युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका किंवा अमेरिका या देशाबद्दल न ऐकलेला माणूस या पृथ्वीतलावर आढळणे कठीण आहे. जवळ जवळ प्रत्येकालाच या देशाचे सुप्त आकर्षण असते. अमेरिकेतील अतिप्रगत पायाभूत सुविधा, थक्क करून टाकणारी वैज्ञानिक प्रगती, आंतरराष्ट्रीय राजकारणात दादागिरी करणारे या देशाचे राजकारण, या देशातील मोकळे सामाजिक वातावरण, वैयक्तिक प्रगतीसाठी न संपणाऱ्या संधी व प्रगतीस पोषक असे वातावरण हि यादी न संपणारी आहे.अमेरिकेला माना अथवा न माना या देशाच्या प्रभावाने आपल्या सर्वांच्याच जगण्यावर परिणाम झालेला आहे. आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तूंपासून आपल्या करमणुकीच्या माध्यमांपर्यंत कुठलाही कोपरा अमेरिकेच्या प्रभावाखाली नाही असे म्हणता येणार नाही. अमेरिकेचे कौतुक करणारा असो वा जगातील प्रत्येक समस्येसाठी अमेरिकेला सतत दोष देणारा असो, अमेरिकेला भेट देण्याची संधी कुणीही नाकारणार नाही.अमेरिकेला भेट न देताही, चित्रपट व इतर माध्यमांद्वारे आपल्याला अमेरिकेबद्दल बरेच माहीत असते. तिथले रुंद रस्ते, वेगात धावणारी वाहने, सार्वजनिक शिस्त, पोलिसांचा कुशल कारभार, नाइट लाईफ वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष भेट दिल्यावर दिसणारी अमेरिका बरीच वेगळी वाटते. आपल्या देशाने केलेल्या जोरदार प्रगतीमुळे बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटेनासे झालेले आहे. पण तरीही अश्या अनेक साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या अमेरिकन समाजाकडून आपल्या समाजाने शिकायला हव्या. विशेषकरून सार्वजनिक ठिकाणांवरील शिस्तपूर्ण आचरण, सौजन्य, स्वच्छता इत्यादी. पण राहून राहून एक प्रश्न माझ्या मनात येतो की हा देश असा कसा महाबलाढ्य बनला, जगातील इतर नावाजलेल्या देशांपेक्षाही पुढे कसा गेला कारण फार नाही पण अडीचशे वर्षांपूर्वी देश अथवा संस्कृती म्हणून दखल घेण्याजोगे अस्तित्वही नव्हते. सुरुवातीला इंग्रज व पाठोपाठ इतर युरोपियन्स अन मग इतर देशातील लोक येतात काय अन हा देश घडतो अन असा घडतो की अलम दुनिया त्याला सलाम करेल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी करतोय अन मला जे उमजतंय ते आपल्यापुढे या लेखमालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये आपले सहकार्य फार मोलाचे आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------एका नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी इंग्लंडमधील साहसी दर्यावर्दींनी अटलांटिक महासागर ओलांडून एका भूमीवर पाऊल ठेवले. अन यातून एका राष्ट्राचा जन्म झाला जे पुढे जगाच्या हेव्याचा अन कौतुकाचा विषय बनले. पण तेथे स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मित्रांशी शत्रुत्व घ्यावे लागले. या नव्या राष्ट्राच्या रहिवाशांनी तत्कालीन महासत्तेविरुद्ध युद्ध छेडले जिची लष्करी ताकद जगात अभेद्य होती. व्यापाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी जहाजे भरून व्यापारी अन त्यांचे सवंगडी अटलांटिक महासागर पार करण्यास निघाले. मे १६१० म्हणजे कोलंबस ने अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवल्याच्या १२० वर्षांनंतरही हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. अश्याच एका जहाजावर जॉन रॉल्फ नावाचा एक खलाशी होता. २४ वर्षीय जॉन व्यवसायाने शेतकरी होता. अत्यंत महत्त्वाकांक्षी, आत्मनिर्भर अन द्रष्टा असलेला जॉन एक जन्मजात उद्योजक होता. आज ज्या प्रवासाला विमानाने केवळ ६ तास लागतात त्याच प्रवासाला त्या काळात दोन महिन्यांपेक्षाही अधिक वेळ लागायचा. त्या काळातील ७०% खलाशी प्रवासाला निघाल्यापासून वर्षभरातच दगावत असत. पण तरीही हि जोखीम नक्कीच आकर्षक होती कारण उत्तर अमेरिका हि अमर्यादित संधी देणारी भूमी होती. एक भूप्रदेश जो विपुल साधन संपत्तीने भरभरून होता. सर्वप्रथम बहुमूल्य अशी जमीन जी अर्ध्याहून अधिक घनदाट जंगलांनी व्यापली होती. अन त्या जमिनीवर ६ कोटींहून अधिक संख्येने असलेले बायसन प्राणी. अन त्याहून विशेष म्हणजे अमेरिकन जमिनीच्या पोटात सोने चांदी सारखे मौल्यवान धातू बऱ्याच प्रमाणात असल्याची वंदता होती. हे नवे रहिवासी सोन्याचा मोठा साठा मिळाल्याखेरीज थांबणार नव्हते.पण जॉन जेव्हा पूर्व किनाऱ्यावरील जेम्सटाउन वसाहतीवर पोचला तेव्हा त्याला तेथील परिस्थिती नरकाहूनही भयंकर वाटली. त्याच्यापूर्वी ५०० हून अधिक लोक तिथे पोचले होते त्यापैकी केवळ ६० जिवंत राहू शकले होते अन मरणाऱ्यांपैकी बहुतांश भूकबळी होते. जॉन रॉल्फ च्या आगमनापूर्वी जे वाचले ते जवळ असलेल्या घोड्यांचे मांस खाऊन एवढेच नव्हे तर चामड्याच्या वस्तू शिजवून त्यावर कशी बशी गुजराण करत होते. जगण्यासाठी करावी लागलेली अमानवी तडजोड म्हणजे एका माणसाने तर आपल्या गर्भवती असलेल्या बायकोला मारले व तिचे मांस खाण्याची तयारी करत असताना इतरांनी त्याला पकडले व या गुन्ह्यासाठी त्याला मृत्युदंड दिला. हि घटना जॉन येण्याच्या ३ महिन्यांपूर्वीची.
