Wednesday, June 28, 2023

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

 जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता.

1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले.
1) सर्व अधिकार असणारा.
2) कॅन्डिडेट्स
3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते.

देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला.
शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले.

सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे.

बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात.

शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.

बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत).

शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही.

1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई.
आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत.

मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली.

1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली.

आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे.

समाप्त.

http://www.misalpav.com/node/36734





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...