Tuesday, June 27, 2023

स्ट्रॅटफोर्डमधले घर कौलारू...

 http://sahajkahisuchalela.blogspot.com/2019/11/blog-post_18.html

कुठल्याही देशात, समाजात शांतता आणि स्थैर्य आले की तिथे संस्कृतीला कोवळे धुमारे फुटू लागतात. इंग्लंडमध्ये आता हेच होणार होते. कला, साहित्य आणि नाट्यजगतात उत्साहाचे वातावरण पसरू लागले. रंगमंचावर नवनवीन आविष्कार होऊ लागले. देशाच्या सांस्कृतिक क्षितिजावर एक नवीन पहाट होत होती.
अ‍ॅव्होन नदीच्या काठी पहुडलेले, इंग्लंडमधील एक शांत निवांत गाव स्ट्रॅटफोर्ड. छोटीशी बाजारपेठ, हजार-दोन हजार लोकांची वस्ती, लहान-मोठी घरे, दुकाने... सर्वसामान्य गावांसारखे हे गाव. जॉन आणि मेरी नावाच्या सुखवस्तू जोडप्याने स्ट्रॅटफोर्डमधील हेनली स्ट्रीटवर एक घर विकत घेतले. जॉनची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. गावांमधल्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये जॉनचे नाव मानाने घेतले जायचे.
हेनली स्ट्रीटवरील नवीन घरात जॉन आणि मेरी दोघांचा संसार सुरू झाला. दोनाचे चार आणि पुढे चाराचे नऊ झाले. जॉन आणि मेरी दोघांना १५६४मध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले. नवजात बाळाचे नाव ठेवण्यात आले विलिअम... संपूर्ण नाव विलिअम शेक्सपिअर!
जॉन आणि मेरी शेक्सपिअरच्या या मुलाने 'नावात काय आहे?, 'व्हॉट इज इन अ नेम?' असे म्हणत म्हणत स्वतःचे नाव मात्र इतिहासात सुवर्णाक्षराने कोरून ठेवले. वर्षे लोटली, शतके उलटली, पण 'विलियम शेक्सपिअर' नावाचे गारूड जगभरातल्या साहित्यप्रेमींच्या मनावरून अजून उतरले नाही आणि उतरणारसुद्धा नाही.
शेक्सपिअरची कारकिर्द खऱ्या अर्थाने बहरली ती लंडनमध्ये. त्यांची नाटके, सुनीते, कविता सर्वसामान्यांपासून ते राजेरजवाड्यांपर्यंत लोकप्रिय झाली. रोमिओ अँड ज्युलिएट, हॅम्लेट, किंग लेयर, मॅकबेथ यासारख्या अजरामर कलाकृती निर्माण करणाऱ्या अवलियाने आपल्या आयुष्यातला बराचसा काळ लंडनमध्ये व्यतीत केला. पण लंडन जरी त्यांची कर्मभूमी असली, तरी स्ट्रॅटफोर्ड त्यांची जन्मभूमी होती. शेक्सपिअरची नाळ आपल्या जन्मभूमीशी घट्ट जोडली होती. आयुष्याच्या संध्याकाळी शेक्सपिअर आपल्या जन्मगावी, स्ट्रॅटफोर्डमध्ये परत आले आणि इथेच या साहित्यमहर्षींनी आपला शेवटचा श्वास घेतला.
ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये म्हणतात. ते शोधणे कठीण असावे किंवा अप्रासंगिक असावे, म्हणून असे म्हणत असावेत. पण सुदैवाने शेक्सपियर नावाच्या ऋषितुल्य साहित्यिकाचे मूळ गाव, जन्मस्थान सर्वसामान्यांना ज्ञात आहे आहे. इंग्लंडच्या स्ट्रॅटफोर्ड अपॉन अ‍ॅव्होन या गावात त्यांचे घर आजही उभे आहे. 'शेक्सपिअर्स बर्थप्लेस' नावाची ट्रस्ट त्याची उत्तम देखभाल करते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक हे घर बघायला येतात.