नव्याने आलेले ब्रिटिश स्थलांतरित या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. अन कष्टाची कामे करण्याची त्यांची तयारी नव्हती. सोबत मोठा अन्नसाठा आणण्याऐवजी त्यांनी सोने ओळखणाऱ्या रसायनांचा साठा आणला होता ज्याचा उपयोग सुरू करण्याइतकेही सोने त्यांना सापडू शकले नाही. अन हि भूमी त्यांच्यासाठी अजूनही परकीयच होती. जेम्सटाउन वसाहतीची उभारणी स्थानिक नेटिव्ह अमेरिकन्सच्या (Powhatans) साम्राज्याच्या मधोमध झालेली होती. अन्नासाठी तडफडणारे ६० रहिवासी जवळ जवळ २० हजार स्थानिकांनी वेढले गेले होते. नेटिव्ह्जकडे वेगाने वापरता येतील असे धनुष्यबाण होते. त्या तुलनेत ब्रिटिशांकडे असलेल्या बंदुका फारच वेळखाऊ होत्या. अन लौकरच दोहोंमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. या सर्व परिस्थितीमुळे नव्याने आलेल्या रहिवाशांपुढे जिवंत राहण्याच्या प्रयत्नांखेरीज करण्यासारखे काहीच नव्हते.जॉन रॉल्फ मात्र सर्वांहून वेगळा होता. तो येथे आल्यावर साधन संपत्ती लुटून पळून जाण्यासाठी आलेला नव्हता. त्याने बरोबर येताना तंबाखूचे बियाणे आणले होते. त्याने तंबाखूची लागवड सुरू केली. त्यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमध्ये तंबाखूचा प्रसार झाला होता. तत्कालीन तंबाखूंच्या बियाण्यांचा जागतिक व्यापार स्पॅनिश व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. थोड्याच कालावधीत जॉनने लावलेले तंबाखूचे पीक हाती आले. त्याने उत्पादित केलेल्या तंबाखूची आजची किंमत १ दशलक्ष डॉलर्स होते यावरून त्याच्या यशाची कल्पना करता येईल.अन या तंबाखूच्या जोरावर नव्या रहिवाशांनी नेटिव्हांशी मैत्री केली. जॉन रॉल्फने स्थानिक टोळीप्रमुखाच्या कन्येशी (Pocahontas) विवाह केला. साहसी व मुत्सद्दी असलेल्या Pocahontas ने १६०७ मध्ये कॅ. जॉन स्मिथ याचे प्राण वाचवले होते व रहिवाशांना काही वेळा अन्नधान्याची मदतही केली होती. लग्नानंतर काही वर्षांनी तिचे तैलचित्र इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाले. अन या वसाहतीला इंग्लंडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. शेक्सपिअरने त्याच्या नाटकातही वसाहतीचा उल्लेख केला. लंडनमधील मोठे गुंतवणूकदार वसाहतीमध्ये नव्या मोहिमांद्वारे गुंतवणूक करू लागले.
Pocahontas - पारंपारिक वेशात
जॉन व Pocahontas
Pocahontas व तिचा पुत्र थॉमसत्यानंतर दोनच वर्षांत वसाहतीतील प्रत्येकजण तंबाखूचे उत्पादन घेऊ लागला अन यामार्गेच जेम्सटाउन ची भरभराट झाली. अजून दोन वर्षांनी हजार नवे रहिवासी आले त्यांनी काही आफ्रिकन गुलामही बरोबर आणले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे जाऊन या गुलामांपैकी काहींनी तेथे जमीन पण खरेदी केली. पुढील ३० वर्षांत व्हर्जिनिया राज्यात बाहेरून आलेल्यांची संख्या वीस हजारांवर पोचली.तंबाखूच्या भरघोस उत्पादनामुळे या प्रदेशाची दखल संपूर्ण जगात घेतली जाऊ लागली. पुढील दीडशे वर्षे उत्तर अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या जिन्नसांमध्ये तंबाखू आघाडीवर होता.सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.क्रमशः
http://www.misalpav.com/node/22719
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया हा देश इंग्लंड स्कॉटीश तडीपार नागरीकांच्या वंशजांचा आहे.
असे नाही! हा फार मोठा गैरसमज आहे!!
फक्त तडीपारच लोक येथे आले नव्हते तर त्या बरोबर जहाजावरचे खलाशी, रंगारी, सुतार, लोहार, सरकारी नोकर, घोडे सांभाळणारे मोतद्दार, अनेक प्रकारचे सरकारी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, सोने शोधायला आलेले हरहुन्नरी लोक असे अनेक लोक येथे येऊन थडकले. त्याच सुमाराला पहिल्याच तुकडीत येथे पंजाबी भारतीयही इंग्रजांच्या सोबत आले. दुसर्या महायुद्धा नंतर येथे मॅसेडोनियन, ग्रीक आणि इटालियन आले.
त्यांच्याही आधी सुमारे १४व्या शतकापासून चीनी व्यापारी , ऑस्ट्रेलिया येथील मूलनिवासी लोकांशी व्यापार करतच होते. त्यांनाच येथील सोन्याचा शोध सर्वात आधी लागला.
ऑस्ट्रेलिया हा देश येथील मूलनिवासींचाच आहे. आणि त्याची ग्वाही प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाच्या आधी आणि शेवटी दिली जाते. त्या जमातीतील प्रमुख आणि पुर्वजांना स्मरूनच कार्यक्रम केले जातात. हे सर्व सरकारी कार्यक्रमांनाही लागू असते.
असो,
नोव्हेंबर १६२० - जॉन रॉल्फच्या आगमनाच्या १० वर्षांनंतर जेम्सटाउनच्या उत्तरेला स्थलांतरीतांचा एक नवा गट दाखल झाला. हे ठिकाण जेम्सटाउन वसाहतीपासून ४५० मैल उत्तरेला होते. या लोकांचा प्रवास इंग्लंडमधील प्लिमथ बंदरातून सुरू झाला असल्याने त्यांनी या जागेलाही प्लिमथ नाव दिले. जेम्सटाउनच्या रहिवाशांपेक्षा हे लोक बरेच वेगळे होते. ते वृत्तीने फार धार्मिक होते परंतु इंग्लंडमधील तत्कालीन धार्मिक व्यवस्थेमध्ये ते समाधानी नव्हते. या प्रवासासाठी त्यांनी वापरलेल्या जहाजाचे नाव होते मेफ्लॉवर.अटलांटिक महासागर पार करून नव्या भूमीकडे मार्गक्रमण करण्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे इंग्लंडमधील जाचक धार्मिक बंधनांपासून मुक्ती मिळवणे. यामुळेच या लोकांना पिल्ग्रिम्स असे संबोधले जाते. त्यांच्यापैकी एक - २४ वर्षीय एडवर्ड विन्स्लो. एडवर्ड व्यवसायाने एक प्रशिक्षणार्थी लेखनिक होता जो धार्मिक लेखन करीत असे. ऐन हिवाळ्यात समुद्रकिनाऱ्याजवळील जागेत नव्या वसाहतीच्या उभारणीचे काम सुरू झाले. थंडीचे दिवस असल्याने मुक्कामासाठी जहाजाचाच वापर केला जात होता. नव्या रहिवाशांच्या दुर्दैवाने त्यांचे आगमन त्या काळातल्या एका खरतड अश्या हिवाळ्यात झाले. सुरुवातीच्या काळात जरी मेफ्लॉवर जहाजावर मुक्कामाची सोय होती तरी मुळातर हे जहाज आकारमानाने लहान होते व त्यावरील सोयी सुविधाही अपुऱ्याच होत्या. नव्या रहिवाशांपैकी व जहाजांवरील खलाशांपैकी अनेक लोक रोगग्रस्त झाले व त्यापैकी बरेच मृत्युमुखी पडले.
