Thursday, February 8, 2024

माहुर

 

माहुरला न बघितलेला वाघ

8 जुन 1991 ला अनिल मामाचं लग्न होतं. त्यानिमित्य आम्ही सगळे लग्नघरी माहुरला आलो होतो. माझं वय असेल दहा वर्ष. तेव्हा मी पहिल्यांदा माहुरचा किल्ला दूरून बघितला होता. मला तो किल्ला आतमध्ये जाऊन पूर्णपणे बघायची इच्छा होती.

लग्नावरून आम्ही परत आलो. दुसरे दिवशी सकाळी पप्पा, माझी बहिण आणि मी माहुर गावातुन घाट चढून देवीच्या दर्शनाला गेलो होतो. देवीचं दर्शन घेऊन खाली उतरलो. माझी आणि माझ्या बहिणीची पप्पांकडे भुनभुन सुरू झाली की आम्हाला किल्ला दाखवा.

आम्ही देवीच्या पायथ्याशी असलेल्या हाॅटेलात बसलो होतो. पावसाचे दिवस होते. ढगाळून आलं होतं. पप्पांची किल्ल्यात येण्याची फारशी इच्छा नव्हती. तितक्यात आम्हाला माझा मावसभाऊ अनंता (त्याला आम्ही बाबा म्हणतो, तेव्हा त्याचं वय अंदाजे वीसेक वर्ष) व त्याचा आतेभाऊ रावसाहेब (खरं नाव उल्हास, वय वर्ष वीसेक) दोघे जण किल्याच्या बुरूजाकडे जाताना दिसले.

पप्पांनी त्यांना आवाज दिला आणि ते दोघेही आल्यावर मला व माझ्या बहिणीला किल्यावर घेऊन जायला सांगितलं. बाबापण तयार झाला. आम्ही दोघे बाबा व रावसाहेब सोबत गडाच्या बुरूजावर चढायला लागलो. फारतर पाचेक मिनीटात आम्ही निसरड्या पायवाटेने किल्याच्या महाकाली बुरूजात प्रवेश केला.

बुरूजात गेल्यावर समोरच महाकालीचं मंदिर होतं. या महाकाली मातेने एका स्त्रीने तिला केलेला नवस फेडला नव्हता म्हणुन तिचं दहा बारा वर्षांचं मूल गिळलं होतं अशी गोष्ट माझी आजी (आईची आई) मला सांगायची. ते आठवुन महाकालीचं दर्शन घेताना मी मनातुन चांगलंच घाबरलो होतो, पण आता पर्याय नव्हता.

देवीचं दर्शन घेऊन मी, माझी बहिण, बाबा व रावसाहेब किल्याच्या तटबंदीला असलेल्या पायऱ्या चढून तटावर आलो व तिथुन पुढे चालायला लागलो. माहुरचा किल्ला हा परिसरातील एकमेव डोंगरी किल्ला आहे व तेव्हा तो घनदाट जंगलाने व्याप्त होता. किल्यात सर्वत्र जंगल पसरलेलं होतं. तसंच किल्यात वन्यप्राणी असतात अशी किल्याजवळच सूचना लागलेली होती. विशेषतः किल्यात वाघ आहे अशी माहुरमध्ये कायम चर्चा असायची.

गावालगत, डोंगरउतारावर असलेल्या गणपतीमंदिरापर्यंत (आज जिथं माहुरचं BSNL ऑफिस आहे तिथं) वाघ येतो अशी नेहमीचीच चर्चा होती व आम्ही सगळे ही गोष्ट ऐकून होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मनावर दडपण होतंच, फक्त कोणी बोलून दाखवत नव्हतं, एवढंच !

रावसाहेबचं गाव, दोनवाडा हे आजसुद्धा बऱ्यापैकी जंगलातच आहे. आर्णीवरून माहुरला येताना कोसदनीच्या अलिकडे लागणारा घाट संपतो, (आता रस्ते नवीनीकरणामुळे घाट जाणवणार नाही कदाचित तिथे) तिथुन पूर्वेकडे अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर पैनगंगेच्या खोऱ्यात, जंगलात दोनवाडा वसलेलं.

