मिपाकरांनो,
२०१४ च्या दिवाळीत मी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती केली. त्याचा संक्षिप्त व्रुत्तांत देत आहे.
सोलापुर एक निवांत शहर. महाराष्ट्र कर्नाट्क आणि आंध्र प्रदेशातील भारतीय येथे गुण्यागोविंदाने राहतात.
मला सोलापूरातील अर्थातच आवड्लेले ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मन्दिर.
विस्तीर्ण सरोवर आणि त्याच्या मध्यभागी वसलेले हे पवित्र शिवमंदिर अतिशय प्रेक्षणीय ठिकाण !
बाजूलाच सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे.
सोलापूर ला एक दिवस राहून मी तुळजापूरला महाराष्ट्राच्या कुलदेवतेचे तुळजाभवानी चे दर्शन घ्यायला गेलो.
त्यानंतर निवांत नळदुर्ग पाहिला.
दर्शन बारी मोठी असल्यामुळे मी तुळ्जापुरचे आणि पंढरपुरचे फोटो काढू शकलो नाही पण
सोलापूर आणि नळदुर्गचे फोटो काढले. डकवत आहे. तिसर्या दिवशी मी पंढरपूर विठोबाचे दर्शन घेतले.
नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात असून तुळजापूर पासून अगदी जवळ आहे. दर दहा मिनिटांनी तुळजापूर पासून नळदुर्गला बस आहेत.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला! बोरी नदीवर बांधलेला . मूळ किल्ला नळ राजाने बांधला . नंतर तो आदिलशाहने जिंकुन घेतला व पाणी महाल बांधला . किला विस्तीर्ण आणि प्रेक्षणीय आहे. पाणि महाल मधून धबधब्यासारखे पाणि कोसळताना दिसणारे दृश्य अप्रतिम असते (पावसाळ्यात)
संपूर्ण किल्ला बघण्यास इतिहासप्रेमींना १ संपूर्ण दिवस पण पुरत नाही . किल्ल्याचे बांधकाम बेसाल्ट खडक आणि मुरूम यांनी केले आहे.
प्रकाशचित्रे देत आहे.
माझे प्रकाश चित्र पण दिले आहे. मी महेश कुलकर्णी(४३.५) उर्फ शांतीप्रिय !

ह्या प्रांतात राष्ट्रकूट, चालुक्य आणि कलचुरींनी आळीपाळीने राज्य केले. तिन्ही राजवटींत नळराजाचा उल्लेख नाही. उपरोक्त फ़लकात दर्शवलेला नळ राजा पुराणांतल्या नल दमयंतीपैकी आहे काय?
मला तरी ह्या किल्ल्याची ही निर्मिती चालुक्य किंवा राष्ट्रकूटांनी केलेली वाटते.
मूळ किल्ला कल्याणी चालुक्यांनी बांधला. नळराजाने बांधला ही एक आख्यायिका आहे. जसे पांडवकालीन, शिवकालीन तसेच. बहामनी सुलतानांनी बाहेरची तटबंदी बांधली. किल्लाही बांधला. पण खरे बांधकाम इब्राहिम आदिलशहा (दुसरा) याच्या कारकीर्दीत झाले. बहामनी किल्ला आणि आदिलशाही किल्ला हे जवळजवळच आहेत. महाराष्ट्रातल्या भुईकोट किल्ल्यांतला हा सर्वांत सुंदर आणि सर्वात भव्य (कदाचित दौलताबादच्या खालोखाल) किल्ला आहे. बहामनी तटबंदी आणि बांधकाम तितकेसे सुस्थितीत नाही. पण आदिलशाही बांधकाम अजूनही व्यवस्थित आहे. किल्ल्याला तीन बाजूंनी ११५ बुरुज आहेत. त्यातला उपली बुरुज, नवबुरुज अतिशय भव्य आणि सुंदर आहेत. इब्राहिम आदिलशहा (दुसरा) हा एक विद्वान, कलाप्रिय, संगीतप्रिय आणि त्या काळच्या मानाने अत्यंत सहिष्णु राजा होता. त्याच्या कारकीर्दीत विजापुर तर बहरलेच पण इतरत्रही सुंदर बांधकामे उभी राहिली. नळदुर्गातला पानीमहल त्यातलाच. त्याच्याच कारकीर्दीत दक्खनी चित्रकला हा एक नवा प्रवाह चित्रकलेत निर्माण झाला. त्याने नवरसांवर पुस्तक लिहिले आहे. आदिलशाहीत मराठी हीसुद्धा (पर्शिअनबरोबर) दरबारी भाषा झाली. मुघलांची भाषा तुर्की होती तर