Wednesday, June 21, 2023

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – Narmada Parikrama

 https://charudattasawant.com/2021/12/25/narmada-parikrama-1/

नर्मदे हर!

खूप दिवसांनी कै. दादांची (माझे वडील) तीव्र ईच्छा त्यांच्या मागे पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. ठाण्यातील डॉ. गिरीष बापट यांच्या श्रीरामकृष्ण ट्रावेल्सची माहिती मिळाली. आणि नरेनने (माझा मुलगा) उचल घेतली, नर्मदा परिक्रमा करण्याकरीता (Narmada Parikrama by Vehicle) माझे नाव नोंदवले.

गंमत म्हणजे या प्रवासात माझ्या ओळखीचे किंवा नात्यातील कोणीही बरोबर नव्हते. एका अनोळखी ग्रुपबरोबर मी जाणार होते. १० फेब्रुवारीला त्यांनी सर्वांना मिटिंगसाठी बोलावले होते. मी व नरेन गेलो होतो. श्री. व सौ. पाटील तसेच कल्याणची अर्चना व सुमनताई यांची ओळख झाली. डॉक्टरांनी आम्हाला सगळी माहिती दिली. चांगला नाष्टा दिला व निघताना एक हँडबॅग, एक किट, एक शबनम व एक होल्डींग पाऊच दिला. किटमध्ये दररोज लागणाऱ्या व प्रवासात ऐनवेळी दगा देणाऱ्या गोष्टींवर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी दिल्या. उदा. नेलकटर, कात्री, सुई-दोरा, बटणे, पिना, साबण, टूथपेस्ट, बॅटरी, शाम्पू, डायरी, पेन इत्यादी. घरी सर्वांना दाखवले. खूपच समाधान वाटले.

अठरा दिवसांच्या प्रवासाची भरपूर तयारी करुन १४ तारखेला संध्याकाळी मी व नरेन टॅक्सीने मुंबई सेंट्रलला गेलो. संध्याकाळी ७.२० ला अवंतिका एक्सप्रेसने मुंबई सोडली. माझ्या डब्यात म्हणजे बी३ मध्ये मी शयनयान क्रमांक ८० वर होते. २२, २४वर मालाडच्या दोघी होत्या. व आर.ए.सीवाल्या तिघी मध्ये होत्या. माझ्या कुपेमध्ये दोन स्त्रिया व सहा पुरुष होते. मी सोडल्यास सर्व हिंदी भाषिक होते. त्यांच्या गप्पाटप्पा ऐकत रात्रीचे जेवण केले.

प्रवासात मानवी स्वभावाचे विविध नमुने पहायला मिळाले. दोन सामान्य माणसे (कदाचित मोठी असतीलही) टाटा श्रेष्ठ का रिलायन्स श्रेष्ठ यावर जोरजोरात वाद घालत होती. तर दुसरा एक जण डब्यातील सर्व अनोळखी माणसांना घरच्या समस्या सांगत होता. त्यात प्रमुख म्हणजे, आमचे दोन दोन ठिकाणी घरे आहेत. मोठ्या मुलाची सासूरवाडी खूपच श्रीमंत आहे. त्यामुळे धाकट्याच्या सोयरीकीचा प्रश्न त्यांना भेडसावित आहे. हे सगळे ऐकून मी मात्र मनातल्या मनात हसत होते. एक वाजता आम्ही झोपलो.

उजाडता उजाडता उज्जैनी आली. सामान घेऊन मी खाली उतरले. तेंव्हा डब्यातील सहयात्रिक भेटले. जिना चढण्याउतरण्याचा प्रश्न नव्हता. सामान बाहेर नेण्यास मला सहयात्रींनी मदत केली. बाहेर कंपनीचे लोक १८ सीटरची बस घेऊन आले होते. बसने आम्ही गिरनार हॉटेलवर गेलो. तेथे आम्हाला तीन जणांना एक एक रुम देण्यात आली. माझ्या रुमवर मी, अर्चना व भावना होतो. प्रवासातील जास्तीजास्त दिवस आम्ही एकत्र होतो. रुमवर गरम पाण्याने अंघोळी करुन नाष्टा व चहा घेऊन महांकाळेश्वरला गेलो. दोन ते अडीच तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले. परत येताना बडा गणपती व कालिका मंदिर पाहून हॉटेलवर परत आलो.

कंपनीचे सामान व कुक बरोबर असतात. हॉटेलमध्येही त्यांच्यासाठी मोकळी जागा असते. त्यामुळे त्यांनी स्वयंपाक केला. सर्व हॉटेल व धर्मशाळेत अशा सोई आढळल्या. दुपारी चहानंतर आम्ही कालभैरव मंदिर व सांदिपनी आश्रम पाहिले. दुसऱ्या दिवशी पहाटे चारला अंघोळी करुन महांकिलेश्वरला भस्मारतीसाठी जायचे होते. आधी पुन्हा रांगेत उभे राहणे नको म्हणून न जाण्याचे ठरविले पण मुलींनी (आता मी त्यांची ममा, व त्या माझ्या मुली हे मानसिक नाते निर्माण झाले होते) मला उभारी दिली व मी गेले. आधी माझे दोन वेळा दर्शन झाले होते पण दुरुनच. आता मात्र स्वतःच्या हाताने पिंडीवर जल घालून व हात लावून दर्शन घेतले. मनाचे समाधान झाले.

नंतर मंडपात बसून शंकराची पंचामृती पूजा पाहिली. हवेत गारठा होता. पहाटेची वेळ होती. मंडपात जाताना सुद्धा वरखाली चढउतार करुन जावे लागले. पाणी घालण्यासाठी गाभाऱ्याशी गेल्यावर अंगावरील स्वेटर, शाल पायातील मोजे वगैरे सगळे काढावे लागले. आधीच थंडी त्यात पाय ओले, गारठले पण माझ्या मुलींनी माझ्यासाठी जागा धरुन ठेवली. गर्दी तर खूपच होती. त्यांनी मला हाका मारल्या पण गदारोळात ऐकू येत नाही असे पाहिल्यावर अर्चना खाली आली व हाताला धरून मला वर घेऊन गेली. पूजा बरोबर ४.३०ला सुरु झाली व ५.२०ला भस्मारती! चितेतले खरेखुरे भस्म आणले जाते. म्हणून ही आरती स्त्रियांनी पहायची नाही, डोळे मिटून बसायचे. त्या भस्माचे पिंडीवर विलेपन करतात.

