Tuesday, June 27, 2023

जपान, जपानी आणि मी!

 https://www.misalpav.com/node/33120

'' पमीचान, यु आर अ बेरी गुड कूकर''.....माझ्या हातचा खतरर्नाक स्वयंपाक खाउन सुद्धा मला " गुड कूकर" म्हणणार्या बाईकडे मी थक्क होऊन पहात होते.

पुढे हळूहळू जपानी लोकांच्या या अती नम्रपणाची इतकी सवय झाली की मग त्यांनी मला 'यू आर बेरी स्मार्त' किंवा अगदी 'यू आर बेरी थीन' वगैरे म्हटले तरी मी अजिबात दचकायचे नाही. खरंच कौतुक करताहेत का टोमणा मारताहेत असलं फालतू टेन्शन न घेता बेधडकपणे थॅंक यू ..आरिगातो गोझाईमास म्हणून टाकायचे.
पण देश, भाषा, संस्कृती, रंग- सगळ्याच बाबतीत परक्या असलेल्या मला, या जपानी स्त्रियांनी 'पमीचान' म्हणत आपल्या वर्तुळात अलगद सामावून घेतलं होतं, अगदी सहजपणे.
जपान मधे पुरूष असो वा स्त्री, सगळ्यांनाच सरसकट नावामागे' सान' लावण्याची पद्धत आहे. जसे की अक्षय सान, अमोल सान तसेच टीना सान, गौरी सान वगैरे. नाहीतर मग 'चान' हे संबोधन. लहान मुलांना किंवा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीला प्रेमाने चान म्हणायची पद्धत आहे.

माझ्या मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने काही वर्षे आम्ही जपानी लोकांच्या निकट सहवासात घालवली. काही काळ जपानमधे आणि बराचसा काळ जपानच्या बाहेरसुद्धा या लोकांबरोबर राहिल्यामुळे त्यांची विचारपद्धती, चालीरीती, बोलण्या-वागण्याची पद्धत मला अगदी जवळून अनुभवता आली. या लेखातून मी माझ्या मर्यादित नजरेला दिसलेले, कळलेले आणि प्रचंड भावलेले जपानी समाजमन मांडण्याचा थोडाफार प्रयत्न करतेय. माझे काही अनुभव, काही निरिक्षणे, काही गमती आणि आठवणी....

जपान मधे रहातांना आम्ही आमच्या कंपनीच्या कॉलनी मधे राहात होतो. एक पंधरा वीस इमारतींची ही सोसायटी. एकेक इमारत पाच मजल्यांची. अगदी जुनं बांधकाम. रंगरंगोटी कधीतरी पुरातन काळात केलेली. लिफ्ट वगैरे लाड नाहीच. साधारणपणे सहा फुट बाय आठ फुट अशा मापाचे पाच चौकोन आखून अख्खा फ्लॅट त्यात बसवला होता.
स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं.
या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन.

स्वयंपाकघरात वॉटर हीटिंग नसल्यामुळे हिवाळ्यात बर्फाळ पाण्यात भांडी घासतांना मात्र मला खूप त्रास व्हायचा. लिविंग रूम आणि स्वयंपाकघर मिळून एक आम्ही एसी घेतला होता. त्याचा डक्ट बाहेर गॅलरीत होता. उन्हाळ्यात हवेत दमटपणा इतका की त्या डक्ट मधून सतत पाणी गळणार. ते पाणी गॅलरीत साचू नये म्हणून त्या डक्ट खाली मी एक बादली ठेवली होती. ती बादली दर दोन तासांनी भरून रिकामी करायला लागायची इतकी दमट हवा.

सोसायटीच्या खाली खुल्या जागेत पार्किंग लॉट आणि सार्वजनिक बाग होती. बाग म्हणजे काय होतं की प्रत्येक कुटुंबाला एक असा जमिनीचा एक चिमुकला भाग नेमुन दिला होता. त्या जागेत तुम्ही भाजी किंवा फुलं काहीही लावा. जपानी लोकांना बागकाम फार प्रिय. त्या छोट्याश्या वाफ्यातसुद्धा या बायका हौसेहौसेनी काकड्या, टोमॅटो, मिरच्या काय काय लावायच्या. सगळ्यांचाच अंगठा हिरवा.. दुपारी कधीही बघितलं की सर्व बायका डोक्यावर टोपी, बागकामाचे हातमोजे घालून बागकाम करायच्या आणि बरोबर त्यांची बच्चे कंपनी सुद्धा हातात पाण्याची झारी किंवा हातात खुरपणी घेऊन आईला मदत करायची.

या देशात खरंतर सर्व इमारती भूकंपाच्या दृष्टीने सुरक्षित साहित्य वापरुन बंधल्या असतात. पण या आमच्या इमारती जुन्या असल्यामुळे आम्हाला तशी काही सुरक्षितता नसायची. मोठा भूकंप झालाच तर पाच मजले आपल्याला उतरता येतील का अशी थोडी काळजी वाटायची.
मी तिथे असतांना मोठा धक्का कधी नाही बसला पण अधून मधून जरा झुम्मकन चक्करल्यासारखी बिल्डिंग हलायची मग सगळ्या बायका गॅलरीत येऊन भूकंप किती रिक्टर स्केल चा असावा यावर थोडीफार चर्चा करायच्या मग आपापल्या कामाला लागायच्या.

या लहान घरं असलेल्या, जुन्या आणि आणि गैरसोयी असलेल्या सोसायटी मधे राहण्याचे आमच्या सकट सगळयांचे एकमेव कारण की हे कंपनी अपार्टमेंट्स असल्यामुळे अत्यंत स्वस्त दरात आम्हाला मिळायचे. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात आणि जपानच्या प्रचंड महागाईत ही छोटीशी घरं आम्हा सगळ्यांसाठी मोठ्या वरदानासारखी होती. लोकं वयाच्या पस्तीस-छत्तीस वर्षांपर्यंत इथे राहात असत. मग वयानुसार एक दोन प्रमोशन्स घेऊन बॅंक बॅलेन्स वाढला की मग स्वत:चे मोठे घर घ्यायचे.

वयानुसार प्रमोशन्स हे जपानी कंपनी मधे शब्दश: असते. म्हणजे सुरुवातीला इंजीनीयर म्हणून माणूस लागला की डोळे मिटून तो सांगू शकतो की आजपासून तीन वर्षांनी मला पहिली बढती मिळेल, मग त्यानंतर चार वर्षांनी दुसरी. आजपासून दहा वर्षांनी मी अमक्या अमक्या हुद्द्यावर असणार आणि माझा पगार इतका इतका असणार. म्हणजे करियर ग्राफ हा ठरलेला.
म्हणजे एखाद्याच्या हुशारीबद्दल त्याला सटासट बढती मिळेल असे नाही किंवा एखाद्याला माठपणाबद्दल बढती नाकारली असेही नाही. सगळं वक्तशीर आणि ठरलेलं.

