Monday, June 19, 2023

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १

 https://skyposts.blogspot.com/search/label/Travel

हिमालयात एकदा जाऊन आलं कि पुनःपुन्हा जाण्याची ओढ लागते. ते पर्वत आपल्याला साद घालत राहतात. हिमालय मी पहिल्यांदा अगदी जवळून पाहिला तो "व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या" ट्रेकमध्ये. (त्याबद्दल वाचा या लेखमालिकेत) त्यानंतर एक दोन वर्षात "एव्हरेस्ट बेस कॅम्प" ट्रेक करण्याचा योग्य जुळुन आला. (त्याबद्दल लिहिण्याचा योग अजून जुळून यायचा आहे.) त्या अविस्मरणीय ट्रेकनंतर मी पुन्हा हिमालयात जाण्याची वाटच बघत होत

ती संधी पुन्हा या वर्षी मिळाली. आत्ता गेल्या आठवड्यात मी आणि आमचा ८ जणांचा ग्रुप, आम्ही ट्रेक दि हिमालयाज सोबत "चोपता चंद्रशिला तुंगनाथ" हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेक दि हिमालयाज हि नावाप्रमाणेच हिमालयात ट्रेक आयोजित करणारी कंपनी आहे. ऋषिकेशला त्यांचं मुख्यालय आहे. 

यावर्षीचा चंद्रशिला साथीचा हा त्यांचा अखेरचा ट्रेक होता. एका ट्रेकमध्ये ते २४ पर्यंत बुकिंग घेतात. आणखी ६ जण आणि ट्रेक लीडर असे एकूण १५ जण या ट्रेकमध्ये होते. 



भारतातले बरेच हिमालयातले ट्रेक हे उत्तराखंडमध्ये आहेत, आणि त्यांची सुरुवात होते हरिद्वार/देहरादून किंवा ऋषिकेशमधुन. आमच्या ट्रेकची सुरुवात होती हरिद्वारमधून. हरिद्वारमध्ये सगळ्यांना एकत्र करून गाडीने सारी या गावाला नेऊन तिथून खरा ट्रेक सुरु होतो. 

त्यामुळे आम्ही पुणे-मुंबई कॅबने, मुंबई-देहरादून थेट विमान आणि मग देहरादून-हरिद्वार पुन्हा कॅब असे टप्पे खात हरिद्वारला दुपारी येऊन पोचलो. जॉली ग्रॅण्ट विमानतळ हे देहरादूनचं विमानतळ म्हणून ओळखलं जात असलं तरी ते देहरादूनमध्ये नाही. तेथून बऱ्याच अंतरावर आहे. देहरादून, ऋषिकेश आणि हरिद्वार अशा ३ मुख्य शहरांमध्ये आहे.

तेथून हरिद्वारचा रस्ता तासाभराचाच असला तरी आम्हाला ट्राफिक खूप लागली. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला. हा पर्यटनाचा मोसम असल्यामुळे सध्या रोज खूपच ट्राफिक आहे असं ड्रायव्हरकडून समजलं. 

हरिद्वारला हॉटेलवर पोचलो तेव्हा सगळ्यांना भूक लागली होती. सामान रूममध्ये काढून ठेवलं आणि लगेच खाली येऊन खाण्यापिण्याची चौकशी केली. मॅनेजरने होशियारपूरी नावाचं एक हॉटेल चांगलं आहे असं सुचवलं. त्यावेळी त्या छोट्याशा गल्लीत जास्त रहदारी नव्हती.

सायकल रिक्षा असल्या तरी आम्ही त्या करायला जरा बिचकत होतो. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही शेवटी दोन रिक्षा ठरवून निघालो. एका माणसाने आपल्यासारख्या ४ धडधाकट व्यक्तींना ओढून न्यावं हा थोडा विचित्र विचार मनात येत होता.

पण त्यांच्याकडे पाहून सगळ्यांनी असा विचार केला तर हा रोजगार म्हणून निवडलेल्या माणसांनी काय करावं हा हि विचार येत होता.

१५ मिनिटात आम्ही होशियारपूरी हॉटेलला पोचलो. १९३७ पासून असा त्याचा फलक ते किती जुनं हॉटेल आहे हे दर्शवत होता. फार मोठं टापटीप हॉटेल नसलं तरी तिथल्या गर्दीवरून ते लोकप्रिय आहे याचा अंदाज येत होता. आम्हाला ४-५ मिनटात ८ जणांना पुरेसं एक टेबल मिळालं.

