अॅमेझॉन! नाव घेताक्षणी डोळ्यासमोर येतं ते घनदाट जंगल, असंख्य कीटक साप पक्ष्यांनी भरलेली समृद्ध भूमी, अजूनही जगाच्या आधुनिक संपर्कांस नाकारणारे आदिवासी आणि बरंच काही. अॅमेझॉनच्या जंगलातील भटकंतीचा हा माझा दुसरा अनुभव. काही वर्षांपूर्वी पेरूमध्ये नदीच्या उगमाकडच्या प्रवाहांच्या प्रदेशात जाणे झाले होते तेव्हाच या निसर्गाच्या मायाजालात पूर्ण गुंतलो होतो. नदीच्या अवाढव्य विस्ताराविषयी माहितीत होते, त्यामुळे पुढीलवेळी जाताना जिथे नदीचे विस्तृत रूप पाहता येईल अशा एखाद्या प्रदेशात जायचे हे मनात होते. अॅमेझॉनचा वनप्रदेश हा तसा ९ देशात विस्तारलेला आहे, परंतु महानदी आकार घेते ती ब्राझीलमधेच. "स्टेट ऑफ अमेझॉनास" म्हणजे या वनप्रदेशाचं हृदय! रिओ नेग्रो व सोलीमोस या महानद्या व अनेक उपनद्या एकत्र येत इथे अॅमेझॉन नदास जन्म देतात. अजूनही येथील बऱ्याच भागात मानवी स्पर्श नाही. वाहतूक व प्रवासी वर्दळ फारच कमी व मोजक्या ठिकाणीच. येथेच कुठेतरी जायचे एवढेच नक्की केले.
अॅमेझॉनास राज्याची राजधानी व रिओनेग्रो-सोलीमोस संगमापासून जवळच वसलेले शहर 'मनाऊस' हा या साहसाचा मुख्य तळ म्हणून निश्चित केला. एक कारण म्हणजे शहर म्हणण्यासारखे हे इथले एकच. व हा नदीसंगम अतिशय विशेष आहे हे पुढे दिसेलच. इथली प्रवासी माहिती तशी बरीच कमी उपलब्ध आहे व असलेली बऱ्यापैकी पोर्तुगीजेत. तशी रिओ-साओ पॉलो-इग्वाझू प्रवासाच्या च्या निमित्ताने आधी थोडी भाषा शिकणे झाले होते, पण का कुणास ठाऊक मला हि भाषा अजिबात रुचत नाही. स्पॅनिश त्यापेक्षा फार बरी. शेजारी भाषा असूनही या दोघीत मराठी-कानडी प्रमाणे फरक, त्यामुळे त्या भाषेचे ज्ञानही उपयोगाचे नाही. असो, तर तयारीत प्रथम भाषा. व्हिजा तसा सहज मिळतो, तोही गेल्या वेळचा प्रवासी व्हिसा होताच, पण गंमत म्हणजे तो किती महिने/वर्ष वापरू शकतो हे त्यावर लिहीत नाहीत व ते तिथे गेल्यावरच कळते. पण शक्यतो एक वर्षाचा असतो. तशी हि सहल बरीच माझ्या नेहमीच्या प्रवास सवयीच्या विरुद्ध होती असे म्हंटले पाहिजे. केवळ ‘इथे जायचे आहे’ असे म्हणून होत नसते, तिथला अभ्यास करायला वेळ द्यायला हवा, परंतु या प्रवासात ‘आज ठरविले आणि आठा दिवसात तिथे’ असे काहीसे झाले. बऱ्याच अंशी ट्रू बॅकपॅकिंग... प्लॅन ऍज यु गो... एक्सिक्युट ऍज यु प्लॅन... पोहोचायच्या दिवशीचे हॉस्टेल तेवढे बुक केले आणि प्रस्थान. आता एक नेहमीची प्रवासाची यादी तशी तयारच असते त्यामुळे त्याचेही फार कष्ट नव्हतेच, पण काही गोष्टी यावेळी अधिक घेतल्या त्या म्हणजे पाणी शुद्ध करायच्या गोळ्या आणि दोन प्रकारचे कीटकनाशक स्प्रे.
