http://indiatravel-rohan.blogspot.com/2012/06/blog-post.html
होळीच्या दिवशी पुरणपोळ्या खाण्यासाठी आमच्या घरी काही मित्र-मैत्रिणी जमलो होतो. गप्पा मारता-मारता शमिकाने अचानक सिक्कीमचा विषय काढला. सिक्कीमला जायचे हा विषय तसा तिच्या डोक्यात गेली १० वर्षे होता. अनघा, राजीव काका यांनी तो विषय उचलून धरला. सुहास, दिपक, ज्योती आणि आकाने मात्र सुट्टीच्या कारणाने हात वर केले. दुसर्या दिवशी भाग्यश्रीताईने देखील नक्की येणार असे पहिल्या सेकंदाला कळवून टाकले. बघता बघता आम्ही ५ जण तयार झालो आणि मग माझी पुढची तयारी सुरू झाली.
पुढच्या ३-४ दिवसात जालावरून बरीच माहिती मिळवून सिक्कीमला काय-काय बघायचे, सिक्कीमच्या नकाशात ह्या जागा कुठे आहेत त्याप्रमाणे कसे कसे बघायचे याचा एक तक्ता बनवला. एकुण किती दिवस लागतील, प्रवासाचे साधन काय असावे, कुठे राहावे, एकुण खर्च किती येईल ह्यावर संपूर्ण महिन्यात मी, शमी, अनघा, श्री आणि राजीव काका सतत मेल्स मधून माहितीची देवाण-घेवाण करत होतो. तारखा नक्की झाल्यावर पाहिले विमानाची तिकिटे बुक करून घेतली. जालावरुन महिती मिळवताना सिक्किम पर्यटन या संकेतस्थळाचा खुप फायदा झाला. सर्व हॉटेल ऑन्लाईनच शोधुन बुकिंग्स केली. नरेंद्र गोळे काकांनी नुकतीच सिक्किम सहल केल्यामुळे त्यांच्याकडुनही थोडी माहिती मिळु शकली. माझा मित्र सुहास जोशी याने सिक्किम मधला सर्वात महत्वाचा संपर्क मला दिला. तो म्हणजे श्री. तांबे.
श्री तांबे हे सध्या सिक्किम येथे केंद्र सरकारतर्फे विशेष अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सिक्किम स्प्रिंग्स हे संकेतस्थळ नुकतेच विकसीत केले आहे. ह्याच धर्तीवर आता सह्याद्री स्प्रिंग्स हे संकेतस्थळ विकसीत होत आहे. श्री. तांबे यांच्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाची मदत झाली. त्यांनी आम्हाला सोनम भुतिया, ज्यांचा सिक्किम येथे पर्यटनासाठी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे, यांच्याशी भेट घालुन दिली. ह्या सोनमने आम्हाला संपुर्ण प्रवासात त्याच्याकडचा खास ड्रायव्हर सत्यम गुरुंग आणि त्याची झाय्लो गाडी पुर्ण वेळ दिली होती. हा सत्यम उर्फ सत्या आमचा भलताच चांगला दोस्त बनला. त्याचे किस्से पुढे येतीलच. :) पुर्व आणि उत्तर सिक्किम येथे जाण्यासाठी लागणारे परमिट देखील सोनम यांनी आम्हाला बनवुन दिले.
एकंदरीत सर्व पूर्वतयारी झाली आणि शेवटच्या काही दिवसात अनघाने कामाच्या कारणाने यायचे रद्द केले. शेवटी आम्हा ४ जणांचा १३ दिवसांचा कार्यक्रम असा ठरला...
१५ मे - मुंबईवरुन विमानाने प्रयाण. दुपारी जमेल तसे आणि तेवढेच कोलकत्ता दर्शन. रात्रीच्या ट्रेनने न्युजलपायगुडी येथे प्रयाण.
१६ मे - न्युजलपायगुडी ते गंगटोक प्रवास.
१७ मे - गंगटोक स्थळदर्शन.
१८ मे - पुर्व सिक्किम स्थळदर्शन. नथु-ला, चांगु लेक आणि, बाबा मंदिर वगैरे.
१९ मे - दक्षिण सिक्किम स्थळदर्शन. नामची, चारधाम वगैरे.
२० मे - उत्तर सिक्किम स्थळदर्शन. गंगटोक वरुन लाचुंग येथे प्रयाण.
२१ मे - झिरो पॉईंट, युमथांग बघुन लाचेन येथे पोचणे.
२२ मे - गुरुडोंग्मार लेक पाहुन गंगटोकमध्ये परत.
२३ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन. युकसुम वगैरे.
२४ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन करुन दार्जिलिंग पोचणे.
२५-२६ मे - दार्जिलिंग स्थळदर्शन.
२७ मे - बागडोगरा येथे पोचून कोलकत्तामार्गे परतीचा प्रवास.
सदर सफरनामा १०-१२ भागात येथे सादर करायचा मानस आहे. अर्थात भरपूर फोटो येतीलच.
क्रमश:... सिक्कीमचा सफरनामा - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...
सिक्कीमचा सफरनामा - भाग २ : गंगटोकच्या दिशेने... !
कामावरून परतल्यावर तसा फार वेळ हातात नव्हता. पुढच्यावेळी लागण्याऱ्या व्हिसासाठी आवश्यक ते सोपस्कार अगदी १४ तारखेच्या रात्रीपर्यंत सुरूच होते. कुठल्याही कारणाने मी माझे फिरायला जाणे रद्द करणार नव्हतोच त्यामुळे कागदपत्र सबमिट करायचे काम अनघाच्या खांद्यावर सोपवले आणि १५ तारखेला पहाटेच घर सोडले. विमानप्रवास करून दुपारी कोलकत्ता येथे पोचलो. दुपारच्या १२ वाजताच्या भर उन्हात कोलकत्ता विमानतळावरून चितपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मेगा कॅब्सच्या नशिबाने आम्हाला ए.सी.कॅब मिळाली होती त्यामुळे जरा गारवा होता. बाहेर बघवत नव्हते इतके रणरणते उन. आमचा सारथी ज्या गल्ल्यांमधुन आम्हाला नेत होता त्यापाहुन मला आपल्याकडच्या गोवंडी-मानखुर्द नाहीतर मस्जिद बंदर सारख्या भागाची आठवण होत होती. अजुन काही लिहायला नकोच. एकदाचे चितपुर येथे पोचलो. कॅब सोडण्याआधी हेच ते स्टेशनना जिथुन आपली ट्रेन सुटणार आहे याची खात्री करुन घेतली आणि स्टेशनच्या क्लॉकरुमकडे मोर्चा वळवला. जवळचे सर्व सामान तिथे टाकुन खांदे मोकळे करुन घेतले आणि उदरभरण करण्यासाठी एखादे चांगले हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडलो.
