https://www.misalpav.com/node/32426
लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो हा रस्ता आहे क्रॉमवेल अॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो एका अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं एकेकाळचं भारताबाहेरील प्रमुख केन्द्र--पत्ता ६५ क्रॉमवेल अॅवेन्यु, हायगेट, लंडन आणि ओळख -एकेकाळचं इंडिया हाउस.
विसाव्या शतकाचा सुरुवातीचा काळ. कधीही अस्त न होणारा इंग्रजी सत्तेचा
सूर्य भारतात अगदी ऐन भरात होता. स्वराज्य आणि स्वदेशीची चळवळ देशभरात
मोठ्या जोमात चालली होती. लाल, बाल आणि पाल या त्रिमुर्तींनी देशभरात
जनजागृती करून लोकांमधे परकीय सत्तेविरूद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम
जोरात चालविले होते.
एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्झन ने फोडा आणि झोडा या जगप्रसिद्ध ब्रिटीश
नीतीला जागुन बंगालची फाळणी घडवून आणली. अशातच इंडियन नॅशनल कॉंग्रेस मधे
जहाल आणि मवाळ असे सरळ सरळ दोन गट पडले. सशस्त्र प्रतिकाराशिवाय देशाला
स्वातंत्र्य मिळणार नाही असा एक विचार जोर पकडू लागला होता आणि त्याला
अनुसरून बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, तामीळनाडू मधे अनेक क्रांतिकारक संघटना
निर्माण होऊ लागल्या.
आपल्या देशामधे ही धामधूम चालली असतानाच एक समांतर चळवळ आकार घेऊ
लागली होती ती मात्र भारताच्या बाहेर, थेट वाघाच्या गुहेत--लंडन मधे.
श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचच्या फेब्रुवारीत इंडियन होम रूल
सोसायटी ची लंडन मधे स्थापना केली. मॅडम भिकाजी कामा, दादाभाई नवरोजी
सारखे दिग्गज या संस्थेंचे आधारस्तंभ होते. या संस्थेने हिंदुस्थानासाठी
सेल्फ रुल अर्थात स्वराज्य या संकल्पनेची मांडणी केली. याचे उद्दिष्ट होते
खुद्द लंडनमधून या स्वराज्याच्या कल्पनेचा पाठपुरावा करणे, या कामासाठी
जनजागृती करणे आणि त्यासाठी पैसा उभारणे. या काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय
मुले शिकण्यासाठी लंडन मधे येऊ लागली होती. या मुलांना लंडन मधे साहजिकच
वंशभेदाचा, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागे.
श्यामजी कृष्ण वर्मांनी या भारतीय विद्यार्थांसाठी एका वसतीगृहाची एकोणीसशे
पाच मधे स्थापना केली. ह्या घराचे नाव ठेवले--इंडिया हाउस.
हे इंडिया हाउस पुढच्या पाच वर्षांसाठी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील
इंग्लंडमधील एक प्रमुख केन्द्र बनले. येथील सदस्यांनी द इंडियन
सोशियलोजीस्ट नावाचे ब्रिटीश सरकारविरोधी वृत्तपत्र चालविले होते. या
वृत्तपत्राने भारतात चाललेल्या इंग्रजी दडपशाही विरुद्ध वेळोवेळी आवाज
उठविण्याचे काम केले.
अनेक भारतीय विचारवंत, नेते, क्रांतिकारक देशभक्तांचे इंडिया हाऊस हे लंडन
मधील हक्काचे घर बनले. इथे त्यांच्या बैठकी चालायच्या, अनेक नवे विचार,
नव्या कल्पना इथे मांडल्या जायच्या. जहाल-मवाळ अशा सर्व विचारांना या
घराने एकत्र आणले.
सगळयांचे मार्ग वेगळे होते पण धर्म एकच--राष्ट्रभक्ति आणि उद्दिष्ट----स्वराज्य.
या इंडिया हाउस च्या सभासदांपैकी प्रमुख नावे होती--- बॅरिस्टर विनायक
दामोदर सावरकर, मदन लाल धिंग्रा, लाला हरदयाल, वी. एन. चटर्जी, सेनापती
बापट इत्यादी. महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या ब्रिटन दौर्यात इथे काही
दिवस राहायला होते.
