो तो पारंपारिक परिक्रमा मार्ग आणि डावीकडे वळलेला सडक मार्ग आहे तो सध्याचा परिक्रमा मार्ग . ( या लेखातील सर्व नकाशा चित्रांमध्ये नर्मदा खालून वर वाहते आहे याची कृपया नोंद घ्यावी)
वरील नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की अमरकंटक शहराचा अगदी थोडासाच भाग मानवी वस्ती असून तिथून पुढे संपूर्ण जंगल मार्गातून नर्मदा मैया वाहते . हेच चित्र नीट पाहिल्यावर आपल्याला मध्ये डावीकडे एक रस्ता फुटलेला दिसतो तो सध्याचा रुळलेला सोपा परिक्रमा मार्ग आहे . कबीर चबुतरा नामक स्थानावरून हा डांबरी रस्ता पुढे जातो .९९ टक्के परिक्रमावासी याच डांबरी मार्गाने परिक्रमेला पुढे मार्गस्थ होतात . याचे कारण वेगळे सांगण्याची गरज नाही . कपिलधारेच्या दिशेने आणि तिथून पुढे जे काही घनदाट अरण्य लागते तिथे एकट्या मनुष्य प्राण्याचा निभाव लागणे कठीण आहे असा कोणाचाही समज होणे स्वाभाविक आहे . आणि ते एका दृष्टीने खरे देखील आहे . रान डुकरे ,अस्वले ,बिबटे आणि वाघ या जंगली शापदांचा अतिशय मुक्त वावर या प्रदेशात आहे . याच वनातून समोरच्या तटावरून येताना दोन गाई आणि एक बैल खाल्लेल्या वाघाची कथा मी मागे सांगितली आहेच .त्यामुळे इथले स्थानिकच तुम्हाला जंगलातून जाण्यास विरोध करतात . विरोध इतका टोकाचा होतो की जंगल मार्गच त्यांनी मोठाल्या जाळ्या वगैरे टाकून बंद करून टाकला आहे .परंतु नर्मदा मातेची जर आपल्यावर कृपा असेल तर ती आपल्याला कुठल्याही मार्गातून पार करविते हा माझा ज्वलंत धगधगीत अनुभव आहे त्यामुळे मी या भय कारक विचाराशी सहमत नाही .त्यामुळेच की काय , परंतु अनेक लोकांनी सांगून देखील मी हट्टाने अरण्यातील मार्गानेच मार्गक्रमणा करण्याचे निश्चित केले होते. एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद करतो. हे अरण्य किती भयानक आहे हे यापूर्वी मी नकाशामध्ये वगैरे पाहिलेले नव्हते . आज परत आल्यावर जेव्हा मी हे अरण्य आणि त्याचा विस्तार बघतो तेव्हा त्याची भयानकता अधिक लक्षात येते . कदाचित आधीच हे सर्व माहिती असलेला मनुष्य या भानगडीतच पडणार नाही ! परंतु तरीदेखील ज्या कोणाला या मार्गाने जाण्याची इच्छा आहे त्या सर्वांना मी एकच सांगेन . नर्मदा मैया ची प्रार्थना करा , तिला सांगा आणि चालायला लागा ! ती सर्व काळजी घेते . या भागात मला खूप अद्भुत अनुभव आले ते पुढे ओघाने सांगेनच . हे अनुभव सांगावे की न सांगावे असे द्वंद्व मनामध्ये होते . परंतु माझ्या असे लक्षात आले आहे की सध्या परिक्रमावासी या मार्गाने जाणे अक्षरशः बंद झालेले आहे . त्यामुळे हे अनुभव मुद्दामहून सांगतो ज्यायोगे कोणालाही जरी या मार्गे जाण्याची इच्छा झालीच तर ती निर्भयपणे त्यांनी जावे आणि आपली मनोकामना पूर्ण करावी .असो .
या चित्रामध्ये आपल्याला (खाली )गीता स्वाध्याय मंदिर (तांबडा पत्रा ),नर्मदा उगमस्थान मंदिर ,कोटी तीर्थ कुंड व तिथून पुढचा नर्मदा मातेचा भव्यपात्राचा प्रवास दिसतो आहे .
इथला नर्मदा मातेचा काठ अतिशय सुंदर हिरवागार आणि अप्रतिम आहे . उगमा नंतर अचानक नर्मदा माता इति भव्य कशी झाली असा प्रश्न मनात पडतो . परंतु चालत अजून थोडे पुढे गेले की त्याचे उत्तर मिळते जेव्हा आपल्याला नर्मदेवर घातलेला पहिला आडवा बांध दिसू लागतो .
पुष्कर बांध नामक बंधाऱ्यामुळे इवल्याशा नर्मदा राणीला इतके भव्य स्वरूप प्राप्त झालेले आहे . इथे अतिशय सुंदर असा स्नान घाट देखील बांधलेला आहे
इथेच कुठेतरी तो आश्रम होता जो मी काल शोधत होतो परंतु तो काही मला सापडला नाही . पुष्कर सरोवराच्या काठावरून चालताना तिथे नर्मदा जलामध्ये कपडे धुणारे लोक पाहिले आणि फार वाईट वाटले . हे नर्मदा नदीमध्ये सुरू झालेले पहिले प्रदूषण . आपण वस्त्रे बाहेर कुठेतरी धुतली आणि ते पाणी जमिनीमध्ये सोडले की जमीन त्यातील अनावश्यक भाग काढून घेते ज्याचे सूक्ष्मजीव विघटन करतात आणि पाणी तेवढे झिरपून अंतिमतः नदीला प्राप्त होते इतके सोपे गणित आपल्याला का कळत नाही ! आपल्या सर्व घाणी थेट नदीत नेऊन अर्पण करणे याचा सारखे महापातक नाही ! तेच पाणी लाखो जीवांचे जीवन आहे . आपल्या स्वच्छते करता ते मलीन करण्याचा अधिकार आपल्याला अजिबातच नाही . हा लेखन प्रपंच वाचणार्‍या प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या आयुष्यामध्ये जलस्त्रोतांची अतोनात काळजी घ्या . कारण जोपर्यंत पाणी आहे तोवरच आपले जीवन आहे . आणि जलस्त्रोतांची काळजी घेणे आपल्याला वाटते तितके अवघड किंवा कठीण नाही . काही सोप्या सवयी आत्मसात केल्या की जलसाठे शुद्ध ठेवता येतात . कुठलीही घाण थेट पाण्यामध्ये नेऊन न सोडणे हा त्यातील एक सोपा उपाय आहे . जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात सूक्ष्मजीव असतात जे कचऱ्याचे विघटन करून त्याची पुन्हा माती करतात . पाण्यामध्ये अशा जिवाणूंचे प्रमाण कमी असते .ओघाने विषय निघाला म्हणून सांगितले . पुढे देखील परिक्रमेमध्ये अक्षरशः हजारो ठिकाणी अशा पद्धतीने नर्मदा मातेला प्रदूषित करणारे असंख्य लोक पाहिले आणि हृदय विदीर्ण झाले . याबाबतीत काहीतरी ठोस उपाय योजना करण्याची कोणाची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून ते कार्य अवश्य सिद्धीला नेऊयात ! त्यासाठी लागणाऱ्या अनेक कल्पना डोक्यामध्ये तयार आहेत . असो .
पुष्कर बंधारा हे एक अगदी छोटेसे धरण असून त्याच्या पुढे असलेल्या एका छोट्या बंधाऱ्यातून नर्मदा खाली झेपावते ते पुन्हा एकदा छोट्याशा बालिकेचे रूप घेते . या भागातील नर्मदा मातेचे रूप हे नितांत सुंदर आहे . आपण ज्या भव्य दिव्य नर्मदा नदीची कल्पना करतो ती इतकी छोटी देखील असू शकते हे मनाला पटतच नाही ! एक उडी मारली की पलीकडे जाता येते इतके छोटेसे पात्र या भागात आपल्याला आढळून येते . या भागातील स्थानिक लोक पुन्हा पुन्हा तुम्हाला नदीपात्राकडे जाण्यापासून परावृत्त करतात परंतु मी आपणाला अशी विनंती करेन की आपण आवर्जून येथील काठ अनुभवावा आणि धन्य व्हावे . 
पुष्कर बंधाऱ्याला लागून अजून एक छोटासा बंधारा आहे
भव्यरूपातून अचानक बालस्वरूप प्राप्त झालेली नर्मदा
यापुढे नर्मदेच्या काठाने बऱ्यापैकी दाट झाडी सुरू होते . 
इथून समोरच्या काठावरील काल मी आलो होतो मार्ग स्पष्ट दिसत होता . नर्मदेच्या काठावरती मोठी मोठी झाडे आता दिसू लागली होती आणि मोठाली लाकडे देखील तोडून ठेवलेली ठीक ठिकाणी मी पाहिली . इथे मानवी वावर हळूहळू कमी होत जातो . परिक्रमा वासी हा संपूर्ण टप्पा डांबरी रस्त्याने चालून पार करतात परंतु कोणाला जर काठाने चालण्याची इच्छा असेल तर मार्ग निश्चितपणे उपलब्ध आहे फक्त अत्यंत सावधपणे मार्गक्रमणा करावी इतकीच विनंती आहे . कारण असंख्य छोटे मोठे ओढेनाले नर्मदा मातेला येऊन मिळत असतात त्यामुळे नक्की नर्मदा कुठली याबाबत दृष्टी भ्रम होण्याचा संभाव असतो . 
कबीर सरोवर पार केल्यावर लागणारा डांबरी मार्ग .इथेच परिक्रमेचा जुना पायी मार्ग प्रारंभ होतो .
अजून एका बंधाऱ्यामुळे कबीर सरोवर नावाचे छोटेसे कुंड किंवा रुंदावलेले पात्र तयार झालेले दिसते आणि मग एक पूल लागतो ज्याच्या समोर रामकृष्ण कुटीर हा आश्रम आपल्याला दिसतो . इथून बहुतांश लोक डांबरी मार्गाने मार्गस्थ होतात . मार्ग घनदाट अरण्यातून जाणारा आहे आणि तीव्र उताराचा असल्यामुळे सावधपणे चालावे लागते असे त्या मार्गाने गेलेल्या लोकांकडून कळले . मी मात्र सरळ जाण्याचा निश्चय केला आणि काठाकाठाने पुढे निघालो . 
अजून एक लघु बंधारा यानंतर नर्मदा मातेचे खरे बाल स्वरूप सुरू होते .जे पुढे बराच काळ टिकते .
इथून पुढे चालताना नर्मदा मातेचे अजून एक भव्य दर्शन झाले आणि मग मात्र ती पुन्हा एकदा बालरूपामध्ये खळाळत वाहू लागली .
दोन्हीकडे घनदाट अरण्य आणि मध्ये बाल स्वरूपात वाहणारी नर्मदा मैया
या टप्प्याचा सर्वाधिक आनंद मला मिळाला कारण घनदाट जंगल असले तरी मोठी रुळलेली पायवाट होती आणि नर्मदा मातेचे सुंदर दर्शन उजव्या हाताला अखंड होत होते .अरण्यातील पशुपक्ष्यांचे घनगंभीर आवाज आणि किर्र झाडी यांना भेदण्याचे समर्थ फक्त त्या अवखळ नर्मदा बालेच्या चंचल खळखळाटामध्येच होते .एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्याचा आनंद काय आहे तो अशा निसर्ग संपन्न जागी लक्षात येतो ! असे सुख स्वर्गात देखील नाही ! सतत समोर दिसणारी रेवा माई आणि पायाखालून झरझर मागे सरणारी पायवाट ! मरेपर्यंत असे चालायला सांगितले तरी मी चालायला तयार आहे ! इतका आनंद अन्य कशातच नाही ! स्थिती पेक्षा गती मानवाला प्रिय असते . आणि नर्मदा परिक्रमे मध्ये तुमच्या पायाला प्राप्त झालेली गती ही तुम्हाला सद्गती मिळवून दिल्याशिवाय राहत नाही ! मध्येच पात्रातून वाहणाऱ्या एखाद्या पानाशी मी स्पर्धा करून पहायचो ! निरीक्षण केल्यावर असे लक्षात यायचे की सर्वत्र पाण्याची एकच एक गती नाही . कधी ती मंदावते तर कधी दुणावते ! लहान मुलं सुद्धा पहा . कधीही एकसमान गतीने पळत नाहीत. मध्येच थांबतात ,मध्येच उभी राहतात , मध्येच चालायला लागतात व मध्येच वायू वेगाने धावतात . नर्मदा मातेच्या या बाल लीला हृदय पटावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत . असे वाटत होते इथेच बसून राहावे आणि तिचे रूप न्याहाळत राहावे . परंतु लवकरच अंधार पडणार होता आणि तो पडण्याच्या आत मला कुठल्याही परिस्थितीमध्ये कपिलधारा पार करून रामदास बाबांचा आश्रम गाठायचा होता . मला वाटले होते की कपिलधारेपासून अमरकंटकचा मार्ग जसा सोपा आहे तसाच हा मार्ग देखील सोपा सरधोपट असणार . परंतु तो माझा भ्रम आहे हे लवकरच सिद्ध झाले . पुढे अरण्य दाट होत जाते व किनारा सुटल्यास रस्ता सापडणे कठीण होते . 
या ठिकाणी एक आश्रम होता परंतु तो नक्की कुठल्या काठावर आहे हेच कळत नव्हते . कारण त्याच्या आजूबाजूने वाहणारी नर्मदा ही अक्षरशः एखाद्या छोट्याशा नाल्यासारखी दिसत होती . त्यामुळे तिथे न जाण्याचा निर्धार करून मी पुढे चालत राहिलो . इतक्यात समोरून एक फक्कड साधू येताना मला दिसला . त्याला मी मार्ग विचारला नव्हता तरीदेखील त्याने मला सांगितले की डावीकडे वळ आणि सरळ जा म्हणजे तुला परिक्रमेचा मार्ग मिळेल . आता इथे मी संमोहित झाल्याप्रमाणे झालो हे नंतर माझ्या लक्षात आले . कारण नर्मदा उजव्या हाताला स्पष्ट दिसत असताना विनाकारण त्या साधूचे शब्द मी ऐकले आणि डावीकडे वळलो . साधूचा देखील काही दोष नव्हता कारण त्याला असे वाटले की मी मार्ग भटकलो आहे आणि त्याची इच्छा मला डांबरी मार्गाने पाठवण्याची होती . आणि मला मात्र असे वाटले होते की कदाचित नर्मदा डाव्या हाताला वळली आहे म्हणून साधू अलीकडे वळायला सांगतो आहे . एकंदरीत या जर तर अनुमान प्रकाराने पुढील दोन तास माझी चांगलीच परीक्षा पाहिली हे मात्र खरे ! कारण मी डावीकडच्या जंगलामध्ये शिरलो खरा परंतु नंतर मला बाहेर पडण्याचा मार्गच सापडेना ! शक्यतो उतार बघून चालणारा मी इथे आल्यावर चक्रावून गेलो कारण हे संपूर्ण जंगल समतल होते . सूर्याचा अंदाज घेऊन दिशा काढावी तर सूर्यदेव सुद्धा ढगांच्या आड लपून गेला . आणि पायाखाली तर पायवाट नावाचा प्रकारच नव्हता ! परिक्रमेमध्ये शक्यतो मागे फिरायचे नसते . त्यामुळे मी उजव्या हाताला मार्ग सापडेल या आशेने चालत राहिलो . परंतु परीक्षा अधिक कठीण करण्याचे नर्मदा मातेच्या मनामध्ये आले आणि मी त्या जंगलाच्या एका अशा टापू मध्ये पोहोचलो जिथे सर्वत्र बांबू च बांबू होते . जिकडे पहावे तिकडे वन खात्याने बांबूंची लागवड केलेली होती . साधारण एक समान अंतरावर लावलेले हे बांबू जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत दिसत होते . तिथे कोणाचाच वावर नसल्यामुळे काही बांबू आडवे तिडवे पडले होते . जे कोणी छाटले सुद्धा नव्हते त्यामुळे त्यांनी अक्षरशः मार्ग बंद केले होते ! या सर्व प्रकारामध्ये माझे दिशा भान पूर्णपणे हरपले ! साधारण दुपारी अडीच तीन ची वेळ असावी . माझ्या चारही बाजूंना मला बांबू च बांबू दिसू लागले ! बांबूच्या छोट्या काटक्या वाळल्यावर काट्याप्रमाणे पायामध्ये घुसतात त्यामुळे त्या टाळत अतिशय लक्षपूर्वक डोळ्यात तेल घालून चालणे भाग होते . माझ्या लक्षात आले की मी पुरता फसलेलो आहे .एक क्षणभरच नर्मदा मातेचे अनुसंधान सोडून दुसऱ्या कोणाचे तरी ऐकले आणि त्याची शिक्षा मी भोगत होतो . हा अरण्य प्रदेश किती भयानक आहे याची मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती परंतु आज जेव्हा मी नकाशामध्ये तो भाग बघतो तेव्हा अंगावरती काटा येतो .आपल्या माहितीकरता त्या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . सुमारे तास दीड तास मी या घनदाट अरण्यामध्ये वेड्यासारखा दिशाहीन पणे भटकत होतो . 
अचूक अक्षांश रेखांशासहित हेच ते आरण्य जिथे मला "बांबू लागले " !
मराठीमध्ये एक म्हण आहे . एखाद्या माणसाची वाट लागली की लोक म्हणतात की याला बांबू लागले त्याचा अर्थ मला त्यादिवशी कळला . चालता चालता कळकाचे बन अथवा बांबूचे बेट तुम्हाला लागले की तुमची वाट लागणे निश्चित असते . याचा साधा सोपा सरळ अर्थ असा आहे . खरे पाहायचे तर माझा स्वतःच्या दिशा भानावर अतिरेकी विश्वास होता . मला असे वाटायचे की माझ्या डोक्यात एकदा दिशा पक्क्या बसल्या की मी वाट चुकू शकत नाही . परंतु माझा हाच अहंकार ठेचण्यासाठी नर्मदा मातेने ही छोटीशी गंमत केली असावी ! कल्पना करून पहा ! तुम्ही सरळ डावीकडे उजवीकडे किंवा मागे कुठेही वळून पाहिले की तुम्हाला सर्वत्र एकसारखी दिसणारी बांबूची वने दिसत आहेत ! आकाशात सूर्य दिसत नाही आणि कुठल्या दिशेला जायचे तेच तुम्हाला माहिती नाही ! अशावेळी तुम्ही कुठल्या दिशेला पळाल ?मी देखील असाच वेड्यासारखा चहू दिशांना धावत सुटलो .मध्ये मध्ये पाणी पिऊन कमंडलू देखील रिकामा झाला .  खूप पळून जेव्हा माझ्या पायातील बळ निघून गेले तेव्हा मला लक्षात आले की आता आपल्याला यातून तारणारी एकच व्यक्ती आहे !आणि मी बेंबीच्या देठापासून पुकारा चालू केला नर्मदे हर ! नर्मदे हर ! हे नर्मदे माझे संकट हर ! विघ्न दूर कर ! 
क्षणाचाही विलंब न लागता मला दुरून एका स्त्रीचा आवाज आला . " इधर आओ बाबाजी ! इधर ! " तिचा आवाज सर्वत्र घुमत होता त्यामुळे नक्की कुठून आवाज येतो आहे हेच मला कळेना . मी आवाजाच्या दिशेला चालू लागलो .इतक्यात पुन्हा तिचा आवाज आला ,"अरे उधर नही बाबाजी ! इधर ! " मला काहीच कळेना . बांबूची घनदाट झाडी असल्यामुळे कोणी दिसतच नव्हते . इतक्यात मला दूरवर चरणाऱ्या दोन गाई दिसल्या . मी त्या दिशेने पळू लागलो . "आराम से आईये । हम कही नही जा रहे । " त्या बाईच्या आवाजातील आश्वासकता मनाला सुखावून गेली ! आता आपल्याला निश्चितपणे मार्ग सापडणार याची खात्री झाली . थोड्याच वेळात बांबूच्या बेटा खाली विसाव्याला बसलेली एक तरुण स्त्री उठून उभी राहिली . "यहा कहा रास्ता भटक गये बाबाजी ? यह परिकम्मा मार्ग नही है । " मी म्हणालो , "हा माताराम ।आप सही बोल रही है । लेकिन मुझे रास्ते मे एक साधू मिला जिसने मेरा रास्ता भटका दिया ।नही तो मै अच्छा खासा मैया के किनारे किनारे चल रहा था । " "किनारे से तो बिलकुल भी रस्ता नही है । साधूने ठीक रस्ता बताया था आपको ।  लेकिन अभी आप पक्की सडक छोडके बहुत आगे आ चुके हो । " मला त्या डांबरी सडकेच्या मार्गाने मुळीच जायचे नाही हे मी तिला निक्षून सांगितले . तिने एक दोन वेळा मला पुढील मार्गातील धोके सांगायचा प्रयत्न केला परंतु मी ऐकत नाही असे लक्षात आल्यावर मात्र तिने मला पुढील मार्ग दाखवला . तिने मला तिच्या हातानेच एक दिशा दाखवली आणि सांगितले आता ही दिशा अजिबात सोडू नकोस म्हणजे तू कपिलधारे पाशी पोहोचशील ! आधीच्या अनुभवामुळे मी इतका पोळलो होतो की मी ताबडतोब त्या दिशेला माझी काठी पकडली आणि तिचा कोन जराही न बदलता काठी हीच जणु माझी होकायंत्राची सुई आहे अशी भावना डोक्यात ठेवून झपाझप पावले उचलायला सुरुवात केली . थोडे पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहिले तर तिथे अजून एक म्हातारी स्त्री आली होती आणि दोघी बोलत उभ्या होत्या . माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी काठी पकडून वेगाने पळत सुटलो . पाच ते दहा मिनिटे झाल्यावर एक छोटा डांबरी रस्ता मला लागला . या निर्मनुष्य रस्त्यावर कोणी दिसते का ते पाहावे म्हणून मी क्षणभर थांबलो इतक्यात लुना सदृश गाडीवरून एक जोडपे माझ्याकडे येताना दिसले . "नर्मदे हर !आप गलत रस्ते से जा रहे है बाबाजी ।आपको पीछे मूडना चाहिये था । "  त्या माणसाने गाडी थांबवत मला सांगितले . त्याचा चेहऱ्यावरती हास्य होते आणि मला त्याचा चेहरा पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला . मी त्याला माझा रामदास बाबांना भेटण्याचा निश्चय सांगितला . मग तो मला म्हणाला तुम्ही एक काम करा . आता जर एकटे निघालात तर मार्ग सापडणे कठीण आहे . इथून एक सव्वा किलो मीटर पुढे माझे घर आहे . तिथे मी आपली वाट पाहत उभा राहतो . आपण या . मी आपल्याला कपिलधारे पर्यंत नेऊन सोडतो . इतक्यात त्याची बायको गाडीवरून उतरली आणि म्हणाली तुम्ही गाडीवर बसून पुढे जा . मी चालत येते . मी गाडीवर बसणार नाही हा माझा निश्चय त्याला सांगितला . मग तो म्हणाला हरकत नाही . थोडे पटपट चाला मी तुमची वाट पाहतो . हा सर्व संवाद हिंदी भाषेमध्ये झाला . मला हायसे वाटले . परंतु त्या माणसाला कुठे पाहिले आहे हे मात्र मला काही आठवत नव्हते . दहा पंधरा मिनिटातच त्याचे घर आले . रस्त्याच्या डाव्या हाताला एक दोन बैठी घरे होती . तो मला म्हणाला खरे तर तुम्हाला चहापाणी करून पुढे सोडले पाहिजे . परंतु तुम्हाला रामदास बाबांचा आश्रम गाठायचा असेल तर एकही सेकंद वाया न घालवता चालावे लागेल तरच तुम्ही पोहोचू शकाल . मी तुम्हाला कपिलधारेपर्यंतचा जंगलातील गुप्त मार्ग दाखवतो . हा मार्ग कोणालाच माहिती नाही . माझी त्या माणसाबद्दलची उत्सुकता वाढत होती . मी त्याला सरळ सरळ विचारले की आपण पूर्वी कधी भेटलो आहोत का ? तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला "अरे बाबाजी , कल ही तो हम मिले थे ! आप जब कपिलधारा पे बैठके बंदरो को भगा रहे थे तब मै ही तो बंदरों को गलोलसे पत्थर मार रहा था ! आपने मुझे बोला भी था कि मेरा निशाना बहुत अच्छा है ।" आणि मला एकदम तो प्रसंग आठवला . बहुतेक मागच्या प्रकरणात मी त्याचा उल्लेख देखील केला असेल ,कारण माझ्या डायरीमध्ये मी हा उल्लेख करून ठेवला आहे . तो त्या वनक्षेत्रामध्ये रोज येजा करणारा मनुष्य होता . त्याच्या पायाखाली अक्षरशः भिंगरी लावली आहे असे वाटावे इतकी त्याची गती होती . इथला वनमार्ग अजिबात सोपा नव्हता . रुळलेल्या पायवाटा चालायला सोप्या असतात परंतु आडमार्ग असल्यामुळे पायाखाली दगड आहे ,का पालापाचोळा आहे , का लाकूड आहे ,का काटे कुटे आहेत , काहीच अंदाज येत नव्हता . तो चालत होता आणि त्याच्या मागे मी अक्षरशः धावत होतो . जाता जाता तो मनुष्य मला त्या संपूर्ण परिसराची इत्थ्यंभूत माहिती देत होता . त्याने मला सांगितले की त्याच्या उभ्या आयुष्यात पहिला परिक्रमावासी या मार्गाने त्याला भेटला आहे . कारण किनारा पकडून चालणारे लोक एका अतिशय सोप्या पायवाटेने कपिलधारेपाशी येतात .परंतु मी वाटेत भेटलेल्या साधूची गंमत त्याला सांगितली .त्याच्यामुळेच असे झाले असे म्हणालो . परंतु असे का झाले असावे याचे उत्तर देखील त्यानेच देऊन टाकले ! तो म्हणाला की कदाचित मैयाची अशी इच्छा असावी की तुम्हाला आमचे अमरकंटकचे जंगल दाखवावे ! आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये राहतो याचा तुम्हाला अंदाज यावा ! आणि ते खरेच आहे . घराच्या बाहेर पडल्यावर काही फूट अंतरावर मीठ मिरची लिंबू भाजीपाला दूध फळे मिळणारे सोपे आयुष्य जगणारे आपण . कित्येक किलोमीटर पायपीट केल्याशिवाय पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही अशा वातावरणात कधी बरे राहणार ! आणि राहिलोच तर किती काळ तग धरणार ! इथले सर्वच अतिशय विषम आहे ! मी चालता चालता त्याला माझ्या शंका विचारत होतो आणि तो देखील अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तरे देत होता . मनुष्य हुशार आणि अभ्यासू होता .त्याला माकडांची भाषा कळत असे आणि माकडे त्याचे इशारे ऐकतात हे त्याने मला सांगितले आणि मी ते प्रत्यक्ष बघितले देखील होते .
थोडे अंतर गेल्यावर मानवी वस्तीच्या काही खुणा मला जाणवू लागल्या . इतक्यात त्याने सांगायला सुरुवात केली . मध्यप्रदेश मधली एक अतिशय मोठी बॉक्साइट खनिजाची खाण इथे काही वर्षांपूर्वी होती . 
हाच तो दुर्दैवी शापित परिसर जिथे कधीकाळी गोकुळ नांदत होते
खाण म्हटलं की खाण कामगार आले , ड्रायव्हर आले , इंजिनीयर आले , आणि त्या सर्वांची कुटुंबे कबीले , त्यांची मुले बाळे असे एक छोटेसे गावच जणूकाही इथे वसले होते .परंतु काही डाव्या लोकांनी केलेल्या चळवळीमुळे ही खाण कायमची बंद पडली . आता तिथे अतिशय भीषण शांतता नांदत होती . त्याने मला जुन्या चाळी , जुनी घरे , जुनी शाळेची इमारत ,सर्व काही दाखवले . मनुष्य वावर शून्य असल्यामुळे या सर्वांचा ताबा जंगलातील मिळेल त्या वनस्पतीने घेतला होता . एखाद्या भय पटाला शोभेल असे वातावरण तिथे होते . अगदी मोकळे मैदान सुद्धा होते आणि त्या मैदानाचे रूपांतर हळूहळू जंगलामध्ये होऊ घातले होते . मानवी वस्ती नष्ट झाली की निसर्ग किती कमीत कमी काळामध्ये आपले साम्राज्य पुन्हा उभे करतो याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते . मी तिथे उभा राहून एक क्षणभर भरलेल्या गोकुळाप्रमाणे नांदणाऱ्या गावाची कल्पना केली . खूपच सुंदर वातावरण असणार होते त्या काळातील ! परंतु सध्याचे विदारक वास्तव दुःखदायकच होते . आपल्याकडे उठ सूट कुठल्याही कारणासाठी चळवळ आंदोलन मोर्चा वगैरे करण्याची टूम अलीकडे वाढत चालली आहे . परंतु याचा दूरगामी परिणाम किती लोकांच्या जीवनावर ,रोजी रोटीवर होतो याचा अभ्यास आपण करून मगच ते केलेले बरे असे मला वाटते . त्या गावामुळे आजूबाजूच्या जंगलावर कुठलाही परिणाम झाला नव्हता हे मी स्वतः अनुभवले होते . तरीदेखील ती वस्ती उठवली गेली आणि अनेक लोक बेघर झाले . ज्यांना एखाद्या माणसाचे आयुष्य उभे करता येत नाही त्यांनी किमान एखाद्या माणसाचे सुंदर सुरू असलेले आयुष्य उजाड तरी करू नये असा सल्ला मी माझ्या सर्व डाव्या विचारसरणीच्या मित्रांना देईन . इथे गाव वसत असताना वातावरण किती सुंदर होते याचे वर्णन मला त्या माणसाने सांगितले . इथून अगदी थोड्या वेळात आम्ही कपिलधारेपाशी पोहोचलो . त्या माणसाने मला पुढे काय काय धोके वाढून ठेवले आहेत याची चांगली कल्पना देऊन ठेवली . समतोल जमिनीवरून चालणारे आम्ही अचानक एका खोल दरीमध्ये उतरतो आहोत असे मला जाणवले . आणि इतक्यात कालचा तो पूल मला दिसू लागला ज्यावरून अमरावतीच्या भूषण स्वामींची परिक्रमा खंडित झाली होती ! 
आता इथून पुढे मी सांगितले आहे त्याप्रमाणे जा .मी येतो .असे तो मनुष्य म्हणाला . मला एक क्षणभर काहीच कळेना . मला असे वाटले होते की हा मनुष्य चणे विकण्याकरिता कपिलधारे पाशी निघाला आहे . आणि जाता जाता मला मार्ग दाखवतो आहे . परंतु तो केवळ मला मार्ग दाखवण्याकरता एवढ्या दुरून जंगलामधून पायपीट करत आला होता . त्याने निरोप घेतला आणि एका क्षणात चढ चढत दिसेनासा देखील झाला . उतरण्याच्या गती पेक्षा चढण्याची त्याची गती अधिक होती .त्या माणसाचे नाव विचारायची फुरसत देखील मला मिळाली नाही . परंतु त्याची सहृदयता पाहून डोळ्यामध्ये पाणी आले . कोण कुठला मी ?त्याचा माझा काय संबंध ? मी त्याच्यासाठी असे काय केले होते ? किंवा करणार होतो की ज्यामुळे त्याने माझ्यासाठी इतके सौजन्य दाखवावे ? ज्याला सभ्य पांढरपेशा भाषेमध्ये कम्फर्ट झोन म्हणतात त्यातून बाहेर पडून माझ्यासाठी रान वाटा तुडवाव्यात ?  परंतु केवळ नर्मदा मातेचे नाव घेऊन मी निघालो आहे इतकीच ओळख त्याला पुरेशी होती . तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला इथले भूमिपुत्र तयार व्हायचे व होतात! हा अनुभव तुम्हाला जगात अन्यत्र कुठेही येणे कालत्रयी शक्य नाही ! नर्मदा मातेचा हा प्रताप आहे ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! समोर नर्मदा माता अतिशय सुंदर दर्शन देत होती ! 
दक्षिण तटावर बांधलेला नर्मदेचा पक्का घाट (संग्रहित छायाचित्र )
असे वाटत होते की काही काळ पक्क्या बांधलेल्या घाटावर बसावे आणि तिचे रूप डोळे भरून पाहावे .परंतु अंधार पडण्याची वेळ जवळ येऊ लागली होती . वनक्षेत्रामध्ये अंधार लवकर पडतो . त्यात इथली झाडी इतकी गर्द होती की दिवसादेखील रात्री सारखा अंधार पडलेला असायचा . इथे पर्यटकांची थोडीफार वर्दळ जाणवली . सर्वजण आपापले सेल्फी घेण्यामध्ये मग्न होते त्यामुळे मी समोरून गेलो तरी कोणाच्या लक्षात देखील आले नाही . नाहीतर शक्यतो परिक्रमावासी दिसल्यावर या भागातील लोक आवर्जून नर्मदे हर करतात . या भागातील एक दोन विक्रेत्यांनी मला सांगितले की पुढे मार्ग नाही . परंतु मुझे रामदास बाबा के पास जाना है असे सांगितल्याबरोबर ताबडतोब मग इथूनच जा असे ते सांगत होते . पुढे आलो आणि कपिलधारा जलप्रपाताचे अद्भुत दर्शन घडले ! 
कपिलधारा जलप्रपात
तीस-पस्तीस फुटावरून नर्मदामाता इथे मेकल पर्वताच्या खांद्यावरून जमिनीवर उडी घेते ! हे दृश्य पाहता यावे असा लोखंडी सज्जा इथे केलेला आहे . 
पर्यटकांसाठी केलेले पक्के कुंपण 
परंतु तिथे पर्यटकांची सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही . नंतर माझ्या लक्षात आले की इथून जंगलामध्ये जाणारा मार्ग चांगले साडेपाच सहा फूट उंचीचे पक्के कुंपण लावून बंद करण्यात आलेला आहे !
पर्यटकांसाठी केलेला सेल्फी पॉईंट .इथूनच पुढे जंगल मार्ग सुरू होतो .
आता मात्र थोर पंचाईत झाली ! पलीकडे कसे जावे असा विचार करता करता मी पाठीवरची झोळी काढली आणि पलीकडे फेकून दिली ! एक दोन स्थानिक लोक मला सांगू लागले अरे उधर मत जाना । रास्ता नही है ।
मग तर मी दंड पण पलीकडे टाकला आणि त्यांना सांगितले मेरा सामान उधर है । वह लेने के लिए जा रहा हू । आणि कुठलाही विचार न करता मी मोठी उडी मारून ते कुंपण ओलांडले आणि धप्प करून जमिनीवर उडी टाकली ! झोळी पाठीवर टाकली , दंड उचलला आणि जंगलामध्ये बाणासारखा घुसलो ! नर्मदे हर ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही . आता लवकरच रामदास बाबांची भेट होणार म्हणून अष्ट सात्विक भाव जागृत झाले ! जंगलामध्ये अतिशय छोटीशी पायवाट होती परंतु ती रुळलेली नाही हे स्पष्टपणे कळत होते . कारण सर्वत्र पालापाचोळाच दिसत होता . आत मध्ये प्रचंड अंधारून आलेले आहे असे माझ्या लक्षात आले . काही झाडांना छोट्या चिंध्या बांधल्या होत्या तोच मार्ग आहे हे माझ्या लक्षात आले . उजव्या हाताला खाली खोल दरीतून नर्मदा माता वाहत होती !  आजूबाजूला घनदाट अरण्य सोडून बाकी काहीच नव्हते ! हळूहळू ती पायवाट देखील पुसट होत गेली . आणि आता माझ्या साथीला उरले किर्र जंगल आणि नर्मदेचा खळखळ खळखळ आवाज ! थोड्यावेळाने माझ्या असे लक्षात आले की ही वाट डावीकडे डावीकडे सरकत आहे आणि नर्मदा माता माझ्यापासून दूर आणि खोल जात आहे . आता हळूहळू डावीकडून उजवीकडे जाणारे ओढे नाले मला लागायला सुरुवात झाली . हा मार्ग म्हणजे एक प्रकारचा डोंगर उतारच होता . परंतु अतिशय गर्द झाडी असल्यामुळे तोल जाण्याची भीती नव्हती . पावला पावलावर झाडे होती . आता पायवाट पूर्णपणे संपली आणि चिन्ध्या देखील दिसायच्या बंद झाल्या . माझ्या लक्षात आले की मी नर्मदेचे मूळ पात्र सोडून बराच डावीकडे आलो आहे . परंतु आता नर्मदा गाठायची तरी कशी ? मी असा विचार केला की नर्मदा सर्वात खालच्या पातळीवरून वाहत असणार . त्यामुळे जिकडे उतार दिसेल तिकडे चालायचे .परंतु लवकरच लक्षात आले की हे खूप अवघड आहे .कारण वाटेमध्ये असंख्य ओढे नाले ओहोळ होते . ते पार करताना चुकून नर्मदाच पार झाली तर ?सगळाच खेळ खल्लास ! इतक्यात माझ्यातील इंजिनिअरने तार्किक उत्तर दिले . नर्मदा आपल्या उजव्या हाताने वाहते आहे . म्हणजे तिचा प्रवाह उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे असला पाहिजे . आणि येऊन मिळणारे ओढे डावीकडून उजवीकडे वाहत आहेत . त्यामुळे प्रवाह पाहून नदी आहे का ओढा त्याचा निर्णय करायचा . वाचता क्षणी तुम्हाला देखील हे किती योग्य आकलन आहे असे वाटेल ! परंतु माझा तिथला अनुभव अत्यंत विपरीत होता ! डोंगराला अंतर्गत चढउतार असल्यामुळे हे ओढे कधी कधी उलटे सुद्धा वाहत होते ! आता माझ्या लक्षात आले की या मार्गाने का जाऊ देत नाहीत ! पायवाट संपली होती त्यामुळे जागा मिळेल तिथे पाय ठेवत होतो . इथली झाडी अस्पर्शीत असल्यामुळे ताठ मानेने चालताच येत नव्हते .अखंड पाठीमध्ये वाकून किंवा कधी कधी गुडघ्यावर बसून रांगत चालावे लागत होते .हे सर्व करताना तीव्र चढ-उतार असल्यामुळे तोल जाण्याचा आणि गडगडण्याचा संभव होता . काटेरी झाडे आणि वाळलेल्या काटक्या कुटक्या देखील खूप होत्या . कपडे अडकून फाटत होते . शक्यतो मानवी वावर असलेल्या वनक्षेत्रातील इंधन लोक सरपण म्हणून गोळा करतात . परंतु इथे कोणीच फिरकत नव्हते त्यामुळे इथली सर्व वाळलेली लाकडे जंगलातच कुजून माती होत होती . आता मात्र अंधार वाढतो आहे असे मला जाणवू लागले . समोर डावीकडे उजवीकडे कुठेच नर्मदेचा मागमूस नव्हता . दुपारी जशी माझी अवस्था झाली तशीच किंवा त्याहून भयानक अवस्था माझी होत आहे याची मला जाणीव झाली . तिथे निदान उजेड तरी होता इथे भयंकर अंधार होता .तिथे समतोल जमीन होती इथे तीव्र उतार होता . अखेरीस मी असा विचार केला जे व्हायचे ते होऊ देत परंतु आता उताराच्या दिशेने धावत सुटायचे .आणि मी नर्मदा मातेचा धावा करत मिळेल त्या वाटेने उताराच्या दिशेने उतरायला सुरुवात केली . पालापाचोळा इतका साठला होता की काही काही ठिकाणी अडीच ते तीन फुटाचा थर झाला होता . अशा ठिकाणी साप विंचू काटा प्रचंड प्रमाणात असतो . परंतु या प्राण्यांना हल्ल्याची संधी न देता क्षणात तुम्ही पुढे निघून गेलात तर ते तुम्हाला काही करत नाहीत . हीच युक्ती वापरून मी अतिशय गतीने उताराच्या दिशेला माझे सर्वस्व झोकून दिले . कधी कधी एकदम पाच दहा फूट घसरायचो पण तसाच उतरत रहायचो . तोल गेले . गडगडलो तरी  पुन्हा सावरायचो . सुदैवाने मध्ये सर्व उलटे वाहणारे ओढे मिळाले . तीव्र उतार उतरल्यावर अचानक सपाटी लागल्यासारखे झाले आणि मला समोर एक पिवळ्या रंगाची ताडपत्री लावलेली कुटी दिसू लागली ! मला खूप आनंद झाला ! मला वाटले की चला ! आता आपण रामदास बाबांच्या आश्रमामध्ये लवकरच पोहोचणार ! कुटी अतिशय स्वच्छ सारवलेली होती . आत मध्ये काहीच सामान नव्हते . पूर्णपणे रिकामी कुटी ! आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते . मी मोठ्या आवाजात नर्मदे हर !नर्मदे हर ! असा पुकारा चालू केला .परंतु संपूर्ण जंगलातून कुठूनही प्रतिसाद येत नव्हता . इथून पुढे एक खड्डा दिसत होता बहुतेक नर्मदा माता तिथेच असावी असा कयास मी बांधला . परंतु कुटी आणि परिसरात तर स्वच्छ झाडलोट केलेली होती याचा अर्थ कोणीतरी नक्की इथे राहत असणार ,मग आपल्याला प्रतिसाद का मिळत नाही असा विचार करून मी अजून थोडा प्रयत्न करायचा निश्चय केला . त्या घनदाट अरण्यामध्ये मला दुसरा कुठला सोयीचा मार्ग देखील दिसत नव्हता . मी ज्या भागामध्ये हे सर्व अनुभवले त्या भागातील अरण्याचा गुगल फोटो खाली जोडत आहे म्हणजे वाचकांना थोडीफार कल्पना येईल .
साधारण याच भागात ती कुटी होती . इथे नर्मदा शोधून देखील सापडत नाही हे वाचकांच्या सहज लक्षात येईल .
मी मनातल्या मनात खजिल झालो . आणि विचार केला जाऊ दे .अजून जास्त वेळ इथे थांबलो तर इथेच रात्र व्हायची . त्यापेक्षा थोडेफार दिसते आहे तोपर्यंत रामदास बाबांची कुटी गाठायचा प्रयत्न करूया . तोवर मी आजूबाजूला फिरून पाहिले तर माझा अंदाज बरोबर निघाला शेजारच्या खड्ड्यामधूनच नर्मदा माता वाहत होती ! तिचा तो विवक्षित रंग मी लगेच ओळखला !आणि मग काय विचारता ! आता हिला सोडायचीच नाही असा विचार करून मी काठाकाठाने चालायचा निर्णय घेतला . इतक्यात दूरवरून खणखणीत आवाज आला . , "आगे मत जाओ । रुको , हम आ रहे है। "
त्या आवाजात अतिशय जरब होती . तो आवाज त्या संपूर्ण जंगलामध्ये घुमत होता . मोठा आवाज झाल्यावर जंगलातील बाकीचे वन्य पशु पक्षी क्षणात चिडीचुप होतात तसे झाले . मला आवाज कुठून येतो आहे त्याचा मी अंदाज घेऊ लागलो . दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते . किंवा पालापाचोळा तुडवत चालल्याचा आवाज देखील येत नव्हता . परंतु , " मै आ रहा हु । " " मै आ रहा हु । " असा आवाज हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला . थोड्याच वेळात दूरवर मला खांद्यावर लाकडांची मोळी घेतलेला एक साधू दिसला . तो अतिशय वेगाने माझ्या दिशेने येत होता . त्याच्या ढांगा लक्षात येण्या इतपत मोठ्या होत्या . "क्षमा चाहता हु । जंगल मे लकडी इकठ्ठा कर रहा था । आपको बहुत समय रुकना पडा । "  मोळी एका बाजूला फेकत तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला ! मी म्हणालो "नर्मदे हर ,महाराज ! " नर्मदे हर , नर्मदे हर , यहा कहा रास्ता भटक गये? " "भटके कहा है महाराज ? मैया के किनारे किनारे तो चल रहे है । " " लेकिन आगे जाने का मार्ग तो उपर से है । यहा से कोई नही जाता । यहा चलने लायक मार्गही नही है ।" साधू म्हणाला .
 " उस उपर के मार्ग की तो बात ही मत बताओ मुझे ! बुरी तरह से फस गया था मै वहा । वहा कोई रास्ता नही है ।" मी म्हणालो .साधू मोठ्याने हसला . त्याचा रंग गोरापान होता . त्याने संपूर्ण अंगाला भस्म लावले होते . आणि कमरेला एक छोटासा मळकट पांढरा पंचा गुंडाळला होता . तब्येत लक्षात येण्या इतकी चांगली होती . शक्यतो खाण्यापिण्याचे हाल केल्यामुळे साधू अतिशय सडपातळ असतात . परंतु या साधूचे शरीर चांगले पिळदार होते . त्याने आणलेल्या मोळीचा आकार पाहूनच मी सुरुवातीला हबकलो होतो ! या सर्वांवर मात करत होते ते त्याचे निळे शार डोळे ! त्याचे डोळे अतिशय तेजस्वी बोलके आणि निळ्या रंगाचे होते ! डोळ्यांमध्ये असा सुस्पष्ट निळा रंग शक्यतो पाहायला मिळत नाही . डोक्यांवर जटांचा भार होता . आणि आवाज अतिशय भारदस्त होता . त्याच्या चेहऱ्यावर एक जबरदस्त स्मितहास्य अखंड विलसत होते . त्याचे ते रूप मी पाहतच राहिलो ! इथे राहून हा काय खात असेल ? काय पीत असेल ? कशी साधना करत असेल ! सगळेच अगम्य ! लहानपणी मी जेव्हा ऋषीमुनींच्या कथा वाचायचो तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक प्रतिमा तयार झाली होती . हा साधू बऱ्यापैकी त्या प्रतिमेमध्ये बसणारा असा होता . 
" अब एक काम करो l यहां से वापस ऊपर चले जाओ वहां आपको पगडंडी मिल जाएगी ।" " नहीं महाराज ,मैं ऊपर नहीं जाऊंगा । हमने परिक्रमा उठाई है मैया के दर्शन करने के लिए ।और अब जब मैया दिख रही है तो हम उसे छोड़ेंगे नहीं । आप कोई किनारे किनारे जाने वाला रास्ता बताइए ।" "लेकिन आप जाओगे कहां ?" "मुझे रामदास बाबा से मिलना है । बहुत लोगों ने बताया उनका दर्शन करो । धन्य हो जाओगे ।" 
" लेकीन रामदास बाबा का आश्रम तो यहां से काफी दूर है । पूरा अरण्य मार्ग है ।" " देखिए महाराज अब कुछ भी हो जाए । हम मैया को नहीं छोड़ेंगे । चाहे मैया में उतर के ही क्यों चलना ना पड़े । लेकिन हम अब मैया का किनारा नहीं छोड़ेंगे ।" माझा हा निश्चय ऐकून साधू एक क्षणभर विचारात पडला . त्याने डोळे मिटून घेतले . आणि ते तेजस्वी निळे निळे डोळे उघडून क्षणात मला म्हणाला "फिर तो एक बहुत आसान रास्ता है । अब यहा जो मैया का किनारा पकडा है उसे छोडना नही । सीधे-सीधे चलते रहो । कुछ भी हो जाए पीछे मुड़ना नहीं । वैसे तो १ घंटे का रास्ता है । आप आराम से रामदास बाबा के पास पहुंच जाओगे । " साधूने नर्मदा किनारी जाणारा रस्ता सांगितल्यामुळे मला खूप आनंद झाला ! " बाबा जी आप नाम क्या लिखते हैं ? " अंगभूत आगाऊपणातून मी त्याला प्रश्न केला . 
" शंकर " अतिशय धीर गंभीर आणि खड्या आवाजात साधू उत्तरला . पुढे मी विचारले "आप कहा बिराजते है ? " "मै यही पर रहता हु । " " ठीक बाबाजी । नर्मदे हर ! "
मी क्षणाचाही विलंब न लावता वळलो आणि किनाऱ्याचा रस्ता पकडला . त्या साधूचे पाणीदार निळे डोळे आणि त्याची तीक्ष्ण नजर डोळ्यासमोरून जात नव्हती . काही वेळापूर्वी भयभीत झालेले आणि बिथरलेले माझे मन क्षणात तळ्यावर आले .आता आपल्याला रामदास महाराजांचा आश्रम सापडतो की नाही या शंकेने मनामध्ये जे घर केले होते त्याची जागा निश्चिन्तीने घेतली . आता मला खात्री होती की तासाभरात मी आश्रमामध्ये पोहोचणार ! उजवीकडे नर्मदा मातेचे सुंदर बालरूपातील पात्र वाहत होते ! या पात्रामध्ये मला माझा दंड बुडवता येत होता इतक्या जवळून मी चालत होतो . संपूर्ण जंगलामध्ये अंधुक अंधार पसरला होता . धुके सदृश्य वातावरण पडले होते . आणि केवळ नर्मदा माता तेवढी तेजाने झळाळत होती . मी मनातल्या मनात विचार करीत होतो ,की लोक किती चुकीची माहिती देतात परिक्रमा वासींना . इतका चांगला मार्ग असताना इकडे रस्ता नाही म्हणून सांगतात . कारण मी ज्या मार्गाने निघालो होतो तो मार्ग खरोखरीच खूप प्रशस्त आणि बऱ्यापैकी सपाट होता . महिंद्रा थार किंवा जिप्सी सारखी एखादी फोर बाय फोर गाडी त्या मार्गावरून सहज गेली असती असा तो मार्ग होता . मी मनात क्षणभर असा विचार देखील केला की आपण कधीतरी इथे ऑफ रोडिंग करण्याकरता गाडी घेऊन येऊया ! माझ्या पायांनी चांगलीच गती घेतली होती . इतक्यात नर्मदा मातेचे पात्र रुंद होते आहे असे माझ्या लक्षात आले . हळूहळू नर्मदेच्या एका धारेपासून अधिक धारा निर्माण होऊ लागल्या . मला दुरूनच कोणीतरी बोलत आहे असा आवाज येऊ लागला . आवाज हळूहळू मोठा होत होता . नर्मदेच्या मध्ये तयार झालेली बेटे देखील गर्द झाडीने भरलेली होती . मी आवाज दिला , " नर्मदे हर ! " बेटावरून आवाज आला ,
"नर्मदे हर ! वहीं पर रुकना बाबा जी । मैया की धारा पार मत करना ।हम वहां आते हैं । "
" जी महाराज " मी उत्तरलो आणि जागेवर स्तब्ध उभा राहिलो .चालायला लागून उणीपुरी १५ मिनिटे सुद्धा झालेली नव्हती. मला अजूनही कोण बोलले ते कळत नव्हते .नीट डोळे विस्फारून पाहिल्यावर मला त्या अनेक बेटांच्या गर्दीतील एका बेटावरून झाडीतून चालत येणारी दोन माणसे दिसली . एक भव्य देहयष्टी असलेले साधु महाराज होते . व त्यांना आधार देत चालणारा दुसरा एक वनवासी म्हातारा होता.मी त्यांच्या दिशेला चालू लागलो इतक्यात महाराजांनी पुन्हा एकदा मला हात वर करून थांबायचा इशारा केला . "रामदास बाबा .. " मी बोलणार इतक्यात तो म्हातारा ओरडला ," हां रामदास बाबा ही है यह । रुको वह स्वयं आप को दर्शन देंगे । आप अंदर नहीं आ सकते । नहीं तो आपकी परिक्रमा खंडित हो जाएगी । "  मी जागेवरच उभा राहिलो .परिक्रमा खंडित होणे किती क्लेषदायक असते याचे अनुभव काही परिक्रमा वासींकडून ऐकले होते. रामदास बाबांना चालता येत नव्हते असे माझ्या लक्षात आले . त्यांचा संपूर्ण भार म्हाताऱ्याने आपल्या अंगावर घेतला होता . मला क्षणभर खूप वाईट वाटले . आपल्यामुळे त्यांना उठून इकडे यावे लागते आहे . त्यापेक्षा सरळ त्यांना सांगावे की तुम्ही माझ्यापर्यंत येण्याचे त्रास घेऊ नका , तिथेच थांबा . मी दुरून दर्शन घेऊन पुढे निघून जातो . असे माझ्या मनात आले . इतक्यात महाराज स्वतः मोठ्या आवाजात आणि चक्क मराठीमध्ये म्हणाले , " अहो माझी काही काळजी करू नका ! मला ही मैय्याच सर्व शक्ती देते . थोडा त्रास देतो तुम्हाला . पाच च मिनिटे थांबा ,मी आलोच . " रामदास बाबांना चालताना खरंच त्रास होत होता . परंतु त्यांचाच आदेश असल्यामुळे मी एका जागी स्तब्ध उभा राहिलो . चालता चालता दोघांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या . दोघे खूप वर्षांनी एकमेकांना भेटले असावेत अशा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या . साधारण दहा मिनिटे झाल्यावर महाराज नर्मदेच्या दोन-तीन धारा पार करून माझ्यासमोर एका सारवलेल्या दगड मातीच्या कट्ट्यावर येऊन बसले . "जय जय रघुवीर समर्थ ! राम कृष्ण हरी ! नर्मदे हर ! " रामदास महाराज मोठ्या आवाजात मला म्हणाले . मी धावतच जाऊन त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला . मी उठून उभा राहिलो आणि त्यांच्यासोबत असलेला म्हातारा माझ्यावरती एकदम खेकसला ! "आप यहां से कहां से आए ? " मी म्हणालो , " अमरकंटक से आया महाराज । " "हां वह तो ठीक है । लेकिन अमरकंटक से यह कौन सा रास्ता लेकर आए ? " "कपिलधारा तक आया । फिर वहां से जाली कूद के अंदर आ गया । "
"आप मेरी बात समझ नहीं रहे । आपके आने की आवाज मैं काफी समय से सुन रहा हूं । आप किनारे किनारे कैसे आ गए ? " मग माझ्या लक्षात आले .रामदास बाबांच्या आश्रमाकडे येण्याचा वरचा एक मार्ग होता . तो मी मगाशीच सोडला होता . मला असे वाटले की कदाचित म्हातार्‍याला हा नवीन मार्ग माहिती नसावा . मी त्याला म्हणालो , " यहां मैया के किनारे से आने के लिए बहुत बड़ा रास्ता है । यहा से सिर्फ पंधरा मिनिट की दूरी पर एक साधू की कुटी है । उसने मुझे यह रास्ता बताया ।नही तो मै पहले उपर वाले रस्ते से जा रहा था और बुरी तरह से भटक गया था । " मला अजूनही त्या म्हाताऱ्याचे समाधान झालेले आहे असे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटेना . त्याचा चेहरा अत्यंत त्रासिक आणि वैतागलेला वाटत होता . "बहुत बड़ा रास्ता है ? हमें तो नहीं पता ।और तुम कौन से साधु की बात कर रहे हो ? हमारी उम्र बीत गई इस जंगल में । क्या महाराज क्या बोलते हो ? आपको अमरकंटक के इस जंगल में कौन लेकर आया ? " रामदास बाबा मंद स्मितहास्य करत हिंदी मधे बोलू लागले , " यह सही बात बोल रहे है । इनको इस जंगल का चप्पा चप्पा मालूम है । यही मुझे यहा पंचधारा मे लेकर आये ।और मै पिछले पैतीस साल से यहा रह रहा हु । यहा से पीछे सीधा अमरकंटक तक जंगल मे एक भी साधू नही रहता और नही रह सकता । " हे सर्व बोलणे ऐकून मी चक्रावून गेलो . पंधरा मिनिटांपूर्वी घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर ताजा ताजा असताना आणि अतिशय प्रशस्त महामार्गासारख्या रस्त्याने नर्मदेच्या काठावरून मी इथे चालत आलेला असताना हे लोक असे का बोलत आहेत हे मला काही कळेना . एक क्षणभर मनात आले की हे खोटे तर बोलत नाहीत ? म्हातारा पुन्हा एकदा चिडून मला म्हणाला . "तुम यहां से आए ना ? देखो पीछे और बताओ मुझे कहां है तुम्हारा बड़ा वाला रास्ता ? "महाराज मैं सच बता रहा हूं । यहां से ठीक १५ मिनट की दूरी पर एक कुटिया है । पीले रंग की ताडपत्री में ढकी हुई है । वहां एक साधु भी रहता है । वह जंगल में लकड़ी जमा कर रहा था ।उसने मुझे यह रास्ता बताया है । चाहे तो अभी आपको उनसे मिलवाता हूं । ज्यादा दूर नहीं है उनके आश्रम का रास्ता । ''  " अरे पागल वही तो हम पूछ रहे हैं ।कहां है तुम्हारा यह रास्ता ?"म्हातारा चिडून माझ्यावर खेकसला. मी मागे वळून पाहिले . आणि माझ्या तोंडचे पाणीच पळाले ! कारण मी ज्या प्रशस्त मार्गाने चालत आलो होतो तो मार्ग आता मला कुठे दिसतच नव्हता . उलट प्रचंड गर्द किर्र झाडी मात्र दिसत होती .ही झाडी किती दाट असावी ? एखादे मांजराचे पिल्लू देखील त्यात शिरू शकणार नाही इतकी दाट झाडी होती . माझ्या अंगावर काटा आला ! हा नक्की काय प्रकार आहे माझ्याच लक्षात येईना .कारण मी महाराजांनी थांब म्हटल्यावर जागेवरती उभा राहिलो होतो .त्यामुळे मी ज्या मार्गाने आलो तो मार्ग मी सोडलाच नव्हता .आणि आता मागे वळून बघतो तर मागे मार्गच दिसत नव्हता . मी पूर्णपणे खोटा पडलो होतो . मी डोळ्यात पाणी आणून तळमळीने रामदास महाराजांना म्हणालो , " महाराज नर्मदा मैया की कसम मे इसी रास्ते से आया हू ।मतलब अभी मुझे वह रस्ता द
दिख नही रहा लेकिन  उस कुटीयासे यहा तक बहुत बढीया रास्ता था । हम स्वयम उसी पर चलकर आए हैं । हमने उस साधु को पूछा भी था की नर्मदा किनारे किनारे अगर चलना हो तो कौन सा रास्ता है वह बताओ ।" म्हातारा वैतागलेला दिसत होता परंतु रामदास बाबा मात्र अतिशय मंद स्मितहास्य करत माझ्याकडे पाहत होते . महाराज म्हणाले , " परस्ते ! समझे कुछ ? तू तो बड़ा जानकार है ना इस जंगल का ?" त्या म्हाताऱ्याचे नाव परस्ते आहे असे माझ्या लक्षात आले . "नही बाबा कुछ नही समझा । यह परिक्रमा वासी झूठ बातें बतला रहा है । " परस्ते म्हणाला . रामदास बाबा म्हणाले , "रुको अभी समज जाओगे । "आणि माझ्याकडे वळून मला म्हणाले , " कौन था वह साधु ? कुछ समझे ? " मी अजूनही तंतरलेल्या अवस्थेमध्ये होतो . माझ्यासमोर प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट आता वेगळीच दिसते आहे याचा धक्का मला बसला होता . तरी देखील धीर एकवटून मी म्हणालो . , "बाबा मैंने उसे उसका नाम भी पूछा । " "क्या नाम बताया उन्होंने ? " "शंकर । शंकर नाम है उसे साधु का ।नीली नीली आंखें है । और एकदम पहलवान जैसा हट्टा कट्टा दिखता है । " रामदास बाबा मोठ्या आवाजात हसू लागले ! त्यांचे ते गडगडाटी हास्य संपूर्ण जंगलामध्ये घुमू लागले ! , " वा भाई वाह ! माई तेरी लीला न्यारी।  परस्ते समझ गए ना कौन सा साधु था ? इस परिक्रमा वासी को छोड़ना नहीं चाहिए आज परस्ते। क्या कहते हो ! " "जी बाबा जी । इन्हें आज रोक लेते हैं हमारे आश्रम में ! " परस्ते उत्तरला . रामदास बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले आणि आकाशाकडे बघून दोन्ही हात वर करून जोर जोरात ओरडू लागले , "  शंकर ! शंकर ! नर्मदे हर ! शंकर ! " 

लेखांक एकोणतीस समाप्त (क्रमशः )

 लेखांक ३० : नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा

रामदास बाबांनी पुन्हा काही त्या साधूचा विषय काढला नाही . यावरून त्यांच्यासाठी असे चमत्कार नित्याचेच होते हे लक्षात आले ,किंवा अशा चमत्कारांना साधकाने फारसे महत्त्व देऊ नये असा त्यांचा भाव असावा . तो मी पक्का आत्मसात करण्याचा निश्चय केला . आता या रामदास महाराजांविषयी तुम्हाला थोडेसे सांगावेच लागेल . संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जे कोणी सर्वाधिक तपस्वी अद्भुत आणि अलौकिक महात्मे भेटले त्यातील सर्वोच्च क्रमांक रामदास महाराजांचा असायला हरकत नाही . ( ती माझी योग्यता किंवा लायकी खचितच नाही ,परंतु भौतिक पातळीवर हा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे म्हणून सांगतो आहे की किमान मला आलेल्या अनुभूतींच्या पातळीवर मला जाणवलेली क्रमवारी अशी आहे ) परमपूज्य श्री सियाराम बाबा तर सर्वांना ज्ञात आहेतच व त्यांचे मला आलेले अनुभव पुढे ओघाने सांगेनच . परंतु त्यांचा आश्रम तुलनेने सहजगम्य आहे .रामदास बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालून प्रवास केल्याशिवाय दर्शन शक्य नाही . इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असून देखील रामदास बाबांनी आपले तपोसामर्थ्य असे काही वाढविलेले आहे की त्याच्या अनुभूती तुम्हाला पदोपदी येऊ लागतात . मूळच्या नागपूर प्रांतातील छिंदवाडा गावातील हा एका पाटलाचा मुलगा . शिवराम पाटील असे त्यांचे मूळ नाव .शिक्षण इयत्ता नववी पास . ग्राम सावजपाणी पोस्ट कोंढार तहसील पांडुरना जिल्हा छिंदवाडा राज्य मध्य प्रदेश . ही माहिती स्वतः बाबांनी मला दिलेली आहे व मी लगेचच माझ्या वहीत उतरवून घेतलेली आहे त्यामुळे अतिशय विश्वसनीय मानावी .
 परमपूज्य परमहंस श्री रामदास महाराज , पंचधारा
आत्ता थोडा तपास केल्यावर असे लक्षात आले की नागपूर पासून अतिशय जवळ असे हे गाव आहे . आधुनिक भारतीय सीमारेषा नुसार हे मध्य प्रदेश मध्ये मोडते परंतु याचा जास्त संपर्क महाराष्ट्राशीच आहे . महाराष्ट्रातील नारखेड किंवा वरुड किंवा सावनेर इथून ते जवळ पडणारे गाव आहे . शालेय शिक्षणामध्ये महाराजांना उत्तम गती होती परंतु गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे ( जे समर्थ रामदास स्वामी स्थापित असण्याची शक्यता आहे असा माझा कयास आहे कारण रामदास बाबांच्या जीवनावर समर्थ रामदासांच्या जीवनाचा खूप प्रभाव दिसतो ) तिथे बसून बाल शिवराम तासंतास साधना करीत असे . ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी बालवयामध्येच रामरायाला भेटण्याकरता आपले सर्वस्व सोडून तीर्थयात्रेला निघाले तसेच आपणही निघून जावे असा विचार करून एक दिवस शिवरामने सर्व काही सोडून दिले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला . समर्थांनी नारायण हे नाव त्यागले आणि रामदास हे नाव धारण केले त्याप्रमाणे यांनी देखील शिवराम या नावाचा त्याग करून रामदास हेच नाव धारण केले . दोघांच्या जीवनामध्ये अनेक साम्य स्थळे आढळतात . १९८० साली महाराजांनी नर्मदा परिक्रमा चालू केली . या परिक्रमेदरम्यान फिरत फिरत ते अमरकंटक क्षेत्रामध्ये आले . आणि या क्षेत्राने त्यांना मोहिनी घातली . तसे भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर महाराजांचे गाव साधारण याच टापूमधील जंगलामध्ये आहे . परंतु मध्ये इतके घनदाट अरण्य आहे की जाण्यासाठी मार्ग नाही . परंतु हवामान ,जीवनमान , तापमान ,वातावरण वगैरे सर्वसाधारण सारखेच आहे .इथे जंगलामध्ये कुठेतरी कुटी करून राहावे असे त्यांनी ठरविले . तब्बल १२० दिवस महाराज या जंगलामध्ये केवळ नर्मदेचे जल पिऊन व्रतस्थ पणे राहिले . या दरम्यान त्यांना एक आदिवासी तरुण भेटला . रयतवाड किंवा रैतवाड या गावातील हा आदिवासी तरुण या भागातील अरण्याचा जाणकार होता . त्याने महाराजांची महती ओळखली आणि त्यांना नर्मदेच्या काठी राहण्यायोग्य एक जागा त्याने सुचवली व तिथे तो त्यांना घेऊन आला . महाराजांना देखील ते रम्य स्थान पसंत पडले व इथेच त्यांनी छोटीशी कुटी बांधली . ही जागा होती पंचधारा . आणि या माणसाचे नाव होते प्रेमसिंह परस्ते ! होय बरोबर ओळखलेत ! माझ्यावरती  खेकसणारा परस्ते तो हा प्रेम सिंह परस्तेच ! लॉक डाऊन मुळे सुमारे दोन-तीन वर्षे महाराजांचे दर्शन झाले नाही म्हणून तो त्यांना खास भेटण्याकरता जंगलातील वाटा तुडवत चालत आला होता. आणि माझे भाग्य किती थोर पहा नेमका त्याच दिवशी मी तिथे पोहोचलो ! त्यामुळे गेल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सहवासातील त्या दोघांच्या अद्भुतरम्य भयचकीत करणाऱ्या आठवणींच्या गप्पा ऐकणे इतकेच काम मला उरले ! मी मनोमन ठरविले की आपण फक्त ऐकायचे ! मध्ये काहीही बोलायचं नाही ! आणि अक्षरशः माझे कान तृप्त झाले इतक्या अद्भुत आठवणी मला त्या दोघांच्या संवादातून पुढे ऐकायला मिळाल्या ! असो .
महाराजांनी इथे जी छोटीशी कुटी बांधली होती तिचे नाव ज्ञानेश्वरी कुटी असे ठेवले . पुढे वन खात्याने आदेश काढला की अमरकंटकच्या जंगलात कोणीही कुटी बनवू शकणार नाही जो आजही लागू आहे , तेव्हापासून महाराज उघड्यावरतीच राहतात ,उघड्यावरतीच झोपतात , उघड्यावरतीच बसतात आणि सर्व काही उघड्यावरतीच सुरू आहे .त्यांची बसण्याची जागा नर्मदेच्या इतक्या काठावर आहे की चुकून ही तोल गेलाच तर ते थेट नर्मदा जलामध्येच पडतील :आजही या मार्गाने फारसे कोणी जात नाही . पूर्वी तर या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमा वाशींची संख्या अक्षरशः नगण्य होती . त्यामुळे इथे महाराजांना अपेक्षित असलेला एकांत आणि नर्मदा मातेचा संग पुरेपूर लाभला . धिप्पाड देह ,खणखणीत आवाज , सुस्पष्ट वाणी ,गोड हसरा चेहरा ,गोरा वर्ण ,अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि संपूर्ण जंगलात घुमणारे गडगडाटी निखळ शुद्ध हास्य ! महाराजांबद्दल किती सांगू आणि किती नाही असे मला झालेले आहे !
महाराज साधनेच्या काळामध्ये अगदी १२० दिवसांपर्यंत नर्मदा जलावर जगलेले आहेत . एरव्ही ते सहा सहा लिटर दूध आरामात फस्त करत असत ! परिक्रमा मार्गातील सर्वच लोक आणि संत त्यांना खूप मानतात कारण ते ज्या घनदाट अरण्यात ज्या पद्धतीने एकटेच उघड्यावर राहतात हे काही सोपे काम नाही .
इथे राहू लागल्यावर महाराजांना नर्मदेचे अनेक अनुभव येऊ लागले . महाराज सांगतात की नर्मदा मातेनेच मला सर्व काही शिकवले . आता हे वाक्य ऐकायला फार साधे सोपी सरळ वाटते . परंतु नर्मदा मातेने महाराजांना काय काय शिकवले आहे याचे पुरावे तुम्ही पाहिलेत तर आपली मती गुंग होऊन जाते ! मुळात मला स्वतःला भाषा या विषयाची अत्यंत आवड आहे त्यामुळे महाराजांनी सांगितलेल्या एका मुद्द्याचा मी चांगलाच काथ्याकूट त्यांचे समक्षच करून घेतला ! नर्मदा मातेने महाराजांना ५६ भाषा शिकविली !  ५६ भाषा शिकविल्या नाही ५६ भाषा शिकविली ! आता याचा अर्थ नक्की काय ? मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी तमिळ तेलगू अशा भाषा ? महाराजांनी मला सांगितले की ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी या भाषेचा वापर केलेला आहे . आणि याचा उल्लेख संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी माऊलींवर केलेल्या एका अभंगामध्ये केलेला आहे . नामदेव महाराज म्हणतात

ज्ञानराज माझी योग्याची माउली ।
जेणें निगमवल्ली प्रगट केली. ॥१॥
अध्यात्मविद्येचें दाखविलें रूप ।
चैतन्याचा दीप उजळीला. ॥२॥
गीता आळंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी हेलावली. ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली. ॥४॥

श्रवणाचे मिसें बैसावें येवोनी ।
साम्राज्य भोगोनी सुखी असा. ॥५॥
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।
येक तरी वोवी अनुभवावी ॥६॥


 ५६ भाषेचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारली ॥
या ओळीच्या संदर्भात बोलताना काही विद्वानांचे असे मत आहे की ज्ञानेश्वरी मध्ये ५६ विविध भाषांमधील शब्द आलेले आहेत . त्याची एक मोठी यादी देखील विद्वानांकडून सादर केली जाते . ती देखील आपल्या माहिती करता सोबत देत आहे . 

1) अंग
2) वंग 3) कलिंग 4) कांबोज 5) काश्मिरी 6) सौबीर 7) सौराष्ट्र 8 ) मागध 9) मालव 10) महाराष्ट्र 11) नेपाळ 12) केरळ 13) चोळ14) पांचाळ 15) गौड 16) मल्लाळ 17)सिंह 18) वड्य 19) द्रविड 20) कर्नाटक 21) मरहट 22) पानाट 23) पांडित्य 24) पुलिंद 25) आंध्र 26) कनोज 27) यावन 28) जलांध 29) शलभ 30) सिंधू 31) अवंती 32) कन्नड 33) हूण 34) दाशार्ण 35) भोजकोट 36) गांधार 37) विदर्भ 38) बाल्हिक 39) गज्जर 40) बर्बर 41) कैकेय 42) कोशल 43) कुंतल 44) शूरसेन 45) टंकण 46) कोंकण 47) मत्स्य 48) मद्र 49) रौंधव 50) पाराशर्य 51) गुर्जर 52) खरच 53) भूवक्र 54) झल्लक 55) प्राग्जोतिष 56)कराहट.

परंतु महाराजांना या ५६ भाषा येतात असा त्याचा अर्थ आहे का ? महाराजांना या सर्व शंका मी उघडपणे विचारून घेतल्या . ज्या व्यक्तीला ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता सर्व प्रश्न एखाद्या लहान बालकाच्या सरलतेने , सहजतेने विचारले पाहिजेत . महाराज माझ्या या प्रश्नाने खूप खुश झाले आणि मला सांगू लागले की त्यांनी देखील हाच प्रश्न नर्मदा मातेला विचारला होता .हे नर्मदे या जगामध्ये एकूण भाषा तरी किती आहेत ते मला कृपा करून सांग . नर्मदा माता त्यांना म्हणाली मी तुला केवळ त्या भाषांची नावे च सांगत नाही तर त्या सर्व भाषा मी तुला शिकवते ! आणि साक्षात नर्मदा मातेने रामदास बाबांना ५००० भाषा शिकविल्या ! हा आकडा ऐकून मी अवाकच झालो ! माझी अवस्था महाराजांनी ओळखली आणि मला म्हणाले जा त्या कुटीमध्ये जा आणि अमुक अमुक वह्या घेऊन ये .मी जाड जूड वह्यांची बाडे घेऊन महाराजांच्या पुढे येऊन हात जोडून बसलो . महाराजांनी मला एक एक पान उलटायला सांगितले . रामदास बाबांनी या वह्यांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द ५००० विविध भाषांमध्ये लिहिलेला होता . मला यातील ज्या भाषा येत आहेत त्या तपासून पहाव्यात असे मी ठरविले . संस्कृत , मराठी , हिंदी , इंग्रजी , फ्रेंच , तमिळ , तेलगू, कन्नड , बंगाली ,गुजराती इतक्या भाषांमध्ये तरी महाराजांनी अतिशय अचूक ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिला होता ! तसेच सुरुवातीला त्या भाषेचे नाव देखील महाराजांनी लिहिलेले होते . समजा एखाद्याने या गोष्टीवर अविश्वास दाखवायचे ठरविले आणि अशी कल्पना केली की महाराजांना त्या त्या भाषा बोलणारे परिक्रमावासी आल्यावर त्यांनी त्यांच्याकडून हा शब्द शिकून घेतला , तर मग चायनीज , जापनीज , स्वाहिली ,अरेबिक , पर्शियन , नॉर्डीक , जर्मन , डच इत्यादी भाषांचे काय करायचे ? कारण महाराजांनी जगभरातील सर्व च भाषांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिला होता ! त्यांनी नर्मदे हर हा शब्द देखील अनेक भाषांमध्ये लिहून काढला होता . याचा अर्थ त्यांना हे ज्ञान थेट नर्मदा मातेकडून प्राप्त झाले होते हे स्पष्टपणे दिसत होते ! मी उत्कंठा म्हणून सर्व भाषांची नावे वाचून काढली . याच्यामध्ये पृथ्वीची भाषा ,नदीची भाषा , वाऱ्याची भाषा , पक्षांची भाषा अशा भाषा देखील होत्या ! याबाबतीत माझे कुतूहल जागृत झाल्यामुळे मी महाराजांना अधिक शंका विचारू लागलो ! मी त्यांना विचारले मग नर्मदा माता तुमच्याशी कुठल्या भाषेमध्ये बोलते ? त्यांनी सांगितले की नदीची एक स्वतःची भाषा असते . आपण जर शांत चित्ताने बसून तिच्याशी एकरूप झालो तर ती काय बोलते आहे हे आपल्याला कळू लागते . आता तू अमरकंटक वरून निघाला आहेस आणि जंगलातून येतो आहेस हे मला नर्मदेने आधीच सांगून ठेवले होते ! मध्ये तू वाट देखील भटकलास ! तू तिला चार दोन शिव्या देखील हासडल्यास असे तिने मला सांगितले . आता मात्र माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या . कारण मी नर्मदेला खरोखरीच दोन-चार ठेवणीतल्या हासडल्या होत्या .आणि हे माझ्या खेरीज कोणाला माहिती असण्याची शक्यताच नव्हती .जरी कुणी भेटले असते तरी मी आपण होऊन थोडी सांगणार होतो की मी काय काय म्हणालो नर्मदेला ते !  जंगलामध्ये भटकताना जेव्हा मला मार्ग सापडेनासा झाला आणि नर्मदेचा आर्त धावा करून देखील कुठलाच मार्ग दिसेना तेव्हा मी मोठ्या त्वेषाने म्हणालो होतो , " *****, ****** तुझ्या किनाऱ्यावरचा सोपा मार्ग दाखवत नाहीस तर मग बोलवतेस कशाला परिक्रमेला !" आणि त्यानंतरच मला शंकर साधू भेटला होता . महाराजांनी मला जवळ घेत डोळे पुसले . म्हणाले ," आपल्या आईशी असे कधी बोलू नये . ती आपली आई आहे . आई जशी मुलाला घडवण्यासाठी कधी कधी मुद्दाम संकटात टाकते आणि दुरून गंमत पाहत राहते तसे नर्मदामाता करत राहते .वेळ आल्यावर बरोबर ती संकटातून मुलाला बाहेर काढत असते . आपण यासाठी तिला बोल नाही लावू ! मला माहिती आहे पुन्हा तुम्ही असे काही करणार नाही ! " आपल्या दुष्कृत्याचा मला अतोनात पश्चात्ताप झाला . पूर्व संस्कार काही केल्या जात नाहीत हेच खरे .पुढे महाराज सांगू लागले , " मला वाऱ्याची भाषा देखील कळते . वारा देखील जाता जाता आपल्याला बरेच काही सांगून जातो . पशु पक्षांना या सर्व भाषा कळत असतात . वाऱ्याची , पाण्याची , ढगांची ,आभाळाची अशा सर्व गोष्टी मिळून एक भाषा तयार होते जिचे नाव आहे ५६ भाषा . " मी मन लावून ऐकत होतो . महाराज एका वेगळ्या भावा विश्वामध्ये पोहोचल्यासारखे वाटत होते . " वारा मला सांगतो आहे की वाघाने नुकतेच दोन गाई आणि एक बैल मारून खाल्ले आहेत . " बापरे ! हे देखील विश्वासार्ह होते कारण दोनच दिवसांपूर्वी मी समोरच्या किनाऱ्यावर रामकुटी मध्ये असताना वाटेत लोक या घटनेची चर्चा करत होते . "इतके बारकावे समजतात का बाबा या भाषेतले ? " महाराज पुन्हा सांगू लागले , "आपल्या बोलीभाषेला मर्यादा आहेत परंतु ५६ भाषा ही अमर्याद आहे ! तुम्ही मला सांगा समोरासमोर दोन मोठे सेनासागर उभे आहेत युद्धाला तोंड फुटलेले आहे आणि अशावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत . इतका वेळ तरी असेल का त्या दोघांजवळ ? त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला जो बोध केला तो एका क्षणात त्याला प्राप्त झाला आहे आणि तोच या ५६ भाषेचा गौरव आहे ! तुमच्या आधुनिक कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये अपलोड डाऊनलोड असे काहीतरी म्हणतात बघा तशी ही भाषा आहे ! ती या हृदयातून त्या हृदयामध्ये थेट अपलोड होते ! तुम्ही उपदेश ऐकायला बसलात की तो थेट डाऊनलोड होतो ! " आधुनिक शब्द वापरून सांगितल्यामुळे मला चटकन महाराजांना काय म्हणायचे आहे ते लक्षात आले . महाराज पुढे सांगू लागले , " अहो ज्ञानेश्वर माऊली साक्षात ज्ञानाचा सागर आहे !  त्यांचे वर्णन करण्याचा ज्यांच्या वाणीचा अधिकार ते नामदेव महाराज , त्यांच्याकडून लिखाणामध्ये कधी चूक होईल का ? छपन्न भाषेचा केला से गौरव असे म्हणायचे ऐवजी त्यांनी छपन्न भाषांचा केलासे गौरव असे म्हणायला पाहिजे होते ना ! परंतु त्यांना ५६ वेगळ्या वेगळ्या भाषा अपेक्षितच नाहीत तर ५६ भाषा नावाच्या या एका भाषेबद्दल ते बोलत आहेत . ती एकदा ज्याला आली त्याला जगातील सर्व भाषा कळू लागतात . समोरचा काय बोलला त्याचा आशय आपोआप मनामध्ये उतरतो . आणि नामदेव महाराज म्हणतात की भवसागरातून ,भावार्णवातून तरुन जाण्यासाठी तुमची नाव म्हणजे ही छप्पन भाषा आहे ! जिचा वापर करून श्रीकृष्णाने तिला धन्य करून टाकले व तीच भाषा ओळखून माऊलींनी आम्हाला धन्य केले . " महाराजांचे हे सर्व ज्ञान मी तहानलेल्या चातकासारखे टिपून घेत होतो . त्यांचे प्रत्येक वाक्य ब्रह्म वाक्य होते ! 
वाचकांना त्यांचा आश्रम कसा होता याची कल्पना यावी म्हणून आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे करतो आहे . कृपया मी जसा तिथे रमलो तसे आपण सर्वांनी ही रममाण होऊन जावे ! न जाणो कोणे एके क्षणी अचानक ५६ भाषा आपल्यालाही प्राप्त होऊन जाईल !

रामदास बाबांचा आश्रम साधारण इथे कुठेतरी आहे
उभी वाहणारी काळसर रेषा म्हणजे नर्मदा आहे .
मी स्वतः गुगल स्थानीय मार्गदर्शक अर्थात लोकल गाईड लेवल १० पार केलेली असून देखील हा आश्रम येथे ( गूगल मॅपवर ) जोडण्याचे धाडस करत नाही कारण त्याची जागा प्रत्यक्षातच काय उपग्रह छायाचित्रांमधून शोधता येणे देखील अशक्य आहे . (मी हे वाक्य लिहीत असताना जगामध्ये ही पातळी पार केलेले फक्त एक हजार पंचवीस लोक आहेत आणि भारतामध्ये पन्नास लोकल गाईड . असो ) चुकून जरी एखादा मनुष्य गुगल मॅप लावून तिथे पोहोचायचा प्रयत्न करेल आणि जंगलामध्ये भटकेल तर त्याला परत जिवंत शोधता येणे अवघड आहे ! वाचकांना नम्र विनंती कृपा करून नर्मदे काठी गुगल मॅपचा वापर करू नका !आणि आपल्याला अचूक माहिती असल्याशिवाय एखादे स्थान देखील तिथे जोडायचा प्रयत्न करू नका . नर्मदेचे एक स्वतःचे नेवीगेशन आहे ! त्याचा अवश्य वापर करा ! असो.
दूधधारेवरून नर्मदा हलकी उजवीकडे वळण घेते आणि अतिशय सुंदर स्वरूपात वाहत राहते . इथे पात्राची रुंदी केवळ पाच फूट ते दहा फूट आहे . खोली म्हणाल तर कधी कमरे एवढी आणि कधी घोट्या एवढी . संपूर्ण वनमार्ग असल्यामुळे नर्मदेच्या पाण्यामध्ये भरपूर लाकडे पालापाचोळा पडलेला दिसतो . रामदास बाबांच्या आश्रम जवळ येताना मात्र नर्मदा पाच धारांचे स्वरूप घेते .त्यामुळे तिला पंचधारा असे नाव पडले आहे . या पाचही धारा बऱ्यापैकी विस्तृत आहेत . आणि त्यांच्यामध्ये मध्ये बेटे तयार झालेली आहेत . मुख्य धारा पाच आहेत आणि छोट्या धारा अगणित आहेत . यातील जी सर्वात मोठी धारा आहे तिच्या काठावर एका मोठ्या खडकावर रामदास बाबा यांचा निवास आहे . तिथे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये बाबा बसलेले असतात . कुण्या परिक्रमावाश्याने जाता जाता त्यांना मच्छरदाणी लावून दिलेली आहे . कोणीतरी खाली गादी अंथरून दिलेली आहे . इथे बसण्यासारखा औरस चौरस कट्टा तयार झाला आहे . इथून मागे बाबांनी पत्र्यामध्ये बांधलेली ज्ञानेश्वरी कुटी आहे . त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व वह्या सुरक्षित आहेत . या कुटी पाशी खरे तर पंचधारा संपते . त्यामुळे समोरचा किनारा अगदी जवळ दिसतो . ज्यांना माहिती आहे अशी माणसे समोरून जाता जाता बाबांचे दर्शन घेतात . किंवा बाबांना जोरात आवाज देतात की बाबा कट्ट्यावर येऊन बसतात . इथून एक छोटासा ओढा ओलांडून पलीकडे गेले की चढावर वनखात्याकडून खास परवानगी घेऊन बाबांनी एक खोली बांधलेली आहे . आलेल्या परिक्रमावासींना वन्य श्वापदांनी त्रास देऊ नये म्हणून ही खोली आहे . खोली अत्यंत जुनी व साधी असल्यामुळे मोडकळीला आलेली आहे . तिथेच आत मध्ये चूल आणि एक मोठा पेटारा आहे . जाणारे येणारे यात्रेकरू या पेटार्‍यामध्ये शिधा भरत असतात . इथून मागे घनदाट जंगल सुरू होते . इथपर्यंत देखील सर्वत्र जंगलच आहे . मोकळी जागा अशी फारशी कुठे नावालाही नाही . याच खोलीमध्ये स्वयंपाक करून रामदास बाबा येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना भोजन प्रसाद देत असत . (मी येणाऱ्या व जाणाऱ्या असे शब्द विचारपूर्वक वापरले आहेत कारण जलहरी परिक्रमा करणारे लोक समुद्र ओलांडत नाहीत ते समुद्रापर्यंत जाऊन पुन्हा उलटे त्याच मार्गाने येतात ) . परंतु काही वर्षांपूर्वी ( सुमारे तीन ते चार वर्षे ) एक दुर्दैवी घटना घडली . महाराज एक दिवस असेच आपल्या स्वस्थानी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला .ज्याला इंग्रजी मध्ये पॅरालिसिसचा अटॅक असे म्हणतात . आणि महाराज नर्मदेच्या पात्रामध्ये पडले . दोन-तीन दिवस महाराज त्याच अवस्थेमध्ये पडून होते . त्यांना हालचाल करता येत नव्हती .मैया च्या कृपेने एक परिक्रमा वासी त्या बाजूने निघाला होता त्याने महाराजांची अवस्था पाहिली . आणि ताबडतोब गावकऱ्यांना कळवून महाराजांना तिथून हलविण्यात आले आणि आधी जबलपूरला आणि मग नागपूरला उपचारांकरता ठेवण्यात आले . उपचारा दरम्यान डॉक्टरांनी आता हे कधीच बरे होणार नाहीत वगैरे सांगायला सुरुवात केली . परंतु जरा बरे वाटू लागताच महाराज हॉस्पिटल मधून थेट निघाले ते पुन्हा आपल्या पंचधारा स्थानावर येऊन बसले . आता मात्र ते पहिल्यासारखा स्वयंपाक करू शकत नाहीत किंवा वेगाने झपझप चालत देखील नाहीत . त्यांची उजवी बाजू पूर्णपणे शिथिल पडलेली आहे . उजवा हात उजवा पाय त्यांना अजिबात वापरता येत नाही . मैया च्या कृपेने जीभ मात्र पूर्ण सुस्थितीत आहे . त्यामुळे संवाद उत्तम साधता येतो . अमरकंटकच्या आरण्यातील प्रचंड थंडी धुवाधार पाऊस आणि कडक उष्मा हे सर्व सहन करत ते तिथेच राहिलेले आहेत . त्यामुळे ज्या ज्या संतांना रामदास बाबांची ही अवस्था माहिती आहे ते ते संत परिक्रमावासींना विनंती करतात की तुम्ही मुद्दाम होऊन रामदास बाबांच्या आश्रमावरून जा आणि त्यांना चार घास बनवून जेवू खाऊ घाला . न्हाऊ माखू घाला .  त्यांची सेवा करा आणि मगच पुढे जा .जर कोणी येथून गेले नाही तर मात्र बाबा नर्मदा जलावरती गुजराण करतात ! किती जबरदस्त त्याग आणि तपस्या आहे विचार करून पहा ! मला धन्य वाटत होते की अशा संतांचा सहवास मला सदेह लाभतो आहे ! महाराजांच्या उशाशी दोन मोठे ठोकळे ग्रंथ दिसले . कुतुहल म्हणून पाहिले असता त्यातील एक ज्ञानेश्वरी होती आणि एक ग्रंथराज दासबोध होता . हे दोन्ही ग्रंथ वाचून वाचून चाळून चाळून अगदी गाळण झाल्यासारखे झाले होते . महाराजांना ज्ञानेश्वरी आणि दासबोध अक्षरशः तोंडपाठ होता . विशेषतः दासबोधाची वचने तर ते घडा घडा घडा बोलून दाखवत ! समासच्या समास त्यांना मुखोद्गत होते . आपले रामदास हे नाव त्यांनी जणु सार्थ केले होते ! मी महाराजांना विनंती केली आणि काही करुणाष्टके आणि सवाया त्यांना म्हणून दाखविल्या . सवाई हा प्रकार गाताना बेंबीच्या देठापासून ओरडावे लागते व तो आवाज खूप लांब पर्यंत ऐकू जातो .पूर्वी राजदरबारामध्ये राजाचे भाट अथवा स्तुती पाठक राजाच्या नावाने सवाया गायचे .समर्थ रामदासांनी अशा सवाया मारुतीच्या रामाच्या देवीच्या वगैरे लिहून ठेवलेल्या आहे त्या सर्व मी म्हणालो . महाराजांना खूप आनंद झाला . 
महाराजांचे काही व्हिडिओ युट्युब वर मला सापडले ते आपल्या माहिती करता खाली देत आहे . ते पाहून साधारण तुम्हाला रामदास बाबा कसे आहेत त्याची कल्पना यावी !
बाबांचे अस्खलित संस्कृत आणि सुस्पष्ट वाणी येथे ऐका .
https://youtu.be/bQ7zaOnhFs8?si=I-Llbm1ptZsOALEU

एका स्थानिक पत्रकाराशी बोलताना बाबा .इथे नर्मदा मैयाचे सुंदर दर्शन होते आहे
https://youtu.be/6sVWsTKZ3t8?si=B7qpwIEWl1qJZAnS

जडीबुटींची माहिती सांगताना रामदास बाबा
https://youtu.be/4uGoQodfFYo?si=ZdUtCMNM64eDgb8N

एका परिक्रमावाशीशी गप्पा मारताना रामदास बाबा
https://youtu.be/FbqoIGs_eno?si=TUG-1ZF0YGKoF49P

एका संतांशी वार्तालाप करताना रामदास बाबा
https://youtu.be/7IGZpZnJ5HQ?si=ABpUNkmWrv1OP6RY

महाराजांना मला काय सांगू आणि काय नको असे झाले होते . आणि मलाही महाराजांकडून काय ऐकू आणि काय नको असे झाले होते ! मी आयुष्यात अनेक संतांना भेटलो परंतु यांच्या विषयी जेवढा जिव्हाळा आणि आपुलकी वाटत होती तेवढी फार कमी वेळा वाटली . "चातुर्मासाचे चार महिने या भागात कोणीच फिरकत नाही " महाराज सांगू लागले . "नाही म्हणायला आमचे मित्र वाघोबा मात्र येऊन जाऊन असतात ! " मला नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहरा आला ! रामदास बाबा उघड्यावर झोपतात आणि वाघ येऊन त्यांना फक्त दुरूनच नमस्कार करून निघून जातो हे दृश्य अनेक स्थानिक लोकांनी देखील पाहिलेले आहे . परस्ते हा या क्षेत्रातला अतिशय जाणकार मनुष्य ! त्या दोघांच्या गप्पा तर मुलखावेगळ्या होत्या ! एकदा एक साधू रामदास बाबांकडे आला आणि म्हणाला की मला या अरण्यामध्ये साधना करण्यासाठी राहायचे आहे .बाबांनी त्याला सांगितले की नर्मदा मातेची परवानगी घे . मी कोण तुला सांगणारा . परंतु साधुनी ऐकले नाही आणि बाबांच्या कुटीपासून जवळच त्याने एक कुटी बांधली .पुढे भुकेल्या वाघाने त्याचा बरोबर कार्यक्रम केला आणि त्याचा अर्धा मुर्दा देह शोधण्याकरता परस्ते आणि बाबा दोन-तीन दिवस भटकत होते . त्याचा देह अतिशय वाईट अवस्थेत सापडला . शक्यतो वाघ माणसाला खात नाही कारण माणसाच्या अंगामध्ये स्नायू कमी असतात . आणि तावडीत सापडले तर तो फक्त स्नायूंचा भाग खाऊन टाकतो . त्यामुळे त्या साधूची छाती दंड आणि मांड्या तेवढ्या खाल्ल्या होत्या बाकी सर्व तसेच पडले होते .परस्तेला हे सर्व सांगताना जराही काही वाटत नव्हते . आणि मला मात्र नुसत्या कल्पनेने देखील अंगावर काटा येत होता . दोघांनी असे बरेच किस्से मला ऐकवले ! आता सुद्धा ज्या गुराख्याची तीन गुरे वाघाने मारून खाल्ली त्याला परस्ते ओळखत होता . वाघाचे हल्ले ,अस्वलाचे हल्ले , रानडुकराचे हल्ले असे बरेच प्रकार त्यांनी मला ऐकवले . त्याला हे पक्के माहिती होते की याला काहीही सांगू शकतो .कारण मुळात या स्थानापर्यंत येण्यासाठीच कसे अरण्य पार करावे लागते हे त्याला माहिती आहे . इथपर्यंत आला आहे म्हणजे तो ऐकण्याचा अधिकार आहे असा त्याचा भाव होता . परस्तेला जंगलाचे फार सखोल ज्ञान होते . वासावरून प्राणी कुठे आहे ओळखणे वगैरे कला त्याला अवगत होत्या . काळा सावळा किडकिडीत देह ,पांढरे शुभ्र केस ,कमरेला गुंडाळलेली भगवी लुंगी आणि वर एक मळकट भगवा सदरा . बाबा भेटल्यापासून हा जरी गृहस्थी असला तरी एखाद्या साधूचेच जीवन जगत होता . "अभी आगे हमारा प्लॅन बहुत जबरदस्त है । " महाराज सांगू लागले . "मी लवकरच मैया च्या कृपेने दूर गमन सिद्धी प्राप्त करून विविध देशांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार करणार आहे !त्यावेळी तुम्हाला बरोबर कळेल की बाबा आता इथून निघाले ! " बाबांना हे करता येणे सहज शक्य आहे याची मला खात्री पटलेली होती . बोलता बोलता रात्र कधी झाली आम्हाला कळलेच नाही . थंडी वाजू लागली . महाराजांना मी पायामध्ये मोजे चढवून दिले . आणि हाताला धरून हळूहळू आतल्या स्वयंपाकाच्या खोलीमध्ये नेले . महाराज म्हणाले आज आपल्याकडे करण्यासारखे फार काही नाही . एक मोठा कांदा आहे .दोन-तीन लसणाच्या पाकळ्या आहेत . दोन मिरच्या आहेत आणि वाटीभर पीठ आहे . मग सर्वानुमते असे ठरले की टिक्कड आणि मस्त कांद्या लसणाची चटणी करायची ! मी कणिक मळायला बसलो . माझी गती आणि पद्धती बघून प्रेमसिंग परस्ते माझ्यावर पुन्हा भडकला . " लाव इधर ! तुम भोसड़ी के शहर वाले कुछ काम के नहीं ! " परस्तेने इरसाल शिवी हासडून माझे काम सोपे केले ! त्या खोलीमध्ये वर खाली अशा दोन पातळ्या होत्या . त्या पायरीवर बाबा बसले होते . आणि आमची मजा बघत होते . मी बसल्या बसल्या कांद्या लसणाची उत्तम पैकी चटणी तयार केली . मुठभर शेंगदाणे सुद्धा त्यात कुटून घातले .  आणि मग त्या चुलीजवळ बसूनच तिघांनी भोजन प्रसाद घेतला ! पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाला देखील या प्रसादाची सर येणे शक्य नव्हते ! रामदास महाराज तर ती साधीसुधी चटणी इतके कौतुक करून खाऊ लागले की मला देखील ती चटणी भारी वाटायला लागली ! मी परस्ते ला सांगितले होते की तू टिक्कड कर परंतु शेवटचा एक गोळा माझ्यासाठी ठेव . त्याच्या मी दोन मऊशार महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पोळ्या करून महाराजांना खाऊ घातल्या . नाहीतर इथले टिक्कड म्हणजे आपल्या भाकरी पेक्षा दुप्पट जाड असतात ! महाराजांना त्या फारच आवडल्या ! म्हणाले आधी कळाले असते तर तुम्हालाच सगळ्या पोळ्या करायला लावल्या असत्या . महाराज महाराष्ट्राकडचे असल्यामुळे त्यांना लहानपणी आईच्या हातच्या खालेल्या पोळ्यांची आठवण नक्की आली असणार . त्यानंतर मी सर्व भांडी घासून ठेवली . विशेषतः चुलीवरची भांडी घासायला थोडीशी तापदायक असतात . त्यात थंडीमध्ये बर्फासारखे गार पाणी असताना अजूनच त्रास होतो . परंतु रामदास बाबांची सेवा करतो आहे हा भाव असल्यामुळे मला काहीच त्रास वाटला नाही ! शिवाय हुशार परस्तेने थोडेसे गरम पाणी चुलीवर ठेवून दिले होते तेही शेवटी वापरले . आता मी बाबांना हाताला धरून पुन्हा त्यांच्या स्थानावरती सोडायला गेलो . मी बाबांना विचारले की आपल्या शेजारी मी आसन लावले तर चालेल का ? बाबा म्हणाले इथे रात्री थंडी खूप पडते . दव इतके पडते की संपूर्ण अंथरूण पांघरूण भिजून जाते . आणि मुख्य म्हणजे इथे झोपायची आज्ञा नर्मदा मातेने फक्त मला दिलेली असल्यामुळे इतर जीवांची शाश्वती मी देऊ शकत नाही . एखादा वन्य हिंस्र प्राणी आलाच तर तो मला काही करणार नाही परंतु शेजारच्याला काय करेल याचा नेम नाही . एकदा तर एक भला मोठा अजगरच रात्रभर बाबांना विळखा मारून बसला होता . बाबा देखील त्याला ऊब मिळते आहे तर घेऊ दे अशा भावामध्ये पडून राहिले होते . सकाळी तो आपोआप निघून गेला . असे सर्व प्रकार होत असल्यामुळे मी आतच झोपणे श्रेयस्कर आहे हे बाबांनी मला पटवून सांगितले . परंतु माझ्या चेहऱ्यावर बाबांची चिंता आहे हे त्यांनी लगेच ओळखले आणि ते मला म्हणाले , "मेरी चिंता मत करना । मेरा चिंतन करना । "
महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तिथून झोपडी मध्ये परतलो . परस्ते झोपी गेला होता . मी देखील आसन लावले . सर्व पूजा पाठ करून घेतले आणि पाठ टेकणार इतक्यात सगळीकडून आवाज येऊ लागले . पाहतो तो काय सुमारे ३० ते ४० भले मोठे उंदीर त्या कुटीमध्ये सर्वत्र संचार करत होते ! ते आम्हाला अजिबात घाबरत नव्हते जणू काही त्यांचेच राज्य असल्यासारखे वर्तन सुरू होते ! खरे पाहायला गेले तर ते राज्य त्यांचेच होते . मीच तिथे पाहुणा होतो . त्यातील दोन-तीन उंदीर माझ्या झोळीवर देखील फिरत आहेत असे माझ्या लक्षात आले . मग मात्र मी ती उचलली आणि बाबांनी मोठा पेटारा जो ठेवला होता , धान्यासाठी , त्यात टाकून दिली . मग मात्र मला निश्चिंत झोप लागली . रात्री एक दोन वेळा जाग आली . अरण्य रात्री अजिबातच झोपत नाही . ते दिवसा झोपलेले असते . त्यामुळे बाहेरून अनेक प्रकारचे आवाज येत होते . माझ्या मनात रामदास बाबांचा विचार येऊन गेला की ते आता काय करत असतील ? कसे असतील ? परंतु तिथपर्यंत जाण्याची हिंमत माझ्या मध्ये नव्हती इतका गुडुप्प अंधार सर्वत्र पसरला होता . मी पुन्हा झोपी गेलो . पहाटे जाग आल्यावर उठलो . प्रेमसिंग परस्तेने एक खूप मोठे काम केले होते ते म्हणजे त्याने रात्रभर चुलीवर गरम पाण्याचे आधण ठेवून दिले होते . त्यातीलच लोटाभर पाणी घेऊन मागच्या जंगलामध्ये बहिर्दिशेला गेलो . माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्वात भयप्रद असे ते विसर्जन होते ! जंगलातून इतके तऱ्हे तर्हे चे आवाज येत होते की विचारू नका ! गरम पाणी कोमट होऊन बघता बघता गार होऊन गेले . नशीबाचा भाग इतकाच की ते बर्फासारखे गार होण्याच्या आत वापरले गेले .  तशीच आंघोळ करून घेतली . आणि महाराजांच्या दर्शनाला निघालो . महाराज ध्यानस्थ बसलेले होते . बराच वेळ ते तसे बसून होते . सुमारे तासाभराने त्यांची समाधी भंग पावली . मला आता पुढे निघणे आवश्यक होते . मी केवळ महाराजांची परवानगी घेण्याकरता म्हणून थांबलो होतो . महाराजांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून मंद स्मितहास्य करून म्हणाले "रात्री दोन वेळेस तुम्ही जागे झाला होतात आणि दोन्ही वेळेला तुम्हाला माझी काळजी वाटली होती . " "होय महाराज अगदी बरोबर " मी उत्तरलो . " मी तुम्हाला म्हणालो ना की माझी काळजी नर्मदा मैया करते .तिला सर्वांचीच काळजी आहे .तुमची ,माझी त्या परस्ते ची , या पशु पक्ष्यांची , वाघांची , अस्वलांची , सर्वांची काळजी आहे . मला तुम्ही कधीही कुठेही माझ्या स्मरण केले की कळते . इथून पुढे सुद्धा तुम्ही जेव्हा घरी परत जाल तेव्हा माझी फक्त आठवण काढा मला लगेच तुमची आठवण येईल ! " 
हे लिहिताना माझ्या अंगावर आता सुद्धा शहरा येतो आहे कारण हा लेख लिहिताना बाबांची अखंड आठवण येते आहे आणि बाबांना देखील आपली आठवण येत असणार आहे ! मी याची साक्षात प्रचिती घेतलेली आहे . "बाबा , आता पुढे जायला आज्ञा द्या " मी म्हणालो . "अरे अजून आले नाहीत अन् इतक्यात निघाले सुद्धा ? इतकी काय घाई आहे ? रहा दोन चार दिवस निवांत ! " महाराज म्हणाले . मी माझ्या आज वरच्या चालण्याच्या गतीवरून जो काही हिशोब काढला होता तो पाहता मला चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपविणे आवश्यक वाटत होते .म्हणून जमेल तितके चालत राहावे असे माझे नियोजन होते . परंतु नर्मदे काठी तुमचे काही चालत नाही हे मात्र खरे आहे . बाबा म्हणाले आम्हाला छान काहीतरी म्हणून दाखवा . मग मी दासबोधातील सद्गुरु स्तवन समास म्हणून दाखविला . त्यानंतर महाराज त्यावर बोलू लागले .बोलता बोलता त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला . लेखन क्रिया निरूपण या समासावर देखील ते फार विस्तृत बोलले . महाराजांचा लेखन क्रियेवर फार भर होता आणि त्यांचे अक्षर अतिशय मोत्यासारखे सुंदर होते . फक्त देवनागरीच नव्हे तर प्रत्येक भाषेतील त्यांचे अक्षर अतिशय वळणदार आणि मोत्यासारखे टपोरे होते . नर्मदा मातेने त्यांना भाषा शिकविताना ठिपक्यांच्या स्वरूपात भाषा शिकविली असे ते म्हणाले . त्यामुळे ते सर्वसामान्य लिहिताना देखील ठिपके ठिपके काढून लिहीत आणि नंतर ती अक्षरे जोडत . त्यांचा उजवा हात आता लकवा मारल्यामुळे चालत नव्हता तरीदेखील ते म्हणले तुझ्याकरता मी प्रयत्न करून बघतो आणि त्यांनी माझ्या वहीमध्ये शिक्का मारून स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तीन लिप्यांमध्ये स्वतःचे नाव लिहून दिले . पैकी पहिले मोडी अक्षर आहे दुसरी देवनागरी लिपी आहे आणि तिसरी रोमन लिपी आहे . त्याचा फोटो आपणा सर्वांसाठी जोडत आहे .
ब्रह्मनिष्ठ संत श्री रामदास महाराज यांनी माझ्या वहीमध्ये केलेल्या तीन स्वाक्षरी (अनुक्रमे मोडी , देवनागरी आणि रोमन लिपीत ) शिक्यातील अक्षरे येणेप्रमाणे : ब्रह्मनिष्ठ संत श्रीरामदास महाराज मुक्काम पंचधारा रेवा आश्रम ,कपिलधारा के पास , पोस्ट अमरकंटक ,जिल्हा अनुपपूर मध्य प्रदेश
हात पहिल्यासारखा चालत नसल्यामुळे त्यांना हे लिहायला देखील खूप वेळ लागत होता . परंतु तरी त्यांनी नेटाने आणि हट्टाने जे हवे ते लिहिलेच . त्यांनी मला पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी कुटीमध्ये जायला सांगितले आणि आतील काही वह्या आणायची आज्ञा केली . इथे येणाऱ्या परिक्रमावासींची ती यादी होती . बाकी रस्त्यालगत असणाऱ्या आश्रमांत शेकड्याने परिक्रमावासी येत असतात त्यामुळे त्यांची पानेच्या पाने भरतात परंतु बाबांकडे मात्र अतिशय मोजकेच परिक्रमावासी येत आहेत हे ती वही पाहिल्यावर माझ्या लक्षात आले . अशा अनेक वर्षांच्या वह्या महाराजांकडे पडल्या होत्या . त्यांच्या बाबतीत एक गमतीदार गोष्ट होती . लोक आपली इच्छा या वहीमध्ये लिहून ठेवत आणि ती पूर्ण होते अशी त्यांची धारणा होती . शिवाय काही लोक आपला फोटो देखील तिथे चिकटवून ठेवत ! रामदास महाराजांनी मला गंमत म्हणून लोकांच्या इच्छा काय काय असतात ते वाचायला सांगितले आणि हसून हसून आमची पुरेवाट झाली ! शिवाय लोकांचे फोटो पहायला देखील मजा येत होती . महाराज म्हणाले थांब तुला अजून एक पुढची गंमत सांगतो . ते जिथे बसले होते तिथे झाडाला इकडे तिकडे मिळेल त्या खांबाला लोकांनी चिंध्या बांधल्या होत्या . रंगीबिरंगी चुनरी चे कापड असते त्याच्या चिंध्या. ते लोकांनी महाराजांच्या पुढे बोललेले नवस होते . मला त्यांनी त्या चिंध्या मोजायला लावल्या तर त्या सुमारे ५०० पेक्षा अधिक भरल्या ! महाराजांचा स्वभाव मोठा गमतीशीर होता . हसून हसून माझे पोट दुखायला लागले !  मला खरे म्हणजे इथून पुढे पंधरा-वीस किलोमीटरचे घनदाट जंगल पार करायचे होते . परंतु महाराज काही सोडेनात. मग मला म्हणाले चल आपण स्वयंपाकाची तयारी करू आणि त्यांचा हात धरून हळूहळू मी त्यांना खोलीमध्ये घेऊन आलो . माझ्याकडे एक अप्रतिम दर्जाचा चमचा होता तो मी त्यांना दिला आणि त्यांना तो फार आवडला . इतका आवडला की तो चमचा मी असेपर्यंत त्यांनी हातामध्ये धरून ठेवला होता .मला म्हणाले हा चमचा पाहिला की मला तुमची आठवण येत राहील . आता खायला काय करायचे ? बाबा मला म्हणाले त्या पेटार्‍यामध्ये काय काय आहे बघ . मी तो पेटारा उघडला परंतु तो प्रचंड जड होता आणि आत मध्ये बुडुख अंधार होता . मी पुन्हा झाकण लावले आणि माझ्या झोळीतील बॅटरी काढून एका हाताने पेटारा उघडला आणि दुसऱ्या हाताने आत काय काय आहे ते फ्लॅश मारून पाहू लागलो . हा प्रसंग नीट लक्षात ठेवा ! इथे मी केलेल्या एका चुकीमुळे मला खूप जबरदस्त अनुभव आला होता . पेटारा खूपच जड होता त्यामुळे तांदूळ एका हाताने काढता येणे अवघड होते . म्हणून मी बॅटरी पेटार्‍याच्या आत मध्ये ठेवली आणि डोक्याने पेटारा धरून दोन्ही हाताने हवे तेवढे तांदूळ आणि डाळ काढून घेतले . त्यानंतर मी झाकण लावले आणि विचार केला की बॅटरी नंतर घेऊ काढून . परंतु कामाच्या गडबडीत मी पेटार्‍यामध्ये चालू बॅटरी ठेवली आहे हे विसरून गेलो . इकडे चुलीवर आधण ठेवून मी मस्तपैकी आमटी भात शिजविला . महाराजांना भात फार आवडत असे . त्यांनी मोठ्या आवडीने आणि मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले . विशेषतः त्यांचा उजवा हात निकामी झाल्यामुळे चमच्याने खायला त्यांना फार बरे वाटत होते . हा चमचा फारच जाडजूड आणि खणखणीत होता त्यामुळे खाण्यासाठी सोयीचा होता . नंतर आम्ही उन्हामध्ये येऊन बसलो . इथे देखील बाबांचा खूप सत्संग लाभला . परिक्रमावासींच्या आणि परिक्रमेतील अनेक गमती जमती बाबा सांगत होते . लोक काय काय प्रकारचे भेटतात हे देखील त्यांनी खुमासदार शैलीमध्ये सांगितले .आता आजचा मुक्काम निश्चित आहे असे डोक्यात ठेवून मी निर्धास्त गप्पा मारत होतो .दुपारचे साधारण तीन वाजले असावेत . आणि अचानक मला रामदास बाबा म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकता ! पंधरा किलोमीटर तीन तासात ?साधे अंकगणित करणाऱ्या माझ्या मनाने हे शक्य आहे असा निर्वाळा दिला .परंतु मला हेच माहिती नव्हते की जंगलातील कठीण मार्गावरून तासाला एक दीड किलोमीटर चालता आले तरी खूप झाले ! परंतु महाराजांनी आज्ञा दिल्यामुळे आता मला निघणे भाग होते . महाराजांनी परस्ते ला देखील माझ्यासोबत निघायला सांगितले .त्याला समोरच्या तटावर काहीतरी काम होते ते करून तो घरी जाणार होता . आम्ही दोघे निघणार इतक्यात स्वतः बाबा माझा हात धरून माझ्यासोबत चालू लागले . मला काही कळेना की बाबा काय करत आहेत ? बाबा म्हणाले मी तुला सोडायला येतो आहे काही अंतर . परंतु याची खरच गरज नाही असे मी निक्षून सांगितले . रामदास बाबा मला म्हणाले की हे पहा मी सर्वांना काही स्वतः सोडायला जात नाही . आतापर्यंत दोन-तीन लोकांनाच असे मी सोडलेले आहे . "अहो बाबा परंतु तेव्हा तुम्ही धड धाकट होतात .आता तुम्हाला उभे देखील राहता येत नाही आधाराशिवाय . तुमचा तोल गेला तर तुम्हाला कोण सावरणार आणि उठवून कोण बसवणार ? " बाबांचे वजन किमान शंभर किलो तरी असावे . परंतु माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करते चालत राहिले . त्यांची बोलण्याची एक विवक्षित पद्धत होती . " ऐस्सा ! " " ज्जे ब्बात ! " असे ते जेव्हा जोरात म्हणत तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटे ! सुमारे दोन किलोमीटर बाबा माझ्यासोबत चालले . परस्ते मध्येच कुठेतरी गायब झाला होता तो एका गुराख्याला घेऊन पुन्हा हजर झाला ! परस्ते ला कोण कुठे किती वाजता गुरे घेऊन फिरत असतो याचा अंदाज होता .आणि बाबांना सोबत एकटे जावे लागू नये म्हणून याला तो सोबत घेऊन आला . मी त्या गुराख्याला म्हणालो , " बरे झाले तुम्ही आलात . आता रामदास बाबांना कृपा करून कुटीपर्यंत सोडा " गुराख्याने मला सांगितले की त्याला बाबांचा आवाज ऐकू येत होता . त्यामुळे तो इकडे यायलाच निघाला होता . दरम्यान त्याने खुणेचा काहीतरी आवाज काढला जो परस्तेने ओळखला . आणि तोही खाणाखुणा करत त्याच्या मागावर गेला आणि त्याला घेऊन आला . वनवासी लोकांचे हे सर्व जगणे कळायला किमान एक जन्म तिथे राहणे आवश्यक आहे . मी त्या गुराख्याला म्हणालो की अरे इथे सध्या वाघ फिरतो आहे तरी  स्वतःची सांभाळणे . यावर तो उत्तरला की " तुम्ही दोन गाई आणि एक बैल पळविण्याची जी बातमी ऐकली होती ती माझीच गुरे होती आणि माझ्यासमोर वाघाने या शिकारी केल्या " म्हणजे ऐकलेली बातमी सत्य होती हे इथे सिद्ध झाले . मग त्याने बाबांना आणि परस्तेला वाघाने कशी झडप घातली वगैरे संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगितला .तुम्ही कल्पना करून पहा .जर तुमची गुरे अशा पद्धतीने वाघाने पळवून नेली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागात तुम्ही गुरे वळायला याल का ? परंतु इथल्या लोकांचे वन्य श्वापदांसह सहजीवन किती सुंदर आहे याचे हे उदाहरण आहे . वाघाला गुरे पळविण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आधीच मान्य केलेले आहे . वाघ आपल्या दारात येत नसून आपण वाघाच्या घरात फिरत आहोत याची त्यांना जाणीव आहे . त्यामुळे वन खात्याकडे मोबदला मागणी वगैरे असले काहीही त्याने केले नाही व करणारही नाही म्हणाला . कारण वाघाने गुरे पळवून नेली तर त्याचे पुरावे दाखवावे लागतात आणि ते कोण शोधणार आणि कोणाला दाखवणार आणि कसे दाखविणार ? वाघाच्या गुहेत जाऊन असले नसते धंदे करण्यापेक्षा गेलेली गुरे नर्मदार्पणमस्तु म्हणणे या लोकांना सोपे वाटे . परंतु सरकारने यावर विचार करून अशा लोकांना मदत दिली पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते . असो . रामदास बाबांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो . बाबा म्हणाले काळजी करू नकोस फक्त आठवण काढत राहा . गुराखी आणि बाबा चालू लागले . त्यांचा आवाज पुढे बराच काळ मला ऐकू येत होता इतका स्पष्ट जंगलामध्ये घुमत होता . दुपारचे चार वाजले होते आणि मला अजून सुमारे १२ किलोमीटर अंतर कापायचे होते . मध्येच मला सोमनाथ बाबांची कुटी दिसू लागली . मागील प्रकरणांमध्ये त्यांच्याविषयी मी सांगितले आहे . मी त्यांना आवाज दिल्याबरोबर कुटीतून बाहेर आले आणि नर्मदा मैया पार करून मला भेटायला इकडे आले . गेल्या दोन दिवसांमध्ये नऊ अधिक तीन अशा बारा परिक्रमावासींची परिक्रमा एका विशिष्ट ठिकाणी खंडित झाली होती . सोमनाथ बाबा ने मला नेऊन ती जागा दाखविली . मीदेखील समोरच्या तटावर असताना अगदी याच ठिकाणी येऊन माझा गोंधळ उडाला होता परंतु झाडांवर बांधलेल्या चिन्ध्यानी मला योग्य मार्ग दाखविला होता . सध्या सोमनाथ बाबा स्वतः सायकल घेऊन परिक्रमेला निघालेले आहेत असे मला आढळून आले . असो . परस्ते त्याच्या कामाकरिता इथून उत्तर तटावर निघून गेले .जाण्यापूर्वी त्याने मला काही मौलिक सूचना केल्या . परस्ते म्हणाला , " देखो बाबा जी यह बड़ा खतरनाक जंगल है । अभी शाम के चार बजे है । कुछ भी करके तुम इस जंगल को पार नहीं कर पाओगे । यहां हम जहां खड़े हैं वहां से दो ढाई किलोमीटर उत्तर तट पर दमगढ नाम का गांव है । अगर तुम्हें कुछ होता है और तुम चिल्लाते हो तो हमें आवाज सुनाई दे सकती है । लेकिन इसके आगे निकल गए तो ९ -१० किलोमीटर तक कोई गांव नहीं है । इसलिए यही कहीं खुली आसमान देखकर आसन लगाओ । रात भर जलाने के लिए पर्याप्त लकड़ी इकट्ठा करो ।बड़ी आग जलाओ और बैठे रहो । ध्यान रहे आप आग से आजू-बाजू ५ फुट के बाहर नहीं निकलना । बैटरी तो तुम्हारे पास है ही । " आणि एकदम मला आठवले की बॅटरी कुठे आहे तेच मला आठवत नाही आहे . त्याने मला शांतपणे सर्व सामान काढायला सांगितले . त्याच्यासमोर तीन वेळा मी संपूर्ण सामान रिकामे केले आणि पुन्हा भरले परंतु बॅटरी तिथे कुठेच नव्हती . मग मला अचानक आठवले की स्वयंपाक करताना मी ती बॅटरी पेटार्‍यामध्ये टाकली होती . नेमकी ज्या क्षणी तिची मला गरज होती त्याच क्षणी माझ्या स्मरण शक्तीने मला दगा दिला होता . मला वाईट वाटू लागले . परस्ते म्हणाला काळजी करू नकोस . तसाही तुझ्या या बॅटरीचा आमच्या जंगलात काहीच उपयोग नाही . फार वाटले तर एखादे जळते लाकूड हातात घेऊन फिर . इतक्या सूचना करून परस्तेने धावतच नर्मदा पार केली ! आणि माझ्यापुढे उरला जंगलाचा भयानक आवाज ! इतका वेळ अनेकांच्या सहवासात असलेला मी क्षणात एकटा पडलो ! एकट्या माणसासाठी जंगल किती भयानक असू शकते हे अनुभव घेतलेला मनुष्यच सांगेल ! त्यामुळे मी ठरविले की आता समोर दिसणारी नर्मदा माता सोडायचीच नाही ! आणि पुन्हा एकदा भयंकर जंगलातून माझी वाटचाल सुरू झाली . थोड्याच वेळात माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय ठरणारी एक रात्र उगवणार होती ... ती रात्र मी मरेपर्यंत विसरू शकत नाही . . . 

लेखांक तीस समाप्त (क्रमशः )

 लेखांक ३१ : जंगलात मुक्काम आणि अपरात्री आलेला अनुभव

परस्तेने सांगितल्याप्रमाणे मी कुठे मोकळे आकाश दिसते आहे का ते शोधत चालू लागलो . परंतु ते अरण्य इतके घनदाट होते की आकाश दिसतच नव्हते . एव्हाना अंधार पडायला सुरुवात झालेली होती . अरण्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . अखेरीस मला एक जागा सापडली जिथे मुक्काम करावा अशी आतून प्रेरणा झाली . 
अमरकंटकच्या जंगलातील नर्मदा मातेचे संग्रहित चित्र

आत्ता गुगल मॅप वर मी ती जागा शोधून काढली आहे , ती साधारण अशी होती .
चित्रात अंधारी रेषा दिसत आहे ते नर्मदेचे पाच दहा फुटाचे पात्र आहे .
ह्या घोर जंगलातून शक्यतो जाऊ नका असे नर्मदा परिक्रमा विषयक पुस्तके देखील आवर्जून सांगतात .

इथे फार काही मोकळी जागा नव्हती परंतु थोडीशी सपाटी जाणवली . या भागातील झाडी इतकी दाट आहे की तुम्हाला खरोखरच आकाश दिसत नाही .डिस्कवरी चैनल वर येणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये बेअर ग्रील्स हा माजी इंग्लिश सैनिक जसे जंगलात मुक्काम करतो तसे काहीतरी मला करायचे होते . आता मला एखादी तात्पुरती कुटी उभी करायची होती .माझ्याकडे एक दंड होता . तेच माझे एकमेव हत्यार होते . जास्ती आवाज करून देखील चालणार नव्हते . कारण त्यामुळे तिथे मी असल्याची चाहूल वन्य प्राण्यांना लागणार होती . अंधार आता फार वेगाने दाटू लागला . अंधार पूर्णपणे पडायच्या आत मला जळण्यासाठी भरपूर लाकूड गोळा करून ठेवायचे होते . परंतु पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे दोन-तीन दिवसांपूर्वी याच अरण्या  मध्ये जोरदार पाऊस झाला होता . त्या पावसामुळे सर्व लाकडे कुजलेली व भिजलेली होती . एकही लाकूड जळायच्या लायकीचे वाटत नव्हते . इतक्यात मला एक दोन मोठे ओंडके दिसले . मी ते आनंदाने उचलायला गेलो ,तर क्षणात त्या संपूर्ण ओंडक्याची माती होऊन ते खाली पडले ! त्यांना संपूर्णपणे वाळवीने खाऊन पोखरून टाकलेले होते ! 
 प्रातिनिधिक चित्र
सर्व असलीच लाकडे सापडू लागली . आता मात्र मला भीती वाटू लागली .अंधार जवळपास पडलाच होता . तिन्ही सांजा झाल्या होत्या . आणि माझ्याजवळ पुरेसा काय कणभर सुद्धा लाकूड फाटा गोळा झाला नव्हता . शिवाय विजेरी माझ्याकडे नव्हती तो एक वेगळाच ताप . शेवटी मी ठरविले छोट्या छोट्या काड्या काटक्या सुद्धा गोळा करायच्या . काहीही सोडायचे नाही . आणि अशा पद्धतीने त्या काड्या काटक्या मी जिथे जागा ठरली आहे तिथे आणून टाकू लागलो . आग चांगली भडकावी म्हणून वाळलेला पालापाचोळा जो ताजा ताजा आज पडला होता तो देखील गोळा केला . खालचा पालापाचोळा सगळा ओला आणि कुजलेला होता . इतक्यात मला नर्मदेमधून एक मोठा 
ओंडका गडगडत वाहत येताना दिसला . मी धावतच दंड घेऊन गेलो आणि ओढून काठाला लावून तो ताब्यात घेतला .
ओंडका चांगलाच जड होता . आणि वरून ओला असला तरी आतून कोरडा असण्याची शक्यता होती .
 प्रातिनिधिक चित्र
  तो मी ढकलत ढकलतच जागेपर्यंत नेला . अजून काही मनगटा एवढ्या जाडीची लाकडे मला मिळाली . एका झाडाच्या साली खूप पडत होत्या . त्या सालींच्या ढलप्या चांगल्या चार चार पाच पाच फूट लांबीच्या होत्या .त्यादेखील मी गोळा केल्या . 
एकूणच बऱ्यापैकी लाकूडफाटा माझ्याकडे गोळा झाला होता . हे सर्व करेपर्यंत प्रचंड थंडी वाढली होती . माझे हात पाय कुडकुडायला लागले . आता लवकरात लवकर एक तंबू उभा करणे आवश्यक होते . दोन छोटी झाडे पाहून मी त्याला माझी काठी आडवी अडकवली . खाली पालापाचोळ्याचा बिछाना केला . माझ्याकडे दोन शाली आणि दोन छाट्या ( पांढर्‍या लुंग्या) इतकीच वस्त्रे होती आणि ती निश्चितपणे असल्या थंडीमध्ये पुरणार नव्हती . शिवाय अशा ठिकाणी पहाटे खूप दव पडते हे मला माहिती होते . त्यामुळे मी एक छाटी पालापाचोळ्यावर चादरी सारखी आंथरली . आणि दुसरी मोठी शाल होती .ती काठीवर दोन्ही बाजूंनी टाकून तिचा तंबू केला . त्याच्यावर भरपूर पालापाचोळा टाकला . 
 माझी कुटी साधारण अशी तयार झाली . शेकोटी अजून तोंडाजवळ होती .( प्रातिनिधिक चित्र )

माझ्याकडे असलेल्या शाली मी वाटत वाटत आलो होतो . आता कदाचित त्या कामाला आल्या असत्या असे मला वाटू लागले . आता माझ्याकडे फक्त पांघरायला एक शाल होती . डोक्याला थंडी वाजू नये म्हणून पंचा गुंडाळला होता . शेकोटी लवकरात लवकर पेटवणे आवश्यक होते . कारण आता पूर्ण अंधार पडला होता . माझ्या पूजेच्या साहित्यातली काडेपेटी मी काढली . त्याच्यामध्ये मोजून अठरा काड्या होत्या . काडेपेटीच्या एका एका काडीची किंमत मला त्या रात्री कळाली . पालापाचोळा व काड्या ओलसर असल्यामुळे पेटच घेत नव्हत्या. विझलेल्या काड्या सुद्धा मी जपून ठेवत होतो . अखेरीस एका काडीवर वाढलेले शेवाळे मला सापडले . ते चटकन पेट घेत होते .
 प्रातिनिधिक चित्र
 त्याचा वापर करून मी काही बारक्या काड्या काटक्या पेटवल्या . ती ऊब वापरून पालापाचोळा धुमसवला . आणि मग मध्यम आकाराच्या लाकडांनी हळूहळू धग धरायला सुरुवात केली ! माझ्या जिवात जीव आला . मोठा ओंडका मी समोरच ठेवला होता . त्याला लागून ही छोटीशी शेकोटी पेटवली होती ज्यायोगे तिची उष्णता लागून ओंडका देखील प्रज्वलित व्हावा . समोरच्या तटावर याच भागात राजाराम म्हाताऱ्याने मला हे तंत्र शिकवले होते .ते इतक्या लवकर वापरावे लागेल असे वाटले नव्हते . 
 प्रातिनिधिक चित्र
थंडी इतकी जबरदस्त पडली होती की पुढून पोटाला शेक बसेपर्यंत मागे पाठीचा बर्फ होत होता . माझी ती छोटीशी झोपडी एका बाजूने झोळी लावून मी बंद करून टाकली होती . त्याच बाजूला सारे अरण्य होते . आणि माझ्यासमोर साधारण पंचवीस फुटावर नर्मदा मैया वाहत होती . तिचा आवाज तेवढा माझ्या कानावर पडत होता .

मी ज्या पद्धतीने मुक्काम केला होता त्याच्या अगदी जवळ जाणारे हे चित्र मला इंटरनेटवर सापडले .फक्त जंगल थोडे अधिक घनदाट होते

 शेकोटीतील लाकडे सुद्धा एका बाजूने जळत होती तर दुसऱ्या बाजूने गार पडली होती . आग आणि थंडी यामध्ये थंडीचा विजय लवकर होत होता . ती शेकोटी इतकी हलकी पेटली होती की अखंड डोळ्यात तेल घालून तिच्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक होते . जरा मला डोळा लागला तर ती विझून जाण्याची शक्यता होती . मी मनोमन प्रार्थना करत होतो की वरूण देवा आजचा दिवस थोडी विश्रांती घे !  त्या शेकोटीवर मी ओली लाकडे वाळायला ठेवीत होतो . 
 प्रातिनिधीक चित्र
पंचमहाभूतांच्या सामर्थ्याची यथार्थ कल्पना यावयाची असेल तर परिक्रमा केलीच पाहिजे ! आता हळूहळू अरण्या मधले आवाज वाढू लागले . मी असा विचार केला की आता थोडे आडवे पडावे . परंतु झोपल्या झोपल्या माझ्या असे लक्षात आले की प्रचंड थंडी झोपडीला व्यापून उरलेली आहे ! आणि मी फक्त आणि फक्त शेकोटीपासून फूट दीड फुटापर्यंत झोपू शकतो . त्याच्या मागे गेलो की थंडीने माझा बर्फ होणार ! इतकी थंडी मी आयुष्यात कधी अनुभवली नव्हती . पुन्हा उठून बसलो ,आणि नित्य उपासना उरकून घ्यायची ठरवली ! मग माझ्या लक्षात आले की फार काही झाले तर तुपातील वाती थोड्याफार आहेत . किंवा थोडेसे तेल देखील माझ्याजवळ होते . परंतु याचा वापर अगदी कठीण काळ आला तरच करायचा असे मी ठरविले . समोरच वाहणाऱ्या नर्मदा मातेची मी भावपूर्ण आरती केली . शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणताना भीतिहारी या शब्दातील भीतीचा अर्थ आज मला पहिल्यांदा कळत होता . आणि नर्मदा मैया निश्चितपणे त्या भीतीचे हरण करत होती . जंगलातून श्वापदे पळाल्याचे वगैरे आवाज येत होते . वटवाघळे पंखांचा मोठा आवाज करत उडत होती . सर्व अर्थात सरपटणारे प्राणी यांच्यासाठी तर रात्र म्हणजे नंदनवन ! विशेषतः मण्यारी सारखे काही विषारी साप रात्रीच बाहेर पडतात . परंतु इथे हे सर्व धोके किरकोळ होते . इथे एक मोठे जनावर बाहेर पडलेले आहे हे मी गेले दोन-तीन दिवस ऐकत होतो ! आणि त्याचे प्रताप देखील कानावर पडत होते . वाघ किती भीतीदायक असू शकतो याचा अनुभव मी लहानपणी पेशवे उद्यानात घेतला होता . तिथला एक वाघ एकदा माझ्या दिशेने जोरात पळत आला . खरे तर माझ्या मागे उभे असलेल्या एका शिपायावर त्याचा राग होता परंतु त्या दोघांच्या मध्ये मी उभा असल्यामुळे तो माझ्या दिशेने येतो आहे असे मला वाटले आणि क्षणात माझ्या पायातील बळ गेले आणि मी बसकण मारून खाली बसलो . मध्ये जाळी आहे हे माहिती असताना वाघाची जर इतकी भीती वाटत असेल तर खुल्या जंगलात काय होईल विचार करून पहा ! त्यात परस्तेने मला कल्पना दिली होती की जरी वाघ जवळ आला तरी कुठलीही हालचाल न करता त्याच्याकडे पाहत रहा , तो तुला काही करणार नाही . त्याचे पोट गाई खाऊन भरलेले आहे . तो फक्त तुला पाहत निघून जाईल ! हे असले सल्ले आठवत होते आणि त्यात माझ्याकडे बॅटरी देखील नव्हती . बॅटरी वरून मला तो प्रसंग पुन्हा आठवला . रामदास बाबांची ती खोली रामदास बाबांच्या त्या गप्पा मला आठवू लागल्या . रामदास बाबा आता काय करत असतील असा विचार मी करू लागलो . ते मला म्हणाले होते की माझी आठवण काढली की मला कळते ! म्हणजे कदाचित रामदास बाबांना आता माझी आठवण येत असेल या विचाराने मी सुखावलो . मनोमन मी त्यांना सांगितले की बाबा माझी बॅटरी तुमच्या पेटार्‍यामध्ये विसरलेली आहे . वेळ मिळेल तेव्हा कोणाकडून तरी ती काढून घ्या आणि वापरून टाका . चांगली एव्हरेडी कंपनीची आहे बरं ! 
ती बॅटरी ठेवण्यासाठी मी दप्तराचा बाहेरचा बाटली ठेवण्याचा कप्पा वापरत असे . त्यातून ती सहजपणे काढता घालता येत असे . आणि अंधारात फार चाचपडावे लागत नसे . मी हा सर्व विचार करीत असताना एक अतिशय मोठे जनावर धप धप धप धप असा आवाज करत माझ्या दिशेने पळत येत आहे असा आवाज मला येऊ लागला ! माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले ! आता ह्या कोणत्या संकट टाकलेस माई ? नर्मदे हर !
माझी प्रतीक्षिप्त क्रिया झाली आणि मागे वळून मी बॅगेतील बॅटरीच्या कप्प्यात हात घालून बॅटरी बाहेर काढली आणि मैया ! असे ओरडलो ! बॅटरीच्या प्रकाश झोतामध्ये पाहिले तर काहीच दिसत नव्हते ! शेकोटीपासून उठून बाजूला जाऊन मी चारी बाजूला बॅटरी मारून पाहिले . काहीच दिसत नव्हते . इतक्यात माझ्या लक्षात आले की माझ्या हातामध्ये बॅटरी कशी काय बरे आली ? कारण काही वेळापूर्वी प्रेम सिंग परस्ते समोर मी तीन वेळा संपूर्ण सामान तपासले होते त्यात ती नव्हती ! आणि मला खात्री होती की ती रामदास बाबांच्या इथेच मी पेटार्‍यामध्ये विसरलो होतो . बरं तिथे मी ती चालू ठेवली होती . त्यामुळे तिचे सेल संपणे क्रमप्राप्त होते . ही विजेरी मात्र अतिशय तेजस्वी आणि लख्ख उजेड देणारी झाली होती ! मी पुन्हा निरीक्षण करून पाहिले तर ती माझीच विजेरी होती कारण तिला मी गुंडाळलेला सेलोटेप तसाच होता ! मैयाचा जयजयकार करणे याच्या पलीकडे माझ्या हातात काहीही नव्हते ! मी तिथे उभे राहून मैयाचा आणि रामदास बाबांचा मोठ्या आवाजात जयजयकार केला ! त्या एका छोट्याशा गोष्टीमुळे मला फार मोठी शक्ती प्राप्त झाल्यासारखे वाटले . आता मला साधारण वीस फूट आजूबाजूला काय काय चालू आहे हे स्पष्ट दिसत होते . त्यापूर्वी शेकोटीच्या उजेडात चार फुटा पलीकडे काहीही दिसत नव्हते . मुख्य म्हणजे या विजेरीचा उजेड नर्मदेच्या पाण्यापर्यंत जात होता . मी जागाच मुळी अशी निवडली होती की जिथून नर्मदेमध्ये आणि माझ्या मध्ये एका शेकोटी खेरीज काहीही नव्हते . राहून राहून मला बॅटरीच्या या चमत्काराचे आश्चर्य वाटत होते . हा चमत्कारच आहे हे पुढे सिद्ध झाले . कारण तिथून पुढे संपूर्ण परिक्रमा संपेपर्यंत ती विजेरी माझ्यासोबत होती .परंतु एकदाही त्याच्यामध्ये मला नवीन बॅटरी सेल घालावे लागले नाहीत . आणि परिक्रमा संपायच्या शेवटच्या दिवशी ती माझ्या हातातून जी गायब झाली ती पुन्हा कधीच सापडली नाही . संपूर्ण परिक्रमे मध्ये मात्र मी तिचा पुरेपूर वापर करून घेतला . रामदास बाबांच्या इथे मला अशा तऱ्हेने खूप चमत्कारिक अनुभव आले . आता माझी पूजा अर्चा देखील आटोपली होती आणि झोपायची तयारी करणे क्रमप्राप्त होते . परंतु प्रचंड थंडीमुळे झोपच येत नव्हती . त्यात माझ्या पोटामध्ये हळूहळू कावळे ओरडायला लागले . परिक्रमावासी सोबत शक्यतो थोडेफार खाणे पिणे ठेवत असतात . परंतु माझ्याकडे बिस्किटचा एक पुडा सुद्धा नव्हता किंवा खडीसाखर नव्हती किंवा शेंगदाणे नव्हते किंवा गूळ नव्हता , काहीच नव्हते . सुमारे तासभर मी भुकेने असा तळमळत होतो . भूक लागली आहे असा विचार आला की मी माझे मन दुसऱ्या कुठल्यातरी विचारावर न्यायचो . रामदास बाबा कसे आपल्याला भेटले वगैरे प्रसंग आठवायचो . परंतु माझ्या विचारांमध्ये आलेला प्रत्येक महात्मा हातामध्ये काहीतरी घेऊन मला वाढायला येतो आहे असाच भास व्हायचा ! त्यादिवशी कष्ट पण थोडे जास्त झाले होते . आधीच्या दोन दिवसांचा थकवा भरीला होताच . भूक किती बेकार असू शकते याचा अनुभव त्या दिवशी मी घेतला . यापूर्वी पुणे ते सज्जनगड पायी जाताना बामणोली ते सज्जनगड च्या जंगलामध्ये मी हा अनुभव घेतला होता . परंतु तिथे खाण्यासाठी गवत होते . ते खात खात मी दोन दिवस काढले होते . इथे मात्र खाता येण्यासारखे काहीच नव्हते . अखेरीस मी वाळलेल्या लाकडांच्या साली काढून खाऊ लागलो . मनात विचार आला की फुलवातीमधील तूप खाऊन टाकावे . परंतु हे अतिशय चुकीचे ठरले असते म्हणून तो विचार बारगळला . असे भुकेवर चिंतन करता करता एक दीड तास निघून गेला असेल . मी लहान बाळासारखा रडू लागलो . भुकेने व्याकुळ होऊन मी नर्मदा मातेला आर्त स्वरात हाका मारू लागलो .रात्रीचे सुमारे दहा-साडेदहा वाजले असावेत असा माझा अंदाज होता . अचानक मला समोर नर्मदेच्या पात्रामध्ये कोणीतरी चालते आहे असा आवाज आला . घाबरून मी पटकन माझी बॅटरी ची शलाका तिकडे टाकली . " कौन ? " मी ओरडलो . साधारण २०- २२ वर्षाचा एक तरुण मुलगा डोक्यावरती काहीतरी घेऊन येतो आहे असे मला दिसले . तो कमरे एवढ्या पाण्यातून चालत येत होता . पाणी बर्फासारखे गार होते . हळूहळू तो माझ्या शेकोटी समोर येऊन उभा राहिला . "नर्मदे हर " मी म्हणालो . तो मुलगा खाली बसला आणि त्याने डोक्यावरील पाटी खाली ठेवली . त्याने वरचे झाकण काढताच खालच्या ताटात ठेवलेल्या गरमागरम भोजनातून वाफा येऊ लागल्या ! "भोजन पाइये " तो मला म्हणाला . माझ्या आनंदाला पारावर उरला नाही !
एका मोठ्या थाळ्यामध्ये गरमागरम आमटी भात , पोळी भाजी , कोशिंबीर ,पापड असे सर्व पदार्थ असलेले साग्र संगीत भोजन तो घेऊन आला होता ! मी क्षणाचा ही विलंब न लावता ते ताट हातात घेतले आणि या स्वामी जेवायला म्हणत बकाबका घास भरायला सुरुवात केली . मला भूक लागलेली असल्यामुळे ताट पटापटा रिकामे होऊ लागले . त्या ताटातील सर्वच पदार्थ अप्रतिम असे होते . कुठला एक पदार्थ चांगला आहे असे सांगताच येणार नाही इतके सर्व पदार्थ सर्वोत्कृष्ट होते . आमटी तर इतकी गरम होती की चटके बसत होते ! पोळीवर तुपाची धार होती . इतक्या मऊसूत पोळ्या मी आयुष्यात पुन्हा कधी खाल्ल्या नाहीत . भाजी सुद्धा तेलकट किंवा तिखट अजिबात नव्हती ! काय ते भोजन !आहाहा !
अरे बापरे परंतु हे सर्व माझे सुरू असेपर्यंत समोरचा मुलगा काय करतो आहे इकडे माझे लक्षच गेले नाही .
तो बिचारा शेकोटीच्या समोर उभा राहिला होता . पोटात थोडेसे अन्न गेल्यावर मला ज्ञान सुचू लागले . मी त्याला म्हणालो " बैठो ना । नीचे बैठो । "  तो म्हणाला , "मैं ठीक हूं । " मी त्याला  विचारले " आप तो पूरे गीले हो गए हो ।आपको बदन पोंछने के लिए तौलिया गमछा वगैरा दूं क्या ? " तो म्हणाला , "नहीं उसका कोई फायदा नहीं । मुझे वापस पानी में ही जाना है । " "लेकिन आपको पता कैसे चला कि मैं यहां पर हूं ?" "यहां सामने दमगढ़ नाम का गांव है ।वहां मैं रहता हूं । आपने आगी जलाई उसका धुंआ मुझे दिखा । मैंने सोचा कोई परिक्रमा वासी होगा । उसके लिए खाना ले चलते हैं । "
माझे इकडे उदरभरण चालूच होते . "वा भाई वाह ! बहुत मजा आया । तुम्हें जितने धन्यवाद दूँ कम है । वैसे नाम क्या है तुम्हारा ? " मी विचारले
" नर्मद ... नर्मद सिंग नाम है मेरा । "
"अरे वाह ! धन्य है तुम्हारे माता-पिता जिन्होंने इतना सुंदर नाम आपको रखा ! " माझ्या या वाक्यावर तो फक्त गालातल्या गालात हसला . एव्हाना माझे भोजन झाले होते . ते ताट मी चाटून पुसून स्वच्छ केले . मी म्हणालो, " रुकीये आप को थाली धो के देते हैं । " "नहीं हम स्वयं कर लेंगे । आप अभी निश्चिंत सो जाइए । कोई कुछ नहीं करेगा । सुबह उठते ही ऐसे ही किनारे किनारे पगडंडी से आगे चले जाना । रास्ते में रुकिएगा नहीं जबतक रामघाट ना आजाए। चलते है । " मी त्या युवकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो . एक क्षणभर माझ्या मनामध्ये विचार आला की मी किती कृतघ्न आहे त्याला बस देखील म्हणालो नाही , अंग पुसण्यासाठी पंचा दिला नाही ,थाळी देखील धुवून परत दिली नाही , आता किमान तो निघाला आहे तर त्याला मला सापडलेल्या विजेरीचा उजेड तरी दाखवावा . असा विचार करून मी मागे वळलो आणि दप्तरातील माझी बॅटरी काढून त्याच्या दिशेला धावलो . "अरे नर्मद रुको । हम तुमको रास्ता दिखाते हैं । " असे म्हणत मी विजेरीचा झोत चालू केला . पाहतो तो समोर कोणीच नव्हते . मला वाटले तो आजूबाजूला कुठेतरी गेला असेल . म्हणून मी चहू बाजूंना प्रकाशझोत मारू लागलो . परंतु कोठेच हालचाल नाही. समोरच्या किनाऱ्यापर्यंत माझा प्रकाश झोत जात होता .तोही रिकामा ... "नर्मद ?? ओय नर्मद ? ?? " " नर्मद ओय ! "  " नर्मदे !" आणि एकदम लखकन् माझ्या डोक्यात प्रकाश पडला . "मुझे वापस पानी मे ही जाना है ... " नर्मदा सिंगचे ते शब्द कानात घुमू लागले . बघता बघता मी शेकोटी पासून फार दूर आलो होतो . सोबत कोणीतरी असल्यामुळे माझे धाडस वाढले होते आणि त्यामुळे मी माझी शेकोटीपासून पाच फुटाची मर्यादा ओलांडली होती . मी धावत धावत पुन्हा शेकोटी पाशी गेलो . खाली बसलो . तृप्तीचा ढेकर आला .पोट गच्च भरले होते . शेकोटी नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी भासत होती . जंगलातील वारा जणू काही ते जंगल हसते आहे असे सुचवत होता . समोरून खळखळखळ वाहणारी नर्मदा माता जणु मला सांगत होती , " खुशाल झोपी जा बाळा ! मी आहे तोवर तुला कुठलेच भय नाही ! " साश्रु नयनांनी तिला झोपडीतूनच साष्टांग नमस्कार घातला . आणि त्याच क्षणी त्याच स्थितीत प्रगाढ निद्रेच्या आधीन झालो . . .

