मे महिन्याच्या पहिल्या लाँग विकांताला मित्र-परिवारासोबत चार दिवस कॅरावॅन हॉलिडे करुन आले. शेफिल्डपासून अडिच तासाच्या अंतरावर फिली म्हणून कॅरावॅन पार्क आहे तिथे असंख्य स्टॅटिक कॅरावॅन्स, टेंट्स, मोटरहोम्स पार्क करण्याची सुविधा आहे. तर चार दिवसाच्या मुक्कामात जवळपास काय प्रेक्षणीय स्थळे आहेत हे बघायचे ठरवले, जणेकरुन बाहेर फिरणं ही होईल आणि वॅनमध्ये वेळही घालवता येईल. फिलीपासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर स्कारबराह बीच आहे त्याचे नॉर्थ बे आणि साऊथ बे असे दोन बीचेस आहेत. तो आमचा आवडता बीच, अनेक वेळा तिथे गेलोय पण नवीन अजून काय बघायचे असे चालले होते. मग फिलीपासून साधारण ३० मिनिटाच्या अंतरावर फ्लॅमबराह नावाची जागा आहे जिथे लाईटहाऊस आणि फ्लॅमबराह हेड बघण्यासारखे आहे. आम्ही तिथे ह्या आधी ही गेलो होतो आणि ह्यावेळेसही जाणार होतोच कारण मैत्रीणीला तिच्या मुलांना लाईटहाऊस टुर करावयाची होती . मग असे ठरले की शुक्रवारी फिली पार्कमध्ये वेळ घालवायचा, शनीवारी व्हिटबी आणि स्कारबराह बीचवर टाईमपास, रविवारी आराम + मस्तं क्रिकेट, उनो खेळायचे, स्वीमींग करायचे आणि सोमवारी फ्लॅमबराह करुन घरी निघायचे.
ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळी आंघोळी, ब्रेकफास्ट आटोपून आम्ही व्हिटबीच्या दिशेने निघालो. साधारण ४० मिनिटाचा ड्राईव्ह होता . छान वळण- घाटच्या रस्त्यावरुन आम्ही निघालो. काही मिनिटातचं आम्हाला दुरून व्हिटबी अॅबी दिसू लागले.
दहा एक मिनिटात आम्ही अॅबीच्या कार-पार्कपाशी पोहोचलो. खरं तर नंतर लक्षात आले की अम्हाला अॅबीला जाण्यासाठी सुप्रसिद्ध १९९ स्टेप्सपाशी पोहोचायचे होते आणि तिथून मग आम्ही चढाई करून जाणार होतो , पण आमच्या नॅव्हिगेटरने पोस्ट-कोड टेकडी जवळपासचा सिलेक्ट केल्यामुळे आम्ही थेट टेकडीवरचं पोहोचलो. असो, तर गाड्या पार्क करुन आम्ही पुढे निघालो. ईस्ट क्लिफवरुन दिसणारे व्हिटबी शहराचे मोहक दृश्य अगदी सुरेख होते, उजव्या हाताला दिसणरं अॅबी ही खुणावत होतं. काही फोटो काढून आम्ही पुढे निघलो.
टेकडीवरून दिसणारे व्हिटबी.
टेकडीवरून दिसणारे व्हिटबी.
व्हिटबी अॅबी
विटबी हे गाव पुर्वीपासून मासेमारीसाठी ओळखले जाते. अॅस्क नदीच्या काठाशी वसलेलं नॉर्थ यॉर्कशायरमधील एक गाव आहे. तिकडचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच व्हिटबी अॅबी. सध्या ही अॅबी इंग्लिश हेरीटेजच्या देखरेखीत असल्यामुळे आत जाण्यासाठी तिकिट काढावे लागते. ती काढून आम्ही म्युझियममधून अॅबीकडे निघालो. बाहेर येताच भव्य अॅबीचे दर्शन होते, चहूबाजुंनी हिरवळ आणि मध्यभागी व्हिटबी अॅबी उभं आहे.
व्हिटबी अॅबीचा शोध ६५७AD मध्ये नॉर्थथम्ब्रियाचा राजा ऑस्वीने लावला. त्याकाळी विटबीला Streoneshalh ह्या नावाने ओळखले जाई. त्याने (Abbess) साध्वी हिल्डाला ह्या महामठाची संस्थापक म्हणून नेमले होते. साध्वी हिल्डा ही हार्टलीपूल अॅबीची वरिष्ठ होती. व्हिटबी अॅबी हे केल्ट जातीशी संबधीत दुहेरी मठ होते , तेथे अनेक संन्याशी, साध्वींचे वास्तव्य होते. केल्टीक चर्च हे ख्रिस्ती चर्चपासून वेगळे होते, त्यांच्या इईस्टरच्या तारखा ही वेगळ्या असत आणि केशवपनाची पद्धत ही वेगळी असे.
६६० च्या काळात स्थानिकवासियांना ठरवायचे होते की कुठल्या पद्धतीच्या रुढी, संस्कार पाळायचे म्हणून ६६४ मध्ये अनेक चर्चचे मुख्य अधिकारी व्हिटबीच्या समितीकडे गेले, समितीने त्यावेळी निर्णय दिला की ह्यापुढे नॉर्थथम्ब्रिया मध्ये रोमन रीती पाळल्या जातील.
६८० मध्ये साध्वी हिल्डाच्या मृत्युनंतर पुढच्या २०० वर्षानंतर म्हणजे ८६७-८७० दरम्यान वायकिंग्स हल्ल्यामुळे अॅबीची नासधूस होऊन ते ओसाड पडले, भकास वाटु लागले . १०६६ साली काही पाद्रींनी ज्यांना Prestebi म्ह्णून ओळखले जाई त्यांनी अॅबीचा अगदी लहान प्रमाणात जीर्णोद्धार केला.
व्हिटबी हे Caedmon ह्या इंगलिश महान कवीचे निवासस्थान होते.
माजी सैनिक, रेनफ्रिड जो संन्यासी झाला होता त्याने ह्या अॅबीचे पुनःनिर्माण करायचे ठरवले. १५४० च्या काळात हेनरी दि एट्थ, ज्याचे अॅन बोएलेनशी लग्न झाले होते, तो चर्च ऑफ इंग्लंडचा मुख्य होता आणि त्यानी सगळी मठं बंद केली त्यात व्हिटबी अॅबीही होते. १४-१५ व्या शतकात ह्या चर्चची पुनर्बांधणी केली गेली. एक भव्य दिव्य रस्ता होता त्याला स्वतंत्र आखाती बांधल्या गेल्या. सात चॅपल्स बाधंले गेले, प्रत्येकी एक अल्टार होते. डिसेंबर १९१४ मध्ये अॅबीवर जर्मन युद्धनौकेच्या हल्ल्यमुळे खूप नुकसान झाले.
काही थडगी अॅबीच्या आवारात असलेली.
व्हिटबी अॅबी अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे ड्रॅक्युला.
