Friday, July 28, 2023

Tamilnadu Diaries..!

 http://kedardhepe27.blogspot.com/2021/08/tamilnadu-diaries.html


               खरेतर हत्ती बघायचे स्वप्न घेऊन तामिळनाडू मध्ये आलेला मी, कंपनीचे काम करत सुट्टी च्या दिवशी जवळच्या जंगलात फिरत होतो आणि प्रत्येकाला फक्त हेच विचारात होतो की मला हत्ती कुठे बघायला मिळेल..?
मला जंगली हत्ती बघायचा होता, स्वतंत्रपणे फिरणारा, विना साखळदंडाचा...!

                त्यातच पोंगलची 4 दिवसाची सुट्टी मिळाली आणि मी एक दिवस केरळ मधील मालमबुझा धरणावर जाऊन आलो. तिथला डॅम, गार्डन आणि रोपवे चा आनंद घेतला. रोपवे मधून दिसणारा डॅम आणि तो बगीचा खरेच खूप सुंदर होता. तिथेच थोडे पक्षीनिरीक्षणही केले, Racket-Tailed Drongo हा पक्षीही तिथेच बघायला मिळाला. त्याच दिवशी पालक्कड चा किल्लाही बघितला, संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदी आजही जशीच्या तशी आहे आणि त्याच्या बाजूला पाण्याने भरलेले खोल खंदक आहेत.
                दुसऱ्या दिवशी वालपराई ला जायचे म्हणून सकाळीच निघालो. वालपराई हे पर्यटन स्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे,चहा आणि कॉफ़ी चे मळे आहेत. आणि त्या मळ्यांमधेही भरपूर वन्यजीवन दिसते म्हणून मी ऐकले होते. पोल्लाचीवरून वरून बस पकडली. हा रस्ता अनमलाई च्या जंगलातून जातो. त्या रस्त्याने आपण फक्त सकाळी 7 ते 5 या वेळात  जाऊ शकतो. तो रस्ता रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी बंद असतो. घाटात असलेल्या हेअरपीन बेंड आणि तिथून दिसणारा परिसर म्हणजे एक पर्वणीच आहे. धुक्याने भरलेले रस्ते आणि जंगलाचा भाग मन मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. पहिल्याच भेटीत मला तेथील Lion Tail macaque ही माकडाची जात बघायला मिळाली.

Lion Tail Macaque
खरेतर ही माकडे कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ मधील जंगलात बघायला मिळतात. पूर्ण काळ चेहरा आणि त्याच्या बाजूने पांढरी आयाळ हे त्यांचे वैशिष्ठ्य.! ही माकडे टोळीने राहतात आणि एकदम मृदू स्वभावाची असतात. खरेतर त्यांना बघणे हे सुद्धा माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतेच.!!  अनमलाई च्या घाटात निलगिरी थारच्या (Nilgiri Tahr) दर्शनाने माझ्या चेहऱ्यावर एक हसू उमटले. तामिलनाडूचा राज्य प्राणी असलेला हा निलगरी थार फक्त तामिळनाडू आणि केरळ च्या जंगलात बघायला मिळतो. त्यांची संख्या खूपच कमी असल्याने ही एक धोक्यात असलेली प्रजाती म्हणून ओळखली जाते. उंचच उंच कडे-कपारी वरती राहून ही शेळीची जात आपला उदरनिर्वाह करते. 
Nilgiri Tahr 

         मी वालपराई च्या 5 किमी अलीकडे पुदू-थोत्तम ला उतरलो. तिथून चहाच्या मळ्यांमध्ये चालायला सुरुवात केली, चारी बाजूला चहा आणि त्यांच्या मधून ठेवलेल्या रस्त्यांवरून चालणारा मी एकटा जीव. आज काय बघायला मिळते याची उत्सुकता लागलेली होती. डोंगरउतारावर एक झरा वाहत होता आणि जवळ भरपूर झाडी होती. मी लांबूनच सगळीकडे नजर टाकत होतो आणि त्यातच मला पाहिले दर्शन झाले ते भेकरांचे..! (Barking Deer) भेकर ही एक हरणांची प्रजाती. पण थोडीशी वेगळी. छोटी शेपटी हलवत ते दोघे निवांत चरत होते. खूप वेळ मी त्यांना बघत होतो, थोडे फोटो घेतले आणि त्या डोंगराला वळसा घालून मी पुढे निघालो. 