टेबल मिळण्याआधीच तिथल्या वेटरने अगत्याने दुसरी बसायला जागा दिली होती, पाणी आणून दिलं होतं, आणि ऑर्डर ठरवायला मेन्यूकार्डसुद्धा आणलं होतं. त्यामुळे इतक्या उन्हातून आलो असलो तरी टेबल मिळेपर्यंत आम्ही आत स्थिरावलो होतो, आमची ऑर्डर देऊन झाली होती.

तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव उत्तम होती. आम्ही मनसोक्त जेवलो. आम्हाला विशेष आवडली ती म्हणजे फणसाची भाजी. हा पदार्थ आपल्याकडे सहजासहजी हॉटेल मध्ये मिळत नाही. आणि लस्सी. आपल्याकडे लस्सी फारच घट्ट आणि अति गोड असते. उत्तरेकडे ताजी, पातळ आणि फेसाळती लस्सी पिण्याची मजा वेगळीच आहे.

जेवुन निघाल्यावर पुन्हा ५-१० मिनिटे आम्ही सायकलरिक्षा ला काही पर्याय मिळतो का बघत होतो. पण तो काही मिळाला नाही. सायकलरिक्षा मधेच पुन्हा आमची स्वारी निघाली रूमकडे.

अगदी तासभर पहुडलो आणि लगेच बाहेर निघण्याची वेळ झाली. तयार होऊन आम्ही हर कि पौडीला जायला निघालो. तिथे आम्हाला संध्याकाळची गंगा आरती बघायची होती आणि मग आजूबाजूच्या भागात खादाडगिरी करायची होती. त्याव्यतिरिक्त गर्दी मध्ये मंदिरांमध्ये फिरण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. विचार जुळायला लागले कि ट्रिपची मजा जास्त असते.

जाताना मात्र आम्हाला बॅटरीवाली रिक्षा मिळाली. आम्ही पण निवांत होतो, आणि तो रिक्षावाला पोरगा पण, त्यामुळे काही सेकंद ती रिक्षा चालवायची माझी हौस पूर्ण झाली.

या वेळेस गंगेचं पाणी फार स्वच्छ वाटलं. मागच्या वेळेस इतकं काळं गढूळ पाणी होतं कि त्याला हात लावायची पण इच्छा होत नव्हती. पण यावेळी मात्र आम्ही बिनधास्त पाण्यात उतरलो, टाईमपास केला, फोटो काढले. आता हि कमाल आपोआप झाली का नमामि गंगे, स्वच्छ भारत योजनेमुळे ते ती गंगामैय्याच जाणे.

गंगा घाटावर गर्दी सतत असते आणि आरतीची वेळ जवळ येते तशी ती वाढत जाते. लोक एकेक दोन दोन तास जागा पकडून बसून राहतात. त्यामुळे आम्हाला फार चांगली जागा मिळाली नाही. आणि मागे लोक उभेच होते. तिथले चौकीदार बसून घ्या बसून घ्या अशी विनंती करत होते पण आमच्या पुढचे लोक काही जुमानत नव्हते, त्यामुळे आम्हालासुद्धा उभं राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

तिथे बराच वेळ मंत्रघोष आणि आरती चालु असत. लोकांचे पूजापाठ चालु असतात. तुम्ही सुद्धा पूजा करा आरती करा दान करा म्हणत दलाल मागे लागत असतात. गंगेत स्नान केलं कि पाप मिटतात, अस्थी वाहिल्या कि मोक्ष मिळतो असे समज आहेत. त्यामुळे लोकांच्या अंघोळी, अस्थी/निर्माल्य विसर्जन हेही चालु असतं. लोकांची फोटोग्राफी चालु असतं. आणि हे सगळं सोबत चालु असतं.

गुरुजींच्या मंत्रघोषानंतर गंगेची आरती (रेकॉर्डेड) सुरु होते. ती आठ दहा गुरुजी मिळून करतात. छान सोहळा आहे. त्यानंतर बरेच लोक आरतीचं ताट घेऊन फिरतात. कुठली ऑथेंटिक थाळी ते कळत नाही. पण दानाच्या अपेक्षेमुळे बरेच लोक फिरतात. आणि आलेले लोक दान टाकतात सुद्धा.

आरती झाल्यावर आमची खादाड भटकंती सुरु झाली. आमच्यातल्या समीरने इंटरनेट वरून तिथे खायला चांगलं मिळतं अशी माहिती काढली होती.

सर्वात पहिले खाल्लं ते म्हणजे सामोसे, खस्ता कचोरी, पुरी भाजी आणि चंद्रकला मिठाई. सगळ्यात तेल तूप अगदी भरपूर. चव अगदी विशेष नाही. नशीब चांगलं म्हणून आमचा ८ जणांचा ग्रुप होता. नाहीतर अशा भरपूर गोष्टी ट्राय करणे हे काही सोपे काम नाही.

