
गेले दोन वर्ष लिहिते लिहिते म्हणत होते पण काही ना काही कारणांनी ते राहून जात होतं. आज मात्र ठरवून लिहायला घेतलं आहे. डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा अनिकेत दहावीला होता तेव्हा त्याला पन्हाळा बघायचा म्हणून गेलो होतो आम्ही. नृसिंहवाडीला देवदर्शन ,खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बघुन आम्ही पन्हाळ्यावर गेलो.
पन्हाळा म्हटलं तरी अंगात वीरश्री संचारते माझ्या. पन्हाळा म्हणजे स्वराज्याचा जणू मानाचा तुराच! एकदा खुद्द छत्रपतींच्या पन्हाळा घेण्याच्या प्रयत्नात त्यांच्या १००० मावळ्यांचे बलिदान झालेले असल्याने, शिवाजी महाराज सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यात अडकुन पडलेले, तिथून निसटून स्वराज्याचा फास सोडवणारे, पुन्हा पन्हाळा स्वराज्यात परतला तेव्हा शिवरायांवर सोनफुलं उधळली होती, संभाजी महाराजांना कैदेत रहावे लागल्याने, महाराणी ताराबाईच्या वास्तव्याने भारलेल्या वातावरणाने असा तो प्रचंड गड …पन्हाळा. शिलाहार भोज दुसरा राजाने बांधलेला तो पन्हाळा! दुर्ग पन्हाळा! इथल्या मातीच्या कणाकणात शिवप्रभू बाळगणारा तो पन्हाळा!
अशा मंतरलेल्या अवस्थेतच आम्ही पन्हाळा घाट पार केला आणि गाईड कुठे भेटतील असे विचारले. बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ तीनेक जण उभे होते. अहोंनी गाईड निश्चित केला. जसे माझे त्या व्यक्तीकडे लक्ष गेले तसेच माझा हिरमोड झाला.
त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वात कुठेही उत्साह नव्हता…एकदम सप्पक बोलणं. पहिल्या दोन वाक्यातच त्यांचा शिवप्रभुंविषयी जिव्हाळा संपलेला. इतिहासाविषयी कसलीही आस्था नाही, जी काही थोडीफार माहिती देत होते त्यात कसलीही उर्जा नाही, आत्मविश्वास कुठे राहतो ह्याचा पत्ता नाही. मन खट्टूच झाले माझे.
त्यांच्यापेक्षा तर मलाच कितीतरी अधिक माहिती होती. फक्त स्थान माहिती नव्हते. जिथुन शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले ती जागा खर तर कशी जोशात सांगायला पाहिजे ! सिद्दीच्या वेढ्याचे वर्णन कसे हवे? येणाऱ्या पिढीला इतिहास कळावा तर तो सांगता यायचे कसब पाहिजे. या गाईडने नुसता सोपस्कार पार पाडला.
माझं मन निराश झालं. सज्जा कोठडी, नायकिणीचा वाडा, सध्या बंद असलेलं शिवाजी महाराजांचं मंदिर, दुसऱ्या संभाजी छत्रपतींचे मंदिर, धान्यकोठार, तीन दरवाजा असे थोडेसे पॉइंट्स दाखवून ते महाभाग आम्हाला सोडून गेलेत.
एकतर सगळा पन्हाळा गड नगरपरिषद आहे. आधुनिक बांधकामं चालू आहेत, ठिकठिकाणी हॉटेल्स ,बंगले बांधलेले आहेत. तसंही तिथे ऐतिहासिक वाटावं असं फारसं काही उरलेलं नाही. त्यात ह्या गाईडने माझा अगदीच भ्रमनिरास केला.
अनिकेतला मी सांगू शकते किंवा तो अगदी ३ वर्षांचा असल्यापासून शिवचरित्र सांगितल्याने त्याला माहिती आहे .पण सगळ्यांना कसे कळणार? अशा गाईडला ना इतिहासाची माहिती आहे ना काही अभ्यास. मग त्यांनी ज्यांना ज्यांना पन्हाळा दाखवला असेल त्यांचे काय? असो.
त्याच दिवशी मंगळ,शुक्र आणि चंद्र ह्यांची पिधान युती होती. श्रीपादने फोन केला तेव्हा आम्ही ते दृश्य पाहून घेतलं.
आम्ही बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पुतळ्याजवळच मुक्काम ठोकला एका होम stay मध्ये. रात्री जेवायला बाहेर पडलो तर पोवाड्यांचे आवाज येऊ लागले, डफाचा ताल आम्हाला तिकडे घेऊन गेला. तीन दरवाजा भागात कॉलेजची मुले बसली होती आणि समोर शिवचरित्र आख्यान चालू होतं. सगळ्यांच्या जोशाला उधान आलेलं होतं. तो शिवपादस्पर्श दिन होता. म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्यावर जेव्हा पन्हाळ्यावर आले तो दिवस. आम्ही नशीबवान . तो सगळा सोहळा आम्ही पाहू शकलो. अनिकेतने एक वेगळं विश्व अनुभवलं.