होय, ड्रॅक्युला ह्या पुस्तकाचे लेखक ब्रॅम स्टोकर आयरलँंडवरून
इंग्लंड-व्हिटबीला सुट्टीसाठी आले तेव्हा त्यांनी ह्या अॅबीनं प्रभावित
होऊन ड्रॅक्युला लिहिलं. अॅबीकडे जाणार्या १९९ पायर्या आहेत, पुस्तकात
लिहिल्याप्रमाणे जेव्हा ड्रॅक्युलाची बोट किनार्याला येऊन आदळते तेव्हा
त्यातून काळा कुत्रा बाहेर येऊन पळत सुटतो आणि थेट १९९ पायर्या चढून वर
जातो, त्याच ह्या पायर्या.
१९९ स्टेप्स - छायाचित्र आंजावरुन साभार
व्हिटबी अॅबीला गॉथीक अॅबी म्हणूनही ओळखले जाते आणि व्हिटबीला गॉथ कॅपिटल ऑफ ब्रिटन. जवळपास सेंट मेरी कबरस्थान / स्मशानभूमी आहे जिथे ड्रॅक्युलाने आपल्या पहिल्या व्हिक्टमचा चावा घेऊन रक्त शोषले होते असे म्हणतात.
एकंदरीत हा अनुभव खूपचं उत्कंठापूर्ण होता, अॅबीबद्दल बरीच माहिती मिळाली होती. आमचे १९९ स्टेप्स चढायचे राहून गेले बट देअर इज ऑल्वेज नेक्स्ट टाईम :)
अॅबीतून बाहेर येऊन तिकडची आठवण म्हणून काहीतरी वस्तू घेऊया ठरवले, अनेक ड्रॅक्युलाचे चित्र असलेले मग्ज, स्कार्फ, ब्लड टॉनिक कॉर्डीयल, की चेन्स, पुस्तकं होती. काही वर्षांपूर्वी ड्रॅक्युला पुस्तकचे पीडिएफ वाचले होते मग लगेच सोव्हेनियर म्हणून आणि संग्रहित राहिल म्हणून पुस्तकचं विकत घेतले :)
वातावरण ही गार होतं आणि सगळ्यांना भुका ही लागल्या होत्या म्हणून आवारातचं असलेल्या टी-रुम मधे मस्तं व्हेज पनीनी, व्हेज लजानियावर झक्कास ताव मारला :)
व्हेज पनीनी
व्हेज लजानिया
भरपूर फोटो, एक मस्तं दिवस, छान आठवणी घेऊन अॅबीला टाटा करुन आमची गाडी स्कारबराह बीचच्या दिशेने निघाली. एक अविस्मर्णिय, विलक्षण अनुभव देणारा दिवस गेला होता.
स्टॅटिक कॅरावॅन होती रे, त्याबद्दल काय लिहू? म्हणजे ६ स्लिपर्स किंवा ८ स्लिपर्सची असते. आत १ डबल बेडरुम, १ टिव्न रुम आणि लिंव्हिंग रुममध्ये २ पुल-आऊट डबल बेड्स असतात, काही व्हॅनमध्ये दोन बाथरुम्स असतात, बेसिक गोष्टि उपल्ब्ध असलेले किचन आहे (गॅस, फ्रिज, मायक्रोवेव्ह, भांडी, प्लेट्स, टोस्टर वगैरे). आपल्या कॅरावॅन समोर छोटेसे आवार आहे जिथे तुम्ही बार्बेक्यु करु शकता, खेळू शकता. एकंदरीत त्यात राहण्याचा अनुभव खासचं असतो. मोठ्या पार्कमधे सर्वत्र कॅरावॅन्स, मोटरहोम्स (लोकं आप-आपली घेऊन येतात), टेंट्स असतात. जे लोकं टेंट्समध्ये राहतात त्यांच्यासाठी पार्कमध्ये कॉमन बाथरुम / टॉयलेट्सची सुविधा असते. दुर टेकडीवर हे पार्क आणि खाली समुद्र. आवारात लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड आहे, सर्वांसाठी स्वीमिंग-पूल असतं, गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी एक सुपर मार्केट आहे, फिश अँड चिप्स, पब असेही आहे. जवळचं पेट्रोलपंप आहे.
रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे, एखाद रेफ्रेशींग चेंज म्हणून मला ही हॉलिडे फार आवडते :)
काही फोटो देते जे गेल्यावर्षी आणि ह्या वर्षी काढलेले.
कॅरावॅन पार्क
कॅरावॅन पार्क
डबल बेडरुम
ट्विन बेडरुम
शॉवर-रुम
लिव्हिंग रुम
लिव्हिंग रुम
किचन
राणीच्या देशातील बरीच सुप्रसिद्ध ठिकाणं आपल्याला माहित आहेतच पण अशी ही काही प्रेक्षणीय स्थळं आहेत जी फारशी कुणाला माहित नाही किंवा त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. जशी जशी स्थानिक ठिकाणं फिरण्याचा अनुभव घेऊ तसे तसे किंवा इतर अंतर्गत ठिकाणांबाबत माहिती ह्या लेखमालेच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. पहिला भाग हा धरुन पुढच्या भागाची, नव्या जागेची माहिती देण्यास सुरुवात करतेय.
कॅरावॅन हॉलिडेला गेलो असता गेल्या वर्षी आणि ह्या ही वर्षी फ्लॅमबराहला जाणे झाले. स़काळी ब्रेकफास्ट आटपून आम्ही चेक-आऊट केले आणि थेट निघालो फ्लॅमबराहला. स्कारबराह वरुन ए १६५ आणि बी १२२९ वरुन साधारण ४० मिनिटाचा ड्राईव्ह करुन आम्ही फ्लॅमबराहला पोहचलो. फ्लॅमबराह पूर्व यॉर्कशायर मधले, ब्रिडलिंग्टन सिटी सेंटर पासून चार माईल्सच्या अंतरावर वसलेले छोटेखानी पारिश गाव आहे. येथील मुख्य प्रेक्षणीय स्थळं म्हण्जे फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड. तेथे पोहोचताच गाडी पार्क करुन आम्ही सरळ लाईट-हाऊसपाशी गेलो. थोड्याच वेळात टुर सुरु होणार असे आम्हाला सांगितले गेले. लाईट-हाऊसच्या आत जाण्यासाठी गाईडेड टूर घ्यावी लागते व तिकिटाचे दर ही £ ३.८० असे आहेत.
फ्लॅमबराह गावात, नवं लाईट-हाऊस व फ्लॅमबराह हेड बघायला जात असताना रस्त्याच्या कडेला आपल्यला दिसते जुने फ्लॅमबराह दीपस्तंभ जे आताशी पूर्णपणे बंद आहे. ह्या लाईट-हाऊसची स्थापना १६९९ साली सर जॉन क्लेटन ह्याने केली. हे दीपस्तंभ कधीच प्रज्वलित केले नव्हते. पूर्वी असे मानले जायचे की ह्या अष्टभुजाकृती दीपस्तंभात प्रकाशासाठी कोळश्याच्या शेगडीचा वापर केला जाई पण ह्या वास्तुचा जेव्हा जीर्णोद्धार केला तेव्हा अश्या कुठ्ल्याच खुणा तिथे आढळल्या नाही आणि म्हणूनचं हे दीपस्तंभ कधीच प्रज्वलित केले नसेल असे मत ठरले. हे दीपस्तंभ किनारपट्टी पासून बरेच आत असल्यामुळे खल्याश्यांना संकेत मिळण्यासही अवघड होत असे.
