http://www.misalpav.com/node/48676
येतोस का चादरला ? इति शार्दूल दादा.
हो - दुसऱ्याच क्षणाला माझं तत्परतेने उत्तर.
पण जागा आहेत का? सगळ्या बुक झाल्या होत्या ना - परत मी
एक गळालाय, तू येतोस का ते सांग, नाहीतर दुसऱ्याला विचारतो - चिडलेला शार्दूल
मी येतोय, दुसऱ्या कोणाला विचारू नकोस - अतिउत्साहीत मी.
चादर ट्रेकला जायला होकार तर दिला पण त्यासाठी लागणारे पैसे, हापिसातून सुट्ट्या आणि सगळ्यात महत्वाचं गृह मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार होती. नंतर बघू, असं म्हणून मनातल्या मनात स्वप्न रंगवायला लागलो. चादर ट्रेक - ३ वर्षांपूर्वी एका मित्राच्या गप्पातून या ट्रेकची माहिती कळली तेव्हापासूनच माझ्या बकेट लिस्ट मध्ये सामील झाला होता. कितीतरी वेळा आंतरजालावर चित्र पाहिले होते पण आता प्रत्यक्षात ते अनुभवण्याचा क्षण येणार होता.
चादर ट्रेकबद्दल थोडंसं. आंतरजालावर चादर ट्रेक बद्दल व्हिडीओ आणि माहिती बरीच आहे पण थोडक्यात सांगतो. भारतातल्या सगळ्यात कठीण समजल्या जाणाऱ्या काही ट्रेक पैकी एक आहे हा चादर ट्रेक. भारताच्या लडाख भागातील सिंधू नदीची उपनदी असलेली झंस्कार नदी ही तिथे असलेल्या अति शीत तापमानामुळे गोठते आणि पाण्याचा वरचा थर गोठून त्याची एक चादर तयार होते जी किमान ३ फूट ते काही ठिकाणी १२ फूट देखील असू शकते, त्या बर्फाच्या चादरीवरून आपण ५५ किलोमीटर चालत जायचं अशी ट्रेकची साधारण रूपरेखा. टिलडो पर्यंत रस्ता होण्याआधी हा ट्रेक ९० किमी चा होता पण रस्ता बनवल्यामुळे बर्फाची चादर आता नीट बनत नसल्यामुळे हा ट्रेक टिलडो पासून ठरवला गेला. बीआरओ आता निम्मू पर्यंत रस्ता बनवत आहे त्यामुळे काही वर्षांनी हा ट्रेक अजून कमी किमीचा होण्याची शक्यता आहे. झंस्कार नदीच्या दऱ्यांची खोली ६०० मीटर आहे परंतु नदीच्या पात्राची रुंदी हि जास्त नसल्यामुळे सूर्यकिरणे खालपर्यंत पोहोचत नसल्यामुळे तापमान नेहमीच कमी असते. हिमालयातील अत्यंत कठीण अश्या अतिशीत हिवाळी वातावरणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील चादर ट्रेक म्हणजे प्रतिकूल निसर्गाचा अविस्मरणीय आविष्कारच. डिसेंबर शेवट ते फेब्रुवारी हा चादर ट्रेकचा उत्तम काळ. आणि कालावधी लडाखची चादर ट्रेक संस्था जी सरकारच्या अखत्यारीत येत ती ठरवते. बर्फाची चादर व्यवस्थित झाली आहे की अजून कमी जाड आहे हे पडताळून पाहिल्यावर हिरवा सिग्नल दिला जातो. लेह पासून " टिलडो” या ट्रेकच्या सुरुवातीच्या बेस कॅम्प पर्यंत गाडीने जावं लागत जे अंतर लेह पासून साधारण ६५ किलोमीटर आहे आणि ते १०३९० फूट उंचावर आहे. नंतर सुरु होतो पायी प्रवास जो लोअर शिंगरा कोमा, अपर शिंगरा कोमा (१०५५० फूट), टीब्ब केव्ह (१०७६० फूट) असे करत नेरक (११,१५० फूट) या जागी जाऊन संपतो. तिथे अतिसुंदर असा गोठलेला धबधबा आहे. चादर बद्दल माहितीचा दुवा - Chadar trek - Wikipedia