प्रवासासाठी उत्तम कालावधी होता कारण भरपूर पाऊस पडून गेलेला होता. नद्या अगदी ओतप्रोत भरून वाहत होत्या. सर्व मैदानी भाग पुराखाली आलेला होता (या भागात हे सामान्य आहे). परंतु याचाच अर्थ, कीटकांची नवी पैदास झालेली आहे, वन्यजीव त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर आलेले आहेत, जलचर दिसणे पुरामुळे अधिक कठीण, स्थानिक प्रवास कठीण, जंगलात कोरडी जागा मिळणे व राहणे कठीण, व सर्वात महत्वाचे म्हणजे अन्नाची उपलब्धता व उपलब्ध अन्नाची शुद्धता... या सर्वांचा विचार करून ज्या गोष्टी बरोबर आवश्यक वाटल्या त्या घेतल्या बाकी तिकडे जाऊन आता इतर सगळ्याचा बंदोबस्त. (या प्रदेशात जाण्यासाठी पीतज्वराची लस व ती घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, एकदा घेतलेली लस १० वर्षे उपयोगी असते त्यामुळे पेरूला गेलो असतानाचे प्रमाणपत्र असल्याने मला परत घ्यावी लागली नाही. परत मायदेशी पुनर्प्रवेशासही भारतीय अधिकारी याची विचारणा करू शकतात. माझ्या अनुभवात कुठेच कोणी विचारले नाही हा भाग वेगळा... )
मनाऊस : रात्री १० च्या सुमारास मनाऊसमध्ये आगमन झाले. तसे लहान विमानतळ असल्याने इमिग्रेशन अगदी मिनिटात पार. गरम दमट हवा अगदी मुंबई सारखी. हॉस्टेलचे बुकिंग होतेच, त्यामुळे थेट तिथेच आधी गेलो. टॅक्सीचालक १० मैल जाईपर्यंत चांगला मित्र बनला, त्याने एका जवळच्या टूर कंपनीचा पत्ता सांगितला. हॉस्टेल 'अजुरिकाबा' अपेक्षेपेक्षा फारच उत्तम होते. शहराच्या मध्यवर्ती भागात एका जुन्या छोट्या बंगल्याचे हॉस्टेलमध्ये रूपांतर केलेले होते. ब्राझीलमध्ये इंग्लिशला अगदी कोणीही विचारत नाही. रिओ-साओपॉलो सारख्या शहरी भागातसुद्धा क्वचित कोणी मिळते. पण हॉस्टेल चा मालकही अपवाद नाही. माडीवरच्या खोलीत मला जागा दिली. उशीर बराच झालेला त्यामुळे सगळे बाकीचे झोपले होते. प्रवासी हॉस्टेल मध्ये साधारण २ ते ६ दुमजली बंकबेड एका खोलीत असतात. मला एक कोपऱ्यात रिकामा ठेवलेला होता. अजून दोन रिकामे होते तिथे एक जोडपे उशिरा रात्री आले. दमट गरमी चांगलीच जाणवत होती. एकंदरच मोठ्या कपड्याचे या देशात कमीच महत्व असल्याने गरमीच्या दिवसात ते सर्वांच्याच फायद्याचे ठरलेले दिसत होते. ;-)
हॉस्टेल अजुरीकाबा
शहरातली एक म्युरल / भित्तीचित्र
दुसऱ्या दिवशी सकाळची न्याहारी स्वतःच करून घ्यायची होती. तिथे काही दोस्त झाले पण ते सर्व पॅकेज टूर बरोबर कुठे कुठे जात होते त्यामुळे मी आपला मार्ग वेगळाच ठेवला. आधल्या दिवशी मिळालेल्या एका टूर कंपनीलाही भेट द्यावी असे ठरवून एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. छान कोवळ्या उन्हात परिसर सुंदर दिसत होता. शहरातील प्रसिद्ध नाट्यगृह “तीआत्रो अमॅझॉनास” शेजारीच होते, काही छान चित्रे मिळाली. पुढे टूर कंपनीच्या कार्यालयात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे किंवा कुठलेच 'पॅकेज' नको असल्याने दक्षिणेस मामोरी नदीच्या खोऱ्यात त्यांच्या मदतीने जावे, तिथे पर्यटकांची सोय तिथले गावकरी करतात असे समजले. व पुढचे आयोजन स्वतःच करायचे असे ठरले. होस्टेलवरून बंदरापर्यंत लिफ्ट, तिथून पुढे मोटार बोट, तिथून एक बस, पुढे पूर आलेला असल्याने पुन्हा बोट, व शेवटी त्या गावात वस्ती असा अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम. नाऊ धिस प्लॅन इज टोटली ऑफ माय टाईप! ठरले!
