Monday, February 19, 2024

द्वारकानाथ संझगिरी यांचे लिखाण

 https://dwarkanathsanzgiri.blogspot.com/2020/01/

शेखावती हवेल्या

राजस्थान पाहणं म्हणजे जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर वगैरे पाहणंच नाही. तुम्हाला तिथली एक वेगळी कला पाहायची असेल तर शेखावतीमधल्या कुठल्या तरी एका शहरात जा. मी मंडवाला गेलो होतो.

No photo description available.

इतरत्र राजस्थानात शिल्पकला, दगडातलं नक्षीकाम डोळय़ांचं पारणं फेडतं; शेखावतीमध्ये आपल्याला पेंटिंग्ज मोहित करतात. हवेल्यांच्या भिंती, छत वगैरे सुंदर सुंदर पेंटिंग्जने सजवलेले पाहायला मिळतात. त्या हवेल्या आहेत भारतातल्या नामवंत व्यापाऱ्यांच्या, पण त्यांची अवस्था काय आहे ठाऊक आहे? एखाद्या श्रीमंत माणसाने आपली बायको टाकून द्यावी आणि तिने पतितेचं आयुष्य जगावं तसं आयुष्य इथल्या हवेल्या जगतायत. त्यामुळे जास्त दुःख होतं. तिथे कुणीही राहत नाही. म्हाताऱ्या नातेवाईकांसाठी एखादा वॉर्डबॉय ठेवावा तशी चार-पाच नोकरदार माणसं शुश्रूषेसाठी ठेवली गेलेली आहेत.

तिथे भारतीय पर्यटक फार थोडे दिसतात. उलट गोरे पर्यटक तिथे मोठय़ा संख्येने दिसतात. त्यांना या चित्रकलेचं प्रचंड आकर्षण आहे. मंडवा हे तसं गाव आहे. मंडवा शहर असेल तर आपलं ठाणं महानगर आहे. गावात धुळीचं साम्राज्य आहे. एक मोठं हॉटेल आहे. बाकी काही हवेल्यांचं रूपांतर हॉटेलात केलं गेलंय.

शेखावती पेंटिंग्जबद्दल बोलण्यापूर्वी थोडा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास नजरेखालून घालायला हवा. मग आपल्याला कळेल की, हवेल्या कशा उभ्या राहिल्या आणि ही चित्रकला त्या हवेल्या अंगाखांद्यावर का खेळवत आहेत?

राजस्थानच्या स्थापत्य आणि कलात्मक संस्कृतीत मोगल राजांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. त्याची सुरुवात अर्थात अकबरापासून झाली. अकबर वयाच्या तेराव्या वर्षी गादीवर आला आणि पुढे त्याने पन्नास वर्षे राज्य केले. तो धर्माच्या बाबतीत उदारमतवादी असल्यामुळे त्याच्या अधिपत्याखालील राज्यात कला विकसित झाली. त्याने पर्शियन आणि भारतीय चित्रकलेचा संगम घडवून आणला. जहांगिराला युरोपियन वास्तववादी चित्रकलेची आवड होती. त्याने ती भारतात रुजवण्याचे प्रयत्न केले. शहाजहान सनातनी होता. त्याने फुलांच्या चित्रांवर भर दिला. ताजमहालमधलं संगमरवरामधलं कोरीव काम पाहिलं की, त्याची आवड लक्षात येते आणि ब्रिटिश आल्यावर राजस्थानी चित्रात ‘फिरंगी’ दिसायला लागले. चित्रकलेत या अशा शैली झिरपत गेल्या. कुठलीही कला किंवा व्यापार भरभराटीला यायला शांततेचा काळ महत्त्वाचा असतो. आधी मोगल आणि नंतर ब्रिटिशांच्या काळात तो राजस्थानने अनुभवला. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्यावेळी काही राजस्थानी राजांनी ब्रिटिशांच्या मदतीसाठीसुद्धा फौज पाठवली. त्यामुळे कलेला किंवा व्यापाराला खीळ बसली नाही. स्वराज्य की सांपत्तिक भरभराट यात बहुसंख्य राजपूत राजांनी सांपत्तिक भरभराट स्वीकारली. त्यामुळेच शेखावतीमध्ये ‘बनिया’ मंडळींच्या खिशात पैसे खुळखुळायला लागले आणि चित्रकला मिरवणाऱया या हवेल्या उभ्या राहिल्या.

ब्रिटिशांनी भारतात पाय रोवायला सुरुवात केल्यावर राज्यकारभार सुधारला, पण त्यांचा एक डोळा व्यापारातून मोठा पैसा कमावण्याकडे असल्यामुळे भारतातले हातमाग बंद पडले. विणकारांचे हाल झाले. इथून कच्चा माल घ्यायचा, तो मॅन्चेस्टरला घेऊन जाऊन उत्तम कापड तयार करायचे आणि ते परत भारतात भारतात आणून स्वस्तात विकायचे. त्यामुळे स्थानिक विणकरांवर उपासमारीची पाळी आली. त्यावेळी इंग्लंडमधून कापड इंपोर्ट करणाऱया मंडळींत शेखावती बनिया मंडळी अग्रेसर होती. त्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. त्यावेळी ब्रिटिशांची राजधानी कोलकाता होती. ब्रिटिशांनी त्यावेळी कोलकाता आणि मुंबई ही दोन मोठी बंदरं तयार केली. मोठय़ा युरोपियन बोटी तिथे येत. शेखावतचे बनिया आपलं घर सोडून कोलकात्याला व्यापारासाठी स्थलांतर करायला लागले. त्या काळात १५०० किलोमीटर्सचे अंतर खूप मोठं होतं. कोलकात्याला ब्रिटिश व्यापाऱ्यांचे मुख्य दलाल (Broker) म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. स्थानिक बंगाली त्यांना मारवाडी म्हणून ओळखतात. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांनी कोलकाता येथे आपलं व्यापारी साम्राज्य पसरवलं. त्यांचा महत्त्वाचा धंदा होता कापूस, ज्यूट, चहा, तांदूळ आणि अफू. ते या गोष्टी युरोपात पाठवत आणि तिथला तयार माल भारतात आणत. विशेषतः मॅन्चेस्टरच्या गिरणीतलं ‘मैलोन्मैल’ लांबीचं कापड. त्यामुळे इथले विणकर, हातमागवाले संपले. इंग्रज आणि मारवाडी श्रीमंत झाले. मारवाडी जमातीची एक खासीयत आहे. ते स्वतःच्या मंडळींना सांभाळतात. त्यांचे क्लार्क, हिशेबतपासनीस वगैरे सर्व मारवाडी होते. त्यांच्यासाठी त्यांनी चाळीच्या धर्तीवर हॉस्टेल्स बांधली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मारवाडी समाजाने माल तयार करण्याच्या इंडस्ट्रीत पैसे गुंतवायला सुरुवात केली. मारवाडी ‘शेठ’ एकोणीसाव्या शतकात सनातनी हिंदू किंवा जैन असे. शाकाहारी जेवण घेत असे. त्यांचं कुटुंब गावात राही आणि तो मोठय़ा शहरात. विसाव्या शतकात त्यांची राहणी बदलली. ते कुटुंबासकट मोठय़ा शहरांकडे सरकले. त्यांचं राहणीमान श्रीमंती झालं. त्यांच्यातली काही नावं मोठी झाली. उदा. सिंघानिया, बिर्ला, गोएंका, दालमिया, बजाज, केडिया, खैतान, पोद्दार, रुईया, झुनझुनवाला वगैरे वगैरे.

या मंडळींच्या हवेल्या तुम्हाला शेखावतीत सापडतात. सुरुवातीच्या काळात कमवलेला पैसा त्यांनी हवेल्या बांधण्यासाठी वापरला. हे मारवाडी खऱ्या अर्थाने मोठे झाले. ब्रिटिश गेल्यावर ब्रिटिशांनी त्यांचे कारखाने आणि धंदे विकले, ते त्यांनी घेतले. पंडित नेहरूंच्या संरक्षक अर्थनीतीत ते फोफावले आणि आज देशातील पन्नास टक्के इंडस्ट्रियल कॅपिटल त्यांचं आहे. अंगभर चित्रकला गोंदवलेल्या शेखावती हवेल्या आता पतितेचं आयुष्य जगतायत. कारण त्यांचे मालक आता जगभर गेले आहेत. त्या हवेल्या त्यांच्या श्रीमंतीतल्या गरिबीचा भूतकाळ आहे.

पण हा भूतकाळ जपायला हवा. तो किती सुंदर आहे, ते पुढल्या वेळी.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २६ जानेवारी २०२०)

Labels: #Rajasthan #SanzgiriArticles #SanzgiriTravelDiaries#भटकेगिरी


जोधपूरमध्ये मेहरानगढ किल्ल्यावरून दूर एक महाल दिसतो. तो तुम्ही चुकवू शकत नाही. तो चुकणं म्हणजे हसऱ्या माधुरी दीक्षितच्या चेहऱ्यावरचं हास्यच न दिसणं! त्या महालाचं नाव आहे उमेद पॅलेस. खरं तर उमेद भवन पॅलेस! एका कुटुंबाने निव्वळ राहण्यासाठी बांधलेला जगातला एक भव्य पॅलेस. या पॅलेसमध्ये ३४७ खोल्या आहेत. कोर्ट यार्डस्, बॅन्कवेट हॉल्स वगैरे वेगळे. थोडक्यात, वन बेडरूम हॉलमध्ये खुशीत राहणारी साडेतीनशे कुटुंबे तिथे राजासारखी राहतील. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की, बांधणाऱ्या राजाचं नाव महाराजा उमैदसिंग होतं. आज या महालाचा मालक आहे, गजसिंग! त्याच्या आजोबांची ही कर्तबगारी. १९२८ साली सुरू झालेले काम १९४३ साली संपलं. म्हणजे गर्भात असताना या महालाने महात्मा गांधींची दांडीयात्रा, भगतसिंगची फाशी, १९४२ चळवळ वगैरे पाहिलं. पण त्या गर्भाला त्याबद्दल ममत्व असावं असं नाही. कारण या सर्व महालांच्या मालकांना देशाच्या स्वातंत्र्याबद्दल सोयरसुतक नव्हतं. ब्रिटिशांच्या राज्यात ते ऐषआरामात होते. ब्रिटिशांच्या तिजोरीत काही मोहरा फेकल्या की त्यांचे इतर हक्क अबाधित असत. पण या महालाला एक वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्याचा नाही, पण दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा.

या महालाची जन्मकहाणी वेगळी आहे. एका संताने त्या राज्याला शाप दिला होता की, ‘चांगल्या राज्या’नंतर तिथे मोठा दुष्काळ पडेल. त्यामुळे राठोड घराण्याच्या प्रतापसिंगने पन्नास वर्षे राज्य केल्यावर जोधपूरमध्ये लागोपाठ तीन वर्षं दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी महाराजांकडे मदतीचं साकडं घातलं. महाराजांनी त्यांच्याकडून काम करवून घेऊन त्यांना रोजंदारी मिळवून द्यायचं ठरवलं. चांगली गोष्ट आहे. नुसती पैशाची मदत देण्यापेक्षा चूल पेटवायला ‘कामाचं इंधन देणं’ जास्त चांगलं. एखाद्या सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या राजाने प्रजेच्या हिताच्या कामात त्यांना गुंतवलं असतं. लोकशाहीत अशा वेळी लोकहिताची कामे काढली जातात. पण त्या वेळच्या राजांना एवढी सामाजिक जाणीव नव्हती.

असो, तर महाराज उमैदसिंगने एक अतिविशाल, सौंदर्यशाली महाल बांधायचं ठरवलं. त्याने हेन्री वॉन लॅकेस्टर या ब्रिटिश आर्किटेक्टकडे ते काम सोपवलं. हा आर्किटेक्ट एडविन ल्युटनचा समकालीन. ल्युटनने नवी दिल्लीच्या महत्त्वाच्या इमारती उभारल्या. नवी दिल्लीच्या इमारतीप्रमाणेच उमैद पॅलेसमध्ये घुमट आणि खांबाची (Columns) थीम मांडली आहे. तंत्रज्ञान पाश्चात्य आहे, पण आर्किटेक्चर भारतीय आहे. १९२८ साली सुरू झालेलं महालाचं काम १९४३ साली संपलं. ते रेंगाळायला दिलं गेलं, कारण दुष्काळग्रस्तांना अधिक काम मिळावं हा उदात्त हेतू राजाचा होता. काय औदार्य! या औदार्यावर टीका झाली. कारण माझ्यासारखी नतद्रष्ट माणसं या काळातही होती. सवा कोटीच्यावर पैसे खर्च झाले. पण दोन ते तीन हजार माणसांना काम मिळालं. ते अन्नाला लागले. जोधपूर शहराच्या सीमेवरच्या एका डोंगराची या महालासाठी निवड केली गेली. पण तिथे जवळपास पाण्याचा साठा नव्हता. डोंगर अत्यंत दगडी असल्यामुळे झाडं वगैरे जास्त नव्हती. सॅण्डस्टोनच्या खाणी जवळ नव्हत्या. त्यामुळे जोधपूरपासून खाणीपर्यंत एक रेल्वे लाइन टाकण्यात आली. माती डोंगरावर नेण्यासाठी गाढवांचा उपयोग केला गेला. म्हणजे पहा, गाढवांनाही काम मिळालं. या पॅलेसमध्ये सोनेरी सॅण्डस्टोनचा उपयोग केलाय. मक्राना मार्बल (संगमरवर) सढळ हाताने वापरलाय. लाकडी काम ब्रह्मदेशातल्या लाकडाचं आहे. ज्याला ‘बर्माटिक’ असं म्हटलं जातं. एकंदरीत २६ एकरांत हा महाल बांधलाय. त्यात पंधरा एकराच्या बागा आहेत. अर्थात ३४७ खोल्यांखेरीज इतर सुखसोयी आहेतच. उदा. दरबार हॉल, बॅन्क्वेट हॉल, खासगी डायनिंग हॉल, बॉलरूम, लायब्ररी, अंतर्गत स्विमिंगपूल, बिलियर्डस् रूम, चार टेनिस कोर्ट, दोन स्क्वॅश कोर्ट वगैरे!

पण हा महाल त्या राठोड घराण्याला तेवढा फळला नाही. उमैदसिंग हा महाल फक्त चार वर्षं उपभोगू शकला. त्याचा तरुण मुलगा हनुमंत सिंग. १९५२ साली लोकसभा निवडणुकीत जिंकला आणि घरी परतताना त्याचं विमान कोसळलं आणि तो मेला. आजचा राजा गजसिंग त्याचा मुलगा. त्याने १९७१ साली या महालाचा काही भाग ताजला हॉटेलसाठी चालवायला दिला. एका भागात तो राहतो आणि लोकांसाठी एक छोटा म्युझियम तयार केला.

या हॉटेलमध्ये आता आधुनिक उमैद सिंग राहतात. नीता अंबानीचा पन्नासावा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला. त्या खर्चात अख्खा भारत आठवडाभर पोटभर जेवला असता. आपण म्युझियम पाहताना या जगातल्या एका उत्कृष्ट महालाला पदस्पर्श करू शकतो. तिथे जुनी घडय़ाळं आहेत. पण त्या घडय़ाळांना हैदराबादच्या सालारजंग म्युझियमची सर नाही. म्युझियममध्ये ज्या इतर गोष्टी सापडतात त्या सर्व गोष्टी या म्यझियममध्ये सापडतात. पण तिथली सर्वात खास गोष्ट आहे व्हिन्टेज गाडय़ा! तुम्हाला गाडय़ांचे वेड असेल तर ते वेड हा म्युझियम पाहिल्यावर द्विगुणित होईल. रोल्स रॉइस, मर्सिडीज वगैरे जुन्या मॉडेलच्या गाडय़ा पाहायला मिळतात. देशातल्या अनेक महाराजांकडे अशा गाडय़ा होत्या, पण पहिली गाडी ठेवणारा भारतीय मात्र जमशेटजी टाटा आहे.

उमैद महाल पाहिल्यावर जाणवतं की, राजस्थान श्रीमंती आणि गरिबीचं, जाती व्यवस्थेचं एक अजब मिश्रण आहे. माझा मित्र अक्षय कोहोचकरने राजस्थानात एक मोठं काम घेतलं होतं. त्याने ठरवलं की, कामासाठी लागणारी माणसं तिथून घ्यायची. दोन महिन्यांच्या साध्यासुध्या कामासाठी म्हणजे कारकुनापासून सर्व्हमध्ये रॉड पकडणाऱ्या माणसापर्यंत शिकलेली माणसं त्याला मिळाली. ती प्रचंड आनंदी होती, कारण दोन महिन्यांसाठी का होईना, त्यांना ‘नोकरी’ होती. त्यांनी उत्साहात काम केले. माझ्या मित्राने सर्वांना चांगलं जेवण मिळावं म्हणून एक खानसामा ठेवला. सकाळ-संध्याकाळ जेवण सर्वांसाठी मोफत असे. तरीही काही मंडळी ते जेवण घेत नसत. का ठाऊक आहे? तो खानसामा त्यांच्यापेक्षा हलक्या जातीचा होता. तो नापित होता. तिथे जातीव्यवस्था इतकी रक्तात शिरलीय. पोटातली भूकसुद्धा त्यावर मात करते. त्यामुळे राजाने दुष्काळग्रस्तांच्या भल्यासाठी स्वतःचा महाल बांधणं ही गोष्ट त्या समाजव्यवस्थेला साजेशीच आहे.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, १९ जानेवारी २०२०)


जोधपूरला ‘सूर्याचं शहर’ (सन सिटी) असं म्हणतात. कारण तिथे उत्कृष्ट सूर्यप्रकाश असतो. त्याला ‘निळं शहर’ही म्हणतात. जैसलमेर हे सोनेरी शहर आहे. जयपूर गुलाबी शहर तसे जोधपूर निळं शहर (ब्लू सिटी). कारण जुन्या शहरातल्या इमारतींना निळा रंग दिलाय. वर्षभर सूर्य तळपत असल्यामुळे घरं थंड राहावीत म्हणून ‘निळाई’चा वापर केला जातो असे म्हणतात.

सौंदर्याचा विचार केला तर जोधपूरचा मेहरानगढ बिकानेरच्या जुनागढपेक्षा जास्त सौंदर्यशाली आहे. १४५९मध्ये तो राव जोधाने बांधला. तो मुख्य शहरापेक्षा ४१० फुटांवर आहे. नागमोडी वळणे घेत रस्ता खालच्या शहरातून किल्ल्याकडे जातो. किल्ल्याला जाताना द्वारं लागतात. त्यातल्या दुसऱ्या दरवाजावर अजूनही जोधपूरच्या सैन्याने डागलेल्या तोफांच्या खाणाखुणा दिसतात. जखमा मिरविणारे दरवाजे मला आवडतात. तो खराखुरा इतिहास असतो. पाच दरवाजांपैकी एका दरवाजाचे नाव ‘जयपोळ’ म्हणजे ‘विजयद्वार’ आहे. त्यावेळच्या जयपूर आणि बिकानेर राज्यांच्या पराभवाची एक आठवण जोधपूरला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा कन्याकुमारी ते काश्मीर भारत हा एक देश वाटतो, पण ऐतिहासिकदृष्टय़ा अजूनही त्याबाबतीत कनव्हिन्स नाही. इतक्या अंतर्गत लढाया लढल्या गेल्या. अशीच एक मोगलांच्या पराभवाची आठवण या किल्ल्याचे फतेहद्वार मिरवते, पण अशा ‘गोड’ खुणा अकबराच्या काळात या किल्ल्याने पाहिल्या नाहीत.

राठोड घराण्याच्या राव जोधाने जयपूर शहर उभारले आणि ते शहर मारवाडची राजधानी झाले. तिथे किल्ला उभारण्यापूर्वी एक डोंगर होता. त्याचे नाव होते 'बाकुचाडिया' म्हणजे पक्ष्यांचा डोंगर. दंतकथा अशी आहे की, तिथे फक्त एक साधुपुरुष राहत होता. त्याचे नाव होते चिरीयानाथजी. म्हणजे पक्ष्यांचा देव! तिथे किल्ला बांधण्याच्या वेळी त्या साधूला सांगण्यात आले ‘‘दुसरीकडे सोय बघ’’ त्याने सरळ नकार दिला. साधा एखादा नागरिक असता तर त्याचा शिरच्छेद झाला असता. तो संत माणूस आणि मागे अनेक पाठीराखे. त्यामुळे आणखी एका मोठय़ा संताला मध्ये घालण्यात आले. तिचे नाव करणीमाता. त्या संताने करणीमातेचे ऐकले, पण जाता जाता शाप दिला, ‘‘तुझ्या किल्ल्यावर नेहमी पाण्याचा दुष्काळ असेल.’’ शेवटी तो राजा हुशार राजकारणी ठरला. त्याने त्या संताला पटवून किल्ल्यावर एक घर आणि मंदिर बांधून दिलं. मौनव्रत किंवा उपवासाला बसणाऱ्या संतांना खिशात घालण्याची कला अशी पूर्वापार चालत आलीय. आणखी एक घृणास्पद चाल तुम्हाला पूर्वापार चालत आलेली आढळेल. हा किल्ला बांधताना एक मनुष्यबळी देण्यात आला. त्या माणसाचे नाव राजाराम मेहवाल. त्याच्यावर बळजबरी झाली नाही. तो स्वखुशीने बळी जायला तयार झाला. त्याबद्दल त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्याचे वचन राजाने दिले. आजही त्या राजाराम मेहवालचे वंशज राजबागेत राहतात त्या जागेला राजाराम मेहवाल गार्डन म्हणतात.

किती चित्रविचित्र गोष्टींनी इतिहास भरलेला असतो नाही?

अकबराने हे राज्य आपल्या राज्याला १५८१मध्ये जोडले. राठोडांना अंतर्गत मालकी मिळाली, पण राठोडांचा मालक बादशहा अकबर होता. या शरणागतीचा फायदाही मारवाडला झाला. युद्ध थांबले, शांतता आणि स्थैर्य आलं. व्यापार वाढला, नव्या शैलीच्या विविध कला आणि स्थापत्य शास्त्र सर्वत्र दिसायला लागले. १६७९ साली महाराजा जसवंतसिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने जप्ती आणली. औरंगजेब १७०७ साली अल्लाला प्यारा झाला. पुन्हा काही युध्दे झाली. मध्यंतरीच्या काळात मालक बदलले. ‘मराठे’ मालक झाले आणि मग पुढे ब्रिटिश! १८५७ साली काही राठोडांनी बंड केले. चला, ब्रिटिशांविरुद्ध राजपूत रक्त सळसळलं ते बरे वाटले. पण त्यांचा पराभव झाला आणि मग ब्रिटिश मालक बनले. या ब्रिटिशांच्या काळात तेथील व्यापाऱयांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. ती प्रक्रिया अजून अव्याहत सुरू आहे. व्यापारातला देशाचा सार्वभौम राजा मारवाडीच आहे.

स्वातंत्र्यानंतर जोधपूरचा राजा होता हनवंत सिंग. त्याला भारतीय संघराज्यात यायचं नव्हतं, पण वल्लभभाई पटेलांसमोर त्याचे काही चालले नाही. किल्ल्यातल्या राजवाडय़ात जे अफाट वैभव दिसते, श्रीमंती ओसंडून वाहताना दिसते ती त्या शांतता पर्वातली आहे. हा किल्ला डोंगरावर पाचेक किलोमीटर्सच्या परिसरात पसरलाय. त्या किल्ल्याकडे नुसतं पाहिल्यावर तिथल्या जाडजूड भिंती डोळय़ात भरतात. भिंती ३६ मीटर्स उंच आणि २९ मीटर्स रूंद आहेत. नागमोडी रस्त्याने वर चढत जायलाच हवं असं नाही. तुम्हाला पैसे दिल्यावर लिफ्ट वर घेऊन जाते आणि वरून अख्खं शहर लख्ख दिसतं. हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा असतो. सेल्फी काढता येतो. त्यामुळे वर प्रत्येक मोबाईल फोन ओव्हरटाईम करताना दिसतो. किल्ल्यातले मोतीमहल, फुलमहल, शीशमहल, सिलाहखाना आणि दौलतखाना वगैरे मोठी सौंदर्य स्थळे आहेत. त्या श्रीमंतीचा राग यायला लागतो कारण शेवटी तो पैसा कुणाचा होता? इतिहासातल्या फार थोडय़ा राजांनी प्रजेचा विचार केला.

तिथले म्युझियम एका बाजूला कलात्मकतेची भूक भागवतात. दुसऱ्या बाजूला भुकी कंगाल जनता आणि राजा यातली विषमता दाखवतात. पालख्या किती प्रकारच्या असाव्यात? आणि किती सोने-चांदीने मढलेल्या? हत्तीवर ज्या अंबारीत राजा बसे त्या तिथे ठेवल्या आहेत. पूर्ण सोनेरी. त्यात दोन खण असत. राजा बसे ती जागा प्रचंड, मागे दुसऱ्या खणात शरीररक्षक बसे. त्याला शरीर कोंबावं लागत असे. तलवारी, गेंडय़ाचे शिंग, हिऱ्या मोत्यांनी मढवलेल्या ढाली आणि सोन्या-चांदीचे कपडे घातलेल्या बंदुका वगैरे. तिथेही ऐतिहासिक तलवारी आहेत. एक राव जोधाची, दुसरी अकबराची, तिसरी तैमूरची! ढाल-तलवारीने लढताना सोनं, चांदी, हिरेमाणकं का लागतात? पण मोगल-ब्रिटिश मालक असताना त्यांना लढावं कुठे लागलं? सुंदर सुंदर मारवाडी पेंटिंग्जही पाहायला मिळतात. अर्थात डोळे तृप्तीचे ढेकर देत असताना मन शरणागत राजेशाहीबद्दलही ओरडून सांगत असते. मला वाटतं या कलात्मक सौंदर्यवान किल्ल्यांपेक्षाही भग्न झालेलं चितोड, हंपी, शिवाजी महाराजांचे किल्ले जास्त श्रीमंत आहेत. कारण त्यात शौर्याची श्रीमंती दिसते. पैशाची नाही.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, १२ जानेवारी २०२०)


राजस्थानात बिकानेरला गेल्यावर दोन गोष्टी करायलाच हव्यात. एक बिकानेरचा किल्ला म्हणजे जुनागढ किल्ला पहावा आणि मग बिकानेर बुदिया, कचोरी, समोसे आणि लाळेला आमंत्रण देणाऱ्या मिठाईवर ताव मारणे. ‘हायजिन’ वगैरे डोक्यात ठेवून जुनागढ किल्ल्याच्या समोरच्या ‘पॉश’ रेस्टॉरंटमध्ये जाऊ नका. आम्ही चूक केली. तुम्ही करू नका. तिथे तुम्हाला अनेक गोरी मंडळी दिसतील. ते हॉटेल त्यांच्यासाठी आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण पारतंत्र्यात आहोत आणि बाहेर ‘डॉग्ज ऍण्ड इंडियन नॉट अलाऊड’ अशी पाटी आहे असा भास होतो. फक्त गोरे जेवत असतात. पदार्थांचे दरही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या डॉलर्सना साजेसे असतात आणि हॉटेलात इतके गोरे असतात की, आपल्यासारख्या माणसाकडे लक्ष द्यायला तेथील वेटर्सना वेळ नसतो. मला शेवटी उठून मॅनेजरला सांगावं लागलं की, बिकानेर आता स्वतंत्र भारतात आहे. इंग्रज इथून कधीच निघून गेले आहेत.

पण बिकानेरच्या किल्ल्यातून आणि नंतर लालगढ पॅलेसच्या म्युझियममधून चक्कर मारताना एक गोष्ट जाणवते की, तिथे उगवत्या सूर्याला नहमीच नमस्कार केलेला आहे. मग त्या सूर्याचे नाव ‘मोगल सत्ता’ असो किंवा ‘ब्रिटीश सत्ता’. राजपूत शौर्य तिथे नांदते.

बिकानेर हे पूर्वी एक तसा फारसा काही न उगवणारा प्रदेशच होता. महाराजा रावजोधा या जोधपूरच्या राजाच्या पहिल्या मुलाने त्या वांझोटय़ा जमिनीवर शहर उभारलं. त्याचं नाव रावबिका म्हणून शहराचं नाव बिकानेर. मध्य आशिया आणि गुजरातच्या व्यापाराच्या रस्त्यावर ते होते. ते बहरलं कारण तिथे पाण्याचे झरे होते. या बिकाने १४७८ साली एक किल्ला तिथे बांधला. त्याचे फक्त अवशेष आता शिल्लक आहेत. त्यानंतर शंभर वर्षांनी आजचा जुनागढ किल्ला उभा राहिला. हा उभा राहिला राजा रायसिंगच्या काळात. त्याने १५७१ ते १६११ पर्यंत राज्य केलं. राज्य केलं म्हणजे तो अकबराचा मांडलिक झाला. अकबराच्या दरबारात तो सरसेनापती झाला. त्याने राजपूतांचं अर्ध मेवाड जिंकून बादशहा अकबर आणि नंतर जहांगीरच्या पायाशी ठेवलं. त्याबदल्यात गुजरात आणि बऱ्हाणपूरची जहागिरी मिळविली. कराच्या रूपाने प्रचंड पैसा कमावला आणि त्याने हा ‘चिंतामणी गड’ बांधला. त्याला पुढे जुनागढ हे नाव पडलं. त्यामुळे चित्तोडच्या किल्ल्यावर जसं स्वाभिमानी रक्त सांडलं तसं इथे सांडलं नाही. चित्तोडचा गढ कलाकुसर, श्रीमंती, वास्तूकला, मूर्तीकाम याबाबतीत मोठा नाही, पण त्याला त्यागाचे वलय आहे. या जुनागढचा राजा कला आणि स्थापत्यशास्त्र या विषयात पारंगत होता. परदेशात जाऊन याबाबतीतलं ज्ञान त्याने मिळवलं त्याचा उपयोग त्याने या किल्ल्यात केलेला आढळतो. विशेषतः जी स्मारके तिथे उभारली आहेत त्यातून कलात्मकता ओसंडून वाहताना दिसते. पण त्याला लाचारीची दुर्गंधी येते. विविध महाल हळूहळू कालांतराने उभारले गेले. ऐशआरामासाठी बनवलेले राण्यांचे महाल पाहिले की, राण्यांचा हेवा वाटण्याऐवजी कीव येते. बाहेरच्यांची नजर त्यांच्यावर पडू नये म्हणून जाळय़ा असत. व्हेंटिलेशन अत्यंत कमी असे. त्यांच्यासाठी एक वेगळी मोकळी जागा असे, पण ती फार मोठी नसे. बिकानेरच्या जुनागढमध्ये राण्यांच्या महालामागे खूप मोठी बाग होती. तिथे राण्या विरंगुळय़ासाठी जात. तिथल्या गॅलरीत मी उभा असताना पोपटांचा एक मोठा थवा माझ्या समोरून उडत गेला. क्षणभर राण्यांचा हेवा वाटला, पण मग जाणवलं या राण्यांची अवस्थाही त्या पोपटांसारखीच होती. ते पोपट तरी स्वातंत्र्य उपभोगत होते. राण्यांची अवस्था सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी असे. त्यात त्यांची संख्या पंचवीस-तीस-पस्तीस वगैरे. त्यात रखेल्यांची भर. ऐयाशी हा राजघराण्यात जन्माला आल्यावर मिळणारा हा एक हक्क असावा. बरं तो राजा मेल्यावर त्या सर्व राण्यांना, रखेल्यांना चितेवर चढावं लागे. राजाची राणी किंवा रखेल होणं हा शाप असावा.

असो. तिथल्या म्युझियममधल्या वस्तू विशेषतः कपडे, रत्ने, रत्नजडीत हत्यारं, चांदी-सोन्याची लयलूट पाहिल्यावर डोळे दिपतात. पण स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यातला फरकही कळतो. एक राणा प्रतापसारखा राजा स्वातंत्र्यासाठी जंगलात फिरतो, जमिनीवर झोपतो. तर दुसरा राजा स्वांतत्र्य विकून ऐश्वर्यात लोळतो. राणा प्रताप आठवला की या डोळे दिपवणाऱ्या ऐश्वर्याची शिसारी येते.

१८१८ साली ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकल्यावर बिकानेरचे राजे त्यांचे मांडलिक झाले. त्यांच्या इतिहासात गगनसिंग महाराजांचं महत्त्व मोठं आहे. कारण ब्रिटिशांकडून त्यांनी ‘नाईट कमांडर’ हा किताब मिळवला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मायबाप ब्रिटिश राणीला निष्ठा वाहिली. लालगढ पॅलेसमधील म्युझियम किंवा फोटो गॅलरी पाहायला विसरू नका. ब्रिटिशनिष्ठेच्या खुणा तुम्हाला जागोजागी दिसतात. येथील महाल १९०२ ते १९२६च्या काळात उभारला. का? कारण जुनागढ जुनाट झाला होता. ब्रिटिशांनी आधुनिक राजाने कसं राहायला हवं हे शिकवलं होतं. ब्रिटिश संस्कृतीचं पाणी पिऊन ही मंडळी आलेली होती. या महालाच्या एका भागात आता या महाराजांचे वंशज राहतात आणि उरलेल्या भागाचं पंचतारांकित लालगढ हॉटेल केलंय.

राजकन्या राजश्रीकुमारी ते चालवते. या महालाचा आर्किटेक्टही ब्रिटिशच होता. सर सॅम्युअल स्विन्टन जेकब. त्या काळात एक लाखाचा अंदाजे खर्च येईल वाटणारा महाल शेवटी दहा लाखांचा झाला. कारण जगातला सर्वोत्कृष्ट माल वापरला गेला. तिथे राणी मेरी, राजा किंग जॉर्ज पाचवा, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड आयर्विन वगैरे तिथे राहून गेले आहेत. तो महाल तीन मजली आहे. बाहेर थर वाळवंटातला लाल दगड वापरल्याने त्याला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालंय.

बिकानेरचा तो किल्ला, लालगढ हॉटेल, त्याचा म्युझियम पाहताना श्रीमंती पद्मिनीसारख्या देखण्या ललनेचं रूप घेऊन समोर येते. तिच्या कलासौंदर्याचं कौतुक करावंसं वाटतं. त्याने घायाळ व्हायला होतं, पण तिच्या अंतःकरणात डोकावलं की ते सौंदर्य शापित वाटतं.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, ५ जानेवारी २०२०)


तुम्ही बिकानेरला जाणार असाल, तर वाटेत ‘देशनोक’ नावाच्या एका छोट्या गावात थांबा. तिथे एक मंदिर आहे. करणीमातेचं मंदिर! तुमच्या तेहतीस कोटी देवांच्या यादीत हे नाव सापडणार नाही. कारण तिने मानवी जन्म घेतला आणि ती मग देवी बनली. हे मंदिर कलात्मकदृष्ट्या  किंवा वास्तूकला, मूर्तीकला, कोरीव काम याबाबतीत दिलवाराचं जैन मंदिर किंवा कोनार्क किंवा स्वामीनारायण मंदिरासारखे नाही. नाही म्हणायला मंदिरासमोर उभं केलेलं संगमरवरी द्वार कलाकुसर अंगावर मिरवतं, पण या मंदिराचा ‘यूएसपी’ म्हणजे मंदिरात फिरणारे हजारो उंदीर! उंदरांचा तिथे मुक्त संचार आहे. तुम्ही मंदिरात जाताना ते आजूबाजूला खेळत असतात. ते तुमच्या पायाला गुदगुल्यासुद्धा करू शकतात. त्यांना चक्क प्रसाद दिला जातो. तुम्हाला सांगितलं जातं की या काळ्या उंदराच्या घोळक्यात तुम्हाला एखादा पांढरा उंदीर दिसला तर ते तुमचं सुदैव, तो तुमचा सुदिन. तुम्हाला थेट करणीमातेचं दर्शन झालं असं मानायला हरकत नाही. इतर काळे उंदीर हा तिच्या इतर नातेवाईकांनी आणि जातबांधवांनी पुन्हा मनुष्य योनीत जन्म घ्यायच्या प्रक्रियेआधी घेतलेला जन्म आहे. मला पांढरा उंदीर काही दिसला नाही. मी तेवढा पुण्यवान  कदाचित नसेन. माझ्या सश्रद्ध बायकोने मात्र उंदरांच्या  खाण्यापिण्याचीही सोय केली होती.

अशा विस्मयकारक कथा भारतातच वाचायला मिळतात आणि अशी स्थळंही भारतातच सापडतात. राजस्थानमध्ये येणारे परदेशी पर्यटकसुद्धा उंदीर पाहायला गर्दी करतात. एवढे उंदीर एकगठ्ठा त्यांना कुठे पाहायला मिळणार! आपल्या हिंदू धर्मात, या काही चाली, काही प्रथा, किती विचित्र आहेत ना? पिकांची नासाडी करणाऱ्या उंदराला गणेशप्रेमी मंडळी गणेशाचे वाहन मानतात. देवळात त्याच्या कानात आपलं मनोगत कुजबुजतात. तिथे राजस्थानात त्याच मूषकांना करणीमातेचे वंशज मानतात. 

आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना जन्माने मिळालेल्या जातीमुळे काही मंडळी अस्पृश्य मानत. त्यांची सावलीदेखील कधीकाळी नकोशी त्यांना होती. परवाच मी लोकहितवादी या समाजसुधारकांवरचं पुस्तक वाचत होतो. उच्चभ्रू कुटुंबातला, पेशव्यांशी संबंधित कुटुंबातला हा माणूस. इंग्रजी शिक्षण घेत होता म्हणून घरून विरोध झाला. त्यांना पुस्तकं विहिरीजवळ एका कपाटात ठेवावी लागत. अभ्यास झाला की आंघोळ करायची, पवित्र व्हायचं आणि घरात शिरायचं. त्याच समाजात ही मंडळी चक्क उंदराला देवी समजतात. हिंदूधर्म हा समुद्र आहे. कुठलाही प्रवाह येऊन त्यात मिसळतो. दलितांच्या हातचं किँवा घरातलं जेवणं म्हणजे ‘शिव शिव शिव’ असा प्रकार होता, पण या उंदरांनी अर्धवट खाल्लेले जेवण प्रसाद म्हणून स्वीकारणे हा ‘मोठा मान’ समजला जातो. तुमच्या हातून (किंवा पायाने) एखादा उंदीर मारला गेला तर पूर्ण चांदीचा उंदीर ‘प्रायश्चित्त’ म्हणून देवीला भाविक वाहतात.

असो. आधी मूळ मुद्द्याकडे येतो. ही करणीमाता कोण? तिच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यातली एक अशी की तिचा मुलगा लक्ष्मण, कपिल सरोवरामध्ये पाणी पित असताना बुडाला. तिने मुलासाठी यमाकडे साकडं घातलं. यमाने आधी नकार दिला, पण नंतर या लक्ष्मणाला आणि इतर मुलांना मृत्युपश्चात उंदराचा जन्म देण्याचं कबूल केलं. जे पांढरे उंदीर मंदिरात आहेत ते म्हणजे ही करणीमाता आणि तिची चार मुलं असं मानलं जातं.

आख्यायिकेतून इतिहासाकडे प्रवास केला, तर जाणवतं की, तिचा जन्म २ ऑक्टोबर १३८७ चा. ती १५१ वर्षे जगली असं सांगण्यात येतं. तिला दुर्गेचा अवतार मानलं जातं. जोधपूर आणि बिकानेरच्या राजघराण्याची ती अधिकृत देवता आहे. तिने बिकानेरच्या महाराजांच्या आणि जोधपूरच्या महाराजांच्या किल्ल्यांची पायाभरणी केली असं इतिहास नमूद करतो. सायिका गावच्या दीपोजी चव्हाणची ती बायको. लग्नानंतर काही काळाने तिने संन्यासी व्हायचं ठरवलं. नवऱ्याला आधी वाटलं की, ती गंमत करतेय. ती गंमत नव्हती. नवऱ्याचं लग्नानंतरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिने स्वत:च्या सख्ख्या बहिणीचं लग्न आपल्या नवऱ्याशी लावून दिलं. पुढे ती आपल्या अनुयायांबरोबर गाव सोडून गेली आणि भटक्या-विमुक्त जमातीच्या माणसांसारखं आयुष्य जगली. तिने भरपूर समाजसेवा केली. त्यातून ती देवी झाली. अर्थात आपल्याकडे एकाच व्यक्तीची एकच आख्यायिका नसते. काहींच्या मते तिचं आधी एक लग्न तिच्या चरण जातीच्या दुसऱ्या पुरुषाशी झालं होतं. पण पुढे सांसरिक आयुष्याचा तिला कंटाळा आला. त्यामुळे त्याच्यापासून विभक्त होत तिने दीपोजीबरोबर बहिणीसह लग्न केलं. 

या चरण जमातीचा समज असा आहे की, त्यांचा मृत्यू झाल्यावर ते उंदीर होतात, उंदीर म्हणून मेल्यावर पुन्हा मनुष्य जातीत जन्म घेतात आणि ही अशी सायकल सुरू राहते.

आणखीन एक सुंदर आख्यायिका म्हणजे ती वयाच्या १५१व्या वर्षी जेव्हा अकस्मात अदृष्य झाली त्यावेळी ती तरुण दिसत होती. आपल्याकडचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे संस्कृतीप्रेमी ‘त्याकाळात तरुण राहायचं विज्ञान आपल्याकडे उपलब्ध होतं’ यावर आनंदात नाचू शकतील.

आणखीन एक ‘पुराण कथा’ ऐकायची आहे? या सर्व समजुतींना छेद देणारी? असाही काही मंडळी विश्वास ठेवतात की, एकदा एक आक्रमक राजा (नाव माहीत नाही) बिकानेरवर चाल करून आला. त्याच्या वीस हजार शिपायांना करणीमातेने उंदीर बनवलं. खरं सांगू, मला या ‘लोककथा’ प्रचंड आवडतात. त्यातून त्या काळाची भाबडी कल्पनाशक्ती कळते. पण एक ऐतिहासिक सत्य सांगितले जाते की, इतके उंदीर एकत्र असून कधी ‘प्लेग’ त्या काळात तिथे फैलावला नाही किंवा एवढे उंदीर फिरत असताना उंदराच्या लघवीपासून होणाऱ्या लॅप्टोस्पायरिसिसचा त्रास कुणाला झालेला नाही. एका गोऱ्या शास्त्रज्ञाला प्रश्न विचारला गेला की, उंदरांची संख्या वाढत कशी नाही?’ त्याने म्हटले की, ‘हे उंदीर त्यांच्यातल्या काही रोगामुळे मृत्युमुखी पडत असावेत. असं त्यांच्या शेपटी आणि शरीरावरच्या डागांमुळे जाणवते आणि त्याचबरोबर प्रजोत्पादन होत असल्यामुळे संख्या तेवढीच राहते.’ एक नक्की की बुद्धीप्रामाण्यवादाला डोक्यातून काही काळ मंदिराबाहेर ठेवून तुम्ही मंदिरात शिरलात आणि गाईडच्या कथा ऐकल्यात तर एन्जॉय कराल.

- द्वारकानाथ संझगिरी

 


इंदौरहून घरी आल्यावर मी वजनाच्या काट्यावर उभा राहिलो. काटा जागच्या जागी होता. मी सुटकेचा एवढा मोठा निश्वास सोडला की, तो इंदौरला सराफा बाजाराची खाऊगल्ली आणि छपन्न दुकानांच्या हमरस्त्यावर ऐकू गेला असेल. इंदौरहून कुठलाही खवैय्या वजन वाढल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही.

आम्ही राजवाडा पाहिल्यानंतर तिथला ‘लाईट अँड साउंड शो’ मला बघावयाचा होता. मध्ये वेळ होता. कुणीतरी म्हणालं, "सराफा बाजार याच्या मागेच आहे.” सराफा बाजार शब्द ऐकल्यावर माझी बायको व बहिणीचे चेहरे फुलले आणि माझी जीभ! कारण सराफा बाजाराचे रात्रीचे नाव ‘खाऊगल्ली’ आहे. 

त्यावेळेस सराफांची दुकानेही उघडी होती. नणंद-भावजय तिकडे गुंतल्या. मी खाण्याचे स्टॉल बघत फिरत होतो. तव्यात तयार होणारे गुलाबजाम, जिलेबी, मालपुवा, रबडी! जिभेची चुळबूळ सुरू झाली. विविध स्वादांच्या पाणीपुऱ्या (किमान १० स्वाद) खुणावत होत्या. साबुदाणा खिचडीचे स्टॉल्स पाहून मी वेडावलो. साबुदाणा खिचडी उपवासाला चालत नसती तर कदाचित भक्तांनी उपवास केले नसते. दह्यात एकरूप झालेली साबुदाणा खिचडी आणि अमृत यातलं मी काय स्वीकारेन हे मला सांगता येणार नाही. साबुदाणा खिचडी ही बिर्याणीप्रमाणे किलोवर मिळते हे मी प्रथम तेथेच पाहिले. पावभाजी, डोसा, चायनीज स्टॉल्सकडे मी सिनेमातल्या साईड नट्यांकडे दुर्लक्ष करावे तसे दुर्लक्ष केले. 

"इथला बेस्ट स्टॉल कोणता?" असे विचारल्यावर दूध-चक्का विकणाऱ्या दुकानदाराने सांगितले, "जोशींच्या दुकानातला दहीवडा खाल्ल्याशिवाय इथून जाऊ नका. जोशींचं दुकान शोधणे हे गर्दीत अमिताभ बच्चन शोधण्याइतके सोपं होतं. बाहेर गर्दी आत गर्दी. मुंबईत पूर्वी लक्ष्मी-विलास वगैरे चहाची दुकाने असत. तसा त्या दुकानांचा चेहरा-मोहरा. बाहेर कढया, त्यात कचोऱ्या, दहीवडे, समोसे, पॅटिस वगैरेंची निर्मिती. निर्मितीची कला तेथील स्वैपाकी कचोऱ्या वर उडवून दाखवत होते. अधाश्याप्रमाणे आम्ही कचोरी, मक्याचा कीस आणि दहीवडे मागवले.

इंदौरी कचोरी ही मुंबईत शेव-गाठींच्या दुकानांत कचोरी मिळते तशी नाही. ही क्रेटरच्या आकाराची. त्यात कधी बटाटे, कधी डाळ तर कधी दोन्ही कोंबलेले आणि त्यातली स्वर्गीय चटणी. यामुळे जी चव येते ती अफलातून असते. मक्याचा कीस किंवा शिरा म्हणा, लाजवाब! असा दहीवडा मी क्वचित खाल्लाय. त्यात गोड-तिखट चटणी टाकण्याची पद्धतही नेत्रदीपक. मुंबईतल्या उडीपी दहीवड्यापेक्षा हा वेगळा. दह्याने नाते जोडले म्हणून त्याला दहीवडा म्हणायचं.

माझ्या लहानपणी चाटवाल्याकडे पकोडे मिळायचे. भय्या लिंबाच्या आकाराचे दोन वडे कुठल्याशा पाण्यातून काढून पिळायचे आणि मग त्यांना दही, चटणी वगैरेचा संस्कार व्हायचा. तसला प्रकार येथे होता पण आकार मोठ्या डाळिंबांसारखा. 

‘लाईट अँड साउंड शो’नंतर छपन्न दुकान विभागात गेलो. दिवाळीमुळे असेल दिवे झगमगत होते. रस्ता मोठा होता. उत्तमोत्तम गाड्यांनी तो सजलेला होता. एका रांगेत उदरभरणाची ५६ दुकाने आहेत. प्रथम शिकंजीची चव घेतली. आपली बासुंदी प्याल्यासारखे वाटते. मिठाईच्या दुकानात शिरलो. प्रत्येक गोड पदार्थाची चव दिली गेली. त्यातला एक पदार्थ बेळगावच्या कुंद्याचा श्रीमंत चुलतभाऊ होता. एक चमचा पोटात गेल्यावर मी कॅलरीजचा हिशेब मनात सुरू केला. मग पाणीपुरी झाली. इतकी चविष्ट पाणीपुरी मी क्वचितच खालीय. तिथे आणखी एक पदार्थ खाल्ला आणि जीव वेडावला. त्याला ' खापरा पॅटिस ' म्हणतात. म्हणजे खोबऱ्याचे पॅटिस अधिक जीभ चाळवणाऱ्या चटण्या! केवळ कॅलरीज आणि कोलेस्टेरॉल या दोन दैत्यांच्या धाकाने पॅटिसचा सहवास आवरता घ्यावा लागला.

दुसऱ्या दिवशी मी जाहीर केले, "मी रात्री खाऊगल्लीत जाणार, दोन ठिकाणी हायजीन मी खुंटीवर टांगणार!” 'नजारा' पाहण्यासाठी मी येते, पण जेवायचे दुसरीकडे, या अटीवर बायको आली. नजारा पाहून तीही स्तिमित झाली. छोटी २०-२५ फुटी गल्ली माणसांनी भरून गेली होती. काय पदार्थांची रेलचेल. आधी सांगितलेले पदार्थ सोडून केळावडा, गटाडू, परासे, रसमलाई, छोले-भटुरे पासून पनीर टिक्कापासून कॉर्नचाटपर्यंत. दहा स्वादांची पाणीपुरी झाली आणि रबडी चमच्याने खाताना जिभेने परमोच्च सुख अनुभवलं! तो खाऊगल्लीचा नजारा डोळ्यांत आणि चव जिभेवर ठेवून आम्ही हॉटेलात परतलो. परतताना आम्हांला दोघांनाही लाहोरच्या अशाच खाऊगल्लीची आठवण झाली. पण इंदौरच्या खाऊगल्लीची सर तिला नाही.

अरे हो, विसरलोच, एक मस्त पेय जाताजाता घेतलं. नारळाचं पाणी आणि त्यात खोबरं टाकतात आणि मिक्सरमध्ये घुसळतात. मस्त चव लागते. उरलेल्या दोन दिवसांत अनेकांनी उरलेले काही पदार्थ खाण्यास सुचवले. उदा. पोहे, वा क्या बात है! इतके मऊ, खरेतर लुसलुशीत आणि कावीळमुक्त पोहे मी क्वचितच खाल्ले आहेत. 'डाएट' हा शब्द मी चार दिवसांसाठी माझ्या शब्दकोशातून बाहेर काढला होता. हे खाद्यपदार्थ इतके स्वस्त होते की 'अच्छे दिन' फक्त मध्यप्रदेशातच आहे की काय असं वाटलं. १०० रुपयांच्या नोटेची किंमत तिथे खूप वर्षांनी जाणवली. एकदाही नॉनव्हेजची आठवण झाली नाही. जिभेची चंगळ पोटासाठी अमंगळ ठरली नाही आणि चॉकलेटी पान चघळत मी जिभेला सांगितलं, "आता हनिमून संपला बरं का, उद्यापासून कोलेस्ट्रॉल, शुगर, कॅलरीज वगैरे शब्दांचा मान राखायचा !

- द्वारकानाथ संझगिरी

साभार : सादर - विलास पोतदार

(‘भटकेगिरी’ या द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या अनोख्या शैलीत लिहिलेल्या व मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांनी प्रथम २०१७ साली प्रकाशित केलेल्या बहारदार पुस्तकातून वाचकांच्या परिचयार्थ वेचलेला एक रुचकर भाग साभार, सादर.)


शेखावती ‘हवेल्यां’ मधला ‘हवेल्या’ हा शब्द भारतात सर्वत्र वापरत नाहीत. आपण महाराष्ट्रात बंगला, फार फार तर कौतुकाने प्रासाद म्हणू. माझ्या एका मित्राच्या छोटय़ा बंगल्याचं नाव ‘गौरीप्रसाद’ होतं. आमच्या चाळीवजा घराचं नावं मालकाने ‘हेंद्रे कॅसल’ ठेवलं. कुणालाही पत्ता सांगितला तर त्या माणसाची माझ्या घराबद्दलची अपेक्षा विस्तारते. घरी आल्यावर ‘रामायणा’तली शबरी इथेच कुठे राहत होती का हे तो फक्त भिडेपोटी विचारत नसावा. पण महाराष्ट्रात अमुकतमुक हवेली असं वर्णन मी ऐकलेलं नाही. पण राजस्थानात ‘हवेली’ हा शब्द लोकप्रिय आहे. बनियासाठी हवेली म्हणजे त्याचं घर, त्याचा बचाव, त्याचं स्टेटस. हवेली हा शब्द इस्लामपूर्व पर्शियातून आला. हवेली म्हणजे बंद जागा. शेखावती प्रासादांना ‘हवेली’ हे नाव योग्यच होते. कारण या हवेल्यांत आत ‘कोर्टयार्ड’ (मोकळी सुशोभित जागा) असे. अगदी आतल्या जागेला ते ‘जनाना’ म्हणत. तिथे स्त्रिया राहत. त्यांना कुणी पाहू नये अशी व्यवस्था असे. त्या बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून (म्हणजे बंद गाडीतून) आल्यावर त्या मागच्या दरवाजाने घरात शिरत. त्या बाहेर पडत त्यावेळी चेहऱ्यावर पदर असे. श्रीमंत राजस्थानी स्त्रिया या ‘हवेली’ नावाच्या पिंजऱ्यातच राहत. पिंजरा सोन्याचा असे. दाण्याऐवजी मोती मिळत, पण स्वातंत्र्य शून्य! ही कदाचित इस्लामी आक्रमणानंतरची प्रतिक्रिया असावी; जशी ‘जोहार’ ही होती. काही राजघराण्यांत स्त्रियांना सर्व शिक्षण दिलं जात असे. विशेषतः लढाईचं. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की, दोर कापले गेलेल्या परिस्थितीतही आगीत उडी घेण्यापेक्षा महिलांनी मारत मारत मरणं हे जास्त मोठं वीरमरण होतं. अनेकांचे या बाबतीत मतभेद असू शकतात. ताराबाई असो किंवा अहिल्या होळकर, झाशीची राणी किंवा चाँदबिबी, धर्म कुठलाही असो, त्यांनी तलवार गाजवली ना? त्या अंतःपुरात पडून राहिल्या नाहीत. पुरुषी वर्चस्वाला त्यांनी भीक घातली नाही. या सर्व महिला ‘महाराष्ट्र’ नावाच्या मातीतल्या आहेत हा फक्त योगायोग नसावा. कुठेतरी मातीचा गुण असावा. असो, स्त्रियांवर रूढींनी घातलेल्या बंधनाबद्दल लिहिताना माझ्या पेनाची शाईसुद्धा तप्त होते.

