https://www.maayboli.com/node/79533

corona च्या पहिल्या लॉक डाऊन मध्ये
आमची ट्रीप सुद्धा लॉक डाऊन झाली आणि त्यानंतर जुन महिन्यापर्यंत आमच्या
हातात घरी बसण्या शिवाय पर्याय नव्हता.अर्थात future planning सुरू होतच...
May संपून June उजाडला आम्ही सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून होतोच...
हिमाचल प्रदेश reopen होणार असं समजलं आणि जुन च्या दुसऱ्या आठवड्यात
ठरवलं... बहुतेक एक छोटी window मिळेल त्यातच सुटायच....ठरलं... त्या
छोट्या कालावधीत सगळी कामं,committments पूर्ण करून सामान pack करून
निघायचं एक आव्हानच होतं... पण जायची इच्छा इतकी प्रबळ की दिवस रात्र एक
करून सर्वांनी सगळी कामं पूर्ण केली. 15 जुन ला हिमाचल ओपन होणार हे
समजल्यावर 15 चीच flight घेऊन दिल्ली ला पोचायचं अस ठरलं आणि दोन दिवस आधी
तिकिटं बुक झाली.आता प्रश्न RTPCR चां... एक दिवस आधी अर्धा दिवस घालवून
sample दिले आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळावा आणि negative मिळावा ह्या
प्रतीक्षेत बाकी तयारी आटपली.
15 तारखेला हातात negative report आल्यावर आणि तिथून मुंबई एअरपोर्ट ला
जेव्हा एकत्र भेटलो...तेव्हा आमचा विश्वासाचं बसत नव्हता की आपण खरंच जातो
आहोत... दोन वर्षांपासून जो प्लान बनता बनता कॅन्सल होत होता...त्या
प्रवासासाठी आम्ही निघालो आहोत...चिमटे काढले आम्ही एकमेकांना...
पुढच्या काही दिवसांमध्ये आमच्या ह्या प्रवासाची गोष्ट....
Stay tuned
मधुवंती
#onewaytickettospiti


मुंबई दिल्ली प्रवास गप्पा मारतच पार
पडला. दिल्ली ला उतरलो तेव्हा रात्रीचे 11.30 झाले होते, इथे आम्हाला
एअरपोर्ट बाहेर भेटणार होता आमचा चौथा साथीदार राजु.
राजु ची गाडी डस्टर पुढचे 8-10 दिवस आमचे वाहन होते.
सामान डिकी मधे ठेवुन जेव्हा गाडी सुरु केली आणि गणपती बाप्पा मोरया!
म्हणुन प्रवासाला सुरुवात केली.दररोज बाप्पा ची घोषणा होवुनच मग प्रवासाची
सुरुवात होवु लागली.
गाडीने दिल्ली बाहेर पडुन निघालो आणि गाडीचा वेग एकदम कमी करावा
लागला.रस्त्याच्या दोन्ही बाजुने किसान आंदोलन कारींचे तंबु,पत्र्याची घरं
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोदुन ठेवलेला रस्ता. हा आंदोलनकारींनी वेढुन
ठेवलेला रस्ता बघताना आपण नुकतेच भारताच्या राजधानीच्या बाहेर पडलोय ह्यावर
विश्वास बसेना!
ह्या भयंकर वाईट रस्त्यावर जवळ जवळ तासभर चालवल्यावर अखेर मुरथल नावाच्या ठिकाणी असलेला प्रसिद्ध अम्रिक सुखदेव ढाब्यावर रात्री साधारण 2 वाजता दाखल झालो.हा ढाबा बहुतेक 24 तास चालु असावा.रात्रीच्या 2 वाजता सुद्धा इथे प्रचंड गर्दी होती.इथलं प्रसिद्ध म्हणजे आलु पराठा आणि केसर वाली चाय.इथल्या खाण्याचं जाणवलेलं वैशिष्ठ्य म्हणजे उगाच जळजळीत तिखट नाही त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. पोट भरुन घेतल्यावर परत एकदा आमचा प्रवास सुरु झाला.
पहाटे च्या दरम्यान आम्ही शिमला च्या जवळ येउन पोहोचलो होतो...अर्थात शिमला ला फ़ाटा देउन आम्ही पुढे निघणार होतो...
नारकंडा इथे नेगी धाब्यावर गरम गरम सुप पिउन पुढे मार्गस्थ झालो.
साधारण दोन तासांनी रामपुर मधे पोहोचलो.आमची राह्ण्याची व्यवस्था तिथल्या
पी.डब्ल्यु.डी च्या रेस्ट हाउस मधे होती. ब्रिटिशकालीन दिसणारी ही छोटी
वास्तु प्रशस्त खोल्या आणि आजुबाजुला बगिचे....
आम्ही अर्थात फ़क्त आरामच केला.जवळ जवळ 15 तासाचं ड्रायविंग झाल्यानंतर हे आवश्यक होतं.
