https://www.maayboli.com/node/65541
जर्मनी : लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग १)
Germany : Linderhof Palace And Oberammergau
(Munich-Neuschwanstein Castle Day Tour – Part 01)
मुखपृष्ठ – ००१
Will Update Picture Soon
जर्मनीला जायचं ठरल्यावर कुठल्या कुठल्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्याचं Planning सुरु झालं. बरेच पर्याय पुढे आले. त्यातले काही मागे गेले,काही वगळले गेले. पण त्या सगळ्यात कायम आघाडीवर, अगदी पहिल्या नंबरवर राहिला तो म्हणजे जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आणि जर्मनीमधली सर्वात जास्त भेट दिली जाणारी इमारत आणि ती म्हणजे परिकथेतला नॉईश्वानस्टाईन कॅसल.
हा किल्ला जर्मनीमधल्या बव्हेरिया या परगण्यात आहे आणि शेजारी देश ऑस्ट्रियाच्या अगदी बॉर्डर (हद्दी) जवळ आहे.
आमच्या या जर्मनी टूर मध्ये म्युनिक या जर्मन शहरात आम्ही ५ दिवस होतो. एक अपार्टमेंटच बुक केलं होतं . त्यापैकी एक दिवस या प्रख्यात किल्ल्याच्या भेटीसाठी राखून ठेवला होता.
म्युनिक रेल्वे स्टेशनच्या बाहेरून बऱ्याच खाजगी कंपन्यांच्या आरामदायक बसेस या किल्ल्याची डे टूर घडवून आणतात.
या डे टूर मध्ये म्युनिक रेल्वे स्टेशनबाहेरून पिक अप, लुडविग-II या जर्मन राजाचा लिंडरहॉफ राजवाडा, ओबरआमेरगॉव हे गांव , नॉईश्वानस्टाईन किल्ला ज्या गांवात वसलेला आहे ते होहेनश्वांगॉव गांव , तिथे दुपारचे जेवण,नॉईश्वानस्टाईन किल्ला अथवा होहेनश्वांगॉव राजवाडा/ किल्ला या दोघां पैकी एका किल्ल्याला आपल्या मर्जीनुसार भेट (चॉईस दिला होता) आणि बसमधून परतीचा प्रवास. पण ड्रॉप मात्र म्युनिक रेल्वे स्टेशनऐवजी तिथल्याच एक प्रख्यात बीअर गार्डन जवळ, असा डे टूरचा भरगच्च प्रोग्राम होता.
या भागात आपण लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव हे चित्र रंगवलेल्या भिंतीच प्रसिद्ध गाव पहाणार आहोत. (खरं तरं या दोन ठिकाणांबाबत आधी आम्हाला नीटशी माहिती नव्हती. मूळ किल्ल्याबरोबर डे टूर मध्ये Part of the Package आहेच म्हणून घेतलं. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर ही दोन्ही ठिकाणं म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्काच ठरला).
आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच या टूरचं पुढच्या दिवसासाठी बुकींग केले होतं . त्यांच्या सूचनेनुसार सकाळी ८. १५ वाजता आम्ही म्युनिक स्टेशनच्या बाहेरच्या त्यांच्या बस स्टॉपपाशी पोहोचलो. तिथे आमच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन २ x २ बसेस उभ्या होत्या. त्यापैकी पहिल्या बसमधे आमचा नंबर लागला. बसमध्ये बसल्यावर जरा वेळातच बस निघाली आणि आमच्या डे टूरची सुरुवात झाली .
बराचसा प्रवास हायवेने (ए-९५) होता. काही छोटीशी जर्मन शहरं ,गावं आणि बराचसा अतिशय विरळ वस्तीचा, हिरव्या कुरणांचा प्रदेश यामधून आमचा प्रवास चालू होता.
जसे माझे "स्विस स्केप्स: आगगाडीच्या रुळांवरून" यामधले फोटो ट्रेन मधून
काढलेले होते तसे ह्या प्रवासातले फोटो चालत्या बसमधून, काचेमधून काढलेले
आहेत आणि म्हणूनच थोडे ब्लर, थोडे अनक्लिअर आहेत.
मात्र बसच्या काचेच्या आतून ही छायाचित्रे टिपली असल्यामुळे तो एक काचेचा
अडसर आणि त्या काचेमधील प्रतिबिंब (Reflection) तुम्हाला ह्यातल्या काही
क्षण चित्रात आढळेल. पण लेखाला पूरक ठरतील म्हणून इथे दिले आहेत.
प्रचि ०१: म्युनिक मधून बाहेर पडल्यावर मध्यम किंवा विरळ लोकवस्तीची अशी दृश्य दिसायला लागतात. पण प्रत्येक ठिकाणी एखादं चर्च किंवा चॅपेल हे दिसतंच दिसतं . दृश्य साधारणपणे स्विझर्लंडमधल्या ग्रामीण भागासारखंच. . . . .कारण देशाच्या सीमा बदलल्या तरी प्रदेश सारखाच. . . वातावरणही सारखंच आणि आल्प्सचं सान्निध्य ही सारखंच.
प्रचि ०२: आल्प्सची पार्श्वभूमी...
प्रचि ०३: विरळ लोकवस्ती आणि गवता-कुरणांचा प्रदेश -०१
प्रचि ०४: गवता-कुरणांचा प्रदेश -०२
प्रचि ०५: लिंडरहॉफ पॅलेसकडे नेणारा प्रवेश रस्ता
प्रचि ०६: राजवाड्याकडे जाताना उजव्या हाताला लागलेलं हे तळं आणि पाठीमागे आल्प्सची पार्श्वभूमी. . . . सगळ गवत हिरव्या कंच रंगाचं आणि दाट झाडांच्या सावलीने वेढलेलं. इथल्या कुठल्या तरी झाडाखालच्या सावलीत ह्या गवतावर पहुडावं, मनमुराद लोळावं अशी इच्छा प्रत्येकालाच होत असणार. मला तर नक्कीच झालेली. (नशीब माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो. . . . कि दुर्देव माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो...?)
प्रचि ०७: राजवाड्याकडे . . . . सगळ्या हिरवाईत हे एक लाल पानांचं झाड
प्रचि ०८: राजवाड्याच्या रस्त्यावर. . . .अजून एक, खर तर दोन लाल पानांची झाडं
आमचं टूर मधलं पहिलं ठिकाण होतं राजा लुडविगने बांधलेला लिंडरहॉफ पॅलेस .
राजा लुडविग -II याने ३ राजवाडे बांधले, त्यातला हा सर्वात लहान राजवाडा. आणि हा एकमेव राजवाडा जो लुडविग पूर्ण झालेला पाहू शकला. खरं तर सन १८८६ मध्ये हा राजवाडा त्याच्या सर्व वैभवासह पूर्ण झाला आणि त्याच वर्षी नंतर राजा लुडविग-II दुर्दैवी, अकाली, अनपेक्षित आणि रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावला.
पण हा राजवाडा म्हणजे आधीच्या वास्तूचे भव्य राजवाड्यामध्ये रूपांतर असल्यामुळे राजाला ह्या राजवाड्यात रहाता तरी आले.
मोठा झाल्यावर लुडविग राजाचं जास्तीत जास्त वास्तव्य ह्याच राजवाड्यात असे.
हा राजा ज्याला वेडा राजा (Mad King Ludwig)
म्हणून ओळखलं जातं, तो स्वतः कलासक्त मनाचा होता. सुंदर इमारती बांधण्यात
त्याला रुची आणि गती होती. बांधकामाच्या आराखड्यात आणि बाह्यरूपात
बाह्यसौंदर्यात त्याला रस होता. या सर्वांमध्ये त्याचा सहभाग असे तसंच तो
त्यात हस्तक्षेपही करी आणि हा हस्तक्षेप कलात्मक दृष्टीने चांगलाच असे हे
त्याने उभारलेल्या इमारतींवरून सिद्ध झालेले आहे.
या राजाला त्याच्या इमारती एखाद्या आधी झालेल्या , त्याला आवडलेल्या
इमारतीच्या संकल्पनेवर डिझाईन करायची, ती संकल्पना फुलवायची सवय होती.
