http://misalpav.com/node/27580
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं.
पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते. कायमस्वरुपी वस्तीला असलेली भिकार्यांची कुटुंबं, दूरुनच नुसत्या वासाने ओळखू येणारी प्रसाधनगृह, काय बोलताहेत हे कळू नये असे ध्वनीक्षेपक आणि रांगेत ताटकळत असणार्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करून गप्पा मारणारे कर्मचारी ह्या आठवणी आहेत. गॅरे दे लिऑन स्थानकात शिरल्याबरोबर समोरच आरक्षण कक्ष, तिकिटे विकत घ्यायचे कक्ष, पर्यटन माहिती केंद्र, प्रसाधन गृह आणि गाड्यांची स्थिती दर्शविणारे मुख्य इलेक्ट्रॉनिक फलक (इंडिकेटर्स) ह्यांची माहिती देणारे, नजरेत भरणारे, फलक पाहावयाला मिळतात. तुम्हाला जिथे जावयाचे असेल (स्थानकावर) तिथपर्यंत हे माहिती फलक तुमची साथ करतात. आरक्षणाचा फलक पाहात पाहात मी आरक्षण कचेरीच्या दाराशी पोहोचलो. माझा युरेल पास दाखवून तो कार्यान्वित करण्याची विनंती केल्यावर तिथल्या महिलेने (हो सर्व आरक्षण केंद्रांवर प्रवाशांच्या आरक्षण विषयक समस्या सोडविण्यासाठी महिलाच होत्या.) तात्काळ माझा पास कार्यान्वित करून दिला. मला स्विट्झर्लंडच्या 'ल्युझर्न' शहरी जायचं होतं. पण अति आत्मविश्वासाने किंवा कशाने असेल माझा गंतंव्य स्थानाचा उच्चार 'लुसान' असा झाला. बाईंनी मला आरक्षणाचे तिकीट हाती ठेवले. गाडी तासाभराने होती. बाहेर स्थानकावर येऊन मोकळ्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. विचार करीत होतो बरे झाले वेळेवर पोहोचलो. आरामात गोष्टी पार पाडता आल्या. उगा धावपळ झाली नाही. समोरच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर गाड्यांची नांवे, गंतव्य स्थान, वेळ आणि फलाट क्रमांक दाखवले होते. २० मिनिटे आधी फलाट क्रमांक दर्शविला जातो. आमच्या गाडीचा फलाट क्रमांक केंव्हा लागतो हे पाहात बसलो असताना एक लक्षात आलं मला जायचं होतं त्या शहराचं नांव आणि आरक्षण तिकिटावरील शहराचं नांव ह्यात किंचित फरक होता. मनांत शंकेची पाल चुकचुकली. पुढे जाऊन गोंधळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा त्या आरक्षण महिलेकडे गेलो आणि माझी शंका तिला बोलून दाखवली. तेंव्हा 'ही दोन वेगळी शहरं आहेत, तुम्हाला कोठे जायचे आहे?' असे तिने विचारल्यावर मी तिला माझ्या जवळील, माझ्या मित्राने दिलेले, माहिती पत्रक दाखविल्यावर तिने मला 'धीस इस 'ल्युझर्न', यू सेड 'लुसन'' असे म्हणून माझी चुक माझ्याच गळ्यात बांधली. तिची माफी मागून नवे आरक्षण मिळविले आणि परतलो. अजून २५ मिनिटे वाट पाहणे होते.
वेळेवर प्रवासाला सुरुवात झाली. डब्यात अवजड बॅगांसाठी वेगळे सामानकक्ष होते. तिथे आमच्या बॅगा ठेवून स्थानापन्न झालो. गाडी अत्यंत स्वच्छ, प्रशस्त होती. प्रवास अतिशय सुखाचा होता. रुळांचा खडखडाट नाही, जास्त हेलकावे नाहीत पण वेग प्रचंड होता. ह्याची तुलना भारतातल्या 'शताब्दी एक्स्प्रेस'शी होऊ शकेल. समोर टिव्हीच्या पडद्यावर पुढच्या स्थानकाचे नांव, आत्ताचा गाडीचा ताशी वेग, थोड्याफार त्यांच्या सोयी सुविधांची जाहिरात वगैरे चालू होते. स्विट्झर्लंडचे पहिले दर्शन बर्फाच्या अस्तित्वाने अधोरेखित झाले. गॅरे दे लिऑन ते बॅसल ते ल्युझर्न ते एंजलबर्ग असा प्रवास झाला. एंजलबर्गला आधीही एकदा भेट दिलेली असल्याने चालण्याफिरण्यात सराईतपणा होता. स्थानका बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्यास निवासाचा पत्ता दाखविल्याबरोबर त्याने 'माहित आहे' अशा अर्थी मान हलवून सामान त्याच्या टॅक्सीच्या सामानाच्या कप्प्यात ठेवले. फक्त पाचच मिनिटात आम्ही टेकडीवरच्या आमच्या निवासास पोहोचलो.