आमच्या इथल्या स्त्रिया तशा पस्तीशीच्या आतल्या. वयाच्या पस्तीस-छत्तीस नंतर थोडी आर्थिक सुबत्ता आली की मग या सोसायटीमधून बाहेर, स्वत:च्या हक्काच्या घरात जायच्या. सगळ्याजणींची साधारणपणे एकसारखीच मध्यमवर्गीय पार्श्वभूमी. शिक्षण झाल्यानंतर या नोकरीला लागलेल्या. बहुतेक करून जवळ जवळ सगळ्याजणी आमच्या ( म्हणजे जिथे माझे मिस्टर काम करायचे त्या) कंपनीच्याच माजी कर्मचारी. काम सेक्रेटरीयल, क्लरिकल अशा स्वरूपाचं. काम करता करता तिथल्याच तरुण इंजीनीअर्सची ओळख. ओळखीचं रुपांतर आधी प्रेमात आणि मग लग्नात. या सर्व घडामोडींमधे वय तिशीला आलेलं त्यामुळे लग्नाची आणि मग मूल होऊ देण्याची घाई.
लग्नाआधी ऑफिस मधे काम करणार्या, फूल पाखरासारखे स्वच्छंद जगणार्या या मुली लग्न होऊन आमच्या कंपनी अपार्टमेंट (शाताकू) मधे येईपर्यंत अगदी टिपिकल चूल आणि मूल टाइप ताई, माई, अक्का बनून जायच्या. पण अतिशय उत्कृष्ट गृहिणी! फार हौसेनी संसार करतात या मुली . इतकेसे घर, तितकीच लहानशी बाग, आपली गोडम गोड मुलं आणि आपले थोडेसे गंभीर, अबोल नवरे अगदी मनापासून सांभाळतात.

त्यांच्याशी बोलतांना मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मुलं झाल्यानंतर त्या करियर का नाही सुरू ठेवत. त्यांच्या उत्तरावरुन लक्षात आलं की या सर्व मुली फार उच्च शिक्षीत किंवा महत्वकांक्षी अशा नव्हत्या. साधारण शिक्षण आणि मग छोटे मोठे कोर्सेस करून नोकरीला लागलेल्या. करियर पाथ फार काही जोमदार नाही. नवरा मात्र छान शिकलेला स्थिर नोकरीत, योग्य सांपत्तिक स्थती असलेला असा मिळाला की त्या समाधानी असत. पुन्हा मूल झाल्यावर त्याला डेकेअर मधे पाठवणे म्हणजे सगळा आपला पगार डे केअर ला देण्यासारखंच होतं. या देशात बाकी सर्व गोष्टींप्रमाणेच ही सुविधा पण खूप महाग. मग आपणच घरी राहून फुल टाइम गृहिणी का न बना? हा विचार. यामधे जपानच्या पारंपरिक जुन्या पुरुषप्रधान संस्कृतीचाही मोठा पगडा आहेच. या देशात नोकरी करणार्या स्त्रियांचं प्रमाण जरी खूप असलं तरी वरच्या जागांवर, सीनियर लेवल वर स्त्रियांचं प्रमाण कमी दिसतं. उघडपणे कबूल नाही करणार कदाचित पण स्त्रीची पारंपरिक चूल आणि मूल ही प्रतिमा इथे आदर्श मानली जाते. आता नवीन पिढीत मात्र हे प्रमाण खूप कमी होत आहे, सुदैवाने.

या आमच्या सोसायटीमधे दर महिन्यात एक सामूहिक साफसफाई (सोजी)चा दिवस असायचा. त्या दिवशी सकाळी आम्ही सर्व बायका आपापला झाडू, पुसपास करायला स्वच्छ फडकी घेऊन बिल्डिंग च्या खाली उतरायचो. पुढचे दोन एक तास पार्किंग लॉट, सोसायटीचे रस्ते, बगिचा सर्व गोष्टींची साफसफाई व्हायची. तसं तर सोसायटीच्या साफसफाई साठी सफाई कर्मचारी यायचेच. कॉलनीची स्वच्छता ही काही आमच्या महिन्यात एकदा होणार्या सोजी वर अवलंबुन होती असे अर्थातच नाही पण तरीही ही प्रथा लोकं अगदी मनापासून पाळायचे.

जपानमधे अशा सामूहिक उपक्रमांचे फार महत्व असते. या सर्व लोकांमधे माझा देश, माझं शहर किंवा माझी सोसायटी या विषयी एक सशक्त सामजिक बंधिलकीची भावना असते. हे लोकं स्वत:च्या भावना तीव्र पणे व्यक्त करत नाही पण लहानपणापासून ही सामजिक जबाबदारी यांच्या मनावर अशी काही बिंबवली जाते की श्वास घेण्याच्या सहजतेने ही लोकं या अशा सामूहिक उपक्रमांमधला आपापला वाटा उचलतात. माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मधे सुद्धा महिन्यातुन एकदा ऑफीस समोरच्या बागेची अशीच सफाई मोहिम असायची. कंपनी सी ई ओ पासून शॉप फ्लोर वरच्या कर्मचार्यापर्यंत प्रत्येक जण यात सामील व्हायचा.

स्वच्छता, वक्तशीरपणा, सचोटी या बाबतीत जबाबदारीचे तीव्र भान असणारे हे लोक काही बाबतीत अतिशय उदासीन असतात. मला खूप खटकणारी यांची गोष्ट म्हणजे अतिरेकी धूम्रपान. ट्रेन स्टेशन्स, दुकानं, रेस्टोरेंट्स, ऑफीस सगळीकडे अगदी बिनदिक्कत या लोकांचे धूम्रपान चालू असते. आपल्याबरोबर आपण दुसर्यांच्याही तब्बेतिला धोक्यात टाकतोय किंवा साधे बेसिक मॅनर्स सुद्धा या वेळी ही लोक गुंडाळून ठेवतात.
मद्यपान करून गाडी न चालविण्याच्या बाबतीत मात्र हे लोक अगदी काटेकोर असतात. रात्री कुठे बाहेर डिनर/ /ड्रिंक्स ला जायचे असेल तर ही लोक सरळ ट्रेन किंवा बस ने जाणार आणि येतांना त्यांच्या बायका गाडी घेऊन त्यांना पिकअप करायला येणार, अगदी शिस्तीत.
म्हणजे दारू प्यायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयत्तिक प्रश्न आहे पण प्यायल्यावर रस्त्यावर गाडी चालविणे हा मग मात्र वैयत्तिक प्रश्न राहात नाही मग तो सामाजिक गुन्हा ठरतो. तिथे झीरो टॉलरन्स! धूम्रपानाच्या बाबतीत मात्र हा काटेकोरपणा कुठे जातो काय माहीत.

