Monday, July 31, 2023

राणीबागेत एक दिवस - वनस्पतीतज्ज्ञासोबत

 https://www.maayboli.com/node/22629

मी ९ तारखेला मुंबईत येतोय, राणी बागेत भेटायचे का? दिनेशदांचा विपु आल्यापासुन मला राणीबागेत जायचे वेध लागले. कित्येक दिवसांची कित्येकांची इच्छा आहे दिनेशदांबरोबर राणीबागेत आणि माहिमच्या निसर्ग उद्यानात भटकायची. त्यातले एकतरी स्वप्न पुरे होतेय आणि तेही वर्षाच्या सुरवातीलाच....

निसर्गाच्या गप्पांवर ही खुषखबर जाहीर केल्यावर लगेच कित्येक हात वर झाले. ९ तारखेला रविवार असुनही मी सकाळी ६ चा गजर लाऊन झोपले. सकाळी जाग आल्यावर नेहमीसारखी परत झोपणार होते पण अचानक आठवले कुठे जायचेय ते आणि उडी मारुन अंथरुणाबाहेर पडले. राणी बाग परिसर याआधी बरेचदा पाहिल्यामुळे तिथे खायचे हाल आहेत हे माहित होते. सकाळी ११ वाजता भेटुन ३-४ तास राणीबागेत घालवायचे म्हणजे पोटाची काहीतरी सोय करणे भाग होते. घाईघाईत मेथीचे पराठे बनवले. योगेशला फोन करुन दिनेश भारतात पोचले का? याची खात्री करुन घेतली आणि निघाले. निघताना सोबत पराठ्यांसाठी दही घेतले आणि भावाला व वैनीला घेऊन रेल्वे स्टेशन गाठले. रविवार म्हणजे मेगॅब्लॉकवार. तो सुरू व्हायच्या आत गाडीत बसलेले बरे. रे रोडवर उतरल्यावर उत्साहात बाहेर पडलो आणि दिसलेल्या पहिल्याच टॅक्सीवाल्याला राणीबागेत घेऊन जायची आज्ञा केली. त्याने थंडपणे रस्त्याच्या त्या बाजुची टॅक्सी पकडा अशी आम्हाला उलटी आज्ञा केली. वाकडे तोंड करत तिकडचा टॅक्सीवाला गाठला. तोही असला जबरी निघाला. बसायच्या आधीच त्याला सांगितले, राणीबागेत चल. तो बसल्यावर विचारतो, 'रानीबागमे कहा?' माझ्या डोळ्यासमोर दुर्मिळ झाडांनी भरलेली राणीबाग तर त्याच्या डोळ्यासमोर राणीबाग हा मुंबईतला एक भाग.

'हमको राणीबागमेच जाना हय', मी, 'च' वर विशेष जोर देत.

'आप लोग कहांसे आये है? रानीबागमे अब जानवर कहा है देखनेके लिये?' ' कमालेय. आम्ही अलिबागेतुन आताच आयात झालोय असे दिसत होतो की काय?

'नवी मुंबईसे आये है. राणीबागमे मित्रोंको मिलनेका है'. उगीच हिंदीच्या चिंध्या होऊ नयेत याची काळजी घेत भाऊ.

'तो मोबाईल करके किधरभी मिलनेका. रानीबागमे क्यो?' आता ह्याला राणीबागेत बद्दल काय दुश्मनी होती? राणीबागेतल्या वाघाने याच्याकडे लिफ्ट मागितलेली काय?

'हम झाड देखने आये है यहा. सब मिलके झाड देखेंगे.' इति मी.

'तो खानापिना भी साथ लाये हो क्या?' हा टॅक्सीवाला म्हणजे कहर आहे अगदी......