यानंतर रुमवर येउन एक तास विश्रांती घेतली. सर्व सामान पॅक करुन बॅगा रुमबाहेर ठेवल्या. इडली चटणीचा नाष्टा करून व चहा घेऊन आम्ही इंदोरकडे प्रयाण केले. वाटेत महागणपती, अन्नपुर्णामंदिर, लालमहाल व खजराना मंदिर पाहिले. व ‘गजानन धर्मशाळा’ नर्मदा घाट, ओंकारेश्वर येथे गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता चहा झाल्यावर अंघोळीचे कपडे, पूजेचे साहित्य, नर्मदा (Narmada River) जलासाठी बाटली इत्यादी घेऊन नावेतून नदी पार केली. अजून परिक्रमेला सुरवात झाली नव्हती. पलिकडील घाटावर सर्वजण गेलो. नंतर सर्वजण ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी वर गेले. मी वर चढले नाही. दर्शन झाल्यावर नावेतून परत इकडच्या घाटावर आलो. या घाटाला नांगर घाटाला-नांगर घाट म्हणतात. येथे नर्मदेची शास्त्रोक्त पूजाअर्चा व आरती केली. तेव्हा गुरुजींनी प्रत्येकाला आपले आई वडिल सासू सासरे इतर नातेवाइक, तसेच दोन्हीही घराण्याचे गोत्र उच्चारण्यास सांगितले. त्यावेळी दादांच्या आठवणीने डोळे भरून आले. पूजेसाठी मी नऊवारी नेसले होते. प्रार्थनेच्यावेळी मी काकूळतीने, ‘माझी परिक्रमापूर्ण करुन घ्यावी’, अशी विनंती दादा व नर्मदा मैयाला केली. आणि दोघांनी ती माझ्याकडून करवून घेतली.

बाटलीत जल भरून घेतले नंतर सवाष्णीची ओटी, साडी चोळी नेसवली. कुमारीकेची पूजा केली व घाट चढायला सुरवात केली. बाकी सारे ममलेश्वराच्या दर्शनाला गेले मी खालीच रिक्षात बसले. नंतर आम्ही आठदहा जणी रिक्षाने धर्मशाळेत आलो. असे म्हणतात की, शुलपाणीला मामा लोक लूटतात आणि ते चांगले असते. आमच्या बसच्या मार्गावर हे जंगल लागत नाही. म्हणूनच मैयाने, घाटावरच माझ्याकडील एक टॉप व एक टॉवेल गेला. व रिक्षातून उतरताना पर्स गेली. पर्समध्ये १५० रुपये, आधार कार्ड, निवडणूक कार्ड व कुटूंबाचे फोटो होते.

जेवणे झाल्यावर साधारण अडीच तीनला आम्ही ओंकारेश्वर सोडले. आणि परिक्रमेची खरी सुरवात झाली. रात्री बडवानी येथील श्रीकृष्ण राजभोग येथे आलो. इथे नर्मदेचे विशाल पात्र आहे. येथे घाटावर अंघोळी करतात. येथून पुढे पात्रात मैयाचे वाहन असणाऱ्या मगरींचे वास्तव्य आहे. तसेच पायवाटेवर शूलपाणीचे जंगल लागते. तिथे नर्मदेचे भाऊ असलेले मामा लोक रहातात.

गुजराथमध्ये शिरण्यापुर्वी नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रकाशा हे गाव आहे तेथे पश्चीमवाहीनी तापी नदी नर्मदेला मिळते. प्रकाशा येथे एक मोठे कुंड आहे त्याचे नाव बलबला असे आहे. कुंडाजवळ उभे राहून मोठ्याने नर्मदे हर म्हटल्यास कुंडातून बुड बुडे येतात. जितके आपण मोठ्याने म्हणू तितके मोठ मोठे बुडबुडे येतात. पूर्वी या परीसरात बलबला राक्षसाने धुमाकूळ घातला होता. नर्मदेने त्याच्याशी युद्ध करुन त्याचा पाडाव केला अशी वदंता आहे. पण मोठ्या आवाजाने मोठे बुडबुडे हे मात्र प्रत्यक्षच पाहिले. नंतर राज पिपला येथील हरसिद्धी धर्मशाळेत थांबलो. जवळच स्वामी नारायणाचे सुंदर देवालय आहे यालाच निलकंठ धाम म्हणतात. तेथेच आम्ही मुक्काम केला.

भाग 1 समाप्त क्रमश:


Smita Shrihgari Kadhe

लेखिकेचा परिचय

नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: 2, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006


Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.


काही क्षणचित्रे

Namrada Parikrama Photos 18
अमरकंटक येथे माता नर्मदेच्या उगम स्थानी
Namrada Parikrama Photos 22
Namrada Parikrama Photos 20
अमरकंटक येथे माता नर्मदेच्या उगम स्थानी
Namrada Parikrama Photos 16

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

नर्मदे हर!

[मागच्या भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या तीरावरील प्रकाशा गावातील बलबला कुंडावर गेलो. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश झाल्यावर प्रसिद्ध शूलपाणीच्या जंगलाला वळसा घालून राज पीपला गावात मुक्कामाला पोहोचलो. आता पुढे …..]