'यहां आसपास कुछ नही मिलेगा' हे ४ लोकांकडुन ऐकल्यावर पुन्हा एकदा टॅक्सी घेउन मोर्चा हॉटेल शोधायला. यावेळी पिवळी टॅक्सी आणि त्यामुळे बाहेरचा उन्हाचा भपका जाणवु लागला. दुपारचे १ वाजुन गेले होते. पोटात कावळे ओरडत असल्याने 'कोई अच्छेसे ए.सी. रेस्टॉरंट लेके चलो' असे चक्रधारीला सांगुन आम्ही ४ जण टॅक्सीच्या बाहेर डोकावुन डोकावुन एखादे चांगले हॉटेल दिसते का ते बघत होतो. आमचा चक्रधारी त्याच्या हिशोबाने अच्छा हॉटेल दाखवत होता जी आम्हाला जमणारी नव्हती. विश्वास बसणार नाही पण तब्बल १ तास झाला तरी आम्हाला किमान स्वच्छ आणि नीट बसुन खाता येईल असे हॉटेल मिळेना. अखेर पार्क स्ट्रिट नामक ठिकाणी ती टॅक्सी सोडली आणि पायी फिरु लागलो. २ वाजुन गेले होते आणि आता जे हॉटेल समोर दिसेल त्यात शिरायचे असे आम्ही ठरवले होते. २:३० वाजता अखेर एक हॉटेल मिळाले. त्याचे नाव काय किंवा आम्ही काय खाल्ले असा प्रश्न विचारु नका. पोटभर खायला मिळाले हेच मनी चिंतुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. स्टेशनला परत जाताना मध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल बघुन, हावडां ब्रिज बघुन परत जायचे असे ठरले.
व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल हा १९२१ साली बनवला गेला आहे. आता आतमध्ये म्युझियम आहे. कधी जाणार असाल तर दुपार टाळा. ४ नंतरच जा. परिसर छान हिरवागार ठेवला आहे पण आत हॉलमध्ये भयंकर गरम होते. दर सोमवारी हॉल बंद असतो. मी ह्या हॉलबद्दल काही लिहिणार नाही आहे. कारण मला कोलकत्ता सोडुन सिक्किमकडे सरकायचे आहे. त्याक्षणी देखील हेच वाटत होते. तुम्हाला अधिक महिती हवी असेल तर विकिपेडिया जिंदाबाद. हे तिथे घेतलेले काही फोटो.
तासाभरात तिथुन निघालो. नव्या हुबळी आणि जुन्या हावडा ब्रिजला फेरी मारुन पुन्हा एकदा स्टेशनकडे यायला निघालो. वाटेत चिनुक्सच्या अन्नः वै प्राणा:ची आठवण झाली. त्याचे कारण असे की बंगाली मिठायांचे दुकान दिसले. मग कुठल्याही दुकानात बंगाली मिठाई खाण्यापेक्षा के.सी.दास शोधुया म्हणुन पुन्हा एकदा आम्ही चक्रधारीला पिडायला सुरु केला. दुर्दैव म्हणजे कोणालाच जवळपासचे के.सी.दासचे दुकान माहित नव्हते. अखेर बर्याच वेळाने एका सदगृहस्थान आम्हाला अचुक पत्ता सांगितला. १० मिनिटात टॅक्सी तिथे जाउन पोचली. बघतो तर काय... के.सी.दास कपड्यांचे दुकान... देवा!!! आता संध्याकाळचे ६ वाजुन गेले होते आणि आम्हाला स्टेशनला परतायचे होते. जिथे होतो (देव जाणे नेमके कुठे होतो :P) तिथुन स्टेशनला जाताना एखादे दुकान असावे अशी एक भोळीभाबडी आशा मला अजुनही असल्याने मी एका माणसाला 'यहां कोई के.सी.दास - मिठाई दुकान है क्या?' असे विचारताच त्याने अत्यंत आनंदात मला पत्ता सांगायला सुरुवात केली. ह्यावेळी मी चक्रधारीला बाजुलाच उभा करुन ठेवला होता. त्याला विचारले 'कैसे जानेका सम्झा?' तो पुन्हा एकदा. 'हा पता है.' असे म्हणुन टॅक्सीकडे जाउ लागला. तिथुन निघलो आणि अखेर के.सी.दास नावाच्या दुकानासमोर पुन्हा एकदा आमची गाडी उभी राहिली. ह्यावेळी हे मिठायांचेच दुकान होते. दुकान लहानसेच होते. दुकानाच्या पाटीवर 'Founder of Rosgolla' असे लिहिले होते. आम्ही ४-५ पदार्थ खाउन पाहिले. याचसाठी केला होता अट्टहास!!! ह्यापेक्षा १०० पटीने उत्तम बंगाली मिठाई तर आपल्याकडे मुंबई-पुण्यात मिळते.
अखेर तिथुन आमचा लवाजमा निघाला आणि बर्रोबर ७ वाजता स्टेशनला पोचला. क्लॉक रुम मध्ये ठेवलेले सामन ताब्यात घेतले आणि वेटिंग रुममध्ये जाउन फ्रेश झालो. नव्याने बांधलेले स्टेशन त्यामुळे वेटिंग रुम चकाचक. तास-दोनतास आराम करुन, स्वतःच्या आणि फोनच्या बॅटर्या चार्ज करुन फलाटावर लागलेल्या गाडीकडे मोर्चा वळवला. ठरल्या वेळेच्या आधीच ट्रेन येउन उभी राहिली होती. ९ वाजता आम्ही त्यात स्थानापन्न झालो आणि खर्र्या अर्थाने आमचा प्रवास सिक्किमच्य दिशेने सुरु झाला. विमान प्रवासासाठी पहाटे लवकर उठलो होतो आणि दुपारभर उन खाउन डोके धरल होते. रात्री १० वाजता जे झोपलो ते थेट सकाळी ७ वाजता डोळे उघडले.
राजीवकाका बहुदा कधीच उठले होते आणि त्यांनी
नाश्त्याची तयारी करुन ठेवली होती. चहा-कॉफी, डोसा मग पुन्हा चहा-समोसा,
कटलेट, ऑमलेट असा भरगच्च नाश्ता झाला. ट्रेन २ तास लेट होती. डब्यात सोबत २
बंगाली तरुण होते. ते आसाममध्ये कामाख्या येथे जात होते. त्यांच्याशी
सिक्किम बद्दल बर्याच गप्पा झाल्या. वेळ पटकन निघुन गेला. आम्हाला न्यु
जलपायगुडीला (एनजेपी) पोचायला ११ वाजले. सोनमने घ्यायला पाठवलेली गाडी
कधीचीच पोचलेली होती. त्यात बसलो आणि सिक्किमच्या अधिक जवळ जायला निघालो.
अवघ्या तासाभराच्या प्रवासात निसर्ग दुसरेच रुप दाखवु लागला होता. सुरुवातच रस्त्याच्या दोहो बाजुंना बहरलेल्या बोगन वेलीच्या झाडांनी झाली. त्यानंतर काही वेळातच घाट रस्ता सुरु झाला आणि आपण सिक्किममध्ये आता प्रवेश करणार न समजलो. एक डोंगर पार करुन गाडी पलिकडे उतरु लागली आणि आम्हाला तिस्ता नदीचे पहिले दर्शन झाले. गुरुडोंगमारजवळ उगम पाउन इथपर्यंत वाहत येणारी, रंगपो-रंगीत नद्यांना कवेत घेणारी आणि पुढे ब्रह्मपुत्रेत मिसळुन जाणारी तिस्ता. सिक्किमची खरिखुरी जिवनदायिनी तिस्ता. लडाखला सिंधुनदी पाहुन किंवा मंत्रालयमला तुंगभद्रा पाहुन मला जे भाव मनात अले होते तेच भाव आत्ताही मनात सहज उमटले.