असो. एकूण या देशात माझे मस्तं मजेत दिवस चालले होते. नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं पहात होते. चुकत होते, धडपडत होते तरीही नित्य नवीन शिकत होते.
अशातच आमच्या बदलीचे वारे सुरू झाले आणि एक दिवस संध्याकाळी हे त्यांच्या बॉस कडून बदलीचा आदेश घेऊन घरी आले. आमच्या कंपनीच्याच अमेरिकेतील ब्रांच मधे आमची बदली झाली होती.
हा देश सोडायची हूरहुर तर होती पण अमेरिकेला जाण्याची उत्सुकताही तेव्हडीच होती. नवीन देश, नवीन मित्र , नवीन संस्कृती अनुभवायला मिळणार याची गंमत वाटत होती.
पॅकिंग करायला मूविंग कंपनीचे लोक आले त्यांनी आमचं अगदी इतकेसे समान दोन तीन तासात पटापट बांधून ट्रक वर चढविले. लहान घर असल्याचा एक मोठा फायदा आमच्या लक्षात येत होता. ठेवायचं कुठे म्हणून आम्ही कमीत कमी गोष्टींचा संचय केला होता. त्या अत्यंत कमी असलेल्या सामानामुळे आमचं झट पॅकिंग, पट मूविंग झालं होतं.

बदलीची ऑर्डर हातात पडल्यापासून बरोब्बर दहाव्या दिवशी आम्ही नारिता विमानतळावरून डेट्रॉइट ला जाणार्या विमानात बसलो....'पूर्वरंग' मनात साठवून घेत आम्ही आता 'अपूर्वाई' च्या दिशेने निघालो होतो.

क्रमश: 

 जपानमध्ये २ महिने होते त्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला. बर्‍याचशा गोष्टी, अति नम्रपणा, धुम्रपान, बागकाम, सफाई अनेक बाबतीत सहमत. खास करुन लहान, खरंतर मायक्रो किचन मधला स्वयंपाक आणि तसंच लहानसं घर हे वाचताना तर ती सगळी धमाल आणि त्याच वेळी होणारी चिडचिड सगळे काही आठवले. आता हसु येतंय.

अति नम्रपणाचा अनुभव जागोजागी येतो. ट्रेन मधले डायव्हर हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. अगदी रोबोट सारखे काम, चोख अर्थातच. पांढरे हातमोजे आणि काळा कोट असायचा, त्यांचे प्रत्येक स्टेशनला गाडी थांबवताना आणी तिथुन निघतानाचे जे काही नियम असायचे, त्याप्रमाणे डावीकडे बघा, उजवीकडे बघा यावर विशिष्ट हातवारे करायचे जे पहिल्यांदा बघणार्‍याला खूप विनोदी वाटायचे. पण त्यांच्या कामात त्याने काही फरक पडायचा नाही.
दुकानात खरेदी करताना तर प्रचंड आग्रह, शक्य तेवढे इंग्लिश मधुन बोलुन, म्हणजे खरे तर एकच शब्द..प्रेझेंत्त. :)
स्वयंपाकघर म्हणजे तर कहर होता. दोन इंडक्शन प्लेट्स आणि त्याच्या वर एक कपाट. बास. "इन किचन' असे नाही, 'अ‍ॅट किचन' असे मी गमतीने म्हणायचे तेव्हा. त्याच्या बाजुला एक भिंत आणि भिंतीपलीकडे वॉशिंग मशिन होतं. त्यावर मी पोळ्या लाटायचे आणि इकडे भाजायचे. असेच फोडण्या देताना. भाज्या चिरताना पण. आणि बेड म्हणजे एक मोठ्ठं कपाट. फोटो शोधायला हवेत त्याचे. ३ पायर्‍या चढुन बेडवर जायचे. खाली बरंच सामान जाईल अशी जागा. पण तरीही त्या घरात सोयी सगळ्या होत्या, अगदी पुरेपुर उपयोग होता जागेचा.
माझ्या ऑफिसातही आम्ही १०-१२ भारतीय आणी १०-१२ जपानी. तिथेही मी एकटीच मुलगी होते आणि तिथली एक रिसेप्शनिस्ट यायची तीही फक्त २ तास. बाकी तसे बहुतांशी पुरुषच दिसले कामाच्या ठिकाणी. भाषेचा प्रॉब्लेम तर यायचाच, अगदी लहान गावात ऑफिस असल्याने जास्त वाटायचे ते.
कलाकुसरीत पण हे लोक अफाट आहेत, दुकानात, हॉटेलात कुटेही एवढ्या सुबक सुंदर वस्तु, त्यांचे रचना, सजावट फारच सुंदर.
फक्त सगळ्यात नावडलेली बाब म्हणजे जपानी लोकांचा वर्कोहोलिक पणा. वेड्यासारखे काम करतात आणि करायलाही लावतात. ऑफिसात झोपायचे ते लोक खुर्चीवर रात्रभर गरज पडल्यास. शनि रवि फक्त काम. सकाळी ८ ते रात्री ८-९ आणि विकेंडलाही काम हे रुटीन कधी एकदा संपतेय असे झाले होते. त्यातही सकाळी त्याआधी उठुन डबे आणि रोजचा प्रवास. पण ते ऑफिसचे लोकेशन, तिथे जवळपास पब्लिक ट्रान्सपोर्ट नसणे वगैरे इतर बाबींमुळेही जास्त त्रासदायक वाटायचे. ३ तासांवर असुनही मी अजुन फॅमिलिला भेटलो नाही असे जेव्हा एक जण म्हणाला तेव्हा मी बघतच बसले होते. आणि असेच बरेच होते की जे फक्तच काम आणि काम करतात. हेही एक कारण आहे तेथील बायका शक्यतो गृहिणी म्हणुन प्रीफर करतात असे ऐकले होते, कारण घराकडे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ तर हवाच, स्वाभाविक आहे. पण तिथेही बरेच फरक असतील, इतक्या कमी वास्तव्यात मी फार काही सरसकटीकरण करणार नाही.
तेव्हा बर्‍याच गोष्टींचा त्रास वाटायचा, या सगळ्याला कंटाळुन मी कधीही जपानला परत येणार नाही असा पणच केला होता. आता मात्र त्यातुन शिकलेले धडे दिसतात आणि त्या आठवणी छान वाटतात.
आज या सुंदर लेखाने नोस्टॅलजिक होउन लिहायला भाग पाडले. जरा जास्तच लांबलाय प्रतिसाद. :P

 होय वर्कोहोलिझम बद्दल ऐकून आहे. तसेच दीर्घायुष्य व वृद्ध स्त्रियांची देखील काम करत रहाण्याची वृत्ती याबद्दल ऐकून आहे. हर्बल चहा खूप पितात म्हणे. एक मोठ्ठा फ्लास्क भरुन .. दिवसभर त्या फ्लास्कमधील चहा सिप करत रहातात. त्यामुळे व कामात व कामात व्यग्र असल्याने की काय दीर्घायुषी असतात की काय कोण जाणे.

 

जपानी गृहिणींचं छान वर्णन केले आहे आणि त्यांना कार्यालयात हलक्या दर्जाचीच कामे असतात हे खरच आहे. बाकी जपान मधली पुरूष मंडळी आणि तिथले वर्क कल्चर यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. हे अबोल लोक, कुठे रात्री दोन ग्लास चढवले की चांगलाच दंगा घालायला सुरू करतात. एरवी घरी आणि कामाच्या ठिकाणी मात्र फार दबून असतात.