भाग २रा सुरू:

नंतर आम्ही हसोटी मार्गे कटपोर या सागरकिनाऱ्यावरील ठिकाणी जाण्यास निघालो. आम्हाला दोन दिवसाचे कपडे व सागर पूजनाचे साहित्य बरोबर घ्यायचे होते आणि पादत्राणे मात्र बसमध्येच ठेवायची होती. बस नदीच्या पुलावरून पलिकडे जाणार होती. आणि आम्ही जवळच्याच धर्मशाळेत उतरणार होतो. ज्यांना परिक्रमा (Narmada Parikrama) करायची असेल त्यांना पुलावरुन जाता येत नाही, कारण नदी ओलांडली जाते. आणि दुसरे म्हणजे परिक्रमवासियांनी सागर प्रवास करुन रेवा सागराला वळसा घालून पल्याड तीरावर जायचे असते. परिक्रमेतील हा सर्वात अवघड भाग होता. ज्यांना चिखलातून एक दिड मैल चालता येईल त्यांनी थांबावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी बसने जावे असे सांगण्यात आले. मी सुद्धा दहा वेळा विचार केला. बस सोडण्यापूर्वी घरी फोन करुन ह्यांच्याशी बोलले, मगच सागरी मार्ग निवडला.

आम्ही धर्मशाळेत पोहचलो. मिणमिणता प्रकाश देणारे लाईट होते. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. आम्हा बायकांना वॉशरुमला जायचे होते. एका साधूने अथवा पायी प्रदक्षिणा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या कमंडलूतून हौदाचे पाणी आणून देण्याची सेवा केली. असे म्हणतात की, परिक्रमावासियांना नर्मदामैया दर्शन देते. मात्र कोणत्याही स्वरुपात देते, ते रुप ओळखण्याची नजर असावी लागते व ती मैयेवरील श्रद्धेतून येतेच. मला तर उज्जैनीला उतरल्यापासून वेगवेगळ्या रुपात तिचे दर्शन होत होते. धर्मशाळेत आम्ही रात्री बाराला पोहचलो होतो. खूप गर्दी असूनही सर्वांची पाठ टेकण्याची सोय झाली. पण पहाटे दोनलाच उठून आम्ही किनाऱ्यावर गेलो. थंड हवा, चमचमणारे थोडेसे तारे, लूकलूकणारा बॅटरीचा उजेड, आणि खाली टोचणारे लहानमोठे दगड अशा अवस्थेत आम्ही तीन साडेतीन तास बसलो होतो. भरती आल्यावरच नावा सोडतात.

Namrada Parikrama Photos 2

सकाळी सकाळी सहा वाजता आम्ही नावेत बसलो. कोठेही लाईट नाही. नावेत टॉर्च, मोबाईल चालू करायचे नाहीत असे सांगितले. पूर्ण उजाडल्यावर आम्ही सर्वांनी फोटो काढले. नर्मदा जिथे सागराला मिळते त्या रेवासागराला वळसा घालून अरबी समुद्रातून सकाळी साडेनऊला आम्ही मिठीतलाई गावाजवळ नावेतून उतरलो. आता खरी परिक्षा होती, उतरण्याच्या वेळी ओहटी होती. त्यामुळे नाव किनाऱ्यापासून एक ते दिड मैल आतच थांबली. व आम्हाला गुढग्याएवढ्या पाणी व चिखलातच उतरावे लागले. पाण्यातून चालताना भिती वाटली, तसेच मजाही वाटत होती. थोडेसे चालल्यावर लटपटत्या पायाने दगा दिला आणि समुद्राने मला प्रेमाने मिठी मारली. तो म्हणाला, “नदीत तर नेहमीच अंघोळ करता जरा माझ्यातही बुडी मार ना”. स्वतःचा जोर व थोडी दुसऱ्याची मदत घेऊन उठले. आधाराने पाण्याबाहेर पडले. पण पुढेतर आणखीच मोठी अडचण ‘आ’ वासून ऊभी! नुसता चिखलच चिखल आणि तो सुद्धा निसरडा, एक एक पाऊल टाकणे कठीण होते. तेथील लोक सांगत होते, एक पाऊल टाकून घट्ट रोवा, मगच दुसरे पाऊल उचला! पण थोड्या कमी वयाच्या व वजनाचे परिक्रमावासी हे करु शकत होते. इथेही एका माणसाच्या रुपाने नर्मदा मैया मदतीला धावली. एक माणूस ‘माँजी, माँजी’ करत पुढे आला, माझ्या हाताला धरुन त्याने मला शेवटपर्यंत, म्हणजे कोरड्या वाळूत आणून सोडले! मी त्याला नमस्कार केला. तर त्याच्या डोळ्यात पाणीच आले. त्यानेच मला वाकून नमस्कार केला. नर्मदेचे हे दुसरे रुप मी पाहिले.

या ठिकाणाला हरीधाम म्हणतात. तेथे चहा नाष्टा करुन आम्ही नारेश्वरला घाटावर अंघोळीला गेलो. माझे बरेच कपडे चिखलाने माखले होते ते सर्व मी नदीवर धुतले. अंघोळ केली. भर दुपारची वेळ असल्यामुळे ओले ओझे घेऊन घाट चढताना मला बराच त्रास झाला. पायऱ्या बऱ्याच उंच होत्या. आणि धर्मशाळाही लांब होती. एका मुलीला मी कपडे वर आणून देण्यास सांगितले. इथे माझी पुरी दमछाक झाली. मी आवारातील एका झाडाखालील बाकावर बसूनच राहिले, जेवायला जाण्याचेही मला त्राण नव्हते. तेंव्हा केदारने पाणी व खऱ्यांनी, ‘थोडे तरी खा’ म्हणून थोडा भात दोन पोळ्या वगैरे भरेलेले ताट तेथेच आणून दिले. हे उपकार कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर आम्ही गाडीने गरुडेश्वरला निघालो. आमच्यातील एक प्रवासी सौ. स्वप्ना केळकर यांनी मात्र गाडीनेच मिठीतलाई गाठली होती.

ह्यावेळेस आम्ही नर्मदेच्या उत्तर तटावर होतो.

नंतर आम्ही गरुडेश्वराला निघालो. येथे श्री वासूदेवानंद सरस्वती यांचे समाधी मंदिर आहे. भोळ्या शिवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी गरुडाने येथे तपश्चर्या केली. म्हणून या स्थानाला गरुडेश्वर म्हणतात. घाटावर गरुड व शिवलिंग यांचे छोटेसे मंदिर आहे. पण घाटावरुन मंदिराला जाण्यासाठी १५० पायऱ्या आहेत. तेथून जवळच टेंबेस्वामींचा मठ आहे तेथेही दर्शन घेतले. नंतर आम्ही मांडूकडे रवाना झालो.

