तर असे आम्ही आनंदवनाच्या दिशेने निघालो... मध्ये एकीकडे चहा नाष्टा झाला
आणि विंगर गप्पा गाण्यांच्या साथीने आनंदवन ला पोहोचली.. इथे मिळाला तो
पहिला सुखद धक्का.. प्रकल्प नाहीतर अख्खं एक गाव आमच्या स्वागताला हजर
होतं !!!!
"आनंदवन".... चंद्रपूरच्या वरोरा पासून जवळ बाबासाहेब आमटेंनी वसवलेले एक अनोखे गाव ...
कुष्ठरोग याविषयी आपल्या समाजात खूप सारे गैरसमज आहेत. या गैरसमजांना
वेशीपल्याड लोटून आणि अथक परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी घडवलेले हे आनंदाचे
वन..
एक दैवतुल्य माणूस समाजासाठी निस्वार्थ मनाने काय करू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे आनंदवन...
मुरलीधर देविदास आमटे अर्थात बाबा आमटे यांना 1951 मध्ये ही जमीन सरकारकडून
मिळाली. त्याआधी त्यांनी 6 महिने कलकत्त्याला जाऊन प्रशिक्षण घेतले आणि
1949 मध्ये महारोगी संस्था रजिस्टर केली..
त्यांना त्यांच्या कार्याबद्दल गांधीजींनी अभयसाधक ही उपाधी दिली.
अशा या आनंदवनात साधारण सकाळी 11 च्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो.. मधोमध
दूरवर गेलेला रस्ता... आणि दुतर्फा बैठ्या घरासारखे दिसणारे वेगवेगळे
विभाग अशी काहीशी आनंदवन ची डोळ्याना दिसलेली पहिली छबी...
काही वेळातच आम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या निवासाच्या खोल्यांकडे पोहोचलो...
इथे आमच्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र बिछान्यापासून ते गिझर आणि मोबाइल
चार्जिंग पर्यंतच्या साऱ्या सोई उपलब्ध करून दिलेल्या होत्या...
दुसरा सुखद धक्का... मी तर मेणबत्या पासून पोर्टबल चार्जेर पर्यंत सारं
काही घेऊन आली होती....आमटेंच्या कार्याची व्याप्ती किती असावी याची ओळख
इथपासून व्हावी...
मी,विशू, श्रेया आणि रुपाली एका खोलीत होतो..
आन्हिके उरकून लगेचच आम्ही जेवणासाठी खानावळीकडे वळलो... शिस्तबद्ध प्रकारे
जेवणं सुरू होती... प्रत्येकाने आपल्याला हवे तितकेच वाढून घ्यावे मन
तृप्त होईल इतके जेवावे आणि स्वतःची ताट वाटी स्वतः धुवुन ठेवावी .. असा
इथला शिरस्ता आहे
आजूबाजूला अन्नाची नासाडी टाळावी असे संदेश देणारे फलक लावलेले दिसत
होते... त्यातला एक छायाचित्र लक्ष वेधून घेत होतं ... दुष्काळग्रस्त भागात
एक अगदीच कृश यष्टीचे रांगते मूल एका अन्न छत्राच्या दिशेने अंगात त्राण
नसतानाही रांगत सरपटत चालले आहे आणि त्यामागून पाठलाग करत एक गिधाड आपल्या
भक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करतेय... असे विदारक दृश्य.. ज्या
छायाचित्राला खूप मोठा पुरस्कार मिळाला पण ते ज्याने काढले.. त्याला ही
घटना ईतका मोठा मानसिक धक्का देऊन गेली की त्याने स्वतःचे आयुष्य संपवले...
अन्नाचे महत्त्व यावरून लक्षात यावे..
इथे बनविले जाणारे जेवण इथल्याच भाजी आणि धान्य वापरून बनविले जाते.. जे
इथले कुष्ठरोगी (कुष्ठरोगी म्हणायला जीवावर येतेय खरं तर आपल्याहुन जास्त
मेहनती ही माणसं आहेत यापुढे रहिवासी म्हणून लिहीतेय)
स्वतः पिकवतात आणि जेवणही स्वतः बनवतात अन्नपूर्णेला स्मरून सांगते इतके
चविष्ट आणि आरोग्यवर्धक जेवण कधी खाल्ले नव्हते..कुठल्या पंचतारांकित
हॉटेललाही हे भाग्य नाही.. बहुदा आमटे परिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची
निस्वार्थ सेवा इथल्या रहिवाश्यांच्या हातातल्या चवीत उतरली असावी.
