Sunday, December 17, 2023

सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय

 https://www.maayboli.com/node/84458

लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असल्यानं थोडं सांभाळून घ्या.
या वर्षी राजस्थान ची सहल करावी असा मानस होता. पण आमचे चिरंजीव यांचं आसाम ला पोस्टिंग झालं अन मग ठरवलं या वर्षी पूर्वोत्तर राज्य.
नोव्हेंबर महिन्यात नियोजन करायचे ठरले पण दसरा आन दिवाळी यामुळे विमान प्रवासाचे चढे दर त्यामुळे डिसेंबर महिन्यात जाण्याचे पक्के केले.
जाताना पुणे ते दिल्ली व दिल्ली वरून गोहाटी या साठी स्वस्त म्हणून एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनी ची तिकीट बुक केली. तसेच येताना गोहाटी ते पुणे इंडिगो ची तिकीट बुक केली.
पण प्रवास निर्विघन होईल तो प्रवास कसला. जाण्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता एअर लाईनचा फोन आला. तुमचं विमान उशिरा सुटणार आहे. जोडून असणारी फ्लाईट हि पोहोचण्या अगोदर सुटत होती. बरीच फोना फोन झाली. वाद विवाद, शेवटी एअर इंडिया एक्सप्रेस ला शिव्या घालत सगळं रिफंड घेतला आणि घाईने त्याच दिवशीचे तिकीट बुक केले. या मुले एकवीस हजाराचा भुर्दंड पडला. वाचकांना विनंती आहे कि एअर इंडिया एक्सप्रेस ची तिकिटे बुक करताना काळजी घ्या. पुणे, गोहाटी या ठिकाणाची या एअर लाईन्स ची विमाने उशिरा सुटत होती.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या सौं. खरेदी करत होत्या. लाडक्या अन एकुलत्या एक लेकाकडे जायचे म्हणून खुश होत्या. त्याला आवडणारे पदार्थांची यादी वाढतच जात होती. शेवटी लक्षात आणून दिले कि विमानात वजन न्यायला मर्यादा असते.
शेवटी सर्व सोपस्कार उरकून विमानात बसलो आणि गोहाटी साठी उड्डाण केले. पहाटे गोहाटीला पोहचलो. विमानतळ बाहेर येताच थोडी भीती वाटली. सैन्याची चिलखती गाडी अन त्याच्या वर बसलेला स्टेनगन धारी जवान असं दृश्य पाहून कोणालाही भीती वाटावी. पण इथे नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था असते असे ड्रायव्हरशी बोलताना समजले. आमची टुरिस्ट कार ठरवलेच होती. पूर्वोत्तर राज्यात टुरिस्ट कार चे दर ठरवताना काळजी घ्यावी लागते. इथे पेट्रोलचे दर रु. ९६ ते ९८ प्रति लिटर आहेत. त्यामुळे टुरिस्ट कार नऊ रुपये प्रति किलोमीटर या दराने मिळते. पण रुपये अठराशे हा फिक्स चार्ज असतो. म्हणजे तुम्ही दिवसात अगदी शंभर किलोमीटर फिरलात तरी नऊशे अधिक अठराशे असे दोन हजार सातशे रुपये द्यावे लागतात. माझ्या मूलाने बर्याच ठिकाणी चौकशी केली पण गोहाटी मध्ये सर्व ठिकाणी टुरिस्ट कार साठी हाच दर होता. या मध्ये रस्त्याचे टोल, ड्रायव्हरचे जेवण, राहणे सर्व समाविष्ट असते त्यामुळे आपल्याला काही पाहावे लागत नाही. सर्व रिसॉर्ट, हॉटेल नि ड्रायव्हरच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय केलेली असते.