ड्रायव्हरने गाडी बाजुला घेतली आणि ५ मिनिट थांबुया असे म्हणाला. आम्ही तेवढेच फोटो काढुन घेतले. नदीचे पाणी गढुळ होते. याचा अर्थ वरती पाउस सुरु होता आणि बरीच माती वाहुन येत होती. दुरवर असणारे काळे धग आम्हाला बहुदा जरा चुणुक दाखवणार होते. पुन्हा मार्ग्क्रमण सुरु झाले आणि आम्ही अखेर सिक्किमच्या प्रवेशद्वारात येउन पोचलो.
'सिक्किममध्ये तुमचे स्वागत आहे.' हे वाक्य वाचुन मोजुन १०० मिटर पुढे जातो-न-जातो तोच सोसाट्याचा वारा वाहु लागला आणि तुफान पाउस. अवघ्या काही क्षणात पावसाने जणु आमच्यावर झडपच घातली होती. तश्यात जरा पुढे जातोच तो ढगांच्या गडगडाटाप्रमाणे आवाज झाला. आमच्या पुड्गची गाडी थांबली तसे आम्हीही थांबलो. बघतो तर रस्त्यावर एक मोठे झाडं आडवे पडले होते. सोसाट्याच्या आणि वादळी वार्या-पावसापुढे त्याचा टिकाव लागला नव्हता.
बघता-बघता गाड्यांची रांग लागली. रस्ता सुरु होईपर्यंत आम्हाला मात्र
आता तास-दोनतासांची निश्चिंती होती. दुपारचे २ वाजले होते आणि भुक
लागलेलीच होती. खरेतर जिथे जाउन राहणार होतो त्यांनाच जेवण बनवायला
सांगितले होते पण ट्रेन लेट आणि आता हा उशीर त्यामुळे फोन करुन ते रद्द
केले आणि गाडी जिथे उभी होती तिथेच शेजारी असणार्या हॉटेलात मोर्चा वळवला.
सिक्किममध्ये प्रवेश केल्या-केल्या माझे मोमोज खायचे स्वप्न पुर्ण होणार
होते. २ प्लेट मोमो आणि ऑमलेट असा हलकासा फराळ करुन आम्ही भुक शमन करुन
घेतले. चहा हवाच होता. तासा-दिडतासाने रस्ता सुरु झाला. त्यानंतर कुठेही न
थांबता आणि कुठलाही अडथळा न येता आम्ही संध्याकाळी ५ वाजता ठरल्या ठिकाणी
म्हणजे आशिष-खीम या होम स्टेच्या दारात होतो.
मिसेस प्रधान यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला आमच्या रुम्स दाखवल्या. प्रथमदर्शनी मला त्यांचे घर खुपच आवडले. तळ मजल्यावर आमच्य रुम्स होत्या आणि एक सामायिक हॉल होता. तिथे वेताचे सोफा, मोडे वगैरे होते. त्यावर बसुन जरा निवांत होतो तोच चहा आला. ते मग्स कसले क्युट होते!!! हे इथे मिळतात तर नक्की विकत घ्यायचे, हे शमिचे पहिले वाक्य. शॉपिंग सुरु!!! :P
संध्याकाळ होत आली होती आणि एक चक्कर एम.जी.रोड येथे मारावी असे सर्वांचे मत बनले. लगेच तयार झालो आणि कुच केले एम.जी.रोडच्या दिशेने...
क्रमशः ... सिक्कीमचा सफरनामा - भाग ३ : एम.जी.रोड...
सिक्कीमचा सफरनामा - भाग ३ : एम.जी.रोड...
एम.जी.रोडला जाण्यासाठी निघालो तेंव्हा अंधार पडत आला होता. आम्ही निघालो तेंव्हा प्रधानबाईंचा मुलगा आशिष देखील गाडीत पेट्रोल भरण्यासाठी त्याच बाजुला जाण्यासाठी निघत होता. त्याने आम्हाला लिफ्ट दिली. आम्ही पोचलो तेंव्हा रस्त्यावर सर्वत्र रोशणाई केलेली दिसली.
११-१५ मे तिथे समर कार्निव्हल होउन गेला होता. कार्यक्रम संपले असलेले तरी रोशणाई मात्र कायम होती. एम.जी.रोड हा दुतर्फा १००-१५० दुकाने असलेला गंगटोक मधला शॉपिंग स्ट्रीट आहे. मध्ये मध्ये रेस्टॅरंट देखील आहेत. म्हणजे फिरताना भुक लागली तरी हरकत नाही. दुतर्फा असलेल्या सर्व बिल्डिंग्स खरेतर हॉटेल्स आहेत. खाली दुकाने आणि वरती रुम्स असे एकंदरीत चित्र आहे. आता ह्या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे. रस्त्याच्या सुरुवातीला महात्मा गांधींचा पुतळा आहे.
विजेचे खांब आणि त्यावर सजावटीसाठी टांगलेल्या रंगेबिरंगी फुलांच्या कुंड्या लक्ष्य वेधुन घेतात. दर काही फुट अंतरावर बसायला बाकडी ठेवलेली आहेत. फिरुन दमलात की हवतरं जरा बसुन दम खा. काही खरेदी करायची नसेल तरी संध्याकाळी उगाचच फिरायला हा एक मस्त स्पॉट आहे. आम्ही गंगटोक मध्ये ४ दिवस असणार होतो त्यामुळे लगेच शॉपिंग करण्याऐवजी तासभर चक्कर मारली आणि कुठे कुठे काय काय मिळतयं ते पाहुन घेतले. संध्याकाळी ज्या मग्स मध्ये चहा-कॉफी घेतली होती ते देखील पाहिले. अचानक फिरता फिरता महाराजा स्विट मार्ट समोर जाउन पोचलो. पुढे काय सांगायची गरजच नाहिये.
फिरता फिरता २ तास कसे निघुन गेले कळलेही नाही. शेवटी घरी जाण्यासाठी निघालो. टॅक्सीस्टॅण्ड वरुन टॅक्सी घेतली आणि जाता-जाता हा रस्त्याचा घेतलेला एक फोटो.
संध्याकाळच्या जेवणासाठी घरी परतलो तेंव्हा ८ वाजुन गेले होते आणि गरमा-गरम जेवण तयार होते. डाळ-भात, चपाती आणि बांबु शुटची भाजी. सोबत भेंडी आणि खास आलुकी सब्जी. रायता आणि पापड. एकंदरीत मस्त जेवण होते.
