कोणे एके काळी...
दोन वर्षांपूर्वी लडाखला दुचाकी वरून गेलो होतो तेव्हाच त्या वारीला
लागूनच स्पिती खोरे पण करणार होतो. लडाख आणि स्पिती असा दुहेरी वसा घेतला
होता. पण काही कारणास्तव तो का पूर्ण झाला नाही, ते तुम्ही माझ्या लडाखच्या
प्रवासवर्णनात वाचलेच असेल.
https://www.maayboli.com/node/55605
त्यामुळे लवकरात लवकर स्पिती खोरे करायचेच होते. पण तरी एक वर्ष मधे गेले. मग यावर्षी योग जुळून आला. यावर्षी जमेल असे जेव्हा एप्रिलच्या दरम्यान वाटले तेव्हा लगेच फेसबुकवर जाहीर केले... स्पिती कॉलिंग...! अगदी मागच्या वेळसारखेच अक्षयने लगोलग विचारले कधी जातो आहेस? म्हटलं साधारणपणे जुलैचा शेवट. तो म्हणाला मी पण येणार आहे. चला एक सवंगडी लगेच तयार झाला. मागच्या वेळेस अजयने असाच ताबडतोब प्रतिसाद दिला होता. अतुलला पण यावसं वाटत होतं पण ऐन धंद्याच्या मोसमात जात असल्यामुळे त्याला जमणार नाही हेही माहीत होते. आता तयारीला लागायला पाहिजे होतं. लगेच गुगलबाबाला विचारायला सुरुवात केली. मी नेहमीप्रमाणे मनाली ते मनाली असं वर्तुळ करणाऱ्या मंडळाचा शोध घेत होतो. पण जी कुठली मिळाली, त्यांच्या तारखा नक्की नव्हत्या कारण त्यांच्याकडे पुरेसे लोक नव्हते. त्यामुळे चंदीगड ते चंदीगड असाच प्रवास करावा लागेल असे दिसत होते. यामध्ये अजून एक लक्षात आले की लडाखच्या मानाने स्पितीला नेणारी मंडळे अजूनही खूपच कमी आहेत. म्हणजे या वेळेस मात्र मनाली ते चंदीगड हा प्रवास दुचाकीवरूनच करावा लागणार असे दिसत होते. मागच्या वेळेस ज्या मंडळाबरोबर स्पिती करणार होतो त्यांना विचारले, त्यांनी सांगितले ८ ते १८ जुलै अशी त्यांची स्पिती वारी आहे. मी आधी जुलै शेवट किंवा ऑगस्ट सुरुवात अशा तारखा बघत होतो. पण तसं एकही मंडळ मिळालं नाही आणि नंतर असेही कळले की ऑगस्टमध्ये खूप पाऊस पडू शकतो. मग म्हटले जुलै ठीक आहे. अक्षयची पण तयारी होती या तारखांची. यावेळेस आम्ही तिकडेच दुचाकी भाड्याने घेणार होतो. त्यामुळे दुचाकी इथून पाठवण्याचा प्रश्न नव्हता. हे मंडळ चंदीगड ते चंदीगड करणार होते. यावेळेस माझी तयारी होती मनाली ते चंदीगड दुचाकी चालवायची. अक्षय म्हणाला की त्याला याच भागाचा मागच्या वेळेस चालवून खूप कंटाळा आला होता आणि उन्हाने अगदी हैराण व्हायला झाले होते. तेव्हा आपण शक्यतो मनाली ते मनाली करूया. मग परत मागच्या वेळेसारखे नियोजन सुरू केले. मागच्या वेळेस मी आणि अजय मनालीहून या मंडळाला लाहूरी या गावी भेटणार होतो. यावेळेसही तोच मार्ग घ्यायचा असे ठरवले. मी परत गुगलचे नकाशे पाहून अभ्यास करायला सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनी जाण्याच्या पहिल्या दिवसाचे व शेवटच्या दिवसाचे काटेकोर नियोजन झाले. मग इतर दिवसांचे देखील थोडेफार नियोजन करून ठेवले. इतर दिवशी जरी सगळेजण आपल्या बरोबर असले तरी चुकामुक होऊ शकते. तेंव्हा पूर्णपणे अनभिज्ञ राहणे फारच धोक्याचे ठरू शकते.
पहिला आणि शेवटचा दिवस हे आमचे आम्हाला पार पाडायचे होते. मंडळाबरोबर आम्ही असणार नव्हतो त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन केले. मग त्याप्रमाणे मंडळाचा मुख्य नितीन याच्याबरोबर परत बोलणे केले. मागच्यावेळेसारखच परत त्याला समजावून सांगितलं. GPS स्थान पण दिले आणि अशा रीतीने आम्ही त्यांना कुठे भेटायचे ते ठरले. आता बुकिंग करण्यासाठी परत गुगलबाबाला विचारायला सुरुवात केली. त्याचबरोबर मनालीमध्ये दुचाकी भाड्याने देणारा विश्वासू असा कोणी माणूस मिळतोय का ते बघायलापण सुरुवात केली. अतुलच्या ओळखीमधून एक मनालीमधील ओळख मिळाली. मग त्याला, म्हणजे निशितला फोन करून सर्व काही माहिती मिळवली. मी आधी होंडा युनिकॉर्न मिळतेका याबद्दल बरीच शोधाशोध केली होती. पण ती मिळत नाही. पल्सर, अव्हेंजर मिळते आणि सगळ्यात जास्त बुलेट. बरोबरच्या सगळ्या लोकांची बुलेटच असणार होती. त्यामुळे दुरुस्तीला लागणारे सुटे भाग हे त्यांच्याकडेही असण्याची शक्यता जास्त होती. तसेच वाहनतज्ञ देखील बुलेटमध्येच तज्ञ असण्याची शक्यता होती. खरतर मला बुलेट आवडत नाही पण बुलेटच घेणे सोयीस्कर होते. म्हणून निशितबरोबर बोलून बुलेट क्लासिक ३५० ठरवली. तो म्हणाला आम्ही त्याच्याबरोबर लडाख कॅरिअरपण देतो. ते बसवलेलेच असते. मग ते हवे की नको यावर बरीच चर्चा झाली. कारण आम्ही आमच्याबरोबर मागच्या वेळेस घेतलेले खोगीर घेणार होतो. पण ते त्यावर बसेल की नाही ते कळत नव्हते. शेवटी ठरवले की असू देत तिथे गेल्यानंतर बघू. मग सराव म्हणून मी अतुलची बुलेट तासभर चालवून आलो.
आता विमान प्रवासाची तिकिटे, दिल्ली ते मनाली जाण्याची तिकिटे तसंच परतीची तिकिटे याबद्दल शोधाशोध सुरू झाली. मेकमायट्रीप, गोबीबो, विस्तारा असे बरेच पर्याय बघत राहिलो. शेवटी जे स्वस्त आणि मस्त पर्याय दिसले ते खरेदी केले. यातून नेहमीचच एक लक्षात आलं की विमानाची तिकिटे ही नेहमी त्या त्या विमान कंपनीच्या साईटवरच स्वस्त मिळतात. बाकीच्या साईटस ह्या तुलना करायला आणि एकूण किती विमाने उपलब्ध आहेत हे बघायला उपयोगी पडतात. मेकमाय ने दोन हजार रुपये दिले असल्यामुळे बस प्रवासाच्या बाबतीत मात्र आम्हाला खरी सूट मिळाली. म्हणजे मनालीला जाण्यायेण्याच्या बस प्रवासात दरवेळेस माणशी जवळपास शंभर-दोनशे रुपयांची बचत झाली.
मागच्या वेळेस आम्ही प्रचंड सामान घेऊन गेलो होतो. पंधरा किलोचे चेक इन आणि सात किलोचे केबिन सामान खचाखच भरून नेले होते. काय नेले होते कोणास ठाऊक ! यावेळेस मात्र आम्ही फक्त खोगीर न्यायचे असे ठरवले होते. म्हणजे सात किलो मध्ये सगळे बसवणार होतो. त्याप्रमाणे बसवलेही. मी फक्त एक रिकामी सॅक खोगीरावर बांधून ठेवली होती. एकदा दुरुस्तीवाहन बरोबर असले की खोगीर खचाखच भरलेल्या स्थितीत वागवणे गरजेचे नव्हते आणि चांगलेही नव्हते. खोगीर फाटले तर ? त्यामुळे तिकडे गेल्यावर काही गोष्टी सॅकमध्ये भरून वाहनात टाकणार होतो. दोघांसाठी एक सॅक पुरे होती. लडाखच्या अनुभवाप्रमाणे आम्ही गरम कपडे घेऊन ठेवले होते. मी अतुलचे खोगीर घेणार होतो. कारण माझे खोगीर युनिकॉर्नचे असल्यामुळे छोटे होते आणि तिकडे आम्ही बुलेट वापरणार होतो. यावेळेस मी हातापायाची चिलखते अजिबातच नेणार नव्हतो. पण अतुलने पायाचे तरी घेऊन जा असा आग्रह केला त्यामुळे ते पण त्याचेच घेतले होते. पुढे ते सगळा प्रवासभर माझ्या पायावरती कुठेतरी लटकलेले असायचे. त्याचा खरा उपयोग होईल अशा ठिकाणी ते नसायचेच. पावसाळी पोशाख देखील घेतला होता आणि हे सगळे एका खोगीरात बसवले होते. त्यामुळे आम्ही आमच्यावरच बेहद्द खूष होतो. अनुभवाचा फायदा होतो तो असा !
---
सर्व भाग
https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप
आषाढ शुद्ध चतुर्दशी (८ जुलै) - दिल्ली
सकाळी अक्षय मित्राबरोबर त्याच्या गाडीने माझ्या घरी आला. मग आम्ही
तिघे विमानतळावर निघालो. आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचे होते. पण
नेहमीप्रमाणे चुकून आधी स्थानिक विमानतळावर गेलो व तिथून आंतरराष्ट्रीय !
त्यामुळे वेळ कमी पडेल की काय ही धाकधूक, पण पोचलो व्यवस्थित. आत शिरलो
आणि थक्कच झालो. इतकं मस्त विमानतळ बांधलं आहे हे नुसते ऐकून होतो. ते
प्रत्यक्षात पाहिलं. पण चेकइनची रांग बघून घाबरलो. थोडा वेळ त्या रांगेत
उभे राहिल्यावर आपले आपण चेकइन करायचे चालू झालेले दिसले. मग मी लगेच तिकडे
जाऊन आमचे तिकीट छापले. अक्षयला बोलावून आमची खोगीरं तिथल्या ललनेकडे
सोपवली. आता आम्ही एकदम सडेफटिंग झालो. माझ्याकडे फक्त कमरेचा पाऊच होता.
शेवटी एकदाचा स्पिती खोऱ्याकडे निघालो होतो. सुरक्षा चाचणीतून बाहेर पडून,
कॉफी किती महाग आहे ते बघून एका ठिकाणी विसावलो.

