उगवत्या सूर्याचा देश
जपान! उगवत्या सूर्याचा देश! शाळेमध्ये इतिहास,भूगोलाच्या पुस्तकांतून
जपानची ओळख झाली,तर पु.लंच्या पूर्वरंग आणि तानाजी एकोंडेंच्या 'उगवत्या
सूर्याचा देश' या पुस्तकातून जपानशी ओळख झाली.त्या ओळखीचं कधीतरी एकदम
स्नेहात आणि मैत्रीत रुपांतर होईल, असं कधी स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं.
A I 134 , मुंबई- दिल्ली-हाँगकाँग- ओसाका असा आमच्या विमानाचा मार्ग!
आपल्याला गाड्या लेट होण्याची सवय,आमचे विमानही लेट झाले,चांगले ३ तास!
थोडा कंटाळा प्रवासाच्या सुरुवातीलाच आला,एवढ्या वेळात दिल्लीपर्यंत
पोहोचलो असतो असं स्वत:लाच सांगून झालं, पहिल्यांदाच देश सोडणार होते,माझी
मायेची माणसं सोडून जाणार म्हणून थोडी हुरहुर मनात होतीच..
एकदाचे आम्ही विमानात बसलो,पट्टे बांधण्याची उद्घोषणा झाली,आणिबाणीच्या
काळात वागण्याच्या आवश्यक सूचना देऊन झाल्या,आणि धावपट्टीवर विमान धावू
लागले,विमानाबरोबरच माझे मनही धावू लागले, विमान आकाशात झेपावले आणि काही
काळाकरता का होईना धरणीशी नाते तुटले.. खिडकीतून खाली मुंबापुरीतल्या
दिव्यांचा लखलखाट दिसत होता. हळूहळू सारे मुंगी एवढे दिसू लागले आणि सभोवार
चांदण्या दिसू लागल्या,आतमध्ये हवाई सुंदर्यांची लगबग,सरबराई चालू
झाली.तासाभरातच दिल्लीच्या "आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर " आलो.परत एकदा
सिक्युरीटी चेक चे सगळे सोपस्कार झाले. ओसाका जन्मगाव असलेली एक जपानी ललना
मला तिथे भेटली आणि मी सुध्दा ओसाकाला जाते आहे हे ऐकून जपानी इंग्रजीत
कुतुहुलयुक्त प्रश्नांचा माराच तिने सुरू केला.खिडक्या बंद करून आम्हाला
'गाई गाई' करायला लावून विमानसुंदर्याही झोपल्या.
माझे घड्याळ पहाटेचे साडेचार दाखवत होते,पण बाहेर लख्ख उजाडले होते.सकाळचे
७.१५ इथला लोकल टाईम दाखवत होते.म्हणजे हाँगकाँग आले तर... खिडकीतून बाहेर
डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत
होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने
ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला
उतरलं.चढणारे,उतरणारे प्रवासी,सफाईकामगारांची लगबग असा गजबजाट झाला.उरली
सुरली झोप कडक कॉफीने उडाली.आता विमानाने परत आकाशात झेप घेतली,ढगांच्याही
वर निळ्या निळाईतून जाऊ लागलो आम्ही,उगवत्या सूर्याच्या देशाकडे..
ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते असे दिनेशने आधीच
सांगून ठेवल्याने खिडकीला नाक लावूनच बसले होते आणि ते सारे डोळ्यात साठवत
होते.सुंदर्,स्वच्छ रेखीव रस्ते,मुंग्यांची रांग वाटावी अशा पळणार्या
गाड्या,जुन्या पध्दतीची घरे अशी रांगोळी पाहताना अंगावर आणि मनातही रोमांच
उभे राहत होते.या धरतीवर आता आपण काही महिने राहणार आहोत,जगातील सर्वात
प्रगत तंत्रज्ञानाच्या देशात! हा विचारच इतका उत्तेजक होता की त्या नादात
विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते.
छोटीशी शटल ट्रेन घेऊन आम्ही कस्ट्म क्लिअरन्स्,बॅगेज क्लेम कडे आलो.भाषेचा
प्रश्न धास्ती करुन होताच पण सुहास्य वदना जपानी ललना आपली ती भीती पळवून
लावत असाव्यात.सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन
घेऊन सामान घेण्यासाठी पुढे आले,तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग
र्ट्रॉलीवर घालून दिली आणि 'हाजीमेमास्ते' असे स्वागतात्मक अभिवादन करून
पुढे कसे आणि कोठे जायचे हे ही सांगितले.(मंडळी,बेल्ट वरून बॅग काढून
द्यायला अटेंडंट; तो ही सुहास्यवदनी मला पुढे कधीही , कोणत्याही विमानतळावर
दिसला नाही.)बॅगेत किराणासामान ठासून भरले होते,थोडे आंबेही होते दिनेश
साठी.यातलं इथे काय चालतं आणि काय नाही याचा विचार मनात येऊन नर्व्हस झाले
होते पण तिथल्या अधिकार्याने पासपोर्ट पाहिला फक्त आणि विचारले,"गोईंग टू
मीट युअर हजबंड?" माझ्या 'हो'ला "दिस बे बित युअल लगेज.." असं उत्तर आणि मी
चक्क बाहेरच आले की,समोरच दिनेश!
बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही.
योदोबाशी आणि दाई याई
बाहेर पडल्यावर समोरच दिसली ए/सी लिमोसिन बस!गुबगुबीत ऐसपैस खुर्च्या,
झुळझुळीत पडदे असलेली गुलाबी रंगाची देखणी ,प्रशस्त बस!अतिशय नम्रपणे
सुटाबुटातला एक जपानी चेहरा अभिवादन करून तिकिटे देत होता.तोच होता आमच्या
बसचा चालक.गुळगुळीत रस्त्यावरुन,उड्डाणपुलावरून बस धावू लागली १०० किमी
च्या ही जास्त वेगाने.अतिशय शिस्तीत जाणारीवाहने,सिग्नल न तोडणारे वाहन
चालक,बसबरोबरच एका बाजूने धावणारा समुद्र,उजवीकडेच असलेले अतिभव्य टेंपोझान
(जायंट व्हील्),युएसजे स्टुडिओ.. दिनेश एकेक गोष्टी दाखवत होता आणि
विस्फारलेल्या डोळ्यांनी मी ते सारे दृश्य मनात साठवून घेत होते.
प्रवासाचा शीण काही नव्हताच,तासाभरातच आम्ही घरी पोहोचलो.जपानमध्ये जागेची
आत्यंतिक टंचाई असल्याने अति लहान लहान सदनिका आहेत, १२* १२ च्या जागेत
आख्खे घर! म्हणजे एक किचन कोपरा,लहानसे न्हाणीघर आणि झोपण्याची जागा! अशा
खोल्यांतून तीन/चार महिने राहून शेवटी दिनेश आणि त्याच्या २ सहकार्यांनी
मोठी सदनिका घेऊन एकत्र राहण्याचे ठरवले,त्यादॄष्टीने प्रयत्न करून घर
मिळवले आणि आता त्या नवीन घरात येणारी मीच शेवटची मेंबर होते.बाकीची मंडळी
आधीच येऊन पोहोचली होती.
दुसर्याच दिवशी सकाळी आम्ही नांबाला जायचे ठरवले.आम्ही म्हणजे इतरांनी
ठरवले,मला तिथे पोहोचून २४ तासही झाले नसल्याने नांबा हे गावाचे नाव आहे
एवढीच माहिती मला बाकीच्यांच्या बोलण्यातून समजली. जपानची एलेक्ट्रॉनिक
गुड्स मधली प्रगती तर सार्या जगाला माहित आहे पण प्रत्यक्ष पाहताना
अक्षरशः चकित व्हायला होतं.रस्तेच्या रस्ते दुतर्फा मोठमोठया शो
रुम्स्,मजलेच्या मजले नुसते कॅमेरे,डिजिटल कॅमेरे,विडीओ कॅमेरे वॉकमन्स आणि
कितीतरी अशा वस्तू की ज्यांची नावंही माहित नसतील.अक्षरशः अलिबाबाच्या
गुहेत शिरल्यासारखी स्थिती झाली. 'योदोबाशी' ही ७ मजली इमारत फक्त
कॅमेर्यांची शो रुम! मी स्वत:लाच एक चिमटा काढून स्वप्नात नसल्याची खात्री
केली.
इथे येऊन ३,४ दिवस झाल्यावर सुप्रिया आणि मी दोघींनीच 'दाई याई ' या
प्रसिध्द सुपरमार्केटात जाऊन रोजच्या लागणार्या वस्तू आणण्याचा बेत
केला.बेत केला म्हटले अशाकरता, की ते दुकान आमच्या घरापासून साधारण ३ किमी
दूर,रस्ता सरळ नाही,एकदा उजवीकडे वळा मग डावीकडे जा,परत डावीकडे
वळा...असला आणि त्यात माझे दिव्य दिशाज्ञान!तो मार्ग लक्षात ठेवूनच तिथे
जाणे भाग होते कारण भाषेचा प्रश्न!एकदाचे तिथे पोहोचलो.एवढ्या प्रचंड
दुकानाला ५,६ दारं! आता कोणत्या दारातून आत शिरलो हे लक्षात ठेवणे आवश्यक
,नाहीतर जत्रेत हरवल्यासारखी स्थिती होणार आपली! स्वतःलाच बजावत
होते.आजूबाजूला असलेल्या पाट्यांवरचे एक अक्षर समजेल तर शपथ! शेवटी 'खुणा'
लक्षात ठेवल्या.बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच
खुणा लक्षात राहतात!),समोरच असलेल्या चौकातली बेकरी आणि 'वॉशिंग्टन' अशी
रोमन लिपीत पाटी असलेलं एक दुकान ,जी एकमेव पाटी आम्हाला वाचता आली.असं
सगळं डोक्यात ठेवून आम्ही दोघी सरकत्या जिन्यावरून धडधडत्या मनाने आत
शिरलो,हव्या असलेल्या वस्तू आधी शोधल्या ,मग घेतल्या आणि काऊंटर पाशी
आलो.'येन' मध्ये यशस्वी रीत्या बिल देऊन बाहेर आल्यावर काहीतरी मोठ्ठेच
काम केल्याच्या थाटात बाहेरच्या लाऊंजमध्ये बसलो.लहानपणी एकट्याने दुकानात
जाऊन केलेल्या खरेदीचा जो आनंद असतो ना,तसंच काहीसं वाटत होतं. नंतरच्या
काही दिवसातच हे दाई याई, तिथले लोक,तो परिसरच आमचे दोस्त बनून जातील,याची
त्या दिवशी आम्हाला काहीसुध्दा कल्पना नव्हती.
जपानी चलन फक्त येन च आहे.म्हणजे रु/पैसे, डॉलर्/सेंट, युरो/सेंट असे काही नाही.
१,२ ,५,१०,२०,२५,५०,१००,२०० येनची नाणी असतात आणि
५००,१०००,१०००० येनच्या नोटा असतात.
१०० येन= ४० रु. हा विनिमय दर तेव्हा होता,आताही त्याच्याच आसपास असावा.
हरणांच्या गावा..
'नारा'! नाराचं वर्णन जपानला यायच्या आधीपासूनच ऐकून,वाचून होते.त्यामुळे या शनिवारी नाराला जायचे आहे,असा फतवा निघाल्यावर आता हे नारा काय आहे ? असं तरी नांबाला जाताना वाटलं होतं तसं वाटलं नाही.इथे कुठेही फिरायला जायचं म्हटलं की शाळेच्या सहलीसारखा डबा आपला बरोबर! यावेळी सुध्दा पुलाव,शिरा,पराठे इ.शिदोरी बरोबर घेतली आणि ओसाका स्टेशनवर आलो.ओसाका हे जंक्शन स्टेशन आहे, दादर स्थानकासारखे!पण दादरला फक्त मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडली आहे,ओसाकाला अशा बर्याच लाइन्स जोडल्या आहेत.त्यातील एक ,लूप लाईन. तेथे जाऊन नाराकडे जाणारी गाडी पकडायची होती. इथे जपानमध्ये आल्यापासून आपली स्थिती तर पहिल्यांदाच गाव सोडून भाऊच्या धक्क्यावर उतरलेल्या,अक्षरओळख नसलेल्या माणसासारखी होते. एकही पाटी मुळी वाचताच येत नाही.त्यातल्या त्यात इंडिकेटर वरचे आकडे तरी थोडा वेळ जपानी आणि थोडा वेळ रोमन मध्ये दाखवतात.(२००२ च्या फुटबॉलची कृपा!)तर लूप लाईन वर आलो,आता नाराची गाडी पकडायची म्हणून इंडिकेटरवर रोमन आकडे येतात कधी आणि आपल्याला काही अर्थबोध होतो कधी, याची वाट पाहू लागलो.
तिथेच बाजूला सहलीला जाणारी शाळेची मुलं उभी होती,९वी /१०वी तली असावीत.तरूणांना इंग्रजी समजते,ते थोडेफार बोलू शकतात हा अनुभव असल्याने त्यांना नाराला जाणारी गाडी विचारली आणि फलाटाला लागतच असलेली गाडी नाराची ,असे कळल्यावर आम्ही लगेचच गाडीत बसलो.सामानसुमान लावतो न लावतो तोच मघाचची दोन मुले आणि त्यांचे शिक्षक लगबगीने आमच्या दिशेने आले आणि आम्हाला गाडीतून खाली उतरायला लावले. त्या मुलांच्या समजूतीत काही गोंधळ झाला होता,आणि आम्ही भलत्याच गाडीत बसलो होतो. त्या सरांना हे समजताच त्या मुलांना घेऊन ते आमच्या इथे आले आणि आम्हाला योग्य गाडीत बसवून दिले.
नारा अगदी लहानसं स्टेशन,अगदी वांगणी,शेलू,नेरळची आठवण येईल, असं!पण स्टेशनाच्या बाहेरच टूरिस्ट इन्फर्मेशन सर्विसचे काऊंटर आणि चक्क इंग्रजी बोलू शकणारे सहाय्यक!तोडायजी मंदिराकडे जाणारी बस २ मिनिटात सुटत असल्याचे सांगून हातात तिकिटे आणि नकाशा कोंबून त्यांनी आम्हाला बसकडे पिटाळले. बस खचाखच भरी हुई थी,चक्क उभं रहायला लागलं.बाहेरची हिरवाई न्याहाळत असतानाच दोन शिंगं दिसली,त्याच्या मागोमाग अनेक शिंगं!सोनेरी ठिपके असलेला हरणांचा कळपच्या कळप चक्क रस्त्यावर बागडत होता.रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा तापदायक कळप पाहण्याची सवय असलेल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्या डोळ्यांची हरणंच हरणं.. (सीतामाईला पण अशीच मायावी हरणं दिसली असतील का?आणि त्या गोजिर्या हरणाला मारून त्याचं वस्र करण्याची शक्कल ! काय पण कवीच्या कल्पनेची भरारी?)
तोडायजी बुध्दमंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षराजी ,हिरवळ
,कुरणं आणि त्या कुरणात चरणारी असंख्य हरणं!माणसांचे थवे मंदिराच्या
बाजूला येतानाची चाहूल लागली की हरणांचे कळपच्या कळप कुरणं सोडून जणू
स्वागतालाच आल्यासारखी सामोरी येत,आपल्या हातातली बिस्कीटे घेऊन
जात.त्यातल्याच एकाने बिस्किटाबरोबरच माझ्या हातातला नकाशाचा कागदही
पळवला.काशी विश्वेश्वराच्या आवारात माकडं जशी वावरतात आणि हातातल्या वस्तू
पळवतात ना,त्याची आठवण झाली.
तीस मीटर उंच,२५० टनांपेक्षाही जास्त वजन असलेली दाईबुत्सुची अर्थात
बुध्दाची मूर्ती असलेले 'तोडायजी बुध्दमंदिर' हे जपान्यांचं श्रध्दास्थान!
तिथे अनेकजण आपल्या इच्छा देवाला सांगतात म्हणजेच नवस बोलतात.तालीबानांनी
जगातील सर्वात मोठी बुध्दमूर्ती उद्ध्वस्त केल्यानंतर आता तोडायजी मंदिराची
मूर्ती सर्वात मोठी मूर्ती आहे.इस.७५२ मध्ये बांधलेले हे मंदिर म्हणजे
लाकूडकामाचा जपानमधील,कदाचित जगातील अतिभव्य नमुना आहे.बुध्दमंदिरांचे
मुख्यालय असलेले हे मंदिर असल्याने प्राचीन काळी नारा ही राजधानी होती.
परंतु नाराचा आणि बुध्दीझमचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ती इस. ७८४ मध्ये
नागाओका येथे हलवण्यात आली.
भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं.मुख्य बुध्दमूर्ती आणि अनेक भावावस्था असलेल्या मूर्तींची प्रभावळ इथे आहे. अत्यंत शांत शांत होत,निर्विचार असे आपण तिथे आपोआपच स्तब्ध उभे राहतो.या मंदिरात एक खांब आहे.हिअरिंग पिलर असे त्याचे नाव!त्या खांबाला एक मोठे भोक आहे आणि त्या भोकातून पलिकडे जाणारी व्यक्ति पुण्यवान असा एक जपानी समज आहे.त्या खांबातून पलिकडे जाणारी मंडळी ,त्यांचे ते प्रयत्न चित्रबध्द केले.(प्रत्यक्ष कृती शक्य नव्हतीच त्यामुळे जे आणि जेवढं शक्य होते ते केले.)नंतर 'कासुगा तायशा' म्हणजे'कासुगा श्राईन'ला आम्ही भेट दिली. जपानमधील हे प्रसिध्द शिंतो श्राईन. इस.७६८ मध्ये बांधलेले,अतिभव्य आवार असलेले,दाट वनराईने वेढलेले हे श्राईन पाहताना 'आहे मनोहर तरी गमते उदास..'अशी भावावस्था होते.
राष्ट्रीय खजिना असलेलं 'शिन याकुशिजी मंदिर'इस.७४७ मध्ये बांधलेले आहे
आणि इस.७१० मध्ये बांधलेले कोफोकुजी मंदिर म्हणजे पाच मजली पॅगोडा
आहे.आजूबाजूला असलेल्या जवळजवळ पाऊणशे इमारती १३०० वर्षात आता नाहीशा
झाल्या आहेत,परंतु पॅगोडाची मुख्य इमारत मात्र अजूनही रमलखुणा जपत उभी
आहे.आपल्या गोव्याकडच्या मंदिरांसमोरील दीपमाळेची आठवण करून देणारे 'कहान'
मंदिरासमोर आहे.तेथील 'वाकासुकायामा' ही तीन थरांची टेकडी ही प्रसिध्द
आहे.लांबून पाहिलं तर हिरवाईच्या वेगवेगळ्या छटांचे तीन थर दिसतात. दरवर्षी
जानेवारीच्या दुसर्या रविवारी रात्री ह्या टेकडीवरचे गवत जाळण्याचा रिवाज
आहे त्याला 'थामासुकी' म्हणतात.थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले
गवत जाळण्याचा विधी.त्याचं प्रयोजन काय ते आमच्या मोडक्या तोडक्या जपानी
ज्ञानामुळे कळले नाही.
हरणांच्या कळपातून पाऊस अंगावर घेत हिरवळीतून चालताना किनेतेत्सु नारा स्टेशन कधी आले ते समजलेच नाही.
क्योतो
क्योतो! जपानचे सांस्कृतिक केंद्र,प्रसिध्द क्योतो युनिवर्सिटी आणि जपानची जुनी राजधानी असलेलं एक देखणं शहर अशी ओळख घेऊन आम्ही क्योतोला गेलो.स्टेशनातच शहराच्या देखणेपणाची जाणीव व्हायला सुरूवात होते.क्योतो रेल्वे स्टेशनच मुळी ९ मजली आणि अत्यंत देखणं आहे.भव्य आणि कलात्मक!९व्या मजल्यावर एक ओपन टू स्काय रंगमंच आहे.
समोरच्या जिन्यांच्या पायर्यांवर प्रेक्षक बसतात आणि सरकते जिने आणि लिफ्टचा वापर प्रवासी करतात.तेथे कायमच कोणतेतरी सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य चालू असतात. आम्ही गेलो तेव्हा 'हवाई उत्सव' चालू होता.हवाई कपडे, पानाफुलांच्या,शंखांच्या माळा ल्यालेल्या जपानी ललना लयीत नृत्य सादर करीत होत्या.एक ग्रुप जाऊन दुसरा येत होता.प्रत्येक गटाची वेशभूषा,केशभूषा वेगवेगळी होती , हवाई बेटांवरील वेगवेगळी वैशिष्ठ्ये दाखवणारी होती.मोठ्ठ्या घेराचे ,फुगाबाहीचे घोळदार लांब झगे,डोक्यात,हातात,गळ्यात फुलं आणि पानांच्या कलात्मक माळा! सार्या पन्नाशीच्या पुढच्या ललना! त्यांचं ते हवाई नृत्य पाहत बराच वेळ रमलो.
अतिप्राचीन शहर असलेले क्योतो इस. ७९४ ते १८६८ जपानची राजधानी होती आणि सम्राटाचे आवडते निवासस्थान.नंतर नवीन राजधानी वसविताना क्योतोची अक्षरे उलट करून 'तोक्यो 'हे नाव दिले. अनेक लढायात आणि युध्दात क्योतोवर हल्ले झाले,पडझड झाली. दुसर्या महायुध्दात तर क्योतो आम्लवर्षेचे भक्ष्य होती.क्योतोच्या रस्त्यांवरून चालताना दुकानादुकानातून त्या सुप्रसिध्द जपानी बाहुल्यांचे अनंत प्रकार पहायला मिळतात. किमोनो, युगाता घातलेल्या,वेगवेगळ्या भावछटा असलेल्या, अत्यंत आकर्षक पध्दतीने मांडलेल्या त्या बाहुल्यातील एक तरी आपल्या संग्रहात असाविशी वाटतेच वाटते. जपानमध्ये नऊ प्रमुख कॅसल्स आहेत.क्योतो ज्यू किवा क्योतो कॅसल हा त्यापैकी एक. इतिहासाच्या,गतवैभवाच्या खुणा जपत मोठया दिमाखात उभा असलेला देखणा क्योतो ज्यू जरा घाईतच पाहून आम्ही किंकाकुजी अर्थात गोल्डन पॅवेलियन कडे गेलो.
पूर्णपणे सोन्याच्या पत्र्याने मढवलेले ते रोकुओंजी किवा किंकाकुजी
कितायामाच्या डोंगरमालिकेत वसलेले आहे. ते पाहताना अमृतसरच्या
सुवर्णंमंदिराची आठवण होणे अपरिहार्यच ! क्योतो हेच मुळी सांस्कृतिक केंद्र
आणि देखणे किंकाकुजी हे क्योतोचे सांस्कृतिक केंद्र! तिथे असलेला पक्षांचा
किलबिलाट, पानाफुलांनी बहरलेले वृक्ष,समोरच्या पुष्करणीत दिसणारे आणि
वार्याच्या झुळुकेने नाजूकपणे थरथरणारे किंकाकुजीचे प्रतिबिंब पाहत
कितीतरी वेळ रेंगाळलो.
गिऑन उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या ह्या यासाका श्राइनमध्ये नवजात बालकांचे
रजिस्ट्रेशन होते,आणि बरेचदा त्यांच्या आज्या आपापले पारंपारिक किमोनो
लेवून बाळराजांना घेऊन तिथे येतात.अगदी पारंपारिक पैठण्या लेवून बाळाला
पहिल्यांदा देवळात नेणार्या आपल्याकडच्या आज्या आणि या जपानी आज्यांमध्ये
फरक तो काय?
आता पहायचे होते कियोमिझु टेंपल अर्थात प्युअर वॉटर टेंपल.इस.६५७ मध्ये दोशो या बौध्द भिक्कुने ते नावारुपाला आणले आणि पुढे इस. ७९८ मध्ये एनचिन या भिक्कुने त्याचे महत्त्व वाढविण्यात पुढाकार घेतला. १३९ पिलर्स आणि ९० क्रॉसबीम्स असलेले अत्यंत प्रशस्त आणि मजबूत दालन आणि व्यासपीठ भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उभे आहे.या मोठ्या दालनाच्या खाली असलेल्या तीन झर्यातून येणारे पवित्र पाणी पिण्यासाठी सारे रांगा लावतात.या मंदिराच्या आवारात अनेक श्राईन्स आहेत.जिसु जिन् जा हे त्यातील प्रसिध्द.प्रेम आणि जोडीदाराच्या लाभासाठी बरेच जपानीयेथे येतात.इथे १८ मीटर अंतरावर दोन प्रेमदगड आहेत आणि डोळे बांधून जो प्रेमवीर एका दगडापासून दुसर्या दगडाकडे जाईल त्याला प्रेमात सफलता मिळते असा जपानी समज आहे.
झुइगुडोचे मंदिर हाच एक मोठा अनुभव आहे. दाइ झुइगु ही बुध्दाची माता.(असे जपानी मानतात.तिथे बुध्दाचाही दाइ बुत्सु होतो.)मंदिरात आतमध्ये एक इच्छापूर्ती दगड आहे.त्या दगडावर संस्कृत मध्ये बुध्दमातेचे नाव लिहिले आहे. अतिकाळोखामुळे अर्थातच आपण ते वाचू शकत नाही आणि बॅटरी किवा तत्सम गोष्टी आत न्यायला बंदी आहे.मंदिरात शिरायच्या आधीच सांगितलं जातं अजिबात बोलायचं नाही,अत्यंत शांतता राखा,आत मिट्ट काळोख आहे.डाव्या बाजूला बांधलेला दोर पकडून,मन एकाग्र करून चालत रहा.आत उतरायला पायर्या आहेत.पायर्या संपतासंपता अंधाराला सुरुवात होते.हळूहळू अंधुकही दिसेनासे होते.मिट्ट काळोख फक्त उरतो.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.मन शांत करत,दोराला धरून पुढे जात रहायचं,सगळे विचार हळूहळू नाहीसे होतात.एका असीम पोकळीत आपण प्रवेश करतो.तो असतो आईच्या गर्भात केलेला प्रवेश.असेच चालत असताना एक अंधूक प्रकाशाची तिरीप दिसते.त्या तिरीपेत एक मोठा दगड दिसतो.तोच तो इच्छापूर्ती दगड! त्याला हात लावून आपली इच्छा व्यक्त करून प्रदक्षिणा पूर्ण केली तर म्हणे ती पूर्ण होते, असाही आणखी एक जपानी समज आहे.पण तिथपर्यंत पोहोचताना आपलं मन इतकं शांत झालेलं असतं,भौतिक जगाचा, तिथल्या सुखाचा, विवंचनांचा सार्यासार्याचाच विसर पडतो.एक असीम निख्खळ आत्मानंद घेऊन आपण परत त्या अंधारातून वाटचाल करीत बाहेर प्रकाशाकडे येतो.तमसो मा ज्योतिर्गमय ! हा संदेशच जणून त्या गर्भात मिळतो.अंधाराकडून प्रकाशाकडे! अज्ञानाकडून ज्ञानाकडे!
