http://www.misalpav.com/node/25361
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व.
पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच.
महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक. प्राचीन (म्हणजे ४ शतकापासुन) ग्रीक आणि चिनी प्रवासवर्णनात महाबलिपुरम बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख येतो. पुर्वी केलेल्या उत्खननात चिनी आणि रोमन चलनी नाणी देखील सापडली आहेत. महाबलिपुरमचे नाव पुराणातल्या बळी राजावरुन पडलेले आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी महाबलिपुरम मध्ये सोन्याची ७ पुरे होती. त्यांची कीर्ती इतकी पसरली की महाबलिपुरम इंद्राच्या अमरावतीप्रमाणे संपन्न समजले जाऊ लागले. त्यामुळे इंद्राने सागराला महाबलिपुरम उद्ध्वस्त करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे महाबलिपुरमचे बरेचे वैभव सागराने गिळंकृत केले. काही गोपुरे पाण्याखाली गेली. पण विष्णुने बळीला दिलेल्या अभिवचनामुळे ते शहर संपुर्ण नष्ट होउ शकले नाही. १८ व्या शतकात विल्यम चेंबर्स नावाच्या एका गोर्या इतिहासकाराच्या टिप्पणानुसार तांब्याचे शिखर असलेले एक गोपुर १८ व्या शतकापर्यंत नक्की शिल्लक होते. महाबलिपुरम मधील समुद्रात बुडालेली काही मंदिरे अल्पशी दिसुन येतात.
महाबलिपुरमचे हे प्राचीन नाव ७ व्या शतकात राजा नरसिंह वर्मन च्या नावावरुन ममल्ल्पुरम असे केले गेले. नरसिंह वर्मन हा एक निष्णात योद्धा आणि कुस्तीवीर होता. त्याला महा मल्ल ही उपाधी देउन गौरवण्यात आले होते. त्याच्या या उपाधीमुळेच आधी या गावाचे नाव महा मल्ल पुरम आणि मग ममल्ल्पुरम असे पडले. सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असे हे बंदर एके काळी पालव राजघराण्याची राजधानी देखील होते.
माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे पालव किंवा पल्लव राजघराण्याचे मूळ थेट महाभारतातल्या द्रोणाचार्यांपर्यंत पोचते. पालव किंवा पल्लव राजघराण्याचा मूळ पुरुष पालव हा अश्वत्थाम्याचा मुलगा. महाभारतात मात्र अश्वत्थाम्याचे लग्न झाल्याचे अथवा त्याला कुठलीही संतती असल्याचे काही उल्लेख नाहित. पालव किंवा पल्लव या शब्दाचा अर्थ असे सुचवतो की पालव राजघराणे मूळचे दक्षिण भारतातले नसुन उत्तर भारतातले होते आणि नागांशी झालेल्या विवाहसंबंधातुन पालव राजघराणे दक्षिण भारतात विसावले आणि बहरले. सातवाहनांच्या पाडावानंतर आणि चोलांच्या घसरणीच्या काळात पालव राजघराणे प्रबळ झाले आणि दक्षिण भारतातले प्रमुख राजघराणे म्हणुन उदयास आले. साधारण याच सुमारास महाबलिपुरमचा सुवर्णकाळ होता.
पालव राजघराण्यातील नरसिंह वर्मन आणि जयसिंह वर्मन यांच्या कारकीर्दीत महाबलिपुरमची स्थापत्यकला आणि वास्तुकला कळसाला पोचली असावी असे मानण्यात येते. येथील वास्तुकला कुठल्याही एका शैलीशी बांधील नसुन अनेक शैलींचा सुरेख संगम आहे असे समजले जाते. जाणकार लोक अनुषंगाने भर घालतीलच.
या पहिल्या भागात आपण किनार्यावरच्या मंदिराची (Shore Temple) काही छायाचित्रे बघुयात. समुद्रालगतच्या या परिसरात ७ मंदिरे होती असे मानण्यात येते. त्यापैकी हे एकमेव उरले आहेत. बाकी ६ समुद्राच्या पोटात गडप झाली. इतिहासकारांच्या मते ती ६ मंदिरे ७ व्या वा ८ व्या शतकात कधीतरी समुद्रपातळी वाढल्यामुळे समुद्राच्या उदरात गडप झाली. तर पुराणांनी यालाच इंद्राच्या रोषाला बळी पडलेली मंदिरे म्हटले आहे. एक मात्र खरे की ही ७ मंदिरे एके काळी खलाशांना खुपच उपयोगी पडली आहेत. समुद्रात दुरवरुन ही सात मंदिरे आणि त्यांचे सोन्याचे कळस दिसुन यायचे आणि चमकायचे. त्यांचा खलाशांना दिशा ठरवण्यासाठी आणि जहाजे वळवण्यासाठी उपयोग व्हायचा.