Barking Deer

थोडाच वेळात एका शाळेजवळ पोहोचलो. तिथेच जवळ मोठे तळे होते. पूर्ण गुलाबाच्या फुलांनी भरलेलं तळे बघितले, क्षणभर वाटले की ही मुले किती भाग्यवान असतील की इतक्या सुंदर ठिकाणी ती शिकत आहेत. चार भिंतींच्या पलीकडची निसर्गाची शाळाही ते अनुभवत आहेत...! तिथेच एक सर्पगरूड ( Serpent eagle ) एक झाडावर बसलेला दिसला आणि काळा गरुड ( Black eagle ) आकाशात उडताना दिसला. महाराष्ट्रात फक्त जंगलांच्या जवळ दिसणारा Black eagle ची संख्या इकडे खूप आहे,इथे ते सहज दिसतात.   तिथून पुढे चालत गेलो आणि चहाच्याच मळ्यात 8-10 घरं होती. समोरून येणाऱ्या म्हाताऱ्या माणसाला विचारले की बाबा इथे हत्ती कुठे बघायला मिळेल..? तेही सगळं इंग्लिश मध्ये विचारल्यामुळे त्यामुळे तोही गोंधळला. ज्यावेळी त्याला हत्तीचा फोटो दाखवला त्यावेळी तो हातवारे करून सांगू लागला की सगळीकडे आहे तो. आणि मोडके इंग्लिश बोलत तो सांगत होता की 2-3 दिवस आधी इथून गेले आहेत. पण काल रात्रीच त्यांच्या घराजवळ वाघ दिसला होता त्यामुळे मी एकटा तिकडे जाऊ शकत नाही असे तो म्हणू लागला. पण आता त्याला मी कसे सांगू की मी तेच तर बघायला इकडे आलो आहे..! शेवटी एक हिंदी बोलणाऱ्या मुलाला त्याने तिथे बोलावले आणि तो सांगू लागला की इथे सगळे प्राणी दिसतात, ते नेहमी इथे चरायला येतात आणि निघून जातात. पण काल दिसलेल्या वाघामुळे सगळे घाबरले आहेत आणि एकट्याने तिकडे जाणे धोक्याचे आहे. मग मी त्यालाच माझ्यासोबत येण्याची विनंती केली आणि नाही नाही म्हणत तो राजी झाला. तो म्हातारा ही आमच्या पाठीमागून येऊ लागला. 1-2 चहाची शेतं ओलांडली पण काही दिसले नाही. पण हत्तीचे शेण सगळीकडे होते.



 2 दिवस आधी दुपारी हत्तीचा एक कळप इथून गेला होता असे तो सांगू लागला. चहाच्या शेता नंतर थोडा संरक्षित केलेला जंगलाचा भाग आला. आणि तिथे जवळच हत्तीचे ताजे शेण बघून मी त्या जंगलात  जायचे ठरवले. पण त्या मुलाची आत यायची तयारी होईना म्हणून तो तिथेच थांबला. मी पुढे नी तो म्हाताराही माझ्या मागून आत येऊ लागला. 200-300 मीटर आत गेलो, दोन्ही बाजूला आमच्याइतकीच उंच झाडी आणि एकच पाऊलवाट. थोड्या वेळात आतमध्ये झाडे मोडल्याचा आवाज येऊ लागला आणि तोही दोन्ही दिशेने येत होता. आता जाणवू लागलेले होते की पुढे मोठे जनावर आहे पण ते नेमके हत्ती आहे का गवा हे सांगता येत नव्हते. आता भीती वाटू लागली होती कारण आम्ही दोघे बरेच आत आलो होतो. आणि आवाज आता जवळून येत होता. आणि तोही पाउलवाटेच्या दोन्ही बाजूने..! 