मी सुटकेचा निश्वास टाकला कारण मी ही जागा ऑनलाईन बुक केली होती. रुम्स आणि जेवण कसे असेल ह्याबद्दल मनात जी साशंकता होती ती आता दुर झाली होती. उद्यापासुन खर्या अर्थाने सिक्किम बघायला निघायचे होते. त्यामुळे आवरुन घेतले आणि झोप येईपर्यंत गप्पा टाकत बसलो. सुरुवात तर छान झाली होती...
********************************************
एम.जी.रोडवर असलेल्या सुविधा...
एस.बी.आय, अॅक्सिस बँक अश्या अनेक बँक्सचे एटीम.
सायबर कॅफे
डी.एच.एल आणि ब्लु डार्ट (सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु)
सिक्किम पर्यटन माहिती केंद्र
अनेक हॉटेल्स आणि रेस्टॅरंटस
टॅक्सी स्टॅण्ड.
क्रमशः ... सिक्कीमचा सफरनामा - भाग ४ : गंगटोक स्थळदर्शन...
सिक्कीमचा सफरनामा - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...
दुसर्या दिवशी पहाटे ६ वाजताच जाग आली. खरंतरं ९ वाजता फिरायला निघायचे होते पण आसपास काही फोटो घेउया म्हणुन खोलीबाहेर पडलो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्याच्या अंगणात अनेक प्रकारची फुलझाडे लावलेली होती. तिथे काही फोटो घेतले. सुर्य कधीच वर आला होता. पुन्हा एकदा त्या क्युट मग्स मधुन चहा-कॉफी झाली आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो.
आज गंगटोकच्या आसपासची काही ठिकाणे बघायची होती. त्यात जोरगाँग मॉनेस्ट्री, गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT), बनझांकरी धबधबा आणि शक्य झाल्यास रुमटेक मॉनेस्ट्री देखील पाहायची होती. या सर्व ठिकाणांचे बरेच फोटो असल्याने ह्या एका दिवसाचेच मी २-३ भाग करणार आहे. :)
त्या दिवशी आमच्या राहत्या घराबाहेर, जोरगाँग मॉनेस्ट्री बाजुला आणि फुलांच्या प्रदर्शनात घेतलेले हे काही फोटो...
एका फांदीला ६-६ गुलाब.. :)
लिली..
हे काय आहे?
ऑर्निथोगॅलम... लोकल नाव - चेमची-रेमची
गुलाबाचा वेल. बघुनच वेडं व्ह्यायला होईल इतके गुलाब...
सिनेरिरिया..
हायड्रेंगिया...
सफेद लिली..
पॅफियोपेडिलम..
निओरोल्गिआ..
अॅलस्ट्रोमेरिया..
सिक्कीमचा सफरनामा - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...
सिक्कीमचा सफरनामा - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...
आम्ही गंगटोक स्थलदर्शनमध्ये आज २ मॉनेस्ट्री पाहणार होतो. एक
शहराच्या अगदी जवळच असलेली जोरगाँग आणि दुसरी दक्षिण सिक्किम मधील रुमटेक.
ह्या दोन्ही मॉनेस्ट्रींबद्दल थोडीफार माहिती आणि फोटो...
गंगटोकच्या ईंदिरा गांधी बायपास रोडवरुन गणेशटोककडे जाण्याच्या वाटेवरच जोरगाँग मॉनेस्ट्री आहे. आकाराने लहान असली तरी प्रथम दर्शनी 'रुप मनोहर' उठुन दिसते. आकर्षक रंगसंगतींमध्ये सजवलेल्या दारं-खिडक्या आणि कमानी हे तिबेटियन संस्कृतीत सर्वत्र दिसते. तिबेटचे १४ वे दलाई लामा यांनी खुद्द २१ वर्षांपुर्वी या मॉनेस्ट्रीची मुहुर्तमेढ रोवली होती.
आतमध्ये प्रवेश केल्यावर लक्ष्यात आले की रंगकाम सुरु आहे. बुद्धमुर्ती देखील नव्याने बनवण्यात येत होती. या खेरिज आतमध्ये खेंपो बोधीसत्व, गुरु पद्मसंभव आणि चोग्याल त्रायसाँग यांच्या मुर्ती आहेत.
धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांनी ८ व्या शतकात भारतात अनेक तिबेटी तरुण पाठवुन बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक संतांना तिबेट मध्ये बोलावणे धाडले होते. पुधे त्यांनी तिबेट मध्ये 'सम्ये' बुद्ध विद्यापिठाची स्थापना केली जिथे बुद्ध धर्मावरील सर्व लिखाण संस्कृत मधुन तिबेटियन भाषेत भाषांतरीत केले गेले.
खेंपो बोधीसत्व हे धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन भारतातुन तिबेटमध्ये गेलेले पहिले बुद्ध संत होते. त्यांनी तिबेटमधील भिक्षुंमध्ये सुरु केलेली 'विनय परंपरा' आजही तिबेटसह सिक्किम, नेपाळ आणि भुतानमध्ये सुरु आहे.
गुरु पद्मसंभव हे भारतातील ८व्या शतकात होउन गेलेले एक थोर बुद्ध संत होते. तिबेट मधील धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन ते तिबेट मध्ये गेले आणि तिथे त्यांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला. ते तंत्र विद्येचे देखील जाणकार होते. पुढे ते नेपाळ, सिक्किम आणि भुतान येथे गेले आणि या प्रदेशांत त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.
या तीन धर्मगुरुंना 'खें - लोप - चो - सम' असे संबोधले जाते.
खें - खेंपो बोधीसत्व, लोप - गुरु पद्मसंभव आणि चो - चोग्याल त्रायसाँग.
रुमटेक मॉनेस्ट्री ही गंगटोक वरुन १४ किलोमिटर अंतरावर आहे. बुद्ध महायान पंथात एकुण ४ उपशाखा आहेत. त्यातील एक आहे काग्यु. या काग्यु महायनाचे एकुण ३०० बुद्ध मठ संपुर्ण जगात असुन त्याचे मुख्यालय म्हणजे ही रुमटेक मॉनेस्ट्री होय. या काग्युचे १६ वे धर्मगुरु गॅल्वा करमाप्पा यांचे वास्तव्य येथेच असते त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था आहे. गाडी घेउन आत जाणे अशक्य. चालत जेवढा रस्ता पार करावा लागतो त्याच्या डाव्या बाजुला एका रांगेत हजारो प्रेयर व्हील्स लावलेली आहेत. मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये फोटो घेता येत नाहीत. बाहेरुन घ्यायला हरकत नाही.
आम्ही आत जाणार इतक्यात एका सिक्किमिज गाईडने मला 'माहिती हवी
का?' असे चक्क मराठीत विचारले. पहिले २ सेकंद मला कळलेच नाही पण मग लक्षात
आले की अरे हा तर चक्क मराठीत बोलतोय. आम्ही त्याला गाईड म्हणुन सोबत
घेतले. त्याने आम्हाला बहुतेक माहिती मराठीतुन दिली. काही इंग्रजी-हिंदी
मधुन. महाराष्ट्रातुन दरवर्षी इतके पर्यटक सिक्किमला जातात की त्याने मराठी
शिकुन घेतली असावी. :) हे नक्कीच सुखावणारे होते.