'हा सब लाये है, अंदर बैठके खायेंगे'

मग त्याला सरकारने राणीबाग दुसरीकडे हलवण्याचा छुपा प्लॅन कसा आखलाय याची माहिती दिली. बिल्डर एवढी जमिन घेऊन किती पैसे मिळवतील याचे भविष्य सांगत आणि सोबत आमचा खिसा हलका करत शेवटी टॅक्सीवाल्याने आम्हाला राणीबागेसमोर सोडले. खाली उतरताच 'कोणकोण आले असतील' असा विचार करत मी तिकीटघर कुठे आहे ते पाहात होते तोच योगेश आणि दिनेश दिसले. भल्या पहाटे साडेदहा वाजता योगेश हिरव्या बाटलीतला थंडगार द्रवपदार्थ पित होता. दिनेशनी काय मेवा आणलाय हे पाहात असतानाच एक लहान मुलगी येऊन चौकशी करायला लागली. तिला पाहताच मला एकदम योगेशने 'हसरी येणाराय' सांगितल्याचे आठवले. नावाप्रमाणेच ती हसरी होती त्यामुळे लगेच ओळखले. सोबतच्या पराठ्यांवर ताव मारत चहापान करताना विजय ही येऊन पोचले. आता उगीच टिपी न करता आत जाऊ असे ठरवत होतो एवढ्यात जागुचा फोन.

'अगं, आमची लाँच चुकली, पुढची १०.३० ला आहे, थोडा उशीर होईल यायला'

आँ, लाँच??? माझ्या डोक्यात प्रकाशच पडेना. राणीबागेत यायला लाँच?????? मग उलगडा झाला. उरणवरुन बस/ट्रेनपेक्षा लाँच जास्त बरी.

शेवटी तिकीटे काढुन आत जायच्या रांगेत गेलो. आत प्लॅस्टिक न्यायला बंदी. पाणीबीणी काय ते बाहेरच पिऊन घ्यायचे. आत काही न्यायचे नाही. दिनेशनी हे आधीच वाचुन ठेवल्यामुळे आम्ही सोबतच्या वस्तु नीट बॅगेत लपवल्या. मला माझ्या सॅकमध्ये ठेवलेल्या पराठ्यांची काळजी. पण नशीब जोरावर होते. आम्ही चेहरे असे सोज्वळ आणि गंभीर केले की पोलिसांनी आमच्या आधीच्या आणि नंतरच्या लोकांच्या बॅगा तपासल्या पण आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. अशा त-हेने आम्ही एकदाचे आत आलो आणि कित्येक दिवस ज्याची वाट पाहात होतो ते राणीबाग दर्शन - वनस्पतीतज्ज्ञाच्या समवेत अशी आमची यात्रा सुरू झाली.

गोरखचिंच - ह्याचे बुड मोठे, वर आकार लहान होत जातो, सध्या पानगळ आहे (Adansonia digitata)
लसुण वेल - पानांना लसणाचा वास येतो (Asystasia gangetica???? )
कर्दळीच्या कुळातील झाडाचे फुल

शिवण वृक्षाची फुले (Gmelina arborea)

उंडीची फळे आणि फुले. फुलांना बघुन सुरंगीचा भास झाला Happy (Calophyllum inophyllum)

वरचे लिहिल्यावर ह्या झाडाचे कुळ सापडते का ते शोधायला लागले आणि चक्क ह्या झाडाचा आणि फळांचा फोटो सुरंगी ह्या नावाने सापडला. दिनेश, कृपया लिंक पाहा आणि उंडी म्हणजेच सुरंगी का ते आधी सांगा. मला इतका आनंद होतोय, सुरंगीचे एवढे मोठे झाड पाहिल्याचा की काय सांगु. याआधी गणपतीपुळ्याला सुरंगीचे झुडुप पाहिले होते आणि कुडाळला मोठा वृक्ष पाहिला होता. (राणीबागेतले झाड सुरंगीच असेल तर सुवास का नाही आला? आधीच्या दोन्ही झाडांनी त्यांचा सुवास दरवळवुनच मला खेचले होते त्यांच्याकडे, सुवासाशिवाय मला तरी ओळखता आलीच नसती सुरंगी)

ही घ्या लिंक - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Sultan%20Champa.html
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Surangi.html

इथे अजुन शोधताना Calophyllum suriga ह्या नावाने देखिल सुरंगी सापडली. मला कुडाळ आणि ग.पुळ्याला सापडलेली सुरंगी हीच असावी.

