Friday, July 14, 2023

भटकंती फिनलंडची

 https://www.maayboli.com/node/16516?page=2

खुपदा असे होते कि एखाद्या ठिकाणी आपणांस जायचे नसते पण नाईलाजाने जावे लागते आणि तिथे गेल्यावर तिकडची माणसे, निसर्ग, आपलेपणा यामुळे आपण एव्हढे तेथे रुळतो कि परत येताना पाय निघत नाही. असेच काहितरी ३ वर्षापूर्वीच्या माझ्या "फिनलंड" सफरीबाबत घडले.

ऑफिसच्या कामाकरीता "फिनलंड" ला जाण्यासाठी माझी निवड करण्यात आली. जवळपास लाखापेक्षा जास्त सरोवरे असलेला प्रदेश, १९५२ साली हेलसिंकी फिनलंड येथे झालेल्या ऑलम्पिकध्ये हॉकित भारताला मिळालेले सुवर्णपदक आणि नोकीया कंपनीचे मुख्य ऑफिस एव्हढीच काय ती माझी फिनलंडची ओळख. त्यामुळे जरासा नाराजच होते तेथे जायला. (अर्थात यु.के., युएसए, कॅनडा असते तर एव्हढा विचार केला नसता :).) पण त्या प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती मला असल्याने नाईलाजाने मला तीन महिन्यांसाठी जावेच लागले. पहिला परदेस प्रवास आणि तोही एकट्याने ३ महिन्यासाठी!!!! पण ज्यांना भटकण्याची आवड आहे त्यांना एकटेपणा कधी जाणवत नाही. माझा दौरा हा उन्हाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) मध्ये असल्याने मध्यरात्रीचा सुर्य हा अनुभव घेता आला. रात्री १२ वाजेपर्यंत सुर्यास्त आणि पहाटे ३ वाजता सुर्योदय.

फिनलंड येथील तीन महिन्याच्या अनुभवाबाबत लिहिण्यासारखे भरपुर आहे. सध्यातरी मी येथे काहि फोटो आणि त्यांची थोडक्यात माहिती टाकत आहे.

फिनलंड एका दृष्टीक्षेपात:
उत्तर युरोपमधील स्कॅन्डीनेव्हियन देशामधील एक देश फिनलंड असुन आकाराने सातव्या क्रमांकावर. युरोपमधील विरळ लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश. ६ डिसेंबर १९१७ साली फिनलंड रशियन राजवटीतून स्वतंत्र झाला. फिनलंडचा एक चतुर्थांश भाग हा उत्तर ध्रुवाच्या बाजुला असल्याने लॅपलँड आणि बाजुच्या प्रदेशान सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र हा निसर्गाचा विलक्षण चमत्कार पहायला मिळतो. याच लॅपलँडमध्ये सर्वांचा लाडका "सांताक्लॉज" याचे घर आहे. रशिया, स्वीडन, नॉर्वे आणि एस्टोनिया हे शेजारचे देश. फिनलंडचे मूळ रहिवाशी हे सामे वंशाचे असुन ते उत्तरेकडील भागात राहतात. फिनिश हि फिनलंडची मुख्य भाषा असली तरी ६ टक्के लोक स्विडीश भाषा बोलतात. फिनलंडची लोकसंख्या ५०-५५ लाख असुन भ्रष्टाचाराचा बाबतीत शेवटच्या क्रमांकावर आहे (म्हणजे जवळपास नाहीच) :). हेलसिंकी हे प्रमुख राजधानीचे शहर. बाल्टिक समुद्रकिनारी वसलेल्या फिनलंडमध्ये स्वच्छ व प्रदुषणमुक्त हवा, निळंभोर आकाश, दाट जंगल, शुद्ध आणि भरपूर पाणी, बेटांचे प्रदेश हे स्कॅन्डीनेव्हियातल्या इतर देशात असलेली वैशिष्ट्ये फिनलंडमध्ये हि आहे.

फिनलंडला भेट देण्याचा उत्तम कालावधी हा उन्हाळा (मे ते ऑगस्ट). हिवाळ्यात येथील तापमान उणे ३०-४० पर्यंत जाते. उन्हाळ्यात दिवस मोठा तर रात्र लहान. रात्री १२ वाजेपर्यंत दिवस असतो.