तिथे एखाद्या पडीक जमिनीत बकऱ्या चरताना दिसाव्यात तसे तिथे हरणं दिसतात, मोर तर कोंबड्यांसारखे घराच्या अंगणात येतात. गावाबाहेर भटकी कुत्री दिसावीत तसे कोल्हे-लांडगे दिसतात दोनवाड्याला, असं आम्ही ऐकून होतो, त्यामुळे रावसाहेब आमचा माहुरच्या किल्ल्यात भटकताना वन-गुरू बनला होता.

त्याला वन्य प्राणीजीवनाचा असलेला (कदाचित नसलेलाच) अनुभव आम्ही मनोमन मान्य केला होता. रावसाहेबचं म्हणणं होतं की जर जंगलात वाघ जवळपास आला असेल तर वाघाच्या अंगाचा भयंकर उग्र दर्प सुटतो. आमची, रावसाहेबच्या या मतावर संशय घेण्याची टाप नव्हती.

बोलत बोलत आम्ही किल्याची तटबंदी बघत हत्ती दरवाजापर्यंत पोहोचलो. तिथं बाजुलाच राणीचा महल म्हणुन एक महल आहे असं ऐकीवात होतं. किल्यात आम्ही चौघं वगळता चिटपाखरूही नव्हतं.

सगळीकडे दाट झाडी होती. सकाळी मुसळधार पाऊस पडून गेला होता. ढगाळ वातावरणामुळे सगळं वातावरण कुंद वाटत होतं. हत्ती दरवाजा बघुन आम्ही समोर निघालो. पलिकडे झाडी जरा जास्तच दाट झाली होती. एकाएकी रावसाहेब स्तब्ध उभा राहिला !

त्याला तसं उभं राहिलेला बघुन बाबा पण थांबला. त्या दोघानाही थांबलेला बघुन मी व माझी बहिण पण थबकलो. रावसाहेबनी तोंडावर बोट ठेवून आम्हाला चूप बसण्याचा इशारा दिला. काहीतरी गडबड आहे हे जाणवुन आम्ही दोघेही चिडीचूप झालो.

बाबाने मात्र रावसाहेबला विचारलं की काय झालंय? का बरं थांबलास तू ? त्यावर रावसाहेब कुजबुजत बोलला की त्याला खुपच उग्र दर्प येतो आहे आणि या दर्पाचं कारण काय असावं याचा अदमास घेण्यासाठी तो थांबलाय.

उग्र दर्प हे शब्द ऐकताच आमच्या सगळ्यांची पाचावर धारण बसली. रावसाहेबचं मत होतं की बाजुला जाळीत पाच दहा फुटावर वाघ आहे. बाबा त्याला म्हटला की तू इथेच थांब, मी समोर जाऊन बघुन येतो. बाबा वाघ बघायला समोर जाणार हे ऐकताच मी व माझी बहिण हवालदिल झालो, परंतु बाबासाहेब मूळचेच अत्यंत धाडशी स्वभावाचे, तो कोणाचे ऐकेल हे कठीणच !

तो समोर गेलाच आणि दोन एक मिनीटात अदमास घेऊन परत आला. त्याला वाघ काही आढळला नव्हता. तो पुढचा किल्ला बघायला तयार होता पण एव्हाना रावसाहेब मधला वन गुरू पूर्णपणे जागृत झाला होता.

रावसाहेब परिसरात वाघ आहेच या त्याच्या मतावर ठाम होता, आणि दर्प म्हणजे वाघाचा असतो या ज्ञानाचा उद्गाता असल्यामुळे ‘माम् एकं शरणं व्रज’ चा उपदेश करून रावसाहेबने वाघ अवतीभवती असताना उरलेला किल्ला बघायची त्याची तयारी नाही हे जाहिर केले. मी व माझी बहिण, दोघेही वयानी फारच लहान होतो, आमचं मत ऐकण्याचा काही प्रश्न नव्हता कोणाचा.