मग तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यातुन फिरत फिरत, थोडी किरकोळ शॉपिंग करत आम्ही पुढे निघालो. मोठे पान दि गिलोरी, बेलफळाचा ज्यूस असा आस्वाद घेत घेत आम्ही पोचलो जैन चाट भांडारला. हे आपल्याला गुगल मॅप्स शिवाय सापडणे मुश्किल आहे. किंवा पुन्हापुन्हा विचारत जावे लागेल.

जैन चाट भांडार अगदी पैसे वसूल होतं.तिथले काका अगदी गप्पिष्ट होते आणि आमच्या नशिबाने रात्र होत आली असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. त्यांनी अगदी निवांत त्यांच्या पदार्थांबद्दल माहिती देत प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं.

त्यांच्या गोडगोड बोलण्याइतकंच त्यांचे पदार्थ अप्रतिम होते. कांजिवडा (त्यांची खासियत), गोलगप्पे (पाणी पुरी), आलू चाट हे सगळं आम्ही मनापासुन एन्जॉय केलं. मला आधी इथे न आल्याचा आणि बाकी ठीकठाक गोष्टी खाऊन पोट थोडं भरल्याचा पश्चाताप झाला. पण तरी ह्या जागेची माहिती मिळाल्या बद्दल इंटरनेटचे आणि माहिती काढणाऱ्या समीरचे मी मनोमन आभार मानले.

तिथून निघाल्यावर मग एका गाडीवर कुल्फी आणि बदाम मिल्क (दोन्हीही सुरेख) याने आम्ही आमच्या चरण्याची सांगता केली.

रात्री साधी इकडच्या टमटम सारखी रिक्षा मिळाली. तुडुंब पोट घेऊन रात्री कसेबसे झोपलो. सकाळी लवकर उठून निघायचं होतं दिवसभराच्या प्रवासासाठी. सारी या आमच्या ट्रेकच्या आरंभ स्थानासाठी.


क्रमशः

ता. क. हरिद्वारचा हा दिवस दृक्श्राव्य माध्यमातून अनुभवण्यासाठी हा युट्युब व्हिडीओ बघा.
 
 

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल

या मालिकेतील मागील लेख: चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार

हीच मालिका युट्युबवर दृकश्राव्य माध्यमात :
Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal

ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला लांबलचक प्रवास करायचा होता. हरिद्वारहुन ऋषिकेश मार्गे सारी या गावी आम्हाला जायचं होतं.



अंतर म्हणायला सव्वादोनशे किमीच्या आसपास जरी असलं तरी पूर्ण रस्ता घाटातला आहे. उंच डोंगरात दोन्ही बाजूने फक्त एकच लेन आहे. त्यामुळे फार वेगात प्रवास होत नाही.

आणि त्यात भर पडली ती हरिद्वार आणि ऋषिकेश जवळ झालेल्या ट्रॅफिक जॅमची. पर्यटनाचा मोसम असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूची भरपूर गर्दी झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामेही चालू आहेत. त्यामुळे सध्या रोज ट्रॅफिक होत असल्याचं आम्हाला समजलं.

आमचा ८ जणांचा ग्रुप, आणि अजून ६ ट्रेकर्स हरिद्वार मध्ये आलेले होते. ट्रेक दि हिमालयाजकडून आमच्यासाठी ३ गाड्यांची (सुमो/बोलेरो) व्यवस्था करण्यात आली होती. हरिद्वार स्टेशनहुन आम्हाला घेऊन या गाड्या निघाल्या आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्या. ऋषिकेश पार करायलाच ५-६ तास लागले.

आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मी ज्या गाडीत होतो त्या गाडीचं चाक जॅम झालं. ट्रॅफिक जॅम असल्यामुळे बाकी गाड्या पुढेमागे झाल्या होत्या. आमची गाडी बाजूला घेईपर्यंत बाकी गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही मागे हरिद्वार शहराच्या थोडंसंच बाहेर अडकलो.

मेकॅनिक बोलावणे, तीच गाडी नीट करायचा प्रयत्न करणे ह्यात २-३ तास गेले. तोपर्यंत आम्ही बाजूला धाब्यावर वेगवेगळे चविष्ट पराठे, लस्सी असा भरपेट नाष्टा केला, पत्ते खेळले. दुसरी गाडी बोलावली पण तीसुद्धा हरिद्वारहुनच याच ट्रॅफिकमधुन येणार असल्यामुळे भरपूर वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही निघालो.