या हवेल्यांमध्ये बैठका बाहेर असत. त्या बैठकीत फार फर्निचर नसे. मस्त गादय़ा पसरवलेल्या, त्यावर टेकायला लोड! जमिनी पांढऱ्या लखलखणाऱ्या. भिंती पुन्हा पांढऱ्याच, घोटून प्लॅस्टर केलेल्या. . . अशा पांढऱ्या प्लॅस्टरला तिथे ‘शिमला प्लॅस्टर’ म्हणतात. हवेल्यांच्या बंदिस्तपणामुळे आत सूर्यप्रकाश फारसा येत नसे. त्यामुळे या बैठका पांढऱ्याशुभ्र केलेल्या असाव्यात. त्यावर दोन बाजूला खोल्या असत. त्याला जाळी किंवा झरोके असत. तिथे जायला ललनांच्या जनान्यातूनच रस्ता असे. त्यावर बसत आणि बैठकीत बसलेल्या समारंभात भाग घेत. म्हणजे पाहत. त्यांना पुरुष दिसत, पुरुषांना स्त्रीचं नखही दिसत नसे.

हवेलीचा चेहरा हा सजवलेला असे. म्हणजे खिडक्या, गॅलऱ्या वगैरे! कमानी, नक्षीकाम, पेंटिंग सर्व सर्व तिथे पाहायला मिळेल. नटलेल्या ललनेला हेवा वाटावा अशा मंडवा किंवा शेखावतीमधल्या हवेल्या सजल्या आहेत. बाहेरच्या मुख्य दरवाजाच्या पोटात दोन छोटे दरवाजे असत. हा प्रकार कुठल्याही जुन्या वाडय़ात तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मुख्य दरवाजातून तुम्ही आत गेलात की, मग बैठक येते. तिथे बैठका होत असल्यामुळे, सण साजरे होत असल्यामुळे किंवा चक्क व्यापार होत असल्यामुळे कुणीही येऊ शके. मात्र नंतर समोर एक भिंत असे आणि त्या भिंतीपलीकडे अंतःगृह. त्या भिंतींना दरवाजा असे. त्या दरवाजातून आत शिरायचे. मंडवामध्ये या दरवाजाच्या फ्रेम्स लाकडी आहेत. शेखावतच्या इतर भागात त्या दगडी आहेत. त्या दरवाजावर तुम्हाला आजही तोरणं दिसतात. बऱ्याच दारांवर तुटलेली तोरणं! ती का लटकतात ठाऊक आहे? एक गमतीदार रूढी होती. घरावर तोरणं म्हणजे त्या घरातल्या मुलीचं लग्न झालंय. रूढी अशी की, मुलाची वरात तिथे येते. त्याला अडवण्यात येते. लुटूपुटूची लढाई होते. मग एका झाडाच्या फांदीने तो दरवाजाच्या किंटलला स्पर्श करतो तेव्हा तो लढाई जिंकतो. राजकन्या सर करतो. त्यावेळी दरवाजावर तोरण लावलं जातं. ते तोरण लाकूड आणि धातूचं बनवलेलं असतं. त्यावर पोपटाचं डिझाईन असतं. पोपट का? चिमणी, घार, गरुड का नाही? तर पोपट हा प्रेमाचा निरोप पोचवणारा दूत! थोडक्यात तो ‘राजपुत्रीला’ प्रेमाचा निरोप पोहोचवतो आणि बनिया राजकन्येला पळवून न्यायला, तेसुद्धा लढून! कल्पना वाईट नाही, पण पुरुषी अहंकाराला फुंकर घालणारी आहे. राजकन्या जिंकायची असते या ‘रामायण’- ‘महाभारत’ समाजाचं हे अंधानुकरण आहे. ती राजकुमारी एकदा पडदानशीन झाली की, अंतःपुरात अदृश्य होते. कारण या बैठकीतला दरवाजा सर्वांसाठी उघडत नाही. ज्या भिंतीत तो बसवलेला असतो त्याला बारीक जाळी लावलेली असते. म्हणजे कोण बाहेरून आलंय ते कळत असे. बाहेरून येणाऱ्या माणसाने, विशेषतः पुरुषाने त्या दरवाजावरची लोखंडी साखळी हाताने वाजवायची. मग कुटुंबातली एक वयस्कर स्त्री येऊन कोण आलंय याचा अंदाज घ्यायची. फक्त बायका किंवा घरातले पुरुष किंवा अत्यंत जवळचे मित्र यांना आत प्रवेश मिळे आणि त्यावेळी घरातल्या महिलांना चेहऱ्यावर पदर ओढून घ्यायचं फर्मान सोडले जाई. राजकुमारी होण्यापेक्षा ‘लहान’ कुमारी राहणं जास्त सुसहय़ होतं. कारण बंधनं कमी होती.

कुटुंबं मोठी असल्यामुळे त्यावेळी घरात दोन-तीन स्वयंपाकघरे असावीत. कारण काही जुन्या हवेल्यांत त्या स्वयंपाकघरातल्या जाळाने खराब झालेल्या भिंती दिसतात. अगदी जुन्या हवेलीत बाथरूम किंवा संडासाचा मागमूस नाही. त्या काळात पुरुष तर कपडय़ांवर उघडय़ाने आंघोळ करत. इंग्रज आले. ते काही आधुनिक गोष्टी घेऊन आले. त्यानंतर या हवेलीमध्ये संडास-बाथरूमची सोय झाली. एखाददोन हवेल्यांत सेप्टिक टँकही दिसतात. मी ज्या हॉटेलात रहात होतो ते हॉटेल म्हणजे हवेलीचं रूपांतर केलेलं हॉटेल होतं. तिथे गच्च्यांवर काही शयनखोल्या होत्या आणि बाहेर गच्ची! का ठाऊक आहे? राजस्थानात उन्हाळय़ात खोलीत झोपणं कठीण असतं. दिवसभराचं ऊन विटा, मॉर्टर शोषून घेते आणि रात्री भट्टी होते. त्यामुळे ती कुटुंबं त्यावेळी गच्चीत झोपत.

इंग्रज आले, भारतात स्थिरावले. त्यानंतर बनियांचा धंदा वाढला. पैसे खुळखुळू लागले. मग या हवेल्या अधिकाधिक मोठय़ा आणि सुंदर झाल्या. भिंती म्युरल्सने रंगवल्या गेल्या. काळाप्रमाणे चित्रं बदलत गेली. चित्रातल्या देव, पक्षी, नक्षींची जागा इंग्रज सैनिक, राण्या यांनी घेतली. त्यांच्या दरवाजावर आपल्याला गणपती दिसतो. तो म्हणजे बुद्धीचा देव. पण सामाजिक बदल पटकन घडवून आणण्याची बुद्धी त्यांना झाली नाही. पिंजरा रंगीबेरंगी झाला एवढंच. या हवेलीतली चित्रं, त्यातला बदल याबद्दल पुढच्या भागात.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २ फेब्रुवारी २०२०)


राजस्थानी गवंड्यांना भारतात प्रचंड मान आहे. इंजिनीयर म्हणून काम करताना प्लास्टर किंवा लाद्यांचे (Tiles) सर्वोत्तम काम आम्ही फक्त राजस्थानी ‘कडियां’कडे (गवंडी) सोपवत होतो. उत्तम कारागिरी आणि तुफान वेग ही त्यांची खासियत. शेखावतीतल्या मंडवाला गेल्यावर मला त्यांचे मूळ सापडलं. 

शेखावती हवेल्या रंगवणारी हीच ती जमात. जास्त करून जयपूरकडून आलेली. मागच्या जोधपूरवरच्या एका लेखात मी जोधपूरच्या फूल महालाचा उल्लेख केलेला आठवतो? फुलांची अफलातून सुंदर चित्रकला आहे, ती या जयपूरच्या गवंडय़ांची. १८३३ साली टी. एस. हेण्डले नावाच्या एका ब्रिटिश लेखकाने तो फूल महाल पाहिल्यावर लिहिलं होतं. "The finest Interior. The writer has seen of a painted interior is the Phul Mahal or Flower Palace at Jodhpure. the fifteen years work of a Jepore artist." त्या काळी जयपूरचा उच्चार जेपूर करत. म्हणून ते स्पेलिंग. जयपूर ही ‘भारतीय भिंती चित्रा’ची राजधानी होती. १७३०च्या सुमारास पहिल्या बाजीरावाने शनिवारवाडय़ाचे काम पूर्ण केलं. त्यावेळी वाडय़ाच्या आतल्या भिंती सुशोभित करण्यासाठी बाजीरावाने जयपूरच्या कारागिरांनाच बोलावलं होतं. दुर्दैवाने त्यावेळच्या गवंडी-चित्रकारांना लिहिता येत नव्हतं. त्यामुळे पेंटिंगच्या खाली त्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. एकोणीसाव्या शतकातली जी पेंटिंग्ज आहेत त्यावर काही ठिकाणी स्वाक्षऱ्या आहेत. कारण तोपर्यंत लिहिता वाचता येणं हळूहळू खालच्या थरापर्यंत झिरपत होतं. जातीय व्यवस्था आपल्या किती अंगात भिनली होती पाहा. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या काळात काही चित्रांवर कारागिराच्या स्वाक्षऱ्या आणि ते चित्र पूर्ण केल्याची तारीख पाहायला मिळते. त्या स्वाक्षऱ्यांबरोबर त्यांनी त्यांच्या शहराचे किंवा गावाचे नाव लिहिलेलं असतंच. पण पुढे ‘जात’सुद्धा लिहिलेली असते. ते हिंदू चित्रकार स्वतःला ‘कुंभार’ म्हणवून घेत. याचा अर्थ कुंभार फक्त मडकी तयार करत नसत. प्लास्टर करत, नक्षीकाम करत आणि पेंटिंगसुद्धा करत. मुस्लिमात जात नसते असं म्हटलं जातं. जातिविरहित समाज वगैरे! पण भारतीय मुसलमानांनी थोडीफार जातिव्यवस्था हिंदूंपासून उसनी घेतली होती. जे आपल्या नावापुढे ‘चेजारा’ असं लिहीत. म्हणजे कुंभार. त्यांच्या कलेच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. मंडवातला एक कलावंत उजव्या आणि डाव्या हाताने एकाच वेळी कृष्णाची दोन चित्रे काढायचा आणि ती पूर्ण झाल्यावर लक्षात यायचं की दोन्ही चित्रात काहीही फरक नाही. एक कालखान नावाचा चित्रकार हुबेहूब चित्रं काढायचा. तो गर्वाने म्हणायचा, "माझ्याकडे एकच गुणवत्ता नाही. ती म्हणजे या चित्रात प्राण फुंकण्याची." पण त्याची कबुतरं पाहिली की पटतं की ती उडून कुठल्याही क्षणी आपल्या खांद्यावर येऊन बसू शकतील. पण बालूराम या चित्रकाराचे नाव मंडवामध्ये फार कौतुकाने घेतलं जातं. त्याने आधी कुंभाराचं काम केलं आणि मग त्याला पेंटिंगची आवड निर्माण झाली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी तो गेला. पण तो तिथला ‘पिकॅसो’ मानला गेला. काही ‘माळी’ जमातीतली मंडळीही पेंटरवाली. त्यांच्या स्वाक्षरीपुढे ‘माळी’ जात लिहिलेली आहे. जातीय बिल्ला मिरवण्याची ही त्या काळची वृत्ती रक्तगट बनून भारतीय माणसाच्या शरीरात वावरत होती.

आता हे सर्व कारागीर कुठे आहेत? हा प्रश्न माझ्याप्रमाणे तुमच्याही जिभेवर आला असेल ना? ते बहुतेक आता पुन्हा गवंडी झाले आहेत आणि भारताच्या काही शहरात दिसतील किंवा आखातात. कारण आता हवेल्या कोसळायला आल्या आहेत आणि त्यांना ‘औषधपाणी’ही कोण देत नाही. काही चित्रं आता धुसर व्हायला लागली आहेत. विशेषतः त्यातल्या त्यात जुनी चित्रे. हा फक्त काळाचा महिमा नाही. जुन्या काळातले रंग नंतर आलेल्या जर्मन रंगाएवढे दर्जेदार नव्हते. ही चित्रे काढताना त्या भिंतीवर चढण्यासाठी परांची बांधली जाई. त्यामुळे त्या चित्रांकडे बारकाईने पाहिलं तर आदल्या दिवशी जिथे चित्र संपलं आणि जिथून दुसऱया दिवशी सुरू झालंय ते ‘सांधे’ ओळखता येतात. एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की ही चित्रे काढताना स्टेन्सिल्सचा वापर केला होता का? पण तिथले गाईड सांगतात की नाही. चित्रं आठवणींतून फ्री हॅण्ड काढली गेलेली आहेत. या चित्रांचे विषय विविध आहेत. धार्मिक पुराण, ऐतिहासिक, रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी, प्राणी आणि झाडे, कामचित्रं, नकाशे आणि गाव आणि महत्त्वाचं ब्रिटीश, सैनिक, राणी वगैरे वगैरे. पुराणकथा किंवा त्याला आपण ‘फोकटेल्स’ म्हणूया, त्या चितारलेल्या दिसतात. विशेषतः लैला-मजून, हिर-रांझा, सोनी-महिवाल वगैरे.

स्वातंत्र्य चळवळीवर आधारित काही चित्रं मी मंडवात पाहिली. ते चित्र १९४०च्या दशकातलं असावं. बहुदा १९४२च्या नंतर, ‘चले जाव’च्या चळवळीनंतर. कारण चित्र असं होतं, भारतमातेच्या हातात तिरंगा आहे आणि तिचा पाय पाठीवर बॅग असलेल्या इंग्रजावर आहे. त्याच्या चेहऱ्यावर भयाची भावना आहे. Quit India (चले जाव) लिहिलंय. अर्थात बरोबर महात्माजी आणि पंडित नेहरूंची चित्रं आहेतच.

कामचित्रं बिनधास्तपणे काढलेली दिसतात. म्हणजे ज्या काळात माणसं गुदमरलेले कामजीवन जगत होते त्या काळात चक्क ही कामचित्रं बाहेरच्या भिंतीवर जास्त दिसतात आणि शयनगृहात खूपच कमी. काही ठिकाणी नग्न किंवा अर्धनग्न स्त्री आपलं सौष्ठव दाखवताना दिसते. काही प्रणयचित्रंदेखील आहेत, पण मंडवात १९८४नंतर संस्कृतीरक्षकांनी ती पुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज फार थोडी प्रणयचित्रे तिथे दिसतात.

ब्रिटिश राज्यकर्ते आणि त्यामुळे झालेला बदल हा त्या चित्रांमध्ये फार मोठय़ा प्रमाणात दिसतो. त्या काळात ‘आगगाडी’ नवी होती. ती राजस्थानातही आलेली होती. त्यामुळे त्यांची चित्रं दिसतात. एका हवेलीतल्या चित्रात एक ब्रिटिश माणूस फोन करताना पाहता येतो. फोन त्या वेळी नुकताच आला होता. ब्रिटिश पुरुष-स्त्रिया बऱ्याच चित्रात हातात मद्याची बाटली किंवा प्याला घेऊन दाखवलेल्या आहेत. कॅमेऱ्याने फोटो काढणारी स्त्री, मिलिट्रीच्या वेषातले सुभाषचंद्र बोस ही चित्रे कलात्मकदृष्टय़ा फार वरच्या दर्जाची नाहीत. पण कलाकारांना उपलब्ध असणारे साहित्य, रंग, वेळ याचा विचार केला तर तो एक ठेवा नक्की आहे, जो श्रीमंत बनियांनी वापरायलाच हवा.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, ९ फेब्रुवारी २०२०)


राजस्थानमध्ये ‘म्युरल्स’ पाहत फिरत असताना माझ्या मनात सतत नॉर्दर्न आयर्लंडमधलं बेलफास्ट शहर डोळय़ात तरळत होतं. 

ते एक असं शहर आहे जिथे भिंतिचित्रं (त्याला ते म्युरल्स म्हणतात.) जागोजागी दिसतात आणि त्यातल्या त्यात जिथे कामगार वस्ती आहे तिथे! राजस्थानात अशी चित्रं आणि शिल्पं ही श्रीमंतीची, सत्तेची निशाणी आहे. बेलफास्टमधली भिंतिचित्रं ही राजकीय आणि सामाजिक क्रांतीची चित्रं आहेत. बेलफास्ट आणि डेरीमधल्या भिंतिचित्रांचं वर्णन ‘युरोपमधली सर्वात सुप्रसिद्ध म्युरल्स’ असं नक्की करता येईल. जवळजवळ दोन हजारांच्या आसपास भिंतिचित्रं पाहायला मिळतात. ती घराच्या किंवा कंपाऊंडच्या भिंतींवर असल्याने बेलफास्ट बस, टॅक्सी किंवा ट्रमने फिरताना ती आपल्याला दिसतात. पण जर तुम्हाला त्यात विशेष रस असेल तर तिथे ‘ब्लॅक टॅक्सी टुर्स’ मिळतात. टॅक्सीवाला तुम्हाला तिथे घेऊन जातो आणि तुम्ही ती जास्त चांगल्या रीतीने अभ्यासू शकता. 

‘द बेलफास्ट म्युरल गाईड’ हे पुस्तक २०१४ साली प्रसिद्ध झालं. त्यात त्यांनी म्हटलंय की, किमान तीनशे दर्जेदार भिंतिचित्रं तुम्हाला पाहायला मिळतात. जवळपास दोन हजारांच्या आसपास भिंतिचित्रं तिथे आहेत. त्यातली उत्तम अवस्थेतली आणि दर्जेदार तीनशे म्हटल्यावर कलाकारांच्या क्षमतेची तुम्हाला कल्पना येईल. अर्थात निव्वळ कलात्मक चष्म्यातून त्याच्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. ती चित्रं पाहताना तुमच्या चष्म्याची एक काच क्रांतीची आणि दुसरी इतिहासाची हवी. तरच त्या चित्रांचा अर्थ उलगडत जातो. त्यासाठी तुम्हाला आयर्लंडच्या इतिहासाची माहिती लागेलच. तिथे एक सुंदर म्युरल आयर्लंडच्या ऐतिहासिक दुष्काळावर आहे, पण त्याचं नीट आकलन होण्यासाठी किंवा त्याची सौंदर्यमिमांसा करण्यासाठी तो इतिहास तुम्हाला ठाऊक हवा. त्या दुष्काळात दीड लाख माणसं मेली आणि काळ कुठला तर १८४५ ते १८४९, जेव्हा आयर्लंडची लोकसंख्या खूपच कमी होती. त्यात जर्जर झालेली आयरिश माणसं दाखवली आहेत आणि म्हटलंय ‘Britains Genocide by starvation’ म्हणजे त्या वेळचे जे ब्रिटिश राज्यकर्ते आहेत त्यांनी जनतेला भुकेले ठेवून नरसंहार केला असं म्हटलंय. ते समजण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्ते कसे क्रूरतेने वागले हे वाचायला हवे. 

आयर्लंडच्या इतिहासाबद्दल मी जेव्हा आधी आयर्लंडबद्दल लिहित होतो तेव्हा त्याविषयी लिहिलंय. आयर्लंडमधल्या अनेक लढाऊ संघटनांनी स्वतःला ‘आयआरए’ (आयरिश रिपब्लिकन आर्मी) म्हणून घेतलंय. पण सुरुवात झाली पहिल्या महायुद्धाच्या वेळी. जसं नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेत ब्रिटिश फौजातले हिंदुस्थानी ब्रिटनविरुद्ध लढले तसंच काहीसं आयर्लंडमध्ये झालं. आयर्लंडचे ब्रिटिश फौजेतले सैनिक बाहेर पडले आणि ते स्वातंत्र्ययुद्ध लढले. आयर्लंड स्वतंत्र झालं. म्हणजे दक्षिण आयर्लंड स्वतंत्र देश झाला. आधी तो ब्रिटनबरोबर कॉमनवेल्थमध्ये होता, नंतर युरोपियन युनियनमध्ये तो सामील झाला. पण ब्रिटिशांच्या दुफळी करण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी आयर्लंडची फाळणी केली. उत्तर आयर्लंडचा काही भाग त्यांनी स्वतःजवळ ठेवला. त्यामुळे काही मंडळींनी ब्रिटिशांविरुद्ध अंतर्गत लढाई सुरू ठेवली. ते स्वतःला ‘आयआरए’ म्हणवून घेत. ‘आयआरए’चा एक आवडता छंद होता. स्वतःचे तुकडे करणे. आपल्याकडे जसा समाजवादी पक्ष वारंवार फुटला. संयुक्त समाजवादी, प्रजा समाजवादी, जनता पक्ष, . . . कितीतरी त्यांची रूपं झाली. तेच ‘आयआरए’चं झालं. १९६९ साली त्यातल्या एका गटाने मार्क्सवादी तत्त्व प्रणाली स्वीकारली आणि त्यातून 'वर्कर्स पार्टी ऑफ आयर्लंड' हा राजकीय पक्ष निर्माण झाला. आमचा ब्लॅककॅबचा ड्रायव्हर त्या पार्टीचा होता. त्याचा भाऊ त्यांच्या चळवळीत मारला गेला होता. तो ड्रायव्हर स्वतः गोळी लागून जखमी झाला होता. तुरुंगातही राहून आला होता. त्याने स्वतःची ओळख करून देताना मला सांगितलं, ‘मी मार्क्सवादी आहे.’ तरीही मी थोडय़ा कुजकटपणे विचारलं, ‘कॅथलिक की प्रोटेस्टंट?’ तो पण हुशार होता. तो म्हणाला, ‘जन्माने कॅथलिक, पण आता निरिश्वरवादी.’

किती वर्षांनी मला मार्क्सवादी माणूस अभिमानाने ‘मी मार्क्सवादी’ असं सांगत होता. पूर्व युरोपातून साम्यवाद गेल्यापासून चीन हा एकमेव साम्यवादी देश उरलाय. तोसुद्धा नावापुरता आणि हो, फिडेल कॅस्ट्रोचा क्युबा! अमेरिकेत तर कम्युनिस्ट पार्टीत दहा मेंबर असतील तर पाच सीआयएचे मेंबर असायचे. त्यांच्यावर पाळत ठेवायला. भारतात आज मार्क्सवादी विचार मांडला तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवलं जातं. पण या पार्टीची अवस्था तिथे खूप चांगली आहे. ती तिथली दुसरी मोठी पार्टी झालीय. 

तो मला प्रथम शांतता भिंत (Peacewall) दाखवायला घेऊन गेला. या भिंतीवर अनेक चित्रं आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल शांतता भिंत म्हणजे काय? बेलफास्टमध्ये कॅथलिक रिपब्लिकन्स आणि लॉयलिस्ट प्रोटेस्टंट जिथे मोठय़ा संख्येने राहतात त्यांच्यामध्ये या भिंती बांधल्या आहेत. त्यावर अनेक क्रांतीची म्युरल्स आहेत. त्या भिंतींना दरवाजे आहेत. संध्याकाळी सात वाजता दरवाजे बंद होतात आणि सकाळी सात वाजता उघडतात. दिवसभर त्या भिंतीतून आरपार जाता येते. कॅथलिक मंडळींचा कल अखंड आयर्लंडकडे आहे. प्रोटेस्टंट ख्रिश्चन ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्यात ठिणग्या उडतात. त्यातून आग फोफावू नये म्हणून या शांतता भिंती उभारल्या आहेत. शांतता भिंतीपलीकडची वस्ती धुमसतेय हे जाणवतं. निखाऱ्यांवर राख जमलीय. पण ‘राष्ट्रपेमा’च्या एका फुंकरीत ही राख जाऊन पुन्हा निखारे दिसू शकतात याची जाणीव तिथली शांतता देते. त्या निखाऱ्याबद्दल आणि चित्रातल्या निखाऱ्याबद्दल पुढच्या वेळी.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, १६ फेब्रुवारी)


बर्फात खेळण्याचा, बर्फात गारठलेलं गाव किंवा शहर पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. बर्फात खेळण्यासाठी जगभर अनेक जागा उन्हाळय़ातही उपलब्ध असतात, पण बर्फ पडताना मी आयुष्यात फक्त दोनदा पाहिलाय. एकदा लंडनमध्ये आणि एकदा मनालीत. हिमाचल प्रदेशात. ती दोन्ही दृष्ये मनातल्या म्युझियममध्ये मी जपून ठेवली आहेत.

बर्फाइतकं नसेल, पण थोडं वेगळं सौंदर्य वाळूला आहे. लहानपण मुंबईत चौपाटीच्या वाळूत खेळण्यात गेल्यामुळे असेल, पण बर्फाएवढं कौतुक मला वाळूचं वाटत नाही. दुबई असो किंवा जैसलमेर, वाळूची सफर मी सोडलेली नाही आणि वाळूही मी एन्जॉय केलीय. जैसलमेरची उन्हात चमकणारी वाळू जेवढी मस्त दिसते आणि तप्त वाटते, तेवढीच ती सूर्यास्ताच्या वेळी किंवा चंद्रप्रकाशात हवीहवीशी आणि शांत वाटते. यावेळी जैसलमेरला सूर्य अस्ताला जात असताना आम्ही वाळवंटात होतो ते दृष्यही मी पिकासो किंवा रविवर्माच्या एखाद्या पेटिंगप्रमाणे त्या म्युझियममध्ये लटकवून टाकलंय. केवढे ते बदलते रंग! सोनेरी, लाल, भगवे! बदलत्या रंगाच्या आकाशाकडे सरडय़ानेही विस्मयाने पाहावं असं ते आकाश! त्या रंगाप्रमाणे वाळू आपले कपडे बदलते. सूर्याने एकदा ‘सायोनारा’ म्हटलं की, ती उफाळलेली वाळू शांत होते.

वाळूचे छोटे डेंगर ज्याला इंग्लिशमध्ये ‘डय़ून्स’ म्हणतात, ते बऱ्याचदा बदलत असतात. विशेषतः आकाराने! समुद्राच्या लाटांच्या जवळ जाणारा त्यांचा आकृतिबंध. त्या डय़ून्सवर गाडीने फिरताना एक प्रकारचा रोलर कोस्टर परिणाम जाणवतो. डय़ूनवर चढणं आणि धाडकन उतरणं यातली गंमत अनुभवल्यावर कळते. दुबईत जेव्हा मी डेझर्ट-सफारी’ केली तेव्हा डय़ून्स मोठे होते आणि गाडय़ा फोर व्हील ड्राईव्ह. त्यामुळे जैसलमेरपेक्षा काकणभर जास्त मजा आली, पण तरीही जैसलमेरचे सौंदर्य वेगळं आहे. त्यात ते वाळूत उंटाचं डुलत डुलत चालणं आणि त्या उंटावर आपण बसलेलं असणं ही गंमतच वेगळी आहे. उंटावर बसल्यावर उंटावरून एकेकाळी लढणाऱ्या शूरवीरांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला. इ. स. ७१७ मध्ये जेव्हा महमद कासीमने भारतावर हल्ला केला तेव्हा तो तीन हजार उंटांवरचे स्वार घेऊन आला होता. महमद गझनीचा तर चरितार्थच सोमनाथ लुटण्यावर चालला आणि आपणही एकदा सोमनाथ गझनीने लुटलं की, पुन्हा ते हिऱ्या-सोन्याने भरून ठेवायचो. आपलं भरणं झालं की, तो पुन्हा यायचा आणि लुटायचा. तर त्यावेळी तो हजारो उंटांचा उपयोग करायचा. वाळवंटातून जाताना पाणी आणि लूट नेण्यासाठी या उंटांचा उपयोग होत असे. नंतर मग अकबर आणि राजपूत राजांनी ‘उंटस्वार’ तयार केले. ब्रिटिशांनी या राजपूत राजांच्या उंटस्वारांचा मध्य आशिया, इजिप्त वगैरे ठिकाणी युद्धासाठी उपयोग केला. उंट पाचसहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतो आणि पाणी मिळालं की, एकावेळी पासष्ट लिटर पाणी पिऊ शकतो. असो. बिकानेरमधल्या उंटाच्या प्रजोत्पादन संस्थेच्या निमित्ताने जेव्हा मी लेख लिहिला. त्यावेळी उंटाबद्दल खोलात जाऊन लिहिलंय, पण उंटाची सफर मी जैसलमेरला खूप वर्षांनी एन्जॉय केली.

उंटावरून परतल्यावर आपण तंबूत राहतो. तिथे रात्री एक नाचगाण्याचा कार्यक्रम होता. राजस्थानी मातीतलं गाणं (फोक साँग), नाच तिथल्या स्थानिक कलाकारांनी सादर केली. मी गेलो तेव्हा थंडी कडाक्याची नव्हती. एक पातळ जर्किन पुरेसा होता. ज्याला ‘गुलाबी’ हे विशेषण आपण लावतो तशी थंडी होती. त्यामुळे संध्याकाळ मजेत गेली, पण पाणी इतकं वाईट होतं की, सकाळी तोंड धुण्यापासून खाऊन चूळ भरण्यासाठीसुद्धा ‘बाटली’च्या पाण्याचा उपयोग करावा लागला. तुमच्यासाठी खास जेवण, मद्य वगैरेची थेट वाळवंटातही सोय केली जाऊ शकते. बऱ्याचदा युरोपियन जोडपी तो आस्वाद घेतात. तुम्ही किमान वाळूची सफर आणि तंबूतलं राहणं तरी अनुभवायला हवं. एक रात्र त्यासाठी नक्की राखून ठेवावी.

जैसलमेरची सफर तिथेच संपत नाही. तुम्ही गारीसर तलाव पाहायला हवा. तलाव तलावासारखा आहे. मध्ये एक ‘छत्री’ आहेत. छत्री म्हणजे राजे-महाराजे, सरदार यांना जिथे ‘चिरशांती’ दिली जाते ती जागा. तेथे एक सुंदर कलात्मक स्मारक उभं राहते. त्याला छत्री म्हणतात, पण तलावातली ही छत्री पाण्यात तरंगतेय असं वाटतं. या घाटली तलावाच्या प्रारंभी एक सुंदर कमान आहे. त्याला द्वार असं म्हणायलाही हरकत नाही. इ. स. १९०९ साली एका नायकिणीने ती उभारली असं म्हटलं जातं. ती नायकीण अतिशय देखणी होती. कमळासारखं तिचं रूप होतं. ती हसली की, ओठातून मध टपकतोय असं वाटायचं. अनेक श्रीमंत, व्यापारी, सावकार, सोनार, सरदार वगैरे मंडळी तिची गिऱ्हाईके होती. त्यामुळे तिने प्रचंड पैसाअडका जमवला आणि सामाजिक कामं केली. दुर्दैवाने ती नायकीण असल्यामुळे तिला ‘हलकी’ मानणारी माणसं समाजात होती. हे द्वार पूर्ण होत असताना काही मंडळी राजाकडे गेली आणि म्हणाली, ‘‘एका नायकिणीने द्वार बांधणं हा ‘वाईट संकेत’ आहे. प्रत्येकाला पाण्यासाठी नायकिणीच्या दरवाजा खालून जायला लागणार.’’ राजाच तो, त्याने आज्ञा दिली, ‘‘ते द्वार तोडून टाका,’’ पण ती नायकीण (तिचं नाव तीलॉन) हुशार होती. तिचे काही पाठराखे होते. त्यांच्या मदतीने तिने त्या द्वारावर विष्णूचे देऊळ बांधून टाकलं. आता सनातन्यांची पंचाईत झाली. विष्णूचं देऊळ कसं तोडणार? त्यामुळे द्वार टिकलं आणि त्या नायकिणीचं नावसुद्धा? त्या देखण्या नायकिणीला स्थापत्य कलेतल्या सौंदर्याचीसुद्धा जाण असावी. त्या द्वारावरचं दगडी नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. कला किंवा कलेतून मांडलं जाणारं श्रीमंतीचं प्रदर्शन ही फक्त श्रीमंत मारवाडी व्यापाऱ्यांची मक्तेदारी नाही हे त्या नायकिणीने दाखवून दिलंय. पददलितांनाही सामाजिक जाणीव असते, सौंदर्यदृष्टी असते. त्यामुळे ते द्वार मला इतर हवेल्यांइतकंच महत्त्वाचं वाटलं.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २२ डिसेंबर २०१९)


डोळे ही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची सर्वात आकर्षक, लक्षणीय गोष्ट आहे. जैसलमेरच्या बाबतीत तिथल्या हवेल्या हे ‘ऐश्वर्याचे डोळे’ आहेत. त्या पाहताना माणूस विस्मयचकित होऊन स्तब्ध होतो. सुरवंटातून निपजणारं रंगीबेरंगी फुलपाखरू जेवढं गोड, धक्कादायक, तेवढंच सोकरी दगडाचं होणारं नक्षीकामातलं रूपांतर गोड धक्का देणारं.

‘हवेली’ हा शब्द पर्शियन भाषेतल्या ‘हवेली’ शब्दातून आपल्या हिंदीत आला. स्वतःच प्रशस्त घर! गंमत पहा, हवेलीची सुरुवात गुजरातमध्ये श्रीकृष्णाच्या घरापासून झाली. कृष्णासाठी बांधलेली घरं ही शिल्पकलेची प्रदर्शनं वाटायची. दगडावर काय काय गोष्टी कोरल्या जायच्या! राम-कृष्णाच्या आयुष्यातले प्रसंग, विष्णूचे अवतार वगैरेपासून गंधर्व, यक्ष, येशूचे एंजल्स आणि ब्रिटिश राजा-राणीपर्यंत. त्या हवेलीत पानघर (देवासाठी पानं), फूलघर (देवासाठी फुलांचे हार बनवणं), दर्जीघर (देवाचे कपडे शिवण्याची खोली), जलघर (देवासाठी पाणी), रसोईघर (देवासाठी प्रसाद बनवणे) वगैरे खोल्या असत. हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा ख्रिस्ती माणूस, त्यांनी गरिबीत खितपत पडलेल्या माणसांसाठी क्वचित काहीतरी केले. त्यांच्या झोपडीला ‘घराचं’ रूपपण दिलं नाही, पण जो कधीच दिसत नाही, त्या देवासाठी आलिशान घरं उभारून तो मोकळा झाला. पुढे मारवाडय़ांनी ठरवलं की, आपली घरंही देवासारखी सुंदर असावीत. मग त्यांनी हवेल्या बांधल्या. ती परंपरा नंतर राजस्थानमधल्या शेखावती मंडळींनी उचलली. त्यांनी शिल्पकलेपेक्षा चित्रकलेचा वापर हवेलीचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला.

जैसलमेरमधल्या तीन महत्त्वाच्या हवेल्यांतून तुम्हाला फिरवून आणण्यापूर्वी तिथलं आर्किटेक्चर आणि कला याबद्दल सांगायला हवं.

जैसलमेरच्या भाटी राजपुतांचा विचार केला तर त्यांची इ.स. १२०० ते इ.स. १५०० ही तीनशे वर्षे मुस्लिमांच्या आक्रमणाला तोंड देण्यात गेली. ते सतत युद्धाच्या छायेत असत. मग त्यांनी अकबराला नातेवाईक करून घेतले. मांडलिकत्वाचा ‘कमीपणा’ स्वीकारल्यानंतर पुढे शांतता नांदायला लागली. तो काळ होता इ.स. १५०० ते इ.स. १८०० चा. त्यानंतर १२ डिसेंबर १८१८ला त्यांनी ब्रिटिशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'शी तह केला. म्हणजे त्यांचे संरक्षण ब्रिटिशांनी करायचं. इ.स. १८३८-३९ला पहिलं अफगाण युद्ध ब्रिटिश लढले. त्यावेळी जैसलमेरच्या राजाने ब्रिटिशांना उंट दिले. १८५७च्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळी जैसलमेरचं ‘राजपूत शौर्य’ तटस्थ होतं. किंबहुना अकबराशी नातं जुळल्यानंतर राणा प्रतापासारखी काही असीम शौर्याची उदाहरणे सोडली तर राजपूत राजे ऐश्वर्यात लोळत होते.

हे चांगलं की वाईट हे प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या चष्म्यातून पाहावं, पण त्यामुळे व्यापाराचा विकास झाला. व्यापारी, राजेमहाराजे यांच्या हातात पैसा खेळायला लागला आणि विविध कला, विशेषतः शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला यांचा विकास झाला. जैसलमेर इराण, इराक, अफगाणिस्तान, सिंध, चीन या देशांच्या व्यापाराच्या वाटेवर होते. हा मार्ग एकेकाळी ‘सिल्क रूट’ म्हणून सुप्रसिद्ध होता. त्यामुळे जैसलमेरमध्ये तूप, अफू, ज्वेलरी, सुका मेवा, मसाले वगैरेंचे बाजार उभे राहिले. त्यात व्यापारी आणि राजांनी पैसे कमविले आणि सुंदर हवेल्या उभ्या राहिल्या.

जैसलमेर हे शहर पंधराशेव्या शतकात किल्ल्याभोवती उभं राहिलं. तिथली घरं आणि घरांची आखणी दर्शविते की, हे शहरसुद्धा जातीव्यवस्थेप्रमाणे उभे राहिलंय. शहराच्या मध्यावर श्रीमंत, उच्चवर्णीय आणि व्यापारी कुटुंबीयांची मोठी घरं आहेत. ती दुमजली, सौंदर्यसंपन्न, कलात्मक आहेत. शहराच्या सीमारेषेवर दलित, शूद्र आणि गरीबांची मातीची घरं आहेत. श्रीमंत घरांच्या दर्शनी बाजूचं सौंदर्य कलाकुसरीने वाढवल्यामुळे हे शहर दगडावरच्या नक्षीकामाचं प्रदर्शन भरवल्यासारखं दिसतं. ज्यात स्थापत्यशास्त्र दिसतं. त्यात हिंदू, जैन आणि मुस्लिम परंपरांचा प्रभाव आहे. म्हणून तिथे स्वस्तिक, विष्णू, लक्ष्मी, गणेश, कृष्णही आहेत. इस्लामिक भूमितीचं नक्षीकाम, घुमट, मेहराब आहेत. जैन तोरणे आहेत आणि जैन तीर्थकारांचे पुतळे आहेत. दर्शनी भागातलं नक्षीकाम दगडावर नाही, तर लाकडावर केलंय असं वाटावं इतकी नजाकत त्या नक्षीकामात आहे. दगडातून इतकं नाजूक नक्षीकाम तयार करता येतं? हा प्रश्न वारंवार सतावतो. इमारतीचे दगड हे चुन्याचे नाहीत तर बॉल आणि सॉकेट जॉइंटने एकमेकाला जोडले आहेत. जैसलमेरमध्ये स्थापत्य शास्त्रज्ञांना ‘गजधर’ म्हणत. ‘गजधर’ संपूर्ण इमारतीची आखणी करत असे. शिल्पकला करणाऱ्यांना ‘सिलावत’ म्हणत. वर्षानुवर्षे काम चाले, पण ते कधी थकत नसत. त्यातूनच पटवा, नथमल किंवा सलाम सिंगसारख्या हवेल्या उभ्या राहिल्या.

इ.स. १८०० ते १८६० या काळात जैनांमधल्या बाफा ओसवाल कुटुंबातल्या पाच भावांनी पाच हवेल्या बांधल्या. जैसलमेरच्या राजांनी त्यांना ‘पटवी’ हे टायटल दिले. त्यामुळे ते पटवा म्हणून ओळखले जायला लागले. ते आधी दागिन्यांसाठी सोन्याचांदीचे धागे बनवत. नंतर त्यांनी अफू आणि हिरे, माणकांच्या धंद्यात अफाट कमाई केली. इतकी की, ते राजाला पैसे उधार देत. उदयपूरचा राजा त्यांच्याकडून कर्ज घेई. एका छोटय़ा गल्लीत या पाच हवेल्या आहेत. त्या हवेल्यांच्या खिडक्या, बाल्कन्या वगैरे तोडून नंतर आपल्या घराला जोडाव्यात असं वाटतं राहतं. इतकं त्यावरचं नक्षीकाम सुंदर आणि नाजूक आहे. त्याचबरोबर एकदम सिमेट्रिकल! भूमितीत चूक नाही. त्यांच्या तळमजला उंचावर असे. मग वरचे मजले सुरू होतात. गुडघे दुखत असले तरी मनाचा हिय्या करून वर चढाच. त्यांच्या दिवाणखान्याचा ‘काचमहाल’ केलाय! रंगीबेरंगी काचांच्या तुकडय़ांनी भिंती, खांब, छत वगैरे सुशोभित केलंय. तसंही इतर खोल्यांमध्ये ‘‘सजावट केली नाही तर शिक्षा ठोठावली जाईल’’ असा सज्जड दम देऊन आर्किटेक्टकडून काम करून घेतलं असं वाटतं. छत लाकडाचं आहे आणि त्यावर सोन्याची नक्षी आहे. प्रत्येक खिडकी, बाल्कनी, कमानीला वेगळं नक्षीकाम, पेंटिंग किंवा शिल्पकला! आणि विचार करा, हवेलीला साठ बाल्कन्या आहेत. काही कलाकारांनी संपूर्ण हयात या हवेल्या तयार करताना घालवली असेल. सुंदर स्त्री दिसली की, प्रेमळ मन तिच्यावर बसतं. हवेली पाहिली की, कलात्मक मन तिच्यावर जडतं.

अशीच पाहण्यासारखी हवेली म्हणजे नथमल या दिवाणाची हवेली. ही हवेली हायू आणि लालू या दोन आर्किटेक्ट भावांनी तयार केली. त्यांनी काय केलं असेल? हवेली दोन भागांत वाटून घेतली. एकाने उजवी बाजू, दुसऱ्याने डावी! एकाचं ड्रॉइंग दुसऱ्याला ठाऊक नाही. दोन भावांमध्ये सुदृढ स्पर्धा होती. इमारत पाहताना एकरूपता जाणवते, पण त्या एकरूपतेतही वैविध्य आहे. या हवेलीवर शेखावती परंपरेची छाप आहे. कारण दर्शनी भागावर पेंटिंग काढलेली आहेत. त्यात पक्षी, हत्ती, शिपायापासून थेट सायकल आणि वाफेच्या इंजिनाचं पेंटिंग आहे. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव त्यावर दिसतो. त्या हवेलीत आजही दिवाणाची आजची पिढी राहते.

जमलं तर सलाम सिंगची हवेलीसुद्धा पहा. माणूस वाईट, क्रूर, खुनी. त्याबद्दल पुढच्या वेळी बोलतोच. एका जुन्या हवेलीवर त्याने नवी हवेली चढवली. त्या हवेलीचा सर्वात वरचा मजला आणि छप्पर अफाट सुंदर आहे. नक्षीकाम म्हणजे भरजरी शालूला हेवा वाटावा असे. गच्चीवर प्रत्येक कमानीवर मोर आहेत. जणू एका साच्यातून काढले आहेत. त्या हवेलीच्या बोटीच्या आकारामुळे त्याला जहाज महालही म्हणतात.

जैसलमेर पाहताना दगडी नक्षीकामाचं कधी कधी अजीर्ण होतं, पण हे अजीर्ण त्रासदायक नाही. डोळे सुखावतात, मन आणि बुद्धी त्या कलावंतांना सलाम ठोकते.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, १५ डिसेंबर २०१९)


जैसलमेरमध्ये आम्ही राहत होतो. त्या हॉटेलचं नाव होतं नाचना हवेली. सौंदर्यवती तिथे नाचत असाव्यात आणि राजा नेत्रसुख लुटत असावा या माझ्या कयासाच्या त्या हॉटेलच्या मालकाने चिंधड्या उडवल्या. कुणा एका राजपूत सरदारच्या गावाचं नाव नाचना होतं. आजचा मालक त्या सरदाराच्या वंशावळीतला होता. चांगलं हिंदी, इंग्लिश बोलतानाही त्याच्या तोंडात ‘हुजुर’ हा शब्द इंग्रजांच्या तोंडात ‘थॅन्क यू’ जसा घर करून बसलेला असतो तसा बसलेला होता. वंशपरंपरा काही शब्द घट्ट धरून ठेवते. हवेली मस्त होती. माझी ‘सुईट रूम’ सरदाराची किंवा त्याच्या मुलाची बेडरूम (शयनगृह) असावी.


ब्रिटिशांच्या काळात त्या सरदाराने एक मोठा टबसुद्धा त्यात ठेवला हाता. हवेली हवेलीसारखी सजवल्याने फोटो सेशनची हौस मी भागवून घेतली. ही हवेली तिथल्या ‘माणिक चौक’ या प्रमुख बाजारपेठेच्या पायाशीच होती. तिथून रस्ता पुढे जैसलमेरच्या किल्ल्याकडे जात होता. हा किल्ला तब्बल दोनशे पन्नास फूट उंच आहे आणि त्याला तीन भिंती आहेत. या भिंती सॅण्डस्टोनच्या आहेत. सॅण्डस्टोनचे दोन गुणधर्म फार महत्त्वाचे. एक म्हणजे अस्मानीच्या सुलतानीचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. ऊन, पाऊस, गारठा वगैरे नैसर्गिक सुलतानी तो समर्थपणे झेलतो आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकुसर करण्यासाठी तो उत्तम दगड आहे. थोडक्यात 'आखूडशिंगी बहुदुधी'! तीन भिंती उभारण्यामागचे तत्त्व म्हणजे डोंगरावरून घसरणारे दगड रोखणे आणि शत्रूने चाल केली तर त्याला तीन भिंती ओलांडाव्या लागतं आणि तो दोन भिंतीत सापडला की, सर्वात आतल्या भिंतीवरून त्याच्यावर दगड, गरम पाणी, गरम तेल ओतलं जाई. सतराव्या शतकात आपल्या भिंतीना व्यापून बुरूज उभारले गेले. साधारण १६३३ ते १६४७ च्या सुमारास! त्यावर तोफा ठेवल्या गेल्या.


त्या किल्ल्यावर जायला चार दरवाजे आहेत ते अर्थात चढणावर आणि नागमोडी वळणावर आहेत. वर रिक्षाने (टुकटुक) जाता येतं पण ज्याच्या छातीत आणि पायात दम आहे, त्यांनी वर चढत जावं. पहिलं द्वार हे गणेश पोळ. मग सुरज पोळ, भूत पोळ आणि हवा पोळ. प्रत्येक द्वार वळणावर असल्यामुळे शत्रूला मोठय़ा संख्येने वर चढणं कठीण जात असे. पहिले द्वार त्या बाजाराजवळ आहे. सुरज पोळकडे जाणाऱ्या रस्त्याचा चढ पन्नास-साठ अंशाचा असेल. तीन घोडेस्वार गड चढू शकतील एवढाच रस्ता रुंद आहे. तिसरा दरवाजा भूत दरवाजा. किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करताना इथे अनेक सैनिकांचं रक्त सांडलय. म्हणून त्याला भूतद्वार म्हणतात. इथेच गणपतीचं आणि भवानी देवीचं मंदिर आहे. गणपती हा सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून त्याचं मंदिर तिथे बांधलं गेलय असं सांगितलं जातं. आई भवानीमाता ही शूरवीर भाटी राजपूतांची रक्षणकर्ती असं मानलं जातं. भवानीमाता ही शिवाजी महाराजांचीसुद्धा! आम्ही राहत होतो त्या नाचना हवेलीचा मालक राजपुतांच्या शौर्यकथा मला सांगत होता. राजस्थान हे शौर्यभूमीच दुसरं नाव आहे. हे त्याच्या प्रत्येक शब्दातून ध्वनित होत होतं. तेव्हा मी म्हटलं, ‘महाराष्ट्र हीसुद्धा शूरवीरांची भूमी आहे. शिवाजी महाराज आणि अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठय़ांना विसरू नका.’ तो हवेली मालक पटकन म्हणाला, ‘शिवाजी महाराज पण मूळचे बिसोदिया राजपूत.’


शेवटचं द्वार आहे हवा पोळ. त्यासमोर राजमहाल आणि एक प्रशस्त चौक आहे. तिथे एक चौथरा आहे. त्यावर एक सिंहासन आहे. तिथे राजा बसायचा. आजूबाजूला राजपुत्र, मंत्री, सरदार असत. तिथे लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली जात. तिथेच तो आपल्या सैनिकांशी बोलत असे. दुसरा एखादा राजा आला त्याचं तिथेच स्वागत होत असे. तिथेच राजघराण्यातली लग्न होत. पण त्या चौकाला आणखीन एक काळी किंवा क्लेशदायक बाजूही आहे. राजघराण्यातल्या स्त्रिया तिथे सती जात आणि त्या चौकात जोहार करत. राजमहालाच्या द्वाराच्या आधी जी जागा आहे त्याला ‘सतीयोंका पखतियाँ’ असं म्हणतात. मराठीत सांगायचं तर सतीच्या पायऱ्या! तिथे आजही त्या भिंतीवर सती गेलेल्या स्त्रियांच्या हाताचे ठसे आहेत. ते पाहताना अंग शहारतं आणि मन विषण्ण होतं. अत्यंत क्रूर अशी ही चाल राजस्थानात फार मोठय़ा प्रमाणात होती. सती जाणं म्हणजे, नवऱ्याच्या चितेवर उडी घेणे. बायको मेली की पुरुष काही दिवसांतच बोहल्यावर चढत असे आणि स्त्रीला मात्र नवरा गेल्यावर चितेत उडी घ्यावी लागे. बरं त्या मध्ययुगीन कालखंडात राजेमहाराजे अनेक स्त्रियांशी लग्न करत. त्या पलीकडे त्यांच्या अनेक रखेल्या आणि दासी असत. एका राजाच्या चितेत त्या सर्व उडी घेत. बऱ्याचदा स्त्रियांना अफू देऊन, त्या गुंगीत असताना चितेत ढकलत. त्या ललनांचे चित्कार ऐकू येऊ नयेत म्हणून ढोल जोरजोरात वाजवत. काही वेळा त्यांना चितेत ढकललं जाई. समाजात अशा स्त्रियांना ‘हुतात्मा’ मानत. त्यांचे पुतळे उभारत.


जोहार तर त्याहून भयानक गोष्ट होती. जैसलमेरमध्ये त्याला ‘साका’ म्हणतात. राजपूत राजे युद्धात हरले की, शत्रूच्या हातात स्त्रिया पडू नयेत म्हणून सर्व स्त्रिया प्रचंड आगीत उडी घेत. सर्व दोर कापल्याची जाणीव झाल्यावर शूर राजपूत सैनिक शत्रूवर तुटुन पडत आणि मारता मारता मरत. जैसलमेरच्या चौकात जिथे आम्ही उभे होतो तिथे तीन जोहार झाले होते. तो चौक माझ्याशी बोलतोय असा मला भास झाला. पहिला १३०८ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळी, नंतर दुसरा महमद तुघलखच्या वेळी आणि तिसरा अलिखानच्या वेळी. त्यावेळी राजपूत स्त्रियांनी चितेत उडी घेतली नाही तर त्यांची डोकी कापण्यात आली. त्यांना अर्धा जोहार म्हटलं गेलं.


त्या गडावर उत्कृष्ट अशी जैन मंदिरं आहेत. राजा हिंदू असला तरी त्या राजांना जैन धर्माबद्दल आदर होता. शेकडो जैन श्वेतांबर कुटुंबीय जैसलमेरमध्ये स्थायिक झाले होते. या किल्ल्यातील जैन मंदिरं पाहण्यासारखी आहेत. प्रत्येक खांब, छत कलाकुसरीने सजवलाय. लग्नाच्या रिसेप्शनला उभी असलेली वधू कशी नखशिखांत सजलेली असते, तसे तिथले प्रत्येक खांब सजले आहेत. तिथल्या चित्रकारांच्या मूर्तीवरचे शांत पण खोल विचारात गुंतलेले भाव फार जिवंत वाटतात आणि मंदिरात चक्क प्रणय करण्यात गुंतलेल्या स्त्री-पुरुषांची शिल्पं आहेत. सेक्स हासुद्धा माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे ही गोष्ट ते नमूद करतं. स्त्री ही शरीरसुखासाठी असते असं दर्शवणारी काही शिल्पं आहेत. त्या स्त्रियांचा शिल्पात चेहरा चंद्रासारखा आहे. कपाळ डोळे मोठे आहेत. नाक सरळ आणि उरोज उन्नत आहेत. अंगभर दागिने आहेत. थोडक्यात माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं त्यात चित्रण आहे. त्यावेळी मुद्रण कला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे समाजाचं चित्रण हे अशा शिल्पकलेतून किंवा पेंटिग्जमधून व्यक्त होत असे. पण या जैन मंदिरात झाडाच्या पानांवर लिहिलेली ४२६ पुस्तकं आहेत. त्यात जैनधर्म, इतिहास, काव्य, नाटय़, प्रेम, व्याकरण, न्याय, भोग, वेद आणि ज्योतिषाबद्दल माहिती सापडते. ती पुस्तक संस्कृत, प्राकृत, ब्रीज आणि राजस्थानी भाषेतली आहेत. हिंदुस्थानी संस्कृतीचे हे वैभव आहे, अभिमान वाटण्याजोगं!

द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, ८ डिसेंबर २०१९)


माझ्या फिरण्याच्या ‘बकेट लिस्ट’मधला राजस्थानचा जैसलमेर, बिकानेर आणि जोधपूर भाग मी अलीकडे पूर्ण केला. राजस्थान हा सौंदर्यशाली राजवाडे, वेड लावणारी कलाकुसर आणि शिल्पकला, पेंटिंग यांचा प्रांत. तिथे शौर्याच्या कथा ऐकायला मिळतातच, पण कधीकधी शौर्य, त्याग, शारीरिक पावित्र्य वेडेपणाच्या सीमेवर उभं होतं असंही वाटतं. आजही सामाजिकदृष्टय़ा थोडाफार मागासलेला समाज तिथे आहे. स्त्रीने डोक्यावरून पदर ओढून घेणं ही पूज्य संस्कृती आहे.

