Wednesday, December 27, 2023

हरिश्चंद्र गड

 

दुपारचे साडे बारा वाजले. आम्ही हरिश्चंद्र गडासाठी सिन्नर-अकोले-राजूर-पाचनई मार्गाने निघालो. वाटेत चहा घेतला. रस्ता जरा लहान असला तरी खूप चांगला आहे. रहदारीही विशेष नव्हती. वातावरण थोडेसे ढगाळ असल्याने ऊन अजिबात जाणवत नव्हते. आजूबाजूचे डोगर, दऱ्या , नद्या, धरणाचे अडलेले पाणी यांचे देखावे असा नयनरम्य प्रवास होता.

पाणवठे

शेती

निळेशार आकाश, आणि विखुरलेले ढग

नदी

उत्तुंग डोंगर माथे

वाटेत एक वनखात्याची चौकी लागली. तेथे गाडीचे रु,१००/- व माणशी रु.३०/- भरून गडाकडे निघालो.

पाचनई गावात येऊन पोहचलो.
गावातले हनुमान मंदिर

पर्यटकांसाठी डॉर्मिटरीचीही व्यवस्था दिसली.

आदल्या दिवशीच पाचनईचे 'हॉटेल कोकणकडा' चे मालक श्री भास्करभाऊ यांचेशी संपर्क साधला होता. त्यांनी माहिती पत्रक, पार्किंगचे लोकेशन इ. ची माहिती पाठवली होती.

त्यानुसार त्यांच्या घरापुढील अंगणात येऊन पोहचलो. स्वत: भास्करभाऊ नव्हते पण घरच्यांनी व्यवस्थित स्वागत केले. फोन लागत नव्हता त्यामुळे आम्ही थोड्याच वेळात पोहचतो आहे व जेवणार आहोत हे सांगू शकलो नव्हतो. पण भूक लागली आहे सांगताच चूल पेटवून पटकन चार भाकरी टाकल्या.

कुतूहल म्हणून मी त्यांच्या घरात फिरूनही आले. जुळ्या मुलांसाठी एकसारखे कपडे आपण नेहमी बघतो इथे दिड वर्षाच्या मुलींसाठी दोन एकसारखे झोके बांधलेले दिसले.

पिठले तयारच होते. पिठलं भाकरी खाल्ली. मिळालेल्या वेळात फोन चार्ज करून घेतले . (नवीन फोन गाडीत असलेल्या चार्जरवर चार्ज होत नव्हता). आता पुढील २४ तास वीज नसल्याने फोन चार्ज करता येणार नव्हता तसेच नेटवर्कही असणार नव्हते. पण फोटोंसाठी फोन वापरावाच लागणार होता तो मात्र जपून. मोजकेच सामान बरोबर घेतले. तरी सुद्धा पाठीवरच्या पिशव्यांव्यतिरिक्त सतरंजी, स्वतःचे पांघरून वगैरे अशा दोन तीन पिशव्या घेऊन गड चढणे आम्हाला कठीण होते. पण सकुबाईने सर्व सामान उचलले आणि आमची काळजी मिटली. आमचा वाटाड्याही तीच होती आणि गडावर आमची सर्व व्यवस्थाही तीच पाहणार होती.

चढाईला सुरुवात करता करता चार वाजले.

प्रवेशद्वार

अजून ताज्या दमाचे असल्याने चढाई सोपी वाटत होती.

आता मात्र थोडा दम लागायला लागला

सखुबाई मात्र खांद्यावर, पाठीवर पिशव्या लटकावून, डोक्यावरच्या पिशवीचा तोल सांभाळत झरझर चालत होती आणि काही अंतर पुढे जाऊन परत आमची वाट बघत थांबत होती.

रस्ता कठीण होत चालला.

हा तर अगदीच कठीण पण आता शिड्या लावल्याने थोडा सोपा

काही ठिकाणी कठडे आहेत.

कातळावर सुंदर चित्र काढली आहेत.

संध्याकाळ व्हायला लागली . डोंगरमाथ्यांना सोन्याची झळाळी आली.

नदी पार करण्यासाठीअसलेला पूल. सध्या नदीला पाणी नसल्याने खालूनच जाता येते.

एका सपाट भागात पोहचलो


हरिश्चंद्रेश्वर मंदिर टप्प्यात आले

मंदिरापर्यंत पोहचता पोहचता अंधार पडायला सुरुवात झाली. मंदिर उद्या सकाळी परत येतांना बघा. सकूबाईची सूचना आली. आम्हाला वाटले आम्ही पोहचलो पण नाही. आमचा कॅम्प कोंकण कड्यावर होता. मंदिराच्या बाजूनेच कड्याला जायचा मार्ग आहे.