ऋषिकेशच्या पुढेच जरा रस्ता मोकळा झाला आणि ड्रायव्हरचं कौशल्य पाहायला मिळायला लागलं. तिथले सगळेच ड्रायव्हर अशा दुर्गम घाटातसुद्धा इतक्या सफाईनं आणि वेगात गाड्या चालवतात. आपण शहरातसुद्धा बारीक गल्ल्यांमध्ये समोर गाडी आली कि जरा जपून थांबत थांबत चालवतो. पण ते अशा घाटातसुद्धा कोणाच्या बापासाठी थांबत नाहीत. सुरुवातीला जरा धडकी भरू शकते, पण थोड्यावेळाने आपल्यालासुद्धा ह्याची सवय होते.



रस्त्यात अलकनंदा आणि भागीरथीचा संगम म्हणजेच देवप्रयाग लागतं. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा, प्रवाहाचा वेग वेगळा, आणि संगम झाल्यावरसुद्धा काही अंतरापर्यंत हा वेगळेपणा स्पष्ट दिसत राहतो. बरोब्बर संगमाच्या कोपऱ्यावर एक सुंदर घाट आणि गाव आहे. तिथे जायला रस्ता पण आहे. मागे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाताना आणि याही वेळेस तिथे थांबण्याची आणि जाण्याची खूप इच्छा होती. पण खूप दूर जायचं असल्यामुळे तेवढा वेळ नसतो. आणि आजतर आम्हाला खूप उशीरही झाला होता.

जेवण सोडता आम्ही कुठेही थांबलो नाही. सारीला आम्हाला पोचायचं होतं ५ वाजता पण वाजले १०. जेवण करून आम्ही लगेच झोपून गेलो.

सकाळी देवेंदर या आमच्या ट्रेक लीडरने ब्रिफींग घेतली. सगळ्यांच्या ओळखी झाल्या, कोणी कोणकोणते ट्रेक केलेत, काय तयारी केली आहे यावर बोलणं झालं. सारी ते देओरीया ताल हा आजचा ट्रेक अगदीच छोटा आणि सोपा असल्यामुळे आम्ही आरामात नाश्ता करून निघालो.


३-४ किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि ह्यात मुख्यतः चढच आहे. अगदी रमत गमत जाऊनसुद्धा आम्ही ३-४ तासात लंचच्या आधी आरामात पोचलो.

कॅम्पसाईट वर आमचं वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आलं. तिथे एक बुरांश नावाची त्या भागात उगवणारी वनस्पती आहे. त्याला लालसर रंगाची फुलं येतात. त्याचं इंग्रजीतील नाव Rhododendron आहे. हे म्हणताना सगळ्यांची गम्मत येते. त्याचा अगदी रुह अफझासारखा दिसणारा ज्यूस बनतो. आणि हे वेलकम ड्रिंक सुद्धा रुह अफझासारखंच तजेलदार आहे. तिथे सर्व दुकानात कोकमसारख्या ह्याच्या बाटल्या मिळतात. ट्रिपहुन येताना मी बुरांश आणि बेलफळ अशा स्क्वाशच्या दोन बाटल्या ट्राय करायला घेऊन आलो.


तिथे कॅम्पसाईटवर पोचल्यावर देवेंदरने सगळ्यांकडून ५-१० मिनिटे स्ट्रेचिंग करून घेतलं. हि गोष्ट मला खूप आवडली. ट्रेकनंतर जो शीण येतो किंवा अंग दुखतं ते ट्रेक संपल्या संपल्या अशी स्ट्रेचिंग करण्यामुळे जवळपास नाहीसं होऊन जातं. एकदम ताजंतवानं वाटतं.

मी या आधी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, एव्हरेस्ट बेस कॅम्प असे दोन हिमालयातले ट्रेक्स केलेत, पण तिथे आमच्याकडून हे करून घेतलं नव्हतं. स्ट्रेचिंगची हि जादू पहिल्यांदाच पाहिली, त्यामुळे ट्रेक दि हिमालयाजच्या त्यांनी ह्या विचारपूर्वक टाकलेल्या गोष्टीचं कौतुक वाटलं.



थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला. ताजेतवाने होऊन जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडावेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण कमीअधिक जोराने पाऊस चालूच होता. त्यामुळे आम्ही शेवटी पावसातच ताल म्हणजेच तलाव बघायला गेलो. ह्याच्यामुळेच ह्या जागेच नाव देओरीया ताल असं आहे.

