Ranganathaswamy Temple Srirangam-श्रीरंगमचा रंगनाथस्वामी

Interesting Story of Largest Temple of India – The Ranganathaswamy Temple Srirangam
India’s
Largest Temple and World’s Largest Hindu Temple in Worship. The
Ranganathaswamy Temple spans an area of 156 acres in Srirangam, north of
the city of Tiruchirappalli in the State of Tamilnadu. The Temple
consists of 7 concentric rectangular Enclosures with the enclosing walls
(Prakaras) having Gopuras at the centre of each wall. The Main entrance
is from the South Side which is explained by a Local Legend, which
takes us back to Ramayana period and has been attributed to Ravana’s
brother Bibhishana, whose image is seen on a column depicting the story.

Out of 7 enclosures, the outer 3 enclosures are fully populated and are inhabited by various residents and shopkeepers like a village. The outermost enclosure has a Gopura of 236 feet, which is the Highest Gopura in the world and hence called Rajagopuram. The Story related to this Gopuram & the Temple is narrated here in MARATHI (मराठी)
भारतातील सर्वात मोठ्या पूजित मंदिराची अजब कहाणी
रंगनाथस्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या त्रिचनापल्ली येथील विष्णुमंदिर. सुमारे १५६ एकर चा विस्तार असलेले हे प्रचंड मंदिर भारतातील नव्हे तर जगातले, पूजेत असलेले, सर्वात मोठे मंदिर आहे(अंगकोर वाट यापेक्षा मोठे आहे पण हिंदू पुजेचे मंदिर नाही). या मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. सर्वसाधारणपणे मंदिरे पूर्व , पश्चिम अथवा उत्तर मुखी असतात पण हा रंगनाथ स्वामी मात्र दक्षिणेकडे पहात शेषावर पहुडला आहे आणि त्याची एक सुंदर कहाणी आहे.
मंदिराची दंतकथा
रावणवधानंतर
श्रीराम अयोध्येला परतले. रामाच्या राज्याभिषेकाला हनुमंतासहित बिभीषण
देखील उपस्थित होता. श्रीरामाचा वियोग आता आपल्याला होईल या विचाराने तो
अस्वस्थ झाला. तेव्हा श्रीरामांनी त्याला आपल्या ईश्वाकू वंशातील श्री
रंगनाथ स्वामींची मूर्ती दिली व ती माझा वियोग तुला जाणवू देणार नाही असेही
सांगितले, पण अट एकच, नेताना ही मूर्ती कुठेही खाली ठेवायची नाही (गोकर्ण
महाबळेश्वर कथेतील रावणाला शंकराने घातलेली अट). इथेही देवांना पुन्हा
काळजी पडली, रंगनाथ स्वामी लंकेत पोहोचले की लंकेची भरभराट होईल. स्वर्गाचे
महत्त्व कमी होईल. बिभीषणाचे ठीक आहे , पण त्याच्यानंतरचा राजा कोण असेल ?
कसा असेल ? त्यामुळे हे थांबवायला हवे. पुन्हा ही कामगिरी गणपतीकडे
सोपविण्यात आली. यावेळी बिभीषण संध्या करण्यासाठी त्रिचनापल्लीला थांबला.
गुराखी गणपतीला रंगनाथाची मूर्ती सांभाळायला दिली. गणपती म्हणाला, माझ्या
मालकाने बोलावल्यावर मी तुला ३ हाका मारेन. आलास तर ठीक नाहीतर मूर्ती
तिथेच ठेऊन मी परत जाईन. बिभीषण संध्या करायला उतरला व इकडे गणपतीने ३ वेळा
त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात हाका दिल्या, आणि रंगनाथाला तिथेच ठेऊन
निघून गेला.
बिभीषण परतला आणि पहातो तर रंगनाथ स्वामी जमिनीवर व गुराखी गायब. त्याने देवाला विनंती केली, पण देवाने सांगितले की मी इथेच थांबून तुझ्या राज्यावर नजर ठेवेन आणि म्हणून इथला रंगनाथ स्वामी दक्षिणमुखी आहे. या कहाणीशी संबंधित विमानातून रंगनाथ स्वामीला लंकेला नेणारा बिभीषण येथील खांबावर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो.
कदाचित याच कारणास्तव (रंगनाथ स्वामीचे श्रीलंकेवर लक्ष रहावे म्हणून ) दक्षिण दरवाजा कमी उंचीचा म्हणजे गोपुर नसणारा होता. पण १९७० च्या सुमारास मंदिर व्यवस्थापनाने तो मुख्य दरवाजा असल्याने वाढविण्याचा व त्यावर उंच गोपूर बांधण्याचा निर्णय घेतला व १९८७ साली हे गोपुर पूर्ण झाले.