पाच एक मिनीटं बाबा व रावसाहेबची किल्ल्यात पुढे जायचं की नाही याबद्दल भवती न भवती होऊन त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. वाघापासुन शक्य तितक्या लवकर दूर जायचं म्हणुन त्या दोघांनी आलो त्या रस्त्याने बुरूजावरून खाली न उतरता हत्ती दरवाजातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. आम्ही सगळे जण हत्ती दरवाजातुन माहुरकडे उतरायला लागलो.

थोडे दूर उतरलो की आम्हाला मुसळधार पावसाने गाठलं. मनात वाघाची दहशत अजुनही होतीच त्यामुळे पावसात ओलं होत आम्ही गावाकडे चालत होतो. लवकरच आम्हाला जंगलात जळतन गोळा करायला आलेल्या स्त्रीया दिसल्यात तेव्हा कुठं आमच्या जीवात जीव आला होता.

श्रीपाद जोशी

इंजाळा तलाव

लहानपणापासुन माहुरचं मला आकर्षण वाटत आलंय. अगदी लहानपणी काळीला आजोळच्या वाड्यासमोरील जोत्यावर सायंकाळी उभं राहिलं की ईशान्येला माहुरच्या डोंगरावर देवीच्या मंदिरावर लागलेला दिवा दिसतो असं मोठी आई (आईची आई) सांगायची.

आईचं माहेर खरं तर अंजनखेड, ते माहुर किनवट रोडवर येतं.
मग दरवर्षी तिथं आईच्या काका-काकूंकडे जायचं झालं की माहुरला उतरून, देवीचं दर्शन घेऊन आणि मगच पुढे जाण्याचा शिरस्ता होता आमचा.

माझ्या मनाला भुरळ घालू शकतील अशा अनेक गोष्टी तिथे एकत्र आल्या आहेत. रेणुका देवीचे, परशुरामांचे मंदिर, अनसुया मंदिर, दत्तशिखर, देवदेवेश्वरीचं मंदिर, घनदाट जंगल, पांडवलेणं, माहुरचा किल्ला, पैनगंगा नदी, धनोड्याला पैनगंगेच्या पात्रात उन्हाळ्यात दिसणारे टरबुजाचे वाफे आणि वेगवेगळ्या दंतकथा.

पुढे चालुन त्यात एक भर अधिक पडली. मी आयुर्वेदात गेलो. आयुर्वेदाची भक्ती हळूहळू भिनत गेली. उत्तम आयुर्वेदीक व्हायचे झाले तर जडीबुटी ओळखता यायला हव्या. त्या ओळखता येण्यासाठी जंगलात जायला हवं आणि घरापासुन सर्वात जवळचं जंगल माहुरला. देवीचं दर्शन, वनौषधी संकलन(हर्बेरियम गोळा करणं सेकंड इयरला), आजोळी जाणं अशी बहू-उद्देशिय सोलो ट्रिप व्हायची माझी.

एकदा काॅलेजात फायनल इयरला असताना वर्गातली काही पोरं माहुरला गेलो होतो आम्ही. पांडव लेणं तेव्हा फार एकांतात होतं, तिथं डब्बा खाल्ला आम्ही सगळ्यांनी. माधव मस्के, पंडित राठोड, प्रज्ञाशिल नळे, रवी शाबराणी, विजय चिंतनवार आणि अजुन असतील कोणी, नावं आठवत नाही आता. तिथल्या गुफा आणि निरव शांतता बघुन मला टाइम मशिनमध्ये बसुन ती गुफा बनवली जात असल्याच्या काळात गेल्याचाच भास होतो.