वाटेत पाहिले की, दोन उंच मध्यावर सरदार सरोवर हे धरण बांधण्यात आले आहे. या परिसरात नर्मदेला पाच सहा नद्या येऊन मिळतात. तेथील जवळजवळ असलेल्या दोन टेकड्यांवर सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. आताशी दोन्ही टेकड्यांवर एक एक पाय उभारुन झाला होता. मांडूला जैन धर्मशाळेत मुक्काम केला. येथे श्रीराम मंदिर असून ते ११०० वर्षांचे जुने आहे. त्याची स्थापना इ. स. ९०१ मध्ये झाली. येथील मुर्ती चतुर्भूज आहे.

नंतर राणी रुपमतीचा महाल पाहिला. तिची नर्मदेवर खूपच श्रद्धा होती. म्हणून बाजबहाद्दर व रुपमतीने तेथे रेवाकुंड बांधले. राणीचा जहाज महाल पाहिला. या महालाच्या चारही बाजूला तलाव आहेत पावसाळ्यात हे तलाव पाण्याने भरतात त्यामुळे हा महाल जहाजा सारखा दिसतो. दररोज सकाळी व रात्री सोबत घेतलेल्या नर्मदा जलाची आरती आम्ही करत होतो. पुष्कळ वेळा माझी जलाची बाटली विसरली गेली, तेंव्हा अर्चनाने ती जबाबदारी घेऊन स्वतःच्या बाटलीबरोबर माझी ही बाटली घेत असे. तसेच माझ्याजवळ पूजा साहित्यही नव्हते. मी फक्त नर्मदेसाठी तीन साड्या व कुमारीकांसाठी गळ्यात कानात असे घेतले होते. पण मला अर्चनाने वेळोवेळी मदत केली. माझ्या बाटलीला छोटेसे लोकरीचे आसनही दिले, जे मी अजून जपून ठेवले आहे. माझी सख्खी मुलगी ना ती!

नंतर आम्ही महेश्वरला रवाना झालो. हॉटेलवर जाण्यापूर्वी होळकर वाडा व तेथील प्रसिद्ध घाट पाहिला. घाटावर अहिल्याबाईंचा ब्रांझमधीला पूर्ण उभा पुतळा आहे. सर्व संकटांवर मात करत राज्य धुरा सांभाळून लोककल्याणाची अनेक कामे त्यांनी केली. दिल्ली ते रामेश्वर हा क्रमांक एकचा रस्ता त्यांनी बांधला. ठिकठिकाणी घाट व धर्मशाळा व पाणपोई उभ्या केल्या. हातमाग व्यवसाय तेजीस आणला. येथील महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. तसेच इंदुरी साड्याही प्रसिद्ध आहेत. अशा कणखर व्यक्तीमत्वाला व सात्विकतेला माझा दंडवत!

नंतर आम्ही नर्मदामैयाचे नाभीस्थान असलेल्या नेमावर येथे गेलो. वाटेत मंडलेश्वर येथे नर्मदा स्नान केले. नदीत पाण्याखाली असलेले शिवलिंग पाहिले. पिंडीसमोर नंदी व पिंडीमागे पार्वती असे हे शिवलिंग होते. नेमावर हे नर्मदेच्या मध्यावर आहे म्हणून नाभीस्थान म्हणतात. येथे घाटावर पांडवांनी उभारलेले शिवमंदिर पाहिले. मंदिराची बांधणी व शिल्पकला पाहून लोक खरंच भान विसरतात. घाटावर स्नान करतेवेळी एक गंमतच झाली. रुमवरुन कपडे घेताना मी परकरच विसरले. मग गाऊनवरच साडी नेसली. फारसे कोणाला जाणवले नाही. लहानपणी फ्रॉकवर साडी नेसण्याची युक्ती येथे कामी आली. जेवणे झाल्यावर जबलपूरकडे निघालो.

वाटेत बरमन (ब्राम्हण) घाट लागला. रात्र झाल्यामुळे फक्त वरुनच घाट पाहिला. येथे प्रवाहात मध्यभागी एक भूखंड आहे, त्यावर भीमकुंड, अर्जूनकुंड अशी सात कुंडे आहेत. जैन धर्मशाळेत मुक्कम केला. भेटाघाटावर जाण्यापूर्वी एक धबधबा (धुआंधार धबधबा) पहाण्यासाठी गेलो. घाटापासून खूपच मागे गाडी उभी राहिली. मधला सगळा बाजार ओलांडून घाटावर जावे लागले. मी निम्माच घाट उतरले. परत वर चढणे व गाडीपर्यंत चालत जाणे जमणार नाही. म्हणून मध्येच एका झाडाशी बसले. जवळच पेरुवाली होती. पेरु घेतले. अजून खाली उतरुन गेल्यास नर्मदामैया कड्यावरुन कोसळताना दिसते. तेथपर्यंत विजेरु पाळण्यानेही (Ropeway /Cable Car) जाता येते. पण तसे करताना नदी ओलांडली जाते म्हणून परिक्रमावासी जात नाहीत. मी बसलेली असतानाच श्री. खरे खालून वर आले, व म्हणाले, “ज्यांनी पावसाळ्यात कोकण पाहिले आहे त्यांना या धबधब्याची काय महती”. असो. पण नंतर कळले. जेथे पाणी कोसळते. तेथेच खाली पांढऱ्या संगमरवरी खडकाचे शिवलिंग आहे व त्यावर मैया अभिषेक करते आणि त्याचे तुषार चौफेर उडत असतात.

वर आलेले लोक बाजारात संगमरवरी वस्तू खरेदी करत होत्या. जास्त ओझे नको म्हणून मी खरेदी टाळली. आधीच माझे सामान सतत कोणी ना कोणी उचलत होते. त्यात भर नको. हळूहळू मीही वर बाजाराच्या दिशेने चालू लागले. पण रस्त्यात ग्रुपमधले कोणी दिसेनात. अंधारही पडू लागला होता. एका दुकानात मी दमून बसले व मँगो पित होते तेवढ्यात मला श्री. केळकर दिसले. त्यांना हाक मारुन दहा मिनीटात येते असे सांगितले. पण गाडीत गेल्यावर कळले कि पुष्कळ बायका अजून दुकानातच आहेत.