एका हवेलीत अंतःपुराबद्दल आम्हाला माहिती देणाऱ्या सुशिक्षित गाईडला मी विचारले, ‘‘अजूनही मध्यमवर्गीय स्त्रिया घरात पाहुणे किंवा सासऱ्यासमोर घुंघट चेहऱ्यावर घेऊन वावरतात?’’ तो पटकन म्हणाला, ‘‘आमच्या घरात वावरतात. घरातल्या सासऱ्यांना वगैरे किंवा पाहुण्यांना आदर दाखवायची ती पद्धत आहे.’’ मी तसा बंडखोर असल्यामुळे आदर दाखवण्यासाठी स्त्रीने चेहरा लपवावा ही गोष्ट मला मध्ययुगीन वाटते, पण एका विशिष्ट संस्कृतीत रमणाऱ्या सामान्य माणसाला ती गोष्ट किती नैसर्गिक वाटते हे मला जाणवलं.

तर अशा विविध सामाजिक, ऐतिहासिक, कलात्मक स्तरांवर हा पश्चिम राजस्थान पाहताना ज्ञानात भर पडत होती. मला जैसलमेरबद्दल विशेष आकर्षण होतं. कारण या शहराबद्दल, वाळवंटाबद्दल मी खूप ऐकलं होतं. माझ्या अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण झाल्या. जैसलमेरला सुवर्णनगरी म्हणतात. सकाळच्या वेळी कोवळय़ा सूर्याच्या किरणात ते शहर आणि शहरातून मान वर करून आसपासच्या वाळवंटाकडे पाहणारा तो किल्ला हे सोनेरी दिसतात आणि सूर्याने परत जायचं ठरवलं की, ते शहर, तो किल्ला मधाच्या रंगाचा दिसायला लागतो. दोन्ही वेळेला किल्ला आणि शहर पाहणे हा कलात्मक आनंद आहे. ती सर्व किमया तिथे सापडणाऱया पिवळय़ा सॅन्डस्टोनची आहे.

चला मग माझ्याबरोबर त्या किल्ल्यावर. हा किल्ला फक्त पर्यटकांचा किल्ला नाही. तिथे जवळपास चार हजार माणसं राहतात. आपली जातीय व्यवस्था किती खोल मुरलीये हे राजस्थानातही जाणवते. किल्ल्यात ब्राह्मणांची वस्ती एकीकडे, क्षत्रियांची दुसरीकडे वगैरे प्रकार आहेत. गाईडचं बोट धरून हिंडलो म्हणून मला कळलं. भारतात बऱ्याच जागी असे असतं, राजस्थान कसा वेगळा असेल? राजस्थानच्या सामाजिक आयुष्याबद्दल एका पुस्तकात वाचताना जाणवतं की, गावातही जमीनदाराचं घर मध्यावर असतं. त्याला ते तिथे जहागीरदार किंवा ठाकूर म्हणतात. ती घरं दगड किंवा विटांची असतात. उच्चवर्णीयांची घरं जमीनदाराच्या घराजवळ असतात आणि दलितांची गावकुसाबाहेर. पुरोगामी महाराष्ट्रात तरी वेगळं कुठाय? तिथेही माणसाची जात त्याच्या कपडय़ांवरून ओळखता येते. मला राजस्थानात एकच सामाजिक समज चक्क पुरोगामी वाटला तो म्हणजे म्हणे तिथे लहान मुलं, हरिजन आणि राजपूत जातीच्या माणसांना दरवाजातून बाहेर पडताना पाहणे हे शुभ मानले जाते (क्षणभर मला ती मुद्रणातली चूक वाटली). महाराष्ट्रात दलितांच्या नुसत्या सावलीने विटाळ व्हायचा. त्यामुळे जैसलमेरच्या किल्ल्यातली जातनिहाय विभागणी मला आश्चर्यकारक वाटली नाही. जुन्या जैसलमेर गावातले आणि गडावरचे रस्ते मला भावले. युरोपियन शहरातल्या जुन्या भागात असतात तसे चिंचोळे होते, पण या चिंचोळय़ा रस्त्यावरून वेगात ऑटोरिक्षा (टुकटुक) मोटारसायकली फिरत असतात. उंटांनाही तिथे वॉक घ्यावासा वाटतो आणि ‘भटक्या’ गाईंना तर आपण रस्ते आंदणच दिले आहेत. या किल्ल्यावर चढण्यापूर्वी या किल्ल्याची एक छोटी कथा सांगतो. तुम्हाला कल्पना येईल की, हा किल्ला का बांधला गेला आणि मुस्लिम आक्रमकांना आपण कसं पायघडय़ा घालून बोलावलं.

हे भाटी राजपुतांचं शहर. हे राजपूत थेट श्रीकृष्णाचे वंशज आहेत असं मानलं जातं. जैसलमेरला गुप्त आणि बुद्धकाळातल्या मूर्तीसुद्धा सापडतात. जैसलमेरमध्ये मोहेनजोदडो वगैरे सिंधू संस्कृतीच्या खुणा वगैरेसुद्धा सापडतात, पण तेव्हा हा किल्ला नव्हता. त्यावेळी तिथून १५ किलोमीटरवर असलेलं लोडारवा (Lodarva) हे काक नदीवरचं शहर ही राजधानी होती. शहर सुंदर आणि श्रीमंत होतं. भुजदेव हा या शहराचा आणि जैसलमेरचा राजा होता. जैसल हा भुजदेवचा काका. त्याला लोडारवाचं राज्य हवं होतं. त्याचवेळी महंमद घोरीने गुजरातवर हल्ला करण्याची तयारी केलेली होती. हे लोडारवा राज्य वाटेवर होते. आजच्या राजकीय भाषेत सांगायचं तर जैसलने घोरीबरोबर युती म्हणा, आघाडी म्हणा, केली. घनघोर युद्ध झालं. या युद्धात राजा भुजदेव मारला गेला. महंमद घोरीची चैनच झाली. त्याने लोडारवा राज्य लुटलं. देवळं आणि किल्ले उद्ध्वस्त केले आणि असं उद्ध्वस्त लोडारवा जैसलच्या हातात देऊन तो पुढे गुजरात लुटायला गेला.

त्यानंतर जैसल शहाणा झाला. तो किल्ल्यासाठी नवी जागा शोधायला लागला. एका ज्योतिष जाणणाऱया साधूने त्याला जवळचा त्रिकोणी डोंगर दाखवला. तिथे किल्ला बांधायला सांगितला. त्याला दोन कारणं होती. किल्ला डोंगरावर असल्यामुळे शत्रूवर नजर ठेवणं, टेहळणी करणं जास्त सोपं होतं. दुसरं म्हणजे त्या किल्ल्यावर एक मोठी विहीर होती. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार होता. असं म्हटलं जातं की, श्रीकृष्णाच्या एका बाणाने ती विहीर तयार झाली (आज श्रीकृष्ण असता तर मराठवाडा समृद्ध नसता झाला?) त्यामुळे इ.स. ११५५ साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. जैसलने तिथे फक्त पाच वर्षे राज्य केलं. मग तो स्वर्गवासी झाला. त्या गडाला आधी जैसलगड नाव पडलं आणि मग शहराला जैसलमेर.

या किल्ल्याने सुरुवातीच्या काळात अनेक जखमा सहन केल्या. रक्ताचे पाट पाहिले. फुटलेल्या बांगडय़ांचा आवाज ऐकला. आगीत होरपळणाऱ्या स्त्रिया आणि मुलांचे चित्कार ऐकले आहेत. किमान दोनदा तिथे मोठे जोहार झाले. सोळाव्या शतकानंतर या किल्ल्याने शांती पाहिली. कारण महारावळ या राजाने मुगल सम्राट अकबराशी जुळवून घेतलं. त्याने आपली मुलगी अकबराला दिली (त्या काळात राणा प्रतापच्या मार्गावरून फारसे राजपूत राजे गेले नाहीत). त्यानंतर जैसलमेरमध्ये समृद्धी आली. कारण राजकीय ताणतणाव नव्हते आणि विविध धंदेही भरभराटीला आले. त्यावेळी धान्य, अफू, तूप वगैरेंचा व्यापार थेट अफगाणिस्तान, इराक, इराणपर्यंत होत होता. सौंदर्यशाली हवेल्या, नक्षीकाम, शिल्पकला वगैरे विविध कलांचा विकास त्या वेळचाच. राज्याच्या लोभातून, वैऱ्याला सुपारी देऊन उभं केलेले जैसलमेर असे समृद्ध झाले. ती समृद्धी आणि त्या बदल्यात मोजलेली किंमत पाहत पुढच्या वेळी फिरूया.

- द्वारकानाथ संझगिरी
(सामना, १ डिसेम्बर २०१९)


टायटॅनिक बोट १० एप्रिल १९१२ला २२२३ प्रवासी घेऊन न्यूयॉर्कच्या दिशेने निघाली. १४ एप्रिलच्या रात्री तिची उजवी बाजू एका भीमकाय हिमगर्भावर वेगात आपटली. तिचं डिझाइन असं होतं की, तिच्या सोळा कंपार्टमेंटपैकी चार कंपार्टमेंट पाण्याने भरले तरी ती तरंगणार होती. तिच्या दुर्दैवाने तिचे पाच कंपार्टमेंट पाण्याने भरले आणि अवघ्या तीन तासांत ती बोट बुडाली. एक हजार पाचशे सतरा प्रवासी मृत्यू पावले. जवळपास अमरत्वाचा वर मिळालेली बोट पदार्पणातच बुडाली. बुडताना बोटीचे दोन भाग होऊन बोट बुडाली असं दृश्य दिसलं.

मृत्यू जास्त झाले त्याचं एक कारण दिलं जातं ते म्हणजे लाइफबोटी खूपच कमी होत्या. त्यांची क्षमता फक्त १,१७८  माणसांची होती. त्या भयावह वातावरणात आणि किंकाळय़ांमध्ये त्या लाइफबोटी पूर्ण भरल्यासुद्धा गेल्या नाहीत. काहींनी समुद्रात उडी मारली, काही समुद्रात पडले. त्यामुळे काही फक्त गारठून किंवा बर्फ होऊन मेले.

टायटॅनिक बुडत असताना ‘कॅरपाथिया’ नावाची बोट प्रवाशांना वाचवायला प्रथम पोहोचली. तिने ७१३ प्रवासी आणि काही खलाशांना वाचवले. ती बोट निघाली होती न्यूयॉर्कहून मेडिटेरियनला म्हणजे युरोपात. दिवसाचे काम संपवून त्या बोटीचा कॅप्टन आर्थर रॉसट्रॉन आपल्या केबिनमध्ये विसावत होता. इतक्यात त्याचा वायरलेस ऑपरेटर कॅप्टनच्या रूममध्ये धावत आला आणि टायटॅनिककडून मदतीचे सिग्नल्स येतायत असं त्यानं सांगितले. कॅप्टनने आपली बोट चक्क उलटी वळवली. पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी त्यांनी पहिली लाइफबोट पाहिली. त्यातली पहिली प्रवासी होती एलिझाबेथ ऍलन. तिने कॅरपाथियाच्या कॅप्टनला सांगितलं की, टायटॅनिक बोट बुडतेय. पुढे चार तासांत त्यांना वीस लाइफबोटी सापडल्या आणि मग ती बोट युरोपकडे न जाता परत न्यूयॉर्ककडे वळवली गेली.

कॅरपाथिया बोट वाचवलेल्या प्रवाशांना घेऊन १८ एप्रिलला न्यूयॉर्कला पोहोचली. तीस हजार माणसं आपल्या मित्र, नातेवाईकांसाठी जमली होती. कोण जगलं, कोण मेलं याचा हिशेब हळूहळू होत होता. वाचलेले प्रवासी धक्क्यातून सावरलेले नव्हते. बरेच जखमी होते. ती गर्दी पाहून काही प्रवासी बोटीतून उतरायलाही घाबरत होते. बोटीबाहेर काही ठिकाणी आनंदाश्रू वाहत होते, तर काही ठिकाणी फक्त दुःखाश्रू. ज्यांना आपले मित्र, नातेवाईक दिसले नाहीत त्यांनी हंबरडा फोडला. डोरेमी गिल्सन नावाची हॉलीवूडची नटी टायटॅनिकवर होती. ती आईबरोबर युरोपमध्ये ‘हॉलिडे’साठी गेली होती. ती वाचली. त्यानंतर तिने अपघातावरच्या एका सिनेमात कामसुद्धा केलं. तिने घटनेचे वर्णन करताना सांगितले,‘‘समुद्रात बुडणाऱ्या माणसांचा आक्रोश अजून माझ्या कानात घुमतोय. ती बुडणारी माणसं पाहून त्यांचे नातेवाईक वेडेपिसे होऊन आक्रोश करत होते.’’

टायटॅनिकच्या अनेक हृदयद्रावक आणि काही अचंबित करणाऱया कथा आहेत. टायटॅनिकच्या अपघातातून वाचवलेली शेवटची स्त्री वयाच्या ९८व्या वर्षी ३१ मे २००९ रोजी हे जग सोडून गेली. तिचं नाव ‘मिस मिल्विना डीन’. ती आणि तिचा भाऊ वाचले. ती त्यावेळी फक्त नऊ आठवडय़ांची होती. तिला एका पोस्टबॅगेत घालून लाइफबोटवर पाठवण्यात आले. एका मुलाखतकाराने तिला गमतीत विचारलं, ‘‘बोट बुडतानाचं दृश्य आठवतं का?’’ ती हसत म्हणाली, ‘‘नाही, पोस्टबॅगेच्या बाहेर मी पाहू शकले नाही.’’

एक अशी घटना घडली की, हरवलेल्या मुलाचे चित्रपट काढणाऱ्या मनमोहन देसाईलासुद्धा एक नवीन कथा देऊन गेली असती. एका फ्रेंच स्त्रीची दोन मुलं मायकेल आणि एडमंड टायटॅनिकवर होती. तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झालेला होता. नवऱ्याने काय केलं असेल? त्या मुलांना पळवलं आणि तो आपल्याबरोबर युनायटेड स्टेट्सला घेऊन निघाला होता. बोट बुडाल्यावर तो मेला, ती मुलं वाचली. फ्रेंच वर्तमानपत्रात एकदा त्याचे फोटो छापून आले. ते त्यांच्या आईने ओळखले. ते फोटो कशासंबंधात आले असतील, तर टायटॅनिकच्या अनेक कहाण्या त्यावेळी विविध वर्तमानपत्रांत छापून येत असत. त्यात या दोन पोरक्या मुलांची कहाणी छापून आली. ती तिने वाचली. तिला लक्षात आलं की, ही आपलीच मुलं आहेत. कथेचा शेवट अचानक गोड झाला. ज्या मृत प्रवाशांची प्रेते सापडली त्यांना पुरण्यासाठी टायटॅनिक तयार करणाऱ्या कंपनीने जागा विकत घेतली. त्यातले १२१ प्रवासी हे प्रोटेस्टंट ख्रिस्ती होते. त्यांना प्रोटेस्टंट धर्माच्या स्मशानात पुरलं. कॅथलिक ख्रिश्चन प्रेते कॅथलिक स्मशानभूमीत पाठवली गेली. दहा प्रेतांवर ज्यूंच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

तुमच्या ओठांवर प्रश्न आला असेल की, कॅप्टनचं काय झालं? सर्वसाधारणपणे बुडणाऱ्या बोटीचा कॅप्टन बोटीबरोबर जलसमाधी घेतो. टायटॅनिकचा कॅप्टन होता स्मिथ! अनेक जण वेगवेगळय़ा कहाण्या सांगत होते. काही जण म्हणाले की, त्याने समुद्राच्या बर्फाळलेल्या पाण्यात उडी घेतली. काही जण म्हणाले, त्याने स्वतःला गोळी मारून घेतली. एक गोष्ट खरी होती. त्याने एका मुलाला वाचवलं. त्याला लाइफबोटीत बसवलं. स्वतः मात्र लाइफबोटीत बसायला नकार दिला. टायटॅनिकबरोबर त्यानेसुद्धा जगाचा निरोप घेतला. नेव्हल जगात त्याला हिरोचं मरण म्हणतात.

एवढय़ा मोठय़ा अपघातानंतर चौकशी तर होणारच होती. चौकशीअंती काही निष्कर्ष काढण्यात आले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं होतं की, बोटीवर पुरेशा लाइफबोटी नव्हत्या. काही तर अर्धवट भरलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या. दुसरं म्हणजे तिसऱ्या दर्जाच्या प्रवाशांना तर वॉर्निंगच मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या दर्जाचे प्रवासी जास्त मेले आणि कॅलिफोर्नियन नावाची बोट जवळ असूनही मदतीला आली नाही.

बेलफास्टच्या सिटी हॉलसमोर टायटॅनिकच्या मृत प्रवाशांचं एक स्मारक आहे. टायटॅनिक म्युझियम पाहिल्यावर एक मोठं समर्थ स्वप्न एका छोटय़ा चुकीने दुःस्वप्न होतं हे दिसलं.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २४ नोव्हेंबर २०१९)


बेलफास्टमध्ये टायटॅनिक म्युझियमकडे जाताना दोन प्रचंड ‘गॅण्ट्री’ दिसतात. त्याला ‘सॅमसन ऍण्ड गॉलियथ’ म्हणतात. ग्रीक पुराणातल्या दोन शक्तिमान पुराण पुरुषांची नावे या गॅण्ट्रींना देण्यात आली आहेत. 

बेलफास्टमधून कुठूनही या ‘गॅण्ट्री’ दिसतात एवढय़ा त्या मोठय़ा आहेत. अर्थात त्यांचा संबंध टायटॅनिकशी नाही. गॉलियथ गॅण्ट्री १९६९ साली उभारली गेली, सॅमसन १९७४ साली, पण या दोन ‘गॅण्ट्री’ बेलफास्टमधल्या बोट निर्मितीच्या इतिहासाची आठवण करून देतात. म्हणूनच शंकराला भेटताना आधी नंदीवर आपण बेल ठेवतो तसं टायटॅनिक म्युझियमला जाताना तिथे एक भेटीचा बेल ठेवणं मस्टच. ज्या ‘हार्टलॅण्ड ऍण्ड वुल्फ’ या कंपनीने टायटॅनिक बांधली, त्यांच्या शिपयार्डमध्येच या दोन गॅण्ट्री उभ्या आहेत. त्याच शिपयार्डमध्ये मोठय़ा गॅण्ट्रीज या कंपनीने उभ्या केल्या. १९६० मध्ये त्या काढून टाकण्यात आल्या. १७ सप्टेंबर १९०८ साली टायटॅनिकचं काम सुरू झालं आणि ३१ मे १९११ रोजी तिने बेलफास्टच्या लागन नदीत प्रस्थान केलं. ते दृश्य पाहायला एक लाख माणसे जमली होती. १९११ साली एक लाख माणसं लंडन, अमेरिकेतून आलेली. म्हणजे किती गवगवा या बोटीचा झाला असेल तो विचार करा.

या बोटीचं आतलं रूप एखाद्या सर्वोत्तम हॉटेलासारखं होते. या बोटीचं वर्णन तुम्हाला त्या काळात जाऊन वाचायचंय. मग त्यातली भव्यता कळेल. आपण शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय याचं भान असू दे. त्या बोटीला त्या काळात अकरा डेक होते. त्यातले आठ हे प्रवाशांसाठी होते. त्या बोटीची प्रवाशांची क्षमता २४५३ होती. त्यात ६९१ पहिल्या वर्गाचे, ६१४ दुसऱया वर्गाचे आणि १००६ तिसऱ्या वर्गाचे होते. निव्वळ खलाशी आणि त्यांचा नोकरवर्ग ही संख्या नऊशेच्यावर होती. या बोटीचं इंटिरियर डिझाइन लंडन पिकॅडलीचं रिट्झ हॉटेल डोळय़ांसमोर ठेवून केलं होतं. जगातले ते एक लॅण्डमार्क उच्चभ्रू हॉटेल होतं. १९०६ साली ते लंडनमध्ये उघडलं गेलं. त्यापूर्वी आठ वर्षे आधी पॅरिसला रिट्झ हॉटेल उभं राहिलं होतं. एम्पायर स्टाइल, रॅनसान्स  काळ आणि पंधराव्या लुईच्या काळातलं इंटिरियर तिथल्या पहिल्या दर्जाच्या केबिन्समध्ये आणि मोठमोठय़ा हॉलसाठी केलेलं होतं. आपण बोटीत नाही, तर कुठल्याशा मोठय़ा श्रीमंत घरात आहोत असं वाटल्याचं मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केलं. त्या काळात बोटीवर स्विमिंग पूल ही फार मोठी चैन होती. टायटॅनिकवर सात फूट खोलीचा तरण तलाव होता, एक जिम्नॅशियम होतं, स्क्वॉश कोर्ट होतं, स्टीम बाथ, मसाज रूम, थंड रूम, गरम रूम असे प्रकार होते. व्हर्सायच्या पॅलेसमधल्या लाऊंजसारखा लाऊंज होता. आज कदाचित या गोष्टी आश्चर्यचकित करणार नाहीत. कारण लक्झरीची पातळी आणि व्याख्या आता खूप वर गेलीय, पण त्यावेळी ती बोट हा पाण्यात तरंगणारा राजवाडा होता. टायटॅनिकच्या ग्रॅण्ड स्टेअरकेसचं भयंकर कौतुक झालं होतं. अस्सल इंग्लिश ओकच्या लाकडांनी ती तयार झालेली होतीच, पण तिची वळणं पाहून क्लिओपात्रालासुद्धा हेवा वाटला असता. सात डेकमधून ती फिरायची. अतिशय सुंदर पेंटिंग्ज तर जागोजागी होती. टायटॅनिकची दुसऱ्या दर्जाची केबिन इतर बोटींच्या पहिल्या दर्जाच्या केबिनच्या दर्जाची होती. तिसऱ्या दर्जाच्या केबिन्स इतर बोटीत डॉरमिटरी स्टाईलमध्ये असतात. टायटॅनिकमध्ये त्यांच्यापाठी आकर्षक केबिन्स होत्या. टायटॅनिक म्युझियममध्ये या सर्व केबिन्स आणि आतल्या सजावटीची झलक पाहायला मिळते. प्लेटस्, कप, ग्लासेस, चमचे, बश्या या गोष्टींमध्ये बोनचायनाचं राज्य होतं. त्या काळात जी अद्ययावत उपकरणं आयटी इंडस्ट्रीत उपलब्ध होती ती बोटीवर होती. उगीच नाही, अनेक श्रीमंत माणसे या टायटॅनिकच्या पहिल्या सफरीवर होती.

२ एप्रिलला टायटॅनिकने बेलफास्ट सोडलं. ती बोट ४ एप्रिलला साऊथम्प्टनला पोहोचली. साऊथम्प्टन हे इंग्लंडच्या दक्षिणेकडचं एक बेट. अटलांटिक महासागरात जाणाऱया बोटींसाठी साऊथम्प्टन हे मोठं विश्रामस्थान होतं. तो काळ असा होता जेव्हा इंग्लंड-युरोपातली मंडळी मोठय़ा संख्येने अमेरिकेला जात होती. अमेरिका हे त्यांच्यासाठी नवं नंदनवन होतं. आता ९०-१०० वर्षांनी ते भारतीय तरुणांसाठी नंदनवन झालंय. टायटॅनिक हा देवमासा त्यांना त्यांच्या नंदनवनात घेउैन जाणार होता. त्यामुळेच ही बोट फ्रान्सला चेटबोर्गला गेली. चेटबोर्ग हा युरोपचा भव्य दरवाजा होता. त्यावेळी विमानसेवा नव्हती. श्रीमंत अमेरिकन्स युरोप पाहायला येत. ते बोटीने तिथे उतरत. गंमत पहा. या बंदरावर चक्क २७४ पहिल्या वर्गाचे प्रवासी बोटीत चढले. फक्त ३० दुसऱ्याचे चढले आणि १०२ तिसऱ्या वर्गाचे होते. ज्यांचं आयुष्य लवकर संपणारं नव्हतं असे २२ प्रवासी बोटीतून या बंदरावर चक्क उतरले. केवळ टायटॅनिकचा अनुभव घ्यावा आणि उर्वरित आयुष्यभर जगाला सांगावं की,  टायटॅनिकमधून प्रवास केला. म्हणून त्यांनी प्रवास केला होता. नियती किती खटय़ाळ असते पहा. टायटॅनिक बुडाल्यानंतर त्यांनी येशू ख्रिस्तासमोर गुडघे टेकले असतील आणि देवाचे आभार मानले असतील. ते जिवंत राहून आयुष्यभर टायटॅनिकने फिरलो सांगायला मोकळे राहिले.

बेलफास्टमधील टायटॅनिक म्युझियममध्ये जर गेलात तर एक दिवस त्यासाठी ठेवा. तरच काही रंजक गोष्टी तुम्हाला वाचता येतील आणि पाहता येतील. या बोटीला साऊथम्प्टन सोडतानाच अपघात होणार होता. ती बोट गोदीतून रुबाबात समुद्रात जाताना तिचं ते निद्रावस्थेतून जागं होणे इतकं प्रलयकारी होतं की, बाजूच्या धक्क्यावर उभ्या असलेल्या न्यूयॉर्क बोटीचे किनाऱ्याशी बंध तुटले. ती बोट वेगात टायटॅनिककडे ओढली गेली. ती टायटॅनिकवर आपटणारच होती, पण टायटॅनिकच्या खलाशांनी ऐनवेळी प्रसंगावधान दाखवून अपघात टाळला. तिथे एक फिल्म आहे. ती लंडनच्या वॉटर्लू स्टेशनवरून सुरू होते. टायटॅनिक स्पेशल ट्रेनमध्ये प्रवासी चढताना दिसतात आणि ती फिल्म संपते टायटॅनिकमध्ये शिरल्यावर. ही फिल्म कशी मिळाली ठाऊक आहे? एक फ्रॅन्क बाऊन नावाच फोटोग्राफर बोटीवर होता. त्याला त्याच्या काकाने टायटॅनिकचं साऊथम्प्टन ते क्वीन्सटाऊन्स  तिकीट दिलं होतं. बोटीवर त्याला एक अमेरिकन करोडपती भेटला. त्याने त्याला न्यूयॉर्कपर्यंत तिकीट द्यायची तयारी दाखवली. त्याने ऑफिसला कळवलं. ऑफिसने सांगितलं, ‘‘ताबडतोब परत यायचं!’’ त्याने आज्ञा पाळली. त्याच्यासाठी ती देवाची आज्ञा होती. तो वाचला. त्याने काढलेली फिल्म ती पाहायला मिळते. अजून बरंच काही इंटरेस्टिंग पुढच्या शेवटच्या भागात.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, १७ नोव्हेंबर २०१९)


बेलफास्टला गेल्यावर ‘टायटॅनिक म्युझियम’ न पाहता फक्त शहर पाहून परतणं म्हणजे अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’ला भेट देऊन फक्त त्याच्या पीएशी बोलून परत येण्यासारखं आहे. एखादं शहर आपलं ‘अपयश’ कसं मिरवू शकतं, तिथे पर्यटकांना कसं आकर्षित करू शकतं याचं तो म्युझियम हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

टायटॅनिक हा बोटीतला ‘राक्षस’ होता. तो ऍटलांटिक महासागरावर राज्य करणार असं तो राक्षस निर्माण करणाऱ्यांचं मत होतं. ‘माणसाचा मेंदू जास्तीत जास्त ‘परफेक्ट’ बनवू शकेल अशी बोट’ असं तिचं वर्णन केलं जायचं. ती बोट म्हणजे मानवी कुशाग्र बुद्धीचं ‘चिरंजीव’ होण्याचं वरदान मिळालेला राक्षस होता. जणू हिरण्यकश्यपूच! एका हिमगर्भाशी खेळ करायला गेला हा राक्षस आणि तो ‘हिमगर्भ’ या हिरण्यकश्यपूला जलसमाधी देणारा नरसिंह ठरला! १४ एप्रिल १९१२ रोजी या टायटॅनिकला जलसमाधी मिळाली, पण अजूनही कुठल्या ना कुठल्या रूपात टायटॅनिकच्या आठवणी जाग्या होतात. कधी एखादी कादंबरी, एखादा भव्य सिनेमा त्या झोपलेल्या आठवणीला उठवतो. एखादा मोठा पराभव, दुर्घटना, चूक यासंबंधातही टायटॅनिकची उपमा दिली जाते.

अशा टायटॅनिकची जन्मकहाणी, तिचं मोठं होणं, वयात येणं, मग प्रवास सुरू होणं, तिचं ते बुडणं, त्यानंतरचा हाहाकार, अश्रू, मरणाऱ्या माणसांच्या किंकाळय़ा, त्यानंतरची चौकशी आणि शेवटी ऍटलांटिकच्या तळाशी जाऊन विसावलेल्या टायटॅनिकचे अवशेष वगैरे सर्व जीवनप्रवासातून हा म्युझियम आपल्याला घेऊन जातो. बऱ्याचदा तो चित्रांच्या माध्यमातून आणि चटपटीत वर्णनातून सांगितला जातो. उदा. ती बोट तयार झाल्यावर जेव्हा पाण्यात जाते तेव्हा तिचं वर्णन ‘शी टूक टू वॉटर ऍज दो शी वेअर इगर फॉर बॅप्टिझम’ (She took to Water as though she were eagar for baptism)  असं केलं जातं. म्युझियमच्या एका टप्प्यावर आपण एका छोटय़ा गाडीतून फिरतो. ती गाडी आपल्याला बोट तयार करण्याच्या प्रक्रियेतून घेऊन जाते. हा प्रवास सर्वोत्तम आहे. आजूबाजूच्या फाऊंड्रय़ा, लोखंडकाम, सुतारकाम वगैरे गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. बोटीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दर्जाच्या सुखसोयी काय होत्या याची आपल्याला कल्पना येते. थोडक्यात, या म्युझियममध्ये आपण टायटॅनिकचा एक भाग बनतो. तिच्या सुखाच्या पूर्वार्धाचा आणि मग भेसूर शेवटाचा.

हा म्युझियम पाहिल्यावर मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एकदोन पुस्तकं विकत घेतली. ती चाळताना मला एक अविश्वसनीय गोष्ट वाचायला मिळाली. एक अमेरिकन कादंबरीकार होता. त्याचं नाव मॉर्गन रॉबर्टसन. त्याने ‘फ्युटिलिटी’ नावाची एक कथा लिहिली. ती कथा अशी होती- ‘एक कधीही बुडणार नाही असं वाटणारी ‘टायटन’ नावाची बोट. ऍटलांटिक महासागरात वेगाने एका हिमगर्भावर आपटते. त्यातले फक्त काही प्रवासी आणि बोटचालक (क्रू) वाचतात. कारण त्या बोटीवर सर्वांना सुरक्षितपणे बोटीबाहेर घेऊन जाणाऱया लाईफ बोटी नव्हत्या. ही घटना एप्रिलच्या एका रात्री घडते.’ टायटॅनिक बोट बुडण्यापूर्वी चवदा वर्षे आधी ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. म्हणजे १८९८ साली. टायटॅनिकच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. याला कल्पकता म्हणायचं की घडणारी गोष्ट आधीच दिसणारी शक्ती? ज्याला इंग्लिशमध्ये ‘प्रिमोनिशन’ म्हणतात.

ही कथा छापून आल्यावर काही वर्षांनी लॉर्ड पिरी आणि जे. ब्रुस इस्मे हे टायटॅनिकसारखी बोट तयार करण्याचं स्वप्न पाहत एकत्रितपणे एका उंची हॉटेलात उंची जेवण घेत होते. जे. ब्रुस इस्मेने  हातातला वाईनचा ग्लास उंचावला आणि पिरीला सांगितलं, ‘‘माझ्यासाठी अशी बोट बनव की, त्या बोटीत बसून वाईन पिताना त्यातले ‘सेडिमेंट्स’ हलणार नाहीत. वाईन हिंदकळणार नाही.’’ फक्त वारुणीमध्ये (रेड वाईन) अगदी छोटे छोटे कण (सेडिमेंट्स) असतात. ती पिताना तो ग्लास किंचित हलवत ठेवावा लागतो. त्यामुळे ते खाली बसत नाहीत. लाल वारुणी घेणारा ‘भक्त’ तुम्हाला या गोष्टी सांगू शकेल. तर इस्मेला अशी बोट हवी होती की, जी त्या रक्तवारुणीतले कणसुद्धा हलवणार नाही. ऍटलांटिकच्या लाटांच्या उंचीचा विचार करून दोनशे एकाहत्तर मीटरची बोट करायचं ठरलं. त्या काळात तो आकार मानवी बोटीचा नव्हता, राक्षसी बोटीचा होता.

आता हा जे. ब्रुस इस्मे कोण होता ते थोडक्यात सांगतो. तो व्हाईट स्टारलाइन या कंपनीचा चेअरमन होता. या कंपनीच्या मालकीच्या अनेक मोठय़ा बोटी होत्या. त्यांची तुलना नेहमी ‘कुनार्ड लाइन’ या स्टीमर कंपनीबरोबर चाले. या इस्मेला अशी बोट बनवायची होती जी  बी. जी. कुनार्ड कंपनीचं नाक खाली आणेल. आयुष्य कधी काय वळण घेईल, कुणालाही सांगता येत नाही. ही टायटॅनिक बुडली तेव्हा तिथल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी ‘कारपाथिया’ नावाची बोट आली ती या कुनार्ड कंपनीची होती. त्यावेळी ‘टायटॅनिक’वर जोसेफ ब्रुस इस्मे होता. त्याला वाचवलं या कुनार्ड कंपनीच्या बोटीने. कुनार्डचं नाक कापायला गेलेल्या इस्मेचं स्वतःचं नाक कापलं गेलं आणि बुडणाऱ्या बोटीतून स्वतःला वाचवल्यामुळे या इस्मेची जगभर छीःथू झाली ते वेगळीच.

इस्मेच्या वाईनच्या ग्लासाला ग्लास भिडवणारा लॉर्ड पिरी कोण होता ठाऊक आहे? अत्यंत हुशार नेव्हल आर्किटेक्ट! टायटॅनिक बोट ज्या हार्टलॅंड आणि वुल्फ कंपनीने उभारली तिथे त्याचा दबदबा त्याने तिशी ओलांडण्यापूर्वीच वाढला होता. १८६२ साली या कंपनीत तो शिकाऊ इंजिनीअर ऍप्रेन्टिस) म्हणून लागला आणि त्याने पुढे मॅजेस्टिक, टायटॅनिक, ब्रिटॅनिक नावाच्या बोटी डिझाइन केल्या. तो टायटॅनिकच्या त्या सफरीवर असणार होता, पण तो आजारी पडला. त्यामुळे तो गेला नाही. म्हणून तो वाचला. पुढे बारा वर्षांनी क्युबाजवळ असताना त्याला न्यूमोनिया झाला. तो त्यात गेला. त्याच्या पार्थिवाला मायदेशी त्याने डिझाइन केलेल्या ‘ऑलिंपिक’ बोटीने परत आणण्यात आलं.

आणि योगायोग पहा, ऑलिंपिक आणि टायटॅनिक एकाच वेळी तयार करण्यात आल्या. ऑलिंपिक आधी सुरू केली. बोट तयार करताना जी जास्त सुधारणा करावीशी वाटली ती टायटॅनिकवर केली गेली. ती बुडाली, ऑलिंपिक तरली.

- द्वारकानाथ संझगिरी
(सामना, १० नोव्हेंबर २०१९)


जर तुम्हाला टायटॅनिक बोट कशी बांधली गेली, कशी ‘अपराजित’ म्हणून मिरवली गेली आणि कशी बुडाली हे नीट समजून घ्यायचं असेल तर उत्तर आयर्लंडमधल्या बेलफास्टला जायलाच हवं. मला या बोटीत प्रचंड रस. त्यामुळे मी डब्लिनमधून बेलफास्टला गेलो.

अर्थात बेलफास्टला जाण्यासाठी आणखी दोन कारणं होती. एक म्हणजे ते ‘म्युरल्स’चं शहर आहे. बेलफास्ट शहराच्या भिंतीवर त्यांचा इतिहास, त्यांची लढाई, त्यांची संस्कृती आणि जगातल्या घडामोडींवर अप्रतिम पेंटिंग्ज काढली गेली आहेत. काही पुसली जातात, काहींची नव्याने भर पडते. ही क्रांतिकारी म्युरल्स पाहणे हे एक माझ्यासाठी आकर्षण होते.

आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते जो ‘फाळणी फाळणी’ खेळ आयर्लंडमध्ये खेळले तो पुढील काही वर्षे बेलफास्टच्या रस्त्यावर खेळला गेला. एका बाजूला कॅथलिक मंडळी, दुसऱ्या बाजूला प्रोटेस्टंटचे पेटते निखारे असे ते द्वंद्व होते. बॉम्ब फुटले, आगी लागल्या, माणसे मेली. आता ते सर्व शांत झालंय, पण राखेखाली धुगधुगी आहे. ती आजही जाणवते. ते कसं घडलं, कुठे घडलं ते मला पाहायचं होते. जमलं तर तिथल्या मंडळींशी बोलायचं होतं. बेलफास्टच्या छोटय़ा वास्तव्यात हे सर्व जमून गेलं. या सर्व घटना एका लेखातून नक्कीच रेखाटता येणार नाहीत, पण पुढच्या काही लेखांमधून ते रेखाटण्यापूर्वी बेलफास्टची थोडी माहिती घ्यायला हवी; हे शहर ‘फास्ट’ कसं वाढलं हे जाणून घेतलं पाहिजे.

आयर्लंडमधल्या १८४०च्या महासंहारक दुष्काळानंतर माणसे गावांतून शहरात आली. ती बेलफास्टला आली कारण तिथे कापड गिरण्या उभ्या राहिल्या होत्या. बंदर वाढून शिपयार्डस् तयार झाली होती. पाच-सहा वर्षांत शहर कसे वाढले याचे एक उदाहरण नुसते लोकसंख्येचा आधार घेऊन देतो. तुम्हाला कल्पना आहे की, युरोपमध्ये लोकसंख्या भारत-चीनसारखी कधी वाढली नाही, पण १८५१ साली बेलफास्टमध्ये सत्त्याऐंशी हजार माणसे राहत होती. १९०१ साली ती तीन लाख एकोणपन्नास हजार एकशे ऐंशी झाली. म्हणजे चौपटीपेक्षा जास्त! ‘जवसाचे’ पीक तिथे जोरात येत असे. त्यातून कापड निर्माण होते. एकोणीसाव्या शतकात मुंबईत जशा कापड गिरण्या उभ्या राहिल्या आणि मुंबईचे रूप बदलले, वाढ झाली तसेच बेलफास्टचे झाले. १९०० साली आयर्लंडमधली पासष्ट हजार माणसे कापड गिरण्यांत काम करत, त्यातली बहुसंख्य बेलफास्टमध्ये होती. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सहापर्यंत माणसे तिथे आठवडय़ाचे सहा दिवस राबत. तुटपुंज्या पगारात ते काम करत. विशेषतः बायका गरोदरपणात आणि मुलांच्या जन्मानंतर लगेच कामावर जात. आज आपण पर्यावरण, हायजिनिक कंडिशन्स वगैरे शब्द सतत वापरत असतो. कारण त्याचे महत्त्व जगाला कळलंय. त्यावेळी गिरण्यांसाठी दमट वातावरण लागे. त्यामुळे फुप्फुसाचे रोग जडत. धुळीच्या साम्राज्यामुळे क्षयाचा प्रादुर्भाव होत असे. पाण्यात उघडय़ा पायाने काम करण्यामुळे पायाला रोग होत. शहरवाढीचे हे सर्व दुष्परिणाम होत.

बेलफास्टमध्ये दुसऱ्या बाजूला गोदीची भरभराट झाली. ‘गोदी’ वाढायला लागल्याबरोबर गोदीसाठी आवश्यक गोष्टींच्या निर्मितीची इंडस्ट्री उभी राहिली. शहर असं वाढतं आणि रोजगार असा उत्पन्न होतो.

बोटी उभारण्याची इंडस्ट्री उभी राहिल्यावर ‘सुंभा’ची गरज लागू लागली. मग ‘सुंभ’ तयार करण्याचे कारखाने उभे राहिले. १९०० सालात नुसत्या सुंभ तयार करण्याच्या इंडस्ट्रीत दोन हजार माणसांना नोकऱ्या मिळाल्या. चाळीस एकर जमिनीवर पसरलेल्या या कारखान्यात मग अनेक प्रकारचे दोर तयार झाले. शहर वाढते तशा त्या शहराच्या गरजा वाढतात आणि मग वाढणाऱ्या गरजांसाठी नव्या इंडस्ट्रीज उभ्या राहतात, नव्याने रोजगार निर्माण होतो. व्हेंटिलेशन आणि पंखे निर्मितीसाठी सॅम्युअल डेव्हिडसनने सिरोको कंपनी उभी केली. ज्या ‘हार्टलॅण्ड ऍण्ड वुल्फ’ कंपनीने टायटॅनिक बोट उभारली त्यांना व्हेंटिलेशन पंखे या ‘सिरोको’ कंपनीने पुरवले.

शहराची वाढ इथेच थांबत नाही. तिथे राहणाऱ्या माणसांना मनेही असतात. चांगल्या वाईट सवयी असतात. इंग्लंडने जगाच्या ओठात सिगारेट दिली. त्याकाळी बेलफास्टमध्येसुद्धा ‘मरे’ आणि ‘गॅलहार’ या दोन सिगारेट कंपन्या उभ्या राहिल्या. त्या काळात दहा गोल्ड प्लेट सिगारेट्स फक्त तीन पेन्सला मिळत. म्हणजे भारताचे उदाहरण देऊन सांगायचे तर तीन पैशांत दहा सिगारेट्स. बेलफास्टमध्ये सिगारेटचा धूर वाढवणाऱ्या या कंपनीने सोळाशे माणसांना रोजगार दिला. सिगारेटची भरभराट झाल्यावर व्हिस्की कशी मागे राहील? ‘डनव्हिल’ने बेलफास्ट आणि आयर्लंडला व्हिस्की पुरवण्याचे पवित्र काम केले. १९०० सालाच्या उंबरठय़ावर ही कंपनी देशाबाहेर जाणारी साठ टक्के व्हिस्की तयार करत होती. स्वतःच्या देशाला नशा दिली ती वेगळीच. इंग्लिश राज्यकर्तेही खूश होते. त्यांना कररूपात रग्गड पैसा मिळत होता.

मुंबईत गिरण्यांमुळे गिरणगाव उभे राहिले. तिथल्या गिरणीत काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंजा पगार मिळत असे. त्यामुळे राहण्यासाठी ‘चाळ’ नावाची वस्ती निर्माण झाली. बऱ्याचदा एखादी खोली किंवा काही वेळा तुम्ही नशीबवान, सुखवस्तू असाल तर दोन खोल्या हे चाळीचे वैभव होते. बेलफास्टमधल्या कामगारांची स्थिती किंचित बरी होती. त्यांच्यासाठी घरे मिलच्या जवळ बांधली गेली. ती दोन प्रकारची असत. एक किचन हाऊस म्हणजे किचन आणि बेडरूम तळमजल्यावर. पार्लर हाऊसमध्ये छोटय़ा लिव्हिंगरूममुळे जागा किंचित मोठी असे. तिथे आपल्याप्रमाणे चाळी उभारण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे छोटी छोटी घरे उभारली गेली. आज बेलफास्ट किंवा इंग्लंडमध्ये कुठेही राहताना त्या काळात नळाला सदैव पाणी नसे, टॉयलेट बाहेर असत. यावर आज विश्वास बसत नाही. आजची ‘फ्लश टॉयलेट’सुद्धा अस्तित्वात नव्हती. आपल्यापेक्षा फार पुढे नव्हते ते! मुलांनासुद्धा फक्त अर्धवेळ शाळा उपलब्ध होत्या.

मुंबईत मी चाळीत राहतो. त्यामुळे बेलफास्टची वाढ, तिथलं आयुष्य याची मी कल्पना करू शकतो. वाढणाऱ्या मुंबईतले आणि वाढणाऱ्या बेलफास्टमधले साम्य मला दिसू शकते. दोन्ही तशी बंदरे ब्रिटिशांनीच मोठी केलेली. आज मात्र दोन्ही शहरांत फार काही साम्य नाही. मुंबई कुठच्या कुठे पुढे निघून गेली. मुंबई बहुरंगी-बहुढंगी झाली. बेलफास्ट मात्र अजूनही धार्मिक वेडेपणाच्या खुणा जपत जगतेय. वरून शांत आहे, पण राखेला फुंकर घातली तर निखारे दिसतात.

टायटॅनिक आणि इतर गोष्टींबाबत पुढे एकापाठोपाठ एक!

- द्वारकानाथ संझगिरी 

(भटकेगिरी, सामना, ३ नोव्हेंबर २०१९)


तुम्ही डब्लिनला राहिलात तर ‘रिंग ऑफ केरी’ची एक ट्रीप घ्याच.

रिंग ऑफ केरी हा एक पश्चिम-दक्षिण आयर्लंडमधला ‘ड्राईव्ह’ आहे. अंगठीसारखा जवळपास वर्तुळाकृती रस्ता, साधारण १७९ किलोमीटर्सचा आहे. तुमच्याकडे स्वतःची म्हणजे तिथे भाडय़ाने घेतलेली गाडी असेल तर उत्तम, नाहीतर टुरिस्ट बसेस आहेत.

काय पाहायचं हा तुमचा पुढचा प्रश्न असेल.

नाही, तिथे तुम्हाला एखादा आयफेल टॉवर, टाईम स्क्वेअर, बकिंगहॅम पॅलेस वगैरे पाहायला मिळणार नाही. दिसेल फक्त निसर्ग. पाऊस नसेल तर स्वच्छ निळं आकाश, निळं पाणी, हिरवे डोंगर तर कधी मर्दानी डोंगर, चरणारी गुरं, टुमदार घरं, फुलझाडं, प्रदर्शनातली वाटावीत अशी चर्च, रेस्टॉरंट व हवीहवीशी वाटणारी गावं वगैरे!

तुम्ही म्हणाल, रग्गड पाहिली आहेत. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड आणि इतर अनेक ठिकाणी.

हो, मीसुद्धा पाहिला आहे असाच निसर्ग!

पण माधुरी दीक्षितला पाहून झालं म्हणून आपण दुसऱया सौंदर्यवतींना टाळतो असं नाही. मान वळतेच. तसंच हे आहे. सौंदर्याची विविध रूपं असतात, हे एक त्यातलं आणखीन एक!

एखाद्या गावच्या पबमध्ये आयरिश कॉफी प्यायची आणि सुटायचं. बाय द वे, आयरिश कॉफी म्हणजे कॉफी अधिक स्कॉच बरं का! तुम्ही स्वतःची गाडी घेऊन फिरणार असाल तर घडय़ाळाच्या दिशेने फिरा. कारण टुरिस्ट बसेस घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

तिथे पाहण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात एक आहे स्केलिंग रॉक्स (Skelling Rocks), माझ्यासाठी ते ‘दुरून डोंगर साजिरे’ होते. कारण ते अकरा किलोमीटर अंतरावरच्या बेटावर आहेत. निळय़ा पाण्यात एक डोंगर आभाळाला दोन बोटं दाखवत उभा आहे. थोडक्यात डोंगराची दोन शिखरं हातात हात घालून उभी आहेत. तिथे सहाव्या आणि आठव्या शतकाच्या मध्ये कधी तरी ख्रिश्चन धर्मपीठ उभं राहिलं. ते बाराव्या शतकापर्यंत तिथे होतं. पूर्वीच्या काळी धर्मप्रेमी माणसं कशी काय तिथंपर्यंत पोहोचली देव जाणे! आज ती युनेस्को विश्व हेरिटेज साईट आहे. तिथे जाऊन परत यायला म्हणजे बसकडे सहा तास लागतात. सध्या दिवसाला १८० पर्यटक तिथे येतात. पण ते सर्व अत्यंत फिट, धाडसी, हायकिंगची हौस नाही तर खाज असलेले असावेत. कारण बऱ्याचदा समुद्र खवळलेला असतो. लाटा बेभानपणे उसळून दगड निसरडा करतात आणि त्या ख्रिश्चन धर्मपीठाच्या अवशेषापर्यंत पोहायला सहाशे मध्ययुगीन दगडी पायऱ्या आहेत. बरं, वर ना पाणी मिळतं ना खाणं, वॉटरप्रुफ कपडे घालून वर चढावं लागतं. दगडाच्या पायऱ्या कठीणतम आहेत. त्यामुळे तुम्हाला खाज नसेल तर किनाऱ्यावर उभं राहून ते बेट, तो डोंगर पाहा. वातावरण मस्त असेल. सूर्यदेव मूडमध्ये असेल, तर डोंगराच्या दोन शिखरांसह तो डोंगर दिसतो. खंडाळय़ाला डय़ुक्स नोज नाही का पाहत आपण दुरून? आपण थोडेच त्या नाकाडावर चढतो?

त्यापेक्षा व्हॅलंशिया बेटाला फेरफटका मारा. आयर्लंडचं सर्वात पश्चिमेकडचे ते टोक. मुख्य जमिनीपासून एक पूल तुम्हाला त्या बेटावर घेऊन जातो. निळं पाणी, हिरवा डोंगर, तसा बुटकाच आणि निसर्गाच्या रौद्ररूपावर माणसाचा बळी जाऊ नये म्हणून माणसांना धोका दाखवत उभा असलेला पांढरा दीपस्तंभ या नेहमीच्या गोष्टी तिथे आहेत. युरोपात त्या तुम्हाला कुठल्याही बेटाच्या जवळ सापडतील अशा!

तुम्हाला किल्ले आवडत असतील तर वाटेत ‘काहेरगल स्टोन फोर्ट’ पाहून टाका. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपुढे हा किल्ला म्हणजे पिल्लू आहे. सातव्या शतकातला हा दगडी किल्ला. चक्क गोल आहे. फार मोठा नाही. त्याचा आतला व्यास २५ मीटर्सचा आहे. बाहेरची भिंत चार मीटर उंच आहे आणि पाच मीटर जाडीची! आपण त्याला किल्ला म्हटलं असतं का? कौतुकाने जगाला दाखवला असता का? आपण कर्मदरिद्री. शिवाजी महाराजांचं उठसूठ नाव घेतो, पण त्यांचे किल्ले जगासमोर यावेत म्हणून काय करतो? काहीही नाही. किती वेळा रडायचं? अश्रूपण सुकले.

किलरनी नॅशनल पार्क जे वाटेवर लागतं ते सुंदर आहे. म्हणजे ते सुप्रसिद्ध किलरनी तळं आणि तो मर्दानी डोंगर. निसर्गसौंदर्य डोळय़ात जमवत जमवत चालायचंय किंवा कॅनॉइंग करायचंय तर तिथे थांबा आणि मस्त फिराच. या नॅशनल पार्कमध्ये ‘लेडीज ह्यू’ म्हणून एक जागा आहे किंवा आपल्या माथेरान-महाबळेश्वराच्या भाषेत पॉइंट आहे. त्याला ‘लेडीज ह्यू पॉइंट’ म्हणतात. नाही, सुंदरी दिसत नाहीत तिथे! उगाच गैरसमज नको.

सुंदर निसर्ग मात्र दिसतो. १८६१ साली राणी व्हिक्टोरिया तिथे आली होती. तिला पाहण्यासाठी आलेल्या बायकांना ती जागा एवढी आवडली की, त्या तिथे तिची वाट पाहत उभ्या राहिल्या. म्हणून त्या जागेला लेडीज ह्यू पॉइंट म्हणतात. रिंग ऑफ केरीला फिरताना काही धबधबे दिसतील. त्यातल्या टॉर्क वॉटरफॉलबद्दल कौतुकाने सांगितले जाईल. फार मनावर घेऊ नका. पावसाळय़ात आपल्याकडे खंडाळय़ाला असे टॉर्क वॉटरफॉल जागोजागी दिसतात.

निसर्गाइतकीच तिथली छोटी रंगीबेरंगी गावं किंवा टाऊन्स म्हणा हवं तर, आपल्याला मोहात पाडतात. एक तर ती डोंगराच्या कुशीत असतात किंवा निळय़ा पाण्याच्या सानिध्यात. छोटीछोटी घरं, त्याला विविध प्रकारचे रंग लावलेले, घरांना पिवळे, लाल, नारिंगी, हिरवे, निळे रंग असतात. पण ते बटबटीत नसतात. दिवाळीत ठिपक्यांची रांगोळी असते, तशी घरांची रांगोळी आपण पाहतोय असं वाटतं. तिथे सुंदर पब, विविध प्रकारच्या खाण्याची रेस्टॉरंटस् असतात. सुखासीन, विविध काळज्यांपासून दूर असा दिवस घालवायला त्या उत्कृष्ट जागा असतात. आयर्लंडमध्ये असाल तर रिंग ऑफ केरीला मारा एक चक्कर!

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, २७ ऑक्टोबर २०१९)


डब्लिनला गेल्यावर ‘क्लीफ ऑफ मोहर’ न पाहाणं म्हणजे माथेरानला जाऊन ‘पॅनोरमा पॉइंट’ न पाहाणं. डब्लिनहून टुरिस्ट बस तुम्हाला थेट पश्चिम किनाऱ्यावरच्या ऍटलांटिक समुद्रापर्यंत घेऊन जाते. त्या बसने प्रवास करताना पोटातलं पाणी, गिनिज बीअर, व्हिस्की काहीही हलत नाही. उलट आदल्या रात्रीच्या अंमळ जास्त झालेल्या बीअर किंवा स्कॉचमुळे आलेला हँगओव्हर निसर्गाची हिरवी सजावट पाहतापाहता माणसाला नॉर्मल करतो. आमच्या बसच्या ड्रायव्हर कम गाइडने सांगितलं, “आमच्या हिरवळीच्या हिरव्या रंगाला 34 शेडस् आहेत.” मला चार-पाच शेडस् नक्की सापडल्या. उरलेल्या अठ्ठावीस शेडस् हा अतिशयोक्तीचा प्रकार होता की माझी दुबळी दृष्टी हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. पण ज्या काही शेडस् दिसत होत्या त्याने डोळे सुखावत होते.