क्रमशः
#onewaytickettopiti

रामपुर खुप छोटंसं गाव सतलज नदी किनारी वसलेलं.उजाडल्यापासुन पाउस होताच
आणि पुढचे काही दिवस खराब हवामानाचं भाकित होतं.रामपुर ला नीट आराम करुन
दुसर्या दिवशी 17 तारखेला आम्ही चितकुल कडे निघालो.हे भारताच्या सीमेवरचं
शेवटचं गाव....त्यापुढे चीन ची बॉर्डर सुरु होते. रामपुर वरुन निघुन थोडाच
वेळ झाला होता आणि आम्हाला आमच्या ह्या ट्रीप मधलं पहिलं स्नो पीक
दिसलं....
सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे इथे आर्मी चे काही
चेक पोस्ट्स लागतात,त्याच बरोबर आर्मी चे जवानांना घेउन जाणारे ट्रक्स दिसत
राहतात.
त्याआधी आपल्याला सांगला ह्या ठिकाणी जाण्यासाठी करचम ह्या गावापासुन वेगळी
वाट पकडावी लागली. इथला एक पुल ओलांडल्यावर सतलज नदीवर बांधलेलं धरण आणि
हायड्रो पावर प्रोजेक्ट दिसतो. सांगला इथे एक जागा सुइसाईड पॉईंट म्हणुन
प्रसिद्ध आहे. अन्य कित्येक टुरिस्ट स्पॉट सारखी ही पण एक ओवर हाइप्ड जागा.
दरीत बाहेर निघालेला एक दगड जिथे उभं राहुन लोक फ़ोटो काढतात,आता तो लोखंडी
रेलिंग लावुन बंद केला गेला आहे....अर्थातच काही उद्योग लोकांना महागात
पडले असणार! तेवढयासाठी वाट वाकडी करण्यासारखं खचितच ते ठिकाण नाही.करचम ते
चितकुल पसरलेल्या व्हॅली ला बस्पा वैली म्हणतात. किन्नौर मधे असलेल्या
ह्या भागाला निसर्गरम्यतेचं वरदान लाभलं आहे.सफ़रचंद,जर्दाळु साठी प्रसिद्ध
आहे. करचम,रकचम अशा गावांना ओलांडुन आपण चितकुल/छितकुल इथे पोचतो. चितकुल
बसपा नदीच्या किनारी वसलेलं आहे...बसपा नदी, सतलज नदीचीच एक उपनदी आहे.
आजचा आमचा स्टे बसपा नदी किनारी असलेल्या कॅम्प मधे होता. चितकुल गाव
पर्य़टकांसाठी अजुनही बंद होतं त्यामुळे तिथले होम स्टे देखील बंदच होते.
हा आमचा कॅम्प स्टे देखील सुंदरच होता. चहुबाजुनी डोंगररांगांनी वेढलेलं हे
गाव, ते पलिकडे बघा ते शिखर चायना च्या ताब्यातलं असं सहज पणे एखादा
स्थानिक माणुस सांगतो.
आज देखील वातावरण खराबच होतं त्यामुळे समोरची शिखरं धड दिसत नव्हती.
11000 फ़ुटाच्याही वर असलेलं हे गाव असल्याने इथे येइपर्यंत तुमचं शरीर
व्यवस्थित सरावलेलं हवं. तुम्हाला जर अल्टिट्युड सिकनेस जाणवत असेल तर इथे
सुचवला जाणारा हमखास उपाय म्हणजे कच्चा लसुण चावुन खाणे! अर्थात अनेक
प्रवासी आधीपासुनच डायमॉक्स घेउन निघु शकतात. एक खुप महत्वाची लक्षात
ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शक्यतो इथे तब्येत बिघडु देउ नका कारण इथे
मेडिकल असिस्टंस मिळणं जरा मुश्किल असतं.
क्रमशः
#onewaytickettospiti
18 ची सकाळ स्वच्छ उन्हं घेउन उजाडली होती. आजचा आमचा प्रवास तसा कमी होता त्यामुळे रमत गमत करता येण्यासारखा होता.
परत एकदा एक छोटा ओढ्याचा पुल ओलांडुन टापरी पर्य़ंत येउन आम्ही नाको च्या
रस्त्य़ाला लागलो. आता हळु हळु रस्ता थोडा कच्चा होउ लागला.झाडी विरळ होतीच
परंतु नजारे मात्र क्षणाक्षणाला बदलणारे आणि विलोभनीय....खाली खोल दरी वर
उंच कडा भला मोठा नाग जणु उभा काढुन फ़णा...अशी एक कविता होती लहानपणी ती
प्रत्यक्ष अनुभवत होतो.आता परत ढग दाटुन येउन थोड्याच वेळात पावसाला पण
सुरुवात झालीच.साधारण सोमवार पर्यंत हवामान खराब आणि पावसाळी राहिल असा
अंदाज हवामान विभागाकडुन वर्तवला गेला होताच.
आम्ही मात्र भरपुर फ़ोटो काढत नाको ला संध्याकाळ पर्य़ंत पोहोचलो.
आजचा आमचा स्टे होता ताशी होम स्टे मधे.
नाको मधल्या एका लेक च्या जवळच हा ताशी होम स्टे होता.आमचं नशीब असं की lockdown नंतर आम्हीच त्याचे पहिले ग्राहक होतो.
नाको हे गाव इथल्या मटाराच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.इथले मटार सर्वोच्च भावाने विकले जातात.