तिथे पोचलो तेंव्हा ४ वाजुन गेले होते आणि ५ नंतर इथे कोणालाही प्रवेश नसतो. इथे दिक्षा घेणारे सर्व भिक्षु प्रश्न-उत्तराचा खेळ खेळत होते.
मॉनेस्ट्रीच्या भिंतींवर अनेक चित्रे रंगवलेली आहेत. खालील ४ चित्रे ही मॉनेस्ट्रीची रक्षा करणार्या द्वारपालांची आहेत. सर्वात शेवटी आहेत आपले बाप्पा. बुद्ध संस्कृतीत गणपतीचे उल्लेख कुठे कुठे येतात ते ठावुक नाही पण असे चित्र लेहच्या अल्ची मॉनेस्ट्रीमध्ये देखील पाहिल्याचे स्मरते.
सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : गंगटोक स्थळदर्शन (उर्वरीत) ...
सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : उर्वरित गंगटोक...
गंगटोक शहर तसे खुपसे गजबजलेले आहे. सपाटी तशी इथे कमीच. शहराच्या मध्यभागात आणि आसपास असलेली डोंगर उतारावर असलेली घरे आणि इमारती सोडल्या तर इतरस्र तशी शांतता असते. गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT) ही गंगटोकच्या आसपासची काही बघण्यासारखी ठिकाणे. एका दिवसात हे सर्व पाहून होते.
इंदिरा बायपास रोड जवळच आमचे राहते घर होते. तिथून जरा वरच्या बाजुला गेले की मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट आहे. इथे जाण्याचे एकमेव कारण म्हणजे येथून कांचनजुंगा (तिथे लोक कांचनझोंगा असे म्हणतात) दिसते. जर आकाश साफ असेल तरच इथे जाण्यात अर्थ नाहीतर वेळ फुकट. तिथे वरती टोकाला एक छानसे दुकान आहे. काही शॉपिंग करायची असेल तर.... इथे मुळीच करू नका. :D मार्केट मध्ये त्याच वस्तू अधिक स्वस्त आहेत..
वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे लिकर्स.. अगदी कॉफी ते चेरीपासून सर्व...
काही लाकडाचे मुखवटे..
२ वर्षापुर्वी लडाखला गेलो होतो तेंव्हा सर्वत्र फडकणारे प्रेअर
फ्लॅग्स पाहिले होते. इथे मात्र जरा वेगळेच प्रेअर फ्लॅग्स बघायला मिळाले.
आमचा ड्रायव्हर सत्याच्या मते एखाद्या विशिष्ट भागाच्या किंवा गावाच्या
वेशीवर ते लावले जातात. रस्त्याला जिथे घातक वळणे असतात किंवा रस्ता खचून
अपघत होण्याची चिन्हे असतात तिथे ते हमखास लावले जातात.
गणेशटोक हे डोंगरच्या एका टोकावर वसलेले श्री गणेशाचे अष्टकोनी
मंदिर आहे. गाभार्यात अष्टविनायकाचे दर्शनही घेता येते. खालच्या बाजुला
थोड्या सपाटीवर एक छोटासा कॅफेटेरिया आहे. समोरच्या मोकळ्या जागेत
पारंपारिक सिक्किमी आणि तिबेटी कपडे घालून फोटो काढता येतात. ३०-४० रुपये
असा दर असतो.
इथून थेट आम्ही गेलो गंगटोक रज्जुमार्ग उर्ग रोप-वे. रोप-वे जिथून सुरु होतो तिथे सिक्किम राज्याचे विधान भवन आहे. रोप-वे राईड तशी छोटी आहे आणि त्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे तिकिट काढुन अजुन किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यावा आणि काहीतरी खायला / जेवायला जावे. नाहीतरी दुपार झालेली असतेच. :)
रोप-वे राईड जिथे संपते तिथेच जवळ नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी आहे. १९५८ साली तिबेट मधून सिक्किम मध्ये आलेल्या दलाई लामा यांनी या वास्तुचे उद्घाटन केले. त्या वेळचे राजे नामग्याल यांनी या वास्तुसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला. तिबेट्ची संस्कृती, सण-परंपरा आणि ईतिहास याची जपणुक, ठेवण आणि अभ्यास हे एन. आय.टी.चे धैय आहे. ही वास्तु तिबेटी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना देखील आहे. आतमध्ये प्रवेश करण्याकरिता प्रत्येकी १० रुपये फक्त शुल्क भरावे लागते. प्रदर्शनातील गोष्टींचे विनापरवानगी फोटो घेणे प्रतिबंधित आहे. बाहेरून मात्र तुम्ही फोटो घेउ शकता.
माझ्या आवडी-निवडी पाहता आजच्या दिवसातली ही मला आवडलेली सर्वात सुंदर इमारत होती. एकंदरित दिवस्भरात गंगटोक आणि परिसरातील महत्वाच्या स्थळांना भेट देउन झाली होती. आता घरी परतणे, खरेतर एम.जी. रोड वर परतणे गरजेचे होते. कशाला.. दिवसाभराची शॉपिंग करायला आणि गुलाबजाम खायला...
क्रमशः.....
सिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड...
मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्या नथु-ला अर्थात ऐकत्या कानाच्या खिंडीची भेट. पहाटे ६ वाजता जाग न येते तर नवल. मोकळ्याहवेत बाहेर येउन बसावे. सांगितल्या वेळेत बरोबर चहा-कॉफी हजर असावी. सोबत एम.जी.रोड वरील बेकरीमधील खारी, टोस्ट नाहीतर बटर कुकीज. अहाहा!!!
सकाळ ताजीतवानी आणि प्रसन्न. :) आवज नाही, गोंगाट नाही की प्रदुषण नाही. निवांत आवरून घेतले की नाश्ता तयार. आज तर प्रधान बाईंनी कहर केला. चक्क छोले-पुरी. कसे नाही कसे म्हणावे याला!!! थंड वातावरणात थोडे जास्तच खाल्ले जाते नाही का. श्रीला तिच्या दातांचा विसर पडला होता. शमिका आणि राजीव दोघेही त्यांचे व्याप ठाण्यालाच सोडून आले होते. राजीव काकांना बघून तर मी थक्क व्हायचो. खाण्याच्या बाबतीत त्यांनी थंडी जास्तच मनावर घेतली होती. ;)
नथु-ला येथे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडून परमीट मिळवावे लागते. स्थानिक एजंट हे काम तसे सहजपणे करुन देतात. पण एका दिवसात इथे जाणार्या गाड्यांची संख्या लष्कराने २०० अशी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे जायला मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामानाने उत्तर सिक्किमचे परमीट सहज मिळून जाते. रस्त्याची एकुण अवस्था बघता हा आकडा २०० का? हे उत्तर सहज मिळते. खरेतर हा रस्ता अधिक उत्तम स्थितीत असणे गरजेचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्या हिमांक प्रकल्पातून लडाखमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामानाने हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तुम्हाला पाठीचे / मानेचे दुखणे असेल तर हा प्रवास नक्की टाळा. किंवा प्रवासाआधी एकदा रस्त्याची किमान अवस्था विचारून पहा.
