Wednesday, June 28, 2023

ट्यूलिप्सच्या गावा..

 https://www.misalpav.com/node/7564

ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन! ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले! अनेकविध प्रकारचे ऑर्किड्स सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात.

आपल्या हिंदी चित्रपटांच्या कृपेने (यश चोप्रा आणि मंडळी) ही ट्यूलिप्सची शेतं आपण ८०च्या दशकातच पडद्यावर पाहिली आहेत.(हो ताटवे नव्हे चक्क शेतंच आहेत ती..) तीच प्रत्यक्षात पहायला मिळणार,नव्हे एक दिवस त्यांच्या सहवासात रहायला मिळणार या कल्पनेनेच मनातल्या मनात रंगोत्सव करून झाला,इंटरनेटवरील साईटवर चित्रे पाहून झाली,देखा एक ख्वाब...,ये कहाँ आ गये हम इ.इ. गाणी dvd वर चारसहा वेळा पाहून झाली.प्रथमच त्यातल्या अमिताभकडे दुर्लक्ष झाले आणि फक्त फुलांकडेच डोळे भरुन पाहिले. ट्यूलिप्सच्या भेटीलागी जीवा आस लागून राहिली होती.

सक्काळी नऊ वाजताच आम्ही हाग हून कॉकेनहॉफला पोहोचलो.वाटेत अनेक प्रकारची फूलं दिसत होतीच.वसंताला 'ऋतुराज' का म्हणतात? याचे प्रत्यक्ष उत्तरच वाटेवरच्या रस्त्यारस्त्यांवर मिळत होते.रंगीत फुलांच्या सुंदर सुंदर रांगोळ्याच जणू रस्त्याच्या दोबाजूला होत्या.मोठ्या मोठ्या वृक्षांवरती कोवळी कोवळी नवी पालवी होती‌. सगळी कडे एक सुखद उबदारपणा होता. गप्पा, गाणी,भेंड्या आपसूकच मंदावल्या आणि गाडीचा वेग ही कमी झाला.ट्यूलिप्सची शेतं आमच्या दृष्टीपथात आली होती. डोळ्यातच काय पण कॅमेर्‍याच्या डोळ्यातही तो रंगोत्सव माईना.'नयनसुख' चा अर्थ मला कॉकेनहॉफने सांगितला. खरोखरच आपण काही शब्द इतके वापरतो की वापरुन,वापरुन त्यातला अर्थ झिजून गुळगुळीत होतो, आणि त्याची खरी ओळखच होत नाही.

इथे मात्र मला,आम्हा सर्वांनाच वेगळी अनुभूती मिळाली. जिकडे पहावे तिकडे नजरेच्या टप्प्यात रंगीबेरंगी फुलेच फुले!एका ओळीत,एका रांगेत शिस्त्तीत वाढलेली,तरीही कृत्रिम वाटत नव्हती.मध्येच एखादे फूल वळण,वेलांटी घेत दुसर्‍या दिशेनेही गेले होते,पण ते या अखंडतेच्या सौंदर्यात भरच घालत होते. धरतीचा हिरवा शालू इथे रंगीत झाला होता. लाल,पिवळा,केशरी,जांभळा,पांढरा अशा ट्यूलिप्सच्या हजारो,लाख्खो फुलांचा कशिदा होता तो.तहानभूक सग्गळं काही हा रंगोत्सव भागवित होता.

याच बागेत जुनी पवनचक्की आहे ती आतून,बाहेरुन,वर चढून सर्व बाजूंनी पाहिली.'हॉलंड हा पवनचक्क्यांचा देश आहे' असे भूगोलाच्या पुस्तकातले वाक्य आठवणीतून वर तरंगत होतेच.वाटेत आम्हाला अनेक आधुनिक पवनचक्क्या दिसतही होत्या पण आम्हाला जायचे होते जुन्या पवनचक्क्या पहायला... पण ट्यूलिप्स आणि इतर फुलांच्या मोहात इतके मनापासून रमलो होतो.कमीतकमी ५,६ तास तरी ही बाग पहायला हवेतच.

या पवनचक्कीच्याच खालच्या बाजूला एक जण हॉलंडचे प्रसिद्ध लाकडी बूट करवतीने लाकूड कापून तयार करत होता ते पहायला आणि विकत घ्यायला बरीच गर्दी जमली होती.'युरो' प्रत्येक वेळी रुपयांत मोजला तर साधा पाव खाणं पण मुश्किल होईल!त्यामुळे युरोचे धर्मांतर न करताच ट्यूलिप्सचे कांदे खरेदी केले.(आता हे कांदे लागून माझ्या फ्रांकफुर्ट च्या गच्चीत ट्यूलिप्स येणार कधी?आणि मुळात येणार का? हे प्रश्न मला त्या उन्मनी की कायशा अवस्थेत पडले नाहीत.इतके ट्यूलिप्सचे संमोहन होते. नंतर त्या कांद्यांची फुले कधीच झाली नाहीत हा भाग अलाहिदा!)

आता पवनचक्क्या पहायच्या होत्या,आणि चीजचा कारखाना..युरोपातला प्रवास नेहमीच सुखकर असतो,वाहन कोणतेही असो.एकतर प्रदूषण कमी,घाण,कचरा नाही,रस्ते बिनखड्ड्यांचे! वाहन चालवायलाही सुख आणि आजूबाजूला पहायला सृष्टीचा खजिनाच. चीज म्युझियम,कारखाना आणि जुन्या पवनचक्क्या पाहण्यासाठी फुलांच्या राज्यातून नाइलाजानेच निघालो.