चादर ट्रेकला जितका खर्च येईल तितका माझ्या खात्यात जमा झाला पाहिजे या बोलीवर गृह मंत्र्यांकडून परवानगी मिळाली. चला एक गड सर झाला. हापिसात १० दिवसांच्या सुट्ट्या सांगून ठेवल्या. आता वेळ होती या अवघड देहाला ट्रेक साठी तयार करायची. सह्याद्रीची सवय होती पण आता हिमालयाशी गाठ होती. “ट्रेक दि हिमालयाज” या संस्थेच्या साईटवरून कठीण पातळी असलेल्या ट्रेकसाठी स्टॅमिना वाढवण्यासाठीचा व्यायामाची माहिती घेतली आणि त्यानुसार चालणे, सूर्यनमस्कार, बैठका सुरु केल्या. एका मित्राच्या साहाय्याने विमानाच्या सीट बुक केल्या, माझ्या आधी तिकिटे बुक केलेल्या शार्दूल ला बऱ्याच कमी किमतीत मिळाल्या पण त्यामुळे लडाखवरून येताना त्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला जो पुढे सांगेनच. हिमालयात पहिल्यांदाच जात असल्यामुळे काय घ्यावं आणि काय नाही हे माहित नसल्यामुळे नेटवरून माहिती शोधणं सुरु झालं. डिकॅथलॉनला जाऊन गरजेच्या वस्तूंची खरेदी केली आणि आर्थिक भार कमी करण्यासाठी काही गोष्टी गोराईच्या नंदूकडून भाड्याने घेण्याचं ठरलं आणि जाण्याच्या आदल्या आठवड्यात जाऊन घेऊन आलो. सुका खाऊ बराच घेतला जेणेकरून पोटाला त्रास न होता कमी खाण्यात जास्त एनर्जी मिळू शकेल.
सामान
चादर ट्रेक साठी तयारी म्हणून जानेवारी महिन्यात राजगडला जाऊन आलो. नियमित व्यायामामुळे, चालण्यामुळे खूप फायदा झाला. वजन कमी झालं नसलं तरी स्टॅमिना वाढून दमछाक कमी झाली त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच दुणावला. जसजसा प्रस्थानाचा दिवस जवळ येत होता तसतसं पोटात गुदगुल्या होत होत्या.
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे चिंता होतीच पण त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्सुकता होती. तसेच लेकीला सोडून इतके दिवस राहिलेलो नसल्यामुळे उदास देखील वाटत होते, अगदी मिश्र अशा भावना होत्या. बोर्डिंग पास घेताना काउंटर वर खिडकीजवळची सीट असेल तर द्या असं विचारलं पण नशीब खराब त्यामुळे आहे त्याच सीटवर समाधान मानावं लागलं. १५ जानेवारी २०२० ला मुंबईहून दिल्लीसाठी प्रयाण केले. दिल्ली येथील तापमान देखील माझ्या सारख्या मुंबईत राहणाऱ्या माणसाला न मानवणारे, दिल्लीला उतरलो तापमान ७ डिग्री से. (अजून पण प्लस मधेच होतो ) यावरूनच लेह येथे माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आलाच होता. पूर्ण रात्र दिल्लीच्या विमानतळावर काढून सकाळी ६ ला दिल्लीहून लेहला जाणाऱ्या विमानात बसलो. सकाळी लेह येथे विमानाचे आगमन होतानाच हिमशिखरे खुणावत होती. हिवाळ्यातील हिमशिखरांचे सौन्दर्य काही न्यारेच. विमानातून बाहेर येताच सामना होता उणे तापमानाशी. उतरताच असा काही झटका होता तो कि काही क्षणांत ब्रह्माण्ड काय असते ते आठवले. म्हणतात ना "All Best Things are Wild" तसंच काहीतरी. लेह विमानतळ, अत्यंत टुमदार देखणे, लडाखी संस्कृतीला साजेसे "कुषोक बकुळा रिम्पोचे" विमानतळ, भारतीय सैन्याच्या देखरेखीखाली असलेले विमानतळ.
कुषोक बकुळा रिम्पोचे यांचा विमानतळावर असलेला फोटो
जगप्रवासी
क्रमशः
तळटीप : हा धागा ट्रेकची सुरुवात आणि माझ्या लेखनाची बऱ्याच अवधीनंतर सुरुवात असल्यामुळे त्रोटक आहे, पुढचे भाग बऱ्याच फोटो सकट असतील. तसेच बऱ्याच कालावधी नंतर लिहीत असल्यामुळे शुद्धलेखनात बऱ्याच चुका सापडतील त्याबद्दल क्षमस्व.