इंग्लंडवर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. प्रत्येक राजघराण्याने आपल्या कार्यकालात देशाच्या कला, संस्कृती, साहित्य यावर आणि अगदी स्थापत्यावरही आपली छाप पाडली. शेक्सपियरअन काळात इंग्लडवर आधी हेन्री आठवा आणि मग त्याची मुलगी एलिझाबेथ राजसत्तेवर आली. साहजिकच तात्कालीन स्थापत्यावर आणि बांधकामावर त्यांच्या ट्युडर घराण्याचा मोठा प्रभाव होता.
शेक्सपियरचे घर ट्युडर बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे. त्या काळात सर्वसाधारणपणे घरे आकाराने फार मोठी नसायची. शेक्सपियर यांचे मात्र घर बऱ्यापैकी मोठे आहे. त्यांचे वडील मोठे व्यापारी आणि गावचे महापौरसुद्धा होते. त्यांच्या उत्तम सांपत्तिक स्थितीमुळे हे घर मात्र त्या काळच्या मानाने ऐसपैस होते. खोल्या मात्र अतिशय लहान आणि छत बुटके आहे. शेक्सपिअर कुटुंबाचे घर हे एक नांदते गोकुळ होते. घरात आई, वडील, भाऊ, बहिणी आणि एकंदर सधन परिस्थिती असल्यामुळे लहानग्या विलियमचे लहानपण सुखासमाधानाचे गेले.

विलियमवर त्याच्या आईचा - मेरीचा खूप प्रभाव होता. मेरी ही एक सुशिक्षित स्त्री होती. विलियमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिनेच मोठ्या समर्थपणे त्यांच्या मालमत्तेचे नियोजन आणि वाटप केले. सर्वसाधारण आयांप्रमाणे मेरीसुद्धा आपल्या मुलांना खूप गोष्टी सांगायची. पऱ्या, राक्षस, भुते, चेटकिणी... गोष्टी रंगवून रंगवून सांगण्यात तिचा हातखंडा होता. लहानपणी तिच्याकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी पुढे शेक्सपिअरने आपल्या नाटकांमधूनही सादर केल्या. वयाच्या सहा-सात वर्षांपर्यंत मेरीने विलियमला घरीच शिकवले आणि नंतर स्ट्रॅटफोर्डमधीलच किंग्ज न्यू स्कूलमध्ये त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अ‍ॅन हॅथवे या मुलीशी विलियमचा विवाह झाला. वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा काही काळसुद्धा विलियम आणि अ‍ॅन दोघांनी या घरातच घालवला. नंतर आयुष्याच्या उमेदीच्या काळात मात्र ते लंडनमध्ये होते.
पुढे १५९७मध्ये स्ट्रॅटफोर्डमध्येच त्यांनी स्वतःचे असे घर घेतले. ते न्यू प्लेस म्हणून ओळखले जाते. न्यू प्लेस हे घर अतिशय प्रशस्त होते. मोठ्या प्रशस्त खोल्या, भरपूर मोठा बगिचा... इंग्लंडमधल्या सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कलाकाराच्या इभ्रतीला साजेल अशीच ही इमारत होती. विलियम आणि अ‍ॅन त्यांच्या दोन मुलींबरोबर या घरात राहायला आले ते शेवटपर्यंत इथेच होते. विलियम शेक्सपिअर यांच्या मृत्यूनंतर त्यांची घरे आणि बरीचशी मालमत्ता त्यांची मोठी मुलगी सुझानाकडे आणि मग तिची मुलगी एलिझाबेथकडे वारसा हक्काने गेली. एलिझाबेथ मात्र निपुत्रिक असल्यामुळे शेक्सपिअर परिवाराची वंशवेल तिथेच थांबली.