तीआत्रो अमॅझॉनास
शहरातली एक चौक
महापालिका
फोटोशूट साठी आलेले एक नवविवाहित दाम्पत्य. मुलगी, स्थानिक जमातीतील लोक नाकीडोळी कसे दिसतात याचे प्रातिनिधिक रूप. मुलगा मिश्र अमेरिन्डियन वर्णाचा आहे.
या साहसाचे साधारण भौगोलिक स्थान
पहिला पडाव मनाऊस बंदरापर्यंत. नेग्रो नदीच्या उत्तर तटावर हे बंदर आहे. आतापर्यंत कल्पनेतच असलेले अॅमेझॉनचे रूप आता इथे पाहावयास मिळणार... अवाढव्य कंटेनर कार्गो समुद्रात असल्याप्रमाणे ये जा करीत आहेत, मासेमारीचे मोठे ट्रॉलर्स व इतर प्रवासी वाहतुकीच्या नावा नांगर टाकून आहेत असे दृश्य. अथांग! एकच शब्द... अफाट पसरलेली रिओ नेग्रो... नावाप्रमाणेच काळे शांत पाणी… सुदूर एक किनाऱ्याची रेष, पण तो तर केवळ मध्यबिंदू, त्यापलीकडे गढूळलेली तेवढीच रुंद सोलीमोस नदी... माझ्या बरोबरच्या चालकाने एकाशी ओळख करून दिली व पुढचा नदीचा प्रवास काही वेळात सुरु. रिओ नेग्रो हि कोलोम्बियामधून उत्तर पूर्वेकडून वाहत येते. या जीवनवाहिनीमुळेच इथल्या समृद्ध जंगलाचे पोषण होते व शेवटी सर्व तिच्यातच सामावून जाते, या साखळीचे आकारमान इतके मोठे आहे की या मिसळून जाणाऱ्या द्रव्यांमुळे नदीचा रंगच गहिरा काळा झालेला आहे. अशीच कथा सोलीमोस नदीची, परंतु ती अँडीज पर्वतश्रेणी कापत येत असल्याने मातीचाही गढूळ रंग लावून घेते. दोघींची भेट इथे होते व पुढील प्रवाहास जग ओळखते ते अॅमेझॉन नावाने!नदीसंगम, उपग्रहचित्र
प्रथम दर्शन
धक्क्यावर विक्रीस असलेले मासे
नदीत ये जा करणारे अवाढव्य कंटेनर वाहक
अवाढव्य कंटेनर वाहक
एक कोळी महिला तिची मुलगी व मी असे तीन प्रवासी असलेली ती छोटेखानी मोटरबोट नदीच्या लाटांवर स्वार होत पलीकडच्या तिराकडे झेपावू लागली. नेग्रो नदी पार करत असता हळूहळू सोलीमोस चे पाणी दिसू लागले. दोन्ही नद्या वेगवेगळ्या प्रदेशातून येतात त्यामुळे पाण्याचे तापमान, त्यात मिसळलेले घटक यातील मोठ्या फरकामुळे दोघींच्या पाण्याची घनता यात मोठी तफावत आहे. व त्यामुळे संगमस्थानी पाणी एकत्र येत नाही. अनेक नद्यांचे संगम असे विलग दिसतात परंतु येथील घनतेतील तफावत मोठी असल्याने अनेक मैलांपर्यंत त्या शेजारी परंतु वेगळ्या वाहतात त्यामुळे हे विशेष. 'मीटिंग ऑफ वॉटर्स' नावाने प्रसिद्ध असलेला हा संगम एक विशेष अनुभव. संगमस्थानी चालकाने नाव थोडी संथ केली... तिथे कॅमेरानी टिपलेले दोन्ही बाजूना पसरलेले अमर्याद पाणी... एक अथांग श्यामल प्रवाह, आणि दुसरा तितकाच अफाट पिंगल प्रवाह...