जादूनगरी
युएसजे म्हणजेच युनिवर्सल स्टुडिओ जपान! मोशन पिक्चर मॅजिक! ही जादूई नगरी आहे ओसाकामध्ये.युनिवर्सल स्टुडिओ,हॉलिवूड या ओरिजिनल स्टुडिओची ही जपान शाखा!प्रसिध्द हॉलिवूडपटांवर आधारित मोठेमोठे सेट्स इथे उभारले आहेत.तेथे आपल्याला त्या त्या सिमेमावर आधारीत शो पाहता येतात,निरनिराळ्या राईड्स घेता येतात आणि त्या सिनेमातले अनुभवही प्रत्यक्ष घेता येतात. अतिप्रचंड आवार असलेली ती नगरी शनिवार,रविवारी तर गर्दीने फुललेली असते.
पहिल्यांदा आम्ही गेलो 'जॉज' मध्ये,एका बोटीत आपण १०,१२ जण बसतो.बोट चालवणारी बाई,बोटीची कप्तान! आमचा प्रवास सुरू झाला.वाटेत आम्हाला एक छोटं बेटं दिसलं, त्याला वळसा घालून आमची बोट पुढे निघाली आणि एक मोठी शेपटी दिसली.शार्क! शार्क! असा एकच ओरडा झाला.पाणी कापत ते धूड आमच्या बोटीच्या दिशेने येऊ लागले.आमच्या पुढे काही अंतरावर असलेली एक बोट उलथली,दुसरीला आग लागली.आम्ही पुढे जात होतो,पण शार्क आपला जबडा वासून येत होताच.आमची कॅप्टन किंचाळायला लागली.जपानीतून घाईघाईने सूचना द्यायला लागली आणि जवळ येत असलेल्या त्या धूडाची हार्पूनने तिने शिकार केली.पाणी उसळलं आणि बोट पुढे निघाली.अगदी खरा खरा वाटणारा तो खोटा शार्क! जॉज सिनेमातले ते चित्तथरारक प्रसंग आपण या तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष अनुभवतो.ज्युरासिक पार्क राईड हे इथले खास आकर्षण, त्याला भरपूर गर्दी असते.तासंतास रांगेत उभे राहून लोक ती राईड घेतात म्हणून आधीच त्याचं आरक्षण केलं आणि दुसर्या शोजची मजा घेण्यासाठी आम्ही पुढे वळलो.
बॅक ड्राफ्ट हा सगळा आगीचा खेळ होता.सिनेमात आग कशी लागते? किंबहुना कशी लावतात? याचं ते प्रात्यक्षिकच होतं म्हणा ना!आपल्या समोरच आग लागते,धूर येतो,मोठाली पिंपे,कॅन्स घरंगळत खाली पडतात,कडाकडा आवाज करत जिना खाली बसतो आणि सगळ्यात शेवटी तर कहर होतो.हे सारे पाहत आपण जिथे उभे असतो ना, तिथेच हादरे बसायला लागतात,समोरचा कठडा कोसळतो आणि वरचं छप्परच खाली येतं, आपल्यापासून अगदी चार हातांवर!वाटतं ,आता पडणार..पडणार हे आपल्या डोक्यात!साहजिकच आपण घाबरतो,दचकतो तर कधी किंचाळतो सुध्दा! हळूहळू सारे शांत होऊ लागते.पडलेला जिना परत जागेवर बसतो,घरंगळलेली पिंपे होती तिथे जातात,खाली आलेलं छत परत वर होतं. सगळं आपओआप होत असतं.सिनेमात आग कशी लागते? इमारती,जिने कसे कोसळतात?एकावर एक रचलेली पिंपे कशी धडाधडा खाली येऊन एकमेकांवर आदळतात?सिनेटेक्नॉलॉजीशी हळूहळू ओळख व्हायला लागते.
बॅक टू द फ्युचर नावाचा एक भन्नाट फोर-डी शो! चौथी मिती काळाची!एका उघड्या मोटारीत पुढच्या भागात ४,आणि मागच्या सीटवर ४ असे ८ जण बसतात.गाडीला फक्त दरवाजे।रुफटप नाही की विंडशिल्डची काच नाही.गाडी सुरू होते.हळूहळू वेग घेते.समोर आपल्याला बर्फाळ डोंगर दिसत असतात.त्या डोंगरातच आपली गाडी जाते.एकदम थंडावा जाणवायला लागतो.सगळीकडे गारवा मुरायला लागतो.हिमनग दिसायला लागतात आणि आपण पाण्यातच शिरतो.त्या समुद्रातील कॉरल्स,सागरी वनस्पती,प्राणी आणि छोटेमोठे मासे पाहत असतानाच अचानक आपली गाडी वर उचलली जाते आणि तिथे एक डायनॉसोर आ वासून वाटच पाहत असतो आपली. डायनॉसोरच्या युगातून,अश्मयुगातून थेट आपण भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे धावतो.उंचउंच गगनचुंबी इमारती आणि स्पेस शटल्स पाहताना आपल्या मोटारीचंच स्पेस शटल होतं.आपण अवकाशात विहार करू लागतो.२०५० मधील जग कसे असेल?याची चुणूक पाहत असतानाच आपण पुन्हा एकदा 'चालू वर्तमानात' येतो.मनात माहिती असतं, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने आपल्या समोर येतं की ते आपण नुसते पाहत न राहता आपण त्याचाच एक भाग बनतो आणि ते सारे अनुभवतो.
डिजिटल कार्टून शो म्हणजे धमालच धमाल!भाषेचा प्रश्न तंत्रज्ञान सोडवून टाकते.स्टेजवर वावरणारी खरी पात्रे,विडिओचा वापर आणि ऍनिमेशन असा तिहेरी गोफ आहे.कार्टूनिस्टचे पात्र खरे तर संपादक कायम पडद्यावर!फोन वाजतो आणि संपादकाची छबी पडद्यावर उमटते आणि दोघांचे संभाषण कम कार्टूनिस्टची खरडपट्टी सुरू होते.थोडक्यात गोष्ट अशी: एक असतो कार्टूनिस्ट,त्याला डेडलाइन सांभाळताना नेहमीच नाकीनऊ येत असतात.संपादक सतत त्याच्या मागे भुणभुणत असतो.एकदा कार्टूनिस्टने काढलेल्या बदकातच जीव येतो. ते बदक इतक्या गमती करतं,त्या कार्टूनिस्ट्च्या घरात नाचतं,गातं,चित्र काढतं,खोड्याही काढतं.त्याचे ब्रश,रंग,पेनं,कागद सारे काही विखरून टाकतं.बदकाला पकडायचा विचार करकरून हा थकतो.शेवटी त्याला युक्ती सुचते.एका वॅक्युम क्लिनरमध्ये तो बदकाला बंद करतो आणि ते बदक आता तो कागदावर उतरवणार तेवढ्यात बदकोबा बाहेर येऊन आपल्या हातात वॅक्युम क्लिनर घेतो आणि त्या कार्टूनिस्टलाच बंद करतो आणि कागदावर बदकाचे चित्र उतरण्याऐवजी याचंच कार्टून!थक्क होत,कसं काय बुवा केलं असेलं असे प्रश्न मनात घेऊन आपण त्या शोला सलाम करतो.
ज्युरासिक पार्क राईड हा आणि एक सुंदर अनुभव होता.त्या ज्युरासिक पार्क
सिनेमातल्या सारखीच आमची बोट सफरीला निघाली.वाटेत बेटं,जंगलं,जंगलातील
हरणं,ससे,कूजन करणारे पक्षी,आणि डायनॅसोर्सची पिल्लं ,अंडी आणि अंडी फोडून
बाहेर पडत असलेली पिल्लं!सारं कुतुहल डोळ्यात घेऊन पाहत असताना आमची बोट
वेडीवाकडी वळणं घेत उंच लाटेवर जात होती,कधी वेगात खाली येताना हिंदकळत
होती.अचानक एक अतिमहाकाय,प्रचंड डायनॅसोर आपल्या बोटीवरच चालून येतो.भीतीने
मंडळी गारठतात आणि सुसाट वेगाने पाणी कापत,स्प्लॅश करीत बोट जवळ जवळ ८०
फूटांवरून धप्पकन खाली येते.त्या भिजलेल्या अवस्थेत सर्वांचेच चेहरे फोटो
काढण्यासारखे झालेले असतात,आणि तिथे लपलेल्या यंत्रात तुमची छबी
उतरतेही!पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं.
(क्रमश:)
जादूनगरी (पुढे चालू)
ज्युरासिक पार्कमध्ये चिंब भिजून आम्ही पुढच्या शो कडे गेलो."इट्स अ वाईल्ड वाईल्ड वाईल्ड वर्ल्ड!" नावावरूनच स्टंटबाजी भरपूर असणार,याची कल्पना आलीच म्हणा!समोरच मोठ्ठा सेट होता.बँक, सलून,घर,विहिर,फाँसी का फँदा अशा अनेक गोष्टी इंडिकेट केलेल्या होत्या.प्रायोगिक रंगभूमीच्या नेपथ्यासारखा काहीसा प्रकार दिसत होता.समोर नाटक सुरू झालं,भाषा अर्थात समजत नव्हतीच पण अभिनयातून,समोरील दृश्यातून हळूहळू कथानक उलगडू लागलं,एका बँक दरोड्याची गोष्ट होती ती!दोघंजण बँक लुटतात आणि मग मारामारी,हाणाहाणी इ.इ.. शेवटी दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचा विजय!कथानकात काही नाविन्य नव्हते,होते ते सादरीकरणात!आपण त्या बँक दरोड्याचे साक्षीदारच बनून जातो .प्रत्येक ठिकाणी हे जाणवले की आपण तो खेळ नुसता पाहत नाही,तर त्याचेच एक भाग बनून जातो आणि तो थरार प्रत्यक्ष अनुभवतो.
स्टेज २२ या ठिकाणी चक्क इंग्रजी आणि जपानी दोन्ही भाषांमध्ये सिनेमातली ड्रेपरी,नेपथ्यासाठी लागणाऱया वस्तूंचा वापर कसकसा करतात याची माहिती एक जण देत होता.इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे स्टंटशो सुरू होण्याआधी त्याची माहिती तुम्ही रांगेत उभे असताना मॉनिटरवरून दाखवली जाते. काही ठिकाणी रक्तदाबाचा त्रास असणारे,हृदयविकार असणारे यांना नम्रपणे प्रवेश नाकारलाही जातो.
आता आम्ही "टर्मिनेटर टू डी "साठी रांगेत उभे राहिलो.समोर दिसणार्या सज्जातून नाजूक आरडाओरडा करत एक ललना प्रेक्षकांशी जपानीत संवाद साधत हशा पिकवित होती.आम्ही मख्ख! आणि आत कधी सोडतेस बाई? अशा कपाळावर आठ्या!शेवटी एकदाचे आत जाऊन खुर्च्यांवर बसलो.तर ही बया आली की आतसुध्दा!परत आपली तिची बडबड आणि प्रेक्षक संवाद सुरू झाला.हा ३डी शो आहे की हिच्या भाषणबाजीचा कार्यक्रम?एवढ्यात आमच्या डाव्या,उजव्या बाजूंनी तीन तीन महाकाय,बंदूकधारी प्रकट झाले आणि स्वैर गोळीबारच चालू झाला.ती जपानी बाला आणि तिचे साथीदार तिथून लुप्तच झाले आणि समोरच्या पडद्यावरच दिसायला लागले की एकदम!पडदा असं आपलं म्हणायचं, इतका महाकाय पडदा होता तो की प्रेक्षक आणि पडदा असं काही अंतर उरलच नाही.एकदम सगळीकडून धूर यायला लागला,बंदूकीच्या फैरीवर फैरी तर झडतच होत्या.आमच्या खुर्च्यांसकट आम्ही पाण्यातच गेलो की!मोठेमोठे मासे,ऑक्टोपस आमच्या दिशेने चाल करून येऊ लागले तसे आपल्या डोळ्यांवरचे चष्मे कितिक जणांनी काढून टाकले.पाण्यातून आम्ही एकदम परत जमिनीवर आलो,भन्नाट वेगाने मोटरबाईक घेऊन दोन तरुण आपल्याच दिशेने येऊ लागले.आले,आले, आता आदळणारच आपल्यावर! कडाकड आवाज होऊन इमारती कोलमडू लागल्या.अवकाशात युएफओ तबकड्या भिरभिरू लागल्या आणि आता एकदम बर्फाळ प्रदेश दिसायला लागला.आमच्या इथेही गारवा जाणवायला लागला,पाऊस पडायला लागला आणि थेंब टपोरे’ आपल्या अंगावर!एकदम हादरे बसायला लागले, भूकंपच झाला जणू! खुर्चीतल्या खुर्चीत हादरून आपण काय झालं ते पाहिपर्यंत आपण खुर्चीसकट आदळून खाली येतो.अतिशय रोमांचकारी अनुभव घेत बाहेर आलो तर काय?
गाण्याच्या तालावर सारे थिरकत होते.रस्त्याच्या दोबाजूला गर्दी उसळली होती आणि एकेका रथातून ज्युरासिक पार्क मधले डायनॅसोर्स,जॉज मधले शार्क्स,ऑक्टोपस येत होते.लाखो दिलोंकी धडकन मेरेलिन मन्रो होती आणि ००नाना म्हणजे००७ बाँडही होता(जपानीत नाना= सात).हॉलिवूडच्या ताऱ्यांच्या त्या सोंगाना पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती,सारे जण त्या परेड बरोबर नाचत,गात पुढे चालले होते.गर्दी असली तरी गोंधळ,धक्काबुक्की मात्र अजिबात नव्हती."ओ भाऊ,व्हा की जरा बाजूला,आम्हालाही पाहू द्यात की परेड.. "असले प्रेमळ संवादही नव्हते.
वॉटरवर्ल्ड मध्ये पाण्यातली स्टंटबाजी पहायची आणि अनुभवायची होती.पाण्यात एक नाटुकलं सुरू होतं.तरुण तरुणी बोटीतून गुजगोष्टी करीत चाललेले असतात,तोच काही चाचे येतात,हल्ला करतात,हाणामारीला सुरूवात होते.उंचावरून उड्या मारणे, दोरीवरून खाली चढणे,उतरणे,एकदम वॉटरस्कूटरवर उडी मारणे,या बोटीतून त्या बोटीत जाणे वगैरे वगैरे..अचानक एक हेलिकॉप्टरही घिरट्या घालायला लागते आणि त्यातून दोरीने काही लोक खाली येतात.डोके बाजूला ठेवून आपण सिनेमात जे जे पाहतो ते ते इथे चालू होते,आपल्या समोर,काही फूटांवर! नाटकाची संहिता नेहमीचीच,घासून गुळगुळीत झालेली!गुंड आणि सज्जन असे दोन गट आणि त्यांची लढाई! अंती सज्जनांचा जय आणि दुर्जनांचा नाश!कोणत्याही हिंदी चित्रपटात खपून जाईल अशी स्टोरीलाईन! पण सगळी मजा होती सादरीकरणामध्ये! त्यातच तर नाटकाचा खरा जीव होता.अस्सल वाटावे असे एकाहून एक स्टंटस,जबरदस्त सकस सादरीकरण आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड! नकळत आपण त्या सगळ्या नाटकाचाच एक भाग बनतो.
ऍनिमल ऍक्टर म्हणजे तर मिनी सर्कसच होती.कुत्रा,मांजर,माकड,घार,ससाणा,पोपट,कबुतरे यांचा खेळ होता तो.मांजर स्टेजवर आलं आणि एका टोपलीत बसलं,ती टोपली एका कप्पीला लावली होती.कुत्र्याने ती दोरी कप्पीने ओढली आणि मांजरीची टोपली वर उचलली गेली.तिथे असलेल्या पाटीचे मग मनीबाईंनी अनावरण केले.पाटी होती ’ ऍनिमल ऍक्टर्स!नंतर एक जपानी युवती आली आणि जपानीत जे काही बडबडली त्यातलं एक अक्षरही समजले नाही.आमच्या पुढेच बसलेल्या एका ललनेने आपल्या उजव्या हातात १००० येनची नोट धरली आणि एक पोपट उडत येऊन चक्क तिच्या हातावर बसला.चोचीत ती नोट पकडून उडाला की भुर्रकन स्टेजवरच्या युवतीकडे.मग झाले कबुतरं,घारी,ससाणे यांचे विभ्रम! माझे लक्ष त्या खेळातून उडाले. गेली की रे त्या बाईची १००० येनची नोट! माझे मध्यमवर्गीय मन म्हणू लागले.आता माकडाच्या माकडचेष्टा झाल्या पण लक्षात राहिलं ते त्याने त्याचा खेळ संपल्यावर टोपी काढून तीन तीनदा कमरेत वाकून केलेले जपानी अभिवादन!अरिगातो गोझायमास! आणि त्या खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये थोड्या वेळाने आला की तो पोपट आमच्या पुढच्या बाईकडे आणि दिली की तिला तिची नोट परत! लोक आता टाळ्या वाजवायला सुध्दा विसरले.
अनेक नवनवीन कुतुहलं साद घालत होती,अजून काही पाहूया,अनुभवूया असं मन म्हणत होतं.दमलेले पाय त्याला साथ द्यायला अगदी तय्यार होते,पण 'वक्त की पाबंदी 'होतीच.नाईलाजाने मागे वळूनवळून पाहत आम्ही बसच्या दिशेने निघालो.
ओऽसाका
'ओसाका' नावाशी भारतात असल्यापासूनच ओळख झाली होती.जपानला कोठे जाणार आहात? या प्रश्नाचे उत्तर सान नो मिया-ओसाका असे देऊन देऊन कागदोपत्री ओळख झाली होतीच.जपानचे पहिले हवाई दर्शनही ओसाकाच होते,आणि 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला..' अशी अवस्था ओसाकाने केली होती की विमान जमिनीवर आले तरी अस्मादिकांना हवेतून खाली यायला अंमळ वेळच लागला होता.आल्याच्या दुसर्याच दिवशी नांबा ला गेलो होतो तेही ओसाकाहूनच,निहोंबाशीला गेलो तेही ओसाकाहूनच,नाराला जातानाही ओसाकाहूनच गाडी पकडली आणि माऊंट फुजीला जाणारी बसही ओसाकाहूनच सुटणार होती.थोडक्यात आपल्या दादर, चर्चगेट सारखे हे मोक्याचे स्टेशन आहे.
ओसाका मधील ओ थोडा लांबवून किंचित हेलकावा देऊन म्हणतात.'ओऽऽसाका देस्'अशी उद्घोषणा कानाला मोठी गोड वाटते. स्टेशनच्या बाहेरच योदोबाशी ही ७ मजली भव्य शो रुम आहे.जपानच्या सुपरटेक्नॉलॉजीचं प्रदर्शनच तिथे मांडले आहे जणू!कॅमेर्यांचे अनंत प्रकार,लॉपटॉप्स,काँप्युटर्स, टीव्ही,स्टीरीओ सिस्टीम्स्,सीडीप्लेअर्स,वॉकमन्स एक ना दोन...वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांची उत्तमोत्तम मॉडेले.. काय नाही तिथे? डोळे अक्षरशः दिपतात. अलिबाबाला गुहेत शिरल्यावर असेच वाटले असेल नाही!
ओऽसाकामध्ये असलेले ३०० मी. उंच टेंपोझान म्हणजे जायंट व्हील पहिल्याच दिवशी बसमधून घरी जाताना दिसले होते. त्याची जगातील सर्वात मोठे जायंट व्हील अशी ख्याती आहे.(मोठे जायंट व्हील= द्विरुक्ती झाली ! पण खरचच ते अतिभव्य आहे.विएन्नाच्या जायंट व्हीलमध्ये बसल्यावर सारखे ओसाकाचे टेंपोझान आठवत होते.)त्यात बसून आजूबाजूचा परिसर पाहता येतो.अतिशय धीम्या गतीने ते आपल्याला आकाशात नेते.काचेने पूर्ण बंदिस्त पाळण्यात बसून आपण बाहेर पाहत,उंचीचा अंदाज घेत असतानाच उद्घोषणा होते.डाव्या बाजूला पहा- कानसाई विमानतळ,जपानचे ट्विन टॉवर्स पहा, पूर्वेकडे आवाजी आयलंड आहेत त्यांच्याकडे नजर टाका आणि नजारा पहा..अशा सूचनांनी आपण नक्की काय पाहतो आहोत ते समजतेच पण त्या पाळण्यांमध्ये चारही बाजूंना नकाशे,चित्र काढून नावेही लिहिलेली आहेत. ह्या टेंपोझानच्या पायथ्याशी आहे काययुकान,जपानमधील सर्वात मोठे आणि प्रसिध्द मत्स्यालय! काचेच्या ७ ते ९ मीटर खोल खोल्यांमध्ये मोठमोठे व्हेल्स,शार्क्स,डॉल्फिन्स आहेत.त्यांना विहार करायला मुक्त जागा असल्याने काचेच्या पेटीत बंदिस्त केलेले बापुडवाणे मासे नाही वाटत ते.एका ठिकाणी पाण्याची संततधार चालू होती आणि डॉलफिन्स तेथे जाऊन 'आ' करून पाणी पित होते.त्यांच्या शेजारीच पेंग्विन्स साठी खास शीतालय होते.भुरभुरणारे हिम पेंग्विन्सना 'घराचा फिल' आणत होते.पोहोताना पेंग्विन साधारण बदकासारखाच दिसतो तर पाण्याखालून पोहोताना त्याचा चक्क मासाच होतो.
अतिशय नैसर्गिक वातावरणाचा आभास निर्माण करून अनंत प्रकारचे जलचर येथे ठेवले आहेत.मोठमोठ्या व्हेल्स पासून अगदी पिटुकल्या माशांपर्यंत सारे येथे नांदतात.फुग्यांच्या आकाराचे मासे,केशरी,सोनेरी,जांभळे,झेब्र्यासारखे पट्टे असलेले मासे,तोंडात दोन्ही बाजूला रसगुल्ले ठेवून गाल टम्म फुगलेले असावेत असे खोडकर मुलासारखे मासे,कोंबड्यासारखा तुरा असणारे ऐटबाज मासे,ठिपक्याठिपक्यांचा फ्रॉकच जणू घातलेले मासे,जेलीफिशचे अनेक प्रकार्,ऑक्टोपस्,चिंबोर्यांपासून राक्षसी म्हणता येतील अशा खेकड्यांचे अनेक प्रकार,सी वॉलरस,सी उटर्स,इल मासे,पेंग्वीन्स,बदकं,अगदी चिमुकल्या कासवांपासून महाकाय कासवांपर्यंत अनेकविध कासवे..काय नव्हतं तिथे?सारी जलसृष्टी आपल्यापासून फक्त एका काचेच्या अंतरावर होती.
जपानमध्ये मुख्य ९ कॅसल्स आहेत,ओऽसाका ज्यू म्हणजे ओऽसाका कॅसल ह्या मुख्य ९ पैकी एक. इस. १४९६ मध्ये जोदो- शिनयु ह्या बौध्द धर्मगुरुने सध्या असलेल्या किल्ल्याजवळ एक मंदिर बांधले.सन १५८३ मध्ये हिदेयोशी तोयोगामी नावाच्या सरदाराने ओऽसाकावर कब्जा केला आणि ह्या मंदिराजवळच एक मोठा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि अत्यंत मजबूत आणि सुंदर असा ओसाका ज्यू उभा राहिला.परंतु इस १६१७ च्या एका लढाईत हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्थ झाला,आगीचे भक्ष्य बनला.१६२० मध्ये शोगुन हिदेतादा तोकुगावाने ओसाका काबीज केले आणि हा किल्ला पुन्हा बांधायला सुरुवात केली.तो पूर्ण व्हायला ९ वर्षे लागली.पण ह्या किल्ल्याच्या मुख्य मनोर्यावर वीज पडली आणि तो जळून खाक झाला. नंतर १९३१ मध्ये ,इतक्या शतकांनतर तो पुन्हा बांधला आनि असा मजबूत की भूकंपाला टक्कर देत तो आजही उभा आहे.पण हा झाला सगळा पुस्तकी इतिहास! आपण आत शिरलो की वर्तमानाशी नातं तुटतं आणि आपण इतिहासातच शिरतो.भव्य दालनांमध्ये पुरातन वस्तू अतिशय कलात्मकतेने जपून ठेवल्या आहेत. एका दालनात पूर्ण भिंतभर पडद्यावर हा सारा इतिहास चित्ररुपात सतत दाखवला जातो.ती सांस्कृतिक जपणूक पहाताना किती वेळ गेला कळलंच नाही.