चला तर मग सफरीची सुरुवात करूया विमानप्रवासाने. मी आधीच कळवले आहे कि आमचे काही मायबोलीकर फिनलंड भेटीला येत आहे त्यामुळे सध्यातरी पासपोर्ट्-व्हिसाची आवश्यकता नाही. Happy

==================================================
(मुंबई ते हेलसिंकी व्हाया फ्रँकफर्ट )
==================================================

फ्रँकफर्ट सिटी

फ्रँकफर्ट एअरपोर्ट

हेलसिंकी एअरपोर्ट

==================================================
हेलसिंकी शहर
==================================================

फिनलंडचा राष्ट्रीय ध्वज

हेलसिंकी कॅथेड्रल आणि सिनेट स्क्वेअर

सिनेट स्क्वेअर हे निओ क्लासिकल आर्किटेक्चरचे उत्तम उदाहरण आहे. हि इमारत सन १८५२ साली बांधुन पूर्ण झाली. हेलसिंकी शहरातील न चुकता पहावी अशी वास्तु. २००२ साली या वास्तुने १५० वर्षे पूर्ण केले. स्कॅन्डीनेव्हियन टूर मधले एक महत्वाचे पर्यटनस्थळ. चर्चच्या पायर्‍या चढुन वर आल्यावर उंचीवरून आजुबाजुचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येतो. चौकात मध्यभागी "अलेक्झांडर द ग्रेट सेकंड" या रशियन झारचा पुतळा आहे. रशिया आणि फिनलंडमध्ये १९३९ साली युध्द झाले होते, जे "विंटर वॉर" या नावाने ओळखले जाते. शंभर दिवस चाललेले हे युद्ध उणे चाळीस (-४०) अंश इतक्या कडक थंडीच्या मोसमात लढले गेले. फिनलंडचा त्यात पराभव झाला होता. पण तरीही अलेक्झांडर हा फिनलंडचा मित्र होता. त्याने फिनलंडला रेल्वे, स्वतःची नाणी, पोस्टऑफिस इ. सुविधा दिल्या. म्हणुनच सिनेट चौकात त्याचा पुतळा उभारला आहे.

हेलसिंकी कॅथेड्रल, सिनेट स्क्वेअर आणि अलेक्झांडर सेकंड

हेलसिंकी रेल्वे स्टेशन
१९१९ साली लोकांसाठी खुले करण्यात आलेले सेंट्रल रेल्वे स्टेशन हे आता हेलसिंकीची ओळख म्हणुन नावारुपाला येत आहे. हातात दिवे घेतलेले चार पुतळे हे या प्राचीन वास्तुचे सौंदर्य वाढवत आहे. फिनलंड अंतर्गत रेल्वेसेवेव्यतिरिक्त येथुन रशिया मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे जाण्यासाठी नियमित रेल्वे सुरु असतात.

फिनिश ऑर्थोडेक्स चर्च
पश्चिम युरोपमधील सर्वात मोठे चर्च १८६८ साली बांधण्यात आले. रशियन वास्तुच्या प्रभाव असलेली फिनलंडमधील एक वास्तु.

बाल्टिक समुद्र आणि त्यात नांगरलेल्या होड्या Happy

बोटॅनिकल गार्डन

फिनलंडमधील ट्राम आणि मोकळे रस्ते Happy

हेलसिंकी उपनगरातील "लेप्पावारा" रेल्वे स्टेशन (सुरुवातीचा १ महिना या शहरात माझे वास्तव्य होते, नंतर २ महिने राजधानी हेलसिंकीमध्ये)

हेलसिंकी ते एस्पू या ऑफिसपर्यंतच्या प्रवासात अत्यंत आवडलेले हे एक घर. न राहवून एकदा बसमधुन उतरुन याचे मनसोक्त फोटो घेतले Happy

फिनलंडमध्ये "सेवरासारी" नावाचे "ओपन एअर" म्युझियम आहे, हे चारही फोटो तेथेच काढले आहेत. उन्हाळा हा त्यांचा खास उत्साहाचा महिना. त्यासाठी येथे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये फिनिश संस्कृती दर्शविणारे नृत्य/प्रसंग सादर केले जातात.