जशी ही ट्रीप ठरली तेंव्हापासून मी परिक्रमेने पछाडले होतेच. जरी गाडीतून कोठेही उतरले नाही तरी गरूडेश्वर व भेटाघाटाला नक्की उतरणार असे मनाशी ठरविले होते. आजपर्यंत सिनेमा, छायाचित्रे व चित्रकलेतून भेटाघाटाचे सुंदर, मनोहारी चमचमणारे चित्र मनावर कोरले गेले होतेच. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर मात्र तसे वाटले नाही. नदी पार न करता नौका विहार करण्याचे ठरले. ट्रिपमधील माझ्या सख्ख्या व सावत्र मुलींनी (ही नावे त्यांनीच ठेवलेली, मात्र वागणूक अशी नव्हती) माझी जबाबदारी घेतली. पायऱ्या उतरवून मला नौकेत बसविले. नाव सुरु झाली आणि नजरेसमोर असलेले घाटाचे स्वरूप पालटू लागले. त्यातच गाईडनेही त्याची रसाळ कॉमेंट्री सुरु केली. हास्याच्या उकळ्या फुटू लागल्या. समोर किळेकभिन्न संगमरवरी दगड तर विरुद्ध बाजूला पांढऱ्या संगमरवराचे खडक पहाताना खूप आनंद व आश्चर्य वाटत होते. प्रवाहात मध्यभागी पांढराशुभ्र संगमरवर आहे. त्याचा आकार शिवाच्या पिंडीसारखा आहे.

पहाता पहाता रात्र झाली. नदी अंधारात बुडाली. आकाशात चंद्र उगवला. वल्ह्याचा चुबुक चुबुक आवाज येत होता. आणि एकदम घाटीकडे लक्ष गेले. कोणी दाक्षिणात्य, त्यांचे ते चक्राकार वातींची रचना असलेले पात्र हाती घेऊन नर्मदेची आरती करत होता. त्याचे सुंदर प्रतिबिंब नर्मदेत पडले होते. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ही दृष्य पहात होते.

आम्ही नावेतून घाटावर उतरलो. क्षणार्धात मला ग्रुपमधील कोणीच दिसेना. घाटावर अंधार पडला होता. वर जाण्याच्या मार्गावर दिवे होते. त्या उजेडात मी बसून राहिले. कोणाचे तरी लक्ष गेले, …अरे, आजी तिकडे कोठे गेल्या. असे म्हणाले. अर्चनाचे लक्ष गेले. ती माझ्याजवळ आली. म्हणाली, “ममा, ईथेच बस, आरती झाल्यावर येथूनच पुढे जायचे आहे”. माझी मैयाजलाची बाटली आरतीसाठी तिने बरोबर घेतली होती. हळूहळू लोक वरती चढू लागले. मीही एका बंद दुकानाच्या फळीचा आधार घेत वर चढू लागले. पाय जाम सुजले होते. तेवढ्यात एक सुस्थितीतील तरुण माणूस खाली आला व माझ्या हाताला धरुन त्याने मला वर नेले. वर गेल्यावर कळले, तो शेवटच्या दुकानाचा मालक आहे. नोकरवर्ग दुकानात होता. आणि हा अडलेल्यांना आधार देत होता.

जय नर्मदे हर! ती मला अशीच वेगवेगळ्या रुपात भेटली.

भाग २ समाप्त क्रमश:

भाग १ वाचा

सूचना: सदर लेखात वापरलेली छायाचित्रे हि केवळ स्थानिक माहात्म्य वाचकांना कळावे, त्याचा अनुभव घेता यावा, म्हणून टाकली आहेत. ती छायाचित्रे परिक्रमे दरम्यानची नाहीत. मात्र क्षणचित्रात वापरलेली छायाचित्रे हि लेखिकेची स्वतःची परिक्रमे दरम्यानची आहेत.


Smita Shrihgari Kadhe

लेखिकेचा परिचय

नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: 2, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006


Copyright Proof: Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.


काही क्षणचित्रे

Namrada Parikrama Photos 2
Namrada Parikrama Photos 12
Namrada Parikrama Photos 10
Namrada Parikrama Photos 6
Namrada Parikrama Photos 5
Namrada Parikrama Photos 9
Namrada Parikrama Photos 3
Namrada Parikrama Photos 4
Namrada Parikrama Photos 1


स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

नर्मदे हर!

[मागच्या दोन भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या तीरावरील प्रकाशा गावातील बलबला कुंडावर गेलो. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश झाल्यावर प्रसिद्ध शूलपाणीच्या जंगलाला वळसा घालून राज पीपला गावात मुक्कामाला पोहोचलो.
पुढे गुजरातच्या पश्चिम किनार्यावरील कटोपार गावातून नावेने रेवा सागर म्हणजे जिथे नर्मदा नदी समुद्राला मिळते त्याला वळसा घालून पलीकडच्या मिठी तलाई गावात पोहोचलो. तेथे पोहोचेपर्यंत समुद्रात सुमारे दीड मैल चिल्का आणि गाळातून चालावे लागले होते. तेथून पुढचा प्रवास हा नर्मदेच्या उत्तर ताटावरून झाला. वाटेत गरुडेश्वरला वासुदेवानंदसरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, पुढे मांडू गावातील ११०० वर्षे जुने श्रीरामाचे एकमेव चतुर्भुज मूर्तीचे दर्शन घेतले. जबलपूरच्या जवळील भेडाघाटला आल्यावर तेथील सुप्रसिद्ध ‘धुवाधार धबधबा’ पाहिला आणि सायंकाळच्या वेळेस भेडाघाटाच्या रंगीबेरंगी संगमरवरी डोंगरातून नर्मदेत फेरफटका मारला. आता पुढे …..]]

भाग ३रा सुरू:

नर्मदे हर ….!