मी लगेच भ्रमणध्वनी चार्जिंगला लावला. हो पुढे कुठे सोय मिळेल की नाही
माहीत नव्हते. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा चार्ज करायला लावायचे ठरवले
होते. एअर इंडियाचे विमान थोडे उशिरा सुटले पण वेळेत पोचले. विमानात
पावभाजी खायला मिळाली. दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे ती तिखट पाव भाजी
खावी लागली. मग विमानातच ती लगेच परत देऊन आलो
हो, आपण कोणाचे काही जास्त वेळ ठेवत नाही.
दिल्लीला उतरलो आणि बराच वेळ चालत रहावे लागले कारण फिरते पट्टे बंद
होते. सामान सुखरूप मिळाले. बाहेर पडलो आणि दिल्लीच्या त्या भयानक उकाड्यात
फरफट सुरू झाली. तरी बरं समोरच मेट्रो स्थानक होते. ते वातानुकूलित होते.
म्हणजे निदान तिकीट काढायच्या ठिकाणी तरी. मी दिल्ली मेट्रोचा नकाशा बघून
तीन तीन गाड्या कराव्या लागतील असं ठरवलं होतं. पण तिकीट देणाऱ्याने सोपा
मार्ग सांगितला ज्यामुळे दोनच गाड्या कराव्या लागल्या. माझ्या हे आधी
लक्षात कसे नाही आले हेच कळले नाही. परफेक्शन सुध्दा १०० टक्के पर्फेक्ट
नसतं ना
आम्हाला आर के आश्रम इथे जायचे होते. तिकीट काढून खाली फलाटावर आलो व
लक्षात आले की वातानुकूलन चालू नाही. म्हणजे परत घामाच्या धारांना सुरुवात.
एक गाडी पकडून द्वारका स्थानकात गेलो. तिथून दुसरी गाडी पकडून जवळपास
पावणेदोन तास प्रवास करून आश्रमला पोचलो. मेट्रोच्या गाड्या आतून फारच मस्त
आहेत. गाडीतील वातानुकूलन चालू होते.
स्थानकाबाहेर पडलो आणि मेकमायवर दिलेल्या माहितीप्रमाणे पालिका बाजार या ठिकाणी पोचलो. तिथे कोणालाच देव हिमाचल या कंपनीची माहिती नव्हती. खूप शोधाशोध केली. मग उपलब्ध असलेल्या एकमेव फोनवर फोन केला. त्याने काहीतरी त्रोटक माहिती सांगितली त्यावर परत त्या बाजारात फेरी मारली. पण व्यर्थ ! शेवटी तिथल्याच एका साध्या माणसाने अमूक अमूक गाळा बघा असे सांगितले. एव्हाना जवळपास अर्धा तास निघून गेला होता. नशिबाने तिथेच बऱ्यापैकी स्वच्छ असे स्वच्छतागृह होते. जिथे मी जवळपास दोन वेळा अंघोळच केली. आता हा शेवटचा पर्याय बघावा नाहीतर सरळ मेकमायला जाब विचारावा असे ठरवले होते. त्याठिकाणी शिरून देव हिमाचल असे विचारल्यावर हो हेच असे कळल्यावर जीव भांड्यात पडला. देव हिमाचल आणि हिमालयन नोमेड ह्या एकाच कंपनीच्या दोन बसेस आहेत. देव मध्ये शंभर दोनशे रुपये जास्त घेऊन तुम्हाला एक पांघरूण, चार्जिंगची सोय, एक बाटली पाणी या सोयी पुरवल्या जातात. आम्ही ताबडतोब तेथे सामान टाकून जेवायला बाहेर पडलो. त्यांनी सांगितलेल्या जवळच्याच एका गल्लीत सबवे सापडलं आणि धन्य झालो. दोघांनी फूटभर लांबीचे बर्गर खाल्ले आणि मग घाईघाईने परतलो. आता म्हटले जरा वातानुकूलित खोलीत बसून राहू तर त्या माणसाने सगळ्या प्रवाशांना बाहेर काढून रस्त्यावर आणले. म्हणतो आता बस येईलच. तिथे कुठेही बसायला जागा नव्हती. त्यामुळे जवळपास शे-दोनशे प्रवासी उभेच होते. आणि वातावरणात तर रण पेटले होते. मला देव हिमाचलकडून बसचा नंबर मेसेज केला गेला होता. पण अर्थातच आमची खरी बस वेगळ्याच नंबरची आहे असे त्या माणसाने सांगितले. तासभर घामाने चिंब भिजल्यावर आणि संताप संताप झाल्यावर आमची बस आली. सामान खालच्या कप्प्यात टाकून बसमध्ये येऊन बसलो. बस अतिशय उत्तम स्थितीत होती. हात ठेवायच्या कठड्याखालीच चार्जिंगची सोय होती. आणि ती चालतही होती. वरती माळ्यावर स्वच्छ पांघरुणे होती. एक पाण्याची सीलबंद बाटली देखील मिळाली. एकूण कबूल केलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि इतर खोट काढायला काहीही जागा नव्हती. लौकरच वातानुकूलित वातावरणात स्थिरावलो. फोन लगेच चार्जिंगला लावला.
आता बाहेरील दिल्ली बघायला सुरुवात केली. एक पाटी वाचली; दरवाजेही दरवाजे ! म्हटलं हे काय भरपूर दरवाजे असं म्हणायचं आहे की काय ! चुकून या दुकानात झालं असेल. पण नाही दुसरीकडे कुठेतरी आरसेही आरसे असं काहीतरी वाचलं आणि म्हटलं ही इथली पद्धतच दिसते. म्हणजे, आपल्याकडे वडेच वडे असं एखाद्या वड्याच्या गाडीवर लिहिले तर कसे दिसेल? आम्ही बराच वेळ ज्या मेट्रोने आलो होतो त्याच दिशेने मेट्रोला संलग्न चाललो होतो. म्हटलं आता विमानतळापर्यंत जातो कि काय ? पण नशिबाने अर्ध्या तासानंतर कुठेतरी उजवीकडे वळून आम्ही चंदीगडच्या दिशेला निघालो. वाटेत कश्मीरी गेट नावाचे मेट्रो स्थानक लागले. अक्षयला म्हटलं आपल्याला येताना इथेच यायचे आहे. आता मी झोपेच्या तयारीला लागलो. एव्हाना साडेसहा वाजले होते व आमचे पोट तुडुंब होते. आता आम्ही हायवेला लागलो होतो. सकाळी लवकर उठलो असल्यामुळें झोपही पटकन लागली. शिवाय जेवढी मिळेल तेवढी झोप घेणे गरजेचे होते. कारण रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी आम्हाला लगेच दुचाकी चालवायला सुरुवात करायची होती. त्यामुळे डोक्यावरून पांघरूण ओढून झोपून गेलो. रात्री साडेनऊ वाजता बस एका खूप मोठ्या हॉटेलपाशी थांबली. मग उत्तम पैकी सूप आणि पुलाव घेतला. आता जे झोपलो ते सरळ सकाळी सातच्या दरम्यान गाडी थांबली तेव्हा जाग आली.
आषाढ पौर्णिमा (गुरु पौर्णिमा - ९ जुलै) - मनाली, लाहुरी
आता बाहेर मस्त गुलाबी थंडी होती. दिल्लीचा भयंकर उकाडा संपला होता. नंतर औत बोगद्यात शिरताना इथूनच आपल्याला दुचाकीवरून परत यायचे आहे असे अक्षयला सांगितले. आता फोन करून निशितला आम्ही कुठे आहोत ते कळवले. तो म्हणाला या तुमच्या गाड्या तयारच आहेत. गाडीने आम्हाला माल रस्त्याजवळच्या एका पेट्रोल पंपावर सोडले. तिथले प्रसाधनगृह चांगले आहे हे बघताच आम्ही आमचे प्रातर्विधी आटोपून घेतले. चला आता आम्ही पूर्ण सज्ज होतो. झोपही छान झाली होती. लगेच गॅरेजमध्ये पोचलो. गाड्या तयारच होत्या. आम्ही लगेच त्या चालवून पाहिल्या. माझी गाडी थोडीशी उजवीकडे खेचली जात होती. हे मी त्याला सांगितले पण अर्थातच त्याने ते नाकारले. ही एकच खोट सोडल्यास बाकी गाड्या एकदम उत्तम होत्या. गाड्या अगदीच नवीन होत्या. जेमतेम तीन-चार हजार किलोमीटर्स झाले होते. आता आमची खोगीरं बसत आहेत की नाही ते पाहीलं आणि नेमकं कॅरीअर्स काढावी लागतील हे लक्षात आलं. मग ती काढून होईस्तो आम्ही निशितबरोबर एका पराठा धाब्यावर गेलो. रस्त्याच्या कोपऱ्यावर छोटासा धाबा आहे. त्याच्या बाजूलाच निशितचे कार्यालय होते. तिथे त्याला उरलेले पैसे देऊन टाकले आणि निवांतपणे धाब्यावर पराठे हाणले. खाता खाताच माझ्या लक्षात आले की मागच्या वेळेस अतुल अक्षयने मला इथेच सोडले होते. माझे पराठे खाऊन होईपर्यंत ते कुठेतरी जाऊन आले होते. मी गेलो नव्हतो कारण माझा पाय प्लास्टरमध्ये होता. काय मजेशीर नशीब असतं !
परतलो व गाडीवर सामान चढवले, चिलखते घातली, त्याच्याकडचे शिरस्त्राण घेतले. हे मात्र अगदी वाईट परिस्थितीतले होते. पाच-सात शिरस्त्राणे तिथे शीर कापून ठेवल्यासारखी ठेवली होती. त्यात ३ जणांना तर काचच नव्हती आणि मला तर काच फार गरजेची वाटते. एकाच्या काचेतून काहीच दिसत नव्हते. म्हणून जे उरले होते ते शिरस्त्राण घेतले. याची काच अर्धवट दाखवत होती. आता गॉगल घालावाच लागणार असे दिसले. खरतर मला अजिबात गॉगल घालून चालवायला आवडत नाही. त्यामुळे मी नेहमीच शिरस्त्राणाच्या काचेवर भिस्त ठेवून असतो. ही नीट बसत असेल आणि एकदम स्वच्छ असेल तर दिसतेही चांगले आणि हवाही लागत नाही. पण आता नाविलाज को क्या विलाज ! पण मी साधा पंधरा वीस रुपयांचा गॉगल आणला होता व खरा रायडिंगचा चष्मा घरीच ठेवला होता. विनाशकाले विपरीत बुध्दी ! मग काय आता बांधा रुमाल आणि चढवा गॉगल. अक्षयने बिनकाचेचेच शिरस्त्राण घेतले होते. त्याला चालणार होते. आमच्या एक लक्षात आले की शिरस्त्राण तरी आपलेच आणले पाहिजे. असो. पुढच्या वेळेस. आता लगेच सकाळच्याच पेट्रोल पंपावर इंधन भरायला गेलो कारण गाडी मध्ये काहीच इंधन नव्हते. इंधन भरले आणि मग खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला.

आता पुढचे आठ नऊ दिवस या दुचाकी वरच. तिथे जायच्या आधी मला असे वाटत
होते की आपल्याला बुलेटची सवय व्हायला निदान एक दिवस तरी जाईल. पण आज मी
बसलो आणि युनिकॉर्न इतक्याच सराईतपणे चालवायला सुरुवात केली. पाच मिनिटे पण
लागली नाहीत. फक्त एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पहिल्या गिअरवरती बुलेटची
ताकद कमी आहे. त्यामुळे चढ चढताना थोडा त्रास होऊ शकेल. माझ्या युनिकॉनवर
मी बऱ्यापैकी चढ आरामात चढून जातो. असो. पुढे बघू.
आता डावीकडे व्यास नदी, उजवीकडे डोंगर, बऱ्यापैकी थंडी !

दुचाकी चालवायला अतिशय उत्तम वातावरण होते. आम्हाला जवळ पास एकशे सत्तर किलोमीटर पार करायचे होते. त्यात जलोडी नावाची एक मोठी खिंड पार करायची होती. विचार असा होता की सहा तास लागतील आम्ही बारा वाजता सुरू केले होते. म्हणजे सहा साडेसहा पर्यंत दिवसाउजेडी मुक्कामी पोचायला हरकत नव्हती आमच्याबरोबर आज दुरुस्ती वाहन नव्हते. त्यामुळे झटपट अंतर कापणे गरजेचे होते. वाटेत एका ठिकाणी दोन लिटरच्या दोन शीतपेयाच्या बाटल्या उचलल्या. पुढे याचाच उपयोग आम्ही इंधन भरून घेण्याकरता करणार होतो. आणि तसंही आता चांगलंच उकडायला लागलं होतं त्यामुळे मी तर जॅकेट काढून ठेवले होते. तर ते पेय पिऊनपण घेतले थोडेसे. आता नुसत्या लांब बाह्यांच्या सदऱ्यावर चालवायला सुरुवात केली. लडाखच्या अनुभवावरून आम्ही गरम कपड्यांची जय्यत तयारी केली. होती. पण सगळं ओमफसच झालं पुढेदेखील वारीभर. फारशी थंडी अशी कुठे नव्हती की जिथे सतत 2 पूर्ण बाह्यांचे सदरे आणि वर जॅकेट लागेल. मधून मधून जॅकेट काढावेच लागत होते.
व्यास नदीच्या कधी उजवीकडून कधी डावीकडून जाताना खूप मजा येत होती. एकदोन जलविद्युत केंद्रे देखील पाहिली. पुढे पुढे रोजच एक तरी जलविद्युत केंद्र दिसत असे. पण मग प्रश्न पडला की इतकी केंद्रे असूनही हिमाचल प्रदेशमध्ये विजेचा तुटवडा का? लवकरच औत बोगदा पार केला. पुढे असलेल्या तिठ्यावर फोटो काढले. आता त्या सुंदर घनगंभीर आवाजाच्या व्यास नदीचा सहवास संपला व तिर्थ नदीकाठचा प्रवास सुरू झाला. लगेचच दोन वेळा ती तीर्थ नदी झटपट ओलांडून तिथे असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरून घेतले. टाकी दरवेळेस काठोकाठ भरायची असे ठरवले होते. आता एकदम निमुळता घाटरस्ता सुरू झाला. जेमतेम एक मोठी गाडी जाऊ शकेल एवढाच होता पण गर्दी अजिबात नव्हती. त्यामुळे मस्त रमतगमत गाडी चालवता येत होती. आता चांगलीच भूक लागली होती. मस्त छोटी छोटी गावे लागत होती. बंजरला पोचायच्या थोडंसंच आधी एक हॉटेल दिसले. आम्ही तिथे थांबलो पण तीन मजले वर चढून जावे लागले. कारण राहण्याची सोय खाली व जेवायची सोय वरती होती. पण इतके वर चढून गेल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर गच्चीत स्वच्छ चकचकीत व्यवस्था होती. बाजूने तीर्थ नदी शांतपणे वाहत होती.

इतके अप्रतिम स्थळ जेवायला मिळालेच नसते आणि जेवण तर काय फारच चविष्ट होते. गरम गरम फुलके व भरली भेंडी ! जेवण जरी झटपट मिळाले तरी आम्ही जवळपास तासभर तिथे होतो.

मग मात्र अक्षयला म्हटले आता आपल्याला पाय उचलायला पाहिजे आहेत. दिवसाउजेडी घाट पार करून जायलाच पाहिजे. नाईलाजाने निघालो. आता त्या छोट्याश्या लाघवी तीर्थ नदीचा सहवास संपला. आता आम्ही खिंड चढू लागलो. पाचदहा मिनिटातच होता नव्हता तो ही डांबरी रस्ता संपला व दगडधोंड्यांचा, मातीचा रस्ता सुरू झाला. पाऊसही भुरु भुरु पडू लागला. मी लगेच पावसाळी पोशाख चढवला. यातला वरचा सदरा हा अतुलच्या बायकोचा होता. म्हणजे एकदम गुडघ्यापर्यंत लांब आणि ढगळ. त्यामुळे माझ्या जॅकेट वरूनही तो मला चढवता येत होता. आणि यावेळेस हाताची चिलखतेही नसल्यामुळे हे शक्य होत होते.
मस्त धुकं पडलं होतं. पण त्यामुळेच अंधारही दाटला होता. इथे चांगल्यापैकी चढ होता आणि मला जाणवलेला बुलेटचा पहिल्या गिअरचा कमी ताकदीचा त्रास कधीही होऊ शकेल असे वाटू लागले. आता आम्ही चांगल्याच दाट जंगलातून जात होतो. आणि तरीही अधून मधून एक एक दोन दोन घरे दिसत होती. आम्ही एका वेगळ्याच धुंद वातावरणात, तंद्रीत चालवत होतो. तेवढ्यात पुढे वाहतूक ठप्प झालेली दिसली. रस्त्याचे डांबरीकरण चालू होते म्हणून थांबवण्यात आली होती. पण त्यांनी दुचाकी उजवीकडे खाली उतरवून शेवटी परत वर काढा असा इशारा केला. सर्वात शेवटी परत रस्त्यावर चढवताना दुचाकी निघाली नसतीच पण मी अर्ध्या क्लचवर ताकद मिळवून चढवली. माझी युनिकॉर्न इथे पहिल्या गियर वर सहज चढली असती. पुढे बघतो तर लगेचच आम्ही खिंडीच्या वरच्या टोकाला पोचलो. तिथे एक देवीचे मंदिर होते.

दोन्ही बाजूला असलेल्या घरांच्या पडवीमध्ये बरीच माणसे बसलेली होती. ही सगळी त्यांना घेऊन जाणाऱ्या भाड्याच्या गाडीसाठी थांबलेली होती. यात जवळपास ७० % बायकाच होत्या. खूप पूर्वी हिमालयात ट्रेक करताना पुरुष मस्त तंगड्या वर करून हुक्का ओढत ऊन खात बसलेले व बायका तुफान काम करताहेत या बघितलेल्या गोष्टीची आठवण झाली. आम्ही मस्त फोटोसेशन केले. एका फिरंगी गटाला मार्गदर्शन केले व निघालो. आता म्हटले कुठेही न थांबता तडक निवासस्थान गाठायचे. कारण डोंगरदऱ्यात अंधार लवकर पडतो. पाऊस अगदी बारीक पडतच होता. आम्ही एका झेन अवस्थेमध्ये चालवत सुटलो व एका वळणावर मला अपेक्षित असलेले इंधनगृह दिसले. आमचे निवासस्थान पुढेच अगदी नेमक्या तिठ्यावर होते, जिथे नारकंडहून येणारा रस्ता मिळतो. त्यामुळे उद्या आमच्या मंडळाच्या इतर सभासदांना आम्हाला भेटणे सहज सोपे होते. खोली बुक केली होती तेव्हा जीएसटीचे लफडे नव्हते. आता नुकतेच चालू झाले होते. पण तरीही त्याने त्याच भावाने खोली दिली. आधी एक खोली दिली त्यातला हीटर चालत नव्हता आणि आम्हाला तर गरम पाण्याच्या अंघोळीची नितांत आवश्यकता होती. मग त्याने दुसरी खोली देऊ केली. ती खालच्या मजल्यावर असल्यामुळे कोंदट आणि भरपूर डास असलेली होती. मग त्याने तिसरी खोली दाखवली त्यातला पंखा फक्त एकाच, कमी वेगाने चालत होता. पण म्हटले जाऊ दे आत्ता उकडतंय पण नंतर गारवा येईल. आता आम्ही जवळपास छत्तीस तासानंतर सचैल स्नान केले. अंग एकदम हलके फुलके होऊन गेले. मस्तपैकी जेवणावर ताव मारला. नितीनला फोन करून कळवून ठेवलं. तो म्हणाला आम्हाला निदान दहा तरी वाजतील. म्हटलं चला आज निवांतपणे दहा-बारा तास झोपता येईल. खोलीत आलो तोपर्यंत वातावरण पण थोडे गार झाले होते. अशी काही झोप लागली म्हणून सांगू !
आषाढ कृष्ण प्रतिपदा (१० जुलै) - सांगला
जवळपास अकरा तासानंतर जाग आली तेव्हा दोन दिवसांचा शिणवटा पूर्णपणे निघून गेला होता. मग झटपट आवरले. उत्तम पराठ्यांचा नाश्ता केला व बाहेर जाऊन सामान गाडीवर लावेपर्यंत मंडळी आलीच. मी आता थोडे सामान सॅकमध्ये टाकले होते. त्यामुळे दुरुस्ती गाडी येईपर्यंत थांबून राहिलो. तोपर्यंत नमस्कार चमत्कार झाले. आमच्या या नितीन नामक नायकाची देखील अव्हेंजर होती. जशी लडाखच्या नायकाची होती. एकूण ह्या गाडीवर नायकांचा विश्वास जास्त दिसत होता. आता आम्हा दोघांना दुरुस्ती गाडीचा पाठिंबा उपलब्ध होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार झाडी होती.