==================================================
क्रमशः - भाग दुसरा पुढिल शुक्रवारी
 
 

साधारणपणे काही महिन्यापुर्वी मला हेलसिंकी मधे ४-५ दिवस राहायची संधी मिळाली. जानेवारी महिना - सूर्य सकाळी १० वाजता उगवायचा आणि दुपारी ३ वाजता सूर्यास्त. तापमान अगदी शून्याखाली -१० ते -२० च्या मधे. ह्या थोड्या दिवसात फिनलंड च्या सौंदर्याने आणि लाघवी माणसानी मला अगदी जवळ केले. साध्या फोन च्या कॅमरा मधले काही फोटो टाकत आहे. गोड मानून घ्या. दुधाची तहान ताकावर भागवणे असेच, जिप्सी ह्यांचे फोटो येतील तोपर्यंत.

१- हेलसिंकी मार्केट स्क्वेर
उन्हाळ्या मधे एकदम गजबजलेला भाग, बर्फात अगदी गार गार झालाय.
Fin111.jpg

२ - गोठलेला बॉल्टिक समुद्र आणि नांगरलेल्या मोठ्या बोटी ह्या क्र्यूज़ साठी वापरतात. समुद्र कोठे चालू होते आणि जमीन कोठे संपते ही रेघच जणू मिटलेली.
fin2.JPGfin3.JPG

३ - गोठलेल्या बॉल्टिक समुद्रातून वाट काढत जाणारी फेरी बोट.fin 5.JPG


४ लव लॉक्स - युरोप मधे बर्‍याच ठिकाणी हे लॉक्स बघायला मिळतात. प्रेमीजन प्रीतीच्या आणा भाका घेऊन एक कुलुप पुलावर बांधतात आणि किल्ली खालच्या नदीत, समुद्रात, तलावा मधे फेकून देतात. याचा अर्थ असा की आता ते प्रेम कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत.
पॅरिस मधे ह्याच कुलूपाच्या वजनाने एक लहान पूल मागच्या महिन्यात कोसळला. फ्रांस अशा कुलुप प्रेमावर बंदी घालायचा विचार करत आहे.
lovelocks1.jpg

५ - When life gives you snow (and a lots of snow), you make a snowman. जागो जागी अतिशय सुंदर हिम कृती दिसल्या. काही अश्या तर काही तश्या. शेवटी युरोप ते युरोपच.
snow3.JPGsnow1.JPGsnow2.JPG

धन्यवाद

 

आज फिनलंडच्या सफरीला सुरुवात करण्याआधी बेसिक "फिनिश" भाषा शिकुन घेऊया :). चायनीज आणि जपानी भाषेनंतर कठिण (grametically) भाषा म्हणुन "फिनिश" भाषा ओळखली जाते. उच्चारायला थोडीशी अवघड, पण तीन महिन्यात थोडंफार शिकलेलो Happy

Moi - मोई - नमस्कार
Terve - तेरवे - हॅलो
Kiitos - कितोस - धन्यवाद
Huomenta - हुआमेंता - सुप्रभात
Hyvää Yötä - ह्युवा योता - शुभरात्री
Häuskä Tävätä - हाउस्का तवाता - तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला
Mitä kuuluu? - मिता कुलु - कसा/कशी आहेस?
Kiitos hyvää! Entä sinulle? - कितोस ह्युवा! एन्ता सिनुले - मी ठिक आहे! तु कसा/कशी आहेस?
Anteeksi! - अंतीकसी! - माफ कर
Tervetuloa! - तेरवेतुलोआ - तुमचे स्वागत आहे!
En Puhu Suomea - एन पुहु सुआमी - मला फिनिश भाषा येत नाही.
Suomi on kaunis maa - सुआमी ओन कौनीस मा - फिनलंड खुप सुंदर देश आहे.
==================================================
Sightseeingसाठी बसही आणली आहे पटकन आपली जागा राखुन ठेवा Happy