डब्बा खावून झाल्यावर आम्ही किल्ल्यात गेलो होतो. तिथे भटकताना मला किल्ल्यातला तलाव दिसला होता. 2002-2003 च्या आसपासची गोष्ट आहे ही. किल्ल्याच्या डोंगराने तीन बाजुने उतार केलाय, त्यात पावसाचे पाणी जमा होऊन तो तलाव बनतो. त्याचं नाव इंजाळा तलाव.

तेव्हा तिथे घनदाट झाडी होती. तिथली निरव शांतता, निसर्ग सौंदर्य, इतिहासाचं जाणवणारं अस्तित्व आणि एकांत मला खुपच आवडला होता. त्या तलावाच्या काठावर महानुभाव संप्रदायाचं एक छोटंसं प्रार्थनास्थळ होतं. तिथं एखाद दोन लोक होते. त्या तलावाजवळचे मोठे वृक्ष, पाण्यावर उठणारे तरंग, निरव शांतता, एकांतवासाचं माझ्या मनावर पक्कं गारूड बसलं होतं.

त्यानंतर मी जेव्हाही एकटा माहुरला जायचो, तेव्हा तेव्हा त्या तलावावर जावून बसायचो. तेव्हा त्या तलावाला जाण्याचा रस्ता, महाकाली बुरूजाच्या खालुन वळसा घालुन जायचा. दक्षिण दिशेला, तिकडे किल्ल्याला एक दरवाजा आहे, त्या दरवाजातुन आत गेलं की थोडं दूर सरळ चालत जायचं, उत्तरेकडे आणि मग पूर्वेकडे वळायचं, खरं तर तिथुनच तलाव दिसू लागतो. आणि मग तलावाच्या काठावर जावून बसायचं हा माझा क्रम असायचा.

त्या किल्ल्यात तेव्हा अनेक  वनस्पती होत्या, कुटज नावाचं झाड तिथे भरपूर होतं. मला आयुर्वेद, इतिहास, शांतता, निसर्ग सगळं काही भरपुर मिळायचं तिथं. कर्मधर्मसंयोगाने मी तिथे बहुतेकवेळा दिवाळीनंतर जायचो. तेव्हा किल्ल्यातले गवत वगैरे सुकलेलं असायचं आणि पायवाटा स्पष्ट दिसायच्या.

पुढे पिजीला विजयवाड्याला गेलो. विजयवाड्यावरून घरी आलो की एक ट्रिप माहुरला असायचीच. कधी कधी तर येताना आदिलाबादमार्गे आलं की माहुरवरूनच यायचो मी. आधी घरी येऊन मग दोन चार दिवसांनी दर्शनाला जायचो तिथे आणि मग भटकंती.

तोवर माहुरच्या जंगलाला हिडींबवन म्हणतात, हिडिंबा मुळची तिथली होती अशी दंतकथा कळली होती, शिवरायांचा शत्रू, औरंगजेब कधी काळी तिथल्या किल्ल्यात आश्रयाला होता, तिथले जगजीवनराम देशमुख शहाजहानच्या वतीने अफगाणिस्तानात कंदहारला मोहिमेवर असताना वीरगतीला गेले होते, रायबागण सावित्रीबाई देशमुख, शामा कोलाम अशा
अनेक गोष्टी कळल्या होत्या माहुरविषयी. ते वय अशा गोष्टींचं आकर्षण वाटायचं होतं.

2006- 07मध्ये कधीतरी एकदा मी विजयवाड्यावरून घरी आलो होतो, श्रावणात. आणि माहुरला गेलो देवीच्या दर्शनाला.  देवीचं दर्शन, थोडा वेळ किल्ल्यातील तलाव आणि मग आजोळी अंजनखेडला जायचा प्लॅन होता माझा.