-
लवकरच तो घाट आला जिथे त्या प्रसिद्ध दगडाच्या कमानी आहेत. म्हणजे खरतर डोंगर पोखरून जेवढ्यास तेवढा घाट तयार केला आहे. इथे जोरदार फोटोसेशन व चलतचित्रण झाले.

-
-
आम्ही अतुलचा व्हिडिओ कॅमेरा घेऊन जाणार होतो. पण काही कारणास्तव तो
नेला नाही. मग पहिले दोन दिवस अक्षयने एक युक्ती केली होती. तो कमरेचा पाऊच
छातीवर लावून त्यामध्ये त्याचा आयफोन खुपसत असे. पण यामुळे चित्रण उभे येत
आहे हे मी त्याला सांगितले. हा घाट मात्र फोटोत दिसतो तेवढा प्रत्यक्षात
काही अरुंद किंवा अवघड नाही. पण पलीकडच्या डोंगरावर मात्र जो घाट होता तो
अगदीच अरुंद होता. जेमतेम सुमोसारखी गाडी जाईल एवढाच. आणि तो पूर्णपणे
मातीचा होता. अर्थात तो आम जनतेसाठी नव्हताच. त्यावरून एक टेम्पो जाताना
दिसत होता. अगदी सावकाश, मोजून मापून चालवत होता.
.
foto
घाट पार करून गेल्यावर सतलज नदीकाठचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळाने
भरपूर कुमारवयीन लोक दिसायला लागले. रामपूरचे कॉलेज जवळ आले होते. प्रीती
झिंटा इथेच शिकली ! ईती आमचा महानायक ! आजूबाजूच्या सुंदरी बघून ते म्हणणे
पटलेच लगेच. काही लोकांचा तर आता इथेच टाका तंबू आता असा विचार चालू झाला
म्हणून आम्ही एक चहासाठी थांबा घेतला. चाय पे चर्चा झाल्यावर साधकबाधक
विचार करून आम्ही पुढे निघालो. आता एका फारच वाईट दिसणाऱ्या धाब्यावर
जेवायला थांबलो. राजमा उसळ फुलके भात असा बेत चवीला चांगला होता. पाणी
मात्र आम्ही बंद बाटली विकत घेऊनच प्यायले. पुढे सुद्धा पूर्ण वारीभर
बहुतांशी सगळे बाटलीबंद पाणीच पीत होते. मी आणि अक्षय मात्र मधून मधून
स्थानिक पाणी देखील पीत होतो. आता मस्त सतलज आणि बास्पा नदीचा संगम पाहिला.
मग बास्पा नदीच्या कडेने सांगला खोरे या पुढच्या ठिकाणी पोचलो आणि मस्त
गरमागरम चहा आणि भजी खायला मिळाली. किन्नर कॅम्प हे आमचे आजचे निवासस्थान
अफलातून होते. इतकी उत्तम बडदास्त, इतका स्वच्छ तंबू, इतक उत्तम जेवण आणि
मुख्य म्हणजे इतकी अप्रतिम बास्पा नदीच्या काठची जागा.. जणूकाही स्वर्गातच
होतो. त्यामुळे लवकरच यक्ष किन्नर गाणी गाणार आणि अप्सरांचा नाच सुरू होतो
की काय अशी उत्सुकता लागून राहिली
चहा पिऊन झाल्यावर लगेच नदीकाठी जायला पळालो कारण आता अंधार पडायला फारवेळ बाकी नव्हता. नदीकाठ सगळा हिरव्यागार सूचीपर्णी वृक्षांनी भरलेला होता. दोन्ही बाजूला उंच डोंगर, मध्ये खळाळत वाहणारी बास्पा नदी, आम्ही दोघे सोडून बाकी कोणीही मनुष्यप्राणी नाही, मस्त संधिप्रकाश असं सगळं वातावरण एकदम अफलातून झालं होतं. अक्षयने लडाख मध्ये हमखास केला जाणारा दगडावर दगड रचण्याचा उद्योग सुरू केला. मी मात्र एका कातळावर निवांत आडवा पडून राहिलो. डावीकडे हात पसरला की थेट पाण्यात जात होता.

-
-
-
मन एकदम शांत सुखिन झाले होते. थोड्या वेळाने आमच्यातील इतर मंडळीही
थोडीशी खालच्या अंगाला नदीकाठी आलेली दिसली. अंधार खूपच पडला तसे नाईलाजाने
पण उल्हसित मनाने तंबूत परतलो. आमच्याबरोबर बारा-चौदा चक्क मारवाडी
लोकांचा संच होता. ही मंडळी भारीच हरहुन्नरी होती. त्यांनी पत्त्यांचा डाव
टाकला होता. ती मंडळी पूर्ण वारीवर रोज संध्याकाळी थकून मुक्कामी पोचलो की
उत्साहाने पत्ते खेळायची. कहर आहे ! आमच्या मराठी संचामधील लोकांनी आचमने
घ्यायला सुरुवात केली होती. अक्षय तर पितच नाही व मी लडाख प्रमाणेच इथेही
वारी भर मदिरा घ्यायची नाही असे ठरवले होते. पण अर्थातच त्यांच्याबरोबर
गप्पा मारायला मांडी ठोकली. उद्या पहाटे सव्वापाचला चिटकूलला जायला निघायचे
होते. साडेआठच्या सुमारास जेवण तयार आहे अशी आरोळी ऐकू आली व लगेच जेवायला
पळालो. बघतो तर तिथे मारवाडी लोकांनी किशोरची मस्त गाणी लावली होती.
म्हणजे मैफिल आधीच जमली होती. आम्ही पण सुग्रास जेवण ताटात घेऊन मैफिलीत
सामील झालो. जेवणानंतर तंबूबाहेर थोडावेळ खुर्चीत बसून विचारमंथन केले
मग मात्र हे आपले काम नोहे हे लक्षात येऊन लगेच झोपायला पळालो.
आषाढ कृष्ण द्वितीया (११ जुलै) - नाको
सकाळी आम्ही दोघे उठून निघेपर्यंत बाकीची मंडळी गाड्या काढून पुढे निघून गेली होती. आम्ही घाईघाईत दुचाकीपाशी जाताना मी दुचाकीची चावी कुठेतरी हरवली. एकदम ब्रह्मांडच आठवलं ! मग शोधाशोध ! तंबूपासून दुचाकीपर्यंतचा रस्ता चाळून काढला तेव्हा ती मिळाली. जीव भांड्यात पडला. आता लगबगीने दुचाकी काढून पळवत सुटलो. झुंजूमुंजू नुकतेच झाले होते. पण तरी दिवे लावावे लागत होते. कारण भरपूर धुकं आणि अगदी बारीकसा पाऊस होता. आत्ता आम्ही सगळं सामान बरोबर घेतला नव्हतं कारण परत कॅम्पवर येऊन नाश्ता करायचा होता. मारवाडी लोकांपैकी एक दोन जणच तिकडे निघाले होते. पाचदहा मिनिटातच उजाडले आणि फारच अवर्णनीय हिमालय दिसू लागला. अगदी आपण जुन्या चलतचित्रांमध्ये पहायचो तसा. सगळीकडे एकदम शांत होते. मस्त मस्त फुलं फुलली होती. अधूनमधून एखादे हिरवेगार शेतही दिसत होते. अधून मधून पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. 4 गुरांना घेऊन जाणारा गुराखी दिसला. सकाळच्या व्यायामाला बाहेर पडलेले आपले सैनिकही दिसले. वर्णनातीत वातावरण होते.

-
चिटकूलला पोचलो तर पुढे गेलेली मंडळी चहा बिस्कीट हाणताना दिसली. गरज
होतीच त्यामुळे आम्हीदेखील आडवा हात मारला. इथून फक्त तीन किलोमीटर पुढे
आपल्याला जाता येते. तिथे जाऊन चौकीवर सैनिकांना भेटून आलो. ते म्हणाले
डोकलामच काय घेऊन बसलात, इथे आम्ही दहा वर्षांपूर्वी जिथे जाऊ शकायचो
त्यापासून दहा किलोमीटर तरी मागे आलो आहोत. चीन सगळीकडेच आपल्याला मागे
रेटतो आहे. आता आम्ही देखील मागे फिरलो. हो चिन्यांशी आत्ता लढणे आम्हाला
परवडण्यासारखे नव्हते
परत येताना आमचा हा विचार पक्का होत नव्हता की कोणाला चिटकूलला रहा असे
सांगावे की सांगलाला. अर्थात चिटकूलला निवासस्थाने अगदी एक-दोनच आहेत.
कॅम्पवर परतलो तोपर्यंत इतर मंडळी उठली होती आणि त्यांचा नाश्ता चालला होता. आम्हीपण जोरदार नाश्ता केला आणि लगेच इतक्या नितांतसुंदर स्थानाला अलविदा केला. अक्षयचं खोगीर कुठेतरी खाली घासत होतं त्यामुळे त्याने आता ते दुरुस्ती गाडीत टाकलं. फक्त शेवटच्या दिवशी त्याने ते परत दुचाकीवर घेतलं. सांगला उतरून परत तिठ्यावर आलो जेथे एक मोठे जलविद्युत केंद्र आहे. इथून आम्हाला पुन्हा मुख्य रस्त्याला लागून काजाच्या दिशेला जायचे होते. काही मंडळी अजून यायची होती. त्यामुळे आम्ही साकव ओलांडून पलीकडे गप्पा टप्पा करत बसलो. एकाची हिमालयन दुचाकी होती. या दुचाकीवर लावायच्या इतर गोष्टी त्याच कंपनीकडून घ्याव्या लागतात. तसे त्याने इंधनाचे ५ लिटरचे दोन डबे टाकीच्या आजूबाजूला बसवून घेतले होते. त्याची गाडी म्हणे पुण्यात फक्त २५ किलोमीटर प्रतिलिटर जायची. म्हणजे इथे कदाचित २० पण देईल. त्यामुळे त्याचे आपण दुरुस्ती गाडीत देखील इंधन भरून ठेवूया का असे सारखे चालू होते. त्याची भीती रास्तच होती. कारण रेकाँग पीओ या जागेनंतर काजापर्यंत मधे कुठे पेट्रोल पंप नव्हता.
आता जरा रखरख जाणवू लागली होती. धूळही भरपूर उडत होती. डांबरी रस्ता हा प्रकार कालच संपला होता. आता बऱ्याचदा धुळीचाच किंवा डांबर पूर्ण गेलेला असाच रस्ता दिसत होता. असेच बराच वेळ गेल्यावर एक वर वर जाणारा घाट सुरु झाला आणि लक्षात आले की हा शेवटचा घाट आजचा. ह्या घाटाच्या टोकावरून दरीकडचे खुपच छान दृश्य दिसत होते.

तिथून आम्ही लवकरच नाको या गावी अगदी नाको तलावाला लागूनच असलेल्या निवासस्थानी पोचलो. आमच्या खोलीसमोर तलाव व पुढे दूरवर हिमाच्छादित शिखरे दिसत होती.

संधिप्रकाश पसरला होता. डावीकडे उंच डोंगर दिसत होता. आता आम्ही आधी अंघोळी करून घेतल्या. ताजेतवाने झाल्यावर चहा आणि भजी हा कार्यक्रम झाला. थोडा वेळ गप्पा मारल्यावर जेवणाची आरोळी आली आणि आम्ही वर टेकडीवर चालत जाऊन जेवायच्या ठिकाणी पोहोचलो. पाच-दहा मिनिटेच चालायचे होते. पण तरी धाप लागली. उंचीचा परिणाम जाणवत होता. जेवायच्या इथे एक मोठा कुत्रा होता. तिबेटी मास्टिफ नावाचा. जवळपास वासराएव्हढा तरी मोठा होता. गर्दी वाढू लागली म्हणून त्याला बाहेर नेण्यात आले. जेवणाची जागा छोटीशीच पण स्वच्छ होती. आणि जेवणही चांगले होते. जेवण करून आल्यावर जेमतेम दहा मिनिटे बाहेर बसलो आणि लगेच पडी टाकली. काय सही झोप लागली !
आषाढ कृष्ण तृतीया (१२ जुलै) - टाबो
माझ्या गाडीच्या पुढील भागातून काहीतरी कच कच आवाज येत होता. आम्ही वर जाऊन नाश्ता करून येईपर्यंत तज्ञाने दुरुस्त करून ठेवली होती. इतर पण एक दोन गाड्यांची दुरुस्ती त्याने करून ठेवली होती. एकंदरीत आमच्या मंडळाचं नियोजन चांगलं होतं. आज लवकर उठून निघणार होतो कारण आज आम्हाला महत्त्वाचा मलिंग नाला पार करायचा होता. यात कधी कधी खूपच पाणी असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. इकडे हिमालयात जेवढा उशीर कराल तेवढं ओढ्यानाल्यांना पाणी वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण उन्हाने बर्फ वितळून पाणी झटपट वाढत जातं. आज मात्र सर्व काही आलबेल होते. आरामात पार करून गेलो. तरीपण उगाचच चलतचित्रण वगैरे केले. जणूकाही फारच कष्टप्रद नाला होता :). आता परत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. म्हणजे गेल्या दोन रात्री राहिलो थंड ठिकाणी आणि दिवसा प्रवास उष्ण वातावरणात. माझ्या शिरस्त्राणाला काच नीट नसल्यामुळे चेहरा रापून निघाला होता. शिवाय गॉगल घालावा लागत होता. त्यामुळे फोटो काढायचा तर गॉगल काढा मग शिरस्त्राण काढा. आणि हा क्रम चुकला की अगदीच मनस्ताप व्हायचा. मला त्या धुरकट दिसणाऱ्या काचेबद्दल काहीतरी करायलाच पाहिजे होते.
आजचा प्रवास जास्तच खडतर होता. खूपच धुरळा उडत होता. ऊन पण मी म्हणत होते. आता आम्ही मुख्य रस्ता सोडून गेयू गुहेच्या दिशेने निघालो. इथे पाचशे वर्ष जुनी, काहीही रासायनिक प्रक्रिया न करता उत्तम राहिलेली नैसर्गिक ममी होती. या रस्त्याला लागलो आणि आभाळ भरून आले. थोडी थंड हवा सुरू झाली. ह्या रस्त्याच्या आजूबाजूचं दृश्य खूपच सुंदर होतं. फारच सुंदर हिरवळ व त्यावर सोनकीची फुले फुलली होती. मन एकदम उल्हसित झाले.