अलीकडच्या किनाऱ्यावर श्यामलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या क्षौद्रत्वाचे प्रतिबिंब पाहिले. पलीकडच्या किनाऱ्यावर पिंगलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या मलिनतेचे प्रतीक पाहिले. निसर्गाच्या सान्निध्यात विचार थंडावले. चित्त शांत प्रशांत झाले. ओंजळीतल्या पाण्याचा अर्घ्य दिला... पुढले काही दिवस या अमितमगंगेच्या अंगणात खेळायचे... पण हे रौद्र रूप झेपणारे नव्हे, त्यासाठी थोडे लांब लहान प्रवाहांच्या प्रदेशात, 'मामोरी खोरे'!मीटिंग ऑफ वॉटर्स
नदीसंगम
किनाऱ्यावर एक लहान बस पुढे घेऊन जाणार होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस लहान खेडी, शेतं, गाव संपलं कि जंगल आणि तळी. ताटापेक्षा मोठाली, कडा असलेली पाने असलेली कमळाची जाळी आणि भरपूर प्रमाणात देशी गायी हे या प्रवासातले विशेष. सगळेच नवीन असल्याने अंतर पटकन पार झाल्यासारखे वाटले. एखाद दोन सरी हजेरी लावून गेल्या त्यामुळे वातावरण गरम असले तरी दृश्य फार सुंदर होते. पुढे बस चा मार्ग संपला, एका तळ्याच्या काठी पुढली नाव. जाताना कळले कि हे तळे नसून पुराचे साठलेले पाणी आहे, अन्यथा रस्ता या खोलगट भागातून पुढे जातो. पाण्याच्या चहू बाजूंस शांत निरव जंगल. या शांत वातावरणात मोटरबोटचा वापर किती अयोग्य आहे असेही वाटले, वाटत राहिले, परंतु येथील हीच वाहतुकीची सोय असल्याने सध्यातरी इलाज नाही.
निसर्गरम्य खेडं
तासाभरात एका गावात पोहोचलो. खरेतर गाव नाहीच तसे, आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांनी एकत्र येऊन इथे काही लाकडी घरे बांधली आहेत व पर्यटक त्याचा हॉटेल/हॉस्टेल सारखा वापर करतात. बदल्यात स्थानिकांनाही पैसे मिळतो व पर्यटकांनाही कमीत कमी कृत्रिम असलेला पर्यटनाचा अनुभव. एक मोठ्या वर्तुळाकृती मचाणासारख्या उंचावरच्या माडीवर १०-१२ लाकडी पलंग व सर्वांवर डासाच्या जाळ्या. त्यातलाच एक मी घेतला. साधारण ८-१० लोक आधीपासून आलेले होते. काही रिओ-साओ च्या शहरी भागातले, काही इतर देशातले. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक लोक होते पण बहुतेकजण माझ्यासारखेच, त्यामुळे धम्माल! दुपार कलत होती, पण तरीही घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्यावर इथे सोपा उपाय, लगतच असलेल्या तळ्यात बुडी मारायची. पाण्याचा रंग सर्वत्र गहिरा काळा-पिवळा, बुडी घेऊन बाहेर आलं कि सगळ्या शरीरावर एक पिवळसर छटा चढलेली. हे मात्र फारच अनपेक्षित होते. नंतर त्याच तळ्याच्या गाळलेल्या (थोड्या कमी पिवळ्या) पाण्याने अंघोळ. कपडे धुतले तरी दमटपणामुळे वाळायला कठीण. हे असे असल्याने सगळी जनता कपड्याचे वावडे असल्यागतच वावरत होती. आल्या दिवशी संध्याकाळी केवळ जंगलाची तोंड ओळख म्हणून आम्ही २-४ टवाळ असेच फिरून आलो. अतोनात डास व तदृश कीटक. दोन वेगवेगळे बग स्प्रे नेऊनही उपयोग शून्य. सूर्यास्तानंतर थोडा भात खाऊन मी ढेर. राहती जागा