अजून जवळपास एक तासाची चढाई करायची होती. थोड्याच वेळात काळोख झाला. सोबत टॉर्च होते म्हणून बरे. धडपडत कसेबसे मुक्कामी पोहचलो. सकुबाईने पटकन चहाचे आधण चुलीवर चढवले.

आज आठवड्याचा मधला दिवस असल्याने पर्यटक नव्हते. माळावर फक्त दोन तंबू लागलेले दिसत होते. सकुबाईचे हॉटेल म्हणा, घर म्हणा किंवा झोपडी म्हणा जे काही होते ते प्रशस्त होते. तुम्ही म्हटला तर तंबू लावू पण आज गर्दी नाही त्यामुळे घरातच झोपला तरी चालेल असं सांगितल्याने आम्ही घरातच झोपायचे ठरवले.

रात्रीचं जेवण तयार होईपर्यंत थोडं झोपडीच्या बाहेर येऊन बसलो. मस्त गार वारा सुटला होता. जास्त वेळ मात्र बसवले नाही. परत घरात आलो आणि जेवायला बसलो.

दुपारपासून शहरी जीवनाचा संपर्क तुटला आहे. आज केक नाही, महागडे हॉटेल नाही, चमचमीत जेवण नाही, आरामदायी बिछानाही नाही पण आकाशात डोक्यावर अष्टमीचा चंद्र आणि त्याच्यापासून थोडेसेच अंतर राखून गुरुही ढगांच्या पुंजक्यातून डोकावून पाहत आहेत, चंद्राचा मंद शीतल प्रकाश आहे, चुलीवरचे अस्सल ग्रामीण जेवण आहे, झोपायला सारवलेल्या जमिनीवर चटई अंथरलेली आहे यापेक्षा चांगले वातावरण लग्नाचा वाढदिवस साजरा करायला कायअसू शकते.

चला ,आता झोपायला जातो आम्ही. पुन्हा भेटू लवकरच उर्वरित सहलीच्या निमित्ताने. शुभ रात्री!

आज थोडी उशिराच जाग आली. सूर्य उगवला नसला तरी चांगलाच उजेड झाला होता. ब्रश केला, तोंड वगैरे धुतले. बाकी प्रातःर्विधीसाठी शौचालय वगैरे काही नाही. पाण्याची बाटली भरून माळरानावरच झुडुपांच्या जाळीत जायचे.
सर्व आटोपून चहा घेतला आणि कोकण कडा पाहण्यासाठी निघालो. कडा अगदी बाजूलाच आहे. झोपडीजवळूनच कड्याच्या बाजूने सुरक्षेसाठी लावलेले कठडे दिसत होते.

दोन मिनिटात येथे पोहचलो.

कड्याजवळ पोहचताच अचानक अप्रतिम नजारा समोर येतो. कड्याहून समोरची खोल दरी व बाजूचे सरसोट कडे दिसतात. पायथ्याशी एक गावही दिसते.

आणि नजर पोहचेल तेथपर्यंतचा कोकण परिसर आणि सह्याद्रीचे कडे दिसतात.
मला नावं सांगता येणार नाही पण अनेक सुळके, डोंगरमाथे येथून नजरेस पडतात.


कडेकडेने फेरफटका मारत भरपूर फोटो घेतले.
रात्री माळावर लागलेले तंबू रिकामे झाले होते. माहितीसाठी तंबूंचा फोटो

तासभर फिरून झोपडीत परत आलो. सकुबाई नाश्त्यासाठी पोहे बनवत होती. गरमागरम पोहे खाल्ले.

आता पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. आणखी उंचावर जाऊन तारामती शिखर पाहता येणार होते. बालेकिल्लाही पाहता येऊ शकत होता पण दुपारपर्यंत खाली उतरून रात्री नऊ-दहापर्यंत मुंबईला परतणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे उतरतांनाच असणारे गणेश मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफा पाहण्याचे ठरले. सर्व ठिकाणे बाजुबाजुलाच आहेत.
तुम्ही व्हा पुढे, मंदिर बघा तोपर्यंत मी येतेच आवरून असे सकुबाईने सांगितल्याने आम्ही पुढे निघालो. जड सामानाच्या पिशव्या सकुबाई घेऊन उतरणार होती.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर दृष्टीपथात आले.

त्याआधी उजवीकडे वळून थोडेसे पुढे गेल्यावर काही गुफा आणि गणेश मंदिर आहे
गुफा

गुंफेतील गणेशमंदिर

गणेश मंदिराजवळच TrekKamp या नगरच्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरचे श्री. लाहोटी सर भेटले.

त्यांनीच आम्हाला मूर्तीबद्दल सांगतले की ही खूपच वैशिष्ठपूर्ण मूर्ती आहे जिच्यात श्री गणेशाचे लिंग दाखवण्यात आले असून अशा प्रकारची ही संपूर्ण भारतातील एकमेव मूर्ती आहे.