लेखांक एकतीस समाप्त ( क्रमशः )

 लेखांक ३२ : रामघाटावरची हाडे गोठवणारी थंडी

कडाक्याच्या थंडीमुळे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सकाळी डोळे उघडले तर मी अजूनही साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेतच होतो . समोरची शेकोटी पूर्णपणे विझून गेली होती . काल मी नर्मदेतून आणलेला भला मोठा ओंडका पूर्णपणे भस्मसात झाला होता .मी चटकन उठून कुटीच्या बाहेर आलो . त्या झोपड्यातून माझा दंड तेवढा सोडवून घेतला . आणि बाकीची कुटी तशाच अवस्थेत ठेवून झोळी उचलली . मागून कोणी गावकरी किंवा परिक्रमावासी आले तर त्यांना इथे कोणीतरी राहून गेले होते हे कळावे हाच हेतू .  
 प्रातिनिधक चित्र

सकाळचे सहा वाजले असावेत . अंधुक अंधुक दिसू लागले होते . सर्वत्र घनदाट धुके पसरले होते . थंडी हाडांपर्यंत शिरत होती . मला रामघाट गाठण्यासाठी अजून किमान १२ किलोमीटर चालायचे होते . आणि अजूनही मी वनराजाच्या अर्थात वाघाच्या टप्प्यामध्येच होतो . त्यामुळे मी नर्मदा मातेला वंदन केले आणि ताबडतोब तिथून धूम ठोकली . रात्री पोटभर जेवल्यामुळे आता पायांना चांगली गती आली होती . मुख्य म्हणजे रोज सकाळी जाणवते तशी शौच विसर्जनाची गतीच पोटाला जाणवत नव्हती . इतके पोटभर जेवून देखील पोट अगदी हलके हलके वाटत होते . नर्मद सिंगने रात्री सांगितले त्याप्रमाणे समोर एक पायवाट दिसत होती . ती पकडून मी अक्षरशः धावायला सुरुवात केली . नर्मदा पुन्हा हळूहळू लांब निघून गेली परंतु पायवाट सोडायची नसल्यामुळे सरळ रेषेत चालत राहिलो . झपाझप पावले टाकत जाताना शेवटी व्हायचे तेच झाले . एक रुंदसर ओढा ओलांडताना मूळ रस्ता सुटला आणि सुमारे दोन तास त्या घनदाट जंगलामध्ये बेकार भटकलो . गेले दोन दिवस अशा पद्धतीने जंगलामध्ये भटकण्याचा माझा चांगला सराव झाला होता त्यामुळे यावेळी फार काही भीती वाटली नाही . सर्वत्र दाट झाडी आणि भरपूर पालापाचोळा होता . या संपूर्ण कालावधी मध्ये मी चार ते पाच मोठे ओढे पार केले . यातील काही ओढे तर अत्यंत खोल होते . मी असा विचार केला की यातीलच एखादा नाला पकडावा आणि नर्मदा मातेचे पात्र गाठावे . असा विचार करून चालत असताना समोर एक मोठा औरस चौरस ओढा आडवा आला . हा चांगला वीस-बावीस फूट खोल खड्ड्यातून वाहत होता . मी त्याच्या काठावर उभा राहून विचार करू लागलो की आता याला पार कसे करायचे ? इतक्यात मला काही कळायच्या आत सर्व जंगल हलते आहे असा भास झाला ! आणि माझ्या पायाखालची वाळूयुक्त जमीन सरकून , तुटून मी थेट त्या ओढ्याच्या पात्रामध्ये अलगदपणे पडलो !  ते भूस्खलन खरोखरीच सुखदायक होते ! पुन्हा वर जावे आणि पुन्हा तसेच खाली पडावे असा एक मजेशीर विचार डोक्यात येऊन गेला ! परंतु प्रयत्नपूर्वक सुद्धा वरती जाता येणे आता शक्य नव्हते . कारण दोन्ही बाजूला वाळूच वाळू होती .वाळूच्या त्या उभ्या भिंती पहात पहात मी ओढ्यातूनच चालायला सुरुवात केली . मध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले होते . त्यातील एका खोडावर चढून मी वरती जायचा प्रयत्न केला परंतु प्रचंड कडकडून चावा घेणाऱ्या मोठ्या डोंगरी मुंग्यांनी ते झाड भरलेले आहे असे पाहिल्यावर पुन्हा ओढ्यात उडी मारली . आता हा ओढा सोडायचा नाही असा विचार करून मी त्या पत्रातून चालत राहिलो . त्याचे पाणी कधी घोटाभर ,  कधी गुडघाभर तर कधी कमरे एवढे होत होते . त्या ओढ्याने दोन्ही बाजूला केलेला विध्वंस बघता पावसाळ्यामध्ये हा किती भरून वाहत असेल याचा मी अंदाज लावला . पावसाळ्यामध्ये हा ओढा ओलांडणे सोडा त्याच्या जवळपास उभे राहणे देखील अशक्य होत असेल . ओढ्यातूनन चालता चालता अचानक मला समोर ओळखीचा तो रंग दिसू लागला ! रेवारंग ! नर्मदा मातेच्या पाण्याचा तो रंग पाहता क्षणी खूप आनंद झाला ! अशा पद्धतीने त्या ओढ्याने मला सुखरूप नर्मदेच्या पात्रात आणून सोडले . काल मुक्काम केला तिथे पाच दहा फूट लांबीची असलेली नर्मदा इथे मात्र चांगली तीस-पस्तीस फूट रुंदी ने वाहत होती वाहात होती . मध्ये तिला येऊन मिळणारे ओढे नाले तिची जलसंपदा वाढवीत होते . आता पुन्हा मी किनारा पकडला . इथे अजूनही घनदाट जंगल असल्यामुळे काठाने चालता येणे कठीणच नव्हे तर अशक्यच होते .मी नर्मदा मातेकडे पहात हतबल उभा राहीलो आणि मनोमन प्रार्थना केली की माते मला मार्ग दाखव .  इतक्यात एक छोटीशी गुरांची पायवाट मला  सापडली . याच वाटेने वरती जंगलामध्ये चालणारी गुरे खाली पाणी प्यायला येत असणार असा अंदाज बांधत मी त्या वाटेने वरती उलटे चालायला सुरुवात केली . आणि पाचच मिनिटांमध्ये मी त्या मोठ्या पायवाटेला पुन्हा येऊन मिळालो . नर्मदा माता अशा पद्धतीने पदोपदी आपल्याला अंतःप्रेरणेच्या रुपाने मार्गदर्शन करत असते .इथून वेगाने चालत असताना अचानक जंगल विरळ होते आहे असे मला जाणवले . आजूबाजूला तोडलेली लाकडे वगैरे दिसू लागली .थोड्यावेळाने तर उजव्या हाताला मोठे तार कुंपण लागले . आणि समोरून एक डांबरी रस्ता आडवा गेला होता व त्याच्या पलीकडे शेती चालू होत होती .
मी वरती वर्णन केलेला मार्ग या नकाशा मध्ये पहावा . उजवीकडून वाहते आहे ती नर्मदा नदी आहे . डावीकडे पिवळ्या बाणाने दर्शविलेला पायवाटेचा मार्ग आहे आणि मी भटकलेला मार्ग हिरव्या रंगाने दाखवलेला आहे .वरच्या डावीकडच्या टोकाला डांबरी रस्ता राखाडी रंगात दिसत आहे .
 आजूबाजूला कोणीच नव्हते . इतक्यात शेतामधून कोणीतरी मला हात करते आहे असे दिसले .नर्मदे हर असा पुकारा करत मी त्या माणसाच्या दिशेने धावलो .आता आपल्याला वाघाचे काहीही भय नाही या विचाराने मन सुखावले ! तो शेतकरी माझ्याकडे पाहून अतिशय आश्चर्यचकित झाला आहे असे माझ्या लक्षात आले . इतक्यात आजूबाजूच्या चार-पाच शेतामध्ये काम करणारे सर्वच शेतकरी हळूहळू तिथे गोळा झाले . "नर्मदे हर बाबाजी ! " एक जण म्हणाला . "आप यहां से कहां से आए भगवन् ? " " अमरकंटक से आया प्रभु । "
"हां । वह तो हम जान गए , कि आप अमरकंटक से ही आए होंगे । लेकिन यहां से कैसे आए ? " "मैं कुछ समझा नहीं । " मी म्हणालो . "मतलब अमरकंटक से अगर सुबह निकलते हैं तो हमारे पकरीसोढा गांव में पहुंचते पहुंचते अंधेरा हो जाता है । आप तो सुबह १० - ११ बजे ही पहुंच गए ।यानी आप अमरकंटक से नहीं आए । " शेतकरी म्हणाला . मला त्याचा मुद्दा लक्षात आला . मी म्हणालो , " वैसे तो आप सही बोल रहे हैं । हम अमरकंटक से परसो ही निकले थे । " "अरे बाप रे ! तो रास्ते मे आपने मुकाम कहां कहां पर किया ? " एक शेतकरी चिंतातूर चेहऱ्याने विचारू लागला . "कल मैं रामदास बाबा के इधर रुका था । उसके बाद ...उसके बादमें जंगल में ही रुका रहा और सुबह उठकर चला आया । " " बाप रे ! क्यों मैया को परेशान करते हो बाबा जी ? " चिडून एक जण म्हणाला .
 " मतलब ? "
"अरे मतलब क्या मतलब? आप परिकम्मावासी ऐसे कांड करते हो और मैया को चौकन्ना रहना पड़ता है रात भर । और खाने-पीने का क्या इंतजाम किया था ? "
मी म्हणालो , " खाना ? वह तो रात को १० बजे के करीब दमगढ़ से एक आदमी ले आया था । एकदम गरमागरम ! " माझा चेहरा आनंदाने फुलाला होता .
आता मात्र सर्व शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले . त्यातला एक वयस्कर शेतकरी म्हणाला , " देखिए बाबा जी हमारी उम्र बीत गई इस जंगल में । आप जिस रास्ते से आए वहां से दमगढ़ तकरीबन दो ढाई किलोमीटर दूर है । वह भी सामने के तट पर । और हमारे यहां जब जंगल में कोई बडा जानवर ( वाघ ) निकलता है तो शाम को ४ बजे के बाद कोई भी घर से बाहर नहीं निकलता । पेशाब टट्टी के लिए तक बाहर कोई नहीं निकलता । और आप बोल रहे हैं की रात को १० बजे , वह भी ढाई किलोमीटर दूर दमगढ़ से कोई आपके लिए ,उस तटसे इस तटपर ,गरमा गरम खाना ले आया था , तो वह केवल असंभव है । " 
"नर्मदा मैया की कसम बाबा ,सच में वह आया था । " "इसीलिए तो हम कह रहे थे क्यों मैया को परेशान करते हो ! अब आइंदा ऐसी हरकत मत करना । " "ठीक है बाबा ।हमें माफ करना । " पडेल स्वरामध्ये मी त्या सर्वांची क्षमा मागितली . "पहिली परिक्रमा है क्या ? " एकाने विचारले .  मी होकारार्थी मान हलवली .  " तो फिर इतना खतरनाक आयडिया आपके दिमाग मे आया कैसे ? इस जंगल रास्ते से तो जादा तर नागा साधू निकलते है । " मी म्हणालो , " देखो भैय्या ,जब से हमने परिक्रमा उठाई है हमने खुद का दिमाग लगाना बंद कर दिया है ।  हम कल सुबह जल्दी निकलने वाले थे ।लेकिन रामदास बाबा ने हमें रोक के रखा । और दोपहर को ३ बजे के करीब बोला कि अब आगे चले जाना । " "ऐसा ! तो फिर बहुत अच्छे ! अगर रामदास बाबा ने बोला है तो वही करना है ! वैसे उनकी तबीयत कैसी है ? चल फिर पा रहे है के नही ?" "अच्छा खासा चल लेते हैं । कल हमें छोड़ने के लिए एखाद दूई किलोमीटर आगे आए थे । " मी म्हणालो . रामदास बाबा स्वतः दोन किलोमीटर चालत आले हे ऐकल्यावर त्या सर्वांनाच खूप आनंद झाला ! या आनंदवार्तेने तिथले तंग वातावरण एकदम बदलूनच गेले .आणि सर्वांनी मोठ्या आनंदाने मला निरोप दिला . जाताना पुन्हा एकदा मी काठानेच चालणार आहे हा माझा निश्चय ऐकल्यावर त्यांनी मला काठा काठाने जाण्याचा मार्ग देखील सांगितला . नर्मदा खंडातील लोक खरोखरीच खूप चांगले आहेत . पकरी सोंढा गावामध्ये बेलघाट नावाचा छोटासा घाट आहे तो पाहून मैयाच्या काठाकाठाने पुढे निघालो . पूर्ण वेळ नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालत होतो . हा एक अतिशय विलक्षण आणि अद्भुत अनुभव होता . काल जंगलाला बाजूला सारत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पाहणारी बाल नर्मदा आता एखाद्या जाणकार दशवर्षीय मुलीप्रमाणे भासत होती . अजूनही डोंगर चढ-उतार असा प्रदेश असल्यामुळे नर्मदा माता प्रचंड वळणे वळणे घेत वाहात होती . तिला मध्येच येऊन मिळणारे ओढ़े नाले देखील असंख्य होते . या सर्वच जलप्रवाहातील पाणी इतके स्वच्छ व शुद्ध होते की ते निःशंकपणे कोणीही कितीही प्यावे . नर्मदेचे पात्र पूर्णपणे निर्मनुष्य होते . फक्त ती आणि मी ! किनाऱ्यावर वाळू खडक चढ-उतार असे सर्व मिश्रण होते . तिथे मानवी वावर असेल असे सुचविणारी एकही खूण दिसत नव्हती . आजूबाजूला अजूनही झाडी होतीच फक्त आता ती विरळ झालेली होती . इतक्यात मला समोर ओळखीची जागा दिसू लागली ! पाहिल्यावर लक्षात आले की हा तर निळकंठ आश्रम आहे ! इथे पात्र इतके छोटे झाले होते की पलीकडे दोन उड्या मध्ये जाता यावे . मी या तटावरून गौतम गिरी बाबांना आवाज देऊ लागलो . आतून एक दुसरा तरुण साधू पळत बाहेर आला आणि त्याने मला गौतम गिरी बाबा गावाला गेले असल्याचे सांगितले . त्यादिवशी निळकंठ आश्रमातून निघताना मी सुरक्षित जाईन का नाही याची काळजी गौतमगिरी बाबांना वाटत होती असे मला लक्षात आले होते आणि नेमका त्याच संध्याकाळी भयंकर पाऊस देखील मला लागला होता . त्यामुळे मी सुखरूप पुढे गेलो आणि पुढे परिक्रमेला मार्गस्थ देखील झालो हे त्यांना कळविणे आवश्यक होते .तसा निरोप त्या साधू जवळ दिला आणि पुढे निघालो . दोन दिवस अतिशय कठीण जंगलातून केलेल्या प्रवास डोक्यात ताजा होता त्यामुळे की काय परंतु हा नर्मदा मातेचा टापू मला अतिशय म्हणजे अतिशय आवडला ! इथे नर्मदा मातेचे स्वच्छ शुद्ध निखळ नितळ स्फटिका सारखे पाणी इतक्या सुंदर आणि विविध रूपांमध्ये वाहत होते की त्याचे वर्णन करण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे अधिक आनंददायी ठरावे ! इथे नदीकाठी अतिशय विरळ गावे आहेत . जी काही गावे आहेत ती नुसती नावाला गाव म्हणण्यासारखी आहेत . ना इथे रस्ते ,ना इथे पक्की घरे ,ना इथे दुकाने वगैरे . काहीही नाही . काठाने चालण्याचा मार्ग आहे एवढे मात्र खरे . नर्मदा मातेच्या काठाने चालण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही असे लोक कसे काय सांगतात हा मला अजूनही पडलेला अनुत्तरित प्रश्न आहे . असो . नर्मदा टोला नावाचे गाव लागले . गाव कसले ४ -२ घरांची वस्तीच . इथला किनारा सोडलाच नाही आणि पुढे खाटी या गावातील बेलघाट म्हणून जो प्रसिद्ध घाट आहे त्याचे समोरील तटावर दर्शन घेतले . हे करेपर्यंत मध्यान्ह उजाडली होती . पोटामध्ये कावळे ओरडू लागले होते . हा सर्व प्रांत किती सुंदर आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या भागाचा एक नकाशा आपल्या माहितीकरता जोडत आहे . 
नर्मदे काठची विरळ झाडी आणि त्यातून वाहणारी वाहणारी निर्मनुष्य नर्मदा बाला
यातील डाव्या बाजूच्या तटाने मी चालत होतो . इथे एका टेकाडावर छोटीशी कुटीया दिसली . राजेंद्र गिरी नावाचा एक तरुण साधू इथे रहात होता . तो जुना आखाड्याचा होता . त्याने मला एका झाडाच्या सावलीमध्ये बसायला आसन लावले . त्याच्या या छोटेखानी आश्रमाच्या समोर चार-पाच लोक शेकोटी करून उन्हामध्ये शेकत बसले होते . होय भर दुपारी हे लोक शेकोटी करून बसले होते कारण थंडीच तशी पडलेली होती . मी देखील माझे आसन उन्हामध्ये आणून ठेवले आणि बसलो .मगच बरे वाटू लागले . अंगावरचे वस्त्र घामाने भिजले होते ते काढून मी एका दोरीवर वाळत टाकले . कारण त्याची देखील थंडी वाजू लागली होती . या भागामध्ये मी ज्या प्रकारच्या थंडीचा अनुभव घेतला तशी थंडी आपल्या महाराष्ट्रामध्ये फारशी पडत नाही . साधू कुटीमध्ये छान गोमातेची सेवा देखील करत होता . त्याच्या कुटीकडे येण्यासाठी एक छोटीशी पायवाट होती . आणि त्या पठारावरून वाहत येणाऱ्या पाण्याला छोट्याशा झऱ्याचे स्वरूप देऊन त्याने त्या वाटेमध्ये सुंदर पाणी पिण्याचे स्थान तयार केले होते . साधू स्वयंपाकाला लागला आणि त्याचे सर्व शिष्य मनसोक्त गांजा पीत बसले होते . मला विचारू लागले की तुम्ही गांजा पिणार का ? मी नम्रपणे नकार दिला . इथे तुम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हटल्यावर लोक फारसा आग्रह करत नाहीत . हे सर्व शेतकरी लोक होते . नर्मदेच्या काठावर आता हळूहळू छोटी मोठी शेती दिसू लागली होती . साधूने आतून गरमागरम टिक्कड आणि हरभरा पातीची भाजी करून आणली . माझी थाळी घेऊन मी तयारच बसलो होतो . त्याने मला भरपेट जेऊ घातले . माझे जेवण होईपर्यंत तो समोरच उभा होता . काय हवे काय नको ते पहात होता . इथपर्यंत येण्याकरिता मलाच इतके कष्ट पडले होते तर याने हा सर्व शिधा , ती सामुग्री इथपर्यंत कशी आणली असेल याचा वाचकांनी फक्त विचार करून पहावा . अत्यंत गरिबी असून देखील नर्मदे काठी राहणारे लोक नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी काय वाटेल ते करायला तयार होतात .
या आश्रमाच्या टेकड्यावरून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होत होते . या भागात ही मोठी मोठी वळणे घेत येते तो सर्व परिसर इथून मोठा रम्य दिसत होता . आता परतल्यावर मी तो गुगल नकाशावर शोधून काढला आणि त्या कुटीची जागा मला सापडली त्याचे चित्र आपल्यासाठी खाली देत आहे . 
लाल ठिपक्याने दाखविलेली राजेंद्र गिरी बाबांची टेकाडावरील कुटीया आणि झोकदार वाहणारी नर्मदा बाला
भोजन झाल्यावर मी थोडीशी पाठ टेकली परंतु तो गांजाचा वास मला त्रासदायक ठरू लागला . त्यामुळे मी ते "पॅसिव्ह स्मोकींग " टाळून पुढे निघण्याचा निर्णय घेतला . साधूने राहण्याचा आग्रह करून पाहिला परंतु मला पुढे जायचे आहे हे लक्षात आल्यावर त्याने मला प्रेमाने निरोप देखील दिला . ही व्यक्ती पुन्हा आपल्याकडे येणार नाही आहे आणि आपल्याला काहीही लाभ देणार नाही आहे हे माहिती असून देखील त्या व्यक्तीसाठी इतके सारे करणे हीच आपली थोर भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे .हिचा प्रत्येकाने अभिमान बाळगलाच पाहिजे . कुटीच्या दुसऱ्या बाजूला देखील भरपूर उतार होता . तो उतरून मी चालायला सुरुवात केली . आता पुन्हा मी काठाकाठाने निघालो होतो परंतु आता मात्र झाडी कमी होऊन शेती सुरू झाली होती . इथली शेतं छोटी छोटी होती . अगदी नर्मदेच्या काठापर्यंत लोक शेती करत होते . कागदो पत्री बोलायचे तर मी खन्नतमाळ आणि किरंगी माळ अशा दोन गावांच्या हद्दी आता पार केल्या होत्या . माळ हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो त्याच अर्थी मध्य प्रदेशात देखील वापरला जातो . तसेच आपल्याकडे वाडी किंवा वस्ती म्हणतात तशा अर्थी इथे टोला अर्थात टोळी असा शब्द वापरतात . म्हणजे मला वाटेत लागलेला नर्मदा टोला हा कुठल्यातरी एका गावाचा टोला  अर्थात फुटकळ छोटीशी मानवी वसती होती . इथे मला राम घाट नावाचे एक स्थान लागले . साडेतीन-चार चा सुमार होता परंतु फारच थंडी वाजू लागली होती . आता पुढे जवळ कुठला आश्रम नाही असे लोकांनी सांगितल्यामुळे मी रामघाट आश्रमामध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला . सुदैवाने गुगलवर राम घाटाची काही चित्रे मिळतात त्याच्या साह्याने तुम्हाला रामघाट कसा होतो कसा होता ते सांगायचा प्रयत्न करतो . 
नर्मदा काठावरील रामघाट , मोठी आडवी खोली आणि शेजारील पूलच्या
राम घाट हा आश्रम नर्मदेच्या अगदी काठावर आहे आणि इथे नर्मदा मैया एका बाजूने कातळ खडकाला कापून अतिशय खोल खोल वाहते आहे आणि पुढे एक तीव्र वळण ती घेते. 
दुरून रामघाटाचे दर्शन
आतली दोन मंदिरे
इथे आरसीसी मध्ये छोटेसे बैठे मंदिर बांधलेले असून समोर चांगली मोठी जुन्या पद्धतीने शेणाने सारवलेली आडवी लाकडी खोली आहे व तिचे दोन भाग करण्यात आलेले आहेत . आत मध्ये बजरंग बली आणि महादेव अशी मंदिरे आहेत परंतु त्यांना भिंती नाहीत फक्त खांब तेवढे बांधलेले आहेत . आश्रमाला छोटेसे दार आहे . 
रामघाट आश्रमातून होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन व तिच्या वरील छोटासा पूल किंवा पुलिया

नर्मदे हर ! असा आवाज दिल्याबरोबर एक वयस्कर पुजारी बाहेर आले आणि त्यांनी मला आत मध्ये येऊन आसन ग्रहण करण्याची विनंती केली . समोर एक लाकडी खाट पडली होती त्याच्यावर माझे सर्वसामान मी ठेवले आणि खाली बसलो . आशा खाटे ला इथे तखत असे म्हणतात आणि त्यावर शक्यतो फक्त संन्यासी व साधू लोकच बसतात असा संकेत आहे . इथे बंजारा समाजाचे दोन बंधू आणि एक रामचरण तिवारी नावाचे पंडित असे तिघे मिळून सेवा करण्याकरता राहत होते .
इथे मला भेटलेले वृद्ध सेवेकरी . मी गेलो तेव्हा आता चालू असलेले बांधकाम अस्तिवात नव्हते .
मागे तिघांच्या रहाण्याच्या खोल्या दिसताहेत .
 तिघांची वये सत्तरीच्या पुढची होती त्यामुळे तिघेही बऱ्यापैकी थकलेले दिसत होते परंतु तरीदेखील सेवा करण्याचा त्यांचा उत्साह व इच्छाशक्ती खूपच दांडगी होती त्यामुळे त्यांचे हे सेवा कार्य अविरत सुरू आहे . वरती मी सांगितली ती आडवी खोली त्यातील डाव्या भागात दोघे भाऊ राहायचे आणि उजवीकडे पंडितजी राहायचे . पंडितजींनी बाहेर बसण्याकरता मोठा कट्टा करून घेतला होता . बहुतेक लोक त्यांना भेटायला तिकडे येत असत . 

आश्रमाच्या कुंपणा शेजारी महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती .
आश्रमाच्या बाहेर पडले की लगेच नर्मदा मातेचे असे विलोभनीय दर्शन व्हायचे . मुख्य गंमत म्हणजे नर्मदा मातेचे इतके मोठे पात्र उगमापासून यापूर्वी कुठेही दिसलेले नव्हते . इतका वेळ अवखळ खळखळाट करत वाहणाऱ्या नर्मदा बालेला आता एका खोल धीर गंभीर नदीचे स्वरूप प्राप्त झाल्यासारखे वाटत होते . 
मी देवदर्शन करून पुन्हा खाटेपाशी येऊन बसलो . आपण ज्या कुठल्या आश्रमामध्ये किंवा मठ मंदिरामध्ये उतरतो तेथील आराध्य दैवतांचे दर्शन आणि जी काही पडेल ती सेवा करणे हे परिक्रमावासीने आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे हे मला मोहन साधूने शिकविलेले होतेच त्याप्रमाणे सारी दर्शने करून येऊन बसलो . पंडित जी माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले , "तखत पे बिराजिये । " मी त्यांना म्हणालो , " पंडित जी मै गृहस्थी हू ।नीचे ही ठीक हू। " पंडित जी बोलले , " वह बात नहीं है । लेकिन यहां जमीन पर आसन लगाओगे तो यहां की ठंड सह नहीं पाओगे । आप चाहो तो कमरे के अंदर भी अपना आसन लगा सकते हो । " परंतु मी विचार केला उगाच कशाला यांना त्रास द्यायचा म्हणून मी बाहेरच झोपायचा निर्णय घेतला . तो निर्णय किती चुकीचा होता हे लवकरच त्या रात्री मला उमगले ! असो .
मग त्या मजबूत लाकडी खाटेवर बसूनच मी माझी पूजा अर्चा उपासना आटोपली आणि बसून राहिलो . आता मला फारच थंडी वाजू लागली . माझी एक शाल त्या तंबूमध्ये राहिली होती आणि माझ्याकडे एकच शाल उरलेली होती . ती गुंडाळून माझी थंडी काही भागेना . पंडितजींनी मला दोन गोधड्या आणून दिल्या . इकडे छोट्या गावांमध्ये कुठेही कोणीही आले तरी त्याची बातमी लगेच गावभर पसरते तसेच काहीसे झाले आणि समोरच्या तटावर असलेल्या आश्रमातील एक महाराज मला भेटायला म्हणून मुद्दाम आले . थंडीमुळे आणि भरपूर चालल्यामुळे आणि मुख्य म्हणजे इतके चालण्याची पायांना सवय नसल्यामुळे माझे पाय प्रचंड दुखत होते . या महाराजांसोबत बराच वेळ गप्पा मारत बसलो . इथे आश्रमा शेजारी असलेला छोटासा पूल ओलांडला की समोरच्या काठावर भूलकाहा टोला अथवा परडिया नावाच्या गावामध्ये यांचा 'माँ रेवा सुभग कुटी ' नावाचा आश्रम होता . बेलघाटाच्या आधी हा आश्रम उत्तर तटावर चालताना लागतो . लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या या गोऱ्यापान महाराजांचे नाव विवेक कुमार मिश्रा असे होते व त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक देखील मला वहीत लिहून वहीत लिहून दिले .ते असे ८० ८५ ४१ ८५ २२| ७५ ८० ९९ १४ २२ . 
मी पुण्याचा आहे म्हटल्यावर त्यांनी मला सलील पालकर नावाच्या एका परिक्रमा वासी ला फोन जोडून दिला जे स्वतः पुण्याचे आहेत व वडगाव बुद्रुक येथे राहतात . मी त्यांना फोन केला तेव्हा ते त्यांच्या आजवर झालेल्या एकूण तीन नर्मदा परिक्रमांपैकी दुसरी नर्मदा परिक्रमा करत होते आणि संपूर्ण सामानासकट नर्मदा मैया मध्ये पडून पूर्णपणे भिजलेले होते . एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उडी मारताना त्यांचा तोल गेला व नर्मदा मैया मध्ये ते पडले आणि तितक्यात आम्ही त्यांना फोन केला असे ते झाले होते ! त्यांचा भारदस्त आवाज आणि मैया मध्ये ते कसे पडले याचे वर्णन ऐकून आम्ही सर्वचजण हसू लागलो ! 
अति उच्च रक्तदाबा सारख्या गंभीर व्याधीवर मात करत तीन नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे वडगाव बुद्रुक पुणे येथील श्री सलील पालकर

श्री सलील पालकर यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर नर्मदा परिक्रमेचा एकमेव व्हिडिओ टाकलेला आहे जो छोटासा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एकत्र चालणाऱ्या परिक्रमा वाशींची परिक्रमा कशा स्वरूपाची असते त्याचा लगेच अंदाज येईल .त्या व्हिडिओचा दुवा खालील प्रमाणे . 
https://youtube.com/watch?v=bofJ5k3cIBQ&si=MWFw1pb1R0FE9uvz

नंतर देखील त्यांना कधीतरी भाष केल्यावर नर्मदा मैया या विषयावर ते तासंतास बोलतात ! असो .थोड्याच वेळात पांढरे कपडे घातलेली एक अतिशय सुंदर वृद्ध महिला त्या आश्रमाच्या दारातून सारखी जाते आहे व आत डोकावून पाहते आहे असे माझ्या लक्षात आले . मी तिला हाताने आत मध्ये बोलवले . तिच्या हातामध्ये ती काही झाडे घेऊन आली होती . आल्या आल्या ती तिवारी पंडित जी मिश्रा पंडित जी आणि माझ्या पाया पडली . अगदी पायाला स्पर्श करून तिने नमस्कार केला . मी देखील तिला फिरून नमस्कार केला असता ती म्हणाले की आप मेरे पाव मत पडना । मै हरिजन हू । मी म्हणालो मग तर फारच चांगली गोष्ट आहे ! तुम्ही हरिजन म्हणजे हरीचे लोक !आम्ही अजून तेवढी पात्रता प्राप्त केलेली नाही , प्रयत्न करतो आहोत . म्हणूनच परिक्रमा वगैरे करतो आहोत . परंतु एक गोष्ट नमूद करतो की इथे उपस्थित असलेल्या दोनही ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला स्पर्श करण्यापासून परावृत्त केले नाही किंवा आत येऊ नको बाहेर जा वगैरे असे देखील काही बोलले नाहीत . तर ती तिथेच अगदी आमच्या समक्ष आमच्या समोरच बसून बोलत होती . हे मुद्दाम सांगतो आहे कारण आजकाल शक्यतो आपण  आपले ज्ञान माध्यमांमधून मिळवायचा प्रयत्न करतो व त्यामध्ये नेहमी उलट्या-सुलट्या व नकारात्मक बातम्या छापलेल्या असतात किंवा दाखविल्या जातात . प्रत्यक्ष समाजामध्ये फिरून तुम्ही जो अनुभव घेता तो मात्र अगदी विपरीत असतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते . ती बाई नेहमी त्या आश्रमामध्ये येऊन तिवारी पंडितजींना भेटत असे परंतु आज नवीन कोणीतरी समोर बसलेले आहे म्हणून ती आत यायला कचरत होती इतकेच . तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि चमक होती .तिने माझ्यासाठी झाडपाला आणला होता . मला तिने आश्रमामध्ये चालत येताना पाहिले होते . आणि तेव्हा तिच्या लक्षात आले होते की माझे पाय चांगलेच दुखत आहेत . कारण चालताना देखील माझ्या चालीमध्ये या दुखण्यामुळे फरक पडला होता . त्यामुळे तिने जंगलामध्ये जाऊन दोन झाडे शोधून आणली होती व ती गरम पाण्यामध्ये खळाखळा उकळून त्यामध्ये पाय सोडून बसले की पायाचे दुखणे जाते असे तिने मला सांगितले . यातील एक झाड रुईचे होते ते मी लगेच ओळखले दुसरे जे झाड होते त्याला सरळ सोट दांडा आणि त्यावर गोल गोल काटेरी फळे होती . मी त्या झाडाविषयी भरपूर शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु अजून तरी मला त्याचे नाव सापडलेले नाही . सुदैवाने त्याचे एक स्केच मी काढून ठेवले होते ते आपल्या माहिती करता देत आहे . कोणाला माहिती असेल तर कृपया मला त्या झाडाचे नाव सांगावे . अशा काड्या शक्यतो सुशोभीकरणाकरता घरामध्ये वापरलेल्या मी पाहिलेल्या आहेत . साधारण कदंबाच्या फुलाच्या आकाराचे ते गट्ठू होते .
पायदुखी साठी मला तेजस्वी हरिजन म्हातारीने आणून दिलेली औषधे
( दरम्यान वरील चित्र पाहून आपल्या या ब्लॉगचे एक वाचक वैद्यराज श्री त्रिलोक विश्वास धोपेश्वरकर यांनी खालील माहीती पुरविली ती येथे वाचकांच्या माहितीकरिता जोडत आहे . काही अन्य वैद्यांशी चर्चा केल्यावर सर्वानुमते या वनस्पती विषयी माहिती मिळाली ती अशी . ही दीपमाळ अथवा ग्रंथीपर्ण (ग्रंथी म्हणजे गाठ ) नामक वनस्पती आहे . हिच्या विषयी आयुर्वेदात खालील माहिती मिळते . )
म्हातारीने मला औषधे आणून दिली खरी परंतु ते उकळणार कोण आणि त्यात पाय सोडून बसणार कोण हा सर्व त्रास त्या तिवारी पंडितजींना देण्याची माझी इच्छा नव्हती . तरी देखील तिचा मान म्हणून मी ती सर्व औषधे सोबत ठेवली . अंधार पडू लागल्यावर पंडितजी झोपी गेले ते रात्री भोजन करत नसत . शेजारच्या खोलीतील बंजारा भावाने मला आत मध्ये बोलावले . बाहेर पेक्षा आत मध्ये किमान १० ते १५डिग्री अधिक उष्णता होती ! मी तर त्यांची परवानगी घेऊन चुलीजवळ जाऊन बसून राहिलो . शेकल्यावर जरा बरे वाटले . या महाराजांच्या तीन परिक्रमा करून झाल्या होत्या . त्यातील अनुभव ऐकत ऐकत भोजन प्रसाद ग्रहण केला . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्ही तुमचा "लिसनिंग मोड " "ऑन " केला की खूप काही नवनवीन ऐकायला शिकायला मिळते . भोजन झाल्यावर त्यांनी सौजन्य म्हणून मला विचारले की त्यांचे बंधू कुठेतरी गावाला गेलेले असल्यामुळे आत मध्ये एक जागा आहे . त्यावर मी इच्छा असल्यास झोपू शकतो . परंतु खरोखर सांगतो मनापासून संकोच वाटल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि बाहेर तख्तावर जाऊन पडलो . आणि ती माझी घोडचूक ठरली ! त्या रात्री नर्मदा मातेने मला शिकविले की निस्पृहाने कधीही संकोच करायचा नाही ! अन्यथा परिणाम गंभीर होतात ! म्हाताऱ्याने दार लावून घेतले आणि आता मात्र त्या उघड्या जागेवरती फक्त मी आणि माझ्या दोन गोधड्या इतकेच काय ते उरले . खरे तर मला पंडितजी अजून दोन ब्लॅंकेट देत होते ती मी पुन्हा एकदा संकोच म्हणूनच नाकारलेली होती . त्या दोघांना त्या भागाची चांगली कल्पना असल्यामुळे त्यांनी मला हे सर्व देऊ केले होते . परंतु मी संकोच म्हणून या सर्व सुविधा नाकारल्या आणि मला नर्मदा मातेने आयुष्यभराची अद्दल घडवली ! त्या रात्री इतकी भयंकर थंडी पडली की विचारु नका ! पांघरलेल्या दोन्हीही गोधड्या काहीही कामाच्या नव्हत्या. मला असे लक्षात आले की माझ्या अंगाखाली तख्तावर अजून दोन गोधड्या आंथरलेल्या आहेत . त्या काढून खाली मी शाल अंथरली आणि चारही गोधड्या पांघरून झोपलो . तरी देखील माझी दातखिळ बसलेली होती . अंगातून भयंकर वेगाने रक्त प्रवाह जात आहे असे जाणवत होते . थंडीने मी अक्षरशः कुडकडून गेलो . त्यात उघड्यावरती झोपल्यामुळे भरपूर वारे लागत होते आणि ते अंगाला बोचत होते . नदीकाठी थंडी पडते हे माहिती होते परंतु इतकी बेकार थंडी पडते याची कल्पना नव्हती . पिण्याचे पाणी तोंड देखील लावता येणार नाही इतके गार झाले होते . ती संपूर्ण रात्र मी तळमळत तळमळत जागाच राहिलो कारण थंडीमुळे झोपच येईना . यापूर्वी अशा स्वरूपाच्या थंडीचा अनुभव एकदाच मी बद्रीनाथ इथे घेतला होता . परंतु तेव्हा मी हॉटेलच्या सुखरूप खोलीमध्ये होतो आणि त्यावेळी वजा सात इतके तापमान खाली उतरले होते . इथे ती शक्यता नव्हती . तरी देखील तितकीच भयानक थंडी मात्र जाणवत होती .
क्षणभर वाटायचे पळत जाऊन म्हाताऱ्यांचे दार वाजवावे परंतु तिथपर्यंत पळण्याची देखील ताकद अंगात नव्हती . अखेरीस उजाडण्याची वाट पाहत पडून राहणे याखेरीज माझ्याकडे काहीच उरले नव्हते . तसाच रात्रभर पडून राहिलो . पहाटे बहिर्दिशेला म्हणून मागच्या बाजूला बांधलेल्या पत्र्याच्या संडासामध्ये गेलो . ते तर अक्षरशः कोल्ड स्टोरेज होते ! कारण सगळ्या बाजूने बर्फासारखा गारेगार पत्रा होता . कधी एकदा इथून बाहेर पडतो असे मला झाले . जेव्हा मी पाण्याचा वापर केला तेव्हा तर माझे अक्षरशः हात दुखायला लागले इतके ते पाणी गार होते आणि हजारो सुया हाताला टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या . असा अनुभव मी यापूर्वी कधीही घेतलेला नव्हता . मी ठरवले की आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नर्मदा मातेला शरण जाणे आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी थेट नर्मदे कडे गेलो . गार पाण्याने आंघोळ केली असता थंडी पळून जाते असे मी अनुभवले होते . त्यामुळे त्या तसल्या बोचऱ्या थंडीमध्ये नर्मदा मातेमध्ये आंघोळ करायचा निर्णय मी घेतला . इथे उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या केल्या होत्या ज्या डाव्या हाताला असलेल्या नैसर्गिक दगडी भिंतीला समांतर होत्या . दंड बुडवून मी पाहिले असता माझ्या लक्षात आलं की इथे पाणी चांगलेच खोल आहे . नदीचा तो एक खोल डोह होता . मी अंगावरची सारी वस्त्रे काढल्यामुळे आता मला थंडी असह्य झाली होती . सर्व बाजूंनी दशदिशांनी मला हजारो सुया टोचल्या जात आहेत अशी अनुभूती येत होती . कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी दोन्ही हात छाती जवळ घेतले आणि त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये जोरदार उडी मारली !नर्मदे हर ! 
पाण्यात पडताक्षणी माझे दोन्ही पाय आखडून छातीजवळ आले आणि हात तर छातीजवळ तसेच राहीले होते आणि अशा पद्धतीने माझ्या शरीराचे झालेले मुटकुळे थंड थंड अति थंड बर्फाच्या सारख्या गार पाण्यामध्ये हळूहळू तळाशी जाऊ लागले . माझा यापूर्वीचा अनुभव असा होता की बाहेर कितीही थंडी असली तरी नदीचे पाणी मात्र थोडेसे कोमट असते . आमच्या कृष्णा नदीमध्ये तर हा अनुभव मी नेहमी घेतला आहे . परंतु नर्मदेने माझी कुठली कठीण परीक्षा मांडली होती मला माहिती नाही . शक्यतो पाण्यात उडी मारताक्षणी हात पाय बाजूला घेऊन मारायला सुरुवात केली की तुम्ही तरंगता . परंतु इथे त्या बर्फासारख्या गार पाण्यामुळे माझ्या अंगाची जी आकडी वळली आणि स्नायूंना जे काठीण्य आले त्यामुळे मला काही केल्या माझे हात पाय बाजूलाच घेता येईनात ! आणि तशात त्या पाण्याला बऱ्यापैकी गतिमान प्रवाह होता ! तसेच मी जो बुडून खाली गेलो होतो तो वरतीच आलो नव्हतो ! शिवाय बाहेर अजून फारसे उजाडले नव्हते त्यामुळे पाण्याखाली सर्वत्र खोल अंधाराचे साम्राज्य होते .सुदैवाने मी पट्टीचा पोहणारा असल्यामुळे ( असे आमचे तीर्थरूप म्हणतात जे स्वतः खरोखरीच महापुरात पोहणारे आहेत ) श्वास चांगला रोखून धरला होता व आजूबाजूला काय घडते आहे हे पाण्याखाली बुडलेला असून देखील मला सर्व कळत होते . माझे मुटकुळे काही केल्या वर येत नव्हते व हळूहळू प्रवाहाबरोबर वाहून चालले होते . परंतु अधिक काळ श्वास रोखून धरणे मला देखील शक्य होणार नव्हते . खरे सांगायचे तर थंडीमुळे आपोआप श्वास रोधला गेला होता . पुन्हा वर येण्यासाठी मला हातपाय मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता . आता नर्मदा मातेच्या उदरामध्ये आपण शांतपणे मृत्यूला सामोरे जाऊया असा विचार माझ्या मनामध्ये येऊ लागला . मृत्यू समयी काहीतरी चांगले चिंतन करावे म्हणून मी नर्मदा मातेचा गजर मनोमन आरंभिला . इतक्यात मला असे लक्षात आले की मी कडेच्या दगडी भिंतीला आपटला असून एका झाडाच्या मुळामध्ये मी अडकत आहे . माझ्या हाताची बोटे तेवढी हलत होती त्या बोटांनी मी मूळ घट्ट पकडले आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून हळूहळू हळू हळू बोटांनी त्या मुळाला धरत वरती यायला लागलो . सुदैवाने पाण्याच्या पातळी बाहेर माझे डोके आले आणि मी श्वास घेतला . माझे शरीराचे गाठोडे अजूनही सुटलेले नव्हते . वरून एक कोळी मला आवाज देत होता आणि बाबाजी बाहेर आओ ! बाबाजी बाहर आओ असे ओरडत होता . मी माझे कपडे वरती काढून ठेवले होते त्यातील एक धोतर त्याने घेतले व एक टोक खाली टाकले आणि मला ते पकडायला सांगितले . ते मी पकडल्यावर त्याने ओढत ओढत मला पायऱ्यांच्या दिशेला खेचले आणि मग पायऱ्यांवर चढून मी बाहेर आलो . त्याने ताबडतोब त्याच धोतराने मला स्वच्छ कोरडे पुसले आणि माझे अंग चोळून त्याने थोडीशी गर्मी उत्पन्न केली . मला थोडेसे बरे वाटू लागले . आता थंडी बऱ्यापैकी कमी जाणवू लागली . वाचकांना नक्की काय प्रकार झाला होता हे लक्षात यावे म्हणून मी स्वतःच एक छोटेसे चित्र काढले आहे ते पाहिल्यावर तुम्हाला अंदाज यावा .
आपुले मरण पाहिले म्या डोळा । रम्य तो सोहळा दिसतसे ॥
खरे तर हा अनुभव ब्लॉगमध्ये लिहावा की नाही अशी माझ्या मनात शंका होती . परंतु पुन्हा कोणी असली चूक करू नये म्हणून मुद्दाम काहीही न दडविता आलेला अनुभव जशाच्या जसा सांगितला . माझे परममित्र आणि मार्गदर्शक श्री सचिन गाडगीळ जे या ब्लॉगचे नित्य वाचक देखील आहेत त्यांनी देखील मला अशीच सूचना केली की असे अनुभव आवर्जुन लिही जेणेकरून तसे पुन्हा कोणी न करो .ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांनी अशा चुका निश्चितपणे टाळाव्यात . अशाने नर्मदा मातेला त्रास होतो हे खरे आहे . तो मनुष्य कुठून कसा काय धावून आला माहिती नाही परंतु तो जर तिथे आला नसता तर माझे काय झाले असते याची मी कल्पना ही  करू शकत नाही . त्याने देखील मला सौम्य शब्दांमध्ये झापले . त्याच्याकडून मला कळाले की त्या रात्री तापमान शून्याच्या देखील खाली उतरले होते . असे फार क्वचित होते परंतु त्या दिवशी ते झालेले होते . त्याने मला त्याच धोतरामध्ये गुंडाळून आश्रमा पर्यंत आणून सोडले . आता मात्र मी थेट म्हाताऱ्या सेवेकर्यांच्या उबदार खोलीमध्ये जाऊन चुली पाशी बसलो . मग माझ्या जीवात जीव आला . मी नर्मदेवर स्नान करून आलो आहे इतकेच त्याला सांगितले . आणि त्यांनी केलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेत नर्मदा मातेचे मनोमन आभार मानू लागलो . जीवन के इस भागदौड मे , जब जब डोर कतरती है । पता नही किस रूप मे आ के , रेवा संकट हरती है !


लेखांक बत्तीस समाप्त ( क्रमशः )

 लेखांक ३३ : अमेरिकन प्राध्यापक परिक्रमावासी आणि शैला आदिवासी नृत्यकार

गरमागरम काळा चहा पिऊन थोडीशी तरतरी आली होती ती जराही न दवडता वेगाने चालायला लागावे म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असा विचार मी केला . आणि पटापट पूजा अर्चा आटोपून झोळी उचलली . म्हातारीने दिलेला झाडपाला देखील सोबत घ्यावा लागला . आश्रमाच्या बाहेर आल्यावर मी विचार केला आता हे ओझे घेऊन कुठे चालावे ? आणि तिने सांगितलेला उपाय तरी कोण मला करून देणार ?त्यापेक्षा नर्मदा मातेला प्रार्थना केली की तू मला क्षमा कर आणि या म्हातारीने दिलेले औषध मी तुला समर्पित करतो त्याच्या बदल्यात तू माझ्या पायाचे दुखणे जमल्यास बरे कर ! आणि त्या छोट्याशा पुलावरून मी सर्व झाडपाला नर्मदार्पण करून टाकला ! तिथून पुढे खरोखरीच माझ्या पायांना भरपूर आराम मिळाला . सुरुवातीच्या पंधरा दिवसांमध्ये जसे पाय दुखायचे तसे पुन्हा कधीही दुखले नाहीत . मी पुन्हा नदीच्या काठावरचा शेतांच्या बांधावरील मार्ग पकडला . अशा मार्गावर मऊसर चिखल असतो . ज्याच्यामुळे पायाला चांगली पकड येते ,असा माझा यापूर्वीचा अनुभव होता .  त्यामुळे बांधांमधील मोठी फट व पलीकडे मऊ चिखल दिसताच मी मोठी ढांग मारून पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला , परंतु झाले भलतेच ! रात्रभर पडलेल्या थंडीमुळे चिखलातील पाण्याचा गोठून बर्फ झाला होता ! त्याच्यावरून सरररर करून पाय घसरून मी पार्श्वभागावरती राप्पकन् जोरात आपटलो ! गोठलेला चिखल इतका कडक झाला होता की त्याने कुठलीही दया माया न दाखवता छाटी फाडून माझ्या पार्श्वभागावर नक्षीकाम केले . 
गोठलेला चिखल काहीसा असा दिसतो ( संग्रहित चित्र )
दिसताना तरी हा चिखल ओला आहे असे वाटत होते परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा कडक असा दगड झालेला होता . एक क्षणभर वाटले की पुन्हा माघारी फिरावे आणि आश्रमामध्ये विश्रांती घ्यावी . परंतु आश्रमातून शिक्का घेऊन बाहेर पडलो होतो त्यामुळे पुन्हा माघारी फिरण्याचा प्रश्नच नव्हता .
 १९ जानेवारी २२ रोजी हनुमान मंदिर रामघाट येथे मुक्काम केल्याचा माझ्या वहीमध्ये घेतलेला शिक्का

अशा प्रकारे चिखलाचा बर्फ होऊन त्यावरून पाय सटकण्याचा हा काही माझा पहिला अनुभव नव्हता . यापूर्वी हिमालयामध्ये गिरी भ्रमण करताना असे अनुभव आलेले होते . परंतु त्यावेळी तुमच्या बुटाला गेटर्स नावाचे एक विशेष प्रकारचे तळवे किंवा काटेदार तळवे लावण्यात येतात . त्यामुळे बर्फातून पाय सटकत नाहीत . इथे मात्र आधीच झिजून पार गुळगुळीत झालेले माझ्या बुटाचे संपलेले सोल होते .त्यामुळे साराच आनंदी आनंद होता . जवळपास प्रत्येक पाऊल बांधावरून सटकत होते . सर्वत्र गोठलेले दवबिंदू दिसत होते . अखेरीस सूर्यदेव उगवले . जरी सूर्य उगवला असला तरी त्याच्या प्रकाशाची जरा देखील उष्णता जाणवत नव्हती इतका दाट थंडीचा थर त्या परिसरामध्ये होता .मुळात नर्मदा मातेच्या काठावरील रस्ता निवडल्यामुळे तिथे एकंदरीतच पाण्याचे प्रमाण जास्ती असलेली जमीन होती . परंतु काहीही झाले तरी हा किनारा न सोडण्याचा माझा निश्चय होता त्यामुळे तसाच चालत राहिलो . नदी वळणे घेत वाहत असल्यामुळे या प्रकारे चालताना सुमारे दहा-बारा किलोमीटर अंतर वाढले परंतु पावला पावलाला नर्मदा मातेचे दर्शन होत होते त्यामुळे त्याचे काहीही शल्य वाटले नाही . आता सर्वत्र शेती सुरू झाली होती . वाटाणा , हरभरा , गहू अशी शेती तुडवत मार्ग शोधावा लागत होता . या शेतामध्ये आलेली फुले मोठी सुंदर दिसत होती . छोटी छोटी शेते , बांधावरील अति अरुंद पायवाटा , कापलेले पाय फाडणारे गवत ,अंगाला चिकटणाऱ्या काटेरी व गवताच्या बिया हे सर्व सहन करत मार्गक्रमण सुरू होते . विशेषतः घातक पद्धतीने छाटलेले तुरीचे टोकदार देठ फारच भयानक ! तोल गेला की विषय संपला ! शंभर टक्के कुठेतरी घुसणार .अशी एकंदरीत सर्व परिस्थिती . वाटेमध्ये काही मोठ्या नद्या पार कराव्या लागल्या अगदी धोकादायक गतीने वाहणाऱ्या अशा या नद्या होत्या . इथे एका शेतामध्ये मला एक गुजराती माणूस भेटला . याचा एकंदरीत अवतार बघून हा परदेशी पर्यटक आहे असे मला वाटले परंतु त्याने नर्मदा परिक्रमा सुरू केलेली होती . त्याच्याकडे मोठा ट्रायपॉड ,चांगल्यापैकी 4 K व्हिडिओ कॅमेरा , लाईटचे सामान , तंबूचे सामान असे बरेच काही होते . त्यात भर म्हणून त्याने एका मोठ्या ट्रेकिंग सॅक मध्ये हे सर्व भरून आणले होते . त्याच्या त्या झोळीचे वजन सुमारे ४० किलो आसावे . त्याच्याशी बोलताना लक्षात आले की हा अमेरीकेतील मिशिगन विद्यापीठामध्ये फिल्म मेकिंग चा प्रोफेसर होता .आणि नर्मदा परिक्रमा करायची इतकेच डोक्यात ठेवून दोन महिन्याची रजा टाकून आला होता . बाकी त्याला परिक्रमेविषयी फारसे काहीच माहिती नव्हते . गडी वजनदार होता आणि त्याने सोबत रोज नवीन कपडे घालायचे अशा हिशोबाने बरेच कपडे आणले होते .त्याच्या सोबत असलेल्या सामानामुळे तो रोज फक्त पाचच किलोमीटर चालू शकत होता . मला त्याने एके ठिकाणी उभे राहून पोझ द्यायला सांगितली आणि त्याने माझे काही फोटो काढले . परंतु माझ्याकडे फोन नाही मग ते फोटो मला पाठवणार कसे असे म्हटल्यावर त्यांनी माझा ईमेल आयडी लिहून घेतला .प्राध्यापक अनल शाह असे त्याचे नाव होते. बिचारा चालून चांगलाच वैतागला होता . 
 हाच तो इंडो अमेरिकन परिक्रमावासी

माझे इंग्रजी बरे आहे कळल्यावर तो मला म्हणाला आता आपण एकत्र परिक्रमा करूयात . याच्या गतीने चालता येणे मला खरोखरीच शक्य नव्हते . शिवाय अमरकंटक वरून सडक मार्गाने आल्यावर त्याने नेमका हा कठीण किनारा पकडला होता . मी काही तास त्याच्यासोबत अनुकंपा तत्वावर चाललो . त्याचे हाल खरोखरीच मला बघवत नव्हते . शिवाय तो क्षणाक्षणाला व्हिडिओ घेत होता आणि फोटो देखील काढत होता . या पद्धतीने परिक्रमा पूर्ण करायला त्याला चार-पाच वर्षे तरी लागली असती आणि याच्याकडे रजा होती दोन महिने .हा मनुष्य मोठा मजेशीर होता . उत्तम गुजराती येत असून देखील शक्यतो इंग्रजीमध्ये बोलत होता . मूळचा हा बडोद्याचा . याने वाटेमध्ये एक मोठीच मजा केली . मजा कुठली कदाचित आमचा जीव गेला असता अशी क्रूर चेष्टा त्याच्या हातून चुकून घडली !इथे नर्मदा नदीचे पात्र वळणावळणाचे असल्यामुळे वाळू साठायला सुरुवात झालेली होती झालेली .आणि छोट्या छोट्या नावांमधून अवैध पद्धतीने वाळू उपसण्याचे काम जोरात सुरू होते .या वाळू माफिया लोकांवर सरकारच काय कोणाचेही बंधन नसते . त्यांना हवी तेवढी वाळू ते नदीपात्रातून गोळा करतात म्हणजे करतातच . त्याला विरोध करणाऱ्या जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा पोलिसांवर प्राणघातक हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो . अशा पद्धतीने आमच्या समोरच पलीकडच्या तटावर वाळू उपसा चालू होता . आणि अनल भाऊने आपला ट्रायपॉड लावून त्यांचे शूटिंग चालू केले . काठावर काही स्त्रिया स्नान करीत बसल्या होत्या . त्यादेखील याच्या चित्रणामध्ये येऊ लागल्या . समोरच्या एका माणसाने आम्हाला बघताच इशारा केला आणि एका क्षणात नावेतील सर्वांनी पाण्यामध्ये उड्या मारून सर्वांनी पाण्याखाली दडी मारली ! हे लोक उत्तम पाणबुडे असतात . पाण्याखाली दहा पंधरा वीस फुटापर्यंत जाऊन वाळू उपसून वर आणतात . काठावरील स्त्रियांनी देखील पाण्यामध्ये उड्या मारल्या . हा संपूर्ण आदिवासी वनवासी परिसर असून इथले लोक अतिशय संवेदनशील आहेत याची त्या महाविद्वान प्राध्यापकाला काहीच कल्पना नव्हती . शिवाय हा कोणीतरी सरकारचा एजंट आला आहे (आपले अवैध धंदे टिपायला ) असा गैरसमज होऊन त्याच्यावरती कदाचित हल्ला झाला असता . परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी सर्वांना आरडाओरडा करून बाहेर बोलावले . आणि मोठ्या आवाजात ओरडून सांगितले की हा कोणीही सरकारचा मनुष्य नसून अमेरिकेवरून आलेला एक परिक्रमावासी आहे . मग त्या सर्वांचा जीव भांड्यात पडला . तरीदेखील त्यांनी स्नान करीत असलेल्या स्त्रियांचे चित्रीकरण करण्यास तीव्र आक्षेप नोंदविला . मी ते अनल शाह याला समजावून सांगितले . इथून पुढे त्याने कुठल्याही प्रकारचे चित्रीकरण करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याच्या सूचनाच त्याला मी ऐकवल्या . तो इतक्या दुर्गम भागामध्ये आला होता आणि इतका "माल" घेऊन सोबत बाळगून होता की त्याला कधी कुठे काय झाले असते याचा काहीही नेम नव्हता . याचे बऱ्यापैकी शिक्षण अमेरिकेतच झालेले होते . शिक्षणाने तुम्हाला माहिती भरपूर मिळते परंतु ज्ञान मिळेलच याची खात्री नसते . असो .
जीवावरचा हा प्रसंग टळल्यावर आम्ही अजून थोडे पुढे चालू लागलो असता समोर असे काही दृश्य दिसले की मला प्रश्न पडला की नर्मदा अचानक उलटी कशी काय वाहू लागली ? गप्पा मारत चालताना चुकून माझ्याकडून नर्मदा नदी पार तर नाही ना झाली ? माझी परिक्रमा खंडित झाली की काय ? असे अनेक प्रश्न मला भेडसावू लागले . खरे तर ही मला आडवी आलेली पहिली मोठी उपनदी होती . हिचा आकार ,प्रकार हुबेहूब नर्मदे सारखाच होता फक्त पाण्याचा प्रवाह डावीकडून उजवीकडे वाहत होता . मला एक क्षणभर काहीच कळेना . इतक्यात अनल शहा ने गुगल मॅप वर पाहिले की ती नर्मदा नाही .
लाल रंगाने दाखविलेली हीच ती नदी जिने  क्षणभर माझ्या तोंडचे पाणी पळविले
 परंतु तिचे तट इतके उंच होते की पात्रामध्ये उतरायला जागाच नव्हती . साधारण चार-पाचशे मीटर उलटे चालत गेल्यावर एक छोटीशी ढलान सापडली जिथून मी अनल ला त्याच्या सामानासकट सावकाश खाली उतरवला . आता ही नदी पार करायची होती . साधारण गुडघाभर पाणी असावे . परंतु पाण्याला अतिशय वेग होता आणि त्यातून चालताना तोल जाण्याची खूप शक्यता होती . अनल शहा म्हणाला मी ही नदी पारच करणार नाही ! आता आली का पंचायत ! मी त्याला खूप सांगून पाहिले की इतके काही अवघड नाही परंतु तो तयार होत नव्हता . अखेरीस मी त्याला खूप जास्ती विनवण्या केल्यावर तो कसाबसा तयार झाला . बरे तो त्याचे सामान देखील माझ्याकडे द्यायला तयार नव्हता . कदाचित त्याला मनोमन असे वाटत असावे की मी त्याची बॅग घेऊन पळून जाईन ! सारीच मज्जा ! त्या नदीचे पाणी कोमट होते इतके मला पक्के स्मरणात आहे . कशीबशी ती नदी पार केल्यावर मात्र मी अनल भाऊ शाह यांना एक प्रदीर्घ नमस्कार करून तिथून नर्मदे हर केले ! आज माझे पाय अजिबात दुखत नव्हते . त्यामुळे आज भरपूर चालायचे मी ठरवले . वाटेमध्ये छोटे छोटे आदिवासी टोले लागत होते . तिरंगी गावातून निघाल्यावर मी भीम कुंड पंचधारा पार करून नर्मदा टोला , बंजर टोला , तेलीटोला ,रहंगी , लाल खाटी अशी गावे पार केली . ही गावे इतकी लहान आहेत की गुगल नकाशावर सुद्धा त्यांची नावे कोणी टाकलेली नाहीत . प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन जो फिरणार त्यालाच ही नावे माहिती होणार . नकाशावरीलच गावे सांगायचे तर मी आज पकरी रयत , रहंगी रयत , पाटण रयत , गोरखपूर रयत अशी मोठी गावे पार केली . जेव्हा मी गावे पार केली असे म्हणतो तेव्हा कदाचित वाचकांना असे वाटू शकते की मी गावांमधून चाललो की काय परंतु त्या त्या गावाच्या हद्दी मधून जाणारी नर्मदा नदी पार केली असा त्याचा अर्थ समजून घेणे . इथे मैयाचे पात्र फार सुंदर होते . कधी दहा-पंधरा फूट अरुंद तर कधी तीस चाळीस फूट रुंद . पाणी अतिशय स्वच्छ होते . वाटेत एका गावामध्ये शैला / सैला नृत्यकार भेटले . डोक्यात रंगीबेरंगी पिसांचे , फुलांचे तुरे खोचून ,रंगीत पिवळे धोतर व कपडे घालून ,पायात चाळ बांधून ,पखवाज आणि खोळ यांच्या मधले असलेले मांदर नावाचे एक ताल वाद्य आणि टिमकी याच्या तालावर पौष पौर्णिमेच्या आसपास या भागातील आदिवासी मंडळी नृत्य करत गावोगाव फिरतात .असाच एक आदिवासी समूह एका घराच्या बाहेर बसला होता त्यांनी मला चहा प्यायला बोलावले . मला संगीताची आवड असल्यामुळे उत्सुकतेने मी त्यांना त्यांच्या वाद्याबद्दल अधिक माहिती विचारून घेऊ लागलो . त्यांनी लगेच ते वाद्य माझ्या गळ्यात अडकवले . मग मीही त्यांच्या आग्रहास्तव मांदर वाजवायला घेतले . ते मला जमते आहे असे कळल्यावर त्यांनी बरेच ताल बदलून बदलून वाजविले व आम्ही सर्वांनी एकत्रित खूप आनंद लुटला ! आधी फक्त माझे वादन बघणारे आदिवासी हळूहळू एक एक करून आमच्या भोवती फेर धरून नाचू लागले आणि एक वेगळाच सोहळा अनुभवायला मिळाला ! 

शैला आदिवासींसोबत मांदर / मांदल नावाचे वाद्य वाजविणारा प्रस्तुत लेखक व सभोवती नाचणारे आदिवासी
हे सर्व करीत असताना एक आदिवासी तरुण या सर्वांचे चित्रीकरण करीत होता . त्याने ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . वाचकांना देखील आनंद घेता यावा म्हणून ते व्हिडिओ सोबत जोडत आहे . ज्यांना संगीताची आवड आहे किंवा तालाचे ज्ञान आहे त्यांनी आवर्जून हे व्हिडिओ पहावेत . 



वरील व्हिडिओमध्ये पांढरे कपडे , काळपट रंगाचा थर्मल आणि डोक्याला फेटा बांधून पायात पांढरे कॅनव्हास बूट घालून जो मनुष्य तुम्हाला दिसत आहे तोच प्रस्तुत लेखक होय . या तालामध्ये एक अतिशय धीर गंभीर गूढरम्यता आहे . सांगितिक परिभाषेमध्ये बोलायचं झाले तर या वादनामध्ये फारशी अदाकारी किंवा वादन वैचित्र्य नाही आहे परंतु तरी देखील मनाला शांत एकाग्र करणारा असा हा ताल आहे . विशेषतः सर्वजण मिळून नाचू लागल्यावरती जो एकत्रित सामूहिक आविष्कार तयार होतो तो फारच मंत्रमुग्ध करणारा आहे . हे वादन सुरू असताना प्रचंड थंडी पडल्यामुळे माझ्या हाताची बोटे गारठत होती परंतु त्या सामूहिक सांगितिक आविष्कारामुळे त्याचा विसर पडत होता . या सर्वांचा निरोप घेऊन पुढे चालू लागलो . नर्मदेच्या काठावरती मध्ये एक सिताराम बाबांचा आश्रम लागला .दुपारचा एक वाजला होता तरीदेखील थंडी प्रचंड जाणवत होती . या आश्रमामध्ये बहुतांश महिला सेवेकरी दिसत होत्या .एक नाथपंथीय बाबा तिथे आला होता त्याच्याभोवती सर्वजणी बसल्या होत्या . नाथपंथी बाबाचे वय फार नसावे . त्या स्त्रियांच्या वागण्यामुळे बाबा अस्वस्थ होत आहे हे मला जाणवत होते . परंतु वयाने लहान असल्यामुळे तो त्यांना काही बोलू शकत नव्हता . स्त्रियांची चेष्टा मस्करी जोरात सुरू होती . मी अंगणातच दरवाजासमोर उन्हामध्ये भोजन प्रसाद घेण्यासाठी बसलो . एका तरुण सेवेकरी मुलीने माझे भोजनाचे ताट आणून समोर ठेवले . त्या आश्रमाची काही चित्रे गूगल वर मिळाली ती सोबत जोडत आहे .या आश्रमामध्ये एक आलिशान गाडी उभी होती . एक छोटेसे मारुती मंदिर देखील होते .
याच आश्रमात मी भोजन प्रसाद घेतला
आश्रमातील मारुती मंदिर
आश्रमातील अखंड धुनी
आश्रमातील गुरुपरंपरा
आश्रमाच्या शेजारून वाहणारी सुंदर नर्मदा माता
त्या बाबाला माझ्यासमोर बसून काही महिलांनी भोजन भरविले . मी बर्फासारख्या थंडगार पाण्याने ताटली स्वच्छ धुऊन घेतली आणि तिथून काढता पाय घेतला . तिथले वातावरण मला फारसे आवडले नाही . परंतु परिक्रमेमध्ये या व अशा भावनांना काही थारा नसतो .तुमच्यासमोर जे काही घडते आहे ते तटस्थपणे पाहणे व पुढे चालू लागणे हा परिक्रमेचा मूलभूत नियम आहे . मुळात सर्वच माया असल्यामुळे तुमच्या समोर जे काही घडताना दिसते आहे ते प्रत्यक्षात तिथे घडत असेलच असे नाही , तर तो केवळ तुम्हाला दिलेला अनुभव आहे , इतपत अनुभवांचे वैविध्य ह्या परिक्रमेमध्ये नर्मदा मैया विविध परिक्रमावाश्यांना देते असे अनेक साधूंचे मत आहे . तिथे काय घडते आहे यापेक्षा तुमची प्रतिक्रिया काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे . आणि नर्मदा परिक्रमा ही एक साधना असल्यामुळे आपली प्रतिक्रिया साधकाचीच असली पाहिजे सिद्धाची नव्हे ! असो . भोजनानंतर मी बरीच गावे मागे टाकली . नर्मदा टोला , बंजर टोला , तेली टोला , रहंगी , लाल रयत अशी गावे पार करत चालताना शिवनी नामक नदीचे एक भव्य पात्र समोर आडवे आले आणि मी थबकलो. मला खरोखरीच कल्पना नव्हती की ह्याच्या पुढची माझी रात्र किती अविस्मरणीय ठरणार होती ...

अनुक्रमणिका
लेखांक तेहेतीस समाप्त ( क्रमशः)

 लेखांक ३४ : मध्यरात्री ऐकले दिवंगत पुण्यात्म्याचे भजन

समोर आडवी आलेली शिवनी नदी कितपत खोल आहे याची मला काहीच कल्पना नव्हती . शक्यतो उथळ नद्यांचा तळ वरून लगेच दिसत असतो किंवा त्यांच्यामध्ये दगड वाळूची बेटे तयार झालेली असतात . परंतु इथे मात्र असे काहीच दिसत नव्हते याचा अर्थ पाणी खोल असणार असा अंदाज मी लावला . नदीचे पात्र अतिशय खोल वाहत होते . मी उंच शेताच्या बांधावर उभा राहून खाली उतरण्याचा मार्ग शोधत होतो . नदी नर्मदा मातेला जिथे मिळते त्या संगमावर पाणबुड्यांची वाळू काढण्याची लगबग सुरू होती . इतक्यात मला दूरवरून नर्मदे हर असा आवाज आला . समोरच्या तटावर एक गुराखी निवांत बसला होता त्याने मला हाताने इशारे करायला सुरुवात केली . त्याने दाखवलेल्या मार्गाने मी प्रथम खाली उतरलो . पाण्याचा रंग काळपट होता आणि पाण्याला बऱ्यापैकी जोरदार प्रवाह होता . नदी अतिशय खोल असणार असे माझे मन मला सांगत होते परंतु तो मनुष्य मला म्हणाला की मी सांगतो त्या मार्गाने तुम्ही चालत रहा . त्याने काठीच्या टोकाने मला रस्ता दाखवायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे मी नदीमध्ये पावले टाकायला लागलो . बूट व पिशवी मी डोक्यावर घेतली . साधारण बेंबीच्या थोडेसे वर इतकेच खोल पाणी मला लागले आणि हळूहळू मी नदी पार झालो ! पाण्याला चांगलीच ओढ होती ! नंतर माझ्या लक्षात आले की अशा मोठ्या नद्या जेव्हा आडव्या येतात तेव्हा त्या पार करण्याकरता पूल उपलब्ध नसेल तर लोक वाळूचे जलांतर्गत रस्ते तयार करून ठेवतात . म्हणजे वाळूचा एक असा आडवा ढिगारा तयार करून ठेवतात की ज्यावरून चालत नदी पार करता येते . परंतु हा मार्ग सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे याचे ज्ञान असल्याखेरीज अशा मार्गावर चालण्याचे धाडस करणे म्हणजे कपाळमोक्षच होय . कारण हे मार्ग प्रवाहानुसार हळूहळू बदलत राहतात .मला नशिबाने तो गुराखी भेटला म्हणून माझी नैया पार झाली ! पलीकडच्या तटावर गेल्यानंतर मी तो गुराखी कुठे दिसतो आहे का पाहिले परंतु मला काही पुन्हा तो दिसला नाही . असे अनुभव तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये वारंवार येतात . नेमकी तुम्हाला ज्या क्षणी व जी मदत हवी आहे त्या क्षणी ती मदत देणारी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर उपस्थित होते . मदत करते आणि क्षणात निघून जाते . हे एकदा दोनदा घडणे योगायोगाचे म्हणता येऊ शकेल परंतु प्रत्येक वेळी असे घडत असल्यामुळे त्याच्यामागे एखादी सूत्रबद्ध दैवी रचना कार्य करीत आहे की काय अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे ! मदत करणारी व्यक्ती म्हणजे कोणी साक्षात देवता आहे असे माझे म्हणणे बिलकुल नाही परंतु त्या व्यक्तीला देखील त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची बुद्धी कुठलीतरी सामाजिक जाणीव तिला देत असते . या जाणीवेवर आपले नियंत्रण निश्चितपणे नाही . ही जाणीव व्यापक समाज मन ठरवीत असते . असो . सिवनी अथवा शिवनी नदीचे पाणी काळे कुट्ट होते आणि नर्मदा मातेचे पाणी तुलनेने शुभ्र पांढरे भासत होते . परंतु संगम झाल्या झाल्या काळा रंग लुप्त होऊन फक्त नर्मदेचा रंग शिल्लक राहत होता ! इथे समोरच्या तटावर एक गोरख चिंच जातीचा वृक्ष आहे ज्याला परिसरातील सर्व लोक कल्पवृक्ष म्हणून ओळखतात . हे मूळचे आफ्रिकन झाड असून भारतामध्ये चांगले रुजलेले आहेत . पुढे मांडवगड किल्ल्यावर मी या झाडांचे अक्षरशः जंगल पाहिले . आपल्या महाराष्ट्रात देखील नानासाहेब फडणवीस यांच्या वाईजवळच्या मेणवली गावामध्ये हे झाड आहे व ते हत्तीचा पाय म्हणून प्रसिद्ध आहे . 
नर्मदे काठचा हाच तो कल्पवृक्ष . मी समोरील तटावरून चालत होतो . 
या संपूर्ण परिसरामध्ये अवैध पद्धतीने वाळू उपसून तिची विक्री करणाऱ्या दलालांचा अक्षरशः सुळसुळाट मी पाहिला . विशेषतः वर्षातील काही ठराविक दिवसच वाळू काढता येते कारण नंतर नर्मदेची जलपातळी वाढलेली असते त्यामुळे त्यांचे सुगीचे दिवस सुरू होते . मोठ्या मोठ्या नावांमध्ये आधी पाणबुड्यांच्या मदतीने वाळू भरली जाते आणि नंतर ती काठावर आणून उतरवली जाते . काठावरती एका ट्रॅक्टरमध्ये ती वाळू भरली जाते आणि हे ट्रॅक्टर नर्मदेचा कठीण किनारा चढत ही वाळू बाहेर घेऊन जातात . नर्मदेच्या पातळीपासून किनारा उंच असल्यामुळे प्रचंड चढ असतो आणि या चढावर चढताना ट्रॅक्टरची पुढची चाके उचलली जातात . ती उचलली जाऊ नये म्हणून ट्रॅक्टरच्या पुढे अक्षरशः चार चार पाच पाच मजूर बसविले जातात आणि ट्रॅक्टर जोरात पळवला जातो . हे सर्व करण्यासाठी तयार झालेला रस्ता हा ट्रॅक्टरच्या अतिरिक्त वजनामुळे खचून गेलेला असतो व दोन्ही चाकांचे दीड दीड फूट खोल खड्डे त्या रस्त्यावर पडलेले असतात . त्यातून फक्त आणि फक्त ट्रॅक्टर जाऊ शकेल अशी त्या रस्त्याची रचना असते . 
अतिरिक्त वजन घेऊन जाणारा ट्रॅक्टर जाऊन तयार झालेले रस्त्यावरील खड्डे उपग्रहातील प्रतिमेमध्ये देखील दिसतात यावरून त्यांच्या आकाराचा अंदाज घ्यावा

ट्रॅक्टर वेगाने पळवताना चुकून एखादा मजूर खाली पडला तर त्याचा चिरडून मृत्यू निश्चित आहे इतके हे सर्व भयानक प्रकार आहेत . परंतु तरीदेखील राजरोसपणे हा खेळ इथे चालू आहे .
क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्यामुळे ट्रॅक्टर असा उचलला जातो
ते टाळण्यासाठी मजुरांना असे ट्रॅक्टरच्या पुढे बसविले जाते ( संग्रहित छायाचित्रे )
 या लोकांना नर्मदे विषयी फारशी आस्था नाही असे मला त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले . तिच्याकडे ते जीवनदायीनी म्हणून न बघता वालुकादायिनी इतक्या मर्यादित रूपात पाहत आहेत . आणि नर्मदे कडे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला ती मुबलक देते त्यामुळे या सर्वांचे धंदे अतिशय उत्तम सुरू आहेत . यांच्यामध्येही नर्मदेचे भक्त निश्चित पणे असतील परंतु पोटामुळे त्यांना नर्मदेची वाळू काढून विकणे हे काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही . अशाच एका ट्रॅक्टरने तयार केलेल्या खड्ड्याच्या रस्त्यातून चिखल तुडवत मी वरच्या दिशेला पळू लागलो कारण मागून एक ट्रॅक्टर जोरात येत होता ! समोरून परिक्रमावासी जात आहे तर आपण थोडेसे थांबावे असा विचार त्या ट्रॅक्टर चालकाने केला नव्हता कारण त्यांचे वेळेचे गणित असते . ठराविक वेळेमध्ये ठराविक फेऱ्या झाल्या तरच त्यांचे आर्थिक गणित जुळते . त्यामुळे अतिशय निर्दयपणे यांचे उपसण्याचे काम चालू असते . धावत धावत धापा टाकत मी तो चढत चढलो . पुढे एक भव्य पिंपळाचा वृक्ष होता आणि त्याच्या खाली एक गोपाळ कृष्ण मंदिर आहे असे माझ्या लक्षात आले . इथे परिक्रमावासींची सेवा केली जाते असे मला दिसले . इथे एका ओट्यावर काही देवता होत्या त्यांचे दर्शन घेतले आणि एका कट्ट्यावर मी विश्रांती घेत बसलो . इतक्यात मंदिराच्या मागे असलेल्या घरातून एक वयस्कर काकू बाहेर आल्या आणि त्यांनी मोठ्या आस्थेने माझे विचारपूस केली . "नर्मदे हर महाराज ! कितने मूर्ती है ? " काकूंनी विचारले . नर्मदा खंडामध्ये आणि एकंदरीतच साधू जीवनामध्ये साधूला किंवा परिक्रमा वासीला मूर्ती असे संबोधले जाते . "हम दो मूर्ती है माताजी । " मी म्हणालो . माझ्या आजूबाजूला कोणी दिसत नाही असे पाहून त्या म्हणाल्या "दुसरा कौन है? " " नर्मदा मैया " मी लगेच उत्तरलो . काकू आनंदी झाल्या आणि म्हणाल्या " मैया तो हर जगह है ! अच्छा है । आप और मैया श्रीकृष्ण भगवान के मंदिर मे आसन लगा सकते है ।" मंदिरामध्ये आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली . अजूनही प्रचंड थंडी जाणवत होती . इथे थंडी कधी कमीच होत नाही की काय असे मला वाटत होते . मंदिरामध्ये गेलो आणि गोपाळ कृष्णाला साष्टांग नमस्कार केला . फरशी अत्यंत गार होती त्यामुळे तो नमस्कार लक्षात राहिला !छोटेसेच परंतु सुंदर मंदिर होते . या मंदिराचे काही फोटो इंटरनेटवर मिळाले ते आपल्या दर्शनासाठी टाकत आहे .
उजवीकडून डावीकडे वाहणारी वरची नदी नर्मदा आहे आणि खालून तिला येऊन मिळालेली शिवनी नदी आहे . समोरच्या तटावरील कल्पवृक्ष आणि मी मुक्काम केला ते राधाकृष्ण मंदिर येथे दिसत आहे .समोर पात्रात वाळूच वाळू दिसत आहे . 
शिवनी संगम आश्रमाचा परिसर
काठावरील भव्य पिंपळाचा वृक्ष
आश्रमातील देवदेवता ,स्थानदेवता
ह्याच कट्ट्यावर जाऊन मी बसलो होतो आणि मागच्या घरातून काकूंनी येऊन विचारपूस केली .या चित्रात देखील थकले भागलेले परिक्रमा वासी विश्रांती घेताना दिसत आहेत . 
गोपाळ कृष्णाचे मंदिर . (श्रीक्षेत्र शिवनी संगम )
मंदिराला मोठे जाळीचे दार होते ( कोलॅप्सीबल डोअर ). आत मध्ये संगमरवराची गारेगार फरशी लावलेली होती . डावीकडच्या एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . कुठेही आसन लावून झाले की माझा सर्वात पहिला कार्यक्रम हाच असायचा की तिथून बाहेर जाणे आणि नर्मदा मातेचे दर्शन घेणे . तिचे त्या घाटावरील रूप नेत्रामध्ये साठवून ठेवणे . मी बाहेर आलो आणि उतार उतरून नर्मदेच्या पात्रामध्ये गेलो . इथे समोर एक मोठी निळसर रंगाची जॅक वेल ( उपसा कूप ) होती ज्याद्वारे पाणी उपसून जवळच्या गावांना पुरविले जात होते . जवळच एक छोटेसे मंदिर होते .इथे त्या विहिरी शेजारूनच जाणाऱ्या एका पुलाचे काम देखील सुरू झाले होते . तशा खाणा खुणा आजूबाजूला दिसत होत्या . इथे वाळूमुळे नर्मदा मातेचे पात्र रुंद झालेले होते व केवळ एका कोपऱ्यातून पाणी वाहत होते . हा प्रवाह देखील अतिशय उथळ असा होता . त्यामुळे छोटी छोटी मुले या प्रवाहामध्ये बिनधास्त पळापळी करून खेळत होती . घरातील कुठली तरी जुनी चादर आणून त्याच्या साह्याने मासे पकडणे हा इथल्या मुलांचा आवडीचा खेळ आहे . काठावरती बरेच दगड गोटे होते . त्यावर पूर्वी पुरामध्ये येऊन गेलेल्या शेवाळ्याचे वाळलेले थर होते . एक छोटासा घाट बांधण्यात आला होता .
शिवनी संगमावरील नर्मदेचा घाट (समोर जॅकवेल )
मी सकाळ संध्याकाळ नर्मदेमध्ये आवर्जून स्नान करायचो . परिक्रमेमध्ये सर्वाधिक महत्त्व जर कशाला असेल तर ते या स्नानाला आहे . हजारो किलोमीटर वाहणारी नर्मदा तिच्या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या औषधी वनस्पतींचे गुण आणि जमिनीतून सापडणाऱ्या मूलद्रव्यांचे कण आणि क्षार घेऊन वाहत असते याची कल्पना करता येणे कठीण आहे . या सर्व रसायनांच्या अभ्यंगाचा लाभ आपल्याला या स्नानाने होत असतो . शरीरातील अनेक व्याधी विकार रोग दूर करणारे असे हे औषधी जल आहे . इथे देखील थंडगार पाण्यामध्ये मांडी घालून बसून आंघोळ करता येईल इतपतच पाणी होते . मी हळूहळू अंदाज घेत थोडेसे आत जाऊन बसलो . परंतु थंडगार पाणी अंगावर घेण्याची हिंमत होईना इतक्यात लहान मुलांनी माझ्याजवळ येऊन चहूबाजूंनी माझ्या अंगावर पाणी उडविले ! त्यामुळे माझी थंडगार पाण्याची भीड चेपली आणि मी यथेच्छ स्नान करून घेतले ! 
शिवनी संगम येथे स्नान करणारा एक अन्य परिक्रमावासी (संग्रहित छायाचित्र )
थंडगार पाण्यातून बाहेर आल्याबरोबर सर्व थंडी पळून गेली ! आणि तसाच उघड्या अंगाने मी गोपाळ कृष्ण मंदिरामध्ये गेलो . अंगात जाडजूड स्वेटर जॅकेट इत्यादी घालून वाळू वाहतूक करणारे लोक माझ्या त्या अवताराकडे पाहत राहिले . " जय हो माई की चिंता काहे की ! " इथून वरती जाताना तिथे थोडीशी दुर्दैवी माहिती मला वाचायला मिळाली . या घाटा संदर्भात ती माहिती होती . इथून जवळच गोरखपूर नावाचे मोठे गाव आहे . या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत . त्या गावातील सलुजा नावाचा एक मोठा व्यापारी आहे ज्याने हा घाट आणि धर्मशाळा बांधलेली आहे . आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मरणार्थ त्याने हे सर्व केलेले आहे . ऋषी सलुजा असे त्याच्या दिवंगत पुत्राचे नाव होते . इथे महाशिवरात्रीचा मोठा मेळा भरतो तसा मेळा एक वर्ष भरलेला होता . मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे लहान मुले इथे आवडीने पाण्यामध्ये खेळत असतात . त्याप्रमाणे या सलुजा व्यापाऱ्याची दोन्ही मुले पाण्यामध्ये खेळत होती . इतक्यात वरती अमरकंटक भागामध्ये मोठी ढगफुटी झाली आणि एक महापूर अचानक तिथे नर्मदेला आला . इंग्रजीमध्ये या प्रकाराला flash flood असे म्हणतात . व हा प्रकार अतिशय भयानक असतो . याच्यामध्ये सुरुवातीला चिखलगाळ ,दगड माती लाकडे इत्यादी वाहत येत असतात . आणि त्यानंतर गढूळ पाण्याचा मोठा प्रवाह असतो . याच्यामध्ये पट्टीचा पोहणारा देखील मरू शकतो इतके हे पाणी बेकार असते . आणि तसेच झाले . व्यापाऱ्याचा धाकटा मुलगा वाहून जायला लागला .हे पाहून उत्तम पोहणाऱ्या थोरल्या ऋषी सलुजा याने त्या प्रवाहामध्ये उडी मारली आणि धाकट्या भावाचा प्राण वाचविला .परंतु हे सर्व करत असताना तो प्रवाहाला लागला आणि वाहून गेला आणि पुन्हा कधीच सापडला नाही .त्यामुळे त्याच्या स्मरणासाठी त्याच्या वडिलांनी हे सर्व सेवा कार्य उभे केलेले आहे . तिथे ऋषी सलूजा याची जन्मपत्रिका देखील लावलेली आहे . त्याच्या मृत्यू स्थानामध्ये राहू शुक्र आणि सूर्य असे ग्रह होते . असो . ज्योतीष शास्त्रातील जाणकारांकरिता ग्रहस्थिती सांगून ठेवली . मगाशी मला भेटलेल्या काकू व त्यांचे पती आणि तीन मुले एक मुलगी हे तिवारी नामक एक ब्राह्मण कुटुंब असून त्यांची नेमणूक या सर्व परिसराची देखरेख करण्याकरता केलेली आहे . पैकी थोरले पंडित जी कृष्णाची सेवा करून निवर्तले . आता त्यांचा पुत्र देवेंद्र कुमार तिवारी सर्व व्यवस्था बघत आहे . देवेंद्र कुमार तिवारी माझ्याकरता गरमागरम चहा घेऊन आला ! तो साधारण माझा समवयस्कच होता . मी माझे पूजन आटोपून घेतले . इतक्यात देवेंद्र कुमार तिवारी ने आरतीची तयारी सुरू केली . मंदिरामध्ये आम्ही दोघेच होतो . तिथे एक सुंदर शंख पडलेला मला दिसला . मी त्याला शंख वाजवू का असे विचारले . तो म्हणाला हा माझ्या पिताजींचा शंख आहे व तो बंद पडलेला आहे . आता तो वाजत नाही . मला याचा अर्थ कळेना . मी त्याला एकदा फक्त काय झाले आहे पाहू का असे विचारले आणि शंख ताब्यात घेतला .अतिशय जुना मोठा आणि जड शंख होता . मुख्य म्हणजे त्याचे मुख अतिशय छोटे होते . छोटे मुख असले की कमी हवा सोडून मोठा आवाज काढता येतो . त्यामुळे हवा अधिक काळ टिकते आणि शंख वादनाचा कालावधी वाढतो . मी नर्मदा मातेचे नाव घेतले आणि शंख फुंकायला सुरुवात केली . आज पर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी इतका प्रदीर्घ काळ शंख कधीच वाजवला नव्हता इतका दीर्घकाळ तो वाजला ! त्या शंखाचा नाद अतिशय धीर गंभीर आणि सुस्वर होता ! इतका सुंदर शंख मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिलेला नव्हता ! माझे शंख वादन ऐकून देवेंद्र खुश झाला आणि त्याने पुन्हा एकदा शंख वाजवायला मला सांगितले ! त्याचे वडील गेल्यापासून हा शंख वाजलाच नव्हता . मुळात त्याचे छिद्र लहान असल्यामुळे अतिशय कमी शक्ती लावून तो वाजविता येत होता व बहुतेक लोक अधिक शक्ती लावून वाजवायचा प्रयत्न करत असल्यामुळे तो वाजत नव्हता . देवेंद्र कुमारला मी तो शंख वाजवण्याची युक्ती शिकविली . देवेंद्र तिवारी ने आरती चालू केली . त्याने आरती चालू केली आणि मी चकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो ! त्याचा आवाज इतका सुरेल होता व तो आरती इतकी सुंदर म्हणत होता की मी मंत्रमुग्ध होऊन गेलो ! आजवर कोणाला इतक्या सुराने आणि आर्ततेने आरती गाताना मी पाहिलेले नव्हते .मुळात आरती या शब्दातच आर्तता आहे आणि ती आर्तता जर येत नसेल तर ती आरती व्यर्थ आहे असे माझे मत आहे. त्याच्या आरत्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिलो . एका मागोमाग एक सुरामध्ये आणि तालामध्ये तो आरत्या म्हणत होता . त्याची निरंजन ओवाळण्याची पद्धत देखील खूप सुंदर आणि पाहण्यासारखी होती . इतक्या भावपूर्ण पणाने कोणी आरती करत असेल तर देव आपण होऊन प्रगट व्हावा ! 
त्याची आरती संपताच मी आरती घेतली आणि अतिशय तोंड भरून त्याच्या गायनाचे कौतुक करू लागलो . माझे बोलणे ऐकल्यावर तो म्हणाला मी तर काहीच गात नाही इतके सुंदर माझे पिताजी गायचे . ते याच मंदिरामध्ये एकदा भजनाला बसले की रात्रभर देवाची भजने म्हणायचे आणि सकाळीच उठायचे ! तसेच त्यांचे गायन आणि भजन ऐकण्यासाठी दूरवरून लोक यायचे इतके ते सुंदर गात असत ! त्यांनी आयुष्यभर या गोपाळ कृष्णाची गायन सेवा केलेली होती . त्या अनाम पुण्यात्म्याला मनोमन नमस्कार करून मी माझे आसन ग्रहण केले . तिवारी घरून गरम गरम जेवण घेऊन आला . पोळी भाजी भात आमटी असे सर्व सुग्रास जेवण पोटभर जेवलो आणि मन तृप्त झाले ! माझे संपूर्ण भोजन होईपर्यंत तो शेजारी उभा राहिला बस म्हणल्यानंतर देखील बसला नाही . त्याच्या बोलण्यातले मार्दव नम्रता आणि स्वरातील गोडवा खरोखरीच कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहिला . त्याला भेटल्यानंतर निश्चितपणे माझे आरती म्हणणे बदलले आहे . एखादे नैमित्तिक कर्म उरकून टाकायचे म्हणून पटापट आरती म्हणणे आणि तिवारी म्हणतो त्या पद्धतीने आरती म्हणणे यातील फरक खरोखरीच अनुभवण्यासारखाच आहे .  जाताना तिवारीने मला सांगितले की रात्री खूप थंडी पडते त्यामुळे जाळीच्या दाराला एक मोठा फ्लेक्स चा फलक लावला आहे तो बांधून टाका म्हणजे हवा आत येणार नाही . तसेच आतून कुलूप लावून घ्यायला त्याने मला सांगितले . त्याप्रमाणे मी सर्व बंदोबस्त केला आणि दिवे मालवून समयीच्या मंद उजेडा मध्ये दिसणारे गोपाळ कृष्ण आणि राधिकेचे रुपडे पहात बसून राहिलो . माझ्या देखील डोळ्यावर झापड येऊ लागली म्हणून मी पाठ टेकवली आणि मला डोळा लागला . अशीच रात्र पुढे सरू लागली . आता यापुढे मला जो अनुभव आला तो मी जसा आला तसाच लिहीत आहे . त्यावरून कोणाला काय अनुमान काढायचे ते काढू देत . परंतु मला अनुभव आला हे मात्र खरे आहे . रात्री बाराच्या सुमाराला मला मंदिरातून कोणीतरी चालत आहे असा भास झाला . कुणीतरी घसा खाकरत आहे असे देखील आवाज मला येऊ लागले . मला वाटले रात्री अन्य कोणी परिक्रमावासी आलेले असतील म्हणून मी दुर्लक्ष केले आणि पुन्हा झोपी गेलो . थोड्यावेळाने मला पुन्हा खोकल्याचा आवाज येऊ लागला . आवाज अतिशय नाजूक होता परंतु पुरुषाचा होता . मी उठून बसलो आणि हातामध्ये विजेरी घेऊन आजूबाजूला पाहू लागलो . आजूबाजूला कोणीही नव्हते . मी पुन्हा भिंतीकडे तोंड करून झोपलो आणि आता मात्र माझी झोप उडाली होती आणि माझे सर्व लक्ष त्या आवाजाकडे लागलेले होते . इतक्यात पुन्हा इकडून तिकडे चालल्याचा आवाज मला येऊ लागला . पुन्हा घसा खाकरण्याचा आवाज ऐकू आला . आता मात्र मी विजेरी घेऊन प्रदक्षिणामार्गाच्या मागे धावलो कारण तेवढी एकच जागा माझी बघायची राहून गेली होती . तिथे देखील कोणी नाही हे पाहिल्यावर मात्र मी पुन्हा पळत येऊन भिंतीकडे तोंड करून डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपी गेलो . झोपतोय कुठला ! माझे पंचप्राण त्या आवाजाकडे लागून राहिले होते ! मी विचार करू लागलो की हा आवाज कोणाचा असावा ? इतक्यात पुन्हा चालण्याचे आवाज मला येऊ लागले . आता मात्र माझी भीती हळूहळू कमी होऊ लागली आणि डोक्यात विचारांची चक्रे सुरू झाली की यातून उपाय काय करावा ! कारण दार तर मी स्वतः आतून कुलूप लावून बंद केले होते आणि त्यावर फ्लेक्स बोर्ड इतका घट्ट बांधला होता की तो सोडवून बाहेर जाण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता . त्यापेक्षा नर्मदेचे स्मरण करीत शांतपणे पडून राहायचे आणि काय काय होते तो अनुभव घ्यायचा असे मी ठरविले . त्या आवाजातील नाजूकपणा पाहून मला असे वाटले की कदाचित हा आवाज दिवंगत पंडितजींचा तर नसावा ? मी सर्व धैर्य एकवटून मोठ्या आवाजात म्हणालो "पंडित जी ! ?? " मला स्पष्ट आवाज ऐकू आला " ह्म " आता मात्र माझ्या जीवात थोडासा जीव आला . कारण तिथे खरोखरीच काहीतरी दैवी शक्तीचे अस्तित्व आहे याची खात्री मला या प्रकारातून पटली . मी म्हणालो "निंद नही आ रही क्या ? " " हां " धीर गंभीर आवाज मंदिरात घुमला . इकडे माझी पाचावर धारण बसलेली होती . परंतु हिम्मत हरून चालणार नव्हते कारण मला इथे अख्खी रात्र घालवायची होती . मी पुन्हा विचारले "आपको खासी की तकलीफ थी क्या ? " " ह्म .. " इतकाच आवाज आला आणि पुन्हा खोकला सुरू झाला . आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते आहे हे पाहून माझा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मी म्हणालो , " पंडित जी हमने सुना है आप गाना बहुत अच्छा गाते थे । कृपा करके हमे कुछ भगवान के गीत , भजन सुनाए । " मी  म्हणालो मात्र अन् त्या संपूर्ण आसमंतामध्ये एक स्वर्गीय स्वर घुमू लागला ! अतिशय नाजूक गोड आणि मंत्रमुग्ध करणारा तो आवाज होता ! त्या आवाजामध्ये परमेश्वराची विविध भजने आणि कवने मला ऐकू येऊ लागली . अंगाची मुटकुळी करून भिंतीकडे तोंड करून मी झोपलेला होतो .आधीच बाहेरची थंडी आणि त्यात हा प्रकार त्यामुळे वळून इकडे पाण्याची हिंमत माझ्या मध्ये होत नव्हती . परंतु पडल्या पडल्या तो स्वर्गीय आवाज मी ऐकू लागलो आणि माझी भाव समाधी लागली ! इतके सुंदर गायन यापूर्वी मी ऐकले नव्हते ! माझ्या मनातील भय भीती शंका या सर्व भावना कुठल्या कुठे पळून गेल्या आणि केवळ भाव भक्ती शिल्लक राहिली इतके त्या स्वरामध्ये सामर्थ्य होते . त्यांनी बरीच गाणी एका मागोमाग एक म्हटली, परंतु त्यातील एक हनुमंताची आरती मात्र माझ्या पक्की लक्षात राहिली ! आरती की जै हनुमान लला की । दुष्ट दलन रघुनाथ कला की ॥ असे त्या आरतीचे शब्द होते आणि स्वर केवळ स्वर्गीय होते ! मला मुळात संगीत श्रवणाची आवड असल्यामुळे ती गाणी ऐकता ऐकता माझा कधी डोळा लागला हे माझे मलाच कळले नाही ! सकाळी दार वाजल्याचा आवाज आला म्हणून मी जागा झालो तर तांबडे फुटू लागले होते आणि बाहेर एक मनुष्य उभा होता . मी जाऊन दार उघडले तर मला कळाले की तो मनुष्य मलाच भेटायला आलेला आहे . मी वरती जो ऋषी सलुजा याचा प्रसंग सांगितला त्यातील बुडणारा धाकटा भाऊ , तोच हा मनुष्य मला भेटायला आला होता . साधारण पस्तीस ते चाळीस वय असावे . तो रोज नर्मदा मातेचे दर्शन घ्यायला यायचा आणि येणाऱ्या परिक्रमावासींची विचारपूस करून जायचा . आज त्याला काय झाले होते माहिती नाही परंतु तो खूप दुःखी वाटत होता आणि मला आल्या आल्या त्याने विचारले की तुम्हाला ज्योतिषशास्त्र कळते का ? मी स्पष्टपणे नकार दिला आणि त्याला कारण विचारले की असे तो का विचारत आहे यावर तो उत्तरला , " मेरी हर बिझनेस मे वाट लग चुकी है बाबा । सर के उपर बहुत कर्जा है और घर से साथ नही मिल रहा । " लॉक डाऊन मुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे हे माझ्या लक्षात आले . तसेच त्याची पत्नी ऐनवेळेला त्याची साथ सोडून निघून गेली होती त्यामुळे देखील तो दुःखी होता .  मला हस्तरेषांमधले थोडे कळते अशी लोण कढी थाप मारून मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य व्यावसायिक कौटुंबिक आणि सामाजिक सल्ले दिले .  त्यावेळी काहीतरी करून त्याला आत्मविश्वास देणे हे मला अधिक महत्त्वाचे वाटत होते .एकंदरीत त्याचा आत्मविश्वास कमी पडत होता हे माझ्या लक्षात आले होते आणि त्यामुळे त्याला त्या अनुरूप काही सल्ले दिले . विशेषतः त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत असे त्याने मला सांगितले त्यानंतर मात्र मी त्याला त्याच्या भावाची आठवण करून दिली आणि भावाने तुला याच कारणासाठी जिवंत ठेवले आणि स्वतः मृत्यू पत्करला काय ? असे विचारल्याबरोबर तो भानावर आला आणि काही झाले तरी मी आत्महत्या करणार नाही असे वचन त्याने मला दिले . एकंदरीतच नर्मदा मातेची साक्ष देत त्याला चार सोप्या सरळ साध्या युक्त्या सांगून जीवन जगण्याच्या कलेतील काही पैलू उलगडून सांगितले आणि तिथून ताबडतोब काढता पाय घेण्याचे ठरविले कारण हे करण्यामध्ये मला काहीही रस नव्हता . खरे तर मला रात्री आलेला अनुभव तिवारी कुटुंबीयांना सांगायचा होता परंतु हे नसते लटांबर गळ्यात पडू नये म्हणून मी माझे सामान उचलले आणि नर्मदे हर केले ! अजून पूर्ण उजाडले नव्हते अशा अंधुक वेळीच मी नर्मदेच्या अगदी काठावरील रस्ता पकडला आणि झपाझप चालायला सुरुवात केली . छुरीया मठ्ठा , तुलसीघाट , बैसाख टोला , शिवाटोला , भुर्री टोला , करबे मठ्ठा , पत्थरकुचा इत्यादी गावे एका दमात एका चालीत अथकपणे पार करत माझिया खार नावाचे गांव गाठले .  हा संपूर्ण प्रवास नर्मदा मातेच्या काठाकाठाने केला व अतिशय अविस्मरणीय असा होता ! पंडितजींचे स्वर्गीय स्वर अखंड माझ्या कानामध्ये घुमत होते व तेच गुण गुणत मी पुढे पुढे मार्गस्थ होत होतो . कुठेही अपेक्षा नसताना अनपेक्षित पणे हा सुंदर अनुभव तिथे मला आला . आयुष्यभर एखाद्या देवतेची भक्ती गेल्यावर मृत्यू पश्चात देखील तुमच्या फ्रिक्वेन्सी तिथे कशा शिल्लक राहतात आणि तरल झालेल्या तुमच्या मनामध्ये त्याचे तरंग किती सहजतेने उमटू शकतात याचाच अनुभव मी येथे घेतला असा माझा दृढ विश्वास आहे . नर्मदा खंड अशा वैविध्यपूर्ण अनुभूतींनी समृद्ध राहिलेला आहे . फक्त आपली ग्रहण क्षमता किती व कशी आहे त्यानुसार येणाऱ्या अनुभूती आणि त्यांची तीव्रता बदलत जाते . आता हे लिखाण करताना देखील माझ्या कानामध्ये तेच स्वर्गीय स्वर घुमत आहेत . . .
आरती की जै हनुमान लला की । दृष्ट दलन रघुनाथ कला की । ...


लेखांक चौतीस समाप्त ( क्रमशः)

लेखांक ३५ : नर्मदेने सिद्ध / शिवालय घाटावर दिला पोलादी चिमटा

माझिया खार गावामध्ये ग्रामस्थांनी मिळून एक सुंदर छोटेखानी धर्मशाळा बांधलेली आहे . अगदी नर्मदा मातेच्या काठावर ही धर्मशाळा आहे . धर्मशाळा म्हणजे एकच मोठी खोली त्याच्या एका कोपऱ्यामध्ये शेगडी मांडलेली आणि एका बाजूला स्वयंपाकाचे सर्वसामान ठेवलेले आहे . इथे परिक्रमा वासींना सदाव्रत दिले जाते . म्हणजे शिधा दिला जातो व आपण स्वयंपाक करून खावे लागते . नर्मदेच्या उगमाजवळ शिधा जास्त मिळतो .समुद्राच्या दिशेने जाता जाता तयार भोजन मिळण्याचे प्रमाण वाढत जाते . नर्मदेच्या पाण्याच्या प्रमाणात संपन्नता सर्वत्र वाढत गेलेली आढळते त्याचा इथे थेट संबंध असावा ,असो. मला गावातील एका छोट्या मुलाने या धर्मशाळेपर्यंत आणून सोडले . नर्मदा खंडातील छोटी मुले अतिशय बिनधास्त ,हुशार आणि चुणचुणीत आहेत . घरातील सुखसोयींमध्ये वाढलेल्या लाडावलेल्या शहरी मुलांच्या तुलनेत त्यांचा उजवेपणा लगेच लक्षात येतो . असो . या धर्मशाळेची किल्ली एका दुकानदाराकडे असते असे कळले . मग मी त्या दुकानामध्ये गेलो असता त्याने मला अजून काही शिधा हवा आहे का असे विचारले . मी त्याला ,बघून सांगतो असे उत्तर दिले आणि किल्ली घेऊन धर्मशाळा उघडली . आसन लावले आणि नर्मदे वरती स्नानाला गेलो . मातीचा उतार उतरल्या उतरल्या नर्मदेचे सुंदर स्वच्छ पात्र खुणावत होते . त्या उतारावरच एका साधून छोटीशी झोपडी बांधली होती आणि तिथे तो धूनी लावून बसला होता . इथे उजव्या हाताला बसंतपुर गावाला जोडणाऱ्या एका पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये पडलेले दिसून येत होते . इथे नर्मदेचे पात्र अत्यंत उथळ असल्यामुळे दुचाकी गाडी घेऊन किंवा चार चाकी घेऊन लोक इकडून तिकडे जातात .या परिसराचे गुगल नकाशावर मिळालेले काही फोटो आपल्या माहितीकरता जोडत आहे .
माझिया खार गावातून होणारे नर्मदा दर्शन
माँ नर्मदा आदर्श धर्मशालेचे बाहेरून काढलेले छायाचित्र
तळातील प्रत्येक वस्तू स्पष्ट दिसेल असे स्वच्छ नितळ नर्मदा जल
इथले पाणी इतके उथळ आहे की लहान मुले देखील बुडून आंघोळ करू शकत नाहीत
त्यामुळे इथले पुलाचे काम अर्धवट पडलेले असून लोक थेट पात्रातून गाड्या पलीकडे घेऊन जातात .
आदर्श धर्मशाळा परिसराचे विहंगम दृश्य
प्रचंड थंडी पडलेली होती परंतु थंडगार नर्मदा जलाने अंघोळ केल्यामुळे थंडी फारशी वाजत नव्हती . तशाच उघड्या अंगाने बसून मी माझे नर्मदा मातेचे पूजन करून घेतले . इतक्यात मघाशी किल्ली दिलेला दुकानदार ताजे शेतातले मटार , बटाटे ,टोमॅटो , कोथिंबीर आणि पीठ इत्यादी सामान देऊन गेला . मी स्वयंपाकाला लागलो . कणिक मळून ठेवली आणि भाज्या चिरून मस्तपैकी ताजी ताजी मटार घातलेली बटाटा भाजी तयार केली . समोर साधू राहत आहे हे मी पाहिले होते त्यामुळे त्याच्या नावचे भोजनदेखील मी बनवून ठेवले . मला दुकानदार सांगून गेला होता की हे फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे अजून कोणाला देऊ नका वगैरे वगैरे . परंतु साहित्य भरपूर होते आणि त्यामध्ये आम्ही दोघे आरामात जेवलो असतो . साई इतना दिजीये । जा मे कुटुंब समाय । मै भी भु खा ना रहू ।साधू न भूखा जाय ॥  हा संत कबीरांचा दोहा मला त्याक्षणी स्मरला आणि त्यामुळे मी दोघांचा स्वयंपाक करून ठेवला . गरम गरम पोळ्या करून खाल्ल्या आणि चार-पाच पोळ्या व भाजी साधूला नेऊन दिली . साधूला खूप भूक लागली होती त्याने देखील मोठ्य आनंदाने तो प्रसाद ग्रहण केला . हा जुना आखाड्याचा भारती स्वामी नाव लावणारा एक साधू होता . इकडे मला भेटायला गावातील काही मंडळी आली . त्यांनी कोपऱ्यात झाकून ठेवलेला ढोलक पेटी वगैरे काढली . मग आम्ही सर्वांनी मिळून तास दोन तास मस्तपैकी भजन केले . इथे उत्तम गाणारे लोक आढळून येतात . रात्री थंडी पडू लागली तसे ग्रामस्थ मला विचारू लागले की माझ्याकडे थंडीसाठी काय समान आहे .माझ्याकडे केवळ एक शाल होती ते पाहिल्यावर त्यांनी ताबडतोब पेटारा उघडला आणि त्यातून दोन नवी कोरी ब्लॅंकेट काढून मला दिली . खरे तर एक ब्लॅंकेट पुरेसे होते परंतु हलकीफुलकी असल्यामुळे आणि परिक्रमेच्या नियमानुसार नाही म्हणता येत नसल्यामुळे मी दोन्ही ब्लॅंकेट मुकाटपणे स्वीकारली . ही ठेवण्यासाठी माझ्या झोळीमध्ये जागा नव्हती त्यामुळे मी ती बाहेरच्या बाजूला लटकवून ठेवीत असे .कारण थंडीमुळे अमरकंटकच्या जंगलात लागलेली वाट माझ्या चांगली लक्षात होती ! थंडीमुळे वाट लागण्यापेक्षा पाठीवर ओझे झाल्यामुळे वाट लागलेली फार बरी ! 
ही माझी परिक्रमेतली झोळी होती
त्याच्या एका बाजूला माझी स्टायरोफोमची गादी मी अशी लटकवून ठेवत असे . तशी सोयच शिंप्याकडून करून घेतली होती . (वरील छायाचित्र नर्मदा मातेच्या उत्तर तटावर चौथ्या दिवशी काढलेले आहे )
काही केल्या ती दोन ब्लॅंकेट झोळी मध्ये बसली नसती .त्यामुळे मी ती अशा पद्धतीने बाहेर बांधायला सुरुवात केली . गमछा , लंगोटी वाळवण्यासाठी बाहेर बांधलेली असायचीच .आता त्यात या दोन ब्लँकेटची भर पडली .
 झोळीच्या बाहेर बांधलेली ब्लँकेट्स .
एक निळसर तर एक गुलाबी होते .
या ब्लँकेटस् नी मला पुढे ओंकारेश्वर पर्यंत साथ दिली .
सकाळी अंधारामध्येच उठून सर्व आन्हिके आटपली . थंडगार नर्मदा जलाने स्नान करून पूजा अर्चा करून निघालो . आज विनायकी चतुर्थी असल्यामुळे नर्मदेमध्ये स्नानासाठी मुलांचे जथेच्या जथे येताना दिसले . तशी परंपरा या भागामध्ये आहे असे माझ्या लक्षात आले .जिकडे पहाल तिकडे शेकडो मुले नर्मदेमध्ये उड्या मारून स्नान करत होती .हिरवी शांत आणि धीर गंभीर भासणारा नर्मदा किनारा आज मुलांच्या कलकलाटाने गजबजून गेला होता . छोटी छोटी मुले जाताना नर्मदे हर चा आवाज देत होती .त्या प्रत्येकाला तितक्याच उत्साहाने नर्मदे हर म्हणून प्रत्युत्तर द्यावे लागत होते ! परंतु त्यातही एक वेगळा आनंद होता ! तितक्या वेळा वैखरीमध्ये नर्मदेचा जयजयकार आपल्या मुखातून घडत होता ! आज पुन्हा एकदा संपूर्ण प्रवास नर्मदा मातेच्या काठाकाठाने केला . 
चालताना मध्ये तुलसी घाट नावाचे एक रमणीय ठिकाण लागले . इथे मैया फार सुंदर दिसते . अक्षरशः निळेशार पाणी दिसते !



श्रीक्षेत्र तुलसी घाट
इथे घाटावरील दर्शने करून पुढे निघालो असता एक तरुण मुलगा काठावरती आपले सॅंडल काढून नर्मदा मातेमध्ये पोहत होता . मला पाहताच तो बाहेर आला आणि पाया पडला . कोणीही पाया पडले की आपण फिरून त्याच्या पाया पडायचे या नियमाप्रमाणे मी देखील त्याच्या पाया पडलो . परस्परो देवो भव ! थंडीने गारठत असल्यामुळे मी हातमोजे , थर्मल , कानाला फेटा , पायात मोजे वगैरे घालून चालत होतो . आणि एवढ्या प्रचंड थंडीमध्ये हा निवांत उघडा पोहत होता . मला म्हणाला बाबाजी आपका एक फोटो लेता हु । टॉवेल ला हात पुसत त्याने कानटोपी मध्ये ठेवलेला आपला मोबाईल उचलला आणि काठावर उभे करून माझे फोटो काढले . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले .

तुलसी घाटावर एका युवकाने काढलेले फोटो
इथे मैयाचे पाणी अतिशय खोल , धीर गंभीर , शांत , आणि निवळ शंख परंतु गतिमान होते . पुढे चालायला सुरुवात केली . काठाकठाने महत्प्रयासे चालत राहिलो .
शेती ओढे नाले दगड धोंडे पार करत दुपारी तीनच्या सुमाराला शिवालय घाटावर पोहोचलो . शक्यतो दुपारी बारा ते एक फार फार तर दीड वाजेपर्यंतच भोजन प्रसाद मिळतो . त्यानंतर आश्रमातील लोक विश्रांती घेत असतात .मला मध्ये कुठेही मंदिर आश्रम घर काहीच न लागल्यामुळे मी चालत राहिलो आणि भुकेने बऱ्यापैकी व्याकुळ झालेलो होतो . मनामध्ये विचार करू लागलो की आज बहुतेक मैया चतुर्थीचा उपास घडविणार ! आज काही आपल्याला जेवण मिळत नाही , इतक्यात दुबे नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण धावत माझ्यासमोर आला . हात जोडून त्याने त्याच्या झोपडीमध्ये येण्याची विनंती मला केली . मला अतिशय आनंद झाला आणि मी त्याच्या मागोमाग त्याच्या झोपडीमध्ये गेलो . अगदी शिवालय घाटावरच त्याने छोटीशी झोपडी उभी केली होती . अंगणामध्ये त्याने मला जेवायला बसवले . थंडीमध्ये उन्हात बसून जेवायला छान वाटत होते . त्याने ताट वाढून आणले ते पाहिले मात्र माझे डोळेच चक्रावले ! त्याने चक्क पंचपक्वान्ने वाढून आणली होती ! मी त्याला विचारले की एवढ्या उशिरा ही पक्वान्ने कशी काय केली ? तो म्हणाला की आज मैयाला पाच पक्वान्ने करून खाऊ घालावीत अशी मला इच्छा झाली . त्याप्रमाणे नैवेद्य दाखविला . दुपारी एक परिक्रमावासी आला सुद्धा परंतु तो आजारी पडलेला आहे त्यामुळे त्याने काहीच खाल्ले नाही आणि झोपून आहे . परिक्रमा वासी जेवल्याशिवाय आम्ही नवरा बायको जेवत नाही त्यामुळे तुम्ही आलात फार बरे झाले ! मला त्याचे फार कौतुक वाटले ! इतकी गरिबी असून देखील परिक्रमा वाशी जेवावा यासाठी त्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती . मी पटापट सर्व ताट चाटून पुसून साफ केले . दोघेही पती-पत्नी अतिशय आनंदी झालेले जाणवत होते . हात धुतल्यावर मी माझ्या जवळ असलेले पन्नास रुपये त्याला देऊ लागलो . परंतु त्याने ते अजिबात घेतले नाहीत . शेजारीच एक देवाचे स्थान त्याने मला दाखविले . मी गुपचूप आत मध्ये गेलो आणि देवा पुढे ते पैसे ठेवून दिले . कारण ती व्यक्ती खरोखरच खूप गरीब आहे हे सर्वच लक्षणांवरून कळत होते . आत मध्ये कुठला परिक्रमावासी आजारी आहे ते बघायला गेलो असता बाहेर ओळखीच्या लाल सँडल दिसल्या . हा तोच परिक्रमावासी होता ज्याला मी समोरच्या तटावर मला मिळालेले सॅंडल दिले होते . तो तापाने चांगलाच फणफणला होता त्यामुळे मागे पडला होता .सोनू शर्मा असे त्याचे नाव होते आणि तो दोन दिवस इथेच झोपून होता . त्याने मला या सिद्ध घाटाचे व समोरच्या शिवालय घाटाचे महत्त्व सांगितले . या बाजूला सिद्ध घाट आणि समोर शिवालय घाट होता . या घाटाचे महात्म्य असे की इथे स्वतः नर्मदा मातेने तपश्चर्या करून शंकराचे दर्शन प्राप्त केलेले होते . नर्मदेच्या उथळ पात्रामध्ये इथे अनेक शिवमंदिरे बांधलेली दिसत होती . सोनू शर्मा म्हणाला की इथे एक हजार शिवलिंगे स्थापित केलेली आहेत . म्हणून याला शिवालय घाट असे म्हणतात . व इथेच नर्मदा सिद्ध झाली म्हणून हाच सिद्ध घाट . हा घाट मोठा पवित्र असून याचे दर्शन नक्की घे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी माझे सर्वसामान उचलले आणि सिद्ध घाट गाठला . समोरच्या शिवालय घाटावर मी मोहन साधू सोबत मुक्काम केलेला होता . इथे पात्र अतिशय रुंद झालेले आहे . आणि नर्मदा एक मोठे वळण घेते आहे . इथे सिद्ध घाटाच्या बाजूने गाळ मातीच होती . बांधलेला घाट फारसा नव्हता . हळूहळू मी नर्मदा जलामध्ये शिरू लागलो असता एक चमत्कार घडला . माझ्या पायाला जोरात काहीतरी टोचले . म्हणून मी पाय फुटभर पुढे टाकला तर तिथे देखील पुन्हा काहीतरी जोरात टोचले .दोन्ही वेळी टोचणारा पदार्थ एकसारखा आहे असे मला जाणवले म्हणून मी कुतूहलाने पायाखाली काय आहे ते पाहिले .तर तो एक चिमटा होता ! नागा साधू सदैव सोबत बाळगतात तो चिमटा मला मैयाने दिला ! हा चिमटा अतिशय जुना होता हे त्याच्या धातूकडे पाहून कळत होते . मला धातुशास्त्राची अत्यंत आवड असून ओतकाम वगैरे करून पाहायला मला आवडते . त्यामुळे मी लगेच त्या धातूची परीक्षा करून घेतली . ते एक उत्तम दर्जाचे पोलाद होते . चिमट्याला दोन टोकदार बाण होते . आणि तीन लोखंडी कड्या त्याला अडकवलेल्या होत्या .मला एक क्षणभर कळेना की हा चिमटा घ्यावा की पुन्हा नर्मदेमध्ये अर्पण करावा . इतक्यात तिथे एक माणूस आला आणि मला म्हणाला " मैया का प्रसाद है ।साथ मे रखो । " आणि निघूनही गेला . मी त्या चिमट्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिलो .


 मला मैय्याने साधू बनण्याचा आदेश तर नाही ना दिला ? असा अचानक चिमटा मला कसा काय दिला ? या चिमट्याचे फार महत्त्व साधू जीवनामध्ये असते . हा चिमटा गुरु शिष्याला देत असतो . याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो . सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे ते एक टोकदार हत्यार आहे . त्याने लाकडे फोडता येतात . वाटेतील काटे कुटे उचलता येतात . माती खणता येते .आगीतील लाकडे निखारे बाहेर काढता येतात . टिक्कड , पोळ्या उलटता पालटता येतात . चिमट्याचे दोन दात अथवा हात एकमेकांवर आपटून सुंदर असे भजन करता येते . भजन करण्यासाठी कधी कधी या चिमट्याला खंजिरीप्रमाणे चकत्या लावलेल्या असतात .अशी अनेक कामे या एका हत्याराने होत असतात . त्यामुळे साधू जीवनामध्ये या चिमट्याला फार महत्त्व असते . कुठेही गेल्या गेल्या साधू सर्वप्रथम हा चिमटा धुनी मध्ये खोचून उभा ठेवत असतो .या चिमट्याला त्याचे तोंड बंद करण्यासाठी लॉकिंग मेकॅनिझम सुद्धा असते . 

साधूचे आणि चिमट्याचे अविभाज्य नाते दर्शविणारी काही संग्रहित छायाचित्रे
मी बराच वेळ तो चिमटा हातामध्ये घेऊन तिथे नर्मदा जलामध्ये उभा राहिलो .परंतु तो चिमटा सोबत ठेव असे त्या माणसाने सांगितल्यामुळे मी तो स्वच्छ घासून पुसून चकाचक चमकवीला अन पिशवीमध्ये टाकला आणि पुढे चालू लागलो . थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की हा चिमटा पिशवी फाडून बाहेर येतो आहे . मुळात साधूंचा तापट स्वभाव माहिती असल्यामुळे हा चिमटा हातामध्ये घेऊन फिरता येणे खूप अवघड होते . हा चिमटा तुला कोणी दिला किंवा हा चिमटा घेण्याचा तुला काय अधिकार ? असा नवीन वाद उत्पन्न होऊ नये म्हणून मी तो चिमटा एका उपरण्यामध्ये गुंडाळून झोळीच्या तळाशी अक्षरशः लपवून ठेवला ,तसेच त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही असे मी ठरवले . जेव्हा मैयाचा आदेश येईल तेव्हा पुढचे काय ते ठरवू असे डोक्यात ठेवले आणि काठ पकडून चालायला लागलो .
दरम्यान आता आपल्याला दाखवण्यासाठी मी गूगल नकाशावर सिद्धघाट शोधला तर तिथे आता ती झोपडी दिसत नाही आहे ! 
 लाल खुणेच्या जागी सिद्ध घाटावर एक झोपडी होती . इथेच चिमटा मिळाला . समोर शिवालय घाट दिसत आहे



लेखांक पस्तीस समाप्त ( क्रमश:)

लेखांक ३६: नर्मदेला प्रदुषित होताना पाहणारे पहिले शहर 'दिंडोरी '

चिमटा सोबत घेऊन निघालो आणि मैयाचा किनारा पकडून सुसाट वेगाने चालत सुटलो . आज मी मैयाच्या इतक्या कडेकडेने चालत राहिलो की माझी सावली सतत मैयाच्या पाण्यामध्ये पडत राहिली . सुमारे पंचवीस तीस किलोमीटर सलग मैया च्या काठाने चालत राहिलो . असंख्य सुंदर सुंदर रूपांमध्ये नर्मदा नटून थटून वाहत होती . तिचे हे रूप चांगले की ते रूप चांगले हे ठरविता येणे खरोखरीच कठीण ! कधी शांत धीर गंभीर प्रवाह तर कधी अवघड खळखळ तर कधी मोठा गडगडाट करत धावणारा शक्तिमान प्रवाह !
 वाटेमध्ये मनुष्य वस्ती अशी कुठे दिसलीच नाही . त्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये पशुपक्षी , कीटक ,वनस्पती दिसत होते . माणसे कमी त्यामुळे वाटेमध्ये लागणारे घाट देखील फारसे नव्हतेच .नर्मदे काठी गावे जरी अनेक असली तरी पक्के बांधलेले घाट फार कमी गावांमध्ये आहेत .मध्ये चंदन घाट नावाचा एक घाट लागला जिथे नर्मदेवर पूल बांधलेला आहे . हा घाट येण्यापूर्वी चकरार अथवा तुचीदिः या नदीचा आणि नर्मदेचा सुंदर संगम होतो . ही नदी मी पाण्यात उतरून पार केली . मधोमध गेल्यावर प्रथेप्रमाणे आचमन केले .इथून जवळच असलेल्या एका घनदाट अरण्य युक्त पहाडातून या नदीचा उगम झालेला आहे .
नर्मदा आणि चकरार नदीचा संगम
नितांत सुंदर चंदन घाट
चंदन घाट पुलावरून दिसणारी नर्मदा माता आणि सभोवती घनदाट अरण्य
चंदन घाटावरील शिव मंदिर आणि भव्य शिवलिंग

चंदन घाट लागला आणि त्यानंतर थेट चरकुटिया गाव लागल्यावरच थाबलो. मध्ये अनेक छोटी मोठी गावे लागत गेली . मी शक्यतो एखादा नावाडी ,कोळी ,शेतकरी , गुराखी किंवा ग्रामस्थ भेटला की त्याच्याकडून पुढील सर्व गावांची नावे विचारून घेत असे . तसेच मागील नावे देखील विचारून तो क्रम बरोबर होता का तपासून पाहत असे . शक्यतो या लोकांना आपापल्या परिसरातील भूगोलाचे अत्यंत चांगले आणि सखोल ज्ञान असते . शाळेत जरी फारसे कोणी शिकलेले नसले तरी प्रत्यक्ष निसर्गाच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी चांगलेच तयार झालेले असतात .
शुकलपुरा रयत , सुन्हा दादर , कौंदिया , खरगना माळ , करोपानी ही गावे पार करत चरकुटिया गावातील आश्रमामध्ये पोहोचलो . 
या भागातील नर्मदा मातेची रूपे अत्यंत सुंदर आहेत .
आपल्याकरिता त्यातील काही निवडक रूपे गुगल नकाशावर मिळाली , ती टाकत आहे .

चरकुटिया इथे जिंतूर वरून आलेले संतोष जोशी आणि आनंद नामक दोन युवक अन्नछत्र चालवीत होते . त्यांच्यासोबत गोविंद कुलकर्णी म्हणून चिंचवडचे एक परिक्रमावासी होते . यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सहकुटुंब परिक्रमेला आलेले होते . त्यांच्या सुविद्य पत्नी आणि अमृता आणि नम्रता नावाच्या दोन मुली असे सर्वजण मिळून नर्मदा परिक्रमा करत होते व इथे काही काळ राहत होते . मुलींशी बोलताना मला असे पुसटसे कळाले की काही कारणामुळे त्यांची परिक्रमा खंडित झाल्यामुळे ते इथेच थांबलेले आहेत . ही त्यांच्यासाठी दुःखदायक बाब असल्यामुळे त्याविषयी अधिक चौकशी न करता मी तो विषय तिथेच सोडून दिला . कुलकर्णींच्या दोन्ही मुली छोट्याशा परंतु अतिशय हुशार व चुणचुणीत होत्या .
हाच तो चरकुटिया आश्रम ( संग्रहित छायाचित्रे )
आश्रमाकडे जाणारा रस्ता
समोरच्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर शेष घाटाचे दर्शन होत होते . या सर्वांसोबत चहापान केले आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली . 
मध्ये कमाल बाबा नावाच्या एका आदिवासी सत्पुरुषाचा आश्रम लागला परंतु तिथे कोणी नसल्यामुळे मी थांबलो नाही . इथे नर्मदा मातेचे एक छोटेसे मंदिर होते आणि आत नर्मदेची छोटीशी मूर्ती होती .नकाशावर या आश्रमाची काही चित्रे सापडली ती आपल्या दर्शनासाठी देत आहे .


नर्मदा मंदिर व आतील मूर्ती

आदिवासी सत्पुरुष कमाल बाबा

इथून जरा पुढे गेल्यावर मध्ये गोमती नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते . एका ग्रामस्थानी सांगितले की ही नदी ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या चरणाजवळून येते त्यामुळे हिच्यामध्ये स्नान केल्यावर कर्जातून माणूस मुक्त होतो . माझ्यावर सध्या तरी कुठले कर्ज नव्हते परंतु त्याचा भाव पाहून मी नदी फार करताना मध्ये डुबक्या मारून घेतल्या .
 नर्मदा गोमती संगम ( पावसाळ्यातील चित्र )
शेष घाटासमोरचा छोटासा पूल या बाजूने पाहिला . समोर दिसणाऱ्या त्रिवेणी संगमाला नमस्कार केला .अजून उजेड आहे तोवर चालत राहायचे असे ठरविले होते . शेती , दगड गोटे ,खडक असे सर्व पार करत करत काठाने चालत राहिलो .सूर्यास्त होण्याच्या आत पुढचा आश्रम सापडणे आवश्यक होते .
साधारण अशावेळी आश्रम सापडणे अत्यावश्यक असते . हे संग्रहित चित्र शेष घाट पुला नंतरचेच आहे .
साधारण अंधार पडू लागल्यावर हनुमान घाट नावाच्या एका घाटावर मी पोहोचलो .
 हनुमान घाट व झोकदार वळण घेणारी नितळ निर्मळ नर्मदा
इथे नर्मदेचे अत्यंत सुंदर स्वरूप पाहायला मिळते !
एक अतिशय पल्लेदार वळण घेत नर्मदा येथे वाहते .
इथे एका ठाकूराने करोडो रुपये खर्च करून सुंदर असा पक्का बांधिव घाट आणि आश्रम उभा केला आहे . 
हनुमान घाट समोरच्या तटावरून असा दिसतो
हनुमान घाटावर स्नान करणाऱ्या स्थानिक भाविकांचे संग्रहित छायाचित्र .

कोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून निवृत्त झालेले एक अधिकारी येथे साधू बाबा बनून हा सर्व पसारा सांभाळत होते . मला त्यांच्याशी पहिले वाक्य बोलता क्षणी लक्षात आले की हा मनुष्य केवळ साधू नाही आहे . कारण मी आश्रमामध्ये आल्या आल्या त्यांनी बेफिकीर साधू सारखे निवांत संभाषण न करता एखाद्या व्यवस्थापकाला शोभेल अशा पद्धतीने मला आश्रमाचे नियम समजावून सांगितले व मी कुठे राहावे हे देखील उत्तम पद्धतीने सुचविले . मी त्यांना लगेच विचारले की आपण पूर्वाश्रमी कोण होतात ? त्यावर ते खुश झाले आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जीवना बद्दल सर्व माहिती त्यांनी मला सांगितली .त्यांचा स्वतःच्या गावी फार मोठा व्यवसाय होता . त्यांच्याकडे अनेक जेसीबी , ट्रक , बस व अन्य वाहने होती . ती सर्व स्थावर जंगम संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून त्यांनी केवळ एक बोलेरो जीप आणि एक मोटरसायकल घरातून घेतली आणि हा आश्रम गाठला . यांची उंची सहा फुटाच्या वर होती . गोरापान वर्ण ,पांढरी शुभ्र दाढी आणि धिप्पाड देहयष्टीचे हे साधू बुवा "बाबा लालदास " असे नाव लावत असत .  हे दिवसभर मौनामध्ये राहायचे आणि फक्त संध्याकाळी बोलायचे . यांना ऐकायला कमी येत असे . परंतु यांना गप्पा मारायची खूप हौस होती . माझ्यासारखा ऐकणारा भेटल्यावर त्यांची कळी फारच खुलली ! इथे अजून एक मरतुकडा गरीब बिचारा म्हातारा त्यांना मदतनीस म्हणून राहत होता . हा बाबांचे हातपाय चेपण्यापासून पडेल ते काम सांगताक्षणी करायचा . आयुष्यभर ऑफिसर राहिलेल्या लोकांना असा एखादा मनुष्य हाताखाली लागतोच ! त्या दोघांमधील नात्याचे मी निरीक्षण केले असता मला मौज वाटली ! ते गुरु शिष्य असे नाते नव्हते तर गुलाम आणि मालक असे नाते मला वाटले ! आमच्याशी प्रेमाने बोलणारा बाबा त्याच्यावरती मात्र एकदम गुरगुरून आणि भडकून बोलायचा ! तो देखील सर्व अपमान निमूटपणे सहन करत हसतमुखाने येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींची सेवा करत होता . मला त्या जीवाची खूप कीव वाटली . इथे मला अजून एक तरुण परिक्रमावासी भेटला . याचे नाम बळीराम रमेश जाधव असे होते आणि हा सावळा तरुण अतिशय तेजस्वी होता . याचे गाव बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी .  याने सोबत एक रिलायन्सचा छोटासा फोन आणला होता .त्याच्याशी अधिक बोलल्यावर असे लक्षात आले की हा संघाचा कट्टर स्वयंसेवक होता . आम्हाला दोघांना त्या बाबाने बाहेर अंगणात आसन लावायला सांगितले होते . इथे आश्रमाच्या बाहेर मोठे पटांगण गच्चीसारखे बांधलेले होते . इथे आत्ताच हाडे गोठविणारी थंडी जाणवू लागली होती . परंतु मी चांगला ऐकणारा आहे हे पाहिल्यावर बाबा खुश झाले आणि त्यांनी त्यांची रामायण वाचण्याची एक अतिशय उबदार खोली होती तिथे आम्हाला दोघांना हलविले . इथे मोठ्या अक्षरातील तुलसीरामायणाची अजस्त्र पोथी पडलेली होती ती त्याने आम्हाला वाचून दाखवली . खोली इतकी लहान होती की तिथे फक्त ते रामायण मी आणि बळीराम असे तिघेच कसे बसे मावू शकत होतो .बाबाने आम्हाला स्वच्छ हातपाय धुवून पूजा आटोपून घ्यायला सांगितले व खाली घाटावर आरतीला यायची आज्ञा केली . मी आधी संपूर्ण आश्रमाचा परिसर झाडून घेतला . त्यानंतर खाली स्नानासाठी गेलो . झाडू मारणे वगैरे कामे केले की थंडी कुठल्या कुठे पळून जाते . असो . घाटावर अतिशय मोठ्या मोठ्या पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या . आज बरेच चालल्यामुळे पाय बोलत होते आणि उतरताना पायांची वाट लागत होती . इथे घाटावर जलप्रवाह वळत असल्यामुळे पाणी अतिशय वेगाने वाहत होते . परंतु ते इतके स्वच्छ आणि सुंदर होते की विचारू नका ! त्या पाण्यामध्ये मनसोक्त स्नान केले . आता चांगलेच अंधारून आले होते . नेहमीप्रमाणे स्नान केल्यावर थंडी पळून गेली . आजूबाजूला हळूहळू आरतीसाठी ग्रामस्थ मंडळी जमू लागली . सर्वांनी स्वेटर , मफलर , कान टोप्या , हातमोजे इत्यादी घातलेले होते . आणि मी उघडा ओल्या अंगाने वरती पळत जाताना बघून सर्वांना आश्चर्य वाटत होते . उतरताना ज्या पायऱ्या मला अतिशय कठीण भासत होत्या त्याच पायऱ्या मी अक्षरशः एकादमात चढून वरती पोहोचलो . नर्मदेच्या पाण्याचा नुसता शरीराला स्पर्श जरी झाला तरी आपली क्षमता अशी कित्येक पटीने वाढते हा अनुभव मी अनेक वेळा घेतला . बंदिस्त खोलीमध्ये बसून मस्तपैकी पूजा अर्चा आटोपून घेतली . परिक्रमे मध्ये सकाळ-संध्याकाळ तुमच्यासोबत असलेल्या नर्मदा मातेच्या कुपीचे पूजन हे अनिवार्य सांगितलेले आहे . आणि बहुतेक परिक्रमावासी मोठ्या मनोभावाने हा उपक्रम करतात . काही परिक्रमावासी तर हाच मुख्य उपक्रम आहे असा जणू भाव ठेऊन परिक्रमा करीत असतात . परंतु माझी पूजाअर्चा मात्र अतिशय विक्रमी आणि कमीत कमी वेळात पूर्ण व्हायची . कारण माझे प्राधान्य हे तिथे असलेले नर्मदेचे रूप पाहणे व आजूबाजूला फिरणे व सर्व परिसर अभ्यासणे या गोष्टींना अधिक राहायचे . खाली आरतीसाठी मी आणि बळीराम गेलो . तिथे एक जुना शंख ठेवला होता . संपूर्ण आरती होईपर्यंत मी बेंबीच्या देठापासून तो शंख वाजवत राहिलो . त्या शांत आणि स्तब्ध परिसरामध्ये त्या शंखा चा आवाज फार जोरात घुमत होता . मी शंख चांगला वाजवतो आहे हे पाहून ग्रामस्थ मला प्रोत्साहन देऊ लागले . संपूर्ण आरती सुरू असताना मी शंख वाजवीत राहिलो . त्या शंखनादामुळे मन पूर्णपणे निर्विचार होऊन गेले . ज्या क्षणी आरती संपली आणि सर्व लोक वरती निघून गेले त्या क्षणी मी तिथेच असलेल्या एका छोट्या मंदिरापाशी बसून राहिलो . त्या मंदिराचे चित्र मला गुगल नकाशावर सापडले .ते आपल्यासाठी देत आहे .
रात्री बाबाजींनी गरमागरम जेवण करून वाढले आणि सर्वजण झोपी गेलो . खोलीमध्ये पडल्या पडल्या बळीरामची आणि माझी बऱ्याच विषयांवर चर्चा झाली . बऱ्याच गोष्टींबद्दल त्याचा खूप अभ्यास होता असे माझ्या लक्षात आले . त्याचा स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती मला आवडली . हा देखील एकटाच परिक्रमेला निघाला होता . डोक्याला भगव्या रंगाची एक शाल बांधून तो चालायचा . शेतकरी असल्यामुळे याची पावले मोठी होती आणि मोठ्या मोठ्या ढांगा टाकत चालायचा . परिक्रमा परिसरातील जनजीवनाचा अतिशय डोळसपणे त्याचा अभ्यास सुरु होता . त्याची आणि माझी काही निरीक्षणे जुळू लागली . मला असे प्रकर्षाने जाणवले होते की या परिसरातील सर्वच लोकांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहे याबाबत माहिती आहे असे नाही . बऱ्याच लोकांना काठावरून जाणारी ही माणसे कोण आहेत हे देखील माहिती नसते व माहीत करून घेण्याची इच्छा देखील नसते . विशेषतः नवीन पिढीतील तरुणांना काहीच कल्पना नसते असे मला या भागात विशेषत्वाने जाणवले . इथे ९०% आदिवासी वस्ती असल्यामुळे आणि सध्या या आदिवासी लोकांची डोके भडकवण्याचे काम काही संघटना पद्धतशीरपणे करत असल्यामुळे त्याचा परिणाम परिक्रमेवर होत आहे असे आम्हाला दोघांना निश्चितपणे जाणवले . स्थानिक आदिवासी लोकांना हिंदू धर्मा विरोधात भडकवण्याचे काम अविरतपणे काही लोक इथे करत आहेत . हे सर्व आदिवासी जरी स्वतः हिंदू असले तरी तुम्ही हिंदू लोकांपेक्षा वेगळे आहात आणि तुम्हीच इथले मूळनिवासी आहात वगैरे विपरीत ज्ञान त्यांना शिकवून समोर असलेल्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष कसा उत्पन्न केला जाईल असे पाहिले जाते . विशेषतः "जय सेवा " किंवा  "जय बडा देव " वगैरे पाट्या लावलेल्या घरातील आणि हेच स्टिकर लावलेल्या गाड्यांवरील लोक हे अधिक विद्रोही वृत्तीचे असतात असे जाणवले. असे लोक तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाहीत किंवा तुम्ही नर्मदे हर म्हणल्यावर देखील ते प्रत्युत्तर देत नाहीत . बसक्या नाकाचे आणि जाड ओठांचे टिपिकल चेहरे इथे तुम्हाला आढळून येतात .हे सर्व गोंड जमातीतील आदिवासी लोक आहेत .
साधारण या भागातील आदिवासी युवकांची चेहरेपट्टी अशी असते (संग्रहित चित्र )
 आम्ही या विषयावर बराच खल केला .बळीराम ने मला या सर्व संघटना आणि महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या काही विद्रोही संघटना यांच्या मोडसऑपरेंडी मधील साम्य स्थळे नेमकी शोधून दाखविली . तो स्वतः याच क्षेत्रात काम करणारा हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याचा ह्या विषयावर खूप सखोल अभ्यास होता . गप्पा मारता मारता मध्यरात्री उलटून गेली असावी . अखेरीस देहाला विश्रांती आवश्यक आहे हे माहिती असल्यामुळे ठरवून दोघेजण झोपी गेलो . महात्मा जी नेहमीप्रमाणे सकाळी मौनामध्ये गेले परंतु तशा मौन अवस्थेमध्ये देखील ते आम्हाला दोघांना इथे राहाच म्हणून खूप आग्रह करू लागले .त्यांना आमच्या वाचून करमणार नाही असे ते खुणेने सांगू लागले . परंतु मी नम्रपणे आणि सुस्पष्ट असा नकार दिल्यावर मात्र त्यांचा चेहरा हिरमुसला झाला . आणि ते त्या मौन अवस्थेतच आम्हाला काही अंतर सोडायला म्हणून चालत आले . बरेच अंतर चालल्यावर आम्ही त्यांना परत फिरण्याची विनंती केली तरीदेखील सुमारे दोन किलोमीटर ते आमच्याबरोबर चालले असावेत . त्यांच्या इशाऱ्यांवरून त्यांचा मॉर्निंग वॉक सुरू आहे असे काहीतरी मला कळले . परत फिरल्यावर मात्र आम्ही मागे वळून पाहिले नाही आणि नर्मदेचा किनारा पकडला . या व्यक्तीने सर्वसंग परित्याग केल्याचा भाव जरी आणला असला तरी अजून संपूर्ण साधू अवस्था त्यांना प्राप्त झाली होती किंवा नव्हती याबाबत मी साशंक आहे . अजूनही त्यांना माणसाची सोबत आनंददायी वाटत होती . अजूनही त्यांना गप्पा मारणाऱ्या किंवा मारलेल्या गप्पा ऐकणाऱ्या माणसाची गरज भासत होती . अजूनही ते सर्व कामे स्वतः एकट्याने करत नव्हते तर त्यांना मदतनीस लागत होता . परंतु त्यांचा सेवाभाव आणि शिस्त मात्र वाखाणण्याजोगी होती आणि संसारामध्ये अडकून पडलेल्या भोगी माणसांपेक्षा ते अनेक पायऱ्या वरती होते हे मात्र अतिशय निश्चितपणे सत्य आहे . अशाप्रकारे करोडो रुपयांच्या संपत्तीला लाथ मारणे हे काही सोपे काम नाही . जाताना त्यांनी न विसरता आश्रमाचा शिक्का आणि त्यांची सही माझ्या वहीमध्ये दिली त्याचे चित्र खालील प्रमाणे. 
लिहिलेले शब्द येणेप्रमाणे
बाबा लाल दाष मडियाराष डिन्डौरी
हनुमान घाट नर्मदा आश्रम ग्राम मडियारास
तहसील व जिल्हा डिन्डौरी
२२ । १ । २२
( मध्यप्रदेश मधील लोकांच्या सवयीनुसार  "स" चा "ष" केलेला आहे)
पायांनी आता गती घेतली होती .मी बळीराम ला आधीच सांगितले की मला एकट्याला चालायला आवडते त्यामुळे तू पुढे किंवा मागे एकटा चालत राहा . आपण सोबत चालत राहिलो तर फार गप्पा मारू . त्याची चाल तशी ही माझ्यापेक्षा वेगवान होती त्यामुळे तो पुढे निघून गेला . परंतु तो सतत माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये मात्र होता .तसेच चालताना तो मी येईपर्यंत थांबायचा आणि पुन्हा चालायला लागायचा .
पुढे बुधगाँव रयत , माडियारास माळ,  दांड बिछिया , कोहका माळ , घानाघाट माळ , ही गावे तुडवीत दिंडोरी नगर गाठायचे होते . परंतु इथे आजूबाजूला असलेली शेती आता गायब झाली आणि अचानक सर्वत्र खडकच खडक दिसू लागले . हा प्रवास अतिशय खडतर असा होता . काठाने रस्ता असा नव्हताच तर मार्ग स्वतः बनवून चालावे लागत होते . मोठ्या मोठ्या खडकांना चिरत नर्मदा माई इथून वाहते आहे . त्या खडकामध्ये एक मोठा फणा काढलेला साप मी पाहिला . हा नाग नव्हता परंतु नाग असल्याचे भासवत होता .बहुतेक तो धूळ नागिण जातीचा साप असावा असे मला वाटले . आम्ही स्तब्ध उभे राहिल्यावर तो सळसळत निघून गेला .
हीच भारताची नाभी असावी असे मला वाटले ! इथे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे प्रस्तर सुस्पष्ट वेगळे वेगळे दिसतात आणि या भागात मैया तीन ते चार ठिकाणी आठ आठ फुटाच्या मोठ्या उड्या मारते ! हे दृश्य पाहण्यासाठी अतिशय रम्य आहे . इथे कुठेही माणसाचा वावर आढळला नाही . या भागाला रामघाट किंवा लछमन मांडवा / लक्ष्मण मंडप असे म्हणतात . या भागाची नकाशावर सापडलेली चित्रे आपल्या माहिती करता जोडत आहे .
शांत निवांत नर्मदा किनारा
नर्मदेने मारलेली उडी झूम करून पहावी
नर्मदेची अजून एक उडी
नीट पाहिले असता दोन खडकाच्या स्तरांमधील फरक लगेच जाणवतो .


