Wednesday, June 28, 2023

पिट्सबर्ग

http://www.misalpav.com/node/41098

 अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले अमेरिकेतील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे पिट्सबर्ग. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या स्टीलशी संबंधित उद्योगधंद्यांमुळे पिट्सबर्गला 'स्टील सिटी' आणि शहरात असणाऱ्या तब्बल ४४६ पुलांमुळे 'सिटी ऑफ ब्रिजेस' अशी बिरुदावलीदेखील दिली गेलेली आहे. आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक गणले जाणारे पिट्सबर्ग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मात्र एक अतिप्रदूषित शहर बनले होते. ह्याचे कारण म्हणजे युद्धकाळात वाढलेली स्टीलची गरज. ही वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी इथले कारखाने दिवसाचे २४ तास काम करत असत आणि त्यामुळे इथली हवा व पाणी प्रचंड प्रमाणावर प्रदूषित झाले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर शहरातील हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला. आणि ह्याचाच परिणाम म्हणजे गेली काही वर्षे बऱ्याच मासिकांतर्फे केल्या गेलेल्या बऱ्याच सर्व्हेंमध्ये पिट्सबर्गची गणना अमेरिकेतल्या / जगातल्या राहण्यास सर्वोत्तम शहरांमध्ये होऊ लागली.

२०व्या शतकाच्या सुरवातीला पिट्सबर्ग हे न्यू यॉर्क आणि शिकागोच्या खालोखाल रोजगार निर्माण करणारे अमेरिकेतील महत्त्वाचे शहर होते. स्टीलबरोबरच अ‍ॅल्युमिनिअम, लोखंड, काच निर्मिती हे इथले मुख्य उद्योगधंदे होते. पण १९८० साली अमेरिकेने Deindustrialization करण्याचा निर्णय घेतला, ज्यायोगे इथले बरेचसे कारखाने बंद केले गेले वा दुसरीकडे हलवले गेले. त्या कारखान्यांत काम करणारे कामगार एकतर कामधंदा गमावून बसले वा त्यांनी कामाच्या शोधार्थ दुसरीकडे स्थलांतर केले. २०व्या शतकाच्या शेवटी माहिती तंत्रज्ञानाची लाट आली. ह्या शहरानेदेखील ही संधी हेरली आणि उत्पादन क्षेत्राकडून तंत्रज्ञान आधारित उद्योग, शिक्षण, पर्यटन, वैद्यकीय सेवा ह्या व्यवसायांकडे मोर्चा वळवला. आज बऱ्याच टेक्नॉलॉजी कंपन्यांनी आपली मुख्य कार्यालये पिट्सबर्गमध्ये स्थापन केली आहेत.

कॅथेड्रल ऑफ लर्निंग (पिट्सबर्ग विद्यापीठ)

१६३ मीटर उंच असलेली ही ऐतिहासिक बिल्डिंग पिट्सबर्ग विद्यापीठची मुख्य बिल्डिंग असून जगातील चौथी सर्वात उंच शैक्षणिक इमारत आहे. ह्या इमारतीमध्ये विद्यापीठाच्या बहुतेक विभागांची मुख्य कार्यालये आहेत. १९२६मध्ये घेण्यात आलेल्या एका निर्यणानुसार ज्या ज्या देशांचे नागरिक पिट्सबर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर राहत आहेत आणि ज्यांनी शहराच्या विकासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे, अशा देशांनी त्यांच्या संस्कृतीला अनुसरून एक नॅशनॅलिटी रूम विकसित करायची, असा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे ३० देशांच्या ३० नॅशनॅलिटी रूम्स इथे विकसित करण्यात आल्या आहेत. ह्यात एक आपली भारताचीदेखील असून भारताने नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर ही रूम विकसित केली आहे. नालंदा विद्यापीठाचे वर्णन करणारा ऑडिओदेखील ऐकण्याची सोय केलेली आहे.

भारताने विकसित केलेली नॅशनॅलिटी रूम

कॅथेड्रल ऑफ लर्निंगमधील ही कॉमन रूम

ही कॉमन रूम २०व्या शतकातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते.

