ये कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे २०१४ पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला. लगेच प्लान करुन टिकिट्स बुक केले आणी आता वेध लागले होते ट्युलिप्स बघण्याचे.
११ एप्रिलच्या शुक्रवारी दुपारचे विमान होते त्याप्रमाणे मँचेस्टर एअरपोर्ट्वर आलो आणी विमानासाठी गेटपाशी जाऊन बसलो.
काही मिनिटात आमचे विमान लागले आणी आम्ही अॅमस्टरडॅम - स्किपोलला रवाना झालो. एअरपोर्टला उतरुन बाहेर पडलो आणी समोरचं आय अॅमस्टरडॅमचा लोगो दिसला आणी मग काय एक फोटो तो बनता है :)
एअरपोर्टच्या आवारातही छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये ट्युलिप्सची फुलं लावली होती, वातावरण ही छान होतं , संध्याकाळचे साडेचार वाजले होते , कोवळं ऊन, हलका वारा आणी समोर ट्युलिप्स.
मित्र घ्यायला आला , तसेच पटापट सामान गाडीत टाकून थेट अॅमस्टरडॅम सिटी सेंटरला गेलो, मागेच सिटी, संग्राहलय बघून झाले होते त्यामुळे फारसे ते न करता दाम स्क्वेअरला थोडा टाईमपास केला, तेथूनच थोडे पूढे अॅमस्टरडॅमच्या "प्रसिध्द" गल्ल्यांमध्ये फेर-फटका मारला ;) आताशी सडकून भूक लागली होती म्हणून माओजमधल्या फलाफालची खादाडी केली. तिकडचा मालक हा पंजाबी आहे, त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारून आम्ही पुन्हा भट्कायला निघालो.
फलाफल
सिटीत थोडे फिरून आम्ही झुतरमिअरला मित्राच्या घरी आलो, जेवून झोपी गेलो. दुसर्या दिवशी Keukenhof / क्युकेनहॉफला निघायचे होते.
सकाळी लवकरचं नाश्ता करून आम्ही निघालो. Keukenhof / क्युकेनहॉफ हे लिस्स (Lisse) ह्या शहरात आहे. येथे जायला हार्लेम, स्किपोल ट्रेन स्टेशन्वरुन बसेस आहेत. Keukenhof / क्युकेनहॉफला गार्डन ऑफ युरोप असे म्हटले जाते. तेथे ट्युलिप्ससोबत, डॅफोडिल्स, हायसिंथ, ब्लूबेल्स, नारसीसस फुलांची ही लागवड केली जाते.
जसे जसे आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफ जवळ येऊ लागलो तसे तसे ट्राफिक आम्हाला लागू लागले. बर्याच देशातून असंख्य पर्यटक येथे हा बहर बगायला येतात. तिथे सायकलवरून ही फिरता येतं, पार्कमध्ये सायकल नेण्यास बंदी आहे, त्यासाठी त्यांनी वेगळे सायकल रूट्स बनवले आहेत, तसेच बोटींग करुन ही तुम्ही ह्या ट्युलिप्सचे सौंदर्य बघू शकता. काही गाईडेडे टुअर्सदेखील आहे. Keukenhof / क्युकेनहॉफबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल.
हळू-हळू करत आम्ही एकदाचे तेथे पोहोचलो. गाडी पार्क करुन थेट तिकिटघर गाठले. इतकी गर्दी असूनही तिकिटाला भली मोठी रांग अशी नव्हती. पटापट तिकिटं काढून आम्ही आत गेलो.
आता येताच विविध रंगानी सजलेली ती बाग, ते सुंदर ट्युलिप्सचे बल्ब बघून खरचं दिल ट्युलिप ट्युलिप हो गया :)
'Jan Bos' - ह्या फुलांचा सौम्य सुवास दरवळत राहतो.