गोहाटी ते काझीरंगा नॅशनल पार्क हा प्रवास दोनशे किलोमीटरचा आहे. या साठी चार ते साडेचार तास लागतात. काझीरंगा पार्क जवळ प्रत्येक पाचशे मीटरवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर आहेत. पावसाळ्यात प्राणी रस्त्यावर येतात तसेच रात्री हि रस्त्यावर येतात. मधेच थांबून अल्पोपाहारासाठी ब्रेक घेतला. इथे नाश्त्यासाठी पुरी भाजी छान मिळते. स्वच्छ सुंदर हॉटेल होत इथेच फ्रेश झालो अन तासाभरातच वाईल्डर नेस्ट हॉटेलवर पोहचलो.
स्वच्छ , सुंदर निसर्गरम्य वातावरणातील रिसॉर्ट पाहून मन प्रसन्न झाले. प्रवासाचा सिन होताच त्यामुळे फ्रेश झाल्यानंतर जेवण करून आराम करणे पसंत केले. चार वाजता पहिली भेट द्यायला निघालो ते ओर्चीड पार्कला. पूर्वेकडे लंबक सूर्यास्त होतो त्यामळे अंदाज चुकला. चार वाजता इथे संध्याकाळ होते त्यामुळे पूर्ण पार्क पहाता आले नाही. इथे जवळ जवळ दोन हजार देशी विदेशी झाड, फुलझाडं, वेळी जातं केल्या आहे. याची सर्व भाषेत माहिती देण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. हि सर्व रोप लाकूड तसेच विटांचे तुकडेआणि कोळसा वापरून लावलेली आहेत.
या पुढे लगेच आसाम मधील पारंपारिक वाद्यांचे संग्रहालय आहे. यातील काही वाढे हि म्हशीच्या शिंगा पासून बनवलेली आहेत. येथील स्वयंसेवक श्री इमू यांनीही सर्व वाद्यांची माहिती दिली तसेच काहीही वाध्य वाजवून व गाऊन दाखवली. हि सर्व वाध्य त्यांचे गुरु श्री गोगोई यांनी बनवली आहेत. इथं कोणत्याही गोष्टीला हात लावण्यास परवानगी नाही किंवा कोणत्याही वाध्य वाजवण्यास पर्यटकांना परवानगी नाही पण काही अति उत्साही पर्यटक आणि लहान मुले या मुले स्वयंसेवक त्रासून गेले होते. या नंतर होते ते आसाम मधील सामाजि संस्कृती दर्शविणारे संग्रहालय. आसाम मध्ये हिंदू व्यतिरिक्त बोडो, कोरबी अशा बर्याच जाती जमाती आहेत. यांची जुन्या काळातील शेती अवजारे, शिकारीची हत्यारे, वेषभूशा,, मासे पकडण्यासाठी बांबूची सापळे, होड्या तसेच हातमागावर विणले जाणारे कपडे. कपडे विक्री साठी होते पण दर पाहिल्यानंतर घेण्याची हिंमत झाली नाही. अंधार पडल्यामुळे उत्तर काही जसे बांबूचे बन व आणखी काही कलाकृती पहाता आल्या नाही.
या नंतर येथील खास आकर्षण म्हणजे इथला सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी दिल्ली वरून काही विधार्थी आले होते. तरुणांचा भरणा प्रेक्षकात जास्त होता. या कार्क्रमात आसाम मधील वेग वेगळ्या जमातीचे पारंपारिक नृत्य, गाणी आणि वाध्ये यांचा सुरेख संगम होता. आसाम मधील प्रमुख सण बिहू हा संक्रातीच्या काळात साजरा होतो. या मधील नृत्याचे सादरीकरण सुरेख होते. तसेच नागा नृत्य, मणिपुरी, अरुणाचल प्रदेश मधील कला सुंदर रिर्तीने साजऱ्या केल्या.