प्रसिद्ध नेरक धबधबा आंतरजालावरून साभार
चादर ट्रेक - २
दिवस पहिला लेह
विमानतळावरून आम्ही गाडीने आमच्या हॉटेलवर पोहचलो. लेह येथे हिवाळ्यात जनजीवन तसे अत्यंत शांत असते. फार कुठे हालचाल दिसत नाही. त्याच शांततेचा अनुभव आम्ही आमच्या राहत्या हॉटेलात घेत होतो. दूरवर डोंगररांगा आणि पोह्यावर शेव पसरावी तसा पसरलेला बर्फ. बूट आणि मौजे काढून बर्फात अनवाणी चालायचा अनुभव घेतला. आतापर्यंत फ्रिजमधला बर्फ हातात घेतला होता पण या बर्फाचा स्पर्श वेगळाच. आपल्या इथल्या थंडीत दातावर दात आपटतात पण तिथे पूर्ण अंग व्हायब्रेट मोडवर गेल्याप्रमाणे थरथरत होत.
हॉटेल १
हॉटेल २
शो ऑफ
आमच्यासाठी एक ट्रेनर बोलावला होता जो आपल्या भारतीय संघासाठी फुटबॉल खेळला होता, त्याने आमच्याकडून काही शारीरिक व्यायाम करून घेतले.
स्ट्रेचिंग
पिण्यासाठी आणि बाथरूमसाठी सतत गरम पाणी होते. नाश्त्याला दुधातून कॉर्न फ्लॅक्स आणि गरमागरम पराठे. हॉटेलची जबाबदारी असलेला अब्दुल हा कारगिल भागातून कामासाठी आलेला आणि दुसरा राजबीर हिमाचल प्रदेशातून आलेला. राजबीरने हॉटेल मॅनेजमेंट केलेले परंतु कामासाठी लडाख जवळ केलेले. रूममध्ये एकत्र जमून गप्पांचा फड रंगला, मग कोणी कशी तयारी केली, काय काय खाऊ आणला आहे याची देवाणघेवाण झाली.
वातावरणाशी जुळूवुन घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आपण समुद्र किनारी राहणारी माणसे. या अश्या प्रतिकूल वातावरणाचा त्रास हा झालाच आमच्या पैकी काही जणांना ' HIGH ALTITUDE SICKNESS' चा त्रास झालाच. काही जणांना इस्पितळात देखील दाखल करावे लागले. शार्दुल दादाला प्रचंड उलट्या झाल्या, विशाखाला, अविनाशला ऑक्सिजन मास्क लावावा लागला. येथील इस्पितळातील कर्मचारी, डॉक्टर देखील अत्यंत नम्र आणि प्रेमळ यानेच आपण अर्धे अधिक बरे होतो. ते नेहमी हसतमुख आणि आपल्यासारख्या पर्यटकांशी बोलण्यास उत्सुक असतात. कुठेही जायचं असेल तर गाडी बोलवावी लागते आणि दर हा ५०० फिक्स असतो. त्यांना दुसऱ्या दिवशी इस्पितळातून सोडले.
आपण म्हणतो ना 'पहिली रात्र सैतानाची' त्या प्रमाणेच लेह येथील पहिली रात्र खरेच सैतानाची होती. थंडीमुळे आम्हाला नीट झोपही लागत नव्हती आणि श्वास देखील नीट घेता येत नव्हता. विचार करत होतो; कशाला आलोय येथे या जीवघेण्या थंडीत तेव्हा मनातं विचार फक्त भगव्याचा येत होता, शिवाजी महाराजांचा येत होता ध्येय पक्के होते. लेहच्या चादरीवर भगवा फडकवणे, वाटचाल अत्यंत खडतर होती. पहिली रात्र कशीतरी ढकलली.
उद्या लेहच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बाजारात फेरफटका मारायला जाणार होतो.
दिवस दुसरा लेह
आजचा दिवस होता इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा. नंदू दादाने सांगितल्या प्रमाणे आम्ही जास्त पाणी पित होतोच आणि थंडीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न देखील करत होतो. सकाळीच थोडी स्ट्रेचिंग करून अंग मोकळं केलं, थोड्याफार उड्या आणि पुश अप मारून अंगात ऊर्जा निर्माण करायचा प्रयत्न केला.
नाश्ता करून आम्ही ' शांती स्तूप' या भगवान गौतम बुद्धांच्या देखण्या स्तूपाकडे प्रयाण केले. आमच्या हॉटेल जवळच असल्यामुळे आम्ही चालतच निघालो.
शांती स्तूपाच्या वाटेवर
अर्थात आम्हाला वातावरणाशी जुळूवुन घेण्यासाठीच तो प्रयत्न होता. काय बघू, किती बघू असं झालं. शांती स्तूप हा बऱ्यापैकी उंचीवर असल्यामुळे लेह शहराचे सुंदर दृश्य दिसत होते.