आम्ही तेथे गेलो त्या दिवशी हानाबी होता. हानाबी म्हणजे समर फेस्टिवल.उन्हाळ्यात संध्याकाळपासून उत्तररात्रीपर्यंत भरपूर आतशबाजी करतात.मनोरम,रंगीबेरंगी आतशबाजी खरोखरच पाहण्यासारखी असते.आकाशात रंगीत,लखलखती प्रकाशफुलं असतात तर जमिनीवरही आकर्षक रंगांचे पारंपरिक युकाता,किमोनो घातलेल्या ,पारंपरिक केशरचना केलेल्या पर्या चिवचिवत असतात.उन्हाळ्यामुळे हातातले ते प्रसिध्द जपानी पंखे,उचिवा आणि सेन्सु फडफडत असतात.मोकळ्या अंगणात आपल्या भेळपुरी,वडापावच्या गाड्यांसारख्या गाड्या लागलेल्या असतात. नूडल्स्,सूपं,मोमो,तेंपुरा( एक प्रकारची भजीच ही!) अशा पदार्थांचे ठेले असतात,इतकेच काय बर्फाचे गोळे आणि बुढ्ढीके बाल सुध्दा असतात.(बुढ्ढीके बाल जर्मन जत्रेतही असतात)अमाप उत्साहात गर्दी हानाबी पहाण्यासाठी जमते.त्याच उत्साहाचा एक थेंब बनून आम्हीही हानाबीची ती प्रकाशफुलं वेचत राहिलो.
तुमच्या लेखातुन जपान मधे नवे तसेच जुने यांचे अतिशय चांगले मिश्रण आहे ते कळते. आपल्याकडे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टिंकडे खूप दुर्लक्ष होते त्याचे वाईट वाटते.
परदेशात पर्यटनातील महत्वाच्या सोयी म्हणजे
१) जाण्या-येण्याचा मार्ग, बससुवीधा इ. अश्या की म्हातारी माणसे, लहान
मुले, अपंग (व्हीलचेयर, अंध)माणसे देखील बर्याच ठीकाणी फार त्रास न होता
जाउ येऊ शकतात.
२) परत तिथे गेल्यावर फक्त माहिती बोर्ड किंवा "राजू गाईड" इतकेच नाही तर
स्वातीताईंनी वर सांगीतल्याप्रमाणे दृकश्राव्य फिती, हेड फोन्स, जे पर्यटक
प्रामुख्याने ज्या भागातुन येतात त्यांच्या भाषेत माहीती देणारे असतात.
स्विर्झलंडमधे काही ठिकाणी हिंदीमधे पाट्या आहेत. :-)
३) खाणे-पिणे व सर्वात महत्वाचे स्वच्छ्तागॄहाची सोय!
भारतात जिथे जिथे अश्या सोयी आहेत तिथे पर्यटन नक्किच वाढले आहे. आशी आशा आहे की (निदान यापुढे १० वर्षानी) ह्या सुंदर लेखमालेसारखेच बरेच परदेशी पर्यटक भारतातल्या वेगवेगळ्या (दर्जात्मक) सहलीबद्दल सातत्याने लिहतील.
रोक्कुसान
रोक्कूसान,रोक्कू पर्वत!आपण जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे
जपानी 'सान' प्रत्यय लावतात.निसर्गाशी इतके कृतज्ञ असलेले हे जपानी लोक
पर्वताच्या नावापुढेही 'सान' लावतात एवढेच नव्हे तर पेंग्विन्सान,डॉलफिनसान
असेही संबोधतात.रोक्कूसानच्या पायथ्याशी असलेलं रोक्कूमिची हे सान नो
मियापासून म्हणजे आमच्या गावापासून दुसरं स्टेशन,साधारण आपलं ठाणे-भांडुप
अंतर असेल.तिथे जाऊन रोक्कूसान चढून तेथून मायासानवर जाऊन खाली उतरायचे असा
बेत आम्ही ठरवला.त्याप्रमाणे रोक्कूमिची स्टेशनात उतरून पायथ्याशी जायला
बस घेतली.एक जपानी आजोबा भारताविषयीच्या प्रेमाने आमच्याकडे कौतुकाने
पाहत,तोडक्यामोडक्या इंग्रजीतून संवाद साधू लागले.त्यांनी आम्हाला
केबलकारने वर जाण्याचा प्रेमळ सल्ला वजा आग्रहच केला.फुजितासानही हेच
म्हणाली होती,केबलकारने वर जा आणि मग चाला हवे तितके.
रोक्कू केबलकारची ती भव्य पाटी आधी नजरेत भरली आणि लगेचच दिसली त्या
पाटीखाली दिमाखात उभी असलेली ती केबल कार!आपल्या पेशवे उद्यानातील फुलराणी
सारखी पण एकाच डब्याची ती गाडी साधारण ६०,६५ अंशाच्या कोनात उभी
असावी.तिच्यात बसण्यासाठी मोठ्ठा जिना चढून जायचे.आजूबाजूला चिवचिवणारी
मुलं,त्यांच्या आज्या,काचा नसलेल्या उघड्या खिडक्यातून दिसणारी रोकूसानची
हिरवाई! डोंगरच्या कुशीतून,नव्हे अंगाखांद्यावरून थेट वरपर्यंत अत्यंत कठीण
चढावर आपल्याच मस्तीत मशगूल होऊन ती जात असते, आणि रोकूसान आपल्याला
बोलावत असतो,या माझ्याकडे! पहा तरी इथली झाडं,पानं,इथला निसर्ग!
डोळे भरून किती पाहू आणि किती नाही असे ते सारे दृश्य डोळ्यांनीच पित असताना आम्ही वर पोहोचलो.१००० मी उंचीवर, भन्नाट वारा, ढगाळ हवा,मध्येच येणारे चुकार किरण.. चालायला,फिरायला एकदम मस्त वातावरण!पक्ष्यांची किलबिल ऐकत,फुलं,पानं आणि फुलपाखरं पाहत,हवे तेथे थांबत,रोकूसानशी ओळख करून घेत आम्ही चालत सुटलो.पक्ष्यांच्या किलबिलाटाखेरीज दुसरा कसलाच आवाज नाही.एका बाजूने उंच उंच कडे तर दुसर्या बाजूला धुक्याच्या दुलईत गुरफटून शांत झोपलेली खोल खोल दरी! माळशेज किवा खंडाळ्याच्या घाटातल्या पावसाळी सहली आठवण साहजिकच होतं.. आमची बडबड,गप्पा आपसूकच थांबल्या आणि आम्हीही त्या नीरव शांततेत मिसळून गेलो.अक्षरशः भारावून चालत होतो.रोक्कूसानशी हळूहळू दोस्ती होत होती.
दरीऐवजी आता छोट्या छोट्या टेकड्या ,त्यावर चरणार्या मेंढ्या दिसायला लागल्या.येथे जपानमधील सुप्रसिध्द वूल आणि चीज फॅक्टरी आहे.'रोकूसान पाश्चर,कोबे चीज हाऊस' चा तो परिसर खरोखरच पाहण्यासारखा आहे.चीज आणि लोकर कसे तयार करतात ते पहायला मिळते.एवढेच नव्हे तर कोबे चीज रेस्टॉरंट मध्ये चीजचे वेगवेगळे पदार्थही खायला उपलब्ध आहेत आणि लोकरीचे वेगवेगळ्याप्रकारचे गुंडे आणि कपडेही विकायला ठेवलेले आहेत.चरणार्या मेंढ्या,घोडे,गाई यांच्यातून वाट काढत,टेकड्या चढत,उतरत त्या परिसरात मनमुराद भटकलो.चीजकेक,चीजचॉकलेटांवर ताव मारला आणि परत डोंगरमाथ्यावरून दर्यांकडे पाहत,फुलं निरखित,फोटो काढत,रमतगमत पुढे चालू लागलो.'माया केबल शीता' च्या रस्त्याने जाताना उंच डोंगरमाथ्यावरून जावे लागते.तेथून सारे कोबे दिसते.
मायाकेबल शीताचा प्रवास दोन टप्प्यातला आहे.पहिल्या टप्प्यात एका बंद
पाळण्यातून १०/१२ माणसे २०० मीटर खाली आणतात. तेथे मायादेवीचे मंदिर
आहे.तिची मूर्ती काही शतकांपूर्वी भारतातून येथे आणवली हे ऐकून आणि वाचून
मंदिराबद्दलचे कुतुहल वाढले होते तसेच 'माया' नावामुळेही!मंदिर साधेसेच
आहे, सर्वत्र इतकी शांतता आहेच आणि तेथे गेल्यावर अजूनच शांत वाटतं.
येथून आता केबल कारने रोकूमिचीला जायचे होते.सकाळी ७० अंशात उभ्या
केबलशीतातून चढलो होते आता तसेच खाली उतरायचे होते.ज्युरासिकपार्कच्या
राइडच्या आठवणी ताज्या होत्याच, आणि फोटो काढायचे म्हणून अगदी पुढे जाऊन
बसलो.अगदी ड्रायवरसीटच्या लगतच्याच बाकड्यावर टेकलो.ड्रायव्हर होती एक
जपानी सुहास्यवदना!बस,टॅक्सी,इंजिन ड्रायव्हर बाया पाहिल्या होत्या पण
केबलकार हाकणारी ही ललना प्रथमच पाहत होते.तिचे कौतुक वाटल्यावाचून आणि
कौतुक केल्यावाचून राहवले नाही.
चढतानाची मजा वेगळी,उतरतानाची वेगळी!त्यातून येता आणि जातानाचा आमचा
मार्गही वेगळा होता.एका ठिकाणी समोरून चढणारी केबलशीता येत होती,आमची उतरत
होती.एकच ट्रॅक,फक्त क्रॉसिंगपुरती काही फिटची डबल लाईन,आम्ही
उतारावर,समोरची चढणीवर..एका मिनिटाचा जरी हिशेब चुकला असता तरी ... काही
क्षण जीव मुठीत धरून बसलो होतो आणि हे दिव्य कसे पार पडते याचे कुतुहलही
होतेच. बरोब्बर क्रॉसिंगला दोन्ही केबलशीता समांतर आल्या,रुमाल,हात हलले
आणि गाड्यांचे क्रॉसिंग सहज झाले.कुतुहलाने समोरच्या शीतातल्या चालकाकडे
पाहिले.इथेही जपानी वनिता!
खाली सुखरूप आल्यावर आमच्या चालिकेचे पुनःपुन्हा आभार मानत आणि कौतुक करत आम्ही तिला रोकूमिचीला जाणारी बस कुठून सुटते ते विचारले.उत्तरादाखल ती धावतच सुटली.१०/१२ पायर्या उड्या मारतच उतरुन तिने रोकूमिचीला जाणारी बस थांबवली.असा सुखद,सुंदर अनुभव बहुतेक सारेच जपानी देतात,पटकन मदत करून मोकळे होतात.आपण 'अरिगातो गोझायमास' म्हणून धन्यवाद दिले तर परत परत झुकून स्वतःच 'अरिगातो' म्हणतात.तिला सायोनारा करून बसमध्ये चढलो.काही अंतर गेल्यावर समजले वाटेत एक बस बंद पडल्याने रस्ता बंद झाला आहे.काही अंतर चालावे लागेल किवा ती बस वाटेतून बाजूला होईपर्यंत थांबावे लागेल असे २ पर्याय उरले.दिवसभराच्या चालण्याची नशा अजून असल्याने आम्ही चालायला सुरुवात केली.आणि थोड्या अंतरावर दिसलेलं दृश्य पाहून परत जपानी वेगळेपण जाणवलं.आमच्या बसमधले काही प्रवासी,बंद बसमधले प्रवासी आणि दोन्ही बसचालक मिळून बंद बस रस्त्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते.येणार्या मदतीची वाट न पाहता आपणहूनच मदतीचे अनेक हात पुढे आले.आम्हीही आपला हातभार लावायला तेथे गेलो तर 'अतिथी' म्हणून आम्हाला नम्र नकार आणि सगळ्यावर कडी म्हणजे मदत करणार्या दोन्ही बसप्रवाशांकडून आणि बस सोडून चालत पुढे गेलेल्या सर्व प्रवाशांकडून चालकाने तिकिट घेतले नाही! तसदीबद्दल क्षमस्वच नाही तर तसदीबद्दल चक्क फुकट प्रवास! सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली. रोक्कूसानने दाखवला खर्या अर्थाने जपानी माणूस!
चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.
जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात
असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-)
बाकी तिसर्या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत? सुमा
सुमा गावातले सुमा ऍक्वेटिक पार्क आणि तेथील डॉलफिन शो आम्हाला कधीपासून
खुणावत होता.शेवटी एका रविवारी तो योग आला.सुमा स्टेशनातून बाहेर पडले की
आपण थेट पुळणीवरच उतरतो.समोरच दिसतो मंद गाजा देत असलेला प्रशांत
महासागर!माडपोफळीऐवजी सायकस,पाईनची बनं!उन्हाळ्यातल्या उबदार
शनिवार,रविवारी बरेच जण सायकली घेऊन किवा गाड्यात तंबू आणि
कुत्र्यामांजरांसकट सारे कुटुंब भरून येथे येतात,डिंग्या,होड्या घेऊन
पाण्याच्या लाटांवर स्वार होतात,समुद्राच्या कुशीत पोहायला
जातात,बार्बेक्यू लावतात, चटया पसरून पहुडतात नाहीतर चक्क कागद आणि रंग
घेऊन किनार्यावर वाळूत चित्र काढत रमतात.
एरवी शांत असणार्या त्या किनार्यावर तर उन्हाळ्यात जत्राच भरते.
सगळ्या किनाराभर पालं ठोकली जातात,प्रत्येक स्टॉलवर ढिंच्याक संगीत चालू
असतं, होड्या,वॉटर स्कूटर्स ,तंबू,चटया,बार्बेक्यू करायला ग्रील्स सुध्दा
भाड्याने मिळतात.वाळूत फुटबॉल,व्हॉलीबॉल पासून कुस्त्यांपर्यंत खेळ चालू
असतात.खानपानाचे स्टॉल लावलेले असतात.चक्क बुढढीके बाल आणि बर्फाचे गोळे
सुध्दा मिळतात.घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात
परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.
पायाला गुदगुल्या करणार्या त्या पुळणीतून चालत आम्ही ऍक्वेटिक पार्क
गाठले.सी ऑटर्स,पांढरे शार्क्स,महाकाय कासवं आणि खेकडे,जेलिफिश,ऑक्टोपस आणि
परमेश्वराच्या पहिल्या अवताराची अनंत रुपं पाहताना भान हरपतं.ऍमेझॉनचं
खोरंच तिथे उभं केलं आहे.झाडापानातून,जंगलातून वाट काढत आपण एका पाण्याच्या
बोगद्यात येतो.काचेचा बोगदा तो!खाली,वर,डाव्या,उजव्या सर्व बाजूना पाणीच
पाणी आणि त्या पाण्यात सळसळणारे मासे!काचेपलिकडून एखादा अवाढव्य मस्यराज
अगदी आपल्या जवळ येऊन विचारपूस करतो तेव्हा आपल्यात आणि त्याच्यात फक्त एका
काचेचं अंतर असतं! येथील 'फिश लाइव शो ' अशा पाटीने फार कुतुहल निर्माण
केलं होतं मनात म्हणून तो शो पहायला थांबलो.एका ललनेने एका फिशटँकची एक कळ
फिरवली त्याबरोब्बर एक बोर्ड टँकमध्ये लटकायला लागला.गटागटाने तेथे मग मासे
आले.त्यांनी तोंडात पाणी घेऊन त्या बोर्डावर पिचकार्या मारल्या त्याबरोबर
त्यावर लावलेले 'खाणे' खाली पडले ,ते मटकावून मासे सळसळत निघून
गेले.थोड्या वेळाने दुसरा गट आला त्यांनीही तसेच केले. असे ३,४ गटांच्या
पिचकार्या पाहून आम्ही पुढच्या टँककडे वळलो.त्यामध्ये सी इलची जोडी
आळसावून पहुडलेली होती. टँकच्या तळाशी असलेल्या वाळूवर नुसते पसरलेले
इलद्वय पाहण्यात आम्हाला काही विशेष स्वारस्य वाटले नाही आणि आम्ही पुढच्या
टँककडे जाणार तेवढ्यात त्या मघाचच्याच ललनेने ह्या टँकमध्ये काही
लहान,लहान जिवंत मासे सोडले. पाण्यात मासे सळसळू लागले आणि इलच्या जोडीच्या
नजरेला पडले.त्यांच्यात शिवाशिवी सुरू झाली.इलना लहानगे चुकवण्याचा
प्रयत्न करू लागले.पण लक्षात आले की तो खेळ नव्हता.जीव वाचवण्याची धडपड
होती ती! इलची शिकार होती ती.जीवो जीवस्य जीवनम्।थोडेसे उदास होतच आम्ही
पुढे निघालो.समुद्री सॄष्टीतले सारे जलचर ,उभयचर पाहत पाहत आम्ही
डॉलफिनशोच्या जागेकडे निघालो. डॉलफिनसानना भेटण्याची ओढ असल्याने जरा
लगबगीनेच आम्ही अगदी मोक्याची जागा पकडून बसलो.मंद संगीत सुरू होतं आणि
समोरील पाण्यात डॉलफिनस् ची सळसळ सुरू होती. "कोन्निचिवा!"(हॅलो!) म्हणत
एका जपानी बालेने संवाद साधायला सुरुवात केली.तिने आधी बोलावले सीलना!
महाकाय,अवजड आणि जरा कुरुपच म्हणावेत असे ते सील आले आणि त्यांनी थोडावेळ
डोंबार्याचा खेळ केला.मग आले पेंग्वीन सान!दुडुदुडु धावत ते दुसर्या
टोकाला गेले आणि पटकन पाण्यात उड्या मारून सुळ्ळकन नाहीसे झाले.आम्ही मुख्य
नायकांची वाट पाहत होतो एवढ्यात दोघी ललना आल्या ,एक मोठ्ठे
"कोन्निचिव्हा"! आणि संगीताच्या तालावर त्यादोघींच्या गिरक्या सुरू झाल्या
आणि पाण्यात एकदम हालचाल जाणवली.आत डॉलफिन्सच्याही गिरक्या सुरू झाल्या
होत्या.ते गिरक्या घेतघेत उलटी उडी मारून,शेपटी वर करून ऐटीत उभे
रहायचे.एकजण पाण्यात रिंग उंच धरुन उभा राहिला आणि डॉलफिनसानने एखाद्या
कसरतपटूसारखी त्या रिंग मधून उडी मारली .. सिंपली मार्वलस!!!
संगीताच्या वेगाबरोबर डॉलफिन्सच्या गिरक्यांचा आणि उड्यांचाही वेग
वाढला.पाणी बाजूला सारत,उंच उसळी घेत,आम्ही तुमच्याशी मैत्री करत आहोत असे
सांगणार्या त्या हालचाली,त्यातली नजाकत,तो डौल केवळ अप्रतिम!पुढे अनेक
ठिकाणचे डॉलफिनशो पाहिले पण सुमामधला तो खेळ मात्र त्यासम तोच!त्यांना
सायोनारा करून जड पावलांनी तेथून पुळणीवरून चालत निघालो.परतीच्या वाटेवर तो
तेजोमयी सूर्यही आम्हाला निरोप देत होता.
आवाजी बेटं आणि फुकुरा पोर्ट
कागीयामासान,हा आमचा जपानी मित्र सुमा गावात राहतो.तो आमच्या अनेक दिवस
मागे लागला होता आवाजी आयलंडला जाऊ या. एका अशाच निवांत शनिवारी आवाजी
बेटांना भेट देण्याचे ठरले.तेथे जाताना एका 'सस्पेंडेड ब्रिज'वरून जावे
लागते.कोबे आणि आवाजी बेटांना जोडणारा हा 'आकाशी कायकोयो ब्रिज'. जगातील
सर्वात लांब,उंच आणि महागड्या अशा साधारण ४ किमी लांबीच्या ह्या पुलाचे
बांधकाम वीस एक वर्षे चालले होते.१९९८ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला
झाला.याचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्याला खालून आधार न देता वरून मजबूत वायर्सनी
आधार दिला आहे.खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे
सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित
झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या
सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे.
हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये
फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी
..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून
रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा.
जपानमध्ये फिरायला जाताना आमची 'डबाबाटली' कायम सोबत असायचीच.त्यातून
कागीयामासानची भारतीय जेवणाची फर्माइश होती.त्यामुळे इथे थांबून पुरीभाजीला
न्याय द्यायला हवाच होता.पुळणीवरून उठावसं वाटत नव्हतं पण आवाजी बेटं
पहाण्याची उत्सुकता तर होतीच. तिथे पोहोचल्यावर रेलिंगच्या दिशेने सारे
धावलो.लांबवर पसरलेला पॅसिफिक पाहत होतो.कागियामाने तेथून सुमाबीचही दाखवला
आणि विंग स्टेडियम सुध्दा!फूटबॉलज्वराने तेव्हा सार्या जपानला वेढलं
होतं, कारणच तसं होतं.त्यावेळच्या फूटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद
जपान-कोरियाकडे होते ना!(त्याचा एक फायदा म्हणजे इंग्रजी पाट्या दिसू
लागल्या होत्या!)
ह्या आवाजी बेटावर लोकं शनिवार,रविवारी डबाबाटली घेऊन येतात,चटया पसरून
हिरवळीवर पहुडतात,फोटो काढण्यात रमतात. लहानथोर,तरुणांचे ताटवे,आजीआजोबांचे
थवे सारेच येतात;पण इतरांना त्रास होईल असे कोणीच वागत नाही.तरुणींची छेड
कोणी काढत नाही,सार्वजनिक संपत्तीचा अपव्यय तर कोणी नाहीच करत पण डबे खाऊन
कचरा करून ठेवला आहे.शीतपेयांच्या बाटल्या,चॉकलेटांचे कागद असा कचराही कोणी
करत नाहीत.उलट आवर्जून आपण बसलेली जागा आपण तशीच स्वच्छ ठेवून जातो आहोत
ना,याची काळजी घेतात.(स्वयंशिस्तीच्या बाबतीत जपान्यांसारखे कोणीच नाही.)
आवाजी बेटांवर फुलांचा एक सुंदर,रंगीत ताटवा मुद्दाम तयार केला आहे.तिथे
जाण्याचा कागीयामाचा अगदी आग्रह चालला होता.तसे फुलांचे ताटवे इथे जागोजागी
आहेत तर हा काय वेगळा आहे? दिसतो आहे की इथून छान..अशा आमच्या बोलण्याकडे
लक्ष न देता त्याने आम्हाला जवळपास ओढतच तेथे नेले. तो ताटवा म्हणजे चक्क
घड्याळ आहे,चालू स्थितीत असलेले!
हे जपानी कुठे,कशी टेक्नॉलॉजी वापरतील.. नेम नाही.त्यांच्या रसिकतेला दाद
देत आम्ही तेथून निघालो फुकुरा पोर्टकडे.'नरुटो वर्लपूल्स',समुद्राच्या
भरती ओहोटीमुळे दिवसात दोनदा बदलणारे पाण्याचे प्रवाह हे फुकुरा पोर्टला
जाण्याचे मुख्य आकर्षण! भरतीमुळे पॅसिफिक मधले पाणी प्रचंड प्रमाणात नरुटो
कालव्यातून १३ ते १५ किमी/तास वेगाने इनलँड सी मध्ये घुसते आणि वसंतातील
भरतीत तर हा वेग २० किमी/तास इथपर्यंत वाढतो.इनलॅंड सी आणि पॅसिफिक
महासागराला जोडणार्या ह्या १.६ किमी लांबीच्या अधांतरी पूलाला नरुटो
कालव्याचेच नाव दिले आहे.
वळणावळणांचा रस्ता,पूर्णपणे समुद्राला लगटून आम्ही जात होतो.एका बाजूला सतत
पॅसिफिकची गाज तर दुसर्या बाजूला कुठे फुलांचे ताटवे तर भाताची इवली
रोपं,कोबीचे गड्डे..थोड्या वेळाने मात्र फुलं,भाताची रोपं यातलं काहीच
दिसेना ,फक्त कांदेच कांदे दिसायला लागले.मुसुंब्याएवढे किवा त्याहूनही
मोठ्ठाले कांदे आणि त्यांच्या जम्बो पाती!सगळ्या वाफ्यांतून पातींची पाती
लवलवत होती.कुठे पोतीच्या पोती रचून ठेवलेली, कुठे टेंपोत ती पोती भरणं
चाललं होतं,ह्याच ठि़काणाहून पूर्ण जपानभर कांदा पुरवला जातो.
फुकुरा पोर्टहून भरतीच्या वेळानुसार फेरीबोटी सुटतात. त्या बोटीने पॅसिफिक
सागरात अशा ठिकाणी नेतात जिथे पाण्याचे प्रवाह बदलतात.सगळ्यात वरच्या डेकवर
जाऊन आम्ही राहिलो.भन्नाट वारा सुटला होता.समुद्राचे तुषार उडवत आमची बोट
निघाली. प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा
नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा
सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की
दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर ..
त्या समुद्राच्या अजून पोटात शिरलो.आता मात्र पाणीच पाणी चोहीकडे!
जमिनीशी नातं सांगणारा नरुटोपूल फक्त अधांतरी तरंगत होता,बाकी सगळीकडे फक्त
पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं
अथांग,विशाल!जहाजाच्या कंट्रोल केबिनमधून जपानीत सूचना दिल्या जाऊ लागल्या
बरोबर कागीयामाने आम्हाला कठड्याला धरुन उभं रहा अथवा तिथल्या बाकांवर बसा
अशी भाषांतरित सूचना केली.
प्रवाह जेथे बदलतात तेथे आम्ही पोहोचत होतो.वार्यात हेलकावणारे आमचे जहाज
आपला वेग जवळजवळ शून्य करत थांबले.इथे समुद्र अजिबात शांत नसतो.भन्नाट वारा
आणि उसळणार्या,प्रवाह बदलत जाणार्या त्या लाटा आणि त्यांनी तयार होणारे
मोठे भोवरे..निसर्गाचं एक वेगळंच रुप भान हरपून पाहताना एकीकडे आपला तोलही
सांभाळावा लागत होताच.त्याच तंद्रीत असताना आमच्या जहाजाने परतीची वाट कधी
पकडली ते कळलेच नाही.