जेवण झाल्यावर आम्ही एका सभागृहात
जमलो तिथे आम्हाला आनंदवन ची माहिती सांगणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली...
आणि यापुढे परांजपे काकांनी आम्हाला प्रकल्पाची सफर घडवून द्यायला साथ
दिली
बाबा आमटेंच्या नंतर तितक्याच समर्थपणे त्यांचे थोरले पुत्र विकास आमटेंनी आनंदवनाची धुरा सांभाळली आहे..
हस्तकला, हातमाग, फॅब्रिकेशन,
काष्ठशिल्प तसेच अनेक उपकरणे बनविण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही हे
खरेच ...स्वयंरोजगार म्हणजे काय याचाही प्रत्यय इथे यावा..
शकुंतला जी स्वतःच्या हाताने जरी अकार्यक्षम असली तरी पायाने शुभेच्छा पत्र बनविते.. तेही एका मनमुराद हास्यसह...
एक आजीबाई ज्या हाताला बोटे नसतानाही हाताने रस्त्यावरील पालापाचोळा उचलतात..
एक ढकल गाडी जी बाबासाहेब आमटेंच्या शेवटच्या काळात इथल्या रहिवाशांनी स्वतःच्या हाताने आणि निर्मळ प्रेमाने बनवली आहे
एका अंधत्व आलेल्या व्यक्तीने विणलेली रंगीत सतरंजी...
एका अंधत्व आलेल्या व्यक्तीने विणलेली रंगीत सतरंजी...
प्रकल्पाला भेट दिल्यावर आम्ही
आमटेंच्या समाधीकडे मार्गस्थ झालो.. श्रद्धावनात श्रद्धेय बाबासाहेब आमटे
सपत्नीक देहरूपाने विसावले आहेत.. आणि इथं वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्यातून काळ मागे टाकत अमर आहेत.
रात्रीच्या उत्कृष्ट जेवणानंतर सत्याने आम्ही आजच्या अनुभवातून काय घेतलंय या बाबतीत एक चर्चासत्र (session) घेतलं..
माझ्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या दोन session पैकी एक.. खरं सांगायचं
तर आजच्या अनुभवानंतर आम्ही निशब्द झालो होतो... पण आमच्या सत्रानंतर च्या
गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या..
फक्त डॉ.विकास आमटेंची भेट झाली नाही इतकीच हुरहूर घेऊन निद्रिस्त झालो...
हेमलकसा...
डॉ. प्रकाश आमटे यांच्या विषयी तसे
आपण खूप काही जाणतोच पण प्रत्यक्षात त्यांना भेटणे आणि त्यांच्या
प्रकल्पाला पाहणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नच!!
लोकबिरादरी प्रकल्प....
माडिया या आदिवासी जमातीसाठी
शून्यातून म्हणजे अक्षरशः जंगलात येऊन झोपडं बांधण्यापासून डॉ. प्रकाश आमटे
यांनी पत्नी डॉ. मंदा आपटे आणि सहकाऱ्यांसोबत उभारलेला वटवृक्षच!!!!
वर्षानुवर्षे खर्ची घालून आपल्या
वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे विकास आमटे आणि प्रकाश आमटे नावाप्रमाणेच
सामाजिक विकास घडवणारे आणि दुर्लक्षित पण समाजाचा भाग असणाऱ्या सजीव आणि
सहजीवांना प्रकाश दाखवणारे ठरलेत ... action speaks louder than words हे
यांच्या कार्यावरून उदाहरांसाहित स्पष्ट होते.
आज माडिया जमातीत डॉ. प्रकाश आमटेंची प्रतिमा देव हीच आहे.
इथे पुनर्प्रत्यय आला तो अन्नपूर्णा इथेही प्रसन्न आहे याचा.. पोहोचल्यावर
काही वेळातच आम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि आधी पोटोबा झाल्या
झाल्या विठोबांचं म्हणजे साक्षात डॉ. प्रकाश आमटेंचं लागलीच दर्शन झालं...
तेही सपत्नीक .....साधी राहणी आणि चेहऱ्यावर झळकणारी कार्याच्या
समाधानातून मिळालेली शांती.. उभयतांच्या दर्शनातच जाणवली.
शपथेवर सांगते... इतका निखळ आनंद कदाचित देवाने प्रकट होऊन दर्शन दिल्यावरही झाला नसता.!!!!