आता एकच मंदिर उरलेले आहे. त्यातलादेखील काही भाग समुद्राच्या उदरात गडप झाला होता आणि २००४ च्या त्सुनामीपर्यंत तो भाग स्थानिकांना देखील ज्ञात नव्हता. २००४ च्या त्सुनामीचे पाणी मंदिरापर्यंत पोचले आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांता पाणी आटुन परत मूळ स्थानापेक्षा थोडे सूर गेले. त्यामुळे तोवर ज्ञात नसलेले एक मंदिर पाण्याबाहेर आले: हीच ती जागा हेच ते मंदिर :)
पल्लवकालीन स्थापत्यकलेची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. त्याकाळी या मंदिरातुन कांचीपुरमपर्यंत ५० किमी लांबीचा एक गुप्त भुयारी मार्ग काढण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोगही करण्यात यायचा.
मंदिराच्या प्रांगणात पल्लव राजघराण्याची मुद्रा असलेल्या सिंहाचे एक रेखीव शिल्पदेखील आहे. या सिंहाच्या उदरात दुर्गेचे शिल्प कोरण्यात आले आहे. स्थापत्यशास्त्रात मला अजिबात गती नाही. पण या शिल्पामध्ये चिनी स्थापत्यशास्त्राची झाक वाटली हे मात्र खरे. आता हे सिंह चिन्यांनी पल्लवांकडुन चोरले की पल्लवांनी चिन्यांकडुन की असे काही नसुन हा माझा भ्रमच आहे हे मात्र नाही सांगता येणार:
मंदिराच्या आवारातच अजुन एक छोटेसे शिल्प आहे. हे इतर वास्तुच्या मानाने थोड्या खालच्या बाजुला आहे. समुद्राकाठची रेती आत येउ नये म्हणुन याच्या चारी बाजुंनी भिंत बांधण्यात आली आहे. या शिल्पाच्या बाजुला एक वराह आहे जो विष्णुच्या वराह अवताराचे द्योतक आहे. हा वराह पृथ्वीला समुद्राच्या पाण्यापासुन वाचवतो आहे अशी कल्पना केलेली दिसते. वरील भुयार याच शिल्पाच्या बाजुला आहे.
मुख्य मंदिराचे ३ भाग करण्यात आलेले आहेत. त्यातील २ मंदिरे शंकराची असुन एक विष्णुचे आहे. एका मंदिरात शिव पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. हेच मुख्य मंदिर. याबद्दल २ प्रवाद असे आहेत की मंदिर शिव पार्वतीचे असुन शंकराच्या खांद्यावर कार्तिकेय आणि गणेश आहेत. तर दुसर्या मतप्रवाहानुसार दोने खांद्यांवर ब्रह्मा आणि विष्णु आहेत आणि हे शिल्प त्रिमुर्ती संकल्पनेचे आहे. पहिला प्रवाद जास्त पटतो मात्र. त्यात गणेशाचे शिल्प सोड आणि गजमुखाशिवाय आहे त्यामुळे शंकेला वाव उरतो. तर दुसरा मतप्रवाह मान्य केलास पार्वतीच्या शिल्पाचा संदर्भ कळत नाही. असे असुनही दुसरा युक्तिवाद सुद्धा मान्य करावासा वाटतो कारण पार्वतीच्या मांडीवर एक मूल दाखवले आहे. जर शंकराच्या खांद्यावर कार्तिकेय आणि गणेश आहेत असे मानले तर पार्वतीच्या मांडीवर कोण आहे ते कळत नाही. शिवाय शिल्पात शंकराच्या खांद्यावर असलेल्या २ व्यक्तींपैकी एक त्रिमुखी असल्याचा भास होतो. त्यावरुन ते ब्रह्माचे शिल्प मानले पाहिजे
आता काही मंदिराची छायाचित्रे:
******************************************************************************************************
क्रमशः
पुढच्या भागात पांडव रथ, अर्जुन शिल्प आणि इतर
ही महाबलीपुरमची मंदिरे भारतातील बहुधा सर्वात जुनी मंदिरे आहेत. वेरूळचे अद्वितीय कैलास लेणे बांधतांना निर्मात्यांपुढे महाबलिपुरमच्या मंदिरांचाच आदर्श होता असे म्हणतात म्हणूनच ह्या दोन मंदिरांमध्ये कमालीचे साध्यर्म दिसून येते. टिपिकल द्राविड शैली. कळसाचे बांधकाम सुद्धा महायान बौद्ध स्तूपांच्या छत्रांतून उत्क्रांत झाल्यासारखे दिसते.
ते शिवपार्वतीचे शिल्प म्हणतोस त्या मूर्तीला 'सोमास्कंद शिव मूर्ती' म्हणतात. म्हणजेच उमा आणि स्कंदासहित शिव.
पार्वती शेजारी बसलेली असून तिच्या मांडीवर लहानगा स्कंद आहे. पाठीमागे ब्रह्मा आणि विष्णू उभे आहेत (ते शिवाच्या खांद्यावर नाहीत) चतुर्मुखी ब्रह्मा (ह्याची नेहमी तीनच मुखे दृश्यमान असतात) आणि हातात गदा आणि शंख धारण केलेला विष्णू अगदी सहजच ओळखू येतोय.
बाकी पुढचा भाग लवकर येऊ देत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.