नर्मदा जरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते तरी ही खचदरी दक्षिण उत्तर आहे हे विशेष उल्लेखनीय आहे .
इथे नर्मदेचा अतिशय सुंदर धीर गंभीर असा आवाज गरजत राहतो .इथे काही काळ शांतपणे बसून नर्मदेचा आवाज ऐकला की अजून काही ऐकण्याची इच्छाच शिल्लक राहत नाही . त्या दोन भूपट्ट्या वर खाली झाल्यामुळे नर्मदा मातेला इच्छा नसताना इथे मोठ्या उड्या माराव्या लागतात असे वाटते . उडी मारल्यावर ती पुन्हा शांतपणे वाहू लागते .  या भागामध्ये अनेक छोटे-मोठे ओढे नाले नद्या नर्मदेला येऊन मिळतात .खालील चित्रामध्ये त्या दाखविलेल्या आहेत .
निळ्या बाणाने दर्शविलेले जलस्त्रोत नर्मदार्पण होतात
इथून पुढे चालत असताना मध्ये राज घाट नावाचा एक छोटासा घाट लागला . इथे काही स्थानिक क्षत्रिय लोक एकत्र येऊन भोजनाची तयारी करत होते . एकाच कुटुंबातील लोक असले तरी एक बस भरून लोक आलेले होते . बायका स्वयंपाकाची तयारी करत होत्या मुले इकडे तिकडे खेळत होती तर पुरुष गप्पा मारत बसले होते . त्या आश्रमाच्या मधोमध एक यज्ञाचा कट्टा होता त्यावर आम्ही दोघे बसलो आणि त्यांनी आम्हाला गरमागरम चहा आणून पाजला . घाट अतिशय सुंदर होता आणि तिथून नर्मदेचे शांत स्वरूप पाहायला मिळत होते . मुलांशी गप्पा मारत दोघांनी चहा घेतला आणि सर्वांना नर्मदे हर केले .
सुंदर असा छोटासा रेखीव राजघाट
याच ओट्यावर माता-भगिनींची स्वयंपाकाची लगबग सुरू होती
या कट्ट्यावर बसून आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला
ते लोक खरे तर जेवून जा म्हणून आमच्या मागे आग्रह करत होते .परंतु पुढे दिंडोरी मोठे शहर आहे तिथे नक्की जेवायला मिळेल असे वाटल्यामुळे आम्ही मार्गक्रमणा सुरु ठेवण्याचे ठरविले .तशीही अजून जेवायची वेळ झालेली नव्हती .

इथून पुढे मात्र पुन्हा शेती सुरू झाली आणि नर्मदेच्या पात्रामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी खूपच अतिक्रमण केलेले आहे असे जाणवले . इतके दिवस कुठेही बंधन म्हणून न पाहिलेल्या मार्गाने चालून इथवर आल्यावर आता मात्र विविध प्रकारची काटे कुटे टाकलेली कुंपणे दिसू लागली आणि परिक्रमेचा मार्ग चक्क बंद केलेला आहे असे जाणवू लागले . परिक्रमा वासी ला जाताच येऊ नये अशा पद्धतीने सर्व कुंपणांची रचना केलेली मला स्पष्टपणे जाणवली . मध्ये एक मोठीच्या मोठी नदी आडवी आली . एका ठिकाणी नदीमध्ये उतरावे आणि ती पार करावी असे आम्ही दोघे ठरवू लागलो .आता काय करावे असा प्रश्न दोघांना पडलेला असताना नदीच्या पलीकडे एक माणूस आम्हाला आवाज देतो आहे असे लक्षात आले .त्याच्या दिशेला या असे त्याने खुणावले व आम्ही तिकडे गेल्यावर तिथे एक नदी ओलांडण्याचा तुलनेने सोपा मार्ग त्याने आम्हाला दाखविला .
नकाशातील लाल खुणेच्या जागी त्या माणसाने आम्हाला नदी पार करविली

आम्ही जिथून नदी पार करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे अतिशय खोल डोह होता आणि आम्ही कदाचित त्यात बुडू देखील शकलो असतो असे त्या माणसाने आम्हाला सांगितले . . 
या नदीचे नाव देखील गोमती आहे असे त्याने सांगितले . पूर्वी एक गोमती नदी लागली होती असे सांगितल्यावर ती हीच नदी आहे असे तो म्हणाला ! कदाचित ती गोमली नावाची नदी असावी असे वाटते . नर्मदेमध्ये एकाच नावाच्या अनेक नद्या येऊन मिळतात ! सगळा घोळच आहे , असो ! इथून पुढे शेतातून जाण्याचा एक मार्ग त्याने आम्हाला दाखविला . त्याचे आभार व्यक्त करण्याकरता आम्ही दोघांनी मागे वळून पाहिले तर तो मनुष्य दिसला नाही . कदाचित लघुशंका वगैरे करण्यासाठी कुठे बसला असेल असे वाटल्यामुळे आम्ही काही वेळ त्याची वाट पाहिली परंतु तो मनुष्य गायबच झाला .आजूबाजूला सर्वत्र मोकळी शेती असल्यामुळे लपण्यासारखी जागा कुठे नव्हती त्यामुळे आम्हाला दोघांना या गोष्टीची मौज वाटली ! नर्मदा मातेचा जयजयकार करत आम्ही पुढे चालू लागलो .आता खाजगी जागा मालकांच्या मोठ्या मोठ्या जमिनी लागू लागल्या व त्याला तारांचे किंवा जाळीचे कुंपण केलेले दिसू लागले . असे प्लॉट दिसले की मोठे शहर जवळ आले ओळखायचे .
बळीराम आणि मी दोघेही जण एकाच कुंपणापाशी येऊन अडलो . दोघांनी देखील ठरविले की काय वाटेल ते होऊ दे आपण या कुंपणावरूनच जायचे . आम्ही कसेबसे पुढे गेलो आणि असे लक्षात आले की पुढे खोल दरी वजा भाग असून मध्ये एका शेताला लोखंडी जाळीचे कुंपण लावलेले आहे . आम्ही त्या जाळीला धरून माकडासारखे आडवे आडवे पुढे जाऊ लागलो . आणि अखेरीस ती जाळी देखील संपली आणि खाली दरी मात्र तशीच राहिली साधारण ४० फूट खोल दरी असावी . आता मात्र आम्ही मध्ये अध्ये लटकलो होतो ! पुढे जायची सोय नाही मागे जाण्याची सोय नाही आणि खाली उतरायचे तर उडी मारणे देखील शक्य नाही ! नर्मदे हर असा धावा दोघांनी सुरू केला ! इतक्यात माझे लक्ष एका झाडाच्या मुळाकडे गेले . ते साधारण सात आठ फूट खाली होते . उडी मारून ते मूळ पकडले तर खाली उतरायला मार्ग होता .मुळाला पकडून ती खडकाळ दरी उतरण्याची शक्यता वाटत होती . मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता नर्मदे हर असे ओरडत वरची जाळी सोडून दिली आणि खाली उडी मारून ते मूळ पकडले ! माझ्या मागोमाग बळीराम देखील उडी मारून आला . आता बळीराम पुढे उड्या मारत खाली उतरू लागला . दगडांना शेवाळे असल्यामुळे तो सटकत होता ते पाहून मी अतिशय बेताबेताने खाली उतरलो . अखेरीस दोघेही किनाऱ्याला लागलो आणि समोर पाहतो तो काय एक अतिशय घाणेरडा नाला आम्हाला आडवा गेला होता .तो नाला इतका घाणेरडा होता की कल्पनाच करता येत नाही . त्याच्यामध्ये मानवी व्यक्तीच्या लेंड्या वाहत येत आहेत असे मला दिसले . त्या पाण्याला अतिशय दुर्गंध येत असून काळाकुट्ट रंग होता . आणि हा नाना चक्क नर्मदेमध्ये मिसळत होता . परिक्रमा सुरू केल्यापासून इतके घाण पाणी नर्मदेमध्ये थेट मिसळताना मी कुठेच पाहिले नव्हते . नर्मदेच्या उगमापासून नर्मदेला प्रदूषित करणारा हा पहिलाच जलस्त्रोत आहे असे मला आढळले . बर हा नाला पार करण्याकरिता आमच्या समोर दुसरा कुठला पर्याय नव्हता . त्यामुळे अखेरीस गुडघाभर पाण्यामध्ये पाय बुडवत तो नाला आम्ही अनिच्छेनेच पार केला . नाल्याच्या दुतर्फा देखील लोकांनी विष्ठेच्या रांगोळ्या काढून ठेवल्या होत्या . इतका गलिच्छ घाणेरडा आणि घृणास्पद प्रकार मी पहिल्यांदाच बघत होतो . छोट्या छोट्या गावांमध्ये देखील सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असताना या नगरपालिका असलेल्या शहराला साधे घाणेरड्या पाण्याचे नियोजन करता येऊ नये याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते . इतके दिवस अतिशय स्वच्छ निर्मळ आणि शुद्ध असलेल्या नर्मदा जलामध्ये किती घाणेरडे पाणी मिसळू शकते हे मी सर्वप्रथम या ठिकाणी पाहिले म्हणून त्याबाबत इतके सविस्तर लिहीत आहे . पुढे असे लक्षात आले की प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये सर्व सांडपाणी थेट नर्मदेमध्ये सोडले जाते . अशाप्रकारे नर्मदा नदीचे प्रदूषण करण्याचा कुठलाही अधिकार कोणालाही नाही . मी पूर्वी एके ठिकाणी नमूद केले आहे त्याप्रमाणे अशा प्रकारचे सांडपाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यामध्ये कमळाची झाडे जर लावली तर त्याच्या सांडव्यावरून शुद्ध पाणी बाहेर पडते . कमळाच्या झाडाला वाढीसाठी सांडपाण्यातील घटकांची आवश्यकता असते त्यामुळे ते सर्व घटक तिथे वापरले जातात आणि शुद्ध पाणी मात्र बाहेर पडते . आंबील ओढे नदीमध्ये सोडण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने दहा-बारा ठिकाणी अशी कमळ उद्याने केल्यास बाहेर पडणारे पाणी अतिशय स्वच्छ राहील याची खात्री वाटते . त्यासाठी फार मोठे काही करण्याची गरज नसून मध्ये फक्त धरणवजा भिंती बांधाव्या लागतील . असो . हा पहिला ओढा असे अजून काही घाणेरडे ओढेनाले ओलांडत अखेरीस दिंडोरी शहरामध्ये प्रवेश केला . जे परिक्रमावासी रस्त्याने प्रवास करतात त्यांना असे ओढे ओलांडायची वेळ कधी येत नाही .कारण त्यावर बांधलेल्या पुलावरून ते पुढे जातात . परंतु नर्मदेचा काठ न सोडण्याचा माझा अट्टाहास असल्यामुळे मला जागोजागी असे अनेक ओढे पुढे पार करावे लागले . राजघाटावर भोजन नाकारल्याची शिक्षा देण्याचे बहुतेक नर्मदा मातेने ठरविले . आणि इतके मोठे शहर असून आणि इतकी मनुष्य वस्ती असून देखील इथे भोजन प्रसाद देणारा एकही आश्रम नाही असे आमच्या लक्षात आले . भर दुपारची वेळ झाली होती आणि पोटामध्ये प्रचंड आग पडली होती . परंतु संपूर्ण दिंडोरी शहराचा घाट फिरल्यावर देखील आम्हाला एकही आश्रम सापडला नाही . दिंडोरी शहरातील नर्मदा मातेची काही स्वरूपे आपल्या दर्शनासाठी देत आहे .
समोरच्या उत्तर तटावरून दिसणारा दिंडोरी घाट
इथे नर्मदेला एक मोठा बांध घातलेला असून त्यावरून नर्मदेचे पाणी खळाळत वाहत असते

घाट औरस चौरस पसरलेला व मोठा असून येथे कायम भाविकांची गर्दी असते

नमामि देवी नर्मदे अशी चमकती अक्षरे पालिकेने लावलेली असून ती फार छान दिसतात
एक मोठा पूल बांधाच्या शेजारून गेलेला दिसतो
इतके मोठे शहर असून परिक्रमावासींची सोय मात्र फारशी कुठेच होत नाही
आम्ही दोघे चौकशी करत घाटावर फिरू लागलो तेव्हा कोणीतरी शेजारच्या रस्त्यावरील एका आश्रमात प्रसाद सुरू आहे असे सांगितले . ती एक गुजराती धर्मशाळा होती . परंतु तिथे भोजन प्रसाद संपला आहे असे सांगण्यात आले . म्हणजे तसे परिक्रमावासी येथे उतरतात वगैरे परंतु नर्मदा मातेला बहुतेक आम्हाला शासन करायचे होते त्यामुळे आम्हाला तिथे भोजन प्रसाद मिळाला नाही इतकेच .


हीच ती गुजराती धर्मशाळा जिथे परिक्रमावस्यांची सेवा होते
भुकेने कासावीस झालेले आम्ही दोघेजण पुढे मिळेल त्या माणसाला इथे कुठला आश्रम आहे का असे विचारत चालू लागलो . अखेरीस एका निनावी आश्रमाकडे एका माणसाने आम्हाला पाठविले . इथे अत्यंत अंधाऱ्या खोलीमध्ये एक पांढरी साडी नेसलेली म्हातारी स्त्री सर्व आवराआवरी करायला लागली होती . आम्ही दोघांनी जाऊन नर्मदे हर केल्याबरोबर तिने बसण्यासाठी आसन टाकले आणि ताटल्या काढण्याची सूचना केली . त्या अंधाऱ्या खोलीतच आम्ही टिक्कड आणि उरलासुरला आमटी भात चेपला आणि ताटवाट्या धुवून तिथून प्रस्थान ठेवले . हे करेपर्यंत दुपारचे दोन तीन वाजले असावेत . सकाळी एके ठिकाणी अन्नाला नाही म्हणाल्यामुळे त्यादिवशी आम्हाला अन्न मिळायला उशीर झाला अशी आमची धारणा आहे . पुढे देखील अशी अनुभूती अनेक वेळा आली . नर्मदा मातेची लीला अगम्य आहे हेच खरे ! नर्मदे हर !


लेखांक छत्तीस समाप्त (क्रमशः )

लेखांक ३७ : घनदाट जंगलातली चाल आणि नर्मदा बुढी माय संगम

दिंडोरी शहरांमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नव्हते . आणि इथला एकूण बकालपणा अस्वस्थ करत होता त्यामुळे लवकरात लवकर तिथून पुढे निघालो . इथे संघसंचलित इमलय कुटी नावाचा एक आश्रम आहे . बळीराम जाधव ला तो आश्रम बघायचाच होता . परंतु बाहेरून आश्रमाला कुलूप होते आणि आत मध्ये वनवासी मुले खेळत बसली होती . मी दारापाशी जाऊन चौकशी केली परंतु लॉकडाऊनमुळे आश्रम उघडणार नाही असे सांगण्यात आले . त्यामुळे त्या आश्रमाबाबत अधिक माहिती घेण्याची आमची संधी हुकली .
संघ संचलित इमलय कुटी वनवासी आश्रमातील विद्यार्थी ( संग्रहित छायाचित्र )
इथून पुढे काठा काठा ने चालण्याचा मार्ग बंद झाला . दिंडोरी गावानंतर नर्मदा मैया चक्क ९० अंशाचे वळण घेत काटकोणात वळते .या भागातून कोणीच परिक्रमावासी जात नाही असे आम्हाला जागोजागी सांगण्यात आले .पुढचा मुक्काम देखील जवळपास कुठे नव्हता .त्यामुळे भरपूर चालायची तरी ठेवा असे सर्वजण सांगत होते . त्यामुळे पायांनी गती घेत निघालो . मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ एका ब्राह्मणाचा धरम काटा अर्थात वे ब्रिज होता . त्याच्यावरती भरलेल्या ट्रकचे वजन केले जात असल्यामुळे याची अचूकता साधारण पाच किलोपर्यंत असते . दहाच दिवसांपूर्वी मी उत्तर तटावर धरम काट्यावर वजन केले होते तेव्हा झोळी सकट माझे वजन १०० किलो भरले होते आज माझे वजन झोळी सकट ९० किलो भरले ! म्हणजे सुमारे पाच दहा किलो मेद नर्मदेने जाळला होता ! त्याने त्याच्या कार्यालयामध्ये बसवून आम्हाला चहा पाजला .त्याने छापलेली नर्मदा परिक्रमेची पत्रके दिली तसेच पुढील सर्व गावांची माहिती वगैरे व्यवस्थित आम्हाला सांगितली . या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाला ठरवून कसे टार्गेट केले जाते हे देखील त्याने सांगितले . त्याला हा व्यवसाय उभा करताना किती अडचणी आल्या हे त्याने सांगितले . समोरच्या तटावर साहूच्या काट्यावर मी वजन केले होते हे सांगितल्यावर त्याने तो त्याचा मित्रच असल्याचे सांगितले . तसेच साहू लोक फार धार्मिक असतात अशी पुस्ती देखील त्याने जोडली . तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे सर्व का लिहितो आहे . इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला काही महत्त्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे प्रत्यक्षदर्शी माणसाने केलेल्या लिखित कागदोपत्री नोंदीचे महत्त्व ! मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे मला त्या त्या काळात जे जे प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळाले किंवा सांगण्यात आले त्याची लेखी नोंद मी त्याच दिवशी डायरीत करून ठेवलेली होती . ती कुठे हरवू नये म्हणून इथे देखील करून ठेवत आहे इतकेच . कदाचित काही लोकांसाठी हे सर्व मुद्दे संदर्भहीन वाटू शकतात .तसे ते आहेत देखील . परंतु माझ्या लेखक म्हणून असलेल्या अधिकाराचा गैरवापर करत मी हे सर्व मुद्दे डायरीमधून ब्लॉगमध्ये उतरवून ठेवत आहे तरी वाचकांनी उदार अंतःकरणाने पामराला क्षमा करावी ! या मनुष्याने आम्हाला पुढे जाण्याचा एक मार्ग सांगितला जो अतिशय निर्मनुष्य आणि निवांत रस्ता होता . मध्ये फक्त एक गाव होते आणि मोठी महाविद्यालयं तिथे होती .परंतु शिक्षणाचे एक वातावरण जाणवते तसे तिथे बघून काही जाणवत नव्हते कारण मनुष्य वस्ती फारच विरळ होती . 
दिंडोरी शहरानंतर नर्मदा मैया असे ९० अंशाचे वळण घेते
आम्ही मात्र बऱ्यापैकी या काटकोनाच्या वळणाच्या जवळूनच चाललो . लोक हे वळण सोडून सरळ निघून जातात तसे आम्ही केले नाही . त्यामुळे आमचे चालणे वाढले परंतु ते एका दृष्टीने बरे झाले . कारण सरळ गेल्यावर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो असतो तिथे फारसे आश्रम नव्हतेच . शिवाय बळीराम आणि मी दोघांनीही एकटे चालायचे ठरवले असल्यामुळे आम्ही म्हटले तर एकत्र चालत होतो परंतु दोघांमध्ये शंभर दोनशे मीटर अंतर ठेवून न बोलता आमची वाटचाल सुरू होती . त्यामुळे दोघांचा सहवास एकमेकांसाठी सह्य होता .  लोक दिंडोरी वरून निघून थेट शासकीय आदर्श महाविद्यालयापाशी पोहोचतात .तसे न करता आम्ही खालील प्रमाणे मार्ग निवडला .
आमचा मार्ग भगव्या रंगात
या वाटेने परिक्रमावासी फारसे जात नसल्यामुळे येथे आश्रम किंवा भोजन पाण्याची कुठलीही सुविधा नाही . दिंडोरी जबलपूर राज्य महामार्ग सोडल्यावर आम्ही थेट एका माळावरती आलो .या संपूर्ण रस्त्यावरती आम्हाला एकही मनुष्य भेटला नाही . परंतु या भागामध्ये बोराची एवढी झाडे होती की विचारूच नका . आणि प्रत्येक झाड फळांनी अक्षरशः लगडलेले होते .
परंतु परिक्रमेमध्ये कुठल्याही झाडावरची फळे तोडून खायची परवानगी नाही .त्यामुळे खाली पडलेली बोरे खात खात आम्ही पुढे निघालो . समोरासमोर जरी झाडे असली तरी त्यांची फळे आकार रंग आणि चव यात खूप फरक होता . मला खूप मजा वाटली . एकाही फळाची चव दुसऱ्या फळासारखी नव्हती ! काय चमत्कार आहे निसर्गाचा ! हे अंतर तासा दोन तासांमध्ये आम्ही तोडले आणि एक मोठा रस्ता लागला . थोडेसे चालल्यावर शासकीय आदर्श महाविद्यालय आले आणि त्याच्या शेजारी मध्य प्रदेश पर्यटन विभागाने बांधलेली एक कुटी आहे तिथे परिक्रमावासींची मुक्कामाची सोय होते असे आम्हाला सांगण्यात आले .
लाल बिंदू म्हणजे ती कुटी

 इथे नर्मदा पुन्हा एकदा वळण घेऊन सरळ वाहू लागते . इथे नर्मदा दक्षिणवाहिनी असल्यामुळे एकूणच संपूर्ण परिसर बकाल होता आणि आश्रमाची देखील वाट लागलेली होती . आश्रम कुठला ती फक्त एक बांधलेली खोली होती आणि आत मध्ये नुसता सावळा गोंधळ होता ! पुढे एका साधूने मला सांगितले की नदी उत्तर वाहिनी असेल तर शुभ मानतात आणि दक्षिण वाहिनी अशुभ मानली जाते . परंतु हे माहिती नसताना देखील त्या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड नकारात्मकता भरली आहे हे मी स्वतः अनुभवले होते आणि तसे वहीत लिहून देखील ठेवले होते . असो . हे एक छोटेसे टेकाड होते आणि त्या टेकडाच्या वरती सरकारने एक मोठीच्या मोठी खोली बांधली होती व त्याला पत्रे वगैरे लावले होते . टेकडी उतरल्यावर शिवघाट नावाचा एक अतिशय छोटासा घाट नर्मदेवर काँक्रीट मध्ये बांधला होता . खरे तर इथून नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होत होते . परंतु त्या संपूर्ण वातावरणात भरलेल्या नकारात्मकतेमुळे तिथून निघून जावे असे सारखे वाटत होते !  त्या खोलीमध्ये आधीच दहा-बारा वयोवृद्ध माणसे राहत होती . एक म्हातारा मनुष्य आणि त्याचा गांजाडा तरुण मुलगा असे दोघे मिळून येथे परिक्रमावस्यांची सेवा करत होते . सेवा म्हणजे काय तर तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला जेवायला घालतो अशा मोडवर त्यांचे काम चालले होते . ते काही साधू नव्हते त्यामुळे त्यांना कुठूनही शिधा वगैरे मिळत नव्हता . त्यांना स्वतःला राहायला जागा मिळाली होती इतकेच ! कुटी आतून अतिशय गलिच्छ अस्वच्छ आणि विस्कटलेली होती .बऱ्याच दिवसात तिथे कोणी झाडू देखील मारलेला दिसत नव्हता . मी गेल्या गेल्या स्वच्छता मोहीम हातात घेतली आणि संपूर्ण कुटी चकाचक केली . बाहेर अंगण देखील उखडलेल्या अवस्थेमध्ये होते . ते देखील स्वच्छ केले . घाटावरती स्नानासाठी गेलो . 
शिव घाट दिंडोरी
घाटावरून आणि आश्रमातून होणारे नर्मदेचे अद्भुत दर्शन (संग्रहित चित्र )
पावसाळ्यातील संग्रहित छायाचित्र
या संग्रहित चित्रामध्ये नर्मदा मैया , वरती डाव्या हाताला आश्रम आणि उजवी कडे उतरणारा घाट असे सर्व दिसत आहे . याच घाटावर मी बसलो होतो
 . (सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार )
थंडी असल्यामुळे बळीराम स्नान करणार नव्हता परंतु मी जमेल तितक्या वेळा नर्मदेमध्ये स्नान करून घेत असे . ही संधी काही रोज रोज मिळणारी नव्हती ! आणि मुख्य म्हणजे त्या स्नानाने दिवसभर चालून आलेला थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा ! मी घाट उतरून खाली गेलो तर तिथे एक मच्छीमार मासे पकडत बसला होता . त्याचे डोळे घारे होते . मी बराच वेळ त्याचे निरीक्षण करत होतो . त्याने मासेमारी मधल्या बऱ्याच गमती जमती मला सांगितल्या . गळ टाकून मासेमारी करणे हा केवळ एक व्यवसाय नसून तपस्या आहे . कारण कधी कधी तीन चार तास झाले तरी तुमच्या गळाला काहीच लागत नाही . एखादा दिवस असा येतो की दिवसभरात एकही मासा मिळत नाही आणि एखाद्या दिवशी एकदम ३० - ४० मासे देखील मिळतात . गरीब मच्छीमारांसाठी दोन्हीही अवस्था वाईटच . कारण मासे मिळाले नाहीत त्या दिवशी त्यांना उपाशी झोपावे लागते आणि ज्या दिवशी इतके मासे मिळतात तेवढे विकत घेणारे गिऱ्हाईक कोणी नसते आणि मासे टिकवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नसते त्यामुळे ते मासे वाया जातात . त्यामुळे हे लोक पोटापुरते मासे मिळाले की लगेच घरी जातात . मी त्याला विचारले की तुझे आजचे टार्गेट काय आहे ? त्याने सांगितले मला दोन मध्यम मासे मिळाले की मी घरी जाणार . तेवढ्या मध्ये चार जणांचे पोट भरते . मी पाण्यामध्ये हळूहळू उतरलो . इथे पाण्यामध्ये मोठे मोठे खडक आडवे तिडवे पडले होते त्यामुळे खूप धोकादायक पात्र होते . परंतु पाणी स्वच्छ असल्यामुळे तळ दिसत होता तो एक फायदा . मी तीन डुबक्या मारून वर येतो तोपर्यंत याला खूप मोठा मासा सापडला . तो माझ्यामुळेच सापडला , अन्यथा गेले सहा तास त्याला काहीच मिळाले नव्हते ,असे श्रेय मला देऊन तो मनुष्य घरी निघून गेला .मी बाहेर येऊन अंग पुसले आणि बसल्या बसल्या चिंतन करू लागलो की समजा माझ्यामुळे याला मासा मिळाला तर मी पुण्य केले की पाप केले ? कारण याचे जरी पोट भरले तरी एक जीव जीवानिशी गेला त्याचे काय ! त्यामुळे मुळात कुठल्याही गोष्टीचे कर्तुत्व स्वतःकडे न घेणे हे एक फार सोयीचे ठरणारे कृत्य आहे . याचा अर्थ किंकर्तव्यमूढता नव्हे . परंतु कुठलेही कर्म केले तरी त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवणे हे फार म्हणजे फार सोयीचे ठरते . जीवो जीवस्य जीवनम् हेच खरे असा विचार करत मी पुन्हा कुटीमध्ये आलो . बघतो तो समोर काही जिवांनी धुडगूस घातलेला होता ! जिकडे बघावे तिकडे उंदीरच उंदीर दिसत होते ! त्या उंदरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता . कुटीमध्ये इतकी माणसे असून देखील त्यांना त्याचा काहीही फरक पडताना दिसत नव्हता . आपापले सामान जपून ठेवणे याला पर्याय नव्हता . विशेषतः पूजा साहित्यामध्ये असलेल्या तुपाच्या वाती हे या उंदरांचे आवडते खाद्य होते . इथे वीज देखील नव्हती पाणी देखील नव्हते त्यामुळे ती रात्र फार मजेशीर गेली . शेजारी वाहणारी थंडगार नर्मदा मैया , वरती गारठलेले पत्रे , गार पडलेली फरशी आणि जोरदार वारे ! मला त्या ब्लॅंकेटचा तिथे फारच फायदा झाला . इथे बळीराम आणि मी दोघांनी भजने म्हटली . त्याने काही पुस्तके आणली होती ती तो उजेड आहे तोपर्यंत वाचत होता . अंधार पडल्यावर दोघांनी पूजा करून घेतली आणि भजन सेवा झाली त्यानंतर त्या म्हाताऱ्या माणसाच्या मुलाने आम्हाला नुसता भात खाऊ घातला .  कोपऱ्यात केलेल्या एका चुलीवर मातीच्या मडक्यामध्ये केलेला सुंदर असा भात ! त्या भाताला अमृताची चव लागत होती ! भातावरती घालायला मसाला किंवा मीठ नसले तरी म्हाताऱ्याने डोळे मोठे मोठे करून सांगितलेल्या गोष्टींमुळे खूपच मिर्चमसाला आम्हाला मिळाला ! गेल्या आठवड्यात या ठिकाणी रात्री एक मोठी पट्टेरी वाघीण आणि तिचे दोन बछडे आले होते , ते कसे आले आणि म्हातार्‍याला कसे काय दिसले याचे रसभरीत वर्णन त्याने आम्हाला करून सांगितले ! वाघीण कशी गुरगुरत होती हे सांगताना त्याचे डोळे बघून मला फार हसू येऊ लागले ! त्याने नर्मदा मातेचा धावा केल्यावर वाघिणी शांतपणे निघून गेली हे सांगायला देखील तो विसरला नाही . 

वाघिणीने म्हातार्‍याला नेले असते तर किती बरे झाले असते वगैरे बोलून त्याचा मुलगा मध्येच फोडणीला तडका देत होता ! तर बापा पेक्षा तूच गेला असतास तर बरे झाले असते असे आजूबाजूला बसलेले म्हातारे त्याला डिवचत होते . तिथल्या भेसुर गरिबीला ही विनोदाची श्रीमंती लाजवत होती ! यातला गमतीचा भाग सोडला तर एकंदरीत वनवासी क्षेत्रातील लोकांनी वाघाचे सह अस्तित्व किती सहजपणे स्वीकारले आहे हेच या गप्पांमधून माझ्या लक्षात येत होते . वाघाने कोणाला मारले तर त्याचा फारसा बाऊ इथले लोक करत नाहीत . मला आधी वाटले की हा मनुष्य बाता मारतो आहे म्हणून मी हसण्यावारी नेले परंतु मी फार हसतो आहे पाहिल्यावर त्याने मला सांगितले की उद्या सकाळी तुला मी वाघाचे ठसे दाखवतो .  मी त्याला आत्ताच दाखव असे सांगितले त्यावर त्याने मला सांगितले की साधारण याच वेळी त्याला वाघ दिसला होता त्यामुळे आता आपण बाहेर जाणार नाही तर उद्या सकाळी उजाडल्यावर नक्की ठसे दाखवितो . ती रात्र छान झोपेत गेली . दोन ब्लॅंकेट असल्यामुळे थेट सकाळी जाग आली . रात्रभर माझ्या डोक्यात वाघाचे पंजे राहिले होते त्यामुळे उठल्या उठल्या मी म्हाताऱ्या जवळ गेलो आणि मला पंजे दाखवायची विनंती केली . त्याने मागच्या बाजूला चिखलामध्ये नेऊन मला तिथे उठलेले पंजे दाखवले . हे एखाद्या मोठ्या मांजराचे किंवा कुत्र्याचे पंजे असावेत असे मला वाटले . तसे मी म्हाताऱ्याला म्हणालो देखील परंतु नंतर त्याने मला वाघिणीच्या पायाचे ठसे दाखवले आणि मग मात्र माझी खात्री पटली की हे पंजे खरोखरच वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे होते .

 इथून बांधवगड आणि कान्हा हे दोन्ही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प तसे जवळ आहेत त्यामुळे तिथले वाघ येथे येत राहतात . 
बांधवगड आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पांना दिंडोरी मध्यवर्ती पडते . उजव्या बाजूला अमरकंटक आणि अचानकमार व्याघ्र प्रकल्प दिसतो आहे .

सकाळी मी पुन्हा एकदा स्नान करून आलो आणि पिता पुत्राने चांगली सेवा दिली म्हणून माझ्याजवळ असलेले पन्नास रुपये त्यांना दिले . दोघांना खूप आनंद झाला . सकाळी बाहेर पडल्या पडल्या धुक्यामध्ये हरवलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४ ब  लागला . ( NH 54 B ) . इथून पुढचा संपूर्ण रस्ता डोंगर आणि जंगल असा होता त्यामुळे नर्मदे काठी चालण्यासाठी मार्ग नाही तसेच वन्य श्वापदे असल्यामुळे इथून कोणालाही जाऊ दिले जात नाही . तसेच हा हमरस्ता नर्मदेला समांतर जात असल्यामुळे परिक्रमावासी हाच मार्ग निवडतात . या रस्त्यावरती एका मागोमाग एक अनेक चढ-उतार आणि घाट होते . सोबत अतिशय घनघोर असे आरण्य ! वातावरण थंड होते त्यामुळे भरपूरच चालणे त्या दिवशी झाले . सुमारे ३० किलोमीटर सलग चालत हर्रा टोला नावाचे गाव गाठले . इथे वाटेमध्ये एक पुण्याचे बनकर म्हणून काका आणि अजून एक वयोवृद्ध आजोबा अशी दोन माणसे ओळखीची झाली . दोघे प्रचंड वेगाने चालत होते . मध्ये शंभर दोनशे मीटर अंतर ठेवून मी पायाच्या तालावर जप करत झपाझप चालत होतो . आज खूप दिवसांनी चालण्याला लय सापडल्यासारखे वाटत होते . घाट वळणावळणाचा असला तरी परिक्रमावासिनी मधले जंगलातले शॉर्टकट रस्ते निर्माण केलेले आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला . तसेच पंच्याहत्तरी गाठलेले म्हातारे लोक ज्या चपळाईने चालताना मला दिसत होते त्यामुळे मी देखील मोठ्या हिकमतीने चालू लागलो !
 यातले पांढरे शुभ्र दाढी झालेले काका चालायला सर्वात जास्त तयार होते . ते रोज पहाटे तीन साडेतीनला उठून चालायला सुरुवात करायचे . आणि कधी कधी तर दिवस मावळेपर्यंत कमीत कमी ६० - ६५  किलोमीटर अंतर तोडायचे . त्यांच्यासोबत पुण्याचे अवधूत बनकर म्हणून परिक्रमावासी होते . यांना साखरेचा त्रास होता . त्यांनी माझ्यासमोर एकदा शुगर मोजली . आणि रागाने शुगर मोजायचे ते यंत्र आणि पट्ट्या सर्व त्यांनी दरीमध्ये फेकून दिले ! आणि म्हणाले आता जे काय व्हायचे ते होवो ! नर्मदा मैया ची इच्छा ! पुढे काही दिवस थोड्याफार अंतराने ते मला मुक्कामावर भेटायचे परंतु त्यांना कुठलाही त्रास झाला नाही . चालताना मधेच एक मोठा आडवा ओंडका पडलेला बळीराम ला दिसला त्याच्यावर तो बसला . त्याचे पाहून बनकर काका व आजोबा देखील बसले . मी शक्यतो एकदा चालायला सुरुवात केली की मध्ये फारसा थांबत किंवा बसत नसे . परंतु त्यांच्या आग्रहाखातर तिथे झोळी खाली ठेवली आणि त्यांच्यापैकी एकाच्या मोबाईलवर त्या तिघांचा फोटो मी घेतला . तो फोटो आपल्या करिता खाली देत आहे .
डावीकडे प्रस्तुत लेखकाची झोळी ,त्यानंतर आजोबा ,श्री बनकर काका आणि बळीराम जाधव हे परिक्रमावासी ओंडक्यावर निवांत बसलेले.

बळीराम फार वेगाने चालायचा त्यामुळे तो पुढे निघून गेला . एका वळणावर एक गाडी थांबली होती त्याच्यामध्ये चार-पाच तरुण मुले गांजा पीत बसली होती . त्यांनी बळीराम ला थांबविले व गांजा प्यायला दिला . हा बाबाजी देखील मस्त झुरका घेऊन पुढे निघाला ! तसा वैयक्तिक आयुष्यामध्ये हा तरुण निर्व्यसनी होता . किमान असे त्याने मला सांगितले होते . परंतु हा प्रकार पाहिल्यावर त्याने मला सांगितले की मी हा नर्मदेचा प्रसाद म्हणून एक झुरका घेतला . असो ज्याची त्याची श्रद्धा . मला खूप ठिकाणी असा प्रसाद मिळून देखील मी तो नम्रपणे नाकारला . बाकी बळीराम हा मुलगा एका छोट्या खेडेगावात राहत असून देखील संपूर्ण भारताचा एक राष्ट्र म्हणून अतिशय मनापासून निष्ठेने सखोल विचार करीत होता ही गोष्टच फार आशादायक होती . त्याचा विवेक अतिशय जागृत होता असे मला वेळोवेळी जाणवले त्यामुळे मी त्याला काहीही बोललो नाही . हर्रा टोला गाव गाठेपर्यंत अंधारून आले होते .इथे गावामध्ये बाजार भरलेला होता . रस्त्याच्या उजव्या हाताला एक सुंदर असा शेणाने सारवलेला आश्रम होता . आश्रमाच्या मधोमध एक पांढऱ्याशुभ्र रंगाचे छोटेसे पण मजबूत मंदिर बांधले होते . एका बाजूला उंचावर साधू राहत होते आणि खाली परिक्रमावासींसाठी झोपड्या तयार केल्या होत्या . 
 हर्रा टोला आश्रम व साधू कुटी
 मी राहिलो ती झोपडी आणि तिचे अंधारे दार
आश्रम एका ओढ्याच्या काठावरती होता . त्यामुळे प्रचंड थंडी होती . आत मध्ये एक धुनी होती .परंतु या आश्रमामध्ये आधीच २५ - ३० परिक्रमावासी येऊन उतरलेले होते . इतके परिक्रमा वासी एकत्र पाहण्याची मला तरी सवय नव्हती कारण मी इतके दिवस एकटाच चालत होतो . हा महामार्ग असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी अमरकंटक वरून हाच रस्ता पकडून चालायचे . मी अमरकंटक वरून जंगलाच्या मार्गाने येथे आलो आहे हे कळल्यावर त्यातील काही लोकांनी हे कसे शक्य नाही वगैरे सांगायला सुरुवात केली . माझ्या पाच परिक्रमा झाल्या आहेत माझ्या दहा परिक्रमा झाल्या आहेत अशी दर्पोक्ती करणारे हे परिक्रमा वासी होते . पुन्हा एकदा अनुमान विरुद्ध अनुभव असे द्वंद्व इथे दिसून आले . अमरकंटक मार्गे येथे येण्यासाठी जंगलातील मार्ग असूच शकत नाही असे त्या सर्व तथाकथित अनुभवी परिक्रमावासींचे अनुमान होते . आणि त्या पद्धतीने मी येथवर पोहोचलो आहे हा माझा स्वानुभव होता . अशा प्रसंगी मौनम् सर्वार्थ साधनम् हे किती श्रेष्ठ धोरण आहे याची कल्पना मला आधीच मोहन साधूने दिलेली असल्यामुळे मी शांतपणे सर्वांची मते ऐकत राहिलो व अजिबात व्यक्त झालो नाही . एकट्याने परिक्रमा करण्याचे महत्त्व मला त्या रात्री कळले . एकापेक्षा एक भयानक परिक्रमा वासी परिक्रमे मध्ये होते ! दुर्दैवाने असे नमूद करावेसे वाटते की त्यातील बहुतांश लोक हे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी असावेत असे वाटत नव्हते किंवा अत्यंत असमाधानी दिसत होते . परिक्रमेमुळे एक तर तुम्हाला टोकाचा अहंकार येऊ शकतो किंवा मग तुमचे सारे मी पण गळून पडू शकते . तुम्हाला यातील काय हवे आहे हे ज्याचे त्याने निवडायचे असते . काठाने चालणे किती भाग्याचे आहे हे मला त्या दिवशी कळले . एकतर बहुतांश लोकांना वयानुसार आलेला अनुभवाचा अहंकार होता . काही जणांना परिक्रमा किती वेळा केली त्या संख्येमुळे आलेला अभिमान होता . काही जणांना आम्ही एका दिवसात किती अंतर तोडतो हे दाखविण्याची खुमखुमी होती . काही जणांना त्यांना सर्व कसे कळले आहे हे सांगायची घाई होती . मोठमोठ्या आवाजामध्ये बोलून आपापसामध्ये वाद विवाद चर्चा संवाद असे सर्व सुरू होते . इतका गोंगाट ऐकायची सवयच मला राहिलेली नव्हती . त्यामुळे मी आपले स्नान पूजा अर्चा वगैरे आटपून घेण्याचा निर्णय घेतला . बाजार म्हणजे रस्त्यावर बसलेले काही विक्रेते होते . सुमारे शंभर एक माणसे विविध गोष्टी खरेदी करत होती . आश्रमामध्ये पाण्याची सोय नव्हती व मागे असलेला ओढा मी पाहून आलो तो फारच धोकादायक होता . त्यामुळे समोर असलेल्या हातपंपावर स्नान करायचे असे मी ठरविले . थंडीचा कडाका वाढला होता .सुमारे सात डिग्री सेल्सिअस तापमान असावे . मी पटापट वस्त्रे काढली आणि त्या हातपंपावर थंडगार पाण्यामध्ये सर्वांसमोर स्नान करू लागलो . कान टोपी मफलर स्वेटर घातलेले आणि जागोजागी शेकोट्या करून बसलेले लोक आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते . माझी थंडी पाचच मिनिटात पळून गेली . 
स्वच्छ अंग पुसून धूत वस्त्र नेसून मी पूजेला बसलो . या सर्व लोकांशी चर्चा करायची नसेल तर काहीतरी साधना आपण करतो आहोत असे दाखवणे अत्यावश्यक होते . त्यामुळे मी बराच वेळ पूजाअर्चा करण्यात घालविला ! 
या निळ्या गोलात दिसणाऱ्या हातपंपावर मी स्नान केले . 
मी एक कोपरा पकडला होता . त्या कोपऱ्यामध्ये ओढ्याच्या बाजूने भरपूर वारं येत असल्यामुळे कोणी तिथे आसन लावत नव्हते . माझ्या जवळचे एक ब्लॅंकेट लावून मी तो वारा पहिला बंद करून टाकला . इथे कुटीला भिंती न बांधता झाडांचे तट्टे लावले होते त्यातून वारे आत शिरायचे . 
असे तट्टे लावले किंवा वारे इकडून तिकडे सहज जाते
प्रेरणा मूर्ती भारती श्रीजी नामक कोणी महिला संत हा आश्रम चालवीत होत्या .

एवढ्या सार्‍या लोकांचे भोजन कोण बनविणार असा प्रश्न मला पडला त्यामुळे मी बाहेर पाहणी करायला गेलो . तिथे राहणारा साधू आधीच अतिशय वैतागला होता . कारण संसारी परिक्रमावासी साधूंना फार त्रास देतात . त्यातील बहुतांश लोकांचा असा मूढ भाव असतो की जणू काही त्यांना सर्व सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून त्या त्यांना ताबडतोब जिथल्या तिथे मिळाल्याच पाहिजेत ! हे अत्यंत चुकीचे आहे . असो .
परंतु तिथे आदिनाथ नावाचा एक अतिशय चाणाक्ष तरुण मुलगा होता .विशेष म्हणजे त्याचा आज २४ वा वाढदिवस होता . त्या प्रीत्यर्थ त्याने आज सर्वांचा स्वयंपाक स्वतः केला आणि स्वतः सर्वांना जेवायला वाढले .गरमागरम जेवण वाढून त्याने सर्वांना खुश केले . मी सोबत असलेल्या दक्षिणेच्या पैशातून बाजारातून मिठाई खरेदी करून आणली आणि त्याला भरविली . मिठाई म्हणजे गुडदाणी रेवडी वगैरे मालाचा ढीग ! सारेच पौष्टिक . मुलगा अतिशय गुणी होता .गुटगुटीत दिसणारा आदिनाथ दुसरी परिक्रमा करत होता . तो बसल्या बसल्या तुळशीच्या लाकडापासून सुंदर माळा बनवायचा आणि लोकांना द्यायचा . परंतु तो संपूर्ण परिक्रमा रस्ता मार्गाने करत होता त्यामुळे त्याने सांगितले की परिक्रमा २८०० किलोमीटर आहे . सडक मार्गाने तेवढी ती असेल देखील .परंतु काठाकाठाने चालल्यावर परिक्रमेचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढते याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी . नर्मदेचे प्रत्येक वळण आत आणि बाहेर तुम्ही चालता त्यामुळे अंतर वाढत जाते . असो .
सोबत एक घारे डोळे असलेले बडोद्याचे तेजस्वी काका होते . त्यांच्या घरी दत्तोपासना होती . दत्ताच्या प्रकट पादुका होत्या . त्यांनी त्यांचा बडोद्याचा पत्ता मला लिहून दिला .
संजय वासुदेव देहाडराय .
दत्तप्रसाद , रेड क्रॉस बिल्डिंग मार्ग , 
खारे वाव रोड 
पोस्ट ऑफिस रावपुरा 
वडोदरा
रात्री साधूने आश्रमाचा सही शिक्का दिला .
माझ्या वहीतील आश्रमाचा शिक्का . हा माझा २३ वा मुक्काम होता . शिक्यातील शब्द असे :
प्रेरणामूर्ती भारती श्रीजी 
प्रभू मै तेरा नर्मदा अन्नक्षेत्र दक्षिण तट
ग्राम हर्रा टोला जिला डिण्डौरी ( मध्य प्रदेश )
फोन क्रमांक दिसत नाही
 मी आसन लावले होते तिथे समोर मारुतीची मूर्ती होती . त्यामुळे मारुतीची उपासना करून त्या रात्री मी झोपी गेलो .पहाटे तीन वाजता ते आजोबा उठले आणि आवरून चालायला लागले . ते दुपारी अकरा वाजेपर्यंत पुढचा मुक्काम गाठत आणि तिथून पुढे पूर्ण वेळ विश्रांती घेत . त्यांच्यापाठोपाठ बनकर काका देखील निघाले . परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय चालायला सुरुवात करायची नसते हे मला माहिती होते . परंतु आज खूप अंतर चालायचे आहे असे सर्व अनुभवी परिक्रमावासी रात्रीच सांगत होते . आणि संपूर्ण सडक मार्ग होता त्यामुळे पहाटे पाच वाजता निघण्याचा निर्णय मी देखील घेतला . बाहेर प्रचंड अंधार होता . घनदाट अरण्यातून जाणारा हा सर्व मार्ग होता . प्रचंड चढ उतार होते . दमवणारे चढ आणि पळविणारे उतार होते . हे संपूर्ण सागवानाचे जंगल होते . रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून निघाला होता . ही खरे तर वन्य श्वापदांची परतण्याची वेळ असते . त्यामुळे मी शक्य तितक्या सावधपणे चालत होतो . इतक्यात खूप भयंकर आवाज जंगलामध्ये झाला . काहीतरी धप्पकन पडल्याचा तो आवाज होता . थोड्यावेळाने हा आवाज सारखाच यायला लागला . मग माझ्या लक्षात आले कि ती सागवानाची पाने पडत आहेत ! त्याचा आवाज त्या शांततेत फारच भीतीदायक वाटत होता .  दीडदोन फुटी आकाराची अजस्र पाने पडत होती . सर्वत्र दमट ओलसर गारवा पसरला होता . हाडे गोठवणारी थंडी सर्वत्र साचली होती . फक्त एखादे मोठे झाड आले की त्याच्याखाली रात्री त्याने सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे गरम वाटायचे पुढे पुन्हा गार वाटू लागायचे . 
हळूहळू उजाडायला लागले तसे पक्षी विविध दिशांनी ओरडायला लागले . इतका वेळ एकटे भासणारे ते जंगल प्रत्यक्षात किती गजबजलेले आहे याचीच ती साक्ष होती . मी आज एका विशिष्ट गतिमान चालीने चालायला सुरुवात केली . आणि सर्वांना मागे टाकत आज मी विक्रमी ५० किलोमीटर अंतर चाललो !
घनदाट अरण्यातून एकटे चालताना थोडीफार भीती वाटायची परंतु भीती हारी नर्मदेचे स्मरण केले की सर्व सुरळीत व्हायचे . चालता चालता दोन घाट उतरलो . नर्मदा उगमापासून समुद्रापर्यंत उतारानेच वाहते आहे त्यामुळे या दक्षिण ताटावर संपूर्ण उतार अनुभवायला मिळतो . अखंड चालत देवगाव संगम गाठला .इथे बुढी माय नावाची नदी नर्मदा मातेला काटकोनामध्ये येऊन मिळते .
 नर्मदा- बुढीमाय संगम श्री क्षेत्र देवगांव
 दोन्हीही नद्या अतिशय जुन्या आणि भव्य पात्रे असणाऱ्या आहेत . पैकी बुढीमाय पसरट पात्रातून शांतपणे वाहते आणि नर्मदा मात्र प्रचंड वेगाने उतारावरून वाहत येते .त्यामुळे अक्षरशः उड्या मारत , उसळत , खळाळत ,फेसाळत खाली येताना दिसते . तिचे हे अतिशय भयानक आणि रौद्ररूप आहे . खालील चित्रात दिसतो आहे तसा अंधार पडू लागला होता त्यामुळे तत्काळ स्नान करण्याचा निर्णय घेतला . परंतु पाण्याचा प्रवाह इतका भयंकर होता की त्यात उतरणे शक्यच नव्हते . इथे एक गमतीशीर प्रकार घडला . माझ्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे नर्मदा मैया इतक्या वेगाने वाहत होती की मी ज्या दगडी घाटावर बसलो होतो त्या घाटाच्या वर दोन ते अडीच फूट तिच्या लाटा उसळत होत्या . परंतु हे पाणी घाटावर सांडायच्या आधीच पुढे निघून जात होते . त्यामुळे मी त्या घाटाच्या अगदी कडेला गेलो आणि उसळणाऱ्या लाटांमधून कमंडलू ने वरचेवरच पाणी घेऊन आंघोळ केली ! या पाण्याला भयंकर गती आणि प्रवाह होता . त्याच्या खळखळाटांमध्ये आजूबाजूचे काहीही ऐकू येत नव्हते . जे दोन घाट मी उतरत आलो होतो साधारण त्याच उंचीवरून नर्मदा खाली येत होती . मला मुक्काम करण्याची गरज असल्यामुळे माझी गती मंदावली होती परंतु तिला कुठल्याही मर्यादा नव्हत्या त्यामुळे ती बेफाम सुटली होती !

कट्ट्याच्या वरून उसळून वाहणारे नर्मदा जल
देवगाव संगम येथील स्वच्छ निर्मळ फेसाळणारे खळाळणारे नर्मदा जल
रम्य संगम क्षेत्र देवगाव संगम .डावीकडे नर्मदा उजवीकडे बुढी माय
देवगाव संगमावर पर्वणी मध्ये स्नानासाठी होणारी गर्दी
रम्य देवगाव संगम .डावीकडे बुढी माय तर उजवीकडून नर्मदा येते आहे व समोर जाते आहे
उथळ परंतु वेगवान नर्मदा
श्रीक्षेत्र देवगाव संगम

संगमावर भर थंडीमध्ये आंघोळ करून झाल्यावर माझ्या अंकात एक वेगळे चैतन्य संचारले . आणि त्याच्या बळावर तो प्रचंड मोठा उताराचा घाट मी अतिशय वेगाने एका दमात चढत वरपर्यंत गेलो ! विशेष म्हणजे मला जराही दम लागला नाही ! नर्मदा जलामध्ये फार मोठी ताकद सामावलेली आहे याची प्रचिती तुम्हाला वेळोवेळी येत राहते . असेच स्नान तुम्ही अन्य कुठल्या नदीमध्ये केल्यावर तुम्हाला इतकी शक्ती प्राप्त होईलच असे सांगता येत नाही . नर्मदा जल की बात ही कुछ और है !
संगमाकडे उतरणाऱ्या तीव्र उताराच्या पायऱ्या . वरती धर्मशाळा दिसते आहे

इतिहासातील प्रसिद्ध जमदग्नी ऋषी यांची तपोभूमी म्हणून हा संगम प्रसिद्ध आहे . यांचे इथे एक मंदिर बांधलेले असून अन्य देखील छोटी मोठी एक दोन मंदिरे आहेत . नर्मदेच्या काठावर शंकराची मंदिरे आहेतच आहेत . आणि त्यातील सर्व शिवलिंगे नर्मदेश्वरच असतात . अर्थात नर्मदेमध्ये सापडलेले बाणच शिवलिंग म्हणून वापरले जातात .
देवगाव ही जमदग्नी ऋषींची तपोभूमी आहे व त्यांचे एक मंदिर तिथे बांधलेले आहे
अन्यही काही मंदिरे येथे दिसतात
देवगाव संगम येथील धर्मशाळा फार प्रशस्त व सुंदर आहे
देवगाव संगम येथील धर्म शाळेचे प्रवेशद्वार
धर्मशाळेमध्ये परिक्रमावासी अशा पद्धतीने मुक्काम करतात
देवगाव संगम आश्रमामध्ये काही मराठी परिक्रमावासी भेटले .एक नाशिक भागातले दांपत्य होते ज्यांची ही दुसरी परिक्रमा सुरू होती . हे दोघेही जनार्दन स्वामी ( जटाधारी ) यांचे शिष्य होते . अजून एक हिंदी भाषिक परिक्रमावासी माझ्या शेजारी होता त्याला प्रचंड ताप आणि खोकला येत होता . 

मी ठीक याच कोपऱ्यामध्ये मुक्काम केला होता व आता मनुष्य झोपलेला दिसतो आहे तिथे एक तापाने फणफणलेला परिक्रमा वासी होता .
साधू मात्र संसारी परिक्रमा वासींसोबत शक्यतो मुक्काम करत नाहीत तर बाहेर उघड्यावर एखादे तखत लावून त्यांचा डेरा पडतो
आश्रमाला सुंदर चिरेबंदी भिंत असून आत मध्ये भांडी धुण्याची कपडे धुण्याची वगैरे सोय केलेली आहे .
सीमा भिंतीच्या आत मध्ये कपडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती तिथे जाऊन मी माझे सर्व कपडे धुऊन वाळत टाकले . गावातील काही सेवेकरी इथे येऊन सेवा करून जात . तसा एक मनुष्य आला आणि त्याने उत्तम पैकी स्वयंपाक करून सर्वांना जेवायला वाढले . नर्मदेचा जयजयकार करत भोजन प्रसाद घेतला आणि निद्रादेवीच्या आधीन झालो .
धर्मशाळेमधील नर्मदा मातेची मोहक मगरारूढ मूर्ती
मी स्नान केले ती जागा 
सकाळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खळाळत्या पाण्यामध्ये बाहेरून कमंडलू घालत स्नान केले .
आश्रमातील एका सेवेकर्‍याने येऊन सही शिक्का दिला .
मा रेवा प्रसादी प्रकल्प देवगाव संगम जिल्हा मंडला यांचा माझ्या वहीतील शिक्का . हा माझा २४ वा मुक्काम ठरला .
आता मी निघणार इतक्यात अनुभव झारिया आणि सत्यम झारिया नावाची दोन छोटीशीच परंतु गुंड प्रवृत्तीची मुले माझ्याशी येऊन गप्पा मारू लागली . त्यांनी आम्ही तुम्हाला बुढी माई नदी पार करून देण्यासाठी आलो आहोत असे सांगितले . खरे म्हणजे ही नदी पार करणे काही फारसे अवघड नाही परंतु काही ठिकाणी खड्डे आहेत आणि काही ठिकाणी प्रचंड शेवाळे आहे . नेमका तिथेच तुमचा पाय पडला की वाटचाल अवघड होणार हे निश्चित .
बुढी माय नदी ओलांडण्यासाठी अत्यंत कठीण , निसरडी आणि धोकादायक आहे . लाल रंगाच्या मार्कर च्या इथून तिला पार करावी लागते .
बुढीमाय नदीचे उबड खाबड पात्र (सर्व चित्रे साभार गुगल नकाशा )
या नदीच्या पात्रामध्ये अनेक वर आलेले जमिनीचे भाग असून त्यामुळे ती पार करणे अजूनच क्लिष्ट बनून जाते . या दोन मुलांनी नाशिकच्या दांपत्याला आणि मला व्यवस्थित बुढी माय नदी पार करविली . जाताना वाटेतील अनेक धोकादायक ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखविली . मला या मुलांबद्दल थोडीशी शंका वाटत होती . यांचा हेतू काही सरळ नाही हे मला लगेच लक्षात आले होते . पैल तटावर गेल्यावर दोन्ही मुले पैसे मागू लागली . बुढी माय नदीची शपथ घेऊन सांग या पैशाचे तुम्ही काय करणार असे विचारल्यावर मुले म्हणाली की आम्ही या पैशाने अभ्यासाचे साहित्य खरेदी करणार आहोत . मुलांचा एकंदरीत स्वभाव पाहता हे काही खरे नाही हे कोणीही ओळखले असते . मग मी त्यांना म्हणालो नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगा तुम्ही या पैशाचे काय करणार आहात . मग मात्र त्यांच्यातील एक जण म्हणाला की बाबाजी आम्ही या पैशाने राजश्री गुटखा विकत घेऊन खाणार आहोत . आम्ही रोज इथे लोकांना नदी पार करवतो आणि त्या पैशातून राजश्री गुटखा विकत घेऊन खातो !
दोघे सातवी आठवीच्या वयाची होती . मग मात्र मी त्यांना माझ्यासमोर खाली बसविले आणि त्यांना या वयात योग्य ते खाण्याचे महत्त्व पटवून सांगितले . गुटखा तंबाखू खाऊन त्यांच्या शरीरावर काय विपरीत परिणाम होऊ शकतात हे सर्व त्यांना समजावून सांगितले . आणि आपले हित करणाऱ्या व्यक्तीशी कधीही खोटे न बोलण्याची शपथ त्यांच्याकडून घेतली . त्यांनी दुसऱ्या नदीची शपथ खाऊन खोटे खपविले परंतु नर्मदेची शपथ खाल्ल्यावर मात्र ते खरे बोलले यातच नर्मदा मातेची शक्ती किती आहे व त्याचा तटावरील लोकांना अनुभव कसा येतो हे आपल्याला सहज कळू शकते ! त्यांना पैसे देण्यामध्ये काहीही हित नाही हे जाणून मी त्या दोघांना बिस्किटाचे दोन पुडे दिले व ते देखील माझ्यासमोर खायला लावून प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची हे त्यांना समजावून सांगितले . एकंदरीतच परिक्रमेमध्ये आपल्याकडून प्लास्टिकचा एक कण देखील भूमीवर पडणार नाही याची काळजी मी घेतच होतो परंतु इतरांनी फेकलेले शक्य तेवढे प्लास्टिक वेळोवेळी उचलून ते मी ठराविक अंतराने नष्ट करीत असे . दोन्ही मुले जाताना पाया पडली . बहुतेक खूप दिवसांनी आपल्याला कोणीतरी मनापासून चांगला सल्ला दिला आहे हे त्यांना आतून कळत होते . जाताना मुले अतिशय सोप्या आणि वेगळ्या मार्गाने गेली याचा अर्थ त्यांनी आम्हाला इकडे आणताना मुद्दाम फिरवून कठीण आणि लांबच्या मार्गाने आणले होते हे सुस्पष्ट होते ! मला पैसे कमवण्यासाठी त्यांनी लावलेल्या या बुद्धीचातुर्याचे अप्रूप वाटले . त्यांनी जे केले ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा . परंतु हे सुचण्यासाठी लागणारी प्रज्ञा या वयामध्ये नर्मदे काठी राहणाऱ्या लहान मुलांच्या मेंदूमध्ये सहज उत्पन्न होते ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यात सारखी आहे . नर्मदे काठची सर्वच लहान मुले अतिशय हुशार , चाणाक्ष , चुणचुणित आणि धीट आहेत याची प्रचिती मला वेळोवेळी येत गेली . धन्य ती नर्मदा माऊली आणि धन्य तिच्या काठावरील मुले मुली !


लेखांक सदतीस समाप्त (क्रमशः )

लेखांक ३८ : गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर

गेल्या ४८ तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो . आपल्या माहिती करता मी पार केलेल्या गावांची नावे देत आहे . डिंडोरी ,सुबखर रैयत , धूरी रयत , गांगपुर माल , औराई माल ,रायपुरा माल , इमली माळ , इमली रयत , छपरी रयत , सलैया रयत ,किसलपुरी माळ , केवलारी रयत , भैंसवाही रयत , सक्का माळ , सक्का रयत , कचनारी रयत , राई रयत , हर्रा टोला , धानगांव , खम्हरिया , आण्डिया माळ , चाबी , खैरी माळ , खैरी रयत , तेडिया नाला , खाल्हे गिठौरी , मोहगांव , अण्डियादार जर , उमरदी , मोहगाव , बिन्झी , इंद्र माळ , बनियातारा , सुडगाव , डोंगरगाव , देवगांव संगम !
भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण दोन किलोमीटर वर गाव बदलते . वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते . छोटी शहरे साधारण तीन चार किलोमीटर व्यासाची असतात . मध्यम शहरे पाच ते सहा किलोमीटर व्यासाची असतात . महानगरे दहा ते बारा किलोमीटर आकाराची असतात . अर्थात ही ढोबळ रचना मी सांगतो आहे . देश काल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो . वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमातींची वस्ती अधिक होती . यातील आंडिया आणि चाबी या गावांमध्ये मात्र प्रचंड यावनी वस्ती असल्याचे मला आढळून आले . मोठमोठी प्रार्थना स्थळे त्यावर वाजणारे कर्णे आणि गावभर त्या लोकांचा ठळक वावर हे पहिल्यांदाच पाहिले . चाबी गावामध्ये रस्त्याच्या कडेलाच उजव्या हाताला एक दुर्गा मंदिर लागले . 
चाबी गावचे श्री दुर्गा मंदिर
इथे दर्शनासाठी मी थांबलो असताना मोठ्या आवाजात अजान सुरू होती .मंदिरामध्ये एक मोठा शंख आणि साऊंड सिस्टिम देखील होती . मी पुजाऱ्याला शंख मागितला . आधी त्याने शंख देण्यास नकार दिला . नंतर मी काही प्रबोधनपर बोलल्यावर प्रेरित होऊन त्याने शंख मला दिला . मला माइक आणि साऊंड सिस्टिम वर शंख कसा ऐकू येतो ते पाहायचे होते . मी खणखणीत आवाजात शंखनाद करता क्षणीच संपूर्ण चाबी गावांमध्ये त्याचा आवाज घुमू लागला . मंदिरावर लावलेले कर्णे पुरेसे मोठे होते . इथून पुढे अशा पद्धतीने माईकचा वापर करून शंखनाद करण्याची सूचना मी त्याला केली आणि पुढे निघून गेलो . सर्वांना आपल्या प्रार्थनेचा मोठ्या आवाजात गजर करण्याचा समान अधिकार आहे ! कारण सर्वच - - - समान आहेत ! या एक दोन गावांच्या परिसरामध्ये कोणीही तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाही किंवा चहापाणी विचारत नाही . भारताचे अध्यात्मिक जीवन खरे तर फार समजूतदार पद्धतीने या सर्व गोष्टींकडे पाहते . परंतु मला इतकेच सांगावेसे वाटते की पूर्वी सिंधू नदीच्या काठावर पूजा पाठ करणारे श्रद्धाळू हिंदू देखील असेच उदारमतवादी होते . आज सिंधू नदीच्या काठावरील विविध मंदिरे आणि पवित्र घाट तर सोडूनच द्या परंतु सिंधू नदीचा स देखील भारतीय लोकांना बघायला मिळत नाही हे दुर्दैवी आहे , परंतु सत्य आहे . हीच वेळ नर्मदा ,गोदावरी ,कृष्णा , कावेरी ,गंगा ,यमुना या नद्यांवर येऊ नये असे वाटत असेल तर सध्या तिथे राहणाऱ्या भोळ्या भाविक भक्तांनी आपला अभ्यास वाढविण्याची गरज आहे . कराची शहरांमध्ये सर्वात जास्त मराठी लोक पूर्वी राहायचे आणि तिथे मराठी शाळा होत्या . आज कराची मध्ये एकही मराठी माणूस नाही . केवळ धर्म बदलत नाही भाषा ,संस्कृती , पेहराव , आवडीनिवडी , प्राधान्य सर्वच बदलते .सिंधू नदीचा उगम आम्ही गमावला आणि सागर संगम देखील गमावला . आम्हाला पवित्र असलेल्या गंगेचा सागर संगम देखील आज आमच्या देशात नाही याच्यापेक्षा आमच्या श्रद्धास्थानांची दुरावस्था काय असू शकते ? ज्या महादेवाची कन्या आम्ही नर्मदेला मानतो त्या महादेवांचे निवासस्थान अर्थात श्रीक्षेत्र कैलास पर्वत आम्ही गमावून बसलेलो आहोत आणि तरी देखील वृथा वल्गना करीत आहोत की आम्हाला सर्व टिंब टिंब समान आहेत यापेक्षा मोठा हास्यास्पद दैवदुर्विलास असू शकत नाही .आमच्या गावात असे काही होत नाही असा भोळा युक्तिवाद तुम्हाला तारणारा नाही . तर व्यापक राष्ट्रहिताला मारणारा आहे . असो . तूर्तास या गावात परिक्रमावासींची अजिबात सेवा केली जात नाही इतकी नोंद कागदोपत्री पुरेशी ठरावी . किसलपुरी या गावांमध्ये बळीराम जाधव याने माझ्या मागे लागून मला दोन लिटरचा एक कमंडलू विकत घ्यायला लावला . विकत घेणे म्हणजे बाजार दराने वस्तू मिळत नाही तर ज्या दराने दुकानदार खरेदी करतो त्याच दराने परिक्रमावसीला वस्तू दिली जाते .सुमारे अडीचशे रुपये विक्री मूल्य असलेला हा कमंडलू होता . दुकानदाराने माझ्याकडून केवळ शंभर रुपये घेतले .
किसलपुरी गावात घेतलेला २ लिटरचा कमंडलू
 कमंडलू म्हणजे आपण घरी गोडं तेल ठेवण्यासाठी जो कडीचा डबा वापरतो तोच होय . भांड्यावर नावे टाकण्याचे यंत्राने मी त्या कमंडलू वर नर्मदे हर वगैरे लिहिले . याच्यामध्ये ठेवलेले पाणी बर्फासारखे गार व्हायचे . मला हातामध्ये कमंडलू घेऊन चालण्याची अजून सवय नव्हती त्यामुळे तो हाताला काचत असे . तो बाळगण्याची सवय नसल्यामुळे एक दोन ठिकाणी तो मागे देखील राहिला व पुन्हा मला कमंडलू घेण्यासाठी ४ एक किमी उलटी तंगडतोड करावी लागली . त्यामुळे ४४ किलोमीटर अंतर असूनही माझे मात्र ५० किमी च्या वर चालणे झाले .याच्यामध्ये पाणी पिण्याचे सोयीचे जावे म्हणून एक पेला ठेवला होता . चालताना तो हिंदकळून आपटायचा आणि विविध प्रकारचे आवाज करायचा . हलणारे पाणी आणि हा पेला याच्या आवाजाने माझे फार काळ मनोरंजन केले . असो .
देवगाव चा संगम ओलांडल्यावर शेतातील मार्ग लागला . विविध छोट्या-मोठ्या शेतांच्या बांधावरून चालू लागलो . मध्ये एक नवरा बायको नणंद असे परिक्रमा वासी भेटले . त्या बिचाऱ्या माणसाची मला फार मजा वाटली .
मार्ग कठीण होता व मध्ये ओढे नाले चिखल खूप होता .त्यामुळे त्याने आधी बायकोला हात दिला तर बहिण नाराज व्हायची आणि बहिणीला मदत केली की बायको राग राग करायची ! तिघेही सामान भरण्याकरता निघालेले परिक्रमावासी वाटत होते त्यामुळे तिघांकडे मरणाचे सामान होते ! ह्या माणसाने कधी बायकोचे ओझे उचलले तर बहिण चिडायची आणि बहिणीची झोळी भावाने हातात घेतली की बायकोला वाईट वाटायचे ! स्त्रियांमध्ये "क्वचित प्रसंगी "  आढळणारा आजादूजा भाव अथवा परनारीअसहिष्णूता अशा पद्धतीने या माणसाला फारच सतावत होती ! शेवटी तो वैतागून जायचा आणि दोघींना अ पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व शिव्या घालायचा ! त्यांच्या परिक्रमेमध्ये नर्मदा मातेला कुठे स्थान असेल याची पुसटशी देखील शंका कुणाला येऊ नये याची काळजी तिघेही घेत होते ! त्यांची मजा पाहून मी हळूहळू त्या सर्वांच्या पुढे निघून गेलो . कारण पुढे एक छोटेसे जंगल पार करायचे आहे असे मला कळले होते .आणि तिथल्या शांततेमध्ये मला यांचे सुविचार ऐकायची इच्छा नव्हती . झपा झप चालून शेती पार केल्यावर एक छोटीशी टेकडी लागली जी घनदाट अरण्याने वेष्टित होती . चढ खडा होता आणि दुचाकी जाणार नाही अशा पद्धतीचे टोकदार दगड गोटे सर्वत्र पसरलेले होते . तरी देखील लोकांनी गाडी येथून नेल्याच्या खुणा दिसत होत्या . टेकडी उतरल्यावर बिलगाव अथवा निधानी नावाचे गाव लागले . एका बारीक बोळातून या गावाच्या मधोमध आलो असता तिथे एक हनुमान मंदिर होते आणि त्याच्यासमोर एक छोटेसे घर होते . या घरामध्ये परिक्रमावासींची सेवा केली जाते असे मला सांगण्यात आले . खरे तर याहून श्रीमंत घरे गावामध्ये होती परंतु हे घर ज्या तरुणाचे होते त्याने नर्मदा परिक्रमा केलेली असल्यामुळे त्याला परिक्रमे मध्ये केल्या जाणाऱ्या सेवेचे महत्व माहिती होते . त्याच्या आई-वडिलांनी देखील नर्मदा परिक्रमा केलेली होती . त्याच्या आईने गरमागरम पोहे आणि चहा आणून दिला . सोबत काही शिधा हवा आहे का हे विचारायला विसरल्या नाहीत . वजन सोबत बाळगायला नको म्हणून मी नम्रपणे नकार दिला . अशा पद्धतीने हळूहळू मी कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ निघालो होतो . या परिसरातील सर्व गावांमध्ये वाघाचा वावर नित्याचा झाला होता . ज्याप्रमाणे सध्या पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये बिबट्याचा वावर लोकांच्या परिचयाचा झाला आहे तसे या भागामध्ये पट्टेरी वाघांचे झालेले आहे . वाटेमध्ये मला एके ठिकाणी वाघाने मारून टाकलेली म्हैस दिसली . त्याला हवा तेवढा मुद्देमाल खाऊन संपवून तो निघून गेला होता . उरलेल्या म्हशीवर गावातील भटकी कुत्री ताव मारत होती . या म्हशीची शिकार वाघाने कशी केली याचे किस्से गावातील लोकांनी मला सांगितले . गुराख्या समोर त्याने कळपावर हल्ला करून या म्हशीचा फडशा पाडला . गुराखी काठी घेऊन वाघाच्या अंगावर धावल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला . परंतु रस्त्याच्या कडेला पडलेली ती म्हैस त्याने रात्री पुन्हा येऊन संपवून फस्त केली .
 (संग्रहित छायाचित्र)
 त्यानंतरच्या सकाळचे दृश्य मी पाहत होतो म्हणजे शिकार ताजी ताजी होती . तरी देखील त्या मृत देहाचा वास सर्वत्र पसरू लागला होता . म्हशीच्या फासळ्या किती मोठ्या असतात हे त्या दिवशी मला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघायला मिळाले . आणि त्या कडकडा मोडून खाणाऱ्या वाघाच्या दातात शक्ती किती असेल याची फक्त कल्पना करून पहा ! मी जात असताना म्हैस खाणारी कुत्री माझ्यावर गुरगुरू लागली . त्यामुळे मी पायांना गती देत तिथून पुढे निघून गेलो . आज अनपेक्षित पणे एका ऐतिहासिक वास्तूचे मला दर्शन घडले . रामनगर नावाच्या एका गावामध्ये मी पोहोचलो . गोंड राजा अक्कराय याची ही ऐतिहासिक राजधानी होय . आज २६ जानेवारीचा दिवस होता अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिवस . आणि त्याच दिवशी एका अत्यंत प्रजा प्रिय राजाच्या नगरीमध्ये मी प्रवेश करत होतो . हा राजा त्याची महाराणी आणि संपूर्ण राजघराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी बांधलेली विविध मंदिरे आणि बांधकामे या परिसरामध्ये आजही दाखवली जातात .या राजाचा अति भव्य प्रसाद नर्मदा किनारी आजही दिमाखात उभा आहे . मोती महल असे याचे नाव आहे .
 शेकडो वर्षे झाली तरी त्याची मूळ वास्तू अजूनही सुस्थितीमध्ये आहे हे पाहून बरे वाटले . 26 जानेवारी चा दिवस असल्यामुळे राष्ट्रीय सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या प्रासादामध्ये झालेली होती .
 बहुतांश परिक्रमावासी हा महाल न बघता पुढे निघून जातात परंतु मी इतिहासाची आवड असल्यामुळे हा संपूर्ण महाल बघितला . इथे आत जाण्यासाठी तिकीट आकारले जाते परंतु परिक्रमावासी असतील तर मात्र एकही रुपया घेतला जात नाही . त्यामुळे मी आत मध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण राजमहाल फिरून पाहिला .
 प्रत्येक भिंतीवर प्रेमी युगुलांनी आपापली नावे कोरलेली होती  तसेच आत मध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेले होते तरी देखील त्यातून त्या राजमहालाची भव्यता लपत नव्हती . जाड जूड रुंद भिंती आणि त्यावर उभा असलेला हा बहुमजली राज महाल पाहून मनात विचार आला की जेव्हा इथे स्वतः राजा राहत असेल त्यावेळी इथले राजवैभव कसे दिसत असेल ! आज त्या प्रसादाचे अक्षरशः खंडहर झालेले असून रिकामटेकडी प्रेमीयुगले बसण्याचे ते एक ठिकाण ठरलेले आहे . या प्रसादामध्ये अनेक तरुण मुले मला भेटली ज्यांनी माझे फोटो काढले . कारण त्या सर्व गर्दीमध्ये मी एकटाच वेगळा उठून दिसत होतो . त्यातील ज्यांनी काढलेले फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवले त्यातील काही चित्र सोबत जोडत आहे .
किल्ल्याचे प्रवेशद्वार
हे छायाचित्र किल्ल्यातून बाहेर पडताना रायपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने काढले . त्या नादात कमंडलू तिथेच विसरला
अजून एक तिथलेच छायाचित्र
किल्ल्याच्या आत मध्ये मधोमध एक पाण्याचे कुंड होते
किल्ल्याच्या जाडजूड भिंतींमधून वर गच्ची वरती जाण्यासाठी जागा होती . किल्ल्याचे घुमट फारच सुंदर दिसत होते . आपल्या लक्षात येईल की प्रत्येक फोटो वेगळ्या वेगळ्या कॅमेर्‍याने काढला गेलेला आहे . सर्वांपेक्षा वेगळा दिसत असल्यामुळे तिथल्या सर्व पर्यटकांचे मी एक आकर्षण बनल्यासारखे झालो होतो .

बाबाजी और एक फोटो प्लीज .खडा वाला .
सोबत आजूबाजूला फिरणारी आदिवासी मुले .या सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण विवक्षित असते .
किल्ल्याच्या मागे वाहणारी नर्मदा मैया
किल्ला आणि मागे होणारे नर्मदा मातेचे सुंदर दर्शन
मोती महलच्या मधोमध असलेले जलकुंड
महालाच्या बांधकामाची सध्याची अवस्था
याचे घुमट खूप सुंदर आहेत
मोती महालाच्या मागूनच नर्मदा मैया एक झोकदार वळण घेऊन वाहते आहे
इथून जवळच राजाच्या राणीने बांधलेले विष्णूचे एक पुरातन मंदिर आहे . सध्या या मंदिरामध्ये मूर्ती नसल्या तरी एकेकाळी हे मंदिर किती भव्य असेल याची कल्पना लगेच येते .
राणी सुंदरी देवी स्थापित श्री विष्णु मंदिर . याचेही कळस मोती महल सारखे आहेत .
हे एक संरक्षित स्मारक आहे
या मोतीमहलच्या बाहेर आल्यावर तिथे चणे फुटाणे विकायला बसलेल्या एका बाईने मला चणे खायला दिले . इथे रायपूर मधील एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आलेले होते . त्यांनी नर्मदा परिक्रम विषयी माझी एक छोटीशी मुलाखतच घेतली जणू . परंतु त्यांना परिक्रमे विषयी बरीच माहिती त्या अर्ध्या तासात कळाली . त्यांच्या मनातील सर्व किंतु परंतु नाहीसे झाले आणि आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा त्यांना निर्माण झाली असे त्यांनी बोलून दाखविले . त्यांनी फोटो काढताना मी कमंडलू त्या मावशी जवळ ठेवला तो परत घ्यायचा विसरून गेलो आणि पुढे चालायला लागलो . पुढे घुघरी रस्ता , रामनगर इथे एक नर्मदा मंदिर लागले जिथे मी भोजन प्रसाद घेतला . मंदिरातील महंताने वहीमध्ये शिक्का दिला . त्याचा फोटो 
नर्मदा मंदिर , घुघरी रोड , रामनगर
इथून वाघांचे परिक्षेत्र फार जवळ होते . त्यामुळे अंधार होण्याची वाट न बघता उजेडातच थांबण्याचा सल्ला मला सर्वांनी दिला . त्यामुळे मी सरळ रस्त्याचा मार्ग पकडला . इथे नर्मदे काठी चालण्यासाठी चांगला मार्ग नाही असे मला सांगण्यात आले . तसेच नर्मदा एक दोन जबरदस्त वळणे घेते जिथे संपूर्ण जंगल आहे . 
मधुपुरी घाटापूर्वी नर्मदा नदीने घेतलेले निर्मनुष्य जंगली वळण
या वनक्षेत्रातून चालण्यासाठी पायवाट देखील नाही त्यामुळे रस्त्याने चालण्या शिवाय पर्याय उरत नाही . मधुपुरी या पुढच्या गावातील आश्रमामध्ये राहण्याचे मला सुचविण्यात आले होते . संध्याकाळची वेळ असल्यामुळे जंगल मार्गातून जाणे मी टाळले . कारण म्हैस खाऊन बसलेला वाघ जवळपास असण्याची शक्यता होती . तो जंगलाकडे जाण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी नर्मदे कडे आला असणार हे खूप शक्य होते . त्याला त्याच्या अधिवासामध्ये जाऊन त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती . या जवळपास निर्मनुष्य मार्गावरील वाटचाल अतिशय सुखद होती ..


लेखांक अडतीस समाप्त (क्रमशः )

लेखांक ३९ : अखंड रामायण सेवा चाललेली मधुपुरीचा मार्कंडेय तपोभूमी घोडाघाट

वाघाने मारलेल्या म्हशी बद्दल विचार करत पुढे चालत राहिलो . एवढ्या ताकदवान जनावराला लोळवून ठार करणारा वाघ किती शक्तिमान असेल याची कल्पनाच न केलेली बरी . आणि मुळात अशा वाघाच्या तावडीत मनुष्य प्राणी सापडला तर तो त्याचे किती हाल करू शकतो केवळ या विचाराने देखील अंगावर काटा आला !
मध्ये डाव्या हाताला एक डोंगर अखंड सोबत चालतो आहे असा भास होत होता . हा संपूर्ण डोंगर काळ्या रंगाच्या खडकांनी भरलेला होता .  पुढे गेल्यावर त्याच्या नावाची पाटी दिसू लागली . या डोंगराला काला पहाड असे म्हटले जाते . हे पर्यटकांचे खास आकर्षण असून या पहाडावरती अतिशय मोठ्या मोठ्या काळ्या रंगाच्या भव्य कातळ शिळांचा अक्षरशः खच पडलेला आढळून येतो . इथल्या राणीशी जोडलेल्या काही कथा देखील लोक या पहाडा विषयी बोलताना सांगतात . अतिशय वैचित्र्यपूर्ण असलेल्या या शिळा महाराणीच्या इशाऱ्यावर जागा सोडून हलत असत असे स्थानिक लोक मानतात. 
काला पहाड वरील भव्य शिळांचा खच (संग्रहित छायाचित्रे )
अशा प्रकारच्या शिळा भारतानंतर केवळ उत्तर आयर्लंड मध्ये आढळतात आणि या करोडो वर्ष जुन्या आहेत अशी पाटी इथे सरकारने लावलेली आहे . 
थोडेसे अंतर गेल्यावर दूरवर कुठेतरी रामायण वाचन चालू आहे असा आवाज येऊ लागला . हळू हळू हा आवाज मोठा होत गेला . सुमारे चार किलोमीटर अंतरावर हा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता . त्या परिसरामध्ये एवढी निरव शांतता होती की रामायणातील प्रत्येक शब्द कळत होता . त्या आवाजाच्या दिशेने चालायचे मी ठरविले . मजल दरमजल करता करता नर्मदेच्या काठावर असलेल्या मधुपुरी गावामध्ये पोहोचलो . इथे नर्मदा परिक्रमेचे प्रवर्तक महर्षी मार्कंडेय महामुनी यांनी तपस्या केलेला घोडा घाट आहे . या घाटावर एक घोड्याची मोठी मूर्ती स्थापित आहे . महादेवाचे पुरातन मंदिर आहे . मार्कंडेय मुनींनी स्थापन केलेले भव्य दिव्य शिवलिंग ,धूनी इथे आहे . तसेच हनुमान मंदिर देखील असून या हनुमानाच्या समोरच गेली ३३ वर्षे दिवस रात्र अखंड रामायण पारायण आणि अखंड ज्योतीचे तेवणे सुरू आहे . दिनांक आठ जुलै १९९० रोजी या २४ तास अखंड रामायण पाठाला इथे सुरुवात झाली . याच मंदिरामध्ये शेणाने सारवलेल्या बंदिस्त उबदार अशा एका लांबच लांब ओसरीमध्ये परिक्रमावासीयांची राहण्याची सोय केली जाते . पायाने अपंग असलेला एक सेवेकरी येथे रामायण देखील वाचत असे आणि परिक्रमावासींची सेवा देखील करत असे . याचे नाव लोधी असे होते . दोन्ही पायांनी अपंग होता व मोठा भाविक आणि सात्विक होता .इथे कोणीही बसून रामायणाचे वाचन करू शकतो परंतु रामायणाच्या वाचनामध्ये कधी खंड पडू नये म्हणून इथे चार सेवेकरी दीड हजार रुपये पगारावर ठेवलेले आहेत . मी असे ठरवले की ज्यावेळी कोणीही रामायण वाचायला तयार होत नाही अशावेळी आपण वाचावे . लोधी मला तखत देऊ करत होता परंतु ते नम्रपणे नाकारत मी एका कोपऱ्यामध्ये जमिनीवरच आसन लावले आणि नर्मदा मातेचे दर्शन करण्यासाठी निघालो.  सर्वप्रथम हनुमंताचे दर्शन घेतले . 
मधुपुरी गावातील दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर
 ८ । ७ । १९९० से श्रीराम चरित मानस पाठ एवं अखंड ज्योती प्रारंभ
थोडेसे नर्मदे कडे गेल्यावर मार्कंडेय महामुनी स्थापित प्राचीन महादेव मंदिर लागले
शेजारीच श्री मार्कंडेय आश्रम आहे
या परिसरामध्ये नित्य वावर असलेल्या वाघोबांनी इथल्या मंदिरांमध्ये देखील स्थान पटकावले आहे . वाघाच्या या मूर्ती पाहून दुसरे वाघ मंदिराजवळ येत नाहीत असे मला एका साधूने सांगितले . 
यानंतर घोडा घाटावरील घोड्याचे दर्शन होते
दगडावर चुन्याने लिहिलेली घोडा घाट ही अक्षरे
घोडाघाट अतिशय उत्कृष्ट आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने बांधलेला असून त्याच्या पायऱ्या सुबक आखीवरेखीव आणि मजबूत आहेत .
नर्मदा मातेला घोडा घाट असा दिसतो !
आणि घोडा घाटावरून दिसणारे नर्मदेचे रुपडे देखील नितांत सुंदर असेच आहे !
तासनतास या सुंदर रूपाकडे पाहत बसले तरी मन भरत नाही . . .
इथे शेजारीच एक प्राचीन आणि भव्य दिव्य वटवृक्ष दिमाखात उभा असलेला दिसतो . हा देखील इथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे . नर्मदे काठी अशी प्राचीन झाडे अनेक ठिकाणी आहेत . 
स्थानिक तरुणांनी एडिट केलेली वटवृक्षाची प्रतिमा
घाटावरती बसून मी स्नान केले . पाणी अक्षरशः बर्फासारखे गार होते . परंतु आता हळूहळू अशा थंडगार पाण्याने स्नान करण्याची शरीराला सवय लागून गेली होती . पहिला कमंडलू घेताना अंगाला झटका लागायचा . नंतर मात्र शरीराला सवय होऊन जायची . या घाटावर शांत बसायला खूप भारी वाटते . इथे फारसा मानवी वावर देखील नव्हता . एका दमात सर्व पाऱ्या चढत आश्रमामध्ये पोहोचलो . एरवी खरोखरीच असे काही करू शकण्याची शारीरिक क्षमता माझ्यामध्ये आहे का नाही याबाबत मी साशंक आहे . परंतु परिक्रमेमध्ये मात्र एक वेगळीच शक्ती प्राप्त झाली होती असा अनुभव मी वेळोवेळी घेतला .  असो . आधी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो . मंदिरामध्ये काही साधू लोक धूना पेटवून बसले होते . त्यांच्या इथे मी देखील जाऊन बसलो . कोणीही नवीन परिक्रमावासी आला की त्याची संपूर्ण सीआयडी चौकशी काही साधू लोकांकडून बरेचदा केली जाते तशी माझी देखील झाली ! भोले बाबा का प्रसाद चाहिए ? एकाने मला विचारले . माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून दुसरा गरजला , गांजा पियोगे ? नही महाराज | मै नही पिता । मी शांतपणे सांगितले . कोई बात नही चाय प्रशादी पालो । असे म्हणत त्यांनी आतील एका नवख्या साधूला चहा बनवण्याचे फर्मान सोडले . साधूचे  साधू जीवनातील वय किती आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या जटांची लांबी शक्यतो बघितली जाते . नव्या साधूंच्या दाढी मिशा व जटा लहान असतात तर अनुभवी लोकांच्या जटांचा भार त्यांना झालेला असतो इतक्या त्या मोठ्या असतात . मुळात डोक्यावर असलेला हा भार सतत त्यांना त्यांच्या साधू म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत असतो असे मला एका साधूनेच सांगितले . या जटा खाजतात , दुखतात ,ओढल्या जातात ,ओल्या राहतात , डोक्यावर वजन टाकीत राहतात , मान अवघडवतात , झोपताना त्रास होतो ,कुस बदलताना त्रास होतो , स्नान करताना त्रास होतो , प्रवासामध्ये जंगलातून जाताना त्रास होतो . परंतु तरीदेखील त्या बाळगल्या जातात . कारण तेच एका खऱ्या साधूचे वैभव असते असे साधू मानतात . साधू डोक्याला फारसा ताण करून घेत नसल्यामुळे त्यांचे केस काळे असण्याचे प्रमाण जास्त असते . संपूर्ण केस पांढरे झालेला साधू फारच दुर्मिळ असतो . याउलट संन्यासी मात्र दर काही दिवसांनी संपूर्ण दाढी मिशा केस काढून टाकत असतात . व ते एकत्र वाढले की पुन्हा काढून टाकतात . असो .
सांगायचे तात्पर्य इतकेच की त्या नव्या साधूने चहा आणून दिला व तो प्राशन करून मी आपल्या हनुमान मंदिरामध्ये आलो . इथे देखील सर्व लोक शेकोटी करून बसले होते . मी देखील त्यांच्यामध्ये हळूच सामील झालो . शक्यतो अशा शेकोटीच्या ठिकाणी अध्यात्मिक चर्चा किंवा राजकीय चर्चा जोरजोरात सुरू असतात . काही अनुभव सांगणारे लोक त्यांना आलेले मैयाचे अनुभव बेंबीच्या देठापासून आर्ततेने सांगत असतात .अशा ठिकाणी शांत बसून लोकांचे निरीक्षण करणे आणि बोलणे ऐकणे हा अतिशय मजेशीर आणि समृद्ध करणारा अनुभव बरेचदा असतो . थोड्यावेळाने मी माझी पूजा अर्चा आटोपून घेतली . आणि रामायण वाचायला गेलो . इथे रामचरितमानस वाचण्याची एक विवक्षित पद्धत रूढ आहे . काही ठराविक ओव्या वाचून झाल्या की संपूट मंत्र म्हणायचा असतो .  संपुट म्हणजे झाकण . आपण एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देताना ती जशी छान वेष्टित करून देतो त्या पद्धतीने देवाला मंत्र अर्पण करताना संपुट मंत्राचे झाकण लावून दिला जातो म्हणजे त्या मंत्राचे सामर्थ्य वाढते अशी मान्यता आहे . रामचरितमानस गाताना असे अनेक संपुट मंत्र सांगितलेले आहेत . त्यातील एक मंत्र इथे समोर भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिला होता . 
कवन सो काज कठिन जग माहीं। जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं॥
काही ठराविक वेळाने त्याचा उच्चार अनिवार्य पणे करावा लागत असे . 
तसे पाहायला गेले तर भारतातील सर्वात प्रसिद्ध संपुट चौपाई ही आहे . V

मंगल भवन अमंगल हारी,
द्रबहु सु दसरथ अजिर बिहारी ।

द्रबहु याचा अर्थ द्रवू देत ! कोण ? दशरथाच्या अजीर म्हणजे अंगणामध्ये बिहार म्हणजे विहार करणारा श्रीराम , जो मंगलाचे निवासस्थान आणि अमंगळाचा विनाशक आहे तो अथवा त्याचे हृदय माझ्याकरिता द्रवू देत !

रामचरितमानस हे एक वेगळेच विश्व आहे ! यातील रचना इतकी सरळ , इतकी सुलभ , इतकी सुंदर , इतकी प्रासादिक आणि इतकी रसाळ आहे की विचारूच नका ! याच्या तोडीचा दुसरा कुठलाही ग्रंथ हिंदी भाषेमध्ये सापडणे अशक्य आहे . याचा प्रचार व प्रसार देखील भरपूर झालेला आहे . आणि अखंड रामचरितमानस वाचन करणारे अनेक लोक आपल्या देशामध्ये आहेत . याच्यामध्ये केवळ रामाची कथा येत नाही तर त्या अनुषंगाने आयुष्यामध्ये कुठल्या प्रसंगाला आपण कसे सामोरे गेले पाहिजे याचे विवेचनच तुलसीदासांनी करून ठेवलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने रामचरितमानस अवश्य वाचावे . मी रामायण वाचायला बसलो आणि माइक वरून तो आवाज संध्याकाळच्या निरव शांततेमध्ये सुमारे चार किलोमीटर परिसरामध्ये घुमू लागला . इथे ठराविक चार लोक सोडले तर अजून कोणी रामायण फारसे वाचत नसावे कारण माझा आवाज ऐकल्या ऐकल्या गावातील बरीचशी मंडळी नक्की कोण नवीन बुवा आला आहे हे पाहण्याकरता आळीपाळीने मंदिरात येऊन गेली . मी शांत गतीने आणि सुंदर चाली मध्ये रामचरितमानस गात राहिलो . इथे बसणारे लोक थोडेसे गडबड करत वाचन करायचे . मी मात्र संथ लय मध्ये लताबाई मंगेशकर यांनी गायलेल्या चालीमध्ये रामचरितमानस गात राहिलो . या पद्धतीने दोन तास वाचन झाले .तिथे येऊन भेट देणाऱ्या माणसांमध्ये काल जिने मला रामनगर येथे चणे दिले त्या बाईचा भाऊ देखील आला होता . माझा कमंडलू तिच्याकडे विसरला आहे ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली होती ! गावामध्ये छोट्या छोट्या बातम्या देखील कशा सर्वतोमुखी होतात हे पाहून आश्चर्य वाटते. इथे बातमी प्रसारित होण्यासाठी कुठल्याही वृत्तवाहिनीची किंवा व्हाट्सअप समुहाची गरज नसते ! लोकच आपापसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले असतात . तो मला ताबडतोब गाडी घेऊन रामनगर ला जाऊन कमंडलू आणून देण्यासाठी तयार झाला होता . परंतु मी त्याला सांगितले की तो कमंडलू मी तुझ्या ताईला देऊन टाकला आहे असे तिला सांग व घरातील स्वयंपाकासाठी तो तिने वापरावा अशी माझी इच्छा आहे असे तिला कळव ! विचार करून पहा एक रुपयाचे दोन रुपयाचे शेंगदाणे विकणारी ती बाई दिवसभरात अशी कशी किती कमाई करत असेल ? तरीदेखील तिला एका परिक्रमावासीला भरभरून खायला द्यावे अशी इच्छा झाली हीच खूप मोठी गोष्ट होती . तिने शक्य त्या पद्धतीने मला काहीतरी दिले व आज ती संधी मला नर्मदा मातेने दिलेली असताना ती दवडू नये असे मला मनापासून वाटले आणि मी त्या कमंडलूचा विषय तिथे कायमचा संपविला .
तोपर्यंत भोजनाची वेळ झाली . या आश्रमामध्ये खरे तर परिक्रमावासींना सदावर्त / सदाव्रत दिले जाते . अर्थात शिधा दिला जातो व त्यांनी स्वयंपाक करून खाणे अपेक्षित असते . परंतु मी दोन तास रामायण वाचल्यामुळे मला भोजन प्रसाद तयार वाढण्यात आला . सर्वांनी गरमागरम भोजनप्रसादाचा आनंद लुटला ! लोधी अपंग असून देखील सर्व कामे मोठ्या चपळाईने आणि हिरीरीने करत होता . मला त्याचे खरंच खूप कौतुक वाटले . विशेषतः तो ज्या प्रेमाने आग्रह करून सर्वांना वाढत होता ते पाहून कोणीही दुप्पट जेवले असते ! परंतु मला रात्री पुन्हा रामायण सेवा करायची होती त्यामुळे मी मर्यादित जेवलो . आणि लगेचच रामायण वाचायला निघून गेलो . इथे अजून एक तरुण तेजस्वी साधू आला होता व तो देखील सुंदर रामायण वाचत होता . हा सुशिक्षित मुलगा वाटत होता व त्याने जाणीवपूर्वक संन्यास घेतला आहे हे त्याच्याकडे पाहून लक्षात येत होते . हा उत्तर प्रदेशचा असावा असे त्याच्या भाषेवरून वाटत होते . याने आणि मी आलटून पालटून बसत रात्रीचा बराच वेळ रामायण वाचले . इथे कुठल्याही वयोगटातील माणसाला चष्म्याशिवाय रामचरितमानस वाचता यावे अशा आकाराची एक अजस्त्र प्रत मिळते .
रामायणाची मोठी प्रत (संग्रहित छायाचित्र )
अखेरीस खूप झोप येऊ लागल्यावर मात्र मी शांतपणे आत जाऊन पाठ टेकली .
मोठ्या आवाजात वैखरीमध्ये रामायण पाठ केल्यामुळे मेंदूला परम शांतता लाभली होती ! त्यामुळे क्षणात डोळा लागला . गोस्वामी तुलसीदासांनी अतिशय सुंदर आणि डोळ्यासमोर चित्र उभे करणारे करणारे वर्णन केलेले असल्यामुळे ती सर्व चित्रे ते सर्व प्रसंग रात्री झोपेमध्ये डोळ्यासमोर तरळू लागले ! ती रात्र खूपच संस्मरणीय अशी ठरली . रामाचे चरित्र किती महान आहे हे जर कोणाला अनुभवायचे असेल तर वाल्मिकी रामायण तर वाचावेच पण  त्याहूनही सुंदर असे तुलसी रामायण अवश्य वाचावे ! 
रामायणाचा विषय निघालाच आहे म्हणून अभ्यासकांसाठी थोडेसे विस्तृत सांगतो . प्रभू रामचंद्रांचे अधिकृत चरित्र म्हणून वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाकडे पाहिले जाते . याच्यामध्ये सात कांडे असून पाचशे सर्ग आणि २४००० श्लोक आहेत . 
तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरितमानस या रामायणामध्ये चौपाई आणि दोहा ही वृत्ते सर्वाधिक आढळतात . हनुमान चालीसा म्हणताना आपण श्री गुरु चरण सरोज रज असे जे कवन म्हणतो तो दोहा आहे . आणि जय हनुमान ज्ञान गुण सागर इथपासून पुढे सुरू होणाऱ्या चौपाया आहेत . अगदी त्याच पद्धतीने रामचरितमानस गान करताना ४६०८ चौपाया , १०७४ दोहे , २०७ सोरठे आणि ८६ छंद आहेत .
चौपाई मध्ये चार पदे व चारही पदांमध्ये १६ I १६ मात्रा असतात .
दोह्यामध्ये  १३ । ११ । १३ । ११अशा मात्रांची चार पदे असतात . 
सोरठ्या मध्ये ११ । १३ । ११ । १३  अशा मात्रांची चार पदे असतात .
हे प्रत्येक अक्षरगण वृत्त वेगवेगळ्या पद्धतीने गायले जाते व त्याचा सूक्ष्म अभ्यास केला असेल तर आपल्याला लक्षात येते की रामचरितमानसमध्ये या वृत्ताचा भंग झाला आहे असे उदाहरण कुठेच सापडत नाही !यावरून कवीची प्रतिभा काय दर्जाची आहे ते पहा ! त्या ग्रंथाला आणि ग्रंथकर्त्याला साष्टांग नमस्कार ! खरे म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा रामचरितमानस पाहत होतो परंतु गाताना तसे वाटत नव्हते हे कवीचे यशच म्हटले पाहिजे !
सकाळी उठल्यावर त्या आश्रमातील सर्वच जण मला अजून काही दिवस तिथे राहून रामायण पाठ करण्याचा आग्रह करू लागले . परंतु मला अशा कुठल्याही बंधनामध्ये अडकायचे नव्हते . मी आणि त्या तरुण साधूने रात्री काही काळ पाठ केल्यामुळे खूप दिवसांनी या पाठकांना रात्री झोपायला मिळाले होते .त्यामुळे ते आमच्या मागे लागले होते की इथेच रहा ! तो साधू तिथेच राहिला आणि मी मात्र पुढे निघालो . इथून अखंड चालत सूर्यकुंड गाठले . नर्मदे मध्ये असलेले सूर्यकुंड अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते . हे सकवाह नावाचे गाव आहे आणि इथल्या आश्रमामध्ये देखील श्रावण महिन्यापासून अखंड रामायण सुरू होते . या घाटावरती स्नानाचे विशेष महत्त्व असल्यामुळे सकाळीच घोडा घाटावर स्नान केलेले असून देखील इथे पुन्हा एकदा स्नान केले . इथे चिखलमय उतार होता आणि अतिशय धोकादायक चिखलामध्ये उभे राहून स्नान करावे लागले . घाटावरती स्नान करण्याकरता लोकांची गर्दी झालेली होती . स्नान करून वरती धर्म शाळेमध्ये गेलो . हा संपूर्ण परिसर अतिशय मोठा औरत चौरस पसरलेला आणि उत्तम पैकी बांधकामे केलेला होता . गावापासून थोडेसे बाहेर असलेले सूर्यकुंड एका मोठ्या कमानी द्वारे आपले स्वागत करते . कमानी मधून आज प्रवेश केल्या केल्या उजव्या हाताला अतिशय मोठ्या हॉलची रचना केलेली असून इथे परिक्रमा वासी शेकड्याने राहू शकतील अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . थोडेसे पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक पिंपळाचा पार असून डाव्या हाताला भव्य मारुती मंदिर आहे आणि इथेच अखंड रामायण सेवा सुरू आहे . तिथून पुढे गेल्यावर छोटी मोठी अनेक मंदिरे असून उजव्या हाताने चिखलाचा उतार थेट नर्मदेमध्ये घेऊन जातो . आपल्या माहितीकरता या परिसराची काही छायाचित्रे सोबत जोडत आहे .
सूर्यकुंड परिसराची स्वागत कमान .उजव्या हाताला भगवी भिंत दिसत आहे ती परिक्रमा वाशांची निवास व्यवस्था आहे .
श्री भारती महाराज यांनी हा आश्रम उभा केला आहे .
अखंड रामायण सेवा सुरू असणारे भव्य हनुमान मंदिर
सूर्यकुंड येथील हनुमंताची मूर्ती
इथे बनकर काका आणि अजून काही ओळखीचे परिक्रमा वासी भेटले . सर्वजण फोमच्या गाद्या टाकून विश्रांती घेत होते . कडाक्याची थंडी पडलेली होती . मी थेट रामायण सेवा गाठली . आणि जणूकाही माझी वाटच पाहत बसला होता अशा पद्धतीने माझ्या आधी बसलेला युवक जो पळून गेला तो पुन्हा आलाच नाही ! मग पुन्हा एकदा चांगले तासभर मी अतिशय शांतचित्ताने रामायण गायले ! प्रचंड थंडी असल्यामुळे पाठकांसाठी तिथे डाव्या हाताला हिटर ची व्यवस्था केलेली होती . मंदिरावर लावलेल्या मोठ्या मोठ्या ध्वनी क्षेपणावरून हे संपूर्ण रामायण आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप लांब पर्यंत ऐकू जात होते ! महाराष्ट्रामध्ये धार्मिक क्षेत्रांवरील ध्वनीक्षेपकांना जसा विरोध केला जातो तसा मध्य प्रदेश मध्ये किंवा एकूणच नर्मदा खंडामध्ये कुठेही केला जात नाही . मी रामचरितमानस गातो आहे आणि नर्मदा मैया ते ऐकते आहे ही कल्पनाच माझ्यासाठी फार सुखावह होती ! तिथे आलेल्या एका परिक्रमा वासी काकांनी माझा रामचरित मानस गाताना चा व्हिडिओ रेकॉर्ड केला . कालांतराने त्यांनी तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविला . तो आपल्याकरिता सोबत जोडत आहे .


काल रात्री सुंदर कांड वाचायला मिळाले तर आज माझ्यासमोर बालकांडातील सुंदर अशा चौपाया येत होत्या ! 
भूप बचन सुनि सहज सुहाए। जरित कनक मनि पलँग डसाए।।
सुभग सुरभि पय फेन समाना। कोमल कलित सुपेतीं नाना।।
उपबरहन बर बरनि न जाहीं। स्त्रग सुगंध मनिमंदिर माहीं।।
रतनदीप सुठि चारु चँदोवा। कहत न बनइ जान जेहिं जोवा।।

रामाच्या बालपणीचे हे सुंदर वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करत होते . विशेषतः कालपासून मी हनुमंताची विशेष कृपा अनुभवत होतो ! हनुमंताने सांगून ठेवलेले आहे की जिथे जिथे माझ्या प्रभू रामचंद्राची कथा सुरू असेल तिथे तिथे मी कायम उपस्थित राहीन आणि त्याची अनुभूती जाणीवे च्या स्वरूपात येत होती ! संपुट मंत्र म्हणताना आपोआप भरून यायचे . एकंदरीत नर्मदा मैयाने रामायण पाठाची सुंदर अशी सेवा दोन दिवस माझ्याकडून करून घेतली ! एखाद्या माणसाला निवृत्तीनंतर काय करावे असा प्रश्न पडला असेल तर त्याने रामचरितमानस पाठ आवश्यक करावा ! त्याच्यासारखा आनंद त्याला अन्य कुठल्याच ग्रंथात मिळणे शक्य नाही ! ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये जशी प्रासादिकता आहे अगदी तशीच प्रसादिकता याही ग्रंथामध्ये आढळते ! सियावर रामचंद्र की जय !पवनसुत हनुमान की जय ! नर्मदे हर !मातुगंगे हर ! जटाशंकरी हर ! ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव !
रामायणाचे वाचन झाल्यावर श्री सूर्यकुंड हनुमान महाआरती भंडारा समितीचे कार्यकर्ते मला बोलवायला आले आणि पिंपळाच्या झाडाखाली मस्तपैकी सर्व परिक्रमावासी जेवायला बसले . मध्यप्रदेश मधीलच एक दांपत्य परिक्रमेमध्ये होते ते माझ्यासमोर बसले होते .साधारण ज्यांच्या मुलांची नुकतीच लग्न झालेली आहेत अशा वयाचे लोक परिक्रमेमध्ये अधिक येतात असे एक निरीक्षण मी केले . कदाचित ज्या मुलांकरिता सर्वस्व पणाला लावले ती मुले लग्न झाल्या झाल्या आपण नक्की कोणासाठी जगत आहोत याची झलक आपल्या आई बापाला देतात त्यामुळे आई बापांना वैराग्य उत्पन्न होऊन ते परिक्रमेला निघत असावेत ! किंवा कदाचित कृतांत कटकामळध्वजजरा दिसो लागली अशी देखील त्यांची अवस्था असू शकते .म्हणजे काळाची साक्षात ध्वजा असलेले वार्धक्य आता जवळ येत असल्याचे लक्षात आल्यामुळे या वयात अधिक परिक्रमा वासी बाहेर पडत असावेत . असो . भोजन प्रसादी झाल्यावर कार्यकर्त्यांनी माझ्या वहीमध्ये शिक्का दिला . 
सूर्यकुंडपाशी मिळालेला शिक्का
इथे भोजन झाल्या झाल्या विश्रांती वगैरे न घेता मी पुढे चालायला लागण्याचा निर्णय घेतला . मुळात हा सर्व व्याघ्रमय परिसर होता त्यामुळे अधिक अंधाराकडे न चालण्याचा सूज्ञ विचार मी केला होता.सामान उचलले आणि पावलांना गती दिली . नर्मदे हर !


लेखांक एकोणचाळीस समाप्त (क्रमशः )

लेखांक ४० : स्वर्गीय सहस्त्रधारा आणि पाटणचे भयाण जंगल

सूर्यकुंडामध्ये गायलेल्या रामायणाचे स्वर कानामध्ये रुंजी घालत होते . एक एक चौपाई म्हणत पावले टाकत होतो . त्या नादातच सकवाह गाव पार केले .त्यानंतर पूर्व मंडला गाव संपले आणि समोर बंजर अथवा बंजारा नावाची नदी आडवी आली . इथे ते आजोबा आणि बनकर काका नदी पार करण्यासाठी थांबलेले दिसले . नदी खोल होती आणि तिच्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फुटभर व्यासाचा लोखंडी पाईप टाकलेला होता . गमतीचा भाग म्हणजे या लोखंडी पाईप वरून चालतच नदी पार करावी लागत होती . नदीचे पात्र सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचे होते . चार पावले लोखंडी पाईप करून चालणे वेगळे आणि इतके अंतर चालणे वेगळे .या नळ्यावरून चालताना पाय सटासट सटकत होते . आधी थोडेसे उथळ पात्र असल्याने पाण्यातून चालत आल्यामुळे पादत्राणे भिजलेली असत .त्यामुळे पाईप ओला होऊन गुळगुळीत पृष्ठभागावरून अधिकच सटका सटकी होत असे .मी देखील चालताना मला एका क्षणी अशी भीती वाटू लागली की माझा तोल जाणार आहे ! मी विचार केला की जर माझी ही अवस्था होत आहे तर या दोन वयोवृद्ध माणसांची कशी अवस्था होत असावी ? ते काही नाही . या दोघांना नदी पार करायला लावून मगच आपण पलीकडे जायचे असा निश्चय मी मनोमन केला . त्यात बनकर काकांना मधुमेहाचा त्रास आहे याची मला कल्पना होती . मी पुन्हा माघारी आलो आणि काकांना आधी जायला सांगितले . काकांना मी धीर दिला आणि खाली न बघता लोखंडी पाईप वरून तोल सांभाळत चालायला सांगितले . परंतु साधारण मध्ये आधे गेल्यावर त्यांचे पाय लटलट लटलट कापायला लागले आणि आता ते नदीमध्ये पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली . तिथे काही गोंड आदिवासी मुले सेल्फी काढत उभी होती . मी ओरडून त्यांना आवाज दिला की काकांना पकडा . परंतु त्यांनी तो प्रकार हसण्यावारी नेला . आता काका नदीमध्ये पडणार इतक्यात मी साधारण वीस फूट अंतर अत्यंत वेगाने , त्या पाईप वरूनच पळत गेलो आणि काकांना पकडले ! काकांचा तोल जाता जाता वाचला आणि त्यांनी मला मिठी मारली . त्यानंतर माझा हात धरून शांतपणे मी त्यांना संपूर्ण नदी पार करवली . त्यानंतर पुन्हा उलटा चालत आलो आणि आजोबांना देखील नदीच्या पलीकडे घेऊन गेलो . हा नळ्या वरील प्रसंग खरोखरच खूप थरारक होता ! त्या आनंदा प्रीत्यर्थ बनकर काकांनी बंजर नदी पार केल्यावर मला गरमागरम चहा पाजला ! हा परिसर अतिशय सुंदर असा आहे . मंडला हा जिल्हा म्हणजे अखंड भारत मंडलाचे मध्य स्थान आहे हे आपण मागील एका लेखांमध्ये पाहिले . त्याचाही मध्यबिंदू म्हणाल तर हा संगम होय ! इथे नर्मदेने एक अतिशय झोकदार वळण घेतलेले आहे . फार कमी ठिकाणी ती अशी वळणे घेते . बरोबर त्या वळणाच्या जागी गोंड राजाने बांधलेला बुर्ज किल्ला आहे . हा किल्ला मराठ्यांपासून संरक्षणासाठी त्याने बांधला अशी इतिहासामध्ये नोंद आहे . बंजारा नदीच्या बाजूला नर्मदेचा जो तट आहे तिथे एक सुंदर राधाकृष्ण मंदिर असून समोरच्या तटावर मांडला किल्ला दिसतो . बंजारा नदी पार केल्यावर महाराजपुर नावाचे गाव लागते जे आता मंडला गावाचा भाग झाल्यासारखे आहे . इथे दुर्गा देवी राणीचा एक सुंदर किल्ला होता . इथे एक भव्य व सुंदर राम मंदिर आहे ते पाहून पुढे आलो . वाचकांच्या आनंदाकरिता वरील परिसराची छायाचित्रे खाली देत आहे . 
रम्य सुंदर बंजारा / बंजर नदी
हाच तो धोकादायक लोखंडी नळा . यावरूनच बनकर काका पडता पडता वाचले .वरती गंधासारखे वळण घेते आहे ती नर्मदा मैया . तिच्या पलीकडच्या तटावर मांडला किल्ला आणि खाली बंजारा / बंजर नदी दिसते आहे .
डावीकडून आजोबा आणि बनकर काका . बंजर नदी पार करण्यापूर्वी काढलेले चित्र
बंजारा अथवा बंजर नदीचा उगम कान्हा व्याघ्र अभयारण्यामध्ये होत असून तिच्या काठावर समृद्ध वन्यजीवन आहे . बंजर = बनचर = वनचर अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे . वाघ , हरणे ,गवे असे सर्व प्राणी इथे आढळतात .
मंडला शहराला लाभलेले नर्मदेचे अद्भुत सान्निध्य लक्षात घ्यावे . सूर्यकुंड धाम ते बंजर - नर्मदा संगमाचा रस्ता इथे दिसतो आहे . 
नर्मदेच्या काठावरील सुंदर भव्य राधाकृष्ण मंदिर
राधाकृष्ण मंदिरातून दिसणारे नर्मदेचे सुंदर वळण आणि मधोमध मंडला किल्ला
डावीकडे मंडला किल्ला . उजवीकडून येणारी बंजर नदी . समोर पांढरे राधाकृष्ण मंदिर .
मंडला किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज नरेंद्र शाही बुर्ज
नरेंद्र शाही बुरुजाचा इतिहास . मराठ्यांसाठी अभिमानास्पद असणारा असा हा इतिहास आहे .
नर्मदेने मराठ्यांचा भरपूर इतिहास पाहिलेला आहे .
अठराशे अठरा साली वडगाव मावळच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण भारत इंग्रजांच्या घशात गेला . त्याचवेळी हा किल्ला देखील इंग्रजांनी ताब्यात घेतला . यावरून मराठ्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावे . गोंड राजाने मराठ्यांना साथ दिली असती तर चित्र वेगळे असते . 
बुरुजाच्या बाजूने दिसणारे राधाकृष्ण मंदिर
  नरेंद्रशाही बुर्ज
हा किल्ला सध्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो
संगमावर मोठ्या संख्येने दिसणारे सीगल पक्षी
महाराजपुर घाट
नर्मदे काठचा सूर्योदय
चहा पिल्यावर माझ्या विनंतीनुसार बनकर काका आणि आजोबा पुढे निघाले . माझ्या पायातील जबलपूर मध्ये घेतलेल्या कॅनव्हास च्या बुटाच्या फाटून पार चिंध्या झाल्या होत्या . आता त्यातून रस्त्यावरील खडा आणि खडा माझ्या पायाला जाणवत होता .इतका त्याचा सोल झिजून पातळ झाला होता . माझ्याजवळ दक्षिणेचे दोन तीनशे रुपये साठलेले होते . महाराज पूर हे मोठे गाव आहे . मंडला शहराचेच उपनगर म्हटले तरी चालेल . इथून पुढे जबलपूर शिवाय मोठे गाव लागणार नव्हते . जबलपूर देखील उत्तर तटावर आहे दक्षिण तटावर वस्ती अजिबात नाही . त्यामुळे महाराज पूर मध्येच नवीन पदत्राणे घेण्याचा निर्णय घेतला . रामाचे दर्शन घेऊन झाल्यावर गल्लीबोळातून फिरत फिरत एका छोट्याशा चपलांच्या दुकानामध्ये आलो . ज्याने एका स्थानिक कंपनीचे परंतु चांगल्या दर्जाचे बूट मला दाखविले . याची किंमत सुमारे आठशे रुपये होती . परंतु परिक्रमेमध्ये असल्यामुळे त्याने माझ्याकडून पैसे घेण्यास नकार दिला ! खूप आग्रह केल्यावर मात्र त्याने केवळ तीनशे रुपये घेतले ! गमतीचा भाग म्हणजे माझ्या खिशात तेव्हा केवळ तीनशे रुपयेच होते ! त्याची खरेदी किंमत तेवढी त्याने माझ्याकडून आकारली . त्याच्या दुकानासमोरच एक कचरापेटी होती . तिथे त्याने मला जुने बूट टाकून द्यायची विनंती केली . परंतु ही कृती माझ्या जीवावर आली . ज्या बुटांनी गेले २५ दिवस अव्याहतपणे मला साथ दिली त्यांना असे अचानक उकिरड्यावर टाकून देणे मला बरे वाटले नाही . त्या बुटाची आठवण म्हणून मी त्याच्या नाड्या काढून घेतल्या . आणि त्या नाड्यांनी मी माझी फोम ची गादी बांधायला सुरुवात केली . या नाड्यांनी मला जवळपास शेवटपर्यंत साथ दिली . एका कुंपणाच्या भिंतीवर मी ते बूट ठेवून दिले आणि पुढे चालायला लागलो . नवीन बूट निळ्या रंगाचे होते आणि फारच सुंदर दिसत होते ! तसेच ते माझ्या पायाच्या मापाचे असल्यामुळे पायाला अधिक सोयीचे वाटत होते .
परिक्रमेसाठी वापरलेला पहिला कॅनव्हास चा बूट
२५ दिवसांनी त्याची झालेली अवस्था
महाराजपुर येथे मिळालेला नवा कोरा निळा बूट 
मला आधी वाटले होते की पहिलाच कॅनव्हास चा बूट संपूर्ण परिक्रमा मला पुरेल . परंतु मला खरोखरीच ठाऊक नव्हते की परिक्रमा संपूर्ण होईपर्यंत पंधरा पादत्राणे मला वापरावी लागणार आहेत ! पहिल्या कॅनव्हास च्या बुटा इतका पुढे कुठलाच बूट टिकला नाही ! सरासरी दहा-बारा दिवसांमध्ये माझी पादत्राणे माना टाकत होती ! कदाचित काठावरील मार्ग थोडासा कठीण असल्यामुळे असे होत असावे . किंवा कदाचित माझी चाल देखील थोडी भारदार असावी . परंतु पादत्राणे वेळोवेळी लागत , मिळत आणि फाटत गेली हे मात्र खरे . असो .
आता मध्ये थोडीफार गावे होती आणि त्यानंतर नर्मदेचे नितांत सुंदर रूप जिथे पाहायला मिळते अशी सहस्त्रधारा होती . परिक्रमा एकट्याने करण्याचे काही फायदे असतात याची मला जाणीव इथे एका प्रसंगामुळे झाली . आजोबा आणि बनकर काका एकत्र चालत होते . तसे दोघांचे काही फारसे जवळचे संबंध नव्हते . परंतु दोघांनी एकत्र परिक्रमा चालू केल्यामुळे दोघे एकत्र चालत होते . पैकी आजोबांना प्रत्येक गोष्टीची खूप घाई असायची . आणि बनकर काकांची अशी इच्छा असायची की आपण आलो आहोत तर प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत पुढे जावे . यावरून त्या दोघांमध्ये सतत गमतीशीर वाद विवाद व्हायचे ! आताही तसेच झाले . मला उजव्या हाताला नर्मदेचा घनगंभीर आवाज येऊ लागला ! आणि माझ्या लक्षात आले की इथे काहीतरी वेगळे रूप बघायला मिळणार आहे . म्हणून मी निघालो आणि माझ्या मागे बनकर काका सुद्धा येऊ लागले . परंतु आजोबांना मात्र पुढे जाऊन आश्रम गाठण्याची घाई झाली होती . इथे दोघांची थोडीशी बाचाबाची झाली आणि आजोबा एकटेच पुढे निघून गेले आणि बनकर काका माझ्यासोबत नर्मदेचे नितांत सुंदर रूप पाहण्याकरता सहस्त्र धारे पाशी आले ! सहस्त्रधारा म्हणजे नर्मदेचे पात्र अचानक हजारो शाखांमध्ये विभागले गेलेले आहे ! नर्मदा उंचावरून समुद्रसपाटीकडे प्रवाहित होताना मधील दगडांचे अनेक थर पार करते . त्यातील मंडला जवळचा दगडांचा हा थर पार करताना ती अक्षरशः सहस्त्र खंडित होते ! या प्रत्येक प्रवाहाचा एक धीर गंभीर नाद निर्माण होतो ! आणि सुमारे एक किलोमीटर रुंदीचे हे पात्र विस्तारलेले असताना अचानक या सर्व धारा नष्ट होऊन नर्मदा केवळ बारा फुटातून वाहू लागते ! एक किलो मीटर पात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा जोर केवळ त्या बारा फुटांवर लागतो आणि प्रचंड खळखळाट करत नर्मदा खाली झेपावते ! हे दृश्य इतके नयन रम्य आहे की विचारू नका ! हे दृश्य ज्याने पाहिले तो खरोखरच धन्य होय ! आवाजाचा वेध घेत मी आणि बनकर काका त्या दृश्यापाशी पोहोचलो ! ते दृश्य पाहून आम्ही दोघेही स्तिमित होऊन गेलो ! आजोबांनी किती मोठे दर्शन हुकवले आहे याचे काकांना वाईट वाटू लागले . आम्ही दोघेही तिथे सुमारे तासभर बसलो असू ! विविध प्रकारे आम्ही नर्मदेची स्तुती करू लागलो ! आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदाष्टकापेक्षा अधिक चांगली स्तुती कोण करू शकणार ! त्यामुळे बनकर काका नर्मदाष्टक म्हणू लागले . आणि मी अतिशय धोकादायक वाटणाऱ्या बिंदू वरती जाऊन नर्मदेच्या दर्शनाचा , नाद श्रवणाचा आणि दंडाने ते खळाळते पाणी उडवत स्पर्शाचा आनंद घेऊ लागलो ! बनकर काकांनी या प्रकाराचा एक छोटासा व्हिडिओ घेतला . कालांतराने त्यांनी माझ्या मित्राच्या क्रमांकावर तो पाठवून दिला . आपल्या सर्वांकरिता तो सोबत जोडत आहे . नर्मदेच्या एक किलोमीटर पात्रातील सर्व मासे या बारा फुटातून झेपावतात त्यामुळे इथे कोळ्यांना भरपूर मासे सापडत राहतात . खालील व्हिडिओमध्ये देखील आपल्याला एक कोळी बांधव मासे पकडत बसलेला दिसेल . इथे शांत निळ्याशार नर्मदा जलाचे रूपांतर शुभ पांढऱ्या स्फटिक सम तुषारां मध्ये झालेले दिसते !


वरील नकाशा मध्ये नर्मदा मातेवरील सहस्त्रधारा दिसत आहे आणि अतिशय रुंद असे पात्र कसे १२ फुटातून झेपावते आहे ती जागा देखील लाल मार्कर ने सुचित केली आहे . वरील व्हिडिओ नेमका याच जागी बसून घेतलेला आहे .आता पुन्हा व्हिडिओ पाहिल्यास लक्षात येईल . 
 सहस्रधारा मंडला
 असे अक्षरशः हजारो जलप्रपात इथे आहेत
 स्वच्छ पवित्र सहस्रधारा
चातुर्मास वगळता सहस्त्रधारा अशी नयनरम्य दिसते
चातुर्मासातील अर्थात पावसाळ्यातील तिचे रूप मात्र भयावह असते !
सहस्रधारेपाशी बनकर काकांनी काढलेला फोटो
सहस्त्रधारे पाशी बसलेले बनकर काका
सहस्रधारेचे भव्य दिव्य स्वरूप आणि त्यापुढे कःपदार्थ प्रस्तुत लेखक
नर्मदे वरून वाहणारा मुक्तिदायक मुक्त वारा भात्यात भरून घेताना प्रस्तुत लेखक ... सावलीमध्ये बनकर काका . 
नर्मदेचे निर्मळ जळ ,तिच्या  काठची ओलसर मऊ लुसलुशीत हिरवळ किंवा मऊशार वाळू ... सारेच सुखदायक , आल्हाददायक !

इथे नर्मदेचे ते सुंदर रूप न्याहाळताना बनकर काकांचा कमांडलू तिथेच राहिला . सुमारे दोनेक किलोमीटर पुढे आल्यावर त्यांना आठवले . मी ताबडतोब माझी झोळी त्यांच्याजवळ दिली . एका झाडाखाली त्यांना बसवले . आणि पुन्हा पळत त्यांचा कमंडलू आणायला गेलो . खरे तर याने माझे चालणे वाढणार होते . परंतु नर्मदेचे ते सुंदर स्वरूप पुन्हा एकदा बघायला मिळावे म्हणून मी गेलो होतो ! असा स्वार्थ देखील त्या परमार्थामध्ये होता . मी पळतच कमंडलू घेऊन आलो . काकांना फार आनंद वाटला . तुला मी एक नवीन कमंडलू घेऊन देणार असे वचन त्यांनी दिले . दुर्दैवाने पुढे तशी संधी आम्हाला कधी मिळाली नाही . परंतु काकांना माझा स्वभाव खूप आवडला . त्या दिवशी चालताना त्यांनी मला चार अनुभवजन्य सल्ले देखील दिले . त्यांनी आयुष्यभर मोठ्या पदावर सरकारी नोकरी केल्यामुळे त्यांना लोकसंग्रह आणि लोकांची परीक्षा चांगली होती . त्यांच्याकडून चार व्यावहारिक सल्ले शिकत आम्ही पुढचा मार्ग पकडला . एका झाडाखाली आजोबा झोपलेले दिसले . पुन्हा काका त्यांना बोलू लागले की तुम्ही इथे येऊन झोपा काढल्यात त्यापेक्षा तिथे येऊन नर्मदेचे दर्शन घ्यायला पाहिजे होते . इथून पुढे चार विविध आश्रम होते असे कानावर आले होते . एक गोशाळा होती एका टेकडीवर नग्न अवस्थेत राहणाऱ्या नागालँड येथील साधूचा आश्रम होता तिसरे एक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात हनुमान मंदिर होते आणि तिथे रामजी महाराज म्हणून मूळचे नाशीक चे साधू राहत होते आणि चौथा एका साध्वी शामप्रिया उर्फ मैय्यांचा नितांत सुंदर असा आश्रम होता . या दोघांना चालून थकवा आल्यामुळे ते पहिल्या आश्रमामध्ये थांबले . मी हळूच पुढे सटकलो आणि थेट शेवटचा म्हणजे त्या माताजींचा आश्रम गाठला . इथे एक माताजी प्रमुख असून त्यांच्या सर्व शिष्या हा आश्रम सांभाळत होत्या . पुरुषांनी ठेवलेली स्वच्छता आणि स्त्रियांची स्वच्छता यात नेहमीच फरक पडत असतो . त्यामुळे हा आश्रम अतिशय टापटीत नीटनेटका स्वच्छ आणि सुंदर दिसत होता ! विशेषतः फुलांची अतिशय सुंदर बाग येथे केलेली होती आणि भिंतींना देखील खूप छान पद्धतीने रंग दिलेला होता .या आश्रमाची काही चित्रे नकाशावर सापडली ती आपल्याकरता टाकत आहे .
माताजींच्या आश्रमातील सुंदर रंगकाम केलेले यज्ञकुंड
शेणाची इतकी चोख आणि गुळगुळीत तुळतुळीत लिपाई पुताई आणि इतके सुरेख रंगकाम अन्यत्र कोठेही पाहायला मिळाले नाही .
साध्वी शामप्रिया प्रेरित सद्गुरु घाट आश्रम सहस्त्रधारा मंडला . सर्वांनी अवश्य पहावा असा एक आदर्श आश्रम !
वर दुसऱ्या चित्रात भगवी भिंत दिसत आहे त्याच ठिकाणी मी आसन लावले आणि माताजींना नमस्कार केला . माताजींनी माझी सर्व चौकशी करून घेतली . आणि कुठेही आसन लाव असे मला सांगितले . इतक्यात नाशिकचा एक साधू तिथे आला . माताजीं शी गप्पा मारता मारता त्याने माझी चौकशी केली . आणि तो माझ्या मागे लागला की मी त्याच्या मंदिरामध्ये यावे . मुक्कामासाठीच यावे ! आता माझी कुचुंबणा झाली . इकडे हा आश्रम मला फारच आवडला होता . आणि तिकडे हा साधू एकटा राहत असून माझ्या सहवासाची भिक्षा मागत होता . तो अक्षरशः गयावया करून मला विनवणी करू लागला . मला संकोचल्यासारखे झाले . मी माताजी ना विचारले की आपण निर्णय द्यावा . त्या म्हणाल्या जशी तुझी इच्छा . सर्व मठ आपलेच आहेत.  इतक्यात माताजींच्या दोन तरुण शिष्या तिथे स्वयंपाकासाठी येऊन बसल्या आणि माझी चौकशी करू लागल्या . मी झटक्यात निर्णय घेतला आणि मातृ स्वरूप असलेल्या त्या तिघींच्या पाया पडून लगेचच माझे सामान उचलले .आणि साधूच्या मागे निघालो . परिक्रमेमध्ये खरे तर पुढे गेल्यावर मागे जायचे नसते . परंतु साधूच्या अति आग्रहास्तव मला २०० मीटर उलटे चालावे लागले . एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शेजारी मारुतीचे मंदिर बांधले होते . मंदिराचा स्लॅब धोकादायक पद्धतीने तिरका झालेला होता . भिंतींना तडे गेले होते व हा सर्व प्रकार एकंदरीत इतका भयंकर होता की कुठल्याही क्षणी तो स्लॅब कोसळला असता . स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात बांधकामाची पाहणी केली असता माझ्या लक्षात आले की या बांधकामाला उभे खांब घेतलेले नव्हते तर चार भिंतींवर हा स्लॅब टाकला होता ! त्या वास्तू विशारदाला मी मनोमन साष्टांग नमस्कार घातला ! केवळ नर्मदेची कृपा आणि हनुमंताची इच्छा म्हणून ते मंदिर टिकले होते ! बरे त्या भोळ्या भाबड्या साधूला याची काहीच कल्पना नव्हती . मी जेव्हा त्याला सर्व दाखवले तेव्हा तोही घाबरा- घुबरा झाला ! मंदिराला लागून एक छोटीशी झोपडी बांधून साधू राहत होता . बाबा गेली आठ वर्षे इथे सेवा देत होते . बाबा तसे बरे होते परंतु फार भावनिक होते .वय ४५ ते ५० असावे . संसारीच व्हायचा पण चुकून ब्रह्मचारी राहिलेला साधू ! त्यांना गप्पा मारायची भारी हौस होती . आणि या किनाऱ्याच्या मार्गावरून जास्ती लोक जात नसल्यामुळे त्यांची भावनिक उपासमार होत होती . त्यामुळे त्यांनी माताजींशी संगनमत करून मला मिळवले होते ! 
हेच ते भिंतीवर भिंतीवर स्लॅब टाकलेले मारुती मंदिर !डावीकडे शाळेचे इमारत तर उजवीकडे उतरत्या छपराची साधूची कुटी व त्या शेजारी नर्मदा माता दिसत आहे .
आश्रमा समोरचे नर्मदा मातेचे शांत स्वरूप
रात्री साधूने सुंदर पद्धतीने मातीच्या मडक्यामध्ये बटाट्याची भाजी आणि गरमागरम पुऱ्या केल्या ! दुसऱ्या एका मडक्यामध्ये दम बिर्याणी बनवली ! त्याच्या हाताला खूप चव होती आणि भोजन अतिशय सुग्रास बनविले होते ! मोठ्या आनंदाने आम्ही दोघांनी तो प्रसाद ग्रहण केला . साधूने एक चिचुंद्री पाळली होती . हाक मारल्या बरोबर ती आली आणि प्रसाद घेऊन पुन्हा निघून गेली . साधू थांब म्हणला की ती थांबायची आणि पळ म्हटलं की पळून जायची . मला या प्रकारची फार मौज वाटली . साधूने संपूर्ण परिसराची भरपूर माहिती मला सांगितली . आसपासचे लोक कसे आहेत व साधू लोकांशी कसे वागतात ते देखील मला सांगितले . शेजारचा संपूर्ण महिलांचा आश्रम देखील किती कठीण पद्धतीने चालविला जातो ते मला सांगितले . लोचटपणा करणारे अनेक पुरुष भक्त आहोत असे दाखवून द्या आश्रमात येतात असे साधूचे म्हणणे होते . परंतु माताजींना माणसाची चांगली पारख असून त्या चुकीच्या माणसाला दारात देखील उभे करत नाहीत हेही त्यांनी सांगितले . डोंगरावरील नागालँड येथील साधू बद्दल देखील त्याने भरपूर माहिती सांगितली . हा दिगंबर अवस्थेमध्ये राहत असल्यामुळे तिथे शक्यतो महिला परिक्रमावासी जात नाहीत असे याचे म्हणणे होते . तसेच त्याला उत्तम इंग्रजी बोलता येते त्यामुळे सुशिक्षित परिक्रमावासी तिकडे अधिक जातात हे देखील त्याने सांगितले . एकंदरीत साधू बहुचक अर्थात बहुतेक ठिकाणची माहिती राखणारा होता. त्या रात्री फार भयानक थंडी पडली . साधू त्याच्या कुटीमध्ये झोपला होता व मी मात्र त्याचा आग्रह मोडून मारुतीरायासमोर आसन लावले होते . मायेचा त्याग करण्याकरता परिक्रमे मध्ये आल्यावर अति माया काय कामाची ! हा साधू माझ्याशी गप्पा मारताना इतका रंगून गेला होता की आता आठवडाभर मी जायचे नाही असे त्यांनी जाहीर करून टाकले ! मी देखील मौनं सर्वार्थ साधनम् या मंत्राचा वापर करत काहीच बोललो नाही ! आणि मनोमन पुढचा बेत आखून ठेवला . शेजारी असलेल्या विस्तृत सहस्त्रधारेमुळे थंडी मी म्हणू लागली . दोन्ही ब्लॅंकेट देखील पुरत नव्हती अशी थंडी पडली होती . अर्धवट झोपेतच ती रात्र गेली . पहाटे लवकर उठून डोल डाल स्वच्छ निर्मळ नर्मदाजलात स्नान वगैरे आटोपून पूजा करून दाराचा आवाज न करता हळूच नर्मदे हर केले ! साधूने मला सांगितले होते की सकाळी तो माझ्यासाठी चहा नाश्ता वगैरे करणार आहे परंतु त्याच्या मायेमध्ये अडकण्यात मला अजिबात रस नव्हता . कदाचित माझ्या निघून जाण्यामुळे त्याला वाईट वाटले असावे परंतु त्याला माझा निरुपाय होता . रामजी महाराज मला आशा आहे की आपण मला उदार अंत:करणाने क्षमा केली असेल .मी निघालो खरा परंतु प्रचंड धुक्यामध्ये वाट हरवली होती .इतके धुके मी परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच अनुभवत होतो . चार पावलांच्या पुढचे दिसत नव्हते मग मैया दिसणे तर फारच दूरची गोष्ट . मी एक भौगोलिक निरीक्षण केले ते म्हणजे असे की जिथे जिथे नर्मदेच्या पाण्याला खळखळाट आहे तिथे त्या गरम पाण्यातून येणाऱ्या वाफाचे धुक्यामध्ये रूपांतर व्हायचे आणि घनदाट धुके पसरायचे . इथे हजारो ठिकाणी नर्मदेच्या पाण्याला खळखळाट असल्यामुळे प्रचंड धुक्याची निर्मिती कायम होत असावी . तशाच परिस्थितीमध्ये आणि कडाक्याच्या थंडीमध्ये चालत घाघा नावाचे गाव गाठले इथून पुढे अहमदपूर मार्गे सुरजपुरा - पाटण असा जंगलातला एक शॉर्टकट होता असे मला कळले होते .चालत असताना एका दुकानदाराने चहा प्यायला बोलावले . इंग्रजी वाय आकाराची दोन लाकडे जमिनीत ठोकून त्याच्यावर एक आडवा ओंडका टाकलेले बाकडे तिथे तयार केलेले होते . या भागात सर्वत्र अशीच बैठक व्यवस्था आढळते .तिथे शांतपणे बसलो असताना एक गुजराती महात्यागी साधू आणि एक बुटकीशी वयस्कर मराठी बाई तिथे आले . हा साधू बोलायला अतिशय हुशार होता .गुजराती असला तरी त्याला बऱ्याच भाषा बोलता येत होत्या . मी महाराष्ट्रातला आहे हे कळल्यावर त्याने घडाघड ज्ञानोबा तुकोबांचे अभंग म्हणायला सुरुवात केली ! आज एकादशी होती . त्यामुळे कुठे काही खायला मिळणे अशक्य होते . त्या दुकानदाराने मूठभर शेंगदाणे दिले .मला सध्या भूक नसल्यामुळे मी ते सोबत ठेवून दिले .या गुजराती महा त्यागी सोबत असलेली स्त्री एका मोठ्या समूहासोबत परिक्रमेसाठी निघाली होती परंतु सर्वांचे चालणे वेगवान असल्यामुळे हिला एकटीला मागे टाकून सर्वजण पुढे निघून गेले होते . त्या बिचारीला हिंदी भाषा सुद्धा बोलता येत नव्हती आणि तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता त्यामुळे तिची फारच कुचुंबणा होत होती . अशा परिस्थितीमध्ये तिने नर्मदेचा धावा केला की माझी परिक्रमा काहीतरी करून पूर्ण कर . आणि तिला हे साधू महाराज भेटले . मी पुढे चालायला लागलो .एक मोठे झाड पाहून त्याच्या खाली महा त्यागी आणि ती माताराम असे बसले होते . महा त्यागीने मला आवाज दिला आणि तिकडे येऊन बसण्याचे फर्मान सोडले . परिक्रमेमध्ये शक्यतो साधूचा उपमर्द कोणी करत नाही . शाळेमध्ये मुले जसे मास्तरांचे किंवा हेडमास्तरांचे ऐकतात अगदी त्याच पद्धतीने नर्मदा परिक्रमे मध्ये परिक्रमा वाशी साधूंचे त्यागींचे आणि महा त्यागींचे शांतपणे ऐकून घेतात . मी झाडाखाली बसल्यावर त्याने मला सफरचंद खायला दिली . आज ग्यारस है l खा लो । असे त्यांनी मला सांगितले .एकादशीला हिंदीमध्ये ग्यारस असे म्हणतात . त्याच्याजवळ असलेला अजून बराच उपवासाचा माल त्याने काढला आणि आम्ही तिघांनी तो फस्त केला . मागे महाराजपुरच्या अलीकडे एका गुऱ्हाळे वाल्याने मला ताजा ताजा गुळाचा खडा दिला होता तो आणि शेंगदाणे मी काढले आणि तिघांनी मिळून खाल्ले .इथे पुन्हा साधूशी गप्पा झाल्या तेव्हा असे कळाले की हा साधू त्याच्या गुरुशी भांडून आश्रमातून बाहेर निघाला .आणि वाटेत ही स्त्री भेटल्यावर तिच्यासोबत उरलेली संपूर्ण परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला . बाईंची उंची पाच फूट देखील नव्हती त्यामुळे तिचे सर्व सामान देखील हा वेळोवेळी उचलायचा आणि तिला खूप मदत करीत होता . या साधू बद्दल वरकरणी पाहता कोणाचाही गैरसमज होणे शक्य आहे .परंतु मला याचा शेवटी एक खूप जबरदस्त अनुभव आला तो योग्य वेळी लिहेन . साधू अखंड गांजा पीत होता . मी त्याला विचारले , " महाराज आप महा त्यागी कहलाते हैं ना ? तो फिर आपने इस गांजा पीने की आदत का त्याग क्यों नहीं किया ? " मोठ्याने हसत साधू म्हणाला , " देख बेटा । जिसने गांजा छोडा वह त्यागी है । परंतु तेरे मन में यह जो गांजा के प्रति घृणा है ,हमने उसे घृणा का ही त्याग किया कर दिया है ।इसलिए हम महां त्यागी है । " या उत्तरावर मी निरुत्तर झालो. दोघे विश्रांती घेत पहुडले आणि मी पुढे निघालो .
या भागातून मला लवकरात लवकर पुढे सटकणे आवश्यक होते कारण हे प्रचंड जंगल होते आणि याला लागून अनेक मोठे मोठे व्याघ्र प्रकल्प होते . आपल्याला कल्पना यावी म्हणून मी या अरण्य प्रदेशाला जोडून असलेल्या व्याघ्र  प्रकल्पांचा नकाशा सोबत जोडत आहे . हे सर्व व्याघ्र प्रकल्प इथून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत . 
व्याघ्र प्रकल्पांची नावे हिरव्या रंगात दर्शवली आहेत .
पेंच आणि भांडार रेंज व्याघ्र प्रकल्प देखील या वनाला लागून होता .
सुरजपुरा या गावापासून नर्मदेचे विस्तीर्ण पात्र सुरू होत होते आणि बर्गी धरणामुळे आलेला फुगवटा इथून पुढे चालू झाल्यामुळे नर्मदेच्या काठाने चालण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला होता . 
नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकांमध्ये देखील बर्गी धरणामुळे इथून पुढे काठाचा मार्ग नसल्याची ठळक नोंद आहे .
लाल रंगात दिसते आहे ते सुरजपुरा गाव . सुरजपुरापासून पाटण पर्यंत संपूर्ण वनक्षेत्र होते व मध्ये मानवी वस्ती अजिबात नव्हती . या वनामध्ये सर्व प्रकारची वन्य श्वापदे होती .
या जंगलातील मार्गाचा अवलंब फारसे परिक्रमावासी करत नाहीत . त्यापेक्षा सरधोपट डांबरी सडकेने ते थेट जबलपूर गाठतात . मी घाघा गावामध्ये आलो आणि एका रमणीय तलावाच्या काठावर बसून राहिलो . चालून चालून पुन्हा एकदा भूक लागली होती . भरपूर वाटले तरी शेंगदाणे आणि गुळ शिल्लक होते ते तिथे बसून एक एक करून चावून चावून खाल्ले . समोर पक्षांच्या अनेक जाती दिसत होत्या . त्यातले मला कुठले पक्षी ओळखता येतात असे मी पाहत होतो . फलाहारी अर्थात उपवासाचा फराळ करताना समोर इतके सुस्वरे कूजन करणारे पक्षी असावेत हे मला स्वर्गीय वाटत होते ! नर्मदे काठचे पक्षी या विषयावर खरे तर एक वेगळे पुस्तकच होईल ! अगदी आद्य शंकराचार्यांनाही नर्मदाष्टकात या पक्षांचा उल्लेख टाळता आलेला नाही !  पक्षी लक्ष कुजितम असे ते म्हणतात . त्याप्रमाणे खरोखरीच लक्षावधी पक्षी इथे आहेत . सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे । असे ते म्हणतात ते चक्रवाक पक्षी देखील इथे खूप आहेत . याला मराठीमध्ये ब्राह्मणी बदक असे म्हणतात . इंग्रजीमध्ये रुडी शेल्ड डक असे नाव आहे .नर्मदेमध्ये एकंदरीतच मासे मगरी देखील भरपूर आहेत . असंख्य कीटक आहेत . या भागात मला राखी धनेश हुप्पो अथवा हुदहुद पक्षी बरेच दिसले .नीलकंठ ही मुबलक प्रमाणात दिसले .खंड्या पक्षाच्या सर्व जाती इथे तुम्हाला बघायला मिळतात . कॅमाफ्लाज होणाऱ्या तांबूस डोंगरी चिमण्या तर अगदी खूप आढळतात .तुम्ही अगदी जवळ जाईपर्यंत ह्या दिसत नाहीत व आपण जवळ गेलो की भुर्रकन उडून जातात . त्यांच्या त्या एकदम उडून जाण्यामुळे माणूस दचकतो . टिटव्या भरपूर आहेत . बदके मुबलक आहेत .
बगळ्याच्या सर्व जाती आहेत .स्थलांतरित पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर येतात . हॉर्नबिल , स्पून बिल , सर्व प्रकारचे गाय बगळे ,पिवळे बगळे ,भुरे बगळे , पाण कोंबड्या ,वेगळ्या दिसणाऱ्या साळुंख्या , तांबट , सुतार , असे सर्वच पक्षी दिसले . डोमकावळे ,कावळे , चिमण्यांचे तर २०० -२०० चे थवे दिसायचे . छोटे आणि मोठे पाणकावळे देखील भरपूर होते . घारी ,गरुड , ससाणे ,घुबडे देखील पाहिली . फक्त मोर आणि गिधाड तेवढे दिसले नाही .पुढे गुजरात पासून मोर देखील मुबलक दिसले . 
नर्मदेमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारा चक्रवाक पक्षी .Rudy Shelduck ,,, ब्राह्मणी बदक
हे आपली चाहूल लागल्यावर मजेशीर आवाज काढतात .
राखी धनेश अथवा  gray hornbill हा पक्षी देखील येथे आढळून येतो
 हुप्पो किंवा हुडहुड / हुदहुद पक्षी
अखेरीस मनुष्यवस्ती संपली आणि जंगल चा रस्ता सुरू झाला . हे अरण्य खरोखरच खूप घनदाट होते . सागवानाची झाडे अधिक प्रमाणात होती . पायवाटा जवळपास नव्हत्याच . परिक्रमावासींसाठी मार्गदर्शन करणारे फलक किंवा चिन्ध्या देखील लावलेल्या नव्हत्या. फक्त तुम्हाला रस्ता सांगणाऱ्या माणसाने हाताने दाखवलेली दिशा लक्षात ठेवायची आणि चालत राहायचे एवढेच काम होते . एक गमतीशीर प्रयोग आपणास स्वतः करून पहा . खाली दाखवलेल्या नकाशावर गुगल नकाशे मध्ये जा आणि झूम इन करून कुठलीतरी एक दिशा धरून चालत रहा .बघा तुम्हाला गाव सापडते का ! जर नकाशावर ठराविक गावात पोहोचणे इतकं अवघड आहे तर प्रत्यक्षात किती कठीण असेल याची कल्पना करून पहा . 
हेच ते पाटणचे जंगल जे एका दमात पार करायचे होते . चुकला की संपला !
या जंगलामध्ये असंख्य ओढे नाले आडवे आले होते .
ते पार करण्याकरता थोडेसे डावीकडे उजवीकडे गेले की मुख्य वाट सुटून जायची . असा मी खूप वेळा या वनामध्ये भटकलो . परंतु नर्मदेचे स्मरण केले की मार्ग सापडायचा . हा धगधगीत स्वानुभव आहे . या जंगलामध्ये खूप सारे स्फटिक सापडत होते . इथे थोडेफार मोकळे माळरान लागले की त्यावर स्पटिकांसारख्या रंगीबेरंगी दगडांचा अक्षरशः खच पडलेला असायचा . हे सर्व स्फटिक इतके सुंदर होते की पाहतच बसावेसे वाटायचे !गारगोट्यांचे इतके नानाविध प्रकार मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते . या भागात पूर्वी घडलेल्या काही भौगोलिक हालचालीमुळे किंवा जमिनीतील उष्णतेमुळे तिच्या पोटातील मूलद्रव्यांचे स्फटिकीकरण झाले असावे .  थोड्यावेळाने मला एक जोडपे असलेले परिक्रमावासी भेटले . त्यांच्या पुढेमागे काही काळ चाललो . नंतर ते दोघेही दिसायचे बंद झाले . मी पुढे निघून गेलो .
संध्याकाळ होता होता मी त्या जंगलातील संपूर्ण वाटचाल पूर्ण केली आणि पाटण नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचलो . गावामध्ये एक दुर्गा मंदिर होते तिथे दर्शन घेऊन मी कट्ट्यावर बसलो . शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक ग्रामस्थांची ग्रामसभा घेत होते . सभा संपल्यावर सर्वजण माझ्याकडे आले . मी त्यांना मला आलेले काही सामाजिक अनुभव आणि माझी निरीक्षणे सांगितली जी त्यांना राजकारणाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरली असती . त्यांनी पुन्हा काही प्रमुख गावकऱ्यांना बोलावले आणि माझ्यासमोर एक पुन्हा छोटी सभा जणू काही सुरू झाली . त्यांनी मला माझे स्वानुभव बोलण्याची विनंती केली . आपल्या देशाची प्रादेशिक अखंडता टिकून राहावी यासाठी आपण सर्वांनी एक समाज म्हणून एकसंध राहणे कसे आवश्यक आहे व त्यामध्ये फूट पाडणारे घटक कसे दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत हे त्यांना मी उदाहरणांसह पटवून दिले आणि लोकांना देखील ते पटले . या भागामध्ये काही आदिवासी पक्ष असून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला विरोधी असे वातावरण येथे आहे . 
अशा पद्धतीचे प्रचार साहित्य तिथे तुम्हाला सहज सापडते .
गोंड आदिवासींचे राज्य सर्वत्र व्हावे असा प्रचार करणारी गोंडवाना गणतंत्र पार्टी म्हणून एक पक्ष इथे कार्यरत आहे .
मध्यप्रदेशचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे . तसेच त्यांचे विरोधक असलेले काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी देखील आपल्या तिसऱ्या पत्नीला सोबत घेऊन पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे . मध्यप्रदेश मधील राजकारणामध्ये नर्मदेचे इतके महत्त्व आहे की इथल्या राजाला देखील तिला शरण जावेच लागते . असो . राजकीय विषय अनुषंगाने आला म्हणून सांगितला . अधिक विषयांतर नको . 
इथे शेजारी एक दुकान होते . त्याला मी विचारले की दुर्गा मंदिरामध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते का . त्याने मला काही काळ मंदिराच्या बाहेर बसायची विनंती केली व गावातून कोणीतरी किल्ली घेऊन येईल असे सांगितले . आज एकादशी असल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता . समोरून एक तरुण आला आणि त्याने विचारले की बाबाजी तुम्ही दूध पिणार का ? मी होकार दिल्यावर तो दूध आणायला निघाला . चार पावले गेल्यावर पुन्हा मागे आला आणि म्हणाला नाहीतर तुम्ही स्वतःच माझ्या घरी चला तिथे बसूनच दूध पिऊ या . मला घरी घेऊन गेल्यावर त्याने माझ्यासमोर देशी गाईचे शुद्ध धारोष्ण दूध काढले आणि गरम गरम दूध प्यायला दिले ! आश्चर्य म्हणजे ती गाय चार लिटर दूध द्यायची . त्या दिवशी तिने साडेपाच लिटर दूध दिले त्यामुळे मी तांब्याभर दूध पिऊन सुद्धा अर्धा लिटर अधिकचे दूध उरले . तो धार काढत असताना मी गाईला आंजारत गोंजारत होतो त्याचा हा परिणाम असावा . इथल्या प्राण्यांना देखील नर्मदा परिक्रमा कळते की काय कोण जाणे ! कारण तुम्ही कुठल्याही परिक्रमा वाशीला हे विचारून पहा ! गावातून जाताना घरात चरणारे कोंबडे तुम्हाला नर्मदे हर असा आवाज देतात ! म्हणजे ते म्हणतात कुकू चुकू हेच ! परंतु आपल्याला मात्र नर्मदे हर ऐकू येते कारण आपण विचारांनी आचारांनी नर्मदामय झालेले असतो .
असो . मी पुन्हा दुर्गा माता मंदिराच्या ओसरीवर येऊन बसलो . इथे समोरच एक ऑनलाईन दुकान होते .याचा अर्थ भारत सरकारने दिलेल्या सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ इथून घेता येतो असे दुकान एका तरुण वनवासी मुलाने चालू केले होते . मी किल्ल्यांची वाट पाहत बसलेलो  होतो ,तेव्हा गावातील एक मनुष्य माझ्या शेजारी येऊन गप्पा मारू लागला . इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने मी कसा माणूस आहे याचा अंदाज घेतला . मी आज कुठे मुक्काम करणार आहे वगैरे त्याने सर्व मला विचारून घेतले . परिक्रमा कशासाठी सुरू केली ? कशी काय सुरू आहे ? वगैरे चौकशा देखील करून घेतल्या . मी त्याला सांगितले की ऑनलाईन दुकान चालवणाऱ्या मुलाने मला दोन पर्याय सांगितले आहेत . एक संजय यादव नावाचा कोणी मनुष्य शेजारी असलेल्या कोकाटोला गावामध्ये परिक्रमा वाशींची सेवा करतो आणि दुसरे म्हणजे हे दुर्गा माता मंदिर आहे . मी मात्र मंदिरामध्येच राहतो कारण गृहस्थी माणसाच्या घरात राहण्यात मला फारसा रस नाही . वगैरे आमचे बोलणे चालू होते . आधी त्याने संजय यादव या माणसाला खूप शिव्या घातल्या . आणि तो मनुष्य अतिशय वाईट असल्याचे मला सांगितले . मी त्या माणसाला इतकेच म्हणालो की हे पहा हा संजय यादव कोण आहे त्याला मी ओळखत नाही . परंतु जर तो परिक्रमा वाशींची सेवा करतो आहे तर याचा अर्थ तो नक्कीच अतिशय सहृदय मनुष्य आहे आणि त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याच्यासारखे काहीतरी कार्य आपण करावे ते अधिक चांगले .माझ्या या उत्तरावर तो मनुष्य खुश झाला आणि म्हणाला , " बाबाजी मै ही संजय यादव हूँ। और अभी आपको मेरे घर चलना ही होगा । आपके सामने दूसरा कोई विकल्प है ही नहीं । क्योंकि मंदिर का पुजारी शहर गया है । इसलिए चाबी नहीं मिलेगी । " मी त्याच्याकडे पाहतच राहिलो ! माणसाची परीक्षा घेण्याची ही त्याची अजब पद्धत पाहून मला मजा वाटली . नंतर त्याने सांगितले की तो ग्रामसभेमध्ये देखील उपस्थित होता आणि त्याने मी काय बोललो तो विषय देखील ऐकला . त्याला एकंदरीत कल्पना आली होती की आता या परिक्रमावासीला घरी न्यावे लागणारच आहे परंतु तत्पूर्वी हा नक्की कसा मनुष्य आहे याची परीक्षा त्याने त्याच्या पद्धतीने करून घेतली इतकेच ! मी क्षणभर विचार केला की जर मी कुठलाही अनुभव नसताना केवळ ऐकीव अनुमानाने संजय यादव या माणसाला शिव्या घातल्या असत्या तर माझी आज काय अवस्था झाली असती ? तो कुठल्याही प्रकारे त्याची ओळख न सांगता निघून गेला असता . आणि मी मात्र घर का ना घाट का अशा अवस्थेमध्ये त्या कट्ट्यावर झोपून राहिलो असतो ! म्हणूनच आयुष्यामध्ये अनुमानापेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व द्यावे हेच बरे ! असो .
इथून संजय यादव चे घर जवळच होते आणि योगायोग म्हणजे त्याचा सख्खा धाकटा भाऊ प्रदोष कुमार यादव हा कालच त्याची नर्मदा परिक्रमा आटोपून घरी परत आला होता ! शेतामध्ये यांचे मोठे वाडा वजा घर होते भरपूर गुरेढोरे होती . आणि परिक्रमावासींच्या निवासाकरिता यांनी एक स्वतंत्र बांधकाम केलेले होते .
हात पाय धुऊन मी त्या खोलीमध्ये गेलो असता तिथे आधीच एक ओडिया परिक्रमावासी झोपलेला मला दिसला . हा उडिया मनुष्य तापाने फणफणला होता .त्याच्याशी अधिक बोलल्यावर असे लक्षात आले की हा एक महात्मा असून जगन्नाथ पुरीला याचा स्वतःचा मठ आहे . तो तीन-चार दिवस झाले इथेच मुक्कामी होता . त्याच्या आजारपणामुळे त्या खोलीला एक आजारी वास येत होता . याच्या तापाची थोडीफार बाधा मला देखील होणार याची मानसिक तयारी ठेवूनच मी त्याच्या शेजारी आसन लावले . हे त्याला खूप बरे वाटले कारण गेल्या काही दिवसात तो आजारी आहे कळल्यावर लोक पुढे निघून जात होते किंवा बाहेर आसन लावत होते . मुळात ज्याच्या नशिबात जे ठेवलेले आहे ते व तेवढेच त्याला मिळते यावर माझे दृढ श्रद्धा असल्यामुळे अशा किरकोळ मरणा बिरणाला आपण कशाला भ्यायचे ! कोरोना जागतिक महामारीच्या काळामध्ये देखील मी मास्क वगैरे न लावता खुशाल कोविड केंद्रामध्ये जाऊन रुग्णांच्या शेजारी झोपून त्यांची शुश्रुषा केली होती आणि तरी देखील मला साधी सर्दी देखील झाली नव्हती . आता देखील याची थोडीफार शुश्रुषा करावी असा विचार डोक्यात ठेवूनच मी शेजारी आसन लावले होते . 
यादवांचे हे एकत्र कुटुंब होते आणि घरामध्ये भरपूर मुले होती . बाल सुलभ उत्कंठेनुसार एक एक करून हळूहळू आत येऊ लागले आणि कोण नवीन बाबाजी आला आहे हे पाहू लागले ! त्यांचे ते चमकणारे डोळे आणि डोळ्यातील आश्चर्य मिश्रित भिती पाहून मला फार मौज वाटत होती ! परंपरेनुसार मी एकेकाला त्यांची नावे विचारली आणि काय शिकत आहेत वगैरे माहिती घेतली . "बाबाजी आपको मेरा ड्रॉइंग बुक दिखाए? " एका छोटी ने विचारले . हो म्हणताच पळतच जाऊन तिची वही घेऊन आली . माझी चित्रकला जरा बरी आहे असे लोक म्हणतात त्यामुळे मी तिच्या वहीमध्ये भरपूर चित्र काढून दिली . मुले भलतीच खुश झाली ! याच्यामध्ये शिवोम नावाचा एक मोठा मुलगा होता आणि बारावी नंतर पुढे काय असा प्रश्न त्याला पडला होता . त्याला देखील माझ्या परीने मी मार्गदर्शन केले . अजून एक मोठी ताई होती तिला देखील पुढील शिक्षणाबाबत काही सांगितले .  रामजी , संतोषी उर्फ सरस्वती ,शिवोम , दिव्या , नेहा अशी या मुलांची नावे होती .
मुलांनी पळत जाऊन बाबांचा फोन आणला आणि काही फोटो काढले . माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले . मुले माझ्या इथून हलेचनात ! त्यांचे वडील येऊन त्यांना तीन वेळा सांगून गेले की बाबाजी चालून दमले आहेत त्यांना विश्रांती घेऊ दे .परंतु मुले काही माझा पिच्छा सोडेनात ! मी देखील यादव यांना सांगितले की हरकत नाही मुले काहीतरी चांगलेच ऐकत आहेत . ऐकू द्यावे . त्याचवेळी मी मुलांकडून त्या भागातील भूगोलाबद्दल ,इतिहासाबद्दल ,संस्कृतीबद्दल देखील जाणून घेत होतो . शक्यतो लहान मुलांची मते ही पूर्वग्रहदूषित नसतात . त्यामुळे ती आवर्जून घेत जावीत . 
संतोषी , शिवोम , रामजी , नेहा ,दिव्या आणि प्रस्तुत लेखक

मी सुचविल्याप्रमाणे शिवोम ने पुढे खरोखरीच अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि जबलपूरला राहून तो शिकू लागला . त्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना काही अडचणी आल्या , इंग्रजी भाषेची अडचण आली ,तसेच वस्तीगृहामध्ये राहताना देखील अडचणी आल्या .त्या प्रत्येक वेळी त्याने मला आवर्जून फोन केला आणि सल्ला घेतला . परिक्रमा संपल्यावर देखील त्याने आठवणीने माझ्याशी संपर्क ठेवला याचे मला कौतुक वाटते . कारण परिक्रमेदरम्यान तर आमचा संपर्क होण्याची शक्यताच नव्हती . परंतु माझ्या ज्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवले होते त्याच्या संपर्कात राहून त्याने माझा नवीन क्रमांक मिळविला आणि पुन्हा संपर्क प्रस्थापित केला . विशेषतः मुलांनी घरापासून लांब राहण्याला घरातील मोठ्या माणसांचा विरोध होता त्यांचे देखील प्रबोधन मी त्या रात्री केले आणि त्याच्या अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग थोडासा सुकर झाला . त्या रात्री देखील खूप थंडी पडलेली होती . शिवोम मला एका कोपऱ्यात बनवलेल्या चुलीपाशी घेऊन गेला . हा कोपरा कायम गरम असायचा आणि शेक घेण्यासाठीच या भागाची निर्मिती करण्यात आली होती . तिथे शेकता शेकता आम्ही दोघांनी भरपूर गप्पा मारल्या . रात्री त्यांनी मला भरपूर दुधात केलेली साबुदाण्याची खीर खाऊ घातली . रात्री यादव यांचे वडील आणि दोघे बंधू यांच्यासोबत अंगणामध्ये गप्पा मारत बसलो . संजय यादव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . त्या भागामध्ये तो शाखा लावायचा . झोपण्यासाठी खोलीमध्ये गेल्यावर उडिया साधूशी गप्पा मारत पाठ टेकली .तुम्ही पुरीला आलात की आमच्या आश्रमात नक्की या असे आग्रहाचे आमंत्रण त्याने दिले .तो अतिशय तरुण होता .साधारण ३० - ३५ वय असावे . सकाळी लवकर उठून अंधारातच जंगलामध्ये जाऊन डोल डाल आटोपून आलो .पूर्वी यादव कुटुंबीयांना या विषयामध्ये अतिशय कटू अनुभव आले होते . काही परिक्रमावासी , विशेषतः महिला अंधारात शेजारच्या घरांच्या  दारामध्ये वगैरे जाऊन दाराच्या तोंडालाच विष्ठा टाकून येत . त्यामुळे शेजारीपाजारी यादव कुटुंबीयांना खूप बोलू लागले होते .काही काळ याच कारणासाठी त्यांना सेवा देणेदेखील बंद करावे लागले होते . परंतु नंतर त्यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला . माझे त्यांनी विशेष आभार मानले . परंतु पहाटेच्या अंधारामध्ये जंगलात मला कसे वाटले याचा अनुभव मी त्यांना न सांगणेच पसंत केले ! आता मी निघण्याची तयारी करू लागलो परंतु यादव कुटुंबीयांनी मला थांबवले आणि द्वादशीचे भोजन करून जाण्याची विनंती केली . पुढे जवळपास कुठलेही गाव किंवा आश्रम नव्हता . पुन्हा थोडाफार जंगलातील रस्ता होता . यांच्या घरातून नर्मदा मैयाचे सुंदर दर्शन होत होते ! दूरवर तिचे पाणी छान चमकत होते ! यादवांचे अतिशय संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंब होते . शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता . प्रदोष कुमार यादव ने जाताना मला एक खतरनाक शॉर्टकट रस्ता सांगितला . या रस्त्याने चालत जाताना दोन-तीन मोठी घनदाट जंगले पार करावी लागत होती . परंतु जवळपास तीन दिवसांचे चालणे वाचून एकाच दिवसात मी पुढे पोहोचत होतो .मध्ये कुठेही परिक्रमा वासींची सेवा होत नाही . कारण हा रुळलेला परिक्रमेचा मार्गच नाही . तर हा मार्ग केवळ स्थानिक ग्रामस्थ येण्या जाण्यासाठी वापरतात .घरातून निघालो आणि शेतामध्ये काम करणारे संजय यादव आणि शिवोम भेटले . मला बरगावच्या आश्रम शाळेमध्ये मिळालेली छत्री मी इथे यादव ला देऊन टाकली . तसाही तिचा वापर केलाच नव्हता . तुका म्हणे घालू तयावरी भार इतकेच तिचे काम होते ! यादव कुटुंबीय डोळ्यात पाणी आणून निरोप घेताना दिसले . खूप कमी काळात ते माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेले की मैयाची कृपा . परंतु तुम्हाला तर आता माहितीच आहे ! आपले ठरलेले आहे ! कुठल्याही मायेत न अडकता सटकायचे ! तसाच सटकलो आणि सुसाट वेगाने जंगलच्या दिशेने चालत सुटलो . नर्मदे हर !