एका झाडाच्या सावलीत आम्ही त्यांच्याशी संवाद साधला .
अगदी आत्मीयतेने त्यांनी आम्हा
सर्वांची ओळख करून घेतली. आयुष्यातले मंतरलेले क्षण.. आम्ही विचारलेल्या
प्रश्नांची ते अगदी दिलखुलास गप्पा माराव्यात तशी उत्तरे देत होते...
"माडिया जमातीचे लोक मुंगळ्यांची
चटणी खरंच खातात का हो?? " या प्रश्नावर उत्तर म्हणून एका माडिया जमातीतील
उपस्थित इसमाने मुंगळ्यांची चटणी आमच्या समोर तोंडात घातली आणि हे पाहून
आम्ही आश्चर्याने बोटं तोंडात घातली
यावर डॉक्टर म्हणाले.. "इथं रोज
खायला मिळायची भ्रांन्त असल्याने जे पुढ्यात येईल ते खायचे असं यांचं
असायचं, त्यांना शेती कशी करावी ,व्यापार कसा करावा हे फारसं अवगत नव्हतं.
बरं त्यांची भाषाही वेगळी. त्यामुळे इतर लोक या भाबड्या माडियांना लुटायचे.
विड्या वळणे हे त्यांचे तेव्हा मुख्य काम असायचे कारण त्याची पानं इथे
मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. त्यात सुद्धा त्यांना फसविले जायचे"
आज हा माडिया समाज खूप काही
शिकलाय.. शेती, शिक्षण,व्यापार या सोबतच वैद्यकीय सेवा किती महत्वाची आहे
हे या निस्वार्थ मनाने सेवा करणाऱ्या देवदूताने त्यांना पटवून दिले तर आहेच
पण त्यांच्यापर्यंत तितक्याच कळकळीने पोहोचवलेही आहे.
जवळपास तासभर आम्ही त्यांच्याशी सुखसंवाद साधत होतो.
मनोमन भटकंती चे आभार मानून त्यांच्या पायाला स्पर्श केला.
आता वेळ होती ती आमटेंच्या आर्क ला भेट देण्याची.. इथे यतीशशी ओळख झाली..
नेगल ज्याच्या विषयीऎकलं होतं त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक झाड नेगल स्मृती म्हणून लावलंय.. लोकबिरादरी सारखंच तेही बहरलंय.
यानंतर आम्ही इथल्या शाळेला भेट दिली .. दहावी पर्यंत शाळा इथे शिकता येते.
शाळेत भोजनाची व्यवस्था आहेच तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहही बांधण्यात
आले आहे.
विस्तीर्ण पटांगणात अनेक मुले खेळताना दिसली. आश्चर्य वाटेल पण इथे
पुस्तकी ज्ञानाबरोबरच सोशल मीडिया चा वापर कसा करावा हेदेखील शिकवले जाते.
इथली धुरा आता प्रकाश आमटे यांचे सुपुत्र सांभाळतात असं कळलं... त्यांचा दिवस सकाळी 5 वाजता ओ पी डी ने सुरू होतो.
दिवसाची समाप्ती इथे झाली ती संगमावरच्या सूर्यास्ताने...
आणि आम्ही आमच्या राहण्याच्या खोल्यांकडे वळलो. काही वेळाने जेवणे आटोपली.
दुसऱ्या दिवशीचे
चर्चासत्र...माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे दुसरे session!!! यात जवळपास
सगळेच मनाने मोकळे झाले!!.. मला सत्याचा प्रश्न अजूनही लक्षात आहे. "
तुम्ही स्वतःला कोणत्या नैसर्गिक गोष्टीची उपमा द्याल आणि का. ??.. . "
यातून उलगडलेले सर्व प्रसंग मनात घर करून गेले.
सगळ्यांची मतं मांडून झाली तेव्हा
जवळपास 11:30 वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सोमनाथकरिता
निघायचे होते, त्यामुळे बहुतेक जणांनी आमचा निद्रिस्त होण्यासाठी निरोप
घेतला. उरले फक्त काहीच मी, विशू, धनंजय, भूषण, दुर्गेश आणि सत्या!!
आता 2-3 तासासाठी काय झोपायचे
त्यापेक्षा गप्पा मारू.. या हेतूने सुरू झालेला हा कोलाहल ... ... पण
session नंतर आम्ही बऱ्यापैकी मनाच्या दाराने मोकळे झालो होतो.. त्या तीन
तास रंगलेल्या गप्पा ही आयुष्यभराचा अनमोल ठेवा आहे... आणि ही सगळी मंडळी
आता माझी अगदी खास दोस्तमंडळी!!