           दोन्ही बाजूला बघत आम्ही पुढे जात होतो आणि माझ्या पाठीवर त्या म्हाताऱ्याचा हात पडला म्हणून थांबलो, उजव्या दिशेला बघितले तर एक मोठा हत्ती आमच्याकडे बघत होता आणि तोही अवघ्या 20 फुटांवरून...!!  आमच्याकडे बघत तो निवांत चरत होता, झाडी मोठी असल्याने त्याचे निम्मे शरीर आम्हाला दिसत होते. त्याच्या डोक्यावरील माती स्पष्ट दिसत होती.  जवळ-जवळ एक मिनिटभर आम्ही नुसते बघत होतो. त्यावेळी मनात वाटत असलेली भीती आणि हत्ती बघायला भेटला याचा आनंद या दोहोंमध्ये मी अख्खा बुडालो होतो. फोटो घ्यावा म्हणून बॅगेतून कॅमेरा काढला तोपर्यंत तो थोडा पुढे निघून गेला. त्याच्या पाठीच्या उंचवट्याचा एक फोटो मिळाला, आणि काही वेळात तो दिसेनासा झाला. आता त्याच्या मागून जायची आमची तरी हिम्मत होत नव्हती. त्याला बघून झालेला आनंद गगनात मावत नव्हता. तो झाडीत दिसेनासा झाला म्ह्णून आम्ही माघारी फिरलो पण दोन पावले मागे जातो तोपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारा आवाज जास्ती स्पष्ट झाला होता,पण झुडपांमुळे काही दिसत नव्हते. तसाच थोडा पुढे गेलो आणि झुडपे एका हाताने बाजूला केली आणि थक्कच झालो...! 15-20 फुटांवर आणखी एक नर हत्ती आमच्या दिशेने बघत होता. त्याने आम्हा-दोघांना बघितले, एकदा मोठा आवाज काढला आणि लगेच दुसरीकडे तोंड फिरवून तो मागे निघून गेला. काही सेकंदात दिसेनासा झाला.! त्याच्या अनपेक्षित दर्शनाने खरेतर खूप भीती वाटली आणि आम्ही तडक परतीचा रस्ता पकडला. त्या दुसऱ्या हत्तीच्या मनात आले असते तर तो 2-3 सेकंदात आम्हाला त्याच्या सोंडेत घेऊ शकला असता, पण त्याने तसे न करता माघारी फिरणे पसंद केले. कोणताच वन्य प्राणी स्वतःहून  माणसावर हल्ला करत नाही, तो तिथून निघून जाणेच पसंद करतो..!


                त्याच रस्त्याने परत येताना मन सुन्न झाले होते. आज मिळालेला एक अविस्मरणीय अनुभव घेऊन बाहेर आलो. मागे वळून त्या म्हाताऱ्याकडे बघितले तर त्याच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता, कारण आज आयुष्यात पहिल्यांदा त्याने इतक्या जवळून हत्ती बघितला होता. नेहमी हत्ती दिसला की लांबूनच पळून जायचे. मी खरेतर त्याचे आभार मानले आणि आम्ही आलेल्या रस्त्याने परत त्यांच्या वस्तीजवळ निघालो. तिथे पोहोचताच त्या माणसाने मला त्याच्या घरी नेऊन चहा दिला. त्याने त्याचा एक फ्रेम करून घेतला फोटो मला दाखवला, ज्यात तो आणि त्याचे सहयोगी पोलीस यांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर घेतलेला फोटो होता. चहा घेऊन मी त्याचा निरोप घेतला आणि पुढे निघालो. गवा बघायचा म्हणून गावापासून विरुद्ध दिशेला निघालो.
                 रस्त्यात जाताना एक ठिकाणी ओढ्यावर थांबलो

Malabar Grey Hornbill
तिथून निर्मळ धबधबा वाहत होता त्याच्याजवळ जाऊन थोडा वेळ फोटोग्राफी केली. दोन्ही बाजूला जंगल आणि त्यात पायाला लागलेले जळू.  तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा रस्त्याला लागलो. समोरच्या झाडावर मोठ्याने किलबिलाट करणारे पक्षी बघत होतो आणि त्यातच एक मलबार हॉर्नबिल दिसला. तो एक सुरवंट घेऊन आला होता आणि ती सुरवंट तो झाडावर घासून स्वच्छ करत होता आणि थोड्याच वेळात त्याने ती गिळूनही टाकली. खरेतर मलबार हॉर्नबिल मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला. 

                 तसाच पुढे चालत निघालो, रस्त्याच्या बाजूला एक ठिकाणी गव्याचे फलक लावले होते आणि त्यावर सावधानतेचा इशारा केला होता, मी त्याचा फोटो घेतला आणि आता लिस्ट मधला फक्त गवा बघायचा राहिला आहे असे पुटपुटलो. एक किलोमीटर गेलो असेल तोपर्यंत डाव्या बाजूला झाडावर बसलेला सर्पगरूड दिसला. एकदम शांतपणे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवत बसलेला होता तो. तिथेच आडवा झालो आणि त्याचे चांगले फोटो घेण्याचा प्रयत्न केला. दहा-पंधरा मिनिटं गेले असतील, तोपर्यंत रस्त्याने जाणारा एक माणूस हात करून बायसन म्हणून दाखवू लागला. Bison म्हणजेच गवा. ते शब्द ऐकताच मी उभा राहिलो आणि दोनशे-तीनशे फुटांवर चलत असलेला मला मोठा गवा दिसला, खरेतर त्यावेळी झालेला आनंद गगनात मावत नव्हता. मी पळतच तिकडे निघालो. त्याच रस्त्याने एक बाई आणि तिचा लहान मुलगा चालत होते, मी त्यांना बोट करून समोर bison आहे असे सांगितले आणि त्या बाईने इतक्या सहजतेने मान फिरवली की तो म्हणजे त्यांचा पाळलेला प्राणी आहे.  आणि त्याच रस्त्याने पुढे निघून गेलीही. मी त्यांच्या मागून गव्याजवळ येऊन थांबलो. तो नर होता. त्याचे शरीर भारदस्त होते,शिंगांचा आकार खूप मोठा आणि टोके थोडी आतल्या बाजूला वळलेली होती. त्याचा खांदा मजबूत दिसत होता, आणि इतका मोठा प्राणी माझ्याकडे 10-15 फुटांवरून असा बघत होता जसे की फोटो साठी पोज च देत आहे. मीही थोडे फोटो घेतले आणि बॅटरी संपली म्हणून कॅमेरा बॅगेत ठेऊन दिला.