तिबेटी पद्धतीचा डायनिंग गच्ची वरुन दिसणारा नाको लेक संध्याकाळ अंधार
पडेपर्यंत मग तिथेच बसुन समोर दिसणारं रो पुर्ग्यिल नावाचा बर्फ़ाच्छादित
शिखर बघत राहिलो...
ताशी आणि त्यांची बायको हे जोडपं हा होम स्टे चालवतं.
lockdown मधे इथली स्थिती काय होती वगैरे गप्पा झाल्या,एकुणच स्वत:चं शेत असल्याने फ़ारसा त्रास झाला नसल्याचं जाणवलं.
उद्याचा दिवस खुप सगळ्या गोष्टी बघत जाणार होता त्यामुळे ताशी नी वाढलेलं गरम गरम साधंच पण रुचकर जेवण जेवुन लवकरच निद्राधीन झालो
नाको चा होम स्टे खरतर सोडवत नव्हता पण पुढे निघायला हवं होतं. ताशी ला आम्ही बरोबर आणलेला काही बेसिक मेडिसिन चा डब्बा दिला.नाको मधे एक मॉनेस्ट्री आहे सन 2007 मधे दलाई लामांनी इथे भेट दिली होती....ती सुरु असण्याची शक्यता कमी होती परंतु तरी तिथे भेट दिली.अपेक्षे प्रमाणे मॉनेस्ट्री बंद होती. तिथेच एका छोट्या दगडी इमारतीत जनजाती संग्रहालय दिसलय...ते बघण्यासारखं असावं परंतु दुर्दैवाने ते देखील बंद होतं. कोरोना मुळे ह्या सगळ्या शक्यता आधीच गृहीत धरल्या होत्या.
पुढचा पडाव होता ग्यु मॉनेस्ट्री.ही
मॉनेस्ट्री मात्र सुरु असावी अशी मनात प्रार्थनाच करत होते. ही जागा खास
आहे कारण इथे 600 वर्ष जुनी एका तपस्व्याची ममी जपुन ठेवण्यात आली आहे.
असं म्हणतात की इथुन जवळ असलेल्या एका स्तुपा मधे ही ममी होती.1975 साली
झालेल्या भुकंपात ही परत एकदा जमिनीखाली गाडली गेली. सन 2004 साली ITBP चं
काम सुरु असताना ती परत सापडली आणि सध्याच्या ठिकाणी ठेवण्यात आली.
ग्यु मॉनेस्ट्री बंदच होती त्यामुळे आजुबाजुच्या खिडकीतुन काही बघायला
मिळतय का ते बघायचा प्रयत्न सुरु असताना कुठुन तरी गावातला एक माणुस
येताना दिसला आणि त्याने बरोबर किल्ली आणली होती त्यामुळे आता आम्हाला ती
ममी नीट आत जाउन बघता येणार होती.
ह्या ममी च वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणच्या ममी ज्या प्रकारे काही वनस्पती
किंवा औषधांचे लेप लावुन जतन करण्यात आले तसे काहीही ह्या ममी ला केलं गेलं
नाहीये. अंदाज असा केला जातो की हे लामा ध्यान करत असताना त्यांचा त्याच
अवस्थेत मृत्यू झाला असावा आणि इथल्या बर्फ़ाळ हवामानामुळे त्यांचे शरीर
deteriorate न होता नैसर्गिक ममी बनलं.
त्या माणसाशी बोलताना त्याने सांगितलं की त्याच्या दोन पिढ्या आधी लोकांनी
ह्या उत्खननात भाग घेउन जेव्हा ममी बाहेर काढली तेव्हा ममी अतिशय जिवंत
माणसासारखी दिसत होती.आज अजुनही ममी चे दात शाबुत असल्याचं आपण बघु शकतो.
असं पण म्हटलं जातं की ह्या ममी ची नखं अजूनही वाढतायत.
अर्थात हात झाकलेले असल्याने बघता मात्र आलं नाही.
ग्यु मधे स्नो लेपर्ड चा मागोवा घेण्यासाठी सुद्धा पर्य़टक येतात परंतु ते थंडीच्या महिन्यांमधे!
ग्यु कडुन ताबो हा पुढचा थांबा होता.
ताबो मधे 1200 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आहे. अतिशय जुन्या पद्धतीचं मड हाउस पद्धतीचं बांधकाम निळ्याशार आकाशावर कॉन्ट्रास्ट उमटतं.
जुन्या मॉनेस्ट्री ची 75 च्या भुकंपात बरीच पडझड झाली होती,त्यानंतर नवीन मॉनेस्ट्री ची उभारणी दलाई लामांच्या हस्ते करण्यात आली.
लाकडी कोरीव काम केलेले खांब आणि पुतळे,तंखा पेंटींग्ज अजुनही नीट जपुन ठेवलेले बघायला मिळतात.
अन्य मॉनेस्ट्री सारखी ही भव्य दिव्य नाही उलट खुपच साधी आहे परंतु इथली
शांतता खरोखरच अंतर्मुख करुन जाते....काही वेळ इथे शांत बसावं असं
प्रत्येकालाच वाटलं.
ताबो मधेच जेवणाची वेळ झाली होती.इथे मैत्रेय रेस्टोरंट नामक छान रेस्तोरंट आहे तिथे मग जेवणावर ताव मारला.