ममीच्या डोक्यावर चक्क थोडे केस आहेत. इथे एक छान सगळ्या गाड्यांचा व माणसांचा असा फोटो झाला. आता आम्ही पुढील निवासस्थानाकडे कूच केले. वाटेत दरड कोसळल्याने ती काढण्याचे काम चालू होते. त्यामुळे जवळपास पाऊण तास थांबून राहावे लागले. मी लगेच रस्त्यालगतच्या खांबाला टेकून एक झोप काढून घेतली. नंतर पुढेही एका ठिकाणी दरड कोसळत होती. दरडीने हळू हळू पूर्ण रस्ता व्यापून आम्ही अडकून पडायची भिती होती. तेंव्हा बारीक बारीक दगड होते म्हणून जा पण पटकन पार करा असा तिथल्या लोकांनी इशारा केल्याबरोबर आम्ही गाड्या सुसाट सोडल्या. जवळपास दोन-अडीच वाजताच निवासस्थानी पोचलो. मग लगेच जेवायला बाहेर पडलो.
टाबो हे गाव तस छोटंसंच आहे. एका चांगल्याश्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. ते बनेपर्यंत आम्ही इथल्या गुहेपर्यंत फेरफटका मारून आलो. आता सपाटून भूक लागली होती. सगळेच जेवणावर तुटून पडले. मग बाहेर आलो तर चक्क पाऊस पडत होता. आणि आमचे मारवाडी मित्र त्या पावसात उघड्याने नाचत होते. हे लोक मजा करण्याच्या बाबतीत कहर होते. त्यांना आम्ही सगळ्यांनीच हसून दाद दिली. आम्ही परत गुहेकडे जाऊन गुहा आतून पाहिली. गुहेच्या जवळच एक प्रार्थना कक्ष नव्याने बांधला आहे. तो फारच मोठा आहे आणि बाजूचे आवारदेखील एकदमच प्रशस्त आहे. कक्षाबाहेर बरेच छोटे लामा मोठ्या लामांकडून संथा घेत होते. बघायला मजा आली. त्यांचा बालसुलभ गोंधळ पण चालू होता. आता खोलीवर परतलो व थोडी झोप काढली. मग असेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्हरांड्यात बसून गप्पा मारत होतो. संध्याकाळ झाली होती. खाली रस्त्यावर गावकरी गाड्यांमध्ये बसून कुठेतरी समारंभाला चालले होते. मी बोलता बोलता माझ्या शिरस्त्राणाच्या काचेबद्दल विषय काढला. अक्षयचे म्हणणे होते की इंधनाने पुसल्यास काच स्वच्छ होईल. बाजूच्याच वरांड्यात आमचे मित्र मदिरापान करत बसले होते. मी म्हटलं मग दारू देखील चालू शकेल. मग मित्रांकडून थोडी दारू टीपकागदावर घेऊन काच पुसली. आणि काय आश्चर्य ! काच खूपच स्वच्छ झाली. आता उद्या कळेल कितपत फायदा झाला ते.
एवढ्यात सुंदर मुलींनी भरलेली एक गाडी आमच्या समोर थांबली. आता सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले. पण व्यर्थ ! त्या काही आमच्याइथे रहायला आल्या नाहीत. आता अंधार पडला. आम्ही जेवायला म्हणून खाली गेलो. आधी पाऊण तास बाहेर मस्त थंडीत बसून गप्पाटप्पा केल्या. मग दाबून जेवलो. परत गप्पा मारल्या व मग येऊन झोपलो.
आषाढ कृष्ण चतुर्थी (१३ जुलै) - काजा
आज जरा आरामात उठलो. गेले दोन दिवस पहाटे उठत होतो. आज फक्त पाचपन्नास
किलोमीटरच जायचे होते. वाटेत आज धनकर गुहा बघायची होती. मुख्य रस्ता सोडून
थोडेसेच आत गेल्यावर या गुहेपाशी पोचलो. पण आम्हाला ऐन गुहेपाशीच काम चालू
असल्यामुळे शंभर मीटर तरी अलीकडेच थांबावे लागले. हे अंतर चढत जायचे होते.
कोणालाच त्या विरळ हवेत एवढी इच्छा नव्हती. त्यामुळे दुचाकी वर टांग टाकून
परत निघालो. आता झपाट्याने काजा गाठले. लगेच इंधन भरून घेतले कारण मुंबईला
असताना इथे इंधनाची टंचाई आहे असे समजले होते. आम्ही दुपारच्या जेवणासाठी
गावात गेलो. एका ठिकाणी पहिल्या मजल्यावर एका स्थानिक माणसाचेच उपाहारगृह
होते. तिथे थुकपा चांगला मिळेल अशी आशा होती. पण त्यांनी एकतर तासापेक्षा
जास्त वेळ लावला व शेवटी भरपूर शेवया असलेलेच सूप आणून दिले. त्यात
भाज्यांचा पत्ताच नव्हता. लडाख मधे किती मस्त सूप मिळाले होते. असो. जेवण
झाल्यावर मी आणि अक्षय थोडे बाजारात फिरून आलो. कालपर्यंत शिरस्त्राणाची
काच वर करूनच वापरल्यामुळे माझे ओठ फुटले होते. आज मात्र आमच्या कालच्या
प्रयत्नांमुळे काच व्यवस्थित खाली करून चालवू शकलो. केवढं हायसं वाटलं
होतं. कष्ट पडत होतेच पण तरी काच खाली ठेवता येत होती. ओठांना लावायला मलम
घ्यायला गेलो. दुकानवालीला छोटी डबी पहिजे असं म्हटल्यावर ती थोडी विचारात
पडली. मग तिने एक बदामाच्या आकाराची फक्त दहा रुपयांची स्ट्रॉबेरी चवीची
डबी पुढे केली. थोडे हसायलाच आले पण म्हटले मला चालेल. लाजेपायी उगाच
साठ-सत्तर रुपयांची डबी कोण घेणार. कारण घरी असल्या मलमांच्या सत्राशेसाठ
बाटल्या पडल्या आहेत. आता निवासस्थानी येऊन निवांत झोपलो.
उठल्यावर खिडकीतून नजर टाकली तर स्पिती नदीकाठी एक मोठे मैदान होते व तिथे
समालोचनासहित कबड्डीचे सामने चालू होते. अंघोळ वगैरे करून ताजेतवाने झालो.
दाढी पण केली. आता आम्ही विचारपूस करत करत त्या मैदानात पोचलो. नदीकाठी
एकूणच फार छान वातावरणात हे सामने चालू होते. पंचक्रोशीतल्या शाळांमधील
भरपूर खेळाडू दिसत होते. आम्ही एक सामना पाहिला.

मग गावात परत जायचे असल्यामुळे निघालो. वाटेत एका दुकानात स्पितीचे शीतपेटीला चिकटवायचे लोहचुंबकवाले स्टिकर्स घेतले. इथे हाऊ वुई गॉट लेहड प्रकारचे सदरे नव्हते. त्यामुळे त्यांची खरेदी झाली नाही. हां, गाड्यांना लावायचे ते पताकावाले दोर होते. ते घेतले. गावात पोचल्यावर मस्त रमतगमत फेरफटका मारला. एक बुलेटची दुरुस्ती करणारा तज्ञ एका कोपऱ्यात पहिला. तिथे एक चांगलं हॉटेलही होतं. तिथे एका ठिकाणी भाड्याने द्यायच्या बुलेट ठेवलेल्या दिसल्या. सहज जाऊन विचारले. त्यांचे भाडेही आमच्या गाडी एवढेच होते. आम्ही एक आयफोन ते पेनड्राईव्ह जोडणारी केबलपण शोधत होतो. माझ्या अँड्रॉइड फोनवरून काल-परवा फारच सहजपणे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे असलेल्या केबलने पेनड्राइव्हवर ट्रान्स्फर केले होते. पण माझी केबल आयफोन ला बसेना. म्हणून हा खटाटोप ! पण ही केबल काही तिथे मिळाली नाही. तसं हे शहर खूपच लहान आहे, जरी आमच्या या वारीतले हे मुख्य शहर होते. लडाखचे जसे लेह तसेच हे स्पितीचे. पण लेह खूपच मोठे आहे.
आता परत निवासस्थानी येऊन भोजनगृहात गप्पा मारत बसलो. मग तिथे असलेल्या एकदोन जोडप्यांशी पीन दरी व इतर जागांविषयी गप्पा मारल्या. ते उद्या तिकडे जाणार होते. आम्ही आज तिकडे जाऊ शकलो असतो पण आमच्या नियोजनात ती दरी बसत नव्हती. मग खोलीत जाऊन मित्राच्या मॅकबुकवर अक्षयचे फोटो ट्रान्स्फर करता येतात का ते पाहू लागलो. आधी तर त्याला आयट्यून आहेका हे पाहावे लागले. मग आयट्यून सगळे फोटो एकदम टाकू देईना. या आयफोन ची नाना लफडी ! मी तर कंटाळूनच गेलो. अक्षयला म्हटलं मी जातो जेवायला. थोड्यावेळाने सगळेच खाली आले व झकास जेवलो. अक्षय परत फोटोसाठी झटापट करू लागला. झोपायला आला तेव्हा विचारले तर म्हणाला अर्धवटच झाले. म्हटलं जाऊ दे मरू दे झोप आता. आयफोनचे हे नखरे फार आहेत. पण एक-दोन चांगल्या गोष्टी पण दिसल्या. त्याचं ऊर्जेचे व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे. आणि फोटो तर नेहमीच सरस येतात.
आषाढ कृष्ण पंचमी (१४ जुलै) - लांगजा
आज तसे आरामात उठलो कारण जेमतेम पन्नास एक किलोमीटरच जायचे होते. किंवा आम्हाला तसे वाटले
निवांतपणे आमलेट पाव, पराठा असा जोरदार नाश्ता केला. मग नेहमीप्रमाणे
रपेटीला सुरुवात केली. आज आम्ही लांगजा या ठिकाणी राहणार होतो. उद्या
लोसरला राहायचे होते. जे आमच्या मनालीच्या वाटेवरच होते. त्यामुळे नायक काल
जेव्हा म्हणाला की परवा आपण काजाला इंधनासाठी व जेवायला येऊ, तेव्हा आम्ही
दोघांनी ठरवले होते की आपण उलटे दहा बारा किलोमीटर कशाला यायचे त्यापेक्षा
आपण त्या तिठ्यावरच थांबू. याचं कारण म्हणजे आम्हाला इंधनाचे योग्य
व्यवस्थापन करायचे होते. जेणेकरून दुचाकी परत देताना जास्त इंधन राहणार
नाही. त्यानुसार आम्ही खूपच मोजमाप करून आज इंधन भरले होते. आज टाकी पूर्ण
भरली नव्हती. फक्त दोन लिटरच्या एका बाटलीत इंधन घेतले होते. अडीअडचणीला
असावे म्हणून. नाही वापरले तर आमच्या इतर मंडळींना देऊन टाकले असते कारण ते
मनाली ते चंदिगड जाणार होतेच. चालवायला सुरवात केली आणि लगेचच २ किमी मधेच
तो तिठा आला. म्हणजे १० १२ किमी काही मागे जागे लागणार नाही उद्या. चला
त्या निमित्ताने हा पर्यायही खुला झाला.
कि गुहा लवकरच दृष्टीस पडली. फारच उत्तम दृश्य होते. थोडेसे आकाशाकडे बघत असताना गुहा व त्याच्या मागे उंच पर्वत व त्यावरही निळेशार निरभ्र आकाश !

लवकरच गुहेपाशी देखील पोहोचलो. गुहा तशी चांगली आहे. पण इतर असतात तशीच आहे. एकूणच इथल्या गुहांमध्ये बुद्ध प्रतिमा, जाडजूड ग्रंथ, खाली लालसर जाजम पसरलेले, खांबांना रंगबिरंगी पताका फडकवलेल्या, भरपूर काळोख, वाकूनच जावं लागेल अशा खोल्या, भिंतींवर भिंतभर चितारलेली दृष्य ...असा ठरलेला ढाचा असतो. एक दोन पाहिल्या की पुढच्या पाहायलाच पाहिजेत असं मला तरी वाटत नाही. फक्त मला तिथलं जुनं लाकडी बांधकाम, त्यावर केलेला कोरीव काम हे बघायला आवडतं. आता आम्ही किब्बर या गावाकडे चढू लागलो. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. जरादेखील हिरवळ दिसत नव्हती. त्या उन्हातच एक फिरंगी जोडपे सामान घेऊन वर चढत चालले होते. बहुदा किब्बरला चालले असावेत. फिरंगी लोक काय काय करतील याचा नेम नाही. बराच वेळ वर वर जात राहिल्यावर डावीकडे घळीच्या पलीकडे हिरवळ दिसू लागली. तसेच छोटी छोटी घरं पण दिसू लागली. नायकाची गाडी लावलेली पाहिली तिथेच आमच्या गाड्यापण लावल्या व दोरजेच्या घरात स्थानापन्न झालो.
मुख्य खोलीत भिंतीला लागून गाद्या टाकल्या होत्या. त्याच्या पुढ्यात बैठी लांबलचक टेबले होती. ज्यांना पाहिजे त्यांनी चहा व चहा नकोवाल्या माझ्यासारख्यांनी स्थानिक सफरचंदाचे पेय घेतले. पोट बऱ्यापैकी भरलेलेच असल्यामुळे आम्ही बिस्किटे फार खाल्ली नाहीत. ही मोठीच चूक झाली हे आमच्या नंतर लक्षात आले. त्या इतक्या उंचावरच्या गावात आठवीपर्यंत शाळा आहे हे ऐकून चाटच पडलो. कॉलेजसाठी मात्र त्यांना रामपूर मनाली अशा ठिकाणी जावे लागते. मग थोडा वेळ गच्चीत फिरून आलो. काल रात्री आमचा नायक इथेच येऊन झोपला होता. तो काजाहून रात्री फक्त तेवढ्यासाठी इकडे आला होता व पहाटे परत काजामध्ये आला होता. रात्री इथून आकाशगंगा नक्कीच तुफान दिसली असणार. अर्थात आज रात्री आम्ही ती बघूच. तिथून निघाल्यावर तीनएक किलोमीटर परत आल्यावर आम्ही डावीकडे जाणारा फाटा घेतला. परत डोंगरावर चढत गेलो व नंतर थोड्याश्या सपाट भागावरून गेल्यावर उजवीकडे जाणारा फाटा घेतला. अक्षय आणि काही लोक पुढे असल्यामुळे ते हा फाटा न घेता सरळ पुढे गेले. आम्ही बोंबलून त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते हाकेच्या अंतराच्या पुढे गेले होते. या फाट्याला वळल्यावर एखादा किलोमीटरमधेच एका कड्याच्या टोकाशी पोचलो. इथूनच बरोबर खाली कि गुहा दिसत होती. फारच उत्तम जागा होती. कदाचित इतर मंडळं इथे लोकांना आणतही नसतील. लवकरच चुकलेले फकीर देखील परत येऊन इथे पोचले. मग जोरदार फोटोसेशन झाले.

-
-
मारवाडी बंधूंनी नेहमीप्रमाणे सदरे काढून उघड्याने फोटो काढले. हा खूपच आडबाजूचा भाग होता. त्यामुळे इथे बाकी कोणीच नव्हते. खाली ती गुहा, त्याच्या पलीकडे स्पिती नदी आणि दोघांच्या मधून जाणारा रस्ता... फारच सुंदर दृश्य होते. बराच वेळ तिथे काढून आम्ही परत निघालो. आम्हाला वाटले आता आपण सरळ निवासस्थानी जायचे. पण नायकाचे विचार वेगळे होते. त्याला आम्हाला अजून बिनरस्त्याच्या भागात घेवून जायचे होते. त्यामुळे आम्ही मगाशी चुकलेले फकीर जिकडे गेले होते त्याच दिशेला निघालो. आमच्यातले बरेच लोक तिकडे आले नाहीत. आम्ही काहीतरी पाचच जण पुढे गेलो. जवळपास दहा किलोमीटर पुढे गेल्यावर परत मस्त हिरवळ लागली व भरपूर याक चरताना दिसले.

दोनचार घरे व बाजूला झुळझुळ वाहणारे पाणी देखील होते. एकदम विहंगम दृश्य होते. इथून थोडेसेच पुढे गेल्यावर रस्ता पूर्ण संपला. म्हणजेच आम्ही ताशिगंग या छोट्याशा गावी पोचलो होतो. इथून उजवीकडे दिसणाऱ्या दरीपलीकडे आमचे लांगजा हे निवासस्थान होते. पण तिथे जायला इथून रस्ताच नव्हता. त्यामुळे आम्हाला परत उलटे जाऊन मोठा टल्ला पडणार होता. पण रस्ता बांधणार आहेत अशी माहिती नायकाने दिली. इथे निवांत दहा मिनिटे बसून निघालो.