छायाचित्र आंजावरुन साभार
नव्या लाईटहाऊसच्या आत ११९ चक्राकार पायर्या चढून वर जावे लागते.
नव्या दीपस्तंभाची रचना वास्तुकार सॅम्युएल वायेट ह्यांची आहे व ह्याचे बांधकाम, ब्रिडलिंग्ट्नच्या रहिवाशी जॉन मॅटसनने १८०६ साली केले. त्याकाळी ह्या बांधकामासाठी आलेला एकूण खर्च £ ८००० असा होता. दीपस्तंभाचे बांधकाम पूर्ण व्ह्यायला नऊ महिने लागले होते. ह्या स्तंभाची पुनर्रचना जेम्स डग्लासने केली. दीपस्तंभाच्या सर्वात वरचा कंदिलासारखा आकार आहे त्याची रचना ह्यानेच केली.
कंदिलासारखा आकार
१८०६ च्या डिसेंबर मध्ये प्रथम हा दीप्स्तंभ प्रज्वलित केला गेला. २६.५ मीटर उंची असलेला, पांढर्या शुभ्र रंगाचा असा हा दीपस्तंभ. ह्याच्या प्रकाशाची उंची भरतीच्या वेळेस ६५ मीटर उंच अशी आहे, प्रकाशाचे कार्यक्षेत्र २४ नॉटिकल माईल्स असे आहे. दीपस्तंभच्या परिसरात चौकोनी पांढरे ब्लॉक्स बांधले आतहे जेथे पूर्वी स्तंभाचे राखणदार राहत असे. अलिकडे ह्या ब्लॉक्सचा हॉलिडे अकॉमडेशन म्हणून वापर केला जातो. वरुन दिसणारे दृश्य मोहक आहे पण कंदिलासारख्या आकारच्या खिडकीमधून आत्ताशी बाहेरचे दृश्य धुरकट दिसते आणि बाहेर जाण्यास परवानगी ही नाहीये.
लाईटहाऊस आणि पांढरे ब्लॉक्स
ह्या टॉवरमध्ये प्रथम प्रकाशाची उपकरणे बसवली जॉर्ज रॉबिनसनने. एक मोठा उभा, फिरता प्रकाशझोत बसवला ज्याला स्वतंत्र २१ पॅराबॉलिक परावर्तक, प्रत्येकी सात असे तिन्ही बाजुंनी बसवले. लाल काचा / आरसे सगळ्या बाजूंनी बसवले. फ्लॅमबराह दीपस्तंभ हे जगातले पहिले दीपस्तंभ होते / आहे ज्यात संकेतासाठी रंगीत प्रकाशाचा वापर केला गेला. संकेतासाठी दोन पांढर्या लाईट्स चमकवून मग एक लाल लाईट चमकवली जाते. १९४० साली ह्या दीपस्तंभात वीजपुरवठा केला गेला आणि १९९६ साली हे लाईटहाऊस पूर्णपणे स्वयंचलित झाले. ट्रिनीटी हाऊस ह्या लाईट-हाऊसची देखरेख इतर लाईट-हाऊस प्रमाणेच हार्रिच, ईसेक्समधून करते.
लाईटहाऊसच्या आतिल ऑप्टिक लेन्स
लाईट-हाऊसमधून खाली उतरतानाच्या पायर्या.
लाईट-हाऊस पासून थोडे पुढे चालत गेले की फॉग सिग्नल स्टेशन येतं. येथे पूर्वी धुसर वातावरणात संकेत देण्यासाठी दर पाच मिनिटांनी रॉकेट सोडले जायचे. त्यानंतर Diaphone हॉर्न्स इमारतीच्या पूढिल भागी बसवला होता. १९७५ साली वीजेवर चालणारा हॉर्न बसवला गेला. त्यानंतर ह्यात ही थोडे बदल करुन फॉग डिटेक्टर बसवला गेला. दर दीड मिनिटांनी दोनदा हा हॉर्न वाजतो. तिथे आत जाण्यास मनाई आहे. लाईट-हाऊस जवळचं फ्लॅमबराह हेड आहे.
फॉग सिग्नल स्टेशन
फ्लॅमबराह हेड फिली आणि ब्रिडलिंग्टनच्या ईशान्येला समुद्रकिनारी उभे असलेले व्हाईट चॉक आणि सेडीमेंटरी रॉक क्लिफ आहे.
फ्लॅमबराह हेड जवळ सेलव्हिक्स बे आहे, बेच्या उत्तरेला बेम्पटन क्लिफ्स आहेत, जवळचं आर्क आहे तर दक्षिणेला स्टॅक आहे. क्लिफ उतरून खाली जाण्यासाठी पायर्या व पायवाट असे दोन्ही आहेत.
बीचचा किनारा बराच खडकाळ आहे व ओहोटीच्या वेळी तळाला चॉक / चुनखडीचे थर लांबच्या लांब पसरलेले दिसतात. क्लिफच्या तळाशी समुद्राच्या लाटांमुळे किनार्यावर चिकणमातीचा व शेवाळ्याचा थर जमला आहे.
इथे वेग-वेगळ्या प्रकारे, आडवे-तिडवे चॉकचे थर आहेत.
वेव्ह-कट नॉट्च
क्लिफच्या टोकावर १८.००० वर्षापूर्वी पासूनचा टिलचा थर म्हणजेच ग्लेशियल डिपॉझिटचा थर आहे. फ्लॅमबराह हेडच्या आत अनेक गुफा, कमानी तयार झाल्या आहेत. समुद्राच्या लाटा भरतीच्या वेळेस उभ्या कडांवर आदळतात, त्यामुळे हलके झालेल्या, कमकुवत असलेल्या चुनखडीची झिज होऊन गुफा तयार होते. आडव्या असलेल्या चुनखडीच्या थरावर उभ्या रेषा तयार होतात आणि तो भाग हलका, पोकळ होऊ लागतो. क्लिफवर जिथे खडू ढासळून बाहेर पडू लागतो तिथे हळू-हळू कमान तयार होते. ही कमान जर कमकुवत होऊन ढासळली तर त्या थराचा खांब तयार होतो ज्याला स्टॅक असे म्हणतात.
स्टॅक - बेरील नुक
नॉर्थ लँडिंगवरुन दिसणार्या गुहा
फॉग सिग्नल स्टेशनवरुन दिसणारे लाईट-हाऊस
ह्या फ्लॅमबराह हेड वर अनेक समुद्रपक्ष्यांची वसाहत आहे. उन्हाळ्यात हजारो प्रकारचे पक्षी जसे सीगल, पफीन्स, fulmars, kittiwakes येत असतात, त्यांना बघायला खासकरुन लोकं येथे येतात. दुरुन कॅमेर्यात सीगल टिपण्याचा प्रयत्न केलाय.
सेलव्हिक्स बेवरुन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणारे आजी-आजोबा.
