शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे यांनी शतकी वर्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील सामान्य
जनतेची ,इतिहासाकडे पाहण्याची नजर घडवण्यात (किंवा आधीची नजर पक्की
करण्यात) त्यांचा काही एक वाटा नक्कीच आहे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणी
घरातील मुलाचे त्यांच्या शिवचरित्राविषयीचे आधीचे भारलेपण आणि नंतर त्याला
पडत गेलेले प्रश्न.......

लहानपणी मी आजोळी गेलो कि रात्री झोपताना मला आजी, डोक्यावर थोपटत
थोपटत, "शिवाजीच्या गोष्टी" सांगायची. ती सांगलीच्या चिमड संप्रदायांच्या
संतश्रेष्ठ गोविंदराव (मामा) केळकरांची अनुग्रहित होती.( स्वतः कै.
गोविंदराव (मामा) केळकर साक्षात शांतीब्रह्म होते). त्यामुळे तिच्या
गोष्टीत लढाया वगैरे फारसे नसायचे तर शिवाजी महाराज शंकराचा अवतार कसे
होते, लाडक्या शिवबाचा अहंकार समर्थांनी कसा दगडातील बेडकी दाखवून नष्ट
केला. महाराज तुकोबांकडे गेले असता पांडुरंगाने अनेक शिवाजी निर्माण करून
त्यांना कस सुखरूप ठेवल, तुकोबांनी दागदागिने कसे परत पाठवले असल्या भन्नाट
गोष्टी असायच्या. तेंव्हापासून शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी स्पेशल
आयकोन झाले होते.
नंतर आजीच्या गोष्टीतले चमत्कार रम्य असले तरी
असं घडू शकेल का वगैरे किडे चावायला सुरवात झाली. सांगलीच्या ताम्हणकर बुक
डेपो मधून शिवाजी महाराजांची छोटी पुस्तके आणून वाचणे वगैरे चालू होत.
अश्यावेळी इतिहासात एमे केलेला , माझ्या आईचा मामा, शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे नावाच्या व्यक्तीबद्दल झपाटून बोलायचा. माझे कोंग्रेसी आजोबा, मामा
त्याची चेष्टा करायचे. (तुझा शिवाजी शाखेतला शिवाजी आहे हे पेटंट वाक्य,
पुरंदर्यांच्या तिथी तारखा सांगून समोरच्याला चकित करण्याची नक्कल वगैरे)
मग पुरंदरे सांगलीत आले कि शेजारच्या घारपुर्यांकडेच राहतात, त्यांच्या
कडे त्यांची सगळी पुस्तके आहेत हे कळल आणि घारपुरे काकुनी कौतुकाने त्याचं
महाराज हे पुस्तक वाचायला दिल, त्यातली चित्रे आणि खाली थोडा थोडा मजकूर
अशा स्वरूपाचे लेखन सोलिड भारी वाटल.
पुढे
६-७ वीत गेल्यावर पुरंदर्यांचे "राजा शिवछत्रपती" वाचल. इचलकरंजीत त्यांची
व्याख्यानमाला ऐकली आणि त्या वयात झपाटून गेलो. त्यातले भाषेचे अनंतदेखणे
सोहळे, शिवाजी महाराजांचे दैवी भव्य रूप, लढाया, समस्त खान लोकांची केलेली
चेष्टा वगैरे सोलिड आवडायचं. शाळेत off तासाला, घरी पाहुणे आले कि आमच्या
पुरंदरे स्टैलने सादर केलेल्या शिवचरित्राचे कार्यक्रम सुपरहिट जायचे. असच
एकदा पाहुण्यांकडे गेलो असताना माझ भाषण ऐकून त्यांनी मला कौतुकाने दुसरे
एक ( बहुदा दि वी काळे यांचे) शिवचरित्र दिलेले आठवते. एकंदर ती वर्षे
पुरंदरे नावाच्या कवीने मांडलेल्या चमत्कारविरहित शिवचरित्राने रंगीत करून
सोडली होती.
पुढे त्यांच्याबरोबर पुलं हे आमचे आणखी एक वाढीव "बुवा"
झाले. पुलंनी शिक्का मारला कि तो माणूस मोठा. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे
यांच्यावरचा लेख वाचल्यावर पुरंदरे म्हणजे लास्ट वर्ड ओंन शिवाजी अस ठरवून
टाकल.