याबरोबरचा योगायोगाचा भाग असा की हे गोपूर पूर्ण झाले आणि रंगनाथाची लंकेवरची कृपादृष्टी हटली व दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. दहशतवाद फोफावला, आर्थिक अरिष्टाच्या सावटाखाली देश आला. हे टाळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा यांनी रंगनाथस्वामीचे मंदिर श्रीलंकेतच निर्माण करायचे ठरविले होते पण त्यानाही सत्तेपासून पायउतार व्हावे लागले, आणि त्यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.
अशा या भव्य मंदिरामध्ये मोठ्ठा गरुडमंडप आहे ज्यावरील खांबांवर अनेक शिल्पकृती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत यातही कृष्ण अर्जुन, राम-लक्ष्मण-सीता-हनुमंत ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. या गरुड मंडपाच्या बरोबर समोर शेषशायी विष्णुंची मोठी मूर्ती असलेले मुख्य मंदिर आहे. काळ्या रंगाची ही पहुडलेली मूर्ती, गाभाऱ्यात असलेल्या अपुऱ्या प्रकाशामुळे, नीट निरखून पहावी लागते.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सनक म्हणजेच चार बाल ऋषी, श्रीरंगममध्ये रंगनाथाच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी रंगनाथाची विश्रांतीची वेळ असल्याने, त्यांना वैकुंठाच्या जय आणि विजय या द्वारपालकांनी रोखले. अनेकदा विनंती करूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. रागाच्या भरात चौघेही द्वारपालकांना शाप देत निघून गेले. द्वारपालकांनी विष्णूजवळ जाऊन त्याला शापाबद्दल सांगितले. रंगनाथाने सांगितले की तो शाप परत करू शकणार नाही आणि त्यांना दोन पर्याय दिले. (१) तीन जन्मांत विष्णूचा विरोध करणारे राक्षस म्हणून जन्म घ्या किंवा (२) पुढील सात जन्मांत चांगला मनुष्यजन्म घ्या. परमेश्वरासोबत परत येण्यास उत्सुक असलेल्या द्वार पालक जय विजयानी असुर योनीत जन्म घेणे आणि असे मानले जाते की त्यांनी पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू म्हणून जन्म घेतला ; दुसऱ्या वेळी रावण आणि कुंभकर्ण म्हणून ; तर तिसऱ्या वेळी शिशुपाल आणि दंतवक्र. विष्णूने प्रत्येक जन्मात या राक्षसांना मारण्यासाठी अनुक्रमे वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण असे चार अवतार धारण केले. पण प्रत्येक जन्मात त्यांच्या दुष्टपणाची तीव्रता कमी होत गेली म्हणून हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता विष्णूला दोन पूर्ण अवतार लागले तर रावण आणि कुंभकर्णाना त्याने केवळ एकाच म्हणजे रामावतारात संपविले आणि शिशुपाल व दंतवक्र तर त्याच्या अवताराच्या विरोधातील मुख्य पात्रेही नव्हती.
रंगनाथस्वामी मंदिराचा विस्तार

१५५ एकरच्या प्रचंड विस्तारात सामावलेले हे ७ कोट असलेले प्रचंड विस्तीर्ण मंदिर आहे. या सातव्या कोटाचेच गोपुर जगातील सर्वात उंच गोपुर असून २३६ फूट उंचीचे हे गोपुर २५ मार्च १९८७ मध्ये पूर्ण केले गेले, आणि आता राजागोपुरम म्हणून ओळखले जाते. ६ व्या कोटाची गोपुरे होयसळ (१३ वे शतक) व पांड्य (१४ वे शतक) यांच्या कालावधीत बांधली गेली असावीत असे त्यांच्या शैलीवरून वाटते. तर ५ व्या कोटाच्या गोपुरांवर चोला राजांचा प्रभाव जाणवतो.