अतिशय अरुंद आणि वळणा-वळणाच्या उंचसखल आणि खडबडीत अश्या रस्त्याने हळु हळु उंची गाठत आपण नथु-लाकडे सरकत असतो. अचानक दिसते ती लांबचलांब गाड्यांची रांग. पण ह्या सर्व गाड्या थांबून का राहिल्या आहेत बरे? पुढे जाउ देत आहेत ना? की इथुनच मागे फिरायचे? मग लक्ष्यात येते की दरड कोसळलेली आहे आणि लष्कराचे जवान अथक प्रयत्न करून मार्ग मोकळा करण्याच्या मागे लागले आहेत. रांगेत गाडी उभी करत आमचा ड्रायव्हर सत्या खाली उतरला.
सत्या - जल्दी खुले तो अच्छा है. २ बजे के पहले लास्ट पोस्ट पे नही पहुचे तो नथु-ला जानेको नही मिलेगा.
मी - लेकीन हमारे पास परमीट है ना. फिर क्यु नही जाने देंगे?
सत्या - वो उनपे है. उपर जानेतक ५ बार परमीट चेक करते है. पॉपकॉर्न खाओ.
श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा.
आसपासच्या गावामधले बरेच लोक पॉपकॉर्न विकत बसले होते. आम्ही सहज खायला म्हणून ते घेतलेही पण त्याने जास्त ऑक्सिजन कसा मिळेल हे काही मला अजुन कळले नाहिये. :)
नथु-लाकडे जाणारा रस्ता सोंग्मो उर्फ चांगू लेकवरून पुढे जातो. १२,४०० फुटांवर असलेले हे एक ग्लेशियर लेक आहे. लेकच्या आजुबाजुला चिक्कर उपहारगृह आहेत. पण नुडल्स सोडुन काही खायला मिळेल तर शप्पथ!!! लडाखला आणि इथेही हे एक लक्षात आलयं ते म्हणजे नाश्ता मजबुत करून निघा आणि दिवसाअखेर पुन्हा व्यवस्थित जेवा. दिवसभर फिरताना तुम्हाला धड काही खायला मिळेल याची शाश्वती नाही. :)
ज्या लोकांना नथु-लापर्यंत जाण्याचा परवाना मिळत नाही त्यांना किमान चांगू लेक आणि बाबामंदिरपर्यंत नक्की जाता येते. आमचे मुख्य लक्ष्य नथु-ला असल्याने इथे आणि बाबामंदिरला न थांबता आम्ही थेट पासपर्यंत पोचलो. जसे जसे आपण वर जातो तसा निसर्ग अधिकच खुलतो. बर्फाच्छादित दोंगर आणि त्यातून उगम पाउन चांगू लेक मध्ये मिळणारे पाण्याचे ओढे. नथु-ला म्हणजे सिक्किम भेटीमधले माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्थळ होते. पुर्व सिक्किममध्ये १४,१४० फुटांवर असलेल्या या खिंडीमधून चीनच्या ताब्यात असणार्या तिबेटमध्ये प्रवेश करता येतो. प्राचीन काळचा हा सिल्क रुट. १९६२ च्या युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. भारत-चीन मधील करारानंतर २००६ मध्ये नथु-ला पुन्हा सुरु केला गेला. दरवर्षी येथून भारतातर्फे २९ तर चीन तर्फे १५ वस्तुंची देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होते.
नथु-ला पोस्टकरता थोड्या पायर्या चढून तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागले. वाटेत डाव्या हाताला भारतीय लष्कराने शहीद स्मारक उभे केले आहे. थोडेवरती आपला तिरंगा वार्यावर अभिमानाने फडकत उभा आहे. पायर्या चढताना सावकाश. कारण विरळ हवेनी आपल्याला लगेच त्रास होउ शकतो. डोके जड होणे, श्वास घेण्यात अडचण येणे हे तर सर्रास. अगदी ६-८ पायर्या चढून थांबत गेलो तरी हरकत नाही. आम्ही चढत असताना एक जोडपे त्यांच्या लहानश्या मुलाला घेउन, खरतरं अक्षरशः खेचत, आमच्याही जास्त वेगाने,वर जाताना पाहून, थांना काही बोलणार तेवढ्यात वरून खाली येणारा एक सुभेदार त्यांना थांबवत ओरडलाच. इथे येणार्या पर्यटकांची काळजीही हे जवान लोक घेत असतात.
पोस्टच्या बाजूला भारतातर्फे येथे एक इमारत उभारली गेली आहे. चीनतर्फे त्याहून मोठी इमारत उभारली गेली आहे. दोन्ही इमारतीत फारतर १२-१५ मिटरचे अंतर असेल. मध्ये असलेल्या तारेच्या कुंपणापलिकडे चिनी शिपाई उभे असतात. त्यांच्या तोंडावर अजिबात स्मितहास्य नसते. अर्ध्यातासाहून अधिक काळ इथे राहिल्यास विरळ हवेचा अधिक त्रास होउ शकतो हे पाहून इथे फार वेळ थांबू नका अशी विनंती पोस्टवरच्या जवानांकडून केली जाते.
गंगटोकवरून सकाळी ८ वाजता निघुनही खराब रस्ते आणि हवामान यामुळे नथु-लापर्यंत पोचायला किमान ५-६ तास लागतात. खुद्द पोस्टवर ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रवास.
बाबामंदिर म्हणजे १३,१२३ फुट उंचीवर बांधलेली हरभजन सिंग यांची समाधी आहे. मुळ समाधी जिथे आहे तिथे सपाटी नसल्याने, आणि पर्यटकांसाठी पुरेशी जागा नसल्याने, जवळच सपाटी बघून आता बाबा मंदिर उभारण्यात आले आहे. हरभजन बाबा यांना आजही सर्व लष्करी सोई पुरवल्या जातात. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी त्यांने सामान जीपमध्ये ठेवून एक जवान न्यु-जलपायगुडी येथे पोचवतो आणि तिथून ते सामान पंजाब मधील त्यांचा गावी पोचवले जाते. हरभजन बाबा हे चीन सिमेवरील संकटांची चाहुल २-३ दिवस आधीच भारतीय जवानांना देतात अशी इथे श्रद्धा आहे.
मंदिरासमोर एक छानसे दुकान आहे. इथे तुम्हाला नथु-ला पास करून आल्याचे सर्टिफिकेट बनवून घेता येते. परतीच्या मार्गावर पुन्हा एकदा चांगु लेकला थांबून याकची सवारी करण्याची इच्छाही भागवून घेता येते. आम्ही मात्र ते काही केले नाही. ३ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा कंबरतोड प्रवास पुर्ण करत आम्हाला गंगटोकमध्ये पोचायचे होते. पोचलो तेंव्हा ७ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्याचा प्रस्ताव रद्द करत आम्ही थेट एम.जी.रोड कडेच मोर्चा वळवला. आज पुन्हा मोमो खायची इच्छा जागी झाली होती. :)
क्रमश...
ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव
जरा कल्पना करा...
एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...
किंवा
व्हरांड्यासमोरच्या काळजीपूर्वक राखलेल्या बागेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही गरमागरम आलूपराठे खात आहात...