लेखांक चाळीस समाप्त (क्रमशः)

लेखांक ४१ : कोरोठार , रामकुंडी , मेहेरतला आणि नर्मदेवरचे पहिले भव्य धरण बर्गी बाँध

शेतांच्या मधून गेलेला मार्ग पकडला आणि चालत चालक केदारपुर गाव गाठले . हा सिवनी जिल्हा सुरु होता . छत्तीसगड ,दिंडोरी ,मंडला ,शिवनी असे चार जिल्हे मी अमरकंटक पासून बाराच दिवसात पार केले होते .इथे नाक्यावर सोनू शर्मा आधीच येऊन बसला होता . एका दुकानदाराने मला पूजा साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचा रिकामा डबा दिला . हा डबा तंबाखूचा होता . परंतु चांगला टिकला . याच्यामध्ये ठेवल्यामुळे काडेपेटी हवाबंद रहायची. इथून पुढे संपूर्ण जंगलाचा मार्ग होता . 
जंगलातून जाताना अचानक मागून गाडीचा आवाज येऊ लागला . म्हणून मागे वळून पाहिले तर हिरव्या रंगाची एक जिप्सी गाडी येत होती . गाडी माझ्या शेजारी येऊन थांबली आणि आतील माणसाने आवाज दिला नर्मदे हर ! हे होते राजकोट गुजरात येथून परिक्रमेला निघालेले श्री प्रकाश कलोला जी . यांचा सर्जिकल इक्विपमेंट बनविण्याचा व्यवसाय होता . परंतु तरीदेखील वेळात वेळ काढून ते आपल्या जिप्सी गाडीमध्ये दोन ट्रेमध्ये बरेचसे सामान ठेवून परिक्रमेला निघाले होते . गाडीतच ते झोपत असत .गाडीला छप्पर वगैरे काहीही नव्हते . उघड्या गाडीतून जवळपास काठाकाठाने परिक्रमा करत ते आलेले होते . ऑफ रोडिंग चे सर्वात मोठे एक्स्पिडीशन ते ठरले असेल ! मला त्यांनी काही फळे खायला दिली आणि पुढे निघून गेले . काही अंतर गेल्यावर रस्ता लागत होता तिथे ते थांबलेले होते . तिथे मी त्यांचा क्रमांक नाव वगैरे लिहून घेतले . त्यांच्या मोबाईलवर त्यावेळी आम्ही एक सेल्फी काढला . आता लिहिताना त्यांची आठवण झाल्यावर त्या क्रमांकावर फोन केला असता त्यांनी तो फोटो ईमेलवर पाठवून दिला . तो आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
राजकोट येथील चतुष्चक्री परिक्रमावासी श्री प्रकाश कलोला जी . त्यांची हिरवी जिप्सी आणि मागे ठेवलेले शिधा , तंबू आदि सामान . 
प्रकाशजींना नर्मदे हर करून पौंडी गावातून पुन्हा एक शॉर्टकट पकडला आणि चालत राहिलो. प्रत्येक पावलाला नर्मदा मातेचे स्मरण करत चालायचे ,असे केल्याने तुम्ही किती चाललात ते लक्षात येत नाही . आज एका अनवट मार्गाने कुरोठार अथवा कोडोठार नावाच्या गावामध्ये पोहोचलो. गावातून एक मोठा ओढा वाहत होता व तो नर्मदेला जाऊन मिळत होता . गावाच्या अलीकडेच ओढ्याच्या काठावर एक आश्रम होता . एका साधूची समाधी , तिच्या जवळच तीस माणसांच्या कवेत मावेल असे एक अतिप्रचंड पिंपळाचे झाड , त्याची तुटलेली एक महावृक्ष सदृश्य फांदी व त्या फांदीमुळे उध्वस्त झालेला जुना आश्रम आणि समोर छोटासा नवीन आश्रम बांधलेला , शेजारी वाहणारा एक ओढा जो थेट नर्मदेमध्ये जाऊन मिळतोय असे याचे स्वरूप होते .
हाच तो भव्य अश्वत्थ वृक्ष आणि त्याची तुटलेली फांदी मागे दिसत आहे . समोर समाधी
तुटलेल्या फांदीमुळे उध्वस्त झालेला जुना आश्रम . जुना आश्रम आता वापरात नाही
नव्या आश्रमाची मुख्य इमारत (व्हीआयपी रूम !)
नर्मदेच्या अति भव्य पात्राच्या तुलनेत आश्रमाचे स्थान . शेजारी पार केलेला सघन वन प्रदेश .
लछनदास बाबा नावाचे एक साधू या आश्रमाची व्यवस्था पाहत होते . साधूचे वय सुमारे ७०-७५ असावे . हे साधू मनाने फार निर्मळ होते परंतु स्वभावाने अतिशय कर्मठ आणि कठोर होते . यांची अत्यंत कडक शिस्त होती . जरा देखील इकडचे तिकडे झालेले त्यांना चालत नसे . पादत्राणे सांगितले आहे त्याच ठिकाणी व शिस्तीतच लागली पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास असायचा . या गुणाचा त्यांना फायदा देखील होत असावा . कारण मी या वास्तव्यामध्ये त्या साधूला शंख कसा वाजवायचा ते शिकविले .आणि त्यांना ते जमू देखील लागले .ते फार जास्ती शक्ती वापरत होते त्यामुळे शंख वाजत नसे परंतु जेव्हा मी त्यांना युक्ती शिकविली तेव्हा त्यांनी ती लगेचच आत्मसात केली . एका "पॅटर्न " मध्ये चालण्याच्या सवयीमुळे शंख वाजवण्याचा "पॅटर्न " अथवा पद्धती त्यांना लगेच कळली . असो .आश्रमामध्ये सर्वप्रथम मी पोहोचलो . थोड्या वेळाने सोनू शर्मा आला . त्यानंतर वासुदेव नावाचा एक अतिशय खवचट म्हातारा तिथे पोहोचला . पुढे नर्मदेवर पुनासा नावाचे मोठे धरण आहे त्याच्या शेजारी हा पुनासा गावातच राहायचा . म्हाताऱ्याने आयुष्यात सर्व गोष्टी करून पाहिल्या होत्या आणि आता अध्यात्म करून पहावे या विचाराने परिक्रमेला आला होता . पुढे दोन-तीन दिवस तो माझ्या मागे पुढे होता . ऐकायला कमी येत असल्यामुळे फोन स्पीकरवर टाकून बोलायचा . फोन उचलण्यापूर्वी मला सांगायचा , बायकोचा फोन आहे . दरवेळेस पलीकडून वेगळ्या स्त्रीचा आवाज यायचा . मी त्याला विचारले की दरवेळेस वेगळा आवाज कसा काय येतो आहे ? तर हसत हसत मला सांगायचा की बायकोच बोलते आहे , फक्त दुसऱ्या कोणाचीतरी ! इतका म्हातारा विक्षिप्त व परदारा लिप्त होता . सुंभ जळाला तरी अजून पीळ जळलेला नव्हता . माझ्या दृष्टीने यातली आनंदाची बाब इतकीच होती की हा बाबा व्यक्तिगत जीवनात काही का करेना परंतु नर्मदा परिक्रमा पायी करत होता .असो . तर लछन दास साधूने आम्हाला पिंपळाचे झाड ज्या खोलीवर पडले होते त्या पडक्या खोली मध्ये स्वच्छता करून राहायला सांगितले .पारावर काही ग्रामस्थ मंडळी येऊन बसली होती .खोलीमध्ये दगड विटा माती यांचा ढीग लागला होता आणि प्रचंड धूळ होती . वासुदेव म्हातारा आणि सोनू शर्मा दोघे या प्रकारामुळे चिडले . मी शांतपणे हातामध्ये खराटा घेतला आणि जेवढा भाग शक्य होता तेवढा झाडून स्वच्छ केला . कचरा उचलताना मला तिथे एक अग्नि कुंड आहे असा साक्षात्कार झाला . मग त्याच्यावरील दगड विटा बाजूला करून त्याच्यामध्ये मी अग्नी प्रज्वलित केला त्याबरोबर दोघेही तिथे आसन लावायला धावतच आले . मोक्याच्या जागा पटकावून दोघांनी आसन लावले . मला जागा शिल्लक राहिली नाही त्यामुळे मी पिंपळाच्या पारावर आसन लावले . नंतर दोघांना काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी माझ्यासाठी थोडीफार जागा निर्माण केली आणि मग मी तिथे माझे आसन हलविले . तिघेही आगीचा शेक घेत मस्त गप्पा मारत बसलो . सोनू शर्मा बद्दल मी आधी सांगितलेच आहे त्याप्रमाणे तो अतिशय झपाझप चालायचा . माझी गती त्याच्या निम्म्याहून निम्मी होती . परंतु तरीदेखील आतापर्यंत बरेचदा तो मला भेटला याचा अर्थ आमचे ससा कासव शर्यती सारखे चालले होते . 
अगदी या आश्रमामध्ये येण्यापूर्वी देखील दुपारी चहा पिण्यासाठी बरेली आणि अंडिया गावातील एका धर्मशाळेमध्ये मला ग्रामस्थांनी नेले तर तिथे आधीच सोनू येऊन बसला होता . सेवेकरी तरुणाने आमच्या दोघांसोबत एक सेल्फी काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
बरेली गावातील सेवेकरी, प्रस्तुत लेखक आणि सोनू शर्मा
हाच तो आश्रम जिथे वरील छायाचित्र काढण्यात आले आहे
बरेली अंडिया परिक्रमावासी सेवा आश्रमाची समोरची बाजू
इथे एक छोटेसे नर्मदा माता मंदिर असून भिंतीवर रेखाटलेली नर्मदा माता देखील खूप सुंदर आहे
आश्रमातील नर्मदा मैया
असो . तर सांगायचे तात्पर्य इतकेच की कितीही वेगाने चालला तरी मध्ये थांबत असल्यामुळे सोनू शर्मा मागे पडत होता . कधी कधी फार जास्ती चालल्यामुळे आजारी देखील पडत होता व त्यात त्याचे एक-दोन दिवस जात होते . मला मात्र डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी पहिल्याच दिवशी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी निवांत आणि एका विशिष्ट गतीने , न थांबता , अखंडित चालत असल्यामुळे तुलनेने कमी त्रास होत होता आणि अंतर ही अधिक कापले जात होते . गप्पा मारता मारता त्या दोघांनी साधूला शिव्या घालायला सुरुवात केली . असे कुठे असते का ? परिक्रमा वासींना असे पडक्या खोलीमध्ये कधी कोणी झोपायला देईल का ? स्वतः साधू मात्र चांगल्या बांधलेल्या पक्क्या खोलीमध्ये राहतो आहे ! गंमत म्हणजे तो आम्हाला त्या खोलीच्या आत मध्ये देखील येऊ देत नाही ! स्वतःला कोण समजतो हा साधू ? असले ५६ साधू पाहिले !वगैरे वगैरे ! सोनू शर्मा साधारण चाळीशीचा शिडशिडीत तरुण होता आणि म्हातारा साठीचा होता . साठी बुद्धी नाठी ही म्हण मूर्तीमंत सार्थ करण्याकरताच त्याचा अवतार असावा असे एकंदरीत त्याचे वर्तन होते ! सोनू तसा स्वभावाने शांत आहे हे मला माहिती होते परंतु या म्हाताऱ्याने त्याला चांगलेच भडकवले . दोघे साधुशी भांडून आले ! आता तर साधूने निश्चय केला की यांना शक्य तितका त्रास द्यायचा ! आणि तो प्रत्येक गोष्टी करता त्यांना झापू लागला ! मला या सर्व गोष्टीची मोठीच मौज वाटत होती ! मनोमन मी मोहन साधूचे आणि पर्यायाने नर्मदा मातेचे आभार मानत होतो ! की मला खूप पूर्वी अशाप्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण त्यांनी देऊन ठेवले होते ! जळणाची लाकडी संपली आहेत हे कळल्यावर साधूने एक भला मोठा ओंडका आणून पारावर ठेवला आणि त्या दोघांना कुऱ्हाडी आणून फोडायचे काम दिले . वासुदेव म्हातारा भलताच आळशी होता .त्याने कुऱ्हाडीला अजिबात हात लावला नाही . मग मी कुऱ्हाड हातात घेतली . साधूने करड्या आवाजात मला कुऱ्हाड खाली ठेवण्याचा आदेश दिला . मला म्हणाला तू अजिबात हात लावू नकोस कामाला . आल्या आल्या तू संपूर्ण पार झाडून घेतला आहेस आणि खोली देखील स्वच्छ केलेली आहेस . या दोघांना काहीतरी काम करू दे . नर्मदा मैया फुकट खायला घालत नाही ! मी खरोखरच आल्या आल्या पिंपळाच्या सर्व काड्या काटक्या गोळा करून पालापाचोळा वेगळा बिया वेगळ्या काटक्या वेगळ्या असे झाडून ठेवले होते . या प्रदेशामध्ये शेकोटी करण्याकरता असा लाकूडफाटा लागतोच हे मला आता माहिती झाले होते .आणि तसेही कुठल्याही नवीन जागी गेल्यावर तुम्हाला राहण्यासाठी योग्य अशी जागा निर्माण करावी लागते हे कुठल्याही किमान बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला देखील कळू शकणारे वास्तव आहे .त्यासाठी कुठल्या मोठ्या पुस्तक पंडिताची गरज नाही . असो . इतक्यात वासुदेव म्हाताऱ्याने एक मोठाच आगाऊपणा केला . एक भला मोठा ओंडकाच त्याने ढकलत ढकलत पडक्या खोलीकडे न्यायला सुरुवात केली . साधू त्याच्या खोलीतूनच ओरडून सांगू लागला ऐसी भूल मत करना !पछताओगे ! परंतु म्हातारा काही ऐकायला तयार नव्हता त्याने तो ओंडका नेऊन शेकोटीच्या एका बाजूला ठेवलाच ! त्याच्या मते आता काम सोपे झाले ! लाकूड फोडण्याची गरज नाही आणि काहीच नाही ! आम्ही तिघे पुन्हा गप्पा मारत बसलो . पुनासा भागातील नर्मदेची रूपे वगैरे म्हातारा सांगत होता . इतक्यात त्या अंधुक अंधारात मला काहीतरी काळे इकडे तिकडे पळते आहे असे वाटले . म्हणून मी विजेरीच्या प्रकाशात पाहिले तर साधारण अर्धा इंच आकाराचे काळे कुळकुळीत शेकडो विंचू त्या लाकडाच्या ओंडक्यातून उष्णता लागल्यामुळे भसा भसा बाहेर पडू लागले होते ! ओंडक्यातून खाली उतरताना ते एका रांगेत उतरत होते आणि खाली उतरले रे उतरले की विखुरले जात होते ! साधारण आठ आण्याच्या आकाराचे विंचू होते .
बरोबर याच आकाराचे आणि प्रकारचे ते विंचू होते .
 सर्व खोलीभर सामान भर आणि आसनभर विंचूच विंचू झाले ! तिघेही उठून उड्या मारायला लागलो ! आपापले सामान घेऊन बाहेर आलो . मी पळतच जाऊन साधूला ही वार्ता सांगितली . साधू शिव्या घालत बाहेर आला . आणि वासुदेव म्हाताऱ्याला झापू लागला . मैने बोला था मत ले जाना लकडी अंदर । अब भुगत लो परिणाम !
दोघेही जरा खजील झाले . साधूने सांगितले काळजी करू नका . ती विंचवाची पिले आहेत . थोड्याच वेळात ती आपापल्या जागी निघून जातील . तासाभराने आत मध्ये जा . लाकडाच्या आत असलेल्या पोकळीमध्ये विंचविणीने अंडी घातली असावीत . उष्णता पोहोचताच सारी पिले बाहेर आली इतकेच . आम्हा तिघांचे नशीब थोर की आम्हाला एकाही विंचवाने डंख मारला नाही ! मला ते विंचू दिसायला अजून थोडासा उशीर झाला असता तर नक्की एखादा तरी विंचू चावला असता ! आणि मग मी त्या सर्वांना नाथांचे विंचू चावला हे भारुड आठवले तसे कृती सकट म्हणून दाखविले . त्याचा गूढ अर्थ सांगितला . आणि त्या भारुडातील नाच पाहून सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली ! इथून नर्मदेपर्यंत अंधारात जाता येणे शक्य नव्हते कारण मध्ये घनदाट अरण्य होते . त्यामुळे मागच्या ओढ्यावर जाऊन स्नान केले . पूजन केले आणि साधूला स्वयंपाकाला मदत करावी म्हणून उजव्या हाताला असलेल्या स्वयंपाक घरात गेलो . साधूने मला विचारले की तुला काय काय येते ? मी अजून शिकतो आहे असे सांगितल्यावर मला म्हणाला तू काहीच करू नको .फक्त बसून रहा . मी करतो माझ्याशी गप्पा मार . त्याचा कडक स्वभाव पाहता त्याला फिरून काही बोललेले आवडणार नाही हे माहिती असल्यामुळे मी मानेने होकार दिला आणि शांत बसून राहिलो . मी फक्त इतकेच म्हणालो की आपण गप्पा मारूयात परंतु त्या तुम्ही मारा आणि मी फक्त ऐकणार आहे . माझ्याजवळ असे काहीही नाही की जे तुम्हाला ऐकवून तुमचे कल्याण होईल . परंतु आपल्याजवळ असे भरपूर काही आहे की जे ऐकून माझे कल्याण निश्चितपणे होणार आहे ! माझ्या या उत्तराने साधू प्रसन्न झाला आणि त्याने अध्यात्माच्या अनेक संकल्पना मुळापासून मला समजावून सांगितल्या . परिक्रमेमध्ये आहे त्याचा लाभ घेत विविध महात्मे संत महंत यांना भेटून त्यांच्याकडून भरपूर ज्ञान गोळा करण्याची अनायासे आलेली संधी दवडू नकोस असे त्यांनी मला सांगितले . साधू डोळे मिटून बोलायचा . आणि बोलता बोलता परब्रम्ह वगैरे शब्द आले की क्षणभर त्याला ध्यान लागायचे . तो अतिशय शुद्ध , सात्विक , नैष्ठिक , अधिकारी सत्पुरुष होता असे पाहताक्षणी जाणवत होते . परंतु त्याच्या स्वभावामध्ये असलेली कडक शिस्त ही त्याच्या पूर्वाश्रमीच्या जीवनामुळे आणि सवयीमुळे आलेली होती . साधूंना शहाण्या माणसाने कधीही त्यांच्या पूर्वाश्रमाविषयी प्रश्न विचारू नयेत .त्यांना ते आवडत नाही . एखाद्या घटस्फोट झालेल्या माणसाला तुमचा घटस्फोट कसा झाला याचे एकदा वर्णन करून सांगा असे म्हटल्यासारखे ते आहे . साधू प्रत्येक गोष्टीमध्ये निष्णात , तरबेज , पटाईत होता . त्याने केलेले कणकेचे उंडे देखील एकसारखे गुळगुळीत व एका वजनाचे मापाचे होते . त्याने कणिक मळल्यावर एक कण देखील पिठी मागे शिल्लक राहिली नाही . त्याच्या पोळ्या इतक्या गोल होत्या की कर्कटक घेऊन काढल्या आहेत असे वाटावे ! आणि त्याने बनवलेल्या भाजीमध्ये देखील प्रत्येक गोष्ट तो मोजून मापून टाकत होता . ज्या माणसाला एका कृतीमध्ये परफेक्शन जमले त्याला तेच परफेक्शन दुसऱ्या कृतीमध्ये आणायला वेळ लागत नाही . साधूंना त्यांचे मानवी जीवन जगणे या प्रकारामध्ये परफेक्शन अर्थात सर्वोत्कृष्ट नियमितता प्राप्त झालेली असते . त्यामुळे शक्यतो ते सर्वच गोष्टी उत्तम करू शकतात . मुळात वैराग्य पत्करणे आणि निभावणे ही सर्वात अवघड गोष्ट असल्यामुळे त्याच्यापुढे अन्य सर्व गोष्टी किरकोळ आहेत . साधूने एक घोळ केला. त्याने मोजून आठच टिक्कड केले आणि माझ्या अंगावर काटाच आला ! समोरच्या तटावर असताना लुकडा सुकडा दिसणारा सोनू शर्मा किती टिक्कड खाऊ शकतो हे मी स्वतः पाहिले होते ! दहा-बारा टिक्कड तर तो आरामात खायचा ! पुनासा वाला वासुदेव म्हातारा देखील बुटका आणि जाडजूड होता . अशा प्रकारची ग्रामीण माणसे देखील शक्यतो दाबून जेवण करतात . आता साधूला हे दोघे काहीतरी बोलणार याची मला खात्री पटली .दोघे अत्यंत तोंडाळ होते . पुढचे वादविवाद कमी व्हावेत म्हणून भरपूर भूक लागलेली असून देखील मी साधूला आधीच सांगितले . की आज मला भूक नाही त्यामुळे मी एकच टिक्कड खाणार आहे .मला अगदी वाटलेच आणि त्याप्रमाणे साधू मला म्हणाला आधी का नाही बोललास एक टिक्कड कमी बनवला असता ना ! स्वभावाला औषध नाही हेच खरे ! आम्ही तिघे पाराखाली जेवायला बसलो आणि साधूने वाढायला सुरुवात केली . मी मुद्दाम छोटे छोटे घास घेऊन हळूहळू जेवत होतो . सोनू अर्ध्या पोळीचा एक घास करायचा . त्याचा टिक्कड संपताच त्याने साधूला आवाज दिला आणि टिक्कड मागवला . साधू म्हणाला , आता हा शेवटचा आहे यानंतर मिळणार नाही . दोघेही चिडून उठून उभे राहिले ! आणि भांडू लागले . एकच टिक्कड मिळेल याचा अर्थ काय ? त्यापेक्षा उपाशी तरी मारायचे आम्हाला ! मी दोघांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की अन्नाचा अवमान करू नये .जितके मिळाले आहे तितके आधी खाऊन घ्यावे . तर दोघे माझ्यावर भडकले . शेवटी मी साधूला एक उपाय सुचवला . मी एक पोळी खाल्ल्यामुळे सात शिल्लक होत्या . या दोघांना तीन-तीन द्याव्यात व साधूने देखील एकच खावी . अखेरीस दोघे खाली बसले आणि दोघांनी तीन तीन पोळ्या खाल्ल्या . मी साधूला पुन्हा टिक्कड बनवून देणार होतो परंतु त्याने नकार दिला .दहा दहा चपात्या पचवणाऱ्या या दोघांना अशाप्रकारे त्यारात्री अर्धपोटी राहावे लागले . रात्री आम्ही तिघे त्या पडक्या खोलीमध्ये झोपी गेलो . तास दोन तास गेले असतील . साधू हळूच पायाचा आवाज न करता माझ्याजवळ आला . आणि मला उठवून इशाऱ्याने त्याच्या मागे चालण्याची सूचना केली . मला काही कळेना की काय होते आहे . हा मला आत मध्ये बांधलेल्या स्पेशल व्हीआयपी रूममध्ये घेऊन गेला . व्हीआयपी रूम म्हणजे काय तर तिच्या भिंती पडलेल्या नव्हत्या इतकेच . परंतु दिवसभर बंदिस्त असल्यामुळे खोली थोडीशी उबदार होती . साधू बाहेर ओसरीवर झोपला आणि मी खोलीमध्ये दार ओढून घेऊन जमीनीवरच झोपलो . खूपच छान झोप लागली . परिक्रमेमध्ये मला काही सूचक स्वप्नं पडायची . म्हणजे काही विशिष्ट व्यक्ती स्वप्नामध्ये दिसायच्या .त्याची नोंद मी वहीत करून ठेवायचो . परिक्रमा संपल्यावर मी खात्री करून घेतली की अमुक अमुक दिवशी तुम्ही स्वप्नात आला होतात. तर नेमकी त्याच दिवशी त्या व्यक्तीने माझी इकडे आठवण काढलेली असायची . असे बऱ्याच जणांच्या बाबतीत खरे ठरल्यामुळे माझी नक्की कोणकोण आठवण काढत आहे हे देखील मला अनायासे कळत होते .असो . त्या साधूने असे मला आत मध्ये एकट्याला झोपायला बोलवावे हे मला पटलेले नव्हते .परंतु काही बोलायच्या आत तो झोपी देखील गेला . सकाळी लवकर उठून मी ओढ्यावर स्नान वगैरे आटोपून पूजा उरकून दोघे जागे व्हायच्या आत धूम ठोकली . पुन्हा या व्हीआयपी वागणुकीवरून होणारी वादावादी मला ऐकायची नव्हती . आज पुन्हा दोन-तीन जंगले पार केली . दूरवर गोरखपुर पावर प्लांट ची मोठी चिमणी दिसत होती . या चिमणी कडे पहात चालत राहिलो .
गोरखपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाची चिमणी

या चिमणीची एक गंमत होती . कितीही चालले तरी ती चिमणी समोरच आहे असे वाटायचे . तिची उंची चांगली पाचशे - हजार फूट असावी . दीपस्तंभाकडे पाहत वाटचाल करणे याचा अर्थ मला त्या दिवशी कळला . जंगल निर्मनुष्य होते .मध्ये एक दोन घरे लागली . इथे एक मनुष्य झाडाच्या काडीने दात घासत होता . त्याने मला विचारले की तुम्हाला दात घासायला काडी हवी आहे का . ही रामफुल नावाच्या झाडाची काठी होती . त्याने घराजवळ नेऊन मला गरम पाणी आणि राम फुलाची काठी दिली . हा कबीर पंथी होता . कबीर पंथाचे लोक कुठल्याही मूर्ति पूजेच्या अवडंबरामध्ये न पडता कबीरांच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करतात .यांच्या घरात किंवा दारात कबीरांचा फोटो लावलेला असतो हीच त्यांची खूण .हे लोक पांढरी वस्त्रे , पांढरा झेंडा वापरतात .हा या भागातील किराणा मालाचा दुकानदार होता . आधी त्याने बसण्यासाठी खुर्ची आणि त्यावर छान आसन टाकून व्यवस्था केली .त्याने मला चहा आणि पार्ले जी चा बिस्कीटचा छोटा पुडा आणून दिला . तिथे बसल्यावर खूप शांत वाटत होते . कारण सकाळी लवकर निघाल्यामुळे जंगलातून भरपूर चालणे झाले होते आणि थंडी अजून देखील जाणवत होती .इतक्यात सूर्य देवाने दर्शन दिले आणि छान उबदार वाटू लागले .बसल्या बसल्या त्याच्या मुलाने फोटो काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .कबीर पंथी माणसाच्या दारात बसलेला प्रस्तुत लेखक
या चित्रात मागे दिसणारी छोटीशी खिडकी म्हणजे याचे किराणा मालाचे दुकान होते .छोट्या खेड्यांमध्ये अशीच एक खिडकी दुकाने असतात .
या माणसाने मला पुढील मार्ग समजावून सांगितला .आजकाल शहरातील परिक्रमावासी गुगलचा वापर करून स्वतः मार्ग ठरवितात परंतु त्याच्यामुळे वाटेतील काही महत्त्वाचे ठिकाणे सुटू शकतात .गुगल वर अवलंबून राहण्यापेक्षा जर स्थानिक लोकांशी चर्चा केली तर खूप भारी , सोपे , वेगळे , अद्भुत आणि अनवट मार्ग मिळतात असा माझा अनुभव आहे . असो . असेच एक स्थान मला या माणसाकडून कळले व ते म्हणजे रामकुंडी नावाचे जलकुंड होते . वनवासामध्ये असताना स्वतः प्रभू रामचंद्रांनी या कुंडावर स्नान केल्याची आख्यायिका आहे . या परिसरात एक मोठे मैदान आणि छोटी मोठी अनेक मंदिरे तसेच मोठी मोठी झाडे होती .
अटरिया गावातील श्रीक्षेत्र राम कुंडी परिसर . गोल विहीर आणि तलाव येथे रामाने स्नान केले होते .तलावामध्ये बुडलेले मंदिर .विहिरी शेजारी साधू कुटी .
 कुंडामध्ये उतरायला बंदी होती परंतु दोरी बांधलेल्या प्ला 1स्टिकच्या डब्याने पाणी शेंदून काठावर आंघोळ करता येत होती . शेजारीच एक मोठा तलाव होता व त्यात स्त्रिया धुणे वगैरे धूत होत होत्या . मला काही लोकांनी सांगितले की तलाव म्हणजे रामकुंड आहे आणि काही लोकांनी सांगितले की विहीर वजा गोल टाके म्हणजे रामकुंड आहे . आपल्याकडून पुण्यस्नान चुकायला नको म्हणून मी दोन्ही ठिकाणी स्नान करून घेतले ! इतक्यात वासुदेव आणि सोनू शर्मा देखील आले . इथे एक दिगंबर साधू राहत असे . त्याने आम्हाला शिधा दिला आणि मैदानावरच मंदिराशेजारी एक छोटीशी चूल करून आम्ही तिघांनी स्वयंपाक करून भोजन केले . वासुदेव म्हातारा टिक्कड फक्कड बनवत होता ! आज या दोघांचे राज्य असल्यामुळे दोघांनी पोटभर खाऊन घेतले ! दिगंबर साधूला कशाचेच काही पडले नव्हते तिथे बांधलेल्या एका छोट्या खोलीतून जे लागेल ते घ्या आणि बनवून खा असे त्याने मला सांगितले . भोजन प्रसाद झाल्यावर मी साधूच्या पुढे काही काळ बसलो . अशाप्रसंगी जो काही सत्संग लाभतो तो फार मोलाचा असतो . काही साधू तुम्हाला ज्ञान देतात तर काही साधू तुमच्याकडून सध्या समाजात , देशात ,राज्यात काय सुरू आहे याचा कानोसा देखील घेतात . या साधूने माझ्याकडून बरीच माहिती मिळवली.
रामकुंडी येथील श्री हनुमान मंदिर
रामकुंडी तीर्थक्षेत्र परिसर . या मंदिरात मी कपडे धुऊन वाळत टाकले होते जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः पाच मिनिटात वाळले .
रामकुंडी येथील विहीर व तलाव दोन्हींचे दर्शन येथे होते आहे .
रामकुंडी मधील श्रीरामांच्या स्पर्शाने पवित्र जल
रामकुंडी परिसरातील भव्य वृक्ष . मागे पांढऱ्या रंगाची दिगंबर साधूची खोली .
तलावामध्ये मी अगदी याच जागी स्नान केले जिथे आता एक व्यक्ती स्नान करत आहे . (सर्व चित्रे गूगल नकाशावरून साभार )
दिगंबर साधूने  "अकेले परिक्रमा करना " असे सांगून मला निरोप दिला . माझ्यासोबतच्या दोघांचा राग रंग बहुतेक त्याने लगेच ओळखला असावा . इथून बाहेर पडल्यावर शेतातले रस्ते लागले . थोड्याच वेळात सोनू शर्माने देखील मला गाठले . इथे चौकोनी आकाराची शेते होती .त्यातून चालताना पुढे मागे डावीकडे उजवीकडे असे आम्ही होत राहिलो .या संधीचा फायदा घेत मी एकटाच पुढे निघून गेलो . इथल्या गावांची नावे मोठी मजेशीर आहेत . इथे एका गावाचे नाव ईश्वरपूर होते तर त्याच्या शेजारचे होते दुर्जनपूर . पनारझीर , जम्होडी , तुनिया , दिवारी आदि गावे पार करत मी चालत राहिलो . मार्ग संपूर्ण जंगलातला होता .हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली . सूर्य मावळू लागला . सूर्यास्तापूर्वी नर्मदेची आरती करणे आवश्यक असते . परंतु हा संपूर्ण जंगलाचा मार्ग होता आणि परिक्रमावाशांची कुठे सोय दिसत नव्हती . म्हणून मी उजवीकडे पाहिले असता इतके जबरदस्त दृष्य दिसले की मी स्वतःला विसरून गेलो ! बर्गी धरणाच्या फुगवट्यामुळे बाळसेदार झालेली नर्मदा मैया आणि तिच्यामध्ये मावळणारा सूर्यदेव ! आणि त्याच्या लाल भडक रश्मींनी आकाशात उधळलेला गुलाल आणि त्याचे नर्मदेमध्ये पडणारे प्रतिबिंब !
 मैयाच्या आरती करता गरज असते ती समोर मैया असण्याची आणि एक ज्योत असण्याची . मी लगेच एक दगड पाहून त्यावर बसलो . आणि मैया ला सांगितले की आता हा सूर्य हीच माझी ज्योत ! आणि मैया ची आरती सुरू केली !
ॐ जय जगदानन्दी,
मैया जय आनंद कन्दी,
ब्रह्मा हरिहर शंकर,
रेवा शिव हर‍ि शंकर,
रुद्री पालन्ती,
ॐ जय जगदानंदी।... ... ...
ही संपूर्ण परिक्रमेतली माझ्या सर्वात लक्षात राहिलेली आरती ! बघता बघता सूर्य मावळून गेला . आणि माझ्या असे लक्षात आले की माझ्यामागे कोणीतरी उभे आहे . वळून पाहिलं असता एक सद्गृहस्थ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते . मला म्हणाले इथे नर्मदा मातेची आरती आपण का केलीत ? मी म्हणालो आरतीची वेळ टळून जाऊ नये म्हणून आरती करून घेतली . तसेही माझ्याकडे दिव्याची ज्योत नसली तरी सूर्याची ज्योत हीच मैयाची आरती ओवाळीत आहे अशी कल्पना करून मी आरती केली . तो म्हणाला इथे कुठेही परिक्रमावासींची सेवा करणारा कार्यरत आश्रम सध्या नाही . बर्गी गावामध्ये आश्रम आहे . परंतु तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचू शकणार नाही . तुम्ही म्हणत असाल तर मी गाडीवर तुम्हाला तिकडे सोडतो . मी नम्रपणे परंतु स्पष्टपणे नकार दिला . मी म्हणालो जिचे नाव घेऊन निघालो आहे तिला काळजी ! आपण फक्त चालत राहायचे ! यावर खुश होऊन तो म्हणाला माझे नाव रामनाथ यादव . इथून पुढे पुढे गेल्यावर माझा मोठा बंगला आहे . तिथे आपण कृपया रहावे . आणि गाडीवर पुढे निघून गेला . मी अंधारातच झपाझप पावले उचलून चालू लागलो . थोडे अंतर गेल्यावर एका पडक्या शाळेतून वासुदेव म्हातारा मला हात करतो आहे असे दिसले ! हा बहुतेक गाडीवर तिथपर्यंत आला होता . एका पडक्या शाळेमध्ये त्याने मुक्काम ठोकला होता . मला प्रश्न पडला की आता रामनाथ यादव ला काय सांगावे ,इतक्यात शाळे शेजारच्याच बंगल्यातून स्वतः रामनाथ यादव बाहेर आले . मी त्यांना सांगितले की बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा या शाळेमध्ये वासुदेव म्हाताऱ्या सोबत मी मुक्काम करत आहे . तो म्हणाला शेजारी धरण असल्यामुळे इथे थंडी खूप पडते तरी कृपया घरी चलावे . मला पुन्हा कालचा प्रसंग आठवू लागला . केवळ शहरी असून चांगले आणि नम्रपणे बोलतो आहे म्हणून लोक माझ्या बाबतीत दाक्षिण्य दाखवत आहेत आणि खेडूत ग्राम्य भाषेत बोलणाऱ्या वासुदेव म्हाताऱ्यावर सगळीकडे अन्याय होत आहे असे होऊ नये म्हणून मी स्पष्टपणे सांगितले की मी वासुदेव सोबतच इथे राहतो . तेच खरे तप ठरेल . जशी तुमची इच्छा . परंतु भोजन मात्र माझ्या घरचेच तुम्हाला घ्यावे लागेल ! असे त्याने निक्षून सांगितले . शाळेसमोर एक हापसा होता त्याच्यावरती स्नान वगैरे आटोपून घेतले.  आज मी आरती करणार नाही सांगितल्यावर वासुदेव महाराजांचे प्रवचन देखील ऐकले ! पडक्या शाळेच्या एका भिंतीच्या बाजूला आम्ही दोघांनी आसन लावले . त्याचे पुन्हा तसले फोन सुरू झाले . म्हातारा अतिशय गुलूगुलू बोलायचा . अखेरीस न रहावून मी वासुदेवाला स्पष्टपणे विचारले की " घरीं असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी | बहुतांचे उचिष्ट अंगीकारी | तो येक मूर्ख || " असे का करतोस ? त्यावर त्याने मोठे विस्तृत उत्तर दिले. त्याच्यामते इंग्रजांनी बहुपत्नीकत्वाचा कायदा आणून ती मूळ भारतीय प्रथा बंद केली . आपल्या दोन-तीन पिढ्या पूर्वीपर्यंत बहुपत्नीकत्व समाजाला मान्य होते . खेड्यामध्ये आजही जितक्या अधिक स्त्रिया सांभाळू शकेल तितका त्या माणसाचा तो पुरुषार्थ मानला जातो . अर्थात हे सर्व भौतिक पातळीवर तो सांगत होता . परंतु तो ज्या भागात राहत होता त्या नेमाड प्रांतात हे अतिशय नित्याचे आहे असे त्याने मला सांगितले . त्यामुळे मनोमन मी त्याचे नाव नेमाडचा गेमाड असे ठेवून टाकले ! त्याची अखंड फोनाफोनी चालूच होती . मी त्याचे निरीक्षण करत होतो . त्याच्याकडे ना रूप होते , ना रंग होता ,ना प्रकृती होती , ना पैसा अडका होता , ना प्रॉपर्टी होती , ना वक्तृत्व होते . मग तरीदेखील इतक्या माता-भगिनी त्याला का भुलत होत्या ? तर त्याच्याकडे असलेला एकमेव गुण म्हणजे तो त्यांची सतत विचारपूस करत असे . कशी आहेस ? जेवलीस का ? तब्येत कशी आहे ? हे कसे चालू आहे ? ते कसे चालू आहे ? मुले कशी आहेत ? आज काय भाजी केली होती ? कुठल्या रंगाची साडी घातली ? वगैरे वगैरे . त्याच्या या शिळोप्याच्या गप्पांचा मला अक्षरशः वीट आला होता . परंतु त्याने माझा तो भाव ओळखून मला सांगितले की स्त्रियांना काहीच नको असते . त्यांना फक्त त्यांच्याकडे लक्ष देणारा कोणीतरी नर हवा असतो . सतत त्यांचे कौतुक करणारा कोणीतरी हवा असतो . अशा मनुष्या करता त्या कुठल्याही थराला जायला तयार होतात . त्याचे वागणे जरी मला पटत नसले तरी तो जे सांगत आहे ते त्याचे अनुभवजन्य बोल होते आणि त्याचे परिणाम देखील मी समोरच पाहत होतो . खरोखरीच माझ्या मनामध्ये विचार सुरू झाला की असे जर असेल तर मग आयुष्यभर लोक आपल्या जोडीदाराला छान राहता यावे , छान वाटावे ,म्हणून जे अहोरात्र कष्ट करतात आणि त्या कष्टांच्या नादात त्यांना वेळ तेवढा द्यायचे विसरून जातात त्याचे परिणाम किती गंभीर होत असतील ! नव्हे नव्हे होतातच ! आणि याचाच गैरफायदा वासुदेव सारखी माणसे घेताना दिसतात . मग जर सर्व माता-भगिनींनी एक सोपे सूत्र ठरविले की कुठल्याही परिस्थितीमध्ये असल्या अनावश्यक गोष्टींना , व्यक्तींना , अपेक्षांना आणि इच्छांना मनात थाराच द्यायचा नाही तर किती संसार सुखाचे होतील ! शहरामध्ये सध्या हे सर्वच ताळतंत्र बिघडल्याचे स्पष्टपणे जाणवते . नर्मदे काठी मात्र मी ज्या काही स्त्रिया बघत होतो त्या सर्व टोकाच्या पतिव्रता आणि गृहकर्तव्यदक्ष , धार्मिक , सात्विक , कष्टाळू , प्रेमळ तरीही अत्यंत हुशार , मर्यादशील ,सुशील ,लाघवी , कोणाशी कसे वागावे , कोणाशी कसे बोलावे , याचे सम्यक ज्ञान असलेल्या , विवेकी होत्या . त्याचे प्रत्यंतर लगेचच आले कारण रामनाथ यादव सपत्निक तेथे आमच्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आले . त्या मातेने अत्यंत प्रेमाने आम्हाला आग्रह पूर्वक जेवायला वाढले . त्या दिवशीचे इतके अप्रतिम होते की काय सांगावे ! गरम गरम तुपातल्या पातळ रोट्या ! भाजी ,आमटी ,भात , दूध सर्वच अप्रतिम ! पोटभर जेवण झाल्यावर दोघे निघून गेले . आम्ही दोघांनी त्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिले ! बराच वेळ वासुदेव आणि मी त्या भोजनाचे कौतुक करत राहिलो . वासुदेव ची गाडी पुन्हा मूळ पदावर आली . त्याने मला ह्या पतीव्रतेचे उदाहरण देऊन सांगितले की अशी स्त्री आयुष्यात कधी चूक करणार नाही .मग कोण चुका करते ? तर हलक्या कानाच्या आणि हलक्या मनोवृत्तीच्या माता-भगिनी अशा चुका करतात . आता मी तर पडलो म्हातारा ! माझा कुठल्याच दृष्टीने यांना काहीच उपयोग नाही .परंतु तरीदेखील मी त्यांच्या मनातील एकलकोंडेपणा दूर करून त्या स्त्रीचा संसार वाचवण्याचे पुण्याचे काम करतो आहे ! कारण मी जर तिच्याशी गप्पा मारल्या नाहीत आणि तिचे मन मोकळे केले नाही तर नक्कीच कुठलातरी जवळपासचा फाल्तुक तरुण पुरुष ते काम करणार आहे आणि तिथे ती स्त्री फसणार आहे . म्हणून एक प्रकारे मी मोठे सामाजिक कार्य करत आहे . त्याचे हे उत्तर ऐकून मी हतबुद्ध झालो . नैतिकतेच्या कुठल्याच पुस्तकी व्याख्येमध्ये बसणारे हे वर्तन नव्हते परंतु ते अनुभव सिद्ध बोल होते एवढे मात्र नक्की . अखेरीस त्याची परवानगी घेऊन मी कूस बदलून झोपी गेलो . धरण शेजारीच असल्यामुळे भयंकर थंडी पडली होती . रात्री उठून वासुदेवने मध्ये जाळ करून ठेवला . त्याचा शेक घेत पहाटे जागा झालो . हातात घड्याळ किंवा सोबत मोबाईल नसल्यामुळे किती वाजले आहेत हे कळायची काही सोय नसायची . साधारण कोंबडे आरवत आहेत , पक्षांची किलबिल सुरू झाली आहे ,अशा काही खुणा पहाट झाल्याचे सांगायच्या . किंवा सर्वात सोपे म्हणजे आकाशातील तारे बघून मी वेळ ठरवायचो . रात्री झोपतानाच मी ध्रुवतारा कुठे आहे हे पाहून ठेवलेले असायचे . आणि सप्तर्षी किती कोनावर आहे ते देखील बघून ठेवायचे . ध्रुवताऱ्या भोवती एक पूर्ण चक्कर म्हणजे २४ तास . त्या हिशोबाने साधारण किती वाजले आहेत याचा अंदाज मी लावायचो आणि तो बरेचदा अचूक निघायचा . परिक्रमेमुळे माझे बायोलॉजिकल क्लॉक किती सुंदर पद्धतीने सेट झाले होते हे मला परिक्रमा संपल्यावर घरी परतल्यावर लक्षात आले . कारण पुढे कित्येक दिवस मला बरोबर ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे साडेतीन वाजता आपोआप जाग येत असे . त्यादिवशी देखील वासुदेव ला जागृत न करता मी हळूच पुढे सटकलो . त्याचे ते तथाकथित अनुभव सिद्ध तत्वज्ञान ऐकण्यात मला शून्य रस होता . त्याला तो एकच ध्यास आहे की काय असे त्याचे वर्तन होते . बहुतेक परिक्रमे ला गेल्यावर तरी म्हातारा सुधारेल अशा अपेक्षेने घरातल्या लोकांनी त्याला परवानगी दिली असावी . असो . अंधुक प्रकाशात मी डांबरी रस्त्यावरून पुढे निघालो . नर्मदा मैया माझ्या उजव्या हाताला होती . आमच्या दोघांच्या मध्ये घनदाट जंगल होते . आता तीव्र असा उतार सुरू झाला . हा उतार इतका भयानक होता की अक्षरशः पळावे लागत होते . पाठीवरचा बोजा आणि काठी वगैरे असल्यामुळे गती अजूनच वाढत होती . परंतु त्यामुळे हे अंतर फार वेगाने कापले गेले .आज जर मी याच गतीने चालत राहिलो असतो तर कदाचित मी जिथून परिक्रमा चालू केली त्या ग्वारीघाटापर्यंत पोहोचण्याचा योग आहे असा मला अंदाज होता .  जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती होत्या . आणि अधून मधून लोकांनी केलेली शेती दिसत होती . या शेतामध्ये घरातील सर्व लोक मिळून पाखरांना उडवून लावत आहेत असे दृश्य जागोजागी पाहिले . चांगली फलधारणा झालेल्या शेतापासून पाखरांना दूर ठेवण्यासाठी गोफणीने मोठे मोठे दगड भिरकावले जात होते . यातील एखादा दगड चुकून आपल्याला येऊन लागू नये अशी मी मैयाची मनोमन प्रार्थना केली ! कारण त्या शेतकऱ्यांना अर्जुनाप्रमाणे फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता ! अतिशय चित्रविचित्र आणि कर्णकर्कश्य भयानक आवाज काढून पक्षांना पळवून लावले जात होते . पक्षी देखील मोठ्या मोठ्या थव्यांनी इकडे तिकडे उडत होते . वर्षभर केलेल्या कष्टाचे पाणी होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांची चाललेली ती तळमळ ती तगमग पाहून त्यांची खूप दया आली . शेतकऱ्यांचे जीवन कसे असते हे समजून घ्यायचे असेल तर नर्मदा परिक्रमा अवश्य  करावी . उलट माझे तर असे मत झाले आहे की ज्यांना कुणाला राजकारणामध्ये पडायचे आहे किंवा समाजकारणामध्ये पडायचे आहे अशा प्रत्येक माणसाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी म्हणजे आपले भारतीय जनजीवन कसे काय चालते याची यथार्थ कल्पना त्या व्यक्तीला येऊ शकते . कागदावर ग्वारी घाटाचे इथून अंतर ३३ किलोमीटर दाखविले होते . परंतु प्रत्यक्षात थोडे जास्त चालावे लागते असा माझा अनुभव होता . इथले लोक तुम्हाला जे अंतर सांगतात त्यात दोन तीन किलोमीटर वाढीव अंतर पकडावे लागते .फार क्वचित तो आकडा अचूक निघतो . असो . बरेच अंतर चालल्यावर बर्गी धरण लागले . इथून परिक्रमावासी सरळ निघून जातात परंतु मला ते भव्य धरण बघायचे होते . धरण म्हणजे एक अख्खा डोंगर चढावा लागतो ! तेव्हा कुठे तुम्ही भिंतीच्या पातळीला येता . आणि तो माझा निर्णय योग्य ठरला ! कारण इथून त्या धरणाचे इतके सुंदर दृश्य दिसत होते की विचारूच नका ! राणी अवंती लोधी जलाशय असे या जलाशयाला नाव दिलेले असून हा अतिशय विस्तीर्ण जलाशय होता . नजर जाईल तिथवर पाणीच पाणी ! 
 बरगी अथवा बर्गी धरण
डाव्या बाजूच्या काठाने चालत मी धरणापर्यंत पोहोचलो .

आतापर्यंत नर्मदा मातीची जी काही छोटी रूपे पाहिली त्या तुलनेत हे रूप फारच भयानक रुद्र आणि अतिप्रचंड होते. मी धरणाच्या काठाने चालायला सुरुवात केली . पाण्यापर्यंत जाता येत नव्हते इतका गाळ सर्वत्र पसरला होता . पुढे पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी उतरली असावी . साधारण गुडघाभर गाळ सहज होता .
या भागातील गाळाचे संग्रहित छायाचित्र
या पाण्यामध्ये स्नानासाठी उतरता येतच नाही .
 समुद्रासारख्या लाटा येत होत्या . निळे शार पाणी काठाजवळ गढुळलेले दिसत होते .पुढे पुढे गाळ कमी होत दगड गोटे दिसू लागले .
काठाकाठाने मी बरेच अंतर चालल्यावर तिथे काही मुले पोहून झाल्यावर काठावरती मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेली दिसली . त्यावेळी तिथे त्यांना मी दिसणे अपेक्षित नसावे . त्यातील एका मुलाने मला हाक मारून फोटोसाठी पोज द्यायची विनंती केली . नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने तो फोटो पाठवून दिला .
बर्गी धरणाच्या साठाक्षेत्रात प्रस्तुत लेखक
मागे दिसणारे सर्व डोंगर आणि जंगल पार करत मी इथपर्यंत आलो होतो .
ह्या मुलांना मी कोण आहे काय करतो आहे याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते आणि यांना नर्मदा परिक्रमे विषयी काहीच कल्पना नाही असे माझ्या लक्षात आले . मग मी त्यांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे सांगू लागलो आणि ती मुले माझ्यासोबत काठाकाठाने चालू लागली . 
मोबाईल बघितल्यामुळे कसे शरीराचे नुकसान होऊ शकते आणि ब्रह्मचर्याची किती ताकद असते याबद्दल त्यांना मार्गदर्शन करून मी पुढे निघून गेलो . इथे काठावरती काही नावा नांगरलेल्या होत्या . प्रचंड गाळ असल्यामुळे धरणामध्ये उतरताच येत नव्हते . परंतु या मोठ्या आणि लांबच लांब नावांमुळे ती शक्यता निर्माण झाली . नावेचे एक टोक कोरड्या जमिनीवर होते तर दुसरे टोक नर्मदेमध्ये बुडलेले होते . नावे मध्ये चढून नावे मध्ये सर्वसामान काढून ठेवले आणि दुसऱ्या बाजूने अलगद नर्मदा मैया मध्ये उतरून यथेच्छ स्नान केले .
बर्गी धरणात नांगरलेल्या नावांचे संग्रहित चित्र
नर्मदेमध्ये समुद्रासारख्या लाटा पहिल्यांदाच अनुभवत होतो ! प्रचंड वारे असल्यामुळे पाण्यातून बाहेर आल्या आल्या अर्धा कोरडा होऊन गेलो . अंग पुसून आता धरणाच्या भिंतीवर चढू लागलो . ही भिंत खूप मोठी होती . आणि नर्मदेचा मूळ प्रवाह हा अजून बराच लांब होता . त्यामुळे त्या भिंतीवर थोडे अंतर चालल्याने परिक्रमा खंडित होण्याची भीती नव्हती . कारण अजूनही माझ्या उजव्या हाताला नर्मदा होती आणि डाव्या हाताला जमीन होती . फक्त फरक इतकाच होता की उजव्या हाताची नर्मदा अगदी जवळ होती आणि डाव्या हाताची जमीन कित्येक शे फूट खोल होती . या भिंतीवर दोन मुले रिल्स बनवण्यामध्ये व्यस्त होती . त्यातील एकाने मला येताना पाहिले आणि दोघे माझ्याशी बोलू लागले . यांना देखील नर्मदा परिक्रमा काय असते हे माहिती नव्हते असे माझ्या लक्षात आले . मी त्यांना तो विषय समजावून सांगितल्यावर त्यांनी आनंदाने माझ्यासोबत काही फोटो काढून घेतले . माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविताना मात्र त्यांनी माझे एकट्याचे फोटो पाठवले . या भिंतीवरून दिसणारे नर्मदेचे स्वरूप अतिसुंदर अति भव्य आणि अति विशाल असे होते ! अक्षरशः शाई ओतल्यासारखा निळा रंग पाण्याला आला होता ! मी आजवर अनेक धरणे पाहिली होती परंतु इतके स्वच्छ पाणी कुठल्याच धरणात पाहिले नव्हते !
बर्गी धरणाच्या भिंतीवरून दिसणारे निळेशार नर्मदा पात्र
या भिंतीवरून किती अंतर चालल्यावर नर्मदेचा मध्यभाग येतो याचा मी अंदाज घेतला . आणि त्याच्या साधारण पाचशे मीटर आधीच उतरायचे ठरवले . सुदैवाने थोडेच अंतर चालल्यावर भिंतीवर ती लावलेले लोखंडी गेट लागले . त्याच्या अलीकडून मी भिंतीवरून धोकादायक पद्धतीचा उतार उतरून खाली आलो .
इथून डावीकडे वळले की पुढे मार्गस्थ होता येते .उजव्या हाताला नर्मदा नदी व तिचा काठ स्पष्ट दिसत आहे .
बर्गी धरणाच्या भिंतीवर या बिंदूपर्यंत सहज चालता येते . इथून पुढे शक्यतो जाऊ नये त्यामुळे परिक्रमा खंडित होण्याची शक्यता असते . इथून दिसणारे नर्मदेचे रूप नजरेमध्ये न मावणारे आहे .
लाल रंगाने दर्शविलेला नर्मदा मातेचा मध्यबिंदू असून डावा आणि उजवा असे दोन कालवे इथून निघतात . पैकी डावा कालवा ओलांडायला परवानगी आहे . कारण काही अंतर पुढे गेल्यावर तो नर्मदेला ओलांडून उजव्या हाताला निघून जातो . 
उतार उतरून खाली आल्यावर बरगी नगर नावाचे छोटेसे नगर वसविलेले आहे . धरण परिसरात काम करणाऱ्या कामगारांची घरे येथे आहेत . मी निवडलेला मार्ग हा नर्मदा नदीच्या अत्यंत काठाकाठाचा असा होता . परंतु बहुतांश परिक्रमावासी डांबरी सडकेने पुढे हर्दुली गावात जातात आणि तेथील नंदिकेश्वर महादेवाचे दर्शन घेतात .  धरणापेक्षा उंच असलेल्या एका टेकडीवर बांधलेल्या या भव्य मंदिरातून धरणाचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो . 
हर्दुली गावातील श्री नंदिकेश्वर महादेव मंदिर शेजारी बर्गी धरण
खाली उतरल्यावर उंचच उंच झाडांच्या सावली मधून चालताना पुढे मला एक जलविद्युत प्रकल्प दिसू लागला . या प्रकल्पामधून आत मध्ये जाण्यास परिक्रमावासींना बंदी आहे . 
बरगी नगर जलविद्युत प्रकल्प
जलविद्युत प्रकल्पाच्या आतील मार्ग
मला इतक्या दूर आल्यासरशी हा विद्युत प्रकल्प बघायची मनोमन इच्छा होती . तसेही हा प्रकल्प काठावर असल्यामुळे परिक्रमे मध्ये काही अडथळा आणत नव्हता .परंतु ग्रामीण भागातील परिक्रमावासी कधीकधी मागचा पुढचा विचार न करता शौच विसर्जन वगैरे करतात तसेच घाण देखील करतात असा पूर्वानुभव असल्यामुळे या प्रकल्पामधून परिक्रमा वासींना अजिबात प्रवेश दिला जात नाही . दुसरे अजून एक कारण आहे परंतु ते मला थोड्या वेळाने कळले . योग्य वेळी सांगतो . आता आत मध्ये कसा प्रवेश करावा याचा विचार मी करत होतो आणि प्रकल्पाचे भव्य लोखंडी महाद्वार बंदच होते . आतून एक माणूस माझ्या दिशेने येत होता आणि बहुतेक इथे मार्ग नाही असे मला सांगत होता .
परंतु सुदैवाने त्या प्रकल्पाच्या महाद्वारापाशी मी यायला आणि आतून एक आलिशान गाडी बाहेर यायला एकच वेळ आली . या गाडीमध्ये प्रकल्पाचे चीफ इंजिनिअर साहेब बसले होते .तशी पाटीच गाडीवर लावलेली होती . मी हात करून गाडी थांबवली व त्यांनी काच खाली केली . मोठ्या साहेब लोकांशी कुठल्या भाषेमध्ये बोलल्यावर त्यांचे अंतकरण द्रवते याचा माझा थोडाफार अभ्यास होता . मी त्यांना म्हणालो , " excuse me Sir, my name is xyz. I am from abc City and I am an engineer by education. could you please allow me to have a walk through of your esteemed project ? I have heard a lot about it and I'm keen to watch it. It's possible with your permission only.I assure you that I will walk away immediately after seeing the campus" 
"Oh why not sir! It's my pleasure" असे म्हणत त्याने गेट उघडण्यासाठी आलेल्या इंजिनिअरला हाक मारली . आणि सांगितले , " ये महाराष्ट्र से बडे इंजिनियर साब आये है । इनको जरा अपना हायड्रो प्लांट दिखा लाना । सब कुछ दिखाना । चाय पानी नाश्ता सब खिलाना । " काच वर गेली आणि गाडी निघून गेली . जो इंजिनियर मगाशी मला हाकलायला पुढे येत होता तोच सर सर म्हणून माझ्यासोबत फिरू लागला . वरील प्रसंग ऐकायला गमतीशीर वाटतो . परंतु आजही आपला देश कसा गुलामगिरी मानसिकतेत जगतो आहे याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे . इंग्रजीमध्ये बोलले की आजही आपल्या समाजातील बहुतांश लोकांना हा मनुष्य कोणीतरी खूप मोठा आणि उच्चशिक्षित आहे असा गैरसमज होत असतो . प्रत्यक्षात मी बोललेले वरील वाक्य कुठलाही शाळकरी मुलगा देखील बोलू शकला असता . परंतु त्याची फारशी शहानिशा न करता इंग्रजीमध्ये बोलले आहे म्हणजे सर्व सत्यच असणार असा समज इंजिनियर साहेबांनी करून घेतला आणि माझे काम झाले . हेच जर मी माझी शैक्षणिक ओळख लपवून एक परिक्रमावासी म्हणून विनंती केली असती तर कदाचित ती धुडकावली गेली असती . ज्याने त्याने विचार करून पहावा .असो . 
जबलपूर वरून येऊन जाऊन नोकरी करणारा तो एक जुनियर इंजिनियर होता . तो मला पुढे पुढे घेऊन जात असल्यामुळे वाटत असलेल्या कुठल्याही सिक्युरिटी गार्डने मला अडवले नाही . हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून इथे फोटोग्राफी देखील प्रतिबंधित होती . जबलपूर हे मध्य प्रदेश मधील सर्वात मोठे शहर मानले जाते . इंदोर च्या जवळपास जाणारा आहे याचा विस्तार आहे . आणि इथून पुढे नर्मदेच्या काठावर प्रचंड गावे आहेत . त्यामुळे हे धरण अतिशय संवेदनशील मानले गेलेले आहे . याच्या एक दशांशाहून ही अधिक लहान असलेल्या पानशेत धरणाच्या फुटण्यामुळे पुणे शहराची काय वाहतात झाली होती हे आपण जाणतोच . (पानशेत धरण १० टीएमसी क्षमतेचे आहे तर बर्गी धरण १४० टीएमसी क्षमतेचे आहे ) त्यामुळे इथे इतकी कडक सुरक्षा असणे स्वाभाविक होते . हे धरण फुटले तर अर्धा मध्य प्रदेश वाहून जाईल . असो . 
जिज्ञासूंसाठी बर्गी धरणाची तांत्रिक माहिती

अभियंत्याने संपूर्ण प्रकल्प मला मोठ्या आस्थेने दाखवला . या परिसरामध्ये आलेला मी पहिला परिक्रमावासी आहे हे देखील त्याने मला सांगितले . आता मला उत्कंठा होती ती सर्वात महत्त्वाचा एक बिंदू बघण्याची ! जलविद्युत प्रकल्पाचे पाणी उंचावरून अतिशय वेगाने एका टरबाइन वर अर्थात लोखंडी चक्रावर सोडले जाते आणि त्याच्या गतीमुळे विद्युत निर्मिती होत असते . हे पाणी इतक्या भयंकर गतीने सोडले जाते की ते जितक्या उंचावरून येते तितक्याच उंच पुन्हा उडत असते . त्याचा आवाज प्रचंड कानठळ्या बसविणारा असतो . अजून तो परिसर शांत होता याचा अर्थ पाणी सोडलेले नव्हते . इंजिनीयरने मला सांगितले की मी एकदम योग्य वेळी आलेलो आहे आणि आता ते पाणी सोडण्यात येणार आहे . तो मला जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य बोगद्यापाशी घेऊन आला .मोठ्या आवाजात भोंगे आणि सायरन वाजू लागले . इंजिनीयरने मला सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला पाण्याच्या दिशेला जायचे नाही आहे. अन्यथा पाण्याच्या गतीमुळे निर्माण झालेले वारे आपल्याला पाण्यामध्ये खेचून घेते . अचानक ढग गडगडतात तसा गडगड आवाज येऊ लागला . आणि छातीमध्ये धडकी भरेल अशा पद्धतीचा उर दडपवणारा आवाज करत नर्मदा जलाचा एक भव्य प्रवाह त्या बोगद्यातून बाहेर आला ! हे दृश्य अतिशय अद्भुत परंतु तितकेच भयंकर होते !
या लोखंडी मार्गिकेवरून पाण्याच्या विरुद्ध बाजूने चालत मी पुढे गेलो . हा प्रवास अत्यंत चित्त थरारक होता .
 लोखंडी जिन्याचा एक मार्ग या बोगद्याच्या वरून पलीकडे जाऊन वळत होता . इंजिनीयर त्याच बाजूला थांबून राहिला कारण या पाण्यामुळे सर्वत्र मोठे तुषार उडून मोठाले ढग तयार झाले होते . आणि त्याच्यामध्ये भिजण्याची त्याची इच्छा नव्हती . मी हळूहळू पुढे सरकू लागलो आणि अक्षरशः माझ्या पायाखालून धडधड धडधड आवाज करत वाहणारे ते पाणी आता मला आत मध्ये खेचून घेत आहे असा मला भास झाला . हे पाणी इतके पांढरे शुभ्र होते की विचारू नका . तिथेच पाच मिनिटे उभे राहून मी त्या पाण्याकडे बघत राहिलो ! अक्षरशः ध्यान लागेल अशी ती अवस्था होती ! मन संपूर्ण निर्विचार झाले होते ! पंचमहाभूतांची ताकद किती अफाट आहे याची प्रचिती घेत होतो ! त्या पाण्यामध्ये आलेली कुठलीही वस्तू त्याने छिन्नभिन्न केली असती इतकी त्या प्रवाहामध्ये ताकद होती ! इकडून इंजिनियर मला ओरडून ओरडून सांगत होता की बाबाजी तिथे उभे राहू नका पुढे जा . परंतु मला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता इतका त्या पाण्याचा आवाज होता . अखेरीस त्याने एका सुरक्षारक्षकाला माझ्या दिशेने पाठवले . तो बिचारा तुषारां मध्ये भिजत भिजत माझ्याकडे आला आणि मला पुढे जायची विनंती केली . त्याचेही बरोबर होते कारण धरणाच्या भिंतीवरून कोणी मी तिथे उभा आहे असा फोटो काढला असता तर त्याची नोकरी गेली असती . परंतु नर्मदा मातेचे हे असे अद्भुत स्वरूप मला तरी पुन्हा कधी बघायला मिळणार होते त्यामुळे निर्विचार अवस्थेमध्ये मी तिथे हातबुद्धपणे उभा होतो . पुढे गेल्या गेल्या डावीकडे वळून चालावे लागत होते . आणि इथे तर त्या पाण्याचे अजूनच भयंकर रूप बघायला मिळत होते . कारण जेवढ्या उंचावरून ते पाणी येते आहे जवळपास तेवढ्याच उंच ते पुन्हा उडी मारत होते . इथे काहीही दिसत नव्हते संपूर्ण ढग आणि तुषार होते ! मी संपूर्णपणे भिजून गेलो होतो ! 
 बोगद्यातून असे काहीसे पाणी येत होते
वाचकांना कल्पना यावी म्हणून मी कुठल्या मार्गाने चालत गेलो आणि त्या बोगद्याचे ठिकाण कसे होते हे दाखविणारा एक फोटो खाली जोडत आहे .
उजव्या हाताला दिसतो आहे तो बरगी धरणाचा राणी अवंतीबाई लोधी जलाशय . हिरव्या रंगाने दाखविलेल्या मार्गाने मी मार्गस्थ झालो . जलविद्युत प्रकल्पातून निघालेले पाणी अक्षरशः उपग्रहातून देखील दिसते आहे याच्यावरून त्याच्या आकाराचा अंदाज घ्यावा . वरच्या बाजूला धरणाचे उघडलेले दरवाजे दिसत आहेत . पुढे वाहणारी नर्मदा माई दिसत आहे .
या भागामध्ये छायाचित्रण प्रतिबंधित असल्यामुळे कुठेच या दृश्याची चित्रे मला आढळली नाहीत . मुळात हे दृश्य इतके भयकंपित करणारे असते की तिथे उभे राहून फोटो काढता येणे देखील शक्य नाही . तुषारां मुळे इथे मोठे इंद्रधनुष्य निर्माण झाले होते ! आणि मी ज्या मार्गाने चालत होतो तो पूर्णपणे चिखलमय झाला होता .बर्गी धरणाची उंची साधारण सत्तर मीटर अथवा दोनशे तीस फूट आहे . इतक्या उंचावरून पाणी येऊन आदळल्यामुळे पाण्याचा हा पांढरा शुभ्र प्रवाह खूप अंतर हवेतून उडत असतो . नंतर जेव्हा तो कालव्यामध्ये पुन्हा पडतो तेव्हा खाली आपटून पुन्हा तीस चाळीस फुटापर्यंत उसळतो . पुन्हा आपटतो पुन्हा उसळतो असे करत करत हळूहळू कालव्याचे पाणी स्थिर होते . इतक्या भव्य लाटा आयुष्यात कुठेच बघायला मिळणार नाहीत . हे दृश्य अत्यंत मनोहर होते ! नर्मदेच्या पाण्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता ! माझ्या मनामध्ये हा प्रकल्प बघण्याची इच्छा यायला आणि प्रमुख अभियंता त्याच वेळी दारातून बाहेर पडायला हा अशक्यप्राय योगायोग जुळवून आणण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्ये आहे ? जिच्यामध्ये आहे तीच अवखळ मुलीसारखी उड्या मारत पुढे निघाली होती ! हे तिचे केवळ एक टक्का जल होते ! ९९% जलाचा मुख्य प्रवाह अजूनही माझ्या उजव्या हातालाच होता ! हा डावा कालवा खूप मोठा आहे . पुण्यामध्ये मुठा नदीचे पात्र जेवढे आहे साधारण तेवढा हा कालवा आहे . बहुतांश परिक्रमावासी या कालव्याच्या पलीकडच्या तटावरून  प्रवास करतात . मला मात्र नर्मदा मातेने डाव्या कालव्याच्या या तटावरून प्रवास करण्याची सुसंधी  दिली होती . पलीकडच्या तटावर राणी अवंतीबाई लोधी हिचा सुंदर पुतळा आहे . 
डाव्या कालव्याच्या डाव्या हाताला असलेली राणी अवंती बाई लोधी हिची अश्वारूढ मूर्ती
ही मूर्ती तुम्हाला कोल्हापूरच्या ताराराणी मूर्तीची आठवण करून देते
राणी अवंतीबाई हिचा अल्प इतिहास
अशा पद्धतीने नर्मदेचे एक अतिशय वेगळे आणि विराट रूप मला तिने मला दाखविले ! आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या नर्मदाष्टकामध्ये पहिल्याच ओळीमध्ये तिचे जे वर्णन केले आहे ते इथे साकार स्वरूपात विलसत होते !
 
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं ।
थेंबांच्या मोठ्या सागरासह वेगाने खाली पडत 
लाटांमध्ये रूपांतरित होत भंग पावणाऱ्या जलाने 
जी नटलेली आहे ,
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
द्वेषातून निर्माण होणाऱ्या पापाचे निर्मूलन करण्याचे 
सामर्थ्य असलेले पवित्र जल जिच्यामध्ये आहे ,
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे ।
यमदूतांच्या मुळे निर्माण झालेल्या मृत्यूच्या भयाचे 
जी हरण करते
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १॥
अशा तुझ्या चरण कमलांना ,
हे नर्मदे देवी मी नमस्कार करतो !
त्या ठिकाणी उसळणारे तिचे खळाळते जल पाहून मग हृदयांतर्यामी वास करणारी सरस्वती देखील उफाळून येते आणि त्या नर्मदा मातेचे गुणगान करू लागते !

तुषारसागरे खळाळत्या जलात शोभते ।
धुवून द्वेषपाप हो जिचे सलील टाकते ।
मरावयास भीती त्या भयास पूर्ण भेदिते ।
नमू तुझ्या पदारविंदी माय देवी नर्मदे ॥


लेखक एक्केचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४२ : निगरीचे बेळीलाल आणि ग्वारी घाट गुरुद्वार्‍यातील अनुभव

भयानक अशा बर्गी डाव्या कालव्याचे मुखदर्शन करून पुढे निघालो . समोर पाण्याचा दर्या उसळला होता तर पोटामध्ये आगडोंब उसळला होता . उजव्या हाताला खाली हाथी वाले दादा यांचा नर्मदा कुटी नावाचा एक आश्रम आहे असे मला भिंतीवरील मुलांनी सांगितले होते . त्या आश्रमाचा शोध घेत मी कालव्याच्या भिंतीवरून चालू लागलो . थोड्याच वेळात एक घाट रस्ता ओलांडून मी वळणावर असलेल्या त्या आश्रमामध्ये पोहोचलो . कालवा आणि नर्मदा मैया चे पात्र याच्यामध्ये हा आश्रम होता . इथून बर्गी धरणाचे दरवाजे खूप सुंदर दिसायचे . पावसाळ्यामध्ये तर बर्गी धरणाचे सर्व वीस दरवाजे उघडतात तेव्हा फार भयंकर दृश्य असते .
लाल खुणेने ने दाखविलेला नर्मदा कुटी आश्रम
हाथी वाले दादा यांचा नर्मदा कुटी आश्रम गर्द झाडीमध्ये लपलेला असून दोन्ही बाजूंनी नर्मदेच्या पाण्याचा खळखळाट इथे अखंड ऐकू येतो . एका बाजूने मुख्य पात्र तर दुसऱ्या बाजूने डावा कालवा .
 आश्रमामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .
पैकी या मोठ्या मंदिराच्या कट्ट्यावर मी आसन लावले
सवयीप्रमाणे आश्रम झाडून घेतला
आश्रमातील एक मंदिर 
आश्रमातील गणपती बाप्पा
आत मध्ये एक धुनी होती .तिथे एक सेवेकरी काम करत होता . मला पाहताच त्याने आनंदाने गरम गरम टिक्कड आणि भाजी वाढली . आज सकाळपासून खूप चालणे झालेले असल्यामुळे आनंदाने पोटभर जेवलो . सेवेकरी मनाला सावकार जीवा इथून दोन किलोमीटर पुढे कालवा संपतो . तिथून पक्का रस्ता लागतो जो जबलपूरला जातो . भोजन प्रसाद घेतल्यावर दोनच मिनिटे बसलो आणि कडक ऊन आहे तोवर चालून घेऊयात असा विचार करून नर्मदे हर केले . पुन्हा एकदा कालव्याचा मार्ग पकडला .. हा मार्ग अतिशय त्रासदायक होता .ना धड कच्चा ना धड डांबरी त्यामुळे अत्यंत खडे , खड्डे खुड्डे आणि असमान रस्ता होता . प्रत्येक पाऊल लक्ष देऊन टाकावे लागत होते .
आता केवळ दोनच किलोमीटर चालायचे आहे या विचाराने मी एकदम निवांत चालू लागलो.परंतु तासा दीड तासाने माझ्या असे लक्षात आले की हे अंतर संपतच नाही आहे . बरे वाटेत कोणीच भेटत नव्हते . आणि या मार्गाशिवाय पर्याय नव्हता कारण नर्मदे काठी प्रचंड दलदल आणि जंगल होते . नर्मदा मैया मला उजव्या हाताला खाली वाहताना दिसत होती . परंतु तिथवर जायला मार्ग नाही हे देखील दिसत होते . खूप अंतर असेच चालत राहिलो . मध्ये एक मनुष्य भेटला त्याने सांगितले आता फक्त सहा किलोमीटर चालायचे आहे . पुन्हा पावलांनी गती घेतली आणि चालत राहिलो . नाही म्हणायला डावीकडचा कालवा मात्र खूप सुंदर होता . त्यातही नर्मदा जलाचा तो विवक्षित रंग उतरला होता . पहिल्यांदाच माझ्या डाव्या हाताला पाणी वाहत आहे असे पाहत होतो . अन्यथा परिक्रमा सुरू केल्यापासून नर्मदा माई सतत माझ्या उजव्या हातालाच राहिलेली होती . त्यामुळे मेंदूला थोडेसे विचित्र वाटत होते . कालवा अतिशय रुंद होता मोठा नदी एवढा वाटत अनेक नद्या त्या कालव्याला ओलांडून वाहत होत्या मध्ये नदी आडवी आली की कालवा पुलावरून जायचा . इथे मोठे मजेशीर असे वॉटर / ॲक्वा डक्ट अर्थात भुयारी जल मार्ग तयार केले होते ज्याच्या वरून गाड्या जायच्या आणि खालून पाणी जायचे ! मी इथे बरेच खेळ करून पाहिले ! म्हणजे पाण्यामध्ये एखादी काडी टाकायची आणि पुलावरून पळत पुढे जाऊन काडीच्या आधी पोहोचायचे ! किंवा या डक्टला मध्ये मध्ये फटी ठेवल्या होत्या त्याच्यातून पाण्याचा आवाज कान लावून ऐकायचा ! किंवा त्यातून मोठ्या आवाजात नर्मदे हर म्हणायचे व तो आवाज आत मध्ये कसा घुमतो ते ऐकायचे ! अशाप्रकारे माझे बालपण जागृत करणारा हा कालवा होता ! परंतु काही केल्या संपत मात्र नव्हता !
 डाव्या कालव्यावरील टेमर नामक नदी ओलांडून देणारे एक्वा डक्ट जलपूल . रुंद कालवा पुलावर अरुंद झाल्यामुळे पाण्याची गती वाढते . 
 हळूहळू दिवस मावळतीकडे जाऊ लागला . परंतु कालवा काही संपायचे नाव घेईना . आता जबलपूर गाठणे मला अशक्य वाटू लागले .सुरुवातीचे दोन किलोमीटर आपण उगाचच टंगळमंगळ केली याचे शल्य वाटू लागले . अजूनही कालव्याचा मार्ग सुरूच होता . आता मात्र माझा संयम संपत चालला ! आपल्याला अंतर सांगता येत नसेल तर सरळ सांगावे ना की मला माहिती नाही . इतक्या मोठ्या अंतराला दोन किलोमीटर असे का सांगावे ? त्यामुळे माझे सगळेच गणित बिघडत चालले होते . काही ठिकाणी कालवा डोंगर फोडून वाहत होता . एक छोटी नर्मदाच जणूकाही माझ्या शेजारून वाहत होती ! मोठी नर्मदा हळूहळू लांब गेली होती परंतु मधून अधून दर्शन देत होती . नर्मदा कुठे आहे हे क्षितिजाकडे पाहिल्यावर लगेच कळायचे . अलीकडची झाडी गडद रंगाची व पलीकडची फिकट रंगाची दिसायची आणि मधल्या फटीमध्ये धुक्या सारखे नर्मदेचे बाष्प साठलेले दिसायचे . हा कालवा अजून धावतच होता . डावीकडे कालवा उजवीकडे खड्डा अशा अवस्थेत मधून चालण्याला पर्याय नव्हता . आणि मध्ये दगड गोटे खडे यांचा खच पडलेला . त्यामुळे पाय प्रचंड दुखायला लागले . साधारण १५ किलोमीटर अंतर चालल्यावर रेल्वेचा एक पूल लागला . याच्याजवळ प्रदीप साहू नावाचे एक सदृहस्थ भेटले जे सपत्नीक आपल्या बाईकवरून कुठेतरी निघाले होते . हे सालीवाडा किंवा सालीबाडा या जवळच्याच गावामध्ये परिक्रमा वाशांची सेवा करत . त्यांनी मला गावातील दुर्गा मंदिरामध्ये जाऊन बसण्यास सांगितले . त्यांना यायला उशीर होणार होता . परंतु अजून थोडासा उजेड होता त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार देऊन पुढे चालायला सुरुवात केली . अगली बार जरूर आना असे सांगून  माझ्या हातावर वीस रुपये दक्षिणा टेकवून पाया पडून दोघे निघून गेले . वाटेमध्ये परिक्रमावासींना जो नमस्कार केला जातो तो तुम्हाला नसून तुमच्या पाठीवर तुम्ही घेऊन चालत असलेल्या नर्मदा मैयाला असतो हे सतत ध्यानात ठेवावे लागते . नाहीतर केलेल्या परिक्रमेचे संपूर्ण अकाउंट खाली व्हायला वेळ लागणार नाही ! मध्ये शेतकऱ्यांनी मोठे मोठे काळ्या रंगाचे सहा इंची नळे टाकून कालव्यामधून थेट पाणी उचलले होते . ते ओलांडून चालावे लागत होते . हळूहळू माझ्या पायातील बळ कमी होऊ लागले . सूर्य अतिशय वेगाने मावळतीकडे धावतो आहे असे वाटू लागले . अजून जबलपूर सात आठ किलोमीटर दूर होते . वाटेत कुठलंह घर आश्रम मंदिर काहीही दिसेना .मुख्य म्हणजे हा कालवा तर दिसत होता परंतु याची आई नर्मदा मैया ती देखील कोठे दिसेना ! आता मात्र माझी मनस्थिती थोडीशी बिकट होऊ लागली ! पाण्याचा हा प्रभाव असावा ! सतत खडक कातळ पाहून सह्याद्री मधील मने जशी कठोर झालेली असतात तसे सतत ते पाण्याचे भव्य दिव्य रूप पाहून माझे मन अतिशय तरल ,विरल व चंचल झाले आहे असे मला वाटले . मोठ्या आवाजात नर्मदेला हाक मारली . इतक्यात उजव्या हाताच्या शेतातून एक छोटीशी मुलगी पळतच बाहेर आली . " नम्मदे हद बाबाजी " मुलगी बोबड्या आवाजात म्हणाली ! तिचे ते गोड रूप आणि गोड आवाज ऐकून माझा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला ! जणू काही तिच्या रूपाने साक्षात मैय्याच मदतीला धावून आली असे मला वाटते ! इतक्यात तिच्या मागून तिच्या पेक्षा एक दोन वर्ष मोठा असलेला एक मुलगा धावत आला . त्याने देखील मोठ्या आवाजात मला निर्भयपणे नर्मदे हर केले ! मी नर्मदे हर असे प्रत्युत्तर दिले . इतक्यात त्या दोघांना रागवण्याकरता आतून एक मनुष्य बाहेर पळत आला . आणि मला पाहून धावतच माझ्याकडे आला . चटकन वाकून त्याने मला नमस्कार केला . आणि माझे पाय धरले .मला म्हणाला आज तुम्ही इथून पुढे जायचे नाही . आज या गरीबाच्या झोपडीमध्येच तुम्ही मुक्काम करायचा ! खरे म्हणजे मला मुक्कामाचा प्रश्न पडलेलाच होता . म्हणूनच मी इतक्या वेगाने चालायचा प्रयत्न करत होतो . परंतु आता पाय काही साथ देत नव्हते . सकाळपासून जो अखंड उतार मी उतरत होतो त्याच्यामुळे गुडघे बाद व्हायची पाळी आली होती . पाणी नेहमी उतारा कडे वाहते . या नियमानुसार कालवा देखील अखंड उतरत होता . मी खाली वाकून त्याला उठवले आणि त्याच्या पाया पडलो .परस्परो देवो भव ! आज ३५ किमी अंतर सहज चाललो होतो . आणि वाटेत कुठे चहासुद्धा मिळालेला नव्हता . कुठेतरी विश्रांती घेणे अत्यावश्यक वाटत होते . या मनुष्याचे नाव केशवप्रसाद कुशवाहा असे होते . राणा प्रताप युद्धाच्या काळात कधी कधी गवतावर देखील झोपायचे . त्यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून राजपूत लोक पुढे गादीवर झोपायच्या ऐवजी गवतावर झोपू लागले . सुखाची चटक लागून आपले ध्येय विसरू नये हे त्यामागचे कारण होते . परंतु काही शतके गेल्यावर जसे स्थैर्य आणि श्रीमंती आली तसे या लोकांनी पुन्हा गादीवर झोपणे चालू केले परंतु गवतावर झोपलो आहे हे शब्दशः सिद्ध व्हावे म्हणून गवताची एक काडी उशी खाली घेऊन झोपू लागले . कुश म्हणजे गवतावर झोपणारे म्हणून हे कुशवाह असे नाव पडले . याचे नाव केशव प्रसाद असले तरी याला सर्व निगरी गावातील लोक बेळीलाल म्हणून ओळखायचे .याची चाळीस एकर शेती तिथे होते . शेतामध्ये त्याने एक झोपडी बांधली होती .हा गावातच राहायचा परंतु शेतात काही काम असले तर इकडे राहायचा . 
डावीकडून वाहणारा नर्मदा डावा कालवा .पिवळ्या रंगाची बेळीलाल कुशवाहाची झोपडी . रस्त्याच्या डाव्या बाजूची नांगरलेली सर्व शेती त्याचीच आहे .

मी झोपडी मध्ये जाऊन बसलो . पंधरा बाय आठ फूट मापाची एक खोली होती . मागे पंधरा फूट बाय सात फुटाचे जागेत शेतीचे सर्व सामान ठेवलेले होते . बाहेर येऊन हात पाय धुतले . समोरच्या शेतातून एक तरुण कामगार स्त्री डोक्यावरून पदर घेऊन झरझर बाहेर पडली . बेळीलाल ने तिला काहीतरी सांगितले आणि ती निघून गेली . याने घरी निरोप पाठविला होता की तो आज इथेच मुक्काम करणार आहे . आणि त्याच्यासोबत एक परिक्रमावासी राहणार आहे . भोजनाची चिंता नसावी . मी पुन्हा कुटीमध्ये येऊन बसलो . शेणाने सारवलेली सुंदर कुटी होती . काड्या काटक्यांच्या भिंती होत्या . त्या देखील मातीने लिंपून त्याला काव मारली होती . बाहेर थंडी असली तरी आत मध्ये उबदार होते . शेतात काम करून थकल्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी अशा झोपड्या शेतकरी उभ्या करतात . दोन्ही मुले माझ्या आजूबाजूला येऊन बसली ! त्या दोघांनी माझे प्रचंड मनोरंजन केले ! त्या मुलाचे नाव होते राजू रजक आणि त्याची धाकटी बहीण खुशी रजक . खुशी बोबडी होती . त्यामुळे ती काय बोलते आहे समजायचे नाही . परंतु राजू इतका समजूतदार होता की तिचे वाक्य संपते न संपते तोच तिला काय म्हणायचे आहे हे तो शुद्ध स्पष्ट हिंदीमध्ये सांगायचा .खुशीचे वय सहा वर्षे होते तर हा आठ वर्षाचा होता . " बाबाजी बाबाजी आप तहा था थहे थो ? " खुशीने मला विचारले . लगेच राजू म्हणाला " बाबाजी मेरी बहन तोतली है । वह पूछ रही है की आप कहा जा रहे हो ? " माझी हसून हसून पुरेवाट झाली ! तिचे तोतरे बोलणे ऐकून मला हसू येते आहे हे पाहिल्यावर तिला अजूनच चेव चढला ! आणि ती अजून जास्त तोतरे बोलू लागली ! बोलता बोलता दोघे माझ्या मांडीवर कधी येऊन बसले मलाच कळले नाही ! बेळीलाल त्यांना रागवू लागला ! "शैतानो ! उतरो नीचे ! घर भागो ! बाबाजी थक के आए है। उनको आराम करने दो । " मी त्याला म्हणालो की अरे राहू दे ! खरं सांगायचं तर पाय दुखत असल्यामुळे दोघे दोन बाजूला बसल्यामुळे पायाला आराम मिळतो आहे !आणि मला लहान मुले खूप आवडतात त्यामुळे दोघांना खेळू दे काय खेळायचे ते ! दोघांनी माझ्या दंडापासून पिशवीपर्यंत प्रत्येक गोष्ट उचकून पाहिली . एकादशीला खाण्यासाठी ठेवलेला थोडासा गुळ माझ्या पिशवीमध्ये होता तो मी त्या दोघांना दिला ! एखादे चॉकलेट मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद दोघांना झाला . बेळीलाल म्हणाला , "बाबाजी ये दोनो दिखते है उतने प्यारे बच्चे नही है । बहुत बडे शैतान है ।इतना उधम मचाते है की पूछना मत । " मी म्हणालो अरे त्यांनी नाही दंगा करायचा तर मग कोणी करायचा ? आणि मला त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते आहे त्यामुळे असू दे ! मग मात्र बेळीलाल माझ्या समोर येऊन बसला . आणि सांगू लागला की हे आपलेच घर समजा . किती दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहा . काहीही कमी जास्त लागले तर मला सांगा . संकोच करू नका . या मार्गाने कोणी परिक्रमा वासी जात नाही . त्यामुळे त्याला सेवा करण्याचा मिळालेला हा अवसर सार्थकी लावावा ! मी त्याला सांगितले की खरे तर मला आज जबलपूरलाच पोहोचायचे होते . परंतु वाटेत कसे चुकीचे अंतर मला सांगितले गेले हे त्याला सांगितल्यावर तो हसायला लागला ! त्याने मला सांगितले , नर्मदा खंडामध्ये कधीही कोणीही सांगितलेल्या अंतरावर विश्वास ठेवायचा नाही ! फक्त दिशा विचारून घ्यायची . अंतराचा अंदाज आपणच लावायचा ! विशेषतः ज्या सेवेकऱ्याने मला अंतर सांगितले होते तो याच्या माहितीतला होता . मध्ये भेटलेला प्रदीप साहू देखील याचा मित्र होता . माझ्या येण्यामुळे त्याला अतिशय आनंद झालेला होता . आणि तो प्रत्येक वाक्यातून जाणवत होता . मला काय करू आणि काय नको असे त्याला झाले होते ! मी आलो आहे हे सांगून त्याने दोन-तीन मित्रांना बोलावून घेतले . बाबाजी आज आपण जेवायला काय करूया ? मी त्याला म्हणालो मला काहीही चालेल . तो म्हणाला तसे नाही 'तुम्ही जर पंचपक्वान्ने म्हणालात तर पंचपक्वान्ने करून खाऊ घालतो ! मी विचारत पडलो . पाचच मिनिटापूर्वी बसायला देखील जागा नसल्यामुळे ,आणि शेजारी एवढा मोठा कालवा असून देखील त्याच्यात उतरता येणे शक्य नसल्यामुळे पाणी पाणी करणारा मी , आणि आता मैया मला या शेतकऱ्याच्या रूपाने पंचपक्वान्ने देऊ करते आहे ! मी त्याला म्हणालो जे तुला योग्य वाटेल ते काहीही चालेल . इतक्यात तो मला म्हणाला , "बाबाजी आपने गक्कड भरता खाया है क्या ? " मी हे नाव पहिल्यांदा ऐकत होतो . माझा चेहरा बघून त्याने ओळखले आणि तो म्हणाला आज तुम्ही हा पदार्थ खाऊन बघाच .आणि तो देखील माझ्या हातचा खाऊन बघा ! हा आमच्या भागातला खास पदार्थ आहे ! आणि हा बनवायला फारसे कष्ट देखील लागत नाहीत ! शेतकरी लोक शेतामध्ये कष्ट करतात तेव्हा काम करता करता एका बाजूला आपोआप तयार होणारा हा पदार्थ आहे . गाईच्या शेणाच्या दहा-बारा मोठ्या गोवऱ्या घेऊन पेटवून ठेवायच्या . एकदा त्या धुमसल्या की चांगल्या लालबुंद होतात . तोपर्यंत इकडे एका दगडावर पाण्याने स्वच्छ करून मस्त कणिक मळायची . शेतातून दोन-चार वांगी , दोन टोमॅटो , चार-पाच कांदे , एखादा बटाटा तोडून आणायचा . आणि त्या पेटलेल्या गोवरी / शेणकुटाखाली हे सर्व ठेवायचे .इथे त्याला कंडा म्हणतात .मळलेल्या कणकेचे मस्त लाडवाच्या आकाराचे गोळे करायचे आणि ते गोळे या गोवऱ्यांवर टाकून द्यायचे . आणि भजन करत बसायचे . 
गक्कड भरता बनविण्याची पद्धत (संग्रहित छायाचित्र )
अधून मधून गोळे उलटे पालटे करायचे . अर्ध्या तासात सर्व तयार होते ! नंतर वरचे गोळे बाजूला काढून झटकून घ्यायचे . हे झटकायची एक पद्धत आहे . याच्यावर एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने जोरात फटका मारायचा . त्याने राख निघून जाते आणि कडक झालेला गोळा फुटतो देखील . मग याला भरपूर गाईचे तूप लावून घ्यायचे. हा झाला गक्कड ! आता शिजलेली वांगी टोमॅटो कांदा वगैरे घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये हाताने कुस्करायचे . त्यात थोडेसे तिखट मीठ टाकायचे . वरून शेतातील ताजी कोथिंबीर पसरून द्यायची . झाला भरता तयार ! काही गोळे वेगळे बाजूला काढायचे . आणि त्यात भरपूर तूप आणि गूळ टाकून हाताने कुस्करायचे . हा झाला चुरमा किंवा मलिदा तयार !
अशा पद्धतीचा फक्कड गक्कड भरता आणि चुरमा बेळीलालने बघता बघता तयार केला ! बहात्तर गक्कड त्याने केले . आणि दहा गक्कडचा मलिदा बनवला .त्याचा मित्र दिलीप रजक देखील आला . माझे एक मित्र आहेत सुभाष पवार म्हणून . हा दिलीप रजक म्हणजे त्यांची झेरॉक्स कॉपी होता ! वागणे , बोलणे ,हसणे आवाज सर्व काही सुभाष पवार ! मला खूप आश्चर्य वाटले . शेकडो किलोमीटर अंतरावर दोन इतक्या एक सारख्या व्यक्ती कशा काय असू शकतात ! निसर्गाची कमाल आहे ! परंतु नर्मदे काठी अशी मला अनेक माणसे भेटली . माझ्या असे लक्षात आले की संपूर्ण भारतभर जितक्या म्हणून प्रकारची लोक आहेत त्यातील प्रत्येकाचे एक सॅम्पल नर्मदे काठी निर्माण करून ठेवलेले आहे ! हा दिलीप म्हणजे राजू उर्फ राजा आणि खुशी यांचा बाप होता . आणि मी तर अशा भ्रमात होतो की ही बेळीलालची मुले आहेत ! बेळीलाल चे वय साधारण ४५ वर्षे असावे . तो म्हणाला अहो बाबाजी माझी नातवंडे सुद्धा या पोरांपेक्षा मोठाली आहेत ! काय ? ? कसे काय शक्य आहे ?शहरी मनासाठी खरोखरीच आश्चर्यकारक गोष्ट होती ! याचे लग्न तेराव्या वर्षी झाले होते . आणि चौदाव्या वर्षी याला पहिली मुलगी झाली . तिसाव्या वर्षी हा आजोबा झाला . आणि आता नातवाचे लग्न लवकर झाले तर पन्नाशीच्या आसपास पणजोबा देखील होईल ! आणि तरीदेखील हा अजून अत्यंत सुदृढ आणि कार्यक्षम होता . आजही खेड्यामध्ये लवकर लग्न लावून दिले जाते . राजस्थानमध्ये तर आजही बालविवाह केला जातो . या प्रकारचे समर्थन करणे किंवा विरोध करणे यापेक्षा याचा उहापोह करणे आवश्यक वाटते . आजकाल विशेषतः शहरी सुशिक्षित नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणीं मध्ये उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढलेले आहे . आणि याच लोकांमध्ये घटस्फोटाचे आणि निःसंतान राहण्याचे प्रमाण देखील जास्त आहे . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा झालेले लग्न होय . निसर्गाने योग्य वयामध्ये माणसाला प्रेरणा दिलेली असते . सरकारचे कायदे काहीही सांगत असले तरी निसर्गाचे कायदे योग्य वेळी काम करतात . त्यामुळे साधारण बाराव्या तेराव्या वर्षी मुला मुलींमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होऊ लागते . वैद्यकीय शास्त्रानुसार संतान प्राप्ती होण्याचे उत्तम वय देखील १८ ते २२ असे आहे . त्यानंतर स्त्रैण बीजाची गुणवत्ता कमी होत जाते आणि शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता देखील घटत जाते . परिक्रमेमध्ये मला भेटलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचे लवकर लग्न झाले होते व त्यामुळे त्यांचे संसार अत्यंत सुखाचे सुरू होते . लहान वयामध्ये असलेल्या लवचिकपणामुळे पती-पत्नीचे मन अधिक लवकर जुळते . उशीरा वयात लग्न झाले की जुळवून घेण्याचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे खटके उडू लागतात . असो .तात्पर्य इतकेच की  बेळीलालचे लवकर लग्न झाल्यामुळे त्याचा मुलगाही लवकर हाताशी आला होता . ज्या वयात शहरातील काही मुले वधु वर सुचक मंडळामध्ये नाव नोंदवण्यासाठी विचार करू लागतात त्या वयात बेळीलाल च्या घरी आठ दहा गाई होत्या आणि त्यांच्या धारा काढून जबलपूरला दूध घालायला त्याचा मुलगा जायचा व आजही जातो .
बेळीलाल सर्व चाळीस एकर शेती पाहतात . दोन ट्रॅक्टर आहेत . भरपूर मोठा व्याप आहे . परंतु खाऊन पिऊन सुखी आहे . आपल्या घासातला घास काढून देण्याचे वृत्ती ,जी आताच्या काळात अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे ती यांच्याकडे प्रचंड प्रमाणात होती . त्यामुळे परमेश्वराची अखंड कृपा यांच्यावर बरसत राहणार यात शंकाच नाही .  निगडीच्या ( निगरी आणि निगडी एकच . या भागात ड ला र म्हणायची पद्धत आहे ) पलीकडे नदीच्या काठावर बहुरी पार नावाचे याचे गाव आहे . मी इकडे मुलांना चित्रे काढून देत होतो . मुलांनी माझ्याकडून भरपूर चित्रे काढून घेतली . आता आपण नर्मदा मातेची पूजा आणि आरती करूया असे सांगून मी पूजा साहित्य काढले . इतक्यात छोटीशी खुशी माझ्यासमोर येऊन पाय जुळवून बसली . आणि म्हणाली मीच नर्मदा आहे ! माझी पूजा कर ! मला अतिशय आनंद झाला ! आणि त्यादिवशी मी नर्मदा मातेचे जल असलेली कुपी तिच्याच हातात देऊन तिचीच पूजा आणि आरती केली ! गक्कड भरता मलिदा यांचा तिला नैवेद्य दाखवून एकेक घास भरविला ! मला अतिशय आनंद होत होता ! रोज नर्मदा जल पिणारी ,नर्मदे वरून येणारा वारा हुंगणारी , नर्मदे मध्ये डुंबणाऱ्या आणि नर्मदेकाठचे हिरवेगार गवत खाणाऱ्या गाईचे दूध पिणारी आणि नर्मदेच्या काठी नर्मदा जलावर पिकलेली पिके खाऊन पुष्ट झालेली नर्मदा काठची सर्व माणसे साक्षात नर्मदास्वरूपच आहेत !त्यांच्या नसानसामध्ये कणाकणामध्ये नर्मदा भरलेली आहे ! नर्मदे काठच्याच स्मशानामध्ये राख बनून ही पुन्हा नर्मदापण होतात आणि पुन्हा नर्मदा खंडामध्येच कुठेतरी उगवतात ! 
हाच भाव मनामध्ये ठेवून मी खुशीची नर्मदा देवी म्हणून आरती पूजा केली ! "तुम्हारी परिक्रमा पूर्ण होगी । " असा आशीर्वाद मैया ने दिला ! यानंतर बेळीलालचे सर्व मित्र , दोन्ही मुले आणि मी असे गोल बसलो आणि सर्वांनी मध्ये ठेवलेल्या गक्कड भरत्यावर यथेच्छ ताव मारला ! एरवी यातले दोन गक्कड खाल्ले तरी पोट भरावे इतके ते जड असतात . परंतु त्या दिवशी भरपूर चाललेलो असल्यामुळे मी चांगले सात-आठ गक्कड खाल्ले . बेळीलाल तरीदेखील आग्रह करून वाढतच होता ! शेवटी चांगला ओंजळभर मलिदा देखील चेपला ! बोटातून अक्षरशः तूप ओघळत होते इतके तूप त्याने घातले होते ! "घरच्या देशी गाईचे तूप आहे बाबाजी , हवे तेवढे खा ! " त्याने सांगितले .  त्यादिवशी तडस लागेपर्यंत जेवलो ! त्याने सांगितले आता उठू सुद्धा नका इथेच आडवे व्हा ! त्या रात्री मुले घरी जायला तयारच होईनात मग त्यांचा बाप दिलीप त्यांना तिथेच सोडून घरी निघून गेला . विचार करून बघा आपण आपल्या मुलांना असे कोणाच्याही घरी पाठवू शकतो का ! आणि त्यातही एखादा बैरागी साधू वगैरे आला असेल ज्याची काहीही ओळख पाळत नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना असे त्यांच्या हवाली कराल का ! नर्मदा खंडामध्ये हे सर्रास केले जाते आणि त्यामुळेच तिथल्या मुलांना खूप काही शिकायला मिळते आणि ती शहरातल्या मुलांपेक्षा ती अतिशय हुशार , क्षणाक्ष असतात . शुद्ध मराठी भाषेमध्ये स्मार्ट असतात ! त्या रात्री थंडी फारशी वाजली नाही . एका लोखंडी घमेल्यामध्ये निखारे पेटवून कुटीमध्ये ठेवले होते . सकाळी लवकर उठलो . बहिर्दीशा आटोपून मोटरच्या चार इंची पाईपच्या भूमिगत गरमागरम पाण्याने स्नान केले . इथे बोअरचे पाणी देखील होते आणि कॅनॉल मधून पाणी देखील उपसले जायचे . परंतु कॅनॉलचे पाणी अतिशय गार असते . आणि बोअरचे पाणी गरम असते . दोन्ही ठिकाणचे पाणी आहे नर्मदेचेच . कारण याच्या शेताच्या दोन्ही बाजूने नर्मदा जल वाहते .एका बाजूने मुख्य नदी आणि एका बाजूने कालवा . असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते . तोपर्यंत बेळीलालने गरमागरम चहा केला ! घरच्या देशी गाईचे ताजे ताजे धारोष्ण दूध घेऊन दिलीप रजक आला होता . रजक म्हणजे धोबी . या भागामध्ये सर्रास जातीवरून आडनावे आहेत . रजक , केवट , नामदेव , कुशवाहा अशी आडनावे सहज दिसतात . आपल्याकडे देखील माळी , शिंपी , कुंभार , कोळी अशी काही जाती सूचक आडनावे आजही दिसतात तसाच हा प्रकार . तांब्याभर चहा त्याने माझ्यापुढे आणून ठेवला ! गंमत म्हणजे त्यातील अर्धा अधिक चहा मी खरोखर प्यायला . इतका तो सुंदर होता ! कालचे उरलेले गक्कड त्याने एका पिशवीत भरले आणि माझ्या सामानात कोंबले . मला खरे म्हणजे ते नको होते .त्यांचे प्रचंड वजन माझ्या पाठीवर झाले होते आणि मला ते नको होते . परंतु इतक्यात मला मोहन साधूने सांगितलेला नियम आठवला की परिक्रमेमध्ये कोणीही काहीही दिले की नाही म्हणायचे नाही , त्यामुळे निमुटपणे मी ते २४ गक्कड पाठीवरच्या झोळीत धारण केले ! - इथे अजून रहा असा बेळीलालचा आग्रह सुरू होता . परंतु मला पुढे चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपवायची होती . त्यामुळे मी त्याला मनोमन नमस्कार करून त्याची रजा घेतली . नर्मदे हर ! मला सोडायला सर्वजण काही अंतर आले . पुढचा सर्व मार्ग त्यांनी मला सांगितला . इथून जवळच नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ७ लागत होता . त्या मार्गाने थोडेसे गेल्यावर माणेगाव नावाच्या गावातून उजवीकडे वळले की जबलपूरच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ग्वारी घाटाच्या समोर मी पोहोचणार होतो ! कालव्यामुळे घनदाट धुके पसरले होते . पुढचे काहीही दिसत नव्हते . पायासमोर दिसणारा मार्ग पकडून चालत राहिलो . इतक्यात गाड्यांच्या हॉर्न चे आवाज येऊ लागले . मोठ्या मोठ्या ट्रकचे चित्र विचित्र हॉर्न ऐकू येऊ लागले . इतके दिवस रानावनातील पशुपाखरांचे आवाज ऐकणारा मी , मला त्या आवाजाचा खूपच त्रास होऊ लागला . असे वाटले की या सर्वांचे हॉर्न एकाच वेळी बंद करावेत . गाड्यांच्या इंजिनचे आवाज आणि वेगाने जात असल्यामुळे येणारा टायर्स आवाज देखील कानाला त्रासदायक वाटत होता . या आवाजाची खरोखर माणसाला गरज आहे का असा प्रश्न पडला . प्रवास करणारे बहुतांश लोक का प्रवास करत आहेत हेच त्यांना माहिती नसते . हा निघाला , तो निघाला , म्हणून मी पण निघालो ,अशा स्वरूपाचे बहुतांश प्रवास असतात . असेनात . समोर आलेला महामार्ग फारच मोठा होता . किंवा मी इतके दिवस पायवाटा तुडवत असल्यामुळे मला तो फार मोठा वाटत होता . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात असा याचा जुना रुळलेला क्रमांक आहे . नवीन नामांतरणानुसार याचा क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ झाला आहे .
याच महामार्गाने मानेगाव पर्यंत चालून उजवीकडे वळले की ग्वारी घाट येतो
दिवसभर मला साथ केलेला कालवा येथे सुटला आणि मी उजवीकडे वळलो .
वाटेमध्ये पलीकडच्या बाजूच्या एका ढाब्यामधून मला आवाज दिला गेला . एक ७५ - ८० वर्षाच्या आजीबाई ढाबा सांभाळ होत्या . त्यांच्या मुलाने गरम गरम सामोसे आणि चहा आणून दिला . तो घेऊन पुढे निघालो असता विरुद्ध बाजूने पुन्हा बोलावले गेले . तिथे पुन्हा चहा झाला . महामार्गावरून चालताना परिक्रमावासी लोकांनी नेहमी रॉंग साईड म्हणजे विरुद्ध बाजूने चालावे . असे केल्यामुळे त्यांना समोरून येणारी वाहने दिसतात . समोरून येणारा वाहन चालक तुमच्याकडे बघतो आहे का नाही ते देखील दिसते . आणि मागून येणारी वाहने तुमच्या पासून लांब राहतात . याच्या बरोबर विरुद्ध चालताना सर्व लोक दिसतात जे अत्यंत घातक आणि चुकीचे आहे . आपण कितीतरी वेगाने चाललात तरी शंभरच्या गतीने जाणाऱ्या वाहनासाठी तुम्ही स्थिर असल्यासारखेच असता . असो . इथे मानेगाव फाटा लागला जिथे यादव ढाबे वाला आहे . ढाब्याचा मालक राजू यादव स्वतः बाहेर आला आणि मला तिथे टाकलेल्या एका मोठ्या ओंडक्यावर घेऊन बसला . नोकराने चहा बिस्किटे आणून दिली . राजू यादव त्याच्या गुरुदेवांची माहिती आणि महती मला सांगू लागला . अत्यंत थोर विभूती मत्व असलेले त्याचे गुरुदेव होते . त्यांनी नर्मदा काठी कशी तपस्या केली आणि ते लोकांशी कसे वागायचे ,कसे बोलायचे इत्यादी बऱ्याच गोष्टी त्याने मला सुमारे तासभर सांगितल्या . राजू यादव आणि त्याचा भाऊ मिळून हा ढाबा चालवितात . राजू यादव यांचे वय साधारण ५० - ५५ असावे आणि वजन चांगले शंभर किलोच्या पुढे होते . परंतु एवढ्या भव्य दिव्य माणसाच्या डोळ्यात गुरुदेवांचे नाव घेता क्षणी अश्रू येताना पाहून मला खूप धन्य वाटले . इथून ग्वारी घाट जवळ होता . बहुतांश परिक्रमावासी इथून ग्वारी घाटाकडे न जाता थेट सरळ जातात . परिक्रमेच्या पुस्तकांमध्ये देखील तशी नोंद असते . 
परंतु मी मात्र नर्मदा मातेचा किनारा अजिबात न सोडण्याचा निश्चय मनोमन केला .
 चालताना मध्ये एखादे मोठे सावली देणारे झाड लागले की क्षणभर थांबत असे . इथे असाच एक भव्य वटवृक्ष होता आणि त्याच्या खाली मोठे मोठे कोरीव दगड होते . त्या दगडावर क्षणभर बसलो आणि डोक्याचा फेटा काढून ठेवला . परत निघताना हा फेटा मी क्षणात बांधत असे . मला सर्व प्रकारचे फेटे बांधता येतात . ग्वारी घाटामध्ये आता गुरुद्वारामध्ये जाणार होतो म्हणून मी असा विचार केला की आज पंजाबी पद्धतीचा फेटा बांधूया . त्यासाठी कोणीतरी फेटा धरणारा लागतो . तिथे खोचलेल्या एका त्रिशुळाचाच वापर करून मी फेटा बांधला . आणि पुढे निघालो . गुरुद्वारा बंद होता . मी नर्मदा मैया चा काठ पकडला आणि तिची भेट घेतली ! या काठाच्या बाजूला घाट वगैरे नव्हता तर संपूर्ण चिखल होता . एक पाच फुटाचा स्लॅब मात्र नर्मदेमध्ये उतरण्यापुरता केला होता . तो प्रचंड निसरडा होता . त्यातून हळुवारपणे पाण्यामध्ये उतरत सुंदर असे स्नान केले ! नर्मदा मैया मध्ये मी लहर आली की स्नान करून घ्यायचो ! समोर भव्य दिव्य असा ग्वारी घाट दिसत होता . आज मौनी अमावस्येचा दिवस होता . आणि मी बरोबर मागच्या अमावस्येला परिक्रमा चालू केली होती . याचा अर्थ आज ठीक एक महिना झाला होता आणि मी पुन्हा ग्वारी घाटासमोर आलो होतो ! हा घाट किती सुंदर आणि किती भव्य आहे हे या काठावरूनच पहावे !  स्नान करून मी पुढे जाणार इतक्यात काही भाविक नावेने आले आणि वरती गुरुद्वारामध्ये गेलेले दिसले . त्यांच्या पाठोपाठ मी देखील गेलो . समोरून गुरुद्वारा बंद असला तरी नर्मदा पार करून येणाऱ्या लोकांसाठी दर्शनासाठी उघडा होता . गुरुद्वारा मध्ये जाऊन मी गुरु ग्रंथ साहेबांचे दर्शन घेतले . इथे काही सेवादार शिख उभे होते परंतु कोणीही बोलत नव्हते . परिक्रमा वासींचे स्वागत करण्यासाठी हे लोक अनुत्सुक आहेत असे मला उगाचच जाणवले .  गुरुद्वारा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर होता ! त्याची भव्यता ग्वारी घाटावरून देखील लक्षात येत होती . परंतु प्रत्यक्षात तो फारच सुंदर होता . पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंती आणि मोठाले घुमट तसेच काचेची मोठी मोठी तावदाने आणि स्वच्छ सुंदर फरस बंदी ! मी संपूर्ण परिसर हिंडून पाहिला . इथे छोटेसे दुकान होते त्या शीख दुकानदाराने मला एक लोखंडाचे कडे भेट दिले . चमकणारे स्टीलचे कडे आजकाल मुले घालतात परंतु लोहा अर्थात लोखंडी कडे हेच खरे महत्त्वाचे असते . शिख पंथीय बांधवांच्या पाच ककारां पैकी हे एक महत्त्वाचे साधन आहे . कडा ,कंगी , केश ' कटारी , कच्छा हे ते पाच 'क'कार आहेत . असो . कोविड मुळे इथले लंगर बंद आहे . इथे भोजन प्रसाद मिळणार नाही तरी तुम्ही कृपया पुढे निघून जावे असे मला तिथल्या मुख्य पंच प्यारे शिखाने सांगितले . परंतु मी इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी आलेलो नसून गुरु ग्रंथ साहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे असे मी त्यांना सांगितले . आणि गुरूंची इच्छा असेल तर काहीही होऊ शकते अशी पुस्ती देखील जोडली . समोर दिसणाऱ्या ग्वारी घाटाचे अनिमिष नेत्रांनी मी दर्शन घेऊ लागलो . इतक्यात तिथे एक तरुण आला . आणि मोबाईल चालू करून माझी मुलाखत घेऊ लागला . त्याने घेतलेला व्हिडिओ  माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने पाठवून दिला . तो आपल्या करिता सोबत जोडत आहे .

या तरुणाचे नाव रणजीत सिंह असे होते आणि तो रोज जबलपूर येथून नावेने गुरुद्वारा मध्ये येत असे आणि लंगरची सेवा देत असे .
रणजीत सिंह यांनी गुरुद्वारापासून काढलेला ग्वारी घाटाचा फोटो . चित्रात प्रस्तुत लेखक . 
ग्वारी घाट हा नर्मदे वरील सर्वात मोठा आणि विस्ताराने लांबरुंद पसरलेला घाट आहे .मागे ब्लॅंकेट आणि वाळण्यासाठी लटकवलेला लंगोट दिसतो आहे .डोक्यावर पंजाबी पद्धतीचा फेटा नसला आहे .
रणजीत सिंह हौशी होता . त्याने विविध ठिकाणी उभे करून माझे भरपूर फोटो काढले . 
एका सरदारजीने दिलेले कडे मी हातात घातले आहे
मागे वाळत टाकलेला गमछा . समोर ग्वारी घाटावरचा न्हावी घाट . नर्मदा जलात सीगल पक्षी .
 ग्वारी घाटच्या भव्य गुरुद्वारा समोर मला उभे करून रणजितसिंह ने काढलेले फोटो
ह्या तरुणाने माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या . परिक्रमा कशी असते ? त्याच्यामध्ये काय काय अनुभूती येतात ? वगैरे प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली . मी परिक्रमा सुरू करून आताशी एक महिना झाला होता . त्यामुळे फारसे अनुभव गाठीशी नव्हते . परंतु तरीदेखील त्याला एक अनुभव मला सांगावासा वाटला ,कारण तो त्याच्याच गावात मला आला होता . जबलपूर मधून बाहेर पडताना मला जिलेबी आणि पोहे खायची इच्छा झाली होती आणि तत्काळ मैयाने ती इच्छा पूर्ण केली होती हा अनुभव मी मागील एका लेखामध्ये सविस्तर सांगितलेला आहेच . तोच अनुभव मी त्याला सांगितला . इतका वेळ हसतमुख असणारा रणजीत सिंग एकदम गंभीर झाला आणि म्हणाला ठीक आहे ठीक आहे .तुम्हाला लंगर घ्यायचे असेल तर माझ्याबरोबर चला . तसे भाविकांसाठी लंगर बंद आहे परंतु रोज येणारे सेवा दार लंगर घेत आहेत . तुम्ही इतक्या लांबून आला आहात तर आमच्या लंगरचा अवश्य लाभ घ्या . पाचच मिनिटात तुम्हाला बोलवतो , असे सांगून लंगरची तयारी करण्याकरता तो पुढे निघून गेला . त्याने आवाज दिल्यावर मी आत मध्ये गेलो आणि जेवायला खाली बसलो . मोजके दहा-पंधरा लोक जेवत होते . सर्वजण पगडी घातलेले शीख होते आणि माझी देखील शिखांसारखी पगडी असल्यामुळे मी त्यांच्यात मिसळून गेलो होतो .  लंगर चा मेनू ठरलेला असतो . गरमागरम रोट्या , भाजी , आमटी आणि भात . इतकाच मेनू दररोज बनविला जातो . रणजीत सर्वांना वाढत होता . इतक्यात तिथे एक सरदारजी दोन मोठी खोकी घेऊन आला .  संग्रहित छायाचित्र

आणि त्याने मोठ्याने आवाज दिला , " ओय रणजीत पाजी सत श्री अकाल ! " "सत श्री अकाल पाजी । फर्माईये ! " सरदारने दोन्ही खोकी त्याच्या हातात देत सांगितले , " जरा ये तो चीजे लंगर मे बाट देना ।कोई दे के गया बाहर । " रणजीत ने खोली घेतली आणि स्वयंपाक घरात गेला . आणि तिथून तो बाहेर जो आला तो पळतच आला आणि माझ्यासमोर येऊन खाली बसला ! त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि त्याने माझे पाय धरले होते . , " दादाजी मुझे क्षमा करना ! प्लीज मुझे माफ कर देना । मेरी बहुत बडी गलती हो गई । " त्याचे हे बोलणे ऐकून आणि वागणे बघून मला काहीच बोध होईना ! मी त्याला म्हणालो "लेकिन पाजी हुआ क्या है ? " तोपर्यंत माझे जेवण झाले होते आणि मी उठायच्या तयारीत होतो . तो म्हणाला , " रुकिये । अभी और प्रसाद आना बाकी है " इतक्यात आतून एक शीख सेवादार जिलेबी आणि पोहे घेऊन बाहेर आला ! आणि सर्वांना वाढू लागला ! होय त्या दोन खोक्यांमध्ये जिलेबी आणि पोहे होते ! मी पोटभर जिलेबी आणि पोहे पुन्हा एकदा खाल्ले ! जबलपूरचे आणि जिलेबी पोह्याचे काहीतरी वेगळेच नाते आहे असे मला वाटू लागले ! आता मी ताट घेऊन धुण्यासाठी जाणार इतक्यात रणजीत सिंह ने माझे ताट उचलले आणि पळत धुण्यासाठी निघून गेला . मी त्याच्या मागे धावलो की अरे माझे ताट मला धुवू दे . परंतु तोपर्यंत त्याने माझे ताट धुतले होते आणि ते वाळत घालून पुन्हा येऊन माझ्या पाया पडू लागला . आणि क्षमा याचना करू लागला . माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे म्हणून मी त्याला घेऊन बाहेर गेलो आणि एका बाकड्यावर आम्ही दोघे बसलो . त्याला म्हणालो शांत हो .आणि सगळे मला नीट सांग .मला काहीच कळत नाही . तो मला म्हणाला (आमचे हिंदी संवाद होते .आपल्या माहितीकरता मराठीमध्ये अनुवादित करून सांगत आहे ) रणजीत म्हणाला की मी गेली बारा वर्षे दररोज न चुकता नर्मदा नदीचे दर्शन ग्वारी घाटावर घेतो आणि नावेने गुरुद्वारा यामध्ये घेतो आणि लंगरची सेवा करतो . इथून सर्व नावाडी आता मला ओळखतात . गेली बारा वर्षे लंगर मध्ये ठरलेला एकच एक मेनू आहे .त्यात कधीही बदल होत नाही . " " बर मग ?" मला अजूनही कोडे पूर्णपणे सुटलेले नव्हते . " त्याचे असे आहे बाबाजी , अगदी खरे खरे सांगतो . समोर नर्मदा मैया आहे मी खोटे बोलणार नाही . " " बोला " मी उत्तरलो . रणजीत सांगू लागला . की जेव्हा मी त्याला जिलेबी आणि पोहे मिळाल्याचा अनुभव सांगितला तेव्हा त्याला ते धगधगीत खोटे वाटले . त्याला असे वाटले की इतके चांगले अनुभव कथन करणारा हा परिक्रमा वासी अचानक काहीही खोटे नाटे सांगू लागला आहे . असे कुठे जिलेबी आणि पोहे मिळतात होय ? बरं जाऊ दे !आता दारात आलाच आहे तो , तर उपाशी पाठवण्यापेक्षा खायला घालून हाकलून द्यावा !  अक्षरशः असा विचार करून त्याने मला लंगरला बोलावले होते . परंतु मी सांगितलेले प्रत्येक वाक्य सत्य वचन असल्यामुळे त्याचा नर्मदा मैया ला राग आला असावा आणि तिने गेल्या बारा वर्षात पहिल्यांदा या लंगर मध्ये जिलेबी आणि पोहे वाढण्यासाठी पाठविले ! रणजीतला माहित आहे की लंगर मध्ये जिलेबी आणि पोहे कधीच वाढले जात नाहीत . परंतु त्या दिवशी कोणीतरी बाहेर असलेल्या सेवादार सरदारजीला जिलेबी आणि पोह्याची खोके हातात देऊन निघून गेले ! रणजीत आता रडू लागला आणि म्हणाला की माझी फार मोठी चूक झाली . मी तुम्हाला खोटे समजलो .याची मैयाने मला शिक्षा दिली . आणि लगेच अनुभूती देखील दिली . आता मला काहीतरी प्रायश्चित सांगा ! हा मोठा कठीणच प्रसंग माझ्यापुढे उभा राहिला . मी जे काही केलेलेच नाही त्याकरिता मी एखाद्या माणसाला प्रायश्चित्त सांगणारा कोण ? मुळात जिलेबी आणि पोहे मला खरोखर मिळाले होते इतकेच मी त्याला सांगितले होते . ते त्याला खोटे वाटले आणि आता खरे वाटत आहे यात माझा काय दोष ! मैया अशी कधी कधी आपल्याला लटकवून देते !आणि हसऱ्या चेहऱ्याने मजा बघत बसते .  मी त्याला म्हणालो की प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण तुला जरी माझे बोलणे खोटे वाटले होते , तरी मला त्याबद्दल काहीही आपत्ती नाही . त्यामुळे तुझ्या हातून काही चूक झाली आहे असेच मुळात मला वाटत नाही . तरी देखील काहीतरी प्रायश्चित्त मला सांगा असा तगादा त्याने लावला . आता या सरदारजीचे काय करावे मला काही कळेना ! इतक्यात तो म्हणाला की ठीक आहे !मीच सांगतो माझे प्रायश्चित्त ! मी संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करणार ! त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते . त्याचे हात जोडलेले होते . आणि नर्मदा मातेकडे पाहून तो क्षमा याचना करत होता . त्याच्या या संकल्पमुळे मला अतोनात आनंद झाला ! एखादा सरदारजी केवळ नर्मदे वरील प्रेमापोटी पायी परिक्रमा करतो हे किती आनंदाची गोष्ट आहे ! आणि नर्मदा देखील किती अवखळ आहे पहा ! आपल्या भक्ताचे ब्रीद राखण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचा पुन्हा एकदा मला अनुभव आला आणि माझ्या देखील डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या . आम्ही दोघांनी कडकडून गळाभेट घेतली ! आणि मोठ्या आवाजात पुकारा केला नर्मदे हर ! कदाचित तो आवाज पलीकडे ज्वारी घाटावर देखील ऐकू गेला असावा ! मी पटापट पायऱ्या उतरत खाली आलो आणि चिखलाने भरलेला पुढचा मार्ग पकडला . एक अनुभव संपतो न संपतो तोच नर्मदा मातेने दुसऱ्या प्रसंगामध्ये मला ढकलले ! मी चालत होतो तो काठ अत्यंत उताराचा होता आणि केवळ एक बारीक पायवाट तिथे होती. डावीकडे खडा चढ आणि उजवीकडे तीव्र उतार . खाली नर्मदेचे खोल पात्र ! अशा त्या पायवाटेवर एक मरणासन्न गोमाता तडफडत पडलेली मला दिसली . ती नेमकी पायवाटेवर पडलेली असल्यामुळे मला खालून किंवा वरून जाता येत नव्हते . नीट पाहिले असता मला लक्षात आले की तिचा एक पाय तुटला आहे आणि त्यामुळे लुळा पडला आहे . ती गेले दोन-तीन दिवस इथेच पडलेली असावी कारण तिचे पोट खपाटी जाऊन हाडे वर आली होती . तिला इतकी भूक लागली होती की पडल्या पडल्या तिच्या तोंडाच्या टप्प्यामध्ये येणारे गवत उपटून खायचा ती प्रयत्न करत होती .संग्रहित छायाचित्र
एवढ्या मोठ्या देहाला इतके मुठभर गवत कसे काय पुरणार ? त्यामुळे उपासमार होऊन तिच्या अंगातील सर्व शक्ती क्षीण झाली होती आणि ती गलित गात्र होऊन हताशपणे पडलेली होती . मी विचारात पडलो की आता हिला काय खायला घालावे आणि कसे उभे करावे ? आजूबाजूला हिरवे गवत होते . परंतु चढ-उतार खूप असल्यामुळे पाय सटकला की थेट नर्मदार्पणमस्तु झाले असते ! इतक्यात मला आठवले की काल बेळीलालने केलेले गक्कड आज सकाळी त्याने सोबत बांधून दिलेले आहेत ! मी लगेचच झोळी खाली ठेवली . बरगड्या दिसू लागलेल्या त्या गाईच्या समोर गेलो . तिच्या डोक्यावरून हात फिरविला आणि तिच्या तोंडापुढे एक गक्कड धरला . तिने गप्पकन तो खाल्ला ! मला खूप आनंद झाला ! तिची देखील शेपटी हलू लागली ! मी अजून एक गक्कड तिला भरविला . बघता बघता तिने सर्व २४ गक्कड फस्त केले ! त्यानंतर मी तिला कमंडलू ने पाणी पाजले .पोटात अन्न आणि पाणी गेल्यावर तिला थोडीशी तरतरी आली आणि ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली . मी लगेच तिला पाठीच्या बाजूने ढकलले आणि उठायला मदत केली . पोटात अन्न गेल्यामुळे तिला थोडीशी शक्ती आली असावी त्यामुळे ती देखील जोर लावून उठली आणि तीन पायावर चालू लागली ! आता मात्र मी तिची गळ्यातली दोरी पकडली आणि अतिशय सावकाश तिला त्या उताराच्या रस्त्यावरून बाहेर काढत पुढच्या घाटापर्यंत चालत नेले . पुढचा घाट म्हणजे शेजारीच असलेला एक काँक्रीटचा मोठा घाट होता आणि इथे एका ब्राह्मणाची मोठी गोशाळा होती . पूर्वी ग्वारी घाट प्रकरणामध्ये आपण नमामि देवी नर्मदे अशी जी मोठी अक्षरे पाहिली होती ती या गोशाळेमध्येच होती ! त्या गोशाळे मधील एक सेवक धावतच आला आणि अरे ही आमची गाय आहे असे म्हणून तिला घेऊन गेला .जाता जाता त्याने माझा एक फोटो काढला. नर्मदा मातेला तिच्या काठावर फिरणाऱ्या केवळ परिक्रमावासींच्या पोटाची काळजी नसते तर प्रत्येक जीव जंतूच्या पोटाची ती काळजी करते हे या प्रसंगाने सिद्ध झाले आणि माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले !  मला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला ! काठावरती बसलेला एक तरुण मुलगा हे सर्व पाहत होता आणि त्याने माझे फोटो काढायला सुरुवात केली . नंतर त्याने माझ्याकडून माझ्या मित्राचा क्रमांक लिहून घेतला आणि त्या क्रमांकावर सारे फोटो पाठवून दिले . ते सर्व फोटो आपल्या माहिती करता इथे जोडत आहे .
हीच ती जागा जिथून थोडेसे मागे गोमाता पडलेली होती . समोर जबलपूरचा ग्वारी घाट दिसतो आहे .
गाय नेणाऱ्या सेवेकऱ्याने काढलेला फोटो .
मागे गवारी घाट ची प्रसिद्ध ओळख असलेल्या नावा
या चित्रात काय काय बघाल ? मी परिक्रमा सुरू केली तो घाट ,नर्मदा मातेचे पात्र ,सीगल पक्षी ,माझ्या पायातील नवे बूट ,माझ्या हातातील सरदारजी ने दिलेले लोखंडी कडे , डोक्यावर पंजाबी फेटा ,पोटाच्या कप्प्यात ठेवलेली छोटीशी डायरी , चालून चालून वाकलेला दंड ,माझे कमी झालेले वजन , आणि मनोमन सुरू असलेले नर्मदेचे भजन ! 