खाली उतरून शिव मंदिराकडे निघालो.
पाण्याचे टाके


बाजूलाच लहानसे मंदिर आहे

मंदिरासमोर सप्ततीर्थ समजले जाणारे पुष्कर्णी कुंड आहे. कुंडाच्या आतील बाजूने चौदा देवळ्या आहेत . सध्या यात मूर्ती नाहीत.

पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ शिवमंदिर आहे. मंदिराला दगडी तटबंदी आहे.
तटबंदीतील प्रवेशद्वार

आतमध्ये शिरताच दिसणारे सुंदर मंदिर

मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूने नंदी देखील आहेत.

शिवलिंग

पश्चिम दरवाजाकडील मंदिराचे खांब

मंदिराची दक्षिणेकडील बाह्य भभिंत व गणेश मूर्ती.

मंदिराची उत्तरेकडील बाजू.

मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि प्रागंणात अनेक कोरीव शिल्प आहेत.

मंदिर पाहून बाहेर आलो. थोड्या वेळापूर्वी भेटलेले लाहोटी सर नगरच्या शाळकरी मुलांचा ग्रुप घेऊन आले होते व प्रश्नोत्तर स्वरूपात मंदिराबद्दल छान गोष्टी समजावून सांगत होते.

आम्हीही बाजूला बसून ऐकू लागलो. त्यांच्या बोलण्यात चांगदेव ऋषी व त्यांच्या गुफेच्या उल्लेख आला. आम्ही मंदिर पाहून आलो होतो पण आम्हाला गुफा दिसली नव्हती.
त्यांना माहिती विचारून परत मंदिरात गेलो. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या गुफेत एक चौथरा आहे. येथे एक पालखी ठेवली आहे ती बाजूला सारून पाहिल्यास कातळात कोरलेली छोटीशी अंधारी खोली दिसते तीच ही गुफा चांगदेव ऋषींनी येथे बसून अनेक वर्षे तपश्चर्या केली असे सांगतात.

मंदिराच्या उत्तरेस असलेल्या घळीत केदारेश्वर गुफा आहे.

गुफेच्या आत पाणी असून पाण्यातच एक चौथरा आहे, त्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चारही कोपऱ्यावर आधारासाठी छतापर्यंत खांब होते. तीन खांब तुटलेले असले तरी एक शाबूत खांब आणि दोन अर्धवट खांब त्यांचे अस्तित्व दाखवतात. गुंफेतील थंड पाण्यातून याला प्रदक्षिणाही मारता येते.

मंदिर परिसरात अनेक वीरगळ, मूर्ती आढळतात.

दुपारचे बारा वाजायला आले. गड उतरायला सुरुवात केली. वाटेत एके ठिकाणी नदीच्या थंडगार पाण्यात पाय सोडून आराम केला.

आज उतरतांना लिंबू सरबतही मिळाले. कपारीतच दगड रचून त्यामागे सामान ठेवायची खोली होती. संध्याकाळी सगळे सामान आतमध्ये ठेवून नंतर दगड रचून कपार बंद करून जातात. माकडांपासून संरक्षण.

उतरतांना एक शेवटचा फोटो घेतला.

साधारण दोन-सव्वादोन पर्यंत पाचनई गावात येऊन पोहचलो. भास्कर कुटुंबीयांनी जेवणासाठी आग्रह केला पण घरी पोहचण्यास उशीर झाला असता म्हणुन लगेच निघालो. नेटवर्क नसल्याने रस्त्याचा गूगल नकाशा मिळत नव्हता. विचारत विचारत निघालो. येतांना राजूर मार्गे आलो होतो. आताही राजूरलाच जायचे होते पण रस्ता वेगळा होता आणि बराचसा खराबही होता. राजूरला पोहचलो. येथे ठिकठिकाणी कंदी पेढे बनवून विक्री करणारी दुकाने दिसत होती. वाटण्यासाठी म्हणून थोडे पेढे घेतले. येथेच चहापाणी घेतले व भंडारदरा-घोटी-ठाणे मार्गे रात्री दहाला नवी मुंबई गाठली

मला तांत्रिक बाबी सांगता येणार नाहीत पण गाडी ऍटोमॅटिक असल्याने घाटांमध्ये चढावावर गाडी हळू झाली किंवा अगदी थांबली तरी परत वर चढण्यास अजिबात त्रास झाला नाहीं. सर्व प्रवास अगदी आरामात झाला.
खर्च:
* पेट्रोल व टोल - रु.१२००/ प्रत्येकी
* गडावरील चहा, नाश्ता, दोन वेळेचं जेवण, रात्री राहण्याची व्यवस्था - रु.५००/ प्रत्येकी
* इतर खर्च : रु.८००/ प्रत्येकी
* दोन दिवसांचा एकूण खर्च - रु.२५००/- प्रत्येकी

समाप्त

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...