फ्रान्सचा राजा १४वा लुई हा राजा लुडविग II चा आदर्श होता. आणि १४व्या लुईचा पॅरिसचा व्हर्सायचा राजवाडा हा लुडविगचे लिंडरहॉफ राजवाडा बांधण्यामागचे प्रेरणास्थान होते.
त्यामुळे दोघांच्या आकारमानात खूप फरक असला तरी व्हर्सायच्या राजवाड्यातील आणि त्याच्या परिसरातील सूर्य-प्रतिमा, किंग्ज कॉटेज, आईने महल, ह्या गोष्टींचा वापर लिंडरहॉफ राजवाड्यातही झालेला दिसतो.
प्रचि ०९ : राजवाड्याचे पहिले दर्शन...
प्रचि १०: राजवाड्याचे प्रवेश द्वार. तीन कमानीच्या मधून प्रवेश आणि
कमानींच्या बाजूंवर चार सशक्त पुरुषांच्या शिल्पाकारातील दगडी ब्रॅकेट वर
तोललेला सज्जा.
सज्जाचे रेलिंग आणि कठडा काळ्या आणि सोनेरी रंगाच्या अतिशय डेकोरेटिव्ह बिडाच्या जाळीमध्ये....
प्रचि ११: दगडी पुरुष शिल्प (अॅटलस) : जवळून
प्रचि १२: मात्र राजवाड्यात प्रवेश करण्यापूर्वी टूर गाईड आपल्याला
राजवाड्या समोरचे कारंज पाहायला आणि तिथून वर जाणाऱ्या पायऱ्या चढून वर
जायला सांगतो. कॅमेराही कॅरी करायला सांगतो. कारण हि एक अशी जागा आहे जिथून
अख्खा राजवाडा त्याच्या सभोवतालासह, कारंजासह, विविध दगडी शिल्पांसह, वर
खाली जाणाऱ्या सुरेख रेखीव पायऱ्यांसह आणि मागे चढत जाणाऱ्या हिरवळीच्या
पार्श्वभूमीसह आपल्या नजरेच्या कवेत येतो.
आणि ते समोरचं दृश्य पाहिलं की मग लुडविग -II ने निर्मिलेली लिंडरहॉफ
राजवाडा हि एक उत्कृष्ट, रमणीय आणि अविस्मरणीय वास्तू आहे, असं का म्हटलं
आणि मानलं जातं त्याचा आपल्याला प्रत्यय येतो.
Will Update Picture Soon
लहान लुडविग खरं तर त्याच्या बाबांबरोबर शिकारीसाठी ह्या किंग्ज कॉटेज नावाच्या गवताळ कुरणं असलेल्या आणि जंगल- डोंगराच्या सानिध्यातील प्रॉपर्टीमध्ये यायचा.
हि जागा, हा परिसर आवडल्यामुळे त्याने हेच कॉटेज लहानपणी लुडविग इथे
ज्या फाॅरेस्टर्स हाऊस (Royal Hunting Lodge) मधे रहायचा ते मोठा झाल्यावर
त्याने वाढवलं.
नंतर हळूहळू त्यात त्याने टप्प्याटप्प्याने (Phase Wise) खोल्यांची भर घातली... आणि मग मूळ Lodge संपूर्ण पणे काढून टाकलं..
त्यामुळे म्हटलं तर त्याने मूळ इमारतीत भर घातली आणि म्हटलं तर जुनी इमारत संपूर्ण पणे पाडून टाकली..
आणि याचमुळे तो ह्या राजवाड्यात बराच काळ राहू शकला.
हा राजवाडा आर्किटेक्चरच्या रोकोको स्टाईलमधे बांधला आहे.
१८ व्या शतकात पॅरिसमध्ये उदय पावलेल्या , नंतर फ्रान्सभर पसरलेल्या आणि नंतर अन्य युरोपियन देशात, विशेषतः ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये विशेष वाढ झालेल्या Rococo Architectural style मध्ये ह्या राजवाड्याचे बांधकाम आहे. त्यामुळे सहाजिकच ह्या शैलीचे वैशिष्ट्य असलेल्या अतिशय डेकोरेटिव्ह घटकांची यात रेलचेल आहे.
प्रचि १३: राजवाड्याची उजवी बाजू.
हेच डेकोरेटिव्ह घटक राजवाड्याच्या अंतरंग सजावटीतही (Interior) दिसून येतात.
मात्र दुर्दैवाने ह्या राजवाड्याच्या अंतर्भागाचे छायाचित्रण करण्यास मनाई
आहे, म्हणून ह्या सर्व प्रतिमा केवळ राजवाड्याला प्रत्यक्ष भेट देऊन अथवा
आंतरजालावरतीच पाहता येतात. त्यामुळे प्रत्यक्ष राजवाडा पाहिला तरी फोटो
काही काढता आले नाहीत म्हणूनच केवळ वाचकांना थोडीशी कल्पना यावी यासाठी
आंतरजालावरून काही प्रचि इथे साभार देत आहे.
प्रचि १४ : आईने महल (Hall of Mirrors) हि ह्या राजवाड्यातील एक अतिशय खास जागा. ही खोली लुडविग ची अतिशय आवडती होती. कारण हा निशाचर राजा दिवसा झोपायचा आणि रात्रभर जागा राहून ह्या खोलीतल्या एखाद्या कोनाड्यात बसून पुस्तकं वाचायचा किंवा बऱ्याच मेणबत्त्या पेटवून आरसे महालातल्या असंख्य आरशांमध्ये त्या ज्योतींच्या अनंत प्रतिमा पहात त्या उजेडात आनंदाने हरवून जायचा. (आंतरजालावरून साभार)
प्रचि १५: सोनेरी रंगाची खुर्ची, सोनेरी मोल्डींग्ज्, मयूर नील रंगाचा (Peacock Blue) रेशमी पडदा आणि गालिचा (आंतरजालावरून साभार)
हे त्याचे खाजगी निवास स्थान असल्याने या राजवाड्यात त्याचे सिंहासन नाही. राजवाड्यामधील एकंदर गोल्ड प्लेटिंगसाठी सुमारे ५ किलो सोन्याचा वापर केलेला आहे.
प्रचि १६: लुडविग राजाची बेडरूम (आंतरजालावरून साभार)
प्रचि १७: ऑडियन्स रूम (आंतरजालावरून साभार)
राजवाड्याच्या परिसरातील बगिचांमध्ये लँडस्केपिंगची आखीव रेखीव आणि भौमितिक स्वरूपाची “बरोक” शैली, इंग्लिश शैली आणि इटालियन रेनेसान्स शैली यांचा सुयोग्य मिलाफ आहे. आणि म्हणूनच या बागा जगातील सर्वात सुंदर बगिच्यांपैकी एक म्हणून गणल्या जातात. ह्या लँडस्केप्ड बागा जवळजवळ सव्वाशे एकरात पसरलेल्या असून सभोवतालच्या नैसर्गिक अल्पाईन लँडस्केप मध्ये त्या छान मिसळून जातील असे त्यांचे डिझाईन आहे.
प्रचि १८: अश्व शिल्प कारंज (Neptune Fountain) आणि पाठीमागे चढावरती दिसणारे Music Pavilion
हे कारंजामधलं पाणी आल्प्स पर्वताच्या उतारावरून वहाणार्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी आहे.
प्रचि १९: बागेतील पुतळा – ०१
प्रचि २०: निळे स्वछ आकाश...
प्रचि २१: आखीव रेखीव भौमितिक बाग -०१ (मला स्वतःला लँडस्केपिंगची ही भौमितिक शैली अजिबात आवडत नाही, सगळं फार कृत्रिम वाटतं)
प्रचि २२: आखीव रेखीव भौमितिक बाग -०२
प्रचि २३: आखीव रेखीव भौमितिक बाग -०३
(पॅव्हेलियन आणि त्याच्या वाटेवरील बाण मारणाऱ्या मदनाचे कारंजे) (Cupid Fountain)
प्रचि २४: बागेतील पुतळा – ०२
प्रचि २५: परतीच्या वाटेवरील ताटवा
प्रचि २६: राजा लुडविग II चा ब्राँझ मधला अर्धपुतळा
प्रचि २७: बसकडे जाताना सभोवतालचे Alpine Landscape
लिंडरहॉफ राजवाड्यानंतर आमचे पुढचे ठिकाण होते ओबरआमेरगॉव (Oberammergau).