तुमच्या घराचे वर्णन वाचून जपानमधे राहणे म्हणजे कोण त्रास असे काहिंना वाटू शकते. पण इतरांसाठी सांगायचं तर, बहुतेक भारतीय तिथे जपान सरकारच्या "यु. आर." अपर्ट्मेंट मधे राहतात जिथे आपल्या १BHK, २BHK सारखीच घरं असतात आणि अगदी आरामात राहता येते. घरासाठी लागणारे सर्व सामानसुधा इतर भारतीयांच्या कडून लगेचच आणि स्वस्त किमतीत उपलब्ध होत असते.

 मी २००२ नंतर जपानला गेलो नाही. काही मजेशीर आठवणी अजूनही लक्षात आहेत.
असाही आणि किरीन इकीबान बीयर. टोकियोमधे चौकाचौकत व्हेंडींग मशीन होत्या ज्यात या बीयर मिळायच्या. रात्री, अपरात्रीही बीयरची सोय होती. असाहीची तर बिल्डींगसुद्धा बीयरच्या बॉटलच्या आकाराची होती. साके ही राइस वाइन मात्र मला फारसी आवडली नाही त्यापेक्षा शोचू वाइन आवडायची. शोचू आणि उरुंचा (हा जपानी चहा होता)
जेआर यामानोते लाइनच्या गाड्यांना रोज असनारी प्रचंड गर्दी. मी दोन दिवस प्रयत्न केले आणि नंतर सोडून दिले. दोनच स्टेशन जावे लागायचे तेंव्हा पायीच जायचो. शिंजूकू स्टेशनला असनारी गर्दी. सीएसटी सारखी गर्दी कधीही जा.
हॉटेलमधे प्रवेश करताना आणि हॉटेल सोडताना सारे कर्मचारी ओरडतात मला वाटते स्वागत (सिरा साइ मासेन) धन्यवाद(अरीगातो गोझायमास्ता). जाणकारांनी जापानीझ शब्द दुरुस्त करावे. पहील्यांदी तर मी घाबरलोच होतो हे असे का ओरडतात. माझा काही चुकले का.
वर म्हटल्याप्रमाणे ऑफीसमधे असलेली हायराकी. बॉसच्या अगोदर यायचे आणि बॉस गेल्यावर ऑफिस सोडायचे. वरच्यानी सांगितल्याशिवाय काही फारसे करायचे नाही. माझ्या पीसीवर जापनीझ व्हिजव्हल स्टुडीओ होता. आमचे त्या भाषेचे ज्ञान अति दिव्य. मी तिथल्या आयटीवाल्याला इंग्रजी व्हिजव्हल स्टुडीओ द्या सांगितले. त्यानंतर त्यांची आपसात चर्चा सुरु झाली. माझा मित्र मला गंमतीने म्हणाला अच्छा खासा आराम कर रहे थे तुने उनको कामपे लगा दिया. त्यांचा बॉस सिगरेटसाठी बाहेर आला तेंव्हा दोन सेकंदात प्रश्न मिटला. नंतरही का कुणास ठाऊक सारे इंग्रजी असले तरी को़ड कंपाइल किंवा रन केल्यानंतर ज्या चुका यायच्या त्या जापानीझ मधे. मग तो चुक नंबर गुगलमधे टाकायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि कोड बदलायचा. हळूहळू मला नंबर पाठ झाले.
खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकयला मिळाले.

 

'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच.
एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते.
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती. या बाईला अचानक वेडाचा झटका आला की काय म्हणून पार हबकुन गेले बिचारे....

बरीच वर्षे या लोकांच्या सहवासात राहूनसूद्धा मी काही नीट जपानी शिकले नाही. याला एक कारण असे होते की मला सुरुवातीला वाटलं होतं की या लोकांशी बोलून बोलून माझी भाषा छान पक्की होईल. पण हे लोक त्यांचा इंग्रजीचा सराव व्हावा म्हणून माझ्याशी इंग्रजीतच बोलायचे. आता माझं इंग्रजी त्यांना कुठल्या दृष्टीने सुंदर वाटायचं कोण जाणे. पण अमेरिकन लोकांशी बोलतांना मी "हाय, हाउ आर यू?" किंवा "इट्स अ ब्यूटिफुल डे टुडे" सारखी कठीण वाक्य सटासटा बोलत असल्यामुळे बहुतेक त्यांना तसं वाटत असावं.

जपान जरी मागे राहिलं असलं तरी आमचे जपानी ऋणानुबन्ध मात्र अजुन सुटले नव्हते उलट पुढल्या काही वर्षात ते आणखीच पक्के होणार होते.
या टिपिकल अमेरिकन मिडवेस्टर्न खेडगावात तीन- चार जपानी कंपन्यांचे कारखाने होते. सगळ्या कारखान्यांचे मिळून जवळ पास तीसेक एक्सपॅट जपानी कुटुंबे इथे राहात होती. आमच्या कंपनीचे आम्ही बारा जपानी कुटुंबे होतो. आता जरी जन्माने नसलो तरी आमची गणना तिथे " वुई झापानीझ फॅमीरिस" अशीच व्हायची.

कारखाना अमेरिकेत होता तरी इथे काम करण्याची पद्धत मात्र जपानी. ऑफिस मधे सगळ्या कर्मचार्यांना गणवेश असायचा. सी. ई. ओ. पासून शॉप फ्लोर वरच्या ऑपरेटर पर्यंत सगळे सारख्याच कपड्यात. कोणालाही क्यूबिकल वगैरे ही ऐश नाही. सगळ्यांची टेबलं लाईनीत शाळेतल्या वर्गासारखी, ओपन लेआऊट. बॉसचे टेबल सगळ्यात मधे त्यामुळे त्याचं सतत सगळीकडे लक्ष. या जपानी सी. ई. ओ. ची शिस्त असायची, ती म्हणजे तो स्वत: आणि त्याच्याबरोबरचे हेड ऑफीसचे बारा लोक ह्यांनी सगळ्यांपेक्षा एक तास आधी यायचं आणि सगळे गेल्यानंतर तीन तासांनी जायचं. जपानचं वर्क कल्चर त्याने आपल्या टीम पुरतं तसंच ठेवलं होतं, पण स्थानिक कर्मचार्यांना मात्र त्याचा त्रास नव्हता. तसेही जपानी लोकांना कमीत कमी तेरा तास ऑफिस मधे बसलं नाही की अक्षरश: ताण येतो, मनात अपराधी भावना येते. त्यांच्या बायका तर त्यांच्यापेक्षा वरताण. इतक्या की, नवरा जरा बर्यापैकि वेळेवर घरी आला की हा असा कसा लवकर आला? आता शेजारीपाजारी काय म्हणतील हे टेन्शन त्यांना येतं.