Indian Bison

जवळच दुसरा एक नर गवा चरत होता, तोही त्याच्याच धुंदीत होता. दुसरा गवा चांगलाच मोठा आणि त्याचा रंग जास्त उठून दिसत होता, पाहिलवानाच्या शरीराला तेल लावल्यानंतर दिसतो तसा. तो कदाचित वयस्कर असावा. दोन्ही गवे आता एकमेकांजवळ येऊन थांबले. एखाद्याला गोंजारावं तसं ते एकमेकांना त्यांचे शरीर घासत होते. आणि त्यानंतर एका मिनिटात सगळं दृश्य बदललं..! मागचे दोन्ही पाय जमिनीत रोवून ते एकमेकाना भिडले. त्यांच्यात टकरी सुरू झाल्या. चहा च्या शेतात एकमेकांना मागे हुसकवत ते जोमाने लढत होते, कितीतरी मोठ्याने त्यांच्या शिंगांचा आवाज येत होता. जवळ जवळ एक मिनिटभर दोघेही मागे हटत नव्हते,पण नंतर बाजी पालटली आणि वयस्कर दिसणाऱ्या गव्याने दुसऱ्याचा धुव्वा उडवला. जोरात हुसकावून देत त्याला मागे ढकलले, हरलेला गवा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या मांडीच्या खाली आपले एक शिंग रुतवले आणि त्याने रुतलेल्या शिंगाने दुसऱ्याला 4-5 फूट उंच उचलले. दुसरा गवा हतबल झाला आणि शांतपणे उभा राहिला. मी या सगळ्याचा मोबाइल मध्ये विडिओ करत होतो, आणि मला स्पष्ट जाणवत होते की आपला हात थरथर कापत आहे. मघाशी कोणताही वन्य प्राणी स्वतःहून कधीच कोणावर हल्ला करत नाही म्हणून गव्याच्या समोर उभा राहून फोटो घेणारा मी आणि आता माझ्याच डोळ्यासमोर 40-50 फुटांवर दोन गव्यांची झालेली टक्कर बघून मी आवाक झालो होतो हे नक्की. मला आता त्यांच्या शक्तीचा अंदाज येत होता. आणि एवढी शक्ती असूनही त्याने माझ्यावर स्वतःहून हल्ला करण्याचा विचार ही केला नव्हता,त्याने सरळ तिथून निघून जाणे पसंद केले होते अगदी त्या हत्तीसारखे. तेवढ्यात मागून कळपातील बाकी गवे आणि मादी येत होत्या ते बघून मी तिथून काढता पाय घेतला आणि वालपराई मध्ये एक रूम घेऊन मुक्काम केला. तिथेही जवळ एक ठिकाणी रोज रात्री बिबट्या दिसतो असे मला समजले होते. म्हणून लोकल एका माणसाला घेऊन मी तिथे जाऊन आलो. पण तो बिबट्या त्या दिवशी तिथे आलाच नाही. आजचा दिवस माझ्यासाठी खरे तर अविस्मरणीय होता. दिवसभरात घडलेल्या गोष्टीचा विचार करत कधी झोपी गेलो समजलेच नाही.

