Wednesday, December 27, 2023

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर

 बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले.

ठरल्याप्रमाणे पहाटे बरोबर साडे पाचला नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला. ठाणे, शहापूर, इगतपुरी मार्गे नऊ वाजता घोटीला पोहचलो. येथे उजवीकडे वळण घेत जुन्या मार्गाने सिन्नरला पोहचायचे होते. भूक लागली होती आणि सकाळच्या औषध गोळ्याही घ्यायची वेळ झाली होती . त्यामुळे वळल्यावर बाजूच्याच ढाब्यावर झणझणीत वडा रस्सा खाल्ला, चहा घेतला आणि पुढे निघालो.

चुकून समृद्धी मार्गाला लागलो पण पुढे एका ठिकाणी रस्ता बंद असल्याने माघारी फिरून परत योग्य रस्ता पकडला आणि अकरा वाजता गोंदेश्वर मंदिराजवळ येऊन पोहचलो.

मध्यावरचे मुख्य शिव मंदिर आणि चार उपदिशाना असलेली गणेश, विष्णू , पार्वती आणि सूर्य यांची चार मंदिरे यामुळे हे शैवपंचायतन म्हणून ओळखले जाते.
पुरातत्त्व खात्यातर्फे लावलेल्या फलकावरील माहिती जशीच्या तशी -
गोंदेश्वर महादेव मंदिर
गोंदेश्वर महादेव दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण संरक्षित आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर अंदाजे इ. स. १२ व्या शतकाच्या सुरवातीस बांधले गेले. हे पंचायतन मंदिराचे ( चार कोपन्यावर स्थित चार छोट्या मंदिराच्या केंद्रभागी स्थापित मुख्य मंदिर) विलक्षण उदाहरण आहे. पाच मंदिराचा समूह एका ३८ ४२८ मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असुन येथे मध्यभागी मुख्य शिवमंदिर असुन इतर चार छोटी मंदिरे विष्णु, गणपती, सूर्य आणि पार्वती आदि देवी-देवतांना समर्पित आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर चारी बाजूंनी भिंतीनी घेरलेला आहे, जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस प्रवेशद्वाराची योजना आहे. मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्धमंडप अशी योजना आहे. पूर्व दिशेस मुख्य मंदिरापासुन निराळ्या मंडपात बसलेला नंदी आहे. मुख्य मंदिराचे वक्ररेखिय शिखर अनेक छोट्या होत जाणाऱ्या लघु अंग-शिखरांनी बनलेला आहे. महामंडपाचे शिखर शंक्वाकृती आहे.

मंदिराचा बाह्यभाग रामायणातील दृश्ये, देवी, देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभीत आहे. मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी, पार्वती, शिव, भैरव मूर्ति प्रमुख आहेत. नंदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या प्रतिमा उल्लेखनीय आहेत. गर्भगृहातून निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यमातून बाहेर निघते. गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या सममित रुपात आणि भव्य आकारमानातच सामावलेले आहे.

फलकावर सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी वल्लींचा हा लेख जास्त उपयुक्त ठरेल. अत्यंत ओघवत्या भाषेत त्यांनी मंदिराची संपूर्ण ओळख करून दिलेली आहे.

गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात

त्यामुळे फक्त फोटोतुनच हे मंदिर आपल्याला दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

मंदिर दर्शन वेळ

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असले तरी सध्या रस्त्याच्या बाजूकडील (दक्षिण)
दरवाजानेच प्रवेश आहे.

प्रवेश करताच हे भव्य मंदिर संकुल नजरेस पडते.

मुख्य शिव मंदिराचे सभागृह. सभामंडपाच्या खांबावर अप्रतिम कोरीव काम आहे.

मैथुन शिल्पही दिसतात.

काही मैथुन शिल्प नंदी मंडपावरही दिसतात.

भिंतीवर पौराणिक, रामायणातील प्रसंगही कोरलेले आहेत.

इतर काही शिल्पं

दरवाजाच्या चौकटीवरील सुंदर कोरीव काम

शिवलिंग

शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी असलेले सुंदर मकरमुख.

पार्वती मंदिराच्या पुढे मकरमुखातून पडलेले शाळुंकेचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग असल्याने तो ओलांडून ईशान्येकडील सूर्य मंदिराकडे जाऊ नये असे सुचविण्यात आल्याने मागे वळून परत गणेश मंदिराकडून फेरी मारून पलीकडे जावे लागले. वास्तविक मकरमुखातून पडलेले पाणी एका कुंडात जमा करून पाणी जाण्यासाठी भूमिगत व्यवस्था केली तर ही अडचण दूर होऊ शकते.

नंदी मंडप

चार कोपऱ्यांना असलेली मंदिरं. शिल्प वेगळी असली तरी रचना सारखीच.

पश्चिम बाजूने दिसणारे मंदिर

स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (आतील बाजूने). सध्या बंदच आहे. उत्सव, यात्रेच्या वेळी उघडतात.

स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (बाहेरील बाजूने).

स्वर्ग मंडप. अतिशय सुंदर. नुकतीच मेघालायची सहल केली. तेथल्या पर्यटन मंडळाचे घोषवाक्य आहे "Half Way To Heaven". तेथे अर्ध्या वाटेहुन स्वर्ग पाहण्याचा प्रयत्न केला पण येथे तर प्रत्यक्ष स्वर्ग पाहिल्याचा आभास झाला.

मंदिर पाहून थोडा वेळ पायऱ्यांवर विसावलो

  

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

बदामी हंपी https://maharashtradeshee.blogspot.com/2026/06/pune-to-gokak.html

    ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे! विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्य...