-
आता प्रचंड भूक लागली होती. वाटेत याक जिथे होते तिथे डावीकडे एक रस्ता
जात होता. हाच रस्ता बहुतेक पुढेमागे लांगजाला वाढवतील. नायकाने त्या
रस्त्यावर अजून एकाला घेऊन पोबारा केला. आम्हाला सांगितले तुम्ही पुढे जा
आम्ही येतोच.
पुढे जाता जाता एकाची दुचाकी बिघडली. मधून मधून चालू होत नव्हती. तेव्हा ते
ढकलत होते. दुरुस्ती वाहन पुढे तिठ्यापाशी होते. म्हणून मी आणि अक्षय पुढे
गेलो. तज्ञ म्हणाला की थोडावेळ थांबून गाडी इथे पोचल्यावर दुरुस्त करू.
आता पोटातले कावळे देखील कोकलून दमले होते. मी म्हणत होतो की उलट दिशेला का
होईना पण किब्बर तीन किलोमीटर वरच आहे. तर तिथे जाऊन दोरजेकडेच जेऊ. पण ते
काही कोणास पसंत पडेना. मग वाहन चालकाच्या लक्षात आले की मारवाड्यांनी
त्याला ठेपले दिले आहेत. पिशवी बाहेर काढली तर तब्बल वीस-पंचवीस होते.
शिवाय कसलातरी लाडू देखील होता. मी तर चांगलाच ताव मारला. आम्ही मारवाडी
बंधूंना नावे ठेवत होतो की हे लोक इथेही खाकरा ठेपले जिलबी काय वाट्टेल ते
खात होते. पण आत्ता त्यांच्यामुळेच जीव वाचला होता. वेळेवर खायला मिळाले
होते. ते सुद्धा भरपूर ! अजूनही ते दुचाकीवाले आले नाहीत उलट आमचा नायकच
पोचला. तो म्हणाला ती गाडी चालूच होत नाहीये तेव्हा तज्ञाला घेऊन मी तिकडे
जातो.
मग मी आणि अक्षय पुढे निघालो. मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळून काजाकडे
निघालो. आता आम्हाला सात-आठ किलोमीटर गेल्यावर परत डावीकडे वळून वर वर चढत
जायचे होते. अक्षयला सरळ रस्ता दिसल्यावर तो वेगाने पुढे निघून गेला. पण
अगदी दोन तीनच किलोमीटर पुढे गेल्यावर तो मला त्रस्त चेहेऱ्याने
रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसला. इतके दिवस आम्ही एकमेकांना धरूनच गाडी
चालवत होतो. कारण दुरुस्ती वाहन कुठे असेल हे नक्की सांगता येत नाही. काही
गरज पडली किंवा अगदी कोणी दरीतच पडला तर निदान साक्षीदार तरी असायला पाहिजे
ना ! जवळ जाऊन पाहतो तर म्हणाला की माझी ऍक्सिलरेटर केबल तुटली आहे.
म्हटलं चला दुरुस्ती वाहनाची किती जबरदस्त गरज असते ते आता कळते आहे. आम्ही
गाडी बाजूला लावून दहा पंधरा मिनीटे वाट बघितली पण आमचे वाहन काही आले
नाही. आम्ही दुचाकीचे अतिरिक्त सामान आणले तर होते. पण ते सगळे दुरुस्ती
वाहनात होते. पण बहुतेक मागे बंद पडलेलीच दुचाकी अजून दुरुस्त झाली नव्हती.
आम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला नदी होती तिकडे जाऊन तिथे एकमेव मोठा दगड
होता त्याच्या आडोशाने बसून राहिलो. गरम होत होते. भूक अजूनही थोडीफार
होतीच. या वेळेस तर मी नेहमी नेतो ते ऊर्जा बार पण नव्हते. अर्धा पाऊण तास
असाच गेला गाडी काही आली नाही.

शेवटी मी म्हटले चल बघूया आपल्याला काही करता येते का. स्क्रू पिळून
गाडीचे आयडलिंग पूर्ण वाढवून ठेवले. आता म्हटलं पहिला गिअर टाकून ठेव, क्लच
दाबून ठेव, गाडी चालू कर आणि क्लच सोड. गाडी पहिल्या गिअरवर चालेल. आपण
असं करत करत सरळ काजाला जाऊ. तसंही आम्हाला वाटलं होतं लांगजाला जायच्या
तिठयापासून काजा सात ते दहा किलोमीटर लांब आहे, तसं नव्हतं. ते फक्त दोन
किलोमीटरवर आहे. गुगलबाबा कधीकधी चुकीच अंतर दाखवतो हे आम्हाला दोन तीन
वेळा जाणवलं होतंच. तर मग काजालाच जाऊन गाडी नीट करून घेऊ. पण ह्या
उपायानेसुद्धा गाडी पुढे जात नव्हती. मग गाडीची हत्यारे बाहेर काढली. विचार
असा होता कि हँडलच्या खाली जिथे केबल अडकवलेली असते, तिथले स्क्रू काढून
केबल हातात किंवा पक्कडीत धरून खेचायची. गाडी चालवता येते. मी माझी
टीव्हीएस मोपेड अशी चालवत असे.. पण ते स्क्रूच काढता येईनात. बहुधा गंजले
असावेत. उगाच जास्त ताकद लावून फिरवले तर त्यांचे माथे बिघडायचे
म्हणजे, खरोखरच त्याच्या डोक्यातील पिळायला दिलेली खोक झिजते आणि मग तो
काढायला तज्ञांना देखील फारच त्रास पडतो. आता काय करायचे याचाच विचार करत
होतो तेवढ्यात मला एक युक्ती सुचली. त्यातला एक पान्हा ऍक्सिलरेटर केबल
ज्या धातूच्या पत्र्याला गोल फिरवते त्या पत्र्याच्या खाली घुसवला. आता
थोडक्यात पूर्ण ऍक्सिलरेट केल्यासारखं झालं. अक्षयला म्हंटलं आता हे जमलं
असेल तर न थांबता सरळ काजाकडे जात राहा. मी येतोच मागून. ही युक्ती एवढी
लागू पडली होती की अक्षय जवळपास चाळीसच्या वेगाने गाडी पळवत होता. तिठ्यावर
आल्यावर तो म्हणू लागला की आपण सरळ निवासस्थानी जाऊ मग रात्री दुरुस्ती
गाडीतून केबल घेऊन बदलून घेऊ. पण मी म्हटले तसे नको काजा जवळच आहे. आपण सरळ
तिकडे जाऊन बदलून घेऊ. दुरुस्ती गाडी कधी येईल सांगता येत नाही कारण ती
पहिली गाडी दुरुस्त झाली का ते देखील आपल्याला माहीत नाही. आणि हे केले ते
बरेच झाले असे नंतर दिसले.
तर आमची जोडगोळी पुन्हा एकदा काजाच्या बाजारात हजर झाली. विचारपूस
करताना अचानक आठवण झाली ती काल बघितलेल्या रस्त्यावरच्या तज्ञाची. मग
दुचाकी घेऊन तिकडे गेलो. तो म्हणाला करून देईन आणि त्याच्याकडे केबलपण आहे.
आता आमच्या नायकाला कळविणे गरजेचे होते. आमचे दोघांचेही फोन लागत नव्हते.
एकूणच या वारीत फक्त भारत संचार निगम चालते असे दिसले होते. आणि बाजारात
एकही पब्लिक फोन नव्हता. तेवढ्यात अक्षयला बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये
सकाळचे जोडपे दिसले ज्यांच्याबरोबर आम्ही पीन दरीबद्दल वार्तालाप केला
होता. त्यांच्याकडे भारत संचार होता हे आम्हाला माहीत होते. त्यांनीही उदार
मनाने तो आम्हाला देऊ केला. काही खाणार आहात का असं विचारल्यावर तर आमचे
डोळेच भरून आले
आमचे नायकाशी बोलणे झाले तेव्हा तो म्हणाला की ती आधीची दुचाकी चालू झालीच
नाही व आम्ही ती दुरुस्ती वाहनात टाकून काजालाच आणत आहोत. काल आयफोनचे
नखरे बघितले होते. आज बुलेटचे पाहीले. बुलेटची केबल बदलायला चक्क टाकी व
पहिले आसन काढून ठेवावे लागते. हे म्हणजे चार आण्याची कोंबडी असला प्रकार
होता. अर्थात त्या तज्ञाने झटपट सराईतपणे काम केले व योग्य तेवढेच पैसे
घेतले. आम्हीच बळेच त्याच्या हातात थोडे जास्त पैसे कोंबले.
आता आम्ही दुचाकी घेऊन परत लांगजाकडे निघालो. परत तिठ्यावर पोचलो तरी आमची दुरुस्ती वाहन किंवा मंडळी काही दिसली नाहीत. आता अंधार पडायला जेमतेम अर्धा तास शिल्लक होता. म्हटलं आपण पुढे जाऊ. आम्ही पुन्हा एकदा घाट चढू लागलो. जरा वेगानेच हाणत होतो. गाव अगदीच दोन किलोमीटर राहिले असताना आम्हाला आमचेच तीन चार लोक दिसले. काय झालं विचारता अजून एकाची गाडी बंद पडली आहे असे कळले. आता बोचरी थंडी पडली होती. अंधारही जवळपास पडलाच होता अगदी शेवटची लालसर छटा आकाशात रेंगाळत होती. मग त्याची दुचाकी तिथेच ठेवून आम्ही सगळे गावात पोचलो. तर शेवटी आमची आजची रपेट तब्बल शंभर वगैरे किलोमीटर्सची झाली.
आजचे निवासस्थान खऱ्या अर्थाने होमस्टे होते. गाव एकूणच छोटे होते. पहिल्या मजल्यावर राहण्याची सोय होती. तळमजल्यावर ते कुटुंब राहत होते. गेल्या गेल्या मस्त चहा झाला. मग मी प्रातर्विधीची सोय बघून आलो. ही म्हणजे चक्क दुमजली खोली होती. आपण पहिल्या मजल्यावर बसायचे व खाली तळमजला पूर्ण खत होण्यासाठी वापरलेला. मग लोकांना ही माहिती दिली. हो उगाच रात्रीच्या अंधारात कोणी धडपडायला नको. थोड्याच वेळात नायक आणि दुरुस्तीची गाडी येऊन पोचली. त्यांनी आधीची दुचाकी शेवटी गाडीत टाकून काजाला नेली. तिथे आमच्या कालच्या निवासस्थानापाशी सोडली. त्यामुळे ते आम्हाला वाटेत सापडले नाहीत कारण ते निवासस्थान बाजारापासून लांब होते. मग ते इकडे आले. वाटेत त्यांना दुसरी दुचाकी बंद पडलेली दिसली. आता आमचा तज्ञ ती दुरुस्त करत होता. थोडक्यात आजचा दिवस दुचाकीसाठी वाईट होता. आमच्या चक्क तीन गाड्या आज बिघडल्या. पहिल्या गाडीचं तर म्हणे पूर्ण वायरिंगच स्फोट होऊन जळून गेलं. म्हणजे आता ती गाडी दुरुस्त होणारच नाही की काय? नायक म्हणाला की मनालीहून येणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या चालकाला वायरिंग आणायला सांगितले आहे. उद्या सकाळी काजाला पोचेल. हे जरा अवघडच वाटत होते. पण आम्ही काळजी बाजूला ठेऊन समोर आलेल्या गरम गरम जेवणावर ताव मारला. गप्पा गोष्टी करता करता कोणीतरी चेष्टेत म्हणालं की अक्षय आणि मला एक खोली द्या. मग मी पण म्हटले हो नाहीतरी आम्ही मधुचंद्रावर आहोत. जेवल्यावर मी दहा-पंधरा मिनिटे बाहेर आकाशगंगा बघत बसलो. कृत्रिम प्रकाश अजिबातच नसल्यामुळे आकाश तारकांनी खचाखच भरलेले दिसत होते. आकाशगंगा अगदी सहजच कळत होती. लोकांना थोडी तारका, आकाशगंगा, नक्षत्र यांची माहिती दिली. आम्ही झोपायला जाईपर्यंतही दुसरी गाडी दुरुस्त होऊन आली नव्हती. उद्याचा दिवस फारच खडतर जातो की काय असे वाटायला लागले. दुसरी गाडी जर चालू झाली नाही तर दोन दोन गाड्या काही दुरुस्ती वाहनात टाकून मनालीला नेता आल्या नसत्या. असो. उद्याचं उद्या बघू. पांघरायला म्हणून चक्क गादीच होती. थंडी ही तशीच होती म्हणा ! मस्त गुरफटून घेऊन झोपून गेलो.
आषाढ कृष्ण षष्ठी (१५ जुलै) - लोसर
आज पहाटेपासूनच दुसऱ्या गाडीशी झटापट चालू होती. आमचा नाश्ता होईपर्यंत तज्ञाने दुसरी गाडी दुरुस्त करून आणली. सगळ्यांच्या मनात हुश्श झाले. आता आम्ही वेगाने कोमिक या गावी निघालो. हे गाव म्हणे जगातील सगळ्यात उंचावरचे गाडी जाण्यासारखे गाव आहे. इथेदेखील एक छान गुहा होती. आत जाऊन बघतो तर गुहेमध्ये मुख्य दालनात ती प्रसिद्ध लामा लोकांची रांगोळी काढणे चालू होते. खरं तर काही उत्सव वगैरे नव्हता मग हे कसे काय असा प्रश्न पडला. पण आजूबाजूला बघितल्यावर उत्तर मिळाले. नॅट जिओची लोकं येथे चित्रीकरण करायला आली होती. गावात समोरासमोर एकूण दोन गुहा होत्या. एक जुनी व एक नवी. ही रांगोळी काढण्याचे काम नवीन गुहेत चालू होते. जुन्या गुहेमध्ये बर्फाळ प्रदेशात सापडणारा बिबळ्या पेंढा भरून ठेवला होता. गुहेबाहेर समोर बर्फाच्छादित शिखरांची रांगच रांग होती. फोटोसाठी एकदम उत्तम जागा.

-
मारवाडी बंधूंनी अर्थातच उघड्याने फोटोसेशन केले. काही लोकांनी तिथे आलेल्या स्थानिक माणसाकडून जीवाश्म विकत घेतले. काही काही खूपच सुंदर होते. हिमालय बनायच्याआधी इथे समुद्र होता याची खात्री पटली. मग त्यावर अर्थातच जोरदार चर्चा झाली. कारण काही लोक अनभिज्ञ होतेच. तेवढ्यात भारतीय सैनिकांनी भरलेला एक ट्रक आला. यातसुद्धा काही महिला होत्या. एकूणच सीमेवरील भागात महिला सैनिकही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सज्ज असतात असे दिसले. कारण आम्ही चिटकूलला पण महिला सैनिक पाहिल्या होत्या. आज सगळ्यांच्या हातात मशीनगन्स होत्या. तेवढ्यात एकाने नवीन गुहेमागील पर्वतावर नॅट जिओच्या माणसांनी कॅम्प ठोकला आहे असे सांगितले. आमचा आधी विश्वासच बसला नाही. गावापासून एवढ्या दूर, एवढ्या वरती कुठेतरी खबदाडात कोण कशाला रहायची व्यवस्था करेल. पण जरा निरखून पाहिले तर खरच एक माणूस डोक्यावर मोठं ओझं घेऊन त्या डोंगरावर चढत होता. त्याचा अगदी ठिपका दिसत होता. तो त्यांच्यासाठी रसद घेऊन चाललेला होता असे समजले. आम्ही तर तोंडात बोटेच घातली. ही फिरंगी लोकं जरा वेडीच असतात. असो.
आता आम्ही इथून जगातल्या सगळ्यात उंचावरच्या टपालघराला भेट द्यायला निघालो. लवकरच हिक्कीमला पोचलो. पण रस्ता वर आणि गाव शंभरएक फूट खाली. या विरळ वातावरणात कोणी आधी खाली उतरायला तयार नव्हते. अपवाद अर्थातच मारवाडी बंधूंचा. यांचा उत्साह वर्णनातीत होता. ते धडाधड खाली उतरत सुटले. त्यांच्याकडे बघताना असे लक्षात आले की टपालघर मागच्या वळणाच्या खाली आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले इथून जास्त खाली जावे लागणार नाहीये. मग आम्ही देखील पटापट उतरलो. नायकाने सगळ्यांसाठी कार्ड आणली होती. प्रत्येकाला एक-एक दोन-दोन अशी कार्ड पाच रुपयाच्या स्टॅम्पसहित वाटली. मग त्यावर पत्ता लिहिणे, स्टॅम्प चिकटवणे, पेटीत टाकताना फोटो काढणे असे सगळे सोपस्कार यथासांग झाले.