ताबो सोडल्यावर रस्ता स्पिती नदीला समांतर जाउ लागतो. आपण स्पिती घाटीत प्रवेश केलाय!
आजुबाजुची हिरवी झाडी आता नाहीशी झालेली असते आणि खुरटी झुडुपं आता दिसत राहतात. सुंदर गुलाबी रंगाची फ़ुलं रस्ताभर दिसत राहतात.
ताबो पासुन निघाल्यापासुन साधारण तीस पस्तीस किलोमीटर वरच स्पिती आणि पिन
नदीच्या संगमावर बांधलेला एक पुल दिसतो....इथुनच पिन व्हॅली आणि मुद गाव
कडे जाणारा रस्ता दिसतो. बरेच ट्रेक रुट्स इथुन सुरु होतात.आमच्या प्लान
मधे मात्र मुद नसल्यामुळे आम्ही काझा च्या रस्त्याकडे लागलो.
काझा जिल्ह्याचं गाव अनेक मॉनेस्ट्री आणि प्रेक्षणीय ठिकाणं इथून एका
दिवसात बघून येण्यासारखी असल्याने काझा हा बेस ठेवून सर्वत्र फिरता येतं.
ट्रॅव्हलर्स शेड नामक हॉटेल मध्ये आमचं बुकिंग झालं होतंच.
इथे पोहोचतानाच आम्हाला समजलं होतं की काझा च्या पुढचा रस्ता आणि चंद्रताल
चा रस्ता बंद आहे त्यामुळे काझा मधला मुक्काम एक दिवस अजुन वाढवायचं ठरवलं.
#onewaytickettospiti

20/06/2021
काझा हे स्पिती मधलं एक मोठं गाव...गावातले 95% स्थानिक सरकारी नोकरदार आणि शेतकरी.
काझा बेस बनवुन तुम्हाला अनेक ठिकाणं बघता येतात.
आज थोडे निवांत तयार झालो आणि आमच्या आजच्या भटकंती साठी निघालो.
काझा पासुन 46 किलोमीटर वर असलेलं हिक्कीम हा आमचा पहिला थांबा होता.
हिक्कीम इथे जगातलं सर्वात उंचीवरचं पोस्ट ऑफिस आहे.वाटेवर खुपदा फ़ोटो साठी
थांबत थांबत हिक्कीम ला पोहोचलो.सर्वोच्च पोस्ट ऑफिस मधुन आपल्या आप्त
मित्र मंडळांना इथुन पोस्टकार्ड्स पाठवता येतात,अर्थात ती कधी मिळतील
त्याचा काही अंदाज मात्र देता येत नाही.एका ब्लॉगर ने लिहिल्याप्रमाणे
त्याचं कार्ड एक वर्षानंतर मिळालं!
इथल्या पोस्ट मास्टर बरोबर थोड्या गप्पा झाल्या त्यांना देखील एक मेडिसिन बॉक्स दिला.
आणि पुढच्या ठिकाणासाठी निघालो.
लांग्जा ह्या गावात बनलेला मोठा बुद्धाचा पुतळा लांग्जा च्या वाटेवर
असताना दुरुनच दिसु लागतो.एका डोंगराच्या अगदी कडेवर असलेला हा अवाढव्य
पुतळा थोडंसं चालत जाउन जवळुन बघता येतो.
सुमारे 50 दशलक्ष वर्षांपुर्वी दोन महाखंड (लॉरेशिया आणि गोंडवाना) च्या
टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरीमुळे हिमालय रेंज आणि तिबेटी पठार उदयास आले,
त्यामुळे टेथिस समुद्र नाहीसा झाला. लेह मध्ये आणि अन्य काही ठिकाणी सुद्धा
काही खाऱ्या पाण्याचे तलाव अजुन बघायला मिळतात.टेथिस समुद्राखाली राहणारे
सागरी प्राण्यांचे जीवाश्म आज लांग्झा व आसपासच्या खेड्यात आढळतात.
गावात चौकशी केल्यास स्थानिकांकडे असे जीवाश्म बघायला मिळु शकतात.
ह्या गावाच्या आणि बुद्धाच्या पुतळ्याच्या पार्श्वभुमीवर एक अणुकुचिदार टोक
असल्यासारखे एक शिखर उठुन दिसते.त्या शिखराचं नाव आहे चाउ चाउ कांग निल्डा
(सी.सी.के. एन) ह्याचा शब्दश: अर्थ आहे आकाशातला निळा चंद्र....ह्या
संपुर्ण परिसरात फ़िरताना हे शिखर प्रामुख्याने दिसत राहतं.
देमुल ह्या गावी जाण्यासाठी गाडी सुरु केली आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत
आल्यावर लक्षात आलं की गाडी मधे काहीतरी प्रॉब्लेम आहे.गाडी हीट अप होते
आहे. आजुबाजुला एकदमच निर्जन प्रदेश त्यामुळे थोडावेळ गाडी बंद करुन
थांबायचं ठरवलं,कदाचित गाडी थंड झाल्यावर इंडिकेटर बंद होईल असं वाटुन.