जाताजाता डुलकी येऊ नये म्हणून तो बरीच माहिती देत होता. तो म्हणाला, “आयर्लंडमध्ये तुम्हाला फारशी मॉल संस्कृती दिसणार नाही. आम्ही स्थानिक लोकांकडून खरेदी करतो. पूर्वापार चालत आलेल्या धंद्यांना प्रोत्साहन दिले जाते.” मी डब्लिनचा कोपरान् कोपरा पाहिला असं नाही. पण जे मी पाहिलं, त्यात मोठे मॉल दिसल्याचं स्मरत नाही. त्याने आणखीन एक गोष्ट सांगितली. त्यांच्या देशात इलेक्ट्रिक गाडय़ांना भरपूर प्रोत्साहन दिले जातंय. पुढील दहा वर्षांत सर्व मोटरगाडय़ा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असाव्यात, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी काय केलंय? इलेक्ट्रिक गाडय़ांना पार्किंग चार्ज नाही. सरकार त्यांना करात कपात करते. त्यांना विशेष ग्रॅन्ट देते. इलेक्ट्रिक गाडी ही पेट्रोल किंवा डिझेलच्या गाडीपेक्षा महागच असते. खरं तर खूप महाग असते. पण एखादी चांगली ‘ई गोल्फ’सारखी इलेक्ट्रिक गाडी तिथे ४६ हजार युरोला असेल तर सरकारी मदतीमुळे ती ३६ हजार युरोला पडते. बऱ्याचशा चार्जिंग स्टेशन्सवर तिथे इलेक्ट्रिक गाडय़ांना चार्जिंग मोफत आहे. आयर्लंडमध्ये सध्या २६,२०० गाडय़ा विद्युतशक्तीवर चालतात.

असो. आम्ही मात्र डिझेल बसने क्लिफ ऑफ मोहरकडे जात होतो. “अजून १०-१५ वर्षांनी तुम्ही याल तर इलेक्ट्रिक बसमधून जात असाल.”, ड्रायव्हर कम गाइडला फ्ल्युचिरिस्टिक व्हायची उबळ आली. मलाही मूड आला. मी म्हटलं, “पुढच्या जन्मी मी येईन तेव्हा बस उडत असेल.” ड्रायव्हरला विनोद आवडला की त्याला मिळणाऱया पगाराला स्मरून तो हसला, येसू ख्रिस्तच जाणे! पण छान हसतखेळत आम्ही मोहरच्या टेकडीजवळ कधी पोहोचलो कळलंच नाही.

‘क्लीफ ऑफ मोहर’ म्हणजे ऍटलांटिक समुद्र नावाच्या निळय़ा शाईत आपलं कमरेखालचं अंग लपवून उभा असलेला डोंगर. चेहरा थोडा गोरा. कारण त्या डोंगराची जडणघडण चुनखडीची आहे. हा मोहरचा कडा दक्षिण-उत्तर असा १४ कि.मी.चा आहे. दक्षिणेकडे पाण्यावर तो ३९० फूट आहे तर उत्तरेकडे ७०२ फूट. त्याच्याजवळच एक गाव दक्षिणेकडे सहा किलोमीटर्सवर आहे आणि दुसरं उत्तरेकडे सात किलोमीटर्सवर डुलिन नावाचं गाव, जिथे रेस्टॉरंटमध्ये मी तिथल्या स्थानिक बीअरबरोबर एक ‘मुंबई चिकन’ खाल्ली. एरवी मोहरच्या कडय़ाजवळ माणसांची वस्ती नाही. डिशचं नाव ‘मुंबई चिकन’ होतं. आयर्लंडमध्येही बॉम्बेचं मुंबई झालंय हे पाहून बरं वाटलं! मुख्य म्हणजे मस्त भूक लागली होती. कारण मोहरच्या कडय़ावरून फिरून आलो होतो.

मुंबईत कडा चढायचा की नाही याबद्दल मी शंभर वेळा विचार केला असता. पण तिथे ‘थोडं अजून वर जाऊया. . . थोडं अजून वर’ वगैरे विचार करता करता मी दक्षिण टोकाच्या माथ्यावर कधी पोहोचलो ते मला कळलंच नाही. अत्यंत शुद्ध हवेचा हा परिणाम आहे. हातात काठी घेतलेले गोरे जोडप्याने वर चढताना पाहून आपलाही हुरूप वाढतो. त्या कडय़ावरून दिसणारा निळा ऍटलांटिक आणि वरचं निळं आकाश डोळय़ात साठून राहतं. तिथे मानवाने बांधलेला एक पडका किल्ला सोडला तर मानवी काही नाही. आहे तो निसर्ग. त्या निसर्गापुढे आपण किती क्षुद्र वाटतो. माणसातल्या मोठय़ात मोठय़ा चित्रकाराची पेंटिंग्ज निसर्गाच्या कुंचल्याच्या निर्मितीसमोर थिटी पडतात. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, पाश्चात्य देशात ही निसर्गाची पेंटिंग्ज पॅरिसच्या ललुर्व्हमधल्या मोनालिसाच्या पेंटिंग्जप्रमाणे जपली जातात. ती खराब करण्याचा प्रयत्न कुणाला करून दिला जात नाही. वर्षाला सोळा लाख पर्यटक तिथे जातात. म्हणजे दिवसाला पाच हजार वगैरे. त्यांच्यासाठी व्हिजिटर सेंटर तिथे उभं केलंय. त्यात सुखसोयी आहेतच, पण विविध चित्रफितीतून तुम्हाला माहिती पुरवली जाते.

तिथे पक्ष्यांचे साम्राज्य आहे. ते जपले जाते. तिथे पफिन नावाचे पक्षी पाहायला मिळतात. पोटाकडे गोरे, पाठीकडे काळे. त्यांची खासियत म्हणजे ते समुद्राच्या पाण्यात थेट आत जातात. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते. समुद्रातल्या पाण्यातलं सावज ते वरून हेरतात आणि वेगात झडप मारतात. ते पंख किती वेगात हलवत असतील? एका मिनिटात चारशेच्या आसपास वेळा पंखांची उघडझाप करता येते. सर्व पक्षी मिळून तिथे तीस हजार पक्ष्यांची जोडपी आहेत. तुम्ही नशिबवान असाल तर समुद्रात तुम्हाला डॉल्फिन्स आणि शिळमासे दिसू शकतात. मी नव्हतो. बोटीतून त्या कडय़ांच्या पायथ्याशी आम्ही गेलो. कुठल्या फलाण्या सिनेमाचं शूटिंग कुठल्या ठिकाणी किंवा गुहेत झालं हे सांगितलं गेलं. त्यात हॅरी पॉटर सिनेमा होता.

तिथून निघताना कोकणाचा किनारा माझ्या डोळय़ांसमोर आला. काळे कातळ आले. त्यातल्या कपारी आल्या. गुहा आल्या. अरे, पांढरा डोंगरच विकला जातो असं नाही. काळा पण जातो. पण विकायची बुद्धी, कौशल्य आणि वृत्ती हवी. कोकणातल्या मातीतल्या आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या आणि आज आयर्लंडचा पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकरकडे ती आहे. उरलेल्या कोकणी माणसांना कोकण पर्यटनाच्या जागतिक नकाशावर कधी येणार, हा प्रश्न का पडत नाही?

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २० ऑक्टोबर २०१९)


आयर्लंडमध्ये डब्लिनच्या विमानतळावर उतरून हॉटेलकडे जाताना टॅक्सी ड्रायव्हरशी मराठीत बोलता येईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे गडकरी, जोशी, चव्हाण, गायकवाड, नाडकर्णी वगैरे आडनावाचा कुणीही टॅक्सी चालवत नव्हता. मराठी माणूस परदेशात जाऊन टॅक्सीचा धंदा फार क्वचित करेल. तो ड्रायव्हर केरळचा होता, पण आयुष्य पुण्यात दापोडीजवळ गेल्यामुळे मराठी माणसासारखा बोलत होता. त्याने आम्हाला डब्लिनच्या मध्यावर असलेल्या हेझलब्रूक हाऊस हॉटेलवर सोडलं. तिथे काऊंटरवरचा तरुण पुन्हा थेट मराठीत बोलला. मला क्षणभर कळेना की, आपण डब्लिनला आलोय की ढेबेवाडीला! त्या रिसेप्शनवरच्या मुलाचं नाव होतं रोहन नागलकर. तोही पुण्याचा होता. त्याक्षणी त्या रोहनने पुढच्या गल्लीत डाव्या हाताला चितळेंचं दुकान आहे आणि पुढच्या चौकात डब्लिन मारुती आहे सांगितलं असतं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. ‘तो तिथे काय करत होता?’’ हा प्रश्न  माझ्याही मनात आला. तो म्हणाला, तो शिकतोय तिथे. 'मास्टर्स इन क्लाउड कम्प्युटिंग' आणि 'मास्टर्स इन डाटा ऍनालिसीस'चा कोर्स करत होता. जगात असा कोर्स अस्तित्वात आहे हेसुद्धा मला ठाऊक नव्हतं. एकदा व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअर झाल्यावर शैक्षणिक क्षेत्रात काय काय नवा माल आलाय हे मी वळूनही पाहिलं नव्हतं. इतकी शिक्षणाची भीती मनात बसली होती. शिकताशिकता तिथे तुम्हाला आठवडय़ाला चाळीस तास नोकरी करता येते म्हणून तो त्या हॉटेलात रिसेप्शनिस्टचे काम करत होता. देशाबाहेर मराठी माणसं नेहमीच एक चांगला वेगळा अनुभव देतात. त्याने आम्हाला विचारलं, ‘‘सकाळी लवकर निघाला असाल ना? तुमचा ब्रेकफास्ट झाला नसेल ना? आमच्या नियमाप्रमाणे आज तुम्हाला ब्रेकफास्ट देता येत नाही, पण निदान फळ आणि सीरियल्स तरी देतो.’’ पोटात भूक होतीच. मी खाण्यासाठी द्रौपदीची थाळी शोधत होतोच, त्याने ती आणून दिली. त्यानंतर पुढे दोन दिवस डब्लिनचा आमचा गाईड तोच होता.

तिथे महाराष्ट्रातून आलेली मुलं खूप होती. त्यांनी तिथे त्यांचा एक छोटा महाराष्ट्र स्थापन केला होता. त्यानेच मला ट्रिनिटी कॉलेज आणि त्या कॉलेजच्या लायब्ररीची आठवण करून दिली. काही वर्षांपूर्वी मी त्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेलो होतो, पण वेळेअभावी लायब्ररी पाहायची राहिली होती. यावेळी ती इच्छा मी पूर्ण केली. मुळात कॉलेज सुंदरच आहे. ब्रिटनची विद्यापीठं प्राचीन विशेषणं वापरावीत इतकी जुनी आहेत. हे ट्रिनिटी कॉलेज ऑक्सफोर्ड-केंब्रिजनंतरचं. हे कॉलेज १५९२चं. ते बांधलं आणि वसवलं, डोळ्यांसमोर केंब्रिज - ऑक्सफोर्ड ठेऊनच. एक जुनी गंमत सांगण्यासारखी आहे. पूर्वीच्या काळी ऑक्सफोर्ड - केंब्रिज महिलांना डिग्री देतं नव्हतं. स्त्रीला दुय्यम समजणं हे फक्त भारतातच होतं असं नाही. ऑक्सफोर्ड-केंब्रिज मुलींना शिकवत, त्यांची परीक्षा घेत, त्यांचे निकाल घोषित करत, पण डिग्री मिळवण्यासाठी त्यांना डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजला जावं लागे. ट्रिनिटी कॉलेज आणि डब्लिन विद्यापीठ यातून एकच अर्थ ध्वनित होतो. अनंत विषयांच्या पदव्या तुम्हाला इथून मिळू शकतात. या कॉलेजच्या सोळा टक्के जागा या देशाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यातल्या चाळीस टक्के युरोपियन  देशांसाठी. उर्वरित उरलेल्या जगासाठी! म्हणून तिथे भारतीय आणि विशेषतः मराठी विद्यार्थी दिसतात.

ज्यांना फक्त ट्रिनिटी कॉलेज पाहायला जायचंय, त्यांच्यासाठी तिथलं वाचनालय हा एक वेगळा अनुभव आहे. तो पाहण्यासाठी चक्क चौदा युरोचं (एक हजार रुपये) तिकीट आहे, पण ज्याचं पुस्तकावर प्रेम आहे, त्याच्यासाठी ते हजार रुपये एक रुपयासारखे आहेत. १७१२ ते १७३२ या वीस वर्षांत हे ग्रंथालय उभं राहिलं. त्यात जुन्यात जुनी दोन लाख पुस्तकं आहेत आणि तरीही ही आयर्लंडमधील सर्वात जुनी लायब्ररी नाही. सेंट पॅट्रिक कॅथेड्रलजवळ एक ग्रंथालय आहे. ते यापेक्षा जुनं आहे. ज्ञान कसं जमवून ठेवलंय ते पहा.

या ग्रंथालयाची तीन आकर्षणं आहेत. एक ‘बुक ऑफ केल्स’. ‘बुक ऑफ केल्स’ हे कॅथलिक ख्रिस्तांचं पवित्र पुस्तक. लॅटिन भाषेतली चार गॉस्पेल्स या चित्रमय पुस्तकात आहेत. हे पुस्तक साधारण ख्रिस्तजन्मानंतर आठशे सालातलं आहे. आजही त्याबद्दलचं आकर्षण कमी झालेले नाही. का होईल? उद्या व्यासांनी लिहिलेलं ‘महाभारत’ आणि त्यातली ‘भगवद्गीता’ डोळ्यांनी पाहायला मिळाली तर आपण गर्दी करूच ना? सहाशे पानांच्या या पुस्तकाची फक्त दोन पानं नटवलेली नाहीत. बाकी अख्खं पुस्तक प्रेक्षणीय केलंय. ती दोन पानं तरी का सोडली देव जाणे! पाश्चात्त्य जग ‘बुक ऑफ केल्स’ला जगातलं सर्वात जुनं पुस्तकं मानतं.

हे ग्रंथालय कॉपीराईट ग्रंथालय आहे. म्हणजे आयर्लंडमध्ये पब्लिश होणारं प्रत्येक पुस्तक तिथं मोफत द्यावंच लागते. जगात इतरत्र अशी ग्रंथालयं नसावीत. इथली ‘लॉगरूम’ही लॉर्डस्‌च्या लॉगरूमएवढीच सुप्रसिद्ध आहे. ती लांबीला पासष्ट मीटर्स आहे. नव्याने येणारी पुस्तकं मावावीत म्हणून १८६० साली छप्पर उंच केलं गेलं. त्याचबरोबर तिथे मार्बलमध्ये तयार केलेले विविध लेखक, कवी, तत्त्वज्ञ यांचे पुतळे बसवले गेले. त्यात प्लॅटो, सर आयझॅक न्यूटन, विल्यम शेक्सपिअर, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल वगैरेंचे पुतळे आपलं लक्ष वेधून घेतात. कारण या मंडळींबद्दल आपल्याला माहिती असते. तिथं एक वाद्य आपलं लक्ष वेधून घेते. त्याचं नाव ब्रायन बोरू हार्प. आयर्लंडचे ते राष्ट्रीय सिम्बॉल आहे. ते मध्ययुगातलं म्हणजे १४-१५ व्या शतकातलं वाद्य असावं. त्याला पितळेच्या एकोणतीस तारा आहेत.

हे सर्व कौतुकाने पाहताना माझं मन हजार वर्षे मागे गेले. आपल्याकडे असंच एक नालंदा विद्यापीठ होते. तिथे नऊ लाख पुस्तके होती. ती तुर्की आक्रमकांनी जाळली. धर्माची अफूची गोळी घेतलेल्यांना याची जाणीव नव्हती की, एक जागतिक ठेवा ते जाळतायत. नाहीतर आज त्यापेक्षा जास्त कौतुक मी नालंदाचं करत असतो.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, १३ ऑक्टोबर २०१९)


डब्लिन हे जगातलं एक तरुण शहर आहे आणि शहरात सळसळतं तारुण्य जाणवतं. तुम्ही टेम्पलबार विभागात रात्री गेलात की, तुमच्या रात्रीचा दिवस होऊ शकतो. तुम्ही तरुण होता. ‘नाइट लाइफ’ जगण्यासाठी ब्रिटनमधून तिथे रसिक मंडळी येतात. ‘नाइट लाइफ’ याचा तुमच्या मनात आहे तेवढाच चावट ‘मर्यादित’ अर्थ घेऊ नका. तिथं मद्य वाहतं. विशेषतः आयर्लंडची ती काळपट बिअर आणि हो आयरिश कॉफीसुद्धा. (त्यात व्हिस्की असते. त्यामुळे अपेयपान न करणाऱ्यांनी त्यापासून दूर राहावं.) जगातल्या वेगवेगळय़ा पद्धतीचं खाणं मिळतं. मग पब्ज, डिस्को वगैरे गोष्टी येतातच. तिथल्या वातावरणात एक प्रकारचं चैतन्य असतं. तुमच्या सभ्यतेला धक्का लागणार नाही, असं चैतन्यही तिथे उपलब्ध आहे.

अर्थात डब्लिनला तेवढय़ासाठी जा, असं मी सांगणार नाही. या शहरामधून एक नदी वाहते. तिचं नाव आहे ‘लिफी नदी’. ही नदी दक्षिण-उत्तर अशी शहराला दुभंगते. दक्षिण हा भाग तसा दक्षिण मुंबईसारखा श्रीमंत वगैरे आहे. उत्तरेचा भाग तसा मध्यमवर्गीय, पण मध्यमवर्गीयांची त्यांची व्याख्या आणि आपली व्याख्या यात विराह कोहली आणि के. एल. राहुल एवढा फरक आहे. ते मस्त संपन्न शहर वाटतं. नुसत्या ओकॉनेल स्ट्रीटवरून चालणं आणि विंडो शॉपिंग करणं हा वेगळाच आनंद आहे. एकेकाळी तो पिटुकला रस्ता होता  यावर आता विश्वास बसत नाही. तो तब्बल पन्नास मीटर रुंद आहे. मधून ट्राम जाते. दोन्ही बाजूला दोन-दोन लेनचे रस्ते आणि अतिशय रुंद फूटपाथ. फूटपाथला लागून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॉपिंगसाठी दुकानं असं त्याचं आजचं रूप आहे. त्या रस्त्यावर आधी ‘लंडन प्लेन ट्री’ होती. ‘लंडन प्लेन ट्री’ हा एक झाडाचा प्रकार आहे. कदाचित ब्रिटिशांचे राज्य तिथे असताना ती लावली असावीत. ती काढण्यामागे ‘राष्ट्रीय’ भावना नसावी किंवा ‘पर्यावरण गेलं खड्डय़ात’ ही वृत्तीही नव्हती. त्या त्या जागी वेगवेगळय़ा  प्रकारची झाडं लावली, ती वाढवली. त्यामुळे त्या रस्त्याला एक वेगळं सौंदर्य लाभलं. आयर्लंडमध्ये पाऊस वर्षभर पडतो. गेल्या वेळी डब्लिनचा एक टॅक्सी ड्रायव्हर मला जुलैमध्ये सांगत होता, (त्यांच्या उन्हाळय़ात) ‘‘गेल्या वर्षी उन्हाळय़ात मी ८८ दिवस सूर्य पाहिला नाही.’’ सांगायचा मुद्दा काय की, तिथे पाऊस खूप पडतो. त्यामुळे झाडं लवकर तरारली. पण त्यामागे प्रयत्न होता. मुंबईतही  पाऊस पडतो. झाडं तुटतात, तोडली जातात, पण झाडांना पोटच्या पोराप्रमाणे वाढवायची वृत्ती नसते. त्यांनी हा ओकॉनेल रस्ता सुंदर करताना, जे नवे दिव्याचे खांब उभारले, त्यामागची सौंदर्य दृष्टी लगेच दिसते. कचरा टाकण्याच्या पेटय़ा इतक्या सुंदर आहेत की, त्यात कचरा टाकताना प्रचंड आनंद होतो. कचऱ्यालासुद्धा आपण सुस्थळी पडल्याची भावना होत असेल.

या रस्त्यावर पुढे ‘जीपीओ’ची प्रचंड भव्य इमारत आहे. तिथे त्यांनी एक स्क्वेअर तयार केलाय. तिथेच त्यांचे राष्ट्रीय कार्यक्रम होतात. तिथे २००३ साली त्यांनी ‘स्पायर ऑफ डब्लिन प्रोजेक्ट’ हाती घेतला. पूर्वी तिथे ‘नेल्सन पिलर’ होता. हा ‘स्पायर ऑफ डब्लिन’ म्हणजे स्टेनलेस स्टीलचं आकाश भेदणारं शिल्प आहे. शिल्प म्हणजे आईस्क्रीम कोनसारखा ३९० फुटांचा एक सुळका, जो  डब्लिनच्या मध्यभागातून कुठूनही दिसतो.

या हमरस्त्याच्या सौंदर्याला पुन्हा धक्का लागू नये म्हणून त्यांनी त्या विभागातल्या बांधकामासाठी वेगळे नियम तयार केले. कुठल्याही इमारतीत, दुकानात किंवा इतरत्र किंचितही बदल करायचा असेल तर डब्लिन सिटी कौन्सिलची विशिष्ट परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला  पुस्तकाच्या दुकानाचं फूड स्टॉल वगैरे करता येत नाही. रस्त्याच्या सौंदर्याचा विचार करून मग परवानगी दिली जाते. टेबलाखालून पैसे घेऊन नसावी. या रस्त्यावर आयर्लंडच्या राष्ट्रपुरुषांचे मोठमोठे पुतळे आहेत. त्या राष्ट्रपुरुषांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर उत्तमच, पण नसेल तर नुसते पुतळे पाहणे हे सौंदर्यदृष्टी असलेल्या माणसांच्या दृष्टीने ‘मिष्ठान्न’ आहे. डोळे तृप्त होतात.

या शहरात आता भरपूर स्थलांतरित येतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयर्लंडमध्ये उच्च राहणीमान. भरपूर पगार आणि त्यांचं युरोपियन युनियनशी असलेलं कौटुंबिक नातं. आता विश्वास बसत नाही की, पूर्वी इथून माणसं देशाबाहेर पळाली, त्याला यादवी आणि धार्मिक युद्धापासून महाभयंकर अवर्षण किंवा दुष्काळ कारणीभूत होता. आयर्लंडमध्ये बटाटय़ांची पैदास मोठी. १८४० मध्ये बटाटय़ांच्या पिकांना रोगाने ग्रासलं. १८४५ साली ती कीड पिकात घुसली. १८४६  साली कहर झाला. ही आकडेवारी पाहा. १८४१ साली आयर्लंडमध्ये आठ दशलक्ष माणसं होती. १८५१ साली साडेसहा दशलक्ष होती. म्हणजे दीड दशलक्ष (लोकसंख्येच्या वीस टक्के) माणसं कमी झाली. त्यातली अर्धी मेली, अर्धी देशाबाहेर पळाली. १९११ मध्ये आयर्लंडमध्ये फक्त ४.४ दशलक्ष माणसं होती. म्हणजे सत्तर वर्षांत लोकसंख्या निम्मी झाली. या अवर्षणाची तुलना फक्त बंगालमधल्या १९४३च्या दुष्काळाशी करता येईल. त्यावेळी सहा कोटी बंगाली जनतेमधील तीस लाख माणसं मेली होती. ती फक्त भुकेने मेली नाहीत. भुकेमुळे निर्माण होणारे आजार, लोकांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती, त्यातून उद्भवलेले मलेरियासारखे रोग यामुळे मेली. गरीब जनता अशावेळी होरपळली जाते. आयर्लंड काय किंवा बंगाल काय, दोन्ही ठिकाणी तेच झालं आणि गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रिटिश राज्यकर्ते होते. बंगालमध्ये हाहाकार माजला तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्यावेळी भुकेने मरणाऱ्या लोकांपेक्षा विन्स्टन चर्चिलला त्याचे सैनिक महत्त्वाचे होते, जे बर्माच्या सीमेवर लढत होते. तांदूळ तिथे गेला आणि बंगालमध्ये गरीब माणसं मरत राहिली. आयर्लंडमध्येही लंडनच्या सरकारने ‘आयर्लंडमधल्या ब्रिटिश सरकारने पाहून घ्यावं’ असं फर्मान काढलं. म्हणजे देव नको करू दे, पण उद्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला किंवा अस्मानी संकट आले तर दिल्लीने तिथे पाठ फिरवण्यासारखं होतं. तिथे लंडनने पाठ फिरवली. आधीच आयर्लंडमध्ये ब्रिटिशद्वेष होता. तो वाढला आणि आजही कमी झालेला नाही.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, ६ ऑक्टोबर २०१९)


चला, स्कॉटलंडवरून मी तुम्हाला आयर्लंडला घेऊन जातो. आयर्लंडच्या बाबतीत अनेकांचे अनेक गैरसमज आहेत. त्याबद्दल आधी लिहितो.

दक्षिण आयर्लंड हा एक स्वतंत्र देश आहे. हा ब्रिटनच्या पश्चिमेला बेटाच्या स्वरूपात आहे. त्याच्या पश्चिमेला ऍटलांटिक महासागर आहे आणि ब्रिटनच्या भूमीपासून आयरिश समुद्र, नॉर्थ चॅनल (उत्तरेची खाडी) आणि सेंट जॉर्ज चॅनेलने त्या बेटाला अलग केलंय. पण हे संपूर्ण बेट हा स्वतंत्र देश नाही. यातला पाच षष्ठांश भाग एक स्वतंत्र देश आहे. एक षष्ठांश उत्तरेकडचा भाग ब्रिटनकडे आहे. जिथे जिथे ब्रिटिश गेले तिथे तिथे त्यांना ‘फाळणी फाळणी’ खेळ खेळायला भयंकर आवडलं. ते आपल्याकडे तो खेळ खेळले, मध्य पूर्वेत खेळले, पण या सर्वांच्या आधी ते आयर्लंडमध्ये तो खेळ खेळले. आयर्लंडच्या शरीरावरच्या जखमेने खपली धरलीय असं लांबून वाटतं, पण ते खरं नाही. त्यांच्या मनावर झालेली खोल जखम यावेळी मी बेलफास्टमध्ये अनुभवली. बेलफास्ट ही ब्रिटिशांकडे असलेल्या नॉर्दर्न आयर्लंडची राजधानी, तर डब्लिन स्वतंत्र आयर्लंडची! स्वतंत्र आयर्लंड युरोपियन युनियनला जोडलं गेलंय, जिथून ब्रिटन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांची मुद्रा युरो आहे. आपल्याकडून ते ब्रिटिश पौंड घेत नाहीत. आपल्या हातून चुकून सुपरमार्केटमध्ये ब्रिटिश नाणं सुटलं गेलं, तर स्वच्छ तांदळातून खडा बाहेर काढावा तस ते बाहेर काढतात. आयर्लंडला जायला ब्रिटिश व्हिसा सध्या चालतो. पण ब्रेक्झिटनंतर काय होईल देव जाणे.

यावेळी डब्लिनला जायची माझी दुसरी वेळ होती. गेल्या वेळी मी डब्लिनला गेलो होतो तेव्हा आमच्या टीव्हीच्या एका सहकारी मुलीने मला सांगितलं होते, ‘‘सर, माझ्यासाठी एखादा आयरिश नवरा शोधा. आयरिश मुलं हॅण्डसम असतात.’’

मी म्हटलं, ‘‘आणि मुली?’’

ती म्हणाली, ‘‘डोळय़ानेच पहा.’’

मी तिथे डोळे उघडे ठेवून फिरलो होतो, पण ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ असं वाटावं असं डोळय़ात कुणी उतरलंच नाही, पण यावेळी ‘क्लिफ ऑफ मोहर’ला जाताना गाईडने माझे डोळे उघडले. तो म्हणाला, अनेक अमेरिकन अध्यक्ष आयरिश आहेत. म्हणजे त्यांच्या धमन्यांतून आयरिश रक्त वाहतंय. त्यात तिघं असे होते, ज्यांच्यासाठी जगातल्या ललनांनी जीव टाकला. जॉन एफ. केनडी, डोनाल्ड रिगन आणि वन ऍण्ड ओन्ली बिल क्लिंटन. त्याने घेतलेले पुढचं नाव हे देखण्या पुरुषाचं नसेल, पण कर्तबगार अध्यक्षाचं होतं. ते होतं - ‘बराक ओबामा.’ माझे डोळे चमकले. मग कळलं की, बावीस अमेरिकन अध्यक्ष हे आयरिश रक्ताचे आहेत. त्यात ओळखीची काही नाव म्हणजे कार्टर, निक्सन, बुश वगैरे. ट्रम्पचं नावं नव्हतं.मी निःश्वास सोडला. आयर्लंड ही राजकीय वेड्यांची भूमी कधीच नव्हती.

त्या आमच्या टुरिस्ट बसच्या गाईडमुळे मी आणखी खोलात शिरलो आणि मला उमगलं की, नील आर्मस्ट्राँग, वॉल्ट डिस्ने, हिचकॉक, महमद अली, नेपोलियनला हरवणारा डय़ूक ऑफ वेलिंग्टन (ज्याच्या नाकाच्या नावाने खंडाळा हा कडा ओळखला जातो) आणि इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा त्यांचा कर्णधार इयान मॉर्गन हेसुद्धा आयरिशच. थोडक्यात आयरिश मुलं जगभर आहेत.

पण गंमत पाहा, आता हळूहळू एका भारतीय मुलाबद्दल मला असंच बोलावं लागणार आहे.

कारण आज तिथे एक भारतीयच नाही तर मराठी मूळ रुजून सध्या आयर्लंडचे पंतप्रधान झालं आहे. त्या मुलाचं नावं आहे लिओ वराडकर. सचिन तेंडुलकरपेक्षा सहा वर्षांनी लहान (असं म्हटलं कारण तो पंतप्रधान झाला तेव्हा किती लहान होता हे मला सांगायचं होतं). त्याचे वडील मूळचे कोकणचे. वैद्यकीय अभ्यासक्रम त्यांनी मुंबईतून केला. साठच्या दशकात ते इंग्लंडला गेले. लिओची आई मरियम त्यांना इंग्लंडच्या हॉस्पिटलात भेटली. ती नर्स होती. ते मग डब्लिनमध्ये १९७३ साली स्थायिक झाले. वडिलांनी मुलाला चक्क ‘कॅथलिक’ म्हणून वाढवलं. लिओने डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा केला. त्यांनी इंटर्नशिप चक्क मुंबईच्या केईएममध्ये केली. नंतर पूर्ण वेळ राजकारणात पडण्यापूर्वी डॉक्टरी केली. आयर्लंडमध्ये ‘गर्व से कहो हम कॅथलिक है’ वाली मंडळी बहुमतात आहेत. अतिशय सनातनी आहेत. किती सनातनी असावीत? ज्या जगात आधुनिक वारे नुसते वाहत नाहीत, तर चक्क वादळी वारे असतात त्या जगाचा भाग असलेला आयर्लंड हा देश! पण तिथे घटस्फोटाचा कायदा १९९५ साली संमत झाला. तोसुद्धा अगदी चिमूटभर फरकाने.  तोपर्यंत जिथे घटस्फोटाला परवानगी नव्हती. तिथे समलिंगी संभोग हे पाप आहे.पण त्या देशात लिओ ने  जाहीर केलं की त्याला  पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण वाटतं. थोडक्यात तो ‘गे’ आहे. तरीही तो देशाचा पंतप्रधान झाला.त्याचा समलिंगी पार्टनर (अर्धांग म्हणूया का?) मॅथ्यू बॅरेटसुद्धा डॉक्टरच आहे.

थोडक्यात, अमेरिकन जगात आयरिश रक्ताने क्रांती करणाऱया आयर्लंडमध्ये एका भारतीय रक्ताच्या डॉक्टर पंतप्रधानाने क्रांती केलीय. मला त्यांच्या कुटुंबाला भेटायला आवडलं असतं, पण अलीकडेच दिलीप वेंगसरकर लिओच्या वडिलांना, म्हणजे डॉक्टर अशोक वराडकरांना भेटला होता. दिलीप म्हणाला, "ते आपल्यासारखं मराठी बोलतात."

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जाता जाता सांगतो, आयर्लंडचा मराठी संबंध वराडकर व्हाया स्वा. सावरकर असा आहे. आयरिश मंडळींची मोठी वस्ती अमेरिकेत आहे. ‘द गॅलिक अमेरिकन ऑफ न्यूयॉर्क’ हे त्यांचं मुखपत्र होतं. त्याचे संपादक फ्रीमन, यांचा सावरकरांच्या कार्याला पाठिंबा होता. सावरकरांचे लेख त्या मुखपत्रात छापून येत आणि पुढे ते लेख फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, इटालियन, रशियन भाषेत भाषांतरित होऊन तिथल्या वर्तमानपत्रांत छापून येत. दुसरी गोष्ट, सावरकरांवर जो इंग्लंडमध्ये खटला चालवला गेला, पुढे ज्यातून त्यांना अंदमानात जावं लागलं, तेव्हा इंग्रजांविरुद्ध आयरिश क्रांतीत भाग घेणाऱया गार्नेट यांनी सावरकरांना ब्रिक्सटनच्या तुरुंगात भेटून त्यांना तिथून सोडवण्याचा ‘कट’ आखला होता. आयर्लंडचे क्रांतिकारक डाव्या विचारसरणीच्या चळवळीतले.  सिनफिन मूव्हमेंटची मंडळी तिथून त्यांना पळून जायला मदत करणार होती. सावरकरांना पळवताना संघटनेचे काही अधिकारी पकडले जाण्याची शक्यता होती. त्यासाठी मनाची तयारी असलेले आयरिश क्रांतिकारकसुद्धा तयार होते आणि पॅरिसहून लंडनला आले होते. दुर्दैवाने कट यशस्वी झाला नाही.

पण भारतीय आणि आयरिश रक्ताचं हे नातं आता लिओ वराडकरने घट्ट केलंय.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २२ सप्टेंबर २०१९)


स्कॉटलंडला गेलात तर 'आईल ऑफ स्काय'ला नक्की जा. ते एक बेट आहे. स्कॉटलंडच्या मूळ भागाशी ते एका पुलाने जोडलंय. तो पूल, ही मूळ गर्भाला जोडणारी नाळ आहे. ते बाळ, मूळ गर्भाच्या सौंदर्यात भर घालतं. ते न पाहणं म्हणजे हिमाचलला जाऊन धरमशालेला न जाण्यासारखं आहे. पाहायचं काय तर निसर्गच! मर्दानी डोंगर, निळं पाणी, डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे दुधाळ धबधबे, निसर्गाने तयार केलेली डोंगरातली शिल्पं पहायची आणि अंगावर वारा झेलत, समुद्राकडे पाहत स्कॉच प्यायची. ऐषआरामी चैन! निसर्गरम्य बेट म्हटल्यावर श्रीमंतांचे वलयांकित बंगले आलेच. ती श्रीमंती पाहिली आणि आफ्रिका-आशियातली गरिबी पाहिली की, माडगूळकरांच्या गीताची ओळ आठवते, ‘कुणा मुखी पडते लोणी, कुणा मुखी अंगार!’ लोणी चाखता येत नाही, पण लोणी पाहायला काय हरकत आहे?

तिथे फिरायला गाडी हवी आणि मजबूत पाय. असंच एक फिरायचं ठिकाण म्हणजे ‘ओल्ड मॅन ऑफ स्टॉर'. हे शिखर खूप लांबून दिसतं. आपण कर्नाळय़ाला गेल्यावर ‘थम्स अप’ केलेला डोंगर किती कौतुकाने पाहतो? फार नाही, पण 'आईल ऑफ स्काय'ला गेल्यावर ‘ओल्ड मॅन ऑफ स्टॉर' कौतुकाने पाहत त्याचे फोटो काढतो. उत्साही मंडळी वर चढायला जातात. तुम्ही पॅकेज कसं बनवून विकता त्यावर सर्व अवलंबून असतं. या डोंगराच्या एका बाजूला म्हणजे पूर्वेकडे उभा कडा आहे. तो निळय़ा तलावात पाय सोडून उभा आहे, पण पश्चिमेकडून एक गवती रस्ता आहे. तिथून तुम्ही वर चढू शकता. कारपार्कपासून न थांबता वर चढायला सव्वा तास लागतो. वर गेल्यावर तिथून विहंगम दृश्य नक्की दिसत असेल, पण किती कडे चढायचे? आता लोकांना हा कडा चढवायला लावायचा म्हणून या कडय़ाभोवती एक दंतकथा रचली गेली. ‘ओल्ड मॅन ऑफ स्टॉर’ हा एक प्रचंड राक्षस वगैरे होता. तो तिथे राहायचा. तो मेला. मग त्याला पुरलं तेव्हा त्याचा अंगठा वर राहिला. ते शिखर म्हणजे तो त्याचा अंगठा. बरं, त्याचं एका दंतकथेवर भागलं नाही. दुसरी दंतकथा अशी आहे की, तिथे ब्राऊनी नावाचा प्राणी होता. या आईल ऑफ स्कायच्या बेटावरच्या ओशिन (Osheen) नावाच्या एका गावकऱ्याने एका ब्राऊनीचे प्राण वाचवले. त्यामुळे दोघे मित्र झाले. म्हणजे माणूस आणि पशू! त्या ओशिनची बायको वारली आणि ओशिन दुःखीकष्टी झाला. त्यातच तो मेला. मग त्या ब्राऊनीने काय करावं? त्याने डोंगराला तोडून दोघांच्या स्मरणार्थ दोनं शिल्पं बनवली. त्यातला मोठा दगड म्हणजे ओशिनसाठी केलेलं शिल्प आणि दुसरं छोटं त्याच्या बायकोसाठी! बोला? ही दंतकथा पसरवली की, आजच्या विज्ञानयुगातही माणसं तिथे येतात.

जाताजाता आणखी एक दंतकथा ऐकून जा. सील मासा देखण्या माणसाचं रूप घेतो. कुणी म्हणतं, त्यांना वर्षातून एकदा संधी मिळते. कुणी म्हणतं, चक्क नऊ दिवसांतून एकदा मिळते. अतृप्त स्त्रियांना सुख देणं हे त्यांचं प्रमुख काम असतं. जगभरात इतरत्र मत्स्यकन्यांच्या कथा सांगितल्या जातात. स्कॉटलंडमध्ये चक्क मत्स्यपुरुषांच्या! मुख्य म्हणजे काही मंडळींनी असं काही पाहिल्याचे अनुभव लिहून ठेवले आहेत.

कपोलकल्पित कथांनी जागांचे माहात्म्य वाढवायचं हा तिथला एक उद्योग आहे. एकंदरीत अंधश्रद्धा भारतातच नाही, चक्क जगभर आहे. तसा हा म्हातारा फक्त ७१९ मीटर उंच आहे. हौस असेल तर चढा वर आणि अंगठा सर करा.

‘फेअरी पूल्स’ ही आणखी एक आकर्षक जागा आहे. दुधाळ पाणी कलिन डोंगरांच्या अंगाखांद्यावरून नाचत खाली येते. ते खाली येते तिथे लगून्स तयार होतात. पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक आहे की, पाण्याखालचे डोंगर वगैरे आरशात पाहिल्यासारखे दिसतात. गाडी कारपार्कमध्ये ठेवून अडीच एक किलोमीटरचं अंतर दगडावरून चालायचं कोठेही. फार मोठा चढउतार नाही. ते खळाळून वाहणारं स्कॉचचं पाणी तुमच्या सोबतीला असतं. आकाश निरभ्र असेल आणि तुम्ही नशीबवान असाल तर पाणी चक्क हिरवं भासतं. त्यालाही एक दंतकथा आहे. 'आईल ऑफ स्काय'मध्ये इतिहासपूर्व काळात सुंदर पऱ्या राहत असत. तिथे अनेक जागांचा उल्लेख फेरी अमुक, (Fairy) फेरी तमुक असा असतो. या सुंदर तलावांमध्ये या पऱ्या आंघोळ करत असतात म्हणून हा ‘फेअरी पूल’. प्रेमात पडावं, अशी छोटी तळी आहेत आणि त्यात उडी मारायची भयंकर इच्छा होते. पण तुम्ही अंगात एक स्वेटर किंवा कोट घालून फिरत असाल तर पाण्याच्या वाटेला जाऊ नका. रोज गिझरच्या गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांचं ते काम नाही. त्यांनी काठावर बसावं. पायपण पाण्यात सोडू नयेत. आपला चेहरा पाण्यात पाहावा. जर शर्ट आणि अर्ध्या चड्डीत फिरत असाल तर मनाचा हिय्या करून पाय पाण्यात टाकून बघावं. बर्फाच्या पाण्यात उतरायची तयारी असेल तर उतरावं. पण तिथे आत उतरून जलतरणाचा आनंद घेणारे गोरे पर्यटक पाहिले की, वाटतं, त्यांच्या शरीराला हीटर्स बसवलेले असावेत. एरवी त्या पाण्यात पऱ्याच पोहू शकतात. माणसं नाहीत.

काळय़ा कलिन डोंगराच्या पायथ्याशी एक लेक आहे. स्कॉटलंडमध्ये सुंदर लेक आहे ही बातमी नाही. त्या तलावाचं नाव लॉक कोरुस्क. खरं सांगू, अनेकदा कानावर पडूनही त्या तलावाचं नाव माझ्या लक्षात राहिलेलं नाही. हा गोड पाण्याचा तलाव आहे. त्यालाही आख्यायिका आहे. स्कॉटलंडच्या तलावाच्या पोटात असं काय घबाड आहे की, तिथे चित्रविचित्र प्राणी राहत असावेत असं त्यांना वाटतं. आधी त्या तलावाचं स्पेलिंग सांगतो. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उच्चार करा Loch Coruisk. या तलावात म्हणे केल्पीज राहतात (Kclpies). ही घोडय़ासारखी भुतं आहेत. कारण ते त्याचा उल्लेख स्पिरिटस् असा करतात. ती भुतं दिसतात घोडय़ासारखी आणि त्यांच्यात शंभर घोडय़ांची ताकद असते. तिथल्या टुमदार फॉलकर्क शहराजवळ मोटरवेने जाताना दोन प्रचंड लोखंडाचे घोडे दिसतात. म्हणजे त्यांची डोकी घोडय़ासारखी आहेत. ती शिल्पं आहेत, पण त्या दंतकथेतून निर्माण झालेली.

स्कॉटलंडला फिरायला जाताना स्कॉटिश दंतकथा वाचून जा. मग तुम्हाला विविध गोष्टींचा उलगडा होईल. भारतातही काही ठिकाणी काही गोष्टी समजून घ्यायला पुराण वाचावं लागतं. घरोघरी मातीच्याच चुली.

- द्वारकानाथ संझगिरी


स्कॉटलंड फिरताना म्हणजे विशेषतः हायलॅण्डच्या दऱ्याखोऱ्यांतून जाताना आपण इथे आयुष्यात जरा लवकर यायला हवं होतं असं वाटत राहतं. कारण हायलॅण्डला फिरायला जशी गाडीची गरज आहे तशी मजबूत पायाची आणि निरोगी हृदयाचीसुद्धा. हवा एवढी शुद्ध असते की, दमछाक कमी होते. तरी हसत डोंगर चढणे, उतरणे याला फक्त ‘उत्साह’ अपुरा पडतो. फिटनेस आणि तारुण्याची गरज असते. कारण तरच तुम्ही तिथल्या निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू शकता. एखादा धबधबा पाहायलाही डोंगरात दीड-दोन किलोमीटर चालायला लागते. निसर्गाच्या मांडीवर गाडीने जाता येतं, पण तिथून पुढे जायला तारुण्य लागतं. आजची पिढी खरंच नशीबवान आहे. योग्य वयात ते युरोप-अमेरिकेत स्थायिक होतात. त्यांचे खिसे गरम असतात, फिरायची हौस असते. ती मंडळी हे स्कॉटलंड पाहणं वगैरे तिशी-चाळिशीत पूर्ण करतात.


मी नशीबवान होतो की, क्रिकेटचे बोट धरून मी खूप जग फिरलो. पण इतर अनेकांची सुरुवातच पन्नाशीत किंवा साठीत होते. त्यामुळे काही गोष्टी लांबून पाहाव्या लागतात किंवा कंडक्टेड टूरच्या बसमधून. त्यामुळे महत्त्वाच्या जागा पाहता येतात, पण निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळणं होतं नाही. स्कॉटलंडमध्ये कॅसल्स (किल्ले) अनेक पाहायला मिळतात. अर्थात त्यांचं आर्किटेक्चर आपल्या किल्ल्यापेक्षा वेगळं असतं, पण तरीही किती पाहणार! मात्र काही नक्की पाहायला हवेत. त्यात एक कॅसल आहे ‘एलियन डोनान कॅसल’. एका चिमुकल्या बेटावर तो किल्ला उभा आहे. तिथे तीन समुद्री तलाव मिळतात. हा किल्ला किनाऱ्यापासून फक्त एक किलोमीटरवर आहे. किनाऱ्याला तो एका पुलाने जोडला गेलाय. तुम्हाला हा किल्ला विविध सिनेमांत दिसेल. त्याची चित्रं तुम्हाला मॅगझिनमध्ये दिसतील किंवा टेलिव्हिजनवर तो तुमच्या डोळ्यांसमोरून जाईल. इतका तो फोटोजेनिक आहे. ‘इलियन डोनान’चा अर्थ ‘डोनानचं बेट’. डोनान हे एका हुतात्मा झालेल्या संताचे नाव आहे. इ.स. ६१७ साली तो हे जग सोडून गेला. त्याने तिथे चर्च बांधलं असे म्हटलं जातं, पण चर्चचे अवशेष तिथे दिसत नाहीत. आजचा किल्ला तिथे तेराव्या शतकात बांधला गेला. मग त्याने स्कॉटलंडच्या रक्तरंजित इतिहासाचे घाव सोसले. त्या इतिहासाच्या खोलात जायची गरज नाही. जर तुम्ही माझ्याप्रमाणे इतिहासप्रेमी असाल तर स्कॉटलंडच्या इतिहासावर एक नजर टाकून हा किल्ला पाहायला जा. मग तुम्हाला ‘क्लॅन मॅकेन्झी’ किंवा ‘जॅकोबाईट बंडखोर’ वगैरे शब्द अनोळखी वाटणार नाहीत, पण फक्त किल्ल्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर डोक्याला फारसा त्रास करून घेऊ नका. कारण ते करणं म्हणजे हंपी पाहताना स्कॉटिश माणसाला हरिहर- बुक्क  समजावून सांगण्यासारखं आहे. या किल्ल्याच्या आयुष्यात त्याच्यावरच्या घावांमुळे तो अनेकदा कोलमडला. पुन्हा उभा राहिला, पुन्हा कोलमडला. हे रहाटगाडगं सुरूच होतं. आज जो किल्ला आपण पाहतो तो विसाव्या शतकात लेफ्टनंट कर्नल जॉन मॅकरीगिल स्ट्रपने केलेल्या डागडुजीनंतरचा आहे. आपल्या ऐतिहासिक वास्तूची ते किती काळजी घेतात पहा. त्या डागडुजीसाठी जॉर्ज मॅकी वॉटसन या एडिंबराच्या आर्किटेक्चरकडे ती जबाबदारी सोपवली गेली. पूर्वीची फारशी ड्रॉइंग्ज अस्तित्वात नव्हती. त्यामुळे तो असलेला किल्ला पाहून ते पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे असतील याचं काल्पनिक चित्र त्या आर्किटेक्टने स्वतःच्या डोळ्यासमोर उभं केलं आणि मग तो किल्ला पुन्हा उभारला.  त्या किल्ल्याकडे आता आपण दक्षिणेकडून शिरतो आणि आता किल्ल्याकडे जाणारा जो कमानीवर उभारलेला पूल आहे, त्यावरून आपण आत जातो. त्या किल्ल्याचे सौंदर्य हे जास्त आतल्या ओक लाकडाचं छत असलेल्या बॅन्क्वेंट हॉल, गोल टॉवर किंवा बिलेटिंग हॉलमध्ये नाही. त्यापेक्षा कितीतरी श्रीमंत किल्ले जगात आहेत. या किल्ल्याची नैसर्गिक श्रीमंती खूप मोठी आहे. सर्व बाजूला निळं पाणी आणि एका नितांतसुंदर पुलाने त्या पाण्यातल्या किल्ल्याची मुख्य जमिनीला जी नाळ जोडली गेलीय त्यामुळे तो किल्ला सुंदर दिसतो. त्याचे वरून घेतलेले काही फोटोग्राफ मी पाहिले आहेत. ते पाहिल्यावर त्या किल्ल्याचं सौंदर्य जाणवते.


हा किल्ला ‘मॅकरी’ जमातीचा आहे. ही एक स्कॉटिश जमात आहे. १७१९ साली हा किल्ला जॅकोबाईट बंड मोडण्यासाठी ब्रिटिश रॉयल नेव्हीनं उद्ध्वस्त केला. वर मी उल्लेख केल्याप्रमाणे हा उद्ध्वस्त किल्ला जॉन मॅकरीगिल स्ट्रपने विकत घेतला. आता त्यावर मॅकरी कुटुंबाच्या ट्रस्टची मालकी आहे. १९५५ साली तो आम जनतेसाठी खुला झाला. दरवर्षी हजारो माणसं तो पाहायला येतात. पर्यटकांच्या संख्येचा विचार केला तर तो स्कॉटलंडमधला तिसरा सर्वात लोकप्रिय किल्ला ठरावा. अनेक हॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग्ज या किल्ल्यात झालेले आहे. अगदी १९४८ च्या ‘बॉनी प्रिन्स चार्ली’पासून. बॉलीवूडच्या ‘कुछ कुछ होता है’च्या गाण्याचं शूटिंग या किल्ल्यात झालं होतं. तिथून बहुदा जवळच एक ग्लेन फिनान व्हायाडक्ट आहे. व्हायाडक्ट म्हणजे रेल्वे किंवा रस्त्यासाठी दरीवर बांधलेला लांबलचक पूल. दोन खांबांवर एक कमान उभी केली जाते. अशा अनेक कमानींचा तो पूल तयार होतो. इथे स्कॉटलंडमधला हा पूल अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यावरून धुराच्या इंजिनाची गाडी जाताना पाहणे हा प्रचंड आनंद आहे. त्या ब्रिजवरून जायचा अनुभव मी घेतला नाही, पण जवळून त्यावरून बागडत जाणारी आगगाडी पाहिली. ११८ वर्षांपूर्वीचा तो पूल आहे. वर एकच रेल्वे ट्रक आहे. त्याला २१ कमानी आहेत आणि सर्वात मोठी कमान १५ मीटरची आहे. अशी एक गोष्ट सांगितली जाते की, त्या पुलाच्या बांधकामाच्या वेळी एक घोडागाडी एका मोठय़ा खांबाच्या कॉन्क्रिटमध्ये पडली. प्रा. रोनाल्ड पॅक्स्टनला वाटलं की, घोडा खांबाच्या बांधकामात पडणं ही आख्यायिका आहे की खरी कहाणी ते पाहावे. त्याने दोन मोठय़ा खांबांना ज्यात घोडा जाऊ शकतो अशी दोन लहान भोकं करून त्यात कॅमेरे सोडले, पण दगडाशिवाय काहीही सापडलं नाही. २००१ साली स्कॅनिंगचे तंत्रज्ञान आलं. त्यात चक्क घोडागाडीचे अवशेष सापडले. ती आख्यायिका खरी ठरली. अनेक चित्रपटांत त्या पुलाचे चित्रीकरण झालंय. विशेषतः ‘हॅरी पॉटर’मध्ये. तो पूल पाहताना मी कधी बालपणात शिरलो आणि पुलावर धुरांच्या रेषा काढत आगगाडी आली तेव्हा किती फोटो काढत गेलो हे कळलंच नाही. नंतर आजूबाजूला पाहिलं तर चाळिशीच्या पुढची अनेक लहान मुलं तोच उद्योग करत होती. स्कॉटलंड खरंच वय विसरायला लावतं.

- द्वारकानाथ संझगिरी


इनव्हरनेस, बेननेव्हिस, आईल ऑफ स्काय हा त्रिकोण पूर्ण केल्याशिवाय स्कॉटलंडमधून परतू नये. पाप लागतं. माणसाच्या कलात्मक जाणिवेचा अपमान होतो. स्कॉटलंडच्या नैसर्गिक आस्वादामध्ये फक्त स्कॉच व्हिस्की येत नाही. आम्ही हा त्रिकोण पालथा घातला. गाडीने जात असल्यामुळे हवं तिथे थांबता यायचं. मुख्य म्हणजे हवं तिथे जाता यायचं. अलीकडे 'जीपीएस'मुळे वाकडी वाट केली, तरी पुन्हा हमरस्त्यावर येणं सोपं होतं.


थंडीत सकाळी उठल्यावर दुलईतून बाहर पडणं नकोसं वाटतं. स्कॉटलंडचा निसर्गच तसा आहे. तिथून बाहेर पडणं नकोसं वाटतं. तुम्ही फिरता, त्यावेळी नशिबवान असाल तर वर निळं आकाश असतं. उत्तर-पश्चिमेस कुठला ना कुठला तलाव असतो. पाणी तसंच निळं असतं. तलावाची नावं फक्त बदलतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोंगर असतो. माणसाने सजवलंय वाटावं, इतपत हिरवेपण शिस्तबद्ध असतं. मेंढय़ांचे कळपच्या कळप, तो फाइव्ह स्टार बुफे रिचवत असतात. एकंदरीत त्यांच्या शरीराकडे पाहिल्यावर त्यांच्या सुखवस्तूपणाची जाणीव होते. रस्ते संगमरवराचे न बनवूनही गुळगुळीत वाटतात. ते फार रुंद वगैरे नसतात. पण ट्रॅफिकची शिस्त असल्यामुळे ते तसे वाटतात. समोरून येणारी गाडी ‘पहिले आप’ म्हणत उभी राहते. त्यामुळे रस्ता रुंद वाटायला लागतो. ‘पहिले आप’चं कौतुक लगेच तो समोरून येणारा मोटरवाला करतो, इतकी वर्षे परदेशी जाऊनही एका गोष्टीचा मला अचंबा वाटणं कमी झालेलं नाही. अरुंद रस्त्यावर समोरून गाडी आली की प्रत्येकजण दुसऱ्याला आधी जाऊ देण्याचा किती प्रेमाने प्रयत्न करतो. भारतीय माणसासाठी ही शिस्तीची परिसीमा आहे. आपल्याकडे आपण असा एकतर्फी प्रयत्न केला तर उर्वरित आयुष्य आत गाडीत बसून राहू.