पॉईंट स्टेट पार्क

ऑगस्ट १९७४मध्ये सुरू करण्यात आलेले हे पार्क अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ या नद्यांच्या संगमावरच असून जवळपास ३६ एकरात पसरलेले आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा फॉल कलर्सची सुरुवात असते, तेव्हा इथल्या झाडांची रंग बदलणारी पाने पाहणे एक नेत्रसुखद अनुभव असतो. पॉईंट स्टेट पार्कपासून जवळच आहे Duquesne Incline. पिट्सबर्ग शहराचे बरेचसे भाग उंचीवर वसलेले आहेत. असाच एक भाग माउंट वॉशिंग्टन. तिथे मालाची ने-आण करणे सोपे पडावे, ह्यासाठी हा ८०० फूट लांबीचा Duquesne incline १८७७ साली सुरू करण्यात आला. माउंट वॉशिंग्टनमधील रहिवाशांना एवढ्या उंचावरून खाली मुख्य शहरात येणे-जाणे खूप जिकिरीचे पडत असे. त्यामुळे कालांतराने Duquesne inclineमधून प्रवासी वाहतूकदेखील सुरू करण्यात आली.

Duquesne inclineमधील प्रवासी वाहतूक करणारी लाकडी वॅगन

ही वॅगन ८०० फूट अंतर जवळपास अर्ध्या मिनिटात ५ फूट रुंदीच्या रेल्वे ट्रॅकसारख्या रुळांवरून चढून जाते आणि आपण पोहोचतो माउंट वॉशिंग्टनला. इथून दिसणारा पॉईंट स्टेट पार्क आणि पिट्सबर्गचा डाउनटाउन भाग म्हणजे फक्त बघतच राहावे असा नजारा.

फोर्ट पिट पूल - पिट्सबर्गमधील ४४६ पुलांपैकी पॉईंट स्टेट पार्कमधून दिसणारा फोर्ट पिट पूल

हेइन्झ फील्ड स्टेडियम

फुटबॉल हा अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ. १९२० साली सुरू करण्यात आलेली नॅशनल फुटबॉल लीग ही अमेरिकेतील एक अत्यंत महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या ३२ संघांपैकी एक आहे पिट्सबर्गचा 'पिट्सबर्ग स्टिलर्स'. हेइन्झ फील्ड हे पिट्सबर्ग स्टिलर्स ह्या संघाचे होम ग्राउंड आहे.

पिट्सबर्ग कल्चरल डिस्ट्रिक्ट

पिट्सबर्ग डाउनटाउनमध्ये कल्चरल डिस्ट्रिक्ट नावाचा एक भाग आहे. हा शहराचा सांस्कृतिक भाग म्हणता येईल. इथे बेनेडम सेंटर, बायहम थिएटर यासारखी बरीच थिएटर्स, आर्ट गॅलरीज आहेत.

कार्नेजी सायन्स सेन्टर

१९९१ साली सुरू झालेले हे सायन्स सेंटर पिट्सबर्गचे सर्वात जास्त भेट दिले जाणारे म्युझिअम आहे.
ह्या म्युझिअममध्ये असणाऱ्या रोबोवर्ल्ड विभागात ३०पेक्षा जास्त कायमस्वरूपी रोबोटिक डिस्प्ले असून हे जगातील सर्वात मोठे कायस्वरूपी रोबोटिक म्युझिअम आहे.

इथले एक वेगळे ठिकाण म्हणजे National Aviary. ही अमेरिकेतील सगळ्यात मोठी Aviary असून त्यात जवळपास २०० प्रकारचे पक्षी आहेत. पक्ष्यांसाठी त्यांच्या मूळ अधिवासाप्रमाणे वेगवेगळी छोटी जंगले Aviaryच्या आत तयार केलेली आहेत.

शहराचा डाउनटाउन भाग म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्तुंग इमारतींबरोबरच जुन्या, अत्यंत सुंदर अशा पुरातन इमारती आणि आखीव रेखीव रस्ते असणारा भाग आहे.

पिट्सबर्गचा डाउनटाउन भाग

मार्केट स्क्वेअर

प्रेस्बायटेरिन चर्च

आणि ही टुमदार घरे

जुन ते सप्टेंबर थोडाफार असलेला उन्हाळा सोडला, तर एरवी इथे हिवाळाच असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी म्हणजे कडाक्याच्या थंडीचे आणि बर्फवृष्टीचे महिने. नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या बर्फवृष्टीनंतर दिसणारे एक दृश्य

अशा ह्या अमेरिकेतील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या शहराला जमल्यास नक्कीच भेट द्या. तुम्ही नक्कीच ह्या शहराच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...