दुसर्या दिवशी उजाडल्यावर खिडकितून बाहेर पाहिलं आणि धन्य धन्य झालो. दूरवर डोंगराच्या शिखरापासून उतरणीपर्यंत पसरलेलं बर्फ थेट आमच्या निवासाच्या खिडकीपर्यंत आलं होतं.
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत. आता बर्फ एवढा हाताशी होता तर ते आकर्षण उरलं नाही. पण बर्फाच्छादित डोंगरांचं, निसर्गाचं नयनरम्य, विलोभनिय दृष्य मनांत साठवून गारगार वाटत होतं. असाच खिडकीतून बाहेरील चित्ताकर्षक देखावा पाहात पाहात नाश्ता उरकला आणि आम्ही माऊंट टिटलीसकडे निघालो.
हिवाळ्याचे हे दिवस म्हणजे स्किईंग करणार्यांसाठी मोठी पर्वणीच. त्यामुळे युरोपभरातून लोकं सहकुटुंब सहपरिवार स्किईंग करायला स्विट्झर्लंड्ला येतात. ह्या काळात येणार्या पर्यटकांमध्ये ९८ टक्के स्किईंगवाले आणि २ टक्के आमच्यासारखे नुसतेच निसर्गप्रेमी. त्यामुळे स्विट्झर्लंड खच्चून भरले होते. त्यामुळे निवासाच्या व्यवस्था महाग, जेवणखाण महाग आणि गर्दी असा देखावा होता. पण ह्याची कल्पना होतीच. 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' अनुभवायचाच हा अट्टाहास होता. जवळ जवळ दिड तास तिकिटासाठी आणि पाऊण तास विजेरी पाळण्याच्या रांगेत ताटकळल्यावर अखेर प्रतिक्षा संपली.
विजेरी पाळण्यातून माऊंट टिटलीस ह्या पर्वताच्या शिखराकडे जाताना खाली एंजलबर्ग खेड्याचे दृष्य फारच मनोहर दिसत होतं.
दूरवर दिसणार्या एंजलबर्ग खेड्याच्या आपण प्रेमात पडतोच पण एवढ्यात जाणवत आपल्या आजूबाजूला मस्त बर्फाळ गालीचा पसरला आहे आणि आपण वेड्यासारखे पाहतच राहतो.
आयुष्यात पहिल्यांदा जमिनीवर पसरलेलं बर्फ पाहिलं ते हिन्दी चित्रपटातच. अनेक अनेक वर्षं त्यावरच समाधान मानावं लागलं. कधीतरी असं बर्फच बर्फ स्वतः अनुभवायचं असं बर्फाळ स्वप्न पाहात तारूण्य सरलं. आज ह्या बर्फाच्या थंडगार कुशीत मन मोहरून गेलं.
माऊंट टिटलीसचे शिखर १०,००० फुट उंच आहे. म्हणजे कांही विशेष नाही. पण स्विस सरकारने त्याचे पर्यटकांच्या आकर्षणात फार चांगले रुपांतर केले आहे. शिखरावर पोहोचण्यासाठी विजेरी पाळणे, वरती पोहोचल्यावर उपहारगृह, भेटवस्तूंची दुकानं, बर्फाची गुहा अशा अनेक सुविधा आणि आकर्षणं सामान्य पर्यटकांसाठी तर स्किअर्ससाठी विशेष सुविधा आहेत. अनेक स्किअर्स युरोपातील विविध भागांमधून इथे सरावासाठी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी येत असतात. हौशी कुटुंबे ज्यांना स्किईंग येत नसतं पण ज्यांना आपल्या मुलांना स्किईंगचा आनंद द्यायचा असतो अशांसाठी ३ फुट व्यासाच्या टोपल्यांच्या आकाराचे प्लास्टिकचे टब भाड्याने मिळतात त्यात बसून मुलं आयुष्यातल्या पहिल्या स्किईंगचा आनंद घेताना दिसतात.
माऊंट टिटलीस इतकंच आकर्षण होतं ते इस्पिकचा एक्का ह्यांनी वर्णिलेल्या 'ग्लेशियर एक्स्प्रेस' ह्या पर्यटन विशेष गाडीचं. ग्लेशियर एक्स्प्रेस ही झरमॅट स्थानकावरून सकाळी ९ वाजता सुटणार होती. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही 'ताश' ह्या, झरमॅटच्या एक स्थानक अलिकडच्या, गावी पोहोचलो. निवासाची व्यवस्था इथेच होती. ती संध्याकाळ पुन्हा एकदा 'वांगी पित्झ्यावर' काढली. जास्त भूक नव्हती आणि शाकाहारी जेवणात फक्त वांगी पित्झाच उपलब्ध होता.