नंतर रात्रीचा प्रवास करून आम्ही मृत्युंजय आश्रम अमरकंटक येथे पोहचलो. देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडणाऱ्या विंध्यसातपुडा (Satpuda Mountains) पर्वतात आणि मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात हे स्थान येते. या स्थानापासून पर्वत उंच सखल होत होत अरबी समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. अमरकंटक हे स्थान मैकल पर्वतात आहे. याची समुद्रसपाटी पासूनची उंची ३५०० फूट आहे. रेवा नायक या राजाने येथे कुंडाची निर्मिती केली आहे. त्या राजाचा तेथे पुतळा आहे. नागपूरचे राजे भोसले यांनी येथे स्नानकुंड बांधले आहे. त्याचे स्वच्छतेचे काम चालू होते म्हणून आम्ही जवळच्या घाटावर स्नानाला गेलो. नेमावर व या ठिकाणी स्त्रीयांना कपडे बदलण्यासाठी छोट्या छोट्या पत्र्याच्या शेडस् उभ्या केल्या आहेत. बाकी कुठल्याही घाटावर ही सुविधा नाही. तरीही अंघोळ करताना वा कपडे बदलताना कोणीही स्त्रीयांकडे पहात नाही, किंवा अश्लिल टोमणेही कधी ऐकू आले नाहीत.

उगम स्थानी पांढरी साडी नेसायची मी ठरवले होते. नदीस्नान झाल्यावर मी कपडे करुन टपरीतून बाहेर आले. पांढरे केस तसेच पांढरे साडी ब्लाउज पाहून “नर्मदामैया” म्हणत सर्वांनी ओरडा केला. पण नुसत्या वेषाने गुण थोडेच अंगी येणार.

Writer Smita Kadhe at Amarkantak
Writer Mrs. Smita Kadhe at Amarkantak

तेथे एकूण तीन नद्या उगम पावतात. एक नर्मदा, दुसरी शोण (हा नद आहे) आणि तिसरी जुहिली म्हणजेच भद्रा, अर्थात नर्मदेची मैत्रिण असे सांगतात. पूर्वी नर्मदा व शोण यांचे लग्न ठरले होते, पण शोणने जुहिलीशी लग्न केले. नर्मदा रागावली व तिने तोंड फिरविले आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागली. तर शोण व जुहिली पूर्वेकडे वाहू लागले व नर्मदा कुमारिकाच राहिली.

घाटावरुन गाडी दुसऱ्या रस्त्याने जाते. व यात्रिक डोंगरावरील जंगलातून चढ उताराची वाट चालत नदीच्या उगम स्थानी जातात. येथे नर्मदेची काळ्या पाषाणातील अतीसुंदर मूर्ती आहे. तेथील गुरुजी नर्मदेची आपल्याकडून शास्त्रशुद्ध पूजा करुन घेतात. सोबत आणलेले जल थोडे कुंडात ओतायचे व दुसरे भरुन घ्यायचे. येथे नर्मदेची बारीक धार आहे. जलाची पूजा झाल्यावर जल तर बदललेच, पण घरी नेण्यासाठी बाटलीभर तेथील जल घेतले. गुरुजींनी सुंदर माहिती दिली व शंका असल्यास विचारा असे सांगितले. मी दोन प्रश्न विचारले. एक नर्मदेला रेवा का म्हणतात व फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करतात?

त्यांचे उत्तर दिले, “नर्मदा खडकाळ भागातून जाताना खळखळाट करीत जाते. देवाने तिला भेडाघाटाचा डोंगर फोडण्याचे काम दिले होते. ते करण्यासाठी मला सतत शिवसन्निध्यात रहायचे आहे असे तिने सांगितले. आपण पहातोच, नर्मदे किनारी वा कोठकोठे प्रवाहातही शिवलिंग दिसतात. नर्मदेतील गोटे बाण म्हणून (शंकराची पिंड) देवघरात दिसतात. खडक फोडताना बारीक वाळू सारखे कणही उडतात, म्हणजे रेती (वाळू) तयार होते म्हणून तिला रेवा म्हणतात”.

जे चार प्रकल्प झाले त्यात सर्व नष्ट झाले. फक्त नर्मदा मैया व मार्कंडेय ऋषी त्यातून वाचले. तसेच ही एकच नदी पूर्वेला उगम पावून पश्चिमेला वहाते. तापी ही तशीच वहाते पण तिचा प्रवाह नर्मदे इतका खोल नाही.

तेथे एक गंमत झाली एक छोटा हत्ती होता. त्याच्या अंगाखालून बाहेर यायचे. त्या हत्तीची उंची कमी होती, बऱ्याच जणींनी प्रयत्न केला. कोणा कोणाला त्रास झाला.

नंतर आम्ही उगमस्थानच्या मागच्या बाजूने म्हणजे, माईच्या बगिच्यातून चालत चालत जिकडे बस थांबली होती तिकडे गेलो तिथे तर फारच गंमत झाली. चहूबाजूने घनदाट जंगल असल्यामुळे माकडांची कुटूंबच्या कूटूंबे तिथे नांदत होती. वाहानांवरील बॅगांवर त्यांचे लक्ष होते. ड्रायव्हरचे जरा दुर्लक्ष झाले, तर चढविलाच त्यांनी हल्ला! आमच्या बसवरील दोन बॅगा त्यांनी उघडल्या, त्यातील कपडे खाली टाकून खाण्याचे जिन्नस पळविले. एवढ्या गडबडीत एक माणूस तेथे मोठ्या पांढऱ्या शुभ्र काचेच्या पेल्यातून रस विकत होता. मी तहान व भुकेने व्याकुळ झाले होते, पण गाडीखाली उतरण्याची हिंमत होत नव्हती. गाडीतील जे खाली होते त्यांना पैसे देण्याची विनंती करत मी खिडकीतूनच ग्लास घेतला, तेवढ्यात माकडांनी पुन्हा हल्ला केला तसे सर्वजण पटापट गाडीत बसले. मीही पटकन रस पिऊन ग्लास त्याला दिला. तोही माकडांच्या भितीने पळत सुटला. मी गाडीतील सर्वांना पैशाबद्दल विचारले, पण सर्वजण आपण दिले नाहीत असे सांगत होते. मैयाने मला बहूदा शंकराचा प्रसाद दिला असावा.

