पुणे शहराला आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि इतिहासाचा प्रचंड अभिमान आहे. या शहराने आपली संस्कृती यशस्वीपणे जपली आहे आणि जोपासली आहे.
ओंकारेश्वर मंदिर हे असेच एक उदाहरण आहे जे या शहराची आध्यात्मिक जोड अधोरेखित करते. ओंकारेश्वर मंदिर भगवान शंकराचे मंदिर आहे .
मुठा नदीच्या काठावर शनिवार पेठेत असलेले हे ओंकारेश्वर मंदिर पुणे शहरातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने मंदिर आहे. पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू शिवराम भट यांनी 1740 ते 1760 च्या दरम्यान या मंदिराची उभारणी केली होती.
मंदिर एकेकाळच्या वैभवशाली पेशवे शासनकाळाचा साक्षीदार आहे. तत्कालीन मराठा सेनापती आणि बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी मंदिर बांधण्यासाठी देणगी दिली. चिमाजी आप्पा या मंदिरास नियमितपणे भेट देत असत. दुर्दैवाने चिमाजी आप्पांचे निधन याच ठिकाणी झाले. त्यांची समाधीही या मंदिरात आहे.
1962 मध्ये पानशेतच्या पुराने पुण्याचा नकाशाच बदलला होता. परंतु ओंकारेश्वराची ही वास्तू मात्र न डगमगता उभी होती. मजबूत पायावर बांधले गेले असल्याने ते पुरामुळे झालेल्या विनाशाला तोंड देऊ शकले होते.
प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला नंदीचा सुंदर मंडप दिसतो. नाही म्हणायला पानशेतच्या पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने नंदीची मूर्ती वाहून गेली होती. स्थानिकांना नंदीची जड मूर्ती खेचून मूळ स्थितीत ठेवावी लागली.
वास्तुकला :
ओंकारेश्वरकडे सतराव्या शतकातील कला आणि वास्तुकलेचा एक परिपूर्ण नमुना म्हणून पाहिले जाते. मंदिराचा पांढरा घुमट मऊ साबण दगडाचा आहे. त्यात गणेश, दत्तगुरू, मकरध्वज, व्यास आणि चार कीर्ती मुख या हिंदू देवतांचे नक्षीकाम असलेले नगारा शैलीतील शिखर आहे.
ओंकारेश्वरामध्ये भव्य वास्तुशिल्प, प्रचंड घुमट आणि किचकट नक्षीकाम आहे जे भाविकांना त्याच्या सौंदर्याने मोहित करते आणि आश्चर्यचकित करते. कलात्मक स्तंभांसह प्रशस्त व्हरांडा मंदिराची भव्यता वाढवतो. स्तंभ वर्तुळ, बहुभुज आणि चौरसांच्या आकारात आहेत. परिसरात देवी दुर्गा, भगवान विष्णू, भगवान शनी आणि भगवान हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत.
शिवलिंग
गर्भगृहात सजवलेले प्रसन्न शिवलिंग पाहून भक्तांचे मन आध्यात्मिक भावनेने भरून जाते.ओंकारेश्वर शतकानुशतके भक्तांवर आपला आशीर्वाद आणि कृपादृष्टीची बरसात करत आहे. संपूर्ण परिसरात खूप आरामदायी आणि शांत वातावरण आहे जे तुमची मनस्थिती प्रसन्न करण्यास मदत करते. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमा असे तीन मुख्य सण इथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.
जर तुम्ही पुणे शहराला भेट देण्याचे योजत असाल, तर ओंकारेश्वर मंदिराला भेट देणे हे यादीत सर्वात वरच्या स्थानावावर असावयास हवी!
नमोस्तुते !!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.