आम्हाला सोडायला तो घरापर्यंत आल्यावर आपल्या पध्दतीप्रमाणे ,"चल की
वर,अर्धा कप चहा तरी घेऊन जा.." असे म्हटले.खरं तर जपानी आयत्या वेळचं
आमंत्रण स्वीकारायला उत्सुक नसतात.पण तो झाला बाबा लगेच तयार.आत येऊन
चहापाणी होईपर्यंत लता,किशोरची गाणी ऐकत त्या जादूभर्या आवाजात अडकून
पडला. चहा पितापिता एकदम कॅमेरा सरसावला त्याने आणि कचोर्या,बाकरवड्या आणि
चिवड्याचेच फोटो काढत बसला.
तो आणि त्याची गाडी आम्हाला केव्हाही,कुठेही नेण्यासाठी तयार आहे असे निघताना सांगून मैत्रीची गाठ त्याने आणखी पक्की केली.
ओकायामा ज्यू
ओकायामा कॅसल पाहण्यासाठी कागीयामासान बरोबर जाण्याचे ठरले.बरोब्बर ९ वाजता
आम्ही सुमा गावात पोहोचलो,तो गाडी घेऊन तयारच होता.ढगाळ पण कुंद नाही अशी
सुखद गारवा असलेली हवा,वार्याच्या मध्येच येणार्या झुळूका आणि डेकमध्ये
लावलेल्या मंद संगीताची जोड!त्यात आणि जातानाचा रस्ता इतका सुंदर
होता.दोबाजूला हिरवी मखमल पसरली होती.भाताची इवली रोप डोलत होती.एका डौलदार
वळणानंतर मात्र एका बाजूला खोल दरी आणि दुसर्या बाजूला आणि समोर दूरवर
डोंगर दिसू लागले.सार्या हिरव्या रंगछटांची उधळणच होती तिथे. हळूहळू
डोंगरांवरची हिरवाई कमी होऊ लागली.आणि नुसते काळे,तपकिरी कातळ दिसायला
लागले. "इथे दगडांच्या खाणी आहेत."कागीयामाने जणू आमच्या मनातला हिरवा
प्रश्न ओळखून लगेचच उत्तर दिले.डोंगरांच्या कुशीतून मोठमोठे बोगदे खोदले
आहेत आणि माया टनेल,निशीवाकी टनेल अशी नावाची पाटी, बोगद्याची लांबी आणि तो
बोगदा कधी खोदला ते साल अशा माहितीच्या पाट्या बोगद्यात शिरतानाच
खोदलेल्या दिसतात.लांबच लांब बोगदे,दोन्ही बाजूंनी घातलेले रेलिंग, अंतरा
अंतरावरचे संकटकाळासाठीचे टेलिफोन या सार्याची त्यावेळी नवलाई वाटत होती
कारण आपला मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे सुध्दा तेव्हा पूर्ण झाला नव्हता.
१५९७मध्ये बांधलेला हा पुरातन कॅसल, ओकायामाज्यू !त्याच्या काळ्या
बाह्यांगामुळे त्याला क्रोज्यू/ क्रोकॅसल असेही म्हणतात.दुसर्या
महायुध्दात विमानातून केलेल्या बंबार्डिंगमुळे उध्द्वस्थ झाला होता. परंतु
१९६०च्या सुमाराला तो परत पहिल्यासारखा उभा केला. भारतासारखीच इथेही लहान
लहान राज्ये होती आणि सरदार,उमराव,राजे ती चालवित असत. पुढे कित्येक
वर्षांनी एकसंध राजवट चालू झाली.जपानमधील ९ मुख्य कॅसल पैकी हा एक
महत्त्वाचा कॅसल !
असाही नदीच्या तीरी कोराकुवेनबगिचाला खेटून उभा असलेल्या ओकायामाज्यूचा
काळा रंग त्या हिरवाईत मोठा उठून दिसतो. क्रोज्यूच्या सभोवताली
बगिचा,पाण्याचे लहान लहान हौद,पुष्करणी ,कारंजी आहेत.त्यात सुंदर,रंगीत
मोठमोठे मासेही आहेत. हे सारे हौद,पुष्करणी एका मोठ्या तलावाला आतून जोडले
आहेत.बगिच्यात निरनिराळी फुलझाडे,शोभेची झाडे अतिशय रेखीवपणे वाढवून
त्यांची निगा राखलेली दिसते.ठिकठिकाणी बसण्यासाठी दगडी वा लाकडी बाकं आहेत
पण ती बांधीव नाहीत तर नैसर्गिक आकारातून तयार झालेल्या ओबडधोबड
पायर्या,बाकडी सुंदरतेत अधिकच भर घालतात.बागेमधल्या त्या दगडी
पायर्यांवरून जाताना मला उगाचच लेण्याद्रीच्या डोंगराच्या ओबडधोबड
पायर्या आठवत होत्या. त्या पुरातन वास्तूला आणि तिथल्या परिसराला न
शोभणारं असं कोणतंच बांधकाम तिथे नाही.पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न अगदी
त्या कॅसलच्या परिसरात असणार्या उपाहारगृहातही दिसतो.पारंपरिक जपानी
बैठकीवर वज्रासनात बसून वाडग्यातून हाशीने(चॉप स्टिक्स)जेवायचे.
ह्या सहा मजली ज्यू मध्ये ४थ्या मजल्यापर्यंत लिफ्टने जायचे आणि
गतवैभवाच्या खुणा पाहत खाली उतरायचे अशी आधुनिक सोय मात्र आहे.एकेका
मजल्यावर जुन्या कालातल्या गतखुणा जपून ठेवल्या आहेत. स्वयंपाकाच्या जुन्या
चुली,भांडी,ताटल्या,वाडगे त जुनी शस्त्रास्त्रे, कपडे, खेळणी,पारंपरिक
किमोनो ,सावकाराची पेढी,जुने तराजू ,वजने अशा अनेक गोष्टी मांडून ठेवल्या
आहेत. त्या पाहत अस्ताना जपानीत रेकॉर्ड केलेली त्या किल्ल्याची माहिती
ठराविक वेळाने लावतात.
एका मजल्यावर जुनी खेळणी ठेवली आहेत.सागरगोटे आणि लगोरीशी साधर्म्य असणारे
खेळ तिथे होते.त्यांची जपानी नावे आठवत नाहीत पण आम्ही त्यांचे सागरगोटे
आणि लगोरी असेच बारसे केले. महत्त्वाचं म्हणजे ते बंद काचेआड नव्हते तर
लोकांना खेळण्यासाठी खुले होते.सानथोर सारे जण तिथे खेळत होते आणि आपले
खेळून झाल्यावर खेळ जागेवर ठेवून पसारा आवरून जात होते.तिथे कोणीही
रखवालदार नव्हता पण लगोरीतली चकती किवा सागरगोट्यातला एखादा सागरगोटा तिथून
हरवला नव्हता.आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये
हरवलो.कागीयामासानने जेव्हा भानावर आणले तेव्हा पुढचे पहायला निघालो.
एका ठिकाणी पारंपरिक राजघराण्यातील किमोनो होते.असे किमोनो 'दाई मारु'
सारख्या अत्यंत महागड्या दुकानाच्या काचेआडच फक्त पाहिले होते आणि त्याच्या
किमतीत एक दोन पैठण्या येतील असा सूज्ञ विचार करून किमोनो घेण्याचा विचार
तूर्तास बाजूला ठेवला होता आणि पैठणी घेण्यासाठी भारतात जाणे आणि तसे काही
कारण असणे असे दोन्ही इतक्यात शक्य नसल्यामुळे माझ्या किमतींच्या
तुलनेपासून दिनेशला तूर्त तरी धोका नव्हता.
हे किमोनो विशिष्ट पध्दतीने बांधायचे असतात,ते बांधून द्यायला एक ललना
तिथे होतीच आणि ते तसे बांधून फोटो काढू शकतो ही माहिती कागीयामाने
पुरवली,मग काय ?आम्ही सर्वांनी किमोनोची औटघटकेची हौस 'सुगोई' सुगोई'
(सुगोई- ग्रेट!,मस्त!)करत भागवली. आमच्या सुगोई मुळे तिची जपानी शिनकानसेन
भरधाव सुटली.मग मात्र कागीयामाला पुढे करावे लागले.कारण तेवढ्या चारदोन
शब्दांच्यापुढे आमचं जपानीज्ञान संपत होतं.
एका मजल्यावर मोठमोठे कोच ठेवले आहेत आणि समोर भिंतभर पडदा!ओकायामाचे
चित्र पडद्यावर दिसते आणि सुरू होते ओकायामाची कहाणी! हा एक विलक्षण अनुभव
आहे,पुलंच्या मिस्टर सानफ्रांसिस्कोमधला 'घिराडेलीचा सिनेमा' सारखा आठवायला
लागला.त्याच तंद्रीत परतीच्या प्रवासाला लागलो.
इप्पोनमात्सु व्ह्यु पाँईट ला कागीयामाने गाडी थांबवली तेव्हा इतिहासाच्या
तंद्रीतून बाहेर आलो.त्याने न बोलता फक्त समोर बोट दाखवले. दूरवर
दिसणार्या टेकड्या,त्यांच्या अंगाखांद्यावरच्या असंख्य इमारती,मोठ्या
दिमाखात उभा असलेला तो आकाशी कायकोयो पूल आणि त्या बेटाला वेढून टाकणारा
अथांग सागर, एखादा नावेचा ठिपका,सागराच्या क्षितिजाला टेकलेले आकाशातले ढग
आणि नीरव शांतता! त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो.
आजचा दिस गोड झाला होता!
http://www.misalpav.com/node/1694
माझं जपानी रुटीन
आम्ही मैतरणी जवळ जवळ रोजच सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यानं बाहेर पडत असू.दोन तीन तास आसपासच्या रस्त्यांवरून भटकंती करत तिथल्या रस्त्यांची,दुकानांची आणि माणसांचीही ओळख करून घेत येताना भाजी,दूध ,अंडी इ. गोष्टी आणत असू.इथल्या टीव्ही वरती फक्त जपानी चॅनेले दिसायची.(आता इथेही तेच! फकस्त जर्मन चॅनेले! दुसर्या महायुध्दातल्या पराभूत देशात असा रुल आहे की काय? ;) )तर इथे फक्त जपानी कार्यक्रम दिसत. घरी इंटरनेट नव्हते. बाहेर नेट कॅफे असत पण सगळे जपानीतून ! इंग्रजी व्हर्जन ज्या नेट कॅफेमध्ये होते तो आमच्या घरापासून २ किमी लांब! सॉलिटेअर तरी किती खेळणार?आम्ही ३ कुटुंबे एकत्र राहत होतो. स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुम असल्या तरी आमचे स्वयंपाक घर आणि हॉल एकत्र होते. आमच्या मालकीण बाई श्रीमती लीला रेड्डी आम्हाला वेगवेगळ्या हिंदी सिनेमांच्या कॅसेटा देत असत.(हो, तेव्हा सीडी,डीव्हीडी इतक्या सहज मिळत नसत.)कधीतरी दुपारी आम्ही तिघीजणी एकत्र सिनेमा पहायचो पण जपानमधला वेळ हिंदी सिनेमात वाया घालवायला मला आणि सुप्रियाला जास्त आवडायचं नाही.लेखाला मात्र शिनूमात रस असायचा.मग आम्ही दोघी भटक्या परत बाहेर पडत असू आणि मोतोमाचीच्या शॉपिंग लेनमध्ये नाहीतर शिन कोबेच्या रस्त्यावर,बागांमध्ये भटकत असू.आमच्या घराच्या कोपर्यावरच एक "को ऑप" नावाचं सहकारी भांडार होतं. तेथेही आम्ही जात असू.कोऑपच्या समोरच सुंदर कट्टा बांधलेला होता आणि काही बाकडीही टाकलेली होती.तिथे बसलं की वार्याच्या हलक्या झुळूका येत असत आणि समोरचे कोऑप आणि संपूर्ण रस्त्यावरच्या हालचाली दिसायच्या. पहारे करायला बसल्यासारख्या आम्ही दोघी तिथे बसत असू. आजूबाजूच्या बाकड्यांवरही कोणकोण बसलेले असायचे.ओळख देख नसताना सहज "कोन्निचिव्हा" (हॅलो,नमस्कार..)व्हायचे.आमची बिनाअस्तराची जपानी आणि त्यांची तितकीच बिनाअस्तराची इंग्रजी; दोन्हीची मोडतोड करत संवाद सुरू व्हायचा.आमचा वेळ मजेत जायचा. दुपारी साधारण प्रौढ आणि वृध्द स्रियांचाच वावर तिथे जास्त असायचा.त्या काय खरेदी करतात? त्यावरून त्यांच्या राहण्या खाण्याच्या सवयींचा अंदाज बांधायचा जणू छंदच आम्हा दोघींना लागला होता.
बर्याच जणी आपापले कुत्रे घेऊन खरेदीला येत. त्यांना बांधायला दुकानाच्या दाराशी स्वतंत्र स्टँड होता.तिथे बांधतानाही त्यांच्याशी लाडेलाडे बोलत.(बहुतेक ,"शहाणा मुग्गा ना तू? शांत बसायचं हं,मी लग्गेच येतेच.तुला चॉक्केट आणते हं. आणि काय हवं बाळाला?" असला काही संवाद जपानीतून होत असावा असा मला दाट संशय आहे.)त्यांचे लहान मुलांच्या वरताण लाड!त्यांच्या केसांना रिबिनी काय बांधतील,केस रंगवतीलच काय?त्यांना झबलेवजा फ्रॉक काय घालतील. पाऊस असला तर रेनकोट! आणि हद्द म्हणजे त्यांच्या पायात बूट!
त्याच गल्लीच्या दुसर्या टोकाला "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. (त्या पेश्शल हाटेलाच्या बाहेर असलेल्या बाकड्यांवर बसून आमचे तेही निरिक्षण चाले.)पण एक मात्र होतं ,ह्यांच्या कुत्र्यांचा त्रास इतरांना होत नसे .प्रत्येक कुत्राधारिकेबरोबर एक पिशवी जरूर असायची.त्या पिशवीचं कोडं एक दिवस उलगडलं.एक श्वान माता आपल्या लेकराला बाहेर ठेवून खरेदीला गेली असता इकडे बाळाने कार्यक्रम करून ठेवला.ती ललना बाहेर आल्यावर ते दृश्य पाहून" अर्रे लबाडा,तरी सांगत होते जास्त खाऊ नकोस." असे भाव चेहर्यावर! पिशवीतून टिश्यु काढून तिने ती जागा आणि कुत्र्याचा पार्श्वभाग दोन्ही साफ केले.जवळच्या प्लास्टीक पिशवीत तो ऐवज परत ठेवला. समोरच मोठ्ठी कचराकुंडी असतानाही ती पिशवी घेऊन चालायला लागली.भोचकपणा करून आम्ही तिला (बिनाअस्तराच्या जपानीत)समोरच असलेली कचराकुंडी दाखवली.तिचं उत्तर मात्र बरच काही शिकवून गेलं." ही कुंडी कॅन्स आणि बाटल्यां,जुने कागद इ.साठी आहे.ते सारे रिसायकलिंगला जाते,त्यात ही घाण टाकून कसं चालेल?
त्या समोरच्या मोठ्या कचराकुंडी मध्ये कॅन्स,बाटल्या,ओला आणि सुका कचरा,कागद,दुधाचे खोके इ. साठी वेगवेगळे कंटेनर्स होते.(परदेशात बहुतेक सगळ्याच ठिकाणी असे असते हे तेव्हा माहित नव्हते.सगळ्याचीच नवलाई होती.)लोकं तिथे येऊन वर्गीकरण करून कचर्याची विल्हेवाट लावत असत. कोणीही एकदाही आपली कचर्याची पिशवी एकाच कंटेनरमध्ये टाकून गेलेले पाहिले नाही.दुधाचे खोके तर रिसायकलिंगला सोपे जावे म्हणून धुवून,चपटे करून,महिन्याभराचे साठवून त्यांचा गठ्ठा करून मगच टाकत. एकदा असेच तिथे कट्ट्यावर बसलो असताना एक स्त्री आणि तिची १०/१२ वर्षांची मुलगी कचरा टाकायला आल्या.बाई वेगवेगळ्या कुंड्यात वर्गवारी करत कचरा टाकत होत्या. मुलगी कंटाळली आणि तिने उरलेली पिशवी एकाच कुंडीत टाकली.बाईंनी पाहिलं आणि मुलीला ओरडा तर बसलाच पण बाईंनी ती पिशवी कुंडीतून उचलली आणि मुलीला वेगवेगळ्या कुंड्यात कचरा टाकायला लावला.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य नुसते सप्ताह पाळून होत नाहीत तर या आणि अशाच गोष्टीतून ते राखलं जातं ह्याचा तो एक वस्तुपाठच होता.
रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी!(पंगत मांडण्याइतके स्वच्छ रस्ते मला युरोपातही क्वचितच पहायला मिळाले. )रस्त्यांमधल्या डीव्हायडर वर अनंताची,गुलाबाची झाडं,बोगनवेली लावलेल्या असतात.छत्रीच्या वाकड्या मुठीने किवा काठीने कोणीही रामभाऊ देवपूजेसाठी ती काढताना किवा कोणी रमाकाकू,ठमाकाकू वेणीत माळण्यासाठी ती खुडताना दिसत नाहीत.एकदा सूटाबूटातले हपिसर लोकं हातात मोजे घालून,लांब चिमट्यांनी वाटेतला कचरा म्हणजे फुलांच्या पाकळ्या,वार्याने गळलेली पानं,चुकून कुठे असलंच तर सिगरेटच थोटुक गोळा करून जवळ असलेल्या एका कचर्याच्या कुंडीत टाकत होते.कपड्यांवरून ते काही सफाई कामगार तर वाटत नव्हतेच. आम्ही परत एकदा भोचकपणा करून ह्याबाबत त्यांना विचारलं .उत्तर मिळालं,"आम्ही इथल्या जवळपासच्या इमारतीत कामाला येतो तर इथला रस्ता स्वच्छ ठेवणं ही आमची जबाबदारी आहे."(काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते.तेव्हा विचारणा केली असता मिळालेले उत्तर होते."कितने लोग यहा रोजाना आते है। कॉर्पोरेशन के सफाई करनेवाले भी रोज कौनसी तो गली साफ करतेही नही है।")
राखेतून नंदनवन उभं केलेल्या ह्या देशाचं रहस्य तेथलेच सुजाण लोकं आपल्या कृतीतून सांगत होते.
कोबे
आज हवा मस्त होती . संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो.सगळीकडे हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलं!आम्ही ८/१० जणं हसत खिदळत चाललो होतो.वाटेत एक सुंदर चर्च लागलं.उत्सुकतेने डोकावलो तर तिथे एक लग्न लागत होतं.त्या वर्हाड्यांच्या घोळक्यात डोकावलो, हिरवळ दिसल्यावर बागडलो,रानफुलांचे गुच्छ करून किती वेळ हातात धरून चालत होतो.आपल्याला इथे ओळखणारं कोणी नाही ह्या जाणिवेनं सगळेच आपापली कायदेशीर वयं,हुद्दे,पत सारे विसरून रोप वे त बसलो. उंच उंच झुल्यातून सगळ्या कोबे शहराचं दर्शन घडलं.वरती हर्ब गार्डनला गेल्यावर तर समोर पसरलेला अथांग सागर आणि त्याच्यावर वसलेली पोर्ट आयलंड आणि रोक्को आयलंड पाहिली.ह्यातल्या पोर्ट आयलंडवर दिनेशची कचेरी होती.तिथे जायला मॅगनेटवरची बिनड्रायवरची गाडी किवा मग सरळ रस्त्याने बस किवा मोटारीने जाता येतं आणि बोटीनेही जाता येतं. र्डोंगर फोडून, त्या मातीदगडांची भर समुद्रात घालून तयार केलेली मानवनिर्मित बेटंच ती ! जागेची कमतरता कमी करण्याचा हा प्रयत्न! मॅनमेड आयलंड वरचं ते मॅन मेड साम्राज्य पाहताना थक्क व्हायला होतं.त्यामागचे अथक परिश्रम,ध्यास जाणवतो.खरंच,जागेची टंचाई,असलेली जमीन रेताड आणि पहाडाची,चोहोबाजूनी सागराने वेढले आहे आणि धरणीमाता कंप पावत कधी धक्के देईल ह्याची शाश्वती नाही ,त्यात भर म्हणून की काय दुसर्या महायुध्दातली होरपळ.. सार्या सार्यावर मात करून,राखेतून भरारी घेणार्या फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी! मनातल्या मनात त्यांच्या विजिगिषु वृत्तीला सलाम करून उतरण्यासाठी परत एकदा रोप वेत बसलो.
सीगल हार्बर हे कोबे बंदराच्या तीरावरचं दुमजली दुकान! सायकल,मोटारींचे टायर,घरं सजवण्याचं सामान, गाद्याउशांपासून पलंगांपर्यंत सारे काही घडीचे,फोल्डींग! वेगवेगळ्या प्रकारचे गालिचे,जाजमे, मनमोहक दिव्यांचे प्रकार,सुंदर वॉलपेपर, पडदे, सहलीसाठीचे तंबू,प्रवासाला लागणार्या पिशव्या,ट्रंका,पाठीवरच्या पिशव्या,पोटपिशव्या,कमरेचे कसे, प्रसाधनसाहित्य, घड्याळांपासून कॅमेर्यापर्यंत आणि रेडिओपासून टेपरेकॉर्डर,टीवीपर्यंत सारे काही तिथे सुखाने नांदत होते.
तळमजल्यावरील एका कोपर्यात अनेक प्रकारची झाडंझुडुपं विक्रीला होती तर दुसर्या कोपर्यात वेगवेगळे प्राणी!जपान्यांमध्ये श्वानप्रेम जरा जास्तच दिसलं. घरे लहान लहान पण माणसांच्या बरोबरीने घरात कुत्र्यांची संख्या! त्या कुत्र्यांच्या पिल्लांचे लाड तर स्वत:च्या पिलाहूनही जास्त करत असावेत.केसाळ कुत्र्यांच्या वेण्या घालून त्यांना रिबिनी काय बांधतील,स्वेटर काय घालतील, इतकेच नव्हे तर त्यांना बूटही घातलेले पाहिले.एका ठिकाणी तर खास कुत्र्यांसाठी उपाहारगृह पाहिले.म्हणजे मालकाने आपल्या टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे? आणि आवडीचा खाऊ द्यायचा? स्वतः तो कसे खातो आहे हे कौतुकाने पाहत बसायचे आणि नंतर बिल देऊन ,त्याची रपेट करवून घरी यायचे?सगळीच मजा!तर कुत्री,मांजरं,ससे, त्यांची घरकुलं,त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पुडे,अनेक प्रकारचे पक्षी ,त्यांचे झोकदार पिंजरे पाहता पाहता एका ठिकाणी आम्ही थबकलोच,आणि थोडे हबकलोही! तिथे चक्क घुबडं विकायला ठेवली होती.छोट्या पिलांपासून पूर्ण वाढलेली,ध्यानस्थ बसलेली घुबडंच घुबडं!चक्क हातावर पोपट घ्यावा तसं घुबडाच पिलू घेऊन किमती विचारणं चालू होतं. पूर्ण वाढलेल्या घुबडाची किंमत ... १६ लाख येन!!!ऐकूनच चक्करायला झालं.इथे घरा,दुकानांच्या बाहेरही बर्याच ठिकाणी लाकडाच्या, चिनीमातीच्या घुबडप्रतिमा ठेवलेल्या दिसतात.घुबडाला अत्यंत शुभ मानून आपल्या घर अथवा दुकानाबाहेर,अंगणात घुबडाच्या प्रतिमा ठेवतात ही मंडळी.काय गंमत आहे? आपण ज्याला दिवाभीत,अशुभ मानतो तेच घुबड इथे शुभ मानलं जातं!गंमत वाटली!
कोबे टॉवरच्या पायथ्याशी हार्बरलँडच्या रेलिंगवरुन समुद्र पाहताना काळोख दाटायला लागला होता. पैलतीरावरचे लुकलुकणारे दिवे,पूलावरच्या दीपमाळांचे वार्याने हलणारे दीपझुले दिसत होते.मन आणि डोळे भरून ते पाहत असतानाच 'ती' आली.ती आली,आम्ही तिला पाहिलं आणि आम्हाला तिने जिंकलं!तीच ती 'कॉनगार्टो' फेरीबोट! पूर्ण दीपमाळांनी श्रॄंगारलेली ,आपल्या अंगाखांद्यावर सानथोरांना बागडू देणारी कॉनगार्टो समुद्राच्या लाटांशी लडिवाळपणा करत,पाणी कापत समुद्रात जाऊ लागली.२.३० ते ३ तासांची आवाजी बेटांपर्यंतची ही फेरी असते.तिथे असलेला 'सस्पेन्शन ब्रिज' सप्तरंगाची उधळण लक्षलक्ष दिव्यांनी करत असलेला साक्षात दीपमालांमध्ये बसून पाहणं ,खरच एक विलक्षण अनुभव आहे.त्याच मंतरलेल्या अवस्थेत घरी आलो.
१५ ऑगस्ट
एकदा ओसाकाहून कोबेला येत असताना अशाच गप्पा चालल्या होत्या. दहीकाला होऊन गेला नाही,१५ ऑगस्ट पण जवळ आला ना? असेच काहीबाही बोलत होतो तेवढ्यात एकाने हटकले."आप इंडियासे हो?" राष्ट्रभाषेतून सवाल आला." हाँ! "अशा आमच्या उत्तराची वाट न पाहताच " आपको मालूम है? शिन कोबेमे जहाँ इंडियन कॉन्सुलेट है,वहाँ हर १५ अगस्त,२६ जनवरीको फ्लॅग हॉइस्टिंग प्रोग्राम रहता है।अपने कॉन्सुलेट जनरल चीफ गेस्ट रहते है । " मग आम्हीही त्याला तुम्ही कोण,कुठले विचारले. तर किंचित गंभीर होत तो म्हणाला," हम वैसे तो लाहोरसे है । बटवारेके बाद हमारे पिताजी और दादाजी लाहौर चले गये और फिर १९५० मे यहाँ कोबेमे आगये और फिर यही बस गए,अब तो पासपोर्ट भी जापानकी है । आप १५ अगस्त के फंक्शनमे जरुर जाना,मै मी हर साल वहाँ जाता हूँ, काश पाकिस्तानी एंबसी भी ऐसा कुछ १४ अगस्तको यहाँ करती !"