आसामी शास्त्रीय नृत्य प्रकार हा शास्त्रीय नृत्य व योग याचा सुरेख संगम होता. याच सादरीकरण फार सुंदर होत. कार्यक्रम संपला अन थंडीचा कडाका बाहेर आल्यावर जाणवला. मोबाईल वर चेक केले तर तापमान १२ डिग्री होते. अशातच तेथील नागा जाकीट खूप आवडले होते पण हातमागावर विणले असल्याने किमंत खूप होती त्यामुळे नाद सोडून दिला. पूर्वोत्तर राज्यात प्रत्येक ठिकाणी पॅकिंग फी आणि प्रवेश फी आहे. ओर्चीड पार्क साठी एकूण रुपये ४५० इतकी फी आहे. थंडी सहन होण्य पलीकडची होती त्यामुळे लवकरच रिसॉर्ट चा रास्ता धरला. थोडं तीर्थ प्राशन केल्या वरही थंडी कमी होईना. पण सौ. चे मोठे झालेले डोळे पहिले, जेवण केले अन मुकाट हिटर लावून झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून अभयारण्य पाहायला जायचे होते.
काझीरंगा नॅशनल पार्क पाहण्यासाठी जीप सफारी आणि एलिफन्ट सफारी असे दोन प्रकार आहेत. बहुतेक लोक जीप सफारी ला पसंती देतात. जीप सफारी साठी रुपये तीन हजार इतका चार्ज पडतो त्यामध्ये सरकारी फी समाविष्ट असते. जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर त्याचे वेगळे पैसे. डी एस एल आर असेल तर थोडे जास्त पैसे. जीप मध्ये चार लोक बसू शकतात. आत मध्ये कोणतेही खाण्याचे पदार्थ नेता येत नाहीत. अभयारण्याच्या एंट्रीलाच लांब पल्ल्याच्या दुर्बीण भाड्याने मिळतात. रुपये ३०० ते २५० इतका चार्ज लावला जातो. तुम्ही गेलात तर जरूर घ्या. कारण प्राणी दूरवर असतात. दुर्बीण असल्यानं सहज पहाता येतात. प्रवेश करताच जवळच हरणाचा कळप चरत होता. काही हरिणी निवांत रवंथ करत बसल्या होत्या. सफारी जीप उघडी असल्याने चारी बाजूला पहाता येत होते. अगदी उभं राहून हि पाहता येते. फक्त कुठे हि खाली उतरता येत नाही. कोणताही प्राणी कधीही तुमच्या वर हल्ला करू शकतो. या नंतर रस्त्याच्या कडेला शांत पाने चारणारे गवा दिसला. मजबूत शरीर यष्टीचा, पल्लेदार शिंगे अन पायावर पांढरा रंग मोठा डौलदार प्राणी आहे. यानंतर झाडावर बसलेले नीलकंठ, हॉर्नबिल पक्षी ड्रॉयव्हरने दाखवले. ड्रायव्हरला बोलता करा. तो भरपूर माहिती देईल. यानंतर गवताळ प्रदेश चालू झाला. अचानक गवतातून रानडुक्कर रस्त्यावर आले. थोडा वेळ थांबलो , ड्रायव्हर ने सांगितले कि वाघ दिसण्याची शक्यता आहे पण डुक्कर रस्ता पार करून गेले. पुढे निघाले वाटेत वाघाचे पंजे धुळीत उमटलेले दिसले. थोड्याच वेळात काझीरंगा नॅशनल पार्क चे वैभव एक शिंगी गेंडा रस्त्यावर उभा होतो. शरीरावर चिलखती आवरण असणारे गेंडे २००० च्या संख्येने आहेत. पुढे एक तळे होते पलीकडे रानटी हत्तीचा कळप चरत होता. लहान मोठे १५ हत्ती तरी असावेत. शक्य तेवढे मोबाईलने फोटो घेतले. एका ठिकाणी तळ्यात मोठ्या प्रमाणात कासवे होती. पलीकडे उन्हात दोन गेंडे शांतपणे उन्हात पडले होते. ड्रॉयव्हरने एके ठिकाणे गाडी थांबवली. या ठिकानि टॉवर बांधला उतरून टॉवर चढून जंगल पहाता येते. दोन तास झाले होते. सर्व प्राणी पाहून झाले पण वाघोबाने दर्शन दिले नाही. पण आमचे नशीब जोरावर होते. परतीच्या प्रवासात अचानक एक रान डुक्कर समोरून गेले अन त्या पाठोपाठ वाघ रस्त्यावरून पलीकडे उडी मारून गवतात नाहीसा झाला. वाटलं याच साठी केला होता अट्टाहास.