                 दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ची बस पकडून अक्षरा शाळेजवळ येऊन पोहोचलो. तिथे थोडं पक्षीनिरीक्षन करायला मी थांबलो. पण अंधार आणि धुक्यामुळे मला तासभर असाच घालवावा लागला, माझ्या जवळच्या बॅटरी ने अंधारात साप हुडकण्याचाही प्रयत्न केला पण काही मिळाले नाही. तिथूनच सकाळी 8 ची आथिरापल्ली ला जाणारी बस पकडली आणि निघालो केरळ मध्ये. सकाळच्या वेळी वालपराई धुक्याने भरलेली होती. चहा चे मळे मागे पडू लागले आणि केरळ ची मल्लकापारा रेंज सुरू झाली. खूपच घनदाट जंगल आणि त्यात एकच रस्ता. दुसरी एखादी गाडी आली तर बस एका बाजूला आधीच लावावी लगे नाहीतर मग ती गाडी तरी शे-दोनशे मीटर मागे घ्यावी लागे. तिथे सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडायचे अवघड..! उंचच उंच झाडे, जवळच असलेला शोलेयर चे बॅकवॉटर. मनात फक्त एकच विचार घोळत होता की इथे पुन्हा एकदा यावे लागणार, हे जंगल बाघायला..!!

Athirapalli Waterfalls, Kerala

           अकरा वाजता आथिरापल्ली धबधब्याजवळ पोहोचलो. आणि तिकीट घेऊन आत चालू लागलो. 1 किमी चालत जाऊन समोर चालकुडी नदी लागते आणि त्याच नदीवर हा धबधबा आहे. धबधबा तसा खूपच मोठा आहे. पांढरे शुभ्र फेसळते पाणी आणि कितीतरी मोठ्याने होणारा त्याचा आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करतो. कितीतरी वेळ तिथेच त्या धबद्धब्याकडे बघत बसलो आणि थोडे फोटो घेऊन निघालो. त्यावेळी 1 वाजले होते आणि माघारी निघताना मनात फक्त एकच घोळत होते की आज कोणताच प्राणी दिसला नाही. म्हणून तिथून बसने न जाता चालत जायचे की ठरवले. धबधब्याच्या परिसरात पहिले दर्शन झाले ते सांबराचे. एक नार आणि एक मादी डोंगरावर चरताना दिसली. लांबूनच थोडे फोटो घेऊन पुढे निघालो. रस्त्यावरून जाताना एकाला हॉर्नबिल चा फोटो दाखवला आणि हे कुठे दिसेल म्हणून ही विचारले , त्याने नकारार्थी मान हलवली. नदीचे पात्र जवळच होते, रस्ता सोडला नि नदी च्या दिशेने चालत गेलो. रस्त्यात अनेक पक्षी दिसलेही पण लक्ष होते ते हॉर्नबिल वर..! आणि त्यानंतर 10 मिनिटांमध्ये एक हॉर्नबिल ची जोडी दिसली ही, पण ती बसली नदीच्या दुसऱ्या दिशेला. आणि नदी उथळ असली तरी तिला पार करायचे म्हणजे मला संपूर्ण भिजवे लागणार होते. तिथूनच त्यांना बघत बसलो आणि पुन्हा पुढे चालत निघालो. जवळच्या एका नारळाच्या बागेत शिरलो आणि बघतो तर जवळ जवळ 20-22 सांबर आणि 2 हरणे खुशाल चरताना दिसली. मी थोडा लांबच एक जागी बसलो आणि कॅमेरा ऍडजस्ट करू लागलो. काही माझ्याकडे कुतूहलाने बघत उभी होती तर काही चारण्यात गुंग. थोड्याच वेळात त्यातील एका संबरांच्या कळपाने तिथून नदीच्या दिशेनी धाव घेतली आणि नदी ओलांडू लागली. खरे तर ते दृश्य बघताना मला आपण नॅशनल जिओग्राफी वगैरे तर बघत नाही ना असेच वाटत होते. 4-5 सांबर एकामागून एक असे त्यांची छोटीशी शेपटी वर करून नदी ओलांडत होती. त्यांच्या मागून एक नर ही होता. काही ठिकाणी पाणी जास्ती होते तर काही ठिकाणी खडक. त्यातून रस्ता काढत ती दुसऱ्या बाजूला असलेल्या जंगलात  गेलीही. हे सगळं बघून खरे तर खूप भारी वाटत होतं. इतकं सगळं बघायला मिळालं त्याबद्दल मन सुखावलं होतं. 