बराच वेळ तिथे थांबुन सुद्धा काही फ़रक नव्हता त्यामुळे पुढे न जाता परत
मागे वळायचं ठरवलं आणि जवळच्या गावात काही मदत मिळते आहे का बघुया म्हणुन
हळुहळु खाली निघालो.
कोमिक हे जगातलं सर्वात उंच मोटरेबल गाव आल्यावर तिथे चौकशी केली.तिथे
असलेला एक हिमाचली ड्रायवर मदतीला आला खरा...परंतु प्रॉब्लेम तसाच होता
त्यामुळे काझा कडे परत फ़िरायचं असं ठरवुन निघालो.
हा सगळा भाग किब्बर अभयारण्यामधे समाविष्ट आहे.इथे थंडीत स्नो लेपर्ड बघण्यासाठी खास सहली आयोजित केल्या जातात.
इथल्या वन्यजीवनाची झलक बघायला मिळेल की नाही ह्या बद्दल साशंक
होते....परंतु काझा ला परत येताना अचानकच दरीत आयबेक्स चा कळप दिसलाय.
आमचीच गाडी असल्यामुळे की कोण जाणे पण न घाबरता त्यांचा वावर चालु होता.
काझा ला गाडी सरळ मेकैनिक कडे वळवली.सुदैवाने काही मोठा प्रॉब्लेम नव्हता,त्यामुळे उद्याची आमची भटकंती देखील निर्धोक होणार होती.
क्रमश:
21/06/2021
कालच ट्रैव्हलशेड च्या अरुण ने आम्हाला चंद्रताल आणि मनाली कडे जाणारा
कुंजुम पास वाला रस्ता पुन्हा सुरु झाल्याची बातमी सांगितली
होती...त्यामुळे आता आम्हाला सर्किट करता येणार ही गोष्ट नक्की झाली.
आज काझा च्या जवळच्या अजुन काही जागा बघण्यासाठी निघालो....
इथल्या मुख्य मॉनेस्ट्रीज मधे की मॉनेस्ट्री चा समावेश होतो.ही
मॉनेस्ट्री जवळ जवळ 1500 -1600 वर्ष जुनी असल्याचं मानलं जातं. इथे
बुद्धाच्या मंदिरा व्यतिरिक्त बौद्ध सन्याश्यांसाठी शिक्षण आणि राहण्याची
व्यवस्था देखील आहे. एका वेळी इथे अडीचशे मॉन्क्स राहतात.
की मॉनेस्ट्री च्या मुख्य पायर्या चढुन वर गेलो आणि तिथे एका monk ने
आम्हाला मॉनेस्ट्री दाखवायला सुरुवात केली.सर्वप्रथम एका छोट्या किचन मधे
घेउन जाउन त्यांनी आम्हाला हर्बल टी दिला, इथे ऑक्सीजन कमी त्यामुळे बर्याच
जणाना त्रास होतो....ह्या हर्बल टी ने थोडा आराम मिळतो असं सांगुन त्यांनी
आम्हाला मॉनेस्ट्री दाखवायला सुरुवात केली. ह्या मॉनेस्ट्री मधे हजारो
वर्ष जुनी पुस्तकं जी संस्कृत,पाली आणि तिबेटी भाषेत लिहिली गेली आहेत
भुर्जपत्रावर लिहिलेली ही पुस्तकं,अध्यापन कक्ष बघायला मिळालं.एका
छोट्याश्या अंधार्या खोलीत मेडिटेशन रुम होती. डोळे मिटुन तिथे शांत किती
वेळ बसलो होतो कोणास ठावुक परंतु तो अनुभव अतिशय ह्रुद्य होता खरा...त्या
जागेतच असं काहीतरी होतं ज्याने मन अगदी शांत झालं होतं.
मुख्य मंदिरात पुजा सुरु होती तिथे थोडावेळ घालवुन बाहेर आलो....छोटे संन्यासी तिथे क्रिकेट खेळत होते थोडावेळ आम्ही देखील खेळलो!
की मधे फ़ोटोग्राफ़ी करायला परवानगी नव्हती.
आता आम्ही निघालो आशिया मधील सर्वात उंच पुल चिचम ब्रिज वर जायला.
हा पुल किब्बर आणि चिचम ह्या दोन गावांना जोडणारा तसा नवीनच म्हणावा
लागेल.ह्या पुलामुळे लोसर मार्गे चंद्रताल कडे जाणारा एक मार्ग कमी अंतरात
पार करता येतो.
आजकाल पर्य़टकांमधे हा पुल फ़ोटोग्राफ़ी,विडिओ साठी खुपच लाडका होतोय....आजचा इंटरनैशनल योग दिवस आम्ही इथे साजरा केला. 
चिचम वर बराच वेळ घालवुन आम्ही ह्या डोंगराच्या दुर्गम भागातल्या छोट्या छोट्या गावांना भेट देणार होतो. गेटे गाव आणि ताशिगॉन्ग.
ह्या गावांमधे काही विशेष नाही पण तिथे जाणारा रस्ता आणि तिथुन दिसणारी
सुंदर दृश्य ह्यासाठीच केवळ तिथे जायचं. आज आमच्या बरोबर आमच्याच होटेल मधे
राहणारे काही पर्य़टक होते...त्यांना मात्र ताशिगॉन्ग, गेटे बद्दल काहीच
कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही पुढे आणि ती मंडळी मागे असे आम्ही निघालो.