माझी प्रदक्षिणेची खरी कळकळ तिला कळली असावी. मी कधीही थंड पाण्याने अंघोळ करत नाही, पण या अठरा दिवसात फक्त पहिल्या दिवशी मी गरम पाण्याने अंघोळ केली, नंतर सदैव गार पाणीच वापरले. तसेच मी उघड्यावर म्हणजे नदी किनारी कधीही अंघोळ करत नाही. मागे दोनदा केली पण दोन्ही वेळा मला ताप आला. परिक्रमेत मी जवळ जवळ चार पाच वेळा घाटावर अंघोळ केली. तसेच भर उन्हात व प्रवासात मी ऊसाचा रस पित नाही, मला लगेच बाधतो, पण परिक्रमेत मी ऊसाचा रस प्यायले व अगदी ठणठणीत घरी आले. म्हणून म्हणते, मैयाला माझी कळकळ समजली. एकटी प्रवासाला गेलेली मी, पण प्रवासात साथ संगत सुद्धा भावनिक नाते जोडणारी लाभली.

अमरकंटकहून येताना परतीच्या प्रवासात दोन गंमती घडल्या. आमचे मॅनेजर श्रीयुत खरे मागेच राहिले. माकडांच्या गडबडीने गाडी लवकरच पुढे पळवली. एका पेट्रोल पंपावर ही गोष्ट लक्षात आली. तेंव्हा तेथील कोणाची तरी स्कुटर घेऊन ड्रायव्हर त्यांना आणायला गेला. ते आल्याच्या आनंदात आणि वेळेवर पोहचायचे, या विचिराने गाडी ड्रायव्हरने लगेचच सुरु केली. पाच दहा मिनीटे गाडीने प्रवास केला. नंतर लक्षात आले की, बसमधील दोघी तिघी पेट्रोलपंपावरच राहिल्या. परत गाडी मागे घेऊन त्यांना बसमध्ये घेऊन गाडी निघाली. परत मृत्युंजय आश्रमात जेवणे केली . दुपारच्या चहा नंतर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. मैकल पर्वतात दुग्धधारा व कपिलधारा असे दोन धबधबे आहेत. दुर्वास ऋषींनी उग्र तपाचरण केले, तेथे मैया दुग्धधारांनी धांवली व कपिलऋषींनी जिथे तप केले तिथे ही सहस्त्रधारांनी धांवली, म्हणून धबधब्यांना अशी नावे पडली.

रात्रीचा प्रवास करुन सकाळी सकाळी आम्ही होशंगबादला हॉटेल संगिनी येथे उतरलो. बाकी लोक घाटावर गेले. मी मात्र रुमवरच अंघोळ केली. संध्याकाळी आम्ही सर्वच घाटावर गेलो. शांत वातावरण, फक्त घाटावरच उजेड व नदीवर पूर्ण अंधार. आकाशात चंद्र दिसत होता, तेथून उठूच नये असे वाटत होते. परत समाजाच्या गदारोळात अडकू नये असे वाटत होते. पण फरशीचा गारठा आणि बसलेल्या ठिकाणची कमी उंची, यामुळे उठल्यावर चालणे कठीण वाटले. म्हणून थोड्या जास्त उंचीवर बसावे, म्हणजे पटकन उठता येईल असे वाटले. जरा खालच्या पायरीवर ग्रुपमधील काही बायका होत्या. त्यांना मला दुसरीकडे बसते असे सांगायचे होते म्हणून हाका मारत होते. त्याही त्या दृष्यात गुंग झाल्या, त्यामुळे त्यांचे लक्ष गेले नाही. शेजारच्या ग्रुपमधील एकाचे लक्ष गेले. त्यांनी तत्परतेने पुढे येऊन खाली उतरण्यासाठी मदत देण्याची तयारी दर्शवली. नंतर त्या बायकांना मी सांगतो, तुम्ही चला असे म्हणून माझ्या हाताला धरुन त्या उंच जागेकडे मला चालविले. वाटेतच म्हणले चपला काढा. विचित्र मन साशंक झाले, पण चपला काढल्या तर, अहोआश्चर्य! त्यांनी माझ्या हातात चालू असलेल्या आरतीचे तबकच दिले. दररोज बाटलीतल्या जलाची आरती तर करतातच पण मला नर्मदेच्या पात्राचीच आरती करायला मिळाली. ही त्या मैयाचीच कृपा! डोळ्यात पाणी आले. मैयानेच माझ्याकडून पूजा करवून घेतली. माझ्या दादांची ईच्छा तिनेच पुरवली.

त्या दिवशी नरेनचा वाढ दिवस होता. म्हणून सर्वांना देता येईल असे काहीतरी स्वीट बाजारातून आणायला खऱ्यांना सांगितले. त्यांनी रसगुल्ले आणले होते. प्रत्येकी एक एक आला. जेवणा आधी मैयाची आरती केली. रात्री तिथेच मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारेश्वरासाठी रवाना झालो. दुपारी तीन वाजता तेथे पोहचलो. गजानन धर्मशाळेत जागा मिळाली नाही. दुसरीकडे उतरावे लागले. सर्वजण अगदी मॅनेजर व पुजारी सुद्धा सांगत होते कि, आजच संकल्पपूर्ती करा. पण जेवणे झाल्यावर संकल्पपूर्ती नको असे ठरले. बहुतेकांनी पहाटे रुमवरच अंघोळी केल्या. पहाटे चारला चहा घेऊन आम्ही घाटावर निघालो. घाटावर पूर्ण अंधार होता. पायाखालचा रस्ताही दिसत नव्हता. बऱ्याच उशीराने गुरुजींनी पूजा सांगितली. नंतर बरोबरचे जल थोडे प्रवाहात, थोडे ओंकारेश्वरावर आणि उरलेले सर्व ममलेश्वरावर घालायचे असे गुरुजी म्हणाले. संकल्पपूर्ती झाल्यामुळे आम्ही नावेतून नदी ओलांडून वर जावे का नाही या विचारात असतानाच वैशाली आणि सुजाता म्हणाल्या, “चल ममा, आम्ही आहोत बरोबर. तू स्वतःच्या हातानेच जल घाल”. त्यांनी मला उभारी दिली व मी वर गेले. माझे सामान इतरांनी घेतले. हळू हळू वर चढले. देवळात गर्दी तर खूपच होती. प्रत्येकाच्या हातात पाणी होते. आणि ते पाणी हिंदकळत होते. त्यामुळे सगळीकडे ओले झाले होते. गर्दीने धक्काबुक्की व रेटारेटी होत होती. अर्चनाताईंना फारच त्रास होऊ लागला. कोणीतरी, बहुतेक वैशाली असावी, त्यांना बाजूला काढले व त्यांना मोकळा श्वास मिळाला.

