गेल्या काही वर्षांत झालेल्या भटकंतीत मला भावलेली, कॅमेऱ्यातून क्लिकलेली काही दृष्ये या लेखमालिकेत देण्याचा विचार आहे. सुरुवात रोम पासून करतो.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात रोम बघायला जायचे ठरल्यावर रोममधील सुप्रसिद्ध
ठिकाणांखेरीज काही जुने व्हिलाज , टायबर नदीच्या पलिकडला भाग, जुनी
चर्चेस, व्हॅटिकन संग्रहालय , रोममधील जुन्या वस्त्या वगैरे सर्व फिरायला
किमान पाच दिवस तरी हवेत असे वाटून airbnb.com मधून रोमच्या मध्यवस्तीतले
एक घर आरक्षित करून आम्ही रोमला पहुचलो. रहायला मिळालेले घर छानच होते,
आणि हॉटेलच्या एका लहानश्या खोलीच्या किंमतीत स्वतंत्र घर ( बैठकीची खोली,
दोन बेडरूमा, सर्व उपकरणासहित स्वयंपाकघर वगैरे ) समोरच उत्तम भारतीय
रेस्तराँ, जवळच मेट्रो स्टेशन, पहाटे तीनला उघडणारी भाजी- फळे-
खाद्यपदार्थांची उत्कृष्ट मंडई , कोलोसियमादि जागा पायी पंधरा मिनिटाच्या
अंतरावर हे सर्व बघून खूपच आनंदलो.
स्वयंपाकघर असल्याने घरगुती उकळलेल्या चहाचा विरह सहन करावा लागला नाही,
शिवाय घरून भाजलेला रवा, खिचडीचे सामान वगैरे घेऊन गेलो होतोच. ताजी फळे
आणून रोज ज्यूसही काढता येत होते.
तीन दिवसाचा रोमा पास घेऊन (यात अमर्याद मेट्रो, बस प्रवास आणि दोन संग्रहालयांची तिकिटे एवढे होते) भटकंतीला लागलो.
रोमच्या प्रसिद्ध, टुरिस्टाळलेल्या जागांना धावत्या भेटी देऊन इतर कमी
प्रसिद्ध, शक्यतो निर्मनुष्य जागा हुडकण्यासाठी भरपूर पायपीट केली.केंव्हा
कुठे गेलो, त्या त्या जागांचा इतिहास वगैरेत न शिरता आता रोममध्ये
क्लिकलेली दृश्ये देतो:
गर्द सावलीतील झाडांचे आकार आणि मागे छाया- प्रकाशाने नटलेल्या प्राचीन इमारती:
'जिधर देखो कयामत ही कयामत' हा फिल्मी डायलाक मला इथे आठवला:
प्राचीन संगमरवरी स्तंभ आणि उंच झाडांच्या बुंध्यांची जुगलबंदी:
उत्कृष्ट संगमरवरी मूर्ती रोममध्ये ठाई ठाई नजरेस पडतात:
चुकून भलत्याच वाटेला लागल्याने झालेल्या पायपिटीबद्दल मिळालेले बक्षीस दृष्य :
कोलोसियमचा एक लहानसा कोपरा :
रोममधील जुना रहिवासी भाग:
.
पंधराव्या शतकातील अनेक भव्य व्हिला अजून आपली आब राखून आहेत. त्यात
अजूनही त्या त्या कुटुंबांचे वंशज रहातात किंवा संग्रहालये केलेली आहेत.
सुप्रसिद्ध फार्नेसी घराण्याचा असाच एक व्हिला :
काराकेला ने बांधलेले विशाल स्नानगृह (इ.स. २१२ -२१७): सातत्याने सहा वर्षे दररोज २००० टन साहित्य वापरून ही स्नानगृहे बांधली गेली.
पॅलेटाईन टेकडीवरील एका घरासमोर बूड टेकवून थोडासा विश्राम
वरील घराची आतील बाजू:
त्याच घराचे आणखी एक दृश्य:
प्राचीन रोम सात टेकड्यांवर वसलेले होते, त्यापैकी पालातीनो (पॅलेटाईन) टेकडीवर बरेचसे अवशेष आहेत.
पॅलेस ,पलाझो, पाले वगैरे शब्दांचे मूळ 'पॅलेटाईन' या शब्दात आहे म्हणे.
व्हॅटिकन भोवतालाची तटबंदी:
व्हॅटिकन मधील एक जुनाट पाण्याचा नळ (कुणास ठाऊक, मायकेलअँजेलो काम
करता करता मधेच छिन्नी हातोडा बाजूला ठेऊन या नळातून येणारे पाणी ओंजळीतून
प्याला असेल):
व्हॅटिकन मधील एक काच-चित्र:
व्हॅटिकन संग्रहालयातील अनेक दालनांची छते अशी खच्चून सजवलेली आहेत:
मायकेलअँजेलोने डिझायनलेला सेंट पीटर्स चर्चचा भव्य घुमट. फोटोत जे
पांढरे बारकेसे भोक दिसते आहे, तिथवर पोचायला या घुमटातून ३२० पायऱ्यांचा
अरुंद जिना चढावा लागला.
घुमटावरून टिपलेले व्हॅटिकन संग्रहालयाचे विहंगम दृश्य. खालच्या उजव्या
कोपऱ्यात दिसणारी लांबट छताची इमारत म्हणजे मायकेलअँजेलोच्या अद्वितीय
चित्रासाठी जगद्विख्यात असलेले सिस्टीन चॅपेल:
सेंट पीटर्स चौक.
कोणत्याश्या पोपची कबर : अश्या जागोजागी आहेत.
कशासाठी पोटासाठी -- टायबर नदीच्या एका पुलावर बसलेला पर्णमानव.
पुलावरून टायबर नदीचे दृष्य (दूर सेंट पीटर्सचा घुमट )
(क्रमशः)... पुढील भागात वर्सायची सफर करूया.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.