वाटेवरून शांती स्तूपाचे होणारे दर्शन
दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा
सहज टाईमपास
प्रार्थना स्थळ
अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांचे जन्मापासून महानिर्वाणापर्यंत सुंदर शिल्पे येथे कोरलेली आहेत. वरती देहभान हरपून जावी अशी भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती आहे. ते शांत भाव पाहून मनातले ताण तणाव सगळे दूर पळून गेले.
भगवान बुद्ध
भगवान बुद्ध यांचा जन्म
दुष्टांवर मिळवलेला विजय
भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण
शांती स्तूप
शांती स्तूपाचा मागच्या बाजूने फोटो काढण्याचा प्रयत्न
पॅनोरमा
स्तूपाजवळील एक वास्तू
इथून दिसणारा लेह चा आसमंत खरेच सांगत होता जगात कुठे शांतता, प्रेम कुठे असेल तर येथेच आहे येथेच आहे.
स्तूपाजवळून दिसणारे लेह शहर
स्तूपाच्या मागच्या बाजूने बाजाराकडे जाण्याच्या मार्गावर बनवलेल्या वास्तू
आणि याची प्रचिती आम्हाला लेह शहरात प्रत्येक माणसाला भेटल्यावर त्यांच्या प्रेमळ स्वभावावरून येतच होती. लेह बाजारात फिरताना आमच्या शब्द कोशात 'जुले' अर्थात स्थानिक भाषेत नमस्कार असा होतो याची भर पडली.
जागोजागी बांधलेले देखणे प्रार्थना चक्र
जागोजागी मंत्र कोरलेले दगड ठेवलेत
बाजारात विकण्यासाठी ठेवलेल्या वस्तू
विकण्यासाठी ठेवलेल्या काश्मिरी शाल
बाजारातील एका देखण्या वास्तुवरची कलाकुसर
सगळ्यांना 'जुले' करतच आमचा बाजारात फेरफटका मारत गमबुटच्या खरेदीसाठी मिलिटरी वस्तूंच्या दुकानात गेलो. चादर वर चालण्यासाठी लागणारे गमबूट घेतले. आमच्या सोबतच्या पटवर्धन काकांनी मुंबईहून त्यांच्या मित्राचे गमबूट आणले होते ते इथल्या वातावरणात आल्यावर दगडाहून कडक झाले होते, मग त्यांनी सुद्धा नवीन गमबूट आणि एक्स्ट्रा हातमौजांचा जोड घेतला. तिथल्याच एका स्थानिक दुकानात जाऊन जेवलो.
हाताशी वेळ होता मग काय भटके थोडीच शांत बसणार. बाजाराच्या खालच्या अंगाला असलेल्या नाक्यावर जाऊन स्थानिक लोकांना विचारणा केली असता पत्थर साहिब, मॅग्नेटिक हिल ला जात येईल असे कळले. पॅंगॉंग लेकला जाण्याचा रस्ता बर्फामुळे अजून चालू झाला नव्हता.
एक स्थानिक गाडी ठरविली आणि निघालो भटकंतीला.'पत्थर साहिब गुरुद्वारा' येथे गुरु नानक साहेबांनी एका राक्षसाला भक्ती मार्गाची अनुभूती दिली आणि हो खरंच त्या पवित्र वास्तूत आपणही शांत राहून उपासना केली तर आपल्यालाही याचीच प्रचिती येते. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात, गुरु नानकजी सिक्कीम, नेपाळ, तिबेट आणि यारकंद येथे गेले होते आणि त्यानंतर ते श्रीनगरमार्गे पंजाबला परतत होते. परतीच्या प्रवासात, त्यांनी लेहजवळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आख्यायिका म्हणते की या भागात एक राक्षस राहत होता, लोकांना छळ करीत होता आणि दहशत घालत होता. स्थानिकांना असहाय्य वाटले आणि त्यांनी सर्वशक्तिमान देवाला मुक्तीसाठी प्रार्थना केली; तेव्हा गुरु नानकजी यांनी त्यांची बाजू ऐकली आणि त्यांना त्रासातून वाचवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या