सकाळी ७-७.३० ला निवासस्थान सोडून आम्ही बाहेर पडलो. बाहेर सर्वत्र पुन्हा खच्च्चून बर्फ पसरलं होतं.
'ताश' स्थानकाबाहेरच जवळ जवळ कमरेइतका बर्फ (गेल्या कांही दिवसांत) जमला होता.
सूर्यकिरणांनी 'बर्फाच्छादित हिमशिखरे' नुकतीच चमकवायला सुरुवात केली आहे. एवढ्यात आमची टॅक्सी आली आणि आमचा प्रवास झरमॅट ह्या स्थानकाकडे सुरु झाला.
झरमॅट रेल्वे स्थानकावर हिन्दी भाषेतला हा फलक आपल्याला आश्चर्याचा गोड धक्का देतो.
ग्लेशियर एक्स्प्रेस ही एक्स्प्रेस असली तरी जगातील सर्वात धीम्यागतीने धावणारी एक्स्प्रेस आहे. झरमॅट ते सेंट मॉरीत्झ हे ३०० ३५० कि.मी. चं अंतर कापायला ८ तास लागतात.
ग्लेशियर एक्स्प्रेसच्या पॅनोरामा डब्यात छतापर्यंत पसरलेल्या खिडकित बसून, स्विट्झर्लंडच्या वाईनचा घोट घेत घेत, बाहेरील नयनरम्य दृष्य पाहात बसणं एक अविस्मरणिय अनुभव आहे. सोबत मधे मधे निवेदनाचे तुकडे त्या त्या स्थळाचा इतिहास, व्यापार, लोकवस्ती आदीची माहिती देत असतेच. हसत-खेळत, खात-पित ८ तास स्विट्झर्लंड 'पाहणं' चालत.
इथल्या रहिवाश्यांचेही कौतुक केले पाहिजे. एव्हढ्या बर्फात नित्यनेमाने आपली दिनःश्चर्या पारपाडायची म्हणजे कर्मकठीणच म्हणावे लागेल. साहेबाकडे रजेचा अर्ज टाकतानाही 'माझ्या सासुरवाडीस प्रचंड प्रमाणात बर्फ पडल्याने माझ्या सासूसासर्यांच्या चिंतेने ग्रासलेल्या सौंला तिच्या माहेरी सोडावयास जायचे आहे, तरी कृपया माझी २ दिवसांची रजा मंजूर करावी ही विनंती.' असा करीत असावेत. साहेबही रजा मंजूर केल्यावर '२ दिवसांनंतर 'बैठक जमवायची का?' अशी विचारणा करीत असतील कारण त्यांची बायकोही माहेरी गेलेली असणार. अतिपावसाने आपल्याकडे पाण्याचा पूर येतो तसा इथे बर्फाचा पूर येतो असे दिसत होते. निसर्गाची विविध रुपं पाहायला मिळतात. एकदा उन्हाळ्यात (स्विट्झर्लंडचा हो..) इथला हिरवागार निसर्ग पाहिला होता, आज बर्फाची साथ लाभून सुशोभित झालेली घरंदारं, हमरस्ते-गल्ल्या आणि दर्या-खोर्या पांढर्याशुभ्र झालेल्या पाहणं, निदान आपल्यासाठी तरी अचंबित करणारं असतं.
पुन्हा, सेंट मॉरित्झच्या अलिकडच्या स्थानकावर, सेलेरिनावर, आमचा ग्लेशियर एक्स्प्रेसचा प्रवास संपणार होता. म्हणजे एक्स्प्रेस शेवटच्या स्थानकापर्यंत, सेंट मॉरित्झपर्यंत जाते पण आमच्या निवासाची व्यवस्था सेलेरिना गावात होती. त्यामुळे आम्ही तिथे उतरलो. एका अद्भुत अनुभवानंतर देहाने निवासस्थानी पोहोचलो पण मन अजून मागेच रेंगाळत होते.
दुसर्या दिवशी म्युनिचला जायचे होते. 'निनाद मुक्काम पश्चिम जर्मनी' वाट पाहात होता. सकाळी ११ची गाडी पकडली. २ ठिकाणी गाड्या बदलून अखेर म्युनिचच्या गाडीत स्थानापन्न झालो. हुश्श...
आता वाट पाहायची जर्मनीच्या म्युनिच शहाराची.
आणखी एकदोन आयफेल टॉवरचेही..
थंडीने बर्फ झाला होता या ठिकाणी..
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.