नैरोबी - एक पुनर्भेट
नैरोबी हे माझे आवडते शहर. एक कारण वर्षभर असणारे सुखद हवामान आणि दुसरे म्हणजे तिथे भरभरुन फुलणारी फुले. दूधाची, फळे आणि भाज्यांची रेलचेल ही देखील कारणे आहेतच.
मध्यंतरी एकदा व्हाया नैरोबी आलोच होतो पण त्यावेळी मोजके तास ट्रांझिट मधे होतो, शहरात जाता आले नाही.
यावेळेस माझे लुआंडा नैरोबी विमान तासभर लेट झाले आणि मला नैरोबी मधे मुक्काम करावा लागला. हॉटेल
वगैरे व्यवस्था, केनया एअरवेज ने केली होती. माझ्या हाताशी अर्धा दिवस होता आणि त्याचा भरपूर फायदा मी
घेतला.
ज्या हॉटेल मधे मुक्काम होता, तिथूनच मी एक टुअर घेतली आणि काही ठिकाणांना भेट दिली, थोडा वेळ मी ज्या
भागात ( नैरोबी वेस्ट ) रहात होतो, तिथे भटकलो. त्याची हि चित्रमय झलक.
1) साधे बाभळीचे झाड केनयात असे ताडमाड वाढते
नैरोबी शहराला जवळ जवळ लागूनच त्यांचा नॅशनल पार्क आहे. तो खुपच मोठा आहे पण त्याला लागूनच
नैरोबी सफारी वॉक, प्राण्यांचे अनाथालय वगैरे आहे. त्या पार्क मधे सिंह, बिबळे, चित्ते, हरणं, जिराफ, झेब्रा,
शहामृग वगैरे प्राणी सहज दिसतात. त्याला लागून असलेल्या एका पार्कात काही प्राणी आहेत तिथे मी भेट दिली.
तिथले प्राणी आहेत रुबाबदार पण पिंजर्यात असल्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत.
2)
3)
4)
5)
a data-flickr-embed="true" href="https://www.flickr.com/photos/dineshda/29956445810/in/album-721576750902..." title="DSCN2301">
6)
केनयामधील प्राण्यांबद्दल माझे आणखी एक निरिक्षण म्हणजे ते प्राणी विमानांना आणि माणसांना अजिबात बूजत
नाहीत. अगदी नजरेला नजर देऊन बघतात.
7) हे रानडुक्कर रस्त्यावरच होते.
8) ही पण ( शांतपणे रस्ता मोकळा व्हायची वाट बघत होते )
नंतर नैरोबीतल्या काझुरी फॅक्टरीला भेट दिली. या फॅक्टरीत सिरॅमिक चे मणी तयार करतात. हे मणी हातांनीच
तयार करतात. मग त्यांचे रंगकाम करतात. हि सर्व प्रक्रिया तिथे बघता येते. तिथे अर्थातच विक्रीव्यवस्था आहे,
पण त्यातून काही मणी निवडणे म्हणजे महाकठीण काम आहे.
9)
हि फॅक्टरी नैरोबीतल्या करेन भागात आहे. या भागात नैरोबीतल्या अतिश्रीमंत लोकांची घरे आहेत पण ती घनदाट
झाडीत लपलेली आहेत. त्या भागातून गाडीने फिरतानाही खुप छान वाटते. तिथल्या रस्त्यांचे काही फोटो देतो आहे.
10)
11)
12)
नंतर मी जिराफ सेंटर ला भेट दिली. ( हा थोडा पैसे कमवायचा प्रकार वाटला मला पण ठिक आहे )
या भागाला लागून जे जंगल आहे तिथले काही जिराफ आपल्याला जवळून बघता येतात. त्यांना हाताने भरवता येते.
त्यांना खाण्यासाठी म्हणून काहि प्रकार आपल्या हातात देतात आणि ते बघून काही जिराफ तिथे बांधलेल्या एका
गॅलरी जवळ येतात. जीभ लांब करून ते आपल्या हातातले खाणे खातात. मी तिथे ऊभा होतो, तर एका जिराफाने
माझा गालच चाटला. ( अजून शिरशिरी येते तो स्पर्श आठवून ) तिथे सुवेनियर शॉप आहे. तिथल्या झाडांवर
मला दोन वेली आढळल्या आणि त्यांची फुले फारच सुगंधी होती.
13)
14)
15) जिराफाचे अगदी जवळून दर्शन
16) तिथल्या सुवेनियर शॉपचे कल्पक डिझाईन
17 ) हिच ती सुगंधी फुले
18 ) हि फुले पण सुगंधी होती
नंतर तिथल्या हत्तींच्या अनाथालयाला भेट दिली. ही जागा पर्यटकांसाठी फक्त दुपारी अकरा ते बारा, या वेळातच
उघडी असते. या वेळात तिथे हत्तींच्या पिल्लांना दूध पाजण्याचा कार्यक्रम असतो. जवळ्यच्या जंगलातून हि आईविना
असलेली पिल्ले हाकारत आणतात. ती आणताना बालगजाननांचा भास होत राहतो. आल्या आल्या बाटलीने
जवळजवळ ५/६ लिटर्स दूध, घटाघट पितात आणि मग खेळायला सुरवात करतात. चिखलात लोळणे, अंगाला माती
फासणे, एकमेकांना ढूश्या देणे असले चाळे सुरु करतात. त्यांना बघणे फार मौजेचे असते.
हि पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना जंगलात सोडायचा प्लान आहे. माझ्या मनात मात्र वेगळे विचार आले. आफ्रिकन
हत्ती, आपल्या आशियाई हत्तींपेक्षा वेगळे असतात. ते आकाराने आणि ताकदीनेही मोठे असतात. पण ते
माणसाळत नाहीत ( म्हणजे आपल्याकडच्या प्रमाणे त्यांना देवालयांच्या सेवेला जुंपलेले नसते कि त्यांच्याकडून
ओझी व्हायली जात नाहीत. ) तरीही केनयातील हत्ती आणि तिथली माणसे यांच्यात एक भावबंध आहे. तिथल्या
वाळवंटात पाणी शोधायला हत्तींची मदत होते ( म्हणजे हत्ती जे पाणी शोधतात ते माणसे वापरतात ) आणि
कृतज्ञता म्हणून हत्तींसाठी ते लोक पाणी काढून ठेवतात. याचे चित्रीकरण बीबीसी ने ह्यूमन प्लॅनेट मधे केलेले आहे.
तर ही पिल्ले पुढे माणसांशिवाय राहू शकतील काय ? त्यांना बाकीचे हत्ती स्वीकारतील काय ?
19)
20)
21)
22 ) एका बाजूला हत्तींचा खेळ चालला होता, तर तिथल्याच एका टेबलावरून हा त्यांच्यावर लक्ष ट्।एवून होता.
त्यानंतर मी नैरोबी वेस्ट भागात भटकलो. तिथे फुललेला झकरांदा, दिल्ली सावर बघितली, जून्या सुपर्मार्केट
मधे थोडीफार खरेदी केली, तिथल्या झाडांवरची कोरी पक्ष्यांची घरटी बघितली... आणि अर्थातच फुले टिपली.
23 ) केनयामधला भरभरून फुललेला झकरांदा
24 ) झकरांदाचा क्लोज अप
25 ) हि माझ्या घरामागची गल्ली
26 ) या फुलांवर मी एक लेख लिहिला होता
27 ) हि कोरी पक्ष्यांची वसाहत
28 ) दिल्ली सावर
29 )
30 )
31 ) अगदी नखाएवढी होती हि फुले
32 ) जास्वंदीचा वेगळा प्रकार
33 )
34 )
35 )
36 )
37 ) आघाड्याचा तूरा
38 ) सुझन
39 )
40 ) अगदी खोटी वाटेल अशी, पण खरी वेल
41 )
परत कधी येऊ... असा विचार करतच विमानतळावर परत आलो.
- भाग २ - केनया
घर असावे घरासारखे - भाग २ - केनया
केनया मधे मी एकंदर पाच घरात राहिलो ... शिवाय अनेक हॉटेल्स मधेही राहिलो, पण तो या मालिकेचा भाग नाही.
४) सामत सोजपार हाऊस, किसुमू - साल १९९३
लग्न होऊन केनयात गेल्यावर आम्ही या घरात राहिलो. दुसर्या मजल्यावरचा ३
बेडरुम्स, दोन किचन्स, ३ टॉयलेट्स सिंटींग रुम, डायनिंग रुम, स्टोअर रुम..
असला अवाढव्य फ्लॅट होता तो. दुसर्याच मजल्यावर होता तरी
तळमजल्यावर एक गोदाम होते आणि त्याची उंची बरीच असल्याने, घरी जाण्यासाठी बरेच जिने चढावे लागायचे.
अगदी मोजक्याच भांड्यांनी आणि वाणसामानानी सुरु केलेला संसार मी दोन महिन्यातच भरपूर वाढवला होता.
त्यापुर्वीचे वास्तव्य मस्कतसारख्या सुरक्षित शहरात झाले होते, त्यामूळे केनयात सुरक्षिततेसाठी जी काळजी
घ्यावी लागत असे, त्याचे नाही म्हंटले तरी थोडे दडपण आले होते.
याच घरी जाण्यासाठी इमारतीचे, मग मजल्याचे आणि मग फ्लॅटचे अशी ३ कुलुपे उघडावी लागत असत.
पण नंतर पुढे ही बंधने मला जाचक वाटेनाशी झाली किंवा मी ती जुमानेसा झालो. संध्याकाळी घरी आल्यावरही
मी बाहेर पडत असे, पण किसुमूला रोज त्या वेळी पाऊस पडत असल्याने, त्यावरही बंधने होती.
या घराला भरपूर खिडक्या होत्या तरी त्या मागच्या आणि बाजूच्या गल्लीच्या दिशेने होत्या. त्यातून फार काही
दिसतही नसे. केनयामधे कोळसा स्वस्त आणि मुबलक मिळतो. आणि त्याचा वापर करण्यासाठीच बहुदा तिथे
एक जास्तीचे उघड्यावरचे किचन असते. तसे या घरालाही होते. तिथे मी शेगडीवर जेवण करत असे.
केनयात तसे भारतीय वाणसामान सहज मिळते. भाजीपालाही ताजा आणि स्वस्त मिळायचा. तो मी आणत असे.
पण तिथे ताजे दूध मिळत असूनही मला ते घेता येत नसे, कारण मी दिवसभर ऑफिसमधे आणि दूधवाला
दिवसभरात कधीही येत असे.
त्या घराचे आमचे शेजारी म्हणजे डॉ. रुपारेलिया. ते तसे चांगले होते पण दिवसभर दोघे क्लीनीकमधे असत. त्यांची
भेट क्वचितच होत असे.
घरात टीव्ही नव्हता. दर रविवारी मी थिएटर मधे जाऊन चित्रपट बघत असे, पण रोजची करमणूक अशी काही
नव्हती. मी लोकसत्ता आणि लोकप्रभा मागवायचो ( तो दुसर्या दिवशी मिळायचा ) पण तोही अधाश्यासारखा
लगेच वाचून टाकायचो. घरातून काही दिसत नसल्याने संध्याकाळी चहाचा कप घेऊन गच्चीवर जायचो. किसूमूहून
संध्याकाळी उडणारे एकमेव विमान, उडलेले बघून परत घरी यायचो.
या घराच्या मागेच व्हिक्टोरिया डिस्को होता. शुक्रवारी आणि शनिवारी त्याचा एवढा आवाज यायचा कि सर्व
खिडक्या बंद करूनही मला झोप लागत नसे. हा डिस्को पहाटे ३/४ वाजेपर्यंत चालू असे.
एकंदर या घराच्या आठवणी म्हणजे एकटेपणाच्या आणि क्लेशकारकच आहेत. पण हा एकटेपणा ३ महिन्यातच
संपला. या घराबद्दल एवढी अढी मनात बसली होती, कि नंतर त्याच गावात काही वर्षे असूनही, मी या घरासमोरचा रस्ताही टाळला.
पुढच्या घरात मला मनीष मीना मेहरोत्रा या दोघांचा अपार स्नेह लाभला. खरे तर त्यांच्याच आग्रहावरुन मी घर
बदलले..
५) बंगलोज बिहाईंड केसीबी - साल १९९३-१९९५
आमच्या कंपनीतले अधिकारी किसुमु गावात वेगवेगळ्या ठिकाणी रहात होते. वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे
व्हावे म्हणून ब्रिटीशकालीन बंगले असलेली एक कॉलनी आमच्या कंपनीने विकत घेतली होती.
तिथे शिफ्ट होणे आमच्या मनावर होते पण मी आणि मनीषने तिथे शिफ्ट व्हायचे ठरवले. ( मनीष माझा
कलीग होता आणि त्यानेच मला आग्रह केला.)
त्या छोटेखानी बंगल्याच्या मी प्रथमदर्शनीच प्रेमात पडलो. दुमजली बंगला होता तो. तळमजल्यावर किचन
आणि सिटिंग रुम होती, तर वरच्या मजल्यावर दोन बेडरुम्स, मधली मोकळी जागा,
बाथरुम आणि सुंदरशी बाल्कनी होती. मागच्या बाजूला मोरी शिवाय मागे पुढे भली
मोठी मोकळी जागा. सर्व घरभर काचेच्या मोठ्या मोठ्या
खिडक्या, दरवाजेही काचेचेच. मनीषचे आणि माझे बंगले समोरासमोर. आजही हे माझ्या आयूष्यातले सर्वात
सुंदर घर आहे.