नंतर नावेने अलिकडे येऊन ममलेश्वराला आलो. तेथील घाट कसाबसा चढले. पुन्हा चालणे कठीण वाटले. तर गुरुजीच स्कुटर घेऊन आले. त्यांनी मला देवळात सोडले. इथेही मी स्वतःच्या हाताने पाणी घातले, रिकामी बाटली सिंधुताईंनी घेतली व परत घाटावर जाऊन घरी नेण्यासाठी भरुन आणून दिली. तेवढ्यात यशोदा मैयाने हांक मारली व आपण रिक्षाने रुमवर जाऊ, असे सांगितले. मंदिराबाहेरआल्यावर तिघी चौघी रिक्षाने रुमवर आलो.

आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मला नेहमीचा पायाचा अटॅक आला. अठरा दिवस निर्विघ्न पार पडले होते. मी चालूच शकत नव्हते. रिक्षा ड्रायव्हरच्या मदतीने मी फाटकाच्या आत एका खुर्चीवर बसले. रुममधील माझे सामान पॅक केलेलेच होते. ते मुलींनी बाहेर ठेवले. नाष्टा व जेवणाची पॅकेटस् देण्यात आली होती. बसमध्ये पुढील सीट माझ्यासाठी राखून ठेवण्यात आली. मी कशीबशी सीटवर बसले. ड्रायव्हर हिरालालने कौशल्य दाखवले, ११ वाजता ओंकारेश्वराहून निघून, बरोबर एक वाजता आम्ही इंदोर गाठले. कारण तेथून पुण्याची गाडी १.२०ला होती. तर कोणाचे पाचचे फ्लाईट होते. आमची अवंतिका एक्सप्रेस ४.२०ला होती. स्टेशनला सामान आत नेण्यासाठी हातगाडी ठरवली. पुरुषवर्ग सामानाबरोबर गेला. वैशाली व सुजाता यांनी स्टेशनमध्ये जाऊन माझ्यासाठी व्हिलचेअर आणली. गाडीत बसताना त्यांनी मला आधार देऊन सीटवर बसविले व माझे सामान सीटखाली नीट लावून दिले. ४.२० ला गाडी हलली. अर्चना व भावना पुण्याच्या गाडीने गेल्या. माझ्या पायाच्या अटॅकमुळे मी त्यांना बाय बाय पण करु शकले नाही. नंतर पाच- साडेपाचच्या सुमाराला पाय नॉर्मलला आला. पहाटे पहाटे गाडी मुंबई सेंट्रलला आली. ठाण्याला रहाणारे चौधरी यांनी मला टॅक्सीने घरापर्यंत सोडले.

प्रवासाला सुरुवात झाली, त्यावेळी कंपनीच्या कामगारांपैकी कोणीतरी माझ्या तोंडावरच म्हणाले, या वयात घरच्यांनी एकटे पाठवलेच कसे? मी त्यांना म्हटले, “तुमच्याच जबाबदारीवर”. तसे आम्हाला सांगितलेच होते. असे असूनसुद्धा त्या सर्वांनी खूपच छान काम व सर्वांची योग्य ती काळजी घेतली. माझे पाय खूपच सुजले होते. माझ्या सूनेने मोबाईल वर एका औषधाचा फोटो पाठविला रस्त्यात औषधाचे दुकान दिसताच केदारने ते औषध मला आणून दिले ग्रुपमधील सर्वांनीच एकमेकांना, विषेशतः मला खूपच मदत केली.

जरी आमची ट्रीप खूप छान झाली असली तरी एक फार मोठे गालबोट लागले व कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. आमचे मॅनेजर श्री. खरे, अतिशय साधे व गरीब स्वभावाचे. वेळोवेळी सदैव कुठल्याही कामाला तयार असणारे. ओंकारेश्वरी पहाटेच्या अंधारात अंघोळ करताना पाय घसरून पडले. त्यांना तर पोहता येत नव्हतेच पण पट्टीचे पोहणारेही त्या अंधारात पाण्यात उडी घ्यायला तयार झाले नाहीत. तेथे पाण्याची खोली ५०० फूट आहे असे म्हणतात.

शेवटी उजाडल्यावर म्हणजे सात साडेसातला त्यांचे पार्थीवच हाती आले.

नर्मदेमुळे त्यांचे सोने झाले, पण घरच्यांचे मात्र दररोजचे मरणच ना!

नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!

समाप्त!

सूचना: सदर लेखात वापरलेली छायाचित्रे हि केवळ स्थानिक माहात्म्य वाचकांना कळावे, त्याचा अनुभव घेता यावा, म्हणून टाकली आहेत. ती छायाचित्रे परिक्रमे दरम्यानची नाहीत. मात्र क्षणचित्रात वापरलेली छायाचित्रे हि लेखिकेची स्वतःची परिक्रमे दरम्यानची आहेत.


Smita Shrihgari Kadhe

लेखिकेचा परिचय

नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: , सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006


Copyright Proof: Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.


काही क्षणचित्रे

Namrada Parikrama Photos 14
Namrada Parikrama Photos 21
Namrada Parikrama Photos 23
Namrada Parikrama Photos 9
Namrada Parikrama Photos 7
Namrada Parikrama Photos 5
Namrada Parikrama Photos 13





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...