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या त्याला १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाला जावेसे वाटते ह्याचे आम्हाला फारच अप्रूप वाटले. त्याच्याकडून पत्ता आणि वेळ घेतली आणि जायचे ठरवले.जपानचे सरकार इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसांसाठी कामातून सवलत देते.त्यामुळे दिनेश आणि बाकी सर्वांनी कचेरीत तसे सांगून ठेवले.शाळा सुटल्यापासून झेंडावंदनाला गेलेच नव्हते कोणी ! इतक्या वर्षांनी आणि ते ही दूरदेशी असताना १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला जायची सार्यांनाच उत्सुकता वाटत होती. दोन दिवस आधी तिथपर्यंत जाऊन रस्ता पाहून ठेवला. हो,झेंडावंदनाला (तरी)उशीरा नको जायला. कॉन्सुलेटच्याच आवारात इंडोजापनीज कल्चरल सेंटर असल्याचे आम्ही पाहिले. आत शिरतानाच दिसतो गांधीजींचा अर्धपुतळा ज्याचे अनावरण डॉ. राजेंद्रप्रसादांच्या हस्ते झाले होते.
पांढरे कपडे घालून,कॅमेरे घेऊन तयार झाली सर्व मंडळी! जपानमधील ८ वाजता म्हणजे भारतातल्या ४.३० वाजताच आम्ही झेंड्याला सॅल्युट करणार होतो. लाल किल्ल्याच्या सोहळ्याआधीच! लाल किल्ल्यावरचा तो सोहळा टीव्हीवर पहायला म्हणजे तिन्ही दलांचे संचलन आणि त्यांनी दिलेली मानवंदना पहायला मला आवडते.
सव्वासातलाच सगळे तयार झाले आणि पावणेआठच्या सुमाराला कॉन्युलेटच्या इमारतीत पोहोचलो.बरेचजण आधीच तिथे आलेले होते. भारतीय चेहरे तर होतेच पण जपानी मंडळीही दिसली आणि काही शाळकरी जपानी मुलंही होती. ओळख नसतानाही सगळे एकमेकांना अभिवादन करत होते. त्यातच श्री.वर्माही होते. त्यांनीही आम्हाला गुड मॉर्निंग केले,आम्ही त्याचा हसून स्वीकार केला. नंतर जेव्हा ते झेंड्यापाशी गेले आणि त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण झाले तेव्हा समजले की हे तर आपले कॉन्युलेट जनरल! किती सहजपणे ते आमच्याशी बोलत होते! त्यांच्या बरोबर होते ह्यूगो प्रिफेक्चर चे चीफ मिनिस्टर! पोलिसांचा ताफा नव्हता की बॉडीगार्ड्स नव्हते.मिरवणं नव्हतं आणि मुख्यमंत्र्यांचा रुबाब तर अजिबातच नव्हता. ते फक्त वर्माजींच्या बाजूला उभे होते.
आता सारेजण रांगेत ताठ उभे राहिले."सावधान! झंडेको सलामी देंगे,सलामी दो!" अशी घोषणा झाली आणि सगळेजण झंडेको सलामी देत खड्या सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दूरदेशात तिरंगा फडकताना पाहून उर भरून आला आणि डोळे पाझरायला लागले.. एक विलक्षण भावना मनात दाटली. ह्यूगो प्रिफेक्चरचे मुख्यमंत्रीही आमच्याबरोबर तिरंग्याला सलामी देत होते आणि शाळकरी जपानी मुलं आमच्याबरोबर आपले राष्ट्रगीत गात होती. इंडोजपान कल्चरलच्या मंडळींनी ह्या मुलांकडून आपल्या राष्ट्रगीताची तालीम करून घेतली होती. सर्वांनी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.(असं हस्तांदोलन करून शुभेच्छा देणं सुध्दा आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं ) नंतर सर्वांनी आतील हॉलमध्ये बसावे अशी सूचना आली.
श्री.वर्मानी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्वांना १५ ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रपतींचा 'राष्ट्राला उद्देशून संदेश' वाचून दाखवला. डॉ.कलामांचे राष्ट्रपती म्हणून पहिलेच भाषण होणार होते आणि ते हुकणार असे वाटत होते पण वर्मासाहेबांनी सारे भाषणच वाचून दाखवले! त्याचबरोबर हे सुध्दा सांगितले की राष्ट्रपती भवनातून रात्री १.३० वाजता फॅक्स आला, त्यात स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा आणि भाषणाची प्रत होती. फॅक्सच्या पहिल्या पानावर खुद्द कलामांच्या हस्ताक्षरात रिमार्क होता,हे भाषण कार्यक्रामात वाचून दाखवले जावे. भाषण वाचून दाखवल्यानंतर ही प्रत आणि मिठाई आम्हा सर्वांमध्ये फिरवण्यात आली. हे सारं अनुभवताना आतून खूप भरून येत होतं.
नंतर चहापानासाठी तर वर्माजी आमच्यातच येऊन बसले. तुम्ही इथे नवीन दिसता?कुठून आलात? कुठे काम करता? सगळी चौकशी केली आणि स्वतःचे कार्ड देऊन काही अडचण आली तर विनासंकोच फोन करा..असेही सांगितले.सगळ्यांच्या चहाखाण्याकडे त्यांचे जातीने लक्ष होते एवढेच नव्हे तर ते आग्रह करुन वाढायला लावत होते. भारतीय सरकारी यंत्रणेचा इतका सुखद आणि जिव्हाळ्याचा अनुभव आम्ही प्रथमच घेत होतो.
चहाखाणे झाल्यावर अजून एक सुखद धक्का होता. एकीकडे काही जणांनी तिथे असलेल्या लहानशा स्टेजवर भारतीय बैठक सजवली.इंडोजपान कल्चरल सेंटर तर्फे जपानी युवकांनी बासरी,तबला आणि वीणेवर अभिजात भारतीय संगीत सादर केले.(क्योतो विद्यापीठातल्या मुलांनी दोन हिंदी एकांकिकाही सादर केल्या होत्या मागे एकदा आणि त्याचा प्रयोग अटलजींसमोर करून वाहवा मिळवली होती,त्यांच्या शुध्द हिंदीपुढे आमचे बंब्बेय्या बिनाअस्तराचे हिंदी बोलायलाही लाज वाटली होती.)
तिरंग्याच्या साक्षीने जपानी युवती तबल्यावर आणि एक तरुण बासरी वाजवित होता.वीणेवर अजून एक जपानी बाला साथ देत होती.. ही मैफल संपूच नये असं वाटत राहिले. ह्या मैफिलीची झलक आपण इथे आणि इथे पाहू शकता.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी जवळ आला की जपानमधला हा १५ ऑगस्ट हटकून आठवतोच.
राजधानी
टोकिओला जाण्याचा बेत ठरला तोही बुलेट ट्रेनने... बुलेट ट्रेन नाही म्हणायचं,' शिनकानसेन' म्हणायचं बरं.. शिन कोबे हे टर्मिनल फक्त शिनकानसेन साठीचे आहे. तेथे आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन पाहून येऊ या असा विचार केला आणि सगळी फय्यर निघाली शिनकानसेन आणि शिन कोबे पहायला.. आम्ही स्टेशनात शिरत असतानाच समोरुन तीही आत येत होती. माशाच्या तोंडासारखा निमुळता पुढचा भाग आणि माशासारखीच सुळक्कन आली की. डोळे भरुन तिला पाहताना कॅमेर्याच्या डोळ्यात तिला साठवण्याचा मोह अर्थातच आवरला नाही.
दुसर्या दिवशी सकाळी ८.१६ ची आमची गाडी होती. आम्ही ८ च्याही आधीच स्टेशनात आमचा ११ नं.चा डबा जेथे येईल असे बोर्डावर लिहिले होते तेथे जाऊन उभे होतो. बरोब्बर ८.१५ वाजता उद्घोषणा झाली आणि त्यापाठोपाठ आमची मासोळी आली आणि प्लॅटफॉर्मची ऍटोमॅटिक दारे उघडली. त्यापाठोपाठ गाडीचीही दारे उघडली आणि आम्ही आत शिरलो. आपल्या शताब्दी किवा राजधानीसारखा दिमाख, पण खाणे पिणे तुमचे तुम्ही आणायचं बरं का,नाहीतर रेल्वेच्या पँट्रीतून विकत घ्यायचं.(मनात विचार आला मग आमची राजधानी मस्त की, जेवण बिवण तरी देते,) पण फरक असा की राजधानी दिवसाला एक आहे तर दर १५ मिनिटाला एक प्रमाणे हिकारी लाईन वरची शिनकानसेन हिमेजी -तोक्यो धावते.६४० किमीचे अंतर तीन तासात पार करते. ह्या गाडीत,खरंतर जपानमधल्या अगदी लोकल ट्रेनमध्ये सुध्दा आपल्या सीटा फिरवून समोरासमोर तोंडे करून बसता येते हे एक विशेषच!
शिनकानसेनमध्ये आपल्या आसनासमोर एक चार्ट असतो. त्या चार्ट मध्ये डब्यात असलेल्या सोयी आकृतीसकट लिहिलेल्या असतात त्यामुळे भाषा जरी समजली नाही तरी काम चालून जाते. गाडीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक बोर्डावर येत असलेल्या फिरत्या सूचना जपानी व इंग्रजीत असल्याने तेथेही भाषिक प्रश्न आड येत नाही. तोक्योला जाताना वाटेत फुजीसान आपल्याला दर्शन देतो. डाव्या बाजूच्या खिडकीतून फुजीसान दिसेल अशी जपानी घोषणा झाली आणि डब्यातले सगळे लोकं आपापले कॅमेरे घेऊन डाव्या बाजूला धावले. आम्ही बावळटासारखे त्यांच्याकडे पाहत राहिलो. आमच्या चेहर्यावरचा गोंधळ रेल क्रूच्या लक्षात आला. त्यांच्यातल्याच एका ललनेने सायबाच्या भाषेत आम्हाला डाव्या बाजूच्या खिडकीतून काही वेळाने फुजीसान दिसेल तेव्हा त्या बाजूला पाहिलेत तर तुम्हाला तो पाहता येईल आणि फोटो सुध्दा काढता येईल असा बहुमोल सल्ला दिला. फुजी स्टेशनात गाडी थांबते, आणि त्या मिनिटभरात शेकडो कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट होतो.
जपानमधील सगळीच स्टेशनं इतकी स्वच्छ आणि आकर्षक आहेत! स्टेशनात ठिकठिकाणी माहितीच्या पाट्या लावलेल्या असतात. "मे आय हेल्प यू?" च्या पाटीखाली हेल्प करायला कोणीतरी असते. त्या पाट्यांवर स्वतःचे वाड्मय आणि चित्रकला दाखवण्याचा सोस तेथील जनतेला नाही ,खर्या अर्थाने ती 'जनताकी संपत्ती' आहे. एक वैशिष्ठ्य जाणवलं ते म्हणजे स्टेशनात जागोजागी ठेवलेले त्यात्या गावचे नकाशे! जपानी आणि इंग्रजी भाषेतले ते नकाशे वापरायला सहज,सोपे. टूरिस्ट गाइडची गरजच नाही. कोणाला विचारायला सुध्दा लागत नाही. तिकिट काढण्यासाठी कुठून कुठे जायचे ते टाइप करुन मशिनच्या खाचेतून नोट सरकवली की बोर्डावर ते दिसणार आणि उरलेले पैसे व तिकिट दुसर्या खाचेतून बाहेर येणार असे जवळजवळ सर्वच प्रगत देशात आहे पण त्यावेळी आमचा तो पहिलाच अनुभव होता. मशिनने पैसे खाल्ले तर.., ते ऑपरेटच झालं नाही तर..तिकिटावर नीट शिक्काच उमटला नाही तर.. असे विचार कायम माझ्या शंकाखोर मनात येत पण सुदैवाने तसं कधीच झालं नाही.जपानमध्ये तुम्ही तिकिट पंच केलं की प्लॅटफॉर्मकडे जाणारे दार उघडते आणि तुम्ही आत/बाहेर करू शकता. टीसी नसतोच,असतो तो फेअर ऍडजस्ट करणारा.थोडक्यात आपल्या एक्सटेंशन काऊंटरचं काम तो करतो. गाडीत बसल्यावर मध्येच तुमचा विचार बदलला आणि तुम्ही दुसरीकडेच जायचं ठरवलंत किवा चुकीच्याच गाडीत बसलात.(दुसरी गोष्ट घडायचीच शक्यता आमच्या बाबतीत जास्त!) तर परत बाहेर जाऊन तिकिट काढायची गरज नाही तर त्याच्याकडून पुढचे तिकिट घ्यायचे. येथे लोकांनी टीसीला फसवण्याची वृत्ती दिसली नाही आणि रेलकर्मचारीही तुमच्यावर अविश्वास दाखवताना दिसले नाहीत.
तीनसव्वातीन तासात आम्ही तोक्योला पोहोचलो. प्रवासाचा शीण नव्हताच आणि बरोबर सामानही फार नव्हते त्यामुळे टोकिओ टॉवर पाहून मग हाटेलावर सामान टाकायचे ठरले. आयफेल टॉवरच्या धर्तीवर बांधलेला तोक्यो टॉवर दिमाखात उभा आहे. १५० मीटर उंचीवरुन आपल्याला तोक्योचे विहंगम दर्शन होते. तिकिटाबरोबरच नकाशा मिळतो. लिफ्टने टॉवरच्या माथ्यावर नेऊन सोडतात. तेथे सर्व बाजूंनी काचा लावलेले मोठे दालन आहे. काचेवर दिशा लिहिल्या आहेत आणि जागोजागी दुर्बिणीही ठेवलेल्या आहेत. हातात असलेल्या नकाशाच्या आधारे आणि दुर्बिणीच्या सहाय्याने आपण नेमके काय पाहत आहोत हे समजून पाहिले जाते. एक जण जर दुर्बिणीतून पाहत असेल तर बाकीचे रांगेत शांतपणे आपला नंबर यायची वाट पाहत नुसत्या डोळ्यांनी जेवढा नजारा दिसतो तो पाहत किवा माहिती वाचत उभे राहतात. "ओ भाऊ,चलाकी आता..कितीवेळ लावता?.. आम्हाला पण बघू द्या की.." असले प्रेमळ संवाद नाहीतच पण आरडाओरडा,गोंधळ तर अजिबातच नाही. खूप वेळ तोक्योचे विहंगम दर्शन घेऊन मग आम्ही इंपिरिअल पॅलेस पाशी आलो.जपानी सम्राटाचे ते भव्य निवासस्थान त्याच्या समोर असलेली तितकीच भव्य आणि सुंदर उद्याने पाहिली. ह्या राजवाड्याच्या सभोवतीची भक्कम तटबंदी आणि पाण्याचे खंदक आजही सुस्थितीत आहेत. ह्या पाण्यात विहरणारे लाल गुंजेच्या डोळ्यांचे काळे डौलदार राजहंस प्रथमच पाहत होतो.(पुढे असाच काळा राजहंस म्युनस्टरच्या आसे मध्ये पाहिला.)
नंतर आम्ही डायट ऑफ जपान अर्थात पार्लमेंट हाउस पाहिले. लोअर हाउस म्हणजे हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि अप्पर हाउस म्हणजे हाउस ऑफ काउंन्सेलर्स.सर्वप्रथम इंपिरिअल डायट नावाने मेइजी कॉन्स्टीट्यूशन जापान्यांनी १८८९ पासून अनुसरली. संसदभवनाला डायट ऑफ जपान का म्हणत असावेत? हा प्रश्न साहजिकच आमच्या मनात आला. जपानी राजकारण्यांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार तर सर्वश्रुत आहेच, त्यावर त्यांनी सामुहिक डायट करण्याचे हे केंद्र तर नव्हे? असा एक खोडकर विचार मनात आला.
त्यानंतर रेंकोजी टेंपलपाशी आलो. नेताजींचा अस्थीकलश येथे ठेवलेला आहे. तसेच त्यांचा अर्धपुतळाही तेथे आहे. एका वेगळ्याच अनामिक भावनेने सगळे भारून गेलो होतो पण आमच्या दुर्देवाने टेंपल काही दिवसांसाठी बंद होते. कळसाला नमस्कार करून नाइलाजाने मग आम्ही पुढे निघालो.
जगातलं महाग शहर तोक्यो आणि तेथले महाग मार्केट गिंझा बझार! विंडो शॉपिंग करायलाही घाबरावं अशा किमती ! उंच उंच इमारतीतील सुपरमार्केटं आणि त्यातील वस्तूंच्या किमती पाहूनच जीव दडपतो. खरेदी तर दूरची गोष्ट. तेथील सोनीची अतिभव्य इमारत पाहून वासलेला आ कितीवेळ बंदच होईना.
आता आम्हाला जायचे होते रेनबो ब्रिज पहायला, पहायचा होता चमचमणारा तोक्यो टॉवर आणि तोक्योचा लखलखाटही ! पाय दमले होते तरी मनातला अमाप उत्साहच पायांना चालवित होता. पॅसिफिक महासागरावर बांधलेल्या अनेक अजस्त्र पूलांपैकी हा एक रेनबो ब्रिज, सप्तरंगी दिव्यांच्या लक्षलक्ष दीपमालांच्या लखलखाटाने आपलं नाव सार्थ करत आत्ममग्न असा तो सेतु आपल्याच प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलेला वाटतो. सागरातलं ते सप्तरंगी प्रतिबिंब पाहताना तर प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर वाटत होती. तेथे असलेला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजच्या जपानी पिढीच्या अमेरिकावेडाची साक्ष आहे. तेथून उठावसं वाटत नव्हतंच, मात्र नाइलाजाने तेथून निघालो कारण तोक्यो टॉवरचा दीपोत्सव खुणावत होता.
फुजीसान!
आपल्याकडे कसं म्हणतात ना," काशीस जावे नित्य वदावे.." तसे जपानी म्हणत असावेत "फुजीस जावे नित्य वदावे.."
अशा ह्या समग्र जपानच्या लाडक्या फुजीसानला भेटायचेच हे मनोमनी ठरलेलंच होतं आणि त्या दृष्टीने तयारी सुरु केली. त्यात जून महिन्यात हा निद्रिस्त ज्वालामुखी जागा होऊन लाव्हा वाहू लागल्याच्या बातम्या ऐकल्यावर तेथे एकदा तरी जाण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली. "फुजी चा ट्रेक अगदी साधा सोपा आहे ,तुम्ही जाऊन याच, खूप आवडेल तुम्हाला,जुलै नंतर फुजीसान पर्यटकांसाठी खुला होतो.", इति फुजितासान! आणि तिने एका जपानी केसरी/ सचिन/ चितारी बरोबर गाठ घालून दिली आणि आमच्या वतीने नावनोंदणीही करुन टाकली. इंग्रजी येणारे वाटाड्ये आहेत त्यांच्या सहलीत, ही माहितीही पुरवली. आम्ही राहत होतो कोबे मध्ये, तेथून बसने फुजीयामाला जायचे तर ६ ,७ तास सहजच लागतात. ही काही रमतगमत करायची सहल नव्हती तर शनिवारी सकाळी ७वाजता ओऽसाकाहून निघायचे होते आणि रविवारी रात्री परत. जपानमध्ये कुठेही हिंडायचे की आपली डबाबाटली सोबत हवीच. बाहेर जेवायचे झाले तर कोरडा भात, त्यावर कच्च्या माशाचा तुकडा, बांबूचे तुकडे,मशरुम्स ,समुद्री भाज्या असले काहीतरी घातलेल्या, उग्र वासाच्या न्यूडल्स कसल्या तरी सॉसांबरोबर खायच्या ही कल्पनाच सहन न होऊन दोन दिवसांचे जेवण आणि इतर खाणे आदल्या दिवशी रांधायला सुरुवात केली. २,३ प्रकारचे पराठे,पुलाव,ब्रेड,केक,बिस्किटं,फळं,पाण्याच्या ,लिंबूपाणी,कोकच्या बाटल्या , चॉकलेट्स असं सगळं पोतडीत भरुन 'इसापचं बोचकं' तयार केलं. घरातून पहाटे ५.४५ लाच निघालो. ओऽसाका स्टेशनच्या बाहेरच आमची फुजीयामाला जाणार्या सहलीची बस उभी होती. एकूण ४५ जणांच्या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही ४ भारतीय, ३ ब्रिटीश बाया आणि २ जर्मन बाप्ये एवढेच गायकोकुजिन म्हणजे परदेशी होतो, बाकी सगळे जपानी चेहरेच होते. त्यात एक साधारण साठीच्या आजी आजोबांचा १०/१२ जणांचा एक ग्रुप होता. दंगा,गाणी करत सहलीचा पुरेपुर आनंद घेत बस पुढे चालली होती. मोडक्यातोडक्या जपानी/इंग्रजी आणि हातवार्यांनी एकमेकांशी बोलत आम्ही ओळखी करुन घेतल्या.
फुजीसान चढण्यासाठी साधारण १० टप्पे केले आहेत आणि पाचव्या टप्प्यापर्यंत बस जाते,ते बेस स्टेशन ! साधारण चारच्या सुमाराला आम्ही तेथपर्यंत पोहोचलो. ससाकी सान आणि सुझुकीसान ह्या आमच्या २ उत्साही म्होरक्यांशी ओळख करुन दिली आणि आम्हाला बसमधून उतरवून दोन हॉल्स मध्ये नेण्यात आले आणि गरम कपडे घालून चढायला तयार होण्यास सांगितले . एकात बाया आणि दुसर्यात पुरुषमंडळी गेली आणि साधारण अर्ध्या तासात सगळे तयार होऊन तेथेच असलेल्या भोजनगृहात जपानी जेवणाची सोय केलेली होती तेथे जमले. आमची डबाबाटली जरी बरोबर असली तरी बशीमध्ये ओळख झालेल्या ह्या आमच्या नव्या मित्रांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या पंगतीला बसलो.
एकदाचा तो सोपस्कार पार पाडून बाहेरच्या मोकळ्या अंगणात सर्वांची वाट पाहत थांबलो. भन्नाट वारा वाहत होता, बारीक रेती मधूनच उडत होती. तापमापी ७ अंश से. दाखवत होता. एकटेदुकटे पुढे जाऊ नका, खूप मागेही कोणी रेंगाळू नका, ग्रुप मध्ये रहा.. इ. ढोबळ सूचना ससाकीसान आणि सुझुकीसानने दिल्या आणि राखीसदृश्य रेशमी धागे प्रत्येकाला दिले.आता ह्यांचं काय करायचं? असा आमच्या डोळ्यातला प्रश्न आकीसानने वाचला आणि आम्हाला त्या राख्या हाताला बांधायला सांगितले. पुढे सुझुकीसान म्हणजे इंजिनडबा आणि ससाकीसान गार्डाचा डबा आणि मध्ये आम्ही सगळे असे चढायला लागलो.
सुरुवातीला वळणावळणांचा, मातीचा आणि रेतीचा कच्चा रस्ता आहे. हळूहळू चढ कठिण होत जातो आणि वाळूवरुन पाय घसरतो. बारीक बारीक खडे,दगडगोटे चालताना मध्ये येतात आणि त्यावरुनही पाय घसरतो आहे असे लक्षात यायला लागले तरी खिदळत,गप्पा मारत आम्ही चढत होतो. आकीसान आणि योशिकोसान ह्या दोन जपानी मुलीही आमच्याबरोबरच चढत होत्या त्यातली आकीसान भारतात दोनदा येऊन गेली होती आणि जुहूबीचवर भेळ आणि पानपट्टीही तिने खाल्ली होती , अशा गप्पा मारत आमचे चढणे चालले होते.
सहाव्या टप्प्यापर्यंत गेलो असू,नसू आणि जोरात वारा सुरू झाला. वाळूचे बारीकबारीक कण उडायला लागले आणि चेहर्यावर बसू लागले., डोळ्यात जाऊ लागले. गॉगल बिगलचा , काही उपयोग नव्हता. बोलायला तोंड उघडलं तरी वाळू तोंडात जाऊ लागली , वारा तर इतका जोरात वाहू लागला की त्याच्या जोराने ढकलले जाऊ लागलो.जणू वाळूचे वादळच सुरु झाले. सगळा असाच निसरडा रस्ता आणि कठिण चढ.. एका बाजूला फुजीचे उंचउंच कडे तर दुसर्या बाजूला खोऽल दरी ! चढताना मला श्वासाला त्रास व्हायला लागला, दम लागायला लागला.आकीसानने तोंडात चॉकलेट ठेवायला सांगितले. "उंचावर हवा विरळ होते.." विज्ञानाच्या पुस्तकातलं वाक्य आठवणीतून तरंगत वर आलं आणि मी अजून एक गोळी तोंडात ठेवून पुढचं एक वळण पार केलं. जसे जसे वर चढत होतो तसतसा मला अधिक दम लागू लागला. चार पावले चालले की मी थांबू लागले. अजून बरेच वर चढायचे होते. सातवा टप्पा अजून दृष्टिक्षेपातही आला नव्हता. माझी अवस्था पाहून ससाकीसानने आम्हाला खालती बेसवर परत जायचा सल्ला दिला जो अर्थातच आम्ही मानला नाही. जन्माच्या कर्मी एकदा फुजीसानला भेटायला आलो आहोत , चढतो आहोत आणि ही संधी अशी अर्ध्यात सोडून मला तर जायचे नव्हतेच आणि माझ्यामुळे बाकीच्या तिघांची संधीही घालवायची नव्हती. मला जाणवत होतं की विरळ हवेमुळेच मला(आणि त्या ४५ जणांमध्ये फक्त मलाच, :( ) श्वासाला त्रास होतो आहे, जर सावकाश चालत चढले तर आपण पुढे जाऊ शकू ह्या विचाराने मी दिनेशला म्हटले ,"चल, जायचे आपण वरपर्यंत, फक्त मी भरभर नाही येऊ शकत. सावकाश चढले की दम कमी लागतो आहे,बाकी काळजी नको करु." पण ससाकीसानला मात्र काळजी वाटायला लागली आणि तो आमच्या बरोबरच चढू लागला. त्याच्याजवळ जुजबी औषधं, प्रथमोपचार पेटीही होती. सुदैवाने त्याची गरज पडली नाही, कोणालाच..
