Friday, July 28, 2023

केकी मूस - महाराष्ट्राच्या मातीतील आंतरराष्ट्रीय चित्रकार

 http://hachikotourism.blogspot.com/


 केकी मूस - महाराष्ट्राच्या मातीतील आंतरराष्ट्रीय चित्रकार 


                                                          Keki Moose (1912-1979)

तुम्हाला जर पिकासो, व्हॅन गॉग हे चित्रकार माहीत असतील तर भारतातील केकी मूस यांच्याविषयी माहिती असायलाच हवे.  केकी मूस यांनी चित्रकला, फोटोग्राफी, शिल्पकला, कार्विंग, क्लेमोडेलिंग ओरेगामी अशा विविध कला क्षेत्रात एक प्रकारचे कालातीत योगदान दिलेले आहे. हे केकी मूस नेमके कोण होते? कुठे राहत होते? त्यांचा जीवन प्रवास कसा होता? त्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? या सर्वांविषयी जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येतात आणि मग त्या अनुषंगाने त्या परिसरातील त्या गोष्टी तशा का आहेत याचाही संदर्भ लागून जातो.  केकी मूस यांचं तसं नाव कैखूश्रो  माणेकजी मूस असे होते पण त्यांची आई लाडाने त्यांना केकी म्हणायची आणि तेच नाव पुढे जगप्रसिद्ध झाले. केकी मूस यांचा जन्म ऑक्टोबर 1912 आरसी कॉन्ट्रॅक्टर या त्यांच्या मामाच्या घरी मलबार हिल, मुंबई या ठिकाणी झाला. आर सी कॉन्ट्रॅक्टर हे मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. केकी मूस यांचे आजोबा वडोदऱ्याहुन  व्यवसायानिमित्त चाळीसगाव या ठिकाणी आले होते.  

महाराष्ट्रातील खानदेश भागात, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा एक तालुका आहे.  केकी मूस यांच्या वडिलांनी व्यवसात मोठी मजल मारली.  1905 साली बांधलेलं त्यांचं घर आजही तितकेच मजबूत अवस्थेत उभं आहे की जे आजमितीला केकी मूस कला संग्रहालय म्हणून जतन करण्यात आलंय. नाही म्हणायला त्याला थोड्या डागडुजीची गरज आहे पण एक हेरिटेज बिल्डिंग म्हणून ते छान प्रकारे उभं आहे.  केकी मूस यांचा जन्म मुंबई झाला, ते मुंबईतच वाढले, विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी घेतली.  1937 मध्ये केकी मूस यांच्या वडिलांचे आजारपणाने निधन झाले, वडिलांच्या शेवटच्या काळात केकी मूस त्यांच्याजवळ म्हणजे चाळीसगाव लाच होते.  वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने राहत्या घरात हॉटेल व वाईन शॉप सुरू केले. केकी ने त्यांना व्यवसायात मदत करावी अशी त्यांची इच्छा  होती पान मनाने कलाकार असणाऱ्या केकी मूस यांना व्यवसायात रस येत नव्हता. त्यांनी आपल्या आईकडे  



कलेच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी मागितली आणि आईच्या होकार सोबत ते इंग्लंडच्या शेफील्ड शहरातल्या बेनेट आर्ट कॉलेजमध्ये शिकू लागले. कलेतील डिप्लोमा घेतल्यानंतर पुढे इजिप्त, ग्रीस, रशिया, जपान, चीन अशा देशांना भेटी देऊन तिथल्या  कला व संस्कृतीचा अभ्यास करून ते 1939 च्या दरम्यान मुंबईला आले.  1940 साली त्यांनी चाळीसगाव या ठिकाणी कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा  निर्णय घेतला.  चाळीसगावला असताना साधारण १ वर्षापर्यंत ते बाहेर जात येत  होते. त्या दरम्यान वालझरी, पाटणादेवी, औट्रम घाट अशा ठिकाणी भ्रमंती करत तासन तास निरीक्षण करत असत मग त्यातून काही स्केचिंग, काही फोटोग्राफी सुद्धा व्हायची.  



1940 च्या दरम्यान एका गूढ कलाटणीतून त्यांनी आत्मकैद स्वीकारली, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.  पुढील ५० वर्ष ते घरातच राहिले, त्या काळात त्यांनी अनेक कला प्रकार लीलया हाताळले.  टेबलटॉप फोटोग्राफी हा त्यांचा आवडीचा विषय होता.  जवळपास 13 हजार आर्ट फोटोग्राफीची निर्मिती त्यांनी त्याकाळी केली होती. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान सुद्धा त्या काळात मिळाले होते. 31 डिसेंबर 1979 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.  त्यांना जगभरातून लोक भेटायला येत असत, त्याच सोबत भारतातील ही अनेक दिग्गज लोक त्यांच्याकडे जात येत होते.  केकी मूस फार कमी लोकांना भेटत असत, पंडित नेहरूजींचा एक किस्सा सांगितला जातो.  चाळीसगाव दौऱ्यामध्ये असताना त्यांना केकी मूस यांच्या विषयी, त्यांनी केकी मूस साहेबांना भेटायला निरोप पाठवला. केकी मूस म्हणाले माझं तर त्यांच्याकडे काही काम नाही, त्यांचंच असेल तर ते येऊ शकतात आणि नेहरूजी त्यांना भेटायला गेले.  राजकुमार, बालगंधर्व, एम एफ हुसेन असे अनेक मंडळी त्यांच्याकडे येत जात होती.  केकी मूस हे उत्तम शायर सुद्धा होते.  ते स्वतःबद्दल नेहमी म्हणत असत