अतिशय सुंदर तलाव आहे, पण पावसामुळे आम्हाला तिथली दृश्य मात्र फार काही बघता आली नाही. परत आलो.

मग सगळ्यांमध्ये मिळून बराच वेळ काही गेम्स खेळण्यांमध्ये छान टाईमपास झाला. संध्याकाळी पाऊस जरा थांबला आणि आम्ही मग जवळपासच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवर जाऊन फेरफटका मारला. हळूहळू ढग बाजूला होत आम्हाला फार सुंदर दृश्य दिसायला लागली.



आणि काहीच वेळाने आम्हाला पहिल्यांदाच हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. तेव्हा सर्वांना झालेला आनंद शब्दांच्या पलीकडे होता. वाह, जब्बरदस्त, क्लास, एक नंबर असे सतत एका मागून एक उद्गार आमच्या सर्वांच्या तोंडून निघत होते.

संध्याकाळची कातरवेळ आणि ढगांचा प्रकाशसोबत खेळ चालू असल्यामुळे कॅमेऱ्यात मात्र ते आम्हाला तितक्या ताकदीने टिपता आलं नाही.

कधी कधी देव माणसाला असं काही दाखवतो कि ते टिपायला त्याची कला आणि त्याने बनवलेली यंत्रेसुद्धा पुरी पडत नाहीत. अशा वेळेस आपण फक्त तो सुंदर क्षण आपल्या डोळ्यात आणि मनात साठवु शकतो आणि तो अनुभवायला दिल्याबद्दल  देवाचे आभार मानु शकतो. अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने ह्या ओळी मला पुसटश्या आठवत होत्या पण नेमके शब्द आठवत नव्हते. नंतर गुगल करून शेवटी सापडल्या.

छोटासा ट्रेक, गेम्स, निसर्गसौंदर्य असा हा दिवस छान गेला. पुढच्या दिवशी मात्र तिथून बनियाकुंडपर्यंत २० किलोमीटरच्या ट्रेकचं आव्हान होतं. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात.

(क्रमशः) 
 

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : 
---

आदल्या दिवशी ३-४ किमीचा पिटुकला ट्रेक करून आमचा दिवस नंतर मजेत गेला. पण आज मात्र आमची परीक्षा होती. ३-४ किमीवरून ट्रेकच्या अंतराने थेट पाचपट उडी मारली होती. आज देओरीया ताल ते बनियाकुंड हे जवळपास २० किमी अंतर आम्हाला पार करायचे होते. 

सकाळी आम्ही लवकर तयार झालो. दुपारच्या जेवणासाठी आम्हाला आमचे डबे घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. आज्ञेबरहुकूम सगळ्यांनी छोटे मोठे स्टील किंवा टप्परवेअरचे डबे आणले होते. ते सगळे एकत्र करून त्यात साईझप्रमाणे पोळ्या किंवा भाजी असे कॅम्पवरच्या लोकांनी भरून आम्हाला दिले. ते घेऊन आमचा ट्रेक सुरु झाला. 



हा पूर्ण ट्रेक घनदाट जंगल, हिरवळ, उंच झाडे यांनी आच्छादलेल्या डोंगरांवरून आहे. आणि अंतर खूप असलं तरी दिलाशाची गोष्ट म्हणजे सलग चढ नाही. एखादा डोंगर चढून मग काही वेळ पठार, किंवा काही वेळ उतार असं असल्यामुळे अगदी असह्य होत नाही. 

त्यातही आम्ही मध्येमध्ये पाणी, चॉकलेट्स, बिस्कीट, फोटो अशा अनेक निमित्ताने थांबत थांबत ब्रेक्स घेत होतोच. 



आदल्या दिवशी भरपूर पाऊस झाल्यामुळे ती एक धास्ती मात्र आम्हाला होती. आज खूप मोठा ट्रेक होता आणि त्यात भिजून चालणं नकोसं वाटत होतं. 

पुण्याजवळ पावसाळ्यात खास भिजण्यासाठी आपण ट्रेकला जातो, तिथे भिजण्याची मजा असते. कारण तो ट्रेक करून एका दिवसात आपण घरी येतो, आराम करून पुन्हा रुटीन चालु. 

पण इथे आमच्या ट्रेकचा दुसराच दिवस होता. पुढच्या दिवशीसुद्धा ट्रेक करायचा होता. आणि इथल्या थंड वातावरणात आपल्याला सवय नसल्यामुळे पावसाचा काय परिणाम होईल सांगता येत नाही. ग्रुपमधल्या एक दोघांना हलका तापही येऊन गेलेला होता. 