त्या तलावाजवळच्या रस्त्यावरची झाडं बऱ्याचदा कमानी करून उभी आहेत असं वाटतं. काहीवेळा बाजूला अनंत सुंदर फुलं पाहायला मिळतात. ऱहोडोडेंड्रॉन्स (Rhododendrons) नावाची फुलं तिथे रस्त्याजवळ मैलोन्‌मैल दिसतात. ती केवळ रस्त्यावर दिसतात, निसर्गतः दिसतात, म्हणून त्याला ‘रानटी फुलं’ म्हणणे विचित्र वाटतं. हे ऱहोडोडेंटड्रॉन्स थंड प्रदेशात जास्त खुलत असावे. उत्तर अमेरिकेत किंवा आपल्याकडे नेपाळ, उत्तराखंड वगैरे ठिकाणी ती फुलं सापडतात. जर्मनीत या फुलांच्या बागा तयार केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी त्याचं खास रोपण केलं जातं, अशी ऱहोडोडेंड्रॉन स्कॉटलंडच्या फॉरर्टविल्यम्सला बेवारशासारखी उगवताना दिसतात. निसर्गाचा विचित्र न्याय आहे हा. इंग्लंडच्या काही किनाऱ्यांवर बारीक वाळू खास आणून टाकलीये. कारण तिथे जास्त छोटे गोटे सापडतात आणि अरबी आखातात वाळू सर्वत्र बेवारशासारखी पसरलेली असते, तसंच हे आहे. निसर्ग कुणाला काय देईल सांगता येत नाही. त्याने अरबांना वाळू दिली, कडक उन्हाळा दिला. गरम चटके दिले आणि त्याबरोबर तेल देऊन टाकलं. स्कॉटलंडला गोठवणाऱ्या थंडीचा शाप दिला पण दोन उशाःप दिले. एक हिरवागार रंगबेरंगी उन्हाळा आणि डोंगरातून खळाळत वाहणारं पाणी, ज्याची किंमत स्कॉच व्हिस्की पिताना कळते. हुशार गोऱ्यांनी बर्फ आणि थंडीतल्या  दिवसाचेही नंदनवन केले. तिथला हिवाळा आता बर्फातल्या खेळांनी दुमदुमून जातो.


स्कॉटलंडमध्ये जाऊन बेननेव्हिस न पाहणे म्हणजे सिक्कीमला जाऊन कांचनगंगा शिखर न पाहण्यासारखं आहे. बरं पाहणं, म्हणजे नुसतं पाहणं हं. वर जाणे नाही. तो दम आता माझ्यात नाही.फक्त स्कॉटलंड नाही, तर ब्रिटनचा तो मुकूट आहे. चार हजार चारशे अकरा फुटांवरचं ब्रिटनचं सर्वांत उंच शिखर! तसे ब्रिटनचे डोंगर बुटकेच. स्कॉटलंडमधल्या डोंगरात त्यातल्या त्यात उंची दिसते. त्यातलं हे सर्वांत उंच. पर्यटक म्हणून तुम्ही तिथे जात नाही. कारण वर साधं हॉटेलही नाही. टॉयलेट्सही नाही. तिथे गिर्यारोहक जातात. डोंगराशी संबंधित जेवढे साहसी खेळ आहेत ते बेननेव्हिसच्या कुशीत खेळता येतात. तिथे १७७१ साली १७ ऑगस्टला पहिला माणूस पोहचला. जेम्स रॉबर्टसन हे त्याचं नाव. आता दरवर्षी एक लाख साहसी पर्यटक तो चढून जातात. त्यात तीनचतुर्थांश मंडळी कच्चा रस्ता वापरतात. त्याला 'पोनी ट्रॅक' म्हणतात; या ब्रिटिशांच्या मुकुटाचा आकार कोसळलेल्या घुमटासारखा आहे. तिथे पूर्वी एक ‘ऑबझरवेटरी’ होती. ती साधारण १८८३ ते १९०४ पर्यंत ‘कार्यरत’ होती. आता ती बंद आहे. अर्थात बेननेव्हीस चढणं फारसं कठीण नसावं. त्या ‘पोनी ट्रॅक’ची नीट काळजी घेतली जाते. डोंगरातून वाहणाऱ्या स्कॉचच्या पाण्यामुळे आणि काही ठिकाणी विविध आकाराचे दगड यामुळे काही भाग निसरडा ठरू शकतो. चढ सरळ नाहीये, नागमोडी वळणं आहेत. त्यामुळे उत्साह असेल आणि पायात आणि छातीत दम असेल तर वर नक्की चढावं. जे नेहमी डोंगरखोऱ्यात रमतात त्यांच्यासाठी बेननेव्हीस चढणं हा वेगळा आनंद ठरू शकतो.


तिथे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी बेननेव्हीस धावत चढून उतरण्याची शर्यत होते. त्याला ‘बेननेव्हीस रेस’ म्हणतात. १८९५ साली फोर्ट विल्यम्समधला एक नाभिक धावत बेननेव्हीस चढला आणि उतरला. तो सप्टेंबर महिना होता. त्याने साधारण दोन तास एकेचाळीस मिनिटं घेतली. तिथे या शर्यतीचे बीज पडले. त्यावर  रेसचं रोपटे उगवले, पुन्हा जमीनदोस्त झाले. पण १९३७ पासून हे रोपटं खऱ्या अर्थाने फोफावलं. आता फोर्ट विल्यम्स इथल्या क्लॉगन पार्क, फुटबॉलच्या मैदानावरून शर्यत सुरू होते. ती १४ किलोमीटर्स लांबीची आहे. त्यात ४४०० फुटाचा (१३४० मीटर्स) चढ आहे. फक्त पाचशे धावपटूंना भाग घेता येतो. ज्यांनी किमान तीन डोंगर रनिंग स्पर्धेत भाग घेतलाय त्यांचीच निवड होते. धावपटूला स्वतःचा रेनकोट, एक टोपी, हातमोजे आणि एक शिट्टी आणावी लागते. एखादा धावपटू दोन तासांत बेननेव्हिसला भोज्या करू शकला नाही तर त्याला वरून परत पाठवलं जातं. आजचा तिथला विक्रम १ तास २५ मिनिटे ३४ सेकंदांचा आहे. पण तो १९८४ साली केस्वीक (लेक डिस्ट्रिक्ट)च्या केनी स्टुअर्टने केला होता. आजही तो अबाधित आहे. महिला फार मागे नाहीत. २०१८ साली व्हिक्टोरिया विल्कीनसनने एक तास त्रेचाळीस मिनिटे आणि एक सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला. तुम्हाला हे विक्रम मोडायचेत तर पळा बेननेव्हीसवर.

पण जी मंडळी दोन जिने चढायला लिफ्ट वापरतात त्यांच्यासाठी हे काम नाही. त्यांच्यासाठी जवळच्या एका शिखरावर जायला गोंडोला आहे. त्याने मस्त वर जायचं. तो जवळच्या डोंगरावर ६५० मीटर्सपर्यंत घेऊन जातो. जाताना समोरचे डोंगर तलाव टुमदार गाव दिसतात. बेननेव्हिस दिसतं. वर एक चांगलं रेस्टॉरंट आहे. मी तिथे गेलो तेव्हा पाऊस उन्हाचा खेळ सुरू होता. ढग आलं की समोरचं दृश्य मिटून जायचं. फक्त राखाडी पडदा दिसत होता. ढग गेले, सूर्य आला की समोरचं दृश्य साठवायला दोन डोळे अपुरे वाटतात. हातात एक गरम कॉफी घ्या आणि एक एक घोट घेत समोरच्या डोंगरात आणि तळय़ामध्ये हरवून जा. तिथे काही खेळही आहेत. पक्ष्यासारखं उडता येते. सायकलने खडबडीत रस्त्याने खाली उतरता येते. नाहीतर गोंडोला आहेच परत जायला. तो आपले कष्ट झेलतो; आपण विसावतो.

मला तर गोंडोलाच माझा मित्र वाटला.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, १ सप्टेंबर २०१९)


काही वेळा परमेश्वर एक उजाड माळरान देतो. माणूस त्याच्यावर त्याच्या कल्पनेतून सुंदर नगरी उभी करतो. उदा. लास वेगास.

काही वेळा परमेश्वरच सुंदर स्थळ देतो. त्यात डोंगर असतात, विविध रंगांची फुलं असतात, हिरव्या रंगाच्या विविध शेडस्‌चं प्रदर्शन असतं, क्लिओपात्राच्या डोळय़ासारखं निळंभोर तळं असतं आणि शुद्ध हवा असते. काही महिन्यांनी हे हळूहळू नाहीसं होतं आणि एखाद्या श्वेतांबरीप्रमाणे ती जागा पूर्ण सफेद होऊ जाते. त्या जागेत जेव्हा कल्पक माणूस एखादं शहर किंवा गाव वसवतो तेव्हा ते शहर स्वप्नातलं शहर वाटतं. इनव्हरनेस तसं आहे.

खरं तर गाडीने फिरणं हा तिथल्या निसर्गाचा अपमान आहे. एक तर चालावं किंवा मैलोन्‌मैल पसरलेल्या लॉकनेसच्या काठावरून सायकलने  सफर करावी. मग तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या मांडीवर असता. शहर म्हणाल तर टिपिकल ब्रिटिश शहराप्रमाणे इथे चर्चेस आहेत, म्युझियम आहेत, वॉटरफ्रंटला लागून पब्ज आहेत. वॉटरफ्रंट ही संकल्पना पाश्चात्य देशात फार सुंदर रितीने राबवली जाते. नदी असो, कालवा असो, तळं असो, समुद्र असो. त्याकडे पाहत ड्रिंक घेणं, जेवणं हा वेगळा आनंद आहे. ‘ऑम्बियन्स’ हा शब्द अलीकडे रेस्टॉरंटसाठी नेहमी वापरला जातो. निसर्गाच्या ऑम्बियन्ससमोर मानवनिर्मित ऑम्बियन्स फिकं पडतं, हे साध्या वॉटरफ्रंटच्या पबमध्ये बसल्यावर जाणवतं. तिथं बीयर, व्हिस्की, वाईन किंवा कॉकटेल वगैरे  असतं. वेगळं काही नसतं.पण हा नैसर्गिक ऑम्बियन्स त्याची नशा वाढवतो. इनव्हरनेसला गेलात तर अशा पबमध्ये जाऊन मी सांगतो तो अनुभव घ्याच. विशेषतः रात्रीच्या वेळी. दिव्यांचं प्रतिबिंब नेस नदीच्या पाण्यात पडतं. त्यामुळे पाणी दिवाळी साजरी करतेय असं वाटतं. बरं पब्ज जवळजवळ असल्यामुळे एका पब वरुन दुसऱ्या पुबला जाणं सोपं होतं. स्कॉटलंडचं सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट म्हणजे तिथली स्कॉच व्हिस्की. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक डिस्टीलिरीची चव, गंध आणि नशा वेगवेगळी असते. तिथली प्रत्येक स्कॉच व्हिस्की इंग्लंडच काय स्कॉटलंडबाहेरही विकली जात नाही. त्यामुळे तिथली स्कॉच तुम्हाला लंडनमध्ये मिळेलच असं नाही. मुंबई तर दूर राहिली. त्यामुळे वाईन, बीयर, नेहमीची ब्लॅक लेबल वगेरे कुठल्याही मोहात न पडता तिथली स्थानिक व्हिस्की घ्या. मला व्हिस्की फारशी आवडत नाही. मी भारतात व्हिस्की फार क्वचित घेतो. अगदी सिंगल माल्ट एकवीस वर्षं जुनी वगैरे असेल तरच! शँपेन हे माझं सर्वात लाडकं ड्रिंक. पण स्कॉटलंडमध्ये मी फक्त वेगवेगळय़ा स्कॉचची चव घेतली. कितीही आवडली तरी पंजाबमध्ये जाऊन इडली सांबार खाण्यात अर्थ नसतो. ती व्हिस्की घ्यायचीही एक पद्धत आहे. त्यात एक थेंब पाणी टाकायचं आणि घ्यायची. ही दीक्षा मला तिथल्या व्हिस्कीच्या डिस्टीलरीतल्या तज्ञाने दिली. त्या एका थेंबाचं महत्त्व ना मला नीट समजलं, ना तो तज्ञ मला सांगू शकला. अगदी थेंबाने जमत नसेल तर दोन बर्फाचे तुकडे टाका, पण दोनच! पाण्याचे थेंब टाकून घेतलेली स्कॉच आणि दोन बर्फाचे तुकडे टाकून घेतलेली स्कॉच यात लग्नाच्या पहिल्या पंक्तीतला मठ्ठा आणि तिसऱ्या पंक्तीतला मठ्ठा एवढा फरक आहे. मी यावेळी हायलॅन्डस्‌मधल्या बेन नेविस डिस्टीलरीत डोकावलो. तिथे मला टूर घ्यायची होती. पण ती टूर फुल होती. मी चक्क मधल्या वारी गेलो होतो. तरी टूर भरलेली होती. याचा अर्थ अशा टूर्स किती लोकप्रिय आहेत याचा प्रत्यय तुम्हाला येईल. नंतर ग्लॅनमॉरेंजीला गेलो. हा अनुभव घेण्यासारखा असतो. ‘कुदरतने जो हमको बक्शा है वो सबसे हंसी जाम है ये’ असं साहिर लुधियानवी का म्हणतो ते कळेल. इतरत्र जगात स्कॉच व्हिस्की तयार करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही, कारण स्कॉटलंडचं पाणीच वेगळं आहे. तुम्ही हायलँडमधून फिरलात की डिस्टीलरीज्‌च्या डोंगरावरून गेलेले पाण्याचे मोठे पाइप दिसतील. डोंगरातल पाणी त्या पाइपातून आणलं जातं. डिस्टीलरी पाहिल्यावर पाण्याला ‘जीवन’ का म्हणतात ते पटतं.

असो. तुम्हाला शॉपिंग आवडो न आवडो (न आवडोपेक्षा न परवडो म्हणणं जास्त योग्य. कुणाला शॉपिंग आवडत नाही? आमचं दुःख हे असतं की आम्हाला ते परवडत नाही.) पण व्हिक्टोरियन मार्केटला एक चक्कर मारा. १८७०च्या आसपास ते बांधलं. त्यावेळी त्याला छप्पर नव्हतं. निळं आकाश हेच छप्पर. नंतर कधीतरी ते आगीत जळालं. तिथल्या वास्तूत लाकडाचा वापर जास्त असल्यामुळे पूर्वी तिथे आगी जास्त लागत.

१८९०-९१ च्या सुमारास ते नव्याने उभारलं तेव्हा त्याला छप्पर आलं. त्या छपराच्या जवळ खिडक्या आहेत. त्यामुळे जेव्हाजेव्हा सूर्याची चक्कर स्कॉटलंडला असते तेव्हा नैसर्गिक प्रकाश त्या मार्केटला मिळतो. तिथल्या ऍकॅडमी स्ट्रीट वरुन जिथे मार्केटमध्ये शिरता येते, तिथल्या कमानी १८७०च्या आहेत. आगीत त्यांचं नुकसान झालं नव्हतं. त्यातल्या मोठ्या  कमानीवर चक्क बैलाचं डोकं आहे. मधल्या दोन कमानींवर मेंढय़ाचं डोकं आहे. स्कॉटलंडच्या दृष्टीने ही दोन्ही जनावरं फार महत्त्वाची आहेत. एक व्हिक्टोरियन काळातलं मार्केट, त्यावेळचं आर्किटेक्चर कसं असे म्हणून पाहायला चांगलं आहे. स्कॉटलंडच्या आठवणीसाठी काही गोष्टी घेऊन जायच्या असतील तर त्या तिथे मिळतील. एरवी तुमचा भ्रमनिरास होईल.

स्कॉटलंडला जाल तर किल्टचा (Kilt) अनुभव घ्या. किल्ट म्हणजे कमरेएवढा स्कर्ट. ज्याला पाठी प्लीट्स (निऱ्या म्हणूया का?) असतात. हे स्कर्ट पुरुष घालतात. आपण जसे समारंभाला, घरच्या लग्नाला, धोतर घालतो, बायका नऊवारी साडी घालतात तसा तो तिथे घातला जातो. तो स्कॉटलंडचा राष्ट्रीय पोशाख आहे. तिथे तो लोकरीपासून बनवला जातो. तो टार्टन पॅटर्नचा असतो. टार्टन म्हणजे रंगीत चौकटीचं आणि नक्षीकाम असलेलं लोकरी कापड. त्यातला लाल रंग डोळय़ांत भरतो. एखाद्या फोटोसाठी तो परकर भाडय़ाने मिळतो. तुम्ही सूट किंवा कोट घालत असाल तर ‘ट्वीड’चा कोट किंवा सूट घ्या. महाग असतो, पण आयुष्यभर टिकेल आणि स्कॉटलंडची आठवण देत राहील. आयुष्यभर स्कॉटलंडच्या आठवणींचा सुगंधदेखील ठेवण्याची कुवत या ट्वीडच्या कोटात आहे. मला परवडला नाही. म्हणून शब्दरूपात मी आठवणी जपतोय, पण तुम्हाला जमलं तर तुमच्या वॉर्डरोबचा ‘रोब’ तो नक्की वाढेल.

- द्वारकानाथ संझगिरी
(भटकेगिरी, सामना, २५ ऑगस्ट २०१९)


यूकेमध्ये गेल्यावर लेक डिस्ट्रिक्ट आणि स्कॉटलंडला जायला मला कधीही आवडतं. गेल्या वर्षीच लेक डिस्ट्रिक्टला गेल्यामुळे यावेळी विश्वचषकाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मी स्कॉटलंडला गेलो. एक गोष्टही ठरवून टाकली होती की, यावेळी इनव्हरनेसला मुक्काम करायचा आणि तिथून इतरत्र फिरायचं. काही वर्षांपूर्वी मी इनव्हरनेसला काही तास थांबून तिथल्या लॉकनेस या जगप्रसिद्ध तलावाला फेरफटका मारून निघून गेलो होतो. यावेळी मला पद्मिनी फक्त आरशात पाहायचं समाधान नको होतं. मला पद्मिनी डोळे भरून पाहायची होती. त्यामुळे इनव्हरनेसमध्ये मुक्काम केला. इनव्हरनेस हे शहर ‘नेस’ नदीच्या मुखावर देवाने गंधर्वासाठी आधी वसवलं आणि मग माणसाकडे सुपूर्द केलं असं वाटतं. या शहराच्या सौंदर्याला लॉकनेसमधल्या एका राक्षससदृश जनावराने जास्त सुप्रसिद्ध केलं. त्याला ‘नेसी’ किंवा ‘लॉकनेस मॉन्स्टर’ असं म्हणतात. बाय द वे, स्कॉटिश भाषेत लॉक म्हणजे तलाव. या नेस तलावात तो राहतो अशी दंतकथा आहे. मी जरी त्याला दंतकथा म्हणालो तरी तिथली काही मंडळी त्याला पाहिल्याचं छातीठोकपणे सांगतात. इनव्हरनेसच्या छोटेखानी टुमदार विमानतळावरून शहरात जाताना आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने त्याच्या वडिलांनी ‘नेसी’ पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले. त्याच्या वडिलांच्या वर्णनाप्रमाणे तो साधारण डायनासोरसारखा होता. गेल्या वेळी मी ज्या टुरिस्ट बसमधून फिरत होतो त्यावेळी लॉकनेसच्या काठाजवळच्या एका पबच्या बारटेंडरने त्याच्या कुणी मित्राने पाहिल्याचं सांगितलं होतं. तो त्याला चिनी ड्रॅगनसारखा वाटला होता. तुम्ही नेमकी कुठली स्कॉच घेतलीय यावर वर्णन अवलंबून असावं. माझ्या मते ती दंतकथा आहे. एडिंबराच्या किल्ल्यातल्या भुताटकीसारखी. नाहीतर आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात त्या राक्षसी प्राण्याला लपून बसून सोयीप्रमाणे दर्शन देणं जमणारं नाही. तो असलाच तर सात्त्विक वृत्तीचा असावा. तो दर्शन देतो, पण हल्ला करत नाही. धूर्त ब्रिटिशांनी हा नसलेला राक्षस किती सुंदर विकलाय पहा ना! या वैज्ञानिक युगातही त्यावर विश्वास ठेवणारी माणसं ब्रिटिश असू शकतात. हार्वे, सर आयझॅक न्यूटनच्या देशातलं हे चित्र आहे.

इनव्हरनेस हे महागडं शहर आहे. साहजिकच आहे. सुंदर गोष्टी कधीच स्वस्त नसतात. इनव्हरनेसच्या सिटी सेंटरजवळ 'ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट’ मॉटेल्सही प्रचंड महाग होती म्हणून आम्ही इनव्हरनेसच्या परिघावर असलेल्या युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. खर सांगू, मजा आली. ती हॉस्टेल्स भाड्याने विंâवा हॉटेलप्रमाणे दिली गेली. कारण तो सुट्टीचा मोसम होता. बरीच मुलं घरी गेली होती. मला माझे जुने इंजिनीअिंरगचे दिवस आठवले. फक्त ही हॉस्टेल्स आमच्या त्या हॉस्टेल्सपेक्षा पॉश होती. आता आपलीही हॉस्टेल्स पॉश झाली असतील. कारण मी माझा १९७० मधला अनुभव सांगतोय. मस्तपैकी प्रत्येकाला एक वेगळी खोली, एक वेगळं टॉयलेट बाथरूम, बाकी टेबल, खुर्ची, कपाट, हीटर वगैरे गोष्टी आल्याच. हीटरची गरज मला लागलीच नाही. इंग्लंडच्या उत्तरेला असणारं इनव्हरनेस बऱ्यापैकी उष्ण होतं. चक्क खिडकी उघडी ठेवून मी चार दिवस झोपलो. पूर्वी इंग्लंडमध्ये पंखा हा प्रकार क्वचित सापडायचा. आता पंखा ही मूलभूत गरज आहे. आठएक खोल्यांना मिळून एक कॉमन किचन होतं. त्यात सर्व होतं. मायक्रोवेव्ह, मिक्सर्स, भांडी, इलेक्ट्रिक शेगड्या, फ्रीज; सर्व अगदी घरच्या स्वयंपाकघरासारखे आणि अर्थात टीव्ही, बसायला सोफा वगैरे! आपण आपलं खाणं आणायचं, बनवायचं, खायचं आणि भांडीकुंडी नीट धुऊन ठेवायची. बाकी बडदास्त उत्तम होती. त्यातला एकच त्रासदायक भाग होता, स्वत:चं जेवण स्वत: करणं. माझ्या वयाच्या पाश्चिमात्य पिढीलाही त्याची सवय असते. आजच्या भारतीय पिढीलाही आहे. आमच्या पिढीला नव्हती. कारण आमच्या वेळी आई आणि नंतर बायकोने आम्हाला लाडावून ठेवलेलं आहे. आता बऱ्याचदा नवरा बायकोला लाडावून ठेवतो. चहाची किटली आणि डिपडिप इंग्लिश ब्रेकफास्ट टी (माझी दिलमा या श्रीलंकन चहानंतरची लाडकी) असल्यामुळे चहा जमून गेला. ऑम्लेट करणं जास्त जिकरीचं वाटलं. मला कुणी ऑफर दिली असती की, मला नेटमध्ये तीन ओव्हर्स गोलंदाजी कर. मी तुला ऑम्लेट बनवून देतो, तर ती मी स्वीकारली असती.

आम्ही (मी आणि माझा मित्र विनायक दळवी) हॉस्टेलवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वगैरे वाजले होते. उन्हाळ्यात  सूर्य वगैरे असल्यामुळे रात्र पडलीय हे जाणवतच नाही, पण पोटात बोंबलणाऱ्या कावळ्यांनी जाणीव करून दिली होती की, ‘डिनर’ची वेळ झालीय. जवळ एकही रेस्टॉरंट नव्हतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की, एखादं ‘टेस्को’सारखं सुपरमार्केट गाठावं. फळं, अंडी, पाव, बटर, बिस्कीट वगैरे घेऊन येऊन पोटाची खळगी भरावी. हॉस्टेलच्या रिसेप्शनिस्टने मला सांगितलं, ‘‘चालत पंधरा मिनिटांत येईल.’’ स्कॉटलंडमध्ये चालणार नाही, तर कुठे चालणार? थोडं पुढे गेल्यावर मोबाईलवर पत्ता टाकायला गेल्यावर कळलं की, आसपास तीन-चार टेस्को आहेत. झाला गोंधळ! मग भारतीय पद्धत वापरली - विचारत जायचं, पण विचारायला रस्त्यावर माणूस लागतो. तो कुठून आणायचा? एकवेळ लॉकनेसमधला राक्षसी प्राणी दिसला असता, पण माणूस सापडणं कठीण. अचानक एक देवदूत आला. त्याची गाडी मी थांबवली. मी त्याला माझी व्यथा सांगितली. त्याने गाडीत घेतलं आणि जवळच्या टेस्कोच्या जवळ नेऊन सोडलं, पण ती थोडी इंडस्ट्रियल जागा होती. त्याने स्कॉटिश इंग्लिशमध्ये सांगितलेला पुढचा पत्ता डोक्यावरून गेला. इंग्लिश माणसाचं इंग्लिश तरी बऱ्यापैकी कळतं. स्कॉटिश माणसाचं इंग्लिश कळण्यापेक्षा अर्धमागधी भाषा कळायला जास्त सोपी. १९९६ साली मी पहिल्यांदा स्कॉटलंडमध्ये लालू राजपूतकडे गेलो होतो. तो तिथे पर्थला राहायचा. ‘‘पर्थला जाणारी बस . . . ’’ एवढा प्रश्न मी ग्लासगोच्या एका चौकात चार जणांना विचारला. तिघांनी इंग्लिश चित्रपटात हिरो खांदे उडवतो तसे खांदे उडवले. चौथ्याने जास्त आपुलकी दाखवली. मी काय म्हणतोय ते त्याला कळेना. शेवटी मी त्याला स्पेलिंग सांगितलं. ऊप्! ‘प्यार्थ’ तो म्हणाला आणि त्याने योग्य बस दाखवली. तर मी काय सांगत होतो? पुढे माझं सिव्हिल इंजिनीअरिंगचं ज्ञान वापरत आम्ही टेस्को गाठलं. सामान घेतलं. पुन्हा मोबाईलला आज्ञा देताना गोंधळ झाला. चार युनिव्हर्सिटीची हॉस्टेल्स वेगवेगळ्या ठिकाणी. काय करायचं? पुन्हा माझ्या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या ज्ञानावर मी विश्वास टाकला आणि विश्वासघात झाला. आम्ही चुकलो वाट. तोपर्यंत अंधार झाला होता. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पोटातला खड्डा भरताना आम्ही दोघांनी प्रत्येकी एक बॉक्स स्ट्रॉबेरी संपवली आणि दुसरा देवदूत भेटला. तो स्कॉटलंड यार्डचा पोलीस होता. त्याने प्रथम आमच्याकडे संशयाने पाहिले. कारण आमचे चेहरेच तसे, तो तरी काय करणार? मग त्याला मी कर्मकहाणी सांगितली. त्याने घड्याळाकडे पाहिलं. त्याला कुठेतरी गस्त घालायला जायच होतं. त्याला साधारण हॉस्टेलच्या जवळ काय आहे ते मी सांगितले. त्याने गाडीत घालून बरोबर दारात सोडलं. स्कॉटलंड यार्डबद्दल आदर होताच. तो द्विगुणीत झाला. तो डोळे मिचकावत म्हणाला, ‘‘ उद्या लॉकनेसच्या काठावर फिरताना तो राक्षसी प्राणी दिसतो का पहा. दिसेलही कदाचित.’’ मी त्याला ‘‘तू तो पाहिलायस का?’’ हे विचारलं नाही. कारण तो ‘‘हो’’ म्हणाला असता तर माझा स्कॉटलंड यार्डवरचा विश्वास उडाला असता. मीसुद्धा डोळे मिचकावत म्हटले, ‘‘तो नेमका कुठे आहे हे स्कॉटलंड यार्डखेरीज कुणाला जास्त ठाऊक असणार? सांगा ना पत्ता?’’ तो गडगडाटासारखा हसला आणि निघून गेला.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, १८ ऑगस्ट २०१९)


इंग्लिश चॅनलमधलं ‘आईल ऑफ व्हाईट’ खूप दिवस माझ्या बकेट लिस्टवर होतं. यावेळी विश्वचषकाच्यावेळी मी ती इच्छा पूर्ण केली.

फ्रेंच स्पेलिंग्ज आणि त्यांचे उच्चार हे गाढव आणि सुरेल ओरडणे इतके दूरचे आहेत. अर्थात इंग्लिश स्पेलिंग्ज आणि त्या शब्दांचे उच्चार हे कोकिळा आणि सुरेल आवाज इतकेही जवळचे नाहीत. त्यांना मध्येच सायलंट (मूक) अक्षरं टाकावेसे वाटतात. उदाहरणार्थ न्यूमोनियाच्या स्पेलिंगमध्ये ‘पी’ काय करतं ते मला कधीच कळलं नाही. या आईल (Isle) मध्ये ‘एस’चे काय काम? व्हाईटचं स्पेलिंग चक्क 'Wight' असं आहे. थोडक्यात 'Isle of Wight' असं इंग्लिशमध्ये लिहिलं जातं.

आयलंड म्हटलं की बंगले आले, रिसॉर्टस् आले. घराच्या गॅलरीत बसलं की समोरच्या निळाईने डोळय़ाला सुख द्यावे असे समुद्राकडे तोंड करून बसलेले फ्लॅटस् आले. ज्याला आपण ‘सुख’ असं म्हणतो ते सर्व आहे. अगदी व्हिक्टोरियन काळापासून ब्रिटिश माणूस तिथे हॉलिडेसाठी जातो. इंग्लंडमध्ये वाळूचे किनारे खूप कमी आहेत. जिथे तिथे दगडगोटे असतात. त्यामुळे मऊ लुसलुशीत वाळू दिसली की गोरा माणूस तिथे धावतो. इथे या बेटावर दक्षिणेकडे शॅन्कलिन आणि व्हेन्टॉर हे सुंदर समुद्रकिनारे आहेत. बरं, हवामान ‘डिप्रेसिंग’ नाही. परमेश्वराने तिथे सूर्याची डय़ुटी लावलेली आहे. त्यामुळे हे बेट लोकप्रिय आहे. साऊथम्प्टनच्या बंदरापासून अर्ध्या-पाऊण तासात मोठय़ा बोटीने तिथे जाता येतं. तुमच्याकडे तुमची किंवा भाडय़ाची गाडी असेल तर उत्तम. ती बोटीतून घेऊन जाता येते. पोर्टस मथवरूनही तिथे जाता येते. आम्ही म्हणजे मी, विनायक दळवी, त्याची भाची अनुष्का आणि तिचा मित्र जेम्स असे साऊथम्प्टनहून गेलो. संपूर्ण बेटाभोवती फिरणारा एक रस्ता आहे. त्यावरून हुंदडलो.

ख्रिस्तपूर्व ९५ साली हे बेट ज्युलिअस सिझरने जिंकल्याचा दाखला आहे. त्याचं रोमन नाव व्हेक्टिस. रोमन्सनी या बेटावर शहर वसवलं नाही, पण त्यांचे रोमन व्हिला (बंगले) या बेटावर अजून पाहायला मिळतात. ख्रिस्तपूर्व १२९३पर्यंत ते बेट चक्क नॉर्मन कुटुंबाचे होते. बेट विकत घेणं ही किती जुनी कल्पना आहे पहा. मग ते इंग्लंडच्या सिंहासनाचे झाले. १८६० साली फ्रेंचांनी या बेटावर हल्ला करू नये म्हणून बुरूज बांधण्यात आले. काम पक्कं होतं, म्हणून ते आज तसेच आहेत. व्हिक्टोरिया राणी तिथे लहानपणी सुट्टीसाठी यायची. तिथेच तिने ‘ऑसबोर्न हाऊस’ बांधलं. हे राणीचं हिवाळय़ातलं घर! राणीचं घर हे घर नसतं, तो पॅलेस असतो. ते नुसतं बाहेरून पाहिल्यावर कळतं की त्याला पॅलेसऐवजी हाऊस म्हणणं म्हणजे शाहरूख खानच्या ‘हेरिटेज’ बंगल्याला ‘झोपडं’ म्हणण्यासारखं आहे. राणीने ते बेट हॉलिडेसाठी सुप्रसिद्ध केल्यावर तिथे कवी लॉर्ड टेनिसन, चार्ल्स डिकन्स (थोर कादंबरीकार; 'टेल ऑफ टू सिरीज' किंवा 'डेव्हीड कॉपरफिल्ड' लिहिणारा) तिथे काही काळ राहिले. त्यांची तिथे घरं होती. डिकन्सने 'डेव्हिड कॉपरफिल्ड' तिथे लिहिलं. ती जागा अशी आहे की, त्या निसर्गाच्या सान्निध्यात बसल्यावर वेगवेगळय़ा कल्पना स्फुरू शकतात. अर्थात सर्वोत्कृष्ट निर्मिती फक्त निसर्गरम्य ठिकाणीच झालीय असं नाही. ‘कमला’ हे महाकाव्य स्वा. सावरकरांना तुरुंगात स्फुरलं. टिळकांनी ‘गीतारहस्य’ मंडालेच्या तुरुंगात लिहिलं. पण तरीही निसर्ग आणि उत्तम निर्मिती याचा कुठेतरी संबंध असावा. म्हणूनच आचार्य अत्रे नाटकं किंवा पटकथा लिहिताना त्यांच्या खंडाळय़ाच्या बंगल्यावर जात. अर्थात मला तिथून परतल्यावर एखादं काव्य किंवा कादंबरी नाही सुचली. एका दिवसात काय सुचणार? त्यात माझी प्रतिभा सामान्य. हं, विश्वचषकाच्या ‘इंग्लिश ब्रेकफास्ट’ या माझ्या स्तंभातला एक चांगला लेख मात्र सुचला.

आयलंडमध्ये पाहायचं काय असं मला विचारलंत तर चटकन सुचणारं उत्तर आहे - अप्रतिम निसर्ग सौंदर्य, पडून राहावं असं वाटणारं समुद्राचं निळं पाणी आणि लोळावीशी वाटणारी वाळू. तिथल्या डोंगराने लाटेचे, वाऱ्याचे प्रहार सहन करून घडवलेली शिल्पे वगैरे आहेत. त्यात एक आपले डोळे तृप्त करते ते ‘निडल्स’, म्हणजे सुया. चक्क प्रचंड पांढरे खडू समुद्राच्या पाण्यात उभे आहेत असं वाटतं. पाण्याच्या वर ते तीस मीटर्स आहेत. त्याला जग निडल्स म्हणत असले तरी ते सुयांंसारखे नाहीत तर कुऱ्हाडीच्या पात्यासारखे दिसतात. मग त्याला निडल्स का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे की, जो समुद्रातून डॉल्फिनसारखा वर आलेला सुळका होता तो सुईसारखा होता. तो १७६४ साली एका वादळात कोसळला. त्याला ‘निडल’ म्हणत. ते नाव चिकटलं ते चिकटलं. ते इंग्लंड आहे. तिथे नावाच्या पाटय़ा राज्यकर्त्यांच्या मर्जीप्रमाणे बदलत नाहीत. त्यांना इतिहास जपणं आवडतं. त्याच्याजवळच्या भागाला ‘ऍलम बे’ म्हणतात. निसर्गाच्या ज्या स्वतःच्या विविध लीला सुरू असतात. उदा. वादळ, भूकंप वगैरे. त्यातून असं काहीतरी अद्‌भूत उभं राहतं आणि जी ब्रिटिशांसारखी हुशार मंडळी असतात ते त्याचं सुंदर मार्केटिंग करतात. नैसर्गिक शिल्पांचं आकर्षण असणारी माझ्यासारखी माणसं तिथे जातात. आपल्या देशाचा समुद्रकिनारा केवढा मोठा आहे. त्यानेही वादळ, लाटा, भूकंप झेलले आहेत. तिथेही विविध शिल्पे तयार झाली आहेत, पण ती जगासमोर आलेली नाहीत. कारण जगासमोर आणण्यासाठी लागणारा उत्साह आपल्या ‘निर्णय घेणाऱ्या’ मंडळीत नाही. असो. किती दुःख उगळायचे! तर त्या ‘ऍलम बे’ला एक जी जेट्टी (बोटीचा धक्का) आहे तिथून बोटीने या निडल्सच्या जवळ जाता येते. डोंगरावरून तिथे जायला एक छोटीशी केबल कार आहे, खरं तर चेअरकारच ती! आम्ही तिथे गेलो तेव्हा पिसाट वारा म्हणजे काय याची मला जाणीव झाली. तो फक्त टोपी, स्कार्फ, कोट वगैरे उडवत नव्हता. तो माणसालाच उडवत होता. असा वारा मी आयुष्यात त्याआधी एकदा, दक्षिण आफ्रिकेत टेबललॅण्डवर अनुभवलाय. न उडण्यासाठी मला कसून प्रयत्न करावे लागत होते. त्यामुळे ती चेअरकार, ती बोट वगैरे सर्व बंद होतं. डोंगरावरूनही ते खडू मस्त दिसत होते. कारण त्यावर सूर्यप्रकाश पडला होता. पण त्या ‘खडूंचा’ फोटो काही काढता आला नाही. कारण कठडय़ाला धरलेला हात सोडून नुसतं उभं राहणंच कठीण होतं. हा अनुभवच वेगळा होता.

तिथून आम्ही ‘ऍलपेकॅस’ फार्मला गेलो. ‘ऍलपेकॅस’ हे अंगावर भरपूर लोकरीसारखे केस असलेले प्राणी. ते साधारण समुद्रसपाटीपासून अकरा हजार फुटांवर सापडतात. विशेषतः दक्षिण अमेरिकेत. तिथून आणून त्यांना या बेटावर त्यांचे प्रजोत्पादन केलंय. त्यांचे जे केस म्हणा, लोकर म्हणा असतात त्यातून ब्लँकेटस्, हॅटस्, स्वेटर्स, मोजे, ग्लोव्हज् तयार करतात. आपल्या बकऱ्या, कोंबडय़ा, कुत्रे वगैरे उंच, धष्टपुष्ट आणि लोकरीने भरलेले केले की कसे दिसतील तसे ते दिसतात. त्यांच्याबरोबर दोन तास वगैरे ट्रिप असते. म्हणजे त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, त्यांना गवत द्यायचं वगैरे. गोरे काय काय कल्पना लढवतात पैसे कमवायला!

असो, साऊथम्प्टनला गेलात तर मारा एक चक्कर आईल ऑफ व्हाईटला.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, ११ ऑगस्ट २०१९)


जर्सी हे बेट कापलेल्या ‘चीज’च्या तुकडय़ासारखं वरून दिसतं. समुद्र सर्वत्रच आहे, पण जो कापलेला भाग आहे तिथे सुंदर मरीन ड्राईव्ह आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हपेक्षा कदाचित जास्त लांबलचक असावा. एका बाजूला श्रीमंत बंगले आणि घरं आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक श्रीमंती असलेलं निळं पाणी असा तो थाट आहे. चालण्याचा कंटाळा असलेल्या माणसालाही सकाळ-संध्याकाळ वॉक घ्यावासा वाटेल असा तो रस्ता आहे. तिथे बरेच पर्यटक येत असल्यामुळे बंगले आणि नैसर्गिक सौंदर्याबरोबर मानवी सौंदर्यस्थळं पाहायला मिळतात. ते वेगळंच असतं. तो आपला बोनस.

हे बेट तसं छोटं असलं तरी संपूर्ण बेट फिरण्यासाठी जवळ जवळ ३५० मैलांचे रस्ते आहेत. बरेचसे नागमोडी. डोंगरमाथ्यावरचे, गोव्यातल्या गल्ल्यांसारखे छोटेखानी आणि देखणे. संपूर्ण जर्सी फिरायचा उत्तम मार्ग म्हणजे सायकलने फिरणं. अनेक पर्यटक उत्तमोत्तम सायकली मिरवत फिरत असतात. पण त्यासाठी तुम्ही फिट हवेत. कारण शेवटी हे डोंगरावरून फिरणं आहे. बऱ्याचदा तिथल्या सायकलपटूंचा स्टॅमिना पाहून मी थक्क झालोय. सायकल बऱ्याचदा थकून आपल्या स्वाराला सांगते ‘जरा विश्रांती घेऊया, दमले मी’ असा भास मला आडव्या झालेल्या सायकलकडे पाहून होतो. अलीकडे युरोपात फिटनेस आणि पेट्रोल व पैसे बचतीसाठी सायकल मुबलकपणे वापरली जाते. बरीच मंडळी ऑफिसातसुद्धा सायकलने जातात. त्यांच्यासाठी हा फिरण्याचा प्रकार सर्वोत्तम आहे. फिट नसाल तर नसत्या भानगडीत पडू नका. जर्सीमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिस नाही. डॉक्टरची साधी भेट चार हजार रुपयांना पडते. अर्थात आणीबाणीच्या परिस्थितीत सेवा फुकट असते. पण सेवा फुकट आहे म्हणून आणीबाणी स्वतःवर ओढवून घ्या कशाला?

तुमच्याकडे कारचं लायसन्स आहे, तुम्हाला नियमांची बंधनं पाळून गाडी चालवता येते, आपलं घोडं न दामटवता समोरच्या गाडीला ‘पहले आप’ म्हणता येतं, थोडक्यात कर्टसी दाखवता येत असेल तर गाडी घेऊन फिरणे उत्तम. फक्त लक्षात ठेवा, गाडीचा जास्तीत जास्त वेग ताशी चाळीस मैल एवढाच शक्य आहे. बऱ्याच ठिकाणी ताशी तीस मैलाच्यावर जाता येत नाही. रस्ते इतके अरुंद आहेत की, बऱ्याच ठिकाणी आपली गाडी थांबवून समोरच्या गाडीला वाट करून द्यावी लागते. मी बसने फिरलो. एके ठिकाणी एका अरुंद रस्त्यावर समोरून चक्क ट्रॅक्टर आला. बस चालकाने बस थांबवली. ट्रॅक्टरला वाट करून दिली. तो ट्रॅक्टर चक्क एक कुणी तिथली सोनाक्षी सिन्हा आयटेम गर्लच्या कपड्यात चालवत होती. आमच्या बसचालकाला सवय होती म्हणून त्याचा गाडीवर ताबा राहिला. एरव्ही अपघात होऊ शकला असता.म्हणून गाडी चालवताना सांभाळावं लागतं.गाडी चालवताना आसपासचा निसर्गही लक्ष विचलित करू शकतो. कधीतरी डोंगरमाथ्यावरून खाली असंख्य मोरपिसं एकत्र आल्यासारखा, मोरपंखी समुद्र दिसतो. बऱ्याचदा हिरवंगार माळरान, त्यावर चरणाऱ्या जर्सी गाई, तर कधी बटाटय़ाची शेते दिसतात. (ती पाहिल्यावर कळतं की ‘पोटॅटो चिप्स तिथे त्याची भाकर का बनली आहे. किंवा जॅकेट पोटॅटो त्यांना पक्वान्न का वाटतो?) मध्येच दोन्ही बाजूंना छत्र्या धरल्याप्रमाणे झाडांची रांगचरांग दिसते. या सुंदरसुंदर गोष्टींनीही लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे जर्सी फिरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टुरिस्ट बसने फिरणं. त्या बस ड्रायव्हरच्या कॉमेंट्रीमुळे चार गोष्टी कळत जातात. काही अतिसुंदर बंगल्यांच्या इथे गाडी थांबवून तो सांगतो, ‘हा अमक्या तमक्याचा बंगला. आता हा अमका तमका तिथल्या टी.व्ही. सीरियलचा हिरो वगैरे असेल तर आपल्याला माहीत नसतो. ज्यांना कळतं ते आनंदी चित्कार सोडत असतात, पण काही आपल्यालाही उमगतात. एका फ्रेंच किल्ल्यासरख्या वास्तूसमोर उभा राहून तो म्हणाला, ‘‘स्वाईप’ या जगप्रसिद्ध टॉनिक वॉटर’ बनवणाऱया कंपनीच्या मालकाचा हा बंगला.’’ एकेकाळी ‘जीन ऍण्ड टॉनिक’ माझं लाडकं ड्रिंक होतं. अलीकडे मला टॉनिक वॉटरमधल्या क्विनाईनची ऍलर्जी होते. केवळ त्यामुळे पुढच्या जन्मी तो बंगला घ्यायचा विचार मी रद्द केला. कुरूपता शोधून सापडली नाही. एका जुनाट घरासमोर गाडी थांबवून बस चालक म्हणाला,"इथे १०२ वर्षाची म्हातारी जन्मापासून राहते". ते घर तर ३०२ वर्षाचं वाटत होतं. पण तरी कुरूपता नाही.

तिथे ते बेट फिरताना, महत्त्वाच्या जागा कळतात.

त्यातली एक म्हणजे सेंट हेलिअर. म्हणजे त्यांची राजधानी असेल. साधारण दादरएवढी. माझं हॉटेल तिथेच होतं. जर्सीची चौतीस टक्के लोकसंख्या तिथे राहते. म्हणजे साधारण चौतीस हजार माणसं. त्यामुळे ते गजबजलेलं वाटतं. सहाव्या शतकातल्या एका ख्रिश्चन साधूचं नाव त्या शहराला दिलंय. तिथून जवळ एलिझाबेथ कॅसल दिसतो. तो समुद्रात आहे, पण अलिबागप्रमाणे ओहोटीच्या वेळी किल्ल्यात चालत जाता येतं. सेंट हेलिअर बंदराच्या आणि अर्थात बेटाच्या संरक्षणासाठी तो बांधला. त्यावेळी पहिल्या एलिझाबेथचं राज्य होतं. त्यामुळे तिचं नाव देऊन टाकलं. ती बस तुम्हाला मॉ ऑरजी (Mont Orgucil) हा ‘गोट’ हार्बरजवळचा किल्लासुद्धा दाखवते. एकेकाळी जर्सीच्या संरक्षणासाठी तो बांधलेला आहे. तुम्ही म्युझियमप्रेमी असाल तर जर्सी म्युझियम ऍण्ड आर्ट गॅलरी, ला ह्यू बाय म्युझियम (La Houguc bic,)मॅरीटाइम म्युझियमसारखे म्युझियम्स आहेत. एक प्राणिसंग्रहालय आहे. एक माझं पाहायचं राहिलं पण तुम्ही पहा. मॉ आरग्यू कॅसलमध्ये ‘व्हील ऑफ युरीन’ आहे. एका मध्ययुगीन यंत्र, ज्यात लघवीच्या रंगावरून रोग ठरवला जात होता.

पण जर्सीला पर्यटक येतात ते डोंगराला हायकिंग करायला, मनमुराद सायकलिंग करायला, समुद्राच्या निळय़ा पाण्यात झोकून द्यायला आणि गुदगुल्या करणाऱया पांढऱ्या वाळून झोपून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कातडीत मुरवून घ्यायला. तिथे आणखी दोन सुंदर ऐतिहासिक वास्तू आहेत. एक ऐतिहासिक जर्सी वॉर टनेल आणि एक काचेचं चर्च. ते पुढच्या वेळी.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, २७ जुलै २०१९)


भटकेगिरी करताना आपण किती ‘अज्ञानी’ आहोत याचं आपल्याला ‘ज्ञान’ होतं आणि आपल्या सामान्यज्ञानाचाही अहंकार गळून पडतो. मी आज माझं अज्ञान माझ्या वाचकांसमोर ठेवतोय.

विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये आल्यावर माझा मित्र केदार लेलेचा फोन आला, “सर, मी सध्या जर्सीत आहे. या ना इथे, सुंदर बेट आहे.” तो मला त्याच्या लेखनातला द्रोणाचार्य मानतो. एकलव्याप्रमाणे तो माझ्याकडून शिकला असं तो म्हणतो. हा एकलव्य बुद्धिबळ वरच्या दर्जावर खेळायचा. तो बुद्धिबळ स्पर्धा कव्हर करतो. विश्वनाथन आनंद त्याचा जवळचा मित्र. त्याच्याशी तो बुद्धिबळाबद्दल चर्चा करतो. त्याने विम्बल्डनवर मराठीत पुस्तक लिहिलंय. ते तिथल्या लायब्ररीत आहे. विम्बल्डनवर पुस्तक लिहिणारा तो एकमेव भारतीय लेखक आहे. घरात वावरल्याप्रमाणे तो विम्बल्डनमध्ये वावरतो. या गोष्टींशी माझा जवळचा संबंध नाही. बुद्धी नसल्यामुळे मी बुद्धिबळाजवळ कधी गेलो नाही. एकेकाळी मी विम्बल्डनवेडा होतो. दोनतीनदा तिथे फेरफटकाही मारलाय, पण लॉर्डस् नावाच्या पंढरपूरप्रमाणे मी तिथला वारकरी नाही. तरीही त्याला मी द्रोणाचार्य वाटतो ते बहुधा वयामुळे. . .  आणि हो, दोघांतलं आणखी एक साम्य म्हणजे आम्ही दोघंही इंजिनिअर आहोत.

. . .  तर या एकलव्याला मी उलटा प्रश्न विचारला, “हे जर्सी कुठाय?”

तो म्हणाला, “अटलांटिक समुद्रात फ्रान्सजवळ आहे. पण ते ब्रिटिशांचं आहे. तिथे जायला वेगळा व्हिसा लागत नाही, ब्रिटिश व्हिसा चालतो.”

मी म्हटलं, “पाहूया कसं जमतं ते. वर्ल्डकपच्या धांदलीत कसं जमणार? दोन मॅचमध्ये मोठी गॅप असेल तर प्रयत्न करतो.”

त्याचं प्रत्युत्तर कसं होतं? विराट कोहली दोन क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप शोधतो तशी त्याने दोन सामन्यांत गॅप शोधली. त्यानेच तिकीट पाठवलं, हॉटेल बुक केलं आणि मी जर्सीला पोहोचलो.

मला तोपर्यंत ब्रिटिशांकडे ‘बेटं’ आहेत हे माहीत होतं. त्याला ‘चॅनल आयलंडस्’ म्हणतात हे ठाऊक होतं. स्कॉटलंडमधलं ‘आईल ऑफ स्काय’ माझ्या बकेट लिस्टवर होतं. साऊथम्पटजवळच्या ‘आईल ऑफ व्हाईट’ला जायचं मी ठरवूनही टाकलं होतं, पण जर्सी माझ्या डोक्यातच नव्हतं. तिथे गेल्यावर मला कळलं की, जर्सी गाय तिथलीच. अमेरिकेतल्या न्यू जर्सीला ‘जर्सी’ नाव याच बेटामुळे पडलं. माझ्या लहानपणी माझा एक लाडका सिनेमा होता, ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’. देव आनंदने सुरुवातीला ज्याच्या स्टाईल्स उसन्या घेतल्या तो ग्रेगरी पेक त्यात होता. त्याचं बरंचसं शूटींग जर्सीत झालं होतं.

मी जर्सीच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हा सकाळचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. विमानतळ छोटा होता. बाहेर लख्ख ऊन होतं. ब्रिटिशांना जर्सी उन्हासाठी आवडते. सूर्यदर्शनासाठी हपापलेल्या ब्रिटिशांना जर्सी हे सूर्यदेवाच्या गाभाऱ्यातलं बेट वाटतं. अर्थात तिथे थंडी नाही असं नाही. ज्या टुरिस्ट बसमधून मी जर्सी फिरलो त्याचा गाईड कम ड्राईव्हर सांगत होता की, चार-पाच वर्षांतून एकदा कधीतरी बर्फही पडतो, पण शून्याखाली तापमान फार क्वचित जातं. मी केदारला शोधत विमानतळाबाहेर गेलो आणि मला उन्हात थंड वाटलं. कारण वारा जोरात वाहत होता. ते एक छोटं बेट आहे. पंचेचाळीस चौरस मैलाचं. त्यामुळे वाऱ्याच्या मिठीत हे बेट बऱ्याचदा असतं. वारा नसला की, अंगातलं समर जॅकेटच काय, फुलशर्ट नकोसा वाटायचा. विमानतळाहून हॉटेलवर जाताना एक गोष्ट जाणवली की, रस्त्याच्या पाटय़ा चक्क फ्रेंचमध्ये आहेत. काही बंगले फ्रेंच ‘शॅटो’ स्टाईलचे आहेत. प्रत्येक बंगल्यातून श्रीमंती टपकतेय. पुढे बेटाच्या सफरीवर गेलो तेव्हा अंबानीच्या एक लाखांश पैसे मिळाले तर कुठला बंगला घ्यावा याचा माझा निर्णय होत नव्हता. देवाला मी म्हटलं, “मला अंबानीच कर, मी बेटच विकत घेऊन टाकतो.” तसं ते बेट इंग्लंडच्या राणीच्या मालकीचे आहे. त्याचं संरक्षण ही ब्रिटनची जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच त्याचं प्रतिनिधित्व करतं. एरवी त्याची स्वतंत्र लोकशाहीवर आधारित राज्यघटना आहे. गव्हर्नर तेवढा ब्रिटीशांचा असतो आणि हो, पाऊंड राज्य करतो. त्यांची स्वतःची करन्सी आहे, पण पौंड दिला की, पौंडच मिळतो. मी कुणालाही फ्रेंच भाषेत बोलताना ऐकलं नाही. तिथे ड्रायव्हिंगची बाजू आपल्यासारखी आहे. म्हणजे ब्रिटिश पद्धतीची. १९४० ते १९४५पर्यंत हे बेट दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने जिंकलं होतं. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हिंगच्या बाबतीत ‘किप लेफ्ट’चं ‘कीप राईट’ केलं, पण जर्मनीकडून ते दुसऱ्या महायुद्धात हिसकावून घेतल्यावर पुन्हा नियम बदलले. फ्रेंचांसाठी त्यांनी फक्त रस्त्यांची आणि जागांची नावं सोडली. भाषेच्या राज्यात फ्रेंच भाषेला घुसू दिलं नाही. इथे फ्रेंच भाषा नाही. कारण लोकसंख्येच्या ०.९ टक्के फ्रेंच आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त पोर्तुगीज आहेत. मूळ रहिवासी ४६.४ टक्के आहेत. त्यानंतर ब्रिटिश!