स्ट्रॅटफोर्ड अपॉन अ‍ॅव्होन हे शेक्सपिअरचे गाव लंडनपासून अवघ्या दोन तासांवर आहे. ट्रेनने, बसने किंवा कारने इथे सहज जाता येते. लंडनपासून यायला-जायला सोयीचे आणि महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने स्ट्रॅटफोर्डमध्ये सर्व सोयी उत्तम आहेत. रेस्टॉरंट्स, थिएटर्स, शॉपिंग मॉल्स अगदी सगळे आहे. पण सर्व आधुनिक सुखसुविधा असूनही या गावचे मूळ रूप टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. अतिशय सुंदर गाव आहे हे. आखीव, रेखीव आणि सुरेख. नदीचा शांत किनारा, सुबक स्वच्छ रस्ते, लहान लहान कॅफेज, रंगीबेरंगी फुले... नुसता फेरफटका जरी मारला तरी मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
या गावात शेक्सपिअर परिवाराची सुमारे पाच घरे आणि बगिचे आहेत. एका तिकिटाच्या दरात ही सगळी घरे आपल्याला बघता येतात. खरे म्हणजे शेक्सपिअरचे जन्मस्थान असलेले घर आणि त्यांचा उत्तरार्ध जिथे झाला असे त्यांचे दुसरे घर अशी दोन घरे जरी बघितली, तरी पुरेसे आहे. अर्थात हाताशी वेळ असल्यात सगळी घरे बघण्यास काहीच हरकत नाही. सगळ्या वास्तू आणि आतमधील गोष्टी व्यवस्थित छान जतन केल्या आहेत. माहितीचे फलक आणि माहिती देणारे लोक जागोजागी आहेत. सगळ्या चीजवस्तू फार काळजीपूर्वक ठेवल्या आहेत, त्यांना हात लावण्यास अर्थात मनाई आहे. खरे सांगायचे, तर हात लावून बघण्याचा मोहही होत नाही. इंग्लिश साहित्याचे जनक म्हणावेत असा महान लेखक जिथे जन्मला, वाढला त्या वास्तूमध्ये आपण आहोत या नुसत्या कल्पनेनेच मन भरून येते.. नतमस्तक व्हायला होते.
घरात जागोजागी त्या काळच्या वेषभूषेमध्ये लोक उभे असतात, ते आपल्याला त्या त्या खोलीची माहिती देतात. 
शेक्सपिअरच्या या सुंदर गावात जागोजागी त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येतात. सरकारने आणि जनतेने अत्यंत अभिमानाने त्या सांभाळल्या आहेत. इथले लोक गमतीने म्हणतात की आज चारशे-साडेचारशे वर्षांनीसुद्धा शेक्सपिअर स्ट्रॅटफोर्ड अपॉन अ‍ॅव्होनमध्ये परत आले, तर ते हेनली स्ट्रीटवरच्या आपल्या घरी अगदी सहज न चुकता जातील. संपूर्ण गावच जणू शेक्सपिअररंगी रंगले आहे.

'ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वूमन आर मेअरली प्लेयर्स' असे म्हणणारा हा महानायक जगाच्या रंगमंचावर एक अद्वितीय भूमिका पार पाडून गेला. अनेक नाटके आणि अगणित कविता लिहिणारे विलियम शेक्सपियर वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.
स्ट्रॅटफोर्डमधील हेनली स्ट्रीटवर सुरू झालेला प्रवास अत्यंत दिमाखदार वळणे घेत शेवटी १६१६मध्ये स्ट्रॅटफोर्डच्याच चॅपल स्ट्रीटवरील न्यू प्लेस या घरात येऊन संपला. एका देदीप्यमान पर्वाची अखेर झाली.
'विलियम शेक्सपिअर' यांच्या अस्तित्वाने पावन झालेले स्ट्रॅटफोर्ड अपॉन अ‍ॅव्होन हे गाव जगभरातील नाट्यरसिकांसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी आज एक तीर्थस्थळ बनले आहे.


 घर कौलारू

हेनली स्ट्रीट

शेक्सपियर यांचा जन्म या खोलीत झाला 

शेक्सपियरची शाळा 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...