आणि काय सांगू? चित्र काढावे ना,तस्सा देखावा दिसायला लागला. जुन्या पद्धतीच्या पवनचक्क्या,सगळीकडे 'हरिततृणांच्या मखमालीचे गालिचे', रंगीबेरंगी तृणफूले,पाण्याचा खळखळाट करणारे झरे आणि मागे विस्तीर्ण जलाशयही!सगळी कडे स्तब्ध शांतता आणि त्या शांततेचा भंग करणारा पक्षांचा कलरव,मध्येच बदकांचे 'क्वॅक,क्वॅक' आणि हा निसर्गाचा देखावा आपल्या कागदावर चितारणार्‍या हौशी आणि पट्टीच्या कलाकारांची समाधी...आमचीही भावसमाधी लागू लागली.

चीजची आधुनिक फॅक्टरी आहेच आणि म्युझियमही आहे,पण तिथे पारंपारिक पद्धतीने गवळी,शेतकरी चीज कसे करतात हे सुद्धा पहायला मिळते.आणि ताज्या चीजचे असंख्य प्रकार चाखायलाही मिळतात. जुन्या पद्धतीच्या युरोपियन घरातच ही फॅक्टरी आहे.तिथे चीज तयार करणे चालू होतेच. ती एक मोठ्ठी प्रक्रिया आहे.आतल्या एका खोलीमध्ये चीजविक्री चालू होती.कुतुहलाने आम्ही पाहत होतो.smokecheese ला धुराचा वास येत होता. जिरे,मिरे,ऑलिव्हज,पाप्रिका(ढोबळी मिरची),पेप्रोनी (मिरची),लसूण,कांदा असे अनेक पदार्थ घालून वेगवेगळ्या प्रकारची चीज तिथे होती.(कॅलरींचा हिशेब चीजफार्मच्या बाहेरच ठेवून आत यावे,हेच खरे!)सकाळी नयनसुख झाले ,आता रसनासुख !

तिथेच एका ठिकाणी मला मेथीदाणे घातलेले चीज दिसले आणि मी उडालेच!कारण या लोकांना मेथी माहिती नाही.तिथल्याच एका चीजसुंदरीला विचारले तर ती म्हणाली ह्या बिया भारतातून येतात.'मेथी' मला अशी हॉलंडमध्ये चीजच्या आवरणात भेटेल असं वाटलंच नव्हतं.(एरवी मेथीकडे फारशा प्रेमाने न पहाणारी मी इथे आनंदून गेले होते)

तिथे आलेल्या इतर फिरंग्यांनाही मेथी माहिती नव्हतीच.fennugreek चे भारतीय नाव methi असे मी तिला लिहून दिले आणि ती पण This is methi cheese. असे येणार्‍या पाहुण्यांना सांगू लागली. चीजच्या मिश्र चवी तोंडात घोळवत आपापल्या पिशव्या जड करून आणि पैशाचे पाकीट हलके करुन आम्ही ऍमस्टरडॅम कडे निघालो.जाता जाता वाटेत डेन हेगजवळील समुद्रकिनार्‍यावर थोडा वेळ थांबलो.

हॉलंडचा स्वातंत्र्यदिन होता‌. सगळीकडे 'केशरी' प्रभाव दिसत होता. लोकांचे कपडे केशरी रंगाचे,केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे,पताका रस्तोरस्ती डोलत होत्या.रस्त्यांवर भरपूर केशरी गर्दी (मला तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचीच आठवण झाली!)समुद्रकिनारी तर जत्राच होती.विजेचे पाळणे,मेरी गो राउंड,एकीकडे डोंबार्‍याचे खेळ चालले होते,कुठे गाण्यांच्या तालावर तरुणाई डोलत,थिरकत होती.खुद्द ऍमस्टरडॅम शहरात सुद्धा काही वेगळे चित्र नव्हते.कालव्यांच्या या शहरातील सगळ्या कालव्यांमधून बोटी ओसंडून वहात होत्या‌. संगीताच्या तालावर आबालवृद्ध डोलत,नाचत होते‌. संध्याकाळ केव्हाच झाली होती,पण उन्हाळ्यात दिवस मोठा असतो.९ पर्यंत सूर्यप्रकाश असतो. हवेतही उबदारपणा असतो.त्यामुळे सगळीकडे केशरी आल्हाद दाटला होता.

मागच्या वेळच्या आठवणी जाग्या करीत आम्ही चक्कर मारत होतो. हा रस्ता स्टेडियम कडे जातो,ते बघ व्हॅन गॉग म्युझियम, हा तर डॅम स्क्वेअर इथून थोडे चालत गेले की मादाम तुसाँच्या बाहुल्या.आणि अरे याच्या पुढच्या चौकात तर ऍन फ्रँक हाउस! असे आमचे सारखे एकमेकांना सांगणे चालू होते.त्या स्मृती जागवण्यात मोठी गंमत होती.त्याच भारलया अवस्थेत असताना घड्याळाचे काटे परतीच्या प्रवासाकडे खुणावू लागले.

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...