प्लिमथ, इंग्लंड येथून निघताना मेफ्लॉवर जहाज
अटलांटिक महासागरात
एप्रिल १६२१ मध्ये नव्या रहिवाशांना वसाहतीवर सोडून मेफ्लॉवर जहाज इंग्लंडला परतले. त्यावेळी वसाहतीच्या उभारणीचे काम पूर्ण व्हायचे होते. स्थलांतरीतांची एकूण १९ कुटुंबे व पाळीव प्राणी ज्यांत शेळ्या, कोंबड्या व कुत्र्यांचा समावेश होता. त्यांच्याजवळील इतर साधन सामग्री म्हणजे चरखे, खुर्च्या, धार्मिक ग्रंथ, बंदुका इत्यादी.वसाहत उभारून झाल्यावर व हिवाळ्याचा जोर ओसरल्यावर नव्या रहिवाशांनी तेथील जमिनीवर लागवड करणे सुरू केले. पण त्यांच्या दुर्दैवाने समुद्रकिनाऱ्याशेजारील जमीन लागवडीसाठी अजिबातच उपयुक्त नव्हती. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढच्या काही महिन्यांत आणखी बरेच रहिवासी दगावले. विल्यम ब्रॅडफर्ड हा वसाहतीचा प्रमुख होता. एक वेळ तर अशी आली की अंगमेहनतीची कामे करण्यायोग्य केवळ ६ रहिवासी होते. मरण पावणाऱ्यांना पुरणे हि आणखी एक नित्यनेमाने करावी लागणारी कामगिरी होती.एडवर्ड विन्स्लोची पत्नी देखील मरण पावणाऱ्यांपैकी एक होती. काही महिन्यांनी एडवर्डने वसाहतीतील सुझाना व्हाईट या विधवेशी विवाह केला. तिचा पतीही वसाहतीवरच दगावला होता. भविष्यात या दांपत्याला ५ मुले झाली. आजच्या काळातील जवळ जवळ १०% अमेरिकन्सच्या वंशावळीची श्रूंखला मेफ्लॉवर जहाजावरून आलेल्या रहिवाशांपर्यंत पोचते.एडवर्ड विन्स्लोया भागात पोचणारे मेफ्लॉवर हे पहिलेच जहाज नव्हते. ५ वर्षांअगोदर एका दुसऱ्या जहाजाद्वारे काही युरोपियन लोक तेथे पोचले होते ज्यापैकी बहुतांश प्लेगने पीडित होते. अन त्या लोकांमुळेच तेथील स्थानिक नेटिव्ह्जनांही प्लेगची बाधा होवून असंख्य लोक मृत्युमुखी पडले. वाचलेले नेटिव्हज किनारपट्टीचा प्रदेश सोडून अंतर्गत भागात निघून गेले. हे स्थानिक लोक Pokanoket जमातीचे होते. प्लिमथ वसाहतीची उभारणी झाल्यावर ते पुन्हा या भूभागाकडे परत आले व नव्या रहिवाशांशी त्यांची गाठ पडली.नव्या रहिवाशांच्या सुदैवाने हे स्थानिक लोक आक्रमक नव्हते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री निर्माण होवून नव्या रहिवाशांना बरीच मदत होते. जसे तेथील जमिनीमध्ये लागवड करण्याच्या परिणामकारक पद्धती त्यांना कळल्या. उदा. मासळीचा वापर खत म्हणून करणे.पण या स्थानिकांना या मदतीच्या बदल्यात काही वेगळेच हवे होतो. प्रतिस्पर्धी जमातीच्या टोळ्यांचा काटा काढण्यासाठी त्यांना नव्या रहिवाशांची मदत हवी होती. अन त्यामागचे कारण म्हणजे रहिवाशांकडे असलेल्या बंदुका. पारंपरिक शस्त्रे वापरून दोन्ही बाजूंचे नुकसान होत असे त्यांमुळे बंदुकांच्या जोरावर त्यांना आपले पारडे जड करायचे होते.धार्मिक पगडा असलेल्या या रहिवाशांना लढाई वगैरेचा फारसा अनुभव नव्हता. शिकारीसाठी व स्वसंरक्षणासाठी ते बंदुका ठेवत. पण नव्या भूमीवर जम बसवायचा असेल तर अश्या तडजोडी करणे ओघाने आलेच. १४ ऑगस्ट १६२१ च्या मध्यरात्री प्रतिस्पर्धी जमातीच्या वसाहतीवर अचानक हल्ला केला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी प्रथमच आघात झाल्याने त्या जमातीच्या लोकांना काही कळलेच नाही की हा नेमका काय प्रकार आहे?त्यामुळे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे काही मेले व इतर जीव वाचवून पळून गेले. अन त्या भूभागात पिल्ग्रिम्स व Pokanoket यांच्या युतीच्या वर्चस्वाला आव्हान देणारे कुणीच उरले नाही. या मैत्रीचा दोन्ही बाजूंना बराच लाभ झाला पण दीर्घकालीन लाभ मात्र नव्या रहिवाशांचाच झाला.
नकाशात पिवळ्या रंगाने दर्शविलेला भूभाग म्हणजे तत्कालीन प्लिमथ वसाहत. उत्तरेला आजचे बोस्टन शहर आहे.
१६२१ च्या हिवाळ्याच्या सुरुवातीला हे यश साजरे करण्यासाठी एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले ज्यातून थँक्सगिव्हिंगच्या परंपरेची सुरुवात झाली जी आजतागायत थँक्सगिव्हिंग डे (नोव्हेंबर महिन्यातील चौथा गुरुवार) सुरू आहे.
पिल्ग्रिम्संनी Pokanoket ना दिलेली मेजवानी. उजव्या कोपऱ्यात एडवर्ड विन्स्लो
या स्थिर व भयमुक्त वातावरणामुळे उत्तर अमेरिकेमध्ये समृद्धीचे नवे पर्व सुरू झाले. जेम्सटाउन व प्लिमथ हि या समृद्धीची केंद्रे होती. या समृद्धीच्या वार्ता युरोपात पोचून नव्या स्थलांतरीतांचा ओघ अमेरिकेकडे सुरू झाला. स्थलांतर करणाऱ्या प्रत्येकाची वैयक्तिक कारणे वेगळी असली तरी अमेरिकन भूमीवर असलेल्या प्रगतीच्या संधी हे त्यामागे असलेले सर्वात मोठे आकर्षण.काहीच वर्षात प्लिमथ व जेम्सटाउन सारख्या ११ नव्या वसाहती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थापन झाल्या. जेम्सटाउन कडून दक्षिणेकडे शेतीव्यवसाय जोमाने पसरत गेला. इंग्रजांखेरीज आयरिश, जर्मन स्वीडिश लोकही मोठ्या संख्येने दिसू लागले. या सर्वांखेरीज डच स्थलांतरीतांनी अमेरिकन भूमीवर व्यापाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे केंद्र होते हडसन नदीच्या मुखाजवळील बेट ज्याला आज सर्व जग न्यूयॉर्क या नावाने ओळखते.वर्षामागून वर्षे गेली अन प्रगतीची नवी दारे उघडत गेली. अमेरिकन भूमीवरील नैसर्गिक संसाधने व तेथे नव्याने बनत असलेले मोकळे सामाजिक वातावरण यांसारख्या घटकांमुळे स्थलांतरीतांची आर्थिक व वैयक्तिक प्रगती होऊ लागली. युरोपात राहणाऱ्या त्यांच्या भाऊबंदांपेक्षा त्यांचे जीवनमान मोठे होऊ लागले व शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीतही बरीच प्रगती होऊ लागली. सुरुवातीच्या काळात हे लोक आपली युरोपियन ओळख सांगत पण प्रत्येक पिढीगणिक ती ओळख मागे पडू लागली व अमेरिकन अस्मिता जन्म घेऊ लागली.अवांतर -
- इंग्लिश स्थलांतरितांच्या मोठ्या संख्येमुळे व नव्या भूमीवर जम बसविण्यात त्यांनी मिळवलेल्या यशामूळे अमेरिकेच्या इशान्य भागातील सहा राज्यांच्या समुहाला न्यू इंग्लंड म्हणून ओळखले जाते.