याच्या बाहेरील ३ कोटांमध्ये तर आता गाव वसलेले असून इतर ४ कोट मंदिरासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
रंगनाथस्वामी मंदिराच्या इतिहासाचा आढावा
भारताच्या धार्मिक इतिहासात या वैष्णव मंदिराला अनन्यसाधारण स्थान आहे. याच्या निर्मितीचा निश्चित कालावधी सांगता येणे कठीण असले तरी ७ व्या शतकापासून ते दहाव्या शतकात चोला राजांच्या कालखंडात याच्या अस्तित्वाचे साहित्यिक पुरावे सापडतात. यानंतर ११ व्य शतकातील चोला राजांनी दिलेली दानपत्रे देखील आहेत. हिंदू धर्माचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत मांडणाऱ्या रामानुजाचार्यांचा उदय याच सुमारासचा . त्यांनी याच मंदिराला आपले स्थान बनवले होते जे आजही त्यांच्या स्मृतिवशेषांच्या स्वरूपात जपले जाते. मंदिराच्या दक्षिण द्वाराने ४ थ्या कोटात (म्हणजे सध्या मंदिराच्या सर्वात बाहेरच्या) शिरल्यावर उजव्या हाताला (पूर्वेकडे) रामानुजचार्यांची समाधी आहे. येथे त्यांचे बैठे शव गेली ९०० वर्षे जतन करुन ठेवले आहे.हा रामानुजाचार्यांचा देह असल्याचे सांगितले जाते. (आम्ही पाहिल्यावर आंम्हाला तो देह इतक्या सुस्थितीत वाटलं की तो इतक्या दीर्घकाळ टिकला असेल असे खरे वाटले नाही… असो). रामानुजाचार्यांनी अगदी काश्मीरपर्यंत प्रवास केला होता. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना चोला राजाच्या जावयाने काही कारणाने दंडित केले व त्यांना म्हैसूर च्या होयसळ राजवटीच्या आश्रयाला जावे लागले.
हे मंदिर चोल राजांच्या राजवटीत प्रथम बांधले गेले असण्याची शक्यता आहे.
आठव्या व नवव्या शतकातील तामिळ संत साहित्यात (अल्वर साहित्य) या मंदिराचा
उल्लेख येतो. पुढे दहाव्या शतकातील तामिळ साहित्यात या मंदिराचे उल्लेख
सापडतात. चोलांनी या मंदिराला देणग्या दिल्याचे उल्लेख येतात. चोल, चालुक्य
चोल, पांड्य अशा अनेक राजांच्या राजवटी श्रीरंगम वर राज्य करत असतानाच
पुढे १३११ मध्ये मलिक काफूरची वक्रदृष्टी या व आसपासच्या प्रदेशाकडे वळली
आणि त्याने या मंदिराची लूट केली. त्यामुळे येथील मूर्ती पुन्हा घडवावी
लागली. पुन्हा १३२३ मध्ये मुहंमद बिन तुघलक आला आणि त्यानेही मदुराई व
आसपासच्या प्रदेशातील लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याने तर या
मंदिरातच तळ ठोकला होता. पण त्याआधीच या मंदिरातली सर्व संपत्ती तिरुपतीला
हलविल्याने सुरक्षित राहिली.
यानंतर दक्षिणेत विजयनगर साम्राज्याचा उदय झाला आणि त्यांनी बाजी उलटविली.
मंदिराची पुनर्स्थापना केली. तिरुपतीला नेलेली मूर्ती आणि दागिने परत आणले
गेले व रंगनाथाचे वैभव त्याला परत मिळाले. त्याचे आज असलेले स्वरूप हे
मुख्यत्वेकरून विजयनगर साम्राज्यामुळे मिळाले आहे. पुढे विजयनगरचे
साम्राज्य लयास गेल्यानंतर स्थानिक नायकानी या मंदिराच्या संरक्षणत व
जडणघडणीत हातभार लावला. यानंतर श्रीरंगम वर जरी अर्कोट च्या नबाबाचे
अधिपत्य असले तरी मंदिराचा फारसा ह्रास झाला नाही. ब्रिटिश , फ्रेंच या
सत्ता देखील या सुमारास भारतात मूळ धरू लागली होत्या. त्यानंतर १७८१ च्या
सुमार हैदर अली आणि १७९० च्या सुमारास त्याच मुलगा टिपू यांनीदेखील काही
काळ श्रीरंगम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो फार काळ यशस्वी झाला
नाही. आणि पुढे १८०१ मध्ये तर श्रीरंगम ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
संदर्भ – Sri Ranganathaswami, A Temple of Vishnu in Srirangam by Jeannine Auboyer (First Edition, June 1969… Current Ninth Edition 2019)
इतर शिल्पाकृती
याच्या समोरच एक सुंदर मूर्तिकाम असणारा “शेषराया मंडप” आहे. या मंडपाच्या खांबांवर टाचा उंचावलेल्या घोड्यावर बसलेला स्वार व या घोड्याच्या टाचेखाली आलेले विविध प्राणी यांची सुंदर शिल्पे दिसून येतात. यात या प्राण्याच्या शरीरात घुसलेल्या तलवारी बारकाईने दाखविल्या आहेत. या मंडपातच बिभीषणाची वर सांगितलेली कथा आहे व तसेच मगरीच्या तावडीतून सुटणाऱ्या हनुमंताची देखील.