अतिशय निर्जन अशा प्रदेशात खरतर रस्ता चुकण्याची शक्यता दाट असते.काहीच
वेळापुर्वी मोटरसायकल वरुन आलेले काही स्थानिक मात्र पुढे जाउन आमच्या साठी
थांबुन राहीले होते...रस्ता न सापडुन गोंधळ होवु नये ह्यासाठी...आम्ही न
सांगताही त्यांचं हे अगत्य ही खरं म्हणजे अतिथी देवो भव चं ब्रीदवाक्य
म्हटलं पाहिजे.
गेटे गावात फ़क्त 7-8 घरं आहेत.तिथुन थोडंसच पुढे गेल्यावर ताशिगॉन्ग
मॉनेस्ट्री आणि गाव लागतं. इथे एका घरात जेवणाची सोय होते तिथेच बनणारा
मटार वापरुन बनवलेला पुलाव पर्यटकांसाठी बनवण्यात येतो असं समजलं होतं,भुक
लागली होतीच पण गावात बाहेर कोणीच दिसेना मग एका घराचं दार वाजवल्यावर एक
आजीबाई आल्या बाहेर...जेवायला मिळेल का? असं विचारल्यावर "अभी पंचायत ने
अलौ नही किया ना! इस लिये नही दे सकते....लेकीन आप गुस्सा मत होना वापस
आना!" असं सांगितलं....
या छोट्या छोट्या गावातली एकी बघुन खरंच आश्चर्य वाटलं....
अर्थात जरी पुलाव मिळाला नाही तरी एक छानसा फ़ोटो मात्र मिळाला.
थोडावेळ ह्या ठिकाणी घालवुन परत फ़िरलो.
काझा ला परतल्यावर इथल्या काझा मार्केट मधे थोडावेळ भटकलो...आणि रुम वर
येउन परत आंघोळ वगैरे तयार झालो....आज सोनम डोल्मा भेटणार होती..
लहान खुर्या चणीची आणि तपकिरी सुंदर डोळ्यांची सोनम जेव्हा आली तेव्हा कल्पना नव्हती की ह्या छोट्या मूर्ती मध्ये किती धमक आहे.
गोष्ट आहे आत्ता आत्ताचीच, सोनम डोलमा ह्या 31 वर्षाच्या युवतीची...
सोनम डोलमा, काझा ची सरपंच.. कदाचित सर्वात लहान.पण त्याआधी corona काळात
काजा मधल्या महिला मंडळाने तिच्यावर प्रधान किंवा अध्यक्ष होण्याची
जवाबदारी टाकली. भारतभर corona पसरत होता,आणि आपल्या छोट्या प्रांतात kaza
मध्ये corona पसरू नये म्हणून काहीतरी करायचं असं ह्या बायकांनी ठरवलं.
त्यांचं नेतृत्व करून सोनम ने सर्वानुमते असं ठरवलं की kaaza मध्ये
कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही. बायका फक्त एवढाच निर्णय घेऊन थांबल्या
नाहीत तर सकाळी 6 ते 8 अशा बायकांच्या duty लावल्या गेल्या.kaza च्या
हद्दिपाशी सर्वांना अडवण्यात आलं.पर्यटकांना परत पाठवल गेलं. स्पिती
सर्वांसाठी बंद केलं गेलं.
त्याच दरम्यान हिमाचल चे कृषी मंत्री राम लाल मारकंडा त्यांच्या काही
कामासाठी kaza मध्ये येणार होते. परंतु बायकांनी मंत्री महोदयांना सुद्धा
थांबवलं.
सोनम ही गोष्ट सांगताना म्हणत होती,मी माझ्या लोकांना वाचवण्यासाठी हे करत
होते.जर आमच्या गावातल्या बाहेर गेलेल्या लोकांच्या दोन दोन वर्षांच्या
मुलांना quarantine केलं गेलं,आम्ही केलं तर मंत्रीजी तर खूपच मोठे आहेत न!
त्यांना एवढं तर समजायला हवं की नियम सर्वांसाठी सारखे असतात!
त्यानंतर ही खबर पसरली आणि माध्यमांनी उचलून धरली.मागोमाग हिमाचल मधल्या
सर्व महिला मंडळांनी त्यांना support केला आणि सांगितलं की हम स्पिती के
महिलाओं के साथ है! उन्होंने कुछ गलत नही किया.
मी काही फार शिकलेली मुलगी नाही.दोन मुलांची आई आहे आणि शेतकरी आहे पण मला
एवढं कळतं की आपल्या गावाला ह्या भयंकर आजारापासून वाचवायला हवं आणि
त्यासाठी समोर मंत्री असो की अजुन कोणी! सोनम म्हणाली.ह्या कामासाठी
आम्हाला कुठलंही appreciation मिळालं नाही पण त्याची मला पर्वा नाही!