- एकूण १३ वसाहती त्या काळात स्थापन झाल्या. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावरील १३ आडव्या पट्ट्या हे या १३ वसाहतींचे प्रतिक आहे. तसेच कोपऱ्यातल्या चौकोनातील ५० तारे हे ५० राज्यांचे प्रतिक आहेत.
सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.क्रमशः
१९ मे १७६८ - जॉन रॉल्फ नंतरची सातवी पिढी. बोस्टन शहर जागतिक व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनत चालले होते. तेथील बंदरातून अमेरिकन लाकडाची विक्रमी निर्यात होऊ लागली होती. युरोपियन जहाजबांधणी उद्योगांसाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले अमेरिकन लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले होते.
बोस्टनमध्ये सगळीकडे ब्रिटिशांचाच बोलबाला होता. ब्रिटिश सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी लिबर्टी नावाच्या जहाजावर अचानक धाड टाकली. या जहाजाचा मालक जॉन हॅनकॉक हा होता. जॉन हा त्या काळातला एक अतिश्रीमंत उद्योजक होता. त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी वाइनची १०० पिंपे लपवून ठेवलेली होती कारण त्यावरचे आयातशुल्क त्यांना भरायचे नव्हते. तत्कालीन परिस्थितीनुसार हा सरळ सरळ बंडखोरीचा एक उत्कृष्ट नमुना होता. अन हे बंड होते ५००० मैलांपलीकडे असणाऱ्या ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हॅनकॉकची सगळी जहाजे जप्त केली. अन बोस्टन शहरात ब्रिटिश सत्तेविरुद्ध हिंसक आंदोलन सुरू झाले. ज्या राजदरबारात किंवा संसदेत आमची बाजू मांडणारा कुणीच नसेल तर आम्ही त्यांचे आदेश व नियम का पाळायचे असा धडक सवाल तेथील जनतेचा होता. या सगळ्या गोष्टींची कुणकुण लागताच इंग्लंडहून चार हजार सैनिक पाठवले गेले. त्यांच्या गणवेशाच्या रंगामुळे त्यांना रेडकोट्स असे संबोधले जाई. लौकरच त्यांची बोस्टन शहरातील घनता चार नागरिकांसाठी १ एवढी बनली. म्हणजे शहर पूर्णपणे ब्रिटिश फौजेच्या ताब्यात गेले.
ऑक्टोबर १७६८ - बोस्टन त्या काळातील अमेरिकेचे सर्वात महत्त्वाचे बंदर होते. ब्रिटिश फौजांनी त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. बोस्टन बंदराच्या गोदीमध्ये दर वर्षी २०० मोठ्या जहाजांची निर्मिती होत असे. यामागचा महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकन भूमीवरील मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली वृक्षसंपदा. ब्रिटिश साम्राज्याला लागणाऱ्या जहाजांपैकी एक तृतियांश जहाजे वसाहतींद्वारे बनवली जात असत. कारण भौगोलिक मर्यादांमुळे इंग्लंडमध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या लाकडाची क्षमता कधीच संपली होती. तत्कालीन जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जहाजनिर्मिती व इमारतबांधणीसाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे स्थान होते जसे आज खनिज तेलाचे आहे.
बोस्टनसकट अमेरिकन भूमीवरील १३ वसाहती इंग्लंडच्या आर्थिक भरभराटीत अत्यंत मोलाची भूमिका पार पाडत होत्या. इंग्लंडच्या एकूण निर्यातीपैकी ४०% निर्यात वसाहतींना होत असे. इंग्लिश उद्योगांसाठी लागणारा बराचसा कच्चा माल वसाहतींवरून येत असे. अमेरिकन भूमीवर अंगमेहनतीची कामे करण्यासाठी आफ्रिकन गुलामांची मोठ्या प्रमाणात आयात केली जात असे. अठराव्या शतकात अडीच लक्षांहून अधिक आफ्रिकन गुलाम अमेरिकेत आणले गेले. हि संख्या स्वेच्छेने अमेरिकेत आलेल्या इतर स्थलांतरीतांपेक्षा कितीतरी अधिक होती.
या गुलामांपैकी बहुतांश दक्षिणेकडील भूभागांवर पसरलेल्या शेतीमध्ये काम करीत असत. याखेरीज मजूर म्हणून त्यांची विपुल उपलब्धता उत्तरेकडील वसाहतींकरिताही फार उपयोगाची होती. बोस्टनच्या लोकसंख्येमधील १०% लोक हे कृष्णवर्णीय गुलाम होते
बोस्टनमधला असंतोष दिवसेंदिवस वाढतच होता. पॉल रिव्हिअर - त्या काळातील बोस्टनमधला एक मोठा व्यापारी. त्याची चांदीच्या दागिन्यांच्या व्यापारात मोठी उलाढाल होती. पॉलने स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपला व्यापार उभारला होता. ब्रिटिश फौजांचा प्रमाणाबाहेरचा जाच त्याला सहन होईना.
जॉन हॅनकॉक
पॉल रिव्हिअर
५ मार्च १७७० - ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जाचक अटींमुळे अनेक लोक बेरोजगार झाले होते. व्यवस्थेविरुद्ध आत्यंतिक चीड असणारे अनेक लोक रस्त्यांवर उतरून उघडपणे प्रदर्शन करू लागले. बोस्टनच्या मध्यभागी असणाऱ्या एका चौकात ब्रिटिश सैनिकांशी त्यांची गाठ पडली. इशारे देऊनही आंदोलक मागे हटत नव्हते. आंदोलकांमध्ये एक १७ वर्षांचा युवक होता - एडवर्ड गॅरीक. जमाव हिंसक बनत चाललेला होता. जेव्हा जमावातील एका गटाने एका सैनिकाला एकटे गाठून त्यावर हल्ला केला तेव्हा ब्रिटिश सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यासाठी त्यांच्याकडे वरिष्ठांकडून मिळवलेली पूर्वपरवानगी नव्हती. तीन आंदोलक जागीच गतप्राण झाले व इतर दोघे नंतर मरण पावले. त्याखेरीज अनेक लोक जखमी झाले.