सकाळी चांगलं ऊन असलं तरी ढगांचा ऊन सावल्यांचा खेळ चालु होता. आणि ट्रेक लीडर आम्हाला पावसाचीच भीती दाखवत पुढे पुढे दामटत होते. 

या रस्त्यात रोहिणी बुग्याल लागतं. बुग्याल म्हणजे मेडोज किंवा कुरण. ह्या भागात असे वेगवेगळे प्रसिद्ध बुग्याल आहेत. त्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकारने इथे कॅम्पिंग, मुक्काम ह्याला मज्जाव केलेला आहे. 



चोहीकडे पसरलेलं पठार, हिरवं गार मैदान, भरपूर गवत असल्यामुळे इथे आसपासचे पहाडी लोक आपली गुरे चरायला येतात. 

असेच काही गढवाली लोक इथे आम्हाला भेटले. पाण्याच्या एका झऱ्याजवळ आम्ही ब्रेक घेतला आणि पाणी भरायला थांबलो. एकदम थंडगार छान पाणी होतं. तिथेच या लोकांनी चूल मांडून दाल चावलचा बेत केला होता. आम्हाला पाहुन त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं, खूप प्रेमाने आग्रह केला. आम्ही सांगितलं कि आमच्याकडे डबे आहेत आणि थोडं पुढे आमचा लंच ब्रेक होणारच आहे. पण ते डब्यातलं थंड जेवण सोडा, आमच्या सोबत गरम खा म्हणून त्यांनी आग्रह केला. 

त्यामुळे आम्ही मान राखण्यासाठी अगदी चवीपुरता वरण भात एका पत्रावळीवर घेतला. आधी २-३ जण होते पण मग बाकी सगळे पण आले आणि सगळ्यांनी त्यात खायला सुरु केलं. तेव्हा त्यांनी अगदी आग्रहाने अजून अजून करत वाढलं. 



मग त्यांना हि मंडळी आपल्या सोबत खात आहेत हे बघुन अजून चांगली व्यवस्था करता आली नाही ह्याची खंत वाटायला लागली. भात कच्चाच राहिला, मीठ कमी पडलं अशा तक्रारी ते स्वतःच करून हळहळ करू लागले. कि आम्ही तर कसंहि बनवुन खातो, तुम्हाला थोडं अजून चांगलं मिळायला पाहिजे होतं. तुम्ही आमच्या घरी आले असते तर काय काय करून खाऊ घातलं असतं. त्यांचं हे प्रेमळ बोलणं बिलकुल तोंडदेखलं वाटत नव्हतं. 

आमचा गाईड स्वतः गढवाली होता. तो आम्हाला अभिमानाने सांगतच असायचा कि तिथली लोकं खूप चांगली असतात, मदत करतात, प्रवाशांची पाहुण्यांची सेवा करतात. त्याच्या भागातल्या अनोळखी लोकांनी आमचा असा पाहुणचार केलेला पाहून त्याचा चेहरा अभिमानाने आनंदाने फुललेला दिसत होता. 

तिथून थोडं पुढे एक डोंगर उतरल्यावर आकाश कामिनी नदीकाठी आमचा लंच ब्रेक झाला. छोटीशी डोंगराळ नदी, तिच्यावर पायी जाण्यापुरता छोटासा पूल, पाण्याचा आवाज, आणि आजूबाजूला डोंगर अशी छान जागा होती. आमचा ट्रेक बराचसा झाला होता. पण तिथे निवांत जेवण झाल्यावर पुढे जाण्याचं जीवावर आलं होतं. 



ट्रेकवर माझा अनुभव असा आहे कि छोटे छोटे ब्रेक्स (तेहि उभ्याउभ्या) घेत गेलो तर अंतर सहज पार होतं. सुका मेवा, चॉकलेट, बिस्किटे असं खात राहिलं तर भूकही लागत नाही. पण विश्रांतीसाठी जास्त वेळ थांबलो, जास्त वेळ बसलो, किंवा पद्धतशीर जेवलो तर त्यानंतर चालायला अवघड होतं. जितक्या वेळा बसू तितकं उठण्या-बसण्यात आपली ऊर्जा जाते, आपली ट्रेकची लय बिघडते. 

मला स्वतःला चढावर दम बराच लागतो आणि उन्हाचाही त्रास होतो. त्यामुळे मी सावकाश एक गती राखत चालत राहतो. दम लागला कि काही सेकंद थांबतो आणि पुन्हा चालायला लागतो. बाकीचे आरामाला थांबले तरी मी शक्यतो टेकण्यासारखं झाड किंवा दगड पाहून उभ्याउभ्याच आराम करायचा प्रयत्न करतो. 