खालच्या मजल्यावरून सभोवतालची बाग दिसायची तर वरच्या मजल्यावरून अगदी बाथमधूनही लेक
व्हिक्टोरियाचे नयनरम्य दृष्य दिसायचे. संध्याकाळी पाऊस पडल्यावर हवामान
सुखद व्हायचे. या घरात ए सी काय, पंखा पण नव्ह्ता. ( गरजच नव्हती. )
हे बंगले जुने असले तरी व्यवस्थित राखलेले होते शिवाय त्यांची नव्याने
रंगरंगोटी केली होती. तिथे गेल्या दिवसापासून मीनाभाभीने मला, भाईसाब
म्हणायला सुरवात केली. ती पंजाबी असली तरी बनारसमधे
वाढलेली होती, शिवाय तिची आई मराठी होती, त्यामूळे ती तिन्ही भाषा ( हिंदी, पंजाबी आणि मराठी ) सुरेख
बोलायची. मी तिला माझ्या हिंदीचे गुरुपद देऊन टाकले होते. सुंदर वाक्यरचना आणि काही अनोखे शब्द
मी तिच्याकडून शिकलो.
केनयात दूधाचा सुकाळ आहे. त्यामूळे दूधवाल्याकडून ती माझ्यासाठी रोज दूध घेऊन ठेवायची, इतकेच
नव्हे तर गरमही करुन ठेवायची. मी आणि मनीष घरी आलो कि तिघे मिळून पायरीवरच चहा पित असू.
मग तिथेच आज जेवायला काय बनवायचे त्याची चर्चा व्हायची. मग अर्थातच एकमेकांना नमुने पाठवले
जायचे.
आजूबाजूला खुप मोकळे आवार असल्याने मी तिथे खुप फुलझाडे लावली होती. आणि तिथल्या
सुंदर हवामानात ती भरभरून फुलायचीही. मागच्या जागेत भरपूर भाजीपाला लावला होता. मग अर्थातच
त्याचीही देवाण घेवाण व्हायची.
मनीषचा मुलगा प्रणव हा माझा घट्ट मित्र आणि खेळगडी. बाकिचीही मूले होती तिथे. बहुतेक स्टाफ टेक्नीकल
होता, त्यामूळे त्यांना रात्रीच्या शिफ्टची व्यवस्था लावून यावे लागायचे. मी मात्र आधी निघायचो. त्यामूळे
सटरफटर वाणसामान कुणाला हवे असेल तर ते मीच आणायचो. आणि आल्यावर सगळी मुले मिळून खेळतही असू.
केनयात १५ दिवस कापणी केली नाही तर भयानक गवत वाढते, त्यात मूलांनी जाऊ नये म्हणून जपावे लागे आणि तेही मीच करत असे. सापांची भिती नव्हती तर गोखरु ( कंटक ) ची भिती होती त्याच्या काटेरी फळावर काय बाजूला जरी पाऊल पडले तर भयानक वेदना होत. पण ती उचकटायची एक पद्धत होती, ती मुलांना मी शिकवली होती. आठपंधरा दिवसांनी तो उद्योग करावा लागायचा.
कधी कधी तर आणखी एक वेगळीच मजा असायची. गेटवर मूले माझी वाट बघत असायची आणि मला
बघताच, अंकल, लिटील डायनोसॉर, लिटील डायनोसॉर आया है, असा आरडाओरडा करायची. अशावेळी
माझ्या पायरीवर हमखास एक भली मोठी मॉनिटर लिझार्ड बसलेली असायची. तिला हुसकावणे
हा एक प्रोजेक्ट व्हायचा. दगड मारून चालायचे नाही कारण दरवाजा काचेचा होता.
बरं ती तशी मठ्ठ (कि बेरड). आरडाओरडा करूनही जात नसे. खुपदा कुणातरी केनयन
माणसाला बोलावून आणावे लागे, तो तिला
पकडून नेत असे.
त्या घराला धूर जाण्यासाठी म्हणून उंचावर बारीक झरोके होते. कधी कधी त्यातून बारीकसे वटवाघूळ
घरात शिरलेले असायचे, त्याला बाहेर जायचा रस्ता सापडत नसे, त्याला हुसकावणे हा आणखी एक प्रोजेक्ट
असायचा.. पण हे सगळे आम्ही एन्जॉय करायचो.
अगदी पहाटे पाचला मी उठत असे ( तसा अजूनही उठतोच ) आणि मागच्या बाजूला कोळश्याची शेगडी
पेटवून अंघोळीसाठी पाणी तापवत असे. त्याची एक वेगळीच मजा. आणि माझे पाणी तापवून झाले कि
मागच्या बंगल्यातल्या कुलकर्णी वहिनी त्याच शेगडीवर पाणी तापवत असत, नव्हे तसेच ठरले होते.
केनयामधल्या ब्लॅक मॅजिक म्हणजेच जूजूचा पण अनुभव मी याच घरात घेतला. एकदा माझ्या घरात
३ चोर शिरले आणि पैसे आणि बर्याच वस्तू नेल्या ( त्याची मला पूर्ण नुकसान भरपाई मिळाली ) पण
ते घरात असताना मला गाढ झोप लागली होती. ते कसे झाले याचा उलगडा मला मनीषच्या हाऊसमेडने
करून दिला. माझ्या बेडखाली चोरांनी एक जाडजुड दोर जाळला होता आणि तो दोर साधासुधा नव्हता
तर गळफास लावून आत्महत्या केलेल्या कुणाच्या तरी फासाचा होता. ( अर्थात मला गाढ झोप लागली,
हे एका अर्थी बरेच झाले म्हणायचे. )
या घटनेची चर्चा अर्थातच झाली, आणि कॉलनीतली एक गुजराथी बाई म्हणाली, उधर उनका बेटा पैदा
हुआ और यहाँ चोरी हो गयी.... यावर मीनाभाभीनेच तिच्याशी जोरदार भांडण केले
होते. प्रणवची छोटी बहीण, प्रेरणाचा जन्म पण त्याच काळातला. त्या काळात
मीनाभाभीने माझ्याकडून हक्काने पदार्थ करून मागितले.
अगदी लहानपणी कोंबडी कापताना बघितल्यामूळे मी आयुष्यभर नॉन व्हेज खाणे सोडले. पण याच घरात मी
स्वतः कोंबडी कापली ( जिवंत नाही ) ते पण मीनाभाभीसाठीच. अर्थात नंतर या सगळ्याचे काही वाटेनासे झालेय.
या घराबद्दल मी आजही खुप हळवा आहे. या घराच्या आठवणी काढताना मी हरखून जातो. या घराला
मला नंतर कधी भेट देता आली नाही पण मेहरोत्रा आजही माझ्या संपर्कात आहेत.
किसुमूला असताना नैरोबीहूनच भारताचे विमान पकडावे लागे, त्यावेळी नैरोबीबद्दल खुप कुतूहल वाटायचे.
माझी पुढची ३ घरे नैरोबीत झाली.
६) पार्कलँड्स, नैरोबी - साल २०१०
केनयामधल्या माझ्या दुसर्या सत्रात माझी ३ घरे झाली. तिन्ही नैरोबीत. मी नैरोबीत दाखल झाल्यावर माझ्या
पसंतीने घर फायनल करायचे असे ठरले होते. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून मी पार्कलँड मधे, उषाबेन आणि
मुकेशभाई यांच्या घरी राहिलो. तरी तिथे ५ आठवड्याचा मुक्काम झाला.
पार्कलँड हा नैरोबी मधला श्रीमंताचा भाग. मोठमोठाली घरे आहेत तिथे. उषाबेनच्या घरात आम्ही पी.जी.
मिळून १० जण होतो. शिवाय ते दोघे, त्यांच्या २ मुली आणि मुकेशभाईंचे आईवडील.
पण सगळे हसत खेळत रहात असू. एवढ्या सगळ्यांचे नाश्तपाणी, रात्रीचे जेवण शिवाय ज्यांना हवा त्यांना
दुपारचा डबा, असे सगळे उषाबेन हसत हसत मॅनेज करत असत. आम्हा प्रत्येकाची आवडनिवड त्या जपत.
कुणाला अधेमधे भूक लागली तर खाण्यासाठी खाऊचे डबेही सतत भरलेले असत. त्यांच्या हाताला चव होतीच.
त्याशिवायही कुणाला थेपले करुन दे, कुणाला मेथीचे लाडू करुन दे, असे उद्योग त्या करत असत.
आमच्यापैकी काही जण अगदीच तरुण होते. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असत ( गर्लफ्रेंड, दारू, घरचे प्रॉब्लेम्स ) त्याची
चर्चा पण दिलखुलासपणे जेवणाच्या टेबलवर होत असे. त्या पाच आठवड्यातही
माझ्याकडे घरचाच माणूस हे पद आपसूक आले. एकदा उषाबेन ना कुठेतरी जायचे
होते, त्या दिवशीचे जेवण त्यांनी माझ्यावर सोपवले होते.
हे घर सुंदर होते. गच्चीला खेटूनच सोनचाफ्याचे झाड होते आणि ते भरभरुन फुलायचे. तो परीसरही सुंदर होता,
पण रस्त्यावर वर्दळ अजिबात नसायची. माझ्या कराराप्रमाणे मला स्वतंत्र घर असणार होते, म्हणून तसे घर
सापडताच मी उषाबेनचा निरोप घेतला.
अगदी सख्खी बहिण असावी, तशी ती होती. मला जाताना त्यांनी शिदोरी बांधून दिली, नव्या घरी लगेच कुठे जेवण करणार तू, म्हणत.
खर्या अर्थाने अन्नपूर्णा !
७) बॉम्बे फ्लॅट्स, नैरोबी वेस्ट. - साल २०११
पार्कलँड हून मी नैरोबी वेस्ट आलो. पार्कलँड हा मुंबईतला हिंदू कॉलनीसारखा भाग तर नैरोबी वेस्ट, हा गिरगाव सारखा.आणि मुख्य म्हणजे माझे किशोरी मिश्रा आणि अजय पटेल, हे दोन कलिग्ज त्याच भागात रहात होते.
बॉम्बे फ्लॅट्स हेच त्या बिल्डींगचे नाव. तिथे तिसर्या मजल्यावर मला एक फ्लॅट मिळाला. बिल्डींगमधे गुजराथी आणि आफ्रिकन अशी मिश्र वस्ती होती. फ्लॅट मोठे २ बेडरुमचे असले तरी रचना चाळीसारखी होती. घरी जाताना लांब बाल्कनी चालत जावी लागे.
घराला मागे आणि पुढेच फक्त खिडक्या, त्यामूळे घरात थोडा अंधारच असायचा. पण तरी तो एरिया मला आवडला होता. दोन मोठी सुपरमार्केट्स जवळ होती. शिवाय रस्त्यावर फळे, भाज्या वगैरे विकायला असत. केनयासारखी ताजी फळे आणि भाज्या तर मुंबईतही मिळत नाहीत.
मी रोज सकाळी किशोरीकडे जात असे, मग रानीभाभीच्या हातचा चहा पिऊन आम्ही ऑफिसला जायला निघत असू. जाताना त्याच्या मुलांना म्हणजे अभय, आशीष ना शाळेत सोडत असू. छोटा आकाश, जवळच्याच शाळेत जात असे.
या बॉम्बे फ्लॅटमधे पाण्याचा पण प्रॉब्लेम होता. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र पंप तळमजल्यावर होता, आणि
त्याचा स्विच मात्र घरात. तो चालू केल्याशिवाय पाणी येत नसे. आणि रात्री तो स्विच ऑफ करायला मी खुपदा
विसरत असे, मग तळमजल्यावरचे कुणीतरी मला आठवण करुन द्यायला वर येत असे.. तो प्रकार जरा
वैतागवाणाच झाला होता.
या घरात मला जेवण करायचा पण मूड लागत नव्हता. ऑफिसमधे भारतीय पद्धतीचे रुचकर जेवण होत असे,
आणि रात्री मी फळे खाऊन रहात असे. रविवारी, नैरोबीतल्या एखाद्या भारतीय रेस्टॉरंट मधे जात असे.
याच रस्त्यावर एका नवीन बिल्डींगचे बांधकाम पूर्ण होत आले होते. अजूनही सर्व बिल्डिंगवर आच्छादन होते,
आणि ज्या दिवशी ते काढले, त्याच दिवशी मी त्या बिल्डींगच्या प्रेमात पडलो. गुलाबी, केशरी रंगात रंगलेली
ती बिल्डिंग खुप सुंदर होती.
तिथे बाहेर बोर्ड लागल्याबरोबर मी फ्लॅट बघायला गेलो, आणि सहाव्या मजल्यावरचा, टेरेस ला लागून असलेला एक फ्लॅट मी पसंत केला.....
८) ग्लेन किर्कमॅन फ्लॅट्स, नैरोबी वेस्ट. साल २०१२
दोन बेडरुम्स आणि छोटी बाल्कनी या फ्लॅटला होती आणि एक भली मोठी टेरेसही होती. या बिल्डींगची
पाणीव्यवस्था उत्तम होती.