भेटीनंतर, गुरु नानक जी नदीच्या काठावर स्थायिक झाले, त्यांनी लोकांना प्रवचन देऊन आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामध्ये आशेचे प्रतीक बनले. लोक त्याला नानक लामा म्हणू लागले, यामुळे राक्षसाला राग आला. तो चिडला आणि त्याने गुरु नानकजींना ठार मारण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी गुरु नानक जी ध्यान करीत असतांना, राक्षसाने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने डोंगरावरुन एक मोठा दगड ढकलला. दगड उंचावरून घरंगळत येत असल्यामुळे त्याने वेग पकडला आणि तो टेकडीवरुन खाली कोसळला, परंतु जेव्हा त्या दगडाचा गुरु नानकजींना स्पर्श झाला, तेव्हा तो मेणासारखा वितळला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकाराचा ठसा उमटला. इतके होऊनसुद्धा गुरु नानकजी शांतपणे ध्यानधारणा करीत राहिले. याचा त्या राक्षसाला प्रचंड राग आला त्याने नानकजींना चिरडण्यासाठी पायाने तो दगड ढकलायला सुरुवात केली. पण मेणाप्रमाणे वितळलेल्या दगडावर त्याच्या पायाचा ठसा उमटला. हे पाहून, राक्षसाला लाज वाटली, आणि गुरु नानकांच्या सामर्थ्यवान आणि अध्यात्मिक बुद्धिमत्तेच्या तुलनेत त्याला त्याच्या दुबळेपणाची जाणीव झाली. त्याने गुरूंची क्षमा मागितली. तेव्हा गुरु नानकजींनी राक्षसाला त्याच्या दुष्कृत्यांचा त्याग करण्यास आणि दहशतवादापासून दूर राहून शांततापूर्ण जीवन जगण्यास सांगितले. तेव्हापासून, त्या राक्षसाच्या पावलाच्या ठसा असलेल्या आणि नानकजींची शरीराची छाप असलेल्या मोठ्या दगडांसह ही जागा पवित्र मानली जात आहे. आज येथे गुरुद्वारा उभा आहे, भारतीय सैन्याच्या पंजाब आणि शीख रेजिमेंटद्वारे गुरुद्वारा पथर साहिबची देखभाल केली जाते. शिखांच्या दहाही गुरूंच्या तसबीर आणि त्यांची माहिती गुरुद्वारात लावलेली आहे. आत फोटो काढण्यास मनाई आहे. त्या पवित्र अशा दगडासमोर नतमस्तक झालो.
दगडात गुरु नानकजींच्या पाठीच्या बाजूचा आलेला आकार
गुरुद्वारा पत्थर साहिब
त्यानंतर आम्ही 'मॅग्नेटिक हिल' हा निसर्गाच्या आणखीन एक आविष्कार पाहिला. चोहो बाजुंनी पर्वताने वेढलेला हा रस्ता. येथे मार्किंग केलेल्या जागी आपली गाडी उभी करून ठेवली तर ती एका विशिष्ट दिशेला ओढली जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले; मनोमन निसर्गाला नमस्कार करून परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा रात्री हॉटेल मध्ये थंडीचे संकट. तापमान -२८ डिग्री. येथे तुम्हाला ती सहनच करावी लागते. यातच कालचा थकवा त्यामुळे झोप लागलीच परंतु तुटक-तुटक. मग आठवत होते 'पाण्यातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याचे वंशा तेव्हा कळे'. उद्या आमची वैद्यकीय तपासणी होणार होती. चादर ट्रेक करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करावीच लागते, जर तुम्ही त्याच्यात उत्तीर्ण झालात तरच पुढे ट्रेक करता येतो अन्यथा नाही. कितीतरी जण चादर ट्रेकचं स्वप्न घेऊन आलेले वैद्यकीय तपासणीत फिट न ठरल्यामुळे इथून नाईलाजाने परत गेलेत.
