लेखांक ५५ : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण , चतुर्मुख महादेव भोला आणि घोघरा
लेखांक ५६ : पथाडा चा घातक पथ , बाबरी मध्ये भजन आणि चंद्राची तपोभूमि , चांदगढची चांदला कुटी
या आश्रमामध्ये मी प्रवेश केल्या केल्या एक पंडित माझ्याकडे आला आणि म्हणाला आप अगर असली परिक्रमा वासी है तो मेरे एक प्रश्न का उत्तर दीजिए . आता हे काय नवीन प्रकरण म्हणून मी बुचकळ्यात पडलो . तो मला म्हणाला , "बताईये सबसे कम समय में नर्मदा मैया की परिक्रमा कैसे की जाती है ! " मी विचारात पडलो . क्षणाचा ही विलंब न लावता पंडिताने माझ्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाला , " हो गई मेरी परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा वासी के साथ साक्षात नर्मदा मैया हमेशा वास करती है ! इसीलिए जब भी मुझे कोई परिक्रमा वासी मिलता है तो मै उसकी परिक्रमा कर लेता हु । इस प्रकार मेरी हजारो नर्मदा परिक्रमा हो चुकी है । " त्याच्या या श्रद्धायुक्त बुद्धी चातुर्या चे मला कौतुक वाटले . यावरून मला गणपती आणि कार्तिक स्वामींची गोष्ट आठवली . जेव्हा महादेवांनी संपूर्ण ब्रम्हांडाची परिक्रमा करून यायला सांगितले तेव्हा कार्तिक स्वामी खरोखरच संपूर्ण जगाची परिक्रमा करून आले . आणि गणपतीनी मात्र आई-वडिलांची परिक्रमा केली . कारण आई-वडील हेच साक्षात परब्रह्म आहेत . असा जरी या कथेचा भावार्थ असला तरी त्या घटनेचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत . कसे ते सांगतो . भगवान कार्तिकेय स्वामी जेव्हा विश्व परिक्रमा करून आले तेव्हा त्यांनी या परिक्रमेवर आधारित एक अनुभव ग्रंथ लिहिला . ज्याचे नाव स्कंदपुराण . या स्कंद पुराणातील रेवा खंड नावाचे प्रचंड मोठे प्रकरण म्हणजेच कार्तिक स्वामींनी नर्मदा खंडामध्ये विहार करून लिहिलेली , त्यांच्या प्रवासाची डायरी आहे , असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . यालाच लोक नर्मदा पुराण असे सुद्धा म्हणतात . असो .
लेखांक ५७ : भव्य भिलाडिया घाट , भयप्रद पोपवंती नदी आणि हमीदपूरचे मौनी सन्यासी
लेखांक ५८ : गंजाल-गोमती-नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ
गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगम
लेखांक ५८ : गंजाल-गोमती-नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ
गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगम
लेखांक ५९ : लछोरा येथील सौ. प्रतिभा सुधीर चितळे मैया यांची रेवाकुटी
लेखांक ६० : व्रतस्थ नाईकबुवा रामदासी आणि उधळलेल्या राणी घोडीला घातलेले रेवास्नान
लेखांक ६१ : खरा रेवाभक्त कृषक रामदयाळ कीर आणि नर्मदेच्या नाभी स्थानचा पागल बाबा आश्रम
लेखांक ६२ : अति विस्तीर्ण पुनासा धरणामुळे बदललेला मार्ग आणि बावरचे आनंदस्वामी
लेखांक ६३ : ब्रिजेश बिश्नोईचे अश्व आणि किशनगोपाल यादवचे ताक
या गावांमध्ये जाण्यापूर्वी चौकडी नावाचे गाव लागते .इथे रजनीश बिश्नोई नावाच्या एका सद्गृहस्थाने मला आवाज दिला . आणि चहा पिण्यासाठी घरी बोलावले . अंगणातच त्याने मला बसण्यासाठी आसन दिले .
और हम कहते थे । मैने नही खाया ! " मला सुरदासाचे ते भजन आठवले आणि मी लगेच ती ओळ गायलो , " रे मैय्या मोरी , मै नही माखन खायो ! " दोघेही हसायला लागलो . ते अमृता समान लोणी आणि ताक पोटात गेल्यावर पोटाला एकदम थंडावा मिळाला . थंडपणाची ती लहर अगदी मेंदूपर्यंत गेली .त्याने आग्रहाने अजून थोडे ताक ओतले आणि म्हणाला , " मैया को कोई क्या फसाए ? मैय्या है वह । सब जानती है । उसको सब पता रहता है । अपना बेटा किधर क्या कर रहा है । " मी त्याचे मनापासून आभार मानले आणि बिस्कीट चा पुडा त्याला देऊ केला . तो नाकारत यादव म्हणाला , " मेरी एकादशी होती है । " ताकाची चव अजून तोंडातून जात नव्हती . पेल्यामध्ये तळाशी जमा झालेले दोन चार थेंब सुद्धा मी पुन्हा एकदा पिऊन घेतले ! आता पेला आणि पार्ले जी चा पुडा झोळी मध्ये ठेवावा म्हणून मी मागे वळलो आणि दप्तरामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्या . झोळी खांद्यावर घेतली आणि बघतो तो काय ! माझ्या आजूबाजूला समोर कोणीच नाही ! हा इतक्या वेगाने कसा काय निघून गेला असेल ? असा विचार करून मी धुळीने भरलेल्या रस्त्यावर त्याच्या सायकलच्या चाकांच्या खुणा दिसतात का पाहू लागलो . परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर माझी एकट्याची पावले सोडून अजून कुठल्याही खुणा उठलेल्या नव्हत्या. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या . अरे किमान सांगायचेस तरी ! हृदयातून त्याने साद दिली . तुला सांगितले की रे ! तुझ्या लक्षात नाही आले ! आणि खरोखरच माझे पोट दुखते आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हते ! याने पोटासाठी हे चांगले आहे हे कसे काय सांगितले असेल ? सारेच अनाकलनीय होते . परंतु जुलाबाने गळून गेलेले माझे शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने , तरतरीत आणि जणू काही झालेच नव्हते असे निश्चितपणे झाले होते ! तोंडातली ती अमृताची चव अजूनही जात नव्हती ! मी पुन्हा एकदा पेला काढून पाहिला . त्याला ताकाचा जराही अंश चिकटला नव्हता आणि वासही येत नव्हता . एरव्ही ताकाचा वास व ओशटपणा कितीही भांडे घासले तरी जाता जात नाही . हा सर्व प्रकारच अगम्य होता . चालण्यासाठी दहा हत्तीचे बळ आल्यासारखे झाले . थोडे अंतर चालल्याबरोबर एकाने उपवासाचा चिवडा , द्राक्षे आणि केळी आणून दिली . ती न खाता तशीच ठेवून दिली . साक्षात अमृताची चव तोंडात होती .ती मला घालवायची नव्हती . कानामध्ये अखंड त्याचे आश्वासक स्वर घुमत होते , " मैय्या है वह । सब जानती है । "
लेखांक ६४ : रामपुरीचा मुक्काम , अजूनच मोठी तवा नदी आणि चारखेडा-मांडला अरण्य
लेखांक ६६ : कापसाला विक्रमी भाव देणारी मुंदीची मंडी आणि भमोऱ्याची काळझोप
लेखांक ६७ : मैय्याने महाशिवरात्रीला गाठविला माझ्या नर्मदा परिक्रमेचा मध्य बिंदू , श्री क्षेत्र ओंकारेश्वर अमलेश्वर
लेखांक ६८ : श्री क्षेत्र ओंकारेश्वर , श्री क्षेत्र अमलेश्वर , ओंकारमांधात पर्वत
लेखांक ६९ : बिबट्याने दिलेले दर्शन आणि अरण्यातील गूढरम्य मौनीबाबा गुफा आश्रम
इथून पुढे चालण्यायोग्य मार्ग नसल्यामुळे थांबून मी पाहणी करत होतो . तोपर्यंत सात्यकी मागून फोटो काढत होता . थोडेसे दगडाचा आधार घेत चालल्यावर एका पावलाचा मार्ग सापडला आणि समोर मानवी वावराच्या खुणा दिसल्या .
लेखांक ७० : धर्मवीर बलिदान मास आरंभ आणि रमणीय नजर निहाल आश्रम
आज फाल्गुन महिना सुरू झाला होता . गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील आणि काही प्रमाणात महाराष्ट्रा बाहेरचे देखील तरुण हा महिना श्री धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात .
या गुरुजींच्याच उपदेशा प्रमाणे सर्व सुरू होते . आज काठाकाठाने चालून जो मिळेल तो आश्रम गाठायचा असे नियोजन होते . मौनी बाबा आश्रमातील महंतांनी त्यांनी अनवाणी पायाने केलेल्या परिक्रमेचे अनुभव सांगितले होते . परंतु या भागातील खडक पाहता ते किती कठीण तप आहे याचा अंदाज येत होता . पायात बुटाचा जाडसर तळवा असूनही पाय कापतील असले खडक इथे होते . अतिशय विषम परिस्थितीमध्ये अनवाणी परिक्रमा लोक करतात . मला बलिदान मासामध्ये अनवाणी चालण्याची सवय गेली अनेक वर्ष असून देखील परिक्रमेमध्ये अनवाणी चालताना खूप त्रास व्हायचा . हे तप खरोखरच खूप कठीण आहे . आज आश्रमामध्ये भरपूर पोट पूजा झाली असल्यामुळे भूक लागलेली नव्हती . सकाळी तिथे पोहोचल्या पोहोचल्या वडे आणि भजी यांचा बालभोग मिळाला होता . त्यानंतर पुन्हा भोजनाचा आग्रह झाल्यामुळे टिक्कड भाजी खाल्ली होती . त्यानंतर खालच्या नैसर्गिक एसी असलेल्या परिक्रमावासी विश्रामगृहामध्ये एक डुलकी मारून साडेतीन वाजता पुढे निघालो होतो . नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरून चालताना सूर्य कायम दुपारनंतर तुमच्या डोळ्यासमोर चमकत असतो .त्यामुळे कधी कधी डोके सुद्धा दुखते इतका त्याचा उष्मा तीव्र असतो . त्यात बरेचदा नर्मदा जलामध्ये त्याचे प्रतिबिंब चमकत राहते . अशावेळी समोरून येणाऱ्या आपोज्योतीच्या तेजामुळे डोळ्यांची दृश्यमानता कमी होऊन जाते . उत्तर तटावर चालताना दिवसाच्या पूर्वार्धामध्ये ही परिस्थिती असते . असो . आज मैया पूर्णपणे खडक कापत निघाली होती रंगीबेरंगी हिरवे जांभळे राखाडी खडक कापत तिचा वेगाने प्रवास चालू होता रस्ता नव्हताच पण एकंदरीत चालायला मजा येत होती मध्ये शेकडो फूट खोल नरसिंह कुंड आणि एक साधू कुटी लागली . नरसिंह कुंडाच्या इथे खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत होती . इथे नर्मदा माता प्रमाणाच्या बाहेर खोल आहे . तिच्या स्वच्छ पाण्याचा तळच दिसत नाही . साधू कुटीमध्ये साधारण नव्वदीचे वय असलेले एक साधू महाराज खाटेवर निवांत बसले होते .त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी थोडावेळ सत्संग घडला . त्यांचे शरीर अतिशय कृृष झाले होते परंतु तरीदेखील हालचालींमध्ये कमालीची तत्परता आणि आवाजामध्ये जरब होती. परिक्रमा करण्याचा आमचा मार्ग अतिशय योग्य आहे असे त्यांनी मला सांगितले . या मार्गाने फारसे कोणी जात नाही हे देखील त्यांनी सांगितले . बंगाली बाबू ने महाराजांच्या चरणाशी बसलेला एक फोटो काढला .
नरसिंह कुंडा जवळच्या साधू कुटीतील साधू महाराज आणि प्रस्तुत लेखक
नर्मदे काठी असे अनेक साधू तपस्वी संन्यासी आपापल्या मस्तीमध्ये मस्त आहेत ! हे लोक बाहेर कुठे जातच नाहीत . साधू म्हटल्यावर आपण टीव्ही , प्रसारमाध्यमे , सोशल मीडिया इत्यादीवर ज्या साधू लोकांना पाहतो , तीच प्रतिमा आपल्या मनामध्ये असते . परंतु हे सर्व बहिर्मुख कार्य करणारे संत आहेत . खरे अंतर्मुख संत पाहायचे असतील तर नर्मदा परिक्रमा करण्याशिवाय सोपा पर्याय नाही . स्वत्वाची पूर्णपणे राख केलेली ही अजब निस्पृहता आहे . तिची तुलना कुठल्याही चकाचक फाईव्ह स्टार तथाकथित साधूत्वाशी होऊ शकत नाही . जगामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये अनेक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूंचे पेव सध्या फुटलेले आहे . आणि पाठांतर चांगले असल्यामुळे ते तुम्हाला काही संकल्पना ऐकवू देखील शकतात . परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे "प्रचितीचा महंत " मिळणे खरंच खूप कठीण असते . तो तुम्हाला असा गिरी कंदरांमध्येच शोधावा लागतो . असो .
या भागातील प्रस्तर खचून तिरके झाले होते आणि त्याच्या मधून नर्मदामाता वेगाने वाहत होती . सातपुडा आणि विंध्य पर्वत यांची धडक झालेला हा भाग आहे . नर्मदा मातेची खोली शोधणे खरोखरच खूपच कठीण काम आहे . इथे आता नावांची वर्दळ दिसू लागली . एका नवाड्याने सांगितले की पुढे नजरनिहाल आश्रम नावाचा आश्रम आहे . तिथे मुक्काम करावा . नर्मदानंद स्वामी नावाच्या एका संन्यासी महाराजांनी हा आश्रम उभा केलेला आहे .
तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत नर्मदानंद स्वामी
अतिशय सुंदर असा घाट , वरती संगमरवरी हनुमान मंदिर ,अतिशय अप्रतिम जनावरे असलेली सुंदर गोशाळा आणि जिवाभावाने परिक्रमावासींची सेवा करणारे सेवक कुटुंब असा तो आश्रम होता . मी आश्रमामध्ये गेल्यावर तिथे एक सेवेकरी दोन बैलांच्या सहाय्याने आश्रमाची जमीन नांगरतो आहे असे मी पाहिले . एका वयस्कर आजोबांनी आसन लावण्याची सूचना केली . आश्रमामध्ये पत्र्याची एक मोठी शेड होती तिथे उघड्यावरतीच मी आणि बंगाली बाबू ने आसन लावले . मला नांगरणी पाहायला खूप आवडते . परंतु प्रत्यक्षामध्ये बैलांची नांगरणी मी कधी केलेली नव्हती . माझे सर्व मामा उत्तम शेती करणारे होते आणि स्वतः मोट धरणे , नांगरट करणे , कुळव चालवणे ,ही सर्व कामे त्यांना जमायची . परंतु मला कळायला लागल्यापासून ट्रॅक्टरनेच शेतामध्ये प्रवेश केलेला होता . त्यामुळे माझ्या मनात झालेली इच्छा ओळखून त्या माणसाने थेट बैलांचे कासरे माझ्या हातात दिले आणि मी नांगरायला सुरुवात केली . आधी माझा नांगर सरळ रेषेत फिरत नव्हता . परंतु लवकरच नांगरटीचे सूत्र माझ्या लक्षात आले आणि संपूर्ण क्षेत्र नांगरण्याचा आनंद मी घेतला ! त्या माणसाला देखील थोडीशी विश्रांती मिळाली . इथे प्रकाश पाटीदार आणि त्याची परिक्रमावासीकर्तव्यदक्ष पत्नी ज्योतीताई असे कुटुंब सगळी व्यवस्था पाहत होते . यांची दोन मुले अनुराधा आणि जीवन आई वडिलांना मदत करायचे . प्रकाशचे आजोबा गोविंदरावजी पाटीदार हा मनुष्य फारच अवलिया होता ! त्यांच्याकडे एक सुरेख गोफण होती . आश्रमामध्ये शक्य ती सर्व फळझाडे फुलझाडे महाराजांनी लावलेली होती . इथे माकडांचा उपद्रव खूप होता . त्यामुळे त्यांनी माकडांना पळवून लावण्यासाठी एक पाळीव माकड ठेवले होते . याचे नाव रँचो असे होते . परंतु त्याला कर्करोग झालेला असल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या . एका झाडावर एका विशिष्ट खोबणी मध्ये ते दिवसभर बसून राहायचे . त्यामुळे माकडांना पळवून लावण्यासाठी गोविंदराव पाटीदार या गोफणीचा वापर करायचे . गोफणीने दगड फेकून मारता येतो इतकेच मर्यादित ज्ञान मला होते . परंतु गोफण किती अचूकपणे वापरता येते हे मी आयुष्यात कधी पाहिलेले नव्हते . गोविंदराव मला म्हणाले की तुम्ही पाया थोडे अंतर घेऊन उभे रहा . माझ्यामागे एक लोखंडाचा खांब होता . मला काही कळायच्या आत त्यांनी गोफण फिरवली आणि माझ्या मागून खंण्णण असा जोरात आवाज झाला ! गोविंदरावांनी मारलेला खडा माझ्या दोन पायांच्या मधून जाऊन खांबावरती आपटून पुन्हा त्यांच्या पायापाशी येऊन पडला होता ! मला हा योगायोगाने बसलेला नेम आहे असे वाटले . परंतु त्यांनी पुन्हा एकदा तसाच खडा मारला आणि खांबावर आदळून बरोबर त्याच जागी तो पुन्हा येऊन पडला ! खांबाचा आकार दंडाकृती असल्यामुळे तो जर बरोबर सरळ रेषेत बसला तरच माझ्या पायांमधून परत येणे शक्य होते . जरा जरी बाजूला बसला तर दगड दुसऱ्या दिशेला निघून गेला असता !
मला आश्चर्य वाटत आहे हे पाहून गोविंदरावांना मौज वाटायला लागली आणि त्यांनी मला अनेक गोष्टी नेम धरून उडवून दाखवल्या ! गोफणीने इतका अचूक नेम साधता येतो हे मला खरोखरच माहिती नव्हते . अतिशय लहान वय असल्यापासून गोविंदराव गोफण खेळत होते त्यामुळे त्यांची ही साधना सिद्ध झाली होती ! आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा आणि नियमितपणे करत राहिले तर त्याच्यामध्ये अचूकता येत जाते . पाटीदार आजोबांनी मला गोफण फिरवायला शिकवले . आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता तो एकदा नजरे खालून घालावा म्हणून मी चक्कर मारू लागलो . गो शाळेतील जनावरांनी माझे लक्ष वेधले . इथे अतिशय सुंदर जातिवंत अशा वीस गिरगायी होत्या दोन भव्य दिव्य नंदी होते आणि एक कामधेनु होती . कामधेनु म्हणजे अशी गाय जिला पाच थानं असतात व सर्व स्तनातून ती दूध देते ! इथे गाईंना खूप चांगल्या पद्धतीने ठेवले होते . गाई सारखा प्रेमळ पशू दुसरा नाही . मी ज्या ज्या आश्रमामध्ये राहिलो त्या त्या आश्रमातील गोसेवेचा पुरेपूर आनंद घेतला . गो सेवेसारखे पुण्यदायक आणि आरोग्यदायक दुसरे काही व्रत नाही !
इथे असलेला मुख्य वळू अतिशय मारका होता असे मला सांगण्यात आले होते . परंतु त्याने पहिल्या स्पर्शापासून मला खूप प्रेमाने आणि आदराने वागवले !
याला कुरवाळून घेण्याची खूप आवड होती .याच्या तुलनेने पलीकडची गाय किती छोटी दिसते आहे पहा .
हे सर्व फोटो ज्योतीताई पाटीदार हीने प्रकाशच्या मोबाईलवर काढले आणि माझ्या मित्राकडे पाठवून दिले . हा वळू कोणाला तरी हात लावू देतो आहे याचे आश्चर्य वाटल्यामुळे तिने फोटो काढायला सुरुवात केली ! शक्यतो जनावरे जनावरांना त्रास देत नाहीत ! ;)
त्यानंतर इथली सर्वाधिक दूध देणारी गाय देखील मी पाहिली . कामधेनु माता ही तर साक्षात परमेश्वरी अवतार वाटत होती इतकी ऊर्जा तिच्या आजूबाजूला जाणवत होती !
मला ही गोशाळा फारच आवडली . कामधेनू अतिशय शांत होती . तिच्या कानाचा आकार किती मोठा आहे ते पाहताना प्रस्तुत लेखक .
गो वंशा सोबत वेळ कसा जातो कळतही नाही .सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशी ही गोमाता मला खूप आवडली .
इथे ज्योतीताई गोसेवा करण्यासाठी येत असत . अतिशय उंच अंगकाठी असलेली ही धडधाकट स्त्री भारतीय लष्करामध्ये मोठ्या अधिकारी पदावर गेली असती असे तिच्याकडे बघून मला वाटले . तिला मी तसे बोलून देखील दाखवले . तिने सांगितले की तिची पोलीस किंवा लष्करामध्ये जाण्याची खूप इच्छा होती . परंतु लवकर लग्न झाल्यामुळे ते स्वप्न अर्धवट राहिले असे ती म्हणाली .मला हे अजूनही न उघडलेले कोडे आहे की लग्नापूर्वीचे स्वप्न आणि लग्नानंतरचे स्वप्न हे वेगळे कसे काय असू शकते ! स्वप्न हे स्वप्न असते ! ध्येय लग्नानंतर बदलणार असेल तर ते काही चांगले नाही . मुक्त संवाद साधून आपल्या ध्येयधोरणांची कल्पना माता-भगिनींनी आपल्या पतींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली पाहिजे असे वाटते . संवाद तुटला की प्रगती खुंटते . पुरुषांनी देखील आपले कर्तव्य समजून जोडीदाराच्या योग्य त्या स्वप्नांना उभारी देण्याचे कार्य आवर्जून केले पाहिजे . तिची दोन्ही मुले चांगली उंच होती . किमान त्यांना तरी सैन्य अथवा पोलीस भरतीच्या दृष्टीने प्रयत्न करायला मी सुचविले . मुलांची माझी चांगली गट्टी जमली . दोघेही माझ्या आसनापाशी येऊन बसले होते आणि त्यांच्या अभ्यासाच्या वह्या ,चित्रकलेच्या वह्या वगैरे मला दाखवीत राहिले . मी सर्वच मुलांना चांगले हस्ताक्षर कसे काढायचे याचे नमुने काढून देत असे . तो कित्ता गिरवत बसण्यासाठी त्यांना सांगायचो . या मुलांनी माझ्याकडून नर्मदा मैया , शंकराचे तांडव नृत्य , रंग अवधूत महाराज अशी विविध चित्रे काढून घेतली .बलिदान मास सुरू झाल्यामुळे आज रात्री जेवणार नव्हतोच . त्यामुळे केलेला स्वयंपाक सर्वांना मी वाढला आणि नैवेद्याचे दूध घेऊन झोपी गेलो . पाटीदार आजोबांना शस्त्रांची आवड असल्यामुळे इथे वंश परंपरागत घराण्यातील पुजेतील तलवार ,गोफण ,लगोर अशी सर्व शस्त्रे होती . एक अतिशय मोठा शाळीग्राम आणि स्फटिकाचे सुंदर शिवलिंग देखील पूजेमध्ये होते . आश्रम मला खूपच आवडला . पाटीदार काका काम झाले किती गोफण कंबरपट्ट्यासारखी कमरेला बांधून ठेवत . एखाद्या बंदुकीपेक्षा घातक असे हे शस्त्र होते ! मला वाटेत कुणीतरी भरपूर सुकामेवा दिला होता . तो मी रांचो माकडाला भरवावा म्हणून त्याच्यापुढे धरला . तर गंमत म्हणजे हा त्यातील फक्त काजू काजू निवडून खाऊ लागला ! बदाम , खारीक, मनुका , बेदाणे ,पिस्ते यातील काहीही तो खात नव्हता ! मला या प्रकाराची फारच मौज वाटली ! प्रकाश देखील अतिशय सुस्वभावी , सरळ आणि सज्जन मनुष्य होता . सतत काही ना काही काम करत राहायचा . इथे बाहेर गावच्या येणाऱ्या स्वामीजींच्या शिष्यांसाठी उत्तम अशी निवास व्यवस्था गोशाळेच्या वर केलेली होती . ती त्याने फिरवून मला दाखवली . ओंकारेश्वर वरून मोर टक्क्याकडे जाणारा एक डांबरी रस्ता आहे . या रस्त्यावरून या आश्रमाकडे येण्यासाठी रस्ता आहे असे त्यांनी मला सांगितले . स्वामीजी तीर्थयात्रेसाठी गेलेले होते . त्यांच्याबद्दल इथले सर्वच लोक अतिशय आदराने बोलत होते आणि भरभरून त्यांचे कौतुक सांगत होते . वरिष्ठांच्या माघारी त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असेल तर ते वरिष्ठ खरोखरच खूप चांगले असतात ! कारण ते चांगले नसतील तर त्यांच्या अपरोक्ष उखाळ्या पाखाळ्या करण्याची संधी शक्यतो कोणीही दवडणार नाही !
सुका मेवा दिल्यावर त्यातले फक्त काजू निवडून खाणारे कर्करग ग्रस्त 'रँचो ' माकड आणि प्रस्तुत लेखक . वरच्या खोबणीमध्ये ते बसून राहायचे . त्याने लघवी देखील तिथेच केलेली ओघळावरून दिसत आहे .
Rancho घे !
नजर निहाल आश्रमाचा सुंदर परिसर . नजर निहाल म्हणजे केवळ नजरेने सांभाळ करणारा ! नजर निहार असा मूळ शब्द असून हे विशेषण कासवी साठी वापरले जाते . अशी कवी कल्पना आहे की कासवी केवळ नजरेने आपल्या पिलांचे पोषण करते . त्याप्रमाणे परमेश्वर किंवा नर्मदा माता केवळ नजरेने आपल्या भक्तांचे कल्याण करते .
नजर निहाल आश्रमाचा नर्मदे वरील घाट
आश्रम अगदी नर्मदे काठी आहे
सुंदर असे छोटेखानी संगमरवरी हनुमानाचे मंदिर आपले स्वागत करते
नजर निहाल हनुमानजी
ओंकारेश्वर मोरटक्का महामार्गावरील आश्रमाच्या महाद्वाराचे बांधकाम सुरू असताना देखरेख करणारे स्वामीजी
आश्रमातील गुरु पादुका स्थान
आश्रमामध्ये अशी शेती केलेली आहे . मी हीच शेती नांगरली
ह्याच पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावरती आम्ही झोपलो होतो .
आश्रमातील सुंदर आणि आदर्श गोशाळा . आता याच्यावर दुमजली बांधकाम असून निवास व्यवस्था केलेली आहे .
आश्रमात स्वामीजींसाठी लावलेला एक झोपाळा असून त्याच्यावर अन्य कुणाला बसू दिले जात नाही
झोपाळ्यावर बसून भक्त मंडळींशी चर्चा करताना नर्मदानंद स्वामीजी
नजर निहाल आश्रमाचे श्री नर्मदानंद स्वामी नर्मदा दर्शनाचा आनंद घेताना
या आश्रमामध्ये तुम्ही पुन्हा कधी देखील या असे पाटीदार काकांनी मला सांगितले . त्यांचे नुसते हे शब्द देखील खूप आश्वासक आहेत . कारण आपण आता जाणताच की ९०% परिक्रमा वासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू करतात . आणि तिथून निघाल्यावर पहिल्या दिवशी माणसे कमी चालतात त्यामुळे जवळपास प्रत्येक परिक्रमावासी मुक्कामासाठी याच आश्रमामध्ये सर्वप्रथम येतो . त्यामुळे इथे एका वेळेला एक हजार दीड हजार असे परिक्रमावासी हंगामामध्ये येत असतात ! यातील बहुतांश लोक नंतर परिक्रमावासी राहत देखील नाहीत हे पण आपण पाहिले . परंतु पहिल्या काही दिवसांच्या उत्साहामध्ये या भागातील , पुढच्या महिन्याभरातल्या टाप्यातले आश्रम हे खरोखरीच प्रचंड तणाव सहन करतात . त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे . असे असूनही एखाद दुसरा परिक्रमावासी आला तरी देखील त्याच्या अगत्यामध्ये कुठलीही कसर हे लोक सोडत नाहीत हे पाहून फार बरे वाटले ! कल्पना करून पहा हे वर्तन किती कठीण आहे . त्यात ज्या दिवशी सर्वांची परिक्रमा संपते अशा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो . म्हणजे खरंतर या लोकांसाठी सुट्टी चालू होण्याचा तो दिवस होता . मैया चा काठ अशा अद्भुत सेवाधारी लोकांनी गजबजलेला आहे . या सर्व लोकांमध्ये एकच समान धागा आहे . हे सर्वजण मैयाला आपली आई मानतात . तिच्या पवित्र जलावरच त्यांचे देह पोसलेले आहेत . परिक्रमावासी तर किती प्रकारचे पहावेत ! माझ्यासारखा एखादा दुसरा अनुभव लिहून ठेवणारा परिक्रमावासी सोडला तर अनुभवांची खीजगणती देखील न ठेवणारे परिक्रमा वासी ९९ .९९% आहेत ! अर्थात मी देखील त्यातलाच एक होतो ! ज्या दुकानदाराने मला डायरी आणि पेन दिले आणि मोठ्या अज्ञार्थक शब्दात रोज रात्री दिवसाचे सर्व अनुभव लिहून ठेवायला सांगितले ,त्याच्या इच्छेचीच ही परिणती आहे . आणि नर्मदे काठी बसलेल्या कुठल्याही माणसाची इच्छा ही नर्मदेचीच इच्छा असते असा अनुभव हळूहळू प्रत्येकालाच येऊ लागतो ! असो .
सकाळी लवकर येथून प्रस्थान ठेवले . पुढे जाताना काठावरतीच श्री श्री रविशंकर यांच्या शिष्यांनी उभा केलेला एक आश्रम दिसला . सात्यकीला हा आश्रम पाहायचा होता . मलाही उत्कंठा होती . म्हणून आम्ही आत मध्ये जाऊन आश्रमामध्ये फेरफटका मारला .परंतु तिथे कोणीही नव्हते त्यामुळे पुढे निघून गेलो परंतु आश्रम अतिशय सुंदर होता . नर्मदे काठी जाऊन साधना करण्यासाठी अतिशय उत्तम असे ते ठिकाण मला वाटले . आर्ट ऑफ लिव्हिंग चे चे कुणी भक्त असतील त्यांनी आवश्य या आश्रमात जाता येते का ते पाहावे .
आश्रमाचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे
श्री श्री आश्रम
हे शब्द खूप वास्तववादी आहेत
श्री श्री रविशंकर यांचा विषय निघालाच आहे म्हणून मला आलेला त्यांचा एक अनुभव नमूद करावासा वाटतो . फार वर्षांपूर्वी माझा एक मित्र माझ्या मागे लागला होता की तू आर्ट ऑफ लिविंग चा बेसिक कोर्स कर . माझे वैयक्तिक मत असे होते की जिथे अध्यात्म आहे तिथे पैसा नाही आणि जिथे पैसा आहे तिथे अध्यात्म नाही . त्यामुळे मी त्याला म्हणालो की कोर्स करायला माझी हरकत काही नाही परंतु त्यासाठी ते फी आकारतात ते मला आवडत नाही . तुझे गुरु जर खरे असेल तर ते मला मोफत सर्व विद्या देतील ! आणि मगच मी त्यांना मानेन . मित्राचा निरुपाय झाला . पुढे काही वर्षांनी माझा एक उच्चपदस्थ अधिकारी मित्र एके ठिकाणी पंधरा दिवसाच्या कोर्ससाठी दक्षिण भारतामध्ये आला होता .काही निवडक अधिकाऱ्यांसाठी हे खास शिबिर आयोजित करण्यात आले होते . त्याचा मला संदेश आला की मी दक्षिण भारतात आलो आहे तू देखील जवळच आहेस तर आपण भेटूया . त्याने मला आश्रमाचा गुगल पत्ता पाठवून दिला . हा श्री श्री रविशंकर यांचा बंगलोर येथील मुख्य आश्रम होता . मी नेमका आश्रमाच्या इथे पहाटे तीन वाजता पोहोचलो आणि धुवाधार पावसामुळे काहीच कळेनासे झाले . त्यात बस वाल्याने मला दोन किलोमीटर पुढे सोडले . पावसात भिजत मी आश्रमाचे महाद्वार सापडते का ते पाहत होतो . इतक्यात दुचाकीवरून एक मनुष्य जाताना दिसला म्हणून मी त्याला अडवले . या भागामध्ये सर्व जंगल होते . घनदाट जंगल ,आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस आणि पहाटेची विचित्र वेळ त्यामुळे या माणसाला मी लुटारू वाटलो . तो गाडी पळवू लागला . नेमका एक गतिरोधक आला तिथे मी धावत जाऊन त्याला गाठले . आणि विचारले की अमुक अमुक शिबिर कुठे चालू आहे . त्या माणसाला काय वाटले कुणास ठाऊक मला म्हणाला गाडीवर बसा मी तुम्हाला दाखवतो . आणि आश्रमाच्या दारावर तो आला . द्वारपालाने त्याला आत सोडले . मी उतरू लागलो . तो मला म्हणाला उतरू नका बसून रहा . आणि सुमारे दोन किलोमीटर आत मध्ये गाडी चालवल्यावर एका इमारती पाशी थांबला आणि तो म्हणाला इथे तुमचे शिबिर चालू आहे . माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मित्र फोन करून थकला होता . मला थेट समोर पाहिल्यावर त्यांनी मला घट्ट मिठीच मारली ! इतक्यात कोर्स सुरू होणार अशी सूचना झाली . ते मला त्यांच्या खोलीची किल्ली देऊ लागले . इतक्यात त्यांचा मुख्य प्रशिक्षक तिथे आला , आणि मला म्हणाला की आज यांच्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे . तुम्ही देखील हे शिबिर अटेंड करावे अशी माझी इच्छा आहे . मला प्रश्न पडला की असे कसे काय झाले ? हा प्रशिक्षकच मगाशी मला बाहेर भेटला होता !त्याने हेल्मेट घातल्यामुळे माझ्या लक्षात नाही आले ! तो मला म्हणाला की तुम्ही ज्या वेळी , ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या ठिकाणी मला भेटला आहात त्यावरून मला असे वाटते की तुम्ही आजचा दिवस शिबिराचा आनंद अवश्य घ्यावा . झाले !शिबिर सुरू झाले . तो मनुष्य म्हणाला की आज आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे गेले १४ दिवस आपण काय काय शिकलो याची उजळणी आपण आज करणार आहोत . अशा रीतीने त्या संपूर्ण शिबिराचे सार मला त्या दिवशी शिकायला मिळाले . संध्याकाळी स्वतः श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन सर्वांसाठी होणार होते . त्यांनी नेमके सांगितले की आज आपण काहीच करायला नको .फक्त ध्यान शिकूया ! आणि अशा रीतीने स्वतः श्री श्री यांच्या मुखातून मला ध्यान करण्याची प्रक्रिया शिकायला मिळाली ! ती देखील मोफत ! याच्यापुढे घडलेला प्रसंग तर केवळ अकल्पनीय होता . रविशंकर यांचे स्वतःचे हत्ती घोडे वगैरे आहेत . त्यांचे प्रवचन जेव्हा होते तेव्हा बाहेर हत्ती घोडा उभा करतात . त्या दिवशी नेमके घोडा उधळला होता आणि हत्तीला लाथा मारायला बघत होता . काही केल्या घोडा सांभाळणाऱ्या मुलाला घोडा आवरत नव्हता . चुकून मागून हत्तीला वर्मी लाथ लागली असती तर हत्ती चवताळला असता आणि आश्रमामध्ये त्या दिवशी कमीत कमी चार हजार लोक मुक्कामी होते .त्यातील दोन एक हजार लोक आजूबाजूलाच वावरत होते . मी धावतच जाऊन घोड्याचा ताबा घेतला . काही क्षणातच घोडा मला वश झाला . त्या मुलाला मी जरा झापलेच , की असे कसे काय करतो आहेस ? घोडा नीट सांभाळता येत नाही का तुला ? तो म्हणाला हा घोडा सांभाळणारा माणूस गावाला गेला आहे . मी त्याचा मदतनीस आहे . आता घोडा तबल्यामध्ये नेऊन लावायचा होता .परंतु हा मुलगा भीतीपोटी घोड्याला हातच लावायला तयार होईना . मला म्हणाला तुम्हीच घोडा नेऊन लावा . रविशंकर यांच्या आश्रमामध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्था असून त्यांना भेटायला कोणीही सहजासहजी जाऊ शकत नाही . हा घोडा स्वतः श्री श्री रविशंकर यांचा असल्यामुळे माझ्यासाठी पहिले गेट उघडले गेले . तिथून बरेच अंतर चालल्यावर दुसरे महाद्वार लागले ते देखील घोड्याला पाहून उघडले गेले . तिसरे महाद्वार देखील अशा पद्धतीने उघडले गेले . आणि घोडा कुठे लावायचा हा मी विचार करताना समोर एका कुटीमध्ये श्री श्री रविशंकर स्वतः उभे असलेले दिसले . मी त्यांनाच विचारले की स्वामीजी घोडा कुठे लावायचा ? ते माझ्याकडे पाहून अचंबित झाले ! तू कोण आहेस बाबा ! मी त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला . त्यांनी त्यांच्या कुटी बाहेर असलेला तबेला दाखवला आणि घोडा लावून कुटीमध्ये येण्यासाठी सांगितले . कुटीमध्ये जाऊन त्यांचे रितसर स्पर्श दर्शन घडले ! मग मी त्यांना माझा अनुभव सांगितला की तुमचा कोर्स पैसे देऊन शिकायची मला इच्छा नव्हती . परंतु आता मला तुमच्या अधिकाराबद्दल खात्री पटली कारण तुम्ही मला फुकट सर्व ज्ञान दिलेले आहे ! त्यावेळी त्यांनी मला मोठे मोठे आश्रम चालविण्यासाठी निधीची , पैशाची कशी काय गरज असते हे सर्व अर्थकारण समजावून सांगितले . त्यामुळे माझ्या मनातील ही शंका कायमची दूर झाली . त्यांनी अतिशय प्रेमाने मला आशीर्वाद आणि प्रसाद दिला . मी देखील तबेल्या मध्ये अजून काय काय सुविधा करता येतील याची सर्व माहिती त्यांना दिली व त्यांनीही ती योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली . घोडेस्वारीच्या ज्ञानाने अशा पद्धतीने त्या दिवशी मला खूप मोठ्या संतांचे दुर्लभ दर्शन घडविले ! इथे आश्रमामध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले कारण इतक्या सहज या संतांचे दर्शन तिथे घेता येत नाही . परंतु माझी अशी खात्री आहे की तुमचा भाव शुद्ध असेल आणि हेतू प्रामाणिक असेल तर जे योग्य आहे ते घडतेच ! त्या दिवसापासून श्री श्री रविशंकर यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात असलेले शंकेचे मळभ दूर झाले आणि खात्री पटली की यांचे कार्य चांगलेच आहे ! अनुमानाची जागा अनुभवाने घेतली !
असो . सांगायचे तात्पर्य इतकेच की ही सर्व पार्श्वभूमी मनात असल्यामुळे हा आश्रम पहावा असे मला वाटले . परंतु तेथे कोणी नसल्यामुळे मी पुढचा मार्ग पकडला . आता पुढे नर्मदेवर काही पूल दूरवर दिसू लागले . हे मोरटक्का नावाचे गाव येणार होते . चालता चालता नर्मदेच्या पाण्यामध्ये काठी बुडवत चालण्याचा आनंद घेऊ लागलो . मी गमतीने नर्मदेला वेगळ्या वेगळ्या नावांनी हाक मारायचो ! त्यातील एक नाव होते नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी या शब्दाचा उच्चार कोल्हापुरी पद्धतीने अति अति वेगाने केला तर "नर्मदे " असे ऐकू येते ! म्हणून पहा! अशा आमच्या गमतीजमती चालायच्या ! चला आता आपण नरेंद्रमोदी सोबत मोर टक्क्याला जाऊया !
नर्मदे हर !
लेखांक ७१ : नर्मदाष्टकाची जन्मभूमी मोरटक्क्याची चिदंबर गुहा अन् टोकसरची मण्यार
नर्मदे वरील दोन-तीन पुल इथून दिसू लागले .त्यांच्या दिशेने चालत राहिलो . रस्ता मार्ग लोहमार्ग आणि कॅनॉलचे पाणी घेऊन जाणारा पूल असे हे पुल आहेत . पैकी लोहमार्ग हा भारतातील एकमेव मीटरगेज मार्ग शिल्लक राहिला आहे . लवकरच त्याचे देखील ब्रॉडगेज होणार आहे . ही रेल्वे अतिशय सुंदर आहे . माझ्या लहानपणी सर्वत्र अशाच रेल्वे होत्या हे मला आठवते .
मोरटक्का येथील नर्मदेवरील पूल
मीटरगेज रेल्वे पूल
किनाऱ्याचा मार्ग पकडून चालत राहिलो . वाटेमध्ये अनेक आश्रम दिसत होते परंतु आम्ही कुठे थांबलो नाही . या आश्रमांमध्ये अनेक साधू आहेत . । संत आहेत . अनेक महंत आहेत . परिक्रमेमध्ये तुम्हाला सर्वच ठिकाणावरील सर्व माणसे भेटतील असे नसते . तुमच्या नशिबामध्ये जी माणसे आहेत तेवढी तुम्हाला भेटतात . बरेचदा तुम्ही सकाळी निघालात की थोड्याच अंतरावर अजूनही आश्रम असतात जे तुम्ही टाळून पुढे जाता . तुमच्या मागे कुठेतरी मुक्काम केलेला परिक्रमावासी कदाचित या आश्रमात मुक्कामाला थांबत असतो . त्यामुळे कोणीही असा खात्रीने दावा करू शकत नाही की मी नर्मदा खंड संपूर्ण पाहिला आहे . काही ना काही पाहायचे राहूनच जाते . त्यामुळे जे काही तुम्ही स्वतः अनुभवले तेवढाच नर्मदाखंड तुम्हाला माहिती असतो . त्याच्याशिवाय देखील भरपूर घडामोडी येथे घडत असतात . विशेषतः ज्या परिक्रमावासिनी एकापेक्षा जास्त परिक्रमा केलेल्या आहेत त्यांना प्रकर्षाने हा अनुभव येतो की दरवेळी परिक्रमा नवीन काहीतरी आश्चर्यकारक असे काहीतरी समोर घेऊन येते ! दरवेळी नवीन माणसे भेटतात . नर्मदा परिक्रमा ही अशी मजेशीर आहे .असो . इथे मध्ये कुठेतरी आश्रम असलेल्या अशाच एका तरुण साधूने गूगल नकाशावर खूप सुंदर फोटो टाकले आहेत . ते आपल्यासाठी इथे जोडतो आहे
नर्मदे काठचा सूर्योदय आणि सूर्यास्त हे चुकवू नये असेच असतात !
वाटेत तुम्हाला घडणाऱ्या प्रत्येक देवतेच्या दर्शनाने तुमची जन्मजन्मांतरीची पापे जळून जात असतात .
नर्मदा खंडातील लहान मुले देखील मोठ्या भक्ती भावाने परमेश्वराची भक्ती उपासना पूजा अर्चना करताना दिसतात .
साधू जीवनासाठी तर नर्मदे सारखा प्रांत नाही !