नेहमीसारखं देवीचं दर्शन घेऊन खाली उतरलो आणि महाकाली बुरूजाचा डोंगर चढुन, त्यावरील पायवाटेने किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाकडे वळलो. हा भाग देवीच्या मंदिराच्या अंगणातुन स्पष्ट दिसतो. तोवर मला काहीही वाटले नाही.

पुढे जसा मी दरवाजाच्या जवळ आलो, मला जाणवलं की आता मी जिकडे आलोय, तो भाग कोणालाही दिसू शकत नाही. पण मला त्या गोष्टीची काही चिंता वाटली नाही, कारण मी तोवर बरेचदा एकटा आलो होतो तिथे.

दरवाजा ओलांडून आतमध्ये आलो आणि मला समोर माझ्या कंबरेएवढे उंचच उंच गवत दिसले. त्यात कुठेही पायवाट दिसेना. पण माझ्या मनात, पाण्याने तुडूंब भरलेला, निरव शांततेत गुरफटलेला तलाव रूंजी घालत होता. तिथे जायचे हे मनाने नक्की ठरवलेच होते.

आणि मी एकदाचा त्या गवतात पाय घातला. मनात धाकधुक सुरू होती कारण पायाखालचं काहीच दिसत नव्हतं. पण मी तेव्हा गद्धेपंचविशीत होतो, मला कसलीही भीती वाटत नव्हती.

चालत चालत मी समोर आलो आणि तोवर मी जिथे गवत बिवत वाळलेलं असताना पूर्वेकडे वळायची जागा सहज ओळखायचो, ते वळण श्रावणाच्या गर्द हिरवाईत ओळखायला कठीण झालं होतं. तोवर गवतात चालण्याची भीती वाटायला लागली होती.

परत जावं तरी त्याच गवतातुन चालत जाणं होतं, त्यामुळे मी समोर जाण्याचा निर्णय घेतला. आणि मला तीन चार माणसं आपापसात बोलण्याचा आवाज ऐकू आला. मला एकीकडे हायसं वाटलं तर दुसरीकडे काळजीही. कारण तिथे मी तोवर फार काही लोकांना आलेलं बघितलं नव्हतं.

तरीही मी तलावावर जाण्याचंच ठरवलं आणि दोनच मिनीटात मला तलाव दिसला. ती माणसं तलावाच्या काठावर टीनाचं जे खोपटं होतं, महानुभावांचं, तिथंच बसली होती. समोर  सिमेंट वाळू गिट्टीचं मिश्रण पडलं होतं, टोपले, कुदळ, फावडे, वाळूची चाळणी इ गोष्टी पडलेल्या होत्या आणि पायऱ्यांचं बांधकाम सुरू होतं.

मला चालुन चालुन आणि गवताची भीती वाटल्यामुळे दम लागला होता. समोर अनपेक्षित अशी माणसं बघुन मी मनातुन दचकुनच गेलो होतो पण मी समोर चालत गेलो.

आणि जसा मी त्या माणसांच्या समोर जाऊन उभा राहिलो, माझ्याऐवजी ती चौघं माणसं आणि त्या महानुभावांच्या प्रार्थना स्थळातील पुजारी, सगळेच दचकले. किल्ल्यातल्या ज्या बाजुने मी आलो होतो, तिकडून तेव्हा कोणी येईल याची कल्पनाच त्यांनी केली नव्हती.

इकडे मीदेखील मनातुन घाबरलेलाच होतो. न जाणो ही माणसं माझ्यासोबत कशी वागतात याची भीती मला वाटायला लागली होती. त्या पुजाऱ्यानी मला आवाज दिला.  मी त्यांच्या खोपटाच्या पायऱ्या चढून वर गेलो.

चढणं उतरण्यामुळे मला चांगलीच धाप लागली होती. त्या पुजाऱ्यानी मला धाप लागल्याबद्दल फार आश्चर्य व्यक्त केलं. जान जवान माणुस असून एवढा दमला म्हटले ते.