यापुढे रोजचा उद्योग, काही दोस्त बरोबर पकडून, एक काहीतरी दिशा ठरवून जवळच्या गावात जाणे, कोणी स्थानिक बरोबर घेणे, आणि मग दिवसभर भटकणे. हा सर्व प्रदेश मामोरी नावाच्या उपनदीच्या खोऱ्यातील. परंतु पावसाने अॅमेझॉन सर्वदूर भरून जाते. पाहाल तिथे पाणीच पाणी. त्यामुळे रोजचा प्रवास होडीनेच. एक दिवस पिरान्हा शिकार, एक दिवस मोठाल्या वृक्षांच्या शोधात, एकदा मगरी पकडण्याचा उद्योग, एकदा जंगलात राहण्याचे साहस, एकदा स्थानिक आदिवासींना भेट, एकदा डॉल्फिन दर्शन असे अनेक उद्योग करत करत एक छान कंपू जमला. रोजची दिनचर्या ठरलेलीच, सकाळी उठल्यावर बरोबर आणलेल्या ग्रॅनोला चिक्कीची न्याहारी, तळ्यात डुबकी अंघोळ, काही फळे असतील गावात तर ती खाऊन पक्षी वगैरे टिपण्यासाठी एखादी लहानशी रपेट, त्यानंतर आमच्यातले काही जण व बरोबर एखाद दोन स्थानिक असे थोडी दूरची भटकंती, संध्याकाळी घरट्यात परत, पुन्हा डुबकी अंघोळ... एकंदरच जंगल तुलनेत अतिशय शांत होते. नावेची मोटारही आम्ही दाट जंगलात गेल्यावर बंद करत असू. पण स्थानिकाची आवश्यकता फिरण्यासाठी अनिवार्य. एक तळे पार करत काठाच्या झाडीपर्यंत पोहोचावे तर पलीकडेच दुसरे तळे, पुढे तिसरे... कुठेही चकवा लागलाय असा वाटावं इतके सगळे भाग सारखे. काही ठिकाणी विशेष वेगळी झाडे खुणेसाठी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही स्वतःहून वाट शोधणे कठीणच.
रोजचे वाहतूक साधन
रम्य परिसर
पुरामुळे अर्धे पाण्यात बुडालेले जंगल
काही ठिकाणी फसवी जमीन वाटावी अशी जलवनस्पतींची हिरवळ
पाण्यातील प्रवासाची काही क्षणचित्रे
एक दिवस स्थानिक आदिवासी वस्तीलाही भेट दिली. टीव्ही वर पाहतो तसे पाने वगैरे बांधणारे आदिवासीही इथे आहेत, पण या भागातले आता तसे बरेच पुढारले आहेत व आधुनिक जगात बरेच सामावत आहेत. प्रामुख्याने टॅपिओका (साबुदाणा) व काही जंगली फळे याची शेती येथील लोक करतात व त्याशिवाय नदीतील शिकार हे मुख्य अन्न स्रोत. काही खेड्यात वीज येत आहे. त्याबरोबर बाकीच्याही सुधारणा होत आहेत. फोटोसाठी मनाई केली नाही तरी ते लोक फार उत्सुकही वाटले नाहीत त्यामुळे आम्ही कोणी फारसे उगा क्लिकक्लीकाट करायचा नाही असे ठरविले. एक गम्मत म्हणजे हे लोक रोजच हॅमॉक मध्ये झोपतात, फारच विचित्र...