जेवण झाल्यावर सगळ्यांना ट्रेक कधी एकदा संपतो असं झालं होतं. अजून एक दिड तासभर चालल्यावर अचानक एक डांबरी रस्ता लागतो आणि लक्षात येतं कि ट्रेक आता जवळपास संपला. हा रस्ता एका घाटात निघतो. तिथून एका बाजूला चोपता आणि दुसऱ्या बाजूला बनियाकुंड. त्याचा पुढचा ट्रेक चोपतालाच असला तरी आमचा मुक्काम बनियाकुंडला होता. 

तिथून मग उतारावर आरामात रमत गंमत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो. इथे बऱ्याच कॅम्प साईट्स आहेत. पण पाऊस झाल्यामुळे त्यांनी आमच्यातल्या काही जणांना रूम मध्ये राहण्याची सोय केली होती. 

आज २० किमी चालून जवळपास सर्वच जण थकले होते. १०-१५ मिनीट स्ट्रेचिंग करून फार बरं वाटलं. इथे अंधार खूप लवकर पडतो. आणि थंडी सुद्धा भरपूर आहे. सुदैवाने त्यांनी शेकोटीची व्यवस्था केली होती. जेवणाआधी आणि जेवणानंतर आम्ही बराच वेळ शेकोटी जवळच होतो. 

रात्री गरम कपडे, तिथले अतिशय जाड ब्लॅंकेट ह्यात घुसून आम्ही झोपून गेलो. आराम आवश्यक होता. 

पुढच्या दिवशी चंद्रशिला तुंगनाथ हा मुख्य ट्रेक करायचा होता. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात. 

क्रमशः
 
 

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : 
बनियाकुंडला दिवसाची सुरुवात सुंदर झाली. आम्हाला सकाळी एकदम लवकर जाग आली. या भागात खुप लवकर उजाडतं. सूर्य उगवण्याही आधी इतका प्रकाश असतो कि सकाळचे ८-९ वाजलेत असं वाटतं. 

आमच्या रूम्स समोरच छोट्या टेकाडावर एक हनुमान मंदिर होत.



तिथून समोर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. हळु हळू सूर्य आमच्या उजवीकडच्या डोंगरामागून वर येत होता आणि प्रकाशाची तिरीप आपला कोन बदलत खाली खाली येत होती. ह्या दृश्यांनी आम्हाला किती तरी वेळ तिथेच खिळवून ठेवलं होतं.




थोड्या वेळाने आम्ही आवरून नाश्ता करून निघालो. बनियाकुंड ते चोपताच्या पायथ्यापर्यंत आम्ही जीपने गेलो. एकच जीप तिथे पोहोचली होती त्यामुळे दोन चकरा करून जावं लागलं. 

चोपता चंद्रशिला तुंगनाथ असं या ट्रेकचं नाव आहे, आणि हे सगळं ह्या आजच्या दिवसातच आहे. चोपता गावातुन चढायला सुरुवात करावी लागते. आणि वर आधी तुंगनाथचं मंदिर लागतं.

हे मंदिर महादेवाच्या पंचकेदारांपैकी एक आहे. (म्हणजे काय ते विचारू नका. १२ ज्योतिर्लिंगांसारखी ५ महत्वाच्या मंदिरांची दुसरी यादी समजूया. कोणाला समजत असल्यास खाली कमेंटमध्ये आपलं ज्ञान पाजळण्यास हरकत नाही. तेवढीच सगळ्यांना मदत होईल. :-) ) केदारनाथ पण ह्याच पंचकेदारांपैकी एक आहे. 

तर, पंचकेदारांपैकी एक असल्यामुळे ह्याला विशेष महत्व आहे. हे मंदिर केदारनाथपेक्षाहि उंच आणि जगातलं सर्वात उंचावरचं महादेव मंदिर आहे. इथे यात्रेकरूंची संख्या बरीच असते. त्यांच्यासाठी भरपूर घोडे, खेचरं, पिठू इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे खालुन वरपर्यंत चांगली दगडी पायवाट बनवलेली आहे.



तुंगनाथ मंदिरापर्यंत तर ट्रेकला आल्यासारखं वाटतच नाही. यात्रेकरू मध्ये पुष्कळ लोक घरातल्या लहान मोठ्यांसकट सर्व कुटुंबाला  घेऊन येतात. त्यामुळे यात्रेला आल्यासारखंच वाटतं. तसे सर्व वयाचे लोक कुटुंबासकट ट्रेकवरसुद्धा भेटतात, पण तिथे संख्या कमी असते. 