सातव्या टप्प्याशी पोहोचेपर्यंत कच्चा रस्ताही बंद झाला होता. आता फक्त खडकांवरुन माकडांसारखं चढून जायचं होतं. ह्या खडकांना साखळदंड बांधलेले होते पण त्यातले कितीतरी खडक जरा हात लागला तरी डगडगत होते. कधी गडगडून साखळदंडासकट खाली येतील याचा नेम वाटत नव्हता.अंधारही पडल्यामुळे टॉर्चच्या अपुर्या प्रकाशात पुढची चढण पार करायची होती. चढ आणखीच कठिण झाला होता. एका हातात बॅटरी, पाठीवर बोचके आणि गळ्यात क्यामेरा अशी ध्यानं फुजी चढत होती. अधून मधून रोवलेल्या लोखंडी शिगा आणि साखळदंड सोडले तर आधाराला काहीच नाही, एखादे झुडुपही नाही. ज्वालामुखी पर्वत असल्याने जांभळट रंगाचे ठिसूळ दगड, खडक आणि रेती फक्त! वारा 'मी' म्हणत होता, अंधारामुळे पुढचं काही दिसेनासं झालं . एकमेकांना ओरडून सांगत, चाचपडत आम्ही वर चढत होतो. सिंहगड, लोहगड, पन्हाळा इ. किल्ले पालथे घातल्याने आणि फुजीचा साधासोपा ट्रेक आहे अशी माहिती मिळाल्याने आम्हाला वाटले होते की आपण आरामात,मजेत चढू फुजी पण कसलं काय.. आमच्या ग्रुपमधले इतर मात्र फुजी चे नेहमीचे वारकरी असल्याने सराईतपणे पुढे निघून गेले होते अगदी आजीआजोबांच्या ग्रुपसकट! आम्ही जरा चेव येऊन भरभर चढायला लागलो तर ससाकीसानने थोपवले. तुम्ही तुमच्या वेगानेच चढा. अंधार आहे, कठिण चढ आहे, एकाचा जरी पाय सटकला तर सरळ दरीत जाल.. झाले , आम्ही आपले परत 'गो स्लो..' वारा थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्यात आता पाऊस सुरु झाला . वाट निसरडी होऊ लागली. कधी एकदा आपण आठव्या टप्प्यावर पोहोचतो असं झालं होतं पण .. ससाकीसानचे 'गो स्लो' ! खाली दरीत पाहिलं की दूरवर चाललेला 'हनाबीचा सण' ,शोभेचे दारुकाम, ती आतशबाजी उंचावरुन पाहताना काही वेगळीच दिसते. एकीकडे निसर्गाचे हे रौद्ररुप तर दुसरीकडे ही प्रकाशशोभा! पण ती शोभा निवांतपणे पाहत थांबायची ती वेळ नव्हती. तिथे तेवढी जागाही नव्हती. पावसाचा जोरही वाढला. ढग गडगडू लागले आणि विजा चमकायला सुरुवात झाली. आता तिथे असं प्रकाशशोभा पाहत थांबणं धोक्याचं होतं.आता जरा भीतीही वाटायला लागली, ससाकीसानने तर आता हाताला धरुनच चालवायला सुरुवात केली.
आकाशात विजा चमकताना आपण अनेकदा पाहतो. विमानात असताना आमोरासमोर चमकून जाणारी सौदामिनीही कितीतरी जणांनी पाहिली असेल . खुल्या आकाशाखाली, उंच कड्यांवर उभे असताना आमच्यापासून दूर पण एकाच समपातळीवर ती चमकून गेली आणि त्या तेजाकडे पाहताना काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येत.. अजून थोडे वर गेल्यावर थोडी मोकळी जागा होती. ससाकीसानने आम्हाला तिथे उभे राहून खाली पहायला सांगितले. खालच्या दरीत विजांचा पाठशिवणीचा खेळ रंगला होता, तो पाहताना तर अंगावर काटा आला. आता शेवटचा चढ बाकी होता. वारा इतका ढकलत होता की ओणवे होऊन आणि जवळजवळ रांगतच आम्ही शेवटचा चढ पार केला. आम्ही पोहोचल्याबरोबर तेथे असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि गरमगरम ओचाचा कप पुढे केला. आजीआजोबांच्या ग्रुपचा म्होरक्या पुढे आला आणि त्या सर्वांतर्फे एक छोटोशी भेट त्यांनी मला दिली. परत सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.माझी दम लागलेली अवस्था पाहून हे लोकं काही वर येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला होता आणि आम्ही तेथे पोहोचलेले पाहून त्यांना कौतुक वाटले होते. त्यांचे हे कौतुक आनंदाचा शिडकावा करून गेले. आधीचा ग्रुप आमच्या १० च मिनिटे आधी तेथे पोहोचला होता हे समजल्यावर तर फुजीच्या शिखरावर आमचा आनंद पोहोचला.
आठवा टप्पा ११,००० फूट उंचीवर आहे आणि अजून १००० फूट वर चढले की शिखर! आत्तापेक्षाही कठिण ,अतिशय कठिण असा पुढचा १००० फूटांचा रस्ता आहे आणि तो पार करायचे अजून दोन टप्पे आहेत. पण आता इथवर आलो आहोत तर शिखर गाठायचेच, आमचा वज्रनिर्धार होता. ह्या आठव्या टप्प्यावर एक घर बांधले आहे आणि तेथे एका हॉलमध्ये चरासारखे गोलाकार खणून बादलीपेक्षाही मोठ्या अशा दोन केटल्स मध्ये ओचा उकळत ठेवलेला होता. तिथल्या कट्ट्यावर उबेपाशी बसून ओचा पित आमच्या नव्या मित्रांशी गप्पा मारत आम्ही पुढच्या सूचनांची वाट पाहत बसलो. गम्मत म्हणजे ह्या उंचीवर मोबाइल नेटवर्क चालत होते. वैद्यकिय सेवा उपलब्ध होती आणि जरुर पडली तर रुग्णवाहिकेची सोयही होती. हॉलच्या चारही बाजूंनी असलेल्या दालनात रेल्वेच्या टू टियर सारखी बंकरबेडची गाद्या, उशा, पांघरुणांसकट सोय केलेली होती. येथे ३ तास विश्रांती घेऊन रात्री १२ च्या सुमाराला शिखराकडे कूच करण्याचे ठरले .
सूर्योदय आणि कावागुची सरोवर
१२ वाजून गेले तरी पाऊस आणि वादळी वार्याचा धिंगाणा आणि जोडीला विजांचा बॅले चालूच होता. इथवर आलोत आता शिखरापर्यंत जायला मिळणार की नाही? सार्यांच्या मनात एकच प्रश्न होता. शेवटी १.३० वाजता पावसाचा जोर थोडा कमी झाला आणि आम्हाला शिखरावर जायची अनुमती मिळाली. आम्ही पुढे कूच करायला सुरुवात केली. आठव्या टप्प्यापर्यंतचा अनुभव लक्षात घेता परत एकदा ससाकी आणि सुझुकीसानने मला तेथेच आराम करायला सांगितले पण मी अर्थातच ते न मानता सगळ्यांच्या पुढे रांगेत जाऊन उभी राहिले. मंद हसत ससाकीसान आमच्याबरोबर राहिला आणि इतरही सगळ्यांनी सहकार्य केले. रात्रीच्या त्या किर्र अंधारात आणि पावसाच्या भुरभुरीत एका हाताने विजेरी धरुन काय प्रकाश पडणार? आमच्या बरोबरच्या जपानी मंडळींनी मात्र सावधगिरी बाळगून खाणकामगारांसारख्या डोक्यावर बांधायच्या विजेर्या आणल्या होत्या, त्याने दोन्ही हात मोकळे राहत होते. आता चढ आणखी कठिण होता त्यामुळे आमच्या केविलवाण्या टॉर्चांना बंद करुन त्या प्रकाशात चढण्याची सूचना ससाकीसानने केली. काही जणांनी आधाराला काठ्याही आणल्या होत्या. झाले, आम्ही सारे चढू लागलो, दिड दोन तासात वर पोहोचून ओचा पिऊन फ्रेश व्हायचे आणि सूर्योदय पहायचा असा बेत होता. तसे फुजीसानची वारी करणे म्हणजे शिखरावरुन सूर्योदय पाहणे मस्टच! (आणि मस्तही!) वरचा चढ अजून स्टिप होता , त्यात गारा पडू लागल्या. आम्ही रेनकोट घातले खरे पण ते काही पावसाच्या आणि गारांच्या मार्याला पुरे पडेनात. वारा तर रेनकोटातून आणि गरम कपड्यातून पार अगदी हाडांपर्यंत जात होता. हातावर हात चोळूनही उब कशी ती वाटतच नव्हती, तसेच चढणे सुरु होते आणि ती तोरीइ कमान दिसू लागली. आम्ही शिखरावर पोहोचल्याचेच ती कमान आम्हाला सांगत होती.
एव्हाना ३ वाजून गेले होते. पावसाने आपला खेळ आवरता घेतला तरी आकाशात 'काले काले बादल' होतेच. अशा वातावरणात कसा सुंदर सूर्योदय दिसणार? ही चिंता आता सारे करु लागले पण अजून आहे अर्धापाऊण तास असा दिलासा एकमेकांना देत तेथल्याच एका ढाब्यावर झटपट ओचा पिऊन सगळे वज्रासनात बसून प्रार्थना करु लागले . ते पाहून दिनेश आणि अविनाशने सूर्याची नावे घेत सूर्यनमस्कार घातले आणि आम्ही 'कराग्रे वसते लक्ष्मी.. ' म्हटले. पहाटे ३.४५ वाजता सूर्योदयाची वेळ होती. एव्हाना पूर्वेकडे तांबडी नक्षी दिसू लागली. उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यजन्माचा तो उत्सव पाहण्यासाठी सारेच आतुरले होते, आपसूकच सगळे बोलायचे बंद झाले. समोर क्षितिजावर सूर्यजन्म होत असताना त्याच उंचीवरुन आम्ही तो सोहळा पाहताना वाटलं याचसाठी केला होता अट्टहास.. जेव्हा पहिले कंकण दिसू लागले तेव्हा लोकांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
शिखराच्या मध्यभागी असलेल्या नाइन म्हणजे क्रेटर भोवती साधारण ३.५ किमीची प्रदक्षिणा घालता येते. आत डोकावून पाहिले तर खोऽल दरी आणि कडांना बर्फ ! स्तिमित होऊन पाहत राहिलो. ह्या क्रेटरला असलेली ८ पिक्स केनगामाइन, हाकुसान, कुसुशी, दाइनिची, इझु, जोजु,कोसागाताके आणि मिशीमादाके! या शिखरावर जपानमधले सर्वात उंच पोस्ट हापिस आहे आणि तेथून भेटकार्डे पाठवू शकतो पण ते पोस्ट हापिस उघडेपर्यंत थांबायला लागले असते आणि तेवढा वेळही नव्हता.
पाच साडेपाचलाच लख्ख ,स्वच्छ प्रकाश पसरला होता. खाली पाहिलं तर कालच्या तांडवाचा कुठे मागमूसही नव्हता. अगदी नाटकातल्या ट्रान्सफर सीन सारखा बदल झाला होता रात्रीत! काल रात्रीच्या अंधारत, विजांच्या चमचमाटात, ढगांच्या गडगडाटात आणि पावसाच्या मार्यात वर चढताना इतरत्र लक्ष देताच आलं नव्हतं , आता उतरताना मात्र स्वच्छ प्रकाशात निसर्गाचं ते देणं मनसोक्त पाहत उतरु लागलो. उतरताना कालचं चढणं मनोमन आठवलं, उतरतानाही आधाराला काही नाही, पाय घसरला तर थेट खोल खोल दरीतच.. 'जपून टाक पाऊल' म्हणत उतरु लागलो. ससाकी सान आणि सुझुकीसान दोघांचंही सर्व नीट उतरत आहेत ना, उत्साहाच्या भरात कोणाला खोल दरीचा विसर पडत नाही ना.. याची काळजी घेत होते.
आम्ही खाली उतरताना चढणार्यांना प्रोत्साहित करत होतो. सहाव्या टप्प्यावर आम्हाला एक ग्रुप भेटला, त्यात एक बया पाठीवर ३,४ महिन्यांचं गाठोडं बांधून फुजी हेंगायला आली होती. आपल्याकडे ३ महिन्यांचं पोरगं घेऊन एकटीला प्रवास सुध्दा करु देत नाहीत आया,काकवा.. इथे तर ही ... "धन्य ग बाई तुझी.." असं न राहवून चक्क मराठीत म्हटलं तर गोड हसली. तिला शुभेच्छा देऊन पुढे उतरु लागलो.
पाचव्या टप्प्यापर्यंत म्हणजेच बेस कँपपर्यंत खाली उतरलो आणि तेथल्या हॉलमध्ये न जाता लगेचच बशीत भरुन आम्हाला एके ठिकाणी नेण्यात आलं.जरा हातपाय तरी धुवायला वेळ द्यायचा अशी माझी थोडी कुरकुर झाली , पण माझ्याकडे कोण लक्ष देणार होतं? पाच/दहा मिनिटातच आम्हाला एके ठिकाणी उतरवलं . हे होते स्प्रिंग शॉवर बाथ! इथेही २ मोठ्ठी दालनं होती. एक बायांचा आणि दुसरा बाप्यांचा, आत गेले तर आत लहान लहान हौद होते त्यात गरम पाणी सोडले होते आणि एका बाजूला शॉवर्स होते. शांपू, साबणाचे बुधलेही तेथे ठेवलेले होते. पण बाहेरचा दरवाजा सोडला तर एकही आडोसा नाही. एवढ्या सगळ्या बाया मुक्तपणे निसर्गावस्थेत नि:संकोच डुंबत होत्या,काहीजणी तुषारस्नान घेत होत्या."हमाममे सब नंगे.." असले तरी तिथेच इतक्या बायांच्यात आपण आंघोळ करायची? हा विचारच सहन होईना.. मग इकडे तिकडे बघितले आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये येणार तेवढ्यात आकीसानने हाक मारली आणि हौदात डुंबायला नेले. एकदा पाण्यात उतरल्यावर मग सगळा संकोच पाण्यातच विरघळला. डोळे मिटून पाण्यात पडून राहिले,गरम पाण्यात अंग मुरवलं अक्षरशः सगळा शीण निघाला. बाहेरच यावेसे वाटत नव्हते पण तासभराचा वेळच आम्हाला स्नानासाठी दिला होता त्यामुळे आकीसानने त्या समाधीतून बाहेर काढलं आणि तयार होऊन आम्ही बाहेर आलो. दिनेशला विचारलं तर पुरुषांच्या हॉलात पण अशीच व्यवस्था असल्याचं समजलं.
आता आम्हाला कावागुची सरोवर पहायला जायचं होतं. ह्या सरोवरात फुजीसानचं प्रतिबिंब दिसतं. अशी पाच सरोवरे फुजियामाच्या परिसरात आहेत. कावागुची,यामानाका, साई,मोनोसु आणि शोजी! पूर्वी ती पाचही सरोवरे म्हणजे एकच मोठ्ठा जलाशय होता पण जेव्हा हा ज्वालामुखीचा फुजीपर्वत तयार झाला तेव्हा त्या एका जलाशयाची ५ सरोवरे झाली. ही पाचही सरोवरे खालून एकमेकांना जोडलेली आहेत असे तेथील अभ्यासकांना संशोधनाअंती समजले आहे. संशोधन म्हणजे चक्क पाणबुडे आणि लहान पाणबुड्या आत नेऊन पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
संथ जलाशयात पडलेले ते फुजीसानचे प्रतिबिंब पाहताना 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर 'चा प्रत्यय आला. पाण्याच्या हलक्या तरंगांबरोबर प्रतिबिंबातला फुजीसानही हेलकावे खायचा ते पहायला मोठी मौज वाटत होती. त्या सरोवरात नौकाविहाराचीही सोय आहे पण त्या दिवशी मात्र नौकानयन बंद होते.त्यामुळे आम्ही काठावर बसून फुजीसानचे प्रतिबिंब निरखित कितीतरी वेळ बसलो , आकीसान आणि योशिकोसान बरोबर गप्पा मारत ,'इसापचं बोचकं' हलकं केलं.
पोट आणि मन दोन्हीही भरलं होतं, त्याच तंद्रीत परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. फुजीसानने आम्हाला अतिशय रोमांचकारी अनुभव तर दिलाच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे दोन छान, गोड मैत्रिणी दिल्या.
गाक्कोउ - शाळा जपानी !
आम्ही राहत होतो तेथे २ गल्ल्या सोडून एका कोपर्यावर एक मोठी इमारत होती आणि त्या इमारतीच्या आवारात नेहमी १२, १४ वर्षांची मुले दिसत त्यावरुन ती शाळा असावी असा कयास बांधला आणि एके दिवशी त्यातल्याच एका टोळक्याला पकडून संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यांचे इंग्लिश आणि आमचे जपानी यांची झटापट होऊन ती शाळाच असल्याचे समजले. त्यांच्या इंग्लिशच्या मास्तरांना भेटता येईल का? असे विचारल्यावर त्यातलीच दोघं पळाली की शाळेच्या दिशेने आणि एक मध्यमवयीन सद् गृहस्थ आमच्या दिशेने येताना दिसल्यावर उरलेली टाळकीही पांगली. मी आणि सुप्रिया तिथेच आपल्या उभ्या! ते आमच्याकडेच आले आणि इंग्रजीत वदते झाले, " आमच्या मुलांनी तुम्हाला काही त्रास दिला का? मी मात्सुदा, ह्या शाळेचा उपमुख्याध्यापक," आता समजले मुले का पांगली ते.. शाळेच्या मुख्यांपैकीच एक जण तिथे आल्यावर त्यांच्या वार्याला उभे राहण्याचा वेडेपणा कोण करेल? आणि मास्तर पण जगभर सारखेच की.. आपल्या मुलांनीच काहीतरी दंगा केला असेल, ह्या नवख्या, परक्या बाईंना त्रास दिला असेल या समजुतीने ते विचारत होते.
"मुलांनी काही नाही हो त्रास दिला,मला जपानी तितकीशी येत नाही आणि मुलांना इंग्रजी! संवाद करता येईना म्हणून इंग्रजीचे गुरुजी आहेत का? विचारत होते. आम्ही इथेच २ गल्ल्या पलिकडे राहतो. तुमची शाळा बघायची इच्छा होती, परवानगी मिळेल का?" मी मुलांशी बोलण्याचं कारण सांगितल्यावर गुरुजींचा चेहरा हुश्श झालेला जाणवला मला, मला हळूच म्हणाले द्वाड आहेत हो आमची पोरं, त्यातून टीनएजर सगळे.. १४, १५ वर्षांच वय ना..टवाळ्या करत असतात म्हणून वाटलं तुम्हाला काही त्रास दिला की काय? परत एकदा घाईघाईने मुलांनी मला काहीही त्रास दिला नसून मलाच शाळा बघायची उत्सुकता असल्याने मी त्यांच्याशी गप्पा मारायला आल्याचे सांगत असतानाच एक तरुणी आमच्या दिशेने आली. ह्या योशिदासान, आमच्या इंग्रजीच्या बाई. गुरुजींनी ओळख करुन दिली आणि त्यांच्या मागोमाग येण्याची खूण केली. योशिदासानबरोबर मी त्यांच्या कचेरीत पोहोचले. दुसर्या दिवशीपासून १५ दिवस कसलीशी सुटी होती म्हणून त्यानंतरच्या एके दिवशी मला शाळा बघायला येण्याचे रीतसर आमंत्रणच त्यांनी दिले. एवढेच नाही तर मुख्याध्यापक दाइचीसानशी ओळख करुन दिली. योशिदासान आणि मी एकमेकींना फोन नं दिले आणि संपर्कात रहायचे ठरवले.
अखेर तो दिवस उगवला, मी शाळेपाशी पोहोचले तर योशिदासान आणि ४,५ मुले फुले घेऊन माझ्या स्वागताला हजरच होती. आम्ही मग शिक्षककक्षात पोहोचलो. तेथे मात्सुदासानसुध्दा सगळे शिक्षक होते. दाइचीसान आल्यावर सगळेजण उभे राहिले.त्यांनी सार्यांना अभिवादन केले आणि आम्हाला बसायला सांगण्यात आले. मग सुबकशा पेल्यातून चहा आला, गव्हाचा रस घातलेला तो हिरवट चहा पाहून, 'मी चहा घेत नाही ' असे योशिदाला हळूच सांगितले तर ती म्हणाली, तू चहा प्यायल्या सुरुवात केल्याशिवाय कोणीही पिणार नाही आणि नाही म्हणालीस तर ते चांगले समजले जात नाही. मग काय? चेहरा चांगला ठेवून तो काढा पिण्याची कसरत करावी लागली. जुजबी बोलून आणि योशिदासानला मला शाळा दाखवायला सांगून दाइचीसान आणि मात्सुदासान आपापल्या कचेर्यात निघून गेले. खोलीत असलेले शिक्षक माझ्याशी बोलायला उत्सुक होते पण झालं काय की सगळ्यांनाच काही इंग्रजी बोलता येत नव्हते त्यामुळे ते झू मधल्या प्राण्याकडे पहावं तसं माझ्याकडे पाहत होते. शेवटी मी योशिदाला विचारलं की शाळा कधी दाखवणार तू मला? तर म्हणाली तू येणार म्हणून मुलांना एक तास उशिरा बोलावलं आहे. हा तासभर शिक्षकांना तुझ्याशी बोलण्यासाठी ठेवला आहे. त्यांच्याशी काहीतरी बोल. सगळ्यांना बर्यापैकी इंग्रजी समजत पण बोलताना पंचाईत असते. मग काय? मीच एक 'भाषान' ठोकलं.. म्हणजे आपल्याकडच्या शाळा, आपल्याकडे काय आणि कसं शिकवतात. १०वी ची परीक्षा कशी महत्त्वाची असते नंतर कसे विज्ञान, कला किवा कॉमर्सला जाता येतं.. इ. इ. जसं आठवेल तसं सांगत गेले आणि मंडळी भक्तिभावाने ऐकत राहिली पण तो माझ्या भाषणाचा प्रभाव नसून भाषेची अडचण आहे हे नंतर त्यांनी योशिदासानमार्फत विचारलेल्या प्रश्नांवरुन समजलं. भारताबद्दल असलेलं कुतुहल त्यांना प्रश्न विचारायला लावत होतं. घंटा होईपर्यंत हा प्रश्नोत्तरांचा तास चालू होता. मग मात्र सगळ्यांनी मला आणि मी त्यांना धन्यवाद देऊन ते आपापल्या वर्गाकडे आणि योशिदासानबरोबर मी शाळा बघायला निघाले.
सगळ्यात आधी लायब्ररीमध्ये गेलो. प्रचंड मोठ्ठी ग्रंथसंपदा पाहताना डोळे विस्फारत होते आणि प्रेमळ चेहर्याचे लायब्ररीयन हारुसान लगबगीने आलेच की खुर्चीतून उठून. स्वत: दालनांतून हिंडून मला त्यांचे पुस्तकालय दाखवत होते. १० वी, १२ वी पर्यंत शिकणार्या मुलांसाठी जगभरातली माहिती ,ज्ञान तिथे उपलब्ध होतं आणि बहुतांश जपानी भाषेत! भारतावरची,बुध्दावरची काही पुस्तकं त्यांनी दाखवली. सगळी जपानी मध्ये असल्याने लहान मुलं जसं पुस्तकातली चित्रं पाहत ना तशी पाहत राहिले. दुसरं काय करणार? तेवढ्यात दालनातल्या एका कोपर्यातल्या प्रचंड मोठ्या मांडणीकडे बोट दाखवून हारुसान म्हणाले इंग्रजीमधली एवढीच पुस्तकं आहेत सध्या, तुम्हाला हवे तर तुम्ही घेऊन जा वाचायला. १५,२० दिवसात परत आणून द्या. मग काय हरखलेच मी. २,३ पुस्तकं घेतलीच मग वाचायला. लगेच त्यांनी एक सुबक वही उघडली. योशिदासानने स्वतःच्या नावावर त्यापुस्तकांची नोंद करुन घेऊन मला दिली. त्यांचे आभार मानून आम्ही पुढे निघालो.
चित्रकलेच्या दालनात कॅलिग्राफीचा वर्ग चालला होता. त्या मास्तरांनी सगळी शाळा पाहून झाली की मग चित्रकलावर्गात यायला सांगितले, तोपर्यंत मुलांची डिझाइन्स पूर्ण होतील आणि मला सावकाशीने पाहता येतील असे सांगितल्यावर माझ्या सात पिढ्या चित्रकारांच्याच अशा थाटात मान डोलावून पुढे गेलो. एव्हाना वर्ग चालू झालेहोते. आम्ही वर्गात गेलो की मुले उठून अभिवादन करायची. बहुतेक मास्तरांनी त्यांना येणार्या पाहुण्यांची कल्पना दिलेली असावी. शाळेत मुली कुठेच दिसेनात. मग समजले की ही फक्त मुलग्यांची ५वी ते १२वी पर्यंतची शाळा आहे. कॉरीडॉरमधून दुसर्या वर्गात जाताना डोळ्याच्या कोपर्यातून आपल्याकडे बरेच डोळे पाहत आहेत हे जाणवत होतं. पुढे एका वर्गात बाई इतिहास शिकवत होत्या. म्हणजे योशिदासान म्हणाली त्या इतिहास शिकवत आहेत म्हणून इतिहास, ती विज्ञान, भूगोल, गणित जे काय सांगेल ते सगळे मला फक्त 'जपानी'च होते. काला अक्षर भैस बराबर!