त्या भागातली सर्वात उंच इमारत तीच होती. घरातील दोन बेडरुमच्या खिडक्यातून थेट सुर्योदय आणि सुर्यास्त
दिसत असे. त्याशिवाय टेरेसमधून नैरोबीचा फार मोठा भाग दिसत असे.
रस्त्याच्या दुसर्या बाजूला, न्यायो स्टेडीयम, हे नव्याने बांधलेले
स्टेडीयम होते. त्यात होणारे कार्यक्रम मला टेरेस मधूनच नव्हे तर घरातूनही
दिसत असत.
नैरोबीचा दुसरा विमानतळ, विल्सन एअरपोर्ट हा जवळच होता आणि त्याची धावपट्टी घरातून दिसत असे.
छोटी छोटी विमाने तिथून दिवसभर उडताना दिसत.
या घरात जायला मला सहा जिने चढून जावे लागत खरे, पण नंतरची संध्याकाळ
फार रम्य असे. खुपदा कॉफीचा मग हातात घेऊन मी, टेरेसवरून सूर्यास्त बघत
असे. नैरोबी तसे हिरवेगार आहे. भली मोठी झाडे आहेत तिथे.
ती वेगवेगळ्या काळात भरभरून फुलतात. बाभळीचा पांढरा, झकरांदाचा आकाशी, दिल्ली सावरचा गुलाबी,
वावळ्याचा पिवळा, टोकफळाचा लाल असे रंग सभोवताली आळीपाळीने असत.
या परीसरात गुजराथी, पंजाबी लोकांची वस्ती आहे. एक मोठे देऊळ आणि गुरुद्वारा पण आहे. रविवारी
मी या परीसरात भटकत असे. देवळात सर्व सण दणक्यात साजरे होत. नवरात्रीत
रात्रभर गरबा असे तिथे, त्याच वेळी रोज प्रसादाचे जेवणही असे.
या घरात एकदम उत्साही आणि प्रसन्न वाटत असे. मायबोलीवरची, भाज्यांवरची माझी अवघी विठाई माझी, हि मालिका याच घरात असताना पूर्ण केली मी.
माझ्या शेजारी तिघी सिंगल मदर्स होत्या. हाय / हॅलो एवढीच आमची ओळख
राहिली पण पहिल्या मजल्यावरच्या एका शीख फॅमिलीशी माझी मैत्री झाली. त्या
मिसेस सिंग आणि त्यांच्या तिघी मुली तिथे रहात होत्या. मिस्टर सिंग हयात
नव्हते. मधली कमल शिकत होती. . पुढे मी तिला माझ्याच ऑफिसमधे जॉब मिळवून
दिला आणि
माझ्या रजेच्या काळात ती माझे काम संभाळत असे.
किशोरीच्या घरी रोज जात होतोच. याच घरात असताना आम्ही नैरोबीच्या आजूबाजूच्या बर्याच सहली केल्या.
केनयामधे इंटरनेट आणि फोनसुद्धा अगदी स्वस्त आहेत. या घरात असताना यू ट्यूबवरुन बरेच डाऊनलोड्स पण
करुन झाले.
हे घर नैसर्गिक रित्याच थंड आणि हवेशीर होते. पंख्याची गरजही कधी वाटली नाही. दुपारी झोपताना पण ब्लँकेट
घेऊन झोपावे लागे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात विमान चुकल्याने नैरोबीत एक दिवस मुक्काम होता, त्या दिवशी या दोन्ही घरांना परत एकदा डोळे भरून पाहून आलो.
क्रमश :
अमा, या साईटवर ते मणी मिळतील. तिथेच मग्ज वगैरे पण बनवतात. सर्व मणी मात्र हातानेच बनवतात साचे क्वचितच वापरतात. ति सर्व प्रोसेस तिथे बघता येते. किमती फार नाहीत.
ती रानडुक्करे मी अनेकदा बघितली आहेत तिथे. रस्ता क्रॉस करण्यासाठी, तो मोकळा व्हायची वाट बघत असतात. अजिबात हल्ला करण्याचा पवित्रा नसतो. तिथे त्यांना कुणी त्रास देत नाही आणि तीही कुणाला त्रास देत नाहीत.
भाग ३ - नायजेरिया
९) जी आर ए, फेज २. पोर्ट हारकोर्ट, नायजेरिया, साल १९९६-१९९८
पोर्ट हारकोर्ट हे नायजेरियातले शहर नंतरच्या काळात फार बदनाम झाले. भारतीय लोकांच्या अपहरणाच्या घटनाही
तिथे घडल्या. पण मी ज्या काळात तिथे होतो, त्या काळात एवढी दशहत नव्हती.
जी आर ए ( नायजेरियन उच्चार जीआरोए ) ह मोठमोठ्या बंगल्यांचा भाग. अश्या पाच बंगल्यांच्या एका संकुलात
आमच्या कम्पनीचे अधिकारी रहात होते. त्यातला पहिल्या बंगल्यातल्या तळमजल्यावर मी रहात होतो,
तर वरच्या मजल्यावर गेताँ हा फ्रेंच माणूस आणि जो हिल हा ब्रिटीश माणूस रहात होते. पण दोघांचे काम
साईटवर असल्याने ते क्वचितच घरी असत आणि घरी असले तरी त्यांच्या "एक्स्ट्रा करिक्यूलर अॅईक्टीव्हीटीज "
भरपूर होत्या.
बंगल्याला फ्रेंच विंडोज होत्या पण मागच्या बाजूला मोठी भिंत होती. त्या
भिंतीवर काटेरी तारांची वेटोळी होती. त्या वेटोळ्याला मी माझ्या वर्ल्ड
रिसिव्हर रेडीओची एरीयल जोडली होती. त्यामूळे मला भारतातले रेडीओचे
कार्यक्रम नीट ऐकू येत.
पाचव्या बंगल्यात आमचे ब्रिटीश एम डी, पीटर रोल्स, त्यांची करेबियन बायको आणि दोन मुली. बाकीच्या
घरांतून असेच साइट इन चार्ज रहात होते. त्यामूळे खुपदा त्या आवारात मी आणि पीटरची फॅमिली असेच उरत
असू ( पीटर पण खुपदा "बाहेर" जात असे.)
तर या सगळ्या फ्रेंच, ब्रिटीश, इतालियन, जर्मन गोतावळ्यात मी एकटा भारतीय. पण त्या सगळ्यांशी माझी छान
दोस्ती होती.
हा बंगला सुंदरच होता. समोर आवारातच मोठे गार्डन होते, आमच्या बर्याच
पार्ट्या तिथे होत. आवारात दोन आंब्याची झाडे होती. शिवाय घरामागे मोकळे
आवार होते. तिथे अर्थातच मी खुप भाजीपाला लावला होता.
तिथल्या सुपीक जमीनीत तो नुसता वाढायचाच नाही तर माजायचा. त्याची विल्हेवाट कशी लावायची, तोच
प्रश्न असायचा ( तो नंतर माझ्या भारतीय मित्रांनी सोडवला.. पण ती नंतरची गोष्ट )
मीच एकटा तिथे कायम रहात असल्याने त्या संकुलाची देखभालीची जबाबदारीही माझ्यावर होती. सर्व हाऊसमेड्स,
गार्डनर्स, जनरेटर ऑपरेटर त्या आवारातच स्वतंत्र घरात रहात असत. त्यांच्यावर देखरेख मीच करत असे.
नायजेरियात त्या काळात दुसर्या आणि चौथ्या शनिवारी, सॅनिटेशन डे असे. त्या दिवशी सकाळी कुणालाही
घराबाहेर पडण्यावर बंदी असे. त्या काळात घराचा परीसर साफ करावा ( म्हणजे वाढलेली झाडे तोडावीत वगैरे)
अशी अपेक्षा असे. त्या काळात मी आवारातल्या झाडांची देखभाल करवून घेत असे.
गेताँ आणि जो माझे चांगले मित्र असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसे. त्यांचे वादही मलाच सोडवत असे.
दोघांचा दुभाषा म्हणून मी काम करत असे आणि खुपदा नको तसल्या शिव्या ते एकमेकांना देत, त्यांचा अनुवाद
करण्यात माझी धांदल उडत असे. दोघेही अर्थात माझ्या जेवणाचे फॅन होते. त्या काळात माझ्याकडे रोटीमेकर
होता आणि त्यावर रोट्या करणे मला बर्यापैकी जमतही असे. तर मी त्या करत असताना, दोघे माझ्या बाजूला
बसत आणि गरमागरम रोट्या खात असत. त्यांना रोटी फुगते कशी त्याचेच नवल वाटत असे.
त्या दोघांनी त्याबद्दल इतर जणांनाही सांगितले त्यामूळे जो कोणी इतर घरीही असेल, तो माझ्या पंगतीला असे.
आंब्याची जी दोन झाडे होती, त्याला भरपूर आंबे लागत. नायजेरीयन लोक, कच्चे फळ कधीच तोडत नाहीत,
त्यामूळे त्या झाडांच्या कैर्या मीच तोडत असे. त्यांचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे बरेच प्रकार करत असे आणि
त्याची चटक पीटरला लागली होती. तो तर मला मुद्दाम त्याच्यासाठी ते बनवायला लावायचा.
त्या बहुतेक फ्रेंच माणसांची स्थानिक प्रेमपात्रं होती. त्यांच्या निरोपाची देवाण घेवाणही मीच करत असे. ( तेव्हा
सेल फोन नव्हते ) एकदा तो सांस्कृतिक धक्का पचवल्यानंतर मला त्या मुलींबद्दल आकस वाटेनासा झाला.
या मुलींसंबंधी एक मजेशीर आठवण सांगण्यासारखी आहे. त्या काळात मी दर सहा
महिन्यांनी भारतात येत असे, तर भारतातून एक साडी आणायला मला गेताँने
सांगितले. मी माझ्याच मनाने ब्लाऊज, परकर वगैरे सगळे घेऊन गेलो होतो.
गेतॉला ती आवडली, पण येड्याने मला सांगितले कि ती आली कि तिला नेसव ती..
त्याला मी अर्थातच ठाम नकार दिला. तिने ती आणखी कुणाकडून तरी नेसवून घेतली
आणि मला दाखवायला पण आली होती.
आमच्या घरी एम नेट चे कनेक्शन होते. दक्षिण आफ्रिकेतले हे नेटवर्क अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करते आणि
खास बात म्हणजे या चॅनेलवर अजिबात जाहीराती नसतात. अनेक फ्रेंच चित्रपट मी या काळात बघितले ( सर्वच
चांगले होते, असे अजिबात म्हणणार नाही. ) पण माझा बराचसा मो़कळा वेळ ते कार्यक्रम बघण्यात जात असे.
तिथेच मी काही फ्रेंच आणि इतालियन पदार्थही शिकलो. खराखुरा पिझ्झा मी तिथेच खाल्ला.
पहिले सहा महिने माझी कुणा भारतीयाशी ओळख नव्हती पण अशीच अचानक एकदा संदीप गायकवाडशी
ओळख झाली आणि तो माझा आजही मित्र आहे. संदीप पोर्ट पासून जरा दूर चोबा या गावी रहात होता.
तो दर गुरुवारी शॉपिंगसाठी पोर्ट ला येत असे आणि तो माझ्या ऑफिसमधून मला पिक करत असे.
मग आम्ही दोघे भाजी वगैरे घेऊन घरी येत असू. त्यानंतर बहुतेक रविवारी मी त्याच्याकडे जात असे.
पोर्ट मधेही आम्हाला अगदी मोजक्याच भाज्या मिळत. ते मार्केट माझ्या ऑफिसच्या समोरच होते
आणि दुसरे म्हणजे आमच्या कंपनीत फ्रान्समधून काही भाज्या येत असत. त्या पण मी त्याला देत असे.
संदीपमूळे मला अनेक भारतीय मित्र मिळाले आणि आमचे सहभोजनाचे कार्यक्रम सुरु झाले. अगदी १५/२० जणं
जेवायला जमत असू. माझ्या कडे पदार्थ शिकायलाही काही भारतीय बायका येत असत.
संदीपची फॅमिली भारतात होती. त्याची लेक गायत्री, त्याच काळात जन्मली आणि मी तिला संदीपच्याही आधी
भेटून आलो. ( संदीप पुढे मला गोव्यालाही भेटायला आला होता, आता तो पुण्यात असतो.)
माझ्या घरात पण मी बर्याच वेळा पार्टी देत असे. मदतीसाठी हाऊसमेड्स होत्याच, त्यामूळे अगदी भरगच्च
मेनू असे माझा. पार्टीतले उरलेले मसाले, लोणची, पंचामृत वगैरे बायका पॅक करुन नेत असत.
याच काळात एकदा गेताँला अपघात झाला आणि त्याचा हात दुखावला. मीच त्याचे ड्रेसिंग वगैरे करून देत असे.
त्याने ती नोकरी सोडली तेव्हा तो खुप रडला. मला म्हणाला, माझ्या कुटुंबातदेखील कुणी माझ्यासाठी एवढे केले
नाही. पारी ( पॅरीस ) ला ते मग तूला तूराफेल ( आयफेल टॉवर ) ला नेईन .. वगैरे बराच बोलला. मला मात्र अजून
जमलेले नाही ते.