काठावरील एकाने फोटो काढायला सुरुवात केली
गाय प्रकरणामुळे भावविभोर होऊन नर्मदा मातेला मी घातलेला साष्टांग नमस्कार . 
ज्याला फोटोग्राफीच्या भाषेमध्ये कँडीड मोमेंट असे म्हणतात तशा या घटना आहेत . ज्याचा अर्थ समोरच्या माणसाचे लक्ष नसताना गुपचूप काढलेले फोटो ! नर्मदा मातेला असा नमस्कार वेळोवेळी करायचो . संपूर्ण शरणागती मध्ये जो काही आनंद आहे तो शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे !
नमस्कार करताना चे फोटो माझ्या  नकळत काढून झाल्यावर तो मनुष्य पुढे आला आणि त्याने अजून काही फोटो काढण्यासाठी पोज देण्याची मला विनंती केली ,ते हे फोटो .
हीच ती "नमामि देवि नर्मदे " अक्षरे जी रात्री सुंदर चमकतात ! समोर प्रस्तुत लेखक . मागे झेंडे लावले आहेत ती गोशाळा आहे .
प्रस्तुत लेखक , नर्मदा मैया आणि समोर ग्वारी घाट .डोक्यामध्ये महिनाभर आलेल्या अनुभवांचे काहूर दाटलेले ! या चित्रांमध्ये नीट पाहिल्यास तुम्हाला मध्ये स्थिर असलेला सरळ रेषेत वाहणारा नर्मदेचा खोल प्रवाह ,डोह दिसेल . हा मुख्य प्रवाह असून आजूबाजूला सर्व गाळ आहे .
इथून पुढे अचानक सर्व गर्दी नष्ट होऊन शांत रस्ता लागला . रस्ता म्हणजे नर्मदे काठी केलेल्या शेतांमधील छोटीशी पायवाट ! इथून पुढचा प्रवास अतिशय संस्मरणीय आणि रमणीय होता !


लेखांक बेचाळीस पूर्ण (क्रमशः )
 
 

लेखांक ४३ : दद्दा घाटचा साधू ,घुन्सोर आणि त्रिशूलभेद घाटचे अद्भुत सौंदर्य

दद्दा घाट सोडला आणि किनाऱ्याचा मार्ग पकडला .नर्मदेचे निळे शार पाणी अखंड साथ करीत होते . अधून मधून एखादे छोटेसे होडके फक्त दिसायचे .बाकी परिसर हळूहळू निर्मनुष्य होत गेला . मोठ्या शहराजवळ नर्मदे काठी थोडीफार गर्दी आढळते परंतु एरवी नर्मदा बऱ्यापैकी निर्मनुष्य असते .
जबलपूर शहराची हद्द संपल्यावर शेती सुरू झाली . परंतु मोठे शहर जवळ असल्यावर लोक धान्याची शेती न करता ताबडतोब उत्पन्न देणारा भाजीपाला अधिक लावतात तसेच इथे आढळले नर्मदेच्या काठाने दुतर्फा भरपूर भाजीपाला लावला होता आणि या भाजीपाल्याला पाण्याचे प्रमाण अधिक लागते त्यामुळे शेतामध्ये सतत पाणी सोडण्याचा परिणाम म्हणून सर्वत्र प्रचंड चिखल माजला होता .

नर्मदे काठी लावण्यात आलेला भाजीपाला 
शेतामध्ये माजलेला चिखल आणि उजवीकडे वाहणारी नर्मदा .
अशा प्रसंगी चुकून माकून नर्मदेच्या बाजूला तुम्ही घसरलात तर नर्मदार्पणमस्तु होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही ! अगदी नर्मदा देखील नाही !
ग्वारी घाटाच्या पुढे काही अंतर चालल्यावर तिलवाडा अथवा  तिलवारा नावाचा घाट लागतो . तिथे दोन पूल आहेत एक नवा आणि एक जुना .नव्या जोड पुलामधून मी काल ज्याच्या काठावर चाललो तो बर्गी डावा कालवा नर्मदा नदी ओलांडून उत्तर तटाला जातो . येथील मुख्य घाट समोरच्या म्हणजे उत्तर तटावर असून दक्षिण तटावर अधिकांश झाडी दिसते . या संपूर्ण परिसरामध्ये जबलपूरच्या धनिकांचे मोठमोठाले बंगले , प्रासाद , राज महाल असून त्यांच्या कुंपणामुळे काठावरून  चालणे थोडेसे जिकीरीचे होऊन जाते .
जुना पूल तिलवारा घाट . हा  पूल सध्या वाहतुकीसाठी वापरात नसून याचा सध्या सेल्फी पॉईंट झाला आहे .
नवे जोडपूल ज्यातून बर्गी डावा कालवा नर्मदेच्या उजवीकडे नेला गेला आहे
तिलवारा घाटावर देखील ग्वारी घाटासारखी नर्मदेची आरती होते . ती बघण्यासाठी पुलावर खूप गर्दी जमते
दोन्ही पूल
इथे घाना नावाच्या गावामध्ये नीम करोली बाबांच्या नावाने दद्दा घाट नावाचा घाट काँग्रेसच्या एका आमदाराने बांधलेला आहे . त्याचे प्रवेशद्वार
संजय  यादव नामक कांग्रेस आमदार आहेत त्यांनी बांधलेला नींब करौरी बाबांचा आश्रम .
लाल खुणेने दाखविलेला यादव याचा राजमहाल ज्याचे नाव दद्दा धाम असे आहे. त्या शेजारी बाबांचा आश्रम आणि वरती वाहणारी नर्मदा

आश्रमातील निमकरोरी बाबांची मूर्ती खूप सुंदर आहे
बाबांच्या पादुका चल असून रोज स्थानासाठी नर्मदेमध्ये नेल्या जातात
शेजारी हनुमंताची सुंदर मूर्ती आहे
बाबांच्या मूर्तीला रोज वेगवेगळे साज केले जातात

आश्रमातील बाबांच्या विविध भावमुद्रा ,हनुमान जी आणि मुख्य गाभारा
या आश्रमात काही कार्यकर्ते गप्पा मारत बसले होते . परिक्रमावासींची फारशी सेवा येथे केली जात नसावी असे जाणवले . दर्शनासाठी आलेल्या एका माणसाने पेढ्यांचा पुडा आणि शंभर रुपये हातात ठेवले . पेढे तिथेच वाटून टाकले आणि खाली घाटावर आलो . हा घाट खाजगी असून इथे जायला परवानगी नाही असे हे लोक सांगत असत . परंतु मी गेलो . समोर गिरजा देवीज ब्लेस्ड होम नावाचे अतिभव्य घर होते . वरून खाली उतरण्यापूर्वी मी परिसराची पाहणी करत असे . तीव्र उतार होता समोर नर्मदा नदी वाहत होती . उजव्या हाताला थोडेसे वाळवंट होते आणि डाव्या हाताला शेती सुरू होत होती . आता शेतीचा मार्ग पकडायचा आणि पुढे चालायला लागायचे असे ठरवून मी शेताकडे निघालो . इतक्यात शेतामध्ये गुडघ्यामध्ये डोके घालून बसलेला एक तरुण साधू माझ्या दिशेने धावत येतो आहे असे मला दिसले . साधू मला थांबा थांबा असे विनवत होता आणि मला मात्र पुढे जायची घाई झाली होती कारण लवकरच अंधार पडणार होता . अखेर साधू ने मला गाठलेच आणि कृपया माझ्या कुटीमध्ये चला असे म्हणू लागला . गुणसागर दास नावाचा हा तरुण साधू होता . नर्मदे काठी एक छोटीशी झोपडी बांधून साधना करत राहत होता . मी मला पुढे जाणे आवश्यक आहे असे सांगितल्यावर त्याने सांगितले की तो सकाळपासून येथे बसलेला आहे आणि मी या मार्गावरून जाणारा पहिला परिक्रमा वासी आहे . त्यामुळे मी त्याच्या कुटीमध्ये येणे अतिशय आवश्यक आहे . मला काही कळेना तेव्हा त्याने अधिक उलगडा करून सांगितले . त्याला नर्मदा मातेने असा दृष्टांत दिला होता की उद्या एक परिक्रमावासी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे आणि तुला खरा साधू बनवणार आहे . बोलत बोलत झोपडी मध्ये आम्ही गेलो . आत मध्ये एक वृद्ध माताजी संन्यासिनी जप करीत बसल्या होत्या मी त्यांच्या पाया पडलो . साधूची साधनेची जागा होती तिथे त्याने मला बसविले . त्याच्याकडे अनेक देवांचे फोटो होते त्यात रामदास स्वामींचा देखील फोटो मला दिसला परंतु त्यांच्याबद्दल त्याला काही माहिती नव्हते त्यामुळे मी त्याला समर्थ रामदास स्वामी यांची माहिती दिली . हा फोटो त्याला कुठेतरी सापडला आणि त्यातून खूप ऊर्जा जाणवली म्हणून त्याने नित्य पूजेत तो ठेवला होता . मला त्याने पुन्हा काहीतरी द्या असे मागितले . माझ्याकडे त्याला देण्यासारखे काहीच नव्हते . मी विचार करून पाहिला . माझ्याकडे काय काय आहे याची यादी मी मनातल्या मनात करू लागलो . दोन वस्त्रे , दोन ब्लॅंकेट , एक झोळी , एक काठी ,एक कमंडलु, दोन हात मोजे , दोन पाय मोजे , थर्मल अपर ,पायातले बूट , दोन लंगोट्या ,पूजेचे साहित्य ,भगवद्गीता ,स्तोत्र संग्रह , झोपण्याची  मॅट , गमछा , बॅटरी , ताटवाटी , भांडे ,सुई दोरा ... बघता बघता मी बराच संसार गोळा केला आहे असे माझ्या लक्षात आले ! तो पुन्हा म्हणाला .असे होणे शक्यच नाही . नर्मदा माता मला सांगून गेली आहे म्हणजे तुमच्याकडे नक्की काहीतरी आहे . आणि इतक्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! चिमटा ! नर्मदा मातेने मला सिद्ध घाटावर दिलेला चिमटा ही अशी एकमेव गोष्ट होती की जी गेल्या दहा दिवसांत वापरलीच नव्हती .फक्त सोबत बाळगत होतो ! मी तो पिशवीतून बाहेर काढतात त्याने पटकेने त्याच्यावर झडप घातली आणि म्हणाला , हीच ती गोष्ट ! हीच ती गोष्ट ! चिमटा घेऊन तो धावतच झोपडीच्या बाहेर गेला आणि नर्मदेच्या काठावर नाचू लागला ! आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून ओघळत होते ! क्षणभर माझ्या मनात चलबिचल झाली . हा चिमटा तर नर्मदेने मला दिला आहे मग मी तो ह्याला का द्यावा ? परंतु मी लगेच विचार करून पाहिला की मी काही साधू नाही . गृहस्थी आहे आणि गृहस्थी कधी चिमटा घेऊन फिरताना पाहिलेले नाहीत . शिवाय नर्मदा मातेने जर खरोखर याला दृष्टांत दिलेला आहे तर तो चिमटा त्याला दिल्याने त्याची मैया वरील श्रद्धा अधिक दृढ होणार होती . त्यामुळे मी तिथून निघू लागलो . त्याने थांबायची विनंती करून काळा चहा केला . आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली . त्याच्या मनातील अन्य धर्माविषयीचे काही समज गैरसमज दूर करण्यात मला यश आले . नर्मदा मातेने त्याला सांगितले होते की आज तुझा खरा साधू बनणार आहे . ते एक प्रकारे सत्यामध्ये उतरले कारण त्याच्या गुरुने दिला सर्व काही दिले होते . फक्त चिमटा दिला नव्हता . आता तो साधू जमातीमध्ये फिरताना ताठ मानेने फिरू शकणार होता . माझ्या हातावर त्यांनी दहा रुपये दक्षिणा ठेवली आणि मी त्याला नर्मदे हर केले . पुढे शेतात एका मुलीला मी माझ्याजवळ साठलेली सर्व दक्षिणा देऊन टाकली . आणि पुन्हा एकदा किनारा पकडला . नर्मदा परिक्रमा तुम्हाला हेच तर शिकवते . कुणी काही दिले तरी आनंदाने स्वीकार करा . कुणी काही मागितले तरी आनंदाने त्याग करा . तुम्ही सोबत काहीही आणलेले नाही व काहीही नेणार नाही ! तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या दानातून आनंद मिळवा ! तो चिमटा दिल्याने माझे ओझे खूप कमी झाले होते . जड पोलादाच्या त्या चिमट्याचे भौतिक वजन तर होतेच . परंतु तो सोबत बाळगताना साधू काय म्हणतील किंवा या चिमट्यामुळे आपल्याला साधूत्व स्वीकारून सर्वसंग परित्याग करून निघून तर जावे लागणार नाही ना , याचे एक मानसिक दडपण देखील होते ! ते देखील क्षणात निघून गेले !
घाना गावाच्या पुढे आल्यावर हे एक सुंदर शिवमंदिर लागते ज्याचा कळस मला खूपच आवडला . फार दूरवरून ही पिंड आपल्याला दिसते .
शेतात घातलेली अशी काटेरी कुंपणे पार करत पुढे चालत राहिलो .
मध्ये अचानक अशा नद्या आडव्या येतात त्या गुडघाभर पाण्यात किंवा कमरे भर पाण्यात उतरून पार करून टाकायचो .
अशाप्रसंगी शेतातून जाऊन शेतकऱ्यांची बोलणी खाण्यापेक्षा खालून जायचे . मार्ग थोडा कठीण असतो परंतु निश्चितपणे सापडतो
नर्मदा वळताना रस्ता बुडवून वाहते .तर विरुद्ध बाजूला भरपूर वाळू साठलेली असते .दोन्हीकडून चालणे कठीण असते . परंतु अशक्य मात्र नसते
जसजसा अंधार पडू लागला तस तशी पायांची गती वाढविली
जवळपास गाव असल्याची खूण म्हणजे असा एखादा सांडपाण्याचा नाला येऊन नर्मदेला मिळताना दिसतो .तो त्याच्यामध्ये पाय ठेवूनच पार करावा लागतो .
इथे घुन्सौर नावाचे एक गाव मला लागले . काल आपण पार केले ते घनसोर नावाचे गाव होते . एक सारख्या नावाची अनेक गावे नर्मदा खंडामध्ये सर्रास आढळतात . इथे ग्रामस्थांनी मला गावांमध्ये हनुमान मंदिरात राहण्याची विनंती केली . मला मंदिरात सोडून गावकरी निघून गेले . मंदिरामध्ये एक तेजस्वी गोरापान साधू भागवत वाचत बसला होता .त्याने तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती . मारुती मंदिराच्या आत एक छोटीशी खोली होती तिथे आसन लावले . समोर असलेल्या हातपंपावर स्नान केले . इतक्यातच मोटर सायकलवर एक तरुण मला शोधत आला . छोट्या गावामध्ये बातम्या लगेच पसरतात . गावातील मंदिरात कोणी परिक्रमा वासी आला आहे हे लक्षात आल्यावर मला घरी भोजनाचे आमंत्रण द्यायला तो आला होता . याचे नाव बिरू यादव असे होते . माझ्या एका मित्रासारखा तंतोतंत हा दिसत असे .  मला गंमत वाटली ! बोलण्याची ढब , चालण्याची ढब ,हसण्याची पद्धत , दिसण्याची पद्धत , सर्व एकसारखे ! नर्मदे काठी असे एक सारखे दिसणारे अनेक लोक मला भेटले . असो . आरती पूजा करून त्याच्या घरी गेलो . श्रीमंत कुटुंब होते . आई वडील करोनामध्ये ढगाला हात लावून खाली आले होते . दोन बहिणी होत्या . त्यांची मुले होती . मुलांना चित्रे काढून दिली . त्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर कसे ठेवता येईल या विषयावर दोघी बहिणींना सप्रयोग मार्गदर्शन केले . सुंदर असे घरगुती भोजन झाल्यावर बिरू यादव च्या आयुष्यातील काही समस्या होत्या त्या विषयावर तासभर बंद खोलीमध्ये चर्चा केली . आणि माताजींनी दिलेले फरसाण पोहे घेऊन परत आश्रमामध्ये आलो . बिरू यादव ला माझा स्वभाव आवडला आणि त्याने सांगितले की तुमची परिक्रमा जबलपूरला पूर्ण होईल तेव्हा मला फक्त एक फोन करा . मी तुमची कन्या भोजनाची सर्व व्यवस्था करणार ! दुर्दैवाने तसा काही योग पुढे आला नाही परंतु बिरू यादव हा व्यक्ती माझ्या चांगला स्मरणात राहिला . रात्री त्या आश्रमामध्ये एक गांजाडा भगत आला आणि बराच वेळ साधुशी मोठ्या आवाजात गप्पा मारत राहिला . त्यामुळे माझी झोप काही झाली नाही . पहाटे साडेतीन चार वाजता डोळा लागणार इतक्यात भजन करणारी काही मंडळी आली आणि त्यांनी संपूर्ण गावांमध्ये प्रभात फेरी सुरू केली . टाळ ढोलकी शंख झांजा अशी वाद्य घेऊन रामनामाचा गजर करीत ते रोज प्रभात फेरी काढत असत . त्यांच्या या प्रभात फेरीमुळे संपूर्ण गाव पहाटेच्या रामप्रहरी जागा होत असे . ही संकल्पना मला फार आवडली . मी थोडे अंतर त्यांच्याबरोबर चाललो देखील . पुढे अनेक गावांमध्ये मला अशा प्रभात फेऱ्या दिसल्या . ही परंपरा आपल्या महाराष्ट्रातून अस्तंगत झालेली दिसते . ती या लोकांनी जिवंत ठेवलेली आहे . मी हातपंपावर गरमागरम भूजलाने पुन्हा एकदा स्नान करून घेतले . परत मारुती मंदिरात आल्यावर या लोकांनी माझ्या हस्ते आरती करून घेतली . पूजा वगैरे आटोपून मी भल्या पहाटे पुढे निघालो . आता नर्मदेचा अतिशय सुंदर असा किनारा मला दिसू लागला ! इथून खरे तर डांबरी मार्ग होता परंतु तो टाळून मी काठावरीलच मार्ग पत्करला . आणि तो माझा निर्णय अतिशय अतिशय योग्य ठरला ! हिरवेगार गवत संपून आता विविध रंगाचे दगड दिसू लागले . चित्रविचित्र आकारांचे हे खडक पायाला टोचणारे होते आणि चालण्यासाठी अत्यंत घातक होते . त्यामुळे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाकावे लागत होते .
गवताचा प्रदेश संपून खडकाळ किनारा सुरू झाला
खडकाचा एक फायदा असा की अगदी काठाने चालता येते
या भागातील नर्मदेचे जल अत्यंत शुद्ध पवित्र आहे

किती किलोमीटर चालताना तुम्हाला एकही मनुष्य आढळत नाही

काठावरती दगडांचे विविध आकार , प्रकार , रंग बघायला मिळतात
मध्ये एक छोटेसे मंदिर लागले . अशी खूप छोटेखानी पूजास्थाने नर्मदे काठी आहेत .इथे बसून स्थानदेवतेचे दर्शन करणे व ध्यान करणे खूप आनंददायी असते .
काठावरून चालताना कधी कधी दगडांवरून उड्या मारत चालावे लागे .नर्मदेचा मुख्य प्रवाह आपल्याकडून ओलांडला जाणार नाही एवढी काळजी फक्त घ्यायची .
या भागातून चालणे हा अतिशय सुखद अनुभव होता .विविध रंगाचे रंगीबेरंगी खडक आणि शिवलिंगे येथे सापडत होती .समोर मोठे विद्युत मनोरे विजेचा प्रवाह नर्मदेच्या इकडून तिकडे घेऊन जात होते .
पुढे अचानक नर्मदेचे पात्र अरुंद झाले आणि अतिशय शांतपणे आवाज न करता दहा फूट खाली झेपावताना दिसले .हाच नर्मदे वरील जगप्रसिद्ध घुघुवा धबधबा होता हे मला नंतर समोरच्या ताटावर पोहोचल्यावर कळले . हे दृश्य फारच नयन मनोहर होते ! वरील चित्राच्या समोरील तटावरून मी चालत होतो .
पुढे इतका मोठा धबधबा तर अलीकडे पाणी इतके शांत , नितळ , निर्मळ होते ! सारेच अद्भुत !

याच परिसरातील काही दृश्य
हे ठिकाण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते . परंतु मी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते
शांतपणे वाहणारी नर्मदा आणि तिच्यामध्ये तरंगणारे असे एखादे होडके किंवा डोंगा हे दृश्य हृदयात कायमचे कोरले गेलेले आहे !
पुढे अचानक असा एक नाला आडवा आला . नंतर नर्मदा पुराण वाचताना मला कळले की हा देवनाला नावाची नदी होती !
नर्मदेचे पात्र अचानक तीन मोठ्या मोठ्या शाखांमध्ये विभागले गेले .हेच ते पुराण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्रिशूल भेद ! इथून नर्मदा अचानक उत्तरवाहिनी होऊन जाते .

त्रिशूल भेद तीर्थाच्या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केलेली आहे .
शेजारी देवनाला वाहतो आहे
त्रिशूल भेद तीर्थातील देवता
हा देवनाला अतिशय पवित्र असून याच्यामध्ये स्नान करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते . मला हे काही ठाऊक नव्हते . परंतु नाल्याच्या वरील चित्रात दिसणाऱ्या  काठाने चालताना अचानक माझा पाय सटकला आणि संपूर्ण सामानासकट मी खाली घसरू लागलो आणि देवनालमध्ये  पडणार असे लक्षात आले . मी पटकन पाठीवरची झोळी मोकळी केली ,फेकून दिली आणि देवनाल्या मध्ये उडी मारली ! मला हे अपघाती स्नान घडले खरे ! परंतु नंतर नर्मदा पुराण वाचल्यावर त्या स्नानाचे महात्म्य माझ्या लक्षात आले ! आणि आता खूप कृत कृत्य वाटते . या छोट्या छोट्या घटनांवरून असे लक्षात येते की आपण परिक्रमा करत नसतो तर नर्मदा मैया आपल्याला तिच्या पद्धतीने परिक्रमा घडवीत असते . नाहीतर हे त्रिशूल भेद तीर्थ आहे वगैरे मला काहीही माहिती नव्हते . नर्मदा पुराणा मध्ये आलेल्या या सर्व कथा पुढे एका स्वतंत्र प्रकरणांमध्ये लिहावयाचा मानस आहे . त्यामुळे ज्यांना पुराण कथा ऐकण्यामध्ये रस आहे त्यांना ते एकत्रित वाचायला मिळेल .
त्रिशूल भेद तीर्थ अतिशय पवित्र मानले जाते

इथे नर्मदा उत्तरवाहिनी होत असल्यामुळे या भागाचे विशेष महात्म्य आहे
ही सूचीपर्णी वनस्पती आपल्याला जागोजागी आढळते जिच्यामुळे थोडीफार तरी गाळ माती साचून कठीण खडकांमध्ये थोडेसे वाळवंट तयार होण्यास मदत झालेली आहे . ही परदेशी वनस्पती असून मध्य प्रदेश सरकारने हीची जाणीवपूर्वक काठावरती लागवड केलेली आहे ज्यामुळे पूर नियंत्रणास मदत होते . चालताना मात्र ही वनस्पती फार तापदायक असून हिच्या वाळलेल्या काठ्या पायामध्ये खूप बेकार घुसतात . त्यामुळे हिच्या वनातून चालताना फार जपून चालावे लागते . 

आता हळूहळू खडकांचा आकार मोठा होऊ लागला आणि एखादा मोठा पर्वत चढतो आहे की काय असे वाटू लागले . लवकरच एका जगप्रसिद्ध ठिकाणचे दर्शन नर्मदा मैया मला घडविणार होती !
आजूबाजूला डोंगर आणि हे शांत रूप पाहून कोणालाही शंका सुद्धा येणार नाही की इथून पुढचे नर्मदेचे रूप किती भयानक आणि रौद्र असू शकेल !
इथूनच पुढे नर्मदा अचानक तीनशे फूट खोल दरीमध्ये झेपावते आणि सुरू होतो जगप्रसिद्ध भेडाघाट !नर्मदे हर !


लेखांक त्रेचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४४ : जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा , भेडाघाट आणि ग्वारीची सिद्धन बाई

पायाखालची माऊशार माती जाऊन खडकाळ भूमी सुरू झाली . चित्र विचित्र आकाराचे धारदार खडक , स्तरित खडक ,ते खचून तिरके झालेले , यातील चुनखडक धुतला जाऊन फक्त धातुयुक्त भाग शिल्लक राहिलेला , पांढरट दगड , संगमरवरी दगड ,काळे दगड , पिवळे दगड ,लालबुंद दगड ,मोठाले अभ्रकाचे खडक ,मोठाले चकचकीत धातूयुक्त गोटे ,सारेच अद्भुत दृश्य ! 
इतके सारे वैविध्यपूर्ण खडक एकाच ठिकाणी मी आजवर कधीच पाहिले नव्हते ! मध्ये लम्हेटा नावाच्या गावामध्ये प्रभू रामचंद्राने स्थापन केलेले दुहेरी शिवलिंग होते . इंद्रेश्वर आणि कुंभेश्वर असे त्याचे नाव . शेजारी पिपलेश्वराचे मंदिर देखील आहे . हे जोड शिवलिंगाचे मंदिर अतिशय सुंदर आहे . छोटेसेच परंतु आखीव रेखीव बांधलेले असून सुंदर असा घाट तिथे तयार केलेला आहे
श्रीरामांनी स्थापन केलेले इंद्रेश्वर कुंभेश्वर जोड शिवलिंग मंदिर
जोड शिवलिंग
मंदिरा भोवतालचा छोटासा बगीचा आणि छोटेखानी घाट

मंदिरातील अन्य देवता
पौराणिक पिपलेश्वर महादेव मंदिर
 पिप्पलेश्वर महादेव
 शनीकुंड लम्हेटा घट
मध्ये लागणारे आश्रम .
जाबाली ऋषी यांची तपोभूमी .यावरूनच या शहराला जबलपूर नाव पडले आहे .
 . त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो .मध्ये एक शनि कुंड आहे त्याचे देखील दर्शन घेतले . हळूहळू नर्मदा मैया एकदम शांत होत गेली . इतकी शांत झाली की जणू काही प्रश्न पडावा की ही वाहते आहे की स्थिरावली आहे ! परंतु फार थोड्या जणांना माहिती होते की ही घनघोर वादळापूर्वीची शांतता आहे ! इथून लवकरच नर्मदा मैया अतिशय वेगाने खोल अशा दरीमध्ये झेप घेणार होती ! हा संपूर्ण प्रदेश जंगलाचा आहे . वाटेमध्ये मला कोल्हे वगैरे दिसले . मी काठाकाठा ने चालत होतो . अचानक मला खूप मोठा गडगडाटी आवाज ऐकू येऊ लागला ! आसमंतामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग उडत आहेत असा भास झाला ! आणि त्या अद्भुत नजाऱ्याचे अखेर दर्शन घडलेच ! हाच तो जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा ! इथून पुढे संगमरवराचे पहाड चालू होतात . इथला संगमरवर अतिशय मृदू असल्यामुळे नर्मदेच्या प्रवाहाने त्याचे दोन प्रवाह मध्ये विभाजन केलेले आहे . आणि त्याला अक्षरशः करवती ने चिरावा तसा उभा चिरत खाली नेलेला आहे ! नर्मदेच्या अनेक रूपांमधील अतिशय सुंदर असे हे रूप आहे ! या भागाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये बघण्या सारखे आहे . जबलपूर शहर जवळ असल्यामुळे येथे पर्यटकांचा नेहमीच राबता असतो . इथे दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्यासाठी एक उडण खटोला म्हणजे झुलता पाळणा तयार करण्यात आलेला असून ते पर्यटकांचे खास आकर्षण आहे .
हाच तो जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा . याच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या काठावरून मी चालत आहे .
पावसाळ्यामध्ये हा दुथडी भरून वाहतो
इथे पर्यटक समोरच्या म्हणजे उत्तर तटावर  . दक्षिण तटावर फारसे कोणी दिसत नाही .
धुवाधार धबधब्यानंतर नर्मदेचे दोन धारांमध्ये विभाजन होते . पुढे पुढे या दरीची खोली वाढत जाते . इथला जलप्रवाह अतिशय भयावह आहे .
हा धबधबा सुरू होण्याच्या अगदी ५० फूट अलीकडे काठावरती दोन माणसे स्नान करत आहेत असे मला दिसले . मी तिथे जाईपर्यंत ते बाहेर आले . हे स्थानिक मच्छीमार होते . मी देखील तिथे स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली . परंतु दोघांनी मला तिथे स्नान न करण्याचा सल्ला दिला . परंतु ते दृश्य इतके अद्भुत होते ! इथूनच नर्मदा खाली खोल दरीत झेपावत होती आणि त्याच्या अगदी जवळ हे दोघे स्नान करत होते ! तिथे उभे राहून ते दृश्य फार अद्भुत दिसत होते ! नर्मदेचा गतिमान प्रवाह बघता बघता अदृश्य होत होता आणि मोठा पांढरा मेघ आकाशामध्ये उठत होता ! त्या दोघांनी मला एका अटीवर पाण्यात उतरण्याची परवानगी दिली . ते म्हणाले बाबाजी तुम्ही एक इंच सुद्धा पुढे जाणार नाही असे वचन देत असाल तर एक जागा तुम्हाला दाखवतो . आणि त्यांनी दगडांमधील एक फट मला दाखवली जिथे पाण्याचा प्रवाह उलटा फिरत असल्यामुळे उभे राहायला जागा तयार झाली होती . तिथे गळ्या एवढ्या पाण्यामध्ये मी उभा राहिलो . हृदयाचा थरकाप उडवणारे एकंदरीत दृश्य दिसत होते ! मी गंमत म्हणून वेगाने वाहणाऱ्या प्रवाहामध्ये हात घालायचा प्रयत्न केला . परंतु केवळ माझे बोट त्या प्रवाहामध्ये शिरताच संपूर्ण हातच अति वेगाने खेचला गेला ! तो मी चटकन बाहेर काढला नसता तर कदाचित संपूर्ण शरीर आत मध्ये ओढले गेले असते ! मग मात्र मला त्यांनी एक इंच देखील पुढे जाणार नाही असे का वदवून घेतले ते लक्षात आले . ते दोघे कुठे गेले लक्षात आले नाही . परंतु त्यांना तिथे स्नान करताना मी पाहिले नसते तर माझी तिथे उभे राहण्याची हिंमत देखील झाली नसती हे मी १००% खात्रीने सांगतो !
मी स्नान केले ती जागा लाल बाणाने दाखवली आहे .कृपया कोणीही इथे स्नान करण्याचे जीवघेणे दुःसाहस करू नये अशी विनम्र विनंती आहे .
मी तिथून ताबडतोब बाहेर आलो आणि अंग पुसून तिथेच दगडावर बसून पूजन करून घेतले ! ही जागा फारच भयानक परंतु तितकीच अद्भुतरम्य होती ! जोवर मागून पाण्याचा मोठा प्रवाह येत नाही तोपर्यंत मी सुरक्षित होतो ! परंतु असा एखादा प्रवाह आलाच तर मला कोणीही वाचवू शकले नसते इतक्या भयानक जागी मी बसलो होतो . परंतु अशाच काही प्रसंगामुळे आद्य शंकराचार्य नर्मदेला भीतीहारी वर्मदे का म्हणतात ते लक्षात येते ! तिचे कितीही भयानक रूप असू दे . तुम्हाला भीतीच वाटत नाही ! समर्थ रामदास स्वामी म्हणतात , " व्याघ्रसिंह भयानक ।पाहून भयचकीत लोक । परंतु तयांची पिली निशंक । तयांपुढे खेळती ॥ " तसे काहीसे आपले नर्मदेच्या बाबतीत होऊन जाते ! ती आपली आईच असल्यामुळे तिच्या कुठल्याही रूपाची भीती वाटतच नाही ! समोर आसमंत व्यापून टाकणारा तुषारांचा मेघ सुखद गारवा निर्माण करत होता ! हे दृश्य हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कायमचे कैद करून ठेवलेले आहे ! इथून थोडेसे पुढे आलो आणि मग एक सिमेंटचे बांधकाम लागले . खडकांमधील कठीण मार्ग सोडून एका लोखंडी पाईप वरून उडी मारून वरती चढलो . इथे चणे फुटाणे विकणारा एक मुलगा उभा होता . मी ज्या मार्गाने आलो तिथून येण्याचा मार्गच नाही . त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता ! त्याने तिथे उभे करून माझे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढले . नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने ते पाठवून दिले .


धुंवाधार धबधब्यापाशी प्रस्तुत लेखक . मागे दिसणारा भेडाघाट .
मुलाने काढलेली अजून काही चित्रे
मुलाने फोटो काढल्यावर तो बार मी पुन्हा ओलांडला आणि नर्मदेच्या काठाकाठाने चालू लागलो . वरील फोटो पाहिल्यावर मी कुठून चाललो तुमच्या लक्षात येईल . चालत चालत मी जवळपास निम्म्याहून अधिक खाली उतरलो . पुढे भयंकर दरी दिसू लागली . इथून पुढे जायला देखील मार्ग नव्हता आणि मागे यायला देखील खूप धोकादायक मार्ग होता . एक क्षणभर विचार आला की नर्मदेच्या गतिमान प्रवाहामध्ये उडी मारून द्यावी आणि पोहत पुढे जावे ! तसेही इथे बंदर कुदनी नावाची एक जागा आहे जिथून मुले पाण्यामध्ये उड्या मारतात . परंतु परिक्रमेमध्ये हे सर्व करण्यास मज्जाव असल्यामुळे निराश होऊन पुन्हा मागे फिरलो .आणि काठानेच चालू लागलो .
इथे वृंदावन गोपाला नावाचे एक अठरा एकरामध्ये पसरलेले रिसॉर्ट आहे . त्याची हद्द कधी सुरू झाली आणि त्या हॉटेलमध्ये मी कधी शिरलो माझे मलाच कळले नाही . मला अचानक कुंपण ओलांडून आत येताना पाहून मालक चक्रावला . त्याने मला सांगितले की आज पर्यंत या मार्गाने कोणीही गेलेले त्याने पाहिलेले नाही . याचाच साधा अर्थ असा होता की आजपर्यंत कोणालाही न झालेले नर्मदा मातेचे दर्शन मला तिथे झाले ! त्याने सन्मानपूर्वक रिसॉर्ट मध्ये नेऊन मला उत्तम पैकी चहा पाजला . खूप दिवसांनी कमी गोड आणि अतिशय दर्जेदार चहा प्यायला मिळाला ! नाहीतर शक्यतो खेड्यामध्ये चहा फार गोड करण्याची पद्धत भारतात सर्वत्र आढळते . उडन खटोला हॉटेलच्या शेजारूनच जात होता ते बघायला फार मजा येत होती . मी जेव्हा मालकाला सांगितले की हा उडन खटोला जिथे संपतो त्या भागावरून मी आलो तेव्हा त्याला डोक्याला हातच मारला ! कारण ती जागा खरोखर खूप भयानक आहे . आता इथून पुढे जाण्यासाठी डांबरी मार्ग होता परंतु मी डांबरी मार्गाने जाण्यास स्पष्ट नकार दिला . मालकाने मला बोलावले नसते तर मी काठाकाठाने पुढे गेलो असतो याची त्याला जाणीव करून दिली आणि त्याला देखील काय वाटले कोणास ठाऊक ! त्यांनी मला हॉटेलचे मागचे दार उघडून दिले .सोबत एक माणूस पाठविला आणि पुढचा मार्ग किनाऱ्याने कसा आहे ते दाखवून देण्यास त्या स्थानिक माणसाला सांगितले . इथून पुढे काठाने भयानक जंगल माजलेला मार्ग होता . मार्ग नव्हताच मुळी . अतिशय उंच सखल संगमरवरी डोंगर . त्यावर माजलेली झाडी . आणि उजवीकडे चुकून जरी तोल गेला तर १०० ते ३०० फूट खोल दरी ! इथे नर्मदेहर असा पुकारा केल्यावर समोरून प्रतिध्वनी यायचा ! त्याचा पुरेपूर आनंद घेत मी पुढे निघालो ! या मार्गाने आजवर कोणीही गेलेले नाही .कारण मध्ये संपूर्ण रिसॉर्ट असल्यामुळे ते तुम्हाला पुढे जाऊच देत नाहीत !त्यामुळे जाताना मला कुठेही पायवाट मिळाली नाही .तर हातातील काठीने वाटेतील झाडे तोडत रस्ता तयार करत मी पुढे निघालो . मार्ग अत्यंत कंटकाकीर्ण होता . परंतु अतिशय सुंदर असे नर्मदेचे दर्शन सतत होत असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देखील जात नव्हते ! मध्ये एक पंचमुखी हनुमान मंदिर लागले . त्या मंदिरात मध्ये देखील मागच्या भिंतीवरून उडी मारून आत गेलो . आत बसलेला साधू बावचळला . आता तो मला काहीतरी बोलणार हे लक्षात आल्यामुळे पटकन दर्शन घेऊन मी पुन्हा भिंतीवरून उडी मारून मागचा मार्ग पकडला . साधारण शंभर फूट खोल असलेली दरी हळूहळू तीनशे फुटापर्यंत गेली . वाटेमध्ये काही खाजगी प्रॉपर्टी होत्या व त्याची कुंपणे थोडासा त्रास देत होती . परंतु तिथे चरायला येणाऱ्या गुरांची कृपा अशी की त्यांच्यामुळे छोट्या छोट्या पायवाटा तयार झाल्या होत्या . त्यांचा अवलंब करत वरून चालत राहिलो . हा आतापर्यंतच्या परिक्रमेला अत्यंत अविस्मरणीय असा टप्पा होता . नर्मदा मातेचे इतके विहंगम आणि सुंदर दर्शन फार क्वचित ठिकाणी होते ! तिच्या पाण्याचा तो निळा शार रंग ! पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकांच्या मध्ये अतिशय उठून दिसतो . एखाद्या सुंदर सावळ्या केरळी स्त्रीने पांढरी शुभ्र पट्टसाडी नेसावी असे ते दृश्य आहे .  या भागामध्ये पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की तुम्हाला बऱ्याच खोलीपर्यंत संगमरवरी खडक दिसत राहतो . परंतु तितकेच खोल देखील असल्यामुळे कुठेही तुम्हाला तळ दिसत नाही . या संपूर्ण भागामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे . इथे पर्यटकांना नावे मधून देखील फिरविले जाते . हा संपूर्ण टापू निर्मनुष्य आहे . आणि एका निश्चित बंधनामध्ये नर्मदा नदी वाहत असल्यामुळे तिला प्रचंड गती आहे . याच भागामध्ये एक अद्भुत दृश्य बघायला मिळाले . बरेचदा अनेक साधू असा दावा करतात की त्यांनी नर्मदेमध्ये दूध धारा पाहिली . मला देखील एक क्षणभर दुधाची धारा दिसू लागली आणि डोळ्यावर विश्वासच बसेना ! नंतर माझ्या लक्षात आले की आजूबाजूच्या चुनखडकांमधून वाहताना नर्मदेमध्ये त्या रसायनांच्या योगाने पांढरा फेस तयार होतो . आणि गतिमान प्रवाहामुळे तो मधोमध गोळा होतो आणि वाहू लागतो . दुरून आणि विशेषतः वरून पाहताना हा प्रवाह दुधाचा आहे असा भास कोणालाही होतो . हीच ती दूध धारा . पुढे अशी दूध जरा नर्मदेमध्ये अजून काही ठिकाणी दिसली . परंतु भेडाघाट मध्ये नर्मदेचे पाणी अतिशय शुद्ध असल्यामुळे इथली धारा खरोखरच दुधासारखी स्वच्छ होती . या भागातील नर्मदेची काही रुपे आपल्या दर्शनाकरिता खाली देत आहे . मध्ये असून एक सुंदर 'व्ह्यू पॉईंट ' सरकारने निर्माण केलेला आहे . तिथून देखील नर्मदेचे अतिशय सुंदर विहंगम दृश्य दिसते . ( विहग म्हणजे पक्षी . विहंगम दृश्य म्हणजे शुद्ध मराठी मध्ये बर्ड्स आय व्ह्यू !) इथे काही पर्यटकांनी माझे फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .
 एका पर्यटकाने काढलेला प्रस्तुत लेखकाचा फोटो . 
मागे दिसणारे भेडाघाटचे अद्भुत सौंदर्य . इथे जी झाडी मी दाखवतो आहे तिथून मी चालत आलो .उजव्या बाजूने नर्मदा येते
 डाव्या बाजूला नर्मदा वाहते . संगमरवरी पहाडाचा शुद्ध पांढरा रंग उठून दिसतो . समोर प्रस्तुत लेखक .
भेडाघाटचे पांढरेशुभ्र पहाड , खाली वाहणारी हिरवीगार नर्मदा माई आणि त्याचे दर्शन घेणारा प्रस्तुत लेखक .
धुवाधार धबधबा .पलीकडे पर्यटकांची गर्दी
धुवाधार धबधबा इथे तयार होणारा धुवा अर्थात धुके
भेडाघाटचे सुंदर दर्शन घडविणारा उडन खटोला अर्थात उडता पाळणा
सायंकाळी होणारे धुवाधारचे विहंगम दर्शन
भेडाघाटचे अभेद्य संगमरवरी पहाड आणि त्यांना चिरत जाणारी नर्मदा
बंदर कुदनी : इथून मुले नर्मदेमध्ये उड्या मारून पैसे कमवतात
भेडाघाट मध्ये मैया कधी काळात वाहते तर कधी अशी शांत वाहते .वरून नर्मदा जल शांत दिसले तरी त्याला प्रचंड वेग असतो .खोली अधिक असल्यामुळे पाणी शांत जाणवते इतकेच .
भेडाघाटचे अजून एक रूप . पाण्याची कमी अधिक होणारी पातळी दगडांवर दिसते .
हे पहाड कुणीतरी जाणीवपूर्वक फोडून नर्मदेला मार्ग करून दिला आहे असे वाटावयास वाव आहे , इतके हे मार्ग आखीव रेखीव आहेत
इथल्या संगमरवरांमध्ये देखील बरेच प्रकार आढळतात .

चित्रपटातील गाण्यांच्या चित्रीकरणासाठी याहून सुंदर ठिकाण कोणते मिळणार ? अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या भागात झालेले आहे . अशोका , मोहनजोदडो ,जिस देश मे गंगा बहती है ,बॉबी ते अगदी काल-परवा आलेला डंकी चित्रपट यातील काही महत्त्वाचे चित्रीकरण या भागात झालेले आहे .
२०१३ मध्ये आलेल्या महाभारत मालिकेतील सुरुवातीची काही दृश्ये इथेच चित्रीत झाली होती .
डंकी चित्रपटातील दृश्य
मोहनजोदडो चित्रपटातील एक दृश्य
अशोका चित्रपटातील एक दृश्य .
असो .चित्रपट हा काही माझा प्रांत नाही .परंतु ओघाने विषय निघाला म्हणून जाणकारां करिता माहिती देऊन ठेवली असे .
काठाने असलेले जंगल पहा .त्यातून चालण्याची पायवाट निघते . परंतु वयस्कर परिक्रमावासीना डांबरी रस्त्याने चालण्याचा सल्ला स्वानुभवाधारे प्रस्तुत लेखक देत आहेत .

इथले पाणी इतके स्वच्छ आहे की बुडलेले पहाड देखील दिसतात .
पहाडांचे विविध आकार आणि प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात .
पहाडा मध्ये काही ठिकाणी गुफा निर्माण झालेल्या असून इथे नक्की कधी काळी कोणी साधना केलेली असणार हे लक्षात येते . तसेच इकडून नर्मदा जलाला स्पर्श करता येईल इतके खाली उतरण्यास काही ठिकाणी जागा आहे . तिथे आवर्जून उतरून पाण्याच्या गतीचा अनुभव घ्यावा ! 

जंगलातून चालताना झाडीतून नर्मदा अशी दर्शन देत राहते . पुढे असलेले कठीण मार्ग तिच्या या रूपाकडे पाहताच सोपे वाटू लागतात !
एकाच वळणाची विविध वेळी दिसणारी विविध रूपे
मध्ये काही ठिकाणी अशी शांत सरोवरे देखील आहेत . शिवाय केवळ महापुरामध्ये वाहणाऱ्या काही शाखा देखील आहेत ज्या एरवी कोरड्या असतात परंतु महापुरामध्ये दुथडी भरून वाहातात .
पर्यटकांसाठी अशा नावा येथे मिळतात . नावेच्या आकारावरून पात्राच्या खोलीचा अंदाज घ्यावा !
एका फ्रेम मध्ये नर्मदेचे हे सुंदर रूपडे पकडता येणे केवळ अशक्यच आहे .
अशी ही सुंदर नर्मदा माता जंगलाच्या वाटेने चालता चालता कधी आपल्याला ग्वारी गावामध्ये आणून सोडते हे आपल्याला कळत देखील नाही ! उत्तर तटावरील ग्वारी घाट संपल्यावर दोनच दिवसांमध्ये ग्वारी नावाचे हे गाव दक्षिण तटावर लागते .
ग्वारी गावामध्ये नर्मदेच्या काठी एक सुंदर घाट लागला . या घाटावर एक हनुमान जी चे मंदिर होते आणि एक आश्रम होता . 
भेडाघाट संपल्यावर लागणारा नर्मदे काठचा सुंदर घाट . लाल रंगांमध्ये दाखविलेला सिद्धनबाई अथवा शामाबाई यांचा आश्रम आहे .
आश्रमासमोरील छोटे खानी हनुमान मंदिर .

या आश्रमामध्ये भागवत कथा सुरू होती . त्यामुळे मी आश्रमामध्ये गेलो आणि भागवत कथा श्रवण करीत बसलो . हा आश्रम सिद्धन बाई नावाच्या एका महिला संताचा होता . सिद्धन बाई एका खाटेवर आसन लावून बसल्या होत्या आणि अडकित्त्याने सुपारी कातरत बसल्या होत्या . यांचा हेअर कट पुरुषांसारखा होता . शरीरष्टी दणकट , अगदी एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखी होती . आणि कमरेला त्यांनी पैलवानासारखी लुंगी गुंडाळली होती . वरती देखील त्यांनी पुरुषी कोपरी / बंडी घातली होती . पांढरेशुभ्र केस , रापलेला चेहरा , यांचा एकंदरीत सर्व अवतार एखाद्या पुरुषासारखा होता . वय ७० - ७५ दरम्यान असावे . केवळ त्या बोलायला लागल्या की स्त्री आहे एवढे कळायचे . परंतु बोलताना देखील , मै करता हु । मै जाता हू । मै खाता हु ।अशा पुरुष वाचक वाक्यरचना करायच्या ! देवाची लीला अगम्य आहे हेच खरे ! यांच्या आश्रमामध्ये काही तरुण युवती ,साधिका , सेवेकरी होत्या . आत मध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला गोशाळा होती ज्याच्यामध्ये पंधरा-वीस उत्तम उत्तम गाई होत्या . गेल्या गेल्या बाईंना नमस्कार करून मी संपूर्ण भागवत कथा श्रवण केली .हे बाईंनी पाहिले होते . श्रवणाला आश्रमातील युवती आणि मी इतकेच लोक होतो . दुपारी चारच्या सुमाराला बाईंनी मला भोजन प्रसाद घेणार का असे विचारले . मी होकार दिल्यावर मला भोजन देण्यात आले . त्यानंतर बाईंनी मला कोपऱ्यातील एका खोलीकडे हात करून तिथे आसन लावायची सूचना केली . भागवत कथा करणारा मनुष्य तरुण होता . त्याने भागवत कथा झाल्यावर माझ्या खोलीमध्ये येऊन खूप वेळ गप्पा मारल्या . त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे . कारण शक्यतो सिद्धन बाई कुठल्याही परिक्रमा वासीला आश्रमामध्ये येऊ देत नाहीत ! आणि मुक्काम भोजन प्रसाद वगैरे तर फारच लांबच्या गोष्टी आहेत ! त्या स्वभावाने खूप कडक होत्या आणि काही चुकले तर तोंडावर अपमान करायच्या . हे सर्व मला भागवत काराने सांगितले खरे परंतु मला मात्र तसा काही अनुभव आला नाही . बाईंनी मला खूपच प्रेम दिले . मुळात ती स्त्री आहे असे मला वाटतच नव्हते . एखादा वस्ताद पहिलवान बसला आहे असे डोक्यात ठेवून मी तिच्याशी वागत होतो .बोलत होतो . तिला बहुतेक ते आवडले असावे . आश्रमामध्ये तरुण महिला साधिका असल्यामुळे बाई इथे सडाफटिंग परिक्रमा वासींना राहू देत नसाव्यात असा अंदाज मी बांधला . मी बाईंच्या चरणाशी बसलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या . मी काठाकाठाने आलो आहे हे कळल्यावर त्यांना खूप कौतुक वाटले . रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो ! रात्री बाईंचा एक चुणचुणीत ,हुशार डॉक्टर / वैद्य शिष्य तिथे आला . त्याचे नाव रेवाप्रसाद सेन असे होते .याला झाडपाल्याचे खूपच चांगले ज्ञान होते . आम्ही तिघे आणि आश्रमातील काही साधिका असे शेकोटी करून अंगणात बसलो . बाईंचा आज चांगला मूड असावा असे दिसत होते . बाईंनी १९७३ साली तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती . हिला सर्व गाव बाई म्हणत असे त्यामुळे मी देखील बाई असा उल्लेख करत आहे . प्रत्यक्षामध्ये तिच्याशी बोलताना आम्ही बाईचा भाई करून तिला भाई म्हणत होतो ! ती खरोखरच एखाद्या गँगस्टर सारखी हिम्मतवान , कर्तृत्ववान आणि तुफान स्त्री होती . तिच्यापुढे बोलताना दहा वेळा विचार करून बोलावे लागे . इतकी तिची दहशत होती . आश्रमामध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणी तर सतत तिच्यापुढे डोक्यावर पदर घेऊन वावरायच्या ! तिच्या परिक्रमेमधील आठवणी ती सांगत राहिली . तीन वर्षाच्या अशा तीन परिक्रमा तिने आयुष्यामध्ये केल्या होत्या ! तो काळ असा होता जेव्हा परिक्रमावासींची सेवा फारशी कुठे होत नसे . आणि एखादी महिला परिक्रमा करते आहे अशी उदाहरणे तर फारच दुर्मिळ असायची . मला अनुभव सांगताना सिद्धनबाई अथवा श्यामाबाई अक्षरशः तिथे पोहोचली होती ! तिची भाषा ,प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी आणि एकंदर अविर्भाव हे सर्वच मला खूप भावले . आता हिचे वय सत्तरीच्या पुढे होते परंतु अजूनही अंगात भरपूर ताकद होती हे दिसत होते . एका परिक्रमेमध्ये भिल्लांनी तिला कसे लुटले याचा किस्सा तिने सांगितला . यांची मजेदार भाषा बाई कशी शिकली हे देखील तिने सांगितले . नर्मदा मैयाने तिला कधी कधी कुठे कुठे आणि कसे दर्शन दिले हे सांगताना मात्र तिच्यातली हळवी स्त्री जागी व्हायची आणि डोळ्यातून अश्रू धारा झरायच्या ! शूलपाणीच्या झाडीमध्ये भिल्लांनी जेव्हा तिला लुटले तेव्हा तिने एक गंमत केली होती . त्याकाळी भिल्ल पुरुष , स्त्रिया सर्व सदासर्वकाळ विवस्त्रच असायचे . आजही बऱ्यापैकी विवस्त्र अवस्थेतच भिल्ल लोक असतात . त्यामुळे हिला देखील त्यांनी परिक्रमेमध्ये संपूर्ण विवस्र केले . जवळचे सर्व सामान ,वस्त्रे सर्व लुटून घेतले . बाईने हुशारी करून डोक्याला एक रुमाल बांधला होता . आणि त्याच्यामध्ये दहा रुपयाची एक नोट खोचून ठेवली होती . ती म्हणाली उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून एवढा रुमाल तरी माझ्या डोक्यावर राहू दे . आणि झाडाची पाने कमरेला आणि छातीला गुंडाळून बाई चालायला लागली . इतक्यात एक मामा म्हणजे भिल्ल पळत आला आणि तिला म्हणाला थांब ! जागेवर उभी रहा ! हातात विषारी बाण ताणलेला धनुष्य असल्यामुळे जागेवर उभे राहावेच लागते . मामा तिला म्हणाला की तुझ्याकडे दहा रुपये आहे ते मला का नाही सांगितले ? आता मात्र बाईची बोबडी वळली ! तिने गप गुमान दहा रुपये काढून त्याच्या पुढे टाकले .आणि विचारले की तुला कसे काय कळले ,माझ्याकडे दहा रुपये आहेत ते ? कारण तुम्ही सर्व लुटले तर पुढे थोडेफार पैसे गाठीला असावेत म्हणून मीच युक्ती करून पैसे जटे मध्ये खोचून टाकले होते . ते फक्त मलाच माहिती होते . मामा म्हणाला तुला आणि माझ्या बहिणीला म्हणजे नर्मदेला ,दोघींना माहिती होते . आणि तू मला सांगितले नाहीस तरी मैय्या मला सर्व सांगत असते . तेव्हा बाईची खात्री पटली की या मामा लोकांना खरोखर नर्मदा बहीण म्हणून मदत करत असते . हे आदिवासी नर्मदेला आपली बहिण मानतात त्यामुळे परिक्रमावासी त्यांना मामा असे म्हणतात . नर्मदा माता त्यांना सर्व गोष्टी सांगत असते याचा अनुभव अनेक परिक्रमावस्यांनी घेतलेला आहे . मुळात नर्मदा मातेचा आधार वाटण्याऐवजी शामा बाईला त्या दहा रुपयांच्या नोटेचा आधार वाटत होता . तुमची ही आलंबना किंवा तुमचे हे परावलंबित्व संपविण्यासाठी नर्मदा मातेने मामा लोकांची नियुक्ती केलेली आहे . ते स्वतः निस्पृह असल्यामुळे त्यांना नर्मदा सर्वकाही कानात येऊन सांगते आणि मग तितकेच ते लुटतात .बरोबर तुमच्या आवडीचा पदार्थ ते मागून घेतात . असे एकापेक्षा एक खुमासदार किस्से बाई रात्री बारा वाजेपर्यंत सांगत राहिली ! ही बाई इतरांशी इतकी फटकून वागत असेल यावर माझा सांगूनही विश्वास बसू शकणार नाही इतके तिचे वागणे सुरेख होते . या सर्वांचे श्रेय मी मोहन साधूला देतो . त्याने मला आश्रमामध्ये गेल्यावर कसे वागावे , कसे बोलावे ,याचे जे प्रशिक्षण दिले होते त्याचीच ही फळे असावीत ! रात्री झोपायला जाताना रेवाप्रसाद सेन आवर्जून मला भेटायला आला . आणि पहाटे लवकर तुम्हाला भेटायला येतो असे सांगून निघून गेला . भल्या पहाटे उठून मी नर्मदा स्नान करून आलो . समोर प्रसिद्ध असा सरस्वती घाट आहे . आता निघायची तयारी करत होतो इतक्यात खरोखरच डॉ. सेन आला . त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे ! कारण बाई काल स्वतःविषयी जितके बोलल्या तितके त्या कधीच बोलत नाहीत ! स्वतःबद्दल ब्र देखील त्या काढत नाहीत . अगदी फोटो सुद्धा कोणाला घेऊ देत नाहीत . काल मी अगदी निरागसपणे आणि मनापासून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता देता त्यांनी त्यांच्या तीनही परिक्रमांचा पट अलगदपणे उलगडून सर्वांच्या समोर ठेवला . रेवा प्रसाद म्हणतो आहे त्यात तथ्य आहे हे मला आत्ता जाणवते आहे . कारण या लेखामध्ये टाकण्याकरता मी बाईंचा फोटो शोधतो आहे .तर त्यांच्याविषयी एक अवाक्षर देखील आंतरजालावर उपलब्ध नाही !फोटो तर फार लांबची गोष्ट ! तीन-तीन परिक्रमा करून स्वतः विषयी एक शब्द देखील माहिती कुठे मिळू नये याची काळजी घेणाऱ्या आणि तसे आयुष्य प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी निस्पृहता असणाऱ्या सिद्धन  बाईंसारख्या सिद्ध साध्वी कुठे आणि एकच परिक्रमा पूर्ण झाल्यावर (लोकाग्रहास्तव म्हणून तरी का होईना ) लागलीच ब्लॉग लिहायला घेणारा माझ्यासारखा नतद्रष्ट ,महामूर्ख कुठे ! नर्मदे काठी सारेच अगम्य आहे ! नर्मदे हर !


लेखांक चव्वेचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४५ :गरम पाण्याची झरिया , डोलोमाईटच्या खाणी आणि भीकमपूरचा सीनियर संगम

सिद्धन बाईंचा आश्रम सोडला आणि अतिशय अप्रतिम असा चार किलोमीटर लांबीचा जंगल मार्ग लागला . तुरळक खुरटी झाडी होती परंतु वन्य जीवन मुबलक असल्याच्या खुणा सगळीकडे दिसत होत्या . या वनामध्ये एक भयाण शांतता होती . सर्वत्र पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगड गोट्यांचा खच पडला होता . माती कमी आणि खडक जास्त असल्यामुळे झाडे फार उंच वाढत नव्हती . या भागात कोल्हे लांडगे खूप होते . त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत होत्या . हळूहळू मातीचा रंग पांढरा होत गेला . पायाखाली सापडणाऱ्या खड्यांचे दगड आणि दगडांचे खडक झाले . आजूबाजूला मोठमोठे खड्डे दिसू लागले . आणि इतक्यात एका प्रचंड स्फोटाने माझे कान हादरून गेले . मी चटकन खाली बसलो . एखाद्या भूसुरुंगाचा हा स्फोट होता . एरवी चित्रपटांमध्ये आपण असेच स्फोट पाहतो .परंतु खऱ्या आयुष्यात मी प्रथमच तो अनुभवत होतो . मी स्फोटाच्या दिशेने चालू लागलो . आणि अचानक समोर एक भव्य दिव्य संगमरवराची खाण आली . या खाणीमध्ये दगड काढण्याकरता असे स्फोट केले जातात . आता माझ्या लक्षात आले की मागे मी पाहिलेले मोठे खड्डे म्हणजे बंद पडलेल्या खाणी होत्या . नर्मदेचा काठ दिसत होता आणि पलीकडच्या काठावर एक फार मोठा विद्युत उपकेंद्र ( सबस्टेशन ) प्रकल्प दिसत होता. 
भेडाघाट पासून काठाकाठाने लागलेला निर्मनुष्य जंगल मार्ग .समोरच्या तटावरील भव्य हिरापूर बांदा विद्युत उपकेंद प्रकल्प . झाडीच्या मधोमध लालपूरचा आश्रम .
या खाणींविषयी माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली . परंतु आत मध्ये खोल यंत्रे उतरलेली होती आणि मला खाली उतरणे शक्य नव्हते . त्यामुळे मी पुढे मार्गस्थ झालो . आता जंगलामध्ये लालपुर नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये असलेली एक साधू कुटी दिसू लागली . इथे एक हात लुळा असलेला जटाधारी साधू दिगंबर अवस्थेमध्ये फिरत होता . तोच आश्रमाची सर्व व्यवस्था पाहत असे . आश्रम छोटासा परंतु नीटनेटका होता .राम मंदिर हनुमान मंदिर अशी स्थाने होती . इथून जवळच गरम पाण्याचा एक झरा आहे असे मला साधूने सांगितले . याला सिद्ध झरिया असे म्हणतात . 
लालपुर चा आश्रम
 जबलपूर जिल्ह्यातला लालपूर आश्रम नागा साधूंचा आहे
ओम संत रेवा आश्रम लघु गिरनार लालपुर जिल्हा जबलपूर . कवडीलाल राय आश्रमाचे संचालक आहेत . 
इथेच सामान ठेवून मी आश्रम परिसर पाहून घेतला
आश्रमामध्ये नित्य धुना होता आणि इथे नागा साधू नित्य येत जात असतात .
आश्रमातील हनुमान चौथरा
आश्रमातील एक शिव मंदिर . या परिसरामध्ये संगमरवर मुबलक उपलब्ध असल्यामुळे जलहरी , मूर्ती तसेच फरशीसाठी सर्वत्र संगमरवर वापरलेला आढळून येतो . जयपुर किंवा राजस्थान मध्ये सापडणाऱ्या संगमरवरापेक्षा हा थोडासा हलक्या दर्जाचा असतो
आश्रमामध्ये सामान ठेवून गरम पाण्याच्या झर्‍यावर अंघोळ करून येण्याचे मी ठरविले . समोर उताराची एक वाट जंगलामध्ये जात होती तिने चालत झरा गाठला . अतिशय शुद्ध नितळ अशा पाण्याचा छोटासा झरा तिथे होता . पाणी खरोखरच गरम होते . विशेषतः सकाळची थंडी पडलेली असल्यामुळे ते पाणी अधिकच गरम वाटत होते . त्या पाण्याने झर्‍याच्या बाजूला बसून मनसोक्त आंघोळ केली . इतक्यात तिथे एक तरुण परिक्रमावासी आला . हा रात्री आश्रमामध्ये मुक्कामी थांबला होता .याचे नाव योगेश राऊत होते आणि तो जालन्याचा होता . त्यानेही स्नान केले . दोघे पुन्हा आश्रमामध्ये आलो . साधूने गरमागरम काळा चहा पाजला . योगेश २७ वर्षाचा होता . परिक्रमेमध्ये आल्यावर शक्यतो तंबाखू , गुटखा ,बिडी ,सिगरेट इत्यादी व्यसने कायमची सोडणारे अनेक जण मला भेटले होते . परंतु या पठ्याने मात्र मुळात निर्व्यसनी असून इथे येऊन बिडी व गांजा ओढायची विद्या आत्मसात केली होती . त्याबाबत मी त्याचे प्रबोधन करण्याचा तोकडा प्रयत्न करून पाहिला . परंतु त्याला इतकी जबरदस्त तलफ यायची की विचारू नका . मुळात तुम्हाला व्यसनाच्या नादाला लावणारे लोक तुम्ही नवीन असल्यावर तुमची फार काळजी घेतात तसेच सर्वत्र याचे होत होते . जे म्हणाल ते मिळते आहे म्हटल्यावर हा पठ्ठ्या तरी कशाला शांत राहतो ! बाकी तो युवक मनाने खूप चांगला होता . त्याचे वय इतके अल्लड होते की काहीतरी वेगळे करून पाहायची उर्मी शांत बसू देत नव्हती . मुळात साधू गांजा का पितात हे आपण समजून घेतले पाहिजे . गांजा हे एक असे आयुर्वेदिक औषधी द्रव्य आहे जे तुमच्या मेंदूकडे जाणाऱ्या सर्व संवेदना क्षीण करते . साधूंचे जीवन मुळातच खूप कठीण आहे . त्यामुळे चालल्यामुळे होणारे श्रम ,पायांचे दुखणे , शरीर अवघडणे , तहानभूक या सर्व संवेदना मेंदूकडे अत्यंत क्षीण होऊन जातात . आणि त्यामुळे साधूची वृत्ती सदैव शांत राहण्यास मदत होते . प्रथमच गांजा ओढणाऱ्या माणसाला हे खूप भारी वाटते ! त्याला असे वाटू लागते की माझे सर्व शरीर हलके झाले आहे . माझ्या सर्व वेदना नाहीशा झाल्या आहेत ! मला खूप शांत शांत वाटते आहे ! या भावना साधनेतून अथवा ध्यानावस्थेतून आणता येऊ शकतात .परंतु गांजाच्या सेवनाने आयत्याच मिळतात त्यामुळे माणसाला छान वाटू लागते . गांजा ओढून साधू इकडे तिकडे न फिरता शांत एका जागी बसून भजन करत असतात . तासंतास एका जागी बसून ते ध्यानधारणा साधना करतात . त्यामुळे त्यांनी गांजा ओढणे हा एक वेगळा विषय आहे .साधू गांजा शोधण्यासाठी कुठे लांब जात नाहीत तर त्यांच्या आश्रमाच्या भोवतीच एखादे झाड लावून ठेवलेले असते . शक्यतो झेंडूची खूप झाडे दिसली की नीट पाहायचे त्यामध्ये एखादे गांजाचे एखादे झाड लपवलेले असते . कारण दोघांची पाने सारखीच दिसतात . हे सर्व साधूने करणे खरोखरीच क्षम्य आहे .परंतु संसारी पुरुषांनी त्याच्या नादाला लागणे याच्यासारखे घातक काही नाही . कारण गांजा अगदी तुमच्या पुनरुत्पादक क्षमतेवर देखील परिणाम करतो . अनेक साधूंनी मला सांगितले की गांजा ओढल्यावर काम वासना पूर्णपणे नष्ट होऊन जाते . हे साधूसाठी सर्वोत्तम आहे . परंतु गृहस्थी माणसासाठी याहून घातक काय असेल ? हे सर्व योगेश ला समजावून सांगितले आणि मी त्याला नर्मदे हर केले . जाताना नागा साधूने मला माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला . इच्छुकांनी कवडीलाल राय यांच्याशी संपर्क अवश्य करावा . परिक्रमावासींची अतिशय विषम परिस्थितीमध्ये असूनही येथे सोय केली जाते .
इथून पुढे पुन्हा एकदा निर्मनुष्य टापू सुरू झाला .पुन्हा एकदा कानावर स्फोटांचे आवाज आणि मोठमोठ्या यंत्रांचे आवाज पडू लागले . इथून पुढे नर्मदे काठी संगमरवरी दगडाच्या खूप खाणी आहेत .
नर्मदे काठी आढळणाऱ्या संगमरवरी दगडाच्या खाणी लाल दर्शकाने दाखवल्या आहेत

 नशिबाने इथे उत्खनन करण्याचे कंत्राट मिळालेला मुख्य मनुष्यच मला तिथे भेटला आणि त्याने मला सर्व माहिती दिली . खरे तर हा हलक्या प्रतीचा संगमरवर असून याला डोलोमाईट असे म्हणतात . ६० टक्के कॅल्शियम कार्बोनेट आणि ४० टक्के मॅग्नेशियम कार्बोनेट असलेला हा खडक . याचा बांधकामासाठी फारसा उपयोग होत नाही . मोठमोठे स्फोट करून खडक जमिनीपासून वेगळा केला जातो त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून जवळच्या पावडर फॅक्टरी मध्ये हे दगड नेले जातात ४२५ रुपये टन असा त्याचा भाव त्यावेळी तरी होता .हीच पावडर पुढे पावडर पासून संगमरवरी दिसणाऱ्या मूर्ती करणारे लोक किंवा फेस पावडर बनवणाऱ्या कंपन्या वापरतात .  याच माणसाने खाणीपाशी माझे काही फोटो देखील काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . 
लालपुर गावाजवळची डोलोमाईटची खाण
"फेस पावडर " च्या खाणीपाशी उभा प्रस्तुत लेखक !
विविध टालकम पावडर कंपन्यांच्या घटक पदार्थांमध्ये पिवळ्या रंगाने अभिरंजीत केलेले घटक पदार्थ वाचावेत
कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट मिळून बनतो नर्मदा काठावरचा डोलोमाईट दगड
त्यामुळे इथून पुढे तुम्ही कुठल्याही कंपनीची फेस पावडर लावाल तेव्हा शक्यता आहे की तुम्ही नर्मदा काठची माती आपल्या गालावर चोळत आहात !
 ४२५ रुपये प्रति १००० किलो भावाने खरेदी करून तुम्हाला तीच फेस पावडर विकताना कॉस्मेटिक कंपन्या किती नफेखोरी करतात याचा अंदाज घ्या माता-भगिनींनो ! 
(आजकाल तरुणांसाठी देखील तथाकथित सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात मिळत आहेत . आणि युवक त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत . त्यामुळेच अशा सर्व तरुणांना सांगू इच्छितो , मी उभ्या आयुष्यात कधीही तोंडाला पावडर फासलेली नाही याचे समाधान आहे ! चेहेऱ्या वरचे तेज आत खोलवर लागलेल्या ध्येयाच्या आगीतून प्राप्त होत असते . असो)  हा खडक खरोखरीच अतिशय मऊ होता आणि अगदी हाताने सुद्धा याचा चुरा होत होता . या संदर्भातील एक कथा समोरच्या तटावर आल्यावर एका साधूने मला सांगितली . नर्मदेला आडवा आलेला हा पहाड तिच्या विनंतीवरून नरम झाला आणि तिला मार्ग करून देता झाला अशी ती कथा आहे . इथून पुढे बगरई नावाचे एक गाव लागले . बगरई गावामध्ये संगमरवरा पासून मूर्ती करणारे अनेक कारागीर राहतात .या मूर्ती फार काही सुबक रेखीव नसतात परंतु तरीदेखील जवळपासच्या खेड्यातील लोक त्या खरेदी करतात . या परिसरातील बहुतांश मंदिरांमध्ये मला याच गावातील लोकांच्या मूर्ती आढळल्या . विशेषतः नर्मदे मध्ये मिळणारी जी विविध शिवलिंगे आहेत त्याखाली ठेवण्याच्या जलहरी इथे उत्तम बनवितात . इथे चालता चालता एका घरातून मला आवाज दिला आणि चहा पिण्यासाठी आत बोलावले . हे घर देखील एका मूर्तिकाराचे होते आणि आश्चर्य म्हणजे घरातील सर्व मराठीमध्ये बोलताना दिसले ! वरील घरातील सर्व मूर्तिकार बहुतांश वेळ मूर्ती कामासाठी महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये राहत होते . त्यामुळे त्या सर्वांना मराठी चांगली येत होती . किसन बर्मन असे त्या मूर्तिकाराचे नाव होते व त्याची मुले देखील उत्तम मूर्तिकार होती . ज्यांना कुणाला मंदिर बनवायचे असेल त्यांना मी मूर्ती कलेमध्ये आणि कोरीव कामांमध्ये सहाय्य करू शकतो असे त्यांनी सांगितल्यामुळे त्याच्या क्रमांकासोबत मी एक फोटो त्याच्या मुलाला काढायला लावला आणि माझ्या मंदिर बांधकामाची आवड असलेल्या मित्राला पाठवून देवविला . 
इच्छुकांनी मूर्तिकला किंवा मंदिर निर्माण किंवा कोरीव काम यासाठी वरील क्रमांकावर अवश्य संपर्क करावा .अत्यंत विषम परिस्थितीमध्ये राहून या मूर्तिकारांनी आपली कला जिवंत ठेवलेली आहे .
बगरईच्या मूर्तिकाराने बनविलेली नर्मदा मातेची मूर्ती .
बगरईच्या मूर्तिकाराने बनवलेली गोमाता
विशेषतः आपल्या गावातील शिवलिंगासाठी जलहरी हवी असेल तर इथल्या दगडापासून ती चांगली बनते . असो . या बर्मन कुटुंबीयांचे एक गुरु आहेत असे त्यांनी मला सांगितले . त्यांचा पुढे आश्रम असून त्यांचे दर्शन अवश्य घ्या असे देखील सांगितले . यांना मौनी बाबा असे म्हणत . कधीकाळी कोणी मौनव्रत केले असले तर त्या साधूला आयुष्यभर मौनी बाबा असे नाव पडते . सध्या ते बोलत असतात परंतु आपल्याला प्रश्न पडतो की बोलतात मग मौनी बाबा कसे ? अशा शंकांचे निरसन मी थेट त्या साधूला विचारूनच करत असे . त्यामुळे मनात शंका राहत नाहीत . बर्मन कुटुंबीयांची रजा घेऊन मी पुढे निघालो आणि साधारण झाडीझुडपातून जाणाऱ्या एका रस्त्यात समोरून तेच मौनी बाबा मोटरसायकलवर आले ! थांबून त्यांनी मला नर्मदे हर केले . ते तिलवारा घाटावर काही कामानिमित्त निघाले होते . परंतु पुढे त्यांचा आश्रम असून तिथे जाऊन भोजन प्रसाद अवश्य घेण्याची विनंती त्यांनी मला केली . सकाळी निघतानाच ते स्वयंपाक करून निघाले होते . त्यांना नर्मदा माता आतून प्रेरणा देत असते की आज अमुक अमुक लोकांचा स्वयंपाक कर . आज त्यांच्या आश्रमामध्ये कोणीच मुक्कामाला नसल्यामुळे ते स्वतःपुरता स्वयंपाक करणार होते परंतु नर्मदा मातेने अजून एक दोन जणांचा स्वयंपाक करण्याची सूचना त्यांना केली . त्यामुळे मला बघताच त्यांना खूप आनंद झाला . मी किसन बर्मनला भेटून आलो हे सांगितल्यावर त्यांना अजून बरे वाटले .तो त्यांचा अतिशय लाडका शिष्य होता . आणि मी जंगलातील आणि किनाऱ्याच्या मार्गाने चालतो आहे हे ऐकून देखील त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले ! पुढे बराच वेळ चालल्यावर त्यांचा आश्रम लागला . आश्रम एका टेकडावर होता . छोट्याच जागेमध्ये बऱ्यापैकी बांधकाम केले होते . अलीकडेच त्यांनी परिक्रमावासींच्या निवासाची मोठी सोय केली आहे असे गुगल नकाशावर पाहिल्यावर माझ्या लक्षात आले .
आश्रमामध्ये एक माताराम सेवेकरी होती . तिने भोजन प्रसादी संपली आहे असे मला सांगितले . शक्यतो गरीब सेवेकरी महिला आश्रमातील उरलेसुरले अन्न घरी नेऊन आपल्या मुलाबाळांना खाऊ घालतात .त्यामुळे त्यांचे असे सांगणे समजून घेण्यासारखे आहे .परंतु मी जेव्हा तिला सांगितले की सकाळी तिलवारा घाटावर जाण्याच्या आधी मौनी बाबांनी स्वतः दोन लोकांचा अधिकचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे ,तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले ! अशाच ठिकाणी चमत्काराचा जन्म होतो ! तिला मनोमन असे वाटले की मी कोणी चमत्कारी साधू आहे . परंतु लगेचच तिला मी मध्ये मला बाबा कसे भेटले वगैरे सर्व प्रसंग सांगितला आणि तिने भोजनासाठी बसण्याची विनंती केली . इतक्यात योगेश देखील तिथे आला .एका माणसाचा स्वयंपाक होता . आम्ही दोघांनी मिळून दोन टिक्कड आणि चटणी खाल्ली . माझ्याकडे थोडासा गुळ होता तो देखील मी त्याला टिक्कड सोबत खाण्यासाठी दिला .
 आश्रमाचे काही फोटो आपल्याकरिता देत आहे . 
मौनी बाबा आश्रम
इथेच बसून आम्ही भोजन प्रसाद घेतला .आणि आम्हाला वाढणारी हीच ती माताराम . डावीकडे भगव्या रंगात कॅमाफ्लाज  झालेले मौनी बाबा दिसत आहेत !
इथे आम्ही आमचे सामान ठेवले होते .
आश्रमामध्ये सदावर्त / सदाव्रत देखील दिले जाते . आपण स्वतः स्वयंपाक करून घेऊ शकतो .
परिक्रमावासींसाठी केलेली नवीन निवास व्यवस्था .
हेच ते संत कैलास भारती जी अथवा मौनी बाबा
वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मातारामने दिला
पुढे कुठेही जवळपास आश्रम नव्हता . त्यामुळे खूप चालायचे आहे हे लक्षात आल्यामुळे विश्रांती न घेता मी तेथून नर्मदे हर केले .
मी आज ज्या भागातून चाललो त्या भागाचा नकाशा आपल्या करता देत आहे
दुपारच्या भोजनापर्यंतची चाल हिरव्या रंगाने दाखवली आहे . आणि संध्याकाळच्या मुक्कामापर्यंतचे चालणे लाल रंगाने दाखविले आहे . यावरून मी किती गतीने आणि कसे चाललो असेल याचा तुम्हाला अंदाज यावा . हे सर्व अंतर किमान २५ किलोमीटर आहेच .
थोडे अंतर गेलो आणि ग्रामस्थांनी सांगितले की इथे मध्ये एक रामकुंड आहे ते ओलांडायचे नसते . कारण त्या कुंडामध्ये नर्मदेचा वास आहे . त्यामुळे पुन्हा थोडे अंतर उलटे आलो आणि जंगलामध्ये असलेल्या रामकुंडापाशी पोहोचलो . इथेच स्नानाचे फार महत्त्व आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त स्नान केले ! सकाळी नर्मदेमध्ये केलेले एक स्नान !त्यानंतर गरम पाण्याच्या झऱ्यावर दुसरे स्नान !आता हे तिसरे स्नान ! अशा पद्धतीने परिक्रमेमध्ये अनेक स्नाने घडत असतात . सरासरी चार स्नाने सहज घडतात ! कारण मला नर्मदेचे जे रूप आवडायचे अशा एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी मी आनंदाने पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करून घेत असे ! स्नानाचा एक फायदा असा असतो की तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटते आणि पुढे चालण्यासाठी खूप जास्ती शक्ती ऊर्जा मिळते ! उपाशीपोटी किंवा कमी खाल्लेले असताना देखील चालणे अधिक होते . आज स्नानही घडले होते आणि एकच टिक्कड खाल्लेला असल्यामुळे पोट देखील रिकामे होते . त्यामुळे आज नर्मदेचा किनारा पकडून भरपूर चालायचे असा संकल्प केला ! पायांनी गती घेतली आणि नर्मदा जलाशी स्पर्धा करत पुढचा मार्ग पकडला ! या भागात अतिशय समृद्ध पक्षी जीवन आहे . मैय्याचे येथील रूप नितांत सुंदर आहे !भव्य पात्र ! पात्रामध्ये रेती ,माती , कधी दगड गोटे ! आता तर संगमरवराचे शंकर अर्थात शिवलिंग देखील सापडू लागले ! हिरवे , केशरी , काळे , पांढरे , रंगीबेरंगी , चमकदार धातूचे , अभ्रकाचे असे शेकडो पाषाण ! सर्व टोकविरहित , गुळगुळीत ! भेडाघाटातून वाहून आणलेला चुना वाळूमध्ये कालविला जाऊन नैसर्गिक रित्या सिमेंट तयार व्हायचे आणि त्यापासून या दगड गोट्यांचे मोठमोठे स्लॅब जणूकाही नर्मदा मैयाने बनविले होते ! हेच स्लॅब पाच ते दहा फूट रुंदीचे असायचे ! अनेक वर्षांपासून पात्रामध्ये पडून ते तिरके तारके झालेले असायचे . याच्यामध्ये देखील असंख्य जुने आकर्षक दगड गोटे सापडायचे .परंतु ते काढता येणे कठीण होते कारण खरोखरच खूप टणक सिमेंट तयार झालेले होते . अशा स्लॅब वरून चालताना अक्षरशः सिमेंटच्या स्लॅब वरून चालतो आहोत असे वाटायचे . महापुरामध्ये वाहत येऊन आडवे तिडवे एकमेकांवर चढलेले स्लॅब पाहून नदीच्या ताकदीची कल्पना यायची !
या चित्रांमध्ये नीट पाहिले असता मी वरती वर्णन केलेले मोठे मोठे स्लॅब पात्रात आडवे-तीडवे पडलेले दिसत आहेत .
 कधी लाल भडक पाषाण व त्याला मैयाने पाडलेली असंख्य छिद्रे ! त्यात छोटे छोटे गोटे वर्षानुवर्षे फिरून तयार झालेले रांजणखळगे ! मैया कधी शांत तर कधी कृद्ध ! काठावरती हिरवीगार शेते !सर्वत्र मजाच मजा ! आनंदी आनंद ! 
या भागातील उंच सखल शेती
नर्मदेचे या भागातील एक रुप
वाटेत लागलेला एक आश्रम व त्याच्या आवारातील भव्य वृक्ष

आश्रमातील मंदिर परिसर
वाटेतील अजून एक आश्रम
आश्रमातील भव्य वटवृक्ष

सिद्ध कुटी, घुघरा , मूरकटिया , धरती कछार , भडपुरा अशी गावे ओलांडत भिकमपूरच्या अटरिया नावाच्या भागात पोहोचायचे माझे नियोजन होते .वाटेमध्ये मनुष्यवस्तीमध्ये दिसणारे कोंबडे नर्मदे हर आवाज द्यायचे हे तुम्हाला मागे देखील मी सांगितले आहे ! इथे एक अजून वेगळाच गडी त्यात सामील झाला ! रामकुंडा जवळ कस्तुरी नावाची एक पोपटीण पाळलेली होती . जी नर्मदे हर म्हण म्हटले की नर्मदे हर म्हणायची ! अगदी सुस्पष्ट ऐकू येईल असे तिचे उच्चार होते ! नर्मदे हर म्हणायची ,राम राम म्हणायची !
सुदैवाने कस्तुरीचा एक व्हिडिओ मला युट्युब वर सापडला ! अन्यथा काही अतिचिकित्सक वाचकांना ही वल्गना वाटली असती ! 


धरती कछार गावा पाशी एका साधू कुटीमध्ये चहा बनवून पिलो .पुन्हा तिथे स्थानिक गांजा प्रेमी जमल्यावर हळूच काढता पाय घेतला .अन्यथा साधू मला तिथेच राहा असे म्हणत होता . व ती जागा अतिशय जबरदस्त होती . मैयाच्या काठावरील एका उंच पर्वताचे ते टोक होते आणि समोर मोर कटीसारखी वळलेली नितांत सुंदर नर्मदा मैया दिसत होती ! त्यामुळे या गावाला मूरकटिया असे नाव होते ! साधूने मला सांगितले की इथे नर्मदा माता मोरा च्या कटी सारखी दिसते म्हणून या गावाचे नाव मोरकटी पडलेले आहे . मी नकाशामध्ये मोराच्या आकाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता मला खालील दोन आकार आढळले . आपल्या माहिती करता देत आहे .
मुरकटिया येथील नर्मदा मैया . आधी आपण मोराचा आकार शोधून पहा .न सापडल्यास मला सापडलेला आकार खाली पहा ! 
दिसतो आहे का मोर ?
मोराची कंबर अतिशय नाजूक असते . त्यामुळे चालताना ती खूप झोकदार दिसते . तशी नर्मदा माता इथे वाहते ,म्हणून या गावाचे नाव मोरकटी पडलेले आहे . अपभ्रंश होऊन लोक आता त्याला मुरकुटिया म्हणतात . 

असाही एक मोराचा चेहरा कोणाला दिसू शकतो . परंतु नर्मदे काठी तिच्या दृश्य रुपावरून पडलेली नावे अधिक आहेत हे मात्र खरे . त्रिशूल भेद ,सहस्र धारा ,दूध धारा ,धुवाधार ,नीलकुंड ही त्याची काही उदाहरणे
आपल्या देशातील कुठल्याही गावाचे नाव विनाकारण ठेवलेले नाही हे आपल्याला यावरून लक्षात येते . प्रत्येक नावाला आडनावाला काही ना काही इतिहास असतो . मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना आम्हाला एक प्राध्यापक होते जे नामावादी होते . म्हणजे ते आडनाव न वापरता केवळ स्वतःचे नाव आईचे नाव आणि वडिलांचे नाव असे लिहीत असत . त्यांच्या मते आडनाव लिहिणे म्हणजे जातीयता होती . परंतु वरील पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक आडनावाला काहीतरी इतिहास असतो . तो आपल्याला आडनावावरून निश्चितपणे कळतो . विशेषतः महाराष्ट्राने सदैव आपल्या देशाचे अखंडत्व टिकवण्याकरता अनेक लढाया केलेल्या असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश आडनावे ही युद्धासंबंधी असतात असे आपल्याला लक्षात येते . बारसोडे ,डोईफोडे , खानझोडे , वाघमारे , भालेराव , सरनाईक अशी शेकडो उदाहरणे देता येतील . वरील उदाहरण पाहता मला मुरकुटे या आडनावाचे उत्पत्ती स्थान मोर कटी या शब्दा मध्ये आहे की काय असे वाटते . असो . पुढे काठाकाठाने चालत राहिलो . या भागातील नर्मदेची सुंदर रूपे नजरेत साठवून घेत राहिलो . मध्ये एक छोटासा पूल देखील लागला . मालकछार नावाचे हे गाव होते .
मालकछारचा पूल
पुलावरून दिसणारे नर्मदेचे विहंगमदृश्य आणि परिक्रमा मार्ग
पुलाचा कठडा व त्यावर ग्रामस्थांनी लावलेली नर्मदेची प्रतिमा
 मालकछार पुलाच्या कठड्यावरून उड्या मारून काही मुले पोहत होती . (संग्रहित छायाचित्र )
मालकछार पुल . नर्मदेवर असे शेकडो पूल आहेत .
बरेच अंतर गेल्यावर दूरवर कुठेतरी नर्मदा पुराण सुरू होते त्याचा आवाज ऐकू येऊ लागला . त्या आवाजाचा वेध घेत पुढे पुढे चालू लागलो . बऱ्यापैकी पायपीट केल्यावर भीकमपुर नावाच्या गावामध्ये पोहोचलो . इथे सनैर , सनीयर किंवा सीनियर नावाची नदी नर्मदार्पण होते . आज खूपच चालणे झाले होते . त्यामुळे मुक्कामाचे ठिकाण सापडले रे सापडले की पाठ टेकायची असे ठरवून चालत होतो . परंतु इकडे मात्र सारा गाव कथा ऐकण्यासाठी जमला होता ! त्यामुळे पाठ टेकणे वगैरे राहिले बाजूला , सर्वांसोबत मंडपामध्ये बसून कथा ऐकू लागलो . कथा सुरू असताना कोणी परिक्रमावासी आला तर त्याला कथावाचक व्यासपीठावरूनच नमस्कार करतात . अशी पद्धत इथे सर्वत्र आढळते आणि याचा मी खूप वेळा अनुभव घेतला . कथाकार या प्रकाराला शुभ शकुन मानतात . परिक्रमावासी फक्त एक वाहक असतो परंतु त्याच्या पाठीवर नर्मदा मैया असते त्यामुळे त्याच्या रूपाने साक्षात नर्मदा मैया कथा ऐकायला आली असे मानले जाते . लवकरच नर्मदा जयंती साजरी होणार होती त्या निमित्ताने ही आठवड्याभराची कथा चालली होती . मी मंडपामध्ये येताच सर्व ग्रामस्थांनी मिळून जोरदार आवाजात नर्मदेचा जयजयकार केला . गावातील तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी लगेच गर्दीतून वाट करत मला पहिल्या रांगेत आणून बसविले . गावातील लहान मुले मोठ्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहू लागली . शहरातली मुले जसे कार्टून बघतात तशाच त्यांच्या नजरा मला वाटल्या ! तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी लहान मुले तऱ्हे तऱ्हेच्या माकड चेष्टा करतात ! कथा वाचकांनी एक पायरी पुढे जात मला व्यासपीठावर आमंत्रित केले . मी देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन वर जाऊन एका कोपऱ्यात बसलो . कथा उत्तम सुरू होती . कथाकार चांगले विद्वान होते . त्यांचा मूळ संस्कृत संहितेचा अभ्यास चांगला होता .  कथा संपल्यावर खाली एक छोटीशी खोली होती तिकडे कथा वाचकांसाठी विशेष नाष्टा ठेवला होता . तिथे ते स्वतः मला घेऊन गेले . खोलीमध्ये बसल्या बसल्या आमची शास्त्र चर्चा सुरू झाली . कथावाचक ब्राह्मण समाजाचे होते हे त्यांनीच मला आधी सांगून टाकले . तसेच ते कुठल्याही जातीपातीच्या लोकांनी कथा ठेवली तर आवर्जून जातात आणि कथा करतात हे देखील त्यांनी मला सांगितले . त्यांच्या ठायी प्रचंड विद्वत्ता असून देखील पराकोटीची नम्रता होती ती मला फार भावली . तिथे एका कोपऱ्यामध्ये काही माताराम रात्रीचा स्वयंपाक करत होत्या . बाहेर सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक सुरू होता . तर आत मध्ये केवळ कथा वाचकांसाठी बिन कांदा लसणाचा स्वयंपाक सुरू होता .त्यांनी माझ्यासाठी देखील त्यांच्यासोबत भोजन बनवण्याची विनंती केली . गावातील मोजकी प्रतिष्ठित मंडळी त्या खोलीमध्ये येऊन गप्पा मारत बसली होती . खोली साधीच होती त्यात प्रचंड पसारा पडला होता आणि खाली गाद्या अंथरलेल्या होत्या. पाय दुखत असल्यामुळे मी वज्रासन घालून बसलो होतो . कथा वाचकांचा भाचा त्यांनी सोबत आणला होता जो संस्कृत संहिता वाचून दाखवायचा .एका कार्यकर्त्याने तिथे आमचा फोटो काढला आणि माझा मोबाईल नंबर विचारला . माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिला .
डावीकडून कथावाचक ज्यांना या भागामध्ये कथा व्यास असे म्हणतात , मध्ये प्रस्तुत लेखक ,उजव्या हाताला कथाव्यासांचा भाचा .
कथाकारांनी पायी नर्मदा परिक्रमा करणेची इच्छा व्यक्त केली . 
अंधारी खोली , अपुरा उजेड आणि सर्वसाधारण कॅमेरा असला तरी कथाकारांचा नर्मदे प्रती असलेला भाव या तीनही चित्रातून लक्षात येईल .
पुरी भाजी चे उत्तम भोजन झाले . सोबत खीर देखील वाढली गेली . कथाकार अतिशय अल्प भोजन घेत असत . मला मात्र भरपूर चालल्यामुळे चांगली भूक लागत असे . मी खाताना संकोच करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आग्रहाने पोटभर खाऊ घातले . तृप्त अंत:करणाने नित्याप्रमाणे "अन्नदाता सुखी भव । " असा आशीर्वाद देत उठलो आणि व्यासपीठाकडे गेलो . तिथले दृश्य पाहून काय बोलावे तेच कळेना ! इतका वेळ तल्लीन होऊन नर्मदा पुराण ऐकणारा तो सर्व समुदाय चित्रपटातील धांगडधिंगा गाणी लाऊन डीजे लावल्याप्रमाणे नाचत होता ! त्यात मुले व स्त्रिया देखील मागे नव्हते हे विशेष ! मी आलो आहे हे पाहिल्यावर मुले अजूनच चेकाळली . माझ्या पुढे येऊन लोळून वगैरे नाचू लागली . त्यांचे ते चाळे पाहून गावातील मोठी मंडळी येऊन त्यांना बदडू लागली ! एकंदरीत या सगळ्याच प्रकाराला एक वास येत होता ! होय यातील बहुतांश लोक दारू पिलेले होते ! खेड्या पाड्या मध्ये आजही सार्वजनिक उत्सव म्हणजे हमखास मदीरा पिऊन तिथे जायचे अशी प्रथा या भागात दिसते . १५ - १६ वर्षाच्या वयाच्या पुढील मुलांनी देखील चोरून ढोसली आहे हे लक्षात येत होते . हा सर्व प्रकार बघणे असह्य झाल्यामुळे मी तिथून माझे सामान उचलले .इतक्यात एक बारीक साधू वजा दिसणारा मनुष्य धावत माझ्या दिशेने आला . याने कमरेला अर्धी लुंगी गुंडाळली होती आणि दाढी वाढवलेली होती . याच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होते . रंग गोरापान होता . त्याने मला मागच्या बाजूला असलेल्या धर्म शाळेमध्ये राहण्याची विनंती केली . ही धर्मशाळा ब्रिटिशांच्या काळात १९०४ साली बांधलेली एक मजबूत इमारत होती . आकार अतिशय छोटा होता परंतु बांधकाम फारच सुबक होते .इथे एक शिलालेख देखील होता . संपूर्ण चुना आणि दगडांमध्ये बांधकाम होते . मुख्य म्हणजे बाहेर प्रचंड थंडी असून आत मध्ये चांगली ऊब होती . आत मध्ये जेमतेम एक माणूस झोपेल इतकी रुंदी आणि दहा माणसे झोपतील इतकी लांबी होती . भिंती चांगल्या चार चार फूट जाडीच्या होत्या .
माझ्या एक दिवस आधी याच धर्म शाळेमध्ये राहिलेल्या परिक्रमावासी ने काढलेले प्रकाशचित्र
 आत मध्ये बाहेरील आवाज खूप कमी ऐकू येत होता . एका कोपऱ्यामध्ये आसन लावून मी माझे पूजन आटोपून घेतले आणि झोपण्याची तयारी करू लागलो . ज्याला सांगीतिक कान आहे अशा व्यक्तीला एक संगीत चालू असताना दुसरे काही गाता किंवा ऐकता येतच नाही ! तसे माझे झाले . मी पाठ टेकली मात्र सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली ! संगीत बंद करून आयोजकांनी माईक हातामध्ये घेतला आणि गोळा झालेल्या सर्व मुलांना घरी हाकलून दिले . माइक वर मोठ्या आवाजात " बाबाजी सो रहे है । सब अपने अपने घर जाओ । "  असे सांगण्यात येत होते ! प्रत्यक्षात मी झोपतो आहे याचे निमित्त करून त्या कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करायचा होता आणि पुढे त्यांचा वेगळा डाव रंगणार होता ! थोड्याच वेळात एका भव्य लाकडाच्या ओंडक्या भोवती शेकोटी करून सारे बसले आणि उखाळ्या पाखाळ्या करत सार्वजनिक सोमरसपान सुरु झाले . मी दमलेलो असल्यामुळे मला डोळा लागला .त्या रात्री एक मजाच झाली ! दहा-बारा तद्दन बेवडे लोक आत मध्ये आले . आणि मला उठवून म्हणाले महाराज आपली हरकत नसेल तर आम्ही इथे भजन करू का ? आता यांना अडवणारा मी कोण ? आणि त्यात मला भजनाची विशेष आवड आहे . त्यामुळे मी म्हणालो मी देखील तुमच्यासोबत भजन करतो . सगळी टोळी आत मध्ये आली आणि जोरदार भजन सुरू झाले . सर्वजण दारू आणि गांजाच्या नशेमध्ये तुन्न होते . यांच्यामध्ये तो मघाशी मला आत मध्ये आणून सोडलेला साधू तेवढा शुद्धीवर होता ! तारवटलेले डोळे , जड झालेल्या जीभा आणि त्यातच  रामायण भजन सुरू झाले ! हळूहळू त्यांच्यातील एक एक गडी आडवा पडत होता . बाकीचे जागे असल्याचा आव आणून तारेतच भजन करत होते . हा प्रकार पाहून माझी हसून हसून मुरकुटी वळली ! मी हसून हसून लोळतो आहे हे देखील त्यांना कळत नव्हते इतके सर्वजण तारेमध्ये होते ! मी सुरुवातीला ढोलक वाजवत होतो . परंतु पेटीवाला पेटीवरच पडल्यावर मी पेटी वाजवायला घेतली ! त्यानंतर ढोलक वाला ढोलकावर पडला ! मी आणि तो साधू वजा इसम खूप हसलो ! त्याचे नाव चेतराम मेहरा भगत असे होते . हा मनुष्य किती अवलिया होता हे मला त्या क्षणी नाही कळाले . पुढे या माणसावर स्वतंत्र प्रकरण येणार आहे ! अखेर रात्री दोन तीन वाजता सगळ्याच विकेट पडल्या ! मग मी देखील झोपलो . नित्याप्रमाणे पहाटे चार वाजता मला जाग आली . रात्रभर नाचून ग्रामस्थ मुले वगैरे सारे मंडपातच झोपी गेले होते . एक मोठा लाकडाचा ओंडका रात्रभर पेटत पडला होता त्याचा शेक घेत थोडावेळ मी बसलो . त्यातून भयानक उष्णता येत होती . मग पहाटे दोन्ही हात तुटलेले परंतु तसेच कोष्ठाला कातडी च्या आधारे लटकत ठेवून काम करणारा असा एक तरुण साधू परिक्रमावासी मला बोलवायला आला . तो धर्म शाळेच्या मागे राहत होता . त्याने माझ्यासाठी चहा केला होता . तो त्याचे हात अतिशय कौशल्यपूर्वक वापरत असे . मी हाताचे काही शस्त्र कर्म का करून घेतले नाही ? असे विचारल्यावर तो म्हणाला ,आपले भोग आहेत ते भोगून संपवायचे ! याला दोन्ही हात वर उचलता येत नव्हते कारण ते सांध्यातून निखळले होते . परंतु हाताला पकड मजबूत होती . एक हात गुडघ्याजवळ घेऊन त्याच्या साह्याने दुसरा हात उचलून त्याने तो तिसरी वस्तू ताब्यात घ्यायचा ! त्याचे ते कौशल्य  व शास्त्र वचननिष्ठा पाहून मी त्याला मनोमन साष्टांग नमस्कार केला ! उजाडता क्षणी धर्मशाळेचे टेकाड उतरायला सुरुवात केली . हा संपूर्ण वाळूचा टिला होता आणि तीव्र घसरडा उतार होता . तो धावतच उतरलो कारण सर्वत्र वाळूच वाळू होती त्यामुळे थांबताही येत नव्हते आणि पडण्याची भीती सुद्धा वाटत नव्हती . मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन वाहणारी सीनियर नावाची नदी खूप विस्तीर्ण पात्रासह वाहत होती . गुडघाभर पाण्यातून तिला पार केले आणि नर्मदेचा काठ धरला .
सैनीर अथवा सिनीयर नदी . इंग्रजी मधील सीनियर या शब्दाचा हिच्या नावाशी काही एक संबंध नाही . तशी ही सीनियर नदी नर्मदेला ज्युनियरच आहे ! 
सीनियर नदी भीकमपूर


लेखांक पंचेचाळीस समाप्त (क्रमशः )
 
 

लेखांक ४६ : गंगई चे शतायुषी धुरंधरदास महाराज ,मनोरम मुआर घाट आणि जबरेश्वराचा जबर अनुभव

नर्मदा सीनियर संगम पार करून काठाचा सुंदर पायमार्ग पकडला . थोड्याच वेळात रेल्वेचे दोन पूल लागले . एक जुना लोखंडी होता तर एक नवीन मनोऱ्यासारखा काँक्रीटचा होता . जबलपूरला येताना माझी रेल्वे याच पुलावरून आली होती . आणि परिक्रमेपूर्वीचे नर्मदा मातेचे पहिले दर्शन मला याच पुलावरून झाले होते . दोन्हीही पूल अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत 
जबलपूर जवळील रेल्वे चा जुना आणि नवा पूल
 पुला जवळ एका मंदिराचे अवशेष दिसतात
एका पुलावरून दिसणारा दुसरा पूल . नर्मदे वरून रेल्वेचे फारसे पूल गेलेले नाहीत .
हे संग्रहित फोटो पुलावरचे असले तरी मी दोन्ही पूल खालून पार केले
पुलावरून एखादी रेल्वे जाताना पहावी अशी इच्छा मनात आली ,आणि लगेचच एक पॅसेंजर गाडी धडधडत वरून निघून गेली . आपण रेल्वेमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्याला फार काही दिसत नाही . परंतु खालून पाहताना लक्षात येत होते की प्रत्येक खिडकी मधून माणसे नर्मदा मातेला नमस्कार करत होती ! पैसे फेकत होती , फुले फेकत होती !
पुलावरून जाणारी रेल्वे इतकी लहान दिसते !
 श्रद्धेची ताकद किती असते बघा ! तिथे खाली पाण्यात लोहचुंबक टाकून पैसे गोळा करणारी मुले दिसतात . परंतु आजवर कोणालाही डोक्यात वरून फेकलेले नाणे लागले आहे असे ऐकीवात नाही ! मी रेल्वेतून जेव्हा हा फुल पार केला तेव्हा नरसिंहपूर भिकमपूर अशी स्थानके लागली होती .आणि मग हा पूल आला होता . असो .  
आज मला समोरच्या तटावरून खूप सारे परिक्रमा वासी जाताना दिसले .सगळे मिळून ५० - ६० जण तरी असतील . यातील बहुतांश लोक पुढे कुठेतरी एकत्र मुक्काम करणार होते . 
 भीकमपुर येथील समोरच्या तटावरून चाललेला एक परिक्रमावासी . मागे शेतात काम करणारी माणसे आणि निघालेला परिक्रमावासी यांच्यातील फरक नजरेला तत्काळ कळतो .
आम्ही मात्र दोघेच जण होतो .मी आणि माझी नर्मदा मैया ! क्रमांक एक ची जोडी ! प्रथम दिवसापासून सतत सोबत !काय अप्रतिम ठिकाण निवडले होते नर्मदा मैयाने माझ्यासाठी !आणि ती वेळ तरी किती सुंदर ! नववर्ष आणि जबलपूर चा ग्वारी घाट ! ही क्रमांक दोन ची जोडी ! मला समोर जे लोक दिसत होते त्या सर्वांनी ओंकारेश्वर येथून परिक्रमा उचलली होती आणि इथून पुढे पलीकडच्या तटावर मला अशीच गर्दी दिसणार होती . सुरुवातीचे काही दिवस लोक खूप उत्साहाने नर्मदा परिक्रमा चालतात . नर्मदेचा समुद्र संगम अर्थात विमलेश्वर अथवा बमलेश्वर येथे पोहोचेपर्यंत मात्र बऱ्याच लोकांना याची काठिण्य पातळी लक्षात येते आणि ते हळूहळू गळू लागतात . परंतु तोपर्यंत असलेल्या आश्रमांना फार मोठ्या प्रमाणात परिक्रमावासींची सेवा करावी लागते . काही काही आश्रमांमध्ये तर हजार हजार परिक्रमावासी एका रात्री मुक्कामाला असतात . अडीचशे तीनशे हा आकडा तर अगदी सहज पार होतो . इतक्या लोकांना सेवा देताना थोडीफार गैरसोय होऊ शकते . तसेच स्वच्छतेचा प्रश्न देखील निर्माण होतो . त्यामुळे माझे असे स्पष्ट मत आहे की कुठल्याही एका अनवट घाटावरून तुमची परिक्रमा अशा वेळी सुरू करा ज्यावेळी तिथे कोणी नसेल . माझा जाईल तिथे यथोचित आदर सत्कार आणि स्वागत झाले याचे कारण बहुतांश वेळा मी एकटाच होतो . एका माणसाची सेवा करायला समोरच्या माणसाला फारसा ताण येत नाही . चार-पाच लोक असले की शक्यतो शिधा दिला जातो आणि करून खा म्हणून सांगितले जाते . परंतु एका माणसाचे जेवण कुठेही कसेही मिळू शकते . त्यामुळे बरेचदा मला गृहस्थी लोक जेवायला घरी घेऊन जात आणि मी मुक्कामाला आश्रमात असे . इथून पुढे बेलखेडी गाव लागते .या गावापासून पुढे अगदी समुद्र येईपर्यंत नर्मदेमध्ये बेसुमार वाळू उपसा चालतो . अगदी नारळाच्या करवंटीने पाटी पाटी वाळू काढणाऱ्यांपासून ते भले मोठे अजस्त्र आकाराचे जबडे असलेले जेसीबी लावून मोठमोठ्या हायवा किंवा डंपर मधून वाळू उपसणारे कंत्राटदार असोत . या सर्वांचा येथे सुळसुळाट दिसतो . असो .
आज मी खूप चाललो . कारण मैय्याचे विस्तीर्ण पात्र ,सखल गाळ प्रदेश व सुखद गारवा सारेच अनुकूल होते ! खूप आनंदी वातावरण होते ! माझे मन अतिशय शांत झालेले होते ! समोरच्या तटावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना मोठ्या आवाजात नर्मदे हर असा आवाज दिला की ते तिकडून पुन्हा नर्मदे हर म्हणत यातला आनंद घेत पुढे चाललो होतो . पुढे पुढे मात्र नर्मदे काठी केलेली शेती त्रासदायक ठरू लागली . पात्रापासून लांब शेती करणे वेगळे आणि अगदी नर्मदेच्या पाण्यामध्ये शेती करणे वेगळे . इथे काही शेतकऱ्यांनी अगदी नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने रोपे लावली होती . पुढे झाशी घाट दिसू लागला . इथे शेतकऱ्यांनी फुकट मिळते म्हणून २४ तास पाणी शेतात सोडून दिले होते . शेत भरून ते पाणी पुन्हा नदीत जात होते . परंतु त्यामुळे झालेल्या चिखलगाळामुळे चालताना खूप त्रास होत होता . कोणी आपल्या शेतातून जाऊ नये म्हणून मुद्दाम हे सर्व केले आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती होती . झाशी घाटाच्या अलीकडे एका शेतकऱ्याने मोठे तारेचे कुंपण घालून मार्ग अडवला होता . 
मी कसा बसा आत मध्ये शिरलो . परंतु समोर झाशी घाट दिसतो आहे आणि मध्ये मजबूत तारेचे कुंपण आडवे घातलेले आहे पाहून इतका वेळ शांततेने आणि आनंदाने चालणाऱ्या माझ्या रागाचा पारा क्षणात अनावर झाला . मला इतका राग कधी येत नाही . परंतु त्या दिवशी काय झाले माहिती नाही ! दुर्दैवाने तो शेतकरी समोर आला आणि मला म्हणू लागला "ये मेरी जमीन है ।तू बाहर निकल । " मेरी जमीन हा शब्द ऐकल्या ऐकल्या माझ्या तळपायाची आग मस्तकालाच गेली . आणि मी त्याला म्हणालो अरे ही नर्मदा मातेची जमीन आहे . आणि मी नर्मदा मातेचा मुलगा आहे . असेल हिम्मत तर अडवून दाखव . तुझ्या शेतातूनच जाणार ! आणि काही कळायच्या आत वेगाने पळत येऊन त्याने तार कुंपणासाठी गाडलेले जे सिमेंटचे खांब होते त्याला मी जोरात लाथ घातली . माझ्या लाथेने ओल्या मातीमध्ये गाडला गेलेला तो खांब तिरका झाला . त्यावर मी चढलो आणि तो खांब माझ्या वजनाने पूर्णपणे आडवा झाला . तो खांब आडवा झाल्याबरोबर बाकीचे सर्व खांब तिरके झाले . मी एक एक करून लाथा घालून सर्व खांब आडवे पाडले . अशा पद्धतीने नर्मदे काठी एक राजमार्ग तयार झाला ! माझा तो रुद्रावतार पाहून शेतकरी अक्षरशः पळून गेला ! घाटावर स्नान करणारे लोक हा प्रकार पाहत होते . तिथे उभा राहून मी ओरडू लागलो , "कान खोलकर सुनना सबलोक ।यह नर्मदा मैया की जमीन है । अपनी जगह सिर्फ शमशान मे है । मैया चाहे तो पुरी जमीन खा ले । "
झाशी घाटाजवळचे हेच ते शेत जिथे मी क्रोधाग्नी अनुभवला
 झाशी घाट चा पूल
 नर्मदेचे निवळ शंख पाणी आणि झाशीघाटचा पूल
 झाशी घाट
 झाशी घाटावर अशी वर्दळ नेहमी असते . इथे काही लोक भजी खात बसलेले मी पाहिले .पुढे त्याचा संदर्भ येईल .
मी पुढे चालू लागलो आणि माझी मलाच स्वतःची लाज वाटू लागली . मी असा कसा काय वागलो ? माझे मलाच कळेना ! षडविकारांवर विजय मिळवण्याकरता आपण नर्मदा परिक्रमा करतो आणि इथे तर माझा क्रोध हा विकार इतक्या मोठ्या प्रमाणात उफाळून आला ! की मी समोरच्या शेतकऱ्याचे नुकसान करून टाकले !  मला खूप वाईट वाटू लागले . आणि एक निवांत जागा बघून मी पाठ टेकून आकाशाकडे पाहत राहिलो . समोर वाहणाऱ्या नर्मदेला मी विचारले की असे कसे काय झाले ? त्यावर माझ्या मनामध्ये स्फूर्तीरूपाने तिने उत्तर दिले . हे उत्तर म्हणजे माझे स्वतःचे विचार नक्कीच नव्हते कारण मी खरोखर त्या अवस्थेमध्ये नव्हतो . तो शेतकरी बरेच दिवस येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना त्रास देत होता . माझी जागा आहे ,माझी जमीन आहे ,असे सांगून तिथून लोकांना परत उलटे पाठवायचा . त्याला आज ना उद्या कुठल्यातरी रूपाने धडा शिकवण्याची नर्मदा मातेची इच्छा होती . नर्मदे काठी जे काही घडते ती तिची इच्छा असते . मी वरती लिहिले आहे त्याप्रमाणे माझा अतिशय आनंदी आणि शांत भाव त्यादिवशी होता . त्याचे क्षणात क्रोधामध्ये रूपांतर होणे अशक्य होते . परंतु नर्मदा मातेला कदाचित त्या माणसाला धडा शिकवायचा होता म्हणून तिने माझा वापर करून घेतला . नाहीतर लोकांच्या समोर उभा राहून अधिकार वाणीने असे काहीतरी मी ओरडून सांगेन हे अशक्य आहे ! ते देखील तिने माझ्याकडून करवून घेतले ! सारेच अगम्य आहे .अलौकिक आहे आणि तर्कातीत आहे .
मैयाच्या मनामध्ये आले की ती सर्व जमिनीवर ताबा मिळविते .  हे वाक्य किती खरे आहे हे आत्ता गुगल नकाशा वरील फोटो पाहिल्यावर लक्षात आले . झाशी घाटाचा हा पूल नर्मदेच्या पुरामध्ये संपूर्ण बुडून जातो .
झाशी घाट पुलावरून वाहणारी नर्मदा मैया
महापुरामध्ये झाशी घाट पुलावरून दिसणारे नर्मदेचे रौद्र रूप
मी नर्मदा मातेकडे पाहिले तर ती हसते आहे असे जाणवले ! तिचा खळखळाट खळखळून हसणाऱ्या तरुणीसारखा भासत होता . खजील होऊन मी आकाशाकडे एकटक पाहू लागलो . इतक्या मला आकाशातून काही विमाने जाताना दिसली . गंमत म्हणून पडल्या पडल्या मी विमाने मोजली . सुमारे दहा पंधरा मिनिटे मी पडलो असेन . तेवढ्या वेळात वीस एक विमाने माझ्या डोक्यावरून गेली . इतके एअर ट्राफिक फार कमी ठिकाणी असते . मुंबई विमानतळावर दर मिनिटाला एक विमान उतरते . ही गती त्याहून अधिक होती . याच्यावरून मी अंदाज लावला की हा दिल्लीचा हवाई मार्ग असणार . कारण भारतातील सर्वाधिक विमाने दिल्ली विमानतळाकडे जातात . यापूर्वी दोन वेळा मी विमानातून नर्मदेचे दर्शन घेतलेले आहेत . आणि क्षणात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! कारण विमानातून हे नर्मदेवरचे रेल्वेचे पूल वगैरे स्पष्ट दिसतात ! 
 विमानातून नर्मदा दर्शन
याचा अर्थ विमानातून मी जो प्रदेश पाहिला होता आज त्याच प्रदेशात मातीत झोपून मी विमाने पाहत होतो ! मला मोठी मौज वाटली !   मला एका गोष्टीचे मोठे आश्चर्य देखील वाटले . आपण म्हणतो की आकाश अमर्याद आहे . परंतु सर्वच विमाने अगदी आखून दिल्याप्रमाणे एकाच रेषेतून जात होती . याचा अर्थ विमानांचेही राष्ट्रीय विहंगम महामार्ग असणार ! असो .
पुढे इमली घाट ,करुआ घाट पार करून बेलखेडी गावातील महादेव मंदिराचे दर्शन घेतले .
प्राचीन महादेव मंदिर
अद्भुत शिवलिंग
सिद्ध घाटावरील हनुमान जी आणि सेवादार साधू
अशी छोटी मंदिरे आणि घाट मैयाकाठी हजारोंनी आहेत
या भागातील पायांना सुखद परिक्रमा मार्ग
इथून पुढचा मार्ग बऱ्यापैकी निर्मनुष्य होता . जिथे जिथे मानवी वावर कमी आढळतो तिथे तिथे प्रचंड प्रमाणात पक्षी जीवन आढळते . नर्मदे काठी इथून पुढे मला भरपूर पक्षी पाहायला मिळाले .पाणकोंबड्यांची संख्या आता वाढली होती .
 जांभळी पाणकोंबडी
टिटव्यांची संख्या देखील वाढली . चक्रवाक बदके कमी झाली पण भुरे बगळे ,पांढरे बगळे सुरू झाले .
 ( ब्ल्यू रिव्हर हेरॉन ) भुरा बगळा
बलाकांच्या अर्थात बगळ्यांच्या वरील सर्व जाती नर्मदे काठी आढळतात
टिटवीच्या आवाजाने नर्मदा काठ कायम दुमदुमत असतो . काठाने जाणाऱ्या परिक्रमावासींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न हे पक्षी नेहमी करतात .
निसर्ग वाचनाची उपजत आवड असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने उघड्यावर टिटवी ने घातलेली अंडी नक्की सापडतात .तुम्ही अंड्यांच्या जितक्या जवळ जाल तितक्या टिटव्या आक्रमक होतात . त्यांच्या वर्तनावरून घरटे शोधणे सोपे जाते .
 ससाणे होते . भारद्वाजही होते . परीट पक्षी देखील खूप दिसले . आता मोठमोठे पाण कावळे दिसू लागले .
नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळणारा कोकील वर्गीय भारद्वाज पक्षी
धुळे आपटल्यासारखी शेपटी आपटणारा परीट पक्षी
पाण कावळ्याच्या या सर्व प्रजाती नर्मदेमध्ये आढळतात
पाणकावळे पाण्यातून केवळ डोके वर काढून पोहताना साप चालला आहे असा भास होतो .
 आज नर्मदा मातेमध्ये मी एक सुंदर विरोळा साप देखील पाहिला .
वरील सर्व छायाचित्रे संग्रहित . आंतरजालावरून साभार
आश्चर्य म्हणजे अमरकंटकच्या कुंडामध्ये पाहिलेला भव्य मासा वगळतात अजून पर्यंत तरी मला एकही मासा नर्मदेमध्ये दिसलेला नव्हता . हे फार मोठे आश्चर्य मानले पाहिजे .कारण नर्मदा ही माशांसाठी प्रसिद्ध आहे . कदाचित मी अतिशय काठावरून चालत असल्यामुळे माझ्या पावलांची चाहूल लागून किंवा मला पाहून ते खोल आत जात असावेत . परंतु इथे असलेल्या पाणपक्ष्यांची संख्या पाहता १००% इथे भरपूर मासे होते . असो . हे सर्व सौंदर्य पहात चालताना हळूहळू मनामध्ये विविध विचार येऊ लागले .एक क्षणभरच नर्मदेचे स्मरण सुटले आणि मनातील नामस्मरणाची माला थांबली .इतक्यात काही कळायच्या आत धप्पकन आपटलो . पाच-सहा फूट खोल खड्ड्यामध्ये पडलो . डावा गुडघा चांगलाच बडवला गेला . डोळ्यातून टचकन पाणी आले . क्षणात भानावर आलो . पुन्हा नर्मदेचा गजर केला . आणि जप सुरू केला . जरा जरी जप थांबला तरी मैय्या अशी शिक्षा तत्काळ देते . पाय घसरतो . कधी मुरगळतो . किंवा रस्ताच भटकतो . आज मात्र नर्मदेने मला फार मोठी शिक्षा दिली . मला डाव्या पायाने अक्षरशः चालता येईना . त्यामुळे मी तिच्यावर रागावलो . गुडघा टेकता सुद्धा येत नव्हता इतका तो दुखत होता . मी नर्मदेवर चिडून तिला म्हणालो ,एक क्षणभरच तुझा विसर पडला तर इतकी मोठी शिक्षा कशाला देतेस ? आता मला पुढचे पाऊल देखील टाकता येत नाही . गरिबाने चालावे तरी कसे तुझ्या काठाने ? ते काही नाही . तूच मला बरे कर . असे म्हणून गुडघाभर पाण्यामध्ये जाऊन उभा राहिलो . मला असे जाणवले की माझ्या गुडघ्याला वळसा मारून वाहणारे नर्मदा जल त्यातील वेदना वाहून नेत आहे . बाहेर आलो तो संपूर्ण वेदना मुक्त होऊनच ! पुन्हा एकदा नर्मदेचा जयजयकार केला आणि मार्गस्थ झालो .पायाची वेदना तर गेलीच परंतु पायाला न भूतो न भविष्यती अशी गती प्राप्त झाली .रायखेडी नावाच्या गावातील रायखेडी घाट ओलांडून पुढे सिद्ध घाट येथील हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे निघालो .
या भागातील नर्मदा मैया

पुढे बाराच्या सुमारास गंगई गावात पोहोचलो . इथे एक अति भव्य वडाचे झाड आणि पुरातन देवालय होते .  इथे दादाजी उर्फ धुरंधर दासजी महाराज नामक अतिशय प्रेमळ अशा शतवर्षीय संतांचा आश्रम आहे . लहान मुले , कुत्री , मांजरे सर्वांना इथे अभय आहे व जे हवे ते मिळते .मुले तर बाबांसोबत मित्रासारखी वागत .जे हवे ते उचलून घेत .बाबाही मुलांना फार जीव लावत .मलाही बाबांनी प्रेमाने चहा पाजला . 
धुरंधर दास जी महाराजांच्या आश्रमातील भव्य वटवृक्ष
आश्रमाचे प्रवेशद्वार .समोर एक गवताची कुटी आहे .त्याच्यापुढे महाराजांचे निवासस्थान आहे . 
स्वतःच्या देहापेक्षा अधिक लांबीच्या जटा असलेले शतवर्षीय संत श्री धुरंधर दास जी महाराज
यांच्या आश्रमामध्ये एक जाड जूड तरुण साध्वी बसलेली होती . हिच्या सर्व गप्पा अन्न आणि अन्नपदार्थ या भोवती फिरत होत्या . हिला आज भजी आणि वडे खायची इच्छा झाली त्यामुळे तिला बाबांच्या शिष्याने आलू बोंडे आणि भजी करून खायला घातली . मी देखील भोजन प्रसाद घ्यायला बसलो होतो . मला चार पोळ्या , भात आमटी आग्रहाने खाऊ घातलेच .शिवाय भजी आणि वडे खायला घातले ! सकाळी झाशी घाटावर भजी खाताना माणसे पाहिल्यावर मनात तमिळनाडू मध्ये हॉटेलमध्ये मिळतात तशी भजी खाण्याची सूक्ष्म इच्छा झालेली होती ती नर्मदा मातेने अशा पद्धतीने पूर्ण केली ! नर्मदा म्हणाली खा किती खातोस पाहूया ! साधू आग्रहाने वाढत राहिला आणि पोटाला तडस लागेपर्यंत भजी खाल्ली !आता पुढे एक देखील पाऊल टाकणे अशक्य आहे असे मला जाणवले .त्यामुळे बाहेर बनविलेल्या गवताच्या कुटीमध्ये जाऊन तिथे आधीच टाकून ठेवलेल्या गादीवर अंग टाकले .आश्रमामध्ये मोठ्या आवाजात रामायण लावून ठेवले होते ते ऐकता ऐकता कधी डोळा लागला कळलेच नाही . सुमारे तास दोन तास मी झोपलो असेन . परिक्रमेत अशा पद्धतीने प्रथमच मी दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी केली .उठल्यावर गडबडीने पुढे निघालो . आज केवळ पंधरा-सोळा किलोमीटर अंतरच चाललो होतो . चालण्याचे अमूल्य दोन तास मी झोपेमध्ये दवडले . आश्रम सोडला आणि पुढून फिरून न येता वाळूच्या ढिगार्‍यावरून पांदीत उडी मारत खाली उतरलो . पायांना पुन्हा गती दिली . पुढे पुन्हा गंगाई घाट लागला . बेलखेडा घाट लागला . सूर्य हळूहळू अस्ताला जाऊ लागला . तो पाहात जमनी अथवा मुंआर घाटावर पोहोचलो . स्नान केले .एका भक्ताने पन्नास रुपये दक्षिणा दिली .तिथे एक जॅकवेल होती आणि उंच टेकाडावर एक आश्रम व कुटी होती . कुटी मधून एका साधून आवाज दिल्यामुळे वर गेलो . वरती जाणारा रस्ता प्रचंड चढाचा आणि चिखलाने माखलेला अतिशय निसरडा होता .तिथे दोन चार साधू आधीच गप्पा मारत बसले होते .एक बंगाली साधू होता .त्याची नवीनच परिक्रमा होती .इथे दोन-तीन टप्प्यांवर बांधकामे होती . एक बंकर वजा खोली परिक्रमावासींच्या निवासासाठी खाली बांधली होती . तिथे मी सामान ठेवून आसन लावले . माझ्या शेजारी तो तरुण बंगाली होता . माझी बंगाली भाषा ऐकून तो खूप खुश झाला . मी रवींद्र संगीतातील गाणी म्हणून दाखवल्यावर तर तो पाया पडायचाच बाकी होता ! शेपटी सारखा तो माझ्यासोबत फिरू लागला ! इथे दिल्लीचा एक तरुण साधू सेवा देत होता . तसा तो परिक्रमेमध्येच होता परंतु या स्थानावरचा साधू बाहेर गेल्यामुळे त्याला मागे ठेवून गेला होता . या साधूला बहुतेक स्वयंपाक पाण्याचा प्रचंड कंटाळा होता .त्यामुळे त्याने सदाव्रत घेऊन स्वतः करून खा असे मला सांगितले . याने दाढी मिशा देखील ठेवलेला नव्हत्या. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागणार इतक्यात मोटरसायकल वरून परिक्रमा करणारे महेश्वर चे एक दाम्पत्य तिथे आले . कृष्णकांत नारायण जोशी ( पंडितजी ) असे त्यांचे नाव होते . त्यांचा महेश्वर जिल्हा खरगोन येथे सप्तमातृका आश्रम नावाचा आश्रम होता .त्यांचा मुलगा गोपाळ जोशी याचा क्रमांक त्यांनी मला लिहून दिला . त्यांनी मला सांगितले की तुम्ही स्वयंपाक करू नका आम्ही करतो आहोत . खाली अजूनही काही परिक्रमावासी आहेत हे मी सांगितल्यावर त्या सर्वांचाच स्वयंपाक त्या काकूंनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने केला . त्यांनी टिक्कड आमटी करून भरपूर खायला घातली . हे दांपत्य जगन्नाथ कुंटे यांना ओळखत होते .जगन्नाथ कुंटे अर्थात संन्यास आश्रम धारण केल्यावरचे अवधूतानंद स्वामी यांनी त्यांच्या परिक्रमेदरम्यान या दांपत्याची भेट सुद्धा घेतलेली होती .त्याखेरीज ओंकार कुंटे म्हणून पुण्यातील एक परिक्रमावासी यांचा चांगला मित्र होता असे त्यांनी मला सांगितले . आज या दांपत्याला भेटून मला जगन्नाथ कुंटे यांची झालेली भेट स्मरली . त्यांच्या परिक्रमे वरील एका व्याख्यानाला मी पूर्वी गेलेलो होतो . एका मागोमाग एक सिगरेट पेटवत नर्मदा मैया च्या आठवणी सांगणारे कुंटे चांगले स्मरणात राहिले होते .त्यांच्या पुस्तकातील आठवणी मध्ये सतत ताक प्यायला मिळाल्याचा उल्लेख असायचा . परंतु अजून तरी मला नर्मदे काठी कुठे ताक प्यायला मिळाले नव्हते .असा विचार मी करत होतो इतक्यात दिल्लीचा साधू तांब्याभर ताक घेऊन बाहेर आला . आणि म्हणाला मी काहीच करून खायला घातले नाही असे तू कोणाला सांगायला नको म्हणून मी तांब्याभर ताक बनवले आहे ! घे !  थंडी खूप असल्यामुळे अन्य कोणालाच ताप नको होते त्यामुळे सर्व ताक मीच प्यायलो ! नर्मदेची लीला अगम्य आहे ! 
इथे शेकोटी करून अजून एक परिक्रमावासी बसला होता . त्याला अपघात झाल्यामुळे अपंगत्व आले होते .तरीदेखील तो गाडीवरून परिक्रमेला निघाला होता .त्याच्याशी थोडेसे बोलून घाटावर आलो .शेजारी असलेल्या जॅक वेलवर जायला एक पुल केलेला आहे . इथून घाटावरचे दृश्य खूपच सुंदर दिसते .
इथे संध्याकाळी नर्मदेची सुंदर आरती होते . हा घाट फार सुंदर आहे . इथे समोरच्या तटावर वाळू उपसण्याचे मोठे काम चालते . बाकी सर्वत्र झाडी आहे . इथे नर्मदा एक सुंदर झोकदार वळण घेते आणि खळाळत वाहते . त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात धुक्याची निर्मिती होते .
घाटावर उतरण्याचा मार्ग अतिशय धोकादायक आणि निसरडा होता . त्यामुळे हळूहळू अंदाज घेत उतरलो . नर्मदा महाआरती समितीचे कार्यकर्ते आले होते .त्यांनी नुकताच इथे पक्का घाट बांधला आहे असे सांगितले .लवकरच घाटावर गाड्या येतील अशी व्यवस्था ते करणार होते . घाटावर एक छोटेसे नर्मदा मंदिर होते . पाणी उथळ असल्यामुळे इथे खूप लोक स्नानासाठी येतात .जबलपूर जिल्ह्यातील हे शेवटचे गाव आहे . इथून पुढे नरसिंहपूर जिल्हा सुरू होतो . वाचकांच्या दर्शनाकरता घाटाची काही रूपे संकलित छायाचित्रांच्या रूपाने दाखवीत आहे .
 मुँआर घाट
समोरच्या तटावरून मुआर घाट असा दिसतो .जॅकवेल तिचा पूल आणि उजव्या हाताला उंच टेकडीवर आश्रम दिसत आहे .घाटावर लागलेल्या दोन गाड्यांच्या वर तिरका मातीचा उतार देखील दिसतो आहे . बगरई येथील कारागिरांनी बनविलेली संगमरवरी जलहरी आपल्याला दिसते आहे .
पर्व काळामध्ये आणि उत्सव प्रसंगी मुआर घाटावर स्नानासाठी प्रचंड गर्दी असते
दुर्गा पूजेला मुआर घाटावर विसर्जित केले जाणारे घट.ही रोपे पुढे जाऊन उगवतात आणि चांगल्या बीजाचा सर्वत्र प्रसार होतो .सोबत स्वच्छ नर्मदा जल .
उत्सवामध्ये नर्मदे मध्ये सोडले जाणारे दिवे फारच मनोहर दिसतात ! यातील तुपाच्या वाती नंतर मासे खाऊन टाकतात . पूर्वी कणकेचे दिवे करून पानावर सोडले जायचे ती अधिक योग्य पद्धत होती .आज-काल वरील चित्र दाखविल्याप्रमाणे प्लास्टिकचे आवरण असलेले द्रोण /दिवे येतात जे पर्यावरणासाठी घातक आहेत .
 मुआर घाट
नर्मदा महाआरती मंडळांने बांधलेला प्रेक्षा सज्जा
मुआर घाटावरून पहाटे दिसणारे नर्मदेचे रम्य रूप
नेहमीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली . सत्यजित दत्त नावाचा तो बंगाली परिक्रमावासी थांब म्हणत होता परंतु मी हळूहळू चालत ये असे त्याला सुचवून पुढे निघालो . निघताना दिल्लीच्या साधूने गरमागरम चहा करून पाजला . तो ताज्या घट्ट दुधाचा चहा फारच अप्रतिम होता ! आज वसंत पंचमीचा दिवस होता .त्यामुळे काठावर पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली होती .मी नर्मदेला साष्टांग नमस्कार केला . परंतु बहुतेक सर्वांसमोर मी तिला नमस्कार केलेला तिला आवडले नसावे . त्यामुळे उठून वळलो आणि ठसकन पायाच्या नडगीला एक पायरी लागली आणि नडगी फुटून रक्ताची धार वाहू लागली . आधीच मरणाची थंडी आणि त्यात आता हे नवे दुखणे उद्भवले की काय असे वाटले . परंतु नर्मदा मातेनेच दिलेले असल्यामुळे कणभरही दुखले नाही . समोरचे दृश्य पाहून सर्व वेदना विरघळून गेल्या ! प्रचंड धुक्यामध्ये नर्मदा हरवली होती ! सूर्य थोड्या वेळाने उगवला तरीदेखील त्याचे बिंब एका पांढऱ्या ठिपक्यासारखे दिसत होते . चालताना ताज्या ताज्या गव्हाच्या अंकुरांवर साचलेल्या दवाने सर्व जखम धुवून टाकली आणि पाय खडखडीत बरा झाला ! मैयाचे म्हणणे इतकेच असावे की आपली भक्ती अशी सर्वांसमक्ष दाखवू नकोस ! सार्वजनिक ठिकाणी तुम्ही प्रेयसी वरचे प्रेम कधी उघडपणे व्यक्त करून पहा ! लगेच एक फटका मारला जातो ! तसेच काहीतरी इथे घडले . असो .आज न भूतो न भविष्यती असे धुके सर्वत्र दाटले होते .शेजारी शांत वाहणारा प्रवाह अचानक काही काळ खळखळून वाहत होता व त्यातून या दाट धुक्याची निर्मिती अविरतपणे होत होती . हे धुके इतके दाट होते की श्वासालाही जाणवत होते . त्याने सूर्याला पूर्णपणे गिळंकृत करून टाकले होते . अक्षरशः स्वर्ग ! शेजारी खळाळून वाहणारी रेवामाई .पण धुक्याच्या दाट पडद्याआडून .कुठून कुठे चाललोय काहीच कळत नव्हते . थंडीमुळे सर्वच स्तब्ध झालेले .अद्भुत शांतता ! परिक्रमेतील पहाटेचा प्रवास सर्वोत्तम असतो तो याचसाठी ... आता पुढे लागणार होते ब्रह्मकुंड नावाचे तीर्थक्षेत्र . राक्षसांचा विजय झाल्यामुळे पराभूत झालेल्या सर्व देवांना ब्रह्मदेवाने याच घाटावर तपश्चर्येसाठी बसविले होते . अशी कथा नर्मदा पुराणामध्ये आहे . अतिशय पवित्र असा हा घाट आहे . इथे नर्मदा वळण घेत असल्यामुळे घाट खोल पाण्यामध्ये आहे . इथे दोन तरुण महिला शंकराला अभिषेक करत होत्या . मी आल्यावर दोघींनी माझे पाय दूध आणि पाण्याने धुतले . दोघींना मनापासून आशीर्वाद देऊन पुढे चालायला लागलो . खरे तर गृहस्थी माणसाला अशा प्रकारांची सवय नसते . परंतु अशावेळी तुम्ही तुम्ही राहत नाही तर तुमच्या देहाचा ताबा नर्मदा माता घेते . अशाप्रसंगी ती तुमच्याकडून काय काय करून घेईल याचा काहीही नेम नसतो . वाचकांना दर्शन व्हावे म्हणून ब्रह्मकुंडाची काही चित्रे सोबत देत आहे .
पवित्र आणि खोल ब्रह्मकुंड घाट . या घाटावर मी नर्मदा मातेच्या पातळीवरून चालत चालत  हातातील दंड पाण्यामध्ये बुडवत आलो ,वर दिसणाऱ्या चबुतऱ्यावर दोघींनी माझे पाय धुतले आणि मग तिथून खाली उतरून तसाच पुढे गेलो . 
 स्वच्छ पवित्र नर्मदाजल
 ब्रह्मकुंड घाटावरील मंदिरे
येथे सर्व देवांनी तप केलेले असल्यामुळे बऱ्याच देवता आढळतात
 त्यातील राम मंदिर
 हनुमानजी ब्रह्म कुंड
ब्रम्ह कुंडाचे दर्शन घेऊन जमिया गावातून पुढे सिद्ध घाट नावाचा घाट पाहिला . एका महा भव्य वटवृक्षाखाली प्राचीन मंदिरे आहेत . यानंतर बुधघाट लागतो . हे बुधगाव नावाचे गाव आहे . येथे बुधग्रहाने तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे . अभीरामदास नामक उत्तर प्रदेशातील अयोध्येचा एक साधू इथला मठ सांभाळत होता . त्याने मला सदाव्रत दिले . वाटीभर तांदूळ आणि वाटीभर डाळ देवून खिचडी करून खायला सांगितले . मी एका कोपऱ्यात चूल बनवून लाकडे गोळा करून खिचडी शिजायला लावली .चुलीवर मी एकट्या पुरती खिचडी केली होती परंतु अचानक तीन-चार परिक्रमावासी आले . त्यांनी स्वयंपाक करण्यास नकार दिला . मग त्या सर्वांना थोडी थोडी खिचडी वाढली . मी घासभरच खाल्ली . इथे थोडीशी वादावादी झाली . मला चुलीवर स्वयंपाकाची फारशी सवय नसल्यामुळे खिचडी थोडीशी खालून लागली होती . त्यावर आलेल्या चौघांपैकी एक म्हातारा मला बोलला . परंतु मला अपेक्षित नसताना अभिरामदास महाराज माझा पक्ष घेत त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला ! अखेरीस मी सर्वांना शांत केले आणि जेवायला वाढले .सर्वजण तृप्त होऊन झोपी गेले . इथे ताडाची काही झाडे होती . पूर्वी तमिळनाडू मध्ये असताना माझ्या एका मित्राच्या सोबतीने मी दहा हजार पेक्षा अधिक ताडाची झाडे तिकडे लावली होती . तो तामिळनाडूचा राज्यवृक्ष आहे . परंतु त्या झाडाबाबत इथल्या लोकांना काहीच माहिती नव्हती . मी आश्रमातील जमलेल्या सर्व लोकांना त्या झाडाची इत्थ्यंभूत माहिती सांगितली . सर्वांना खूप आनंद वाटला . कारण हे निरुपयोगी झाड आहे असे वाटून ते तोडण्याचे नियोजन चालले होते ते आता बारगळले . इथे आलेल्या एका ग्रामस्थांनी माझे काही फोटो काढले . माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर मी दिलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी फोटो पाठवून दिले . बुध घाटाचे काही फोटो खालील प्रमाणे .
बुध घाट येथील आश्रम
इथे राहणाऱ्या अभिरामदास साधूने माझे चांगली परीक्षा पाहिली .
इथे पूर्वी एक प्राचीन मंदिर अस्तित्वात होते याचे अवशेष आपल्याला सहज दिसतात . मंदिराच्या कळसाचा आमलक व त्यावर ठेवलेली मारुतीची मूर्ती .
बुध घाटावरील काही देव . डावीकडे ताडाच्या एका झाडाचे खोड दिसते आहे .
बुध घाटावर काढलेला प्रस्तुत लेखकाचा फोटो
बुध घाटावरून दिसणारे नर्मदेचे विहंगम दृश्य
बुध घाटावरील ताडाचे झाड व सोबत प्रस्तुत लेखक
                      ॐ बुधाय नमः ।
मी बुध घाटावर अन्य परिक्रमा वासींना माझ्या घासातला घास काढून दिला खरा . परंतु नर्मदा मातेला सर्वांची कशी काळजी असते पहा ! .पुढच्याच सांकल गावामध्ये दोन ठिकाणी मला भोजनप्रसाद मिळाला ! या घाटाचे पौराणिक नाव शांकर घाट असे आहे कारण इथे आद्य शंकराचार्यांना त्यांच्या गुरुंनी गुरु दीक्षा दिली होती अशी मान्यता आहे . शंकराचार्य दक्षिण भारतातून आले ते थेट या घाटावर आले इथूनच त्यांनी नर्मदा नदी ओलांडली आणि पलीकडच्या तटावर असलेल्या गुफेमध्ये तपश्चर्या केली . त्यामुळे शांकर असे नाव पडलेला हा घाट .त्याचा अपभ्रंश होऊन लोक आता साकल घाट असे म्हणतात . इथे मी काठाकाठाने जात असताना काही लोकांनी एका टेकाडावरून मला आवाज दिला . वरती एक साधू नुकताच नर्मदे किनारी येऊन राहिला होता . त्याच्या आगमना प्रित्यर्थ गावकऱ्यांनी भंडारा ठेवला होता . साधू साठी एक मोठी कुटी गावकऱ्यांनी बांधली होती . साधू महाराजांचे दर्शन घेऊन मी भोजन प्रसाद घेतला आणि पुढे निघालो . पुढे नर्मदा वळण घेते तिथे वाळूचा मोठा किनारा आहे .या ठिकाणी एक त्याच गावातला युवक नर्मदा परिक्रमा उचलत होता त्यामुळे त्याने कढाई ठेवली होती . ती सुरू असतानाच एक परिक्रमावासी आला हा शुभ शकुन मानून त्या सर्वांनी खाली बसवून माझे पूजन केले आणि मला देखील पुन्हा एकदा जेवायला वाढले ! त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका उत्साही युवकाने माझे फोटो सेशन केले ! परंतु माझ्याकडे फोन नाही कळल्यावर मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले . 
 सांकल घाटावर प्रस्तुत लेखक . इथे समोरून हिरन नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते . पुढे शेर नावाची देखील एक नदी आहे ! हा फोटो पाठवताना त्या मुलानेच एडिट करून अक्षरे टाकलेली आहेत .
परिक्रमा वासीला दिलेल्या नवीन कपड्याचा बॉक्स शेजारी पडलेला आहे .
नर्मदे काठी भक्त मंडळी पांढरा व लाल झेंडा लावतात .
ही वाळू भट्टी सारखी तापलेली असते .
सावली वरून तुम्हाला वेळेचा अंदाज येईल . 
या परमपवित्र स्थानावर काही वेळ घालवायला मिळाला हे माझे भाग्य ! नर्मदा मातेला सर्व काळजी असते ! मागे देखील ब्रह्म घाटाजवळ एका अतिशय गरीब शेतकऱ्याने मला अंगावरचे एखादे वस्त्र द्या असे सांगितले . मी त्याला माझ्या जवळील एक वस्त्र शाल वगैरे देऊन टाकले . नंतर पुढे आल्यावर मला कळाले की त्या घाटावर वस्त्रदानाचे फार महत्त्व आहे ! नर्मदा माता अशा पद्धतीने जिथे जिथे जे जे करणे आवश्यक आहे तिथे ते ते माझ्याकडून करून घेत होती .सर्व आपोआप घडते .
काय अद्भुत योगायोग आहे पहा ! मी हा प्रसंग लिहीत असताना माझ्या सद्गुरूंनी नेसलेले अंग वस्त्र प्रसाद स्वरूप घेऊन एक भक्त आत्ता थोड्याच वेळापूर्वी घरी आले आणि त्यांनी ते वस्त्र मला अर्पण केले ! थोडक्यात माझ्याजवळ असलेले वस्त्र पुन्हा माझ्याकडे आले ! जय हो माई की ! जय सद्गुरु ! 
 सांकल च्या पुढे खूप चालल्यावर महादेव पिपरिया नावाचे गाव आले . या गावामध्ये शिरण्यापूर्वी अद्भुत अनुभव आला . इथे मैया दोन शाखांमध्ये विभागते आणि डावीकडे वळत तीव्र उजवे वळण घेते . त्यातली उजवीकडची शाखा विस्तीर्ण , उथळ आणि हळू आहे . तर डावीकडची शाखा अरुंद , अति खोल आणि अति वेगवान आहे . जिथे जिथे मैया असे वळण घेते तिथे ती वाळूचा किनारा उभा कापत जाते . मला याचा अजून फारसा अंदाज आलेला नव्हता . आपल्या डोक्यात एकच गणित असायचे की किनारा सोडायचा नाही . त्याप्रमाणे एकही ठिकाणी जाता जाता माझा मार्ग संपला . समोर वाळूचा उभा किनारा आणि खाली खोल नर्मदा मैया . आता मागे देखील जाता येणार नाही आणि पुढे देखील जाता येणार नाही अशा परिस्थितीत अडकलो असताना अचानक एक माकड माझ्यावरून तोच कडा वेगाने पार करत पुढे निघून गेले . त्याची गती बघून मला पुढे जाण्याची युक्ती कळाली . मी प्रत्येक पाऊल स्थिर करायचा प्रयत्न करत होतो त्यापेक्षा वेगाने पावले टाकत गेले की वाळूचा खंड तुटायच्या आत पुढे जाता येत होते . तसा मी झरझर गेलो आणि तो टापू पार केला गेला ! पुढे पुन्हा एकदा तसेच वळण आले . हे तेच वळण जिथे नर्मदा वेगाने आणि खोल वाहते . हिमालयातून गंगा खाली येताना कोणी पाहिली असेल तर तिची कशी गती असते तशा पद्धतीने इकडे नर्मदा वाहते . इथे छोट्याशा वळणावर भरपूर शिवलिंगांचा खच पडला होता . ती पहात पहात मी पुढे जात होतो इतक्यात माझे लक्ष नर्मदेच्या काठावर बसलेल्या एका वेडसर बाई मुळे तिकडे गेले . तिचे नाव द्रौपदी होते . तिने लहान मुली सारखा फ्रॉक घातला होता . आणि पाण्यात खेळत बसली होती . दुरून पाहिले तर लहान मुलगी आहे असे वाटायचे . जवळ गेल्यावर कळायचे की ही चांगली सत्तरी पंचाहत्तरीची ची म्हातारी आहे . मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला परंतु ती वेडसर आहे असे माझ्या लक्षात आले . मी तिला विचारले पुढे रस्ता आहे का ? ती म्हणाली " जाओ । जाओ । सीधा जाओ । मैय्या है । जाओ । " मी जिथून इथे पोहोचलो तो रस्ताच नव्हता आणि ही वेडसर बाई इथे पोहोचली आहे म्हणजे कुठलातरी रस्ता असणार आणि तो पुढचाच रस्ता असेल असे वाटून मी पुढे चालायला लागलो . तसेही नर्मदे काठी कोणत्याही मातारामने काहीही सांगितले तरी ते नर्मदेनेच सांगितले असे मानून ऐकायचे असा दंडक मी स्वतःला घातलेला होताच .पुढे चालत राहिलो .
हळूहळू पायाखालची पायवाट अरुंद होत गेली आणि वाळूचा उभा कडा लागला . दोन पावलांची पायवाट हळूहळू एका पावलाची झाली . थोड्यावेळाने मातीची उभी भिंत समोर आणि खाली प्रचंड वेगाने वाहणारी नर्मदा माई असे चित्र दिसू लागले . आता मला पुढे पाऊल टाकण्यासाठी जागाच नव्हती त्यामुळे मी एक पाऊल ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर उभा राहिलो .इथून पुढे जायला रस्ता दिसत नव्हता .आणि मागे परत जावे तर वळता येणे शक्य नव्हते अशा जागेवर मी उभा होतो .नर्मदेचे पात्र माझ्यापासून खाली पाच-सहा फूट होते .अति प्रचंड वेगाने आवाज करत नर्मदेचे पाणी वाहत होते . त्या पाण्याचा खळखळाट अतिशय भयानक वाटत होता .  आता पुढे कुठे जावे ? कसे जावे ?असा विचार करत मी उभा होतो .क्षणभर मी असा देखील विचार करून पाहिला की चक्क पात्र मध्ये उडी मारावी आणि पोहत हा टापू पार करावा . परंतु पाण्यामध्ये खडक असण्याची शक्यता होती ज्यांनी माझा कार्यक्रम केला असता .इतक्यात मला काही कळायच्या आतच माझ्या पायाखाली असलेला मातीचा तो छोटासा तुकडा तुटला आणि मी थेट पात्रामध्ये पडलो ! चांगला कमरे एवढ्या पाण्यामध्ये बुडालो ! आता मी नर्मदेमध्ये वाहून जाणार इतक्यात माझ्या असे लक्षात आले की माझ्या डाव्या हातामध्ये कुठल्यातरी झाडाचे मूळ अडकलेले आहे . मी चटकन ते घट्ट पकडले . माझ्या उजव्या हातात काठी होती . तो दंड आपोआप फिरून खाली गेला आणि माझ्या पायाखाली डाव्या हाताला असलेल्या मातीच्या भिंतीमध्ये जोरात घुसला . त्यामुळे माझ्या दोन्ही हातांना आता चांगला आधार मिळाला . एका हातात औदुंबराचे मूळ आणि दुसऱ्या हातात माझ्या पायाखाली जाऊन रुतलेला दंड त्याचा आधार होता . परंतु पाण्याच्या गतीमुळे माझे पाय पाच-सहा फूट पुढे गेले होते ! काही केल्या ते मला जवळ घेता येईनात इतका पाण्याला वेग होता . माझे सामान आणि कमरेपर्यंत मी पूर्णपणे भिजलो होतो . मला क्षणभर काय करावे काही सूचेना . चक्क सर्व सोडून नर्मदेमध्ये उडी मारावी असा देखील विचार केला . परंतु त्या परिस्थितीमध्ये दंड मागे राहिला असता आणि दंड तर सोडायचा नसतो .  मी जोरात नर्मदेला हाक मारली .इतक्यात माझ्या लक्षात आले की पाय सरळ मागे येत नसले , तरी डावीकडे मातीच्या भिंतीवर हळूहळू मी चढलो तर पाय वर जात आहेत आणि पाण्यातून बाहेर पण निघत आहेत . कल्पना करून पहा ! माझ्या डाव्या हातात औदुंबराचे मूळ आहे . उजव्या हातात काठी घट्ट पकडलेली आहे . आणि या दोघांच्या आधारे मी प्रतिघटीवत् ( अँटीक्लॉकवाईज ) गतीने मातीच्या  भिंताडावर उलटा वर जातो आहे . एक क्षण मी खाली डोके वर पाय अशा स्थितीमध्ये आलो . माझे दप्तर डोक्याच्या खाली लटकले . आणि काही कळायच्या आत मी मागच्या बाजूला पाय टाकले . जिथे बरोबर दोन पावले मावण्या इतकी जागा होती ! पायाखाली काहीतरी टोचले म्हणून पाहिले तर एक सुंदर शिवलिंग तिथे होते ! ते उचलून चटकन मी उलटा मागे पळालो ! दंड तिथेच खोचलेला होता तो मी जागेवर उपसून काढला ! ओले दप्तर मी काढून टाकले ! आणि त्या वाळूमध्ये उताणा पडून राहिलो ! एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदेने मला वाचविले होते !
हीच ती जागा जिथे वर वर्णन केलेला प्रसंग घडला .हा फोटो समोरच्या घाटावरून काढलेला आहे .अलीकडे दिसते आहे ती नर्मदेची मोठी आणि शांत शाखा आहे . मी पलीकडच्या अरुंद वेगवान शाखेमध्ये पडलो .
याच ठिकाणी वरील प्रसंग घडला . आता रस्ता कसा निमुळता होत गेला होता ते आपल्या लक्षात येईल आणि पाण्याचा प्रवाह कसा वेगवान झाला आहे ते देखील दिसेल . 
 मी मला मिळालेले शिवलिंग निरखून पाहू लागलो ! मला अगदी जसे हवे होते तसे हे शिवलिंग होते ! हे संगमरवराचे होते परंतु याच्यामध्ये मिश्र दगड होता . याच्यामध्ये नैसर्गिक त्रिपुंड्र काढलेले होते . एक छोटासा त्रिशूळ देखील होता ! मला जे हवे ते मिळाले होते ! परंतु ते मिळण्यासाठी नर्मदेने फार मोठी परीक्षा घेतली . काठावर पास होणे कशाला म्हणतात ते मला त्या क्षणी कळले ! नाहीतर बुडालोच होतो ! किमान वाहवत तरी नक्की गेलो असतो ! त्या शिवलिंगाला मी पुढे  परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वर मध्ये जलहरी विकत घेतली .आपल्या दर्शनाकरता त्याचे फोटो टाकत आहे .
हेच ते महादेव पिपरिया घाटावर मिळालेले शिवलिंग .यातली खालची जलहरी आणि नागोबा नंतर ठेवलेला आहे . इथून पुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये मी या शिवलिंगाची पूजा केली . नीट पाहिले असता तुम्हाला आडवा त्रिशूल उजव्या बाजूला दिसेल .
या शिवलिंगावर अनेक  शुभचिन्हे अंकित आहेत . पहाल तितके ओम याच्या मध्ये सापडतात . त्रिपुंड्र आणि त्रिशूळ स्पष्टपणे दिसतात . डोक्यावर जटाभार बांधल्यासारखी नक्षी पण आहे . पुढे अनेक संतांनी हे शिवलिंग पाहिले आणि त्याचे तोंड भरून कौतुक केले ! सर्वांनी एकमुखाने याचे नाव नर्मदेश्वर असेच ठेवले ! 
नर्मदेश्वर झोळी मध्ये ठेवला आणि शांतपणे शेतातील मार्ग पकडून महादेव पिपरीया गावात आलो .या गावामध्ये मोठी जत्रा भरली होती . माझे सर्व कपडे भिजलेले होते . मला बघून लोक हसू लागले .मला देखील माझे स्वतःचेच हसू येत होते . फार मोठ्या प्रसंगातून नर्मदेने वाचवले ! तिचा जयजयकार ! तोच जयजयकार करत गावातील धर्मशाळा गाठली . वाटत काही लोकांनी मला अडवले आणि सांगितले तुम्ही या गावात राहू नका . वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळे कोणीही ताळ्यावर नाही .तसेच आज पोलीस मेळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत कारण करोनाची पुन्हा लाट आली आहे .  अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खायला कोण देणार ? मी म्हणालो जिच्यासाठी निघालो आहे तिला माझ्या पोटाची काळजी आहे . तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही . अखेरीस आज तुम्हाला उपाशीच झोपावे लागणार असे आग्रहपूर्वक सांगत त्या माणसाने मला धर्मशाळा दाखवली . धर्मशाळा कसली ती ? जणू काही सार्वजनिक कचरा पेटी होती ! बाजारातील सर्व कचरा तिथेच टाकण्यात आला होता . आत मध्ये प्रचंड धुळ होती . मी एक झाडू तयार केला आणि कचरा झाडू लागलो . प्लास्टिकच्या बाटल्यांचा तर खच पडला होता . सुमारे अर्धा तास स्वच्छता करून मी माझे आसन लावले . या धर्म शाळेची काही चित्रे आपल्याकरता सोबत जोडत आहे .
महादेव पिपरिया येथील धर्मशाळा
डावीकडे दिसणाऱ्या दारातून आत जाऊन त्या खोलीमध्ये मी माझे आसन लावले . कारण आत्ता जिथे निळे आसन लावलेले दिसत आहे तिथे व्यापारी दुकाने लावून बसले होते .
इथेच स्वयंपाक करून खाण्याची सोय म्हणजे चूल दिसत होती . 
मी शांतपणे आसन लावून बसलेलो असताना गावातील एक मनुष्य आत मध्ये आला आणि माझ्यासमोर बसला . हा मनुष्य माझी चौकशी करू लागला . कुठून आलो कसा आलो वगैरे विचारताना मी ओला कसा झालो हे देखील त्याने विचारले . मला सापडलेले शिवलिंग मी त्याला दाखवले . तो मनुष्य भलताच खुश झाला ! आणि म्हणाला आपली हरकत नसेल तर कृपया आपण माझ्या घरी आज मुक्काम करावा . तसाही आज बाजाराचा दिवस असल्यामुळे आणि वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत विश्रांती मिळणार नाही . मी माझा बोरिया बिस्तर उचलला आणि त्याच्या मागे चालू लागलो . मध्ये महादेवाचे एक सुंदर मंदिर लागले . मी त्यांना म्हणालो की आपण आधी देवाचे दर्शन घेऊ मगच घरी जाऊ . 