आम्ही चालत चालत मोरटक्का हे गाव गाठले . या गावातही अनेक आश्रम आहेत . त्यापैकी बहुतांश परिक्रमावासी हे भक्तराज महाराजांच्या आश्रमामध्ये राहतात . परंतु मला तिथे एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे असे दिसले . तयार मंदिरे आपल्याला अनेक दिसतात परंतु बांधकाम सुरू असलेले मंदिर पाहण्याची गंमत काही वेगळीच आहे ! उत्कंठेपोटी मी तिथे गेलो असता मला असे लक्षात आले की हे राजे राजेश्वरी धाम नावाचे मंदिर त्रिपुरा सुंदरी देवीला समर्पित आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हे बांधकाम चालू होते . इथे संपूर्ण मंदिराचे बांधकाम कोण पाहते आहे असे मी विचारल्यावर मला कैलास जी आवले नामक एका सद्गुरूस्थांचा क्रमांक देण्यात आला . मंदिर निर्मितीचे अंदाजपत्रक साधारण दोन कोटी पर्यंत जात होते . मी तिथे उपस्थित असलेल्या एका शुभम जोशी नामक गुरुजींच्या मोबाईलवरून कैलासजींना फोन लावला . हे बडवाह येथे एका बँकेमध्ये नोकरी करत असत . आता देखील ते बँकेमध्ये होते . बँक मंदिरापासून नऊ किलोमीटर लांब होती . ते मला म्हणाले की तुम्ही तिथेच थांबा मी आत्ता तुम्हाला भेटायला आलो आणि बरोबर वीस मिनिटांमध्ये कैलास जी आवले हातातली सर्व कामे टाकून स्वतः तिथे जातीने हजर झाले ! मंदिर निर्माणा प्रति त्यांच्या असलेल्या या तळमळीचे मला प्रचंड कौतुक वाटले . त्यांनी मला त्या संपूर्ण परिसराची माहिती दिली . जयपुर येथून लाल दगड ते मागवत होते . माझे यासंदर्भातील जे काही संपर्क आहेत ते सर्व त्यांना मी दिले . हेतू इतकाच की कमी खर्चामध्ये भव्य दिव्य मंदिर उभे राहावे . मी गेलो तेव्हा मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नव्हते . परंतु आता गुगल नकाशावर पाहिले असता मंदिर पूर्ण झाल्याचे दिसते . हा संपूर्ण परिसरात अतिशय ऊर्जा युक्त होता . कैलास जी आवले मला या परिसराबद्दल माहिती सांगू लागले .भालचंद्रजी शास्त्री भारती नावाचे गोळवलकर गुरुजी यांचे मित्र तिथे राहत होते .इथे असलेल्या एका तळघर वजा गुफेमध्ये त्यांनी आयुष्यभर साधना केली . गुहेला चिदंबर गुहा असे स्थानिक लोक म्हणतात . होय गुफा नाही गुहा असेच म्हणतात ! भालचंद्र जी मराठी होते आणि गोळवलकर गुरुजी देखील मराठी . त्यामुळे चिदंबर गुहा असे शुद्ध मराठी नाव या गुहेला देण्यात आले . गोळवलकर गुरुजी देखील अत्यंत निस्पृह असल्यामुळे त्यांनी या जमिनीतील एकही गुंठा स्वतःच्या नावे न ठेवता संपूर्ण जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे करून टाकली . पुढे संघाच्या रचनेतून इथे एखादे भव्य मंदिर उभे करावे असे ठरले . त्या मंदिराला लागूनच भक्तनिवास आणि मोठे सभागृह देखील बांधण्यात आले . चिदंबर गुहेचा देखील जीर्णोद्धार केला गेला . कैलास जी यांनी एवढे सर्व कार्य उभे केलेले असून देखील त्यांचा नम्रपणा पहा ! अजून काही सूचना अभिप्राय असतील तर आवर्जून सांगा असे ते मला म्हणाले . गेले अनेक दिवस माझ्या डोक्यामध्ये जो विषय घोळतो आहे तो मी इथे कैलास जी यांच्याशी बोललो . सुदैवाने माझ्या परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात मला मोहन साधू भेटल्यामुळे माझ्याकडून परिक्रमेमध्ये सहज होऊ शकणाऱ्या अनेक चुका झाल्या नाहीत . परंतु बहुतांश परिक्रमावासी ओंकारेश्वर येथूनच परिक्रमा उचलत असल्यामुळे आणि त्यानंतरचा पहिला मुक्काम बहुतेक वेळा मोरटक्का इथेच पडत असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या परिक्रमावासींची संख्या अत्यंत म्हणजे अत्यंत जास्ती असते . अशावेळी या सर्व लोकांना एखाद्या छोट्याशा चल चित्रपटाच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमे मध्ये काय करावे आणि काय करू नये , कसे वागावे आणि कसे वागू नये ,कसे बोलावे आणि कसे बोलू नये ,कसे चालावे आणि कसे चालू नये , हे सर्व जर प्रशिक्षण दिले गेले तर त्याचा संपूर्ण परिक्रमे दरम्यान परिक्रमा आणि काठावरील रहिवाशांना अतिशय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही . माझी ही कल्पना कैलासजींना अतिशय आवडली . त्यासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टी इथे तयार होत्या . एखाद्या भिंतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून हा चित्रपट दाखवता येण्यासारखा होता . तसेच इथे अतिशय भव्य सभागृह आणि खुर्च्या वगैरे व्यवस्था आधीपासून होती . या कामामध्ये कुठलीही मदत लागली तर मला कधीही सांगा असे मी कैलाजींना सांगितले . अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी नेहमीच उपलब्ध असते ,त्यामुळे त्याची गरज नसते हे मला माहिती होते . परंतु मी माझा भाव प्रकट केला इतकेच . कैलास जी येईपर्यंत शुभम जोशी या तेजस्वी तरुण गुरुजीने आम्हाला चिदंबर गुफा दाखवली . तळघरामध्ये अतिशय निरव शांतता होती . तिथे अक्कलकोट स्वामींची एक मूळ तसबीर होती . तिचे वजन किमान ४० किलो असावे इतकी ती जड होती . इथे स्वामी मुक्कामी येऊन गेलेले आहेत असे गुरुजींनी मला सांगितले . या गुहेमध्ये अनेक संत महात्मे राहून साधना करून गेलेले होते . त्यातील सर्वात प्रमुख नाव म्हणजे आद्य शंकराचार्य होय . त्यांनी या गुहे मध्ये राहून काही काळ साधना केली होती . याच काळात त्यांना नर्मदाष्टक हे अजरामर काव्य स्फुरले होते असे या भागात मानले जाते . इथे त्यांचा देखील फोटो होता . ही गुहा शंकराचार्यांना दाखवली कुणी असे विचारल्यावर मला गुरुजींनी सांगितले की शंकराचार्यांचे गुरु गुरुगोविंदपादजी महाराज यांची मांधात पर्वतावर गुहा आहे तसेच ते इथेही ह्या गुहेमध्ये येऊन राहायचे व त्यामुळेच त्यांनी आद्य शंकराचार्यांना ह्या गुहेत साधना करायला सांगितले . गुरुजी सांगत होते तसा अंगावर काटा येत होता ! जे नर्मदाष्टक परिक्रमावासी रोज म्हणतात आणि मी देखील काठाने चालताना बरेचदा जे मोठ्याने म्हणायचो ,त्या स्तोत्राची ही जन्मभूमी आहे या कल्पनेनेच अंग शहरून गेले ! गुहा अतिशय सुंदर आणि ऊर्जेने भारलेली होती आत मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांची देखील एक मूर्ती होती . अक्कलकोट स्वामी हे नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रचिती देत असतात . मला आज इथे स्वामींनी दर्शन दिले तसे काल मौनी बाबा आश्रमामध्ये विश्रांती घेत असताना अक्कलकोट स्वामींच्या मराठी गाण्यांची एक सीडी तिथे मला सापडली ! त्यातील सर्व गाणी मला पाठ होती . त्यामुळे त्या सीडीवरील नाव वाचावे आणि ते गाणे मी गायला सुरू करावे ,अशा तऱ्हेने स्वामींची गाणी इथपर्यंत आलो होतो ! आणि आज लगेच स्वामींनी दर्शन दिले ! या परिसराची काही चित्रे आपल्या माहिती करता देत आहे .
इथेच बसून आम्ही गप्पा मारल्या
मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झालेले आहे
श्री राजेश्वरी माता त्रिपुरा सुंदरी देवी
इथे अजून एक गंमत अशी झाली की शुभम जोशी गुरुजी बंगाली बाबुला म्हणाले की तू कपाळाला काहीच का लावत नाहीस ? बंगाली बाबू ने उडवा उडवी चे उत्तर दिल्याबरोबर स्वतः शुभम जोशी यांनी त्याच्या कपाळावर सुंदर असा चंदनाचा टिळा लावून कुंकवाचा नाम ओढला . आणि त्याला कुंकवाचे , तिलक लावण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याने देखील महत्त्व समजल्यासारखे केले आणि बाहेर गेल्याबरोबर नाम पुसून टाकला ! अशा लोकांना शक्यतो आपण एकटे किंवा वाऱ्यावर सोडून देतो . परंतु माझे मत थोडेसे विपरीत आहे . जो आधीचाच भक्त आहे त्याच्यावर डोके फोड करण्यापेक्षा जो अभक्त आहे त्याला भक्तिमार्गाला लावणे हे अधिक कौशल्याचे आणि कठीण काम आहे . त्यामुळे ह्या मुलासोबत बराच वेळ चालून मी त्याच्याशी विविध सामाजिक , धार्मिक , आंतरराष्ट्रीय ,राजकीय विषयांवर चर्चा करायचो आणि त्याची मते अधिक सकस आणि सरस ठरावीत यासाठी त्याला वास्तविक परिस्थितीचे भान द्यायचो . मला त्यात कितपत यश आले हे मला जाणून घ्यायचे नसून , माझ्याकडून निष्क्रियता त्यागून काही प्रयत्न झाले हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे . फळाची आशा न धरता जर असे सर्वच सज्जन कर्म करू लागले तर दुर्जनांची मती पालटायला वेळ लागणार नाही .समर्थ म्हणतात ,
गतीकारणे संगती सज्जनांची।
मती पालटे सूमती दुर्जनाची ।
शुभम जोशी गुरुजींच्या संगतीमुळे काही काळ का होईना बंगाली बाबूंची मती पालटली होती ! असो
इथून पुढे निघालो आणि किनारा पकडला .
आज काठाने चालताना सर्वत्र चिखल लागत होता . चिखल होण्याचे कारण म्हणजे नर्मदेच्या काठावर असलेल्या शेकडो पाणी उपसणाऱ्या मोटर्स ! या पंपांच्या जोडामधून आणि पाणी वाहून देणाऱ्या नळ्यांच्या जोडांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सांडायचे . प्रचंड काटेरी जंगले देखील या भागात होती . बाभळीच्या काट्यांचा भडिमार झालेला सगळा परिसर होता ! तमिळनाडू मध्ये वृक्षांवर काम करणाऱ्या माझ्या एका डाव्या समाजसेवी मित्राने मला सांगितले होते की पूर्वी रशियन विमाने भारतावरून फिरून कुबाभूळ या झाडाच्या बिया सर्वत्र फेकत असत . त्यांचा हेतू इतकाच होता की त्यामुळे भारतातील सुपीक जमिनीचे प्रमाण कमी होत जावे . किंवा सुपीक जमीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कष्टामध्ये वाढ व्हावी . आज भारतभर प्रवास करताना जेव्हा बाभळीची वनेच्या वने दिसतात तेव्हा लक्षात येते की हा हेतू यशस्वी झालेला आहे . असो . पाण्याच्या मोटर जड असतात त्यामुळे त्यांना नेणे आणणे सोपे जावे म्हणून तोफे सारखे गाडे केलेले या भागात आढळतात . हे गाडे उंच असल्यामुळे याच्यावरती मोटरचा सहा इंची किंवा चार इंची पाईप तिरका वर चढत जातो आणि तो पार करता येणे अवघड होऊन जाते . तसेच या पाईपला छिद्रे पडलेली असतात किंवा फाटलेला असतो किंवा जोड असतो तिथून प्रचंड पाणी गळत असते . कधी कधी पंधरा-वीस फूट उंचीच्या चिळकांड्या उडत असतात . हे पाईप आणि मोटर पर्यंत वीज नेणाऱ्या वायर्स पाहून काळजीपूर्वक चालावे लागते . यामध्ये जरा जरी हलगर्जीपणा झाला तरी चुकीला माफी नाही ! कधी कधी या पद्धतीने झालेला चिखल १०० - २०० मीटर पर्यंत पसरलेला असायचा . त्यातून मग अतिशय सावधपणे चालावे लागायचे . पुढे बडा आली अथवा अली बुजुर्ग नावाच्या गावापासून खरगोन जिल्हा चालू झाला .खंडवा जिल्ह्यामध्ये मुबलक चिखल होता .खरगोन जिल्ह्यात त्याचे प्रमाण कमी झाले . इथे आगे रस्ता नही है हे वाक्य आता तोंडपाठ करून टाकले होते . जो भेटेल तो सांगायचा बाबाजी आगे रस्ता नही है । परंतु मी जेव्हा माझा निश्चय सांगायचो की मला काठानेच चालायचे आहे तेव्हा मात्र लगेच रस्ता सांगितला जायचा . रस्ता सांगितला जायचा म्हणजे काय तर फक्त गावांची नावे जाणून घ्यायची . रस्ता तर सोपाच आहे ! नर्मदेचा काठ ! पुढे एका सिताराम बाबांचा आश्रम लागला . छोटा बंगाली सुद्धा माझ्या मागे येतच होता . या आश्रमामध्ये तीरथदास महाराज नावाचा एक स्त्रैण साधू होता . या गावाचे नाव होते कटार . इथे सुंदर असे स्नान केले आणि भोजन केले . आता हळूहळू उकाडा वाढतो आहे असे लक्षात आले . आईच्या मायेने साधूने जेवायला वाढले .आश्रम अतिशय सुंदर होता आणि शांत निवांत होता . तिथे एक वयोवृद्ध माताजी सेवा करताना दिसल्या . मैया चे पाणी उपसून नळ तयार केला होता . नळी काळी असल्यामुळे ती उन्हा मध्ये प्रचंड तापत होती आणि त्यामुळे नळाला गरम पाणी येत होते . तिथे मी मस्तपैकी आंघोळ करून घेतली . साडेतीन वाजता पुढे निघालो . या कटार गावामध्ये अनेक आश्रम आहेत . करपात्री महाराजांचा आश्रम , गणेश दास महाराजांचा आश्रम ,निरंजन आखाड्याचा आश्रम ,नर्मदा सेवा आश्रम असे अनेक आश्रम येथे पाहायला मिळतात . ज्या आश्रमामध्ये परिक्रमावासी आधी पोहोचतो किंवा ज्या आश्रमातून त्याला बोलावणे येते तिथे जाण्याचा योग त्या त्या परिक्रमावासीच्या नशिबामध्ये असतो . एकदा एखाद्या आश्रमात तुम्ही आसन लावले की दुसरीकडे कोणी जात नाही . इथे गणेश दास बाबा नावाचे एक अगडबंब साधू राहतात . हार्मोनल डिसऑर्डर मुळे अर्थात संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे आलेला अति स्थूलपणा या महाराजांनी आपल्या अखंड साधनेने , नामस्मरणाने आणि तपाचरणाने खुजा करून दाखविला आहे .
पंचाग्नी साधना करताना गणेश दास महाराज
श्री गणेश दास महाराज कटार
इथून पुढे मला एक सामाजिक वास्तव लक्षात येऊ लागले ते नमूद करून ठेवतो . या संपूर्ण परिसरामध्ये वनवासी आदिवासी बांधवांचे बाहुल्य आहे . या लोकांना नर्मदा मातेला देवी न मानता जलदेव नावाचा दुसरा खोटा देव उभा करून त्याच्या मागे लावण्याचे षडयंत्र काही डाव्या चळवळीतील कार्यकर्ते इथे करत आहेत . लवकरच इथल्या मुलांमध्ये नक्षलवादाविषयी प्रेम निर्माण होऊन ते नक्षलवादी चळवळीमध्ये सामील होऊ शकतात अशी परिस्थिती तिथे वावरताना मला जाणवली . यावर वेळीच उपाययोजना करून या मुलांना राष्ट्रनिर्मितीच्या मूळ प्रवाहात आणणे अतिशय आवश्यक आहे . अन्यथा पुन्हा एकदा विनाकारण संघर्ष उभा राहणार हे निश्चित आहे . प्रस्थापित वर्णांमध्ये संघर्ष उभा करून त्या निमित्ताने सरकारच्या नाकी दम आणून सरकार कसे नाकर्ते आहे हे सिद्ध करून दाखवणे , व्यवस्था कशी कामाची नाही हे पटवून सांगणे आणि देशातील सत्ता ,प्रस्थापित सत्ता असे म्हणूयात फार तर , तिला उलथवून टाकून डाव्या विचारांचे राज्य आणणे ही मोडस ऑप्रेंडी प्रत्येक देशामध्ये अगदी याच पद्धतीने राबवली जाते , तशी इथे देखील राबवली जात आहे . सामाजिक आस्था असणाऱ्या लोकांनी या भागामध्ये येऊन कार्य करणे अतिशय अत्यावश्यक आहे . जय जलदेव ,जय बडा देव वगैरे पाट्या तुम्हाला इथल्या तरुणांच्या गाड्यांवर दिसतात . त्या देवांना विरोध नसून त्या देवांच्या आडून होणाऱ्या राष्ट्रविघातक आणि राष्ट्र विभाजक विचारांच्या प्रचार प्रसाराला हा विरोध आहे . असो . मध्यंतरी जगद्गुरु नरेंद्रनाथ महाराज नाणीज यांचा एक आश्रम होता आणि अक्कलकोट स्वामींना समर्पित एक आश्रम होता . परंतु अजून उजेड असल्यामुळे चालत राहिलो .
अक्कलकोटस्वामी मठ
इथून
पुढे किनाऱ्याने चालता चालता टोकसर नावाचे गाव आले आणि तिथला भव्य दिव्य
आश्रम पाहून डोळे दिपले ! निर्विवाद पणे हा नर्मदे काठी असलेल्या अनेक
मोठ्या आश्रमांपैकी एक आहे . इथे अतिशय व्यवस्थित पद्धतीने परिक्रमावासींचे
आगत स्वागत आणि व्यवस्थापन केले जाते .त्यासाठी जनकल्याण समितीने खूपच
भव्य दिव्य असा आश्रम उभा केला असून त्याची अत्यंत सुंदर व्यवस्था लावलेली
दिसते . इथे अनेक मंदिरे असून औरस चौरस पसरलेला मोठा हॉल आहे
,ज्याच्यामध्ये अनेक परिक्रमावासी विश्रांती घेऊ शकतात . मागच्या बाजूला
चक्क बांधलेले संडास आहेत ! भोजनाची देखील अप्रतिम व्यवस्था आहे .
गौतमेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि गोमुख घाट आहे . परिक्रमावासींच्या
निवासासाठी बांधलेल्या सभागृहातील खांब अतिशय सुंदर आहेत .परिसरामध्ये
अतिशय सुंदर उद्यान निर्माण केलेले आहे . या आश्रमामध्ये आधी मी एकटाच होतो
. नंतर तिथे छोटा बंगाली आला .त्याशिवाय अमरकंटकच्या जंगलात माझ्यासोबत
असलेला भूषण स्वामी देखील इथे भेटला . आणि एक ओडिया तरुण परिक्रमावासी
भेटला ,जो सुशिक्षित होता .उच्च विद्या विभूषित होता . परंतु खास नर्मदा
परिक्रमा काय असते त्याचा अनुभव घेण्याकरता परिक्रमेला निघालेला होता .
याने उशिरा परिक्रमा चालू केली असल्यामुळे त्याला पुढे एकट्याला चालावे
लागणार होते . मी त्याला परिक्रमा कशी असते वगैरे सर्व माझ्या परीने
समजावून सांगायचा प्रयत्न केला . मोहन साधूने मला जे काही सांगितले होते
त्याचा मला प्रचंड फायदा झाला होता . तेच डोक्यात ठेवून मी त्याला सांगेन
गोष्टी युक्तीच्या चार असे थोडेफार केले . याचे नाव होते मिलन प्रधान . या
घाटावर अतिशय सुंदर असा नर्मदा अंतर्गत स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता
! म्हणजे एक असा चौकोनी खोल चौथरा तयार केला होता जिथे पाणी शांत व्हायचे
आणि पोहता यायचे ! अनेक तरुण-तरुणी येथे पोहण्याचा आनंद घेताना दिसले .
सर्व मंदिरांची दर्शने करून भव्य दिव्य सभागृहातील एका पंख्याखाली आसन
लावले .
हाच तो टोकसर चा गोमुख घाट
घाटाच्या
बाजूला नैसर्गिक दगडाला ओलांडत नर्मदेची एक शाखा आलेली आहे . तिच्यावर पूल
केला असून त्यामुळे छोटासा जलतरण तलाव तयार झालेला आहे .
या पुलावरून दगडावर जाता येते किंवा थेट पाण्यात उडी मारता येते .
परंतु दगडावर जाऊन उडी मारण्याचा आनंद काही वेगळाच आहे !
लहान थोर सर्वजण हा आनंद सतत घेतात !
अर्थात परिक्रमावासी या दगडावर जाऊ शकत नाहीत परंतु आपल्या माहितीकरता हे संग्रहित फोटो जोडत आहे .
परिसर अतिशय सुंदर अशा उद्यानांनी भरलेला आहे .
अतिशय कलाकुसर पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने रंगविलेल्या खांबांनी परिक्रमावासी निवास सभागृह बांधण्यात आलेले आहे .
गौतमेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे
गौतमेश्वर महादेव
सुंदर यज्ञशाळा
परिक्रमा वासी निवास सभागृह
नर्मदा पात्रातून दिसणारा आश्रम आणि मंदिराचा विस्त्रीर्ण परिसर
या भागातील नौका
ओडिया परिक्रमावासी मिलन प्रधान
याने परिक्रमेसाठी सर्व आधुनिक साधने आणली होती . मी त्याला माझ्या परीने नियम समजावून सांगितले की गॉगल वगैरे परिक्रमेमध्ये चालत नाही . पुढे हा किती दिवस चालला काही कळाले नाही . परंतु एकट्याने इतक्या उशिरा परिक्रमा चालू करणे ती देखील उन्हाळ्याच्या सुमारास , हे सोपे नक्कीच नाही . त्या रात्री एक गमतीशीर परंतु भीतीदायक प्रकार घडला . खूप दिवसांनी भेटल्यामुळे भूषण स्वामींच्या आणि माझ्या आत्मय गप्पा रंगल्या होत्या . सतत चालल्यामुळे शांत बसायला पायांना नको वाटते . त्यामुळे भूषण मला म्हणाला की चल आपण बाहेर फेरफटका मारता मारता गप्पा मारू ! एखादी गोष्ट कशी तुम्हाला बोलावून तिच्याजवळ आणते याचे हे उदाहरण बर का ! तिन्ही सांजा झाल्या होत्या आणि चांगलाच अंधार पडला होता . पायाखाली समोर आजूबाजूला काय आहे काहीही दिसत नव्हते . इतक्यात चालता चालता माझे समोर लक्ष गेले आणि मी भूषण ला बाजूला ढकलले ! एक क्षणभर त्याला राग आला ! मी त्याला म्हणालो पटकन तुझा मोबाईल काढ आणि बॅटरी लाव ! त्या विजेरीच्या उजेडामध्ये सळसळत जाणारा काळाकुट्ट पूर्ण वाढ झालेला अतिविषारी मण्यार साप दिसला ! भूषणने मगाशी अक्षरशः त्या सापावर पाय टाकला असता ! गंमत म्हणजे आम्ही दोघेही अनवाणी होतो ! इतक्या अंधारामध्ये तो काळा साप मला कसा काय दिसला काय माहिती ! परंतु भूषणचा पाय खाली पडता पडता मी त्याला ढकलला आणि त्यामुळे तो थोडासा हेलपाटला . परंतु जेव्हा त्याने तो विषारी साप पाहिला तेव्हा त्याला हायसे वाटले की आपला प्राण वाचला
त्या
सापाने अजून कोणाला दंश करू नये , आणि विषारी सर्प म्हणून त्याला कोणी
मारून टाकू नये म्हणून मी त्याला हळूच उचलला . एका पिशवीमध्ये तात्पुरता
भरला . आणि शेजारी असलेल्या जंगलामध्ये सोडून दिला . सर्पमित्र अनिल खैरनार
, राजाभाऊ शिर्के , अमित गाडेकर , संजय जोशी यांच्याकडून प्रत्यक्ष आणि
सर्पमित्र राम नाना भुतकर , आनंद चिट्ठी , निर्झरा चिट्ठी यांच्याकडून
अप्रत्यक्ष पणे घेतलेल्या ज्ञानाचा अशा रितीने परिक्रमेमध्ये फायदा झाला .
मण्यार हा सर्प शक्यतो मध्यरात्री संचार करतो . त्यावेळेस त्याला पकडता
येणे अशक्य असते . आत्ता त्याची संचाराची वेळ नसल्यामुळे हालचाली थोड्याशा
मंदावलेल्या होत्या . परंतु तो प्रसंग भूषण स्वामी आणि माझ्या चांगल्या
लक्षात राहील ! इथे भोजनगृहामध्ये सुंदर अशी टेबल खुर्च्यांची व्यवस्था
केलेली आहे ! परिक्रमेमध्ये गजानन महाराज आश्रम सोडल्यावर इथेच टेबल
खुर्च्या पाहिल्या ! सेवेकरी अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने भरपेट जेवायला
वाढत होते ! संपूर्ण परिक्रमेमध्ये सर्वत्र तुम्हाला ताजे ताजे गरमागरम
अन्न वाढले जाते ! एक वेळ घरी आपले शिळे खाणे जास्त होते , परंतु
परिक्रमेमध्ये शिळे खाण्याची वेळ येत नाही . रात्री आम्ही सर्वजण गप्पा
मारत पाठ टेकली . राम कुटीमध्ये रात्री गाणी ऐकणारा साधू माझ्या दंडाला
घाबरून कसा जंगलात पळून गेला याची कथा बंगाली बाबूला अतिरंजीत वाटायची
.परंतु प्रत्यक्ष साक्षीदार आज उपस्थित असल्यामुळे मी भूषणलाच तो प्रसंग
सांग , असे सांगितल्यावर त्याने संपूर्ण किस्सा बंगाली बाबूला ऐकवला आणि
त्याची खातरजमा झाली . दरम्यानच्या काळात कुठे कुठे काय काय पाहिले , कुठे
कुठे कोण कोण भेटले ,याची उजळणी करत आणि देवाणघेवाण करत हळूहळू
निद्रादेवीला आधीन झालो .
हा परिक्रमेतला बासष्ठावा मुक्काम ठरला . दिनांक होता ४ मार्च २०२२ .
लेखांक एक्काहत्तर समाप्त ( क्रमशः )
लेखांक ७२ : रावेरखेडी मध्ये समाधीस्थ बाजीराव पेशवा अन् शिवलिंग निर्मिती साठी प्रसिद्ध बकावां
काठाने चालत चालत जाताना लक्षात आले की या संपूर्ण भागामध्ये नर्मदा नदीचे पात्र अतिशय विस्तीर्ण आणि उथळ आहे . तसेच खाली गाळ किंवा वाळू नसून संपूर्ण खडक आहे ! त्यामुळे घोड्यावरून नदी ओलांडण्यासाठी हा सर्वोत्तम प्रदेश होता . इतिहास असे सांगतो की नर्मदा मातेने महाराष्ट्राचे आणि पर्यायाने दक्षिण भारताचे यावनी आक्रमणापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण केलेले आहे . कारण वर्षातील चार ते सहा महिने नर्मदा दुथडी भरून वहायची . त्यामुळे तिला ओलांडता येणे अशक्य होते . त्यामुळे शत्रूला वर्षातील काही काळच महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहता यायचे . त्यातही नर्मदा प्रत्येक घाटावर उल्लंघ्य नाही . त्यामुळे या भागासारखे थोडेसेच प्रांत आहेत जिथून घोडदळा सकट सैन्य नर्मदा पार करू शकते . या भागातून मराठ्यांचे घोडे अनेक वेळा गेलेले आहेत . अटकेपार झेंडा लावताना किंवा पानिपतच्या युद्धाला जाताना मराठ्यांनी हाच मार्ग वापरला होता . त्यामुळेच मराठेशाहीच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे . इथे मराठेशाहीतील काही बांधकामे आपल्याला आढळतात . विशेषतः नदीवर स्त्रियांना सुरक्षितपणे पाणी भरता यावे यासाठी बांधलेले घाट आणि पाण घाट अथवा पनघट देखील आढळतात . मोहे पनघट पर नंदलाल छेड गयो रे हे गाणे आपण ऐकलं असेल . यातील पनघट म्हणजे पाणी भरण्याचा घाट . या घाटाकडे जाणाऱ्या स्त्रियांवर कोणी वाईट नजर टाकू नये म्हणून आठ ते दहा फुट उंचीच्या भिंती दोन्ही बाजूने बांधलेल्या असतात . आणि नदीच्या बाजूला एक छोटेसे दार असते . भिंती पाण्यामध्ये बुडलेल्या असल्यामुळे भिंतीच्या बाहेरून येणारा माणूस पनघट मध्ये जाऊ शकत नाही . प्रत्यक्षात मला असे जाणवले की या पनघट मधून संपूर्ण घोडदळ देखील इकडून तिकडे जात असावे . असाच एक मोठा पनघट आम्हाला आडवा लागल्यावर तो ओलांडायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला . त्याची भिंत सुमारे दहा फूट उंच होती . धावत येऊन भिंत चढावे तर ते शक्य नव्हते . मग आजूबाजूला पडलेली दगडे रचून मी थोडीशी उंच पायरी तयार केली . त्यावरून मोठ्या कष्टाने भिंतीवर चढलो माझ्यामागे छोटा बंगाली येतच होता . त्यालाही एका हाताने वर घेतले . इथे मात्र त्याचे पाय लटलट कापायला लागले . आता आम्हाला आडवी आलेली ती भिंत पूर्णपणे पार करायची होती . च्या दोन फूट रुंदीच्या दगडी भिंतीवरून आधी उजवीकडे चालत जाऊन , मग दरवाजा ओलांडून पुन्हा डावीकडे वळून समोरच्या बाजूची भिंत ओलांडून ,त्याच्या पलीकडे उडी मारायची होती . काही लोकांना उंचीवरून खाली बघण्याचा फोबिया असतो . अर्थात भय असते . तसे सात्यकी चे झाले होते . बर तो माझ्यापुढे असल्यामुळे मी त्याला ओलांडू सुद्धा शकत नव्हतो . अखेरीस घाबरून तो खाली बसला . तो खाली बसल्याबरोबर मी त्याला ओलांडले आणि धावतच ती संपूर्ण भिंत पार करून पलीकडे उडी मारली . याला ती भिंत पार करायला अर्धा तास लागला . जी साधारण ३० , ४० सेकंदामध्ये पार करता येणे शक्य होते . उजवीकडे तोल गेला तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता आणि डावीकडे तोल गेल्यावर आत मध्ये माजलेल्या गवतामध्ये ,खडकाळ पृष्ठभागावर पडण्याची खात्री होती . अखेरीस कसा बसा बंगाली बाबू पार झाला . उतरण्याच्या बाजूला एक कट्टा केलेला होता . त्यामुळे उतरणे तुलनेने सोपे होते . हे खेयगाव नावाचे गाव होते . गुगल नकाशावर मला ही पनघट सापडली . आपल्यासाठी तिचे उपग्रह चित्र सोबत जोडत आहे .
याच्यावरून देखील मार्ग होता परंतु मी नर्मदा जलाच्या जवळून चालत असल्यामुळे पनघट ओलांडणे माझ्यासाठी जास्त सोपे होते .
या पाणी भरण्याच्या घाटा पेक्षा देखील वैशिष्ट्यपूर्ण असे काहीतरी आज मला नर्मदेमध्ये पाहायला मिळाले ! ही पनघट लागण्याच्या थोडेसे अलीकडे गंगातखेडी नावाचे एक गाव लागले . इथे नर्मदा पात्राच्या मधोमध महादेवाची पिंड असून तिथे नर्मदेला भेटण्यासाठी साक्षात गंगा प्रकट झालेली आहे अशी मान्यता आहे .त्यामुळे नर्मदेचे वाहणारे जल इथे आपला प्रवाह उलटा वळविते आणि गंगेला एक प्रदक्षिणा मारून पुन्हा पुढे मार्गस्थ होते ! आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहता येतो ! सरळ पश्चिमेकडे वाहणारे पाणी अचानक उत्तरेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे वळते आणि वळसा मारून पुन्हा एकदा पश्चिमेकडे वाहू लागते ! मधोमध असलेल्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून नर्मदा माता पुढे जाते ! हे दृश्य साध्या डोळ्यांनी देखील पाहायला अतिशय सुंदर ,मनोहर आणि आश्चर्यकारक आहे . इथे एका वानप्रस्थाश्रमी गृहस्थाने छोटीशी कुटी टाकली होती . तिथे बसवून त्याने प्रेमाने चहा पाजला आणि बालभोग खायला दिला . समोरच गंगेची परिक्रमा करणारी नर्मदा माता पाहून धन्य धन्य वाटले ! या भागाची आंतरजालावर मिळालेली काही चित्रे आपल्याकरिता सोबत जोडत आहे ज्यामुळे आपल्याला नक्की काय प्रकार होतो आहे याची कल्पना येईल .
एरवी उजवीकडून डावीकडे प्रवाहित होणारी नर्मदा मैया येथे या महादेवांना आणि गंगेला परिक्रमा करताना उलटी वाहते .
भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर इथे खडकांची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यामुळे एक विवक्षित उतार तयार होतो ज्यामुळे नर्मदा ज्याला उलटे व्हावे लागते . या ठिकाणी नावेने जाऊन दर्शन घेता येते . अर्थातच परिक्रमावासी या स्थानावर कधीच जाऊ शकत नाहीत .
गंगातखेडी येथील गंगा प्राकट्य स्थानाच्या कट्ट्यावरूनच घेतलेली ही सर्व छायाचित्रे आहेत . जी आपल्याला दाखवीतात की या भागातील दगड कसे उथळ आणि उतार असलेले आहेत .
गंगात खेडी येथील नर्मदा पात्रातील खडकाळपणा लक्षात घेतला म्हणजे आपल्याला कळेल की इथे नदी पार करणे सोपे आहे .
समोरून आपल्याकडे येतायेता अचानक डावीकडे वळलेली नर्मदा मैय्या .
या भागात नर्मदा पात्रामध्ये असलेल्या खडकाळ तळावर वरून वाहून आलेले खडे दगड गोटे गडगडत जाताना घासून घासून त्याची शिवलिंगे तयार होतात . त्यामुळे नर्मदेच्या पात्रात सर्वाधिक शिवलिंगे तुम्हाला या भागात सापडतील याची खात्री बाळगा . तरी यापूर्वी जिथे शिवलिंग तयार व्हायची ते धाराजी हे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर धरणामध्ये बुडून गेले आहे . आणि धरण ओलांडून तयार झालेली शिवलिंगे पुढे वाहू शकत नाहीत त्यामुळे आता जी शिवलिंगे सापडतात ती पूर्वीच तयार झालेली आहेत . या भागामध्ये अनेक रंगीबेरंगी दगड मात्र सापडतात . बहुरंगी दगड हे इथले वैशिष्ट्य आहे . लाल तांबूस तपकिरी पिवळा हिरवा निळा असे रंग एकाच दगडामध्ये आढळतात . या दगडाला शिवलिंगाचा आकार प्राप्त झाला की ते शिवलिंग त्यामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसते . गंगातखेडी येथील गंगामैयाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो . पन घट पार केली . मध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आणि आश्रम लागतात . नर्मदा मातेचे या भागातील रूप वेगळेच आणि सुंदर आहे .
नर्मदेचा खडकाळ किनारा . इथून चालायला थोडेसे धोकादायक असले तरी मजा येते .
मध्ये लागलेले एक हनुमान मंदिर
नर्मदा किनाऱ्याजवळील खडकांचा आकार आणि प्रकार लक्षात घ्या . प्रचंड खडक हीच इथल्या पात्राची ओळख .
या भागातून चालताना परिक्रमा वासिनी आपला पाय मुरगळणार नाही याची काळजी घ्यावी . प्रत्येक पाऊल एकाग्रतेने विचारपूर्वक टाकावे . नर्मदेच्या काठी दिसणारे मोठ्यात मोठे दगड सुद्धा अतिशय अस्थिर असतात हे मी खूप वेळा अनुभवले . अगदी फूट दोन फुटापर्यंत ते हलू शकतात . त्यामुळे प्रत्येक पाऊल पायाखालचा पृष्ठभाग तपासून मगच टाकावे हेच अधिक हिताचे आहे .
या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरे परकीय आक्रमकांनी भग्न केलेली आहेत .त्यामुळे अशा प्रकारच्या प्राचीन हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा खच या भागात सर्वत्र आढळतो .
हे सर्व भग्न अवशेष पाहून मन विषण्ण होते .
आपल्या देशातील धर्म कुठल्या अवस्थेला पोहोचला होता हे लक्षात त्याचे असेल तर नर्मदा खंडामध्ये भ्रमण करावे . पावला पावलावर तुम्हाला तुटलेल्या मंदिरांचे अवशेष सापडतील . वरील फोटोत पहा तुटलेल्या एका मूर्तीचा चेहरा शिवलिंग म्हणून बसवला आहे . आपल्या देशामध्ये पूज्य मानल्या गेलेल्या प्रत्येक प्रतीकाचा अपमान परकीय आक्रमकांनी , वेळोवेळी मिळेल त्या पद्धतीने केलेला आपल्याला आढळतो . काही ठिकाणी शिवलिंगांचा वापर पायरी म्हणून केला गेला . काही ठिकाणी वजू खान्यामध्ये अर्थात पाय धुण्याच्या जागी शिवलिंग वापरले गेले . अनेक मूर्तींची मुंडकी उडवली गेली . अनेक मंदिरे तोडली फोडली . अनेक मूर्ती पूजक यम सदनी धाडले गेले . अनेक घराणी नष्ट केली गेली . अनेक सुंदर स्त्रिया भ्रष्ट केल्या गेल्या . जिथून मराठा फौजेची ये जा होते त्या भागात स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी पनघट बांधणे स्वाभाविक आहे . परंतु नर्मदे सारखी पवित्र नदी समोर असताना तिचे पाणी भरणाऱ्या स्त्रीला आपल्या अब्रूची भीती वाटावी अशी परिस्थिती या देशांमध्ये निर्माण झाली होती यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो . संत आणि नदी यांच्यामध्ये एक साम्य आहे . "जो जे वांछील , तो ते लाहो "असा त्यांचा भाव असतो . अर्थात ज्याला जे हवं ते त्याला मिळावं . नदी कधी पाणी पिणाऱ्या जीवाचा धर्म वर्ण जात लिंग बघत नाही . तो विवेक आपल्या ठायी असला पाहिजे की आपल्याला त्या नदीच्या संरक्षणासाठी कशी धार्मिक व्यवस्था तिच्या काठावर उभी करायची आहे . बाजीराव पेशव्यासारख्या माणसाला सुद्धा नर्मदेने भुरळ घातली आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे . संपूर्ण भारत खंडावर ज्याची समशेर एकेकाळी राज्य करत होती असा बाजीराव नर्मदे काठी चिरनिद्रिस्त झाला ही अतिशय महत्त्वाची घटना आहे . बाजीरावाच्या घोड्याने कावेरी पासून गंगा यमुना सिंधू ते अगदी अटकेपार च्य अफगाणी नद्यांचे पाणी पिलेले आहे असे असताना , शेवटचा श्वास त्याच्या मालकाने नर्मदे काठी घ्यावा यातच या नदीचे महान पण सामावलेले आहे . असे म्हणतात की शेवटच्या काळाला नर्मदेच्या काठी असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे बाजीराव पेशवा यांना लूचा त्रास झाला . हे "लू" लागणे म्हणजे किती बेकार प्रकार असतो याचा अनुभव मी घेतलेला होता . तीव्र उन्हामुळे उन्हाळी लागते आणि मनुष्याचे हळूहळू खंगत जाऊन निधन होते . अशाप्रसंगी बाजीरावांना पुण्याला किंवा अन्य कुठेतरी हलवता येणे शक्य होते परंतु त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल की मला शेवटचा श्वास नर्मदा तीरावरच घेऊ द्यावा . . . आज संपूर्ण मार्ग चालताना डोक्यामध्ये फक्त मराठ्यांचा तेजस्वी ,देदीप्यमान इतिहास निनादत होता . असे वाटायचे की क्षणात डावीकडून हजार एक घोडदळ येईल आणि एखादा मावळा जाता जाता मला म्हणेल , " नर्मदे हर बाबाजी ! ही घ्या साखर ! तोंड गोड करा ! आपला भगवा झेंडा अटकच्या किल्ल्यावर फडकला आहे ! " आणि बघता बघता ते सर्व घोडे चब डब चब डब आवाज करत नर्मदेच्या लाटा चिरत पैलतीर गाठतील आणि वेगाने उत्तरेकडे रवाना होतील ! धर्मवीर बलिदान मास सुरू होता . छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदानामुळे पेटून उठलेल्या मराठा सैन्याने उभा आडवा हिंदुस्तान एक करून टाकला ! त्यांच्या चरण धुळीने पावन झालेला हा परिसर होता ! ही फौज काही पगारी सैनिकांची नव्हती . इथे स्वतःची पैरण , स्वतःचा घोडा , स्वतःची ढाल , स्वतःची तलवार आणि स्वतःची भाकरी घेऊन येणारा मावळा स्वतःच्या जीवाची बाजी एका महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी लावत असे .हे महान स्वप्न , ही जाज्वल्य निष्ठा , हे अद्वितीय साहस ,हा अतुलनीय पराक्रम , हे असामान्य शौर्य त्यांच्या हृदयानंतर्यामी निर्माण करणाऱ्या सर्वच प्रातःस्मरणीय परमेश्वरी अंशांना साष्टांग नमस्कार करता झालो . तिथली चिमूटभर माती घेऊन जिभेवर टाकली . न जाणो कोण्या एखाद्या अणू रेणू मधून राष्ट्रनिष्ठेसाठी धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या स्वेदबिंदूचा अंश किंवा रक्ताच्या सांडलेल्या थेंबातला बाणेदार पणा माझ्या शरीरात जाऊन गुणसूत्रांमध्ये घुसावा . बाजीराव पेशवा यांची समाधी जसजशी जवळ जवळ येऊ लागली तस तसा माझ्या अश्रूंचा बांध रोखून धरणे मला अवघड होऊ लागले . कोण कुठले दक्षिणेतल्या बादशहाचे सरदार ! त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो काय , आणि साऱ्या भारत वर्षाचे भाग्य पुन्हा बदलून टाकतो काय ! ठरवले असते तर आयुष्यभर महालामध्ये बसून आयुष्य ऐशो आरामात जगता आले असते .परंतु ते सहज प्राप्त आयुष्य नाकारून स्वतःच्या तलवारीने स्वतःच्या धर्माधिष्ठित राज्याच्या सीमा आखणारा लोकोत्तर पुण्य पुरुष म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ! त्यांच्या उपदेशाला अनुसरून ह्या राज्याचा कैकपटीने विस्तार करणारे त्यांचे अतिपराक्रमी पुत्रोत्तम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ! आणि त्यांच्या अपूर्ण मनीषा पूर्ण करण्यासाठी अखंड हिंदुस्थानात घोड्यावर स्वाऱ्या करून उभा आडवा हिंदुस्तान पुन्हा एका सूत्रात बांधणारा महापराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा ! ज्याने आयुष्यामध्ये झोपेत सुद्धा वेळ वाया घालवला नाही असा बाजीराव ! असे म्हणतात की बाजीराव दोन घोडे घेऊन चालायचा त्यातील एका घोड्यावर तो झोपत असे आणि दुसरा घोडा पहिल्या घोड्याला मार्ग दाखवत असे . इतका भीमा पराक्रम गाजविणारा हा महायोद्धा इथे चिरनिद्रिस्त झाला आहे या नुसत्या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येत होता . ब्रह्मदेश ते बलुचिस्तान आणि काश्मीर ते कन्याकुमारी देश एका सूत्रामध्ये बांधला तो या महान योद्धा परंपरेने . इतिहास साक्षीला आहे की जेव्हा जेव्हा आपण हत्यार खाली ठेवले तेव्हा तेव्हा आपल्या देशाचा एक एक भूभाग गमावला आहे . आणि अजूनही आपण इतिहासातून बोध घेऊन शहाणे झालो नाही तर भविष्यामध्ये कदाचित परदेशाचा विसा घेऊन नर्मदा परिक्रमा करावी लागेल .जास्त जुना काळ नाही , केवळ ७५ वर्षांपूर्वी सिंधू काठी राहणारे हिंदू देखील असे सिंधू नदीच्या बाबतीत सांगितल्यावर विनोद समजून हसत होते ! आज आपल्याला सिंधू नदी पाहण्यासाठी पाकिस्तान देशाचा विसा घेऊन जावे लागते . आणि माझ्या उभ्या आयुष्यात मी एकही मनुष्य असा पाहिला नाही की ज्याने खास सिंधू नदीचे दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली आहे . अजून शंभर दोनशे वर्षांनी कदाचित कैलास मानसरोवर यात्रेला हिंदू जाणे बंद करतील . आजच तुम्ही गुगल नकाशावर शोधायला गेलात तर कैलास आणि मानसरोवराची नावे बदललेली आपल्याला दिसतात . एक समाज म्हणून आपण षंढ आहोत त्याची ही परिणती आहे . षंढ माणूस जास्त अपेक्षा ठेवत नसतो . त्याला फक्त दोन वेळचे भोजन मिळाले तरी पुरेसे असते . मी स्वतः गुगल कंपनीला पत्रव्यवहार करून कळविले होते की त्यांनी कैलास मानसरोवर आणि राक्षस ताल ही नावे बदलली नाही पाहिजेत . परंतु त्यांनी मला असे कळविले होते की दोन्ही देशांची ह्या भूभागाच्या मालकीबद्दल सहमती झालेली असल्यामुळे तुमच्या माझ्या मताला काही किंमत राहत नाही . गंमत म्हणजे आजपर्यंत कोणीही मोठ्या संख्येने असा आक्षेप गुगल नकाशावर नोंदवलेला नाही . कारण तो आपला प्रांत आहे तो आपला भूभाग आहे तिथे आपली संस्कृती कधीकाळी नांदत होती याची जाणीवच हिंदू समाजाला नाही . अशा रीतीने शतखंडित झालेला भारत वर्ष , त्याला आज तो ज्या आकारात दिसतो तो आकार देणारा बाजीराव पेशवा ! आणि तेजस्वी मराठेशाहीची परंपरा ! सारेच आज डोक्यामध्ये वादळासारखे घोंगावत होते . ग्वाल्हेर चे शिंदे , बडोद्याचे गायकवाड ,धार चे पवार , इंदोरचे होळकर , नागपूरचे भोसले , पुण्याचे पेशवे सर्वांनी एक दिलाने , एकजुटीने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले . आपली जात पात पंथ भेद विसरून सर्व बलुतेदार त्यांच्या या महान राष्ट्र यज्ञामध्ये आहुती म्हणून सामील झाले . त्या महानतम त्यागाच्या विभूतीवर आज आपले राष्ट्र उभे आहे . बघता बघता समोर भव्य तटबंदी दिसू लागली . मध्यप्रदेश सरकारने उत्तम पैकी खर्च करून मजबूत काँक्रीटीकरण करीत या समाधी स्थळावर महापुराचा कमीत कमी प्रभाव पडेल अशी व्यवस्था केलेली दिसते . पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि महाद्वारापाशी येऊन उभा राहिलो . साधारण चौरसाकृती वाटणारे भव्य दिव्य प्रवेशद्वार या वाड्याला आहे . बाहेर एका मोठ्या झाडाचा पार होता . आत मध्ये गेल्यावर उजव्या हाताला श्रीमंत बाजीराव पेशवा यांची समाधी आहे . समाधीवर डोके टेकले आणि अश्रूंनी समाधीला अभिषेक घातला . मला असे फार वाटते की कुठल्यातरी एका जन्मामध्ये मी या सैन्याचे घोडे सांभाळण्याचे काम करत असणार . किमान त्यांची धुणी धुण्याचे किंवा पायताणे पुसण्याचे काम नक्की करत असणार . माझ्या मागोमाग सात्यकी देखील आत मध्ये आला . एका जुनाट पडक्या वास्तू कडे पाहून मी इतका ढसाढसा का रडतो आहे याचा बोध त्याला होत नव्हता . होणे शक्य देखील नव्हते . आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत . संस्कार हा रक्तातून यावा लागतो . महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसांना रक्तातून मिळालेला जो काही वारसा आहे तो अन्य प्रांतातील लोकांना मिळण्याची शक्यताच नाही . महाराष्ट्र भारतातील एक अग्रेसर राज्य असण्याचे एकमेव कारण हा उदात्त वारसा आहे . बाकी काही नाही . या भागाचे दर्शन आपल्याला घडवतो . ज्याप्रमाणे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किंवा वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही स्थाने हिंदूंसाठी ज्योतिर्लिंगाप्रमाणे पूज्य आहेत तशीच ही समाधी देखील आहे .
नदीपात्रातून चालत आल्यावर समोर अशी मजबूत धारक भिंत आणि त्यावर बाजीराव पेशवा यांची समाधी दिसते .
समाधी पर्यंत येण्याचा काठावरील मार्ग असा आहे
रावेर आणि खेडी अशी दोन वेगळी गावे असून ही समाधी खेडी गावात आहे . रावेर खेडी म्हणजे रावाची खेडी . अर्थात बाजीरावाची खेडी .
अतिशय मजबूत तटबंदीने बंदिस्त अशा एका छोटेखानी किल्ल्यामध्ये ही समाधी आहे .
समाधी स्थळाचे महाद्वार छोटेसे परंतु आकर्षक आहे
संपूर्ण दगडामध्ये केलेले हे बांधकाम अतिशय सुबक आणि भरभक्कम आहे .
समाधी स्थळाच्या बाहेर एक मोठा पिंपळाचा वृक्ष असून त्याचा मोठा पार आहे . तसेच इथे समोर नर्मदा पात्रामध्ये एक मोठे बेट असून नर्मदा दोन शाखांमध्ये विभागून इथे वाहताना दिसते .
श्रीमंत बाजीराव पेशवा यांची हीच ती समाधी
समाधी
समाधी मंदिरातून नर्मदा मातेचे अतिशय सुंदर दर्शन होते . समोर दिसत आहे तो नर्मदेचा पहिला तीर नसून नर्मदे मधील एक मोठे बेट आहे . या बेटाच्या पलीकडून अजून एक शाखा वाहत आहे . इथे बसून राहायला खूप भारी वाटते .
समाधीस्थळाबाहेर लावलेली माहिती
भारतीय पुरातत्व विभागाने लावलेल्या पाट्या
तटबंदीच्या भिंतीवर चढण्याचा मार्ग
महापुरामध्ये ही समाधी जलमग्न होते .