त्या काळातही पोर्ट मधे सुरक्षिततेचे प्रॉब्लेम्स होतेच. कुठेही बाहेर जायचे असेल अगदी रस्ता ओलांडून बाजारात
जायचे असेल तरी मला बंदुकधारी गार्ड घेऊन जावे लागे. त्या काळात मी एकटा कधी गेटबाहेरही गेलो नाही.
अपवाद म्हणून शेवटच्या दिवशी, काजू आणायला गेटबाहेर एकटा गेलो होतो ( त्याच काजूची भाजी शेवटच्या
पार्टीला केली होती. )
१०) बोरी क्रिसेंट, अगबारा इस्टेट , साल २००९ - २०१०
पोर्ट हारकोर्ट लेगॉस पासून बरेच लांब होते. विमानानेच जावे लागे. त्यामानाने अगबारा लेगॉसच्या जवळ ( तरी
४० किमी ) होते. हे एक इंडस्ट्रीयल टाऊन आहे. बरेच कारखाने आहेत पण लोकल
माल विकणारी दुकाने आणि बाजार सोडला, तर सुपरमार्केट्स वगैरे नाहीत.
पण अगबारा इस्टेट मात्र मोठमोठ्या घरांचे एक संकुल आहे. अश्याच एका मोठ्या घरात मी रहात होतो.
तळमजला आणि पहिला मजला मिळून ८ बेडरुम्स होत्या. शिवाय स्टोअर रुम्स, सिटींग रुम्स, डायनीन रुम्स (
मुद्दाम रुम्स लिहितोय, कारण त्याही किमान दोन दोन होत्या ) घराभोवती मोकळी जागा होतीच. तिथेही मी बराच भाजीपाला लावला होता.
या घरातले माझे सहनिवासी म्हणजे चौहानसाहेब आणि नारायणन. दोघेही मला बरेच सिनीयर आणि टेक्नीकल.
माझा कल बघून त्यांनी घराची सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली. आणि काय कारणं असतील ती असोत,
पण हे घर पुढे अगत्यशील म्हणून फेमस झाले. घरी आलेला कुणी, जेवल्याशिवाय गेला नाही इतकेच
नव्हे तर खास जेवण्यासाठी म्हणुन इथे लोक येऊन गेले. ( सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांची कन्या आणि
जावई इथे जेऊन गेले. माझ्या गुरुचा असा आशिर्वाद मला मिळावा, यापेक्षा दुसरे भाग्य काय असणार ? )
अगबारा इस्टेट हि मोठ्या घरांची कॉलनी होती. एरवी नायजेरियात रस्त्यावर फिरणे तेवढे सुरक्षित नसते पण
हि इस्टेट अपवाद होती. हिला रस्त्याच्या बाजूने मजबूत कुंपण तर इतर बाजूंनी घनदाट जंगलाचा आणि नदीचा
वेढा होता. ते ओलांडून कुणी येईल अशी शक्यताच नव्हती, त्यामूळे मी या ईस्टेटभर भटकत असे.
अगदी रात्री अंधारातही मला कधी भिती वाटली नाही. अंधारात मी कितीतरीवेळा साप आडवे जाताना बघितले.
घुबडही उडताना दिसत. मधला काही भाग रस्ता, घनदाट जंगलाच्या कडेने जात होता. तिथे दिवसाही जायला
लोक बिचकत, मी मात्र तिथे बिनधास्त भटकत असे.
आमच्या शेजारच्या घरात एक निवृत्त शिक्षिका रहात असे. तिने घरी काही मूले आश्रयाला ठेवली होती, त्यांचा
सर्व खर्च ती करत असे. ती खुपदा माझ्याशी गप्पा मारत असे. तिचे इंग्लीश फार सुंदर होते. सापांचा उल्लेख
ती नेहमी रेप्टाईल्स असा करत असे.
नायजेरीयातली माती खुप सुपीक. मी लावलेली झाडे भराभर वाढत. कढीपत्ता तर दर आठवड्याला तोडावा
लागे असा वाढला. तुळशीचे रान माजले. भारतातून नेलेल्या बटाटाएवढ्या कोनफळाचा छोटासा कोंब लावला
तर त्यापासून ४ किलो आकाराचे कोनफळ तयार झाले.
किचनमधे हाताखाली दोन मेडस होत्या. त्यापैकी डिव्हाईन माझ्या हाताखाली शिकून चपात्याही करू लागली
होती. एकंदर किचनची जबाबदारी माझ्यावर होती. पण अगबारा गावात काही मिळायचे नाही, म्हणून मी दर
रविवारी लेगॉसच्या इलूपेजू आणि लेकी या भागात जाऊन, ताज्या भाज्या आणि किराणासामान घेऊन येत असे.
नायजेरियात लोकल बीन्स आणि याम खुप छान मिळतात, त्याचे भारतीय मसाल्यातले पदार्थ मी करत असे.
याच इस्टेट मधे दुसर्या एका घरात, आमचा कलीग त्रूषार आणि त्याची बायको रुपा रहात होते. काही बॅचलर्स
( अंकुर, रमण, अमन वगैरे ) दुसर्या घरात रहात होते. या सगळ्यांना मी एकत्र ज्मवून महिन्यातून एकदा तरी
सहभोजन करत असे. कोजागिरी, दसरा असे सणच नव्हे तर मुलांचे वाढदिवसही दणक्यात साजरे होत.
आमच्या फॅक्टरीमधे दिवाळीची पूजा, विश्वकर्मा जयंती असे सणही मी साजरे करत असे. मग त्यासाठी प्रसादाचे
जेवणही मीच घरुन बनवून नेत असे. कुणी लेगॉसला ऑफिसच्या कामासाठी जाणार असेल, तर त्याला डबा
बनवून देणे, कुणी आजारी असेल तर पत्थ्याचे जेवण करून देणे असेहि चाले. खरे तर नायजेरियात खुप जण
बॅचलर्स म्हणून जातात. घरचे जेवण मिळत नाही आणि स्वतःला करणे जमत नाही, अशी अवस्था असल्याने,
मानसिक रित्या ते खचून जातात. मी या मुलांसाठी ते करू शकलो, यातच मला खुप समाधान मिळाले.
हि सर्व मुले, अजूनही माझ्या संपर्कात आहेत.
अंकूरला मासे खायची चटक मी लावली ( मी स्वतः खात नसूनही ) तिथे कोलंबी,
खेकडे वगैरे चांगले मिळत असत. चिकन आणि टर्की पण मिळत असत. ( त्यांच्या
काही रेसिपीज मी त्या काळात मायबोलीवर लिहिल्या होत्या.)
कोळश्याची शेगडी पेटवून त्यावर भरताची वांगी तर भाजत असेच शिवाय दालबाटी, चुर्मा सारखे प्रकारही करत
असे.
रोजच्या रोज दही लावणे हा पण माझा उद्योग होता. मूळ विरजण मी भारतातून नेत असे, ते कारण असेल किंवा
मला ते तंत्र जमत असावे असेही असेल, पण दही मात्र फार सुंदर लागायचे. या
दहि लावण्याची एक मजेशीर आठवण आहे. कुणी व्हीजीटर आला कि तो आमच्याच घरी
रहात असे. हे घर एवढे मोठे ( नव्या माणसासाठी भूलभुलैयाच होते ते.) कि नवखा
माणूस बिचकत असे. तर असेच एकदा एक बंगाली माणूस रहायला आला होता. तो
वरच्या मजल्यावर काम करत बसला होता. मी दूध तापवून थंड करत ठेवले होते.
आणि रात्री उशीरा उठून विरजण लावायला मी खाली आलो. त्याला न सांगताच मी
गुपचूप खाली आलो, तर त्याला जाणवले कि कुणीतरी आपल्या
मागून गेले आणि त्याने घाबरून दार लावून घेतले आणि रुममधे जाऊन झोपला. मी
विरजण लावून वर जाऊ लागलो तर दार बंद. दार ठोठावून फायदा नव्हता, कारण
सर्व बेडरुम्स त्यापासून लांब. माझा फोनही वरच राहिला होता. ती रात्र मी
खालीच सोफ्यवर झोपून काढली.
लेगॉसहून आमचे एम डी येणार असले तरी ते मला जेवण बनवून आणायला सांगत.
पुढे मग तो नियम आम्ही सगळ्याच भारतीय व्हीजीटर्स ना लागू केला. अगबाराला
कुणीही येणार असलं तर त्याची जेवणाची जबाबदारी आम्ही घेत असू. म्हणजे
नारायणन, मला न विचारता परस्पर आमंत्रण देऊन टाकत. अर्थात आमच्या दोघात
तेवढे
अंडरस्टँडींग होतेच.
उत्तम घरगुति जेवण हा एवढाच दिलासा मी सहकार्यांना देऊ शकत होतो. बाकी
सगळ्या बाबींचा तिथे आनंदी आनंद होता. बाजारात जायला फक्त ४० किमी जावे
लागे. सकाळी लवकर निघून मी दुकाने उघडता उघडताच
लेगॉसला पोहोचत असे, पण येताना तेवढेच अंतर कापायला मला तीनचार तासही लागत असत. आणि तो
प्रवासही धोकादायकच होता, तरी माझ्या बोलक्या ड्रायव्हरमूळे तो सुसह्य होत असे. आमच्या दुसर्या बाजूच्या
घरात मेहता ( पंजाबी होते ते ) कुटुंब रहात होते. त्या मिसेस मेहता लहानपणापासून नायजेरियात राहिल्या होत्या.
त्यांनी माझी भिती घालवली. एकदा सोबत असताना, त्यानी रस्त्यावर उतरुन, घासाघीस करून अननस विकत
घेतले.. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, " अरे भाई इन कालोंसे डरनेका नही ! खायेंगे नही हमको, वैसे खा
सकते है, मगर नही खायेंगे ! " दुर्दैवाने त्यांचा एकुलता एक मुलगा, ड्रग्ज च्या आहारी गेला, त्याला भारतात
सुधारण्यासाठी ठेवले होते पण तो वाचू शकला नाही. त्यांना त्या प्रसंगी खटपट करून मी विमानाची तिकिटे
मिळवून दिली होती. पण बाई धीराची होती, शेवटपर्यंत तिने डोळ्यातले पाणी दिसू दिले नाही कुणाला.
त्या घटनेची हाय खाउन, मेहता पण महिनाभरातच वारले.
वैद्यकिय सोयी नव्हत्याच ( आठवा माझी नायजेरियन विचित्र कथा - एक कर्नल कि मौत ) एकदा आम्ही दोघेच घरी
असताना नारायणनना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखणे, घाम फुटणे, डावा हात दुखणे असा त्रास सुरु झाला.
निव्वळ माझ्याशी बोलत राहून आणि मसाज करुन त्यांना थोडा आराम पडला. मग मात्र मी त्यांना जबरदस्तीने
भारतात पाठवले. ते सहा महिन्यांनीच परत आले. ते अजून माझ्या संपर्कात आहेत. चौहानसाहेब मात्र आता
हयात नाहीत.
अंकूर, रमण, अमन अजूनही माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या वाढदिवसाला माझ्या फोनची ते वाट बघत असतात.
क्रमश :
भाग १ - सल्तनत ऑफ ओमान / दुबई
ज्या घरात किमान १ महिना वास्तव्य झाले ते माझे घर, अशी सुटसुटीत व्याख्या केली तर मी
आज माझ्या १९ व्या घरात राहतोय. यापैकी फक्त ३ अपवाद सोडले तर हि सर्व घरे मी, स्वतः
मॅनेज केलीत. मॅनेज केलीत म्हणजे घराची साफसफाई, सामान भरणे, वीज पाणी, आला गेला,
पै पाहुणा... पण तरीही मी घरांना संभाळले, असे मी म्हणणार नाही. त्यांनीच मला संभाळले.
त्यातल्या वास्तव्य काळातच नव्हे तर नंतरही माझे मन त्यात गुंतून राहिले. घर, सभोवताल, शेजारी
यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा तेव्हा मी या घरांना परत भेटी दिल्याच,
पण असे योग फारच कमी वेळा आले. तर हि पाच भागातली लेखमाला ( १. सल्तनत ऑफ
ओमान / दुबई २. केनया, ३. नायजेरिया, ४ अंगोला आणि ५ अर्थातच भारत...
लिहायला घेतोय. त्या घरांना मानसभेट देण्याचा
माझा एक क्षीणसा, केविलवाणा प्रयत्न.
इथे मी थोडा स्वार्थीपणा करतोय कारण या घरांशिवाय, अशी अनेक घरे आहेत कि ती मी, माझी म्हणू शकेन.
यात जसे माझे आजोळ आहे तसेच माझ्या जिवलग मैत्रिणीचे, ऑकलंड मधील घरही आहे. इतरही अनेक आहेत,
ज्या घरात मी कधीही, न सांगता सवरता जातो, हक्काने राहतो.. त्या घरांचीच
नव्हे तर त्यातल्या माणसांची मनं पण माझ्यासाठी सदैव उघडी असतात......पण
मला त्या घरांबद्दल या मालिकेत लिहायचे नाही.
१) मत्राह हाय स्ट्रिट, मस्कत, सल्तनत ऑफ ओमान, साल - १९९० - १९९२
भारताबाहेरचे पहिले वास्तव्य या घरातले. चौथ्या मजल्यावरचा, ३ बेडरुमचा अगदी प्रशस्त असा फ्लॅट. पहिल्यांदा
या घरात आम्ही तिघे रहात होतो, पण नंतर दोघेच राहिलो. पण तरीही माझ्या रुममधे मी एकटाच असे.