आदिलशाहीत समृद्ध अशा फारसीला महत्त्व होते. स्वतः दुसर्या इब्राहिमला मराठी, संस्कृत, कन्नड, फारसी अशा अनेक भाषा येत होत्या. निजामशाहीबरोबर तह झाल्यानंतर शेजारून आक्रमणाचा धोका उरला नाही आणि किल्ल्याचा वापर दारूगोळा साठवण्यासाठी होऊ लागला. पुढे ब्रिटिशांच्या काळात कर्नल मेडोज़ टेलरने प्रांताची कचेरी नळदुर्गात हलवली आणि तो स्वतःसुद्धा त्यात राहायला गेला. दुर्गाच्या आर्किटेक्चरने तोही प्रभावित झाला होता. आपल्या आत्मवृत्तात त्याने त्याबद्दल लिहून ठेवले आहे. नळदुर्गाविषयी लिहावे तितके थोडे. बसाल्टचा पाषाण, जो स्थानावरच उपलब्ध होता, त्यात हा किल्ला बांधला आहे. (असे ऐकले होते की पाषाणाला फारसीमध्ये नळसदृश शब्द आहे. खरेखोटे माहीत नाही.) नळदुर्गाविषयी आणि दुसर्या इब्राहिमविषयी लिहावे तितके थोडे.
सुंदर आणि माहीतीपूर्ण प्रतिसाद राहीताई.
थोडेसे अॅडिशन जे मला नळदुर्गाच्या वास्तव्यात ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले त्यवरुन.
उपल्या हा बुरुज तटबंदीत नाही. तो जवळपास सेंटरला वॉच टॉवर प्रमाणे आहे. त्यावर तोफा असत. जवळपास १०० कीमी वर भुभाग त्यावरुन स्पष्ट दिसतो. नळ राजांसंदर्भात अनेक आख्यायिका एकायला मिळतात पण पुरावे नाहीत. खंडेरायाच्या कथेत या किल्ल्याचा उल्लेख आहे. इथे कैद असलेल्या एका सुभेदाराला/मांडलिकाला खंडेरायाने घोडा पाठवून सोडवले अशी कथा एकली आहे.
सध्या किल्ल्यात निजामशाहने वतने दिलेल्या मसजिदी आहेत. त्यांचे मौज्जन ताबा सोडत नाहीत. ते किल्ल्यातच राहतात. किल्ल्यात लाईट नाही. पिण्याचे पाणी पण खाली उतरुन आणतात.
नरमादी धबधबा आधी नैसर्गिकपणे बोरी नदीच्या प्रवाहाला वळण देऊन बांधलेला होता. आता त्यामध्ये धरण झाल्याने सांडव्यातून ओव्हरफ्लो झाला तरच नर मादी धबधब्यातून पाणी पडते. तीन चार वर्शात एकदा हा योग येतो.
एक धबधबा लवकर सुरु होतो. फोर्सफुली पडतो अन थांबतो. दुसरा धबधबा उशीरा सुरु होतो, शांतपणे पडत राहतो व बराच काळ टिकतो. (त्यांना नर मादी अशी नावे आहेत. कुठला नर अन मादी ते वर्तनावरुन ओळखावे अन्यथा अभिव्यक्तीचा धागा वाचावा)
होय. उपली बुरुज तटबंदीत नाही. चूक दुरुस्त केल्याबद्दल आभार. तो टेहेळणीसाठीच आहे. मात्र वरती अजूनही तोफा आहेत. वरून पाहिल्यास कितीतरी मोठा टापू नजरेच्या टप्प्यात येतो. मोठे विलक्षण दृश्य असते ते.
माझ्या प्रतिसादात आणखी एक चूक आहे. आदिलशाही आणि नगरच्या निज़ामशाहीत सलोखा होऊन अहमदनगरची राजकन्या चाँद बीबीचा इब्राहीम आदिलशहा पहिला याच्याशी विवाह झाल्यावर तात्पुरती शांतता नांदली हे खरे. पण पहिल्या इब्राहीमच्या मृत्यूनंतर विजापुर दरबारात तंटे बखेडे माजले. त्यातच अकबराने दख्खनी सुलतानांनी मुघलांचे आधिपत्य मान्य करावे असा हुकूम काढला. अर्थात तो दख्खनींना मान्य नव्हताच. मग मुरादचे सैन्य दख्खनवर चालून आले. चांदबीबीने गोवळकोंडा आणि विजापुर यांच्या संयुक्त सैन्य नळदुर्गात गोळा केले. कालांतराने नगरचे निज़ामशाही सैन्य देखील त्यात सामील झाले. पण मुघलांनी हे युद्ध जिंकले. (त्याही आधी नगर आणि गोवळकोंडा यांनी हातमिळवणी करून विजापुरवर हल्ला केला होता पण चांद्बीबीने मराठ्यांचे साह्य मागितले आणि संयुक्त फौजांना पराभूत केले.)
