हिल
स्टेशन आवडत असेल तर पंचमढी छान आहे. समुद्र सपाटीपासून १०६७ फुट
उंचीवरील सातपुडा पर्वत रांगांमधील हे ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशमधील एकमेव
हिल स्टेशन. जवळचे रेल्वे स्टेशन : पिपारिया (४७ किमी )
मुंबईहून गुरुवारी दुपारी गरिबरथ गाडी सुटते ती शुक्रवारी सकाळी ३ च्या
दरम्यान पिपारियाला पोहचते. (लवकर पोहचायचा उद्देश एव्हढाच कि भटकंतीसाठी
पूर्ण दिवस मिळावा) भटकंतीसाठी सर्व दिवस भाड्याने गाडी करावी. येथे
फिरण्यासाठी (4x4) गाडी करावी लागेल. गाडीवालेच पंचमढी फिरण्यासाठी वन
विभागाचा परवाना वगैरे घेऊन देतील.
रेल्वे स्टेशनपासून पिकअप /ड्रॉप समाविष्ट असावा. सहलीसाठी सोबत आणखी एखादे
कपल असले तर बघा. गाडीचा खर्च निम्मा होईल आणि मजाही येईल.
आमच्या ग्रुप सहलीत आम्हीही याच रेल्वे गाडीने गेलो होतो. आम्हाला घेण्यासाठी गाड्या स्टेशनवर हजर होत्याच. पहाटे साडेपाचलाच पंचमढीला पोहचलो. येथे मध्यप्रदेश पर्यटन मंडळाचे 4-5 चांगले हॉटेल आहेत. त्यातील 'रॉक एन्ड मॅनोर' हा एक ब्रिटिशकालीन सुंदर बंगला (6 रूम) आम्ही बुक केला होता. जरी आमचे दुपारचे चेक इन असले तरी आदल्या दिवशी बंगला रिकामा असल्याने व मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या कृपेने आम्हाला पहाटेच सर्व रूम उघडून देण्यात आल्या.
पंचमढी दोन मुक्कामात (३ दिवस) व्यवस्थित पाहून होईल. क्षेत्र खूप जास्त
नसल्याने गाडीवाले दिवसाच्या दोन सत्रात वेगवेगळ्या भागात फिरवतात. दुपारी
जेवणासाठी व थोडा आराम करण्यासाठी गाड्या हॉटेलवर परत येतात,
पंचमढी येथे धबधब्यांची मालिकाच आहे. बी फॉल ,जमुना प्रपात, रजत प्रपात,
अप्सरा विहार “Fairy Pool” :धबधब्याच्या पायथ्याशी तयार झालेल्या नैसर्गिक
पाणवठ्यात पर्यटक मनसोक्त डुंबण्याचा अनुभव घेवू शकतात . उथळ पाण्यामुळे
मूल-बाळ असणाऱ्या कुटुंबासाठी सोयीस्कर.
पांडव गुफा: या गुफा भारतीय पुरातत्व खात्यामार्फे जतन केल्या आहेत.
समोरच सुंदर उद्यान आहे.
उद्यानाच्या बाहेर कमी उंचीच्या छोटया बाईकची राईड घेता येते. मुले, महिलांना आवडेल.
प्रियदर्शिनी पोइंट (Forsyth Point) : याच ठिकाणाहून कॅप्टन फोरसिथ यांना इ.स. १८५७ मध्ये पंचमढीचा शोध लागला.
हांडी खोह: घोड्याच्या नालेच्या आकाराची खोल अरुंद दरी. ३०० फुट खोल सरळसोट कडा. अगदी जवळपर्यंत गाडी जाते. जास्त चालावे लागत नाही. एक कठडा असलेला व्ह्यू पोईंट आहे जेथून दोन डोंगरामधील दरीचे सुंदर दृश्य दिसत. येथे घोड्यावरची रपेट करता येईल. (येथे फिरण्यासाठी अर्धा तास पुष्कळ होईल) खोह = खड्डा, दरी
जटाशंकर मंदिर : नैसर्गिकरित्या तर झालेले गुंफेतील शिवलिंग
महादेव मंदिर : अध्यात्मिक भटकंतीत हे एक पवित्र स्थान आहे. पंचमढी शहरापासून १२ किमी. येथे शंकराची मूर्ती तसेच शिवलिंग आहे. येथून अर्ध्या किमीवर खडकात गुफा/ भेग आहे. हे ठिकाण गुप्त महादेव किंवा छोटा महादेव म्हणून ओळखले जाते.
राजेंद्रगिरी सनसेट पॉईंट
रिचगड (रीसगड:बहुतेक अस्वलांवरून पडलेले नाव). गुफा आहेत. सुंदर नजारा
बायसन लॉज संग्रहालय: पंचमढीचा इतिहास समजून घेण्यासाठी चांगले ठिकाण. पंचमढी वनक्षेत्रात येत असल्याने परवाना घेण्याचे ठिकाण.
चौरागड मंदिर
३ ते ४ किमीचा ट्रेक /१३८० पायऱ्या चढून गेल्यावर केल्यावर हे मंदिर आहे.
साधारण दोन तास वर पोहोचण्यासाठी लागतात. थोडे थकायला होते पण आजूबाजूचे
निसर्गसौंदर्य पाहून सर्व थकवा दूर होतो.
मंदिर परिसरात भाविकांनी वाहिलेले हजारो त्रिशूळ दिसतात. येथे शंकराची मूर्ती असून मंदिर आधुनिक काळात बांधलेले आहे.
हा ट्रेक चुकवू नये असे माझे मत. ज्यांना शक्य नाही त्यांना गुप्त महादेव मंदिराजवळच थांबू द्यावे.
आपल्याकडे खाद्य पदार्थ असतील तर वाटेत माकडांपासून वाचण्यासाठी खूप काळजी
घ्यावी लागतेमाकडांना पळवण्यासाठी येथे गलोलही विकत मिळतात. नुसती
माकडांच्या दिशेने फिरवली किंवा खडा बाजूला कुठेतरी मारून आवाज केला तरीही
माकडे दूर पळतात.
बाकी नवरे मंडळी स्वतःच्या बायकोला का दूर पळवायला बघतात ते कळत नाही .
धुपगड: हे सातपुडा पर्वतराजीतील सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे.येथून सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा दिसतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आलंय.
धूपगडला जाताना वाटेत पॅरासेलिंगची मजाही अनुभवता येईल.
तसेच पंचमढीत झिप लाईन इ. साहसी खेळही आहेत. छोट्यांसाठी टॉय ट्रेन आहे.
एकाच सहलीत निसर्ग,आध्यत्मिक ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, खेळ सर्वच अनुभवता येईल.
रविवार संध्याकाळ किंवा रात्री ९-१० वाजताच्या सोईस्कर गाडीने सोमवार सकाळपर्यंत मुंबईला परत. सध्या तरी जाण्यायेण्याची सर्व तिकिटे उपलभद्ध दिसतात.
माझी सर्व माहिती 6 वर्षांपूर्वीची आणि पावसाळ्यानंतरच्या सहलीतील आहे. जायचे झाल्यास थोडी चौकशी करून जावे.
http://www.misalpav.com/node/51364
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.