हनुमंत आणि कालनेमी
मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हिमालयातून संजीवनी वनस्पती रात्रभरात आणण्याची जबाबदारी हनुमंतावर सोपवली जाते. हि बातमी हेरांकरवी रावणाला कळताच त्याच्या वाटेत विघ्न आणण्याकरिता रावण आपल्या कालनेमी नावाच्या मायावी राक्षसाला त्याला आधीच वाटेत गाठून वेळकाढूपणा करावयास सांगतो. त्याप्रमाणे अनिच्छेनेच का होईना, पण कालनेमीला जावेच लागते. तो एका साधूच्या वेशात पुढे जाऊन हनुमंताच्या वाटेवर थांबतो. त्याचा फसवा रामनामाचा जप ऐकून हनुमान काही काळ विश्रांतीसाठी थांबायचे ठरवितो. त्याच्याबरोबर बोलण्यात कालनेमी वेळ काढू लागतो. हनुमंताला पाणी हवे असते तेव्हा तो त्याला शेजारच्या सरोवरावर पाठवतो. तेव्हा एक मगर हनुमंताला पकडून गिळते. पण शक्तिशाली हनुमंत तिचे पोट फाडून बाहेर येतो, तेव्हा तिचा उद्धार होऊन त्याच्या जागी एक अप्सरा प्रकट होते व ती स्वर्गलोकी जाण्यापूर्वी कालनेमीच्या हेतूबद्दल हनुमंताला अवगत करते.
हनुमंत परत येतो व कालनेमीचा वध करतो आणि पुढे आपल्या कार्याला निघून जातो आणि जेव्हा त्याला ती संजीवनी वनस्पती नेमकी समजत नाही तेव्हा अक्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन परततो. अशी ती कथा.
यापैकी साधुवेशातील कालनेमी व त्याला भेटणारा हनुमंत, मगरीच्या पोटातून बाहेर येणारा हनुमंत व त्या मगरींद्वारे प्रकट झालेली अप्सरा आणि नंतर कालनेमीला फरफटत नेणार हनुमंत या गोष्टी ३ वेगळ्या पॅनेल्स मध्ये अतिशय उत्तमप्रकारे शिल्पित केल्या आहेत.
याच शेषराया मंडपाच्या समोरचा भला मोठ्ठा १००० खांबी मंडप आहे. प्रत्यक्षात यात ९५३ खांब असल्याची माहिती मिळते. प्रत्येक वेळी येथे प्रवेश दिला जात नाही.
गरुडमंडप
याच्या पुढे आता शिरल्यावर आपल्याला एक भलीमोट्ठी गरुडमूर्ती असलेला गरुडमंडप लागतो. या मंदिराच्या गरुडमंडपात असलेली गरुडाची मूर्ती कदाचित भारतातील गरुडाची सर्वात मोठी मूर्ती असावी. याच्या बरोबर समोरच्या गाभाऱ्यात शेषशयनी रंगनाथस्वामी म्हणजेच श्रीविष्णूची २१ फूट लांब (६.४ मीटर) काळ्या दगडातील अतिशय सुंदर मूर्ती आहे. या गरुड मंडपाच्या विविध खांबांवर देखील काही सुंदर शिल्पे देखील आहेत. यात पक्षाला भरविणारी बालिका, इरले घातलेला गुराखी बालक, गोपींची वस्त्रे पळवून झाडावर बसलेला श्रीकृष्ण आणि झाडाखाली त्याची विनवणी करणाऱ्या गोपी, गरुडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू, बासरी वाजविणारा श्रीकृष्ण, नृसिंहावतार, कालियामर्दन अशी काही शिल्पे उल्लेखनीय आहेत.
(टिप-मंदिराच्या गाभाऱ्यात देखील बरीच शिल्पे आहेत पण आत मोबाईल वापरता येत नसल्याने येथील फोटो घेता येत नाहीत).