जर्सीच्या मूळ रहिवाशांची स्वतःची भाषा आहे, पण त्यावर इंग्लिशचीच छाप आहे. कॅनडात, मॉण्ट्रियलमध्ये फिरताना आपण फ्रान्समध्ये फिरतोय असं वाटतं. तसा फ्रेंचचा ठसा इथे नाहीच आहे. फ्रान्सचा किनारा समोर दिसतो, पण ते १४ मैलांचं अंतर फ्रेंच भाषा, किंवा संस्कृती ओलांडू शकलेली नाही. फ्रेंचला ऐतिहासिक भाषेचा दर्जा देऊन ‘बस कोपऱ्यात’ असं सांगितलंय. आमचा गाईड सांगत होता की, अलीकडे युरोपियन समुद्रातून जर्सीला जर्मन्स जास्त येतात. दुसऱ्या महायुद्धामुळे जर्मन्स हे त्यांचे तसे शत्रू. नाही म्हणता जर्मन राज्यात जर्सीच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. पारतंत्र्यातली सर्व दुःखं त्यांच्या वाटय़ाला आली, पण तरीही जर्मन माणसाबद्दल त्यांना रागद्वेष नाही. उलट सध्या त्यांच्या इकॉनॉमीला जर्मन पर्यटक हातभार लावतात. सध्या ते युरोपातलं श्रीमंत राष्ट्र आहे. ते थेट स्वतःच्या विमानातून येतात. शनिवार-रविवार जर्सीच्या उन्हात टॅन होतात. मऊ वाळूचा बिछाना करून विश्रांती घेतात आणि तरतरी येण्यासाठी ऍटलांटिकच्या निळय़ा पाण्याच्या कुशीत शिरतात. सोबतीला उत्तम वाईन, बीअर असतेच, पण जर्सीचं आईक्रिम हा उन्हावर उत्तम उतारा आहे. जर्सी गायीच्या दुधाचे पिवळसर व्हॅनिला म्हणजे जिभेसाठी अमृत. जिभेवरून ते घरंगळत जठरात गेल्यावर जठरालासुद्धा जिभेचा हेवा वाटत असेल, की ‘आपल्याला चव कळत असती तर. . . ’ मी परदेशात प्रत्येक गोष्ट मोजूनमापून खातो, पण ज्या दिवशी मी ते बेट टुरिस्ट बसने हिंडलो, तेव्हा आठ तासांच्या अवधीत मी दोन जर्सी आईक्रिम संपवले. मी विश्वामित्र असतो तर कदाचित मेनकेचा मोह टाळला असता, पण जर्सी आईसक्रिमचा टाळू शकलो नसतो. 

अरे हो, तिथे भारतीय भेटतात. मराठीसुद्धा भेटतात. पहिल्याच दिवशी बॉलीवूड हॉटेलात जेवताना त्या रेस्टॉरंटची भाषा मराठी झाली होती. माझी बहीण सांगत होती, तिथे ‘बॅक ऑफ इंडिया’ची शाखा आहे. मी माझं अज्ञान दूर करून घेतलंय. पुढच्या रविवारी तुम्हांला जर्सी फिरवतो.

द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, २१ जुलै २०१९)


निसर्गाने इंग्लंडला सौंदर्याचं वरदान दिलंय. हे वरदान चार महिने आपले डोळे सुखावतं. मे-जून-जुलैमध्ये आपली नजर पोहोचेल तिथवर हिरवा रंग त्याच्या विविध रूपांत दिसतो. त्यामुळेच ते पाचूचं बेट वाटतं. त्यावेळी इंग्लंडमध्ये कार किंवा ट्रेनने फिरणं हा एक वेगळा सौंदर्यानुभव असतो. क्रिकेटच्या विश्वचषकासाठी फिरताना बऱ्याचदा हा निसर्ग तुम्हाला पुनर्जीवित करतो. एक नवी ऊर्जा देतो.

साऊथम्प्टनच्या सामन्यानंतर ही ऊर्जा घेण्यासाठी मी ‘डर्डल डोअर’ला गेलो. माझ्या बरोबर विनायक दळवी आणि निमिष पाटगावकर हे माझे दोन पत्रकार मित्रही होते. इंग्लंडच्या दक्षिणेला डॉरसेटमध्ये ज्युरॅसिक किनाऱ्यावर एक दगडाची नैसर्गिक कमान तयार झालीय. त्याला ‘डर्डल डोअर’ म्हणतात. ज्युरॅसिक किनारा जवळजवळ ९६ मैलांचा आहे. ईस्ट डेव्हनमधल्या एक्समथमधून तो सुरू होतो तो डॉरसेटपर्यंत येतो. त्याचं नाव ज्युरॅसिक आहे. कारण तिथल्या दगडांचं अस्तित्व हे ज्युरॅसिक काळापासून आहे. तिथल्या डोंगरात ज्युरॅसिक काळापासूनच्या प्राण्यांचे अवशेष फॉसिल्सच्या रूपात सापडतात. हे डर्डल डोअर जेव्हा तुम्ही डोंगरावरून पाहता तेव्हा एक अजस्र डायनासोर निळं पाणी पितोय असा भास होतो, पण त्याचा आणि ज्युरॅसिक बीच नावाचा संबंध नाही. ‘वेल्डस्’ नावाच्या एका कुटुंबाचा या डर्डल डोअरवर चक्क ‘मालकी’ हक्क आहे. डॉरसेटमध्ये त्यांची बाराशे एकरची इस्टेट आहे. त्या इस्टेटीचा डर्डल डोअर एक भाग आहे, पण त्यांनी तो हॉटेल किंवा रिसॉर्टला न देता सर्वसामान्य माणसांसाठी खुला केलाय. जुन्या इंग्लिशमध्ये डर्डलचा अर्थ ‘ड्रिल केलेला’ असा आहे. चुनखडीच्या (Limestone) डोंगरात ही कमान निसर्गाने ड्रिल केल्यासारखी वाटते.

सर्वसाधारणपणे इंग्लंडमध्ये कुठेही बस आणि ट्रेनने पोहोचता येतं. इंग्लंड आणि अमेरिकेतला हा मोठा फरक आहे. अमेरिकेत लिंबू आणायलाही पार्श्वभागाखाली गाडी लागते. इंग्लंडमध्ये बस, ट्रेन तुम्हाला कुठेही नेऊन सोडतात, पण डर्डल डोअरच्या बाबतीत तो प्रवास जरा जिकिरीचा आहे. मुख्य म्हणजे ते ट्रेन-बसचं वेळापत्रक पाळणं थोडं कठीण होतं. त्यामुळे आम्ही गाडी भाडय़ाने घेतली. तिथे आपल्याप्रमाणे ट्रॅफिकला ‘कीप लेफ्ट’ हा मंत्र असल्यामुळे गाडी चालवणं आपल्याला सोपं जातं. त्यातल्या त्यात कठीण गोष्ट असते ती नियम पाळणं किंवा कायदा न तोडणं. आपल्याकडे लोक महात्मा गांधींना विसरले, पण त्यांची सविनय कायदेभंगाची चळवळ ट्रॅफिकच्या बाबतीत मात्र सुरू ठेवलीय. इंग्लंडमध्ये त्यासाठी सविनय शिक्षा होते. निमिष पाटगावकर आमचा सारथी झाला आणि आम्ही साऊथम्प्टन एअरपोर्टवरून निघालो. होकायंत्रापासून प्रगती होत होत आता माणसाच्या हातात जीपीएस आलंय. पूर्वी इंग्लंडमध्ये गाडी चालवताना वेगवेगळे नकाशे घेऊन बसावं लागे. जवळ जवळ २००० सालापर्यंत मी तो खेळ जवळून पाहिलाय. नंतर टॉमटॉम आले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाटाडय़ाच, पण कंपनीचं नाव ‘टॉमटॉम’ म्हणून त्याला टॉमटॉम म्हणत. आता मोबाईल. हा असा जादूचा दिवा आहे, तो घासला की, सर्व काही मिळतं. त्यातल्या जीपीएस नावाच्या वाटाडय़ाला आम्ही जागृत केलं, पण तो अवलंबून असतो वायफायवर. त्या रस्त्यावर काही ठिकाणी वायफाय नसायचं आणि तो वाटाडय़ा चुकवायचा. त्यामुळे चुकत आम्ही दोन तासांचा प्रवास अडीच तास केला, पण ते चुकणं भयंकर सुखद होतं. कारण इंग्लंडमध्ये गावचे रस्ते अरुंद असतात. बाजूला हिरवं गवत नाहीतर टुमदार बंगले असतात. ते छोटय़ा डोंगरांच्या अंगावरचं गवत पाहिलं की, शम्मी कपूर, देव आनंदप्रमाणे हिरॉईनसह गाणी म्हणत लोळत खाली यावंसं वाटतं. खरं सांगायचं तर मनाने मी देव आनंदप्रमाणे ‘उफ् युम्मा’ म्हणत लोळण घेऊनही आलो. बरोबर आशा पारेख तेवढी घरची होती. ती रस्त्यावरची गावं पाहिली की, आपलं गाव असं असावं असं वाटतं. ‘त्या तिथे पलीकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे’ लिहिणारे माडगूळकर काही वर्षे इंग्लंडच्या खेडय़ात राहिले असते तर त्यांनी त्या खेडय़ाचं अफलातून वर्णन केलं असतं. ‘खेडं’ हा शब्द चुकीचा. तिथे काय नसतं? प्रत्येक सुखसोय, शांतता आणि वर निसर्ग हा बोनस! एक चर्च असणारं, एक पब असणारं, एक फिश ऍण्ड चिप्सचं दुकान असणारं मस्त निवृत्ती जीवन जगायला आदर्श अशी ही गावं किंवा किमान वीकेण्ड एन्जॉय करायला तरी. आम्ही डर्डल डोअरला कधी पोहोचलो ते कळलंच नाही. खारा वारा नाकात गेल्यावर समुद्राची चाहूल लागली. डोंगरावर एक कार पार्क आहे. तिथे गाडी ठेवायची आणि खाली उतरत जायचं. उतार बऱ्यापैकी जास्त आहे. मग एका व्हय़ू पॉइंटला आपण येतो आणि तिथे ते दृश्य तुम्ही डोळ्यांच्या कॅमेऱ्याने क्लिक करायचं. डोळा हा सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा आहे. त्यामुळे हवे तेवढे फोटो काढून तुम्ही ते जतन करून ठेवू शकता. त्या फोटोत दिसते ती कमान, तो पाणी पिणारा डायनासोरसदृश डोंगर, निळा आणि मध्येच मयूरपंखी वाटणारा समुद्र आणि क्षणभर पांढऱ्या वाळूत येऊन विसावणाऱ्या मंद लाटा. हे सर्व फोटो काढताना गार वारा तुमच्या शरीराशी झोंबत असतो. या व्हय़ू पॉइंटवरून खाली उतरले की, वाळू येते. आम्ही गेलो त्या दिवशी सूर्य तळपत होता. त्यामुळे सूर्यकिरणांसाठी आसुसलेली गोरी मंडळी वाळूत विसावली होती. मी अंगात जॅकेट घालून त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होतो. मी अंगात जॅकेट घालून वाऱ्याला दूर ठेवत होतो आणि ती मंडळी वारा अंगावर खेळवत होती. दोन-चार तरुण-तरुणी पाण्यात पोहत होते. काही मंडळी किनाऱ्यावरून दूर चालत निघालेली होती. कारण दूरवर आणखी एक नैसर्गिक कमान दिसत होती. थंडीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे हे मला जाणवलं.

‘डर्डल डोअर’ पाहताना मला पटलं की, निसर्ग हा एक अत्यंत दर्जेदार मूर्तिकार असतो. समुद्राच्या लाटा, वारा ही त्याची ‘छिन्नी-हातोडा’ वगैरे असतात. हजारो वर्षे काम करून तो ‘डर्डल डोअर’सारखं नैसर्गिक शिल्प तयार करतो. ती कमान एवढी मोठी आहे की, त्यातून मध्यम आकाराची बोट जाऊ शकते. या डर्डल डोअरवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालंय, कविता लिहिल्या गेल्या आहेत. एक कविता मला आवडली.

आर्थर माऊल नावाच्या कवीने त्या डर्डल डोअरवर चार ओळी लिहिल्या आहेत-

                          Shall the tide thus ebb and flow for ever, and for evermore?
                          Rave the wave and glance the ripple through the rocks at Durdle Door?

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, १४ जुलै २०१९)

पृथ्वीच्या पाठीवर छोटी टुमदार शहरं, ज्यांचा उल्लेख आपण ‘टाऊन’ असा करतो, अशी अनेक आहेत. काही ठिकाणी निसर्ग इतका भरजरी आहे की, ती परमेश्वराची एकेकाळची रिसॉर्टस् वाटतात. मानवाच्या निर्मितीनंतर ती त्याने मानवाला देऊन टाकली.

त्यातली परमेश्वराची दोन रिसॉर्टस् मी क्वीन्स टाऊन शहराच्या कुशीतच पाहिली. एक ऍरोटाऊन, दुसरं ग्लेनॉर्की. ऍरोटाऊन पाच सहा रस्त्यांचं शहर असेल. जास्तीत जास्त आमच्या दादर पश्चिम एवढं. पण डोळे कॅमेऱ्याप्रमाणे क्षणाक्षणाला फोटो काढत असतात. थांबावंसं वाटतच नाही. क्षणात ते फोटो मनाच्या अल्बममध्ये चिकटवले जातात. आता लिहितानाही मी तो अल्बम चाळतोय आणि मनाने ऍरोटाऊनमध्ये फिरून येतोय.

हे शहर ऍरोनदीवर वसलंय म्हणून ते ऍरोटाऊन. १८६२च्या सुमारास ऍरो नदीत ‘सोनं’ सापडलं म्हणून ते वसलं गेलं. त्याचं पहिलं नाव होतं, ‘फॉक्स’. कारण विल्यम फॉक्सने प्रथम तिथे सोनं शोधलं. पण लगेचच त्या शहराने नदीचं नाव स्वीकारलं. सुरुवातीला खाणीत काम करणारी माणसं एक हजार इथं होती. ती लोकसंख्या थेट सात हजार झाली. त्यात युरोपियन्स आणि चिनी होते. पुढे सोन्यासाठी धडपड संपली आणि लोकसंख्या रोडावली. किती कमी व्हावी? १९६० साली दोनशेपेक्षा कमी माणसं ऍरोटाऊनमध्ये राहत. शिवाजीपार्कला संध्याकाळी चालताना भेटणारी माणसं मोजली तरी दोनशेपेक्षा जास्त भरतील. आता तिथे दोन हजारच्या वर माणसं आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक शाळा आहे. शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत. माणसं वाढली तरी शहराचं रूपडं बदलणार नाही, हे तिथली नगरपालिका पाहते. नव्या प्रत्येक घराचं सौंदर्य न्याहाळून घराला परवानगी मिळते. इतक्या काटेकोरपणे विजय मल्ल्यानेसुद्धा किंगफिशरसाठी हवाईसुंदरींची निवड केली नसेल. त्यामुळे सर्व घरं सौंदर्य स्पर्धेत मांडल्यासारखी दिसतात. पूर्वी युरोपियन आणि चिनी इमीग्रंट्स  राहात ती घरेही आज ‘अजून यौवनात मी’ म्हणू शकतील.

ग्लॅनोर्की हे क्वीन्सटाऊनचं उपनगरच म्हणायला हवं. नगर नाही ते गाव आहे. कसं काय नगर म्हणणार त्याला? तिथे फक्त तीनशे त्रेसस्ट माणसं राहतात. २००६च्या सेन्ससनंतर तिथे तब्बल शहाण्णव माणसं वाढली. (ग्लॅनोर्की जाऊ देत पण अख्ख्या न्यूझीलंडनेही ‘गर्दी’ ही गोष्ट कधी पाहिली नसावी.) तिथे दोन पब्ज आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीत पब नसलेलं गाव सापडणं कठीण! एक कॅफे आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा तो गिऱ्हाईकांनी भरलेला होता. आम्हाला हवं असलेलं फार अन्न शिल्लक नव्हतं. एक कॅफे किती पर्यटकांना पुरणार? तिथे अजून शेट्टी, पंजाबी, गुजराती दुकानदार कसा पोहोचला नाही? ही दुकानं पर्यटकांसाठीच आहेत. पण एक वैभव पहा. एक बोटीसाठी जेट्टी आहे आणि विमान उतरवण्यासाठी एअरस्ट्रीप! कारण नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत क्वीन्सटाऊन ही ऐश्वर्या राय असेल तर ग्लॅनोर्की हे त्या ऐश्वर्याचे डोळे आहेत. निळं पाणी, निळं आकाश, डोंगर, त्या डोंगरांच्या माथ्यावरचा बर्फ, मध्येच मयूरपंखी किंवा हिरवं दिसणारं पाणी हे आम्ही दंश करणाऱ्या थंडीत थक्क होऊन पाहात होतो.

मुळात क्वीन्सटाऊनहून ग्लॅनोर्कीला जाणे हा आनंदाने काठोकाठ भरलेला रस्ता आहे. क्वीन्सटाऊन शहरापासून थोडी नागमोडी वळणं घेत तो ग्लॅनोर्कीला जातो. ते पंचेचाळीस किलोमीटर्सचं अंतर संपूच नये असं वाटतं. डावीकडे सतत वाकाटिपू तलावाचं रंग बदलणारं पाणी, त्यातून जाणाऱ्या बोटी, उजवीकडे हिरवागार डोंगर, अधूनमधून डोंगरावरून घर डोकावून आपल्याकडे पाहातायत असं वाटतं. त्या पंचेचाळीस मिनिटांत अनेक उद्गारवाचक चिन्हं आपल्या तोंडातून बाहेर पडतात. तुम्हाला गाडीने जायचं नसेल तर तुम्ही बोटीने, खरंतर लाँचने जाऊ शकता. लाँच त्या ग्लॅनोर्कीच्या जेट्टीला जाऊन लागते. लाँचने कदाचित जास्त मजा येत असेल. कारण तुम्ही पाण्यातच असता. आम्ही तिथे निघालो होतो तेव्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली होती. त्या पंचेचाळीस किलोमीटर्सच्या प्रवासात पाऊस आणि काळे ढग धमकी देत होते. पण त्या तलावाच्या पाण्यावर जिथे ऊन पडायचं तिथे पाणी वेगळं दिसायचं आणि आकाशात सावळे ढग आले की पाणी रंग बदलायचं. सरडाच रंग बदलतो असं नाही. राजकारणीच रंग बदलतो असं नाही. पाणीसुद्धा रंग बदलतं. पण तो रंगबदल हवाहवासा वाटतो. आम्ही ग्लॅनोर्कीला पोहोचलो आणि पाऊस रिमझिमला. नुसत्या रिमझिमणाऱ्या पावसाने हवा भयंकर थंड केली. त्यात वाऱ्याला आपली ताकद दाखवायची लहर आली. दोन स्वेटर, एक जर्किनसुद्धा थंडीशी झुंज देऊ शकत नव्हते. माझ्या दोन नातवांना लोकरीत गुंडाळून आम्ही जेट्टीवर फेरफटका मारून आलो. हवेतली शुद्धता अशी असते की, शरीराचं तुम्ही नीट संरक्षण केल्यावर सर्दीची आठवण देणारीही शिंक तुम्हाला येत नाही. मग तुम्ही थंड बियर घ्या किंवा आणि काही.

अजून न्यूझीलंडला खूप पहायचंय. तीनदा तिथे गेलो, पण समाधान होत नाही. आणखी काय पाहायचं याची यादी वाढत जाते. आपण वेड लावणाऱ्या निसर्गाच्या बाहुपाशात जेव्हा असतो तेव्हा एक गोष्ट मनावर ठसत जाते की, हे सौंदर्य अचानक एका अपघाताने निर्माण झालं? याचा निर्माता कुणी नाही? याची आखणी कुणी केली नाही? अशक्य! कुठलीतरी शक्ती असावी. तिने या सौंदर्याची कल्पना करून निर्मिती केली असेल.

मी सश्रद्ध आहेच. पण हा निसर्ग, हे सौंदर्य हे त्या परमेश्वराचं अस्तित्व मनावर ठसवत जातं. विश्वास वाढवतं.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, ३० जून २०१९) 

न्यूझीलंडमधलं क्वीन्सटाऊन हे मी पाहिलेल्या पहिल्या चार सर्वोत्कृष्ट छोट्या शहरांत येतं. यात मी ‘मेट्रो’ शहरे धरलेली नाहीत. क्वीन्सटाऊन पाहिल्यावर क्वीन्सटाऊन अधिक सुंदर की दक्षिण आफ्रिकेतलं केपटाऊन? हा मला प्रश्न पडला. एकेकाळी बायको साधनासारखी हवी की वैजयंतीमालासारखी? हा प्रश्न मी सोडवू शकलो नसतो. तशीच माझी काहीशी परिस्थिती आहे. केपटाऊन ऍटलांटिकमध्ये पाय सोडून बसलंय तर क्वीन्सटाऊन निळ्या कृष्णाचा रंग मिरवणाऱ्या वाकाटिपू तलावात. क्वीन्सटाऊन हे दृष्ट लागण्यासारखं शहर आहे, पण दृष्ट लागू नये म्हणून साधं काळं तीटही त्याला निसर्ग देणाऱ्या देवाने किंवा त्या निसर्गाचं सोनं करणाऱ्या मानवाने लावलेलं नाही. जिथे जावे तिथे सौंदर्य दुथडी भरून वाहतंय. मग तुम्ही तलावाच्या काठावर बसा, तलावासमोरच्या एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये बसून बीअरचा आस्वाद घ्या, पॅराग्लायडिंग करता करता गरुडाप्रमाणे खाली नजर टाका किंवा डोंगराच्या एका टोकावरून नजरेचं जाळं शहरावर टाका. त्या जाळय़ात फक्त सौंदर्य अडकेल. तिथे कुरूपतेला वाव नाही.

हे फक्त सोळा हजार लोकसंख्येचं शहर न्यूझीलंडमधलं सर्वात महागडं शहर आहे. ऑकलंड हे उत्तर न्यूझीलंडमधलं राहायला सर्वात लोकप्रिय शहर. न्यूझीलंडमध्ये स्थापित झालेले ८० टक्के हिंदुस्थानी ऑकलंडमध्ये राहत असतील. कारण त्यामानाने तिथे थंडी कमी आहे. पण तरीही क्वीन्सटाऊनमधली जागेची किंमत ऑकलंडपेक्षा जास्त आहे. कारण ते पर्यटनाचे शहर आहे. ऐसपैस जागा नाही आणि परदेशी मंडळी आणि पैसे गुंतवणारी मंडळी या शहराच्या सौंदर्याने घायाळ झाली आहेत. साधारण डिसेंबर २०१६ नंतर तिथल्या घराची सरासरी रक्कम पाच कोटी रुपये झाली. तलावाच्या काठावर किंवा डोंगराच्या ‘केसा’त फक्त देवलोकातली नशीबवान मंडळी राहत असतील असं वाटतं. या शहराची लोकसंख्याही साधारण ७.१ टक्क्यांनी वाढते.
हे खऱ्या अर्थाने पर्यटकांचं शहर आहे. आम्ही वानाकात राहत असलो तरी रोज क्वीन्सटाऊनला जात होतो. तिथून क्वीन्सटाऊनला जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक डोंगरातून जायचा. तो पाऊणएक तासात तिथे पोचवायचा, पण त्या डोंगराची वळणं अशी होती की, नागालाही त्या वळणांनी कॉम्प्लेक्स दिला असता आणि अशा उंचीवर आहेत की, तिथून खाली पाहताना घारीलाही घेरी येईल, पण त्या वळणांवरून माझा मुलगा रोजचा गाडीखालचा रस्ता असल्यासारखा गाडी चालवायचा. रोज नव्या व्हय़ू पॉइंटवरून तिथल्या  दऱ्यांचं छाती दडपून टाकणारं दृश्य पाहायचो. रात्री मात्र दुसऱ्या लांबच्या, पण सरळ त्या डोंगराला विळखा घालून जाणाऱ्या रस्त्यावरून परतायचो. जाताना डोंगर उतरून गोल्फ क्लबसारखी हिरवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसली की, लक्षात यायचं, आपण क्वीन्सटाऊनमध्ये आलो. जरा पुढे गेलं की, ‘गॉगल’च्या निळय़ा काचेसारखा वाकाटिपू तलाव दिसायचा आणि उजव्या बाजूला नजर गेली की, डोंगरावरची शरदाच्या गारव्याने पिवळी, लाल झालेली झाडे एखाद्या गुच्छाप्रमाणे दिसायची. जणू निसर्ग हा गुच्छ घेऊन तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे असं वाटायचं. नुसतं दुकानाचं सौंदर्य तुम्हाला शॉपिंगसाठी खेचतं. क्वीन्सटाऊनच्या डोंगराच्या अंगावर जे रस्ते आहेत, त्यावरून गाडी चालवताना काळजी घ्यावी लागते.

क्वीन्सटाऊनला गेलेला पर्यटक गोंडोलाने (केबल कार) बॉब्ज पीकला (Bob’s Peak) जातो. गोंडोलातून वर जाताना जे दृश्य दिसतं ते पाहून जो श्वास रोखत नाही तो मनुष्यप्राणी नसतो. निळं पाणी, निळं आकाश, त्यावरचे ढग नावाचे आकाशकंदील, रंगात न्हालेली झाडं न्यूझीलंडमध्ये वारंवार दिसतात. कधी कंटाळा येत नाही. पुन्हापुन्हा  ती हवीहवीशी वाटतात. सुंदर मुली एकेकदा पाहून पोट भरतं का कधी? त्या गोंडोलात बसून बॉब्ज पीकवर जाताना निसर्गाची मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा पाहतोय असं वाटतं. कॅमेरा वेड्यासारखा क्लिक केला जातो. सेल्फीला उधाण येतं. गोंडोलातून वर जाताना डोळय़ांची पापणी मिटणं हा गुन्हा मानला जातो. डोंगरमाथ्यावरून तेच दृश्य आपण पुन्हा अधाशीपणे पाहतो.

डोंगरमाथ्यावर रग्गड धमाल करायची सोय आहे. लहान मुलांना खेळायला विविध खेळ आहेत आणि मोठय़ांसाठी तर विचारू नका. त्यात एक आहे ल्युग कार्ट (Luge Cart). न्यूझीलंडचाच तो शोध आहे. खेळण्यातली गाडीच समजा. ती गुरुत्वाकर्षणाने खाली जाते. तुमच्याकडे वेगावर नियंत्रण ठेवायला ब्रेक्स असतात. मुलं, मुलांचे आईबाप सर्व आनंद लुटू शकतात. दोन ट्रॅक्स आहेत. एक सीनिक म्हणजे सौंदर्याचा आस्वाद घेत फिरायचं. दुसरा अडथळय़ाचा म्हणजे अडथळे पार करायचे. तुम्ही आनंद लुटला की, छोटी चेअर लिफ्ट म्हणजे छोटी केबल कार तुम्हाला बॉब्ज पीकवर घेऊन येते. तुम्ही शूर असाल आणि खिसा गरम असेल तर बंगी जंप आहे, पॅराग्लायडिंग आहे, पॅरासेलिंग आहे. भरपूर हिंदुस्थानी माणसं या गोष्टी उत्साहात करताना दिसतात. कारण अशा साहसी खेळांच्या बाबतीत न्यूझीलंड ही सर्वात सुरक्षित जागा मानली जाते आणि हिंदुस्थानी पर्यटकांचा खिसा चिनी, जपानी, अरब पर्यटकांसारखा भरलेला असतो. ही प्रगती लक्षणीय आहे. सायकल ट्रॅक्सही तिथे खच्चून आहेत. रात्री वर येऊन निरभ्र आकाशात टेलिस्कोपने तारे पाहायची सोय आहे आणि उदरभरण हा आवडता उद्देश असेल तर मस्त रेस्टॉरंट आहे. या सौंदर्यवती नगरीकडे जितका वेळ तुम्हाला टक लावून पाहायचा तेवढं एखादी खुर्ची पकडून उत्तम कॉफी पीत पाहू शकता. अरे हो, लंचला फोर कोर्स आणि डीनरला सिक्स कोर्स डिनर तुम्ही घेऊ शकता.

ही अशी एक जागा आहे जिथे कंटाळा येत नाही. सौंदर्य पिऊन डोळे थकत नाहीत. निघताना पाय जड होतात आणि मन भरलंय असं अजिबात वाटत नाही.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, २३ जून २०१९)

न्यूझीलंडचं सर्वात उंच शिखर म्हणजे ‘माऊंट कूक’. युरोपियन वसाहतदारांमधला कॅप्टन कूक हा मूळ पुरुष असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ‘कूक’ हे नाव न्यूझीलंडमध्ये आढळेल. गांधी घराण्यालाही असूया वाटावी एवढय़ा ठिकाणी कूकचं नाव आढळतं. या माऊंट कूकची उंची २०१४ साली ३,७२४ मीटर (१२,२१८ फूट) मोजली गेली. १९९१ साली ती ३,७६४ मी. (१२,३४९ फूट) होती. माऊंट कूक थोडा बुटका व्हायचं कारण दगडाचं कोसळणं (रॉक स्लाईड). हायकिंगची हौस तुम्ही तिथे भागवू शकता, पण शिखर आधी लांबून आणि मग बऱ्यापैकी जवळून पाहायलाही मस्त वाटतं. आकाश निरभ्र असेल तर ते १५० किलोमीटरच्या परिघातूनही दिसतं. हायवेवरून जाताना ते खुणावत असतं. सुपाच्या टोकासारखं त्याचं रूप नजरेत रुतून राहतं. सूर्यास्ताच्या वेळी पाहताना ते सोन्याच्या शिखरासारखं दिसतं. आम्ही सूर्यास्ताच्या वेळीच तिथे पोहोचलो तेव्हा शिखरावर सोन्याचे कण कुणीतरी टाकून गेलाय असं वाटलं.

गर्दीत दूरवर पांढरे कपडे घातलेली सिंड्रेला दिसावी तसं ते शिखर दिसत राहतं आणि अचानक ती सिंड्रेला तुमच्या समोर दत्त म्हणून हजर राहते. तिथे पायथ्याशी एक गाव आहे आणि कुशीत एक हॉटेल. त्या हॉटेलवर एक रात्र राहायची संधी आम्ही हुकवली. अंगावर मरिनो लोकर चढवली तरी थंड वारा खटय़ाळपणा करताना गुदगुल्या करता करता बोचकारत होता. एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण घेतले. त्या रेस्टॉरंटचा ऑम्बियन्स अतिशय सुंदर होता. उच्चभ्रू रेस्टॉरंट होते. गोरी जोडपी ग्लासाला ग्लास भिडवून वाईन घेता घेता रोमँटिक होत होती. ते वातावरणच असं होतं की, उबेसाठी मेरिनो लोकरीपेक्षा प्रियकर किंवा प्रियतमेची ऊब जास्त गरजेची वाटत होती. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये प्रथम मी गोऱ्या वेटर्स आणि वेट्रेसेसच्या नजरेत हिंदुस्थानीयांबद्दलची तुच्छता पाहिली. आम्ही आठ जण होतो. त्यात दोन लहान मुले. त्यात थंडी. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर टॉयलेट, अमुकतमुक करत सेटल व्हायला थोडा उशीर व्हायचा. बरेच पदार्थ असे असतात की, ज्याचे गुणधर्म आपल्याला ठाऊक नसतात. नशीब तिथे पदार्थांची नावे माओरी भाषेतली नाहीत. त्या वेटर्सना वाटलं, ‘‘ही मंडळी कुठून आपला वेळ घ्यायला आली आहेत?’’ कायदे आले तरी काही गोऱ्या माणसांच्या अंतर्मनातला वर्णश्रेष्ठत्वाचा तथाकथित अहंकार गेलेला नाही. आपल्याकडे तेच असतं म्हणा. वर्णाची जागा फक्त धर्म किंवा जात घेते. पहिल्यांदा मला असं वाटलं की, न्यूझीलंडमध्ये आमची ऑर्डर नाइलाज म्हणून घेतली जातेय. खाणं कंटाळून सर्व्ह केलं जातंय. त्यात पूर्वी भारतीयांकडे पाहताना ‘हे कडके’ असं पाहिलं जात होतं. आता युरोपियन गोरे ज्याला ‘महाग’ म्हणतात त्या गोष्टी भारतीय पर्यटक लीलया विकत घेतात.

माऊंट कूकचं डोळय़ात वसलेलं सौंदर्य यःकश्चित वेटरच्या उद्दामपणामुळे काही डागाळलं नाही. अजूनही ते माझ्या डोळय़ांत ओनरशिपची जागा घेऊन बसलंय. तिथे वर चढून जायची मोहीम मी पुढच्या जन्मी ढकललीय. कारण १२ हजार फूट फार मोठी उंची नाही. सिक्किममधला शांगू लेक मला वाटतं, त्याच उंचीवर आहे. हे शिखर अनेकांनी सर केलंय. त्यातलं एक नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे ते म्हणजे सर एडमंड हिलरी. एव्हरेस्ट सर करणारा पहिला मानव. पहिलं पाऊल त्याचं होतं. मग शेर्पा तेनसिंगचं! १९४८ साली त्याने माऊंट कूक सर केलं आणि २९ मे १९५३ साली एव्हरेस्ट. अर्थात माऊंट कूक सर करणं मॅट्रिक पास होणं होतं, एव्हरेस्ट सर करणे डॉक्टरेट! त्याने ती फक्त पाच वर्षांत पूर्ण केली हे महत्त्वाचं.

त्या माऊंट कूकच्या जवळच एक आणखी तलाव आहे. त्याचं नाव ‘लेक पुकाकी.’ माऊंट कूककडे जाताना तो बराच काळ कंपनी देतो. त्यामुळे डोळे सुखावतात. तो तलाव निळय़ा पाण्याचा आहे हे मी पुनः पुन्हा सांगणे म्हणजे किशोरी आमोणकर काय सुंदर गायच्या असं म्हणण्यासारखं आहे. किशोरीताई गायल्या म्हणजे चांगल्याच गायल्या हे जितकं गृहित आम्ही धरायचो, तेच तलावाचं आहे. न्यूझीलंडचा तलाव निळा नसेल तर मी तसा उल्लेख करीन, पण या प्रवासात तरी मला ती संधी मिळाली नाही. या पुकाकी तलावाची निळाई ही ग्लेशियर्सच्या पिठीमुळे आहे. आता ‘‘पीठ हा काय प्रकार आहे?’’ असे तुम्ही विचारणारच, तर दगडाचे जे पिठासारखे कण आहेत त्यांना ‘ग्लेशियर्स फ्लोअर’ असं म्हणतात. त्यामुळे ते पाणी निळं दिसतं. हा तलाव जिथे पुकाकी नदीला जाऊन मिळतो तिथे धरण बांधलंय. धरणाचा मुख्य हेतू वीज निर्माण करणं आहे. धरण हा माझ्या सिव्हिल इंजिनीअरिंग कारकीर्दीतला एक आवडता विषय असल्यामुळे थंड वाऱ्याला न जुमानता मी ते धरण पाहिलं.

माऊंट कूकवरून वानाका या निसर्गरम्य चिमुकल्या टाऊनमध्ये जाताना तुम्हाला लिंडीस लागते. पास म्हणजे आपल्या आईच्या भाषेत खिंड. खिंड म्हटली की, मराठी माणसाला पावनखिंड आठवते. डोळय़ांसमोर बाजीप्रभू दिसतो. पेशावरला गेल्यामुळे मला खैबरखिंडही आठवते. कारण खैबरखिंड म्हणजे पूर्वीचा सिल्क रूटचा भाग किंवा जिथून शक आले, हूण आले, मोगल आले ती खिंड! दोनदा या पेशावरला जाऊनही मला ती खिंड पाहायला मिळाली नव्हती. न्यूझीलंडमधल्या लिंडीस खिंडीला तसा काही इतिहास नाही. ती खूप सौंदर्यशालीही वाटली नाही. आपल्याला बोडक्या डोंगराचं काय आकर्षण? आपण दगडांच्या देशात राहतो. तो पाऊसपाणी नसलेला भाग असावा. तुळतुळीत गोटा केलेले डोंगर होते. बरं, चिंचोळा भागही खूप चिंचोळा नव्हता. हिंदुस्थानात फिरणाऱ्या माणसाला फार वेगळं वाटत नाही, पण या गोऱ्या लोकांची तुळतुळीत गोटे केलेले डोंगर विकण्याची मार्केटिंगची ताकद मी मानली. अनेकजण खिंडीतून फेरफटका मारतात. खरंच, ते काहीही विकू शकतात. ज्या वानाकात आम्ही तीन रात्री मुक्काम ठोकला तिथल्या तलावात किनाऱ्यापासून २५-३० फुटांवर एक झाड आहे. ती ‘विलो ट्री’ असावी. अरे, काय कौतुक त्या झाडाचं! न्यूझीलंडमध्ये कुठल्याही झाडाचे इतके फोटो काढले गेलेले नाहीत. कौतुक मोठं असलं तरी रस्त्यावर तिथे जाण्याच्या पाटय़ा नाहीत. अलीकडे जीपीएसमुळे त्याची गरज लागत नाही. थंड वारा झेलत मी एकटाच त्या झाडापर्यंत पोहोचलो. कमीत कमी शंभर पर्यटक त्या झाडाकडे अनिमिष नजरेने पाहत होते. जणू ओलेती एलिझाबेथ टेलर किंवा बो डेरेक पाण्यात उभी आहे. मला अणुभरही कौतुक वाटलं नाही. पाण्यात एकटं उभं आहे हीच फक्त कौतुकाची बाब. माणसं जाऊ देत, आसपासच्या झाडांनाही त्या झाडाचा हेवा वाटला नसता, पण वानाकात कायकाय आहे यासाठी गुगलवर गेलात तर झाड सर्वत्र दिसते. पाणी ओसरत असताना लोक झाडावर चढतात म्हणून तेवढा आक्रोश केला जातो.

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!

- द्वारकानाथ संझगिरी

(उत्सव, सामना, ९ जून २०१९)

दक्षिण न्यूझीलंडचं ‘अंतर्गत’ सौंदर्य पाहायचं असेल तर ख्राईस्टचर्च ते क्वीन्सटाऊन हा प्रवास विमानाने न करता गाडीने करावा. जवळपास पाचशे किलोमीटरचा रस्ता आहे. ख्राईस्टचर्चपासून ‘सीनिक रुट’ (सौंदर्यशाली रस्ता) लागेपर्यंत डोळे थोडेफार सुखावतात. पण गाडी सीनिक रुटकडे वळली की डोळे विस्फारतात. नागमोडी वळण, हिरवे डोंगर, निळं आभाळ, दूर डोंगरावर दिसणारा बर्फ आणि अधूनमधून लागणारा एखाद्या तलावाचा किनारा या डोळय़ांत साठवायच्या गोष्टी आहेत. वाटेत लागणारी छोटी गावे इतकी टुमदार असतात की, पुढे येणारे प्रत्येक गाव मागच्यापेक्षा सुंदर वाटतं. आपल्या सौंदर्याच्या व्याख्या बदलत जातात. मग लेक टेकॅपो येतो. त्यावर वसलेलं एक गाव येतं आणि आपल्याला वाटतं की, सौंदर्याची व्याख्या इथे पूर्ण होते.

टेकॅपो हे फक्त ३६९ रहिवाशांचं गाव आहे. ही मंडळी यक्ष-किन्नर वगैरे नाहीना याची मी खात्री करून घेतली. नाही, ती माणसंच होती. आपल्यासारखीच, पण काही बाबतीत नशिबवान. टेकॅपो तलावासमोर अलिशान घरामध्ये राहणाऱ्या माणसांची मला मुलाखत घ्यावीशी वाटली. समोर निळय़ा रंगाच्या वेगवेगळय़ा शेडस् दाखवणारा तलाव, त्या तलावात पाय सोडून बसलेले दक्षिणेचे आल्पस् पर्वत, तिथून दिसणारी बर्फाच्छादित शिखरे हे रोज पाहायचे. हे सुख की बोअरिंग? यांना जगात अस्वच्छता असते, कचऱ्याचे ढीग असतात, त्यात अन्न किंवा वस्तू शोधणारी अर्धनग्न माणसं असतात याची कल्पना तरी असेल का? ख्राईस्टचर्चच्या हत्याकांडानंतर जगात अतिरेकी आहेत हे त्यांना निदान कळलं तरी असेल. परवाच माझ्या न्यूझीलंडच्या एका लेखावर माझ्या एका वर्गमित्राने एक किस्सा लिहून पाठवला होता. १९८४ साली तो कोलकात्यात होता. तिथे भारत-इंग्लंड हा कसोटी सामना झाला होता. मी तो सामना कव्हर केलाय. अझरुद्दीनने पदार्पणात शतक ठोकलं होतं. त्यावेळी माझा मित्र गिरीश वैद्य ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड बँकेत होता. बँकेने इंग्लिश संघासाठी खाना वगैरे ठेवला होता. त्यावेळी काही इंग्लिश खेळाडूंशी त्याचं बोलणं झालं. त्यांना हिंदुस्थानी माणसाबद्दल अचंबा वाटला होता. त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यानंतर शिखांचं शिरकाण झालं. तरीही त्यातून माणसं उभी राहिली. मीडियामध्ये चर्चा क्रिकेटची होती. हिंदुस्थानी संघ सामना जिंकेल का वगैरे गोष्टींत लोकांना रस होता. तो खेळाडू आमच्या गिरीशला म्हणाला, ‘या एवढय़ा मोठय़ा गोष्टी कशा क्षणात विसरल्या गेल्या? त्या उलट आम्ही आदल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये होतो. त्यावेळी एका विशिष्ट रोगाने तिथल्या तेराशे मेंढय़ा मेल्या, तेव्हा संपूर्ण दौराभर चर्चा त्या मेढय़ांची होती. त्या रोगावर कशी मात करता येईल यावर होती. कुणालाही क्रिकेटमध्ये रस नव्हता.’ हिंदुस्थानात माणसाच्या आयुष्याची काही किंमतच नाही. न्यूझीलंडमधल्या मेंढीएवढीही किंमत भारतात माणसाच्या आयुष्याची नाही. तर मुद्दा हा की, टेकॅपोमधील टुमदार घरं पाहिली की, आयुष्याचा किमान एक दिवस तिथे काढावा असं वाटतं. तिथे राहणे म्हणजे अनुपम निसर्गाच्या मांडीवर बसणं. मला सर्व आनंद देणाऱ्या गोष्टी तिथे करायला आवडतील. चांगलं वाचणं, गाणं ऐकणं, चांगला सिनेमा पाहणं, उत्तम वाईन घेणं, क्रिकेट पाहणं आणि हो, तुमच्या मनात असलेली गोष्टसुद्धा करणं!

टेकॅपोमध्ये गर्दी पर्यटकांची दिसते. दुपारच्या वेळी आम्ही तिथे पोहचलो तर रेस्टॉरंटचं जेवण जवळपास संपलं होतं. म्हणजे ते कंटाळा आणणारे फक्त बर्गर्स शिल्लक होते. ३६९ माणसांच्या गावात नोकरी करणारे भारतीय पाहून ऊर भरून आला. मंगळावारी जर रेस्टॉरंट उघडलं तर तिथे नोकरी करणारा पहिला माणूस सरदारजी असू शकतो आणि दुसरं हॉटेल गुजरात्याचं असू शकतं. शॉपिंगसाठी गर्दी करणारी बरीचशी माणसंही भारतीय होती. तीन-चारशे न्यूझीलंड डॉलर्स (१५ ते २० हजार) रुपयांचे स्वेटर्स ही मंडळी लिलया विकत घेतात. माझी बायको पापलेट किंवा कोळंबीही इतक्या लिलया विकत घेत नाही. तिथे मेरिनो वूलचे उत्तम स्वेटर्स मिळतात. त्यात मेंढीबरोबर पॉसम (मांजरासारखा प्राणी) ची लोकर मिळवली की तो स्वेटर महाग होतो. तरीही भारतीय माणसं शर्ट घेतल्यासारखं स्वेटर घेत होती. हिंदुस्थानात गरिबी आहे यावर तो दुकानदार विश्वास ठेवू शकला नसता. गोरी मंडळी खरेदी वगैरेपेक्षा वाईन-बिअर घेत उन्हात पडणं, पाण्यात पडून राहाणं जास्त पसंत करतात. तिथल्या उत्तम बागेत माझी दोन नातवंडे हुंदडळीय, पण मीसुद्धा लहान होऊन झोपाळे वगैरे एन्जॉय केले. ‘टेकॅपो’ हा माओरी शब्द आहे. त्याचा अर्थ रात्री झोपलेलं मॅट! माओरीजनी तलावाला दिलेली ती उपमा असावी. या तलावाचा शोध एका जेम्स मॅकेन्झी नावाच्या युरोपियन माणसाने लावला. गुगलप्रमाणे तो मेंढय़ा चोरणारा स्कॉटिश चोर होता. त्याचं नाव त्या विभागाला दिलंय. चोराचा झालेला इतका बहुमान फार क्वचित पाहायला मिळतो. त्यानंतर तिथे जॉन आणि बार्बरा हे या दांपत्याने पहिलं मेंढय़ांचं फार्म वसवलं. तिथे पुढे हॉयड्रोपॉवर स्टेशन उभं राहिलं आणि टेकॅपो गाव वसलं. तिथे एक चर्च आहे. इतके छोटं की, दहा-बारा पावलांत संपतं. पण तळय़ाच्या किनाऱयावर आहे आणि त्याची जी खिडकी आहे, ती पाहताना ती खिडकी नाही एक पेंटिंग लटकवलंय असं वाटतं. कारण ती जागा अशी निवडलीय की, तिथून तळय़ाची निळाई, समोरचे डोंगर, त्यावरच्या बर्फाच्या ‘हॅटस्’ पेंटिंगसारख्या दिसतात. तिथे लग्न लावले जाते. आम्ही तिथे असताना एक जोडपं लग्न करून तळय़ाच्या पाण्यात फोटो शूटसाठी गेलं होतं.

त्या चर्चच्या बाजूला एक कास्याचा (ब्रॉन्झचा) कुत्र्याचा पुतळा  आहे. कारण तिथे मेंढय़ाचे कळपच्या कळप राखण्याचे काम विशिष्ट जातीचे कॉली कुत्रे करतात. त्यासाठी कृतज्ञता म्हणून त्याचा पुतळा १९६८ साली बांधला.त्या मॅकेन्झी बॅरीनमधल्या रहिवाशांनी तो बांधलाय. प्राण्याबद्दलची कृतज्ञता माणूस फार क्वचित व्यक्त करतो. टेकॅपोच्या कुत्र्याचा पुतळा हे त्याचं सुखद उदाहरण आहे.

- द्वारकानाथ संझगिरी

(भटकेगिरी, सामना, २ जून २०१९)



एखाद्या देशात फिरताना, स्वतः गाडी चालवत फिरलं की पर्यटनाच्या नकाशावर नसलेली, काही ठिकाणं दिसतात. एखाद्या छोटय़ाशा स्थानिक उपाहारगृहात एखादा वेगळाच पदार्थ चाखायला मिळतो. स्थानिक ब्रुअरीतून तयार केलेली बीयर तुमच्या जिभेवरून पोटात घसरताना शरीर उत्तेजित करते. प्रवासाचा शीण तत्काळ निघून जातो. कधीतरी एखादी धक्कादायक गोष्ट दिसते. अशीच एक धक्कादायक गोष्ट आम्हाला दिसली. वानाकाहून क्वीन्सलॅण्डला जाताना एका शेतात एक तारांची भिंत उभी केली होती आणि त्यावर विविध रंगांच्या आणि आकाराच्या कंचुकी लटकत होत्या. आणि गाडी थांबवून काही ललना चक्क कंचुकी लटकवायला जात होत्या. माझ्यातलं कुतूहल जागं झालं आणि कुतूहल जागं झालं की मी स्वस्थ बसत नाही.

उभ्या आडव्या तारांच्या पट्टय़ांनी ती भिंत उभी केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच एका अतिशय ऐतिहासिक कारड्रोना हॉटेलजवळ आम्ही थांबलो. त्या वेळी तिथल्या एका दुकानदाराला मी त्या बेसियर्सच्या भिंतीबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘‘ज्या शेतात ती भिंत उभारली आहे त्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिची आठवण म्हणून त्याने तिच्या कंचुकी तिथे लटकवल्या. मग त्यातून तिथे येऊन कंचुकी लटकवायची आणि स्तनांच्या कॅन्सरसाठी तिथल्या पेटीत पैसे टाकण्याची पद्धत सुरू झाली.’’ अर्थात त्याची एक दुसरी बाजू मांडली जाते. १९९८-९९ सालापासून हे कंचुकी (ब्रा) त्या भिंतीला लटकवणं सुरू झालं. ती भिंत कार्ड्रोना दरीच्या हमरस्त्यावर आहे. त्यामुळे त्या भिंतीकडे लक्ष वेधले जायला लागले. हळूहळू कंचुकींची संख्या शेकडय़ाने वाढली. न्यूझीलंड हा सामाजिकदृष्टय़ा सुधारलेला देश असला तरी तिथेही संस्कृतीरक्षक आहेत. त्यामुळे एकदा अचानक त्या कंचुक्या भिंतीवरून गायब झाल्या. ही ब्रेकिंग न्यूज झाली. लगेच नवमतवादी सरसावले. त्यांनी भिंत कंचुकींनी सजवली. पुन्हा कुणीतरी त्या गुपचूप काढल्या. त्याबरोबर पहिल्यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज झाली. मीडियाची ताकद पहा.

युरोपियन पर्यटकांचे या भिंतीकडे लक्ष गेले. (त्यामुळे माझं तिथे लक्ष गेले, याचं आश्चर्य वाटू नये!) पुन्हा भिंत बहरली. गंमत पहा. काहींचं मत ही भिंत पर्यटकांना आकर्षित करते म्हणून ठेवावी. दुसरं मत, ‘‘यात काय सौंदर्यशाली आहे? पुढचा रस्ता डोंगरातून नागमोडी जातो. त्या कंचुकींचा ड्रायव्हरवर परिणाम होऊन त्याचा गाडीवरचा ताबा सुटला तर.’’ मला दुसरं मत रंजक वाटलं. ज्या देशात उन्हाळय़ात कंचुकीसदृश ब्लाऊजवर फिरणं ही फॅशन आहे, तिथे भिंतीवर लटकावलेल्या कंचुकीने माणसाचा तोल जाऊ शकतो? तिसरं मत होतं की, ‘जवळच्या वानाका शहरात जपानी विद्यार्थी राहतात. तिथे आशियाई मंडळी (त्यात हिंदुस्थानी आली) राहतात. त्यांच्या भावना दुखावल्या तर?’ या मतभेदानंतर तिथल्या नगरपालिकेने ती भिंत काढायची ठरवले. लोकशाहीत अशा गोष्टीला प्रत्युत्तर मोर्चा, सत्याग्रह, मानवी साखळीने दिले जाते. ती भिंत कंचुकीने सजलेली असावी यासाठी तिथल्या कंचुकीवादी मंडळींनी ७४०० कंचुकींची साखळी तयार केली. जागतिक विक्रमापेक्षा ही संख्या एक लाखाने कमी आहे. असेही विक्रम असतात याची मला कल्पना नव्हती. पण ‘वानाका’च्या लोकसंख्येचा विचार केला तर ७४०० माणसं ही प्रचंड गर्दी आहे. या साखळीमुळे तिथली नगरपालिका नमली. ती भिंत डौलाने उभी आहे आणि आम्ही ती पाहू शकलो, म्हणून मी लिहू शकलो.

त्या कंचुकी भिंतीच्या पुढे एक ऐतिहासिक कारड्रोना हॉटेल आहे. वानाका-क्वीन्स टाऊनला जोडणारा ‘क्राऊन रेंज रोड’ म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची सढळ हाताने केलेली उधळण आहे. तो रस्ता सापाचा आकार घेत, डोंगरातून जातो. त्या डोंगराच्या पायथ्याशी हे हॉटेल आहे. १८६३ साली ते बांधलं. त्या वेळी त्या ओटॅर्गो विभागात सोने सापडले. त्यामुळे गाव आणि छोटे शहर वसले. त्या वेळी चिनी तिथे आलेले आहेत. कुठे चीन, कुठे दक्षिण न्यूझीलंड! भाकरी आणि पैसा माणसाला कुठूनही कुठे घेऊन जाऊ शकतो. हॉटेलची ती लाकडी इमारत तशीच्या तशी आज उभी आहे. ही मंडळी ‘म्हातारीण’ तरुण ठेवण्यात वाक्बगार आहेत. आतला माहोलही, तसाच एकशे छप्पन वर्षांपूर्वीचा आहे. बसायला लाकडी बाकं, टुरिस्ट बसेस इथे थांबतात. (चामडी सोफाही त्या काळातला) लाकडी बार आणि थंडीत उबदार वाटण्यासाठी तयार केलेली एक जुनी काऊबॉईजच्या जुन्या हॉलीवूड सिनेमातली फायरप्लेस. तिथला एक पियानो पण आपलं लक्ष वेधून घेतो. हळूच मी त्यावरून बोटं फिरवली. तो गोड वाजला. ही माझ्या बोटाची किमया नव्हती. मला कुठे पियानो वाजवता येतो? तो पियानोही म्हातारा झालेला नव्हता.

त्या हॉटेलच्या काही जुन्या जाहिराती किंवा फलक त्यांनी तसेच ठेवले आहेत. त्यात घोडे आणि बग्गी भाडय़ाने मिळण्याची जाहिरात होती. ती थेट मला त्या काळात घेऊन गेली. मी घोडय़ावरून एक रपेटही मनातल्या मनात करून आलो. १९२६ साली जेम्स पॅटरसनने ते हॉटेल विकत घेतले आणि १९६१ साली वयाच्या ९१व्या वर्षी त्याची त्या हॉटेलवर मालकी होती. त्याची जुनी व्हिंटेज गाडीही त्या हॉटेलच्या दारात उभी आहे. त्या काळातही तिथे एक बिलियर्डचं टेबल होते. पार्टी, बॉलडान्स, कॉन्सर्टस्साठी हॉल उपलब्ध होता. आणि मालक जेम्स पॅटरसन प्रत्येक गिऱ्हाईकाची काळजी घ्यायचा. तो ठरवायचा कुणाला किती पेग द्यायचे. समजा प्रवासी ती डोंगराची नागमोडी वळणं पार करून क्वीन्सटाऊनला जाणार असेल तर तो फक्त एकच पेग सर्व्ह करायचा. मग जास्त पैसे दिले तरी दुसरा पेग दिला जायचा नाही. उद्देश एकच, त्या खडतर रस्त्यावरून जाताना प्रवाशाला मद्यामुळे अपघात होऊ नये. वानाकाच्या दिशेने जाणाऱया प्रवाशाला दोन पेग ‘मंजूर’ केले जात. तो शक्यतो महिलांना मद्य देत नसे.