हि बातमी संपूर्ण वसाहतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली व लोकांच्या मनातील संतापाने नवी उंची गाठली. हेन्री पेल्हॅम नावाच्या चित्रकाराने हा प्रसंग एका चित्रात रेखाटला. त्या चित्राला शीर्षक होते 'द ब्लडी मॅसेकर' पॉल रिव्हिअरने ते चित्र धातूच्या पत्र्यावर कोरले व त्यावरून त्याच्या अनेक प्रती छापण्यात आल्या. त्याखेरीज बोस्टन गॅझेट नावाच्या नियतकालिकातही हे चित्र छापून आले. त्याद्वारे हि बातमी इतर वसाहतींपर्यंतही पोचली. त्या काळात जवळ जवळ ४० नियतकालिके सुरू झाली होती. बेंजामिन फ्रँकलीन हे टपालखात्याचे प्रमुख होते.
बोस्टन गॅझेट मध्ये छापून आलेले - 'द ब्लडी मॅसेकर'
वेगवान घोडेस्वारांच्या मदतीने टपालासोबत नियतकालिकांचेही वितरण दूरपर्यंत होत होते. ब्रिटिश शासनकर्त्यांच्या या माध्यमाचे उपद्रवमूल्य कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. या वेगवान टपाल व्यवस्थेमूळे कुठलीही बातमी इंग्लंडला पोचायच्या आत सर्व वसाहतींवर पोचलेली असे. या असंतोषाला लष्करी ताकदीने चिरडणे परवडणार नाही हे पाहून ब्रिटिश सत्तेने वसाहतीवरील अनेक कर कमी केले अपवाद चहावरील आयात कर.
१६ डिसेंबर १७७३ - वसाहतीतील जनतेचा रोष कमी झालेला असला तरी पूर्णपणे शमलेला नव्हता. त्या वर्षी ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याद्वारे चहावरील आयातकर अधिकच वाढला. या घटनेमुळे वसाहतवाल्यांच्या असंतोषाचा नव्याने भडका उडाला. या अन्यायकारी कराविरुद्ध आंदोलन करणारे आंदोलक बोस्टन बंदरात उभ्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर गेले ज्यातून चहा आयात करण्यात आला होता व त्यांनी चहाची अनेक खोकी बोस्टन बंदरातील खाडीत फेकून दिली. त्या फेकून दिलेल्या चहाची आजची किंमत जवळजवळ १ दशलक्ष डॉलर्स होते. हि घटना अमेरिकन स्वातंत्रलढ्यात दूरगामी परिणाम करणारी ठरली.
५० वर्षांनंतर त्या घटनेला 'बोस्टन टी पार्टी' असे नाव दिले गेले तरी त्या काळी 'द डिस्ट्रक्शन ऑफ टी' असे म्हंटले जात असे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटिश शासनकर्त्यांनी बोस्टन बंदराला टाळे ठोकले. या निर्णयाने अनेक लोक बेरोजगार झाले.
बोस्टन टी पार्टी
या असंतोषाचे केंद्रस्थान जरी बोस्टन असले तरी त्याचे लोण आतापर्यंत इतरत्रही चांगलेच पसरले होते. वसाहतींमधले अनेक रहिवासी पश्चिमेकडे स्थलांतर लागले होते. परंतु नेटिव्ह्जचे उच्चाटन होवू नये म्हणून ब्रिटिश शासनकर्त्यांनी या स्थलांतरांना मनाई केली होती. न्यू इंग्लंड च्या भागातील असंतुष्ट लोकांनी आता मोठ्या उठावाची तयारी सुरू केली. शस्त्रांची तस्करी करून जागोजाग त्यांची गुप्त भांडारे बनविली गेली.
५ सप्टेंबर १७७४ - ब्रिटिश शासनकर्त्यांचे निर्बंध झुगारून तेराही वसाहतींतील ५६ प्रतिनिधींची एक परिषद फिलाडेल्फिया येथे भरली. या परिषदेला 'फर्स्ट काँटिनेंटल काँग्रेस' असे म्हंटले जाते. अमेरिकन लोकशाहीच्या स्थापनेतील हि प्रथम पायरी होती. त्यामध्ये होते जॉन ऍडम्स, पॅट्रिक हेन्री अन व्हर्जिनियातील एक जमीनदार - जॉर्ज वॉशिंग्टन. या परिषदेतील अनेक प्रतिनिधींना यापुढे सशस्त्र उठाव दिसत असला तरी अजूनही काही जणांना ब्रिटिशांबरोबर शांततामय पद्धतीने वाटाघाटी करता येतील अशी आशा होती. पण सखोल चर्चेअंती परिषदेने ठराव मंजूर केला की ब्रिटिश शासनकर्त्यांचे कुठल्याही वसाहतींवरील लष्करी आक्रमण हे सर्व वसाहतींवरील आक्रमण समजले जाईल. वसाहतींमध्ये निर्माण झालेली एकात्मतेची भावना हे या परिषदेचे मोठे यश होते.
फर्स्ट काँटिनेंटल काँग्रेस
१७७५ चा वसंत ऋतू - मॅसेच्युसेटस मधील कॉंकॉर्ड या ठिकाणी आयझॅक डेव्हिस याने बंडखोर तरुणांना लष्करी धडे द्यायला सुरुवात केली. जर ब्रिटिशांकडून लष्करी हल्ला झालाच तर त्याला उत्तर द्यायला हे बंडखोर तयार होते. त्यांना लागणाऱ्या शस्त्रास्त्र व प्रशिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांकडून वर्गणीद्वारे जमा केला जात होता. हे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये शेतकरी, लोहार, सुतार, दुकानदार अश्या प्रकारची कामे करणाऱ्यांचा भरणा होता. त्याखेरीज गुलामगिरीच्या पाशांतून बाहेर पडलेले काही कृष्णवर्णीयही होते. बहुतांश तरुणांना शस्त्रे चालविण्याचा काहीही अनुभव नव्हता. हळू हळू अश्या अनेक तुकड्या वसाहतींच्या इतर भागात बनू लागल्या. मॅसेचुसेटसमधील १६ ते ५० वयोगटातील एक तृतियांश पुरुष कुठल्याही क्षणी सशस्त्र उठावात भाग घेऊ शकतील एवढी तयारी झाली.
१९ एप्रिल १७७५ - पुढे येऊ घालणाऱ्या लष्करी आव्हानाला वेळीच अटकाव करण्यासाठी ९०० ब्रिटिश सैनिकांची एक तुकडी बोस्टन मधून लेक्सिंग्टनकडे मध्यरात्री निघाली. बंडखोरांना अटक करायची व त्यांचा शस्त्रसाठा जप्त करायचा हे आदेश त्यांना मिळाले होते. पॉल रिव्हिअरला ही खबर लागताच त्याने वेगाने पुढे जाऊन बंडखोरांना सावध केले. पहाटे ५ वाजताच लेक्सिंग्टनबाहेरच्या जंगलात ६० शस्त्रसज्ज बंडखोरांची एक तुकडी सज्ज झाली. त्यांचे नेतृत्व जॉन पार्कर नावाचा एक शेतकरी करत होता. लौकरच त्यांची गाठ शस्त्रांनी व अनुभवांनी सुसज्ज असलेल्या शेकडो ब्रिटिश सैनिकांशी पडली.