Ekambareswarar Temple-एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम

Sri Ekambareswarar Temple of Kanchipuram is one of the famous temples of Kanchipuram wherein Shiva is worshipped in the form of Earth Linga, a Lingam made out of River Sand. This temple has a 192 feet high Gopuram which is amongst the largest of South Indian Temples. The Temple derives its names from One Mango Tree in it, and hence Shiv here is known as Ekambaranatha.
In Hinduism, the Sapta Puri, or seven holy cities, are Ayodhya,
Mathura, Maya (Haridwar), Kasi (Varanasi), Kanchi (Kanchipuram),
Avantika (Ujjain), and Dvaravati (Dwarka). These cities are considered
to be the holiest Hindu Teerths, and each city has a strong connection
with Hindu deities.
Shiva in Kanchipuram worshipped as Ekambareswarar or Ekambaranathar or
Rajlingeswaram, and is represented by the lingam as Prithvi lingam while
Parvati is depicted as Elavarkuzhali or Kamakshi Amman.
कांचीपुरम ही दक्षिणेतील मंदिरांची नगरी. व म्हणूनच हिंदू धर्मातील पवित्र सप्त पुरींपैकी एक. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, काञ्चीपुरम, अवन्तिका (उज्जैन), द्वारिकापुरी ही ती सात पुण्य नगरे. याच कांचीपुरम नगरीत कैलासनाथार चे सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे तसेच एकांबरेश्वराचे देखील. या मंदिरातील शिव वालुकामय शिवलिंगाच्या स्वरूपात असून ११ टप्पे असलेले १९२ फूट उंचीचे येथील गोपुर हेदेखील दक्षिणेकडील मंदिरांच्या उंच गोपुरांपैकी एक आहे.
मंदिराची कथा

या मंदिराच्या कथेशी पार्वती जोडलेली आहे. एकदा शंकर विश्वाच्या रचना प्रक्रियेत गुंतले असताना पार्वतीने मधेच येऊन लाडिकपणे त्यांचे डोळे झाकले. पण यामुळे त्यांच्या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे शंकर संतापले आणि त्यांनी पार्वतीला आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर पाठवून दिले. पार्वती पृथ्वीवर आली ती थेट या कांचीपुरम मध्ये कंबा अथवा वेगवती नदीच्या काठावर. तिथे तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी वाळूचे शिवलिंग बनवून एका आंब्याच्या झाडाखाली तप सुरु केले. शिवाने या तपाचरणाची परीक्षा पाहण्याकरिता अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला पण पार्वती या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली. यात शिवाने तिच्यावर अग्नी पाठवला तेव्हा पार्वतीने आपल्या बंधूंची, विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने या अग्नीला शीतल करण्याकरिता चंद्राची योजना केली व त्याच्या किरणांनी झाड आणि पार्वतीला देखील थंड केले.

त्यानंतर पार्वतीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी शिवाने आपल्या जटेतील गंगा या शिवलिंगाला वाहून नेण्यासाठी सोडली तेव्हा पार्वतीने गंगेला पटवून दिले की, त्या बहिणी असल्याने तिने पार्वतीला इजा करू नये. तसेच तिने या शिवलिंगाला मिठी मारली आणि आपल्या छातीशी ते कवळून धरले आणि गंगेचा स्पर्श त्याला होऊ दिला नाही. मग पार्वतीवर प्रसन्न होऊन याच आंब्याच्या झाडाखाली पुढे शिवाने पार्वतीचा स्वीकार केला व म्हणून तो एकांबरेश्वर बनून तिथेच राहिला.
दुसऱ्या एका कथेनुसार शिव व पार्वती फाशांचा खेळ खेळत असताना त्यांच्यात काही वाद झाला व शंकराने तिला कुरूप होण्याचा शाप दिला. त्यामुळे या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी पार्वती कांची येथे आली व येथे तिने तप केले आणि या ठिकाणच्या आंब्याच्या झाडाखाली त्यांचे पुनर्मिलन झाले म्हणून तो “एक-आम्र-नाथ” किंवा “एकाम्बरनाथ” आणि तपश्चर्येने रूपवान झालेली पार्वती म्हणजेच कामाक्षी. या कामाक्षी देवीचे मंदिर येथून जवळच असून ते कामाक्षी अम्मन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवकथेतील
हा भाग दर्शविणाऱ्या कथा या एकांबरेश्वर मंदिरातील व तसेच कामाक्षी अम्मन
मंदिरातील अनेक खांबांवर कोरलेल्या आहेत. त्या पाहून, त्यामागची कथा जणू
घेणे उत्कंठावर्धक ठरते. या मंदिरातच ते आंब्याचे झाड अजूनही दाखविले जाते व
या झाडाच्या ४ फांद्या ४ वेगवेगळ्या चवीची आम्रफले देतात असेही सांगितले
जाते. या मंदिरांची परिक्रमा करताना १०८ शिवलिंगे दृष्टीस पडतात. या
मंदिराच्या आवारातच शिवगंगा हा प्रशस्त तलाव देखील आहे. याचबरोबर निळकंठ
पेरुमल हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशांपैकी एक असलेले मंदिर देखील येथे आहे.