हॉटेल वर पोहचताच तिथल्या लोकांनी सांगितलं जवळ १५ किलोमीटरवर काको चँग धबधबा आहे. मग निघालो धबधबा पाहायला. जवळ पोहचल्या नंतर पुहे दोन किलोमीटर चालत जायला लागले. चांगलीच पायपीट झाली पण धबधबा पहिल्या नंतर मात्र सगळा त्रास विसरून गेलो. वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद, वरून पडणारे फेसाळते स्वच्छ नितळ पाणी, मस्त मजा आली. वाटेत बांबू मध्ये शिजवलेले मटण दिसले पण चौकशी केल्यावर ते पोर्क आहे असे समजले. हॉटेलवर येऊन चेक आऊट करून परत गोहाटीला निघालो. निघायला साडेचार वाजले होते. थोड्याच वेळात पूर्ण अंधार पडला. वाटेत पुन्हा एकदा गेंड्यान दर्शन दिले.

क्रमश.

Submitted by सातारी जर्दा on 21 December, 2023 - 11:47

भाग - २
सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय
काझीरंगा नंतर परत गोहाटी ला आलो. वाटेत मुलांसाठी भाजी आणि सुवासिक तांदूळ घेतला. जो शिजवताना सुंदर वास येत होता अन खायलाही चवदार होता. सकाळी उठून शिलॉंग (मेघालय ) ला जाण्यासाठी निघालो. शिलॉंग गोहाटी पासून जवळ आहे. दोन तासात पोहचता येते. वाटेत नाष्ट्या साठी थांबलो. जिवा हि हॉटेल ची साखळी पूर्ण उत्तर पूर्वे कडे आहे. स्वच्छ व चवदार खाध्य पदार्थ योग्य किमतीत मिळतात. मेगालय म्हणजे पूर्ण पर्वतीय प्रदेश. येथे खासी हिल, गारो हिल आणि जयंतीया हिल असे तीन भाग पडतात. खासी हिल येथे खासी जमातीचे पण धर्माने कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतात. गारो हिल येथे गारो जमातीचे पण धर्माने बाप्टिस्ट ख्रिश्चन लोक राहतात. तर जयंतीया हिल येथे हिंदू लोक राहतात. मी जो भाग फिरणार होतो तो पूर्व खासी हिल हा भाग होता. खासी लॉग स्वभावाने थोडे उर्मट असतात असे ऐकले होते. प्रवासात याचा अनुभव आलाच. एक तर तिथले रस्ते अरुंद, त्यामध्ये यांची प्रवासी वाहने वेडी वाकडी उभी केलेली. याना बोलण्याची सोय नाही नाहींतर हे लोक माझे इकडे येणे बंद करतील. असे ड्रायव्हरने सांगिंतले. बाहेरील लोकांनी येथे येऊन व्यवसाय करणे त्यांना पसंद नाही. असेही पर्यटन, प्रवासी वाहने आणि होमस्टे या व्यतिरिक्त तेथे फारसे व्यवसाय नाहीत.