इथल्या स्वातंत्र्य चळवळीची कुणकुण स्कॉटलॅंड यार्ड ला लागली नाही तरच नवल होते. हळूहळू ब्रिटीश सरकारने इंडिया हाउस वर नजर ठेवायला सुरूवात केलीच होती. एकोणीसशे नऊ मधे इंडिया हाऊस च्या मदन लाल धिंग्रांनी लॉर्ड कर्झन वायलीचा लंडन मधे भर सभेत वध केला. त्याच्या नंतर मात्र या इंडिया हाउस वर इंग्रजी सत्तेचा झपाट्याने वरवंटा फिरू लागला. मदन लाल धिंग्रांना फाशी देण्यात आली. इंडिया हाउस चे बरेच सभासद भूमिगत झाले.
१९०५ ते १९१० या काळात या इंडिया हाउस ने अनेक तरुण भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या उच्चविद्यभूषित तरुणांच्या मनात ब्रिटीश राज्यसत्तेविरुद्ध असंतोष जागा केला. त्यांच्या विचारांना हक्काचं व्यासपीठ दिले. बॉम्ब, पिस्तुले बनविण्याची माहिती पत्रके भारतात क्रांतिकारकांसाठी इथून पाठविली जात. येथील सदस्यांनी पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. या इंडिया हाउस ने बलाढ्य आणि अजिंक्य ब्रिटीश साम्राज्याला जाब विचारायचं धाडस दाखवलं ते थेट त्यांच्या घरात शिरून.
आज या वास्तुची नाही चिरा नाही पणती अशी अवस्था आहे. फक्त हे घर मात्र जसंच्या तसं उभं आहे आणि सावरकर इथे वास्तव्यास होते अशा उल्लेखाची घरावर एक निळ्या रंगातली पाटी, बस इतकंच. या घराकडे बघतांना राहून राहून वाटत होतं की आत काहीतरी संग्रहालय, नाहीतर घरासमोर काही माहितीचा फलक तरी, काहीतरी हवं होतं. पण काहीही नाही.
क्रॉमवेल अॅवेन्यु
डावीकडचे घर.
या घराकडे आम्ही बाहेरूनच बघत होतो. इथे या देशात काहीतरी खूप आपलसं वाटणारं समोर दिसत होतं. इथपर्यंत येतांना डोक्यावरचं उन, लंडन मधली गर्दी, मॅप नीट बघता येत नाही का म्हणून एकमेकांवर केलेली चिडचिड सारं काही एका क्षणात विसरलो होतो. आम्ही दोघे, बरोबर माझा भाऊ आणि वाहिनी. चौघेही निशब्द.... काही बोलण्यासारखं नव्ह्तच. फक्त कधी घरासमोर तर कधी रस्त्याच्या पलीकडे जाऊन या इंडिया हाऊस कडे आम्ही एकसारखे पाहात होतो. उगाचच घराच्या आजूबाजूला घुटमळत होतो. खरोखर येथून पायच निघत नव्हता. पण मग शेवटी थोडेफार फोटो काढले आणि जरा वेळाने तेथून निघालो.
हा फोटो जालावरून साभार.
गॉड सेव द किंग आळवत अवघ्या हिंदुस्थानाला त्राही माम करून सोडणार्या
ब्रिटीशांच्या राजधानीत वंदेमातरम् चा मंत्रघोष करण्याची हिंमत या घराने
दाखविली.
देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत आपला वाटा उचलून काही काळासाठी का होईना पण
इंग्रज सरकारला भयंकर अस्वस्थ करणार्या या इंडिया हाऊस ला देशाच्या
स्वातंत्र्यदिनानीमित्त विनम्र अभिवादन.
अवांतर--स्वामी विवेकानंद भारतातुन श्रीलंका,हाँगकाँग,जपान,कॅनडा (व्हँकुव्हर) तेथुन रेल्वेने शिकागोला गेले.
वाटेत विनिपेग स्टेशनवर त्यांनी एक रात्र मुक्काम केला होता. तेथील
भारतीय समाजाने त्यांचा अर्ध पुतळा विनिपेग स्टेशनवर उभारला आहे.
http://www.winnipegfreepress.com/arts-and-life/life/faith/hindus-honour-...
आर्ट इन्स्टिट्युट ऑफ शिकागो येथे जे सभागृह आहे त्याच ठिकाणी सप्टेंबर १८९३ मध्ये स्वामीजींनी आपले प्रसिद्ध भाषण दिले होते. आता त्या सभागृहाची रचना बरीच बदलली असली तरी सभागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर स्वामीजींचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. मी काढलेले काही फोटोज.
फोटोज मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
http://www.satyashodh.com/London_Tour_17112011.htm
मी ह्या सफरीबद्दल चांगली मते ऐकली आहेत. श्री गोडबोले अतिशय तळमळीने
माहितीपूर्ण सफर करवतात असे ऐकले आहे. तुम्हाला ह्यात रस असू शकेल.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.