फारच धमाल आली. पण गाडीपाशी चढून जाताना नाकी नऊ आले. जबरदस्त धाप लागत
होती. ऊनही मी म्हणत होते. म्हणजे हवा थंड होती, पण उन्हाला आडोसा नव्हता.
आता आम्ही जे निघालो ते थेट काजालाच जाऊन थांबलो. जवळपास एक वाजला होता.
आमच्या कालच्या निवासस्थानाच्या अलीकडेच एक निवांत हॉटेल होते. तिथे आम्ही
गप्पांचा फड जमवला. वाहन दुरुस्तीवाले कालच्या वायरिंग जळालेल्या गाडीशी
लढू लागले. काल वाटलं होतं त्याप्रमाणेच मनालीहून वायरिंग आलं नव्हतं.
प्रकरण अवघडच वाटत होतं पण तज्ञाला खूपच आशा होती काहीतरी जुगाड करता येईलच
अशी. आम्ही निवांतपणे जेवत होतो. मग हात धुतल्यावर तिथेच लिहिल्यानुसार
जगातल्या सर्वात उंचावरच्या एअर ड्रायरवर हात कोरडे केले
जवळपास दोन अडीच तासानंतर गाडी दुरुस्त झाली आहे अशी बातमी कानावर आली व
सगळेच बाहेर गेलो. बघतो तर गाडी खरोखरच चालु होत होती आणि चालवताही येत
होती. तज्ञांच्या हिकमतीची कमालच म्हटली पाहिजे.
आता मात्र आम्ही घाई केली. झटपट इंधन भरले व लगेच लोसर या पुढील निवासस्थानाकडे कूच केले. हा रस्ता तसा सपाटच होता त्यामुळे वेगाने मार्गक्रमण करता आले. अंधार पडता पडता आम्ही इच्छितस्थळी पोचलो. आजचे पण होमस्टे होते. इथे म्हणे आमिर खान येऊन राहिला होता. हॉटेल छानच होतं पण मग कळले की आम्हा दोघांना आणि अजून दोन जणांना दुसऱ्या हॉटेलवर जावे लागणार आहे. मग म्हटले चला आपण आधी तिकडे जाऊन सामान टाकू. ते हॉटेल मात्र बंडल होते. बहुदा ते बंदच पडायला आले असावे. आधी पाणी येत नव्हते. मग टॉवेल साबण मागितला तर दोन टॉवेल आणून दिले व म्हणतो की एक टॉवेल एका खोलीला तेव्हा दुसरा तुम्ही दुसऱ्या खोलीत द्या. हा म्हणजे अगदीच कहर झाला. आणि त्यांनी शेवटपर्यंत खरंच अजून टॉवेल आणून दिले नाहीत. आमच्या खोलीतून समोर नजारा मात्र फारच सुंदर होता. खिडकी पलीकडे हिरवी शेते, त्यापलीकडे नदी आणि त्याच्या पलीकडे उंच पर्वत. सगळीकडे निरव शांतता. आम्ही थोडी झोप काढली. उठल्यावर लक्षात आले की इंधनाची बाटली खोगीरात नाहीये. पहिल्या हॉटेलपाशी थांबलो तेव्हा ती नक्कीच होती. म्हणजे कदाचित वाटेत पडली असावी. अंधार पडल्यानंतर पहिल्या हॉटेलमध्ये गेलो. जाताना बाटली दिसते आहे का याचा शोध घेत गेलो. पण मिळाली नाही. माझा तर दावा असाच होता की पहिल्या हॉटेलपाशी जेव्हा थांबलो आणि आत जाऊन खोल्या बघून आलो तेवढ्यात कोणीतरी ती चोरली. पण आता काय करणार म्हणा. अर्थात ती अतिरिक्त इंधनाचीच होती. त्यामुळे एवढा प्रश्न नव्हता. आमची जेवायची व्यवस्था तिकडेच होती हे बरेच झाले. कारण त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये चहा मिळायची देखील मारामार होती. इथले वातावरण मात्र फारच मस्त उबदार होते. आजचे जेवणाआधीचे दारूकाम आणि गप्पा मस्त चालू होत्या. नंतरचे जेवणही छान होते. जेवण झाल्यावर मात्र लगेचच आम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊन झोपी गेलो. मी थोड्या वेळाने काही कारणासाठी उठलो होतो. तेव्हा बाहेर जाऊन दहा मिनिटे आकाश पाहून घेतले.
आषाढ कृष्ण सप्तमी (१६ जुलै) - चंद्रताल
आज निवांतपणे उठून पहिल्या हॉटेलवर चविष्ट पराठे आणि आम्लेट पाव याचा समाचार घेतला. मग मजल दरमजल करत निघालो. आज फार अंतर खरंच कापायचे नव्हते. थोड्याच वेळात सुंदर हिरवागार घाट सुरू झाला. हाच तो कुंझुम घाट. आमच्या या वारीतला सगळ्यात उंच घाट. घाटाच्या टोकावर एक नेहमीप्रमाणे देवीचे देऊळ आहे. फक्त हे देऊळ आणि आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी मोठा होता. उंची काहीतरी पंधरा हजार पाचशे आहे. इथल्या हिरवळीवर याक चरत होते. अक्षय त्यांच्यापाठोपाठ फिरत होता. मी दुचाकीवर बसून होतो. चारी बाजूला पर्वत, त्यांची हिमाच्छादित शिखरे आणि शांतता.

-
हे दृश्य आता इतकं सवयीचं झालं होतं की मुंबईत परतल्यावर त्या काँक्रीटच्या जंगलात कसं वाटेल याचा विचारही करवेना. अर्धा-पाऊण तास इथे काढल्यावर आम्ही दरी उतरू लागलो. रस्ता फारच अरुंद आणि घसरडा होता. त्यामुळे गाडी सांभाळून चालवावी लागत होती. अर्धा घाट उतरल्यावर एक आणखीनच चिंचोळा रस्ता उजवीकडे जात होता. हाच आम्हाला त्या प्रसिद्ध चंद्रतालकडे नेणार होता. मी हे ठिकाण मनात व्यवस्थित नोंदवून ठेवले. तसेच फोटोही काढून ठेवला. आम्हा दोघांना उद्या एकटेच या वाटेने परत यायचे होते. खरतर वारी ठरली त्यावेळेस टाबोला थांबायचे ठरले नव्हते. आमची तिकिटे काढून झाली व नंतर नायक म्हणाला की रस्ता खडतर असल्यामुळे टाबोला मुक्काम करावा असे स्थानिकांनी कळवले आहे. त्यामुळे आपला मनालीचा मुक्काम दोन वरुन एका रात्री वर आला आहे. म्हणजेच आम्हा दोघांना उद्या मनाली गाठली की लगेच संध्याकाळची बस पकडून दिल्लीला जायचे होते. त्यामुळे आमचे नियोजन असे होते की उद्या भल्या पहाटे सव्वापाचला चालू पडायचे. सात तास नक्कीच लागतील. तेव्हा एक वाजेपर्यंत मनालीमधे पोचल्यावर गाड्या परत देऊन होईपर्यंत तीन-साडेतीन तर सहज होतील. मग सहाची बस पकडायची होती. आणि हे सगळे अंतर आम्हाला एकट्यानेच पार करायचे होते. कारण बाकी मंडळी उशिरा निघणार होती. ती मनालीमधेच राहणारही होती. परवा ती मंडळी चंडीगडला जाऊन विमान पकडणार होती. त्यामुळे आमच्या बरोबर दुरुस्ती वाहनदेखील असणार नव्हते. म्हणजे पहिल्या दिवशी जसे आम्ही एकटेच होतो तसेच उद्याही. तो चिंचोळा मार्ग म्हणजे जेमतेम एक सोळा आसनांची बस जाऊ शकेल एवढाच होता. मोठी 52 आसनांची बस तर जाऊच शकली नसती. एकदोन थोडेसे खडतर ओढे पार करावे लागले आणि उद्या काय वाढून ठेवले आहे याची चुणूक मिळाली. बारा साडेबारापर्यंत मुक्कामी पोहोचलो. आजचे देखील तंबू उत्तम स्थितीतले होते. गेल्या गेल्या गरम गरम शेवया खायला मिळाल्या. तंबूची जागा चक्क नदीच्या पात्रात होती. आत्ता पात्र कोरडे होते. पण नंतर जेव्हा केव्हा पाऊस पडत असेल तेव्हा हा सगळा भाग पाण्याखाली जात असणार. येताना पादत्राणे ओढ्यात भिजल्यामुळे आल्या आल्या गोष्टी वाळत टाकल्या. आकाश एकदम निरभ्र होते. तेव्हा लगेच चंद्रताल वर जाऊन यावे असे ठरले.

थोड्याच वेळात गाड्या घेऊन निघालो. वाटेत एक बऱ्यापैकी दम काढणारा ओढा आहे असे कळले होते. त्यामुळे एकेकट्याने आपापली गाडी घेऊन जायचे ठरवले. त्या ओढ्यातून जाताना थोडे कष्ट पडलेच. पण नंतर बऱ्यापैकी सोपा रस्ता होता. तुरळक लोक चालत जाताना दिसत होते. त्यातल्या दोन मुलींनी अक्षयाला थांबवले व वाहन तळापर्यंत सोडण्याची विनंती केली. मग त्या दोघी अक्षयच्या मागे व त्यांचा भाऊ माझ्या मागे असे आम्ही पुढे निघालो. मंडळी मुंबईचीच होती व परवा इथूनच लडाखला जाणार होती. वाहनतळावरून पुढे अडीच किलोमीटर चालत जावे लागते. उंचावरील ठिकाण असल्यामुळे चालताना दम लागू शकला असता म्हणून सावकाश चालत होतो. पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर होता की अक्षय पळतपळत एका टेकडीवर चढला. त्याला वाटले त्या टेकडीवरून तलाव दिसेल. पण त्याच्या पुढच्या टेकडीवर जेव्हा आम्ही चढलो तेव्हा डावीकडे एक छोटा तलाव व उजवीकडे चंद्रताल दिसू लागला. चंद्रतालचे निळेशार पाणी पाहून डोळे निवले.
चंद्रतालच्या काठाकाठाने चालायला छोटी पायवाट आहे. मी आणि अक्षय वरून फोटो काढून झाल्यावर खाली धावत सुटलो. सह्याद्रीतल्या भ्रमंतीचा या धावण्यासाठी चांगलाच उपयोग झाला. सगळ्यांच्या आधी आम्ही खाली पोचलो. आणि त्या सुंदर निळ्या पाण्यात पाय बुडवून फिरू लागलो. तिथे सुरुवातीला तर चक्क पुळण आहे. अचानक आमच्या दोघांच्या मनात पाण्यात डुबकी मारायचा विचार बळावला. पाणी तर गोठवणारे होते. पण बाहेरील वातावरण स्वच्छ आणि उबदार होते. कारण आभाळ वगैरे काही आले नव्हते. की पाऊस पडला नव्हता. इतकी योग्य संधी पुन्हा आली नसती. मग काय ! कपडे काढून पाण्यात सूर मारला. लगेचच लक्षात आले की हालचाल केली नाही तर नुसते डुंबता येणार नाहीच. अंगात उष्णता येण्याकरता जोरजोरात हातपाय हलवून पोहणे गरजेचे होते. एक छोटीशीच गोलाकार फेरी मारून आलो व बाहेर पडलो. उगाच फार वेळ पोहत राहण्याचा धोका पत्करण्यात अर्थ नव्हता.