ह्या अप्रतिम सौंदर्याने मोहून गेलो होतो, बरेच फोटो ही काढून झाले. आता हळू-हळू वर चढाई सुरु केली, थोडीशी दमछाक झाली पण मज्जा आली. लाईट-हाऊसच्या आवारातच, एक मोठे कॅफे - बार आहे जिथे खाण्या-पिण्याची उत्तम सोय आहे. भुक ही लागली होती, वर येऊन बार्बेक्यु टोस्टेड पनीनी, स्वीट चिली चिकन बगॅट व बनोफी पाय वर यथेच्छ ताव मारण्यात आला.
जवळचं असलेल्या सोव्हेनियर शॉपमध्ये एक फेरी मारली आणि छोटीशी स्मरणवस्तू घेऊन आम्ही प्रसन्न मनाने घरी यायला निघालो. एकंदरीत फ्लॅमबराहची ही ट्रिप पण मस्तं झाली होती.
ह्यातले काही फोटो गेल्यावर्षी इथे आलो असताना काढलेले आहेत तर काही ह्यावर्षीचे फोटो आहेत.
कंट्री-साईड जवळचं रहायला आल्यामुळे बर्याच दिवसांपासून बेकवेल गाव फिरण्याची फार इच्छा होती. घरापासून १५ - २० मिनिटांच्या अंतरावर गुरं-मेढरं चरताना बघणं, लांबच्या-लांब पसरलेली हिरवळ, डोंगर-दर्या, घाट-वळाणाचा रस्ता, टुमदार गावं, नदी अशा सौंदर्याने नटलेले पिक डिस्ट्रिक्ट अगदी जवळ आल्याने बेकवेल ट्रिप नक्की करायची असे ठरले.
बेकवेल हे डर्बीशायर काऊंटीमधले छोटेसे पारीश गाव आहे. बेकवेल गावाचे नाव पूर्वी येथे असलेल्या वॉर्म स्प्रिंग "Badequella" म्हणजे बाथवेल वरुन पडले. शेफिल्डच्या नैऋत्याला १३ माईल्सच्या अंतरावर, वेई नदीवर वसलेले हे गाव आहे. असे म्हणतात की बेकवेल ह्या गावाचा शोध अँग्लो-सॅक्सनच्या काळात लागला. ९२४ मध्ये एडवर्ड दी एल्डरने बेकवेलला बरोह / बराह / नगर बांधण्याचा आदेश दिला. बेकवेलला मार्केट टाऊन ही म्हटले जाते. येते १२०० पासूनचे प्राचीन बाजार आहे. ह्या बाजारात पहिला मेळा १२५४ साली झाला. आजही येथे दर सोमवारी बाजार भरतो. येथे एक पशुंचे मोठे बाजार आहे जे बघण्यासारखे आहे.
बेकवेलची मुख्य आकर्षणे म्हणजे ऑल सेंट्स किंवा बेकवेल चर्च, ओल्ड हाऊस म्युझीयम, दी ओल्ड ओरिजिनल बेकवेल पुडिंग हाऊस. असेच इथले अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे रटलँड आर्म्स हॉटेल. ह्याचे बांधकाम १८०४ मध्ये झाले. लेखिका जेन ऑस्टेन ह्या हॉटेलमध्ये १८११ साली रहायला होत्या. त्यांच्या प्राईड अँड फ्रेज्युडाईस मध्ये एलिझाबेथ बेनेट ह्याच रटलँड आर्म्सला डार्सी आणि मिस्टर.बिंग्लेला भेटण्यासाठी आल्याचा उल्लेख आहे.
आंजावरुन साभार
आम्ही सर्वात आधी ऑल सेंट्स चर्च बघायचे ठरवले. चर्चच्या आवारात कार पार्क नसल्यामुळे आम्ही टाऊन सेंटरला टुरीस्ट इन्फॉर्मेशन सेंटरजवळच्या कार पार्कला गाडी पार्क करुन चालत निघालो. अगदी ५-८ मिनिटाच्या अंतरावर, हे चर्च आहे पण रस्ता जरा चढणीचा असलामुळे थोडा वेळ लागतो चढायला.
ह्या चर्चची स्थापना ९२० मध्ये अँग्लो-सॅक्सनच्या काळात झाली. असे म्हणतात की ९४९ मध्ये राजा एड्रेडनी मिन्स्टर चर्च बांधण्यासाठी Uhtred - अर्ल ऑफ नॉर्थम्ब्रियाला आज्ञा दिली होती. ह्या चर्चचे काही अँग्लो-सॅक्सन, कोरीव काम असलेले दगड चर्चच्या द्वारमंडपात आपल्याला बघायला मिळतात. ह्या वास्तूच्या काही भागाची १८४० मध्ये पुनर्बांधणी झाली तेव्हा ह्या शिळांचा शोध लागला होता. त्यापूर्वी हे चर्च लाकडी असावे असे मानले जाते. आवारातच दगडी शवपेट्या ही उभा केलेल्या दिसतात.
दगडी शवपेट्या
कोरीव काम केलेले दगड
११०० च्या दरम्यान व्हिलियम पेव्हरीलच्या राज्यात हे चर्च पाडून ह्याची नॉर्मन शैलीत बांधकाम झाले अर्थात त्यातला फक्त चर्चचा मध्यभाग आणि पश्चिमेकडचा भाग आता बघायला मिळतो बाकीच्या चर्चची पुनर्बांधणी १२२० ते १२४० च्या दरम्यान झाली. १३४० साली ह्या गिरिजाघरावर अष्टभुजाकृती स्पायर ही बांधले गेले पण हा स्पायर धोकादायक झाल्यामुळे १८४० मध्ये बदलून पुन्हा बांधले गेले.
अष्टभुजाकृती स्पायर
गिरिजाघराचे मुख्यद्वार पश्चिमेला ग्रेट पोर्टिको मधून होते. आजही हे अखंड द्वार तिथे उभे आहे. चर्चच्या आत Sir Geoffrey Foljambe आणि त्यांची पत्नी अव्हेना ह्यांच्या स्मारकाचे अवशेष बघायला मिळतात. Sir Geoffrey Foljambe हे चौदाव्या शतकातले इंगलंडमधले जमीनदार होते. ह्यांची कबर ह्याच चर्चच्या आवारात असलेल्या स्मशानभूमीत आहे.
ग्रेट पोर्टिको
Sir Geoffrey Foljambe- पत्नी अव्हेना - आंजावरुन साभार
आत गेल्यावर आपल्याला बघायला मिळतं चौदाव्या शतकातले बाप्तिस्मापात्र (फाँट). आतून चर्च खूप सुंदर आहे, प्रार्थना घर, स्टेन्ड ग्लासच्या खिडक्या, आतही काही दगडं बघण्यासाठी ठेवले आहेत. चर्चच्या आत एक मोठाले फिंगर ऑर्गन आहे.१८१० साली जे.लिंकन ह्यांनी हे ऑर्गन इथे बसवले. पुढे ह्या ऑर्गन ला १८५१ मध्ये व्हिलियम हिल ह्यांनी पुन्हा बसवले.
बाप्तिस्मापात्र
दी नॉर्थ आयल - ही खिडकी हेन्री हॉलिडे ह्यांनी दिली.