महादेव पिपरिया घाटावरील मेळा
धर्म शाळेकडून मंदिराकडे येणारा घाट रस्ता . समोर नर्मदा मैया
जबरेश्वर महादेव मंदिर समोर समूह
 मंदीराचे आवार
देवालयाचे हे छोटेसे प्रवेशद्वार बघून कोणाला अंदाज येऊ शकेल की आत मध्ये काय ठेवलेले आहे
 ?
मुख्य मंदिर छोटेसे होते . अंधाऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला मात्र माझे डोळेच दिपले ! कारण समोर सात-साडेसात फूट उंचीचे महादेवाचे शिवलिंग होते ! इतके मोठे शिवलिंग मी आजवर कोठेच पाहिलेले नव्हते ! म्हणजे तसे तंजावरच्या बृहदिश्वराचे शिवलिंग किंवा अलीकडे जग्गी वासुदेव यांनी कोइंबतूर येथे आश्रमात स्थापन केलेले ध्यानलिंग ही आकाराने मोठी शिवलिंगे मी पाहिलेली आहेत . परंतु ती मानवनिर्मित आहेत . नैसर्गिक नाहीत .हे निसर्गनिर्मित शिवलिंग होते !
जबरेश्वर महादेवाचे दर्शन घेताना प्रस्तुत लेखक . कपडे अजूनही संपूर्ण ओले आहेत ! मागे पडलेली शिवलिंगाची सावली पहावी !
 स्वयंभू जबरेश्वर महादेव
हे स्थान अत्यंत जागृत आहे .
हे शिवलिंग  सुमारे दोन अडीच फूट जमिनीमध्ये गाडलेले आहे . याची एकूण उंची साडेसात फूट आहे .
अत्यंत भयानक प्रवाहतही जिची अजिबात भीती वाटली नाही अशी ही भीतीहारी नर्मदा मैया आहे ! आणि तिच्या काठी असलेल्या या जबरेश्वराची कथा देखील अद्भुत आहे ! मला घेण्यासाठी आलेल्या सदृहस्थांचे नाव होते हनुमत् सिंह घोषी (ठाकूर) . महादेव पिपरिया या गावाचे नाव पूर्वी फक्त पिपरीया होते . पिंपरीच्या झाडावरून पडलेले हे सर्वसामान्य नाव . पुढे गावातील एका मनुष्याला स्वप्नामध्ये येऊन महादेवांनी दृष्टांत दिला . त्यांनी सांगितले इथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावर मी आहे . मला इकडे घेऊन ये . याने सुरुवातीला दुर्लक्ष केले .परंतु पुन्हा पुन्हा स्वप्न पडू लागल्यावर तो शोध घेण्यासाठी त्या डोंगरावर गेला . त्याने भरपूर शोधले परंतु त्याला काही शिवलिंग सापडले नाही . मुळात तो एक इंचापासून एक फुटापर्यंत आकाराची शिवलिंगे शोधत होता . त्याच्या स्वप्नातही आले नसेल की त्याला दृष्टांत देणारे देव "महा"देव आहेत ! अखेरीस महादेवांनी स्वतः तो डोंगर सोडून रोज थोडे थोडे अंतर चालायला सुरुवात केली ! अर्थात गावातील गुराखी पाहायचे की रोज हे शिवलिंग थोडे थोडे गडगडत पुढे पुढे येत राहिले . उतार संपेपर्यंत शिवलिंग आले परंतु पुढे चढावर देखील ते आपोआप चढू लागले ! अखेरीस आत्ता त्याची जी जागा आहे तिथे आल्यावर ते स्थिर झाले ! त्यानंतर लोकांनी आजूबाजूला मंदिर बांधले . जबर म्हणजे मोठा म्हणून या महादेवाचे नाव जबरेश्वर ठेवले ! ही कथा ऐकत हनुमंत सिंग यांच्या घरी गेलो .हे सद्गृहस्थ अत्यंत भाविक होते . यांनी ओसरी मध्येच माझ्यासाठी एक स्वतंत्र खोली मला दिली . शेणाने सारविलेली ही खोली अत्यंत उबदार होती . माझा शिवलिंगाचा प्रसंग ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला . कारण ती जागा त्यांना चांगली माहिती आहे . त्या म्हातारीचे नाव द्रौपदी आहे हे यांनीच मला सांगितले . मी केलेल्या वर्णनावरून त्यांनी तिला ओळखले . परंतु ती तिथे कधीच नसते हे देखील त्यांनी मला सांगितले . ती कसे बोलत होती हे मी बोलून दाखवल्यावर ते मनापासून हसू लागले ! मी तिची हुबेहूब नकल करत होतो असे त्यांना वाटले . असो . रात्री अतिशय उत्कृष्ट असे घरगुती भोजन मला मिळाले . हनुमंत सिंह नावाप्रमाणे व्यासंगी होते . त्यांचा शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता . अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते तसेच त्यांचे पाठांतर देखील चांगले होते . आणि या सर्वां उपर नर्मदे काठी राहिल्यामुळे त्यांना माणसे ओळखण्याची खूप चांगली कला अवगत होती . मी गावात आल्याचे कर्णोपकर्णी त्यांच्या कानावर पडले .तसे ते धर्मशाळेमध्येच सदावर्त आणून देतात . परंतु त्यांना काय वाटले कोणास ठाऊक . त्यांनी मला घरी बोलावले . साधू लोक मात्र कटाक्षाने गृहस्थी लोकांच्या घरामध्ये राहायला जात नाहीत . मला हा नियम सुरुवातीला माहिती नव्हता . परंतु सुदैवाने मोहन साधूने परिक्रमेत कसे वागावे वगैरे सांगितले असल्यामुळे माझ्या हातून कुठलीही चूक किंवा प्रमाद कधीच घडला नाही . गृहस्थांच्या घरी राहायला न जाण्याची अनेक कारणे असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरेचदा गृहस्थलोक त्यांच्या दुःखांचा पाढा साधूकडे वाचून दाखवतात . आता तुम्ही आपण होऊन जो संसार पत्करला आहे त्याला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे ?तो कसा का असेना निभावणे हेच मुख्य कर्तव्य नाही का ! असे साधूंचे म्हणणे असते .जे रास्त देखील आहे . असो . रात्री हनुमान सिंह रामायण भजनाला जाणार होते . मी भजनाला येणार का असे त्यांनी मला विचारले . मी मोठ्या आनंदाने होकार दिला ! रात्री अकराच्या सुमाराला ते मला घेऊन गेले . गावातीलच एकाच्या घरामध्ये भजन होते . तिथे क्रमाक्रमाने पेटी , ढोलक ,झांजा , टिमकी ,चिपळ्या ,चिरैया नावाचे एक अद्भुत वाद्य आणि माझे तोंड असे सर्व एकेक करून वाजविले ! चिरैया म्हणजे लाकडाची एक चिमणी असते जी लाकडी पंख आपटून खूप सुंदर आवाज करते ! 
इथे अमरावतीच्या पिंपळखुटा आश्रमातील धीरज नावाच्या सेवेकर्यांसारखा हुबेहूब दिसणारा एक मुलगा भेटला . रामायण भजन बरच काळ चालले . मला भजनात रस आहे हे कळल्यावर त्यांनी वेळेचे काही बंधन ठेवले नाही ! एका भजनकऱ्याने काही फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. ते आपल्यासाठी देत आहे .
महादेव पिपरीया गावामध्ये रामायण भजन करताना प्रस्तुत लेखक . सोबत ग्रामस्थ मंडळी .पंतप्रधान आवास योजनेतील साध्या घरामध्ये अगदी माईक वगैरे लावून रात्रभर भजन चालले होते ! मी सध्या चंडा वाजवतो आहे .
भजनातील अजून एक क्षण
भजन संपल्यावर त्यांनी माझा सत्कार करून खांद्यावर पांघरलेली शाल मला दिली . आज सकाळीच मी अजूनही प्रचंड थंडी असूनही माझी शाल एका शेतकऱ्याला दिली होती . लगेच मैयाने परतफेड केली . हाच तो मुलगा जो धीरज भाऊ सारखा दिसत होता . 
पहाट होताना हनुमंत सिंह आणि मी पुन्हा घरी परतलो .आता पुन्हा झोपण्याचा प्रश्न नव्हताच . त्यामुळे मी स्नान वगैरे आटोपून घेतले . हनुमंत सिंह यांनी मला नर्मदा मैया ठेवण्यासाठी खांद्याला लटकवायची एक छोटीशी पिशवी दिली . त्यांनी सांगितले की शुल्कानी च्या झाडीमध्ये जाताना नर्मदा मैया त्या छोट्या पिशवीमध्ये ठेवणे . म्हणजे जरी मोठ्या झोळीची लूट झाली तरी फरक पडणार नाही . ही पिशवी पुढे मला अत्यंत कामाला आली . घरातील सर्वांचे आभार मानून नर्मदे हर केले . इथे त्यांच्या घराबाहेर एक मुका मनुष्य उभा होता . तो काल मी आल्यापासून माझ्याकडे पाहत होता . तो मला घाटापर्यंत रस्ता दाखवायला आठवणीने आला . त्याला बोलता येत नव्हते परंतु त्याचा भाव मला कळला . मी जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेले दिसले . मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे डोळे पुसले . त्याच्या अश्रूंचा बांध फुटला .त्याला बोलता येत नव्हते . परंतु त्याला ही एकच भाषा कळत होती .प्रेमाची भाषा . मुका असल्यामुळे सारे जण त्याला हिणवत असणार हे तर उघडच होते . परंतु त्याचे ते हमसून हमसून रडणे पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले . मी त्याची मिठी सोडवली . आणि नर्मदा मातेकडे हात करून तिला मिठी मार ,तीच तुला तारणार आहे असे खुणेनेच त्याला सांगून माझे डोळे पुसत पायांना गती दिली . अत्यंत वेगाने पुढचा मार्ग पकडला . सोबत साक्षात " नर्मदेश्वर महादेव " विराजमान होते !


लेखांक सेहेचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४७ : पिपरहाच्या यतींसोबत साजरी केलेली नर्मदा जयंती अन् आगे शेर है !

महादेव पिपरिया सोडल्यावर लांबच लांब वाळूचा किनारा लागला . त्यामुळे आज पायाखाली इतकी वाळू होती की चालताना दमछाक होत होती . पाणी सर्वत्र उथळ आणि पात्र अति रुंद होते . इथे काही ठिकाणी नर्मदेमध्ये वाळू उपसणारी मोठी मोठी यंत्रे लावलेली दिसतात . यांच्यामुळे नर्मदेच्या पात्राचा आकार काही काळ बदलून जातो .
या चित्रांमध्ये आतपर्यंत घुसलेले जे दिसते आहे ते वाळू उपसण्याचे यंत्र आहे .नर्मदेच्या पात्रात खोलवर जाऊन तिथली वाळू हे बाहेर काढते . नंतर जेसीबी वगैरेच्या साहाय्याने ही वाळू ट्रॅक्टर आणि हायवा मध्ये भरली जाते .
काही परिक्रमावासींचे असे मानणे आहे की नर्मदे काठी किती जरी वाळू असली तरी त्या खालून नर्मदेचा प्रवाह वाहत असतो त्यामुळे वाळू वरती पाऊल ठेवू नये . परंतु अशा पद्धतीने जर वाळू सोडून चालायचे ठरवले तर कधी कधी नर्मदा दीड दोन किलोमीटर दूर जाते . त्यामुळे वाळूचा किनारा आला रे आला की मी कितीही कष्ट होऊ देत परंतु नर्मदा जिथे सुरू होते त्या वाळूच्या किनाऱ्यावरून चालत असे . ही वाळू सकाळी फारच गार पडलेली असते आणि दुपारी फारच तापलेली असते . दोन्ही वेळा तिचा स्पर्श पायाला त्रासदायक असतो . तसेच ती प्रत्येक पावलाला तुमच्या शरीरातली निम्मी ऊर्जा काढून घेत असते . परंतु तरीदेखील आपला दंड नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये बुडत असतो त्यामुळे हे सर्व त्रास फारसे जाणवत नाहीत . कधी कधी असे किनारे वळणावळणाचे असतात त्यामुळे चालणे थोडेसे वाढते . वाढेना चालणे ! आपण थोडी इथे धावण्याची स्पर्धा करायला आलेलो आहोत ! आपण नर्मदा मातेचा अधिकाधिक सहवास घ्यायला आलेले आहोत . याच कारणासाठी सोबत कोणी साथीदार घेऊ नये . कारण तुमचा विचार त्याला किंवा तिला पटेलच असे नाही . एकटा जीव सदाशिव ! 
आणि 
एक निरंजन ! दो सुखी । तीन मे खटपट । चार दुखी ।
ही दोन सूत्रे नेहमी हृदयाशी बाळगावीत !
पायाखाली किती वाळू होती हे कळावे म्हणून आजच्या चालण्याचा नकाशा सोबत जोडतो .
यातील उजव्या हाताचे करंबेश्वर महादेव मंदिर म्हणजेच जबरेश्वर महादेव मंदिर . इथून ते गोकला गावापूर्वीच्या चिनकी घाटापर्यंत नर्मदा एका सरळ रेषेत वाहते त्यामुळे येथे वाळूच वाळू साठलेली आहे . हा संपूर्ण टापू प्रचंड वाळूचा आहे .हे अंतर किमान १५ किलोमीटर तरी आहे . पुढे वळणाजवळ छोटी धुवाधार नावाचा धबधबा असल्यामुळे तेथील पहाड वाळूला अडवतात . आणि एक नैसर्गिक धरण तयार होते .
चालता चालता वाटेमध्ये एके ठिकाणी गुऱ्हाळासाठी  उसाचा रस काढणारे यंत्र दिसले . शेतातच यंत्र लावले होते . त्याने आवाज देऊन रस प्यायला बोलावले . कमंडलू ने कंटाळा येईपर्यंत उसाचा रस प्यायलो ! इथून डाव्या हाताला गरारू गाव होते . थोडे अंतर चालल्यावर छोटासा गरारू घाट लागला . इथे अतिशय प्राचीन किल्ले वजा दोन मंदिरे आहेत . यांना मंदिर म्हणणे धाडसाचे ठरेल इतकी ती भव्य दिव्य आहेत ! यातील एक मंदिर शिवाचे आहे आणि एक मंदिर गरुडाचे आहे . मी आधी गरुडाचे मंदिर पाहिले कारण ते दूर आणि टेकडावर होते . परत येताना शिव मंदिर देखील पाहिले . 
 धुके पसरले आहे ती नर्मदा आहे . गरुड मंदिरातून शिव मंदिर व पलीकडे दिसणारी नर्मदा माई . 
 छोटासा गरारू घाट
 गरुड मंदिर 
 गरुड मंदिरावरून दिसणारे शिवमंदीर आणि नर्मदा मैया
 गरुड मंदिराचा असमान घुमट
हे सर्व बांधकाम पर्शियन शैलीचे होते .त्यामुळे एखाद्या मशिदीचे या मंदिरामध्ये रूपांतर केलेले आहे असे मला फार वाटले .दोन्ही मंदिरे थोड्याफार फरकाने अशीच होती .
 गरुड मंदिराची अभेद्य तटबंदी
 गरुड मंदिरातून दिसणारी नर्मदा माई . हे मंदिर कमी आणि टेहळणी मनोरा अधिक वाटते . .
पुढे मला या दिशेला जायचे आहे .
 शिव मंदिराच्या पायऱ्या
 शिव मंदिरातून दिसणारे गरुड मंदिर
 शिवमंदीर
 बम भोले !
 अजून एक शिवपिंडी
 या परिसरातील १००० वर्षे जुना महा वृक्ष
इथून पुढे काठाने जाताना काही काळ हिरवीगार शेती लागली .
परंतु लवकरच खोल नर्मदा जला पर्यंत पोहोचणारी काटेरी आडवी कुंपणे मार्ग अडवू लागली . अशी कुंपणे आली की मी शक्य असल्यास उडी मारून जात असे . अन्यथा त्यातील एखाद्या नाजूक भागावर आडवे लाकूड ठेवून त्यावर पाय रोवून पुढे जात असे . बरेचदा हे करताना किरकोळ जखमा होत . परंतु त्या चालता चालता बऱ्या  होऊन जात .
काही कुंपणे तर थेट मैया च्या पाण्यामध्ये शिरलेली असत . अशावेळी शांतपणे निरीक्षण केल्यावर एखादा कच्चा दुवा सापडायचा . जागा मालकाने स्वतःला ये जा करण्यासाठी एखादी छोटीशी जागा ठेवलेली असायची जी उचलून बाजूला करता यायची .एकंदरीतच ही कुंपणे परिक्रमेचा काठावरील मार्ग बंद पाडण्यास एक महत्त्वाचे कारण ठरलेली आहेत . 
चालता चालता दुपार झाली . पात्रातून डावीकडे बघितले तर एका टेकाडावर आश्रम आहे असे लक्षात आले . इथे गेल्यावर वातावरण खूपच पवित्र वाटले . इथे एक मोठी यज्ञशाळा लाकडापासून तयार केलेली होती . 
राधारमणदास साधूचा आश्रम आणि यज्ञशाळा
येथे पूर्वी एखादे भव्य मंदिर असावे असे सुचविणारे अवशेष तिथे सर्वत्र विखुरलेले दिसत होते .
एक तरुण साधू पंचाग्नी साधना करीत बसला होता . साधू जीवनामध्ये अतिशय कठीण मानली जाणारी अशी ही साधना आहे . या साधनेमध्ये बारा वर्षे साधूला भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दोन तास स्वतःच्या चहू बाजूने अग्नि प्रज्वलित करून मध्ये तप करत बसावे लागते . वरून सूर्य आग ओकत आहे , आणि चहूबाजूनी अग्नीच्या झळा लागत आहेत अशी ही भयंकर कठोर साधना आहे . 
पंचाग्नी साधना करणारा साधू
कुंभमेळ्यामध्ये पंचाग्नी साधनेला बसलेले साधू .
त्यातील काही साधू तर डोक्यावर देखील निखारा ठेवतात .
भगवत् गीतेतील शीतोष्ण सुख दुःखेषु कूटस्थमचलं धृवं या वाक्याचे शब्दशः जगणे म्हणजे ही साधना !
समर्थ रामदास स्वामींनी हीच साधना थंडगार पाण्यामध्ये तासंतास उभे राहून केली होती .
नर्मदे काठी पंच अग्नी साधना करणारे अनेक साधू मला दिसले . त्या सर्वांना मी मनोभावे साष्टांग नमस्कार करत असे . 
तप या शब्दाचा शब्दशः अर्थ तापणे असा आहे . हे खरोखरीच मोठे तप आहे . त्याने खुणेनेच मला स्वतः स्वयंपाक करून खाण्याची सूचना केली . आश्रम खूप सुंदर होता . इथे एका झाडाच्या पारावर रेवा राम नावाचा आगाऊ म्हातारा बसला होता . 
 रेवाराम बसला होता तो पार आणि मागे स्वयंपाक घर
प्रत्येक गोष्टीची चेष्टा करण्याची त्याला सवय होती . परंतु त्याचा स्वभाव मनमोकळा असल्यामुळे आमची गट्टी जमली . त्याचे वय ८० ते ९० च्या दरम्यान असावे . तो गंमत कशी करायचा काही उदाहरणे सांगतो . तो मला म्हणाला की मी असा विचार केला की चला या साधूला खिचडी करून खाऊ घालू . तर हा बाबा आग पेटवून बसला आहे ! आता मी याला तर खाऊ शकत नाही ! कारण आग पुरेशी लांब आहे ! मग मी विचार केला की कोणीतरी परिक्रमा वासी येऊन आपल्याला खायला घालेल ! 
मी त्याला म्हणालो हरकत नाही मी आपल्यासाठी खिचडी बनवतो ! तो म्हणाला , " नाही नाही ! मी गंमत केली " परंतु तरीदेखील मी दोघांच्या नावाची खिचडी बनवली .
झाडाखाली बसून दोघांनी खिचडी खाल्ली . इतक्यात साधू उठले . ते मौनामध्ये होते . त्यांनी एका यज्ञाचे आयोजन केले होते त्याची आमंत्रणे द्यायला ते निघाले होते , असे मला खुणांनी सांगून ते निघून गेले . मी दुरूनच त्यांना मनोमन साष्टांग नमस्कार केला .या सिद्ध साधूंचे नाव राधारमणदास असे होते . जाताना आज मुक्काम कर असे खाणाखुणांनी मला आवर्जून सांगून गेले . रेवा राम देखील त्यांच्या खाणाखुणा अनुवादित करून मला सांगत होता . परंतु अजून अर्धा दिवस बाकी होता त्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला . रेवा राम फुल गप्पाडदास होता . एखादा स्टॅन्ड अप कॉमेडियन होण्यासाठी लागणारे सर्व गुण त्याच्या ठायी होते . विशेषतः चेहऱ्यावरची एक रेषही न हलू देतात तो ज्या शिताफीने विनोद करायचा ते पाहून हसून हसून माझी पुरेवाट झाली ! उदाहरणार्थ त्याने मला विचारले तुला डुकरीया म्हणजे काय माहिती आहे का ? मी म्हणालो हो !  डुकराची मादी ! तो म्हणाला मला माहितीच होतं . तुम्ही मराठी माणसे इथे फसणार ! इथल्या स्थानिक भाषेमध्ये डुकरा म्हणजे नवरा आणि डुकरिया म्हणजे बायको ! परंतु हे सांगताना त्याचे कायीक हावभाव पाहून मी हसून हसून लोळलो ! मला खरे तर इथे मुक्काम करायला काही हरकत नव्हती .परंतु हा म्हातारा जर तिथे राहिला असता तर माझी हसून हसून वाट लागली असती ! जसे एखादा फलंदाज प्रत्येक चेंडूला षटकार मारतो तसे याचे चालले होते ! प्रत्येक वाक्यावर तो काहीतरी विनोद करायचा ! आमची फ्रिक्वेन्सी चांगली जुळली होती परंतु त्यामुळेच त्याची क्षमा मागून मी सामान उचलले . आणि नर्मदे हर केले ! या घाटाचे नाव बम्होरी घाट होते .
किनाऱ्याने चालू लागलो .
इथे तास दोन तास झाल्यावर मला सामनापूर या गावांमध्ये एक जयपूरचा साधू आणि त्याची आई भेटले .ते दोघे एक छोटीशी खोली घेऊन पांढरी शुभ्र वस्त्र घालून साधना करीत राहिले होते . या दोघांनी मिळून १९५१ ते १९५७ अशी प्रदीर्घ नर्मदा परिक्रमा केली होती .यांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पाजला .त्या काळामध्ये परिक्रमा किती कठीण होती याचे अनुभव देखील सांगितले . पुढे निघालो . सामनापुरापूर्वी मेहगवा घाट नावाचा घाट लागला . इथे तीरथ दास लोधी आणि केशवदासजी त्यागी नावाचे सत्पुरुष भेटले .समोर केरपाणी नावाचे गाव होते .
 मेहगवा घाटावरून दिसणारी नर्मदा माई . अशी झेंडूची झाडी दिसली की ओळखायचे याच्यात मध्येच एखादे गांजाचे झाड आहे .
इथे उजव्या हाताला छोटी धुवाधार नावाचा धबधबा आहे . परंतु त्याचे अस्तित्व नर्मदेच्या पाण्याकडे पाहून जाणवत नव्हते . आता उमरिया गाव पार करून सगुण घाट आणि शेर नदीचा संगम गाठायचा असे माझ्या डोक्यात होते .बऱ्यापैकी अंतर काठाकाठाने चालल्यावर माझ्या कानावर भागवताचे शब्द पडू लागले . बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज अतिशय ताकतीचा होता . (अमरीश पुरी सारखा तो खर्जातला आवाज होता . ) अतिशय अधिकार वाणीने आणि शांतपणे भागवत कथा ते सांगत होते . नर्मदे काठी अतिशय शांतता असल्यामुळे अशा तऱ्हेने स्पीकरवर लावलेले आवाज फार दूरपर्यंत ऐकू जातात . त्या आवाजाने मला वेड लावले . मला तो आवाज ज्या कोणाचा आहे त्या व्यक्तीला बघण्याची इच्छा निर्माण झाली . ती व्यक्ती जे काही ज्ञान सांगत होती ते सर्व अगाध होते . वाणीमध्ये शुद्धता ,स्पष्टता होती . परंतु आवाजाला साधनेची धार होती . तो आवाज कानातून हृदयामध्ये करवत घुसावी तसा चिरत जात होता . मी किनारा सोडून त्या आवाजाच्या रोखाने शेतांमध्ये घुसलो . साधारण अडीच तीन किलोमीटर चालल्यावर पिपरहा नावाचे एक गाव आले . तिथे एका दुकानदाराला मी विचारल्यावर त्याने सांगितले की या रस्त्याने सरळ जा इथे ग्वारी नावाच्या गावात खेरा माई चा घाट आहे तिथे ही कथा चालू आहे . ग्वारी नावाचे हे तिसरे गाव ! मोठमोठे मातीचे ढिगारे कापत रस्ता तयार केला होता . त्या रस्त्याने मी थेट आश्रमामध्ये आलो . इथे एका भव्य सभागृहामध्ये ही भागवत कथा सुरू होती . भागवतकार विचारू लागले . " बताओ सज्जनो । भक्त कैसा होता है ? " त्यांनी हे वाक्य उच्चारायला आणि मी दारात जाऊन उभा रहायला एकच वेळ आली . माझ्याकडे हात करत स्वामीजी म्हणाले , " इसे कहते है भक्त । मैया की भक्ती मे निकल पडे है । ना घर की चिंता । ना खुद से लगाव । " सर्वजण वळून माझ्याकडे पाहू लागले . मला ओशाळल्यागत झाले . इतक्या "स्पेशल अटेंशन " ची सवय गृहस्थी माणसाला नसते . सर्वसामान्य जीवनामध्ये गृहस्थ हा सर्वात दुर्लक्ष करण्यायोग्य प्राणी म्हणूनच ओळखला जातो . याचे कारण त्याचे कर्म असते . स्वतःचे घर ,स्वतःचा संसार ,स्वतःची मुले सोडून जगासाठी , समाजासाठी , देशासाठी ,काही करण्याची इच्छा ,शक्ती ,क्षमता ,हीच तो गमावून बसलेला असतो . तो असतो मात्र एक " कॉमन मॅन " . मी पुढे जाऊन त्या भागवतकरांना नमस्कार केला . ते नुसते भागवतकार नव्हते तर भगवी वस्त्र धारण केलेले एक संन्यासी होते . त्यामुळे मी त्यांना साष्टांग नमस्कार करून "ओम नमो नारायणाय " अशी प्रार्थना केली . ते त्यांच्या आसनाशेजारी खुर्ची लावून बसण्याची सूचना मला करू लागले . परंतु मी नम्रपणे नकार देत खाली लोकांमध्ये जाऊन बसलो . भागवत कथा पुन्हा सुरू झाली . कसा खूपच अप्रतिम होती . एका मोठ्या व्यासपीठावर महाराज बसले होते . तिथे त्या  आश्रमाची त्रिसूत्री लिहिलेली होती .  सेवा सत्संग सुमिरन . कृपया कोणीही काहीही भेट चढवू नये अशी पाटी देखील लावलेली होती . याचा अर्थ संन्यासी महाराज काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आले होते हा त्यांचा सुस्पष्ट हेतू इथे व्यक्त होत होता . या संन्यासी महाराजांचे नाव होते स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी महाराज . सव्वा सहा फूट उंची . गोरापान वर्ण . गरुडा  सारखे बाकदार नाक , क्षौर केलेले .स्वच्छ नीटनेटकी भगवी वस्त्रे परिधान केलेली . चेहऱ्यावर मंद स्मित हास्य .आवाजामध्ये प्रचंड जरब . आणि सर्व काही मुखोद्गत .यांच्याकडे पाहता क्षणी कुठल्याही वयोगटाची कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती लगेच आकृष्ट झाली असती असे चुंबकीय व्यक्तिमत्व होते . ऋषिकेश येथील कैलास आश्रम हे त्यांचे गुरुस्थान . या आश्रमाला अजून नाव दिलेले नव्हते . नुकतेच नवीन बांधकाम झाले होते आणि हा पहिलाच कार्यक्रम तिथे चालू होता . सध्या या आश्रमाचे नामकरण श्रीहरी आश्रम ग्वारी घाट असे झालेले आहे असे नकाशावर दिसते .
श्रीहरी आश्रमाचे छोटी धुवाँधार धबधब्यापासूनचे सानिध्य दाखविणारा नकाशा .
इथे नर्मदेचे पाणी अतिशय शांतपणे परंतु अत्यंत वेगाने वाहत होते . वरून पाहताना नर्मदा शांत वाटायची पण प्रत्यक्षात पाण्याला ओढ खूप होती हे पाण्यात उतरल्यावर समजायचे .नर्मदेपासून काठावर काही शेती होती . तिथून वर उंच मातीच्या कड्यावर पुन्हा शेतजमीन चालू व्हायची तिथे हा आश्रम बांधला होता . 
आश्रमातून दिसणारी छोटी धुवाँधार च्या बाजूची नर्मदा .
याच सभागृहामध्ये भागवत कथा सुरू होती आणि याच दारातून स्वामींनी मला आत मध्ये घेतले
पुढे वाहत जाणारी नर्मदा माई
आश्रमामध्ये स्वामीजींसाठी बांधलेली षटकोनी कुटी . हिला तळघर असून तिथे ध्यान गुंफा आहे .इथे स्वामीजी कोणाला येऊ देत नाहीत . त्यांच्या मूळ पिंड एकांत प्रीय आहे .
स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी
आश्रमातील व्यासपीठ . एका भक्ता सोबत बसलेले स्वामीजी
स्वामींची हरियाणा मध्ये फार मोठी गोशाळा आहे .

हरियाणा येथील सिरसा गावानजीक दडबा कला या गावात श्रीकृष्ण प्रणामी गौशाला नावाची महाराजांची गोशाळा असून तिथे साडेचार हजार पेक्षा अधिक गाई सांभाळलेल्या आहेत .
महाराजांची अखंड भ्रमंती सुरू असते .

साधूच्या वयाचा अंदाज लावता येणे कठीण असते परंतु यांचे वय साधारण ६० च्या आसपास असावे असा मी अंदाज लावला .
स्वामीजी उच्च विद्या विभूषित असून यांना कोणीही कधीही कुठेही सहज भेटू शकते . कुठलाही बडेजाव करत नाहीत . 
भागवत कथा झाल्यावर माझे आसन मी त्याच सभागृहामध्ये एका कोपऱ्यात लावले . स्वामींनी रात्री पुन्हा गप्पा मारण्यासाठी येतो असे सांगितले . आश्रमामध्ये भागवत कथा सुरू असल्यामुळे खूप भक्तजन गोळा झालेले होते . विशेषतः स्वामींचे विविध प्रांतातील शिष्य तिथे उत्सव साजरा करण्याकरता गोळा झाले होते . त्यातील सर्व उत्सुक लोकांनी मला पकडले आणि नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगा म्हणून मागे लागले . हा अनुभव प्रत्येक परिक्रमा वासीला थोड्याफार फरकाने येतोच . अगदी या ब्लॉगचे मूळ देखील हाच प्रश्न आहे . तुमच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला काय अनुभव आले ? तुम्हाला अश्वत्थामा दिसला का ? या दोन प्रश्नांची उत्तरे देऊन घशाला कोरड पडल्यामुळे अखेरीस शेवटचा उपाय म्हणून हा ब्लॉग लिहायला घेतला आहे ! आता कुणी अनुभव विचारले की मी लिंक पाठवतो ! गमतीचा भाग सोडून द्या ! परंतु आमच्या गप्पा बराच वेळ चालल्या . इथे नागपूरचे एक गोव्रती आले होते . ते एका अन्य कार्यक्रमाकरिता मध्य प्रदेश मध्ये आले होते परंतु खास महाराजांना भेटायला इकडे येऊन गेले . यांचे कार्य विदर्भामध्ये खूपच प्रसिद्ध आहे . या आश्रमामध्ये सुद्धा काही सुंदर जातिवंत गायी होत्या . भोपाळ वरून आलेला एक आयटी सेक्टर मधला तरुण होता .याचे नाव आकाश दीक्षित होते . त्याशिवाय दिनेश दीक्षित नावाचे एक विद्वान आणि उच्च विद्या विभूषित गृहस्थ , जे भोपाल जवळच्या पानदेवरी या रायसेन जिल्ह्यातील गावातून आले होते , यांचा माझ्याशी विशेष स्नेह जुळला . दिनेश आपली पत्नी आणि छोटासा मुलगा पार्थ या दोघांना घेऊन आला होता . हा पार्थ शक्यतो कोणाकडे फारसा जात नसे . परंतु मी आल्यापासून तो जो मला चिकटला तो सोडेचना ! आई-वडिलांकडे सुद्धा जायला नाही म्हणू लागला ! त्याला माझ्यासारखे बनायचे होते ! त्यामुळे तो माझ्या मागे लागला की तुम्ही मला सुद्धा फेटा नेसवा ! इतक्यात तो पळत गेला आणि त्याच्या आईचा दुपट्टा घेऊन आला . मला म्हणाला याचा फेटा मला नेसवा ! मग त्या बालहट्टा पायी मी त्याला सुंदर असा फेटा नेसवला ! गंमत म्हणजे रात्री सुद्धा तो आई-वडिलांकडे झोपायला गेला नाही तर माझ्याच अंथरुणावर झोपला ! अखेर त्याचा डोळा लागल्यावर वडिलांनी उचलून नेले ! नर्मदा परिक्रमा करताना आपले मन निर्विचार झालेले असते . त्यामुळे मुलांच्या संवेदनशील मेंदूला फारशा मुंग्या येणारे विचार जाणवत नाहीत .त्यामुळे ते परिक्रमावासीकडे आकृष्ट होत असावेत . पार्थच्या वडिलांनी आमचा एक फोटो काढला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तोच हा प्रसंग ! 
 भोपाळ येथील छोटा नर्मदा भक्त पार्थ आकाश दीक्षित आणि प्रस्तुत लेखक .मागे दिसणाऱ्या व्यासपीठावरच महाराजांची कथा चालली होती .
तीन वर्षाचा पार्थ आणि त्याने आवर्जून डोक्यावर बांधून घेतलेला फेटा

इथे तात्पुरते संडास बाथरूम बांधण्यात आले होते . त्यामुळे मी माझे सर्व कपडे इथे धुऊन घेतले . साधारण दोन दिवसांनी कपडे धुतले जायचे . रात्रभर दोरीवर आणि नंतर अंगावर किंवा पाठीमागच्या झोळीवर टाकून वाळवायचो . संध्याकाळी स्नानासाठी खाली नर्मदेवर गेलो . वेगवान प्रवाहात मनसोक्त स्नान केले . वरवर पाहता पाणी शांत दिसायचे परंतु आतून खूप गती होती . इथे शेजारीच एका साधूची कुटी होती . हे महाराज गावात आल्यापासून साधूकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते . त्यामुळे हा त्या महाराजांविषयी फार काही सकारात्मक बोलत नव्हता . परंतु मी त्याची समजूत काढली आणि महाराजांच्या मोठ्या कार्यामध्ये सामील होण्यासाठी त्याला विनविले . महाराजांच्या एका शब्दाखातर त्यांच्या एका भक्ताने ती सर्व जमीन त्यांना विकत घेऊन आश्रम बांधून दिला होता . शिवाय जमीन आणि आश्रम महाराजांच्या नावावर देखील केला होता . महाराजांच्या नावावर म्हणजे त्यांच्या गुरूंच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या नावावर .  तिवारी नामक एका अतिशय भाविक भक्ताने भागवत सप्ताहाच्या संपूर्ण आयोजनाचा खर्च उचलला होता तो व त्याची श्रद्धावान पत्नी दोघे मिळून सर्वांची आस्थेने विचारपूस करत होते . महाराजांच्या पूर्वाश्रमीचे काही नातेवाईक देखील इथे मुक्कामी आलेले मला दिसले . महाराज मात्र त्यांच्यामध्ये फारसा रस घेत नव्हते . अगदी महाराजांच्या मातोश्री देखील आल्या आहेत असे मला कळाले . परंतु महाराजांच्या वागण्यातून त्यांचे पूर्वाश्रमाचे नातेवाईक कोण आहेत याचा काही अंदाज येत नव्हता . इतकी तटस्थता त्यांनी साधली होती . इथे मोठी च जेवणावळ झाली . मला मोठ मोठ्या उत्सवांमध्ये गतीने वाढण्याची चांगली सवय आहे . त्यामुळे मी पहिल्या काही पंगती वाढून घेतल्या . शेवटी जेवायला बसलो . आश्रमा मधील पडेल ते काम मी करू लागलो . भांडी घासायला मदत केली . सभागृह स्वच्छ केले . सतरंज्या जाजम वगैरे झटकून आणले . महाराज हे सर्व पाहत होते . रात्री ते गप्पा मारायला आले . त्यांनी बराच वेळ गहन विषयांवर शास्त्र चर्चा केली . मी पूर्णवेळ फक्त श्रवण भक्ती केली .  महाराजांनी मला सांगितले ,उद्या आमच्या कथेचा शेवटचा दिवस आहे . तसेच नर्मदा जयंतीचा उत्सव आणि हवन देखील आहे तरी हे कार्यक्रम चुकवून पुढे जाऊ नये . काहीही करून उद्याचा एक दिवस मुक्काम वाढवावा . संपूर्ण परिक्रमेमध्ये मी एका रात्री शिवाय अधिक कोठे मुक्काम केला नव्हता . परंतु महाराजांच्या आज्ञार्थक विनंती पुढे माझा निरुपाय झाला . रात्री अंग टाकणार इतक्यात एका ट्रॅक्टर मध्ये मागे ट्रॉलीमध्ये बसून गावातील म्हाताऱ्या कोताऱ्या भजनासाठी आल्या ! मग काय ! मी लगेच उठून त्यांच्या भजनामध्ये सामील झालो ! भजनातला आनंद काही वेगळाच आहे !
माझे वडील भजनामध्ये तबला वाजवायचे .ते लहानपणापासून मला भजनाला घेऊन जायचे . त्यांचे मित्र श्री प्रकाश नातू म्हणून एक होते त्यांनी मला भजनाची प्रारंभिक ओळख करून दिली . हरिभक्तीपरायण साष्टे बाबा यांनी मला भजनाची गोडी लावली . त्यानंतर हरिभक्तीपरायण रायबा मालुसरे यांनी देखील माझ्या भजनाच्या आवडीला प्रोत्साहन दिले .
हभप रामचंद्र बुवा भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणी काही कीर्तने देखील केली . 
 आयुष्यातील प्रथम कीर्तन झाल्यावर प्रस्तुत लेखक वय १० वर्षे
यावर कडी केली ती परम आदरणीय भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांचे स्वीय टाळ वादक श्री माऊली टाकळकर यांनी . हे मला नित्य त्यांच्या सोबत भजनाला घेऊन जात . त्यांचे भजन अतिशय तालासुरात असायचे . त्यामुळे तिथे मुक्त प्रवेश नव्हता . त्यांच्या सायकलच्या नळीवर बसवून ते मला सगळीकडे घेऊन जात ! माऊलींच्या कृपेने मला पंडितजींचा काही काळ सहवास देखील तरुण वयात लाभला . 
भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांच्या समवेत प्रस्तुत लेखक (साल साधारण १९९९ - २००० )
प्रस्तुत लेखकावर ताल संस्कार करणारे दोन गुरुवर्य . तालयोगी श्री संजय करंदीकर आणि ह भ प माऊली टाकळकर . 
योग्य वयात अशा दिग्गजांनी भजनाचे संस्कार केलेले असल्यामुळे ती आवड आयुष्यभर टिकली . पुढे भजन सम्राट पंडित अजित कडकडे किंवा संगीतकार यशवंत देव यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील तालवाद्यांची साथ संगत करण्याची संधी प्रस्तुत लेखकाला मिळाली . 
संगीतकार यशवंत देव यांच्या समवेत त्यांचा वादक चमू .
प्रस्तुत लेखक त्यांच्या उजव्या हाताला पायाशी बसला आहे .
महाविद्यालयीन जीवनात हौसेखातर तलावाद्यांची साथ संगत करताना प्रस्तुत लेखक .
लहानपणी एका मंदिरात भजन करीत बसलेला प्रस्तुत लेखक
हातामध्ये विणा किंवा एकतारी आणि समोर सगुण रुपात देव असेल की भजनाला बहार येते ! 
वरील सर्व माहिती मी वाचकांना केवळ याच कारणासाठी देत आहे की आपल्याला त्यातून आपल्या मुलांना भजनाची आवड निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी . भजनाची आवड अशी एका दिवसात येऊ शकत नाही हेच मला सांगायचे आहे . बहुतांश वेळा भजन चालू झाले की वैतागून उठून जाणारे परिक्रमा वासी मी पाहिले आहेत . तसेच तुम्हाला सहजासहजी कुणी त्यांच्या भजनामध्ये सहभागी करून घेऊ शकत नाही . त्यासाठी तुम्हाला तालाचे , सुराचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भजनाच्या भावाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे . त्यासाठी अखंड श्रवणाला पर्याय नाही . त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आजच भजनाची गोडी लावा . ती आयुष्यभर कामाला येते .विशेषतः म्हातारपणी कामाला येते .
जो उदात्त वारसा आपल्याला मागच्या पिढीने दिला ...
तो आपण पुढच्या पिढीला दिलाच पाहिजे ...

 पुढे मात्र मी संगीत क्षेत्रात वाहवत जाऊ शकतो असे जाणवल्यावर मी त्याचा नाद पूर्णपणे सोडला तो आजतागायत .आता मी फक्त देवाच्या भजना पुरते तोडके मोडके संगीत वापरतो. असो .  मी त्या महिलांच्या भजनामध्ये असाच तोडका मोडका ढोलक वाजवू लागलो . कोणीतरी अन्य मनुष्य भजनकर्यांमध्ये आला की त्यांना अजून जोश चढतो तसे काहीसे झाले . रात्री अडीच वाजेपर्यंत भजन चालले . सर्व माताराम खुश झाल्या आणि मला आशीर्वाद देऊन निघून गेल्या . मी पाठ टेकली . दरम्यान अजून काही परिक्रमा वासी आलेले मला दिसले . पहाटे लवकर उठून मी बाहेर आलो . इथे नर्मदेच्या बाजूला महाराजांनी एक धोकादायक जिना खोदून फक्त नर्मदा दिसेल अशी ध्यान गुफा तयार केलेली आहे . तिच्यामध्ये जाऊन बसलो . इथे खूपच जबरदस्त वाटत होते ! इथली स्पंदने फार भारी होती .
हीच ती ध्यान गुफा . मी बसलो तेव्हा देखील समोर असेच घनदाट धुके होते .
 थोड्या वेळाने उजाडल्यावर खाली नर्मदा स्नानासाठी गेलो . एका दगडावर कपडे काढून ठेवले आणि पाण्यामध्ये उतरलो . माझ्या मागोमाग आकाश दीक्षित देखील आला . मी पाण्यात उतरून स्नान कुठे करायचे याचा अंदाज घेत होतो . त्याने माझे फोटो काढायला सुरुवात केली . तसेच त्याने मी केलेल्या स्नानाचा एक छोटासा व्हिडिओ देखील घेतला . नंतर त्याने हा सर्व डेटा मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . आपल्या माहिती करता ते फोटो खाली देत आहे .
सुंदर पहाटे नर्मदा मातेच्या दर्शनाचा आणि स्पर्शाचा अनुभव येणारा प्रस्तुत लेखक . हा नर्मदा जयंतीचा दिवस आहे हे विशेष !
महादेव पिपरिया येथे मला हनुमत सिंह घोषी यांच्याकडून मिळालेली नर्मदा मैया ठेवण्याची मांजरपाठाची पांढरी पिशवी खांद्याला लटकवलेली दिसत आहे . पाणी प्रचंड गार होते . बाहेर देखील चांगलीच थंडी होती .
अखेर हिम्मत करून मी अजून खोल पाण्यामध्ये गेलो आणि स्नानाला सुरुवात केली . अशा थंड पाण्यामध्ये स्नान म्हणजे सूर्याला अर्घ्य देऊन केवळ तीन डुबक्या मारणे आणि बाहेर येणे .

आज माघ शुद्ध सप्तमी होती . नर्मदा मातेचा प्रकट दिन ! त्यानिमित्त सकाळी महाराजांनी हवन ठेवले होते आणि त्यानंतर आश्रमामध्ये मोठा भंडारा ठेवला होता .  पिवळ्या रंगाचे कपडे घातलेला एक तरुण साधू महाराजांना मदत करायचा . परंतु त्याला सर्व ताण झेपवत नव्हता असे मला वाटले . त्यामुळे मी देखील स्वयंपाकापासून पंगती वाढण्यापर्यंत प्रत्येक कामामध्ये सहभागी झालो . विशेषतः हलक्याफुलक्या थर्माकोलच्या पत्रावळी उडून नर्मदेमध्ये जाऊ नयेत म्हणून त्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम मी स्वतः वरती घेतले . स्वामी मला म्हणाले की परिक्रमा झाल्यावर इथे येऊन रहा आणि मग आपण आश्रमामध्ये काही सुधारणा करू . त्यांनी स्वतः संपूर्ण परिसर मला फिरवून दाखवला . अगदी त्यांची षटकोनी कुटी देखील त्यांनी मला आत मध्ये नेऊन तळघरापर्यंत नेऊन दाखवली . तळघरामध्ये ते साधनेसाठी बसत असत . जसे स्वयंपाक घर हा त्या स्त्रीच्या मनाचा आरसा असतो त्याप्रमाणे साधूची कुटी हा त्याच्या मनाचा आरसा असतो . जितके मन साधे ,सरळ , स्वच्छ तितकी कुटी साफसूफ आणि मोकळी असते . यांची कुटी तशी होती . स्वामींच्या भक्त परिवारामध्ये स्वामी नामक एक शिष्य होता . तो बराच वेळ माझ्यासोबत फिरत होता . डॉक्टर तिवारी नावाचे एक विद्वान गृहस्थ होते . शुक्ल म्हणून एक सज्जन होते . अवधेश नावाचा एक उत्साही तरुण होता . एकंदरीत सर्व चमू छान होता . यांना माझी गरज पडणार नाही अशी परिस्थिती होती !  नर्मदा जयंतीच्या निमित्ताने सुरेख याग झाला . यज्ञकुंड तयार करण्यापासून प्रत्येक कामात माझा सहभाग राहिला . खूप काही शिकायला मिळाले . सर्व भक्तांनी मिळून मला यज्ञकुंडाच्या समोर स्वामींच्या शेजारी बसविले .  नेमक्या अग्नीच्या ज्वाला माझ्याच दिशेने येत राहिल्या . मी शांतचित्ताने पंचाग्नी साधना करणाऱ्या साधूचे स्मरण करत ती धग सहन केली .  थंडी किंवा उष्णता या गोष्टी मनातून वाटणाऱ्या असतात . त्यांना मनातून काढून टाकले की त्यात त्रास देत नाहीत . इतक्यात यागाची एक मोठी ठिणगी उडून माझी छाटी थोडीशी जळाली आणि मांडीला चटका बसला ! हे पाहता क्षणी अतिशय सकारात्मक विचारसरणी असलेले स्वामीजी मला म्हणाले ! वा साक्षात अग्निदेवांनी येऊन तुझ्या मांडीवर थाप दिले की रे ! भाग्यवान आहेस ! अग्नि देवाचा प्रसाद मिळाला .तुझा याग सफल झाला ! मी मनात विचार केला अग्नी देवाने मिठी नाही मारली ते बरे झाले !  भोजने झाल्याबरोबर भागवत सप्ताह सुरू झाला . भागवत सप्ताह संपल्या संपल्या सर्वजण भजन करीत नर्मदे काठी गेले . आता इथे नर्मदा मातेची पूजा करायची ,तिची साडी चोळीने ओटी भरायची , तिच्यामध्ये दीप प्रदान अर्थात दिवे सोडायचे आणि आरती , नर्मदाष्टक तसेच नर्मदा चालीसा म्हणायचे असे ठरले होते . भजनाचा माइक आणि स्पीकर स्वामीजींनी माझ्या हातात दिला . नर्मदा मातेचा गजर आणि जयजयकार करत आम्ही सर्वजण खाली घाटावर गेलो . 
स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पिपरहा गावातील खेरामाई घाटावर नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा पूजनासाठी जमलेले भाविक गण . मग शुद्ध सप्तमी आंग्ल दिनांक सात फेब्रुवारी २०२२ . स्वामींच्या शेजारी फेटा घातलेला प्रस्तुत लेखक दिसत आहे .

मी गुडघाभर पाण्यामध्ये उतरून उभा राहिलो . माइक वर खणखणीत आवाजात नर्मदा मातेची आरती नर्मदाष्टक आणि नर्मदा चालीसा म्हटली . माता-भगिनी नर्मदा जलामध्ये दिवे सोडत होत्या ! ते दृश्य मोठे मनोहर होते ! साडीचोळी अर्पण करून नर्मदा मातेची पूजा करण्यात आली . स्वामीजींनी मला देखील आरती ओवाळायला दिली . मला सोडायला दिवे देखील त्यांनी दिले . अशा रीतीने नर्मदेमध्ये दिवे सोडण्याची माझी इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली ! एकंदरीत ते वातावरण भारावलेले होते . नर्मदा मातेची स्तुती करताना कंठ भरून येत होता . एरवी इतरांचे ऐकून तिचे गुणगान करणे वेगळे आणि आता इतके अनुभव गाठीशी आल्यावर तिचा जयजयकार करणे यात फार मोठा फरक होता .


वरील व्हिडिओमध्ये काय काय पाहाल ? नर्मदेचे शांत दिव्य स्वरूप ! सुंदर मिणमिणणारे दिवे ! लोकांनी प्रवाहित केलेले नारळ गोळा करणारे डोंगावाले अर्थात नावाडी . उपस्थित जनसमुदाय . भगव्या वस्त्रा मध्ये आरती करणारे स्वामीजी . त्यांच्या उजव्या हाताला फेटा बांधून माईक हातात घेऊन उभा असलेला प्रस्तुत लेखक . नर्मदे प्रती जनसमुदायाचा भाव .

तो दिवस फार अविस्मरणीय आणि अप्रतिम होता . नर्मदा मातेने अशा रीतीने नर्मदा जयंती अतिशय शांतपणे साजरी करवून घेतली ! रात्री छान सत्संग झाला . स्वामीजी जेवायला मला सोबत घेऊन बसत आणि त्यांच्या ताटातील सर्व पदार्थ मलाही देत . तिथल्या मायेमध्ये फार काळ अडकणे चांगले नव्हते . नर्मदा जयंती देखील झालेली होती त्यामुळे मी तिथून पहाटे उठून गुपचूप निघालो . परंतु तिवारी काकांनी मला पाहिले व ते आले .त्यांनी मला एक उंची तलम धोतर व पाचशे रुपये दक्षिणा दिली .
स्वामीजींचे एक यूट्यूब चैनल मला सापडले . ते पाहिल्यावर असे लक्षात आले की सध्या स्वामीजी नर्मदा परिक्रमा करत आहेत . या परिक्रमेमध्ये त्यांचे समाजकार्य सुरूच आहे ! वाटेत भेटणाऱ्या युवकांचे व्यसन ते सोडवत आहेत . त्याची काही उदाहरणे .




 डॉक्टर तिवारी आणि शुक्ला मला सोडायला बरेच अंतर आले . हे गुरांचे डॉक्टर होते व अतिशय विद्वान होते . दोघे वळले आणि जोरात पाऊस सुरू झाला ! कालच स्वामींची आणि माझी चर्चा झाली होती की कुठलाही यज्ञ यशस्वी झाला की त्याचे फलस्वरूप थोडा तरी पाऊस पडतो . तसा तो पडला .त्या पावसाने मी उभा आडवा भिजलो . पायाखालच्या चिकट चिखलामुळे माझे बूट फाटले व एकंदर अवस्था वाईट झाली . जवळच असलेल्या सगुण घाटावर जाईपर्यंत सर्व सामान भिजून गेले होते . इतक्यात एक छोटा मुलगा तिकडे आला आणि म्हणाला , "बाबाजी बचके रहना ! संभल के जाना !आगे शेर है ! " मला त्याचा राग आला . आधीच पावसाने भिजवलेले आणि त्यात याची ही थट्टा मस्करी . तो पळून गेला आणि जाताना "सच मे आगे शेर है । " असे ओरडू लागला ! एखाद्याची चेष्टा कधी कुठे व किती करावी याला काही मर्यादा आहे की नाही ?  पुढे एक खोल नदी आडवी आली . दूरवर एक माणूस ती नदी पार होताना दिसला . तिथपर्यंत जाणे अशक्य होते कारण चिखलाचा उतार होता . इतक्यात एक बगळा उडत उडत आला आणि तो माझ्यासमोर नदीमध्ये उतरला आणि वाळूतून चालत पलीकडे गेला .त्या बगळ्या कडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की इथे नदी उथळ आहे . थोडा चिखल अधिक होता परंतु कसाबसा गुडघ्याएवढ्या पाण्यातून पार झालो . बगळा उडून गेला . 

माझ्या आदल्या दिवशी नावेची वाट पाहत उभे असलेले परिक्रमा वासी . बहुतांश परिक्रमा वासी शक्यतो शेर नदी नावेतून पार करतात .
वरील नकाशा बारकाईने पाहिल्यावर जिथे शेर नदी नर्मदेला मिळते तिथे वाळूचा एक छोटासा ढिगारा तयार झाल्याचे दिसते .  त्याच्यावरून बगळ्याने मला मार्ग दाखविला .
पलीकडे गेल्या गेल्या एक मोठी जॅकवेल ,एक झोपडी आणि हनुमंताचे मंदिर दिसले . सर्व सामान झोपडी मध्ये वाळत टाकले आणि पडून राहिलो . पाऊस काही थांबायचं नाव घेईना . मंदिर बंद होते . स्वामीजींनी मला काही पुस्तके सोबत दिली होती . पडल्या पडल्या मी ती पुस्तके वाचू लागलो . इतक्यात तिथली व्यवस्था पाहणारा एक साधू आला आणि त्याने मला मंदीर उघडून आत बसायला सांगितले . त्याने बालभोग खायला आणून दिला . बाल भोग म्हणजे नाष्टा किंवा अल्पोपाहार. पाऊस उघडला होता . नर्मदा जयंती साठी केलेली विद्युत रोषणाई उतरवण्याचे काम साधू करत होता . मी त्याला मदत केली . शिडी पकडणे . काढलेल्या माळा गुंडाळून ठेवणे . कर्णे उतरविणे . विद्युत सामानाचे वर्गीकरण करून ठेवणे अशी मदत मी त्याला केली . आणि नर्मदे हर करून पुढे निघालो . इतक्यात मला एक शंका आली म्हणून मी मागे वळलो आणि त्या साधूला दुरूनच ओरडून विचारले ' ," बाबाजी इस नदी का नाम क्या है ? " साधू स्वच्छतेसाठी कळसावर चढला होता . तिथून तो ओरडला
 ," शेर नदी ! "


लेखांक सत्तेचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४८ : सतधारा , सूर्यकुंड आणि परमपवित्र बर्मान घाट

 शेर संगम घाटाचे नाव ग्वारी घाट असेच आहे . या ग्वारी घाटावर नर्मदा मातेला खूप मोठी साडी नेसवली होती . या काठावरून त्या काठावर मोठी केबल ताणून बांधलेली असते .त्यावर अग्निबाण लावून साडी सोडली जाते . पूर्वी धनुष्यबाणाने साडी सोडली जायची .

रेवा नावाच्या गुजराती चित्रपटामध्ये माहेश्वर घाटावर चित्रित झालेले नर्मदेला साडी नेसवण्याचे अलौकिक दृश्य

 काही ठिकाणी नावेने देखील साडी पलीकडे नेली जाते . या साडी नेसविण्याच्या विधीची छायाचित्रं वाचकांसाठी सोबत जोडत आहे .हा विधी खरोखरच बघण्यासारखा असतो .
माझ्या आधी तिथून काही परिक्रमा वासी गेले होते त्यांनी हे फोटो काढले होते . आत्ता त्यांच्याकडून मला ते प्राप्त झाले .  शेर संगम  घाटावर नर्मदा मातेच्या जयंती चा सुरू असलेला उत्सव . मी साधूला याच माळा काढण्यासाठी मदत केली होती . 
नर्मदा मातेला नेसविण्यात येणारी लांबच लांब साडी
पुढे पुढे पात्राची रुंदी जशी वाढत जाईल तसतशा साड्या देखील मोठ्या होत जातात . परंतु प्रत्यक्ष साडी नेसवलीच जाते .

अमरकंटकच्या जंगलामध्ये रामकुटी येथे नर्मदा मातेला नेसविलेली एकच पाचवारी साडी आपल्या स्मरणात असेलच ! तीच नर्मदा आता पहा किती मोठी झाली आहे !
होय !हे नर्मदा मातेचेच पात्र आहे !

नर्मदा मातेला साडी नेसवीतानाचा व्हिडिओ पश्चिम बंगाल येथून आलेल्या सात्यकी रॉय या परिक्रमावासीने घेतला होता तो इथे पहावा .

या भागातील नर्मदेचा काठ खूपच सुंदर आहे . हिरवीगार शेते ,सुखद गारवा आणि मधोमध वाहणारी हिरव्यागार रंगाची नर्मदा मैया . माझ्या आधी इथून गेलेल्या एका परिक्रमावसीने काढलेली काही चित्रे आपल्या माहिती करता देत आहे . पश्चिम बंगाल मधून आलेला हा युवक परिभ्रमण करत होता . त्याने काढलेली ही चित्रे आहेत .
नर्मदे काठी बहुतांश मार्ग असे शेतातून जातात . असा एक मार्ग शेतकऱ्याने मोकळा ठेवला तरी पुरेसे आहे .
विशेषतः दोन्ही बाजूने नर्मदा हिरवीगार असल्यामुळे डोळ्यांना फारच सुखावणारे असे दृश्य असते . 
कधी शेते ,कधी झाडेझुडपे कधी छोटीशी जंगले असा हा सर्व परिसर आहे .
मध्ये मध्ये वाळूचे किनारे तर नर्मदे काठी सर्वत्र असतात . ही वाळू इतकी सुंदर आणि वस्त्रगाळ आहे की समुद्रकिनारी देखील इतकी सुंदर वाळू मिळणार नाही ! 
मध्येच एखादा नावाडी , कोळी तेवढे दिसायचे .
नर्मदेची रुपे अशी क्षणाक्षणाला पालटत होती . शांत वालुकामय प्रवाह सोडून आता तिने हळूहळू खडकाळ स्वरूप धारण केले होते . हे मोठमोठाले खडक फोडून नर्मदा पुढे गेली कशी असेल हेही एक कोडेच आहे ! तिला प्रारंभिक मार्ग तिचे पिताश्री महादेवांनी करून दिला असावा असा माझा भाबडा कयास आहे ! 
इथे एका ठिकाणी मी सुमारे १०० पाणकावळे (इंडियन शॅग ) समूहाने शिकार करताना पाहिले ! अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचे काम चालले होते . इथे पाण्याला अचानक गती येते . त्या गतीचा वापर करत सर्वजण एकदम उडायचे आणि अचानक पाण्यामध्ये शिरल्यावर माशांची  धावपळ व्हायची . नेमक्या या क्षणाचा वापर करून उरलेले कावळे पाण्यात सूर मारून शिकार करायचे . थोड्यावेळाने ते फील्डिंग लावायचे आणि मघाचे उपाशी पाणकावळे शिकार करायचे ! मी बराच वेळ त्यांची ही गंमत पाहत होतो . एखाद्या शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे त्यांचा हा कार्यक्रम चालू होता .
 पाणकावळ्यांचा समूह
जसजसा नर्मदेच्या पात्राचा आकार वाढत जातो तसं तसे तिची वेगवेगळी भौगोलिक रुपे सुद्धा बघायला मिळतात . आता हळूहळू मध्ये आपल्याला छोटी मोठी बेटे दिसू लागतात . ही बेटे म्हणजे एक स्वतंत्र जीव संस्था आहे . कारण त्याच्या चहुबाजूने नर्मदा वाहत असते . त्यामुळे फारसा मानवी वावर तिथे नसतो . तिथले अरण्य हे अधिक घनदाट आणि तजेलदार वाटते . कारण तिथे कुणी लाकडे तोडायला जात नाही . किंवा चारा कापायला जात नाही . सुमारे नऊ दहा किलोमीटर अंतर चालल्यावर असेच एक बेट नर्मदेमध्ये दिसू लागले . आता सर्वत्र खडकच खडक लागला . एका अतिशय भव्य खडकाला पार करून नर्मदा येथे वाहत होती .
खडकांमधून वाहणारी नर्मदा माई
या वळणावर एक आश्रम लागला .
मा गौरी शारदा घाट नावाच्या या घाटाला आणि आश्रमाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे पुलाकडे निघालो .
समोरच्या किनाऱ्यावर दिसणारा एकच अखंड खडक जो आहे त्यावरून मी चालत होतो .
इथे नर्मदेमध्ये खूप सारे दगड गोटे आढळतात .

इथे नर्मदा खडकांमुळे सात छोट्या छोट्या धारांमध्ये विभागली जाऊन वाहते म्हणून या स्थानाला सप्तधारा किंवा सतधारा असे म्हणतात .मी पूर्वीच सांगितले त्याप्रमाणे मध्य प्रदेशातील लोक स चा उच्चार श असा करत असल्यामुळे याला इथले स्थानिक लोक शतधारा असेच म्हणतात . परंतु प्रत्यक्षामध्ये सात धारा आपल्याला मोजता येतील इतक्या स्पष्टपणे दिसतात .इथे नर्मदे काठी अतिशय सुंदर असे दोन पूल आहेत . आणि पुढे नर्मदे काठचा सर्वात पवित्र मानला जाणारा बर्मान घाट आहे . 
या दोन पुलांपैकी जुना पूल खूप सुंदर आहे
इथे खडकाचे प्रस्तर खचून तिरके होऊन नर्मदेला मार्ग तयार झाल्याचे स्पष्ट दिसते .
पुलावरून दिसणारे घाटाचे दृश्य
इथेच खडकामुळे सात धारा तयार झालेल्या स्पष्ट दिसतात .हे तीर्थक्षेत्र पवित्र असल्यामुळे स्नानासाठी सदैव गर्दी असते .
नर्मदे काठी विशेष पौराणिक महत्त्व असलेली काही ठिकाणे आहेत . त्यातील हा एक महत्त्वाचा घाट .
 ब्रम्हदेवाने तपस्या केली म्हणून या घाटाचे नाव ब्रम्ह घाट . किंवा ब्रम्हा घाट . अथवा ब्रह्मांड घाट . ब्रम्हदेश शब्दाचा जसा अपभ्रंश होऊन तो बर्मा झाला तसे या ब्रह्मा घाटाचा अपभ्रंश होऊन तो बर्मान घाट झाला आहे . पुलाच्या अलीकडे एक छोटे बेट आहे . आणि पलीकडे मोठे बेट आहे ज्यावर ब्रह्मदेवाने तपस्या केली . त्यामुळे दोन्ही बाजूला बर्मान घाटच आहे . असे फार कमी ठिकाणी नर्मदेवर होते . समोरासमोरच्या दोन्ही घाटांची नावे शक्यतो वेगळी असतात .आता त्या बेटावर मोठे मंदिर आणि मारुतीची मूर्ती बसवलेली आहे . नर्मदेची जी शाखा डावीकडे वळते तिला सूर्यकुंड असे म्हणतात व ते अतिशय पवित्र कुंड आहे . इथे स्नान करण्यासाठी सदैव गर्दी असते . या घाटावर कायमच लोकांची झुंबड उडालेली दिसते .
वरील नकाशा पाहिल्यावर तुम्हाला या भागातील भूगोलाची स्पष्ट कल्पना येईल . या नकाशात नर्मदा खालून वरच्या दिशेला वाहत आहे . सुरुवातीला अंतरिक्ष नावाचे छोटेसे बेट आहे त्यानंतर दोन पूल आहेत . इथेच सप्तधारा दिसते आहे .त्याच्यापुढे ब्रह्मदेवाची तपोभूमी असलेले मोठे बेट दिसते आहे .प्रचंड वाळू पासून हे बेट तयार झालेले आहे . या बेटाच्या डावीकडून जी शाखा जाते ते गोलाकार सूर्यकुंड दिसते आहे . या मोठ्या बेटाच्या आजूबाजूच्या प्रत्येक घाटाला बर्मान घाट असेच नाव आहे . वरती अगदी शेवटी पुन्हा एक छोटासा पुल नर्मदेवर दिसतो आहे . यातला बर्मान नया पुल म्हणजे काश्मीर कन्याकुमारी महामार्ग आहे . अर्थात भौगोलिक दृष्ट्या देखील हा घाट महत्त्वाचाच आहे .

 सप्तधारे जवळील पुलाच्या इथे एक सुंदर आश्रम आहे . गोवंश कल्याण आश्रम चौगान किला असे या आश्रमाचे नाव आहे . ब्रह्मलीन संत विश्वंभरदास त्यागी जी महाराजनामक एका संतांनी इथे नर्मदा जयंतीला १०८ यज्ञ करण्याची परंपरा सुरू केली आहे . त्यांची शिष्या असलेली श्यामा दीदी नावाची एक तेजस्वी आणि तपस्विनी साध्वी ही परंपरा पुढे चालवीत आहे . मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा तिथे यज्ञ सुरूच होते . यज्ञासाठी हजारो लोक तिथे जमले होते . एक अतिशय भव्य दिव्य यज्ञशाळा बनविण्यात आली होती . मोठमोठे मांडव घालून त्यामध्ये लोक बसले होते . आश्रमामध्ये साध्वी शामादीदी तिच्या धुनी पुढे गादीवर बसलेली होती . तिच्यासमोर अनेक साधुसंत येऊन बसत होते .गप्पा मारत होते . काही येत जात होते . मी आश्रमामध्ये सामान ठेवले . सूर्यकुंडावर जाऊन भर गर्दीमध्ये स्नान करून आलो . इथले पाणी फारच घाणेरडे होते . एका जागी साचलेले पाणी व त्यामध्ये हजारो लोक अंघोळ करत आहेत , कचरा टाकत आहेत असे दृश्य होते . परंतु कुठलाही विचार न करता मी तीन डुबक्या मारून स्नान करून वरती आलो . व तिथून तडक बाहेर निघालो व गर्दीपासून थोडे दूर बाजूला येऊन अंग पुसले . इथे बडोद्याचा एक परिक्रमावासी मुलगा कोणालातरी शोधतो आहे असे मला दिसले . इतक्यात त्याचे सहकारी देखील आले . अवधूत नावाचा वापी इथला एक तरुण मुलगा यांच्यामध्ये होता . याने युट्युब वर चॅनल चालू केले होते आणि तो लोकांच्या मुलाखती घेत असे . तो मला नर्मदेच्या बाजूला घेऊन गेला आणि त्याने माझी छोटीशी मुलाखत घेतली . पुढे त्याने ती युट्युब वर टाकली का नाही याचा काही तपास मला लागला नाही . तिथून मी निघालो आणि आधी यज्ञ शाळेमध्ये जाऊन यज्ञ नारायणाचे दर्शन घेऊन आलो . 
अतिशय सुंदर व भव्य दिव्य सात मजली यज्ञशाळा बनविण्यात आली होती . आत मध्ये एकाच वेळी १०८ दांपत्ये बसून यज्ञ करत होती . एक पुजारी माईकवर मंत्र सांगत होता . प्रत्येक यज्ञकुंडासमोर एक एक सहकारी पंडित बसलेला होता . सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध सुरू होता
संत श्री विश्वंभर दास त्यागी जी  महाराज . यांनीच ही यज्ञ परंपरा येथे सुरू केली .
आश्रमातील महाराजांची प्रतिमा आणि घातलेले मोठे मांडव , शामियाने
आपल्या धूनी पुढे बसून साधू संतांशी चर्चा करणाऱ्या साध्वी श्यामा दीदी .
या चित्रामध्ये भगवी लुंगी घालून मनुष्य बसला आहे बरोबर त्याच जागी श्यामा दीदींनी मला बसविले आणि माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या .
आश्रमामध्ये बाबांची सुंदर मूर्ती आहे . तिथेच अखंड रामनाम जप सुरू असतो . याच ठिकाणी आसन लावण्याची सूचना मला श्यामा दीदींनी केली .

मी आश्रमात गेल्या गेल्या आधी दीदींच्या पाया पडलो . त्यांनी मला शेजारी बराच वेळ बसवून घेतले . कुठून आलो वगैरे सर्व चौकशी केली . त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते . तसेच त्यांचे हास्य केवळ दैवी होते .
मला म्हणाली , " बाबा , बालभोग के लिये फलाहरी पाओ । शकरिया खात हो ? " मला त्याचा अर्थ कळेना . मग तिने मागविल्यावर माझ्या लक्षात आले की ते रताळे आहे . मी रताळे म्हटल्यावर ती हसायला लागली ! म्हणाली , " हा हा ! बराबर !आप मराठी लोक इसे रतालू बोलते है । रतालु ! ". दीदी ने माझ्यासाठी पपई आणि उकडलेले रताळे मागविले . मला सांगितले हा साधूचा आहार आहे , लक्षात ठेव . आणि खरोखरीच रताळे हे एक संपूर्ण आहार आहे हे तुम्हाला त्याच्या मधील घटक पदार्थ पाहिल्यावर लक्षात येईल . 
रताळ्यातील जीवनसत्वे . उपवासाला बटाटा - साबुदाण्या ऐवजी रताळे खाऊन पहा .
मी स्नान केले ती सूर्यकुंडाची जागा लाल खुणेने दाखवली आहे .
"या घाटाचे नाव सिद्ध कालिका घाट असे आहे . " शामा दीदी मला सांगू लागली .तिला भेटायला सतत नवीन नवीन माणसे येत होती . परंतु तिने मला बसवून ठेवले होते . थोड्या वेळाने तिथे गाडरवाडा येथील दीपक दुबेजी म्हणून सत्यसाईबाबांचे भक्त आले . गाडरवाडा हे ओशो चे जन्मगाव . हे बाबांचे एवढे निश्चित भक्त होते की त्यांचा मोबाईल नंबर मध्ये देखील सत्य साई बाबां ची जन्मतारीख होती . २३ । ११ । २६ . यांना हे आकडे सर्वत्र दिसायचे . अगदी यांच्या गाड्यांचे क्रमांक देखील हेच असतील याची काळजी ते घेत . उदा : MP 23 XY 1126 ! भक्तीचे किती वेगळे वेगळे प्रकार असू शकतात हे पाहून मला मौज वाटत होती . दीदी कट्टर हिंदुत्ववादी होत्या . त्यांना अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील येऊन भेटत होते . आपल्याकडे असा एक सार्वत्रिक भ्रम पसरविला जातो की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आहे . परंतु तसे अजिबात नसून साध्वी स्त्रियांना देखील एखाद्या साधू इतकाच मान सर्व लोक देतात हे मी स्वतः अनेक वेळा अनुभवलेले आहे . किंबहुना ती मातृशक्ती असल्यामुळे काकणभर अधिकच मान तिला समाज देतो हेच मी पाहिलेले आहे . साध्वी शामा दीदीचा दरारा आणि परिस्थितीवर तिचे कसे नियंत्रण होते हे पाहून मला बरे वाटले . तिच्या डोक्यावर भरपूर मोठा जटाभार होता . मी तिला महाराजांविषयी प्रश्न विचारले . आपल्या गुरुजींविषयी बोलताना ती भावुक झाली . केवळ त्यांच्या कृपेमुळेच तिच्या जीवनाचे सोने झाले आहे अशी तिची दृढ श्रद्धा होती . ती सांगू लागली , " जैसे ही गुरुजी ब्रह्मलीन हो गए ,सब लोग बोलने लगे ।अब तो श्यामा गई काम से ।अब सारी परंपराएं खंडित हो जाएगी । लेकिन आप ही मुझे बताएं भगवन् क्या श्यामा में इतनी ताकत है , जो इतना बड़ा सात मंजिला यज्ञ कुंड खड़ा करें ? इसके लिए मैं खास लखनऊ से कारीगर मंगाए है । लाखों रुपया खर्च किया है । इतनी ताकत इस श्याम दीदी में कहां है ? यह तो सब गुरु जी की कृपा है जो हमें प्रेरणा देते हैं । " तिचे ते शुद्ध हिंदी , वाणी वरचे प्रभुत्व आणि गुरूंच्या प्रती असलेला भाव यामुळेच असे भव्य दिव्य कार्य ती सहज उभे करू शकत होती . अजून बरेच मोठे मोठे प्रकल्प तिच्या डोक्यामध्ये होते . आत मध्ये स्वामींची समाधी होती . तिथे अखंड सीताराम नामस्मरण चालू असे .मी देखील मग तिथे बसून कधी ढोलक वाजवत , तर कधी पेटी वाजवत सीताराम चा जप केला ! सिताराम हा जप अनेक सुंदर सुंदर चालींमध्ये गाता येतो ! मी परिक्रमेमध्ये अनेक नव्या चाली शिकलो . इथे काही म्हाताऱ्या स्त्रिया येऊन जाऊन जप करायच्या . त्यासारख्या कुठे जात आहेत म्हणून मी मागे पाहिले तर तिथे टनावारी हवन सामग्री येऊन पडली होती . ती सर्व एकत्र करण्याचे काम चालले होते . मोठमोठ्या पातेल्यामध्ये शेकडो किलो हवन सामग्री होती . ती सर्व ओतणे ,एकत्र कालविणे हे शक्तीचे काम होते . मी लागलीच त्या कामाला लागलो . हवन सामग्रीतील सर्व घटक पदार्थ हे आयुर्वेदिक अथवा औषधी असतात त्यामुळे त्याचा अतिशय सुंदर असा वास सर्वत्र पसरला होता . सामग्रीची यादी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल .
कर्पूर कचरी, बेलगिरी, फुलधावा, गुलाब पंखुरी, गिलॉय, वाच, तगर, आगर, नागरमोथा, नव ग्रह लकडी पावडर, जटामांसी, गुगल, लोबन पावडर आणि गोमय या साऱ्या आयुर्वेदिक औषधी आहेत .

हाताला होणारा त्या औषधींचा स्पर्श देखील सुखावह होता . नुसती हवन सामग्री कालवली तरी खूप ताजेतवाने वाटत होते . आज-काल परदेशामध्ये हजारो रुपये खर्च करून आरोमाथेरपी घ्यायला लोक जातात . आपल्या पूर्वजांनी याचा फार पूर्वी वापर करून घेतलेला आहे . साधे घरातील देवाला सुगंधी फुल वाहताना ,उदबत्ती / धूप ओवाळताना किंवा कापूर जाळताना जे काही सूक्ष्म वास आपल्या नाकात जातात ते दिवसभर आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्याचे काम करतात . आपल्यापैकी कोणी आयुर्वेदातील तज्ञ असतील तर ते यावर अधिक प्रकाश टाकू शकतात . मी असे ऐकले आहे की काही विशिष्ट मानसिक रोगांसाठी फुलांनी भरलेल्या खोलीमध्ये रुग्णाला ठेवले जाते . त्या सुगंधाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो . असो .
हे सर्व करेपर्यंत भोजनाची वेळ टळून गेली होती . मी भोजनाची चौकशी करायला मागे गेलो तर स्वयंपाकाची मोठी मोठी भांडी घासायला सुरुवात झाली होती . भोजन संपले होते . थोडेफार भोजन शिल्लक होते . परंतु ते आचारी लोकांना जेवणासाठी लागणार होते . तिथे असलेले कोणी मला थोडेफार खाऊन जा वगैरे काही म्हणाले नाही .आपल्यामुळे कोणी उपाशी राहायला नको असा विचार करून मी भोजन प्रसाद न घेता पुन्हा समाधी पाशी आलो . श्यामा दीदीला नुसते सांगितले असते , तरी तिने पुन्हा स्वयंपाक करायला लावला असता हे माहिती असल्यामुळे मी शांत राहिलो . इथे आज मुक्काम करा असा सर्व सेवेकर्‍यांचा आग्रह हळूहळू होऊ लागला . ते पाहून कोणालाही न दुखवता हळूच तिथून काढता पाय घेतला .चिकूच्या बी प्रमाणे सटकणे याबाबतीत आता मी चांगला तज्ञ झालो होतो ! इथून पुन्हा सूर्यकुंडा मार्गे जावे लागणार होते . तसा मी निघालो . पोटामध्ये भूकेची आग पडलेली होती . हवन सामग्री कालवून कालवून चांगलीच भूक लागली होती . आता लवकरात लवकर पुढे जावे असा विचार करून मी पायांना गती दिली आणि इतक्यात एक जाडसर माणूस धावतच मला आडवा आला . त्याने माझे पाय धरले आणि मला विनवू लागला की आज आपण कृपया माझ्या हातचे भोजन करून पुढे जा . त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही . मी शांतपणे त्याच्यामागे निघालो . इथे सूर्यकुंडामध्ये लोकांना पूजा पाठ करता यावेत म्हणून सिमेंटचे काही स्लॅब सरकारने घातलेले आहेत .
सूर्यकुंडावरचे पूजा मंडप
 इथे हा सोनी नावाचा सागर येथील परम साईभक्त मनुष्य आणि त्याच्या कुटुंबातील सुमारे पंधरा-वीस लोक नर्मदा स्नानासाठी आलेले होते . लहान मुले , बालके , तरुण-तरुणी आणि म्हातारे सर्व प्रकारचे लोक होते . सोनीने मला बसण्यासाठी आसन दिले आणि माझ्याशी बोलू लागला . मगाशी जेव्हा मी इथे स्नान करण्यासाठी आलो होतो तेव्हा हा सोनी काठावरती अनुष्ठान करत बसला होता . त्याचे डोळे मिटलेले होते . मी पाण्यामध्ये तीन डुबक्या मारून जेव्हा बाहेर आलो त्या नेमके त्याच क्षणी ह्याने डोळे उघडले . आणि त्याला असा भास झाला की साक्षात शंकर नर्मदेतून बाहेर येत आहे . सोनी सांगत होता आणि मी ऐकत होतो . त्या क्षणी सोनीने नमस्कार करण्याकरीता हात जोडले , डोळे मिटले आणि मनात संकल्प सोडला , की आता मी नैवेद्य दाखविन तो यांना खायला घालून मगच स्वतः खाईन . डोळे उघडून बघतोय तोपर्यंत मी गायब झालेलो !  प्रत्यक्षात मी मगाशी सांगितले तसे वेगाने त्या स्त्री पुरुषांच्या गर्दीतून बाहेर गेलो आणि लांब जाऊन अंग पुसले . शिवाय तिथे अवधूतने पकडून मला पुन्हा नर्मदे काठी नेले आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली .. इकडे हा सोनी मला सैरभैर होऊन शोधू लागला . त्याला फार वाईट वाटले . म्हणून त्याने सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भोजन प्रसाद खाऊन घ्या . मी काही आज जेवणार नाही . त्याप्रमाणे सर्वजण जेऊन तिथे निवांत पडलेले होते . हा सोनी बिचारा एकटाच उपाशी राहिला होता . इतक्यात पुन्हा मलाच येताना पाहून त्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या ! त्याने केलेल्या या संकल्पा मुळे नर्मदा मैय्याने तिकडे मला शिल्लक असूनही भोजन प्रसाद दिला नाही ! त्या उपासाचे कोडे आता मला उलगडले . सोनी मला म्हणू लागला , " तुम्ही आज मला भेटला नसता , तर मी उपाशी परत गेलो असतो . तरी कृपया माझ्या हातचे दोनच घास खा ! " मी त्याला सांगितले , " दोन घास नाही ! चांगले पोटभर खाऊ घाल ! खूप भूक लागली आहे ! " मी हे वाक्य बोलतात त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही ! त्याने लगेचच झोपलेल्या सर्वांना जागे केले आणि सर्वांना कामाला लावले ! पटापट गोवऱ्या पेटवून त्यामध्ये त्याने फक्कड असा  गक्कड भरता बनवला ! एका बाजूला चूल पेटवून त्यावर सुंदर अशी खिचडी बनवली ! भरपूर तूप घालून रसायन विरहित काळ्या गुळाचा चुरमा तयार केला ! हे सर्व करताना त्याच्या माझ्याशी अखंड गप्पा चालू होत्या . त्याच्याबरोबरच्या मुलांची माझी चांगली गट्टी जमली . त्या सर्वांना चार चांगल्या गोष्टी सांगत नैवेद्य होण्याची वाट पाहत बसलो . सर्व स्वयंपाक सिद्ध झाल्यावर सोनीने खरोखरच मला समोर बसवून देवाला दाखवतात तसा नैवेद्य दाखवला . आणि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा म्हणत एक एक घास मला भरवला . मला भरवला असे तरी मी का म्हणावे ? कोणाला भरविला हे आपण मंत्रामध्ये सांगतोच आहे ! प्राणाय स्वाहा ! तुझ्या मध्ये असलेल्या प्राणशक्तीला हा घास अर्पण ! प्रेताला कोणीही घास अर्पण करत नाही . कणकेचा गोळा तेवढा तोंडावर दाबून ठेवतात . परंतु तिथे प्राणाय स्वाहा असा मंत्र येत नाही . आपल्या शरीरामध्ये असलेले पंचप्राण हीच आपण त्या परमेश्वराचा अंश असल्याची महत्त्वाची खूण आहे ! सोनीचे डोळे पाणावले . मी माझ्या ताटातला पहिला घास कालवला आणि सोनीला भरवला ! दोघांनी अतिशय प्रेमपूर्वक आणि पोटभर जेवण केले ! सोनी चांगला खवय्या होता ! त्याचे वजन १०० किलोच्या आसपास असावे . वयाने मोठा असला तरी बालसुलभ स्वभाव असल्यामुळे आणि देवाच्या भक्तीमुळे गुटगुटीत बालकासारखा दिसायचा ! दोघेही भुकेने कडकडलो होतो . आणि दोघांची नर्मदा मातेने परीक्षा पाहिली होती ! त्यामुळे दोघेही तिचा जयजयकार करत प्रत्येक घासाचा आस्वाद घेत होतो ! त्या दिवशीचा भोजन प्रसाद अविस्मरणीय असाच होता ! भोजन प्रसाद झाल्यावर त्याने मला अजून एक विनंती केली . सागर मध्ये एक मोठे साईबाबांचे मंदिर बांधावे अशी त्याची इच्छा होती . त्याने खूप वेळा प्रयत्न केला परंतु त्याला यश येत नव्हते . तो म्हणाला  आज तुम्ही माझ्या वतीने संकल्प सोडा . तुमच्या संकल्पाला नर्मदा मैया लवकर यश देईल . त्याने सर्व पूजेचे साहित्य मला आणून दिले . आपल्याकडे या सर्व उपचार पूर्वक केलेल्या पूजेचा आपल्या अंतर्मनामध्ये खोल परिणाम होत असतो . नुसते "आज पासून तू माझी बायको " असे म्हणून केलेले लग्न आणि हजारो लोकांच्या समोर विधीपूर्वक केलेले लग्न यातील पहिल्या प्रकारचे लग्न मोडण्याची शक्यता अधिक असते . कारण त्यात फारसे कोणी साक्षीला नसते . याउलट हजारो लोक साक्षीला असताना आणि मोठे विधी विधान करून केलेला संकल्प अंतर्मनामध्ये अधिक खोल उतरतो , हे स्वाभाविक आहे . त्यामुळे त्याच्या इच्छे खातर मी थोडीफार नर्मदा मातेची पूजा करून त्याच्या वतीने संकल्प सोडला , " हे नर्मदा माते , मी तुझ्या परिक्रमेला निघालेलो असताना ,सूर्यकुंडावर मला हा सोनी नावाचा मनुष्य भेटलेला आहे . हा साई भक्त आहे आणि याला साईबाबांचे मंदिर उभे करायचे आहे अशी त्याची इच्छा त्यानी व्यक्त केलेली आहे . तरी तुला योग्य वाटेल ते कार्य याच्या हातून तू करून घेशील याबाबत मला काहीही शंका नाही . याच्या इच्छे खातर त्याचे मंदिर पूर्ण व्हावे असा संकल्प तुझ्या साक्षीने मी सोडत आहे . त्याला इच्छा देणारी देखील तूच आहेस आणि संकल्प सोडणारी देखील तूच आहेस . संकल्प पूर्णत्वाला नेणारी देखील तूच आहेस .   जे योग्य असेल ते , योग्य ठिकाणी ,सुयोग्य वेळी , योग्य व्यक्तीच्या हातून , योग्य प्रकारे घडो . नर्मदे हर ! "  सोनीला खूप आनंद झाला !  हे सर्व करेपर्यंत सूर्य मावळायला सुरुवात झाली होती . आता मी निघतो असे म्हणून सामान उचलू लागलो .त्याने निघताना माझ्यासोबत एक फोटो काढून घेतला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . 
सागर येथील साई भक्त श्री सोनी (सपत्निक ) आणि प्रस्तुत लेखक
निघता निघता मी त्यांना गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थी माणसाने कसे असावे याबाबत सदाशिव नित्यानंद गिरी स्वामींनी मला दिलेले हिंदी पुस्तक भेट म्हणून दिले .माझे ते सकाळीच वाचून झाले होते .
इथून पुढे पुन्हा खडकाळ नर्मदा होती .उजव्या हाताला मोठे बेट दिसत होते . त्या बेटावर प्रचंड वाळू साठलेली आहे . बेटाच्या मधोमध महादेवाचे मंदिर आणि हनुमंताची अतिभव्य मूर्ती आहे . 
बर्मन घाट बेटावरील हनुमान मूर्ती आणि मंदिर .या मंदिराच्या सोनेरी कळसाचे प्रतिबिंब नर्मदा जला मध्ये खूप सुंदर दिसते !
इथे लावलेली नमामि मात नर्मदे ही अक्षरे रात्री दुरून खूप सुंदर दिसतात .
मंदिर नर्मदा पात्राच्या मधोमध असल्यामुळे परिक्रमा वासीना येथे जाण्यास परवानगी नाही .संग्रहित छायाचित्र
बर्मन घाटावर पोहोचेपर्यंत अंधारून आले . इथे खाली बारा महिने मोठा मिळाला लागलेला असतो . त्यातील दुकानांचे तंबू , कचरा , गोंधळ पहात पुढे चालत होतो . निसर्ग प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आपण होऊन ठेवत असतो . आणि मनुष्यप्राणी जिथे शक्य होईल तिथे अधिकाधिक कचरा करत असतो . नर्मदे काठी ही दोन्ही टोके अनेक वेळा बघायला मिळतात . माणसाला एवढे सुद्धा कसे काय कळत नाही की ज्या नदीला आपण पवित्र माता मानतो आहोत तिच्या काठावर आपण घाण करू नये ?  वाईट वाटते .असो . इथे स्वामी राम लखन दास महाराज प्रेरित शारदा मंदिर नावाची संस्कृत पाठशाळा आहे . ३० विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत .  चार आचार्य आहेत . एक प्रमुख आचार्य आहेत . डावीकडे एका उंच दगडी बांधकामावर पाठशाळा आहे . वरून मुख्य आचार्यांनी मला जोरात आवाज दिला ,"नर्मदे हर ! महाराज पधारीये । उपर आईये । " मी मोठ्या मोठ्या २५ -३० पायऱ्या एकाच दमात चढत आश्रम गाठला . परिक्रमेमध्ये अशा पायऱ्या आल्या की मला काय व्हायचे काय माहिती ! लहान मुले जशी पळत सुटतात तसे मी पळत चढायचो आणि पळत उतरायचो ! कदाचित हे केल्यामुळे पायाचे रक्ताभिसरण अचानक वाढून पायांना खूप आराम मिळायचा . त्यामुळे असेल .पण मजा यायची ! वरती आचार्यांसोबत अजून दोन मुले माझी वाट पाहत उभी होती . त्यांनी मला अगदी व्यवस्थित हात पाय धुण्याची जागा दाखवली तसेच आत मध्ये कुठे आसन लावायचे ते देखील दाखवले . आतापर्यंत आलेल्या अनुभवांपैकी हा एक वेगळा आणि सुखद अनुभव होता . कुणीतरी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत येत आहे आणि तुम्हाला मदत करत आहे ही भावना फार सुखावह असू शकते . विशेषतः कित्येक किलोमीटर तंगडतोड केल्यानंतर ! आत मध्ये एक मोठी धर्मशाळा होती . लांबच लांब अशा त्या खोलीमध्ये माझ्या आधीच पंधरा-वीस परिक्रमावासी येऊन बसलेले होते . 
आज मी थांबलो आहे तो बर्मान खुर्द अथवा छोटा बरमान घाट  होता . आपल्या महाराष्ट्रामध्ये गावांची नावे खालील प्रमाणे असतात . मुख्य गावाला बुद्रुक म्हणले जाते . त्याच गावाच्या एखाद्या छोट्याशा वस्तीला खुर्द म्हटले जाते . हे फारसी भाषेतून मराठी मध्ये आलेले शब्द आहेत . खुर्द म्हणजे खुर्दा
. अर्थात छोटासा तुकडा . मध्य प्रदेशामध्ये मुख्य गावाला खास म्हणतात . छोट्या गावाला खुर्द . किंवा कला म्हणतात . आपल्याकडे वाडी म्हणतात तशा अर्थी इकडे टोला हा शब्द वापरतात . 
हा आश्रम सांभाळणारे महाराज गुजराती होते . ते अगदी आसाराम बापूंसारखे दिसायचे . हे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले की हे वाक्य त्यांना भेटणारा प्रत्येक मनुष्य त्यांना सांगतो ! गुजराती होते . पटेल बाबा असे त्यांचे नाव होते . पटेल म्हणजे जातीने क्षत्रिय असून संस्कृत पाठशाळा चालवत होते ,याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी . आज-काल संस्कृत या भाषेला एका विशिष्ट जातीशी बांधण्याचा वाईट खटाटोप काही लोक करत आहेत . असो . इथे राहणाऱ्या मुलांपैकी दोन मुले आळीपाळीने त्यांच्या मदतीसाठी थांबायची . मी बाबांची परवानगी घेऊन मुलांसोबत आत मध्ये जाऊन संपूर्ण पाठशाळा पाहिली . इथे सर्व जातीतील मुले राहून संस्कृत भाषेचे अध्ययन करत होती . सर्वच मुले गुण्यागोविंदाने राहत होती . पाठशाळेमध्ये अतिशय सुंदर अशी मंदिरे होती त्यांची पूजा अर्चा देखील विद्यार्थी करायचे . या मुलांशी मी बराच वेळ गप्पा मारल्या . त्यांच्या शंकांना उत्तरे दिली . माझे तोडके मोडके संस्कृत ज्ञान ,नानाविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून तपासून घेतले .आश्रमातील वातावरण अतिशय पवित्र होते . चातुर्मास करण्यासाठी हे एक अत्यंत आदर्श ठिकाण आहे .  रात्री पटेल बाबांनी सर्वांना आग्रह करून करून पोटभर जेवायला वाढले . यांनी एक परिक्रमा केलेली होती त्यामुळे परिक्रमावासींच्या जीवनाबद्दल यांना कल्पना होती . अतिशय प्रेमाने आदबीने प्रत्येकाची विचारपूस ते जागेवर जाऊन करत होते . त्यांचे व्यक्तिमत्व वरवर पाहताना अतिशय कठोर शिस्तीचे वाटत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते अतिशय प्रेमळ आणि मवाळ मनुष्य होते . दर पाच मिनिटांनी ते घाटाच्या बाजूला जाऊन कोणी नवीन परिक्रमावासी येतो आहे का याचा अंदाज घ्यायचे .कोणी दिसलाच की ती दोन्ही मुले देखील त्यांच्या मदतीला जायची . आणि तिघेही आरडाओरडा करून हात वारे करून त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आणि परिक्रमा वासीला वर बोलवायचे . इथून समोर नर्मदा मातेचे फार सुंदर दर्शन होते .रात्री तर हा परिसर फारच सुंदर झगमगाटाने नटलेला असतो . पहाटे लवकर उठून स्नान पूजा वगैरे आटोपून मी पुढे मार्गस्थ झालो . इथे बाहेर पडल्या पडल्या एक पूल आहे .पूल अतिशय अरुंद आहे .व याच्या आजूबाजूला सर्वत्र सतत मेळा लागलेला असतो .वर्षभर मेळा लावणाऱ्या या लोकांनी इथे जणू मुक्कामच ठोकलेला असतो . त्या लोकांनी इथून पुढचा अर्धा एक किलोमीटरचा सुंदर वालुकामय किनारा पुरता हागणदारी करून टाकलेला आहे . इथून चालताना अखंड नाक झाकावे लागत होते .खाली पाहिल्याशिवाय एकही पाऊल टाकता येणार नाही अशी परिस्थिती होती . हे सर्व व्यापारी लोक होते . यांना नर्मदेशी काहीही देणे घेणे नव्हते . पिढ्या न पिढ्या यांनी फक्त आणि फक्त व्यापारच केलेला आहे . परंतु ते पाहून फार वाईट वाटले . कोणी प्रशासकीय अधिकारी हा ब्लॉग वाचत असतील तर त्यांनी कृपया या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यासाठी आणि ती अनिवार्य करण्यासाठी काहीतरी कार्य करावे . मी संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जाणवलेल्या गोष्टींबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र परिक्रमा झाल्या झाल्या लिहिलेले आहेच . असो . इथून पुढे पुन्हा एकदा काठाने जाण्याचे मी ठरविले . पटेल बाबांनी काठाने जाऊ नको असे सांगितले होते तरी मी तो मार्ग निवडला . तो मार्ग इतका भयंकर होता की कल्पना देखील करता येणार नाही ! परंतु त्या भागा इतकी मजा देखील अन्यत्र कुठे क्वचित आली ! आता पुन्हा मला त्या मार्गाने जाल का असं म्हणून कोणी विचारले तर कदाचित मी नाही असे उत्तर देईन ! या सर्वच परिसराची आपल्याला कल्पना यावी म्हणून काही संग्रहित चित्रे खाली जोडत आहे .
याच शारदा मंदिराच्या पायऱ्या आहेत . आणि डावीकडे दिसणाऱ्या लोखंडी सज्जा पाशी उभे राहून पटेल बाबांनी मला आवाज दिला होता . 
समोरच्या बेटावरील नमामि देवी नर्मदे अक्षरे खूप सुंदर दिसतात . 
समोर दिसणारा मोठा ब्रह्मन् / बर्मान घाट . इथे पाणी किती खोल आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून हे चित्र टाकले आहे ! जिथे जिथे वाळू असते तिथे तिथे नर्मदेच्या खोली विषयीचे तुमचे अनुमान फसतेच !
छोट्या बरमान घाटावर वर्षभर लागलेला मेळा

बर्मन घाटाला जोडणारा छोटासा पूल . आता आपण एक काम करूया . या पुलावर उभे राहून उजव्या हाताने घटीवत अर्थात क्लॉकवाईज गोल गोल फिरत या परिसराचे अवलोकन करूया . 
पुलावरून दिसणारी नर्मदा माता आणि समोर मोठा ब्रह्मन् / बरमान घाट . 
अजून थोडेसे उजवीकडे वळल्यावर आपल्याला मधले बेट दिसते आहे आणि अलीकडच्या छोट्या घाटावरील दुकाने दिसत आहेत . या बेटावर समोरच्या तटावरून नावेने जाता येते आणि अलीकडच्या तटावरून पाण्यातून चालत जाता येते . परंतु पर्यटकांना गुडघाभर पाणी असले तरी नावेतूनच नेले जाते . आणि पाणी फार खोल असल्याची बतावणी केली जाते ! 

आता आपल्याला आधी बेट , त्यानंतर सूर्यकुंडाकडून येणारी नर्मदेची शाखा दिसते आहे . आणि त्यानंतर या घाटावर लागलेली दुकाने दिसत आहेत . मागे पांढऱ्या रंगाचे मंदिर दिसते आहे तोच आपला शारदा आश्रम आहे .
आता समोर आश्रमाचा भव्य परिसर आणि दुकानांची गर्दी तसेच हा छोटासा पूल पुन्हा एकदा दिसतो आहे . त्याशिवाय ज्या तरुणांनी ड्रोन वरून हे सर्व चित्रीकरण केले आहे त्यांच गाडी देखील दिसते आहे .

अजून उजवीकडे वळल्यावर आपल्याला परिक्रमेचा पुढचा मार्ग दिसायला सुरुवात होते . सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया वयोवृद्ध परिक्रमावासिनी या मार्गाने जाण्याचे साहस करू नये . ज्यांना खरोखरीच काहीतरी मोठे साहसी कृत्य करण्याची आवड आहे अशा तरुणांनीच या मार्गाने जाऊन पहावे . इथे दिसणारा वाळूचा संपूर्ण किनारा घाणे घाण करून टाकण्यात आलेला आहे . 
इथून पुढे नर्मदा इतकी सुंदर दिसते . काठावर लोकांनी केलेली घाण आणि प्रदूषण स्पष्टपणे दिसते आहे . पुढे नर्मदा एक वळण घेते जिथे मी वर्णन केलेला खतरनाक टापू मला लागला .
मुद्दाम थोडेसे झूम करून तुम्हाला जंगलाचा तो टापू मी दाखवितो आहे जिथून किनाऱ्याने चालताना खूप धोकादायक मार्ग होता . किंवा सरळ असे म्हणा की तो मार्गच नव्हता ! 
हाच तो लाल रंगाने दाखविलेला काठाकाठाचा मार्ग आहे जो माझ्या कायमचा स्मरणात राहिला . अर्थात नर्मदे काठी असे मार्ग पुढे अनेक ठिकाणी मिळाले . परंतु हा पहिलाच असल्यामुळे लक्षात राहिला .
आत्ता गुगल नकाशा मध्ये पाहिल्यावर मला लक्षात आले की वरून खूप चांगला परिक्रमा मार्ग होता परंतु काठाने जाण्याच्या हट्टाहासामुळे मला नर्मदा मातेने खूप सुंदर अशी तिची रूपे मात्र निश्चितपणे दाखविली ! डाव्या हाताला झाडीच्या वर जी पांढरी रेस दिसते आहे तो परिक्रमा मार्ग आहे परंतु मी मात्र खालून पाण्याच्या पातळीवरून चालत गेलो . हा एक अतिशय थरारक अनुभव होता . 
पटेल बाबांनी इथून रस्ता नाही आहे असे मला सांगितले होते . परंतु तिथे उभे राहून मी नेहमीप्रमाणे मैय्याला विचारले की रस्ता आहे का ? आणि मला असे वाटले की मैया हो म्हणते आहे ! म्हणून मी पुढे चालायला सुरुवात केली . इथून पुढे पाच किलोमीटर मैया अशा काही गतीने वाहते की डाव्या बाजूचा पूर्ण तट तिने कापून टाकला आहे . तो देखील उभा ! ५० ते १०० फुटाचे गाळाचे तट कापून समोरच्या तटावर मैया वाळू साठवीत वाहते .सर्वत्र असेच आहे . उजवीकडे वळताना मैय्या डावी बाजू कापते व डावीकडे वळताना उजवा तट चिरते . जिथे वळते त्या बाजूला उथळ वाळूचा भव्य किनारा तयार होतो . वर्षानुवर्षे मैया प्रवाह बदलत अशा तऱ्हेने वाहत आहे . इथे मात्र सलग पाच किलोमीटरचा तट तिने कापला होता . तिथून कोणीच जात नाही .काही जागा तर इतक्या दुर्गम होत्या की कुत्री देखील परत फिरल्याचे ठसे तिथे दिसत होते ! मध्ये मध्ये येऊन मिळालेले ओढे नाले यांनी अतिशय भयानक खोल दऱ्या तयार केल्या होत्या . अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माणसांनी तिथे जाऊन परत उलटे फिरल्याचे बुटाचे ठसे दिसत होते . परंतु मैया सांगत होती , की चालत राहा चालत राहा ! आपल्या अंतर्यामी परमेश्वर स्फूर्ती रूपाने वास करत असतो . एका विशिष्ट तरल भावावस्थे मध्ये गेल्यावर आपल्याला ते संदेश स्पष्ट ऐकू येऊ लागतात .तसे काहीसे परिक्रमेमध्ये होते . शेवटी उभा कडा लागला . पात्राच्या कडेने चालू लागलो . तुफान चिखल ! बूट मोजे चिखलाने माखले ! पाय सटासट सटकू लागले . पण मी निर्धाराने चालत राहिलो . डावीकडील कडे सटकून वर जंगल होते त्या जंगलातील मोठमोठ्या झाडांची मुळे खाली लटकत होती . ती धरत धरत तर कधी गवताच्या काड्यांचा आधार घेत त्या जवळपास ९० अंशाच्या काटकोनाच्या मातीच्या कड्यावरून चालत राहिलो . संपूर्ण भार मागे पाठीकडे जात होता कारण पाठीवर मोठी झोळी होती . हाताने आधार घेतलेले गवत कधी कधी मुळापासून निघून येऊ लागायचे इतक्यात पुढचे काहीतरी सापडायचे . हे पुढचे वेळेवर सापडते आहे याचाच अर्थ जाण्या योग्य मार्ग आहे असे नर्मदेला म्हणायचे होते ! झोळीचा जरा जरी धक्का कुठल्या झाडाला लागला असता तरी मी पूर्णपणे खाली नर्मदेमध्ये पडलो असतो इतक्या नाजूक अवस्थेमध्ये वाटचाल सुरू होती . मुखाने अखंड नर्मदेचा गुजर चालू होता . दोन्ही पाय सतत खूप काळ तिरके तिरके   टाकल्यामुळे मैयाच्या बाजूने बूट माझ्या देहाचा पडून फाटून गेले होते . म्हणजे उजव्या पायातला बूट करंगळीच्या बाजूला फाटला होता तर डाव्या पायातला बूट अंगठ्याच्या बाजूला फाटला होता . समोर , आजूबाजूला , पात्रामध्ये , मागे , पुढे कोणीही नाही ! निर्मनुष्य ! फक्त कानावर नर्मदेचा आवाज पडतो आहे ! अशा स्वरूपामध्ये नर्मदेचे दर्शन करण्यासाठीच परिक्रमा केली पाहिजे ! अखेर परीक्षा पाहणारा तो टापू संपला व एक छोटासा घाट लागला . घाटाचे नाव तरी काय असावे ! बढीया घाट ! वा मैया बहोत बढीया ! असे म्हणून मी धावतच घाट चढलो ! गावातील काही तरुण अंघोळीसाठी खाली येत होते . ते बराच वेळ वरती एका पारावर गप्पा मारत बसले होते . त्यामुळे त्यांना मी कुठून आलो तेच कळेना ! त्यांनी मला अडवून विचारले की तुम्ही कुठून आलात ?मी जेव्हा सांगितले की मी नर्मदा मातेच्या किनाऱ्याने आलो तेव्हा त्यांना ते काही केल्या पटेना ! ते म्हणाले की कसे शक्य आहे ! तिथून तर येण्यासारखा मार्गच नाही ! परंतु मी आलो होतो हे खरे . आणि माझी एकंदर झालेली अवस्था बघता मी तिथूनच आलेलो आहे हे यांना देखील कळत होते . ऐन थंडीमध्ये मी घामाघुम झालो होतो आणि पाय नडगी पर्यंत चिखलाने बरबटलेले होते . इथून पुढे मात्र काठावरील मार्गच नसल्यामुळे गावातून पुढे जाऊन जंगल मार्ग धरला . मैया दिसत होती . वाटेत चालताना आगे कोनसा गाव आहे असे विचारत जायचो . एका इरसाल म्हाताऱ्याने , "आगे लांडिया गाव है । " असे मला सांगितले .
हे त्याच भागातील जंगल आहे
खूप चालल्यावर त्या गावात आलो . गावाचे नाव आंडिया असे होते . संपूर्णपणे यवन वस्ती असलेले गाव होते . तिथे कोणीही तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाही . भविष्यातील भारताची ती एक छोटीशी झलक होती . सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते .भयंकर दुर्गंधी पसरली होती आणि त्यात उघडी गटारे जी कुठेही आडवी- तिडवी रस्त्यावरून वाहत होती , त्यांची भर पडत होती . आधीच्या कुठल्याही आदिवासी गावात असे चित्र कधीच नव्हते . मघाशी सांगितलेल्या मार्गावरून चालताना माझी छाटी फाटली होती . इथे या गावामध्ये एका वळणावर शिंप्याचे घर आहे , त्याने हे दृश्य पाहिले . त्याने मला अंगणामध्ये उन्हामध्ये बसवून मस्तपैकी त्या धोतराला टाके मारून दिले . तोपर्यंत मला गरम गरम चहा देखील पाजला . त्याला पैसे देऊ केले असता त्याने घेतले नाहीत . आता पुढे सुंदर अशा नर्मदा किनाऱ्याने चालताना लिंगा घाट लागला . इथे भोजन प्रसाद घेऊन पुढे जा असे एका साधूने विनविल्यामुळे तिथे थांबलो . इथे मला काही अवली परिक्रमावासी भेटले जी पुढे बऱ्याचदा भेटत राहिले ! 


लेखांक अठ्ठेचाळीस समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ४९ : कचरा प्रज्वलित करून केलेली मैय्याची आरती अन् कोठीया घाट चे फलाहारी जगजीवनदास महाराज

लिंगा घाट येथील आश्रम अगदी नर्मदेच्या किनारी आहे . सुख चैन नावाची नदी पार केली . नदी बऱ्यापैकी आटत आलेली होती . आश्रमाच्या सुबक ठेंगण्या महाद्वारापाशी आलो
 लिंगा घाटापूर्वीची चाल

लिंगा घाट मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे .
लिंगा घाट आश्रमाचा परिसर
इथे एक विदेही बाबा अन्नक्षेत्र चालवितात . त्यांच्या शिष्याने आस्थेने मला बसवून घेतले आणि स्वयंपाकाला लागला . इतक्यात तिथे चार-पाच परिक्रमा वासी आले .याच्यामध्ये वापी इथला अवधूत फरले होता .ज्याने मगाशी माझा व्हिडिओ घेतला होता . त्याच्यासोबत बापू दादा आणि बंगाली बाबू असे तिघेजण होते . बापू म्हणजे गुजरात मधला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता . दादा म्हणून एक आजोबा होते . आणि सात्यकी रॉय नावाचा एक गोड बंगाली मुलगा होता . हा वर वर पाहता अतिशय नम्र आणि गुणवान वाटायचा ! परंतु त्याच्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर तो काय प्रकार आहे ते लक्षात यायचे . बंगालमध्ये सर्वत्र मुबलक आढळणाऱ्या डाव्या चळवळीचा प्रभाव याच्या मेंदूवर स्वाभाविकपणे होता . त्यामुळे तो परिक्रमेमध्ये असून देखील परिक्रमेमध्ये नव्हता . म्हणजे तो सर्व ठिकाणी जात होता . सर्व मार्ग चालत होता . परंतु परिक्रमेचे कुठलेही नियम पाळण्याची इच्छा त्याला नव्हती . त्यामुळे जिथे जाईल तिथे तो सर्वप्रथम त्याच्या वेशभूषेवरून साधूंच्या शिव्या खायचा ! त्यामुळे त्याच्या डाव्या मनावर अजूनच विपरीत परिणाम होत चालला होता . आणि तो अधिक कठोर वामपंथी बनत चालला होता ! अवधूची गोष्ट अजूनच निराळी होती . तो सरकारी नोकर होता . काही कारणामुळे नोकरीपासून त्याला थोड्या कालावधीसाठी दूर राहावे लागणार होते .स्पष्टच सांगायचे तर कारण नसताना त्याला बडतर्फ केले गेले होते . त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तो परिक्रमेमध्ये आला होता . सुरुवातीला त्याला बडतर्फीचे थोडेसे वैषम्य वाटायचे . परंतु नंतर तो आपण होऊन म्हणायला लागला की जे होते ते चांगल्यासाठीच होते ! बापू अतिशय निष्ठावंत स्वयंसेवक होता . तो इतका भेळा भाबडा होता की त्याच्यासोबत दोन-तीन वामपंथी चालत आहेत हे देखील त्याला कळत नव्हते ! 
नोकरीवर असताना अवधूत फरले
याला मराठी , हिंदी , गुजराती , इंग्रजी या सर्व भाषा उत्तम येत होत्या .
अवधूत फरले हा रंगावधूत महाराजांच्या प्रसादाने झाला होता म्हणून याचे नाव अवधूत ठेवले होते . याच्या घरी नारेश्वर येथील रंग अवधूत महाराजांची भक्ती होती . 
शेर नदी पार करण्यासाठी नावेची वाट पाहत उभे असलेले डावीकडून बापू त्याच्यापुढे मागे कमंडलू लटकवलेले दादा आणि पुढे उभा असलेला अवधूत . अलिकडे ठेवलेली ,पावसापासून संरक्षण देणारे कवच घातलेली सात्यकीची चंदेरी झोळी . मी हीच नदी त्याच दिवशी गुडघाभर पाण्यातून पार गेली होती .
आपादमस्तक आधुनिक वेशातला परिक्रमावासी सात्यकी रॉय नॉडिया जिल्हा प. बंगाल.
पूर्ण परिक्रमा मार्गामध्ये कुठेही याच्या अंगाला माती लागायची नाही याचे मला आश्चर्यच वाटायचे !
साधू सोबत पोळ्या लाटताना सात्यकी . परिक्रमेमध्ये असे रंगीबेरंगी कपडे घालायला परवानगी नसते . शिलाई नसलेले कुठलेही पांढरे कापड गुंडाळायचे असते . 
आपल्या नम्रतेने आणि सुहास्य वदनाने सात्यकी रॉय सर्वांची मने जिंकून घ्यायचा ! तो कधीच कुठल्या गोष्टीला उघडपणे विरोध करायचा नाही !
 वापीचा परिक्रमा वासी अवधूत फरले . याने पुढे हांसोट , गुजराथ येथे अन्नक्षेत्र सुरू केले .
एका साधू कडून ज्ञान घेत बसलेले सात्यकी आणि अवधूत .

सात्यकी सुंदर बंगाली शाल होती . आणि काही अप्रतिम ढाका मलमलचे झब्बे होते . विदर्भात तर झब्ब्याला बंगाली असेच म्हणतात ,ते त्यामुळेच .
चांगल्या दर्जाची ट्रेकिंग सॅक ,उत्तम पैकी स्लीपिंग बॅग ,तिच्या खाली अंथरायला चांगल्या दर्जाचे स्लीपिंग मॅट ,हातामध्ये ट्रेकिंग स्टिक ,डोक्यावर तऱ्हे तऱ्हेच्या हॅट ,पाठीवरच्या सॅकला रेन कव्हर , अंगात उंची ढाका मलमल चे झब्बे , खांद्यावर टाकलेली उत्तम दर्जाची बंगाली शाल ,पायात सँडल्स असा त्याचा एकंदर वेश होता . त्यामुळे हा परिक्रमावासी अजिबात वाटत नसे . आणि मनाने तसा तो नव्हता देखील . त्याचे वर्णन त्याने असे केले होते . तो एक वाँडर्लस्ट अर्थात विमुक्त भटका होता ! तो जे करायचा त्याला इंग्रजीमध्ये हीच 
हायकिंग असा शब्द आहे . याचा अर्थ सोबत पैसे वगैरे न घेता , राहण्याची कुठे सोय होईल याची चिंता न करता , मिळेल त्या व्यक्तीला गाडीला लिफ्ट मागत पुढे पुढे प्रवास करायचा . थोडक्यात एक प्रकारची परिक्रमाच . परंतु या लोकांना कुठले बंधन नको असते . अगदी नैतिकतेची बंधने देखील हीच हायकर पाळताना दिसत नाहीत . उलट पक्षी असे म्हणायला वाव आहे की नैतिकतेच्या बंधनांची आवड नसलेली माणसेच या क्षेत्राकडे हळूहळू वळतात . त्यामुळे याच्यासोबत नर्मदा मैया याने घेतली नव्हती . त्यामुळे पूजा वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता . त्याने एक टोळी पकडली होती याचे एकमेव कारण , या टोळी सोबत राहिल्यावर भोजनाची व निवासाची सोय होते हे त्याच्या लक्षात आले होते ! तसाही तो एकटा फिरला असता तर उभ्या भारतात कधी उपाशी मरणार नाही ! कारण हे हिंदू राष्ट्र आहे ! परंतु हेच तो मान्य करत नव्हता . त्याचे असे म्हणणे होते की भारत सेक्युलर असल्यामुळेच आपल्याला सगळीकडे जेवण मिळते . त्याच्याशी मी यापैकी कुठल्याही मुद्द्यावर कधी जास्त चर्चा करायला गेलो नाही . कारण मी स्वतः कधीकाळी याच डाव्या विचारांचा पाईक असल्यामुळे त्यातल्या सर्व खाचाखोचा , बारकावे मला माहिती आहेत ! परंतु इतक्या कोवळ्या वयातील एका तरुणाचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून जे काही योग्य वाटायचे ते मात्र त्याला अवश्य सांगायचो . म्हणजे मी ठरवून असे काही केले नाही परंतु इथून पुढे काही दिवस अधून मधून हा मला सतत भेटत राहिला . आणि त्याला परिक्रमेविषयी बरेच काही मी सांगू शकलो .त्याचा काही उपयोग होणार नाही हे मला माहिती होते . परंतु मला इतकेच समाधान की मी मला जे योग्य माहिती होते ते त्याला सांगितले .  वेळोवेळी सांगितले . याच्याकडे असलेल्या मोबाईल वरून हा अतिशय सुंदर फोटो काढायचा . आणि त्याच्या फेसबुक वर टाकत राहायचा . तो साधू जीवनाचे बारकावे , धर्मक्षेत्रातील वातावरण याचा बारकाईने अभ्यास करत होता . नियम पाळण्याच्या बाबतीत मात्र याचा शिल्लक राहिलेला अहं आडवा यायचा ! असो . तर मी झाड लोट करून जेवायला बसलो तेव्हा हे सर्वजण आले . परंतु साधूने आधीच अंदाजाने जास्तीचा स्वयंपाक करून ठेवला होता . ही बुद्धी , प्रेरणा त्यांना मैया देत असते . इथे खूप छान भोजन मिळाले . गुळ , मुळा, बुंदी ,शेव , पुरी ,भाजी ,खिचडी असा सुंदर बेत होता . जेवताना माझी आणि सात्यकीची चांगली गट्टी जमली . मला बंगाली येते आहे हे कळल्यामुळे तो खूपच खुश झाला . विशेषतः रवींद्र संगीता मधली गाणी मी त्याला म्हणून दाखवल्यावर तर तो वेडाच झाला ! मी त्यांच्या कळपामध्ये सामील व्हावे अशी त्याची इच्छा होती . परंतु मी एकटा शिकारीवर निघालो आहे हे त्याला सांगितले ! मला खरोखरच शिकार करायची होती ! माझी स्वतःची शिकार ! सतत मध्ये येणाऱ्या मी मी या कधी बृहद तर कधी सूक्ष्म अहंकाराची शिकार !  माझ्या षडविकारांची शिकार ! आणि ही शिकार करताना मला मध्ये कोणाचा अडथळा नको होता ! परंतु पुढे अनेक वेळा आमची भेट मात्र होत राहिली . त्याचे या तिघा चौघांपैकी कोणाशी वैचारिक जुळण्याचे तसे काही कारणच नव्हते . कारण अवधूत हा भक्ती संप्रदायात होता . बापू तर पूर्णवेळ स्वयंसेवकच ! आणि दादा सर्वातून निवृत्त ! अवधूत च्या पायाची अवस्था अतिशय वाईट झाली होती . चप्पल चावल्यामुळे त्याच्या पायाला मोठ्या जखमा झाल्या होत्या . तो बिचारा तसाच चालत होता . त्याने कुबेर भंडारी इथून परिक्रमा उचलली होती . मध्ये अध्ये त्याला ही माणसे भेटत गेली . बऱ्याच परिक्रमावासींचे अगदी असेच होते . त्यांना माणसांचा आधार फार सोयीचा आणि अत्यावश्यक वाटत असतो . त्यामुळे आपल्या वैचारिक किंवा भावनिक पातळीवर नसलेल्या अशा कुठल्याही , केवळ तुमच्या समान गतीने चालणाऱ्या माणसांबरोबर ते गट करून चालू लागतात . चालण्याची समान गती हे एकमेव सूत्र अशा गटांना बांधून ठेवत असते . मी बरेचदा पाहिले की एका उंचीचे , एकसारखी चण असणारे परिक्रमा वासी एकत्र चालतात . कारण पायाची लांबी जितकी अधिक तितकी चालण्याला गती अधिक असते . त्यामुळे असे अधिक गती वाले पुढे निघून जातात . हा गट साधारण माझ्या शारीरिक उंचीचा असल्यामुळे मला बरेचदा भेटत राहिला . परंतु मी सुरुवातीलाच सर्वांना सांगत असे की मी एकटा चालतो आहे आणि एकटाच चालणार आहे . आणि या विनंतीचा मान सर्वजण परिक्रमेमध्ये राखतात . मी आलो तेव्हा विदेही बाबा झोपलेले होते . परंतु निघताना मात्र ते जागे झाले होते आणि बाहेरच्या कट्ट्यावर उन्हात येऊन बसले होते . काळा सावळा वर्ण , अस्ताव्यस्त विस्कटलेले केस आणि दिगंबर अवस्था . जाताना सर्वांना बाबा मला काहीतरी द्या ! मला काहीतरी देऊन जा ! असे मागू लागले . चौघांनी तिथून हळूहळू काढता पाय घेतला . वरवर पाहता बाबा वेडसर आहे असे कोणालाही वाटू शकते . परंतु हे विदेही अवस्थेतील संतांचे मुख्य लक्षण असते . विदेही म्हणजे देहाचे भान न उरलेला संत . अक्कलकोट स्वामी ,गजानन महाराज , शंकर महाराज , येहळेगावचे तुकामाई हे सर्व विदेही संत होत .मी माझे सामान काढून त्यात किती पैसे आहेत पाहून ते सर्व गोळा केले आणि बाबांना दिले . इतक्यात मागच्या गावामध्ये कोणीतरी मला चांदीचे कोटिंग असलेले खजूर इथे पाकिटात मिळतात त्याचे पाकीट दिले होते . ते पाकीटही त्यांनी मागितले ! मी लगेच त्यांना देऊन टाकले . न रहावून लहान मुले जसे लगेच खाऊन बघतात तसे त्यांनी खजूर खाल्ले आणि त्यांना ते खूप आवडले ! बाबा माझ्यावर खूप खुश झाले ! आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला . इथून बाहेर आलो तर हे चौघे अजून एका शेतामध्ये उभे राहून समोरचे दृश्य चित्रित करत होते . 
मी आलो तेव्हा हाच फोटो काढण्याचे काम सात्यकी करत होता .
साधारण या शेताचा हा फोटो आहे . तुम्हाला सतत उपग्रह छायाचित्र यासाठी दाखवत आहे ज्यामुळे तुम्हाला नक्की परिक्रमा मार्ग कसा आहे याची अचूक माहिती मिळावी . तसेच सर्वसामान्य छायाचित्रातून प्रत्यक्षात मार्ग कसा आहे त्याचे आकलन होते आहेच .
इथून पुढे काही काळ हे चौघे माझ्या मागेपुढे होते . त्या काळात ते सतत थांबून फोटो काढायचे . खूप वेगाने चालायचे आणि पुढे सावली बघून खाली बसायचे . चौघांपैकी एकालाही बसायची इच्छा झाली की बाकीच्या चौघांनाही बसावे लागायचे . मी एका संथ परंतु नियमित गतीने चालत राहिलो . त्यामुळे मला बरेचदा वाटेत हे लोक भेटत राहिले .
परंतु यांनी काढलेली चित्रे खरोखरच खूप सुंदर होती . त्यातील काही खास आपल्यासाठी देत आहे ज्यामुळे मी कुठल्या मार्गाने चाललो तुमच्या लक्षात यावे . 
याच्याही खाली अगदी काठावरून जाणारी एक कोळ्यांची पायवाट असते ती मी शक्यतो वापरायचो . त्यामुळे बूट चिखलाने माखून लवकर खराब व्हायचे . आत्ताही माझे बूट पार फाटले होते . तसाच खरडत खरडत मी चालत होतो . पादत्राणे  तुटली की त्याचा चालण्याच्या गतीवर निश्चित परिणाम होतो .
घगरोला , पिठेरा कापत कोठीया गावात आलो . आणि समोरचे दृश्य पाहून हबकलोच ! इथे वाळूचा प्रचंड मोठा किनारा नर्मदेला लाभलेला होता .
वाळूच्या वीस फुटी ढिगावर एक भव्य यज्ञ मंडप होता आणि जिथवर नजर जाईल तिथवर कचराच कचरा पसरलेला होता ! प्लास्टिकचे कप ,प्लास्टिकचे ग्लास , प्लास्टिकचे द्रोण , प्लास्टीकच्या पत्रावळ्या , थर्माकोलची ताटे सर्वत्र वाऱ्याने उडत होती . आज बिछुआ घाटापर्यंत पोहोचावे असा माझा मानस होता . परंतु हा कचरा पाहून इथेच थांबायचा निर्णय मी तत्काळ घेतला . माझ्या परीने जमेल तितका कचरा गोळा करून टाकावा असे मी ठरवले . सुदैवाने या अतिशय लांबरुंद वाळूच्या किनाऱ्याला लागूनच अखेरीस एक मारुती मंदिर होते . मी ताबडतोब तिथे गेलो आणि साधूची परवानगी घेऊन आसन लावले . चित्रकूट मधील एक साधू या आश्रमाची व्यवस्था बघत असे . 
कोठीया गावाला लाभलेला वाळूचा भव्य किनारा . आणि राम जानकी मंदिरासमोरील हनुमान मंदिरात आमचा मुक्काम होता .इथून एक दीड किलोमीटर अंतरावर ब्रह्मदेव आश्रम होता .
मी लगेच उठलो आजूबाजूला पडलेल्या काड्या काटक्यांचा एक झाडू बनवला आणि दिसेल तो कचरा झाडून एकत्र करायला सुरुवात केली . इथे पुढे एक आश्रम होता ज्याला ब्रह्मदेव आश्रम असे नाव होते . तिथे आज मोठ्या यज्ञाचे आयोजन केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चालत येत होते . नर्मदा जयंतीच्या निमित्ताने झालेला हा कचरा सर्वजण पाहत  . परंतु त्यांना याची सवय असावी . त्यांना सवय नव्हती ती झाडू मारणाऱ्या परिक्रमा वाशिला पाहण्याची . त्यामुळे जाता येता सर्व ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसत होते . मी मात्र अतिशय शांतचित्ताने माझे कार्य चालू ठेवले . माझ्या डोक्यामध्ये संताप संताप झाला होता . आपण ज्या नदीला आईचा दर्जा देतो तिच्या कुशीमध्ये आपण इतकी घाण कशी काय करू शकतो ? आपण खरोखरच तिला आई मानतो का ? जर आई म्हणत असू तर इतकी घाण खरोखर करू का ? 
मी कचऱ्याचे साधारण ३० - ३० फुटावर एक याप्रमाणे ढीग लावायला सुरुवात केली .  वाऱ्यामुळे कचरा उडून नर्मदेमध्ये जात होता त्यामुळे मला त्वरा करणे आवश्यक होते . इतक्यात माझ्या या कामाचे चित्रीकरण करत अवधूत तिथे आला . तो यूट्युबर व्हीलॉगर या नात्याने मला प्रश्न वगैरे विचारू लागला . "इस कच रे को हटाने के लिए क्या करना चाहिए ? " मी सांगितले तो मोबाईल ताबडतोब पेटवून टाकून प्रथम मदत केली पाहिजे ! त्यालाही लक्षात आले आणि ताबडतोब तोही माझ्या कार्यामध्ये सामील झाला . आमचे बघून एकदोन ग्रामस्थ कचरा झाडू लागले .  बंगाली आणि बापू या दोघांना अवधूत ने खूप वेळा आवाज दिला पण ते काही आले नाहीत . बघता बघता कचऱ्याचे साधारण २०० ते २५० ढीग तयार झाले . अवधूतने एकीकडून ते पेटवून देण्यास सुरुवात केली . मगाशी मला झाडू मारताना बघून हसणारे गावकरी यज्ञातील प्रसाद घेऊन पुन्हा आपल्या गावी निघाले होते . मी अजूनही झाडू मारतो आहे हे पाहिल्यावर त्यांना काय लाज वाटली कोणास ठाऊक ! त्यांनी देखील मोठ्या संख्येने आमच्या सोबत झाडू मारायला सुरुवात केली . बघता बघता त्या सफाई कार्याला एका जन चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले . आणि बघता बघता संपूर्ण घाट स्वच्छ होऊन गेला .
समर्थ रामदास स्वामी म्हणतात
वन्ही तो चेतवावा रे । चेतविताची चेततो ।
प्रयत्नु जाणिजे तैसा । वाढविताची वाढतो ।।
त्याची अनुभूती इथे मला आली . त्यांच्यातील एक जण माझ्याकडे आला आणि माझी क्षमा मागितली . म्हणाला बाबाजी आम्हाला माफ करा . आज तुम्ही विश्रांती घ्या उद्या आम्ही उरलेली स्वच्छता पूर्ण करतो . आता अंधार पडत आहे . तुम्हाला नर्मदेची आरती करायची असेल .ब्रह्मदेव आश्रमातील हवन देखील बघायचे असेल . मी त्याला म्हणालो , " हे पहा देवा , नर्मदेची आरती करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहे नर्मदेला स्वच्छ राखणे ! ज्या आराध्य दैवताची आरती आपण करतो ,आधी त्याला ताम्हणामध्ये घेऊन स्वच्छ करतो ना ! आणि आरती करण्याकरता काय पाहिजे ? नर्मदा माता पाहिजे आणि कोटी रतन ज्योती पाहिजेत ! मग आज हे सर्व ढिगारे ह्याच माझ्या वाती ! आणि माझ्या मनात नर्मदेला स्वच्छ करण्यासाठी निर्माण झालेली तळमळ , आर्तता हीच माझी आरती ! आणि हेच आपले हवन ! आज या हवनामध्ये आपण कचऱ्याची आहुती देऊन टाकू ! चला आपण सर्वजण आज अशी वेगळी आरती करूया ! जगावेगळे हवन करूया ! " आणि मी खरोखरीच कचरा पेटवता पेटवता नर्मदेची आरती म्हणून घेतली . कारण आजच्या आज हा कचरा पेटवणे आवश्यक होते . नाहीतर उद्या तो पुन्हा सर्वत्र पसरला असता . इतके वारे रात्रभर वाहते .ते दृश्य मोठे अद्भुत होते . सुमारे अडीचशे कचऱ्याचे ढिगारे एकाच वेळी पेटलेले आहेत आणि समोर नर्मदा माता वाहते आहे . आणि आम्ही सर्वजण मोठ्या आवाजात तिची आरती करत आहोत ! 
या निमित्ताने मी सर्वच वाचकांना एक गोष्ट सांगू इच्छितो . आपण पर्यावरणापासून जितके दूर जात आहोत तितकी आपल्या आयुष्यातली दुःखे आपण वाढवून घेत आहोत . याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला नाही तरी अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर हे सर्व घटक परिणाम करत असतात . प्लास्टिक मुळे सर्वच घटकांचे प्रदूषण होते . कृपा करून सिंगल युज प्लास्टिक पासून स्वतःला परावृत्त करा . नर्मदे काठी मी प्रत्येक गावामध्ये हा संदेश देत देतच पुढे गेलो . थर्माकोल आणि प्लास्टिक पासून बनविलेल्या ताटल्या , वाट्या , पेले इत्यादी पर्यावरणाचे शत्रू आहेत . पुढील हजारो वर्षे प्लास्टिक जमिनीमध्ये पाण्यामध्ये चिखलामध्ये जिथे कुठे असेल तिथे आहे तसेच राहते . आपल्याला वाटते नदीने कचरा वाहून नेला . परंतु जिथे जिथे नदीचा प्रवाह अडवला जातो उदाहरणार्थ धरणे , तिथे कित्येक किलोमीटर या प्लास्टिकचा अतिप्रचंड ढिगारा साठलेला आहे . मी माझ्या ह्याच डोळ्यांनी हे दृश्य पाहिलेले आहे .  हे दृश्य मोठे हृदयद्रावक आणि विदारक आहे . 
हे आहेत नर्मदेचे ,पर्यावरणाचे शत्रू .
हे आहेत पर्यावरणाचे मित्र . यासाठी केरळ पर्यंत जाण्याची गरज नाही . 
आजकाल सर्वत्र सुपारीच्या पानाच्या पत्रावळ्या किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मिळतात त्या तेंदुपत्त्याच्या पत्रावळ्या किंवा पळसाच्या द्रोण ,पत्रावळ्या हे अप्रतिम पर्याय उपलब्ध आहेत . त्यांचा वापर आवर्जून करा .
अशा पद्धतीच्या पत्रावळींचे निसर्गामध्ये काही आठवड्यातच विघटन होऊन जाते आणि पुन्हा खतात रूपांतर होते . जनावरे या पत्रावळी खाऊन टाकतात . व त्याचे पचन होते . प्लास्टिकच्या पत्रावळी खाऊन अनेक गाई गुरे प्राणाला मुकतात .
या पापात आपण भागीदार होऊ नका .
चार पैसे अधिक गेले तर जाऊ देत . परंतु पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर करा . आपल्या उत्सवाचा भुर्दंड धरणीमातेला आणि नदीला देऊ नका .
पूर्णपणे अंधार पडल्यावर मी पुन्हा आश्रमामध्ये आलो . साधु महाराज निवांत बसले होते . त्यांनी स्वयंपाकाची काही तयारी केलेली दिसत नव्हती . ते मला म्हणाले , " इथे पुढे ब्रह्मदेव आश्रम म्हणून एक आश्रम आहे . तिथे यज्ञ सुरू आहे त्याचे दर्शन घेऊन या . निवांत रात्री उशिरा आलात तरी चालणार आहे . काही गडबड नाही ." त्यांचा इशारा माझ्या लक्षात आला . याचा अर्थ आज भोजन प्रसाद तिकडेच घ्यावा लागणार असा होता . मी विचारले बाबाजी तुमच्यासाठी भोजनप्रसाद घेऊन येऊ का ? ते म्हणाले की  नको . दुपारचे थोडे अन्न शिल्लक आहे . ते खाऊन मी झोपतो . " ठीक आहे . जशी तुमची इच्छा ." असे म्हणून मी सर्वांना निरोप सांगितला आणि आम्ही सर्वचजण तिकडे निघालो . जाता जाता आकाश खूप सुंदर दिसत होते . त्यातील माझ्या ओळखीचे आकाश सर्वांना सांगत आश्रमा पर्यंत आलो . डावीकडे एका टेकाडवर हा आश्रम आहे .  आश्रमामध्ये बरीच गर्दी होती . गेल्या गेल्या आम्हाला शेणाने सारवलेल्या सुंदर मांडवामध्ये बसवले गेले . लगेच भोजन प्रसाद वाढला गेला . भोजन प्रसादी झाल्यावर आम्ही आश्रमामध्ये गेलो . इथे परिक्रमेमध्ये असताना एक साधू आले ज्यांनी या क्षेत्राचा कायापालट केला . फलाहारी जगजीवनदास महाराज असे त्यांचे नाव . या टेकडी वजा आश्रमामध्ये त्यांनी २७ फूट खोल खाली ध्यान गुंफा बांधलेली आहे व त्यात साधना केली आहे . वरती अनेक मंदिरे बांधलेली आहेत . गेली २५ वर्षे यज्ञ सुरू आहे . बाबांना भेटण्यासाठी बरीच मंडळी येऊन बसली होती . बाबा एका छोट्याशा मंदिरासमोर धुनी पेटवत बसले होते . बाबा तेजस्वी आणि लाघवी स्वभावाचे होते . त्यांच्याकडे एक दुर्लभ सौंदर्यदृष्टी होती . शक्यतो साधू त्यांच्या जटा कुठेही कशाही टाकतात परंतु हे मात्र अतिशय व्यवस्थित डोक्यावर गुंडाळून ठेवत होते . यांच्या दाढीच्या देखील कित्येक फोटो लांब जटा झाल्या होत्या त्या देखील त्यांनी सुंदर पद्धतीने गाठ मारून ठेवल्या होत्या . रात्री उशिरापर्यंत स्वामीजी आमच्याशी गप्पा मारत बसले . ते अतिशय तेजस्वी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते . दुर्दैवाने त्यांचे सध्या जे फोटो मला इंटरनेटवर मिळाले त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बरीच खालावलेली दिसते आहे . याचा अर्थ दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसणार असे दिसते . 
वाचकांना महाराजांचे दर्शन घडावे म्हणून काही चित्रे सोबत देत आहे .
ब्रह्मदेव आश्रमाच्या दारात उभी कपिला गाय आणि स्वामी जगजीवन दास महाराज
महाराजांना टोपी खूप आवडते आणि ते स्वतः अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित राहतात . 
त्यांच्याभोवती सतत भक्तांचा विशेषतः तरुणांचा गराडा पडलेला असतो .
आश्रमातील एक सेवेकरी परिक्रमेसाठी निघाला तेव्हा त्याच्या हस्ते कन्या पूजन झाले .त्यानंतर आशीर्वाद देणाऱ्या कन्या . (सर्व चित्रे संग्रहित आहेत )
महाराजांच्या जटा खूप मोठ्या आहेत . त्यांना अन्य साधू खूप मानतात . त्यांच्या वाणीचा अधिकार मोठा आहे .
साधना काळामध्ये ते केवळ फळे खाऊन राहायचे म्हणून त्यांचे नाव फलाहारी बाबा पडले . त्या काळामध्ये महापूर येऊन  आश्रमाच्या चहुबाजूने नर्मदा वाहू लागली आणि हे बेट ही बुडणार अशी परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांनी बेट काही सोडले नाही व त्यामुळे तो महापूर ओसरला अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे .
महाराजांचे अनेक चमत्कार भक्तमंडळी आम्हाला सांगत होती . एकदा त्यांनी डिझेलच नसलेली बोलेरो गाडी शेकडो किलोमीटर चालवत आणली होती . 