लिंडरहॉफ पॅलेसमधून जवळच असलेले हे गांव नॉईश्वानस्टाईन किल्ल्याच्या
वाटेवरच आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते गावातील कोरीव लाकूडकाम करणारे
कारागीर, त्यांनी बनवलेल्या कोरीव लाकूड कामाच्या वस्तू , दर १० वर्षांनी
होणारे पारंपारिक Passion Plays , Nato School आणि मुख्यत्वे परिकथेतील
अथवा धार्मिक चित्रं आणि त्रिमितीय भास होणारी चित्रं रंगवलेली रंगीबेरंगी
घरे (Frescoed इमारती) यांसाठी.
म्हणूनच याला " Town of Painted Buildings " असे म्हणतात.
यामधली Architectural चित्रं म्हणजे एखाद्या साध्याशा खिडकीला किंवा दरवाजाला बाजूने एवढं छान रंगीत चित्र काढून Detailing करतात कि ती खिडकी , तो दरवाजा एकदम शाही अथवा विशेष (Special) होऊन जातो. आणि इमारतीचं रुपचं पालटतं.
प्रचि २८: या इमारतीच्या १ ल्या मजल्यावर धार्मिक प्रसंग चितारलेला आहे. उजवी कडचा कोपरा म्हणजे सपाट भिंत असली तरी त्यात चित्र रंगवण्याच्या पध्दतीमुळे कमानदार त्रिमितीय दरवाज्याचा (3 Dimensional Arched Door) भास होतो.
तर डाव्या कोपऱ्यात एखाद्या घराच्या व्हरांडयाचा भाग, पायऱ्या, व्हरांडयाचं छप्पर असा आभास रंगवण्यामधून, त्याच्या लाईट्स आणि शेडमधून होतोय. आणि याच चित्रांसाठी ओबरआमेरगॉव प्रसिद्ध आहे.
प्रचि २९: हे पण एक तिथले टिपिकल उदाहरण. हे चित्र बहुतेक त्यांच्या एखाद्या परिकथेतील असावं. त्याच्या खालच्या खऱ्या खिडक्या साध्या सुध्याच आहेत पण त्यांच्या मध्ये रंगवलेले गोल खांब, त्या खांबाचं सोनेरी, डेकोरेटिव्ह कॅपिटल, खिडक्यांच्या कमानीवरची सोनेरी, वळणदार पानाफुलांच्या डिझाईनची वेलबुट्टी यामुळे खिडक्यांना एक भारदस्तपणा आणि उच्चभ्रू राजेशाही रुप आलं आहे.
ही सुद्धा ओबरआमेरगॉवची खासियत.
या शिवाय याच इमारतीचं (Hotel चं) आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे लाकडापासून बनवलेले गॅलरीचें कठडे.
प्रचि ३०: पार्श्वभूमीवर ओबरआमेरगॉवचा Signature Mountain समजले जाणारे Kofel शिखर.
या शिखराच्या डोक्याचा भाग लक्षात येईल असा पांढरा आहे. शिखराच्या
माथ्यापर्यंत साधारणपणे १.० किलोमीटरचा सौम्य चढ असल्यामुळे आणि तिथे
टोकाला एक छान सूळ (Cross) असल्यामुळे बरेच ट्रेकर्स याच्या माथ्यापर्यंत
जात येत असतात.
प्रचि ३१: Kofel पहाडावरचा सूळ (Cross). शेजारी काही माणसंही दिसतायत.
प्रचि ३२: सुळाचा (Cross) Close Up..
प्रचि ३३: लाकडी कठड्यांची आणि बाल्कनीत लाकडी सूळ असलेली एक इमारत.
प्रचि ३४: ओबरआमेरगॉव मधला एक निवांत रस्ता. रस्त्याला काँक्रीट आणि दगडी पेबल्सचे फूटपाथ.
(हि
जागा रुंद रस्त्यावर वसली आहे आणि इथे माणसांची, गाड्यांची अजिबात गर्दी
नाही एवढा फरक वगळता जुन्या मुंबईची विशेषतः गिरगाव, कांदेवाडी, फणसवाडी
वगैरेंची आठवण करून देणारा परिसर)
प्रचि ३५:अजून एक रंगवलेली इमारत...
प्रचि ३६: हा एक कॅफे. दोन्ही बाजूला परिकथेतील चित्रं रंगवलेला आणि मधल्या खिडक्यांना वर आणि खाली डिझाईनची रंगवलेली पट्टी आणि वर तिरक्या होत जाणाऱ्या कौलारू छपराचा आभास निर्माण करणारं रंगकाम. चित्रात उन्ह जाणवत असलं तरी तापमान १६ ते १८ डिग्री. . . . So Chill . . . .
प्रचि ३७: दुकानासमोरच्या शोभिवंत फुलांच्या कुंड्या...
प्रचि ३८: हे Passion Play होणारं Passion Play Theater. सन १६३४ पासून या प्लेज ना सुरुवात झाली. ज्या वर्षाच्या शेवटी शून्य असते अशा वर्षी म्हणजे दर दहा वर्षांनी हे प्लेज केले जातात. या पुढचा प्ले आता सन २०२० ला आहे. त्या वर्षी ५ महिने हे प्ले केले जातील. ह्या Plays चं बुकिंग आत्तापासूनच सुरु झालयं. . . .
प्रचि ३९: या Play Theater समोर एक छान बाग आहे. जिच्या भोवती खूप छान म्युरल्स , स्कल्प्चर्स ची मांडणी केलेली आहे.
प्रचि ४०: म्यूरल
प्रचि ४१: बसायला छान बाकं असलेल्या या बागेतलं एक महत्त्वाचं स्कल्प्चर : गाढवावरचा ख्रिस्त (Jesus On Donkey)
प्रचि ४२: Close Up of "Jesus On Donkey"
प्रचि ४३: अजून एक म्यूरल : Rottwagen
इथे दुकानात लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंची आणि त्या टिपिकल ककू क्लॉक्सची रेलचेल असते. पण टूरच्या वेळेच्या मर्यादेमुळे ते फार काही बघता आलं नाही.
प्रचि ४४: हि ती टिपिकल ककू क्लॉक्स...
प्रचि ४५: लाकडी कारागिरीच छान उदाहरण: लाकडी घुबड...
यानंतर आम्ही शेवटचं ठिकाण पाहिलं ते म्हणजे "सेंट पीटर व पॉल "चे चर्च.
प्रचि ४६: सेंट पीटर आणि पॉल चर्चचा Bell Tower...
प्रचि ४७: Bell Tower- Close Up
प्रचि ४८: चर्चचा अंतर्भाग....
आता मात्र आमची ह्या गावातली वेळ संपत आलेली म्हणून मग धावत पळत बसपाशी गेलो.
यानंतर आम्ही बसमध्ये चढलो ते या टूरचं सर्वात मोठं आकर्षण असलेला नॉईश्वानस्टाईन कॅसल - एका वेड्या राजाचे स्वप्न पाहण्यासाठी.
लुडविगची भानगड नीटशी लक्षात आली नाही. मूळ इमारत तशीच ठेऊन त्यावर रचना फुलवायला आवडते असे लिहिलेत >>>
असं नाही म्हणायचंय..
दोन गोष्टी बहुतेक एकत्र केल्यात तुम्ही...
लुडविग राजाला त्याच्या इमारती अन्य छान इमारतींच्या संकल्पनेवर, डिझाईन वर बेतायची सवय होती.
ह्या राजवाड्याचे (लिंडरहाॅफ पॅलेस) डिझाईन त्याने फ्रान्समधल्या व्हर्साय च्या राजवाड्यावर बेतले आहे.
१४व्या लुईचा व्हर्सायचा राजवाडा, त्याचे डिझाईन ही त्याची लिंडरहाॅफ पॅलेस बांधण्यामागची प्रेरणा होती..