आमचे पहिले भेट देण्याचे ठिकाण शिलॉंग पीक हे होते. हा भाग म्हणजे शिलॉंग शहराच्या अगोदर जो उंच डोंगर आहे त्या वरून शिलॉंग शहर पाहणे. या टेकडी वर भारतीय हवाई दलाचा तळ आहे. या तळामधून जावे लागते. पण आपण आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाही. इथून स्थानिक लोकांची टॅक्सी घेऊन जावे लागते. यासाठीचा दर रुपये ३०० होता. इथून संपूर्ण मेघालय मध्ये पार्किंग फी , प्रवेश फी असे पैसे द्यावे लागतात. मेघालय सरकारने स्थानिक लोकांच्या रोजगार साठी हि सोय केलेली आहे. हवाई दल विभागाच्या एरिया मध्ये प्रवेश करताना ओळख पत्र (आधार कार्ड) दाखवावे लागते. बहुतेक विदेशी नागरिकांना इथे प्रवेश नाही. या एरिया मध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही. फार मोक्याची ठिकाणी हा तळ आहे. इथून म्यानमार, बांगलादेश येथे लक्ष ठेवता येथे तसेच अरुणाचल प्रदेश, चीन लगत ची सीमा येथे लवकर मदत पोहचवता येते.
हवाई दलाचा तळ पार केल्यानंतप्रचंड सरोवर लागते. र कोणतीही बंदी नाही. छान बाग आहे. दोन टॉवर बांधले आहेत. इथून डोंगराच्या कुशीत वसलेले शिलॉंग शहराचं विंगम दृश्य दिसते. इथे काही दुकान आहेत्या पैकी एका दुकानात तेथील पारंपरिक खासी वेष भूशा (कपडे) भाड्याने मिळतात तेही अगदी माफक दारात. रुपये १०० प्रति ड्रेस. फक्त फोटो आपल्या कॆमेराने काढावे लागतात. फोटो काढण्यासाठी तेथील लोक मदद करतात. आम्ही तेथिल ड्रेस भाड्याने घेऊन फोटो काढले. तिथे असणाऱ्या मुलीने छान फटो काढले. थोड्याशा त्यांचे गप्पा झाल्या.
या नंतर निघालो ते एलिफंट वॉटर फॉल पाहायला. डोंगराच्या कुशीत वाहणारा हा धबधबा, त्याच बरोबर तिथे असणारे सुंदर बगीच्या पाहण्यासारखे आहे. पाऊस नसल्याने पाणी थोडे कमी होते पण जे होते ते अतिशय सुंदर होते. या ठिकाणी हत्तीच्या आकाराचा दगड होता त्यावरून पाणी खाल्ली पडायचे पण काही वर्षा पूर्वी झालेल्या भूकंपाने हा दगड कोसळला. त्याचे नाव ब्रिटीशानी एलिफंट फॉल दिले ते आज हि तसेच आहे. या साठी जवळ जवळ सत्तर ते ऐंशी पायर्या खाली उतरून जावे लागते. थंड वातावरण असल्याने बिलकुल दमायला होत नाही. बाग मात्र दुरूनच पाहिली. खाली उतरल्या नंतर बागेत जायला रस्ता नाही वर चढून दुसर्या बाजूने जावे लागते. त्यामुळे तिथे जाणे टाळले. इथे जेवणाचे पर्याय फारसे नाहीत त्यामुळे थोडे खाऊन पुढे निघालो.
पुढचे भेट देण्याचे ठिकाण होते, सॅक्रेड फॉरेस्ट म्हणजे पवित्र जंगल थोडक्यात आपल्याकडे देवराई असते तसे जंगल. इथे पूर्वी मेघालय मधील राजघराणे येऊन वन देवीची पूजा करायचे आणि तिथे प्राण्यांचा बली द्यायचे.आजही बळी दिलेल्या प्राण्यांचे अवशेष तिथे दिसतात. इथल्या झाडांची पूर्ण माहिती तसेच त्याचे शास्त्रीय नाव, त्याचे उपयोग याची माहिती दिली जाते. तिथे अर्जुन वृक्ष तसेच रुद्राक्ष वृक्ष विपुल प्रमाणात आहेत. या जंगलात प्रवेश केल्या नंतर कोणताही नैसर्गिक विधी जसे कि लघवी किन्वा अन्य करता येत नाही. याची पूर्व सूचना दिली जाते. चार वाजत आले होते अन जोरदार थंडी पडायला सुरवात झाली. अशातच डावा खांदा धुखायला लागला. थोडी भीती वाटायला लागली उगाच आशंका पण लक्षात आले माझे जुने फ्रोजन शोल्डर चे दुखणे चालू झाले होते. गाडीत बसलो बरोबर असणारी शाल पांघरली अन शिलॉंग कडे प्रयाण केले. शिलॉंग शहरात पोलीस बाजार प्रसिद्ध आहे. मला आपल्याकडच्या चोर बाजार ची आठवण झाली. दुःकणारा खांदा अन दिवसभराचा थकवा या मुळे हॉटेल वर जाणे पसंद केले. हॉटेल गोल्फ रिट्रीट हे शिलॉंग मधील गोल्फ कोर्स शेजारी आहे.