“अलग हम सबसे रहते है, मी साले तार तंबुरा;

जरा छोडे से मिलते है..  मिला लो जिसका जी चाहे।

मैने तो लूटा, अपना खजाना सारा;

ना मंजिल मिली..... मिली तो लाशे अरमानों की।

चित्रकला या विषयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जरा वेगळा होता.  ते म्हणायचे कला लपवण्यातच खरी कला असते (आर्ट लाईज इन कन्सिलींग आर्ट) हे असं म्हणण्यामागे त्यांचा एक भारतीय संस्कृती विषयीचा अभ्यास होता.  जगभर प्रवास करून आल्यानंतर त्यांचे निरीक्षण असं होतं की, जी काही संस्कृती वाढते ती नदीच्या काठावर वाढते. भारतीय संस्कृती ही गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर विकसित झालेली आहे. जशी सरस्वती लुप्त आहे तशीच माझी कला सुद्धा सरस्वती सारखीच आहे.  या सरस्वतीला गंगा यमुना यांना भेटीसाठी घेऊन यावे लागेल म्हणून त्यांनी हिंदू धर्म शास्त्रांचा अभ्यास केला, वेरूळची खंडित शिल्पे पाहिली व दोन स्केच तयार करून शिल्पकार राम सुतार यांचे कडून 1957 साली 



गंगा आणि यमुना ही दोन शिल्पे तयार करून घेतली आणि आपल्या दालनात स्थापित केली राम सुतार यांनी शिल्पकलेचे शिक्षण घ्यावे म्हणून प्रोत्साहन देत असताना सहा वर्ष त्यांना आपल्या जवळ शिक्षणासाठी ठेवून घेतले. केकी मूस आत्मकैदेत जरी असले तरी त्यांना वाचन, नृत्य, नाट्य, गायन, वादन असे छंद होते.  ते सतारवादन अतिशय उत्तम प्रकारे करत असत.  स्थानिक मित्राच्या मदतीने त्यांनी उपलब्ध साधनसामग्रीतुन स्वतःचा सतार तयार केला होता.  त्यांचं “आय हॅव शेड माय टिअर्स” या नावाने  अप्रकाशित आत्मचरित्रही आहे, लवकरच आपल्याला ते वाचायला मिळेल. टेबल टॉप फोटोग्राफी हा प्रकार त्यांनी जगाला दिला आणि ते द किंग ऑफ टेबलटॉप फोटोग्राफी म्हणून जगभर प्रसिद्ध होते.  त्यांच्या निर्मितीतील काही निवडक गोष्टी आजमीतिला त्यांच्या चाळीसगावातील कलादालनात बघायला मिळतात.  चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ त्यांचे कलादालन आहे.  त्या भागात गेलात म्हणून केकी मूस कला संग्रहालयाला  भेट द्या असं मी म्हणणार नाही, तर मुद्दामुन  वेळ काढून खास केकी मूस संग्रहालयाला भेट देण्यासाठी आपण आवर्जून चाळीसगावला भेट द्या असं मी आपल्याला आग्रहाने सांगेल. जवळच पितळखोरा लेणी समहू आहे, पाटणा देवीचे प्राचीन मंदिर आहे. थोर गणीतीतज्ञ भास्कराचार्य यांची कर्मभूमि आहे. त्यांच्या “लीलावती” या ग्रंथातील शून्याच्या शोधाने  या परिसराला शून्याचे गांव देखील म्हणतात.  आजच चाळीसगाव व खानदेश परिसर आपल्याला असा दिसत असला तरी मागच्या शंभर-सव्वाशे वर्षांपासून त्या भागात लोककला विविध रंगांनी कला फुललेली आहे मग त्यात केकी मूस, बहिणाबाई; अलीकडच्या काळातील भालचंद्र नेमाडे, ना धो महानोर, राम सुतार ही सगळी मंडळी, खानदेशाच्या मातीतील रत्न आहेत.  1940 पर्यंत चाळीसगावला विमानतळ होतं, इंग्रजांचे विमान मुंबईहून चाळीसगावला उतरत असे.  मला वाटतं अजिंठ्याच्या लेण्या बघण्यासाठी, जगभर ज्या ठिकाणी इंग्रजांचे राज्य होतं; त्या त्या ठिकाणाहून उच्चपदस्थ अधिकारी आणि व्यावसायिक मंडळी चाळीसगावला येत असावेत. पाचोरा जमणेर अशी छोटीशी ट्रेन आजही सुरू  आहे.

पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राच्या दृष्टीने खानदेशाचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारे आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यांची खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती, बोलीभाषा, सन उत्सव, कला, साहित्य, प्राचीन/धार्मिक/नैसर्गिक व केळी सारख्या समृद्ध शेतीचा वारसा असलेला हा प्रदेश पर्यटन विकासासाठी महत्वाचा आहे. गुजरात, मध्य प्रदेश झालंच  तर राजस्थान या राज्यांमधून  महाराष्ट्रात पर्यटक यावेत म्हणून पायाभूत सुविधांचा, पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच  शाश्वत पर्यटन विकासासाठी जबाबदार पर्यटन ही संकल्पना रुजवात असताना लोकसहभाग तसेच पर्यटकांची ये-जा वाढविण्यासाठी सर्वच स्तरातुन सामूहिक प्रयत्न होने गरजेचे आहे.

 

मनोज हाडवळे

पर्यटक सल्लागार व प्रशिक्षक

09970515438/07038890500

manoj@hachikotourism.in

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...