मात्र बांधकामाचे डिटेल्स जसेच्या तसे वापरण्याऐवजी तो त्यात स्वतःच्या आवडीनुसार फेरबदल करायचा, ते अजून खुलवायचा..
<<< त्याने इमारत पूर्ण पाडून परत बांधली असेही लिहिलेत. तो राहत असलेला राजवाडा व पाडून बांधलेली वास्तू वेगवेगळी आहे बहुतेक. >>>
इथे स्पष्ट करतो आणि लेखात थोडी अधिक माहिती देतो..
लहानपणी लुडविग इथे ज्या फाॅरेस्टर्स हाऊस (Royal Hunting Lodge) मधे
रहायचा ते मोठा झाल्यावर त्याने वाढवलं. नंतर हळूहळू त्यात त्याने
टप्प्याटप्प्याने (Phase Wise) खोल्यांची भर घातली... आणि मग मूळ Lodge
संपूर्ण पणे काढून टाकलं.. त्यामुळे म्हटलं तर त्याने मूळ इमारतीत भर घातली
आणि म्हटलं तर जुनी इमारत संपूर्ण पणे पाडून टाकली..
आणि याचमुळे तो ह्या राजवाड्यात बराच काळ राहू शकला.
मुखपृष्ठ – ००१
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. त्यावर एक राजा राज्य करीत होता. पण तो होता "वेडा". . .
अशा गोष्टी आपण बालपणी वाचल्या.
पण आज मात्र आपण खरंच एका वेड्या राजाची कहाणी पाहणार आहोत.
ह्या राजाला आलम दुनियेत वेडा राजा लुडविग (Mad King Ludwig) म्हणून ओळखले जातं.
त्यालाच Swan King असेही म्हणत.
परिकथेतील राजा (Fairy Tale King) म्हणूनही तो ओळखला जाई.
लहरी राजा हेही त्याचे नामाभिधान.
आणि Shy King Ludwig म्हणूनही तो प्रसिद्ध होता.
ह्या वेड्या राजाने एक स्वप्न पाहिलं, "एक किल्ला बांधण्याचं", आणि
त्याच्या स्वप्नातला हा किल्ला म्हणजे नॉईश्वानस्टाईन कॅसल जो जगातला
सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आहे.
या राजाचं आयुष्य पाहिलं आणि त्याची स्वप्न पाहिली तर मी मात्र याला वेडा राजा न म्हणता
"मनस्वी राजा" म्हणीन आणि त्याने बांधलेल्या नॉईश्वानस्टाईन कॅसलला म्हणीन,
”एका मनस्वी, कलंदर, कलावंत राजाची निर्मिती”.
(इथे एक गोष्ट स्पष्ट
करावीशी वाटते, ती म्हणजे किल्ला म्हटल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे
महाराष्ट्रातील किल्ले, Forts आठवतात. इथे Castle याचा एक अर्थ किल्ला असा
होतो. पण युरोपमधील "Castle" म्हणजे एखाद्या सरदाराचं, उमरावाचं किंवा
मोठ्या माणसाची, संरक्षणाची व्यवस्था असलेली त्यांची रहायची जागा. त्यामुळे
Castle म्हणजे गढी असाही एक अर्थ आहे.)
कधीकधी माणूस पहाताना वास्तू कळते तर कधी वास्तू पहाताना माणूस कळतो याच उत्तम उदाहरण म्हणून राजा लुडविग- II आणि नॉईश्वानस्टाईन कॅसल या जोडगोळीकडे पहायला हवं.
या सुंदर किल्ल्याला "परिकथेतील किल्ला" (Fairy Tale Castle), ”Disney Story Book Castle”, “Cindrella's Castle” असंही म्हटलं जातं.
आल्प्सच्या अंगाखांद्यावरच्या अल्पाईन जंगलाच्या आणि पायथ्याच्या अतिशय विहंगम अशा गवता - कुरणाच्या (Meadows) निसर्गसौंदर्यामध्ये वसलेल्या एका टेकडीवर या किल्ल्याचं बांधकाम केलंय.
मुळात हा किल्ला आल्प्स पर्वतातल्या एका टेकडीवर बांधल्यामुळे त्याची
उंची वाढलेली आहे आणि त्या उंचीवरून होहेनश्वांगॉव गावाच्या अतिशय सुंदर
निसर्गाचं आणि दरीचं मंत्रमुग्ध करणार दर्शन होतं.
प्रथमदर्शनी हा किल्ला आपल्याला मध्ययुगीन काळातील किल्ल्याची प्रचिती आणून देतो.
म्युनिकवरून याच राजाचा लिंडरहॉफ पॅलेस आणि भित्ती चित्रांसाठी प्रसिद्ध
असलेले वाटेतील ओबरआमेरगॉव हे गांव पाहिल्यावर आमच्या डे टूरची बस
होहेनश्वांगॉव गावात पोहोचली ज्या गावात हा नॉईश्वानस्टाईन किल्ला वसलेला
आहे.
मात्र गावात पोहोचण्याआधीच नॉईश्वानस्टाईन किल्ल्याने त्याचे दर्शन लांबवरूनच द्यायला सुरुवात केली.
प्रचि - ०१:
प्रचि - ०२:
इथे आम्हाला उतरवल्यावर आधी जवळपासच्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण आटपून घ्यायचे होते आणि नंतर एका मिनी बसने किल्ल्याजवळ जायचे होते.
किल्ल्यामध्ये जाण्यासाठी घोडागाडीचा पर्यायही होता. अर्थात चालत जाणारे पर्यटकही होतेच.
प्रचि - ०३: ह्या तिकीट हॉलपाशी आम्ही बसमधून उतरलो.
प्रचि -०४: ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच घेतले, त्याच्या दर्शनी भागातही ओबरआमेरगॉव सारखी रंगीत भित्तिचित्रे काढलेली होती.
प्रचि -०५: जेवून झाल्यावर थोडं पुढे गेलो आणि मागे पाहिलं तर पुन्हा नॉईश्वानस्टाईन किल्ल्याचं दर्शन झालं.
प्रचि -०६: गांवातून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल
प्रचि -०७ : नॉईश्वानस्टाईन कॅसलच्या वाटेवर लागतो होहेनश्वांगॉव कॅसल, ज्यामध्ये लुडविग- II राजाचं बालपण गेलं.
प्रचि -०८ : होहेनश्वांगॉव कॅसल
प्रचि – ०९: किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली घोडागाडी (काय मस्त दणकट, धष्टपुष्ट घोडे आहेत नां…..?)
प्रचि – १०: होहेनश्वांगॉव कॅसल जवळून
प्रचि – ११: होहेनश्वांगॉव कॅसल वरचे लुडविग राजाचे हंस चिन्ह
प्रचि – १२: किल्ल्याचा रस्ता चढाचा आहे ज्याच्यावरून मिनी बस पण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही.
बस मधून उतरल्यानंतर थोड्या चढाच्या रस्त्यावरून वर जायला लागतं.
एखादं वळण चढून आपण वर आलो की सरळ रस्ता जातो किल्ल्याकडे आणि उजव्या हाताला एक वाट जाते ती मेरीच्या पुलाकडे.
प्रचि – १३: मेरीच्या पुलाकडे - ०१
प्रचि – १४: मेरीच्या पुलाकडे - ०२
लुडविग राजाने हा सुंदर किल्ला बांधायला तर घेतला. पण एवढं भव्य
बांधकाम, देखणी इमारत जवळून पहाण्यापेक्षा थोडी दुरून पहिली आणि तीही
नजरेच्या पातळीत (Eye Level ला) आणि त्यातूनही घरं, कुरणं, नदी, डोंगर आणि
हे सर्व पहाडाच्या पार्श्वभूमीवर. . . .
तर त्यात एक आगळीच मजा येईल. आणि हे बांधकाम जसजस प्रगतीपथावर जाईल तसतसं आपलं स्वप्न साकार होताना दिसेल.
यासाठी ह्या वेड्या राजाने एक अफाट जागा शोधली . . . .