या भक्तीला पहिल्यांदा किंचित तडा गेला तो कुरुंदकर यांची
"श्रीमान योगी"ची प्रस्तावना वाचताना. कुरुंदकर सांगतायत यातल फारसं काही
पुरंदरे सांगत नाहीत बाबासाहेबांच्या शिवाजीपेक्षा त्यांचा शिवाजी जास्त
भव्य वाटतो अस वाटायला लागल. (कुरुंदकर यांनी पण काही ढिसाळ विधाने
केलीयेत, हे नंतर लक्षात आले)
पुढे शिक्षण व्यवसाय वगैरे मागे लागल्याने सलग आणि elegant
history म्हणता येईल अस काही वाचल नाही तरी वर्तमानपत्री लेख, सदानंद मोरे
याचं लिखाण, यातून महाराष्ट्रातील ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद, संघप्रणीत
हिंदुत्ववाद वगैरे थोड थोडे समजत गेले आणि इथला पॉप्युलर इतिहास या दोन
अक्षांभोवती कसा फिरतो हे कळत गेले. बहुतेक लोकप्रिय इतिहास (सन्माननीय
अपवाद असतीलही) हा ब्राह्मण किंवा मराठा या दोन सत्ताधीशांचा उदो उदो करणे
किंवा ब्राह्मण आणि मुस्लिमांना खलनायक ठरवणे याभोवती फिरतो. हा आजच्या
राजकारणाला सोयीचा इतिहास आहे. हेही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर ५
वर्षापूर्वी पुन्हा राजा शिवछत्रपती जेव्हा जमेल तसं वाचल तेंव्हा मात्र
हळूहळू अपेक्षाभंग होत गेला. पुरंदरे पण या राजकारणाचे वाहक आहेत किंवा
महाराष्ट्रात हे राजकारण शेप करण्यात त्यांच्या शिवचरित्राचा काही वाटा आहे
अशी शंका येऊ लागली. सीबीटी (cognitive behavior therapy) वाचल्यामुळे
त्यांच्या लिखाणातल्या दृष्टीकोनाच्या, चुका लक्षात येऊ लागल्या.
एकतर भारतीय इतिहासात कुठलाही काल हा सहसा
संपूर्ण काळा किंवा पांढरा नसतो. पण पुरंदरे यांनी पहिल्या शिवपूर्वकालीन
काळ रंगवताना त्या काळाचे फार सिम्प्लीस्टिक रूप उभे केलय. खिलजी यायच्या
पूर्वी यादवांचा महाराष्ट्र म्हणजे दुधातुपात नहात होता गजांत वैभवात
महाराष्ट्रलक्ष्मी वास करीत होती, खिलजीनंतर मात्र काळरात्र सुरु झाली(इथे
झाडावर बसलेल्या गिधाड, घुबड याचं चित्र पाहिलेलं मला आठवत) अस अतिशयोक्त
black and white वर्णन त्यांनी केलंय. स्वतःच्या चुलतभावाला दग्याफटक्याने
पकडून त्याचे डोळे काढून सत्तेवर आलेला रामदेवराव मुस्लीम सुल्तानांपेक्षा
कुठे उजवा आहे? खिलजी येतोय हे कळून पण आपल्या मुलाला सैन्य घेऊन कोकणात
कदंबंविरुद्ध लढायला पाठवणारा, कोठारात धान्याऐवजी मीठ भरलंय हे शेवटपर्यंत
न समजणारा राजा कितपत प्रजाहितदक्ष असेल? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजात
काहीतरी सडले कुजले असेल तेंव्हा जन्माला येतो अस मानल तर, पुरंदर्यांच्या
वर्णनात हे सडले कुजलेपण का उमटत नाही? मुस्लीम सत्ता सरसकट धर्मवेडाने
पेटल्या होत्या तर २०० वर्षात ४-५ मुस्लीम सत्ता इथे असून अक्खा महाराष्ट्र
मुस्लीम का झाला नाही? आदिलशहा निजामशहा धर्मप्रसार हे प्रधान कर्तव्य
मानीत होते तर त्यांनी मराठा सरदारांचा उदय कसा होऊ दिला? संपूर्ण महसूल
व्यवस्था देशपांडे-कुलकर्णी-पाटील-देशमुख या हिंदूंकडे कशी राहू दिले?
इस्लामला थ्रेट ठरू शकेल अशी पंढरीची वारी शेकडो वर्षे (काही वर्षाचा अपवाद
असेल कदाचित) कशी सुरु राहिली? अश्या कुठल्याही प्रश्नच उत्तर पुरंदरे
शोधत नाहीत किंबहुना असे प्रश्न त्यांना पडले कि नाही हे पण निश्चित सांगता
येणार नाही.