बाजीरावांच्या पत्नी काशीबाई पेशवा यांची समाधी देखील समोरच एका टेकडीवर आहे
कळस जागेवर नसलेलं अत्यंत मोडकळीला आलेलं एक शिवमंदिर असं त्या समाधीचं स्वरूप आहे
मंदिर छोटेसेच असले तरी मराठा स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे .
या समाधी परिसरामध्ये येण्यापूर्वी मी एक अद्भुत घटना अनुभवली होती . भरपूर चालून उष्णता निर्माण झाल्यामुळे अभी मैया मध्ये स्नान करावे असा विचार करून मी एके ठिकाणी स्नानाला उतरलो . मला एक सवय आहे की स्नानाला उतरल्यावर आजूबाजूला काय काय आहे ते पाहून ठेवायचे . माझ्या आजूबाजूला तीन बाजूंनी दगडांची गुळगुळीत झालेली टोके दिसत होती . मी तीन डुबक्या मारून वर आलो आणि आजूबाजूला पाहिले तर ते सर्व दगड गायब झालेले होते . मग मी काठावर असलेल्या एका दगडाकडे लक्ष ठेवले . थोड्या वेळात तो दगड देखील अदृश्य झाला . मग माझ्या लक्षात आले की धरणातून पाणी सोडल्यामुळे नर्मदेची पातळी वेगाने वाढत आहे ! त्यामुळे मी चटकन पाण्यातून बाहेर आलो . माझी झोळी जी मी नर्मदेपासून वीस फूट लांब ठेवली होती ती आता फक्त पाच फुटावर आली होती ! म्हणजे अजून थोडा वेळ जर मी पाण्यात राहिलो असतो तर कदाचित ती वाहून गेली असती ! पाण्याची पातळी किती वेगाने वाढू शकते हे मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले ! गंमत म्हणजे ही पातळी वाढते आहे तुमच्या लक्षात येत नाही ! एका स्थिर गतीने पाण्याची पातळी वाढत जाते . तशीच ती कालांतराने कमी देखील होत जाते . पातळी कमी जास्त झाल्यामुळे जलव्याप्त होणारा परिसर हा शक्यतो चालण्यासाठी उत्तम ठरतो . कारण इथे फारशी झाडे उगवत नाहीत .
इथून थोडेसे पुढे आल्यावर बिबट्याने मारलेली एक गाय मला पाहायला मिळाली . एका गुराख्याने मला सांगितले की बिबट्याने ही गाय मारली आहे . अशा जनावरांपासून आपण थोडेसे लांबच चालावे . कारण जवळपास हिंस्त्र श्वापद असेल तर त्याला अशी भीती असते की तुम्ही त्याचे खाद्य पळवून न्यायला आलेले आहात . आणि त्या भीतीपोटी तुमच्यावर ते हल्ला करू शकते . रावेर खेडी मध्ये आल्यावर काशीबाई साहेबांच्या समाधी शेजारी एक छोटासा आश्रम होता तिथे परिक्रमा वासी उतरतात असे मला सांगण्यात आले . यापूर्वी सकाळी घडलेला एक प्रसंग चांगला धडा शिकवून गेला . आश्रमामध्ये गेल्यावर भोजनप्रसाद तयार होता आणि लोक जेवायला बसलेले होते . परंतु इथे राहणाऱ्या वानप्रस्थाश्रमी साधूने सांगितले की तुम्ही येण्यासाठी पाच मिनिटे उशीर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला भोजन प्रसाद देणार नाही . आमच्यासमोर सर्वजण जेवले परंतु आम्हाला भोजन मिळाले नाही . आम्ही म्हणजे माझ्यापाठोपाठ आलेला छोटा बंगाली सुद्धा . त्याला या प्रकाराचा खूप राग आला . परंतु मी विचार करू लागलो की असे कसे काय झाले असेल आणि मग मला सकाळचा प्रसंग आठवला . सकाळी आम्ही दोघे चालत असताना एका नावाने आम्हाला थांबविले आणि त्याच्या घरी चहा पिण्यासाठी यायची विनंती केली . मी तयार झालो होतो परंतु छोटा बंगाली म्हणाला आपण आत्ता थांबलो तर दिवसा चालणे होत नाही त्यापेक्षा पुढे निघून जाऊ . मी देखील त्याला होकार दिला होता आणि आम्ही दोघे त्या नावाड्याचे मन दुखवून पुढे निघून गेलो होतो . परिक्रमेमध्ये मिळणारे महत्त्वाचे धडे असे असतात . धडा क्रमांक एक सोबत कोणालाही घेऊ नका एकटेच चाला !
धडा क्रमांक दोन कोणीही काहीही दिले तर त्याला नाही म्हणू नका . मैय्याला असे प्रकार केलेले आवडत नाहीत . समोर जेवण असून उपाशी राहण्याची वेळ त्या दिवशी आमच्यावर आली . अखेरीस तो परिसर पुन्हा एकदा नीट पाहावा म्हणून मी बाहेर पडलो . काशीबाई यांच्या समाधी स्थळी रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे . दक्षिण भारतातील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र कायम मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले होते . इथे एकूण बारा पुजारी आहेत जे सर्व मराठी आहेत . यांच्या नेमणुका रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत . कर्वे , बर्वे ,बोकील ,अष्टपुत्रे , दशपुत्रे , रानडे अशी आडनाव असलेले हे सर्व गुरुजी आहेत . यातील बोकील हे रामेश्वरम मठाचे रामदासी मठपती आहेत . भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाव रामनाथ हे रामेश्वराच्या शिवलिंगावरूनच ठेवलेले आहे . दलित समाजातील रामनाथ कोविंद हे परम शिवभक्त आहेत . ते जेव्हा रामानाथाची पूजा करण्याकरता गाभाऱ्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत विजयकुमार बोकील हे रामेश्वराचे मुख्य पुजारी तिथे होते . सांगायचे तात्पर्य रामेश्वराचा आणि मराठी शाही चा जुना संबंध आहे . त्यामुळे हे शिवलिंग मुख्य रामेश्वराला स्पर्श करून आणले असण्याची शक्यता आहे . इथे बसून माझी सर्व शिवाची स्तवने मी म्हणू लागलो . इतक्यात मंदिरामध्ये अनेक स्त्रिया येत आहेत असे माझ्या लक्षात आले . सर्वांच्या हातामध्ये दुधाची वाटी होती . आणि त्या सर्वजणी मिळून बाहेरच्या नंदीला दूध पाजत होत्या . मी लहान असताना एकदा गणपती दूध पीत आहे अशी अफवा महाराष्ट्र मध्ये पसरली होती . अगदी त्याच धर्तीवर नंदिकेश्वर भगवान दूध पीत आहेत अशी अफवा त्या दिवशी मध्य प्रदेशांमध्ये प्रस्रुत झाली होती . अगदी तरुण मुली सुद्धा वेड्यासारखे नंदीला दूध पाजत होत्या . मी त्या सर्वांना सरफेस टेन्शन म्हणजे काय असते आणि त्या पृष्ठभागीय तणावामुळे कुठलाही द्रव पदार्थ कसा खाली येऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले . केवळ मंदिर नव्हे तर कुठलाही दगड दुध पिऊ शकतो हे देखील त्यांना करून दाखवले . परंतु कोणीही माझे सांगणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . उलट मलाच त्यांच्या नेमाडी भाषेमध्ये उलटेपालटे काहीतरी बायका बोलू लागल्या . हा पाखंडी बाबा आहे याला धर्माचे काही ज्ञान नाही वगैरे वगैरे त्या बडबडत होत्या . मी त्या सर्वांना आव्हान दिले आणि नंदीला अजून बरेच पदार्थ पाजून दाखवले . परंतु त्या बायका काही मान्य करेनात . अखेरीस मी त्या सर्वांचा नाद सोडून दिला आणि बाजीरावाची समाधी गाठली . इथे डावीकडे आत मध्ये गेल्यावर एका कोपऱ्यात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय असून येथे चौधरी नामक एक पुरातत्त्ववेत्ता मनुष्य मला भेटला . याने मला खूप सहकार्य केले आणि संपूर्ण परिसराची चांगली माहिती दिली . तसेच या भागामध्ये राहणारा एक तरुण खूप चांगला गाईड म्हणून काम करतो असे सांगून खेडी गावातून त्याला फोन करून बोलावून घेतले . अनिल रामलाल बिर्ला नावाचा मोराण्या गुर्जर जातीचा हा ३५ - ४० वर्षाचा तरुण होता . याला मी आल्या आल्या नमस्कार केला आणि समाधी विषयी माहिती विचारली . मला असे लक्षात आले की याला बाजीरावा पेक्षा स्वतःबद्दल बोलण्यात अधिक रस होता .त्याचे युट्यूब व्हिडिओ कसे हिट आहेत आणि त्यावर तो कशी माहिती सांगतो वगैरे मला तो सांगू लागला . मी त्याला सांगितले की माझ्याकडे फोन नाही तरी कृपया मला तू आत्ता माहिती दे तो मला म्हणाला अशी प्रत्येकाला माहिती देत बसलो तर मग माझे व्हिडिओ कोण बघणार ! मी काही त्याचे व्हिडिओ पाहिले नाहीत परंतु मला खात्री आहे की हे व्हिडिओ देखील अर्धवट ज्ञानाने परिपूर्ण असणार आहेत ! कारण मुळात बाजीराव पेशवा या व्यक्तीबद्दल याच्या अंतकरणात फारसा कळवळा नाही असे मला जाणवले . तो तसा असता तर त्याने ताबडतोब मला सर्व माहिती सांगितली असती . त्याचे अजून एक वाक्य मला खटकले . किमान २५ - ३० लोक असल्याशिवाय मी माझे तोंड उघडत नाही असे तो म्हणाला ! हे ऐकून मला अजूनच वाईट वाटले . संख्यात्मक आणि गुणात्मक धारणा शक्ती याबाबत त्याचा अभ्यास अजून अपूर्ण होता . तो आल्यावर बरेच काही बोलला परंतु त्यात आत्मप्रशस्ती जास्त होती . तरीदेखील त्याला गाईड म्हणून फायदा व्हावा असे काही त्याला ज्ञान द्यावे असा विचार करून मला जो काही मराठीशाहीचा इतिहास माहिती होता तितका मी त्याच्या डोक्यात कोंबला . त्याने अजून एक गंमत केली ती म्हणजे तो मला म्हणाला की माझे नाव सांगा वरच्या आश्रमामध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील ! मी गंमत म्हणून वरती गेल्यावर जेव्हा याचे नाव आश्रमात सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलेकी तुम्ही आधीच आसन लावले आहे म्हणून ठीक आहे .नाहीतर या माणसाचे नाव सांगितल्यावर तुम्हाला आसन लावायला सुद्धा परवानगी दिली नसती ! असो हे सर्व सांगण्यामागे उद्देश इतकाच आहे की जे कोणी तरुण हे लेखन वाचत असतील त्यांनी लक्षात घ्यावे . प्रसिद्धीच्या मागे कधीही लागू नये . तुमच्याकडे सिद्धी आली की प्रसिद्धी येतेच . परंतु अर्धवट ज्ञानाचा अहंकार करीत आपली स्वतःची टिमकी वाजवत फिरू लागल्यावर समाजामध्ये आपले मूल शून्यवत होते . आज या युवकाला खूप चांगली संधी प्राप्त झालेली असून देखील लाईक शेअर सबस्क्राईबच्या दृष्ट चक्रात अडकल्यामुळे तो एका चांगल्या ज्ञान आदान प्रदानाला मुकला . मी त्याला विचारले सुद्धा की तू फोन केल्यावर लगेच कसा काय आलास ? तेव्हा त्याने त्याची खरी अपेक्षा सांगून टाकली . चौधरी ने त्याला फोनवर सांगितले की इथे एक इतिहास अभ्यासक आलेले आहेत त्यामुळे तो डोक्यामध्ये एक प्रतिमा घेऊन आला होता . सुटा बुटातील चकाचक दिसणारा एखादा विचारवंत समोर येईल असे कदाचित त्याला वाटले असावे आणि समोर माझ्यासारखा फाटका मळकट कळकट इसम पाहिल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला . त्यात त्याला असे वाटले होते की माझे यूट्यूब चैनल असेल , इंस्टाग्राम असेल ,फेसबुक असेल आणि मी 'कोलॅबोरेशन ' करून ह्याला माझ्या संपर्कांमध्ये प्रसिद्धी देईन आणि त्याचे सबस्क्राईबर वाढवीन . प्रत्यक्षात मी मोबाईल वापरत नाही हे पाहिल्यावर त्याने अक्षरशः मला कटवले . मी एका प्रामाणिक आंतर यात्रेवर निघालेला असल्यामुळे , त्याने जर पोट तिडकीने मला मराठ्यांचा इतिहास सांगितला असता तर त्याचे तोंड भरून कौतुक माझ्या डायरीमध्ये मी लिहिले असते . परंतु त्याच्या नशिबात ते नव्हते . माझ्यापेक्षा छोटा बंगाली थोडा चकाचक राहत असल्यामुळे त्याच्याशी मात्र तो फार आदराने वागत होता ! मला या अनिल रामलाल बिर्लाची फारच मजा वाटली ! मी त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्याने मला धड उत्तर दिले नाही . प्रत्येक वेळी तो माझे यूट्यूब चैनल बघा एवढेच सांगत राहिला . शेवटी मी त्याला म्हणालो देखील की तुझी ही आयडिया मला आधी कळली असती तर मी youtube वरच परिक्रमा केली असती , उगाचच प्रत्यक्षात देह जाळून घेतला ! हे ऐकल्यावर तो खजील झाला आणि निघून गेला .
अनिल बिर्ला याच्या हृदयामध्ये बाजीराव पेशवा यांच्या बद्दल भक्ती आहे हे नि:संशय ! कारण त्याच्या मुलाचे नावच त्याने बाजीराव बिर्ला ठेवले आहे ! फक्त त्याने प्रत्यक्ष माहिती देण्यावर अधिक भर द्यावा अशी त्याला या माध्यमातून विनंती आहे ! युट्युब वरच्या रेसिपी बघून जसे पोट भरत नाही त्यासाठी प्रत्यक्ष जेवावे लागते तसेच काहीसे हे आहे . असो .
मी रामेश्वरम मंदिरापाशी बसलेलो असताना एक अतिशय तेजस्वी तरुण तिथे आला . आणि माझ्याशी बोलू लागला . याचे डोळे घारे होते .रंग गोरा होता .उंची चांगली होती . राजबिंडे व्यक्तिमत्व होते . याचे नाव होते धरमसिंह नवलसिंह पवार ! जातिवंत मराठा ! परंतु मूळ पवार लोकांप्रमाणे हे घराणे देखील उत्तर भारतातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेले होते . याच्यासोबत मी किमान सहा तास गप्पा मारल्या असतील ! हा माझा पिच्छाच सोडेना ! याचे नवीन नवीन लग्न झाले होते त्यामुळे बायको सारखा फोन करत होती ! परंतु हा काही घरी गेला नाही . अखेरीस रात्री माझ्यासोबत भोजन केल्यावरच तो घरी गेला . हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . याने मात्र या परिसराची अतिशय इत्यंभूत माहिती मला सांगितली . आमच्या दोघांची अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली . अनिल बिर्ला याला संघाच्या कामात ओढावे असे मी त्याला सुचविले . जेणेकरून त्याची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल . त्या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या कट्ट्यांवर बसून आम्ही चालता चालता बोलत होतो . जणू काही आम्ही जुने मित्र असावे असा आमचा भाव होता ! त्याला देखील मला भेटून खूप आनंद झाला ! त्यावेळी त्याने काढलेले काही फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . ते सोबत जोडत आहे .
याची वाणी अतिशय तेजस्वी होती आणि एकंदरीतच चेहऱ्यावर खूप तेज होते . शुद्ध धारच्या पवार घराण्याचे बीज होते .
रामेश्वरम मंदिरा सोबत आम्ही काढलेला फोटो . नुकतीच शिवरात्र होऊन गेल्यामुळे त्याची सजावट शिल्लक होती .मागे स्त्रियांचा नंदीला दूध पाजण्याचा कार्यक्रम चालूच आहे !
माझा मळलेला वेश पहा !
रेवा तटीची माती , तीच मजला विभूती !
अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत आम्ही किनाऱ्यावर चकरा मारत होतो . असे आश्वासक तरुण देखील याच मातीमध्ये निर्माण होत आहेत तोपर्यंत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे .
काठावरून एक गमतीशीर गोष्ट मी पाहिली . दुपारी मी जेव्हा इथे आलो तेव्हा एका बाईने आपली गाई गुरे नर्मदेमध्ये हाकलली . इथे पाण्याला प्रचंड प्रवाह आहे तरीदेखील ती सर्व जनावरे सराईतपणे पोहत मधल्या बेटावर गेली . बेटावर असलेले हिरवेगार गवत दिवसभर त्यांनी खाल्ले आणि संध्याकाळी हिने खालून आवाज दिल्याबरोबर सर्वजण पुन्हा माघारी आले ! प्रवाहाला वेग असल्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला सर्व गुरे पोहत होती . अगदी लहान वासरे सुद्धा पोहत पोहत काठावर आली . मी या मातारामशी संवाद साधला आणि तिच्याकडून ही संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली . गेल्या अनेक पिढ्या ही गुरे अशा पद्धतीने नर्मदेच्या मधोमध जाऊन परत येत आहेत . ही सवय त्यांच्या रक्ता मधून पुढच्या पिढीमध्ये जाते कारण नवीन गुरे आणल्यावर अशा पद्धतीने पाण्यामध्ये उतरत नाहीत असे तिने सांगितले . गेल्या अनेक पिढ्या हा कळप मधल्या बेटावर जाऊन पुन्हा परत पोहत येत आहे . यात एकदा वर पोहोचलेली गुरे अन्य गुरांना सहकार्य करतात हे देखील मी पाहिले . गुराखी आणि गुरे यांचे हे असामान्य साहस मला फार आवडले ! किमान पक्षी बाजीराव सारख्या महायोद्ध्याच्या समाधीपुढे असे काहीतरी पराक्रमपूर्ण नक्कीच होऊ शकते !
आम्हाला दुपारी उपाशी मारणारा म्हातारा हा प्रत्यक्षात रावेरखेडी मध्ये राहणारा एका टेन्ट हाऊसचा मालक होता . टेन्ट हाऊस म्हणजे मांडवाला . त्याची ही पाचवी परिक्रमा सुरू होती . आणि त्याने रात्री आमची क्षमा मागितली आणि सांगितले की मैयाने प्रेरणा दिल्यामुळे त्याने आम्हाला उपाशी मारले . मी देखील त्याला मग नावाड्याचा चहा नाकारण्याचा प्रसंग सांगितला आणि त्यांनी योग्यच केल्याचे सांगितले . रात्री उशिरा गृहस्थाची कर्तव्ये या विषयावर धरमसिंह पवार शी गप्पा मारून आता त्याचे प्रात्यक्षिक करावे ,अर्थात कुटुंबाला नदेखील पुरेसा वेळ द्यावा असे सांगत त्याला रजा दिली . सकाळी लवकर उठून आन्हिकं आटोपून किनाऱ्याने पुढे निघालो . छोटा बंगाली दगड धोंड्यामध्ये मार्ग काढून वैतागला होता त्यामुळे त्याने डांबरी रस्त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला ! सुंठी वाचून खोकला गेला !
इथून पुढे बकावा गावामध्ये जाताना मध्ये खडक किंवा
बाकुंड नावाची एक नदी लागते . हिच्या पाण्याला गती खूप आहे . पाणी अतिशय स्वच्छ आणि गोड आहे . धोकादायक खडकांवरून ही नदी सावकाश पार केली . इतक्यात पुढे रस्ता नसल्यामुळे बंगाली बाबू देखील इकडे येताना दिसला . त्याला देखील नदी पार करवली . इथे मिलन प्रधान या ओडिया परिक्रमावासीचे बूट फाटले . त्याची नवी नवी परिक्रमा असल्यामुळे त्याला अनवाणी चालता येणे अवघड होते . केवळ पायात बूट नाहीत म्हणून त्याने परिक्रमा अर्धवट सोडू नये म्हणून मी माझी चप्पल त्याला देऊन टाकली . लोफर्स प्रकारची ती चप्पल त्याला बसली . आणि मी पुढे अनवाणी प्रवास सुरू केला . बकावा गावाच्या अलीकडे पासून मोठ्या प्रमाणात दगड पात्रामध्ये दिसू लागले . हे दगड इतके होते की त्यांची संख्या कित्येक कोटी भरावी ! लहान मोठे विविध आकाराचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी दगड होते . इथे अशा पद्धतीचे दगड गोळा करून ते शिवलिंग बनवणाऱ्या कारागिरांना आणून देणे हा एक व्यवसाय आहे . काठाकाठाने मी चाललो होतो . एका नावे मध्ये काही लोक चढत होते . इतक्यात त्या नावेतून नर्मदे हर असा जोरात पुकारा एकाने केला ! बघतो तर ते होते रमेश जाधव ! उत्तर तटावर मी असताना दमगड इथल्या रामकुटी मध्ये मला जे चौघे भेटले होते त्यातील बकावा गावचा हाच तो परिक्रमावासी ! त्यावेळी तो मला म्हणाला होता की तुमच्याकडे फोन नाही मग तुम्हाला संपर्क कसा करू ? तुम्हाला संपूर्ण बकावा गाव मला फिरवून दाखवायचे आहे . आणि मी त्याला म्हणालो होतो की मैयाची इच्छा असेल तर आपली भेट नक्की होईल . प्रत्यक्षामध्ये हा दोन दिवसासाठी शिवलिंगे गोळा करायला म्हणून दूरच्या घाटावर निघाला होता . परंतु मला पाहिल्यावर तो थांबला आणि नाव त्याने सोडून दिली . तो म्हणाला आजचा दिवस तुमच्यासाठी राखीव ठेवला आहे ! आज संपूर्ण बकावा गाव मी तुम्हाला दाखवतो ! आणि उद्या माझ्या प्रवासाला जातो . बकावा या गावाविषयी थोडेसे सांगतो .
नर्मदा खंडामध्ये एक म्हण प्रचलित आहे . नर्मदा मैया का हर कंकर शंकर होता है । कंकर म्हणजे दगड . नर्मदा नदीमध्ये सापडणारा प्रत्येक दगड हा साक्षात शंकराचा अवतार मानला जातो . त्यामुळे मंदिरामध्ये त्याची वेगळी प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही . फक्त आणून त्याला स्थानापन्न केले की झाले ! पूर्वी नर्मदा नदीमध्ये अगदी शिवलिंगाच्या आकाराचे दगड मिळायचे . परंतु लाखो लोकांनी ते दगड उचलल्यामुळे तसेच महापुरामध्ये ते दगड वाहून गेल्यामुळे तसेच विविध ठिकाणी झालेल्या धरणामुळे आता ते पूर्वी इतक्या संख्येने सापडत नाहीत . परंतु तरीदेखील कोट्यावधी शिवलिंगे आपल्या आजूबाजूला पडलेली आपल्याला दिसतात . बकावा या गावांमध्ये एक असा व्यवसाय निर्माण झालेला आहे की हे लोक विविध रंगी दगड गोळा करून आणतात आणि त्याला यंत्राच्या साह्याने किंवा छीन्नी हातोडीच्या सहाय्याने शिवलिंगाचा आकार देऊन ती शिवलिंगे विकतात . हा आकार देताना कुठल्याही फुटपट्टीचा किंवा मोजपट्टीचा वापर केला जात नाही . केवळ नजरेच्या अंदाजाने शिवलिंग बनवले जाते हे विशेष ! आणि या शिवलिंगामध्ये कुठेही समतोल ढळलेला नसतो हे त्याहून विशेष ! लांबी रुंदी उंची सर्व यथासांग असते ! हे किती मोठे आश्चर्य आहे विचार करून पहा ! मुळात गोल आकार बनवणे अवघड आहे त्यात पॅराबोला अर्थात लंबगोल बनवणे अजून अवघड आहे . तू अचूक बनवण्याचे काम इथले कारागीर करतात . संपूर्ण गावामध्ये कुठेही जा तुम्हाला धुळीचे साम्राज्य दिसते आणि दगडावर हातोडीचे घाव पडल्याचे आवाज आणि विविध विद्युत यंत्रांचे कर्णकर्कश्श आवाज सर्वत्र घुमत असतात . सुपारी पासून ते साठ फुटाच्या आकारापर्यंतची शिवलिंगे येथे बनवली जातात . एका मुठीत अनेक मावतील अशी शिवलिंगे सुद्धा इथेच मिळतात . आणि जे हलवायला चार क्रेन ची मदत घ्यावी लागते अशी शिवलिंगे सुद्धा इथेच बनतात !
अशी शिवलिंगे विकणारी शब्दशः हजारो दुकाने या गावात आहेत
काही लोक रस्त्यावर शिवलिंगे विकतात तर मोठे दुकानदार मॉल प्रमाणे शिवलिंगे विकण्याची दुकाने थाटून बसलेले आहेत .
या शिवलिंगांमध्ये अनेक प्रकार असतात .एकाच दगडाची शिवलिंगे किंवा विविध रंग एकाच दगडामध्ये असणारी शिवलिंगे किंवा दोन स्पष्ट रंग असणारी अर्धनारी नटेश्वरासारखी शिवलिंगे किंवा ओम असा आकार उठलेली ओंकारेश्वर शिवलिंगे किंवा त्रिशूलाचा आकार उठलेली शिवलिंगे किंवा भस्म त्रिपुण्ड्र आकार असलेली शिवलिंगे किंवा ब्रह्मांड आकृती असलेली शिवलिंगे किंवा जनेऊ अथवा जानवेधारी शिवलिंगे किंवा आत्मलिंगे असे अनेक प्रकार आहेत . शिवलिंगावर कुठला आकार उठला आहे त्यानुसार त्याची किंमत बदलते . रमेश जाधव ने मला हळूहळू एकेका ठिकाणी न्यायला सुरुवात केली . त्याचा ह्या शास्त्राचा बालपणापासून अभ्यास होता . कुठल्या प्रकारचा दगड कुठे सापडतो याची त्याला चांगली कल्पना असते . आपल्याकडे आलेल्या ग्राहकाची गरज ते आधी समजावून घेतात आणि त्यानुसार ग्राहकाला सोबत घेऊन नावेतून दगड शोधण्याकरता जातात . एकदा त्यांना सापडलेला दगड ते एका बाजूला काढून ठेवतात आणि त्या दगडाला अन्य कोणीही हात लावत नाही . चुकून कोणी हात लावलास तर लगेच त्यांना आपला दगड कुठला होता हे लक्षात येते . अशा पद्धतीने एकाच वेळी सुमारे पाच ते दहा हजार दगडांचे आकार आणि प्रकार त्याच्या डोक्यामध्ये असतात . एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरेल एवढे दगड गोळा झाले की ट्रॅक्टर मागविला जातो आणि ते सर्व दगड कारखान्याला विकले जातात . ट्रॉली चा दर अतिशय कमी असतो . परंतु ओम स्वस्तिक वगैरे आकार उठलेले शिवलिंग सापडले तर त्याची मात्र तोंडी बोली लावली जाते . फार क्वचित तयार शिवलिंग देखील सापडते त्याची किंमत सर्वात जास्त असते . कारण ते स्वतः नर्मदा मातेने तयार केलेले असते . रमेश जाधव ला मी आल्यामुळे प्रचंड आनंद झाला होता आणि मला काय दाखवू आणि काय नाही असे त्याला झाले होते ! गावामध्ये एक छोटेसे राधाकृष्ण मंदिर होते तिथे सामान ठेवायला त्याने मला सांगितले . या मंदिरामध्ये जालना जिल्ह्यातील परतुर येथे राहणाऱ्या गयाबाई नावाच्या संत आहेत त्यांच्यासारखा दिसणारा एक साधू होता . हा अतिशय हुशार आणि कलाकार मनुष्य होता . तिची चित्रकला विणकाम वगैरे सर्व अप्रतिम होते . सामान सुरक्षित आहे तू बिनधास्त सर्व गाव बघून ये असे त्यांनी मला आश्वासन दिले . भार हलका झाल्यामुळे बरे वाटले .सोबत नर्मदा मैयाची कुपी ठेवलेली पिशवी घेतली आणि निघालो . प्रत्येक घरामध्ये शिवलिंगे बनविण्याचे काम चालू होते . कोणीही नाकाला मास्क वगैरे लावलेला नव्हता . रमेश जाधव ने मला सांगितले की इथे होणारा प्रत्येक मृत्यू हा दमा रोगामुळेच होतो . इथे प्रत्येक लहान मोठ्या माणसाला दम्याचा त्रास आहे . आपल्या फुफुसाची रचना अशी असते की त्यामध्ये एकदा आत मध्ये गेलेली वस्तू पुन्हा मरेपर्यंत कधीच बाहेर येत नाही . त्यामुळे धुळीचे जड जड कण फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफुसांची क्षमता कायमची कमी करून टाकतात . अजून एक धक्कादायक माहिती मला कळाली ती म्हणजे अशी की या गावाचे सरासरी आयुर्मान ५० ते ६० होते . याचा अर्थ साठीच्या पुढे शक्यतो कोणी जगत नसे . हे फारच भयानक व विदारक सत्य होते .शिवलिंगाच्या सर्व महत्त्वाच्या फॅक्टरी रमेशने मला दाखवल्या . हे गाव इतके मोठे होते आणि इतक्या फॅक्टरी होत्या की त्या सर्व मी जाऊन पाहणे केवळ अशक्य होते . नर्मदा मातेने त्या क्षेत्रातला तज्ञ मला गाठून दिला त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले . इथे परिक्रमा वासीं कडून शक्यतो शिवलिंगाचे पैसे कोणी घेत नाही . आणि परिक्रमा वासी देखील इथून शिवलिंगे घेत नाहीत कारण ते सोबत बाळगायचे म्हणजे ओझे वाढविण्याचे काम असते . परंतु मला काही लोकांनी दिलेली शिवलिंगे मी आनंदाने स्वीकारली . अर्धनारी नटेश्वराचे एक सुंदर शिवलिंग मला मिळाले .
आत्मज्योती किंवा आत्मलिंग असणारे शिवलिंग
असे बहुरंगी दगड नर्मदा मातेमध्ये सापडतात ते गोळा करून रमेश सारखी माणसे कारखान्यांमध्ये आणून देतात आणि तिथे शिवलिंगाला आकार दिला जातो .
रमेश जाधव याला सर्वच दुकानदार अतिशय मानत होते असे माझ्या लक्षात आले . एक तर तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आला होता तसेच त्याला शिवलिंगे बनविण्यातले खूप चांगले ज्ञान होते असे सर्वांनी मला सांगितले . काही दुकानदारांनी तर सांगितले की रमेश जाधव जे सांगेल तेच अंतिम सत्य या गावात मानले जाते इतके या क्षेत्रातले ज्ञान त्याला होते . त्याला मैया कुठल्या प्रकारचा दगड कुठे आहे ते सांगायची . प्रसंगी खोल पाण्यामध्ये डुबक्या मारून हा दगड काढायचा . इथे केवट आणि कहार लोक दगड गोळा करण्याचे काम करतात . अलीकडे हे लोक देखील शिवलिंगे बनवू लागले आहेत . परंतु या गावांमध्ये या व्यवसायाची सुरुवात ज्यांनी केली ते दीपक नामदेव म्हणून आहेत त्यांच्याकडे देखील मला रमेश जाधव घेऊन गेला . यांच्याकडे फारच अप्रतिम शिवलिंगे होती . त्याने गावातील किमान २० ते २५ प्रतिष्ठित व्यापारी लोकांशी माझी गाठ घालून दिली . रमेश जाधव हा ढिगाने शिवलिंगे न आणता जे हवे ते चित्र असलेले शिवलिंग घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय मान होता . त्यात रमेश जाधव घेऊन आला आहे म्हटल्यावर प्रत्येक दुकानांमध्ये माझे अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत व्हायचे . तुमची संगत चांगली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर अशा पद्धतीने होतो . रमेश जाधव ने मला बघावा गावातील काही अशा ठिकाणी नेले जिथे शिवलिंग बनविण्याचे काम चालू असेल असे स्वप्नातही कोणाला वाटणार नाही . अतिशय भव्य दिव्य शिवलिंगे बनवणारी माणसे देखील इथे आहेत . प्रत्येक कारखान्याने आपली स्वतःची काही वैशिष्ट्ये जपलेली आहेत . संपूर्ण भारतभरातून शिवलिंगे खरेदी करण्याकरिता लोक इथे येतात . मला देखील आळंदी , देहू , पंढरपूर , मराठवाडा येथील अनेक मराठी माणसे भेटली जी शिवलिंगे खरेदी करण्याकरिता इथे आलेली होती . इथे शिवलिंगाची खरेदी तुम्हाला योग्य भावामध्ये करून देणारे शेकडो दलाल फिरत असतात . हा सर्व परिसर अतिशय अद्भुत असाच आहे ! मी प्रत्येक दुकानांमध्ये गेल्यावर त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक शिवलिंगे तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगे दाखवायला सांगत असे . विशेषतः सौरमाला अंकिता असलेले शिवलिंग मला आवडले तसेच आत्मलिंग देखील खूप सुंदर दिसते . काही शिवलिंगामध्ये सोनेरी रंगाच्या छटा देखील आढळतात . आज-काल राजस्थान भागातील काही दगड नर्मदे काठील आहेत म्हणून खपविले जातात परंतु रमेश जाधव हा असा एकमेव तज्ञ होता जो पाहता क्षणी दगड नर्मदेतील आहे का बाहेरचा आहे हे डोळे मिटून सांगायचा . त्या दगडाला स्पर्श करून तो नर्मदेची स्पंदने येतात की नाही ते तपासायचा . कुठल्या दगडामध्ये किती स्पंदने आहेत हे देखील त्याला लगेच कळत होते . मला सापडलेली सर्वच शिवलिंगे त्याला खूप आवडली . आणि ही सर्व शिवलिंगे दुर्मिळ असून केवळ मैयाच्या कृपेनेच अशी सापडू शकतात हे देखील त्याने मला सांगितले . मला यातले काहीच ज्ञान नसल्यामुळे हो म्हणून मान हलवण्या शिवाय माझ्या पुढे कुठला पर्याय देखील नव्हता .
बकावा गावातील शिवलिंगांची माहिती आदरपूर्वक प्रस्तुत लेखकाला देताना एक दुकानदार .यातील प्रत्येक शिवलिंग पाहिल्यावर तो दगड कुठला आहे हे रमेश जाधव मला सांगत होता इतका त्याचा अभ्यास होता . या गावातील प्रत्येक शिवलिंग त्याला पाठ होते .
हाताने हलविणे देखील अशक्य आहे अशी ही शिवलिंगे केवळ डोळ्याच्या मापाने कशी बनवत असतील विचार करून पहा ! हे दैवी कृपे शिवाय शक्य नाही . या गावातील लोकांना ही सिद्धी प्राप्त आहे . जयपुर लाल दगडापासून बनवलेल्या अन्य देवांच्या मूर्ती देखील इथे विक्रीला ठेवलेल्या होत्या .
दरम्यान माझे जुने बूट मला पुन्हा एकदा सापडले . मी ते सामानामध्ये कधी ठेवले मलाच आठवत नव्हते . अन्यथा या गावातून अनवाणी चालताना पायामध्ये दगड घुसून जखमा होण्याचे प्रमाण खूप जास्त होते . शिवलिंगाच्या मापामध्ये जलहरी बनवून देण्याचा देखील व्यवसाय इथे काही लोक करत .
या शिवलिंगाची लांबी किती आहे पहा आणि याचे वजन किती असेल कल्पना करून पहा !
त्याच्याही पेक्षा मोठे शिवलिंग पाहताना प्रस्तुत लेखक . मागे अख्खी बैल जोडी आणि नांगर लपला आहे ! अशा शिवलिंगांची स्थापना करणारे लोक धान्य होत !
अशा पद्धतीने खूप सारी शिवलिंगे रमेश जाधव ने मला दाखवली . वाटीमध्ये आम्हाला दोन लहान मुले भेटली . त्यांच्या आग्रहा खातर त्याच्या घरी गेलो . राम केवट असे या मुलाचे नाव होते . वय वर्ष ११ . दहा वर्षाचा एक भाऊ याला होता . याचे वडील दम्यामुळे निधन पावले होते . वयाच्या आठव्या वर्षापासून हा शिवलिंगे विकण्याचा व्यवसाय करू लागला होता . रमेश जाधव ने मला सांगितले की आपल्या मार्केटिंग कौशल्याच्या जोरावर हा आज बकावा गावातील सर्वात जास्त शिवलिंगे विकणारा मुलगा ठरलेला आहे ! याने आता स्वतःची निर्मिती बंद करून बकावा गावातील सर्वच शिवलिंगांचे मार्केटिंग सुरू केलेले आहे ! याने मोठ्या विश्वासाने त्याच्या घरी नेऊन मला त्याच्या आईची भेट घडवली . असा कुलोद्धारक पुत्र जन्माला घालणाऱ्या त्या मातेला मी नमस्कारच केला ! आपल्या घरातील नऊ दहा अकरा बारा वर्षाची मुले काय करतात ते जरा आठवून पहा . नर्मदे काठी राहणारी त्याच वयोगटातील ही दोन मुले आज लक्षावधी रुपयांची उलाढाल करत होती . त्यांच्या आईने मला सांगितले की या मुलांनी वडिलांपेक्षा कैक पटीने आपला व्यवसाय वाढविलेला आहे . कारण यांचे वडील फक्त शिवलिंगे निर्माण करायचे . साधारण आठवड्याला एखादे चांगले शिवलिंग तयार व्हायचे . परंतु ही मुले मात्र दर दिवसाला कित्येक शिवलिंगे विकत असतात . त्यामुळे यांना व्यापाराची अधिक संधी मिळत असे . शिवाय लहान मुले पोट तिडकी ने माहिती सांगत आहेत हे पाहून लोक देखील डोळे झाकून खरेदी करत . त्या मुलांनी मला देखील काही शिवलिंगे भेट दिली . यांच्या घरातून नर्मदा मातेचे आणि बघावा गावाचे खूप सुंदर दर्शन होत असे . मुलांनी घरातील फोनवर काही फोटो काढले ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
राम शाम केवट बंधूं सोबत प्रस्तुत लेखक . अकाली पडलेल्या जबाबदारीमुळे ह्या मुलांचे बालपण थोडेसे हिरावले गेले असून ती पोक्त वाटत आहेत परंतु ती वयाने लहानच होती . मागे दिसणारे बकावा गाव .
गावातील सर्व घरे बैठी असताना यांनी मात्र स्वकमाईने आणि स्वकष्टाने घरावर माडी चढविली होती . त्यातून सुंदर असे नर्मदा मातेचे दर्शन होत असे . मागे आपल्याला जे बेट दिसते आहे त्याच्या समोरच बाजीराव पेशवा यांची समाधी आहे .
हे परम सुंदर दर्शन घेताना मन भरून आले ! गावावर पसरलेली धुळीची चादर दिसते आहे का पहा !
अकरा बारा वर्षाचा राम केवट . या मुलाला मनापासून दंडवत ! नर्मदेचे पाणीच निराळे आहे हेच खरे !
मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे अशा लोकांनी नर्मदा खंडातील मुलांचे मानसशास्त्र आणि त्याच्यावर नर्मदा परिक्रमेचा होणारा परिणाम या विषयावर अवश्य संशोधन करावे असे मी त्यांना सुचवेन . मला चहा पाजून पुन्हा बाहेर सोडायला ही मुले आली तेव्हा त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये ते कुठल्याही परिक्रमा वासीला कधी बोलवत नाहीत . कारण घरामध्ये त्यांची तरुण माताजी एकटी असते . परंतु यांना माणसाची पारख देखील चांगली होती . इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण पाहून मी खरोखरीच थक्क झालो ! भल्या भल्या लोकांना जे साध्य होत नाही ते शहाणपण त्यांना नर्मदा मातेने वडिलांच्या मृत्यू सोबत सहज बहाल करून टाकले होते . इथून पुढे रमेश जाधव मला अजून एका मित्राकडे घेऊन गेला . याच्याकडे छोट्या छोट्या आकाराची हजारो शिवलिंगे होती . हे घेऊ का ते घेऊ असे व्हावे इतकी सुंदर शिवलिंगे इथे सापडतात . परंतु वजनाची मर्यादा असल्यामुळे मोजकीच घेता येतात . याने मला अतिशय सुंदर असे शिवलिंग भेट दिले . त्याच्या बदल्यात मी त्याला बसल्या बसल्या त्याच्या संपूर्ण व्यवसायाची सुंदर अशी वेबसाईट बनवून दिली . त्याला अतिशय आनंद झाला आणि लगेच त्याने प्रचार प्रसार सुरू केला . या गावामध्ये एका तरुण साधूचा मृत्यू झाल्यामुळे त्याची समाधी गावकऱ्यांनी उभी केली होती . या समाधीवर जे शिवलिंग स्थापित करण्यात आले त्याच्यावर रात्री अचानक त्या साधूचा चेहरा उठला ! हा चमत्कार पाहण्यासाठी आठवडाभर बघावा गावामध्ये प्रचंड गर्दी झाली होती . या प्रकारापासून या गावातील शिवलिंगांचे महत्त्व फार वाढले असे मला रमेशने सांगितले . त्याने मला ते शिवलिंग नर्मदे काठी नेऊन दाखवले आणि खरोखरच माझ्या अंगावर काटा आला कारण त्या साधूचा सुस्पष्ट चेहरा त्या शिवलिंगावर फोटो छापल्याप्रमाणे उठलेला होता ! ज्याला इंग्रजीमध्ये सिलोव्हेट असे म्हणतात त्या प्रकारचे हे चित्र होते . शिवाजी महाराजांचा जाणता राजा असे लिहिलेला अर्धा चेहरा आठवून पहा त्याला सिलोवेट असे म्हणतात .
रमेश जाधव ला मला भेटून फारच आनंद झाला होता हे तो दर दहा-बारा वाक्याने बोलून दाखवायचा ! त्याच्या घरी गेल्यावर त्याने बालभोग देऊन चहा पजला . गावात नर्मदा परिक्रमा वाशींची सेवा करणारी एक धर्मशाळा होती तिथे एका आपला राम केवट सेवा करायचा . त्याने मला मस्तपैकी भोजन वाढले ! एका वयोवृद्ध मातारामनी भोजन बनवले होते .
एखाद्या जुन्या हवेली सारखी असलेली सुंदर धर्मशाळा . येथे परिक्रमावस्यांची खूप आगत्याने सेवा केली जाते
त्याच्यासोबत असलेल्या सर्व परिक्रमावस्यांसोबत त्याच्या फोनवरून बोलणे झाले . माणिक पाटील यांची परिक्रमा दुर्दैवाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिली . बाकी जळगावचे परिक्रमावासी नामदेवराव भोळे असोदेकर आणि नगरचे गायक पं. पवन श्रीकांत नाईक या दोघांशी प्रेमाचे बोलणे झाले . मी रमेश जाधव यांना भेटल्याचा दोघांना आनंद झाला . दमगड च्या रामकुटी च्या प्रकरणात मी जो व्हिडिओ टाकला आहे (नर्मदा मातेच्या दर्शनाचा ) त्याच्यामध्ये या चौघांचे दर्शन आपल्याला होते पहा .
बकावा गावातील शिवलिंगे कशी असतात याची थोडीशी झलक आपल्याला खाली देत आहे .
नर्मदाजीका हर कंकर शंकर होता है !
रमेश जाधव ने मला या व्यवसायातील आर्थिक गणित देखील समजावून सांगितले परंतु ते मुद्दाम येथे देत नाही कारण या लोकांचा जीव घेणा धंदा बसावा असे मला वाटत नाही . हा व्यवसाय केल्यास लवकरच आपला मृत्यू होणार हे निश्चित आहे हे माहिती असून देखील केवळ देवाची सेवा करायला मिळते आहे म्हणून लोक हा व्यवसाय करत आहे ही किती मोठी गोष्ट आहे विचार करून पहा . अशा या ज्ञात अज्ञात , जीवित , दिवंगत सर्वच बकावा वासियांना साष्टांग नमस्कार ! नर्मदे हर !
लेखांक बाहत्तर समाप्त (क्रमशः )
लेखांक ७३ : तेली भट्याण चे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा
दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . काठाने चालताना खूप आनंद मिळत होता . इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता . परंतु इथे कोणी त्याला दगड म्हणत नाहीत . तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिले जाते . बरेच अंतर चालल्यावर मर्दाना नावाचे गाव आले . त्या गावामध्ये मी काठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला . मी कुठून आलो कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला . त्याने सांगितले की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे .
तो नर्मदेचा आदेश मानून मी त्याच्याबरोबर आश्रमामध्ये गेलो . आश्रम अतिशय सुंदर होता . भरपूर झाडी होती . अनेक मंदिरे होती . निवासाची उत्तम व्यवस्था होती .तिथे आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते . सर्वजण झोपायच्या तयारीत होते . इतक्या तिथे कुठून तरी दहा-बारा छोट्या मुली प्रकट झाल्या ! मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला ! प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हा ठेवून मला आशीर्वाद दिला ! नंतर त्या मुली माझ्याशी खेळू लागल्या ! आश्रमात एक जिना होता . या जिन्याच्या कुठल्या पायरीवरून खाली उडी मारता येते पाहूया असा खेळा आम्ही सुरू केला . आमच्या दंग्यामुळे अवधूत वैतागला आणि मला रागवून गेला ! मग मी मुलींना शांतपणे खेळायची सूचना केली . मुली देखील अतिशय 'सायलेंट मोड ' मध्ये खेळू लागल्या ! मला मी स्वतः चार-पाच वर्षाचा मुलगा झाला आहे असे वाटत होते ! हा खेळ थांबू नये असे वाटत असतानाच पुढे भटियाण तेली गाव गाठायचे आहे हे लक्षात आले . तिथे असलेल्या एका माणसाने मुलींसोबत माझा फोटो काढला . आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिला .
माझ्यासोबत आलेला मनुष्य मला म्हणाला की आता इथून पुढे काठाने रस्ता नाही तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो . परंतु मला काठाने जायचे आहे असा निर्धार मी त्याला सांगितल्यावर त्याने सांगितले की इथे अतिशय अवघड असा एक ओढा लागतो जो कोणालाही पार करता येणार नाही असा आहे . वनस्पती आणि शेवाळे माजल्यामुळे त्या ओढ्यात उतरून देखील तो पार करता येत नाही . आणि नाव देखील तिथे चालत नाही .