Wild Samber Deers crossing River

        पुन्हा रस्त्याला येऊन चालू लागलो, रस्त्यावर पक्षाची सावली बघून आकाशात बघटव तर काळा गरुड निवांत उडत होता. महाराष्ट्रात फक्त जंगले आणि त्याच्या जवळच्या भगत दिसणारा हा गरुड इकडे पावलोपावली दिसतो हे नवलच..!  जवळ असलेल्या ओढ्यात बरेच पाणी होते, सहज तिकडे डोकावले तर विरुळा जातीचा साप पाण्यात पोहत होता. त्यालाही कॅमेऱ्यात कैद केला आणि खाली ओढ्याजवळ गेलो. तोपर्यंत तो कुठंतरी गायब झाला होता. तिथेच थोडे पाणी घेतले आणि पुन्हा चालू लागलो. आता उन्हाच्या झळा लागत होत्या. कधी एकदा नदीमध्ये जातो आणि पोहतो असे झाले होते करण तसाही 2 दिवसांपासून अंघोळीच्या पत्ता नव्हता. आणखी एकदा नदी गाठली आणि तिथल्या उथळ पाण्यात जाऊन बसलो. कितीतरी वेळ तसाच गेला आणि पुन्हा एकदा डोक्यावरून जाणारा हॉर्नबिल चा थवा दिसला, आणि ते सगळे येऊन नदीच्या पलीकडच्या एका झाडावर बसले. एकामागून एक असे 12-13 हॉर्नबिल त्या 2 झाडांवर येऊन बसले. मीही कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन नदीच्या काठावर बसलो. आणि त्यांना न्याहाळू लागलो. ती जागा त्यांची रात्रीच्या विश्रांतीची होती. सगळे तिथे येऊन त्यांची पिसे साफ करत होते. काही जवळच्या झाडावर जाऊन खाण्याचा शोध घेत होते. मी तासभर तरी त्यांना बघत होतो, नदी प्रवाहाचा आवाज आणि पक्षांचा किलबिलाट फक्त याचाच आनंद मी घेत होतो. 

Malabar Pied Hornbill

          तिथून माघारी निघणे खरेतर माझ्यासाठी अवघड होते, पण लवकर मला पुन्हा कोइम्बतूर गाठायचे होते. तिथून रस्त्याला लागलो आणि चालकुडी ची बस पकडली. चालकुडी- थ्रिसूर -कोइम्बतूर करत रात्री 11 वाजता रूम ला पोहोचलो.

         दुसऱ्या दिवशी चा पक्षीनिरीक्षणाचा प्लॅन आधीच झालेला होता त्यामुळे पुन्हा 5 ला उठून उक्कडम गाठले. हा सुट्टीचा शेवटचा म्हणजेच चौथा दिवस होता. इथले 4 पक्षीमित्र आणि मी असे आम्ही 5 जण मिळून कल्लार च्या harticulture पार्क ला पोहोचलो. 'पोंगल बर्ड काउन्ट' सुरू असल्याने हे सगळे घरातील कार्यक्रम रीतिरिवाज सोडूनही  सेलवागणेश आणि कार्थिकेयन यांना पक्षांमधील बरेच ज्ञान होते, मागच्या 4-5 वर्षांपासून ते पक्षीनिरीक्षन करत असल्याने त्यांचे आवाज आणि जातींबद्दल त्यांनी बरीच माहिती सांगितली. तिथे मॉकोहा,लिफ बर्ड हे पक्षी आणि इतर 20 नवीन जाती बघायला मिळाल्या ज्या महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी दिसतात. 

Golden Fronted Leafbird

त्यानंतर तिथून आम्ही एका माळरानावर गेलो, जिथे आम्हाला बाकी शिकारी पक्षी आणि संध्याकाळी रातवे बघायला मिळतील म्हणून. खरे तर तीही जागा खूप छान होती. तिथेही 2 गरुडाच्या जाती आणि अनेक पक्षी बघायला मिळाले. दुपारी तिथल्याच एका मंदिरात जेवण करून पुन्हा पक्षीनिरीक्षण सुरू झाले. 5 वाजेपर्यंत तो डोंगर पालथा घातला आणि पुन्हा जिथून आलो होतो त्या रस्त्याला येऊन बसलो ? नव्हे झोपलो. रस्त्यावर जास्ती वर्दळ नव्हती. आता वाट बघत होतो ती तिन्हीसांजेची. सूर्य मावळतीकडे झुकला आणि ईकडे रातव्यांचा आवाज सुरू झाला. आम्ही सगळे तो आवाज ऐकण्यात गुंग होतो, तोच सेल्वागणेश ला  शृंगी घुबडा चाही आवाज ऐकू आला. त्याने आमच्याकडे बघत ते सांगत होता तोच आम्हाला शृंगी घुबड उडताना दिसलेही. आम्ही सगळ्यांनी त्याला त्याच्या कलेची दाद दिली. शेवट त्या शृंगी घुबडाने झाला आणि आम्ही तिथून माघारी निघालो. त्या सगळ्यांना निरोप देऊन रूम वर पोहोचलोही पण मन काही शांत होत नव्हतेच. ते खरे तर कोणालातरी धन्यवाद देत होते, मी 4 दिवसात खूप काही बघितले, त्यांचा इतक्या जवळून अनुभव घेतला त्याबद्दल. मी ते क्षण कधीच विसरू शकणार नव्हतो, बघितलेले हत्ती, गवा, सांबर आणि पक्षी आणि तिथला निसर्ग यांनी मन अगदी भरून आले होते..! ते चार दिवस खरेतर माझ्यासाठी blissful होते म्हणाले तरी हरकत नाही..!!