जगप्रवासी
क्रमशः
बाजारातून पत्थर साहिब येथे जाईपर्यंत अंधारून आल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. गुरुद्वारा पत्थर साहिबचे फोटो जालावरून साभार
कामाच्या ताणामुळे पुढील भाग देण्यासाठी खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही चालतच त्यांच्या ठरविलेल्या ठिकाणी पोहोचलो. चालता चालता गेल्या ६-८ महिन्यांचा काळ सर-सर डोळ्यासमोरून जात होता. ज्या परीक्षेसाठी आम्ही सगळे बरीच तय्यारी करत होतो कोणी सायकलिंग करून, कोणी व्यायाम योगा करून, कोणी नुसतेच जॉगिंग करून आपआपली शारीरिक क्षमता वाढवीत होते केवळ चादर ट्रेकसाठीच, त्याचीच आज परीक्षा होती. काही जण उड्या मारून अंगात गरमी तयार करत होते जेणेकरून रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढेल. ज्यांची लेवल कमी येत होती ते निराश होत होते पण तिथले डॉक्टर त्यांचा उत्साह वाढवायला हिटर जवळ बसायला सांगत होते, पाणी प्यायला सांगत होते, हाताचे तळवे एकमेकांवर घासायला सांगत होते जेणेकरून परत लेव्हल चेक करताना ती व्यवस्थित येईल. बरेच जण त्यात पास झाले. मिपाकरांचे सायकलिंगचे फायदे वाचून सायकलिंग करून स्टॅमिना वाढवला होता पण रक्तदाब अजूनही थोडं जास्त होत आणि त्याचंच मला टेंशन येत होते. आणि शेवटी तेच झालं डॉक्टरांनी सांगितले की तुमचा रक्तदाब थोडासा जास्त आहे. हे ऐकून फक्त रडायचा बाकी होतो, चादरच स्वप्न अर्धवट राहत की काय असं वाटून गेलं. पण डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि सांगितलं की या गोळ्या दोन वेळा खा बाकी उत्तम आहे, काही होणार नाही. हे ऐकल्याबरोबर नाचायलाच लागलो. आमच्या पैकी सगळे उत्तीर्ण देखील झाले. अजून एक टप्पा पार पडला.
चादर ट्रेकचे ऑफिस
शारीरिक तपासणीत पास झाल्यानंतरचा जल्लोष
येथे देखील लडाखी लोकांचा प्रेमळपणा, आपुलकीचे बोलणे अनुभवले 'जुले' करीत आम्ही बाजार भटकंतीला निघालो. बाजारात स्थानिक लोक प्रेमाने विचारपूस करत होते आणि चादरसाठी आलोय हे ऐकल्यावर सल्ला देत होते की भरपूर पाणी प्या, खुश रहा, टेन्शन घेऊ नका. आरामात होईल. थंडीचा जोर वाढतच होता मग काय एक छानशी गरमागरम कॉफी घेतली. आत्ता उद्याचा विचार होता, आपल्या स्वप्नवत मोहिमेचा तोच विचार मनात घोळवत हॉटेल वर आलो. ग्रुपची एक छोटेखानी सभा झाली, उद्या घ्यावयाची काळजी, उद्या घ्यावयाचे सामान याविषयी चर्चा झाली त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली बॅग आधीच भरून ठेवली, रात्रीचे जेवण घेऊन आम्ही झोपी गेलो पण झोप येतच नव्हती. ते ही बरोबरच होतं की एक स्वप्न पूर्ण होणार होतं. बाहेर तापमान -२५.
बर्फवृष्टी झाल्याने काचेवर अशी नक्षी तयार झाली होती
काहीजण रोज हॉटेलच्या रूम मध्ये हिटर लावून झोपायचा प्रयत्न करत होते, त्यांना सांगितलं कि तसे करू नका. आपल्या शरीराला त्या थंडीची सवय होऊ द्या. पण जिथे त्यांच्या मनानेच कच खाल्ली तिथे शरीर तरी कुठे साथ देणार. दंगल चित्रपटात जसं आमिर बोलतो तसं पहिली लढाई मनात जिंकावी लागते. नेमकी तीच लढाई अविनाश आणि गुरू हरले. याच्या नेमकं विरुद्ध शार्दूल मनाने कणखर राहिला आणि त्याने चादर ट्रेक याच आत्मविश्वासावर पूर्ण केला. गुरु आणि अविनाशसाठी विमानाची तिकिटे काढून त्यांना मुंबईला रवाना केले.
दिवस चौथा चादर ( गोठलेली झंस्कार नदी )
‘In to the Himalayas, I go to lose my mind…and find a soul’ याचा विचार करतच दिवस उजाडला. दिवस होता बऱ्याच वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नपूर्तीचा, आत्ता आम्ही बऱ्यापैकी लडाखच्या वातावरणाला सरावलेलो होतो. सकाळचा नाश्ता उरकून आम्ही मिनी बसने चादर च्या दिशेने निघालो, आम्हांबरोबर आणखी काही लोक आम्हाला मिळाले. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासा नंतर आमची मार्गदर्शक आणि पोर्टर ची टीम देखील आम्हाला मिळाली, ओळख झाली त्यांच्या म्होरक्या बरोबर 'लोबझॅग' अत्यंत मनमिळावू मितभाषी गृहस्थ. एका चेकपॉईंटवर सगळ्या माणसांची आणि सामानाची नोंद झाली, आणि पुढे मार्गस्थ झालो.