भारताबाहेरच नव्हे तर घरापासूनही दूर पहिल्यांदाच गेलो होतो. घरच्या आठवणींनी माझे व्याकूळ होणे,
या घरानी बघितले.
त्याकाळात इंटरनेट नव्हते, घरी हवा तेव्हा फोन करावा अशीही सोय नव्हती, त्यामूळे मी दर आठवड्याला घरी
पत्र लिहित असे. घरची आठवण येत आहे असा सूर अजिबात न लावता, मी इथे किती मजेत आहे, असे सांगणारी
ती पत्रे.
पण वाचणारे ते माझेच आईबाबा असल्याने त्यांना ते वर्जित सूर नक्कीच जाणवत असणार. ती पत्रे अनेक वर्षे
माझ्या बाबांनी जपून ठेवली होती. अनेकदा ती पत्रे काढून ते वाचत असत.
अगदी शेजारच्याच बिल्डींगमधे माझे ऑफिस होते त्यामूळे ऑफिस सुटल्यावर ५ मिनीटात मी घरी. आणि
मस्कतमधली सार्वजनिक वाहतूक इतकी सुंदर होती, कि पुढे ऑडीटसाठी जाऊ लागल्यावरही मी
अर्ध्या तासात घरी पोहोचत असे.
माझे पाककलेतले प्राथमिक धडे मी या घरातच गिरवले. पण ते गिरवणे अगदीच सोपे होते, कारण मस्कत मधे
असणारी मुबलकता आणि स्वस्ताई. अनेक पदार्थ तर तयारच मिळत असत. तरी पण देशोदेशीची फळे आणि
भाज्या मी या घरात पहिल्यांदा चाखल्या.
मत्राह हा मस्कतमधला अगदी जुना भाग, बहुतांशी गुजराथी वस्ती. दोनच लेन असलेला तो रस्ता, म्हणजे
ओमानच्या मानकानुसार बोळ होता पण तरीही तो सतत गजबजलेला असायचा. घरातून खाली उतरले
कि लगतच सुपरमार्केट्स होती. घर ऐन स्ट्रीटवर असल्याने दारातच टॅक्सी मिळायची ( पण तो बोळ
असल्याने, सरकारी बसेस मात्र येत नसत तिथे )
त्या काळात मस्कत शांत गाव होते ( अजूनही आहे, फक्त आता इमारती वाढल्यात ) आणि अतिसुरक्षित होते
( आजही आहे ) अगदी मध्यरात्रीही रस्त्यावरून फिरण्यात कोणताच धोका नव्हता. रात्री उशीरा सिनेमा,
मस्कत फेस्टीवल, देवळातले कार्यक्रम, मत्राह मधली नवरात्र असे आटपून मी गुरुवारी चालत घरी येत
असे. मग शुक्रवारी सकाळी उठायला ११ पण वाजत. ११ वाजता उठावेच लागे कारण शुक्रवारी ११ ते १ सर्व
मस्कत बंद असे.
घरात सगळीकडे कार्पेट होते आणि शुक्रवारी व्हॅक्यूम क्लीनरने ते आम्ही आळीपाळीने साफ करत असू. कपडे
धुणे पण शुक्रवारीच पण भांडी मात्र रोजच्या रोज. आता नवल वाटेल, पण मत्राह मधे उंदराचा फार सुळसुळाट
होता. त्यांचा बंदोबस्त करायचे कामही शुक्रवारीच करावे लागे. चौथ्या मजल्यावरही ते येत असत. मग त्यांच्यासाठी
सापळे लावून ठेवावे लागत.
त्या काळात केबल नव्हती पण व्हिडीओ कॅसेट्स होत्या. त्यामूळे गुरुवारी
लोळत लोळत सिनेमा बघणे ( थिएटर मधला बघून आल्यावर ) हा उद्योग असे. कलिग्ज
दाक्षिणात्य असल्याने आम्ही तामिळ / मल्याळी सिनेमा पण
बघत असू.
अरेबिक / फारसी लिपीचे धडेही याच घरात गिरवले. ती लिपी मात्र मी फार लवकर शिकलो.
त्या काळात मस्कत मराठी मित्र मंडळ ( मममिमं) फार जोरात होते. त्यांचे कार्यक्रम खुप होत असत. तसेही
मस्कत मधे भारतीय कलाकारांचे कार्यक्रम खुप होत असत आणि ते बहुतांशी मी
बघतही असे. मित्रमंडळही मोठे होते पण त्यापैकी घरी कुणी आले नाही कधी.
आम्ही बॅचलर्स होतो, म्हणून असेल बहुदा.
याच कारणाने असेल कदाचित पण शेजारी पाजारी भारतीय असूनही आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता.
मत्राह मधे असताना, आम्हाला रुवी चे खुप आकर्षण वाटायचे. रुवी हाय स्ट्रीट हि एक हॅपनींग जागा होती.
शुक्रवारी तो रस्ता फुलून जात असे. माझे नंतरचे घर रुवी मधेच होते.. ते आपण बघूच. पण जाता जाता
मत्राह च्या घराची आणखी एक आठवण.
मी तिथे गेलो तेव्हा माझे वजन ( जेमतेम ) ५८ किलो होते पण तिथल्या तीनच महिन्याच्या वास्तव्यात ते वाढून
तब्बल ७६ किलो झाले. ३ महिन्यात तब्बल १८ किलो !!! ( मूठीमूठीने बदाम पिस्ते खाल्ल्यावर आणखी
काय होणार ? ) भारतातून नेलेले बहुतेक कपडे कुचकामी ठरले.
गेल्या ओमान भेटीत, हे घर मी परत पाहून आलो.
२) बिहाईंड नसीब प्लाझा, रुवी हाय स्ट्रीट, सल्तनत ऑफ ओमान., साल - १९९८-२००१
मुंबईमधे दादरचं जे महत्व आहे तेच मस्कतमधे रुवीचं. प्रत्यक्ष मस्कतला राजवाडा आहे पण ते अगदीच लहान गाव
असल्याने सगळी चहलपहल रुवीलाच असते. तर अश्या रुवीमधे माझे घर होते.
पहिल्या मजल्यावरचा १ बेडरुमचाच फ्लॅट पण ऐन मोक्याच्या ठिकाणचा. रुवी हाय स्ट्रीटच नव्हे तर मुख्य
बस स्टँड, तेव्हा नवीन सुरु झालेलं मल्टीप्लेक्स, देऊळ, ऑथोरिटी फॉर मार्केटींग अॅयग्रीकल्चरल प्रोड्यूस
या संस्थेचे भाजीपाल्याचे मोठे दुकान, "खाना खजाना" नावाचे भारतीय रेस्टॉरंट, भारतीय किराणा माल
विकणारी दुकानं सगळे घराच्या आजूबाजूला.
या काळात मी दिनेश पासून ( मित्रांचा ) दिनेशभाई झालो होतो. त्यामूळे अनेक मित्र गुरुवारी / शुक्रवारी माझ्या
घरी मुक्कामालाच असायचे. माझ्या हातच्या जेवणाचे आकर्षण वाटायचे त्यांना. काही जण तर अगदी
डोळ्यात पाणी आणून आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली, असे सांगायचे.
मलाही त्यांच्यासाठी जेवण शिजवायलाच नव्हे तर त्यांच्या फर्माईशी पुर्ण करायला मनापासून आवडायचे.
आणि त्या बदल्यात ते मला हवं तिथे फिरवून आणत. शिवाय भांडीपण घासून टाकत.
त्या काळात मस्कत मधे केबल सुरु झाली होती, शिवाय सिडी / डिव्हीडीचा जमाना आला होता. माझ्या घरी
सोनीचा मोठा टिव्ही होता, त्यावरही सिनेमा बघायला मित्र येत असत.
या काळात मी मित्रमंडळीसोबत खुपदा लांबवर पिकनिक्स ना जात असे. त्यासाठी सर्व जण माझ्याच घरी जमत असत. सगळ्यासाठी जेवण मीच करून नेत असे.
ओमानमधे नैसर्गिक झर्याच्या पाण्यावर पूर्वापार शेती केली जाते. त्या काळात सरकारने त्या शेतमालाला
बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक संस्था काढली होती आणि तिचे दुकान माझ्याच घराजवळ होते.
अगदी ताज्या ताज्या चवदार भाज्या तिथे मिळत असत. आणि या काळापर्यंत मी बर्यापैकी पाककुशल
झालो होतो.
नव्या मल्टीप्लेक्स मूळे जवळजवळ दर गुरुवारी मी सिनेमा बघत असे. ( थिएटर ला जाऊन )
पण या काळातल्या सर्वात हृद्य आठवणी या क्लॅरिसच्या आहेत. माझा कलीग विल्सन डिकोस्टाची बायको
क्लॅरिस. ती भारतात बँकेत जॉब करत होती, पण सुट्टीत मुलींना घेऊन मस्कत ला येत असे.
क्लॅरिसचे व्यक्तीमत्व एवढे लोभसवाणे आहे कि ती आम्हा मित्रमंडळीत खुपच प्रिय होती. ती आली कि एकत्र
जेवणे, फिरणे यांना ऊत येत असे. अँजेला आणि अमांडा या तिच्या लेकी. त्या दोघींचा मी लाडका
दिनीअंकल. ऑफिसशिवाय जितका मोकळा वेळ मिळेल, तो मी त्या दोघींसोबत घालवत असे. त्यांच्या निरर्थक
गप्पा माझ्यासाठी खुपच महत्वाच्या होत्या. बालसुलभ मस्ती आणि हट्ट त्या करतच असत, पण क्लॅरिसचे
संस्कार असे होते, कि मी त्यांच्या घरातून निघालो कि दोघी गुडघ्यावर माझ्यासमोर बसून, दिनीअंकल ब्लेस मी,
म्हणत असत. त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवताना मला खुपच गहीवरुन येत असे. त्या परत जायला निघाल्या,
कि माझ्या गळ्याला मिठी मारून रडत असत.
पुढे भारतात आल्यावरही आमच्या नियमित भेटीगाठी होत होत्या. आता ते बंगरुलूला असतात. गेल्या
भारतभेटीत मी कुर्ग ला गेलो होतो, त्यावेळी तिच्याशी बोललो, पण त्याच दिवशी ती यू एस ला जात होती, म्हणून
प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.
या घरालापण मी गेल्या मस्कत वारीत भेट दिली.
माझा त्याच काळातला आणखी एक कलिग म्हणजे अँथनी हृदयराज... त्याच्याच आग्रहामूळे मी दुबईमधे
१ महिनाभर जाऊन राहिलो होतो.. ते माझे पुढचे घर.
३) करामा, दुबई, साल - २००१
मी मस्कत सोडले तेव्हा अँथनी दुबईमधे जॉब करत होता. त्या काळात मस्कत वासीयांना दुबईचे आकर्षण
असायचे. मस्कतहून मुंबईला थेट विमान असूनही, आम्ही मुद्दाम वाकडी वाट करून आधी दुबईला जाऊन
तिथून मुंबईला जाणारे विमान पकडत असू.
त्यावेळी दुबई खुपच स्वस्त होते, सध्यासारखे हायफाय झाले नव्हते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ओमानच्याच
व्हीसावर मला दुबईमधे ३० दिवस राहणे शक्य होते.
मी त्या काळातही सुट्टीत भटकायला स्वित्झर्लंड, सिंगापूर, थायलंड ला जातच असे, त्यामूळे अँथनीने दुबईमधे
राहण्याचा प्रस्ताव समोर ठेवल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही.
महिनाभर हॉटेलमधे राहणे मला परवडणारे नव्हते म्हणून पी.जी. म्हणून राहण्याचा पर्याय निवडला. त्या काळात
खलीज टाईम्स मधे अशा अनेक जाहीराती येत असत. आणि तेव्हा फारसे असंतोषाचे वातावरण नसल्याने.,
अनेक कुटुंब असे पी.जी. घरी ठेवत असत.
अँथनीच्याच मदतीने मी करामा भागात एक घर शोधले आणि एका सिंधी कुटुंबात १ महिना राहिलो.
मला अर्थातच स्वतंत्र रुम होती आणि घराच्या मुख्य दरवाजाची चावी माझ्या कडे होती. त्यामूळे येण्याजाण्यावर
कुठलेच बंधन नव्हते.
त्या काळात मेट्रोचे बांधकाम सुरुही झाले नव्हते. सगळिकडे फिरण्यासाठी बसेस किंवा टॅक्सीज वापराव्या लागत.
पण तरीही ते स्वस्तच पडत असे.
तो एक महिना मी निरुद्देश भटकत राहिलो. दूबई सूकमधल्या सर्व गल्लीबोळातून भटकलो. माझे आणखीही
मित्र दुबईत होते. त्यांच्यासोबत शारजाह, अबू धाबीला पण जाऊन आलो. मॉल ओफ
एमिरेट्स आणि दुबई मॉल सुरु होते, तिथेही जायचो. ( बुर्ज अल खलिफा तेव्हा
नव्हती )
मी जिथे रहात होतो तिथे जेवण बनवायची सोय नव्हती ( किचनपासून इतका काळ लांब राहिल्याचा असा काळ,
माझ्या जीवनात दुसरा नाही ) पण खाली उतरल्याबरोबर अनेक भारतीय हॉटेल्स आणि दुकाने होती.