मी निघताना त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो की माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद द्या स्वामी . त्यावर त्यांनी मला सांगितले , " एक बात हमेशा याद रखना प्रभु । नर्मदा परिक्रमा कभी पूर्ण नही होती । यह अविरत परिक्रमा है । पूर्ण होनीही नही चाहिये । पुरा ब्रम्हांड परिक्रमा कर रहा है । अविरत परिक्रमा कर रहा है । इलेक्ट्रॉन अणु केंद्र की परिक्रमा कर रहा है । नदी का जल समुद्र में ,समुद्र का जल बादल में और बादल का जल वापस नदी मे ,ऐसी जल की भी परीक्रमा चल रही है । हम उस नदी की परिक्रमा कर रहे है । चंद्रमा पृथ्वी की परिक्रमा कर रहा है । पृथ्वी सूर्य की परिक्रमा कर रही है । सूर्य भगवान आकाशगंगा की परिक्रमा कर रहे है । पुरा विश्व किसी ना किसी बात की परिक्रमा मे व्यग्र है । परिक्रमा ही इस विश्व का सार है । परिक्रमा है तो सबकुछ है । परिक्रमा नही तो कुछ भी नही । " 
त्यांच्या या उद्बोधनाने माझे डोळे कायमचे उघडले . तिथून पुढे मी कधी कोणाला माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मागितला नाही . अविरत परिक्रमा हेच जीवनाचे सार आहे ! बाबांचा आश्रम सोडायची इच्छा होत नव्हती . बाबा म्हणाले तुम्हाला आवडले तर आमच्या आश्रमात येऊन राहा . तिकडे तशी पण फारशी सेवा होणार नाही . परंतु हे योग्य ठरले नसते त्यामुळे मी पुन्हा हनुमान मंदिराकडे निघालो . जवळजवळ असलेल्या आश्रमांमध्ये समन्वय असणे फार गरजेचे आहे . त्यांचे वर्तन स्वतंत्र साम्राज्यांसारखे असू नये .ते धर्माच्या वाढीसाठी फारसे हिताचे नाही . असो .
रात्री जगजीवन दास महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो . जागृती आणि निद्रा ही देखील एक अविरत परिक्रमा आपण आयुष्यभर करतो . सकाळी उठल्यावर चित्रकूट वाल्या बाबांनी चहाला बोलावले . त्यांनी देखील खूप छान उपदेश केला . हे बाबा कट्टर मोदी भक्त होते . साधूं मध्ये देखील मोदी भक्त आणि मोदीविरोधी असे प्रवाह मला आढळले . विशेषतः मध्य प्रदेश मध्ये आणि गुजरात मध्ये काँग्रेसचे शासन बराच काळ राहिले होते . त्या काळात ज्यांच्या आश्रमांना देणग्या वगैरे मिळाल्या ते लोक शक्यतो उघडपणे मोदींचा प्रचार प्रसार करत नाहीत असे मला जाणवले .  बाबांनी जाताना माझे फाटलेले बूट पाहिले . आणि त्यांच्याकडे पडून असलेला नवीन बुटाचा जोड त्यांनी मला दिला . माझे जुने बूट ज्या स्थानिक कंपनीचे होते त्याच स्थानिक कंपनीचा हा नवीन बूट होता . हा "वॉकिंग बूट " असल्यामुळे मऊ व पायासाठी फारच आरामदायक होता . साधूचे आभार मानून मी पुढे निघालो . अशा पद्धतीने दुसरा बूट माझी साथ पंधराच दिवस देऊ शकला . त्याचे आभार मानून तिसरा बूट स्वीकारला . आज परिक्रमेच्या चाळीसाव्या दिवशी माझ्या पायात तिसरा बूट होता . या नवीन बुटामुळे माझ्या पायांना पुन्हा गती आली . 
चित्रकूट वाल्या बाबांनी कोठीया या गावात दिलेला हाच तो तिसरा बूट . 
आज पुन्हा नर्मदा मातेचा काठ धरून चालत राहिलो . इथे नर्मदेचे पात्र दोन्ही बाजूने समान शेती असलेले आहे . इथे मी एक विचित्र घटना अनुभवली . कदाचित नर्मदा माता माझी परीक्षा घेत असावी . बिछुआ घाटासमोरुन मी चाललो असताना पलीकडच्या ताटावर एक माणूस त्याच्यासोबत एक स्त्री आणि लहान मुलगी असे चाललेले मला दिसले . माणूस त्या स्त्रीला आणि लहान मुलीला काठीने बेदम चोपत घेऊन निघाला होता .ती छोटी मुलगी अतिशय उच्चारवाने बचाव बचाव असे ओरडत होती . ती घटना पाहून माझे डोके पुन्हा एकदा फिरले . मी या बाजूने त्या माणसाला आवाज देऊ लागलो . अरे नालायका ! हिम्मत असेल तर मला मारून दाखव ! स्त्रियांवर काय हात उचलतोस ! माझा आवाज ऐकून तो माझ्याशी तिकडून बोलू लागला . मला शिव्या घालू लागला . आणि म्हणू लागला जा जा ! आपल्या वाटेने निघून जा ! आणि पुन्हा त्या दोघींना बेदम चोपू लागला . तो काठीने इतक्या निर्दयपणे मारत होता की या काठावर देखील त्या मारण्याचा आवाज येत होता . त्या दोघींचे आक्रोश मला सहन होईनात . मी त्याला शेवटची चेतावणी दिली . आणि त्याला सांगितले की आता जर तू थांबला नाहीस तर तू गेलास ! त्याने पुन्हा एकदा मला आई वरून शिव्या घातल्या . आणि मारहाण चालू ठेवली .मी त्याला म्हणालो तुला नर्मदा मातेची शपथ आहे .तर त्याने नर्मदा मातेला देखील शिव्या घातल्या . हळूहळू तो पुढे निघून गेला .नर्मदा मातेला शिव्या घातलेल्या ऐकल्यावर माझा संयम संपला.आता मात्र मी ठरवले की परिक्रमा पुन्हा कधीतरी पूर्ण करू . आज याला चांगला धडा शिकवायचा ! मी माझा दंड ,कमंडलु , दप्तर फेकून दिले आणि नर्मदे हर अशी आर्त आरोळी देत पळतच नर्मदेमध्ये उडी मारू लागलो . पोहत पलीकडे जायचे आणि त्याला त्याच्याच काठीने बेदम मारायचे असे मी ठरवले होते . इतक्यात मला पलीकडून आवाज आला नर्मदे हर ! समोरच्या तटावरच मागून पाच परिक्रमावासी येत आहेत असे मला दिसले .मी लगेच ओरडून त्यांना सांगितले की पुढे असा असा एक मनुष्य मारहाण करत आहे .त्याला चांगला धडा शिकवा . चार तरुण आणि एक म्हातारा असे पाच जण होते . तरुणांनी पळतच जाऊन त्या माणसाला धरला . आणि त्याला नुसती समज देऊ लागले . मी इकडून ओरडून सांगितले . त्याला नुसती समज देऊ नका .बेदम चोप द्या . कारण तो नर्मदा मातेला शिव्या घालतो आहे . हे ऐकल्यावर मात्र मागून पळत येऊन म्हाताऱ्याने त्याच्या डोक्यातच काठी घातली ! पाचही जणांनी त्यांच्या काठ्यानी त्याला मरेस्तोवर चोप दिला . तो इतका रगेल होता की मार खाताना देखील शिव्या घालत होता . त्या बाईने आणि मुलीने समोरच्या तटावरूनच मला हात जोडून नमस्कार केला . शेवटी तो माणूस गयावया करू लागला . त्याला नर्मदा मातेची क्षमा मागायला लावा असे मी ओरडून सांगितले . आणि मग मी पुढे निघून गेलो . अशाप्रकारे माझी परिक्रमा खंडित होता होता वाचली .ते पाच परिक्रमावासी आले नसते तर मी नक्की पलीकडच्या तटावर पोहत जायचे ठरवले होते . कृष्णा नदी एका दमात पोहत पार करून पुन्हा माई घाटावर परत पोहत यायचा सराव मला लहानपणापासून आहे . हे पात्र तेवढ्याच मापाचे होते . त्यामुळे कदाचित जमले असते . 
माझ्या नित्य सरावातील कृष्णामातेच्या पात्राची रुंदी
साधारण तेवढयाच रुंदीचे बिछुवा येथील नर्मदा पात्र
जरा पुढे गेल्यावर मला एक नावाडी दिसला . त्याला देखील मी सांगितले की जाऊन त्या माणसाला चोप द्यायची व्यवस्था करा . त्याने फोनवरून त्या गावातील नावाडी लोकांना काठावर बोलावले . मी त्या नावाड्याला सांगितले की पुढे तो ज्या गावात जाईल तिथे त्याला शिक्षा मिळेल अशी व्यवस्था करा . त्याला देखील हा विचार पटला . नर्मदे हर !  करून मी पुढे निघालो . इथे नर्मदा मातेच्या कृपेने मला एक सूत्र लक्षात आले . की समविचारी लोक सगळीकडे उपस्थित असतील तर प्रत्येक ठिकाणीअन्यायाचा प्रतिकार करायला तुम्हाला जायची गरज नाही . तुमच्यासारखाच विचार करणारे लोक सर्वत्र असले की तो प्रतिकार तुम्ही केल्यासारखेच आहे . त्यामुळे आपण स्वतः सर्वत्र पोहोचून कार्य करण्यापेक्षा आपले विचार सर्वत्र पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे . मी एक परिक्रमावासी असल्यामुळे मला त्या अमुक अमुक घटनेचा राग आला . परंतु समोर देखील परिक्रमावासी उपस्थित असल्यामुळे त्याला प्रत्युत्तर लगेच देता आले . तिथे अन्य कोणी असते तर कदाचित माझ्यासारखी प्रतिक्रिया त्यांनी दिली नसती . किंवा माझे ऐकले सुद्धा नसते . केवळ एक परिक्रमावासी सांगतो आहे ,एवढेच लक्षात घेऊन , माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी पुढील कार्यवाही केली . ही किती मोठी गोष्ट आहे पहा ! संघटनेचे हे फार मोठे सूत्र आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात , 
महंते महंत करावे । युक्ती बुद्धीने भरावे । जाणते करून विखरावे ।नाना देशी विदेशी ॥
आपण अवचिते मरोनी जावे । मग भजन कोणी करावे ।या कारणे भजनास लावावे । कित्येक लोक ॥
आपल्या समविचारी लोकांची संख्या वाढविणे हे फार महत्त्वाचे आहे . आणि आपल्या विचारांना एक प्रतिष्ठा असणे देखील आवश्यक आहे .एक परिक्रमावासी आपल्याला सांगत आहे हे तो नावाडी पाहत होता . त्यामुळेच त्या कोळी बांधवाने देखील माझ्या शब्दाखातर त्याच्या बांधवांना फोन करून पुढे त्या नराधमाला पकडण्याची फिल्डिंग लावली . असो . पुढे मी कीरखेडा गावामध्ये गौ घाटावर स्नान करून गुजराती बाबाच्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी साठी गेलो . येथे सर्वत्र सुंदर खडे ,खोटे मिळतात . ते पहात पहात चालताना भान हरपून जाते . इथे मला एक हिरव्या रंगाचे स्फटिका सारखे पारदर्शक शिवलिंग मिळाले . गंमत म्हणजे याला डोळे नाक तोंड असे स्पष्ट दिसत होते ! बॅटरीच्या उजेडा मध्ये खूप अद्भुत चमकायचे ते!
पिठोरा गावानजिक एक सुंदर झरा होता . त्याचे पाणी आकंठ प्यायलो . ते इतके गोड होते की पोट भरले तरी मन भरत नव्हते ! पोट फुगेपर्यंत पाणी प्यायलो आणि एका लाकडी ओंडक्या वरून तो ओहोळ पार केला . एक स्थानिक ग्रामस्थ इथे भेटला त्याने माझा फोटो काढला . मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
 पिठोरा गावां नजिक स्वच्छ पाण्याचा ओढा ,लाकडी ओंडक्यावरून पार करताना प्रस्तुत लेखक . असे लाकडी पुल नर्मदे काठी शेकडोंनी आहेत .
नर्मदे काठी असे स्वच्छ पाण्याचे झरे देखील अक्षरशः हजारोनी आहेत . ते जलस्रोत तसेच स्वच्छ ठेवणे हे आपले फार मोठे राष्ट्रीय कर्तव्य आहे .
नर्मदेमध्ये गाड्या धुणे वगैरे गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत . नर्मदा म्हणजे कुठलीही नदी . कुठलाही जलस्त्रोत . 
 नदी , नाले , झरे यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते याचे भान आपण ठेवले पाहिजे . इथे गाड्या धुणे अत्यंत चुकीचे आहे . त्यातून तेलाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तवंग नदीमध्ये पसरतो . जो मासे व अन्य जलसजीवांसाठी अत्यंत घातक आहे . शिवाय थेट नदीचे पाणी पिणाऱ्या माझ्यासारख्या लोकांच्या पोटात ही त्याचा अंश जातो . असो .
टिटव्यांची पिले आता अंड्यातून बाहेर पडू लागली होती . त्यांची तुरुतुरु हालचाल बघताना फार मजा यायची ! ती चालताना फार मजेशीर आवाज काढतात . त्यांच्याजवळ आपण गेलो की टिटवी हमखास आपल्या अंगावर हल्ला करते . उलट मी माझ्या मार्गाने शांतपणे चाललेलो असताना अचानक टिटवीने हल्ला केला रे केला की मी लगेच आजूबाजूला कुठे त्यांचे घरटे किंवा अंडी किंवा पिले आहेत काय हे शोधायला लागायचो . आणि हमखास पिले सापडायची ! 
 टिटवीची गोंडस पिले
यांची आणि गहू खाणाऱ्या छोट्या पक्ष्यांची मजा पाहत चालताना आनंद मिळत होता . सुगरण ,चंडोल, चिमण्या, धान वटवटे , मुनिया इत्यादी जातींचे पक्षी धान्यासोबतच पिकावरील छोट्या आळ्या , किडे आणि गवताच्या बिया प्रामुख्याने खातात . त्यामुळे तण व कीड  देखील नियंत्रित राहते .ते शेतकऱ्याचे एक प्रकारे मित्रच आहेत .  आज विविध जातींची बदके देखील दिसू लागली होती . पक्षी निरीक्षण ,निसर्ग वाचन या माझ्या आवडत्या गोष्टी असल्यामुळे त्याच्या नोंदी देखील वहीमध्ये येतात .सर्वसामान्य वाचकांना कदाचित त्यातून काही लाभ होणार नाही , परंतु पक्षी अभ्यासकांसाठी या नोंदी महत्त्वाच्या आहेत .असो .
थरैरी नावाच्या गावामध्ये नर्मदा आणि लेंडी या नद्यांचा संगम होतो . ही नदी मी चालतच पार केली .इथून पुढे हळूहळू नद्यांचे पाणी आटत जाते . 
नर्मदा लेंडी संगम . हिलाच लेहरा किंवा एरंडी अशी सुद्धा नावे आहेत .स्थानिक लोक मात्र लेंडी म्हणतात .
इथे काठावर एक राज राजेश्वरी मंदिर होते . वाटेतील सर्व मंदिरांमधील देवतांचे दर्शन घेऊन पुढे जाणे हे परिक्रमेतील विहित कर्तव्य आहे .बरेचदा शहरातून आलेले परिक्रमावासी यात टाळाटाळ करतात . त्यांना पुढे जाण्याची मरणाची घाई असते ! त्यांचे सतत चला पुढे !चला पुढे !  सुरू असते . पुढे जायचे म्हणजे कुठे जायचे हे लक्षात आले पाहिजे . पुढे कुठे जायचे आणि कशासाठी जायचे हे ज्याला कळले तो खरा ! जग पुढे जात आहे म्हणून आपणही पुढे जाणे असेच काहीसे सर्वत्र सुरू आहे . 
श्री राजराजेश्वरी मंदिर आणि मंदिरातील विग्रह
 थरैरी गावातील एक मंदिर
 थोडेसे पुढे आल्यावर गुजराती बाबांचा आश्रम होता . तिथे भोजन प्रसाद मिळेल असे मला काठावर सांगण्यात आले होते .
 इकडे आश्रमामध्ये गुजराती बाबा गुजरातला गेले होते . गावातील तरुणांनी येऊन स्वयंपाक करण्यात तीन तास लावले . त्यामध्ये बराच वेळ गेला . तीन तास म्हणजे सुमारे १५ किलोमीटर ते बारा किलोमीटर अंतर . परंतु जे भोजन केले ते इतके अप्रतिम होते व एवढ्या प्रेमाने वाढले की बस !   उत्कृष्ट बासमती भात होता .नेहमीपेक्षा तिप्पट जेवलो इतका आग्रह करून वाढले जात होते .
गुजराती बाबांना या भागातील लोक खूप मानतात
गुजराती बाबांचा आश्रम
आश्रमामध्ये वाढणारे गुजराती बाबा (संग्रहित छायाचित्र ) मागे आश्रमातील तरुण सेवेकरी .
 येथे एक बिहारी ब्रह्मचारी आपल्या सतरा वर्षीय कस्तुरी नामक चेहऱ्याला सोबत घेऊन परिक्रमेला आला होता .  याचे एक वैशिष्ट्य होते . हा फार मोठ्या मोठ्या गप्पा करायचा . वेद , वेदांत ,अद्वैत सिद्धांत यावर मोठ्या मोठ्या लंब्या चौड्या बाता मारायचा . एक प्रकारे तो खरोखर साधू जीवन जगत देखील होता . पायात चप्पल नव्हत्या. अनवाणी चालायचा . अगदी माझ्यासारखेच छाटी हे वस्त्र गुंडाळून घालायचा . पण हे सर्व ज्ञान गांजा मिळेपर्यंत ! एकदा का गांजा मिळाला की हा भाऊ वितळला ! याने मला माझ्या कपड्यांवरून फार सुनावले . मी सुद्धा वेडा बनून पेढा खाण्यात तज्ञ आहे . त्याला वाटले मी चिडून काहीतरी उलट बोलेन . परंतु मी त्याला शरण गेलो आहे असे दाखवल्यावर मग तो फुल सुटला ! काय वाटेल ते ज्ञान मला देऊ लागला ! त्याला असे वाटले की चला आपल्याला एक नवीन शिष्य मिळाला . याला किती ज्ञान देऊ आणि किती नाही ! थोड्याच वेळापूर्वी साधूचे कपडे गृहस्थी माणसाने घालू नयेत वगैरे सांगणारा हा मनुष्य आता मात्र माझ्या अवताराचे कौतुक करू लागला ! मुळात परिक्रमेचा नियम , माझी सोय आणि माझी सवय या तीन गोष्टींमुळे मी हा वेश धारण केलेला होता ,हे मागे एका स्वतंत्र प्रकरणात सांगितलेले आहेच . मला अधिक चिंता लागली होती ती त्या साधूसोबत असलेल्या छोट्या मुलाची . इतरांशी बोलताना अवाजवी कृत्रिम आर्जवी भाषेमध्ये बोलणारा हा बाबा त्या चेल्यावर मात्र वसा वसा खेकसायचा . त्याने थोडक्यात स्वतःचे सामान उचलण्यासाठी आणि हरकाम्या म्हणून या कस्तुरी नामक मुलाला सोबत घेतले होते .तो त्याच्याकडून हात पाय डोकं चेपून घेत असे .
अखेरीस न राहवून मी त्याला तंबाखू आणि गांजा वरून फुल झापला . त्याला लागलेल्या व्यसनांना तो आध्यात्मिक मुलामा देऊ पहात होता . व्यसनाधीन माणसाचे एक वैशिष्ट्य असते .त्याचे म्हणणे योग्य आहे हे सांगण्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊन प्रतिवाद करू शकतात . तो म्हणायचा हे सर्व केल्याशिवाय परिक्रमा करता येणे शक्य नाही . मग मी त्याला म्हणायचो अरे मग माझे काय सुरू आहे ? मी सुद्धा परिक्रमा करतोच आहे ना ? मी करतो आहे म्हणजे नर्मदा मैया आपल्याला करवते आहे ! मग मला कसे बरे चालता येते व्यसन केल्याशिवाय ? तुला असे काय वेगळे दिलेले आहे की ज्यामुळे तुला व्यसन करणे आवश्यक आहे ? उलट मी तर अशा काही भयानक मार्गानी आलो आहे की जिथून व्यसनी माणूस जाऊ पण शकत नाही ! परंतु हा बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . त्याला सुधारणे अशक्यच होते . माझा प्रयत्न चालला होता त्या सतरा वर्षाच्या मुलाला याच्या तावडीतून सोडविण्यासाठी . याच्या सततच्या आरड्या ओरड्यामुळे आणि धाक दपटशाहीमुळे तो बिचारा कोमेजून गेला होता . त्या मुलाची या बाबाच्या तावडीतून लवकरात लवकर सुटका करणे अतिशय आवश्यक होते . असल्या दांभिक गुरूकडून लाभ होण्याऐवजी नुकसानच अधिक ! असो . आज चालण्यातली मजाच निघून गेली होती . एकतर इथे तीन तास थांबलो होतो आणि पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो होतो ! त्यामुळे रिछावर पर्यंत पोहोचता येणे अशक्य होते . इथे ककरा घाट नावाचा एक घाट आणि पूल लागतो .  
ककरा घाट पूल .ओशो रजनीश यांची जन्मभूमी गाडरवाडा इथे हा पुल जातो .
 ककरा घाट
इथून पुढे गेल्यावर एक मोठा जल उपसा प्रकल्प आहे . एनटीपीसी पंप हाऊस ककरा घाट
नर्मदेवर या काठापासून त्या काठापर्यंत एक जाडजूड मोठी काँक्रीटची भिंत बांधलेली असून त्याच्यावरून वाहणारे नर्मदा जल खूपच सुंदर दिसते . 
या प्रकल्पामुळे तुम्हाला नर्मदेचा किनारा काही काळ सोडावा लागतो . इथे पंप हाऊसला लागून मागे , एका तरुण देवी उपासक साधकाने स्वतःचा मोठा ती मजली आश्रम उभा केलेला आहे .
 पितांबरी देवी आश्रम ककरा  घाट .
रात्री आश्रम असा दिसतो .
ककरा घाटावरील दीपोत्सव
लाल वस्त्रे परिधान करून बसलेला देवी उपासक तरुण साधू
या साधूची अनेक तरुण शिष्य मंडळी सतत त्याच्या आजूबाजूला असायची . मी याच्या आश्रमासमोरून निघालो होतो इतक्यात मला एका शिष्याने आवाज देऊन आत मध्ये बोलवले . खरंतर आवाज मला दिला होता परंतु माझ्या मागून येणारा बिहारी आणि त्याचा चेला हे दोघे देखील आत येऊन बसले . बिहारी थेट आत मध्ये निघाला होता . मी अंगणामध्ये बसलो .साधू बिहाऱ्याला बाहेर घेऊन आला . इथे त्यांनी अतिशय सुंदर असा फळांचा रस , भरपूर फळे आणि अल्पोपाहार आम्हाला दिला .  गरम गरम मसाला दूध देखील दिले . साधू तेजस्वी होता . मितभाषी होता . आणि शिष्यांवर त्याचा चांगला पगडा होता . तुम्हाला अजून काय हवे वगैरे त्याने मला विचारले . मला काहीच नको होते .
उलट मीच त्याला मला सापडलेली काही शिवलिंगं दिली . तो म्हणाला मी देवी उपासक आहे . मला या शिवलिंगांचा काय उपयोग आणि त्याने ती शिष्यांना माझ्यासमोर वाटून टाकली . इतक्यात मला आठवले की मला एक वेगळेच स्फटिकाचे शिवलिंग सापडलेले आहे .  ते मी त्याला दाखवले .ते पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्याचा आनंद गगनात मावेना ! तो म्हणाला अरे हा तर माझ्या पितांबरी देवीचा तांदळा आहे ! हा अतिशय दुर्मिळ असतो ! तुला कसा काय मिळाला ?  मी म्हणालो , कदाचित तुला देण्याकरता नर्मदेने मला दिला असेल .ठेव तुलाच ! साधूला फार आनंद झाला . तो अजून बऱ्याच गोष्टी देऊ करत होता परंतु मी काहीही न घेता तिथून निघालो . बिहारी आणि चेला तिथेच मुक्काम करायच्या तयारीला लागले होते . परंतु त्यांना त्या साधूने अक्षरशः घालवून दिले . मी स्वतः पाहिले . साधूंना माणसाची खूप चांगली पारख असते हे मी वेळोवेळी अनुभवले आहे . निघताना एका शिष्याने आमचे एकत्र फोटो काढले आणि माझा क्रमांक मागू लागला . माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर त्याने मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर सारे फोटो पाठवून दिले .
राकेश शर्मा या पितांबरी देवी उपासक साधू सोबत प्रस्तुत लेखक 
या साधू मुळे मला पितांबरी देवी विषयी अधिक माहिती कळली . पितांबरी या प्रसिद्ध पावडर ब्राण्डचे नाव देखील याच देवीवरून ठेवलेले आहे .  त्यामुळे आजपासून मी नवीन घोषवाक्य डोक्यात ठेवले !
नर्मदेच्या किनारी , कृपा करी पितांबरी !


लेखांक एकोणपन्नास समाप्त (क्रमशः )
 
 

लेखांक ५० : सिद्धक्षेत्र टिमरावन ते झिकौली शुककुटीची रावण टीम

ककरा घाट सोडल्यावर नर्मदा एक सुंदर असे उजवे वळण घेते . हे वळण खूप मोठे असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी ते टाळून सरळ रिछावर येथे पोहोचतात.
परंतु मला नर्मदेचे एकही रूप नजरे आड करायचे नव्हते त्यामुळे मी उजवीकडे वळलो . अतिशय शांत निवांत आणि निर्मनुष्य असा हा परिसर आहे . पुरेशी झाडी आहे . समोरच्या ताटावर शेती दिसते . टिमरावन गावामध्ये जाईपर्यंत नर्मदा उभा तट चिरत जाते . व गावानंतर अतिशय सुंदर आणि निर्मनुष्य असा वाळूचा किनारा आहे .
 टिमरावन येथील नर्मदेचे सुंदर वळण
सिद्धवती नर्मदा संगम असलेले हे वळण एखाद्या शिवलिंगाप्रमाणे भासते . टिमरावन गावात अनेक छोटी मंदिरे आहेत . त्यातील सिद्धेश्वर मंदिर प्रमुख आहे . 
हे एक सिद्ध क्षेत्र आहे . श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर एका उंच घाटावर होते .खडा चढ असलेल्या पायऱ्या एका दमात तोडत वरती मंदिरात पोहोचलो . छोटेसे मंदिर एका उंच चबुतऱ्यावर बांधलेले होते . मंदिरातील शिवलिंग अत्यंत सुंदर व प्रभावी होते . मंदिरामध्ये एक ऊर्जा भरून राहिलेली होती . इथून हलूच नये असे वाटत होते . मंदिराच्या बाहेरील बाजूला कट्ट्यावर मी माझे आसन लावले . इतक्यात राजकुमार पाराशर असे नाव असलेले त्या मंदिराचे पुजारी तिथे आले . त्यांनी मला इथे रात्री खूप थंडी पडते आणि वारे असते तरी कृपया उघड्यावर विश्राम न करता शेजारी असलेल्या धर्म शाळेमध्ये आसन लावावे अशी विनंती केली . जशी मैयाची इच्छा असे म्हणून सामान उचलले आणि आत मध्ये नेऊन एका कोपऱ्यात आसन लावले . परिक्रमेमध्ये जितके कमी सामान तुम्ही सोबत ठेवाल तितके चांगले असते ते याचसाठी . पुजारी बुवांनी मला एक सुंदर पपई कापून आणून दिली . थंडीमुळे थंडगार पडलेल्या तिच्या फोडी गळ्यातून पुढे सरकताना सर्व घसा कसा गारेगार करत होत्या . परंतु हे मूळ उष्ण प्रकृतीचे फळ असल्यामुळे भरपूर खाल्ले . शिवाय उद्या एकादशी आहे म्हणून मला राकेश शर्मा साधूने दिलेला फलहार देखील सोबत होता तो खाऊन , पूजा आरती करून आता झोपावे असा विचार करत होतो . बाहेर पुरेसे अंधारले होते .
 टिमरावन येथील श्री सिद्धेश्वराचे मंदिर .मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे .
गेल्या गेल्या मंदिराच्या याच कट्ट्यावर मी आसन लावले .
नंतर मागे दिसणाऱ्या लाल रंगाच्या धर्म शाळेत मला पुजाऱ्याने पाठवले . 
प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घ्या .
 । ओम सिद्धेश्वराय नमः शिवाय ।
इतक्यात तो बिहारी साधू आणि त्याचा चेला तिथे टपकले . संध्याकाळी अजून एक साधू आला आणि त्याने बाहेर मी जिथे आधी आसन लावले होते तिथेच आसन लावले . बिहारी बाबाने आणि त्याच्या चेल्याने नेमके माझ्या शेजारीच आसन लावले . पुन्हा त्याचे ब्रह्मज्ञान सुरू झाले . तो नवा नवा साधू बनला होता आणि त्याला कोणाला किती ज्ञान देऊ आणि किती नाही असे झाले होते . नवनवीन शिष्य करण्याची घाई त्याला झाली होती . परंतु तो जे बोलतो आहे ते कोरडे ज्ञान आहे हे एखाद्या लहान मुलाला देखील कळाले असते .त्यामुळे मी तिथून उठून तडक मैयामध्ये गेलो . स्नान वगैरे आटोपून मंदिरामध्ये जाऊन बसलो . आणि माझ्याजवळ असलेली स्तोत्रांची पुस्तके सोबत घेतली होती. तिथे बसून मी महादेवाची एक एक स्तवने गाऊ लागलो . शिवमानसपूजा ,शिवमहिम्नस्तोत्र ,शिव पंचाक्षर स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र ही स्तोत्रे मी प्रत्येक शिवालयामध्ये आवर्जून म्हणत असे . शिवाला ही स्तोत्रे फार प्रिय आहेत . मला या सर्व स्तोत्रांची गोडी लागली ती उमा मोहन नावाच्या एका गायिकेने तयार केलेल्या स्तोत्रमालिकेमुळे . आपणही फावल्या वेळामध्ये उमा मोहन या दक्षिण भारतीय गायिकेने गायलेली स्तोत्रे अवश्य ऐकत जावीत . आधुनिक संगीत आणि पारंपारिक चाली यांचे सुंदर मिश्रण असलेली ही अप्रतिम सांगितीक कलाकृती असते . त्यांचे उच्चारही बऱ्यापैकी स्पष्ट आहेत . असो . मी मंदिरामध्ये बसलेलो असतानाच गावातील चार तरुण मुली आल्या . आणि ज्यांनी अतिशय सुंदर अशी शिवस्तुती म्हटली . मला पिपरहा येथील मुक्कामात चंगा बाबांचे शिष्य तिवारी यांनी एक स्तोत्रांचे पुस्तक भेट दिले होते . अरे हो ! हे तुम्हाला सांगायचेच राहिले ! स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांना त्या भागामध्ये चंगाबाबा नावाने ओळखायचे . कारण त्यांची ठरलेली काही वाक्य होती . "हमारा सुनेंगे तो चंगा ! नही तो पंगा ! " किंवा " आओ तो वेलकम ! जाओ तो भीड कम !" तसेच ते सर्वांना मध्येच चार वेळा नारायण नारायण म्हणायला लावायचे . असो . तर तिवारींनी मला दिलेल्या या पुस्तकामध्ये गणपती , देवी , महादेव ,विष्णू यांची महत्त्वाची स्तोत्रं एकत्रित केलेली होती . ते पुस्तक मी त्या मुलींना भेट दिले . त्यांनी रोज या मंदिरामध्ये येऊन यातील एक एक स्तोत्र म्हणून पाठ करून टाकण्याचा शब्द मला दिला . मला त्या मुलींबद्दल खूप कौतुक वाटले .अगदी याच वयातल्या शहरातल्या मुली आजकाल काय करतात हे त्यांच्या परिचितांनी विचार करून पहावे . या मुली शिकत देखील होत्या . घरातील , शेतातली , गुराढोरांची सर्व कामे करत होत्या आणि तरी देखील दिवसातून आवर्जून वेळ काढून , या शिवमंदिरामध्ये येऊन , त्यावर नर्मदा जलाचा अभिषेक करून ,शिवस्तुती म्हणून मग घरी जात होत्या .  या मुलींचे संसार भविष्यात त्या सुखाने करणार याबाबत शंकाच नाही ! नर्मदे काठच्या स्त्रिया अतिशय समाधानी , संयमी ,गृहकर्तव्यदक्ष आणि त्यागी आहेत असे माझे स्पष्ट मत झालेले आहे .आज-काल दुःखाचे संसार जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा त्यातील सहभागी घटकांचे तारुण्यातील वर्तन कसे राहिलेले असते ,याच्याशी संगती लावून पाहिल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील . सूज्ञास अधिक सांगणे न लगे ! असो. 
आज निराहरी झोपायचे मी ठरवले . इकडे मी धर्मशाळेमध्ये परत आलो तोपर्यंत बिहारी बाबाने गावातील चार-पाच गांजाडी गोळा करून रितसर कार्यक्रम सुरू केला होता . हे गांजा पिणारे एका गोला मध्ये बसतात .प्रत्येकाकडे स्वतःचे एक छोटेसे फटकुर असते . म्हणजे सुती फडक्याचा छोटासा तुकडा .हा तुकडा अतिशय तलम मऊसूत कापडाचा असेल याची काळजी ते घेतात . हा प्रत्येकाचा वैयक्तिक फिल्टर असतो . यानंतर एक जण सुरेख पैकी गांजा निवडतो आणि मळतो . तो तंबाखू मध्ये मिसळून , मातीची किंवा धातूची चिलीम घेऊन , त्यात खाली एक कापसाचा बोळा टाकून त्यावर ठासून भरला जातो . त्यानंतर काही मंत्र म्हटले जातात . ही गावठी मंत्र अत्यंत विनोदी असतात . प्रत्येक माणसाचे स्वतःचे वेगळे मंत्र असतात .  शेवटच्या मंत्रात महादेवाला गांजा पिण्यासाठी आमंत्रण दिले जाते . आणि मग तिथला जो मुख्य मनुष्य आहे तो एक मोठा झुरका मारून गांजाची चिलीम पेटवतो . त्याला दुसरा मनुष्य काडी लावत असतो . एकदा चिलीम शीलगविली की भरपूर दम मारून ती पुढच्या माणसाकडे दिली जाते . मग तो पुन्हा दम मारून तिला पुढे पाठवतो . एकदा त्यांचा हा गांजा फुकायचा कार्यक्रम चालू झाला की मध्ये कोणी बोलत नाही . फक्त त्या नशेचा आनंद घेत राहतात . हे सर्व मी केवळ माझे निरीक्षण नोंदवतो आहे .  प्रस्तुत लेखक धूम्रपानाचा तीव्र निषेध करतो हे आपण जाणताच . गांजाचे हे गावठी मंत्र कसे असतात याचा एक व्हिडिओ मला सापडला . तो पहावा .म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या चार-पाच गांजेकस लोकांनी मिळून किती गोंधळ त्या धर्म शाळेमध्ये घातला होता .


सुंदर अशी शिवस्तुती ऐकून आणि म्हणून आल्यावर हे असले मंत्र ऐकून माझं डोकं सटकलं आणि मी रुद्र अवतार धारण करून सर्वांना बाहेर काढले ! बिहारी साधू तर थरथर कापायला लागला . मी त्या सर्वांना सांगितले की गप एका कोपऱ्यामध्ये बसून गांजा फुकायचा . दंगा घालायचा नाही . नाहीतर माझ्याकडे गांजा सोडवण्याचा मंत्र आहे तो म्हणेन ! गांजा सुटेल या भीतीपोटी सर्वजण बाहेर पळाले ! त्यांच्यासाठी जीवनातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे गांजा होती . गांजा पिणारे लोक गांजा पिण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात . बाहेर इतकी मरणाची थंडी असून देखील सर्वजण बिनधास्त बाहेर जाऊन बसले .रात्रभर त्यांचा धिंगाणा सुरू होता . साधूचा केला सतत आत बाहेर करत होता . याने त्या बिचाऱ्या चेल्या कडून त्या सर्व माणसांचा आणि स्वतःचा स्वयंपाक करून घेतला . सुदैवाने या बिहारी साधूने आपल्या तरुण चेल्याला अजून गांजा प्यायला शिकवले नव्हते . स्वतः जवळ असलेला गांजा त्याला द्यावा लागू नये असा स्वार्थी हेतू त्यात होता . मी गुपचूप खुणेने त्या शिष्याला जवळ बोलावले . बाहेर सर्वजण गांजाच्या नशेमध्ये चढलेले होते . मी त्याला विचारले तू खरोखर या महामूर्ख माणसा सोबत समाधानी आहेस का ?  अगदी खरं खरं सांग . मी कोणाला सांगणार नाही . घाबरू नकोस .तुझ्या मनातले सर्व  बोल .मुलगा रडायला लागला . त्याने रडत रडत त्याची सर्व कर्मकहाणी मला सांगितली . हा बिहारी त्याला एकांतामध्ये भरपूर मारहाण करायचा . दहशत घालून त्याला त्याने सोबत ठेवला होता . शिष्य शिष्य नावाखाली त्याचा पक्का गुलाम बनवून टाकला होता . शिवाय पाप पुण्याच्या भ्रामक कल्पना त्याच्या डोक्यात घालून गुरुद्रोहाचे भय त्याला घातले होते . बिहार मधल्या एका छोट्याशा गावातील हा अशिक्षित मुलगा होता . आपला गुरु सांगेल ते त्याच्यासाठी सर्वस्व होते . आधीच या बिहारी बाबाने याची तीन साडेतीन वर्षे वाया घालवली होती . १३ ते २३ - २४ हेच पराक्रमाचे खरे वय असते .आणि नेमकी याच वयातली त्याची साडेतीन वर्षे वाया गेली होती . परंतु त्याला आतापर्यंत मी जे सांगतो आहे ते सांगणारा कोणी भेटला नव्हता . मी त्याला सांगितले , हे पहा काल तू स्वतः पाहिले आहेस की मी थोडेफार जग पाहिलेले असल्यामुळे सर्व साधुसंत माझ्याशी आदराने बोलतात . आणि तुझ्या गुरूला हाडहुड करतात . याचा अर्थ मी तुला नक्कीच काही चुकीचा सल्ला देणार नाही हे तुला मान्य आहे का ? तो हो म्हणाल्यावर , मी त्याला ताबडतोब इथून पळून जाण्याचा सल्ला दिला . इथून गाडरवाडा गाव जवळ होते . इथून काही ना काही करून बिहार गाठता येणे त्याला शक्य होते . माझ्याकडे थोडेफार पैसे जमले होते ते मी त्याला दिले . त्याला सांगितले आता अजिबात विचार करू नकोस . एकदा का या भोंदू साधूच्या नादाला तू लागलास की संपलास .  खरा साधू असा नसतो . त्याला खरा साधू कसा ओळखायचा त्याच्या काही खुणा देखील सांगितल्या . त्याला दोन पर्याय सांगितले . एक तर थेट घरी जाऊन आई-वडिलांसोबत रहा किंवा एखादा चांगला साधू शोधून त्यांच्या आश्रमात जाऊन रहा . परंतु माझे मत विचारशील तर थेट घरी जा आणि आई-वडिलांची सेवा कर , असा सल्ला मी त्याला दिला . आई वडील मुलासाठी किती महत्त्वाचे असतात हे त्याला समजावून सांगितले . कालपर्यंत आमचा मार्ग सामायिक असल्यामुळे तिथून कसे महामार्गाला लागायचे हे मी त्याला समजावून सांगितले .  तो मुलगा विचार करत बसला .बिहारी बाबा पुन्हा बाहेरून त्याच्यावर खेकसला . " ताटे वाढ आणि आम्हाला जेवायला घाल #@£&@#* ! " बिचाऱ्या मुलाने गुपचूप सर्वांना जेवायला घातले . रात्री उशिरा ऐन थंडीमध्ये थंडगार पाण्याने तो भांडी घासत बसला . मला त्या मुलाचे फार वाईट वाटले . हळूहळू माझा डोळा लागला . पहाटेच्या सुमाराला अचानक काहीतरी गार पायाला लागले म्हणून मी डोळे उघडले . तर तो मुलगा दोन्ही हाताने माझे पाय धरून नमस्कार करत होता . कस्तुरी ? क्या हुआ ? असे विचारत मी उठणार इतक्यात तो चित्त्याच्या चपळाईने पळून गेला !  दारातून बाहेर उडी मारताना ची त्याची ती मूर्ती अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नाही ! 

संग्रहित छायाचित्र
बिहारी साधू इकडे ढाराढूर घोरत पडला होता . आणि इकडे कस्तुरी मुक्त झाला होता ! त्याचे नाव तरी किती समर्पक होते पहा ना ! कस्तुरी ! त्या कस्तुरी मृगाचे देखील असेच आहे . आयुष्यभर तो त्या कस्तुरीच्या शोधामध्ये वण वण , वन वन भटकतो .परंतु अखेरपर्यंत त्याला हेच कळत नाही की ती कस्तुरी त्याच्याच पोटात होती ! नर्मदे काठी असलेल्या कस्तुरी नावाच्या या दोन प्राण्यांना मी विसरू शकत नाही . एक होती पोटासाठी " नर्मदे हर " म्हणून दाखवणारी कस्तुरी पोपटीण . तर दुसरा हा कस्तुरी बिहारी . पहिल्या प्राण्याला जरी मी मुक्त करू नाही शकलो तरी दुसरा प्राणी मुक्त करता आला याचे समाधान आहे . सकाळी उठून माझी आन्हिके आटोपून निघणार इतक्यात पुजारी आले .त्यांनी सोबत आणलेला चहा मला इथे पाजला . आणि मला घरी चला अशी विनंती केली . 
पाराशर गुरुजींच्या शेतातूनच घराकडे जाणारा मार्ग होता .
घरी गेल्यावर त्यांनी मला पुन्हा एकदा घरच्या गाईच्या सकस दुधाचा उत्तम पैकी चहा पाजला . घर मोठे होते . पुजारी ही त्यांची वंशपरंपरागत वृत्ती होती . व्यवसाय नव्हता . आज कालच्या लोकांना वृत्ती हा शब्द माहिती नाही म्हणून मुद्दाम सांगतो . पूर्वीच्या काळामध्ये वंशपरंपरेने चालत आलेले काही हुद्दे होते . नाईक , शेटे , देशपांडे ,देशमुख ,पाटील ,कुलकर्णी ,जोशी ,उपाध्ये , कुलोपाध्ये , राजोपाध्ये , पुजारी , बडवे , पुराणिक या सर्व अशा वृत्ती आहेत . हे व्यवसाय नाहीत . असो . 
राजकुमार पाराशर पुजारी यांना मुखाचा लकवा मारलेला होता .त्यामुळे मंत्र म्हणताना त्रास व्हायचा . त्यांनी मला विचारले , की मी आयुष्यभर या सिद्धेश्वराची सेवा केली मग माझे असे कसे काय झाले ? मी त्यावर त्यांना कर्माचा सिद्धांत माझ्या परीने समजावून सांगितला . इतक्यात मला आठवले की नुकतीच मला जी पुस्तके चंगा बाबा आश्रमात मिळाली होती त्यात कर्माचा सिद्धांत हे हिराबाई ठक्कर यांचे अप्रतिम पुस्तक देखील होते . कर्म का सिद्धांत असे हिंदी भाषेतील हे पुस्तक मी लगेच गुरुजींना वाचायला देऊन टाकले . आणि अजून काही थोडेफार बोलून तिथून नर्मदे हर केले .आज एकादशी होती म्हणजे चालण्याचा दिवस होता ! मैया चा किनारा पकडून चालत राहिलो . अप्रतिम वाळूचा किनारा संपल्यावर आधी काटजुनगर आणि मग रिछावर नावाचे गाव लागते . काटजू नगर गावात दोन छोटे आश्रम आहेत . 
वाटेतील कुटी आश्रम
अजून एक वाटेतील मंदिर
चालण्याचा दिवस असल्यामुळे कुठेही न थांबता आज चालत राहिलो . चालण्याचा दिवस अशासाठी म्हणायचे की आज एकादशीचा उपवास असल्यामुळे कुठे भोजन प्रसाद घ्यायचा नसतो . त्यामुळे हलक्या पोटाने चाल देखील खूप अधिक होते . तसेच भोजनासाठी थांबण्याचा वेळ चालण्यामध्ये वापरला जातो आणि अधिक अंतर कापले जाते . या भागातील नर्मदेची रूपे खूप सुंदर आहेत . वाचकांसाठी काही निवडक रूपे .
उंच मातीचे टिले आणि खाली वाहणारी नर्मदा माई
समोरील वाळूचा किनारा
अशा दगडांवरून तोल सांभाळत चालायला फार मजा येते . या खडकावरून मी गेलेलो आहे . 
रम्या रेवा अन् तिची आपोज्योती
नर्मदेने उभे कापलेले तट आणि त्यावरील शेती . इथे खालून चालायला मार्ग नाही असे वाटू शकते .
परंतु असा एक पाऊल ठेवता येईल असा मार्ग सापडतो .आणि पुढे निश्चितपणे जाता येते .
असे अनेक टापू मी नर्मदा पातळीनेच पार गेले . पुढे मार्ग कसा आहे ते सांगणारा नेमका एखादा नावाडी भेटत असतो .
रिछावर आणि नीलकुंड यामधील नर्मदा
रिछावर च्या पुढे नीलकुंड नावाचे स्थान नर्मदेमध्ये आहे . इथे एका भव्य घाटाचे काम सुरू होते व त्या घाटावर अतिशय भव्य आणि सुंदर असे मंदिर बांधले होते . याचा कळस फारच आकर्षक होता आणि खूप दूरवरून दिसायचा .
नीलकुंड येथील भव्य घाट आणि मंदिर समोरच्या तटावरून असे दिसते
नर्मदेला येणारे मोठे पूल सहन करेल अशी ही पूर प्रतिबंधक भिंत काँक्रीट मध्ये बांधलेली आहे . तिच्यावरून चालताना आणि चढताना घसरायला होते . मध्ये मध्ये पाण्यासाठी लावलेले पाईप आहेत त्यांचा वापर पायरी सारखा करत मात्र वेगाने चढता येते . 
या छायाचित्रावरून तुम्हाला पूर प्रतिबंधक भिंत अथवा रिटेन्शन वॉल च्या आकाराची कल्पना यावी
घाट देखील चढायला खूप आहे
नर्मदे काठी असलेल्या काही मोजक्या लक्षात राहणाऱ्या मंदिरांपैकी या मंदिराचा कळस आहे .
कळस आणि मंदिर भव्य दिव्य आहे .
नीलकुंडेश्वर महादेवाचे दर्शन घ्या
मंदिराप्रमाणेच आतले शिवलिंग देखील भव्यदिव्य आहे .
अतिशय रम्य असा हा नीलकुंड परिसर आहे
याला नीलकुंड असे का म्हणतात हे मंदिरातून खाली नर्मदे कडे पाहिल्यावर कळते . सर्वत्र हिरवट रंगाची दिसणारी नर्मदा इथे आल्यावर आपोआप निळसर दिसू लागते .  अधिक उंचीमुळे समोरच्या आकाशाचे प्रतिबिंब नर्मदेमध्ये पडते . शिवाय खोल पाणी असल्यामुळे बहुतांशी स्थिर असते व आकाशाचे प्रतिबिंब त्यामुळे अधिक चांगले उमटते . ते काही असो , परंतु पाणी निळसर दिसते हे मात्र खरे . पुढे कुठे असे निळे पाणी दिसत नाही . 
शक्कर नर्मदा संगम . डावीकडून येते ती नर्मदा उजवीकडून शक्कर येत आहे .

हे मंदिर संपल्यावर लगेचच शक्कर नावाची एक नदी नर्मदेला येऊन मिळते . तीव्र उतार उतरल्यावर नदीपात्र लागते . इथे रस्ता बनवण्याचे काम एक जेसीबी करत होता . त्याने रस्ता खोल खोदून ठेवला होता . अखेरीस मी खड्ड्यातून पलीकडे जाऊ शकत नाही हे पाहून त्याने जेसीबी च्या जबड्या वर पाय ठेवून पलीकडे उडी मारायला मला सांगितले . किंवा जबड्यामध्ये बसवून पलीकडे तो मला सोडणार होता . परंतु परिक्रमेमध्ये वाहनावर चढणे वर्ज्य आहे . त्यामुळे मी खड्ड्यात उडी मारली . आणि पुन्हा वर चढलो .सर्वत्र वाळू असल्यामुळे लागत काहीच नाही . प्रचंड वाळू घेऊन येणारी ही नदी आहे . तिचे पात्र विस्तृत आहे परंतु अत्यंत उथळ आहे . पाणी अतिशय स्वच्छ आणि अक्षरशः साखरेसारखे गोड लागते ! आकंठ पिऊन घेतले !
सुदैवाने गुगल नकाशावर मला याच जेसीबीचा काम करतानाचा फोटो सापडला !मागे पांढरे मंदिर दिसते आहे . नर्मदेचे मी चाललेले वळण दिसते आहे . तीव्र उतार आणि जेसीबीने काढलेला खड्डा देखील दिसतो आहे . शक्कर नदीने साठविलेली वाळू देखील खाली दिसते आहे .
 शक्कर नदी किती उथळ आहे ते दाखवणारे संग्रहित चित्र . उन्हाळ्यामध्ये ही पूर्ण आटून जाते .
शक्कर नदी पार गेल्यावर पुन्हा पावलांना गती दिली .  सोकलपूर , अनघोरी , उसराय , तुईयापानी , पिपरपानी , सोनदहार , केलकछ , महुआखेडी , खैरुवा, पिटरास , खरैटी मार्गे झिकोली गाव गाठले . 
सोकलपूरचा किनारा . इथे प्रचंड प्रमाणात वाळू आहे . आणि ती चांगल्या दर्जाची आहे .
अनघोरी गावामध्ये एका भव्य पिंपळाच्या झाडाखाली छोटासा आश्रम होता . त्या साधून  काळा चहा पाजला .
इथे मी थोडी विश्रांती घेतली .
याच कट्ट्यावर बसून चहा घेतला .
पुन्हा किनाऱ्याचा मार्ग पकडला . 
नर्मदेच्या काठी असे हजारो वृक्ष आढळतात ज्यांची मुळे मैयाने माती वाहून नेल्यामुळे उघडी पडलेली असतात . उरलेल्या मातीची धूप थांबविण्याचे महत्त्वाचे काम ही झाडे करतात . तसेच कठीण मार्गाने चालताना या मुळांचा अतिशय खंबीर आधार परिक्रमा वासींना असतो . 
पिंपळेश्वर महादेव मंदिर ( पिपलेश्वर )
 श्री पिपलेश्वर महादेव 
गुरु गोरक्षनाथ मंदिरातील अप्रतिम मूर्ती
 पिपरपाणी येथे मैयाकाठी धुनी लावून बसलेला साधू (संग्रहित छायाचित्र )
कधी वाळूचा किनारा तर कधी उभा कापलेला कडा असे भूगोल पार करत करत पुढे चालत राहिलो . आज पायांना चांगली गती आली होती . खूप चालावे असे वाटत होते . 
दरम्यान उसराई गावामध्ये एक मोठे पंप हाऊस होते . यातून नर्मदा जलाचा उपसा जोरात सुरू होता . पाणी घेऊन जाणाऱ्या पाईप मध्ये थोडीशी फट पडल्यामुळे पाण्याची फार मोठी कारंजी उडत होती . या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह नाही हे तपासून मी तिथे मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि स्वच्छ कपडे देखील धुवून घेतले . या  फवाऱ्याला इतकी गती होती की काही सेकंदापेक्षा अधिक त्याच्यासमोर उभे राहता येत नसे .  त्यामुळे कपडे अतिशय स्वच्छ निघाले . 
हेच ते पंप हाऊस जिथे मी फवाऱ्याखाली उत्तम स्नान केले .
इथे खाली एक माताराम कपडे धुवत होती . इतक्यात एक पिसाळलेले कुत्रे तिच्या दिशेने धावू लागले . मी धावतच काठी घेऊन त्याच्या अंगावर गेलो . त्यामुळे ते घाबरून पुढे पळून गेले . कदाचित मी आंघोळीला थांबलो नसतो तर त्या पाठमोऱ्या बाईला ते नक्कीच चावले असते . दिवसातून किमान दोन वेळा व अशा पद्धतीने कधी कधी तीन किंवा चार वेळा देखील माझे स्नान सहज होत असे . नर्मदेच्या पाण्यामध्ये  न्हाऊन निघण्याचा आनंदच काही वेगळा आहे ! 
सुंदर सोनदहार घाटाची काही छायाचित्रे
असे घाट वाटेमध्ये लागले की मी शक्यतो वर जाऊन मंदिरांची दर्शने घेऊन खाली येतसे .
इथे नर्मदा माता खूप सुंदर दिसते .
नर्मदेचे पाणी देखील या भागात खूप स्वच्छ आणि सुंदर आहे .
माझा काठावरून चालत येण्याचा मार्ग . मध्ये असे घाट आडवे आले की बार वरून उड्या मारून जावे लागायचे . सोनदहार घाट असाच उडी मारून पार केला . 
खैरुआ गावामध्ये नेपाळी बाबाचा खूप सुंदर आश्रम आहे . समोर असलेल्या अंडीया गावांमध्ये त्याचा खरा आश्रम आहे . नर्मदा मढीया अशा नावाने त्याने स्वर्ग उभा केला आहे . त्याची झलक या काठावर पाहायला मिळते .
नेपाळी बाबाच्या समोरील आश्रमाची शाखा
असे समोरासमोर आश्रम फार कमी ठिकाणी आढळतात . परंतु इथे न थांबता मी पुढे चालत राहिलो . सध्या आयोध्या मध्ये राम मंदिर बांधून झाल्यावर १००८ यज्ञांसाठी जी यज्ञशाळा आणि जप शाळा बांधली आहे ती या नेपाळी बाबांनीच बांधली आहे . बाबा अतिशय हुशार आहे . आणि त्याच्या इतकादुसरा कल्पक साधू मी उभ्या परिक्रमेमध्ये पाहिला नाही . या बाबा बद्दल समोरच्या तटावर गेल्यावर एका विस्तृत लेखाद्वारे माहिती घेऊ . सध्या आपल्याला झिकोली गाठायचे आहे . झिकोली गाठण्यामागे एक कारण होते . स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांनी मला असे सांगितले होते की तू झीकोली मध्ये पोहोचेपर्यंत तुझ्यासाठी मी एक नवीन कमंडलू तिकडे पाठवण्याची व्यवस्था करतो . आता आपल्याला एक नवीन कमंडलू मिळणार आणि तोही एका चांगल्या साधूच्या हातून या आनंदापोटी मी चालत होतो . पिटरास या गावांमध्ये शिवनारायण सिंह चौहान नामक एक ग्रामस्थ मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने घरच्या दुधाचे एक लिटर अप्रतिम ताक मला पाजले व दहा रुपये दक्षिणा देखील दिली . मी उभ्या उभ्या त्याच्या प्रवेशद्वारावरती भिंतीवर जय श्रीराम व शुभ लाभ अशी अक्षरे लिहून दिली .ती त्याला फार आवडली व त्याने सर्वांना बोलवून दाखवली .
 पिटरास चा नर्मदा घाट
 पिटरास इथे एका मजेशीर शिव मंदिराचे बांधकाम सुरू आहे .
मध्ये खरेटी इथे अखंड रामनाम सुरू होते . त्याचे दर्शन घेतले व थोडेसे नामस्मरण केले .
खरेटी येथील अखंड सिताराम जप कुटी आश्रम .समोर सिद्ध घाट . वाळूमध्ये कुंपण टाकून केलेली शेती दिसते आहे . अशी शेती पुढे जागोजागी आढळते . इथे शक्यतो काकडी वर्गीय वेल वनस्पती लावतात . 
मजल दरमजल करत झिकोली गाव गाठले .
झिकोली गावामध्ये तीन आश्रम होते . एक छोटा घाट म्हणून होता . इथे पूल होता . त्या पुलाखाली हा आश्रम होता .पुलाच्या पलीकडे एक बडा घाट म्हणून होता .या दोन्ही ठिकाणी मी कोणी संन्यासी कमंडलू ठेवून गेला आहे का याची चौकशी केली . परंतु नकार मिळाला .
 झिकोली आणि बोरासदरम्यानचा पूल
महापुरामध्ये या पुलावरून नर्मदा वाहते .
 इथे गावामध्ये दद्दा आश्रम म्हणून एक आहे . तिथे चौकशी करा असे मला एकाने सांगितले . त्यामुळे मी दादाजी धुनीवाले यांचा तो आश्रम शोधत त्या आश्रमा पर्यंत गेलो . परंतु आश्रमामध्ये बसलेल्या एका म्हाताऱ्या साध्वीने मला अपमानपूर्वक बाहेर हाकलले !  परिक्रमावासींना नो एन्ट्री असलेला हा पहिलाच आश्रम मी नर्मदे काठी पाहिला . मी तिला फक्त इतकेच विचारत होतो की कोणी तुम्हाला कमंडलू आणून दिला आहे का . परंतु तिने फार वाईट शब्दात अपमान करून मला हाकलून लावले . या आश्रमाचा मार्ग एका कुटीवाटेतून जात होता . ज्याला आपण झोपडपट्टी असे देखील म्हणतो . मी बाहेर आल्याबरोबर त्या झोपड्या मधून बाहेर आलेल्या स्त्री-पुरुषांनी मला तिथे कशाला गेलात वगैरे सांगायला सुरुवात केली . त्या सर्वांना आश्रमातील म्हाताऱ्या स्त्रीच्या विक्षिप्त वागण्याचा अनुभव होता आणि ती बाई त्यासाठी बदनाम होती . किती दुर्दैव आहे पहा . आपल्या गुरूंच्या नावाने चालविलेला आश्रम स्वतःच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे असा अधोगतीला जात असेल तर त्या सारखे दुर्दैव ते दुसरे कोणते ! किमान जिथे आश्रम उभा आहे तिथल्या स्थानिकांमध्ये तरी तुम्हाला थोडाफार आदर , सहारा मिळायला नको का ! अखेरीस मी त्या कमंडलू चा नाद सोडला आणि पुढे चालू लागलो . पुढे बरीया घाट नावाची धुनीवाले दादाजी यांची तपोभूमी आहे . तिथे शिवरामदास नावाचे महंत राहतात . त्यांनी मला सांगितले की हा झिकोली मधला आश्रमच मुळात बोगस आहे . आणि त्यांचा धुनीवाले दादाजींशी काहीही संबंध नाही . असो . तो आश्रम परवडला इतकी पुढची शुक कुटी मजेशीर होती ! 
खरे तर छोटा घाट चांगला होता . तिथे मुक्कामाची सोय देखील उत्तम होती . उत्तम सोय म्हणजे काय तर जिथे मुक्कामासाठी खोली नाही व थेट नर्मदेच्या काठावरच झोपावे लागते त्याला मी उत्तम सोय मानत असे ! कारण इथे पडल्या पडल्या देखील नर्मदेचे दर्शन व्हायचे .आवाज कानावर पडायचा .
 झिकोली येथील सुंदर नर्मदा
परंतु माझ्या नशिबात नसलेल्या त्या आभासी कमंडलूच्या नादामध्ये मी पूल ओलांडला होता आणि परिक्रमे मध्ये शक्यतो परत उलटे फिरत नाहीत .त्यामुळे पुढे जो काही पर्याय मिळेल तिथे आसन लावणे मला क्रमाप्राप्त होते . त्यात ही कुटी सापडली ! एका शिष्याने आवाज दिल्यामुळे मी छोट्याशा कुटीमध्ये जिना चढून वर गेलो . खाली एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीमध्ये आसन लावले होते .
वामन रूपातील एक गांजा प्रिय पाखंडी बाबा येथे बसला होता . वेदांत मताचा जो अव्हेर करतो त्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये पाखंडी असे म्हटले जाते . त्याच अर्थाने मी हा शब्द इथे वापरला आहे याची कृपया नोंद घ्यावी . देव ,धर्म , मोदी ,भाजप , सण , उत्सव ,पूजा विधि ,यज्ञयाग ,कर्मकांड इतकेच काय साक्षात नर्मदा मैया व नर्मदा परिक्रमा यांची देखील अश्लाघ्य निंदा तो अखंड करत होता . पुढच्या आश्रमाची माहिती विचारल्यावर तो मला म्हणाला की मी नर्मदेमध्ये रोज डोलडाल ला जातो . तिथे डावीकडे एक ओढा आहे . त्याच्यापुढे मी जात नाही . तेवढीच नर्मदा मला माहिती आहे . आणि सारे शिष्य हसायला लागले . तो आणि त्याचे स्थानिक ग्रामस्थ शिष्य अखंड गांजा ओढत होते . त्याने निंदा करणारे वाक्य उच्चारावे व सर्वांनी मिळून फिदी फिदी हसावे असे सर्व चालले होते . मला राग यावा म्हणून मुद्दाम सर्व चालू आहे असे वाटत होते . साधूच्या दहा बाय दहाच्या खोलीला एक छोटीशी खिडकी होती . त्यातून तो सतत खाली थुंकत होता . आपण नर्मदा पात्रामध्ये थुंकत आहोत याची जरा देखील खंत त्याला वाटत नव्हती . नर्मदा मैया माझी परीक्षा घेत आहे असा भाव ठेवून मी शांतपणे सर्व पाहत होतो . साधू मला म्हणाला , "तुझे भोजन प्रसादी तो लगेगी ! लेकिन मेरे यहा भोजन भी नही मिलेगा और सदावरत भी नही मिलेगा । रहना है तो रहले ।" त्याच्या या वाक्यावर सर्व शिष्य मिळून फिदी फिदी हसू लागले . "और एक बात समझ लेना बेटा ।तुम जहां रुके हो वहां नीचे बड़े घाट पर ठेला लगाने वाले लोगों का सामान पड़ा है ।उसमें से नारीयल मुरमुरा बताशा चुराके खा मत लेना । " पुन्हा सर्व गांजाडे हसू लागले .
मी देखील त्यांच्या हसण्यामध्ये सामील झालो आणि म्हणालो , "अच्छा हुआ । आज ही मै शुक कुटी मे आया ।आज मेरा ग्यारस का उपवास है । ग्यारस के दिन मै भूखा ही सोता हू । " मग साधूला काय वाटले कोणास ठाऊक त्याने मला चहा करून पाजायची आज्ञा शिष्याला दिली . चहा घेऊन मी खाली स्नानाला गेलो . वाळूचा घाट होता . इकडे फारशी वर्दळ नव्हती पण समोर असलेल्या बोरास नावाच्या गावामध्ये मात्र मोठा मेळा कायम लागलेला असतो . इकडे काही किरकोळ दुकाने होती . 
 झिकोली बडा घाट येथील दुकाने
ते दुकानदार दुकान बंद केले की सामान या साधूच्या एका खोलीमध्ये कोंबून ठेवत . त्या दहा बाय दहा च्या अत्यंत अस्वच्छ , घाणेऱड्या , वासाड्या , अंधाऱ्या , कुबट खोलीमध्ये मी रात्र कशीबशी काढली . कधी एकदा उजाडते असे मला झाले होते . सकाळ होताच तिथून मी धूम ठोकली . नशिबाने एकादशीचा उपवास होता म्हणून मी वाचलो . या कुटीबाबत अजून बरेच काही सांगता येण्यासारखे होते परंतु ते न सांगितलेलेच बरे . सुदैवाने ही कुटी दरवर्षी चार महिने पाण्याखाली जाते . त्यामुळे साधूला नर्मदा माहिती नसली तरी नर्मदेला कुटी चांगली माहिती आहे . 
पुढे गेल्यावर मला लक्षात आले की जय सेवा अशी घोषणा देणाऱ्या , सर्वसामान्य आदिवासी लोकांना भडकवणाऱ्या ब्रिगेडी संघटनेचा प्रभाव या ठिकाणी आढळत होता . ही मोजपट्टी लावल्यावर शुक कुटी ची सर्व मापे कळाली . असो .
एक राष्ट्र म्हणून आपल्या भारत वर्षाला एकसंध करताना अशा देखील लोकांचा सामना आणि समावेश आपल्याला आपल्या राष्ट्र कार्यामध्ये करून घ्यायचा आहे हे नेहमी प्रत्येक कार्यकर्त्याला डोक्यात ठेवावेच लागेल . इतकाच धडा नर्मदेने इथे मला दिला . 


लेखांक पन्नास समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ५१ : दुधी संगम पंचकोसी यात्रा , रामदासजींचा महायज्ञ , सिवनी आश्रम आणि भटगावचे भग्न मंदिर

शुक कुटी सोडली आणि निमावर गाव गाठले. नर्मदा नदीचे नाभी स्थान नेमावर म्हणून आहे ते वेगळे आणि हे वेगळे . अजून नाभी स्थानापर्यंत आपण पोहोचलेलो नाही . निमावर नंतर संदूक नावाचे गाव लागते .या गावातील खेडापती मंदिर आणि गावाच्या शेवटी लागणारे सिंहनाथ मंदिर तसेच या संपूर्ण परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरांचे भग्न अवशेष बघायला मिळतात .लोकांनी अज्ञानापोटी मंदिराचे विविध भाग देव देवताp म्हणून पुजलेले आढळून येतात . प्रत्यक्षामध्ये हे मंदिराचा आमलक , कळस ,खांब , महिरपी इत्यादींचे मूर्ती भंजकांनी फोडून केलेले तुकडे आहेत हे तज्ञ माणसाला लगेचच लक्षात येते . 
संदूक गावातल्या खेडापती मंदिरामध्ये देव समजून पुजलेले प्राचीन भग्न मंदिराचे अवशेष .
सिंहनाथ मंदिरातील पुरातन मंदिराचे अवशेष आणि उत्कृष्ट मूर्ती . अशा भ ग्न मंदिरांचे अवशेष नर्मदा खंडामध्ये अक्षरशः हजारो गावांमध्ये आहेत .
गत वैभव लोप पावून आजची आमची मंदिरे अशी उरलेली आहेत . हे खेडापती मंदिर आहे . 

इथून पुढे किनाऱ्याने चालताना एक फार मोठा वटवृक्ष दिसू लागला . या वृक्षाची छाया प्रचंड होती . कुतूहलाने वरती गेलो असता लक्षात आले की हा बरिया घाट असून ही धुनी वाले दादाजी यांची ही तपोभूमी होती .
हा संपूर्ण गोल गरगरीत विस्तार एकाच वटवृक्षाचा आहे .
निळा पत्रा म्हणजे साधू कुटी आहे . 
वट चा वड शब्द झाला . वडला बड म्हणू लागले . ड चा र स्वाभाविकपणे इथले लोक करतात .त्यामुळे बड शब्दाचा बर असा शब्द  झाला . त्या वडाचा / बडाचा घाट म्हणून बरिया घाट . शुद्ध मराठीमध्ये वड्या घाट . इति शब्द व्युत्पत्ती कथा .असो .
हे स्थान अतिशय पवित्र होते . पुरणकाळातील एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम कसा असावा हे या स्थानाकडे पाहून कळत होते . तिथे बाजूला एक छोटीशी कुटी होती आणि तिथे शिवरामदास नावाचे साधू राहत होते . कुटी आणि संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला होता .
शिव रामदास बाबांची कुटी
 बाबा स्वभावाने थोडेसे विक्षिप्त होते ,परंतु साधूंच्या दृष्टीने हा स्वभाव सर्वसामान्य आहे . त्यांनी मला कालच्या एकादशी निमित्त केलेल्या भगर आणि भाजीचा बालभोग दिला . तो पोटात गेल्यावर थोडासा आधार आला . यांनीच मला सांगितले की झिकोली गावामध्ये असलेला दद्दा यांचा आश्रम त्यांच्या नावावर चालविला जातो आणि तो अधिकृत शिष्याचा किंवा शिष्य परंपरेतला नाही . हा वटवृक्ष इतका मोठा होता की त्याच्या पारंब्यांचा विस्तार कित्येक मीटर पसरलेला होता . यातील मूळ वृक्ष कुठला आहे ते ओळखता येणे कठीण होते . एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये जशी विविध दालने असतात तशा या पारंब्या पसरून जमिनीत रुजल्यामुळे मोठी मोठी दालने तयार झाली होती . एकाच वेळी किमान दोन तीनशे लोक आराम करतील इतकी सावली या झाडाला होती . इथे काही काळ ध्यानाला बसल्यावर खूप छान वाटले . साधु ने तो संपूर्ण परिसर अतिशय म्हणजे अतिशयच स्वच्छ ठेवला होता . अक्षरशः एवढा मोठा वृक्ष वरती असून खाली एक पान सुद्धा पडलेले नव्हते . पाने , काड्या , फळे , पक्ष्यांच विष्ठा ,पडल्या पडल्या तो झाडून टाकत असे . इतकी स्वच्छता राखत असल्यामुळे स्वाभाविकपणे आलेल्या भाविकांना देखील गैरशिस्त वर्तन करण्याची परवानगी बाबा देत नसे , आणि हे योग्यच आहे .
गुगल नकाशावर या वडाची काही छायाचित्रे मिळाली ती आपल्या दर्शनाकरता सोबत जोडत आहे .
खाली जमिनीवर किती स्वच्छता ठेवलेली आहे पहा . कुठेही एक पान सुद्धा पडलेले दिसणार नाही .ही शिव रामदास बाबांची कमाल आहे .
मूळ खोड इथे कुठेतरी असावे
प्रत्येक पारंबी सरळ जमिनीमध्ये घुसेल असे नियोजनपूर्वक पाहिले गेले आहे . 
इथे आत मध्ये आल्यावर मनुष्य हरवल्यासारखा होतो . 
खालची जमीन अतिशय स्वच्छ चोपलेली ,लिंपलेली आणि खडे -कचरा - काड्या - पाने विरहित आहे .
कुठेही जाऊन तुम्ही आरामात बसू शकता . अशी स्वच्छता कायम ठेवणे किती अवघड आहे विचार करून पहा .
या वटवृक्षाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे
या वडाच्या शीतल छाये मध्ये सुंदर असे शिवमंदिर आहे . शिवलिंग अतिशय उभट आहे .
बढ़िया घाटाच्या इथे खाली उतरून वाळूचा मोठा किनारा पार केल्यावर दुधी नावाच्या नदीचा नर्मदे शी संगम होत होता . संगमाच्या सुरुवातीला एक सुरेख आणि भव्य दिव्य महादेव मंदिर होते .
महादेव मंदिर ,दुधी संगम
यात्रेकरूंनी आणून लावलेले गावोगावीचे ध्वज
मंदिरामध्ये असलेला घनदाट आम्रवृक्ष लक्ष वेधून घेतो .

या दोन्ही नद्यांनी इथे प्रचंड वाळू आणून टाकलेली आहे . त्यामुळे खूप मोठे वाळवंट तयार झालेले आहे . या वाळवंटावर शेकडो तंबू आणि हजारो लोकांची गर्दी दिसू लागली .ही नर्मदेचीच पंचकोशी किंवा पंचक्रोशी किंवा पंचकोसी परिक्रमा सुरू होती . याचा अर्थ साधारण पाच कोस अंतराची छोटी परिक्रमा .  जिकडे तिकडे लोकांची स्वयंपाकाची गडबड चालली होती . बहुतांश लोक गक्कड भाजत होते . जणूकाही एक मोठा मेळाच इथे भरला होता . स्नान करून लोकांनी वाळवंटामध्ये कपडे वाळत घातले होते . ते चुकवत चालताना कसरत करावी लागत होती . परिक्रमेमध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष होते .इथे काही तरुण देखील होते . त्यातल्या एका उत्साही तरुणाने माझे फोटो काढले . आणि पाठवण्यासाठी नंबर मागू लागला . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर त्याने ते फोटो ,मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .
दुधी नर्मदा संगम इथे पंचकोसी परिक्रमावासींनी रात्रीच्या मुक्कामासाठी टाकलेल्या तंबू - राहूट्यांसमवेत प्रस्तुत लेखक . 
परिक्रमावासींनी दूधी नर्मदा संगम वाळवंटामध्ये वाळत घातलेले कपडे चुकवत चालताना आणि स्वयंपाकासाठी चाललेली त्यांची लगबग पाहताना प्रस्तुत लेखक .
नर्मदे काठी अशा पंचकोसी यात्रा अनेक ठिकाणी होतात . अमरकंटकची पंचकोशी ,मी पाहिली ती आत्ताची पंचकोशी यात्रा , नेमावर ची पंचकोशी ,अलीकडे प्रसिद्धीला आलेली उत्तर वाहिनी परिक्रमा , विमलेश्वर ची रत्न सागर पंचक्रोशी , ओंकारेश्वर पंचक्रोशी या सर्व पंचकोशी यात्राच आहेत . इकडे याला पचकोशी किंवा पचकोसी असे सुद्धा म्हणतात .
या लोकांची गंमत काही काळ पाहत होतो . बहुतांश नरसिंहपूर जिल्ह्यातील स्थानिक लोक अधिक होते . आसपासच्या चार-पाच जिल्ह्यामधील लोक देखील सहभागी झाले होते . सर्वत्र प्रचंड कचरा घाण करणे सुरू होते . प्लास्टिकच्या पत्रावळ्या ,थर्माकोलच्या पत्रावळ्या प्लास्टिकचे ग्लास इतस्ततः फेकले जात होते . मला भेटलेल्या तरुणांना मी जमेल तितके प्रबोधित करायचा प्रयत्न केला .  नर्मदा दुधी संगम स्नानासाठी एकच झुंबड उडाली होती . दुधी नदी आटलेली होती . संगमावरती स्नान करून पुढे पांसी घाटावर गेलो .यालाच पांसी घाट , मौनी घाट  किंवा सिरीसिरी घाट असे देखील म्हणतात . इथे प्रभू रामचंद्रांचे पाय लागलेले आहेत .  त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते . तिथे शेकडो साधू जमून एक महायज्ञ सुरू होता . एकीकडे भक्त लोकांची गैरशिस्त पाहिल्यावर इकडे साधू समाजाची शिस्त पाहून जरा बरे वाटले . अक्षरशः शेकडो जटाधारी साधू येथे जमलेले होते . एका फार मोठ्या यज्ञाचे आयोजन येथे केलेले होते . हा सोहळा फक्त साधू लोकांसाठी होता त्यामुळे सर्वसामान्य लोकांना इथे फारशी संधी नव्हती . परंतु मी परिक्रमावासी असल्यामुळे सर्व साधूंनी माझे चांगले आगत स्वागत केले . विशेषतः भोजनाच्या दोन पंगती बसलेल्या होत्या . बाहेर अंगणात सर्वसामान्य ग्रामस्थ व भक्त लोक जेवत होते आणि आत मध्ये आश्रमात साधूंची पंगत चालली होती . मला तिथल्या व्यवस्थापक साधू ने आत मध्ये जेवायला बसवले . भोजन प्रसादी अतिशय उत्कृष्ट होती. हा देखील धुनीवाले दादा परंपरेतील आश्रम होता . इथे महंत रामदास म्हणून महाराज होते ते सर्व व्यवस्था पहात होते . माझ्याकडे असलेल्या दंडाची चौकशी इथे अनेक साधुसंत महंतांनी केली .कारण असा दंड कोणाकडेच नव्हता . तिथे अनेक साधू संतांशी चांगला सत्संग घडला .अनेक नवीन नवीन परंपरा आणि आखाडे रोज मला माहिती होत होते . 
तेजस्वी सत्पुरूष संत रामदास बाबा
आश्रमामध्ये पंचाग्नी साधना करत बसलेल्या साधू जनांवर पुष्पवर्षाव करणारा एक साधू . आपल्याला कर्माने श्रेष्ठ वाटणाऱ्या व्यक्तीवर पुष्पवर्षाव करणे ही साधू संप्रदायाची जुनी परंपरा आहे . 
अयोध्या श्री राम जन्मभूमी मंदिरातील रामललांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मोदींनी बांधकाम कामगारांवर जो पुष्प वर्षाव केला तेव्हा मला सिरसिरी घाटावरील प्रसंगच आठवला . 
एकाच वेळी पंचाग्नी साधनेला बसलेले शेकडो साधू पहायला सुद्धा खूप जबरदस्त वाटत होते .त्यांना लागणाऱ्या लाकडांचा आणि  गोवऱ्यांचा मोठा ढिग मधोमध करून ठेवला होता . 
या आश्रमाचा परिसर खूप भव्य आहे . जिकडे बघावे तिकडे साधूच दिसत होते . वरील चित्रात रिकामा दिसणारा आश्रम त्यादिवशी प्रत्यक्षात साधूंनी खच्चून भरला होता .
नेहमीची यज्ञशाळा
महायज्ञासाठी अशी वेगळी यज्ञशाळा उभी केली होती .
आश्रमातील एक मंदिर .
मुळात परिक्रमेमध्ये यावे ते सत्संगासाठी . आणि इथे तो परिपूर्ण मिळत होता .त्यामुळे मी इथे बराच वेळ दिला . इथे बाहेर भरलेल्या बाजारामध्ये मी एक स्टीलचा कमंडलू विकत घेतला . ही एक लिटरची अशी किटली होती जी माझ्या दप्तराच्या बाहेरच्या कप्प्यामध्ये बरोबर बसायची . दुकानदाराने माझ्याकडून नाममात्र पैसे घेतले . खरी किंमत त्याने शेवटपर्यंत मला सांगितली नाही . त्याने माझ्या जवळची जुनी प्लास्टिकची बाटली देखील मागून घेतली . मी त्याला म्हणालो की बाबा रे हे प्लास्टिक आहे .इकडे घाटावर टाकून देऊ नकोस . घरी नेऊन त्याची विल्हेवाट लाव . त्यावर तो म्हणाला की अहो गेले ४० दिवस तुम्ही या बाटलीमध्ये वेगवेगळ्या तीर्थांवरचे नर्मदा जल भरत आहात . या बाटलीमध्ये नर्मदा जल भरून मी ती पूजेमध्ये ठेवणार आहे . परिक्रमा वासी म्हणून तुम्हाला मिळणारा हा मान खूप काही सांगून जातो . खूप काही शिकवून जातो . खूप काही देऊन जातो . आणि खूप सारे घेऊन देखील जातो ! आजचा दिवस एकंदरीतच माझ्यासाठी खूप भाग्याचा होता ! 
धन्य आज दिन संत दर्शनाचा ! अनंत जन्मांचा शीण गेला । आणि
धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन !
झाली पापा पापा तुटी ।दैन्य गेले उठा उठी ।
 झाले समाधान ।पायी विसावले मन ।
 तुका म्हणे आले घरा । तोची दिवाळी दसरा ।
असे अभंग मनापासून गात पुढचा मार्ग पकडला . या ठिकाणी आपल्याला कोणता लाभ मिळाला आहे हे शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . परंतु सर्वच साधूसंतांनी एकमुखाने सांगून ठेवलेले आहे की संत दर्शनी हा लाभ हे सतत सर्वांनी चित्तात ठेवावे इतकेच वाटते. पुनरुपी पायांना गती दिली पुढे खैरा ,बुधीया ओलांडत सांडिया येथे आलो .येथे शांडिल्य ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे . या गावाच्या आधी नर्मदेच्या वाळवंटातून चाललेलो असताना एक अद्भुत अनुभव आला . मी मनामध्ये नर्मदा मातेचे स्मरण करत होतो . आणि तिला मनोमन म्हणत होतो की खूप दिवस झाले तू माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेला नाहीस . तू मुकी आहेस की काय ? नदी रूपाने दर्शन देतेस . परंतु मला कळेल , मला समजेल अशा माझ्यासारख्याच मानवी रूपामध्ये मला कधी दर्शन देशील ?असा विचार करत मी वाळूतून पाय ओढत ओढत चाललेला असताना दूर वाळूच्या किनाऱ्यावरच शेती करून राहणाऱ्या एका छोट्याशा झोपडीतून कोणीतरी मला हातवारे करून बोलवत आहे असे मला दिसले . नर्मदेच्या अगदी प्रवाहलगत ही झोपडी होती . चुकून नर्मदेचा प्रवाह एखाद फुटाने जरी वाढला असता की ती झोपडी जलमय होणार , इतकी जवळ होती . इथे एक अतिशय सुंदर मुलगी मला हात करत बोलावीत होती. हातानेच माझ्या झोपडी मध्ये या आणि चहा प्या अशा खाणाखुणा ती करत होती . अतिशय दारिद्र्य पूर्ण झोपडी होती , हे बघता क्षणी कळत होते . मुलीचे वय साधारण सोळा वर्षे असावे . तिथे अजून एक दहा-बारा वर्षाची चुणचुणीत मुलगी होती . दोघींच्या अंगावर परकर पोलके होते . दुर्दैवाने दोघींचे कपडे खूप फाटलेले होते . पुरेसे लज्जा रक्षण देखील करता येणार नाही इतपत त्यांचे कपडे फाटलेले होते . झोपडी मध्ये एक म्हातारी बसली होती . आणि बाहेर शेतामध्ये एक म्हातारा काम करत होता . मला पाहून तो आला आणि बसायला एक दगड दिला . सवयीप्रमाणे मी या सर्वांची नावे विचारून घेतली . म्हाताऱ्याने त्याचे नाव रेवाशंकर पंडा असे सांगितले . त्याच्या बायकोचे नाव हरीबाई होते . छोट्या मुलीचे नाव जान्हवी होते . आणि मोठ्या मुलीचे नाव विशाखा होते . त्याने माझी काहीही चौकशी न करता थेट आज्ञा केली की तुम्हाला चहा प्यावा लागेल . मी देखील हो म्हणालो . विशाखाचे कपडे फार अधिक फाटलेले होते . म्हणून मी तिला सांगू लागलो की बाळ असे फार फाटलेले कपडे घालू नयेत . काहीतरी अंगावर गुंडाळत जावे . परंतु ती काही बोलत नव्हती . छोटी जान्हवी अतिशय चुणचणीत मुलगी होती . तिने सांगितले "बाबाजी विशाखा गुंगी है । वह बोलती नही । सिर्फ करके दिखाती है । उसका इशारा जो समझ पाएगा , वही उसे बात कर सकता है । " मला महादेव पिपरिया येथे नवी कोरी शाल मिळालेली होती . ती मी हरीबाई जवळ दिली . आणि सांगितले की हिला ही शाल गुंडाळायला देत जा . तेवढेच लज्जा रक्षण होईल . हरी बाईने तीन दगडांच्या चुलीवर काड्या काटक्या पेटवून सुंदर काळा चहा केला . "या आमच्या नाती आहेत . " आजीबाई सांगू लागली . " धाकटी हुशार आहे . चंचल आहे . बोलायला देखील चतुर आहे . थोरली तिच्यापेक्षा हुशार आहे फक्त तिला बोलता येत नाही . थोडी शांत स्वभावाची आहे .पण तिला काय हवे काय नको ते सर्व ती सांगू शकते . इथून येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींवर तिचे बारीक लक्ष असते . आत्तासुद्धा तुम्हाला येताना तीनेच आधी पाहिले . हा आमचा म्हातारा काही कामाचा नाही . याच्या शेजारून कोणी गेले तरी त्याच्या लक्षात येत नाही . त्याला ऐकायला सुद्धा कमी येते . खूप हाका मारल्या शिवाय तो ओ च देत नाही . " म्हातारीने चहा पदराने गाळला . आणि एका फुटक्या कपात मला दिला . त्या चहाला अमृताची चव लागत होती . माझ्या झोळीमध्ये लोकांनी दिलेले काही खाद्यपदार्थ होते . चिक्की ,राजगिरा लाडू ,फळे  ,गुळ -शेंगदाणे ,असे जे काही मिळाले ते सर्व मी त्या मुलींना खायला देऊन टाकले . खाऊन झाल्यावर प्लास्टिक नदीमध्ये टाकू नका हे सांगायला विसरलो नाही . दोघी मुली खदखदा हसायला लागल्या . मुकी असली तरी हसण्याचा आवाज येत होता याचे मला आश्चर्य वाटले ! चहा पिऊन झाला . रेवा शंकर पंडाचे डोळे निळसर होते . हिराबाई आणि दोन्ही मुली देखील घाऱ्या डोळ्यांच्या होत्या . जितक्या गरीबी मध्ये ते राहत होते , तितके गरीब विचार त्यांचे अजिबातच वाटत नव्हते . चौघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज मला जाणवले . विशाखाच्या अंगाला खूप माती लागली होती . मी तिला म्हणालो , " हे बघ बाळ . नेहमी स्वच्छ राहायचे . इथे शेजारीच मैय्या आहे ना ,तिथे आंघोळ करत जा . अशी अस्वच्छ राहत जाऊ नकोस . आणि केस देखील नीट विंचरत जा . नाहीतर दुधी संमावर जाऊन पहा . कसे जटाधारी साधू जमलेले आहेत .तशा जटा होतील कायमच्या केसांच्या . " विशाखा नुसती हसतच होती . तिच्या डोळ्यांमध्ये एवढे तेज होते की डोळ्यात डोळे घालून बोलता येत नव्हते . मला गंमत वाटत होती . इतके दारिद्र्य असून देखील या मुलींच्या चेहऱ्यावर एवढे तेज कसे काय आहे ! त्यांचे चेहरे अतिशय प्रसन्न आणि दैवी भासत होते . अखेरीस सर्वांना नर्मदे हर केले आणि पुढे निघालो . शक्यतो लहान मुले तुम्ही नजरे आड जाईपर्यंत तुम्हाला अच्छा टाटा करत राहतात . त्यामुळे दोन एकशे मिटर पुढे गेल्यावर मी अच्छा करण्याकरता मागे वळून पाहिले . तर मागे झोपडी किंवा शेती काहीच दिसेना ! मला असे वाटले की कदाचित मी वाळूच्या खालच्या उंचीवर आलो आहे आणि शेती माझ्या नजरेच्या पलीकडे खाली असेल . वाळूचे असे फुगवटे जागोजागी आढळतात . त्यामुळे मी चालताना हळूहळू वर चढू लागलो . पुरेशा उंचीवर गेल्यावर मी मागे पाहिले . वाळवंट पूर्णपणे रिकामे होते . ती जागा मी चांगली लक्षात ठेवली . झोपडी अगदी पाण्याजवळ होती . त्यामुळे समोरच्या ताटावरून मला ती झोपडी नक्की सापडली असती . परंतु समोरच्या तटावरून जाताना देखील मला तिथे काहीही आढळले नाही . नर्मदा मातेचा मनापासून जयजयकार केला आणि पुढे मार्गस्थ झालो . इथे माझा बराच भार हलका झाला होता . परंतु मी या सर्वांना अनावश्यक सल्ले देत बसलो याचे मला वाईट वाटले . कदाचित त्यांचे बोलणे ऐकत बसलो असतो तर काही लाभ झाला असता . असेना . नर्मदे काठी कधी काय होईल याचा नेम नाही .
विशाखाचा तो मातीने मळलेला गोरापान रापलेला हसरा चेहरा आजही डोळ्यासमोरून जात नाही . 
नर्मदे काठी केवट समाज खूप आहे . ह्या लोकांकडे एखादी नाव असते . त्या नावेतून लोकांना पलीकडे सोडणे किंवा त्यांच्या गाड्या पलीकडे पोहोचवणे किंवा मासेमारी करणे असे व्यवसाय प्रामुख्याने हे लोक करतात . वाळू गोळा करण्यासाठी देखील काही विशिष्ट पद्धतीच्या नावा वापरल्या जातात . नर्मदेच्या पात्राचा आकार जसा मोठा मोठा होत जातो तसतसे नावांचे प्रकार देखील बदलत जातात . मंडला जबलपूर नरसिंगपूर जिल्हाध्यक्ष आता थोड्याशा मोठ्या नावा दिसू लागल्या होत्या . कारण आता मी नर्मदापुरम या जिल्ह्यामध्ये होतो . पूर्वीचे या जिल्ह्याचे नाव होशंगाबाद असे होते . सुदैवाने मी परिक्रमेमध्ये असतानाच या जिल्ह्याचे नाव बदलले आहे अशी बातमी कानावर पडली होती . या भागातील नावा काहीशा अशा होत्या .
नर्मदापुरम भागातील नौका . तळाशी साठलेली वाळू पहा . निळ्या केवटाची नाव प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी आहे तर तांबड्या केवटाची नाव प्रवासी आहे .
नर्मदा काठची लहान मुले सुद्धा खूप छान नाव चालवतात .
बरेचदा अशा पद्धतीने नांगरलेली नाव घेऊन मध्ये येणारी नदी मी पार केली . फक्त पलीकडे गेल्यावर नाव पुन्हा नीट नांगरून ठेवावी लागते . तसे न केल्यास ती चुकून प्रवाहाला लागली तर थेट समुद्रात जाते .
नाव खूप दिवस लावून ठेवली की तिच्यामध्ये पाणी भरते  . ते अशा पद्धतीने सामूहिक प्रयत्नातून काढण्यात येते . पांसीघाट येथे नाव रिकामी करताना स्थानिक ग्रामस्थ . या नावेचा आकार खूप सुंदर आहे . 
असे डोंगे पुढे फारसे दिसत नाहीत .
मध्ये लागलेल्या काही छोट्या नद्या मी स्वतः डोंगा घेऊन पार केल्या . मला केवट लोकांनी सांगून ठेवले होते की नदीकाठी लावलेली नाव दिसली की ती  बिनधास्त पलीकडे घेऊन जायची . फक्त नीट बांधून ठेवायची . हेच महत्वाचे . 
केवट आल्यावर त्यांची नाव कुठे आहे ते पाहून गरज पडल्यास पोहत जाऊन नाव ताब्यात घेतात .
अशीच माहिती देणाऱ्या एका केवटाने खालीलपैकी एक नाव घेऊन मला पुढे जाण्यास सांगितले होते . आणि वल्हे नसल्यामुळे हातातील दंडाने सुरुवातीला जमीन ढकलत व नंतर दंड पाण्यात वल्हवत मी नाव पलीकडे नेत ती नदी पार केली.
तत्पूर्वी त्याने काढलेला फोटो . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर त्याने मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर हे फोटो पाठवून दिले . 
नौका हे कुठल्याही नदीवरील अथवा नदी जवळील जीवनाचे अविभाज्य अंग आहे हे मात्र खरे . नुकत्याच अयोध्येमध्ये बांधलेल्या राम मंदिरामध्ये निषाद राजाचे मंदिर त्याचसाठी बांधले आहे . निषाद समाजामध्ये काही उपजाती खालील प्रमाणे आहेत . निषाद,मल्लाह,साहनी,केवट,मांझी,कश्यप,कोळी,भील,बिंद,मझवार,रैकवार,बाथम,मछुआरा,कीर इ . हे सर्व लोक उत्तम पट्टीचे पोहणारे आणि अतिशय निर्भय असतात . नदी आणि पाण्यातील खाचाखोचा यांना चांगल्या ठाऊक असतात . मला संपूर्ण परिक्रमेमध्ये या समाजातील लोकांनी कधीही चुकीचा मार्ग सांगितला नाही किंवा कधीही फसवले नाही . जवळात जवळ पडेल असा योग्य आणि सुरक्षित मार्ग ते नेहमी सांगायचे . या उलट शेतकरी मात्र मार्ग भरकटवायचे असा अनुभव मी खूप वेळा घेतला . अर्थात त्यांना आपल्या शेताची काळजी असायची . उदाहरणार्थ खालील फोटो पहा . 
हे दुधी संगम इथले शिवमंदिर आहे . आणि शेतातला गहू काढणीला आलेला आहे . आता नेमकी याचवेळी तिथे हजारो लोकांची यात्रा भरली . तर या लोकांच्या येण्या-जाण्यामुळे उभे पीक आडवे होऊ शकते . वर्षभराची सारी मेहनत पाण्यात जाते . पावसाळ्यामध्ये नर्मदा नदी इतकी दुथडी भरून वाहते की हे पूर्ण मंदिर च पाण्याखाली असते . त्यामुळे त्यांच्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो . म्हणून शेतकरी तुम्हाला शेतातून मार्ग नाही असे सांगतात . परंतु तुम्ही जर नीट समजावून सांगितले की मी तुमच्या पिकाची काळजी घेत जाईन तर आवर्जून जायला सांगतात . नर्मदा परिक्रमा तुमचा विवेक जागृत करते . प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव शोधायला प्रवृत्त करते .मी म्हणेन तेच खरे . किंवा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे , असे सृष्टीमध्ये नसते ,हे आपल्याला छान हसत खेळत शिकवते . निसर्गाशी सहजीवन कसे राखायचे हे आपण विसरून गेलेलो आहोत . ते देखील परिक्रमा तुम्हाला सहज शिकवते . इथून पुढे जाताना एक हरभऱ्याच्याचे शेत लागले . मी शक्यतो पाया पुढे बघून चालायचो . बरेचदा पायाखाली एखादा साप किंवा अन्य प्राणी येत असे . तसेच खड्डे खुड्डे बघून चालावे लागायचे . परिक्रमे दरम्यान माझा खूप वेळा पाय मुरगळला . परंतु एकदाही सुजला नाही किंवा दुखला नाही . पुन्हा सुरळीत व्हायचा . पायातील स्नायूं मध्ये परिक्रमेमुळे अतिरिक्त ताकद येते हे वास्तव आहे . अधिक चालल्यामुळे बोन डेन्सिटी देखील कमी होते ,असे मला काही डॉक्टरांनी सांगितले आणि तपासून पाहता ते खरे देखील निघाले .  या हरभऱ्याच्या शेतात माझे लक्ष नव्हते . अचानक ३० - ४० डोकी वर आली . बघतो तो संपूर्ण शेतात बसून वानरे हरभरे खात होती . एक क्षणभर मला असे वाटले की या सर्वांना हाकलून लावावे . परंतु तेव्हा मला मोहन साधूने सांगितलेला नियम आठवला . कुठेही काहीही चांगले किंवा वाईट दिसले तरी त्यात आपण डोके घालायचे नाही . कदाचित हा शेतकरी नर्मदेमध्ये घुसून शेती करत आहे . त्यामुळे त्याच्या शेतातील काही वाटा स्वतः नर्मदा माई या तिच्या लेकरांना देत असेल . वानरे मला बघून जरा देखील घाबरली नाहीत . त्यांचा कार्यक्रम त्यांनी चालूच ठेवला . आणि मी पुढे मार्गस्थ झालो . आज पुन्हा एकदा मला शंभर सव्वाशे पाण कावळे एकत्र शिकार करताना दिसले . त्या सर्वांनी मिळून शोधून काढलेला हा हुकमी उपाय आहे .असे केल्यामुळे त्यांना हमखास शिकार मिळते . तसे एकटे शिकारी पाणकावळे अधिक दिसतात . परंतु या त्यांच्या सामूहिक वर्तनावर संशोधन झाले आहे किंवा नाही हे तपासावे लागेल . आणि झाले नसल्यास आवश्यक करावे अशी विनंती पक्षी तज्ञांना आहे . आज मी २५ चित्र बलाक अर्थात पेंटेड स्टोर्क यांचा एक मोठा कळप देखील पाहिला .
 चित्रबलाक (painted stork)
चित्रबलाकांचा कळप
 व्हाईट आयबीस आणि ब्लॅक आयबीस देखील खूप दिसले . 
white Ibis
black Ibis
black headed white Ibis
काळा पांढरा खंड्या
कृष्णधवल खंडे या भागात खूप आहेत .  सिरीसिरी या गावांमध्ये एक विचित्र ओढा मध्ये आल्यामुळे एका गावकऱ्यांनी शॉर्टकट म्हणून एक रस्ता मला दाखवला . इथे एक सरकारी गोशाळा होती . या गोशाळेमध्ये मेलेल्या गाई ते बाहेर उघड्यावरती आणून फेकत होते . त्या गाई फाडून खाण्याचे काम वीस पंचवीस भटकी कुत्री करत होती .
संग्रहित छायाचित्र
 मी तिथून जाऊ लागताच ती सर्वजण माझ्यावर गुर गुरु लागली . आणि त्या मृतदेहांचा कुजलेला वास त्या संपूर्ण परिसरामध्ये इतक्या दूरवर पसरला होता की विचारू नका .कसाबसा मी तो टापू पार केला . पळत पुढे जावे तर कुत्री मागे लागली असती . त्यामुळे एका शांत मंद गतीने जात या नरकातून बाहेर पडलो .
 मेलेल्या गाई हा एक मोठा जटिल प्रश्न नर्मदे काठी आहे . संपूर्ण मध्य प्रदेश मध्ये प्रचंड गोधन आहे . गाईंचे अक्षरशः शेकड्यांनी कळप वाटेमध्ये दिसतात . परंतु ही पवित्र गोमाता आटोपल्यावर तिचे काय करायचे याबाबत समाज आणि अनभिज्ञ दिसतो . मग गुपचूप रात्री नर्मदेमध्ये या गाईंची कलेवरे प्रवाहित केली जातात . छोटी धुवाधार धबधब्यापाशी समोरच्या बाजूला अशा पद्धतीने मेलेल्या गाईंचा अक्षरशः खच पडलेला आहे . इथे पाण्याची गती एकदम मंदावते त्यामुळे गाईंची प्रेते इथे येऊन थांबतात . अशा गाईंचे कुत्र्यांनी तोडलेले पाय शिंगे ,डोके , शेपट्या , खुरे हे सारेदेखील परिक्रमेमध्ये खूप पाहायला मिळतात . नर्मदा या सर्वांना शुद्ध करते हे मात्र खरे आहे . मला स्वतःला आलेला एक अतिशय विकृत अनुभव तुम्हाला विषय निघाला आहे म्हणून आवर्जून सांगतो . नर्मदेच्या काठाने चालताना सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा शरीरातून प्रचंड घाम बाहेर पडत असतो . शरीरातील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे खूप तहान लागत असते . अशावेळी सर्वात विश्वासार्ह आणि जवळचा जलस्त्रोत म्हणजे साक्षात नर्मदा माई हीच आहे . पटकन पात्रा जवळ जावे . ओंजळी भरभरून पाणी प्यावे . आणि कमंडलू भरून घ्यावा . असे मी दिवसातून खूप वेळा करत असे . अगदी स्नानाला उतरलेला असताना देखील मी पाणी पीत असे . महादेव पिपरिया गावाच्या पुढे आल्यावर एकदा असेच मी पाणी पिण्यासाठी पात्रात बसलो होतो . आकंठ पाणी पिऊन झाले . आणि एकदम हालचाल झाल्यामुळे माझे उजवीकडे लक्ष गेले . इथे एका मेलेल्या गाईचे प्रेत अर्धे नर्मदेमध्ये आणि अर्धे जमिनीवर असे पडलेले होते . त्यातील जमिनीवरच्या प्रेताच्या भागाचे लचके तोडून खाणारे कुत्रे मला बघून पळाले होते . जो भाग पाण्यामध्ये होता तो सडला होता आणि त्याला लागून वाहात येणारे पाणी माझ्या इथे येत होते . किती प्रचंड प्रमाणामध्ये जिवाणू या पाण्यामध्ये ते प्रेत सोडत असेल याची आपण फक्त कल्पना करून पहा . परंतु पाणी पिल्यानंतर मला तसे काही जाणवले नाही . आणि हे दृश्य पाहिल्यानंतर सुद्धा उलटी वगैरे होईल असे काही झाले नाही . नर्मदा जलाचा हा प्रताप आहे . हे पाणी वेगळे आहे . मी मागे एका प्रकरणात तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे परिक्रमा वासी गेली लाखो वर्षे नर्मदेचे पाणी इकडून तिकडे तिकडून इकडे टाकत असल्यामुळे संपूर्ण नर्मदेमध्ये एकसारखे बॅक्टेरिया अर्थात विघटन करणारे जीवाणू आहेत . त्यामुळे याची चव देखील सर्वत्र एकसारखीच आहे . आणि यामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीचे विघटन करण्याचे सामर्थ्य या पाण्यामध्ये जास्त आहे . 
नर्मदेच्या काठाने चालताना असे सांगाडे खूप दिसतात
यातील हाडे कुत्री ,लांडगे , कोल्हे इकडे तिकडे पळवतात
नर्मदे काठी सर्वत्र हे दृश्य पाहिले
कोल्हापूर मध्ये असलेल्या एका आश्रमाने याच्यावर उपाय शोधून काढलेला आहे .
मेलेल्या गाईच्या हाडाचा एक कणही शिल्लक राहणार नाही असे जीवामृत बनवण्याची पद्धत कोल्हापूर जवळील काडसिद्धेश्वर मठाच्या स्वामींनी शोधून काढलेली आहे . तिचा प्रसार इकडे होणे आवश्यक आहे .
आता समोर सिवनी गावचा पुल दिसू लागला . काठा काठाने जाताना एका टेकाडावरून साधूने आवाज दिला . मातीचा चढ चढून वर गेलो . इथे मोदकदास त्यागी नावाच्या एका साधूने नवीन कुटी निर्माण केली होती . त्याने मला बसायला पोते दिले . आणि अतिशय प्रेमाने पोळ्या ,भरीत ,मलिदा ,पपई पोटभर खायला दिले .याच्याकडे मुक्कामाची सोय नव्हती . परंतु पूल ओलांडल्यावर पुढे एका त्यागीजींचा आश्रम होता तिथे जायला त्याने मला सांगितले . कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करणाऱ्या तपस्वी साधूला , साधूसमाजामध्ये त्यागीजी म्हणून महत्त्वाचे स्थान असते . मी तिथे जाणार इतक्यात पुलापाशी उभ्या असलेल्या राजू नोडिया नामक एका अपंग मुलाने मला हात केला . याचा एक पाय पोलिओग्रस्त होता . इथे पुलाखाली एक आश्रम बांधण्यात आला होता . पुलाखाली म्हणजे अक्षरशः पुलाखाली बांधकाम होते ! पुलाचा रस्ता हाच या आश्रमाचा स्लॅब होता . दोन्ही बाजूला भिंती बांधून वेगवेगळी दालने तयार करण्यात आली होती . तिथे गोसेवा चालत असे . नर्मदा मातेचे एक सुंदर मंदिर आणि चांगल्या पद्धतीने बांधलेला काँक्रीटचा घाट होता . इथे नर्मदा मातेची आरती केली जायची . या संपूर्ण आश्रमाची व्यवस्था बनारस वाले श्री श्री १००८ मुरारीदास जी महंत म्हणून एक खूप चांगले जटाधारी साधू होते ते पाहत होते . यांची एक अतिशय बारीक शिष्या देखील आरती वगैरे करत होती . पुलाच्या पलीकडे एक आश्रम होता त्याची व्यवस्था ही शिष्या बघत असे . केवळ आरती पुरती ती इकडे येत असे . मुळचा मांगरौल गावचा हा राजू नोडीया आश्रमाचा सर्व कार्यभार समर्थपणे सांभाळत होता . या घाटाचे नाव श्री रामानुनंदन घाट ठेवले आहे असे त्यांनी मला सांगितले . इथे पुलावरून जाणाऱ्या गाड्यांचा धडधड असा आवाज खाली ऐकू यायचा . एका कोपऱ्यामध्ये मी आसन लावले . इथे बहुतांश आश्रमामध्ये मेमरी फोम किंवा पॉलीयुरेथीन फोम पासून तयार केलेल्या आयत्या गाद्या आणि त्याच्यावर चेनकव्हर चढवलेले , अशा पद्धतीने तयार ठेवलेल्या असतात .याची घडी वगैरे होत नाही . तशाच उलगडलेल्या गाद्यां चा चवडवजा ढिगारा एका कोपऱ्यात लावलेला असतो . त्यातून परिक्रमावासी एखादी गादी घेतात . आणि जाताना परत ठेवतात . परंतु या गाद्यांवर कधीही कोणीही झोपत असल्यामुळे मी मात्र शक्यतो माझे स्वतःचे जे फोम मॅट्रेस होते तेच सर्वत्र वापरत असे . त्याला ऊब देखील चांगली होती . ते इतके ऊबदार होते की पुढे उन्हाळा सुरू झाल्यावर त्याचा मला त्रास होऊ लागला होता . असो . स्नान पूजा आटोपून झाल्यावर महा आरतीची वेळ झाली . मी इथे शंख वाजवण्याची सेवा केली . बहुतेक मी जितका वेळ शंख फुंकत होतो तितका प्रदीर्घ इथे कोणी फुंकत नव्हते .त्यामुळे लोकांना त्याचे कौतुक वाटले . इथे पुजारी बुवाने मला फुलवाती आणि तूप दिले . ग्वारी घाटावर झुलेलाल आश्रमात घेतलेल्या फुलवाती आणि तूप अशा पद्धतीने मला ४० - ४२ दिवस पुरले . रात्री स्वतः त्यागी जी महाराज आले . त्यांच्यासोबत मी थोडीशी गोसेवा केली . त्यांचा सत्संग लाभला . सडसडीत देहयष्टी आणि उंचापुरा देह होता .सावळा रंग आणि अतिशय मोहक हास्य चेहऱ्यावर होते . इतर साधूं सारखे हे भक्तांना 'टेन्शन ' देत नसत तर हसत खेळत गप्पा मारत असत . यांचा स्वभाव मला खूप आवडला . काय हवे नको वगैरे मला त्यांनी विचारले . इथे रात्री मुक्कामाला अजून काही परिक्रमावासी होते . राजू नोडिया सर्वांची अतिशय आस्थेने चौकशी करत होता .भोजन प्रसाद घेऊन थंडी अनुभवत निद्राधीन झालो . सकाळी लवकर उठून सर्व आन्हिके आटोपून पुढचा मार्ग धरला . पुलावरून एका पांडे नामक छोट्या दुकानदाराने आवाज दिला म्हणून वरती जाऊन चहा घेतला .
 पांडे चे दुकान . इथे मी चहा घेतला .(संग्रहित चित्र )
 पुन्हा खाली येऊन चालू लागलो . काठाने जाताना डावीकडे त्यागीजींचा आश्रम दिसू लागला . मोदकदास साधूने अवश्य जाऊन दर्शन घेण्यास सांगितले होते म्हणून आश्रमामध्ये गेलो . नर्मदे काठी काय पाहावे , काय पाहू नये , कोणाला भेटावे , कोणाकडे जाऊ नये ,इत्यादी सर्व माहिती तुम्हाला साधू ,संत ,सेवेकरी , ग्रामस्थ देत असतात .त्यांना न कंटाळता हे प्रश्न विचारावेत . पुलापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आश्रम आहे . वरती जाणाऱ्या छोट्या पायऱ्या आहेत . पायऱ्यांवर मोर होता . आश्रमातील दोन वृद्ध सेवेकरी माताजी नर्मदा स्नानार्थ खाली येत होत्या . त्यांनी मला पाणी किती दूर आहे विचारले याचा अर्थ त्या पहिल्यांदाच खाली उतरत होत्या . मी त्यांच्याकडे त्यागीजी महाराजां बद्दल चौकशी केली . त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला त्यांचे दर्शन होते आहे . आश्रमाचा परिसर अतिशय पवित्र भासत होता . इथे राहणाऱ्या जागी महाराजांनी खूप तप आचरण केलेले आहे हे जाणवत होते . आश्रम अंधारा होता परंतु सर्वत्र ऊर्जा जाणवत होती . छोटी छोटी मंदिरे , मोठे मोठे वृक्ष ,अंधारी कुटी आणि सगळीकडे मोरच मोर . झाडी इतकी होती की नर्मदा सुद्धा प्रयत्नपूर्वक बघावी लागायची . त्यागीजींनी मला एका आसनावर सन्मानपूर्वक बसवून स्वतः चहा बनवून पाजला .
 त्यागीजींच्या आश्रमातील एक देवस्थान
शिष्यां समवेत भजन करणारे त्यागी जी
 हे पूर्वाश्रमीचे मराठी असावेत असे त्यांच्याकडे पाहून मला वाटले . साधू आपल्या पूर्वाश्रमाची भनक समोरच्या माणसाला लागू देत नाहीत . परंतु प्रत्येक जनजातीच्या काही जन्मजात सवयी , लकबी असतात त्या जात नाहीत . महाराष्ट्रातही विशेषतः हे कोकणस्थ असावेत असे मला वाटले . अर्थात नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधायला जाऊ नये हेच खरे .  यांचा रंग गोरापान आणि चेहऱ्यावर तेज होते . अंगावर फक्त एक लंगोटी आणि लज्जारक्षणा पुरते वस्त्र होते . सर्व अंगाला भस्म फासलेले होते . त्यागीजींना दंडवत करून मी पुढे निघालो . 
आता नर्मदा मैया ची वळणे मोठी मोठी होऊ लागली होती . अमरकंटकला शंभर शंभर फुटावर वळणारी मैया मंडला दिंडोरी मध्ये ५०० ते ८०० मीटर अंतरावर वळू लागली . जबलपूर जिल्ह्यामध्ये एक दोन किलोमीटरची वळणे होती , तर नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये तीन तीन किलोमीटरची वळणे होती . नर्मदापुरमध्ये चार-पाच किलोमीटरचे वळसे होते . वाळूची पात्रेच एक एक किलोमीटर रुंदीची होती . त्यातून चालताना दमछाक व्हायची . आज थंडी अजिबात नव्हती .गव्हावर दव देखील पडले . नव्हते सूर्य आग ओकत होता . खाली तापलेली वाळू आणि वरती आग ओकणारा सूर्य ! चालणे कठीण होत होते .कसाबसा माछा नावाच्या गावात पोहोचलो . इथे एक पुरातन राम कृष्ण मंदिर होते . खूपच सुंदर शांत आश्रम होता . एक पुरातन राम मंदिर होते आणि कृष्णाचे नवीन मंदिर बांधलेले होते . इथे रामप्रभूंनी स्वतः मुक्काम केला होता अशी मान्यता आहे . एका यज्ञ शाळेमध्ये तरुण तेजस्वी ओडिया साधू मुक्कामी होता . ओडिया साधूने ग्लासभर गरमागरम दूध पाजले . बालभोग प्रसाद दिला . तो खाऊन पुढे निघालो . 
माछा गावातील नर्मदेचा किनारा
गाव नर्मदे काठी वसलेले आहे
नर्मदेच्या काठावरच गावातील मुलांनी क्रिकेटचे स्टेडियम केलेले असून येथे सतत सामने चालू असतात .
गावातील सुंदर आश्रम .हे जिर्णोद्धार केलेले नवीन मंदिर आहे .
जुने मंदिर काहीसे असे आहे .हे स्थान खूपच पवित्र आहे .साक्षात प्रभू रामचंद्र येथे राहून गेलेले आहेत .
आश्रमातील एक समाधी
मधोमध सुंदर अशी यज्ञशाळा होती .इथेच ओडिया साधूचा मुक्काम होता .
इथेच बसून मी दूध व बालभोग सेवन केला .
आश्रमातील एक साधू
रामाच्या वास्तव्यामुळे या घाटाचे नाव राम घाट ठेवले आहे
श्रीरामाच्या चरण पादुका येथे स्थापित करण्यात आलेल्या आहेत . 

गलछा नावाच्या गावामध्ये भोजन घेतले . येथे गालव ऋषींनी तपस्या केलेली होती . इथे खूपच सुंदर असा आश्रम आहे . आश्रमाचा परिसर मोठा विस्तीर्ण होता आणि सर्वत्र सुंदर शेणाने सारवून घेतलेले होते .
 आश्रमामध्ये साधूंच्या निवासासाठी काही तखत लावलेले होते . इथे काही वयोवृद्ध साधू विश्रांती घेत पडले होते .
 गलचा येथील नर्मदा काठ
गालव ऋषींची तपोभूमी असलेला आश्रम
येथील शिवमूर्ती
 एका सेवकाने माझ्यासाठी गरम गरम पोळी भाजी करून मला जेवायला वाढले . मी एकट्यानेच भोजन प्रसादी घेतली . साधू लोक शक्यतो ताजे अन्नच खातात . हे त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याचे एक महत्त्वाचे रहस्य आहे . कुठल्याही परिस्थितीमध्ये शिळे अन्न ते टाळतात . शिळे अन्न खाण्यापेक्षा उपाशी राहिलेले परवडते हे नेहमी लक्षात ठेवावे . शिळे अन्न वाया जाईल म्हणून खाण्याची सवय माता-भगिनींना असते परंतु त्यामुळे शरीरामध्ये अनेक दोष उत्पन्न होतात .गाव देहात मध्ये उरलेले अन्न खाण्यासाठी अनेक तोंडे असतात . गाईगुरे , कुत्री ,मांजरे , कोंबड्या , शेळ्या- मेंढ्या इत्यादी उरलेले अन्न लगेच फस्त करून टाकतात . इथे क्षणभर विश्रांती घेतली . इतक्यात दूरवर कुठेतरी सुरू असलेल्या भागवत कथेचे स्वर कानावर पडले . आश्रमामध्ये चौकशी केली असता पुढे गलछा गावामध्ये पंडित भगवतीप्रसाद तिवारी यांची संगीतमय भागवत कथा सुरू आहे असे मला सांगण्यात आले .त्यामुळे त्या भागवत कथेला जाऊन भागवतकरांच्या विनंतीनुसार पहिल्या रांगेत बसलो . भागवतकरांनी मी आल्यावर थोडा वेळ नर्मदा परिक्रमा या विषयावर देखील भाष्य केले . आणि कथेमध्ये माझी उपस्थिती होणे हा शुभसंकेत असल्याचे सर्वांना सांगितले . माझी उपस्थिती म्हणजे माझ्या गळ्यामध्ये लटकवलेल्या नर्मदा मातेची उपस्थिती हे वाचकांनी लक्षात घ्यावे !त्या नर्मदा मातेच्या सान्निध्या शिवाय आपले बाजार मूल्य ० आहे . गाव संदलपुर तालुका खातेगाव जिल्हा देवास हे या तिवारींचे मूळ गाव होते .यांचे सांगितिक अंग देखील चांगले होते आणि कथा सांगण्याची पद्धत अतिशय शांत व सुंदर होती . खाजड नावाच्या एका ग्रामस्थांनी ही कथा आयोजित केलेली होती . या कथेमध्ये काही भक्त उत्कटपणे मध्येच उभे राहून नाचू लागत . त्यातील साधारण साठीचे एक काका माझ्या लक्षात राहिले . धिप्पाड देह , पिळदार मिशा असलेला हा मनुष्य प्रत्यक्षात मात्र भगवत् भक्तीने अगदी ओथंबलेला होता . दोन तीन तास उत्तम अशी ती कथा श्रवण केली आणि भागवतकरांची आज्ञा घेऊन पुढे निघालो . बाहेर काही अंतर पळत येऊन खाजड कुटुंबीयांनी माझा आदर सत्कार केला . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला सत्कार आणि धिक्कार या दोन्हींचा सामना एकाच मनस्थितीतून करता आला पाहिजे म्हणजे तुम्ही परिक्रमावासी झालात ! आणि हेच आयुष्यभर करता आले म्हणजे तुम्ही जिंकलात !
भागवतकार पंडित भगवती प्रसाद तिवारी . हे अतिशय प्रसिद्ध कथाकार असून यांच्या वर्षभर सतत कथा चालू असतात
या भागातील सर्वच भागवत कथाकार मोठे व्युत्पन्न आणि व्यासंगी आहेत असे माझे निरीक्षण आहे . पोटभर जेवण झाल्यामुळे आणि डोक्यावर कडक ऊन असल्यामुळे हळूहळू चालत होतो . महामार्गावर धिम्या गतीने जाणाऱ्या एखाद्या ट्रकला एखादी सुपरकार जशी झोकामध्ये ओव्हरटेक करते ,तशा पद्धतीने मला मागे टाकून अतिशय वायू वेगाने एक नागा संन्यासी पुढे चालत गेला . त्याची चालण्याची गती पाहून मी अचंबित झालो . तसे चालण्याचा प्रयत्न केल्यावर मला अक्षरशः धावावे लागत होते . नागा साधू लोकांची बरोबरी भलेभले ॲथलीट सुद्धा करू शकत नाहीत हे अगदी सत्य आहे . याचे कारण या लोकांचे ओज किंवा शुक्र या धातूचे त्यांनी अनेक वर्षे संरक्षण केलेले असते . त्याची बरोबरी करण्यासाठी तेवढे तप करणे हा एकमेव उपाय आहे . या भागातील नर्मदेची काही सुंदर रूपे गुगल नकाशाच्या कृपेने वाचकांकरिता देत आहे . दर्शन घेऊन त्या रूपामध्ये रममाण व्हावे ! अशी कल्पना करावी की त्या काठाने नर्मदेच्या पाण्यामध्ये काठी बुडवत बुडवत तुम्ही पुढे चालत आहात ! मानस परिक्रमा ही खरोखरीच खूप श्रेष्ठ परिक्रमा आहे ! साधू लोक देखील बसल्या बसल्या डोळे मिटून मानस परिक्रमा करत असतात . 
माछा गावापाशी नर्मदेला येऊन मिळालेली कुब्जा किंवा अजीर नदी
नर्मदेचे झोकदार वळण आणि समोरचा वाळूचा किनारा
 गलछा मधील नर्मदा दर्शन . तुम्हाला नर्मदा अधून मधून अशी दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही परिक्रमेचा लांबचा मार्ग निवडला आहे . परिक्रमेच्या खऱ्या मार्गाने जाताना नर्मदा तुमच्या नजरेआड होतच नाही ! 
भव्य दिव्य वालुका वाहिनी नर्मदा ! नीट पाहिल्यावर तळाशी साठलेली वाळू दिसते .
असे कुठलेही बंधन परिक्रमावासीला अडवू शकत नाही
 ॐ आपोज्योति रसोsमृतम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।
अशा किनाऱ्यावरून सायंकाळच्या वेळी अनवाणी चालताना पायाला मिळणारे सुख शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे !
चालताना अचानक असे एखादे शिवलिंग दर्शन देते आणि आपल्या हृदयांतर्यामी आत्मलिंग प्रकटते
वाटेमध्ये नर्मदेच्या अंगा खांद्यावर खेळणारे भाविक भक्त परिक्रमा वाशीला न बोलताच भक्ती कशी करावी हे शिकवून जातात .
अशा गर्दीने भरलेल्या किनाऱ्यावरून जाताना तुम्हाला किमान ५० वेळा तरी नर्मदे हर असा प्रति पुकारा द्यावाच लागतो ! ओळख पाळख नसलेला कोणीही तुम्हाला अगदी मनापासून नर्मदे हर असा आवाज देतो !
नर्मदेच्या काठावर असलेली काटेरी झुडपे देखील परिक्रमा वासीला फारसे ओरखडे मारत नाहीत असा अनुभव मी याची देही घेतलेला आहे . कदाचित देहभान हरपल्यामुळे देखील असे होत असावे . 
इथून पुढे काठाकाठाने गेल्यावर भटगाव नावाचे गाव लागले . येथील मंदिरांचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेला होता आणि मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू होता . एका छोट्या खोलीमध्ये दहा-बारा परिक्रमावासी राहिले होते . तिथेच अत्यंत गर्दीमध्ये आसन लावले . 
याच मंदिरामध्ये भटगावचा मुक्काम घडला
या नवीन राममूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे सद्भाग्य मैयाच्या कृपेने लाभले .
हा नागा साधू देखील तिथे आलेला होता . त्याच्याकडून मी नागा साधूंची परंपरा आणि एकंदरीतच आखाडा परंपरा याविषयी खूप मूलभूत ज्ञान मिळविले . हा साधू अतिशय हुशार , तरुण आणि जिज्ञासू होता . त्याचे वय साधारण ३० वर्षे असावे असा माझा अंदाज होता .परंतु प्रत्यक्षात तो ५५ वर्षाचा निघाला . कारसेवेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता . या मंदिरासाठी एक मोठी यज्ञशाळा खाली उभारली होती . तिथे जाण्यासाठी मातीचा धोकादायक उतार बनविला होता . वरती एक मोठे व्यासपीठ बनवले होते . मी खाली जाऊन यज्ञाचे दर्शन घेऊन आलो . खाली मोठा जनसमुदाय जमला होता . किमान हजार लोक असावेत . इथे नर्मदेमध्ये मला एका भग्न मंदिराचे खूप सारे अवशेष दिसले . या बाजूला नर्मदा खोल आहे . स्नान करण्याकरता मी जागा शोधत होतो . परंतु या घाटावर प्रचंड गर्दी असल्यामुळे मी पुन्हा वर मंदिरात गेलो . गावातील तरुणांनी मला शेजारी असलेला एक छोटासा नाले वजा बोळ दाखवला . या पांदीतून चालत गेल्यावर नर्मदेचा एक अति धोकादायक घाट लागला . घाट म्हणजे बांधलेले नव्हते परंतु पाण्यात उतरता येईल अशी थोडी जागा तयार केली होती . उतार इतका तीव्र होता की काठी एक फूट पुढे नेली की चार फूट बुडत होती .  इथे स्नान करून काठावर बसूनच मैया चे पूजन केले .
 भटगाव येथील भग्न मंदिराचे नर्मदेमध्ये बुडालेले अवशेष . मंदिर इतके भव्य आहे की उपग्रहातून देखील दिसते . खाली छोटी नाव दिसते आहे तिथे मी स्नान केले .
 अशा ठिकाणी ज्या व्यक्तीला पोहायला येत नाही त्याने अजिबात जाऊ नये . या ठिकाणी अनेक ग्रामस्थ बुडाल्याचे मला सांगण्यात आले . आधीच बुडालेले मंदिराचे अवशेष , त्यात ही धक्कादायक माहिती या सर्वांमुळे तो परिसर अतिशय नकारात्मक वाटत होता . वरती गेल्यावर गावातील सरपंच आणि काही सन्माननीय गावकरी माझ्याभोवती गोळा झाले . त्या सर्वांना मी नर्मदेमध्ये बुडलेल्या मंदिराविषयी माहिती विचारली . त्यांनी सांगितले की ते मंदिर इतके भव्य होते की त्याचे अनेक कोरीव खांब आणि कोरीव काम केलेले भाग गावात जागोजागी आढळतात . हे संपूर्ण गावच त्या मंदिरांच्या अवशेषांवर उभे आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये ! त्यांनी मला संपूर्ण गाव पायी फिरवून दाखविले . अक्षरशः प्रत्येक घरामध्ये त्या मंदिराचे दगड लोकांनी वापरले होते . कोणी त्याच्या पायऱ्या केल्या होत्या तर कोणी ते भिंतीमध्ये चिणले होते . कोणी त्याचा वापर बसण्यासाठी करत होते तर कोणी देव म्हणून पिंपळाखाली पुजले होते . एका हुशार पठ्याने तर मंदिराचा मुख्य आमलक म्हशीला पाणी घालण्यासाठी ठेवला होता . बऱ्याच लोकांनी घराच्या पायामध्ये हे दगड मोठ्या प्रमाणात वापरले होते . एके ठिकाणी वडाच्या झाडाखाली ठेवलेले असंख्य अवशेष हळूहळू त्या वडाच्या झाडांमध्ये शिरू लागले होते . मी त्या सर्वांचे याबाबतीत प्रबोधन केले . मंदिराचे अवशेष घरामध्ये वापरले असता घरामध्ये सौख्य  नांदणे शक्य नाही ,अशा पद्धतीने मांडणी केल्यावर लोकांना ती पटू लागली . खरे म्हणजे असे काही नाही आहे .परंतु मंदिराचे अवशेष वाचवण्यासाठी या असत्याचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता . गावामध्ये फिरून सारे अवशेष पाहिल्यावर हे मंदिर किती भव्य दिव्य असेल याची कल्पना येत होती . नर्मदा मातेने आपला प्रवाह बदलल्यामुळे हे मंदिर खोल भागामध्ये गेले . आणि हळूहळू खचत जाऊन नर्मदार्पण झाले . पुढे मूर्ती भंजकांनी देखील हे मंदिर तोडले असावे . सर्वांना माझे विचार पटले आणि गाव पातळीवर लवकरात लवकर यावर काहीतरी कार्यवाही करून हे सर्व अवशेष एकत्र करून मध्य प्रदेश सरकारच्या पुरातत्व खात्याला त्याबाबत कळविण्याचे आश्वासन गावकऱ्यांनी मला दिले .  यामध्ये प्रामुख्याने धूलीचंद पूरवीय हे सरपंच होते . आणि त्यांच्यासोबत राजकुमार पूरवीय , उत्तम पुरवीय आणि रामजी पुरवीय असे त्यांचे भाई बंद होते . हे होण्याची शक्यता कमी होती कारण सर्वांना अशी भीती वाटत असे की चुकून सरकारने उत्खनन वगैरे सुरू केले तर आपली घरे त्यात जातील . मी जेव्हा त्यांचे प्रबोधन केले आणि असे काही होणार नाही हे त्यांना समजावून सांगितले तेव्हा सर्व ग्रामस्थ तयार झाले . हे मंदिर पुन्हा पूर्ण वैभवाने उभे राहिल्यास गावाचे अर्थकारण कसे बदलेल हे देखील सर्वांना समजावून सांगितले . तो मुद्दा सर्वांना भावला . या गावातील लोक थोडेसे साधू विरोधी होते . लखनदास त्यागी नामक एका साधूच्या ताब्यातून हा आश्रम सोडवून त्याचा जिर्णोद्धार आम्ही केलेला आहे असे सरपंचाने मला सांगितले . नर्मदे काठी एक पॅटर्न मला सापडला . विशेषतः ज्यांना नर्मदे काठी आश्रम उभा करायचा आहे त्या लोकांनी हे समजून घ्यावे . नर्मदे काठी राहणारे ग्रामस्थ अतिशय हुशार आणि इरसाल आहेत . वर्षानुवर्षे अनेक साधुसंतांना पाहिल्यामुळे त्यांना माणसाची चांगली पारख आहे . हे एखाद्या नवीन साधूला गावामध्ये आमंत्रित करतात . त्याच्याकडून एखादा मोठा आश्रम उभा करून घेतात . आणि तो आश्रम व्यवस्थित चालू लागला की काहीतरी आक्षेप घेऊन किंवा आरोप प्रत्यारोप करून साधूला गावाबाहेर हाकलून लावतात . साधूने आपल्या तपस्येमुळे अनेक भक्त भाविक गोळा केलेले असतात जे आश्रमाला जमीन व आर्थिक देणग्या देतात . साधूला हाकलून दिले की ही सर्व मठाची संपत्ती आयतीच ग्रामस्थांच्या मालकीची होते . याच पद्धतीने ताब्यात घेतलेले अनेक मठ मी पुढे पाहिले . आपल्याकडे मीडियावाले सुद्धा साधू जीवनाचा स्पर्श देखील नसताना किंवा साधू जीवन किती कठीण आहे याचा अंदाज नसताना ,  एखाद्या साधूची प्रचंड बदनामी करून लोकांची मानसिकता साधू विरोधी करण्यामध्ये मोठा हातभार लावतात . हे चुकीचे आहे असे माझे मत आहे . आपण स्वतः अनुभव घेतल्याखेरीज अनुमानाने काहीही बोलू नये , लिहू नये आणि प्रसृत करू नये .किमान इतके पथ्य कोणीही पाळूच शकतो . रात्रभर मंदिरामध्ये भजन चालले होते . त्यामध्ये मी सहभागी झालो . पहाटे चार वाजता उठून जमलेल्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा मंदिरांच्या भग्न अवशेषांचे महत्त्व सांगितले आणि काहीतरी कृती करण्यासाठी वचनबद्धता घेतली . उजाडल्याबरोबर पुढे मार्गस्थ झालो . नर्मदेचा विस्तीर्ण किनारा साद घालत होता . लवकरच मी नर्मदेच्या नाभीस्थानापर्यंत पोहोचणार होतो . 


लेखांक ५१ समाप्त ( क्रमशः )
 
 
 

लेखांक ५२ : वृद्ध नर्मदा , सांगाखेडा येथील लाल्या कीर आणि नर्मदेहून धष्टपुष्ट युवा तवा नदी

इथून पुढे काही अंतराने नर्मदेचा काठ एका अत्यंत विचित्र कारणामुळे सोडावा लागतो . नद्या आपला प्रवाह बदलत वाहत असतात . अर्थात हा बदल होण्यासाठी हजारो वर्षे जात असतात . परंतु एका बाजूने किनारा खात जाणाऱ्या नद्या दुसऱ्या बाजूला वाळू आणि गाळ मातीचा संचय करत वाहत असतात . हे वळण कधी कधी इतके गोलाकार होत जाते की कधीतरी अचानक मग मूळ प्रवाह सोडून नदी सरळ मार्ग धरते . सोबत महापुरामध्ये वाहून आणलेल्या अतिरिक्त वाळूमुळे असे होते . वाळूचा इतका साठा होतो की नदीला आपला मूळ प्रवाह सोडून वहावे लागते . परंतु वाळूच्या खालून जुना प्रवाह संथगतीने चालूच राहतो .  इथून पुढे काही अंतरावर नर्मदेने असाच आपला जुना प्रवाह सोडून नवीन मार्ग पकडलेला आहे . परंतु असे लक्षात आले आहे की जुना प्रवाह अजूनही जमिनीखाली जिवंत आहे . त्यामुळे हा जमिनीखालून वाहणारा जुना प्रवाह ओलांडला जात नाही .नाहीतर परिक्रमा खंडित झाली असे मानण्यात येते . आणि त्यासाठी तुम्हाला खूप लांबून नर्मदा-तवा संगम गाठावा लागतो .
 जमिनीखालचा प्रवाह जिवंत आहे हे कळण्यासाठी एक वृद्ध नर्मदा कुंड बांधण्यात आले असून येथे अक्षरशः नर्मदा जलच सापडते . आजही सापडते . परंतु हा भाग गाठण्यापूर्वी मी आधी रेवा मोहरी गाव ओलांडून रेवा बनखेडी या सुंदर गावामध्ये आलो . या गावांमध्ये नर्मदेच्या अगदी काठावर महंत मदनमोहनदास बाबांचे सुंदर असे राम मंदिर आहे . या राम मंदिरामध्ये अतिशय सुंदर अशा राममूर्ती आहेत . परंतु त्याहून सुंदर अशी एक पाण्याची टाकी इथे बाबांनी बांधलेली आहे . निषाद राज याने केवटाकरवी राम लक्ष्मण सीता यांना गंगा नदी पार करून दिली होती . त्याची आठवण करून देणारी नौका येथे टाकीच्या जागी बनवलेली आहे . मी रामाचे दर्शन घेतले . राम स्तुती पर काही स्तोत्रे म्हटली . इथे दर्शनासाठी एक तरुण भक्त आला होता . तो माझ्याशी गप्पा मारत बसला . त्याने आठवण म्हणून काही फोटो माझ्यासोबत काढून घेतले . त्यांनी संपूर्ण परिसर देखील मला फिरून दाखवला . समोर एक शाळा होती .त्याच्या पलीकडे ऋणमुक्तेश्वराचे मंदिर होते .  इथे मी ऋण मुक्ती अर्थात कर्जातून मुक्त करणारे महादेवाचे स्तोत्र म्हटले .अर्थात माझ्या डोक्यावर कुठले कर्ज नसले तरी परमेश्वराच्या उपकाराचे न फिटणारे कर्ज परिक्रमे ने माझ्या डोईवर जमा केले होते . यातील काही फोटो आपल्या माहिती करता देत आहे .  रेवा बनखेडी चे राम मंदिर 
मंदिर सुंदर रंगवलेले आहे
मंदिराच्या आत मध्ये कधीही न पाहिलेले वेगळेच कलात्मक खांब बघायला मिळतात . कलशामध्ये ठेवलेली झाडाची खोडे असे दोन खांब आहेत .