आदिवासी खेड्यात जाताना
रंगीत चिमण्या
मोठाले तुराको पक्षी
एका रात्री मगरी पकडण्याचा उद्योग केला. कायमन या उपजातीतला हा निशाचर प्राणी रात्री शिकारीला बाहेर पडतो. चमकणारे डोळे ही ओळखण्याची विशेष खूण. नवख्यांनी पिले पकडणे सोपे व सुरक्षित. येथे आढळणाऱ्या काळ्या व पिवळ्या (शेपटीतील फरक पहा) दोन्ही जातीच्या मगरी पाहावयास मिळाल्या. किर्रर्र अंधारात पाच सेकंद हेडलाईट चालू करून काही दिसतंय का पाहणे, न दिसल्यास पुढे हळूहळू वल्हवत राहणे, व एकदा चमकणारे डोळे दिसले कि सगळ्यात अवघड म्हणजे शांत राहून हळूहळू होडी तिथे घेऊन जाणे, आणि सार्याव अवघड, एकाच झटक्यात मानगूट धरणे, एकंदरच थरार. एवढेसे पिलू दिसले तरी जाम दम काढते... एकंदर १५ प्रयत्नातील हे दोन यशस्वी...
कायमन मगरी
एका संध्याकाळी पकडलेला टॅरेंटुला
मंद अस्वल स्लॉथ
खंडेराव
परसातले प्राणी
स्थानिक गिधाड प्रजाती
जकान्या पाणकोंबडी
यातील जंगलातील वास्तव्याचा अनुभव विशेष उल्लेखनीय. खुल्या जंगलात एक रात्र तरी राहावे असे माझ्याबरोबरच अजून ५-६ जणांचे मत पडले. दोन स्थानिक वाटाडे शिकारीच्या वस्तीच्या ठिकाणी घेऊन जायला तयार झाले. मग अजून ४-५ जण सामील झाले. तयारी सुरु झाली... फळे, मांस, भाज्या, लाकडे, कापडी घडीचे झोपाळे, डासाच्या जाळ्या, ताडपत्री, कोयते-कुऱ्हाडी, पिण्याचे पाणी, इत्यादी... दुपारच्या सुमारास प्रवासाला सुरुवात, नेहमीप्रमाणे होडीने मुख्य अंतर कापायचे होते. एका ठिकाणी पाण्याचा डोह निमुळता होत पुढे भूभाग थोडा उंचावत होता तिथे नाव किनाऱ्यास लावली. हे लोक शिकारीला येत तेव्हा वस्तीच्या काही ठिकाणांपैकी हे एक होते. त्यामुळे तशी थोडी जागा मोकळी केलेली होती, काही मोठी लाकडे व चुलीची जागाही आधीच होती. लगेच कामाला लागणे आवश्यक होते कारण सूर्यास्तानंतर शून्य प्रकाश. मोठ्या लाकडांचा वापर करून एक रचना तिथे तात्पुरती उभी केलेली होती, त्यावर ताडपत्री टाकून पावसापासून संरक्षण तयार केले. त्याच्या आत, समोरासमोरच्या लाकडी वाशांचा वापर करून त्यावर झोपण्यासाठीचे झोपाळे (हॅमॉक) बांधले. डासाच्या जाळ्या त्यातच गोवल्या. हि सोय अशा जंगलांमध्ये रात्री अतिशय कामाची. हॅमॉक बाळगायला अतिशय हलका व सोपा, तसेच, त्यामुळे जमीन ओली असण्याचा त्रास नाही, जमिनीवरच्या किडे-प्राण्यांचाही उपद्रव कमी. वर जाळी असल्याने उडणाऱ्या कीटकांपासूनही रक्षण. साप व इतर सरीसृपांसाठी केवळ दोन कोपऱ्यात काटेरी किंवा चिकट किंवा दोन्ही प्रकारचे बंदोबस्त केले कि सर्वात सुरक्षित शयनव्यवस्था तयार! पटापट आमचे शयनागार बांधून