सांगायचे कारण, नळदुर्गाने पुष्कळ उलथापालथी, कट-कारस्थाने, सत्ताबदल पाहिले आहेत. नगरची निज़ामशाही नेस्तनाबूत होऊन हैदराबादेत वेगळी निज़ामशाही स्थापन झाली, तीही लयाला गेली, गोवळकोंडा गेले, विजापुर गेले पण या सगळ्याचा साक्षीदार नळदुर्ग मात्र अजूनही उभा आहे.
बहामनी राज्य आणि नंतरच्या पाच शाह्या याबद्दल मला वैयक्तिकरीत्या फार आकस किंवा शत्रुत्व वाटत नाही. उलट त्यांनी कला आणि संस्कृतीचा समंजस मिलाप घडवून आणला आणि त्यासाठी उत्तेजन दिले असेच वाटते. वेगवेगळे राजे, सरदारांतील लढाया ह्या इतिहासात कायमच दिसतात. या पाच शाह्यांतही त्या होत्या, पण सत्तासंपादन या नेहेमीच्या कारणासाठी होत्या. आदिलशाहीच्या काळात विजापुर हे विद्येचे माहेरघर बनून 'विद्यापुर' हे नाव सार्थ ठरले होते. (अर्थात हे सर्व जनरल आणि वैयक्तिक मत आहे.)
धरणाचा आपण केलेला उल्लेख आणखी एक शल्य भळभळतं करून गेला. इतर काही शहरे जलयुक्त, नौकाविहारयुक्त, कृत्रिम नदीकिनारेयुक्त अशी सुशोभित होत असताना नळदुर्गातले विद्यमान सौंदर्य वरच्या अंगाच्या धरणामुळे हिरावले गेले आहे. पण मराठवाड्याचे सध्याचे जलदुर्भिक्ष्य पाहाता विरोध करणेही कठिण आहे. फक्त एकच, सद्य परिस्थितीत नव्या धरणात पुरेसा पाणीसाठा जमणे कितपत शक्य आहे, आणि पुरेसे पाणी नसेल तर या नव्या धरणाचा उपयोग किती वर्षे होत राहील, आणि तो लाभ खर्या लाभेच्छुकांपर्यंत पोचेल की मध्येच उपश्याच्या मोटरींमधून उडून जाईल याविषयी मन साशंक होते.
हा किल्ला चालुक्यांनी बांधला ह्याला काही पुरावा आहे काय? म्हणजे एखाद्या शिलालेखातले अथवा ताम्रपटातले वर्णन?
ह्यावरून कंधारचा किल्ला हा राष्ट्रकूटांनी बांधलेला आहे ह्याची आठवण झाली. डॉ. ढवळीकरांनी लावलेल्या तिथल्या भव्य क्षेत्रपाळाच्या मूर्तीचा शोध प्रसिद्ध आहे.
खरे तर नळदुर्गविषयी नाही, पण चालुक्यांचे मांडलिक/हाताखाली असलेला कोणी नलराजा याने राष्ट्रकूटांचा पराभव पश्चिम चालुक्य तैलप दुसरा याच्या हातून झाल्या झाल्या हा बसवकल्याण (त्यावेळचा कल्याण) किल्ला इ.स. ९७३ मध्ये बांधला/बांधविला असा शिलालेख या किल्ल्यात आहे. म्हणजे चामुण्डरायाच्या कारकीर्दीत 'गङ्गराजें सुत्तालें करवियलें' असे काहीसे असावे. म्हणजे एक तर तैलप दुसरा याने नलराजाद्वारे कल्याण किल्ला बांधविला अथवा दुसरे म्हणजे नलराजाने तो स्वतः बांधला. हा नलराज म्हणजे नळदमयंती आख्यानातला नळ नव्हेच नव्हे.