-
-
-
बाहेर येऊन कपडे चढवून आम्ही उजव्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने चालू लागलो. काही ठिकाणी पायाखाली मखमली हिरवळ होती. तर काही ठिकाणी काटेरीपण होती. आम्ही अनवाणी चालत होतो. काय तुफान मजा येत होती. पाण्याचा तळ दोन फुटांपर्यंत अगदी सहज दिसत होता. त्या वातावरणात खूप वेळ फिरत राहिलो. बरेच फोटो काढले. मग पुन्हा पुळणीवर येऊन सगळ्या मंडळींबरोबर फोटोसेशन झाले. इथून उडी मार, अशीच मार, पाय असाच वर घे, हात असेच वर फेक, डोकं मागे झुकू दे.. ! काय नि काय ! तिथून हलावेसे अजिबात वाटत नव्हते. आणि निसर्गाने पण चांगलीच साथ दिली होती. पण अंधार पडायच्या आत निवासस्थानी परतणे अत्यंत गरजेचे होते. तेव्हां नाइलाजाने आम्ही सगळे परत निघालो. आजचा दिवस अर्थातच या पूर्ण वारी मधला सगळ्यात उच्च आनंदाचा दिवस ठरला. दुसरा सगळ्यात चांगला दिवस म्हणजे सांगला आणि चिटकूलला गेलो होतो तो. येताना परत त्या मगाचच्याच मुली आणि त्यांच्या भावाला आम्ही गाडीवरून वाटेत लागणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी सोडले. त्या मुलींवरून अक्षयला तलावावर व निवासस्थानीदेखील भरपूर चिडवण्यात आले हे सांगणे न लगे !
आता आम्ही तंबूबाहेर हिरवळीवर गप्पांचा फड नेहमीप्रमाणे चालू केला. आजची संध्याकाळ फारच सुंदर सोनेरी पण मनाला काहूर लावणारी होती. भोवतालचा अत्यंत सुंदर निसर्ग, ते पर्वत, त्यांच्यावरील ते बर्फ, दगडगोट्यांनी आणि पांढऱ्या वाळूने भरलेले नदीचे पात्र, स्तब्ध शांतता, हळूहळू येणारी संध्याकाळ आणि मग अंधार ! एक वेगळच वातावरण तयार झालं होतं. थंडी चांगलीच पडली होती. बरीच मंडळी कानटोपी हातमोजे पायमोजे चढवून बसली होती. मला एवढी थंडी वाजत नाही त्यामुळे मी बराच वेळ सदऱ्यावरच होतो. मला वाटतं आम्हाला खूपच भूक लागली होती. आणि जेवायला अजून वेळ होता त्यामुळे आम्ही परत शेवयांवर ताव मारला.
आता अंधारही पडला होता आणि वारादेखील जोराचा सुटला होता. त्यामुळे चांगलीच थंडी वाजू लागली. मग पेयपानाचा कार्यक्रम एका तंबूत सुरू झाला. आज पहिल्यापासूनच गाणी म्हणायला सुरुवात झाली. पहिल्यांदा अर्थातच किशोरकुमार आणि मग इतर. नायकाकडे एक माईक होता त्यामुळे सगळ्यांनी त्यावर आपला आवाज साफ करून घेतला. वातावरण जबरदस्त भारून टाकणारे झाले होते. वारी बऱ्यापैकी संपत आली होती. आम्ही तर उद्या यांना सोडून पुढे निघून जाणार होतो. एकूणच जोरदार मैफिल रंगली होती. मी पण आज दो घुंट मुझे भी पिला दे शराबी असं म्हणत मोजून दोन घोट घेतले. आता जेवण तयार आहे अशी बातमी आली. मी आणि अक्षय दहा-पंधरा मिनिटांनंतर जेवायला गेलो कारण आम्हाला लवकर झोपायचे होते. आमचं जेवण होईस्तोवर इतर पण जेवायला आले. आता आम्ही त्यांचा निरोप घेतला. उद्या सकाळी सगळे उठले असतीलच असं सांगता येत नाही. तंबूत येऊन पावणे पाचचा गजर लावून झोपी गेलो. झोपायच्या आधी सॅकमधील सगळं सामान पहिल्या दिवशी भरलं होतं तसंच खोगीरात भरून टाकल. आता उद्या काय होतय, वेळेत पोचतो की नाही त्याची चिंता होती. कारण याच दिवशी सगळ्यात जास्त ओढे लागणार होते. त्यामुळे कसोटीचे क्षण नेमके शेवटच्या दिवशी वाढून ठेवले होते.
आषाढ कृष्ण अष्टमी (१७ जुलै) - मनाली
गजर वाजायच्या आधीच उठलो. हे माझं नेहमीचं आहे. ज्यावेळेचा गजर लावला असेल त्याच्या पाच मिनिटे आधीच मला जाग येते. सव्वापाचला आम्ही दोघे तंबूबाहेर होतो. निघणारच होतो. इतक्यात ब्रेड बटर जॅमचा नाश्ता तयार आहे असे कळले म्हणून तिकडे गेलो. खाणं आणि चहा पिणं झालं तोपर्यंत दोन-तीन जण देखील खायला आले होते. हे लोकही सहा वाजेपर्यंत निघणारच होते. म्हणूनच नाश्ता तयार होता. पण ते निघतीलच याची खात्री नव्हती. आणि ते तसे रमतगमत येणार हे नक्की होतं. साडेपाचला आम्ही सुटलो. पाऊण एक तास फाट्याला पोचायला लागेल अस गृहीत धरलं होतं पण आम्ही पंचवीस मिनीटांतच तिथे पोचलो. चांगलाच हुरूप आला. बतलला एक चांगला ढाबा आहे असं कळलं होतं. ढाबा इतक्या पहाटे चक्क उघडला होता व तिथला मुख्य माणूस बाहेर उभा राहून हात करत होता. पण अर्थातच एवढ्या पहाटे खायचा संबंध नव्हता. त्याला हात करून आम्ही पुढे सुटलो. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. एकही गाडी दिसत नव्हती. नसणारच म्हणा ! इतक्या पहाटे कोण कशाला निघेल? आमच्या डाव्या बाजूला चिनाब नदी प्रचंड रोरावत होती. आज जरा जास्तच फेसाळ पाणी दिसत होते. गेले दोन दिवस आम्हाला निरोप येत होते की मनालीच्या आसपास प्रचंड पाऊस पडतो आहे. पर्यटक दोन दिवस मनालीतच अडकून पडले आहेत. म्हणजे अगदी दुचाकी चालवणारे देखील. त्यामुळे नदीला जास्त पाणी असणे स्वाभाविक होते. रस्त्यावरती इतके दगडधोंडे होते की याला रस्ता का म्हणायचे हा प्रश्न होता. आज मी या दगडधोंड्यातून किती वेगाने गाडी हाकत होतो. आणि तरी कुठे डगमगलो देखील नाही. आणि लडाखला मात्र चांगल्या डांबरी रस्त्यावर असलेल्या एका छोट्या दगडावरून फिरकी घेऊन पाय मोडला होता. नशीब दुसरे काय ! माझी स्पिती वारी त्यावेळेस होणार नव्हती म्हणूनच तसे घडले. स्पिती प्रवास लडाखच्या मानाने खडतर होता. कदाचित शारीरिक श्रम खूपच जास्त झाले असते जर मागच्या वेळेस लडाखच्या पाठोपाठ स्पिती केली असती तर. म्हणूनच कदाचित मागच्या वेळेस मला पाडून छोटेसे फ्रॅक्चर देऊन नशिबाने मला दोन्ही पाठोपाठ करू दिल्या नाहीत. असो. जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणायचे.
आम्ही दणादण गाडी पळवत होतो. आणि एक भलामोठा ओढा सरळ रस्त्यावर येऊन रस्त्यावरूनच पंचवीस-तीस फुट वाहत होता. याला तुफानी पाणी होते. आणि दगड धोंडे ही भरपूर होते. अक्षयने आधी गाडी टाकायची व नंतर मी असे ठरवले. कारण त्याला बुलेटची सवय आहे. महत्प्रयासाने तो ओढा पार करून गेला. मग मीही जवळपास त्याच जागेवरून माझी गाडी पलीकडे नेली. सुटलो एका भयानक ओढ्यातून ! एकूण सतरा ओढे वगैरे आहेत असे नायकाने सांगितले होते. पुढचे ओढेही असेच असतील तर आज काही आम्ही वेळेत पोचणार नाही असे वाटले. आणि आता बारीक बारीक पाऊस सुरु झाला. झटपट अंगावरती पावसाळी पोशाख चढवला. पाऊस जोराचा पडू नये अशी खूप इच्छा होती. पण समोर दरीच्या तोंडावर चांगलेच ढग जमा दिसत होते. थोड्या वेळाने छतडू आले. इथल्या धाब्यावरील लोकांनी आम्हाला थांबवले. ते म्हणाले काल रात्रीपासून आम्ही इथेच अडकलो आहोत. आमची गाडी मनालीहून येताना इथून दोन ओढे अलीकडे अडकली. ओढ्यांना खूप पाणी आहे. आणि एक ट्रक रस्त्यातच आडवा पडला आहे. त्यामुळे गाडी पुढे येऊ शकली नाही. आम्ही चालत या धाब्यावर पोचलो व रात्रभर इथेच आहोत. आमच्या बरोबर एक लहान मूल आहे. त्याचे दूध आणि खाणे गाडीत अडकले आहे. तुम्ही आमच्या माणसाला तुमच्या बरोबर घेऊन जा आणि आमच्या गाडीपाशी सोडा. मग तो ते खाणे घेऊन परत इकडे येईल. तो तुम्हाला ओढा पार करायला मदत करेल.
मग त्याला अक्षयच्या गाडीवर बसवून पुढे नेले. लोक एवढ्या तान्ह्या मुलांना घेऊन कशाला इकडे येतात काही कळत नाही. तो धाबा इतका छोटा होता की त्या माणसांना झोपायला देखील जागा मिळाली नसेल आणि अंथरूण-पांघरूण तर सोडूनच द्या. आता परत धो धो वाहणारा एक ओढा आडवा आला. त्या माणसाला विचारले तर टाका डावीकडून असे म्हणाला. तो काल तिथूनच गेला असल्यामुळे त्याला माहीत असेल असे आम्ही गृहीत धरले. अक्षयने गाडी घातली पण डाव्या बाजूने जाणे फारच त्रासदायक ठरले. एकदम मोठ्या खड्ड्यातच गाडी गेली. लगेच पुढे धोंडे पण होते. त्यामुळे गाडी निघेना. मग मी त्याची गाडी मागून ढकलली. तीन-चार वेळा चांगलाच जोर लावावा लागला. विरळ हवेमुळे धाप लागत होती. कशीबशी गाडी बाहेर काढली. हे सगळं करत असताना मला उजवीकडून जास्त सोपं आहे असं दिसत होतं. मग मी माझी गाडी उजवीकडे घातली. इथून देखील कष्ट पडले पण गाडी जास्त ढकलावी लागली नाही. गुडघ्यापर्यंत पाय तर कधीच ओले झाले होते. सकाळी सकाळी फाट्यावर पोहोचायच्या आधीच. तेव्हापासून बुटात पाणी शिरलं होतं ते तसच होतं. पाय एकदम गारठून गेले होते. पण ते पायमोजे काढून पिळणे प्रत्येक ओढ्याच्या वेळेस करता येणे शक्यच नव्हते. आणि माझे बूट ओलेगच्च राहिलेच असते. आता एकदम मनालीमधेच. अजून दोन-पाच किलोमीटर गेल्यावर एका धाब्यावर पोचलो. इथे बरेच बायकर्स दिसले. त्यांनी आम्हाला लगेच विचारले की पुढे किती खतरनाक ओढे आहेत चंद्रतालच्या दिशेला? म्हटलं बरेच आहेत. ते थोडे घाबरल्यासारखे दिसले. तेव्हाच आम्हाला कळून चुकले की आम्हाला अजून खतरनाक ओढे पुढे वाढून ठेवले आहेत. इथे उजवीकडे दरी आणि पलीकडे असलेल्या पर्वतावर मखमली आच्छादन आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांची फुले उमललेली दिसली. आत्तापर्यंत असा मखमल ल्यालेला जांभळटसर रंगाचा पर्वत पाहीला नव्हता. खूपच सुंदर दृष्य होते. म्हणून फोटोसाठी पाचच मिनिटे थांबूया असे ठरवले.

-
-
इथे आम्ही त्या माणसाला सोडले. इथून थोडेसेच पुढे गेल्यावर तो उलटलेला
ट्रक दिसला आणि त्याच्या अलीकडे पलीकडे अडकलेल्या चारचाकी देखील दिसल्या.
नशिबाने दुचाकी जाईल एवढी जागा बाजूनी होती. हो इथे रस्ता इतका अरुंद असतो
की दुचाकी देखील कदाचित जायला जागा राहणार नाही असे होऊ शकते. पण इथे
आपल्या मुंबई पुण्यासारखे कुठेही गाड्या घुसवून सगळ्याच प्रकारची वाहने
अडकून पडतील याची दक्षता घेत नाहीत. उलट नीट रस्त्याच्या डाव्याकडेला वाहन
अडचण होणार नाही असे लावून शांतपणे वाट बघतात. याच ट्रकच्या पलीकडे त्या
माणसाची गाडी होती. चला म्हणजे आता तो त्या तान्ह्या बाळासाठी दूध घेऊन
त्या बायकर्स बरोबर परत आपल्या मुक्कामी पोहोचला असता. आम्ही अजून थोडेसे
पुढे गेल्यावर डावीकडच्या वळणावर एक मोठा धबधबा रस्त्यावर कोसळतो आहे असे
दिसले. ते वळण अजून शंभर एक मीटर अंतरावर होते. आणि पलीकडच्या बाजूने एक
मोठा ट्रक या दिशेला येताना दिसत होता. अक्षयला म्हटले चल वेगाने पळव. तो
ट्रक नक्कीच त्या धबधब्यात अडकणार आणि आपली गोची करणार. पण दुर्दैवाने तो
ट्रक आधी पोचला आणि नेमका ओढ्याच्या मध्यातच सगळा रस्ता अडवून स्वतः अडकला.
आम्हाला जायला जागाच दिसत नव्हती. तरीही डाव्या बाजूने अक्षयने गाडी
घातली. मला तर कळतच नव्हते की तिथे कुठे जागा आहे. कारण तो धबधबा चक्क
चालकाच्या सीटवरच पडत होता. पण अक्षयच्या अंगात मुरारबाजी शिरला होता
बहुतेक. अब आर या पार... मनाली पहूँचकेही रहेगा टाईम पे ! जराही न थांबता
त्याने तिथे गाडी घातली. गाडी घातली पण लगेच अडकलीच. खाली खडकावर चासी
आपटलीच. खांद्यावरती पाणी पडत होते. मग परत मी ढकलायचे आणि त्याने गाडीची
ताकद वापरायची हा उद्योग चालू केला. सात-आठ वेळा प्रयत्न केल्यानंतर गाडी
इंच इंच भूमी लढवत ट्रकच्या पलीकडे बाहेर पडली. ट्रकच्या बाजूला जागा एवढी
कमी होती की गाडीचं पदसंरक्षक एकतर ट्रकला घासायचं किंवा बाजूच्या दगडाला.
शेवटी एकदाची अक्षयची गाडी पलीकडे गेली. दहा पंधरा मिनिटेतरी सहज लागली
असतील सगळ्या द्राविडी प्राणायामाला. गाडीच्या सायलेन्सर मध्ये पाणी जाऊन
गाडी बंद कशी पडली नाही याचे फारच आश्चर्य वाटले. अक्षयने मग मुद्दाम पाच
मिनिटे गाडी घूरघूर केली. पुन्हा सगळा उपदव्याप माझ्या गाडीसाठी करण्यात
आला. पण आता आम्ही सरावलो होतो. नाटकातली आमची भूमिका प्रत्येकाला माहीत
होती. इतके की अगदी कोणत्या ठिकाणी कोणी काय शिवी हासडायची तेही लक्षात
होते
अक्षयने चालवायची आणि मी ढकलायची. दोघांच्या गाड्या पलीकडे नेऊन
पोचवल्यावर आम्ही चांगलेच दमलो होतो. इथे अक्षयने त्याचे गमबूट काढून
पायमोजे पिळले. तुम्हाला आठवत असेल तर पहा. हे गमबूट त्याने लडाखवारीत विकत
घेतले होते चांगलाला जाताना. ते त्याने जपून घरी नेले होते. मी पण
तेंव्हाच घेतले होते पण जागेअभावी मनालीत सोडून दिले होते. माझे आत्ता
स्पोर्ट्स शूज होते. त्यामूळे मी मात्र ते टाळले. दहा मिनिटे विश्रांती
घेतल्यावर परत पुढे निघालो.

हा खतरनाक ओढा पार केल्यावर पुढचे ओढे आम्ही चिल्लरमध्ये पार केले. लवकरच गमडूला पोचलो. इथल्या फाट्यावर समोरच टेकाडावर नाश्त्यासाठी उपाहारगृह दिसले. भूक तर चांगलीच लागली होती. साडेनऊ वाजता आम्ही इथे पोचलो होतो. वर जाऊन झकासपैकी पराठा आणि गाडग्यात लावलेले कवडी दही खाल्ले. ऑम्लेट-पाव देखील चापण्यात आला. आणि वर गरम गरम ताजे दूध प्यायले. सगळा शीण एकदम निघून गेला. आता पाऊस पूर्ण थांबला होता व ऊन पडले होते. ज्या दरीतून आम्ही बाहेर पडलो ती अतिशय विलोभनीय दिसत होती. तिथेच पडून राहावे असे वाटत होते.

-
चार-पाच बायकर्स समोरून आले. त्यांनी सांगितले की गेले दोन दिवस ते मनालीमध्ये अडकून पडले होते. आजच पावसाने उघडीप दिली आहे. तेव्हा ते लेहकडे निघाले आहेत. आमच्यासाठी पुढे चिखल वाढून ठेवला आहे. चला तर मग ! आता लगीन रोहतांग पासचे ! ठिकठिकाणी चिखल चांगल्यापैकी होता पण आम्ही तसे आरामात पार करून गेलो. करता करता दोन तासांनी रोहतांग शिखरावर पोचलो. मागच्या वेळेस इथे कसली प्रचंड गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा बर्फच बर्फ, वाहनेच वाहने आणि बर्फावरती माणसेच माणसे ! पण आज काहीच नव्हते. दोन दिवसाच्या पावसामुळे रोहतांगला पर्यटकांना सोडलेच नव्हते. आजही मनालीमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होताच. म्हणूनही पर्यटकांना आज येण्याची परवानगी असली तरी अगदी तुरळक गाड्या आल्या होत्या. त्यामुळे मागच्या वेळेस न दिसलेला रोहतांगचा शिखरदगड या वेळेस दिसला व आम्ही फोटो काढून घेतले.