पृथ्वी पंचमहाभूत मंदिर
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडे जी पंचमहाभूतांची मंदिरे मानली जातात त्यापैकी हे मंदिर एक असून हे मंदिर पृथ्वीतत्वाचे समजले जाते. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश ही ५ तत्त्वे म्हणजे पंचमहाभूते. ही मंदिरे दक्षिण भारतात,म्हणजे चार तामिळनाडू राज्यात आणि एक आंध्र प्रदेशात आहेत. सर्व पाच मंदिरे 78°E आणि 79°E रेखांशाच्या आसपास आणि 10°N आणि 14°N अक्षांशांच्या दरम्यान आहेत.
या मंदिरातील शिवाची काही रूपे
एकांबरेश्वरच्या या मंदिरात शिवाच्या भिक्षाटन शिव स्वरूपाची काही शिल्पे आहेत. या शिल्पाबद्दलची अधिक माहिती आपल्याला “भिक्षाटन शिव” या लिंक वर मिळू शकेल.
या मंदिराच्या विष्णुमंदिराच्या मागच्या बाजूला लिंगोद्भव शिवाचे एक अतिशय सुंदर शिल्प आहे.
मंदिरातील काही सुंदर शिल्पे
या मंदिरांच्या अनेक खांबांवर व तसेच मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी कथाशिल्पे आहेत. हि शिल्पे ओळखून यांच्या कथा जाणून घेणे देखील एक आनंददायी अनुभव असतो यापैकी काही शिल्पे येथे दिली आहेत. त्या छायाचित्रांवर क्लीक करून त्याविषयीची अधिक माहिती तुम्ही करून घेऊ शकता.
मदुराईचे मीनाक्षी अम्मन सुन्दरेश्वर मंदिर -Meenakshi Amman Temple
The historic Meenakshi Amman Temple is located in the heart of historic Madurai city, about a kilometre south of the Vaigai River.
मदुराई शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे पार्वती देवीचे, देवी मिनाक्षीच्या स्वरूपातील मंदिर. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठातील एका मुख्य मंदिरात देखील होते. मीनाक्षी अम्मन सुंदरेश्वर मंदिर हे पांड्य सम्राट सदयवर्मन कुलसेकरन प्रथम (इ स ११९० ते १२०५) यांनी बांधले होते.त्यानी सुंदरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन मजली गोपुरमचे मुख्य भाग बांधले आणि देवी मीनाक्षी तीर्थाचा मध्य भाग देखील. हेच या मंदिराचे प्राचीन भाग आहेत.

१४व्या शतकाच्या सुरवातीला (इ. स. १३११), दिल्लीच्या मुस्लिम आक्रमणकारी मलिक काफुरच्या सैन्याने हे मंदिर लुटले. मलिक काफूरला हि संधी मिळाली ती मरवर्मन कुलसेखरन या दोन पांड्य राजपुत्रांच्या दुहीमुळे. त्याचबरोबर त्याने दक्षिण भारतातील इतर अनेक मंदिरे व शहरे देखील लुटली. विजयनगर साम्राज्याच्या शासकांनी सुमारे ६० वर्षानंतर म्हणजे इ.स. १३७१ ला मदुराईचा ताबा मिळविला व या मंदिराची पुनर्बांधणी केली व त्याचे गर्भगृह दर्शनासाठी पुन्हा उघडले. या दरम्यान मंदिराची पुरती वाताहात झाली होती. मुस्लिम शासकांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या कहाण्या इतिहासात नोंदलेल्या आहेत. अरबी प्रवासी इब्न बतूता याने इ.स. १३४२ मध्ये या भागाला भेट दिली होती, त्यानेही या अत्याचारांची वर्णने केलेली आहेत. विजयनगरच्या साम्राज्याची मदुराईवरील पकड सैल झाल्यावर १६व्या शतकाच्या मध्यावर, नायकारानी आपले वर्चस्व मदुराईमध्ये प्रस्थापित केले. यानतंर पुढे मदुराईवर नायकारांचे राज्य १७३९-४० पर्यंत चालले. पुढे सुमारे ३ वर्षे राघोजी भोसल्यांच्या नेतृत्वाखालील मराठा फौजेने मदुराई आपल्या ताब्यात ठेवले होते. यानंतर अर्कोट चा नबाब, पुढे ब्रिटिश अशी मदुराईच्या वर्चस्वाची लढाई सुरूच होती व त्यामुळे या प्रदेशात बरीच अशांतता होती. अखेरीस १७९२ ला मदुराई ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

या सर्व धामधुमीच्या काळात या देवळावर देखील बऱ्याच आपत्ती ओढविल्या. मलिक काफूरने नष्ट केलेले मंदिर १३७० च्या सुमारास पुन्हा उभारायला सुरुवात झाली होती पण या मंदिराचा खरा विस्तार थिरुमलाई नायक (इ स १६२३-५५) यांच्या कारकिर्दीत झाला. या मंदिराची ४ मुख्य गोपुर प्रवेशद्वारे याच सुमारास बांधली गेली. यातील दक्षिण गोपुर सर्वात उंच आहे व मंदिरातील छायाचित्रकार त्यातील सुवर्णकमळ तलावाच्या व याच गोपुराच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे घेत असतात. (सध्या मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नाही).
