Sunday, February 4, 2024

श्री आदिशंकर यांचे श्रद्धास्थान चोट्टानिक्करा देवी मंदिर

 
सामना ऑनलाईन

>>प्रा. वर्षा चोपडे

हिंदुस्थानात देवीला आई म्हणून आदराचे स्थान आहे. देशात अनेक देवींची मंदिरे प्रसिद्ध आहेत. केरळमध्ये चोट्टानिक्करा देवी भगवती अम्मनला मानाचे स्थान आहे. चोट्टानिक्करा देवी मंदिर हे हिंदुस्थानच्या केरळ राज्यातील एर्नाकुलम जिह्यातील कोची शहराच्या दक्षिणेकडील उपनगर चोट्टानिक्करा येथे स्थित आहे. हे मंदिर राज्यातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

अत्यंत सुंदर नैसर्गिक वातावरण, मंदिराचे बांधकाम अत्यंत आकर्षक आणि प्राचीन आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने चोट्टानिक्करा मंदिर आणि सबरीमाला मंदिर हे प्राचीन विश्वकर्मा स्थानपती म्हणजे लाकडी शिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवीची मूर्ती आकर्षक आहे आणि भक्तांसाठी येथे ठरावीक वेळेला जेवण मिळते. मंदिराशेजारी पाण्याचे तळे आहे. येथे दोन देवी मंदिरे आणि शनी देवाचे मंदिरही आहे.

जगतमाता देवी भगवती तीन रूपांत दर्शन देते हे इथले वैशिष्टय़ आहे. लाल रंगात रंगवलेल्या भगवतीच्या मूर्तीला स्वयंभू असेही म्हणतात. तिचा आकार नेहमी बदलतो. मंदिराचे पुजारी रोज मूर्तीला अलंकार आणि रंगीबेरंगी साडय़ांनी सजवतात. चोट्टानिक्करा देवीची विविध रूपांत पूजा केली जाते, जसे की सकाळी तिची महासरस्वती म्हणून पूजा केली जाते, दुपारी तिची महालक्ष्मी म्हणून पूजा केली जाते आणि संध्याकाळी श्री दुर्गा म्हणून पूजा केली जाते. याशिवाय सर्वोच्च देवता भगवान शिव, गणेश आणि भगवान धर्मस्थान (अयप्पा) यांचीदेखील मंदिरात पूजा केली जाते.

हिंदू धर्मगुरू श्री आदिशंकर यांच्यासारख्या हिंदू धर्मातील अनेक धर्मगुरूंनीही येथे देवीची पूजा केली आहे. मकोम थोझल हा उत्सव सात दिवस चालतो. या मोठय़ा उत्सवात देवीला विशेष वस्त्र परिधान केले जाते आणि मोठय़ा पूजेचेही आयोजन केले जाते. यावेळी मंदिरात सार्वजनिक विवाह आयोजित केले जातात. विशु, ओणम, नवरात्री सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. संपूर्ण मंदिराभोवतीचचे दीप दररोज प्रज्वलित केले जातात. दीपमाळा आणि भव्य समईच्या प्रकाशात मुख्य आणि इतर मंदिरे न्हाऊन निघतात. दिवे लावण्याचे काम येणारे भक्त मोठय़ा श्रद्धेने करतात.

चोट्टानिक्करा येथील कीझक्कावू मंदिरात साजऱया होणाऱया गुरुथी पूजेला अनेक भक्त भेट देतात. देवी ‘कीझक्कावू भगवती’च्या उग्र रूपाला भद्रकाली मानली जाते. मंदिराच्या तलावाच्या पूर्वेला कीझक्कावू मंदिर आहे. याच मंदिरात मानसिक रोग्यासाठी पूजा केली जाते. भक्त ‘अम्मे नारायण, देवी नारायण, लक्ष्मी नारायण, भद्रे नारायण’ असा जप करतात.

पौराणिक कथेनुसार हे मंदिर घनदाट जंगलात कन्नप्पन नावाच्या आदिवासीने बांधले होते. जंगलात राहणाऱया या कन्नप्पनला एक मुलगी होती. दररोज कन्नप्पन भगवती देवीला एक प्राणी अर्पण करत असे, परंतु एके दिवशी त्याला वध करण्यासाठी एकही प्राणी सापडला नाही. या कारणास्तव त्यांनी आपल्या मुलीला तिच्या पाळीव वासराचा बळी देण्याबद्दल विचारले, परंतु त्याच्या मुलीने मुक्या प्राण्यांचा बळी देण्यापेक्षा स्वतचा बळी देण्याला अधिक महत्त्व दिले. त्या मुलीच्या पशू प्रेमाने देवी भारावून गेली. यानंतर त्या बछडय़ाने त्याचे खरे रूप धारण केले आणि कन्नप्पनला सांगितले की, ती प्राण्याच्या रूपात देवी भगवती आहे. यानंतर कन्नप्पनने आपला विचार बदलला. पशू हत्या बंद झाली आणि ज्या ठिकाणी तो पूर्वी यज्ञ करत असे त्याच ठिकाणी देवीची पूजा करू लागला. पण काही काळानंतर हे मंदिर कालबाह्य झाले आणि नंतर अनेक वर्षांनी एक माळी काम करीत असताना त्याला हे मंदिर दृष्टीस पडले. असे म्हणतात देवीची मूर्ती स्वयंभू असल्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. ही देवी आपणास पशू हत्या करू नका हा संदेश देते. त्यामुळे येथे पशू हत्या किंवा बळी दिले जात नाहीत.

हिंदू देवी भगवती अर्थात महालक्ष्मीला समर्पित अशा या मंदिरात सामान्य भक्त तर येतातच, पण देश-परदेशातील मानसिक आजाराने त्रस्त लोक या मंदिरात देवी दर्शनाला येतात. असे मानले जाते की, चोट्टानिक्करा भगवती देवी त्यांचे दुःख दूर करते. भक्त आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलतात आणि पूर्ण झाला की देवीला आपल्या ऐपतीप्रमाणे धान्य किंवा गूळ, पैसे, सोने, चांदी, हिरे अर्पण करतात. यासाठी तुला केली जाते.

 varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल
सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...