ती म्हणजे मेरीचा पूल (Mary's Bridge)
दोन पहाडांमधून वहाणाऱ्या आणि Pollat George Waterfall मधून उगम
पावलेल्या Pollat Stream वर लुडविगच्या बाबांनी एक छोटासा कामचलाऊ लाकडी
पूल बांधला होता आणि त्यांच्या पत्नीचे, राजा लुडविगच्या आईचे, मेरीचे
(Queen Mary of Prussia) नाव दिलं होतं.
लुडविगने हा लाकडी पूल संपूर्ण पणे लोखंडी कामाने बांधला.
येणारे सर्व पर्यटक आधी ह्या मेरीच्या पुलावर येतात. तिथून डोळे भरून हा किल्ला पाहतात. फोटो काढतात आणि मग मात्र फिरून किल्ल्याकडे जातात.
प्रचि – १५: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१
प्रचि – १६: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०२
दिवसा झोपणाऱ्या या राजाला दिवस झोपून काढल्यावर दिवसभरात किल्ल्याच्या पुऱ्या झालेल्या कामाची उत्सुकता असायची.
मग हा भूतकाळात, मध्ययुगात रमणारा निशाचर वेडा राजा, रात्री या मेरीच्या पुलावर यायचा. (आधी लाकडी आणि नंतर लोखंडी),
आणि त्या रात्रीच्या अंधारात जो उजेड चंद्र, ताऱ्यांचा असेल, बांधकामाच्या
जागेवर पेटवलेल्या दिव्यांचा, मशालींचा उजेड असेल किंवा उबेसाठी पेटवलेल्या
शेकोटीचा असेल त्या उजेडात किंवा अंधारात; तोपर्यंत जेवढा पूर्ण झाला असेल
तो हा मध्ययुगीन किल्ला, त्याचे स्वप्न पुरे होत असल्याचे पहात बसायचा.
जशी विहिरीतील कासवीण आपल्या पिल्लांना नजरेने वाढवते. . . . . अगदी त्याचप्रमाणे स्निग्ध, स्वप्नाळू नजरेने.
या किल्ल्यावरून बलूनने फिरावं आणि हा किल्ला आणि त्याचा परिसर आकाशातून हंस पक्षाप्रमाणे पहावा अशीही या राजाची एक मनिषा होती.
प्रचि – १७: पुलाखालून खळाळत वहाणारा Pollat Mountain Stream. (हिवाळ्यात मात्र हा गोठतो)
प्रचि-१८: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०३
प्रचि - १९: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०४
मेरीच्या पुलावरून हा किल्ला पाहताना नॉईश्वानस्टाईन कॅसल एवढा सुंदर का मानला जातो,
का हा किल्ला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर गारुड करतो,
का प्रत्येक पाहणाऱ्याची नजरबंदी करतो,
याचं कारण समजतं.
आल्प्स पर्वताचं सानिध्ध्य, याच पर्वतामधली एक टेकडी, सभोवताली अल्पाईन जंगल, टेकडीचा विस्तार थांबतो तिथे गवताळ कुरणं, त्यात चरणाऱ्या धष्टपुष्ट जर्मन गायी, उतरत्या छपरांच्या घरांची लोकवस्ती, त्या पलीकडे कायम वहात असलेली नदी (हिवाळ्यात गोठत नाही तोपर्यंत), पर्वतावरूनच वहाणारा स्वछ पाण्याचा धबधबा आणि त्यातूनच वहाणारा, किल्ल्याला पाणी पुरवणारा आणि नंतर पुढे नदीला जाऊन मिळणारा झरा.
आणि त्या टेकडीच्या खडकाळ मजबूत उंचवट्यावर वसलेला ठाशीव कॅसल, गोलाकार उंच खांबांनी त्याला आलेली मृदुता आणि लाभलेलं सौंदर्य, त्याचे भरभक्कम बुरुज आणि एखाद्या अर्जुन वृक्षाप्रमाणे किंवा उंच महोगनी वृक्षाप्रमाणे आकाशाला चिरत जाणारे अरुंद slender तरीही उंच बळकट, शेवटाला निमुळते होत जाणारे, टोकेरी, अणुकुचीदार मनोरे.
आणि यामुळे एकाचवेळी तळाशी जमिनीच्या छाताडात पाय रोवून त्याच्या बुरुजांसह घट्टपणे उभा असल्याचा सामर्थ्यशाली भास आणि जसजशी वरती नजर जाईल तेव्हा त्या खांबा / मनोऱ्यांमुळे होणारा अधरतेचा, तरंगल्याचा आभास (Floating Effect) यामुळे ह्या किल्ल्याला तो खास परिकथेतल्या किल्ल्याचा तरल, Fantasy Feel आला आहे.
या किल्ल्याच्या डिझाईनमध्ये लुडविगचा एवढा हस्तक्षेप होता कि हे डिझाईन आता किल्ल्याच्या आर्किटेक्टपेक्षा लुडविगचे म्हणूनच ओळखले जाते.
या किल्ल्याच्या परिकथेच्या स्वरूपाने, आर्किटेक्चरने वॉल्ट डिस्नेलाही
मोहित केलं आणि त्यावरून प्रेरणा घेत तो त्याची प्रसिद्ध जादूनगरी बनवायला
प्रवृत्त झाला आणि डिस्नेवर्ल्ड फ्लोरिडा मधला Cinderella Castle आणि
डिस्नेलँड पॅरिस मधला Sleeping Beauty Castle यांचे डिझाईन त्याने ह्या
किल्ल्यावर बेतले.
एवढंच नव्हे तर या किल्ल्याला त्याने Disney कंपनीच्या लोगोमध्येही स्थान दिले.
प्रचि -२०: Disney Logo – 01 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि -२१: Disney Logo – 02 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि -२२: Disney Logo – 03 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्या माणसांच्या मनावरही (ज्यात मीही आलो) ज्या वॉल्ट डिस्नेच्या कार्टून फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स ने प्रचंड गारुड केलेलं आहे त्या माणसाच्या मनावर ह्या किल्ल्याने गारुड करावं आणि त्याने ह्या किल्ल्याला स्वतःच्या कंपनीच्या लोगोमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावं यातच नॉईश्वानस्टाईन कॅसल ची महती सामावलेली आहे.
ह्या मेरीच्या पुलावरून किल्ल्याचं दर्शन घेतल्यावर आमच्याकडून एक चूक घडली.
ती म्हणजे आम्ही मेरीच्या पुलावरून किल्ल्यासाठी परत मागे येण्याऐवजी
गैरसमजुतीमुळे पूल ओलांडून पलीकडच्या डोंगरावर गेलो. ह्या पायवाटेवरून एक
५-७ मिनिटं गेल्यावर एक ट्रेकर्सचा ग्रुप लागला. त्यांनी आमची वाट चुकलीय
हे सांगून परत माघारी पाठवलं. त्यात आमची १५-२० मिनिटं वाया गेली.
पण ते भेटले नसते तर काही खरं नव्हतं.
म्हणजे परत आलो असतो, पण वाट चुकल्यामुळे एखाद दीड तास चुकीमुळे वाया गेला असता तर किल्ला बघायला वेळच मिळाला नसता. नुसताच भोज्ज्या.
प्रचि – २३: हि ती चुकलेली वाट...
(खरं तर ही वाट पुलापलीकडच्या
डोंगरावर जाते. तिथून नॉईश्वानस्टाईन कॅसलचा अजून एक छान आणि उंचावरून
दर्शन घडवणारा Point आहे. पण वेळेचे हे चोचले बॅग पॅकर्सना परवडतात, Day
Tour वाल्यांना परवडत नाहीत.)
प्रचि – २४: परत मेरीच्या पुलावरून दिसणारी नदी, तिच्या काठावरचं गांव, घर. कुरणं आणि नॉईश्वानस्टाईन कॅसलचा एक कोपरा ...
प्रचि – २५: हे आता बरोबर रस्त्याला लागल्यावर, रस्त्यावरून दिसणारा कॅसल...
प्रचि- २६: आणि हि जंगलामधून दिसणारी बाजूची उतरती वाट जी चढून आम्ही आलो होतो...