मीनाक्षी अम्मन मंदिराची आख्यायिका
भारतातील सर्व मंदिरांना जशा आख्यायिका असतात तशीच एक या मंदिराबाबत देखील आहे. मीनाक्षीची कथा पांड्य राजा मलयध्वज व त्याची राणी कांचनमाला यापासून सुरु होते. मलयध्वज राजाला मुल बाळ नव्हते म्हणून त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व यातून त्याला ३ वर्षाच्या मुलीची प्राप्ती झाली. तिला ३ स्तन होते व ही देवी पार्वतीचाच अवतार होती. मुलगी व तीही अशा अवस्थेत, पाहून राजा व राणी चिंतित झाले. पण त्याचवेळी देवतांनी त्यांना सांगितले की काही चिंता करू नका. योग्य वेळ येताच हिला चांगला वर मिळेल. त्याला पाहताच हिचा तिसरा स्तन गळून पडेल व पुढे हे राज्य देखील तो सांभाळेल.

मलयध्वज व कांचनमालेने या “मीन – नयनी” मिनाक्षीला पुत्राप्रमाणे वाढविले. राजा मलयध्वज निधन पावल्यावर मिनाक्षीला राज्याभिषेक करण्यात आला. तिनेदेखील राज्य उत्तरेकडे वाढविण्याकरिता लढाया सुरु केल्या ते थेट हिमालयातील देवलोकापर्यंत जात. तिने देवांचा पराभव केला तेव्हा देवांनी शंकराला साकडे घातले. शंकरांनी गणांना युद्धासाठी पाठविले, तेही पराभूत झाले. तेव्हा शिवशंकर स्वतः रणात आले. त्यांना पाहताच मीनाक्षीचा तिसरा स्तन गळून पडला व आपला जीवनसाथी सापडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने शंकराना आपली जन्मकहाणी सांगितली व विवाहाची विनंती केली, जी त्यानी मान्य केली. त्यानी तिला परत आपल्या राज्यात, मदुराईला, जाण्यास सांगितले व स्वतः ८ दिवसांनी तेथे पोहोचले. मिनाक्षीला वडील नसल्याने मोठ्या भावाच्या नात्याने विष्णूने तिचे कन्यादान केले. हा प्रसंग सुंदरेश्वर मंदिराच्या नंदीमंडपातील एका शिल्पामधे कोरलेला आहे व तसेच १००० खांबी मंदिरात असलेल्या एका चित्रात देखील चितारला आहे. हे मंदिर म्हणजेच मीनाक्षी – सुंदरेश्वर यांचे विवाह स्थळ असल्याची मान्यता आहे.
मंदिराचा परिसर बराच विशाल (सुमारे १४ एकर) असून याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उंच गोपुरे आहेत. यातील दक्षिणेकडील गोपूर सर्वात उंच आहे. ही सर्व गोपुरे असंख्य पौराणिक शिल्पकृतीनी भरलेली आहेत. याचबरोबर या मंदिरात व प्रांगणात असंख्य शिल्पे आहेत. याच्या पूर्व भागात एक १००० खांबी मंडप देखील आहे (यात प्रत्यक्षात ९८५ खांब आहेत). या मंदिराभोवतीच वैगाई नदीकाठी संपूर्ण मदुराई शहर वसलेले आहे.