तुंगनाथ मंदिराच्या आणखी पुढे चढत गेलं तर चंद्रशिला शिखर लागतं. हे १३१०० फुटावरचं शिखर आहे. आणि चहूबाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या दिसतात. उत्तराखंडात कुठल्याही जागेचं वर्णन असंच करता येईल. पण प्रत्येक जागेहून दिसणारं दृश्य वेगळं, प्रत्येक ठिकाणचं सौन्दर्य वेगळं. कमी जास्त अशी तुलना करण्यासारखं नाही. 

ह्या भागाला परमेश्वराने उदारहस्ते सौन्दर्य बहाल केलं आहे. कितीही बघितलं तरी डोळ्यांचं पारणं फिटत नाही. 

आणि हे दृश्य अगदी वर गेल्यावरच दिसतं असं नाही. आजच्या ह्या पूर्ण ट्रेकमध्ये जागोजागी वेगवेगळ्या उंचीवरून हीच सुंदर दृश्य आपल्याला खुणावत राहतात.




आम्ही प्रत्येक ठिकाणी फोटो काढत, थांबत चाललो होतो. एक दोन जणांची तब्येतसुद्धा बिघडली होती. त्यामुळे आमची गाडी आज जरा मंदावली होती. गाईड आम्हाला घाई करत होते. हळू हळू चालत आम्ही तुंगनाथला न थांबता आधी चंद्रशिलाला गेलो.




तुंगनाथच्या पुढेसुद्धा चंद्रशिलाला पोहचायला आपल्याला आपल्या वेगानुसार तास दीड तास लागू शकतो. हा पूर्ण ट्रेक १२-१३ किलोमीटर चा आहे. 

इथे शिखरावर आपल्याकडे कळसुबाईला जसं छोटं मंदिर आहे तसंच एक छोटेखानी गंगेचं मंदिर आहे.



वर पोहोचलो तेव्हा ढग यायला लागले होते . गाईड आम्हाला थोडं लवकर आला असता तर पूर्ण मोकळं आकाश आणि दृश्य बघायला मिळालं असतं अशी टोचणी लावत होता. पण येता येतासुद्धा आम्ही ह्या सौन्दर्याचा मनमुराद आनंद घेतला होता. 

शेवटी हिमालय माणसाच्या मनात मावणं अशक्य आहे. त्याची वेगवेगळी रूपं बघायला पुन्हा पुन्हा जाणं आपल्याला भाग आहे. 

आणि कुठलंही शिखर गाठल्यावर एक वेगळाच आनंद होतो. काही मिळवल्याचं समाधान मिळतं.



शिखरावर आम्ही बराच वेळ फोटो काढण्यात घालवला. सर्वांनाच त्या जागेवर ग्रुपचे, एकट्याचे, जोडीचे, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे फोटो काढायचे होते. कोणाला एखादी पोज सुचली आणि दुसऱ्याला आवडली तर पुन्हा सगळ्यांचे त्या पोजमध्ये फोटो असं बराच वेळ चाललं होतं.



परत येताना आम्ही तुंगनाथला आलो तेव्हा दुपारच्या पूजा आरतीसाठी मंदिर काही  होतं. मग आम्ही जवळ जेवण केलं. मंदिर अजून काही वेळ बंदच राहणार होतं. आम्ही निघायचा निर्णय घेतला. महादेवाला मनोमन नमस्कार केला. त्याच्या अगदी दारात पोहोचून फक्त आत दर्शन न झाल्याने तो आणि आम्ही नाराज व्हायचं काही कारण नव्हतं. आषाढी एकादशीला लाखो लोक पंढरपुरात जसं कळसाचं दर्शन घेतात तसंच आमचं झालं. 



आमच्यातल्या एक दोघांना त्रास व्हायला लागला होता. त्यांना घोडी करून देऊन आम्ही निघालो. उतरताना पुन्हा निवांत रमत गमत खाली आलो. जीपने बनियाकुंडला पोहोचलो आणि आराम केला. 

संध्याकाळी जेवणाआधी आम्हाला "ट्रेक दि हिमालया" कडून हा ट्रेक केल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात आलं. आमच्यापैकी काहीजणांचा हा पहिलाच मोठा ट्रेक होता. सगळ्यांना हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल अभिमान वाटत होता. 

यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दिवस भर प्रवास करून ऋषिकेशला गेलो. तिथे रिव्हर राफ्टिंग करायचा आमचा बेत होता. त्याबद्दल पुढील वृत्तांतात. 

(क्रमशः)
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...