चर्चच्या चहूबाजंनी कबरस्थान आहे. इथे Sir Geoffrey Foljambe ची कबर आहे, सर थॉमस वेंडेस्ली जे श्रुजबरीच्या लढाईत मारले गेले, सर जॉर्ज वर्नॉन आणि त्यांच्या दोन पत्नी ह्यांच्या ही कबरी आहेत. ह्या चर्चच्या आवारात दोन पुरातन क्रॉस आहेत, एक अँग्लो-सॅक्सन क्रॉस जो ९०० च्या काळापासून आहे. ह्या क्रॉसच्या एका बाजूला नॉर्स देवाचे - वोडेनचे कोरीव चित्र आहे तर दुसर्या बाजूला काही ख्रिस्ती चित्रे.
आंजावरुन साभार
दुसरा क्रॉस हा अँग्लो- स्कँडेनेव्हियन क्रॉस आहे जो १००० च्या काळात डर्व्हेंट नदीत सापडला होता. ह्या क्रॉसवर एका बाजूला नॉर्सचा मास्क आहे तर इतर बाजुला होली ट्रिनीटीचे चित्र व नक्षीकाम आहे.
आंजावरुन साभार
वरुन दिसणारे बेकवेल शहर आणि चर्चच्या बाजूलाच असलेले कॉटेजेस बघून खूप मस्तं वाटतं, सगळे कसे सुंदर, शांत आहे इथे. दुरुन दिसणारे ऑल सेंट्स चर्च ही सुंदर वाटत होते.
बेकवेल चर्चपासुन २०० मिटरच्या अंतरावर आहे इथले सगळ्यात जुने घर. ही वास्तू म्हणजेच ओल्ड हाऊस म्युझियम जी १५३४ पासून बेकवेल मध्ये उभी आहे. आत जण्यासाठी ४ £ चे तिकिट काढावे लागते. ह्या हाऊसमध्ये स्थानिक जीवनाशी निगडीत प्राचीन वस्तू, कलाकृतीं बघायला मिळतात. ह्या घरात ओंडक्यांचे वासे असलेल्या ११ खोल्या आहेत. हेन्री VIII च्या राज्यात ह्या घराचे बांधकाम झाले. ह्या घरातील चार खोल्या कर समाहर्त्यांसाठी बांधल्या होत्या.
पहिली खोली ट्युडर पार्लर - येथे राल्फ जेलचा प्रबंधक ख्रिस्तोफर प्लांट ह्याची कचेरी होती, तो शेतकर्यांकडून ओट्स, लोकरीच्या उत्पादनातून दशमांश भाग आणि भाडे जमा करुन जेलला देत असे. ह्या खोलीत ख्रिस्तोफरचा पुतळा व बर्याच जुन्या गोष्टींचा ठेवा बघायला मिळतात. छोटासा टीव्ही ठेवला आहे ज्यात ह्या घराबद्दल एक माहितीपट पर्यटकांना दाखवली जाते. ख्रिस्तोफरच्या पुतळ्यासमोर कोरीव काम केलेले प्लॅस्टर फॉर्म्स ठेवले आहेत, काही फॉर्मसवर क्रोशाचे नमुने ठेवले आहेत. ह्याच खोलीत एक जुने कपाट आपल्याला दिसते. ह्या ट्युअडर ओक प्लँक कपाटचा शोध १९५४ मध्ये लागला. चहूबांजूंनी वॉल-पेपरने झाकलेले, मागच्या बाजूस आधुनिक पद्दतीची दारे असलेले, भिंतीच्या आत दोन खोल्यांची विभागणी केलेल्या चौकटीत सापडले होते. तसेच ट्युडर पार्लरच्या खोलीचे मुख्य दार जे निखळले होते ते आता त्या खोलीत उभे करुन ठेवलेले दिसते. इथे एक मोठी फायरप्लेस दिसते ज्यात अनेक जुन्या वस्तू रचून ठेवलेल्या आहेत. ह्याच खोलीत पूर्वी लाकडी पट्ट्या व शेणानी, चिखलानी लिंपलेल्या भिंतीचा ही एक कोपरा आपल्या बघायला मिळतो.
ख्रिस्तोफर प्लांट
मोठी फायरप्लेस
प्लॅस्टर फॉर्मसवर क्रोशाचे नमुने
ट्युअडर ओक प्लँक कपाट
येथे शेलॉग ग्रेगरीने ख्रिस्तोफर प्लांट ह्याच्या पुतळ्यासाठी वेषभुषा केली. अगदी पंधराव्या शतकात जसे पुरुष कपडे परिधान करत तशी रचना करुन त्यांनी हा पोषाख बनवला. त्याबद्दल तपशीलावर माहिती ह्या फ्रेममध्ये छापीलस्वरुपात दिली आहे. ख्रिस्तोफरने पांढरा लिननचा शर्ट, विटकरी रंगाचा डबलेट आणि होस घातले आहे, त्यावर गडद चॉकलेटी रंगाच्या लोकरीचे जाडसर जर्किन घातले आहे जे काळ्या वेलव्हेटच्या कापडाने सुव्यवस्थित केले आहे. ही खोली नंतर जेल कुटुंबीयांची स्वतःची बैठकीची खोली म्हणून वापरली जायची. ह्या खोलीचे १९७८ /७९ मध्ये पुरातनवस्तुशास्त्रीय खात्याने जेव्हा उत्तखनन केले तेव्हा ह्या खोलीत पाच फर्श्या सापडल्या त्यातली एक व्हिकोटोरियन काळातील होती. त्या फरशीचे अवशेष, तसेच अनेक जुन्या वस्तू, स्वयंपाकघरातील चुन्याच्या उखळीचे अवशेष असे एका काचेच्या कपाटात बघण्यासाठी रचून ठेवले आहे.
रिकंस्ट्रक्टिंग ख्रिस्तोफर प्लांट
खोलीचे मुख्य दार
ही वास्तू पिक डिस्ट्रिक्ट मधली सर्वात जुनी इमारत म्हणून ओळखली जाते. राणी एलिझाबेथ I च्या राज्यात हे घर जरा मोठे व त्यात शौचालय (garderobe) बांधले गेले. त्याकाळी ह्या घराला सद्गृहस्थाचे निवासस्थान असे ओळखले जायचे. १७७७ मध्ये सर रिचर्ड ऑर्कराईटने कापड कारखान्यातील कामगारांसाठी ह्या घराचे रुपांतर चाळीत केले होते. ही खोली त्यावेळी कारखान्याची तळमजल्यावरची खोली होती आणि ह्या खोलीचे प्रवेशद्वार आता बंद करुन तेथे जुन्या वस्तू असलेले काचेचे कपाट ठेवले आहे. १९५४ साली ही इमारत निवासासाठी धोकादयक झाल्यामुळे ती पाडण्याची आज्ञा सरकारने दिली पण बेकवेल अँड डिस्ट्रिक्ट हिस्टॉरिकल सोसायटीने ह्या वास्तूला पाडण्यापासून बचावले व त्याचे रुपांतर संग्रहालयात केले.