ते जाणूनच बहुतेक तिने मला ज्यूडो,कराटे आणि क्योंदो साठीचे वर्ग चालू होते तिथे नेले. तेथे आम्हाला प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मुले उत्साहाने डावपेच दाखवत होती. ते पाहून कॉरिडॉरमध्ये आलो . पलिकडे पोहोण्याचा तलाव आहे आणि निवडक मुलांना तिथे खास प्रशिक्षण दिले जाते आणि स्पर्धांसाठी तयार केले जाते. हे ऐकून एवढ्याशा देशाला एशियाड आणि ऑलिंपिकमध्ये पदकांच्या माळा कशा मिळतात त्याचे उत्तर मिळाले. पुढे एका मोठ्या दालनात गेलो. तेथे तर चक्क मोठे ओटे बांधले होते. गॅसच्या चुली होत्या. ओव्हनच्या भट्ट्या होत्या. भिंतीतल्या कपाटात वाडगे, बशा आणि हाशी सुबकपणे मांडून ठेवल्या होत्या. येथे कुकिंग शिकवतात. शाळेतून बाहेर पडेपर्यंत प्रत्येकाला स्वतःचे पोट भरता येईल एवढा तरी स्वयंपाक येतोच म्हणजे मग कुठेही गेलं तरी जेवणाचे हाल होत नाहीत. तीच गोष्ट शिवणाची. पलिकडच्याच दालानात असलेली शिवणयंत्रं दाखवत ती म्हणाली , प्रत्येकाला बेसिक शिवणकाम यायलाच हवं, अगदी कपडे शिवू नका तुम्ही घरी पण टिपा मारणं, उसवलेले शिवणे, बटणं लावणं, बारीकसारीक दुरुस्ती स्वतःची स्वतः करता यायला हवी म्हणून शिवणाचा तास असतोच. आता मधले मैदान ओलांडून पलिकडच्या इमारतीत गेलो. तेथील सुसज्ज प्रयोगशाळा पाहिली आणि मग संगणक कक्षात गेलो. शाळेतल्या मुलांसाठीचा संगणक कक्ष आहे की एखाद्या सॉफ्ट वेअर कंपनीचे ट्रेनिंग सेंटर? असा प्रश्न पडावा इतके अद्ययावत संगणक तिथे होते. आश्चर्य व्यक्त करायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं.
परत मुख्य इमारतीत येताना मैदानात काही मुले येताना दिसली. आम्हाला पाहिल्यावर त्यातले काहीजण आलेच आमच्याजवळ. कोंडाळं करुन उभे राहिले. खेळाचा तास होता त्यांचा. बेसबॉल का क्रिकेट ? काय खेळायचे यावर त्यांचा खल चालला होता. पीटीच्या मास्तरांनी त्यातल्या ४ जणांना खेळाचे सामान आणायला पिटाळले मग त्यांच्यामागोमाग आम्हीही खेळाचे सामान ठेवण्याची खोली पाहायला गेलो.
बेसबॉलची ती दांडकी, चेंडू,फुटबॉल,दोरीच्या उड्या, बास्केटबॉल्साठीचे बॉल्स,ग्लोव्हज्,पॅडस, बॅटी तर होत्याच पण तिथे स्टंप्सचे जवळ जवळ २०/२२ किटस ओळीत लावून ठेवलेले दिसले. हे एवढे कशासाठी? हा प्रश्न तर पडलाच पण असेल कोणता तरी नवा खेळ असं वाटून मी स्टंपकिटकडे बोट दाखवून त्यांना विचारलं हा कोणता खेळ? क्रिकेट माहित नाही तुला भारतीय असून? असा प्रश्न त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट वाचता आला मला पण एवढ्या स्टंपांचे काय करतात हे लोकं? हा प्रश्न माझ्या डोक्यातून जाईना. योशिदासानने मग सांगितलेपलिकडच्या वर्षी मुलांना क्रिकेट शिकवायचे डोक्यात आले. काही भारतीय आणि श्रीलंकन पालक होते त्यांनी शिकवायचे कबूलही केले.किती जण मिळून खेळ खेळतात?एका संघात किती जण असतात?काय काय साहित्य लागते? सगळी चौकशी केली त्याप्रमाणे साहित्य मागवले. पण मागवताना प्रत्येकासाठी एक बॅट, एक बॉल, ग्लोव्ह,पॅड आणि स्टंपकिट!! असे २२ गुणिले ३= ६६ स्टंप्स ४४ बेल्स सहित आणवले की. ते एकून मला यष्टीचित झाल्यासारखेच वाटले.
कसेबसे हसू दाबत आम्ही तेथून निघालो ते परत मुख्य इमारतीत चित्रकलाकक्षात आलो. मी एम एफ हुसेनची पट्टशिष्या असल्याच्या थाटात एकेकाची कॅलिग्राफी पाहत होते. तेवढ्यात त्या सरांनी एक स्वत: केलेले सुंदरसे भेटकार्ड मला दिले. शाळेत अनपेक्षित मिळालेल्या प्रेमाने मी हरखून गेले होते. आता कचेरीत जाऊन मात्सुदासानचा निरोप घ्यायचा होता. त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या कचेरीत गेले तर शाळेतर्फे भेट म्हणून एक सुंदर पेनसेट त्यांनी मला दिला. योशिदासानचा हात स्नेहाने हातात घेऊन तिला निरोप दिला आणि फोन, इमेल द्वारे तिच्या संपर्कात राहण्याचे ठरवले.शाळेच्या फाटकापाशी ती मला सोडायला आली आणि सायोनारा करत तिनेही मला एक सुंदरशी भेट दिली. ह्या स्नेहाने आता मात्र माझे डोळे भरुन आले होते. सांगायला आनंद आहे की आज ७ वर्षांनतरही योशिदासान आणि माझी मैत्री इमेल मधून सुरक्षित आहे.
कोर्टाची पायरी
एकदा दुपारच्या निवांत वेळी कोबे चा नकाशा पाहत होते. सुप्रियाला, ती पब्लिक प्रॉसिक्युटर आहे म्हणून, हे बघ इथलं कोर्ट असं म्हणत नकाशातला कोर्टाचा ठिपका दाखवला. लगेचच आपण जाऊन पाहू या का? असा विचार आला मनात! जपानमध्ये असताना तसेही आम्ही सकाळी सगळे आवरुन झाले , नवरे मंडळी कचेरीत गेली की आम्ही भटकायला (पक्षी उंडारायला)बाहेर पडत असू. आता नकाशा घेऊन कोर्ट कुठे आहे ते शोधून तर काढू आधी, असे म्हणत कोर्ट शोधत फिर फिर फिरलो..२/२.५ किमीची पायपीट झाली. कोर्ट काही दिसायला तयार नाही.एक १७/१८ मजली उंच 'सर्कारी' इमारत दिसली. (जापानचा झेंडा होता ना तिथे, त्यामुळे इमारत 'सर्कारी' आहे असे आम्हीच ठरवले.) तेथे सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन बावळटासारखी कोर्टाची चौकशी केली. तर आम्ही अगदीच विरुध्द दिशेला आलो होतो. तिथल्या भल्या माणसाने, काय बावळट बायका आहेत? असे भावही चेहर्यावर न आणता (मनातून त्याला वाटत असले तरी) आम्हाला कोर्टापर्यंत कसे जायचे ते समजावले आणि वर कागदावर नकाशाही काढून दिला. सुदैवाने त्याला इंग्रजी येत होते त्यामुळे भाषिक प्रश्न आडवा आला नाही.
झाले, आता आम्ही त्याने दिलेल्या नकाशाबरहुकुम कोर्टाकडे कूच केले. परत एकदा पायांना तीन एक किमी चालवले. परत एकदा झेंडावाली सर्कारी इमारत दिसली. हे नक्की कोर्टच आहे ना? ह्याची खात्री करुन तेथल्या स्वागतिकेकडे पब्लिक प्रॉसीक्युटर बद्दल विचारणा केली. आम्ही एकदम प. प्रॉ. ची चौकशी का करत आहोत असे भाव चेहर्यावर आणत ती चिंताक्रांत झाली. इथे परत भाषिक प्रश्न उद्भवला कारण तेवढ्या विचारणेनंतर आमचा जपानी स्टॉक संपला. इंग्लिश,इंग्लिश... पाणी, पाणी च्या थाटात आम्ही दोघी एका सुरात बोललो आणि सुप्रियाने तिचे ओळखपत्र दाखवले. ( नशिब,ते ती बरोबर घेऊन आली होती !) एकदम समजल्यासारखी मान हलवत काउंटरवरच्या बयेने एका दिशेला हात केला आणि आम्हाला तिकडे जायला सांगितले.
एका केबिनच्या दारावर टकटक केली तर चक्क 'कम इन्' असे इंग्लिशमधून उत्तर आले. आत गेलो तर एक मध्यमवयीन प्रसन्न गृहस्थ फायलींच्या ढिगार्यात बसलेला दिसला. आम्हाला वाटले हेच प. प्रॉ. साहेब! आम्ही कोन्निचिव्हा करुन लगेच लगबगीने राणीच्या भाषेवर आलो. हो, उगाच परत भाषिक प्रश्न नको. त्याने आपण प. प्रॉं चा सहाय्यक असल्याचा खुलासा केला आणि साहेब एका केसमध्ये बिझी असल्याने दुपार नंतरच भेटू शकतील हे सुध्दा सांगितले. आम्ही काही भेटीची वेळ ठरवून गेलो नव्हतो त्यामुळे हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हताच. त्याच्याशीच मग कोर्टाचे कामकाज कसे चालते वगैरे विचारणा करत राहिलो आणि फायलींच्या ढिगार्यातून वेळ काढत तोही जमेल तशी उत्तरे देत होता, मध्येमध्ये घड्याळ बघत होता. त्याचा वेळ आम्ही निष्कारणच घेत होतो. शेवटी आम्ही गप्प बसायचे ठरवले आणि आता इथवर पायपीट करत आलोच आहोत तर प. प्रॉ.ना नुसते ५मि. भेटून जायचे असे ठरवले. दोन पाच मिनिटे शांततेत गेली. त्या बाबाला एक ट्रायल कव्हर करायची होती म्हणून तो सारखे घड्याळ पाहत होता. आम्हाला आत येता येईल का? ट्रायल पाहता येईल का? आम्ही पिच्छाच पुरवला. तो अगदी आनंदाने तयार झाला. त्याला वाटत होते आमचे त्याच्या साहेबाकडे काही महत्त्वाचे काम आहे. तसे काहीच नसून आम्ही रिकामटेकड्या केवळ उत्सुकतेपोटी कोर्ट पहायला , जमलेच तर एखादी ट्रायल, एखाद्या वकिलाला भेटायला आलोत म्हटल्यावर अगदी खुशीतच तो आम्हाला ट्रायल रुममध्ये घेऊनजायला तयार झाला. एका चोरीच्या मामल्याची ती केस होती. थोडक्यात त्याने आम्हाला केस सांगितली. काही दम नव्हता तीत. चोराने गुन्हा अल्मोस्ट कबूल केलाच होता. आता फक्त शिक्कामोर्तबच व्हायचे बाकी होते असे त्याच्या एकंदर आर्विभावांवरुन वाटले. खरे तर त्याला त्या केसमध्ये रस नव्हता पण साहेबाचा हुकुम!
आम्ही आत गेलो. हिंदी सिनेमात दाखवतात तसे कटहरे कुठे दिसेनात. साधी मोठीशी खोली. वर्गात शिक्षकांसाठी असतो त्यापेक्षा थोडा मोठा प्लॅटफॉर्म,त्यावर जज्जसाहेबांची खुर्ची, तेथे थोडे मागल्या बाजूला डावीकडे एक दार होते, तेथून बहुदा जज्जसाहेबांची ये,जा असावी. खाली काही अंतरावर वकिलांच्या खुर्च्या, त्यांच्या कडेने अर्धवर्तुळाकार लावलेली बाकडी आणि अजून थोडे अंतर सोडून प्रेक्षकांसाठी थोड्या खुर्च्या! तेथेच आम्हीपण जाऊन बसलो. बाकी आत सामसुमच होती ! ४/५ डोकी फक्त होती, तीही बहुतेक त्या केसशी संबधितच असावीत.
जजसाहेब आल्यावर सारेजण उभे राहिले वगैरे तेच सगळे नेहमीचे सोपस्कार झाले. एकेक नावाचे पुकारे व्हायला लागले. मग दोन तीन साक्षी झाल्या. सारे कामकाज जपानीतच चालले होते. दोन साक्षीदारांच्या मधल्या वेळात अगदी हळू आवाजात, कोर्टाची अदब राखत, आमचा हा नवा मित्र आम्हाला झटकन संभाषणाचा गोषवारा भाषांतर करुन सांगत होता. अखेर जजसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. ते शिक्षा सुनावत असावेत, हिंदी सिनेमांचे कोर्ट सीन्स बघून बघून केलेला अंदाज सुप्रियाला सांगत असतानाच जपानी मित्राने गप्प रहायची खूण केली. हातोडा आपटून जजसाहेब उठले आणि आत जाण्यासाठी वळले, तसे सगळे उठून उभे राहिले. वकिलांनी एकमेकांना कमरेत वाकून अभिवादने सुरु केली. आमचा मित्र आम्हाला परत पहिल्या खोलीत घेऊन गेला. त्या चोराला ४ महिन्यांची शिक्षा झाली. त्याने माहिती पुरवली. गुन्हा काही फार 'संगीन' नसावा. आमचे बॉलिवूडी अंदाज सुरू! कुठे तरी फुटकळ चोरी केली होती. मुद्देमालासकट पकडला गेला. (मग कशाला कोर्टकचेर्या? असा एकदम अस्सल विचार आलाच मनात!) पण अस्मादिकांचे हे अगाध ज्ञान त्याच्यापुढे पाजळण्याऐवजी किती दिवस चालली आहे केस? असा प्रश्न त्याला विचारला आणि दोन/तीन आठवड्यात अशा फुटकळ केसींचे निकाल लागतात अशी ज्ञानप्राप्ती करुन घेत असतानाच तिथे प प्रॉ साहेबांचे आगमन झाले. आमच्या अगांतुक आगमनाची खबर त्यांच्यापर्यंत पोहोचली होतीच. त्यांनी अगदी छान गप्पा मारल्या,जपानी चहापान झाले. त्या दोघांबरोबर फोटो काढून घेऊन त्यांना परत परत अरिगातो गोझायमास करत कोर्टाची पायरी उतरलो.
जापानी किस्से
जपानमध्ये राहत असताना काही वेळा भाषिक गमती घडत तर काही वेळा जपान्यांच्या सौहार्दाचा अनुभव मिळे. आमच्या राहत्या जागेपासून कचेरीत जाण्यासाठी सान नो मिया स्टेशनापर्यंत चालत जाऊन मग मॅगनेटिक ट्रेनने पोर्टलंड या कृत्रिम बेटावर जावे लागत असे. ट्रेनने जाताना आपले पास/तिकिट पंच केले की प्लॅटफॉर्मकडे जाणारे दार उघडते आणि आपण आत प्रवेश करु शकतो. पासावर आपल्याकडे कसं पूर्वी फक्त नांव आणि सही असायची ना तसेच येथेही लिहावे लागते. फोटो ,ओळखपत्र असे काही नसते. कोबेत येऊन अगदी आठवडा सुध्दा झाला असेल,नसेल.. पास पंच करुन खिशात ठेवताना एक दिवस आमच्या एका प्रदीप मिश्रा ह्या मित्राचा पास खाली पडला आणि ते काही त्याच्या लक्षात आले नाही. तो कचेरीत गेला आणि परत यायच्यावेळी तिकिट पंच करायची वेळ आली त्यावेळी ह्या महाशयांच्या पास हरवल्याचे लक्षात आले. तो आणि बाकीच्या तिघांचेही चेहरे उतरले. ४००० कि ५००० येन मोजून तो पास काढलेला होता. त्यात तिथे जाऊन आठवडाच झालेला होता. साइटवरच्या स्थानिक मंडळींशी ओळखी जेमतेम झाल्या होत्या, पगार व्हायला अजून वेळ होता, तोपर्यंत बरोबर आणलेले डॉलर्स मोडून जपून खर्च करणे भाग होते. त्यात जपान अतिशय महाग आणि भाषेचा प्रश्न तर पदोपदी ठेचकाळवत होता. आता मशिनमधून तिकिट तरी काढूया आजच्या दिवसाचे आणि मग उद्या बँकेतून येन ट्रान्स्फर करवून परत पास काढू असे त्याला दिनेशने समजावले आणि ते दोघे तिकिटमशिनपाशी आले. तेथे निशिवाकीसान होता, आज बायकोसाठी कार घरी ठेवल्यामुळे तो ट्रेनने जाणार होता. ह्या दोघातिघांचे सचिंत चेहरे पाहून त्याने काय झाले त्याची विचारणा केली आणि सान नो मिया स्टेशनात पासाची चौकशी करायचा सल्लाही दिला. "पासाची काय चौकशी करायची? काउंटर वर जाऊन काढायचा ना, तिथे आहे एक जण इंग्लिश समजणारा," इति दिनेश. पास काढायची चौकशी नाही तर तो पडलेला पास सापडला आहे का ही चौकशी करा असे निशिवाकीसान सांगत आहे हे समजल्यावर हे दोघं त्याच्याकडे काय परग्रहावरुन आल्यासारखा बोलतो आहे असे पाहू लागले. भाषेचा प्रश्न होताच कारण ह्या साहेबांचे इंग्लिशही जेमेतेमेच होते. शेवटी स्वत:ला तिथे यायचे नसताना हा भला माणूस सान नो मियाला उतरला आणि स्वतः प्रदीपच्या पासाची चौकशी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा पास स्टेशनमास्तराकडे सुरक्षित होता आणि प्रदीपची ओळख पटवून दुसर्या मिनिटाला त्याने पास परत केला.
हरिप्रसाद हा एक हैदराबादी सहकारी , व्हेन देअर इज ब्रेड आय अॅम डेड .. म्हणणारा. सांबार,भात,रस्सम भाताशिवाय पान न हलणारा! कोबेमध्ये थाइ तांदूळ मिळत असे, तो ह्या बाबाला आवडत नसे म्हणून शेवटी ह्या पठ्ठ्याने टोकिओहून बासमती तांदूळ मागवला. याची बायको एकदा घरातच पाय घसरुन पडली आणि फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांकडे जायला तर हवे, तिथेही इंग्लिशची ऐशीतैशीच होती. निशिवाकीसान आणि फुजितासानने मदत केली आणि तिला अॅडमिट केले. पुढचे सगळे सोपस्कार झाले. तिचे प्लास्टरही काढून झाले. डाक्टराचे बिल देऊन झाले,सगळे झाले. आता ह्याची रिएंबर्समेंट इनश्युरन्स कंपनीकडे मागायची वेळ आली. फुजितासानने त्याला डॉक्टरच्या बिलांच्या मूळ प्रती कव्हरिंग लेटर बरोबर कंपनीला पोस्ट करुन फोटोकॉपीज स्वत: जवळ ठेवायला सांगितले तर हे महाशय तिच्याशीच वाद घालायला लागले की कंपनीला कसे समजेल की ही बिले खरीच आहेत? समजा मी डॉक्टरकडून खोटे बिल तयार करुन क्लेम मागितला तर?
आता डॉक्टर खोटे बिल कशाला देईल? ह्या फुजिताबाईंच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे होते पण ते तिला सांगण्यासारखे नसल्याने हरिभाऊंना तेथेच थांबवले.
हॉस्पिटलचा अजून एक अनुभव म्हणजे सुधीर देशमुख कोबेला आला आणि आठच दिवसात तापाने फणफणला ,त्याचा ताप मलेरियावर गेला असल्याचे निदान झाले. जपानमध्ये मलेरियाला हद्दपारच केलेले आहे त्यामुळे डॉक्टरही बुचकळ्यातच पडले. भारतातून येतानाच तो मलेरिया घेऊन आला असावा. त्याला दवाखान्यात दाखल केले . एका पूर्ण मजल्यावर फक्त त्यालाच आयसोलेट करुन ठेवले आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मलेरियाचा रोगी पाहण्यासाठी रीघ लागली.
आमच्या तुटपुंज्या जपानीमुळे तर गमतीच गमती होत. आमचा दूध,तेल,बटर इतकेच काय पावांचाही नेहेमीचा ब्रँड ठरलेला असे. एकदा ब्रेडमधून मासे निघाल्यानंतर आम्ही प्रयोगांच्या फंदात न पडता रोजसाठीच्या वस्तू ठराविक ठिकाणाहूनच खरेदी करत होतो.आमचे ब्रजेन बाबू इंदौरचे, एकदा त्याला रबडी खायची लहर आली. तो दाइ याइ तून नेहमीपेक्षा डब्बल येन मोजून महागाचे दूध घेऊन आला. महाग दूध म्हणजे दाट दूध ,जास्त फॅट वाले दूध असं त्याचं लॉजिक काही चुकीचं नव्हतं. पण दूध आटवायला ठेवले तर ते फाटायलाच लागले. वैतागून गॅस बंद करून त्याने दिनेशला फोन लावला. आमच्यातल्या अविनाशला (डिक्शनरीच्या सहाय्याने का होईना) थोडेफार जपानी लिहिता वाचता येत होते. ब्रजेन आमच्या घरापासून अगदी जवळच १० मिनिटाच्या अंतरावर राहत होता.त्यामुळे लगेचच आम्ही ब्रजेनच्या घरी गेलो. दुधाच्या खोक्यावरची चित्रलिपी वाचून अविनाशने ते मिल्क नसून बटरमिल्क असल्याचा शोध लावला!
एकदा असेच खरेदीसाठी मी आणि दिनेश बाहेर पडलो होतो. एका दुकानात लावलेल्या जीन्स पाहून माझ्या बहिणीसाठी जीन्स घ्यावी असा आम्ही विचार केला. आता मी अंमळ गुटगुटीत आहे आणि माझी बहिण एकदम सडसडीत, त्याला मी काय करणार? तिच्या वेस्ट साईजची जीन्स मी ढिगार्यातून शोधून काढली की तिथला सेल्समन टेप माझ्याभोवती गुंडाळे, माझ्या हातातल्या जीन्सचा साइज दाखवे आणि मोठ्या साइजची जीन्स आणून देई. असे ३,४ दा झाले. दिनेशने त्याला येत असलेल्या जपानीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. शेवटी दिनेशने त्याच्याकडे कागद आणि पेन मागितले. दोन मुलींची चित्रे काढली. एक बारीक आणि दुसरी जाड. जाड चित्रावर एक बोट ठेवले आणि दुसरे माझ्याकडे दाखवले. बारीक चित्रावर इंडिया असे लिहिले आणि ह्या मुलीसाठी जीन्स हवी आहे असे सुचवण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट त्याने ३,४ दा समजावून सांगितली तेव्हा तरी बाबाला काही समजेले की नाही कोण जाणे? कारण आम्ही निवडलेली जीन्स पॅक करताना मला ही जीन्स कशी होणार नाही आणि त्यातलाच दुसरा मोठा साइज देतो असे परत परत तो सांगत राहिला. शेवटी वैतागून म्हणाला, ही जीन्स तुला होणार नाही हे शेवटचं सांगतो, घरी घेऊन गेल्यानंतर परत करायला आलीस तर बदलून देणार नाही. एकदाचे कसेबसे त्याच्या तावडीतूनआम्हाला हवी असलेली जीन्स सोडवून घेऊन तेथून निघालो.
अशा गाभुळलेल्या चिंचांसारख्या आंबटगोड गमतीजमती अनुभवत आम्ही कोबेमध्ये राहत होतो.
कुसुम होंबा
जपानमध्ये येऊन आठ दहा दिवस झाल्यावर बरोबरचा शिधा संपत आला. आता डाळी, तांदूळ, मसाले, कणिक इ. पदार्थ कुठे मिळणार याची विचारणा कशी आणि कुठे करायची ह्याचा विचार सुरू झाला. निशिवाकीसानने 'इंडियन प्रोव्हिजन स्टोअर'चा पत्ता दिला. शियोयाहून साननोमियाला उतरुन इंडियन प्रोव्हिजन स्टोअर ची इमारत शोधणे काही फार कठिण नव्हते. स्टेशनपासून ५-६ मिनिटाच्या अंतरावर एका मोठ्या श्राइनसमोरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरच्या एका भागात हे भारतीय वस्तू भांडार आणि दुसर्या भागात आहे कुसुम होंबा म्हणजे तिवारीसानचे उपहारगृह! तर उरलेल्या भागात त्याचे कुटुंब राहते. तिवारीसान, त्याची बायको कुसुम, मुलगा , शुक्लाजी म्हणजे त्याचा मेव्हणा,मेव्हणी आणि त्यांची मुले. सुमारे ५० वर्षांपूर्वी तिवारीसानच्या वडिलांनी जपानमध्ये येऊन भारतीय मसाले आणि इतर पदार्थांचा व्यापार सुरू केला आणि त्यांनी सुरू केलेले हे इंडियन प्रोव्हिजन स्टोअर आजही अग्रगण्य आहे. घरगुती वापरासाठी आणि आजूबाजूच्या भागातील अनेक भारतीय, पाकिस्तानी रेस्तराँ किराणासामानासाठी तिवारीसानवरच अवलंबून असतात. साधारण ३० एक वर्षांपूर्वी तिवारीसानच्या वडिलांना हार्ट अॅटॅक आला आणि मग सगळा भार ए. के. तिवारीने आपल्या शिरावर घेतला. किराणासामान विकण्याबरोबरच बायकोच्या नावाने खानावळही सुरू केली .स्वतः तिवारीसान, कुसुमभाभी, त्यांची बहिण (तिचे नाव विसरले) व तिचे पती शुक्लाजी असे सगळेच सुगरण बल्लव असल्याने आणि चविष्ट पदार्थ वाजवी दरात विकत असल्याने ह्या घरगुती खानावळीने बघता बघता रुप पालटले आणि कुसुम होंबा आज कोबे परिसरातील एक मान्यवर रेस्तराँ म्हणून नावारुपास आले आहे. मध्यंतरी ऐकले की तिवारीसान अजून एक नवे उपहारगृह काढत आहेत.