आमचा मैत्रिणिंचा ग्रूप मस्तं जमला होता. त्यापैकी काही जणी इंग्रजी चांगलं बोलायच्या. अर्थातच त्यांच्याशी माझी भाषेमुळे जास्ती मैत्री झाली. सगळ्याजणी छान अगदी साध्या होत्या. ही सगळी कुटुंबे इथे साधारण चार सहा वर्षांसाठी यायची आणि मग पुन्हा जपान ला परत. आधी आपला देश सोडतांना भयंकर कुरकुरणारे हे लोक इथे आले आले की इथल्या अमेरिकन ऐसपैस आयुष्याला भलतेच सरावायचे.

जपानपेक्षा महागाई कमी आणि पगार जास्ती. मग काय? शॉपिंग म्हणू नका, गोल्फ म्हणू नका, मोठ्या गाड्या म्हणू नका आणि मोठाली घरं म्हणू नका - थोडक्यात जीवाची अमेरिका करून घ्यायची पाच वर्षात, असा यांचा हिशोब. पण एक समस्या मात्र होती. भाषेची समस्या. पुरूष मंडळी बाहेर काम करतांना जरातरी भाषेचा सराव करून घ्यायचे पण बायकांना मात्र घरी राहून असे करणे कठीणच. म्हणजे त्या इंग्रजीच्या शिकवणीला वगैरे जात असत पण प्रगती बर्‍यापैकी मंद असे. याचा परिणाम असा की हे सर्व लोक नेहमी एका समुहात राहात असत. एखाद्या पाण्यात असलेल्या बेटासारखे ! त्या समुहात, त्या ग्रूपमधे त्यांना सुरक्षित वाटत असे. सगळयांचे एकमेकात खूप छान संबंध होते. या लोकांच्या उपजत कळप प्रियतेची अत्यंत चांगली बाजू ही की या आमच्या ग्रूप मधे कोणालाही अगदी रात्री दोन वाजता जरी काही मदत लागली तरी हे लोक धावत येत असत. आता हीच गोष्ट जपान मधे करतील का ते माहीत नाही पण इथे परदेशात मात्र हे लोकं देश, भाषा आणि कंपनी याची बांधिलकी जिवापाड जपायचे.

अमेरिकेत आल्यावर जपानी पुरूष का कोण जाणे पण स्वत:चं नाव बदलून सोपं अमेरिकन नाव घ्यायचे. उदा. फुमिओ चं जेफ, हिरोशी चं मार्टिन पण बायका मात्र आपलं तेच नाव राहू द्यायच्या. माझ्या बहुतेक सगळ्या मैत्रिणिंची नावं चिकाको, एरिको, नात्सुको, शिएगो, आकिको अशी सगळी 'को' नी संपणारी.
दिसायला, वागायला, बोलायला जपानी लोक फार मृदू असतात. रांग सोडणे, नियम मोडणे किंवा वचवचा बोलणे यांच्यासाठी अशक्य आहे म्हणजे सामाजीक जीवनात ! आता त्यांच्या व्यक्‍तिगत आणि व्यावसायिक जीवनात त्यांचे नैसर्गिक मानवी गुण दोष अर्थात दिसणारच.

जपानी स्त्री ही अस्ताव्यस्त अवतारात, गबाळ्या कपड्यांमधे बाहेर कधीच दिसणार नाही. नेहमी फिक्या, नाजूक रंगाचे आणि अत्यंत क्लासी कपडे. परफ्यूम्स अगदी मंद सुवासाची. केस नेहमी छान कापलेले, सेट केलेले. हसणार तरी नाजूक. आपले दात दिसणार नाही अशा बेताने खुदुखुदु, तोंडावर हात ठेवून. मेकअप ची प्रचंड आवड. तो केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवणे म्हणजे यांच्या दृष्टीने भयानक वाईट समजल्या जाणारी गोष्ट. स्त्री असो की पुरूष, यांचं वैशिष्ठ म्हणजे हे सगळे लोक दिसायला आपल्या वयाच्या दहा-पंधरा वर्षे कमीच दिसतात. अंगाने अत्यंत सडपातळ आणि चपळ. तुरुतुरु करत सगळी कामं पटापट करत असतात. दिसण्यावरून, हालचालींवरून यांच्या वयाचा अंदाजच येत नाही.

स्त्रीयांची एक मजेशीर लकब सांगते. या बायका फोन वर जेव्हा बोलतात तेव्हा अतिशय गोड, नम्र आवाजात लाडीक पणे बोलायला सुरू करतात. आता हा गोड आवाज म्हणजे जरा अतीच असतो. अगदी तीस, चाळीस, पन्नास, साठ वय काहीही असो या स्त्रिया फोनवर बोलतांना सोळा, सतरा वर्षाची तरुणी कशी बालिश, लाडीक आवाजात बोलेल त्या आवाजात बोलतात. फोन उचलता क्षणी अगदी लाजत, मुरकत, बावरत बोलणं सुरू होतं..." मोशी, मोशी, हे अमक्या अमक्या चं घर आहे बर्र का, काय काम आहे हो आपलं? सांगा बरं..." साधारण या सुरात.
आता फोन वर जर नवरा असला तर तो आपल्या कमावलेल्या तुसड्या स्वरात सांगतो '' अगं ए बाई,..पुरे झालं...मीच आहे " मग बायको सुद्धा नवर्याच्या मॅचिंग टोन मधे लग्गेच त्याच्यावर खेकसते '' हं...क्कायेय आहे...बोल लवकर, हज्जार कामं पडलीयेत माझी.."

यांच्या अंगात उपजत कला असते . बोटात जादू असते. कुठलीही गोष्ट मग स्वयंपाक करणे असेल, वीणकाम, शिवणकाम, पियानो वाजविणे असु दे नाहीतर अगदी गोल्फ खेळणे असु दे. कुठल्याही गोष्टीत अफाट जीव ओतून काम करतील. ज्या प्रीसीजन ने गोल्फ खेळतील तेच प्रीसिजन इतर सर्व कामांमधे. साधं गिफ्ट पाॅकिंग इतकं सुरेख करतात की त्यांनी दिलेलं गिफ्ट उघडवसंच वाटू नये.

हे लोक नेहमी एका विशिष्ट चाकोरीत, आखलेल्या मार्गात चालतात. प्रत्येक गोष्टीला एक ठरवलेली पद्धत, एक सिस्टम असते. या सिस्टिम च्या बाहेर काही वेगळं करायला या लोकांना मानवत नाही. एखादी नेमुन गोष्ट, आखून दिलेला नियम मात्र हे लोक अगदी इमाने इतबारे पाळतात. इम्पल्शन, सर्प्राइज़ हे शब्द यांच्या शब्द कोषात नाहीत. या लोकांना कुठलीही गोष्ट एकदम पटकन मनात आले म्हणून केली अशी जमत नाही. सगळं नीट ठरवून, वेळापत्रक बनवून.