लष्करी परिमाणांनुसार ब्रिटिश सैन्यापुढे बंडखोरांचा काहीच मुकाबला नव्हता. पण बंडखोरांसाठी ही चकमक म्हणजे जीवन मरणाची लढाई होती. सूर्योदय झाल्यावर लगेच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अपेक्षेप्रमाणेच ब्रिटिशांसमोर बंडखोरांचा निभाव लागू शकला नाही. काही मिनिटांतच ८ बंडखोर धारातीर्थी पडले व १० जखमी झाले. इतर जीव वाचवून जंगलात पळून गेले. ब्रिटिश सैन्याला लेक्सिंग्टन शहरामध्ये पोचायला सकाळचे ९ वाजले. वसाहतीतील ब्रिटिश सत्तेशी निष्ठावान असणाऱ्यांकडून त्यांना काही शस्त्रभांडारांबाबत माहिती मिळाली होती. परंतु तो शस्त्रसाठा तेथून हलविण्यात बंडखोर यशस्वी झाले होते.
लेक्सिंग्टनची लढाई
ब्रिटिश सैनिकांनी लेक्सिंग्टन शहराचे कसून छाननी केली. या वेळेचा उपयोग बंडखोरांनी या चकमकीबाबत बातमी पसरवण्यासाठी केला. दुपारपर्यंत जवळपासच्या भागांमधून हजारच्या आसपास बंडखोर काँकॉर्ड जवळच्या जंगलात जमा झाले. अगोदरच्या मध्यरात्रीपासून मोहिमेवर निघालेले ब्रिटिश सैनिक दमलेले होते. तशातच वरिष्ठांच्या आदेशामुळे त्यांना २० मैल लांब असणाऱ्या बोस्टनकडे कूच करावे लागले.
जंगलातील वाटेत असताना ब्रिटिश सैनिकांवर बंडखोरांच्या एका तुकडीने अचानक हल्ला केला. त्यात अनेक ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले व जखमी झाले. त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अनेक बंडखोरही धारातीर्थी पडले. त्यामध्ये आयझॅक डेव्हिसचाही समावेश होता. बंडखोरांच्या इतर तुकड्यांनीही ब्रिटिश सैनिकांवर जंगलातील वाटेत जागोजाग हल्ले केले. मरणाऱ्या ब्रिटिश सैनिकांची शस्त्रे त्यांच्या हाती लागली. बोस्टनला पोचेपर्यंत एक तृतियांश ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले होते किंवा जखमी झाले होते.
या लढाईमुळे बंडखोरांना चांगलाच आत्मविश्वास मिळाला. ताकदवान ब्रिटिश फौजेशी आपण दोन हात करू शकतो हि भावना पुढील लढायांसाठी प्रेरणादायी ठरली. याउलट ब्रिटिशांना यातून फारच मोठा धक्का बसला व त्यांनीही बंडखोरांच्या क्षमतेला कमी लेखणे बंद केले. सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.
अवांतर -
- जॉन हॅनकॉक यांच्या स्मरणार्थ डाऊनटाऊन शिकागोमधील एका उंच इमारतीला त्यांचे नाव (जॉन हॅनकॉक सेंटर) देण्यात आले आहे. हि इमारत १०० मजल्यांची आहे. पर्यटकांसाठी असलेल्या ९४ व्या मजल्यावरील ऑब्झर्वेशन डेकवरून शिकागो शहराचे, शेजारी असलेल्या नेव्ही पिअरचे अन विस्तीर्ण पसरलेल्या लेक मिशिगनचे अत्यंत विलोभनीय दृश्य दिसते.
- निर्णय-प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी Pro and Con ची पद्धत सर्वप्रथम बेंजामीन फ्रँकलीन यांनी मांडली जी आजही व्यापकरीत्या वापरली जाते.
व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.
१७७६ चे न्यूयॉर्क शहर - वीस हजार लोकसंख्या असलेले हे बेट, बऱ्याच कालावधीपासून बंडखोरांची छुप्या पद्धतीने तयारी सुरू होती. जुजबी पूर्वतयारी झाल्यावर न्यूयॉर्क बेटाच्या एका कोपऱ्यात एक लष्करी ठाणे स्थापन केले गेले. या बंडखोरांचा नेता होता जॉर्ज वॉशिंग्टन. त्याच्या नेतृत्वाखालीच बंडखोरांनी ब्रिटिश सैन्याला बॉस्टनमधून माघार घ्यायला लावली होती. एक वर्षाअगोदर वॉशिंग्टनला अमेरिकन बंडखोर सैन्याचा सरसेनापती म्हणून घोषित करण्यात आले होते.
जोसेफ प्लम्ब मार्टीन - हा न्युयॉर्कमधल्या बंडखोर सैन्याच्या तुकडीमध्ये होता. त्याने १५ व्या वर्षीच बंडखोर सैन्यात प्रवेश मिळवला होता. एका शेतकरी कुटुंबातला असला तरी त्याच्यासारख्या हजारो तरुणांप्रमाणेच तो स्वयंस्फूर्तीने बंडखोरांच्या सैन्यात सामील झाला होता.
२९ जून १७७६ - ब्रिटिश सैन्याची ४५ जहाजे न्यूयॉर्क बेटाजवळील स्टॅटन आयलंडवर दाखल झाली. या जहाजांवर त्या काळात जगात सर्वोत्तम समजले जाणारे ब्रिटिश सैन्य होते व जोडीला त्या काळातील अद्ययावत तोफा व दारुगोळा होता. त्या पाठोपाठ त्याच प्रकारची ३५० जहाजे अटलांटिक महासागरातून अमेरिकेच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. आपल्या शक्तिप्रदर्शनाद्वारे बंडखोर सैन्याला धडकी भरवून त्यांना शरण येण्यास भाग पाडण्याचा बेत ब्रिटिश सैन्यातील धुरिणांनी बनवला होता.
२ जुलै १७७६ स्थळ फिलाडेल्फिया - कॉंटिनेंटल काँग्रेसमधील १३ वसाहतींमधील ५० प्रतिनिधी एका तातडीच्या बैठकीसाठी जमले होते. यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन, जॉन ऍडम्स यांच्यासारखी जहालमतवादी माणसे होती. या बैठकीमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव चर्चिला जात होता तो पारित झाल्यास त्यावर ब्रिटिश सत्तेकडून देहान्त शासन हेच प्रत्युत्तर असणार होते. यावेळी बंडखोर सैन्याच्या बळाबद्दल शंका व्यक्त करणारेही काही सदस्य होतेच. परंतु त्यांचे प्रमाण पाचास एक असे होते.