दुपारचा मात्र मी त्या घरीच झोपा काढायचो. खुपदा घरी आणखी कुणी आहे का, याचा पत्ताही लागत नसे.
बहुदा कुणी नसावेच. खलीज टाईम्स आणि गल्फ न्यूज वाचत मी दुपारभर लोळत असे.
त्याकाळात कोपर्या कोपर्यावर दुबईत मॉल्स होते. दिवसभर तिथे फारशी वर्दळही नसे, तिथेही जाऊन मी
बसत असे.
त्या सिंधी कुटुंबाशी माझा फारसा संपर्क नव्हता ( पैसे आधीच दिले होते ) त्यामूळे त्या घराच्या आठवणी म्हणजे
निव्वळ आराम अश्याच आहेत.
अँथनीशी पुढे बराच काळ संपर्क होता पण नंतर अचानक त्याचा संपर्क सुटला.
मी माझ्या बहुतेक दुबई भेटीत या घराला भेट देतो. आता तो रस्ता खुपच वर्दळीचा झाला आहे. जवळच मेट्रो स्टेशन आहे.
इंटरनेट / सायबर कॅफे हे त्याच काळात सुरु झाले. आणखी त्या घराची आठवण म्हणजे, मायबोलीचे सदस्यत्व मी
त्या काळातच घेतले होते.
क्रमशः
भाग ४ - अंगोला
मी २०१२ सालापासून अंगोलात आहे. आणि एवढ्या काळात मी सहा घरे बदलली. ( पण घाबरू नका, त्यापैकी प्रत्येकी दोन दोन, एकाच एरियात होती, म्हणून दोन दोन चे गट करून लिहितो. )
११ आणि १२ ग्राफानिल, व्हीयाना, लुआंडा - साल २०१२
अंगोलात आल्याबरोबर पहिल्यांदा नऊ महिने मी ग्राफानिल या भागात राहिलो.
प्र्त्येक मजल्यावर दोन फ्लॅट्स असलेली २ मजली बिल्डींग आमच्या कंपनीने
घेतली होती. त्यात आम्ही सहा जण रहात होतो. दोन बेडरुम्स्चा
सुंदर फ्लॅट होता तो.
ग्राफानिल असे भारदस्त नाव असले तरी ते एक खेडेगाव होते. सर्व बैठी घरे होती. ही बैठी घरे हि खास अंगोलन
पद्धत आहे. चार पाच कुटुंबं मिळून अशी घरे बांधतात त्यात मधे कॉमन भाग असतो. या सगळ्यात जरा ऊंच
जोत्यावर आमची बिल्डींग होती. सभोवताली ऊंच कुंपणाची भिंत होती.
या बिल्डींगमधे मी आधी तळमजल्यावर रहात होतो. खिडकीच्या समोर ४ फुटावर भिंत. मला बाहेरचे काही
दिसेनाच. त्या फ्लॅटमधे मी २ महिने काढले. मग पहिल्या मजल्यावर शिफ्ट झालो.
आता घरातून, समोरचा रस्ता वगैरे दिसत होता. सभोवताली टीपीकल अंगोलन वस्ती. त्या घरातल्यांची
लगबग, मुलांचे खेळ, फेरीवाले सगळे बघत असायचो. अंगोलन सरकार पिण्याचे पाणी, वेगळ्या पाणपोयांवरुन
पुरवते. तिथे एका भिंतीला दोन्ही बाजूने नळ असतात आणि, त्याला सभोवताली जाळीचे कुंपण असते.
आत एक कर्मचारी असतो तो नळांना पाईप लावून जाळीतून बाहेर काढून देतो. नळ आणि पाईप दोन्ही
त्याच्या ताब्यात असते. हे पाणी अगदी कमी दरात ( २ रुपये बादली ) पुरवतात. तिथल्या बायकांची त्या पाण्यासाठी
चाललेली लगबग मी बघत असे. त्यांचा बराच वेळ कपडे धुण्यात जातो. त्यासाठी एक छोटासा सिमेंटचा हौद असतो,
आणि त्यालाच एक उतरता भाग असतो, त्यावर घासून घासून त्या कपडे धूत असत. बहुतेक बायकांच्या पाठीवर
बांधलेले तान्हे बाळ असे... हे सगळे मुद्दाम लिहिले कारण इथल्या लहान मुली पण असाच खेळ खेळतात.
म्हणजे पाठीवर एक ( मोडकी ) बाहुली बांधलेली आणि त्या हौदात खोटे खोटे कपडे धुवायचा खेळ.. !
मुली रिकाम्या वेळी नाचत असत. ( भारतीय नजरांना हा नाच अतिशय प्रोव्होकेटीव्ह वाटू शकतो ) घरासमोरून
बर्याच फेरिवाल्या जात असत. त्यांच्याकडे एक चायनीज लाऊडस्पीकर सारखे उपकरण असे. आपल्या कडच्या
मालाची यादी त्या आपल्या आवाजात टेप करुन त्या उपकरणावर सतत वाजवत असत.
त्या रस्त्यावर काही छोटी दुकाने होती ( त्यातली बहुतेक सोमाली मुसलमानांची होती ) ताजे पाव
आणि इतर सटरफटर सामान मी त्यांच्याकडून घेत असे. मोठे सुपरमार्केट मात्र नव्हते, त्यामूळे मुख्य सामान
मी ऑफिसमधून येतानाच आणत असे. माझे पोर्तुगीज भाषेचे पहिले धडे मी इथेच गिरवले.
रस्त्यावरची लहान मूले माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत. अर्थात लहान मूलांना भाषेचा अडसर कधीच नसतो म्हणा.
घराजवळच्या एका जागी एका मोठ्या गोरखचिंचेच्या झाडाखाली बाजार भरत असे. ते झाड एवढे प्रचंड होते,
कि त्याच्या खोडात एक साठवणीची खोली होती. काही अंगोलन स्थानिक फळे मी इथे चाखली.
या बाजारात भाजी आणि मासे, मटण एकाच विक्रेत्याकडे एकाच ठिकाणी ठेवलेले असे. पण मला आता त्याचे
काही वाटेनासे झाले होते.
घरासमोरचा रस्ता कच्चा होता. पाऊस झाला कि नुसता चिखल होत असे. मग माझे बाहेर जाणे बंद. ऑफिसची
गाडी आली कि त्यात ऊडी मारूनच बसावे लागे. आजूबाजूला शेवग्याची पण बरीच झाडे होती.
ती का लावली होती याची कल्पना नही, कारण हे लोक शेंगा वा पाने खात नाहीत त्याची. मी मात्र तोडून
आणायचो शेंगा.
पण पुढे या बिल्डींगचा जनरेटर बिघडला. खुप प्रयत्न करुन तो दुरुस्त झाला नाही. जवळ जवळ महिनाभर
मी वीज आणि पाण्याचा त्रास सोसला. मग मी नोवा सिदादे दो किलांबा.. या ठिकाणी शिफ्ट झालो.
१३ आणि १४, नोवा सिदादे दो किलांबा ( अर्थ - न्यू सिटी ऑफ किलांबा ) साल २०१३-२०१४
नावाप्रमाणेच नव्याने वसवलेले हे छोटे शहर आहे. ७५० इमारती आहेत इथे आणि शहराची सुंदर आखणी
केली आहे. ३० इमारतींचा एक ब्लॉक. आतमधे काटकोनात रस्ते. ४ ब्लॉकमधे मिळून एक शाळा. तीन मोठी गार्डन्स.. असा सगळा पसारा.
माझा फ्लॅट नवव्या मजल्यावर, आणि ४ बेडरुम्सचा. मी एकटाच होतो तिथे पण कंपनीचे व्हीजीटर्स तिथे
येऊन जाऊन असत. घरात छान सोयी होत्या.
मी तिथे रहायला गेलो तेव्हा, त्या भागात फारशी वस्ती नव्हती. रस्ते निर्मनुष्य असायचे. रस्त्यावर गाड्याही
फारश्या नसायच्या. या कॉलनीच्या सुरवातीलाच केरो ( पोर्तुगीज मधे केरो म्हणजे गरज, वाँट ) नावाचे सुपरमार्केट होते.
पण कॉलनीच्याआतमधे पहिल्यांदा एकही दुकान नव्हते. त्यामुळे आयत्यावेळी काही
मिळायची सोय नव्हती. पण सहा आठ महिन्यातच हे चित्र पालटले आणि आत वस्तीही
वाढली आणि दुकानेही उघडली.
माझ्या घरातून तिन्ही बाजूने सुंदर दृष्य दिसायचे. सूर्यास्त आणि त्याच सुमाराला उडणारे एमिरेट्स चे फ्लाइट आणि
माझ्या हातात कॉफिचा मग.. असा योग जुळून यायचा ( मला लहानपणापासून विमान उडताना बघायला
खुप आवडते )
मी या कॉलनीमधे बहुदा रोजच रात्री भटकायचो. रस्ते सुंदर होते आणि गार्डन्स पण होती. या कॉलनीला
लागून जंगली आंब्याची खुप झाडे होती. आंब्याच्या सिझनमधे मी हटकून तिथे जात असे. भरपूर आंबे लागत
असत त्या झाडांना ( हे लोकही कच्चे फळ खात नाहीत ) मी गरजेपुरती तोडून आणत असे ती.
प्रत्येक बिल्डींगने आपली खाजगी बागही जपली होती. त्यात स्पर्धाही होती. मी पण माझ्या बाल्कनीमधे
भाजीपाला लावला होता. या घरातही मी भरपूर पदार्थ करुन मायबोलीवर लिहिले. ( त्या काळातल्या माझ्या
प्रत्येक पदार्थाच्या फोटोत दिसणारे देखणे टेबल, या घरातले. )
घरातूनच दोन स्टेडीयम दिसत असत. त्यावरची रोषणाई सुंदर दिसत असे. ही कॉलनी चीन सरकारने
बांधलेली आहे, त्यांचा देखभाल करणारा स्टाफ तिथेच रहात असे. त्यांची एक वेगळी कॉलनी, जवळच
होती, तिथे त्याच्या नवीन वर्षदिनी खुप आतिषबाजी होत असे.
इथल्या सुंदर रस्त्यांवरुन स्थानिक मुले स्केटींग करत फिरत असत. ( त्यांचे कौशल्य बघण्यासारखे असते )
त्यांच्यापैकी काही मुले ओळखीची होती. काही जण माझ्याशी इंग्लीश बोलायचा प्रयत्नही करत.
सकाळी ड्रायव्हरची वाट बघत राहिलो कि शाळेत जाणारी मुले पण बोलायचा प्रयत्न करत.
पुढे पिटा या नावाचे तुर्किश रेस्टॉरंट या कॉलनीत उघडले. त्याची सजावट खुपच सुंदर होती. मला तिथे जायला
खुप आवडत असे. ( एक तत्व म्हणून तिथे अल्कोहोल ठेवत नसत, अंगोलन लोक दारू पिऊन फार
दंगा करतात. ) त्यांचे सलादही पोटभरीचे होत असे मला, शिवाय तुर्की आईस्क्रीम पण मिळे तिथे.
याच कॉलनीत मी दुसर्या एका घरातही १ वर्ष राहिलो. तिथे माझ्या सोबतीला, एक जर्मन साऊथ आफ्रिकन
माणूस होता. ( अॅलन नाव त्याचे ) सहनिवासी कसा असावा, याचा तो आदर्श होता.
किचन शेअर करताना, साफसफाई करताना तो प्रत्येकवेळी मला संभाळून घेत असे.
पण दुर्दैवाने तो खुप आजारी पडला आणि परत
जोहान्सबर्गला गेला.
फक्त एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे ही कॉलनी माझ्या ऑफिसपासून २५ किमीवर होती. रोज येण्याजाण्यात
खुपच वेळ जायचा. अंगोलात ट्राफिक सर्कल्स नाहीत. यू टर्न्स आहेत, त्यामूळे घरी येताना खुप लांबचा
वळसा घेऊन यावे लागायचे, म्हणून मी ऑफिसच्या जवळ दुसर्या एका कॉलनीमधे शिफ्ट झालो.
या कॉलनीचे भरपूर फोटो मी मायबोलीवर टाकले होते. किलांबा या नावाने सर्च केल्यावर सहज मिळतील.
ही कॉलनी आता गजबजलेली असते. मी एकदोनदा गेलोही नंतर. माझ्या एका मित्राच्या लहान मुलाच्या
वाढदिवसाचे आमंत्रण होते. अंगोलन घरात जेवायला जायचा हा पहिलाच प्रसंग... पण मजा आली.
१५ आणि १६, विडा पॅसिफीका, झांगो झेरो, साल २०१५-१६ ( विडा म्हणजे जीवन !!! )
ही पण किलांबासारखीच पण ऑफिसच्या जवळ असलेली कॉलनी. किलांबा एवढी मोठी नाही.
१४ मजल्यांच्या बिल्डींग्ज आहेत. बिल्डींगच्या आवारात सुरेख बागा आहेत, बाहेरचे रस्तेही आखीव रेखीव आहेत.
पण किलांबाएवढे रुंद नाहीत. त्यात आणखी गाड्या पार्क केलेल्या असतात, त्यामूळे ट्राफिकचा खोळंबा
नेहमीचाच.