टोरंटो
ट्युलिपा क्युबेक
हार्ट्स डिलाईट
विविध रंगाचे ट्युलिप्स
रेड इम्प्रेशन
Purissima
युडिथ लेस्टर
युनायटेड स्टेट्स
ऑरेंज एम्परर
ऑलम्पीक फ्लेम
मध्ये थोडं थांबून Oranje Nassau Pavilion मध्ये मस्तं फिश एन चिप्स खाल्लं आणी पुढची भटकंती सुरु केली.
लेडी जेन
फायर विंग्स
निघता निघता आम्ही Poffertjes house मधले डच पॅनकेक्सवर ताव मारला. मस्तं लुसलुशीत, बटर व पिठीसाखर भरुभूरलेले गरमा-गरम पॅनकेक्स अहाहा!! हेवन!!
तेथून आम्ही जवळचं असलेल्या ट्युलिप्स फिल्ड्वर गेलो, खरं तर हे प्रायव्हेट फिल्ड्स आहेत पण काहीजणं तेथे फोटो काढायची परवानगी देतात. मनसोक्तं फोटो काढले अगदी यश चोप्रा स्टाईल ;)
दिवस कसा गेला समजले नाही, आम्ही इथे सहा तास होतो चक्क!! कॅमेरात सगळे सौंदर्य किल्क करुन ही समाधान मिळत नव्हते, मेमरी कार्ड भरले पण मन काही भरत नव्हते. जितके साठवून घेऊ तितके घेण्याचा प्रयत्न करत होते.
जिथे मिपावर जोरदार कट्टे सुरु असताना माझा आनंद द्विगुणीत झाला तो क्षण म्हणजे जेव्हा माझी आणी मिपाकर-अनाहिता मैत्रीण मधूरा देशपांडेची भेट झाली. अगदी अचानक समजले की आम्ही दोघी तेथे ह्याच विकांताला जाता आहोत, म्हटले ही संधी सोडायची नाही, भेटायचेच. ती जर्मनीहून आणी मी राणीच्या देशातून येऊन भेटलो थेट Keukenhof / क्युकेनहॉफला :) किती किती आनंद झाला शब्दात व्यक्त करु शकत नाही :) आमचा ही इल्लूसा कट्टा झाला, थोड्या गप्पा झाल्या व मग पुन्हा नक्की भेटू म्हणत आम्ही आप-आपल्या वाटेने निघालो.
ट्युलिप बघून शांत, प्रसन्न वाटत होते. स्वप्नपुर्ती झाली. आता निघायचीही वेळ झाली होती आणी दूर तक निघाहों में हे गुल खिले हुए म्हणत आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफचा निरोप घेतला.
आता जायचे होते वॉलंदाम आणी झान्सेस स्कांन्सला.
क्रमशः
Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P
आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते. पटकन जमेल तसा मोबाईलमधून फोटो काढला.
वॉलंदाम हे एक बंदर आहे. इथे अनेक शेतकरी व मासेमार स्थायिक झाले आहेत. हे बंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक फिशींग बोट्स बघायला मिळतात शिवाय डच लोकांचा पेहरावही बघण्यासारखा असतो. असं म्हणतात तेथील स्थानिक बायका आजही डच पेहराव परिधान करतात. आम्हीसुध्दा डच पेहरावात अनेक फोटो काढले ..ते इथे देत नाहीये ;)
छायाचित्र आंजावरुन साभार*
वॉलंदामला पोहचेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते. हवामानही थंड शिवाय थोडे ढगाळ होते.
वाटेत अॅमस्टेल बियर मिळणारे दुकान कम कॅफे लागले. अॅमस्टेल बियरला अॅमस्टेल नदीवरुन नाव देण्यात आले.
वॉलंदामला येताच समोर दिसते ती सुंदर मार्केनमिअर नदी. एकीकडे सगळे कॅफे, दुकानं आणि दुसर्या बाजूला सगळ्या बोटी. दुरवर दिसणार्या पवनचक्क्या आणि मार्केन बेट.
मेरी ऑफ वॉटर चा पुतळा
मार्केन बेटावर जायला आम्ही लगेच फेरी पकडली.