त्याच्यासोबत मी चालू लागलो . अचानक त्याने परिक्रमेला लक्ष्मणदास साधूंना वगैरे शिव्या घालायला सुरुवात केली . मला कळेना की याला अचानक काय झाले . त्याने मला इस्लाम हाच धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि इस्लाम शिवाय जगाचा उद्धार कसा होऊ शकत नाही हे समजावून सांगायला सुरुवात केली . मी त्याला नाव विचारले असता त्याने सांगितले की त्याचे नाव सय्यद होते आणि तो इथला इमाम होता . मी त्याला विचारले की तुझ्या पूर्वीच्या सात पिढ्यांची नावे तुला माहिती आहेत का ? माझ्याकडे माझ्या पूर्वीच्या २१ पिढ्यांची नावे आहेत हे त्याला सांगितले . आणि सर्व २१ च्या २१ पिढ्या माझे आजचे कुलनाम आहे तेच लावत होते हे देखील सांगितले . याचा अर्थ आमचा वंश जो काही धर्म पाळत आला होता त्याचे पालन करूनही टिकत होता . परंतु त्याचे मात्र तसे नव्हते तीन-चार पिढ्यापूर्वी त्याच्या हिंदू पूर्वजांनी इस्लाम भीतीपोटी स्वीकारलेला होता . भारतातील बहुतेक मुसलमान हे भीतीपोटी हिंदू धर्म त्यागून मुसलमान झालेले लोक आहेत . त्यांच्या पूर्वजांनी कदाचित धैर्य दाखवले असते तर आज ते देखील हिंदू असते . तो काळ भीतीचा होता म्हणून धर्मांतरण केले इथपर्यंत ठीक आहे परंतु आता परधर्मियांची भीती नसल्यामुळे पुन्हा आपल्या मूळ पदाकडे यायला काय हरकत असावी ? असे उलटे मीच त्याला विचारले . चालता चालता आमची चर्चा तापू लागली . त्याने नर्मदा परिक्रमा परंपरेला उलट सुलट बोलायला सुरुवात केली . माझा पारा चढला . मी त्याला सांगितले की तू शेवटचा अपराध केलेला आहेस त्यामुळे मी एक दोन साडे माडे तीन असे म्हणेपर्यंत तुला जितक्या लांब पळता येईल तितके पळून जा . त्याच्यानंतर जे काही होईल त्याला मी जबाबदार असणार नाही . एकंदरीत माझा रुद्र अवतार पाहून सय्यद टिंब टिंब ला पाय लावून वेगाने पळून गेला . अशा पद्धतीने इस्लामची दावत नर्मदा परिक्रमामध्ये अनेकांना मिळाल्याचे मला नंतर कळाले . सुग्रास पंचपक्वान्नांचे भोजन चालू असताना मध्ये एखादे हाडूक त्यात येऊन पडावे असे मला झाले . परंतु तो दिसायला अगदी हिंदू वाटत होता . इमाम असून देखील त्याने दाढी वगैरे राखली नव्हती तर अगदी एखाद्या हिंदू सारखा राहायचा . असे आपले खरे स्वरूप लपवणारे लोकच इथून पुढे आपल्या राष्ट्रासाठी धोकादायक ठरणार आहेत . अशा व्यक्तीचे नाव गाव कुळ दिसणे शिक्षण यापैकी कुठल्याही गोष्टीवरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज लावता येणे केवळ अशक्य असते . मनामध्ये विष घेऊन त्या विषाची पेरणी सर्वत्र करणारे हे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत . सय्यद पळून गेल्यावर मी पुन्हा एकदा काठाकडे वळलो . इथे काठाकडे जाणारा रस्ताच नव्हता तर सर्वत्र झाडी दिसू लागली . मोठ्या कष्टाने काटेरी झाडीपार केल्यावर मला एक दोन पुरुष खोल ओढा लागला . नर्मदे काठचे सर्व ओढे तुम्हाला नर्मदे कडेच घेऊन जातात हे माहिती असल्यामुळे मी ओढ्यामधून चालायला सुरुवात केली . ओढा जवळपास कोरडा पडत आला होता . परंतु या ओढ्यामध्ये प्रचंड काटेरी झाडे होती . ती सर्व मी लीलया पार केली . जणूकाही ते काटे नसून गुलाबाच्या पाकळ्या आहेत असा त्यांचा स्पर्श मला होत होता . मी जेव्हा त्या ओढ्यातून बाहेर पडलो आणि समोर नर्मदेचे पात्र दिसले तेव्हा एक शेतकरी तिथे बसलेला होता . माझ्याकडे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला ! तो म्हणाला बाबाजी इथून कुठून आलात ? मी त्याला सांगितले की असा असा ओढ्याच्या मार्ग पकडून मी आलेलो आहे . तो म्हणाला परंतु तिथे तर इतके काटे आहेत . तुम्ही कसे काय बाहेर पडलात ? मी त्याला मला आलेला अनुभव सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून नर्मदा मातेचा जयजयकार केला ! वाचकांना कल्पना यावी म्हणून मी तो ओढा आणि ते शेत गुगलवर शोधून काढले आहे त्याचा नकाशा खाली टाकत आहे .
लाल मार्कर दिसतो आहे तिथे शेतकरी मला भेटला व तेच हिरवेगार शेत त्याच्या मालकीचे आहे . तिथवर झाडांचा जो हिरवागार पट्टा येतो आहे तोच ओढा होता .बाकी सर्वत्र वाळू काटेरी झुडपे यांचेच साम्राज्य आहे .
शेतकरी मला म्हणाला की गेल्या वर्षा दोन वर्षात या मार्गाने कोणीच गेलेले नाही . याचे कारण असे आहे की नर्मदा मैया येथे डावीकडे वळण घेते आणि रस्त्याने चालत गेल्यावर अंतर कमी पडते . तसेच नर्मदेच्या काठाने चालताना प्रचंड काटेरी झुडपे आणि घनदाट अरण्य आहे त्याच्यामध्ये वन्यपशूंचा वास देखील आहे . रानडुकरे, कोल्हे, लांडगे ,बिबटे , साळींदर यांचा वावर या भागामध्ये असतो . परंतु या सर्वांखेरीज अजून एका गोष्टीचा वास तिथे आहे .तो म्हणजे नर्मदेचा वास ! आणि त्या वासाचाच सहवास मला हवा होता त्यामुळे मला दुसरा कुठला मार्ग आवडणे किंवा सूचणे शक्यच नव्हते . काठावरचा मार्ग अतिशय सुंदर होता . पुढे असलेल्या लेपा धरणामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता आणि पाणी शांत होते . इथे फारशी वळणे नसून एका सरळ रेषेमध्ये नर्मदा मैया वाहताना दिसते . डाव्या हाताला संपूर्ण दाट झाडी असून तिथे तुम्ही एकदा आत शिरला तर बाहेर येऊ शकणार नाहीत इतकी ती घनदाट आहे . पायाखाली मऊशार गाळमाती आहे . हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून अगदी मासे पकडणारे लोक सुद्धा फार क्वचित दिसतात . आतापर्यंत मी जे काही अंतर चाललो होतो त्यातील अतिशय सुंदर असा हा पाय मार्ग होता . संपूर्ण सहा किलोमीटरचे अंतर तोडताना फक्त नर्मदा मैया आणि मी असे आम्ही दोघे जण होतो ! इथे पात्रात फारसे दगड देखील नसल्यामुळे बगळे , पाणपक्षी देखील कमी होते . पाणी चांगलेच खोल होते . हा परिसर कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून नकाशे जोडत आहे .
पथराड गावातील बेट सोडले की पुन्हा नर्मदेमध्ये एक सुद्धा दगड दिसत नाही . नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहते आहे . प्रचंड झाडी जरी असली तरी धरणातील पाण्याची पातळी वाढते आणि कमी होते त्यामुळे काठावरती साधारण चार-पाच फुटाचा वनस्पती विरहित मातीचा पट्टा तयार झालेला आहे . त्याच्यावरून चालत राहिलो .
नर्मदेने डावीकडे घेतलेले वळण आपल्याला येथे दिसते आहे . उजवीकडून डावीकडे वाहणारी नर्मदा नदी आपण पाहतो आहोत . सर्वात उजवीकडे मर्दाना गाव असून किनारा पकडून मी श्री सियाराम बाबा आश्रम (तेली भट्याण ) काठाकाठाने गाठला .
धरणातील पाण्याच्या चढउतारामुळे प्रचंड चिखल सर्वत्र सुरू झाला होता . हा चिखल कधी कधी गुडघाभर देखील होता . परंतु याच्यामध्ये पाय पूर्णपणे बुडणार नाही याची काळजी घेणारा एक दुर्दैवी घटक तिथे सर्वत्र आढळत होता . या संपूर्ण हिरव्यागार चित्राला गालबोट लावण्याचे काम नर्मदेच्या दुतर्फा साठलेले प्लास्टिकचे थर करत होते ! मी तिथे काय काय वस्तू पडल्या आहेत याचा हिशोब लावला . शाम्पू च्या पुड्या , शाम्पू च्या बाटल्या, उदबत्तीच्या पुड्या , रबरी चपला ,बूट ,अंगातील कपडे , प्लास्टिकच्या पिशव्या , थर्माकोलच्या पत्रावळ्या , प्लास्टिकचे ग्लास आणि चमचे ,प्लास्टिकचे कागद , पीव्हीसी पाईपचे तुकडे , प्लास्टिकची खेळणी , नर्मदेला वाहिलेल्या टेरिकॉटच्या साड्या , वाहून आलेली नायलॉनची कोळ्यांची जाळी अशा वस्तूंचा अक्षरशः खच तिथे पडला होता . काही ठिकाणी हा थर साधारण चार फूट जाडीचा झाला होता . म्हणजे संपूर्ण पाय आत मध्ये घातला तरी प्लास्टिकच प्लास्टिक लागत होते . थोड्या अंतरावर असलेल्या लेपा धरणामुळे पाणी संथ होऊन हा सगळा कचरा इथे साठला होता . या सर्व प्लास्टिक सोबत आलेल्या रसायनांमुळे या भागातील पाणी अतिशय दूषित झालेले असणार हे उघड होते . या प्लास्टिकचा एकमेव फायदा असा होत होता की त्यामुळे चिखलामध्ये माझा पाय फसत नव्हता तर प्लास्टिक वर पाय ठेवून चालता येत होते . तसेच हा प्लास्टिकचा थर जेवढ्या भागत होता तिथे एक गवताची काडी सुद्धा उगवू शकत नव्हती . मी मनोमन असा निश्चय केला की भविष्यात कधी काळी नर्मदे काठी प्लास्टिक निर्मूलनाची कुठली चळवळ उभी केली तर ती सर्वप्रथम या भागात राबवावी . इतके प्लास्टिक इथेच पडले होते . बाकीचे काय करतात माहिती नाही परंतु आपण स्वतःपुरता जरी असा निर्णय घेतला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदा मातेमध्ये किंवा अन्य कुठल्याही जलस्त्रोतांमध्ये टाकणार नाही तरी हा प्रश्न खूप सहज गत्या सुटणारा आहे . प्लास्टिकच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी तज्ञ असतील तर त्यांनी कृपया या मध्ये लक्ष घालावे . प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया या नावाने ज्यांना ओळखले जाते ते पद्मश्री डॉक्टर आर वासुदेवन यांना व्यक्तिशः भेटून मी हा संपूर्ण विषय समजावून सांगितलेला आहे . त्यांनी रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे तंत्र शोधून काढलेले आहे परंतु त्यासाठी काही ठराविक प्रकारचे प्लास्टिक लागते .अशा प्रकारचे रबर अधिक प्लास्टिक अधिक पॉलिथिन अधिक पोलियुरेथिन अधिक पॉलिस्टर त्यांना चालत नाही . हे सर्व प्लास्टिक आहे असे उचलून याला उष्णता युक्त दबाव देऊन त्याचे चौकोनी ब्लॉक तयार केले ,तर त्याचा वापर धरण किंवा बंधारे बांधताना करता येऊ शकतो . कालांतराने याचे रूपांतर एका अभेद्य खडकामध्ये होऊ शकते . कृपया तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा . असो . माझे लक्ष सतत डावीकडच्या झाडीकडे होते . एखादे वन्य श्वापद अचानक अंगावर येऊ नये इतकी माफक अपेक्षा होती . हळूहळू पायाखाली असलेल्या चिखलाचे प्रमाण वाढू लागले . आणि आता तर अखंड गुडघाभर चिखलातून मी चालत होतो . मला पुन्हा एकदा इंद्रावती नदीतील चिखल आठवायला लागला . ज्या अर्थी या मार्गाने कोणी जात नाही त्याअर्थी इथे देखील असेच काहीतरी होऊ शकते याची मनाची तयारी मी करून ठेवली होती . अचानक समोर एक ओढा आडवा आला . प्रचंड जंगलातून हा बाहेर आला होता . त्यामुळे त्याला काठ वगैरे प्रकार नव्हता . आता हा ओढा ओलांडणे क्रमप्राप्त होते . हा ओढा किती भयानक आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या ओढ्याचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे .
सियाराम बाबांचा आश्रम जवळ आलेला असताना मला आडवा आलेला ओढा लाल मार्कर ने दाखवलेला आहे .
हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला गुडघाभर चिखल कसा होता आणि ओढा कसा होता हे लक्षात यावे ! लाल मार्कर दाखविला आहे त्याच ठिकाणावरून मी ओढा पार केला .
मी ओढा पार करण्याकरता थांबलेलो आहे हे बघताक्षणी दूरवर नावेतून मासे पकडणारा एक केवट ओरडला चलते रहो चलते रहो ! त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही परंतु हात वारे लक्षात आले . मी नर्मदा मातेचे स्मरण करून ओढ्या मध्ये पाऊल ठेवले . इंद्रावती नदी बरी म्हणायची कारण तिथे पाय स्थिर तरी राहत होता . इथे प्रत्येक पाऊल चिखलात जात होते ! गुडघाभर पाण्यात गेल्यावर मी पुन्हा नावाड्याकडे पाहिले . अजूनही तो मला पुढे जा पुढे जा अशी खूण करत होता . मी कमरे एवढ्या पाण्यात गेलो . पुन्हा नावाड्याकडे पाहिले . त्याचे पुढे जा पुढे जा सुरूच होते . बकावा गावामध्ये रमेश जाधव ने मला सांगितले होते की सियाराम बाबा ,हे त्यांना कितीही पैसे , कोणीही अर्पण केले , तरी त्यातले फक्त दहा रुपये काढून घेतात . उदाहरणार्थ कोणी त्यांना दोन हजार रुपयाची नोट दिली तर ते १९९० रुपये परत करतात .वीस रुपये दिले तर दहा रुपये परत करतात . म्हणून मी मला दक्षिणा मिळालेली एक दहा रुपयाची नोट माझ्या छाटीच्या पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवून दिली होती . पाठीवरचे दप्तर काढून मी डोक्यावर घेतले आणि साधारण छाती एवढ्या पाण्यात उतरलो . नशिबाने नर्मदेचे पाणी स्थिर असल्यामुळे ओढ्याच्या पाण्याला ओढ नव्हती . परंतु त्यामुळेच इथे खूप सारा गाळ देखील माजला होता . अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी ओढा पार झालो . ज्या नावाने मला हात केला होता त्याचे आभार व्यक्त करावेत म्हणून मी वळून मागे पाहिले . परंतु नावाडी काही दिसेना . कदाचित तो अतिशय वेगाने उलट दिशेला गेला असावा . परंतु इथे उभे राहिल्यावर मला साधारण तीन चार किलोमीटरचा नदीचा परिसर दिसत होता . नावाडी कुठेच दिसत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी नर्मदा मातेचा जयजयकार केला . त्याने अतिशय आश्वासक पद्धतीने पुढे जा असा जो एक इशारा केला होता त्याच्या बळावर मी इथपर्यंत आलो होतो . आयुष्यामध्ये गुरूचा सहभाग इतकाच असतो . एखादी गोष्ट करावी की न करावी याचा फक्त हो किंवा नाही इतका सल्ला गुरुने दिला तरी पुरेसा असतो . त्याने या मार्गाने आधी प्रवास केलेला असल्यामुळे त्याचा सल्ला हा विशेष महत्त्वाचा ठरत असतो . आता पुन्हा एकदा छोटे-मोठे नाले नर्मदार्पण होताना दिसू लागले .यातील पाणी घाणेरडे होते याचा अर्थ गाव जवळ आले होते . थोड्याच वेळात एक शेवटचा आंबील ओढा लागला . साधारण गुडघाभर खोलीचा थोडा मी धावतच पार केला आणि भटियाण तेली गावाचा घाट लागला . मुख्य भटियाण बुजुर्ग गाव इथून लांब आहे . त्याची एक छोटी वस्ती म्हणजे तेली भटियाण. या घाटावर वर्षभर प्रचंड गर्दी असते . रविवारी तर इथे पाऊल ठेवायला जागा नसते असे लोकांनी मला सांगितले .
सियाराम बाबांचा घाट
या घाटावर बरेचदा अशी गर्दी असते
हे सर्व लोक फक्त आणि फक्त सियाराम बाबा यांच्या दर्शनासाठी येत असतात . इथे समोरच्या तटावर
गोगवाँ नावाचे गाव आहे . या गावातील नावाडी उत्तर तटावरून दक्षिण तटावर लोकांना आणून सोडतात . माणशी दहा रुपये किंवा वीस रुपये घेतले जातात . उत्सवाच्या काळामध्ये यातला प्रत्येक नावाडी किमान एक लाख रुपये कमवतो याच्यावरून आपण किती लोक येत असतील याचा अंदाज बांधावा ! दक्षिण तटावर जे लोक सडक मार्गाने दर्शनासाठी येतात त्यांना पाच किलोमीटर दूर गाडी लावून चालत यावे लागते . कारण पाच किलोमीटर लांबीची गाड्यांची रांग कधी कधी इथे लागलेली असते . सियाराम बाबांचे प्रस्थ हे असे आहे ! परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण त्यांना पाहिले तर इतका विरक्त मनुष्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नसेल ! केवळ एक लंगोटी हेच त्यांचे बारा महिने ठरलेले वस्त्र आहे . नर्मदा खंडातील सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या या महान तेजस्वी तपस्वी संतांच्या दर्शनाची ओढ मला लागली होती त्यामुळे मैयामध्ये प्रतिकात्मक स्नान करून थेट आश्रम गाठला . आश्रमामध्ये बाबा बसलेले होते ! सियाराम बाबांचे वय किती आहे यावरून अनेक मतप्रवाह आहेत . मी थेट बाबांना त्यांचे वय विचारले असता त्यांनी ८९ असे वय सांगितले . या घटनेला आता दोन वर्षे झाल्यामुळे त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षे आहे ( आंग्ल वर्ष 2024 रोजी ) . १०० , ११० ,१२० ,१३० वगैरे वयाचे आकडे अतिरंजीत आहेत . बाबांच्या रूपाचे वर्णन काय करावे ! अतिशय तेजस्वी अशी छोटीशी मूर्ती . शरीरामध्ये अत्यंत किमान आवश्यक इतकाच अस्थि मज्जा मांस याचा भाग शिल्लक राहिलेला . मेद तर नावाला सुद्धा नाही . परंतु या सर्वांवर मात करणारे प्रचंड तेज संपूर्ण अंगावरती विलसणारे ! पाठीमध्ये अलीकडच्या काळात आलेला बाक . गोरापान वर्ण ! अंगाला भस्म लावलेले . निळसर घारे डोळे ! डोक्यावर अर्धे टक्कल आणि अर्धा जटाभार ! वितभर दाढी . एका पायाला उंदीर चावल्यामुळे झालेली जखम . त्यावर पट्टी बांधलेली . यांच्या तीन मजली आश्रमामध्ये कुत्री मांजरे उंदीर साप बेडूक सर्वांना मुक्त प्रवेश आहे . कोणीही त्यांना हाकलत नाही .
रामायण वाचत बसलेले सियाराम बाबा .समोर कोण आले गेले याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते .किमान ते तसे दाखवत तरी नाहीत .
बाबा एका सिंहासनावर कायम बसलेले असतात . इथेच रात्री झोपतात . समोर रामायणाची मोठी पोथी उघडून ठेवलेली असते व तिचे अखंड वाचन चालू असते . समोर एक जुना टीव्ही लावला असून त्याच्यावरती आलटून पालटून रामायण आणि महाभारत लावले जाते . हे रामायण महाभारत चालू असताना आवाज प्रचंड मोठा ठेवला जातो त्यामुळे बाबांना ऐकायला कमी येते की काय असे तुम्हाला वाटू शकते ! परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांनी बाबांशी फार काही बोलू नये म्हणून बाबांनी च केलेली ही युक्ती आहे , हे मला त्यांच्या शिष्यांनीच सांगितले !
लोक रांगेत उभे राहून बाबांचे दुरून दर्शन घेत होते . हातात दिलेले दहा रुपये बाबा एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे समोर कोण येते आहे वगैरे गोष्टींकडे अजिबात लक्ष नव्हते . गावातीलच काही ग्रामस्थ इथे सेवेसाठी दिवस-रात्र येत राहतात . त्यांच्याशी मात्र बाबा मोठ्या आवाजात बोलताना दिसतात . बाबांना एक चष्मा पण आहे परंतु ते त्याचा वापर क्वचित प्रसंगी करतात . रांगेनुसार माझा देखील क्रमांक आला आणि मी तसाच पोटाच्या कप्प्यात हात घालून दहा रुपयाची ती ओली नोट काढली आणि बाबांच्या हातात ठेवली . बाबा नोट हातात घेऊन न बघता पलीकडे फेकत होते . परंतु माझी नोट त्यांना ओली लागल्यावर त्यांनी खालपासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिले . "अच्छा परिक्रमावासी है " बाबा म्हणाले . त्यांचा आवाज ऐकून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले ! मला म्हणाले "गीले कैसे हो गये ? " मी बाबांना म्हणालो , "बाबा मै मैय्या के किनारे किनारे चल के आया । रास्ते मे एक नाला पडा । उसमे भीग गया । " बाबांनी खात्री पटवून घेण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या ग्रामस्थांकडे पाहिले . ग्रामस्थ म्हणाले होय बाबा बरोबर आहे . काठाने येताना ओढे ओलांडत यावे लागते . मी ग्रामस्थांना म्हणालो , " त्यांनाही हे माहिती असणार आहे ! " सगळ्यांनी आनंदाने बाबांचा जयजयकार केला ! सियाराम बाबा अजूनही मी दिलेल्या दहा रुपयाच्या त्या नोटेकडे उलटी पालटी करून पहात होते आणि त्यांच्या आजूबाजूला काहीतरी ते शोधत आहेत असे मला जाणवले . अखेर त्यांनी एका कोपऱ्यात ठेवलेला हिटर काढला . त्याच प्लग स्वतः सॉकेटमध्ये घातला . आणि तो चालू करून पुढून मागून ती दहा रुपयाची नोट वाळवत बसले . जसजसे त्या नोटेवरील पाणी उडून जात होते तसतसे माझ्या शरीराला चिकटलेले अनावश्यक विचार ,विकार नष्ट होत आहेत असा भास मला झाला . ती नोट जसजशी कडक होऊ लागली तसतसा मी देखील वैराग्याने कर्तव्य कठोर बनतो आहे असे मला वाटू लागले . एक क्षण असा आला की ती नोट संपूर्णपणे कोरडी दिसू लागली . जणू काही तिला कधी पाण्याचा स्पर्शच झाला नव्हता ! बाबांनी ती नोट फडकवली आणि हसू लागले ! इकडे मला देखील असे वाटू लागले की मला मायारूपी संसाराचा स्पर्श मुळात कधी झालेला नाहीच आहे !मी जन्मतःच परब्रम्ह स्वरूप आहे ! अहं ब्रह्मास्मि । सर्वम् खल्विदं ब्रह्म । चिदानंद रूपः शिवोsहम् शिवोsहम् । " अब सुखा हो गया ! अब हमारे पास रख सकते है । " बाबा टाळी वाजवत आनंदाने म्हणाले . हा संपूर्ण प्रकार होईपर्यंत मी बाबांच्या समोर हात जोडून उभा होतो . बाबांनी मला हाताने प्रसाद दिला . मी बाजूला झालो आणि ग्रामस्थ माझ्याशी बोलू लागले . ते म्हणाले बाबाजी तुम्ही खूप भाग्यवान आहात ! तुमची नोट सियाराम बाबांनी इतका वेळ हाताळली ! ते जेव्हा नोट उलटी पालटी करून पाहत होते तेव्हा तुमच्या आयुष्याकडे पाहत होते , भूत वर्तमान भविष्याकडे पाहत होते , हे लक्षात ठेवा ! त्यांनी तुमची आतापर्यंतची सर्व पापे जाळून टाकली ! तुम्हाला पुन्हा एकदा कोरडे केलेले आहे ! तुमची परिक्रमा सफल झाली ! हे ऐकून मला खूप बरे वाटले ! मी अजूनही ओला आहे हे पाहिल्यावर एका युवकाने मला मागे असलेल्या धर्म शाळेमध्ये नेऊन आसन लावण्यासाठी जागा दाखविली . इथे आधीपासून २५ ते ३० परिक्रमावासी येऊन उतरलेले होते . मी ओले कपडे पिळून वाळत टाकले . आणि पुन्हा एकदा बाबांच्या समोर जाऊन बसलो . बाबांची ऊर्जा इतकी सकारात्मक होती की तिथून हलावे असे वाटतच नव्हते . सियाराम बाबा हे पूर्वाश्रमीचे उच्च विद्या विभूषित असून त्यांनी बारा वर्षे एका पायावर उभे राहून तप केलेले आहे आणि बारा वर्षे मौन साधना केलेली आहे . त्यामुळे पूर्वी त्यांना खडेश्वर बाबा आणि मौनी बाबा देखील म्हणायचे . बाबांच्या अनेक रंजक कथा भक्तमंडळी मला सांगत होती . एकदा सर्व भक्तांनी मिळून असे ठरवले की सियाराम बाबांना मारुती कार घ्यायची .त्यासाठी निळ्या रंगाची मारुती अल्टो गाडी सर्व भक्तांनी विकत घेतली आणि बाबांना भेट द्यायची ठरवली .बाबा थेट मारुतीच्या शोरूम मध्ये गेले . भक्तांना म्हणाले मी गाडी वापरावी असे तुम्हाला वाटते ना ? घ्या ! सियाराम बाबा स्वतः गाडीमध्ये बसले आणि ती गाडी स्वतः चालवत भटियाण तेली घाटापर्यंत घेऊन आले आणि एका गॅरेजमध्ये जी लावून टाकली ती कायमचीच !पुन्हा कधीच बाहेर काढली नाही ! त्यावेळी बाबा गाडी चालवताना चा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे !
बाबांच्या पायाला भक्तांनी स्पर्श करू नये म्हणून असा एक छोटासा पिंजरा तयार करण्यात आलेला आहे . रोज लाखो भक्तांनी पायावर डोके ठेवले तर त्यांच्या पायाची जखम कधीच बरी होणार नाही .
रोज परिसरातील एक डॉक्टर येऊन त्यांच्या पायाला मलमपट्टी करतात .
परंतु सियाराम बाबा हे पुरते विदेही सत्पुरुष असल्यामुळे ते पायाची काळजी अजिबात न घेता कुठेही अनवाणी पायाने फिरतात .वरील चित्रामध्ये महापुराच्या पाण्यात अनवाणी पायाने चालताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत .
इथे थोड्याच वेळामध्ये वापीचा अवधूत फरले आणि त्याच्यासोबत चे सर्व परिक्रमा वासी देखील दाखल झाले . इथे नाशिक मध्ये निफाड तालुक्यात रुई देवगाव येथील ज्ञानेश्वर माऊली शिंदे हे कीर्तनकार देखील परिक्रमा संपवून ओंकारेश्वर पासून पायी आले होते . त्यांच्यासोबत एक माताराम होत्या . हे दोघे पुन्हा चालत नाशिकला निघाले होते . यांनी मला सियाराम बाबांविषयी भरपूर माहिती सांगितली . बाबांनी आता जिथे आश्रम आहे तिथे साधना केलेली आहे . एकदा नर्मदा मातेला महापूर आला . परंतु बाबांनी त्यांचे स्थान सोडले नाही . बाबांच्या पायाला स्पर्श करून मैया पुन्हा खाली निघून गेली . त्या पातळीच्या वर पुन्हा कधीच पाणी आले नाही . खाली बाबांनी एक मारुतीचे मंदिर बांधलेले आहे . एकदा यांचे आणि मारुतीचे काहीतरी भांडण झाले . त्यांनी चिडून मारुतीला त्या मंदिरामध्ये चिणून टाकला आहे ! रोज रात्री बाराच्या सुमाराला बाबा या मारुतीची नर्मदा मातेची तुळशीची पूजा करून मगच झोपतात असे मला माऊलींनी सांगितले . मला हे सर्व नवल वाटत होते ! आपल्याला हा सर्व प्रसंग स्वतः डोळ्यांनी पाहायला मिळावा अशी एक सूप्त इच्छा मनामध्ये येऊन गेली . बाबांना लोक कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या आणून देत होते ! आता हा विदेही महापुरुष थोडीच शीतपेय पिणार आहे ! परंतु बाबा ती बाटली घ्यायचे आणि एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे शिष्य मग त्या सगळ्या बाटल्या गोळा करून एका बादलीमध्ये सर्व शीतपेये एकत्र करायचे . मग त्यात माझाचा आंब्याचा रस पण आला आणि सोड्यावाले थम्स अप पण आले ! आणि स्थानिक बाजारात मिळणारा जीरा सोडा सुद्धा आला ! हे सगळे एकत्र कालवले की बादली बाहेर ठेवायचे आणि परिसरातील कुत्री त्याच्यावर ताव मारायची ! सतत अति शर्करायुक्त पेयं पिल्यामुळे इथल्या सर्वच कुत्र्यांच्या अंगावर भरपूर त्वचारोग दिसत होते . परंतु तरीदेखील कुत्र्यांना आत मध्ये आल्यावर कोणी बाहेर काढत नव्हते . आपल्याला कोणी काही बोलत नाही ही माहिती असल्यामुळे इथल्या श्वानवर्गाच्या अंगात एक वेगळीच मस्ती संचारलेली दिसत होती !
रामायण वाचत बसलेले . शेजारी बाबांच्या डाव्या हाताला त्यांनी नोट वाळवली तो हिटर दिसतो आहे .नर्मदा स्नान केल्यावर वर बघितले असता घाट असा दिसतो . भव्य पिंपळाचा वृक्ष संपूर्ण परिसरावर छाया धरून आहे .
आश्रमातील शिवलिंग
प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा
मागे असलेल्या कठड्यापाशी राहून बाबा नर्मदा मैया ची देखील पूजा करतात .
नंतर जवळच टांगलेल्या तुळशीच्या कुंडीकडे जातात .
आणि तुळशीची देखील पूजा करतात .
हे सर्व करताना बाबा सोबत काडीपेटी न ठेवता केवळ आपल्या हाताने ज्योत प्रज्वलित करतात हे अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिलेले आहे . याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्हाला युट्युब वर सापडतील . इतके सियाराम बाबांचे तप:सामर्थ्य आहे असे म्हणतात !
बाबांच्या तपोबलाचे तेज त्यांच्याजवळ गेल्यावर कोणालाही जाणवते . त्यांची वाणी अतिशय धारदार आहे . त्यांची नजर तीक्ष्ण आहे . त्यांची स्मृती तल्लख आहे . मी त्यांच्यासमोर खाली बसून राहिलो . हजारो लोक दर्शन घेऊन जात होते . बाबा फारसे कोणाकडे पाहत नव्हते . अचानक एखाद्या माणसाशी मात्र बोलायचे . एका नवाड्याने नवीन नाव घेतली होती . त्यांना दर्शन घेतल्याबरोबर बाबांनी विचारले काय घेतली का रे नाव ! केवट ढसा ढसा रडू लागला . तुमचे पाय नावेला लागावेत इतकीच इच्छा आहे असे म्हणाला . "बघुया ! जशी मैयाची इच्छा ! " महाराज म्हणाले .
बाबांचे अखंड रामायण वाचन चालू होते . हळूहळू अंधार पडला आणि गर्दी कमी होऊ लागली . आता सर्व स्थानिक ग्रामस्थ तिथे येऊन बसले . बाबा हळूहळू रंगात आले आणि सगळ्यांशी गप्पा मारू लागले ! प्रत्येकाला ते नावाने ओळखत होते . इतक्यात एक गावकरी त्यांचे पाय दाबायला बसला . माझ्या मनात विचार आला की आपल्याला सुद्धा बाबांचे पाय दाबायला मिळाले तर किती बरे होईल ! इकडे रामायण जोरात सुरू होते ! त्याच्या आवाजात कोण कोणाला काय बोलतो याचा काही पायपोस कोणाला लागत नव्हता ! मी हळूच त्या पाय दाबणाऱ्या माणसाला खूण केली की मी सुद्धा पाय दाबू का ? तो मला म्हणाला की बाबा परिक्रमावासींकडून जरा सुद्धा सेवा घेत नाहीत . त्यांचा जन्म परिक्रमावासींच्या सेवेसाठी आहे असे ते सांगतात . त्यामुळे तुम्हाला ते पायाला हात तर लावू देणार नाहीतच पण मला सुद्धा पाय दाबू देणार नाहीत . मला असे फार जाणवले की हे जर तर चे याचे स्वतःचे अनुमान आहे . अजून थोडा वेळ गेला आणि माझ्या मनात तीव्र इच्छा होऊ लागली . पाय दाबण्याची पहिली पायरी म्हणून मी सर्वप्रथम पायाजवळ येऊन बसलो . बाबांचा एक पाय हा मनुष्य दाबत होता . एक पाय हलवत बाबा बसले होते . आपल्याकडे या गेम मधले ट्रम्प कार्ड होते ! हुकुमी एक्का! तो काढायचा मी ठरवले . मी हात जोडले आणि नर्मदा मातेची प्रार्थना केली , " मैया मला सियाराम बाबांचे पाय दाबायची इच्छा आहे . " मी डोळे उघडून बाबांकडे बघत बसलो . कोणीतरी अचानक काहीतरी सांगितल्यासारखे बाबांनी इकडे तिकडे पाहिले आणि माझ्याकडे डोळ्यात डोळे रोखून पाहू लागले . मला काही कळायच्या आत त्यांनी त्यांचा दुसरा पाय माझ्या दिशेला केला आणि म्हणाले , " दबाव " .माझ्या आनंदाला पारावार उरला नाही ! मला बाबा स्वतः पाय दाब म्हणाले आहेत हे शेजारच्या ग्रामस्थांच्या लक्षात आले ! ते खाणा खुणा करून एकमेकांना सांगू लागले ! त्यांच्यासाठी हा चमत्कार होता . कारण सियाराम बाबा कधीच कुठल्या परिक्रमावासीकडून कणभर सुद्धा सेवा करून घेत नाहीत . माझे पाय दाबणे बहुदा बाबांना आवडले असावे . त्यांनी थोड्यावेळाने त्यांचा दुसरा पाय देखील माझ्या मांडीवर ठेवला ! हा त्या ग्रामस्थाला इशारा होता की आता तू पाय दाबू नको . तो मागे सरकला आणि मी बाबांच्या समोर येऊन बसलो . आता बाबांचे दोन्ही पाय माझ्या दोन्ही मांड्यांवर टेकलेले होते . आणि मी दोन्ही पाय एकाच वेळी दाबत होतो .बाबांचा एक पाय दगडासारखा कडक होता आणि एक पाय लोण्यासारखा मऊ होता .त्यांनी ज्या पायावर उभे राहून खडेश्वर तपस्या केली तो पाय दगडासारखा कडक झाला होता . दुसरा पाय अतिशय मऊ मृदू मुलायम होता .वरती बाबांचा टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू होता . मध्येच ग्रामस्थांशी बोलत होते . मध्येच रामायण वाचत होते . असा सुमारे तीन तास मला त्यांचा सत्संग लाभला ! त्यानंतर परिक्रमावासींची भोजनाची वेळ झाल्यामुळे मला आत बोलावण्यात आले . भोजन झाल्यावर पुन्हा काही काळ बाबांजवळ बसलो . त्यांची प्रत्येक कृती बघताना अतिशय आनंद वाटत होता ! शुद्ध परमात्म स्वरूप असा त्यांचा देह होता . त्यांची त्वचा इतकी नितळ आणि इतकी पातळ होती की विचारू नका ! अंगातील शीर आणि शीर दिसायची . रात्री बाबा बाहेर येऊन मारुतीशी कसे बोलतात ते मला ऐकायचे होते . त्यासाठी मी आश्रमामध्ये आसन न लावता बाबा जिथून बाहेर पडतात त्या दरवाजाच्या समोरच आसन लावले . माझ्यासोबत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आसन लावले . बाबांच्या खोलीमध्ये प्रचंड उंदीर होते . उंदीर त्यांचे पाय कुरतडून टाकायचे . म्हणून भक्तांनी बाबांसाठी एक पिंजरा केला होता . बाबा दिवसभर ज्या आसनावर बसतात रात्री त्याचे रूपांतर पिंजऱ्यामध्ये केले जायचे . जेणेकरून उंदीर आत येऊन चावू नयेत . माऊली आणि मी बाहेर झोपलेलो होतोच . प्रचंड थंडी पडली होती . आणि अशातच बाबांच्या कुटीचे दार उघडले . माऊलींनी मला सूचना केली होती की त्यांच्या पाया वगैरे पडायचे नाही . झोपून राहायचे . परंतु आपोआप आम्ही दोघे उठून बसलो . बाबा हातामध्ये तीन पेटवलेल्या उदबत्या घेऊन शांतपणे बाहेर आले . हळूहळू चालत पायऱ्या उतरत मारुती मंदिरापाशी गेले . मारुतीला त्यांनी उदबत्ती ओवाळली . आणि दिवसभर काम करून संध्याकाळी भेटणारे मित्र कसे गप्पा मारतात तसे भिंतीवर ते एक हात ठेवून मारुतीशी गप्पा मारू लागले . त्यांचा संवाद असा होता की जणूकाही मध्ये मारुती देखील त्यांच्याशी बोलत होता . अशा चार-पाच मिनिटे गप्पा मारून झाल्यावर ते पिंपळाला प्रदक्षिणा घालत मागच्या बाजूला गेले . तिथे असलेल्या कठड्यावर हात ठेवून त्यांनी नर्मदा मातेला ओवाळले . तिच्याशी देखील दोन पाच मिनिटे त्यांनी संवाद साधला . त्यानंतर टांगलेल्या तुळशीच्या कुंडी पाशी गेले आणि तुळशीला ओवाळले . त्यानंतर हळूहळू आपल्या खोलीमध्ये गेले आणि पिंजऱ्यामध्ये शिरले . भक्तांनी पिंजरा आणि दार लावून घेतले . यानंतर मात्र ते रात्रभर खोलीमध्ये एकटेच असतात . त्यांच्याजवळ सेवेकरी म्हणून देखील कोणाला झोपायची परवानगी नाही . त्यांच्या काही भक्तांनी सांगितले की बाबा स्वतः हनुमंताचा अवतार असल्यामुळे रात्री हनुमंताच्या स्वरूपामध्ये झोपतात . तसे दर्शन देखील काही लोकांना झालेले आहे . परंतु प्रचंड थंडीमध्ये देखील बाबा कायम एकाच लंगोटीवर कसे काय राहू शकतात हे खरोखरच एक आश्चर्य आहे . त्यासाठी प्रचंड मनोनिग्रह पाहिजे . आणि देह बुद्धीचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय हे शक्य नाही . माऊलींमुळे मला सियाराम बाबांच्या या अप्रतिम रूपाचे अप्रतिम असे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचे आभार मानले . अवधूत ने बाबांच्या सोबत मी बसलेलो असताना बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले होते . परंतु परिक्रमा संपण्याच्यापूर्वीच त्याचा तो फोन पूर्णपणे फॉरमॅट झाला , असे नुकतेच त्याच्याशी बोलल्यावर कळाले . अन्यथा त्याच्या फोनवर त्याने काही अतिशय मौलिक क्षणांचे फोटो काढलेले होते . काही व्हिडिओ मात्र तो तिथूनच त्याच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करत होता ते अजूनही उपलब्ध आहेत . सकाळी उठल्यावर सियाराम बाबा वरती स्नानासाठी जातात . त्यांच्या आश्रमाचे तीन मजले आहेत . अतिशय अरुंद अशा जिन्याने वर जावे लागते . सर्वप्रथम ते सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन पक्षांना वगैरे खायला घालतात . मला तिथल्या सर्व ग्रामस्थांनी हे आधीच सांगून ठेवलेले असल्यामुळे मी आधीच वरती जाऊन बसलो होतो . ठरल्याप्रमाणे बाबा आले त्यांनी पक्षांना धान्य आणि माकडांसाठी बिस्किट वगैरे काढून ठेवली . तिथून खालच्या मजल्यावर आल्यावर अतिशय थंडगार अशा पाण्याचा एक हौद त्यांनी तयार केलेला आहे . त्यातल्या पाण्याने ते आंघोळ करतात . हे पाणी साचून राहिल्यामुळे अजूनच गार झालेले असते . बाबा चुकूनही गरम पाणी स्नानासाठी वापरत नाहीत . गावकऱ्यांनी खूप प्रयत्न करून पाहिले परंतु बाबा त्यांच्या कठोर तपाचरणामध्ये कुठलाही बदल करत नाहीत . यावर गावकऱ्यांनी जो उपाय शोधून काढला आहे तो ऐकल्यावर तुम्हाला लोकांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे ते लक्षात येईल ! बाबा पहिल्या मजल्यावर उघड्यावरती थंडगार पाण्याने अंघोळ करतात . त्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून काही तरुण गुपचूप एक प्रकार करतात . जसे बाबा वरती आंघोळीला गेले तसे खाली काही तरुणांनी लोखंडाच्या बादल्यांमध्ये भरपूर लाकडे पेटवून इमारतीच्या चारी बाजूने ठेवून दिली . त्याच्यामुळे त्या इमारतीच्या भोवतीची संपूर्ण हवा गरम झाली ! जरी बाबा गरम पाणी वापरत नसले तरी किमान गार हवा त्यांना बाधू नये इतकाच त्यामागचा हेतू ! गुरूभक्तीचे इतके अप्रतिम उदाहरण मी अन्यत्र कोठे पाहिले नाही ! बाबांचे स्नान झाल्यावर बाबांनी एका विशिष्ट पद्धतीने लंगोटी नेसली जी पद्धत मला कायमची स्मरणात राहिली . मी वेगळ्या पद्धतीने लंगोट नेसायचो . बाबांची पद्धत अधिक योग्य होती आणि त्यामध्ये त्यांनी मोकळ्या सोडलेल्या एका पदरा मुळे अधिक चांगल्या पद्धतीने लज्जा रक्षण होत असे . बाबांना भक्त किती मानतात हे इथे मला पाहायला मिळाले . बाबा जसजसे पुढे चालत निघाले तसेच अशी त्यांची ओली पावली मागे उठू लागली . काही तरुण भक्त त्या पावलांचे तीर्थ घेऊन चाटू लागले ! असे बाबा खाली उतरेपर्यंत अखंड चालू होते ! या प्रसंगाचा अवधूतने घेतलेला व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वर मला सापडला . अवधूत हा व्हिडिओ घेत असताना मी त्याच्या सोबतच चालत होतो . खाली आल्यावर बाबा जमलेल्या सर्व भक्तांसाठी स्वतः चहा बनवतात . तो प्रसंग देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहिला ! कितीही भक्त आले तरी तो चहा बरोबर पुरतो असा सर्वांचा अनुभव आहे ! आणि तसेच झाले ! आता हा चहा पुरणार नाही असे वाटत असताना चहा पुरून उरला ! इतका उरला की आम्ही सर्वजण तीन तीन कप चहा पिलो ! बाबा शक्यतो एकदाच दहा रुपये कोणाकडून ही घेतात . परंतु मी मात्र पाच-सहा वेळा दर्शन घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांना दहा दहा रुपये दिले . बाबांनी देखील ते घेतले . स्थानिक ग्रामस्थांनी मला सांगितले की हे अजून एक आश्चर्य आहे . कारण बाबा कधीच एका माणसाकडून पुन्हा दहा रुपये घेत नाहीत . या सर्व पैशाचे बाबा काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . तर बाबा प्रचंड दानधर्म करतात . इथे येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद चहा नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था बाबां तर्फे असते . बर बाबा माणसी १० रुपयेच घेत असल्यामुळे जेवढे धन आले तेवढे संपूर्ण किंवा त्याहून जास्तीचा परतावा ते देतात . नुकत्याच बांधून झालेल्या राम मंदिरासाठी बाबांनी साडेचार कोटी रुपये दिले . या परिसरातील अन्य काही मंदिरांच्या बांधकामासाठी जेव्हा लोक देणगी मागायला येतात तेव्हा बाबा कोट्यावधीमध्ये दानधर्म करतात .
दुर्दैवाने या युट्युब चॅनेल चा एक्सेस आता त्याच्याकडे नाही . परंतु तरीदेखील हे व्हिडिओ कायमचे अजरामर झालेले आहेत .
एकंदरीत श्री सियाराम बाबा यांच्या कृपेचा वर्षाव मला अनुभवता आला ही नर्मदा मातेची माझ्यावरील कृपा आहे . साधू बनून साधना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व तरुणांना माझी नम्र विनंती आहे की एकदा श्री सियाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये राहून त्यांचे जगणे , वागणे , चालणे ,बोलणे , खाणे , पिणे , वावरणे याचा अभ्यास करावा . आणि मग आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा . कारण साधू म्हणून जगणे ही सोपी गोष्ट नाही . प्रसिद्ध संत श्री गोंदवलेकर महाराज असे नेहमी सांगायचे की आयुष्यात काय वाटेल ते करा ,फक्त साधू बनू नका !
आता मी बाबांचे दर्शन घेऊन निघणार इतक्यात बाबांनी त्यांच्या शिष्यांना सूचना केली आणि माझाच्या दोन लिटरच्या तीन बाटल्या मला द्यायला सांगितले ! माझ्या अंगावर काटाच आला ! दोन लिटरच्या तीन बाटल्या म्हणजे सहा किलो वजन कोण बाळगणार ! परंतु बाबा सेवेदराला म्हणाले की अरे रिकाम्या तीन बाटल्या दे ! त्याने तीन बाटल्या बाबांच्या पुढे धरल्या बाबांनी त्या बाटल्यांना हात लावला आणि मग त्या बाटल्या त्याने मला दिल्या ! कल्पना करून पहा ! तीन प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या मला देऊन बाबांनी काय साध्य केले असेल ! त्याचे उत्तर मला लवकरच मिळाले ! संतांची कुठलीही कृती निरर्थक नसते . त्या बाटल्यांचा काय उपयोग झाला , त्यांनी काय पराक्रम गाजवला , ते पुढच्या लेखात पाहूया ! बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि दंड उचलला . नर्मदे हर ! परमहंस सच्चिदानंद श्री सियाराम बाबा महाराज की जय ! नर्मदे हर !
लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा
सियाराम बाबांच्या इथून शरीर पुढे हलले तरी मन बराच काळ तिथेच होते .बाबांचे व्यक्तिमत्व अतिशय चुंबकीय आहे . ते फारसे बोलत नसले तरी कृतीतून खूप काही शिकवतात . सतत कार्य मग्न राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे . बाबांचा आश्रम सोडल्यावर मी पुन्हा एकदा मैया चा तट पकडला . इथे जबरदस्त झाडी होती . या संपूर्ण परिसरात साळींदर आणि बिबट्या यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे असे मला स्थानिक लोक सांगत होते . अजून तरी या भागात मगरीचा संचार सापडलेला नाही . परंतु चुकून माकून कोणी इथे मगर आणून सोडली तर तिच्यासाठी अतिशय उत्तम असा हा अधिवास आहे . कारण पुढे असलेल्या धरणामुळे येथे पाणी स्थिर आहे . तसेच मानवी वावर अतिशय कमी आहे . शक्यतो कोळी लोकांना मासेमारी करताना त्रास होतो म्हणून ते मगरींचा वावर वाढू देत नाहीत . मगरी त्यांचे मासे देखील खातात आणि मुक्त वावरावर बंधने देखील आणतात . परंतु ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर त्या भागातील जंगल सुरक्षित होते त्याप्रमाणे एक मगर आली की नदीचा कित्येक किलोमीटरचा किनारा सुरक्षित होऊन जातो हे वास्तव आहे . इथे बिल्वकेश्वर महादेवाचे मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो .
मंदिराचा परिसर असा आहे
ॐ नमः बिल्वकेश्वराय
नर्मदे काठी प्रत्येक घाटावर छोटी-मोठी अनेक मंदिरे आढळतात . त्या सर्वांचे दर्शन घेत जाणे हा एक आनंदाचा भाग असतो ! प्रत्येक मंदिराचे दर्शन घेताना मी त्या मंदिराचे बांधकाम चालू असताना तिथे असलेल्या वातावरणाची कल्पना करतो ! किती लोकांचा हातभार या मंदिराच्या निर्मितीसाठी लागला असेल हे पाहून धन्य वाटते ! आज मला आनंद मिळावा , मला शांतता मिळावी म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि कष्ट येथे खर्ची घातलेले असतात . मंदिरातल्या स्थापित देवतेला नमस्कार करताना या सर्वांनाच मी मनोमन नमस्कार करतो .
हा सर्व परिसर महापुरामध्ये जलमग्न असतो .
या घाटाच्या पुढे गोधारी घाट नावाचा एक घाट लागला
याच्यानंतर मात्र डाव्या हाताला किर्रर्र अरण्य चालू झाले . या भागामध्ये बिबट्या व अन्य हिंस्र प्राणी असण्याची शक्यता मला आतून जाणवत होती . कारण मानवी वावर शून्य असलेला हा भाग होता . आणि वन्य प्राण्यांना असे परिसर खूप आवडतात . शिवाय आपण माणसे चालून ज्या पायवाटा तयार होतात त्या थोड्या मोठ्या असतात .परंतु वन्य प्राण्यांच्या पायवाटा थोड्या-छोट्या असतात . जंगलातून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या अशा पायवाटांची संख्या वाढली की ओळखायचे इथे श्वापदांचा वावर आहे ! अशा ठिकाणी न थांबता वेगाने पुढे निघून जाणे श्रेयस्कर ठरते . त्यामुळे मध्ये एखादा रम्य किनारा मिळाल्यावर थांबणारा मी इथे मात्र अखंड चालत राहिलो . मला कोणी दिसत नसले तरी मी कोणाला तरी दिसत होतो ! हातातील दंड तुम्हाला अशावेळी फार म्हणजे फार उपयोगाचा ठरतो त्यामुळे परिक्रमेला जाताना चांगला मोठा दंड सोबत घ्यावा ! तो केवळ आधारासाठी नाही . तो तुमचा प्राणरक्षक आहे .
या भागातील जंगल कसे आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून गुगल नकाशा आपल्यासाठी जोडत आहे .
आपण थेट नर्मदेचा किनारा पहावा . जिथे जमीन आणि नर्मदा भेटते तिथून मी चालायचो . हे जंगल जरी दाट असले तरी एक पाऊल ठेवण्या एवढी जागा सर्वत्र मिळायची .
अधून मधून असा एखादा गवताचा भाग लागायचा . परंतु डाव्या हाताला जंगल असायचेच .
पुढे पुढे हे जंगल अजून दाट होत गेले . अधून मधून लोक शेती करत असले तरी प्राण्यांना लपून बसता येईल अशी खूप झाडी इथे होती .
इथे काठाने चालत मी एका नदीपाशी आलो आणि तिने माझा मार्ग अडवला . नदी फारच खोल दिसत होती . जसं जसे तुम्ही एखाद्या धरणाच्या जवळ येता तसतशा नद्या खोल होत जातात . मी तेली गाव सोडले होते . आणि लेपा गावाकडे निघालो होतो . मध्ये या नदीने वाट अडवली होती . वरून एका साधूने मला आवाज दिला म्हणून मी तिकडे गेलो . हा परिक्रमेमध्ये असलेला एक तरुण साधू होता . याचे नाव होते हार्दिक मुनी . वय फार फार तर २२ - २३ असावे . तब्येतीने गुटगुटीत होता . चेहऱ्यावर तेज होते . बोलण्यात हुशारी होती परंतु तितकीच नम्रता देखील होती . अतिशय कृतिशील होता . आणि सोबत फोन बाळगत नव्हता याचा अर्थ खरा साधू होता ! पुढे हा फार मोठे नाव कमावणार असे मला वाटले ! याने मला सांगितले की ही नदी पार करता येणे अशक्य आहे कारण इथे नाव नाही . तसेच नदी पार केल्यावर इतके घनघोर जंगल आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही . त्यापेक्षा इथून मागे थोडेसे चालत गेल्यावर असावड गावाच्या जवळून एक रस्ता जातो जो लेपा बंधार्याकडे जातो . परंतु या गावातून सरळ मी चालत गेलो तर वेदा नदीवरचा पूल लागतो तो ओलांडून मी पलीकडे जावे असे त्याने मला सुचवले . परंतु मला नदीच्या काठाकाठाने चालायचे आहे असे मी त्याला निक्षून सांगितले . तो मला त्याच्या छोट्याशा झोपडीमध्ये घेऊन गेला . आणि मला त्या भागातील सर्व परिस्थिती त्याने सांगितली . हा खरे म्हणजे परिक्रमेमध्ये होता . परंतु त्याला हे ठिकाण आवडल्यामुळे इथे चातुर्मास करायची इच्छा झाली . त्यामुळे तो या जंगलामध्ये एकटाच राहत होता . इथे बिबट्याचा मुक्त वावर आहे असे त्याने मला सांगितले . मला ज्या भागातून जायचे होते तिथे बिबटे सतत फिरत असतात असे त्याने सांगितले . कालच इथे मासेमारी करणाऱ्या एका नावाड्याने समोर बिबट्या पाहिल्याचे हार्दिक मुनी म्हणाला .
नुकत्याच जाहीर झालेल्या प्राणी गणने नुसार मध्य प्रदेश मध्ये भारतातील सर्वाधिक ३९०७ बिबटे आहेत . (मार्च २०२४ ) . असोत .
ही नदी पार करण्यासाठी त्याने स्वखर्चाने साडेचार फूट रुंदीचा एक लोखंडी पूल बनवला होता . हा पूल बनवल्यापासून नदी पार करणे लोकांसाठी खूप सोपे होऊन गेले होते . त्याने मला या पुलापर्यंत जाण्याचा रस्ता समजावून सांगितला . परंतु तो थोडासा क्लिष्ट आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला चला मी तुम्हाला स्वतःच तिथपर्यंत सोडून येतो . आणि माझ्यासोबत तो सुमारे तीन किलोमीटर चालला ! या काळात आमच्या भरपूर गप्पा झाल्या! मला तो मुलगा अतिशय आवडला ! एक आदर्श साधू होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी त्याच्याकडे होत्या . मुख्य म्हणजे वय त्याच्या बाजूने होते ! बाकी सर्व मिळविता येते परंतु वय फक्त गमावता येते ! त्याने बांधलेला पूल छोटा च परंतु अतिशय प्रभावी होता . ही नदी मोठ्या खडकाळ प्रदेशातून वाहत होती . नेमक्या त्यातील एका खडकावर हा पूल त्याने अंथरला होता . बाकी दोन्ही बाजूला फुफाटा होता . या पुलावरून मोटरसायकल सुद्धा जाईल इतका तो मजबूत होता . हा पूल बनवण्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला असे त्याने मला सांगितले . हे पैसे त्याने भिक्षेतून वापरले . पुढे गेल्यावर डावीकडे गाव लागते तुम्ही उजवीकडे जंगलाकडे वळा असे त्याने मला सांगितले . याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते . मला अचानक आठवले की ओंकारेश्वरला गजानन महाराज मठामध्ये मला नवे कोरे धोतर शर्ट वगैरे मिळालेला आहे जो मी घालणार नाही ! मी लगेच त्याला ते वस्त्र देऊन टाकले . त्याने देखील मोठ्या आनंदाने वस्त्राचा स्वीकार केला ! पुन्हा याची कधी भेट आयुष्यात होईल का नाही माहिती नाही . हाच भाव चित्तात ठेवून त्याला कडकडून मिठी मारली आणि पुढे निघालो . हार्दिक मुनीची ती हार्दिक भेट कायम हृदयात राहील ! असे आश्वासक ,निस्पृह आणि निरोगी तरुण साधू बनत आहेत तोपर्यंत आपला धर्म अत्यंत सुरक्षित आहे ! पुढे जंगलातील मार्ग सुरू झाला . दुतर्फा भयंकर झाडी होती .
या भागातील वनक्षेत्र कसे आहे हे कळावे म्हणून वरील नकाशा पाहावा ! नर्मदा माता उजवीकडून डावीकडे वाहते आहे .
इथल्या झाडीमध्ये बऱ्याच वन्य श्वापदांच्या हालचाली जाणवत होत्या . परंतु त्याकडे दुर्लक्ष करत मी नर्मदेचे नामस्मरण करत झपाझप पावले उचलत होतो . या भागातून कोणीही परिक्रमा वासी जात नाहीत हे मात्र खरे . कारण संपूर्ण मार्गात मला कोणीही भेटले नाही . स्थानिक ग्रामस्थ देखील इकडे फिरकत नाहीत . अशा ठिकाणी परिक्रमेचा अधिक आनंद मिळतो ! कारण इथे फक्त दोघेच जण असतात ! तुम्ही आणि मैया !
गावाची हद्द सुरू झाल्यावर हेमंत नामक एक दुकानदार सेवा देतो त्याने चहा बिस्किटे दिली . पुढे विक्रम नावाच्या एका सेवाधारीचा बालभोग घेऊन लेपा गावात आलो .
थोडेसे पुढे गेल्यावर एक छोटासा आश्रम लागला .इथे रामाच्या सुंदर मूर्ती होत्या .
लेपा येथील श्रीराम प्रभू
या आश्रमात थांबण्याचा आग्रह होत होता . परंतु क्षणभर विसावा घेऊन पुढे निघालो . इथून परिक्रमावासी डावीकडे वळतात आणि वेदा नदी पुलावरून पार करतात .मी मात्र लेपा बांध जवळून पाहायचे ठरवले . त्यामुळे बिबट्याचा वावर आहे हे माहिती असून देखील निर्मनुष्य असा नर्मदेचा काठ पुन्हा पकडला .
थोडेसे जंगल मागे टाकल्यावर अगदी लेपा बांधाच्या जवळ पोहोचलो ! या भागात खूप मोठे मोठे दगड होते . तसेच छोट्या-मोठ्या शिवलिंगांचा खच पडला होता .
लेपा बाँध
धरणाच्या नंतर लगेच डावीकडून नर्मदेला येऊन मिळणारी वेदा नदी . वेदा आणि नर्मदे वरील पूल देखील इथे दिसत आहेत .
धरणाचे भव्य वक्राकार दरवाजे दिसत होते . मी उभ्या उभ्या दरवाजे मोजले .
२७ - २८ मोठे वक्राकार पोलादी दरवाजे होते आणि २९- ३० छोटे दरवाजे होते .मोजताना डोळे फिरायचे इतके ते सुंदर व एकसारखे बांधकाम आहे.
परिसर प्रचंड खडकाळ आहे .
धरणाकडे जाणारा काठावरचा मार्ग
निखळ आनंदाने वाहणारी नर्मदा माई !हिच्या ऊर्जेला बांध कोण बरे घालू शकणार !
प्रचंड पोलाद वापरलेले वक्राकार लोखंडी दरवाजे
हे धरण बांधून पूर्ण झालेले आहे . परंतु या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करायला सुरुवात केली तर सियाराम बाबांचा मठ , बाजीराव पेशवा यांची समाधी आणि अनेक गावे बुडणार आहेत .त्यामुळे या भागातील लोकांनी प्रचंड विरोध करून धरणाचे काम बंद पाडले आहे ते कायमचेच ! मुळात या विषयावर स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर मला असे सांगण्यात आले की ही जागा धरण बांधण्यासाठी योग्य नाहीच आहे . परंतु तत्कालीन सरकारांनी बाजीराव पेशवा यांची समाधी नष्ट व्हावी यासाठी इथे धरण बांधण्याचा घाट घातला .
इतके भव्य दिव्य बांधकाम करण्यासाठी किती खर्च आला असेल विचार
करून पहा ! बाजीरावाची समाधी बुडविण्याचे हे सर्व बजेट नर्मदा किनाऱ्यावरील
सजग ग्रामस्थांनी पाण्यात बुडविले !
बाजीराव पेशवा यांचा इतिहास मराठी माणसांना फारसा ज्ञात नसला तरी मध्य प्रदेशातील सर्वच लोकांना त्यांचा प्रचंड अभिमान आहे .
उरी बाजी तानाजीला संस्मरावे . . .
बाजीराव पेशवा यांना ब्राह्मण म्हणून हिणवणे म्हणजे , छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा /कुणबी म्हणून मानणे किंवा नरेंद्र मोदी यांचे काम न पाहता , तेली ही त्यांची जात पाहण्या इतके ते केविलवाणे आणि हिणकस आहे . आज आपण ज्या अखंड हिंदुस्थानात राहत आहोत त्याचे सर्वप्रथम स्वप्न पाहणारे साक्षात शिवछत्रपती होते . आणि त्याच्या कर्तव्यपूर्तीसाठी अत्यधिक झटणारा एक महान योद्धा होता बाजीराव पेशवा .
लेपा धरण बांधूून पूर्ण झालेले असले तरी अजून त्याचा वापर होत नाही ही त्यामुळेच आनंदाची गोष्ट आहे . इथून इंदोर शहराला पाणीपुरवठा गेलेला आहे . तसेच महेश्वर विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती देखील केली जाते . तो समोरच्या तटावरील धरण क्षेत्राचा भाग आहे . सध्या मी इथले रंगीबेरंगी दगड पहात अगदी धरणाच्या पहिल्या दरवाज्यापाशी गेलो . तिथून खरे जर चालत पलीकडे जाता येईल अशी परिस्थिती होती . परंतु काँक्रीटच्या त्या भरावावर किमान अर्धा फूट शेवाळे वाढलेले होते . त्यामुळे चालत जायच्या ऐवजी सटकत जावे लागले असते ! शिवाय पुढे ते पाणी कुठे व कसे पडते आहे याची कल्पना नव्हती . तिथे खडक असण्याची खूप शक्यता होती . उथळ पाणी अधिक अपघातजनक असते . खोल पाणी तुलनेने सुरक्षित असते . त्यामुळे मी शांतपणे धरणाची भिंत तिरकस चढावरून चढलो . धरण चालवण्यासाठी लागणाऱ्या खोल्या , नियंत्रण कक्ष सगळे भिंतीवर होते . आत सर्व यंत्रणा होती . परंतु लोकांनी सर्वत्र तोडफोड केली होती . काचांचा खच पडला होता . बऱ्याच दिवसात तिथे कोणीच आले नसावे हे स्पष्ट जाणवत होते . धरणाचे दरवाजे कायमचे सताड उघडून ठेवलेले होते . धरण बांधून सोडून सर्वजण निघून गेले होते असे जाणवत होते . त्या भिंतीवरून जंगलामध्ये उतरलो . आता वेदा नदी चालत पार करणे एवढा एकच मार्ग माझ्या पुढे होता . कारण तिचा पूल खूप लांब होता आणि तिथवर जायला रस्ता नव्हता . नदीच्या पाण्याला वेग होता . पाण्याचा रंग लगेच वेगळा कळत होता . पिवळसर पांढरट रंगाचे हे पाणी होते आणि नदी विस्तृत आणि खडकाळ होती . पाण्याला प्रचंड गती असली तरी देखील भरपूर शेवाळे वाढलेले होते . नदीचे पाणी थोडेसे गरम होते . साधारण गुडघाभर पाण्यापर्यंत मी नदी पार करायला सुरुवात केली . प्रचंड वेगामुळे पाय थरथरू लागले . परंतु काठीचा आधार घेत मी कसा बसा चालत होतो . एक क्षण असा आला की प्रचंड शेवाळलेला पायाखालचा दगड अचानक घसरगुंडीसारखा उतरू लागला . जिथे उतार होता तिथे पाणी खोल होते . आता काय करावे असा मी विचार करेपर्यंत पाण्याचा एक वेगवान प्रवाह आला आणि माझे दोन्ही पाय सटकून मी पाण्यात पालथा पडलो ! एका क्षणात संपूर्ण भिजलो ! आता पाठीवरील सामान देखील भिजणे क्रमप्राप्त होते ! परंतु मला असे जाणवले की कोणीतरी मला उचलून धरले आहे ! म्हणून पाहतो तो माझ्या पाठीवरील झोळी अथवा सॅक पाण्यामध्ये बुडलेलीच नव्हती ! काठीचा आधार घेत कसाबसा उठलो ! आता पूर्णच भिजलेलो असल्यामुळे पाण्याचे भय निघून गेले ! आणि धावतच नदी पार केली ! सियाराम बाबांनी दिलेल्या तीन रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या मी पाठी जवळ ठेवल्या होत्या ! त्यामुळे माझे दप्तर वेदा नदीमध्ये बुडले नाही ! आणि त्यामुळे आतले सर्व सामान कोरडे राहिले ! बाबांनी घडवून आणलेला हा एक मजेशीर चमत्कार ! संत कुठलीही गोष्ट का करतात याचा आपल्याला त्या क्षणी अंदाजच येत नसतो ! पुढे ते लक्षात येते . नदी पार केल्यावर काठाने पुन्हा चालू लागलो . इथे एक मांत्रिक पाण्यामध्ये एका महिलेला व तिच्या पतीला उभे करून काहीतरी पूजा पाठ करत होता . यामध्ये त्या स्त्रीचे मोकळे केस धरून तिला तो पुन्हा पुन्हा पाण्यात बुडवायचा . ती स्त्री देखील शांतपणे हा अत्याचार सहन करत होती . मी तसाही मातीने माखलेला होतो . त्यामुळे इथे शेजारीच मी स्नान करू लागलो . थोडेसे त्या तिघांच्या जवळ जाऊन फक्त एकदाच खुणेने तिला विचारले की माझी गरज आहे का ? तिने नाही , तु पुढे जा , असे मानेने मला सुचवले . अशी खूप शक्यता होती की तिची इच्छा नसताना बळजबरीने तिला या लोकांनी पकडून येथे आणले असावे . तसे काही असते तर माझी दंड युद्धाची कौशल्ये वापरण्याची संधी मला इथे मिळाली होती इतकेच !परंतु तसे काही नाही हे त्या मातारामने सुचवल्यामुळे मी कोरडी वस्त्रे परिधान केली अन पुढे निघालो .
इथे कोपऱ्यावरतीच वेदवेदेश्वर महादेवाचे मंदिर होते . अतिशय सुंदर असे छोटेसे मंदिर होते . टेकडी चढून वर जाऊन दर्शन घेतले . इथे झाडी पण छान होती .
इथे खाली परिक्रमावासींना विश्रांती घेता यावी म्हणून एका स्थानिक ग्रामस्थाने झाडाचा पार बांधलेला आहे .
इथून थोडेसे पुढे गेल्यावर वेदांत विला आश्रम नावाचा एक सुंदर आश्रम आहे . ब्रह्मलीन संत श्री संजय जी वेदांती यांनी हा उभा केला आहे . यांचे नुकतेच दुर्दैवाने पुरी जगन्नाथ यात्रेवरून परत आश्रमाकडे येताना अपघाती निधन झाले होते . त्यामुळे त्यांची समाधी देखील आश्रमाच्या परिसरातच आहे . यांचे वय फार नव्हते . ५० च्या आतच होते . यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून सुमारे १८५०० किलोमीटरचे पदभ्रमण भारतभर केले होते . सायकलवर चारधाम यात्रा केली होती . ऋषिकेश येथून वेदांत विषयात डिग्री घेतल्यावर त्यांनी नर्मदा काठी आधी नयागावचा आणि नंतर माकड खेडा गावातला हा आश्रम स्थापन केला . इथे परिक्रमावस्यांची उत्तम सोय त्यांनी केली आहे . सध्या एक गृहस्थी साधू हा आश्रम सांभाळतात . या आश्रमात सर्वजण पुढच्या दाराने येतात . मी मागून आल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले . इथे पत्र्याची एक मोठी शेड आहे तिथे मी आसन लावले . बाबांनी सुग्रास भोजन प्रसाद वाढला . इथे एक तरुण सुशिक्षित साधू भ्रमणामध्ये आलेला होता . त्याने मला साधू जीवन परिक्रमेच्या व्यतिरिक्त कसे असते याबाबत खूप माहिती दिली . एकंदरीत परिक्रमा हे काही काळाचे साधू जीवन आहे . तर साधूजीवन ही आयुष्यभराची परिक्रमा आहे असे माझे आकलन आहे . एखाद्याला साधू जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल ,परंतु ते जीवन कसे आहे याची कल्पना त्याला नसेल तर त्याला एक छोटीशी झलक देण्याचे काम परिक्रमा करते . जसे आंब्याची पेटी घेण्यापूर्वी आंबे वाला छोट्याशा चाकूने कापून तुम्हाला एक फोड खायला देतो तसा हा प्रकार आहे .त्याचा फायदा असा आहे की ज्यांना हे जीवन झेपत नाही ते नाहक साधू बनून साधूत्वाची गरिमा कमी करत नाहीत . असो . वेदांत विला आश्रमात सर्व सुख सोयी होत्या . बांधलेले संडास बाथरूम होते . मी वेदांती महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो . गृहस्थी साधूंशी देखील चर्चा केली . बरेचदा तुम्हाला ठरलेले प्रश्न विचारले जातात व त्याची उत्तरे तुम्हाला तोंडपाठ झालेली असतात . तुम्ही कुठून आले ? परिक्रमा कुठून चालू केली ? तुम्ही एरव्ही काय करता ? परिक्रमा कशासाठी उचललेली आहे ? वगैरे हे ठरलेले पठडीतले ठराविक प्रश्न असतात . एक-दोन वाक्यातच या सर्व प्रश्नांचा निफटारा तुम्ही केला की मग मात्र बोलण्यासारखे खूप विषय शिल्लक राहतात . त्यामुळे मी गेल्या गेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन वाक्यात देऊन पुढे त्यांच्याकडून काही विशेष ज्ञान मिळते का याची चाचपणी करायचो . माझ्या पायातील फाटलेले बूट पाहून या साधूंनी मला नवीन चपला दिल्या . हे चपलेचे लखानी कंपनीचे मॉडेल इथे प्रचंड प्रसिद्ध असून सर्वजण अशाच चपला घालतात . याच्या काही स्थानिक डुप्लिकेट येतात . चप्पल म्हटली की सर्वांच्या पायात हीच चप्पल दिसते . पुण्या मुंबईसारखे पायताणांचे सोस इथे पुरवत नाहीत असे माझ्या लक्षात आले . अशा रीतीने परिक्रमेच्या ६१ व्या दिवशी मी मैय्याकृपेने सातवे पादत्राण स्वीकारले !
वेदांतविला आश्रमामध्ये प्रस्तुत लेखकाला मिळालेली सातवी पादत्राणे
तत्पूर्वी उडिया परिक्रमावासी मिलन प्रधान ला मी दिलेले लोफर्स . अनवाणी परिक्रमा करू शकलो नाही याचे प्रचंड शल्य माझ्या मनात कायमचे आहे . किती ठिकाणच्या पवित्र मातीच्या स्पर्शाला मी केवळ पादत्राणे घातल्यामुळे मुकलो आहे याची कल्पना आपण करू शकणार नाही . : (
वेदांत विला आश्रमाचे संस्थापक ब्रम्हलीन संत श्री संजय जी वेदांती
आश्रमाचे प्रवेशद्वार
आश्रमाचा परिसर खूप मोठा असून महाराजांच्या अपघाती निधनामुळे इथे एक प्रकारचे औदासिन्य जाणवते .सर्वसामान्य भक्त मंडळी अजून त्या धक्क्यातून सावरलेली नाहीत .होय . संपूर्ण भारतभर पदभ्रमण केलेल्या या संन्यासी महाराजांनी सायकलवरून चारधाम यात्रा सुद्धा केली आहे . परंतु पुरी जगन्नाथ येथून भक्त मंडळीं सोबत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे देहावसान झाले . कर्माचे भोग साधूला देखील चुकलेले नाहीत . फक्त सर्वसामान्य माणसाचा मृत्यू आणि साधूचे मरण यात एक फार मूलभूत फरक आहे . समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये तो सांगून ठेवला आहे . समर्थ म्हणतात ,
म्हणोन साधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥
जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥
साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला।
हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥
साधू ने जिवंतपणीच आपल्या जीवनाचे सार्थक केलेले असते . त्यामुळे त्याचे शरीर आधीचेच कारणी लागलेले असते . अशा जीवनमुक्त त्यांनी पुरुषाचे शरीर कुठेही का पडे ना ! तरी तो धन्यच आहे !साधू चा देह अगदी खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर लोकना ते अयोग्य वाटते .परंतु तसे काही नसते कारण साधू मुळातच मुक्त असतो ! असो .
दुपारी चार वाजता माकडखेडा गाव सोडले . आणि काठाकाठाने चालत कठोरा गावात आलो . इथे येईपर्यंत अंधार पडू लागला होता . गावाला एक छोटासा घाट आहे . घाटावरच्या लोकांनी मला सांगितले की गावामध्ये नानकदासजी महाराजांची संजीवन समाधी आहे तिथे मुक्कामाची सोय आहे . जवळच असलेल्या समाधी स्थानी पोहोचलो . स्थान अतिशय जागृत होते . एका मोकळ्या मैदानात समाधी मंदिर होते . समोर महादेवाचे मंदिर होते . शेजारी चार भिंतीवर पत्रा आंथरून परिक्रमावासींची मुक्कामाची उत्तम सोय केली होती . आत मध्ये जमीन दिसणार नाही इतक्या गाद्या घातल्या होत्या . क्षणभर विसावा घेतला . नंतर बाहेर येऊन परिसराचे अवलोकन करू लागलो . शहरातील स्त्रिया साधारण दुपारी चारच्या सुमाराला चहा वगैरे घेऊन टीव्ही तरी लावतात किंवा शॉपिंग वगैरे करण्यासाठी बाहेर पडतात . परंतु खेड्यातील स्त्रिया संध्याकाळी न चुकता पूजेचे ताट घेऊन जवळच्या मंदिरात जातात . मी महादेवाची स्तवने म्हणत बसलेलो असताना कमीत कमी ५० एक स्त्रिया येऊन दर्शन घेऊन गेल्या असतील . प्रत्येकीच्या डोक्यावर पदर असायचा . त्यांचा मुक्त संवाद आणि वावर असायचा परंतु आत मध्ये एक परिक्रमा वासी बसला आहे हे पाहताक्षणी त्या मर्यादशील व्हायच्या .आणि पदर सावरून पाया पडून शांतपणे पूजेला लागायच्या . आपल्या मौनातून अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याची ही पद्धत फारच वेगळी आहे . आश्चर्य म्हणजे साठीच्या पुढच्या स्त्रिया जशा देवाला येत असत तशा तरुण मुली सुद्धा यायच्या . तुलनेने रेवा खंडातील तरुण मुले देवधर्म कमी करतात असे निरीक्षण मी नोंदवित आहे .अर्थात सेवा कार्यामध्ये यांचा हिरीरीने पुढाकार असतोच . फक्त प्रत्यक्ष मंदिरात जाऊन पूजा करण्याचे प्रमाण थोडेसे कमी आहे इतकेच . बहुतांश मुली चांगला पती मिळावा यासाठी महादेवाची आराधना करतात . आणि लग्न झालेल्या स्त्रिया पतीने चांगले वागावे म्हणून महादेवाची आराधना करतात ! एकंदरीत महादेवाची आराधना काही कोणाला चुकलेली नाही ! पुरुष महादेवाची आराधना कमी करताना दिसतात याच्यामागे कदाचित "अशी बायको मला का दिलीस " याचा राग असावा ! अर्थात हा सर्व विनोदाचा भाग आहे हे आपण सर्वजण जाणताच असे गृहीत धरत आहे ! असो . या मंदिरात मी बराच वेळ बसलो होतो . विजवेश्वर महादेव असे या महादेवाचे नाव होते . जव म्हणजे गती . विजव म्हणजे विशेष गती असलेला . विजवेश्वर म्हणजे विशेष गती असलेला देव .
या भागातील काही छायाचित्रे वाचकांच्या माहिती करता देत आहे . सर्व चित्रे गुगल नकाशावरून साभार .
नर्मदा मातेच्या काठावरून दिसणारा नानकदासजी महाराज संजीवन समाधी आश्रम
कठोरा गावातील नर्मदा नदीचे पात्र . इथे खूप खडक आहेत .कदाचित त्यांच्या कठोरपणामुळेच गावाला कठोरा नाव पडले असावे .
कठोरा गावातील निर्मळ नर्मदा मैया
गुरु नानकदासजी महाराज यांची संजीवन समाधी
श्री विजवेश्वर महादेव मंदिर
श्री विजवेश्वर महादेव
परिक्रमावासींची निवास व्यवस्था . याच खोलीत मी मुक्काम केला होता .
देव दिवाळीनंतर नर्मदा परिक्रमा सुरू झाली की इथे अशा रितीने मोठ्या संख्येने परिक्रमावासी उतरतात व मोठ्या मोठ्या पंगती चालतात . परंतु नर्मदा मातेची माझ्यावर अशी असीम कृपा होती ,की इथून पुढे सर्वत्र मी एकटाच होतो .
थंडी चांगली पडली होती . पत्रे असले की थंडी वाढते .माझे पडल्या पडल्या हवामानाचे निरीक्षण चालायचे . रात्र होईल तशी थंडी वाढत जाते . परंतु मला मात्र थंडी कमी होत असून उकाडा वाढत चालला आहे असे जाणवू लागले . मला मनोमन त्याचे आश्चर्य देखील वाटले . इथे काही साधूंच्या गुहा आहेत असे मला कळाले होते . नुसते बसून राहण्यापेक्षा त्या गुहा पाहून याव्यात असा विचार करून शेजारी असलेल्या एका टेकडीवरील दोन्ही गुहा बघून आलो . गुहा म्हणजे दगडातील गुफा नसून बांधलेल्या बंदिस्त खोल्या होत्या .अत्यंत कचरा व घाण याचे साम्राज्य हे सुचित करत होते की या गुफा अजिबात वापरात नाहीत . दर्शन घेऊन पुन्हा खोलीमध्ये एकटाच बसलेला असताना एक ग्रामस्थ आले . आणि त्यांच्या घरी जेवण्यासाठी येण्याची विनंती मला केली . बाहेर मैदानात मुले खेळत बसली होती . त्यांचा खेळ मी पाहत बसलेला असताना आनंदराम यादव नावाचे हे गृहस्थ आले .परिक्रमेमध्ये कोणाला नाही म्हणणे हा विषय नियमबाह्यच असल्यामुळे त्यांच्या मागोमाग निघालो . यांच्या समोरील घरात राहणाऱ्या शेतकऱ्याने कुबोटा नावाचा मिनी ट्रॅक्टर आजच विकत घेतला होता . माझे ट्रॅक्टरला हात लागावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली . नर्मदा मातेवर लोकांचे किती प्रेम आहे ते अशा प्रसंगातून लक्षात येते . मी देखील त्याच्या ट्रॅक्टरला हात टेकवून डोके ठेवून नमस्कार केला आणि यादवांच्या घरी गेलो . घरी याचे वयस्कर वडील देखील होते . बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या . सुरेख असे घरगुती भोजन त्यांनी दिले . आग्रह हा भारतीय उपखंडाचा जन्मसिद्ध अधिकार आहे ! प्रचंड आग्रह केला जातो ! त्यामागे हेतू हाच आहे की अनाठायी संकोचा पायी कुणी कमी खात असेल तर त्याला अन्न कमी पडू नये . आपल्या पूर्वसुरींनी अतिशय विचारपूर्वक आपली संस्कृती आखलेली आणि बेतलेली आहे . असो . पुन्हा आश्रमामध्ये येऊन महादेवापुढे पुन्हा थोडा वेळ बसलो . या मंदिराला फक्त छत होते भिंती नव्हत्या. त्यामुळे नर्मदेकडून येणारा सुगंधी वारा भावावस्था अधिक गहिरी करायचा . अचानक मृद्गंध येऊ लागला ! आणि पाहता पाहता धुवाधार पावसाला सुरुवात झाली ! नर्मदा खंडामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो ! धावतच खोलीमध्ये गेलो . आणि पडून राहिलो . भल्या पहाटे जाग आली तेव्हा मी उघडाच पडलेला होतो . परिक्रमे मध्ये चालताना इतके श्रम होतात की बरेचदा अंगावर पांघरूण घ्यायच्या आधी झोप लागते . कित्येकदा मी पाणी पिण्यासाठी कमंडलू उघडला आणि तो तसाच हातात धरून झोपी गेलो . सकाळी उठल्यावर पाहिले तर हातात कमंडलू तसाच ! तसेच काहीसे आज झाले . रात्रभर झालेल्या पावसामुळे वातावरण एकदम सुंदर झाले होते ! इथे काठाने खडकाळ भाग अधिक असल्यामुळे सर्व खडक स्वच्छ धुवून निघाले होते ! पावसामुळे निघायला थोडासा उशीरच झाला . पुढे चालत चालत बडगाव आश्रम गाठला .येथे मांडव्य ऋषींची एक प्राचीन ध्यान गुंफा होती . गेली २५ वर्षे इथे एक साधू राहत आहेत . साधू वृक्षप्रेमी आणि स्वच्छताप्रीय होते . आपल्या कुटीमध्ये रामनाम लिहीत बसायचे . त्यांची परवानगी घेऊन गुहेमध्ये जाऊन बसलो . दोन गुणिले दोन फुटाच्या छोट्याशा दरवाजातून आत जाताच समोर दोन मजले होते . एक वर ,एक खाली . वर शिवमंदिर होते तर खाली ध्यानाची खोली होती . आत मांडव्य ऋषींची अजून एक उप गुहा होती .इतकी खोल गुहा असून देखील आश्चर्य म्हणजे आत मध्ये हवा खेळती होती . निरव शांतता ! कुठलाही आवाज आत मध्ये येत नाही ! तुमच्या हृदयाची धडधड फक्त ऐकू येते . नंतर नंतर ती देखील शांत होते . आता तुमच्या मनामध्ये काय वादळे सुरू आहेत तेवढेच तुम्हाला ऐकू येऊ लागतात . बाकी बाहेरच्या कुठल्याही तरंगांचा परिणाम तुमच्या अंतकरणावर होऊ शकत नाही . अगदी नर्मदा मातेचा आवाज देखील आत मध्ये ऐकू येत नाही . कारण गुफा उताराची आणि खोल आहे . अशावेळी तुका म्हणे होय मनाशी संवाद ।आपुलाची वाद आपणासी ।याची अनुभूती नक्की येते ! बसल्या बसल्या कधी डोळे मिटले लक्षात देखील आले नाही . खूपच छान ध्यान लागले . तासाभराने बाहेर आलो . मन संपूर्णपणे निर्विचार झाले होते . मी कोण आहे ,मी कुठे आलेलो आहे , माझे काय सुरू आहे , मला कुठे जायचे आहे , या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे विसर पडला होता . फक्त आणि फक्त शांतता . . शांतता . .शांतता . . .बराच वेळ या शांत अवस्थेमध्ये गेला असावा . साधू महाराजांना या शांततेची सवय असावी त्यामुळे त्यांनी देखील मध्ये व्यत्यय आणला नाही . थोड्यावेळाने टप करून काहीतरी पडले ज्याने माझी ती अवस्था भंग पावली . झाडाला लागलेला एक अप्रतिम आवळा पडला होता ! आजूबाजूला पाहिले तर भरपूर आवळ्यांचा खच पडला होता .आवळे खायला सुरुवात केली . त्याच्या आंबट चवीने भानावर आणले . मैया चे पाणी पिऊन पोसलेले ते आवळे ! आवळ्याला मुळातच आयुर्वेदामध्ये अमृताची उपमा दिलेली आहे ! आणि त्यात हा नर्मदामृत प्राशन केलेला आवळा ! आम्लराजच जणू ! साधू बुवांनी चहा करून आणला . इथे त्यांनी झाडाला एक झोपाळा टांगलेला होता . त्याच्यावर बसून चहाचे झुरके मारत राहिलो . समोर प्रचंड झाडीच्या पलीकडे मैया वाहत होती . अतिशय रम्य असे हे ठिकाण होते . चातुर्मासासाठी अतिशय आदर्श . इथे परिक्रमेदरम्यान आलेल्या एका मराठी माता रामने काही कुटी बांधल्या होत्या . आणि बराच काळ त्या इथे राहिल्या होत्या असे मला साधूने सांगितले .
मांडव्य ऋषींची गुहा दर्शवणारी पाटी . मी वर उल्लेख केलेल्या साधूंचे नाव राघवजी महाराज असे आहे परंतु यांना सगळे बालकबाबा म्हणून ओळखतात .
गुहेच्या आधी ओढ्यावर एक लोखंडी पुल आहे . परंतु मी हा ही ओढा पाण्यातूनच ओलांडला . त्यात एक वेगळाच आनंद आहे .
आश्रमाकडे जाण्यासाठी सुंदर पायवाट बांधलेली असून सुबक पायऱ्या वर गेलेल्या आहेत .
याच त्या पायऱ्या
आश्रमातल्या कुटींचा पाया . मी गेलो तेव्हा या सर्व कुटी बांधलेल्या होत्या .
आश्रमाकडे जाताना अशी झाडी आहे . परंतु आश्रम परिसरातही अनेक मोठे मोठे वृक्ष आहेत .
हेच ते प्रवेशद्वार जिथून गुहेमध्ये उतरून जाता येते .इथे शक्यतो मुक्त प्रवेश दिला जात नाही .माझ्या सुदैवाने बालक बाबांनी मला आत जाऊ दिले .
मी बसलो होतो ती उप गुहा किंवा कोनाडा
हाच तो झोपाळा यावर बसून मी चहाचा आनंद घेतला . इथे बसून भजनानंद घेणाऱ्या एका संतांचे संग्रहित छायाचित्र . (आपण महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरतो . नर्मदा खंडामध्ये कोणालाही संत अशी उपमा सहज देतात . )
आश्रमामध्ये स्वच्छता करण्यासाठी एक आजीबाई येत असत .
त्यांनी देखील खूप गप्पा मारल्या . साधूची मुलाप्रमाणे त्या काळजी घेत .
त्यांना काय हवे काय नको ते पाहत . या साधू महाराजांना गावकऱ्यांनी बराच
त्रास दिला आहे असे त्यांनी मला सांगितले . मला साधू ग्रामस्थ विसंवादाचे
एक महत्त्वाचे सूत्र सापडले आहे . आणि ते सूत्र आहे विसंवाद ! साधू नक्की
कसे आयुष्य जगत असतो किंवा जगलेला असतो याची माहिती तो वैराग्य वशात्
सर्वसामान्य लोकांना देत नाही . आणि सर्वसामान्य लोक देखील त्यांच्या
मनातील साधू विषयक शंकांचे समाधान त्यांच्याकडून करून घेत नाहीत . त्यामुळे
हळूहळू ही विसंवादाची दरी वाढत जाते . साधू विषयक भ्रम पसरविणारी विविध
माध्यमे देखील त्याला तितकीच कारणीभूत आहेत .मुळात कुठल्याही विषयाचे
संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणे हेच बऱ्याचशा
दुःखांचे मूळ असते . त्यामुळे साधू विषयी अज्ञान असून देखील लोक , 'आम्हाला
माहिती आहे तो काय लायकीचा आहे ' वगैरे गैरसमज मनात ठेवून त्याच्याशी
वागायला जातात आणि तिथेच वादाची ठिणगी पेटते . हे साधू अतिशय सात्विक होते
असे माझे निरीक्षण होते . परंतु सतत एकटे राहिल्यामुळे येणारे काही
वैयक्तिक दुर्गुण देखील समाजापुढे प्रकट न करणे साधूला जमले पाहिजे .
अन्यथा वादावादी अटळ आहे . आपल्या लहान मुलांना सतत साधूंच्या संपर्कात
ठेवावे . लहान मुलांशी ते अतिशय मोकळेपणाने वागतात आणि त्यांना खूप
चांगल्या गोष्टी शिकवतात . या उलट आपण "तो बुवाजी तुला झोळीत टाकून घेऊन
जाईल " वगैरे भीती घालून मुलांना साधू आश्रयापासून वंचित ठेवतो .म्हणूनच
लहानपणापासून मुलांवर धर्माचे संस्कार होणे अत्यावश्यक आहे . असा विचार करत
मी आश्रमाच्या पायऱ्या उतरत असतानाच समोर एक पिता-पुत्र परिक्रमा वासी
भेटले ! आणि जणू काही साक्षात माझ्या या विचाराला नर्मदामाता अनुमोदन देत
आहे असे वाटले ! विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले
राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय हे मला या पायऱ्यांवर
भेटले . यांच्या विषयी पुढे अनेक वेळा लिहिले जाईल . सध्या या दोघांचे
दर्शन घ्या इतकेच सुचवेन !
विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय .
या
दोघांना भेटून मला अतिशय आनंद झाला ! हे पिता-पुत्र इतके सात्विक होते की
विचारू नका ! हे पुढे निघाले होते . परंतु त्यांना मी गुहे विषयी माहिती
सांगितली आणि आवर्जून दर्शन घ्यायला सुचवले . दोघेही वर गुहेकडे गेले . आणि
मी पुढे मार्गस्थ झालो . वाटेत विशोकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . हा
खरगोन जिल्हा होता .
लेखांक ७५ : शालीवाहन ,नावडा टोडी , भव्य सहस्रधारा अन ढालखेडा
जसा खरगोन जिल्हा सुरू झाला तसे पाण्यातील मोटर्सचे प्रमाण वाढले . इथे ५० -१०० अशा समूहाने मोठ्या मोठ्या अश्वशक्तीच्या मोटर्स लावलेले असायच्या . त्यासाठी तोफे सारखे गाडे बनवलेले असायचे . इथून चालताना फार काळजी घ्यावी लागायची .मोटर साठी जोडलेल्या विद्युत तारा बरेचदा उघड्या असायच्या . त्यांचा चिखलाला स्पर्श झाला की जमिनीमध्ये विद्युत प्रवाह उतरायचा . अतिशय सावधपणे हा टापू पार करावा लागायचा . खाली माजलेला चिखल चुकविण्यासाठी मोटर मधून येणारे मोठे मोठे पाण्याचे नळे तुडवत चालावे लागायचे . त्याच्यावरून पाय सटकण्याची भीती असायची . त्यामुळे समोर मोटर दिसल्या की अंगावर काटाच यायचा !
इथे तशी काठावर फारशी शेती नव्हती . परंतु आत मध्ये लांब लांब पर्यंत शेतात नर्मदेचे पाणी नेले जायचे . त्यामुळे मोटर्स ची संख्या जास्त होती . शिवाय इथे नर्मदेची पाणी पातळी कमी जास्त होत असल्यामुळे मोटर खूप लांब ठेवलेल्या असायच्या .या भागात वाळू उपसा देखील फारसा कुठे नव्हता . खडकाळ प्रदेश होता . मध्ये एका पुलावर पाकोळ्यांची अक्षरशः हजारो घरटी दिसली होती . त्यांच्या आवाजाने मैयाचा काठ दुमदुमला होता . पाण्याच्या मोटर्समुळे माजलेला चिखल या पाकोळ्यांसाठी घर बनवण्याचा उत्तम कच्चामाल ठरत होता . त्याचे गोळे बनवून त्या न्यायच्या आणि ते लाळेत मिसळत चिकटवून घरटी बांधायच्या .
नराने अर्धे घरटे बांधले की मादी येऊन पाहणी करते . तिला घरटे आवडले तर संसार थाटला जातो आणि घरटे पूर्ण होते . अन्यथा अर्धवट सोडले जाते . बिचाऱ्या पाकोळ्यांना सुद्धा हा कर्मभोग चुकलेला नाही !
इंग्रजीमध्ये याला कॅमोफ्लाज म्हणतात .
आज काठाने चालताना खूप आनंद येत होता . काल झालेल्या पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा होता . भरपूर अंतर चालल्यावर उजव्या हाताला महेश्वर चा घाट दिसू लागला ! माझ्यामते हा जगातील कुठल्याही नदीवरील सर्वात सुंदर घाट आहे !मला त्याचे दर्शन आयुष्यात प्रथमच घडत होते ! डावीकडे एक अतिशय आलिशान हॉटेल बांधलेले आहे . हॉटेल आराम बाग माहेश्मती असे त्याचे नाव आहे .मी आत मध्ये गेलो कारण आधी मला वाटले की हा कुठला तरी आश्रम दिसतो आहे . परंतु ते एक तारांकित हॉटेल आहे कळल्यावर मी पुन्हा काठावर आलो . इथून महेश्वर घाटाचे सुंदर दर्शन होते .
बाहुबली चित्रपटात माहिष्मती हे नाव सर्वांनी ऐकले असेल . प्रत्यक्षात महेश्वर नगरीचे हे प्राचीन नाव आहे .
(हॉटेलच्या खोलीतून दिसणारा महेश्वर घाट )
इथे परिक्रमावासींची सेवा केली जात नाही . परंतु कुणाला पर्यटना निमित्त जायचे असेल तर माहिती असावे म्हणून हॉटेलची माहिती दिली . असो . इथून लगेच पुढे गेल्यावर शालिवाहन घाट लागतो . शाली म्हणजे घोडा . शालिवाहन म्हणजे घोडेस्वारी जाणणारा राजा . आपल्या देशावर शक कुशाण हूण अशा अनेकांनी बाहेरून येऊन राज्य केलेले आहे . आपण जे शालीवाहन शक पाळतो तो शक-कुळातला असा पहिला राजा होता ज्याच्याकडे घोडदळ होते . त्यामुळे आपण त्याला शालीवाहन शक म्हणू लागलो . मात्र हे लोक आपल्या संस्कृतीशी तादात्म्य पावले व अन्य काही लोक अजूनही स्वतःचे वेगळेपण जपून आहेत इतकाच फरक आहे . इथे एक अतिशय सुंदर असे शिवमंदीर होते . मंदिराला दोन मंडप होते . नंदी मंडपा मधला नंदी अतिशय सुंदर होता . मंदिर पुरातन होते . मंदिराच्या कट्ट्यावर बसल्यावर महेश्वर घाट अतिशय सुंदर दिसायचा . मी बराच काळ तिथे बसून होतो . अतिशय शांतता संपूर्ण परिसरामध्ये व्यापून उरलेली होती .
मंदिराच्या मागे मोठे मैदान होते व त्याच्यापुढे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी बांधलेला एक आश्रम होता . इथून मला आवाज दिल्यावर मी तिकडे गेलो . अंधाऱ्या खोली मध्ये आसन लावले . सेवाधारी साधूने मस्तपैकी फोडणीचा भात खायला घातला . माझ्या अपेक्षेप्रमाणे तो मराठीच निघाला ! परंतु मराठी मध्ये बोलत नसे .
श्री शालिवाहनेश्वर महादेव
आश्रमाच्या परिसरातील सुरेख झाडी
हाच तो सुंदर नंदीकेश्वर
मंदिराची आश्रमाकडील बाजू
इथे परिक्रमा वासींना भोजन प्रसाद दिला जातो .
शालिवाहन घाटावरून दिसणारा महेश्वर घाट
इथे देखील मोटारींचे जंजाळ आहेच ! मोटर्स त्याच्या वायर्स आणि पाणी नेणारे नळे यांचे जाळे पहा .इथल्या नावा शिकारासारख्या केलेल्या दिसतात .