क्रमश.

सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय - भाग - 3

Submitted by सातारी जर्दा on 27 December, 2023 - 10:06

भाग - 3
सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय
आमचा पुढचा पाडाव होता चेरापुंजी. भारतातीलच काय पण जगातील सर्वात जास्त पाऊस पाडण्याचे ठिकाण. येथे भेट देण्याचा कालावधी हा ओक्टोम्बर ते नोव्हेंबर हा
आहे. सर्व प्रथम आम्ही लाइटलूम व्हिलेज या ठिकाणी भेट दिली. हे एक खोल दरीत वसलेले खेडे आहे. तीन बाजूनी ताशिव कडे खाली चार हजार फूट खोल दारी त्यातून वाहणारी नदी, दरीच्या तळाशी वसलेले खेडगाव. पूर्वी या गाव साठी रास्ता नव्हता. दरीतून जाणारी पायवाट, पाऊल थोडे घसरले तरी कपाळ मोक्ष. आता येथील सरकारने जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहे. वरून पहिले असता गावात सर्व सुख सोयी दिसतात. अनेक प्रयत्न करून लोकांनी सायकल व मोटार सायकल खाली नेल्या आहेत. पण फक्त गावात फिरता येते बाहेर जात येत नाही. कारण बाहेर जायला रस्ताच नाही. तरीही इथले लोक हसतमुख आहेत. त्यांची कोणतीच तक्रार नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी साठी हे लोक दोन तास चार हजार फोट वर चढून येतात. आयुष्यात नेहमी तक्रार करणाऱ्या लोकांना हे खेडेगाव जरूर दाखवले पाहिजे. इथे एका ब्रिटिश कुटुंबाची भेट झाली. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. तरीही एक प्रश्न भेडसावत होता. इतक्या खोल दरीत पहिले कोण राहायला गेले असेल अन कसे?
या नंतर निघालो ते गार्डन ऑफ केव्ह्ज आणि अवरोह केव्ह्स पाहायला. गार्डन ऑफ केव्ह्स हे डोंगराच्या कपारीत नैर्सर्गिक रित्या तयार झालेल्या गुहा आहेत. त्यातून वाहणारे स्फटिक शुद्ध नितळ पाणी, कोसळणारे धबधबे,, अतिशय सुनंदार अन मनाला थंडावा देणारे ठिकाण. अवरोह केव्ह्स साठी मात्र कुह्प पायपीट करावी लागते. तिथून डोंगराच्या पोटात आत मध्ये जाऊन ह्या गुहा पाहाव्या लागतात. चेरापुंजी मध्ये मात्र निराशा झाली. इथले सेवन सिस्टर्स धबधबे पावसाळ्यात चालू असतात. इथला केवळ एक धबधबा क्षीण पने वाहत होता. इथे एक सुंदर गार्डन आहे. स्थानिक शाळातील मुले मुली सहली साठी आली होती. या बागेतून पाहिल्या नंतर खाली खोल दरी अन समोर बांगलादेश दिसत होता. पण रस्त्यामध्ये आमच्या ड्रायव्हरने नोखालीकाई धबधबा दाखवला. तीन हजार फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासारखा आहे. चार वाजत आले होते अंधार पडायला सुरवात झाली अन रॉसॉर्ट वर परत आलो. सुलावाडो रिसॉर्ट हे चेरापुंजी मधील एक सुंदर आणि सर्व सुखसोयीने युक्त असे रिसॉर्ट आहे.