             त्यानंतर सलग दोन ते तीन वेळा वालपराई गेलो  पण काही बघायला मिळाले नाही, थोड्या दिवसांनी म्हणजेच मार्च मध्ये तिथले आमचे कंपनीचे काम संपणार असल्याने मला एकच रविवार फिरायला मिळणार होता. पण कोइम्बतूर मध्ये शहराचा पक्षी मोजणी सुरू असल्याने तिथले मित्र मला रविवारी पक्षीनिरीक्षानासाठी जॉईन हो म्हणत होतेच, आणि मीही येतो म्हणून सांगितले होते. त्या दिवशी सकाळी 4 लाच उठलो, आणि 5 पर्यंत तर इचनरी च्या स्टँड ल जाउज उभारलो. पण हत्ती चा एक चांगला फोटो खाई मिळाला नव्हता त्यामुळे आज पक्षीनिरीक्षण ऐवजी वालपराई ला जावे वाटत होते, आणि तसे कॉल करून मित्राला बोललो. त्याने लगेच परमिशनही दिली. लगेच वालपराईची बस पकडली आणि 9 वाजेपर्यंत तर वालपराई च्या अलीकडे करूमलाई इस्टेट मध्ये पोहोचलोही. तिथुन चालायला सुरुवात केली तोपर्यंत एक गाडीही मिळाली, त्याने मला करूमलाई जवळ नेऊन सोडलेही. त्याला मी हेच विचारात होतो की मला हत्ती कुठे बघायला मिळेल..? त्यावर तू हेच सांगत होता की हत्ती नेमके कुठे दिसतील हे सांगता येणार नाही पण काळ रात्री ते आमच्या घराच्या मागच्या बाजूला आलेले होते. मी त्याला ती जागा दाखवायची विनंती केली करण ते रात्री तिथे होते तर जास्तीत जास्ती 1- 2किमी गेले असणार. त्यांची वस्तीही एका पठाराच्या उताराला होती, त्याने घराच्या मागच्या बाजुंपर्यंत मला नेले आणि तिथून पुढे जायला सांगितले. 10 मिनिटात मी त्या पाठराच्या वरच्या बाजूला पोहोचलोही. सगळीकडे चहाची शेती आणि एक बाजूला असलेली झाडी बघत होतो. तेवढ्यात एक सुखद धक्का बसला.
             तिथून अवघ्या 50-60 फुटांवर 4 हत्ती होते. एक मोठी आणि वयस्क हत्तीण, 2 नर हत्ती आणि त्यांच्यासोबत एक लहान पिल्लू. ते तीनही हत्ती खाण्यात व्यस्त होते आणि ते पिल्लू खेळण्यात. त्यांना बघितले आणि जवळच्या एक मोठ्या दगडावर जाऊन बसलो. इतक्या दिवसापासूनचे स्वप्न पूर्ण झाले होते. आजपर्यंत साखळदंडांनी जखडले हत्ती खूप बघितले होते, पण आज ते स्वतंत्र चरताना बघत होतो. Free आणि Wild...! त्यावेळी झालेला आनंद खरेतर शब्दात मावणारा नव्हता.