लाल झुंबर - ब्राऊनिया (Brownea coccinea) - झाडाला आलेली नवी पालवी लांबुन सुकलेल्या पानांसारखी दिसते. जवळ गेल्यावर कळते खरे काय ते....

आधी हा कोंब येतो

मग त्यातुन पाने फुलतात

आणि जरा जुन झाली की वेगळी होतात

पुढच्या वेळेस दिनेशनी जितकी माणसे आहेत तितके स्वतःचे क्लोन करुन आणले तर फार बरे होईल. प्रत्येकजण एकेक झाड पाहुन 'दिनेशदा, हे झाड कोणते ते सांगा' म्हणुन हाळी देत होता. दिनेशदा झाड पाहुन त्याचे नाव सांगताहेत तोच दुसरीकडुन दुसरा आवाज देई, 'दिनेशदा, इकडे बघा, याला फळेही दिसताहेत, झाडाचे नाव सांगा ना.......' मधल्यामधे दिनेशदा पळताहेत या झाडाकडुन त्या झाडाकडे Proud

यथावकाश जागु सहकुटूंब, यो रॉक्स, इंद्रधनुष्य आणि कोमल हेही आमच्या वरातीत सामिल झाले. आमचा हा दहाबाराजणांचा गट एखाद्या झाडाखाली उभा राहुन माना वाकड्या करुन वर पाहु लागला की बाकीचे पब्लिकही लगेच थांबुन आम्ही काय पाहतोय ते पाहायला लागायचे. आम्ही फक्त झाडांची पाने फुले पाहतोय हे पाहुन काहींच्या तोंडावर 'माणसे दिसायला तर बरी दिसताहेत मग अशी काय वेड्यासारखी झाडे मोजत चाललीत' असेही भाव उमटत होते.

फोटो काढताना योगेशला वेगवेगळ्या फर्माईशी होत होत्या. याची फळे नीट घे, त्याची पाने नीट पकड.. हे आणि ते.. किती त्या सुचना.....

नोनी कि बारतोंडी?? (Morinda citrifolia)
पावडरपफ कळ्यांचा गुच्छ आणि फुलांचाही (Calliandra haematocephala)
आणि हे पांढरे पावडरपफ
निळी कोरांटी (Barleria terminalis)
दुर्मिळ वृक्ष - "उर्वशी" (Amherstia nobilis)

याची फुले मला एकदम कांचन आणि गुलमोहराचे मिश्रण करुन बनवल्यासारखी वाटली.

मला वाटते उर्वशीलाही ब्राऊनिया सारखीच आधी सुकल्यासारखी दिसणारी पाने येतात. दिनेश कृपया खुलासा.... Happy

समुद्रफुल


ह्याचे फुल सगळ्यांनी पाहिले असेल, फळ मात्र असे दिसते.

सीताअशोकाचा बहर (Saraca indica/Jonesia asoka)

इतकी वर्षे राणीबागेत गेले पण सीताअशोकाची फुले कधी पाहायला मिळाली नव्हती. आताही फार थोडे गुच्छ होते झाडावर. पुर्ण बहरलेले झाड काय सुंदर दिसत असेल याची केवळ कल्पना केली. बहर येऊन गेला असावा कारण झाडाखाली बरेच बाळ सीताअशोक अंकुरलेले. त्यातले दोन अलगद उपटले आणि आणुन कुंडीत लावलेत. बघुया जगतात का ते.... Happy