पुढची खोली आहे ट्युडर पार्लर क्लोजेट. ही सामानाची खोली होती, ह्यात प्रवाशी, शेतकरी आपले बुट, कोट उतरवून ख्रिस्तोफरला भाडे व कर देण्यासाठी थांबत असत. आता ह्या खोलीत शेती करण्यसाठी लागणारी शस्त्रे, बटर बनवण्यासाठी लागणारी साधनसामुग्री व त्यांची माहिती छापीलस्वरुपात ठेवली आहे. येथे एका शेतकर्याचा पुतळा आहे ज्याने पारंपारीक ढगळा अंगरखा (स्मॉक) परिधान केलाय. १८-१९ व्या शतकात शेतात काम करताना शर्टावर हा ढगळा अंगरखा घातला जायचा. लिननच्या कापडापासून हे बनवले जायचे व त्याकाळी हा अंगराखा वडिलांकडून मुलाला देण्याची परंपरा होती.
स्मॉक परिधान केलेला शेतकरी
इकडे भिंतीवर अनेक शस्त्रे, उपकरणं लावून ठेवले आहेत. इथे शेतात बीयारोपण करण्यासाठी सीड फिडल बो असं यंत्र एकोणीसाव्या शतकात वापरले जायचे. ह्या यंत्रात एक छोटेशी कापडी पिशवी होती ज्यात बियाणे असायचे. ह्याला एक काठी जोडलेली असायची जी मागे-पुढे व्हॉयलिन वाजवल्याप्रमाणे हलवली की बियाणे एका पात असलेल्या चकतीत पडून शेतात दर दुसर्या दिशेला फेकले जात. अशा पदध्तीने बियाणे पेरली जायची.
बाजूलाच बटर कसे बनवतात ह्याची माहिती व उपकरणे ठेवली होती. पूर्वी बटर बनवण्यासाठी आधी दुधाला एका उथळ भांड्यात ओतले जायचे. ह्या भांड्याला एका स्वच्छ खोलीत ३६ तासांसाठी ठेवले जायचे. वर जमलेल्या मलईचा थर क्रीम स्किमरने काढला जायचा. ही पद्धत खूप वेळखाऊ व मेहनतीची होती शिवाय ह्यात बर्याच वेळेला दुध खराब होण्याची शक्यता जास्त असे. ह्यावर सोपा उपाय म्हणजे बटर चर्नर किंवा ताक घुसळण्यासाठी असणारी मोठी रवी वापरली जायची ज्यात मलईला दुधापासून वेगळे काढले जायचे मग त्या दुधाला एका पसरट भांड्यात काढून एक दिवस तसेच ठेवले जायचे, त्यामुळे वर सायीचा थर जमा व्हायचा . ह्या थराला क्रीम सेपरेटरचा वापर करुन किंवा स्कूपरने काढले जायचे. कालांतराने यंत्राद्वारे सेंट्रीफ्युगल फोर्सने मलई व दुधाला वेगळे करायला सुरुवात झाली.
पुढे व्हिक्टोरियन किचनमध्ये जाण्यासाठी मोठ्या बैठकीच्या खोलीतून म्हणजे ट्युडर हाऊसप्लेसमधून जावे लागते. ही खोली सोळाव्या शतकात बांधली गेली जेव्हा ह्या घराला वाढावून मोठे बांधले गेले. इथे सगळ्यात मोठी फायरप्लेस आहे जिथे अक्ख्या घराचा स्वयंपाक होत असे. सगळ्या प्रकारचे मांस, मच्छी, भाज्या, फळं इथे शिजवले जात. इथेच कोनाड्यात मोठाले मिठाचे दगड फायरप्लेस कोरडी राहण्यासाठी ठेवलेले असायचे, आजही कोनाड्यात ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. ह्या खोलीच्या एका कोपर्यात आपल्या बेकवेल पुडिंगबद्द्ल माहिती दिलेली दिसते. त्याबद्दल सविस्तर आपण पुढे जाणून घेऊया.
ट्युडर हाऊसप्लेस
बेकवेल पुडिंग
व्हिक्टोरियन किचन - ऑर्कराईटने जेव्हा ह्या घराची पुनर्बांधणी केली तेव्हा ह्या तीन खोल्या स्वयंपाकासाठी, खाण्यासाठी व बाजूलाच असलेल्या सेलारमध्ये कपडे धुण्यासाठी वापरली जायची. व्हिलियम आणि मेरी पिट्ट ह्या तीन अरुंद खोल्यांमध्ये आपल्या सहा मुलांसोबत १८९० ते १९३२ सालापर्यंत राहिले. त्यांची मुलगी फॅनी ही इथे १९६६ पर्यंत भाडेकरुंसोबत राहिली होती. ह्यातली तिसरी खोली बंद ठेवली आहे, ही खोली सतराव्या शतकात नोकर-माणसांच्या झोपण्यासाठी व साठवणीची खोली म्हणून वापरत असत. बर्नार्ड हॅरिसन ह्या खोलीत १९६६ पर्यंत आपल्या बहिणीसोबत राहत होता. हे अख्खे घर नंतर त्यांच्या मालकीचे झाले. ते त्यांनी बेकवेल अँड हिस्टॉरिकल सोसायटी ला त्यांच्या पालकांच्या स्मर्णार्थ दिले. ह्याबद्दल ही माहितीपटात दाखवले गेले आहे.
स्वयंपाक घरात चूलीजवळ एक फायरप्लेस सोबत ओव्हन आणि गरम पाण्याची टाकी आहे. ह्याला रोजच्या रोज साफ करावे लागत असे. मोठ्या टब ला फायरप्लेसजवळ सरकावले जायचे आणि गरम पाणी भरले जायचे त्यात स्नानासाठी. बर्याच जुन्या काळातील वस्तू येथे पाहण्यास मिळतात. ह्या कपाटात वेग-वेगळ्या डिझाईन असलेल्या इस्त्री, ब्रेड-बीन, बरेच पतर्याचे डबे बघायला मिळतात. दुसर्या कपाटात व्हिलियम आणि मेरी पिट्टचा फोटो आहे तसेच व्हिक्टोरियन काळात वापरल्या जाणार्या जिंजरब्रेडचे लाकडी साचे, बटर बनवण्याचे लाकडी साचे, क्रीम स्किमर, ऑर्नामेंटल नाईफ व बरीच भांडी, मीट मिन्सर बघायला मिळतात.
व्हिलियम आणि मेरी पिट्टचा फोटो
जिंजरब्रेड, बटरचे लाकडी साचे.
पूर्वीच्या काळातील पदार्थांची पुस्तके ही इथे ठेवली आहेत.
ह्याच खोलीत कपडे धुण्यासाठी लागणारा वॉशींग बोर्ड, वेग-वेगळे साबण, दगड ठेवलेले दिसतात.
अवयंपाकघरातून खाली सेलारमध्ये उतरले की कपडे धुण्याची खोली येते. हे सेलार नंतर बाधले गेले, ट्युडर काळात इथे फक्त आवार होते. येथे वरच्या मजल्यावरच्या गार्डरोब किंवा टॉयलेट मधून येणारे ह्युमन वेस्ट/ घाण/ मलमुत्र एका खड्ड्यात जमा केले जायचे, मग ती घाण, कचरा टोपलीत भरून शेतात खत म्हणून पसरवली जायची. हे काम व्हिलियम पिट्ट रात्री करायचा. त्याला नाईट सॉईल मॅन म्हणत. १९११ च्या शिरगणतीत त्याने स्वतःचे स्कॅव्हेंजर म्ह्णून वर्णन केले होते.