महेश्वर घाट डोळ्याचे पारणे फेडणारा आहे ! पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची समाधी देखील आपल्याला इथून दर्शन देते . या महान साध्वीचे उपकार आपल्या कातड्याचे जोडे करून तिला घातले तरी फिटणार नाहीत .
क्षणभर विश्रांती घेतली आणि झोळी उचलली . इथून पुढे थोडेसे चालल्यावर नावडाटोडीचा घाट लागतो . नावडा टोडी हे नावाड्यांची टोळी असे सुचित करणारे नाव आहे . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये जेवढे म्हणून केवट आहेत , नावाडी आहेत त्या सर्वांचे एक वार्षिक संमेलन या गावामध्ये भरते . गंमत म्हणजे त्या संमेलनासाठी बहुतांश नावाडी आपापल्या नावा घेऊन येतात . केवट लोकांचे हे सर्वात महत्त्वाचे संमेलन आहे . अनेक महत्त्वाचे निर्णय इथे घेतले जातात . इथे मला एक केवट भेटला ज्याने माझी चौकशी करून काही फोटो देखील काढले . मी सांगितलेल्या क्रमांकावर त्यांने ते फोटो पाठवून दिले .
त्वदीय पादपंकजं नमामि देवि नर्मदे !
त्या दिवशीचा महेश्वर घाट
नावडा टोडीचा घाट
या भागातील नौका मुख्यत्वे करून अशा आहेत .मागे जोडलेले इंजिन पहावे .
केवट समाज नर्मदेमधील चैतन्य आहे
आज काल अशा साच्यातून काढलेल्या फायबर च्या नावा देखील बघायला मिळतात .
इथून पुढे सहस्त्रद्वारेपर्यंत मैया उथळ व विस्तीर्ण होत जाते . त्यामुळे इथे पक्षी जीवन चांगले आहे .
इथून महेश्वर कडे पाहताना मध्ये एका बेटावर महादेवाचे मंदिर दिसते . हे बाणेश्वराचे मंदिर आहे . याचे वैशिष्ट्य असे आहे की हे पात्राच्या मधोमध आहे . त्यामुळे परिक्रमा वासी इथे जाऊ शकत नाहीत . परंतु आजपर्यंत हजारो पूर झेलून देखील हे मंदिर एकही दगड न हलता उभे आहे ! यावरून भारतीय स्थापत्यशास्त्र किती उच्च कोटीचे होते याचा अंदाज जगाला येतो ! वर्षातील बहुतांश काळ हे मंदिर जलमग्न असते .
अत्युत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना ,श्री बाणेश्वर महादेव
धरणातून पाणी सोडले की मंदिराच्या पातळीला पाणी येते . पाणी उतरले की असे असते . मंदिराच्या चबुतऱ्याचा एक दगड देखील पाण्यामुळे हललेला नाही .वास्तुविशारदांनी या मंदिराचा अवश्य अभ्यास करावा .
बाणेश्वराच्या या दर्शनी भागाने नर्मदेचे किती पूर , महापूर पाहिले असतील याचे गणित लावता येणे कठीण आहे .
बाणेश्वर मंदिरातून दिसणारा शालिवाहन घाट .
पुण्यातील बाणेर गावात देखील बाणेश्वराचे शिवलिंग आहे . इथे एका नैसर्गिक गुहेमध्ये हे शिवलिंग आहे . नर्मदे काठी सापडणाऱ्या शिवलिंगांना सर्वसाधारणपणे बाण असे म्हणायची पद्धत आहे . धनुष्यबाण या शब्दा मधील बाणाशी याचा काही संबंध नाही . तर भेडाघाट जवळ नर्मदेला बाण नावाची एक नदी येऊन मिळते . ही सर्वाधिक गुळगुळीत गोटे नर्मदेला आणून वाहते . म्हणून नर्मदेतील गोट्यांना बाण म्हणायची पद्धत पडली आहे . रमेश जाधव सारखे तज्ञ लोक हा गोटा नर्मदेतील आहे का बाण नदीचा आहे हे ओळखू शकतात . असाच बाण नदीतला एखादा सुबक शिवलिंगाचा आकार सापडला की त्याला बाणेश्वर असे नाव दिले जाते . बाकीचे नर्मदेश्वर असतात . असो .
इथून पुढे काठाने चालल्यावर नर्मदेची नितांत सुंदर सहस्त्रधारा लागते .इथे नर्मदेचे पात्र अक्षरशः हजारो धारांमध्ये विभागले गेलेले आहे . हा संपूर्ण खडकाळ टापू आहे . इथे नुकतीच कयाकिंग ची स्पर्धा होऊन गेली होती . खेलो इंडिया अंतर्गत इथे कयाक स्पर्धेचे अर्थात एकल नौकानयन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते . या काठावरून त्या काठावर ताणून केबल बांधल्या होत्या . त्याला लाल पांढरे चट्टे पट्टे असलेल्या काठ्या लटकवल्या होत्या . या काठ्यांना स्पर्श करत प्रवास करायचा असतो . पाण्याचा प्रवाह भयंकर होता . त्यामुळे ही स्पर्धा खरोखरीच खूप साहसी लोकांसाठीच आहे . मुख्यत्वे करून केवट समाजातील तरुण याच्यामध्ये जास्त भाग घेतात . त्यांना जन्मतःच पाण्याची भीती नसते . तसेच पाणी कुठे खोल आहे कुठे उथळ आहे याचा त्यांना जन्मजात अंदाज असतो . मी इथे बराच वेळ बसलो . सहस्त्रधारेचा विराट आवाज सर्वत्र दुमदुमत होता . इथे नर्मदेच्या मध्ये एक बेट तयार झालेले असून त्याच्या चहुबाजूने नर्मदा वाहते . तिच्या अनेक शाखा इथे दिसतात . त्या विविध दिशांना वाहतात . ही शाखा तर चक्क उलटी फिरुन पुन्हा नर्मदेला येऊन मिळताना दिसते . नर्मदेच्या मध्येच तिचाच एक प्रवाह पुन्हा उलट दिशेला वाहताना कसा दिसत असेल कल्पना करून पहा !
वरील चित्रात केशरी रंगाने दाखवलेली धारा नर्मदेच्या उलट दिशेला वाहताना दिसते . नर्मदा रिव्हर राफ्टिंग पॉईंट लिहिले आहे त्याचे चित्रे खाली देत आहे .म्हणजे तुम्हाला भौगोलिक स्थानाचा अंदाज येईल .
इथे मला एक अतिशय सुंदर बाण सापडला . या नैसर्गिक बाणावर कैलास पर्वतासारखा आकार उठलेला होता . तसेच ॐ आकार देखील यावर दिसत होता .
इथे मला अजून एक अर्धनारी नटेश्वर सापडला . ज्याच्यावर गणपतीच्या मुखाचा आकार नैसर्गिकरित्या उठला होता आणि गळ्यात हार घातल्यासारखा भास होत होता .
दिव्य सहस्त्रधारेचे समोरच्या तटावरून काढलेले चित्र .
नावाप्रमाणे सहस्त्रधारा दिसतात
इथे प्रत्येक फुटावर नर्मदेचे रूप बदलत जाते
पाण्याचे सर्वच प्रवाह अत्यंत गतिमान आहेत
खळाळणारे हे नर्मदा जल तुमच्या खळाळणाऱ्या मनाला शांत करते .
कयाकिंग अथवा रोईंगच्या स्पर्धेसाठी सहस्त्रधारेमध्ये लावलेले मार्कर्स . हाच तो 'रिव्हर राफ्टिंग पॉईंट ' .
अशा रीतीने त्या दोन खुणांच्या मधून आपली नौका न्यायची असते .
आपली कयाक नौका घेऊन मार्कर हिट करताना खेळाडू . कार्बन फायबर पासून बनविलेल्या अशा नौका समोरच्या महेश्वर घाटावर खूप दिसतात . तिथे यांचा एक क्लबच आहे . समोरच्या तटावर गेल्यावर आपण तो पाहणार आहोत .
हा खेळ अत्यंत साहस , शक्ती , युक्ती , चिकाटी ,एकाग्रतेचा असून प्रसंगी जीवघेणा देखील आहे .
या कट्ट्यावर मी बराच वेळ बसलो होतो
स्पर्धेच्या वेळी थोडे अधिक पाणी असते
अशा रीतीने मार्कर अडकवलेले असतात
स्पर्धेसाठी असे तात्पुरते शामीयाने उभे केले जातात .
कार्तवीर्यार्जुन या सहस्त्र बाहू राजाने आपल्या हजार बाहुंनी नर्मदा इथे अडवली होती . म्हणून ती शतखंडित झाली असे मानले जाते . परशुरामाने इथेच त्याला मारले . त्यामुळे त्याची समाधी महेश्वर घाटावर आहे . असो .
इथे एक अद्भुत दृश्य मला पाहायला मिळाले . मध्ये तयार झालेल्या बेटावर भरपूर गवत आहे . ते खाण्यासाठी या काठावरची गुरे तिकडे जातात . जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्यामुळे पोहत जातात . आणि पोहतच परत येतात . ही गुरे परत कशी येतात ते मी तिथे थांबून पाहिले . साधारण पन्नासेक गुरे होती . मी वरती उल्लेख केला त्याप्रमाणे नर्मदा मैया चा एक उलटा प्रवाह तिथे वहातो .त्या प्रवाहातून ती पोहत आली आणि मूळ धारेला लागली . शंभर दीडशे मीटर रुंदीचे पात्र पार करायला त्यांना सुमारे पाचशे मीटर पोहावे लागले ! पुढे एके ठिकाणी सर्व गुरे काठाला लागली ! त्यांच्या मागोमाग गुराख्याने देखील पाण्यात उडी मारली . तो देखील एका गायीची शेपटी धरून काठाला लागला . परंतु त्या सर्व गुरांची ती चिकाटी पाहून मला खूप कौतुक वाटले . फक्त देशी गाय बैलच हा पराक्रम करू शकतात असे मला त्या गुराख्याने नंतर गप्पा मारताना सांगितले . त्याच्याकडून मी ही सर्व प्रक्रिया समजून घेतली . गेली अनेक वर्षे त्यांचा हा उपक्रम नित्य चालू आहे . विशेष म्हणजे छोटी वासरे देखील पोहत होती . रावेरखेडीनंतर इथे मी गुरे पोहताना पाहिली . तिथे पाणी तुलनेने संथ होते . येथे मात्र भयानक वेगाचा प्रवाह आहे . खोली सुद्धा खूप आहे . मध्ये अध्ये चित्रविचित्र खडक आहेत . ते सर्व धोके टाळून जनावरे पोहत होती . गुरांना शाबासकी देऊन पुढे निघालो . परंतु इथे स्नान करण्याचा मोह होऊ लागला . सहस्रधारा म्हणजे धुवाधारचीच भव्य प्रतिकृती . इतक्या धारा होत्या की मन मोहून गेले . खडकातून वाहणारी स्वच्छ मैय्या ! यथेच्छ स्नान केले ! अतिशय स्वच्छ आणि थंडगार पाणी होते ! काळा कुळकळीत चमकदार खडक पायांना अल्हाददायक होता . पाणी अतिशय खोल होते . परिसर निवांत , निर्मनुष्य होता .
काठावरील दगड गोटे अतिशय गुळगुळीत आणि तुळतुळीत आहेत .
इथे ढालखेडा नावाचे एक गाव लागले . गावामध्ये नर्मदेच्या काठावरच अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे . मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . इथे गावातील काही तरुण गप्पा मारत बसले होते . त्यांनी मला सांगितले की पुढे एक नवीन परिक्रमावासी सेवा क्षेत्र निर्माण झाले आहे तिथे मी जावे . तिथे रामायण कथा देखील सुरू होती .
अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील नर्मदातट
मंदिराकडे जाणारा रस्ता
क्षणभर या पारावर विसावा घेतला
अन्नपूर्णा माता मंदिराचे प्रवेशद्वार
ह्याच कठड्यावर गावातील तरुण गप्पा मारत बसले होते . या सर्व तरुणांना परिक्रमे विषयी खूप आस्था होती .
अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेतल्यावर गावातील रस्ता पकडला आणि परिक्रमावासी सेवाक्षेत्रपाशी आलो . एका ओसाड माळाच्या खाली एका झाडाखाली हा आश्रम बांधला होता . नुकतेच बांधकाम झाले होते आणि रामायण कथेने आश्रम सुरू करण्यात आला होता . गावातून भरभरून कन्या गोळा करून भोजनासाठी घेऊन जाणारे टेम्पो मी पाहिले . जाताना सर्व कन्या नर्मदे हर आवाज देत होत्या ! त्यांच्या मागोमाग आश्रमावर पोहोचलो . एक मराठी साधू आश्रम चालवीत होता .
हाच तो ढालखेडा आश्रम
आश्रमाच्या बाहेर अंगणामध्ये अगदी याच ठिकाणी मी आसन लावले .
आश्रमाविषयी अधिक माहिती
घोटू बाबा अन्नक्षेत्र असे आश्रमाचे नाव होते . नर्मदा खंडातील नावे मोठी रंजक असतात .
आश्रमाच्या बाहेर अंगणात अशा पंगती बसायच्या .
या आश्रमामध्ये मला खूप लोक भेटले . विशाखापट्टणम येथून परिक्रमेला निघालेले पिता-पुत्र राजेश प्रजापती आणि तनय इथे मुक्कामी थांबले होते . त्यांच्यासोबत दोन नागा साधू होते . एक अतिशय तरुण होता आणि एक वयस्कर होते . पैकी वयस्कर साधूला कुठेतरी पाहिले आहे असे सारखे मला वाटत होते . तरुण साधू खूप विनोदी स्वभावाचा होता . अतिशय बारीक अंगयष्टी असलेला तो साधू अतिशय चपळ विद्वान आणि हुशार होता . विशेषतः हिंदी भाषेवर त्याचे फारच चांगले प्रभुत्व होते . इथे अजून एक कानफाट्या गोसावी आला होता . याने याच वर्षी संन्यास घेतला होता . त्याचे वय साधारण १८ ते २० वर्षे असावे . तब्येत मजबूत होती . म्हातारा नागा साधू त्याची सारखी खेचत होता . त्यामुळे तो मुलगा वैतागला होता . आता विषय निघालाच आहे तर प्रजापती पिता-पुत्रांविषयी थोडेसे सांगतो . राजेश प्रजापति हा कॉर्पोरेट मनुष्य होता . मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला प्रजापती नोकरी निमित्त विशाखापट्टणम मध्ये स्थिरस्थावर झाला होता . एच एस बी सी नावाच्या बँकेत एका मोठ्या ग्लोबल कम्प्लायन्स युनिटचा तो प्रमुख होता . प्रचंड पगार होता . घरात सर्व सुख सुविधा होत्या . दारू-मटण-पार्ट्या यात आयुष्य मजेत चालले होते . नर्मदा हा शब्द देखील त्याला महिन्याभरापूर्वी माहिती नव्हता . परंतु कुठेतरी आत मध्ये असे जाणवत होते की आपल्याला काहीतरी कमी पडते आहे . ते नक्की काय कमी पडते आहे हे त्याला कळत नव्हते .म्हणून एक दिवस बसल्या बसल्या युट्युब वर तो व्हिडिओ चाळत होता . अचानक नर्मदा परिक्रमा या विषयावरचा एक व्हिडिओ त्याच्या पाहण्यात आला . स्वतः राजेश प्रजापती सांगतात त्याप्रमाणे त्यांना नर्मदा हे नाव देखील माहिती नव्हते . परंतु त्या व्हिडिओने त्यांना वेड लावले . यानंतर नर्मदा परिक्रमा या विषयावरती त्याने संशोधन चालू केले .आणि हळूहळू लक्षात येऊ लागले की हीच एक गोष्ट करायची राहिलेली आहे .आणि हीच गोष्ट आयुष्यातला परमोच्च आनंद मिळवून देणार आहे ! अपेक्षेप्रमाणे घरी पत्नीकडून विरोध झाला . मुलाला कोण सांभाळणार ? पगार पाण्याचे काय वगैरे वगैरे . राजेशने निर्णय घेतला की मुलाला म्हणजे तनयला घेऊन परिक्रमा करायची .आणि
पैसा प्रॉपर्टी चा प्रश्न येऊ नये म्हणून आपली सर्व प्रॉपर्टी त्यांनी विकून टाकली . त्याचे पैसे पत्नीच्या हातात टेकवले आणि तिला माहेरी पाठवून दोघांनी घर सोडले ! किती मोठा निर्णय आहे पहा ! हा घेता येणे सोपे नाही ! राहिला प्रश्न तनयच्या शिक्षणाचा तर तो नर्मदा मातेने कसा सोडवला याचा मी स्वतः साक्षीदार आहे ! तनयची मातृभाषा भोजपुरी . घरी बोलायचे हिंदी . बाहेर चालायचे तेलुगु . आणि शाळेत शिकायचं इंग्रजी . यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झालेली ! त्यातल्या त्यात इंग्रजी वगळता अन्य भाषा त्याला फारशा लिहिता वाचता बोलता येत नव्हत्या. परंतु माझ्यासमोर त्या तरुण साधूने तनयला तुलसी रामायण वाचायला शिकवले . त्या साधूला तुलसी रामायण पाठ होते . अक्षर ओळख माझ्यासमोर ढालखेडा अक्षरांमध्ये करून दिली . पुढे बराच काळ मला हे लोक भेटत राहिले . आणि तनय किती गतीने रामायण वाचायला शिकला आणि त्याचा अर्थ देखील सांगायला शिकला हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे . तीनच दिवसात तो हिंदी वाचायला शिकला . हिंदी म्हणजे आजचे हिंदी नव्हे , तर जुने हिंदी अथवा अवधी अशी ती भाषा आहे . परंतु तनय त्या भाषेमध्ये तरबेज झाला ! घरी राहून शाळेत जाऊन हे सर्व शिकायला तीन वर्षे आरामात जातील ! गुरुकुल पद्धतीचे शिक्षण श्रेष्ठ कसे व का आहे हे मी स्वतः येथे अनुभवले . राजेश आणि तनय यांच्यामध्ये अतिशय सुंदर असा सुखसंवाद व्हायचा . तनय या साधूं सोबत शास्त्र चर्चा करायचा . आधुनिक तर्कशास्त्र अधिष्ठित पद्धतीने शिकलेला असल्यामुळे त्याला शंका कुशंका फार होत्या . कधी कधी त्याची उत्तरे देताना साधूंची भंबेरी उडायची ! त्यांचा हा वादविवाद पाहायला मला फार मजा यायची ! ढालखेडा आश्रमामध्ये तर म्हातारा नागा साधू त्याच्यावर इतका उखडला होता की त्याला शाप द्यायला निघाला होता ! तरुण साधूने झडप घालून त्याला शांत केले ! एकंदरीत सर्व प्रकार मजेशीर होता ! तनय परिक्रमेमध्ये जे काही शिकेल ते बाहेर कुठेही शिकणे शक्यच नाही ! तेरा वर्षे असे त्याचे वय होते . इंग्रजीमध्ये twelve नंतर thirteen येते.इथून पुढे Nineteen पर्यंत प्रत्येक आकड्याच्या स्पेलिंगच्या अखेरीस teen हे शब्द येत असल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांना इंग्रजी मध्ये टीनेजर असे म्हणतात . नेमक्या याच वयात तो योग्य ठिकाणी आला होता . प्रत्येक पाऊल ,प्रत्येक व्यक्ती ,प्रत्येक ठिकाण ,प्रत्येक देवस्थान , प्रत्येक आश्रम ,प्रत्येक धर्मशाळा , प्रत्येक ऋतू ,प्रत्येक दिवस त्याला काही ना काही नवे शिकवून जात होता . त्याच्या प्रगतीचा आलेख मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला ! अनुभवला ! तसा हा मुलगा गुटगुटीत होता . इंग्रजीमध्ये ज्याला ओबीज़ म्हणतात असा तो होता असे त्याच्या वडिलांनीच मला सांगितले .परंतु परिक्रमेमध्ये त्याची तब्येत देखील सुधारली . दिवसागणिक तो प्रगल्भ होत गेला . त्याला मी प्रेमाने तनु म्हणायचो . त्याला देखील माझा लळा लागला होता कारण त्याला उत्तरे कुठल्या पद्धतीने द्यावीत याचा अंदाज मला होता . शहरी जीवनाचा स्पर्श झालेला तो बालक होता . एकंदरीत हे चौघे सतत शास्त्र चर्चा करत परिक्रमा करीत होते . या चौघां पैकी तिघांचे पुढे एक ठिकाणी छायाचित्र काढले गेले . आपल्यासमोर व्यक्तिरेखा उभ्या राहाव्यात म्हणून इथे देतो आहे .
प्रस्तुत लेखक , नागा साधू , राजेश प्रजापती , तनय प्रजापती
साधूंच्या कुठल्याही मताशी या दोघांचे काही मतैक्य शेवटपर्यंत झाले नाही ! तिथेच मस्तपैकी पूजा वगैरे आटोपून भोजन केले .इथे रामायणाचा भंडारा घेतला . जमनादास नामक फलटणचा मराठी त्यागी साधू हा आश्रम चालवत असे . ग्रामस्थ आश्रम चालवायला त्याला मदत करत असत . बाबांच्या सात परिक्रमा झालेल्या होत्या . या गावांमध्ये मुख्यत्वे करून राजपूत समाज होता व सर्वजण झटून सेवा करत होते . धर्मपालनाच्या बाबतीत राजपूत लोक अतिशय काटेकोर असतात असे मला जाणवले . मी मगाशी उल्लेख केला तो नागा साधू आणि कानफाट्या गोसावी यांची कुरबुर चालूच होती . गांजा ओढण्यासाठी सर्वजण जेव्हा बसले तेव्हा गांजा मळता येत नाही म्हणून कानफाट्या गोसावी ला नागा साधूने बरेच झापले . कानफाट्या गोसावी अतिशय वैराग्यशील होता . इतक्या थंडीमध्ये देखील त्याने फक्त कमरेला एक बिबट्याचे कातडे असते तशी नक्षी छापलेले कापड गुंडाळले होते . बाकी तो उघडाच होता . माझे त्या नागा साधूकडे सारखे लक्ष लागले होते . त्याला कुठे पाहिले आहे ते मला आठवत नव्हते . त्याचे बोलणे ,त्याचे हसणे ,त्याचा आवाज सर्व परिचित वाटत होते . मी त्याच्याकडे पाहतो आहे हे साधूच्या लक्षात आले . तो मला म्हणाला आप यही सोच रहे हो ना की इस बाबा को पहले कहा देखा है ! मी म्हणालो जी महाराज . साधू मला म्हणाला याद करके देखो मेरे जैसा दिखने वाला कोई आदमी तुमने कही देखा है क्या । मी आठवू लागलो . साधू म्हणाला वैसे मैं किसी को कभी बताता नही । लेकिन तुम कबसे घूर रहे हो इसलिये बता देता हु । मै जनरल व्ही के सिंग का भाई हू । हम छह भाई है । भैय्या पहले फौज में फिर राजनीति मे गये ।और मै साधू बन गया । आता मला सर्व संगती लागली .या दोघांच्या चेहऱ्यात , हसण्यात , बोलण्यात खरोखरच साम्य होते . आता तो खरोखरीच त्यांचा भाऊ होता का नव्हता हे फक्त मैयालाच माहिती . परंतु मला साम्य जाणवले खरे .
या साधूच्या वागण्यात देखील एक प्रकारचा रुबाब , आदब ,करारीपणा होता . आम्ही पुन्हा झोपायच्या ठिकाणी आलो . इथे रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा एकदा तनय आणि साधू यांची शास्त्र चर्चा चालली ! रामायण पाठ असलेला साधू आणि मी खूप हसायचो . त्या वादविवादाचा आनंद घेत झोपी गेलो . उघड्यावर झोपताना कुत्र्यांपासून सामान जपावे लागायचे . पादत्राणे , सामान ,पूजा साहित्य ,सोबतचा खाऊ इत्यादी चोरून , फोडून खाणे कुत्र्यांना आवडायचे . सगळेच सामान पांघरूणामध्ये घेऊन आम्ही झोपायचो . सकाळी उठल्यावर कानफाट्या गोसावी या साधूं सोबत चालणार होता . त्याला हळूच बाजूला घेऊन मी नर्मदेच्या काठाने चालण्याचे आणि एकट्याने चालण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याच्या पायामध्ये पादत्राणे नव्हती . हातामध्ये काठी नव्हती . सोबत झोळी नव्हती . फक्त कमरेला गुंडाळलेले व्याघ्र चर्म इतकेच त्याचे सामान होते . त्याला मी तीन महत्त्वाच्या गोष्टी मनावर ठसाविल्या . एक : कधीही गांजा च्या आहारी जाऊ नकोस .
दोन : काठाकाठाने परिक्रमा कर .
तीन : एकट्याने परिक्रमा कर .
तिथून तो जे सुटला तो त्याने थेट काठच गाठला . पुढे मला बराच काळ त्याची पावले काठावर सापडत होती . मातीमध्ये चिखलामध्ये त्याचे पाय उठलेले मला दिसायचे . त्याने शेवटपर्यंत किनारा सोडला नाही याचा मला आनंद वाटला . बलगांव गावामध्ये एक सुंदर आश्रम होता तिथे मी पोहोचलो . मौनी बाबांचा आश्रम असे त्याचे नाव आहे . इथे मोठ्या प्रमाणात गोसेवा चालते .सुमारे ७०० गाई इथे होत्या . आश्रम अतिशय सुंदर असून मोठे आवार ,प्रशस्त परिसर आणि भरपूर झाडी आहे .
मौनी बाबांच्या मागे लावलेला संदेश विशेष महत्त्वाचा !
इथे अप्रतिम असे चहा पोहे मिळाले . या ठिकाणी एक भगवे कपडे घातलेला तमिळ साधू भेटला . तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा करताना आश्रम आवडल्यामुळे तो इथे राहिला होता . या संपूर्ण आश्रमात आणि परिसरात कोणालाही तमिळ भाषेचा गंध नव्हता . तसेच याला तमिळ सोडून अन्य कुठलीही भाषा येत नव्हती . त्यामुळे तो बिचारा सुकला होता . मी चेहऱ्यावरून हा मनुष्य तमिळ आहे हे ओळखले . आणि वणक्कम स्वामी असे म्हटल्याबरोबर त्याने आनंदाने उडीच मारली ! मला थोडेफार तमिळ येथे आहे हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला ! माझ्याशी किती बोलू आणि किती नाही असे त्याला झाले होते ! तो मौनी साधू आहे असा समज सर्वांनी करून घेतला होता ! कारण तो बोलणे टाळायचा . तिरुअण्णामलईचा हा साधू होता .
सदृत्ती स्वामी असे त्याचे नाव होते . याने आधी हा रामेश्वरम चा आहे असे मला सांगितले . परंतु याची भाषा रामेश्वरम सारखी वाटली नाही म्हणून मी पुन्हा एकदा विचारले . मग त्याने तिरुअण्णामलै चे नाव सांगितले .
आपल्याला देखील एक वाईट सवय असते . कोणी गावाचे नाव विचारले की आपण मूळ गावाचे नाव न सांगता जवळच्या मोठ्या गावाचे नाव सांगतो . आपल्याला वाटते की आपल्या मूळ गावाचं नाव कोणाला माहिती नसेल . परंतु ते नाव माहिती करून देण्याची संधी अशा रीतीने आपण गमावत असतो ! आजही आपण गावाचे नाव विचारल्यावर मूळ गावाचे नाव थेट सांगितले पाहिजे असे माझे मत आहे . आता देखील साधूला वाटले की रामेश्वरम सर्वांना माहिती असते . म्हणून त्याने रामेश्वरम सांगितले . परंतु प्रत्यक्षामध्ये या दोन गावात शेकडो किलोमीटर चे अंतर आहे . तसेही छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुअण्णामलई येथील अरुणाचलपती देवस्थानचा जीर्णोद्धार केलेला आहे हा इतिहास सर्वांना माहिती आहे . रमण महर्षी देखील याच गावचे होते त्यामुळे या नावानेच प्रसिद्ध आहेत . अरुणाचलपती देवस्थानच्या एका गोपुराला राजा गोपूर असे नाव दिलेले असून त्यातला राजा म्हणजे आपला सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी राजे आहेत ,ही हिंदू माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ! या साधूला मी हा इतिहास सांगितला . त्याला खूप आनंद वाटला . त्याने देखील मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या . तमिळनाडूमध्ये पाच तत्वांना वाहिलेली पाच मंदिर आहेत . भूमी , जल , श्वास , आकाश , अग्नी , अशी तत्वे अनुक्रमे तमिळ लोक मानतात . नीलम् , नीर , काट्र , आकायम् आणि अग्नि अशी या तत्त्वांची तमिळ नावे आहेत . या तत्त्वांची देवस्थाने अनुक्रमे खालील गावात आहेत . कांचीपुरम , तिरुवणैकावल ( तिरुचिरापल्ली जवळ ) , कालश्री ,चिदंबरम ,तिरुअण्णामलै . ही सर्व माहिती मला साधू देत होता . आणि माझ्या वहीमध्ये मी तमिळ मध्ये लिहीत होतो . त्यामुळे त्याला अत्यानंदाचे भरते आले . आधी त्याला वाटले मी माझ्या मातृभाषेत लिहितो आहे . परंतु तमिळ लेखन पाहिले आणि त्याने मला मिठीच मारली ! मला साधू म्हणू लागला की आता तू इथून जाऊ नकोस . आपण इथे राहुयात ! दोघे एकत्र परिक्रमा करू ! परंतु मी नम्रपणे त्याला नकार दिला .
सदृत्तीस्वामीने दिलेली माहिती प्रस्तुत लेखकाने तोडक्या मोडक्या तमिळ भाषेत लिहून घेतली . दुर्दैवाने हाताचा नुकताच अस्थिभंग झालेला असल्यामुळे आणि तो पूर्ण भरून न आल्यामुळे अक्षर सुवाच्य नाही याची कृपया नोंद घ्यावी .तमिळ वगळता मात्र आकडे इत्यादी लिहिण्यासाठी मी जन्मापासून आजपर्यंत मातृभाषेचाच वापर करतो .अर्थात देवनागरी लिपी वापरतो . ती लिपी आपण जपली नाही तर अन्य कोणीही जपणार नाही . आपल्या आईला आपल्या शिवाय अन्य कोणीही सांभाळणार नाही .
सदृत्ती स्वामीं समवेत प्रस्तुत लेखक .
तमिळ साधू तेजस्वी होता . तपस्वी होता . तरुण होता सात्विक होता आणि नावाप्रमाणे सदवृत्तीचा होता . आपल्या देशामध्ये अशा लोकांना भाषेची अडचण कधी येत नाही . कोणीही अतिशय प्रेमाने अशा लोकांचा प्रतिपाळ करते . वरील चित्रात मागे नर्मदा माता दिसते आहे पहा . तिथून काठाने मार्ग नाही असे मला सर्वजण सांगत होते . परंतु मला तिथूनच जायचे आहे असे मी निक्षून सांगितले . आणि निघालो . तिथे मार्ग होता . प्रचंड काटे कुटे होते . परंतु एक पाऊल ठेवता येईल एवढा रस्ता सर्वत्र होता . माझ्या आधी गेलेल्या कानफाट्या गोसाव्याच्या पायाचे ठसे पाहत मी चालू लागलो . नर्मदा माता हातात हात धरून सोबत होतीच !
लेखांक पंचाहत्तर समाप्त (क्रमशः )
लेखांक ७६ : खलघाट आणि कठोऱ्याचा ग्यारहलिंगी आश्रम
प्राचीन महावृक्ष . मागे खलघाटचा पूल दिसतो आहे
अशा वृक्षा खाली बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते . इथे सूक्ष्म रूपाने कोणी ना कोणी तपस्या करत आहे असा भास होतो . इथली स्पंदने वेगळी असतात .
या भागात शिवलिंगे भरपूर सापडत होती . चांगली चांगली शिवलिंगे सापडायची . परंतु ती सोबत घेतली की पाठीवर ओझे व्हायचे . त्यामुळे मी ती पोटातल्या कप्प्यात ठेवायचो . आणि पुढे जो कुठला आश्रम येईल तिथे एखाद्या झाडाखाली किंवा देवळात ठेवून द्यायचो . जेणेकरून जाणारा येणारा एखादा भक्त भाविक ग्रामस्थ ते उचलेल आणि घरी घेऊन जाईल . कधी कधी कोणाच्यातरी हातात ते देऊन टाकायचो . देण्यातला आनंद फार मोठा आहे . आपण तो कधी घेतला नसेल तर एकदा घेऊन पहा ! जे सर्वोत्तम आहे ते देऊन टाकायचे ! सर्वोच्च प्रतीचा आनंद मिळालाच पाहिजे ! असो . सहस्त्रधारेचा आवाज तीन किलोमीटर पर्यंत ऐकू यायचा ! थंडीचे दिवस असतील आणि निरव शांतता असेल तर कधी कधी नऊ दहा किलोमीटर पर्यंत तो आवाज पोहोचायचा ! म्हणून तर नर्मदेला रेवा म्हणतात . तिचा रवा ऐकू येतो म्हणून ती रेवा . मी अजूनही तिच्या आवाजाच्या टप्प्यामध्ये होतो . हळूहळू समोर तीन पूल दिसू लागले . खलघाटचे हे पूल आहेत . मुंबई इंदोर राष्ट्रीय महामार्ग येथून जातो . या पुला पूर्वी खल बुजुर्ग नावाचे गाव आहे . इथे नम्मदुस नावाचे रिसॉर्ट लागते .रिसॉर्ट चा परिसर खूप मोठा आहे . मी अर्थातच बाहेरूनच मार्गक्रमणा केली . पुढे साटक नावाची नदी आडवी येते . नदीचे पात्र खूप मोठे आहे . ती पार करून साटकेश्वर महादेवाच्या मंदिरात गेलो .
सटकेश्वर महादेवाच्या शेजारील मारुती . मारुतीची ही सर्व रुपे समर्थ स्थापित मारुती सारखी दिसतात .
खलघाट चे पुल मोठे आहेत त्यामुळे लक्षात राहतात .
इथून इंदोर साधारण ९० - ९२ किलोमीटर आहे . पुलाच्या वर जायची गरज पडत नाही . खालूनच निघता येते .
नर्मदा मातेमधील नावांचा आकार आता हळूहळू मोठा होऊ लागला होता . इथे पाणी खोल आणि पात्राची रुंदी जास्त असल्यामुळे नाव मजबूत आणि मोठी असणे आवश्यक होते .
इथे नर्मदेच्या मध्यभागी एक दगडी स्तंभ आहे . याच्या आजूबाजूला वाळूचा बेट बाजार टापू तयार झाला आहे . खलघाटच्या पुलावरून पाहिल्यावर हा आकार भारताच्या नकाशासारखा दिसतो .अर्थातच परिक्रमावासीना हे दृश्य पाहायला मिळत नाही . परंतु वाचकांसाठी संग्रहित चित्र सोबत जोडत आहे
इथे काठावरून चालताना कठीण असे काही ओढे पार केल्यावर एक राम मंदिर लागले . मंदिरामध्ये स्थानिक ग्रामस्थ खूप सेवा करत होते . एक साधु महाराज तिथे राहत होते . म्हणजे त्यांचा वेश साधूसारखा होता . परंतु अजून ते पूर्णपणे साधू बनले नसावेत असे मला वाटले . कारण त्यांनी संपूर्ण दाढी आणि केस कलप लावून काळे केले होते ! साधूला हे सर्व करण्याची गरज नाही ! तसेच जटा देखील वाढलेल्या नव्हत्या.
कलप लावलेला कुठलाही मनुष्य दिसला की मला भिडे गुरुजींचा तो श्लोक आठवतो .
केले जरी कलप लावून केस काळे ।
तारुण्य त्यातुनी कधी तरी का उफाळे ॥
फसवून पूर्ण जगतास ,आणि स्वतःस ।
लाभेल का कधी कुणा गत यौवनांश ॥
असो .
त्यांच्याशी गप्पा मारल्यावर असे लक्षात आले की ते आयुष्यामध्ये थोडेसे दुःखी देखील होते . किंवा मी असे म्हणेन की पूर्णपणे सुखी नव्हते . परंतु परिक्रमावासींची सेवा मात्र ते मनोभावे करत यात काही शंकाच नाही . इथे प्रजापती पिता पुत्र पुन्हा एकदा मला भेटले . मी चहा आणि पोहे खाऊन पुढे निघालो होतो . परंतु प्रजापती पिता-पुत्र आल्यावर त्यांनी मला थांबवून घेतले आणि आमच्या सोबत जेऊन पुढे जा असे सांगितले .दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी उत्तम असे जेवण बनवून आम्हाला जेवायला वाढले . या भागाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
सडक मार्गाने येणाऱ्या परिक्रमावसंना हे महाद्वार लागते . ( मी मात्र अतिशय कठीण गटारवजा असलेला ओढा ओलांडून आश्रमात चढून वर आलो . )
मंदिरातील हनुमान जी
हेच राम मंदिराचे महंत
मंदिराचे आवार मोठे आहे .बाबांना भेटायला भक्त मंडळी येत असतात . इथे सतत काहीतरी पूजापाठ चालू असते .
मी
पोहोचलो तेव्हा सुद्धा एका कुटुंबाची काहीतरी पूजा चालली होती . त्या
पूजेसाठी आलेल्या काही तरुणांनी माझे फोटो काढले . आणि माझ्याकडे फोन नाही
कळल्यावर मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले .
राम जानकी मंदिर खलघाट येथे प्रस्तुत लेखक .मागे दिसणारे भारताच्या आकाराचे बेट आणि स्तंभ .
हीच ती जागा जिथे फोटो काढले आहेत . इथे उभी असलेली सवत्स धेनू .
मागे खलघाट चे मुंबई इंदोर महामार्ग पूल दिसत आहेत .
मध्यंतरी महाराष्ट्र एसटी मंडळाची एक बस अपघात ग्रस्त झाली होती पहा , ती याच पुलावरून खाली पडली होती .
मध्ये जो जाड खांब दिसतो आहे त्याच्याखाली दगडांचे एक वर्तुळ आहे , तिथे ती पडली होती .
परिक्रमा वासींचे फोटो आणि परिक्रमावासीं सोबत फोटो काढण्याचा आनंद नर्मदा काठावर अनेक जण घेत असतात . त्याचा लाभ मला या लिखाणाला अधिक आकर्षक व स्वीकारार्ह बनविण्यासाठी निश्चितपणे होतो आहे ! या फोटोत तुम्हाला माझे वजन बऱ्यापैकी कमी झालेले लक्षात येईल .
राजेश
प्रजापती आणि तनय यांच्याकडे मोबाईल फोन होता . त्यामुळे त्याने देखील
माझ्यासोबत सेल्फी काढून घेतला . तो अलीकडे परिक्रमा झाल्यावर मला मिळाला .
विशाखापट्टणम इथून परिक्रमेसाठी आलेले राजेश प्रजापती आणि तनय प्रजापती . सध्या राजेश दिल्लीला असतो . तनयचे वाराणसी येथे शिक्षण चालू आहे . प्रस्तुत लेखकाचा दंड साधू लोकांना का आवडायचा ते तुम्हाला या चित्रातला दंड पाहिल्यावर लक्षात येईल !
आश्रमातील महंतांनी जाताना आश्रमाचा शिक्का वहीत मारून दिला .
तपोभूमी प्राचीन श्रीराम मंदिर नर्मदा तट
महंत खल बुजुर्ग श्री श्री 1008 श्री बालक दास जी महाराज , अध्यक्ष , षट दर्शन रेवा मंडल खरगोन , मध्य प्रदेश
हा दिवस होता ९ मार्च २०२२ चा . परिक्रमेतील ६६ वा दिवस !रस्ता मार्गाने चालणारे परिक्रमावासी सुमारे दोन तास उशिरा येथे पोहोचले . निघताना सर्वजण मला सांगायचे की रस्त्याने अंतर कमी पडते . परंतु दर मुक्कामी हे सिद्ध व्हायचे की काठाने चालणारा लवकर पोहोचतो ! इथून पूल ओलांडल्याबरोबर आळंदी मधील वारकरी मंडळींकडून चालवला जाणारा एक आश्रम आहे . इथे मी थांबलो नाही . परंतु परिक्रमा झाल्यावर मध्यंतरी खलघाटचा पूल गाडीने ओलांडताना या आश्रमामध्ये आवर्जून थांबलो होतो . तेव्हा परिक्रमावासींचे दर्शन देखील झाले ! खूप आनंद वाटला होता ! त्या वेळचे फोटो टाकत आहे . हे फोटो २०२३ च्या मार्गशीर्ष महिन्यात काढलेले आहेत .
अलीकडच्या काळात पुन्हा खलघाटच्या काठावर जाऊन नर्मदा तटाचे अवलोकन करताना प्रस्तुत लेखक (डावीकडील ). सोबत मित्र . मागे नर्मदा मैयाचे विस्तीर्ण पात्र .
याच काठावरून ९ मार्च२०२२ रोजी चालत गेलो होतो ! ३० नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेले चित्र !
खाली जोग महाराज आश्रम दिसतो आहे . हा फोटो पाहिल्यावर काठावरचा रस्ता कसा आहे त्याचा अंदाज येईल .
मैयाचे विस्तीर्ण पात्र !नर्मदे हर !
अथांग नर्मदा मैया
पुढे खल टाका किंवा टाका खल गाव लागते . इथे रामाचे मंदिर आणि शिवमंदिर आहे . एक छोटा आश्रम सुद्धा आहे . हे सर्व पाहत पुढे निघालो .
खल टाक्याचा खडकाळ किनारा
पाणी चढत उतरत असल्यामुळे किनारा गाळाने भरलेला आहे . चालताना जपून चालावे लागते .
अशी मोठी झाडे दिसली की तिथे शक्यतो एखादा आश्रम असतोच
किनाऱ्याने चालत चालत चिंचली गाव गाठले . इथे एक खूपच खोल नाला आडवा आल्यामुळे नाईलाजास्तव व गावात जावे लागले .
वाटेतील हनुमान जी
गावामध्ये उत्खननात जुन्या वस्तीचे अवशेष मिळाले होते . इथे देव नाला होता त्याचे दर्शन घेऊन गावातून पुन्हा एकदा नर्मदेचा काठ पकडला . कठीण अशा रस्त्याने काठाकाठाने चालताना डावीकडच्या झाडीमध्ये अचानक मंदिर दिसू लागले .हे एक पुरातन शिवालय होतं . आणि याचं नाव मनकामनेश्वर असं होतं .इथे भंडारा सुरू होता त्यामुळे मांडव वगैरे घातलेला होता . गावकऱ्यांनी मोठ्या आदराने मला एका खोलीमध्ये नेऊन बसवले . आणि भोजन प्रसाद जागेवर आणून दिला . मंदिर अतिशय सुंदर होते . आजूबाजूला गर्द झाडी होती . परिसरातील नागरिकांची उत्सवामुळे गर्दी झालेली होती . या मंदिरातील शिवलिंग थेट ममलेश्वरासारखे किंवा अमलेश्वरासारखे होते . साक्षात प्रति रूपच !
मनकामनेश्वर मंदिरापर्यंत जाताना नर्मदा मातेच्या अगदी काठाने चालताना प्रचंड झाडी लागते . वरवर पाहता मार्ग नसेल असे वाटते . परंतु एका पावलाची पायवाट सर्वत्र आहे . अशा झाडीतून थोडे जपून चालावे इतकेच . मी जपून चालण्यापेक्षा नाम जपून चालायचो ! आणि कठीण टापू सहज पार होऊन जायचा !
श्री मनकामनेश्वराचे सुरेख मंदिर
मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे
श्री अमलेश्वराची प्रतिकृती असलेल्या श्री मनकामनेश्वराचे दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा लोकांचा विश्वास आहे .
या धर्मशाळेमध्ये बसवून भोजन प्रसाद दिला गेला
इथून पुढे नर्मदा मैया अतिशय सुंदर असे एक वळण घेते . वळताना तिच्यामध्ये एक बेट तयार होते . या बेटावर परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . परंतु इथे असलेले प्राचीन शिवालय प्रसिद्ध आहे .
एखादी उभी रेष मारल्यासारखे हे बेट नर्मदेच्या उदरामध्ये निर्माण झालेले असून त्याच्या टोकावर बिल्वामृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . बाकी बेटावर घनदाट झाडी आहे .
मनकामनेश्वर मंदिरापासून ग्यारहलिंगी आश्रमा पर्यंत जाण्याचा किनारा मार्ग बऱ्यापैकी खडतर आहे हे नकाशा पाहिल्यावर लक्षात येईलच .
आपल्या अस्थि देऊन पृथ्वी वाचवणारे दधीची महामुनी इथे रहायचे . ही त्यांची तपस्थळी असून इथे त्यांची व त्यांच्या पत्नीची समाधी देखील आहे .
दधीचि ऋषी पूजित श्री बिल्वामृतेश्वर महादेव
मंदिर घनघोर जंगलाच्या मधोमध आहे
कितीही मोठा पूर आला तरी मंदिर जलमग्न होत नाही
दधीचि ऋषींनी वज्र बनविण्यासाठी आपली हाडे याच बेटावर दान केली होती . अज्ञातवासाच्या काळात पांडव देखील या बेटावर राहिलेले आहेत . त्यामुळेच धर्माराजावरून समोरच्या गावाला धर्मपुरी नाव पडलेले आहे .या बेटावर दत्तात्रेय आणि नर्मदा माता यांची देखील मंदिरे आहेत . परिक्रमेदरम्यान या बेटावर जाता येत नसले तरी हे एक पवित्र तीर्थस्थान मानले जाते म्हणून त्याची अधिक माहिती दिली .असो .पुन्हा आपल्या काठावर येऊयात .
या भागामध्ये नर्मदेच्या काठावर दगड गोटे खूप सापडतात . त्यांच्यावरून चालताना पायाला खूप आराम मिळतो . विशेषतः प्रत्येक पाऊल वेगळ्या वेगळ्या भागातील गुळगुळीत टोकदार दगडांवर टेकवले की तळ पायांना चांगला ॲक्युप्रेशर मसाज होतो . अशा गुळगुळीत दगडांच्या साठ्याची चालताना पावले उत्सुकतेने वाट बघत असत . अशा भागातून पाच-दहा मिनिटे चालले तरी पायांचा दिवसभराचा थकवा निघून जायचा .
वरील दोन्ही छायाचित्रांमध्ये डावीकडील दगड गोटे पाहावेत स्वच्छ नर्मदा जल पहावे आणि उजव्या हाताचे बिल्वामृतेश्वराचे बेट पहावे .
कठोरा गावाचा घाट
यानंतर कठोरा गावाचा छोटासा घाट लागला . गावाकडे न जाता तसाच सरळ गेलो . इथे दोन-तीन केवट चहा पीत बसले होते .त्यांनी मला छोट्या कागदी कपात गार झालेला चहा पाजला . आणि पुढे ग्यारहलिंगी नावाचे स्थान असून तिथे साधूंसाठी आश्रम असल्याचे मला सांगितले . जिथे नर्मदा माई डावीकडे वळत होती त्या ठिकाणी खोल पात्राच्या आत मध्ये ११ स्वयंभू शिवलिंगे आहेत त्यामुळे या स्थानाला ग्यारहलिंगी असे नाव पडले आहे असे मला त्यांनी सांगितले . इथे समोर धर्मपुरी नावाचे गाव होते . इथे अर्थात समोरच्या तटावर कुब्जा नावाची नदी नर्मदेला येऊन मिळत होती .हिलाच खुजनदी असे सुद्धा नाव असल्यामुळे अलीकडच्या काठावर खुजावा गाव होते . इथे दक्षिण तटावर दोन देवनाले नर्मदार्पण होत होते .या अकरा शिवलिंगांपैकी अकरावे लिंग ओंकारेश्वराचा मोठा भाऊ मानले जाई . त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र होते . समोरच्या तटावरून नावेने या बेटावर येणाऱ्या लोकांची सतत वर्दळ दिसायची . काठाकाठाने चालत मी ग्यारहलिंगी आश्रम शोधू लागलो . उंच एका टेकाडावर झेंडा दिसला म्हणून वर गेलो . डावीकडे एक जुनी पुराणी इमारत होती . उजवीकडे एक बैठा आश्रम दिसला . दोन्हीकडून मला नर्मदे हर चा पुकारा झाला . बालकदास महाराज या नावाने दोन साधू दोन वेगळेवेगळे आश्रम येथे चालवीत होते . मी आधी जुन्या इमारतीमध्ये गेलो .