या पद्धतीला आमचा ग्रूप पण अपवाद नव्हता. काही बेत ठरवायला भेटायचे असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर तर एक विशिष्ठ प्रणाली ठरलेली होती.
तो काळ होता २००० च्या सुरुवातीचा. तेव्हा लॅंडलाइन वापरायचा जमाना होता. आमची एक लिस्ट होती. प्रत्येकीला एक नंबर नेमुन दिलेला असायचा. आता समजा मी पाच नंबरवर आहे आणि काही निरोपा निरोपी करायची असेल तर चार नंबरवाली मला फोन करणार आणि मी सहा नंबर वालीला. सीक्वेन्स हा ठरलेला, वर्षानुवर्षे. कुठे बाहेर जेवायला जायचे असल्यास कोणाची गाडी चालवायची पाळी आहे हे सुद्धा ठरलेलं, कोण कोणाला आणि कधी पिक अप करणार हे सुद्धा मिनिटाच्या हिशोबाने. एकीला सहाला, दुसरीला सहा वाजून चार मिनिटाने तर तीसरीला सहा वाजून आठ मिनिटाने, जेणे करून सहा पंधराला रेस्टोरेंट च्या पार्किंग लॉट मधे सगळे हजर. कुठेही गोंधळ नाही आणि चुक नाही.

आता बिल भरण्याची पद्धत तर सगळ्यात अल्टिमेट होती. म्हणजे अशी की सगळ्यांच्या जेवणाचे एक बिल बनणार. मग त्या बिलाचा किती टक्के हिस्सा कोणी भरायचा हा या आमच्या नवर्यांच्या पदावर अवलंबुन होता. म्हणजे सीइओ ची बायको सगळ्यात जास्ती बिल भरणार आणि मग उतरत्या भाजणीने बाकी सगळ्या. शिस्तीत कॅल्क्युलेटर नी सटासट हिशोब व्हायचे मग हिने १०डॉलर अकरा सेंट्स द्यायचे, तीने सतरा डॉलर दोन सेंट्स अशी अगदी काटेकोर विभागणी व्हायची.

पण कधी कधी वेळेवर कुठे जायचा बेत ठरला की मग जरा पंचाईत व्हायची. कारण पटकन कोणीतरी निर्णय घेणे आणि मुख्य म्हणजे तो बोलून दाखविणे हे यांच्यासाठी सोपं नसतं. त्यामुळे आधी ठरलेलं नसतांना वेळेवर जेवायला जाऊ असे ठरले की मग आमच्या गावात मोजून पाचच्या प्रचंड संख्येत असलेल्या रेस्टोरेंट्स पैकी कुठल्या एकात जायचं यावर सगळ्या जणी एकमेकींना तू सांग, तू सांग म्हणून सुमारे पंचवीस मिनिटे घोळ घालणार. एखादीच्या घरासमोर, टळटळीत उन्हात गोल घोळकयात उभे राहून यांचं पहेले आप, पहेले आप सुरू झाले की मग मात्र माझा पेशंस संपायचा. तेव्हा मी तोंडात येइल त्या रेस्टोरेंट नाव घेऊन कुठे जायचं हे ठरवून टाकायचे आणि त्यांच्या या घोळाच्या भाजीत भस्सकन पाणी ओतायचे. .....

क्रमश:....

 

सुमिको निशीमुरा नावाच्या क्लायंटसोबत जवळपास ५ महिने काम केले असल्याने जपानी भाषा औपचारीक पातळीवर जुजबी का होइना पण थांग लागण्या इतपत समजते. तिलाही भारतीय संस्कृती रोचक वाटली. तिला कॉलेजमधे वर्ल्ड लँग्वेजमधे संस्कृत हा ही एक ऑप्शन होता(जो तिने अर्थात घेतला नाही). समवयस्क असल्याने अवांतर गप्पा भरपुर व्ह्यायच्या जसे अवतार चित्रपट भारतात जपानच्या १ आठवडा आधी कसा रिलीज झाला वगैरे वगैरे वगैरे....

एकदा ती ऑस्ट्रेलिया वरुन फिरुन आली (चुकीच्या सिजनमधे) तर प्रचंड उन्हाळा होता, मी प्रश्न विचारला हाउ वाज ऑस्ट्रेलिआ ? फटकन म्हणाली इट वाज फकिंग हॉट... मग जरा शांत झाली आणी करेक्शन केले इट वाज वेरी हॉट. मी रिप्लाय दिला इट्स ओके, आय वाज कंफर्टेबल विद "फकिंग हॉट". यावर ति पुन्हा हसली (स्माइली अ‍ॅडवली) व म्हणाली कधी कधी काम करतान अनौपचारीक भाषा तोंडात येउन जाते. मला ती कधीच पारंपारीक जपानी गृहीणी टाइप ( औपचारीक गुडी गुडी ) व्यक्तीमत्व वाटली नाही. विषेशतः जपानी लोक इंग्रजी बोलताना प्रचंड गोधळतात (आपल्यापेक्षाही.) पण तीचे इंग्रजीवर प्रभुत्व (अगदी उच्चारांसकट) उत्तम होते. अगदी नेटीव इग्लीश बोलणार्‍या व्यक्तीचाच भास व्हावा.

फक्त मला तिचा फोटो का दाखवत न्हवती देवच जाणे. म्हणजे तिचा चेहरा व्यवस्थीत दिसेल असा हाय रिजुल्युशनवाला कधीच दाखवला नाही. एकतर स्काइप वर स्टँपसैज फोटो ठेवायची ज्यातही ती किमान निम्मी असायची. ज्यात ती नक्किच छान वाटत होती. म्हणून तिला ऑस्ट्रेलियामधील झालेल्या सहलीचे फोटो दाखव असा हट्ट केला ज्यावर तिने फोटो शेरिंगची लिंक रिप्लाय म्हणून दिली. क्लिक करताच एक से एक सुरेख निसर्गाचे फोटो टायटल व डीस्क्रीपशनसकट उलगडत होते. पण जेंव्हा जेंव्हा ति असायची कुटे तरी लांब उभी अथवा पाठमोरी. तिने कधीही अ‍ॅसेट्स लपवले न्हवते. तिचे अगदी बिकीनीसुट मधील बरेच फोटो त्यात होते ज्यात तीने चेहरा सोडुन बाकी सर्व हाय रिजोल्युश्नमधे कैद केले होते. त्याफोटोंवर खाली तिच्या फ्रेंड्सचे तारीफ दायक प्रतिसाद मात्र लिहलेले होते.... अन एकानेही कधी टॉवेलने केस पुसत आहे, कधी पाठमोरी कधी एखादे शहामृगमधे आले आहे कोणतेही कारण घडले असो एकानेही जवलपास ३० एक फोटोत तिने नेमका चेहरा(च) का लपवलाय याबद्दल साधा अवाजही उठवला न्हवता. काही कोडी खरच सुटत नाहीत.. नाही का ?

 

पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची...