इमारतीत आत शिरत असतानाच मसाल्यांचा घमघमाट यायला सुरुवात होते. जिना चढून वर गेले की चोहोबाजूंनी रचलेल्या खोक्यातून आणि पोत्यांतून वाट काढत आत जायचे. आतमध्ये एका प्रशस्त खुर्चीवर साधारण सहा फूट उंचीचा आणि तशाच घेराचा पांढराशुभ्र कुर्ता आणि धोती ल्यालेला तिवारीसान बसलेला असतो, नितिन मुकेशची आठवण यावी असा एकंदर अवतार! त्याच्या समोर टीपॉय, ते टीपॉय झाकणारं त्याचं पोट आणि पोटावर एका घमेल्यात ढोकळा नाहीतर समोसे, भजी असे काहीतरी. हातात एक काठी. त्या काठीचा उपयोग दिवा, पंखा, खिडकी उघडणे, बंद करणे इ. साठी.. आपण विचारले चावल किवा दाल कहाँ है? की त्याचे उत्तर जरा दहिनी बाजूके रॅकमे उप्पर देखो, वही होंगे.. मग आपण काय तांदूळ, डाळ,मसाले, आटा जे हवे असेल ते तेथून काढून घ्यायचे. अगदीच नाही सापडले आपल्याला तर मग तो हाक मारणार, शुक्लाजी.. की बाजूच्या खानावळीतून शुक्लाजी येऊन आपल्याला हवी ती वस्तू देणार. पण ह्या तिवारीसानच्या बोलण्यात मिठास आणि नवीन आलेल्या भारतीयांना मदत करायची तयारीही..
अशा तिवारीसानची पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा कोण ,कुठले,कुठे काम करता? कुठे राहता? अशी सगळी विचारणा करुन मँगोज्यूस ,समोसे अशी सरबराई केली आणि मग काय मसाले,डाळी हवे आहे ते विचारले. एकीकडे इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मध्येच तो एकदम खूष झाला. आता ह्याला काय झाले एकदम? हा चेहर्यावरचा भाव वाचल्यासारखा तो दिनेशला मिस्किलपणे उत्तरला, तुझ्या टीशर्टमधून बाहेर डोकावणारे जानवे बघून मी खूष झालो आहे. पुढे चांगली ओळख झाल्यावर तो एकदा म्हणाला की 'कुसुम होंबा' शुध्द शाकाहारी आहे पण त्याला लहर आली की तो कधी कधी चिकन,मटण बनवतो. त्यासाठी त्याची वेगळी भांडी, वेगळा स्टोव्ह आहे आणि तुम्हाला कधी इच्छा झालीच तर फोन करा फक्त,माझ्यातर्फे तुम्हाला पार्टी!
जेव्हा त्याला समजले की आम्ही जागेच्या शोधात आहोत तेव्हा आपणहून त्याने मदतीचा हात पुढे केला एवढेच नव्हे तर यामामातोदोरी भागातल्या यामाते टॉवर मध्ये जागा रिकामी असल्याची बातमीही पुरवली . एवढेच नव्हे तर त्या बिल्डिंगच्या मालकांशी , रेड्डीअंकलशी गाठही घालून दिली आणि हे सगळे पैचीही अपेक्षा न करता वर आम्हालाच समोसे खायला घालून आणि स्वतःकडचे जुने वॉशिंग मशिन आणि फ्रिज देऊ करुन! नुसतेच दिले नाही तर मशिने एक एक करुन बरोबर घेऊन आला. इथे कुठले हमाल? आपणच कुली.. म्हणून स्वतः एका बाजूने हात लावला आणि रस्त्यावरून मशिने, तिवारीसान आणि आमची वरात यामाते टॉवर पर्यंत आली. त्यानेच ती यंत्रे घरात आणून, लावून, व्यवस्थित चालू करुन दिलीकोणतेच काम हलके नसते हे आपले पुस्तकात वाचायला आणि सिनेमात बघायला ठिक आहे पण अशी ओझी घेऊन तो स्वतः मदतीला उतरला.
तिवारीसानच्या दुकानात गेले आणि हव्या त्या वस्तू घेऊन लगेच परत आले असे कधीच झाले नाही. तो हटकून थांबवून गप्पा मारायचा. युपीमध्ये त्याने शाळा काढली होती. फक्त मुलींसाठी हॉस्टेल काढले होते. त्याची वहिनी,काकू ते पाहतात. तिथल्या स्थानिक राजकारणात त्याला भारी रस होता आणि तिकडे काय घडामोडी चालल्या आहेत याकडे त्याचे जपानमधून लक्ष असायचे. जपानला भूकंप नवीन नाही पण १९९५सालचा कोबे परिसरात झालेला भूकंप गंभीर स्वरुपाचा होता. सारे काही जमिनदोस्त झाले. दोन रात्री तिवारीसानही बायकोमुलांसकट रस्त्यावर राहिला होता. सारेच जण रस्त्यावर आले होते. तेथील इतर जपान्यांप्रमाणे तिवारीसाननेही मदतकार्यात भाग घेतला होता. अशा अनेक कथा तिवारीसान ऐकवायचा, त्या ऐकताना समोसा नाहीतर ढोकळा खायला घालायचा म्हणजे त्याच्याकडे जाऊन साधे तांदूळ नाहीतर डाळ आणायची असली तरी तासदोनतास सहज मोडायचे.
आमचा एक मित्र ब्रजेनबाबू (हो, तोच तो रबडीवाला..) त्याचा कसलासा उपास होता. बरं , उपासाला ह्याला साधे मीठ चालणार नव्हते, सैंधवच हवे होते. आता उपासाला साधे मीठ का चालणार नव्हते? असा मला पडलेला प्रश्न त्याने ऐकून न ऐकल्यासारखा केला. इथे परदेशात उपास बिपास कसले करतोस? ह्या प्रश्नावर तर मी परग्रहावरुन आल्यासारखा चेहरा केला त्याने. उपास आहे ना तुझा, मग नुसती दूध,फळे खाऊन रहा. हा माझा सल्ला तर त्याने पार धुडकावूनच लावला. शेवटी तिवारीसानला विचारु सैंधव आहे का? असे म्हणून त्याच्याकडे गेलो. तिवारीसान म्हणे सैंधव आहे माझ्याकडे पण मी मीठ विकणार नाही, तुला नुसतेच देतो. ब्रजेन म्हणे मी नुसते नाही घेणार, मी पैसे देणार.. नमकका मामला है! १५-२० मिनिटे दोघे हुज्जत घालत बसले. शेवटी दिनेश म्हणाला तिवारीसान, आप मुझे सैंधव दिजिए, मै ब्रजेनको दूंगा और ब्रजेन तू मुझे पैसे दे दो फिर वो पैसे मै मंदिरमे रख आता हूँ। आणि एकदाचा तो प्रश्न सोडवला.
असे एकेक अनुभव गोळा करत तेथले दिवस मजेत जात होते.
आमची जॉइंट फ्यामिली!
खरं तर जपानमध्ये जागेची तीव्र टंचाई आणि त्यामुळेच अगदी लहानशी घरकुले, दोन्ही हात पसरुन उभे राहिले की दोन्हीकडच्या भिंतींना हात लागतील अशी .. त्याच एका खोलीत सगळे काही, एक किचन कोपरा तर एका कोपर्यात न्हाणीघर असे खुबीने बसवलेले.. पलंगापासून सारे काही फोल्डिंग! अशा घरात राहण्याचे टाळून मोठे घर घ्यायचे तर येनच्या राशी ओतायला हव्यात. पण तिवारीसानमुळे यामाते टॉवर मधले तिसर्या मजल्यावरचे हे प्रशस्त घर मिळाले. तीन बेडरुम्स विथ अॅटॅच्ड बाथरुम्स, तीन बाल्कन्या, मोठा हॉल, किचन आणि डायनिंग हॉल.. एवढ्या मोठ्या घराचे भाडेही तसेच.. पण मग दिनेश आणि त्याचे दोन मित्र मिळून तेथे राहण्याचे ठरले आणि आमचे एकत्र कुटुंब तेथे नांदू लागले.
आम्ही दोघं, अविनाश आणि त्याची बायको सुप्रिया, विनीत, लेखा आणि त्यांची अबोली, अपूर्व असे सगळे आम्ही एकत्र राहू लागलो. सुप्रिया,लेखा आणि मुले फक्त सुटीसाठी महिनाभर आली होती . तर विनितचे आईवडिलही जपान पहायला म्हणून १५ दिवस आले होते. हे तिघे जण डबा घेऊन सकाळी कचेरीत गेले की आम्हा तिघींना दिवस मोकळा असायचा. मग आम्ही कधी दाइ याइ , कधी मोतोमाची, तर कधी कोबेच्या बंदरपर्यंतही भटकायला जायचो. कधी घरातच पत्ते खेळायचो, कधी सिनेमा बघत बसायचो.ब्रजेन आणि निलू आमच्या घरापासून जवळ अगदी १० मिनिटाच्या अंतरावर राहत असत. निलू पण बरेचदा आमच्या टोळीत सामील व्हायची. लेखाचा मस्तीखोर अपूर्व आणि बडबडी अबोली ही आमची दोन खेळणीच झालेली होती.
पण एवढी मंडळी, विशेषतः एका किचन मध्ये जास्त बायका एकत्र आल्या की भांड्याला भांडे लागणारच. त्यात लेखा आणि सुप्रियाचे स्वभाव भिन्न, स्वयंपाकाच्या पध्दती भिन्न, कधीकधी त्या दोघींची नोकझोक होत असे. पण त्याचा जास्त बाऊ न करता त्या दोघींना एकमेकींच्या कामात ढवळाढवळ न करता सर्वांनी एकमेकांना धरुन रहाण्यासाठी त्यांना समजवावे लागे. कारण परदेशात अगदी एकटे राहण्यापेक्षा ही छान सोय होती. आम्हाला एकमेकींची सोबत होती.
त्याकाळी जपानमध्ये इंग्रजीतून संगणक फार कमी असत, लॅपटॉप हा प्रकारही नवीन होता, इंटरनेटचा वापर कमी होता.टीव्हीवरती फक्त जपानी चॅनेले दिसत आणि त्यावेळी डीव्हीडी तर नव्हत्याच पण व्हीसीडीसुध्दा अगदी नवीन होत्या. रेड्डीआंटींकडे हिंदी सिनेमांच्या कॅसेटांचा संग्रह होता. त्यांनी तो आमच्यासाठी खुला केला होता. टीव्हीवर दिसणार्या फक्त जपानी चॅनेलांपेक्षा हा बदल आम्हाला कधीकधी बरा वाटे.
आमच्या खालच्या मजल्यावर मीरा नावाची एक दाक्षिणात्य महिला आणि तिचा ८-९ वर्षांचा मुलगा ,अमित राहत होते. मीरा कोबेमधील स्टेट बँकेत मॅनेजर होती. मीरा दाक्षिणात्य असल्याने तिच्याकडे नेहमी इडली, डोसे असत. अमित भारी मस्तीखोर मुलगा होता. त्याला इडल्या खायचा कंटाळा आला की तो चक्क खिडकीतून त्या खाली फेकून देई. मीराला ते समजत नसे पण तिच्या किचनच्या बरोबर वर असलेल्या आमच्या बाल्कतीतून ते बरोबर समजत असे. आम्ही तिघी बायका तेथे काही काळासाठीच गेलो होतो. एरवी तेथे हे तिघे मित्रच राहत होते. एकदा असंच अमितने इडल्या बाहेर टाकलेल्या बघून दिनेश किवा अविनाश म्हणाला, हे लोक आपल्या वरच्या मजल्यावर रहायला हवे होते म्हणजे इडल्या झेलायला एक नेट लावले असते. आमचा बाल्कनीतला हास्यकल्लोळ ऐकून अमित कावराबावरा होऊन वरच्या बाजूला पाहू लागला. थोडक्या काळासाठी आल्यामुळे आमच्याकडे मिक्सर, इडलीस्टँड वगैरे नव्हता. मग कधी ती वाटलेले इडलीचे पीठ द्यायची तर कधी मिक्सर .. तर कधी गप्पा मारायला वर आमच्याकडे येताना इडल्या घेऊन यायची. आणि पहिल्या मजल्यावर शिवानी शेट्टी राहत असे. प्राची साचन तिच्याबरोबरच आसे.त्या दोघीही कधीकधी गप्पा मारायला येत असत. मीरा आणि त्या दोघी कायम एकत्र असत. त्यांचीही एक जॉइंट फॅमिलीच झालेली होती म्हणा ना!
आमचे मालक रेड्डी दांपत्य यामाते टॉवरच्याच ८व्या मजल्यावर राहत असत.यामाते टॉवरच मुळी त्यांच्या मालकीचा होता. हे सुप्रसिध्द गेलॉर्ड रेस्तराँच्या चेन मधील एक पार्टनर,अतिशय विनम्र ! दुसरे महायुध्द संपल्यावर रेड्डीअंकल, त्यावेळी १८-२० वर्षांचा असणारा एक तरुण मुलगा जपानला आला आणि त्याने अथक परिश्रमांनी हे साम्राज्य उभे केले. नंतर ५-६ वर्षांनी लीलाआंटीशी लग्न करुन त्यांना इथे घेऊन आले. आंटीना ना भाषा येत होती, ना इथली काही माहिती होती.. त्यांनीही भाषा शिकून नवर्याच्या व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या तिथे रहायला गेल्यावर त्या खूपदा गप्पा मारायला येत नाहीतर आम्हाला त्यांच्याकडे बोलावत.लेखा आणि सुप्रिया भारतात परत गेल्यावर तर रेड्डीआंटी मी एकटी आहे हे जाणून अनेकदा हाक मारत. दुपारी त्याही एकट्याच घरी असत. मग अनेकदा आम्ही दोघी एकत्र जेवत असू, फिरायला जात असू किवा सिनेमाही कधीकधी बघत असू. कधीकधी रेड्डींकडे सगळ्यांची मेहेफिल जमायची. एकत्र जेवण, गाणी, गप्पा व्हायच्या.ते ३५-४० वर्षे तेथे राहत असल्यामुळे जपानबद्दलच्या,जपानी लोकांबद्दलच्या माहितीचा खजिनाच त्यांच्या गप्पांमधून मिळत असे.
जपानच्या मैत्रबनात..
जपान मध्ये बर्याच ठिकाणी स्टेशनच्या बाहेर चौकासारखी मोकळी जागा असते. तेथे वेगवेगळी कलाकार मंडळी आपला रियाज करत बसलेली असतात किवा मग प्रेक्षक जमवून आपली कला सादर करतात. आम्ही राहत असलेल्या सान नो मिया स्टेशनाच्या बाहेरही अशी चौकवजा जागा होती. सान नो मिया! माया पर्वताची सान नो म्हणजे तिसरी डोंगरमाळ! माया पर्वताने एका बाजूने कुशीत घेतले आहे आणि दुसर्या बाजूला प्रशांत महासागराच्या लाटा पायाला गुदगुल्या करत आहेत, असं हे कोबेचा शेजारी असलेलं आमचं सान नो मिया! स्टेशनच्या त्या चौकातच रियाज कम कॉनसर्ट करणारा एक 'कारामानातु' नावाचा पाच जणांचा ग्रुप होता. ती मुलं जेव्हा चौकात दिसत तेव्हा आम्ही हटकून थांबून त्यांच्या बँडचं संगीत ऐकायचो. विशेष म्हणजे त्यांच्यातला प्रत्येक जण एकापेक्षा जास्त वाद्य एका वेळी वाजवत असे. बहुतेकदा लॅटिन अमेरिकन संगीत ते वाजवत असत. ही रस्त्यावरची कॉनसर्ट पहायला भरपूर गर्दी असे. काही काही चक्क नेहमीचे मेंबर आहेत. तिथेच एक ७२ वर्षांची एक फॅशन डिझायनर आजी आमची मैत्रिण झाली. चारपाचदा आम्ही एकत्र ती रस्त्यावरची म्युझिक कॉनसर्ट ऐकली एवढी ओळख पुरली आणि तिचे मोडकेतोडके इंग्रजी, जर्मनचे काही शब्द आणि आमचे बिनाअस्तराचे जपानी एवढ्या भांडवलावर आमच्या गप्पा रंगू लागल्या. अशीच दुसरी मैत्रिण आमची टाक माते वाली.. टाक माते नावाचे एक लहानसे दुकान आमच्या घराजवळ आहे. तेथे आम्ही कधीकधी आइस्क्रिम खायला तर कधी काहीबाही आणायला जात असू. मग येताजाता तीही 'कोन्निचिवा' (हॅलो..) करु लागली आणि मग भाषांची मोडतोड करत आमची मैत्री जुळली.
कारामानातुचे व्हिडिओ- १ ,२ आणि ३
तशीच फुजितासान! ही वास्तविक ती कचेरीच्या कामाची दुभाषी होती पण आमच्या व्यावहारिक अडचणींसाठीही ती धावून यायची. रोजची दूध, भाजी इ. ची खरेदी कुठे करायची हे तिनेच दाखवून दिले तर आमच्या ट्रीपांसाठीही माहिती तिनेच पुरवली. फुजीसानला भेट द्याच हा आग्रह तिचाच आणि ती ट्रीपही तिनेच आखून दिली. दोन तीनदा भारतात जाऊन आलेली असल्याने तिला विशेष आस्था होती. तिला वेळ असला कि ती घरी यायची, भारताविषयी माहिती विचारायची आणि आवडीने भारतीय पदार्थ खायची. आत्ता मागच्यावर्षी दिल्लीच्या विमानतळावर ती अचानक भेटल्यामुळे झालेला आनंद अवर्णनियच आहे! आणि दिनेशचा जपानी सहकारी निशिवाकीसान, हो.. तोच भला माणूस ज्याने प्रदीपचा पास शोधायला मदत केली. आमच्याकडे टीव्ही नाही म्हटल्यावर त्याने आपल्या घरातला मुलांचा टीव्ही सरळ उचलून आणून ठेवला. रोजच्या भाषिक हाणामारीत निशिवाकीसान आणि फुजितासान ह्यांची खूपच मदत होत असे आणि नुसते कर्तव्यबुध्दीने नव्हे तर खरोखरी मनापासून दोघेही सहकार्य करत असत.
निशिवाकीसान भारतीय भज्यांवर बेहद्द खूष होता. एकदा तो आणि त्याचे कुटुंबिय खास भजी खायला म्हणून आमच्याकडे आले. येताना फुलांचा सुंदर गुच्छ युमीसानने आणला होता आणि त्या फुलांसारखीच गोड त्यांची मुलं आयासान आणि काजुकीसान! युमीसान लगेच किचनमध्ये येऊन भजी कशी करतात ते पहायला लागली. त्यांचे तेंपुरा आणि आपली भजी म्हणजे चुलतभावंडेच की.. पण भज्यांचा खमंगपणा तेंपुरात कसा येत नाही? हे डाळीच्या पीठाचे रहस्य तिला उलगडले. नंतर मग एकदा आम्हाला त्याने घरी बोलावले होते. जपानी माणूस सहसा कुणाच्या घरी पटकन जात नाही आणि कुणाला बोलावतही नाही. त्याने घरी बोलावले म्हणजे त्याने मैत्रीचा स्वीकार केला, नाते इनफॉर्मल झाले असे समजायचे. युमीसानने खूप खपून वेगवेगळे जपानी पदार्थ तर केले होतेच पण खास आमच्यासाठी समोसे करुन तिने चकितच केले. समोसे तळताना तिने झार्याऐवजी हाशी (चॉपस्टिक्स) वापरलेली पाहून मी चकितच झाले. (खोटे कशाला बोला? इथे हाशीने एक पदार्थ उचलून तोंडात टाकताना मारामार.. त्यात छोटा काजुकीसान सुध्दा ज्या सराइतपणे हाशीने समोसे ,तेंपुरा मटकावत होता ते बघून तर.. त्यावर लगेच त्या मंडळींनी आमचे हाशी वर्कशॉप घेतले.. ) जेवणानंतर त्यांच्या घराजवळच असलेल्या कारावके सेंटर मध्ये आम्हाला नेले.तेथे लहानलहान केबिन्समध्ये टीव्हीस्क्रिन,माइक्स आणि गाण्यांची डिरेक्टरी असते. हवे ते गाणे निवडून लावले की टीव्हीस्क्रिनवर त्या गाण्याचे शब्द आणिसाजेशी दृश्य दिसू लागतात आणि संगीतही सुरु होते. मग ते गाणं गात,नाचत प्रत्येकात दडलेलं लहान मूलं बाहेर येऊन बागडू लागतं.आता कारावकेचे अप्रूप राहिले नाही पण त्यावेळी मात्र ही सारीच नवलाई होती.
फुजीसानने आम्हाला दोन गोड मैत्रिणी दिल्या, आकीसान आणि योशिकोसान! त्यातली आकीसान ही खूप उत्साही, बडबडी! एका रविवारी त्या दोघी त्यांच्या योकोसान नावाच्या आणखी एका मैत्रिणीला घेऊन आमच्याकडे आल्या. ह्या तिघी अगदी जिवाभावाच्या मैतरणी! पण फु़जी ट्रीपच्या वेळी योकोसानचा नृत्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती येऊ शकली नव्हती. ती गेली ५-६ वर्षे ओडिसी नृत्य आणि हिंदी शिकत होती , येताना तिचे हिंदीचे पुस्तकही ती घेऊन आली होती.माझ्याकडे साडी आहे का? हा पहिला प्रश्न , मग ती कशी नेसतात? त्याची उत्सुकता! साडी नेसून ,टिकली लावून आणि पंजाबी ड्रेस घालून त्यांनी फोटो काढून घेतले आणि त्यांचा युकाता त्या बरोबर घेऊन आल्या होत्या. किमोनो म्हणजे जरीकिनखापाचा उत्सवी, शाही पोषाख तर युकाता हा सुती ,उन्हाळी पोषाख!
पुढे नंतरच्या एका रविवारी आम्ही त्या तिघींबरोबर सुमा बीच वर एकत्र सहलीला जायचे ठरवले. त्यांनी जपानी जेवणाचे डबे आणायचे तर आम्ही पुरीभाजी असा बेत करुन दिवसभर तेथे बागडलो. खूप गप्पागोष्टी केल्या. आकीसान दोनदा भारतात येऊन गेली आहे इतकेच नव्हे तर जुहूबीचवर तिने भेळ आणि पान सुध्दा खाल्ले असल्याचे सांगितले. गप्पांमध्ये संध्याकाळ कधी झाली समजले नाही. सूर्य कलू लागला होता आणि आम्हालाही आता निघणे भाग होते. कोणाचाच पाय निघत नव्हता कारण आता आकीसान ट्रेनिंगसाठी ६ महिने तोक्योला जाणार होती आणि त्याआधीच मी भारतात परत येणार होते, म्हणजे माझी आणि आकीसानची परत भेट कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर दोघींकडेही नव्हतं. डोळ्यातलं पाणी थांबवत ती आणि मी एकमेकींचे हात घट्ट धरुन बसलो होतो.
असेच काही दिवस गेल्यानंतर जपानला सायोनारा करण्याचा दिवस जवळ आला होता, नव्हे अगदी उद्यावरच येऊन ठेपला होता.आदल्या दिवशी दाइ याइ, टाक माटे, को ऑप,मोतोमाची सारे परत एकदा फिरुन आले. संध्याकाळी कारामानातु ग्रुपची गाणी ऐकायला गेले. आज गाणी ऐकण्यात मन लागत नव्हते. त्या सर्वांना, तेथे नेहमी येणार्या परंतु नावेही माहित नसलेल्या सगळ्यांना परत परत पाहत होते. जणू त्यांचा निरोपच घेत होते, कदाचित कायमचा! विमानात बसताना जड अंतःकरणाने जपानचा निरोप घेताना मनातच म्हटले, गुड बाय ! सायोनारा!!!
-------------------------------------------------------------------------------------
सायोनारा..
जपानने मला काय आणि किती दिले, मला किती अनुभवश्रीमंत आणि समृध्द केले ते शब्दांपलिकडले आहे. तेथे जाऊन १० वर्षे होऊन गेली पण तरीही स्मृतीत ते सारे ताजे आहे. तेथे असताना घरात इंटरनेट नव्हते, बाहेर असलेले सगळेच इंटरनेट कॅफे इंग्रजी ओएस वाले नसत. २ किमी वर असणारा एक इंग्लिशकॅफे आम्ही शोधून काढला होता पण तेथे कायम जाता येणे शक्य नव्हते. टीव्हीवरही फक्त जपानीच चॅनेले असत. त्यामुळे करमणूक म्हणजे रेड्डीआंटींकडच्या कॅसेटा आणि जोपर्यंत सुप्रिया, लेखा आणि मुले होती तोपर्यंत त्यांच्याबरोबर भटकणे, पत्ते खेळणे इ.. पण ती सर्व मंडळीही जेव्हा भारतात परत गेली तेव्हा मग दिवसभर मी एकटी आतापर्यंत चांगल्याच परिचित झालेल्या रस्त्यांवरुन, मॉलमधून भटकत असे आणि कधीकधी कॅसेटांवर सिनेमे पाहत असे. दिनेश वर्तमानपत्रांचे प्रिंटआउट काढून आणत असे ते वाचत असे. जेव्हा आम्ही फिरायला, जापान पहायला जात असू तेव्हा तेथील माहितीपत्रके ,नकाशे आवर्जून बरोबर आणत असू. एकदा आवराआवरी करताना ते सारे बाड हाती लागले म्हणून चाळू लागले.त्यातूनच मग डायरीत नोंदी करत गेले. त्याचेच मूर्तस्वरुप म्हणजे ही लेखमाला !
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.