एक प्रचंड जटाभार वाढलेले साधू अंधाऱ्या खोलीमध्ये गांजा पीत बसले होते . इमारतीच्या भिंती मजबूत असल्या तरी छप्पर फाटके तुटके होते . त्यातून आत येणाऱ्या प्रकाश रेखा गांजाच्या धुराने अधिक ठळक होत होत्या . " नर्मदे हर ! भोले बाबा की प्रशादी पाओगे ? " साधूने करड्या आवाजात प्रश्न केला . भोले बाबाचा प्रसाद म्हणजे गांजा पिणे . " नही बाबा । हम नही पाते ।" मी नम्रपणे साधूला सांगितले . त्याच्या आजूबाजूला चार-पाच भगत मंडळी "प्रसाद भक्षण " करण्यासाठी बसली होती . त्यातल्या एकाला चहा बनवण्याचा आदेश साधूने दिला . थोडासा निरीच्छेनेच तो उठला आणि अंगणामध्ये चहा बनवायला गेला .
साधू बहुतेक बराच वेळ गांजा ओढत असावा . त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती . एका खोल भावावस्थेमध्ये जाऊन तो माझ्याशी बोलत होता . साधू जीवनामध्ये जो काही पक्का उपदेश त्याने आत्मसात केलेला आहे तेवढाच अशाप्रसंगी आठवतो . बाकी सर्व विसरायला होते . तो मला जीवनातील अतिशय मूलभूत अशी काही तत्वे फार चांगल्या भाषेत सांगू लागला .
" देख बेटा । तू नर्मदा माई की परिक्रमा कर रहा है । मतलब तुझे पता है ,जीवन मे क्या करना है । और क्या नही करना । फिर भी याद रख । दुनिया गई भाड मे । तेरे मरने के बाद कोई तेरा नही , तू किसी का नही । दुनिया से उतनाही लगाव रखना , जितना खाने में नमक होता है । दुनियादारी करेगा तो ये भी जिंदगी बेकार की मौत मरेगा । " भगतरामने हातात चहा आणून दिला .
(कृत्रिम प्रज्ञेने तयार केलेले काल्पनिक चित्र )
साधू
बोलताना त्याची नजर धुनीवर स्थिर होती . डोळे लालबुंद झाले होते . परंतु
आवाजात जरब कायम होती . " तेरा आज का दिन आखरी दिन है । " साधूने असे
म्हटल्यावर माझा चहाचा कप जागेवरच थांबला . "कल तू मरने वाला है । " मी
आजूबाजूच्या भगत लोकांकडे पाहू लागलो . सर्वजण खदाखदा हसू लागले . साधू
म्हणाला "फट गई ना xx ? " मी हातातला कप खाली ठेवून हात जोडून बसलो . "पिले
पिले । चाय पिले । ऐसी चाय पी , की मानो जिंदगी की आखरी चाय पी रहा है ।
ऐसी जिंदगी जी , की मानो जिंदगी का आखरी दिन चल रहा हो ! " साधूने
बोलता-बोलता मला आयुष्यातील अतिशय मोलाचा उपदेश देऊन टाकला ! आणि स्वतः
त्या गांजाचा एक असा झुरका मारला की जणूकाही हा त्याच्या जीवनातील शेवटचा
झुरका असावा ! आणि साधारण पाच ते सहा फूट लांब बसलेल्या माझ्या अंगावर
त्याने जोरात धूर फुंकला . त्या धुराने एक क्षणभर मला पूर्णपणे व्यापले .
आजूबाजूचे दृश्य अदृश्य झाले . "भागो बाबाजी । तुम्हारा काम हो गया ।
दादाजी ने फूक मारी । अब दुनिया तुम्हारी नही मारेगी । " एक सीनियर भगत
गांजाच्या नशेत बरळला . मी साधूला नमस्कार करून त्या खोलीतून बाहेर आलो .
समोरच्या आश्रमामध्ये गेलो . इथे एका झाडाखाली सर्व संसार थाटलेला होता .
या चित्रात जुना आश्रम दिसतो आहे .मी इथेच पारावर झोपणार होतो पण एका भगतरामने सांगितले की समोरच्या आश्रमात कुत्रा आहे तिथे झोपावे . म्हणजे बिबट्याचे भय नाही .
एका झाडाखाली कट्टा बांधून तिथे इथल्या साधूने त्याचे सर्व देव बसविले होते आणि धुना देखील स्थापन केला होता . हे महाराज देखील नित्य भोले बाबाचा प्रसाद सेवन करायचे . यांनी इथे कमांडो नावाचा एक काळा पांढरा चपळ कुत्रा पाळला होता . तेवढा एकच प्राणी तिथे शुद्धीमध्ये होता ! बाकी सर्वच माणसे एका पेक्षा एक विचित्र वाटत होती . विशेषतः मी जिथे आसन लावले होते , त्या कट्ट्याच्या समोर एका झाडाखाली अजून एका तांत्रिकाने आसन लावले होते . चित्रपटांमध्ये कवटी आणि हाडे वगैरे घेऊन बसलेली भयावह तांत्रिक माणसे दाखवायची पद्धत आहे पहा . हा मनुष्य अगदी तसाच होता .काळा कुळकुळीत रंग , कुरळे लांब केस , मजबूत बांधा ,कमरेला काळे वस्त्र , हातात गळ्यात अनेक प्रकारच्या माळा , लाल भडक डोळे अशा अवतारातला हा तांत्रिक होता . त्याच्यासमोर त्याने मानवी कवटी ठेवली होती . हातामध्ये मांडीचे हाड ( जे लांबीला सर्वात जास्त असते ) घेऊन त्या कवटीवर ते आपटत हा मंत्र म्हणायचा . याने तिथे आल्यापासून मला त्रास द्यायला सुरुवात केली . मला म्हणायचा , " चेला , जाव , पानी लेके आओ । " आता कोणाला पाण्याला नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती आहे . त्यामुळे मी त्याला एकदा पाणी आणून दिले .नंतर याचे नखरेच सुरू झाले . मी त्या माणसाच्या प्रत्येक क्रियेचे निरीक्षण करत होतो . अतिशय तामसी प्रवृत्तीचा तो जीव होता . थोड्यावेळाने त्याला भेटायला गावातील गांजाडे आले . सगळे मिळून गांजा ओढत बसले .तेव्हा सुद्धा याने मला एक दोन कामे सांगितली . मी फारसे आढेवेढे न घेता ती केली देखील . परंतु याने मला चेला म्हणणे मला काही पटले नाही .सर्वच जण गांजा पीत असल्यामुळे कोणाला भुकेची जाणीव होत नव्हती . त्यात मला असे लक्षात आले की हा तांत्रिक त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन मटका खेळत होता . चला भेटायला आलेले गांजाडे शिष्य सुद्धा त्याच्याकडून आकडे घेत होते . कुठून इथे आलो असे मला झाले . परंतु परिक्रमेच्या नियमानुसार एकदा लावलेले आसन बदलता येत नाही . अशी देखील एखादी रात्र असू शकते इतकाच धडा नर्मदा मैया मला देत होती . नाही म्हणायला तिचे अतिशय सुंदर असे दर्शन मात्र समोर होत होते .समोरच्या बेटावरील महादेवाचे मंदिर पुसटसे दिसत होते . मला या माणसाची भीती वाटत नव्हती परंतु आत्यंतिक घृणा मात्र येऊ लागली होती . या माणसाच्या हिंदीवर सांगली कोल्हापूरकडच्या मराठीचा संस्कार वाटला ! म्हणून तो फार बोलायला लागल्यावर मी एक-दोन अस्सल कोल्हापुरी सुभाषिते कमांडो कुत्र्याला ऐकवली . तो मराठी असल्याचे लपवित होता . पण मी तो मराठी असल्याचे ओळखले आहे असे वाटल्यावर मात्र तो माझ्याशी बोलायचा बंद झाला . रात्री अकराच्या सुमाराला साधू महाराजांना आठवण झाली की मी उपाशी आहे . त्यांनी एक-दोन भगताना कामाला लावून आमटी पोळी करून मला खाऊ घातली . तिथले वातावरण अतिशय नकारात्मक असल्यामुळे इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . आपण रात्री मला जाग आली . तेव्हा माझ्यासमोर असलेल्या झाडापाशी बसून ती मानवी कवटी झाडामध्ये खोचून या तांत्रिकाची काहीतरी अघोरी साधना चालू झाली . या पूर्ण काळामध्ये माझे ऐकणारी एकमेव व्यक्ती तिथे होती ती म्हणजे कमांडो कुत्रा ! तो पूर्णवेळ माझ्या पाया पाशीच बसला होता .हा कुत्रा अथवा नर्मदा खंडातील भाषेत भैरव आश्चर्यकारक रित्या अतिशय स्वच्छ होता . घरी सांभाळलेला , आंघोळ घातला जाणारा , पेडिग्री खाणारा कुत्रा जितका स्वच्छ असतो तितका हा स्वच्छ होता . त्यामुळे रात्री तो माझ्या अंथरुणातच झोपला . आणि मी देखील त्याला झोपू दिला . त्याला सुद्धा खूप दिवसांनी एखादा शुद्धीवरचा चांगला माणूस मिळाल्यासारखे वाटत होते . या भागात फारसे परिक्रमा वासी मुक्कामाला येत नाहीत असे माझ्या लक्षात आले . कारण हे मैयाचे वळण आहे . आणि इथे पारंपारिक प्रशस्त रस्ता नाही . काटे कुटे यांनी भरलेला कठीण मार्ग आहे .
या भागातील काठावरचा चालण्याचा मार्ग कसा आहे हे लक्षात यावे म्हणून काही फोटो सोबत जोडत आहे .
बाभळीची प्रचंड बेटे सर्वत्र माजलेली आहेत . याच्यातून मार्ग काढत पुढे चालावे लागते .
किनाऱ्याचा मार्ग हा असा असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी या मार्गाने जात नाहीत . परंतु "सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता । " या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे काठाकाठाने मार्गक्रमणा सुरु ठेवली .
मी झोपलो होतो तिथून समोरचे बेट ,त्याच्या वरील बिल्वामृतेश्वर मंदिराकडे जाणारा घाटमार्ग असे सर्व दिसत होते .
मध्यप्रदेश काँग्रेसचे सर्वेसर्वा दिग्विजयसिंहजी त्यांच्या पायी परिक्रमे दरम्यान या आश्रमामध्ये आवर्जून येऊन गेल्याचे आता गुगल नकाशा पाहिल्यावर कळले .
उद्या सकाळी उठल्यावर तुला चहा आणि बालभोग करून देतो असे सांगून साधू झोपी गेला . मी रात्रभर विचारात पडलो . इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . त्यामुळे सकाळी चहा बालभोग वगैरे ची वाट न बघता लवकर निघून जायचे मी ठरवले . मला पहाटे उठून मी सर्व गुपचूप आवरून घेतले . आणि उजाडायच्या आधीच अंधारातच धूम ठोकली ! पटापटा उतरून किनार्यापाशी आलो . आणि वेगाने पुढे पुढे पळू लागलो . इतक्यात माझ्या असे लक्षात आले की दोन खोल ओढे मला आडवे आलेले आहेत .मागचा पुढचा अधिक विचार न करता मी अंधारातच त्या ओढ्यामध्ये उतरून ते पार केले . छातीपर्यंत पाण्याने भिजून गेलो . या परिसरामध्ये पायवाट नावाचा प्रकार नव्हताच . झाडीमध्ये खाली वाकून घुसावे लागायचे . ग्यारहलिंगीच्या त्या आश्रमातून माझी सुटका झाली असे मला वाटले खरे . परंतु मी न सांगता निघून गेलेले त्या साधूच्या उशिरा लक्षात आलेले असेल . आणि त्याने माझ्या नावाने नक्की बोटे मोडलेली असणार याची प्रचितीच मला त्यादिवशी आली ! त्यादिवशी मला मैयाने आश्रमात देऊ केलेल्या अन्नाचा अव्हेर केल्याबद्दल लक्षात राहील अशी शिक्षा दिली ! मैया है वह । सब जानती है !
लेखांक ७७ : बुराड संगम ,देव संगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रयज्ञाख्य तीर्थ मोहीपुरा
ग्यारहलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा . परंतु अशा रीतीने अंधारामध्ये बाहेर पडणे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . त्यामुळे त्याचे बसायचे ते सर्व फटके मला बसले ! वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले . अनेक कोल्हे मला आडवे गेले . मोठे घुबड पाहिले . अंधारात अज्ञात जनावरे पळण्याचे आवाज ऐकले . पाण्यातून दोन खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती ! त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली . अजूनही झाडी कमी झाली नव्हती .अंधुक दिसू लागले होते .
ग्यारह लिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे . नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथून चाललात तरच चालण्यापूर्ती जागा मिळते अन्यथा चालता येत नाही . परंतु नर्मदेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्या पुरती तरी जागा मिळाली .
आपण वरून खाली चालत आहोत .
हेच ते दोन ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले . मला असे वेडे साहस करायची इच्छा त्यादिवशी का झाली माहिती नाही . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही .तरी कृपया अन्य परिक्रमावासिनी हे अनाठायी साहस करू नये अशी विनम्र प्रार्थना . मैया ला त्रास होतो .
हा संपूर्ण किनारा कसा आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून याचे अजून एक गुगल चित्र टाकत आहे . याच्यामध्ये शेती दिसत असली तरी शेतातून चालणे फारसे सुखावह नसते . त्यामुळे हातातील दंड मैय्यामध्ये बुडवत बुडवत चालायचे . खूप आनंद मिळतो .
हळूहळू जसजसे उजाडू लागले तसतसे सभोवताली पसरलेले दृश्य पाहून तनमन हरखून गेले ! जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र केवळ हिरवळ च हिरवळ होती ! नर्मदेचे पाणी अतिशय शांत होते . शांतता सुद्धा शांत होण्यासाठी इथे येऊन काही काळ शांत बसत असावी ! त्यात मी भिजलेला असल्यामुळे अजूनच थंड पडलो होतो ! थंडगार वारा ! डोळ्यांना देखील थंडावा ! स्वर्गीय अनुभव होता ! असे वाटत होते इथेच राहावे ! भव्य दिव्य नर्मदा पात्र पाहत राहावे ! अचानक समोर एक भव्य दिव्य नदी आडवी आली ! ही नदी तीन वेगवेगळ्या शाखांद्वारे नर्मदेला मिळत होती ! बुराड नदी किंवा बोराणी नदी असे तिचे नाव होते . नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होते . पात्राच्या मधोमध उभा राहून आकंठ पाणी प्यायलो . प्रत्येक नदीच्या पाण्याची चव वेगळी असते हा निसर्गाचा किती मोठा चमत्कार आहे ! आणि त्या चवीतला वेगळेपणा आपल्या टिचभर जिभेला कळतो हा त्याहून मोठा चमत्कार आहे ! नदीचे पाणी मोठा त्रिभुज प्रदेश तयार करत नर्मदार्पण होत होते . इथे खूप सारी शिवलिंगे सापडत होती . नानाविध रंगांची नानाविध ढंगांची शिवलिंगे पाहून उचलण्याचा मोह व्हायचा . परंतु वजन होत असल्यामुळे नाद सोडून द्यायचो . त्यातल्या त्यात एखादे खूप चांगले शिवलिंग मिळालेच तर जुने ओबडधोबड शिवलिंग तिथे ठेवून नवीन घ्यायचो ! म्हणजे वजन तेवढेच राहायचे . ही नदी पार करायला मजा आली ! आधीच भिजलेला असल्यामुळे या नदीला पार करताना काही वाटले नाही . मध्ये खोल डोहामध्ये स्नान देखील केले . मैयाच्या काठाने चालताना अन्य नद्यांची भीती वाटायची बंद झाली होती ! त्या सर्व नद्या आपल्याच आहेत असे वाटायचे ! त्या आपल्याला काय करणार ! आई पेक्षा मावशी जास्त माया करते तसा अनुभव या नद्या द्यायच्या ! अतिशय प्रेमाने त्या परिक्रमावासींना पार करवितात . माझी अशी खात्री पटलेली आहे की या सर्व नद्या , नाले , ओढे यांना स्वतःचे अस्तित्व असते . स्वतःचे मत असते . कुणाला पार करावयाचे आणि कुणाला बुडवायचे हे ठरविण्याची शक्ती यांच्यामध्ये असते . आपण जेवढे त्यांना शरण जाल तेवढे ते आपल्यासाठी सुखकारक असतात . पंचमहाभूतांची परीक्षा घ्यायला जाऊ नये . आपली तेवढी योग्यता नाही . किंबहुना होणारे परिणाम भोगण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये नाही . ही नदी किती सुंदर होती हे तुम्हाला google नकाशा पाहिल्यावर कळेल .
विस्तारपूर्वक नर्मदार्पण होणारी बुराड अथवा बुराणी नदी . घाटवाड्या आणि नन्दगाव यांच्यामध्ये ही नदी लागते .
धरणाच्या पाण्यामुळे या भागातील बरीचशी गावे डूबक्षेत्रात जातात . त्याच्या खाणाखुणा तुम्हाला सर्वत्र दिसतात . मोठे मोठे महावृक्ष वठलेले आहेत . त्यांची पांढरी फटक खोडे नजरेत भरतात . काठावरील जी घरे दरवर्षी पाण्याखाली जातात ती सोडून लोकांनी मागे घरे बांधलेली आहेत . त्यामुळे ही जुनी पडकी घरे भकास दिसतात . मी साधूचा चहा बालभोग नाकारून पुढे आल्यामुळे आज मला वाटेमध्ये कोणी चहाच काय पाणी सुद्धा विचारत नव्हते . अर्थात वाटेत माणसे दिसतच नव्हती . परंतु जेव्हा एखाद्या गावातून जायचो तेव्हा देखील काही विचारणा होत नव्हती . इथे मध्ये अचानक डाव्या हाताला एक अतिप्रचंड खोल खड्डा काढलेला दिसला . मोठे मोठे जेसीबी अखंड काम करत होते . इथून नर्मदा मातेचे पाणी वळविण्याचे काम सुरू आहे असे मला कळले . या प्रकल्पाला नागलवाडी जल उपसा प्रकल्प असे म्हणतात . हा प्रकार फारच भव्य आणि अजस्त्र होता . गंमत म्हणजे नर्मदेपेक्षा खोल खड्डा काढून देखील खाली पाणी फारसे नव्हते . इथे बहुतेक नर्मदापात्रामध्ये खडक असल्यामुळे ही जागा निवडली होती .
प्रकल्पाची भव्यता दर्शविणारी काही छायाचित्रे
इथे खाली जिथपर्यंत खोदकाम कराल तिथपर्यंत वाळूच वाळू सापडते . नर्मदेच्या बाजूला मात्र मोठा अखंड खडक आहे असे अभियंत्याने मला सांगितले .
आता प्रकल्प पूर्ण झाला असून त्यात पाणी भरल्याचे दिसते . मी चालताना मात्र प्रकल्पाचे काम जोरात सुरू होते .
वरील चित्रात दिसणारा नागलवाडी प्रकल्प ब्राह्मणगाव चा घाट नर्मदा सेवा आश्रम आणि राम मंदिर . ही सर्व स्थाने पुढे पाहूयात .
नंदगाव मागे पडल्यावर ब्राह्मणगावात आलो . काठाने चालता चालता दगडी घाट लागला . घाट सुंदर होता . गावात राम मंदिर आहे असे कळले . दर्शनासाठी म्हणून वर गेलो .
ब्राम्हणगावच्या घाटावर मी चालत आलो तो रस्ता समोर सरळ रेषेत आहे .
पायऱ्या चढून वर गेले की ब्राह्मणगाव सुरू होते . विशेष म्हणजे गावात ब्राह्मणांची घरे नव्हती . राम मंदिरांचे पुजारी तेवढे ब्राह्मण होते .
गावामध्ये एक नर्मदा परिक्रमावासी धर्मशाळा उभी करण्यात आलेली आहे . नदीच्या अगदी काठावर पत्र्याची शेड टाकून धर्मशाळा बांधलेली आहे . इथे मी गेलो . परंतु कोणीही मला बस देखील म्हणाले नाही चहा पाणी तर दूरची गोष्ट ! अर्थात यात या कोणाचा दोष नाही हे आपण जाणता ! मला आज उपाशी मारायचे मैय्यानेच ठरवले होते ! रात्री आसरा देणाऱ्या साधूचा , चहा पाण्याचा अव्हेर करून केलेला अपमान , ही नर्मदा खंडामध्ये साधी गोष्ट नाही ! थोडा वेळ या धर्म शाळेत बसलो . आणि राम मंदिरात जाऊन यावे असा विचार केला .
हीच ती धर्मशाळा . ब्राम्हणगाव जिल्हा बडवानी
पत्र्याची शेड असली तरी धर्मशाळा अतिशय अत्याधुनिक आहे . स्वच्छ फरशी जागोजागी पंखे लावलेले आहेत . अशा सुविधा फार कमी ठिकाणी मिळतात .
परिक्रमावासी अशा पद्धतीने आसन लावतात .
इथे फारसे अगत्य न दिसल्यामुळे मी राम मंदिरात गेलो .घरासारखेच मंदिर होते . किंवा बहुतेक मंदिरातच घर थाटले होते .रामरायाचे दर्शन घेऊन आलो आणि ओसरी मध्ये मी क्षणभर बसलो . सकाळचे दहा वाजले असावेत . इतक्यात आतून एक माताराम आल्या आणि त्यांनी सांगितले बारा वाजल्या शिवाय भोजन मिळणार नाही .
ब्राम्हणगाव येथील रामाच्या उत्सव मूर्ती . दक्षिण भारतात कुंभकोणम जवळ स्वामीमलई नावाचे गाव आहे . इथे या सर्व ओतीव मूर्ती बनवल्या जातात .
आज रामराया देखील आपली बाजू घेत नाही असे लक्षात आल्यावर तिथून शांतपणे उठलो आणि पुढचा मार्ग पकडला . पोटामध्ये भुकेची जाणीव हळूहळू तीव्र होत होती परंतु सकाळी केलेला पराक्रम माहिती असल्यामुळे निरुपाय होता . नर्मदा तिचे अनुभव इतक्या खात्रीशीरपणे देत असते की आपल्याला चूक केल्याबरोबर शिक्षा काय मिळणार याची देखील खात्री असते . तसेच माझे झाले होते . मनातल्या मनात माझे द्वंद्व सुरू होते . एक मन म्हणत होते कशाला निघायची घाई केली ? तो तांत्रिक असे माझे काय बिघडवणार होता ? आणि दिसली मानवी कवटी तर काय फरक पडतो ? दुसरे मन सांगत होते , जिथे आपल्याला कोणी विचारत नाही , तिथे क्षणभर तरी कशाला थांबावे ! आणि चालावे लागले उपाशी पोटी एखाद्या दिवशी तर काय फरक पडतो ! रोज सुग्रास अन्न देतेच आहे ना मैया ! एखाद दिवस सुट्टी घेऊ दे की तिला ! असे विचार करत किनारा पकडून झपाझप चालू लागलो . विश्वनाथ खेडा , चैनपुरा गावे ओलांडत मारु की चिंचली गावाची हद्द गाठली . चिंचली गावातील राम मंदिरामध्ये देखील भोजन प्रसाद मिळणार नाही असे मला सांगण्यात आले . तुम्हाला असे वाटू शकते की सारखे भोजन भोजन काय चालू आहे . परंतु जेव्हा पोटामध्ये आग पडते तेव्हा बाकीचे काही सुचत नाही . त्यात चालून कष्ट झालेले असतात जे तुमची भूक अजून गहरी करतात .इथे देव किंवा डेब नावाची नदी आडवी येते . हिचे पात्र फार मोठे असून पाण्याला प्रचंड गती आहे . पाण्यात शेवाळे देखील खूप आहे . त्यामुळे थोडेसे उलटे गावात चालत जावे लागते . तिथून भयाण अशा वाळवंटातून नदी पार करावी लागते . म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जंगल आहे . परंतु कितीही खोल खणले तरी वाळूच सापडते . त्यामुळे हजारो लाखो वर्षांपूर्वीची ही वाळू अवैध रितीने उत्खनन करून काढण्याचा मोठा व्यवसाय या भागात आहे . वाळू खणणाऱ्या लोकांनी इतके विचित्र ठिकाणी उत्खनन करून ठेवलेले आहे की बरेचदा चार-पाचशे मीटर चालल्यावर आपल्या लक्षात येते की आता रस्ता संपला आहे व पुन्हा उलटे जावे लागणार आहे . परत उलटे येताना देखील तुम्हाला पहिला रस्ता सापडेल याची खात्री नसते . इतका भयंकर भुलभुलैय्या येथे निर्माण झालेला आहे . हा परिसर कसा आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे .
या भागात वन्य जीव देखील भरपूर असून कोल्हे लांडगे साळींदर यांची मोठी संख्या आढळते . जपून चालावे लागते . वाळूचे मोठे मोठे उभे कडे कापलेले दिसतात . त्यामुळे ज्या भिंती तयार होतात तिथे वेडे राघू आपल्या गुहा किंवा घरटी बनवतात . अशा सुमारे २०० , ३०० घरट्यांचा समूह एकेका ठिकाणी मी पाहिला . एकंदरीत इथले चालणे भीती प्रद वाटते . पायाखालची वाळू देखील कधीही सटकेल याचा नेम नसतो .
या देव अथवा डेबनदीचे एक वैशिष्ट्य आहे . हिच्या काठावर जेवढी म्हणून गावे आहेत त्या प्रत्येक गावाच्या नावात डेब हा शब्द आहे . उदाहरणार्थ मेहगाव डेब , सेमलदा डेब ,पिपल्या डेब , पिपरी देब , बिल्वा डेब इ . फार थोड्या नद्यांना असे भाग्य मिळते . इथून पुढे नलवाई किंवा नलवाय गावात आलो . इथे देखील कोणीही पाणी सुद्धा विचारले नाही . अखेरीस किनारा पकडून पुन्हा चालू लागलो . इथे कपिला नावाची नदी आडवी आली . नदी खोल होती . पलीकडच्या काठावर एक नाव नांगरलेली होती . तिथे आंघोळ करणाऱ्या एका माणसाने माझ्या दिशेला जोरात नाव ढकलून दिली . मी देखील काठीने नाव ओढून घेतली . नंतर स्वतःच नावेत बसून काठी ने वल्हवत वल्हवत पलीकडचा किनारा गाठला . माझ्या अंगातले सगळे बळ निघून गेले होते . कसाबसा घाट चढलो .हे लोहारा नावाचे गाव होते . इथे एका साधूची धर्मशाळा आहे असे कळले . मोठ्या आशेने धर्म शाळेमध्ये गेलो . साधूने सांगितले की जेवणाची वेळ टळून गेली आहे . दुपारी बारा वाजता आल्यावरच भोजन मिळते . त्याने आसन लावायला सुद्धा नकार दिला . आता मात्र मला खरोखरच पश्चाताप होऊ लागला .जाऊन जाऊन जावे तरी कुठे असा प्रश्न पडला . अखेरीस इथेच रस्त्यावर आसन लावण्याचा निर्णय मी घेतला . इथे घाटावरच एका निवृत्त कर्नल चा बंगला होता . त्याच्या बाहेर एक मोठे झाड होते . त्याच्या सावलीत रस्त्यावर मी आसन लावले . दुपारचे सुमारे तीन वाजले होते . नर्मदा मातेची क्षमा मागण्यासाठी मी घाट उतरून खाली गेलो . तसेही संगमावर स्नान केलेले नव्हतेच . अतिशय निसरड्या अशा त्या तिरक्या घाटावर तीन डुबक्या मारून स्नान केले . आणि हात जोडून नर्मदा मातेची मनोमन क्षमा मागितली . तिला मी सांगितले हे पहा मैया सकाळपासून मी अखंड चालतोच आहे . सुमारे दहा तास झालेले आहेत . पोटात अन्नाचा कण नाही . डोक्यावर सूर्य आग ओकतो आहे . आता इथून पुढे जाण्याची क्षमता माझ्या मध्ये नाही . मला मनापासून क्षमा कर . त्या साधूला सांग की ह्या परिक्रमावासीला त्याच्यापासून काही अडचण नव्हती . परंतु त्याने बाळगलेला मांत्रिक आवडला नसल्यामुळे हा पुढे निघून गेला . पुन्हा असा प्रमाद माझ्या हातून घडणार नाही . माझे तोंड मैया मध्ये बुडवले आणि डोळ्यांनी पुन्हा हाच निरोप तिला सांगितला . बाहेर आलो . अंग पुसले . आणि आसनावरती जाऊन पाठ टेकली . मंद गार वारा सुटला होता . दुपार टळून संध्याकाळ होण्याची लक्षणे दिसू लागली होती . आता छान झोप काढावी असा विचार मी केला . तसेही सुमारे २५ - २७ किलोमीटर अंतर मी सलग तोडले होते . आता माझा डोळा लागणार इतक्यात एक म्हातारी माताराम आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला . "बुखार है क्या बाबाजी ? " "नही मैया । " " तो फिर बाहेर क्यू सोये हो ?अंदर आश्रम मे जाओ ना । " " अरे वो आश्रम वाले महाराज ताला लगाके चले गये । "मी सांगितले . " कोई बात नही । शाम को भी यही पे भोजन करोगे ना ? " माता रामने मला विचारले . "मैया आज मैने भोजन नही किया । अब शाम का तो पता नही । मैया जाने । " माझ्या या उत्तराने म्हातारी ताडकन उभीच राहिली ! "लोहारा गाव मे परिक्रमावासी भूखा सोएगा ? " चिडून नेमाडी भाषेमध्ये तिने बहुतेक साधूला लाखोली वहायला सुरुवात केली . मी तिला म्हणालो "माताजी गलती मेरी है । मैने सुबह चाय बालभोग ठुकराया है । उसकी सजा तो भुगतनी पडेगी ना । " म्हातारी उठून ताडताड निघून गेली . मला पुन्हा डोळा लागला . थोड्या वेळात काही लोकांची गडबड ऐकू आली म्हणून मी जागा झालो . समोर काही लोक पूजा मांडून बसले होते . नीट लक्षपूर्वक ऐकल्यावर मला लक्षात आले की हे लोक मराठीमध्ये बोलत आहेत ! एकीकडे पूजा चालू होती तर एकीकडे स्वयंपाक चालू होता . दाल भाटी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता . त्यांच्यासोबत ची लहान मुले खेळत खेळत माझ्या जवळ आली . माझ्याकडे पाहून त्यांना मौज वाटत होती . रस्त्याच्या कडेला शक्यतो भिकारी झोपतात . आणि भिकाऱ्यांशी बोलू नये असे घरी मुलांना शिकवलेले असते . त्यामुळे मुले माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखी करत होती . खेळता खेळता त्यांचा चेंडू माझ्या अंगावर पडला . मी त्या मुलांना म्हणालो तुमची नावे सांगितली तरच चेंडू मिळेल ! मुले धावतच आपल्या नातेवाईकांकडे गेली आणि त्यांना सांगू लागली अहो तो भिकारी मराठी मध्ये बोलतो आहे ! त्यांचा काहीच दोष नव्हता . मी इतक्या नद्या ओढे नाले चिखलातून ओलांडून आलो होतो की माझे कपडे प्रचंड मळले होते ! बरं वस्त्रांवरची माती , हीच नर्मदेची विभूती हा भाव ठेवून चालत असल्यामुळे समोरच्या माणसाचा गैरसमज होणे स्वाभाविक होते . आणि तसेही एखाद्या भिकाऱ्यांमध्ये आणि माझ्या मध्ये काय फरक होता ? तो देखील भूक लागली म्हणून जेवायलाच मागतो ना ? मी दुसरे काय करत होतो ? तरी देखील त्या कुटुंबाचा प्रमुख माझ्याकडे बोलण्यासाठी आले . नमस्कार चमत्कार झाला . हे डॉक्टर चौधरी नावाचे अंमळनेर इथले वैद्यकीय डॉक्टर होते . त्यांनी बडवानी मध्ये क्लिनिक चालू केले होते . कुठल्यातरी पूजेच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना घेऊन ते नर्मदे काठी आले होते . मी परिक्रमा करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या घरातील सगळे जण माझ्या भोवती गोळा झाले . यांच्या पत्नी जळगावच्या होत्या . सर्वांनाच मराठी बोलणारा परिक्रमा वासी भेटल्यामुळे आनंद झाला होता . डॉक्टर चौधरी मला म्हणाले , " नेमके आम्हाला यायला उशीर झाला . आम्ही दुपारपर्यंत पोहोचलो असतो तर आमच्या सोबतच तुम्हाला दाल बाटी खायला सांगितले असते . " मी केवळ हसलो आणि काहीच बोललो नाही . इतक्यात ती वृद्ध माताराम पदरा आड ताट झाकून घेऊन आली आणि तिने मला गरमागरम चार पोळ्या आणि भाजी वाढली ! हे पाहिल्याबरोबर डॉक्टर साहेब अवाक् झाले ! " हे काय ?तुम्ही अजून जेवला नव्हतात? " त्यांनी आश्चर्याने विचारले . आणि मला प्रेमळ तंबीच दिली . की आता मला त्यांच्यासोबत दाल भाटी सुद्धा खावी लागेल ! मग काय विचारता ! तसेही चार पोळ्यांनी माझे पोट भरणार नव्हतेच ! सोबत भरपूर दाल भाटी खाल्ली ! चुर्मा खाल्ला ! मस्तपैकी आंब्याचे लोणचे ओरपले ! सर्वांनाच खूप आनंद झाला ! अशाप्रकारे मैयाने शिक्षा भोगायला लावून नंतर चांगले बक्षीसही दिले ! या परिसरातील छायाचित्रे आपल्या माहितीकरता जोडत आहे . म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभ राहील !
हाच तो उताराच निसरडा लोहारा घाट जिथे मी स्नान केले . समोर जो तट दिसतो आहे तिथूनच नावेने मी इकडे आलो . ज्या नावेने आलो ती नाव सुद्धा झाडीमध्ये दिसते आहे पहा . ही नाव इथेच नांगरलेली असते .डावीकडून येते आहे ती नर्मदामाता आहे उजवीकडून येणारी कपिला नदी आहे .
संगमाचे स्थान तसे रम्य आहे फक्त काठावर चिखल खूप आहे .
गुगल नकाशा मध्ये पाहिले असता संगम असा दिसतो . लोहारा घाट आणि कपिलेश्वर महादेवाचे मंदिर देखील दिसत आहे . निळा पत्रा दिसतो आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .
हीच ती परिक्रमावासी धर्मशाळा जिला कुलूप लावून व्यवस्थापक साधू निघून गेला .
त्यामुळे इथे या पारावर मी आसन लावणार होतो . परंतु तिथे भैरव समूह झोपलेला असल्यामुळे मी पुढे रस्त्यावर आसन लावले .
हाच तो काँक्रीटचा रस्ता जिथे मी आसन लावले . समोर धर्मशाळा दिसते आहे पहा .
अगदी याच नंदी मंडपाजवळ सावलीमध्ये मी आसन लावले .मागे काळे पांढरे दार दिसते आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .
कर्नल साहेबांच्या बंगल्यामध्ये एक आवळ्याचे झाड होते . त्याचा आवळा टप करून माझ्यासमोर पडला आणि मला आवळे खायची इच्छा झाली . तर जाताना डॉक्टर चौधरी यांनी न विचारता बिस्किटे आणि अर्धा पाऊण किलो आवळे मला सोबत दिले !पुढे बरेच दिवस या आवळ्यांनी माझी तहानभूक भागवली !
इथे पडल्या पडल्या नर्मदा कपिला संगमाचे असे सुरेख दर्शन होत होते . पाणी उतरल्यावर घेतलेले हे चित्र आहे .
इथून थोडेसे पुढे गेल्यावर कपिलेश्वराचा घाट लागतो . ही भगव्या रंगाची नाव येथे कायम नांगरलेली असते . अशा नावा सरदार सरोवरामध्ये खूप आहेत .
कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या याच पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि पुढचा मार्ग चालायला सुरुवात केली .
इथून पुढे बरेच चढ उतार लागले .ओळीने काही टेकड्या आहेत . पहिल्या टेकडीवर बीमलेश्वराचे मंदिर आहे .
इथून नर्मदेचे खूप सुंदर दर्शन होते .
दुसऱ्या टेकडीवर सिद्धेश्वराचे स्थान आहे .
टेकडीवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले . इथून पुढे देखील काही लोकांनी जमिनी विकत घेऊन आश्रम बांधलेले आहेत .एक साईबाबा मंदिर आहे . पुढचे सर्व आश्रम खालूनच पहात पुढे निघून गेलो . परंतु वाचकांपैकी कोणी त्या मार्गाने गेले तर माहिती असावे म्हणून गुगल वर सापडलेले त्या स्थानाचे फोटो सोबत जोडत आहे .
महादेव मंदिरातून नर्मदेचे सुंदर दर्शन होते
मंदिराची टेकडी बऱ्यापैकी उंच आहे
मंदिर प्राचीन आहे . रम्य स्थान आहे .
सिद्धेश्वराचे स्थान देखील इथून जवळच आहे
अशी प्रत्येक स्थानाची काही ना काही आख्यायिका नर्मदे काठी आहेच आहे . त्यामुळे तीन वर्षे तीन महिने १३ दिवसाची परिक्रमा केली तरच सर्व पाहून होते .
पारंपारिक साहित्य वापरून आधुनिक दिसणारे बांधकाम पुढे केलेले दिसते .
स्थापत्य विशारदांसाठी नर्मदा काठ हे नंदनवन आहे हे मी याचसाठी म्हणत आहे . तिथे अजूनही विविध प्रकारच्या वास्तु उभ्या करण्यास पुरेसा वाव आहे . प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्टने एक तरी वास्तू नर्मदे काठी सेवा म्हणून उभी करावी . खूप पुण्य मिळेल .आणि जगभरामध्ये नर्मदा खंडाचे नाव वास्तुवैविध्यामुळे प्रसिद्ध होईल .
अजून एका टेकडीवरील साईबाबा मंदिर आणि आश्रम
मंदिराचा आकार थोडासा विचित्र आहे . परंतु कल्पक आहे . ओम श्री साई नाथाय नमः ।
या भागातील नर्मदा अतिशय भव्य दिव्य आणि शांत आहे .
पाण्याच्या मोटर्स चा आकार आणि उपसा क्षमता आता हळूहळू वाढत जाते आणि खांब लावून विद्युत तारा उचलून घेण्याचे प्रमाण वाढते .
इथे
अजूनच सावधपणे चालावे लागते . कारण आता थेट विजेचा झटका बसण्याची शक्यता
असते ! मी बरेचदा खाली वाकून जायचो . परंतु माझी बिछान्याची गुंडाळी त्या
वायरीं मध्ये नेमकी अडकायची . अजून थोडे खाली वाकावे तर गुडघे चिखलात
आपटायचे ! तसाही इथून पुढे प्रचंड चिखल सुरू झाला ! मध्ये येऊन मिळणाऱ्या
ओढ्यांचे प्रमाण वाढू लागले . आणि सर्वच ओढे गुडघाभर चिखलाने भरलेले होते .
धरणाचे पाणी उतरल्यामुळे असे झाले होते . त्यामुळे माझे सर्वांग चिखलाने
भरून गेले ! खूप वेळा चिखलामध्ये रुतलो . घसरून आपटलो सुद्धा ! पाहणारे
कोणीच नव्हते ! त्यामुळे बिनधास्त सर्व प्रकार चालू होता . धुण्याची देखील
सोय नव्हती . कारण मैया मध्ये सुद्धा पाच ते दहा फूट चिखल झालेला होता .
माझे मलाच हसू यायचे ! परंतु मी एक निरीक्षण केले . मैयाकाठचा चिखल पायाला
लागला की पायाचे दुखणे कमी व्हायचे ! तो जणू काही औषधी चिखल होता !
दुखणाऱ्या पायांना मैयाने स्वतःच्या हाताने लावलेला लेपच जणू ! लेपा !
या
भागातील ओढे नक्की कसे होते हे आपल्याला कळावे म्हणून त्या ओढ्यांचा गुगल
नकाशा खाली जोडत आहे . हे सर्व ओढे कमरे एवढ्या पाण्यातून गुडघाभर चिखलातून
पार केले . हळूहळू तुम्हाला जलस्रोत पाहिल्यावर तो किती धोकादायक आहे याचा
अंदाज येऊ लागतो . आतला आवाज इथे तुम्हाला खूप मदत करतो . आणि तो
निश्चितपणे आपला स्वतःचा नसतो ! त्याच्यावर देखील तिचीच सत्ता आहे !
हे सर्व ओढे काठाकाठाने चालत पार करायचे .अर्थात चातुर्मासामध्ये जेव्हा पाणी चढते तेव्हा हे सर्व जलमग्न झालेले असते . सुदैवाने मी पाणी उतरलेले असताना चालत होतो .
नाहिली नामक नदी नर्मदेला येऊन मिळते तो संगम देखील असाच खूप मोठा आहे . या नदीला पार करणारी प्रत्येक व्यक्ती नाहीलीच पाहिजे असा तिचा नियम आहे ! त्यामुळे खोल पाण्यातून अंघोळ करतच बाहेर पडायचे ! ( परिक्रमेला जाण्याची त्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर पोहणे शिकून घ्यावे म्हणजे पाण्याची भीती जाते ! ) नद्या त्यांचे प्रवाह बदलत असतात . या नदीन बहुधा तिचा प्रवाह कधी बदलला नसावा . जगह से ना हिली इसलिये नाहिली ! असो .
अखेर अतिशय सुंदर अशा मोहीपुरा आश्रमात येऊन पोहोचलो . सूर्य मावळतीला आलेलाच होता . गावातील तरुण आश्रमात केलेली सजावट उतरविण्याचे काम करत होते . सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले . परिक्रमा जवळपास संपलेली असल्यामुळे असा एखादा परिक्रमावासी जेव्हा येतो तेव्हा लोकांना खूप आनंद होतो असे मी अनुभवले .इथे ६२ वर्षे वय असलेले एक पती-पत्नी परिक्रमावासी अन्य परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी म्हणून थांबले होते . हा नितांत सुंदर आश्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांधलेला आहे असे मला सांगण्यात आले . हा आश्रम डूबक्षेत्रामध्ये बांधलेला असल्यामुळे दरवर्षी जलमग्न होतो . व पाणी उतरल्यावर पुन्हा त्याचा जिर्णोद्धार केला जातो . इथे असलेले सिद्धेश्वर महादेवाचे स्थान हे भार्गव ऋषींनी स्थापन केलेले आहे . अमृतानंद पुरी नामक एका यतींनी या स्थानाचा जीर्णोद्धार केला . पांडवांनी पूर्वी नर्मदे काठी एक सहस्र यज्ञ घातले होते . ते स्थान इथून दिसत होते .म्हणून या टोकाला सहस्रयज्ञाख्यतीर्थ असे नाव पडले . स्वामीजी स्वतः पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक होते . त्यामुळे ओघानेच या आश्रमामध्ये संघाच्या स्वयंसेवकांचा सदैव राबता राहिला आहे . आता देखील इथे अनेक तरुण काही ना काही काम स्वयंस्फूर्तीने करताना मी पाहिले . विशेष म्हणजे याच्यामध्ये लहान मुलांचा देखील मोठा सहभाग होता . सगळ्या वानरसेनेने मिळून तासाभरातच संपूर्ण आश्रम आवरून चकाचक केला .
आश्रमाचे स्वयंसेवक
आश्रमाच्या परिसरामध्ये सुंदर बगीचा दरवर्षी उभा केला जातो आणि दरवर्षी पुरामुळे ही सर्व शोभेची झाडे वठतात . मी आश्रमातील स्वयंसेवकांना टिकाऊ पाणथळ देशी वृक्षांची माहिती दिली .
चातुर्मासामध्ये सिद्धेश्वराचे मंदिर आणि आश्रम अशा रीतीने जलमग्न असतो .
या आश्रमामध्ये नर्मदेच्या काठावर एक अतिशय सुंदर अशी गोलाकार कुटीया उभी केली होती . मला या कुटीची रचना फारच आवडली . हिचे छप्पर देखील रंगीबेरंगी होते . गावातील एका तरुणाने मला कुटी आतून दाखवली . आणि त्या कुटी बाहेर उभे करून माझा एक फोटो त्याने काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो वाचकांसाठी सोबत जोडत आहे .
मोहीपुरा गावातील आश्रमामध्ये सुंदर अशा गोलाकार कुटी शेजारी उभा प्रस्तुत लेखक . मागे नर्मदा नाहीलि संगम दिसतो आहे .
हा आश्रम फारच रम्य होता . परंतु दुर्दैवाने येथे चातुर्मास करता येत नाही , कारण हा आश्रम चातुर्मासामध्ये जलमग्न असतो .
चातुर्मासामध्ये हाच आश्रम अशा रीतीने संपूर्ण पाण्याने वेढला जातो . सरदार सरोवराची उंची वाढवल्यावर हा आश्रम बुडणे सुरू झाले . कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है ।
या भागातील अनेक पुरातन वृक्ष वठलेले आहेत आणि जुने वाडे देखील ढासळून ओस पडलेले आहेत . गावांमध्ये एक राम मंदिर आहे . द्वारके नंतर तशी हुबेहूब मूर्ती थेट याच गावांमध्ये आहे . त्यामुळे द्वारकाधीशाची ही मूर्ती प्रसिद्ध आहे .
त्या मातारामने अतिशय सुंदर स्वयंपाक करून मला जेवायला वाढले . पोटभर जेवून बाहेर चालायला आलो .
इथे रात्री गावातील तरुणांचे प्लास्टिक बॉल क्रिकेटचे सामने आश्रमाला लागूनच चालले होते ते पाहत बसलो आणि समालोचकाचे विनोदी शैलीतील समालोचन ऐकून हसून हसून अक्षरशः पोट दुखायला लागले ! आपल्या समालोचनावर एक परिक्रमावासी हसून हसून लोळतो आहे हे पाहिल्यावर त्याने विनोदाची पातळी अजूनच वाढवली आणि संपूर्ण परिसर हास्यमग्न करून टाकला !
क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी समालोचन होते की समालोचनाची मजा वाढवण्यासाठी बाजूला क्रिकेटचे सामने ठेवले होते हेच कळत नव्हते ! कारण सर्वांचे लक्ष त्या स्टँड अप कॉमेडी कडेच अधिक होते !