इथलेही फ्लॅट्स मोठे म्हणजे ३ बेडरुम्सचे आहेत. घरासमोरुनच मोठा वाहता रस्ता जातो. पण त्या रस्त्याला
लागण्यापुर्वीच ( किलांबाला जायला त्या रस्त्यानेच जावे लागे ) माझे घर येत असल्याने चांगला अर्धा पाऊण
तासाचा प्रवासाचा वेळ वाचतो.
या घराच्या बाल्कनीमधे उभे राहिले कि मोठा परीसर दिसतो. प्रत्येक बिल्डींगला केअरटेकर आहे आणि तो
रविवारी पण उपलब्ध असतो. बिल्डींगला रिसेप्शन आहे. सिक्यूरिटी सिस्टीम आहे.
कॉलनीमधे दुकाने नाहीत पण रस्ता क्रॉस केला कि अलिमेंटा अंगोला नावाचे मोठे सुपरमार्केट आहे. आणि
जवळच एक चिनी संकुल आहे. त्यांच्याकडे इथल्याच शेतातल्या छान भाज्या
मिळतात. ( अंगोलामधे शेतीची फारशी पारंपरा दिसत नाही. अलिकडे इस्रायल ने
काही प्रयोग सुरु केले आहेत . ) तसेच चायनाहून
आणलेल्या बर्याच वस्तू मिळतात. त्यापैकी वेगवेगळे फळे माझ्या खास आवडीची. ही फळे भारतात बघितली
नव्हती मी कधी.
इथे काही भारतीय मुलांच्या ओळखी झाल्यात पण इथे फार दिवस कुणी रहात नाही ( टिकत नाही. )
भारतातून येण्यापुर्वी खुप जणांना इथल्या परिस्थितीची नीटशी कल्पना दिलेली नसते आणि इथल्या आयूष्याशी
जुळवून घेताना, त्यांना खुप त्रास होतो. खुपदा ओळख करून, फोन नंबरची देवाणघेवाण करतो, पण नंतर अचानक
ती मुले, अंगोला सोडून गेलेली असतात.
इथल्या रस्त्यावर संध्याकाळी आंबे, अवाकाडो, केळी वगैरे विकायला बसतात. त्याशिवाय पाव विकणार्या गाड्या
असतात. या लोकांना रोज पाव लागतोच. पण ते तुरळकच, एरवी रस्त्यावर फार माणसे
दिसतात. किलांबात भटकायचो तसा मी इथे भटकत नाही. रात्रीच्या फेर्या
बिल्डींगच्या आवारातच मारतो.
इथे बरीचशी वस्ती सोमालियन किंवा सेनेगलीज मुसलमानांची आहे. त्यांना वाटते मी लेबनानी किंवा तुर्किश आहे,
पण माझी अरेबिक आता, सबाह अल खैर, अल्हमदुल्ला, सलाम आलेकूम च्या पुढे फारशी जात नाही.
आता अंगोलातही बर्यापैकी इंग्लीश बोलतात, त्यामूळे पहिल्यांदा आला तसा भाषेचा फारसा अडसर येत नाही.
मी इथे आल्यावर दोन आठवड्यातच माझा शेजारचा माणूस अपघातात वारला. त्याच्या दोन दिवस आधीच आमची
ओळख झाली होती. त्याची लहान मूले आणि बायको तिथेच राहतात. शनिवारी मी लवकर घरी येतो, तेव्हा ती
मूले बाहेरच खेळत असतात. मला बघून ओळखीचे हसतात. कधी कधी पापा म्हणून मिठीही मारतात.
२/३ वर्षाचीच आहेत ती. त्यांना त्यांच्या पापाबद्दल काय आठवत असेल, कुणास ठाऊक ?
पण इथे जवळपास कुठलेच रेस्टॉरंट नाही, त्यामूळे गेल्या दोन वर्षात बाहेर जेवायला जाणे झालेच नाही.
अर्थात बाहेर गेलो तरी मला काही फारसा चॉईस असतो असे नाही. एका मायबोलीकरणीचा आत्येभाऊ
माझ्यासोबत इथे काही महिने होता, तेव्हा त्याला काही खास पदार्थ करुन
खिअलवले होते. तो हैद्राबादला वाढलेला होता, त्यामुळे खुप तिखट खायचा.
त्याच्या हातचेही पदार्थ मी खाल्ले, पण मला फार तिखट खाणे जमत नाही. पण
तोही अंगोला सोडून गेला आहे आता.
तो असताना बाहेर जाणे व्हायचे माझे, पण आता नाही. डी एस टी व्ही, वाचन, गाणी ऐकणे यात माझा बराच
वेळ जातो. विकेंडची सकाळ मित्र मेत्रिंणींना फोन करण्यात जाते.
सध्या मी याच घरात असल्याने, या घराचे काही फोटो...
१) ही माझी बिल्डींग, माझे घर आठव्या मजल्यावर ( पण या फोटोत दिसत नाही.)
२) इथले क्लब हाऊस
३) बिल्डींगच्या सभोवती उत्तम गार्डन राखलेले आहे.
४)
५)
६)
७) बिल्डींग बाहेरचा रस्ता ( पण हा कॉलनीचाच भाग आहे. )
८) आमच्या बिल्डींगचे रिसेप्शन
९) घराच्या बाल्कनीमधून दिसणारा रस्ता आणि संध्याकाळ ( कॅमेरा हलला आहे. खरे तर मला सुर्यास्त
टिपायचा होता.. तो परत कधीतरी )
आफ्रिका, म्हणजे काहीतरी मागासलेला देश ( हो अनेक जण देशच समजतात ) आहे हे खरे नाही तितकेसे. खरे तर हा एक विशाल खंड आहे.
त्यातल्या ८ देशांना मी भेटी दिल्या. ३ देशांत प्रदीर्घ काळ राहिलो. अत्यंत सुंदर अशा या प्रदेशाची किंचीत
ओळख करुन द्यायचा प्रयत्न केलाय मी गेल्या ३ भागात. पुढच्या भागात माझ्या भारतातील घरांबदल लिहून,
हि मालिका आटोपती घेतो.
क्रमशः
भाग ५ - भारत
आतापर्यंतच्या आयुष्यातले ३३ टक्के आयूष्य मी देशाबाहेर घालवले असले तरी मी अजूनही भारतीयच आहे आणि
माझा कायमचा पत्ता हा भारतातलाच आहे.
१७ ) दत्त मंदीर रोड, मालाड पूर्व - साल १९६३ ते १९७४
माझा जन्म मालाडचा. मालडमधल्या स. का. पाटील. हॉस्पिटलमधला.. आणि त्याच्या कुंपणालाच लागून असणार्या
महेश्वरी निवास मधे माझे बालपण गेले. हि बिल्डींग त्या काळातल्या गायिका, मोहनतारा अजिंक्ये यांची.
माझे आईबाबा १९५४ पासून तिथे रहात होते.
ते जेव्हा तिथे आले त्यावेळी मुंबईच्या उपनगरात फारशी वस्ती नव्हती आणि आम्ही मालाड सोडेपर्यतही फारशी
नव्हतीच. मालाड पुर्वेला बसेस, रिक्षा नव्हत्या. रस्त्यावर रहदारीही नसे फारशी. प्रवासी वाहन म्हणजे टांगे.
( स्टेशन ते घर .. दर आठ/बारा आणे ) घासलेट आणि बर्फाच्या बैलगाड्या होत्या. आमराया, गोठे होते.
आमची बिल्डींग चाळ नव्हती. तळमजल्यावर ३ बिर्हाडे आणि वरती चार. शेजारच्या गुप्ते काकू त्याला वाडा
म्हणत. बिल्डींगमधे माझ्याच वयाच्या आसपासची १० मूले. शिवाय समोरच्या घरात ३ त्यामूळे खेळगडी
भरपूर. बिल्डींगला गच्ची, मागे वापरात असलेली विहीर, समोरच्या बिल्डींगचे आंगण, इतकेच नव्हे तर पूर्ण रस्ताही
आम्हाला खेळायला उपलब्ध. रस्त्यावर गाड्याच नव्हत्या, त्यामुळे रस्त्यावर जायचे नाही, असे बंधन नव्हते.
हा काळ म्हणजे निव्वळ खेळाचा असा माझ्या आठवणीत आहे. पुस्तके फारशी नसत ( असली तरी मला
वाचनाची आवड नव्हती ) टीव्ही नव्हता. त्यामूळे शाळे व्यतीरिक्त सर्व वेळ खेळातच जात असे.
सात बिर्हाडापैकी कुणाचेही दार दिवसा बंद नसायचे आणि कुणाच्याही घरी आम्हाला अटकाव नसायचा.
खेळता खेळता तहान लागली, खरचटले तरी कुठल्याही घरात जाऊन चालत असे.
तो संपुर्ण काळ म्हणजे माझी बालमैत्रिण अजिता सोबत घालवलेला काळ. आम्ही रोज एकत्र शाळेत जात असू,
आणि दिवसभर एकत्रच खेळत असू. ( आमच्या आया आम्हाला हाका मारताना, दिनेश अजिता अशी एकत्रच
हाक मारत असत.)
आमच्या सातही कुटुंबापैकी कुणाचेच जवळचे नातेवाईक मुंबईत नव्हते, त्यामुळे काका, मामा अशी सर्व नाती
तिथल्या तिथेच होती. आणि त्यामुळेच सर्व बिल्डिंग एक कुटुंब म्हणून रहात होते. पापडा पासून करंज्यांपर्यंत
सगळे एकत्रच होत असे.
बुधवारची बिनाका गीत माला, रेडीओवरचे प्रपंच वगैरे कार्यक्रम आम्ही रात्री पायरीवर बसून ऐकत असू.
त्यावेळी एक चैनीची गोष्ट म्हणजे घरात बघायचा सिनेमा. अजिताचे बाबा, अच्युत गुप्ते, फिल्मसेंटर मधे
रंगतज्ञ होते. त कधी कधी घरी प्रोजेक्टर आणून सिनेमा दाखवत. वह कौन थी, मिलन, वावटळ असे अनेक
चित्रपट आम्ही घरी बघितले होते.
सिनेमा थिएटरही फार लांब नव्हते. जोहरा ( आता संगीता ) तर ५ मिनीटांवर. महिन्यातून एक दोनदा आम्ही
सिनेमाला जातच असू.
शाळाही घरापासून लांब नाही. मधल्या सुट्तीतही घरी येता यायचे. शिवाय सर्व शिक्षिका आईच्या ओळखीतल्या,
त्यामूळे त्या पण घरी येतच असत.
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावाला जात असू तरी पण त्या आधी आमची दोन कुटुंबाची सहल व्हायचीच. मढ मनोरी ते अगदी शहाड टीटवाळा पर्यंत आम्ही जात असू.
आमचे घर मात्र लहान होते. दोनच खोल्या, त्यातले एक स्वयंपाक घर आणि दुसरी म्हणजे उठाय बसायची,
जेवायची, झोपायची खोली. बाहेर एक स्वतंत्र गॅलरी. पण ती उघडीच होती. आम्ही तीन भावंडे आणि आईबाबा
असे एकत्र होतो त्या घरात शिवाय पाहुणे नियमित असायचेच. मालाडला येणे गावच्या पाहुण्याना थोडे
गैरसोयीचे होते कारण त्यावेळी एस्टी फक्त परळ किंवा बाँबे सेंट्रल ला येत. माझ्या बाबांबा पाहुण्यांची खुप हौस
होती. त्या छोट्याश्या घरात क्रिकेटवीर बापू नाडकर्णी आणि संगीत कोहीनूर पंडीतराव नगरकर जेऊन गेले.
त्यांनी त्या काळात ओनरशिप, सेल्फ कंटेंड ब्लॉक ( हे त्याकाळचे लोकप्रिय शब्द. संडास बाथरुम घरात असणे
ही चैन होती ) स्वप्न बघितले आणि प्र्त्यक्षातही आणले. आईबांबाचे तिथले वास्तव्य २० वर्षांचे होते, आम्ही ती
जागा सोडली त्यावेळी खुप हळवे झाले होते ते, अर्थात आमचे शेजारीही. खुप हळवे झाले. आमची कामवालीही
आमच्याकडे २० वर्षे कामाला होती.
तिथल्या शेजार्यांशी आमचे आजहि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. येणेजाणेही आहे. मी गेल्या भारतभेटीत तिथे
जाऊन आलो. आता ती बिल्डींग मोडकळीला आलीय. लवकरच पाडली जाईल, असे वाटतेय.
अजिता लग्न होऊन कॅनडाला स्थायिक झाली. मधे तिचा माझा संपर्कही झाला होता, पण मग तिचा मोठा
भाऊ अचानक गेला आणि तिने फेसबूक वर येणे सोडले. काकू फार पुर्वीच गेल्या आणि काकाही गेले.
मालाड सोडताना, आपण मोठ्या घरात जाणार या आनंदात मी तरंगत होतो.. मूळात आपण काय सोडून जात
आहोत.. याची कल्पना येण्याचे वयही नव्हते.. आणि जेव्हा ती जाणीव झाली, त्याचा मानसिक त्रासही मीच सोसला काही वर्षे....