थंडी बरीच होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी थोडे उशिराच उठलो. ज्यांच्याकडे राहिलो त्या काकूंनी पावन खिंड का पहात नाही ? तिकडे जा, असं सांगितलं. पण काल मला पन्हाळा बघितल्याचे समाधान झालेले नसल्याने आम्ही सकाळीच पन्हाळा दर्शन घ्यायला गेलो. इतिहासात रमायला, शिवप्रभुंसोबत जगायला मला खूप आवडतं, शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे आपण किती ऋणी आहोत, आपला प्रत्येक श्वास महाराजांना धन्यवाद देत घ्यावा इतकं मोठं कार्य आहे त्यांचं. तिथे जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटतं मला. काल त्या गाईडने मला सोमेश्वर पण दाखवला नव्हता. इतका जिवंत इतिहास त्याने पार गुंडाळुन टाकला. इतका राग खदखदत होता माझ्या मनात.
अफजलखानाचा वध केल्यावर महाराजांनी जो स्वराज्य विस्तार केला त्यात महाराजांनी प्रथम पन्हाळा घेतला. महाराज गडावर आले तेव्हा अंधार पडला होता. पण राज्यांनी रात्रीच तो गड बघितला, इतके महाराज उत्साहित होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी तलावाच्या काठी असलेल्या श्री. सोमेश्वर मंदिरात महादेवाला एक लाख सोन चाफ्याची फुले वाहिली होती.


त्या देवालयात गेल्यावर मला किती किती आनंद झाला असेल मी नाहीच सांगू शकत. ज्या ठिकाणी बसून श्री. शिवछत्रपतींनी फुले वाहिली, पूजा केली, शिर टेकवले त्या पावन झालेल्या जागेला मी स्पर्श करू शकले ह्यातच ह्या जन्माचे कल्याण झाले माझ्या. त्या छोटूश्या गाभाऱ्यात मानस पूजा म्हटली, अर्धातास निव्वळ शांततेत बसून तो शिवाजी महाराजांचा फुले वाहतानाचा प्रसंग मनोमन अनुभवला आणि तिथून निघालो. आता गड उतरून पावन खिंड गाठायची होती.
अनिकेतला मी सतत शिवचरित्र सांगत असते. तो तिसरीत असताना त्याला श्रीपादने पन्हाळा ते विशाळगडाचा प्रसंग सांगितला आहे. त्याच्या मनावर तो प्रसंग कायम उमटला आहे. त्यात चौथीत असताना त्याच्या नागे teacher ने पण शिवचरित्र उत्तम शिकवले आहे.
त्यातही पावनखिंडीत झालेली लढाई ऐकताना अनिकेत खूप रमायचा. मग आता तर प्रत्यक्ष पावनखिंड बघायची असल्याने तो खूप खुश होता. त्याचा वारु उधळला होता नुसता. आम्ही पन्हाळा दुसऱ्या बाजूने उतरलो. काय विस्तार आहे गडाचा …बाप रे!
इतका अवाढव्य गड आणि त्याला सिद्दीने पहारे कसे बसवले असतील ह्याचा विचारच करवत नाही. पावनखिंड फाट्यावरून आत गेलो. गाडी पार्क केली आणि निघालो. गेल्या खेपेस विशाळगड पाहिलाच होता आम्ही. पण तिथले एकंदरीत वातावरण पाहून मन दुखावले होते. आता शिवाजीमहाराज कसे गेले असतील त्या खिंडीतून…आम्हाला तर खिंड उतरावी लागली…तिथे एक छोटी नदी आहे. त्या पाण्यातून, गर्द झाडीतून जावे लागते.
निरव शांतता होती तिथे फक्त पाण्याचा आवाज आणि आम्ही तिघेच. माझे मन ती लढाई शोधत होते, कुठे असतील गनीम, बांदल सेना, बाजीप्रभू,फुलाजीप्रभू ह्यांनी कुठल्या पद्धतीने ही लढई लढली असेल असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते, भावना उचंबळून आलेल्या, कंठ दाटला , छाती भरून आली, अंगाला थरथर सुटली आणि त्या थोर लोकांच्या पायी आपले मस्तक वाहिले तरी कमी पडेल असे वाटू लागले.
माझी ही मनस्थिती तर अनिकेत अजून दूरपर्यंत जातो आहे. खिंडीत अजून काही वेळ थांबू म्हणतो आहे, तोपण त्या वीरश्रीने भारावून गेला आहे. इतक्यात एक खेड्यातल्या लोकांचा ग्रुप आला. खुपशा बायाबापड्या, तरुण मुलं मुली असे सगळे. जसं पाणी दिसलं तसं त्याचं हातपाय धुणे, मस्ती करणे सुरू झालं.फोटो सेशन पण सुरूच. आता तिथे जर महाराज असते तर ह्या सगळ्यांची काय गत झाली असती!
कुठे ती पवित्रता आणि कुठे हा गोंगाट! असो. मी निघण्याची घाई केली आणि अनिकेतने तिथून दोन दगड घेतलेत. मला म्हणाला तो की त्या वीर योद्ध्यांचे पाय लागलेत आई ह्या ठिकाणी. त्यांचे रक्त सांडले इथे ,ती आठवण म्हणून आपण घेऊ या. माझ्या डोळ्यात पाणीच आले. उर अभिमानाने आणि कौतुकाने भरून आला. बाजीप्रभूपण किंचित कौतुकाने हसले असावेत असे भासले मला.
त्या सगळ्या भारलेल्या अवस्थेतच अनिकेतने त्याच्या teacher ला फोन केला तिथूनच.आम्ही परतीचा प्रवास अगदी मौनात केला. तिथले ते छोटे दगड आज ही माझ्या तुळशीत ठेवलेत. आणि रोज त्यांचे दर्शन घेते मी!

©अनुराधा
पन्हाळा
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा
हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव
आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. पन्हाळगड हा
कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील
म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात
मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला.
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.