माझ्यासोबत गावातील एक दोन मुले सामने बघत बसली होती . गावातील मुले क्रिकेट मात्र चांगले खेळत होती . या गावात सर्व मंडलोई आडनावाचे लोक होते . त्यामुळे फलंदाज पण मंडलोई , गोलंदाज पण मंडलोई आणि क्षेत्ररक्षक देखील मंडलोई असायचा ! तसा क्रिकेट या खेळाचा माझा फारसा संबंध नाही . मुळात मी स्वतः अतिशय टुकार दर्जाचे क्रिकेट खेळतो . हा खेळ मला कधीच फारसा आवडला नाही .मला कधीच भरवशाचा फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून वापरले गेले नाही . परंतु काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका छोट्याशा उद्योगामुळे काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी माझा संबंध आला होता इतकेच . आम्ही काही मित्रांनी मिळून एक यंत्र बनवले होते , ज्याच्यावर क्रिकेटचा सराव करता याचा . बघता बघता या यंत्राची कीर्ती सर्व प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये पसरली आणि त्या सर्वांनी ही यंत्रे आमच्याकडून विकत घेतली . सचिन ,द्रविड , गांगुली , सेहवाग , राहणे , भज्जी , इरफान पठाण ,युसुफ पठाण , कुंबळे वगैरे सर्वांनी आमची यंत्र वापरली होती .सहज बोलता बोलता मी ही माहिती माझ्यासोबत बसलेल्या त्या दोन मुलांपुढे बोलून गेलो . आणि ते धावतच स्टेजवर गेले . समालोचक लगेच तिथून माइक वर ओरडू ओरडू सांगू लागला ! आज आपले सौभाग्य आहे की तेंडुलकरचे मित्र आपले सामने पाहायला आलेले आहेत ! वगैरे वगैरे विनोदी शैलीतल्या लोणकढी थापा त्याने सुरू केल्या ! हे ऐकल्याबरोबर मी जी धूम ठोकली ते आश्रमाच्या खोलीत जाऊन आतून कडीच लावून घेतली . आणि झोपून टाकले ! रात्रभर बक्षीस समारंभासाठी कोण जागणार ! इथे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला की स्वतःविषयी मौन राहणे परिक्रमेमध्ये किती आवश्यक आहे व का आवश्यक आहे !
आता विषय निघालाच आहे म्हणून वाचकांच्या माहिती करता याबाबतची काही निवडक चित्रे सोबत देत आहे . त्यातील काही खेळाडूंना आपण देखील ओळखत असाल .
अर्जुन तेंडुलकर यांच्यासमवेत त्याच 'बॅकयार्ड' मध्ये पुन्हा कधीतरी
हरभजनसिंह सह त्याच्या जलंधर मधील अकादमीमध्ये
पारस म्हाम्ब्रे यांच्यासह विदर्भ क्रिकेट अकादमी मध्ये
सर चंदू बोर्डे यांच्या समवेत चंदू बोर्डे पॅव्हेलियन समोर आमच्या यंत्रासह
क्रिकेटर विनू मंकड यांचे नातू आणि भारताकडून २० डेविस कप खेळलेल्या हर्ष मंकड यांच्यासमवेत
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजीओ अली इराणी यांचे समवेत
क्रिकेट प्रमाणेच टेनिस सरावाचे यंत्र देखील आम्ही बनवायचो . भारताचा महान खेळाडू लिएंडर पेस समवेत
भारतातील क्रमांक एकचा टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि क्रमांक दोन बालाजी यांच्या समवेत कोवई मध्ये
राजकीय फटकेबाजी करणाऱ्या राज ठाकरे यांना टेनिस कोर्ट वरील फटकेबाजी बद्दल सांगताना
तेव्हा राज ठाकरे यांनी नुकतेच टेनिस शिकायला सुरुवात केली होती
अमित ठाकरे देखील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे गिरवीत होते
शर्मिलाताई ठाकरे यांचा सराव घेताना प्रस्तुत लेखक
या घटनेच्या बातम्या देखील तत्कालीन मीडियावर गाजल्या होत्या
राज ठाकरे यांच्या समवेत छ. शिवाजी पार्क मैदानावर प्रस्तुत लेखक
सचिन तेंडुलकर यांनी स्वाक्षरी करण्यापूर्वीचे चित्र
प्रस्तुत लेखकाने महाविद्यालयीन जीवनात काढलेली ही चित्रे संबंधित खेळाडू कडून स्वाक्षरी करून घेतलेली आहेत . कोठे गैरवापर होऊ नये म्हणून स्वाक्षरी चा भाग काढलेला आहे .अकरावी मध्ये असताना रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणे ऐवजी टीप कागदावर काढलेले सचिनचे चित्र देखील त्याला आवडले आणि त्याच कागदाच्या मागे त्याने स्वाक्षरी दिली .
चित्रापर्यंत ठीक आहे परंतु असे व्यावसायिक खेळाडू हे तरुणांचे आदर्श असू शकत नाहीत किंबहुना असू नयेत.
आपले म्हणजे तरूणांचे खरे आदर्श असेच हवेत !
महाविद्यालयीन जीवनातील प्रस्तुत लेखकाचे एक पेन स्केच ! असो .
हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच आहे की कोणाला असे वाटू नये की आयुष्यात काहीच न जमलेली माणसे नर्मदा परिक्रमा करतात . याउलट अनेक परिक्रमा वासी पाहिल्यावर मला असे जाणवले की आयुष्यात सर्व काही करून झाल्यावर अजून काहीतरी अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय करण्याची , अनुभवण्याची उत्कट इच्छा असलेले लोकच नर्मदा परिक्रमा करतात . मी शक्यतो या सर्व गोष्टींविषयी फारशी वाच्यता आजवर कुठे केलेली नव्हती . कारण ती करण्यासाठी लागणारी समाज माध्यमे वापरणे मी २००६ सालापासूनच , VIS अर्थात virtual identity suicide करून बंद केलेले आहे . परंतु हा ब्लॉग मोठ्या प्रमाणात तरुण देखील वाचत आहेत . त्यांच्यामध्ये परिक्रमेविषयी आणि परिक्रमावासीं विषयी नकारात्मक संदेश जाऊ नये म्हणून मुद्दाम वरील फोटो काहीशा अनिच्छेने सोबत जोडलेले आहेत ,याची सूज्ञ वाचकांनी कृपया नोंद घ्यावी . माझ्याशी वैयक्तिक परिचय नसलेले अनेक वाचक मनोमन असा विचार करू शकतात की आयुष्यात काही नकारात्मकता आली म्हणून या तरुणाने परिक्रमा उचलली की काय ? तर तसे काही नसून आयुष्यात देवदयेने आलेली सकारात्मकता योग्य प्रकारे वापरली जावी म्हणून ही परिक्रमा आहे !
आपली सर्व विहित कर्मे यथाशक्ती ,यथामती , यथायोग्य आटोपून घ्यावीत आणि मग गुर्वाज्ञेने यथावकाश , सावकाश परिक्रमा उचलावी हे उत्तम !
नर्मदे हर !
लेखांक सत्त्याहत्तर समाप्त ( क्रमशः )
लेखांक ७८ : दतवाडा चा स्वामी प्रबुद्धानंद भारती स्थापित रम्य असा रम्या परिक्रमावासी निवास आश्रम
त्यादिवशी मी पहाटे लवकर उठून आन्हीके आटोपून सिद्धेश्वरा समोर बसून शंकराची स्तवने म्हटली . परिक्रमावासी दांपत्यासोबत महादेवांचे आरती केली . माझी पूजा अर्चा आटोपून घेतली .
वहीमध्ये आश्रमाचा शिक्का घेतला .
गावातील एक मनुष्य आम्हा तिघांना चहा पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी आला होता . त्याच्यासोबत त्याचे घरी चहा पिण्यासाठी तिघेही गेलो . याने सुंदर असा चहा पाजला आणि शेतातल्या भरपूर शेंगा सोबत खायला दिल्या . गावातील राम मंदिराचे दर्शन घेतले . तिथून निघालो आणि थेट मैयाचा किनारा गाठला . थोडेसे अंतर चाललो आणि एका कोळ्यापाशी येऊन थांबलो . धरणातील पाणी कमी जास्त होत असल्यामुळे येणारी भरती ओहोटी याचा अभ्यास करून याने अशा पद्धतीने जाळे लावले होते की रात्रभर भरपूर मासे त्याच्या जाळ्यात सापडले होते . दोघे नवरा बायको मासे गोळा करायचे काम करत होते . त्यांचे ते कर्म थोडावेळ पाहत राहिलो . तडफडणारे मासे इकडे तिकडे उड्या मारत होते . क्षणभर वाटले या माशांना उचलून परत पाण्यात सोडावे . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . नर्मदेच्या काठावर जे काही सुरू आहे त्यात ढवळाढवळ करण्याचे काम परिक्रमा वासी ने जाणीवपूर्वक टाळायचे असते . हे सर्व मी पाहत असताना एक छोटासा मासा माझ्या पायावर येऊन पडला . मी त्याला उचलले आणि माझ्या मनातला भाव कोळ्याने ओळखला . मला म्हणाला "फेक दो बाबाजी मैया मे । " मी आनंदाने माशाला नर्मदा मातेमध्ये फेकले ! थोडेफार त्याच्या या व्यवसायाचे गणित समजून घेतले आणि पुढे निघालो . साधारण एक किलोमीटर चाललो असेन . इतक्यात डावीकडे काहीतरी आहे असे मला जाणवले म्हणून खडकाळ किनारा सोडून पुढे वर चढलो . समोर एक आश्रम दिसत होता . नर्मदा मातेकडे तोंड करून बांधलेल्या सुंदर ध्यान कुटी होत्या . आश्रमाला कुंपण होते आणि दार होते . परंतु दाराचे कुलूप उघडे आहे असे मला दिसले म्हणून मी ते उघडून आत गेलो . राधा नावाची एक माताराम बागेत झाडलोट करत होती . तिला बहुतेक माझे मागून येणे अपेक्षित नसावे . ती जोरात मला म्हणाली " कौन चाहिये बाबाजी ? " मी तिला विचारले की या आश्रमाचे व्यवस्थापक कोण आहेत ? तिने सांगितले की चेन्नई वाले स्वामीजी आहेत . आता तमिळ बोलायला मिळणार या आनंदामध्ये मी असतानाच आतून पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक मनुष्य तिथे आला . "वणक्कम अय्या " मी म्हणालो . " वणक्कम वणक्कम . यार निंगे ? यन्न वेणुम ? " अर्थात कोण तुम्ही ? काय पाहिजे तुम्हाला ? असे मला त्या व्यक्तीने विचारले . हे या आश्रमाचे व्यवस्थापक होते . मी म्हणालो '"नानू ओरू परिक्रमावासी . स्वामीजी ह्येंगे इर्कारे ? स्वामीयै पार्कलाम् " अर्थात मी एक परिक्रमा वासी आहे . स्वामीजी कुठे आहेत ? मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे . व्यवस्थापक राधाशी नेमाडी भाषेमध्ये बोलू लागले . त्यांनी तिला विचारले की हा माणूस आत मध्ये कसा काय आला ? राधा म्हणाली मी पण तोच विचार करते आहे . दार बंद असताना हा कसा काय आत आला ? ती नेमाडी भाषेमध्ये सांगत होती की मी तर या बाबाला बघून घाबरलेच ! अर्थात तिचा त्यात काही दोष नव्हता . गेले दोन दिवस प्रचंड चिखलातून चालल्यामुळे मळलेले माझे कपडे मी धुतलेच नव्हते ! त्यामुळे माझा वेश एखाद्या भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हता ! माझ्या लक्षात आले की आता आपल्याला बहुतेक आल्या पावली त्याच दरवाजाने बाहेर काढले जाणार ! म्हणून मी शेवटचे अस्त्र काढले . आङ्ग्लास्त्र ! आणि म्हणालो , "sir, आय एम रियली व्हेरी सॉरी . आय वॉज नॉट सपोजड टू एंटर फ्रॉम बॅक गेट . But I saw the gate open so I came inside." अर्थात क्षमा करा . मी मागच्या दाराने आत मध्ये यायला नको पाहिजे होते . परंतु दार उघडे दिसले म्हणून मी आलो " No no. Please don't miss understand. I am just thinking who opened the lock if Radha didn't? Because I had myself locked it . Anyway welcome to ashram!" व्यवस्थापक म्हणाले छे छे तसे काही नाही . फक्त दरवाजाचे कुलूप राधाने नाही उघडले तर मग उघडले कुणी हा विचार मी करतो आहे . कारण मी स्वतः कुलूप लावले होते .
माझे हे वाले अस्त्र बरोबर बसले असे मला वाटले! परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत या कुलपाचा उलगडा काही झाला नाही . इतक्यात तिथे मल्ली नावाचा एक मनुष्य आला आणि कानडी मध्ये व्यवस्थापकांशी बोलू लागला . त्याने कानडी मध्ये त्यांना सांगितले की सर्व गाड्या धुवून झाल्या आहेत . व्यवस्थापक देखील अस्खलित कानडी मध्ये त्याला सांगू लागले की आता एक काम कर . या बाबाजींना त्यांची खोली दाखव . त्यांचे सामान न्यायला मदत कर . त्यांना कानडी मध्ये बोलताना ऐकून मी कानडी मध्ये विचारले " नीवु कन्नडीगारे ? " " इल्ला . नानु मऱ्हाट्टा " "कुठलं गाव ? " "पुणे" "अरे वा ! मी पण पुण्याचाच आहे ! " असे मी म्हणालो मात्र आणि दोघेही हसायला लागलो ! कारण इतका वेळ आम्ही दोघांनी देखील एकमेकांना आपल्या मातृभाषेचा पत्ता लागू दिला नव्हता ! हा आश्रम स्वामी प्रबुद्धानंद भारती नामक एका जन्माने तमिळ असलेल्या ग्लोबल संन्यासी महाराजांचा होता . ग्लोबल म्हणायचे कारण असे की स्वामीजी कधी स्वतःला एका प्रांताशी , एका भाषेशी , एका विचारधारेशी ,एका पक्षाशी , एका राष्ट्राशी , एका पंथाशी , नव्हे नव्हे एका धर्माशी देखील बांधून ठेवत नसत .आणि हे व्यवस्थापक महोदय होते श्री सुहास सुरडी . एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे सुहासजी स्वामीजींचे निस्सीम शिष्य होते . यांना भारतीय आणि विदेशी अशा अनेक भाषा येत होत्या . नुसत्या येत नव्हत्या तर अतिशय उत्तम येत होत्या ! माझा भाषिक अभिमान गळून पडण्यासाठीच नर्मदा मातेने यांची माझी भेट घडविली असा माझा ठाम विश्वास होता ! मला येणारी प्रत्येक भाषा तर यांना येतच होती . परंतु त्या शिवाय देखील अनेक भाषा यांना अतिशय सुलभतेने बोलता येत होत्या . हे ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेचा लहेजा उचलून घ्यायचे घ्यायचे . त्यामुळे समोरच्या माणसाला त्यांची मातृभाषा ओळखता येणे खरंच खूप कठीण होते . मी सुहास जी म्हणाल्यावर त्यांनी मला सांगितले की फक्त सुहास म्हण . सुहास यांनी मला सांगितले की वरती आसन लावून स्वच्छ आंघोळ करून स्वामीं च्या दर्शनाला मी खाली यावे .परंतु मला क्षणभर स्वामींचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचे होते . हे आंघोळ प्रकरण नवीन कुठून आले असा विचार मी करू लागलो ! कदाचित माझे मळलेले रूप पाहून यांनी मला हे सांगितले असावे असा विचार मी केला .ठीक आहे . जिथे जो नियम आहे तिथे तो पाळलाच पाहिजे असा विचार करून आता सामान घेऊन मी वरच्या मजल्यावर असलेल्या परिक्रमावासी निवासस्थानाकडे कुच करणार इतक्यात स्वामींचा धीर गंभीर आवाज घुमला . "यार पा ? " कोण आहे रे ? स्वामीजींनी विचारल्या बरोबर सुहासने तमिळमध्ये उत्तर दिले की स्वामीजी एक परिक्रमावासी आलेला आहे . तुमचे दर्शन घ्यायची इच्छा आहे . पाठव त्याला स्वामींनी तमिळमध्येच सांगितले . आणि मी आनंदाने धावतच आश्रमाच्या आत मध्ये आपल्या कुटी बाहेर वर्तमानपत्र वाचत आराम खुर्ची मध्ये बसलेल्या स्वामीजींकडे गेलो . धिप्पाड देहयष्टी असलेले तेजस्वी स्वामीजी खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत होते . मी गेल्या गेल्या स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला . ओम नमो नारायणाय ! आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिलो . त्यांनी मला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळले आणि म्हणाले , " why are your clothes so dirty young man? " अर्थात तुझे कपडे इतके मळलेले का आहेत ?
" They are not dirty Swami ji. They are full of holy mud from Narmada basin" मी म्हणालो की ते कपडे मळलेले नाहीत . नर्मदा खंडातल्या पवित्र धुळीने माखलेले आहेत . माझे हे उत्तर स्वामींना फार आवडले ! आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली ! " दॅटस् द आन्सर ! "
हरी ? त्यांनी हरी नावाच्या शिष्याला हाक मारल्या बरोबर आतून एक तरुण तेजस्वी मुलगा पळत बाहेर आला . प्लीज गेट द फाईन क्लोथ फॉर यंग मॅन फ्रॉम माय कबर्ड .
माझ्या कपाटातून याच्यासाठी तलम असे वस्त्र घेऊन ये .
हरी धावतच आतून सुंदर असे फिकट पिवळ्या रंगाचे दक्षिण भारतीय करवत काठी धोतर आणि उपरणे घेऊन आला . याचे कापड खूप चांगल्या दर्जाचे होते . स्वामिनी माझ्या हातात ती वस्त्रे दिली आणि सांगितले की स्वच्छ आंघोळ करून ही वस्त्रे घालून पुन्हा मला भेटायला ये . वस्त्र हातामध्ये पडल्याबरोबर मी ओळखले की हे रामराज मिलचे कापड आहे . "रामराज अल्वा ? " मी म्हणालो . आणि स्वामीजी आश्चर्यचकित झाले ! हाऊ डू यु नो दॅट दिस इज रामराज क्लॉथ ? तुला कसे काय कळले की हे रामराज मिलचे कापड आहे ? मी तमिळमध्ये उत्तर दिले . इतके तलम कापड फक्त रामराजच बनवू जाणे ! स्वामीजी हसायला लागले ! त्यांनी शेवटपर्यंत मला ते तमिळ आहेत असे जाणवू दिले नाही . परंतु मी अधून मधून तमिळमध्ये बोलून त्यांना मनोमन खुश करून टाकायचो . त्या पहिल्याच भेटीमध्ये हे स्वामीजी मला आवडले ! का आवडले कसे आवडले हे प्रश्न निरर्थक आहेत . प्रत्यक्षात पाहिले तर आमचे अनेक विषयांमध्ये मतभेद देखील होते . परंतु मला स्वामीजी आवडले आणि स्वामीजींना देखील मी आवडलो असणार हे जाणवण्यासारखे बरेच काही पुढे घडले .
साधूचे ध्येय देवाची किंवा धर्माची सेवा करणे हे नाही . त्याचे एकमेव ध्येय आहे मोक्षप्राप्ती .मोक्षप्राप्ती हे दैवी एकरूपतेचे प्रकटीकरण आहे . - सद्गुरु श्री श्री प्रबुद्धानंद भारती स्वामीजी
मी स्वामीजींना म्हणालो की मी आत्ता सकाळीच चालायला सुरुवात केली आहे . एक किलोमीटर सुद्धा चाललेलो नाही . आणि आज मला पुढच्या मुक्कामी पोहोचावे लागेल . त्यामुळे मी स्नान करून आपले दर्शन घेऊन पुढे निघेन . स्वामीजी म्हणाले , असे काही ठरवायची पद्धत नर्मदा परिक्रमेमध्ये असते का ? रोज अमुक अमुक किलोमीटर चालले पाहिजे असे कोणी सांगितले आहे ? आम्ही तुला आवडलो नाही का ? मला माझी चूक लक्षात आली . आणि मी हात जोडून उभा राहिलो . स्वामीजी म्हणाले हे पहा आम्ही संन्यासी आहोत . सतत भ्रमण करत असतो . उद्या मी बंगलोरला जाणार आहे . त्यामुळे आजचा दिवस जर तू राहिलास आणि थोडीशी विश्रांती घेतलीस तर आम्हाला आनंद वाटेल . तू खूप चालतो आहेस असे तुझा अवतार पाहून लक्षात येत आहे . तुला राहायचे तितके दिवस रहा . ताजा तवाना हो . आणि मग पुढे जा . त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना आवाज दिला आणि सांगितले हा मुलगा आपल्या आश्रमामध्ये कधीही आला तरी त्याला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहू द्यावे . आमची स्पेशल परवानगी आहे . स्वामीजींनी इतक्या प्रेमाने आग्रह केल्यावर माझे डोळे पाणावले . आणि मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले . स्वामीजी एका विशिष्ट पद्धतीने आशीर्वाद द्यायचे . अतिशय सुंदर अशा रीतीने त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला . त्यांच्या हातावर मी कधीही पाहिली नव्हती इतकी ठळक खोल आणि लांब भाग्यरेषा होती जी चटकन नजरेत भरायची .आशीर्वाद देताना ते अज्ञाचक्रावर आणि सहस्रार चक्रावर विशिष्ट गतीने आघात करायचे . यांना मर्मबिंदूंचे असलेले ज्ञान हे केवळ आध्यात्मिक नव्हते ! पूर्वाश्रमी हे स्वामीजी न्यूरोसर्जन होते ! आणि संपूर्ण जगभर मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी अविरत प्रवास केलेला होता ! यांची पूर्वाश्रमीची श्रीमंती भल्याभल्यांना थक्क करेल अशी होती . परंतु त्यांनी या सर्व मोहमायेचा त्याग करून संन्यास घेतला . त्यांचे नियम अतिशय कठोर होते . ते कोणालाही शिष्य वगैरे करून घेत नसत . त्यांचे ठरलेले सात भक्त होते . या सर्वांनी मिळून एक कायम निधी उभा केला होता . स्वामीजींचा संपूर्ण खर्च आणि आश्रमाचा संपूर्ण खर्च यातूनच चालायचा . स्वामीजी आश्रमासाठी एक रुपया देखील देणगी घेत नाहीत . आताच्या काळामध्ये हे अतिशय दुर्मिळ आणि आदर्श असे उदाहरण आहे . मी परिक्रमावासींसाठी बांधलेल्या उत्तम अशा हॉलमध्ये आसन लावले . आश्रमाच्या बाहेर बांधलेल्या बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ केली . स्वामीजींनी दिलेले नवे कपडे घालून तयार झालो ! स्वामीजी खोलीमध्ये गेले होते . मग नुसते बसून राहण्यापेक्षा मी स्वयंपाक घरात शिरलो आणि तिथे मदत करायला सुरुवात केली . इथे पोळ्या बनविण्याचे आणि भाजण्याचे सुंदर मशीन होते . एकसारखे फुलके तयार व्हायचे ! आश्रमामध्ये सर्व आधुनिक यंत्रणा होती . स्वामीजींनी आश्रम उभा करताना प्रचंड खर्च केला होता . प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट दर्जाची वापरली होती . स्वामीजींनी इथे तीन ट्रस्ट निर्माण केले होते .
१ ) राजराजेश्वरी महापीठम्
२ ) श्री विद्या महापीठम्
३ ) रम्या परिक्रमावासी निवास
आणि हे सर्व ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला काली मातंगी आश्रम असे नाव दिले होते .
स्वामीजी जगप्रसिद्ध सर्जन असल्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता . स्वभाव अतिशय कडक होता . वाणीमध्ये जरब होती . प्रचंड अभ्यास करण्याची वृत्ती होती . अद्भुत पाठांतर होते . प्रचंड ग्रंथांतर होते . रोखठोक बोलण्याचा स्वभाव होता . राजकारण या विषयाची प्रचंड घृणा त्यांना होती . हाडाचे तमिळ असल्यामुळे स्वाभाविक मोदी विरोध होता . बाहेरच्या लोकांशी केवळ इंग्रजी मध्ये बोलत . हिंदी चुकून सुद्धा बोलत नसत . स्वामीजी वर्षभर इथे राहिले होते आणि बंगलोरला निघाले होते त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या क्षणी मी तिथे पोहोचलो होतो . एक दिवस उशीर झाला असता तर स्वामींचे दर्शन झाले नसते . किंवा अगदी खालून चालताना वरती न पाहता सरळ गेलो असतो तरी आश्रम मागे पडला असता . मैया काठी जे होते ते चांगल्यासाठीच होते . स्वयंपाक करण्यासाठी दोन पगारी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्या दोघी माताराम निमाडी मध्ये बोलायच्या . सुहास सुरडी यांच्या पत्नी देखील तिथे आलेल्या होत्या . त्यादेखील स्वयंपाक घरात मदतीसाठी थांबल्या होत्या . सुहास ना सर्व भाषा येत असल्यामुळे अस्खलित निमाडी मध्ये ते या स्त्रियांना सूचना करत . त्यांना देखील सुरडी कुटुंबीयांबद्दल खूप आदर होता असे जाणवले . या दोन्ही स्त्रिया परित्यक्ता असून स्वामीजींनी त्यांचा पोटच्या पोरीं प्रमाणे उत्तम सांभाळ केलेला होता . त्यामुळे दोघींना स्वामींबद्दल प्रचंड आदर होता . मी भाजी चिरली . परंतु इतकी भाजी का करत आहे हे मला कळले नाही . कारण जेवणारे फारसे कोणी नव्हते . परंतु नंतर मला लक्षात आले की स्वामीजी आसपासच्या गावातील सर्व मुलांना रोज मोफत भोजन देत ! या भागातील मुलांचे कुपोषण होत आहे असे स्वामींच्या लक्षात आले होते . त्यामुळे या मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी स्वामीजींनी दररोजचे दोन वेळचे मोफत अन्नछत्र सुरू केले होते ! इथे विधवा स्त्रिया , परित्यक्ता आणि लहान मुले यांना दररोज भरपेट भोजन दिले जायचे ! किती मोठे कार्य आहे ! या कार्याला तोडच नाही ! स्वामीजींच्या दोन गाड्या होत्या . बोलेरो गाडी देवा नावाचा तमिळ चालक चालवायचा . आणि स्कॉर्पिओ गाडी मल्लिकार्जुन नावाचा कानडी चालक चालवायचा . या दोघांना मी त्या गाड्या धुवू लागलो . दोन्ही भाषा मला जुजबी येत असल्यामुळे दोघे देखील खुश झाले ! दोघांच्या मनात स्वामींच्या बद्दल प्रचंड आदर होता .जेव्हा नोकराच्या मनात स्वामींबद्दल मनापासून खराखुरा आदर असतो तेव्हा ओळखायचे की हा मालक खरोखरीच चांगला आहे ! स्वामीजी या स्त्रियांना आणि मुलांना भोजन द्यायचे आणि कपडा लत्ता देखील द्यायचे .मी इथे राहिलो त्या काळात स्वामीजींनी मला खूप वेळ दिला . त्या वास्तव्यात खूप काही शिकलो . आश्रम कसा असावा ,आश्रम कसा चालवावा , आश्रम कसा वाढवावा याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजे रम्या परिक्रमावासी निवास आश्रम ! स्वामींनी मला एक फार महत्त्वाचे सूत्र दिले ! Learn to unlearn the things! वरवर पाहता स्वामीजी कर्मकांडाला फारसे महत्त्व देत नाहीत असे वाटायचे . परंतु त्यांचे संन्यास धर्माचे सर्व नियम ते काटेकोर पाळत होते . त्यामुळे कर्मकांडाला महत्त्व देत नाहीत असे म्हणता येणार नाही . परंतु अनाठायी महत्त्व नक्कीच देत नव्हते .उदाहरणार्थ या आश्रमामध्ये रजस्वला स्त्रियांचा मुक्त वावर असायचा . त्यांना कुठलीही बंधने कुठल्याही दिवशी घातलेली नव्हती ! हे फारच क्रांतिकारक पाऊल आहे ! विशेषतः नर्मदा खंडामध्ये अन्यत्र कुठे असे उदाहरण मला पाहायला मिळाले नाही . असू देखील शकेल परंतु माझ्या पाहण्यात आले नाही .शाळकरी मुली त्यामुळे अतिशय आनंदाने आश्रमात बागडताना दिसायच्या . इथे तीन दैवते स्थापन केली होती . महादेवाची एक भव्य पिंड होती . एक सरस्वती माता होती . आणि एक काली माता होती . या तीनही मूर्ती एका कट्ट्यावर स्थापन केल्या होत्या . आजूबाजूला भिंती नव्हत्या. नर्मदेच्या पार्श्वभूमीवर या देवतांचे छान दर्शन व्हायचे . मीनाक्षी पूजा मंडप नावाची एक जागा बांधलेली होती . मदुराई मीनाक्षी देवीला वाहिलेली ही जागा होती . परिक्रमावासींची सोय देखील अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची केलेली होती . मी सवयीप्रमाणे आश्रमाचा संपूर्ण परिसर बारकाईने पाहिला . मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे नर्मदा मैयाकडे तोंड करून बांधलेल्या ध्यान कुटी होय ! इथे बसल्यावर सरळ तीस किलोमीटर रेषेमधले नर्मदा काठावरचे प्रत्येक स्थान दिसायचे ! ग्यारहलिंगी धर्मपुरी पर्यंतचा परिसर एका सरळ रेषेमध्ये इथून दिसायचा ! जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी ! आश्रम नावाप्रमाणे अतिशय रम्य होता !
आश्रमाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
मी आश्रमाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला होता परंतु पुढच्या बाजूला असे भव्य प्रवेशद्वार बनविले होते .
अतिशय स्वच्छ व सुंदर परिसराचे महाद्वार देखील तितकेच सुंदर बनवले होते . दोन्ही बाजूला दोन पाट्या होत्या .
आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली की असा बेटासारखा होऊन जायचा .
ह्याच खडकावरून मी जात असताना मला डावीकडे काहीतरी आहे असे जाणवले आणि मी वरती गेलो तेव्हा आश्रमाचे छोटेसे दार मला दिसले . समोर दतवाड गावाचे डोहकूप दिसते आहे .
हेच ते छोटेसे दार ज्याचे कुलूप उघडे दिसले म्हणून मी आत मध्ये प्रवेश केला होता .
नर्मदा मैया कडे तोंड करून बांधलेल्या ह्याच त्या ध्यान कुटी ! डावीकडे छोटेसे प्रवेशद्वार दिसते आहे .इथे तासंतास बसून मैय्याचे दर्शन करण्यातला आनंद अद्वितीय आहे. ही संकल्पनाच फार सुंदर वाटली !
आश्रमामध्ये अशी एक मोठी शेड होती जिथे भोजन प्रसाद दिला जायचा आणि दिवसभर मुलांचा धुडगुस इथे चालू असायचा . कितीही दंगा केला तरी मुलांना स्वामीजी काही बोलायचे नाहीत . मोठ्या माणसांना मात्र चांगलेच शिस्तीत ठेवायचे .
आश्रमामध्ये महाराजांनी अतिशय भव्य असे शिवलिंग स्थापन केले आहे .
या शिवलिंगाच्या कट्ट्यावर शक्यतो कोणाला जाता येत नाही . स्वच्छतेच्या कारणासाठी हे बंधन घालण्यात आले आहे . स्वामीजी पूर्वाश्रमीचे न्यूरोसर्जन असल्यामुळे स्वच्छतेला अतोनात महत्त्व देतात .
शिवलिंगा शेजारीच सरस्वती देवीची मूर्ती आहे .
सरस्वती मातेच्या शेजारी कालीमाता उभी आहे .या सर्व मूर्ती नेपाळमधील कालीगंडकी नदीतून आणलेल्या काळ्याभोर पाषाणातून मैसूर भागातील कारागिरांनी घडविलेल्या आहेत . अयोध्येतील बालकराम देखील याच भागातील कारागिराने घडविलेला आहे .मी काही काळ नोकरीनिमित्त मैसूर मध्ये राहिला असल्यामुळे इथली शिल्पकला जवळून पाहिलेली आहे .
महाराजांनी ग्रामस्थांसाठी महाकाली स्मशान घाटाची निर्मिती केलेली आहे . जन्मापासून मृत्यूपर्यंत सुंदर असे पालन पोषण करत हा आश्रम तुम्हाला सांभाळतो !
या आश्रमाची पाटी खरे तर मी लोहारा गावातच पाहिली होती .यातील सूचना वाचून हा आश्रम अतिशय कर्मठपणे परंपरा पाळणारा असेल असे माझे अनुमान होते परंतु अनुभव अतिशय वेगळा निघाला .
आश्रमामध्ये बांधलेली सुंदर अशी भोजन शाळा
रम्या परिक्रमावासी निवास .खाली आणि वरती परिक्रमावासींची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे .
वर जाण्यासाठी अशा जिन्याची निर्मिती केलेली आहे . या खोलीमध्ये मी फार कमी काळ विश्रांती घेतली . संपूर्ण वेळ आश्रमाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यातच गेला आणि त्यातून खूप आनंद मिळाला !
स्वामीजींच्या आणि माझ्या बऱ्याच आवडी मिळत्या जुळत्या होत्या . मध्येच स्वामीजी बाहेर येऊन गाणी ऐकत बसले होते . तेव्हा त्यांनी उत्तम दर्जाच्या साऊंड सिस्टिम वर सुंदर तमिळ गाणी लावली होती ! गंमत म्हणजे आमची गाण्यांची आवड देखील सारखीच निघाली ! त्यांनी लावलेली तमिळ गाणी मी गातो आहे हे पाहिल्यावर त्यांना फार आनंद वाटला ! त्यांच्यासोबत असलेला हरी नावाचा कोवई अथवा कोइंबतूर येथील शिष्य देखील खुश झाला ! इलाई राजाची जुनी गाणी ठीक आहेत परंतु विद्या वॉक्स नावाच्या अति आधुनिक गायिकेचे माझे आवडते गाणे देखील स्वामीजींचे सर्वात आवडते होते ! पालिवाल भद्रवटकम् नावाचे हे गाणे खरे म्हणजे पारंपारिक देवीचे स्तवन आहे . तिला या विद्या ताईने आधुनिक रूप दिलेले आहे . मी हे आधुनिक रूप आणि जुने गाणे देखील बरेचदा ऐकत असतो . स्वामीजींनी देखील ते त्याच क्रमाने ऐकले . मी हे गाणे तोंडपाठ म्हणून दाखवल्यावर त्यांना फार मौज वाटली . उमामोहनची स्तोत्रे देखील स्वामीजी माझ्याप्रमाणेच ऐकायचे . सध्या डेटा मायनिंग हे क्षेत्र इतके पराकोटीचे प्रगत झालेले आहे की एखाद्या माणसाची आवड ठरविण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे . तुम्हाला काय आवडले पाहिजे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून तुमची आवड दृढमूल केली जाते . किंवा एखाद्या व्यक्तीला काय आवडते हे पाहिल्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती आली की त्याच गोष्टी वाजवल्या किंवा ऐकविल्या जातात . परंतु यासाठी तुमचे प्रोफाईल असलेले डिवाइस तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे . इथे माझ्याकडे काहीच नव्हते त्यामुळे स्वामीजींची ही आवड खरीखुरी होती आणि आमच्या दोघांच्या जुळणाऱ्या आवडी हा योगायोग नव्हता तर वास्तवात असे दिसत होते . तमिळ गाणी गाऊन दाखवल्यावर स्वामीजी भलतेच खुश झाले . त्यांच्याशी इतक्या मोकळेपणाने कोणी संवाद साधत नसे . त्यांची थोडीशी जरब ,दहशत असल्यासारखे होते . परंतु मला तशी काही भीती बाळगण्याचे कारण नव्हते . हीच भिक्षेच्या झोळीची ताकद असते . समर्थ रामदास म्हणतात
भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती ।
भिक्षेनें प्रगटे महंती ।
स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती ।
भिक्षागुणे ।।
याचा अर्थच मला येथे जणू कळत होता . या आश्रमामध्ये संध्याकाळी अजून काही परिक्रमा वासी आले . ओंकारेश्वर येथून नुकतीच परिक्रमा त्यांनी उचलली होती . यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिले व अजूनही संपर्कामध्ये असलेले एक परिक्रमावासी होते ते म्हणजे तुकाराम बुवा सुरवसे ! हे बीड जिल्ह्यातील वडवणी जवळच्या चिंचाळा या गावातील होते . हे स्वभावाने अतिशय तापट होते . गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते . व्यवसायाने बांधकाम कारागीर होते . पत्नी व हे असे दोघेच राहायचे . अतिशय आनंदी व विनोदी स्वभाव असला तरी शीघ्रकोपी कशाला म्हणतात ते यांच्याकडे पाहून मला कळायचे . एका क्षणात यांच्या रागाचा पारा चढायचा ! धष्टपुष्ट धिप्पाड देहयष्टी असल्यामुळे समोरचे यांना घाबरून असायचे .
चिंचाळा वडवणी बीड येथील तुकाराम बुवा सुरवसे .
हे सध्या सायकल वरून बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहेत .
तुकाराम बुवांनी परिक्रमा एकट्याने सुरू केली होती . परंतु उशिरा परिक्रमा उचलल्यामुळे त्यांना फारसे कोणी सोबत भेटले नव्हते .त्यातल्या त्यात एक मराठी काका आणि एक मध्य प्रदेश मधील संसारामुळे पिचलेला गांजलेला परिक्रमावासी त्यांना भेटला होता .तिघे काही काळ एकत्र चालत होते .
मध्यप्रदेश मधील हेच परिक्रमावासी तुकाराम सुरवसे यांच्यासोबत होते
तुकाराम बुवांच्या कडक स्वभावामुळे या तिघांचे सतत खटके उडायचे . मध्यप्रदेशातील मनुष्य बिचारा अतिशय गरीब होता . आणि दुसरा मराठी परिक्रमावासी मात्र आगाऊपणाने तुकाराम बुवांच्या खोड्या काढायचा . या तिघांची मजा पाहताना मला फार हसू यायचे ! आणि मी मनोमन मैय्याचे आभार मानायचो की बरे झाले माझ्यासोबत कोणाला गळ्यात बांधले नाहीस ! या आश्रमामध्ये कायमचे राहावे असे कोणालाही वाटावे इतका हा रम्य होता ! इथे सतत छोट्या मुलांचा राबता असल्यामुळे तसे असेल कदाचित . परंतु इथली स्पंदने अतिशय सकारात्मक होती . इथली बंधने देखील अतिशय स्वीकार्य आणि आदरणीय होती . स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला निघताना कट्ट्यावरील तीनही देवांची महापूजा घातली . ते स्वतः कट्ट्यावर जाऊन तिन्ही देवतांना आंघोळ घालतात . याप्रसंगी अन्य कोणीही त्या कट्ट्यावर जात नाही . सर्वजण हात जोडून खाली उभे असतात . आज स्वामीजी जाणार हे माहिती असल्यामुळे गावातील बरेच लोक तिथे जमले होते . मला स्वामीजींनी कट्ट्यावर बोलवून घेतले . आणि आम्ही दोघांनी तीनही मूर्तींना सुंदर असे पंचोपचार पूर्वक अर्चन केले . नंतर मला आश्रमातील लोकांनी सांगितले की असे कोणाला स्वामीजी सोबत पूजेसाठी घेत नाहीत . कट्ट्यावर तर चढूच देत नाहीत . त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात .
हे भाग्य नक्की कसले आहे याचा विचार मी करू लागलो . मी जर माझ्या घरातून थेट या आश्रमात गेलो असतो तरी देखील मला वरती जाण्याची परवानगी दिली असती का . नक्कीच कोणीही दिली नसतीच . ही सर्व कृपा त्या नर्मदा मातेची होती . हा सर्व मानसन्मान त्या नर्मदा मातेला मिळत होता . तिला सोबत घेऊन चालल्यामुळे आमचा सन्मान . नरेंद्र मोदी जेव्हा रोड शो करतात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर फुले उधळतात . त्यातील काही फुले त्यांच्या चालकाच्या अंगावर देखील पडतात . उद्या जर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणू लागला मी अमुक अमुक रस्त्याने जाताना माझ्या अंगावर खूप लोकांनी फुले उधळली तर ते विधान किती हास्यास्पद ठरेल तितकेच मला मिळणारे सर्व मानसन्मान माझे आहेत असे मी म्हणणे हास्यास्पद होते ! यातील काही माझे नव्हतेच ! मी नर्मदा मातेची छोटीशी कुपी घेऊन चालणारा चालक असल्यामुळे तिच्यासोबत मलाही सर्व गोष्टी अनुभवायला मिळत होत्या इतकेच .
बरोबर निघण्याची वेळ झाल्यावर स्वामीजींच्या गाड्या दारात येऊन थांबल्या . मी आणि हरीने स्वामींचे सर्व सामान गाड्यांमध्ये नीट लावले . माझ्या गुरुदेवांनी आयुष्यभर सतत गाडीने प्रवास केला . अक्कलकोट स्वामींनी त्यांना असा आदेश दिला होता की तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नकोस . खरे तर हा सन्याशाचा नियम आहे . परंतु गृहस्थ असूनही त्यांनी संपूर्ण ५६ वर्षे हा नियम प्राणपणाने जपला . त्यांच्यासोबत मी अनेक वेळा चालक म्हणून किंवा मदतनीस म्हणून हजारो किलोमीटर प्रवास केलेला आहे . त्यामुळे त्यांनी मला गाडीमध्ये सामान कसे लावावे इथपासून ते बॅगेमध्ये अधिकाधिक सामान कसे बसवावे इथपर्यंत सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत . त्या पद्धतीने सामान लावल्यावर गाडीमध्ये भरपूर जागा मोकळी राहते . त्या अनुभवाचा वापर करत मी सर्व सामान लावून दिले . हरीला आश्चर्य वाटले कारण येताना हेच सामान खूप वाटले होते परंतु जाताना खूपच चोखपणे लागले होते . मी स्वामीजींना नमस्कार करून आज्ञा मागितली . ते मला म्हणाले जेवल्याशिवाय जाऊ नकोस . गावातील सर्व मंडळी हात जोडून उभी राहिली . सुमारे वर्षभर सलग इथे राहून आश्रमाचे बरेचसे काम स्वामीजींनी उरकले असल्यामुळे स्वामीजींच्या सहवासाचे प्रेम सर्वांच्या मनात निर्माण झाले होते . त्यामुळे आता स्वामी ची जात आहेत या कल्पनेने सर्वच जण रडू लागले . नर्मदे हर चा पुकारा करत स्वामीजी निघून गेले . मातीच्या रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या त्यांच्या त्या जीप पहात पहात मी आश्रमाचा दरवाजा लावून घेतला . आणि स्वयंपाकाला लागलो . काजल नावाची एक छोटीशी मुलगी इथे मदत करायची . स्वयंपाक झाल्यावर मुलांची पंगत झाली . रात्री मुक्कामाला आलेले परिक्रमा वासी सकाळीच निघून गेले होते . मी सर्वांचे भोजन झाल्यावर भोजन प्रसाद घेतला आणि झोळी उचलली .
जाताना सुहास सुरडी यांनी वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला .
रम्या परिक्रमावासी निवास
ग्राम -दतवाडा तहसील - अंजड
जिला -बडवानी
सारे जग फिरून झाल्यावर हा मनुष्य स्वामीजींच्या चरणाशी स्थिरावला होता
मला सुहास पुढचा रस्ता कसा आहे ते सांगू लागले . परंतु मी पुन्हा एकदा मागच्या गेटकडे निघालो . ते म्हणाले मागून रस्ता नाही . परंतु मी त्यांना सांगितले की नर्मदेच्या काठावर कुठेही रस्ता नाही असे होत नाही . त्यामुळे निश्चिंत राहावे ,मार्ग सापडेल . (सुहास सुरडी या माणसाला भेटण्याची प्रचंड इच्छा मनात आहे . अतिशय हुशार आणि विद्वान मनुष्य आहे . गुरूंच्या चरणी भाव कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ आहे ! त्यांनी दिलेला क्रमांक लागत नाही . वाचकांपैकी कोणाच्या परिचयाचे असतील तर मला नक्की कळवावे . )
अशा
रीतीने परिक्रमेतील सर्वात कमी चालणे किती असू शकते हे अनुभवत मी या
आश्रमाला निरोप दिला . प्रसंगी ५५ ते ६० किलोमीटर अंतर एका दिवसात
चालण्याचा अनुभव गाठीशी असताना या आश्रमामध्ये आलो त्या दिवशी केवळ एक
किलोमीटर चाललो होतो . परिक्रमेमध्ये तुम्ही किती चाललात ते महत्त्वाचे
नसते . तर तुम्ही कुठपर्यंत चाललात हे महत्त्वाचे आहे . चालत तुम्ही कुठे
पोहोचलात याला अधिक महत्त्व आहे . कधी गंतव्य स्थानावर पोहोचण्यासाठी
तुम्हाला खूप चालावे लागते तर कधी पावला पावलावर तुम्हाला थांबण्यासारखी
ठिकाणे , माणसे , स्पंदने , निमित्ते भेटतात . बाहेर पडल्यावर दोन डोह कुपे
पार केली आणि डाव्या हाताला असलेल्या एका तमिळ साधूच्या आश्रमाने पुन्हा
एकदा लक्ष वेधले . आपण हनुमंताला मारुती किंवा हनुमान असे म्हणतो परंतु
दक्षिण भारतात अंजनेय असे नाव वापरतात . इथे एक मारुती मंदिर होते .
आञ्जनेय शक्तिपीठम् दतवाडा / अंजड
पुराचे पाणी येत असल्यामुळे येथे अशी बांधकामे असतात
हनुमंताची गोजिरवाणी मूर्ती
आश्रम अगदी काठावर आहे
बाहेरूनच
या स्थानाचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो . अजून एखाद्या ठिकाणी
थांबणे परवडणारे नव्हते . नावा बंद होण्याच्या आत समुद्रकिनारा गाठणे
क्रमप्राप्त होते .
दतवाडा या गावातील अजून एक वैशिष्ट्य आहे . नर्मदेच्या काठावर संपूर्ण अखंडपणे पसरलेल्या एका खडकामुळे इथे नर्मदेला वळण घ्यावे लागते . हा खडक इतका मोठा आहे की या खडकामध्येच एक अखंड घाट कोरलेला आहे ! हा घाट अतिशय सुंदर आहे ! एका दगडात कोरलेला नदीवरील असा घाट जगाच्या पाठीवर अजून कुठे असल्याचे ऐकण्यात नाही ! या घाटातील अक्षरशः प्रत्येक पायरीचे अवलोकन मी बसून बसून केले ! प्रत्येक पायरी वेगळे आणि प्रत्येक पायरी अतिसुंदर होती ! शिवाय या पायऱ्या करताना चुकीला वाव नव्हता . कारण एक चूक झाली की सगळा घाट कामातून गेला ! परंतु तरी देखील प्रत्येक पायरी अतिशय सुंदर पणाने कोरलेली होती . रम्या परिक्रमावासी आश्रमातून बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावर हा घाट लागला . इथे चंगाबाबा नावाच्या संतांची समाधी आहे . तिचे दर्शन घेऊन पुढे निघालो .
चंगा बाबा समाधी मंदिर
चंगा बाबा यांची समाधी
इथपर्यंत येण्याचा सुंदर काठावरचा मार्ग
या भागातील रम्य नर्मदा मैया
तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे !
अहंता मुळीची मुळातून मोडे ! नर्मदे हर !
लेखांक अठ्ठ्याहत्तर समाप्त ( क्रमशः )

.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.