किंवा
मस्त गार वार्यावर डुलणार्या पपनसांच्या झाडाखाली तुमचं दुपारचं जेवण सुरू आहे. फाईव्ह कोर्स लंच! ते ही तुम्हाला आदबीनं आणून सर्व्ह केलं जातंय. त्यातल्या सॅलडमध्ये आजूबाजूच्या बागेतली हर्ब्ज आणि नॅस्टरशियमची पिवळी, केशरी नाजूक फुलं त्यात सजली आहेत.
किंवा
खळखळ वाहणार्या नदीच्या शेजारी झाडाखाली टेबल-खुर्च्या मांडून तुमच्या फर्माईशीनुसार बनवलेल्या जेवणाचा तुम्ही स्वाद घेत आहात.
किंवा
समोर पसरलेली दरी आणि त्यातील उतरंडीवरील चहाचे मळे बघताना भर दुपारी तुमचं मन
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
च्या जादुई शब्दांवर आणि अगदी तश्श्याच प्रत्यक्षात समोर दिसणार्या जादुई वादीमध्ये तरंगत राहिलंय.
किंवा
संध्याकाळी सूर्य मावळताना, त्या दरीतल्या वस्त्यांमधले आवाज, खमंग वास, दाटून येत असलेलं धुकं आणि संध्याकाळची हुरहुर मनात आत आत साठवत तुम्ही एका वेगळ्या मनस्वी जगात खोल, अगदी आतवर जात राहिला आहात....
आणि हे सगळं होत आहे समोरच दिसणार्या कांचनजंगाच्या साक्षीनं!!!
************************************************************************************************************
नाही, नाही, मी काही कादंबरी लिहीत नाहीये. याची देही याची डोळा घेतलेले अनुभव आहेत हे - दार्जिलिंगच्या ग्लेनबर्न टी-इस्टेटवर. एक आगळा वेगळा luxurious colonial experience!
दार्जिलिंग मध्ये अनेक प्रसिध्द टी-इस्टेट्स आहेत. त्यातल्या काही टी-इस्टेट्स वर आपल्याला जाऊन राहता येते . यापैकी ग्लेनबर्न टी-इस्टेटचे नाव आम्ही आमच्या काही मित्रमैत्रिणींकडून ऐकले होते. त्यातून आमचे भटकंती बायबल - www.tripadvisor.com - वरही या टी-इस्टेटचे छान रिव्हूज वाचून आम्ही हीच निवडली. २०१३च्या दिवाळीत दार्जिलिंग-सिक्कीम भेटीत दोन रात्री इथे राहून आलो. त्या तीन दिवसांत नितांत सुंदर, अविस्मरणीय आठवणी गाठोड्यात बांधून घेऊन आलो. गाठोडं अगदी जपून ठेवलंय मी मनाच्या एका नक्षीदार कप्प्यात!
...इतर कोणत्याही टी-इ प्रमाणेच ग्लेनबर्न ही देखिल एक जगड्व्याळ परिसंस्था आहे. १८५९ मध्ये चहाच्या एका स्कॉटिश कंपनीने ग्लेनबर्न टी-इस्टेट सुरू केली. नंतर अनेक वर्षांनी चहाच्या मळ्यांच्या धंद्यात असणार्या कलकत्त्याच्या एका भारतीय कुटुंबाने ही इस्टेट विकत घेतली. आज याच कुटुंबातील तिसरी आणि चौथी पिढी या चहामळ्याचा कारभार बघते.
२००२ मध्ये या घराण्यातील नविन सुनेने ही इस्टेट पहिल्यांदा पाहिली आणि तिच्या कल्पने नुसार जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे - बडा बंगला ( The Burra Bungalow) - पुनरुज्जीवन करण्यात आले आणि टी-इस्टेटवरील एक बुटीक हॉटेल जन्माला आले. टेकडीच्या शिखरावर वसलेल्या या देखण्या बंगल्याचे वर्णन कितीही केले तरी त्याची पूर्ण कल्पना येणं शक्य नाही. हे फोटोच थोडीफार ओळख करून देतील...
दर्शनी भाग
व्हरांडा
व्हरांड्यातील बैठक
पुढे २००८ मध्ये जरा खालच्या बाजूला अजून एक बंगला बांधण्यात आला - वॉटर लिली. हा नविन बंगला इतक्या चतुराईनं बांधला आहे की तोही जुन्या काळातला वाटावा.
बरा बंगलो मधून वॉटर लिली आणि दरी
मूळ बंगल्यातील ५ आणि नविन बंगल्यातील ४ अशा नऊ खोल्या आता उपलब्ध आहेत. प्रत्येक खोली अत्यंत सुंदर आणि वेगळी थीम, रंगसंगती घेऊन सजवली आहे. 'गुड अर्थ' नावाचा एक महागड्या पण अत्यंत देखण्या गृहसजावटीच्या वस्तू आणि अपहोल्स्ट्री आणि इतर तत्सम वस्तूंचा एक ब्रँड आहे. त्याचं फर्निचर, पडदे, गादीवरील चादरी, उश्यांची कव्हर्स, फ्रेम्स वगैरे निवडून अत्यंत रसिकतेने नटवलेल्या खोल्या बघून प्रेमात पडायला नाही झालं तर नवल.
किचनमध्ये किती किती त्या कितील्या!
आमची रुम ही बरा बंगलो मधील फायरप्लेस असलेल्या दोन रुम्सपैकी एक होती. लेकीच्या आग्रहाखातर आम्ही दोन्ही रात्री खोली गरम करण्यासाठी शेकोटी पेटवून घेतलीच. एका बाजूला कॉमन व्हरांडा आणि दुसर्या बाजूला एक छोटीशी पण सुबक, गोलाकार मॉर्निंगरुम. तिच्यातून बाहेर पडून बागेत जाता येईल अशी सोय. खोल्यांना कपाटांना कुलुपं वगैरे नाहीत. सगळं तुमचंच मग कुलुपांची काय गरज!
फायरप्लेस आणि अँटिक कपाट
रुममध्ये साग्रसंगित चहा
मॉर्निंग रुम
पलिकडे, सकाळच्या उन्हानं भरून वाहिलेली
<
व्हरांड्यातील आमच्या खोलीसमोरची बैठक
दारातून मांजरं येताहेत आणि जाताहेत. हक्कानं त्यांना हवं तिथे डुलकी घेताहेत. त्यांचंही आहेच ना हे सगळं!
आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन तरी काय करावे. टिव्हीला मज्जाव असल्याने एक वेगळीच नीरव शांतता आणि दूरवरून येणारे पक्ष्यांचे, माणसांचे आवाज, हिरवेगार चहामळे, भटकण्यासाठी छोट्या छोट्या पायवाटा. इस्टेटीतून वाहणार्या दोन नद्या - रंगीत नदी आणि रंग्डंग नदी. स्वर्गसुखच केवळ.