आता काळ बदलला. उत्तम गाडय़ा आल्या. त्यामुळे नागमोडी वळणाची दंश करण्याची ताकद कमी झाली. हॉटेलने पण कात टाकलीय. हेरिटेज इमारतीच्या जुन्या वैभवाला किंचितही धक्के न लावता नवी उभारणी केली गेली. बार, जेवणाची जागा, खोल्या वाढवल्या गेल्या. आम्ही तिथे गेलो तेव्हा सकाळी अकरा वाजता क्वीन्सलँडला, नागमोडी वळणावरून जाणारी मंडळीही बीयर, जीन पीत बसली होती. ब्रेकफास्टबरोबर मद्य ही माझी संकल्पना नाही. त्यामुळे आम्ही तसेच निघालो. ती ऐतिहासिक वाट पाहून चढलेली नशा पुरेशी हाती. आम्ही फोटो काढले. कुठल्याही पबपेक्षा न्यूझीलंडमध्ये सर्वात जास्त फोटो या हॉटेलचे निघतात.

- द्वारकानाथ संझगिरी

न्यूझीलंडचं सौंदर्य जगाच्या नकाशावर मांडलं हॉलीवूड सिनेमांनी आणि हिंदुस्थानी पर्यटकांना ही आरशातली पद्मिनी दाखवली बॉलीवूड सिनेमांनी. कारण बॉलीवूड हा आपल्या फॅशन, स्टाइल आणि पर्यटन यांचा आरसाच असतो. ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’ आणि ‘हॉबिट’ या दोन इंग्लिश सिनेमांनी न्यूझीलंडचं निसर्गसौंदर्य अशा रीतीने जगापुढे पेश केलं की, युरोपच्या सौंदर्याशी नातं सांगणारा एक देश पृथ्वीच्या पायापाशी आहे हे जगाला कळलं. न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक टूर्स आहेत ज्या या दोन सिनेमांचं जिथे जिथे शूटिंग झालं त्या जागा दाखवण्याचं काम करतात. मला ऑस्ट्रियामधल्या सालस्बर्गची आठवण झाली. तिथे जी ‘साऊंड ऑफ म्युझिक’ची सहल आहे ती उत्कृष्ट आहे. तो सिनेमा ती तुमच्या डोळय़ांसमोर उभा करते.

‘कहो ना प्यार है’ सिनेमा हिट झाला आणि बॉलीवूडने युरोपकडून मोर्चा न्यूझीलंडकडे वळवला. ‘मैं प्रेम की दिवानी हूं’, ‘प्लेयर्स’, ‘कुछ तुम कहो – कुछ हम कहें’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ वगैरे सिनेमांचं शूटिंग न्यूझीलंडमध्ये झालंय. ‘कहो ना प्यार है’ सिनेमात प्रेमात पडलेला हृतिक ‘ना तूम जाने ना हम’ म्हणत ज्या कॅन्टरबरीमधून जातो त्या रस्त्यावरूनच आम्ही गेलो. फक्त त्या गाण्याचा शूटिंगचा काळ हा तिथल्या शिशिरातला आणि संपत आलेल्या शरदाचा असावा. कारण पिवळी झालेली झाडांची पानेही दिसतात आणि डोंगरावर नुकताच पहुडलेला बर्फही दिसतो. बॉलीवूड सिनेमाचं शूटिंग न्यूझीलंडमध्ये झालंय आणि त्यांनी क्वीन्सटाऊन टाळलंय असं होऊच शकत नाही.

आम्ही गाडीने फिरत होतो आणि एअरबीएनबीत राहत होतो. मला एअरबीएनबीत राहणं आवडतं. मस्त बंगल्यात राहण्याचा फिल येतो. क्वीन्सटाऊनजवळच्या वास्तव्यात आम्ही वानाकात चार रात्री राहिलो. आठ जणांसाठी चार बेडरूमचा बंगला होता. प्रशस्त हॉल, मागे अंगण आणि बंगला चकाचक ठेवलेला. मला त्या मालकाचा हेवा वाटला. त्या चार दिवसांत मला अनेकदा वाटलं की, जुन्या सिनेमांत अशोककुमार मस्त गाऊन घालून सकाळी अंगणात चहा पीत बसतो तसं बसावं किंवा रात्री दिवसभर पाहून आलेल्या सौंदर्यशाली निसर्गासाठी अंगणात बसून उत्तम वाइनचा ग्लास उंचवावा. पण हे फक्त मनातल्या मनात मांडे खाणं होतं. चहा होता, वाइन होती, पण तो गाऊन आणायला मी विसरलो होतो आणि अंगणात स्वेटरवर कोट घालून बसलो तरी वाहणारा वारा धमकीवजा विनंती करायचा, ‘‘छान तंदुरुस्तपणे सहल पूर्ण करायची आहे ना? मग आत जाऊन बसा.’’

आम्ही त्या एअरबिएनबीमध्ये मोठा प्रवास करून रात्री पोहोचलो. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिलं आणि डोळे चोळले. पुन्हापुन्हा चोळले. समोर हिरवागार डोंगर. त्यात लाजून लपतायत असं वाटणारी घरं होती आणि डोंगराने चक्क ढगांचा फेटा गुंडाळलेला होता. दुसऱ्या खिडकीतून निळं आकाश दिसत होतं. इथलं आकाश निळा रंग कसा असतो ते शिकवतं. मुंबईत निळय़ा आकाशाची व्याख्या वेगळी आहे. दरवाजा उघडून मी बाहेर गेलो तर थंड हवेचं भानही सुटलं. पानं तांबूस झालेली झाडं स्वागताला दोन रांगेत उभी! मी खुळय़ासारखा कॅमेरा क्लिक करीत गेलो. शरदाचे झाडाचे रंग मला एलिझाबेथ टेलरएवढेच खुणावतात. मुख्य म्हणजे त्या पानांना स्पर्श करता येतो, एलिझाबेथला नाही आणि आसपास बंगले असे होते की, त्यातला एक विकत घ्यावा इतपत पैसे खिशात असते तर कुठला घ्यावा हे कळलं नसतं. तात्पर्य, ‘गोऱ्या’ देशात एअरबिएनबी राहायला उत्तम. उत्तर न्यूझीलंड सुंदर नाही असं नाही, पण दक्षिण ही निसर्गाची ‘आर्ट गॅलरी’ आहे. वेलिंग्टनला पेंगुळलेल्या डोळय़ांनी आम्ही बोटीत बसलो. वेलिंग्टन हे शहर उत्तर न्यूझीलंडचं खालचं टोक. तिथून ‘कूक स्ट्रेट’ ओलांडून आपण दक्षिण न्यूझीलंडला पोहोचतो. स्ट्रेट (Strait) म्हणजे दोन समुद्रांना जोडणारा पाण्याचा छोटा पॅसेज. या स्ट्रेटला जेम्स कूकचं नाव दिलंय. कारण त्याने तो १७७० साली प्रथम ओलांडला. तास्मन समुद्र आणि पॅसिफिक समुद्राला तो जोडतो. तिथलं पाणी धोकादायक आणि खटय़ाळ मानलं जातं. सुदैवाने आमच्या प्रवासाच्या वेळी पाण्याने खटय़ाळपणा केला नाही. प्रवास सुरू झाल्यावर डोळा लागला. प्रवास संपायच्या एक तास आधी मला जाग आली आणि मी इतरांनाही उठवलं. बाहेर अफलातून दृश्य दिसत होतं. हिरव्यागार झाडांचा डिझायनर ड्रेस घालून दोन्ही बाजूला डोंगर होते. जणू बोटीच्या स्वागतासाठी त्यांना तयार केलं होतं. डेकवर उभं राहिल्यावर हात थोडा मोठा असता तर डोंगरांना थोपटता येईल असं वाटावं इतके ते जवळ होते. ती बोट पिक्टन नावाच्या एका टुमदार गावाच्या धक्क्याला लागली. त्या बोटीच्या पोटात ठेवलेल्या मोटारीतून आम्ही बाहेर आलो आणि निसर्ग पाहताना भान कसं हरवू शकतं, याचा पुन्हा अनुभव घेतला. पांढरे ढग या डोंगरमाथ्यांचं सौंदर्य वाढवतात. ते कधी फेटा बनतात, कधी घुंघट, कधी टोपी तर कधी झुंबरासारखे लटकतात. आम्ही ख्राईस्टचर्चला जायला निघालो होतो. पण मन पिक्टनमध्ये गुंतून होतं. पण पिक्टन सोडल्यावरही रस्ता सुंदर होता. एका बाजूला समुद्र होता. पॅसिफिक समुद्राची वेगवेगळी रूपं मी वेगवेगळय़ा देशांतून पाहिली आहेत. हे एक वेगळं रूप. एका ठिकाणी खडकावर सील किंवा सीलायन्स होते. दोघांमध्ये बारीकसा फरक आहे. मला ते कधी सीलायन वाटले, कधी सील. छान खडकावर पहुडले होते. रस्त्याचं काम सुरू होतं. एका हॉटेलमध्ये उदरभरणासाठी थांबल्यावर तिथल्या मालकीण बाईने सांगितलं की, मोठय़ा भूकंपामुळे रस्त्याचं नुकसान झालं. त्याचं दुरुस्ती काम हिंदुस्थानी इंजिनीअर्स करीत होते. आम्ही कॉलर उंच केली आणि कॅन्टरबरीच्या रस्त्यावरून ख्राईस्टचर्चला निघालो. ओठांवर गाणं होतं, ‘क्यू चलती है पवन, क्यू झुमे है गगन, क्यू मचलता है मन’. ऋतिकच्या ‘कहो ना प्यार है’चं गाणं तिथेच तर घेतलं होतं. मन उचंबळत होतं.

- द्वारकानाथ संझगिरी

ऑस्ट्रेलियात फिरताना विविध जागांची नावं चटकन लक्षात राहतात. कारण ती इंग्लिश असतात. न्यूझीलंडमध्ये बऱ्याच गावांची किंवा छोटय़ा शहरांची नावं ‘माओरी’ भाषेतली आहेत. त्यामुळे ती चटकन मेंदूवर गोंदवली जात नाहीत. माओरी ही युरोपियन्स न्यूझीलंडमध्ये येण्यापूर्वीची तिथली जमात. ऑस्ट्रेलियात युरोपियन्स येण्याअगोदर ‘ऍबॉरोजिन्स’ ही आदिवासी जमात होती, पण न्यूझीलंडचे माओरी आणि ऑस्ट्रेलियाचे ऍबॉरोजिन्स यात खूप मोठा फरक आहे. ऍबॉरोजिन्स ऑस्ट्रेलियात गेली साठ हजार वर्षे राहतात. म्हणजे ते मालक, युरोपियन उपरे हा प्रकार आहे. पण आता युरोपियन मालक आहेत आणि मूळ रहिवासी त्यांच्या ‘दयादृष्टी’वर जगतायत. ती दयादृष्टी त्यांना अलीकडे आली. युरोपियन ऑस्ट्रेलियन्सनी ऍबॉरिजिन्सची काही कमी कत्तल केली नाही किंवा त्यांच्यावर कमी अत्याचार केले नाहीत!

न्यूझीलंडच्या माओरींचं तसं नाही. ते न्यूझीलंडमध्ये इ.स. १२५० ते १३००मध्ये पूर्वेकडून आले, स्थिरावले. आपली भाषा, आपली संस्कृती त्यांनी तिथे रुजवली आणि युरोपियन न्यूझीलंडमध्ये आल्यावर ते युरोपियन माओरींबरोबर सौहार्दाने राहिले. १८४० साली दोघांमध्ये म्हणजे माओरी आणि नववसाहतदार युरोपियन यांच्यात एक तह झाला. त्याप्रमाणे माओरींनी आपली संस्कृती राखली. युरोपियन्सनी त्यांच्या प्रथेप्रमाणे काही माओरींना ख्रिस्ती केले, पण तरीही दोन संस्कृती तिथे हातात हात घालून नांदतात. ऑस्ट्रेलियात तुम्हाला ऍबॉरोजिन्स शहरात क्वचित दिसतात. त्याच्या राक्षसी शरीरावर, तुटपुंज्या आणि मळलेल्या कपडय़ांतून त्यांची गरिबी दिसते. त्यांचा चेहरा पाहिल्यावर आपण साठ हजार वर्षांपूर्वीचा मानव पाहतोय हे पटतं. न्यूझीलंडचे माओरी समाजात बरेच मिसळून गेले आहेत. त्यांची संख्याही मोठी आहे. लोकसंख्येच्या पंधरा टक्के माओरी तिथे अजून आहेत. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये सावळा माणूस दिसला की, तो हिंदुस्थानी असतो, त्याचं आडनाव पटेल असतं असं नाही. तो फिजीतून आलेला हिंदुस्थानी असू शकतो. येस, फिजीतून अनेक हिंदुस्थानी न्यूझीलंडमध्ये आले आहेत. हिंदी सिनेमातून ते हिंदुस्थानशी जोडले गेले आहेत. तो माओरी असू शकतो किंवा तो माओरी इंडियन असू शकतो. तिथे माओरी इंडियन्स हे आणखी वेगळं कॉकटेल आहे. न्यूझीलंडमध्ये ते तीनएक हजार असतील. हे कॉकटेल तयार झालं एका बंगाली माणसामुळे. काहीही म्हणा बंगाल्यांचं निर्मितीमूल्य उच्च असतं. ती निर्मिती साहित्याची असो, क्रांतीची असो किंवा नवसंस्कृतीची. १८१०मध्ये एका बंगाल्याने बोट न्यूझीलंडच्या किनाऱ्याला लावली. ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ असं त्याला एका माओरी मुलीकडे पाहिल्यावर झालं. त्याने बोट सोडली, त्या माओरी मुलीशी लग्न केलं आणि पहिलं माओरी हिंदुस्थानी कॉकटेल तयार झालं.

१८१४-१५मध्ये आणखी काही हिंदुस्थानींनी बंगाली माणसाच्या पावलावर पाऊल ठेवलं. एकोणीसाव्या शतकात फिजी, ब्रह्मदेश, गुजरात, पंजाबातून काही तरुण न्यूझीलंडला गेले आणि त्यांनी माओरी मुलींबरोबर संसार थाटले. त्यात मराठी माणूस नव्हता. कारण तोपर्यंत कॉम्प्युटरचा शोध लागला नव्हता आणि त्यावेळी महाराष्ट्रात कोकणस्थ मुलगा देशस्थ मुलीशी लग्न करीत नव्हता, तो माओरी सुंदरीशी काय करणार! माओरी हिंदुस्थानींची आडनावं शहा, मेहता, कोहली, बेदी वगैरे असतात का याचा शोध घ्यायला मला मिळाला नाही. की त्यांची आडनावंसुद्धा माओरी झाली, देव जाणे! पण अभ्यासायला चांगला विषय आहे. एकंदरीत काय तर युरोपियन्सनी माओरी नावं पुसली नाहीत आणि आजही पर्यटकासमोर ते माओरी संस्कृती मिरवतात. तर असंच एक माओरी नाव धारण करणारं अत्यंत टुमदार इटुकलं पिटुकलं शहर म्हणजे ‘टावपो’ (Taupo). उत्तर न्यूझीलंडच्या मध्यभागी आहे. टावपो तलावाच्या काठावर वसलंय. हा तिथला सर्वात मोठा तलाव. त्याचं क्षेत्रफळ ६१५ चौरस किलोमीटर आहे. तो पुढे वायकॅरो नदीत मिसळतो. ती नदी ‘हुका’ धबधबा बनते. हे टावपो टाऊन तलाव जिथे नदीत समर्पित होतो तिथे वसलंय. त्याला टाऊन म्हटलं, कारण गाव म्हणणं थोडं कठीण जातं आणि सत्तावीस हजार वस्तीला शहर कसं म्हणायचं? आम्ही जवळच एका छोटय़ा गावात राहत होतो. त्या छोटय़ाशा टाऊनमध्ये त्यांनी लहान मुलांसाठी सुंदर बाग केली होती. मी बागेतल्या झाडांच्या रंगीबेरंगी पानांनीच वेडा झालो होतो. शक्य असतं तर देवाला मी अर्ज दिला असता की, शरद ऋतूचा मुक्काम वाढव. शिशिर फक्त झाडांच्या पानांना कपडे बदलता येतील एवढाच ठेव. मग पुन्हा वसंत. रंगीत फुलं आणि मग ती पाहून डोळे भरले की, शरदातले पानांचे रंग! पण हा अर्ज मंजूर होणे कठीण आहे. कारण देवाला दाखवायचं असतं की, प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. मग नवनिर्मिती होते. तिथून आम्ही ‘‘क्रेटर ऑफर मून’’ला गेलो. न्यूझीलंडच्या उत्तरेत ज्वालामुखीचं राज्य आहे. या क्रेटर ऑफ द मूनमध्ये तुम्ही त्या खड्डय़ाभोवती फिरता, जिथून धूर बाहेर येतो.

काही ठिकाणी मातीतून वर येणारे बुडबुडे दिसतात. मटन किंवा डाळ शिजताना जसं दिसतं ना, तसे ते दिसतात. त्यांनी एक वाट तयार केली आहे, त्या वाटेवरून जायची. ती इतकी सहजसुंदर आहे की, बाबागाडी किंवा व्हीलचेअर आरामात ढकलता येते. जिथून धूर निघतो किंवा बुडबुडे दिसतात त्याला कुंपण आहे. लांबून, जिथे तिथे विझत चाललेल्या होळीतून शेवटचा धूर येतोय असं वाटतं. टायपोच्या जमिनीच्या पोटात एक गरमागरम तलाव आहे. त्यातून गरम पाण्याचे झरे वर येतात. तिथल्या औषधी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात तुम्ही शिरूसुद्धा शकता. हा एक अत्यंत वेगळा अनुभव आहे, तो सर्वत्र घेता येत नाही. निसर्गाचं हे थोडं रौद्ररूप पाहताना दोन किलोमीटर चालूनही पाय दुखत नाहीत.

तिथून जवळच हुंका धबधबा आहे. धबधब्याच्या उगमाकडे जायला गिर्यारोहण करायला लागतं किंवा विमानाने फेरफटका मारता येतो, पण जिथे गाडी जाते तिथे त्या धबधब्याचा एक छोटासा भाग दिसतो. डोंगराच्या पन्हळीतून तो त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून जातो. या प्रवासाचा एक भाग एका पुलावर उभा राहून पाहता येतो किंवा तुमच्याकडे सायकल असेल तर तुम्ही त्या पाण्याला पाच-सात किलोमीटर साथ देऊ शकता. पूर्वी पांढरे कपडे स्वच्छ धुण्याकरिता पाण्यात नीळ घातली जायची. ईश्वराने तशी नीळ त्या पाण्यात घातली आहे. टावपोला संध्याकाळी आम्ही तलावाकाठच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो. तलावावर अंधाराने काळसर पांघरुण टाकलं होतं, पण तिथे मी जो एक मासा खाल्ला त्याचं माओरी नाव माझ्या लक्षात नाही, पण माझ्या सारस्वत जिभेवर त्याची चव अजून ठाण मांडून बसली आहे. त्या इटालियन रेस्टॉरंटच्या सल्ल्यामुळे मी तिथली एक ड्रॉट बीअर घेतली. वॉव! ती बीअर एका अमूल्य दागिन्याप्रमाणे जपावी अशा दिवसाची सुंदर भैरवी  ठरली.

- द्वारकानाथ संझगिरी


संपूर्ण कुटुंब एका गाडीने खूप वर्षांनंतर आठ-दहा दिवस फिरणं, हे एक वेगळंच सुख आहे आणि तुम्ही न्यूझीलंडमध्ये फिरत असाल तर सुखाची कल्पना अधिक विस्तारते.

निळं आकाश, त्यावर कंदिलासारखे लटकवलेले पांढरे ढग, बाजूला दिसणारं निळं पाणी आणि रंगीबेरंगी झाडं हे गाडीच्या प्रवासात ठायी ठायी दिसलं तर ज्याचं मन आनंदत नाही, त्याला आनंद म्हणजे काय हे ठाऊक नाही असं खुशाल समजावं. सूर्यप्रकाशाबरोबर पाण्याचा निळसरपणा बदलतो. कधी ते हिरवं दिसतं, कधी मयूरपंखी, कधी परमेश्वराने पेनात शाई भरताना धांदरटपणा करून शाई पाण्यात सांडली असं वाटतं. सध्या शरद ऋतू न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. पानांनी रंग बदलले आहेत. काही रंगीत पाने गळायला लागली आहेत. डोळे तृप्तच होत नाहीत ही निसर्गाची रंगपंचमी पाहून!

एकेकाळी न्यूझीलंडकडे हिंदुस्थानी पर्यटक ढुंकूनही पाहत नव्हता. मी पहिल्यांदा न्यूझीलंडला १९९४साली क्रिकेटच्या निमित्ताने गेलो. त्यानंतर थेट २०१५ ला विश्वचषकाच्या वेळी! १९९४साली क्रिकेटप्रेमी हिंदुस्थानींसाठी न्यूझीलंड हा जॉन रिड, ग्लेन टर्नर, सर रिचर्ड हेडली, मार्टिन क्रो या दर्जेदार क्रिकेटपटूंचा फक्त देश होता. इरसाल पर्यटकसुद्धा तेव्हा युरोप- अमेरिकेत रमले होते. पृथ्वीच्या दक्षिणेस त्यांचा संबंध नव्हता. मी १९९४साली ऑकलंड, नेपियर, हॅमिल्टन, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च वगैरे फिरलो होतो. क्रिकेटव्यतिरिक्त त्या काळातल्या मला तीन गोष्टी आठवतात. ऑकलंडला विमानतळाहून बाहेर पडताना मी अभिमानास्पद पाटी पाहिली होती, “Newzealand is an Aidsfree Country”. मला हसू फुटलं होतं. नाही नाही, रान मोकळं आहे म्हणून मी हसलो वगैरे मनातसुद्धा आणू नका. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या देशात एडस् शिरला तर किती हाहाकार माजला असता विचार करा. आजही त्याची लोकसंख्या २०१७च्या सेन्ससप्रमाणे फक्त ४८ लाख आहे. तेसुद्धा न्यूझीलंडने त्यांचे दरवाजे जगासाठी किलकिले केले म्हणून.

१९९४साली पटेल, शहा, मेहता, लाडवा दिसायचे. आता मराठी माणसं भेटतात आणि ते सर्व न्यूझीलंडच्या उत्तर भागात आहेत. कारण हा भाग थंडीत फार गारठत नाही. मे संपला की, न्यूझीलंडचा दक्षिण भाग गारठतो, पण शहरातही न्यूझीलंडच्या छोटय़ा शहरात रस्त्यावर पत्ता विचारायला माणूस भेटत नाही. आता ठीक आहे. जीपीएस असल्यामुळे वाटाडय़ाची गरज नाही, पण १९९४साली फिरताना फार हाल व्हायचे. रस्त्यात कुत्रेसुद्धा दिसत नाहीत. ते असतात मालकाच्या अतिसुंदर बंगल्यात. क्वचितप्रसंगी एखादी मांजर आडवी जाते. ससे फिरताना दिसतात, पण आमच्या दोन-तीन हजार किलोमीटरच्या प्रवासात सातत्याने दिसल्या मेंढय़ा आणि धष्टपुष्ट गाई. मेंढय़ांची आजची तिथली संख्या आहे तीन कोटी! म्हणजे माणशी सात मेंढय़ा. एकेकाळी हे प्रमाण माणशी वीस होतं. त्यातल्या ९७ टक्के मेंढय़ा दक्षिण न्यूझीलंडमध्ये दिसतात. दक्षिण न्यूझीलंडमध्ये तुम्ही फिरायला सुरुवात केली तर नजर पोहोचेल तिथपर्यंत बऱ्याचदा हिरवं गवत दिसतं आणि त्यात चरणाऱ्या गलेलठ्ठ मेंढय़ा दिसतात. बऱ्याचदा मेंढय़ांची सभा आहे वाटावी इतक्या त्या दाटीवाटीने बसलेल्या असतात. पण गंमत म्हणजे या मेंढय़ांना हाकणारा गुराखी मला दिसलाच नाही. जीन्समधला गुराखी कसा दिसतो हे पाहायची माझी तीव्र इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. क्वचितप्रसंगी एखाददोन कुत्रे दिसायचे. बहुदा ते कुत्रेच तो अवाढव्य कळप सांभाळत असावेत. दक्षिण न्यूझीलंडमध्ये एक टेकॅपो नावाचा नितांतसुंदर तलाव आहे. त्या तलावाच्या काठावर चक्क एका कुत्र्याची समाधी आहे. १८५७ साली जॉन आणि बार्बरा या जोडप्याने त्या टेकॅपो तलावाच्या काठावर ‘शीप फार्म’ म्हणजे मेंढय़ांसाठी फार्म सुरू केलं. त्याची राखण कुत्रे करायचे. त्यांना ‘कॉलिज’ (Collies) म्हणतात. ते मूळचे स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या उत्तरेकडचे. त्यामुळे न्यूझीलंडच्या थंडीत ते घरच्यासारखे राहिले. असं म्हणतात की, कळपांची राखणदारी त्यांच्या रक्तात असते. त्यांच्यामुळे तो मेंढय़ांचा फार्म विस्तारला. त्यांच्या श्रमाचे प्रतीक म्हणून ती कुत्र्याची समाधी १९६८साली बांधली गेली. त्या कुत्र्याच्या समाधीसमोर मी खरोखरच नतमस्तक झालो.

पण तुम्हाला ठाऊक आहे का की, मेंढी हा न्यूझीलंडचा प्राणी नाही? तोसुद्धा इमिग्रंटच आहे. जेम्स कूक या खलाशाने तो १७७३ साली न्यूझीलंडमध्ये आणला आणि आजची लोकसंख्या पहा! त्याचा दुहेरी उपयोग होतो. एक म्हणजे लोकर. हा मेंढा दोन देशांना पैसे मिळवून देतो. एक म्हणजे अर्थात न्यूझीलंड आणि दुसरा देश म्हणजे चीन. न्यूझीलंडमधून लोकर चीनमध्ये जाते आणि स्वेटर बनून येतात, पण माणूस हा क्रूर असतो. माणसाला थंडीपासून बचाव करणारी लोकर देणाऱ्या मेंढय़ांची लोकर बऱ्याचदा थंडी संपायच्या किंचित आधी कापली जाते. नाहीतर वसंतात नैसर्गिकरीत्या ती गळायची शक्यता असते. त्यामुळे ती आधीच कापली जाते. बरं, ती कापताना माणसाला मजुरी तासाप्रमाणे न मिळता ‘जेवढी जास्त लोकर तेवढे पैसे जास्त’ या तत्त्वावर मिळते. म्हणूनच बऱ्याचदा मेंढरांना तीव्र इजा होते. लोकर काढल्यावर त्या थंडीने मरू शकतात आणि जखमांनीसुद्धा! मेंढय़ांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, चांगली लोकर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. बरं, माणूस तेव्हा तरी दया दाखवतो का? चला, तिने तिच्या छोटय़ा आयुष्यात आपल्याला भरपूर लोकर दिली म्हणून उर्वरित आयुष्यात पेन्शन म्हणून तिला फुकट गवत चरायची मुभा देऊया. छे, माणूस तिला कापतो आणि मटन म्हणून विकतो.

त्या कुत्र्याच्या पुतळय़ाप्रमाणे कुणीतरी प्राणिप्रेमी उठून मेंढय़ांचा एखादा पुतळा उभारेल का? आयुष्यभर मासे खाणाऱया कवी बोरकरांनी एकदा इच्छा व्यक्त केली होती की, मरणोत्तर त्यांचं शरीर समुद्रात फेकावं. म्हणजे मेल्यावर का होईना, त्यांचा उपयोग माशांना होईल. मेंढय़ांच्या बाबतीत तेही शक्य नाही. देवाने न्यूझीलंडमध्ये तयार केलेल्या निसर्गाच्या कॅलेंडरचा आस्वाद घेत फिरताना एक अश्रू मी नकळत मेंढय़ांसाठी गाळला. त्या दिवसापासून मी मटण बिर्याणी खाल्लेली नाही.

- द्वारकानाथ संझगिरी

मी कोल्हापूरला जातो किंवा तिथून परततो तेव्हा तेव्हा मला कऱ्हाडमध्ये डोकावंसं वाटतं.

कऱ्हाड हे वाकडी वाट करून पाहावं असं छोटं शहर आहे, असं कऱ्हाडकरही कदाचित म्हणणार नाहीत. एखाद्या कऱ्हाडे ब्राह्मणाचा अभिमान उसळून येईलही! कारण कऱ्हाडे ब्राह्मण मूळ कऱ्हाडचे; पण पुढे ते पोटापाण्यासाठी कोकणात मालवण-संगमेश्वरला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आज कदाचित कऱ्हाडमध्ये कऱ्हाडे ब्राह्मण फारसे सापडणारही नाहीत. तांबे, नेवाळकर, किर्लोस्कर, गोळवलकर, जांभेकर वगैरे आडनावं सापडतात कऱ्हाडात? किर्लोस्करवाडी मात्र जवळ आहे, पण तशी ती सांगली जिल्हय़ातली. मी स्वतः कऱ्हाडे नाही, पण तरीही मला कऱ्हाडबद्दल प्रेम आहे. कारण आयुष्यातले आठ-दहा महिने मी तिथे घालवले आहेत. तिथल्या सर्व आठवणी गोड होत्या असंही नाही, पण काही बंध एकदा बांधले की तुटत नाहीत.

मध्यंतरी कोल्हापूरहून येताना वाटेत, कऱ्हाडला एक चक्कर मारून आलो. कृष्णा-कोयनाच्या संगमावर गेलो. यशवंतराव चव्हाणांचं सुंदर स्मारक तिथे उभारलंय. लांबून तो जुना हायवेवरचा पूल पाहिला. एसटीतून येताना कऱ्हाडमध्ये शिरण्यापूर्वी लागायचा. आम्ही त्याला ‘झुलता पूल’ म्हणायचो. तो हलायचा. पण ते पूल कोसळण्याचे दिवस नव्हते. आता तो संन्यासाश्रमात गेलेला दिसला.

बाय द वे, मूळ मुद्दा मी विसरलो. कऱ्हाडमध्ये का राहत होतो ते सांगायचं! मी कऱ्हाडच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये होतो. तिथून पुढे नंतर मी 'व्हीजेटीआय'ला गेलो. कऱ्हाडला स्वेच्छेने वगैरे गेलो नव्हतो. व्हीजेटीआयमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून गेलो होतो. मला माझा कऱहाडमधला पहिला दिवस आठवतो. दोन दिवस राहणेही अशक्य आहे असं वाटतं होतं. केवळ मी इंजिनीयर व्हावं ही माझ्या वडिलांची दुर्दम्य इच्छा म्हणून राहिलो. ते दोन कठीण दिवस सरले आणि मी कऱ्हाडकर होऊन गेलो. सोमवार पेठेत मी सप्रे वाडय़ात राहत होतो. त्यांनी वाडय़ात काही खोल्या विद्यार्थ्यांसाठी बांधल्या होत्या. आम्ही पाच-सहाजण होतो. आम्ही तिघं एका खोलीत. मी, दिलीप घोरपडे आणि रामेश्वर बिजर्गी. १९६९ साली सुरू झालेली ही मैत्री आजही घट्ट आहे. शाळा-कॉलेजची निर्व्याज मैत्री सहसा तुटत नाही. ‘अरे बिजर्गी, तुझ्या चहाला जगात कशाची म्हणजे कशाचीच सर नाही.’ हा कौतुकाचा पुष्पगुच्छ मी आणि दिलीपने बिजर्गीला पहिल्या दिवशी दिला. त्यानंतर आमचा पहिला चहा नेहमी तोच करायचा. दुसरा चहा आणि ब्रेकफास्ट जवळच्या प्रभातमध्ये व्हायचा. आजही मला ते पदार्थ आठवतात, त्याच्या किमतीसकट! शिरा, उप्पीट, उपमा पंधरा पैसे आणि मसाला डोसा पंचवीस पैसे आणि चहा दहा पैसे! त्यावेळी मनिऑर्डर आली की सुरुवातीला चार-पाच दिवस मसाला डोसाची ऑर्डर दिली जाई आणि मग हळूहळू फक्त शिरा किंवा तिघात दोन शिरा किंवा शिरा-उप्पीट, दोन चहा, कधी फक्त चहा, कधी मनिऑर्डर आल्यावर पैसे देऊ वगैरे आश्वासनावर महिन्याची अखेर पार पडायची. घरून दीडशे रुपयाची मनिऑर्डर येई. त्यावेळी पैशाची किंमत फार कमी असते आपल्याला. आता जाणवतं की, वडील केवळ मी इंजिनीयर व्हावं म्हणून कसाबसा काळजाचा एक तुकडा काढून देत होते. त्या दिवशी संगमावरून मी गाडी सोमवार पेठेत नेली, पण सोमवारातल्या गल्ल्या अजून अरुंदच आहेत. त्यामुळे हमरस्त्यावरच आलो. पुन्हा एकदा कुलकर्ण्यांच्या खानावळीपाशी पाय थबकले. दर सोमवारी उपवास नसताना फक्त साबुदाणा खिचडी आणि दही खायला मी जायचो. तो पहिला मजला मला दिसला, पण ती खाणावळ, ते कुलकर्णी तिथे नव्हते. सप्रे वाडाही नव्हता आणि ते प्रभात हॉटेलही. काळाने काळी जादू करून माझं भावविश्व उध्वस्त केल्यासारखं वाटलं, पण मन काळाला जुमानत नाही. ते भूतकाळात खोलवर शिरतं. कऱ्हाडच्या एसटी स्टॅण्डवरून येणारा मागचा लांबलचक रस्ता तसाच आहे. कॉलेजमधून आल्यावर संध्याकाळी तिथेच आम्ही फेरफटका मारायला जायचो. जी काही थोडीफार सौंदर्यस्थळं त्या काळात कऱ्हाडात होती ती तिथे दिसत. तिथून एसटी स्टॅण्डवर जायचं आणि लक्ष मुंबईच्या एसटीवर! कारण मुंबई-पुण्याहून येणाऱ्या आणि पुढे जाणाऱ्या एसटीत अधूनमधून चंद्रकोरी दिसायच्या. कऱ्हाडात असताना पौर्णिमेलासुद्धा आम्ही आकाशातल्या चंद्राकडे पाहिलं नाही. त्या काळात अपेक्षाचं आमचं दारिद्रय़ किती मोठं होतं हे कळेल. पण सामाजिक स्थिती तशी होती. माझी आई, आत्या वगैरे कधी माझ्याकडे आली आणि आम्ही हॉटेलमध्ये खायला गेलो तर लोकं टकमक पाहायची. बायकांनी हॉटेलात जाणं हे फारसं शिष्टसंमत नव्हतं. मी त्या वर्षभरात कऱ्हाडमध्ये तीन-चार बॉबकट केलेल्या मुली पाहिल्या असतील. त्यापेक्षा जास्त नाही. त्या काळात तिथल्या, संत गाडगे महाराज कॉलेजात अनवाणी मुलं-मुली मी पाहिल्या आहेत. शहरातली श्रीमंत छोटय़ा शहरात, तळागाळात झिरपली नव्हती. कऱ्हाडात मी सायकलने फिरायचो. किंबहुना सायकल फिरवण्याची हौस मी कऱ्हाडात भागवली. महिन्याला पंधरा रुपये भाडं द्यायचो आणि सायकलने कॉलेजला जायचो. कॉलेज येण्यापूर्वी तिथे कृष्णा नदीवर एक पूल होता. आधी उतार आणि मग चढणं. मोमेंटम (Momentum) चा अर्थ मला त्या पुलाने शिकवला. वेगात जर सायकल वरतून सोडली तर पुढचा अर्धा चढ कापला जायचा, पण त्याच्या पुढचा अर्धा चढ चढताना नाकी काय, पायी नऊ यायचे. परवा त्या रस्त्यावरून मी गाडीने गेलो. तो उतार आणि चढाचे आता दात पडले आहेत. जवळपास कॉलेजपर्यंत वस्ती झालीये. मुला-मुलींच्या कपडय़ातून आजची स्टाइल आणि सुखवस्तूपणा टपकत होता. कॉलेज तसंच आहे. गाडीत बसून मी मनाला कॉलेजमध्ये भरधाव सोडलं. मन, ते हॉटेल, ते क्रिकेटचे मैदान, ते कॅण्टीन, ते वर्ग फिरून आलं! तिथले काही मित्र आज हयात नाहीत, काही कुठे आहेत देव जाणे! गावातल्या विद्यार्थ्यांकडेही प्रचंड बुद्धिमत्ता असते हे मला त्या वर्षभराच्या वास्तव्याने शिकवलं. साधी साधी वाटणाऱी वर्गातली मुलं किती हुशार होती!. हुशारीची मक्तेदारी शहराकडे अजिबात नाही. मी तिथे राजकीय मक्तेदारी शिकलो.एका रात्रीत यशवंतराव चव्हाणांनी ते कॉलेज सोलापूरहून कऱ्हाडला वळवल होतं. आमच्या कॉलेजच्या यंत्रावर आणि बाकावर सोलापूरचं नाव होतं.

माझ्या बायकोला, मित्राला आणि त्याच्या बायकोला कऱ्हाडात कधीही रस नव्हता. का असावा? कऱ्हाड हे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुका शहरासारखं होतं. माझ्या आठवणी तिथे गुंतल्या होत्या.

तिथून निघताना मनावरच्या एका व्रणाची खपली निघाली. व्हीजेटीआयमध्ये येण्यापूर्वी मी कऱ्हाडला गेलो होतो. मित्राकडे सप्रेवाडय़ात राहायचो. त्याच्याबरोबर एका खाणावळीत जायचो. त्या खाणावळवालीची एक सुंदर भाची होती. तिच्या मुक्या भावना मला कळायच्या. तिला मुंबईत सोडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मुंबईपर्यंतचा प्रवास आम्ही गप्पात घालवला. उतरल्यावर मला तिच्या डोळय़ात अश्रू दिसले. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली ‘मी इथे माझ्या लग्नासाठी आलेय. माझं लग्न ठरलंय.’ तिने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले. मी थंड स्तब्ध होतो. तिने बॅग उचलली ती निघून गेली. पाठी एकदाही वळून न पाहता, पण जाताना एक जखम मनावर ठेवून गेली. परवा कऱ्हाडला त्या जखमेवरची खपली निघाली.

- द्वारकानाथ संझगिरी

मध्यंतरी कोल्हापूरला जाताना मी जुन्या खुणा शोधत, जुन्या आठवणी चाळवत गेलो. तशी कार्यक्रमानिमित्त माझी कोल्हापूरला वर्षातून एखादी फेरी होतेच. तरी कोल्हापूरला जायचं म्हटलं की, मला आनंद होतो. कोल्हापूर काही लंडन, रोम, पॅरिससारखं किंवा अगदी मुंबईसारखं पर्यटकांच्या उडय़ा पडाव्यात असं शहर नाही, पण बऱ्याचदा एखाद्या गावाकडे किंवा शहराकडे तुमच्या बालपणातल्या आणि तारुण्यातल्या आठवणी तुम्हाला खेचतात. बघताबघता तुम्ही त्या भूतकाळात रमता. भूतकाळातून पुन्हा वर्तमानकाळात आल्यावर आपलं काहीतरी हरवलंय असं वाटतं राहतं. ते हरवलेले दिवस पुन्हा सापडत नाहीत. कारण काळ उलटा फिरवता येत नाही. काळाच्या उदरात एकदा हरवलं की संपलं, तिथं ‘लॉस्ट ऍण्ड फाऊंड’ काऊंटर नाही. लॉस्ट म्हणजे लॉस्ट! आठवणीच्या रूपात ते दिवस तुमच्याकडे राहतात, एवढंच! केवळ त्यासाठी पुन्हा पाय वळतात. आता चकाचक रस्त्यावरून मुंबईहून सहा-सात तासांत मी कोल्हापूरला पोहोचतो. हा प्रवास सुखकारक असूनही मला ती लाल एस.टी. का आठवते? त्यावेळी एसटी ही फायद्यात चालणारी कंपनी होती आणि तो फायदा वाढवण्यासाठी गच्च भरलेल्या गव्हाच्या पोत्याप्रमाणे एसटीत माणसं कोंबली जायची. एसटीत खिडकीची जागा मिळणं आणि समोर किंवा बाजूला सुस्वरूप मुलगी असणं याला कपिलाशष्ठीचा योग म्हणत. ज्या दिवशी एस.टी. खंडाळ्याचा घाट कुठलाही अडथळा न येता पार करत असे, तेव्हा तो हमखास लागणाऱ्या लॉटरीचं तिकीट काढण्याचा दिवस मानला जाई. माझ्या आयुष्यात हे एकदाच घडलं. त्या दिवशी मी माझ्या प्रेयसीला मागणी घातली. ती ‘हो’ म्हणाली आणि लग्न अजून टिकलंय. यावरून त्या दिवसाचं महत्त्व लक्षात यावं.

तरीही तो प्रवास आठवला की गुदगुल्या होतात. ती खिडकी मिळवण्याची धडपड, शेजारच्या सुस्वरूप ठेंगणीला तिच्या एका प्रेमळ कटाक्षावर आपली खिडकी देणं, एक करवंद किंवा जांभळाची पुडी तिला देणं या आठवणीतल्या रोमान्सची सर पुढे पहिल्या डेटला कॅण्डललिट डिनरला घेऊन जाणाऱ्या रोमान्सलाही नाही. कारण ती एसटी त्यातून उतरताना मनावर आठवणीचा एक व्रण ठेवून जायची. पुन्हा न भेटण्यासाठी आणि तो व्रण सतत त्या भेटीची आठवण देत राहायचा. प्रवासात खाण्याच्या जागा आणि गोष्टी ठरलेल्या होत्या! शिरवळला सकाळी पोहोचली एस.टी. तर गोड शिरा घ्यायचा आणि एरवी कधीही थांबली की, अंजिराची छोटी करंडी घ्यायला धडपडायचो मी! मग साताऱ्यात कंदी पेढे, किणी वाठारला चहा या गोष्टी ठरलेल्या. मधुमेह, रक्तदाब, वजन वगैरे गोष्टींचं वजन त्यावेळी मनावर नव्हतं. मन एक स्वच्छंदी फुलपाखरू होतं. शिरा-रबडीपासून पांढऱ्या रश्शापर्यंत कुठेही जाऊन बसायचं.

कोल्हापूरही छोटं आणि टुमदार होतं. आधी टांगा आणि पुढे पुढे ऑटो एस.टी. स्टॅण्डपासून घोळकरांकडे शुक्रवार पेठेत घेऊन जायची. खरं तर कोल्हापुरात एक दिवस रुळल्यावर ‘घोळकरांकडे’च्या ऐवजी ‘घोळकरांच्यात’ तोंडात यायचं. ‘शुक्रवार पेठेत’ न म्हणता मी कधी ‘शुक्रवारात’ म्हणायचो ते मलाही कळायचं नाही. मुंबईबाहेर महाराष्ट्रात मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणायची लोकांना सवय होती. माझी ओळख करून देतानाही ‘बॉम्बेहून आलोय’ अशी ओळख करून दिली जायची, पण माझ्या जिभेवर ‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’ शब्द कधीच आला नाही. मला ती रांगडी भाषा, रांगडी माणसं खूप आवडतात. ‘रांडेच्या’तलं प्रेम, जवळीक, ‘हो मित्रा’, ‘दोस्ता’ वगैरे कुठल्याही शब्दांत नाही. पद्या (प्रदीप), पप्या (पप्पू), प्रशा (प्रशांत), सत्या (सतीश) हे शॉर्टफॉर्म तर मला भावतात. त्यातून फक्त जिव्हाळा जाणवतो. माझ्या तोंडात चपलेला ‘पायताण’ हा शब्द कधीच रुळला नाही. पण ‘काढू का पायताण?’ यात म्यानेतून काढलेल्या तलवारीची जरब आहे. त्यापुढे चप्पल पचपचीत वाटते.

पंधरा-वीस दिवस मेमध्ये कोल्हापूरला राहून मी काय करायचो? फार काही नाही. ‘घोळकरांच्यात’ साधा, पण प्रेमाने ओथंबलेला पाहुणचार घेणं, तिथल्या मित्रांबरोबर गप्पाटप्पा मारणं. गंगावेशात एकाकडे खूप जुनी हिंदी सिनेमातली गाणी होती…ती ऐकणं, इतर कुणीही शिरणार नाही अशा कळकट हॉटेलात जाऊन अर्ध्या चहावर एक अख्खी सिगारेट चोरून ओढणं आणि वास लपवायला एक हॉल्स खाणं, कोल्ड ड्रिंक हाऊसमध्ये वेगवेगळी पेयं पिणं, संध्याकाळी पापाच्या तिकटीच्या वाचनालयातून एखादं पुस्तक आणणं  (क्रिकेटपटूंची नावं विसरली जातात, मैत्रिणींचीही नावं विसरली जातात, पण मी पापाची तिकटी विसरलेलो नाही), मग संध्याकाळी महाद्वार रोडवरून थेट रंकाळ्यापर्यंत तलम कपडय़ांतल्या पक्ष्यांची पाहणी! (काही पक्ष्यांचे मला पिंजरेही ठाऊक होते), येताना अंबाबाईला नमस्कार करून तिच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवून घरी परतणे आणि हो, सकाळी ‘इंद्रधनु’ वर्तमानपत्रातल्या सिनेमांच्या आकर्षक जाहिराती पाहून किमान एक दिवसआड एक सिनेमा पाहणं, कधीतरी उमा टॉकीजला जाऊन इंग्लिश सिनेमा पाहणं. त्यात चोरगेचा चहा, मिसळ आणि चव्हाणची लस्सी. संपली धमाल.

कॉलेजमधल्या त्या पाच-सहा वर्षांत कोल्हापूरला यापलीकडे काही केलं नाही, पण त्या आठवणींचे ऋणानुबंध अजून घट्ट आहेत. आता कोल्हापूर खूप मोठं झालंय. मी रस्ता चुकावा एवढं मोठं. दिलीप गुणे आणि आंद्या पाटणे सोडून सर्व मित्र इतरत्र विखुरले. सर्व ‘पक्षी’ दूरदेशी गेले. महाद्वार रोड अधिक गर्दीचा झाला. देवीचं चटकन दर्शन ही रोमहर्षक घटना वाटायला लागली. तिथले लोक माझ्या लिखाणावर, बोलण्यावर प्रेम करतात तरीही लहानपणीच्या आठवणी विस्मृतीच्या पडद्याआड जात नाहीत. व्हेल माशाप्रमाणे त्या उसळी मारून वर येतात. आंद्या पाटणेला मी जेव्हा त्याच्या प्रचंड मोठय़ा दुकानात भेटतो किंवा दिलीप गुणेच्या घरी मिसळ खाऊन कोल्हापूर सोडतो तेव्हा मन कोल्हापुरात रेंगाळत राहतं, शरीर तेवढं गाडीत बसतं!

- द्वारकानाथ संझगिरी

इंग्लंडमधले पब ही अजूनही लक्षणीय ब्रिटिश जागा आहे.

तो फक्त दारूचा गुत्ता नाही. क्वॉर्टर सिस्टीमचा ‘बार’ नाही. पबला बार किंवा गुत्ता म्हणणं म्हणजे कुठल्याही फसफसत्या वाईनला शॅम्पेन किंवा गौतम गंभीर डावखोरा खेळायचा म्हणून त्याला लारा म्हणण्यासारखं आहे. ती भेटण्याची, सांस्कृतिक चर्चेची, साहित्य प्रसवण्याची, तर कधी निव्वळ धम्माल करण्याची जागा आहे. मद्य हे निमित्त आहे. लंडनमध्ये मी बीअर कुठेही घेतली आहे. घरी, रेस्टॉरंटमध्ये, ट्रेनमध्ये, बसच्या वरच्या डेकवर, हाईड पार्कमध्ये, क्रिकेटची मॅच पाहताना वगैरे कुठेही! त्यामुळे केवळ बीअर पिण्यासाठी मी पबमध्ये जात नाही. तिथले वातावरण अनुभवण्यासाठी, कुणाला भेटण्यासाठी. काही वेळा छोटय़ा कॉर्पोरेट मीटिंगसाठी तिथे माणूस जातो आणि मग तिथे गप्पा मारताना लिंबू सरबत घेत नाही.

अजून बहुतेक सर्व पब ‘ब्रिटिश’ आहेत. म्हणजे पबमध्ये गेल्यावर आपण ब्रिटिश वातावरणात आहोत हे जाणवतं. काही वर्षांपूर्वी माझा मित्र प्रमोद नवाथे मला क्वीन्सबरी किंवा किंग्जबरीला एका हिंदुस्थानी पबमध्ये घेऊन गेला. संपूर्ण पब हिंदुस्थानीनी भरलेला होता. पण तो पब नाही वाटला, बार वाटला. कमरेभोवती पंचा गुंडाळला म्हणून कुणीही महात्मा गांधी होत नाही (बापूजींना वर ठसका लागला असेल, चक्क ‘मद्यालयाला’ बापूंची उपमा!). कधी तरी पूर्वी पिकॅडली सर्कसच्या इथे एका पबमध्ये मी भजी खाल्ली होती. मस्त वाटलं होतं, पण त्या पबचं हिंदुस्थानीकरण झालेलं नव्हतं. पण आपली संस्कृती बदलू शकत नाही. कारण तो ब्रिटिश आहे आणि पबने ब्रिटिश राहण्यात गंमत आहे

वाईन हे जसे ख्रिस्ती मंडळींसाठी ‘धार्मिक’ पेय आहे तशी ‘बीअर’ त्यांच्यासाठी ‘जीवन’ आहे. आपण पाण्याला ‘जीवन’ म्हणतो. पबमध्ये अस्सल ब्रिटिश बीअर किंवा लागर पितो. ते घेताना तो चखना फस्त करीत नाही. तो झिंगतोसुद्धा! पबमधून माणूस मिलिटरीप्रमाणे कवायत करत बाहेर पडावा ही अपेक्षा नसते आणि हे वर्षानुवर्षे घडतंय. पबला आणि बीअरला फार मोठी परंपरा तिथे आहे. ब्रिटनमध्ये कास्ययुगापासून बीअर मिळते. कास्ययुग म्हणजे कास्य तयार झाले ते युग. ब्रिटनमध्ये इ.स. पूर्वी 2500 ते 800 पर्यंत 1700 वर्षांच्या काळाला कास्ययुग म्हणतात. पण आज ज्याला आपण ‘पब’ म्हणतो त्याची गर्भधारणा इंग्लंडमध्ये रोमन साम्राज्याने पाय रोवल्यावर झाली. मग अँग्लो-सॅक्सन काळात एल हाऊसेस आली. घरात बीअर तयार केल्यावर घरवाली पाटी लावे, ‘ताजी बीअर इथे मिळेल.’ ती पुढे इतकी वाढली की इ.स.नंतर 965 साली एडगर राजाने फतवा काढला की, एका गावात एकच ‘एल हाऊस’ असावे. कारण ती जागा म्हणजे भेटण्याची, गप्पा मारण्याची जागा झाली. ‘मद्य कट्टा’ असं म्हणायला हरकत नाही. इंग्लंडमध्ये बीअर पिण्याची इतकी मोठी परंपरा आहे की मी मध्यंतरी 1577 सालच्या एका सर्व्हेबद्दल ऐकले. कर लादण्याच्या दृष्टीने तो सर्व्हे त्यांनी केला होता. त्यांना आठवलं की इंग्लंड आणि वेल्समध्ये मिळून म्हणजे (स्कॉटलंड-आयर्लंड वगळून) एल हाऊसेस (घरची बीअर विकायची दुकाने) 14,202 आहेत. इन (घ्हह) म्हणजे मद्यविक्री अधिक जेवण अधिक राहण्याची सोय 1631 आहेत आणि टॅव्हर्न साधारण तसेच 329 आहेत हा हिशेब मांडला आणि या सर्व गोष्टींना ‘पब’ म्हटलं तर फक्त 187 माणसांमागे एक पब अस्तित्वात होता. सामान्य जनता खरेच तहान लागल्यावर पाणी पीत होती का हा प्रश्न आपल्याला पडतो.

पुढे आणि गंमतच आहे. इ.स. 1700 च्या सुमारास डच मंडळींनी इंग्लंडमध्ये ‘जिन’ आणली. राज्यकर्त्यांनी काय केले असेल? त्यांनी बीअर आणि जिन सोडून प्रत्येक मद्यावर प्रचंड कर आकारला. त्याचा परिणाम असा झाला की पावसाळय़ात गवत वाढतं तशी ‘जिन’ विकण्याची दुकानं वाढली. जिन बीअरपेक्षा स्वस्त मिळायला लागली. त्यामुळे मजूरवर्ग बीअर सोडून जिनच्या मागे लागला. 1740 मध्ये जिन बीअरपेक्षा सहापट जास्त विकली जात होती. नुसत्या लंडनमध्ये आठ हजारांच्या वर जिन विकणारी दुकाने होती. जिनमध्ये मद्यार्क जास्त असतो. त्यामुळे माणसं झिंगायला लागली. दारूच्या नशेत कायदा पायदळी तुडवायला लागली. (आपण दारू न पिता कायदा तोडतो. महात्मा गांधींची कायदेभंगाची चळवळ तेवढी आपण गंभीरपणे घेतली). मग त्या काळातल्या डॉक्टरांनी थिअरी मांडली की बीअर ही प्रकृतीला उत्तम, जिन वाईट. अगदी लहान मुलांनाही ‘स्मॉल बीअर’ दिली जायची. त्यात मद्यार्क कमी असायचा. जेवताना पाण्याऐवजी बीअर पिण्याचा सल्ला देण्यात आला. कारण त्यावेळी पाणी आजच्याएवढे शुद्ध नव्हते. धन्य ते डॉक्टर आणि धन्य त्यांचा सल्ला! कुठे गेले ते सर्व डॉक्टर्स आणि ती थिअरी?