मंदिरातील शिल्पे
मीनाक्षी व सुन्दरेश्वर शिव अशी दोन वेगवेगळी मंदिरे यात आहेत. हे मंदिर अनेक उत्कृष्ट शिल्पाकृतींनी नटलेले आहे. यातील काही छायाचित्रे (पूर्वी घेतलेली असल्याने) मायाजालावर उपलब्ध आहेत किंवा संबंधित पुस्तकांमध्ये पाहायला मिळू शकतात. यात सुन्दरेश्वर मंदिरासमोरील नंदीमंडपात नंदीच्या सभोवतालच्या खांबांवर मीनाक्षी-शिव विवाहाच्या वेळी विष्णू कन्यादान करीत असतानाचे सुंदर शिल्प आहेत. त्याचबरोबर येथे अंधकासूर वध, त्रिपुरान्तक शिव, पिचाण्डेश्वर शिव, गजासुर वध करणारा शिव अशी सुंदर शिल्पे आहेत.

या मंदिराच्या आवारात असलेल्या १००० खांबी मंडपात मीनाक्षी पट्टाभिषेक (तंजावर शैलीतील) व तिच्या सुन्दरेश्वराशी विवाहाचे अशी २ सुंदर चित्रे आहेत व याच ठिकाणच्या एका कोपऱ्यात संगीत खांब आहेत. या दगडी खांबांवर हलकासा आघात केला असता आपल्याला यातून वेगवेगळे सूर ऐकू येतात.
मंदिरातील देवतांची पालखी संध्याकाळी ७ च्या सुमारास पूर्व गोपुरातून
बाहेर काढून मंदिराच्या बाहेरील भागात फिरविली जाते. हा सोहळा आपल्याला
पाहता येतो व चित्रितही करता येतो.
मीनाक्षी अम्मन सुन्दरेश्वर विवाह सोहळा या मंदिराच्या व तसेच परिसरातील इतरही अनेक मंदिरांच्या गोपुरावर शिल्पित केलेला आपल्याला आढळून येतो.
टीप – या लेखासोबत असलेली मंदिराच्या आतील भागातील छायाचित्रे “Madurai Through The Ages” या पुस्तकातून घेतली आहेत.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई आपल्या सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. हे संपूर्ण ठिकाण सुंदर दृश्यांनी भरलेले आहे. दूरदूरवरून लोक येथे एकटे प्रवास करण्यासाठी येतात. तुमच्यासाठी इथला प्रवास हा आजवरचा नक्कीच सर्वोत्तम अनुभव असेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही भेट देण्याचा विचार केला पाहिजे.
महाबलीपुरम
सोलो ट्रीपला जाण्याचा विचार करत असलेल्या लोकांनी एकदा इथे भेट दिलीच पाहिजे. हे ठिकाण चेन्नईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला प्रथम चेंगलपट्टू जिल्ह्यात यावे लागेल. या ठिकाणाचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये देखील समाविष्ट आहे.
या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिर प्राचीन खडक कापून बांधण्यात आले आहे. मंदिराची कोरीव शिल्पे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ते अतिशय अनोख्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
जर तुम्ही चेंगलपट्टू जिल्ह्याला भेट देत असाल तर कोळंबी आणि फिश करी, कुरकुरीत तळलेले मासे आणि कोळंबीचे पकोडे ट्राय करा. हा या ठिकाणचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे.
कांचीपुरम
कांचीपुरम, हे ठिकाण "मंदिरांचे सुवर्ण शहर" म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही चेन्नईला एकटेच जात असाल तर इथे नक्की भेट द्या. त्याचा इतिहास पल्लव राजघराण्याशी जोडलेला आहे.
हे शहर रेशमी साड्या आणि अनेक मंदिरांसाठी ओळखले जाते. जर तुम्ही या ठिकाणी जाणार असाल तर कैलाशनाथ मंदिर, एकंबरेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तसेच, पारंपारिक दक्षिण भारतीय संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही स्थानिक बाजारपेठांना भेट देऊ शकता.
येथे तुम्ही सांबारसोबत कांचीपुरम इडली, दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ आणि नारळाची चटणी जरूर खा.
ब्रीझी बीच
ज्यांना समुद्राच्या लाटांजवळ बसायला आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. जर तुम्ही एकटेच चेन्नईला जात असाल तर ब्रीझी बीचला नक्की भेट द्या.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.