रेवा बनखेडी येथील तरुण रामभक्ता सोबत प्रस्तुत लेखक
येथील राम मूर्ती फार सुंदर आहेत
परंतु विशेष लक्षात राहते ती ही नौका स्वरूप पाण्याची टाकी
मी गेलो तेव्हा ही टाकी नुकतीच बांधलेली होती . आता छान रंगवलेली दिसत आहे .
 १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रस्तुत लेखक इथे होता असे फोटो वरून लक्षात येते .
राम जानकी चे दर्शन झाल्यावर आम्ही ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो .
आणि अचानक मला शासकीय प्राथमिक शाळेच्या समोर काल भागवत सप्ताहामध्ये भक्तीरसामध्ये तल्लीन होऊन नाचणारे ते मिशीवाले काका भेटले !
तरुणाने आमच्या दोघांचा फोटो काढला . 
इथे ऋणमुक्तेश्वराचे शिवमंदिर आहे
राम भक्त तरुणासोबत ऋणमुक्तेश्वराच्या दारात प्रस्तुत लेखक 
 दारिद्रय दुःख दहनाय नमः शिवाय ...
जाताना श्री मदन मोहनदास महाराजांचे दर्शन घडले आणि त्यांच्या शिष्याने चहा पाजून वहीमध्ये हा शिक्का मारून दिला . शिक्यावरील शब्द खालील प्रमाणे
श्री राम जानकी मंदिर 
महंत श्री 108 श्री मदन मोहन दास 
श्री रेवा धाम बनखेडी
 तहसील सोहागपुर 
जिला होशंगाबाद
  इथून पुढे नर्मदेला अनेक नद्या येऊन मिळतात . त्यापैकी रायन ,पलकमती , मारू या तीन नद्या अनुक्रमे ईसरपूर ,पामली आणि रामनगर अथवा पाण्डुद्वीप या गावांमध्ये पार केल्या . या सर्वच नद्यांचे पाणी अतिशय स्वच्छ , नितळ आणि गोड आहे .
पैकी ईश्वरपूर किंवा इसरपूर या गावाच्या बाहेर एका संन्यासी महाराजांचा आश्रम आहे . स्वामी विवेकानंदांच्या नावाने या आश्रमाचे नाव ठेवलेले आहे . आश्रम छोटासाच परंतु अतिशय नीटनेटका व टापटीप होता . 
हाच तो शंकर विवेकानंद संन्यास आश्रम
आश्रमाच्या बाहेर बसलेले संन्यासी महाराज .मी इथे भर दुपारी गेलो होतो .संग्रहित छायाचित्र
संन्यासी महाराजांनी दोन खोल्या एका कोपऱ्यात बांधल्या होत्या . त्यांच्या भाषेवर बंगाली भाषेचा प्रभाव जाणवत होता . परंतु ते मूळचे लखनऊ भागातले होते . मी विचारल्यावर मला त्यांनी सांगितले की त्यांचे बहुतांश आयुष्य बंगालमध्ये गेलेले आहे . संन्यासी महाराज सुशिक्षित होते . इथे एक स्थानिक ग्रामस्थ आला आणि त्याने मला अतिशय उत्तम असे गक्कड ,भरता ,मलिदा  इत्यादी सर्व करून पोटभर खाऊ घातले .शेतातील ताजे मुळे देखील आम्ही खाल्ले . आता मला हे बनविण्यातील ज्ञान प्राप्त झालेले असल्यामुळे मी त्याला मदत देखील केली . आश्रमातील छोट्या मुलांशी गप्पा मारत काही काळ एका शेवग्याच्या झाडाखाली वामकुक्षी केली . तोपर्यंत संन्यासी महाराज बाहेर येऊन बसले . त्यांच्याशी पाया पाशी बसून गप्पा मारल्या . आणि मग त्यांच्यासोबत चहा घेऊन नर्मदे हर केले . इथून पुढे पामली , रामनगर ,पांडू द्वीप अशी गावे ओलांडत सांगाखेडा खुर्द हे गाव गाठले . यातले रामनगर हे गाव अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडे म्हणून लक्षात राहिले . इथे प्रत्येक घरात उघडी गटारे होती . आणि ती रस्त्याच्या कडेने न वाहता रस्ता भर व्यापून वाहत होती . सर्व गावात दुर्गंधी , माशा व घाण पसरलेली होती . नाकाला उपरणे लावून हे गाव पार केले . इथे खूप सारे मोर दिसत होते . आता मोरांसोबतच सात भाई , तितर , चिमण्या , वेडे राघू , धनेश , हुप्पो , बदके ,बगळे तसेच कोल्हे , तरस , रानडुकरे हे सर्व प्राणी मुबलक प्रमाणात दिसत होते . आज तर एक पिसाळलेला कोल्हा माझ्या दिशेने धावू लागला . परंतु मी अजिबात हालचाल न करता शांत एका जागी उभा राहिलो तो आला . त्याने माझ्याकडे पाहिले आणि लांब पळून गेला .  याच्या खांद्याला जखम झाली होती . त्यामुळे तो पिसाळला होता . हे सर्व प्राणी दिसत होते , परंतु मला ज्या प्राण्याची अत्यंत आवड आहे असा प्राणी असून दिसला नव्हता . आणि आज अखेर तो समोर आलाच ! घोडा ! होय नर्मदे काठी चक्क घोडा भेटला ! एका अबलक घोड्याला घेऊन त्याचा मालक नर्मदेच्या काठी वाळवंटावर चकरा मारत होता . घोडा अवखळ होता . त्यामुळे त्याला दमवण्यासाठी वाळूमध्ये चालवले जात होते . मी घोडया जवळ गेलो आणि घोड्याबाबत मालकाशी बोलू लागलो . एक कॉलेजमधला मुलगा बाजूने जाता जाता थांबून आमचे फोटो काढू लागला . मग मी घोडा मालकाची परवानगी घेऊन घोड्यासोबत फोटो काढले . घोडा मालक आधी मला घोडा देण्यासाठी घाबरत होता . कारण असे घोडे हिसका मारून पळून जातात . हा मालक घोड्याला जोर जबरदस्तीने शांत ठेवायचा प्रयत्न करत होता . मी त्याला घोड्याला प्रेमाने कसे शांत करता येते हे शिकविले . त्याच्यासमोर प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे तो खूप खुश झाला . त्या मुलाने काढलेले फोटो त्याने मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . 
घोड्याला घाबरून घोड्यापासून लांब उभे राहून सेल्फी काढणारा मुलगा
घोडा मालक रजनीश बिश्नोई यांच्याशी अश्व संगोपनाबाबत चर्चा करताना प्रस्तुत लेखक
अत्यंत मजबूत गर्दन असलेल्या या देखण्या अश्वाचे अवलोकन करताना प्रस्तुत लेखक . चौकस वृत्तीने आमचा संवाद ऐकणारा ग्रामस्थ .
 लगामाला हिसके दिल्यावर घोड्याच्या तोंडाला कसा त्रास होतो , हे मालकाला समजावून सांगताना प्रस्तुत लेखक
अश्व शक्तीने जिंकता येतो की प्रेमाने ?
 उत्तर आहे प्रेमाने ! अतिशय खट्याळ आणि द्वाड अश्वाला शांत करून प्रेमाने कुरवाळताना प्रस्तुत लेखक .
नर्मदेला ज्याची त्याची आवड माहिती असते . त्यामुळे मला पुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये जेवढे अश्व भेटले तेवढे अन्य कोणालाच दिसले नाहीत . हा घोडा म्हणजे तर फक्त सुरुवात होती .
जिथे मन रमू लागते तिथून पटकन पुढे निघावे हे परिक्रमेत उत्तम असते . बिश्नोई मला घोड्यावर बसता का वगैरे विचारू लागला . परंतु त्याला नम्रपणे नकार देत मी पुढे निघालो . परिक्रमेमध्ये वाहन घेण्यास मनाई आहे आणि घोडा हे देखील एक प्रकारचे वाहनच आहे .
या भागात वाळू वाहणारी गाढवे सुद्धा खूप दिसली . परंतु मनुष्य असून गाढवपणा करणारी तरुणाई इथे अधिक आढळली . स्त्री पुरुष सर्वच इथे राजश्री नावाचा गुटखा खातात . तो दोन वेगवेगळ्या पाकिटात मिळतो . दोन्ही एकत्र करून हे लोक खात असतात . दिवसाचे किमान शंभर ते कमाल अडीचशे तीनशे रुपये या व्यसनावर ते फुकट घालवतात . 
वैधानिक इशारा : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे व त्याचा प्रस्तुत लेखक तीव्र निषेध करतात .
गुटखा खाणारे लोक जाता येता कुठेही थुंकत असतात . मोठ्यांचे अनुकरण करणारी लहान मुले त्यामुळे जाता येता नाहकच थुंकताना दिसतात . मला सुरुवातीला या सवयीचा फार त्रास झाला . नंतर लक्षात आले की इथे प्रत्येकालाच ही सवय आहे . जाता येता उगाचच एखादी पिंक टाकली जाते . नवीन माणसाला हे अपमानास्पद वाटते . परंतु त्या लोकांच्या हे अंगवळणी पडलेले आहे . परिक्रमा वासींना त्रासदायक ठरणारी अजून एक गोष्ट म्हणजे शेतामध्ये लावलेले तुषार सिंचन अथवा स्प्रिंकलर .तुम्ही शेतातून जात असताना कधीही अचानक हे स्प्रिंकलर चालू होतात आणि तुम्हाला संपूर्ण भिजवून टाकतात ! तसेच हे चालू असतील ते शेत पूर्णपणे चिखलमय झालेले असते त्यामुळे चालताना अक्षरशः कसरत करत चालावे लागते . एक जरी पाऊल चुकीचे पडले तरी घसरून चिखलात मनुष्य आपटतो .असा मी खूप वेळा आपटलो . एकदा अंगाला लागणाऱ्या चिखलाचे वैषम्य निघून गेले की मग कितीही वेळा पडता येते ! परंतु या चिखलामध्ये रूतून बूट मात्र लवकर खराब होतात . मी एका शेतकऱ्याकडून या स्प्रिंकलर चे गणित समजून घेतले . २२ स्प्रिंकलर आठ तास लावले की एक एकर शेत भिजते . ही भीज पंधरा दिवसांसाठी पुरते . पुढे पुढे मला या तुषार सिंचन करणाऱ्या यंत्रांच्या फिरण्यातला एक ठराविक पॅटर्न लक्षात आला . त्याची एक मुख्य धार आणि एक छोटी धार असते . मुख्यधारेच्या जवळून चालले असता ती आपल्याला फार भिजवू शकत नाही . अशावेळी तिला चुकवून खाली वाकून वगैरे पुढे जायचे असते . छोटी धार मात्र तुम्हाला हमखास भिजवते . मोठ्या धारेच्या टोकाला तुम्ही सापडलात मग तर तुमची आंघोळच निश्चित होते ! तुषार सिंचन चालू असलेल्या क्षेत्रांमध्ये मी आधी थोडे थांबून निरीक्षण करायचो आणि मग माझा जाण्याचा मार्ग आणि कालावधी निश्चित करायचो .हे सर्व करताना चिखलामध्ये आपटून पडणार नाही याचे देखील गणित बांधावे लागायचे ! 
नर्मदे काठी सुरू असलेला एक तुषार सिंचन प्रकल्प
मध्ये असलेले पांडुद्वीप इथे पांडवांनी फार मोठा यज्ञ केला होता .असे म्हणतात की त्या यज्ञाची यज्ञवेदी इतकी मोठी होती की आजही त्या परिसरामध्ये जी माती आहे तिला भस्माचा रंग आहे . इथे पाचही पांडवांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेली शिवलिंगे आहेत . वाचकांनी कृपया या सर्व शिवलिंगाचे दर्शन घ्यावे .
धर्मराज युधिष्ठिर ,अर्जुन , भीम , नकुल ,सहदेव या पांडवांनी स्वहस्ते यज्ञ पूर्वक स्थापन केलेली , पुजलेली नर्मदेश्वर शिवलिंगे
पांडू द्वीप येथील मंदिर समूह
इथे भस्माच्या रंगाची माती आजही मिळते
सांगाखेडा खुर्द गावामध्ये मी पोहोचलो तेव्हा तिथे सहा परिक्रमावासी खूप आनंदात आहेत असे दिसले . साठीच्या आसपास असलेले हे सर्वजण याच भागातील होते . आणि आनंदाची गोष्ट अशी की त्या सर्वांची परिक्रमा नुकतीच संपली होती ! ज्या घाटावर परिक्रमा आपण सुरू करतो तिथेच तिची समाप्ती होते .त्यानंतर पृथ्वीप्रमाणे भंडारा घालून कन्या भोजन करून आता सर्वजण ओंकारेश्वरला निघाले होते . असे परिक्रमापूर्तीचे भंडारा भोजन मिळणे अतिशय शुभ मानले जाते . नशिबाने मलाही त्यांच्या भंडाऱ्याचे भोजन मिळाले . तिथे मैयाचे पात्र इतके लांबरुंद झालेले आहे की जणू काही समुद्रकिनाराच भासतो .मी उतरलो होतो ती एक अत्यंत जुनी व उत्तम बांधकाम असलेली छोटीशी धर्मशाळा होती . एका छोट्याशा खोलीमध्ये आत एक समाधी मंदिर बांधलेले होते . बाहेर ओळीने पाच-सहा परिक्रमा वासी झोपतील एवढी जागा होती . त्याच्या पलीकडे व्यवस्था पाहणाऱ्या साधूची खोली होती . साधूने मला समाधी असलेल्या खोलीमध्ये आसन लावायला सांगितले . कारण रात्री काही परिक्रमा वासी येणार आहेत असे त्याला फोन करून त्यांनी कळविले होते . आत मध्ये एक तखत होता . तखत म्हणजे मोठी लाकडी चारपाई . साधूने मला त्यावरच आसन लावायला सांगितले . कारण खाली उंदीर खूप होते . समोर एक राम मंदिर होते आणि तिथे काही महिलांचे अखंड भजन सुरू होते . भजनाचा आवाज ऐकून मी देखील तिथे गेलो आणि ढोलक , पेटी इत्यादी वाद्ये आळीपाळीने वाजवत सुंदर असे रामाचे भजन केले . मी आल्यामुळे त्या वृद्ध माताराम उत्साहीत झाल्या . आणि नवीन नवीन ठेवणीतल्या चाली गाऊ लागल्या .  तिथून मी परत धर्म शाळेमध्ये आलो तेव्हा साधू माझ्यावर चिडला आहे असे माझ्या लक्षात आले . तो मला म्हणाला बायकांच्या मध्ये जाऊन साधूने कधी भजन करू नये . मी लगेच त्याला म्हणालो परंतु साधूने स्त्री-पुरुष असा भेदभावच करू नये . फार फार तर भजन करणारे आणि भजन न करणारे असा भेद पाळायला हरकत नाही . साधू म्हणाला तुझी परिक्रमा वाया गेली . मी म्हणालो ,  जया मनी जैसा भाव ।तया तैसा अनुभव ।
माझ्या डोक्यात फक्त भजन होते . त्यामुळे मला भजन दिसले . तुमच्या डोक्यात जे आहे ते तुम्हाला दिसते आहे . साधू काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता . माझ्या आईच्या आणि त्याहून अधिक वयाच्या त्या सर्व माताराम होत्या . परंतु साधूच्या मनात असे विकृत विचार का येत होते हे मला काही कळाले नाही . जी गोष्ट माझ्या ध्यानी मनी देखील नव्हती तिच्यावरून हा मला झापत होता . मी तरीदेखील साधूची क्षमा मागितली .आणि दुपारी झालेल्या भंडाऱ्याचा उरलेला प्रसाद भक्षण करून झोपी गेलो . मी आत मध्ये गेल्या गेल्या साधूने त्या खोलीला बाहेरून कडी लावून घेतली .आता मात्र पंचायत झाली ! रात्री लघुशंका वगैरे आली तर बाहेर पडायचे कसे ? परंतु ती चिंता नर्मदेवर सोडून मी झोपी गेलो . रात्री उशिरा भांडण्याच्या आवाजामुळे मला जाग आली . काही स्थानिक ग्रामस्थ साधू पाशी येऊन मोठ्या आवाजात भांडत होते . साधू त्यांना हळू आवाजात बोलण्याची विनंती करत होता . अखेरीस साधूला धमकी देऊन ते लोक निघून गेले . इकडे याने मला कोंडलेले असल्यामुळे मी उठायचा प्रयत्न केलाच नाही . दार उघडे असते तर कदाचित मी मध्यस्ती केली असती .मध्यरात्री दंडवत घालत एक माताराम आल्या . याचा अर्थ आपल्या घरापासून ते नर्मदा नदीमध्ये स्नान करेपर्यंत प्रत्येक पाऊल हे साष्टांग नमस्कार घालून मगच टाकायचे ! किती कठीण तप आहे विचार करून पहा ! अक्षरशः लाखो साष्टांग नमस्कार घातले जातात . हे तरी वीस पंचवीस किलोमीटर अंतर होते . काही लोक तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा दंडवत घालीत करतात . अशी परिक्रमा पूर्ण व्हायला किमान बारा वर्षे लागतात . काही लोक उभे राहून नर्मदा परिक्रमा करतात . म्हणजे ते कुठेही बसत किंवा झोपत नाहीत कायम उभेच . अशा लोकांना खडेश्वर बाबा म्हणतात . मला एक परिक्रमावासी भेटले ज्यांचे वय १०२ वर्षे होते ! आणि ते पायाला चिंध्या बांधून अनवाणी परिक्रमा करत होते .
सर्व प्रकारचे परिक्रमावासी नर्मदेने मला वाटेमध्ये भेटवले .
 अंध , अपंग , लुळे पांगळे ,बहिरे ,चकणे ,हेकणे , धडधाकट , अशक्त , रोगी , निरोगी , महारोगी , नोकरदार , व्यापारी ,मालक , सेवक ,डॉक्टर , इंजिनियर , वकील , न्यायाधीश , कलाकार ,नकलाकार , अभिनेते , अभिनेत्री ,कीर्तनकार ,लष्करी जवान ,पोलीस , अधिकारी ,सनदी अधिकारी , शेतकरी , कातकरी , कोळी , माळी , दलीत , पंडित ,उच्चवर्णीय , शहरी , निमशहरी , ग्रामीण , राजकारणी, शिक्षक , विद्यार्थी , खेळाडू , प्राध्यापक , उच्चविद्याविभूषित , चोर , डाकू , लुटेरे ,गुंड , मवाली , खुनी , परदेशी , NRI, सात्विक , तामसिक ,राजसिक ,उजवे , डावे , मध्यम मार्गी ,स्त्रिया , पुरुष , मुले , मुली ,तरुण-तरुणी , वृद्ध , त्यागी , महात्यागी, योगी , वितरागी ,तडी ,तापसी , संन्यासी , भवरोगी,भोगी असे सर्व प्रकारचे लोक नर्मदा परिक्रमा करतात .  आणि सर्वांना ती त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार आणि समजेनुसार अनुभव देते आणि मूळ पदाला आणते . असो . दंडवत घालत आलेल्या माताराम सोबत त्यांचे कुटुंबीय होते . त्यांनी दार उघडल्यामुळे मला बाहेर येता आले . सकाळी देखील सेमली या गावातून अजून दोन-तीन लोक दंडवत घालत आले . कारण ती पौर्णिमा होती . आणि नर्मदा स्नानाचा महेंद्र योग नावाचा दुर्मिळ योग आज घडत होता . त्या योगावर स्नान करण्यासाठी नर्मदे काठी एकच गर्दी झाली होती . मी देखील त्या महेंद्र योगावर पवित्र असे नर्मदा स्नान केले . इतक्यात गावकऱ्यांनी लाठ्या काठ्या वापरून काल मला दिसलेला पिसाळलेला कोल्हा मारून टाकला . त्याचे ते असहाय कलेवर पाहून मला फार वाईट वाटले . समाधानाची एकच बाब होती की त्याला नर्मदे काठी मरण आले . आता मात्र  वृद्ध नर्मदा ओलांडली जाऊ नये म्हणून मला नर्मदेचा काठ माझ्या इच्छेविरुद्ध सोडावा लागला . जमिनीवरून चालताना तुमच्या लक्षात येत नाही की असा नियम का केला आहे . परंतु उपग्रहावरून तयार केलेला नकाशा पाहिल्यावर आपल्याला जुन्या नर्मदेचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो . सुमारे हजार वर्षांपूर्वी नर्मदेचे मूळ पात्र ज्या मार्गाने वाहत होते तो मार्ग उपग्रह चित्रांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो . आपल्या अभ्यासाकरता मी खाली दोन नकाशे जोडत आहे . आधी नुसता उपग्रह नकाशा जोडतो आहे जो पाहून तुम्हाला जुन्या नर्मदेचा मार्ग सापडतो आहे का पहा . तो सापडला तर ठीक नाही सापडला तर पुढील चित्रामध्ये मी तो मार्ग दाखवला आहे . तो पाहिल्यावर पुन्हा एकदा पहिले चित्र पहा म्हणजे तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल . 
या नकाशामध्ये पिवळ्या वाळूने अंकित केलेले नर्मदेचे सध्याचे पात्र आहे . जुने पत्र तुम्हाला कुठे सापडते आहे का पहा !
नर्मदेचे सध्याचे वाहते पात्र हिरव्या रंगाने आणि वृद्ध नर्मदा पात्र निळ्या रंगाने अंकित केलेले आहे . याचा दृश्य जलप्रवाह जरी आता लुप्त झाला असला तरी भूमिगत प्रवाह अजून सुरू आहे . 
या निमित्ताने सर्वांनाच मला एक सांगावेसे वाटते . आपल्याला वाहणारी नदी जी दिसत असते ते केवळ हिमनगाचे एक टोक असते . नदीपात्र हे त्याखाली देखील जमिनीत कित्येक शे मीटर पर्यंत मोठा भूजल साठा घेऊन वाहत असते . त्यामुळे वरवर आटलेली दिसलेली नदी ही जर थोडेसे प्रयत्न केले तर पुन्हा पुनरुज्जीवित करता येते . असो . तर वरील नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की या भागामध्ये नर्मदेचा किनारा का सोडावा लागतो . आता तरुण नर्मदा सोडून पुढे माय चा भूमिगत प्रवाह पकडून चालायला सुरुवात केली . अजूनही एका कुंडामध्ये ही वृद्ध नर्मदा प्रकट झालेल्या स्वरूपामध्ये आढळते . बछवाडा गणेरा नागवाडा मार्गे तवा नदीच्या कालव्याजवळून चालत चालत गौ घाट नावाचे तीर्थक्षेत्र गाठले जिथे ही वृद्ध नर्मदा प्रकट झालेली आहे . इथे जाण्यापूर्वी वाटेमध्ये रामदत्त पटेल नामक एका शेतकऱ्याचे शेत पार करावे लागते . यांनी शेतामध्ये पाणी सोडून इतका भयानक चिखल केला होता की गुडघ्यापर्यंत पाय रुतत होते . अतिरिक्त पाणी दिल्यामुळे पिके देखील मरून चालली होती . बरेचसे परिक्रमावासी इथून कुंड जवळ असले तरी देखील दोन किलोमीटरचा मोठा वळसा मारून पुढून फिरून कुंडावरती येतात . मी मात्र असे ठरवले की आपण या शेतातूनच जायचे . दोन-तीन एकराचे हे शेत पार करताना माझे बूट पुरते फाटून गेले . अखेरीस मी अनवाणी पायाने कसाबसा तो टापू पार केला . मला या घटनेमुळे फार वाईट वाटले . पुढे वाटेमध्ये एक घर लागले . त्या घरातील माताराम माझ्यासाठी पाणी घेऊन दारात उभीच होती ! तिने सांगितले की हा शेतकरी मुद्दाम शेतामध्ये पाणी सोडून ठेवतो . ज्यामुळे परिक्रमावासींना जाता येऊ नये आणि तरीदेखील कोणी शेतातून पार झालाच तर तो आमच्याकडे पाय धुण्यासाठी येतो . मी त्या शेतकऱ्याचे नाव पत्ता व्यवस्थित विचारून ठेवला आणि मनोमन काहीतरी ठरवले . इथून जवळच नर्मदा माता कुंड आहे . जे शर्मा नामक एका कुटुंबाचे खाजगी क्षेत्रामध्ये आहे . त्यांनी त्याचे रूपांतर एका छोट्या तीर्थक्षेत्रामध्ये केले असून एक सुंदर बैठे मंदिर बांधलेले आहे .याची व्यवस्था एक एकाक्ष महंत निगुतीने करत आहेत . आणि समोर खोल असे वृद्ध रेवा कुंड आहे .ज्याला उंच असा मनोरा बांधून प्रवेशद्वार केलेले आहे . 
शर्मा यांचा मुलगा माझ्याशी गप्पा मारायला आला . हा मुलगा अतिशय हुशार आणि चाणाक्ष होता . त्याच्याशी गप्पा मारल्या असता मला असे लक्षात आले की त्याला हे क्षेत्र चालविण्यामध्ये फारसा रस नव्हता . हा जर येथून निघून गेला असता तर या क्षेत्राची भविष्यामध्ये दैना होणार हे स्पष्ट होते . कारण हा खाजगी ट्रस्ट होता . मंदिरामध्ये बसून सुग्रास भोजनाप्रसादी घेता घेता शर्मा शी बोलत राहिलो .त्याला काहीतरी मोठे काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा होती . त्याच्या ताब्यात एकूण चाळीस एकर क्षेत्र होते . आपल्या हातात काय नाही आणि आपल्या हातात काय आहे याचा हिशोब मांडून त्याला कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक मोठे काम कसे उभे करता येईल त्यावर सुमारे तास दीड तास मार्गदर्शन केले . कृषी पर्यटनाचा प्रयोग या भागामध्ये खूप चांगला चालला असता . तो देखील वही पेन घेऊन आला आणि त्याने सर्व मुद्दे व्यवस्थित लिहून घेतले .नेरळ येथे सगुणाबाग नावाने कृषी पर्यटन सुरू करणारे श्री चंद्रशेखर भडसावळे हे माझे अतिशय चांगले मित्र , मार्गदर्शक आणि या क्षेत्रातील गुरु आहेत .त्यांनी आजवर मला पटवून सांगितलेले आणि सिद्ध करून दाखविलेले मुद्देच मी शर्माला सांगितले . त्याला सर्व काही पटले आणि त्याने हे स्थान सोडून कायमचे निघून जाण्याचे रहित केले . मुख्य म्हणजे या क्षेत्रामध्ये राहून होणारा अध्यात्मिक लाभ हा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि एकमेवाद्वितीय असा होता .त्यानंतर तो मला वृद्ध रेवा कुंडाचे दर्शन करण्यासाठी स्वतः घेऊन गेला . कुंडातील पाण्याचा रंग पाहिला आणि वेडाच झालो ! हा तर साक्षात नर्मदा मातेच्या पाण्याचा रंग होता ! पाण्याचा वासही तसाच आणि चवही तीच ! खरोखरच हे नर्मदा जल होते ! तिथे स्नान करायला परवानगी नाही . परंतु बाजूला नळाला हेच पाणी येईल अशी व्यवस्था केलेली आहे . तिथेच स्नान करून नर्मदेचे पूजन केले .आज इथेच रहा असा आग्रह त्याने लावला होता . परंतु मला वेळेत परिक्रमा पूर्ण करायची होती . वेळेत म्हणजे चातुर्मास लागण्यापूर्वी चालणे संपवायचे होते . आता ४० -४२ दिवस झाल्यावर मला माझ्या चालण्याचा अंदाज आलेला होता .त्या हिशेबाने कुठेही न थांबता रोज जमेल तितके चालत राहणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होते . माझे स्वतःचे वजन १२ - १५ किलो कमी झालेले असले तरी देखील पाठीवर तेवढ्याच वजनाची नर्मदेत सापडलेली शिवलिंगे स्थानापन्न झालेली होती ! त्यामुळे पायावरचा एकूण भार तेवढाच राहिला होता . हे सर्व गणित सतत माझ्या तार्किक डोक्यामध्ये चालत असे . नर्मदे काठी कुठलाही मानवी तर्क काम करत नाही हे माहीत असून देखील सवयीमुळे असे होत असावे . या परिसराची माहिती आपल्याला व्हावी म्हणून आपल्या दर्शनासाठी काही संग्रहित छायाचित्रे आणि काही शर्मा ने स्वतः काढलेली छायाचित्रे सोबत जोडत आहे .
 गौ घाट वृद्ध रेवा कुंड येथील मंदिर
 वृद्ध रेवा माता
 बुढी माय !
नर्मदा कुंडाचे प्रवेशद्वार .
मंदिरामध्ये प्रस्तुत लेखकाशी गप्पा मारत बसलेला वृद्ध रेवा मंदिराचा ' मालक ' शर्मा
तरुण मुलांना सेल्फी काढायची भारी हौस असते .
नर्मदा परिक्रमा देखील तुम्हाला असाच स्वतःच्या आत्मतत्त्वासोबत 'सेल्फी ' काढण्याची एक अमूल्य संधी देते !
मंदिरात खूप वेळ गप्पा मारून झाल्यावर शर्मा मला वृद्ध रेवा कुंडामध्ये घेऊन गेला . खाली दिसणारे रेवा कुंड पहा ! आता तर तुम्ही देखील नर्मदेचा रंग ओळखू लागला आहात ! सांगा पाहू आहे की नाही साक्षात नर्मदा ! 
या पाण्याचे अनेक लोकांनी शास्त्रीय संशोधन करून सिद्ध केलेले आहे की हे नर्मदा जलच आहे . नर्मदा परिक्रमा किती शास्त्रोक्त पद्धतीने चालते याचाच हा एक उत्तम पुरावा आहे . ती केवळ भक्ती भावाने घडत नाही तर त्यामागे भूगर्भशास्त्र , भूजलशास्त्र , भूगोल इत्यादी सर्वच शास्त्रांचा साकल्याने विचार केलेला आढळतो . ती पूर्णपणे शास्त्रीय आहे . 
इथून निघालो परंतु शर्माला करमेना . तो साधारण एक दीड किलोमीटर मला सोडायला चालत माझ्यासोबत आला . पुन्हा एका झाडाखाली आम्ही बोलत उभे राहिलो . आपल्या देशातील तरुणांना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन केले तर त्यांच्या हातून खूप काही घडू शकते . आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत असते तेव्हा आपल्याला जितके ठाऊक आहे तितके ज्ञान अवश्य द्यावे . आम्ही उभे होतो ते नेमके त्याचेच शेत होते . मग थेट शेतामध्ये जाऊन त्याला काही उपाययोजना सुचवल्या . कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे सुरू करता येईल याची त्याला कल्पना दिली . आणि नर्मदे हर केले . माझा मुख्य हेतू इतकाच होता की या पवित्र आणि पौराणिक तीर्थक्षेत्राची पुढे वाताहात होऊ नये . क्षेत्रपती सक्षम असेल तर क्षेत्ररक्षण अवश्य होते . पुढे गावामध्ये मी रामदत्त पटेल यांचे घर शोधत चालू लागलो . सर्व गावकरी मला सांगू लागले की त्याच्या घरी कशाला जाता ? त्यांना परिक्रमावासी आलेले आवडत नाहीत . त्यांचे मोठे राजकीय संबंध आहेत ! ते अमुक आहेत . ते तमुक आहेत ! अशा सर्व गाव गप्पा ऐकत अखेरीस त्यांच्या घरासमोर येऊन उभा राहिलो . अतिशय मोठ्या ऐसपेस वाड्याला तेवढेच भव्य दिव्य प्रवेशद्वार होते . दारामध्ये उभा राहून मी आवाज दिला रामदत्त पटेल यांचे दर्शन होईल काय ? तो म्हणाला ,काय काम आहे ? मीच रामदत्त पटेल . मी विचारले , मला आत मध्ये येण्याची आज्ञा आहे का ? या ना या .बसा .  असे म्हणत त्याने मला अंगणातच त्याच्यासमोर बसायला खुर्ची दिली . मी माझ्या येण्याचा हेतू त्याला खालील शब्दात सांगितला . माझे नाव अमुक अमुक . तमुक तमुक गावावरून आलोय . या या दिवसापासून नर्मदा परिक्रमा उचललेली आहे . नर्मदेचे जुने पात्र जे आहे त्याच्या काठावर कुठल्या कुठल्या भाग्यवंतांची शेती आहे हे पहावे म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो ! आणि त्यात ती नर्मदा साक्षात आपल्या शेतामध्ये सर्वत्र खेळते आहे आपण किती भाग्यवान आहात ! फक्त मूळ शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे एक चिंता वाटली ती आपल्याला सांगायला आलो . अतिरिक्त पाण्यामुळे आपली पिके मरत आहेत तरी कृपया योग्य प्रमाणात पाणी दिले जावे . बहुतेक शेताची व्यवस्था राखण्यासाठी आपण ठेवलेला वाटेकरी नीट लक्ष देत नसावा त्यामुळे अतिरिक्त पाणी घातले जात आहे . पटेलला मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले .  हा अतिशय घरंदाज आणि जातिवंत मनुष्य होता . परंतु त्याने देखील त्याची बाजू मला सांगितली . शेतामध्ये शौच करणे , ते शेतातील पिके लुटणे ,तोडणे ,तुडविणे असे सर्व प्रकार या भागात येणारे परिक्रमावासी अनेक वर्षे करत असल्यामुळे वैतागून त्याने निरुपयाने हा अघोरी उपाय सुरू केला होता . यावर मी त्याला एक उपाय सुचवला . शेतातून एक कायमचा फुटभर रुंदीचा बांध जर त्याने केला तर त्याने सर्व समस्या कायमच्या सुटणार होत्या . मुख्य म्हणजे त्याच्या शेताला कायमची अंतरलेली नर्मदामाई या परिक्रमावासींच्या रूपाने त्याच्या शेतातून पुन्हा पुन्हा जाते आहे हे फार भाग्याचे लक्षण आहे हे मी त्याला समजावून सांगितले . परिक्रमावासी जेव्हा चिडतो तेव्हा नर्मदा मातेला देखील राग आलेला असतो हे त्याला सोदाहरण पटवून दिले . आणि त्याचे परिणाम कौटुंबिक जीवनावर देखील होऊ शकतात असे मी म्हणताच तो लहान मुलासारखा रडू लागला . त्यांच्या घरामध्ये खरोखरच काही महत्त्वाच्या समस्या सध्या सुरू होत्या . आणि सर्व काही सुरळीत असून असे का होत आहे याचे उत्तर त्यांना सापडत नव्हते . त्यांची धर्म पत्नी अतिशय धर्मपरायण होती आणि दुर्धर अशा कर्करोगाशी लढा देत होती . शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे नातेवाईक होते व यांच्या घरी बरेचदा येत असतात . त्यामुळे हे मोठे घरंदाज घराणे होते . परंतु तरीदेखील केवळ परिक्रमावासींना सहकार्य करत नाही या एका गोष्टीमुळे ग्रामस्थ यांच्याशी थोडेसे फटकून वागत आहेत असे माझ्या लक्षात आले . मी तिथे सुमारे दीड दोन तास बसलो होतो . या सर्वच गोष्टींवर आम्ही खूप साकल्याने साधक-बाधक चर्चा केली . मुळात अमुक एक गोष्ट करणारा मनुष्य हा या परंपरेचा विरोधीच असेल असे सर्वसामान्यांचे अनुमान इथे खोटे पडले होते . उलट या घराण्यामध्ये खूप मोठी धर्मपरायण परंपरा आहे असे माझ्या लक्षात आले . काही कारणामुळे या परंपरेला अंतरलेले हे कुटुंबीय आता पुन्हा एकदा त्या मार्गावर चालणार होते .त्यांनी एक एक करत घरातील सर्वच सदस्यांना बाहेर बोलावून घेतले . अतिशय आदबीने प्रत्येकाचा परिचय माझ्याशी करून दिला . त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्या बसण्यातील रुबाब , आदब आणि नेमस्तपणा मला खूप भावला . आज इथेच मुक्काम करा असा आग्रह त्यांनी केल्याबरोबर खुर्चीतून उठलो आणि नर्मदे हर केले ! इकडे बाहेर मला या घराचा रस्ता दाखवणारे दहा-बारा ग्रामस्थ मोठ्या उत्कंठेने दोन तास उभे होते ! त्यांनी असे अनुमान केले होते की बहुतेक पटेलांनी आसूड काढून या परिक्रमा वाशीला फोडून काढलेले दिसते . संवादाची कडी तुटली की किती मोठे भ्रम निर्माण होतात नाही का ! मी बाहेर आल्याबरोबर सर्वांनी मला खाणा खुणा करून विचारायला सुरुवात केली ! काय झाले ! ? मी सर्वांना नजरेने पुढच्या चौकात जमायची सूचना केली . पुढे एक मंदिर होते तिथे आम्ही सर्वजण जमलो . मी झालेला इति वृत्तांत गावकऱ्यांना सांगितला आणि इथून पुढे पटेल घराण्याशी संबंध न तोडता त्यांच्याशी पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांना केली . ते काय , तुम्ही काय किंवा आम्ही काय , आपण सारी च या नर्मदा मातेची लेकरे आहोत , भारत मातेची संताने आहोत , हे कधीच विसरायचे नाही . याचे त्यांना पुनर्स्मरण करून दिले . जिभेवर साखर ठेवल्याचे परिणाम किती अद्भुत असतात पहा ! चिखलामध्ये रुतल्या रुतल्या माझ्या मुखातून त्या शेतकऱ्यासाठी शाप निघणार होता . परंतु विवेक प्रयत्नपूर्वक जागृत करून मी असा विचार केला की आपण आधी त्याची बाजू समजून घेऊया आणि मग काय ते ठरवूया ! परंतु दुर्दैवाने असा विवेक जागृत नसलेल्या काही परिक्रमावासींनी दिलेल्या शापामुळे त्याची कौटुंबिक वाताहात सुरू झाली होती . परंतु त्यांनी स्वतः दृढ संकल्प केल्यामुळे लवकरच त्यांची ही सर्व घडी नर्मदामाता सुरळीत करणार याची मला खात्री पटली . पुढे आरीमार्गे सांगा खेडा कला अर्थात मोठे सांगाखेडा गाव गाठले त्यासाठी सुमारे ३० -३५ किलोमीटर अतिशय वेगाने चालावे लागले . खूप दिवसांनी डांबरी रस्ता पाहत होतो . रस्ता इतका खराब होता की दोन तासाचे अंतर कापायला मला चार तास लागले . गावात एका राम मंदिरामध्ये शिरलो . मंदिरामध्ये अनेक लोक निवासाला होते . पुजारी महंत भाडेकरू असे लोक दिसत होते . परंतु एकंदरीतच शून्य अगत्य होते . मी पुजाऱ्याला जाऊन विचारले की इथे मुक्कामाची सोय होईल का ? तर त्याने काही उत्तर दिले नाही . एव्हाना अंधार पडला होता . त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता . परंतु कोणीच काही उत्तर देत नाही असे पाहून मंदिर तरी सार्वजनिक असते या न्यायाने मंदिरामध्ये मी माझे आसन लावले . परंतु इथे देखील कोणीही माझ्याशी एक शब्द देखील बोलायला पुढे येईना . या गावांमध्ये भोजन प्रसादाची व्यवस्था कोठे होते का असे मी एका माईला विचारले .परंतु तिने देखील ऐकून न ऐकल्यासारखे केले. अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगण्याची सवय असलेला मी हे सर्व प्रकार पाहून क्षणभर अचंबित झालो . आता माझ्यापुढे दोन उपाय होते . एक तर इथेच लाचारासारखे रात्रभर उपाशी पोटी पडून राहणे . किंवा इथून उठून सरळ नर्मदेचा काठ पकडणे . दुसरा मार्ग सर्वथैव श्रेयस्कर होता . मी शांतपणे माझे सामान उचलले आणि तिथून निघालो . मला कोणीही थांब देखील म्हटले नाही . उलट मी बाहेर पडल्या पडल्या आतून सर्वजण मिळून एकत्र हसल्याचा मोठा आवाज आला ! सांगा खेडा मोठे गाव होते . काल मी मुक्काम केला ते सांगा खेडा खुर्द होते . मध्ये पाच-सहा गावे ओलांडल्यावर पुन्हा त्याच नावाचे हे गाव आहे . गावातल्या बाजारपेठेतून मी पुढे चाललो होतो . इतक्यात एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला तुम्हाला मी सांगणारच होतो की त्या मंदिरात जाऊ नका . इतक्यात तुम्ही आत शिरलात . त्या मंदिरामध्ये परिक्रमावासींची सेवा अजिबात केली जात नाही . सेवा न केली जाण्याला विरोध नाही . माझे म्हणणे फक्त इतकेच होते की एक मनुष्य म्हणून विचारलेल्या प्रश्नाला हो किंवा नाही इतके उत्तर निश्चितपणे देता आले असते . मूर्तीमध्ये आपण पुजतो तो राम कधी कुठल्या रूपाने तुमच्यासमोर येऊन उभा राहील हे कोण जाणणार आहे ! आत्मारामाला दुखवून तुम्हाला दाशरथी श्रीराम कधीच प्रसन्न होणार नाहीत ! असेना . तर त्या गावकऱ्यांनी मला सांगितले की पुढे एक गरीब शेतमजूर परिक्रमा वासीना सेवा देतो . त्याला भेटा . इतक्यात छोटे गाव असल्यामुळे पुढे ती वार्ता पोहोचलीच आणि स्वतः तो मनुष्य मला घेण्याकरता आला . या माणसाला मी कधीच विसरू शकणार नाही ! या महान पुण्य पुरुषाचे नाव आहे लाल्या कीर ! 
दिसते तसे नसते ,म्हणून जग फसते ! या म्हणीचा प्रत्यय देणारा सांगाखेडा कला येथील महापुरुष लालचंद उर्फ लाल्या कीर
लाल्या कीर याची कथा अतिशय प्रेरणादायक आहे . सध्या याने ऐन बाजारपेठेत दोन गुंठे जागा विकत घेऊन घर ,गोठा ,दुकाने ,भव्य शिवमंदिर आणि परिक्रमा वाशींची निवास व्यवस्था असे सर्व बांधलेले आहे . समोर दोन दुकाने काढलेली असून ती भाड्याने दिलेली आहेत . त्यातील मेडिकल वाला परिक्रमावासींना मोफत औषधे देतो . त्याच्यावर एक खोली बांधली असून तिथे परिक्रमावासी उतरतात . 
हीच ती दोन दुकाने
वरच्या बाजूला धर्मशाळा दिसते आहे शेजारी स्वतः लाल्या कीर उभा आहे . मागील बाजूला मंदिराचे सुरू असलेले बांधकाम दिसते आहे .
लाल्या कीर स्वतः बांधत असलेले अतिशय कल्पक शिव मंदिर . याचे प्रवेशद्वार म्हणजे साक्षात एक भव्य दिव्य नंदी आहे . आणि कळस म्हणजे ध्यानस्थ बसलेला शंकर आहे . पायापासून वरपर्यंत या मंदिराची उंची ८० फूट आहे असे लाल्याने सांगितले .
मी आसन लावल्या लावल्या लाल्याच्या घरातील ओळीने सर्वजण येऊन माझ्या पाया पडून समोर बसले . बहुतेक तसा दंडकच त्याने घातलेला होता . स्वतः लालचंद उर्फ लाल्या कीर आणि त्याची गृह कर्तव्यदक्ष पत्नी सौ रक्षा .यांना एकूण पाच आपत्ये . पायल , पलक ,जयराज , राशी आणि साक्षी . सर्वच जण विविध गुणांनी संपन्न होते . यासोबत लाल्याने भरपूर कबुतरे ,गाई , म्हशी , बकऱ्या , कोंबड्या असे सर्वच पाळलेले होते .भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम सुरू होते . केवळ दोन गुंठे अर्थात २००० चौरस फुटामध्ये इतका सारा संसार लाल्याने कसा काय बसवला हा एक मॅनेजमेंट प्रोजेक्टसाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो . लाल्याची कथा मोठी उद्बोधक आहे . विशेषतः आजच्या काळामध्ये भरपूर पगार असून देखील भविष्यात आमचे काय होणार असा नकारात्मक विचार करणाऱ्या सर्वच लोकांनी ही कथा मुळापासून वाचावी . लाल्या कीर हा अंगठा छाप आहे . त्याला थोडी सुद्धा अक्षर ओळख नाही . तो मोलमजुरी करून पोट भरणारा एक गरीब इसम . गरिबी सोबत येणारी सर्व व्यसने इत्यादी त्याला देखील होती . विशेषतः तो जे काम करायचा ते करण्याकरता फार मोठे काळीज लागते . आणि अंगात प्रचंड ताकद देखील लागते . हा भाग भारताची वाळू पंढरी आहे . इथे नर्मदा नदीमध्ये १५ , २० ,२५ तर कधी तीस फूट खोल जाऊन पाटीने वाळू उकरून ती पुन्हा पोहत वरती आणून नावे मध्ये भरायची असे काम दिवस रात्र करणारी मजूर मंडळी असतात . दिवसातील बारा ते अठरा तास हे पाण्यामध्ये असतात . दिवसाला किमान चार ते पाच नावा ते भरतात . ही नाव म्हणजे खूप मोठी नाव असते . त्यासाठी प्रचंड ताकद , हिम्मत ,मेहनत ,दमसास  लागतो . हे काम करून तो जेव्हा भाकरी खाण्यासाठी बसायचा तेव्हा प्रचंड भूक लागलेली असायची . खूप कष्ट सुरू होते परंतु त्याला त्यातून आनंद मात्र मिळत नव्हता . एके दिवशी तो असाच भाकरीचा तुकडा तोडणार इतक्यात एक भुकेला परिक्रमावासी आला आणि त्याने लाल्याला खायला भाकरी मागितली . लाल्याकडे दोन भाकरी होत्या . त्यातली एक भाकरी त्याने परिक्रमा वासीला दिली आणि एक भाकरी स्वतः खाल्ली . ती भाकरी खाणाऱ्या परिक्रमावासीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून लाल्याला आयुष्यात यापूर्वी कधीही झाला नव्हता अशा एका अद्भुत आनंदाची अनुभूती आली ! आणि त्याला जणू काही त्याच्या जीवनाचे गमक सापडले ! दुसऱ्या दिवशी लाल्याने शिदोरी सोडली आणि मनोमन प्रार्थना केली की एखादा भुकेला परिक्रमावासी येऊ दे . गंमत म्हणजे त्याही दिवशी दोन परिक्रमावासी आले आणि लाल्या ने स्वतः उपाशी राहून त्याने दोघांना दोन भाकरी खायला दिल्या . त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लाल्याला आज अजूनच जास्ती आनंद मिळाला ! इथून पुढे लाल्याला हा छंदच जडला ! तो रोज काठाने जाणाऱ्या परिक्रमावासींना भाकरी भाजी चटणी भरवू लागला . भाजी भाकरी साठी पैसा कमी पडू लागल्यावर त्याने दारू , तंबाखू ,नॉनव्हेज अशी व्यसने क्रमाक्रमाने कमी केली आणि त्या पैशातून तो परिक्रमावासींची भूक भागवू लागला . यापूर्वी कुठल्याही कामातून कधीही मिळाला नव्हता असा आनंद त्याला या अन्नदानातून मिळायला लागला . त्याचे अनुभव सांगताना लाल्या जणू काही पुन्हा एकदा तो काळ आठवत होता ! आम्ही सर्वच जण मोठ्या एकाग्रतेने त्याचे अनुभव ऐकत होतो . पुढे एका परिक्रमावासीने जाता जाता लाल्या ला सल्ला दिला की नर्मदे काठी भरपूर भाज्या उगवतात . तर तू भाज्या विकण्याचा व्यवसाय कर .त्यात तुला यश मिळेल . हा साक्षात नर्मदेचाच आदेश मानून लाल्याने भाजीचा व्यवसाय सुरू केला . आता डांबरी रस्त्याने जाणारे परिक्रमा वासी लाल्या कडे थांबू लागले . हा त्यांना टोमॅटो ,लिंबू ,काकडी ,बटाटे अशा भाज्या देत असे . एका परिक्रमावासीने त्याला फळे विकायचा सल्ला दिला . या व्यवसायामध्ये जम बसल्यावर त्याने पुढे फळे देखील विकायला सुरुवात केली .या व्यवसायामध्ये नफा अधिक मिळत असे . मग त्याने परिक्रमावासींना पपई , चिक्कू ,पेरू ,केळी अशी फळे देण्यास सुरुवात केली . एक काळ असा होता की लाल्या कीर दिवस-रात्र कष्ट करून नर्मदेच्या काठावर पिऊन पडलेला असायचा . कोणीही त्याला विचारत नव्हते . आणि आता मात्र लाल्या कीर याचे नाव गावातील प्रत्येकाला माहिती होते . लोक आवर्जून परिक्रमा वासींना सांगायचे की लाल्या कीर नावाचा मनुष्य तुम्हाला सेवा देतो . त्याचा लाभ घ्या . एक अतिशय सन्मान जनक आयुष्य आता तो नर्मदेच्या कृपेने जगत होता . याच कालावधीमध्ये लाल्याला पाच मुले झाली . पत्नीने त्याला या सर्व वाटचालीमध्ये खंबीर साथ दिली . अर्धांगिनी ची साथ खंबीर असेल तर मनुष्य कितीही मोठे कार्य लीलया पेलू शकतो .पुढे या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून लाल्याने गावामध्ये दोन गुंठे जागा घेतली . पुढच्या बाजूला भाड्याने दिलेली दोन दुकाने आणि त्यातून येणारे संपूर्ण उत्पन्न तो केवळ परिक्रमावासींची सेवा याच कामाकरिता लावतो .त्याचा अनुभव असा सांगतो की जोपर्यंत तो स्वतःसाठी आयुष्य जगत होता तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःखे होती . परंतु जसा त्याने स्वार्थ त्यागला आणि परिक्रमावासींसाठी तो सेवा देऊ लागला ,त्या दिवसापासून त्याच्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता कधीच जाणवलेली नाही .आणि हा अनुभव नर्मदे काठी जवळपास प्रत्येक सेवादाराला आलेला आहे . विशेष म्हणजे त्याची छोटी मुलगी साक्षी हिचा एक अनुभव त्याने मला सांगितला .लाल्याने नुकतेच एक एकर शेत खरेदी केले आहे . आता त्याच्या घरातील सर्वजण सकाळी लवकर उठून शेतामध्ये जातात आणि काम करतात . पूर्वी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणारा लाल्या आता स्वतःचे शेत कसतो आहे . ही नर्मदेचीच कृपा आहे अशी त्याची ठाम श्रद्धा आहे . तर एक दिवस असेच सर्व जण शेतामध्ये कामासाठी गेले होते . आणि घरी सहा वर्षाची साक्षी एकटीच होती . इतक्यात १४ - १५ परिक्रमावासींचा एक जथ्था तिथे आला . परिक्रमा वासिनी साक्षीला नर्मदे हर केले . तिच्या जागी एखादी दुसरी सहा वर्षाची मुलगी असती तर कदाचित घाबरून गेली असती किंवा गोंधळून गेली असती किंवा तिने चक्क सर्वांना सांगितले असते की घरी कोणी नाही तरी कृपया पुढे जावे . परंतु साक्षीने सर्वांना वरती धर्म शाळेमध्ये बसविले . स्वतः खाली आली आणि कणिक मळून तिने सर्वांसाठी पुऱ्या लाटल्या . चुलीवरती तेलाचे आढण ठेवून त्या उत्तम पैकी तळल्या . एकीकडे बटाटे चिरून तिला जमेल तशी बटाट्याची भाजी केली . आणि सर्व परिक्रमावासींना वरच्या मजल्यावर ते अन्नपुरा पोटावर नेऊन पुरी भाजी खायला घातली . इतक्यात सर्वजण शेतावरून घरी आले . घरी येऊन लाल्या आणि रक्षा पाहतात तो काय ! सर्व परिक्रमावासी तृप्तीचा ढेकर देत आहेत ! जेव्हा लाल्याला साक्षीचा हा पराक्रम कळला तेव्हा त्याला लक्षात आले की नर्मदा मातेची कृपा असेल तर कोणीही काहीही करू शकते ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाल्याने आणि त्याच्या बायकोने या मुलांवर त्यांच्या नकळत जो सेवेचा संस्कार केला होता त्याची ही फलश्रुती होती . त्या मुलांकडे पाहिल्यावर खरोखरीच कोणालाही लक्षात आले नसते की ही काय दर्जाची मुले आहेत ! लाल्याची मोठी मुलगी पायल ही अतिशय उत्कृष्ट तब्येत असलेली आणि व्यायामाची आवड असलेली खेळाडू होती . तिला मी भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी मुलींना कशा कशा व काय काय संधी आहेत याची विस्तृत माहिती लिहून दिली व सैन्यभरतीची प्रेरणा दिली . पुढे काही दिवसांनी तिने मला आवर्जून फोन करून ती लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत आहे याची कल्पना दिली . राशीला ब्युटीशियन व्हायचे होते ! त्या क्षेत्रामध्ये कुठे , कशा ,किती व कोणत्या संधी आहेत याची देखील तिला माहिती दिली . घरी असलेल्या चार स्त्रिया ही तिच्यासाठी मोठीच प्रयोगशाळा आहे असे सांगताच सर्वच जणी हसू लागल्या ! एकंदरीत माझा लाल्या च्या धर्म शाळेतील मुक्काम अतिशय संस्मरणीय ठरला . लाल्या हा मनुष्य अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणारा आहे . नियमित उत्पन्नाचे स्त्रोत असून ,व्यवसायातून किंवा नोकरीतून मिळणारे चांगले अर्थाजन असून देखील ,केवळ एखादे किंवा दोन मुले सांभाळता सांभाळता नाकी नऊ आल्याचे खोटे नखरे करणाऱ्या शहरवासीयांनो , लाल्याचा आदर्श घ्या ! याच्यामध्ये मी सुद्धा आलो बर का ! लाल्या कीर याने मला खरंच खूप दिले . त्याच्याकडून खूप काही शिकलो . त्याच्या पत्नीकडून देखील खूप काही शिकण्यासारखे आहे . कितीही परिक्रमावासी आले तरी देखील ती माऊली न कंटाळता , न थकता , शेतातील सर्व कामे करून ,गाईगुरे यांचे सर्व सोपस्कार करून , पाचही मुलांचे जेवण , नाश्तापाणी , शाळा , कॉलेज इत्यादी करून , धर्मशाळेत लागेल तशी सेवा करते . वृद्ध आजारी परिक्रमावासींची सेवा करते . इथे आलेले परिक्रमावासी पुन्हा कधी येत नसतात . त्यामुळे देणग्या वगैरे मिळण्याची शक्यताच नाही . तरी देखील लाल्या स्वखर्चाने हे सर्व कार्य चालवितो आहे .मी त्याला यूपीआय म्हणजे काय ते समजावून सांगितले . परंतु त्याने अशा पद्धतीने देणगी घेण्यास स्पष्ट नकार दिला . तो म्हणाला हा लाल्या कीर धड धाकट आहे तोपर्यंत स्वतःच्या बळावरच सेवा कार्य करेल ! साधू संतांचे ,परिक्रमावासींचे मिळणारे आशीर्वाद हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे असा दृढ विश्वास त्याने व्यक्त केला . मला असे आवर्जून सुचवावेसे वाटते की ज्यांना नर्मदे काठी काही सेवा कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी सांगाखेडा कला येथील लाल्या कीर याला अवश्य मदत करावी . त्याचा मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे . श्री लालचंद कीर नऊ सात सात शून्य तीन एक शून्य चार सात दोन
९७७०३१०४७२ . 
हे सर्व बोलणे होईपर्यंत त्याच्या मुलींनी आणि पत्नीने अतिशय प्रेमाने तुपामध्ये अक्षरशः लडबडलेल्या रोट्या आणि भाजी मला पोटभर खाऊ घातली . सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की हे सर्व करणाऱ्या लाल्या कीर याने आता घराच्या जागेतच मंदिर बांधायला सुरुवात केली होती आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ८० फूट कळसाची उंची असलेले दुसरे मंदिरच नव्हते ! गावातील आणि परिसरातील मोठ्या धनिकांना देखील कोडे पडले होते की लाल्या कीर याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून ! त्याचे उत्तर फार सोपे होते ! मैया के नाम पे एक दे दो ,मैया चार वापस करती है ! दुसऱ्या दिवशी सकाळी लाल्याने मला त्याची कबुतरे जनावरे तसेच नवीन बांधकाम सुरू असलेले मंदिर धोकादायक शिडीवरून वरपर्यंत चढून दाखवले . वरती कळस म्हणून उभी केलेली महादेवाची ध्यानस्थ मूर्ती अतिशय सुंदर होती . हे मंदिर भविष्यामध्ये खूप प्रसिद्धीला येणार याची खात्री आहे . थोडक्यात लाल्या आणि रक्षा दोघे मिळून एक अतिशय आदर्श गृहस्थाश्रम जगत होते . यशस्वी गृहस्थाश्रमासाठी शिक्षण ,पैसा ,नोकरी किंवा पद प्रतिष्ठा यातील काहीच लागत नसून केवळ निष्ठा निष्ठा आणि निष्ठा या तीन गोष्टींची गरज असते . स्वतःच्या कर्तव्यावरील निष्ठा , स्वतःच्या ध्येयावरील निष्ठा आणि स्वतःच्या आराध्य दैवतावरील निष्ठा ,या तीन निष्ठा तुम्हाला गृहस्थाश्रमातून तारून नेतात हे मला लाल्याने शिकविले .  निघताना मी लाल्याला माझ्याकडे असलेली एक उंची पांढरी शाल आणि पोरांना खाऊ तसेच प्रत्येकाच्या हातात ५० - ५० रुपये दिले आणि तिथून निघालो . तुम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे देण्याची इच्छा झाली तर जितके पैसे देण्याचा संकल्प तुम्ही केलेला असतो ,बरोबर तितकेच पैसे तुम्हाला त्या एक-दोन दिवसांमध्ये दक्षिणा स्वरूपात मिळालेले असतात असे मी खूप वेळा अनुभवले . मी जाताना पुढे तवा नदीचे फार मोठे पात्र लागणार होते . या पात्रामध्ये भरकटण्याची शक्यता असल्यामुळे लाल्याने त्याच्या पुतण्याला फोन करून बोलावून घेतले आणि मला तवा नदी पार करून सोडण्यास सांगितले . लाल्याचाच पुतण्या तो ! त्याने जाता जाता मला त्याच्या शेतातील ताज्या ताज्या दोन किलो काकड्या काढून दिल्या ! लाल्या चे त्याने स्वतः न सांगितलेले अनेक पैलू या पुतण्याने मला सांगितले . असे स्वतःबद्दल अधिक न बोलता केवळ सेवा कार्यातून व्यक्त होणारे अनेक महापुरुष ,हीच आपल्या देशाची खरी संपत्ती शतकानुशतके राहिलेली आहे . या संपत्तीचे जतन , संगोपन आणि संवर्धन करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे . तवा नदीचे पात्र किती मोठे असावे ? आतापर्यंत नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व नद्या ह्या तिच्या उपनद्या असल्यामुळे आकाराने खूपच छोट्या असायच्या . परंतु तवा ही अशी एकमेव नदी आहे की जी उपग्रहा मधून सुद्धा स्पष्टपणे दिसते ! खोटे वाटते आहे का ? खालील प्रतिमा पहा !
या उपग्रह छायाचित्रांमध्ये तुम्हाला भारताचा गुजरात ,महाराष्ट्र ,मध्य प्रदेश दाखविणारा नकाशाचा काही भाग दिसतो आहे . नकाशामध्ये दाखविलेल्या गोलात जी पांढरी अळी वळवळताना दिसते आहे तीच तवा नदी आहे ! आणि हा पांढरा रंग म्हणजे तवा नदीमध्ये असलेली प्रचंड प्रचंड वाळू आहे ! 
या तवा नदीचे सारेच हटके आहे ! नर्मदेला सर्व नद्या सरळ येऊन मिळतात परंतु तवा मात्र उलटी येऊन नर्मदार्पण होते ! वरील नकाशा नीट पहा . यात वरून खाली नर्मदा नदी येथे आहे तर खालून वर जाणारा वाळूचा सागर म्हणजे तवा नदी आहे . ही तवा नदी एक गंधाकृती वळण घेऊन नर्मदेला जाऊन मिळते आणि अक्षरशः लुप्त होते .
या तवा नदीचे पात्र इतके लांबरुंद विस्तारलेले आहे की त्या कोरड्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोक शेती करताना दिसतात . इथे वाळू जरी दिसत असली तरी वाळूच्या खालून तवा नदी वाहते आहे . नदीच्या मुख्य धारा तीन चार छोट्या छोट्या शाखांमध्ये विभागून वाहतात .आणि या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ ,निखळ ,नितळ आणि गरम आहे ! कदाचित या गरम पाण्यामुळे या नदीला तवा नाव पडले असावे .
लाल्या च्या पुतण्याने मला तवा नदी दाखवेपर्यंत ती इतकी भव्य असेल याचा अंदाज मला आलेला नव्हता . आतापर्यंत सर्वात भव्य नदी केवळ नर्मदाच पाहत आलो होतो . तवा नदीचे पात्र पाहून एक क्षणभर शंका आली की ही नर्मदा तर नसेल ना ! परंतु म्हणून सोबत असलेला मार्गदर्शक आवश्यक आहे ! तो मला पलीकडच्या काठावर नेऊन सोडणार होता परंतु मी त्याला सांगितले की तू इथून परत गेलास तरी चालेल .मला मार्ग सापडेल . इथे प्रत्येक शेतामध्ये झाडांना पाणी घालण्याकरता एक खोल खड्डा केला जातो व त्यामध्ये तवा नदी प्रकट होते . तिचे पाणी डबड्याने घेऊन एकेका रोपाला नेऊन घातले जाते . या शेतीला कोणीही मालक नसतो . केवळ पावसाळा नसताना नदीने कृपा केल्यामुळे तिथे कोणीही येऊन आपापली शेती करून उत्पन्न घेऊन निघून जातो . तरी देखील लोकांनी काटेरी कुंपण वगैरे घालून जाण्या येण्याचे मार्ग अडवलेले आहेतच ! आपली मालकी नक्की कशावर आहे हे ज्याला कळले त्याने सर्व जिंकले ! साक्षात ज्या देहामध्ये आपण राहतो आहोत त्या देहावर देखील आपले मालकी हक्क चालत नाहीत तर बाकीचे काय घेऊन बसलाय ! असो . एका शेतामध्ये अशाच पद्धतीने काढलेला खड्डा मी पाहत असताना लाल्याच्या पुतण्याने फोटो काढला . माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने तो पाठवून दिला . तवा नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये शेती करून झाडांना पाणी घालण्यासाठी तवा नदीचे पाणी उपसण्याची 'जुगाड ' व्यवस्था दाखविताना प्रस्तुत लेखक . मागे तवा नर्मदा संगमावरील बांद्राभान चा पुल दिसतो आहे .
तवा नदी पात्रातील एका काकडीच्या शेतामध्ये उभा असलेला प्रस्तुत लेखक . इथे काकडी ,भोपळा , दुधी भोपळा ,पडवळ ,घोसावळे ,कलिंगड , खरबूज अशा वेलवर्गीय वनस्पतींची हंगामी शेती केली जाते . दूरवर जिथे पर्यंत नजर जाते आहे तिथे पर्यंत तवा नदीचेच पात्र पसरलेले आहे .
तवा नदीचे पाणी जेव्हा लागले तेव्हा मला फारच गमतीशीर गोष्ट कळाली ! हे पाणी गरम आणि अतिशय गतिशील होते . याच्यामध्ये सरळ चालत जाता येतच नव्हते इतकी त्याला ओढ होती . पायाखाली देखील वाळूच वाळू होती . परंतु या पात्रातून पाणी वाहते आहे त्या दिशेला चालायला सुरुवात केली तर मात्र हे पाणी खूप जास्त गती देत होते . अशा पद्धतीने मी नदी पार करायच्या ऐवजी नदीपात्रातून चालायला सुरुवात केली ! पायाखाली वाळूचे लहान-मोठे ढीगारे तयार झाले होते . एकदा अचानक खोल खड्डा लागला आणि मी बऱ्यापैकी भिजलो . मग मी चक्क झोळी बाहेर ठेवून तवा नदीमध्ये स्नानाचा आनंद घेतला ! अशी दोन-तीन वाहणारी पात्रे आडवी आली . त्याचा मनसोक्त आनंद घेत समोरच्या तटावरील खडा चढ चढलो . थोडेसे चालून एक रस्ता ओलांडला की लगेच नर्मदेचे पात्र लागणार होते . इथे एका शेतामधील काकड्या ट्रॅक्टर मध्ये भरण्याचे काम सुरू होते . त्यांनी देखील मला सापासारख्या लांबलचक चार-पाच काकड्या दिल्या . या सर्व काकड्यांनी माझ्या पाठीवर प्रचंड ओझे टाकले होते . त्यामुळे पुढे रस्ता लागल्या लागल्या एका वस्तीतील लहान मुलांना सर्व काकड्या वाटून टाकल्या . तवा आणि नर्मदा यांचा संगम अद्भुत आहे . नर्मदा आणि तवा या दोन नद्यांच्या पाण्यातील रंगांमध्ये खूप फरक आहे . आणि संगम स्पष्टपणे दिसतो . नर्मदेच्या बाजूला पाणी खूप खोल असून तवा नदी उथळ आहे . संगमाच्या रेषेवर जाऊन उभे राहिले की नर्मदेचे पाणी बर्फासारखे गार तर तवा नदीचे पाणी अतिशय गरम लागते !पुढे थोडे अंतर गेल्यावर तवा नदीचे पाणी हळूहळू लुप्त होते आणि केवळ नर्मदा शिल्लक राहते . हे अद्भुत दृश्य तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघता येते . त्यासाठी थोडेसे धाडस करून या दोन नद्या मिळतात त्या बिंदूला जाऊन उभे राहावे लागते .नर्मदा नदीमध्ये आढळणारी अतिशय उत्कृष्ट दर्जाची बारीक वाळू मोठ्या प्रमाणामध्ये नर्मदेमध्ये आणून सोडण्याचे महत्त्वाचे कार्य तवा नदी अहोरात्र करत आहे .  इथे एक गंमतच झाली ! संगमावर स्नानाला जाण्यापूर्वी मी माझी झोळी खाली काढून ठेवली आणि अंगावरील कपडे एका झेंड्याच्या काठीवर लटकवून ठेवले . मी स्नान करत असताना अचानक मोठे वारे आले आणि ते कपडे उडून तवा - नर्मदा संयुक्त नदीमध्ये पडून वाहून गेले ! मैया कशाला गरीबाची चेष्टा करते राव असे म्हणत तसाच निर्वस्त्र बाहेर आलो .या दोन्ही नद्यांचा बांद्राभान इथे झालेला हा संगम साधारण दोन अडीच किलोमीटर रुंदीचा विस्तीर्ण वालुकामय परिसर निर्माण करतो .त्यामुळे इथे माझ्याशिवाय आणि या दोन मातांशिवाय अन्य कोणीही नव्हते . आता बाहेर आल्यावर मला घालण्याकरता एकच वस्त्र शिल्लक राहिले होते ते म्हणजे डोक्यावरचा फेटा! ते गुंडाळून पुढे चालायला लागलो . इतक्यात पुढे काही अंतरावर माझे कपडे काठाला लागलेले मला दिसले ! ते पिळून वाळूवर वाळत घातल्याबरोबर पाचच मिनिटात कडक वाळले ! इथली वाळू भयंकर तापते . परंतु तिच्यातून पाय ओढत चालण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे ! वाळूतून खूप काळ चालल्यावर जमीन लागली की तुमच्या पायाला दुप्पट तिप्पट ताकद आलेली आहे असे वाटते ! आणि ती आलेली असतेच ! इथून पुढे नर्मदा काठावरील एक अतिशय प्रसिद्ध असे शहर होशंगाबाद ज्याचे नाव नुकतेच (नर्मदाजयंती २०२२ रोजी ) नर्मदापुरम असे करण्यात आले होते , तिथे जाण्याचे अहोभाग्य मला लाभणार होते ! आज नर्मदापुरम गाठायचेच असा संकल्प मनाशी करून तलम व तप्त वाळूत रुतणाऱ्या पायांना अजून गती दिली . नर्मदा मातेचा सुखद सहवास सदैव सोबत होताच !


लेखांक बावन्न समाप्त ( क्रमशः )
 
 

लेखांक ५३ : नर्मदापुरम् चा मंदिरसंपन्न शेठाणी घाट

नर्मदा तवा संगमामध्ये स्नान केल्यानंतर खूप मोठा वाळूचा किनारा लागला . अतिशय विस्तृत आणि स्वच्छ वाळू चे पात्र येथे आढळते . मध्ये मध्ये काही लोकांनी शेती देखील केलेली आहे . प्रचंड वाळूचा किनारा पार करत बगवाडा पुलापाशी आलो . हा एक छोटा जोडपुल आहे . 
बगवाडा पूल आणि लक्षात राहणारे समोरचे डोंगर
पुलावरून होणारे नर्मदेच्या स्वच्छ पात्राचे विराट दर्शन . उजवीकडे दिसणारा वाळूचा किनारा आपण पार करत आहोत .
 इथे पाणी अतिशयच स्वच्छ आहे .
 स्वच्छ शुद्ध खळाळते नर्मदा जल
पुलापासून पुढे नर्मदा नदी उजवे वळण घेते त्यामुळे पुन्हा एकदा काठावर दाट झाडी सुरू होते . इथे समोरच्या किनाऱ्याच्या बाजूला मात्र वाळूच वाळू आहे . 
या भागात असे काही लहान मोठे घाट देखील लागतात .
अशा अनेक घाटांपैकी हा गोंदरी घाट नावाचा घाट आहे . इथे पाणी खूप स्वच्छ आहे . फरशी गर्दी देखील नसते . 
गोंदरी घाटावरून समोरील बगवाडा घाटाचे दर्शन .
इथून पुढे पुन्हा एकदा विस्तीर्ण वाळूचा किनारा लागला . नर्मदापुरम हे एक मोठे शहर असल्यामुळे येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत . तसेच आसपासच्या खेड्यापाड्यातली मुले शिक्षणासाठी म्हणून येथे येऊन राहतात . विशेषतः हा टापू निर्मनुष्य व निसर्गरम्य असल्यामुळे इथे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जोडीने "अभ्यास " करत असलेले पाहायला मिळाले . आपण नर्मदा मातेसमोर बसलेले आहोत , किंवा एखादा परिक्रमावासी आपल्या समोरून जातो आहे याचे कुठलेही भान नसलेली युवा पिढी पाहून वाईट वाटले .जगाच्या पाठीवर कुठेही जा मानवी भावभावना फारशा बदलत नाहीत . म्हणूनच संस्कारांना फार महत्त्व प्राप्त होते . पशुतुल्य जीवनच जगायचे असेल तर ते कुठेही जगता येते . थोडे अंतर गेल्यावर कॉलेजमधील युवकांचे टोळी युद्ध पाहायला मिळाले . बापाच्या पैशावर पेट्रोल भरून दुचाकी उडवत इथे येऊन , त्यांच्या मारामाऱ्या सुरू होत्या . मारामारीचा विषय काय असेल यासाठी विशेष संशोधन करण्याची गरज नव्हतीच . आपल्या देशातील तरुणांची संख्या पाहता आपण जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखले जातो आहोत . परंतु तरुण किती आहेत , यापेक्षा तरुण कसे आहेत हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे . आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असा . परंतु शक्य होईल तितक्या कुमार , किशोर व युवा मुला मुलींना चांगले मार्गदर्शन अवश्य करीत जावे . कदाचित त्या क्षणी त्यांना त्याचे मोल कळले नाही तरी आयुष्यात कधी ना कधी त्यांना तुमचा चांगला सल्ला आठवू शकतो आणि कामालाही येऊ शकतो . असो . इथून पुढे एक विचित्र ओढा नर्मदेला येऊन मिळाला होता . विचित्र अशासाठी म्हणायचे कारण त्याची रुंदी सर्वत्र एकसारखीच होती . आणि ती अशी होती की उडी मारावी तरी पंचाईत नाही मारावी तरी पंचाईत . बर यातील पाणी काळ्य रंगाचे अतीव घाणेरडे सांडपाणी होते . त्यामुळे तो उतरून पार करण्याची मला इच्छा नव्हती . मग त्या ओढ्याच्या काठाने मी मागे मागे चालत निघालो . परंतु काही केल्या त्या ओढ्याची रुंदी कमी होईना . अखेरीस एके ठिकाणी हिम्मत करून मी माझी झोळी पलीकडे फेकून दिली . आणि वेगाने पळत येऊन लांब उडी मारून ओढा पार केला . हा पार करताना जिथे उडी मारण्यासाठी जोर लावायचा तो भाग ओल्या चिखलाचा असल्यामुळे पकड मिळत नव्हती . किमान दहा-बारा वेळा तरी मी उडी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला . परंतु यशस्वी झालेली उडी बहुतेक चुकीच्या ठिकाणी पडली . कारण इथून नर्मदे कडे जायला मार्गच नव्हता . तिथून रस्ता शोधत चालता चालता मी एका सुंदर बगीचा मध्ये येऊन पोहोचलो . सर्वत्र बांबूची झाडे लावलेली होती . मधून सुरेख रस्ता तयार केला होता . छोटे छोटे तलाव तयार करून तिथे कृत्रिम जंगल निर्माण केले होते आणि त्यात कमळाची , कमोदिनी ची झाडे लावली होती . खूप रम्य अशी ती बाग बघत मी चालू लागलो . नर्मदा हर्बल पार्क नावाने वन खात्याने महापालिकेच्या सहाय्याने तयार केलेले ते वन उद्यान होते . 
अचानक लागलेला बांबूचा मार्ग
ही पाटी वाचल्यावर मला कळले की हे नर्मदा हर्बल पार्क आहे . सर्व छायाचित्रे संग्रहित आहेत
बागेत तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे परिसराचे सौंदर्य वाढले होते परंतु माझा नर्मदे कडे जाण्याचा मार्ग अवरुद्ध झाला होता .
परिसर मात्र रम्य होता . मुख्य म्हणजे निर्मनुष्य होता .
मी या कमोदिनी पुष्पाचे अवलोकन करीत होतो . 
इतक्यात गोल जाळीदार टोपी घातलेला मोठी दाढी वाढवलेला बिनमिशांचा एक इसम माझ्या अंगावर धावून आला . "अय भिकारी !  चल निकल बाहर ! तू अंदर कैसे घुस गया ? " असे म्हणत दात ओठ खात तो ओरडू लागला . हा वनखत्याचा वॉचमन आहे हे माझ्या लक्षात आले . नर्मदापुरम मध्ये राहत असल्यामुळे परिक्रमावासी कसे दिसतात हे याला माहिती होते . तरी देखील तो मुद्दाम मला भिकारी म्हणत होता . त्याच्यामध्ये माझा अपमान करून त्यातील विकृत आनंद मिळवण्याचा त्याचा हेतू स्पष्ट पणे जाणवत होता . अशावेळी "ठकासी व्हावे महाठक । उद्धटासी उद्धट ।"  हेच योग्य आहे असे जाणून मी थेट काठी उगारली आणि त्याच्या दिशेला धावून गेलो . धावताना ओरडू लागलो , " तू अब गया ।अब देखते है तुझे कोन बचाता है । तेरे बाप की जागीर है क्या बे ? " . तो मनुष्य अक्षरशः पार्श्वभागाला पाय लावून पळून गेला . 
बांबूच्या या बनात तो कुठेतरी लपून बसला
सुदैवाने मला देखील बाहेर नर्मदे काठी पोहोचण्याचा मार्ग लगेच दिसला आणि मी बाहेर पडलो . 
मला राग अजिबात आला नव्हता . पण तसा अभिनय अवश्य केला . कुठलीही कृती केल्यावर ती चूक का बरोबर हे नर्मदा मातेला विचारून तपासून घ्यायची सवयच लागली होती . आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात उत्तर मिळते . नक्की मिळते . इथून पुढे छोटे-मोठे अजून काही घाट आहेत . काँक्रीट मध्ये बांधलेला एक छोटा घाट होता . त्याच्यानंतर थोडा मार्ग चालल्यावर चिखलामध्येच सिमेंटचा बांधलेला विवेकानंद घाट होता . 
इथला मार्ग काहीसा असा होता .
स्वामी विवेकानंद घाट दिसू लागला
स्वामी विवेकानंद घाट नर्मदापुरम
या घाटावरून मला एक अद्भुत दृश्य दिसले . ट्रॉली जोडलेला एक ट्रॅक्टर अतिशय वेगाने नर्मदेच्या पाण्यावरून पळताना मला दिसू लागला ! मला काही कळेना की हा ट्रॅक्टर पाण्यावरून कसा काय पळतो आहे ? घाटाच्या पायऱ्या चढल्यावर समोरचे दृश्य दिसले . इथे वाळू माफीया लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडून ठेवलेला दिसतो . फार मोठ्या प्रमाणात नर्मदेच्या पात्रातून वाळू उपसा केला जातो . ही वाळूचे ढिगारे जवळपास पाण्याच्या पातळीला असल्यामुळे लांबून बघताना गाड्या पाण्यावरून पळत आहेत असा भास होतो . 
नर्मदापुरम येथील समोरच्या घाटावर चालू असलेला वाळू उपसा उपग्रहातून काहीसा असा दिसतो !
यातील प्रत्येक रेष म्हणजे दोन डंपर आरामात जातील असा वाळूचा लांबच लांब उपसून ठेवलेला ढिगारा आहे . 
मोठे शहर आले की नदी घाण व्हायला सुरुवात होते . नर्मदापुरम देखील त्याला अपवाद नाही . परंतु इथला सेठानी घाट तुलनेने अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे . नर्मदे वरील अत्यंत मोठ्या घाटांपैकी हा एक आहे . याचा विस्तारही  औरस चौरस आहे . आणि घाटाचा उतार देखील बऱ्यापैकी आहे . या घाटाचे सौंदर्य आणि विस्तार केवळ शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . त्यामुळे संग्रहित छायाचित्रांच्या माध्यमातून घाटाचे दर्शन घेऊयात . या घाटावर बऱ्याच घडामोडी घडल्या त्या लेखाच्या शेवटी पाहू .
 नर्मदापुरम च्या सेठानी घाटाचे विहंगम दृश्य
 स्वच्छ , सुंदर , सुरक्षित अन् सुकुमार सेठानी घाट
 इथे नर्मदा पात्र खोल असल्यामुळे अशा आपत्कालीन नौका दिवसरात्र तैनात असतात .
 घाटावर साखळदंड लावून स्नानमर्यादा घालून दिलेली आहे . 
 डावीकडे वरती जे चार निळे खांब दिसताहेत तिथे उघड्यावर मी आसन लावले होते ! इथे घाट संपतो .
 इथून नर्मदेचे फार सुरेख दर्शन होते .
घाटापूर्वी नर्मदा दर्शन घडविणारी तारांकित हॉटल्स
 लागतात . 
 उजवीकडील छोट्या होड्या आता कमी होत जाऊन डावीकडील मोठ्या होड्यांची संख्या आता वाढतजाते . पात्र १ किमी रुंदीचे सहज आहे . प्रवाह स्थिर आहे . 
 दिवसाच्या प्रत्येक वेळी घाटाचे वेगळे सौंदर्य पहावयास मिळते . सायंकाळचे दृश्य
 भर दुपारचे दृश्य
 रात्रीचे सौंदर्य
घाट अतिशय स्वच्छ आहे .
 संधीकाळी दिसणारे रूप
 पावसाळ्यातील रौद्र रूप
 दिवेलागणी ला दिसणारे शांतरूप
 सजलेले रूप
 घाटावरील नर्मदा मंदिर
 सेठानी घाट सर्वांचा आहे !
 जलविहार करणारी बदके
 पहाटे निर्मनुष्य असणारा हाच घाट रात्री भाविकांच्या गर्दी ने ओसंडून वाहतो .
 गुलाबी लाल पिवळ्या हिरव्या पूरसंरक्षक
भिंती तर आहेतच . पण त्यातच खुबीने पायऱ्या गोवलेल्या आहेत ! 
  घाट परिसरात अगणित मंदिरे आहेत .
 सेठानी घाट म्हणजे मंदिरेच मंदिरे !
घाटासमोर पात्रामध्ये एक कारंजे अखंड चालू असते . सी गल पक्षी रात्रीच्या वेळी उडता उडता कौशल्याने या कारंजाचे पाणी पिताना मी पाहिले . 
 घाटावरील प्राचीन नर्मदा मंदिर .
 सुंदर असे काले महादेव मंदिर नर्मदापुरम
 श्री काले महादेव 
 श्री काले महादेव श्रृंगारोत्तर
 श्री गायत्री मंदिर
 श्री गायत्री माता
 सुंदर हनुमानजी
 हनुमंताचे रुपडे फारच गोड आहे . त्याच्या खांद्यावरील राम व लक्ष्मण पहा किती गोंडस आहेत ! 
 जगदीशाचे मंदिर तर फारच सुरेख आहे . इथे फक्त दशनामी साधू व सन्यासी राहू शकतात . त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली जाते . 
 जगदीश मंदिराचे सुंदर व भव्य प्रवेशद्वार . समोर मैय्या
 नर्मदेकडून जगदीश मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या
 जगदीश मंदिरातील अद्भुत विविधरंगी विग्रह . पुरी जगन्नाथ प्रमाणे लाकडी मूर्ती इथे दिसतात .
 नर्मदा माता मंदिरातील विग्रह
 श्री नागेश्वर नर्मदापुरम. इथेच अखेरीस मुक्काम घडला . 
 नागेश्वर मंदिर धर्म शाळेतून होणारे नर्मदेचे अद्भूत दर्शन
 नागेश्वर आश्रमातील भोजन शाळेतून नर्मदा दर्शन
 इथे किंवा खाली मुक्काम करता येतो . खाली नर्मदेमध्ये आणि तुमच्या मध्ये रेलिंग नाही म्हणून मी खाली आसन लावले . 
 आश्रमातील भंडारी साधू
मी शेठाणि घाटावरती पोहोचलो तोपर्यंत या गावाचे नाव होशंगाबाद आहे एवढेच मला माहिती होते . आबाद म्हणजे अमर राहो . इस्लामाबाद याचा अर्थ इस्लाम आबाद अर्थात इस्लाम अमर राहो . औरंगाबाद याचा अर्थ औरंगजेब अमर राहो . अहमदाबाद म्हणजे अहमदशहा अब्दाली अमर राहो . सिकंदराबाद म्हणजे सिकंदर अमर राहो . उस्मानाबाद म्हणजे उस्मान आदिलशहा अमर राहो . इलाहाबाद म्हणजे इलाहा अर्थात दीन अमर राहो .क्रूरकर्मा होशंग शाह अमर राहावा असे मला तरी अजिबात वाटत नव्हते . त्यामुळे वरील सर्व शहरांची नावे घेताना माझ्या वैयक्तिक पातळीवर मी अहमदाबादला कर्णावती असेच म्हणतो . उस्मानाबादला धाराशिव असेच म्हणतो . इलाहाबादला प्रयागराज असेच म्हणतो .औरंगाबादला देव खडकी हे त्याचे मूळ नाव किंवा आता छत्रपती संभाजीनगर ( जे अधिक योग्य नाव आहे ) असेच आपण म्हटले पाहिजे . कुणीतरी म्हटले आहे "नावात काय आहे ? " कुणीतरी काय म्हटले आहे याच्याशी मला देणे घेणे फारसे नसावे . आपल्या वडिलांनी , आजोबांनी किंवा आपल्या पूर्वजांनी काय म्हटले आहे ते अधिक महत्त्वाचे आहे . आणि माझे तरी असे स्पष्ट मत आहे की नावात बरेच काही असते . आपल्या घरी एखादे मूल झाले तर त्याचे नाव ठरविण्यासाठी किती दिवस खल चालतो आठवून पहा . नावात काहीतरी असल्याशिवाय आपण इतका विचार करतो का ? मुलांच्या नावावरून बरेचदा आई-वडिलांची मानसिकता कळत असते . सांगायचे तात्पर्य इतकेच की मी नेमका इथे पोहोचलो आणि मला कळले की या  २०२२ च्या नर्मदाजयंती पासून होशंगाबादचे नाव नर्मदापुरम असे करण्यात आलेले आहे ! तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता . अतिशय अभिनंदननीय असे हे काम होते . अजून त्याची कार्यवाही सुरू झाली नसली तरी काही काही ठिकाणी नर्मदापुरम अशा पाट्या आता दिसत होत्या . काही हिंदू लोक आपल्या स्वभावाप्रमाणे हे राजकारण आहे वगैरे म्हणून या नामांतराला विरोध करताना देखील मला दिसले . माझे असे म्हणणे आहे की राजकारण तर राजकारण , परंतु योग्य गोष्ट घडत आहे तर ती स्वीकारली पाहिजे . 
२०२१ मध्ये या गावाचे नाव होशंगाबाद होते ही दर्शविणारी भिंतीवरील पाटी वाचा . आता मात्र हे नर्मदापुरम झालेले आहे . आणि हे नर्मदापुरमच आहे ! 
नर्मदापुरम घाटाची काही जुनी चित्रे
शेठाणी घाट
होशंग शाह किल्ला
या घाटावर असलेल्या एका एका मंदिराचे दर्शन घेत मी फिरू लागलो . रंगीबेरंगी घाट आणि सर्वत्र जाणवण्या इतपत स्वच्छता होती . घाट मोठा आहे मंदिरे खूप आहेत वगैरे सर्व ठीक आहे परंतु परिक्रमावासींच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर इथे धर्मशाळा किंवा राहण्याची व्यवस्था अशी कुठेच सापडत नाही ! जगदीश मंदिरामध्ये फक्त साधू संत संन्यासी राहू शकतात . सर्वसामान्य परिक्रमावासी मग बरेचदा या घाटावरतीच कुठेतरी मुक्काम करतात . शहर मोठे असल्यामुळे बाजारपेठ देखील मोठी आहे . तिथे जाऊन मग काहीतरी खरेदी करून खातात . ग्रामीण भागामध्ये जेवढे अगत्य बघायला मिळते तेवढे शहरी भागामध्ये बघायला मिळत नाही . शिक्षणाचे किंवा अधिक योग्य शब्द आधुनिक शिक्षण असा आहे त्या आधुनिक शिक्षणाचे काही दुष्परिणाम आहेत , त्यातला हा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे . माणूस माणुसकी पासून थोडासा दूर जातो . आता सुद्धा माझ्यासमोरून अक्षरशः शेकडो लोक गेले .परंतु कोणीही नर्मदे हर म्हणत नाही . कोणीही भोजनप्रसादीसाठी वगैरे विचारणा करत नाही असा अनुभव मला आला . इथे मला असे सांगण्यात आले की एकाच मंदिरामध्ये अन्नछत्र चालविले जाते त्यामुळे मी आसन लावता येते का हे पाहण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेलो .घाटावरील हे शेवटचे मंदिर होते . नागेश्वराचे तीन मजली मंदिर येथे आहे . हा पूर प्रवण परिसर आहे . त्यामुळे मंदिरे अशी उंच उंच बांधलेली दिसतात . नर्मदा मातेला जेव्हा महापूर येतो तेव्हा हा संपूर्ण घाट जलमग्न झालेला असतो . पुढे तर मला कळाले की काही महापूरांमध्ये अख्खे नर्मदापुरम शहर पाण्याखाली गेलेले होते . या मंदिरामध्ये परिक्रमावासींसाठी खोल्या किंवा हॉल बांधलेला नसून नर्मदेच्या काठावरतीच बिन भिंतींचा उघडा व्हरांडा आहे . इथे परिक्रमावासी मुक्काम करतात . आज पर्यंत जेव्हा जेव्हा मी मुक्काम केला ,तेव्हा तेव्हा थेट नर्मदेचे दर्शन होणारा किंवा उघड्यावरचा मुक्काम अधिक संस्मरणीय राहिला आहे हा माझा अनुभव असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला . इथे नागेश्वर मंदिरामध्ये एका कुटुंबाची मोठी पूजा चालली होती . त्यांच्या जवळपास शंभर एक नातेवाईक जेवायला होते . मी आलेला पाहून त्यांनी मला देखील भोजन प्रसाद घेण्याची विनंती केली . सर्वात वरच्या मजल्यावर स्वयंपाक घर होते . तिथेच सज्जावर बसून भोजन केले . दाल भाटी मलिदा खाल्ला आणि खाली येऊन उघड्या व्हरांड्यात अगदी नर्मदेच्या काठावर आसन लावले ! इथे अजून काही परिक्रमावासी भेटले . एक मध्य प्रदेशचेच काका सायकलवर परिक्रमा करत आले होते . यांनी सुरुवात पायी केली होती . परंतु नंतर पायाला त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी एक सायकल विकत घेतली . आणि पुढची परिक्रमा सायकलने पूर्ण करत होते .हा घाट अतिशय सुंदर असल्यामुळे आज इथेच थांबावे असे वाटत होते . त्यामुळे मी आज पायांना विश्रांती द्यायची असे ठरविले . अधून मधून एखादा दिवस असा विश्रांतीचा घ्यावा . यामुळे पायाला खूप आराम मिळतो . तसे जर मी दुपारीच पुढे निघालो असतो तर अजून बरेच अंतर तोडू शकलो असतो . परंतु नर्मदेचे इतके सुंदर रूप ते ही निवांत बसल्या जागी पाहायला मिळते आहे , त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला . तो योग्यच होता असे पुढे लक्षात आले . इथे दुपारी झोप काढण्यापेक्षा गावातील सर्व मंदिरे पाहून यावीत असा विचार मनात आला आणि बाहेर पडलो . एक एक करत सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शने घेतली . मोठ्या शहरात आलोच आहे तर कुठे स्लीपिंग बॅग मिळते का ते पाहावे असा विचार करून मी नर्मदेच्या काठावर असलेल्या बाजारपेठेत एक चक्कर मारली . इथे एक मॉल होता . मी मॉलमध्ये स्लीपिंग बॅग मिळते का हे पहावे म्हणून आत मध्ये शिरलो . पाच-सहा दुकाने पाहिली असतील इतक्यात जोरजोरात शिट्ट्या वाजवत तिथला रखवालदार माझ्या अंगावर धावून आला . त्याने दंडाला धरून मला बाहेर ढकलले आणि म्हणाला , " भागो यहासे । यहा भीक मांगने का नही । " मला वाईट वाटले . मी परिक्रमावासी होतो . भिकारी नव्हतो . परंतु यामध्ये त्याचा दोष नव्हता . आपण स्वीकारलेल्या नवीन आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये साधू संतांचे कपडे घालणारा मनुष्य , किंवा पारंपारिक भारतीय वस्त्रे घालणारा भिकारी असतो ,असेच लहानपणापासून शिकवले जाते . याउलट (बेरोजगार असूनही ) टाय शर्ट पँट बूट कोट घालून फिरणारा मनुष्य साहेब असतो ,असे आपण बालमनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवत असतो .  मी आपण होऊन पुढे जाणार होतो . इतक्यात हा सर्व प्रकार पाहणारे तिथले दुकानदार होते त्यातील एक जण म्हणाला , " नही जा रहा है , तो धक्के मारके बाहर करदो । " त्याचे हे शब्द कानावर पडले मात्र " आता माझी सटकली " अशी माझी अवस्था झाली . मी त्याला हाताने इकडे बोलावले . तो क्षणभर घाबरला . मी जोरात ओरडलो , " एक्सक्युज मी ! कॅन यू प्लीस कम हीअर फॉर अ मिनट ? " दुकानदार धावतच मॉलच्या दारापाशी आला . आता काहीतरी मोठे प्रकरण होणार असे वाटून अजून चार-पाच दुकानदार तिथे गोळा झाले . मी त्या दुकानदाराला विचारले , " डू यू नो हू आय ऍम ? " " नो सर " दुकानदार उत्तरला . " सर ? "  मी म्हणालो . "अभी एक मिनिट पहिले तो मुझे भिकारी बोल रहे थे । धक्के मारने की बात कर रहे थे । " " अरे वो तो मै उसे बोल रहा , था साहब को क्या चाहिये पूछ लेना । " आता या सर्वांचे सामुदायिक प्रबोधन होणार होते . कारण माझा 'बावळा वेश ' बघून मला भिकारी समजणारे हे लोक केवळ इंग्रजीतले एक दोन वाक्य काय बोललो ,लगेच सर म्हणून मान देऊ लागली होती . या दोन्हीही घातक गोष्टी आहेत . एखाद्याचा वेश बघून जसे त्याला जोखू नये , तसेच केवळ इंग्रजी भाषा येते आहे म्हणून फार मोठा विद्वान आहे असे देखील समजू नये ! मी त्या सर्वांना समजावून सांगायला सुरुवात केली . हे पहा मित्रांनो मी आता नर्मदा परिक्रमा करतो आहे . त्यामुळे मी हा साधू वेश धारण केलेला आहे . परंतु या वेशाची एक गरीमा आहे . प्रतिष्ठा आहे . पावित्र्य आहे. तुम्ही आज तिच्यावरती आघात केलात . तुम्ही एक सर्वसामान्य दुकानदार आहात .यातील बहुतांश दुकाने भाड्या ची आहेत , स्वतःची नाहीत हे मी न विचारता सांगू शकतो . मालकाला कोणी एक फोन लावावा आणि तुम्ही रस्त्यावर यावे ही तुमची खरी योग्यता आहे !  या पाट्या बघा . ३० टक्के ऑफ ! ५o टक्के ऑफ ! सेल सेल ! अशा पाट्या लावाव्या लागत आहेत कारण तुमच्या दुकानातला माल हालत नाही . साधी आपल्याजवळ असलेल्या मालाची विक्री कशी करावी याची देखील अक्कल तुम्हाला नाही . अशाप्रसंगी समोर एखादे गिऱ्हाईक आले असेल तर त्याचे स्वागत करायचे सोडून तुम्ही त्याला बाहेर घालवत आहात . केवळ त्याचा वेश बघून तुम्ही अंदाज लावत आहात की याच्याकडे किती पैसा असेल किंवा किती क्रयशक्ती असेल ! इतके तर तुम्ही मूर्ख आहात ! मी मुद्दाम बोलताना अधून मधून इंग्रजी मध्ये बोलत होतो . दुकानदार माना खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होते . आता माझा मोर्चा मी वॉचमनकडे वळवला . आता या म्हाताऱ्याचे वय पहा . ६५ ते ७० वय आहे .आणि अजून बिचारा वॉचमन ची नोकरी करतो आहे . याचा अर्थ तरुणपणी याने गोट्या खेळलेल्या आहेत . पराक्रमाचे वय वाया घालवल्यामुळे आणि आयुष्यात काहीच उभे न केल्यामुळे आता घरातल्या लोकांनी याला कामावरती हाकलला आहे . आज जर यानी ही नोकरी सोडली तर घरातले लोक याला दारात उभे करणार नाहीत . ही तर याची खरी योग्यता आहे . तरी देखील एखाद्या परिक्रमावासी वर याचा रुबाब पहा ! एक लक्षात ठेवा मित्रांनो , ही नर्मदा परिक्रमा आहे . हिची एक उदात्त परंपरा आहे . या परंपरेचा आदर झालाच पाहिजे ! तुम्ही २४ तास जिच्यासाठी जगताय त्या मोह मायेचा त्याग केलेला मनुष्यच या परिक्रमेमध्ये टिकत असतो . असा कोणी मनुष्य चुकून माकून तुमच्या दारात आलाच , तर किमान त्याला भिकारी तरी म्हणू नका . खरे भिकारी तुम्ही आहात . तुमच्या आयुष्यातला पैसा काढून घेतला तर तुमची किंमत शून्य आहे . कोणी गिऱ्हाईकाची भीक मागते आहे .तर कोणी नोकरीची भीक मागते आहे . सर्वजण खजील झाले होते . माझा स्वर मी बदलला आणि समजूतीच्या स्वरात सांगू लागलो . हे पहा मित्रांनो आपण सर्वजण भारतीय आहोत . आपण सर्वजण एकच आहोत . दिसण्यावरून कपड्यांवरून भाषेवरून कधी कोणाची पारख करायला जाऊ नका . आपली भारतीय संस्कृती परंपरा खूप उदात्त आहे . तिचे पतन करण्यासाठी इंग्रजांनी आपल्याला या चुकीच्या गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत .आणि विविध माध्यमातून आजही शिकवत आहेत . अधिक शिकलेला तो अधिक विद्वान , अधिक चांगले ब्रॅण्डेड कपडे घालून फिरेल तो अधिक श्रीमंत , अधिक आधुनिक राहतो तो अधिक आधुनिक विचारांचा या सर्व अंधश्रद्धा आहेत ! कधीही अनुमानामध्ये अडकू नका . अनुभव हाच आपला श्रेष्ठ गुरु आहे !  मी बोललो ते वाक्य वॉचमनच्या जिव्हारी लागले होते . तो रडू लागला . मी मुद्दामहून टोचून बोललो होतो . मी त्याला मिठी मारली . तो माझ्या पाया पडू लागला . " मुझे माफ करना बाबा । गलती हो गई । " मी देखील त्याच्या पाया पडलो आणि म्हणालो , " आप बुजुर्ग है । मैने आपके पाव छूने चाहिये । और आप केवट लोग तो बडे पुण्यशाली है । मैया की कोक मे पले बढे हो । " आता मात्र वाचमन आ वासून माझ्याकडे बघू लागला . " मी केवट आहे हे तुम्हाला कसे कळले ? "
 मी हसू लागलो . ही नर्मदा मातेची कृपा होती . माणसे कशी दिसतात , कशी जगतात , कशी असतात हे गेले काही दिवस ती मला रोज दाखवत होती . त्यामुळे चेहरा पाहता क्षणी माझ्या लक्षात आले होते की हा केवट समाजाचा मनुष्य आहे . लहानपणी हा नर्मदेमध्ये भरपूर खेळलेला असणार आहे . परंतु पुढे वडिलोपार्जित व्यवसाय न केल्यामुळे , आणि जग जाते म्हणून आपणही शहराकडे गेल्यामुळे , त्याच्यावरती ही अवस्था आली होती . त्याला मात्र हा चमत्कार वाटून त्याने नमस्कार केला होता . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की या जगात चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नसते . आपल्याला ज्या घटनेचा कार्यकारणभाव कळत नाही तिला आपण चमत्कार म्हणतो . भारतामध्ये पहिली रेल्वे धावली तेव्हा लोकांना भूत आले असे वाटून ते पळत सुटले होते . पहिला वायरलेस मोबाईल कॉल जेव्हा मी पाहिला तेव्हा मला तो चमत्कार वाटला होता ! थोडक्यात चमत्कार म्हणजे आपले अज्ञान असते . प्रत्येक घटनेला स्वतःचा कार्यकारणभाव असतोच . तो एकदा समजला की मग तो चमत्कार राहत नाही . दुकानदाराने दबक्या आवाजात विचारले , " वैसे आपको क्या खरीदना था सर ? " मी म्हणालो , "मुझे स्लीपिंग बॅग चाहिये था । " "वो क्या होता है ? " एकाने विचारले . जाऊदे सोडा . मला आता स्लीपिंग बॅग घ्यायची नाही . तो विषय मी रहित केला आहे . असे सांगून मी सर्वांना नर्मदे हर केले आणि पुढे निघालो . हेच मी पाच मिनिटांपूर्वी सुद्धा करू शकलो असतो . परंतु त्यावेळी मी निघून गेलो असतो तर कदाचित या लोकांचा दृष्टिकोन पालटण्याचे कार्य राहून गेले असते . नर्मदा माता ,जी प्रेरणा आतून देत राहते तसे वागत राहायचे बास ! इथे खरे म्हणजे माझी चूक होती . माझ्याकडे सर्व काही झोपण्याची व्यवस्था असताना , उगाच स्लीपिंग बॅगची हव्यास हवीच कशाला ? परंतु त्या क्षणापूरती ती इच्छा मला झाली होती हे मात्र खरे . असो .
शहरामध्ये पुढे न फिरता शांतपणे घाटावर जायचे असे ठरवून मी घाटावर परतलो . मी परिक्रमेसाठी आलो होतो , पर्यटनासाठी नाही याची जाणीव माझ्या शहरी वातावरणात घडलेल्या मनाला मी करून दिली .घाटावरचे वातावरण खूपच सुंदर होते . इथे नर्मदेच्या मधोमध एक कारंजे लावले होते . हे दिवस रात्र चालू असायचे . मला ते मध्यभागी लावले आहे असे वाटले . परंतु जेव्हा मी समोरच्या तटावरून ते कारंजे पाहिले तेव्हा मला कळले होते की ते दहा टक्के अंतरावरच लावले होते ! इतके हे पात्र विस्तीर्ण आहे .शेकडो भाविक इथे येऊन नर्मदेची आरती पूजा करतात . घाटावर बसून स्नान करतात . संध्याकाळी इथे सुद्धा आरती असते . विनोद दुबे गुरुजी नावाचे एक अतिशय तेजस्वी रेवाभक्त अनेक तरुणांना सोबत घेऊन गेली ३३ वर्षे नित्यनेमाने इथे नर्मदेची सामूहिक सायं आरती करत आहेत . ही आरती पाहायला खूप लोक येतात . अतिशय संथ गतीने सावकाश स्पष्ट उच्चार करत छान अशी आरती आणि नर्मदाष्टक यांनी म्हटले . मी इथे शंख वाजवण्याची सेवा केली . नंतर मी आरतीचे साहित्य ठेवायला त्या तरुणांसोबत आणि गुरुजींसोबत जुन्या नर्मदा मंदिराच्या ओसरी मध्ये गेलो . इथले तरुणांचे संघटन पाहून बरे वाटले . मध्यंतरी या घाटावर काही धर्मांध लोकांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला होता .
 तेव्हापासून या घाटावर अशा पाट्या लावलेल्या आहेत .
आपले सांस्कृतिक वारसे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे
दुबे गुरुजी म्हणजे नर्मदापुरमचे भूषण आहेत . घारे डोळे तेजस्वी चेहरा आणि करारी वागणे बोलणे ! गुरुजींनी मला सांगितले की एकदा तर महापुरामुळे नर्मदापुरम शहरांमध्ये पाचशे मीटर पाणी घुसले होते . तर त्यानंतर जी जमीन होती तिथे उभे राहून त्यांनी आरती केली होती . परंतु आरती मध्ये खंड पडला नव्हता ! हे दुबे गुरुजी रोज तरुणांना एकत्र करून व्यायाम सुद्धा घ्यायचे . नदीचा घाट ,तरुण कार्यकर्ते , व्यायाम आणि गुरुजी म्हटल्यावर कुठल्याही महाराष्ट्रीय माणसाला आठवण येते ती संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांची ! त्यात मी मूळचा सांगलीचा असल्यामुळे अगदी नकळत्या वयापासून गुरुजींसोबत कृष्णा नदीच्या विष्णू घाटावर व्यायामाला जात असे . नंतर माझा फारसा संपर्क त्यांच्याशी राहिला नाही .  केवळ पौष पौर्णिमेच्या आसपास असणाऱ्या त्यांच्या गडकोट मोहिमांना मी जायचो . परंतु नर्मदे काठी मात्र आज मला प्रकर्षाने भिडे गुरुजींची आठवण झाली .  यावर्षी पौष पौर्णिमा परिक्रमेदरम्यानच आली असल्यामुळे मोहीम देखील बुडली होती . मी आसनावरती पडून हा सर्व विचार करत होतो . इतक्यात एक तरुण परिक्रमावासी आला . नर्मदे हर ! सर्वांनी एकमेकांना पुकारा केला . आता या ओसरीमध्ये जवळपास पंधरा परिक्रमावासी उतरले होते . त्यामुळे त्याला आसन लावायला जागा शिल्लक राहिली नव्हती . मी माझे आसन थोडेसे एका बाजूला सरकवून त्याच्यासाठी जागा केली आणि म्हणालो , "बाबाजी आईये । यहा आसन लगाये । " "धन्यवाद ! " म्हणत त्या तरुणाने आसन लावले . "बहुत अंधेरा किया आपने आने मे । " मी त्याला म्हणालो . तो म्हणाला , "नही ।वैसे मै जल्दी आया था । लेकिन नीचे आरती के लिए रूका था । उसके बाद धर्मशाला ढूंढ रहा था । " " आज कहा से निकले हो ? " मी ठराविक प्रश्न विचारत होतो . अशा चर्चेमधून कोण किती चालते आहे याचा अंदाज येतो . " सुबह भटगाव से निकला था । " परिक्रमावासी ने सांगितले . बापरे म्हणजे माझ्या दुप्पट तिप्पट वेगाने हा तरुण चालत होता ! काळा सावळा वर्ण .शिडशिडीत देहयष्टी . व्यायामाचे पिळदार शरीर . आणि तेजस्वी चेहरा ! मला या परिक्रमावासी बद्दल खूप आदर वाटला !  "वैसे आप कहा से हो ? " मी विचारले . " सोलापूर " तो उत्तरला . "सोलापूर म्हणजे मराठी का तुम्ही ? " "होय मराठीच की ! " तरुण हसत सांगू लागला ! "सोलापुरात कुठं ? " "अहो मी पंढरपूरचा आहे " "अरे वा ! पंढरीचे जन । अवघे पावन ! " मी म्हणालो आणि बसल्या बसल्याच त्याच्या पाया पडलो . "राम कृष्ण हरी ! " तो देखील माझ्या पाया पडला . " एकमेका लागतील पायी रे । " दोघांनाही खूप आनंद झाला ! "म्हणजे तुम्ही वारकरी दिसताय " मी म्हणालो . तो म्हणाला "तसे आपण सर्व मराठी लोक वारकरीच असतो . पण मी धारकरी सुद्धा आहे . " माझे डोळे चमकले ! इतका वेळ ज्या भिडे गुरुजींचा मी विचार करत होतो त्यांच्या पाईकांना महाराष्ट्रात धारकरी म्हणून ओळखतात ! "मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा धारकरी आहे " तरुण सांगू लागला . "आपले नाव दादा ? " "मी महेश राजू निकम . मुक्काम पोस्ट पंढरपूर "  मी मघापासून भिडे गुरुजींचाच विचार करतो आहे हे मी त्याला सांगितले. तो म्हणाला "अहो मला इकडे यायला उशीर झाला कारण मी आता फोनवर गुरुजींशीच बोलत होतो . ते आज आमच्या गावामध्ये बैठकीसाठी आले होते .आता सांगलीला निघाले असतील . " असे म्हणत त्याने पुन्हा एकदा ज्या कार्यकर्त्याकडे गुरुजी थांबले होते त्याला फोन लावून चौकशी करून घेतली .गुरुजी सांगलीला जायला निघाले होते . "उद्या सकाळी गुरुजी कुठे असतील ते मला माहिती आहे .मी तुम्हाला सकाळी गुरुजींशी बोलायला देतो " महेश म्हणाला . "अरे पण मी गुरुजीं शी फोनवर कधीच बोललेलो नाही . " मी म्हणालो . "अहो दादा तुम्ही बोलून तर बघा ! त्यांना किती आनंद होईल माहिती आहे का ! मी परिक्रमा करतो आहे कळल्यावर त्यांना फार आनंद झाला ! " महेश सांगू लागला . ती रात्र आम्ही दोघेही अखंड गप्पा मारत राहिलो ! आमच्या दोघांची नाळ जुळली होती ! आजूबाजूचे परिक्रमा वासी वैतागून झोपा आता ! झोपा आता ! असे आम्हाला सांगत राहिले .  परंतु आमच्या गप्पा तेव्हाच थांबल्या जेव्हा अतिशय थकलेला महेश बोलता बोलता झोपी गेला ! तो फारच वेगाने चालत होता ! सरासरी ५० -६० किलोमीटर अंतर तो रोज कापत होता .हे वाटते तितके सोपे नाही . अतिशय थकविणारी ही प्रक्रिया आहे . माझी मात्र झोप उडून गेली होती . त्यामुळे मी घाटावर एक फेरफटका मारायला निघालो . नर्मदेच्या काठाकाठाने मी चाललो होतो . घाटावरती दिवे चालू असल्यामुळे उजेड चांगला होता .  पाण्यावरून सीगल पक्षी वेगाने उडत होते . उडता उडता चोच पाण्यामध्ये बुडवून ते पाणी पितात किंवा मासे पकडतात . एक पक्षी तर मध्ये असलेल्या कारंजातील पाणी पिताना मी पाहिला .  नर्मदेचे पाणी अंधारलेले होते . सर्वत्र निरव शांतता होती . दिवसभर लोकांनी वाहिलेल्या पूजा साहित्यामुळे घाण झालेले पाणी पुढे वाहून गेले होते . आता स्वच्छ पाणी होते ते थोडेसे प्यावे म्हणून खाली वाकलो आणि एकदम माझ्या काळजामध्ये धस्स झाले ! समोर काळेभोर केस असलेले एका महिलेचे पालथे डोके तरंगताना दिसले . गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार होते . नीट पाहिल्यावर तिचे हात सुद्धा मला दिसले . बहुतेक कोणीतरी पाय घसरून पडले असावे . का आत्महत्या केली असावी ? पोलिसांना कळवावे असा विचार करून मी आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहू लागलो . दूरवर एक बुटकासा मनुष्य नर्मदे काठी काहीतरी करत होता . मोठे चुंबक पाण्यामध्ये टाकून त्याला चिकटलेले पैसे गोळा करण्याचे काम तो करत होता . मी त्याला आवाज दिला . "भाईसाहब जल्दी इधर आइये । " "आया बाबाजी । क्या हुआ ? " "ये देखो पानी मे । " मी तरंगणारे ते धड त्याला दाखवले . तो मोठ्यांना हसायला लागला ! "यह ? अरे बाबा जी यह क्या है बताता हु । " त्याने आजूबाजूला बघत एक मोठी बांबूची काठी आणली आणि काठीने ते धूड अलीकडे ओढले . संरक्षणासाठी बांधलेल्या साखळीच्या कठड्यांच्या पलीकडे ते धूड होते . केसांना धरून त्यांनी ते बाहेर काढले . ही पाण्यामध्ये विसर्जित केलेली दुर्गा मातेची मूर्ती होती ! त्याने लगेच तिच्या कानातले गळ्यातले हातातले अलंकार काढले . "ये सब झूठे है । इसमे कुछ भी सोने का नाही । " असे म्हणत त्याने ते लांब पाण्यात फेकून दिले . मूर्तीचे केस अगदी खऱ्या केसांसारखे वाटत असल्यामुळे मला खरोखरीच स्त्रीचे कलेवर पडले आहे असा भास झाला होता . आभास आणि वास्तव यात नेहमीच मोठे अंतर असते . 'आप इतने रात गये यहा क्या कर रहे है ? क्या नाम है आपका ? " मी त्या माणसाला विचारले . अतिशय छोटी चण असलेला तो मनुष्य (हिंदी भाषेत )बोलू लागला . सांगतो सांगतो .  सगळं सांगतो . माझं नाव कृष्ण गोपाल यादव . माझे आई-वडील लहानपणीच गेले . एक भाऊ आहे . त्याचे लग्न झालेले आहे .त्याला मुलेबाळे आहेत . वडिलांचे घर जमीन सर्व भावाने लाटले . माझे लग्न झालेले नाही . म्हणजे मी अविवाहित आहे . पण ब्रह्मचारी नाही ! खोटे कशाला बोलू ! मैयाच्या समोर आहे . खोटे काही सांगणार नाही . खूप झाडांची फळे मी खाल्ली आहेत . आता फक्त मैया आणि मी असे दोघेच जगतो आहोत . म्हणजे मी मैयाच्या काठावर एक झोपडी बांधून राहतो . दिवसभर दारू पिऊन मी झोपून टाकतो . रात्र झाली की इकडे येतो . मला काय हवे काय नको त्याचा हिशोब करूनच मी इकडे येतो . समजा मला आज नवीन कपडे घ्यायचे आहेत , किंवा नवीन बूट घ्यायचे आहेत , तेल तूप आणायचे आहे , तर मी तसा हिशोब करून मैय्याला सांगतो , की आज मला साडेचारशे रुपये हवे आहेत . आणि हे पावरफुल चुंबक मला मैय्यामध्ये सापडले होते त्याला दोरी बांधून मैयामध्ये फेकून देतो . मैया ची कसम सांगतो तुम्हाला ! बरोबर मला जितके पैसे हवेत तितके पैसे मैय्या त्या दिवशी देतेच ! एका फेकण्यामध्ये नाही मिळत . पण रात्रभर बसल्यावर मिळून जातात . कधी कधी मला काहीच नको असते त्या दिवशी काहीच मिळत नाही . पण मला हिला भेटल्याशिवाय मला चैन पडत नाही म्हणून मी रोज येतो . दिवसा येत नाही कारण दिवसा येथे दुसरे लोक पैसे गोळा करतात . त्यांच्याशी भांडण नको म्हणून मी आपला रात्री येतो . दिवसभर भाविक लोक पैसे फेकत असतात . त्यातली ठराविक नाणी या चुंबकाला चिकटतात . ठरलेले दुकानदार माझ्याकडून सुट्टे पैसे घेतात . मग सकाळी घरी जाऊन मी मस्त स्वयंपाक करून जेवतो . दारू पितो आणि झोपून टाकतो ! भाड मे गयी दुनियादारी ! हमको हमरी मैया प्यारी ! 
त्याचे जगण्याचे ही तत्त्वज्ञान ऐकून मी हतबुद्ध झालो होतो . नर्मदा मैया कोणाकोणाला सांभाळते आहे हे पाहून अचंबा वाटत होता . मला तो पैसे कसे गोळा करतो हे पाहायचं होतं . त्याने देखील मला कुठलेही आढेवेढे न घेता पैसे कसे गोळा करतात ते डेमो करून दाखवले . पैसे फेकतानाच तो मैय्याला म्हणाला , "मैया आज सिर्फ बीस रुपये दे दे । बाकी सब है आज ।" त्याच्याकडे स्वयंपाकाचे सर्व सामान शिल्लक होते .  फक्त वीस रुपयाची दारू त्याला प्यायची होती . त्याला खरोखरच किती पैसे मिळतात हे मला पहायचे होते . दोन-तीन फेकींमध्ये अठरा रुपये गोळा झाले . मला एकदा फेकून पहायचे होते ! त्याने मला दोरीची गुंडाळी कशी करायची इथपासून , चुंबक लांब कसे फेकायचे कसे ओढायचे सर्व शिकवले . मी चुंबक फेकले आणि ओढू लागलो . तो म्हणाला दोन रुपये निघतील .जास्त निघणार नाहीत . प्रत्यक्षात तीन नाणी चिकटलेली दिसली . त्यातले एक नाणे दोन रुपयाचे होते . आणि बाकीचे दोन लोखंडाचे साधे गोल होते ! ती नाणी नव्हतीच ! "ये अगरबत्ती का ढक्कन है । " त्याने सांगितले . वीस रुपये गोळा झाल्यावर यादव मोकळा झाला ! कधी कधी पाचशे रुपयाची नोट सुद्धा तरंगताना सापडल्याचे त्यानी मला सांगितले . यादव आता निवांत झाला . एका कट्ट्यावर आम्ही दोघे गप्पा मारत बसलो . तो मला सांगू लागला . त्याने सारी दुनियादारी केलेली होती . भाऊ भावजयी साठी घर यानेच उभे केले . भावाची मुले हीच आपली मुले असे समजून त्यांना सांभाळले . याचे वय साधारण पन्नास असले तरी छोटीशी उंची असल्यामुळे आणि चांगले टकाटक राहण्याची सवय असल्यामुळे अजूनही हा तरुण मुलासारखा हिरोगिरी करत फिरायचा ! तरी देखील त्याने स्वतःचे लग्न लांबणीवर टाकले . परंतु एवढे सर्व करून नातेवाईकांनी फसवल्यावर त्याचे डोळे उघडले . नर्मदेमध्ये जीव देण्यासाठी गेला . जीव देण्यासाठी त्याने उडी मारली असता नेमके पाणी उथळ निघाले आणि तिथे त्याला मोठे चुंबक सापडले ! त्याला काही नाणी चिकटलेली होती ! ते पाहून त्याला ही युक्ती सुचली ! साक्षात नर्मदेने आपल्याला ही युक्ती सुचवली असे त्याचे मत झाले . "जगामध्ये जगण्यासाठी फार काही लागत नाही ! तुमचा हेतू शुद्ध पाहिजे ! " यादव मला सांगू लागला . तिथून पुढे मी ठरवले . आता जगायचे फक्त नर्मदेसाठी .  आणि नर्मदेच्याच जीवावर ! मैया कसम तुम्हाला सांगतो बाबाजी ! मला जे हवे ते ती झोपडी मध्ये आणून देते ! अगदी जे हवे ते ! डोळा मारत त्याने विचित्र इशारा केला . त्याला वीस रुपये हवे होते आणि वीस च रुपये मिळाले हे मी स्वतः पाहिले होते . त्यामुळे हे देखील खरे असण्याची शक्यता होती . नर्मदा खंड अशा असंख्य अनाकलनीय घटनांनी भरलेला आणि भारलेला आहे .एखाद्या सर्वसंगपरित्यागी योगी पासून ते या यादव सारख्या भोगीपर्यंत सर्वांना जे हवे ते इथे सहज मिळते आहे अशी अनुभूती आहे . सारे अद्भुत आहे . यादव ने सांगितलेले काही अनुभव इथे सांगता येण्यासारखे नाहीत . परंतु त्यामुळे नर्मदा कुठल्या कुठल्या स्तरावर काम करते आहे हे मला निश्चितपणे कळले .
यादव ला नर्मदे हर केले आणि आश्रमामध्ये येऊन पाठ टेकली . पडल्या पडल्या डोळा लागला . सकाळी महेश निकमने हाक मारल्यामुळे जाग आली . याने काय पराक्रम केला होता याची मला कल्पनाच नव्हती ! मी झोपेत असताना एका हाताने मला हलवता हलवता दुसऱ्या हाताने याने एकांना फोन लावला होता . माझ्या हातात फोन देतो म्हणाला , " घ्या दादा . तुमच्यासाठी फोन आहे . " मी अर्धवट झोपेतून जागा झालेलो होतो . रोज वेगळ्या ठिकाणी झोपत असल्यामुळे झोपेतून उठल्यावर पहिली दोन-तीन मिनिटे आपण कुठे आहोत हे समजून घेण्यात जायची . अशा अवस्थेमध्ये हा फोन मी कानाला लावला आणि पलीकडून आवाज आला , " नमस्कार .मी संभाजी भिडे बोलतोय . आपण कोण ? " एका क्षणात माझी झोप खाड करून उडाली ! ताडकन उठून मी उभा राहिलो ! "गुरुजी नमस्कार ! मी अमुक अमुक ! तमुक गांवचा ! " "हां . . हां . . आलं लक्षात . दक्षिण भारतात राहिलेले तेच ना ! " "होय गुरुजी !बरोबर ! " महेश निकम असा अचानक " शॉट " करेल याची मला कल्पनाच नव्हती ! मी धावतच घाटावर पळालो . सुमारे पंधरा मिनिटे गुरुजी माझ्याशी बोलले . यावर्षी परिक्रमे मध्ये असल्यामुळे मी मोहिमेला येऊ शकत नाही असे त्यांना सांगितल्याबरोबर ते म्हणाले , " यंदा आपली मोहीम रद्द झालेली आहे . परंतु मोहीम होणार आहे . लवकरच करू . पण तुम्ही जी परिक्रमा करत आहात ती देखील एक मोठी मोहीमच आहे . फार उदात्त परंपरा आहे ती ! मला फार आनंद वाटला की तुम्ही नर्मदा परिक्रमा करत आहात ! " गुरुजी सर्वांशी आदरानेच बोलतात . सर्वांना अहो जाहो करून बोलण्याची उपजत सवय त्यांच्या ठायी आहे . संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून गुरुजींनी जो बलिदान मास पाळण्याची प्रथा सर्वत्र सुरू केलेले आहे ती मी देखील काही वर्षे पाळत आहे . यावर्षीचा बलिदान मास परिक्रमेदरम्यानच येणार होता . तो मी इथेच पाळेन , असे गुरुजींना सांगितले . मी प्रथमच गुरुजींची फोनवर बोलत होतो . मी परिक्रमा कुठून सुरू केली ?कुठे संपणार आहे ? रोज मी किती अंतर चालतो आहे ? अजून साधारण किती दिवसाची चाल बाकी आहे ?हे सर्व प्रश्न गुरुजींनी मला विचारले आणि मी यथाशक्ती ,यथामती त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केला . माझा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता ! माझ्या मनात गुरुजींचे स्मरण काय व्हावे आणि नर्मदा मातेने थेट गुरुजींचा संपर्क घडवून द्यावा ! हे किती अद्भुत आहे ! यापूर्वी मी गुरुजींना पत्र लिहीत असे . ते देखील नेहमी सर्वांना सांगतात की मला चार ओळी खरडत जा . अन नेमके परिक्रमा सुरू केल्याचे पत्र त्यांना पाठवायचे राहिले होते . परंतु तो निरोप अशा पद्धतीने नर्मदेच्या कृपेनेच गुरुजींपर्यंत पोहोचला ! गुरुजींच्या अंत:करणामध्ये नर्मदा माते विषयी किती उदात्त विचार आणि पूज्य भावना आहेत हे देखील मला त्या दिवशी त्यांच्याच मुखातून ऐकायला मिळाले , आणि साक्षात नर्मदेच्या साक्षीने ऐकायला मिळाले , हे मी माझे परम भाग्य समजतो ! 
  पू. संभाजीराव भिडे गुरुजी 
नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना आजही भिडे गुरुजी भल्या पहाटे उठून स्वतः व्यायाम करतात व तरुणांनाही व्यायामाला लावतात . 
सांगली येथील विष्णू घाटावर भिडे गुरुजी रोज पहाटे व्यायाम करतात . मागे वाहणारी कृष्णामाई दिसते आहे . 
गुरुजींनी लिहिलेले हे सर्व प्रेरणादायी श्लोक , नुसते कोरडे शब्द नसून त्यांना अनुभवाची जोड व खोली आहे .त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा मला माझ्या नर्मदा परिक्रमेमध्ये वेळोवेळी झालेला आहे . 
(सर्व चित्रे संग्रहित )

नर्मदा परिक्रमा नक्की पूर्ण होईल असा आशीर्वाद गुरुजींनी फोनवर दिला .  परिक्रमा पूर्ण होणे किती कठीण परंतु महत्त्वाचे आहे हे मध्ये अधे परिक्रमा सुटलेल्या लोकांचे अनुभव ऐकल्यावर लक्षात येत होते .
गुरुजींच्या आशीर्वचनामुळे आजचा दिवस अतिशय आनंदामध्ये उगवला ! महेश निकम याची गती माझ्यापेक्षा अधिक असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची विनंती केली . दोघे एकत्रच निघालो . पुढे एक दोन छोटे घाट लागले . तिथून महेश वर गेला आणि मी काठाने थोड्या कठीण मार्गाने चालत राहिलो . 
 काठावरचा मार्ग
पुढे होशंगशहाचा किल्ला आडवा आला . 
नर्मदेकाठी बांधलेला होशंग शाह कोट
  पाण्यात बुडलेला बुरुज
इथे प्रचंड काटे कुठे घालून एक कुंपण केले होते . मी प्रयत्नपूर्वक त्या कुंपणावरून उडी मारली . पुढे जाऊन पाहतो तो किल्ल्याची उभी तटबंदी नर्मदेमध्ये बुडालेली होती म्हणजे रस्ताच नव्हता ! आता परत येता येणे अशक्य होते ! इतक्यात महेश निकम पुन्हा माघारी येताना दिसला . त्याला आवाज दिला व त्याने मोठ्या शिताफीने मला बाहेर काढले . या किल्ल्याची भिंत मावळ्यां प्रमाणे चढून दोघे मार्गस्थ झालो .
 पुढे घाट दिसताच त्याने डांबरी मार्ग धरला व मी नर्मदा मार्ग पकडला . याच  मार्गावरून चालता यावे म्हणून तर परिक्रमा करायची !


लेखांक त्रेपन्न समाप्त ( क्रमशः)
 
 

लेखांक ५४ : कोकसर ची गौरीशंकर महाराजांची संजीवन समाधी आणि आवली घाट

नर्मदापुरम् मधुन निघताना परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या फोटोचे दर्शन घेऊन निघालो होतो . टेंबे स्वामी परंपरेतील महाराजांचा संप्रदाय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय पूजनीय मानला जातो . गुळवणी महाराज ,दत्त महाराज कवीश्वर , ढेकणे महाराज असे अनेक साक्षात्कारी संत या परंपरेमध्ये होऊन गेले . या परंपरेतील एक मठ देखील इथे रस्त्याने गेल्यावर लागतो . परंतु मी किनारा पकडल्यामुळे या मठाचे दर्शन घेऊ नाही शकलो .
  प.प. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज
होशंगशाह चा किल्ला ओलांडल्यावर राजघाट स्मशान भूमीपासून मी पुन्हा एकदा मैया चा काठ धरला .या मार्गे शक्यतो कोणी परिक्रमा वासी जात नाहीत.मध्ये स्मशाने लागतात . परिक्रमेमध्ये अशी शेकडो स्मशाने ओलांडली . परंतु त्याचे काहीच वाटत नाही . बैतूल भोपाळ प्रवासामध्ये ज्या पुलावरून मैया पाहिली होती ,आणि नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती तो पुल मी आता ओलांडत होतो ! या भागात बरेच पुल आहेत . रेल्वेचे दोन तीन पूल आहेत . एक सडक मार्ग पूल आहे आणि एका पुलाचे काम तिथे सुरू होते . पुलाच्या कामामुळे संपूर्ण किनारा मार्ग चालण्यासाठी बंद केला होता . इथे वाळूचे प्रचंड ढिगारे आहेत . मी इंजिनीयर लोकांना विनंती केली की मला इथून जाऊ द्या परंतु त्यांनी जाण्यास बंदी केली . मग मी थेट नर्मदेच्या पाण्यामध्ये उतरून कधी घोटाभर तर कधी गुडघाभर पाण्यातून चालत पुढे गेलो . यांनी सर्वत्र जाळ्या टाकून ठेवलेल्या आहेत . 
बांधकाम सुरू असलेला पूल 
रेल्वेच्या एका पुलावरून दिसणारा दुसरा पूल
रेल्वेच्या दगडी पुलाचे खांब त्याच्या मनोऱ्यासारख्या आकारामुळे लक्षात राहतात .
 रेल्वे पूल
उपग्रह नकाशातून पाचही पूल व्यवस्थित दिसत आहेत .निर्माणाधीन पुलाचे खांब दिसत आहेत .सर्वत्र प्रचंड वाळू आहे . 
इथे काम करणाऱ्या कामगारांना मी ही कुठली नदी आहे विचारले तर त्यांना माहिती नव्हते . वाईट वाटले . आपण पोटासाठी मिळेल ते काम ,कष्ट अवश्य करावेत . परंतु हे काम कुठल्या नदीवर चालले आहे हे देखील आपल्याला माहिती नसेल तर त्यासारखे दुर्दैव ते दुसरे काय ? मी खालून गाडीचा पूल पाहू लागलो . केवळ दोनच महिन्यापूर्वी जयपुर वरून येणाऱ्या मूर्तींच्या ट्रकला अपघात झाल्यामुळे त्या मूर्ती दुसऱ्या ट्रक मध्ये भरून याच पुलावरून जाता जाता मी नर्मदा मातेचे डोळे भरून दर्शन घेतले होते ! आणि आज मी त्या मार्गावर चालत होतो ! आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ! इथे दोन तरुण अंघोळ करत होते . त्यांनी पुला सोबत माझा फोटो काढून मित्राच्या क्रमांकावर पाठवला परंतु त्याच्याकडून तो डिलीट झाला . एकूण  पाठविलेल्या फोटोंपैकी अर्ध्याहून अधिक त्यांच्या हातून डिलीट झाले . मित्राला आवडलेले फोटो त्यांनी इतरांना फॉरवर्ड केले . त्यातील एकाने संगतवार सेव केल्यामुळे काही फोटो परत आल्यावर मला मिळाले . तेच उरलेले फोटो आपण ब्लॉग मध्ये पाहत आहात . असो .
वाळू मधून जाताना पायांचा कस लागतो . परंतु मी काही वाळूचा किनारा सोडला नाही . डोंगर वाडा गावात एकाने चहा पाजला . इथे अजून आठ-दहा परिक्रमावासी बसले होते . अतिशय सुंदर पद्धतीने सारवलेले अंगण होते . सर्वांना भरपूर चहा आणि पोटभर बिस्किटे खायला दिली गेली . यांच्यामध्ये काही मराठी परिक्रमा वासी देखील होते . ते सर्वजण गावागावातून निघाले आणि मी पुन्हा एकदा मैयाचा काठ पकडला . पुढे मैया काठाने चालत  हसलपूर, रंढाल , बरंदुआ , तालनगरी ही गावे काठाकाठाने पार करत कोकसर अथवा खोखसर गाव गाठले .
या भागात परिक्रमा या शब्दाचा उच्चार परिकम्मा असाच करतात .
 तालनगरी घाट
एक ताल उपासक या नात्याने ताल नगरी हे गावाचे नाव मला खूप आवडले . 
मी या मार्गाने चालायचो
गावातील रस्त्याने चालणाऱ्या लोकांना मात्र अशा पाट्या वाचायची नामुष्की येते .माझ्यावर मैय्याच्या कृपेने ती वेळ फारशी कधी आली नाही . दूरवर सिमेंटच्या पांढऱ्या खांबाच्या मागे पाहिल्यावर नर्मदा नदीचे अस्तित्व दिसते आहे पहा . अचानक लांब दिसणारी धुरकट झाडी म्हणजे तिथे नदी असल्याची खूण असते .
बरंदुआ गावात नर्मदा पात्र सात भागांमध्ये विभागलेले आहे म्हणून त्याला सप्त धारा किंवा स्थानिक भाषेत शतधारा म्हणतात .
  बरंदुआ ची सतधारा
 तालनगरी घाट
रंढाल चा घाट
 तालनगरी काठावरील भव्य व पुरातन लिंब

 निर्भयपणे नौका हाकणारा केवटाचा मुलगा
इथे मैया खूप सुंदर वाहते . अति गतिमान पण उथळ पात्र आहे . त्यामुळे इथे मनसोक्त स्नान केले . 
 कोकसर गावापूर्वी विस्तीर्ण उथळ आणि गतिमान झालेले नर्मदा पात्र
 कोकसर च्या आश्रमात आलो .  धुनीवाले दादाजी यांचे गुरु श्री गौरीशंकर महाराज ,ज्यांना या परिसरामध्ये जमात वाले बाबा म्हणून ओळखले जाते , त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे . आश्रम अतिशय सुंदर आहे व फार स्वच्छ ठेवलेला आहे . साक्षात जिवंत समाधी येथे असल्यामुळे एक वेगळेच पावित्र्य इथे जाणवते . गौरीशंकर महाराजांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी आजन्म नर्मदा परिक्रमा केली . ते परिक्रमेला निघाले की त्यांच्याबरोबर दोनशे तीनशे माणसांचा जमाव परिक्रमेला निघत असे . आणि परिक्रमा संपेपर्यंत हा आकडा पाच सहा हजार पर्यंत जात असे . त्यामुळे ते ज्या गावात जातील त्या गावाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप यायचे ! सगळीकडे उत्सवाचे वातावरण , आनंदी आनंद असायचा ! असे सांगतात की पूर्वी केवळ साधू संन्यासी जी नर्मदा परिक्रमा करायचे ती परिक्रमा सर्वसामान्य गृहस्थी मनुष्य देखील करू शकतो याची समाजाला जाणीव करून देणारे अलीकडच्या काळातील पहिले संत म्हणजे गौरीशंकर महाराज आणि त्यांचे गुरु कमल भारती महाराज होत . तसेच विविध गावांमध्ये परिक्रमावासींची जी सेवा केली जाते ती देखील गौरीशंकर महाराज यांच्या प्रेरणेमुळे सुरू झाली असे मानणारा मोठा वर्ग नर्मदा खंडामध्ये आहे . एकंदरीत आधुनिक नर्मदा परिक्रमेचे जनक म्हणजे गौरीशंकर महाराज उर्फ जमात वाले बाबा आहेत हे सर्वमान्य सत्य आहे . 
ब्रह्मर्षी श्री स्वामी गौरीशंकर जी महाराज उर्फ जमात वाले बाबा
परंतु गौरीशंकर महाराज यांच्याकडे ही परंपरा आली कशी याची कहाणी मोठी रोचक आहे .
नर्मदा खंड ही नेहमीच तपोभूमी राहिलेली आहे . आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये जितकी म्हणून साधू संतांची , तपस्वींची ,ऋषीमुनींची ,देवदेवतांची ,पौराणिक पात्रांची नावे ऐकलेली आहेत ,त्या सर्वांनी नर्मदे काठी कधी ना कधी येऊन घोर तपश्चर्या केलेली आहे . पिप्पलाद, माण्डव्य, महर्षि वाल्मीकि,मातंग, वेदव्यास,
भृगु,सम्राट मेकल, अस्त, सती अनसुईया ,स्वयंभू मनु, मार्कण्डेय,जमदग्नि, श्रृंगी, जाबालि, गौतम, दारूक, भार्गव अशा ऋषींसोबतच आदिगुरू
शंकराचार्य, श्री स्वामी वासुदेवानन्द सरस्वती, श्री गीताचार्य,विद्यानन्द जी, संत कबीर आदि अलीकडच्या काळातील सत्पुरुषांनी देखील नर्मदेचा आशीर्वाद आणि आश्रय घेतलेला आहे . दरम्यानच्या काळात मुसलमानी आक्रमणामुळे भारतातील धार्मिकता लोप पावली . मंदिरे आणि मूर्ती यांचा विध्वंस केल्यामुळे लोक धर्माला घाबरू लागले . जाळपोळ लुटालूट व्यभिचार यामुळे त्रस्त जनतेला धर्मकार्या करता वेळ देता येईना . इंग्रजांनी देखील धर्मकार्य बंद पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते . आपली आस्था ,आपला स्वाभिमान ,आपली अस्मिता , आपली गरिमा ,आपली शक्ती , आपले सर्वस्व धर्मामध्ये आहे हे ओळखून त्यांनी पहिला आघात धर्मावरच केला . त्यामुळे नर्मदा परिक्रमेची पवित्र परंपरा अस्तंगत झाल्याप्रमाणे झाली होती . 
हिमालयातील तत्कालीन ज्योतिर्मठ पीठाधीश्वर  शंकराचार्यांनी ही परिस्थिती ओळखली आणि हिमालयामध्ये बद्रीनाथ च्या पुढे वसुधारा गुफेमध्ये साधना करणारे ब्रह्मर्षी कमल भारती जी महाराज यांना लोकांना भयमुक्त करून नर्मदा परिक्रमेचे पुन्हा प्रवर्तन व संरक्षण करावे अशी आज्ञा केली . 
नर्मदा परिक्रमेचे पुनरुज्जीवक ब्रह्मर्षी कमल भारती महाराज
हा साधारण १८३० चा काळ होता . त्यांनी परिक्रमा सुरू केली व लोकांना मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सामील करून घेतले . यांचे वय तेव्हा १०० च्या पुढे होते असे म्हणतात . त्यांच्या एकूण तीन परिक्रमा झाल्या . तिसऱ्या परिक्रमे नंतर त्यांनी आपला देह ओंकारेश्वर येथे नर्मदा नदी मध्येच समर्पित केला . काही शेकड्यामध्ये सुरू झालेली परिक्रमा शेवटी शेवटी हजाराच्या संख्येमध्ये जात असे . त्यांचे पट्ट शिष्य श्री गौरीशंकर महाराज यांनी देखील आपल्या गुरूंची ही परंपरा आजन्म चालू ठेवली आणि तिला भव्य दिव्य स्वरूप दिले . पुढे दादाजी धुनिवाले यांच्यामुळे ही प्रथा अजूनच फोफावली .हरिहर भोले , धुनीवाले दादाजी , रंग अवधूत महाराज आदी संतांनी परिक्रमेला प्रतिष्ठा मिळवून देत नर्मदा खंडातील लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले . लोक भयमुक्त झाले आणि परिक्रमावासींची सेवा करू लागले . देशाच्या विविध भागातून नर्मदा खंडामध्ये आलेल्या साधुसंत ,संन्यासी आणि गृहस्थींनी पुन्हा आपापल्या भागामध्ये जाऊन धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला . अशाप्रकारे संपूर्ण भारत खंडाला नवसंजीवनी देण्याचे अतिशय मोलाचे कार्य गौरीशंकर महाराजांनी केलेले आहे . अशाच एका परिक्रमेदरम्यान कोकसर येथे त्यांनी नर्मदा मातेच्या काठावर संजीवन समाधी घेतली . त्या मठामध्ये आज मी आलो होतो !  त्यामुळे आज इथेच मुक्काम करावा असे ठरवले .  
आश्रमामध्ये अतिशय सुंदर बगीचा केलेला होता . दरवर्षी इथे पुराचे पाणी येते तरी देखील हा बगीचा पुन्हा उभा केला जातो . 
कोकसर आश्रमातील सुंदर बगीचा मधून होणारे नर्मदा दर्शन
आश्रमाचा स्वच्छ व सुंदर परिसर . केशरी खांब दिसतो आहे त्या खोलीमध्ये आम्ही मुक्काम केला .
आश्रमातील व्यवस्थापकांचे कार्यालय . पायऱ्यांवर टाकलेली हिरवळ पहावी ! खूपच सौंदर्य दृष्टीने आश्रम उभा केला आहे .
श्री गौरीशंकर महाराज यांची संजीवन समाधी . मधला घुमट आहे त्याचे खाली समाधी आहे .
अनेक दीपांनी उजळलेली संजीवन समाधी
मी सुरुवातीला इथे एकटाच होतो . नंतर एक एक करून सहा परिक्रमा वासी आले . याच्यामध्ये गांव बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथून आलेले एकनाथ गोविंदराव रोकडे म्हणून होते . त्यांच्यासोबत शंकर सुखदेव शेळके म्हणून ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथून आलेले एक परिक्रमा वासी होते .अजूनही काही लोक यांच्यासोबत होते. या सर्वांचा चालता चालता सहा जणांचा गट तयार झाला होता . ही सर्व मंडळी निवृत्त होती आणि अतिशय सात्विक होती . हे सर्वजण भरपूर चालायचे व नंतर अतिशय सुंदर पद्धतीने सर्व आरत्या म्हणत उपासना करायचे . इथे भोजन प्रसाद मिळत नाही परंतु तुम्ही स्वतः करून खाऊ शकता असे मला आश्रम व्यवस्थापकाने सांगितले . आश्रमाच्या मागच्या बाजूला चुली होत्या तिथे जाऊन स्वयंपाक करण्याची सूचना त्यांनी मला केली . सोबत असलेली सर्व मंडळी वयस्कर आणि बऱ्यापैकी थकलेली होती त्यामुळे मी सर्वांचा स्वयंपाक करतो असे जाहीर केले . मेनू फार सोपा होता ! खिचडी एके खिचडी !  अर्थात नंतर माझ्या मदतीला सर्वजण आले आणि अशा पद्धतीने सुंदर अशी खिचडी करून समाधीला नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी ती आनंदाने भक्षण केली . रिकामे मध्ये मराठी बोलणारी माणसे खूप अधिक भेटतात हे वास्तव आहे . जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक असेल किंवा अन्य काही युट्युब व्हिडिओ असतील जे पाहून आजकाल मराठी परिक्रमावासी फार मोठ्या संख्येने येतात . अनिश व्यास नावाच्या परिक्रमावासी चे व्हिडिओ पाहून आलेले काही लोक मला पूर्वी भेटले होते . ज्याच्यामध्ये बनकर काका जे सहस्त्रधारा इथे मला भेटले त्यांचा समावेश होता . सांगायचे तात्पर्य इतकेच की गौरीशंकर महाराजांची परंपरा चालू ठेवणारे परिक्रमा वासी आजही आहेत व नवीन निर्माण होत आहेत .फक्त नर्मदा परिक्रमेची परंपरा आणि पारंपारिक नियम आपल्याकडून भंग होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी इतकेच वाटते . संध्याकाळी तिथे अजून एक भटका परिक्रमावासी आला .हा उत्तर प्रदेशचा आहे असे सांगत होता . याच्याकडे नर्मदा मैया नव्हती .हा नुसताच भटकत होता . सतत चिडचिड करून लोकांवर आरडाओरडा करत असे . पण आम्ही सर्व मराठी लोकांनी एकत्रित हिसका दाखवल्यामुळे तो आमच्या नादाला लागला नाही . मराठी माणूस मुळातच लढवय्या असतो हे खरे आहे . कुठेही काही प्रसंग झाला की तिथे सर्वप्रथम मिटवण्यासाठी किंवा पेटवण्यासाठी जाणारा मनुष्य मराठीच असायचा हे मी परिक्रमेमध्ये खूप वेळा पाहिले . त्यासाठी लागणारी निर्भीडता , निर्भयता आणि झुंजार मानसिकता मराठी माणसांमध्ये उपजत असते . काही इंग्रज प्रवाशांनी देखील मराठे अतिशय काटक , चपळ ,शूर आणि तापट डोक्याचे व भांडखोर असतात असे लिहून ठेवलेले आहे ! या सर्वांनी म्हटलेल्या मराठी आरत्या ऐकून छान वाटले . विशेषतः शेळके काका एकनाथ महाराजांची आरती म्हणायचे जी मला माझ्या आजीमुळे पाठ होती .पूर्वी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज यांच्या सोबत एकनाथ महाराजांची आरती देखील केली जायची . परंतु अलीकडे ती परंपरा बंद पडली आहे असे दिसते . 
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
 त्रिभुवनी तु ची थोर । जगद्गुरु जगन्नाथा ।
 आरती एकनाथा ।
अशी ती आरती आहे . रात्री गप्पा मारत सर्वजण झोपी गेलो . यूपीचा साधू आमच्यावर काहीतरी आरडाओरडा करायचा की आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर डाफरायचो की तो घाबरून पलीकडे तोंड करून झोपून जायचा ! मग आम्ही खूप हसायचो . असे हास्य विनोद करत झोपी गेलो . सकाळी लवकर उठून निघण्याची तयारी केली परंतु आकाशामध्ये ढग भरून आले होते . काय व्हायचे ते होऊ असा विचार करून आश्रमाच्या बाहेर पाऊल ठेवले आणि जोराचा वादळी पाऊस सुरू झाला . पावसामुळे पुन्हा माघारी फिरलो व दोन-तीन तास पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलो . अखेर पाऊस कमी झाल्यावर बाहेर पडलो . नदीकडे जाण्याचा मार्ग चिखलाने माखला असल्यामुळे थोडे अंतर रस्त्याने गेलो . इथे एका पटेलाचा अतिशय सुंदर भव्य दिव्य वाडा होता. पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता पण तरीदेखील काठानेच जावे असे वाटून पुन्हा काठ पकडला . टिघरीया घाटावर गोकर्णेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले .

गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार
टिघरिया , कजलास , नानपा ,कुलेरा अथवा कुंतीपूर ,हथनापूर , आवरी घाट , ग्वाडी , भेला किंवा भोला ओलांडत मैयाच्या पूर्ण काठा काठा ने चालत घोघरा गाव गाठले .
मध्ये हत्याहरण नावाची नदी लागली जी फारच खोल होती त्यामुळे ती पुलावरून ओलांडली . 
 । असे अनेक आश्रम सर्वत्र दिसतात . सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने क्रियायोग शिकवला जातो . 
मध्ये प्रत्येक गावाला असे छोटे मोठे घाट आहेत
आता हळूहळू नावांचे आकार आणि प्रकार बदलू लागले . एका माणसाचे डोंगे दिसायचे बंद झाले आणि दोन पाच माणसे बसतील असे डोंगे आणि दहा-बारा लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका दिसू लागल्या .
 हे नावाडी दहा रुपये ते वीस रुपये घेऊन पलीकडच्या काठावर लोकांना सोडतात . मोटर सायकल नावेतून घ्यायची असेल तर अजून दहा रुपये द्यावे लागतात .
नदी आणि नौका यांचे नाते अतूट आहे खरे !
मी वाटेत येणाऱ्या सर्व लोकांचे आणि नौकांचे खूप बारकाईने निरीक्षण करायचो . प्रत्येक मनुष्य वेगळा असतो तशी प्रत्येक नौका स्वतःचे काहीतरी वेगळेपण जपत असते . 
एकत्र बांधलेल्या अशा नौका आपापसात काहीतरी गप्पा नक्की मारत असतील असे मला गमतीने वाटायचे !
याच्यापुढे लागणारी नदी अतिशय भयानक आहे . संपूर्ण खडकांना कापत येणारी ही नदी हत्या हरण किंवा हथनी नावाने प्रसिद्ध आहे . या नदीमध्ये स्नान केल्यावर सर्व हत्यांपासून लागलेली पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे . परंतु नदीमध्ये स्नान करणे इतके कठीण आहे की ज्याने खरोखर हत्या केली आहे तोच हिम्मत करेल ! आपले पूर्वसुरी किती हुशार होते पहा . मी ती नदी पार करण्याची हिम्मत न दाखवता बाजूला असलेल्या पुलावरून ती ओलांडली . वीस पंचवीस फूट खोल दगडी कडे होते . या रस्त्याने आपण आवली घाट या अतिशय विस्तीर्ण आणि प्रसिद्ध घाटावर येतो . हा घाट इतका औरस चौरस पसरलेला आहे की विचारू नका . जिथे जिथे नर्मदा नदीवर पूल आहे तिथे तिथे घाटावर गर्दी थोडी जास्त असते .  इथे कायमच जत्रा भरल्यासारखी गर्दी असते . सरकारने येथे सुंदर अशी भव्य शिवमुर्ती नंदिकेश्वर आणि उद्यान विकसित केलेले आहे . हे पर्यटकांचे आकर्षण झालेले असून ते पाहण्यासाठी देखील लोक येतात . तसेच हा संगम अतिशय पवित्र मानला जातो . त्यामुळे इथे स्नान करण्याकरता कायम झुंबड उडालेली असते . 
घाटावर आणि छोटी मोठी मंदिरे आहेत . दुकाने आहेत . हे सर्व वातावरण पाहायला मौज वाटते . पुढे मात्र अचानक नर्मदा वळण घेते आणि औरस चौरस पसरलेला घाट अचानक संपून काठावरून चालत जाण्याचा मार्गच नष्ट होतो . वाचकांच्या दर्शनाकरिता या घाटाची काही रूपे सोबत देत आहे . सर्वप्रथम आपल्याला हत्या हरण नदीचा संगम लागणार आहे . 
आवली घाट पुलावरून काढलेला हत्या हरण आणि नर्मदा नदी संगमाचा फोटो . हत्याहरण नदीचे पाणी नर्मदेमध्ये लवकर मिसळत नाही हे तुम्हाला प्रवाहात दिसणारा जलौघ पाहून लक्षात आले असेल .
इथे नदीपात्रात सर्वत्र खडकांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे हे अपघात प्रवण क्षेत्र मानले जाते .
ग्रामपंचायतीने तशा पाट्या जागोजागी लावलेल्या आहेत परंतु गर्दी खूप असल्यामुळे दुर्घटना काही टळत नाहीत
शीघ्र कृती दलाचे जवान आणि नौका इथे कायम तैनात असतात कारण पाण्याला गती व खोली खूप आहे .
भव्य दिव्य अवली घाट . घाट संपून अचानक उभा कडा कसा सुरू होतो ते या चित्रात दिसते .
महादेवांची ध्यानस्थ मूर्ती हे या घाटाचे अलीकडच्या काळात निर्माण झालेले उत्तम आकर्षण आहे .
मूर्ती किती भव्य आहे याचा अंदाज जवळ गेल्याशिवाय लागू शकत नाही
नंदीच्या अंगावर चढू नका अशी पाटी लावावी लागते हे किती मोठे दुर्दैव आहे ! .
खूप लांबून देखील ही मूर्ती दिसते . घाट खूपच विस्तीर्ण आहे .
इथला पूल त्याच्या मधल्या गोलाकार मोरीमुळे लक्षात राहतो . अन्य कुठल्या पुलाला असा गोलाकार मध्यभाग नाही . 
समोरच्या घाटावरून दिसणारा आवली घाट आणि महादेवाची मूर्ती
इथे पवित्र नर्मदा स्नानासाठी कायम अशी गर्दी असते
घाटावर प्रशस्त पार्किंग असल्यामुळे आणि गाडी घाटापर्यंत येत असल्यामुळे बसद्वारे किंवा गाडी द्वारे परिक्रमा करणारे परिक्रमावासी येथे आवर्जून येतात
एकंदरीत हा घाट लक्षात राहण्यासारखा आहे . 
हा घाट इतका प्रशस्त आहे त्यामुळे पुढे देखील काठाने रस्ता असेल असे वाटून मी पुढे चालत राहिलो . परंतु अचानक नर्मदा वळण घेते आणि काठाने चालायला रस्ताच नाही असे लक्षात आले . तरी देखील धाडस करून मी साधारण ३० फूट पुढे गेलो परंतु महादेव पिपऱ्या गावामध्ये ज्या पद्धतीने पाण्यामध्ये पडलो होतो तसेच काहीसे दृश्य इथे असल्यामुळे शांतपणे पुन्हा माघारी आलो . आपल्या चुकीच्या वागण्यामुळे नर्मदा मातेला त्रास व्हायला नको असा भाव त्यामध्ये होता . इथे जरी माझा मृत्यूचा संपर्क ठरला असला तरी फारच थोड्या वेळामध्ये तो पुन्हा एकदा येणार आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती ! होय त्या दिवशी मी अक्षरशः माझा मृत्यू माझ्या डोळ्यांनी पाहिला ! त्याचे असे झाले . . .


लेखांक चोपन्न समाप्त (क्रमशः )
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...