==================================================
अरोरा बोरीआलिस किंवा नॉर्दन लाईट्स
==================================================
फिनलंडसारख्या देशाचा बराचसा भाग हा आर्क्टिक्ट सर्कलच्या पलिकडे, उत्तर ध्रुवाच्या बाजूला असल्याने तेथे "अरोरा बोरीआलिस" किंवा "नॉर्दन लाइट्स" या नावाचा प्रकाशाचा एक अद्भुत चमत्कार पहावयास मिळतो. हेलसिंकी पासुन तो प्रदेश बराच लांब असल्याने आणि मला एकट्याला जायला न दिल्याने ते काही पहावयास मिळाले नाही :(, पण त्यावरची फिल्म मात्र हेलसिंकीमध्ये पाहिली आणि दुधाची तहान ताकावर भागवली Happy असो, पुन्हा जाण्यासाठी काहीतरी कारण हवंच ना ;-).

(वरील फोटो हे मी काढले नसुन आंतरजालावरून साभार घेतले आहेत आणि ते येथे टाकण्यास माबो अ‍ॅडमिनने संमती दिल्याबद्दल आभार! या फोटो आणि माहितीशिवाय फिनलंड सफर काहीशी अधुरी राहिली असती Happy
==================================================
सिबेलियस पार्क
==================================================
फिनलंडमध्ये जवळपास लाखापेक्षा जास्त सरोवरे असल्याने गर्द हिरवाई आणि उद्याने आढळतात. असेच एक म्हणजे "सिबेलियस पार्क". जीन सिबेलियस हा फिनलंडचा एक श्रेष्ठ संगीतकार होता. तो स्वतः निसर्गपूजक असल्याने निसर्गातल्या आवाजातुन, पाण्याच्या खळखळाटातुन, पक्ष्यांच्या कूजनांतुन आपल्याला संगीत सुचतं असं तो म्हणत असे. त्याच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त हे स्मारक सन १९४५ साली उभारण्यात आले. नेहमीच्या पद्धतीने नुसता पुतळा न उभारता पियानोत वापरतात तसल्या नळ्यांचा वापर करून एक वेगळी कलाकृती उभी केली आहे. पलिकडे सिबेलियसचा फक्त चेहरा आहे आणि सभोवती सुरेख बाग.

==================================================
टेम्पेलिओकिओ (Temppeliaukio) चर्च
==================================================

नेहमीसारखे भव्य चर्च न बांधता हे डोंगर खोदून गोलाकार बांधले आहे. वरती तांब्याच्या तारेच अभिनव छत आहे त्यासाठी २५ हजार मीटर तार लागली असे सांगितले जाते. चर्चमध्ये येशुची किंवा कोणाचीच मूर्ती नाहि. केवळ क्रॉस ठेवलेला आहे आणि समोर बसण्यासाठी खुर्च्या वगैरे. हेलसिंकीतील एक आवर्जुन बघण्यासारखे ठिकाण.

==================================================
सेवरासारी ओपन एअर म्युझियम
==================================================
फिनिश भाषेत "सारी" म्हणजे "बेट". १९०९ साली उभारण्यात आलेले हे संग्रहालय हेलसिंकीपासुन साधारण २०मिनिटाच्या (बसने) अंतरावर असुन एका बेटावर वसलेले आहे. १८ व १९व्या शतकात बांधलेल्या इमारतींचे हे संग्रहालय आहे. फिनलंडच्या वेगवेगळ्या भागातुन आणलेले लाकडी घरे व इमारतीसाठी हे म्युझियम प्रसिद्ध आहे. येथील काही लाकडी घरे हि रशियातुन आणली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथे ग्रामीण फिनिश संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. लाकडी घरांव्यतिरीक्त येथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील पहावयास मिळतात. लाल/तपकिरी रंगाची खारूताई हि इथले खास वैशिष्ट्ये. या एवढ्या धीट असतात कि तुम्ही जर हातात दाणे घेऊन त्यांच्यासमोर गेलात तर त्या आरामात तुमच्या हातातले एक एक दाणे घेऊन खात बसतात.