संगम ( येथे सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम आहे ) मार्गावरून आम्ही झंस्कार खोऱ्यात प्रवेश केला, एखाद्या स्वप्नात प्रवेश केल्यागत आमची अवस्था होती, मती गोठली होती. अगदी बाहेरच्या तापमानाप्रमाणे केवळ आणि केवळ सौंदर्याची उधळण बर्फाच्छादित रस्ते, शिखरे, गोठलेली नदी, नदीचे खोरे. ते आठवून आत्ता लिहिताना देखील काटा येतो अंगावर. आम्ही आमच्या सुरुवातीच्या स्थळी पोहचलो, गमबूट घालून आम्ही तय्यार होतोच आमची मार्गदर्शक टीम देखील तितकीच तत्पर त्यांच्या स्लेज गाड्या सामान वाहून नेण्यासाठी तय्यार केल्या येथे गोठलेल्या नदीवरून ते स्लेज ने सामान वाहून नेतात परंतु जेथे नदीचा गोठलेला प्रवाह तुटतो तेथे हि मंडळी त्याची सॅक करतात आणि वाहून नेतात. अत्यंत कष्टाचे काम. या सामानात आपले तंबू, जेवणाचे सामान इत्यादी सगळेच असते. तिथे चादर ट्रेकला जाणाऱ्यांसाठी सरकारने ठेवलेला मिलिटरी कॅम्प होता. तिथल्या काही सैनिकांसोबत गप्पा मारल्या, त्यांनी जपून राहायला, स्वतःची काळजी घ्यायला सांगितली. आणि शेवटी निघताना ते म्हणाले काळजी करू नका, काही त्रास झाला आणि अडचण आलीच तर आम्ही आहोतच. आपल्या सैनिकांवर असलेल्या प्रेमापोटी आधीच त्यांच्याबद्दल आदर होता आणि आता या आश्वासक वाक्यांमुळे तो अजूनच वाढला. झंस्कार नदीच्या गोठलेल्या प्रवाहावर वाकून नतमस्तक झालो, तिच्याकडे सांभाळून घेण्यासाठी आशीर्वाद मागितले. 'बकुला' कॅम्पवरून आमचे मार्गक्रमण सुरु झाले स्वप्नात प्रवेश झाला महान फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणतोच ' स्वप्न पहा, स्वप्नाचा पाठलाग करा ती खरी होतातच' अशीच काहीशी आमची अवस्था होती चादर वरील पहिल्या पावला सोबत.
चादरच पहिलं दर्शन
येथे आमची चालण्याची कसोटी होती, गोठलेल्या नदीवरून म्हणजे बर्फावरून चालताना तुम्हाला कायम 'पेंग्विन वॉक' करावा लागतो नाहीतर कपाळमोक्ष अथवा हाथ-पाय गळ्यात येण्याची शक्यता. सरावाने ते चालणे जमलं. पांढऱ्या-निळ्या-करड्या छटांचा सानिध्यात आम्ही 'हेमिस नॅशनल पार्क' मध्ये होतो, चादर हा देखील त्याचाच भाग. या भागात ' हिमालयीन बिबट्याचे' अस्तित्व आहे. वाटेत आमचे गरमा-गरम मॅग्गीचे जेवण झाले, खरंच सुख होत ते. भर दुपारी देखील थंडी वाजत होती. बर्फात वाहत्या गरम पाण्याच्या झरा! आहे ना आश्चर्य! हो, वाटेत आम्हाला एक गरम पाण्याचा झरा लागला, तो चक्क मानससरोवरापासून येतो अशी स्थानिकांची धारणा आहे. ते पाणी पवित्र मानले जाते, त्या पापण्याची चव चाखून थोडावेळ टाईमपास केला.
गरम पाण्याचा झरा
दरमजल करत आमच्या ' शिंगरा कोमा' या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. आमच्या पोर्टर टीम ने आधीच आमचे तंबू उभारले होते, थंडीचा दणका होताच तापमान -३२ डिग्री. अश्या थंडीत तुम्ही तुमच्या सॅकची चैन देखील काढू शकत नाही बाकीच्या गोष्टी दूरच. सॅक मधून एखादी वस्तू काढावयाची असेल तर मोठे संकट. आत्ता हे संकट चादर वर कायम असणार होते, सॅक तर खोलावीच लागते. या अश्या जीवघेण्या थंडीत (हो खरंच जीवघेण्या गेल्यावर्षी चादर ट्रेक वर ३ लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले )चादर ट्रेक वर तुम्ही शारीरिक दृष्ट्या कितीही सक्षम असा तुम्हाला मानसिक दृष्ट्यादेखील अत्यंत सक्षम राहावेच लागते नाहीतर तुमची विकेट ठरलेली, येथे आत्मविश्वास गमावून चालतच नाही. आमच्या समोर तर भगवा फडकविण्याचे ध्येय होते मग आत्मविश्वास तेथून येतोच येतो.