झाले, सूर्यास्ताचा समय होता, बाजूलाच असलेल्या डोहात आम्ही काही जण एक मासेमारी साठी फेरी मारून आलो. निशाचर मगरी दिसताहेत का हे हि उद्देश्य होतेच. तोपर्यंत पाठी राहिलेल्या लोकांनी अग्नी चेतवला व स्वयंपाकाची तयारी सुरु केली. मोठा विस्तव करून त्यावर मास भाजण्यासाठी लटकवले. ताजे मासे हि होते, मला गावात दोन मोठी वांगी मिळालेली ती आगीत खुपसून ठेवली आणि बाजूला बटाटे. हे भोजन... कदाचित ७ वाजले असावेत... आमच्या गप्पा रंगल्या आणि तोपर्यंत समस्त कीटक वर्गात जंगी पार्टीची वर्दी गेली, त्यांचा उपद्रव वाढू लागला. गावातल्या एकाने आम्हाला अजून एक उपाय शिकविला. एक प्रकारच्या धावऱ्या काळ्या मुंग्या झाडावर वारूळ करून राहतात, त्या वारुळावर हात ठेऊन त्यांना थोडे डिवचले कि शेकड्याने त्या मुंग्या अंगावर चढतात, त्यानंतर तशाच त्या अंगावर चिरडायच्या. आयोडेक्स सारखा त्याचा वास येतो पण नंतर बाकी कोणी कीटक बराच काळ जवळ येत नाही. नंतर बऱ्याच गप्पा रंगल्या, शिकार कथा, भूत कथा, प्रवास कथा अशा अनेक कॅम्प फायर स्पेशल विषयांवर चर्चा. पौर्वात्य जगातला मी एकटाच असल्याने भूत-पिशाच-अध्यात्म-धर्माधर्म अशा विषयात बाकीच्यांना नवीन असलेले दृष्टिकोन चर्चेत आल्याने काही विषय अजूनच रंगले. हिंदू मतांमधील 'लॉ ऑफ कर्मा', 'अबसेन्स ऑफ डेव्हील' आणि 'एव्हरीथिंग हॅज अ स्पिरिट' या संकल्पना बऱ्याच लोकांना फार आकर्षक वाटतात. त्यामुळे स्थानिकांची नदी व जंगलातील देवतांची पूजा व माझी ‘रिव्हर वर्शीप’ (अर्घ्य) यात असलेला 'एव्हरीथिंग हॅज अ स्पिरिट' हा समान धागा व निसर्गाशी भावनिक पातळीवर नाते जोडण्याचा हा कसा एक सोपा मार्ग आहे असा एक विषय झाला. काही जणांना 'पेगन अँड प्राऊड' हा ऍटिट्यूड नवीन होता. आणि हे मला नवीन नव्हते :-) त्यामुळे चर्चा चांगलीच रंगली. विस्तव शांत होत आला तशी झोपाझोप चालू झाली, पण आकाश निरभ्र असल्याने तारकानिरीक्षणासाठी अजून एकदा होडक्यातून खुल्या डोहात एक चक्कर मारून आलो. मगरीचे चमकणारे अक्षद्वय पाण्यात हळूच कुठे दिसत होते. वर असंख्य चांदण्या, मैलोन्मैल कुठेही विजेचा स्पर्शही नसल्याने फारच सुंदर आकाश, अगदी परिचयाची नक्षत्रेही सहज ओळखता येईना इतका खच! सिंह पश्चिमेकडे झेपावलेला तर उगवतीकडे वृश्चिकेचा आकडा वर येत असलेला. डोहाच्या मधोमध वल्ही थांबली, सर्व चर्चामंथन निवले, निरभ्र आकाश, निश्चल डोह, निरव शांती, १० मिनिटांचा सुखानुभव... नंतर परत येऊन निद्रेच्या अधीन.अजस्त्र काटे
कीटकरोधक रक्त असणाऱ्या मुंग्या
महाकाय वृक्ष