अशाच काही सुखी पुरुषांची घरं आमच्या आसपास होती. या जपानी पुरूष मंडळींचा थंडीतला सकाळी कामावर जाण्याचा सोहळा थोडाफार असा होता. ओहायोच्या उणे १२ डिग्री सेल्शीयस तापमान आणि बर्फाच्या चार फुटी ढीग जमलेला ड्राइववे साफ करण्यासाठी बायको भल्या पहाटे बाहेर पडणार. त्या हाडे गोठून जातील अशा थंडीत अर्धा पाऊण तास खपून साफसफाई केली की मग ही बाई गराज मधून रेफ्रिजिरेटर झालेली गाडी बाहेर काढणार. पंधरा वीस मिनिटे इग्निशन ऑन करून हीटर लावून ती गाडी छानपैकी गरम करणार. त्यानंतर तिचा नवरा थाटात बाहेर येणार आणि गाडीमधे बसून मठ्ठपणे निघून जाणार. असे हे सर्व सुखी नवरे....त्यांना बघून माझा नवरा फार फार दु:खी व्हायचा कारण त्याची बायको वरीलपैकी एकही गोष्ट करत नसे.

सर्वसाधारण जपानी पुरूष हा अबोल असतो, गंभीर असतो. जरासा तुसडा आणि अतिशय अंतर्मुखी असतो. त्यांच्या या अंतर्मुखी आणि लाजाळू स्वभावामुळे हे लोक पटकन कोणाशी बोलायला, ओळख वाढवायला पाहत नाहीत. शिष्ठ वगैरे अजिबात नाही पण स्वत:च्या कोषात राहण्याच्या सवयीमुळे त्यांची प्रतिमा मात्र शिष्ठ, अकडू अशी होते.
पुरूष पटकन कोणाशी आपण होऊन संभाषण करत नाहीत. एखाद्या स्त्रीशी तर नाहीच नाही. आपण ज्याला स्मॉल टॉक म्हणतो ते त्यांना अजिबात जमत नाही. त्यातून समोरची स्त्री परदेशी आणि इंग्रजी बोलणारी असेल तर अजुनच अवघडल्यासारखे वागतात. अजुन एक गोष्ट म्हणजे जपानी स्त्री असो वा पुरूष आय कॉंटॅक्ट कधीच करणार नाही. त्यांच्याशी बोलतांना किंवा सहज जरी यांच्याकडे आपण बघितलं कीं पटकन नजर झुकवतात.

जपानमधे आम्ही राहात होतो तेव्हा आमच्या सोसायटीमधील पुरूष मंडळी मला पाहून फारच बीचकुन जायची.. मी समोरून येतांना दिसले रे दिसले की हे लोक अगदी अचानक एखादं प्रचंड महत्वाचं काम आठवल्यासारखा चेहरा करायचे, जेमतेम 'कोन्नीचिवा' असे पुटपुटायचे आणि मग अत्यंत घाई गडबडीत असल्याचा अभिनय करीत माझ्यासमोरून सुसाट वेगाने नाहीसे व्हायचे.
पुढे अमेरिकेत आल्यावर मात्र या सर्वांशी छान ओळख झाली, त्यांनाही इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव झाला आणि जपान मधे बुलेट ट्रेनच्या गतीने माझ्यासमोरून गायब होणार्या या लोकांची मग " पमिचान, प्रीज मेक स्पिनिच पाकोरा फोर मी...." असे मला सांगण्याइतपत प्रगती झाली.

जपान मधले जपानी लोक आणि अमेरीकेत आलेले जपानी लोक या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मूळ स्वभाव, विचारधारा तीच असली तरीही देशांतरामुळे त्यांच्या विचारांना, वागण्याला इथे नवीन पैलू पडायला लागायचे. अतीकाम, जागेची टंचाई, महागाई, ट्रॅफिक या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय पण जपान मधे सर्व लोकांच्या चेहृयावर एक प्रकारचा ताण मला सतत जाणवायचा. अमेरिकेत आल्यावर चांगले आर्थिक स्थैर्य, मोकळी ऐसपैस जागा, अघळपगळ गप्पा मारणारे आमच्या गावातले स्थानिक लोक आणि घरापासून मोजून पाच मिनिटावर असलेला कारखाना या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून या लोकांमधे काही सुखद बदल व्हायला लागायचे. तोंडावर तणावाच्या ऐवजी हास्य, बोलण्यवागण्यात आलेला एक प्रकारचा मोकळेपणा पण त्याचबरोबर शरीराचं वाढलेलं वजनही.....

कामात असतांना हे लोक जेवणाच्या सुट्टीत आपलं जेवण तीन ते चार मिनिटात आटपु शकतात. त्यांच्या जेवणाचा असा चपटा, चार पाच खण असलेला बेन्तो बॉक्स असतो. एका खणात भात, दुसर्यात फिश, तीसर्यात सलाड, मग एखादा अजुन मीटचा तुकडा, भाताचे गोळे, मुळा, काकडी यांचे वेनिगार मधे मुरलेले लोणचे..असे प्रकार आलटून पालटून असतात. मग चॉप्स्टीक्स वापरुन हे सगळे प्रकार पटापट उचलून तोंडात गडप होतात. बाकी सगळे प्रकार चॉप्स्टिक ने खाणे ठीक आहे पण भात सुद्धा त्या काड्यांनी हे लोक इतके मस्तं टपाटप खातात की पाहात राहावे. तो भात सुद्धा अगदी चिकट असतो. त्याचा पार गच्च गोळा होतो.

आपले भारतीय पदार्थ त्यांना फार आवडायचे. खासकरून भजी, पकोडे, वडे असे तळलेले पदार्थ. माझ्याकडे हे लोक जेवायला येणार असतील तर स्वयपाकात तिखट मात्र अजिबात मी टाकत नसे. तिखट वगैरे त्यांना झेपतच नाही तसेच गोड पदार्थांचीसुद्धा आवड कमीच. दुधाचे पदार्थ, खीरी वगैरे नाही. बाकी पोळी, भाजी, राजमा, पनीर ग्रेवी, वेजी पुलाव असे पदार्थ मात्र फार आवडायचे.. पोळी तर काही मित्रांना इतकी आवडायची की जेवण झाल्यावर सुद्धा गप्पा मारता मारता अधून मधून एखादी पोळी गुंडाळून खात बसायचे.
मी वरती म्हटल्याप्रमाणे हे लोक आपले जेवण चार मिनिटात संपवतात पण हेच लोक आरामशीर मूड मधे असले किंवा कुठे एकत्र डिनरला भेटले की मग पाच सहा तासांची निश्चिंती!

सहाला या मंडळींना तुम्ही घरी बोलावलंत आणि दारावरची बेल वाजली की खुशाल समजावं की सहा वाजले. एक मिनिट लवकर नाही की उशीर नाही. लवकर आलेत तर घराबाहेर कारमधे बसून राहतील पण दारात उभे राहाणार सहाच्या ठोक्यालाच. मग मात्र निवांत. आधी आपेटाइज़र्स, हळूहळू जेवण, डिज़र्ट, मग परत एकदा भजींचा राउंड आणि या सगळ्याच्या साथीला सतत बियर किंवा वाइन. मद्य पीण्याची आत्यंतिक आवड असते या लोकांना.