मी आणि लोबझॅग
ध्याकाळी आमच्या साहाय्यकांनी आमच्यासाठी 'गरमागरम भजी' समोर आणली, रात्री गरमा-गरम पोळी- भाजी, भात-वरण वरून स्वीट डिश खीर. हे सगळं म्हणजे 'सोने पे सुहागा'. या स्थानिक लडाखी लोकांविषयी सांगावयाचे झाले तर अत्यंत प्रेमळ-मनमिळावू माणसे सदोदित आनंदी राहणारी, मदतीस तत्पर, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सदैव हसरी (लडाख मध्ये ८० % लोकांना रोजगार नाही , हिवाळा ५-६ महिने त्यामुळे घरातून बाहेर पडू शकत नाही उन्हाळ्यात थोडी फार शेती होते आणि काही माणसे चादर ट्रेक वर मदतनीस म्हणून येतात तोच त्यांचा काय तो रोजगार ) एवढे असून सुद्धा अगदी तुमच्या स्लिपींग बॅग ची चैन देखील हसत हसत लावतील त्यांनीच आमच्या स्लिपींग बॅगच्या चैन लावल्या आणि निद्राधीन झालो. अहो निद्राधीन झालो म्हणजे केवळ स्लीपिंग बॅग मध्ये गेलो. थंडीने हाड देखील गोठून थिजलेली केवळ मनाला आधार देत रात्रीचे तास मोजत होतो. बाहेरील तापमान -३६ डिग्री.
दिवस पाचवाचादर ( गोठलेली झंस्कार नदी, टीब्ब केव्ह )
रात्रभराच्या बर्फवृष्टीने तंबूत आत देखील बर्फ झाले होते, थंडीने कहर केला होता त्यात सकाळी तंबूच्या बाहेर येणे म्हणजे आगीतून फोफाट्यात जाणे पण करणे भाग होते. येथे तुम्ही परसाकडे जाताना पाणी वापरू शकतच नाही (हे सांगणे भाग आहे पाणी जर वापरले तर काय होते याचा अनुभव आलाय). सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम कांजी आणि छोले पुरी म्हणजे स्वप्नातील स्वर्गसुख. चादर वरील दुसऱ्या दिवसाची मार्गक्रमणा सुरुवात झाली 'जुले' ने. आमची आजची मजल होती टीब्ब केव्ह पर्यंत. चालताना बऱ्याचदा पाय घसरत होते. काही ठिकाणी पायाखाली चादरची नक्षी इतकी सुंदर होती की आपण एखाद्या मोझॅक वरून चालत असल्यासारखे वाटत होते. एकदा तर एका नक्षी खाली दुसरी नक्षी तयार झालेली दिसली आणि त्याखाली पाण्याचा प्रवाही वाहता झरा.
वाटेत निसर्गरूपी चित्रकाराने सजविलेली अत्यंत सुंदर चित्रे न्याहाळत मार्गक्रमणा चालू होती. या सुंदर चित्रात गोठलेल्या नदीबरोबर गोठलेले धबधबे देखील होते कधी ते चित्र एखाद्या लावण्यवती प्रमाणे वाटते तर कधी रुक्ष पुरुषा प्रमाणे हीच तर मजा आहे 'चादर ट्रेक' ची साधारण ६-७ तास 'पेंग्विन वॉक' करत आम्ही टीब्ब केव्ह पाशी पोहचलो. येथे झंस्कारच्या प्रवाहामुळे गुहा निर्माण झाल्यात त्याच ह्या 'टीब्ब केव्ह'. फार पूर्वी हिवाळ्यात याच मार्गावरून झंस्कार ते लेह दळणवळण व्हायचे तेव्हा येथे प्रवासी या नैसर्गिक गुहेत राहत असत, असो आज आमचा मुक्काम मात्र येथेच परंतु तंबूत होता. संध्याकाळी पुन्हा स्वादिष्ट आदरातिथ्याचा अनुभव अनुभव घेता घेता आर्मी ऑफिसर आम्हाला भेटावयास आले त्यांच्या म्हणण्यानुसार पुढे चादर तुटलेली असल्या कारणमुळे आम्हाला पुढे जाता येणार नव्हते. आम्ही देखील आर्मी चा शब्द प्रमाण मानला आणि पुढच्या योजना आखत थंडीत रात्र ढकलली. बाहेरील तापमान -३६ डिग्री.
क्रमशः
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.