प्रचि - २७: किल्ल्याचे बाहेरील (तटबंदीतील) प्रवेशद्वार
प्रचि – २८: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०१ (Long Shot)
आणि खाली धबधबा......
प्रचि- २९: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०२ (Mid Shot)
प्रचि- ३०: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०३ (Close Up)
प्रचि-३१ : किल्ल्याचे जवळून पहिले दर्शन...
कला आणि स्थापत्य याला आयुष्य वाहिलेला राजा लुडविग शास्त्रीय संगीताचा मोठा भोक्ता होता. जागतिक कीर्तीच्या रिचर्ड वॅगनर या संगीतकार आणि नाट्य दिग्दर्शकाचा राजा लुडविग खूप मोठा चाहता आणि पाठीराखा होता. हा किल्ला त्याने वॅगनरच्या सन्मानार्थ बांधला आणि या किल्ल्यातल्या बऱ्याच खोल्या वॅगनरच्या संगीतिकांमधल्या (Operas) पात्रांवर बेतलेल्या आहेत.
नॉईश्वानस्टाईन चा शब्दशः अर्थ म्हणजे "नवा हंस किल्ला". हे नाव वॅगनरच्या हंसाच्या आकाराच्या नौकेतून येणाऱ्या आणि राजकन्येची सोडवणूक/सुटका करणाऱ्या गूढ हंस सरदारावर (The Swan Knight) आणि त्या परिकथेवर बेतलेलं आहे.
प्रचि – ३२: हंस सरदार (Swan Knight) (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि - ३३: बुरुज
प्रचि- ३४: किल्ल्याचा कोपरा आणि रंगीत दगडी भिंत...
प्रचि-३५: प्रत्यक्ष किल्ल्याचे प्रवेशद्वार
या किल्ल्याला विरोधाभासाचा किल्ला (Castle of Paradox) असंही
म्हणतात. कारण १९ व्या शतकामधे हा मध्ययुगीन काळातील म्हणजे १५ व्या
शतकातला किल्ला बांधला गेला आहे. आणि १५ व्या शतकातल्या बांधकामातल्या
संरक्षणात्मक युक्त्यांचा / तरतुदींचा १९ व्या प्रगत शतकात काहीच उपयोग
नव्हता.
मात्र या किल्ल्याचा अंतर्भाग त्या काळातल्या, १९ व्या शतकातल्या अत्यंत
आधुनिक सुख-सोयींनी युक्त आहे. कारण लुडविग राजा टेक्नॉलॉजि बाबत अद्ययावत
होता. बहुश्रुत होता. आणि त्या सर्व अद्ययावत सुखसोयी वापरण्याकडे त्याचा
कल होता.
या किल्ल्याचं बांधकाम सन १८५९ मध्ये सुरु झालं आणि ते तीन वर्षात पूर्ण करायचे असा लुडविगचा मानस होता. मात्र जरी बराचसा किल्ला पूर्ण झाला तरी परिपूर्ण किल्ला बनवण्याच्या ध्यासापायी लुडविगच्या आकस्मिक, अनपेक्षित, धक्कादायक, संशयास्पद आणि गूढ मृत्यूपर्यंत म्हणजे सन १८८६ पर्यंतही १७ वर्षांच्या कालावधीत हा किल्ला संपूर्ण होऊ शकला नाही.
मात्र त्याच्या हयातीत ज्या १४ खोल्या पूर्ण झाल्या, त्यांचे अंतरंग अतिशय परिपूर्ण, भव्य, राजेशाही आणि तत्कालीन उच्च अभिरुचीचे आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये उंच भिंतीने वेढलेल्या अतिशय सुंदर बागा आहेत. एवढंच नव्हे तर कृत्रिम गुहा सुद्धा आहेत. कारण लुडविगला गूढतेचे आणि एकांताचं (एकटं राहण्याचं) खूप आकर्षण होतं.
ह्या राजाच्या सापडलेल्या डायऱ्यांवरून, लिखाणांवरून या राजाचा कल Homo Sexuality कडे असावा असा अंदाज आहे. पण कट्टर कॅथोलिक धर्माच्या आत्यंतिक प्रभावाखाली, तत्कालीन चालीरीतीनुसार आणि राजघराण्यावर असलेली वावरण्याची बंधनं, त्यांचे आचार विचारांचे रीती रिवाज यामुळे लुडविगने त्याची हि उर्मी कधी व्यक्त केली नाही, करू शकला नाही. यामुळे याबाबत (त्याच्या Homo Sexuality बाबत) ठामपणे तसं होतंच, असं कुणाला म्हणता आलं नाही.
एक गोष्ट मात्र खरी की बव्हेरियाच्या सरदारकन्येबरोबर/ ऑस्ट्रियन राजकन्येबरोबर, सोफी बरोबर त्याचा वाड:निश्चय झाला होता. पण स्वतःचा कल लक्षात घेता आपण आपल्या वाग्दत्त वधूला न्याय देऊ शकणार नाही आणि तिचे आयुष्य वाया जाऊ नये या विचाराने बहुतेक, राजा लुडविगने ही सोयरीक मोडली. यावरूनही त्याची सहृदयता निदर्शनास येते. ह्या घटनेमुळेही तत्कालीन इतिहासकार त्याच्या ह्या कलाकडे बोट दाखवतात आणि त्याचा हा कल स्पष्ट होतो असे मानतात.
एक अतिशय खंत वाटणारी गोष्ट म्हणजे लिंडरहॉफ पॅलेसप्रमाणेच ह्या किल्ल्याच्या अंतर्भागाची छायाचित्रे काढण्यास ही मनाई आहे. मात्र मुख्य खोल्यांची टूर संपल्यावर आपण एका कॅफेटेरियामध्ये येतो. तिथपासून पुढच्या भागाची छायाचित्रे घेण्यास हरकत नाही.
पण तुम्हाला कल्पना येण्यासाठी एकच प्रचि आंतरजालावरून साभार घेऊन इथे देतो. कॅफेटेरिया लागतो
त्या आधी या राजाची सिंहासनासाठी राखलेली खोली लागते.
प्रचि- ३६ : सिंहासन कक्ष (आंतरजालावरून साभार)
भितिंवर देवदूतांची चित्रं रंगवलेली या किल्ल्यातील सिंहासनाची दुमजली खोली आर्किटेक्चरच्या Byzentime शैलीत बनवलेली आहे.
मात्र या खोलीत सिंहासन नाही. कारण राजा लुडविग दुर्दैवाने हि खोली पूर्ण व्हायच्या आधीच मरण पावला.
ही कामं करताना अफाट खर्च झाला. हि अशी भव्य आणि महाखर्चिक बांधकामे
करताना, लुडविगने पैसे मात्र प्रजेचे वापरले नाहीत कि त्यांच्यावर कर लादले
नाहीत.
त्याने हा सर्व खर्च त्याच्या खाजगी/ वैयक्तिक मालमत्तेमधून, संपत्तीमधून केला.
मात्र ही कामे केल्यामुळे बव्हेरियन जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. (आपली रोजगार हमी योजनाच म्हणा नां)
आणि हा रोजगारही एकसुरी, काही विशिष्ट लोकांना मिळण्याऐवजी या बांधकामाच्या
अफाट आणि चतुरस्त्र, आणि विविधांगी गरजांमुळे समाजातल्या जवळजवळ सर्व
घटकांकडे झिरपला.
प्रत्येक बलुतेदार, प्रत्येक क्षेत्रातला कारागीर, तंत्रज्ञ, मजूर यांना
रोजगारासाठी या बांधकामांचा आसरा होता. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या
कलावंतांची कलाही यामुळे बहरली आणि त्यांची आर्थिक सुस्थितीही.
या राजाने त्याची ही स्वप्नवत बांधकामे मजुरांच्या पाठीवर चाबकाचे फटके
मारून निर्दयपणे पुरी केली नाहीत की अशा कलाकृती परत निर्माण होऊ नयेत
म्हणून त्यांचे हात तोडले नाहीत. राजरोस चांगली मजुरी, चांगले मानधन देऊन
करून घेतली.