जाता जाता : इब्राहीम आदिलशहा दुसरा याच्या कारकीर्दीत फरिश्ता या इतिहास/कथाकाराने आपल्या वृत्तांतात नलदमयंतीप्रेमाख्यान अगदी रंगवून सांगितले आहे. पण अर्थात त्याचा इथे काही संबंध नाही. मध्ये भरपूर कालान्तर आहे. नलराज/जा नावाचा कोणी होता हे सत्य. तो इ.स. ९७३ रोजी हयात होता हेही सत्य.
आणखी अप्रत्यक्ष पुरावा म्हणजे नळदुर्गातल्या इमारतींमधल्या एक दोन इमारतींमध्ये चालुक्य घडणीचे असावे असे वाटण्याजोगे काही घडीव पाषाण दिसतात असे एका चर्चेत ऐकले होते. पश्चिम चालुक्यांचे पुष्कळ शिलालेख आहेत. त्यांचे एकत्रीकरण कुठेतरी असणारच. पण माझा तेव्हढा अभ्यास नाही.
नळदुर्गाचे पूर्वीचे नाव बसवकल्याण (कल्याण) हे होते हे अजिबातच माहित नव्हते. ह नलराजा कल्याणीच्या चालुक्यांचा सामंत असावा.
सध्याचे बसवकल्याण गाव पुढे कर्नाटक हद्दीत आहे. आळंद पासून पुढे. बस नळदुर्गावरुन्च जातात.
माझीच चूक झाली. मी 'हा बसवकल्याण' असे लिहायला नको होते. घाईत प्रतिसाद तपासला नाही. बसवकल्याण हा वेगळाच किल्ला आहे आणि तो कल्याण (कल्याणी) या पश्चिम चालुक्यांच्या राजधानीच्या ठिकाणी आहे. याच स्थानी वीरशैवांचे गुरु बसवेश्वर जन्मले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बसवेश्वरांच्या सन्मानार्थ या शहराचे नाव बसवकल्याण असे बदलले गेले.
तरीही फारसा इतिहास बदलत नाही. कारण मग नळदुर्गातल्या शिलालेखातल्या उल्लेखामुळे हा किल्ला प्राचीन हे सिद्ध होतेच फ़क्त निर्मिती राष्ट्रकूट का चालुक्य यांची याबाबत थोडासा संदेह राहतो. कारण तैलप दुसरा हा मान्यखेतच्या राष्ट्रकूटांचा मांडलिक होता. त्याने राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणीच्या चालुक्य राजवटीची मुहूर्तमेढ रोवली.
तो शिलालेख बसवकल्याण किल्ल्यात आहे. तैलप दुसरा याने राष्ट्रकूटांचा पराभव करून चालुक्यांच्या सत्तेचा पाया घातल्यानंतर लगेच बसवकल्याण किल्ला बांधला गेला. म्हणजे बसवकल्याण किल्ला चालुक्यांचाच.
आणि माझ्या एका प्रतिसादात कदाचित ध्वनित झाले असेल तसे बिजापुरचे नाव विद्यापुर नव्हते. इब्राहीम दुसरा याला असे वाटत होते की बिजापुर हे विद्येचे माहेरघर व्हावे. तसे त्याने जाहीर वक्तव्यही केले होते. बिजापुर हे विजयपुर होते.
म्हणजे नळदुर्गाबाबत अजून गूढच आहे. नळदुर्ग निर्मात्याचा शोध घ्यायला आता चालुक्यांची सामंत घराणी अभ्यासावी लागतील.
बाकी विजापूर म्हणजे पूर्वीचे विजयपूरच. कल्याणीच्या चालुक्यांनीच विजयपूरचा पाया घातला.
वरच्या तुमच्या एका प्रतिसादातील आदिलशाही राजवटीच्या फारसी प्रेमामुळे ह्या दख्खनी राजवटी शिया पंथीय होत्या हे आठवले. मुघल आणि इतर ५ दख्खनी शाह्यांच्या संघर्षात ह्या शिया सुन्नी फरकाचा मोठा वाटा होता. पैकी इमादशाही आणि बेरीदशाही खूपच लवकर लयास गेली.
शिया-सुन्नी वैरभावामुळे विजापुर दरबारात सतत तंटे बखेडे असत. इतर शाह्यांपेक्षा आदिलशाहीत शियांचा प्रभाव अधिक होता आणि म्हणून बहुसंख्येने असलेल्या सुन्नींची नाराजीही अधिक.
सुदैवाने यावर जालावरसुद्धा भरपूर माहिती आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.