करूणा चर्च
१६८६ साली बांधलेली "करूणा चर्च" हि इमारत येथील सर्वात जुनी असुन ती "समर वेडिंग" साठी प्रसिद्ध आहे.

==================================================
हेलसिंकी येथी १९५२ साली ऑलंम्पिक गेम्स झाले होते आणि त्यावेळी भारताला हॉकीत पहिले सुवर्णपदक मिळाले होते. इतके जुने स्टेडियम असुनहि आजही त्याची उत्तम निगा राखली आहे.
==================================================

==================================================
सफर फिनलंडची आणि "फ्लाईंग फिन" म्हणुन प्रसिद्ध "पावोनूर्मी" या ऑलम्पिक धावपटुचा उल्लेख नसावा असे शक्य नाही. १८९७ ते १९७३ अशी कारकिर्द असलेल्या या धावपटुने ९ सुवर्णपदक, ३ रजतपदक मिळवले असुन २२ जागतिक विक्रमाची नोंद त्याच्या नावावर आहे.
==================================================

==================================================
क्रमशः

 बाल्टिक समुद्र
(हिवाळ्यात बाल्टिक समुद्र पूर्णपणे गोठतो - तापमान उणे ३०-४० :))

सिलया लाईन (Silja Lines) - फिनलंड ते स्वीडन (Helsinki—Stockholm) जहाजसेवा.
वायकिंग (Viking Line) - फिनलंड ते तल्लीन, एस्टोनिया, जर्मेनी जहाजसेवा.
==================================================

फिनलंडमध्ये हिवाळ्यात जेंव्हा बाल्टिक समुद्र गोठतो तेंव्हा याचा उपयोग बर्फ फोडण्यासाठी करतात.

==================================================
लिन्नामाकी अम्युझमेंट पार्क
२७ मे १९५० साली सुरु झालेले हे पार्क फिनलंडमधील लहान मोठ्यांचे आवडीचे ठिकाण आहे. यात जवळपास ४० पेक्षा अधिक राईडस आहेत. इथले रोलर कोस्टर आणि वॉटर कोस्टर प्रसिद्ध आहे.
==================================================

==================================================
नुक्सियो नॅशनल पार्क (Nuuksio)
इथला एक अनुभव सांगावासा वाटतोय. आम्ही कॅंप फायर करण्यासाठी २ तासांची पायपीट करून एका सुंदर तळ्याकाठी आलो. कॅंप फायरसाठी ती एक चांगली जागा असल्याने काही लोकांनी तेथे अगोदरच सोय (लाकुड, बसायला जागा, लाकडे कापण्यासाठी हत्यारे इ. ) करून ठेवली आहे. आम्ही तेथे आमच्या काही फिनिश मित्रमैत्रिंसोबत सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलो. कॅंप फायर झाल्यानंतर प्रत्येकाने तेथे पडलेला कचरा न सांगता गोळा केला आणि आपआपल्या बॅगेत भरला. एकाने तळ्यावर जाऊन पाणी आणले व त्या आगीवर टाकले. जाण्यासाठी जेंव्हा आम्ही परत निघालो तेंव्हा वाटतच नव्हते कि येथे कोणी सहलीसाठी आले होते इतका तो परिसर स्वच्छ केला होत. परत १ तासाची पायपीट करून जेंव्हा कचऱ्याचा डबा बाहेर दिसला तेंव्हा सगळ्यांनी आपल्या बॅगांमधला कचरा त्यात टाकला.
==================================================

बार्बेक्युची तयारी करताना अस्मादिक Happy

==================================================
उन्हाळ्यातील मौजमजा Happy
==================================================

==================================================
"हाक्कानिआमी" मेट्रो स्टेशन
==================================================

==================================================
हेलसिंकीतील "हाक्कानिआमी" येथील मार्केट
==================================================


==================================================
क्रमशः

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

डोंगर भाऊ blog

 https://samantfort.blogspot.com/2022/06/offbeat-shangarh-pundrik-rishi-lake.html  ऑफ़बीट शानगड आणि पुंडरिक ऋषी सरोवर ट्रेक , हिमाचल प्रदेश (...