साधारण 1 च्या सुमारास मी आणि
विशुने आन्हिके आटोपण्यास पहिला क्रमांक पटकावला .. दीड वाजता आमची जोडगोळी
तयार होती .. हळू हळू एक एक जण उठून तयार झाले आणि साधारण सकाळी 3:45
ला जवळपास ब्रम्हमुहूर्तावर आमची गाडी सोमनाथ च्या दिशेने रवाना झाली....
अर्धा तास उलटला असेल आणि अचानक गाडी बंद पडली!!
भामरागड च्या रस्त्यावर ऐन जंगलात
गाडीनं रामराम ठोकला होता... यावर ड्रायव्हर उत्तरला... "तरी मी विचार
करतोय की तीन दिवस झाले तरी टाकी फुल्ल का दिसतेय??"
खरं सांगते ... फुल्ल राग आला होता
ड्राइवर चा ... डिझेल संपल्यामुळे गाडी बंद पडलेली तीही भर नक्षलवादी
प्रदेशात!! आम्ही सारेच चिडीचूप !! बरंच टेन्शन आलं होतं !! खाली उतरावे
की नाही यावरच जवळपास 10 मिनिटे विचार विनिमय सुरू होता.. काजव्यांचा
लखलखाट आणि रातकिड्याचा सुरांशिवाय चिटपाखरूही दिसण्याची दूरवर अपेक्षा
नव्हती. दुग्धशर्करा योग म्हणजे कोणाच्याच फोनला रेंज नव्हती... जवळपास दहा
ते पंधरा मिनिटे अशीच उलटली आणि लक्षात आलं स्वानीच्या आईच्या मोबाईलला
रेंज मिळत होती.. डॉल्फिन ऐन वेळी मदतीला धावून आलं... आणि सत्या ने
हेमलकसा ला यतीश ला फोन लावला .. तेव्हा कळलं की ज्यांनी आम्हाला गाडी
पुरवली होती त्यांचीच तितकीच मोठी गाडी हेमलकसा ला दुसरा एक चमू घेऊन आली
होती. .. लगेच त्या गाडीच्या ड्रायव्हरला गाडी सकट बोलवून घेतलं !! एव्हाना
जवळ पास सकाळचे 5 :15 वाजले होते.. भराभर सामान दुसऱ्या गाडीत रेटलं आणि
आमच्या गाडीसाठी डिझेल आणायला कमीत कमी 8 वाजणार म्हणून पुन्हा हेमलकसा ला
परत आलो... डॉ. अनिकेत आमटे हॉस्पिटलमध्ये काम करताना दिसले..... हेमलकसा
चा दिवस कधीच सुरू झाला होता....
इतक्यात खबर आली की आम्ही दुसरी
गाडी घेऊन निघू शकतो .. कारण त्या चमुला निघायला बराच अवकाश होता आणि
तोपर्यंत डिझेल ची सोय आरामात होणार होती.
देव धावून आला असा विचार करत
गाडीकडे धावलो.. पुन्हा एकदा सोमनाथकडे धूम ठोकली... प्रवास जवळपास 6
तासांचा होता... कसे बसे 12:30 च्या दरम्यान सोमनाथ ला पोहोचलो..
इथे जरी आमटे कुटूंबीय राहत नसले
तरी इतर कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांनी सोमनाथ फुलवलंय, इथलं मुख्य आकर्षण
म्हणजे टाकाऊ टायर वापरून डॉ. विकास आमटेंनी घडविलेला पाणी अडविण्याचा
बंधारा!!
रेती, सिमेंट आणि प्लास्टिक चा
वापर भर म्हणून करण्यात आलेला आहे. इथे मानवनिर्मित अशी 17 तळी आहेत .
झाडांचीही लागवड पाणी अडुन राहील अशीच करण्यात आलेली आहे
अभियांत्रिकी शिक्षण जरी त्यांनी डॉक्टर आणि अभियांत्रिकी चा खर्च जमणार
नाही म्हणून सोडले असले तरी ते त्यांच्या रक्तात आहे याचा प्रत्यक्ष
अनुभव!!!