फेरीने जसे वॉलंदाम सोडले तसे ते आणखीनचं सुंदर दिसु लागले.
आत्ताशी वारा ही जोरात वाहू लागला होता, वातावरण ही गार होऊ लागले. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मार्केन बेट दिसू लागले.
मार्केन बेट हे द्विपकल्प आहे. इकडची लाकडी, पारंपारिक डच घरं प्रसिद्ध आहेत , लाकडी बुट (क्लॉग्ज) ह्यांचा कारखाना आहे. आम्ही तो मागे डेल्फ्ट्ला बघीतला होता म्हणून ह्यावेळेस नाही पाहिला.
नदीकिनारी वसलेले हे गाव खुपच सुंदर होतं, थोडीबहूत भटकंती केली , ह्या बेटाची आठवण म्हणून १-२ वस्तूंची खरेदी केली. हवामान गार म्हणून थंडीही वाजू लागली. वॉलंदामला जायला फेरी पकडायची होती , थोडा वेळ होता म्हणून गरमा-गरम कॉफी व हॉट चॉक्लेटचा अस्वाद घेतला. जरा तरतरी आली .
जाताना फेरीतून काढलेले काही छायाचित्र.
वॉलंदामला पोहोचताच आम्ही सरळ चीझ फॅक्टरी गाठली. सर्वत्र वेग-वेगळ्या चवीचे, आकारचे चीझ बघून तोंपासू :)
येथे चीझ कसे बनवतात त्याची एक डेमो टुर झाली. थोडक्यात माहिती देते.
दुधाला ३० डिग्री सें तापमानावर तापवतात. त्याचे दही बनण्यासाठी त्यात लॅक्टीक अॅसिड किंवा Rennet त्यात मिसळतात. ते घातल्यानंतर काहीवेळात दुध घट्ट/ सेट (खरवसासारखे) होतं. नंतर त्या दुधाला अनेक पाती असलेल्या रोटेटींग नाईफने बारीक तुकडे / चॉप करतात. व्हे (पनीर तयार केल्यानंतर जे हिरवट्/पिवळट पाणी दिसतं ते) काढून टाकतात. उरलेल्या दह्याला गोल डब्यात दाबून भरतात व वरुन दाब देणार्या मशीन खाली २-३ तास ठेवतात. त्यानंतर डब्यातल्या चीझला काढून मिठाच्या पाण्यात चोवीस तास मुरत ठेवतात. त्यावर वॅक्स कोटींग करुन मॅच्युअर होण्यासाठी ठेवतात. एका महिन्याने हे चीझ खाण्यासाठी तयार होतं.
थोडे चीझ टेस्टिंग झाले आणी मग आम्ही चीझची शॉपींग करुन झांसेस कांसला निघालो.
नेदरलँड्सच्या लोकांचे सायकलप्रेम :)
झांसेस कांसला पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता त्यामुळे एक पवनचक्की जी आतून बघता येते ती बंद झाली होती. फार जळजळ झाली नाही, आमच्या युकेत चालू अवस्थेतील एका पवनचक्कीला गेल्या वर्षी भेट देण्यात आली होती. असो तर इथली चालू अवस्थेतील पवनचक्कीमध्ये पिठं, मसाले दळणे, अशी बरीच कामं केली जातात. ह्या पवनचक्क्या १५७४ साली बांधल्या गेला आहेत. पटापट फोटो काढले, संध्याकाळ ही होऊ लागली होती.
एकंदरीत नेदरलँड्सची ट्रिप मस्तं झाली होती, फ्रेश वाटत होत. ट्युलिप्सचा अनुभव अविस्मरणीय, सुखद होता. मन प्रफुल्लित झाले होते, ते टवटवीत, सुंदर गालिचे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले, ज्यांचा आनंद मला उपभोगता आला ह्याचे समाधान होते, हा अनुभव मी आयुष्यभर जपून ठेवीन :)
समाप्त
आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे.
ही स्कीफॉलची छोटी झलक...
.
.
.
.
आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...
......
.
विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :)(जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) )
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.