पुढे नदीतले डॉल्फिन पाहणे हा अजून एक खास कार्यक्रम. जगात फार मोजक्या ठिकाणी (अॅमेझॉन, गंगा व सिंधू याच नद्यांमध्ये) हा प्राणी आढळतो. सतत गढूळ पाण्यात वावर असल्याने त्यांना दृष्टी निरुपयोगी असल्याने ती अंध असतात. केवळ ध्वनीच्या साहाय्याने ते क्रमणा करतात. मोटरबोट त्यांना मैलांवरूनही कळते. पुराचा एक फायदा म्हणजे नवीन खाद्याच्या शोधात हे प्राणीही नदीपासून दूर बरेच आतमध्ये येतात. एका ठिकाणी २-४ च्या समूहाचे हलके दर्शन झाले. दुसरा अनुभव पिरान्हा मासेमारी, हे मासे झुंडीने त्यांच्या विशिष्ट डोहात राहतात. तशी शिकार सोपी असते पण फार चपळ व पाण्याबाहेर उड्या मारणारे मासे. मारलेल्या माशांचा बाकीच्या मंडळींनी तुरंत फन्ना उडविला.गोड्या पाण्यातील डॉल्फिन, अस्पष्ट का होईना पण काही फोटो मिळाले
पिरान्हा मासे ताजे व भाजलेले (आणि खाल्लेले)
अशा या थोड्याच दिवसांच्या परंतु अविस्मरणीय अशा अॅमेझॉन वास्तव्याची हि कहाणी. पहिल्या वेळी पेरूमध्ये अनुभवास आलेली अॅमेझॉन हि बऱ्याच प्रकारे वेगळी होती. पेरूमध्ये नद्या लहान होत्या, जंगले घनदाट होती पण प्राणिजीवन अनुभवणे तुलनेत सोपे होते. रंगीत पक्षी फुले भरपूर प्रमाणात व सहज दिसत होती, वनराई सजलेली, नटलेली व आपल्या समृद्धीचे प्रदर्शन करणारी वाटली. ब्राझीलचे जंगल अधिक गंभीर अधिक दुर्गम वाटले. पक्ष्यांचे आवाज काही ठिकाणी होते पण नजरेस पडणे कठीण. तशीही कोरड्या जमिनीची कमतरता असल्याने प्राणिजीवन दृष्टीस पडणे दुरापास्तच होते, पण एकंदरच अरण्याचा सर्व काही गुप्त ठेवण्याचा नूर वाटला. जगावेगळी निशब्द अन स्तब्ध शांतता. हा इथला अनोखा, अनपेक्षित व काहीसा गूढ अनाकलनीय अनुभव होता.
इथल्या जंगलातली आरशासारखी स्तब्ध प्रतिबिंबे...
आतापर्यंतच्या एकल प्रवासामध्ये हा खासच वेगळा होता. नेहमीसारखे फार आयोजन-प्रयोजन नाही, पाहण्या-करण्याची मोठी यादी नाही, सुविधा असल्या तरी ठीक नसल्या तरी निभावेल अशी बेताची तयारी, समोर असलेल्या परिस्थितीत व सोबत असलेल्या संगतीबरोबर स्थानिक अनुभव जसा करता येईल तसतशी संथ कालक्रमणा अशी एकंदर 'लेड बॅक इझीगोइंग ट्रिप'... ब्राझीलच्या अॅमेझॉनइतक्याच सुंदर व समृद्ध इतर काही जागांविषयी पुन्हा कधी... तोपर्यंत 'आते लॉगो… चाओ!'
अरे हो... जाता जाता पेरुव्हियन अॅमेझॉनलाही जरूर भेट द्या.
साहस मित्र मंडळ...
http://www.misalpav.com/node/40428
आधी ते सर्व चित्रित व प्रकाशित केल्यामुळे पुनरावृत्ती टाळली आहे http://www.misalpav.com/node/28684
मकॉव् - निळे
मकॉव् - लाल
टुकान
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.