कपडे धुण्याची पण त्यांची रीतसर पद्धत ठरलेली असायची. सोमवारी वॉश डे असायचा. त्याकाळी कॉटन, लिनन व लोकरीचे कपडे वापरले जायचे. ज्या घरात कोळश्याची शेगडी वापरली जायची , तिथे तांब्याचा स्टँड किंवा रेंज खूप आधी तापवून घेतला जाई पाणी गरम करण्यसाठी. रंगीत कपडे व पांढरे कपडे वेगळे केले जायचे. तांब्याच्या स्टँडवर उकळलेल्या पाण्यात पांढरे कपडे, स्टार्च घालून ते कपडे धुतले जायचे तर रंगीत कपडे डॉली टबात गरम पाण्यात घालून धतले जायचे. पांढरे कपडे तीन वेळा टबमध्ये खळबळले जायचे मग त्यात निळ म्हणजेच "रिकिट्स ब्ल्यु" घालून धुतले जायचे. कपडे धुतल्यानंतर बर्याच वेळेला हातानेच ते पिळले जायचे पण कधी-कधी मँगल आणि रबर रिंगर्स ह्या यंत्राचा वापर ही केला जायचा. ते वापरल्याने कपडे लवकर सुकण्यात मदत होत असे. कपडे बाहेर पूर्ण वाळल्यानंतर ते इस्त्री केले जायचे. प्रत्येक घरात दोन इस्त्री असायच्या. एक शेगडीवर तापवण्यासाठी ठेवलेली असायची तर दुसरी कपड्यांना इस्त्री करायला वापरली जायची. १९३० साली वीजेवर चालणारी इस्त्री आली. दर मंगळवारी इस्त्री करण्याचा दिवस असायचा.
मँगल
तिथून मग आम्ही लाकडी पायर्या चढत वरच्या मजल्यावर गेलो. तिथे लिहिले होते "वेल्कम टु दी स्पिरीट ऑफ फॉर्टीज". इथे चाळीसच्या दशकातील बर्याच वस्तू जतन करुन ठेवल्या आहेत, एक छोटेखानी प्रदर्शनच जणू.
१९४० साली वापरात असलेले पैसे.
क. जेराल्ड.ज.अंडरवुड ह्यांचा सरकारी गणवेष. लोकं त्याना क.जेरी अंडरवुड म्हणत. त्यांनी रॉयल सिग्नल कॉर्प्सला बेकवेल,१९३९ साली दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीस क्मांड केले होते.
हा गणवेष एअर ट्रेनिंग कॉर्प्स, जी.हॉड्किन्सन्स ह्यांचा आहे.
दी रॉप्यल कॉर्प्स सिग्नल- बेकवेल ह्यांच्या ह्या वस्तू आहेत. गॅस मास्क, फर्स्ट-एड फॉर गॅस-मास्क कॅज्युएलिटिज असे छोटे पुस्तक आपाल्या इथे दिसते. तिथेच एक नोट आहे "हिटलर विल सेंड नो वॉर्निंग,सो ऑल्वेज कॅरी युअर गॅस मास्क"
पुढे १९४० च्या काळात बर्याच बायका-मुली विणकाम आवडीने करत. ज्यांना विणकामाची आवड आहे त्यांनी इथे ठेवलेल्या लोकर विणून एखादा रो पूर्ण करावा असे तिथे लिहिले होते.
१९६६/ ६७ साली गार्डरोब प्रायव्ही / टॉयलेट इथे असल्याचा शोध लागला. पूर्वी फक्त सधन ट्युडर कुटुंबात घरात अशी छोटी खोली जिथे कपडे ठेवण्यासाठी किंवा मलमुत्र विसर्जित करण्यासाठी सोय असे. ह्या खोलीतून घाण / ह्युमन-वेस्ट खाली असलेल्या खड्ड्यात पडे व वर म्हटल्याप्रमाणे ते सगळे गोळा करुन शेतात खत म्हणून वापरले जायचे.
तिथून आम्ही ट्युडर सेंट्रल बेडचेंबर मध्ये आलो. इथे जुन्या, विविध प्रकारचे कॅमेरे, बटणं, सुया, फोनोग्राफ, क्लॅरिनेट, स्टिरिओ व्ह्युवर, बेड्या, पोलीस बॅटन्स, शिवणयंत्र, लेस सॅपंल असे ठेवलेले आहेत.
हे व्हिंटेज कलेक्शन म्हणा हवं तर, विविध प्रकारची चीनी मातीची भांडी, टीस-सेट ठेवले आहेत.
इथे निरनिराळ्या प्रकाराचे कंदिल, रशलाईट्स, गॉथिक लँप्स, कँडल स्टँड्स ठेवले आहेत.
पूर्वीच्या काळात वापरले जाणारे बुट उत्तखननात सापडले. १७८० ते १८२० च्या काळात वापरात असलेल्या बुटाचे पॅटर्न. तसेच लाकडी सँड्ल्स, बर्फात स्कींग करण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी स्की शूज, लाकडी आईसस्केट्स बघायला मिळतात.
जुन्या काळातले टाईपरायटर्स ही ठेवले आहेत.
पुढची खोली स्मॉल बेडचेंबर होती. इथे आपल्याला ट्युडर काळातील मुळची खिडकी बघायवयाला मिळते. त्याकाळी काच खूप महाग असल्यामुळे, लिननचे कापड तेलात भिजवून झडप म्हणून दिवसा-उजेडी वापरले जायचे आणि रात्री लाकडी फळी लावून बंद केले जाई. ह्या खोलीत अनेक लहान मुलांची खेळणी, कापडी, मेणाच्या, पोर्सिलिन, लाकडी, Bisque, जर्मन बाहुल्या, गोष्टीची पुस्तके, पत्ते, डॉमिनोज अशी बरीच खेळाणी ठेवली आहेत. ही खेळणी १०० वर्ष जुनी आहेत , तर काही काही शेफिल्ड-बेकवेल मधल्या जुन्या रहिवाशांनी ह्या वस्तू दान केल्या आहेत संग्रहासाठी.
ट्युडर काळातील खिडकी
एडविन वोकल्र ह्यांनी आपली बाबा-गाडी/ प्रॅम ह्या सग्रंहासाठी दिली.
इथे आपल्याला नोहाज आर्क बघायला मिळतं, ह्याबद्दल बीबीसी २ रिस्टोरेशन रोडशोमध्ये माहिती देण्यात आली होती.
पुढची खोली सोलर ही आहे. ही खोली पूर्वी खाजगी बैठकीची खोली होती. इथे सर रिचर्ड आर्कराईटच्या कापड कारखान्याबद्दल व कापडाबद्दल माहिती दिली आहे. लिनन प्रेस, चरखा तसेच विविध पॅटर्न असलेले कपडे इथल्या असलेल्या mannequins ना घातलेले बघायला मिळतात. ह्या खोलीचे छप्पर १९५६ साली काढण्यात आले, आता आत ओंडक्यांचे वासे दिसतात. असे म्हणतात की पुर्वी त्याहीवर घरकाम-करण्यार्या स्त्रीयांची खोली होती.