इथल्या स्थानिक लोंकाशी गप्पा मारल्या नंतर एक वेगळी गोष्ट लक्षात आली. इथे सर्व ठिकाणी म्यानमार प्रमाणे मातृ सत्ताक कुटुंब पद्धती आहे. म्हणजे लग्न झाल्यांनतर पुरुषाला पत्नी कडे नांदायला जावे लागते. वडिलांची सर्व प्रॉपर्टी मुलींच्या नावे असते. मुलांचा हिस्सा वडिलोपार्जित मालमत्ते मध्ये नसतो. आता थोडा बदल झाला आहे. मुलगी ठरवते कि मुलाच्या घरी जायचे कि मुलाला इकडे आणायचे. शिकलेले आणि नोकरी असणारे मुला कडे मुली जातात. इथे भात शेती अन सुपारीचे पीक विपुलप्रमाणात येते. इथून सुपारी निर्यात केली जाते.
चेरापुंजी चे तापमान रात्री अजून घसरले. दहा डिग्री से. दाखवत होते. सकाळी लवकर उठून चेक आउट केले अन डावकी रिव्हर पाहायला निघालो. इथून जाताना प्रथमच रस्ता खराब होता. उंच डोंगर, खोल दऱ्या, कठडे नसलेले भीतीदायक रस्ते. इथले डोंगर ठिसूळ आहेत. वाटेत लँड स्लाईड झालेले दिसत होते. इथेही खान माफियांनी उच्छाद मांडलेला आहे. इथे पिवळा आणि पांढरा दगड आहे. पांढरा दगड खाडी आणि वाळू तयार करण्यासाठी वापरता. खान माफियांनी बरेच डोंगर पोखरले होते. शेवटी खराब रस्त्याशी लढाई देत अखेर पॉंगतोग या ठिकाणी पोहचलो. तिथेच रस्त्या लगत ब्रा री वार रिसॉर्ट आहे. तिथे राहण्याचे पक्के करून चेक इन केले. पाच हजार अधिक कर असा दर आहे. इकडे सर्व ठिकाणी रिसॉर्ट ला हाच दर आहे. होम स्टे घेतला तर पंधराशे ते तीन हजार पर्यंत दर आहे. पण जेवनाची थोडी गैरसोय होऊ शकते. रिसॉर्ट मधून निघालो ते डावकी रिव्हर कडे, हि नदी म्हणजे भारत बांगलादेश यांची सीमा. बराच प्रवास करून शेवटी नदी जवळ पोहचलो. पण इथे ट्राफिक जाम होते. भारतातून बांगलादेशात दगडांची निर्यात होते. आश्चर्य वाटले ना? हे सर्व दगड बंगला देशातील सिमेंट फॅक्टरीत सिमेंट बनवण्यासाठी जातात. नदीवर ब्रिटिश कालीन १९३२ मध्ये बांधलेला पूल आहे. त्यावरून सर्व वाहतूक चालते. पोहचल्या नंतर भूर भूर पाऊस सुरु झाला होता. आमच्या गाडीत एक छत्री होती अन माझ्याकडे एक जर्किन. काम भागून गेले पण इथे जातं कधीही पाऊस येऊ शकतो याची जाणीव ठेवावी. नदी जवळ पोहचताच एजंट लोकांचं पटवा पटवी सुरु होते. पण त्यांच्या जवळ न थांबता आम्ही सरळ जिथे बुकिंग होते त्या ठिकाणी गेलो. डावकी नदीत बोटिंग ची फी आठशे रुपये अन हजार रुपये अशी आहे. इथले वैशिष्ठ म्हणजे स्फटिक शुध्ध, नितळ पाणी अगदी तळ दिसतो, जलचर दिसतात, इथे रंगी बेरंगी दगड आहेत. काही गोळा करून मी आणले. नदीतील बेटावर थांबलो. इथे कॅम्पिंग ची सोय आहे. एका रात्रीस तीन हजार असा दर आहे. इथे मॅगी, अननस असा नाश्टा केला अन बोती