अखेरीस ४ जुलै १७७६ रोजी या प्रतिनिधींनी जो ठराव पारित केला त्याने अमेरिकेचाच नाही तर संपूर्ण विश्वाचाच इतिहास बदलणार होता. तो ठराव होता द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडंस. अमेरिकन लोकशाही व्यवस्थेचा तो जन्म होता.
सर्व माणसे समान असल्याचा हक्क अन सुखी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा हक्क हे त्या काळातील क्रांतिकारी हक्क होते. स्वातंत्र्याच्या या घोषणेमुळे बंडखोर सैन्यामध्ये नवे चैतन्य पसरले.
१२ जुलै १७७६ - दोन ब्रिटिश जहाजांनी अचानक न्यूयॉर्क शहरावर तोफांचा मारा सुरू केला. ३२ हजार ब्रिटिश सैनिक मॅनहॅटन बेटावर पोचण्याच्या तयारीत होते. बंडखोरांची संख्या याच्या निम्म्याच्या जवळपास होती. दारुगोळा व शस्त्रास्त्रांच्या क्षमतेच्या बाबतीत ब्रिटिश सैन्य व बंडखोर सैन्य यांची तुलनाच होऊ शकत नव्हती. हा हल्ला न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात ९/११ घडेपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता.
१७ सप्टेंबर १७७६ - एक तास भर ब्रिटिश नौकांवरून जवळ जवळ अडीच हजार तोफा कीप्स बे वरून न्यूयॉर्क शहरावर आग ओकत होत्या. बंडखोर सैन्याच्या तुकड्यांची पुरेशी वाताहत झाल्यावर सुमारे ४ हजार ब्रिटिश सैनिक मॅनहटन बेटावर उतरले. त्यांचे युद्धात सहभागी होण्याच्या अनुभवाचे सरासरी प्रमाण हे अमेरिकन बंडखोर सैनिकाचा सहापट होते.
आपल्या सैन्याची होणारी वाताहत पाहून जॉर्ज वॉशिंग्टनने सैन्याला माघारीचे आदेश दिले. नेटिव्जच्या ज्या रस्त्याने ही माघार घेतली गेली तो रस्ता आज ब्रॉडवे म्हणून ओळखला जातो.
२० सप्टेंबर १७७६ - ब्रिटिश सैन्याने न्यूयॉर्क शहरावर ताबा मिळवला. शहरात जागोजागी आगी लावण्यात आल्या. दोन दिवसांत एक चतुर्थांश ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तीन हजारांहून अधिक बंडखोर सैनिक ब्रिटिश सैन्याच्या हाती पडले. त्यांना न्यूयॉर्क बंदरात नांगर टाकलेल्या ब्रिटिश बोटींच्या तळघरात साखळदंडांनी जखडून ठेवले जात असे. एचएमएस जर्सी (टोपणनाव Hale) ही यापैकी एक बोट होती. या तळघरांमध्ये घाणीचे व रोगराईचे साम्राज्य होते. जिवंत राहण्यास अत्यंत अवघड असे वातावरण असल्याने सरासरी १० पैकी ९ कैद्यांची सुटका मृत्यूनेच होत असे. बरेचदा मृतदेह दहा दिवसांपर्यंत तेथून काढले जात नसत. रॉबर्ट शेफिल्ड या युद्धकैदी पळून जाण्यात यशस्वी झाल्यामुळे युद्धकैद्यांना दिल्या जाणाऱ्या अमानवी वागणुकीची माहिती अमेरिकनांपर्यंत पोचली.
हे युद्ध संपेपर्यंत १२ हजार अमेरिकन युद्धकैदी ब्रिटिशांच्या कैदेत मृत्युमुखी पडले. ही संख्या प्रत्यक्ष युद्धातील कामी येणाऱ्या सैनिकांपेक्षा तिप्पट होती. न्यूयॉर्कमध्ये झालेला पराभव जॉर्ज वॉशिंग्टन यांचा सेनापती म्हणून झालेला पहिला पराभव होता. बंडखोर सैन्याची सगळी आशा आता किनाऱ्यापासून लांब असलेल्या अंतर्गत भागावर होती जो ब्रिटिश सैन्यास अनोळखी होता.
न्यूयॉर्कमधील लढाईच्या सहा महिन्यांनंतर उत्तरेकडील कॅनेडियन भूभागाकडून आठ हजार ब्रिटिश सैनिकांनी हडसन नदीच्या कडेने दक्षिणेकडे कूच केले. या सैन्याबरोबर जवळजवळ दोन हजार असैनिक व्यक्ती होत्या त्यात नोकरचाकर अन सैनिकांच्या पत्नी किंवा मैत्रिणींचा समावेश होता. सोबत रसदीच्या दोनशे घोडागाड्या होत्या. या सर्व भूभागावर वर्चस्व निर्माण करून न्यूयॉर्क शहरामधील ब्रिटिश सैन्यदलाबरोबर वसाहतींना दोन भूभागांमध्ये तोडण्याचा त्यांचा उद्देश होता.
त्यांच्या मार्गावर राहत असलेल्या सर्वसामान्य लोकांना त्याच्यांकडून जाच होत होता. या सैन्याबरोबर समोरासमोर दोन हात करण्याऐवजी जॉर्ज वॉशिंग्टनने गनिमी कावा वापरण्याची रणनीती वापरणे सुरू केले. या कामगिरीचे नेतृत्व कर्नल डॅनिअल मॉर्गन याने केले. त्याच्या नेतृत्वाखाली ५०० शार्पशुटर्स होते. त्यांच्याजवळ त्या काळाच्या तुलने अद्ययावत बंदुका होत्या ज्यांचे बॅरल ४० इंच लांब असायचे अन तरीही वजनाने फार जड नसायच्या. या बॅरलच्या आतल्या बाजूच्या रचनेमुळे छऱ्यांच्या आकारातील गोळीला स्वतःभोवती चक्राकार गती मिळत असे. यामुळे लांवच्या अंतरावरील लक्ष्य अचूकपणे टिपण्याची क्षमता वाढत असे. या बंदुकांचा पल्ला २५० यार्ड इतका होता.
या तुकडीची कार्यपद्धती - घनदाट जंगलात ब्रिटिश सैन्याच्या मार्गात मोठाले वृक्ष पाडून अडथळे निर्माण करायचे जेणेकरून त्यांचे मार्गक्रमण धिम्या गतीने होईल अन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्यांना टिपणे सोपे जाईल. ब्रिटिश सैन्याच्या दिमतीला काही नेटिव वाटाडे असत. मॉर्गनचे सैनिक सर्वप्रथम त्यांना टिपायचे. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू केले. हे तत्कालीन युद्धनियमांच्या विरुद्ध होते पण परिणामकारक होते. ही पद्धत अत्यंत परिणामकारक ठरली, दोन हजार ब्रिटिश सैनिक मारले गेले.