मी पाणी मागितलं प्यायला. त्या मजुरांपैकी एक, बादली घेऊन तलावावर गेला आणि पाणी घेऊन आला. दुरून बघायाला खूप नितळ वाटणारं ते पाणी प्रत्यक्षात खुप गढूळ होतं. माझ्यासमोर त्यांनी ते पाणी दुसऱ्या बादलीत गाळून घेतलं आणि एक प्याला भरून मला दिलं.

माझं पाणी पिवून झालं, तोवर त्यांच्यापैकी एकानी दगडाच्या चुलीवर खिचडी ठेवली होती शिजायला, तीही शिजली. आणि मग त्यांनी थोडेसे भजे तळले.

पुजारी बाबांनी माझी चौकशी सुरू केली. मी कोण आहे? कुठून आलो? काय करतो? तिथे का आलो? इ.इ. तोवर माझी भीतीदेखील कमी झाली होती, दमसुद्धा कमी झाला होता.

मी एकटाच तलावावर निवांत बसायला म्हणुन आलोय हे ऐकल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. त्यांनी मला भीती वाटली नाही का हे विचारलं. मी क्षणभर खरं सांगावं की नाही या दुविधेत पडलो पण मग चार पाच माणसं बघुन घाबरलो होतो हे सांगुन टाकलं त्यांना.

तोवर त्या सगळ्यांनी सागवानाच्या पानांवर खिचडी भजे वाढून घेतले होते. पुजारी बाबांनी मलादेखील खिचडी भजे देऊ केले खायला. मी दोन चार भजे तेवढे खाल्लेत.

खिचडी खाता खाता पुजारी बाबांनी मला बहिण भाऊ किती विचारलं. मला एक बहिण आहे आणि ती लग्न होवून फार दूर गेली आहे, हे ऐकुन पुजारी बाबांनी उसासा सोडला.

पुढे ते मला म्हणाले, की लेकरा माय बापाचा विचार करावा रे जरा. तू एकटा असा रानात फिरायला आला. इथे तुला काही झालं तर बाहेर कोणालाही काही समजणार नाही. गवतातुन आलास म्हणाले, कंबरभर, साप बिप आला असता पायाखाली तर काय केलं असतंस म्हटले.

मी मनातली भीती लपवत शांतपणे ऐकुन घेत होतो. त्यापुढं ते म्हणाले की किल्ल्याच्या ज्या बाजुने मी आलो, त्या दरवाज्याजवळून मी येण्याच्या पाच दहा मिनीटं आधीच एक अस्वल गेलं होतं. विचार कर म्हटले, तुझ्यासमोर अचानक अस्वल आलं असतं आणि तूला एवढा दम लागलेला. काय करू शकला असता म्हटले तू? पळू तरी शकला असतास का?
मी निरूत्तर होवून बसलो होतो.

सगळ्यांचं खाणं आटोपलं आणि मी हात धुवून परत एकदा पाणी पिलं. दहा पंधरा मिनीटं तिथे बसुन मी पुजारी बाबांना परत निघायची वेळ झाली हे सांगितलं. त्यावर पुजारी बाबांनी त्या मजुरांपैकी एकाला मला किल्ल्याबाहेर सोडून द्यायला सांगितलं.

तो मजूर मला नव्याने बनलेल्या पायऱ्यांच्या मार्गे घेऊन आला.  नुकत्याच बनल्या असाव्यात तेव्हा त्या पायऱ्या. किल्ल्याची दक्षिणेकडची तटबंदी ओलांडून, मुख्यरस्त्यावर, मला आणून घातलं त्या मजुराने आणि निरोप घेऊन माघारी वळला.

या प्रसंगानंतरही मी एकट्याने खुप वेळा फिरलोय. परंतू फिरण्यापूर्वी मी कोणालातरी मी कुठे जातोय हे सांगुन जात असे. जिथे जायचंय तिथे स्थानिकांजवळ चौकशी करून वगैरेच जायची सवय मी लावुन घेतली होती.





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...