अर्थात या प्रचंड खर्चामुळे राजा लुडविगला वैयक्तिकरित्या मोठी मोठी कर्जे काढावी लागली.
तरीही पुढचं काम करण्यासाठी राजा लुडविगने जेव्हा आणखी कर्ज घेण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला, तेव्हा Bavarian Parliament नी तो फेटाळला.
त्याच्या कर्ज घेण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी बव्हेरियन
पार्लमेंटने चार मानसोपचारतज्ज्ञांची टीम बनवली ज्यांनी त्याला एकमताने
वेडसर, विवेकशून्य (Insane) ठरवून राज्यकारभार करण्यास असमर्थ असे जाहीर
केले आणि या मतावर विसंबून पार्लमेंटने १० जून १८८६ ला त्याला अटक करून
त्याची राजपदावरून पाय उतारणी केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ४ पैकी ३ डॉक्टरांनी त्याची तपासणी साठी तर सोडाच पण उभ्या आयुष्यात कधीही भेट घेतलेली नव्हती.
तर मुख्य डॉ. गुडेन हे त्याला १२ वर्षांपूर्वी फक्त एकदा भेटले होते.
(शेवटी इतिहास हा जेत्यांकडून लिहिला जातो म्हणतात ते काही खोटे नाही.)
आणि यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे दिनांक १३ जून १८८६ ला, वयाच्या ४०
व्या वर्षी हा सव्वा सहा फूट उंचीचा, अट्टल पोहोणारा राजा Lake Starnberg
तलावाच्या केवळ तीन फूट खोल भागात बुडून मरण पावलेला आढळला.
त्याच्या बरोबर त्याला वेडा म्हणून जाहीर करणारा मानसोपचारतज्ञही (Dr. Gudden) शेजारी मृतावस्थेत आढळला.
लुडविगने आत्महत्या केली असं जाहीर करण्यात आलं असलं तरी घातपात, कपट, आणि खुनाची शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे.
हा राजा जरी सणकी, तऱ्हेवाईक, थोडासा विक्षिप्त (Eccentric) असला तरी त्याचं हे असं वागणं राजघराणं, मंत्री, राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्तींशी होतं. स्वभावाने अंतर्मुख असला तरी सामान्य जनतेबाबत तो अतिशय प्रेमाने आणि भावनाप्रधानतेने वागे.
बव्हेरियन कंट्रीसाईड भागात फिरण्याची आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी
आणि मजुरांशी, कामकऱ्यांशी बोलायची त्याला आवड होती. या प्रवासादरम्यान जे
त्याचे आदरातिथ्य करत त्यांना तो उदारपणे बक्षिसी देत असे.
या दयाळू, उदार स्वभावामुळेच सामान्य बव्हेरियन जनतेचा तो खूप लाडका राजा
होता आणि अजूनही त्याची ही प्रतिमा बव्हेरियन जनतेमध्ये कायम राहिली आहे.
”Bavaria's Beloved King” हे बिरुद त्याला उगाचंच मिळालेलं नाही.
अवघं ४० वर्षांचं अल्पायुष्य, १८ व्या वर्षी डोक्यावर विराजमान झालेला
राजमुकुट, जिथे रुबाबात मिरवायचं त्या राजेशाही लोकांमध्ये वावरताना
लाजरेपणा, ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा त्या सामान्य लोकांशी प्रेमाने
वागण्याची वृत्ती, कदाचित Homo Sexuality कडे असणारा कल, एखादीच्या
आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून मोडलेला वाङनिश्चय, कल्पक स्वरूपाचे आणि
अफाट खर्च करून बांधलेले उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचे नमुने, त्यासाठी
प्रजेला यत्किंचितही तोशीस लागू न देता, उलट त्यांना कायमस्वरूपी रोजगार
देणारी, उत्पन्न देणारी व्यवस्था व वृत्ती,
पूर्ण झालेल्या वास्तूत (लिंडरहॉफ पॅलेस) काही काळच राहायला मिळालेलं सौख्य
आणि सर्वात अफाट, अचाट असलेल्या परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसलची निर्मिती
पूर्ण होण्याआधीच, ती वस्तू पूर्णांशाने उपभोगण्याआधीच झालेला गुढ ,
अनपेक्षित मृत्यू यामुळे राजा लुडविग ५००० हुन जास्त पुस्तकं, अनेक नाटकं,
फिल्म्स, कविता आणि नृत्यांचा विषय झाला आहे.
प्रचि-३७: जिथून फोटोग्राफीला हरकत नाही तो कॅफेटेरिया – ०१
प्रचि- ३८: कॅफेटेरिया - ०२ (ह्या प्रचि मधला छायाप्रकाश मला स्वतःला खूप आवडला)
प्रचि- ३९: कॅफेटेरिया - ०३ (भिंतीवर ओबेरामेरगॉव प्रमाणे भित्तिचित्रे)
या कॅफेटेरियाच्या बाहेर एक मोठ्या गोल दुहेरी खांबांनी वेढलेली छान गॅलरी आहे.
प्रचि -४०: त्या खांबांमधून दिसणारा हा मेरीचा पूल – ०१... आणि खाली धबधबा......
प्रचि- ४१: आणि त्या गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल -०१
(मध्यभागी टेकडीवरचा होहेनश्वांगॉव किल्ला)
प्रचि – ४२: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०२ (Overlooking Forggense Lake in the foot hills of Alps) आणि उजव्या खालच्या कोपऱ्यात होहेनश्वांगॉव किल्ला
प्रचि- ४३: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०३ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)
प्रचि-४४: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०४ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)
प्रचि-४५: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०५ (हिरवी कुरणं आणि लोकवस्ती)
प्रचि- ४६: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०६ (Forggense Lake)
प्रचि - ४७: गॅलरी च्या दोन दुहेरी खांबांमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०७
प्रचि- ४८: पावसाळी ढगांमुळे छान अंधारलेला परिसर
इथून आमचा किल्ल्यामधला परतीचा प्रवास सुरु झाला
प्रचि- ४९: हा शाही मुदपाकखाना - ०१
प्रचि - ५०: शाही मुदपाकखाना – ०२
प्रचि- ५१: किल्ल्याचे लाकडी मॉडेल
प्रचि- ५२: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०१
प्रचि- ५३: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०२
आता बाहेरून बसकडे परतीचा प्रवास आणि तो मात्र चालत.
प्रचि : ५४
प्रचि : ५५
प्रचि : ५६ (Worm’s Eye View of The Castle)
प्रचि : ५७
प्रचि - ५८: परतीची वाट
खरंतर अतिशय खाजगी निवासस्थान म्हणून बांधलेली हि इमारत आणि ते खाजगीच राहू द्यावं अशी अटकेच्या वेळी शेवटची (अंतिम) इच्छा व्यक्त केली असतानाही लुडविग राजाच्या मृत्यूनंतर ७ च आठवड्यात नव्या राजाने लोकांसाठी खुली केली.
आणि राजाचं निवासस्थान पाहायला आलेले लोक या किल्ल्याचं बाह्यरूप आणि
अंतरंग बघून एवढे आश्चर्यचकित आणि थक्क झाले कि हा किल्ला पाहायला लोकांची,
पर्यटकांची रीघ लागली.
त्यासाठी लावलेल्या तिकीट विक्रीतून एवढं उत्पन्न मिळायला लागलं कि खर्चाचा
खड्डा असलेली हि इमारत, हा किल्ला बव्हेरियन तिजोरीसाठी आता उत्पन्नाची
खाण ठरला आहे.
(प्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न १.५ कोटी USD आणि हॉटेलमधला मुक्काम, खाणं-पिणं वगैरे अप्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न ३.० कोटी USD) .
आणि जी गोष्ट एकेकाळी अफाट उधळपट्टी म्हणून गणली जात होती ती आता
विस्मयकारक आणि अत्यंत हुशारीची गुंतवणूक (Brilliant Investment) ठरल्याचे
सिद्ध झाले आहे.
ह्या किल्ल्याची मोहिनी इतकी आहे कि दरवर्षी जवळजवळ १३ ते १५ लाख प्रवासी/ पर्यटक याला भेट देतात. वसंत ऋतूत तर जवळजवळ सहा हजारापर्यंत पर्यटक रोज या वास्तूत असतात.