मग काय, कायदा पुन्हा बदलला. घरात बीअर बनवायची परवानगी मिळाली. पहिल्या वर्षी चारशे बीअर हाऊसेस उभी राहिली. आठ वर्षांत ती शेहेचाळीस हजार झाली. नफा तगडा होता. त्यामुळे एखादा जॉन आपल्या घरात छोटासा धंदा सुरू करी. मिळालेल्या नफ्यातून बाजूचे घर विकत घेई आणि तिथे जाऊन राही. जुन्या घरातल्या प्रत्येक खोलीत बीअरची गंगा, सॉरी थेम्स वाहत असे. काही छोटय़ा शहरांत दोन घरांमागचं एक घर बीअर हाऊस असे. उदंड जाहली बीअर तहान भागविण्या!

मग सरकारला पुन्हा लायसन्स फी वाढवून बीअर हाऊसेसची वाढ रोखावी लागली. मग जुनी जी घरे होती ती काही बंद झाली नाहीत. अगदी 21व्या शतकापर्यंत ती आहेत. त्यातल्या अनेकांनी नवीन लायसन्स घेऊन ‘पब’मध्ये त्याचे रूपांतर केले. पाहिलंत, पब किती जुने आहेत आणि त्यांची परंपरा!

1983 साली मी पबमध्ये प्रथम घाबरत घाबरत शिरलो. बीअरची दीक्षा तिथेच घेतली होती. मी चमच्याने पिणारा होतो, इतर ड्रमने. त्यावेळी पब दुपारी बंद असत. माझा एक क्रिकेटप्रेमी मित्र दरवर्षी महिनाभर क्रिकेटच्या मोसमात इंग्लंडला असायचा. सकाळी क्रिकेट, रात्री कॅसिनोमध्ये जुगार आणि दिवसभर लिक्विड डाएट. त्यावेळी तो गमतीने म्हणायचा, ‘‘दुपारी माझ्या लिव्हरला विश्रांती मिळते.’’ आता सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत पब सुरू असतात. रविवारी फक्त सकाळी बाराला उघडतात आणि रात्री साडेदहाला बंद होतात. अलीकडे मला वाटतं, नव्या वर्षाच्या स्वागताला पब 36 तास उघडे असतात, आणि हो, लंडनचे स्मिथफिल्ड मार्केट, बेलिंग्जगेट फिश मार्केट आणि कॉव्हेंट गार्डनजवळ पब्ज व्हिक्टोरियन काळापासून चोवीस तास उघडे असतात म्हणे. खरेखोटे याचा अंदाज घेतला पाहिजे. बरे, का उघडे राहतात तर मार्केटमध्ये विविध पाळय़ांमध्ये काम करणाऱया कामगारांना बीअर पिता यावी. बीअरकडे मूलभूत गरज म्हणून पाहिले जाणे केवढे थोर! पुढच्या वेळी पुन्हा पबमधून फिरवून आणतो.

- द्वारकानाथ संझगिरी


मी आस्तिक आहे, पण मला माझ्यात आणि परमेश्वरात ब्राह्मण, गुरू, महाराज, सद्गुरू वगैरेंची गरज वाटत नाही. मी पूजाअर्चेच्या भानगडीत पडणाराही माणूस नाही. मी उठून मठातही जात नाही. त्यामुळे कोल्हापुरात ‘‘कणेरी मठ नक्की पाहून ये’’ असं मला अनेकदा सांगण्यात आलं तरी मी फारसं मनावर घेतलं नाही पण नंतर हा ‘मठ’ तसा मठ नाही याची मला ग्वाही देण्यात आली आणि मी कणेरीला गेलो….आणि तिथून परतताना मी तृप्त झालो.

हा काडसिद्धेश्वरस्वामींचा मठ आहे. हल्ली ‘स्वामी’ या शब्दाकडे जरा संशयाने पाहिलं जातं. कारण स्वतःचं उखळ पांढरं करून घेणं आणि स्त्रीभोग यात बरबटलेले अनेक स्वामी आपण पाहतो. काही तुरंगात आहेत, पण अनेक स्वामींनी भक्तिमार्गातून समाजकार्य केलंय. त्यातले एक काडसिद्धेश्वर महाराज. योग ते कोळून प्यायले होते. कठिणातल्या कठीण आसनात त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. ते 96 वर्षे जगले यातून त्यांच्या शारीरिक क्षमतेची ग्वाही मिळते. गरीब मुलांसाठी वसतिगृहासह शाळा काढणं, वृद्धाश्रम काढणं वगैरे समाजोपयोगी कार्ये त्यांनी केली. त्यांचा हा मठ.

कोल्हापूरपासून अवघ्या 10-12 किलोमीटर अंतरावर तो आहे. खरं तर शहर संपलेलं जाणवतही नाही. तिथे बारा राशींची बारा शिल्पं तुमचं स्वागत करतात. 120 रुपयांचं तिकीट घेऊन तुम्ही एका गुहेत शिरतात तिथे तुमची भेट होते प्राचीन काळातल्या आपल्या ऋषिमुनींची. या ऋषींची शिल्पं आहेत. मुख्य म्हणजे शिल्पं अत्यंत रेखीव आहेत. देखावे बऱयापैकी जिवंत वाटतात. प्रत्येक ऋषीची किंवा व्यक्तिमत्त्वाची थोडक्यात दिलेली माहिती कधी नवी माहिती पुरवते तर कधी मनात कुठेतरी तळाला जाऊन बसलेलं ज्ञान थेट पृष्ठभागावर आणते. अनेक ऋषींच्या ज्ञानाला, शोधाला किंवा कार्याला इथे विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केलाय. काही वेळा तो पटतो. आणि वाटतं, ‘‘अरेच्चा, हे असं असावं’’ किंवा काही वेळा तो अवास्तव किंवा ओढून ताणून आणलेला वाटतो.

राजा भगिरथाने आणलेली गंगा तिथे दाखवली आहे. भगिरथाने ही गंगा स्वर्गातून आणली असं म्हटलं जातं. भगिरथ हा सागर वंशाचा राजा होता. त्याने एक हजार वर्षे तप करून ऋषी कपिलाने शाप दिलेल्या आपल्या नातेवाईकांना शापातून मुक्त केले. त्यामुळे देवीच्या रूपातली गंगा नदीच्या रूपात अवतरली वगैरे म्हटलं जातं. म्हणून गंगेच्या उगमाला भागिरथी म्हटलं जातं. ही पुराणकथा आहे. आजच्या विज्ञानाच्या ज्ञानाप्रमाणे ही कविकल्पना आहे. मग काय घडू शकतं, तर हिमालयातल्या दुर्गम भागातून योग्य खोदकाम करून त्याने गंगेचा मार्ग बदलला असू शकतो. ती गोष्टही खडतरच आहे. म्हणून खडतर प्रयत्नांना भगिरथ प्रयत्न म्हणत असावेत. भगिरथाच्या गंगा आणण्याला दिलेलं हे वैज्ञानिक कारण पटतं.

पण कणाद ऋषींनी अणुपरमाणूबद्दल भाष्य केलं किंवा दगड खाली का पडतो, आगीच्या ज्वाळा वर का जातात वगैरे निरीक्षणावर भाष्य केलं म्हणून ते अणुविज्ञान किंवा गुरुत्वाकर्षणाचे अध्वर्यू ठरू शकत नाहीत. ख्रिस्तपूर्व काळातल्या या महर्षीने त्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न केला ही मोठी गोष्ट आहे, पण म्हणून ‘न्यूटन’ आमच्याकडे आधी जन्मला असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

सुश्रुत, वराहमिहीर, पाणिनी, चाणक्य, शबरी, एकलव्य, व्यास, वाल्मीकी, क्रौंच पक्ष्याची हत्या आणि त्यातून निर्माण झालेलं पहिलं काव्य वगैरे पुतळय़ांच्या रूपात अत्यंत सुंदरपणे मांडलय. अर्ध्या-पाऊण तासात आपण या महनीय व्यक्तींच्या सान्निध्यात घालवतो. तो ज्ञानात भर घालतो किंवा उजळणी करतो.

तिथून बाहेर पडल्यावर आपण एका ‘वसवलेल्या’ गावात जातो. ती गावातली माणसं, ती जनावरं लांबून खरी वाटली तरी ती शिल्पं आहेत, पण अत्यंत सुंदर बनवलेली आहेत. मोगल आक्रमणापूर्वी एक टिपिकल गाव कसं होतं हे दाखवलं गेलंय. धान्याच्या पेरणीपासून धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक क्रिया शिल्परूपात आपल्याला पाहायला मिळते. आपल्या ताटात पडलेलं अन्न आपण गिळतो. बऱयाचदा जास्त झालं, आवडलं नाही म्हणून टाकतो. धान्यामागची मेहनत कळली की, आपल्याला त्या गोष्टीची लाज वाटायला लागते. शेतातल्या गाई-म्हशी अत्यंत कल्पकतेने उभ्या केल्या आहेत. म्हणजे काही हडकुळय़ा गाई तर इतक्या खऱया वाटतात की, त्यांच्या अंगावरून हात फिरवला तर त्या शहारतील असं वाटतं. त्यांची हाडं फार कल्पकतेने दाखवली आहेत.

बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही खेडय़ांमध्ये पाहायला मिळते. आजचं खेडं त्या व्यवस्थेनुसार चालत नाही, पण बलुतेदारी म्हणजे काय? कुठले व्यवसाय गावात चालत, त्यावर उदरनिर्वाह कसा होई याची सुंदर मांडणी तिथे शिल्पातून आहे. चांभार, लोहार, सुतार, शिंपी, न्हावी, कोष्टी, सोनार वगैरे तर आहेतच, पण वासुदेव, पिंगळा यांचंही रोजचं आयुष्य तिथे शिल्पातून उभं केलंय. वासुदेव तर आजच्या पिढीला ठाऊक असणं कठीण. हा लोककलाकार गावात सकाळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग- गवळणी गात दान मागायचा. चिपळय़ांपासून पाव्यापर्यंत अनेक वाद्यं तो वाजवायचा. शिवाजी महाराजांनी त्याचा उपयोग हेरगिरीसाठीही केलाय.

या खेडय़ांमध्ये विविध प्रकारचे वाडेही पाहायला मिळतात. उदा. पाटलाचा वाडा, वतनदाराचा वाडा, शिंप्याचं घर वगैरे. त्याबरोबर वेगवेगळे क्षण, लग्नाची वरात वगैरे. एकंदरीत आता हरवत चाललेलं ते पूर्वीचं आदर्श गाव कसं होतं ते या कणेरी मठात पाहता येतं.

परदेशात त्यांची परंपरा टिकवण्यासाठी अशा गोष्टी उभारतात आणि पर्यटक तिथे गर्दी करतात. ही आपली संस्कृती आहे. आपलं गाव आहे. महात्मा गांधी नेहमी म्हणत, “खरा हिंदुस्थान गावात आहे.’’ हा गावातला खरा हिंदुस्थान काडसिद्धेश्वर महाराजांनी उभारलाय. अजून 25 वर्षांनी त्याची किंमत आपल्याला कळेल. कारण तोपर्यंत हे सर्व हरवलेलं असेल.


विजयनगरच्या साम्राज्यावर हा या मालिकेतला माझा शेवटचा लेख. खरं तर हंपीला का जावं, तिथं काय करावं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

हंपी पाहताना पाचशे-सहाशे वर्षांपूर्वी आपल्या देशात काय संस्कृती होती, किती सुबत्ता होती, किती शास्त्रीय प्रगती होती हे अनुभवता येतं. अर्थात कोसळलेले बुरूज, शिल्पं, देवळं, रस्ते यांची भाषा तुम्हाला कळली पाहिजे. ते ‘मूकपणे’ बोलतात. आपण फक्त समजून घ्यायचं. आता विश्वास बसत नाही की, या शहरात सात कोट होते. हे परदेशी प्रवाशांनी केलेलं वर्णन आहे. त्यात असं म्हटलंय की, ‘पहिल्या कोटाबाहेर पुरुषभर उंच आणि अर्धे जमिनीत गाडलेले दगड आहेत. ते घोडेस्वार आणि शिपायांना सहज ओलांडून जाण्यासारखे नाहीत. अगदी बाहेरच्या तीन कोटांमध्ये बागबगिचे, शेते, वाडय़ा, घरे आणि वस्ती आहे.’ कुठलंही शहर वाढण्यासाठी किंवा त्याची भरभराट होण्यासाठी पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतोच. शेवटी पाणी हे जीवन आहे. हंपी उभारताना हा विचार प्रामुख्याने केला गेला होता. तुंगभद्रा नदी या शहराच्या कुशीतून वाहते. ती डोंगरदऱ्यांतून वाहते. त्यामुळे तिचा मार्ग थोडा बदलणं कठीण नव्हतं. किंबहुना, आजचं आधुनिक तुंगभद्रा धरण हे हंपीहून फक्त 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे आपल्याला कल्पना येते हरिहर, बुक्क आणि त्यांचे गुरू विद्याचरण किती दूरदृष्टीचे होते! शहर कुठे आणि कसं वसवायचं याचं त्यांचं ज्ञान किती सखोल होतं! विजयनगरच्या साम्राज्याची लोकसंख्या काही हजारांत होती. त्यात उत्सव, बाजार किंवा युद्धकाळात फार मोठी भर पडत असे.

‘कृष्णदेवरायचरितम्’ या ग्रंथानुसार सम्राटाच्या सेनादलात पाच लाख पदाती (पायदळ), 66 हजार घोडेस्वार आणि 22 हजार हत्ती होते. अब्दुल रझाक हा त्या काळातला प्रवासी म्हणतो की, ‘‘साम्राज्यात 11 लाख पदाती (पायदळ), 5 लाख घोडेस्वार आणि एक लाख हत्ती होते.’’ अर्थात हे विधान थोडं अतार्किक आणि अतिरेकी वाटलं. कारण त्यावेळी मुळात लोकसंख्याच किती होती? पण यातून एक अर्थ निघतो की, विजयनगरचं सैन्य प्रचंड होतं. ते सर्व साम्राज्यात विखुरलेलं असलं तरी राजधानीत त्याची संख्या लाक्षणिक असणार. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याकडे आणि फळधान्यांकडे जास्त लक्ष पुरवलं गेलं होतं. मोठय़ा टाक्या बांधल्या गेल्या होत्या. पाणी वाहून नेण्यासाठी टेराकोटाचे पाइप होते. दगडाने तयार केलेले पाट होते. बाहेरून काळे दगड आणून तलाव बांधले होते. मुख्य म्हणजे जमीन सुपीक होती. पाणी, सुपीक जमीन, दगडांचं चिलखत! राजधानीसाठी आणखी काय हवंय!

सुपीक जमीन आणि पाण्याच्या स्रोतामुळे शहरात शेती होती, फळफळावळ होती. त्यात आजूबाजूच्या गावांतूनही फळं, धनधान्य येत असल्यानं शहर परावलंबी नव्हतं. बाजारात संत्री, नारिंगी, द्राक्षे, लिंबू वगैरे फळफळावळ मिळायची. एका प्रवाशानं विजयनगराचं वर्णन सामानसुमान आणि धनधान्यांनी गच्च भरलेलं असं दुसरं शहर साऱया दुनियेत नाही असं केलं होतं. ‘‘तांदूळ, गहू, कडधान्य, मका वगैरेचा इथे भरपूर साठा आहे. डाळ, पावटे, मूग, तुरी, हरभरे, मसूर, कुळीथ इ. गोष्टी इकडच्या मंडळींच्या रोजच्या खाण्यात येतात. त्यांचा साठाही भरपूर आहे. कारण ते उपलब्ध आहेतच, पण त्यांचे भावही स्वस्त आहेत’’ हे त्यानं लिहून ठेवलंय. त्याचं आणखी एक निरीक्षण महत्त्वाचं आहे. तो म्हणतो ‘मुसलमान लोक बव्हंशी गहू खातात, पण इतर लोकांत तो खाण्याचा रिवाज नाही.’ दाक्षिणात्य मंडळींच्या सवयी अजून बदललेल्या नाहीत.

या शहराचे रस्ते प्रशस्त होते. त्यातले महत्त्वाचे रस्ते दगडांनी बनलेले होते. अर्थात त्यावेळी सिमेंट, डांबर यांचा शोध लागलेला नव्हता. सामानाची ने-आण बैल आणि घोडय़ावरून केली जायची. त्यामुळे तिथे-घोडा, बैल, तट्टू यांचा बाजार मोठा होता, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजयनगर ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झाली होती. तिथे हिंदुस्थानी कपडे तर मिळतंच, पण तुर्कस्तान, पर्शिया आणि चीनमधून रेशीम आणि मखमल येत असे. कुठे तुर्कस्तान, चीन, कुठे विजयनगर! प्रवास घोडय़ावरून करायचा, तरी व्यापारी येत. यावरून विजयनगरच्या साम्राज्याचं महत्त्व अधोरेखित होतं. अर्थात उत्खननात या सर्व गोष्टी सापडल्या नाहीत. या सर्व विविध देशांतल्या आणि प्रांतांतल्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या आहेत, पण तिथे खणल्यावर सोन्याच्या चेन, नाणी, चीनची पोर्सिलिनची भांडी वगैरे सापडली. तिथल्या हिऱ्यामाणक्यांबद्दल, सोन्याचांदीबद्दल बरंच लिहिलं गेलंय. आधुनिक अर्थव्यवस्थेची बाल्यावस्था ही आपल्याला विजयनगरमध्ये सापडेल. तिथल्या राजांनी धातूची नाणी निर्माण केली होती. सोन्याचा धूर निघत होता म्हणून तिथे सोन्याची नाणी अधिक होती. सोन्याच्या नाण्याचं नाव ‘वराह’ (विष्णूचा एक अवतार) असं होतं, पण विदेशी व्यापारी त्याला ‘पगोडा’ म्हणत. चांदीच्या नाण्याला तार म्हणत, पण त्या काळात चांदी फारशी उपलब्ध नव्हती. तांबे तर नाण्यासाठी आयात केलं जात असे. तांब्याचं नाण ‘जितल’ या नावानं ओळखलं जात होतं. नाण्याचा आकार कसा असावा, त्याचे वजन काय असावे हे राजांनी ठरवून दिलं होतं. या सर्व गोष्टीतून हिंदुस्थानी संस्कृती किती सुधारली होती हे जाणवते.

मग महत्त्वाचा प्रश्न येतो की, विजयनगरचे बलाढय़ साम्राज्य उद्ध्वस्त का झालं? कसं झालं?
अनेक कारणं आहेत. प्रमुख कारण म्हणजे ‘लूट’. विजयनगरचं वैभव इतरांच्या डोळ्यात खूपत होतं. त्यात कृष्णदेवराय आणि रामराय यांनी मुस्लिम राजांच्या मनात भयगंड निर्माण केला होता. स्वा. सावरकर त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहितात, ‘‘हिंदूंनी पूर्वीच्या अत्याचाराचे उट्टे धार्मिक आघाडीवरही अधिक कठोरपणे आणि निर्दयीपणे काढले. वाटेने जाताना यथेच्छ लुटालूट केली. त्यांनी जशी हिंदू मंदिरे पाडली तशा त्यांच्या मशिदीही हिंदूंनी पाडून धुळीस मिळवल्या.’’ त्यानंतर सर्व मुस्लिम राजे एकत्र झाले. राजारामरायचा विश्वासघात करून शिरच्छेद करण्यात आला. त्याचं रक्तबंबाळ शीर भाल्याच्या टोकाला लावून सर्व सैन्यात मिरवत नेलं. राजा पडल्यावर इतरांची दाणादाण झाली आणि मग विजयनगर सहा महिने लुटलं गेलं. लुटीसाठी आधी पाडापाड झाली. मग डोक्यावर धार्मिक भूत बसलं. त्यात देवळं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आणि एक प्रचंड साम्राज्य धुळीला मिळालं. साम्राज्याला उदय असतो तसा अंतही असतो, पण हे उद्ध्वस्त साम्राज्य पाहतानाही आपली छाती फुगते. कारण तिथली संस्कृती, तिथली शिल्पकला, तिथला व्यापार, तिथलं साम्राज्य, तिथली धार्मिक सहिष्णुता, स्थापत्यशास्त्र वगैरे सर्वच अत्युच्च दर्जाचं होतं.
…आणि ते शंभर नंबरी आपलं होतं!

-द्वारकानाथ संझगिरी


हंपीमधलं सर्वात सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेलं देऊळ म्हणजे विठ्ठल मंदिर.

विठ्ठल हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. पंढरपूर हे माझं सर्वात आवडतं तीर्थक्षेत्र. कारण तिथे कुठल्याही जातीचा हिंदू, स्त्री असो वा पुरुष सोवळं वगैरे न घालता थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवू शकतो. जुनाट बंधनांच्या कैदेतला तो देव नाही.

पण विठ्ठल हा मूळचा मराठी की कानडी?

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेऊन त्यावर ग्रंथ लिहिणाऱया रा. चिं. ढेरे यांच्या मते विठ्ठल हा कानडीच. साक्षात ज्ञानेश्वराच्या अभंगातही त्याच्या कानडीपणाचं उदाहरण आढळतं. ‘‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु! येणे मज लाविले वेधी।।’’ असं ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणत. एकनाथ महाराजही म्हणतात, ‘‘नाठवेचि दुजे कानडय़ा वाचुनी। कानडा तो मन ध्यानी वसे।।’’

त्यामुळे हंपीवर राज्य करणारी काही घराणी विठ्ठलमय होती. हे मंदिर पंधराव्या शतकातलं आहे. दुसऱया देवरायाच्या कारकीर्दीत हे मंदिर बांधलं गेलं, पण त्याला वैभवशाली केलं कृष्णदेवरायाने! कृष्णदेवराय हा अत्यंत हुशार, पराक्रमी राजा होता. ते द्राविडीयन शैलीत बांधलेलं आहे. प्रामुख्याने दक्षिण हिंदुस्थानी स्थापत्य कला या मंदिरात दिसते. इथल्या खांबांवरची शिल्पं किंवा छतावरची सजावट ही हंपीतली सर्वोत्कृष्ट सजावट आहे. एकही खांब किंवा जागा सजावटीशिवाय सोडलो
तर विठ्ठल रागावणार अशी ठाम समजूत राजाची असावी. अर्थात उच्च दर्जाची शिल्पकला देवळांमुळे टिकली. त्या कलेला प्रोत्साहन मिळालं हे खरं असलं तरी देवाला राहायला महालसदृश घरं असावीत ही सर्वधर्मीय समजूत असावी. त्यामुळे जगभर मंदिर, मशिदी, चर्च यांना भव्यता आणि सौंदर्य बहाल करण्याच्या नादात गडगंज पैसा वाहिला आहे. गंमत पहा, या विठ्ठल मंदिराची एक आख्यायिका आहे की, विठ्ठलरूपातल्या विष्णूसाठी हे देऊळ बांधलं, पण त्याचं श्रीमंती रूप पाहून देव चिडून स्वगृही परतला. माणसापेक्षा अर्थातच देव सुजाण होते.

या मंदिराचं एक महत्त्वाचं आकर्षण आहे, दगडाचा रथ! असे आणखीन दोन रथ हिंदुस्थानात आहेत. तामीळनाडूमध्ये महाबलीपुरममध्ये आणि कोणार्कला ओडिशात. हंपीतल्या स्थापत्यकलेतला तो सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. ते दगडाच्या रथातलं गरुडाचं मंदिर आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. त्यामुळे त्यात विष्णूच्या वाहनाचं मंदिर ही कल्पना मस्त आहे. अर्थात हा रथ ‘भरजरी’ आहे हे सांगायची गरज नाही. या मंदिराचीही तोडफोड झाली. त्यामुळे मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. रथाचीही नासधूस झालीय. पूर्वी रथाची चाकं फिरत. त्यामुळे माणसं तो रथ इथून तिथून हलवत, पण नंतर ती चाकं सिमेंटने जमिनीला जोडली गेली.

त्या मंदिराचा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे रंगमंडप. हा मंडप छप्पन्न खांबांवर उभा आहे आणि हे खांब चक्क संगीतमय खांब आहेत. त्यांना ‘सारेगम’ खांब असंसुद्धा म्हणतात. या खांबांवर एक छोटी काठी आपटली तर त्यातून संगीताचे सूर  ऐकायला येतात. जणू प्रत्येक खांब एक वाद्य आहे. प्रत्येक मोठय़ा खांबाच्या बाजूला सात खांब आहेत. त्यातून सात सूर ऐकायला येतात. ज्या खांबावर जे वाद्य कोरलंय त्या वाद्याचा आवाज येतो. बरं, वाद्य कुठली आहेत तर ताल वाद्य आहेत, तंतूवाद्य आहेत, विन्ड इन्स्ट्रुमेंटही (वायुवाद्य) आहेत. ज्या दगडातून स्वरांची निर्मिती होऊ शकते अशा एका दगडातून हे खांब तयार केलेले आहेत. खांबातून सात सूर बाहेर येणे हा चमत्कार होता. शतकानुशतके ते गूढ उकलण्याचा प्रयत्न झाला नाही याचं कारण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनच नव्हता. ब्रिटिशांचं राज्य आलं. त्यांनाही हा मंडप पाहून गोड धक्का बसला. हे कसं बांधलं असेल, या चमत्कारामागे काही विज्ञान आहे का हे पाहण्याची त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी दोन खांब फोडून बघितले. त्यांचा समज होता की, खांबात असं काहीतरी आहे ज्यामुळे सूर ऐकायला येतात, पण तसं काही त्यात नव्हतं. त्यामुळे हे गूढ अधिकच गहिरं बनलं. ते सूर ही त्या दगडाची मूलभूत गुणवत्ता आहे असं मानलं जातं. हे दोन खांब अजूनही तिथे ठेवलेले आहेत. आता तुम्ही जाऊन त्या खांबांवर काठी आपटून आवाज ऐकू शकत नाही. कारण त्यावर बंदी आहे, पण तुम्ही जर यूटय़ूबवर एखादी जुनी टेप पाहिली तर संगीत ऐकायला येईल.


हे वाजवणं बंद करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाजवून वाजवून खांब खराब व्हायला लागले. कारण कुणीही यायचा, खांबावर काठी किंवा तत्सम गोष्ट आपटायचा. अशा जगावेगळय़ा गोष्टी जपल्या पाहिजेत. मी जग पालथं वगैरे घातलेलं नाही, पण जे जग मी थोडंफार पाहिलंय त्यात असा चमत्कार पाहिलेला नाही. असा चमत्कार जगापुढे ठेवण्याची एक शिस्तबद्ध पद्धत असू शकते. जसं इतर जगात असतं. दिवसातून दोनदा किंवा तीनदा संगीतयात्रा म्हणा, म्युझिक टूर ठेवता येऊ शकते. त्यासाठी वेगळे पैसे आकारता येऊ शकतील आणि आर्किऑलॉजीतल्या तज्ञांनी शिकवलेल्या मंडळींकडून त्या खांबांतल्या संगीताचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. त्याच्या बाजूलाच एक मंडप आहे. या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर त्या मंडपात नृत्य होत असे म्हणतात. देऊळ आणि महाराजांची रसिकता यामुळे नृत्यकलाही टिकून राहिली. अर्थात नृत्य ही उच्चभ्रू वर्गाची कला त्यावेळी नव्हती, पण तेव्हा ती परंपरेतून टिकवली गेली म्हणून आज उच्चभूंच्या घरात तिला प्रवेश मिळाला. तर मी काय सांगत होतो? हं, एका मंडपात आताही त्या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर नाच ठेवता येईल. म्हणजे तो काळ पर्यटकांच्या डोळय़ांसमोर उभा करता येईल आणि हे अशक्य आहे? मला नाही वाटत, पण राजकीय इच्छाशक्ती हवी. ती आणायची कुठून? परंपरेच्या नावाने छाती पुढे काढणारी माणसं शिल्पं, दगडातली कला जपायला उत्सुक नसतात. कारण त्यामुळे मतं मिळत नाहीत. मतं नवीन मंदिर, नवीन शिल्पं उभारून मिळतात. कशाला जुनी मढी उकरायची? मग ती परंपरेची का असेनात!

- द्वारकानाथ संझगिरी


हंपीमधलं सर्वात सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेलं देऊळ म्हणजे विठ्ठल मंदिर.

विठ्ठल हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. पंढरपूर हे माझं सर्वात आवडतं तीर्थक्षेत्र. कारण तिथे कुठल्याही जातीचा हिंदू, स्त्री असो वा पुरुष सोवळं वगैरे न घालता थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवू शकतो. जुनाट बंधनांच्या कैदेतला तो देव नाही.

पण विठ्ठल हा मूळचा मराठी की कानडी?

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेऊन त्यावर ग्रंथ लिहिणाऱया रा. चिं. ढेरे यांच्या मते विठ्ठल हा कानडीच. साक्षात ज्ञानेश्वराच्या अभंगातही त्याच्या कानडीपणाचं उदाहरण आढळतं. ‘‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु! येणे मज लाविले वेधी।।’’ असं ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणत. एकनाथ महाराजही म्हणतात, ‘‘नाठवेचि दुजे कानडय़ा वाचुनी। कानडा तो मन ध्यानी वसे।।’’

त्यामुळे हंपीवर राज्य करणारी काही घराणी विठ्ठलमय होती. हे मंदिर पंधराव्या शतकातलं आहे. दुसऱया देवरायाच्या कारकीर्दीत हे मंदिर बांधलं गेलं, पण त्याला वैभवशाली केलं कृष्णदेवरायाने! कृष्णदेवराय हा अत्यंत हुशार, पराक्रमी राजा होता. ते द्राविडीयन शैलीत बांधलेलं आहे. प्रामुख्याने दक्षिण हिंदुस्थानी स्थापत्य कला या मंदिरात दिसते. इथल्या खांबांवरची शिल्पं किंवा छतावरची सजावट ही हंपीतली सर्वोत्कृष्ट सजावट आहे. एकही खांब किंवा जागा सजावटीशिवाय सोडलो
तर विठ्ठल रागावणार अशी ठाम समजूत राजाची असावी. अर्थात उच्च दर्जाची शिल्पकला देवळांमुळे टिकली. त्या कलेला प्रोत्साहन मिळालं हे खरं असलं तरी देवाला राहायला महालसदृश घरं असावीत ही सर्वधर्मीय समजूत असावी. त्यामुळे जगभर मंदिर, मशिदी, चर्च यांना भव्यता आणि सौंदर्य बहाल करण्याच्या नादात गडगंज पैसा वाहिला आहे. गंमत पहा, या विठ्ठल मंदिराची एक आख्यायिका आहे की, विठ्ठलरूपातल्या विष्णूसाठी हे देऊळ बांधलं, पण त्याचं श्रीमंती रूप पाहून देव चिडून स्वगृही परतला. माणसापेक्षा अर्थातच देव सुजाण होते.

या मंदिराचं एक महत्त्वाचं आकर्षण आहे, दगडाचा रथ! असे आणखीन दोन रथ हिंदुस्थानात आहेत. तामीळनाडूमध्ये महाबलीपुरममध्ये आणि कोणार्कला ओडिशात. हंपीतल्या स्थापत्यकलेतला तो सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. ते दगडाच्या रथातलं गरुडाचं मंदिर आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. त्यामुळे त्यात विष्णूच्या वाहनाचं मंदिर ही कल्पना मस्त आहे. अर्थात हा रथ ‘भरजरी’ आहे हे सांगायची गरज नाही. या मंदिराचीही तोडफोड झाली. त्यामुळे मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. रथाचीही नासधूस झालीय. पूर्वी रथाची चाकं फिरत. त्यामुळे माणसं तो रथ इथून तिथून हलवत, पण नंतर ती चाकं सिमेंटने जमिनीला जोडली गेली.

त्या मंदिराचा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे रंगमंडप. हा मंडप छप्पन्न खांबांवर उभा आहे आणि हे खांब चक्क संगीतमय खांब आहेत. त्यांना ‘सारेगम’ खांब असंसुद्धा म्हणतात. या खांबांवर एक छोटी काठी आपटली तर त्यातून संगीताचे सूर  ऐकायला येतात. जणू प्रत्येक खांब एक वाद्य आहे. प्रत्येक मोठय़ा खांबाच्या बाजूला सात खांब आहेत. त्यातून सात सूर ऐकायला येतात. ज्या खांबावर जे वाद्य कोरलंय त्या वाद्याचा आवाज येतो. बरं, वाद्य कुठली आहेत तर ताल वाद्य आहेत, तंतूवाद्य आहेत, विन्ड इन्स्ट्रुमेंटही (वायुवाद्य) आहेत. ज्या दगडातून स्वरांची निर्मिती होऊ शकते अशा एका दगडातून हे खांब तयार केलेले आहेत. खांबातून सात सूर बाहेर येणे हा चमत्कार होता. शतकानुशतके ते गूढ उकलण्याचा प्रयत्न झाला नाही याचं कारण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनच नव्हता. ब्रिटिशांचं राज्य आलं. त्यांनाही हा मंडप पाहून गोड धक्का बसला. हे कसं बांधलं असेल, या चमत्कारामागे काही विज्ञान आहे का हे पाहण्याची त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी दोन खांब फोडून बघितले. त्यांचा समज होता की, खांबात असं काहीतरी आहे ज्यामुळे सूर ऐकायला येतात, पण तसं काही त्यात नव्हतं. त्यामुळे हे गूढ अधिकच गहिरं बनलं. ते सूर ही त्या दगडाची मूलभूत गुणवत्ता आहे असं मानलं जातं. हे दोन खांब अजूनही तिथे ठेवलेले आहेत. आता तुम्ही जाऊन त्या खांबांवर काठी आपटून आवाज ऐकू शकत नाही. कारण त्यावर बंदी आहे, पण तुम्ही जर यूटय़ूबवर एखादी जुनी टेप पाहिली तर संगीत ऐकायला येईल.


हे वाजवणं बंद करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाजवून वाजवून खांब खराब व्हायला लागले. कारण कुणीही यायचा, खांबावर काठी किंवा तत्सम गोष्ट आपटायचा. अशा जगावेगळय़ा गोष्टी जपल्या पाहिजेत. मी जग पालथं वगैरे घातलेलं नाही, पण जे जग मी थोडंफार पाहिलंय त्यात असा चमत्कार पाहिलेला नाही. असा चमत्कार जगापुढे ठेवण्याची एक शिस्तबद्ध पद्धत असू शकते. जसं इतर जगात असतं. दिवसातून दोनदा किंवा तीनदा संगीतयात्रा म्हणा, म्युझिक टूर ठेवता येऊ शकते. त्यासाठी वेगळे पैसे आकारता येऊ शकतील आणि आर्किऑलॉजीतल्या तज्ञांनी शिकवलेल्या मंडळींकडून त्या खांबांतल्या संगीताचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. त्याच्या बाजूलाच एक मंडप आहे. या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर त्या मंडपात नृत्य होत असे म्हणतात. देऊळ आणि महाराजांची रसिकता यामुळे नृत्यकलाही टिकून राहिली. अर्थात नृत्य ही उच्चभ्रू वर्गाची कला त्यावेळी नव्हती, पण तेव्हा ती परंपरेतून टिकवली गेली म्हणून आज उच्चभूंच्या घरात तिला प्रवेश मिळाला. तर मी काय सांगत होतो? हं, एका मंडपात आताही त्या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर नाच ठेवता येईल. म्हणजे तो काळ पर्यटकांच्या डोळय़ांसमोर उभा करता येईल आणि हे अशक्य आहे? मला नाही वाटत, पण राजकीय इच्छाशक्ती हवी. ती आणायची कुठून? परंपरेच्या नावाने छाती पुढे काढणारी माणसं शिल्पं, दगडातली कला जपायला उत्सुक नसतात. कारण त्यामुळे मतं मिळत नाहीत. मतं नवीन मंदिर, नवीन शिल्पं उभारून मिळतात. कशाला जुनी मढी उकरायची? मग ती परंपरेची का असेनात!

- द्वारकानाथ संझगिरी



माणूस हंपी पाहायला आला की तो प्रथम विरुपाक्ष मंदिरात जातो. विरुपाक्ष म्हणजे शंकराचं एक रूप.
पुराणात त्याबद्दल धमाल कथा आहेत. ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. हंपीच्या हेमकुटा पर्वतावर ती तप करायची. तिथेच काम देवाचा नाश करून शिव ध्यानस्थ बसला होता. शिवाचं ध्यान भग्न करण्यासाठी प्रेमाच्या देवाला, कामदेवाला पाठवलं होत. पुढे शिवाचं आणि त्या पम्पाचं लग्न झालं. ही पंम्पा म्हणजे आपली पार्वती. म्हणजे शंकर हा ‘पंम्पापती’ ठरला. त्याला विरुपाक्ष म्हटलं गेलं. विरुपाक्ष म्हणजे तिरकस डोळय़ाचा (Oblique eyes) देव. तो काळ किती चांगला होता नाही? शंकराला तिरकस डोळय़ाचा म्हटलं म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत. खुद्द शंकराचया
सुद्धा नाही. अशामुळे चिडून शंकराने तांडव केल्याचं वाचनात नाही. त्या काळी देवाला जात वगैरेही नव्हती. असलीच तर देव हीच जात. देव दलित, जाट, जैन वगैरे कुणी नसे. देव हा देव असे…
तर या विरुपाक्षाचं देखणं देऊळ हम्पीत आहे. आजही पूजाअर्चा सुरू असलेलं हे तिथलं एकमेव देऊळ आहे. ‘इतर मंदिरात पूजाअर्चा का नाही?’ या माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना सरकारी शिक्षित गाईड असं म्हणाला की ‘विजयनगर जेव्हा लुटलं गेलं, तेव्हा अनेक मूर्ती भंगल्या. भंगलेल्या मूर्तींची पूजा करत नाहीत. त्यामुळे ती मंदिरं आता फक्त पर्यटनस्थळं झालीएत. हे मंदिर वाचलं.’
माझा पुढचा प्रश्न नैसर्गिकपणे होता, ‘हे मंदिर कसं वाचलं.’
तो म्हणाला, 1565 मध्ये जेव्हा मुस्लिम राजांनी विजयनगर उद्ध्वस्त करून लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या सैन्यातल्या काही मराठय़ांनी राजाला विनंती केली की, हे मंदिर आमच्यासाठी सोडा. ते उद्ध्वस्त करू नका. सुलतानाने ऐकलं.
मला याचा उल्लेख कुठेही मिळाला नाही. 19व्या शतकात या मंदिराची डागडुजी केली गेली. ती कुणी केली. त्याचा ऐतिहासिक पुरावा काही नाही. पण ती इंग्रजांनी केली असावी असा कयास आहे. कारण एक म्हणजे अशा गोष्टी जतन करायच्या असतात याची जाणीव त्यांनाच होती. दुसरं म्हणजे मंदिरात एक-दोन ठिकाणी चक्क ब्रिटिश ठसा दिसतो. तलावाजवळच्या एका गोपुराजवळ वर चक्क इंग्लंडच्या राणीची मूर्ती आहे आणि मंदिरातल्या मंडपावरच्या छताच्या पेंटिंगमध्ये, चर्चमध्ये दिसतात तसे पंख फुटलेले लहानगे एंजल्स दिसतात. पण हे मंदिर टिकलं हे महत्त्वाचं. कारण ते एका देदीप्यमान साम्राज्याचं साक्षीदार आहे.
आपण गोपुरातून मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. गोपूर म्हणजे पिरॅमिडसारखं शिखर. खाली ग्रॅनॅइट आणि वर विटा आणि प्लास्टरने तयार केलेलं नक्षीकाम. हे त्याचं स्वरूप! 11व्या आणि 12व्या शतकातल्या तामीळ देवळावरून या गोपुराची रचना केलेली आहे. या गोपुराच्या वर एक सोनेरी कळस आहे. पिरॅमिडसारख्या टोपीत सोनेरी पिस खोवले जावे तसा तो दिसतो. गोपुरातून आत गेलो की आयताकृती पटांगणात आपण पाऊल ठेवतो. चारी बाजूला मोठय़ा भिंती आहेत. तिथून देवळात जायला एक छोटं गोपूर आहे. ते विजयनगरच्या साम्राज्याच्या काळातलं आहे. 1510 साली कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते उभारलं गेलं. अर्थात स्टाईल तशीच, तामीळ मंदिराकडून उसनी घेतली गेली. त्याच काळात देवळात मंडप बांधला गेला. त्याचे स्तंभ (Columns) खासच आहेत. अख्खा कॉलम खोदून त्यात जागा केल्या गेल्या आहेत. आणि चार छोटे कॉलम्स त्यातून तयार होतात. साधारण आपण देव ठेवतो त्या मखराप्रमाणे. हे विजयनगरच्या स्थापत्यकलेचं अपत्य आहे. मंडपाचे खांब हे ‘याली’ प्राण्यासारखे दिसतात. ‘याली’ हे एक पौराणिक जनावर आहे. त्याला बायोलॉजिकल पुरावा नाही. अनेक देवळांच्या खांबावर ते कोरलेलं दिसेल. किंबहुना हे खांबच बऱयाचदा यालीचं रूप घेतात. अर्धा सिंह, अर्धा हत्ती, अर्धा घोडा वगैरेचं एकत्रीकरण केलेलं असतं. कधी कधी त्याला पक्ष्य़ाचे अवयव असतात. त्याला वाघाचे सुंदर शरीर असतं. पण सिंहाचं डोकं, हत्तीचे सुळे आणि सापाची शेपूट वगैरे! हे जनावर मगरीच्या पाठीवर उभं राहिलेलंसुद्धा दाखवलं गेलंय. दाक्षिणात्य स्थापत्य शास्त्रात ते आढळतं आणि विजयनगराच्या कालखंडात म्हणजे 16व्या शतकात अनेक मंदिरात या विचित्र प्राण्याने खांबाचं रूप घेतलं. या विरुपाक्ष मंदिराच्या मंडपात या प्राण्यावर योद्धा स्वार झालेलाही दाखवलाय. त्या काळातल्या कलावंताची कल्पनेची भरारी केव्हाही मोठी होती हे जाणवतं. या मंडपाच्या छतावर रंगीत पेंटिंग्ज आहेत. त्या चित्रांमध्ये शंकर-पार्वती, राम-सीतेचं लग्न दाखवलंय. राक्षसांवर रथातून शरसंधान करणारा शंकर आहे. ध्यानस्थ शंकरावर बाण सोडू पाहणारा कामदेव आहे. इथे विद्या नारायणाचंही चित्र आहे. ज्या हरिहर- बुक्कांनी विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांचे हे गुरू. त्यांना पालखीतून सैनिक घेऊन येतायत असं दाखवलंय. पण त्या चित्रात जे दिसतं त्यामुळे जाणवतं की काही मूळ चित्रं तशीच ठेवून त्याची डागडुजी ब्रिटिशांनी केलीय. कारण त्या विद्याचरणाच्या चित्रात जे सैनिक दाखवले आहेत त्यांचे कपडे आणि त्यांच्या हातातल्या बंदुका दर्शवितात की हे चित्र 19व्या शतकातलं आहे. कारण विजयनगरच्या साम्राज्याच्या वेळी बंदुका कुठे होत्या? इथेच बायबलमध्ये छोटे एंजल्स पाहायला मिळतात. किंचित चुका करून किंवा त्यांची संस्कृती त्यात मिठासारखी मिसळून जरी कुणाला हे भग्नावस्थेत जाऊ शकणाऱया मंदिराचं पुनरुज्जीवन करावंसं वाटलं असेल तर ते कौतुकच आहे. त्यामागे कुठलाही धार्मिक व्यभिचार करण्याचा प्रयत्न नाही. तरीही त्या काळातल्या अति धार्मिकांनी हे मंदिर वाळीत टाकायचं ठरवलं होतं. पण इतरांचं शहाणपण जागृत होतं.
मध्य युगाचा विचार केला तर संस्कृती कुठलीही असो म्हणजे ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू किंवा हिंदू, चर्च, मशीद, मंदिरात जी जी कला सादर झालीय. मग ती शिल्पाच्या रूपात असो, पेंटिंग्जच्या किंवा मूर्तिकलेच्या. त्या त्या संस्कृतीतल्या पुराणाचा त्यावर प्रभाव दिसतो. त्याबरोबर त्या काळातलं समाजजीवन, सण-पोशाखापासून त्यांच्या शारीरिक संबंधांपर्यंतच्या सर्व बाबी जाणता येतात. ही शिल्पं ही चित्रं, त्या मूर्ती या त्या काळातल्या समाजजीवनाची आणि राजकीय घडामोडींची माहिती पुरवणारी लायब्ररी आहे. फक्त ही असंख्य पुस्तकं आपल्याला वाचता यायला हवी. मला ही पुस्तकं वाचायला आवडतात म्हणून मी जातो. आणि केवळ हौस म्हणून तुम्हाला मोठय़ाने वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मनात एक सुप्त इच्छा असते की या वाचनाची गोडी तुम्हालाही वाटावी.

- द्वारकानाथ संझगिरी


मी मध्यंतरी सोलापूरहून हंपीला जाऊन आलो. ‘हंपी’ म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याचं थडगे. आहे ती जागा! इंग्लिशमध्ये त्याला रुईन्स (Ruins) असं म्हणतात. मराठी किंवा हिंदीत त्याचं भाषांतर खंडहर असं होतं.
मी युरोपात अशी खंडहर पाहिली आहेत. हंपीबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. शेवटी योग आला. मला इतिहास, आर्किऑलॉजी (पुरातत्त्वशास्त्र) जुनी संस्कृती, त्यावेळचं स्थापत्यशास्त्र्ा, समाजाची प्रगल्भता यात रस आहे. या सर्व गोष्टींचा मी एक प्राथमिक शाळेतला विद्यार्थी आहे. ज्याला त्यात रस नाही त्याला त्यात उद्ध्वस्त देवळं, वास्तू, मूर्ती, दगड दिसतील. त्याने तिथे जाऊ नये. ज्यांना आवड आहे, त्याच्याशीच या वास्तू, ते दगड, त्या मूर्ती बोलतात. तुमचा कल्पनेचा तिसरा डोळा उघडला तर त्या वास्तूचं, मूर्तीचं जुनं वैभव दिसू लागतं. या जागेला रामायणात मोठा संदर्भ आहे. नुसता लँडस्केपच नयनरम्य आहे. लाल, राखाडी दगड. वेगवेगळ्या आकाराचे! गोलमटोल दगडांनी दगडी टोपी घातली आहे असं काही वेळा वाटतं. जमीन मस्त विसावलेली, स्थिर (Stable)आहे. जे वेगवेगळ्या आकाराचे दगड दिसतात ती भूकंपाची किमया नाही, पण तीस लाख वर्षे सूर्य, वारा आणि पावसाने दगडांवर केलेली ती कारागीरी आहे. ते दगड गोलमटोल झाले. दगडावर दगड असे उभे आहेत की, कुठल्याही क्षणी घरंगळत खाली येतील असं वाटते, पण शतकानुशतकं ते उभे आहेत.
विजयनगरच्या उभारणीत या दगडांनी खूप भार वाहिला. त्या काळातल्या कारागीरांनी दगडात भोकं केली. त्यात लाकडाचे तुकडे टाकले, ते भिजवले. भिजवल्यावर लाकूड प्रसरण पावले. त्याने दगडात भेगा तयार केल्या आणि मग ते तोडले. ग्रॅनाईटवर त्या जखमांच्या खुणा आजही दिसतात. तुंगभद्रा नदी ही त्यांच्या जीवनाचा स्रोत आहे. ‘जीवन’ या शब्दाचा कोणताही अर्थ घ्या. तिथले दोन पर्वत महत्त्वाचे – एक मातंग डोंगर, दुसरा अंजेनाद्री. एक 115 मीटर उंच आहे, दुसरा 140 मीटर. रामायणातला किष्किंधा प्रदेश म्हणजे हंपी असं मानलं जातं. हाच हनुमान, सुग्रीव, वाली वगैरे वानरांचा प्रदेश. इथे झुंडीच्या झुंडी माकडांच्या दिसतात. अर्थात हे काय मारुतीच्या वास्तव्याचं प्रूफ नव्हे. असं म्हटलं जातं की, हाच तो अंजेनाद्री पर्वत जिथे हनुमानाचा जन्म झाला आणि सूर्याकडे झेप घेतली आणि जणू सूर्य स्वतःचं रक्षण करू शकत नव्हता म्हणून इंद्राने वज्र फेकलं. वालीच्या भयाने मातंग डोंगरात सुग्रीव लपला होता. रावणाने जेव्हा सीतेला पळवलं तेव्हा तो आकाशमार्गे इथून गेला. इथे सीतेने टाकलेला एक अलंकार सुग्रीवने झेलला. इथेच रामाने वालीचा – त्या काळाचा संदर्भ घेतला तर काहीसा अधर्माने – ‘वध’ केला. आता गोल दगडाशिवाय काही दिसत नाही. गाईड ते डोंगर लांबून दाखवतो. आपण एका दगडावर बसून रामायण डोळ्यांसमोर आणायचे. हे जे काल्पनिक रमणं असतं ना, ते मला प्रचंड आवडतं. माझ्या डोळ्यांसमोर राम-लक्ष्मण आले. सीतेला घेऊन पळणारा रावण, आकाशी झेप घेणारे हनुमान आले. माझ्या लहानपणी मी बाबूभाई मिस्त्र्ााrचे अनेक चित्रपट पाहिले होते. ते हिंदुस्थानी पुराणावर चित्रपट काढत. त्यांचा ट्रिक फोटोग्राफीत हातखंडा होता. त्यांचे रामायण, महाभारतासारखे चित्रपट मी कोळून प्यालो आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गेलो की, त्यातले ते ट्रिक शॉटस् डोळ्यांसमोर येतात. मग मला प्रदीप कुमारमध्ये राम दिसतो किंवा पद्मिनीत सीता.
पण जर हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं असेल तर काळजी करू नका. तिथे एक ‘हजारा राममंदिर’ आहे. म्हणजे हजार रामाचं देऊळ. ते मंदिर म्हणजे रामायणाचा रिफ्रेशर कोर्स आहे. नाव ‘हजारा’ का दिलंय हे ना गाईड मला सांगू शकला, ना हंपीवरचं एक उत्तम पुस्तक, जे मला रिसर्चला मदत करतं. गाईडचं म्हणणं होतं की, बोलीभाषेत आपण हजार वेळा सांगितलं असं म्हणतो ना, तसं हजार राम तिथे आहेत वगैरे. बोली माहितीतून ते हजारा राममंदिर झालं असेल, पण त्या मंदिरावर रामचरित्र कोरलंय. रामचरित्रातले चक्क एकशे आठ प्रसंग ग्रॅनाईट दगडात चितारले आहेत. ते पाहताना छिन्नीच्या घावातून दगड काय सुंदर कलेचं रूप घेतो हे आपल्याला अचंबित करतं. विजयनगर साम्राज्याच्या पहिल्या देवरायाने हे मंदिर पंधराव्या शतकात बांधलं. ते राजमंदिर होतं.
या मंदिराच्या वेशीवरच्या बांधावर वसंतोत्सवातल्या मिरवणुकीची चित्रं कोरलेली आहेत. त्यात हत्ती आहेत, घोडे आहेत, सैनिक आहेत, चौघडे वाजवणाऱया आणि नाचणाऱया स्त्र्ाया आहेत. विविध ‘जलखेळ’ त्या काळी कसे असत याची कल्पना येते आणि हत्तीघोडे सांभाळणारे मुसलमान नोकर-चाकरही त्यात दिसतात. राजा हिंदू होता, पण सहिष्णू होता हे त्यातून जाणवलं. ही मिरवणूक राजाच्या सिंहासनाकडे कूच करतेय हे ते शिल्प पाहताना कळतं. बऱयाचदा शिल्प जिवंत झाल्याची भावना होते आणि ती शिल्पं जर नीट चाणाक्ष नजरेने पाहिली तर दोन माणसं किंवा दोन जनावरं सारखे दिसत नाहीत. कारण निसर्गात तशी दिसत नाहीत. ती शिल्पं खरीखुरी वाटण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे.
देवळात एक छोटा शिलालेख आहे. त्यात म्हटलंय “देवरायाचं पाम्पादैवी संरक्षण करते.’’ पाम्पादेवी म्हणजे पार्वती. त्याबद्दल पुढच्या वेळी सांगेन, पण देवळाच्या भिंतीवर जे रामायण चितारलंय त्यात वाल्मीकी रामकथा सांगतायतपासून सुरुवात आहे. मग श्रावणबाळाची कथा, दशरथाला दिलेला शाप, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञपासून रामाच्या राज्याभिषेकापर्यंत सर्व काही आहे. काय काय आहे? रावणाचं साधूतून राक्षसात होणारं रूपांतर, हवेतून जाणारा त्याचा रथ, हनुमानाची समुद्रावरची उडी वगैरे. किती वर्षानुवर्षे रामायण आपल्यापर्यंत झिरपत आलंय ते कळतं. ते खरं की खोटं, इतिहास की पुराण हा वाद बाजूला ठेवा. त्याकडे नुसतं एक महाकाव्य, कादंबरी, वाल्मीकीच्या कल्पनेचा आविष्कार म्हणून पाहिलं तरी त्याची भव्यता, त्याची आपल्यावरची चिरंजीव मोहिनी जाणवते. आमची पुस्तकं वर्षानंतर शिळी होतात. हे हजारो वर्षे टिकलंय आणि टिकेल. त्या मंदिरात पूजा होत नाही. कारण मुस्लिम आक्रमणात तिथल्या मूर्ती भंगल्या आहेत, पण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. फक्त धार्मिक नाही. तो नीट जतन करून ठेवायला हवा. सुदैवाने हंपीने युनेस्कोमान्य जागतिक स्थळांच्या यादीत येतो म्हणून बऱयापैकी सुस्थितीत आहे. हे असे वारसे जपणं हे नवं काही उभारण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. इतकं ते काम मोठं आहे.

- द्वारकानाथ संझगिरी









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...