१८ ) आल्त पर्वरी, गोवा - साल २००४ ते २००८
हा थोडासा मधलाच काळ.. मी नोकरीनिमित्त गोव्यात होतो आणि पर्वरीला नाईकांच्या घरात भाड्याने रहात होतो.
त्यांचे कुटुंब खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर मी.
काही काही घरांचाच गुण असतो, तर या घराचा गुण म्हणजे अगत्यशीलता. मी एकटाच होतो तरी या घरात
पाहुण्यांची कायम वर्दळ असे. माझे नातेवाईकच नव्हे तर अनेक मित्रमैत्रिणीही या घरी राहून गेले. अनेक
मायबोलीकर पण या घरी राहून गेले. आणि माझी मानसकन्या देखील याच घरी बागडून गेली.
त्या काळात माझ्या जीवनात एक वादळ घोंघावत होते पण या घराने मला भरभक्कम आधार दिला. अनेक नाती
जोडून दिली. या घराच्या आठवणी या सर्व गोतावळ्याच्याच आहेत.
पहिल्या दिवसापासून नाईककाकांनी मला भाडेकरू म्हणून वागवलेच नाही. ते निवृत्त शिक्षक होते,
मी ऑफिसमधून घरी आलो कि त्यांच्याशी गप्पा मारतच असे रोज. त्यांच्या घरच्या प्रत्येक सणाला मी त्यांच्या घरी
जेवलो. वरच्या मजल्यावर तीन फ्लॅट्स होते. समोरच्या घरात एक मारवाडी कुटुंब होते. त्या घरात नुकतेच एक
बाळ जन्माला आले होते. ते सहा महिन्याचे झाल्यावर त्याच्या आईने ते माझ्या
घरी आणून दिले आणि पुढची अडीज वर्षे ते बाळ माझ्या अंगाखांद्यावर खेळले.
अनेक शब्द बोलायला त्याला मी शिकवले... तोच तो मनन ( त्या
काळात मायबोलीवरही मी त्याचे अनेक फोटो टाकले होते. )
मुंबई गोवा हायवेपासून फक्त ३ मिनिटावर ते घर होते. गोव्यात जाणारी बस मी वाटेतच थांबवून रस्त्यावरच
उतरत असे. ( त्या काळात माझ्या मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला अनेक फेर्या होत असत.)
नाईकांच्या अंगणातच भरपूर झाडे होती. त्यांच्या दारातच बिमलीचे झाड होते आणि त्याला भरपूर बिमल्या लागत.
त्यांच्या घरी तांब्या पितळेची भांडी घासण्याव्यतीरिक्त त्याचा काही उपयोग करत नसत. मी आणि मनन मात्र
त्या कचाकच खात असू.
एकंदरीतच त्या परीसरात खुप सुंदर झाडे होती. मायबोलीवरचे झाडांवरचे अनेक लेख मी त्या काळात लिहिले
आणि बहुतांशी फोटो पण त्याच भागातले. ऑफिसमधे मी अनेक मित्र जोडले होते आणि त्यांनी मला,
पर्यटकांना न दिसणारा गोवा दाखवला. मायबोलीकर गिरीराज त्या काळात गोव्यात होता, त्याने आणि मी मिळून
भन्नाट भटकंती केली त्या काळात.
त्या घराने पण मला अनेकांना जेवू घालायचे भाग्य मिळवून दिले पण मनावर एक कायमचा ओरखडा दिला तो
विशालच्या रुपात. ( त्याबद्दलही मी मायबोलीवर लिहिले होते. ) हा जळगावचा मुलगा आमच्या ऑफिसमधे
आय टी चे काम बघत होता. माझ्या घराजवळच तो रहात होता. एरवी तो फारसा कुणाशी बोलायचा नाही, पण
माझ्याशी आणि माझा सहकारी सागर शी मनमोकळं बोलायचा. तो पण आमच्यासोबत अंबोली वगैरेला आला
होता.
एका संध्याकाळी सागर त्याला बाईकवरुन माझ्या घरासमोर घेऊन आला आणि
म्हणाला ह्याला बघा, हा घरी फोनवर सांगत होता, कि काळजी घ्या, माझी वाट
बघू नका. सागर त्याला सोडून घरी गेला आणि मी विशालला
वर बोलावू लागलो, तर तो येई ना. मोजे खराब आहेत असे काहीतरी कारण सांगू लागला. मग मीच खाली
गेलो आणि पर्वरीभर भटकत राहिलो. घरी चल, काहीतरी जेवण करू असा आग्रह करत होतो तर त्याने
ऐकले नाही. आधी गप्प गप्प असणारा तो, मग मोकळेपणी बोलू लागला. जळगावबद्दल
बोलला. आम्ही बाहेरच कॉफी प्यायलो. मग रात्री उशीरा मी त्याला त्याच्या
घरासमोर सोडून घरी आलो.
दुसर्या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. फोनही उचलेना. घरी माणूस पाठवला तर तो दार ठोठावून परत आला.
मग सागर आणि मी त्याच्या घरी गेलो, आणि सागरने कौलावर चढून खिडकी उघडली.
मला वरून म्हणाला, विशाल तर दारासमोरच ऊभा आहे पण दरवाजा उघडत नाही आणि
काही क्षणातच सागरने हंबरडा फोडला.
विशालने त्या रात्री साधी कपडे वाळत घालायच्या दोरीचा फास करून आत्महत्या केली होती. त्याच्या वजनाने
ती दोरी ताणली जाऊन तो जमिनीवर ऊभा असल्याचा भास होत होता.
त्याने व्यवस्थित सुईसाइड नोट लिहून ठेवली होती. पुढे पोलिस चौकशी, पोस्ट मार्टेम सगळेच झाले. पण त्याच्या
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जळगावहून त्याचा भाऊ आणि बाबा मला घरी भेटायला आले होते,
त्याला जिवंत बघणारा मी शेवटचा माणूस होतो. त्याचे त्या रात्रीचे प्रत्येक
वाक्य मी आठवून बघितले, त्याने चुकूनही कुठल्या त्रासाचा उल्लेख केला
नव्ह्ता. मला आजही असे वाटतेय, त्या रात्री मी जबरदस्तीने त्याला घरी आणले
असते, जेऊ घातले असते तर कदाचित तो वाचला असता. हा सल मला कायम राहिल.
अनेक मायबोलीकरांशी जिव्हळ्याचे नाते जुळले ते याच काळात ( ती नाती आजही जपली आहेत आम्ही ) अगदी सिनियर मायबोलीकर ललिता सुखटणकरही मला या काळात प्रत्यक्ष भेटल्या. मायबोलीकरांसोबत अनेक गडांना भेटी दिल्या त्याही याच काळात.
पुढे मी मूंबईत परत आलो. नाईक काकांनी तर माझ्याकडून शेवटच्या महिन्याचे भाडेही घेतले नाही. मननला
काय कळले माहित नाही, पण त्यानेही रडून गोंधळ घातला.....नंतर मात्र माझे गोव्यालाही जाणे झाले नाही.
सागर मात्र अजूनही माझ्या संपर्कात असतो.
१९ ) शिवसृष्टी, कुर्ला, मुंबई - १९७४ पासून आजपर्यंत
माझे बाबा व्होल्टास मधे होते. तिथल्या ५० कर्मचार्यांनी एक गृहयोजना आखली आणि जेआरडी नी ती योजना
मान्य केली. आणि ५० घरांची ती सोसायटी निर्माण झाली.
मालडच्या घराच्या दुपटीनेही मोठे घर हे. नव्या घरात बाबांनी सामानही सर्व नवेच घेतले होते. मी वर शिवसृष्टी
कुर्ला असे लिहिले आहे खरे, पण आम्ही आलो तेव्हा शिवसृष्टी नावही नव्हते कि आम्ही कुर्ल्याच्या हद्दीतही
येत नव्हतो. खर तर मोठे घर सोडले तर बाकी सोयी नव्हत्याच. कॉलनीत रस्ते नव्हते, जवळपास बसटॉप नव्हता.
कुर्ला स्टेशनला जायलाही धड रस्ता नव्हता.. मूळात खाडीत भर घालून केलेली ही जमीन होती.
पण हळूहळू सर्व सोयी होत गेल्या. रस्ते झाले, बसेस आल्या. आमच्याच कॉलनीत एस टी डेपो झाला. कुर्ला
टर्मिनस झाले, एअरपोर्ट ला जायला नवीन फ्लायओव्हर झाला.. आणि आमचे घर सर्वांसाठी सोयीचे झाले.
माझ्या बाबांचे स्वप्न पुर्ण झाले. सर्वच दृष्टीने सोयीचे असल्याने गावचे पाहुणे, कुठल्याही कामासाठी
मुंबईत आले कि आमच्याच घरी उतरतात. जाताना बस वा विमान पकडणेही सोयीचे होते. बाबांच्या पश्च्यातपण
ही परंपरा कायम आहे. आमचे नातेवाईकच नव्हे तर माझ्या मित्रमैत्रिणीही हक्काने आमच्या घरी येऊन
राहतात. अगदी मी भारतात नसलो तरीही. याचे श्रेय अर्थातच माझ्या आईला आणि वहिनीला.
पण सुरवातीचा काळ माझ्यासाठी जरा कसोटीचा गेला. मालाडला मी मराठी वातावरणात आणि सवंगड्यात
वाढलो होतो. इथे मात्र शेजारी पाजारी फारसे मराठी नव्हते आणि मला हिंदी वा ईग्लिशचा तेवढा सराव किंवा
आत्मविश्वास नव्हता. पहिली एक दोन वर्षे मला कुणी मित्रच नव्हते कॉलनीत. नवे घर, नवा परीसर. लांब
शाळा, रोज बसने जाणे ... सगळेच बिनसरावाचे.
त्या काळात मी बागकामात लक्ष घातले. घरासमोर भाजीपालाच नव्हे तर पेरु, सिताफळ, आवळा, लिंबू अशी
झाडे वाढवली. अनेक फुलझाडे लावली. आणि सर्व छान फुलूनही आले. आम्ही आलो
त्या काळात प्रदूषणाचा त्रास व्हायचा, म्हणून वृक्षारोपणाची मोहीम जोरात
होती. आम्ही त्या काळात लावलेली झाडे आजही कॉलनीच्या
रस्त्यावर सावली देत दिमाखाने ऊभी आहेत.
माझ्या बाबांना स्वतः दारावरचे तोरण करायची खुप हौस होती. त्याला लागणारी आंब्याची पाने हाताशी
असावीत म्हणून त्यांनी एक आंब्याचे झाड लावले होते. ते असे पर्यंत फक्त पानापुरताच त्याचा उपयोग होता.
ते गेल्यावर मात्र, त्या झाडाला भरपूर आंबे लागायला सुरवात झाली. आमच्याच घरालगत एक जांभळाचे
झाड आहे, त्यालाही खुप जांभळे लागतात.
आणि पुढे दोनतीन वर्षातच मी बाहेर खुप बिझी झालो. शाळेतल्या इतर
अॅक्टीव्हीटीज. मग कॉलेज, सी. ए. चे क्लासेस, आर्टीकलशिप, माझ्या नोकर्या,
भटकंती याला अगदी ऊत आला. आणि माझे कॉलनीतल्या
लोकांत मिसळणे कधी झालेच नाही. आजही हीच परिस्थिती आहे. कॉलनीत मला शिंदेबाईंचा धाकटा किंवा
छायाचा दीर म्हणूनच ओळखतात.
या घराने आम्हा तिघा भावंडांची लग्न बघितली. आईच्या नातवंडांना, पतवंडाना खेळवले. अनेकांची लग्न जुळवली,
परीक्षेसाठी अभ्यास करवून घेतला, आजारी माणसांची सेवा केली.
२५ पेक्षा जास्त वर्षे आईच्या भजनी मंडळाचे भजन ऐकले ( पुढे त्यांची स्वतंत्र जागा झाली. मंडळ अजूनही कार्यरत
आहे ) तसेच माझ्या बाबांचा तृप्त आणि माझ्या भावाचा अकस्मित मृत्यू बघितला. पण घर सावरले आणि घरातली
माणसेही.
या घरातही काही कलाकार येऊन गेले. कुसुमाग्रज, स्नेहलता दसनूरकर, आफळेबुवांची कन्या क्रांतीगीता,
सिनेकलाकार टॉम आल्टर, इंद्रा बन्सल, बाबा माजगावकर ( नाजूका मालिकेचा दिग्दर्शक ), फोटोग्राफर
मृदुला नाडगौडा, कोल्हापूरचे पेंटर वारंगे.
या घरात सर्वच सण सुंदर रित्या साजरे होत. या वर्षी दिवाळीला खुप छान योग आला होता. आई आणि वहिनी
सोबत, अंगोलाहून आलेला मी, हाँगकाँगहून आलेला माझा पुतण्या आणि स्वीडनहून आलेली नलिनी, जय
आणि शांडील्य घरी होते. खुप वर्षांनी आईच्या हातचे अभ्यंग स्नान घडले मला.
या घराची एक प्रतिमा माझ्या मनात आहे. मी कुठून तरी बाहेरून येतोय आणि आई दार उघडतेय. वाहिनी
म्हणतेय, चहा ठेवू ? आई म्हणतेय .. जेवायला काय करू ?..... गेली अनेक वर्षे, हे असेच घडतेय !
समाप्त....

















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.