पायी भटकंती करताना घेतलेले फोटो
झेंडूची फुले आणि संत्र्याची झाडे
आणि या सगळ्यापेक्षाही आपला अनुभव दशांगुळे वर नेऊन ठेवणारं दृश्य म्हणजे या इस्टेटीला लाभलेली कांचनजंगाची पार्श्वभूमी. जाता येता सतत समोर दिसणारा, ढ्गांमागे लपून आपल्याशी लपाछपी खेळणारा, दिवसाभरात विविध विभ्रम दाखवणारा कांचनजंगा पर्वत किती बघू आणि किती नको असं झालं.
सुर्योदयामध्ये कांचनजंगा पाहण्यासाठी पहाटेपासून फिल्डिंग लावून बसलो
पहिल्या किरणांचा स्पर्श
सकाळच्या उन्हात न्हाऊन निघालेला कांचनजंगा आणि दरीतलं धुकं
भर दुपारी
संध्याकाळी
जश्या मालकांच्या अनेक पिढ्या इथे आहेत तश्याच मळ्यात काम करणार्या कुटुंबांच्याही अनेक पिढ्या इथे नांदल्या आहेत. इस्टेटीच्या हजारएक एकर्सच्या जागेत अनेक छोट्या छोट्या वस्त्या आहेत, शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, मैदानं आहेत आणि मैदानात अत्यंत आवडीनं फुटबॉल खेळणारी उत्साही मुलं आहेत. या आडजागी त्यांना वाहतुकीचे साधन म्हणजे इस्टेटीच्या गाड्या, अथवा स्वतःच्या मोटरसायकली अथवा दिवसातून एकदा येणारी प्रायव्हेट बस.
ग्लेनबर्नची परंपरा ब्रिटीश आहे आणि ती इथे कसोशीनं जपली आहे. भारतात आलेले ब्रिटीश कशा पद्धतीनं रहात असत याची एक झलकच आपल्याला इथे दिसते. फर्निचर, खानसाम्यांची आदब, आत्यंतिक स्वच्छता, एकत्र जेवण, जेवणा आधीची ड्रिंक्स सगळंच जपलंय इथं. त्यातून इथे येणार्या पर्यटकांतही इंग्लंड आणि युरोपमधून येणारे जास्तच. आम्ही होतो तेव्हा तर आम्हीच फक्त भारतीय. केअरटेकरही ब्रिटिश. तिची हेल्पर - लाराही ब्रिटीश. एक अमेरीकन भारतातल्या टी-इस्टेटवर रिसर्च करत होता. एक ब्रिटिश डॉक्टर दरवर्षी ग्लेनबर्नला येऊन महिना-दोन महिने राहून मळ्यातल्या कामगारांकरता असलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देते. ती ही होती. एक जगभर हिंडणारं ब्रिटिश जोडपं होतं. ते भारताच्या इतक्या प्रेमात की अनेकदा भारताला भेट देत राहतात. ग्लेनबर्नलाही त्यांची ती तिसरी का काय भेट होती. एक जर्मन कुटुंब होतं. रात्रीच्या जेवणाआधी कॉकटेल लाउंजमध्ये आणि मग जेवताना टेबलाभोवती बसून प्रचंड बडबड करायचे सगळे जण. जगाच्या कोणकोणत्या कोपर्यातून, वेगवेगळे संदर्भ धरून काळाच्या एका तुकड्यापुरते एका सुंदर जागी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. मात्र त्या जेमतेम १५-१६ जणांच्या घोळक्यात दोन लारा आणि दोन जेन्या होत्या. गंमतच!
डायनिंग रुम
कॉकटेल लाउंज
कॉकटेल लाउंज संध्याकाळी
एकदा या टीइस्टेटचे बुकिंग केले की ते सर्वतोपरी आपली काळजी घेतात. विमानतळावरून नेण्या-पोहोचवण्याकरता त्यांची गाडी येते. आपल्या दिमतीला एक टीमच हजर असते. आपल्याला टी-इस्टेटची सैर करवून आणण्यासाठी एक स्थानिक बरोबर असतो. पायी अथवा त्यांच्या गाडीतून ही सैर आपल्याला करता येते. टी-इस्टेटवरच त्यांची चहाची फॅक्टरीही आहे. ती पाहून त्याबरोबर टी टेस्टिंगचा अनुभव घेता येतो. तिथल्या छोट्या छोट्या वस्ती मध्ये पायी भटकून येता येतं.
चहाची फुलं
झूम आउट - चहाचं झाड
अजून झूम आउट - चहाचा मळा
पण हायलाईट म्हणजे नदीकाठची पिकनिक. इस्टेटीच्या एका सीमेवर रंग्डंग नदी वाहते. त्या नदीच्या ज्या काठापर्यंत या इस्टेटीची हद्द आहे, तिथे एक छोटेखानी कॅम्प हाऊस बांधले आहे. चालत अथवा गाडीने तेथपर्यंत जाऊन, तिथे नदीकाठी लंच घेऊन, हवे असतील काही खेळ खेळून संध्याकाळी परत येता येते.
रंग्डंग नदी आणि नदीकाठची पिकनिक
कॅम्प-हाऊस
नदीवर जाण्याचा रस्ता मात्र मुद्दाम खडबडीत ठेवला आहे. त्यामुळे रोड- राफ्टिंग लेवल ५ चा आनंद मात्र आपसुक मिळतो.
ग्लेनबर्नवरून बागडोगराला परत जाताना कांचनजंगाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे दार्जिलिंग
उजवीकडल्या पलिकडल्या डोंगरावर दिसते ती मकाईबारी टी-इस्टेट असं आमच्या गाडीवानानं सांगितलं.
भारी बडबड्या होता तो. गाडी चालवता चालवता आमची चांगलीच करमणूक केली त्यानं. आपल्या खास दार्जिलिंग हिंदी उच्चारांत त्यानं दार्जिलिंगला येणार्या पर्यट्कांची निरीक्षणं नोंदवली ..
"शाब, बोंगाली बाबू आते हे तो सब्बेरे सब्बेरे उठके सनराईज देखनेके लिये जाते है तो पूरा ढकके जाते है. जो जो मिलेगा वो शब पेहन लेगा. स्वेटर, कोट, मोजे, हातमे ग्लोव, कानटोपी शब शब पेहनेगा. उपरसे रूम का चादर भी लपेट के ले जायेगा. और फिर भी उदर जाके ' ठंडी हे, ठंडी हे ' बोलता रहेगा...
दुसरा वो मद्रासी लोग आता है. वो सीधा लुंगी पेहनके सनराईज देखने को जायेगा. मगर उदर जाके फिर गाडी से बाहर नही जायेगा. गाडी मे बैठके बार बार कॉफी पियेगा .... "
लै हसवलं गड्यानं.
*************************************************************************************************************
दार्जिलिंग ते सिक्कीमच्या रस्त्यावर एक व्ह्यु-पॉइंट आहे. तेथून तीस्ता आणि रंगित नदीचा अत्यंत विलोभनीय आणि नेत्रदिपक संगम दिसतो.
समोरून येणारी फिक्या हिरव्या रंगाची ती तीस्ता नदी. आणि डावीकडून येऊन तिला मिळणारी गडद हिरव्या रंगाची ती रंगित नदी.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.