वरून परतीच्या प्रवासाला निघालो. येताना मात्र पलीकडच्या तीरावर उतरलो. बांगलादेश च्या भूमीवर पाय ठेवला. तेथील एकाने जय बांगलादेश म्हणून स्वागत केले मग मी हि आमार बांगला सोनार बांगला म्हणत प्रतिसाद दिला. सगळे गोळा झाले. थोडी चर्चा झाली. क्रिकेट , शेख मुजिबर रहमान, सध्याची राजकीय स्थिती या वर बोललो. भारता बद्दल बांगलादेश नागरिका मध्ये विशेष आपुलकी आहे. तिथून सरळ निघालो ते सीमेवरील मैत्री गेट ला, इथे BSF चे जवान होते त्यांनी फोटो काढले. त्यांच्याशी गप्पा झाल्या. सरकार BSF जवानांची जुनी पेन्शन योजना सुरु करत नाही या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. खरंतर अर्ध सैनिक दलातील जवानांना, आर्मी प्रमाणे पेन्शन योजना पाहिजे. अंधार झाला होता, भीजल्या मुळे थंडी वाजत होती त्यामुळे हॉटेलवर जाणे पसंद केले. हा दोन तासाचा प्रवास होता. वाटेत गावाजवळ दोन वेळा अतिशय घाणेरडा दुर्गंध जाणवला. येथील लोक कच्ची सुपारी पाण्यात भिज़त घालतात. त्यावरचे आवरण सडले कि असा वास येतो अन ती ओली सुपारी खाण्यासाठी वापरतात असे कळले. लवकरच रिसॉर्टला पोहचलो. सहा वाजता काळोख झाला होता. पाऊस चालू होता.
दुसऱ्या दिवशी निघालो ते रूट ब्रिज आणि क्लीन व्हिलेज पाहायला. रूट ब्रिज हा झाडांच्या मुळा पासून ओढ्यावर तयार झालेला पूल आहे. त्यावर लाकडी फळ्या टाकून चालण्यासाठी सोय केलेली आहे. इथेही छोटा धबधबा, रांजण खळगे आणि स्फटिक शुद्ध नितळ पाणी असा निसर्गाचा चमत्कार आहे.
क्लीन व्हिलेज हे आशिया खंडातील पहिले स्वच्छ खेडे आहे. दोनशे वर्षा पूर्वी इथे भयानक महामारी आली होती. भरपूर लोक मृत्यूमूखी पडले. त्यावेळी शासन व्यवस्था हि नव्हती. जाण्यास रस्ता नाही. असा वेळी ख्रिस्ती मिशनरी मदतीस धावून आले. त्यांनी इथल्या लोकांना स्वच्छता शिकवली. थंड वातावरण असल्याने येथील लोक रोज अंघोळ करणे. पौष्टिक खाणे अशा गोष्टीची सवय नव्हती. इथे आता पूर्ण स्वच्छता आहे. शंभर वर्षा पूर्वीचा जुना सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. दोन ठिकाणी, बांबू अन झाडांच्या साह्यानं बांधलेला तीस फूट स्काय वॉक आहे, त्यावरून पूर्ण क्लीन व्हिलेज आणि आजूबाजूचा निसर्ग पाहता येतो.
सर्व पाहून गोहाटीला परत निघालो. पाऊस झाल्याने संपूर्ण डोंगर धुक्यात हरवून गेले होते. इथे एवढे जंगल असून कोणताही प्राणी दिसला नाही किंवा तसे आढळले नाही. केवळ रातकिडे चा आवाज आणि कान बधिर करणारा सूनsssssss न असा आवाज करणारा अगदी छोटा कीड आढळला.
क्रमश:









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...