या लोकांची पिण्याची एक पध्ध्त सांगते. कुठे बाहेर गेलं की हे लोक स्वत:च्या हातांनी स्वत:चं ड्रिंक ओतून घेणार नाहीत. त्याच्या ग्लासमधे त्याचा एखादा मित्र ड्रिंक भरून देईल आणि हा त्या मित्राचा ग्लास भरून देईल. ग्लास थोडासा रिकामा झाला की समोरचा माणूस लगेच टॉप अप करणार की हा लगेच रेसिप्रोकेट करणार.

पण एक गोष्ट आवर्जून सांगते. इतक्या वर्षांच्या सहवासात माझ्या आठवणीत एकदाही, एखाद्याने मद्य पीउन कोणाशी दु:वर्तन केलेय, वेडेवाकडे बोललेय इतकंच काय पण कोणाचा आवाजही चढलेला मी कधी ऐकला नाही. एक स्त्री म्हणून मला किंवा आमच्या ग्रूपमधल्या कुठल्याही स्त्रीला त्यांच्याबरोबर अवघडल्यासारखं होईल असे कोणी कधीही वागलं नाही.

जपान या देशात श्रेणी पद्धती ज्याला आपण भाषेत hierarchy म्हणतो त्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा. इतका पगडा की तिथे कार्यालयीन कामकाजासाठी टॅक्सीने कुठे बाहेर जावं लागलं तर कोण कुठे बसणार याचाही नियम असतो. तो असा की रॅंकनी सगळ्यात जो कमी तो पुढे ड्रायवरच्या शेजारच्या सीट वर. नंतर त्याच्या वरती ज्याची श्रेणी असेल तो बसणार ड्रायवरच्या मागच्या सीट वर आणि तिसरा जो यांचा बॉस असेल तो मागच्या सीटवर ड्रायवरच्या diagonally opposite.. तसेच स्टाफपैकी कोणाच्या लग्नकार्यात जायचे असल्यास आहेर करायलाही कंपनीतील पदानुसार नुसार चढती भाजणी. जरा सीनियर लेवलच्या माणसाला कमीतकमी चारशे/ पाचशे डॉलर्सचा फटका बसलाच म्हणून समजा. त्यामुळे तिकडे लग्नाचं आमंत्रण स्वीकारावं का नाही याच्यावर फार विचार करावा लागतो.

श्रेणीमहात्म्य कसोशीने पाळणारे हे लोक कधी कधी मात्र अतिशय सुखद धक्का देतात. जपानमधे माझ्या मिस्टरांच्या कंपनीत एक फार छान पद्धत होती. ती अशी की कारखान्यात कोणीही मग तो साधा शॉप फ्लोरवर काम करणारा मशीन ऑपरेटर का असेना, तो सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी. त्या प्लान्टचा मॅनेजिंग डिरेक्टर त्या माणसाला गाडीत बसवून स्वत: ड्राइव करीत पूर्ण प्लँट ची चक्कर मारायचा. ज्या कंपनीत उभं आयुष्य घालवलं त्या कंपनीची एक संपूर्ण फेरी मारायला, तिथल्या लोकांशी भेटायला, बोलायला या माणसाला कंपनीचा बिग बॉस स्वत: मोठ्या सन्मानाने घेऊन जायचा. मग एक छानशी भेटवस्तू देऊन त्या माणसाला निरोप देण्यात यायचा.

ऑफिस मधे बॉस हा आपल्या पेक्षा वरच्या श्रेणीचा तर घरी बायको ही आपल्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीची असा या लोकांचा अगदी प्रामाणिक विश्वास असतो. स्त्री पुरूष समानता वर निदान पोलिटिकली करेक्ट बोलावं की नाही? पण तेही नाही. मुळात त्यांना आपण काही चुकीचे करतोय असे वाटतच नाही. पण याचा अर्थ हे लोक दुष्ट असतात, बायकोचा छळ करतात असा अजिबात नाही. फक्त पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यानुसार आपल्या संसारात जबाबदारींची विभागणी कशी असावी याचा त्यांचा साधा स्वच्छ हिशोब असतो...' आय ब्रिंग दा मनी, शी टेक्स केआर ऑफ दा हाउस!'

पण कधी कधी या पारंपरिक समीकरणांना जबरदस्त धक्का देणारेही लोक मला भेटले. अशा लोकांपैकी एक म्हणजे माझी खूप जिवाभावाची मैत्रीण हानोका मात्सुदा. ही मुलगी म्हणजे टिपिकल जपानी गृहिणिंचं आरशातलं प्रतिबिंब....त्यांच्या अगदी उलट स्वभाव!!
खळखळून मोकळं हास्य, चेहृयावर असलेली रसरशीत तकाकी, लहान मुलाची उत्सुकता भरलेले लुकलुकते मिस्कील डोळे. तिचे डार्क, चटकदार इत्यादी जपानी मंडळींना घाबरेघुबरे करणारे रंगांचे कपडे याचबरोबर सुगरणपणा आणि ग्रुहक्रुत्यदक्षपणा अशा गोष्टींपासून तीने ठेवलेले सुरक्षित अंतर...अशी मस्तं मजेदार हानोका!

जपानमधे आपली आर्थिक मालमत्ता, जमीनजुमला फक्त आपल्या फक्त पुरूष वारसदारांच्याच नावे करता येतो कारण त्यांचे आडनाव एकच. मुलींचे आडनाव अर्थातच लग्नानंतर बदलते. त्यामुळे ते एकदा बदलले की मुलीचा हक्क संपला. हानोका ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक. मात्सुदा हे खरंतर त्यांचं आडनाव. आपल्या लग्नानंतर सर्व मालमत्ता सरकारच्या हाती जाण्यापेक्षा या बहाद्दर पोरीने आपल्या नवर्यालाच तिच्या माहेरचं आडनाव घ्यायला लावलं. तिचा नवरा फुमिओ हाशीराचा फुमिओ मात्सुदा झाला.

जपानी लोकांना चारचौघांमधे उठून दिसायला किंवा काहीतरी हटके करायला मुळीच आवडत नाही. बरेच लोकं तर सनग्लासेस लावणं सुद्धा टाळतात ते यांच कारणामुळे. इतकंच काय पण हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार मांडायला, काहीतरी वेगळं बोलायलाही काचकूच करतात.
पण 'आय दोन्त लिसन टू माय हाजबंद, ही लिसन्स टू मी, बीकोझ ही ईज़ अनडर माय फॅमिरी नेम '....अशी सनसनाटी विधानं करून उपस्थीत लोकांना दचकवून टाकणे हा हानोका मॅडमचा आवडीचा टाइमपास होता :)
मग बाकी जपानी काकू लोकांचे तिच्या पाठीमागे "बघा..बघा..कसल्या मेल्या या टोकियोच्या मुली..न रितभात, न बोलण्याचं वळण. फॅशनेबल बाहुल्या नुसत्या. आमच्या क्युशुकडच्या मुली बघा. किती बाई सोज्वळ,सुगरण, कामाला वाघ"... वगैरे वगैरे असले टोमणे सुरू व्हायचे =))

क्रमश:

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...