यापलीकडे इथे कुष्ठरोग्याचं
पुनर्वसन ही करण्यात आलेले आहे. त्यांची आपापसात परस्पर संमतीने लग्ने
लावून त्यांचा संसार थाटता येण्यासाठी घरेही बांधलेली आहेत .. इथली बरीचशी
कामे श्रमदानातून निर्मिती झालेली आहेत.
आमटे कुटूंबियांनी जे काही केलंय त्याचं मोजमाप करण्याची लायकी मज पामराची नाही..
त्यांच्या या कार्याची व्याप्तीमध्ये मोजदाद होणे नाही....
तिन्ही प्रकल्पांना भेट देऊन कृतकृत्य झालेले आम्ही.. परतीच्या वाटेला लागलो होतो...
तसं पाहता आम्ही बर्यापैकी उशिरा निघालो होतो.. सोमनाथ ते नागपूर अंतरही
जास्तच होतं .. पण ड्रायव्हर महाराज अगदी संथ गतीने बैलगाडी हाकत होते..
आणि गाडी फुत्कारणाऱ्या घोड्यांच्या वेगाने पळू लागली... गाडीला घोडे
जुंपले असते तर त्यांच्या तोंडाला फेस आला असता का माहीत नाही पण आमच्या
तोंडाला मात्र नक्कीच फेस आला होता... मध्ये एकदा गाडी तापून बंद पडली
(तेवढाच आमच्या सुटकेचा निश्वास) तेव्हा जवळपास अर्धा तास आम्ही थांबलो.
पुन्हा वाऱ्याच्या वेगाने नागपूर कडे निघालो..
सत्याच्या कृपेने वेळेच्या जरा आधी नागपुरात प्रवेश केला..
फक्त पंधरा मिनिटे काढून हल्दीराम च्या दुकानातून संत्राबर्फीच्या भेटी उचलल्या आणि तडक स्टेशन गाठलं..
" पळा पळा नाहीतर गाडी सुटेल सव्वाआठ झालेत आणि आठ वीस ची वेळ आहे " असं काहीतरी सत्या ओरडला
" पण गाडी तर आठ चाळीस ची आहे" कोणतरी उत्तरलं.
म्हणजे थोडा वेळ आहे तर .....असं म्हणत सत्या, भूषण, स्वानी आणि मी जेवणाची सोय करायला बाहेर पडलो.
जवळच खानावळ सापडली. टेस्ट करण्याच्या नावाखाली दोन चपात्या चौघात
हदडल्यानंतर आम्ही डबे भरायला घेतले.. गाडी सुटायला फक्त पाच मिनिटे बाकी
असताना आम्हीच भराभर पॅकिंग करून स्टेशनच्या दिशेने पळालो.
गाडीत पाय ठेवतो न ठेवतो तोच गाडी निघाली ..
हुश्श करत जागेवर बसलो आणि मिळालेली मेजवानी पोटभर उरकून घेतली.
या सगळया धांदलीत आम्ही गुपचुप केक आणला होता कारण दुसऱ्याच दिवशी धनंजय चा
वाढदिवस होता.. ,रात्री बारा वाजता बोगीत आगळ्या वेगळ्या प्रकारे धनंजय चा
वाढदिवस साजरा झाला...
४ दिवसाधी अनोळखी असलेले आम्ही आता जवळपास घट्ट विणलेल्या मैत्रीच्या
धाग्यात गुंतलो होतो.. सकाळी मुंबई ला पोहोचलो तेव्हा निरोप घेणे खरंच खूप
जड गेले...
यात सांगायच्या राहून गेलेल्या गोष्टी म्हणजे गाडीत केलेली धमाल ...,अगदी
पहिल्या दिवसापासून रंगलेल्या गाण्याच्या भेंड्या, कोण म्हणतं टक्का दिला
चा रंगलेला खेळ, पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मी, विशू,धनंजय स्वानी अनं
दुर्गेश ने न सोडलेली गाडीतली शेवटची सीट, धनंजयचा मिश्किल स्वभाव आणि
त्याने रंगवून सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, स्वानीच्या आईने आणलेले
रव्याचे लाडू, कोण निसर्गा कोण नंदिनी याचं न सुटणारे कोडे , भर जंगलात
गाडी बंद पडल्याने सगळ्यांची उडालेली घाबरगुंडी आणि सगळ्यात महत्त्वाचं
म्हणजे हे मंतरलेले चार दिवस!!
आज या देवदूतांच्या भेटीला वर्षपूर्ती होतेय
तोवर आयुष्य बरंच पुढे आलंय....
https://avatibhavti.blogspot.com/
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.