ह्या विरोधासाठी सोनम ना आणि तिच्या महिला मंडळातल्या बायकांना त्रास सहन
करायला लागला आणि अजूनही आहे. त्यांच्यावर पोलीस केसेस लावण्यात आल्या."पण
मी काही चूक केली नाही!" हे म्हणताना आणि ठोस पणे स्वतः च म्हणणं मांडताना
तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता तो अचंबित करणारा. स्वतः
तेवढंच प्रामाणिक असल्याशिवाय हे होत नाही.
सोनम त्यानंतर पंचायत इलेक्शन लढली आणि जिंकून आली. गावात
शेतकऱ्यांसाठी,बायकांसाठी तिला अजून खूप काम करायचं आहे. तिच्या बोलण्यातून
हे पटतं की ती नक्कीच काहीतरी छान काम करणार आहे.
ही खरी नारी शक्ती! हो ना?
सोनम शी भरपुर वेळ गप्पा झाल्या.आजचा आमचा काझा मधला शेवटचा दिवस...उद्या पहाटे 5 वाजता निघायचं ठरवलं होतं कारण उद्या बराच मोठा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे लवकरच निद्राधीन झालो!
क्रमश:

आज
लवकर म्हणजे 6 वाजता काझा सोडलं.आज बराच मोठा पल्ला गाठायचा होता,असं
म्हणा की पुढे काय कसा रस्ता आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही सुखात होतो.
रस्ता अतिशयच सुरेख होता...macanna's gold मधल्या सारखे उभे सोनेरी डोंगर
कडे आणि त्यातुन तासुन काढलेली वाट लपंडाव खेळणारी पर्वत शिखरं आणि समोर
दिसणारी शेतं आणि घरं! लोसर ह्या गावापर्यंत non stop पोचलो....पहाटे
निघाल्यामुळे नाष्ता चहा झालं नव्हतंच त्यामुळे लोसर च्या एका छोट्या
घरगुती होटेल मधे नाश्ता करायला थांबलो.मस्त आलु पराठा दही आणि सफ़रचंदाचं
लोणचं ह्या कुटुंबाने अगदी प्रेमाने दिलं.
नाश्ता करुन आता कुंजुम पास कडे निघालो. ह्या रस्त्यावर दोन चेक पोस्ट्स लागलीत.
रस्ता आता थोडा खडबडीत व्हायला लागला आहे...पण चारी बाजुने दिसणारे बर्फ़ाचे
पर्वत त्याची जाणीव पुसट करुन देतात. बरीच वळणं ओलांडुन अखेर कुंजुम पास
इथे आम्ही पोहोचलो....चारी बाजुने पर्वत मधे कुंजुम माता मंदिर...मंदिर
कसलं तो एक स्तुप च आहे.सगळीकडे हवेवर फ़डकणारे प्रेयर फ़्लैग्स आणि
शांतता.... कुंजुम पास हा दोन व्हैली लाहोल आणि स्पिती व्हैली ना जोडणारा
पास...14900 फ़ुट उंचीवरचा.इथुन रस्ता थोडा उतरत जाउन आम्ही चंद्रताल च्या
रस्त्याला लागलो.
चिनाब नदीचं उगम स्थान म्हणुन चंद्रा नदी ह्या चंद्र ताल जवळील ग्लेशियर पासुन उगम पावते...
चंद्रताल कडे जाणारा रस्ता खरोखरच खुप खराब धोकादायक वळणांचा...बर्याच
ठिकाणी water crossings ओलांडावी लागतात. इथे दुरवर ग्लेशियर च्या जवळ दरीत
एक इमारत दिसते...ती कसली ह्याचं कुतुहल ओसरत असतानाच पाटी दिसली,हिमांश
हिमालयन स्टेशन...national centre for Antarctic and ocean research
ministry of Earth Sciences चं हे स्टेशन इथे ग्लेशियर चा अभ्यास करण्यात
येतो आणि ह्या ग्लेशियर च्या कमी अधिक गोठण्याचा अभ्यास करुन त्याचा
हवामानावर आणि अप्रत्यक्ष पणे मानवावर होणारे परिणाम अभ्यासले जातात. अशीच
इंन्स्टीट्युट उत्तराखंड ला आमच्या बेस कैम्प जवळ सुद्धा बघितल्याचं आठवलं.
चंद्रताल ला मुख्य ताल पासुन साधारण 5 किलोमीटर अलिकडे पर्य़ंत टेंट्स
लावले जातात.इथे राहण्याची सोय होते.आम्ही मात्र इथे राहणार नसल्याने
चंद्रताल च्या अलिकडे 2 किलोमीटर गाडीने पोहोचलो. उतरल्या उतरल्या एक
गुरगाव चं जोडपं भेटलं आणि dont even think twice just go and see it its
amazing! असा रिव्ह्यु दिला. चालायला सुरुवात केली.फ़क्त दोनच किलोमीटर
चालल्यावर सुंदर पारदर्शक पाणी असलेला चंद्रताल नजरेस पडला. हा तलाव खुप
खोल असल्याचं सांगितलं जातं.हा तलाव गेले काही वर्ष इथे होणारं
प्रदुषण,तलावात बुडुन होणारे मृत्यु आणि त्याच प्रमाणे काही संवेदनशील
प्राण्यांचे इथल्या प्रदुषणामुळे होणारे मृत्यु ह्या मुळे चर्चेत
आहे.नुकताच इथे काही हिम बिबळ्यांचा मृत्यु झाल्याच्या बातम्या होत्या.