पुलं "पुरंदरे शिवाजीला दैवी अवतार मानत नाहीत तर महापुरुष मानतात"
अश्या अर्थाचं विधान करतात. ह्यातही फारस तथ्य नाही. "पुत्र महाराष्ट्राला
झाला, सह्याद्रीला झाला, (आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्यें
कडाडूं लागलीं. संबळ झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यांत सनई
चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रशः दणाणूं लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी
सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा! तो दिवस कौस्तुभाचा,
अमृताचा! छेः हो, छेः छेः छेः! त्या दिवसाला उपमाच नाही! शुभ ग्रह, शुभ
नक्षत्रें, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे-तो शुभ क्षण
गाठण्यासाठीच गेलीं तीनशे वर्षें शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होतीं!)
ह्या वर्णनात पुरंदर्यांच्या, शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते ह्या
धारणा दिसत नाहीत का? ते काव्यात्मक वर्णन आहे या बचावाला अर्थ नाही. बर मी
"इतिहास नाही तर चरित्र लिहिलंय", हि सबब फारशी समाधानकारक नाही.
समाजाच्या अभ्यासाचा आधार घेत उत्तम चरित्र/fiction लिहिता येऊ शकत नाही अस
का म्हणावं?
पुरंदर्यानी शिवकालाचा उदोउदो करताना पण फारशी चौकस वृत्ती ठेवली आहे असे
मला वाटत नाही. शिवाजी महाराजांनी वतनदार लोकांचा धोका ओळखला होता हे खरच
पण कर गोळा करायला त्यांच्याजवळ तरी पर्यायी यंत्रणा सुरुवातीच्या काळात
होती का? त्यामुळे महाराजांनी नवीन वतनदार निर्माण केले नाहीत, त्यांना
आडवे गेलेले वठणीवर आणले, त्यांच्याबरोबर राहिलेले सांभाळून घेतले हे आणि
एवढेच वास्तव आहे. हे वतनदार किती पद्धतीने गावगाड्यात रुजले होते (Stewart
Gorden ने यासाठी nested inerests अशी चपखल संज्ञा वापरली आहे) हे पाहिले
तरी वतनदारी पूर्ण उखडणे हे नवीन राजाच्या आवाक्याबाहेरचे काम होते. तेच
गनिमी काव्याबद्दल. त्याचा इतका उदोउदो त्यांनी आणि इतर लोकांनी केलाय कि
पुढे पेशवे काळात त्या पद्धतीने पेशवे लढले नाहीत हा जणू मूर्खपणा, गंभीर
पाप वाटावा.
ललित चरित्रात या सार्याचा उहापोह असावा अशी अपेक्षा नाही पण या गोष्टी
लक्षात घेतल्या असत्या, त्यांचे प्रतिबिंब लेखनात पडले असते तर हे चरित्र
कदाचित जास्त वास्तववादी झाले नसते का?
या पुस्तकातील दलालांची चित्रे हि पण कुतूहलजन्य आहेत. त्यांनी
रंगवलेले हबशी, इराणी, तुर्की मुस्लीम सरदार सगळे एका छापाचे आहेत.
त्यांच्यात कुठेच फरक दिसत नाही. हे सपाटीकरण पुस्तकाच्या मुळ नरेटिव्हला
धरून आहे. "अक्कल वाटताना मुघल कुठे गेले होते" या वाक्यातून विनोद
निर्मिती होत असली तरी सत्याचे दर्शन घडते असे मला वाटत नाही. पुरंदरे
यांनी सनावळ्यात अडकून पडलेला इतिहास प्रवाही केला हे खर पण तो प्रवाह
त्यांनी कोणाच्या अंगणात जाईल अशा पद्धतीने वळवला हेही महत्वाचे आहेच.
बाबासाहेबांच शिवचरित्र जसं लोकप्रिय
होत गेलं तसे त्याला शह देण्यासाठी इतर शिवचरीत्रे आली किंवा तुकारामांचा
खून झाला अश्या ना शेंडा बुडखा पद्धतीचा इतिहास आला . पुरोगामी महाराष्ट्र
जात, धर्म यांच्या चिखलात अजुनी आनंदाने डुंबू लागला.
आज मी राजा
शिवछत्रपती वाचले तर त्यातल्या वैभवशाली भाषेसाठी, रसांच्या आस्वादासाठी
वाचेन पण त्याला इतिहास किंवा सत्य इतिहास म्हणावे का याबद्दल मला शंका
वाटत राहील
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.