लडाखच्या वेळेस ह्या एका घाटाच्या शिखर दगडाचे फुटवा राहिले होते. आता बहुतेक साडे बारा वाजले होते. म्हणजे नायकाने सात तासांत रोहतांग शिखरावर पोचाल असे सांगितले होते ते बरोबर होते. पण आजचा अतिशय खडतर, भरपूर ओढ्यांचा रस्ता प्रतिकूल परिस्थिती असतानाही आम्ही सात तासातच पार केला होता. आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतली. आता उतरायला सुरुवात केली. प्रचंड धुके रस्त्यावर होते. आणि दहा फूटांपलिकडचे काही दिसत नव्हते. पाऊसही भुरु भुरु चालू होता. वर येणारे सगळेच बायकर्स म्हणत होते की खाली जोरात पाऊस आहे. त्यामुळे वाटले की खाली उतरायला देखील भरपूर वेळ लागणार. पण नशिबाने आम्हाला खूपच कमी पाऊस लागला. वर जाताना चारचाकी वाहनांना जिथे कर भरावा लागतो तिथे आता वाहनांची रांग लागायला सुरवात झाली होती. म्हणजे आता मनालीतले जागे झालेले दिसत होते. नंतर एका ठिकाणी दोन भली मोठी श्वेतगिधाडे दिसली. अगदी दहा फुटांच्या अंतरावर. पण फोटो काही काढता आले नाहीत कारण कॅमेरा चालू करेपर्यंत ती लांब निघून गेली.
मला वाटतं दोन तासांत खाली उतरून आलो. माझा ठाण्याच्या घरून निघताना जो अंदाज होता की आम्ही सात तासात मनालीमध्ये पोचू, तो चुकीचा ठरला व दोन तास जास्त लागले. पण कदाचित आजच्या इतकी वाईट परिस्थिती नसेल तर नक्कीच अंदाजाच्या जवळपास पोचलो असतो. सांगायचं उद्देश हा की आमच्या चालवण्याबद्दलचा माझा जो अंदाज होता तो बरोबरच होता. अर्थात, पहिल्या दिवशी आम्ही ते स्वतःलाच दाखवून दिलं होतच म्हणा ! असो. वेळेत पोचलो होतो हे महत्वाचं. आता आम्हाला प्रचंड शीण आला होता. अंग तर पूर्ण भिजल होत. कपड्यांवर चिखल उडाला होता. अगदीच दारुण अवस्था होती. अशा स्थितीत आम्ही बसमध्ये बसणं शक्यच नव्हतं. पण आमची इतर मंडळी ज्या हॉटेलमध्ये थांबणार होती तिथे आम्ही गेलो. मंडळाच्या पुण्यातील सहाय्यकांनी त्यांना आधीच सांगून ठेवले होते की दोन जण आधी येतील व दोन-तीन तासच असतील. त्याप्रमाणे हॉटेलवाल्यांनी आम्हाला एक खोली उघडून दिली. हॉटेल अगदी 3 किंवा चार चांदण्यांचे वगैरे होते. मुख्य म्हणजे गरम पाण्याचा हिटर उत्तम चालत होता. मस्त आंघोळी करून घेतल्या. भूक प्रचंड लागली होती. पण हॉटेल मालरस्त्यापासून खूपच लांब होते. व आता तेवढ्यासाठी तिकडे जाऊन खाऊन परत ये व परत तिकडेच सामान घेऊन जा असला उपदव्याप करण्याचे त्राण आमच्यात नव्हते. आता खोगीरं परत व्यवस्थित भरली. कारण आता पावसाळी पोशाख, हातमोजे, पायमोजे, बूट वगैरे गाडी चालवण्याच्या वेळेस लागणाऱ्या गोष्टी आत टाकून दिल्या. मग उपाशीपोटीच झोपी गेलो. पण तास-दीड तास कशीतरी झोप झाली. आता आम्ही निघायच्याच बेतात होतो. तरीही आमची मंडळी आली नव्हती. आम्हाला त्याची कल्पना होतीच कारण रस्ता ! त्यात आमची दुरुस्ती गाडी तर येऊच शकणार नव्हती कारण तो रस्त्यात उलटलेला ट्रक. आम्ही खोली सोडत आहोत असे सांगायला तिथला माणूस शोधत होतो. पण तो काही सापडेना. आता आम्हाला मात्र निघायलाच हवे होते. अजून गाड्या परत द्यायच्या होत्या. हिशोब पूर्ण करायचा होता. म्हणून आम्ही गाड्यांपाशी पोचलो. तर आमचा नायक हजर झाला. तो म्हणाला बाकीचे रोहतांग शिखरावरच आहेत. त्यांनादेखील प्रचंड त्रास झाला. पण सैनिकांच्या गाडीने तो ट्रक परत उभा केल्यामुळे निदान रस्ता वाहता झाला व आमची दुरुस्ती गाडीदेखील पुढे येऊ शकली. आमच्या मंडळींनी त्या धबधब्यात अडकलेल्या ट्रकला देखील ढकलून पलीकडे पोचवले. चला म्हणजे सगळेच पर्यटक आणि मालवाहतूकदार देखील सुटले. आता त्या तान्ह्या मुलाच्या मंडळींनादेखील त्यांची गाडी मिळेल व ते पुढे जाऊ शकतील. आम्ही नायकाच्या ताब्यात खोली दिली. पाच मिनिटे त्याच्याशी बोललो व निघालोच. आता आधी निशीतला गाड्या परत दिल्या. त्याने आमचे पैसे परत दिले. हिशोब पुर्ण झाला. नऊ दिवसांपूर्वी चालू केलेली दुचाकीवरील सफर आज दुचाकी परत दिल्यावर संपली.

आम्हाला प्रचंड समाधान होते की काहीही अपघात न होता आम्ही सुखरुप मनाली मध्ये पोचलो होतो. मग त्याने आम्हाला हिमाचल रोड ट्रान्सपोर्टच्या बसथांब्यावर सोडले. अजून साडेसहाच्या बसला एक दिड तास अवकाश होता. बाजूलाच मालरस्ता होता. तिथे जाऊन आज बऱ्याच दिवसांनी पंजाबी जेवण खाल्ले. मग अक्षय तिथेच बसून राहिला व मी रस्त्यावर फिरायला गेलो. मागच्या वेळेस ज्या चौथऱ्यावर मी प्लास्टर घातलेल्या स्थितीत बसलो होतो, तिथेच आज धड पायांनी जाऊन बसलो. किती बरे वाटले म्हणून सांगू !

मागच्या वेळेस वाटले होते की आता स्पिती वारी होणार की नाही. पण पण उतलो
नाही मातलो नाही घेतला वसा टाकला नाही ! वसा दोन वर्षांतच सुफळ संपूर्ण
केला
मग परत येऊन अक्षयला घेऊन बस थांब्यावर जाऊन बसलो.
HRTC सरकारी असल्यामुळे जरी ते इतर खाजगी बसेस एवढेच पैसे घेत असले वोल्वो
बससाठी, तरी कळा तद्दन सरकारी होती. कोणाची हाताची फळी मोडली आहे,
कोणाच्या पायाखाली सरकारी सामान ठेवले आहे, कोणाची पाय ठेवायची फळी मोडली
आहे, कोणाचं आसन खराब स्थितीत आहे, ते मागे झुकतच नाहीये आणि असं बरंच
काही. नशिबाने आमची आसने व्यवस्थित होती. त्यामुळे आम्ही स्थानापन्न होऊन
गप्पा मारू लागलो. सरकारी बसचा एकमेव फायदा म्हणजे बस अगदी वेळेवर सुटली.
हा कदाचित तोटादेखील ठरू शकला असता पण नशिबाने तसे झाले नाही. अंधार
पडेपर्यंत बाहेर बघत बसलो. मागचे सगळे नऊ दिवस स्वप्नवत होते. ते आठवत बसलो
होतो. अंधार पडल्या पडल्या मंडी गाव आले जिथे विमानतळ आहे. त्यामुळे माल
रस्त्यावर भरपूर फिरंगी फिरत होते. आधी मला वाटायचे की मंडीला विमानाने
जाणे, तिथून खाजगी टॅक्सी करून मनालीला जाणे आणि हे सगळे अति पैसे देऊन कोण
करत असेल. पण आज दिसले फिरंगी ही गोष्ट करतात. करोत बापडे ! आता आम्ही
झोपी गेलो ते गाडी बारा साडेबारा वाजता कुठेतरी खायला थांबली तेव्हा उठलो.
बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे बसमधून बाहेर पडलो नाही.
आषाढ कृष्ण नवमी (१८ जुलै) - मुंबई
आता सकाळी कश्मीरी गेटला पोचतानाच जाग आली. बाहेर पडलो सामान ताब्यात घेतले आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मेट्रो स्थानक आहे हे कळल्यावर पलीकडे गेलो. उतरलो तेव्हा थोडीशीच का होईना थंडी होती. पण पलीकडच्या बाजूला जवळपास दीड किलोमीटर चालावे लागले त्यात सगळी थंडी पळाली आणि घामाघूम झालो. वेलकम टू दिल्ली ! मेट्रो स्थानकात शिरलो आणि घामाच्या पटीत वाढ झाली. मेट्रोची गाडी जरी वातानुकूलित असली तरी विमानतळाचे स्थानक सोडल्यास बाकी स्थानकात सगळीकडे वातानुकूलन बंद ठेवले होते. सोय नक्कीच असणार पण मग पैसे कोण खाणार? तरी नशीब गर्दी कमी होती. त्यामुळे पटकन तिकीट काढून गाडीत बसलो. पण हे सौख्य फक्त दोन स्थानकांचेच होते. तिथून एका मध्यवर्ती स्थानकात पोचलो. इथे आपल्या दादर स्थानकासारखी तूफान गर्दी होती. तिकिटासाठी लांबच लांब रांगा होत्या. मी एक रांग पकडून उभा राहिलो. आणि मग फुटलेल्या घामाची महती काय वर्णावी ! अगदी पार नखशिखांत भिजलो. डोक्यावरून घाम खाली येऊन हातावरून ओघळून बोटांवरून खाली धारेच्या स्वरूपात पडत होता आणि मी हताश मुद्रेने शांतपणे आलिया भोगासी म्हणत उभा होतो. खिडकीपाशी पोचल्यावर त्याने मला विमानतळाचे तिकीट तिकडे आहे असे म्हणून झिडकारले. पण खरंतर इथे मिळेल असं लिहिलेलं वाचूनच मी इथे उभा राहिलो होतो. पण नाहीच इथे असं म्हटल्यावर काय करणार ? मग तिकडे जाऊ लागलो तोच विमानतळाचे कर्मचारी वाटणारे कोणीतरी विचारू लागले की आपल्याला सामान चेकइन करायचे आहे काय. या मेट्रो स्थानकात जेट एअरवेज आणि एअर इंडिया यांचे सामान चेक इन करता येते. आम्ही हो म्हटले पण त्यांचे भाडे ऐकून नको म्हटले. आणि तसे केले ते बरेच झाले. कारण फार तर पंधरा वीस मीटरवरतीच चेकइन ची सोय होती. मला थोडी धाकधूक होती की खरच इथून सामान विमानात जाऊन आपल्याला मुंबईला मिळणार का. पण सोय नक्कीच चांगली होती. कारण सामान विमानतळापर्यंत आपण न्यायची गरज नव्हती. त्यामुळे सामान चेकइन करून टाकलं. आता आम्ही सडेफटिंग झालो. इथे वातानुकूलन चालू होते. विमानतळाचे तिकीट काढायला वेगळी खिडकी होती. थोडक्यात काय तर मेट्रोचे व्यवस्थापन सरळसरळ भेदभाव करते. इथे आम्हाला फक्त विमान प्रवाशांसाठीच उपलब्ध असलेले स्वच्छतागृह मिळाले जे खूपच चांगले होते. त्यामुळे आमचे कामच झाले. पण त्या तळमजल्यावर असलेल्या इतर स्थानकांमध्ये जी काही घुसमट होत होती त्यात जर प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी वगैरे झाली तर नक्कीच अनावस्था प्रसंग ओढवेल. हे मला त्या वेळेस जाणवले होते. आणि आता इथे एल्फिन्स्टन स्थानकात तशीच घटना घडली.
विमानतळावर आम्ही बऱ्यापैकी लवकर पोहोचलो होतो. त्यामुळे जरा वातानुकूलन असलेल्या उपहारगृहात काहीतरी खात बसलो. खाद्य अगदीच अखाद्य होते. गेले नऊ दहा दिवस किती मस्त पराठे वगैरे मिळाले होते. आणि आता हे कदान्न ! पोटपूजा केल्यावर तडक विमानतळात गेलो. इथे खऱ्या अर्थाने वातानुकूलन मिळाले. त्यामुळे निवांतपणे स्थिरावलो. विमान थोडे उशिरा निघाले. या जेटच्या विमानात उत्तम खायला मिळाले. मुंबईला बऱ्यापैकी वेळेत पोचलो. खोगीरं देखील व्यवस्थित मिळाली. आता प्रश्न टॅक्सीचा होता. उबेर वापरून आधी मला कोपरीला सोडून अक्षय ठाणे रेल्वे स्थानकाकडे निघून गेला. मी ते खोगीर खांद्यावर टाकून चालत घरी आलो. यावेळेस कसला सुटसुटीत प्रवास झाला होता. सगळे काही ठरवल्याप्रमाणे अचूक झाले होते. घरात निवांतपणे अंघोळ करून तंगड्या वर करून चंद्रतालचे दिवस आठवत पडलो.
समारोप
लडाख आणि स्पिति वारी या दोन वाऱ्या दुचाकी वरून करायच्याच असं स्वप्न होतं ते यावर्षी पूर्ण झालं. आता मला स्वत चालवत चारचाकीमधून काही ठराविक भाग परत बघायचे आहेत. बघू कधी जमते ते. दिल्लीमध्ये झूम कार किंवा खाजगी संस्थांकडे एसयूव्ही भाड्याने मिळतात स्वतः चालवण्याकरता. तसे करता येईल. लडाख आणि स्पिति तुलना केली तर लडाखमधील अंतरं जास्त आहेत. पण स्पितीच्या मानाने रस्ते खूपच चांगले आहेत. स्पितीमध्ये रस्ते नाहीतच असा म्हणणं इष्ट ठरेल कदाचित. म्हणूनच इकडे अजूनही कमी गर्दी येत असावी. अर्थात, इकडे लडाखसारखे अति उंच घाट नाहीयेत हेही आहेच. पण इथले ओढे तोडीसतोड जबरदस्त आव्हान समोर ठेवतात हेही आहे. स्पिति थोडीशीच का होईना जास्त हिरवीगार आहे. स्थितीमध्ये पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे जास्त निवांतपणा मिळतो. स्पिति अजून लडाख एवढे बाजारू झाले नाही.
प्रकर्षाने लक्षात राहिलेल्या काही गोष्टी म्हणजे
धुक्यातील जलोडी शिखर
सांगलाचे निवासस्थान
चिटकूलचा स्वर्गीय निसर्ग
काजातील स्थानिक कबड्डीची स्पर्था
वरून दिसणारी कि गुहा
चंद्रतालमधील मंतरलेला दिवस
भयंकर ओढे, खडतर रस्ता
अधिक फोटो पहाण्याकरता कृपया माझ्या फेसबूकला भेट द्या. hrushikesh bhide असा शोध घ्या. पहीला मीच दिसेन.
एवढे बोलून मी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो !
सव्यसाची
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.