१७ ऑक्टोबर १७७७ ब्रिटिश सैन्याने शरणागती पत्करली. ही बातमी युरोपमध्ये पोचताच तत्कालीन फ्रेंच सरकारनेही अमेरिकेच्या बाजूने समुद्री युद्धात उतरून ब्रिटिश नौदलाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. पण आता वॉशिंग्टनच्या सैन्यासमोर नवेच आव्हान उभे ठाकले. ते म्हणजे हिवाळा. बंडखोरांच्या सैन्याची मोठी छावणी पेनसिल्वेनियातील व्हॅली फोर्ज येथे होती. हाडे गोठवणारी थंडी असूनसुद्धा ४० दिवसांत ९०० झोपड्यांची उभारणी केली गेली. एका झोपडीत डझनभर सैनिक राहू शकत. वॉशिंग्टनच्या सैन्याची संख्या १२ हजारांवर होती अन कॉंटिनेंटल काँग्रेसकडून त्यांना होणारा रसद पुरवठा त्यामानाने तुटपुंजा होता. अशा अवघड प्रसंगात वॉशिंग्टनचे नेतृत्व सुलाखून निघाले.
दुर्दैवाने आव्हानात्मक नैसर्गिक परिस्थितीमुळे सैनिक मोठ्या प्रमाणात आजारी पडू लागले. एक पंचमांश सैनिकांकडे बूटसुद्धा नव्हते. अन्नाची रसद अपुरी पडू लागल्यामुळे रोजचा आहारसुद्धा मर्यादित मिळू लागला. युद्धकाळात शिस्तीने लढत असले तरी हे सैन्य विविध प्रकारच्या लोकांनी बनलेले होते ज्यात गुन्हेगार, गुलाम आदींचाही समावेश होता. त्यांच्यात आता भांडणे उफाळून येऊ लागली. अशा सैनिकांना शिस्त लावण्यासाठी वॉशिंग्टनचे एकच आवाहन असायचे. तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर सैन्याचे नियम पाळावेच लागतील. त्याच्या नेतृत्वाच्या दराऱ्यामुळे बेशिस्त सैनिक शांत होत असत.
यावेळी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे या शिबिरात देवीची साथ पसरली. तिचे मूळ होते ब्रिटिशांच्या कैदेतून परतलेले काही सैनिक. अनेक पिढ्या युरोपपासून दूर राहिल्यामुळे अमेरिकेतील माणसांची रोगप्रतिकारशक्ती देवीच्या रोगाला सामोरे जाण्यास सक्षम नव्हती. देवीची लागण होणाऱ्या १० पैकी ४ सैनिक दगावत होते. जॉर्ज वॉशिंग्टन लहानपणी देवीच्या रोगातून बरा झालेला असल्याने त्याला त्याची लागण झाली नाही. या पूर्वानुभवाच्या जोरावर या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने एक जुगार खेळला. देवीची लागण झालेल्या सैनिकांच्या अंगावरील फोडांमधील पू सुदृढ सैनिकांच्या दंडावर सुरीने जखम करून त्यामध्ये सोडणे. जेणेकरून त्यांच्यामध्ये देवीबाबत प्रतिकार शक्ती निर्माण होईल.
सुदैवाने वॉशिंग्टनच्या या प्रयोगास यश मिळू लागले. परंतु यातही काही अपवाद होत. प्रयोग करण्यात येणाऱ्या दर पन्नास पैकी एक सैनिक देवीच्या रोगाला बळी पडत असे. तरी देखील काही आठवड्यांत ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली.
१७७८ - हिवाळा अन देवीची साथ या दोन आव्हानांना वॉशिंग्टनचे सैन्य पुरून उरले होते. यावेळी वॉशिंग्टनने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. Baron von Steuben या माजी प्रशियन सैन्याधिकाऱ्याला लष्करी प्रशिक्षक म्हणून नेमले. बॅरॉनने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवले. सैन्याला शस्त्रांची निगा राखायला शिकवले, नवे लष्करी डावपेच शिकवले जसे बंदुकीचा संगीन म्हणून दुहेरी वापर. छावणीच्या रचनेत सुधारणा करून स्वच्छता राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने या सैन्यासाठी प्रथमच मिलिटरी मॅन्युअल लिहिले. त्याची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे काही निवडक सैनिकांचा वेगळा गट स्थापून त्यांना आजच्या काळातल्या कमांडोंसारखे प्रशिक्षण दिले.
पेनसिल्वेनियात या घडामोडी घडत असतानाच वॉशिंग्टनचे गुप्तहेर न्यूयॉर्कमधील ब्रिटिश छावण्यांमधून गुप्त माहिती मिळवून वॉशिंग्टनपर्यंत पोचवत होते. याच दरम्यान फ्रेंच नौदलाच्या जहाजांचा काफिला रोड आयलंडजवळ पोचल्याची बातमी न्यूयॉर्कमधील ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागली. फ्रेंचांना आक्रमण करण्याची संधी देण्याऐवजी त्यांच्यावर समुद्रातच अचानक हल्ला करण्याचा बेत ब्रिटिशांनी बनवला. हि महत्त्वाची माहिती गुप्तहेरांद्वारे वॉशिंग्टनपर्यंत पोचली. ब्रिटिश आरमाराला न्यूयॉर्क बंदरातच थांबवण्यासाठी वॉशिंग्टन शेकडोंच्या संख्येने सैनिकांना न्यूयॉर्कच्या दिशेने पाठवले. या हालचाली पाहून ब्रिटिश आरमार न्यूयॉर्क बंदरातच थांबले अन फ्रेंच आरमार त्यांच्या आक्रमणापासून वाचले. वॉशिंग्टनची ही चाल एकूण युद्धाचे समीकरण बदलणारी ठरली.
१७ ऑक्टोबर १७८१ - ब्रिटिशांच्या अंदाजानुसार जे युद्ध ६ महिन्यांत संपायला हवे होते ते ६ वर्षे झाली तरी सुरूच होते. ब्रिटिश सैन्य मायदेशातून येणाऱ्या मदतीची वाट पाहून थकले होते अन प्रत्यक्ष ब्रिटनमध्ये या युद्धाविरोधात वातावरण निर्माण झाले होते.
वॉशिंग्टनने आपल्या सैन्याच्या मोठ्या गटाला व्हर्जिनियातील यॉर्कटाउन मध्ये ठाण मांडून बसलेल्या ब्रिटिश सैन्यावर चढाई करण्याचे आदेश दिले. युद्धशास्त्रात पारंगत झालेल्या या सैन्याने अपेक्षेप्रमाणेच ब्रिटिशांचा पराभव केला. यावेळी ब्रिटिशांनी अंतिम शरणागती स्वीकारली अन शांततेची बोलणी सुरू केली. ब्रिटिश साम्राज्यापासून युद्धाद्वारे स्वतंत्र होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश बनला. अर्थात याची मोठी किंमत मोजावी लागली. सुमारे २५ हजार अमेरिकन लोकांना या युद्धात प्राण गमवावे लागले.
३० एप्रिल १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनने अमेरिकेच्या नव्या राज्यघटनेनुसार अमेरिकेचा पहिला राष्ट्राधक्ष म्हणून शपथ घेतली.
सर्व चित्रे जालावरून साभार.
स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.
अवांतर - डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडंस चा मजकुर व ध्वनीफीत येथे उपलब्ध आहे.
क्रमशः
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.