लिनन प्रेस
एकंदरीत ह्या ट्युडर काळातील घरात फिरताना आपण वेगळ्याच विश्वात आहोत असे जाणवले. लहान असताना आजोळी जायचे तेव्हा आजोबांच्या ब्रिटिशकालीन वस्तू बघून खूप गमंत वाटत असे, नवल वाटत असे तशी काहीशी भावना ह्या घरात जुन्या वस्तू न्याहळताना जाणवली. प्रत्येक खोलीची स्वतंत्र माहिती, तिथे राहिलेल्या लोकांबद्दल माहिती जाणून घेताना, त्यांच्या वस्तू बघताना प्रकर्षाने जाणवले की किती सुंदररित्या ह्या वस्तू येथे जतन करुन ठेवल्या आहेत, लोकांना बघण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. खूप छान अनुभव होता, घरातून बाहेर पडताना काऊंटरवर एक चिनी आजी होत्या त्यांच्याशी गप्पा मारता-मारता समजले की त्या १९६६-१९६८ भारतात, कोलकात्यात रहायला होत्या आणि त्यांना भारतीयांबद्दल खूप प्रेम आहे. बंगालची लोकं तिथल्या मिठाईप्रमाणेच गोड आहेत असे त्यांचे मत होते :) तिथून ह्या घराची आठवण म्हणून स्मरणवस्तू घेतली आणि आम्ही निघालो बेकवेल पुडिंग हाऊसला.
बेकवेलमध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे ते म्हणजे बेकवेल पुडिंग/ टार्ट. आता इथे बरेच अपहारगृह आहेत जे असा दावा करतात की बेकवेल पुडिंगची मुळ पाककृती त्यांचीच आहे. खरंतर ह्या पुडिंगचा शोध अपघातानेच लागला. खरं-खोटे असे कुणी नक्की सांगू शकत नाही पण इतिहासात असे म्हटले आहे की १८६० च्या दशकात "रटलँड आर्म्स" जे त्याकाळी व्हाईट हाऊस म्हणून ओळखले जायचे तिथल्या मिस्ट्रेस मिसेस. ग्रेव्ह्ज आपल्या आचार्याला स्ट्रॉबेरी टार्ट कसे बनवायचे शिकवत होत्या पण काही कामामुळे त्यांना ते काम मध्येच सोडून बाहेर जावे लागले. इथे आचार्याने गडबड केली, त्याने अंड्याचे मिश्रण जॅम वर लावले, खरंतर ते मिश्रण आधी लावून मग वरून जॅम पसरावायचा होता. एका श्रीमंत माणसाने ते टार्ट ऑर्डर करुन खाल्ले आणि मग त्या बेकवेल टार्ट / पुडिंगची प्रसिद्धी सर्वत्र पसरली. मिसेस.व्हिल्सन ज्या एका चांडलेरच्या पत्नी होत्या, त्या ह्या ओल्ड ओरिजिनल बेकवेल पुडिंग शॉपच्या जागी असलेल्या कॉटेजमध्ये राहत व मेणबत्त्या बनवून विकत असे त्यांनी ह्या पुडिंगची पाककृती मिळवली व त्यात एक सिक्रेट जिन्नस सामिल करुन हे पुडिंग तयार केले आणि त्याची विक्री इथे त्यांनी सुरु केली. ही मालमत्ता सतराव्या शतकात ड्युक ऑफ रटलँड ह्यांच्या मालकीची होती. व्हिल्सन दांपत्य येथे भाडेकरु म्हणून राहत. १९२१ मध्ते आठव्या ड्युकने व्हिल्सन कुटुंबियांना ही जागा विकली होती.
ह्या दी ओल्ड ओरिजिनल बेकवेल पुडिंग शॉपमध्ये विविध प्रकारचे पुडिंग्ज, टार्ट्स, जॅम्स, लेमन कर्ड, चीझ, पिकल्स, मध, बेकवेल गिफ्ट हॅपर्स असे विक्रीसाठी ठेवले आहेत. इथे येण्याचा माझा मुख्य उद्देश होत पुडिंग मेकिंग एक्सपिरियंस घेण्याचा. इथे तुम्हाला सगळी सामग्री देऊन आणि बर्यापैकी पाककृतीची माहिती देऊन तुम्ही तुमच्या हाताने हे पुडिंग इथे बनवू शकता. तुमचे पुडिंग बेक होईस्तोवर ह्यांच्या अपहारगृहात चहा-कॉफी किंवा काही नाश्ता खाऊ शकता. मला हा अनुभव घ्यायचा होता आणि म्हणून लगेच आम्ही काऊंटरवर चौकशी केली पण कसलं काय त्यांना म्हण्जे ह्या पुडिंग मेकिंगसाठी मोठा ग्रुप असेल तर चालणार होते. कपल्ससाठी नाताळमध्ये ते काही ऑफर्स ठेवतात तेव्हा तुम्ही हा अनुभव घेऊ शकता असे ते म्हणाले. खूप राग आला, मन खट्टू झालं, थोडासा मूड ही गेला पण मग ठिक आहे नंतर कधीतरी हा अनुभव आपण घेऊच असे ठरवले आणि नवर्याला माझी नाराजी दूर करण्यासाठी बेकवेल पुडिंग खायला हवे अशी आज्ञा दिली, त्याने ही लगेच पुडिंग आणि फज विकत घेऊन दिले आणि आम्ही हसतमुखाने तेथून बाहेर पडलो.
खरचं अप्रतिम चवीचे होते हे पुडिंग नॉट टू स्वीट नॉट टू टार्ट - एकदम पर्फेक्ट :) ह्यासोबत फ्रेश क्रीम किंवा हॉट कस्टर्ड सर्व्ह करावे.
बेकवेल मध्ये लोकली फेर-फटका मारला, चीज अँड वाईन दुकानात जाऊन चीझ-टेस्टींग केले, आयरीश व्हिस्की फ्लेव्हर्ड चीज घेतले. तिथून जवळचं पुस्तकांचे दुकान दिसले मग काय पावले आपोआप तेथे वळले, सेल सुरु होता त्यामुळे लगेच ३ पुस्तके घेतली, बाजूच्याच दुकानात हार्पर ली चे नवे पुस्तक गो सेट अ वॉचमन दिसले, महाग होते पण तरीही मी जाऊन ते विकत घेतलेच :)
थोडक्यात काय बेकवेल ट्रिप ही मस्तच झाली, जुन्या काळातील वास्तू, वस्तु बघायला मिळाल्या, त्यांची माहिती मिळाली, पुडिंगबद्दल ऐकले होते ते ही घेतले, पुस्तक खरेदी ही झाली होतीच, शिवाय वेगळ्या गावात येऊन तिकडचे जीवन, लोकं, निसर्ग बघण्याचा आनंद घेता आला, अगदी मनासारखी एंजॉय करता आली ही डे ट्रिप.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.