आता चंद्रताल परिसरात अनेक निर्बंध घातले गेले आहेत.
चंद्रताल मधे आजुबाजुच्या डोंगरांचं प्रतिबिंब पडत होतं मधुनच ढग आणि उन्हाचा लपंडावही तलावात बघायला मिळत होता.
खरतर पाय निघत नव्हता परंतु निघायला हवं होतं.चंद्रताल चा रस्ता परत घेउन बताल ह्या ठिकाणी पोहोचलो.
बताल हे चंद्रताल काझा आणि मनाली च्या रस्त्यावर तिठ्यावर वसलेलं ठिकाण
आहे. इथला चंद्रा ढाबा किंवा चाचा चाची ढाबा प्रसिद्ध आहे.चाचा चाची म्हणुन
ओळखलं जाणारं एक जोडपं हा धाबा चालवतं.ह्या जोडप्याने वाईट हवामानात
अडकलेल्या पर्य़टकांची,गिर्यारोहकांची देखील मदत,सुटका केली आहे आणि
त्यासाठी त्यांना अनेक सन्मान दिले गेलेत. आम्ही इथे जेवायला थांबलो.
इथेच सावरकरांची प्रतिमा फ़ुलं वाहुन ठेवलेली दिसली.ढाब्याच्या बाहेर एका
झाकलेल्या भिंतीवर सहज लक्ष गेलं आणि दृष्टीस पडलं शिखर सावरकर समिट
केल्याबद्दल ची शिला.
मन अभिमानाने भरुन आलं.
मनोमन नमन करुन आणि भरपेट जेवुन आम्ही आता पुढे छत्रु,सिसु,ग्रांफ़ु अशा
मार्गाने निघालो...खरतर रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा असा रस्ता
होता.चिनाब ला समांतर हा नसलेला रस्ता चालला होता. हळुहळु पहाडांवर काळवंडु
लागलं होतं लवकरच पाउस पडायला सुरुवात होणार होती आणि जर तसं झालं तर ह्या
कच्च्या रस्त्यावरुन गाडी चालवणं कठीण होणार म्हणुन शक्य तितक्या वेगाने
निघालो.अर्थात वळणांमागुन वळणं,डोंगरांमागुन डोंगर,एक घाट चढुन परत उतरुन
आम्ही फ़क्त पुढे पुढे चालत होतो.रस्ता कधी संपणार आणि चांगला रस्ता कधी
लागणार असं प्रत्येकालाच झालं होतं. छत्रु आलं आणि पावसाला सुरुवात झाली.
छत्रु ला असलेल्या एका छोट्या ढाब्यावर चहा पिउन त्या ढाबा मालकाला अजुन
मनाली किती लांब म्हणुन विचारल्यावर अजुन तीन तास तरी नक्की असं सांगितलं
तेव्हा संध्याकाळचे 5 तरी वाजले असतील.
पावसामुळे निसरड्या झालेल्या त्या रस्त्यावरुन परत एकदा यात्रेची सुरुवात झाली ती फ़क्त पक्का रस्ता दिवसा उजेडी दिसु दे या आशेत.
तरी बरं पावसाने फ़ार त्रास दिला नाही...पश्चिमेला सोनेरी झळाळी
होती.डोंगररांगांवर दुरवर तो प्रकाश पसरला होता. आमच्या उत्साहात त्यामुळे
भर पडली.अखेर पक्का रस्ता दिसला आणि थोडं पुढे जाउन दिसलं ते नवीन बनलेलं
अटल टनल.
अटल टनल मधुन गाडी चालवणं 10-12 तासांच्या कच्च्या रस्त्यावरुन गाडी
चालवल्यानंतर एक सुखद अनुभव होता. अत्याधुनिक तंत्रद्न्यानाने बनलेलं हे
टनल लेह लडाख शी संपर्क कायम ठेवण्याच्या दृष्टीने आणि रोहतांग पास मुळे
वाहतुकीस लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने फ़ायदेशीर ठरलं आहे.
टनल मधुन बाहेर पडल्यावर प्रदेश एकदम बदलल्याचं जाणवलं.सुचिपर्णी दाट वृक्ष
्राजी जी गेले बरेच दिवस आम्हाला दिसली नव्हती. सोलन आणि मग मनाली ला
आम्ही दाखल झालो. मनाली ला न राहता आम्ही थोडे पुढे बबेली जवळ राहण्यासाठी
होटेल शोधलं....
एकुण 14 तासांचा भयाण रस्त्याने प्रवास अखेर संपला होता.
स्पिती स्वप्न सध्या पुरतं तरी संपलं होतं पण नेहमीसाठी नाही..
स्पिती मधे अजुनही खुप काही बघण्यासारखं आहे.....पण म्हणतात न प्रत्येक
ठिकाणी काही गोष्टी बाकी ठेवाव्यात म्हणजे परत जाण्याची इच्छा कायम राहते!
तिबेटी भाषेत गुडबाय,हेलो ला जुले असा शब्द आहे....
लवकरच परत भेटुया! जुले!!!

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.