प्रचि- ५९: परिसरातील घरे
प्रचि- ६०: बसजवळ येताना परतीच्या वाटेवरून दिसायला लागलेला होहेनश्वांगॉव कॅसल
प्रचि- ६१: Bye -Bye नॉईश्वानस्टाईन कॅसल
हे साकार झालेलं अप्रतिम स्वप्न बघताना आतून खूप आनंद होत होता.
पण डे टूरच्या गाईडच्या तोंडून राजा लुडविगचं आयुष्य जाणल्यापासून मनाला एक
बोच होती, टोचणी लागली होती. काही केल्या मनातला सल संपत नव्हता, खरं तर
कळत नव्हता.
एखाद्या छान, गुबगुबीत, मऊ मखमली गादीच्या खुर्चीत बसल्यावर सुख पण व्हावं,
बरं पण वाटावं पण कुठेतरी त्या गादीत चुकून राहिलेली सुई सतत, हळूहळू
आपल्याला टोचत राहावी, त्या सुखाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये, स्वस्थ वाटू
नये, असं काहीतरी. . . .
कायम एक अस्वस्थपणा, एक विषण्णतेचा थर हलके हलके मनावर पसरत जावा.
थोडा वेळंच भळभळत राहणाऱ्या रक्ताच्या जखमेपेक्षा कायम मंदपणे स्त्रवत राहणारी, झिरपत राहणारी जणू एखादी जखम . . . .
ते झिरपणारं रक्त कधी थांबत नाही आणि म्हणून माणूस पूर्णपणे कधी बराच होत नाही.
आणि हे फक्त परततानाच झालं असं नाही, तर नंतर जेव्हा जेव्हा या किल्ल्याचे फोटो पाहिले, जेव्हा जेव्हा या किल्ल्याची, या राजाची, या गारुड करणाऱ्या वातावरणाची सय आली, किंवा अगदी आत्ताही हा लेख लिहिताना कायम असंच वाटत राहिलं आहे.
प्रचि- ६२ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०१
प्रचि- ६३ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०२
प्रचि- ६४: बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया- ०३
यानंतर आमच्या डे टुरवाल्या बसने आम्हाला सोडलं ते म्युनिकमधल्या एका बीअर हाॅल मध्ये.
प्रचि- ६५: बीअर हाॅल- ०१
प्रचि- ६६: बीअर हाॅल- ०२
प्रचि- ६७: बीअर हाॅल- ०३
हे सर्व आटपून म्युनिकमधल्या अपार्टमेंटमध्ये आलो. पण हा किल्ला काही पाठ सोडत नव्हता. आणि अजूनही त्याने माझी पाठ सोडलेली नाही. डिस्नेचा लोगो टी. व्ही. वर, थिएटर मध्ये आला कि हा किल्ला हटकून आठवतोच आठवतो.
या किल्ल्याबद्दल माझ्या काही अपुऱ्या इच्छा आहेत. काही स्वप्न आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
o मावळतीच्या संध्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o पौर्णिमेचा चंद्रप्रकाश सांडलेला हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o अमावास्येच्या ठार काळोखात जेव्हा आकाशात तारांगण नुसतं पेटलेलं असतं तेव्हा हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o सूर्योदयाच्या आधीपासूनच हळू हळू उजळत जाणाऱ्या प्राचीच्या वेळी/ त्या
प्रकाशात सूर्योदयाच्या केशरी उजळत जाणाऱ्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या
पुलावरून पहायचा.
प्रचि -६८: पौर्णिमेच्या प्रकाशात उजळलेला किल्ला (प्रचि आंतरजालावरून साभार)
पण त्यापैकीही तमन्ना म्हणावी तर अशी कि :
मेरीच्या पुलाच्या अलीकडे किंवा पलीकडे कॅम्पिंगचा एक तंबू ठोकायचा.
काही समानधर्मी किंवा प्रवासी वेडे मित्र सोबत घ्यायचे. रात्रीच्या Packed
Food /Dinner ची काहीतरी सोय करायची.
रात्री जागं रहाण्यासाठी आणि रात्र जागवण्यासाठी गरमागरम चहा, कॉफीचे
भलेमोठे थर्मासच्या थर्मास भरून ठेवायचे (पेय ज्याच्या त्याच्या
आवडीप्रमाणे
)
आणि जेव्हा भुरभुरता हिम वर्षाव होत असेल अशा ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या
आधीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर पर्यंतची एक रात्र हा
परिकथेतला किल्ला बघत काढायची. . . .
जास्त मेरीच्या पुलावर, थोडीशी तंबूमध्ये. . . .
थंडी वाजू नये यासाठी सर्व जामानिमा चढवून चहा/कॉफीचे घुटके घेत
संध्याकाळी स्पष्ट दिसणाऱ्या किल्ल्यापासून हळूहळू अस्पष्ट होत जाणाऱ्या
आणि केवळ काळ्या बाह्यकृतीमध्ये (Silhouette)/ तिमिराकृतीमध्ये परावर्तित
होणारा रात्रीचा किल्ला, त्याचे आकाशात शिरू पाहणारे टोकदार, उंच
सुळक्यासारखे मनोरे पहात.
आता नांदता झाल्यामुळे काही ठराविक भागात उजेड असेल, एखाद्या गवाक्षातूनही
पिवळसर मंद उजेड झिरपत असेल त्या मर्यादित प्रकाशात दिसणारं थोडंफार
बाह्यरूप. . . .
आणि हे सारं त्या शिशिरातल्या हिमवृष्टीने न्हायलेल्या, माखलेल्या एक जिनसी आसमंतामध्ये…..
“हिम ल्यायलेला तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसल.”
डोळ्यावर फारच पेंग आली तर एखादी छोटीशी झोप काढायची त्या तंबूमध्ये. पण
आपल्या डोळ्यांनीही तीच स्वप्न पाहायची जी त्या वेड्या, मनस्वी राजाने
पाहिली होती. . . . .
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, प्रकाशाच्या/अंधाराच्या वेगवेगळ्या
तीव्रतांमध्ये, वेगवेगळ्या छटांमध्ये तोच तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन
कॅसल पाहायची. . . . . - पुन्हा पुन्हा. . . . . .
आणि जाग आल्यावर ब्रिजवर जाऊन तेच स्वप्न प्रत्यक्षात आणायचं.
(डोळ्यांमध्येही तीच स्वप्नं भरून). अगदी उगवत्या प्रसन्न सूर्यप्रकाशात तो
किल्ला दिसेपर्यंत…..
कदाचित तो वेडा, मनस्वी राजा त्या आसमंतामध्ये कुठेतरी असेलही, त्याच्या त्या स्वप्नाळू डोळ्यांसह, त्याचा नॉईश्वानस्टाईन कॅसल पहात.
आणि कदाचित खुशही होईल त्याच्याच सारखे काही वेडे पीर पाहून. . ..
आणि असाच आसुसून तो किल्ला, त्या वातावरणात, त्या पुलावरून पाहणं, विशेषतः रात्रभर; हीच त्या राजाला, त्याच्या स्वप्नदृष्टीला, त्याने साकारलेल्या स्वप्नाला, त्याने निर्मिलेल्या अजोड कलाकृतीला मानवंदना असेल.
शिशिरात, हिमवृष्टीत मी तिथे गेलो नसल्याने त्या ऋतूतली छायाचित्र माझ्याकडे नाहीत. पण तुमच्यासाठी हि काही आंतरजालावरून साभार. . .
प्रचि- ६९: शिशिरातील नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१. मागे हिमाच्छादित आल्प्स शिखरे (आंतरजालावरून साभार)
So. . . . . . सध्या तरी तंबूमधली एकच जागा भरलीय . . . - माझी. . . .
आणि अजून जागा तर आहेतच.....
तेव्हा समानधर्मी, समव्यसनी माबोकरांनी हात वर करा, नंबर लावायला. . .
स मा प्त
Disclaimer: हा ललित लेख असून इतिहास लेखन नाही.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.