चेंडुफुल - चेंडुफुलावरची तुसे काढल्यावर उरलेला भाग पाहुन गोल्फबॉलची आठवण झाली (Parkia biglandulosa)

वाटेत एका ठिकाणी थांबुन उरलेल्या पराठ्यांना पोटात जागा दिली. जागूने आठवणीने सोबत उकडलेले तरले आणले होते. अतिशय मस्त...... मला खाताना उकडलेल्या फणसांच्या आठळ्यांची आठवण झाली. मग पराठ्यांवर जागुचा गाजरहलवा आणि विजयचा गोड शिरा चापला आणि पुढील वाटचाल सुरू केली. दिनेशनी आणलेला मेवा खाणे चालु होतेच.

कैलाशपती (Couroupita guianensis)

एकट्या राणीबागेतच कैलाशपतीच्या फुलांचे तिनचार रंग दिसले.

कैलाशपतीची फळे आपले canon ball tree हे नाव साजरे करतात
कोकोची फुले (Theobroma cacao)
कोकोची फुले

आणि हे बाळ कोको

कोको म्हटल्यावर सगळेजण श्रावणीकडे पाहायला लागले. जागुच्या श्रावणीला 'कोको' या शब्दाचा एकच अर्थ माहित असणार, तिची आई ज्याची तंदुर रेसिपी करुन तिला वाढते ती 'कोको'.... Happy

मोठी करमळ (Dillenia pentagyna???)
हे एक पामसारखे दिसणारे शोभेचे झुडूप
एक गुलाबी फुल Happy
पुर्ण वाढलेला तिवर/निवर (Barringtonia acutangula)

फुलावर येतो तेव्हा त्याला असे लालभडक मोत्याचे सर लगडतात

अशी भटकंती चालु असताना हसरी, कोमल आणि नंतर जागूने बायबाय केले. त्यांचे दुसरे कार्यक्रम होते, त्यामुळे जाणे भाग होते.

मात्र जागू जाताच तलावात लपलेल्या माश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि सगळे एकदम बाहेर आले. Proud

आमचा मात्र पाय निघत नव्हता तिथुन. पक्ष्यांच्या पिंज-यापुढे बराच वेळ इंद्र आणि योरॉक्सची फोटोग्राफी चालु होती, पण पक्षी मात्र मनासारखी पोज देत नव्हते. केनयाच्या राष्ट्रीय पक्ष्याच्या डोक्यावर अतिशय सुंदर सोनेरी तुरा चमकत होता पण त्याचा फोटो काढणे मात्र त्या पक्ष्याला मंजुर नव्हते. एक काळा राजहंस मात्र आम्हाला पाहुन लगबगीने उठला, पाण्यात शिरला आणि असे काय डौलात पुढे सरकायला
लागला की मी पाहातच राहिले. तो पोहतोय असे वाटतच नव्हते. खालुन प्रॉपेलर लावून तो आपोआप पुढे चाललाय असे वाटत होते. फक्त सुरवातीलाच मला त्याचे पाय पाण्यात वल्हवत असलेले दिसले तेवढेच. नंतर फक्त एक चित्र सरकतेय.....

शेवटी संध्याकाळ जवळ यायला लागली तसे राणीबागेतुन बाहेर येणे भाग पडले. तरी 'अमृतवेल दाखवायची राहिली' म्हणुन दिनेश चुकचुकत होतेच. बाहेर पडतानाच्या वाटेवरचे कनकचंपाही त्यानी अगदी आवर्जुन दाखवले. मला खरेच कमाल वाटली त्यांची. कुठले झाड कुठे आहे हे त्यांना अगदी अचुक आठवत होते.