Wild Elephants

         ते हत्ती तिथेच थोडा वेळ चरून पुढे निघाले. त्या चहा च्या शेतात ते रात्रीच्या वेळी येऊन गवत, छोटी झाडे खात आणि सकाळ होताच जंगलात परत जात. मी सकाळी लवकर तिथर पोहोचलो म्हणून त्यांना बघायचा योग् आला. चहाच्या माळ्यातून ठेवलेल्या रस्त्यांवरून ते चारही हत्ती एकामागून एक चालत पुढे जात होते. वयस्क हत्तीण ही प्रत्येक हत्तीच्या ग्रुप ची प्रमुख असते. हत्तीण एक ठिकाणी थांबली. पायाच्या नखांनी तिने लाल माती उकरली, आणि ती सोंडेत घेऊन स्वताच्याच अंगावर टाकली. असेच तिने 4-5 वेळा केले. कधी डोक्यावर तर कधी बाजूने असे करत तिने पूर्ण पाठीवर माती उडवली. शरीराचे तापमान control मध्ये राहावे यासाठी ते अंगावर माती टाकतात. खरेतर ते 1-2 मिनिटे मी तो सोहळा अनुभवत होतो पण आनंद खूप होता,कारण हे फक्त आजपर्यन्त TV वर बघितले होते.
                सगळ्यात आधी कोईमबातूर च्या मित्राला कॉल करून सांगितले की मी समोर हत्ती बघत आहे, तसेच काही मित्रांनाही तेच सांगत होतो. करण त्यावेळी झालेला आनंद शब्दात सांगण्यासारखा नव्हता , ना सफारीची गाडी,  ना कोणता गाईड..!  पण तरीही मी जंगली हत्ती बघू शकलो हा आनंद. इतके दिवस रात्रंदिवस फिरल्याचे आज सार्थक झाले असे वाटू लागले हे खरे..!
              ते चौघे हत्ती एकामागून एक मिळेल ते गवत खात फिरत होते, पुढे जात होते आणि मी आपला सुरक्षित अंतर ठेवून लांबून त्यांच्या हालचाली न्याहाळत होतो. त्यांना लांबून का होईना पण बघण्यात एक वेगळेच सुख होते, थोड्या अंतरावर एक पाणवठ्यावर ते सगळे पाणी प्यायले, लहानाने सोंडेत थोडे पाणी घेऊन ते बाजूला शिंपडले आणि पुढे निघून गेला.
Elephants walking towards Forest

        ते चौघेही आता जवळ जवळ एक किलोमीटर लांब आले होते आणि थोडी पुढे चहाची शेती संपून संरक्षित केलेली जंगल होते चहाच्या शेतात मिळणारी गवते ते फस्त करत होते, पण त्या लहान हत्तीला ते करता येत नसल्याने तो आईच्या जवळच घुटमळत होता आणि थोड्याच वेळात आईचे दूध पिऊ लागला ते बघताना खरतर खूपच भावुक झालो होतो. ती हत्तीण दोन पाय पुढे सरकवून उभी होती आणि हा तीन ते चार मिनिटे निवांत दूध पिण्यात मग्न होता. हे सगळं मी एकदम लांबून बघत होतो, जवळ जवळ एक तास भाग ते सगळे तिथेच चरत होते आणि लांबून आपला आवडता प्राणी इतक्यावेळ डोळ्यात साठवत होतो आणि आनंदित होत होतो. जवळच्या जंगलातून बाकी हत्तींचा आवाज ऐकू येत होताच. अकरा वाजत आले होते आणि कॅमेराची बॅटरी संपली होती, थोड्याच वेळात ते जंगलात निघून जातील असा विचार करून मी त्यांना निरोप दिला. तिथून पुढे कारूमलाई इस्टेट च्या दिशेने निघालो. तिथे असणारा एक धबधबा, त्याचे वाहत येणारे पाणी आणि दोन्ही बाजूला चहाची शेती बघून खरेतर मन एकदम शांत झाले. बालाजी मंदिरात पोहोचलो आणि दर्शन घेऊन पुन्हा वालपराई च्या दिशेने निघालो. उरलेला दिवस वालपराई मध्ये घालवून रात्री कॉईंबटूर चा रास्ता धरला.
                 तामिळनाडूच्या 3 महिन्याच्या वास्तव्यात मी प्रत्येक रविवार आणि पोंगल व इतर सगळ्या सुट्टीमध्ये फिरत होतो. खरेतर एकही सुट्टीच्या दिवशी मी घरी नव्हतो. आणि तेथील प्रत्येक ट्रिप विशेष असे काहीतरी देऊन गेली. तिथे मला 20 पेक्षा जास्त जातीचे पक्षी बघायला मिळाले, जे महाराष्ट्रात आपल्याला बघायला भेटत नाहीत. तसेच जंगली हत्ती इतके जवळून बघायला मिळाले. गवा, हॉर्नबिलच्या दर्शनाने तर खूप सुखावून गेलो. पाहिल्याच भेटीत वालपराई मध्ये झालेल्या Lion Tail macaque आणि निलगिरी थार च्या दर्शनाने मी सुखावलो होतो. सगळ्या आठवणींचा विचार करतच मी जड अंतःकरणाने तामिळनाडू ला निरोप दिला.



                                    © Kedar Dhepe ( 7387742827 )

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...