नेचा
आयजीच्या जीवावर बायजी सुभेदार

जाताजाता राणीबागेत उरलेले काही प्राणी व पक्षी

हिला सिंहीण म्हणायचे जीवावर येतेय अगदी
काही पक्षी - घार, पाँड हेरॉन आणि हत्ती
राणीच्या बागेत उंडारणारी एक खारूताई

दिवसा उलटी लटकत असलेली वटवाघळे
काही काळानंतर प्राणी असेच पाहायचे Sad

खाली काही झाडे आहेत ज्यांची नावे आता लक्षात नाही. दिनेशदा, कृपया मदत करा

प्रचि १ -

प्रचि २ -

प्रचि ३-

प्रचि ४ - हे कुंपणाला लावलेले झुडुप होते

हा मुचकुंद ना?

बाहेर पडल्यावर आणि दोन्ही योगेश व इंद्रा एकदाचे एकत्र सापडल्यावर खादाडीसाठी कुठे जायचे यावर खल झाला आणि सर्वानुमते न्युयॉर्कर ठरले. तिथे गेल्यावर काय खाल्ले त्याची साक्ष द्यायला फोटो आहेतच..

ही तारिख जरा वाचा मंडळी....

कढईएवढे मोठे फुटबॉलसारखे टम्म फुगलेले भटुरे...

हाय रे दैवा, सोबत केवळ वाटीभरच छोले........बहुत बडी नाईन्साफी है.......

इतके अप्रतिम लोणचे मी कुठल्याही हाटेलात अजुन खाल्ले नाही. दिनेश तुम्हाला तेव्हाच रेसिपी द्या म्हणुन सांगितले होते. कृपया द्या ही रेसिपी.

फलाफल
सिझलर्स
कुठे पोटातल्या सांदीकोप-यात जागा उरलीच तर तिथे ठेवायला म्हणुन मस्त गारेगार मिक्स कुल्फी

अतिशय अप्रतिम अशा त्या कुल्फिने थंडगार होऊन आम्ही सुखाने व्हीटी स्टेशनची वाट धरली.

आयुष्यातील काही सुंदर दिवसांपैकी एक सुंदर दिवस संपला.. आता वाट पाहायची माहिमच्या वनातल्या फेरफटक्याची..... 

 

वनस्पतीतज्ञ या फोटोमधील झाड कुठले आहे सांगतील का?

हे समुद्रफुल उर्फ समुद्रशोकचे फुल Happy

Submitt

 वरचे वाघुळफुलांचे झाड आहे. ह्याला इंग्लिशमधे सॉसेज ट्री म्हणतात. Kigelia pinnata
दिनेशनी इथे लिहिलेय याबद्दल - http://www.maayboli.com/node/2030

 

 

 साधना त्या काळ्या कळ्या आलेल्या झाडाचे नाव कळम (कदंब नव्हे) याची फूले पांधरट सोनेरी रंगाचीच म्हणजे साधारण कदंबासारखीच असतात, पण आकाराने छोटी (साधारण सुपारीच्या आकाराची ) असतात, पण अंख्येने खूप असतात.
शिवाय कदंबाची फूले पानाआड दडलेली असतात कि मात्र लांबूनही नीट दिसतात. अनेक जणांचा कूलवृक्ष कळम असतो. लग्नात देवक बसवायला याची फांदी लागते पण हा वृक्षच दुर्मिळ असल्याने याची फांदी मिळत नाही.
राणीच्या बागेत हा वृक्ष, पाणघोड्याच्या पिंजर्‍याजवळ आहे.

 3

laal_zumbar.jpg

हे आहे ब्राऊनीयाचे फूल (लाल झुंबर) याचे दोन तीन प्रकार आहेत राणीच्या बागेत.

ur3.jpg

हा आहे उर्वशीचा फुलोरा. याची झाडे, मुंबईत तरी फक्त इथेच बघायला मिळतात. हे ब्रम्हदेशातून आपल्याकडे

आलेय.

varuN_ful2.jpg

हा आहे वरुण, वायवर्णा , पाचुंदा चा फूलोरा. या झाडाला अजून पालवी फूटायची होती.

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...